Monday, January 16, 2023

कोकणातील पर्यटन उद्योगाचे भवितव्य

 https://dheerajwatekar.blogspot.com/2022/02/blog-post_13.html



आजच्या घडीला पर्यटन हा संपूर्ण जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा उद्योग आहे. जगातील कंबोडिया, मॉरिशस, बाली, थायलंड आदि अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. हे जरी खरे असले तरी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह जगातील समुद्रकिनारा लाभलेल्या जवळपास देशांच्या विकासाच्या मुळाशी कितीही ‘पर्यटन पर्यटन’ म्हटलं तर ‘पोर्ट डेव्हलपमेंट’ ही मूळ संकल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर स्थिरावण्यासाठी बंदर उद्योगांचा विकास होणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहात ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्र कसा असावा ? हे अभ्यासताना कोकण विभागात पर्यटन उद्योग स्थिरावण्यासाठी पायाभूत सुविधांसह बंदर विकासांची आवश्यकता विशेषत्वाने नोंदवली जायला हवी आहे.

एकविसाव्या शतकात कोकणासह भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला. देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या काही वर्गाच्या हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे सर्वत्र पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे विणले गेले. पूर्णत्वास गेला नसला तरी कोकणातही मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांतून कोकणातही पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचे चित्र तयार झाले. पर्यटन हा पारंपरिक भारतीय जीवनपध्दतीतील परमश्रध्देचा विषय आहे. तीर्थाटनाच्या माध्यमातून सुरु झालेले पर्यटन आज झपाट्याने आधुनिक बदल स्वीकारीत पुढे सरकत आहे. कोकणही त्यात मागे नाही आहे. कोरोना काळातही इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर नववर्षाचे स्वागत (२०२१-२२) करण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती. आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये वैयक्तिक सुखसुविधा आणि स्वच्छता हे मुद्दे कळीचे आहे. कोकणात तुलनेने स्वच्छता आहे. फारपूर्वी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निवास, प्रवास, खानपान सोयीसुविधांचे व्यवस्थापन आणि नियोजन करणे असे पर्यटन व्यवसायाचे स्वरूप होते. कालांतराने त्यात प्रत्यक्ष नियोजन करण्याची भर पडली. आजचा पर्यटन व्यवसाय हा पर्यटन उद्योग म्हणून विकसित होत आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेट बँकिंग आदि सोशल मीडिया मोठया प्रमाणावर साहाय्यभूत ठरत आहे. नवनवीन पर्यटन संकल्पना विकसित करून त्याद्वारे पर्यटन उद्योग बहुआयामी बनविण्याच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. कोकणातही हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हीरक महोत्सवी महाराष्ट्रातील कोकण पर्यटन अभ्यासत ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्राचा विचार करताना ‘कोकण पर्यटन डिजिटल विश्व’ मोठी भूमिका बजावणार हे नक्की आहे. अर्थात यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याची दृष्टी सकस व्हायला हवी आहे.


जागा स्वतःची असेल तर कोकणात पर्यटन उद्योग सुरू करताना लागणारी गुंतवणूक अत्यल्प असते. तसेच या व्यवसायात काही प्रमाणात का होईना, पर्यटकांच्या खिशातून अगोदर पैसे मिळत असल्याने ते प्राप्त करून त्यांच्यावर खर्च करून वर त्यांचीच प्रशंसा प्राप्त करण्याची नामी संधी हा व्यवसाय प्राप्त करून देतो. यात अनेकदा कोकणी स्वभाव आडवा येतो, हे वास्तव आहे. तरीही वर्षानुवर्षे उत्तम सेवा देणारी ठिकाणेही कोकणात कमी नाहीत. अशा ठिकाणच्या कोकणी पर्यटन व्यावसायिकांत आपल्याला उत्तम संवादकौशल्य, संभाषणचातुर्य, मनुष्य हाताळणीचे कौशल्य, विनम्रता, समयसूचकता, साहस, जिज्ञासा, नियोजनक्षमता, कॉमनसेन्स, निर्णयक्षमता, विषयज्ञान आदि गुण हमखास जाणवतात. म्हणून कोकणवर प्रेम करणारे पर्यटक सातत्याने अशा ठिकाणी आपल्या सुट्या व्यतित करत असतात. हे गुण असलेल्या व्यक्तिंची कोकण पर्यटन व्यवसायात वृद्धी होणे हे व्यावसायिक भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोकणात आज येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील मौजमजेसाठी, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पाहाण्यासाठी येतात. हेरिटेज, मंदिर स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, धार्मिक दर्शन, नाविन्यपूर्ण संकल्पना, इंडॉलॉजी, आर्किऑलॉजी, शहरीकरणाला कंटाळलेल्या पर्यटकांना ग्रामीण कोकणी जीवनाच्या परंपरांची, वैशिष्टयांची ओळख आणि अनुभव करून देणारे कृषी पर्यटन, कोकणाला लाभलेल्या सह्याद्री आणि सागराच्या सानिद्ध्यातील साहसी पर्यटन, दुर्गभ्रमण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्क्युबा डायव्हिंग, स्कीईंग, रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग यांसाठीही येतात. तसेच कोकणी घरे, संस्कृती, जीवनपध्दती, खाद्यसंस्कृती, चालीरिती यांचा अनुभव घेण्यासाठी, नदीची परिक्रमा किंवा उगम ते संगम सफर अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. विविध संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांसह विवाहासाठी ‘wedding destination’ म्हणून कोकणी सौंदर्याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण पर्यटकांत वाढते आहे. कोकणातील सण-उत्सवाला, आयुर्वेद, देवराई, वनराई, आकाशदर्शन, आदि पर्यावरणीय संकल्पना समजून घेण्यासाठी, ग्राम पर्यटन, संग्राहालये पाहण्यासाठी, बोर्डी (जि. रायगड) येथील चिक्कू महोत्सव, मुरुड-हर्णे-वेळास येथील डॉल्फिन-कासव महोत्सव, चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीतील क्रोकोडाईल सफारी, डॉल्फिन महोत्सव आदिंसाठी कोकणात पर्यटक येतात. कोकणातील पर्यटन व्यवसाय उद्योगाचे स्वरूप धारण करताना त्याला  अधिकाधिक नवनवीन संकल्पनांद्वारे व्यक्त होण्याची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक पर्यटकस्नेही असायला हवा आहे. कोकण पर्यटन उद्योगाला आपले विश्व व्यापक करण्यासाठी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमावर भर द्यावा लागणार आहे. अलिकडच्या काळात तसे प्रयत्न होत आहेत. संजय नाईक यासाठी विशेष मेहनत घेत आहेत हे निश्चित स्वागतार्ह आहे. वास्तविक कोकणातील प्रत्येक महाविद्यालयात पर्यटन उद्योग विकसित करण्याविषयी मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यांना मार्गदर्शन आणि या विषयात लक्ष घालणारे करणारे कॉलेजच्या स्टाफरूमच्या बाहेरील पर्यटन विषयात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असायला हवेत.

कोकण पर्यटन उद्योगाच्या दुसऱ्या अडचणीच्या बाजूकडे आगामी १५ वर्षांच्या काळात काळजीपूर्वक लक्ष दिले तर कोकण प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था सांभाळू शकतो. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ३८ टक्के टक्के कारखाने कोकणात आहेत. जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कोकण महाराष्ट्राला देत आहे. मात्र हे उद्योग कोकणातील नद्या आणि खाड्या सातत्याने सर्वाधिक प्रदूषित करण्याचे काम करत आहेत. यांच्यामुळे कोकणातील शेती आणि मच्छिमार उद्ध्वस्त झाला आहे. कोकणाला हवा असलेला सागरी महामार्ग आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुंबई गोवा चौपदरीकरण मार्ग आजही अपूर्ण आहे. या रस्त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की अनेक ठिकाणी शासन-प्रशासनाला कंटाळून नागरिकांनी स्वतः रस्त्यांचे खड्डे भरायला घेतलेत. कोकणी माणसांनी काही ठिकाणी या खड्ड्यात वृक्षारोपण कार्यक्रमही केले. पण शासन-प्रशासन म्हणून याची कोणालाही लाज वाटत नाही. कोरोना कालखंडात उद्योगाकडे वळण्याचे स्वप्न पाहणारा त्यासाठी झटणारा कोकणातील पर्यटन व्यावसायिक कर्जांच्या विळख्यात सापडला आहे. त्याला सरसकट कर्जमाफी नको आहे. पण कोरोना संक्रमणात सापडलेल्या कोकणातील व्यावसायिकांना उभारी येण्यासाठी किमान कर्जावरील व्याजमाफी देण्याची भूमिका शासनाने घ्यायला काहीही हरकत असण्याचे कारण नाही, पण तेही होत नाही आहे. कोकणातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी बँकांची कर्ज काढून उभे केलेत. पायाभूत सुविधांची शब्दशः बोंब असताना कोकणातील निसर्गाच्या प्रेमामुळे पर्यटक कोकणात येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी कोकणातील ‘सेवाकर्मी’ पर्यटन व्यावसायिकाला शासकीय आधाराची गरज आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची मासळी हे कोकणाचे वैभव आहे. मागील काही वर्षांत शासनाने कोकणात पर्यटन महोत्सवांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचं मार्केटिंग व्हायला हवं आहे. कोकण पर्यटन व्यवसाय उद्योगात परावर्तित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कल्पक होण्याची आवश्यकता आहे. ‘कोकण पर्यटन उद्योग मिशन’ म्हणून कार्यरत व्हायला हवे आहे. विविध प्रकल्पांना होणारा कडवा विरोध आणि समर्थन या दोन्हींच्या मधला पर्यावरणस्नेही व्यवहार्य विचार रुजविण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी स्टरलाईट प्रकल्पाच्यावेळी जागतिक कीतीर्चे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर यांनी रत्नागिरीत येऊन स्टरलाईट प्रकल्प हानिकारक आहे असा अहवाल दिल्यावर हा प्रकल्प रद्द झाला होता. कोकणातील मायनिंग आणि इतर साऱ्या प्रदूषणकारी उद्योगांचा असाच निर्णय व्हायला हवा आहे. तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी इथली मागणी आहे. यात दक्षिण रायगडमधील २० महाविद्यालयेही समाविष्ट होऊ शकतात. काही संस्थाचालकांना आजही ‘मुंबई विद्यापीठ’ ची भुरळ आहे. यातून मार्ग निघायला हवा आहे. रोजगार देणारे कौशल्य शिक्षण कोकणात हवे आहे. समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, मेरिटाईम, रेल्वे तंत्रज्ञान आदि अभ्यासक्रम कोकणाला हवे आहेत. त्यातून इथले उद्योगजगत विकसित होईल. आगामी काळाचा वेध घेताना हे विचार महत्त्वाचे असणार आहेत.


कोकणात २००९ मध्ये आलेल्या फयाननंतर निसर्ग, तोक्ते अशी ४/५ वादळे आलीत. महापूर-वादळांनी कोकणाची सर्व बाजूंनी नव्याने उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. कोकणच्या उद्योजकीय विकासासाठी अशा संकटांची व्याप्ती आणि खोली शासकीय पातळीवर समजावून घेतली जायला हवी आहे. इथल्या सामान्य शेतकऱ्यांचे जीवन हे आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, करवंद, केळी, मिरी यांवर अवलंबून आहे. महापूर-वादळात यांचे अमाप नुकसान होते. अशावेळी मिळणारी शासनाची मदत साफसफाई करायलाही पुरत नाही. अशा वातावरणात अंदाजे वर्षातील ६० ते ९० दिवस चालणारा पर्यटन व्यवसाय भविष्यात ‘उद्योग’ म्हणून कसा झेपावेल ? यावर आजच विचार व्हायला हवा आहे. कोकणात कोणताही मोठा उद्योग येत नाही. मुंबईत बसून कोकणाच्या भवितव्याचे निर्णय घेणारे पुढारी कोकणाचा विकास करत आहेत. कोकणातील जमिनींचे कसाई भरमसाट दराने शेत जमिनी विकत घेऊन त्यांचे तुकडे पाडून करोडपती बनले आहेत. याची दुसरी बाजू ही की यातून जमिनीच्या वाढलेल्या भरमसाट दरांमुळे नव्याने जमीन घेऊन बाग लावणे हे आता कोकणी माणसासाठी दिवास्वप्न ठरते आहे. महाराष्ट्रात एप्रिल १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी तीन वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली होती. तेव्हा ‘उर्वरित’ समजून कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले. आर्थिक विकासात कोकणाची उपेक्षा आणि अन्यायाची वेग इथून आणखी वाढला. आतातर ही मंडळे कुठे गुंडाळून ठेवलीत देव जाणे ! म्हणून देशासह राज्याच्या आर्थिक विकासात सतत उपेक्षित असलेल्या कोकणाचा विकास होण्यासाठी 'कोकण प्रादेशिक विकास मंडळ' स्थापन करायला हवे आहे. संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करायला हवे आहे. यात कोकण पर्यावरण, महापूर, नद्यांची पात्रे, प्रदूषण, फलोत्पादन, मत्स्योत्पादन धोरण, लहान मच्छिमारांना मोठ्या सवलती, पर्यटन उद्योग कोकण विकासाचा केंद्रबिंदू करण्याचे नियोजन, पायाभूत सुविधा, किफायतशीर हॉटेल बांधण्यासाठी उद्योजकांना सहकार्य, छोट्या-छोट्या धरणांची आवश्यकता, प्रदूषण आदिंचा विचार व्हायला हवा आहे. कोकण विकासाच्या योजनांचा नेहमी मोठा गाजावाजा होतो. योजना जाहीर होतात. मात्र योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना फोलपणा समोर येतो. खर्च होऊनही परिणाम साधला गेलेला नसतो. पुन्हा विकासाचा मुद्दा चर्चेला येतो. पुन्हा नवी योजना येते. महाराष्ट्राचा अमृत महोत्सवी वेध घेताना असंच होत राहाणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे.

गेली पन्नासहून अधिक वर्षे कोळसेवाले आणि आता लाकूडतोडे जंगलमाफिया सह्याद्रीचे लचके तोडत आहेत. कोकणातील घाटातून असंख्य ट्रक भरून लाकडे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांचे बॉयलर पेटवण्यासाठी जातात. इथल्या एम.आय.डी.सी.मधील कारखाने नद्या-खाड्या प्रदूषित करतात. आज प्रचंड जंगलतोडीमुळे कोकणातले डोंगर उघडेबोडके झालेत. जमीन धरून ठेवायला झाडेच नसल्यामुळे डोंगरावरील माती, दगड, गोटे नदी-खाड्यांत आलेत. गाळ वाढलाय. पिढ्यांपिढ्या कोकणी माणूस पाऊस अनुभवतोय. कोकणातल्या काही भागात तर ६/८ महिने पाऊस पडायचा. पण डोंगर खाली येणे, दरडी कोसळणे आणि महापूर येणे हे नित्याचे प्रकार होत नव्हते. ते आज होतायेत, याला कारण अनियंत्रित विकास हेच आहे. निसर्गरम्य कोकणात विदेशी वृक्षांची लागवड नको यासाठी आमदार शेखर निकम आग्रही आहेत. पर्यावरणप्रेमींचीही ही मागणी आहे. तिचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. कोकणात पर्यटन उद्योग बहरण्यासाठी पायाभूत सुविधा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोकणात ७०/८० पर्यटन ग्राम आहेत. राज्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा वेध घेताना किमान या गावात चोवीस तास वीजपुरवठा, पाणी, पक्का दुपदरी रस्ता, पार्किंग, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आदि मुलभूत मूलभूत सुविधा या गावांमध्ये असतील अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. कोकण पर्यटन विकासाचे कामे मार्गस्थ करताना कोकण पर्यटनकर्मींना खूप अडचणी येतात. बांधकामांसह विविध शासकीय बाबी पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगीची सिंगल विंडो व्यवस्था असायला हवी आहे. कोकणातल्या खाड्यात पर्यटक बोटीतून फिरवायचे असतील तर मेरिटाईमसह शासनाच्या सर्व परवानग्या क्लिष्ट आहेत. शासनाकडे भरावे लागणारे शुल्क आणि वर्षाकाठी जमणारी गंगाजळी यांचे गणित जुळत नसल्याचा अनुभव गेली ७/८ वर्षे चिपळूणातील ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था घेत आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन उद्योग विकसित होण्यासाठी अशा प्रयत्नांना जाचक अटीत न अडकवता पाठबळ द्यायला हवं आहे. सागरकिनारा लाभलेल्या जगातील बहुसंख्य देशात रेल्वेही सागरकिनाऱ्यावरून जाते. कोकणात मात्र ती सह्याद्रीतून नेण्यात आली. हे कौशल्याचे काम होते. त्यासाठी सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत. मात्र आज कोकण रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकण्यात अडचणी येताहेत. म्हणून कोकण रेल्वेने आगामी ट्रॅकसाठी सागरकिनाऱ्याकडे आणि त्यातील रिंगरूटकडे पाहायला हवे. ही आणि ‘पोर्ट’ विकासाची माजी आमदार प्रमोद जठार यांची आग्रही मागणी रास्त आहे.

कोकणात एकविसाव्या शतकात, पूर, महापूर, वादळे, चक्रीवादळे आदिंनी कोकण भूमीला हैराण केले आहे. पर्यावरणीय ह्रासाचे हे परिणाम भविष्यात अधिकाधिक गडद होत जाणार आहेत, असं यातल्या तज्ज्ञांचं मत आहे. ते विचारात घेता शासकीय पातळीवर अशा आपत्तींपासून बचाव होण्यासाठी तसेच आपत्तीग्रस्तांना त्वरित न्याय मिळण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण व्हायला हवी आहे. तात्पुरत्या मलमपट्टीस्वरूप उपचारांनी कोकणात ‘पर्यटन उद्योग’ ही संकल्पना अशा आपत्तीत किती टिकाव धरेल हा प्रश्न भविष्याचा वेध घेताना पडतो आहे. कोकण पर्यटन उद्योग साकारण्यासाठी हवी असलेली हजारो कोटींची गुंतवणूक कोकणात आणण्यासाठी ‘पोर्ट’ हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकडे लक्ष दिल्यास कोकण पर्यटन उद्योग उद्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळेल. 

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

 मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद


कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निद्ध्य लाभलेल्या डोंगरात २०२१ च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई मादी बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर एक मादी) मादी बिबट्याने सोबत घेऊन सुरक्षित नैसर्गिक अधिवास गाठला. या संपूर्ण आँखो देख्या घटनाक्रमात वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांना मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीची दुर्मीळ नोंद करता आली. या संवेदनशील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने बघ्यांची अपेक्षित गर्दी टळली होती. प्रयत्नरत हातांचा मूळ हेतू सफल होऊन शेवट गोड झाल्याने मादी बिबट्याच्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीचा उहापोह करणं महत्त्वाचं वाटलं.


मौजे धामणवणे येथील पर्यटन प्रसिद्ध श्रीविंध्यवासिनी मंदिराच्या पाठीमागे ११ जानेवारीला प्रा. चेतन खांडेकर यांच्या घराच्या आवाराला लागून असलेल्या ओढ्यात कोणीतरी मार्जार कुळातील प्राणी ओरडत असल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून खांडेकर यांनी त्यांचे मित्र अॅड. चिन्मय दिक्षित यांना कळवले. दिक्षित यांनी वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांना ही माहिती दिली. ओंकार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहिले असता त्यांना दीड-दोन महिन्याचे बिबट्याचे एक पिल्लू निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क केला. वनरक्षक रा. र. शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर यांनी तातडीने येऊन पाहाणी केली. तेव्हा कोरड्या ओढ्यात दगडाच्या कपारीत बिबट्याचे मादी जातीचे पिल्लू सर्वांना दिसले. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. चिपळूणचे वनविभाग अधिकारी सचिन निलख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्वानुमते, ‘बिबट्याच्या पिल्लाला त्याची आई, मादी बिबट्या घेऊन जाते का ?’ यासाठी प्रयत्न करायचे निश्चित झाले. श्रीविंध्यवासिनी मंदिराच्या नजीक कोरड्या ओढ्याच्या वरच्या बाजूला जिथे पिल्लू सापडलं त्याच वातावरणात एका लाकडी फळ्यांच्या बॉक्समध्ये पिल्लाला ठेवण्यात आलं. घटनेची नोंद व्हावी म्हणून ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला. टीमचे सदस्य सुरक्षित अंतरावर बसून राहिले. रात्री पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येत राहिला. पण मादी बिबट्या आली नाही. उलट एका क्षणी आपल्या नखांचा उपयोग करून ते पिल्लूच बॉक्समधून बाहेर आलं. आजूबाजूला वावरू लागलं आणि कुणाला काही कळायच्या आत अचानक ट्रॅप कॅमेऱ्याच्या कक्षेच्या बाहेर गेलं. आता काळोख्या अंधारात पिल्लू दिसेनासं झालेलं. मध्यरात्र असल्याने पिल्लाला शोधणंही शक्य नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, १२ जानेवारीला बिबट्याच्या पिल्लाचा शोधघेणे सुरु झाले. पण ते पिल्लू सापडेना. शोधण्यात दोनेक तास गेले असतील. ट्रॅप कॅमेऱ्यापासून दोनशे मीटर अंतरावर एका बागेतून पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने शोध सुरु झाला. तेव्हा त्या बागेतल्या सागवानाच्या सुकलेल्या मोठाल्या पानांच्या आडोशाला पिल्लू लपून बसलेलं दिसलं. हे पिल्लू मादी जातीचं होतं. आईचे दूध न मिळाल्याने पिल्लू अशक्त झालेलं होतं. पिल्लाला कृत्रिमरित्या दूध (लॅक्टोजन) पाजण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची वजन आणि आरोग्य तपासणी केली. वनविभागाच्या एस.ओ.पी. (स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) नियमानुसार ‘पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का ?’ यासाठीचे प्रयत्न करायचे निश्चित झाल्याने पिल्लाच्या आईचा, मादीचा शोध सुरु झाला. त्या सायंकाळी लाकडाच्या खोक्यात पिल्लाला ठेवून बाजूस ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. सुरक्षित अंतरावरून नजर ठेवणे सुरूच राहिले.


तिकडे श्रीविंध्यवासिनी मंदिर परिसरात हे प्रयत्न सुरु असताना रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांना धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई मंदिर परिसरातील मालकीच्या शेतात बिबट्याचे पिल्लू असल्याबाबत निसर्गप्रेमी रोहन शेंबेकर यांनी कळविले. त्या दिवशी शेंबेकर यांच्या बागेतकाम करणारे कामगार कांबळी यांच्या पत्नीला दुपारी १२ वाजल्यापासून कोणा प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. ती महिला दिवसभर कांबळींना म्हणत राहिली, ‘मांजर ओरडतंय म्हणून !’कांबळींनी शेवटी सायंकाळी शेंबेकर यांना बोलावून घेतले. तोवर कांबळींच्या मुलाने ओरडणाऱ्या पिल्लाचा अगदी जवळून मोबाईलवर फोटो काढलेला होता. सायंकाळी बागेत आलेल्या शेंबेकर यांनी मोबाईल मधला तो फोटो पाहिला. तेव्हा त्यांना संशय आला. एका क्षणी त्यांनी ही पिल्लाचा आवाज ऐकला. शेंबेकर आवाजाच्या दिशने मार्गस्थ झाले. पण बिबट्याचं पिल्लू जवळपासच्या झुडुपात लपल्याने त्यांना दिसलं नाही. शेंबेकर यांनी मोबाईल मधला फोटो निलेश यांना पाठविला. दोघांचं बोलणं झालं. फोटो पाहताच तातडीने निलेश यांनी धामणवणे गाठले. पण तोवर सायंकाळ झाली होती. निलेश यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून बिबट्याच्या पिल्लाचा विषय सांगितला. आणि ‘धामणवण्याच्या मंदिराजवळ या !’ असं सुचविलं. तेव्हा वन विभागाचे कर्मचारी, ‘आम्ही पिल्लाजवळच आहोत’ असं सांगू लागले. संवादात थोडावेळ कन्फ्युजन झालं. ‘कुठल्या पिल्लाजवळ ?’ असं निलेश यांनी विचारल्यावर ‘देवळाजवळ !’ असं उत्तर मिळालं. शेवटी या संवादात निलेश यांच्या ‘कुठल्या देवळाजवळ ?’ या प्रश्नाच्या उत्तरामधून श्रीविंध्यवासिनी आणि श्रीविठ्ठलाई या दोन स्वतंत्र देवळांच्या ठिकाणांचा उलगडा झाला.

आता तिसऱ्या दिवशी, १३ जानेवारीला सकाळ-सकाळी श्रीविंध्यवासिनी जवळच्या पहिल्या पिल्लाची सर्वांनी पाहाणी केली. तेव्हा पिल्लूबॉक्स मध्येच आढळून आलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पिल्लाची तपासणी केली. पिल्लू सुस्थितीत होते. ट्रॅप कॅमेरा तपासण्यात आला. त्यात कोणत्याही विशेष हालचालीची नोंद नव्हती. प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात निराशा निर्माण झाली. श्रीविंध्यवासिनी जवळच्या पिल्लाला बॉक्सच्या तुलनेत एका लहान बास्केटमध्ये घालून डोंगराच्या दमवणाऱ्या चढाने शोधाशोध करत सारेजण शेंबेकर यांनी दाखवलेल्या बागेच्या आवारातील जागेच्या दिशेने मार्गस्थ झाले. हा मार्ग निवडण्यामागे मादी बिबट्या याच मार्गाने खाली उतरल्याचा प्राथमिक अंदाज होता, जो खरा होता. याच मार्गावर मध्यभागी डोंगरातून ग्रॅव्हिटीने आणलेल्या पाण्याचा एक पाणवठा आहे. पाणवठा ते विठ्ठलाईच्या दरम्यान मादीला विणीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा २/३ आडोश्याच्या जागा टीमच्या निदर्शनास आल्या. तिथे थांबून दुसऱ्या पिल्लाचा शोध घेण्यात आला. मात्र दुसरे पिल्लू सापडले नाही. शोधाशोध करत सारेजण, कामगार कांबळी यांच्या मुलाने बिबट्याच्या पिल्लाचा फोटो काढलेल्या जागेवर पोहोचले. तेव्हा विणीची जागा हीच असावी असा तर्क बांधण्यात आला. दोन वर्षापूर्वी या भागात मादी बिबट्याचा वावर दिसून आलेला होता. याची माहिती वन्यजीव अभ्यासकांकडे होती. सध्याच्या दुसऱ्या पिल्लाचा फोटो काढलेल्या या जागेपासून जवळच पाण्याची उपलब्धी होती. मोठ मोठ्या दगडांच्या कपारीचा आडोसा होता. तणरूपी रानमोडीचं जंगल वाढलेलं होतं. त्यातून चालणं कठीण होतं. याच ठिकाणी काल बिबट्याचं दुसरं पिल्लू दिसलं होतं. त्यामुळे आता, ‘या ठिकाणी बास्केटमधून सोबत आणलेलं बिबट्याचं पाहिलं पिल्लू ओरडलं तर त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडेल आणि शोधणे सोपे होईल’, अशी स्वाभाविक अपेक्षा टीमच्या मनात होती. टीमने सकाळी ७ वाजता पहिल्या पिल्लाला घेऊन चालायला सुरुवात केली होती. त्याला आता पाचेक तास उलटले होते. दुपारी १२ वाजून गेल्यानंतरही दुसरे पिल्लू मिळालेले नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. पण इकडे घटनेत काहीच नवीन घडत नव्हतं. मादी बिबट्याच्या वर्तणुकीचा आणि तिच्या अस्तित्वाचा अंदाज बांधणे कठीण झाले होते.


दुपारची १२ वाजून ३७ मिनिटे झाली असतील. बास्केटमधील पहिलं पिल्लू अचानकपणे सलग ४/५ वेळा ओरडलं. अन् त्याक्षणी दुरून कुठूनतरी दुसऱ्या पिल्लाच्या आवाजाचा हलकासा कॉल सर्वांच्या कानावर आला. खरंतर तो क्षण, ‘आत्ता मादी बिबट्या इथे आली तर ?’ या विचारातून मनात कमालीची अनामिक भिती निर्माण करणाराही होता. पण का कोण जाणे ? टीमला अशी भिती वाटत नव्हती. त्याच निश्चित कारण ती निसर्गशक्तीच सांगू शकेल. भर जंगलात मादीच्या विणीच्या जागेजवळ बिबट्याच एक पिल्लू ओरडतंय, काही क्षणांनी दुसऱ्या पिल्लाचा हलकासा का होईना पण आवाज ऐकू आलाय आणि मादी बिबट्या मात्र अजूनही समोर आलेली नाही. जवळपास तिच्या असण्याचा कोणताही पुरावा दिसून येत नाही. अशी साधारण स्थिती होती. वेळ दिवसाची दुपारची असल्याने टीमचे काही सदस्य आवरायला तर काही जण पिल्लाला दूध आणायला निघून गेले. एक-दोघेजण जागेवर थांबून राहिले. वन्यजीव शास्त्रानुसार साधारणत सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत पिल्लं असताना किंवा नसताना बिबट्या सक्रीय (active) नसतो. त्यामुळे भिती तशी कमी झालेली होती. पण तरी सुद्धा बिबट्या मादी, ‘आत्ता आली तर ? किंवा इथेच असेल तर ?’ हे स्वाभाविक प्रश्न मनात येतच होते. तरीही अशा मानसिक अवस्थेत उपस्थित दोघा सदस्यांनी जमिनीवर सुरक्षितपणे काठी आपटत रानमोडीच्या जंगलाचा डोळ्यादेखतचा सारा परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. बघताबघता दुपारचा दीड वाजला, तरीही दुसरं पिल्लू सापडण्याची चिन्हे दिसेनात. शेवटी बास्केटमधील पहिल्या पिल्लाजवळ येऊन दोघे सदस्य बसलेआणि अचानक आतलं पहिलं पिल्लू पुन्हा ओरडू लागलं. त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडलं, पण आताही एकदाच ! अर्थात टीम सदस्यांना दुसऱ्या पिल्लाचा आढळ कळायला तेव्हढं ओरडणं पुरेसं होतं. दुसरं पिल्लू जवळपासच कुठेतरी आहे, हे आता नक्की झालं होतं. कदाचित ते सहज नजरेला पडणार नाही अशा रितीने कॅमॅफ्लॉज झालेलं असावं. आता सगळी टीम आल्यावर पुन्हा एकदा रानमोडीच्या जंगलाचा परिसर पिंजायचा असं ठरलं.

एकतर आवाज येणारं पिल्लू मिळायला हवं होतं किंवा सध्या टीमच्या सोबत असलेल्या पिल्लाला मादी बिबट्याने येऊन घेऊन जाणं आवश्यक होतं. तासाभराने पुन्हा टीम एकत्र जमली. सर्वांनी जेवण केलं आणि ३ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी ४ च्या सुमारास माडाच्या झाडाखाली दगडांच्या दरी सदृश्य कपारीत गर्द झावळ्यांमध्ये दुसरं पिल्लू अंग चोरून खूप आत दडून बसलेल्या अवस्थेत आढळलं. ते पिल्लू नर जातीचं होतं. ज्या ठिकाणी हे पिल्लू आढळलं त्या ठिकाणी दोघांच्या टीमने पूर्वी दोनदा फेरफटका मारलेला होता. पण तेव्हा पिल्लू दिसलेलं नव्हतं. डोळ्यातून प्राण गेल्यावर माणसाचे उघडे डोळे जसे जाणवतात तसं बिबट्याच्या या दुसऱ्या पिल्लाकडे बघून क्षणभर जाणवलं. त्याचं शरीर कॅमॅफ्लॉज झालं होतं. दुपारी १२ वाजेपर्यंत दोनदा कॉल दिल्यानंतर चारेक तासांनी ते दिसलेलं होतं. त्याच्या पोटाची हालचाल जाणवल्यावर टीमच्या जीवात जीव आला. पिल्लाला वाहेर काढलं तेव्हा तर ते गुरगुरत अंगावरच आलं. त्याची तपासणी केली. ते सशक्त होतं. सुरुवातीला एकमेकांवर गुरगुरून झाल्यावर काही वेळांनी दोन्ही पिल्लं एकमेकांत रमली. आता दोन्ही पिल्लांना बॉक्समध्ये एकत्रित पाहिलं तर दुसर मिळालेलं पिल्लू हे पहिल्यापेक्षा २/४ दिवसांनी मोठं वाटत होतं. पण तसं ते नसावं. खरंतर पहिलं भेटलेलं पिल्लू अधिक सशक्त असावं. म्हणूनच तर ते श्रीविठ्ठलाई ते श्रीविंध्यवासिनी असं डोंगर ओढ्याच्या मार्गाने उतरून मादीसोबत फिरत फिरत खाली आलेलं होतं. पहिलं पिल्लू भेटलं तेव्हा अशक्त होतं कारण ते डी-हायड्रेट झालं असावं. दोन दिवस त्याला काही खायला, आईचं दूध प्यायला मिळालेलं नव्हतं. टीमने दूध पाजलं पण ते दूधही पिल्लू सुरुवातीला पित नव्हतं. जेवढं पित होतं ते पोषणाच्या दृष्टीने कमी होतं. अशा विषयात मादी बिबट्यांना काऊन्ट नसतो. विंध्यवासिनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अडचण जाणवली असल्याने मादी बिबट्या आल्या पाऊली परत फिरली असावी आणि येताना तिच्यासोबत आलेलं पिल्लू ती निघून जाताना मात्र खालीच राहिलं. मादीने डोंगरावर श्रीविठ्ठलाई जवळच्या पिल्लाला मात्र दूध पाजलं असावं. नंतर ती इथून निघून गेली असावी. कदाचित म्हणून सापडलेलं दुसरं पिल्लू सशक्त असण्याबरोबर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की बचावात्मक पवित्र्यात यायचं. नखं बाहेर काढून सर्वांच्या अंगावर यायचं, गुरगुरायचं. यातला योगायोग असा की पाहिलं श्रीविंध्यवासिनीजवळ मिळालेलं मादी जातीचं पिल्लूही सायंकाळी ४ वाजताच मिळालं होतं. दोन्ही पिल्लं ताब्यात मिळाल्यावर वन खात्याच्या एस.ओ.पी. नुसार अशा प्रसंगात सापडलेल्या वन्यजीवांना हाताळण्याबाबतच्या नियमावलीनुसार काम सुरु झालं. दोन्ही पिल्लांसाठी पुन्हा प्लायवूडचा बॉक्स बनविण्यात आला. श्रीविंध्यवासिनीजवळ सापडलेल्या पिल्लासाठी पहिल्यांदा बनविलेला जाड फळ्यांचा लाकडी बॉक्स मोठा होता. तो डोंगरावर आणणे कठीण होते. म्हणून नवीन बॉक्स बनविण्यात आला. ट्रॅप कॅमेरा झाडाला लावता येईल अशी बिब्बीच्या झाडाजवळची जागा निश्चित करण्यात आली.


मादी बिबट्या आली तर ती बॉक्समधल्या पिल्लांना घेऊन जाईल असा अंदाज होता. वन्यजीवांत बिबट्याची जात धूर्त आणि हुशार मानली जाते. एव्हाना खरंतर बिबट्याचा जंगलात सक्रीय होण्याचा वेळ सुरु झाला होता. म्हणून सायंकाळी अंधार पडेपर्यंत सारी टीम सुरक्षित अंतरावर थांबली होती परंतु मादी बिबट्या आली नाही. शेवटी पिल्लांना बॉक्समध्ये ठेवून त्यावर ट्रॅप कॅमेरा लावून सारे चिपळूणला निघून आले. रात्री जेवणानंतर पुन्हा टीमने अख्या धामणवणे गावाला एक फेरफटका मारला. गावातल्या कोणाची गाय, कुत्रं (कॅटलकेस) मारलं गेलं आहे का ? याचा शोध घेतला. मात्र संपूर्ण गावात असं काहीही घडलेलं नव्हतं. कोणाला मादी बिबट्या दिसलेलीही नव्हती. १५ दिवस आधी मात्र गावातल्या अनेकांनी बिबट्याला पाहिलेले होते. पाहणाऱ्यांना बिबट्या जातीने नर की मादी हे सांगता येत नव्हते. रात्रीचा फेरफटका मारून परतताना, पाणवठ्यावरून श्रीगणपती मंदिराच्या परिसराकडे येणाऱ्या मार्गावर, ‘कोणाचा आवाज येतोय का ?’ हे ऐकायला टीम थांबली.तेव्हा त्यांना मादी बिबट्याने एका मातीच्या ढीगाऱ्यावर उभ्या असलेल्या अवस्थेत दर्शन दिलं. पण तेव्हा ना मादी ना ही मंडळी पिल्लांजवळ होती.


चौथ्या दिवशी पहाटे, १४ तारखेला टीमने सात-सव्वासातच्या सुमारास जाऊन ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबता क्षणी सारेजण शहारले. कारण ६ वाजून ५७ मिनिटांनी मादी बिबट्या खोक्याच्या शेजारी बसलेली असल्याचा शेवटचा फोटो अचानक डोळ्यासमोर आला. अर्थात टीमच्या आगमनाची चाहूल लागताच २/४ मिनिटात मादी बिबट्या निघून गेली होती. हे लक्षात आल्याने आणि मादी बिबट्या जवळपास कुठेतरी असू शकते या जाणीवेने टीम आल्यापावली मागे फिरली. खोक्यापासून दूर सुरक्षित अंतरावर गेली. गडबडीत कॅमेऱ्याचं शटर बंद करायचं राहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबून शेवटचा फोटो चेक केल्यावर कॅमेरा पूर्वस्थितीत आणायचाही राहून गेला होता. सकाळी ११ वाजता कॅमेरा पुन्हा सुरु करण्यात आला. पहिल्या ३ दिवसात पिल्लांकडे मादी बिबट्या न फिरकल्याने, एवढ्या मोठ्या कालखंडात, पिल्लांच्या हाताळणीत एकदाही टीमला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणारी, ‘मादी बिबट्या अशी का वागत्येय ?’ असा प्रश्न निर्माण झाला होता. पिल्लांच्या असण्याच्या काळातलं मादी बिबट्याचं हे वर्तन थोडं अचंबित करणारं होतं. तत्पूर्वीपर्यंत, ‘मादी बिबट्या मेलेली असावी !’ असाच कयास टीमने बांधला होता. वन्यजीव नियमावलीनुसार अशाप्रसंगी पिल्लांच्या आईच्या येण्याची किमान सहा दिवस वाट पाहायची असते. त्यानंतरच पिल्लांना देखभाल केंद्रात दाखल करायचे असते. या प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसांचा अवकाश होता. बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना दूध पाजून (फिडिंग), तपासणी करून खोक्यात ठेवलं गेलं. चौथा दिवस सरताना रात्री उशीराच्या फेरफटक्यात गावातल्या एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर मादी बिबट्या दिसली. रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्यावर असलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी, हे पाणी वाहात जात असलेल्या शेतातही नंतर ती दिसली.


पाचव्या दिवशी, १५ तारखेला सकाळी येऊन ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं तेव्हा मादी बिबट्या बॉक्समधील पिल्लांना चाटत असलेलं दिसलं. मादीची पिल्लांप्रती असलेली वत्सलभावना ट्रॅप कॅमेऱ्याने बरोबर टिपलेली होती. खरंतर तेव्हा ती पिल्लांना बॉक्समधून बाहेर काढू शकत होती. पण तिने तसं करणं टाळलेलं होतं. इतकंच काय ? स्वतःच दूध पाजलं नव्हतं की पिल्लांना आपल्यासोबत नेलं नव्हतं. ‘कोणीतरी हा ट्रॅप तर लावलेला नसेल ना ? मी बॉक्सच्या आत गेले तर अडकेन ?’ अशा विचाराने मादी बिबट्या खोक्यात गेलेली नसावी. बॉक्सची सध्याची जागा असलेल्या आजूबाजूला अनेकांच्या आंबा-काजूच्या बागा आहेत. काही जागा नुसत्या कुंपण घातलेल्या आहेत. सकाळी अनेकजण इथल्या जवळच्या मार्गावरून मॉर्निंग वॉक करत असतात. त्यामुळे दुसरा तर्क असा होता की मादी बिबट्याच्या दृष्टीने सध्याची पिल्लांची जागा हीच सर्वाधिक सुरक्षित होती. पिल्लांना घेऊन जाण्यासाठी दुसरी सुरक्षित जागा तिला तोवर सापडली नसावी किंवा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसावा. दिवसभरात चिपळूण शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या कचरा डेपो परिसरातल्या छोट्याश्या पाणवठ्यावर एका जेसीबी ऑपरेटरलाहीआज बिबट्या दिसला होता.

सहाव्या दिवशी, १६ तारखेला ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं असता आदल्या रात्री १ ते ३ वाजेपर्यंत मादी बिबट्या पिल्लं असलेल्या बॉक्सजवळ बसून राहिली असल्याचे दिसले. तेव्हा ती अधून मधून इकडे तिकडे आजूबाजूला न्याहाळत राहिली होती. काहीवेळ बॉक्सच्या भोवती गोल-गोल फिरत होती. मध्येच खोक्यात डोकावून पिल्लांकडे पाहात होती. पण एवढं होऊनही पिल्लांना खोक्याबाहेर काढायचं तिने टाळलं होतं. पण यामुळे मादी बिबट्या रात्रीची पिल्लांजवळ येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. म्हणजे जागेसाठी कुठेतरी तिची पाहाणी सुरु असणार हे निश्चित झालं. फक्त तिची ही जागेची पाहाणी कोणाच्या निदर्शनास येत नव्हती. सलग दोन दिवस पिल्लं एकाच ठिकाणी असल्याने ती सुरक्षित असावीत, हेही तिनं मान्य केलं असावं. स्वतः जागा शोधण्याच्या निमित्ताने पिल्लांपासून लांब गेल्यावर तीही सुरक्षित आणि पिल्लंही सुरक्षित असं तिचं काहीसं वेगळं दुर्मीळ वर्तन सध्या जाणवत होतं. टीमने सध्याच्या बॉक्सला आतून आणि वरून गोणपाट लावलेले होते. त्याला वरती एका ठिकाणी थोडीउघडीक ठेवलेली होती. जेणेकरून गोणपाट फाडून मादी बिबट्या सहज पिल्लांना बाहेर काढू शकेल. पण मागच्या २/३ रात्रीतील अनुभवामुळे तेही तिला अवघड ठरत असावं असं वाटल्याने आज टीमने अशा मोहिमांत उपयुक्त ठरणारे भाजीपाल्यासाठी वापरले जाणारे दोन क्रेट आणले. क्रेट धुतले. मादीला जवळपास कुठेही मनुष्यसदृश्य वास येऊ नये यासाठी क्रेटना माती लावली. पिल्लांची हाताळणी करताना हँडग्लोव्ज वापरण्यात आले. एका क्रेटमध्ये तळाला पिल्लं ठेवण्यात आली. दुसरा रिकामा क्रेट पहिल्यावर उपडी ठेवण्यात आला. त्यावर मादी बिबट्या वरचा क्रेट सहज ढकलू शकेल एवढ्या वजनाचा दगड सुरक्षितेसाठी ठेवण्यात आला. सगळाच अभ्यास सुरु होता. चिपळूण वन्यजीव अभ्यासक टीम यासंदर्भात राज्यातल्या तज्ज्ञांशी बोलत होती. त्यातून या नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात होत्या. आज दिवसभरात सकाळी बैल घेऊन शेतात जाणाऱ्या मंडळींना एक-दोनदा तर एकदा १/२ मुलांनी बिबट्याला पाहिलं होतं.


एवढे प्रयत्न करूनही सातव्या दिवशी, १७ तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा आदल्या रात्रीही मादी बिबट्या स्वतः पिल्लांजवळ येऊनही त्यांना सोबत घेऊन गेली नव्हती. तेव्हाही ती क्रेटच्या आजूबाजूला फिरत राहिली. काहीवेळ क्रेटजवळ बसून राहिली. आता दिवसभर पिल्लांजवळ न थांबता सायंकाळी मावळतीच्या वेळेस पाहाणीसाठी यायचं टीमचं सर्वानुमते ठरलं. सायंकाळी टीम पोहोचण्यापूर्वी मादी बिबट्या क्रेटजवळ बसलेली असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसले. मादी बिबट्याच्या निघून जाण्याच्या आणि टीमच्या पोहोचण्याच्या वेळेत पाचेक मिनिटांचं अंतर होतं. हे असं दुसऱ्यांदा घडत होतं. मादी बिबट्याच्या वावरावरून ती सुरक्षित जागा शोधत असल्याच्या निर्णयाप्रत सारे आले. मादी बिबट्या पिल्लांना नक्की नेईल असा विश्वास वाटू लागला. पिल्लांना पुन्हा दूध पाजण्यात आलं. त्यांची तपासणी करण्यात आली. टीमने पिल्लांची जागा आणि क्रेट बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोजच्या जागेपासून साधारणपणे १० फूट अंतरावर जाणवलेल्या विणीच्या जागेवर एकावर एक रचलेल्या वीटांचे पेटी सदृश्य आकाराचे कच्चे बांधकाम करण्यात आले. त्यात दोन्ही पिल्लांना ठेवण्यात आले. वीटांच्या बांधकामाचा वरचाभाग मोकळा आणि जवळपास नैसर्गिक वाटेल असा साकारलेला होता. नव्याने दोन ट्रॅप कॅमेरे सेट करण्यात आले. रात्री काहीवेळ सुरक्षित अंतरावरून पाहाणी करण्यात आली.

आठव्या दिवशी, १८ तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा दोन्ही पिल्ले विटांच्या कच्च्या बांधकामात आढळून आली नाहीत. ट्रॅपकॅमेरा बंद पडलेला होता. मादी बिबट्या आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित अधिवासात रवाना झाली होती. दोन्ही पिल्लं चालणारी असल्याने तोंडातून नेण्याची आवश्यकता नव्हती. विषयाची खात्री करण्यासाठी पुढील २/३ दिवस टीमने निरीक्षण केले. मादी बिबट्या, तिची पिल्लं दिसली नाहीत. मादीने आपल्या पिल्लांना सुरक्षित सोबत नेल्यावर शिक्कामोर्तब झाले. चिपळूणला वन विभागात दोन ट्रॅप कॅमेरे उपलब्ध होते. रत्नागिरीतूनही आणखी कॅमेरे मागविण्यात आले होते. शेवटीशेवटी भौगोलिक स्थितीनुसार प्रत्यक्ष जागेवर तीन कॅमेरे लावण्यात आले. प्रत्यक्षात दोन कॅमेरे अचानक बंद पडले. एक जो कॅमेरा चालू होता त्यात कोणताही क्लिक मिळाला नाही, अर्थात तोही कॅमेरा खराब झाला होता. शेवटच्या क्षणी ट्रॅप कॅमेरा बंद पडल्याने शेवटच्या क्षणाचे डिटेल्स टीमला मिळवता आले नाहीत. नवीन जागी पिल्लांसह आल्यावर वन्यजीव शक्यतो जागेवरून हलत नसतात. मागच्या पाचेक दिवसात मादी बिबट्या काहीतरी व्यवस्थित खाऊन आलेली असावी. अशात पुढचे सलग २/३ दिवस एका ठिकाणी थांबण्याची क्षमता या वन्यजीवात असते. दोन पिल्लांना दूधाशिवाय अन्य काही खायला देऊन चालणारं नव्हतं. त्यामुळेच मादी बिबट्या दिसली नसावी.


एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टमधील हेलिकॉप्टरच्या रनवेवर ५ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जोरजोरात डरकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने मादी बिबट्या तिथून चालत गेली असावी अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली होती. ‘मादी बिबट्या पिल्लांना घेऊन फिरते आहे का ?’ हे पाहाणे वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचे होते. अर्थात दिसणारी मादी बिबट्या ही तीच !’ असं लगेच म्हणणंही धाडसाचं ठरणारं होते. पण तरीही मादी बिबट्याच्या सोबतीला तिची दोन्ही पिल्लं असतील तर कदाचित ओळखणं सोपं जाईल असं टीमला वाटतं होतं. मादीने आपल्या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर जवळपास दोनेक आठवडे ही मंडळी, मादी-पिल्लांना जगण्यात पुन्हा काही अडचण तर आलेली नाही ना ? या कारणाने त्यांच्या शोधात राहिली. पण मादी दिसली नाही. काही ठिकाणी पाऊलखुणा मात्र सापडल्या. पण त्या तिच्याच कशावरून ? हाही प्रश्न होता. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सकाळच्या वेळेत श्रीविठ्ठलाई मंदिरापलिकडे असलेल्या कचरा डेपोदरम्यानच्या जागेत पहिल्यांदा मादी बिबट्या आणि पाठोपाठ एक पिल्लू पाहाण्यात आलं. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शेंबेकर यांच्या बागेच्या खालच्या बाजूला असलेल्या जंगलसदृश्य गवताळ जमिनीवर कोणीतरी लोळलेलं निदर्शनास आलं. तेव्हा त्या परिसराची पाहणी केली असता अर्ध्या तासाने बिबट्या मादी आपल्या दोन पिल्लांसह कचरा डेपोच्या दिशेने चालत जाताना दिसली. या दोन्ही नोंदी प्रत्यक्षदर्शी निलेश बापट यांनी केल्या. शेंबेकर यांचे बागेतील कामगार कांबळी यांनीही मे महिन्याच्या अखेरपर्यंत तीन वेळा मादी बिबट्याला पिल्लांसह पाहिल्याचे सांगितले. मादी बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर धामणवणे गावातून माहिती घेतली असता गावातील ३/४ कुत्रे गायब असल्याचे समोर आले. या भागातील लोकांची पावसाळापूर्व शेती वगैरेची कामे नियमित सुरु होती. मात्र बिबट्याने कुणाची गाय वगैरे मारल्याची नोंद झालेली नव्हती. मादी बिबट्या ही कदाचित या भागातल्या चिपळूण कचरा डेपोवर पोसलेली कुत्री आणि क्वचित प्रसंगी मिळणारं भेकर मारत असावी, असे अनुमान काढण्यात आले.

मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लांची ही भेट घडवण्यासाठी कोल्हापूरचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमंट बेन, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, कोळकेवाडीचे वनरक्षक राजाराम शिंदे, चिपळूणचे वनपाल किशोर पत्की, रामपूरचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, ओंकार बापट, अॅड. चिन्मय दीक्षित, रोहन शेंबेकर आदिंनी परिश्रम घेतले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून आत आलेल्या चिपळूण नजीकच्या डोंगररांगेत असा प्रयत्न पहिल्यांदाच होत असल्याने विशेष काळजी घेण्यात आली होती. जुन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक आणि बिबट्याच्या अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय यांचेही यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.


बिबट्या अंगावर आला तर माणसाच्या मांडीला चावा घेऊ शकतो. कारण आपली मांडी ही चालताना त्याच्या तोंडाजवळ येत असते. तो मांडी बाद करू शकतो, पंजा मारू शकतो. म्हणून अशा वेळी हाता-पायावर क्रिकेटसारखे पॅड, मानेला कॉलर, डोक्यावर हेल्मेट असलेला विशिष्ठ पेहेराव करून वावरावे लागते. टीममधल्या एक-दोघांनी तो ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसवर असताना बिबट्याने हल्ला केला तर माणूस दगावण्याचा धोका कमी होतो. यातल्या पॉवरपॅक हेल्मेटमुळे बाहेरचा आवाज येत नसतो. ड्रेसमुळे हातापायाच्या हालचालीवर परिणाम होत असतो. त्यामुळे टीममधले सगळेजण तो ड्रेस घालत नसतात. वन्यजीवाने हल्ला केला तर त्याला हाकलणे हे पहिले काम असते. म्हणून इतरांच्या हातात, जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून वापरली जाणारी फेसशिल्ड आणि काठ्या असतात, त्या यावेळी वापरण्यात आल्या. टीममधला एकजण दूर उंचीवर उभा राहून ‘वॉचटॉवर’ सारखा कक्षेतल्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून होता. धामणवणेतील मादी बिबट्याचा हा विषय खूप गुप्त ठेवण्यात आला होता. गावातल्या विचारणाऱ्या माणसांना नीटसं सांगितलं गेलं नव्हतं. अन्यथा विषय जिकडेतिकडे पसरून लोकांची गर्दी वाढली असती. प्रत्यक्ष काम करताना त्रास झाला असता. ४/५ वर्षांपूर्वी चिपळूण गुहागर मार्गावरील उक्ताडला भेकर आणि नंतर एकदा बिबट्याचं पिल्लू मिळालेलं होतं. तेव्हा शेकडोंचा जनसमुदाय जमा झालेला होता. आपल्याकडे एखादा साप किंवा अजगर मिळाला तरी अशीच अवस्था असते. पिल्लं सोबत असताना कोणतीही वन्यजीव मादी आक्रमक असते. ती इतरांना त्रास देऊ शकते. या निकषाचा विचार करता प्रस्तुत घटनेतील मादीच्या घरा-दारात आठवडाभर टीमची सारी मंडळी वावरत राहिली. तरीही मादी बिबट्याने यांच्यातल्या कोणालाही त्रास दिला नाही. स्वतःलाही त्रास करून घेतला नाही. पिल्लांना दूध पाजलं नाही. ज्या पट्टयात हे घडलं त्या धामणवणे भागात क्वचित प्रसंग वगळता अनेकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिलेला नव्हता. २ वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात धामणवण्यात मादी बिबट्या फासकीत अडकलेली होती. त्यानंतर गेल्या २ वर्षात बिबट्या कोणालाही दिसलेला नव्हता किंवा बिबट्याची माणसासमोर यायची वेळ जुळलेली नव्हती. बिबट्या काय किंवा जंगलातले अन्य वन्यजीव काय ? ते माणसांच्या हालचाली दुरून पाहात असतात. माणसाची चाहूल लागताच सावध होतात. सुरक्षित ठिकाणी कॅमॅफ्लॉज होतात. जो वन्यजीव माणसासमोर येत नाही किंवा अनेक दिवसात आलेला नाही तो प्रस्तुतच्या घटनेप्रमाणे स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने मनुष्यासमोर येणं टाळतो, असं मत निलेश बापट यांनी नोंदवलं.


संपूर्ण कोकणाला जैव विविधतेतील विविध परिसंस्थांची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. पट्टेरी वाघासह बिबट्या, रानडुक्कर, माकड, उदमांजर, खवले मांजर, रानगवा, सांबर आदी सस्तन प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुलपाखरे, मगरीसारखे उभयचर प्राणी, सरीसृप वर्गातील प्राण्यांचा येथे आढळ आहे. इथल्या अति वनाच्छादित क्षेत्रात आव्हानात्मक सेवा बजावणे हे नेहमीच शासन प्रतिनिधी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारे ठरते. कोकणातले वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सामुदायिक समन्वयाच्या माध्यमातून स्थानिक वन्यजीव अभ्यासकांच्या साहाय्याने अनेकदा आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडतात. यातला बिबट्या हा प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतो आणि मानव-वन्यजीवांच्या संघर्षाला तोंड फुटते. हे आपण नेहमी वाचतो, दूरचित्रवाहिन्यांवर पाहातो. खरंतर हा संघर्ष घडावा असं कोणाच्याही मनात नसताना ते घडतं. पण याच निसर्गात ‘वन्यजीव संवर्धन मोहीम’ही यशस्वी होत असतात. समाज म्हणून आपण सर्वांनी त्याकडेही डोळसपणे पाहायला शिकायला हवंय. विशेषत शासकीय वन्यजीव संवर्धन मार्गदर्शक तत्त्व प्रणालीस अधीन राहून, कमालीची गुप्तता पाळून एखादी मोहिम यशस्वी केली जाते तेव्हा ती मानव आणि वन्यजीव यांमधले सकारात्मक नात्याचे नवे दोर विणण्याचा प्रयत्न करत असते. धामणवणे येथील घटनेतील मादी बिबट्याच्या वर्तणुकीतील अनोख्या वत्सलभावनेच्या नोंदीने हेच काम केले आहे. ते समाजाने आणि सजग निसर्गप्रेमींनीआवर्जून समजून घ्यायला हवे आहे.

अशा कामांचं यश हे टीमच्या संयमावर अवलंबून असतं. एखादी टीम दुसऱ्याच दिवशी कंटाळली आणि त्यांनी ‘फिमेल मेलेय !’ असं रिपोर्टिंग वन खात्याच्या वरिष्ठांना केलं तर हा सगळा विषय संपू शकला असता. पिल्लांची रवानगी कधीच बाहेर न पडण्याकरिता जुन्नर किंवा बोरिवली अनाथालयात झाली असती. पण या टीमच्या सक्रीयतेमुळे असं चुकीचं काही घडलं नाही. दुसरं असं की श्रीविठ्ठलाई मंदिराकडचं पिल्लू प्रकाशात आलं नसतं तर कदाचित सारी टीम श्रीविंध्यवासिनी मंदिराजवळ नियमानुसार आठवडाभर बसून राहिली असती. सरतेशेवटी कदाचित काहीही हाती लागलं नसतं. सुरवातीला ४/५ दिवस होऊनही मादी बिबट्या पिल्लांना नेत नव्हती. अशा स्थितीत शासनाचे आठवडाभराचे असलेले एस.ओ.पी.चे नियम खूप चांगले आहेत. आपण निसर्गात कार्यरत सर्वांनी ते न थकता संयमपूर्वक पाळायला हवेत, हे या घटनेतून सिद्ध झालं.


प्रस्तुतची मादी बिबट्या सुरक्षित जागेसाठी धडपडत होती. ती पिल्लांजवळ यायची, त्यांना बघायची. काही काळ थांबायची आणि परत फिरायची. पिल्लांजवळ एखादा कुत्रा किंवा गाय गेली असती तर तिने नक्की हल्ला केला असता. पण माणूस म्हटल्यावर तिलाही काहीशी भिती वाटली असावी. अर्थात हाही तर्क आहे. कारण मादी बिबट्याचं असं वर्तन आजवर कोठेही आढळून आलेलं नाही. पिल्लं असताना मनुष्यासह कोणीही मादीच्या कक्षेत जाण्याचा प्रयत्न केला तर मादी आक्रमक होते असाच वन्यजीव शास्त्राचा अनुभव सांगतो. त्यामुळे मादी बिबट्याने असं दुर्मीळ वर्तन का केलं असावं ? याबाबतचे अनेक तर्क आपण समजून घेतलेत. तरीही या मागचं निश्चित कारण ती मादी बिबट्याच आपल्याला सांगू शकेल.

 

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड,चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २४ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.) 

 कोकण पर्यटन आणि डिजिटल विश्व







शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची गती ही समुद्रकिनाऱ्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. ‘डिजिटल लाईफस्टाईल’ हाही असाच एक बदल आहे, तो कोकणने स्वीकारलेला दिसतो. ‘डिजिटल लाईफ’चं मूळ अधिकाधिक व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे कोकणने ‘आमची शाखा कुठेही नाही किंवा जेवणाची काय ती एकदाच ऑर्डर द्या किंवा कोकम सरबताच्या कितीही बाटल्या घ्या, चव बदलणार नाही आणि पैसेही कमी होणार नाहीत’ या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. तरच ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेल्या ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये कोकण पर्यटनाला टिकाव धरता येईल.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इंटरनेट, संगणक आणि मोबाईलद्वारे आपली उत्पादने आणि सेवांचे विपणन अर्थात मार्केटिंग करणे तुलनेने गतिमान झालेले असले तरी त्याचे चांगले-वाईट परिणामही त्याच वेगाने पसरत असल्याने हे तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे आहे. त्यामुळे याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर व्हायला हवा आहे. कोकण पर्यटनात काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेलं ‘डिजिटल मार्केटिंग’ शिकलं पाहिजे. आपण डिजिटल युगात जगत आहोत. मे २०१९ च्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या ७७० कोटी असताना ४४० कोटी लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. सरासरी दोन तास या प्रमाणे ३५० कोटी लोक सोशल मीडिया वापरत होते. गुगल सर्चइंजिनवर प्रत्येक सेकंदाला ४० हजाराहून अधिक सर्च यायचे. यातले ६० टक्क्याहून अधिक सर्च मोबाईलवरून व्हायचे. फेसबुकवर प्रत्येक सेकंदाला ६ नवे प्रोफाईल निर्माण होत होते. त्याच ठिकाणी ६ करोड हून अधिक अॅक्टिव्ह पेजेस होती. साधारणपणे ३०० तासांचे व्हिडिओ युट्युबवर प्रत्येक सेकंदला अपलोड होत होते. इंस्टाग्रामवर दर महिन्याला ८० करोड लोक अॅक्टिव्ह होते. ही आकडेवारी वाढत जाणारी आहे. आजचा ग्राहक डिजिटल आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांनाही अधिकाधिक ‘डिजिटल’ व्हावे लागणार आहे. पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध असलेल्या Shopping, Ticket and Room Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Job searching आदि बऱ्याच बाबी डिजिटल होत आहेत. इंटरनेटच्या या सर्वव्यापी ट्रेंडमुळे पर्यटन व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचा वाटा खूप मोठा राहाणार आहे. एका अभ्यासानुसार तंत्रज्ञान वापर करणाऱ्यांपैकी ७० हून अधिक टक्के लोकं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्याआधी ऑनलाईन, फिरायला बाहेर पडण्याआधी माहिती घेत असतात. त्यामुळे जगाच्या डिजिटल बाजारात आपली ‘कोकण’ म्हणून दमदार आणि देखणी उपस्थिती असायला हवी. डिजिटल दुनिया ही आपल्याला कोकण म्हणून ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवते. ग्राहकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करते. ती आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्यासाठी उपयुक्त आहे. कोकणातील पर्यटन निगडीत उत्पादने आणि व्यावसायिकांनी आपल्या सेवांची ऑनलाईन जाहिरात करायला हवी आहे. Video Marketing, ईमेल मार्केटिंग हीही काळाची गरज आहे. डिजिटल जमान्यात Content Marketingला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या कोकणातील पर्यटन निगडीत व्यवसायाविषयी व्यक्त होताना पुरेशी काळजी घ्यायला हवी आहे.

आपल्या देशात इंटरनेट प्रभावी झालं तेव्हा डिजिटल मार्केटिंग काही लोकांपुरते मर्यादित होते. सोशल मिडिया प्रभावशाली झाल्यावर ते सामान्यांना खुले झालेले आहे. त्याचा नीट उपयोग करून घेणे ही कला असून ती आपण आपल्या आवश्यकतेनुसार शिकायला हवी आहे. आजही कोकणात महामार्गावर बहुतांशी हॉटेलात टिपीकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही. पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात तर प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी ? आणि कसे ? यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. सावंतवाडीतील लाकडी वास्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमीपुत्रांची पाऊले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात. येत्या काही वर्षात साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यास रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नातून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो डिजिटल असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाईल्डलाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाईल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटरपार्क, थीमपार्क आणि सर्वात महत्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राईड सारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रीय करत त्याचे डिजिटल मार्केटिंग करून कितीतरी समृद्धी आणणे शक्य आहे. अर्थात पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा काळजीपूर्वक सांभाळला जायलाच हवा ! आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्क कल्चर नाही. सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरात नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खाजगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोकं ‘सेकंड होम’ एन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी आम्हाला डिजिटल सक्षम व्हावे लागेल. आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने डिजिटल जाहिरातीतून आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये कोकण दिसायला हवे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते. पण तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? इथे अजून डिजिटल मार्केटिंग हवे आहे.

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल. डिजिटल प्लॅटफॉर्म इथे उपयोगी पडेल, पडतो आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची डिजिटल दृष्टी विकसित व्हायला हवी. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची पडायला हवा आहे. चिपळूणच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारीसाठी आम्ही ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. डेस्टिनेशन चिपळूणसर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला. पण सतत याला येणारा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहिला. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी निधी लागणार आहे. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी. 

कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं डिजिटल मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

    कोरोना पश्चात अख्खं जग रिव्हेंज (रिस्क) टुरिझमसाठी तयार झाले आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकणही यासाठी तयार आहे. शासनाने कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ या इथल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोकणातलं कौलारु घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाची, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट इकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या हृदयात उतरायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढऱ्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते ? हे अजून कितीकाळ शब्दातच सांगायचं ? कोकण पर्यटनातील सर्व उद्योग, पर्यटन सुविधा आदिंची माहिती एका क्लिकवर आणण्यासाठी सोशल मिडीयावर शेकाडोनी ग्रुप्स कार्यरत आहेत. यांद्वारे जमा होणारा ‘डेटा’ ही आजच्या ‘डिजिटल लाईफ’मध्ये सर्वात मोठ्या संपत्ती प्रमाणे आहे. तिचा उपयोग ‘कोकण पर्यटन’ म्हणून काळजीपूर्वक व्हायला हवा आहे. कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा डिजिटल मार्केटिंगवर खर्च करतो ? हे फार महत्त्वाचे आहे. व्यवसायासाठी हा खर्च व्हायला हवा आहे. डिजिटल जीवन शैलीतील माध्यमांचा सर्वोत्तम उपयोग करून कोकण पर्यटन वृद्धी शक्य आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८,

dheerajwatekar@gmail.com

 कोयनेच्या जंगलातील व्याघ्रदर्शन

 

पूर्वीच्या कोयना अभयारण्यामध्ये (सध्याचे सह्याद्री टायगर रिझर्व्ह) पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना सुरु झाली, तेव्हाची घटना. आपल्या जंगलांना प्राणीगणना नवीन नाहीत, त्या पूर्वीही व्हायच्या. २००८ पर्यंत प्राणीगणनेत भरपूर फिरायचं, हिंडायचं, जंगलं अनुभवायचं असं चालायचं. फॉरेस्ट गार्डस्, वनमजूर, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आदी मंडळी एकमेकांजवळ माहितीचं, अनुभवांचं आदानप्रदान करायचे. कोयनेच्या जंगलासाठी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्यांदा २००९ मध्ये शास्त्रीय प्राणीगणनेचे आदेश आले. २०१० साली ही शास्त्रीय प्राणीगणना निश्चित झाली. त्यावेळी कोयनेच्या घनदाट जंगलात रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या बावीस मीटर अंतरावरून ऑनफूट वाघ पाहिला होता. जंगलातल्या त्यांच्या चित्तथरारक अनुभवाची ही कहाणी आहे.

सर्वाधिक घनदाट म्हणून प्रसिद्ध असलेले कोयनेचे अभयारण्य हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या साथीने पसरलेले आहे. शिवकालीन इतिहासापासून जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याला जलाशयाची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. या जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूचा अभयारण्याचा बहुतांश भाग घनदाट आहे. या अभयारण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीची मुख्यरांग आणि दुसऱ्या बाजूच्या उपरांगेमधून कोयना नदी वाहते. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ‘बाबू कडा’, अभयारण्यातील सर्वोच्च वासोटा किल्ला या जंगलात आहे. दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात वर्षाला सरासरी ५००० मि.मी. पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता असलेल्या अशा या अभयारण्यात पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना होणार होती.


नियोजनानुसार गार्ड, फॉरेस्टर किंवा वनपाल यांचेकडून विविध बीटातील सहभागी सदस्यांना ठराविक जंगल क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या भागात किमान हजारभर आणि कमाल दोन हजार मीटरच्या ट्रॅन्झॅक्ट लाईन टाकून तिचे २०० मीटरचे तुकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने ही ट्रॅन्झॅक्ट मेथड लाईन (रेषा विभाजन पध्दती) विकसित केलेली होती. उत्तम नोंदींकरिता ओढ्या-नाल्यांना क्रॉसलाईन टाकली जाणार होती. प्राणीगणना करणाऱ्या टीम सोबत एक फॉर्म दिला जाणार होता. त्यात जंगलांचे आच्छादन, एक हजार मीटर ट्रॅन्झॅक्ट लाईनचे दोनशे मीटरचे तुकडे केल्यावर त्या प्रत्येक तुकड्यातील महत्त्वाच्या माहितीची नोंद होणार होती. जंगलातील पायवाटांच्या दुतर्फा चौकोन, काही ठिकाणी वर्तुळं आखली जाणार होती. एखादा प्राणी डावीकडून उजवीकडे किंवा उलट दिशेने पाणवठ्याकडे गेला आहे का ? जंगल वाटांवरून खाली किंवा खालून वर प्राणी गेला आहे का ? प्राण्यांच्या विष्ठा कोणत्या भागात मिळत आहेत ? आदी प्रत्यक्ष पाहिलेल्या नोंदी फॉर्ममध्ये करून वन्यजीवांचा अंदाज घेतला जाणार होता. तेव्हा आजच्यासारखे कॅमेरा ट्रॅप नव्हते.

वाघ किंवा बिबट्याच्या पायाचा ठसा मिळाला तर प्लॅस्टर कास्टिंग करून ठशाचे मोजमाप घेतले जाणार होते. एखादा ठसा साधारणत साडेसहा पावणेसात इंचापेक्षा अधिक असल्यास तो वाघाचा असल्याची शक्यता बळावणार हे नक्की होतं. एखादा ठसा थोडा छोटा असला तरी बिबट्या आणि वाघाच्या पिल्लाचा ठसा यातला भेद समजू शकणार होता. ही प्राणीगणना करताना पहिल्या दिवशी शाकाहारी प्राण्यांचा सर्व्हे, दुसऱ्या दिवशी मांसाहारी प्राणी, तिसऱ्या दिवशी वर्तुळासारख्या केलेल्या मार्किंगमधील विष्ठा पाहिल्या जाणार होत्या. पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे समजणारे आवाज नोंदवले जाणार होते. चौथ्या दिवशीपासून सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष जंगल गस्त (पायदळ) सुरु होणार होती. प्रत्येक दिवसाचा दुपारचा शिधा सोबत घेण्याच्या सूचना होत्या. पायदळीतून एका जंगलाच्या मोठ्या पट्यातील कोणत्या बीटात कोणते प्राणी दिसताहेत ? पायांचे ठसे, कोणत्या प्राण्यांचे आवाज येत आहेत ? प्राण्यांच्या भ्रमणानुसार एका बीटातून दुसऱ्या बीटात जाण्यासाठी काही जवळचे मार्ग आहेत का ? एखाद्या प्राण्याची विष्ठा मिळाली तर ती ताजी आहे का ? की आठवड्याभरापूर्वीची आहे ? आदी नोंदींच्या आधारे संपूर्ण जंगलाची माहिती संकलित करण्याचे नियोजन होते. विष्ठा आदी गोळा करायला पुरेसी साधने, लिहायला लेटरपॅडसोबत असणार होती. वन्यप्राणी, वन्यपक्षी, ठिकाणचे नाव आदी दहाएक नोंदी केल्या जाणार होत्या. जंगलात महत्वाच्या ठिकाणी, पाणवठ्यावर प्राण्यांच्या पायांचे उमटलेले ठसे चटकन कळावेत, प्लॅस्टर कास्टिंग चांगलं व्हावं या दृष्टीने मातीच्या चौकोनात, पीआयपी (पगमार्क इम्प्रेशन पॅड) अर्थात अगदी पुळण (वस्त्रगाळ) माती तयार केली जाणार होती. इम्प्रेशन पॅडमुळे जंगलात गस्त करताना अचूक माहिती मिळायला मदत होणार होती. मागील ८/१० वर्षांपेक्षा ही प्राणीगणना काहीशी वेगळी होती.


कोयना धरण ते नदीचा उगम हे अंतर सत्तरेक किमी असावे. जलाशयाभोवती किमान शंभरएक गावे वसलेली आहेत. देशातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र ‘खिरखंडी’ इथेच आहे. गावांचे दळणवळण लाँचसेवेवर अवलंबून आहे. संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. कोयनेचा जंगलातील भूप्रदेश अत्यंत रमणीय आहे. सह्याद्रीच्या अवघड भौगोलिक रचनेमुळे इथे रस्ते नाहीत. जंगलात असंख्य खोरी आहेत. त्यातल्या झुंगटी, पाली, मालदेव, रोहिणे, करंजावडे, शिरशिंगे, झाडोली, डिचोली, किसरुळे, आंबेघर, आंबेगाव आदी पंधराएक गावांची बीट (खोरी/उपखोरी)तयार केली होती. या बीटातील टीमना ८४ हेक्टर, ९० हेक्टर अशी जंगलांची विभागणी करून देण्यात आली होती. प्रत्येक बीटात एक फॉरेस्ट मजूर किंवा गार्ड, बाकीचे तिघे पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आदी चार सदस्य सहभागी होते. संपूर्ण जंगलातल्या झुंगटी, पाली, मालदेव या बीटात वन्यजीवांच्या हालचाली तुलनेने अधिक असल्याची प्राथमिक माहिती होती. ऐकीव माहितीनुसार जंगलातील आडोस-माडोसपासून बामणोली पर्यंतच्या भागात पट्टेरी वाघाचा वावर होता. पट्टेरी वाघ अगदी चकदेव-परबत पर्यंत फिरायचा.

निलेश बापट यांचा समावेश असलेल्या बीटमध्ये, तीसेक वर्षे कोयनेच्या जंगलात मजूर म्हणून वावरणारे बापू गुरव हे जंगलातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. मध्यम उंची, काळ-सावळा रंग, प्रौढत्वाकडे झुकलेली पण काटक शरीरयष्टी, कंबरेला कोयता आणि अर्धेअधिक टक्कल पडलेल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांचे धनी बापूंचा जन्म कोयनेच्या जंगलातला. जन्मापासून रात्री-अपरात्री जंगलातून चालायची सवय असल्याने त्यांना इथल्या सगळ्या वाटा माहित. कोयना भागात कोणीही अधिकारी आले तरी ते जंगल फिरताना बापूंना हमखास सोबत न्यायचे. कोयनेच्या जंगलाला वाहून घेतलेल्या बापूंचे योगदान इतके मोठे की आजही कोयनेच्या जंगलात काही ठिकाणी बापूंच्या फोटोची पूजा केली जाते. बापट यांच्यासारखे अनेक वन्यजीव अभ्यासक बापूंकडून बारकाईने जंगल वाचायला शिकलेले. तर असे हे बापू आपल्या बीटात असावेत असं प्रत्येकाला वाटायचं. निलेश आणि बापूंच्या बीटात तेव्हा चिन्मय ओक आणि आदित्य जोशी हे दोघे अन्य पर्यावरणप्रेमी होते.


आजचा पहिला दिवस हा सर्वांना विविध बीटाच्या भागात सोडण्यात जाणार होता. कोण कोणाच्या बीटात यांची नोंद आणि शिधावाटप वगैरे होऊन सगळ्यांना घेऊन कोयना धरणाच्या जवळून भन्नाट वाऱ्याच्या साथीने महाराष्ट्र शासनाची वनराणी लाँच निघाली. लाँचमधल्या काही जणांचे ट्रेनिंग झालेले होते. ट्रेनिंगमध्ये वाघाच्या ठश्यांचे प्लॅस्टर कास्टिंग कसे करायचे ? ठसे कसे मोजायचे ? ते कागदावर कसे उतरवायचे ? आदी माहिती देण्यात आली होती. जंगलात कोणत्याही प्रकारचे मद्यपान करायला बंदी होती. जंगलातील प्रत्येक पानावर जंगलाचाच हक्क असल्याने तिथून काहीही बाहेर न्यायला परवानगी नव्हती. मानवी गंध प्राण्यांना किमान १/२ किमीपर्यंत समजत असल्याने परफ्युम वगैरे वापरल्यास वन्यजीव दिसणं अशक्य होईल. यास्तव ते न वापरणे, जंगलात एकटे-दुकटे विनाकारण न फिरणे, जंगलात मोठ्याने बोलणे, हसणे टाळणे आदी सूचनांसह काच, लेटरपॅड, स्केचपेन, मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे साहित्य आणि ७/८ किलो तांदूळ, तेल, मसाला असा शिधा सोबत देण्यात आला होता. कोयनेतून सुटलेली लाँच सर्वांना बीटनुसार सोडत पालीच्या खोऱ्यात पोहोचेपर्यंत सायंकाळचे ४ वाजले. पुढे ही लाँच कोयना जंगलाची शेवटची रेंज असलेल्या ताकवली-मालदेव बीटापर्यंत पोहोचली. तिथून परत फिरून बामणोलीला गेली.

बापू, निलेश, चिन्मय आणि आदित्य यांना लाँचनेज्या पालीच्या पट्ट्यात सोडले तिथे धरणाच्या बॅकवाटरला लागून असलेल्या गर्द जंगलात एक तीन मजली सिमेंट काँक्रीटचा वॉचटॉवर होता, अजूनही तो वॉचटॉवर आहे. वॉचटॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर या चौघा मंडळींचा मुक्काम असणार होता. आवश्यकतेनुसार बॅटरी आणि चूल वगळता रात्रीच्या अंधारात आकाशातील चंद्रकोर हाच काय तो प्रकाश सोबतीला होता. आपण जंगलात आहोत याची सतत जाणीव करून देणारा रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज, अंगाला झोंबणारा गार वारा आणि जलाशयातील पाण्याच्या लाटांच्या चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक आवाजाच्या साथीने दिवस जाणार होते. सह्याद्रीची पर्वतरांग, घनदाट जंगल, हिवाळ्यात दिसणारे हिरवेगार डोंगर, जंगलातील पायवाट, पाणवठा, वन्य प्राण्यांचा सहवास, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, औषधी वनस्पती अशा वातावरणात रात्री घालवण्यात थ्रिलिंग असणार होते. मंडळींनी वॉचटॉवरच्या पायथ्याशी असलेल्या एका झाडानजीकची सवयीच्या जागेवरील चूल नीटशी केली. उघड्यावर जेवण करायचं होतं. पाऊस आला तर आडोश्याला थांबायचं नक्की होतं. कोयनेच्या जंगलात जानेवारीतही अचानक पाऊस भेटीला येत असल्यामुळे बचावासाठी सर्वांजवळ प्लास्टिक होतं. कोयनेतला हा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरलाही पडत असतो. एप्रिल-मे महिन्यात तो सुरुवात करतो. असं वातावरण असतं, आजही होतं. जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब या सर्वांचा उत्साह वाढवित होते. चुलीवरच्या जेवणासोबत सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या. बघता बघता जेवणही आवरलं. झोपायची वेळ झाली. वन विभागाचे ट्रेनिंग निलेशने पूर्ण केलेले होते. त्याने सर्वांना त्याची माहिती दिली. त्यानुसार कामाची विभागणी करायला हवी होती. तेवढ्यात बापू बोलू लागले, ‘तुम्हाला काय काय काम दिलंय ते तुम्ही बघा. मला काय त्यातलं समजत नाय ! मी काय अनपढ ! मी तुम्हाला जंगल दाखविण्याचं काम करतो.’ रात्री अकरा-सव्वा अकराच्या सुमारास सारे वॉचटॉवरवर आडवे झाले. झोपी गेले. सर्वानुमते प्राणीगणनेचे फॉर्म भरायची जबाबदारी चिन्मयने घेतली. त्यासाठीचा नोटपॅड सदैव त्याच्यासोबत असणार होता. जंगलमार्ग दाखवत जंगलाबाबतची समजेल ती माहिती बापू सांगणार होते. आदित्यकडे कॅमेरा असल्याने त्याच्याकडे फोटोग्राफीची जबाबदारी होती. बापूंच्या सहकार्याने नोंदींशी निगडीत साऱ्या बाबी तपासण्याचे काम निलेशकडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. मंडळींचा जंगलातून वाट काढत सुरु झालेला प्रवास त्यांना निसर्गाकडे घेऊन जाऊ लागला. प्रवासातून पावलागणिक नवी उर्जा मिळू लागली. आज त्यांनी कोयनेच्या जलाशयावरती आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या पाणवठ्यावरती बसून प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले. दिवसभरात ऐकलेल्या पक्ष्यांच्या आवाजानुसार सायंकाळी नोंदी अपडेट केल्या. चुलीवरचं आमटी-भाताचं जेवण सारे जेवले. बघता बघता असे दोन दिवस सरले.


तिसरा दिवस उजाडला. आज दिवसभर वाटेवर फिरायचं नियोजन होतं. प्राण्यांची विष्ठा, वनाचे आच्छादन बघण्याचा आजचा दिवस होता. दिवसभरात सारीवाट फिरून सायंकाळी वॉचटॉवरजवळ येऊन मंडळींनी नोंदी पूर्ण केल्या. तोवर अंधार पसरला. साधारणत सात-साडेसातची वेळ असावी. कोयनेच्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब, पाण्याच्या लाटांवर उमटणारे त्याचे तरंग, जलाशया शेजारच्या भूपृष्ठावर तयार झालेली लाटांच्या रेषांची नक्षी पाहात चुलीवर जेवण बनविण्याचं काम सुरु झालं. मंडळींनी थोडी अधिक लाकडं जमवली. इतक्यात निलेशला लघुशंकेचा कॉल आला. तो जवळच्या आडोश्याला गेला. हा जिथे उभा राहिला तिथवरच्या जागेत पायाखाली पाण्याच्या लाटांमुळे निर्माण झालेल्या रेषांची नक्षी स्पष्ट जाणवत होती. निलेशला तिथे उभा राहता क्षणी पायाच्या अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. चुलीपासून तसं जवळचं उभं राहायचं असल्याने याने नेमकं तेव्हा पायात काही घातलेलं नव्हतं. काहीतरी चावल्यासारखा फील येताच याने तिथेच एकदोनदा पाय झटकला. चुलीजवळ परत आल्यावर, त्याने काहीतरी चावलं असल्याचं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. मग हे सारे बॅटरी घेऊन चावलेल्या जागी काही दिसतंय का ? म्हणून शोध घेऊ लागले. जंगलात जमिनीवर साठलेल्या पालापाचोळ्याची चाचपणी करताना बॅटरीच्या उजेडात यांना एक काळसर विंचू दिसला. ‘निलेशला काय चावलं असेल ?’ याचा सर्वांना अंदाज आला. आता तातडीने काही हालचाल करावी म्हटलं तर जवळ लाँच नव्हती. वॉकीटॉकीही नव्हता. या बीटातल्या चिन्मयकडे एक छोटा मोबाईल होता. पण त्याला जंगलात रेंज नव्हती. विचार करण्यात वेळ जात होता. तोवर तिकडे काही मिनिटांनी निलेशचा पाय हळूहळू वरच्या दिशेने मुंग्या येऊन सुन्न पडायला सुरुवात झालेली. बाकी मंडळी, ‘एवढ्याश्या विंचवाने निलेशला काहीही होणार नाही’, म्हणत त्याची मानसिकता सकारात्मक ठेवण्याच्या प्रयत्नात होते. इतक्यात चिन्मयला, त्याने आणलेल्या प्रथमोपचाराच्या साहित्यात सूर्यप्रकाश तेलाची बाटली असल्याचं लक्षात आलं. विंचूदंशात या तेलाचा उपयोग नक्की होणार होता. त्याने निलेशला हे तेल नाकात हुंगायला दिलं गेलं. विंचवाचा दंश झालेल्या जागेवर तेलाचे थेंब टाकायला सुरुवात केली. विंचू चावलेला असल्याने सर्वांनी रात्रभर न झोपण्याचा निर्णय घेतला. तोवर निलेशचा पाय गुडघ्यापर्यंत सुन्न पडत आलेला. आज त्याच्यासह सारे कसेबसे टॉवरवर चढले. गप्पांसोबत सूर्यप्रकाश तेलाचा थेंब-थेंब उतारा रात्रभर चालू राहिला.

सकाळचे साडेचार वाजले. तेव्हा पायाला आलेला सुन्नपणा काहीसा कमी झाल्याचे निलेशला जाणवले. आजच्या चौथ्या दिवशी ट्रॅन्झॅक्ट लाईन पार करून कोयना खोरे फिरायला सुरुवात करायचे नियोजन होते. पालीच्या वॉचटॉवरमागून कोकण कड्यापर्यंत ही ट्रॅन्झॅक्ट लाईन गेलेली होती. निलेशला आता फक्त अंगठ्याजवळ वेदना जाणवत होत्या. त्याने शांतपणे विचार केला आणि सर्वानुमते पहाटे पाच वाजता पायात बूट चढवले. साडेपाच वाजता कोकण कड्यापर्यंत जाणाऱ्या ट्रॅन्झॅक्ट लाईनच्या दिशेला लागणाऱ्या पहिल्या चढाच्या दिशेने मंडळींनी चालायला सुरुवात केली. चढ चढल्यावर यांना एक माळरान भेटलं. तिथे मोठं जंगल आहे. तेव्हा सकाळचे पावणेसात वाजले होते. तिथून पुढे एक पायवाट तिरकी होते आणि समोरच्या जंगलातून खाली उतरून पुन्हा वर जाते. यातल्या खाली उतरणाऱ्या वाटेवर मारलेल्या ट्रॅन्झॅक्ट लाईनला क्रॉस करून खालून वर आलेल्या अवस्थेत यांना कोण्या वन्यजीवाचा किमान पावणेसात इंचाचा पगमार्क मिळाला. तो पगमार्क पाहताच बापू उद्गारले, ‘वाघरू (ढाण्या) फिरलंय इकडे कुठंतरी !’ बापूंचं बोलणं ऐकताच सर्वांचे डोळे विस्फारले. तातडीने ठश्याचं प्लॅस्टर कास्टिंग केलं गेलं. तोवर सव्वा सात वाजले. पुढे चालताना काही अंतरावर टप्प्याटप्प्याने जमिनीवर विशिष्ठ पद्धतीची उकरण दिसून आली. कोयनेच्या जंगलात बापू वगळता इतरांसाठीहे नवीन होते. अजून थोडे चालल्यावर सर्वांना कोकण कड्याच्या एक किमी अलिकडे उतारावरील वळणात एका झाडावर विशिष्ठ स्क्रॅच मार्किंग दिसले. हे स्क्रॅच जवळपास बापूंच्या उंचीएवढ्या अंतरावर केलेले होते. सारे निरीक्षण सुरु असताना मंडळींना जवळच कोण्या वन्यजीवाने लघुशंका केल्याचे निदर्शनास आले. ती लघुशंकाही ताजी होती. जणू काही वेळापूर्वी केलेली ! बापूंनी हे सारं क्षणार्धात ओळखलं. २०१० सालचा जानेवारी महिना संपत आलेला. २९ तारीख. कोयनेतल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस ते. जंगलात सर्वत्र धुकं पसरलेलं. लघुशंका पाहून निलेशने, ‘थंडीमुळे पानावरून पाणी गळलेले असेल’ अशी शंका बापूंना विचारण्याचा प्रयत्न केला. पण बापू, ‘वाघ मुतलेला आहे’ या आपल्या मतावर ठाम राहिले.


आता मंडळी जंगलातल्या त्या अरुंद पायवाटेवरून सावध पावलं टाकत चाललेली. पुढे एका टप्प्यावर यांना वन्यजीवाची विष्ठा मिळाली. पहिला पगमार्क आणि आत्ताची विष्ठा यातलं अंतर पाऊणएक किमी असेल. मागचे सारे संदर्भ डोक्यात घोळू लागल्याने बापू अत्यंत सावध झालेले. त्यांनी तशा सूचनाही इतरांना दिल्या. बापूंच्या मागे निलेश चालत होता. नोंदी आणि छायाचित्रे घेत मागोमाग चिन्मय, आदित्य येत होते. सारेजण एका वाटेवरून खाली उतरले तिथे यांना दोन-तीन मोठे दगड लागले. सर्वांना आता डोळ्यासमोर कोकणकडा दिसत होता. आता इथून तिथवर पोहोचायला जेमतेम दहाएक मिनिटे अजून हवी होती. पाऊल वाटेवरचे दगड पार करत असताना समोर बापूंचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले, ‘अरे वाघ बसलाय ! वाघ बसलाय !’बापूंचे शब्द कानावर पडताच निलेशची नजर त्या दिशेला वळली. निलेशला डोळ्यासमोर एक बऱ्यापैकी विस्तारलेलं आंजणीचं झुडूप दिसत होतं. अजूनही ते झुडूप आहे. त्या झुडुपाच्या खाली पट्टेरी वाघ बसलेला होता. निलेशने अगदी हलक्या आवाजात पाठीमागच्या चिन्मय आणि आदित्यला हाक मारायला सुरुवात केली. ते दोघे मागच्या नोंदी करत आणि छायाचित्रे घेत सावकाश चालत येत होते. आवाज ऐकताच चिन्मय तसाच धावला. तोवर इकडे पाठमोऱ्या बसलेल्या वाघाला निलेश आणि बापूंच्या हालचालींची चाहूल लागली असावी. वाघ जागेवरून उठला. आंजणीच्या झाडामागून चालू लागला. तेव्हा चिन्मय या दोघांजवळ पोहोचला होता. हा वाघ संपूर्ण कोकण कड्यावरती फिरलेला असावा, असा कयास मंडळींनी बांधला. आंजणीच्या झाडामागून चालू लागलेल्या वाघाने काही अंतर कापल्यावर जवळच्या उतारावर दोनदा जोरदार डरकाळी फोडली. दूरवर असलेल्या आदित्यने डरकाळीचा हा आवाज ऐकला. बापू म्हणाले, ‘आता तो पुढे गेलाय. तो काय मागावर येणार नाही.’

पुढच्या तीनेक मिनिटात ही मंडळी पट्टेरी वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ पोहोचली. वाघ निघून गेलेला होता. हातात असलेल्या गोल टेपनं मंडळींनी आपल्यातलं आणि वाघामधलं अंतर मोजलं, तर ते होते अवघं २२ मीटर ! वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ एका वयस्क गव्याची विष्ठा पडलेली होती. त्या विष्ठेच्या एका कोपऱ्यावर वाघाच्या पायाचा ठसा उमटलेला होता. त्या वाघाच्या पायाच्या ठशाचे प्लॅस्टर कास्टिंग केले. त्या ठशाच्या ठिकाणी चारही बाजूंनी दगड लावले. जवळच वाघाचीही विष्ठा मिळाली, यांनी तीही ताब्यात घेतली. समोरच्या कोकण कड्यावर पोहोचल्यावर यांच्या मोबाईलला रेंज मिळाली. काही महत्वाची नोंद मिळाली तर तातडीने संपर्क करण्याबाबतच्या काही सूचना सर्वांना पूर्वीच दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर कुठेही संपर्क होईना म्हटल्यावर निलेशने वन खात्याच्या कोयना कार्यालयात २८४४९२ या क्रमांकावर फोन केला. तोही फोन कोणी उचलेना. शेवटी याने बामणोली फॉरेस्ट रेंजचे आर.एफ.ओ. दशरथ गोडसे यांना मोबाईल कॉल केला. तुलनेने त्यांना या ठिकाणी लवकर पोहोचणे शक्य होते. त्यांचा मोबाईल कॉल लागला. ते तेव्हा सातारा भागातील एका बीटात होते. निलेशने त्यांना कळवलं, ‘आमच्या बीटात आज सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आम्ही प्रत्यक्ष वाघ बघितला. तुम्ही या. ’गोडसे साहेबांनी निलेशचं बोलणं ऐकलं. म्हणाले, ‘तुम्ही जंगलात गस्त करत राहा. मी सायंकाळी येतो.’

ही मंडळी सध्या उभी असलेल्या रस्त्यांनी खाली उतरलं की पाली आणि मालदेवच्या मधलं घनदाट जंगल लागतं. तिथल्या एका जवळच्या ओढ्यापर्यंत जायचं यांनी आज पहाटेच ठरवलेलं. आता अर्धा दिवस सरून गेलेला. दुपारचे साडेबारा वाजलेले. त्या पायवाटेवरून चालताना ठिकठिकाणी यांना जणू डिसेंट्री लागल्यासारखी ताजी पातळ विष्ठा पडलेली दिसली. सुरुवातीची काही मिनिटे, ‘ही विष्ठा कोणाची असेल ?’ याचा यांना नीटसा अंदाज येईना. तिथे थांबून विचार केल्यावर थोड्या वेळाने बापूंच्या लक्षात आलं, ही विष्ठा अस्वलाची होती. अंदाज लावून झाल्यावर सारेजवळच्या डुंग्यावर (छोटा डोंगर) पोहोचले. तेव्हा बापूंचा अंदाज खरा ठरल्याची खात्री पटली. डुंग्याला लागून वाहात असलेल्या ओढ्याच्या जवळपास अस्वलाचं एक पिल्लू फिरत होतं. बापूंनी ते पाहिलं. बापू सर्वांना ते पिल्लू दाखवेपर्यंत पिल्लाच्या आणि मंडळींच्या डावीकडे आणखी एक पिल्लू आणि मादी अस्वलही दिसलं. अस्वल हा जंगलातील वन्यजीवात सर्वात भयानक आणि बेभरवश्याचा प्राणी. त्याचा हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. तो शिकार खात नाही पण फाडून टाकतो. स्वातंत्र्यापूर्वी म्हैसूरच्या जंगलात एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. प्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांनी मेळघाटी सातपुडापुस्तकात, ‘मेळघाटातील कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना घाबरत नाहीत. परंतु आपल्याला जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना देवतांना करीत धास्तावलेला प्रवास करतात’, असे लिहीले आहे. अर्थात प्रसंगावधान राखून बापूंनी सर्वांना डुंग्याच्या दिशेने धावण्याचा आणि दगड गोळा करण्याचा सल्ला दिला. सारे डुंग्यावर चढले. दगड गोळा केले. मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. तोवर अस्वल आपल्या दोन पिल्लांसह डुंग्याच्या खालपर्यंत आलेली. मग यांनी जमवलेले २५/३० दगड काही क्षणात खाली ढकलायला सुरुवात केली. डुंग्याखाली असलेली मादी अस्वल सुरुवातीला जमिनीवर लोळत होती. इकडे तिकडे मान हलवित होती. दगड टाकण्याने ती तिथेच थांबली. या मंडळींना वाघाच्या पाठीवर उंबराचं पाणी असलेल्या ज्या पायवाटेनं जायचं होतं नेमक्या त्याच पायवाटेनं मादी अस्वल निघून गेली. म्हणून मग यांनी आल्या वाटेनं परत जायचा निर्णय घेतला. डुंग्यासमोर यांना कोकणकडा आणि मालदेवमधील सह्याद्रीची हद्द दिसत होती. मंडळींना तिथे पोहोचायला किमान अडीच तास लागावेत. मनुष्याच्या दृष्टीने दूरवरच्या अशा ठिकाणापर्यंत ती मादी अस्वल यांच्या डोळ्यादेखत अवघ्या काही मिनिटात पोहोचली. वन्यजीवांमध्ये किती ताकत असते ? मनुष्य त्यांच्यासमोर किती कमकुवत आहे ? याची साक्ष पटविणारा तो अफलातून अनुभव होता. या दरम्यान कोकण कड्याच्या दिशेने चालताना मादी अस्वलीने ४/५ वेळा मागे वळून आपल्या पिल्लांकडेही पाहिलं. हा अनुभव गाठीशी जमा करून सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान मंडळी पालीतील लोखंडी वॉचटॉवरजवळ पोहोचली.

सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी यांना वॉचटॉवरजवळ बसल्या जागी पट्टेरी वाघाची डरकाळी पुन्हा ऐकू आली. आवाजाच्या दिशेने अंदाज घेतला तेव्हा सकाळी फिरलेल्या पट्ट्यात अजूनही वाघ असल्याचे लक्षात आले. यांची नजर आता समोरच्या शिवसागर जलाशयावर स्थिरावली होती. सकाळी संपर्क झालेला असल्याने वन खात्याचे अधिकारी आत्ताच हे पाहायला पोहोचायला हवेत अशी निलेशची भावना झालेली. तेव्हढ्यात जलाशयात दुरून वनराणीलाँच येताना दिसली. लाँच जसजशी जवळ आली तसतसा तिचा आवाज कानाला जाणवू लागला. वाघाचा आवाज जिथून येत होता ते अंतर मंडळींपेक्षा लाँचमधील अधिकाऱ्यांच्या अधिक जवळ होतं. अर्थात लाँचमधील अधिकाऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू येणे अभिप्रेत होते. संजय पवार नावाचा लाँचचा ड्रायव्हर होता. त्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकल्यावर तत्काळ लाँचचं इंजिन बंद केलं. लाँचमधील गोडसे साहेबांना सांगितलं. पुढे ६ वाजून १० मिनिटांपासून साडेसहा वाजेपर्यंत १३ वेळा या भागात हा पट्टेरी वाघ ओरडला. त्याच्या डरकाळ्या सर्वांनी ऐकल्या. काळोख पडताना वनराणी लाँच पाली वॉचटॉवरजवळ पोहोचली. लाँचमधून उतरताच आर.एफ.ओ. गोडसे साहेब निलेशला म्हणाले, ‘आहे ! तुम्हाला वाघ दिसला हे खरं आहे. आम्ही लाँचमधून आवाज ऐकला.’ खूप आनंदी वातावरणात सर्वांचा गप्पांचा मूड जमलेला तेव्हा !


सहाव्या दिवशी सकाळी लाँच मालदेवला रवाना झाली. पाली बीटाची जबाबदारी असलेली ही मंडळी काल वाघाचा आवाज आलेल्या जलाशया समोरच्या जंगलात आज फिरली. त्यांनी तिथले पट्टेरी वाघाचे पगमार्क जमवले. दुपारी ३ वाजता मंडळी मालदेवच्या पठारावर पोहोचली. तेव्हा, मालदेव बीटमधील मंडळींनीही पालीच्या दिशेला वाघ बघितलेला होता हे समजलं. मालदेवचे स्थानिक शामराव कोकरे यांची म्हैस वाघाने मारली होती. शामरावांनी अनेकदा या भागात वाघ बघितलेला होता. गाडीच्या टायरच्या सोलांच्या चप्पला वापरणारे शामरावांचे भाऊ लक्ष्मण यांनीही २००७/०८ साली पालीच्या जंगलात जवळून चालताना पट्टेरी वाघ बघितला होता. नवजा गावातही काही लोकांनी २००७ ते २०१० सालात वाघ बघितला होता. ज्या पठारावर ही मंडळी भेटली तिथे बऱ्याच ठिकाणी वाघाच्या विष्ठा दिसून आल्या. सातव्या, शेवटच्या दिवशी अवसारी सेंटरवर सर्व बीटमधील सदस्यांची मीटिंग झाली. मिटींगमध्ये शिरसिंग्याच्या खोऱ्यात वाघ ओरडल्याची आणि वाघाने सांबर मारलेल्याची माहिती दाजी ढमाल यांनी दिली. डिचोली, आंबेघर मधील लोकांनीही वाघाचे ओरडण्याचे आवाज ऐकलेले होते. वन खात्याने अजूनही जंगलात राहून काम करू इच्छिणाऱ्यांना दोन दिवसांची जादा परवानगी दिली. निलेशसह इच्छुक १२/१५ जण शिरसिंग्याच्या टॉवरवर पोहोचले. तिथे मुक्काम करून आठव्या दिवशी सकाळी वाघाने सांबर मारलेल्या पाभळ्याच्या पाण्याजवळ आले. तिथल्या परिस्थितीवरून वाघाचे सांबर खाणे सुरु असल्याचे लक्षात आले. यातून एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येत राहिला तो म्हणजे, पालीत दिसलेला वाघ हा इकडे शिरसिंग्यात येऊन सांबर मारू शकत नव्हता. अर्थात हे दोन्ही वाघ वेगळे होते. नर की मादी हे कोणालाच कळले नाही. बापूंनी यापूर्वी जंगलात किमान ५/६ वेळा वाघ बघितला होता. या निमित्ताने निलेश आणि सहकाऱ्यांनी कोयनेच्या जंगलात पहिल्यांदा ‘ऑनफूट’ वाघ पाहिला.

नेहमीपेक्षा वेगळी, वन्यजीवांचे काही ठोस पुरावे मिळतात का ? या शास्त्रीय दृष्टीने केली गेलेली ही प्राणीगणना होती. यासाठी सहभागींना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. या घटनेनं पट्टेरी वाघाचे कोयनेतील अस्तित्व निश्चित केलं. पालीतील प्रत्यक्ष दर्शन, शिरसिंगे येथील सांबराचे किल आणि मालदेव या ठिकाणी मिळालेल्या विष्ठा, पायांचे ठसे आदी पुराव्यांची बेंगलोरस्थित लॅबमध्ये शास्त्रीय तपासणी पूर्ण झाल्यावर २०११ च्या जानेवारी महिन्यात मेळघाट, पेंच

धीरज वाटेकर

 आरमारी ‘शिव’सत्तेत समुद्रीकोकणचा भौगोलिक प्रभाव !

भौगोलिक महाराष्ट्रातला समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश म्हणजे कोकण. कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. इथले दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. शिवपूर्वकाळात मुस्लिम सत्ताधीश त्यांना आपल्या सैन्यात आवर्जून भरती करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मावळ्यांना एकत्र करून मराठा साम्राज्य उभारले. सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. राजांचं पश्चिम किनारपट्टीवरील आरमारी सामर्थ्य अभ्यासताना, कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग पाऊलोपावली जाणवतो. प्रस्तुत लेखात आरमारी शिवसत्तेतील समुद्रीकोकणच्या भौगोलिक प्रभावाचा आढावा घेऊया !

सर्वात प्रभावी आणि जलद प्रवासाची सोय असलेल्या नौकानयनात आपले भारतीय प्राचीन काळापासून निष्णात असल्याचे उल्लेख इतिहासात भेटतात. अर्थात भारतीय राज्यकर्त्यांची नौकानयन परंपरा ही शांतता आणि व्यापाराची होती. प्राचीन लेण्यांमध्ये सागरीप्रवास आणि व्यापाराचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्रातील सातवाहन राजे त्रिसमुद्रतोयपितवाहनया गौरवास्पद उपाधीने स्वत:ला भूषवित. हजारभर वर्षापूर्वी दक्षिणेतील चोल राजांनी पूर्वआशिया (कंबोडिया-अंकोरवाट) भागात भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केलेला. तद्नंतर समुद्रबंदीसारख्या घातक रूढींमुळे भारतीयांनी समुद्राशी नाते तोडले आणि आपले वर्चस्व गमावले. महाराष्ट्राचा सागराशी असलेला संबंध हा यात्रा आणि अभ्यंगस्नानापुरता राहिला. त्यात समुद्री पर्यटनाचे अनुभव नसायचे. तेव्हा कोकण किनारपट्टी आरमारीदृष्ट्या विकसित नव्हती. इथे गुजराप्रमाणे खुल्या खोल समुद्रा थेट मार्गस्थ होता येत नसायचे. भौगोलिक मर्यादांमुळे येणाऱ्या अडचणी, साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे इथले लोकजीव किनाऱ्यालगत ५/७ किलोमीटरच्या परिघाच्या मर्यादेत वावरायचे. दक्षिण कोकणात तर खाड्या आणि खडकाळ भागांमुळे किनाऱ्यालगतचा प्रवास सावधपणे करावा लागे, आजही काही ठिकाणी अशी स्थिती आहे. उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेकडे गोवा सीमेवरील तेरेखोल खाडीपर्यंतची कोकण किनारपट्टी भौगोलिक वैशिष्ट्यांनी युक्त होती. इथली लोकसंस्कृती, माणसांचे स्वभाव, त्यांची वृत्ती, संघर्ष करण्याची मानसिकता हे सारे इथल्या इतिहास आणि भूगोलाचा परिणाम होते. पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पोहोचल्यावर इथले किनारवर्ती वातावरण बदलले. वास्को-द-गामा आल्याची नोंद जगाने घेतली, परंतु आपण नाही. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व भारतात अंमलात आणत सागरी सत्तेची फेरमांडणी केली. पुढे डच, फ्रेंच, ब्रिटिशकाळात हा संघर्ष वाढत गेला. या सागरी सत्तांनी बळकट जलदुर्ग आणि शक्तिशाली आरमार उभारले. तेव्हा एकाही स्थानिक भारतीय सत्ताधिशाकडे आरमार नव्हते. भारताचे बादशहा म्हणवून घेणार्‍या मोगल सत्ताधिशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता, पोर्तुगीजांना फी (कार्ताझ) देऊन विशिष्ठ मार्गावर फिरायचा परवाना घ्यावा लागे. हा कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज गलबतांचे कप्तान जहाजांना अडवत. मालमत्ता जप्त करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. पराक्रमासाठी आसुसलेल्या इथल्या मावळ्यांची मोट बांधली. विशेष पूर्वपरंपरा नसताना, कष्टातून, तरबेज आणि अनुभवी विरोधांना धूळ चारून, सागराचे व्यापारी महत्त्व ओळखून पहिलं स्वदेशी सागरी आरमार उभारलं. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापाराची खंडीत झालेली परंपरा सुरु केली. याची मांडणी सचिन पेंडसे यांच्या ‘मेरिटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ या पुस्तकात भेटते.

१६४८ मध्ये कोकणातील तळे, घोसाळे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा राजांचा सिद्दीशी संबंध आलेला. राजे स्वतः खलाशी किंवा दर्यावर्दी नव्हते. त्यांना आरमारी युद्धतंत्राची माहिती नव्हती. जवळ लढाऊ जहाजेही नव्हती. पाण्यातील किल्ले लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव नव्हता. मोगल आणि आदिलशाहीला भूमीवर शह देत कोकणात आरमार उभारणे सोपे नव्हते. पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज आणि डचांकडून आरमार उभारण्याचे कौशल्य शिकावयास मिळणे अशक्य होते. कोकणातला उंचचउंच सह्याद्री दक्खनच्या पठारापासून वेगळा होता. इथे घनदाट जंगल, अरबी समुद्र, खाड्या, समुद्रातील बेटे आदि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्यांमधील अंतर कमी राहाणार होते. याचे लष्करी डावपेचांमधील महत्त्व राजांनी अचूक हेरले होते. कोकणला पश्चिमेकडे समुद्राचे संरक्षण होते. पूर्वेकडूनही आक्रमणाचा धोका कमी होता. स्थानिक सरदारांच्या माध्यमातून वर्चस्व राखणाऱ्या आदिलशाह आणि मोगल बादशाह यांचे कोकणकडे विशेष लक्ष नव्हते. त्यांनी आरमारी सामर्थ्य उभे करण्याचा विचार केलेला नव्हता. पोर्तुगीज, इंग्रज आणि डच आक्रमकांपासून देशाला वाचविण्यासाठी, स्वराज्याला पूर्णत्त्व आणण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यशाली आरमाराची आवश्यकता महाराजांना जाणवलेली होती. भौगोलिकतेचा अचूक फायदा घेत राजांनी जमिनीवर गनिमीकावा तंत्र अवलंबिलेलं. तसं इथे, सागरी सत्तांवर अंकुश मिळवण्यासाठी आरमार आवश्यक होतं. किनारपट्टीवरील अवघड जागी किल्ले बांधणं गरजेचं होतं. याभागात फिरंग्यांचा संपर्क असल्याने शहरांचा विकास झालेला. वादळात सापडलेली जहाजे समुद्रकिनाऱ्यावर फुटत असत. त्यात असलेला माल स्थानिक सार्वभौम सत्तेच्या ताब्यात येत असे. आरमाराच्या दृष्टीने कोकणातील खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसरा होत्या. समुद्रकिनारी असणाऱ्या कठीण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी उत्तम होत्या. आरमारी संरक्षणाच्या दृष्टीने गिरिदुर्ग आणि जलदुर्गांची बांधणी आणि नवी संरक्षक स्थळे निर्माण करण्यासाठी किनारपट्टीवरील बेटे आणि समुद्रापर्यंत घुसलेले डोंगरसुळके मोक्याच्या जागा पुरवायला सज्ज होते. हे आरमारी महत्त्व लक्षात आल्याने राजे कोकणात शिरायची संधी शोधत होते.

जानेवारी १६५६नंतर औरंगजेब, बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. विजापूरला अली आदिलशाह मरण पावला होता. याकाळात राजांनी जावळी जिंकली. दाभोळवर भगवा फडकवला. तेव्हा कोकण किनारपट्टी निरनिराळ्या राज्यात विभागलेली होती. प्रजा अत्याचारांनी त्रस्त होती. सह्याद्रीतील डोंगररांगांच्या माथ्यावर उभे राहिलेल्या राजांना सागराच्या भव्यतेचे दर्शन झालेले. त्यांनी वेश पालटून कोकणपट्टीची पाहाणी करून घेतली. १६५७ला ते उत्तर कोकणात उतरले. त्यांनी कल्याण, भिवंडी परिसर जिंकला. आता जिंकलेला समुद्रकिनारा आणि मुलुखाच्या संरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता होती. आरमारी उभारणीसं आवश्यक नौका भर समुद्रात बांधता येत नाहीत. त्यासाठी लष्करीदृष्ट्या उपयुक्त अशी समुद्रातून आत घुसलेली खाडी आणि तळ कोकणच्या या भौगोलिक किनारपट्टीत मुबलक होतेच. १६५७ला कल्याणजवळील दुर्गाडी येथे उत्तम प्रतीचे सागवान वापरून पहिली २० जहाजे आणि लढाऊ गलबते बनविण्यास राजांनी सुरुवात केली. पुढच्या काळात राजांच्या आरमारात गाब्र (गुराब-तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज), तरांडी (माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करणारी नाव), तारव आणि गलबत (जलद चालणारे जहाज), शिबाड (मालवाहतूक करणारी व्यापारी जहाज), तिर्कटीतारू, मचवा, पडाव, होडी, डोण, पगार आदि प्रकार राहिले. राजांनी कल्याणची ही जबाबदारी सेनापती आबाजी सोनदेव यांच्यावर सोपविली. कामात आपल्या स्थानिक लोकांचा समावेश असणं लाभदायक ठरलं. जहाजांसाठी लागणारं लाकूड, कारागीर उपलब्ध होते, पण तंत्रज्ञान नव्हतं. हे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी वसईत तारवे बांधणारे कुशल पोर्तुगीज खलाशी लैतांव व्हियेगस आणि त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगस यांची मदत घेतली. त्यांच्यासोबत ३४० माणसं कार्यरत होती. आपल्या स्थानिक कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं हा यातला मुख्य हेतू होता. तसं राजांनी आबाजींना, ‘जी माणसे या कामावर नियुक्त कराल ती अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची हवीत, जी ते ज्ञान आत्मसात करू शकतील’ असं सांगितलं होतं. पोर्तुगालचे मुख्यालय असलेल्या गोव्यात मराठा आरमार उभारणीची ही वार्ता पोहोचल्यावर गडबड होण्याचा धोका होता. अल्पावधीत तसं घडलं. २ महिन्यांनी व्हेगास नोकरी सोडून गेला. अर्थात तोवर मावळे बरेचसे शिकले होते. राजांनी आपल्या जहाजांचे डिझाईन युरोपियन प्रमाणे न करता कोकणच्या भौगोलिकतेला अनुसरून केले. तेव्हा युरोपियन जहाजे खोल पाण्यात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बांधण्यात येत. त्यामुळे त्यांच्या पाण्याखालच्या तळाची खोली अधिक असायची. राजांची जहाजं ही किनारपट्टीच्या आसपास अधिक वावरणार होती. त्यांनी आपली सुरुवातीची जहाज छोटी आणि सरळ तळ असलेली, वेगाने किनारपट्टी जवळ पोहोचतील अशी बनविलेली. यामुळे राजांचे आरमार शत्रूंना आव्हान देऊ लागले. नौकाबांधणी, समुद्र, वारा, खगोलशास्त्र, नाविक रणनीती आदि ज्ञान शिकायला एकेक जन्म पुरायचा नाही हे वास्तव असताना राजांनी हे सारे जुळविले. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ ग्रंथातील, ‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ या वाक्यात मराठी आरमाराच्या प्रेरणेचे गुपित सामावले आहे. राजांना आरमारी, जहाज बांधणीज्ञान संपादन करण्यासोबत नौकाबांधणी, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडणारे जलदुर्ग बांधणे, माणसे प्रशिक्षित करणे आदि गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्यांनी पुढे आरमाराच्या वेगवेगळ्या तुकड्या बनविल्या. प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारची २०० जहाजं असायची. इथल्या भौगोलिकतेचा वापर करीत थेट खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी द्यायचे तंत्र वापरले. मोठी जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत असता शत्रु समोर आल्यास एकत्र येऊन झुंजायचे आणि वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास व गलबत योग्य चालवता येत नसल्यास शत्रूशी झुंज न देता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे, असे युद्धतंत्र होते.

राजे स्वतः शिस्तप्रिय असल्याने, आधुनिक प्रशासनाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवस्थेत दिसतात. नीती-नियमांचे काटेकोर पालन केले जाई. वर्षाचे ८ महिने राजांचे आरमार खुल्या समुद्रात असायचे. पावसाळ्याचे ४ महिने ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित ठेवले जायचे. हे काम समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधि व्हायचे. जहाजे खुल्या उथळ समुद्रात किंवा जलदुर्गाच्या खाली उघड्यावर नांगरून ठेवता येत नसत. छावणी दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात होई. एकाच बंदराच्या आसपासच्या गावांना अधिक कष्ट पडून नये, हे त्यामागचे कारण होते. नाविकांना पावसाळ्याचे ४ महिने शेतीत काम करावे लागे. आरमारात पठाणासोबत कोकणातील कोळी, सोनकोळी, आगरी, भंडारी, दादली, कोकणी मुस्लिम आणि कर्नाटकातील अंबी समाजाचे नाविक असत. या लोकांना समुद्र संचाराचे ज्ञान होते. गावाने प्रत्येकी १०० माणसांमागे २ माणसे आरमाराला द्यावीत अशी मागणी असे. राजांच्या आरमारात ५ हजार लोक होते. सागरी युद्धाच्यावेळी जलदुर्गांमधून आरमाराला युद्ध साहित्य पुरवण्यात येई. युद्धकैदी ठेवण्यासाठी जलदुर्गांचा उपयोग होई. जलदुर्गांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली जहाजे शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहात. नजीकचा परिसर, किनारपट्टी, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे होई. किल्ल्यांवरील सैन्य आणि तोफांमुळे समुद्रात आणि नदीत येऊ पाहणाऱ्या जहाजांना परतून लावता येत असे. राजांचे किल्ले उघड्या मैदानात किंवा सपाटीवर अभावाने आढळतात. भौगोलिकतेचा अचूक उपयोग करून नैसर्गिक बळकटी, अभेद्यता, जलसंचय आणि संरक्षण यांचा विचार येथे दिसतो. सिद्धीचे सामर्थ्य त्याच्या जहाजात होते. त्याचे आरमार दीडशे वर्ष जुने होते. तरीही राजांनी शून्यातून आपले आरमार उभारून त्याला सर्व शक्तीनिशी झुंज दिली. महाराज समुद्राकडे वळले नसते तर कदाचित सिद्दीशी संघर्ष करण्याचा प्रश्न आला नसता. परंतु स्वराज्याचे ध्येय त्यांनी तडीस नेले. आरमाराच्या जहाजांसाठी लागणारं लाकूड रयतेला त्रास न देता उपलब्ध झालं पाहिजे याबाबत राजे दक्ष होते. जहाज बांधणीस कमी पडलेली आंबा, फणसाची लाकडं त्यांनी कर्नाटकातूनही मिळवलेली. महत्त्वाच्या जहाजांसाठी बंदुकीच्या आणि तोफेच्या गोळ्यांपासून बचाव करणारे महत्त्वाचे लाकूड म्हणून ते सागवानाचा उपयोग करीत. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे राजांची १० हजारावर फौज होती. १६७४ च्या मे महिन्यात, लष्कराच्या छावणीला त्यांनी दिलेले पत्र, ‘आदर्श राज्य कसं असावं ?’ याचं उत्तम उदाहरण आहे. राई म्हणजे वनराई तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित राजांनी चलनी नाण्यांना शिवराईसंबोधलं असावं. पुण्याजवळच्या शिवापूरगावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. राजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केली. पुढे इंग्रजांनी ते तोडले. आजही बाणकोटला काही साग दिसतात.

राजांनी सिद्दीची इतर ठाणी जिंकली तरी, चौल (उत्तर) आणि दाभोळ (दक्षिण) या दोन प्राचीन बंदरांच्या मधोमध वसलेला जंजिरा जिंकणे आरमारासाठी आवश्यक होते. त्यासाठी प्रबळ आरमार आणि आर्थिक सामर्थ्य आवश्यक होते. म्हणून १६६४ मध्ये सुरत लुटण्यात आली. १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’शी राजांच्या आरमाराशी इस्ट इंडिया कंपनीच्या मरीनला लढावे लागले. सुरतेतून मिळालेल्या धनाचा उपयोग करून राजांनी २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग उभारण्याचे काम सुरु केले. राजांच्या हस्ते पायाभरणी झालेला तिथला दगडही आज भौगोलिकदृष्ट्या ‘मोरयाचा दगड’ नावाने प्रसिद्ध आहे. ८ फेब्रुवारी १६६५ ला आपल्या आरमाराचा उपयोग करत राजांनी आदिलशाही राज्यातील धनाढ्य बंदर बसरूरवर स्वारी केली. हे जोखमीचे काम अभ्यासल्यावर राजांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहाते. २९ मार्च १९६७ ला सिंधुदुर्गचे काम पूर्ण झाले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये म्हणून राजांनी येथे २ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. जंजिरेवर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा राजांच्या महत्त्वकांक्षेला आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर दुसरी राजपुरी वसवावी लागेल हा विचार करून त्यांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर सागरीदुर्ग बांधायचा निर्णय घेतला. या कुरटे बेटाजवळील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक होते. बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील होते. राजांनी तेथे गड बांधायचे निश्चित केले. गडावर चोहोबाजूंनी खारेपाणी असताना दहीबाव, साखरबाव आणि दूधबावची उपलब्धी, सुमारे ४० शौचकूपांचे बांधकाम तिथल्या भौगोलिकतेचा उपयोग स्पष्ट करते. यानंतर राजांनी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, सुवर्णदुर्ग बांधला. विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून संपूर्ण कोकण किनारपट्टी नियंत्रणाखाली आणली. हर्णै बंदरातील बेटावर १६६३ मध्ये बांधलेला सुवर्णदुर्ग हा राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजा भोज याने ११९५ ते १२०५ मध्ये बांधलेला किल्ला. आरमारी महत्त्व ओळखून राजांनी तो जिंकून घेतला. या भागातले भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे विजयदुर्गजवळची खडकात खोदलेली ३५५ फुट X २२७ फुट आकाराची गिर्ये गोदी होय. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार ५०० टनी जहाज येथे सहज बांधता येत असावे. अर्थात राजांकडील सर्वाधिक जहाज २५० टनी होते आणि १५० टनी जहाजे अधिक बांधली जात. विजयदुर्गपासून १५० मैल अंतरावर पश्चिमोत्तर समुद्रतळातील ४०० मीटर लांबीची तटबंदीही भौगोलिकतेचे दर्शन घडवते. ज्या भागात ही तटबंदी आहे त्या बाजूने येणारी अनेक जहाजे शिवकाळात, धडकून फुटून गेल्याची नोंद आहे. हे कशाने घडते ? याचे कोडे पोर्तुगीज आणि इंग्रजांना पडायचे. विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथे राजांनी पश्चिमोत्तर समुद्राच्या तळात ही संरक्षक तटबंदी उभारल्याचे किंवा ती शिलाहारांच्या काळात बांधली गेली असावी असे म्हटले जात असले तरी संशोधकांच्या म्हणण्यानुसार ती भिंत नैसर्गिक आहे. पुण्याच्या डेक्कन पुरातत्त्व संस्थेचे निवृत्त संशोधक डॉ. अशोक मराठे हे  कोकण किनारपट्टीवर पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीचा अभ्यास करत असताना त्यांना केळशी-हरेहरेश्वर ते विजयदुर्ग दरम्यान किनारपट्टीलगत एक रेष आढळून आली होती. ही दगडी भिंत असल्याच्या प्राथमिक अंदाजानंतर डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्यात पाणबुडे उतरवले. तेव्हा ही भिंत ८ हजार वर्षे पुरातन असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजचे संशोधक सहायक सचिन जोशी यांनीही मिथ्स अँड रिअॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅपट फोर्ट विजयदुर्गया विषयावर शोधनिबंध सादर करताना, ‘विजयदुर्ग किल्ल्याजवळची समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे’ असे म्हटले होते. नंतरच्या काळात आंग्रेंनीही याच भागात समुद्रातील टेकडी ‘आंग्रे बँक’ शोधली. अर्थात या साऱ्या भौगोलिकतेचा उपयोग सुरुवातीच्या काळात राजांनाही झाला.

इंग्रजांनी २६ नोव्हेंबर १६६४ ला इस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या एका पत्रात, ‘शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठविली आहेत.’ असे लिहिले होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार, १६६५ मध्ये मराठा आरमारात ८५ लढाऊ आणि ३ उच्च दर्जाची जहाज होती. पोर्तुगीज विजरई कोंदि द सांव्हिसेति याने राजांच्या आरमाराविषयी १६६७च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास, ‘शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते. त्याच्याविरुद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावर किल्ले बांधले. आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत’ असे कळविले होते. संपूर्ण राजवटीत तारवांमधून (संगमिरी) स्वारी करणारे राजे कदाचित एकमेव असावेत. राजांनी १६७० मध्ये नव्याने १६० जहाजांची बांधणी नांदगाव (कुलाबा) येथे केली. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावरील संगमेश्वरजवळच्या ओझरखोल (निढळेवाडी) येथेही राजांनी नौकाबांधणी सुरु केली होती. छत्रपतींच्या आरमारातील प्रसिध्द 'संगमेश्वरी' नौका इथली. शिवकालीन नौकाबांधणीची ही तंत्रपरंपरा आजही सुरु आहे. चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीवरील गोविंदगड हा दाभोळ खाडीतील आरमाराला निरोप पोचविणे, तेथून येणारे निरोप स्वराज्याची राजधानी रायगडावर पोचविणे या कामातील दुवा म्हणून काम करायचा. रायगडावर विशिष्ठ ठिकाणी आग पेटविल्यावर गोविंदगडाच्या समोरील सह्याद्रीतून ती दिसायची. रायगडावर पेटविलेली आग पाहून गोविंदगडावर खुणेची आग पेटविली जाई. याद्वारे फार थोड्या वेळात राजधानी रायगड ते मराठा आरमार यांच्यात संदेशाची देवाणघेवाण होई, इथे आपल्याला भौगोलिक महत्त्व दिसून येते. राजांनी या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रावर जरब बसवित सागरी व्यापार सुरु केला. समुद्राला पश्चिमेकडील नद्या जिथे मिळत तिथे बंदरे होती. त्यातूनही वाहतूक चाले. खास मीठाच्या (सॉल्टफ्लीट) वाहतुकीसाठी राजांनी गलबतांचा तांडा तयार करून घेतला होता. १६६५ च्या सुरतकर इंग्रजांच्या पत्रानुसार, दरवर्षी दक्षिण कोकणातील ७/८ बंदरातून राजांची २/३ गलबते पर्शिया, बसरा, आणि मोक्का (अबेसॅनिया) बंदरात व्यापारासाठी जात. परकीय सत्तांशी व्यापार करताना राजांनी आयात कमी आणि निर्यात जास्त हे वाणिज्य अनुकूल धोरण अवलंबिले होते. कोकण आणि घाट जोडणारे घाटमार्ग हे व्यापाराचे राजमार्ग होते. त्या मार्गांवर उभारलेले किल्ले चेकपोस्टचे काम करायचे. १६६९ पर्यंत गोवा, वसई, मुंबई ही मोठी समुद्री शहरं वगळता सगळं ताब्यात घेतलं. आरमाराला एक सुसंघटीत आणि फायदेशीर संस्थान बनवलं. या आरमाराने पुढे जवळपास १५० वर्ष राज्य केलं.

राजांनी मुरुड-जंजिऱ्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) बांधला. या पद्मदुर्गच्या भिंतींचे दगड झिजलेत पण दरजा भरलेला चुन्याचा मसाला झिजला नाही. मुंबईजवळ खांदेरी बंदरावरच्या बेटावर १६७२ मध्ये किल्याचं बांधकाम सुरु केलं. तत्पूर्वी या बेटांवर युरोपियन लोकांना गोड्या पाण्याची सोय करणे जमले नव्हते. राजांनी आपल्या संस्कृतीतील ज्ञानाच्या आधारे येथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. कामास विरोध करण्यासाठी इंग्रजांनी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे ठरवले. त्यांना आपल्या मोठ्या जहाजांचे विशेष महत्त्व वाटत होते. त्यामुळे कोकणातला उथळ समुद्र आणि खाड्यांचा विचार करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांच्या मोठ्या जहाजांना खाडीमध्ये ठिय्या देणे जमले नाही. वार्‍यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात. त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. उथळ पाण्यात मराठ्यांच्या छोट्या बोटींविरोधात इंग्रजांच्या बोटी जिंकू शकल्या नाहीत. राजांनी आपले आरमार आपल्या हद्दीत वावरणारे केलेले. मराठे लोकं रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत विविध बेटांवर सामान पोहवत. इंग्रज जहाजे पूर्णपणे वार्‍यावर अवलंबून असत. खांदेरीच्या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलयी वारे आदिंचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. खांदेरी उभारताना आजूबाजूला मोठाले दगड टाकण्यात आले. त्याच्यावर कालवे वाढून दगडाच्या कडा धारधार होतील. पायाला इजा होऊन त्यास सागराचे खारेपाणी लागताच आग होईल आणि पोहोचणं अवघड बनेल अशी योजना होती. जवळचा काशाखडक ते खांदेरी हा सागरीप्रवास खडकाळ आहे. तिथे पाण्याला उलट-सुलट प्रवाह असून अचानक बदलणारे वातावरण अशी त्या सागरीपट्ट्याची आजही भौगोलिक ओळख आहे. १६७८ ला कुलाबा किल्याचं काम सुरु झालं. मोठाले दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधण्यात आल्या. चुन्याने दरजा भरल्या नाहीत. समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळल्या की त्यांचं पाणी दोन दगडांच्या फटीतून आत जावं आणि पाण्याच्या प्रवाहाचा रोध कमी व्हावा, हा विचार भौगोलिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीतल्या समुद्री कोकणला राजांनी आरमारी उभारणीने बळकट बनवले. त्यांनी जमिनीवरील युद्धात जसा सह्याद्रीतले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले आदि भौगोलिकतेचा पुरेपूर वापर करून घेतला तसाच आरमारी युद्धात किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेचा उपयोग केला. स्वराज्य निर्मितीसाठी निष्ठावान मावळ्यांप्रमाणे सह्याद्री, सागराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. राजांच्या आरमाराविषयी जेम्स डग्लस म्हणतो, ‘शिवाजी जन्माने खलाशी नव्हता, ही त्या ईश्वराची कृपा होय. जर असता तर जशी त्याने भूमी पादाक्रांत केली त्याप्रमाणे सागरावर आपला अंमल गाजवला असता. खलाशी नसताना त्याने सागरावर आपले वर्चस्व स्थापन केलेच.’ सह्याद्री आणि सागराच्या या इतिहासात मानवी सामर्थ्याला अपयशी करण्यास निसर्ग आणि भौगोलिकता कारणीभूत ठरल्याचे दिसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य आणि आरमार उभारण्यापासून कोणालाही रोखता आलं नाही.

राजांच्या जीवनातील व्यवधानता पाहाता, सागरी सत्तेसारख्या अनोख्या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या असामान्य कर्तृत्त्वात भौगोलिकतेचा मोठा प्रभाव आहे. राजांच्या आरमाराविषयी कमी लिहिलं गेलं आहे. आजही जगातील ९० टक्के व्यापारी माल आणि वस्तूंची वाहतूक सागरी मार्गाने जहाजाद्वारे होत आहे. आगामी काळात समुद्रमार्ग हा प्रवासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह मोठ्या प्रमाणात खुला व्हायला हवा आहे. तसा तो व्हावा म्हणून अख्खं जग प्रयत्न करते आहे. आपले केंद्र सरकारही यावर काम करते आहे. महत्त्वाचा मार्ग म्हणून सागरीमार्गाला महत्त्व यायला विमान आणि रस्त्यांचे अपघात, प्रवासास लागणारा वेळ, आणि पैसा हेही कारण आहे. केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नातून ‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ अंतर्गत समूह सागरी सेवा प्रकल्प गोव्यात सुरु होण्याबाबतची वृत्त आपण वाचली आहेत. प्रत्येकाला समुद्राच्या तळाशी जाणे शक्य नसल्याने भविष्यात जगातल्या समुद्रीतळाची डिजिटल लायब्ररी तयार होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच भारताने सागरी सत्ता बनण्यासाठी विचार करायला हवा आहे. वर्षभरापूर्वी मुंबई विद्यापीठात सागरी मार्ग वाहतूक यावर एक सेमिनारही झाला होता. आपला अधिकतर इतिहास हा बखरी आणि प्रवासवर्णनातून लिहिला गेलेला आहे. त्याजोडीला इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा चिकित्सक अभ्यास वास्तूविशारदशास्त्राच्या दृष्टीने व्हायला हवाय. त्यातून इतिहासाची अधिकची भौगोलिक चिकित्सा पूर्ण होऊ शकेल.

संदर्भ :

१. मराठी विश्वकोश (http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9817&Itemid=2)

२. केतकर ज्ञानकोश

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी प्रशासनातील मुसलमानांचे योगदान (http://14.139.13.47:8080/jspui/bitstream/10603/241792/9/09_chapter%203.pdf)

४. मराठी सत्तेचा उदय, शिवाजी विद्यापीठ बी.ए. भाग १ (http://www.unishivaji.ac.in/uploads/distedu/2019_2020/SIM%202019/B.%20A.%20Part-I%20History%20(Rise%20of%20Maratha%20Power)%20sem%20I.pdf)

५. https://www.thinkmaharashtra.com/node/2045

६. शिवछत्रपतींचे आरमार - गजानन भास्कर मेहेंदळे

७. महाराष्ट्रेतिहास परिषद निबंध संग्रह-३, १९६८

८. कोकणचा राजकीय इतिहास – डॉ. खोबरेकर (१९९७)

९. इतिहास आणि भारतीय संस्कृती – जानेवारी - मार्च २०१२         

१०. इतिहास आणि भारतीय संस्कृती – एप्रिल – जून २०१६                                  

११. छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) – वा. सी. बेंद्रे

१२. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आणि नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे आणि मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद ‘ए फिफ्थ पर्स्पेक्टीव्ह’चे चंद्रशेखर बुरांडे यांच्याशी चर्चा. 


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. 

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, 

 कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे ‘कलादालन’


देशातील ४५ भारतरत्नांपैकी ६ कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची किर्ती जगभरात पोहोचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदि विविध क्षेत्रात जगात नावलौकिक मिळविणाऱ्या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेले ‘सुरेश भार्गव बेहेरे व्यक्तिचित्र कलादालन’ नुकतेच (१७ नोव्हेंबर) रसिक-जिज्ञासूंना पाहाण्यास खुले झाले. मुंबई ते गोवा दरम्यान अश्मयुगकालीन ठेवा असलेल्या एकमेव वस्तूसंग्रहालयाची (२४ नोव्हेंबर २०१८) उभारणी केल्यानंतर वर्षभरातच वाचनालयाने कलादालन खुले केले. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाजसाहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ हे दोनही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्वाचे आहेत.      

कोकणातील बुद्धिमत्ता हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय असलेले भारत सरकारच्या नवी दिल्ली भटके विमुक्त जनजाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत पुणे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते सुरेश भार्गव बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘व्यक्तिचित्र कलादालन’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोकणात बुद्धिमंतांची मांदियाळी आहे. इथली बौद्धिक शक्ती प्रचंड आहे. कोकणने अनेक महनीय व्यक्तिमत्त्व जगाला, देशाला दिलीत. त्याबाबतची माहिती येथे मिळते. प्रकल्पाची उभारणी होत असताना, सर्वांच्या सक्रीय सहकार्यातून स्वप्नपूर्तीचा आनंद’ अनुभवता आल्याची वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांची प्रतिक्रिया प्रकल्प उभारणीमागची कहाणी सांगते. याच उद्घाटन कार्यक्रमात डॉ. शिंदे यांना लो.टि.स्मा.च्या अरविंद तथा अप्पा जाधव उपरान्त संशोधन केंद्राचा पहिला अपरान्त भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून हडप्पा हीच वैदिक संस्कृतीअसल्याचा निष्कर्ष मांडणारे डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते या कलादालनाचे उद्घाटन झाले. हडप्पा संस्कृतीला कोणा परकीय आर्यानी नष्ट करून स्वत:ची संस्कृती वसवली. या गेल्या दोन शतकातील विचारला छेद देणारे संशोधन डॉ. शिंदे यांनी पुढे आणले. मूळचे मोरवणे-चिपळूणचे असलेले डॉ. वसंत शिंदे गेली अनेक वर्षे हडप्पा संस्कृतीवर संशोधन करत होते. हरयाणा येथील राखीगढी या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरील उत्खननादरम्यान त्यांना ४५ वर्षीय हडप्पाकालीन महिलेच्या कानातील हाडात अखंड डीएनएचे काही नमुने मिळाले. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर त्या स्त्रीची गुणसूत्रे आणि आज भारतीयांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांमध्ये कमालीचे साम्य असल्याचे पुढे आले. हे साम्य पडताळून पाहण्यासाठी डॉ. शिंदे आणि त्यांच्या सहसंशोधकांनी १४०० भारतीयांच्या डीएनएचे नमुने गोळा केले. आपण भारतीय त्या हडप्पाकालीन संस्कृतीचेच वंशज आहोत व आर्य कोणी बाहेरून आलेले नसून तेही याच संस्कृतीचा एक भाग असल्याचा दावा डॉ. शिंदे यांच्या टीमने केला. त्यांचा हा शोधप्रबंध सेल व सायन्स या दोन जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला. याचा आधार घेत संग्रहालय आणि कलादालन प्रकल्पाचे ‘योजक’ वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी वाचनालयावर अनेकांचा विश्वास असल्याचे नमूद करून केलेले ‘वसंतराव शिंदे सरांनी वाचनालयाला मोठं व्हायला संधी दिली’ हे विधान डॉ. शिंदे यांच्या कार्याबद्दल खूप काही सांगून जाते. डॉ. वसंतराव शिंदे यांनी ‘आर्य भारतीयच होते’ हा मांडलेला सिद्धांत सन १९४६ ला आपल्या एका ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्याचे इदाते यांनी नमूद केले. इदाते यांनी आपल्या भाषणातून कोकणाची बौद्धिक संपत्ती उलगडली. त्या संपत्तीला कायमस्वरूपी तैलचित्रांच्या माध्यमातून कलादालनाच्या रूपाने उभारण्याचा वाचनालयाचा विचार अत्यंत अभिनंदनीय तितकाच अनुकरणीय आहे.
   
खरतरं कलादालन ही सुरुवात आहे. हे प्रवाही काम आहे. यात अजून बरीच नावे जोडता येण्यासारखी आहेत. आगामी काळात वाचनालयाच्या माध्यमातून ते होतही राहाणार आहे. मूळचे धामणीचे डॉ. हरिभाऊ वाकणकर हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना डोंगरात चित्र दिसली. त्यांनी ट्रेन मधून उतरून पुढचे आठ दिवस अंगावरच्या वस्त्रानिशी तिथे काढले. ज्यातून जगातील सर्वात पुरातन ठेवा २ लाख वर्षांपूर्वीची शैलचित्रे जगापुढे आली. त्यांचे तैलचित्र येथे भेटते. आरे-गुहागरचे सीताराम केशव बोधे यांनी सन १९२३ साली ‘अस्पृश्यांना सार्वजनिक जागी जाता आलं पाहिजे’ असा डॉ. आंबेडकरांच्या चवदारतळ्याच्या सत्याग्रहाला पूरक ठरणारा ठराव विधिमंडळात मांडला होता. त्यांच्याबाबतची माहिती येथे मिळते. यासह कलादालनात आपल्याला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, भागोजीशेठ कीर, बाळासाहेब ठाकरे, स्वामी स्वरूपानंद, टेंबे स्वामी, दादासाहेब मावळकर, भास्करराव जाधव, डॉ. हरिभाऊ वाकणकर, वासुदेव विष्णू मिराशी, हमीद दलवाई, श्री भी वेलणकर, गोळवलकर गुरुजी, अनंत कान्हेरे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, नानासाहेब जोशी, रियासतकार सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सेनापती बापट, बाळाजी विश्वनाथ, डॉ. आनंदीबाई जोशी, दुर्गाबाई भागवत, सचिन तेंडूलकर, गोविंद वल्लभ पंत, धोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, विंदा करंदीकर, बॅ. नाथ पै, नानासाहेब गोरे मधु मंगेश कर्णिक, राम मराठे, शंकर घाणेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, भार्गवराम विठ्ठल वरेरकर, एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, डॉ. तात्यासाहेब नातू, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णुपंत छत्रे, वसंत देसाई, सुरेश भार्गव बेहेरे, नाना शंकरशेठ आदि ८० तैलचित्रे येथे आपल्याला पाहाता येतात. प्रत्येक चित्रामागे, आयुष्यामागे मोठं काम उभं आहे. त्याची आवश्यक जाणीव, अभ्यास वाचनालयाकडे आहे. म्हणूनच वाचनालयातर्फे आगामी काळात कलादालनातील व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारे पुस्तिक प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक घराघरात पोहोचविण्याचा वाचनालयाचा मानस आहे. 


कोकणातील असामान्य व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, विविध क्षेत्रातील त्यांच्या अभिमानास्पद कार्याचा परिचय करून देण्यासाठी लोटिस्माने व्यक्तिचित्र कलादालन साकारले. अनेक दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्यातून कोकणच्या सुपुत्रांची तैलचित्रे या कलादालनात साकार झाली आहेत. तीन वर्षांच्या मेहनतीतून साकारलेल्या या तैलचित्र कलादालनात आपल्याला रविंद्र धुरी, तुकाराम पाटील, सीताराम घारे, रामचंद्र कुंभार, एस. टी. शेट्ये, के. जी. खातू, विक्रम परांजपे या ख्यातनाम चित्रकारांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेली चित्रे भेटतात. चित्राखालची माहिती वाचत, हॉलमधील भारून टाकणारे ऐतिहासिक वातावरण ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवत प्रत्येकाला विलक्षण क्षणाचे साक्षीदार होता येतं. पाहणाऱ्याला आपण आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण जगत असल्याची निश्चित अनुभूती घेता येईल इतकी क्षमता या प्रकल्पांत आहे. हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले (माफक शुल्कासह) असते. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : ०२३५५ २५७५७३, मो. ९४२३८३१६६८.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
दैनिक तरुण भारत नागपूर दिनांक २६.११.२०१९
INCLUDES NAGPUR AKOLA WASHIM YAVATMAL
VARDHA  BHANDARA GONDIYA  CHANDRAPUR
GADACHIROLI BULDHANA AND KHAMGAON

दैनिक प्रहार दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 

दैनिक तरुण भारत (संवाद पुरवणी) दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 
दैनिक रामप्रहर रायगड (दिनांक २९ नोव्हेंबर २०१९)
वरील लेखाची लिंक : https://ramprahar.com/33256/

 रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले संवर्धन


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या दुर्गांचे संवर्धन हा महाराष्ट्रीयनांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे यावर सर्वांचंच एकमत आहे. शासनही अधूनमधून या विषयात काहीतरी करत असते. या साऱ्यांतून प्रत्यक्षात किल्यांवर काय घडते ? याची जाणीव सह्याद्रीत डोळस भटकंती करणाऱ्या जवळपास सर्वांनाच आहे. निसर्गाला आणि निसर्गातल्या कोणत्याही पुरातत्त्वीय अवशेषाला धक्का न लावता, तिथली साफसफाई राखून तात्पुरत्या स्वरुपात, भेट देणाऱ्या समूहाला आकर्षित करणारे काही करता येत असेल तर ते व्हायला हवे, या मताचे आम्ही आहोत. या निमित्तानं गडकिल्यांचं महत्व, इतिहास, पावित्र्य राखता येऊ शकतं. त्या त्या भागात गड किल्यांकडे स्थानिक संस्था, तरुण उत्साही मंडळी कायम आत्मियतेने पाहात असतात. या वास्तूंच्या स्वच्छता, संवर्धनात आपापल्या क्षमतांनुसार भूमिका बजावित असतात. सतत काहीनाकाही कृतिशील उपक्रम राबवित असतात. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन विषयात सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा आढावा !

सन २०१७ साली जागतिक पर्यटन दिनी किल्ले मंडणगड येथे ब्ल्यू ग्रीन एक्झॉटिकाने तालुक्यातील तायक्वांदो आणि महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविली होती. मंडणगड तालुक्यातील बाणकोटच्या ऐतिहासिक किल्ले हिंमतगडच्या प्रवेशद्वारासमोरील बुरुजाला लागून सन २०१४ पूर्वी एका टाकीचे बांधकाम करण्यात आले. ती टाकी त्वरेने पाडण्याची मागणी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने हे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालकडून मिळाल्याचे सांगितले होते. श्रीवर्धनच्या शिवछत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानने चालूवर्षी मे महिन्यात बाणकोट खाडीकिनारी असलेल्या किल्ले हिम्मतगड येथे स्वच्छता मोहिम राबविली. दापोली तालुक्यातल्या हर्णै गावात सुवर्णदुर्ग, गोवागड, कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग अशी प्रसिद्ध दुर्गचौकट आहे. या किल्यांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी बा रायगड परिवार, क्षेत्र सुमारगड संवर्धन समिती वाडीमालदे, शिवसह्याद्री समूह या संस्थांच्या २५ सदस्यांनी ‘सुमारगड संवर्धन मोहीम' राबविली. या अंतर्गत गडावरील वास्तू / अवशेष मोजमाप नोंदी, नकाशा स्थाननिर्देश निश्चिती, गडावरील तीन टाकीच्या वर असलेल्या टाकाची स्वच्छता, न्हानचं टाकच्या बाजूला असलेल्या भुयाराची स्वच्छता, वाडीमालदे ते किल्ले सुमारगड मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. याचवर्षी पुन्हा जून महिन्यात ‘स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान’ संस्थेने सुमारगड संवर्धन मोहिमेंतर्गत वृक्षारोपण केले. किल्यावरील महादेव मंदिराच्या वरील बाजूस जास्वंद, बाभूळ, एरंड जांभूळ जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यंदाच्या जुलै महिन्यात किल्ले रसाळगडाच्या कोठाराची भिंत ढासळली. गेल्या १० वर्षांत या किल्यावर ‘संवर्धन’ अंतर्गत शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा रसाळगड राज्य शासनाने २००२ साली पर्यटन विकास व संवर्धन करण्यासाठी राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. संवर्धनात पुरातन सात थरांची दीपमाळ पाच थरांची झाली आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यात आला. दोन दशकांपूर्वी दुर्गम असलेला किल्ला पर्यटक व इतिहासप्रेमींच्या जवळ आला. किल्ल्यावर दरवाजा, पायऱ्या, कोठार, तोफा, इमारती, बुरुज, मंदिर परिसर यांवर शासनातर्फे खर्च करण्यात आला. सन १९९० पासून या किल्याची डागडुजी चर्चेत आहे. या किल्यावर वीज आली आहे. किल्याच्या डागडुजीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रत्नागिरी गडकोट वाचवा समितीने केला होता. सन २०१४ साली किल्याच्या तटबंदीलगत ७०० झाडांचे रोपण करण्यात आले होते.  

गेली सतत ५ वर्षे कार्यरत, विविध पुरस्कारांनी सन्मानित ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ हे किल्ले गोविंदगड (गोवळकोट) संवर्धनातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. तीन वर्षांपूर्वी गोवळकोट धक्क्यावरील पुरलेल्या अवस्थेत असलेल्या सहा तोफा गोविंदगडावर संरक्षित करण्याचे महत्वाचे काम या संस्थेने केले आहे. या कामी ग्लोबल चिपळूण टुरिझम, करंजेश्वरी देवस्थान आदि संस्थांनीही महत्वाची भूमिका बजावली होती. प्लास्टिकमुक्त गडकिल्ले मोहिमेंतर्गत या किल्याची स्वच्छता, शिवजयंती, त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव, पर्यटकांना मार्गदर्शन, वृक्षारोपण, संवर्धन या विषयात संस्था कार्यरत आहे. संस्थेला ‘सह्याद्री सन्मान पुरस्कार’ आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा ‘समाजसेवा’ पुरस्कार मिळालेला आहे. दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी या संस्थेला स्वच्छता मोहीम, गडाला उर्जितावस्था आणण्याकरिताचे प्रयत्न यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व वस्तूसंग्रहालये संचालनालय मुंबई यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव पर्यटन, गड संवर्धन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

सन १९६० साली तीनशे रुपयांना विकला जाऊन खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ / १६ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाला. तरीही किल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे, पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेले मध्यंतरी आढळले होते. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी आवाज उठविल्यावर हे कुलूप काढण्यात आले. साधारणतः १५ / १६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवला होता. तेव्हापासून अनेकांनी हा विषय लावून धरण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अलिकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी दीपक वैद्य, शिवतेज फाऊंडेशन, अॅड. संकेत साळवी, मनोज बारटक्के, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे आदिंनी प्रयत्न केले होते. तळ कोकणातल्या एखाद्या किल्याच्या मुक्ततेसाठी वर्तमान शतकात दिला गेलेला हा सर्वात मोठा लढा आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळचा विजयगड राज्य संरक्षित व्हावा याकरिता ग्रामस्थांनी यावर्षीपासून सह्यांच्या मोहिमेद्वारे प्रयत्न सुरु केले. गावातला शिवजयंतीचा उत्सव गडावर साजरा होतो. विजयगडावर मार्च २०१६ मध्ये १० फुट खोल संशयास्पद खोदकाम, शेजारी, नारळ, उदबत्ती, दही आढळून आलेले होते.  

चालू वर्षाच्या सुरुवातीस रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत शिवकालीन किल्ले महिमतगड स्वच्छता आणि संवर्धन मोहीम हाती घेतली. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमानी मंडळीनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. ऑक्टोबर २०१८ पासून या कामाला सुरुवात झाली. तालुक्यात प्रचितगड आणि महिमतगड असे दोन किल्ले आहेत. या गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा म्हणून ग्रामस्थ गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी, गावाजवळ असलेले ऐतिहासिक वैभव आपणच संवर्धित करायचे या निर्णयाने ग्रामस्थ प्रेरित झाले. या शिवकालीन गडाचे संवर्धन करण्याचा एकमुखी ठरावही केला आहे. मोहिमेअंतर्गत गडाकडे जाणारी वाट, प्रवेशद्वार स्वच्छ करण्यात आले. मार्गावर दिशादर्शक फलक उभारण्यात आला. झाडा-झुडपांनी, वेलींनी वेढलेल्या भिंतीनी मोकळ्या केल्या. यासाठी १०० पेक्षा अधिक जण कार्यरत होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये याच महिपतगडावर ‘ट्रेकशिरीष’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले होते. तेव्हा पावसामुळे गडावर गवत वाढून गडाचा दरवाजा झाकला गेला होता. काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली होती. पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या पडल्या होत्या. या साऱ्याची स्वच्छता करण्यात आली. ‘सह्यकडा अॅडव्हेंचर्स’ संस्थेच्या शिलेदारांनी डिसेंबर २०१६ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील किल्ले भवानीगड ट्रेक दरम्यान स्वच्छता मोहिम राबविली होती. ट्रेकिंग करून दमलेले असताना या टीमला तिथल्या अस्वच्छतेने अस्वस्थ केले. मंदिराच्या एका कोपऱ्यात ठेवलेले खराटे, झाडू त्यांना दिसले. त्यांनी इथल्या मंदिरातील कचरा, जाळ्या, जळमटे, पालापाचोळा, इतस्त पडलेल्या लग्नपत्रिका आदिंची स्वच्छता केली. मंदिरातील मूर्ती, घंटा स्वच्छ केल्या. वस्तू नीटनेटक्या ठेवल्या. गडावर असलेली एकमेव तोफ स्वच्छ केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या कुंडी-निगुडवाडी गावच्या सीमेवर असलेला महिपतगड (मेहमानगड) सुस्थितीत रहावा, तिथली साफसफाई व्हावी, ऐतिहासिक वस्तू, वास्तू व्यवस्थित राखली जावी यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या उपस्थितीत गडावर दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्ट्रदिनाला ध्वजवंदन केले जाते. यावेळी स्वच्छताही केली जाते. गड चढाईसाठी सोपा, पोहचण्यास लागणारा कमी कालावधी यांमुळे पावसाळा वगळता इथे शिवप्रेमी, पर्यटक, ग्रामस्थांची वर्दळ असते.

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे राज्यभर किल्ले स्वच्छता आणि संवर्धन, पर्यावरण संरक्षण मोहिमा सुरु असतात. किल्ले जयगड या ठिकाणीही गेली दोन वर्षे ही संस्था आपली मोहिम राबवते आहे. राज्यभरातून जवळपास पाचशे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होत असतात. संस्थेने यावर्षी राबविलेल्या मोहिमेत राज्याच्या २१ जिल्ह्यातून सहाशे कार्यकर्ते एकत्र आले होते. किल्ले जयगड स्वच्छतेत संपूर्ण किल्याचा परिसर, बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदीवरील झुडपे काढणे, परकोट सफाई, बुरुज स्वच्छता करण्यात आली. सन २०१५ साली पावसाळ्यात मावळा प्रतिष्ठान परिवाराने भगवती देवी ट्रस्टच्या मदतीने रत्नदुर्ग किल्यावर दोन दिवशीय स्वच्छता आणि संवर्धन मोहिम राबविली होती. या अंतर्गत वृक्षारोपण, विहिरांची साफसफाई, परिसर सफाई करण्यात आली. रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंग ही संस्था रत्नदुर्गसह विविध किल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा सातत्याने राबवित असते. संस्थेची रत्नदुर्ग किल्ला परिसर स्वछता व संवर्धन मोहिम गेली ५ वर्षे सातत्याने सुरु आहे. संस्थेच्या ट्रेकिंग उपक्रमातही सहभागींना किल्ले स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले जाते. परिसरातल्या समुद्र स्वच्छतेच्या कामातही ही संस्था पुढाकार घेत असते. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, रत्नागिरी-पावस-आडिवरे-कशेळी-राजापूर या सागरी महामार्गावर असलेल्या महत्वाच्या पूर्णगड किल्याची ढासळलेली तटबंदी जांभा दगड वापरून, पुरातत्व विभागातर्फे दुरुस्त करण्याचे काम, दोन चबुतरे बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी पर्यटकांना अर्धा तास लागतो.

लांजा तालुक्यात साटवली गढी / भुईकोट किल्ला हा पाच बुरुजांचा आहे. याच्या संवर्धन आणि स्वच्छतेसाठीही दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी, शिवगंध ढोल पथक, लांजा आणि स्थानिक ग्रामस्थ, तरुणांनी यावर्षी पुढाकार घेतला. चालू वर्षी मे महिन्यात श्रमदान करून गढीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोहिम राबविण्यापूर्वी या संस्थांनी तरुणाईला सोशल मिडीयाद्वारे एकत्र येण्याचे आवाहनही केले होते. स्वच्छतेपूर्वी गढीला झाडा-झुडुपांनी पूर्णतः घेरलेले होते. या टीमने वाढलेली ही झुडुपे बाजूला करण्याबरोबरच कचरा आणि गवतही साफ केले. राजापूर जवळच्या नाटे गावातील किल्ले यशवंतगडाची हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान (राजापूर), शिव संघर्ष संघटना (नाटे), राजा शिवछत्रपती परिवार आणि शिवप्रेमींकडून किल्ल्याची साफसफाई केली जाते. गतवर्षी जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी २४, २५ नोव्हेंबरला येथे संवर्धन मोहिम राबविली होती. मोहिमेंतर्गत गडाचा दरवाजा, तटबंदी, चौथरे स्वच्छ करण्यात आले. यासाठी स्थानिकांसह एकूण ३५ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. किल्ले यशवंतगडाची विक्री झाली आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे आहे. त्यांनी हा किल्ला ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना विकला आहे. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना या गडाची विक्री झाल्याचे, माहिती अधिकाराचा उपयोग करून समीर शिरवडकर यांनी जाहीर केले होते. राजापूर शहरातील किल्ला अर्थात ब्रिटीश वखारीची पुनर्बांधणी करून तिथे पुरातन वस्तूसंग्रहालय आणि कलादालन उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये पत्र दिले आहे. या वखारीचे जतन व्हावे यासाठी स्थानिकांनी नवा आराखडा तयार केला आहे. अर्जुना नदीकिनारी असलेली ही वखार ब्रिटिशांनी सन १७०८ मध्ये बंद केली. त्यानंतर बराच काळ इथे सरकारी कचेऱ्या कार्यरत होत्या. इमारत मोडकळीस आल्यानंतर काही सकारात्मक घडेल या हेतूने अनेक वर्षे शासन दरबारी प्रयत्न करून अपयश आल्यावर सन २००४ मध्ये राजापूर नगरपरिषदेने / सार्वजनिक बांधकाम विभागाने ही वखार पाडली. सध्या ही वखार राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित आहे. या वखारीतून ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी शिवरायांच्या हालचाली लंडनला कळवित असतं.

भौगोलिक रचनेमुळे आपल्या सह्याद्रीत दुर्गांची विविधता अधिक आहे. महाराष्ट्र हे मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले देशातील एकमेव राज्य आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचा स्वतंत्र इतिहास, भौगोलिक महत्व आहे. हिंदवी स्वराज्यासाठी किल्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. गेल्या काही वर्षांपासून गडकिल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन कामाला चांगले दिवस येताहेत. ठिकठिकाणच्या शिवप्रेमी संघटना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ही कामे आपणहून करत आहेत, हे अभिनंदनीय आहे. हे करत असताना संवर्धनाच्या नियमांना धरून करणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास आणि गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे स्वतंत्र अभ्यासण्याचे विषय आहेत. संवर्धन करताना वास्तू सर्वेक्षण, पुरातत्त्वीय, जीआयएस, रेखाटने आदिंचा उपयोग करून किल्ल्याची विविधांगी ऐतिहासिक माहिती गोळा करता येते. या माहितीच्या आधारे किल्ल्यावरील पुरातन वास्तू, स्थळांचा शोध घेतला जाऊ शकतो. साऱ्या लेखी नोंदी ठेवता येतात. शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने किल्ले किंवा पुरातन वास्तू जतन करण्यासाठी तयार केलेल्या दत्तक योजनेचाही विचार केला जाऊ शकतो. या योजनेच्या आधारे किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेता येऊ शकतो. स्वच्छता आणि संवर्धन या विषयात काम करणाऱ्या संस्थांनी दत्तक योजनेत पुढाकार घेतला तर गड-किल्यांचे पावित्र्य अधिक जपले जाईल !

धीरज वाटेकर 

तिवरे ते मालदेव’ व्हाया ‘बैलमारव घाट’

             

 
इतिहासात, ‘देश आणि कोकण’ या दरम्यान चालणारी चिपळूणसह त्याला जोडलेल्या अनेक गावांची व्यापारी देवघेव ज्या मार्गाने चालत होती तो घाट ‘बैलमारव घाट’ या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वांपार या मार्गाने लमाणांचे तांडे कोकणात येत असत. सन १८४६ च्या दरम्यान रत्नागिरी-सातारा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून बैलगाडी प्रवास सुरु झाला आणि ‘बैलमारव घाट’ परिसराचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले. मात्र प्रदूषणाने घेरलेल्या सध्याच्या काळात या प्राचीन घाटमार्गांवर असणाऱ्या पदभ्रमण मार्गांना महत्त्व प्राप्त होऊ घातले आहे. वन्यजीव परीक्षणपर्यटनासह ट्रेकींग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने नुकतेच उघडले. तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा त्यापैकी एक आहे. या ‘ट्रेकरूट’वरील प्रत्यक्ष अनुभवलेल्या, सामान्य पर्यटकाला आपलंस करण्याची क्षमता असलेल्या परिसराचा आढावा !

     
प्राचीन बैलमारव घाट  
चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी मातृसंस्था ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ने या जंगल ट्रेकना पर्यटकाभिमुख बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच आबालवृद्धांच्या उत्साही सानिद्ध्यात 
सह्याद्री टायगर रिझर्व्हनजीक असलेला तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट हा ट्रेक ३० निसर्गप्रेमींनी १६ कि.मी. भटकंती करीत अडीच हजार फुट उंचीपर्यंत जात यशस्वी केला. या ट्रेक दरम्यान तिवरेदुर्गमालदेवपालीदेवसरीबैलमारवघाटरेडेघाट हा परिसर नजरेच्या टप्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या ८२४८.८ चौ.कि.मी. भौगोलिक क्षेत्रापैकी अवघे ६२.५९ चौ.कि.मी. वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच शिखरांची उंची ४०० ते २००० मीटरपर्यंत आहे. जिल्ह्याला लागूनच कोयना व चांदोली अभयारण्ये असल्याने वन्यप्राण्यांचा वावर सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जंगलट्रेक’चे प्रयोजन असून हे घडल्यास जंगलतोडजंगलातील वणवे यांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

      चिपळूणहून ३१ कि.मी. अंतरावर असलेले तिवरे हे गाव सह्याद्रीतील चिपळूण तालुक्यात इतिहासप्रसिद्ध ‘दसपटी’ (दस म्हणजे दहा आणि पट्टी म्हणजे कर दहा टक्क्यांची करवसुली) या २८ गाव इनाम भागात येते. चिपळूण तालुक्याच्या या पूर्व भागात,
मालदेवच्या दिशेने कूच करताना ट्रेकर्स 
सह्याद्रीत बारराव कोळ्याचे साम्राज्य होते. मौजे पेढांबे गावाच्या माथ्यावर खडपोली, कळकवणे यांच्या सीमामध्यावर पंधराशे फूट उंचीचा बारराव कोळ्यांचा ‘किल्ले बारवई’ आहे. तेथे १२ कोरीव लेणी (ओवरी/खोली) आहेत. त्यांचा पाडाव केल्यानंतर शिंदे-कदम सरदारांनी या भागात आपला अंमल प्रस्थापित केला. या दरम्यान त्यांनी कुंभार्ली, चोरवणे खिंड आणि तिवरेच्या घाटात ध्वज लावून चौक्या बसविल्या होत्या. या घाटांतून वाहतूक चालू असताना चिपळूणसह गोवळकोट बंदरात पडाव लागत. गोवळकोट बंदरात ४०० लोकांना एकाचवेळी आणणाऱ्या बोटी प्रवासात होत्या. शहरातील जुन्या पद्मा चित्रमंदिरासमोरील ‘कोकणी आणि घाटी’ अशा दोन स्वतंत्र भव्य गाडीतळात शेकडो बैलगाड्या उभ्या असत. सांगली, कराड, कोल्हापुरातून गूळ, ज्वारी, मिरची, कांदा, लसूण, गुळ, हरभरा, चवळी, मूग, आणि इतर शेतमालाची वाहतूक होत असे. बैलमारव घाटातून 
पुरातन काळापासून देशावरून लमाणांचे तांडे या वाटेने कोकणात येतं. हा घाट कोकण व पश्चिमघाट यांना जोडणारा महत्वाचा दुवा होता. याच मार्गे बैलांच्या पाठीवर माल लादून त्याची ने-आण चाले. म्हणून त्यास बैलमारव घाट असे नाव पडले.

      तिवरेचे ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागातखडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात सातशे वर्षापूर्वीपासून गंगा उगम पावते आहे. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविकजिज्ञासूपर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते. तिवरे येथील सहयाद्रीच्या रांगेत उंच टेबलासारखा पठारवजा डोंगर दिसतो तो तिवरेगड. तिवरे गावातून बैलमारव घाटातून या गडाकडे, मालदेवकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. घाट संपल्यानंतर खिंडीतून उजव्या बाजूने पाल घाटातून पाली गावाकडे, तिवरेगडावर पोहोचता येते.तिवरेगडावर देवीची छोटी मूर्ती, चौथ-याचे भग्नावशेष दिसतात. हा परिसर सह्याद्री प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये असल्याने तेथे जाता येत नाही. घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची योजना असावी. तिवरे धरणाच्या उजवीकडीलभेंडवाडीतील उंच टापूवर आपल्या गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या किंवा
मालदेवहून दिसणारे तिवरे धरण  
उजव्या 
तीरावरून (स्थानिक वाटाड्यांच्या सूचनांनुसार) ट्रेकची सुरुवात करता येते. तिवरे ते मालदेव हा बैलमारव घाटातील प्रवास प्राचीन इतिहासाची आठवण करून देतो. घाटाच्या मध्यभागीही श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश करताना देवीने येथे काहीकाळ विसावा घेतला होता. तेथून थोडे पुढे मार्गक्रमण केल्यानंतर, ‘बैलमारव आलं हं !’ ही अक्षरे लिहिलेला मोठासा काळाकभिन्न पत्थर दिसतो. तिवरे धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारून सुरुवातीचा  प्रवास पूर्ण झाल्यानंतर हा घाट सुरु होतो. घाटातील वातावरण आल्हाददायक आहे. घाट संपतो तेथे खिंड आहे. तिवरे गावातून मालदेवकडे पहिले असता खिंडीचा आकार इंग्रजी ‘U’ अक्षरासारखा दिसतो. मालदेवच्या पश्चिमेला कोकणात याच खिंडीतून दोन वाटा उतरल्या आहेत. त्यातली एक बैलमारव घाटमार्गे आणि दुसरी सोंडेवरून उतरणारी देवसरीची वाट आहे. तिवरे गावातून तेराशे फूट उंचीवर सहयाद्रीत ऊर्ध्व बाजूकडून पायाकडे निमुळता होत गेलेला सुमारे २२ फूट उंचीच्या विशाल प्रस्तरखंडाच्या शेजारून ही वाट गेलेली आहे. प्रस्तरखंडाचा आकार साधारणपणे उभ्या केलेल्या चिलमीसारखा दिसायचा म्हणून त्यास चिलीम खडकही म्हणत. किमान अडीच-तीन तासांच्या पदभ्रमणानंतर बफर आणि कोअर झोनच्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फुट उंचीवरील मालदेव गाव सीमेत आपण तिवरेघाट खिंडीतून प्रवेश करतो. सुखावणारा थंडगार वारा येथे आपले स्वागत करतो. जवळचा एखादा जीवंत झरा आपली तृष्णा भागवतो.मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापूवरून दिसणारे तिवरे धरणाचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या विशालतेचे दर्शन घडते.

ट्रेकमधील एका निवांत क्षणी ब्लॉगलेखक  
      सह्याद्रीच्या माथ्यावर उंच पठारावरील सपाट माळरान म्हणजे माळदेव किंवा मालदेव’ होय. कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ असलेल्या ‘मालदेव’चे सन १९५९ नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पाची गरज म्हणून मनुष्य वस्ती उठवून पुनर्वसन झाले आहे. परंतु शहरीकरणाचा स्पर्श न झालेले, गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक ‘पितृतुल्य’ ८५ वर्षीय शामराव कोकरे यांनी गावावरचे प्रचंड प्रेम, मातीशी असणारे मायेचे नाते यांमुळे अगदी काल-परवापर्यंत गाव सोडलेले नव्हते. ‘मालदेव रिकामं झाल्यानंतरही शामराव भूतासारखे एकटे तिथं राहात. श्वापदांनी हल्यात त्यांचा अडीचशे जनावरांचा गोठा रिता केला. पण ‘मरेन तर इथंच’ या हट्टाने शामराव अनेक दशके येथे राहिले. डोक्याला गुंडाळलेलं मुंडासं, अंगात शर्ट, भगवी लुंगी, हातात काठी, खांद्यावर बॅग असा पेहेराव असलेल्या  शामरावांचा अनेक ट्रेकर्सनाकोयनेतल्या निसर्गाइतकाच लळा आहे. वन्यजीवांच्या सान्निध्यात राहण्याची सवय जडल्याने त्यांना आजही कुठेही गेलं तरीही मालदेव आठवत राहतं. याच आठवणीतूनच त्यांनी (१ ऑक्टोबर २०१८) मालदेवकडे कूच केली नि ट्रेकदरम्यान आमची-त्यांची भेट घडली. ट्रेकच्या दिवशी पहाटे आमच्या सौभाग्यवतीने बनवून सोबत दिलेले ‘कांदेपोहे’ शामरावांना खाऊ घालताना आम्हाला जो आत्मिक आनंद मिळाला तो शब्दातीत ! ‘वाघ आता म्हातारा झालायं, आता त्याला किंमत उरली नाही’, हे त्यांचे वाक्य ऐकून मनाला वेदनाही झाल्या. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामारावांना विविध प्रश्न विचारून खरं जंगल जाणून घेण्याचा अनेकांचा शिरस्ता आम्हीही पाळला. मालदेव हे जिल्ह्याचे ठिकाण साताऱ्यापासून ९७ कि.मी., तर जावळी ९२  कि.मी. अंतरावर आहे७३४ हेक्टर क्षेत्र असलेल्या कोअरझोन मध्ये असलेल्या मालदेवात आता मनुष्य वस्ती नाही. ‘शामराव’ मात्र आजही या भागात अधून-मधून भटकताना दिसतात. या भागात उंबर, अंजन, कढीपत्ता, शिकेकाई, वावडिंगची झाडे, रानगवे, अस्वल, जंगली कुत्रे, रानडुक्कर, बिबट्या, कोल्हा आदि वन्यजीवांचे अस्तित्त्व आहे. अरण्यसहवासासाठी मालदेव उत्तम आहे. शामराव कोकरेंचे वास्तव्य राहिलेल्या वाड्यानजीक एक पुरातन जांभ्या दगडाची बांधीव चौकोनी विहीर (घोडेबाव) असून तीत उतरण्यास रूंद पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात चार कोनाडयाचे छप्पर असून भैरव व देवीच्या मूर्ती आहेत. कोयना धरणाचे बॅकवॉटर पसरलेल्या बामणोली गावातूनही बोटीने मालदेवला जाता येतेहा परिसर कोअरझोन (अतिसंवेदनशील) असल्याने येथे जाण्यास मज्जाव आहे.

      मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच जंगले’ टिकतील ही नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांची भूमिका ट्रेकमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकण्यातला आनंद काही औरच ! ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’चे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी आपली संपूर्ण शारीरिक क्षमता पणाला लावून हा ट्रेक पूर्ण केला. हे पाहून त्यांना ‘सलाम’ करावासा वाटला. आजपर्यटनाचा ट्रेण्ड बदलतोय. लोक त्याच-त्या पर्यटनाला कंटाळलेत. शहरातील जगण्यातली हिरवाईची उणीव भरून काढण्यासाठी पर्यटकांची पावलं निसर्ग सफारींकडं वळू लागलीत.पर्यटकांना जंगलांतला भन्नाट रानवारा शीळ घालतोय. जंगलातल्याआडरानातल्या वाटा खुणावू लागल्या आहेत. म्हणूनच नेचरट्रेल्सजंगल सफारींना प्रतिसाद मिळतोय. महत्त्वाचेम्हणजे सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी तिथं जाताना दिसत आहेतट्रेकिंग करताना मानवाच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो. अनेकदा शरीर अजून सुदृढ बनवायला हवं,खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचं’ असल्याची जाणीवही होते. वयाच्या चाळीशीत थोडंस चालल्यानंतर पाय दुखायला लागले तर आपल्या शरीराच्या सूचना आपल्यालाच मिळत जातात. ट्रेक करताना नुसतेच काय डोंगर चढता नि उतरता ? हा पूर्वीचा खोचक प्रश्न आता कमी झालायं. ट्रेकिंगमध्ये निसर्गातल्या अनेक घटकांशी मुक्तपणे संवाद करता येतो. अनेक सहकाऱ्यांशी जुळवून
२५०० फूट उंचीवर पोटपूजा !
घेत जीवनाची शिस्तबद्ध हालचाल करता येते. डोंगरात वर चढताना श्वासांची क्रिया जलद होते
त्यामुळे पूर्ण श्वासोच्छ्वासाची जलद प्रक्रिया घडते. रक्तप्रवाह वाढतोरक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. प्रसंगी शीरांतीलनसांतील ब्लॉकेज निघतात. ब्लड-प्रेशरचा त्रास कमी होतो. गुडघे, पायांवर ताण येऊन स्नायु उत्तेजित होतात. चढ चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेने ऑक्सीझन आत घेतात आणि बाहेर सोडतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालल्याने कधीकधी डिहाइड्रेशनमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते मात्र इप्सित ठिकाणी पोहोचल्यावर झरातळीपावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शरीरातील चरबी कमी होते. मन प्रसन्न करणाऱ्यानिसर्गाची मुक्तहस्त उधळण असलेल्या वातावरणाने ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ट्रेकिंगमुळे श्वसनरक्तप्रवाहगुडघेछातीपोट आणि मानसिक मानसिक आजारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः खात्री केव्हाही श्रेयस्कर !
    
  निसर्गावर मात करु पाहाणाऱ्या जीवनशैलीने आम्हाला गेल्या शतकात हृदयरोग आणि चालू शतकात कर्करोग दान’ केला आहे. यामुळे मनुष्य नावाचा भारतीय प्राणी निसर्गाकडेनिसर्ग सहवासाकडेआयुर्वेदीय संकल्पनांकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहू लागला आहे. दैनंदिन टिपिकल घर ते ऑफिस जीवन जगणाऱ्या अनेकांना ट्रेकिंगचे महत्त्व पटल्याने डोंगरातील पदभ्रमण हा साहसी पर्यटन प्रकार आता सामान्य पर्यटकांत रुजतो आहे. ट्रेकिंगमॅरेथान सारख्या उपक्रमांना सामान्यजनांचा प्रतिसाद वाढतो आहे. शहरात खाण्यावर वाट्टेल तसा आडवा-उभा ताव मारतअरबट-चरबट खाणं शरीराला लवकर थकवतं आणि डोंगर-दऱ्यांमधल्या पाऊलवाटांवरून चालताना हे जाणवतं. या बाबतच्या वाढत्या जाणीवांमुळे पर्यटक’ म्हणवणारा एक वर्ग ट्रेकिंगकडे वळतो आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान वन्यजीव विभागाने ८ हॉट स्पॉटनजीकच्या बफर झोनचे दरवाजे नुकतेच उघडल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ट्रेकला मिळालेला प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे. तेव्हा ग्लोबल चिपळूण पर्यटन’ (संपर्क : ९८२३१३८५२४) संस्थेने सुरु केलेल्या या ट्रेकचा आनंद घ्यायला तुम्हीही या ! इथला सह्याद्री तुमचे स्वागताला सज्ज आहे !



धीरज वाटेकर


पत्ता : विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.


 चला ! ‘चिपळूण’ला मुक्कामी जाऊ या !

कोकणच्या दिशेने सिंधुदूर्गात वा रायगड-ठाण्याच्या दिशेने निघालेल्या पर्यटकाला कुठे निघालात ? या प्रश्नानंतर,  कसे ? असा प्रश्न विचारल्यावर ‘व्हाया चिपळूण !’ असेच उत्तर मिळते. मुंबई ते गोवा महामार्गावरील चिपळूण शहराची ‘विश्रांतीस्थान / व्हाया’ ही ओळख पर्यटनावर प्रेम करणाऱ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून बदलते आहे. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन सहकारी संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे चिपळूणच्या पर्यटनाला चांगले दिवस यावेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा.

चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात 'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. श्रीविष्णूचा अवतार भगवान परशुरामाने या नगरीची स्थापना केल्याचा उल्लेख ई.स. १६३७ साली कवी विश्वनाथ यांनी लिहिलेल्या 'श्री व्याडेश्वर माहात्म्य' या संस्कृत ग्रंथात आढळतो. शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा.
 
भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे ‘परशुराम’ होय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामी’ यांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. त्यामुळे मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ, सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात. चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास आजही विशेष प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी.  समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.

डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवती अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात, भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावी. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीक असावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर लिंग स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.

सावर्डेपासून कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते.  त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे. 

अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतून श्री.ना. पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या या देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला  लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’ नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’ असून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात ‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.   

पर्यटकांना अवघ्या ६० ते १०० कि.मी.च्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजआदि सारी अमर्याद पर्यटन समृद्धी देणाऱ्या चिपळूणात जवळपास ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार हॉटेलात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था आहे. तालुक्यातील पर्यटन संपूर्णतः विकसित करण्याचे प्रयत्न ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ करते आहे. या साऱ्याची प्रसिद्धी करण्याबरोबरच दर्जेदार पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही चिपळूणात सुरु झाले आहे. आगामी काळात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवेल, ज्यातून पर्यटक चिपळूणात रमतील हे नक्की !

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com  
मो. ९८६०३६०९४८. 

डेस्टिनेशन चिपळूण’च्या दिशेने...!

मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ‘ताज’ने साधारणत सन १९८९ ते ९५ च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात, महेंद्रगिरी डोंगरात, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्रीस्टार हॉटेल उभारले. याकाळात ‘महाराष्ट्र पर्यटन’कडे बघण्याचा पर्यटकांचा दृष्टीकोन वेगळा होता. नंतरच्या काळात कोकण महामार्गावर, इथेच पुढे ‘विसावा पॉइंट’ जन्माला आला, निसर्ग तर पहिल्यापासूनच खुणावतच होता. तेव्हापासून असलेली चिपळूणची ‘विश्रांतीस्थान’ ही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या २०-२५ वर्षांत अनेकांनी आपापल्यापरीने केले. मात्र त्याला दखलपात्र यश मिळत नव्हते. मागच्या महिन्याच्या २३ ते २५ फेब्रुवारीला चिपळूण पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच संपन्न झालेल्या, देशभरातील पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या ‘चिपळूण दर्शन’ दौऱ्यातून हे दखलपात्र यश काही प्रमाणात का होईना, मिळण्याची आशा निर्माण झाल्याचे जाणवून आले. निर्माण झालेल्या आशेवर नुसतेच विसंबून न राहाता चिपळूण पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक स्थानिक घटकाने ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेच्या हातात हात घालून काम करायला सुरुवात केली तर भविष्यातील ‘डेस्टिनेशन चिपळूण’चे स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचे ते दमदार पाऊल ठरेल.          
     
निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेले चिपळूण पर्यटन आजही उपेक्षित आहे.  संपूर्ण कोकणाकडे खूप काही असल्यामुळे ही अडचण निर्माण होते, ज्यांच्याकडे दाखवण्यासारखं थोडंस आहे ते मात्र हमखास प्रगती साधतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी’चे गेल्या पाच वर्षातील ‘आपण चालायला लागलो की रस्ता बनायला सुरूवात होते’ अशा विचाराचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सन १९६४-६५ ला या महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले. तत्पुर्वीपासून परशुराम मंदिराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील बंडोपंत आणि लीलाकाकू सहस्रबुद्धे यांचे ‘विश्रांतीस्थान’ हीच चिपळूणातीलच नव्हे तर कोकणातील (कदाचित) एकमेव पर्यटक व्यवस्था होती. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचा धामणदेवीमार्गे प्रवास चाले. भरणेनाका नाका सोडल्यानंतर चिपळूणपर्यंत एकही हॉटेल नव्हते, वीज, वाहतूक व्यवस्था नव्हती. तेव्हा हे ‘विश्रांतीस्थान’ २४ तास सुरु असायचे. येथूनच ‘कोकम सरबत’ महाराष्ट्रभर पोहोचले. पर्यटन कंपन्या चहा-फराळासाठी इथे थांबत असतं. पाठीमागील वाशिष्ठीची खाडी हे तेव्हाही आकर्षण होते, क्रोकोडाईल टुरिझमसह विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत पर्यटन आकाराला आलेलेच नव्हते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शैलेश वरवाटकर, रविकिरण जाधव, संदेश संसारे आदि काहींनी वाशिष्ठी खाडीत वैयक्तिक प्रयत्नांना सुरुवात केली होती. सन २००८ साली धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांनी, तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या सौ. नूतन आणि श्री. विलास महाडिक यांच्या सहकार्याने ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे इथल्या पर्यटनाची खडानखडा माहिती देणारे अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात इथल्या पर्यटन चळवळींनी आकार घ्यायला सुरुवात केली. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ हे त्याचे आजचे सर्वात समृद्ध स्वरूप होय. याच संस्थेच्या सहकार्याने, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे, इंटरप्रायाझिंग ट्रॅव्हलर एजंट असोसिएशन, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया आदि संस्थांमार्फत कार्यरत प्रसन्ना टूर्स, ट्रॅव्हल मास्टर, गिरिकंद ट्रॅव्हल्स, ओम टूर्स, पॅराडाईज मार्केटिंग, मिहीर टुरिझम, सिमास ट्रॅव्हल्स आदि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांसोबत काम करणाऱ्या नामांकित ३५ टूर ऑपरेटर्सचा नुकताच तीन दिवशीय चिपळूण पर्यटन दौरा संपन्न झाला. चिपळूणची पर्यटन श्रीमंती दाखवून आगामी काळात अधिकाधिक पर्यटक चिपळूणात आणता यावेत, हा या मागचा मुख्य हेतू होता.

पहिल्याच दिवशी दिनांक २३ फेब्रुवारीला दुपारी चिपळूणात दाखल झालेल्या टूर ऑपरेटर्सचे परशुराम येथील ‘दि रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्ट येथे आगमन झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दुपारच्या भोजनानंतर मान्यवर टूर ऑपरेटर्सना डेरवण शिवसृष्टी दाखविण्यात आली. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारलेली महाराष्ट्रातील ही सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे पंधरा वर्षांच्या प्रयत्नातून शिल्पकार दादा पाटकर यांच्या सहकार्याने सन १९८५च्या दरम्यान उभारली गेली. सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली. डेरवण येथेच उभारण्यात आलेल्या ऑलंम्पिक दर्जाच्या क्रीडासंकुलाची पाहणी सर्वांनी केली. कोकणातल्या काटक आणि निसर्गतःच चपळाई अंगात असलेल्या तरुणाईला संधी देण्यासाठी हे ऑलंम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. संकुलामध्ये शूटिंग, जिम्नास्टिक, स्विमिंग, वॉटर पोलो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल, कॅरम, हॉकी, कराटे, कुस्ती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, कराटे, गोळा फेक, थाळी फेक, तिरंदाजी आदि ३५ खेळ खेळण्याची सुविधा आहे. त्यामध्ये रायफल खेळांचा समावेश आहे. सुमारे १०० एकर परिसरात वसलेल्या आणि फळबाग लागवड, विविध पक्षी अभयारण्य, नेचर ट्रेल, १.५ कोटी लीटर पाणी क्षमतेचे शेततळे असलेल्या कँपसाठी उपयुक्त धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स सर्वांनी भेट देऊन तिथल्या ‘जंगल सफारी’ आणि स्थानिक प्रसिद्ध शाकाहारी / मांसाहारी मोंगा पार्टी, विठ्ठलाई नाचनृत्य धामणवणे (मधली उंडरेवाडी), श्रीराम मित्र मंडळ यांच्या पारंपारिक जाखडी नृत्याचा आनंद घेतला. इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी उपस्थितांना ‘चिपळूण इतिहास आणि संस्कृती’ याबाबत माहिती दिली.  

दुसऱ्या दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी चिपळूणचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाची पाहाणी करण्यात आली. गोविंदगड नावाने ओळखला जाणारा, सात बुरुज, वैशिष्ट्यपूर्ण बांगडी तोफ असलेला गोवळकोट किल्ला 'डोंगरी' प्रकारातील आहे. किल्ल्यावर तळी, तोफा पुरावशेष पाहायला मिळतात. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. किल्यावर रेडजाई तर पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. त्यानंतर चिपळूण बॅकवॉटर, आयलँड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा आनंद सर्वांनी घेतला. ‘गोवळकोट ते दाभोळ’ असा ४४ कि.मी.चा प्रवास असलेल्या आपल्या दोन्ही तीरावर दापोली, गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमा अससेल्या देखणे निसर्गसौंदर्य, नितांत सुंदर वाशिष्टी खाडी, खाडीतील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीचे छोटे-मोठे डोंगर आणि खाडीकिनारी निवांत विसावलेल्या मगरींचे दर्शन सर्वांनी बोटीमधून घेतले. दुपारच्या भोजनासाठी सर्वांना शैलेश वरवाटकर यांच्या ‘तुंबाड किनारा रिसॉर्ट्स’ येथे नेण्यात आले. प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘तुंबाडचे खोत’ (१९८७) या कादंबरीने अजरामर झालेले तुंबाड गाव जगबुडी नदीच्या काठावर वसलेलं आहे. खेडच्या पूर्व सह्याद्रीतून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी नदी तुंबाडच्या पुढे वशिष्ठी नदी मिलनानंतर दाभोळ येथे समुद्राला मिळते. निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न असलेल्या या तुंबाडच्या धक्यावरून शरीराला सुखावणारा मंद, गार वारा, झाडांची गर्द सावली. फुलझाडांचा दरवळलेला सुवास अशा नैसर्गिक वातावरणातील प्रसन्नता साऱ्यांनीच अनुभवली. या दरम्यान टूर ऑपेरेटर्सनी पॅगोडा, रीम्झ, अभिरुची, ओमेगा इन, दि रिव्हर व्हयू रिसॉर्ट्स आदींची पाहाणी केली. कोकणाचा स्वामी भगवान परशुराम आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचे दर्शन घेत इथल्या अध्यात्मिक परंपरा समजून घेतल्या. भगवान परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रावतळे परिसरात विध्यवासिनीचे पुरातन मंदिर आहे. शाक्तपंथियांना भावणारी देवीची यादवकालीन अष्टभुजा मुर्ति, कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिसऱ्या शेवटच्या दिवशी, २५ फेब्रुवारी हेदवीतील प्रसिद्ध दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर, निसर्गनवल समुद्रघळ (बामणघळ), वेळणेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा पाहिला. 

तत्पूर्वी दिनांक २४ रोजी सायंकाळी, चिपळूण पर्यटन विकासासाठी खा. हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या भरीव सहकार्याने गेली पाच वर्षे झटणाऱ्या 'ग्लोबल चिपळूण टुरिझम' या टूर आयोजक संस्थेच्या वतीने 'द रिव्हर व्हयू' या चिपळूणातील तारांकित हॉटेलच्या विशेष सहकार्याने पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या टूर ऑपेरेटर्स, स्थानिक हॉटेलियर्स आणि पर्यटन या विषयात रुची असलेल्या सुमारे ६५ अभ्यासू व्यक्तींचे महत्वपूर्ण चर्चासत्र पार पडले. यात ‘प्रसन्ना पर्पल’चे संजय नाईक, मिहीर टुरिझमचे सुधीर करंदीकर, सिमास ट्रॅव्हल्सचे विश्वास केळकर, ‘ट्रॅव्हल मास्टर’चे कृष्णा गोपालन, ओम टूर्सचे राजेश अरगे, पॅराडाईज मार्केटिंगचे मिलिंद आयरे, ट्रीप स्टोअरचे प्रशांत ढेकणे यांनी तर 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'तर्फे अध्यक्ष श्रीराम रेडिज, संजीव अणेराव, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, 'द रिव्हर व्हयू'चे विजय गावकर यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात सुरुवातीला आयोजकांकडून परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे, चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा धबधबा बारमाही प्रवाही करणे, शहरातील तलाव उर्जितावस्था, शहरातील पर्यटनाशी निगडीत रिक्षावाला, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर निश्चिती, गेल्या २५ वर्षांत एकही नवा उद्योग चिपळूणात आलेला नसल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता पर्यटनाकडे पाहण्याची गरज, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, किल्ले गोविंदगडसह चिपळूण पर्यटनातील विविधता याबाबत माहिती देण्यात आली. चिपळूणात आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत. चर्चेदरम्यान, चिपळूणकरांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज, येणा-या पर्यटकांचे स्वागत करण्याबाबत घायावयाची भूमिका, ‘क्रोकोडाईल सफारी’ला ब्रँड अॅम्बॅसिडर बनविण्याची गरज, छोट्या-छोट्या बोट राईड, महाराष्ट्रातील ५-६ हजार टूरएजंटपर्यंत चिपळूण फेस्टीवल पोहोचविण्याची गरज, मार्केटिंग, वैयक्तिक ग्राहकाला पॅकेजमध्ये वेगळी सूट न देण्याचा विचार, ‘सर्टिफाईड गाईड’ची टीम, खाडीतील बेटावर निवासासह विविध व्यवस्था, महाराष्ट्राबाहेरच्या पर्यटकाला त्याच्या कंफर्ट झोनप्रमाणे जेवण, मगरी दिसल्या नाहीत तर पर्यटक येतील का ?  यासाठीची पर्यायी व्यवस्था, एकावेळी ४० माणसं राहू शकतील अशा हॉटेलची वाढीव संख्या, वीज, पाणी व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, मेन्टेनन्स, स्वच्छ बाथरूम, जवळपासच्या देवरायातील नेचर ट्रेक यांवर चर्चा झाली.

मूळात चिपळूणकरांना आपल्या पर्यटनाची ताकद समजायला हवी आहे, त्यासाठी चिपळूणकरांनी चिपळूण  पाहायला, फिरायला हवे आहे. आपल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित शक्तीस्थळांवर काम करावे लागणार आहे. पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, शासन आणि लोकप्रतिनिधी या पर्यटन विकासाच्या दोन महत्वाच्या चाकांचे सहकार्य, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता, रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी, कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार व्हायला हवाय. येथे येणाऱ्या पर्यटकाला शांतता, चांगले खानपान, स्वच्छता, करमणूक, राहाण्याची उत्तम व्यवस्था हवी असते. पर्यटन हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळ, गोवा, हिमाचल, उत्तराखंड, अंदमान आदि देशी ठिकाणाशी तुलना करता कोकण कोठेही कमी नाही. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, अशी व्यवस्था आपण चिपळूणातही करू शकतो. आपल्याकडे पर्यटन विकास कामाची अंदाजपत्रके कोट्यानुकोटींची उड्डाणे घेत आहेत, जी यंत्रणा, व्यवस्था प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी ही विकासकामे पूर्ण करते, तिला ‘पर्यटन दृष्टी किती असते ? की आम्ही फक्त ठेकेदारी कामम्हणून याकडे पाहतो ? पुढेही पाहणार आहोत ? खाडीकिनाऱ्यावरील कामे,  किल्ल्यांची, प्रमुख पर्यटन रस्ते, हेरीटेजची डागडुजी करताना काम करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ठेकेदारी कामम्हणून पाहतो, मग अशा पर्यटन विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो, पर्यटन म्हणून विचार करून यात काम करण्याची संधी आहे. प्रसिद्ध दोन पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचे सक्षमीककरण करताना कल्पकतेने, पर्यटकांच्या रस्त्यावरील गरजा पूर्ण करणारे नियोजन व्हायला हवे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग हवे. चिपळूणची वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला पुढे जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्हाला पर्यटन विकासासाठी हे संदर्भ वापरावे लागतील.

चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजअशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर पर्यटक चिपळूणात रमतील. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. तालुक्यातील मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत अतिशय जवळ नितांत सुंदर म्हणून सवतसडा धबधबा प्रसिद्ध आहे. वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार असलेले दादरचे श्रीरामवरदायिनी मंदिर, टेरवचे भवानी माता मंदिर, तीन हजार फुट उंच किल्ले भैरवगड, शारदादेवी मंदिर तुरंबव, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले शिरंबेचे श्रीमल्लिकार्जुन मंदिर, शहराच्या पश्चिमेकडील अरण्यमय महालक्ष्मीण डोंगर भागात असलेले मिरजोळीत श्रीदेवी महालक्ष्मी - साळूबाई हे देवस्थान, वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या किनार्यावर असलेल्या गोंधळे गावी सन १६९६ मध्ये आप्पाजी गोंधळेकर यांनी बांधून पूर्ण केलेले श्रीहरिहरेश्र्वर मंदिर, त्या मंदिराशेजारी विशाल आकारमानाची ४० पायऱ्यांची प्राचीन विहिर, डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनित वास्तू राजगृह, चिपळूण शहर दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजन बौद्ध गुंफा लेणी, शहरातील गजान्तलक्ष्मी शिल्प, विजयस्तंभ, भोगाळेतील घोडेबाव, ई. स. सहाव्या शतकापासूनचे चिपळूणातील पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे असलेल्या राजेशिर्के यांची ३५० वर्षाचा इतिहास लाभलेली वाडासंस्कृती इथलं वैभव आहे. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या श्रीराम रेडिज, इब्राहिम दलवाई, संजीव अणेराव, आलिम परकार, मिलिंद कापडी, निलेश बापट, धीरज वाटेकर, रमण डांगे, राजेश पाथरे, विश्वास पाटीलसमीर कोवळे, विलास महाडिक, मनोज गांधी, महेंद्र कासेकर, शाहनवाज शाह, समीर जानवलकर यांच्यासह प्रा. सौ. मीनल ओक, डॉ. मनोज रावराणे, संदेश संसारे, सत्येंद्र वैद्य, अभिजित चव्हाण, प्रकाश चव्हाण आदि अनेकजण ‘चिपळूण पर्यटन’ विकसित व्हावे म्हणून धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे, तळमळीचे अनेकांनी कौतुकही केलं.

चिपळूणची जीवनदायिनी म्हणून इथल्या ‘वाशिष्ठी’ नदीकडे पाहाता येईल. कोयनेच्या अवजालामुळे चिपळूणकर निवांत आहेत, अन्यथा आम्हा सर्वांची हयात पाणी भरण्यातच वाया गेली असती. जेव्हा ओहोटी असते, कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी सोडलेले नसते, वीजनिर्मिती बंद असते, तेव्हा या वाशिष्ठी नदीला बहाद्दुरशेखनाकानजीक ब्रिटीशकालिन पुलाजवळून फेरफटका मारला की माझ्या वरच्या विधानाचे मर्म ध्यानी येईल. इथे आगामी काळात ‘रिव्हर बँक प्रकल्प’ राबविताना आम्हाला याचा विचार करावा लागणार आहे. गोव्यात  मांडवी आणि झुआरी नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव,  चिपळूणला ‘आपण सारे’ पर्यटन समृद्ध का करू शकत नाही ? याचा विचार समस्त चिपळूणकरांनी आपणहून करायलाच हवा. चिपळूणला डेस्टिनेशन बनविण्याच्या प्रयत्नांना प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यासह, चिपळूणला उतरलेल्या कोणी पर्यटकाने सहजपणे विचारलेल्या ‘इथे पाहण्यासारखे काय आहे ?’ या प्रश्नावर ‘इथे ? कुठे काय ? काय नाय, बा !’ असे तद्दन खोटे आणि नकारात्मक उत्तर न देणाऱ्या स्थानिक चिपळूणकरांचेही तितकेच  ठोस सहकार्य मिळण्याची गरज आहे.          

धीरज वाटेकर

http://www.mulshidinank.com/2018/03/blog-post_4.html

कोकणाचा स्वामी भगवान परशुराम मंदिर 
धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्समधील जंगल सफारी

एस.आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सची माहिती घेताना टूर ऑपेरेटर्स
प्रसिद्ध विसावा पॉइंट


श्रीदेवी करंजेश्वरी 

किल्ले गोविंदगड भेट 

वाशिष्ठी खाडीतील बेटास भेट

खाडीतील जल पर्यटन

खाडीतील क्रोकोडाईल पर्यटन 

 सवतसडा धबधबा 

चर्चासत्रात 'चिपळूण पर्यटनातील विविधता' याबाबत बोलताना धीरज वाटेकर





हेदवी'तील ‘श्रीदशभुजलक्ष्मीगणेश’ मंदीर

डाव्या मांडीवर अष्टसिद्धिंपैकी सिद्धलक्ष्मीविराजमान असलेल्या श्रीगणेशाचे कोकण किनारपट्टीवरील गुहागर तालुक्यातील हेदवी येथील श्रीदशभुजलक्ष्मीगणेशहे पेशवेकालिन दुर्मिळ व एकमेवाद्वितीय स्वरूप गणेशभक्तांना आकर्षित करते. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्राने वेढलेल्या हेदवीतील या लक्ष्मीगणेश मंदिराच्या परिसरात गेल्यावर मनाला एक शांतता लाभते. मंदिराचा पूर्वेतिहास फारसा उपलब्ध नसल्याने या मंदिराला काही कथांचेही वलय मिळाले आहे.

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी तत्कालीन पेशव्यांनी एका मंदिरात स्थापना करण्यासाठी खास काश्मीरहून ही मूर्ती मागवली होती. मात्र ती ठरलेल्या वेळेत न आल्यामुळे नियोजित मंदिरात दुसऱ्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. काश्मीरहून आलेली मूर्ती गणेशाचे उपासक आणि तीर्थाटन करून धर्मप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या केळकरस्वामी नामक गणेशभक्ताकडे देण्यात आली. एका कथेनुसार, याच दरम्यान पुण्याच्या एका जहागीरदाराला केळकरस्वामींच्या कृपाशीर्वादाने पुत्र झाला होता. त्यांनी केळकरस्वामींना मंदिर बांधण्यासाठी अमाप धन दिले. धन व मूर्ती घेऊन केळकरस्वामी हेदवी या आपल्या जन्मगावी आले आणि त्यांनी मंदिर बांधले. 

दुसऱ्या एका कथेनुसार पेशव्यांच्या द्रव्य सहाय्यातूनच हे मंदिर बांधले गेले. ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती स्वामींना दिलेल्या दृष्टांतानुसार घडवलेली आहे. दोन फूट उंचीच्या आसनावर साडेतीन फूट उंचीची शुभ्रधवल संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीला दहा हात असून डाव्या मांडीवर अष्टसिद्धिंपैकी एक सिद्धलक्ष्मीबसलेली आहे. उजव्या वरच्या पहिल्या हातात चक्र, दुसऱ्यात त्रिशूळ, तिसऱ्यात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळुंग फळ आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्यात पाश, तिसऱ्यात नीलकमळ, चौथ्या हातात दात (रतन) व पाचव्या हातात धान्याची कोंब आहे. सोंडेत अमृतकुंभ अर्थात कलश दिसतो. गळ्यात नागयज्ञोपवीत आहे. या गणेशमूर्तीच्या पुढय़ात एक तांब्याची मूर्ती आहे. त्या मूर्तीवर षोडशोपचार केले जातात. त्यापुढे पादुका असून त्यावर शेंदूर वाहिला जातो. गाभाऱ्यात मोक्याच्या ठिकाणी आरसे बसवल्याने मूर्तीवरील कोरीवकाम पाहता येते. गाभाऱ्यात कुठेही उभे राहिले तरी मूर्ती आपल्याकडे पाहत असल्याप्रमाणे त्रिमितीय नेत्ररचना आहे.

नेपाळमध्ये अशा स्वरूपाच्या मूर्ती आहेत. पूर्वी भारतात अशा शस्त्रसज्ज मूर्ती पूजायचा अधिकार केवळ सेनानेतृत्व करणाऱ्या सेनापतीस असे. संपूर्ण पेशवाईत अशा तीन-चार मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. मंदिराभोवती किल्ल्याची आठवण करून देणारा तट, वैशिष्टय़पूर्ण दगडी दीपमाळ, सुंदर फुलांचा बगीचा, मंदार, शमी, आम्रवृक्ष, कळसाचा व घुमटाचा आकार एकूणच हिरव्या-निळ्या पाश्र्वभूमीवरील गुलाबी रंगाचं प्राधान्य असलेले हे मंदिर अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. सन १९९५ पर्यंत हा सारा जंगलमय दुर्लक्षित परिसर काकासाहेब जोगळेकर व शंभू महादेव हेदवकर यांनी प्रयत्नपूर्वक सन १९५६ मध्ये जीर्णोद्धारित केला आहे. मंदिर गुहागरपासून मोडकाआगर- पालशेतमार्गे २४ कि.मी. अंतरावर आहे. तर चिपळूणपासून ५१ कि.मी. अंतरावर आहे.

याच हेदवी गावात आलात तर समुद्रकिनाऱ्यावर समुद्रघळनामक निसर्गनवल पाहण्यासारखे आहे. उमामहेश्वराच्या मंदिरामागे काळ्याकभिन्न खडकात एक भेग पडली असून भरतीचे पाणी वेगाने आत शिरून निर्माण होणारा जलस्तंभ पाहणे केवळ अविस्मरणीय आहे.

धीरज वाटेकर

हेदवी गणेश मंदिर 

दैनिक लोकसत्ता (मुंबई वृत्तांत) सप्टेंबर २०१०

 शिवपूर्वकालीन दक्षिणाभिमुख "गणेशगुळे"


रत्नागिरीच्या दक्षिणेला २० कि.मी. अंतरावर शिवपूर्वकालीन श्रीलंबोदराचे स्थान आहे. दर्यावर्दी गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे स्थान सागरकिनारी वसलेल्या निसर्गसंपन्न गणेशगुळे या गावी आहे. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला’ या जुन्या म्हणीमुळे अनेक अख्यायिकाही आहेत. हे ठिकाण पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर असून स्वामींची या स्थानावर अढळ श्रद्धा होती.

पौराणिक कथेनुसार लंबासुराचा वध करण्यासाठी अवतरलेले लंबोदर हे गणपतीपुळे येथे युद्ध करीत असताना लंबासुर गणेशगुळे येथे पळाला. तेथेही लंबोदराने त्यास गाठले. आपले प्राण वाचविण्यासाठी लंबासुर मध्य प्रदेशातील ॐकार ममलेश्वर येथे आला व त्याने नर्मदेत उडी मारली. लंबोदराने शिवाची उपासना करून लंबासुर वधासाठी आवश्यक त्रिशूळ शिवाकडून प्राप्त करून घेतले. लंबासुराचा वध केला. तेव्हापासून गणशगुळे, गणपतीपुळे व ॐकारेश्वर (मध्यप्रदेश) येथील पंचसोंडय़ा गणपती ‘लंबोदर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण गणेशभक्त पोटशूळाच्या विकाराने आजारी पडले. आजार असह्य झाल्याने गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. जीवघेण्या वेदनांमध्येही त्यांची निरपेक्ष करुणायुक्त उपासना सुरूच होती. यातूनच त्यांना श्रीगणेशाची ध्यानावस्था प्राप्त झाली. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, ‘तू व्याधीमुक्त होशील. माझे येथे अवशेषात्मक वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर बांध. या कामी तुला सातारचे शाहू महाराज मदत करतील.’ येणेप्रमाणे शाहू महाराजांनाही दृष्टांत होऊन त्यांचा जासूस आर्थिक मदतीसह गणेशगुळे येथे पोहोचला. यातूनच या मंदिराची उभारणी झाली. चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. त्यातून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला. 

या काळात दु:खी व पीडित लोक मोठय़ा प्रमाणावर श्रीगणेशाची उपासना करू लागले. गणपतीच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडे. परंतु नंतर एके दिवशी ‘शिवाशिवीमुळं’ हे झिरपणारे पाणी बंद पडले. त्याच दिवशी गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळे येथे स्थलांतर केले, अशी आख्यायिका सांगतात. स्थलांतरादरम्यान गणेशपावलांचे ठसे पावस मार्गावरील डोंगरात दिसतात, असे म्हणतात.
 स्थानिक भंडारी समाजाचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान असून समुद्रप्रवासापूर्वीच्या त्यांच्या विधीवत पूजनातून ‘गलबतवाल्यांचा गणपती’ अशी एक ओळख या ठिकाणाला मिळाली.

हे मंदिर जांभ्या दगडात बांधलेले असून चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर ४० फूट उंचीचा आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी २ द्वारे आहेत. या दोनही दालनांना जोडणारी १२ फूट उंचीची शिळा म्हणजेच श्रीगणेश असे मानले जाते. संपूर्ण डोंगर गणेशमय झाला आहे. अनेक गणेशभक्तांना या ठिकाणी श्रीगणेश साक्षात्कार झाला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येथे तीन दिवसांचा उत्सव साजरा होतो. माघी गणेशोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराचे आवार निसर्गरम्य असून येथे ७० फूट खोल विहीर आहे. पश्चिमेस पसरलेला अथांग सागर अन् अनेक ठिकाणी खाडीच्या स्वरूपात जमिनीत शिरलेली समुद्राचे पाणी यातून जाणवणारे नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे दिसते.

धीरज वाटेकर


  दैनिक लोकसत्ता (मुंबई वृत्तांत) शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०

 कोकणातील अष्टविनायक

गेल्या काही वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमि म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच... कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर न्याहळताना कधी एकदा आपण गणपती मंदिराकडे पोहोचतो हे कळतच नाही. या सार्‍या पार्श्वभूमीवर कोकणातील महत्वपूर्ण आठ श्री गणेश स्थानाना अष्टविनायक स्वरुपात भाविक्ांसमोर ठेवीत आहोत. प्रस्तुत लेखनातील स्थान निवडित काही वेगळे विचार असु शकतात, परंतु अशा स्वरुपातील मांडणी कोकण पर्यटन विकासास पूरक ठरू शकते. म्हणूनचा हा प्राथमिक   प्रामाणिक लेखन प्रपंच !

श्री क्षेत्र गणपतीपुळे ( रत्नागिरी )

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे होय. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी श्री क्षेत्र गणपतीपुळे ही पश्र्चिमद्वार देवता होय. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला "पुळ्याचा गणपती" असेही म्हणतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती , त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र  ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे.  समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते. रत्नागिरीहून साधारण २५ किमी अंतरावर असणारेगणेशगुळेहे स्थान फारच कमी लोकांना माहित आहे. अगदी साधे गाव, साधे मंदिर आणि बहुतालचा सुंदर, परिसर बघण्यासारखा आहे. ज्यांना वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते, अशा लोकांना गणेशगुळे येथे जायलाच हवे.

कड्यावरचा गणपती मंदिर, आंजर्ले  ( रत्नागिरी )
एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.
दशभुजा गणेश हेदवी ( रत्नागिरी )

निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन मंदिर टेकडीवर वसले आहे. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर हेदवी गाव वसले आहे ह. दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते, असे म्हटले जाते.

जय गणेश मंदिर, मालवण  (सिंधुदुर्ग)
मूळचे मालवणचे कालनिर्णयकर्ते ज्योतिभास्कर जयंतराव साळंगावकर त्यांनी आपल्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्चून सर्वांगसुंदर असे गणेश मंदिर उभारले आहे. शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर पाहताचक्षणीच मन प्रसन्न होते. उत्तम शिल्पकला आणि भडक ऑइलपेंट टाळून केलेली सुखद रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता आहे. गाभार्‍यामधली सुवर्णगणेश मूर्ती अतिशय चित्ताकर्षक आहे. मंद तेवणार्‍या नंददीपांच्या प्रकाशात सुवर्ण चौरंगावर विराजमान झालेले श्री गजानन, दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दी आणि चवर्‍या ढाळणारे मूषक डोळे भरुन पाहताना दर्शनमात्रे मनः कामनापूर्तीअसा अनुभव येतो. आदिदेवता श्री गणेशाच्या भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव जय गणेशमंदिर ठेवण्यात आले आहे. मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

रेडीचा  श्रीगणेश  मंदिर (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वज्ञात आहे. या गावाची महती द्विभुज गणेशामुळे सातासमुद्रपार पोहोचली. रेडीत दोन ठिकाणी द्विभुज गणेश आहेत. एक समुद्रकिनारी आणि दुसरा यशवंत गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ! रेडी हे ठिकाण वेंगुल्र्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.

दिवेआगर गणेश (रायगड)

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव आहे. निळाशार अथांग समुद्र , गर्द माडाची बने आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली ती सुंदर कौलारू घरे, निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभला आहे. येथील द्रौपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सुमारे १००० वर्षापूर्वीची सोन्याची .३२ कि वजनाची सोन्याची मूर्ती सापडली होती. आजमितीस सोन्याच्या गणपतीचे दिवेआगर ही ओळख मुर्तीच्या चोरीमूळे मागे पडली असली तरी मूळ मंदिरास भेट देणार्या पर्यटकांत दिवेआगरचे महत्व कायम आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा किमि. चा अतिशय सुंदर, स्वच्छ आंणि सुरक्षित किनारा लाभला आहे. या किनार्यावर केवड्याची बने आहेत. या गावात एकुण पाच ताम्रपट एक शिलालेख सापडला आहे. गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा .. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे. येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते . येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत. अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले पपनसाची फळे पहावयास मिळतात. श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे, म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे.

नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर   (रायगड)

अलिबागहून मुरुडकडं जाताना अवघ्या सात किलोमीटरवर नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर आहे. मुरुड-जंजिरा तसंच श्रीवर्धन, हरिहरेश्वरला अलिबागहून जाणारा पर्यटक किंवा स्थानिकही या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. नारळी पोफळीच्या बागा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेल्या या मंदिरातील गणपतीचं दर्शन घेतलेल्या भाविक या मार्गावरून पुन्हा जाताना आपोआपच मंदिराकडं वळतो, असा अनुभव आहे. माघ शुद्ध चतुथीर्ला इथं सिद्धीविनायकाची मोठी यात्रा भरते. साळाव-मुरुड मार्गावर मुरुड गावाच्या आधी नांदगाव आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर रेवदंडा गावापुढील असणार्या खाडीवरील पूल ओलांडल्यावर डावीकडे साळाव गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण संगमरवरावर वापरून बांधलेले अतिशय सुंदरबिर्ला गणेशमंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती देखील संगमरवरी असून त्याला विविध प्रकारचे दागदाि गने घातले आहेत. या मंदिराच्या परिसरात मोठा बगीचा देखील आहे.

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा ( ठाणे )

महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातलं टिटवाळा हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे. कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळे या ठिकाणाला  प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे.

वास्तविकत: भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा उत्सव होतात. माघ शुक्ल चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही गणेश ही देवता ओळखली जाते. भाद्रपद माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्म दिन होय. या देवतेस हिंदू धर्म शास्त्रात अग्रपूजेचा मान आहे. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे. अशा या गणेशाची कोकणातील काही स्थानांची भटकंती आपणाला नक्कीच आनंद देईल.

धीरज वाटेकर

पर्यटन अभ्यासक, मो. 9860360948


















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...