मुंबई नुसतं नाव ऐकलं तरी गजबजाट, गर्दी, सतत धावणारी माणसं, पळणाऱ्या ट्रेन्स आणि गाड्या असं चित्र डोळ्यापुढे उभं राहतं, आणि खरोखरच मुंबई अगदी तशीच आहे. सततची गर्दी असलेलं हे ७ बेटांनी बनलेलं शहर, भारताची आर्थिक राजधानी, सिमेंट काँक्रीटचं जंगल आणि घडाळ्याच्या काट्यावर धावणारी लोकं हीच मुंबईची ओळख बनली आहे, पण ऐतिहासिक वारसा लाभलेली हीच मुंबई इतकी बघणीय असेल हे ऐकून बऱ्याच लोकांना नवल वाटतं. मुंबईच देखणेपण हे इथल्या गल्ल्या-बोळात फिरल्याशिवाय कळणं तसं अवघड!
काल हेरिटेज वॉक च्या निमित्ताने साहेबाची जुनी मुंबई बघण्याचा बेत जमला. सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून झाली, रेल्वेने आम्ही CST स्टेशनला पोचलो, मुंबईत प्रथम येणाऱ्याला स्टेशनची हि बिल्डिंग भुरळ पाडतेच पण रोज ट्रेनने प्रवास करून येणाऱ्याला सुद्धा ह्या बिल्डिंगबद्दल तितकंच अप्रूप वाटतं.
पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ची हि वास्तू आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये गणली जाते. ब्रिटिश आर्किटेक्ट फ्रेडरिक विलियम स्टीव्हज ह्याने इटालियन-गॉथिक पद्धतीने बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी आहे. १८८७ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. अप्रतिम स्थापत्याचा नमुना म्हणून ही आजही ओळखली जाते. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे च्या सेंट्रल रेल्वे जाळ्याला जोडणारे मुख्य ठिकाण म्हणजे CST स्टेशन.इथून साधारण १ किमी अंतरावर हेरिटेज वॉकचा आमचा पहिला स्टॉप होता एशियाटिक सोसायटी लायब्ररी.
एशियाटिक सोसायटी लायब्ररी अथवा टाऊन हॉल हे एक राज्य केंद्रीय ग्रंथालय आहे. १८३१ साली बांधून पूर्ण झालेली ही वास्तू, नियोक्लासिकल आर्किटेक्चर शैलीत बांधलेली असून आजच्या घडीला इकडे संस्कृत, मराठी, हिंदी, प्राकृत, पर्शिअन, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली पुस्तकं, ग्रंथ, हस्तलिखिते किमान एक लाखांहून अधिक ग्रंथ, १२०० हुन अधिक नकाशे आणि पोथ्या संग्रहित आहेत. एशियाटिक सोसायटी समोरच हॉर्निमन सर्कल किंवा बँक स्ट्रीट परिसर आहे. हॉर्निमन सर्कल गार्डनला त्याच्या वर्तुळाकार आकारावरून नाव देण्यात आलं होतं. गार्डनच्या सभोवती युरोपियन धाटणीच्या बिल्डींग्स आहेत. पूर्वी ह्याचं नाव एल्फिस्टन गार्डन होतं, स्वातंत्र्यानंतर या भागाला पत्रकार बेंजामिन हॉर्निमन ह्यांच्या नावावरून हॉर्निमन गार्डन असं नाव देण्यात आलं.
पुढे आम्ही बँक स्ट्रीट आणि काळा घोडाच्या गल्ल्यांमध्ये इतिहासाच्या खुणा शोधत मुक्त भटकंती केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग, आजूबाजूचे लहान लहान कॅफेज आणि युरोपियन धाटणीच्या इमारती पाहून मला गोव्याच्या फौंटनहासची आठवण झाली, तिथल्याच एका कॅफे मध्ये मनसोक्त नाश्ता करून पुढे आमची पावलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे वळली. पूर्वीचे हे म्युझिअम २० व्या शतकात बांधलं गेलंय. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट याने हिंदू, राजपूत आणि इस्लामी बांधकाम तंत्राचा वापर केलेला दिसतो. प्रत्येक मंगळवारी विद्यार्थी आणि लहान मुलांना इथे मोफत प्रवेश आहे. संग्रहालयात अनेक दालनं आहेत. संपूर्ण संग्रहालय बघण्यासाठी कमीत कमी २-३ तास लागतात. मुळात ऐतिहासिक वास्तू आणि आतल्या ऐतिहासिक गोष्टी बघून आम्ही भारावून गेलो. मुंबईत लहानपण गेलेल्या, मुंबईत शाळेत गेलेल्या , प्रत्येकाला लहानपणी इथे सहलीला आल्याचे नक्कीच आठवत असेल. इकडे फिरताना शाळेतले आम्ही आठवून खूप मजा वाटली. सध्या बरेच आधुनिक बदल बघायला मिळाले. नूतनीकरणामुळे नक्कीच पर्यटकांची गर्दी जास्त होत असेल. काळा घोडा शिल्पापासून संग्रहालय अंदाजे ८०० मीटर वर आहे. चालत अगदी १० मिनिटांच्या अंतरावर. तसेच पुढे चालत गेल्यावर गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असणारं हे ठिकाण. १९२४ साली ह्याचे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बेसॉल्ट खडकात बांधलेली ही इमारत ८५ फूट उंच असून किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी ह्यांच्य्या भेटीची आठवण म्हणून बांधल्याचे ह्यावर असलेल्या शिलालेखांतून स्पष्ट होते. इंडो- सरसेनिक शैलीचे बांधकाम, समोर अथांग अरेबियन समुद्र, काठाला झुलणाऱ्या लहान मोठ्या होड्या बघत आम्ही बराच वेळ तिथे थांबलो.
थोडं पुढे कोलाबा कॉजवे ला मनसोक्त खरेदी करून घेतली. फोर्ट भागात फिरण्याचा कधीही कंटाळा येत नाही, ह्याची प्रचिती प्रत्त्येक वेळी होते तशी आताही झालीच. दिवस ओसरला तसे आम्ही पुन्हा CST स्टेशनला आलो. हेरिटेज वॉक/ टूर संपली. आता परत ही वास्तू डोळ्यात साठवून निघायची वेळ झाली. पळत पळत ट्रेन न पकडता परत आलो असतो तर जणू पाप लागलं असतं त्यामुळे तेही करून झालं.
मुंबईत फिरण्यासाठीच्या बऱ्याच जागा आहेत आणि त्यासाठी असे हेरिटेज वॉक्सही बऱ्याच कंपन्या अरेंज करतात. वाळकेश्वर, बाणगंगा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तारापोरवाला मत्सालय, क्रॉफर्ड मार्केट,भुलेश्वर मार्केट, नेहरू तारांगण, एलिफन्टा लेणी या आणि अशा अनेक जागांना भेट देऊ शकतो. संध्याकाळी मरिन ड्राइव्ह वर मावळता सूर्य बघणे किंवा रात्री खूप उशिरा सुद्धा तिथे नुसतं बसून समुद्र आणि रात्रीची मुंबई बघणे हे अनुभव निव्वळ वर्णन न करता फक्त अनुभवावेच असे आहेत. गजबजाटा सोबत आयुष्य जगायला शिकवणारी मुंबई प्रत्येकाला आपलंसं करतेच आणि खऱ्या अर्थाने भरभरून आयुष्य जागायलाही शिकवते हे नक्कीच! कोणीतरी म्हंटलंच आहे ना,
ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है Bombay मेरी जाँ...!
1. एशियाटिक सोसायटी लायब्ररी
2. हॉर्निमन सर्कल
१.
२.
3. बँक स्ट्रीट, हॉर्निमन सर्कल

4. लहान गल्ल्या, बँक स्ट्रीट

5. केनेसेथ अलियाहु सिनॅगॉग
१.
२.
6. बेकहाऊस कॅफे, काळाघोडा
१.
२.
7. काळाघोडा शिल्प
१.
२.
8. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
१.
२.
३.
9. Kalaghoda-lanes resembling Fountainhas, Goa
१.
२.
https://mumbaimap360.com/mumbai---bombay-walking-map
https://www.alltrails.com/trail/india/maharashtra/fort-heritage-area-of-...
Map sathichya kahi links share kartey
Hyapaiki khakitours mhanun je ahe tyanche routes sadharan changle
ahet pan rates kahicha kahi wattat. Tyancha route baghun apan apla walk
plan karu shakto fakta information ji sangtat tyacha aplyala abhyas
karun java lagta, apanch aple guide aslyamule. Hope he helpful asel.
Marathi font cha kahi tari gondhal zalyane english marathit type karava lagtay
काला घोडा फेस्टिवल तारखा आणि कार्यक्रमासाठी फेसबुक पेज लिंक
https://facebook.com/100064694376498/
यांचे बरेच कार्यक्रम असतात.
हेरिटेज वॉक असते/ आहे.
आणखी माहिती
https://www.holidify.com/pages/kala-ghoda-arts-festival-1607.html
या डिजिटल माहितीपेक्षाही त्यांचे कार्यक्रमांचे एक रंगीत पुस्तक तिथे मिळते ते मिळवून त्यातून इथे कुणी माहिती दिल्यास तिथे जाण्याची तारीख आणि वेळ कळेल. लहान मुलांसाठी (५-१२ ) पर्वणीच असते. या वर्षी नक्की जा.
तै, रिदम हाउस आणि स्ट्रँड बुक स्टॉल बंद पडले आता. एक पर्व संपले>> मला माहीत आहे दादा. पण ती बिल्डिन्ग आहे. मी काळा घोडा लायन्स गेट बस स्टॉपला उतरून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये काम केले आहे. अप डाउन रोज करून. समोरच ते बर्ड हाउस सलीम अली ह्यांची सोसायटी, जुने मॅक्स मुल्लर भवन, टर्निन्ग वरचे बारके शंकराचे मंदीर, चेतना थाली रेस्टॉरंट , बाहेर मिळणा रे वन प्लस वन मघई पान. वे साइड इन. इथे आंबेडकर साहेब ही येत असत - तिथे मिळणारे धान शाक, - पुढे एन जी एम ए. जबरदस्त एरिआ आहे. वेसाइड इन पण बंद झाले बहुतेक आता.
टाउन इज लव्ह.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.