Wednesday, January 25, 2023

केनिया

 

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)


Masai Mara
नैरोबीहून सकाळीच मसाई मारा अभयारण्य पाहाण्यासाठी निघालो. मसाई हे स्थानिक आदिवासी जमातीचे नाव आहे आणि मारा ही केनिया आणि टांझानिया मधून वहाणारी मुख्य नदी आहे. मसाई मारा नॅशनल रिझर्व आणि सरेंगेटी नॅशनल पार्क मधील वन्य जीवन पूर्णपणे मारा नदीवर अवलंबून आहे. गेली १५ वर्ष मारा अभयारण्याचा अनुभव असलेला ५० वर्षीय सायमन हा ड्रायव्हर कम गाईड आम्हाला घ्यायला आला होता. माराला जाण्यासाठी ४x४ जीप्स आणि व्हॅन मिळतात. एका जीप/व्हॅनमध्ये ७ जण बसू शकतात. जीप आणि व्हॅनच्या भाड्यात माझ्या ६ दिवसांच्या प्लानसाठी १००$ चा फरक होता त्यामुळे मी व्हॅन घेतली होती . पूर्ण प्रवासात व्हॅन घेतल्या बद्दल वाईट वाटले नाही पण प्रवास संपल्यावर १००$ वाचवल्याचा आनंद झाला .

  ऱविवार असल्याने नैरोबीच्या ट्रॅफीक मधून सुटका झाली. नैरोबीतील रस्ते प्रशस्त आणि अप्रतिम होते. केनियासारख्या भारतापेक्षा मागास देशाला जे जमले ते अजून आपल्याला जमलेल नाही. आपण रस्ते खराब होण्यासाठी पावसाच कारण देतो. पण इथे तर विषुववृत्तीय प्रदेश असल्याने पावसाळ्या नंतर इतर वेळीही पाऊस असतोच. नैरोबी शहर जगातील इतर राजधानीच्या शहरांसारखच चकचकीत आहे. त्याच बरोबर अफ़्रीकेतील सगळ्यात मोठी झोपडपट्टी सुध्दा या शहरात आहे. शहरा बाहेर पडल्यावर हायवे चालू झाला. मोंबासा हे केनियाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले बंदर आहे.  युगांडा, रवांडा, बुरुंडी या समुद्र किनारा नसलेल्या देशात (Land lock) येणारा आणि जाणारा माल मोंबासा बंदरातून जातो. त्यामुळे केनियाला चांगल उत्पन्न मिळवून देणारा हा महामार्ग आहे. चिनी कंपनीने मोंबासापासून हा महामार्ग बांधलेला आहे आणि आता रेल्वे मार्गाचे काम जोरात सुरु आहे . अफ्रीकेतील अनेक देशात चीनने गुंतवणूक चालू केलेली आहे. या मार्गांचा चीनला अफ्रीकेतील कच्चा माल आपल्या देशात न्यायला व त्यांच्याकडे बनलेला पक्का माल या देशात ओतायला चांगला उपयोग होतोय. अठराव्या शतकात इंग्रजांनीही मोंबासा ते लेक व्हिक्टोरिया नॅरोगेज रेल्वे बांधली होती. त्याचा वापर इंग्रजांच्या अफ्रिकेतील साम्राज्याचे रक्षण करणे आणि अफ्रिकेतील व्यापार वाढवणे याकरिता होणार होता. त्याकाळी इंग्रजांना स्थानिक अफ्रिकन कामगार मिळेनात त्यामुळे त्यांनी रेल्वे बांधण्यासाठी भारतातून ३८००० कामगार नेले. त्यातील अनेकजण आजारपण आणि सिंहाच्या हल्ल्यात मरण पावले होते. (त्या सत्य घटनेवर आधारीत "The Ghost & The Darkness" हा इंग्रजी चित्रपट मागे पाहिला होता, त्यात ओम पूरीने काम केले होते). 


या रेल्वेपासून इंग्रजांना म्हणावा तसा फायदा  झाला नाही त्यामुळे "Two rusting pieces of Iron" अशी त्या रेल्वे मार्गाची ओळख झाली. रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर ६७४८ मजूरानी (त्यांना इथे कुली म्हणतात) परत जाण्यास नकार दिला आणि ते इथेच राहीले. केनियाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि उभारणीत भारतीयांचे मोठे योगदान आहे. नैरोबीतल्या नॅशनल म्युझिअम मध्ये या रेल्वे बांधणीवर आणि भारतीयांच्या राष्ट्र उभारणीतील्या योगदानावर वेगळे विभाग आहेत .

Hyrax in Maasai Mara National Reserve, Ngiro-are Road, Kenya

Great Rift Valley

नैरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर ९६०० किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेटसच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे, खंडांच्या या सरकण्यामुळे आजपासून अंदाजे ५० लाख वर्षांनी या व्हॅलीच्या जागी समुद्र असेल आणि ईस्ट अफ़्रिका हा अफ़्रिके पासून वेगळा झालेला नवीन खंड तयार होईल. रिफ़्ट व्हॅलीतून जातांना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. "जमिन दुभंगली आणि आभळ फ़ाटल तर दाद मागायची कोणाकडे" या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहाणार्‍या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमिन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्याबरोबर वाहून जाते आणि अचानक जमिन खचते. चीनेने नविनच बनवलेल्या महामार्गावर अशीच जमिन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. यू ट्युबवर या संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.

View of Great Rift Valley
या ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरातून घाट काढलेला आहे. या घाटात व्ह्यू पॉईंट आहे. येथे काही भेटवस्तूंची दुकाने आणि कॉफी शॉप्स आहेत. पर्यटक इथे थांबून ग्रेट रिफ्ट व्हॅली पाहातात . दुकानात चक्कर मारली. इथे लाकडात कोरलेले प्राणी, माणसे त्यांचे मुखवटे, बुकमार्कर, ट्रे , रिंग्ज इत्यादी अनेक प्रकार होते. किंमती मात्र काहीच्या काही सांगत होते. एक छोटा जिराफ १२०० केनियन शिलिंगला होता . याठिकाणी बार्गेनिंग करुन अर्ध्या किमतीत मिळाला असता . या गोष्टी माराला याच्याहून महाग असे तिथला विक्रेता सांगत होता. आम्ही विंडो शॉपिंग करुन पुढचा प्रवास चालू केला . घाट उतरुन पुढचे ४० किलोमीटर ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून प्रवास केला, पुढे ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या पश्चिमेच्या डोंगरावर चढून नारोख हे शहर वजा गाव गाठले. माराच्या आधीचे हेच मोठे गाव आहे . या ठिकाणी माराला जाणाऱ्या सर्व गाड्या पेट्रोल/ डिझेल भरायला थांबतात . कारण यापुढे थेट माराला पेट्रोल पंप आहे पण तिथे पेट्रोल खूप महाग  मिळते. गावात टस्कीज नावाचा मॉल आहे. त्यातून पाण्याच्या बाटल्या घेतल्या. १ लीटरच्या १२ बाटल्यांचा जंबो पॅक ७२० केनियन शिलिंगला मिळाला. याच बाटल्या माराला जास्त किमतीत मिळतात. (आणि इतर ठिकाणी १ लीटरची एक बाटली १०० केनियन शिलिंगला पडते). केनियातल्या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. प्रायव्हेट बस , गाड्या, बाईक्स यांच्यावर पाण्याचे रिकामे / भरलेले कॅन घेउन माणसे दिसतात. कुठल्याही हॉटेलात तुम्हाला फुकट पाणी देत नाहीत , विकतच घ्यावे लागते .

Nairobi to Masai Mara Shortcut
नारोखच्या पुढे खरा प्रवास चालू झाला. ऱस्ता असा नव्हताच. कच्च्या रस्त्यावरुन खड्डे, ओहळ, नाले पार करत ही ५० किलोमीटरची हाडे खिळखिळी करणारी, धुळीने माखून टाकणारी "बंपिंग राईड" चालू झाली. ही राईड साधारणपणे २ तास चालते. या ठिकाणीही चीनी कंपनीचे रस्ता बांधण्याचे काम चालू आहे. एक दोन वर्षात ते पूर्ण होइल. केनियाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणाऱ्या मारा अभयारण्याला जाण्यासाठी आजवर सरकारने पक्का रस्ता का बांधला नाही हे आश्चर्यच आहे ? या रस्त्यावरून जाण्याचा त्रास वाचावा यासाठी नेहमीचे चालक "शॉर्टकटने" गाडी नेतात. अनेक मसाई पाड्या मधून हा रस्ता जात होता. अनेक ठिकाणी हा नसलेला रस्ता खणून मसाईनी अनधिकृत टोल नाके उभारले होते . पारंपारिक कपड्यातले मसाई साध्या लाकडाची काठी आडवी टाकून रस्ता अडवत होते आणि आमचा चालक प्रत्येक वेळी १०० शिलिंग त्यांना देत होता. माराच्या अलिकडे ४० किलोमीटरवर लागणाऱ्या या छोटया छोट्या पाड्यांच्या आजूबाजूलाच झेब्रे, जिराफ, वाईल्ड बिस्ट, हरण दिसायला लागली होती. हे प्राणी पाहून आम्ही हरखून गेलो. कॅमेरे सरसावून बसलो पण आमचा चालक गाडी थांबवायला तयार नव्हता तो म्हणाला,"तुम्हाला मारामध्ये हे प्राणी इतके दिसतील की तुम्ही नंतर त्यांच्याकडे पाहाणारही नाही". आम्हाला वेळेवर कॅंपवर पोहोचवून संध्याकाळच्या गेम ड्राईव्ह (सफारी) साठी त्याला आम्हाला न्यायचे होते . त्यामुळे त्याने गाडीचा वेग जराही कमी न करता त्या तसल्या रस्त्यावरून सुसाट हाणली. आम्ही आमचे बंप एकाजागी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत त्या बंपिंग राईडचा आनंद घ्यायचा प्रयत्न करु लागलो. दुपारी २ वाजता आम्ही एकदाचे "रायनो कॅंपवर" पोहोचलो. इथे ओळीने तंबू मांडलेले होते. वेळी अवेळी पडणाऱ्या पावसापासून संरक्षण होण्यासाठी चार पक्क्या खांबावर तंबूच्यावर पत्रे टाकलेले होते. जमीन पक्की होती. तंबूत तीन खाटा,मच्छरदाण्या आणि मागच्या बाजूला अटॅज्ड संडास, बाथरुम होते. बाथरुम मध्ये फक्त शॉवर होता. बादली तांब्या / जग इथे आंघोळीसाठी वापरत नसावेत . कारण पुढेही सगळ्या हॉटेलात हिच परिस्थिती होती. मात्र प्लास्टिकच्या बादल्या घेउन शॉपिंगला निघालेले आणि बादल्या भरुन सामान आणणारे स्त्री पुरुष मात्र नैरोबी पासून सगळीकडे दिसले.

Rhino Camp, Masai Mara

Tent for 3 days, Rhino Camp, Masai Mara

तंबूत सामान टाकून जेवायला पळालो. ४ वाजता सायमन व्हॅन घेउन आला. आता व्हॅनचे रुफ टॉप उघडले होते. थोड्याच वेळात आम्ही माराच्या गेट मधून आत प्रवेश केला. एका बाजूला डोंगर डोंगराच्या पायथ्यापासून दूरवर नजर ठरणार नाही तिथपर्यंत पसरलेले पठार , त्यावर उगवलेले हिरव - पिवळ गवत आणि या लॅंडस्केपला छेद देत उभे असलेले एखादेच झाड असा एकंदर माराचा नजारा होता. प्रवेशव्दारातून अर्धा किलोमीटर अंतरावर गाडी आली आणि पर्यटकांचे स्वागत करायला उभे असल्या सारखे  झेब्रे, वाईल्ड बिस्ट, हरण दोन्ही बाजूला दिसायला लागली. थोडे पुढे गेल्यावर अफ्रिकन हत्तीचे एक कुटुंब दिसले.  दोन मोठे हत्ती आणि 3 पिल्ल अस ५ जणांच कुटुंब होते. त्यांच्या पाठी धुळीने माखलेल्या होत्या, नुकतेच धुळस्नान झाले असावे. त्यांचे निरीक्षण करत असतानाच मागच्या बाजूला झाडांच्या आड जिराफांचा कळप दिसला. पहिल्याच सफारीत सगळे प्राणी दिसताहेत की काय अस वाटायला लागले.

African Elephant Family, Masai Mara, Kenya
East African Crowned Crane, Masai Mara

Zebra, Masai Mara

African Wild Buffalo

Tapi, Masai Mara

Masai Mara
आम्हाला छायाचित्र घेण्यासाठी वेळ देत थांबत / संथ गतीने व्हॅन पुढे चालली होती. आता रस्त्याच्या डाव्या बाजूला दूरवर तीन रानम्हशी चरत होत्या. त्यातील एक रेडा चिखलात मनसोक्त लोळत होता . नंतर डोक्याने माती उकरुन इकडे तिकडे फेकायला त्याने सुरुवात केली. दुर्बिणीतून त्याच्या हालचाली व्यवस्थित पाहाता आल्या. आता ६ वाजून गेले होते आणि ६.३० ला अभयारण्यातून बाहेर पडायचे असल्याने परत फिरलो. येताना रस्त्याच्या बाजूला आम्हाला रस्त्यालगत "ईस्ट अफ्रीकन क्राऊन क्रेन" या पक्ष्याचे संपूर्ण कुटुंब दिसले. आई बाबा आणि दोन छोटी पिल्ले असा परीवार शांतपणे चरत होता. हा सुंदर आणि राजबिंडा पक्षी घानाचा राष्ट्रीय पक्षी आहे. गंमत म्हणजे त्यानंतर आम्ही जितक्या वेळा या रस्त्याने गेलो त्यावेळी ते कुटुंब तिथेच चरताना दिसले. परतीच्या प्रवासात दोन कोल्हे (जॅकल ) दिसले .

     (Play Video for Masai Mara View from Roof Top Open Van)
तंबूत पोहोचल्यावर सर्वात पहिले काम म्हणजे आपल्या कडील सर्व गोष्टी चार्ज करणे. कारण या भागात वीजेची सोय नाही. संध्याकाळी ७ ते १० आणि सकाळी ५ ते ७  जनरेटर चालवले जाते . त्यात जे काय चार्जिंग करायचे ते करा. चार्जिंगसाठी कॅमेरा लावायला गेल्यावर लक्षात आले की इथे चौकोनी खाचा असलेले सॉकेट आहेत. आपल्याकडच्या गोल पिना यात घुसत नाहीत. मग इथल्या बेथी नावाच्या मॅनेजरला गाठले . बेथी हसतमुख आणि मदतीला तत्पर होती. तिने तिच्याकडचे सॉकेट मला दिले हे चालत का बघ असल्यास मी तुला दुसरे आणून देते म्हणाली . एवढ्या रात्री कुठून आणणार त्यावर ती म्हणाली माझा माणूस बाईकवर जाऊन आणून देइल . फक्त ५०० शिलिंग पडतील अस सांगितले . "नाविलाज को क्या विलाज", अर्ध्या तासात दुसरे सॉकेट हजर झाले . दोन कॅमेरे तंबूत आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी जेवण घरात गेलो. तिथे कोपऱ्यात छोटासा बार होता . सगळे विदेशी पर्यटकांचे दारुकाम सुरु झालेले होते. जेवण बुफे होते . भारतीय खाद्य संकृतीचा केनियन खादयपदार्थावर प्रभाव आहे. त्यामुळे भात, उसळ, चपाती, मटन, चिकन इत्यादी पदार्थ सहज मिळतात. त्यामुळे खाण्याचा कुठेही प्रॉब्लेम झाला नाही. खाऊन झाल्यावर तंबूत परतलो. पाउस चालू झाल्याने आज कॅंप फायर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे तंबूत जाऊन झोपलो. दिवसभराच्या प्रवासाने झोप कधी लागली ते कळलेच नाही .

Wilde Beest

Masai Mara

Masai Mara

Evening at Masai Mara

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 
क्रमशः

 

केनिया सफारी - २ ( सिहांच्या प्रदेशात ) Kenya Safari - 2 (Lion Kingdom)


Lion , Masai Mara
मसाई मारा अभयारण्यात जाण्यासाठी एकच गेट आहे. या गेट मधून एक मोठा कच्चा रस्ता थेट मारा नदीपर्यंत (टांझानियाच्या सीमेपर्यंत) जातो त्यामुळे हे गेट आणि मारा नदीजवळचे गेट या दोन्ही गेटवर केनियन लष्कराचा ताबा आहे. या मुख्य रस्त्याला अनेक उप रस्ते फुटलेले आहेत. या रस्त्यांवरुन तुम्ही कुठेही गाडीने भटकू शकता. फ़क्त रस्ता सोडून गाडी चालवायला मनाई आहे. काल सारखेच वाईल्ड बीस्ट, हरण, झेब्रे यांनी आमच स्वागत केले. थोडे पुढे गेल्यावर ईस्ट अफ्रीकन क्राऊन क्रेनच संपूर्ण कुटुंब परत त्याच जागी दिसले. इतक्यात वायरलेसवर मेसेज आला आणि आमची गाडी सुसाट त्या दिशेने निघाली. एका माळरानावर सिंहाच्या कळपाने वाईल्ड बीस्टची शिकार केली होती आणि ६ सिंहिणी ती शिकार खात होत्या. सातव्या सिंहीणीचे खाऊन झाले असावे. ती बाजूला सकाळच्या थंडीत उन अंगावर घेत बसली होती.  नेहमीप्रमाणे सिंह पहिल्यांदा शिकार खाऊन निघून गेला असावा.त्यामुळे तो आसपास कोठे दिसला नाही.

Lioness with (kill) wild beest, Masai Mara

Lioness with kill , Masai Mara

थोड्या वेळात एकेका सिंहीणींचे पोट भरले, तश्या त्या थोड्या उंचावर येउन वेगवेगळ्या भागात विसावल्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या सुंदर दिसत होत्या. त्यातील एक सिंहीणी आमच्या गाड्यां मधून मार्ग काढून रस्त्याच्या बाजूच्या गवतात गडप झाली. खर तर मारा अभयारण्यात दुरवर पसरलेला गवताळ प्रदेश आणि तुरळक झुडपं/ झाडे आहेत तरीही सिंह, बिबट्या सारखे प्राणी त्याच्याशी समरुप होऊन जातात. 

( झुडपात जाऊन बसलेल्या सिंहीणेचे झूम कमी करत काढलेले ३ फ़ोटोज खाली दिले आहेत. शेवट्च्या फ़ोटोत सिंहीण झुडूपात समरुप झालेली दिसतेय .)




पुन्हा वायरलेस खणखणला आणि गाडी दुसर्‍या दिशेला निघाली. इथे एका उंच खडकावर एक सिंह आणि तीन सिंहीणी सकाळचे ऊन खात शांतपणे झोपल्या होत्या. सिंह आणि त्याच्या बाजूची सिंहीण अधूनमधून उठून आजूबाजूचा कानोसा घेत होती. त्या खडकाला पूर्ण फ़ेरी मारुन त्यांची अनेक छायाचित्र घेतली. अर्धा तास गेला त्यांची समाधी भंग होण्याचा संभव दिसत नव्हता. आम्ही पुढे जाण्यासाठी गाडी वळवली आणि खडकाला वळसा घालतोय तर जीप समोरच एक सिंहीण आणि तिच्या मागोमाग चार छावे रस्ता ओलांडून खडकाकडे निघालेले दिसले.

Lion  at Masai Mara
सिंहींण झपाझप खडक चढून गेली आणि झोपलेल्या सिंहाच्या अंगावर ओरडली. (ती बहुतेक म्हणाली असावी, "शिकार पण आम्हीच करायची, पोर पण आम्हीच सांभाळायची आणि तुम्ही आयत गिळून झोपा काढताय लाज नाही वाटत... वगैरे") सिंह अनिश्चेने उठला आणि खडक उतरुन दुसर्‍या बाजूला गवतात गायब झाला. 

Lioness with Cubs, Masai Mara

Lion, lioness & Cubs ,Masai Mara

दोन छावे खडकाच्या पायथ्यापर्यंत सिंहाच्या मागोमाग गेले. आई बरोबर असलेल्या दोन छाव्यांनी खडकावर इकडे तिकडे बागडायला सुरुवात केली. एकाने सिंहाच्या बाजूला झोपलेल्या आपल्या मावशीशी लाडात येऊन खेळायला सुरुवात केली. पण मावशी त्याच्यावर गुरकावली. तो पर्यंत खाली गेलेले दोन छावे परत खडकावर आले आणि चौघे मिळून खेळू लागले. छाव्यांच्या प्रवेशामुळे मघापासून स्तब्ध असलेल्या चित्रात अचानक चैतन्य आल. पण एवढ नाट्य घडूनही दुसर्‍या बाजूला झोपलेल्या सिंहींणींच्या समाधीचा भंग झाला नाही. 

खेळायला आलेल्या छाव्यावर ओरणारी सिंहीण (कैकयी)

Lioness & Cub , Masai Mara

छाव्यांच्या बाललीला पहाण्यात वेळ मस्त जात होता. इतक्यात बाजूच्या गवतातून अजुन एक सिंहींण आणि तिचा छावा बाहेर आला. सिंहींण पुढे आणि छावा मागोमाग लंगडत येत होता. त्याच्या पुढच्या उजव्या पंजाला काहीतरी झाले होते. सिंहींण खडकावर चढून गेली. छावा लंगडत – लंगडत खडकावर चढत होता. इतक्यात मघाशी खेळायला आलेल्या छाव्यावर ओरडलेली सिंहींण खाली उतरुन आली आणि छाव्याव रगुरकावली. त्या बरोबर छाव्याने जमिनीवर लोळाण घेतली आणि तो तसाच पडून राहीला. सगळ्या छाव्यांचा द्वेष करणार्‍या या सिंहीणीला आम्ही "कैकयी" अस नाव दिले.  मुलाच्या मदतीला आई धावून गेली. त्याबरोबर कैकेयी मावशीने माघार घेतली. हा प्रकार चार छावे खडकावरुन भेदरुन पाहात होते. आईच्या मागोमाग लंगडत आलेल्या दादाला पाहून ते खुष झाले. सगळे मिळून खेळण्यात दंग झाले. या सगळ्या गडबडीने गाढ झोपलेल्या सिंहीणी पण उठून बसल्या. आयांनी पिल्लाना आपल्या जवळ घेउन गोंजारायला चाटायला सुरुवात केली. हे सुंदर दुर्मिळ दृश्य मनात साठवून पुढे निघालो.

या सर्व घडामोडीचा लाईव्ह व्हिडिओ पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
 https://www.youtube.com/watch?v=JVUZv70ZFmA

Injured Cub , Masai Mara

 दुखापत ग्रस्त छाव्यावर ओरणारी सिंहीण (कैकयी)

Lioness & Cub , Masai Mara

मसाई माराच्या मधोमध एक धावपट्टी आहे . दिवसा नैरोबीतून छोटी विमाने पर्यटकांना घेउन येतात. त्यामुळे नैरोबी पासून ६ तासाचा प्रवास वाचतो. पण त्यामुळे ट्रिपच्या खर्चात वाढ होत असल्यामुळे आम्ही तो पर्याय घेतला नव्हता .विमानाच्या प्रवासापेक्षा आम्हाला इतर प्रवास आवडतात. आजूबाजूचा परिसर बघत बघत हव तिथे थांबत प्रवास करता येतो. याठिकाणी मसाई लोक त्यांची कांबळी, कपडे , लाकडाची खेळणी इतर अनेक गोष्टी विकायला बसलेले असतात. सर्व गाड्या इथे येत असल्याने ड्रायव्हर लोक माहितीची देवाणघेवाण करतात. थोडावेळ थांबून आम्ही पुढे निघालो. 

मसाई मारा पहाण्यासाठी देशी विदेशी प्रवासी कंपन्यानी बनवलेले स्टॅंडर्ड प्लान आहेत . पहिल्या दिवशी गाडीने किंवा विमानाने मसाई मारा एक सफारी , दुसरा संपूर्ण दिवस मसाई मारा तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास . यात राहाण्याचे ३ प्रकार आहेत . बजेट (म्हणजे तंबू निवास), मिडीयम आणि लक्झरी . तसेच तुम्ही व्हॅन घेता का जीप आणि गाडीत किती जण आहेत . या सर्वांवरुन किंमत ठरते . साधारणपणे एका व्हॅन मध्ये ६ जण आणि तंबू निवास असा मसाई मारा आणि नकुशा लेक असा चार दिवसाचा प्लान घेतल्यास नैरोबी ते नैरोबी $६०० प्रति माणशी खर्च येतो. यात जेवण, नाश्ता , राहाणे, सर्व पार्क एंट्रीज आणि नैरोबी ते नैरोबी प्रवास खर्च येतो.  आम्ही तिघेच जण एका व्हॅन मध्ये होतो. जंगल सफारीत जितके कमी लोक असतील आणि समान आवड असलेले असतील तर शांतपणे जंगलाचा आनंद घेता येतो. दुसरी एक गोष्ट तिथे गेल्यावर लक्षात आली की जीप किंवा व्हॅन रुफ टॉप ओपन असणार्‍या असतात. पण दिसणारा प्राणी गाडीच्या कुठल्या तरी एकाच बाजूला असतो. त्यामुळे ३ जण असतील तर व्यवस्थित कॅमेरा, दुर्बीण घेऊन उभे राहून पाहाता येते. ६ जण असल्यास आळीपाळीने पाहावे लागते. (अभयारण्यात गाडीच्या टपावर बसण्याची परवानगी नाही. तसेच रुफ़ टॉप उघडे असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खिडक्या बंद ठेवतात.)

Ostrich Male, Masai Mara
Ostrich  Female, Masai Mara

गाडी पुढे जात होती, बाजूला गवतात दोन शहामृग चरत होते. शहामृगाच्या नराची पिसे काळ्या रंगाची असतात तर मादीची तपकीर रंगाची असतात. जुलै - ऑगस्ट हा त्यांचा मिलनाचा काळ असल्याने नराची मान आणि पाय गुलाबी रंगाचे झाले होते. अंडी घातल्यावर दिवसा मादी अंड्यांवर बसते. तिच्या पिसांच्या तपकिरी रंगामुळे ती गवताशी समरुप होवून जाते. तर नर रात्री अंड्यांवर बसतो. त्याच्या काळ्या पिसांमुळे तो अंधाराशी एकरूप होतो. शहामृगाची अंडी आदिवासी चोरतात . कारण त्याचे दोन उपयोग आहेत. शहामृगाचे एक अंड म्हणजे कोंबडीची २४ अंडी, शहामृगाच्या अंड मोठे असते आणि अंड्याचे कवच जाड असते. त्यामुळे त्याचा उपयोग आदिवासी बाटली सारखा करतात. शहामृगाचे अंड चोरण्यासाठी एकमेकांना पुरक असलेल्या दोन चपळ माणसांची गरज असते. अंडी चोरण्यासाठी अंड्यावर बसलेल्या शहामृगाला दिसेल अशा प्रकारे पण सुरक्षित अंतरावर एक जण हालचाली करतो. शहामृगाचे लक्ष त्याच्याकडे गेल्यावर त्याला हुसकवायला शहामृग अंड्यावरुन उठून त्याच्या मागे जातो. या संधीचा फायदा घेउन मागे लपलेला दुसरा माणूस अंडी चोरुन धूम पळून जातो. अंड चोरणारा जर शहामृगाला सापडला तर त्याची खैर नसते. शहामृग हा मसाई मारातला सगळ्यात जोरात धावणारा पक्षी आहे. चित्ता हा शहामृगापेक्षा जोरात धावतो. त्यामुळे बर्‍याच वेळा शहामृगाची शिकार चित्त्याकडून होते.

(शहामृगांचा व्हिडीओ पाहाण्याकरिता खालील Youtube लिंकवर टिचकी मारा.)
https://www.youtube.com/watch?v=SpO8CKg8DHs

Ostrich Male & Female, Masai Mara

मसाई मारात तीन दिवस राहाणार असल्याने आम्हाला कसलीच घाई नव्हती. मसाई मारात येणाऱ्या प्रत्येकाला त्याला मिळणाऱ्या वेळेत "बिग फाईव्ह" (Big Five) बघायचे असतात. सिंह, बिबट्या, गेंडा, हत्ती, रानम्हैस हे ते बिग फाईव्ह. इंग्रज शिकारी लोकांनी शिकार करायला धोकादायक आणि कठीण असलेल्या प्राण्याच  बिग फाईव्ह अस नामकरण केल. पण दिड दिवसाची सफ़ारी घेतल्यामुळे बहुतेक पर्यटक बिग फाईव्हच्या शोधात गरागरा फिरत असतात. जंगल अनुभवायचे मात्र ते विसरून जातात. 

आम्हाला असले बंधन नसल्यामुळे रस्ता सोडून आड रस्त्याला लागल्यावर एक झेब्रा , वाईल्ड बीस्ट , हरण यांचा मिश्र कळप लागला . आता जेवणाची वेळ होइपर्यंत या कळपा बरोबर हिंडायच आम्ही ठरवले. गाडी आणि वायरलेस बंद केल्यावर त्यांच्या गवत खाण्याचाही आवाज ऐकू यायला लागला. कळपात लहान मोठे अक्षरशः हजारो प्राणी होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एकत्र राहातात याचही कारण आहे. यातील कोणाची घाणेंद्रीय तीक्ष्ण असतात त्यांना शिकारी प्राण्यांचा गंध खूप दुरुन येतो. कोणाची नजर चांगली असते, तर कोणाचे कान तिखट असतात. या सगळ्यांच्या सम्नवयाने शिकारी प्राण्यांच्या पासून कळपाला वाचवता येते.

Zebra, Masai Mara

कळपातल्या प्रत्येक झेब्र्याच्या अंगावरच्या पट्ट्यांच डिझाईन वेगळ होते. झेब्र्यांच्या लहान आणि तरुण पिल्लांच्या मानेवरचे केस तपकीर रंगाचे होते तर पूर्ण वाढ झालेल्या झेब्र्यांच्या मानेवरचे केस काळे होते. दुपारच ऊन तापत होते. चरुन झाल्यावर काही वाईल्ड बीस्ट त्यातल्या त्यात उंचावर जाऊन उभे राहीले. काहीनी गवतात बसकण मारली तर उभ्या राहीलेल्या प्राण्यानी वेगवेगळ्या दिशेला तोंड केल होते. त्यामुळे चहूबाजूना लक्ष ठेउन शिकारी प्राण्यांच्या हालचाली टिपण्यात त्यांना मदत होत होती.

Lunch Break at Masai Mara

कळप एका जागी स्थिर झाल्यावर आम्हीही जेवणासाठी एखादे झाड शोधायला लागलो. एका  झाडाखाली गाडीतल कांबळ पसरल आणि सकाळी कॅंप मधून सोबत घेतलेले पॅक लंच उघडले . त्यात दोन उकडलेली अंडी, दोन फळ, फ्रूट ज्युसचा छोटा पॅक आणि सॅण्डविच होते. मसाई मारा मध्ये फिरताना पर्यटकांना गाडी बाहेर पडायची परवानगी नाही. गाडी बिघडली तरी गाडीचा चालकच गाडी बाहेर उतरु शकतो. फक्त जेवणाच्या वेळी सर्वांना थोड्या वेळाकरीता बाहेर पडायची संधी मिळते. आम्ही खायला सुरुवात केल्यावर झाडावरुन एक सुंदर पक्षी खाली उतरला . चमकदार निळी पाठ आणि  पोटावरचा पिवळा रंग यामुळे हा "अफ्रीकन स्टार्लिंग" उठून दिसत होता. स्टार्लिंग म्हणजे मैना कुळातील पक्षी. आपल्या इकडच्या साळुंखी सारखे हे पक्षीही केनियात सगळीकडे दिसतात. एकामागोमाग एक चार पक्षी आमच्या भोवती जमा झाले. झाडावरुन एक निळा पक्षी सतत ओरडत होता. त्याचे घरटे झाडावर होते आणि त्यात पिल्ल किंवा अंडी असावीत. त्यामुळे त्याला आमचे तिथे असणे असुरक्षित वाटत असावे. आम्ही जेवायला बसलो होतो. त्या झाडापासून २० फ़ुटांवर एक झेब्रा आणि वाईल्ड बीस्ट्चा कळप आरामात चरत होता. जेवण आटपून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. बिबळ्याच्या शोधासाठी सायमनने गाडी एका ओढ्या जवळ नेली. ओढ्याच्या दुतर्फ़ा उंच झाड होती. झाडावर झुडूपात पाहात. हळूहळू पुढे चाललो होतो. झुडपातून चार रानडुकरांचा कळप येऊन आमच्या समोर रस्ता ओलांडून गवतात शिरला. एक एकांडा हत्ती झाडांच्या फ़ांद्या तोडून खात उभा होता. आम्हाला पाहिल्यावर तो झाडीत शिरला. झाडा मागून एका जिराफ़चे डोक दिसत होते. झाडाचा पाला खाण्यात तो दंग होता. ज्या बिबट्याच्या शोधात आम्ही फ़िरत होतो तो मात्र नजरेस पडला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर झेब्रे, वाईल्ड बीस्ट आणि हरण दिसत होतीच. 

Warthog , Masai Mara (Hakuna Matata)

उन्हं उतरायला सुरुवात झाली. त्या आड रस्त्यावरुन मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी वळण घेतल. रस्त्याच्या बाजूला ५ फ़ुटावर एक चित्ता गवतात बसून आराम करत होता. चित्त्याच्या अचानक दर्शनाने सगळी मरगळ निघून गेली. वायरलेसवर मेसेज गेला आणि थोड्या वेळात असंख्य गाड्या दाखल झाल्या, पण चित्ता निवांत होता. त्याने कोणाचीही दखल घेतली नाही. मनसोक्त फ़ोटो काढून झाल्यावर आम्ही जागा सोडली आणि इतरांना जवळुन पाहायचा चान्स दिला. 

Cheetah, Masai Mara

कॅंपवर पोहोचल्यावर कॉफ़ी घेण्यासाठी कॅंटीनमध्ये गेलो. तिथे बेथी आणि तिची सहकारी पोळ्या बनवत होते. केनियात ते लोक सणासुदीला पोळ्या बनवतात त्याला चपाती म्हणतात. अर्थात केनियात सगळच मोठे असते. मटणाचे तुकडे असो, कोंबडीचे आहेत की शहमृगाचे असा प्रश्न पडायला लावणारे चिकनचे तुकडे, तशाच चपात्यांचा आकारही मोठा होता. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. केनियात भारतीयांबद्दल आदर आहे. डॉक्टर, इंजिनीअर , बिझनेसमन अशा अनेक व्यवसायात भारतीय आहेत. स्थानिक भारतीय अस्खलित स्वाहीलीत बोलतात. पण पर्यटक म्हणून इथे येणारे भारतीय मात्र खुप आगाऊ आणि भांडखोर असतात. माझ्या डोळ्यासमोर टुर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फ़े फ़िरायला जाणारे पर्यटक डोळ्यासमोर आले. तीने पुढे जे सांगितले त्यामुळे आम्ही उडालोच, त्यांना आपल्या कुंकू आणि बालिका वधू या सिरीयल फ़ारच आवडतात. स्वाहीली भाषेत डब केलेल्या या सिरीयल दररोज संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. हिंदी चित्रपटांचेही तेथील लोक फ़ॅन आहेत. त्यांनी बाहुबली बघितलेला होता. ७ वाजताच जेऊन घेतल. रात्री तुफ़ान पाऊस पडल्यामुळे तंबूतून बाहेर पडता आले नाही. मारा नदीतून होणार्‍या प्राण्यांच्या मायग्रेशनची स्वप्न पाहाता पाहाता कधी झोप लागली कळलच नाही.  

Jackal, Masai Mara

क्रमश: (केनिया सफ़ारी भाग -३)

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and Kenya Safari Planning)

हे दोन भाग नक्की वाचा 

 Male & Female Ostrich, Masai Mara
छायाचित्रण:- © कौस्तुभ आणि अमित सामंत  © Copy Right) 
कॅमेरा :- Nikon, P900

 

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and How to plan budget Kenya Safari)

Hippopotamus at Mara River

आमचा गाईड कम ड्रायव्हर सायमन काल म्हणाला होता , उद्या आपण अर्ली मॉर्निंग सफारी करुया. नाश्ता करुन आम्ही ६ ३० ला निघालो. आज आम्ही मारा नदी पर्यंत जाणार होतो. मारा नदी ही टांझानिया आणि केनियातील अभयारण्यांची जीवनदायिनी आहे . मारा अभयारण्याच्या गेटपासून मुख्य रस्ता थेट मारा नदी पर्यंत गेलेला आहे . इथे एके ठिकाणी केनिया टांझानियाची बॉर्डर मिळते . काल रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल असेल अस वाटले होते . पण पाण्याचा निचरा झालेला होता. रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी जो चर खोदला होता त्यावर अनेक प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पायाचे ठसे उमटले होते. मसाई मारा अभयारण्यात केवळ प्राणीच नाही तर पक्षीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. Ant eater Chat, African roller, Green bee eater, pigions, अनेक प्रकारचे Storks, Herons, Egrets, Robin, Vulturers, falcon, Grass hawk, swifts, Starlings  असे काही परिचित तर काही अपरिचित पक्षी दिसत होते .  

Egyptian Goose, Masai Mara



Superb Starling, Masai Mara

वायरलेसवर मेसेज आल्याने सर्व गाड्या एका आड रस्त्यावर वळल्या . समोरच्या गवताळ मैदानात सिंहाचे ८ छावे बसलेले होते. काल एकाच वेळी ५ छावे बघितले होते . आज एकदम आठ छावे बघून हरखून गेलो. त्यांचे निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पुढे बसलेला छावा दूरवर नजर लावून बसलेला होता. थोडावेळ निरीक्षण करुन त्याने गवतातून चालायला सुरुवात केली. तो/ती  चालायला लागल्यावर इतरांनी चालायला सुरुवात केली. ठराविक अंतर चालल्यावर म्होरक्या थांबत होता आणि पुढील अंदाज घेत होता. सगळ्यात मागे असलेल्या दोघांना मात्र त्याच्याशी काही देणघेण नसावे . शाळेत शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलांसारखे ते एकमेकांशी लुटूपुटूची मारामारी करण्यात गढलेले होते. म्होरक्याने मुख्य रस्ता ओलांडला आणि तो परत कुरणात शिरला. आम्ही सुध्दा आमची गाडी त्यांच्या मागे घेतली. हळूहळू एक एक जण मुख्य रस्ता ओलांडून रस्त्या पल्याडच्या कुरणात शिरत होते. दोन मस्तीखोर छावे मात्र मागेच मस्ती करत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आले की, आपले इतर साथीदार पुढे गेले. मग ते आरामात रस्ता ओलांडून कुरुणात आले . दोघांनी परत मस्ती चालू केली. म्होरक्याने आता दिशा बदलली आणि तो पुढे चालायला लागला. त्या दिशेला एक ओढा होता. ओढ्याच्या पलिकडे एक हिरवे  कुरण आणि त्यामागे टेकडी होती. त्या कुरणात ४ टापी हरण चरत होती. म्होरक्या ओढ्यापाशी पोहोचल्यावर हरणांना त्यांचा वास आला असावा. कारण गवत उंच असल्याने छावे दिसणे शक्य नव्हते . हरणांनी चरणे सोडून टेकडीकडे धाव घेतली आणि अर्धी टेकडी चढल्यावरच त्यांनी दम घेतला . सुरक्षित अंतरावर गेल्यावर त्यांनी छावे होते त्या दिशेकडे पाहीले आणि परत पळायला सुरुवात केली. इकडे छाव्यानी एका मागोमाग एक ओढा ओलांडला . हरणं आपल्या टप्प्या बाहेर गेली आहेत हे म्होरक्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिशा बदलली इतका वेळ सांभाळलेल गांभीर्य सोडून तोही इतरांबरोबर दंगा मस्ती करायला लागला. 

Lion Cubs , Masai Mara

Lion Cubs , Masai Mara

आम्ही पुढे निघालो. एका झाडाच्या बुंध्यावर एक निळ्या रंगाचा सुंदर सरडा (Agma Lezard male) सकाळच्या उन्हात अंग शेकत बसला होता. त्याची मादी तपकिरी रंगाची असते. गवतातून एक मुंगूस बाहेर आले आणि आमच्याकडे पाहून त्याने रस्ता ओलांडला. सकाळीच मुंगूस दिसल्यावर दिवस चांगला जातो म्हणतात. मसाई मारा सारख्या जंगलात रोजच चांगला दिवस असतो काहीना काही न पाहिलेल दिसत असते. वेगळ घडत असते. 
Masai Giraffe, Masai Mara

Masai Giraffe, Masai Mara

गाडी आता एका सुनसान रस्त्यावर धावायला लागली . सायमनही या भागात सहजा येत नाही अस म्हणाला. मसाई माराचा स्टॅंडर्ड प्रोग्राम दिड दिवसाच्या असल्याने मुख्य रस्त्याच्या आजूबाजूलाच सगळे फिरत असतात . अचानक बाजूच्या झुडूपातून एक जिराफ बाहेर आला आणि आमच्या समोर रस्ता ओलांडून निघून गेला. डाव्या बाजूला झुडपांच्या आड एक नव्हे तब्बल ९ जिराफ चरत होते. आमची गाडी रस्त्यात असल्याने रस्ता कसा ओलांडावा असा त्यांना प्रश्न पडला असावा. झुडूपांच्या वरुन डोकावून ते आमच्याकडे अधूनमधून पाहात चरत होते. आमच्या समोर रस्ता ओलांडून गेलेला जिराफ दरी उतरून समोरच्या टेकडीवर चढून गेला तरी बाकींच्यानी अजून रस्ता ओलांडला नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करुन एक जिराफ आमच्या समोर रस्त्यावर उतरला आणि आपल्या लांबलांब ढांगा टाकत रस्ता ओलांडून गेला. त्याच्या मागोमाग एकेक करुन सगळे जिराफ रस्त्यावर उतरले आणि थोड्याच वेळात दरीत उतरुन गेले. जिराफ एवढ्या जवळून पाहायची ही पहिलीच वेळ होती .

Masai Giraffe, Masai Mara

वायरलेसवर अचानक गोंधळ चालू झाला सायमनने गाडी वळवली आणि सुसाट हाणली. काही वेळात आम्ही एका झाडापाशी पोहोचलो. झाड साधारण १२ फूट उंच होते.  त्या झाडावर बिबट्या एका हरणाची शिकार करून घेउन गेला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा तो शिकार झाडाच्या फांद्यांच्या बेचक्यात नीट अडकवत होता. शिकार व्यवस्थित अडकल्यावर त्याने खायला सुरुवात केली पानांच्या मधून कधी त्याचा पंजा, तोंड, दिसत होते. त्याची शिकार पूर्ण खाऊन होइपर्यंत त्याचे पूर्ण दर्शन होणे कठीण होते. वाट बघण्या शिवाय पर्याय नव्हता कॅमेरा सरसावून आम्ही बसलो होतो तितक्यात बिबट्या खाली उतरला. मधल्या फांदीवर बसून त्याने आपले तोंड आणि पंजा साफ केला आता तो तिथेच बैठक मारणार असे वाटत असतानाच त्याने झाडावरून उतरायला सुरुवात केली . गवतात उतरल्यावर त्याने झाडापासून १५ फुटावर चरणार्‍या झेब्रा आणि वाईल्ड बीस्टच्या कळपाकडे पाहीले आणि संथपणे बाजूच्या झुडपात निघून  गेला. आम्हीही जेवणासाठी बसण्यासाठी झाड शोधायला निघालो. एका झाडाखाली पथारी पसरली आणि पॅक लंच खाउन पुढे निघालो.

(वर वर्णन केलेल्या बिबट्याचा (बिबळ्याचा) व्हिडीओ पाहाण्याकरिता खालील Youtube लिंकवर टिचकी मारा.)
https://www.youtube.com/watch?v=Y5ag5EaP3oo

Leopard, Masai Mar

मारा नदीच्या अलिकडे एक डोंगर आहे. त्यावर मारा व्ह्यु पॉईंट आहे. बरेच लोक इथूनच फोटो काढून माघारी फिरतात. आम्ही डोंगर उतरुन मारा नदीपाशी पोहोचलो. नदीच्या पात्रात वाळूवर ६ पाणघोडे झोपलेले होते. त्यांच्या अंगावर काही पक्षी उड्या मारत होते. तिथून थोड्या अंतरावर एक मगर उन खात पडली होती. नदीचा काठ पाण्यापासून १५ ते २० फूट उंचावर होता. त्यावर काही ठिकाणी पात्रात उतरायच्या वाटा होत्या. ऋतुचक्रा प्रमाणे टांझानिया आणि केनियात फिरणारे प्राण्यांचे कळप अशा वाटांनी नदी ओलांडतात. ती नदी ओलांडतानाही सर्वप्रथम कळपाचा नायक सुरक्षित मार्गाची चाचपणी करतो. पाण्यातल्या मगरींपासून त्यांना भय असते. असा सुरक्षित मार्ग सापडल्यावर नायक सर्वप्रथम पाण्यात उतरतो आणि त्यामागून हजारोंच्या संख्येने असलेले प्राणी नदीत उतरतात. केनियात एप्रिल-मे मध्ये पाउस पडून गेल्यावर, जून-जुलैत व्यवस्थित गवत वाढलेले असते. ते खाण्यासाठी हजारोंच्या संख्येने वाईल्ड बीस्ट , झेब्रे , हरण इत्यादी तृणभक्षी प्राणी केनियात येतात . त्यांच्या मागून त्यांना खाणारे प्राणी येतात. त्यामुळे जुलै ऑगस्ट हे केनियात स्थलांतराचे महिने मानले जातात आणि हे स्थलांतर बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पण हे प्राणी नदी नक्की कोठे ओलांडतील हे कोणीच सांगू शकत नाही . आम्हालाही नदी ओलांडणारे कळप दिसले नाहीत . पण मारा नदीच्या जवळच एक मोठा वाईल्ड बीस्टचा कळप दिसला म्हणजे त्यांनी एखाद्या दिवसापूर्वी नदी ओलांडली असावी. नदीच्या काठाने पुढे गेल्यावर एका ठिकाणी एक दगड आहे. या ठिकाणी केनिया आणि टांझानियाच्या सीमा मिळतात. पुढे मारा नदीवर पूल आहे. पूलाच्या पलिकडे केनियन सैन्याचे ठाणे आहे . या पूलावरुनही नदीपात्रात असलेले पाणघोडे दिसत होते. 
Mara River & Migration Routes

Crocodile, Masai Mara

Hippopotamus at Mara River

आता परतीचा प्रवास चालू केला, एका ठिकाणी एका तिरक्या झाडावर Lappet-faced vulture,White-backed vulture, Rüppell's vulture, Egyptian Vulture, Hooded Vulture अनेक प्रकारची गिधाड बसलेली दिसली. त्याठिकाणी थोडावेळ थांबलो. तर अचानक एकामागोमाग एक गिधाड आमच्या समोरच रस्त्याच्या बाजूला उतरायला लागली . गवतामुळे कुठल्या प्राण्याचा फडशा पाडायला ती जमली आहेत हे कळत नव्हते. इथे खाण्याचा  पहिला मान असतो Lappet-faced vulture या गिधाडाला कारण त्याच्या बाकदार आणि मजबूत चोचीने तो प्राण्याची कातडी फाडू शकतो . त्याने फित कापल्यावर सगळी गिधाड मृत प्राण्यावर तुटून पडली. अजून आकाशातून गिधाड उतरच होती . त्यांच्या बरोबर दोन Marabou stork सुध्दा त्या गर्दीत उतरले . सकाळीच यांना एका पाणवठ्यावर पाहीले होते. हे इथे काय करतात हा प्रश्न होता. गिधाडांची खाण्यासाठी ढकलाढकली मारामारी चालू होती पण Marabou stork शांत होते. कारण सगळ्यात शेवटी खाण्याचा मान त्यांचा होता . आपल्या लांब आणि निमुळत्या चोचीमुळे ते प्राण्यांच्या हाडाला चिकटलेले मांस खाऊ शकतात. गिधाडांना तिथेच सोडून आम्ही पुढे निघालो . एक बबून्स माकडांचा कळप रस्ता ओलांडत होता. रस्त्याच्या मध्ये असलेल्या दिशादर्शक फलकावर बसून तो आपल्या कळपावर लक्ष ठेउन होता. आता दिवस उतरणीला लागल्याने आम्ही माराच्या गेटच्या दिशेने निघालो. आम्ही तिघेही छतावरुन निशब्दपणे माराचा परिसर न्याहळत होतो. अडीच दिवस चाललेली ही आमची गेम ड्राईव्ह आता संपणार याची हुरहूर मनात दाटून आलेली. 


Vultures in Masai Mara

Lappet-faced vulture, Masai Mara

Vultures in Masai Mara, please click on link

************** 

केनिया सफारीचे प्लानिंग.

केनिया सफारी असे गूगलवर सर्च केले की अनेक देशीविदेशी साईटस ओपन होतात. त्यावर ठराविक चित्ररुपी प्रश्न विचारलेले असतात १)किती दिवस , २)किती माणसे , ३)राहाण्याची सोय (बजेट (तंबू) , मिडीयम (रुम), लक्झरीयस) आणि ४) गाडीचा प्रकार (व्हॅन / ४ x ४ जीप) तुम्ही पर्याय निवडले की एक स्टॅंडर्ड प्रोग्राम आपल्याला मेल केला जातो. तो पुढीलप्रमाणे असतो . 
पहिला दिवस:- नैरोबीच्या हॉटेलातून पिक अप (६ तास प्रवास / किंवा विमानाने मसाई मारा (यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.)) दुपारपर्यंत मसाई मारा अभयारण्य, संध्याकाळचा गेम ड्राईव्ह.
दुसरा दिवस :- पूर्ण दिवस मसाई मारा (गेम ड्राईव्ह) , 
तिसरा दिवस :- Lake Nakuru (६ तास प्रवास) पाणपक्षी, फ्लेमिंगो आणि गेंडे पाहाण्यासाठी, 
चौथा दिवस :-  Amboseli National Park (८ तास प्रवास) 
पाचवा दिवस:- Amboseli National Park गेम ड्राईव्ह, अफ्रीकन हत्ती पाहाण्यासाठी 
सहावा दिवस:- (५ तास प्रवास ) नैरोबी . 
या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च ६ माणसांच्या तंबू निवासासाठी" $ ९५० माणशी पासून सुरु होतो, मिडीयम (रुमसाठी) $१२५० माणशी पासून सुरु होतो तर लक्झरीअस साठी $१४५० माणशी पासून सुरु होतो. तुम्ही जे हॉटेल निवडाल त्याप्रमाणे आणि सिझनप्रमाणे रेट बदलतात. या पैशात नैरोबी ते नैरोबी सगळा खर्च, यात राहाणे, खाणे, प्रवास, पार्क एंट्री सर्व समाविष्ट असते. याशिवाय तुम्हाला वेगळे काही करायचे असल्यास त्याचा वेगळा चार्ज असतो. (उदा. मसाई गावाला भेट $ २५ प्रत्येकी, मसाई मारा बलून सफ़ारी $३०० प्रत्येकी इत्यादी) 

हा कार्यक्रम मला मिळाल्यावर मी आधी केनियाला जाऊन आलेल्या अनेकांशी बोललो, इंटरनेटवर शोधाशोध केली आणि आता स्वत:च जाऊन आल्यावर माझ असे मत आहे की, एक दिवस मसाई मारा पाहणे आणि इतर दिवशी अर्धा किंवा पूर्ण दिवस प्रवासात घालवून उरलेल्या वेळात जंगल पाहाणे हे टूर कंपन्यांच्या सोईचे असले तरी आपल्या (म्हणजे ज्यांना खरच जंगल पाहायचेय आणि छायाचित्रण करायचे आहे त्यांच्यासाठी) सोईचे नाही. त्यामुळे ३ दिवस तीन रात्र मसाई मारा, चौथा दिवस नकुरु लेक, पाचवा दिवस :- नैरोबी असा पाच दिवसाचा कार्यक्रम केल्यास साधारणपणे $ ६०० प्रत्येकी खर्च होतो. यात सर्व प्राणी, पक्षी पाहायला मिळण्याची शक्यता असते (याची खात्री कोणीच देऊ शकत नाही). अफ़ीकन हत्ती आणि किलिमांजरो पर्वत पाहाण्यासाठी Amboseli National Park ला जायचे की नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वत: सोडवायचा आहे. हत्ती मसाई माराला भरपूर दिसतात. अंबासोलीला गेल्यास त्याचे दोन दिवस वाढून पैसे वाढतात.

या $ ६०० व्यतिरिक्त, $ ५० प्रत्येकी व्हिसा फ़ी द्यावी लागते. व्हिसा तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा केनियात पोहोचल्यावरही काढता येतो. केनियात इमिग्रेशनच्या वेळी व्हिसा काढणार असल्यास $ ५० कॅश द्यावी लागते. कार्डने पैसे घेत नाहीत. व्हिसा तीन महिन्यासाठी मिळतो. केनियात (अफ़्रिकेतील देशात) जाण्यासाठी आपल्याला पिवळ्या तापाचे इंजेक्शन आणि पोलिओ डोस किमान १५ दिवस आधी घ्यावे लागतात. पिवळ्या तापाचे इंजेक्शन ठराविक गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्येच मिळते त्याची यादी आणि वेळ इंटरनेटवर उपलब्ध आहे. पोलिओ डोस सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मिळतो. पिवळ्या तापाचे इंजेक्शन आता एकदा घेतले की आयुष्यभर चालते. याला खर्च ३००/- रुपये येतो. या इंजेक्शन आणि डोस बद्दल आपल्याला भारतात परत येतांना इमिग्रेशनला विचारणा होते तेंव्हा त्यांना इंजेक्शन आणि डोस घेतल्याची कार्डस दाखवावी लागतात. 


एअर इंडीया आणि केनियन एअरवेजचे मुंबई ते नैरोबी डायरेक्ट फ़्लाईट आहे. इतर अनेक विमान कंपन्यांची १ स्टॉप असलेली फ़्लाईट्स आहेत. रिटर्न तिकिट लवकर काढल्यास साधारणपणे २२०००/- माणशी पासून सुरु होते. केनियात केनियन शिलिंग वापरतात. $ १ ला १०४ केनियन शिलिंग मिळतात ( जुलै २०१८ चा रेट). भारतीय रुपयेही येथे बदलून केलियन शिलिंग घेता येतात. केनियात पोहोचल्यावर विमानतळावर $ ५० ते $ १०० पर्यंतचे केनियन शिलिंग बदलून घ्यावे. किरकोळ खरेदीसाठी (पाणी, भेटवस्तू, सोवेनियर इत्यादी) त्याचा उपयोग होतो. (१ लिटरच्या १ पाण्याच्या बाटलीला १०० केनियन शिलिंग पडतात.) केनियात एअरटेलचे नेटवर्क आहे पण ते शहराबाहेर मिळत नाही. Saharacom हे स्थानिक नेटवर्क अगदी मसाई मारातही मिळते. त्याचे सिमकार्ड विमानतळावर मिळते. नैरोबीत उबर टॅक्सीज आहेत.

Migration Map

मसाई मारात जाण्याची योग्य वेळ :- केनियात वर्षभर गेले तरी सर्व प्राणी दिसण्याची शक्यता असते. कारण मसाई मारात स्थानिक प्राणी आहेतच. पण ऋतूचक्रा प्रमाणे त्यांची संख्या कमी जास्त होते. केनियात डिसेंबर ते मार्च उन्हाळा असतो, एप्रिल ते जुन पाऊस, जुलै - ऑगस्ट थंडी, सप्टेंबर - उन्हाळा, ऑक्टोबर, नोव्हेंबर - थोडा पाऊस असे साधारणपणे ऋतूमान असते. एप्रिल ते जुन पाऊस पडल्यावर मसाई मारात गवत उगवते, ते खाण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टमध्ये सर्व तृणभक्षी प्राणी टांझानियाच्या सेरेंगेटी नॅशनल पार्क मधून मारा नदी ओलांडून केनियात येतात. त्यांच्या मागोमाग त्यांचे भक्षक येतात. त्यामुळे मसाई मारात मोठ्या प्रमाणावर प्राणी असतात. जसजसे गवत कमी होते, उन वाढत जाते तसतसे प्राणी टांझानियात जातात. त्यामुळे जुलै शेवटचा आठवडा ते ऑगस्ट संपूर्ण महिना हा काळ मसाई मारात जाण्यासाठी उत्तम काळ समजला जातो. त्यावेळी तेथे थंडी असल्याने दिवसाचे तापमान २० ते २२ डिग्री आणि रात्रीचे तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सियस असते त्यामुळे दिवसभर फ़िरुनही उन्हामुळे होणारा त्रास जाणवत नाही.   

नैरोबीत एक दिवस मुक्काम केल्यास जिराफ़ सेंटर, एलिफ़ंट ऑरफ़नेज ( यावर दोन वेगळे लेख लिहिले आहेत) आणि नॅशनल म्युझियम ही ठिकाणे जरुर पाहावीत अशी आहे. त्यासाठी टूर ठरवतानाच ट्रॅव्हल कंपनीशी बोलून घ्यावे. अर्थात त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. कुठली ट्रॅव्हल कंपनी निवडावी, हे ज्याने त्याने ठरवावे. सगळ्यांकडून कोटेशन घेउन, त्यांच रेटींग आणि रिव्ह्यू वाचून ठरवावे. अर्थात हे सर्व लिहिले आहे ते कमीतकमी पैशात जास्तीत जास्त कसे पाहाता येईल त्यासाठी, अर्थात हा माझा दावा आहे असही नाही . ज्यांची पैसे खर्च करण्याची तयारी आहे त्यांना केनियात पाहाण्यासारखे आणि फ़िरण्यासारखे भरपूर आहे.

केनिया सफ़ारीवर तिथल्या Offbeat ठिकाणांवर ७ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.

समाप्त

छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी

 offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया

Baboon Parliament, Suswa Mountain, kenya

केनियात मसाई मारा अभयारण्यात जायचे ठरल्यावर आजूबाजूला अजून काही बघण्यासारखी आगळीवेगळी ठिकाणे आहेत का याचा शोध घेत होतो. गुगल मॅप बघताना सुस्वा माउंटन हे ठिकाण सापडले. रुढार्थाने हे पर्यटनस्थळ नाही. मुळात इथे जायला रस्ताच नाहीं. ऱस्ता म्हणून जे काही आहे ते पावसाळ्यात नसते. पण या सुस्वा माउंटनच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यामुळे सुस्वा माउंटनला जायचे नक्की केले.


Cave at Suswa Mountain, Kenya

नैरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर ९६०० किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेटसच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे, खंडांच्या या सरकण्यामुळे आजपासून अंदाजे ५० लाख वर्षांनी या व्हॅलीच्या जागी समुद्र असेल आणि ईस्ट अफ़्रिका हा अफ़्रिके पासून वेगळा झालेला नवीन खंड तयार होईल. रिफ़्ट व्हॅलीतून जातांना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. "जमिन दुभंगली आणि आभळ फ़ाटल तर दाद मागायची कोणाकडे" या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहाणार्‍या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमिन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्या बरोबर वाहून जाते आणि अचानक जमिन खचते. चीनेने नविनच बनवलेल्या महामार्गावर अशीच जमिन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. याच रिफ्ट व्हॅलीत सुस्वा माउंटन हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले विवर आहे.या ठिकाणी ज्वालामुखीमुळे एकात एक अशी दोन विवरे तयार झालेली आहेत. अशा प्रकारे एकाच ठिकाणी एकात एक अशी दोन विवरे असणारे हे पृथ्वीवर एकमेव दुर्मिळ ठिकाण आहे .

Baboon's Parliament, Suswa Mountain , kenya 

मसाई माराहून नैरोबीला जाणाऱ्या महामार्गावर नारोख शहर आहे . या शहराच्यापुढे महामार्गाच्या उजव्या बाजूला सुस्वा माउंटन दिसतो. पण या डोंगरावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता लागते. आमचा मसाई वाटाड्या आमची महामार्गावर वाट पाहात उभा होता. मसाई पारंपारिक पेहराव केलेला रॉजर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्याच्या कमरेला मसाई सुरा लावलेला होता. तरस, बिबट्या यांच्याशी सुस्वातील मसाईंची अधूनमधून गाठ पडते. त्यांच्यापासून  संरक्षण करण्यासाठी ते हा मसाई सुरा वापरतात.   

महामार्ग सोडल्यावर एक कच्चा रस्ता सुस्वा माउंटनकडे जातो. या रस्त्यावर रिफ्ट व्हॅलीचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या लांबच्या लांब पसरलेल्या जमिनीतील भेगा दिसत होत्या. या खडबडीत रस्त्यावरुन तासभराचा प्रवास केल्यावर आम्ही ज्वालामुखीच्या विवराच्या पायथ्याशी पोहोचलो. आता रस्ता असा नव्हताच रॉजर दाखवत होता त्यामार्गाने आमचा चालक गाडी डोंगरावर चढवत होता. केवळ अशा प्रदेशात चालवण्यासाठी बनवलेल्या ४ x ४ गाडी आणि गेली १५ वर्ष या भागात फिरणारा कसबी चालक असल्यामुळे आम्ही तासभरात विनासायास विवरात प्रवेश केला. हे ज्वालामुखीचे आतले विवर होते. दुरवर पसरलेला गवताळ माळ त्यावर चरणारी मसाईंची गुरे आणि हरणे दिसत होती. हे कुरण चारही बाजूनी विवराच्या कडेला तयार झालेल्या डोंगररांगेने वेढलेले होते. हे ज्वालामुखीचे आतील विवर होते. या आतल्या विवरात ऐंबेटिरा (Embetira) नावाच २०३१ फुट उंच शिखर आहे.  त्यावरून आतले आणि बाहेरचे अशी दोन्ही विवरे दिसतात. गाडी पुढे गेल्यावर चक्क एक शाळा दिसली . शाळेची पक्की बैठी इमारत होती. पण शाळा बाहेरच्या झाडाखाली भरली होती. आता मध्येमध्ये शेते आणि गाई गुर चारणारे मसाई गुराखी दिसायला लागले होते.


ऐंबेटिरा (Embetira) Highest Peak in Suswa Mountains, Kenya

 आतल्या विवरात मसाईंची तुरळक वस्ती आहे. आमची राहायची सोय ज्या मसाईच्या घरात केली होती तेथे आम्ही पोहोचलो. दोन कुडाची खोपट बाजूबाजूला होती. दोन्ही खोपट पत्र्याने आच्छादित केलेली होती. घरासमोर छोटेसे अंगण होते . त्याच्यापुढे थेट गवताचे कुरण चालू होते. घराला कंपाऊंड नव्हते. एका खोपटात त्या कुटुंबाचे स्वयंपाक घर होते. स्वयंपाक घरात जाण्याचा दरवाजा आपल्या दिंडी दरवाजा सारखा अरुंद आणि ३ फूट उंचीचा होता. त्यांच्या रोजच्या जेवणात मांसाचा वापर असल्याने त्याच्या वासाने जंगली जनावराने पटकन आत शिरु नये यासाठी अशाप्रकारे हा दरवाजा बनवलेला होता.  सुस्वा माउंटनला अजून वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे खोपटात सोलर दिवे होते.

आम्हाला दिलेले खोपटे शेणाने सारवलेले होते. ८ x ६ फूटच्या खोपटात दोन बेड कसेबसे बसवलेले होते. या दोन बेडवर आम्ही तीन जण कसे झोपणार हा प्रश्न होता. पण आमच्याकडे स्लीपिंग बॅग असल्याने एक जण जमिनीवर आरामात झोपू शकत होता. संडास- बाथरुम नव्हते. प्रातर्विधीसाठी गवताळ कुरण मोकळ होते. सह्याद्रीत फ़िरण्यची आम्हाला तिघांनाही सवय असल्याने या गोष्टी आम्हाला अडचणीच्या वाटल्या नाहीत. आमच्या यजमानांनी चहा आणून दिला. आपल्या सारखाच दुधाचा चहा त्या अपरिचित ठिकाणी मिळाल्याने प्रवासाने आलेला शिण निघून गेला. खोपटात सामान टाकून आम्ही एटंबेरा या आतल्या विवरात असणाऱ्या सर्वोच्च शिखराकडे (ऐंबेटिरा (Embetira)) निघालो. या शिखरावर जाऊन येण्यासाठी ४ तासांचा ट्रेक करावा लागतो. तर आतील पूर्ण विवर डोंगरावरुन फिरण्यासाठी ८ तासांचा ट्रेक करावा लागतो. 

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना Suswa Mountain, kenya

जमिनीतील वाफ़ेतून पाणी काढण्याची शक्कल

एटंबेरा शिखराकडे निघाल्यावर वाटेत एका ठिकाणी लाकडी कुंपण घातलेली एक जागा दिसली . त्या कुंपणाच्या आत एका कोपर्‍यात जमिनीतून काही पाईप्स वर आलेले होते. त्या पाईपंमधून वाफ़ येत होती. त्या पाईपांच्या खाली एक १०००० लीटरची सिंटेक्सची टाकी ठेवलेली होती. जमिनीतून आलेल्या पाईपातून पाणी या टाकीत ठिपकत होते. हा सुस्वा माऊंटनवरचा पाणवठा होता. सुस्वा माउंटन येथे पावसा व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यावर उपाय म्हणून जमिनीतून निघणाऱ्या वाफेतून पाणी काढायची अप्रतिम कल्पना मसाईनी लढवली आहे. सुस्वा माऊंटन हा सुप्त ज्वालामुखी असल्यामुळे या भागात काही ठिकाणी जमिन खोदल्यावर जमिनीतून वाफ़ बाहेर येते. अशा जागंचे पारंपारीक ज्ञान या भागात राहाणार्‍या मसाई लोकांना आहे. या ठिकाणी जमिन खोदून त्यात ५ ते १० पाईप्स "L" आकारात बसवले जातात. जमिनीतील वाफ़ या पाईपामधून वर येते. रात्रीच्या वेळी वातावरण थंड असते. त्यामुळे या वाफ़ेचे पाणी होते आणि ते पाणी टाकीत साठवले जाते. हल्ली जमिनितून ५ ते १० पाईप्स आणण्यापेक्षा जमिनिवर आयताकृती सिमेंटचे चेंबर बांधून त्यावर एकच पाईप "L" आकारात बसवला जातो. अर्थात हे सिमेंटचे चेंबर बांधण्यासाठी शहरातून गवंडी बोलवावा लागतो. आम्ही ज्या अदभूत पाणवठ्याला भेट दिली तेथे दोन्ही प्रकारे जमिनीतील वाफ़ काढलेली होती. या पाणवठ्यावर सर्व मसाई पाड्याचा हक्क असतो. पण पाणी वापरण्याचे नियम सर्वजण पाळतात. कपडे भांडी कुंपणा बाहेरच धुतली जातात. आम्ही तेथे गेलो तेंव्हा दोन मसाई बायका कुंपणा बाहेर कपडे धुत होत्या. गाई गुरांना हे पाणी देत नाहीत. तसेच जनावर धुण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जात नाही.

Entrance of cave at Suswa Mountain, kenya

सुस्वाचा माउंटन वरचा अदभूत पाणवठा पाहून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. खुरट्या झुडूपातून, दाट झाडीतून जाणार्‍या मळलेल्या पायवाटेने २ तासात शिखरावर पोहोचलो. येथून ज्वालामुखीचे बाहेरील विवर आणि दोन विवरातील जंगलाचे दृश्य दिसते ते नजर खिळवून ठेवणारे आहे. इथे थोडावेळ थांबून आम्ही आल्या मार्गाने दिड तासात खाली उतरलो.

बिबट्याने खाऊन टाकलेल्या बबून माकडाचे अवशेष

गुहेतील बिबट्याची विष्ठा Suswa Mountain, Kenya

सुस्वा माऊंटन वरील दुसरी महत्वाची जागा (पाणवठा धरल्यास तिसरी महत्वाची जागा) म्हणजे "बबून्स पार्लमेंट". लाव्हा रसाच्या प्रवाहामुळे सुस्वा माउंटनवर काही गुहा तयार झालेल्या आहेत. त्यांना लाव्हा ट्युब्स (Lavha Tubes) म्हणतात.  Baboon's Parliment ही ६ मैल लांबीची लाईम स्टोनची गुहा आहे.  गुहेच्या वरच्या बाजूला जंगल आहे. २० पायर्‍या उतरुन आपण गुहेच्या तोंडाशी पोहोचतो. उजव्या बाजूला एका गुहेच तोंड आहे तर डाव्या बाजूला दुसर्‍या गुहेचे तोंड आहे. आम्ही आमच्या वाटाड्या मागोमाग प्रथम उजव्या बाजूच्या गुहेत शिरलो. साधारणपणे २० फ़ूट उंच आणि २० फ़ूट रुंद गुहेचे तोंड होते. गुहा १०० फ़ूट लांब होती. आत गेल्यावर काळोख वाढल्याने जवळच्या विजेर्‍या पेटवाव्या लागल्या. गुहेच्या शेवटी जमिनीत एक खड्डा होता. त्यावर झाडाची मजबूत फ़ांदी आडावी टाकलेली. त्या फ़ांदीला एक जाड रस्सी बांधलेली होती. या रस्सीच्या सहाय्याने आत उतरता येते. या ठिकाणी वटवाघूळांचे वास्तव्य आहे. त्याचा अतिशय घाणेरडा आणि उग्र वास येत होता. त्यामुळे आम्ही गुहेत न उतरण्याचा निर्णय घेतला आणि परत फ़िरलो. गुहेच्या तोंडाशी पायर्‍यांवर २ हेरेक्स (अफ़्रिकन मोठे उंदीर) आमच्याकडे पाहात बसलेले होते. 


Suswa Mountain, Kenya

आता आम्ही दुसर्‍या बाजूच्या गुहेत शिरलो. इथे जमिन ओबड धोबड होती. मोठ मोठे खडक छतापासून सुटून खाली पडल्यामुळे चालतांना कधी या खडकांच्या बाजूने चिंचोळ्या जागेतून तर कधी खडक पार करुन पुढे जावे लागत होते. पाया खालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. त्यामुळे त्या मिट्ट काळोखात वाटाड्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे जात होतो. एके ठिकाणी थांबून वाटाड्याने आम्हाला गुहेच्या कोपर्‍यात पडलेला विष्ठेचा ढिग दाखवला. ती बिबट्याची विष्ठा होती. बिबट्यांना एकाच जागी विष्ठा विसर्जीत करायची सवय असते. गुहेत जमा होणार्‍या बबून माकडांना खाण्यासाठी बिबट्यांचा या गुहेत वावर असतो. पुढे गुहा काटकोनात वळली आणि काळोख अजूनच दाट झाला. उजव्या - डाव्या बाजूला गुहेला फ़ाटे फ़ुटलेले होते. १० मिनिटे चालल्यावर दूरवर प्रकाश दिसायला लागला. याठिकाणी गुहेचे छत कोसळून झाडाची मुळ आत आली होती. छतापासून १० फुटाचा ओबड धोबड खडक छत कोसळल्यामुळे उघडा पडलेला आहे . या खडकात अनेक नैसर्गिक खाचा आहेत. दररोज संध्याकाळी सुस्वा माउंटन मधली सर्व बबुन माकडे या गुहेच्या वरच्या बाजूला जमा होतात. जसजशी रात्र होत जाते तसतशी ही माकडे जंगलातून गुहेतल्या कपारीत उतरायला सुरुवात करतात आणि आपल्या भक्षक बिबळ्यापासून वाचण्याकरिता जास्तीत जास्त अवघड जागी जाऊन बसतात आणि तिथेच संपूर्ण रात्र काढतात. शेकडो वर्षे या ठिकाणी माकडे येत आहेत. त्यामुळे या भागाला "बबुन्स पार्लमेंट" असे नाव पडले आहे.  बबून माकडांच्या वावरण्याने आणि मलमूत्रामुळे इथले दगड गुळगुळीत झालेले आहेत. त्या गुळगुळीत झालेल्या दगडावर हाताची पकड बसणे मुश्किल आहे. तरीही बिबट्यापासून वाचण्याकरिता जीव धोक्यात घालून माकडे या कपारीत उतरतात आणि अवघड जागी जाऊन बसून, झोपून रात्र काढतात. सगळ्यात अवघड जागा पकडण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात एखादे माकड खाली पडले तर जगण्याची शक्यता फारच कमी असते अशी माकडे बिबट्याची शिकार होतात. बिबट्या चोरपावलाने गुहेत येऊन डरकाळी देतो. त्यामुळे एखादे बेसावध माकड घाबरुन खाली पडते आणि बिबट्याला त्याची शिकार करतो. बबून्स माकडांच्या काही कवट्या आणि हाड तिथे विखुरलेली पाहायला मिळाली. 
 
बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.


बबून माकडांच्या मलमूत्रामुळे गुळगुळीत झालेले दगड.

जास्तीत जास्त उंच्, निसरड्या आणि अडचणीच्या जागी बबून्स रात्री बसतात.
Cave Suswa Mountain, Kenya
गुहेत पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला बिबळ्याची विष्ठा एकेजागी साठलेली दिसत होती. गुहेतला अंधार आणि त्याबरोबर वटवाघूळांचा येणारा घाणेरडा उग्र वास आता वाढत चालला होता. नाकावर रुमाल बांधून आम्ही पुढे निघालो. इथे छताला अक्षरश: हजारो वटवाघुळ (Giant Mastiffs bats) लटकत होती. मोठे कान आणि सुटी शेपूट असलेल्या या वटवाघूळांची ही जगातली सगळ्यात मोठी वसाहत आहे. या वटवाघूळांच्या वास्तव्यामुळे या गुहेच्या जमिनीवर वटवाघुळांच्या विष्ठेचा पांढर्‍या रंगाचा थर जमलेला आहे. या थरातही अनेक किटक आहेत. आजारी आणि लहान वटवाघूळ ज्यावेळी छतावरुन खाली पडतात तेंव्हा हे किटक त्यांचा फ़न्ना ऊडवतात. संध्याकाळच्या वेळी ही हजारो वटवाघूळे "बबून्स पार्लमेंट" पार करुन गुहेच्या छताला पडलेल्या भोकातून बाहेर पडतात त्यावेळी आकाश काही काळासाठी झोकाळून जाते. वटवाघळे बाहेर पडल्यावर बबुन्स, बिबटे आणि किटकांचा गुहेत वावर सुरु होतो. सकाळी बबुन्स माकडे गुहेच्या बाहेर पडली की, वटवाघळांची परतायची वेळ होते. शेकडो वर्षे हे चक्र अव्याहतपणे चालू आहे.

वटवाघळांच्या घाणेरड्या वासामुळे त्याठिकाणी जास्त वेळ उभे राहाणे शक्य नव्हते. आम्ही मागे फ़िरुन आल्या मार्गाने गुहेच्या बाहेर आलो. आता सूर्य अस्ताकडे चालला होता आणि बबून माकडांची एक टोळी "बबून्स पार्लमेंट्स"च्या दिशेने चालली होती.          
 
आमचा वाटाड्या
कसे जाल :- केनियाची राजधानी नैरोबी गाठावी लागते. नैरोबी ते सुस्वा माऊंटन हे अंतर १२५ किलोमीटर आहे. साधारणपणे चार तासात हे अंतर कापता येते. सुस्वा माऊंटनवर तंबू लावून किंवा स्थानिक मसाई मारांच्या घरात राहाण्याची आणि जेवणची सोय होते. नैरोबीहून पहाटे निघून एका दिवसात सुस्वा माऊंटन पाहून परत नैरोबीला पोहोचता येते. दुसरा पर्याय म्हणजे मसाई मारा पाहून नैरोबीला परतताना सुस्वा माऊंटनला जाता येते. सुस्वा माऊंटनचा हे ऑफ़बीट ठिकाण असल्याने केनिया सफ़ारीचे बुकींग करतानाच टूर ऑपरेटशी बोलून प्लान ठरवावा.


Baboon, Kenya
केनिया सफ़ारी त्याचे प्लानिंग आणि आजूबाजूची ऑफ़बीट ठिकाणे यावर ६ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.
 
 
 
https://samantfort.blogspot.com/2019/05/suswa-mountain-kenya.html

https://www.maayboli.com/node/22217

लेक नैवाशा  

आफ्रिका खंडात अनेक वैशिष्ठपूर्ण सरोवरे आहेत आणि त्यापैकी ३ केनयात आहेत.
जगातील दुसर्‍या क्रमांकाचे गोड्या पाण्याचे सरोवर (क्षेत्रफळ ६७००० चौ. कि.मी.) लेक व्हिक्टोरिया चा काही भाग केनयात आहे. युगांडा, केनया आणि टांझानिया या तिन्ही देशांच्या सीमा या सरोवरात मिळतात आणि नाईल नदीचा उगम या सरोवरात होतो. या सरोवराच्या काठी मी २ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आहे.
दुसरे सरोवर म्हणजे लेक नाकुरु. हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. इथे खुप मोठ्या संख्येने रोहित पक्षी (फ्लेमिंगोज) येतात. त्यांच्या वास्तव्याच्या दिवसात विमानातूनही हा भाग पांढरा गुलाबी दिसतो. आणि ते मी विमानातूनच बघितले होते. प्रत्यक्ष त्या सरोवराच्या परिसरात मात्र मला प्रवेश नाकारला होता (कारण विचित्र होते. मी भारतीय दिसत नाही, हे कारण होते ते). या सरोवरातील फ्लेमिंगोजचा एक अप्रतिम शॉट, मेरील स्ट्रिपच्या, आउट ऑफ आफ्रिका, या चित्रपटात आहे.

क्रिसमसच्या सुट्टीत तिथेच जायचे असे आमचे ठरले होते, पण आयत्यावेळी त्या भागात कडाक्याची थंडी पडल्याचे रेडीओवर सांगितल्याने, आम्ही लेक नैवाशाला जायचे ठरवले.
हे सरोवर त्या मानाने लहान म्हणजे फक्त १४० चौ. कि.मी. विस्ताराचे आहे. या सरोवरात बर्‍यापैकी संख्येत पाणघोड्यांची वस्ती आहे. याला लागूनच दोन लहान सरोवरे पण आहेत. माझे चार मित्र, त्यांचा सौ, मूले असे सगळे आम्ही सकाळीच ६ वाजता नैरोबीहून निघालो. नैरोबीहून पश्चिमेला जाणारा हायवे पकडून आमचा प्रवास सुरु झाला.
अत्यंत नयनरम्य असा हा रस्ता आहे. अगदी मध्यम असा उतार आजूबाजूला घनदाट जंगल आणि छोटी छोटी गावे. त्यात अधून मधून शेती. असा प्रवास करत, आम्ही एका खास व्ह्यू पॉइंट ला पोहोचलो.
आफ्रिकेत, खास करुन पूर्व भागाच्या भूगोलात, द ग्रेट रिफ्ट व्हॅली, हि खूप महत्वाची आहे. सिरियापासून केनयापर्यंत ती पसरलेली आहे. नैरोबी हा भाग बराच उंचावर आहे आणि एका ठिकाणी तीव्र उताराच्या समोर ही विस्तिर्ण व्हॅली पसरलेली आहे. या ठिकाणावरुन या व्हॅलीच्या काही भागाचे मस्त दुष्य दिसते. (खरे तर जेवढे दिसते त्यातला अगदी थोडा भाग या फोटोत दिसतोय. हवेत असणार्‍या धुक्यामूळे सर्वच भाग फोटोत येऊ शकत नाही हे एक कारण आणि दुसरे म्हणजे या व्हॅलीचा प्रचंड विस्तार.) या भागात एक कच्चा रस्ता, त्यापूढे काही घरे दिसताहेत त्यापुढे हि व्हॅली आहे. या व्हॅलीतला एक डोंगर अंधूक दिसतोय. पण पुढे हा आपल्याला दिसणारच आहे.

त्याच ठिकाणाहून पूर्व दिशेला दिसणारा हा भाग.

जरा आणखी पुढे गेल्यावर या डोंगराची रुपरेषा आणखी स्पष्ट होत जाते. हा एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. आजूबाजूच्या सपाट प्रदेशात हा चांगलाच उठून दिसतो. नीट निरखल्यास याच्या शिखराच्या अलिकडच्या बाजूस असलेले विवर (त्याच्या कडा ) दिसू शकतात.

या वळणानंतर उतार थोडासा तीव्र होतो आणि आपण नैवाशा गावात शिरतो. या गावातच त्या सरोवराचे एक टोक आहे. इथून आपण सरोवराच्या काठाने पण काही अंतर राखून प्रवास करतो.
इथे बरेच रिसॉर्ट्स आहेत आणि तिथे राहण्याची उत्तम सोय आहे.
अशाच एका रिसॉर्टमधे आम्ही शिरलो. दारातच एका प्रचंड अकाशियाने आमचे स्वागत केले.

या परीसरात सर्वत्र हिच झाडे आढळतात. आपल्या जंगलाच्या ज्या कल्पना असतात त्यापेक्षा इथली जंगले वेगळी असतात. हि तर सव्हाना प्रकारची गवताळ जंगले आहेत. इथे अकाशिया आणि गवत यांच्यात कायम स्पर्धा असते. या स्पर्धेत, हत्ती, जिराफ, हरणे महत्वाची भुमिका बजावतात. (याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल)

त्या रिसॉर्ट्मधे पक्ष्यांची रेलचेल होती. आणि ते बरेच धीटही होते. खालच्या फोटोतला सुंदर रंगीबेरंगी पक्षी, मला नैरोबीमधे नीट टिपता आला नव्हता. इथे मात्र ते मुद्दाम पुढे पुढे करत होते. या धटींगणाने तर मला अशी छाती फूगवून दाखवली.

हि उगाचच दिलेली पोझ

मग जरा प्रोफाईल..

तिथे आम्ही भाड्याने तंबू घेतले. आपल्याला हवे तिथे ते ठोकता येतात. हवेत खुपच गारवा असल्याने आम्ही जरा उनाची जागा पकडली.
तळ्याच्या काठापासून साधारण पन्नास पावलांवरच आम्ही होतो. त्या तळ्याच्या काठी उगवणारे हे खास गवत. गवत असले तरी एकेक दांडा सहज आठ दहा फूट उंच.
याचा दांडा त्रिकोणी असतो. त्याच्या अत्यंत पातळ कापा करून त्यावर वजन ठेवून पाणी काढले कि कागदासारखा पातळ ताव तयार होतो. याला नैसर्गिक रित्याच सुंदर सोनेरी रंग येतो. प्राचीन काळी असा कागद तयार करत असत. इजिप्तमधे अजूनही असा कागद तयार करतात. अशा कागदवर केलेली काही सुंदर पेंटीग्ज माझ्या संग्रही होती.

वरच्या फोटोत दिसतोय त गोलाकार सहज दिड फूट व्यासाचा होता.

खालच्या फोटोवरुन त्या माजलेल्य गवताची कल्पना येईल.

हा पक्षी आकाराने ३ फूट उंचीचा असतो. हा माणसाला अजिबात बिचकत नाही. भर ट्राफिकजॅम मधेही सहज फिरत असतात. दिसायला बेंगरुळ असला तरी याचे उडणे मात्र एखाद्या पतंगाप्रमाणे असते. तिथे हे साहेब मजेत फिरत होते.

त्या परिसराची साधारण कल्पना येण्यासाठी..

माझ्या ग्रूपमधल्या बायका अतिउत्साही होत्या. त्या ठिकाणी गेल्या गेल्या वाटल्या डाळीच्या भज्यांचा आणि गरमागरम चहाचा कार्यक्रम झाला. बाकी अनेक पदार्थ केले आम्ही तिथे, आणि त्याची जय्यत तयारी होती.

त्या तळ्याच्या परिसरात अनेक पक्षी दिसतात. त्यापैकी एक

हा दुसरा..

मग आमचा पनीर भूर्जीचा कार्यक्रम झाला.

आता उन चांगलेच चढू लागले होते. अगदी चटके बसावेत असे उन लागू लागले. सकाळच्या थंडीत उबदार वाटलेली जागा आता गैरसोयीची वाटू लागली होती. आम्ही मग तंबूपासून जरा लांब सावलीत पथार्‍या पसरल्या.
नैवाशा या शब्दाचा स्थानिक भाषेतला अर्थ, अशांत पाणी. शांत सरोवराच्या पाण्याला,हे नाव का दिले, याचा आम्हाला लवकरच अनुभव आला..

इथे बरेच असे डोंगर आहेत. काहि विवरांत उतरताही येते. तिथल्या काही विवरांत
वैषिष्ठपूर्ण दगड सापडतात.

नितीन, इथे प्रत्येक भारतीयाला एक ओळखपत्र (एलियन्स (??) कार्ड) नेहमी जवळ बाळगावे लागते.
त्यावर माझा भारतीय असल्याचा उल्लेख आणि माझा चेहरा याचा ताळमेळ तिथल्या अधिका-याला
लागेना. त्याचे असे म्हणणे पडले कि भारतीय नसल्याने. मला प्रवेश फ़ी, यू एस डॉलर्स मधेच भरावी
लागेल. इतरांना ती स्थानिक चलनांत भरता येते. असे काहि होईल याची कल्पनाच नसल्याने माझ्याकडे
यू एस डॉलर्स नव्हते.

भाऊ,
हि सरोवरे या लोकांसाठी वरदानच आहेत. लोकांसाठी नव्हे तर प्राण्यांसाठीदेखील. इथल्या नद्या थेट
समुद्रापर्यंतच वाहतील याची शाश्वती नसते. त्या मधेच वाळवंटात लुप्त होऊ शकतात.
मी या लेकचेच पाणी पित असे. त्या काळात रवांडामधे दंगल झाली होती आणि त्या दंगलीतले मृतदेह या सरोवरातच टाकत होते, तरीही...

या सरोवरात मी बोटीने प्रवासही केला आहे. आपल्याकडे पूर्वी गावोगावी सरोवरे बांधायची रित होती.
अजूनही ठाण्यात अनेक आहेत पण ते किती टिकतील, याची शंका आहे. आपण ते साफ ठेवले असते,
तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सूटला असता.

पनीर भूर्जी बरोबर चपात्या करायचा बेत होता. सगळ्यांना गरमागरम चपात्या मिळाल्या, तेवढ्यात तव्यावर चुर्र चुर्र असा आवाज ऐकू यायला लागला. पहिल्यांदा आम्हाला काही कळलेच नाही. सूर्यप्रकाश तर होताच त्यामूळे पावसाची शक्यता कुणाच्याच लक्षात आली नाही. बघता बघता सोसट्याचा वारा सुटला. वारा अडवायला खाली झाडे नसल्याने तो अंगाला बोचायला लागला.
आणि थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरु झाला. आमचे टेंट वार्‍याने फडफडू लागले.

बहुतेक वेळा आपण ज्यावेळी सरोवराच्या काठाशी असतो, त्यावेळी सरोवराचे काठ जरा उंचावलेले असतात. त्यामूळे पाणी आपल्या नजरेच्या पातळीखाली असते, पण इथे मात्र ते नजरेच्या पातळीवरच होते.
सहज लक्ष गेले तर आता पर्यंत शांत असलेल्या पाण्यावर प्रचंड खळबळ होत होती. अगदी लाटा उठत नव्हत्या पण पाणी जागच्या जागी डुचमळत होते.
आम्हाला पटापट सगळे आवरुन टेंट्चा आसरा घ्यावा लागला. तास दिड तास हे थैमान चालले होते. तंबू गळायला लागतील असे वाटायला लागले. नैवाशा या शब्दाचा अर्थ आता चांगलाच लक्षात आला होता.
दोन तासाभरातच सर्व शांत झाले. तिथे सरोवरात जाण्यासाठी होड्या होत्या, पण थोड्याच वेळापुर्वी बघितलेले वादळ लक्षात घेता, कुणाचीच तयारी नव्हती.
मग थोडा वेळ इकडेतिकडे केल्यावर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागलो. संध्याकाळी चक्क पावभाजीचा बेत होता. तो पण असातसा नाही, तव्यावर प्रत्येकवेळी कांदा, टोमॅटो परतून, पाव शेकून वगैरे. (खरे तर तिथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. पण हौसेला काय करायचे.. )

मग अर्थातच उबेसाठी शेकोटी करणे आलेच. तिथे झाडांच्या दाटींमूळे पावलापावलावर किडूकमीडूक फांद्या मिळत होत्याच पण उबेसाठी हवे असणारे मोठे ओंडकेही तिथे विकत मिळत होते.

शेकोटीभोवती गप्पांचा फड रंगला. आधी लिहिल्याप्रमाणे त्या सरोवरात हिप्पोंची वस्ती आहे. ते बाहेर पडू नयेत म्हणून तारांचे कुंपण घालून त्यात सौम्यसा विद्यूतप्रवाह सोडतात. त्याने प्राण्यांना ईजा होत नाही. पण ते जवळ आल्यास अलार्म वाजू लागतो.
चतुर्थीची रात्र असल्याने चंद्र उशीराच उगवणार होता. आम्ही आपापल्या टेंटमधे जाऊन झोपलो. रात्री
हिप्पोंचा आवाज बर्‍याच जणांनी ऐकला, दूरवर अलार्म वाजलेला पण ऐकला.

नेहमीप्रमाणेच मला पहाटे ५ वाजताच जाग आली. दिवसभर मला ७ लहान मूलांचा गराडा होता, त्यामूळे मला हवे तसे भटकता येत नव्हते.
तिथली रम्य पहाट मला स्वस्थ बसू देत नव्हती

तिथे प्रसाधनगृह आणि अंघोळीसाठी गरम पाणी सहज उपलब्ध होते. जरासे दिसू लागल्यावर मी फेरफटका मारायला निघालो. रिसॉर्टच्या समोरच एक टेकडी होती, तिच्यावर गेलो. वाटेत कालचेच पक्षी नाचत होते. त्यांना पर्यटकांची सवय असावी.
टेकडीवर खास केनयाची नवसंपदा होती. इथे बाभळीचा एक वेगळा प्रकार दिसला. झाडावरच्या गाठी
साध्यासुध्या नाहीत. पण त्याबद्दल मग लिहिन (मग लिहिनची यादी वाढायलाच लागलीय आता,)

जरा चढून गेल्यावर मात्र सूर्योदयाचे अप्रतिम दृष्य दिसले.

कालचा ज्वालामुखीचा पर्वत मात्र अजून दुलई सोडायला तयार नव्हता.

तिथूनच लेक चा बराच विस्तार दिसायला लागला.

पण तो एका फ्रेममधे मावणे शक्यच नव्हते..

सूर्य हळूहळू वर यायला लागला होता..

पण तरिही डोंगरोबा, दुलई सोडायला तयार नव्हते,,

त्याच परिसरात निवडुंगाची वेगळी फूले दिसत होती.

माझा फेरफटका आटपून मी परत मुक्कामी आलो तर, लेक मधले पाणी बरेच शांत झाले होते.

मग मी सगळ्यांची मिनतवारी करुन, सरोवरात बोटींगसाठी तयार केले. हिप्पो दाखवलेस तरच पैसे देईन या वायद्यावर आम्ही एका होडीत बसलो.
हिप्पोंपेक्षा तिथले पक्षी जास्त प्रेक्षणीय होते, आणि त्या पक्षांनादेखील आमची भिती वाटत नव्हती.

तिथल्या दगडादगडावर त्यांची शाळाच भरली होती.

दूरवर आम्हाला हिप्पो दिसलेही. पण ते काही पाण्याच्या वर यायला तयार नव्हतो. फोटोमधे फक्त त्यांचे फक्त कानच दिसत होते. त्याच्या फार जवळ जाण्यात धोका होता. एका धक्क्याने त्याने आमची होडी उलटवली असती.

मग आम्ही परत पक्षांकडे वळलो.

एक वेगळा पेलिकन

नेहमीचे पेलिकन्स

काहि बदकं

काल हेच लेक इतके अशांत होते, यावर आता विश्वास ठेवणे कठीण होते.

वायदा केलेल्या वेळेपेक्षा दुप्पट वेळ बोटिंग करुन आम्ही किनार्‍यावर आलो. समोरच हा पक्षीराज दिसला.

तिथे खरेच सगळे अनोखे होते.
हे एक डिझायनर माकड (फोटोत दिसत नसली तरी याची शेपटी पण मस्त झुपकेदार होती)

माझ्या अपेक्षेप्रमाणे हा फोटो आलेला नाही, पण तळे आता परत अशांत व्हायलालागले होते. (लेकच्या काठाशी, हिप्पोंच्या कवट्या वगैरे ठेवलेल्या आहेत )

शेवटी परत फिरायची वेळ आलीच. सगळ्या बाळांचा मला खूपच लळा लागला होता. खरे तर ती कायम माझ्याभोवती असल्याने मला फार उंडारता आले नव्हते. पण बाळांना सोडून जाणेही मला शक्य नव्हते. अशाच एका बाळाने दिलेला गोड पापा.

येताना आम्ही दुसर्‍या वाटेने आलो. व्हॅलीतूनच या डोंगराला पूर्ण वळसा घालून अगदी शेवटी तीव्र चढ लागतो. अर्थात तो आपल्या घाटांच्या मानाने मामुलीच आहे. हा भाग मला वाटते पर्जन्यछायेत येत असावा. डोंगर काहि फार हिरवे नव्हते.

पण हा पुर्णपणे दुसरा रस्ता आहे. इथेच वाटेवर आणखी एक व्हॅलीसाठीचा व्ह्यू पॉइंट लागतो. इथे मसाई लोकांच्या शाली वगैरे विकायला असतात (त्या नैरोबीमधेही मिळतात) तिथेच प्राण्यांच्या फर पण विकायला असतात. उत्तम असल्या तरी मला त्या विकत घ्याव्याश्या वाटत नाहीत कारण क्रूरपणा आहेच शिवाय माझ्या माहितीप्रमाणे, विमानातून त्या नेता येत नाहीत.

जायच्या आधी मला या लेकबद्दल नेटवर बघायला वेळ मिळाला नव्हता. हे लेक पूर्णपणे पावसाच्या पाण्यानेच भरते. पावसाच्या प्रमाणानुसार या एकचा विस्तार आणि खोली ठरते. गेला १०० वर्षात दोनदा हे लेक पूर्णपणे कोरडे झाले होते. या लेकला लागूनच दोन छोटे लेक्स पण आहेत.
याच परिसरात गरम पाण्याचे झरे पण आहेत. त्याला हेल्स गेट म्हणतात. ती पाटी आम्हाला दिसली होती, पण तेव्हा त्याची माहिती नव्हती.
माझा ग्रुप खूप मस्त आणि मनमोकळा होता. त्यातील अनेकांना मी पहिल्यांदाच भेटत होतो. पण खरे सांगू, त्या टेकडीवर मला मायबोलीकर दोस्तांची खुप आठवण आली.
योगेश, चंदन, अभिजीत, सावली सारखे कलाकार असते तर याहून सुंदर फोटो बघता आले असते.
(नैरोबीपासून हे लेक साधारण १०० किलोमीटर्स वर आहे. रस्ता उत्तम आहे, राहण्याची, जेवणाची उत्तम सोय आहे. या परिसरातही फ्लेमिंगो दिसतात.)

नैरोबी नॅशनल पार्क

नैरोबी शहराला लागूनच हे भले मोठे पार्क आहे. माझ्या घरापासून केवळ आठ किमीवर हे आहे.
खरं तर माझ्या घरातूनच याचा काही भाग दिसतो. तसा तो नैरोबीच्या कुठल्याही ऊंच इमारतीतून
दिसू शकतो.

शहराला लागून काही जंगल आणि मग पुढे गवताळ प्रदेश आहे. पार्कमधे काही नद्यांची खोरी, अनेक
पाणवठे आहेत. सर्व प्राणी मोकळेच आहेत. पण तरीही मी तिथे जायचे टाळत असे, कारण तिथे
जाणाऱ्या बहुतेक लोकांना तिथले सिंह, बिबळे, चित्ते बघायचे असतात. तेही शिकार करताना.

इथल्या काही टुअर कंपन्या ते दाखवायची हमीच देतात, पण आपल्या डोळ्यासमोर हरणाची शिकार
होतेय आणि त्यावर ताव मारला जातोय, हे बघायची माझी मानसिक तयारी नाही.

त्यामूळे निव्वळ तिथला निसर्ग बघण्यासाठी मला कुणी सोबत मिळत नव्हती, पण काल एक मित्र
तयार झाला.
तिथे आपली गाडी घेऊन जाता येते. आमची सलून कार असल्याने अर्थातच काही मर्यादा येतात.
तिथे फिरण्यासाठी फ़ोर व्हील ड्राईव्ह योग्य ठरते. सर्वच प्राणी दिसतील याची शक्यता कमीच
असते. पण हरणे, झेब्रे, जिराफ़, शहामृग सहज दिसतात. हे प्राणी माणसांना अजिबात घाबरत
नाहीत.
नैरोबीत विमान ऊतरताना याच भागावरुन जाते, त्यामूळे विमानातूनही हे प्राणी दिसतात आणि
प्राण्यांना पण विमाने दिसतात. पण ते त्यालाही घाबरत नाहीत.

गवताळ प्रदेश असल्याने दूरवरचा विभाग दिसत राहतो, पण आपल्याला कल्पना येत नाही, इतक्या
बेमालुमपणे यात प्राणी लपलेले असतात. अगदी जवळ गेल्याशिवाय प्राणी दिसत नाहीत.
या पार्कात गाडीतून खाली उतरायला परवानगी नाही, पण काही फोटो घेण्यासाठी मी बाहेर आलो होतो,
आणि हे प्राणी बिनदिक्कत माझ्याकडे बघत फोटो काढू देत होते.

पार्काचा विस्तार खुपच मोठा आहे, आणि कच्च्या रस्त्यांचा भुलभुलैया आहे. नैरोबी शहर दिसत असल्याने
दिशेचा अंदाज येत राहतो. (मार्गदर्शक फलक मोजकेच आहेत.) अनेक फोटोत ते दिसेलच.
आम्ही साधारण ६ तास तिथे भटकत होतो, एकंदर डेड स्लो स्पीडने चालवूनही ५० किमी भटकलो.
तिथे काही ठिकाणी विश्रांतीच्या जागा आहेत. प्यायचे पाणी, स्वच्छतागृहे आहेत. कचरा अजिबात नाही.

मला तिथे (नेहमीप्रमाणेच) अनोखी फुलेही दिसलीच, ती वेगळ्या ठिकाणी टाकतोय.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

२६.

२७.

२८.

नैरोबी सफ़ारी वॉक

नैरोबीचे नॅशनल पार्क आहे ते नैरोबी शहराला जवळजवळ लागूनच आहे. त्या पार्काचे काही भाग
शहरातच आहेत. नैरोबीला विमान उतरताना या पार्कवरुनच उतरते आणि दिवसा उतरणारे विमान
असेल तर झेब्रा, जिराफ वगैरे प्राणी विमानातूनच दिसतात.

या पार्कचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याच्यालगतचा जंगलाचा काही भाग, नैरोबी सफारी वॉक म्हणून
विकसित केलाय. इथे लाकडाचा मजबूत पदमार्ग आहे आणि त्यावरुन जंगलातील वातावरणाशी तूम्ही
ओळख करुन घेऊ शकता.
इथे काही प्राणी पण ठेवले आहेत. इथे त्यांची उत्तम निगा राखली जाते. आणि त्यामूळे ते निरोगी
तर दिसतातच पण सतत हालचाल करत असतात.
जंगलातील अनाथ पिल्लांची पण इथे काळजी घेतली जाते.
पदमार्ग तर सुंदर आहेतच पण प्राण्यांचे जवळून दर्शन घेण्यासाठी उत्तम सोयीदेखील केल्या आहेत.
हा भाग सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत उघडा असतो. नैरोबी शहरापासून केवळ ७
किमीवर हा आहे. इथून जवळच नैरोबीचा दुसरा विमानतळ आहे. (विल्सन एअरपोर्ट) ती छोटी छोटी
विमाने पाच पाच मिनिटांनी डोक्यावरून जात असतात. पण प्राण्यांना पण त्याचे काही वाटत नाही.

गेले दोन महिने नैरोबीतले वातावरण ढगाळ आहे. सूर्य क्वचितच दिसतो. त्यामूळे मला नीट फोटो
काढता आले नाहीत. (फोटो नेहमीसारखे स्पष्ट नाहीत.) पक्षीही खूप दिसले पण गच्च झाडींमूळे आणि
प्रकाश नसल्याने त्यांचे फोटो नाहीच काढता आले.
आपल्याकडचे सदाहरीत पर्जन्य जंगल आणि या भागातले जंगल यात खूपच फरक असतो. आपल्या
कडच्या हिरवाईच्या छटा इथे दिसत नाहीत. पण या जंगलाचे स्वत:चे असे वेगळे सौंदर्य असतेच.

मी सकाळी नऊच्या सुमारास तिथे गेलो होतो. इतक्या सकाळी तिथे कुणीही पर्यटक नव्हते. त्यामूळे
सगळा परिसर जणू माझ्यासाठीच आंदण दिल्यासारखा होता. इथले कर्मचारी पण हसतमुख आहेत.
प्रत्येक जण हबारी याको (कसा आहेस ?) किंवा जांबो (नमस्कार) केल्याशिवाय रहात नाही. तूम्ही
रस दाखवलात तर, प्राण्यांबद्दल जास्त माहिती, त्यांचे जवळून दर्शन घडवून आणतात.
आणि मुख्य म्हणजे परिसर अत्यंत स्वच्छ आहे. पर्यटकांनीही इथे कचरा टाकलेला नाही.

एक अनावश्यक वाक्य-----मला तिथे काहि वेगळी फुले दिसली.....

प्रत्येक फोटोबद्दल लिहित नाही. जाणकार आहातच.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

हा उदयकडे बघणारा चित्ता..

आज एक थरारक क्षण पण अनुभवला. हा बिबट्या असा लोळत होता, म्हणून मी जरा
जवळ गेलो..

तर आला ना मला गळामिठी मारायला.

घाबरू नका. हा माझा आगाऊपणा होता. तिथल्या गार्डने मला जवळ नेले. सगळेजण
इतक्या जवळ जाऊ शकत नाहीत.

खास वर्षूसाठी खडूच्या रेघा.

आणि प्राण्यांना इतक्या जवळून बघता येते.(मधे जाड पण स्वच्छ काच आहे.)

पूर्व आफ्रिकेतील तिन्ही देशात (युगांडा, टांझानिया, केनया) पर्यटनाच्या उत्तम सोयी आहेत. बाकिच्या देशांतील असा सुविधांपेक्षा त्या स्वस्तही आहेत. याशिवाय इथिओपिया, झांबिया या देशात पण बघण्यासारखे बरेच आहे.
(नैरोबी आणि अदीस अबाबा हि दोन्ही शहरे वर्षभर थंड असतात.)

हा नॅशनल पार्कच्या बाहेरचा भाग आहे. नॅशनल पार्क खुपच मोठा आहे आणि तिथले प्राणी मुक्त आहेत. तिथे गाडीनेही फिरायला दिवसभर
वेळ दिला पाहिजे. हा वॉक अनुभवायला मात्र ३ ते ४ तास लागतात.
हिंस्त्र प्राण्यांना जवळून बघायला जाड काच असलेली एक खोली आहे. तिथून अगदी फूटभर अंतरावरुन प्राणी दिसतात. (प्राण्यांना काचेपलीकडचे दिसत नसल्यासारखे वावरतात.)

पांढरा वाघ असतो तसा पांढरा झेब्रा. या फोटोतल्या प्राण्यांशिवाय तिथे तरस, पिग्मी हिप्पो, शहामृग असेही काही प्राणीपक्षी आहेत.
इथून जवळच कार्निव्होर असे एक हॉटेल आहे. तिथे झेब्रा, मगर, उंट आधी बर्‍याच प्राण्यांचे मटण आपल्यासमोरच रोस्ट करुन मिळते.

हाच तो वॉक का?

nairobi safari walk.jpgView Larger Map

नकाशात तुम्ही म्हणता तो विल्सन विमानतळही दिसला.
हे सगळे अगदी शहरातच आहे असे दिसते... अगदी शहरी प्राणी असणार हे

नैरोबीला यायला मुंबईहून केनया एअरवेज चे (जेट कोडशेअर) रोजचे डायरेक्ट विमान आहे. प्रवास ६ तासांचा आहे. पण त्यापेक्षा इथिओपियन (व्हाया अदिस अबाबा) आणि एअर अरेबिया (व्हाया शारजाह) स्वस्त पडते. त्याने आल्यास या दोन्ही ठिकाणी थांबता येईल. तिकिट कधी कधी १४/१५ हजार रुपये एवढे स्वस्त मिळू शकते.
नैरोबीतली हॉटेल्स आणि सगळ्या रिसॉर्ट्स ची हॉटेल्स तारांकीत दर्ज्याची असल्याने थोडी महाग आहेत. पण जर कुणा ओळखीच्या कुटुंबात रहायची सोय झाली (जशी मी इथे आहे तोपर्यंत माझ्याकडे) तर फारसा खर्च येणार नाही. इथे देवळातूनही रहायची सोय आहे. यूथ हॉस्टेलही आहे.
इथे येण्यासाठी येलो फिव्हर ची लस टोचून घ्यावी लागते. व्हीसाची गरज नाही. इथे आल्यावर ५० डॉलर्सना तो मिळतो. हास व्हीसा युगांडा आणि टांझानियाला पण चालतो. या दोन्ही देशांत इथून रोडने किंवा बोटीने जाता येते.
केनया एअरवेजची पॅकेजेस आहेत. पण भारतातील चांगला टुअर ऑपरेटर उत्तम व्यवस्था करु शकतो. स्वतःहून अगदी इथे आल्यावर पण व्यवस्था करता येते. भाषेची काहीच अडचण येत नाही. सगळ्यांना इंग्लिश येते.

इथे हव्या त्या दर्ज्याच्या गाड्या उपलब्ध असतात. दिवसभराचे रेट साधारण ३००० शिलिंग ( १५०० रुपये ) पासून पुढे.
पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. मोठ्या गावांना जोडण्यासाठी व्होल्वो सारख्या बसेस आहेत. प्रवास साधारणपणे सुरक्षित आहे पण मौल्यवान वस्तू जवळ न बाळगणेच चांगले.
हायवेज उत्तम आहेत.
वरती मी ज्या सरोवरांचा उल्लेख केला आहे त्यांच्या काठावर पण तंबूत वगैरे रहायची सोय आहे. अंघोळ / प्रसाधनगृह ठिक आहेत. जेवणाची सोय आहे, स्वतः करुन खायचे असेल तरी चालते.

चार जणांचा ग्रुप असेल तर माणशी खर्च फार कमी येतो.

निवांतपणे समुद्रकाठावरची मजा चाखायची असेल तर मोंबासा / मालिंदी सारखी गावे आहेत. मसाल्याचे बेट म्हणून झांजिबार प्रसिद्ध आहे.
दूरवरच्या गेम पार्क मधे जे रीसॉर्ट्स आहेत त्यांची स्वतःची एअरस्ट्रीप असते. छोट्या विमानातून तिथे जाता येते.
इथे एक मात्र सांगावेच लागेल, स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यासाठी प्रवेश दर वेगवेगळे असतात.
(मला हा नेहमीच प्रॉब्लेम येतो. मी भारतीय आहे आणि इथला रहिवासी आहे, हे मला नेहमीच कागदोपत्री सिद्ध करावे लागते. ती नसली तर मला स्थानिक चलनात तिकीट काढून प्रवेश घेता येत नाही.)

इथून खरेदी करण्यासाठी चहा, कॉफी, मसाले, हॅझलनट्स, पापड, कोको, चॉकलेट्स, कपडे खास असतात. न्यायची तयारी असेल तर शुद्ध सोने (कच्चे सोने, त्याचे दागिने घडवता येत नाहीत, जाड कडे वगैरे करुन न्यावे लागते.) देखील मिळू शकते. हस्तकलेच्या वस्तूंमधे सोपस्टोनमधे कोरलेल्या वस्तू मिळतात. प्राण्यांच्या फर्स मिळतात, पण माझ्यामते त्या विमानातून न्यायची परवानगी नाही. चामड्याच्या वस्तूही उत्तम मिळतत.

पण करिबूनी --- स्वागत असो.



























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...