Friday, January 6, 2023

मनिला:

 https://sagarkatdare.wordpress.com/

Posted: October 2, 2015 in Uncategorized

कामानिमित्ताने सप्टेंबर महिन्यात मनिला (फिलीपीन्स देशाची राजधानी) येथे जाण्याचा योग आला. मनात तशी बरीच धाकधूकच होती कारण यापूर्वी फारसे कोणी तिथे गेल्याचे ऐकिवात नव्हते (हापिस मधील काही व्यक्ती सोडल्यास). आणि त्यांच्याकडून ऐकलेल्या कहाण्या सुद्धा फारशा encouraging नव्ह्त्या. विशेषत: शाकाहारी लोकांचे होणारे हाल ऐकून मनात धडकी भरलेली होती. पण ४ आठवडे जाण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते.
हा माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास असल्याने जरा आधीपासूनच तयारी सुरु केली होती. तयारी म्हणजे खायला काय काय घेऊन जायचं याची. हो-नाही करता करता अगदी आदल्या दिवशी विसा मिळाला आणि माझ्या जीवाला थोडा विसावा मिळाला. शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी मी आणि सोबत २ सहकारी असे तीघे हैद्रबादेहून रात्रीच्या विमानाने निघालो. (जाण्यापूर्वी अर्थातच विमानतळावर मी सामोसा खाऊन घेतला कारण आता महिनाभर असल्या गोष्टींचे तोंड देखील बघायला मिळणार नव्हते ). पाठ मोडून काढणाऱ्या ५+ तासांच्या प्रवासानंतर आम्ही सिंगापूरला पोहचलो. येथून पुढच्या विमानप्रवासाला ३ तासांचा अवधी होता त्यामुळे मधल्या वेळात गिफ्ट voucher ने खरेदी, wi -fi शोधणे इत्यादी कामे उरकून घेतली. सिंगापूर विमानतळ (“चांगी” विमानतळ) हा अतिशय प्रशस्त आणि नीटनेटका आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे जिने चढण्याचा Escalator असतो त्यांप्रमाणे येथे चालण्यासाठी ‘सरकता रस्ता’ आहे. विमानतळाच्या आतमध्ये विविध नैसर्गिक देखावे नक्कीच लक्ष घेतात.  ईशान्य-पूर्व आणि पूर्वेकडील आशियाई देशांचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या या देशाची सुबत्ता तेथील विमानतळावरूनच ध्यानात येते. काही छायाचित्रे (सौजन्य: गुगल आणि काही माझे )
Singapore-Changi-Airport SIN_andrew_smith_smokersandgumloversbeware_5426q3u0r0 20150926_084916 (Small)

पुढील मनिलापर्यंतचा प्रवास हा बराच सुखद होता. आरामदायी सीट, जोडीला चित्रपट पाहण्याची सोय आणि नाष्टा यामुळे तीन तास अगदी भुर्रकन गेले. विमानातून होणारे मनिलाचे दर्शन कल्पनेपेक्षा बरेच निराळे होते. सुमारे ७००० हून जास्त बेटांचा समूह असलेला हा देश आहे. विमानातून आपल्याला मेट्रो-मनिलाचे दर्शन घडते. मेट्रो-मनिला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फिलीपीन्सचा NCR (National Capital Region). आणि येथील प्रदेशातील लोकसंख्येची घनता (Population density)  मुंबईपेक्षा थोडीशीच कमी. अगदी विमानतळाला लागून दाटीवाटीने असलेल्या वस्त्या पाहूनच आम्हाला याची कल्पना आली होती. परंतु येथील रस्ते अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त होते. शनिवार दुपार असल्याने वाहतुकीची वर्दळ कमी असली तरी सर्व काही अतिशय शिस्तबद्ध होते. फिलीपीन्समधील शहरांवर अमेरिकन संस्कृतीचा बराच प्रभाव आहे हे ऐकून होतो. जागोजागी पिझ्झा हट, Mac-D, KFC इत्यादी ठिकाणे, अमेरिकन पद्धतीची वेशभूषा आणि इंग्रजी बोलणारी माणसे पाहून त्याचा प्रत्ययही येत होता. आमच्या taxi चालकाशी बोलताना समजले की येथे प्रामुख्याने ‘तगालो’  नावाची भाषा बोलली जाते आणि बहुतांश लोकही तगालो याच वंशाचे असतात. या लोकांच्या भाषेमध्ये ‘ड’, ‘ढ’ इत्यादी कठोर वर्ण नसतात त्यामुळे यांच्या इंग्रजीला एक विशेष स्थानिक गोडवा जाणवत होता.

अखेर शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास हॉटेलवर पोचलो आणि उरलेला दिवस झोप पूर्ण करण्यातच घालवला. संध्याकाळी मला एकट्यानेच जेवायला बाहेर पडावे लागले. नशिबाने आमचे हॉटेल अतिशय मध्यवर्ती मोक्याच्या ठिकाणी असल्याने आजूबाजूला भरपूर पर्याय उपलब्ध होते. परंतु खरी पंचाईत तेव्हा आली ज्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणी आमचे corporate क्रेडीट कार्ड accepted नव्हते आणि personal क्रेडीट कार्डला पण त्याच वेळेस दगा द्यायचा होता. त्यामुळे एकतर ATM मशीन शोधून कॅश मिळवणे किंवा Amex कार्ड accept करणारे हॉटेल शोधणे असे दोनच पर्याय समोर होते. दुसरा पर्याय निवडून मी हॉटेल शोधत निघालो. रात्री उशिराने एकट्याने बाहेर फिरणे फारसे सुरक्षित नाही हा मौलिक सल्ला ध्यानात ठेवून मी जवळच्या एका हॉटेलात शिरलो. जरी ते दिसायला चकचकीत असले तरी मांसाहारी वासाने अगदी कसेसेच झाले. १० पानाच्या मेनू कार्डमध्ये मोजून २ शाकाहारी पदार्थ सापडले. पहिल्याच दिवशी उगाच कसलेतरी प्रयोग नको म्हणून मी आपले एक सूप मागवले. परंतु काही मित्रांनी सांगितल्याप्रमाणे शाकाहारी पदार्थाला पण विचित्र वास असल्याने एक चमच्यापेक्षा जास्त काही घेऊ शकलो नाही. मित्रांनी सांगितलेले एकेक किस्से खरे ठरणार या भीतीमध्येच मी घरी परतलो आणि घरचा “खाऊ” खाऊन झोपेच्या अधीन झालो.
क्रमश:

 

नवीन आठवड्याची सुरुवात चांगल्या ब्रेकफास्टने झाली असे म्हणता येईल. शुद्ध(जरा जास्तच) शाकाहारी गोष्टी मिळाल्या. दोन-तीन दिवसात जी काही हॉटेल्स पहिली होती त्यामुळे फळे, कच्च्या फळभाज्या पाहून आयुष्यात झाला नसेल एवढा आनंद झाला आणि भरपूर ताव मारून घेतला. आम्हाला ज्या ऑफिसमधून काम करायचे होते ते ऑफिसच एका मॉलमध्ये होते. मॉल संस्कृती हे मानिलाचे एक वैशिष्ट्य मानले जाऊ शकते (की अमेरिकेचा प्रभाव?)

Brkfast (Small)
मेट्रो-मनिलामध्ये खूप सारे मॉल आहेत आणि येथील मॉल हे आपल्याकडील मॉलच्या तिप्पटीने मोठे अहेत. सर्वात महागड्या ब्रांड पासून नकली मालापर्यंत सर्वकाही मॉल मध्ये मिळून जाते. अगदी Starbucks च्या कॉफी पासून Hongkong lane च्या ब्रेसलेट पर्यंत सर्व काही. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे मॉल कायम लोकांनी दुथडी भरून वाहायचे अगदी सोमवार-मंगळवारच्या दुपारच्या वेळेत सुद्धा. आमची शिफ्ट दुपारी १-१० ची आणि जेवणाची सुट्टी ४-५ होती. मॉल मध्ये थाई, जपानी,फिलिपीनो, इटालिअन, अमेरिकन असे विविध पद्धतीचे खाणे कायमच उपलब्ध असायचे. मांसाहारी लोकांसाठी ही ठिकाणे म्हणजे ‘जन्नत’ आहेत आणि मॉल मध्ये ऑफिस असणं म्हणजे स्त्री-वर्गासाठी पर्वणी 😉

Greenhills mall (Small)

मनिला मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे साधी-सरळ आणि मदतीस तयार असणारी माणसे. संध्याकाळी उशिराने एकट्याने बाहेर फिरू नये, लुटले जाण्याची शक्यता असते ही गोष्ट येथे जेवढी खरी आहे तेवढीच येथील लोक ‘फ़ोरेनर’ म्हणून तुम्हाला वेगळे वागवणार नाहीत हेही खरे ! सदैव हसतमुख आणि शांत स्वभावाचे येथील लोक. अगदी प्रचंड ट्राफिक जाम असताना देखील कोणी होर्नचा वापर करत नाही ही गोष्ट तर एका पुणेकराच्या अगदीच पचनी पडणारी नव्हती. चुकून एखादी गाडी दुसरीच्या अगदी जवळून गेलीच तर आपण होऊन सॉरी म्हणणे, रस्ता ओलांडणाऱ्या लोकांसाठी गाड्यांनी थांबणे या गोष्टी साहजिकच या लोकांप्रती आदर वाढवणाऱ्या होत्या. गल्ल्यांमधील रस्त्यांनी जाताना प्रकर्षाने भारताची आठवण होत असली तरी मुख्य रस्ते अतिशय रुंद, शिस्तबद्ध परंतु  रहदारीचे आहेत. सर्वच दुकानांवर इंग्रजीमधून पाट्या असल्याने कोणते दुकान कशाचे हे समजायला काहीच अवघड जात नाही.

आपल्याकडील ‘टमटम’ प्रमाणे येथे जीपनी नावाचा प्रकार आहे जी एक  ज्यांचे ठरलेले मार्ग असतात. एका जीपनी मध्ये सुमारे १५-२० लोक बसू शकतात त्यामुळे याला एक प्रकारची मिनी-बस सुद्धा म्हणता येऊ शकेल. दुसर्या महायुद्धाच्या काळापासून जीपनी हा प्रकार येथे अस्तित्वात आहे असे समजले. या जीप्नींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर केलेली विविधरंगी चित्रकला. तिच्या प्रचंड आकारामुळे चित्रकारितेला चांगलाच वाव मिळतो

jepeney-2 Jeepney (Small)

अजस्त्र मॉल संस्कृती मध्ये जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांची स्वयंशिस्त. लिफ्टने वर जाण्याची घाई सर्वांनाच असते मात्र यासाठी लिफ्टची शिस्तीने एका ओळीत थांबून वाट पाहणारी आणि ओळीतील आपापल्या क्रमांकानुसारच लिफ्टमध्ये जाणारी माणसे पाहून फोटो काढल्याशिवाय राहवले नाही.

Queue (Small)

आणि आता आत्तापर्यंत जाणवलेली सर्वात उल्लेखनीय गोष्ट. नवीन ऑफिस मधील लोकांनी जेव्हा आम्हाला सांगितले की ‘अमीर खान ‘ हा त्यांचा आवडता कलाकार आहे. ‘थ्री इडीयट्स’ हा सिनेमा इथे सुपरहिट आहे. हे असले काही ऐकायला मिळेल याचा आम्ही कोणी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्ह्ता. बॉलीवूडचे बरेच सिनेमे येथे इंग्रजी उपशीर्षकांद्वारे (subtitles) प्रक्षेपित होतात. ‘तारे जामीन पर’ हा चित्रपटही येथे आवडीने पहिला जातो. आणि ‘क्या इतना बुरा हूँ मै माँ’ हे गाणे यांच्या(ही) डोळ्यातून पाणी काढते. कथानक, संगीत आणि अभिनय या गोष्टींना दाद द्यायला भाषेची फारशी अडचण नसते याचीच प्रचिती येथे येते.

काही उर्वरित छायाचित्रे

night view (Small) Iron man (Small)


 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...