- - रोचना
आफ्रिका हा विषय मराठीत, मराठी लोकांत बराचसा दुर्लक्षित आहे. आफ्रिकेशी आपला बहुतेक संबंध येतो तो ठाशीव कल्पनांच्या स्वरूपात : दुष्काळी भागातले, कुपोषित लोक. (जोडीला आपला प्रच्छन्न वंशवाद.) आफ्रिकेतल्या विविध भागांबद्दलही आपल्याला साचेबद्ध माहिती असते. पूर्वेकडे मसाई मारा अभयारण्य, दक्षिणेकडे महात्मा गांधींची पहिली कर्मभूमी आणि अलीकडे मोक्याच्या क्षणाला हरणारी क्रिकेटची टीम. पश्चिमेकडे गुलामगिरीच्या युरोपीय व्यवसायाला बळी पडलेले देश आणि उत्तरेकडे वाळवंट.
नोकरीच्या संधींसाठी मराठी लोक पाश्चात्त्य जगात जातात. भारतीय लोक गेल्या दीडेक दशकात पूर्व आशियात पर्यटनासाठी जायला लागले. जे कोणी थोडे लोक आफ्रिकेत कामासाठी, पर्यटनासाठी जातात त्यांची वर्णनं आहेत, पण वरवरची… आफ्रिका खंडाच्याच बहुविधतेचा तर सोडून द्या, तिथल्या भारतीय लोकांच्या इतिहासाचाही व्यवस्थित आढावा घेतला गेलेला नाही. ही उणीव एकाच अंकात भरून काढणं अशक्य आहे, पण आफ्रिका खंडाच्या इतिहासावर, वर्तमान स्थितीवर, आणि भविष्याबद्दल काही माहितीपर आणि काही ललित लेख एकत्र आणून या दुर्लक्षित विषयाबद्दल मराठी वाचकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढेल, या आशेने आम्ही हा दिवाळी अंक वाचकांसमोर ठेवत आहोत.
भारतीय लोक गुजरातमधून आणि सिंधमधून पूर्व आणि इशान्य आफ्रिकेत अनेक शतकं व्यापारासाठी जात होते. आधुनिक काळातही ब्रिटिश साम्राज्याच्या छत्रछायेत ते युगांडात, टांझानियात आणि केनियात गेले; तिथे व्यवसाय केला; पैसा मिळवला. तरीही स्थानिकांपासून ते फटकूनच राहिले. इदी अमीनने भारतीयांची हकालपट्टी केली हे अनेकांना ठाऊक असेल. यातून झालेल्या गुंतागुंतीबद्दलचा आढावा अंकात प्रा. महमूद ममदानी यांच्या युगांडाबद्दलच्या भाषांतरित लेखात आहे. ममदानी आफ्रिकेच्या इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे आघाडीचे अभ्यासक आहेत, तसेच ते स्वतः भारतीय वंशाचे युगांडन नागरिक आहेत, आणि या लेखात त्यांच्या व्यक्तिगत अनुभवाचा धागादेखील गोवलेला आहे.
उत्तर आफ्रिकेतल्या सुदान देशाचा परिसर अधूनमधून दरफुर भागात होणार्या भीषण हिंसाचाराच्या बातम्यांतूनच आपल्यासमोर येतो. ब्रिटिशांनी तिथेही वेगवेगळ्या समुदायांची सुसंस्कृत आणि असंस्कृत अशी अनभ्यस्त विभागणी केली, आणि भांडणं लागली. प्रा. महमूद ममदानींच्या या विषयांवरच्या पुस्तकांचा आढावा रोचनानं एका लेखात घेतला आहे. दुसऱ्या टोकाला, दक्षिण आफ्रिकेत, अनेक दशकं 'अपार्थाइड' ही वर्णविद्वेषाची व्यवस्था होती. भारतानं त्याविरुद्ध तत्कालीन दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय बहिष्कार टाकून तिथल्या सरकारवर दबाव आणण्यात पुढाकार घेतला होता, आणि मुत्सद्देगिरी बजावली होती. अपार्थाइड व्यवस्थेचा १९९४मध्ये पाडाव झाला, आणि काळ्या लोकांनी आपल्या देशात लोकशाही मूल्यं रुजवायला सुरुवात केली. पण वर्णविद्वेषाचे परिणाम अजूनही दक्षिण आफ्रिकी समाजात भोगले जात आहेत. गेल्या काही वर्षांत याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठांमध्ये काही महत्त्वपूर्ण विद्यार्थी चळवळी झाल्या. त्या चळवळींचा, आफ्रिकेतल्या शिक्षणव्यवस्थेच्या इतिहासाचा आणि भवितव्याचा आढावा रुची चतुर्वेदी यांच्या लेखातून दिसेल. आफ्रिकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावरच्या लायबेरिया देशात १९८०पासून सुमारे तीन दशक भीषण यादवी युद्ध चालू होतं. लायबेरियाचं वैशिष्ट्य असं, की भारत स्वतंत्र होण्याआधी शंभर वर्षं तो स्वतंत्र होता, आणि त्याची मुळं आफ्रिकेत नसून अमेरिकेत आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या अमेरिकेत गुलामगिरीतून मुक्त झालेल्या माणसांसाठी स्वतंत्र देश म्हणून हा देश निर्माण केला गेला. तेव्हापासून अलीकडच्या काळातल्या संघर्षापर्यंतच्या घडामोडींचा आढावा अवधूत बापट यांनी घेतला आहे. त्याच लेखात उल्लेखलेल्या, लायबेरियाच्या एकाच मार्गावरच्या तीन निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा धावता आढावा नंदन यांनी घेतला आहे. तसंच, डेमोक्रटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशाचाही वसाहतकालापासून आजपर्यंतचा रक्तरंजित इतिहास बापट यांनी 'खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश' या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखात रेखाटला आहे. कॉंगोच्याच शेजारी छोट्याश्या रवांडा या देशातील हुतु व तुत्सी जमातींमधली तेढ वाढत जाऊन १९९४मध्ये त्याचं पर्यवसान तुत्सी जमातीच्या शिरकाणामध्ये झालं. या घटनेचा आढावा पीडितांच्याच शब्दांत सांगणाऱ्या एका पुस्तकाचा परिचय उज्ज्वला यांनी करून दिला आहे. एकूण, आफ्रिका सातत्यानं आर्थिक दारिद्र्यात राहिला आहे; तो वसाहतकालात, शीतयुद्धात आणि आणि आता खनिजांमागच्या साठमारीसाठी श्रीमंत देशांच्या हातात बाहुलं झालेला खंड आहे; आणि यातून आफ्रिकेत लोकशाही फार रुजली नाही, किंबहुना रुजू दिली गेली नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी या सरसकट विधांनांपलीकडे जाऊन हे सर्व लेख सद्य परिस्थितीला महत्त्वाची, आणि गुंतागुंतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी देतात.
शैलेन भांडारे यांचा निबंध आफ्रिकेतल्या चलनावर वसाहतवादाचा काय परिणाम झाला त्याचा इतिहास सांगतो. त्यासाठी इतर अभ्यासकांच्या लेखनाबरोबरच खुद्द वसाहतकालीन चलनांच्या दृश्यमय पुराव्यांचा आधार त्यांनी घेतला आहे. अशा प्रकारचं लेखन अन्यत्र झालेलं नाही. कौस्तुभ नाईक यांचा निबंध गोवा, पोर्तुगाल आणि मोझांबिक ह्यांच्या एकमेकांशी असलेल्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश पाडतो. अंगोला आणि मोझांबिक या गोव्यासारख्या पोर्तुगीज वसाहती होत्या. पोर्तुगीज साम्राज्यात नोकर्यांसाठी अनेक गोवेकर आफ्रिकेत स्थायिक झाले. तिथल्या व्यवस्थापनासाठी गोव्यातून मराठी सैनिकांनाही पाठवलं जाई. त्याविरुद्ध गोव्यात सैनिकांनी बंडही पुकारलं होतं. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या पूर्व आफ्रिकेतल्या देशांतही गोवेकर मोठ्या प्रमाणात जात – आज ब्रिटनच्या केंद्रीय गृहमंत्री, आणि कट्टर उजव्या पंथाच्या, वादग्रस्त विधानं करणार्या राजकारणी सुएला ब्रेवरमन, यांचे वडीलही त्यांच्यापैकी एक होते. असे अनेक रोचक धागे जुळवणारा कौस्तुभ यांचा निबंध जरूर वाचा.

मापुतो मोझांबिक
आरोग्याच्या कारणास्तव आजच्या काळात साखर या नुसत्या शब्दाचंही आपल्याला वावडं झालं आहे हे खरंच आहे. तरीही जागतिक इतिहासाला आकार देणारी ही सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे हे आपण नाकारू शकत नाही. साखर ह्या वस्तूचे परिणाम केवळ आपल्या सर्वांच्या रक्तातल्या HBA1C चाचणी निकालांवरच नव्हे तर समस्त आफ्रिका, कॅरिबियन आणि युरोपच्या इतिहासातही जाणवतात. साखरेची स्वस्त उपलब्धता आणि तिची लोकप्रियता यांच्याशी आफ्रिकन लोकांच्या शतकानुशतकांच्या गुलामगिरीचा फार जवळचा संबंध आहे. साखरेचं रसायनशास्त्र, तिचा इतिहास आणि त्याभोवतीच्या राजकीय अर्थव्यवस्थेची सुबकपणे सांगड घालणारी कडू-गोड कहाणी सई केसकरने तिच्या व्यापक लेखात मांडली आहे. अमेरिका आणि इतरत्र गुलाम बनवल्या गेलेल्या काळ्या आफ्रिकन लोकांबद्दल इतिहासामध्ये बरंच काही लिहून ठेवलेलं आहे, परंतु बॅटमॅन यांचा निबंध दक्षिण आफ्रिकेतील युरोपियन राजवटीखाली गुलाम झालेल्या भारतीयांवर प्रकाश टाकतो. भारताच्या काही भागांतून मॉरिशसमध्ये बळजबरीच्या मजूरकामावर गेलेल्या लोकांना गिरमिटिया असं संबोधण्यात येतं. कागदोपत्री जरी गुलामगिरी संपुष्टात आलेली असली तरी अस्तित्वात असलेल्या ह्या सक्तीच्या गुलामांची कहाणी आदूबाळ यांच्या लेखात आलेली आहे. शोषणावर आधारित व्यवस्थेत त्यांच्या पिढ्या खर्ची पडल्या आणि त्यांनी ज्या देशांत स्थलांतर केले त्यांच्या इतिहासाच्या घडणीमधे त्यांचा मोठा वाटा आहे.
आफ्रिकेतल्या देशांना साठ-सत्तरच्या दशकांत स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झाली. तरी आजही भांडवलशाहीची चक्रं फिरवत राहण्यासाठी आफ्रिकेला नाडलं जात आहेच. उत्तर आफ्रिकेतल्या अनेक देशांत खनिजसमृद्धी आहे. त्या स्रोतांमागे जगातले सगळेच प्रगत देश आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या, ते हा दिवाळी अंक लिहिण्या-वाचण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांत बॅटऱ्या वापरल्या जातात. त्या बॅटऱ्यांमध्ये कोबाल्ट वापरलं जातं; त्यासाठी आजही काँगो देशात अस्थिरता टिकवून धरण्याचा प्रयत्न होत आहे. दुसऱ्या बाजूला कार्बन क्रेडिट ही नवी संकल्पना राबवली जात आहे. या संकल्पनांमागचा विचार, त्यांतल्या त्रुटी आणि त्याचा आफ्रिकेवर होणारा परिणाम याबद्दल उमेश घोडकेंचा लेख आहे.
![]() |
![]() |
| लुआंडा, अंगोला - नॅशनल असेंब्ली | किन्शासा, काँगोमधला पॅट्रिस लुमुंबाचा पुतळा पाहणारे पर्यटक |
नायजेरियाई कादंबरीकार चिमामांडा नगोझी अडिचीचं एक टेड टॉक आहे, "द डेंजर ऑफ ए सिंगल स्टोरी". त्यात ती म्हणते, तिच्या गोष्टींमध्ये नायजेरियाई मध्यमवर्गाचं वर्णन होतं, तर ते तिच्या अमेरिकी प्राध्यापकांना भावलं नाही. आफ्रिका म्हणजे गरीब, भुकेकंगाल समाजच, हा ठरीव साचा काही फक्त भारतीयांबद्दलचा नाही, आफ्रिकेबद्दलचाही आहेच. किंबहुना, अनेक भारतीयांचीही अशीच समजूत असते. अशा सरधोपट समजुतींना छेद देणारे अनेक लेख वाचकांना अंकात सापडतील. "आफ्रिकेकडे अपयशाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून पाहिले जाते," हे वाक्य 'आफ्रिका हा देश नव्हे' या इवोर चिपकिन यांच्या लेखात आहे. चिपकिन आफ्रिकेतल्या भ्रष्टाचाराच्या कारणांचं बारीक विश्लेषण तर करतातच, पण 'आफ्रिका' या बृहत-संकल्पनेचादेखील नव्याने धांडोळा घेतात. प्रेरणा कुलकर्णी यांचा लेख M-Pesa या सेवेबद्दल आहे. ही सेवा पूर्व आफ्रिकेत अलीकडे फोफावली आहे. आफ्रिकी लोकांच्या दैनंदिन आयुष्यांबद्दलच्या आपल्या घडीव कल्पनाही त्यातून मोडीत निघतात. धनंजयचा माहितीपूर्ण लेख आफ्रिकेतल्या मध्यमवर्गीय रोगांबद्दल आहे. एड्स, इबोलासारख्या साथींनी, आणि मलेरियासारख्या साध्या वाटणाऱ्या आजारानेही आफ्रिकेत थैमान घातलं आहे हे एक वेळ माहीत असतं. पण हा लेख आफ्रिकेची पांढरपेशा बाजू दाखवणारा आहे. दक्षिण आफ्रिकेतले शास्त्रज्ञ अँथनी अॅलिसन यांनी सिकल सेल अॅनिमिया या जनुकीय आजारावर केलेल्या संशोधनाबद्दल सत्यजित सलगरकर यांचा लेख प्रकाश टाकतो. सिकल सेल अॅनिमिया असलेल्या रुग्णांमध्ये मलेरिया या प्राणघातक रोगाची प्रतिकारशक्ती सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे हे केनियातल्या व्हिक्टोरिया लेकच्या आसपासच्या प्रदेशातल्या लोकांवर केलेल्या संशोधनाद्वारे अॅलिसन हे दाखवू शकला. या लेखात हे सर्व रोमहर्षक पद्धतीने उलगडण्यात आलेलं आहे.
ऐसी अक्षरेमध्ये यंदा लिहिणाऱ्या आमच्या काही लेखकांनी आफ्रिकेच्या विविध पैलूंबद्दल नेमकी, अचूक माहिती देणारे, टोकदार वाटावेत असे दृष्टीकोन आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कामामुळे हे लोक आफ्रिकेच्या त्या त्या भागांमधे गेले; त्यांनी तिथले प्रत्यक्ष अनुभव घेतले. उदाहरणार्थ शैलेश मुळे – ते त्यांच्या कामाच्या दरम्यान फ्रेंचभाषक आफ्रिकन लोकांच्या संपर्कात आले. फ्रेंचांच्या वसाहती असलेल्या आफ्रिकी देशांशी त्यांनी ओळख करून दिली आहे आणि त्या देशांचे फ्रान्सशी आजच्या काळात संबंध कसे आहेत त्याबद्दल विवेचन केलं आहे. ह्या फ्रेंच वसाहतींपैकी काही देशांतल्या अलीकडच्या घडामोडींकडे बारकाईने पाहिलं, तर ते एका नवीन जागतिक लष्करी आणि मुत्सद्देगिरीच्या जाळ्यात कसे अडकले आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्या राजकीय पटलावर चिंतातुर जंतू यांनी आपल्या लेखाद्वारे प्रकाश टाकलेला आहे. एकीकडे फ्रान्स तर दुसरीकडे चीन आणि रशिया अशा कैचीत सापडलेले हे देश आणि त्यांच्यातल्या काहींवर पडलेला इस्लामिक धर्मांधतेचा प्रभाव हे रसायन आपल्याला त्या लिखाणातून मिळेल.
![]()
दाकार, सेनेगालमधला एंगोर बीच
टिंबक्टूदेखील या फ्रेंच वसाहतींमध्ये येतं. देवकी एरंडे यांनी आपल्या लेखात विषद केल्याप्रमाणे या शहराच्या इतिहासाला, भूगोलाला, आणि वास्तवाला एखाद्या दंतकथेतल्या नगरीसारखी बाजू आहे. आपल्याकडे रेडियोच्या फर्माईशींमधे कसं झुमरीतलैय्या नावाचं गाव येतं, तसं एरवी साध्यासहज वाटणार्या टिंबक्टुला कसं परीकथांचं वलय मिळत गेलं, ते देवकी एरंडे यांच्या लिखाणाद्वारे आलेलं आहे. देवकी इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेडक्रॉसमध्ये काम करतात आणि त्यांनी आपल्याला एकाच वेळी पुरातन टिंबक्टू आणि त्याचं आजचं स्वरूप अशी दुहेरी सफर घडवलेली आहे.
विजुभाऊ नोकरीसाठी जोहानसबर्गमध्ये काही साचेबद्ध विचार मनात घेऊनच गेले. तिथे गेल्यावर ठरीव साचे मोडून ते त्या शहराच्या प्रेमात कसे पडले, त्याबद्दल ते लिहितात. शिल्पा केळकर यांचा लेख केन्यामधल्या मसाई जमातीच्या गोपालांबद्दल आहे. जगात गोसंवर्धनाच्या किती विविध प्रथा आहेत, याची त्यातून कल्पना येते. प्रीति छत्रे यांचा लेख आफ्रिकेत आपली मुळं शोधायला गेलेल्या मारियो रिग्बी या कॅनडाच्या रहिवाश्याबद्दल आहे. मारियोलाही आपल्या, आणि त्याच्यासारख्या कृष्णवर्णीयांच्या तरुण पिढीच्या ठरावीक कोषांतून बाहेर पडायचं होतं. त्यानं दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनपासून इजिप्तच्या कैरोपर्यंत बारा हजार किलोमीटर हा प्रवास जमेल तितका पायी, आणि जमेल तितका यांत्रिक वाहनाचा वापर न करता केला. तो वाटेत असंख्य लोकांना भेटला, त्यांच्याशी बोलला. छत्रेंचा लेख मारियो रिग्बीच्या या दीर्घ, साहसी प्रवासाची, यात्रेची ओळख करून देतात.
याउलट, देवदत्त आपल्या विलक्षण विनोदी शैलीत सिंधुआज्जी या त्यांच्या अत्यंत धाडसी पात्राला टारझनच्या काल्पनिक प्राणिजगताच्या शोधात एका निराळ्याच यात्रेवर पाठवतो. १९८९मध्ये विख्यात विज्ञानकथालेखक डग्लस ॲडम्स आणि जीवशास्त्रज्ञ मार्क कारवारडीन यांना बी. बी. सी.नं आफ्रिकेतल्या काही लुप्तप्राय प्रजातींच्या संशोधनासाठी पाठवलं. त्यातून बी. बी. सी.वर एक रेडियो मालिका निघाली, आणि ॲडम्स यांचं प्रवासवर्णन. ॲडम्स यांची खास, विनोदी शैली आदुबाळ यांनी अत्यंत रसाळ मराठीत उतरवली आहे. तुम्ही लहानपणी किशोर मासिक वाचलं होतं का? त्यात अधूनमधून जगाच्या विविध भागांबद्दल रंगीबेरंगी माहिती दिलेली असायची. किशोर अंकात १९७६ साली छापून आलेल्या आफ्रिकेतल्या हौसा भाषेतल्या काही लोककथा आम्ही ह्या आफ्रिका विशेषांकात पुनर्मुद्रित केल्या आहेत.
ऐसीचा हा दिवाळी अंक चाळताना तुम्ही कॉफी पीत आहात का? आफ्रिकेपासून उगम पावून जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या आपल्या आवडत्या पेयाच्या उत्पत्तीबद्दल आणि प्रसाराबद्दल एक संक्षिप्त, माहितीपूर्ण पार्श्वभूमी अवंतीने दिली आहे. आपण कुणी निराळे आहोत, आपली संस्कृतीच जगात थोर आहे; आपल्या पाककृतींसारखं इतर काही जगात असूच शकत नाही; ही भावना भारतीयांसाठी नवीन नाही. चवीचवीनं खाणाऱ्या आणि हौशीनं स्वयंपाक करणाऱ्या रुचीचा लेख त्या कल्पनेला धक्का लावतो. येमिसी अरीबिसला या नायजेरियन लेखिकेच्या 'लाँगथ्रोट मेम्वार्स' (Longthroat Memoirs) या पुस्तकावर हा लेख आधारित आहे. 'लॉंगथ्रोट मेम्वार्स'ला २०१६मध्ये 'आंद्रे सायमन फूड अँड ड्रिंक अवॉर्डस्'मध्ये 'जॉन एव्हरी' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रूचीचा लेख पुस्तकाचा अनुवाद नव्हे, भाषांतर नव्हे किंवा स्वैर रूपांतरही नव्हे. तर एका रसाळ 'फॅनफिक्शन'च्या स्वरूपातलं हे पुस्तकाचं रसग्रहण आहे. शिरीन म्हाडेश्वरांचा लेख 'दाकाराई सुमन ओकोये' ह्या अनोख्या नावाच्या, आफ्रिकन-मराठी फ्यूजन रेस्तराँ चालवणार्या इसमाशी गप्पांच्या स्वरूपात आहे. ही मुलाखत वाचल्यावर तुम्हाला लगेचच हे रेस्तराँ कुठे आहे हे गुगलून शोधण्याची इच्छा होईल. त्याचं रहस्य लेखातच दडलेलं आहे, त्यामुळे मॅपवर लगेच पत्ता सापडला नाही, तर पुन्हा एकदा लेख नीट वाचावा, अशी आम्ही नम्र विनंती करतो.
सुरेन पिल्ले यांचा लेख दक्षिण आफ्रिकेतल्या जॅझ संगीताच्या विश्वाची आणि गेल्या काही दशकांतल्या आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन संगीतकारांमधल्या जवळच्या संबंधांची ओळख करून देतो. या लेखावर नजर टाकता टाकता काही क्लासिक आणि नवी जॅझ रेकॉर्डिंग ऐकण्याची सोयदेखील काही दुव्यांमधून आम्ही दिलेली आहे. अपार्थाइडच्या वर्णभेदाच्या कायद्यांमुळे तयार झालेल्या गौरेतर लोकांच्या वस्त्यांमध्ये जॅझसारखे संगीतप्रकार बहरले खरे, पण याच कायद्यांमुळे अनेक गुणी क्रीडापटूंना राष्ट्रीय पातळीवर खेळायची संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही पातळीच्या स्पर्धांपासून त्यांना वंचित ठेवले गेले. संजीव साठे यांचा लेख क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम या दोन खेळाडूंची ओळख करून देतो.
![]()
प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका
निवडलेल्या विषयाव्यतिरिक्त काही लिखाण नेहमीप्रमाणे याही अंकात सापडेल. हृषीकेश गुप्ते यांनी याआधीही ऐसी अक्षरेसाठी लिहिलं होतं. 'कानविंदे हरवले' ह्या त्यांच्या ताज्या कादंबरीचा अंश दिवाळी अंकात वाचता येईल. माधुरी पुरंदरे यांच्या 'धाकट्या मामाच्या बारा गोष्टी' म्हणजे तर वाचकांना पर्वणीच आहे. याशिवाय झंपुराव तंबुवाले आणि नील यांच्या कथा दिवाळी अंकात काही वेगळेच ट्विस्ट आणतात. मराठीतली निबंधांची परंपरा समृद्ध करणाऱ्या अरुण खोपकर यांच्या कालकल्लोळ आणि अनुनाद या दोन पुस्तकांचं रसग्रहण भूषण निगळे यांनी केलं आहे, तर रविंद्रनाथ टागोरांच्या काव्यरचनेमागची एक प्रेरणा असणाऱ्या पण महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेल्या अन्नपूर्णा तर्खड (ॲना लिट्लडेल) यांची नव्यानं ओळख करून देऊन मृगेंद्र कुंतल यांनी एक मोठं काम केलं आहे. कॉफी आणि साखरेवरचे लेख अंकात आहेतच; शिवाय चहा-बिस्किटांवरच्या भारतीय माणसांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली त्या गोष्टीला प्रभाकर नानावटी यांनी उजाळा दिला आहे.
एकंदरीत ऐसी अक्षरेचा हा दिवाळी अंक जगभरातल्या मराठी वाचकांसमोर ठेवताना त्यांच्या मेंदूला मेजवानी मिळेल आणि त्यांच्या कानांना, डोळ्यांना आणि जिभेलाही त्यात काही तरी रुचकर मिळेल अशी आशा आहे. नेहमीप्रमाणे वाचकांचा भरघोस प्रतिसाद येऊ लागला आहेच. अंक वाचत राहा, शेअर करत राहा आणि प्रतिक्रियाही देत राहा.
सर्व फोटो विकिपीडियावरून
https://aisiakshare.com/node/8897
आफ्रिका हा देश नव्हे
मूळ लेखक - Ivor Chipkin and Jelena Vidojević
- अनुवाद -उज्ज्वला
आफ्रिका ही संकल्पना
'आफ्रिका' हा विषय निघाला की आपल्याला अनेक सरधोपट आणि बहुशः काचणारे सरसकटीकरण ऐकायला/वाचायला लागते. जगभर लोक भरभरून बोलतात ते क्वचितच एखाद्या विशिष्ट आफ्रिकन देश किंवा समाजबद्दल असते. ते बोलतात 'आफ्रिका' नावाच्या ठिकाणाबद्द्ल1. विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण भूभागांना एकाच गोष्टीचा भाग बनवण्याची प्रवृत्ती दिसते – फसवणुकीच्या घटना, एकसाची प्रतिमा आणि छातीठोक 'सत्य'2. हे शेरे आफ्रिकेत आणि इतरत्र उच्चारणाऱ्यांचे काळजीयुक्त उच्चरव आणि नैतिकतेची कळकळ अगदी ठळक असते.3 आफ्रिकेकडे अपयशाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून पाहिले जाते. 'आफ्रिका' हा शब्द सुटा कधी येत नाही, 'आफ्रिके'वरील संकट, 'आफ्रिके'तील समस्या, आणि / वा 'आफ्रिके'चे अपयश! आफ्रिका खंडाचे वर्णन नेहमी नकारात्मक शब्दांनीच होते – दुबळ्या / अपयशी लोकांची भूमी, जेमतेम संघटित, अकार्यक्षम राज्ये4. असल्या नकारात्मक – अगदी नष्टप्राय नाही, तरी दुःस्वप्नांची खाण – अशासारख्या वर्णनांची चलती संपताना दिसत नाही. अतिरिक्त प्रमाणात आलंकारिक शब्दांतील वर्णने जुन्या, प्रगाढ ठोकताळे अधोरेखित करत आफ्रिका खंड म्हणजे कोणतीच आशा किंवा कसलेही भविष्य नसलेली जागा अशी त्याची संभावना करतात. सन २०००मध्ये The Economist या वृत्तपत्रातील कुप्रसिद्ध संपादकीयात वापरलेले hopeless continent 'कुचकामी खंड' याचेच उदाहरण आहे. "त्यात आफ्रिकेचे चित्र दारिद्र्य, अपयश, व निराशा, पूर आणि दुष्काळ, गरिबी आणि साथीचे रोग, क्रौर्य, हुकुमशाही आणि भ्रष्टाचार, भयाण युद्धे आणि लुटालूट, बलात्कार, नरमांसभक्षण, अंगविच्छेद आणि शिवाय वाईट हवामान असे रंगवल्याने या सगळ्यांमुळे आफ्रिकेचे भविष्य नक्कीच काळवंडले आहे असा सूर दिसतो."5
शीतयुद्धानंतरच्या काळात विकासाबद्दलच्या चर्चांमध्ये 'भ्रष्टाचार' आणि 'भ्रष्टाचाराची चिंता' यांचा इतका उल्लेख होतो की, अनेक विकासाची धोरणे ठरवण्यात आणि त्याबाबतच्या वक्तव्यांत त्याला मध्यवर्ती स्थान मिळाले आहे. Transparency international या संस्थेने तयार केलेला 'भ्रष्टाचार गोचर निर्देशांक' [Corruption perception index] हा निरनिराळ्या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये सर्वांधिक पाहिला जाणारा निर्देशांक जगाच्या दक्षिण गोलार्धाचा विशेषतः आफ्रिका खंडाची समस्या असल्याचे दर्शवतो.
भ्रष्टाचाराने आफ्रिकेतील राष्ट्रांना ग्रासले आहे एवढेच नव्हे, तर ती खास आफ्रिकी बाब आहे असे म्हटले जाते. १९९६साली जेम्स वॉलफेन्सॉन यांच्या भाषणात त्यांनी आफ्रिकेत 'भ्रष्टाचाराचा कर्करोग' पसरला आहे असे म्हटले तेव्हापासून आफ्रिका म्हणजे भ्रष्टाचार असे समीकरण सर्वांच्या मनात रुजले.6 अशा उपमांमुळे भ्रष्टाचार ही केवळ आफ्रिकेत आढळणारी आजारासारखी समस्या बनते.7 'आफ्रिकेतच आढळणारे' छापाचे भ्रष्टाचारविषयक चर्वण8 हे अशा आदानप्रदानाचे फलित आहे, जी भ्रष्टाचार हे आफ्रिकेत केवळ मुरलेलाच आहे असे नव्हे तर ते आफ्रिकेच्या स्थितीचे सर्वांत मोठे कारण किंवा आव्हान आहे असे पसरवते.9
अशा तऱ्हेच्या चित्रणातून संपूर्ण खंडाला एकसाच्यात बसवण्याची, भूगोल आणि राजकारण जणू एकच असावे असे मानण्याची प्रवृत्ती उघड होते. खरे तर या खंडामध्ये ५४ स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात काही साम्ये जरूर आहेत, वसाहतवादाचा अनुभव, हे त्यातील एक. त्यातसुद्धा, फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीज, बेल्जिअन आणि जर्मन वसाहतवाद तसेच राजा लेओपोल्डचा अंमल किंवा दक्षिण आफ्रिका व ऱ्होडेशिया येथील गोऱ्यांच्या वस्त्या व त्यांचा वर्चस्ववाद यांत विविध कंगोरे आहेत. त्यांचा राष्ट्रवाद, वसाहतवादविरोधी लढाई, हा इतिहास सामाईक अशा अर्थाने आहे की, अनेक राष्ट्रवादी चळवळींनी मार्क्सवाद-लेनिनवाद, माओवाद, निग्रो अस्मिता आणि गार्वे प्रणीत काळ्यांचेच राज्य अशा विविध राजकीय विचारांपासून स्फूर्ती घेतली. त्यांनी त्यांचा अर्थ कसा लावला आणि त्यातून काय आकाराला आले यात मात्र खूपच वैविध्य होते. त्यामुळे विविध राजकीय समीकरणे आकाराला आली व त्यातून अतर्क्य व स्थानिक राजकीय युत्या व रचना निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, मार्क्सवादाची सांगड अगदी ख्रिश्चन धर्म, इस्लाम, स्थानिक धर्माशीही घालून काही जटिल, बदलत्या आणि संकरित राजकीय संस्कृती व चालीरीती निर्माण झाल्या. वसाहतवाद संपुष्टात येण्याच्या व स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मिती प्रक्रियेत परस्परांच्या भाषा न कळणारे अनेक भाषक एका सामाईक राजकीय समुदायाला जोडले गेले. त्यांच्या संस्कृती वेगळ्या होत्या, राजकीय इतिहास व शासनव्यवस्था एकसारख्या नव्हत्या आणि त्यांच्याकडे सामुदायिक सौहार्दपूर्ण सहजीवनाचा पायंडा पडलेला नव्हता. या मुख्य बाबींमुळे स्वातंत्र्यानंतर लगेच हुकुमशाही येण्याचा कल वाढला व त्यामुळे या देशांतील राजकारण इतके अस्थिर बनले.10 मात्र या देशांतील विविधतेत समानता आणण्याकडे कल ही काही केवळ पाश्चिमात्य देशांच्या नजरेची मर्यादा नव्हे. आफ्रिकी देशांचे राष्ट्रवाद या असामान्य वैविध्यपूर्ण अस्मिता, दृष्टिकोण, त्यात सहभागी घटक, समूह आणि वर्ग साऱ्यांना एकाच "आफ्रिकन" या साच्यात बसवू पाहतात हेही त्याचे एक कारण आहे.
सर्वसाधारण भ्रष्टाचार
आफ्रिका खंडाचे चित्रण वैचारिक लिखाणांत, माध्यमांच्या वार्तांकनात ज्या प्रकारे चालते ते संशयास्पद आहे हे जरी खरे असले, तरी कित्येक आफ्रिकी देशांमध्ये आर्थिक प्रगती, राजकीय स्थैर्य आणि एकंदर जगण्यातील आव्हाने खडतर व भरपूर आहेत; त्यातही चिकार वैविध्य आहे याचे उदंड पुरावे मिळतात. आफ्रिकी राज्य व राजकारण यांबाबत गैरसमज आहेत. कारण आफ्रिकी राजकारण हे जणू कोणतेही आदर्श, न्यायासाठी धडपड, समानतेची संकल्पना या कशाचाच पत्ता नसलेली, व्यक्तिगत संपत्तीसंचय आणि संरक्षण यापलीकडे न जाणारी व्यवस्था असा गैरसमज पसरला आहे,11 आणि अशा गैरसमजांमुळेच भ्रष्टाचारविरोधी कारवाया या उलटा परिणाम करणाऱ्या नसल्या, तरी निष्प्रभ ठरतात.
भ्रष्टाचाराची सर्वमान्य व्याख्या "सामाजिक अधिकारांचा वैयक्तिक फायद्यासाठी दुरुपयोग" अशी असून ती व्यवस्थेची घडी नीट न घातल्याने निर्माण झालेली समस्या असते असे मानले जाते. भ्रष्टाचार निरनिराळ्या प्रकारचा असतो, मात्र बहुतेक साऱ्या व्याख्यांमध्ये सर्व प्रकारचे भ्रष्टाचार एकाच तागडीत घातले जातात.
या दृष्टीने युएन युएन आंग यांचे चीनवरील पुस्तक किंवा त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "चीनमधील आर्थिक घोडदौड आणि प्रचंड भ्रष्टाचार यांतील विरोधाभास" हे अतिशय तथ्यदर्शक आहे. त्या चीनच्या प्रगतीचा मार्ग भ्रष्टाचाराच्या लोलकातून पाहतात. या काहीशा नावीन्यपूर्ण मार्गाने त्या "मोठ्या अर्थव्यवस्थेने केलेल्या ऐतिहासिक सर्वांत जलद व स्थिर विस्तारा"तील विरोधाभासाचा उलगडा करतात. आंग चीनमधील भ्रष्टाचाराचे प्रकार उलगडत नेतात व बरेच अभिनव विश्लेषण करून असे दाखवून देतात की चीनमध्ये भ्रष्टाचाराचे विविध प्रकार असून त्यांतील काही प्रगतीसाठी चांगले आहेत. नफावाटणीची व्यवस्था, किंवी आंगच्या शब्दांत सांगायचे तर "मुभा द्रव्य" (जमीन, करार किंवा कर्जे मिळण्यासाठी उच्चपदस्थांना देऊ केलेली मोठ्या रकमेची लाच किंवा मोठे उपकार) हे प्रत्यक्षात प्रगतीला उपकारक आहे. असे पैसे चारण्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते, मात्र दीर्घकालीन सम्सय़ाही निर्माण होतात. १९९०पासून चीनने "वाईट प्रकारचा भ्रष्टाचार" कमी करण्यात यश मिळवले, मात्र मुभादेय भ्रष्टाचार टिकून राहिला, कारण केंद्राकडून स्थानिक नेत्यांवर आर्थिक प्रगतीचा दट्ट्या येत होता.
भ्रष्टाचाराकडे एकमितीय घटित असे पाहून चालणार नाही याकडे आंग लक्ष वेधतात. भ्रष्टाचाराचा जर गांभीर्याने अभ्यास करायचा असेल, तर त्यातील विविध गुणात्मक प्रकारांची उकल केली पाहिजे. त्यासाठी भ्रष्टाचारामागील सर्वदूर पसरलेली गृहीतके तपासून पाहायला हवीत.
याउलट, आफ्रिकेतील भ्रष्टाचाराबाबत जे वैचारिक लिखाण होते त्यात दुर्दैवाने सरसकटीकरण आढळते. आशिल म्बेमे याचे कारण "वर्णनवाद" आहे असे म्हणतात, जी ना कसली पद्धत आहे ना कसला सिद्धान्त. आफ्रिकेत आढळणाऱ्या जीवनशैलींची व्याख्या करण्यासाठी वा त्यांचा अर्थ लावण्यासाठी केवळ काही किस्से नाहीतर नकारात्मक विधाने करणे किंवा काही आकडेवारीच्या साहाय्याने आफ्रिकेची सद्यस्थिती व आदर्श स्थिती यांतील तफावतीचा उल्लेख करणे हीच प्रवृत्ती आढळते.12 "आफ्रिके"तील भ्रष्टाचाराबाबतचे शेऱ्यांकडे वर्णनवादाचे उदाहरण म्हणून पाहता येईल. राजकीय व्यवस्थेमध्ये खाजगी व सार्वजनिक अवकाशांत तीव्र व उघड असा भेद असतो हे त्यात गृहीत धरलेले असते.
दुसरीही एक प्रवृत्ती आढळते – मानवविज्ञानाच्या, इतिहासलेखनाच्या अंगाने जीवनशैलींबाबत तपशीलवार लिखाण करणे. क्षेत्रीय अभ्यासाच्या परंपरेतून आलेल्या अशा लिखाणातून काही ठाशीव उदाहरणेही मिळतात. मानवी आयुष्याबद्दल आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे, लिहिले पाहिजे तसेच कोणत्या विश्लेषणात्मक पद्धती वापरून विशिष्ट ठिकाणच्या समाजजीवनाचे वर्णन व आकलन करता येईल याची उकल त्यातून होते.13 अशा प्रकारची वांशिक अभ्यासाची अंतःप्रेरणा "आफ्रिके"वरील चर्चांच्या विरोधी असते. सरससकटीकरणाऐवजी मग त्यातून भरपूर वैविध्य व फरकाचा, ऐतिहासिक व समकालीन भूगोल सामोरा येतो. या संदर्भात मग "भ्रष्टाचारा"चा सामाजिक संकेत त्याच्या परिस्थितीनुसार समजून घ्यावा लागतो.
सापेक्ष भ्रष्टाचार
आपल्या १९७५च्या पुस्तकातून पीटर एकेह असे परिस्थितीसापेक्ष विश्लेषण करण्याचा मार्ग दाखवात. आपल्या Colonialism and the Two Publics in Africa या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की वसाहतकालीन आफ्रिकेने वसाहतोत्तर काळात एक विशेष असे ऐतिहासिक बाह्यस्वरूप निर्माण केले, त्या खंडाच्या दोनपैकी एक चेहरा. पहिला, आदिम लोकांचा, ज्यात प्रत्येक सदस्य व्यक्ती आपले कर्तव्य ही नैतिक जबाबदारी मानून त्याद्वारे आपल्या समूहासाठी फायदा व आधार निर्माण करते. कोणालाही या समूहाकडून भौतिक सुखाच्या अपेक्षा नसतात, तर केवळ समूहासाठी आपुलकीची भावना आणि भावनिक सुरक्षितता हा फायदा मिळण्याची आस असते. याउलट, नागर लोकांकडे (वसाहती सरकारने वसवलेले भूभाग, सरकारी आणि सार्वजनिक संस्था या सर्वांसह) अनैतिक वागणुकीचे व केवळ आर्थिक लाभ मिळवणारे अशा दृष्टीने पाहिले जाते. अशा परिस्थितीत लोक आदिम चेहरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी ते अनेकदा नागरी कार्यक्षेत्रातील जे वेगळे किंवा दोलायमान असते ते पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात. आदिम लोकांना कायम कोणाच्यातरी आपुलकीची गरज असते, तशी नागर लोकांना नसते. आफ्रिकेतील अनेक राजकीय आव्हाने ही या द्वंद्वातून, आणि त्या दोहोंना सामाईक अशी नैतिकता नसल्याने उद्भवलेली आहेत. शिवाय, असे तात्त्विक विवेचन करताना असे विश्लेषण भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे नैतिक दौर्बल्य, किंवा विकासाच्या महत्त्वाकांक्षेपायी बहकलेली राजकीय अर्थव्यवस्था या दृष्टिकोणातून न पाहता राजकारणाच्या स्थानिक आविष्कारातून तयार झालेले घटित म्हणून त्याची मांडणी करता येते.
दक्षिण आफ्रिका या देशाच्या संदर्भात पीटर एकेह यांची मांडणी वंशभेदी राजवटीनंतरच्या काळातील वारंवार आढळणारी घटना समजून घेण्यास मदत करते. जेथे जेथे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे राज्य आहे तेथे बहुतेक सर्व ठिकाणी सार्वजनिक पायाभूत सुविधांना उतरती कळा लागलेली दिसते. देशभरातल्या नगरपालिकांमध्ये, अगदी जोहान्सबर्गसारख्या मोठ्या शहरांमध्येही रस्ते, जलसंधारण प्रकल्प, वीजपुरवठा यांची देखभाल असमाधानकारकच आहे असे नव्हे, तर त्याचे अपुरेपण धक्कादायक आहे. ही हलाखी केवळ शहरे, निमशहरे येथेच आढळते असे नाही, काही ठिकाणी तर अनास्था हीच त्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दशकभरातील लूटमार, अकार्यक्षम व्यवस्थापन यामुळे तेथील Eskom ही वीजनिर्मिती कंपनी सबंध देशाला रोज कित्येक तास अंधारात लोटते. त्याचप्रमाणे Transnet ह्या वाहतूक कंपनीची अवस्था अशी झाली आहे की, लाखो टन कोळसा आणि इतर वस्तू निर्यातीसाठी बंदरांपर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्व परिस्थितीचे वर्णन करताना नेहमीच यात गुंतलेल्या लोकांचा भ्रष्टाचार, नैतिकता (किंवा तिचा अभाव) हीच कारणे विशद होतात. अशा विश्लेषणातून मग वंशभेदी राजवटीनंतरच्या सरकारच्या, किंबहुना वसाहतवादी राजवटींनतरच्या सर्वच सरकारांच्या नैतिक मूल्यांबाबत निष्कर्ष काढले जातात. पीटर एकेह यांची मांडणी अशा नैतिकताधिष्ठित कारणमीमांसेचे खंडन करते. दक्षिण आफ्रिका देशातील Eskom व Transnet या सरकारी कंपन्या केवळ वर्णद्वेशी काळातील नागरी वस्तीपायी अस्तित्वात आल्या नव्हत्या. त्या तेथील आर्थिक मुकुटातील रत्ने होत्या. त्यांची झालेली लूट ही केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हती, तर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्याही राजकीय मोहिमांना आर्थिक मदत म्हणून असे : एकेह यांच्या भाषेत आदिम लोकांसाठी. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भ्रष्टाचार ही नागरी समाजातील अनैतिक कृती ही आदिम नैतिक समाजाच्या हितासाठी वापरली गेली. याचा अर्थ एकेह यांच्या मांडणीतील 'आदिम' समाज हा नात्यागोत्याच्या लोकांचा गोतावळा नसून राजकीय पक्ष आहे.
आफ्रिकन म्हणजे नक्की काय ?
जर आपण आफ्रिकेकडे वैविध्यपूर्ण आणि बहुस्तरीय भूभाग म्हणून पाहिले तर भ्रष्टाचार, आर्थिक साचलेपण, राजकीय अस्थिरता आणि अशा इतर बाबी या "आफ्रिकन" समस्या असा शिक्का मारून चालणार नाही, तर त्या विशिष्ट परिस्थितीशीजन्य आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते ज्या विशिष्ट पार्श्वभूमीवर व ज्या परिस्थितीत निर्माण होतात – कधी स्थानिक, कधी राष्ट्रीय, कधी प्रांतीय तर कधी वैश्विक – त्यांचा विचार झाला पाहिजे. तसेच, ज्या सामाजिक मान्यतांना कायदा व आंतरराष्ट्रीय संस्था 'भ्रष्टाचार' मानतात, त्यांना त्यांच्या परिसंस्थेत तसाच सामाजिक अर्थ गृहीत धरून चालणार नाही. या दृष्टिकोणातून भ्रष्टाचारविरोधी लढा हा सर्व आफ्रिकनांना एका साच्यात बसवणाऱ्या परिभाषेचा त्याग करण्यासाठीचा लढादेखील आहे.
References:
Chipkin, I. 2022. The Dark Side of Democracy. Popular Sovereignty, Decolonisation and Dictatorship. Političke Perspektive, Vol. 12. Issue 1, pp. 35 – 52.
Hellmann, O. 2019. The Visual Politics of Corruption. Third World Quarterly, Vol. 40, Issue 12.
Harrison, E. 2010. Corruption, in: (eds.) Cornwall, A. Eade, D. Deconstructing Development Discourse: Buzzwords and Fuzzwords, pp. 257-265.Practical Action Publishing.
Szeftel, M. 1998. Misunderstanding African Politics: Corruption and Governance Agenda. Review of Review of African Political Economy, no. 76, pp. 221-240.
Ferguson, J. 2006. Global Shadows: Africa in the Neoliberal World Order. Duke University Press.
Apata, G.O. 2018. Corruption and Postcolonial State: how the West invented African corruption. Journal of Contemporary African Studies, 37: 4, pp. 1-14.
Ang, Y. Y. 2020. China's Gilded Age: the paradox of economic boom and vast corruption. Cambridge University Press.
Ekeh, P. 1975. Colonialism and the Two Publics in Africa: a theoretical statement. Comparative Studies in Society and History, vol. 17, issue 1, pp. 91-112.
Mbembe, A. 2021. Out of the Dark Night: essays on decolonisation. Columbia University Press.
Sarr. F. 2019. University of Minnesota Press.
Notes
-
Ferguson, 2006 8 ↩
-
Sarr, 2019 ↩
-
Ferguson, 2006: 10 ↩
-
Ferguson, 2006 ↩
-
Mbembe, 2021: 8 ↩
-
Harrison, 2010 ↩
-
Apata, 2018 ↩
-
आपल्या २०१९च्या लेखात हेलमान दाखवून देतात की, Transparency international या संस्थेने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेमध्ये वसाहतवादी काळानंतरच्या चष्म्यातून दृश्य भ्रष्टाचाराचे राजकारण खेळले गेले. त्यासाठी ते दोन महत्त्वाचे मुद्दे मांडतात : स्पर्धेत दाखल झालेली व बक्षीस मिळालेली छायाचित्रे दोन टोकाची विरोधी चित्रणे दाखवतात – उत्तरेकडचा भाग हा गुणी, मदतीला धावून येणारा, तंत्रकुशल तर्कशुद्धता ओतप्रोत भरलेला, तर दक्षिणेकडला भाग त्याच्या पातकी आणि तर्कहीन स्थितीतून कोणी त्याला वाचवेल म्हणून वाट पाहणारा. मात्र दक्षिण गोलार्धातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देऊन ते वाढवण्यात असलेल्या उत्तर गोलार्धाच्या सहभागावर पांघरूण घातले जाते.) ↩
-
Szeftel, 1998; Wrath and Wilkins in Apata, 2018 ↩
-
Chipkin, 2022 ↩
-
Szeftel, 1998 ↩
-
Mbembe, 2021: 14 ↩
-
Mbembe, 2021: 14 ↩
पोर्तुगीज आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोमंतकीय समाज
- - कौस्तुभ नाईक
सुएला ब्रेव्हरमन महिन्याकाठी किती खळबळजनक विधानं करते त्याचा हिशेब ठेवणं आता अशक्य झालं आहे. हा लेख लिहिण्यापर्यंत 'होमलेसनेस हा एक लाइफस्टाइल चॉईस आहे' अशा आशयाचे विधान तिनं केलं होतं. स्वतः स्थलांतरित परिवारातून येऊनही स्थलांतरितांबद्दलचा तिला कमालीचा तिटकारा असावा असं वाटतं. ब्रिटनसारख्या, वसाहतींच्या जोरावर धनाढ्य बनलेल्या देशाची होम सेक्रेटरी (केंद्रीय गृहमंत्री) बनणं हे एका अर्थी प्रातिनिधिक स्वरूपात ऐतिहासिक म्हणावं लागेल. पण स्थलांतरितांविषयीची तिची किंवा सुनकशासित सरकारची जी भूमिका आहे ती एकविसाव्या शतकातील मोठ्या विरोधाभासांपैकी एक म्हणावी लागेल.
ब्रेव्हरमनचा उल्लेख सुरुवातीलाच करण्याचं कारण की परवा माझी एक लंडनस्थित गोमंतकीय मैत्रीण 'काय लाजिरवाणी आहेत तिची वक्तव्यं आम्हां गोवेकरांसाठी' असं म्हणून गेली असता मला कळलं कि ब्रेव्हरमन गोमंतकीय वंशाची आहे. नंतर कळलं की तिचे वडील गोमंतकीय कॅथलिक होते; ते केनियामध्ये स्थायिक होते आणि साठच्या दशकात ब्रिटनमध्ये दाखल झाले. केनिया, झांझिबार, युगांडामार्गे बरेचसे गोमंतकीय ब्रिटन, तसंच इतर देशांत पोचले. ह्या देशांमध्ये वसाहतवाद संपून स्वायत्त राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर ब्रिटिश सरकारमार्फत नोकरशहा म्हणून आलेल्या बऱ्याच भारतीय लोकांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. मीरा नायर ह्यांच्या 'मिसिसिपी मसाला' ह्या फिल्मची सुरुवात ह्याच इतिहासापासून होते.
मुळात गोवेकर आफ्रिकेत कसे पोचले? गोवेकरांसाठी आफ्रिकेचा मार्ग पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा दोन्ही वसाहती साम्राज्यांमुळे खुला झाला. हा इतिहास एकमेकांत जरी गुंतला असला तरी त्या स्थलांतरणाची प्रक्रिया किंवा तिथे गेलेल्यांचं पुढे काय झालं, ह्या भिन्न गोष्टी आहेत. म्हणून त्या प्रक्रिया दोन वेगळ्या भागांत मी मांडणार आहे. खरं तर हा माझा अभ्यासाचा विषय नाही, पण जी त्रोटक माहिती माझ्याजवळ आहे ती इथे जरा सुटसुटीत करून लिहिण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
आफ्रिकेमध्ये पोर्तुगीज
आयबेरियन द्वीपकल्पात पोर्तुगीज आणि स्पॅनिश अशी दोन साम्राज्यं उदयास येत होती आणि साहजिकच त्यांच्यात आपलं साम्राज्य वाढवण्याची चुरस निर्माण झाली होती. ह्याचा धर्तीवर कॅथलिक धर्मगुरू पोप अलेक्झांडर (सहावे) ह्यांच्या एका फर्मानाने (पेपल बुल) जगाच्या नकाशाचे दोन भाग करून एक भाग स्पेन तर दुसरा भाग पोर्तुगाल साम्राज्याला देण्यात आला. पण ह्यात पोर्तुगालला कमी भूभाग मिळाला असं वाटून १४९४मध्ये ह्या फेरविचार होऊन नकाशा विभागणारी रेषा अजून पश्चिमेकडे हलवली. आणि ह्यामुळेच ब्राझील ते आशियाखंड हा भूभाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि तेव्हापासून त्यांची नजर आफ्रिकेकडे वळली.
![]()
पोर्तुगाल साम्राज्याच्या वाढीत सर्वांत मोठा वाटा हेनरी द नेव्हिगेटरचा मानला जातो. हेनरी हा पोर्तुगालचे तत्कालीन सम्राट राजा जॉन आणि राणी फिलिपा ह्यांचा तिसरा पुत्र होता. त्याचे इतर दोघे भाऊ राजा बनले पण हेनरीने त्याबाबतीत जास्त रस दाखवला नाही असं मानतात. पण त्यानं बऱ्याचशा सागरी मोहिमा आखल्या आणि त्यासाठी लागेल ती मदत उपलब्ध करून दिली. भारतीय उपखंडाकडे जायचा सागरी मार्ग शोधणं, ह्या विचारानं तो झपाटला होता आणि त्याच अट्टहासामुळे तो आफ्रिकी समुद्रतटावर मोहिमा पाठवू लागला. वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकतला पोचेपर्यंत बरेचसे पोर्तुगीज खलाशी क्रमाक्रमानं आफ्रिकेचा तट चाचपडत पुढे पुढे जात होते. ह्या सर्व मोहिमा हेनरीच्या आशीर्वादाने होत होत्या.
त्याकाळी दीपस्तंभ नसत त्यामुळे पोर्तुगालहून निघणारे नाविक जिथे जमेल तिथे मोठाले क्रूस बसवत, ज्यांना पाद्रांव म्हणत. परतीच्या वाटेवर किंवा मागाहून येणाऱ्या मोहिमांना त्याची मदत व्हावी हा त्यामागचा हेतू होता. ह्याच विस्तारवादी मोहिमांतून पोर्तुगीज साम्राज्यानं आफ्रिकेत आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. १४८२ साली डायगो कांव नावाचा पोर्तुगीज खलाशी काँगो नदीच्या मुखापाशी पोचला आणि आफ्रिका खंडातल्या पोर्तुगीजांच्या वास्तव्याची एका अर्थी सुरुवात झाली. गिनी-बिसाउ, मोझांबिक, मदगास्कर, अंगोला, सांव टोम, प्रिन्सेप येथे पोर्तुगीज वसाहती स्थापन झाल्या.
पूर्व आफ्रिकेत मोझांबिक आणि पश्चिम आफ्रिकेत अंगोला ह्या पोर्तुगालच्या आफ्रिकेमधल्या दोन प्रमुख वसाहती होत्या. सोळाव्या शतकापासून सुरू झालेल्या इथल्या वसाहती १९७४ साली सालाझारच्या राजकीय अस्तानंतर संपुष्टात आल्या. आफ्रिकेत प्रामुख्यानं सोनं, हस्तिदंत, मसाले ह्यांच्या निर्यातीवर आपली पकड कायम केली. साखर, कापूस, तंबाखू ह्यांसारख्या श्रम अधिक लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी आफ्रिकेतून गुलाम म्हणून राबवण्यासाठी माणसांची निर्यात व्हायची. ह्या विक्रीत इतर पोर्तुगीज वसाहतींमधल्या स्थानिक व्यापाऱ्यांनीही चांगला जम बसवला होता. गोव्यामधलं त्याकाळचं म्हामाय कामत हे मोठं व्यापारी घराणं गुलामांच्या विक्रीत सामील होतं हे त्यांच्या दफ्तरातल्या नोंदीतून स्पष्ट होतं.
प्रशासकीय सेवेत जसजसा स्थानिकांचा सहभाग वाढत गेला तशा त्यांच्या बदल्या इतर वसाहतींमध्ये होऊ लागल्या. अंगोला, मोझांबिकसारख्या ठिकाणी गोवेकर प्रशासकीय सेवेमार्फत आले. काही हंगामी होते तर काहीजण तिथेच स्थायिक झाले. अंगोलाच्या कम्युनिस्ट नेत्या सीता वालेस ह्यांचे आईवडील सरकारी कर्मचारी ह्या नात्याने गोव्यातून तिथे स्थायिक झाले होते. वालेस ह्यांचा जन्म १९५१ साली अंगोलात झाला. विद्यार्थी चळवळीतून वर आलेल्या वालेस ह्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते व त्या पीपल्स मूव्हमेंट फॉर लिबरेशन ऑफ अंगोला (पीएमएलए) ह्या डाव्या राजकीय पक्षासाठी काम करत होत्या. १९७४ साली जेव्हा पोर्तुगालमध्ये कार्नेशन क्रांती होऊन इश्तादो नोवो (नवं राज्य) ह्या हुकूमशाही सरकारचा अंत झाला तेव्हा त्या क्रांतीचे पडसाद अंगोलातही उमटले. त्यावेळी मॉस्कोत असलेल्या सिता वालेस १९७५मध्ये अंगोलाला परतल्या व तोपर्यंत सत्तेत आलेल्या पीएमएलएच्या सरकारचा भाग बनल्या. पण डाव्या राजकारणातल्या संघटनामध्येही अंतर्गत कलह होते. वालेस ज्या गटाशी संलग्न होत्या तो गट सोव्हियतधार्जिणा मानला जाई. हळूहळू ह्या कलहाचं रूपांतर एका चळवळीत होत गेलं आणि अंगोलाचे त्याकाळचे प्रधानमंत्री अगुस्तिन नेतो ह्यांच्याशी त्यांनी फारकत घेतली. पुढे ह्या गटानं सत्तापालट करण्यासाठी बंडही केलं; ते बंड रोखायला सत्ताधाऱ्यांनी क्युबन सैन्याची मदत मिळवून यश मिळवलं. ह्याच बंडात सहभागी होण्याच्या संशयावरून १९७७ साली सिता वालेस ह्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी त्या केवळ २५ वर्षांच्या होत्या. त्यांनतर त्यांचे बंधू आल्दमार वालेस ह्यांचीही (ते केवळ त्यांचे भाऊ आहेत म्हणून) हत्या करण्यात आली. 'सिता वालेस - अ रेव्होल्यूशनरी अनटील डेथ' हे लिओनोर फिगरेदो ह्यांनी लिहिलेलं त्यांच्यावरचं पुस्तक २०१८ साली प्रकाशित झालं.
मोझांबिकमध्येही बरेचसे गोमंतकीय स्थायिक झाले. काही नोकरी शोधण्यासाठी तर काही सरकारी किंवा सैन्यातल्या नोकऱ्यांमार्फत तिथे पोचले. ह्यापैकींच एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अकिनो दे ब्रागांझा; जे मोझाम्बिक सरकारचे राजदूत होते आणि तत्कालीन राज्यप्रमुख सामोरा माशेल ह्यांचे निकटवर्तीय सल्लागार होते. मोझांबिकमध्ये स्थायिक होण्याआधी ब्रागांझा पोर्तुगाल, फ्रान्स, मोरोक्को आदी देशांमध्ये वास्तव्यास होते. तिथे त्यांनी विज्ञानाचं शिक्षण घेता घेता पत्रकारिताही केली. १९८६ साली सामोरा माशेल ह्यांच्याबरोबर एका दौऱ्यावर असताना विमान अपघातात त्यांचं निधन झालं. २०११ साली त्यांच्या पत्नी सिल्विया ब्रागांझा ह्यांनी 'बॅटल्स वेज्ड, लास्टिंग ड्रीम्स' हे त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहून प्रकाशित केलं.
![]()
आफ्रिकेत गोमंतकीय मराठे
एकोणिसाव्या शतकात पोर्तुगालला आफ्रिकेत आपल्या अखत्यारीखाली असलेला भूभाग वाढविण्याची इच्छा झाली व त्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केले. पण ह्या प्रयत्नांना स्थानिकांतर्फे बऱ्यापैकी विरोध झाला. ह्या प्रतिकाराला तोंड देण्यासाठी पोर्तुगीज नौदलाच्या प्रमुख फेरेरा दे आल्मेदा ह्यानं पोर्तुगीज गोव्याच्या गव्हर्नर जनरलला टेलिग्राफ पाठवून सुमारे चारशे 'सच्चे मराठे' सैनिक पाठविण्याची विनंती केली. हे मराठे म्हणजे सत्तरी, डिचोली ह्या नव्यानंच पोर्तुगीज अखत्यारीत आलेल्या नव्या काबिजादी भागांतले सैनिक होते. त्यात प्रामुख्याने सत्तरी तालुक्यातल्या राणेंचा समावेश होत. राणेंकडे सत्तरीची मोकासदारी होती (आणि आजही आहे).
ह्या काळात मराठा सैनिकांविषयी जे काही प्रचलित समज होते, त्यांच्या बळावरच त्यांना सरकार दरबारी सैन्यात नोकरी वगैरे मिळत असे. आणि ह्या नोकरीचा भाग म्हणून त्यांना इतर वसाहतीत जावं लागणं हेही काही नवं नव्हतं. ह्या आधी मराठा सैनिकांच्या तुकड्या आफ्रिका, तिमोर, मकाऊ इथे पाठवण्यात आल्या होत्या. पण ह्यावेळी परिस्थिती बदलली होती. एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज साम्राज्याचं वैभव कमी होत चाललं होतं. त्यामुळे जे बदल आले त्यांत सैन्यावरच्या खर्चात कपात करण्यात आली होती. सैनिकांमध्ये असंतोष वाढला होता. ह्याला बरीच कारणं होती. सैनिकांचे कमी झालेले पगार आणि हक्क हे ह्या असंतोषामागचं मुख्य कारण होतं. तसंच, सत्तरीच्या जमिनीच्या कारभारात स्थानिक सारस्वत कारकुनांचा वाढत जाणारा प्रभाव हेही एक कारण होतं. नुकत्याच आफ्रिकेतून परतलेल्या एका मराठा तुकडीनं आपले तिथले अनुभव व्यक्त केल्यावर तर तिथं जाणं शक्यच नाही असा पावित्रा सैनिकांनी घेतला. आफ्रिकेत पाठविलेल्या सैनिकांची सर्वांत मोठी समस्या होती की हिंदू सैनिकांसाठी वेगळं स्वयंपाकघर नव्हतं आणि इतर लोकांबरोबर बसूनच त्यांना जेवावं लागत असे. ह्यामुळे त्यांच्या जातीशुचितेचा प्रश्न निर्माण झाला. समुद्र पार करणं हेही वर्ज्य होतं. ह्या धर्तीवर जेव्हा सैनिकांना आफ्रिकेत पाठवायची वेळ आली तेव्हा त्याचं रूपांतर बंडात झालं. १८९५ साली दादा राणेंनी सुमारे ९०० सैनिक घेऊन पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ते लगेच शमवण्यात पोर्तुगीज सरकारला यश आलं. पण ह्या बंडाचा धसका त्यांनी घेतला. १८९७ साली जेव्हा परत मराठा सैनिकांना आफ्रिकेत पाठविण्याचं आदेश मंजूर झाला तेव्हा त्यांना पगार वाढवून मिळाला; आणि हिंदू सैनिकांच्या चालीरीतींत पोर्तुगीज फेरफार करणार नाहीत असं आश्वासनही दिलं. त्यानंतरही गोव्यातून पोर्तुगीज आफ्रिकेत गोमंतकीय सैनिक पाठवले गेले पण तिथे गोमंतकीय हिंदू स्थायिक झाल्याचं ऐकण्यात नाही.
पूर्व आफ्रिकेतले गोमंतकीय समाज
वर नमूद केल्याप्रमाणे एकोणिसाव्या शतकात पोर्तुगीज साम्राज्याचं आर्थिक पतन सुरू झालं होतं. त्यामुळे बरेचसे गोमंतकीय तेव्हा भरभराटीला येत असलेल्या मुंबईकडे नोकरीधंद्यांच्या शोधात निघाले. ह्याच काळात इंपिरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनी आफ्रिकन वसाहतीत रेल्वे प्रशासनासाठी नोकरभरती करत होती. ह्या नोकरभरतीतून गोमंतकीय लोक पूर्व आफ्रिकेत दाखल झाले. केनिया, युगांडा, झांझिबार ह्यांसारख्या देशांत त्यांनी आपलं बस्तान बसवलं आणि एक नोकरशहा वर्ग म्हणून ते आफ्रिकेत उदयास आले. तिथे त्यांची पत इतर भारतीयांपेक्षा जरा वरचढ होती. त्यांच्या इंग्रजीवरच्या प्रभुत्वामुळे आणि इमानदारीमुळे त्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य दिलं जाई, असं एका ब्रिटिश ऑफिसरने लिहून ठेवले आहे. पूर्व आफ्रिकेत गोवेकरांना चांगल्या हुद्द्याच्या जागा मिळाल्या. त्या बळावर त्यांनी स्वतःसाठी सामाजिक संस्था उभारल्या; क्लब्स, शाळा, वाचनालयं वगैरे सुरू केली. तिथले गोमंतकीय जरी भारतीय आणि स्थानिक आफ्रिकन समाजांत मिसळत असले तरी ते स्वतःला भारतीयांपेक्षा वेगळे समजत होते.
जेव्हा पूर्व आफ्रिकेमध्ये स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू झाल्या तेव्हा ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या भारतीय नोकरशाहीलाही त्याची झळ बसली. तोपर्यंत स्थानिक आफ्रिकी लोकांना मोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या सहसा दिल्या जात नसत; त्यामुळे भारतीयांविषयीही त्यांच्यात बराच राग होता. झांझिबारमध्ये प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यानंतर चर्चमधून परतणाऱ्या काही गोमंतकीय लोकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आलं. ह्या घटनेचा धसका स्थानिक गोवेकरांनी घेतला होता. त्यानंतर जेव्हा सरकारनं संसाधनांच्या राष्ट्रीयीकरणाची मोहीम राबवली त्यात बऱ्याच नोकऱ्या गोमंतकीयांकडून काढून घेतल्या गेल्या. ह्या सगळ्यानंतर बरेच गोमंतकी (आणि इस्माइली व्यापारी) झांझिबार सोडून गेले. केनियामध्येही अशाच प्रकारच्या प्रक्रियेअंतर्गत गोवेकरांना केनिया सोडून जावे लागले. पियो गामा पिंटोसारखे गोवेकर तर राष्ट्रवादी चळवळीचा भाग होते, पण स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी त्यांचीही राजकीय हत्या करण्यात आली. युगांडामध्ये ईदी अमीनचे सरकार येईपर्यंत तिथल्या भारतीयांच्या रोजच्या आयुष्यावर काही परिणाम झाला नव्हता पण अमीनच्या उदयानंतर त्याने फर्मान काढून, ज्यांनी कोणी युगांडाचे नागरिकत्व घेतले नाही त्यांनी तीन महिन्यात देश सोडून चालते व्हावे असा इशारा दिला.
जेव्हा १९१० साली पोर्तुगालमध्ये राजेशाहीच्या अंत होऊन प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं तेव्हा पोर्तुगालचं सार्वभौमत्व वसाहतींनाही लागू झालं. त्यामुळे पोर्तुगीज वसाहतींमध्ये राहणारे सगळे लोक पोर्तुगालचे नागरिक मानले जात होते आणि हा नियम पूर्व आफ्रिकेत असलेल्या गोमंतकीयांनाही लागू होता. जेव्हा १९६१मध्ये गोवा भारतात विलीन करण्यात आला तेव्हा पूर्व आफ्रिकास्थित गोवेकरांनी आपले पोर्तुगीज पासपोर्ट भारतीय दूतावासात जमा करावे असा आदेश दिला. ह्यावेळी त्यांनी भारतीय नागरिकत्व घ्यावं का ब्रिटिश प्रोटेक्टड स्टेटस, ह्याविषयी द्विधा मनस्थिती होती. त्यांनी आपला आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करता ब्रिटिश प्रोटेक्टेड पासपोर्ट घेतला. पण जेव्हा पूर्व आफ्रिकेतले देश ब्रिटिशांपासून मुक्त झाले तेव्हा त्यांच्या नागरिकत्वाचा पेच पुन्हा उभा राहिला. राहत्या देशात आयुष्यभर कमावलेलं सगळं सोडून इंग्लंडला जावं, का आहे त्या देशाचं नागरिकत्व घेऊन तिथंच राहावं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या इमिग्रेशन कायद्यात बरेच बदल केले होते. त्यानुसार वसाहतींमध्ये ज्यांना ब्रिटिश नागरिकत्वाचा दर्जा मिळाला आहे त्यांना मर्यादित हक्क देण्यात आले होते; आणि त्यांनी ब्रिटनमध्ये येण्यातही बरेच निर्बंध घातले होते. (ह्या बाबतीत सविस्तर माहिती याच अंकात महमूद ममदानींच्या लेखात आहे). आफ्रिका सोडणं भाग होतं, आणि ब्रिटिश पासपोर्ट असूनही इंग्लंडमध्ये शिरणं अवघड असल्यानं त्यांनी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोर्तुगाल व ब्राझील यांसारख्या देशांत स्थलांतर केलं.
पोर्तुगीज आणि ब्रिटिश ह्या दोन साम्राज्यांच्या वसाहतवादी प्रक्रियेमुळे जी मानवी फरफट निर्माण झाली त्यात गोमंतकीय जगभर विखुरले गेले. त्या प्रक्रियेचं विश्लेषण किंवा त्यात सापडलेल्या लोकांचे अनुभव इतिहासाच्या पटावर फार झळकले नाहीत, कारण वसाहतवाद विरुद्ध राष्ट्रवाद अशा पारंपरिक बायनरीत ते कधीच सामावले जाऊ शकत नाहीत. जागतिकीकरणाचा पाया हा वसाहतवादी इतिहासानं गिरवलेल्या मार्गानंच जातो. आजही गोव्यात परदेशी नोकरीला जाणाऱ्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. कैकदा हा पर्याय नसतो, हतबलताही असते. हल्लीच पोर्तुगीज व्हिजा मिळविण्याच्या निमित्तानं मला महिनाभर पणजीतल्या दूतावासात खेपा माराव्या लागल्या, तेव्हा तिथे पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी येणाऱ्या गोवेकरांना बघून ह्याची पक्की जाणीव झाली. हेही एकप्रकारचे बेघर होणंच आहे.
सुएला ब्रेव्हरमनला हे कळेल काय?
आफ्रिकेतील वसाहतकालीन चलन: दृश्यात्मकता आणि इतिहास
- - शैलेन
विषयप्रवेश
युरोपीय वसाहतवादाचा आफ्रिकेशी संबंध इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून यायला लागला. व्यापारी कंपन्या आणि त्यांचे सरकारी व्यवस्थेशी जवळून संबंधित असणारे भागधारक यांच्या पुढाकाराने आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील भूभागांशी जो व्यापार सुरू झाला त्याची परिणती हळूहळू गुलामांच्या व्यापारासारख्या वसाहतवादाशी कुख्यात प्रकारे जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक घडामोडींमध्ये झाली. पण एकोणिसाव्या शतकात 'नव-वसाहतवाद' नावाने ओळखल्या जाणाऱ्या काळात या घडामोडींचा कळसाध्याय गाठला गेला. अठराव्या शतकापासूनच युरोपात राष्ट्रवादी जाणिवा प्रबळपणे व्यक्त होऊ लागल्या होत्या. या जाणिवांच्या प्राबल्यामुळे युरोपीय देश फक्त आपापल्या राष्ट्राला फायदेशीर होईल असेच व्यापारी धोरण आखू लागले होते. त्यामुळे या राष्ट्रांतल्या व्यापाराला काहीशी खीळ बसू लागली होती. अशा वेळी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या देशांना आफ्रिकेतला भूभाग आणि संसाधने यांची भुरळ पडली. औद्योगिकीकरणामुळे उत्पादित झालेली उत्तम हत्यारे, राष्ट्रवादाची प्रखर जाणीव, ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा प्रभाव, गोऱ्या वंशवादाचा वरचष्मा अशा वेगवेगळ्या कारण-परंपरांमुळे युरोपीयांनी आफ्रिका खंड ओरबाडायला सुरुवात केली. या ओरबाडणुकीच्या शर्यतीमुळे या देशांमध्ये आपापसांत वैमनस्य उद्भवू लागण्याची दाट शक्यता निर्माण होऊ लागली. तेव्हा जर्मनीचा महत्त्वाकांक्षी आणि धोरणी चॅन्सलर बिस्मार्क याच्या पुढाकाराने १८८४मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली; आणि त्यात आफ्रिकेच्या 'वाटणी'चे धोरण सर्वानुमते ठरवण्यात आले. यातून आफ्रिका खंडातला 'नव-वासाहतिक' कालखंड सुरू झाला.

बर्लिन परिषद १८८४ (विकिमिडीया कॉमन्स)
या वसाहतवादी व्यवस्थेमुळे आफ्रिकेवर दूरगामी परिणाम झाले. आज आफ्रिकेत राष्ट्र-राज्ये आहेत ती याच वासाहतिक व्यवस्थेचा परिपाक होत. वसाहतवादामुळे 'महासत्ता' ('Metropole') असलेले देश आणि त्यांच्या वसाहती यांच्यात एक 'संस्थात्मक विलगीकरण' उभे राहिले. वसाहतींतल्या स्थानिक रहिवाश्यांना राज्यकर्त्या वर्गाकडून वेगळी वागणूक मिळायला लागली. राज्यकर्त्या वर्गाच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीच्या अंगाने कितीही प्रगती केली तरी वासाहतिक जनतेचे स्थान त्यांच्यापेक्षा निम्न प्रतीचेच राहिले. वासाहतिक संस्थांनी याला हातभार लावला आणि त्या दृढमूल केल्या. पण असे असले तरी वेगवेगळ्या युरोपीय सत्तांनी त्यांचे वासाहतिक धोरण वेगवेगळ्या प्रकारे राबविले हेही तितकेच खरे आहे. फ्रेंच वसाहतकारांवर राज्यक्रांतीतून आलेल्या समता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांचा प्रभाव असल्याने त्यांचा कल आफ्रिकेतल्या वासाहतिक जनतेलाही एका परीने 'फ्रेंच'च मानण्याकडे होता. पण या संदर्भात अर्थातच 'फ्रेंच' म्हणजे नक्की काय, याची गमके सोयीस्करपणे वेगळी होती. वसाहतीतल्या या तथाकथित 'फ्रेंच' जनतेला स्थानिक कारभारात काही स्थान असले तरी खुद्द फ्रान्समध्ये समान नागरिकत्वाचे हक्क नव्हते! ब्रिटिश वसाहतकारांनी तर इतकीही जवळीक बाळगली नाही. त्यांची पद्धत 'अप्रत्यक्ष कारभारा'ची होती. ब्रिटिशांनी आफ्रिकेतल्या जमातींचे पारंपरिक पुढारीच आपल्याकडे वळवून घेऊन त्यांच्या मदतीने स्थानिक कारभार चालवला पण त्यांच्यावर गव्हर्नरसारख्या वासाहतिक सत्ताकेंद्रांचे थेट नियंत्रण ठेवले. व्यापार-उदीम, चलनव्यवहार, परराष्ट्र-संबंध, सैन्य-नियंत्रण अशा महत्त्वाच्या बाबी अर्थातच या वासाहतिक सत्ताकेंद्रांच्या अखत्यारीत होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली. आफ्रिकेतल्या वसाहतींमध्येही राष्ट्रीय चळवळी राहिल्या आणि अखेरीस वसाहतवादाचा अंत होऊन आफ्रिकेतले देश स्वतंत्र झाले – पण या प्रक्रियेलाही तीसेक वर्षे लागली!
युरोपीय दृश्यकला-संस्कृती आणि आफ्रिकेतला वसाहतवाद
आफ्रिकेतल्या वसाहतवादी घडामोडींचा प्रभाव युरोपातल्या कला-संस्कृतीवर पडला. नव-वसाहतवादाच्या काळात युरोपीय राष्ट्रांकरवी आफ्रिकेची ओरबाडणूक होण्याआधी युरोपीयांनी आफ्रिकेच्या अंतर्भागात केलेल्या सर्वेक्षण-सफरींमुळे या विशाल खंडाचे अंतरंग आहेत तरी कसे याचा थांग हळूहळू त्यांना लागू लागला. याच सफरींच्या माध्यमातून आफ्रिकेतल्या समाजांची त्यांना माहिती मिळू लागली. त्यांच्या जीवनपद्धती, राहणीमान, वगैरे विषय युरोपीय मानववंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचे विषय होऊ लागले. अर्थात या ज्ञान-संपादनाच्या तहानेमागे वसाहतवादाचा मोठा हात होता कारण याच ज्ञानातून मानव-संसाधनांचा वापर वासाहतिक फायद्यासाठी कसा करून घ्यावा याची धोरणे वसाहतकारांना आखता आली.
या काळातच आफ्रिकेतल्या लोकांच्या 'कले'चा परिचयही युरोपीयांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. या परिचयातून युरोपात आफ्रिकी कलेकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन निर्माण झाला. या दृष्टिकोनामागेही वासाहतिक धारणांचा मोठा प्रभाव होता. 'महासत्ता' आपल्या वसाहतींकडे कशा पाहत यावर या धारणा उभारल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने आफ्रिकी जनजीवन टोळीबद्ध, 'रानटी', निम्न-संस्कृत, 'काळे', अशा विशेषणांनी ग्रस्त होते. किंबहुना, वासाहतिक प्रभावातून या लोकांचा 'उद्धार'च होणार आहे या गृहितकावर युरोपीयांची श्रद्धा होती. (आजही या श्रद्धेचा पुनरुच्चार करणारे महाभाग कुठे कुठे दिसत असतात!)
वसाहतकाळात नाना प्रकारचे युरोपीय व्यावसायिक आफ्रिकेत पोचले. आरोग्यसेवक, धर्म-प्रचारक, शिक्षक, शेतमालक, व्यापारी, प्रशासक अशा विविध प्रकारच्या कार्यात हे युरोपीय सामील होते. या लोकांनी आफ्रिकन 'कला'वस्तूंचे संग्रह करायला सुरुवात केली. या संग्रहांमागे या वस्तूंकडे 'कला' म्हणून बघण्यापेक्षाही 'वैचित्र्यपूर्ण' वस्तू बघण्याकडे या लोकांचा कल होता. याला युरोपीय कलाकारही अपवाद नव्हते. या वस्तू म्हणजे 'कला' नव्हेत, तर या वस्तूंचा आपल्या कलेत वापर करून आपण जी निर्माण करतो ती 'कला', असा त्यांचा गाढ समज होता. हर्बर्ट वॉर्डसारख्या ब्रिटिश कलाकाराच्या लेखनात तो प्रतिबिंबित झालेला दिसतोही. या कलावस्तूंचे आफ्रिकी समाज-जीवनात विवक्षित स्थान होते. पुतळे, हत्यारे, मुखवटे यांसारख्या वस्तू आफ्रिकी समाजांत शेकडो वर्षे ठरावीक प्रकारे वापरल्या जात होत्या. त्यांचा वापर जादूटोणा, राजनैतिक व्यवहार, मान्यतेची किंवा सामाजिक अस्मितेची चिन्हे, लग्नासारखे महत्त्वाचे समाज-व्यवहार अशा वेगवेगळ्या प्रकारे केला जात असे. या उपयोगांतून अशा वस्तूंविषयी आफ्रिकी समाजांत एक वेगळे 'सौंदर्यशास्त्र' निर्माण झाले होते. एका बाजूला 'आदिमते'चे आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला 'वैचित्र्या'चे नाविन्य अशा कचाट्यात सापडलेल्या युरोपीय लोकांना हे सौंदर्यशास्त्र उमगले नाही.
असे असले तरी वासाहतिक आफ्रिकी कलाकुसरीच्या वस्तू, तिथले लोक, त्यांचे वेष, चालीरीती वगैरे गोष्टींचा अंतर्भाव युरोपीय दृश्य-संस्कृतीत होऊ लागला. 'वैचित्र्या'च्या, आणि एकंदरीतच आपण या 'रानटी' लोकांचे कसे 'भले' करत आहोत हे दाखवण्याच्या ओढीतून महासत्ता आपापल्या वसाहतींना 'शो-केस'मध्ये ठेवू पाहणारी मोठमोठी प्रदर्शने भरवू लागल्या. याची सुरुवात ब्रिटनमध्ये १८५१मध्ये झालेल्या 'ग्रेट एक्झिबिशन'पासून झाली. बहुतेक प्रदर्शने महासत्तेचे केंद्र असलेल्या देशांतच होत, पण काही काही प्रदर्शने वसाहतींतही (उदा. १८७९ – सिडनी, १९०२ – हनोई) आयोजित केली गेली. १९३१ साली पॅरिसमध्ये भरलेले 'एक्सपोझेसियों कोलोनीयाल आंत्रनास्योनाल' हे बहुधा यांपैकी सगळ्यात मोठे प्रदर्शन होते. सहा महिने चाललेल्या या प्रदर्शनाची सुमारे ३.३ कोटी तिकिटे विकली गेली! या प्रदर्शनांची पोस्टर्स, हँडबिले, त्यात भाग घेणाऱ्या लोकांसाठी काढलेली पदके, स्मरणिका, खास काढलेले पोस्टेज स्टँप्स या सगळ्यांतून वसाहती, तिथली ठिकाणे आणि लोकजीवन यांचे एक रम्य-धूसर, कलात्मक असे चित्र महासत्तांतल्या आणि वसाहतींतल्या सामान्य जनांसाठी या महासत्तांनी तयार केले. अशा सार्वजनिक उपभोगार्थ निर्माण केलेल्या वस्तूंमुळे युरोपीय 'दृश्य-संस्कृती'मध्ये एक विवक्षित वासाहतिक 'शैली' तयार झाली.

पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय वसाहती प्रदर्शनाचे पोस्टर, १९३१ (विकिमिडीया कॉमन्स)
आफ्रिकेतल्या वासाहतिक चलनावर असणाऱ्या दृश्यांची संदर्भ-संगती आपल्याला या दृश्य-संस्कृती-शैलीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाची आहे. प्रख्यात इतिहासकार एरिक हॉब्सबॉम यांनी चलनांवरच्या दृश्यांना 'सार्वजनिक दर्शनोपभोगाचा सर्वांकष आविष्कार' असे म्हटले आहे. चलनी माध्यमे – म्हणजेच आपल्याला सुपरिचित अशा नोटा आणि नाणी – त्यांच्या अंगभूत गुणामुळे लोकांमध्ये 'चालतात', म्हणजेच 'संचरण' करतात. या संचरणामुळे त्यावर असलेल्या दृश्यांचेही आपसूकच संचरण होते. नाणकशास्त्रज्ञ व्हर्जिनिया ह्युईट म्हणतात, "चलनी नोटा या एखाद्या जाहिरात-फलकासारख्या काम करतात आणि म्हणूनच त्यांच्यावरची चित्रे ही सामाजिक किंवा राजकीय भावाशी निगडित असू शकतात." कागदी चलनाचा इतिहास जरी सातव्या-आठव्या शतकाइतका जुना असला तरी त्यावर चित्रात्मक अंकन हे सुमारे अठराव्या शतकापासून अधिक होऊ लागले असे दिसते. नोटा जिथे किंवा ज्यांनी जारी केल्या त्या ठिकाणचे किंवा त्या आर्थिक संस्थेशी निगडित असे काही चित्रण आपल्याला या नोटांवर दिसते.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बँकिंग आणि तारण-व्यवहार कायद्यात पुष्कळच सुधारणा झाल्याने कागदी चलनावरचा लोकांचा विश्वास वाढीस लागला आणि पैशाच्या व्यवहारात नोटांचा अंतर्भाव अधिकाधिक होऊ लागला. कायदेशीर संरक्षणाबरोबरच छापण्याच्या तंत्रात झालेली प्रगती हीसुद्धा नोटांवरचा विश्वास वाढायला कारणीभूत ठरली; कारण बनावट नोटा तयार करणे हे या तंत्रज्ञानाने अधिकाधिक कठीण करून ठेवले. विसाव्या शतकात तर लोक नोटा सर्रास वापरू लागले आणि कागदी चलन हा धातुमय चलन किंवा नाण्यांइतकाच चलनी माध्यमांचा परिचित आविष्कार बनला.
आफ्रिकेतील वसाहत-पूर्व चलन
वासाहतिक चलनाचा, विशेषतः कागदी चलनाचा, आफ्रिकेतल्या समाजांवर काय परिणाम झाला ते पाहण्याआधी तिथे वसाहतपूर्व काळात काय चलन होते याची थोडी माहिती करून घेऊ. कार्ल पोलान्यी 'पैसा' किंवा 'वित्त' याची व्याख्या कार्यात्मक अंगाने करतात. त्यांच्या मते ज्या वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून, हिशेबी एकक म्हणून, किंमत चुकवण्यासाठी आणि मूल्य-साठा करण्यासाठी अशी चार कार्ये पार पाडण्याकरता वापरता येतात त्या सगळ्या 'पैसा' किंवा 'वित्त' या संज्ञेला पूरक असतात. आफ्रिकेतल्या चलन-पद्धतीचे एक ऐतिहासिक वैशिष्ट्य हे आहे की आफ्रिकेत चलन म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जात असत. हे चलन-वस्तूंचे वैविध्य आफ्रिकेतले समाज 'पैसा' किंवा 'वित्ता'कडे कसे पाहत याचे द्योतक आहे. वरकरणी पाहता असे वेगवेगळ्या वस्तू चलन म्हणून वापरणे हे आदिमतेचे किंवा मागासलेपणाचे लक्षण वाटू शकते, पण आफ्रिकेतले लोक हे वैविध्य कुशलतेने आणि अनन्यसाधारण मार्गांनी हाताळत ही वस्तुस्थिती आहे. या वस्तूंद्वारे जे मूल्यविनिमय होते ते केवळ एकाच समाजापुरते मर्यादित नसते. अनेकदा या वस्तू-विनिमयामागे लोक-समाजांच्या साखळ्या आणि त्यातून निर्माण होणारे 'संपर्कजाल' (network) कार्यरत असे. आफ्रिकेतले भाषिक, सामाजिक आणि लोकतत्त्वीय (folk culture) फरक पाहता ते समाज हे वैविध्य कसे हाताळत असत याची कल्पना करणेही कठीण व्हावे इतकी ही वस्तूविनिमय पद्धती जटिल होती. या वस्तूंत कापड, मीठ, धातूंची हत्यारे किंवा बांगड्यांसारखी आभूषणे, 'कोला' बिया किंवा ताडाच्या सोपटासारख्या वनस्पतीजन्य वस्तू; कवड्या, शंखशिंपले किंवा पिसांसारख्या प्राणीजन्य वस्तू, गो-धन किंवा अज/मेष-धन म्हणजे खुद्द प्राणी, काचेचे किंवा दगडांचे मणी आणि त्यापासून बनवलेले दागिने, अशा अनेकानेक वस्तूंचा समावेश होत असे. या वस्तू अनेक कारणांमुळे 'मूल्य-गणती'साठी योग्य समजल्या जात. मागणी आणि पुरवठा या नेहमीच्या बाबी तर त्यामागे होत्याच पण त्याचबरोबर विवक्षित सामाजिक कार्ये किंवा परिस्थिती यांत या वस्तूंचे स्थान नक्की काय आहे यावरही या वस्तूंचे मूल्य ठरत असे. कित्येकदा ही कारणे समाजांच्या रचनेत, परंपरेत आणि चलणुकीत खोलवर रुजलेली असत. थोडक्यात हा वस्तू-विनिमय 'आदिम' किंवा 'मागास' अजिबातच नव्हता – पण युरोपीय वासाहतिक दृष्टिकोनाने त्याला तसे ठरवले. १९४९ साली मानववंशशास्त्रज्ञ पॉल एन्झिग यांनी या विनिमय वस्तूंवर लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाच्या नावातच 'Primitive Money' असा शब्दप्रयोग केलेला आहे!
वसाहतपूर्व काळात आफ्रिकेत ज्या वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून वापरल्या जात त्यापैकी विवक्षित म्हणून ब्राँझ वा पितळेच्या 'मनिला' नामक बांगड्या आणि सोन्याच्या धुळीचे वजन करायला वापरली जाणारी वजने या गोष्टींचा विचार करू. या दोन्ही वस्तू पश्चिम आफ्रिकेच्या 'साहिल' म्हणजे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेच्या भागात – म्हणजे आजच्या माली, बुर्किना फासो, नीजेर (पूर्वाश्रमीच्या फ्रेंच वसाहती) आणि नायजेरिया, घाना (ब्रिटिश वसाहती) या भागांत – या वस्तू चलन म्हणून वापरल्या जात.

पितळेची 'ओकपोको' मनिला, उत्तर नायजेरिया (ॲशमोलियन म्युझियम, ऑक्सफर्ड)
'मनिला' शब्द पोर्तुगीज भाषेतून आला असून त्याचा अर्थ बांगडी अथवा पोची असा होतो. पश्चिम आफ्रिकेतले लोक अशा बांगड्या चलन म्हणून वापरत असल्याचे उल्लेख अगदी सोळाव्या शतकातल्या युरोपीय लिखाणांतही सापडतात. वेगवेगळ्या आकाराच्या आणि किंमतीच्या बांगड्यांपैकी घोड्याच्या नालाच्या आकाराच्या आणि टोकांना चपटा आकार दिलेल्या 'म्क्पोरो' किंवा 'ओकपोको' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांगड्या अधिक लोकप्रिय होत्या. आजही कालाबार, एफिक किंवा इबिबियो यांसारख्या स्थानिक आफ्रिकी भाषांत पैशाला 'ओकपोको' हाच शब्द वापरला जातो. या बांगड्यांचा उपयोग सामान्य बाजारी विनिमयापासून ते दंडाची रक्कम भरणे, हुंडा देणे, जादूटोणे करणाऱ्यांचे मानधन म्हणून, किंवा प्रेताबरोबर पुरण्याच्या वस्तू म्हणून अशा अनेक प्रकारे केला जाई. पण याचबरोबर युरोपीय संपर्काबरोबर गुलामांचा व्यापार जसजसा वाढत गेला, तसतसा गुलामांची खरेदी-विक्री करायलाही या मनिला वापरल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला १२ ते १५ मनिला देऊन एक गुलाम विकत घेता येई. पण लवकरच अटलांटिकपार होणारी शेतजमिनीची वाढ आणि तिथे लागणाऱ्या गुलामांची वाढलेली मागणी, यामुळे या चलनातही 'फुगवटा' निर्माण झाला आणि गुलामांची किंमत ५० मनिलांइतकी घसरली! अठराव्या शतकापासून बर्मिंगहॅम हे या मनिला-निर्मितीचे मोठे केंद्र बनले. इथे औद्योगिक पद्धतीने मनिलांचे उत्पादन सुरू होऊन त्या वासाहतिक पणन-पद्धतीद्वारे आफ्रिकेत पोचायला लागल्या आणि गुलामांच्या व्यापारात महत्त्वाची कामगिरी बजावू लागल्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये गुलामगिरी-प्रतिबंधक कायदा झाला आणि गुलामांच्या व्यापारातून ब्रिटनने अंग काढून घेतले. पण तोवर मनिलांचा चलन म्हणून प्रादुर्भाव आणि परिणाम इतका झाला होता की अन्य प्रकारच्या विनिमयांत त्यांचा वापर चालूच राहिला. ब्रिटनमध्ये गुलामी नष्ट झाली तरी पाम तेलाच्या व्यापारासारख्या वासाहतिक अर्थकारणात या चलनाचे स्थान कायम राहिले. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनने नायजेरियात 'आधुनिक' प्रकारचे चलन आणले आणि मनिला चलनातून कायद्याने बाद केल्या.
आजच्या घाना देशाच्या उत्तरेकडे असलेल्या भागात, कोमोए आणि व्होल्टा नद्यांच्या खोऱ्यांत, जी स्थानिक आफ्रिकन राज्ये होती त्यांना 'आकान' राज्ये म्हटले जाते. बोनो, डेन्क्येरा, अक्वामू, फांटे आणि अशान्ते ही ती राज्ये होत. यांपैकी सतराव्या-अठराव्या शतकात अशान्ते राज्याचा विस्तार होऊन ते एक शक्तिमान स्थानिक राज्य म्हणून पुढे आले. युरोपीय-पुरस्कृत गुलामांचा व्यापार हा या राज्याच्या भरभराटीचे एक कारण होतेच, पण उपरोल्लेखित नद्यांमध्ये वाहून येणारी सोन्याची रेव किंवा धूळ हाही या राज्याच्या उत्कर्षाचा एक महत्त्वाचा भाग होता. महत्वाची व्यापारी वस्तू असलेल्या या रेवेचा उपयोग अशान्ते आणि अन्य आकान राज्यांत चलन-विनिमयाची वस्तू म्हणून केला जाऊ लागला. पण अर्थातच, मूल्य-निश्चिती करायला त्या रेवेचे वजन करणे आवश्यक होते. ही रेव सोन्याची असल्याने तिला बरीच अंगभूत किंमत असणे साहजिक होते आणि म्हणूनच चलन म्हणून वापरताना या रेवेच्या अगदी लहान मात्रेचेही वजन करायची आवश्यकता भासे. त्यासाठी संवेदनाक्षम तराजू वापरले जात. रेव तराजूच्या पारड्यांत टाकण्यासाठी विशिष्ट चमचे असत. रेवेचे वजन करायला खास वजने वापरली जात. ही वजने पितळेची असून ओतकाम करून बनवली जात. ती सुरुवातीला साध्या, व्यावहारिक स्वरूपाची होती, पण जसजशी ही चलन-प्रणाली आकान संस्कृतीत रुजत गेली, तसतसे या वजनांचे दृश्यरूप बदलत गेले.

सोन्याच्या रेवेचे वजन करायची वेगवेगळ्या आकारांची वजने, आकान प्रांत, घाना (पिट-रिव्हर्स म्युझियम, ऑक्सफर्ड)
आकान संस्कृतीत बोलीला अनन्यसाधारण महत्त्व होते आणि या भाषांत म्हणी-वाक्प्रचार यांचे प्राचुर्य होते. जो माणूस यांचा यथायोग्य वापर करून उत्तम बोलू शके, त्याला आकान समाजांत मोठा मान असे. गावोगावच्या बाजारांत लोक एकत्र येत आणि तिथे देवघेव, घासाघीस करताना अशा 'हुशार' संभाषणांना वाव मिळे. अर्थात या बाजारांत विनिमयही घडे, किंबहुना बाजारांचे मुख्य उद्दिष्टच ते असते. तिथे घडणाऱ्या म्हणी-वाक्प्रचारप्रचुर संभाषणांचे प्रतिबिंब सोन्याची रेव तोलायच्या वजनांच्या रूपात पडायला लागले. त्या बोलीत येणाऱ्या प्रतिमा, उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी दृश्य स्वरूपात या वजनांच्या रूपात दिसायला लागल्या. ही वजने माणसे, प्राणी, शेतमाल, पिके, झाडेझुडपे अशा वेगवेगळ्या आकारांत आणि घाटांत बनवली जाऊ लागली. विशुद्ध व्यावहारिक उपयोगापलीकडे विशिष्ट सामाजिक स्थान, ओळख, स्तर इत्यादी सूचित करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. आफ्रिकेतल्या चलन-वैविध्य-परंपरेला अनुसरून ही वजने जन्म, मृत्यू, विवाह अशा विधींत विशिष्ट कारणांसाठी विनिमय-वस्तू म्हणूनही वापरली जाऊ लागली. कौटुंबिक वारसा सांगणाऱ्या वस्तू म्हणून त्यांचे संग्रह होऊ लागले आणि ते पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले जाऊ लागले. 'ज्या समाजांत लेखी साहित्याची परंपरा नव्हती तिथे अशा वस्तूंमध्ये बद्ध केलेल्या चिन्हात्मक संकेतांतून विकार, विचार आणि आचार यांच्या प्रदर्शनाची आणि संक्रमणाची सोय केली जात असे', असे आफ्रिकन तत्त्ववेत्ते क्वामे अँटनी अप्पिया यांचे मत आहे. व्यवहार, विनिमय, वित्त, चलन, भाषा, सत्ता, मत्ता, संस्कृती इत्यादी बाबींचा संगम साधणाऱ्या या वस्तूंना 'प्रिमिटिव्ह' म्हणणे अगदीच अस्थायी आहे.
धातूच्या बांगड्या किंवा वजने यांबरोबरच कवड्यासुद्धा विनिमयाचे साधन म्हणून आफ्रिकेत सर्वत्र प्रचलित होत्या. 'मोनेटेरिया (सिप्रिया) मॉनेटा' या जातीच्या कवड्या या कामासाठी वापरल्या जात.

निकोलो ग्वालतीएरी याच्या शंख-शिंपल्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकात
छापलेले आफ्रिकी चलनी कवड्यांचे चित्र, १७४२ (विकिमिडीया कॉमन्स)
कवड्यांचे उत्पादन आफ्रिकेपासून पुष्कळ दूर असलेल्या मालदीव बेटांत होई. तिथले रहिवासी ज्या प्रकारे कवड्यांचे 'पीक' घेत त्या पद्धतीचे वर्णन इब्न बतूता हा चौदाव्या शतकातला प्रख्यात मोरोक्कन प्रवासी करतो. तिथून या कवड्या सामुद्री व्यापाराच्या जालाद्वारे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या अनेक भागांत निर्यात होत. सहारा आणि साहिल प्रदेशांत त्या इजिप्तमार्गे, वाळवंटी कारवानांच्या आणि नीजेरसारख्या नद्यांच्या वाटेने पोचत.
वसाहतवादाचा आफ्रिकेतल्या चलनावर आणि समाजावर झालेला परिणाम
वसाहतपूर्व आफ्रिकेतले जनसमाज विनिमय-माध्यमांतले वैविध्य वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांद्वारे आणि मार्गांद्वारे हाताळत असत. ठरावीक वस्तूंच्या चलनातच कर आकारणी करणे हा एक मार्ग होता. वस्तूंच्या किंमती इतर ठरावीक वस्तूंच्याच तुलनेत नियमित करणे, हा दुसरा मार्ग. चलनात किती पैसा असावा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या वस्तुरूप चलनात किती व्यापार व्हावा, यावर नियंत्रण ठेवले जात असे. वस्तुरूपी नसलेला आणि टांकसाळीत पाडलेला पैसा, म्हणजेच नाणी, आफ्रिका खंडासाठी नवा नव्हता – इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकातही इथिओपियातले आक्सुमाईट राज्य आणि रोमचे मांडलिक असलेल्या मॉरिटेनिया राज्यात स्वतःची नाणी होती. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या, पंधराव्या शतकातल्या किल्वा राज्याचा कारभार स्वतःच्या नाणेरूपी चलनात चालत असे. मात्र हे व्यवहार ठरावीक प्रांतातच मान्य होते; ठरावीक वस्तूंच्या व्यापारासाठी हा पैसा वापरता येत असे. हा पैसा कुणाला वापरता येईल, हे स्थानिक राज्यकर्ते ठरवत असत. चलनात फक्त नाणीच होती असं नाही तर मणी, कापड, धान्य अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तूही होत्या. युरोपीय लोकांनी व्यापार, विशेषतः गुलामगिरीत जुंपलेल्या लोकांचा व्यापार, सुरू केल्यानंतर आफ्रिकी अर्थकारण आणखी गुंतागुंतीचं झाले – युरोपीय माल आणि पैसा ही संकल्पना – अशी देवाणघेवाण सुरू झाली. जिथे युरोपीय लोकांचा थेट संपर्क येत असे, अशा किनारपट्टी आणि जवळच्या प्रांतात त्यांनी आणलेली नाणी चलनात वापरली जात, कारण त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या आफ्रिकी लोकांना ती परिचित झालेली असत, आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसलेला असे. हे परदेशी पैसे हळूहळू अंतर्भागातही चालायला लागले. नायजेरियामध्ये 'मेक्सिको, पेरू, ब्राझील, चिले, आणि स्पेनची नाणी, ब्रिटिश सोनं-चांदी-तांब्याच्या पैशांच्या जोडीनं खुळखुळू लागली. अमेरिका, फ्रान्स, या देशांचे पैसेही तिथे मालदीव आणि मोझांबिकमधून आलेल्या कवड्यांच्या जोडीने चलनात दिसायला लागले' असे निरीक्षण तिथले अर्थशास्त्रज्ञ वॉल्टर ओफोनागोरो यांनी नोंदवले आहे.
एकोणिसाव्या शतकात वासाहतिक 'महासत्तां'नी त्यांच्या आफ्रिकेतल्या वसाहतींत नवीन चलने आणली आणि त्यासाठी औद्योगिक प्रकारे युरोपात बनवलेली चलनी माध्यमे – म्हणजे यंत्रांनी पाडलेली नाणी आणि आधुनिक प्रतिभूती मुद्रणतंत्राचा वापर करून छापलेल्या नोटा – चलनात आणायला सुरुवात केली. एरिक हेलेनर यांनी हा बदल म्हणजे वासाहतिक शासनांनी आफ्रिकेत घडवलेल्या कमालीच्या महत्त्वपूर्ण संस्थात्मक बदलांपैकी एक होता असे मत मांडले आहे. या निर्णयामागे अर्थशास्त्रीय, राजकीय आणि वैचारिकतेशी संबंधित अशी अनेक कारणे होती. महासत्ता आणि वसाहती यांच्यातल्या परस्पर-विनिमय-व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सोपे जावे हे एक कारण होते. वसाहतींतून निर्यात घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून स्थानिक आर्थिक व्यवहारांची संरचना बदलणे आवश्यक होते. ते या चलन-बदलातून साध्य झाले. ही नवीन चलने बहुशः 'विश्वस्त' (fiduciary) प्रकारची होती म्हणजे त्यांचे दर्शनी मूल्य त्यांच्या अंगभूत मूल्यापेक्षा पुष्कळच जास्त होते. त्यामुळे हे चलन वटवण्यात फायदा होता, जो वसाहतींवर होणाऱ्या खर्चाकडे वळवता येत असे आणि वसाहतींतून होणाऱ्या वित्तशोषणाला साहाय्यभूत ठरत असे.
वासाहतिक चलनांना विनिमय-मूल्याबरोबरच सांकेतिक मूल्यही होते. वसाहतीत एकसमान असा शासकीय अवकाश निर्माण करणे आणि महासत्तेची हुकूमत दाखवणे हे संकेत या चलनांतून दिले गेले. या चलनांचा एक हेतू एकाच महासत्तेच्या वेगवेगळ्या वसाहतींतले वेगळेपण सुस्पष्टपणे दाखवणे हाही होता. त्याचबरोबर, 'रानटी' किंवा 'मागास' अशा आफ्रिकी लोकांना 'सुसंस्कृत' करण्याचे जे विविध उपक्रम वसाहतकाळात राबवले गेले, त्यांचा एक भाग म्हणूनही या चलनांच्या उपयोजनाकडे पाहता येते. वसाहतपूर्व काळातली वस्तूविनिमयाची आफ्रिकी परंपरा वसाहती सत्तांच्या दृष्टीने 'मागासलेली' होती. त्यापेक्षा वासाहतिक शासनांनी आणलेली, नाणी-नोटांच्या माध्यमातून विनिमय करण्याची प्रणाली शासन-पुरस्कर्त्यांना 'आधुनिक' वाटे. आफ्रिकी इतिहासाचे अभ्यासक स्टीव्हन बेयर यांनी नोंदवल्याप्रमाणे फ्रेंच शासनकर्त्यांच्या मते त्यांचे चलन हे पारंपरिक आफ्रिकी चलनापेक्षा 'श्रेष्ठ' होते आणि या चलनाचा संपूर्ण पुरस्कार न करणे म्हणजे एका प्रकारे वसाहती लोकांना सुसंस्कृत करण्याच्या वसाहतवादी हेतूपासून फारकत घेणे असा त्यांचा दृढ समज होता.
पाश्चात्य किंवा 'आधुनिक' प्रकारच्या चलनांच्या आस्थापनेमुळे वसाहतपूर्व आफ्रिकी चलन-परंपरा हळूहळू कोसळून पडली. वसाहतपूर्व आफ्रिकी चलने ही विनिमय-वस्तूंपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची सामाजिक कार्ये पार पाडत. त्या वस्तूंचा वापर सामाजिक आणि राजकीय स्थान दर्शवण्यासाठी होई. त्यांच्या व्यापारातून आफ्रिकेचे वेगवेगळे भाग आणि तिथले जनसमूह एकमेकांच्या संपर्कात येत. त्यांचा वापर आणि पुनर्वापर सांस्कृतिक प्रकारे होत राहत असे – उदाहरणार्थ, वारसा म्हणून अशा वस्तूंचे हस्तांतरण लग्न किंवा जन्म-विधींमध्ये केले जात असे. जमात किंवा टोळीरूप समाजांत खाजगी मालमत्तेचे नियमन करण्याचे गुंतागुंतीचे नियम आणि चालीरीती या वस्तूंच्या सामाजिक वापरांतून बांधल्या जात. साहजिकच या सामाजिक बाजूंवरही या चलन-परंपरा कोसळण्याचे गंभीर परिणाम झाले. वस्तुमय चलनांच्या मूल्य-वैविध्यावर आधारित असलेल्या गाव-बाजार पातळीवरच्या कर्ज आणि तारण व्यवहारांच्या साखळ्या तुटून पडल्यामुळे हे व्यवहार मोठ्या पेचात आले.
वासाहतिक चलन हे त्याच्या पूर्वसूरींपेक्षा दिसायलाही अतिशय वेगळे होते. त्या चलनाचे रूपच असे होते की, त्यावर विविध प्रकारच्या चित्रणाला वाव होता. विनिमयाचे माध्यम म्हणून नाण्यांची देवघेव लोकांत होते, या गुणाचा आधार घेऊन नाण्यांवर 'प्रचारक' स्वरूपाचे चित्रण करण्याची प्रथा पुष्कळच, म्हणजे नाणेरूप चलनाच्या उगमाइतकी, प्राचीन आहे. या चित्रणातून जे लोकांना सांगिले जात असे ते बहुशः त्या नाण्यांच्या विनिमय-माध्यम म्हणून होणाऱ्या उपयोगाला सहाय्यकारक असे – म्हणजे त्यात हे नाणे कोणी, कुठे, कधी पाडले, ते 'खरे' आणि विश्वासार्ह आहे का, त्याचे मूल्य किती आहे इत्यादी संकेत या नाण्यांच्या चित्रणातून दिले जात. ही माहिती अधोरेखित करण्याचे आणखीही वेगवेगळे संकेत हळूहळू निर्माण होत गेले – उदाहरणार्थ, नाणे पाडणाऱ्या राजाने एखादा विजय प्राप्त केला असेल तर त्या चित्रणातून त्याची शक्ती अधोरेखित होऊन लोकांचा त्या नाण्यावर विश्वासही वाढे. या सगळ्या बाबतींमुळे चलनाला एक 'दृश्यात्मकता' प्राप्त होई, जी अनेक लोकांच्या अभ्यासाचा विषय राहिली आहे. अठराव्या शतकापासून पुढच्या काळात, युरोपीय देशांत राष्ट्रवादाचे आणि क्रांतीचे वारे वाहू लागल्यानंतर, या दृश्यात्मकतेची भिस्त बहुशः राष्ट्रवादी चित्रणांवर रहात गेली. या राष्ट्रवादी चित्रणांमध्ये विवक्षित देशाची राष्ट्र-राज्य म्हणून 'ओळख' कशी सांगता येईल त्यावर भर असे. ही ओळख दाखवण्यात प्रतीक-रूपे, भौगोलिक वैशिष्ट्ये, भूतकालीन 'गौरवशाली' घटना, व्यक्ती, अथवा परंपरा, औद्योगिकीकरणातून प्राप्त होणारी व्यापारी किंवा सैनिकी शक्ती, इत्यादींच्या चित्रणाचा मोठा सहभाग होता. नाण्यांपेक्षाही नोटांवर ही चित्रणे करायला अधिक वाव मिळे, त्यामुळे ही दृश्यात्मकता नोटांच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने दिसते. या दृश्यात्मकतेचा ऐतिहासिक अभ्यास आणि विश्लेषण हे वसाहतवादासारख्या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चांगला उजेड पाडू शकतात. असे असले तरी इतिहास-अभ्यासकांचे आणि दृश्यात्मक मानववंशशास्त्रवेत्त्यांचे लक्ष इथे विशेष गेलेले दिसत नाही. नाणकशास्त्रज्ञ व्हर्जिनिया ह्युईट यांनी या अंगाने थोडे लेखन केले आहे, आणि अमेरिकास्थित केनियन अकादमिक वाम्बुई म्वान्गी यांनी केनियातल्या 'माऊ माऊ' चळवळीचा तिथल्या चलनी नोटांच्या दृश्यात्मकतेवर कसा परिणाम झाला, यासंबंधी एक लेख लिहिला आहे.
वासाहतिक आफ्रिकेतील नोटांचे चलन-व्यवहार
वसाहतवादी महासत्तांनी जी नवीन चलने आफ्रिकेत सुरू केली, ती जारी करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्थाही स्थापन केल्या. यातल्या मुख्य म्हणजे नोटांच्या वटणुकीकरता आवश्यक असणाऱ्या बँका. यातली फ्रेंचांच्या अख्त्यारीतली 'बाँक द सेनेगाल' (Banque de Senegal) ही सगळ्यात जुनी बँक – या बँकेची स्थापना १८५५ साली झाली. १८४८मध्ये फ्रान्समध्ये गुलामगिरी बेकायदेशीर झाल्यानंतर पूर्वाश्रमीच्या गुलामांच्या मालकांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने तिची स्थापना करण्यात आली होती. १९०३ साली या बँकेतून 'बाँक द लाफ्रीक ओसिदोंताल' (Banque de l'Afrique Occidentale) उर्फ BAO या बँकेची निर्मिती करण्यात येऊन पश्चिम आफ्रिकेतल्या सर्व फ्रेंच वसाहतींसाठी फ्रँक्सचे चलन जारी करणारी मध्यवर्ती बँक म्हणून या बँकेकडे जबाबदारी देण्यात आली. १९४५ साली महायुद्ध संपले तेव्हा अवमूल्यन होऊन फ्रेंच फ्रॅंकची स्थिती दयनीय झाली होती. या अवमूल्यनाचा तोटा वसाहतींना होऊ नये असे कारण वरकरणी दाखवून BAOने 'कोलोनी फ्रॉन्सेज दाफ्रीक' (Colonies françaises d'Afrique) उर्फ CFA फ्रॅंक या नवीन चलनाची निर्मिती केली. वास्तविक पहाता यामुळे वसाहतींमध्ये फ्रेंच मालाची आयात सोपी होऊन वसाहतींना फ्रान्स सोडून अन्यत्र निर्यात करणे महाग पडणार होते.
१९५५मध्ये BAOचे रूपांतर दोन वेगवेगळ्या 'जारीकरण संस्था' किंवा अँन्स्तीत्यु देमीसियोंमध्ये (Institut d'Emission) झाले. फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो या देशांसाठी एक, आणि फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका आणि कॅमेरून या देशांसाठी एक, अशा या संस्था होत्या. दोन्ही CFA फ्रॅंक हेच चलन काढत. यापैकी पूर्वोक्त संस्था फ्रेंच वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'बाँक सॉन्त्राल देझेता देलाफ्रीक देल्वेस्त' (Banque Centrale des États de l'Afrique de l'Ouest) किंवा BCEAO या नावाने ओळखली जाऊ लागली. दुसऱ्या संस्थेचे अवतरण १९७२ मध्ये 'बाँक देझेता देलाफ्रीक सॉन्त्राल' (Banque des États de l'Afrique Centrale) उर्फ BEACमध्ये झाले. आजमितीला या दोन्ही बँका पूर्वाश्रमीच्या फ्रेंच वसाहती असलेल्या आफ्रिकी देशांत मध्यवर्ती बँका म्हणून कार्यरत आहेत आणि 'CFA फ्रॅंक' याच नावाचे चलन जारी करतात – फक्त त्या नावाचे पूर्णरूप आता 'कॉम्युनॉते फिनॉन्सिएर आफ्रिकेन' (Communauté Financière Africaine) फ्रँक असे धरले जाते. फ्रेंचांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही CFA फ्रँक हे चलन फ्रेंच फ्रॅंकबरोबर पूर्वनियोजित हुंडणावळीच्या दराने 'बांधलेले' होते आणि आजही हे चलन 'युरो' चलनाशी असेच बांधलेले आहे.
पूर्व आफ्रिकेत सोमाली किनाऱ्यावर असणाऱ्या फ्रेंच वसाहतींचे चलन व्यवस्थापन 'बाँक द लँदोशीन' (Banque de l'Indochine) या पूर्वेकडील फ्रेंच वसाहतींचा कारभार बघणाऱ्या बँकेकडे सोपवण्यात आले होते. जिबूती या वसाहतीत या बँकेची शाखा १९०८ साली उघडण्यात आली पण त्याआधीच एक वर्ष या बँकेने तिथे चालवायला नोटा जारी केल्या होत्या.
पोर्तुगीज महासत्तेने १८६४ साली 'बँको नासियोनाल उल्त्रामारिनो' (BNU) या बँकेची स्थापना वसाहतींतले चलन जारी करण्यासाठी केली. १८६५मध्ये लुआंडा (अंगोला), तर १८६८मध्ये साव तोमे ए प्रिन्सीप आणि लुरेन्सो मार्केश (मोझांबिक) इथे बँकेची ऑफिसे उघडण्यात आली. १९२६मध्ये 'बँको दे अंगोला' या नवीन बँकेची स्थापना होऊन अंगोलातले चलन-व्यवहार तिच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आज BNU ही बँक 'काईशा जेराल दे दिप्युतासिओ' या बँकेच्या अधीन असून माकाव या चीनच्या किनाऱ्यावरच्या पूर्वाश्रमीच्या पोर्तुगीज वसाहतीत चलन जारी करते. या बँकेच्या संस्थळावर तिच्या वासाहतिक व्यवहाराचा उल्लेख 'वसाहतींच्या चलनी आणि आर्थिक वातावरणाला यथावकाश 'शिस्त' लावणारा उद्योग' आणि 'बँकेच्या इतिहासातला मैलाचा दगड' अशा गौरवशाली शब्दांत केला आहे!
ब्रिटिश वसाहतींमध्ये जे नवीन चलन आणले गेले त्याच्या व्यवस्थापनाची पार्श्वभूमी आणि पद्धत फ्रेंच आणि वासाहतिक महासत्तांपासून पूर्णपणे वेगळी होती. वर सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांनी आफ्रिकेत 'अप्रत्यक्ष' प्रकारे सत्ता राबवली. याच धोरणाला अनुसरून चलनाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी 'करन्सी बोर्ड' नामक संस्थांची निर्मिती केली. वासाहतिक प्रशासकीय संस्था म्हणून करन्सी बोर्ड्स एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश साम्राज्यात अनेक ठिकाणी कार्यरत झाले. सुरुवात १८४८मध्ये मॉरिशसमध्ये स्थापन झालेल्या बोर्डापासून झाली. मध्यवर्ती बँक आणि करन्सी बोर्ड, या संस्थांच्या प्रशासनांत दोन गुणात्मक फरक आहेत – एक म्हणजे करन्सी बोर्ड हे त्यांची चलने दुसऱ्या एखाद्या 'शक्तिमान' चलनाच्या बदल्यात जारी करत आणि यातल्या हुंडणावळीचा दरही तेच ठरवत. दुसरा फरक म्हणजे करन्सी बोर्ड जिथे कार्यरत असत तिथल्या स्थानिक सरकारी कर्ज किंवा दायित्वांमध्ये (liabilities) गुंतवणूक करत नसत, त्यामुळे त्यांना स्थानिक परतावा मिळत नसे.
ब्रिटिश अखत्यारीत जे करन्सी बोर्ड चालत ते अर्थातच ब्रिटिश पाउंड हे 'शक्तिमान' चलन म्हणून वापरत आणि त्याच्या बदल्यात, ठरावीक दराने वासाहतिक चलन जारी करत. यामुळे वासाहतिक चलनांना स्थिरतेचा फायदा मिळे आणि चलनफुगवट्यासारख्या बाबींपासून त्यांचे संरक्षण होई. पण त्याचबरोबर हेही खरे होते की हुंडणावळीचा दर आणि वसाहतींची स्थानिक वित्तीय धोरणे ही ब्रिटिश सत्ताधारीच ठरवत आणि त्यात स्थानिकांना काही अपवाद सोडल्यास काही स्थान नसे. त्यामुळे आपोआपच वसाहतींतून ब्रिटनशी आणि इतर देशांशी होणारा व्यापार, मालाची आयात-निर्यात, आय-व्ययाची गणिते या सगळ्यावर ब्रिटिशांची अधिसत्ता राही. बहुतेक करन्सी बोर्डांचे व्यवस्थापन लंडनहून केले जाई. तिथे या बोर्डांचे जे तारण आणि मत्ता-व्यवहार होत त्यांचा अभ्यास करून आर्थिक इतिहासकार वदन नरसी यांनी असे दाखवून दिले आहे की, हे व्यवहार वासाहतिक शोषणाचा वस्तुपाठ होते. वसाहतींत चलन जारी करण्यासाठी 'शक्तिमान' चलनाचे जे रोखे वापरले जात त्यांचा तारण-व्यवहार सातत्याने ब्रिटिश साम्राज्याच्या थकबाकी चुकवणे, ब्रिटिश गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, आणि एकंदरीतच ब्रिटिश वासाहतिक सत्तेचे भले करण्यासाठी केला जाई. या रोख्यांची गुंतवणूक मुख्यत्वे कमी परताव्याच्या आणि अल्पकालीन मुदतीच्या व्यवहारांत केली जाई.
स्पॅनिश, इटालियन, जर्मन आणि बेल्जियन वासाहतिक सत्तांचा प्रभाव आफ्रिकेत ब्रिटिश आणि फ्रेंचांइतका मोठा आणि विस्तृत नव्हता, पण त्यांनीही नवीन वासाहतिक चलनाचे प्रयोग आफ्रिकेत केले. पूर्व आफ्रिकेतल्या जर्मन आणि इटालियन अधिपत्याखाली जो प्रदेश आला तिथे चलनात भारतीय रुपयाचे प्राबल्य होते. या परिस्थितीला शेकडो वर्षांची व्यापारी पार्श्वभूमी कारणीभूत होती. या भूभागाचे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातल्या व्यापारी मार्गांमुळे भारताशी जवळचे संबंध होते, त्यामुळे इथे रुपये चालत. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी झंझिबारच्या सुलतानाकडून रुपयाला अधिकृत चलन म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यातून भारतातल्या ब्रिटिश व्यापाराचा फायदा कसा अधिक होईल त्याकडे लक्ष पुरवले. रुपयाच्या या प्राबल्यामुळे जर्मन पूर्व आफ्रिका आणि इटालियन सोमालिया या देशांत अनुक्रमे 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं रुपी' आणि 'रुपिया इटालियाना' या रुपयांचे चलन सुरु झाले. जर्मन पूर्व आफ्रिकेचा कारभार सुरुवातीला 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं गेसेलशाफ्ट' (Deutsch-Ostafrikanische Gesselschaft) उर्फ DOAG ही कंपनी करे. तिच्यातर्फे हे रुपया आणि 'बेसा' उर्फ पैसा असे चलन १८९० साली पहिल्यांदा जारी करण्यात आले. पुढच्याच वर्षी हा कारभार कंपनीच्या हातून जर्मन सरकारने स्वतःच्या हाती घेतला. १९०४ साली 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं बँक' स्थापन झाली आणि तिने या रुपयांचे कागदी चलनही काढले. इटालियन सोमालियात व्हिन्चेन्झो फिलोनार्दी या हिकमतखोर गृहस्थाने १८९३ साली रुपयाच्या चलनाच्या स्वतःच्या कंपनीच्या खाजगी नोटा काढल्या. १९०९-१०मध्ये ही जबाबदारी 'बांका दितालिया' (Banca d'Italia) या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
१८८५ सालच्या बर्लिन परिषदेत बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याला विषुववृत्तीय आफ्रिकेचा मोठा भाग 'मानवतावादी आणि परोपकारी कार्यासाठी' खाजगी मालमत्ता म्हणून बहाल करण्यात आला. इथे लिओपोल्डने 'काँगो फ्री स्टेट' नामक वसाहतीची स्थापना केली. पण प्रत्यक्षात त्याचे तिथले कार्य आणि मानवतावाद किंवा परोपकार यांचा काडीमात्र संबंध नव्हता! किंबहुना, वसाहतवादाचा सगळ्यात नृशंस असा नंगानाच लिओपोल्डने केवळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठी या काँगोमध्ये घातला. तिथे चालणाऱ्या अत्याचारांची दखल सगळ्या जगाने घेतली. अखेरीस १९०८ साली बेल्जियन संसदेने कायदा पारित करून काँगोची मालकी लिओपोल्डकडून काढून घेतली आणि तिथे बेल्जियन सरकारची वासाहतिक सत्ता स्थापन केली. यानंतर झालेल्या प्रशासकीय घडामोडींचा भाग म्हणून काँगोमध्ये 'बाँक द काँगो बेल्ज' (Banque de Congo Belge) स्थापन करण्यात आली. या बँकेकडून बेल्जियन फ्रँकशी जोडलेले स्थानिक चलन जारी करण्यात आले, जे काँगोच्या स्वातंत्र्यापर्यंत चालू होते. पुढे बँकेचे नाव 'बाँक सॉंत्राल द काँगो बेल्ज ए दु रूआंडा-उरूंडी' असे होऊन काँगोबरोबरच शेजारच्या रूआंडा-उरूंडी वसाहतीचा चलन-व्यवहारही तिच्याकडे सोपवला गेला.
वासाहतिक काळातल्या आफ्रिकेतल्या नोटांची दृश्यात्मकता: फ्रेंच वासाहतिक नोटा
वासाहतिक बँकांनी काढलेल्या नोटांवरची चित्रे आणि आरेखने विविध आणि विवक्षित प्रकारची होती आणि त्यातून एका परीने त्या छापणाऱ्या कंपन्यांची आरेखन-परंपरा आपल्याला दिसते. आफ्रिकी वसाहतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोटांचे मुद्रण मुख्यत्वेकरून खाजगी प्रतिभूती मुद्रणालये करत – उदाहरणार्थ, ब्रॅडबरी विल्किन्सन अँड कंपनी, टॉमस द ला रू, वॉटरलो अँड सन्स, आणि अमेरिकन बँकनोट कंपनी. यांतली शेवटची सोडली तर इतर कंपन्या ब्रिटन-स्थित होत्या. या मुद्रणालयांनी आपली स्वतंत्र धाटणी या कामासाठी वापरली. गुंतागुंतीचे आकृतिबंध, मूल्यांक, चित्रण आणि मजकूर यांचे आरेखन-शैलीतले परस्पर-स्थान; मजकूर आणि आकड्यांची टंक-शैली इत्यादी बाबतींतून अशा धाटणीचे वैशिष्ट्य जाणवते. चित्रणाचे आरेखन करण्याआधी पारंपरिक पद्धतीची जलरंग किंवा तैलरंगातली चित्रे काढली जात आणि त्या चित्रांचे आरेखनात उपयोजन केले जाई. अशी धाटणी निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे या कंपन्यांकडे छपाईसाठी लागणाऱ्या तांत्रिक साधनांनी निर्माण केलेल्या आरेखनांचे वैयक्तिक अभिलेखागार तयार असे, आणि या कलात्मक अभिलेखागारातूनच नवनवीन आरेखनांची निर्मिती केली जाई. या कंपन्यांच्या आरेखनकारांनी कल्पनाशक्ती आणि तांत्रिक कसब यांचा वापर करून यात वेळोवेळी भर घातली; पण आरेखनांची मूळ कला-कल्पना (design brief) आणि अखेरीस अंतिम उत्पादन कसे दिसणार याबद्दलचा शेवटचा शब्द वासाहतिक सत्तांच्या प्रतिनिधींचा असे. या खाजगी कंपन्यांमध्ये कोण कोण आरेखनकार / चित्रकार कार्यरत होते, त्यांची नावे आणि त्यांचे कलात्मक कार्य हे बहुशः अज्ञातच राहिले आहे कारण हा विषयच नोटांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने (बनावटीकरणापासून संरक्षण या अर्थाने) हे कलात्मक अभिलेखागार बाहेरच्या अभ्यासकांना आजही सहज उपलब्ध होत नाही.
फ्रान्समधला नोट-छपाईचा इतिहास मात्र काहीसा वेगळा आहे. एक म्हणजे फ्रेंच नोटांच्या छपाईचे पूर्ण काम (आरेखन ते अंतिम उत्पादन) हे बाहेरच्या कंपन्या करत नसत. ते फ्रान्सच्या 'बाँक द फ्रांस' (Banque de France) या मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारीतल्या प्रतिभूती मुद्रणालयात केले जाई. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा फ्रान्सवर नाझी जर्मनीची सत्ता होती, तो अल्प कालावधी हा अपवाद. फ्रेंच वसाहतींच्या नोटांचे आरेखन आणि मुद्रणही इथेच होई. किंबहुना, वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यावरही BCEAO, BEAC वगैरे बँकांकडून फ्रेंच-भाषिक आफ्रिकी देशांचे चलन छापायच्या ऑर्डरी याच संस्थेला मिळत राहिल्या.
फ्रेंच नोटांचे कलाकाम आणि आरेखन कोणी केले याची नोंद अनेकदा त्यांच्या कडेच्या भागात घेतलेली दिसते, हे फ्रेंच नोटांचे आणखी एक वैशिष्ट्य. वासाहतिक नोटाही अर्थातच याला अपवाद नाहीत. त्यांच्या कामगिरीची दखल लॅटिन लघुरूपांची विशेषणे लावून घेतलेली असते. उदाहरणार्थ, ज्याने मूळ संकल्पनात्मक आणि चित्रकलेचे काम केले त्यासाठी INV (लॅटिन : invenit), आरेखनाचा आराखडा तयार करणाऱ्यांसाठी DEL (लॅटिन : delineavit), छपाईसाठी साच्यावर किंवा प्लेटवर कोरीवकाम करणाऱ्यांसाठी FEC (लॅटिन : fecit), म्हणजे शब्दशः "त्याने हे तयार केले" इत्यादी. जेव्हा एकच व्यक्ती मूळ कलाकाम आणि आरेखनाचा आराखडा दोन्ही बनवत असे तेव्हाही हे वापरले जात असे. फ्रेंच वासाहतिक नोटा बरेचदा 'बहुदेशीय' प्रकारे छापल्या जात; म्हणजेच, एकच आरेखन एकाहून अधिक वसाहतींसाठी थोडाफार फरक करून वापरले जात असे. यामुळे एकाच व्यक्तीच्या आरेखन आणि कलाकृतींचा प्रसार फ्रेंच वासाहतिक साम्राज्यात त्यांच्या नोट-कलेद्वारे होई.
आफ्रिकेतल्या सुरुवातीच्या फ्रेंच वासाहतिक नोटा आरेखनाच्या दृष्टीने साधारण होत्या; त्यांची आरेखने नेत्राकर्षक नव्हती. मात्र अगदी सुरुवातीपासूनच साचेबंद अशा मानप्रतिमांचे (stereotypes) चित्रण इथेही आढळते. आफ्रिकेतले वन्य-वनस्पती जीवन युरोपीय लोकांना नावीन्यपूर्ण आणि अजब वाटे; त्यामुळे विशेषतः काही वनस्पती आणि पशूंना या डिझाईनांमध्ये विशेष स्थान मिळाले. 'बाँक दु सेनेगाल'ने १८७४मध्ये गियोम-अल्फाँस आरांग उर्फ 'काबासाँ' (Guillame-Alphonse Harang, a.k.a. Cabasson, १८१४-१८८४) याच्या आरेखनांचा वापर करून नोटा जारी केल्या. त्यात स्थानिक लोकांची मानचित्रे मुख्य स्थानी होती आणि त्यांच्या आजूबाजूला पोपट, काकाकुवे, ऊस वगैरे दाखवले होते.
पुष्कळशा आरेखनांमध्ये सिंह, हत्तीसारखे आफ्रिकी वन्य प्राणी घेतलेले दिसतात. अशा चित्रांची परिणती या आरेखनांत एक 'विलक्षण' किंवा 'अनोखे'पण जाणवण्यात झालेले दिसते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही आरेखनांमध्ये आफ्रिकी कापडांमधल्या विणीचे आकारबंध आणलेले दिसतात. कापड वसाहतपूर्व काळात चलन म्हणूनही वापरले जात असे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. काही आरेखनांत स्थानिक लिपी आणि भाषा वापरल्या गेलेल्या दिसतात. फ्रेंच वासाहतिक महासत्ता वसाहतींकडे 'समावेशक' मेहेरनजरेने बघत असे याचे हे आरेखन-घटक द्योतक आहेत. आपण आधीच बघितले की फ्रेंचांच्या वासाहतिक कारभारात वसाहती जनतेशी 'संलग्नता' महत्त्वाची मानली जाई; 'आपण सगळेच फ्रेंच आहोत' या भावनेचा जाणीवपूर्वक परिपोष या दृष्टिकोणात केला जाई. वासाहतिक सत्तेच्या चलनावर स्थानिक भाषांना मिळणारे स्थान हा याच संलग्नतेच्या भावाचा आविष्कार होता.
'बाँक द फ्राँस'ने १९३०च्या दशकात फ्रेंच रंगचित्रकार आणि मूर्तीकार मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ (Maurice-Sébastien Laurent, १८८७ – १९७३) याला आरेखनकार म्हणून नियुक्त केले. त्याची कारकीर्द ही नोटांचे कलाचित्रण या विषयाचा पूर्णपणे कायापालट घडवणारी ठरली. लॉराँचा जन्म नाँसी शहरात झाला आणि तिथेच त्याने कलाशिक्षण घेतले. १९१२च्या 'सालों'मध्ये (वार्षिक कलाप्रदर्शन) त्याला मानपदक मिळाले होते. त्याने बाँक द फ्राँसबरोबर नोट-आरेखक म्हणून १९३०च्या दशकात काम सुरू केले.
लॉराँने १९३४ साली BAOसाठी केलेली चित्रणे आणि आरेखने ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. चित्रणांमध्ये साचेबंद चित्रांपेक्षा व्यक्तिचित्रणांवर त्याने भर दिला. आफ्रिकेतल्या स्थानिक जनतेतली उदाहरणे घेऊन त्याने त्यांना नोटांवर स्थान दिले. उच्च मूल्यांकाच्या दोन नोटा सोडल्या तर चित्रांमध्ये महासत्तेचा दृश्य-संबंध कुठे विशेषतः दिसत नाही. लॉराँची रंग-निवडही लक्षणीय आहे. गुलाबी, पिवळा, लाल, आणि हिरव्या रंगाच्या सौम्य छटा (pastel shades) त्याच्या चित्रणांत प्रामुख्याने दिसतात. या रंगांच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकी लोकांचा जन्मजात तकतकीत काळा-ब्राँझ रंग एका वेगळ्या प्रकारे उठून दिसतो. पण याच पार्श्वभूमीमुळे उच्च मूल्यांकाच्या नोटांवर आफ्रिकी बायकांबरोबर दाखवलेल्या फ्रेंच महासत्तेचे व्यक्तिरूप असलेल्या 'मारियान' या स्त्रीचे गोरेपणही तितकेच उठून दिसते.


BAO - ५ फ्रँक, १९३४. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ


BAO - १०० फ्रँक, १९३६. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँने हे लोक सर्वसाधारण आफ्रिकी ग्रामीण सृष्टीचे अंग म्हणून दाखवले आहेत. ते आपल्याला बाजाराला जाताना, कापड विणताना, शिकार करताना, शेतात काम करताना, किंवा बाजारात वस्तूंची विक्री करताना दिसतात. या व्यक्तिचित्रणांचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी पुष्कळ जण लॉराँने सन्मुख प्रेक्ष्यात दाखवले आहेत. या विशिष्ट दृश्य-यथार्थतेमुळे हे चित्रण अक्षरशः आपल्या नजरेला भिडते, आणि त्यातून त्या व्यक्तींची जीवनेच्छा जरी व्यक्त होत असली, तरी त्यांचे एक प्रकारे वस्तुकरणही होते. हे लोक आफ्रिकेबद्दलच्या 'आदिम', 'उदात्त वन्यते'च्या (noble savage) साच्यात बद्ध होतात. स्त्रियांचे चित्रण करताना लॉराँ त्यांचा स्तनभार विमुक्तपणे दाखवतो. त्याचबरोबर त्यांचे चित्रविचित्र केशसंभार, दागिने, कपड्यांचे अपुरेपण इत्यादी गोष्टींच्या चित्रणावर लॉराँचा भर दिसतो. अशा चित्रणातून एक विवक्षित 'वासाहतिक एकाग्र-दृष्टी' किंवा 'टक' जाणवते.


BAO - १०० फ्रँक, १९३४. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ


BAO - ५ फ्रँक, १९३६. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँने त्याच्या चित्रणांत महासत्ता आणि वासाहतिक जन यांच्यातले अनुबंध काहीशा हळुवारपणे दाखवले आहेत. 'मारियान' हे फ्रेंच राष्ट्राचे कल्पित स्त्री-रूप आणि आफ्रिकी लोक यांच्या चित्रणात हे अनुबंध विशेष जाणवतात. १००० फ्रँकच्या नोटेच्या आरेखनात लॉराँने मारियान एका आफ्रिकी आई आणि बाळाला अलगद आलिंगन देताना दाखवली आहे, आणि त्या बाळाने तिचे एक बोट नाजूकपणे त्याच्या लहानशा बोटांत पकडले आहे. ५००० फ्रँकच्या नोटांवर मारियान दोन आफ्रिकी बायकांच्या मधोमध, त्यांच्या खांद्यांवर हात ठेवून उभी आहे. या बायका स्तन उघडे ठेवलेल्या आणि आफ्रिकी दागिन्यांनी मढलेल्या आहेत. याउलट मारियान श्वेतवस्त्रा आणि ग्रीक देवतेच्या परंपरेतली दाखवली आहे. याच नोटेच्या मागच्या बाजूला तंतुवाद्य वाजवणारा आफ्रिकी पुरुष आणि ताडाची झावळी हातात घेतलेली आफ्रिकी स्त्री आहे, ज्यांच्या चित्रणातही ग्रीक देवताचित्रणाचे आफ्रिकी प्रतिबिंब दिसते.


BAO - १००० फ्रँक, १९३७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ


BAO - ५००० फ्रँक, १९४७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
आफ्रिकी वसाहती लोकांनी दुसऱ्या महायुद्धात दिलेल्या योगदानाची लॉराँ आवर्जून नोंद घेतो. १९४६ साली जारी केलेल्या ५०० फ्रँकच्या नोटेवर त्याने फ्रान्सचा राष्ट्रध्वज हेलावणारी आफ्रिकी स्त्री आणि एका फ्रेंच सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे दोन आफ्रिकी सैनिक यांची चित्रणे दाखवली आहेत.


BAO - ५०० फ्रँक, १९४७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँच्या चित्रणशैलीचा मोठा प्रभाव फ्रेंच राष्ट्रीय आणि वासाहतिक नोटांवर पडला. त्याची आरेखनशैली – खास करून व्यक्तींवर भर आणि सौम्य रंगच्छटांची पार्श्वभूमी या बाबी – पुढची अनेक दशके फ्रेंच नोटांचा भाग बनली. आफ्रिकेतल्या चलनांत त्याने आणलेल्या वासाहतिक दृश्यमयतेची झलक आपल्याला त्याच्यानंतर नोटांसाठी चित्रणे-आरेखने करणाऱ्या काही कलाकारांच्या कामात दिसते. ऑंरी क्लेमाँ-सेरव्हो (Henri Clément-Serveau १८८६-१९७२) आणि रेमाँ व्होद्यो (Raymond Vaudiau १९१०-१९९५) यांच्या चित्रण आणि आरेखन कामांत ती विशेषेकरून ओळखता येते. व्होद्यो हा केवळ रंगकर्मी कलाकारच नव्हता तर चित्रफितींचा निर्माता आणि मध्य / विषुववृत्तीय आफ्रिकेत मानववंशशास्त्रीय काम करणारा एक शोधक-प्रवासीही होता. क्लेमाँ-सेरव्हो आणि व्होद्यो या दोघांच्याही कामात आपल्याला व्यक्तिचित्रणाबरोबरच आफ्रिकी कलाकुसरीच्या वस्तूंचीही उपयोजना दिसते. या वस्तू आणि आफ्रिकी व्यक्ती यांची चित्रणे यातून सूचित होणाऱ्या 'आदिमते'ला विरोधाभास म्हणून नोटांच्या दुसऱ्या बाजूला अनेकदा औद्योगिक अवजारे, विमानतळ, मालवाहतूक, यांत्रिक शेती इत्यादींची चित्रणे या दोघांनी वापरली. त्यातून वासाहतिक सत्तेने या भागांत 'आधुनिकता' आणली या प्रमेयावर त्यांची श्रद्धा असल्याचे आपल्याला दिसते. विशेष रंजक गोष्ट म्हणजे ज्या कलाकुसरीच्या वस्तूंचे उपयोजन यांनी केले, त्यांपैकी अनेक युरोपातल्या मानवशास्त्रीय संग्रहालयात होत्या; ज्या देशांच्या नोटांवर त्या पाहायला मिळतात, त्या देशांत नव्हत्या. काही वस्तू तर अशा आहेत की, त्यांचा या फ्रेंच वसाहती देशांशी काही संबंधही नव्हता. व्होद्योने तयार केलेल्या एका आरेखनात वापरलेल्या एका 'बेनिन ब्राँझ'चे उदाहरण इथे घेता येईल.


अँन्स्तीत्यु देमीसियों, फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो - १०० फ्रँक, १९५६. आरेखन-कलाकार - ऑंरी क्लेमाँ-सेरव्हो


अँन्स्तीत्यु देमीसियों, फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो - ५०० फ्रँक, १९५६. आरेखन-कलाकार - रेमाँ व्होद्यो
हे सोळाव्या शतकातले शीर्ष-शिल्प इडिया नावाच्या 'ईयोबा' अथवा राजमातेचे आहे. बेनिन हे उत्तर नायजेरियातले आफ्रिकी साम्राज्य – त्याचा साम्राज्यवादी उच्छेद केला तो ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी नव्हे. त्यावेळी लुटून नेलेली ही ब्राँझची शिल्पे आता जगभरातल्या अनेक संग्रहांत विखुरलेली आहेत. व्होद्योने त्याच्या आरेखनात वापरलेले शीर्ष-शिल्पही ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. वसाहतवादी कारवायांतून झालेल्या लुटीच्या वस्तू त्या त्या देशांना पुन्हा परत द्यायची जी चळवळ गेली काही वर्षे जोमाने चालू आहे, त्या चळवळीत या ब्राँझ शिल्पांना महत्त्वाचे स्थान आहे. ही शिल्पे वसाहतवादी हिंसेचे प्रतीक बनली आहेत. व्होद्योने या शिल्पाच्या बाजूला अर्धनग्न आफ्रिकी शेतमजूर शेतात हाताने काम करताना दाखवले आहेत, आणि नोटेच्या दुसऱ्या बाजूवर व्यवस्थित कपडे आणि दागिने घातलेली एक आफ्रिकी युवती असून तिच्या पार्श्वभूमीला औद्योगिक नांगराचे चित्र आहे. या दोन चित्रणांतून वासाहतिक अनुषंगाने आधुनिकता आणि सुसंस्कृतता आली, हा संकेत इथे स्पष्टपणे दिलेला जाणवतो. व्होद्योने आरेखित केलेल्या या नोटा १९५६ साली फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो या देशांमध्ये कार्यरत असलेल्या 'अँन्स्तीत्यु देमीसियों'ने जारी केल्या, पण १९६० नंतर BCEAO बँकेने काढलेल्या स्वातंत्र्य-पश्चात नोटांवरही हे आरेखन सुरु राहिले.

'ईयोबा' (राजमाता)चे शीर्ष-शिल्प, बेनिन, उत्तर नायजेरिया (ब्रिटिश म्युझियम)
ब्रिटिश आफ्रिकी वसाहतींतल्या नोटा
फ्रेंच नोटा आणि ब्रिटिश नोटा यांच्यातला अगदी ठळकपणे जाणवणारा दृश्यात्मक फरक म्हणजे ब्रिटिश नोटांवर आफ्रिकी व्यक्तींचे चित्रण अभावानेच आढळते. ब्रिटिश पूर्व आफ्रिकेच्या पूर्ण नोट-इतिहासात म्हणजे १९२० ते १९६५ या वर्षांत काढलेल्या एकाही नोटेवर व्यक्तिचित्रण नाही – अपवाद फक्त ब्रिटिश राजा/राणीचा! ब्रिटिश वासाहतिक नोटा बहुशः ब्रिटनस्थित खाजगी कंपन्या छापत असल्याने आणि त्यांच्यावर फ्रेंच नोटांप्रमाणे आरेखनकारांची किंवा चित्रणकारांची नावे आढळत नसल्याने, त्यांचे चित्रण-आरेखन कोणी केले हे केवळ नोटांवरून समजत नाही. ब्रिटिश नोटा जारी करण्याच्या कामात वासाहतिक प्रशासने आणि या कंपन्या यांच्यात मध्यस्थ म्हणून ब्रिटिश सरकारचे 'क्राऊन एजंट्स' हे खाते काम करी. नोटांची आरेखने ठरवण्याचे काम वासाहतिक प्रशासने, नोटा छापणाऱ्या कंपन्या आणि क्राऊन एजंट्स या संस्था डॉ. ए. जे. बुल या सल्लागाराच्या मदतीने करे. हे डॉ. बुलसाहेब 'लंडन काऊंटी कौन्सिल स्कूल ऑफ फोटो एंग्रेव्हिंग अँड लिथोग्राफी' या संस्थेत काम करत आणि नोटांच्या आरेखनांच्या निवडीवर तसेच त्यांच्या विषय-निश्चित्तीवर त्यांचा मोठा प्रभाव होता.
ब्रिटिश वासाहतिक नोटांच्या दृश्यात्मकतेची चिकित्सा आपल्याला या बाबी ध्यानात ठेवून लागते. वेगवेगळ्या प्रतिभूती मुद्रणालयांनी छापल्या असल्या, तरी या समान पार्श्वभूमीमुळे ब्रिटिश नोटांचीही एक बनलेली दिसते. या नोटा वासाहतिक प्रशासने त्यांच्या स्थानिक सार्वजनिक प्रशासनाचा भाग म्हणून जारी करत आणि त्यामुळे त्यांच्यावर काही नैसर्गिक भूदृश्यांचा समावेश केला जात असे. पण असे असले तरीही या नोटांच्या आरेखनांत कुठेतरी ब्रिटनचा संदर्भ येणे आवश्यक होते, कारण अर्थातच या नोटा अद्याप स्वतंत्र राष्ट्र-राज्याकडून जारी केलेल्या नसत. हा संदर्भ दृष्टीबद्ध करण्याच्या काही योजना होत्या. एकोणिसाव्या शतकांतल्या कागदी चलनावर 'ब्रिटानिया'सारखी रूपकात्मक चित्रे दाखवली जात आणि अनेकदा तिच्या आगेमागे विवक्षित वसाहतींतले प्राणी, पक्षी, झाडे इत्यादी दाखवून तिचा या भूभागाशी असलेला संबंध दृष्टिबद्ध केला जाई. विसाव्या शतकात केवळ ब्रिटिश राजाचे चित्र हा संदर्भ जोडायला पुरेसे ठरू लागले. किंबहुना, राजा/राणीचा मुखवटा हा कित्येक वासाहतिक नोटांवरचा ब्रिटिश प्रभुत्व दाखवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे दिसते. वासाहतिक प्रशासनाची मुद्रा किंवा राजचिन्ह हा ब्रिटिश प्रभुत्व दृष्टीबद्ध करण्याचा आणखी एक मार्ग होता. अशी चिन्हे दाखवण्याची ब्रिटिश कागदी चलनाची परंपरा होती. अगदी १८व्या शतकात खाजगी बँकांकडून जारी केलेल्या ब्रिटिश नोटांवरही अशी चित्रणे आपल्याला दिसतात. पण एकोणीस-विसाव्या शतकात आफ्रिकी वसाहतींसाठी पूर्णपणे युरोपियन परंपरेत बसणारी अशी चिन्हे निर्माण केली गेली. ढाल, दोन्ही बाजूंनी ती उचलून धरणारे प्राणी, रिबिनी, झेंडे, लॅटिन भाषेतली बोधवाक्ये वगैरे मिथकीय बाजातून ब्रिटिश अधिसत्ता दृष्टीबद्ध करण्याचे काम ही चिन्हे करत. त्या चिन्हांचे उपयोजन अनेकदा ब्रिटिश वासाहतिक नोटांवर केलेले दिसते.
एवंच, राजा/राणी किंवा राजचिन्हे यांच्याशिवाय ब्रिटिश वासाहतिक नोटांवर जर काही प्रामुख्याने दिसत असेल, तर ते म्हणजे निसर्ग किंवा भूदृश्ये. या भूदृश्यांमुळे (आणि काही वेळा स्थानिक भाषा आणि लिपीच्या उपयोगामुळे) या आरेखनांचा त्या त्या वसाहतींशी यथायोग्य दृक-संदर्भ जोडला जाई. ही दृश्ये बहुशः 'लाँग शॉट' प्रकारची, दुरून तो भूभाग पाहिल्यासारखी आहेत. मोठमोठ्या जलाशयांवर विहार करणाऱ्या लहानशा शीडबोटी, नद्यांची पात्रे, सव्हाना किंवा उष्ण-कटिबंधीय जंगले, धबधबे, अशा चित्रांतून आफ्रिकी भूदृश्यांचे विस्तीर्णत्व आणि त्याचबरोबर महासत्तेपासून त्यांचे अतिशय दूरवर असलेले स्थान या दोन्ही बाबींवर एक प्रकारचे दृग्भाष्य ही चित्रणे करतात. वन्यजीवन हा आफ्रिकेच्या बाबतीत लोकप्रिय असणारा विषय इथेही मोठ्या प्रमाणावर वापरलेला दिसतो.


ऱ्होडेशिया आणि न्यासालँड - १० शिलिंग, १९५७ (लेक न्यासाचे चित्र)


दक्षिण ऱ्होडेशिया - १० शिलिंग, १९५१ (व्हिक्टोरिया फॉल्स)
या सर्व आरेखनांमध्ये आफ्रिकी जनता कुठेच दिसत नाही ही बाब अगदी स्पष्टपणे जाणवते. ब्रिटिशांच्या दक्षिणेकडच्या वसाहतीत, जिथे 'अधिवासी वसाहतवाद' जोरात होता, तिथे तर हे अधिकच स्पष्ट होते. काही अपवादात्मक उदाहरणांत आफ्रिकी लोक दाखवलेले दिसतात; उदाहरणार्थ १९५३ साली ब्रिटिश वेस्ट आफ्रिकन करन्सी बोर्डाने जारी केलेल्या नोटा. पण इथे ते लोक भुईमूग, कोको आणि पाम तेल या नगदी पिकांची शेती करण्याच्या संदर्भात, म्हणजेच वासाहतिक प्रशासनाच्या, आणि पर्यायाने महासत्तेच्या फायद्याची कामे करताना दाखवले आहेत. याहूनही दुर्मीळ म्हणजे वसाहती भूभागाच्या वसाहतपूर्व इतिहासाची दखल घेणारी चित्रणे. याचे एकच उदाहरण आपल्याला दिसते, ते म्हणजे 'ग्रेट झिम्बाब्वे' या साम्राज्याच्या राजधानीचे अवशेष आणि तिथला मनोरा. या अवशेषांचे चित्रण सर्वप्रथम १९३९ सालच्या दक्षिण ऱ्होडेशियाच्या नोटांवर दाखवले गेले. पुढे हेच चित्र ऱ्होडेशिया आणि न्यासालँड या वसाहतींचे संयुक्त चलन असलेल्या १९५६ सालच्या एक पौंडाच्या नोटेवर तसेच साठीच्या दशकात ऱ्होडेशियाने काढलेल्या पाच पौंडाच्या नोटेवरही वापरले गेले. .


ऱ्होडेशिया - ५ पाउंड, १९६४ (ग्रेट झिम्बाब्वेचे अवशेष)


ब्रिटिश वेस्ट आफ्रिका करन्सी बोर्ड - १०० शिलिंग / ५ पाउंड, १९५३. (पाम तेलबियांची शेती)
पोर्तुगीज आणि इतर वासाहतिक चलनांची दृश्यात्मकता
वासाहतिक चलनांवर अनेकदा प्रतीकरूपांचे चित्रण दिसते हे वर सांगितलेच. या प्रतीकरूपांत 'मारियान' किंवा 'ब्रिटानिया' यांच्यासारखी महासत्तांची मानवी आणि 'राष्ट्रवादी' प्रतीकरूपे अधिक प्रमाणावर दिसतात हेही आपण पाहिले. पण अशा प्रतीकरूपांचा विलक्षण आढळ दिसतो तो पोर्तुगीज वासाहतिक चलनावर. पोर्तुगीज महासत्ता आपल्या वसाहतींकडे आणि साम्राज्याकडे एक राष्ट्रीय गौरवाची बाब म्हणून कशी बघे याचे पडसाद आपल्याला या चित्रणात उमटलेले दिसतात. याचे एक कारण म्हणजे पोर्तुगिजांचे आफ्रिकेत जे साम्राज्य होते, ते इतर युरोपीय महासत्तांच्या साम्राज्यांपेक्षा पुष्कळच जुने होते. त्याची पाळेमुळे बर्लिनोत्तर 'ओरबाडणुकी'त नव्हती, तर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी केलेल्या नाविक दिग्विजयात होती. पोर्तुगीज आफ्रिकेच्या पुष्कळशा नोटा ब्रिटनस्थित ब्रॅडबरी विल्किन्सन या कंपनीद्वारे छापल्या गेल्या आहेत. टॉमस द ला रू या कंपनीकडेही पोर्तुगीज साम्राज्याच्या काही नोटा छापायची कंत्राटे देण्यात आली होती. यामुळे त्यांची आरेखन आणि चित्रण शैली ही पुष्कळशी ब्रिटिश वासाहतिक नोटांशी साधर्म्य दाखवणारी आहे.
या नोटांवर विशेष उठून दिसते ती एका युरोपीय युवतीची प्रतिमा, जी अर्थातच पोर्तुगीज महासत्तेचे प्रतीक आहे. ब्रॅडबरी विल्किन्सनच्या अनामिक आरेखनकारांनी हिचे जे चित्र निर्माण केले आहे त्यात ती जहाजाच्या अग्रभागावर, नांगराच्या दांडीवर बसलेली दाखवली आहे आणि तिच्या पार्श्वभूमीवर एका 'पॅकेट' जहाजाचे चित्रण आहे. त्या जहाजाच्या पलीकडे, क्षितिजाकडे टक लावून ती विचारमग्न स्थितीत बसली आहे. १९५० नंतर द ला रू कंपनीने केलेल्या आरेखनांत अशीच पाठमोरी स्त्री जहाजांच्या एका समूहाकडे पहाते आहे, असे चित्रण आहे. या समूहांत नॉर्स लाँगशिप, कॅरावेल, गॅल्यन, पॅकेट आणि आधुनिक प्रवासी जहाज अशा वेगवेगळ्या काळातल्या नौकांचा समावेश आहे. या चित्रणांचा संदर्भ निश्चितपणे पोर्तुगीजांच्या दर्यावर्दी भूतकाळाशी लावता येतो आणि पोर्तुगीज महासत्ता तिच्या आफ्रिकी साम्राज्याकडे या गौरवशाली भूतकाळाचेच सातत्य म्हणून पाहात असे, ही भूमिका स्पष्ट होते. हे स्त्रीचे प्रतीकरूप आपल्याला अन्य काही नोटांवर आफ्रिकी जनतेकडे 'मातृभावा'ने पाहताना आणि त्यांच्याकडून वसाहतींचे फायदे (वस्तू, पिके, फळे, प्राणी) इत्यादी शालीनपणे स्वीकारताना दिसते.


BNU, अंगोला - १०० एस्क्युडो, १९२१ (जहाजाच्या नांगरावर बसलेली स्त्री)


BNU, पोर्तुगीज गिने - ५० एस्क्युडो, १९७१ (नुनो त्रिस्ताव आणि जहाजांच्या ताफ्याकडे पाहणारी स्त्री)
वासाहतिक इतिहासातले 'हिरो' हे पोर्तुगीज चलनावर अधिक प्रमाणात दिसतात हेही त्यांच्या दृश्यात्मकतेचे एक वैशिष्ट्य आहे. फ्रेंच नोटांवर व्यक्तिचित्रणाचे प्राबल्य असले तरी वासाहतिक प्रशासक किंवा आफ्रिकेतले 'जेते' त्यांच्यावर दिसत नाहीत. नाही म्हणायला एमिल जोंतील या फ्रेंच सेनाधिकाऱ्याचे चित्र आरेखक-कलाकार पॉल म्युनिए याने तयार केलेल्या 'बहुदेशीय' नोटांवर दिसते. जोंतीलने मध्य आणि विषुववृत्तीय आफ्रिकेत फ्रेंच लष्कराच्या मदतीने 'स्वाऱ्या' करून तिथल्या नाठाळ (!) 'रानटी' लोकांना वठणीवर आणले आणि फ्रेंच साम्राज्याची वृद्धी केली.


कॅस सॉंत्राल द ला फ्रांस दुत्रमेर, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका - २०-फ्रँक, १९४७ (एमिल जोंतील)
पण पोर्तुगीज नोटांवर अगदी पंधराव्या शतकातल्या नुनो त्रिस्ताव, वास्को द गामा अशा दर्यावर्दींपासून एकोणिसाव्या-विसाव्या शतकातले फ्रान्सिस्को द ओलिव्हेईरा कामिसोसारखे धंदेवाईक आणि जोआव अझेवेदो कुटिन्हो किंवा मार्शल आंतोनिओ ऑस्कर कार्मोना यांच्यासारखे वसाहतवादी प्रशासक अशा अनेकांची वर्णी लागलेली दिसते. मोझांबिकमधल्या 'गाझा' राज्याचा राजा न्गुनगुन्हाने याने १८९५मध्ये केलेले बंड चिरडून त्याला हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा जनरल मुझीन्यो द अल्बुकर्क हे आणखी एक उदाहरण. BNUच्या नोटांवर आफ्रिकी लोकांचे चित्रण दिसत नाही, पण बँको दे अंगोलाच्या नोटांवर ते दिसते. अर्थात इथेही पोर्तुगिजांचा वरचष्मा आहेच, कारण बहुतेकदा आफ्रिकी लोक हे पोर्तुगीजांनी आणलेल्या धर्मप्रसार, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी 'सुसंस्कृतपणा'च्या आविष्कारांच्या प्रभावाखाली असल्याचे दाखवले आहे. किपलिंगच्या 'white man's burden' या वसाहतवादी वाक्प्रचाराची थेट आठवण करून देणारी ही दृश्ये आहेत. वासाहतिक इतिहासातले काही ठळक टप्पेही या नोटांवर आपल्याला दृश्यरूपात दिसतात. उदाहरणार्थ, डच आणि पोर्तुगीज यांच्यामधल्या युद्धात १६४८ साली लुआंडाचा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा हस्तगत केला, किंवा १८८५ मध्ये 'कबिंडा' या लहानशा वसाहतीचा ताबा घेताना तिथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांशी पोर्तुगीजांनी केलेला 'सिम्युलाम्बुकोचा तह', अशा घटनांची चित्रणे.


बँको दे अंगोला - ५० एस्क्युडो, १९७२ (मार्शल कार्मोना)


BNU, मोझाम्बिक - १००० एस्क्युडो, १९५३ (जनरल मुझीन्यो द अल्बुकर्क)


बँको दे अंगोला - १० अंगोलार, १९४६ (सिम्यूलांबुकोचा तह)
प्रतीकरूपे आणि आफ्रिकी जनजीवन यांची रंजक सांगड आपल्याला बेल्जियन काँगोच्या चलनावर दिसते. इथे आफ्रिकी लोकांबरोबरच वन्यजीवनाचेही फार सुंदर चित्रण केलेले आहे. वासाहतिक काळाच्या अगदी शेवटी, काँगोला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षेच आधी, काढलेल्या काही नोटा सोडल्यास काँगोच्या नोटांवर बेल्जियन राजघराण्याचे कुठतेही चित्रण दिसत नाही. पण या अखेरच्या नोटांवर का होईना, नराधम राजा दुसरा लिओपोल्ड याचे चित्र एकदा तरी आपल्याला दिसतेच! काँगोला स्वातंत्र्य देताना बेल्जियन राजा बोद्वां याने जे भाषण केले त्यात त्याने लिओपोल्डचे गोडवे गायले होते आणि काँगोचे नवनिर्वाचित अध्यक्ष पॅट्रिस लुमुम्बा यांनी त्याचा जागच्या जागी स्पष्ट धिक्कार केला होता ही गोष्ट ध्यानात ठेवता नोटांवरच्या या चित्रणाची तात्कालिकता आपल्या लक्षात येते.


बाँक सॉंत्राल द काँगो बेल्जीक ए दु रूआंडा-उरूंडी - १०० फ्रँक, १९५६ (दुसरा लिओपोल्ड)
पोर्तुगीज आणि ब्रिटिश नोटांप्रमाणेच बेल्जियन काँगो आणि रूआंडा-उरूंडी या त्याला लागून असलेल्या आणखी दोन वसाहतींमध्ये चालणाऱ्या नोटा प्रामुख्याने खाजगी कंपन्या छापत. पण १९३६-३७मध्ये काढलेल्या नोटा याला अपवाद आहेत. त्यांची निर्मिती बेल्जियमच्या राष्ट्रीय बँकेच्या मुद्रणालयात केली गेली होती. या नोटांचे आरेखन बेल्जियन रंगकर्मी आंद्रे आले (André Hallet) याने केले होते तर कोरीवकाम करणारा एन्द्रे होरवाथ हा हंगेरियन / स्लोव्हाकियन शिल्पी होता. १० फ्रँकच्या नोटेवरच्या चित्रणासाठी आलेने त्याच्या 'ला मार्शे आ बुजुम्बुरा' या रंगचित्राचा आधार घेतला होता. त्यात त्याने उरूंडीमधल्या बुजुम्बुरा शहरात भरणाऱ्या आफ्रिकी बाजाराचे मनोज्ञ चित्रण केले आहे. या नोटेच्या मागच्या बाजूवर आफ्रिकी सव्हानाचा गवताळ भूभाग आणि त्यात चरणाऱ्या हरणांचे सुंदर चित्रण केलेले आहे. अशा प्रकारचे वन्यजीवन आणि लोकजीवन यांची विरोधाभासी सांगड घालणारे चित्रण पुष्कळशा आफ्रिकी नोटांवर दिसते, पण इथे एका चित्रकाराची प्रत्यक्ष कृती आणि नोटेच्या आरेखनात तिचे त्याने केलेले उपयोजन जसे दिसते तसे अन्यत्र कुठेच दिसत नाही.


बाँक द काँगो बेल्ज - १० फ्रँक, १९३७. ‘ला मार्शे आ बुजुम्बुरा’ या रंगचित्रावर आधारित आरेखन.कलाकार - आंद्रे आले
उपसंहार
वसाहतवादी युरोपियांनी आफ्रिकेत 'आधुनिक' प्रकारची, म्हणजे यंत्रांनी उत्पादित केलेली, नाणी आणि नोटांसारखी चलन-माध्यमे तसेच नवीन वासाहतिक चलने आणून आफ्रिकेतल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण चलन-परंपरेचे सपाटीकरण केले. या बदलाचे अत्यंत गंभीर असे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम झाले. वसाहतवादी कार्य-व्यवहारांतून आणि प्रशासन किंवा कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी विषयांच्या अंमलबजावणीतून युरोपीय लोकांची आफ्रिकेबद्दलची जाण आणि जाणीव, दोन्ही घडत गेल्या. या जडणघडणीचे प्रतिबिंब युरोपीय कला-चळवळींत पडले. पण त्यामागे वासाहतिक असमानता आणि शोषण यांची काळी पार्श्वभूमी होती.
वासाहतिक चलनांच्या दृश्यात्मकतेचा अभ्यास हा आपल्याला या बदलामागच्या ऐतिहासिक भूमिकांचे परिशीलन करण्यास उद्युक्त करतो आणि त्याचबरोबर, पुराव्याचे साधन म्हणून सहाय्यभूतही ठरतो. या अभ्यासातून वासाहतिक 'दृश्य-संस्कृती' आणि 'एकाग्रता' किंवा 'टक' (gaze) यांच्याबद्दलचे महत्त्वाचे पुरावे मिळतात. या दृश्यात्मकतेच्या घडणीत वेगवेगळ्या वासाहतिक महासत्तांनी बजावलेल्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. त्यांतून निर्माण झालेल्या चित्रणांतून आपल्याला हे दिसते की, या 'एकाग्रते'चे आयामही वेगवेगळे होते. वाम्बुई म्वांगी यांनी म्हटल्याप्रमाणे चलनाची आरेखने आणि चित्रणे ही त्या-त्या वासाहतिक सरकारच्या 'स्व-प्रतिनिधित्वा'चे तसेच त्या त्या वसाहतींच्या प्रतिनिधित्वाचेही द्योतक ठरतात. फ्रेंच महासत्तेने केलेली वसाहती व्यक्तींची वैचित्र्यपूर्ण चित्रणे, ब्रिटिशांनी आफ्रिकी समाजांबाबत पाळलेली 'अदृश्यता', पोर्तुगीजांनी त्यांच्या चलनाच्या दृश्यात्मकतेत भूतकाळाच्या सातत्यावर आणि साम्राज्य-महासत्ता यांच्यातल्या ऐतिहासिक अनुबंधांवर दिलेला भर या विवक्षित बाबी म्वांगींच्या मताला पोषक आहेत. या दृश्यात्मकतेतून वसाहतवादी युरोपीयांना आफ्रिका खंड म्हणजे 'आदिम', 'विचित्र', 'नैसर्गिक', 'वन्य' आणि 'सुदूर' कसा वाटे असे याचे भान आपल्याला प्राप्त होते. युरोपीय लोक वासाहतिक आफ्रिकेकडे 'सुधारणा'वादी दृष्टिकोनातून कसे बघत याचेही मनोज्ञ दर्शन ही चलनी माध्यमे घडवतात. या 'सुधारणे'चे आणि 'आधुनिकते'चे श्रेय घेण्यासाठी आफ्रिकी समाजांचे मागासपण आणि तथाकथित 'असंस्कृत'पण प्रकर्षाने दाखवायला युरोपीय महासत्ता आफ्रिकी कलावस्तूंचाच वापर करतात. आफ्रिकी वसाहती आणि महासत्ता यांच्यातले विविध प्रकारचे 'अंतर' – सांस्कृतिक, वांशिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि भौगोलिक – संकेतबद्ध करणे हे या दृश्यात्मकतेचे उद्दिष्ट आहे. या दृश्यमयतेच्या मागे कार्यरत असलेली वासाहतिक वैचारिकता आपल्याला त्यांच्या विश्लेषणातून समजता येते, पण अद्याप ही दृश्यात्मकता साध्य करणाऱ्या कलाकारांच्या योगदानाचा अभ्यास म्हणावा तितका झालेला नाही. त्या दृष्टीने भविष्यात अजून प्रयत्न झाले तर या अभ्यासाचे आणखी रंजक कंगोरे प्रकाशात येतील.
(नोटांची चित्रे www.banknoteindex.com आणि www.numizon.com या संकेतस्थळांवरून साभार)
आफ्रिकेतील भारतीय गुलाम: केप ऑफ गुड होप आणि डच ईस्ट इंडिया कंपनी.
- - बॅटमॅन
पूर्वपीठिका
गुलामगिरी हे जगाच्या इतिहासातले एक जाचक आणि लज्जास्पद सत्य आहे. लिखित इतिहासाची उत्पत्ती साधारणत: इसपू ३०००च्या आसपासची मानली जाते. तेव्हापासून आजवर जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कमीअधिक प्रमाणात ही लाजिरवाणी प्रथा चालत आलेली आहे. स्थलकालपरत्वे 'गुलाम' या शब्दाची व्याख्या, त्याला मिळणारी वागणूक, इत्यादी अनेक गोष्टींत अर्थातच फरक आहे. परंतु स्वत:च्या इच्छेविरुद्ध आणि बहुतांशी विनामूल्य इतरांचे काम, तेही वर्षानुवर्षे करावे लागणे, जनावरांसारखी खरेदीविक्री होणे किंवा थेट बळकावले जाणे, ही यांमधील मुख्य साम्यस्थळे होत. जागतिक पातळीवर गुलामगिरीबद्दल बोलायचे तर युरोपीय व अमेरिकन गौरवर्णीयांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय स्त्रीपुरुषांना कसे गुलाम केले आणि पिढ्यानपिढ्या बंधनांत जखडून ठेवले, ही कहाणी काही प्रमाणात ज्ञात आहे. मात्र याच्या तुलनेत भारतीय स्त्रीपुरुषांनाही जगभर कसे नेले गेले, हा तितकाच महत्त्वाचा इतिहास अज्ञातच आहे. प्राचीन काळापासून ही गुलामांची निर्यात अखंड सुरू होती. याचे कैक पुरावे तत्कालीन ऐतिहासिक साधनांत विखुरलेल्या स्वरूपात सापडतात. मात्र वास्को दा गामा भारतात आल्यापासून युरोपीयांची जी अखंड वर्दळ भारतात सुरू झाली, तेव्हापासूनच्या गुलामव्यापाराचे पुरावे अधिक नियमितपणे सापडतात. कैक संशोधकांनी भारताच्या विविध भागांतील गुलाम जगभर कसे नि कुठे नेले गेले, याचा तपशीलवार अभ्यास केलेला आहे. मलबार, कोरोमंडल आणि बंगाल ही भारतातील गुलामांची प्रमुख उत्पत्तिस्थाने. तिथून त्यांना आफ्रिका, अरेबिया, मध्य आशिया, इंडोनेशिया, युरोप, अमेरिका, इ. अनेक ठिकाणी नेले जायचे. 'ऐसी अक्षरे'चा या वर्षीचा दिवाळी अंक आफ्रिकेला वाहिलेला असल्याने सदर लेखात आफ्रिकेतील भारतीय गुलामांचा आढावा घेतला आहे. अधिक नेमकेपणे बोलायचे, तर केप ऑफ गुड होप येथील भारतीय, त्यातही प्रामुख्याने बंगाली गुलामांचा विचार इथे केला आहे, कारण तेथील भारतीय गुलामांमध्ये प्रामुख्याने बंगाल्यांचा भरणा होता.
केप ऑफ गुड होप हे तसे मोक्याचे ठिकाण. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्री इस्लामी सत्तांना डावलून भारतापर्यंतचा थेट जलमार्ग सुरू केला तेव्हापासून एक 'फिलिंग स्टेशन' म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची होती. युरोपहून पूर्वेकडे किंवा उलट दिशेने जाणारी सर्व युरोपीय जहाजे इथे थांबत, पिण्याचे पाणी व खाद्यसामान भरून घेत. इ.स. १६५२मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने केप टाऊन येथे एक लाकडी किल्ला बांधला. हळूहळू काही वर्षांनी त्याचे बांधकाम पक्क्या दगडांनी केले गेले. सुरुवातीच्या वर्षांत या वसाहतीची वाढ म्हणावी तशी झाली नाही. पुढे ह्यूगनॉट पंथीय फ्रेंच लोकांचे आगमन मोठ्या संख्येने होऊ लागल्यावर मात्र लोकसंख्येत वाढ झाली. युरोपीय लोक तिथे शेती करून राहत असत. त्यामुळे स्थानिक खोइ व अन्य जमातीच्या लोकांच्या, तुलनेने भटक्या जीवनशैलीला आवश्यक भूभागांवर निर्बंध आल्याने, त्यांची संख्या किनारपट्टीलगत कमी झाली. या वसाहतीची अर्थव्यवस्था जहाजवाहतूक व शेतीवरच अवलंबून होती. शेतीवर व अन्य कामे करण्यासाठी कैक मजुरांची आवश्यकता होती. ही गरज गुलामांकरवी भागवली गेली. अशा प्रकारे केप ऑफ गुड होपमध्ये गुलामांचा शिरकाव झाला. इ.स. १८०६मध्ये डचांनी ही वसाहत ब्रिटिशांकडे सुपूर्द केली व इ.स. १८३४मध्ये ब्रिटिशांनी अधिकृतरीत्या गुलामगिरी रद्द केली. त्यामुळे सदर लेखात हा इ.स. १६५२ ते इ.स. १८३४पर्यंतचाच कालखंड विचारात घेतलेला आहे.
गुलामांचा व्यापार
सर्वप्रथम हा गुलामांचा व्यापार कसा चालायचा हे पाहू. यात अनेक ठिकाणच्या, अनेक धर्मांच्या व वंशांच्या लोकांचा सहभाग होता. मुघल अधिकाऱ्यांचा यात लक्षणीयरीत्या सहभाग असून यात गुजराती व्यापारीही समाविष्ट होते. मुघल अधिकारी प्रामुख्याने मुसलमान, तर गुजराती व्यापारी प्रामुख्याने हिंदू आणि युरोपीय हे ख्रिश्चन होते. याखेरीज युरोपीय कंपन्या आणि आफ्रिका व इंडोनेशिया येथील कैक सत्ताधीश व लुटारूही या धंद्यात होते. डच कंपनीच्या सदस्यांना यात खाजगीरीत्या सहभागाची परवानगी नव्हती. तशीही त्यांना कोणत्याही प्रकारच्या खाजगी व्यापाराची परवानगी नव्हती. यातून बऱ्याच प्रमाणात लाचलुचपतीचे व छुपेपणाने खाजगी व्यापाराचे प्रकार घडत. गुलामांचा व्यापारही त्याला अपवाद नव्हता. अखेरीस इ.स. १७९१मध्ये यात खाजगीरीत्या सहभागाची मुभा देण्यात आली. गुलाम मिळवण्याचे मार्गही अनेक होते. युद्धे, दुष्काळ, इत्यादींमुळे लोकांचे विस्थापन ही तेव्हा नित्याची बाब होती. हरितक्रांती, अन्नसुरक्षा वगैरे भानगडींचा तेव्हा मागमूसही नसल्यामुळे दोन घास अन्नासाठी स्वत:ला विकणे हे तत्कालीन गरीब जनतेसाठी फार अतर्क्य किंवा अकल्पनीय वगैरे अजिबात नव्हते. याशिवाय बंगालच्या किनारी प्रदेशात अनेकदा चाचे लोक यासाठी सरळसरळ धाडी टाकत. जे कोणी दुर्भागी लोक हाती सापडत, त्यांना कुत्र्यामांजरासारखे जहाजांवर टाकून काही काळाने त्यांची विक्री होत असे. शिवाय, मागणी तसा पुरवठा या न्यायाने विशिष्ट प्रदेशातील लोकांचा विशिष्ट कामासाठी गुलाम म्हणून वापर अधिक होत असे. उदा. मादागास्करमधील गुलाम शेतीकामासाठी, तर अंगोलातील गुलाम एकूणच हमाली कामासाठी पसंत केले जात. तुलनेने भारतीय व इंडोनेशियातील काही ठिकाणच्या गुलामांचा वापर कारागीर म्हणून अधिक केला जाई. कोणत्या कामासाठी वापरायचे हे ठरल्यावर त्यानुसार त्यांच्या किमतीतही फरक पडत असे. बंगाली महिला गुलामांचे विणकामातील कौशल्यही उल्लेखनीय होते. तसे कैक उल्लेख तत्कालीन साधनांत दिसून येतात. केपटाऊनमधील साउथ आफ्रिकन कल्चरल हिस्टरी म्युझियममध्ये मालती नामक बंगाली गुलाम महिलेने विणलेल्या कापडाचा एक तुकडाही ठेवण्यात आला आहे.

युरोपियांच्या नजरेत या सर्व गुलामांचीही एक उतरंड अस्तित्वात होती, त्यानुसार भारतीय गुलाम साधारणपणे मध्यभागी असत. मिश्रवंशीय गुलाम सर्वोच्च तर मादागास्करमधील गुलाम सर्वांत खालचे मानले जात. धाडी टाकणारे फक्त चाचे लोक नसून युरोपीय कंपनीवाले व इतरही असत.
गुलामांचे जीवन
बळजबरीने गुलामांना केप ऑफ गुड होपमध्ये आणल्यावर त्यांची रवानगी 'स्लेव्ह लॉज' अर्थात खास गुलामांसाठी तयार केलेल्या घरांत होई. यात बरीच गर्दी असे. त्यातल्या त्यात डच कुटुंबांकडे काम करणारे गुलाम त्यांच्या घराजवळ तुलनेने बऱ्या स्थितीत राहत. बाकीच्यांना मात्र दाटीवाटीतच राहावे लागे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. विशेषत: इ.स. १७५३मध्ये केप ऑफ गुड होपमधील डच वसाहतीचा गव्हर्नर राईक टुलबाख याने लागू केलेला 'टुलबाख कोड' पाहताना याचे प्रत्यंतर येते. यानुसार कोणत्याही गुलामाला -
रात्री १०नंतर बाहेर पडण्याची मुभा नव्हती.
रात्री त्यांनी गाणेबजावणेच काय, शिट्ट्या वाजवणेही निषिद्ध होते.
सुट्टीच्या दिवशी व रविवारच्या ख्रिस्ती प्रार्थनेवेळी त्यांनी रस्त्यात किंवा चर्चबाहेर एकत्र जमणे निषिद्ध होते.
गुलामांना इतर गुलामांसोबत रस्त्यावर भेट झाली असता बोलण्याची मनाई होती.
गुलामांना कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे निषिद्ध होते.
गुलामाने कोणत्याही मुक्त व्यक्तीविरुद्ध वर्तन केल्यास जाहीररीत्या त्याला/तिला बेड्या घालून चाबकाचे फटकारे दिले जात.
मालकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा करणाऱ्या गुलामाला थेट मृत्युदंड दिला जाई.
हे नियम सर्वच गुलामांना लागू होते व त्याची झळ त्यांना बसत असे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मादागास्कर व अन्य ठिकाणच्या गुलामांना बहुतांश सहकुटुंबच पकडून आणले जात असे. पण तसे बंगाली गुलामांबाबतीत घडत नसे. त्यांना बहुतांश सुटेच आणले जाई. आणि यातही स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असे. कुटुंबापासून तुटलेल्या या पुरुषांना त्यामुळे त्यांच्या लैंगिक व कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी इतर गुलामांशी बराच संघर्ष करावा लागे. त्यातच त्यांच्या हातून बलात्कार, खून, इत्यादींसारखे गुन्हेही घडत. याला अर्थात क्वचित अपवाद असले तरी साधारणपणे असे दिसत नाही. इ.स. १७८२मध्ये आई व मुलांची ताटातूट करू नये असा हुकूम डचांनी काढला तरी त्याची अंमलबजावणी कितपत झाली, हे शंकास्पदच आहे.
अशाही परिस्थितीत बंगाली गुलामांनी कोरोमंडल (आजचे तमिळनाडू व आंध्र प्रदेश येथील किनारपट्टी), मलबार (केरळ), श्रीलंका, इंडोनेशिया, मादागास्कर, इ. ठिकाणच्या गुलामांसोबत संबंध ठेवले. त्यांच्या नोंदी अधूनमधून सापडतात. त्यांना मालकांकडून अनेकदा त्रास होत असे. याचे एक उदाहरण तत्कालीन व्यवस्थेवर चांगलाच प्रकाश टाकते. माणिका नामक बंगाली गुलाम स्त्रीने रेनियर नामक मादागास्करच्या गुलाम पुरुषाशी लग्न केले व त्यांना त्यातून एक मुलगी झाली. वयात आल्यावर ती सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याच्या असूयेपोटी या दोघांच्या मालकाची बायको त्या मुलीला खूप त्रास देत असे. एके दिवशी छळाचा अतिरेक झाल्यावर रेनियरने त्याच्या मालकावर हल्ला करून त्याला ठार मारले आणि स्वत: पळून गेला. तब्बल आठ वर्षांनी त्याला पकडण्यात यश आले.
गुलामांचे संबंध त्यांच्या मालकांशीही येत. यात बहुतांश गोरे मालक आणि गुलाम स्त्रिया यांचे प्रमाण जास्त असे. पण उलट बाजूच्या घटनांच्याही काही नोंदी आहेत. टायटस नामक बंगाली गुलामाचे त्याच्या गोऱ्या मालकिणीशी प्रेमप्रकरण होते. १७१४ साली या प्रेमी युगुलाने टायटसच्या मालकाला ठार मारले. कोर्टाने टायटसला मृत्युदंडाची शिक्षा दिली. मात्र मालकिणीला विशेष काही शिक्षा दिल्याचे उल्लेख नाहीत.
साधारणपणे बंगाली गुलाम घरकाम, शिवणकाम इत्यादी कामांसाठी वापरले जात. क्वचित कधी इतर कामेही ते करत असल्याच्या नोंदी सापडतात - उदा. सुतारकाम आणि ट्रंपेट वाजवण्याचे काम या गुलामांनी केल्याचे नमूद आहे.
केप ऑफ गुड होपमध्ये आणलेले गुलाम इतक्या वेगवेगळ्या ठिकाणचे होते की त्यांच्यात समान धागे शोधणेच अवघड होते. साधारणत: गुलामांना बाटवून ख्रिश्चन करण्याचे धोरण असले तरी अनेकदा त्याची अंमलबजावणी नीट होत नसे. डच आणि पोर्तुगीज या भाषा मुख्यत: वापरल्या जात असल्या तरी अनेक गुलामांना त्या येत नसल्याचे नमूद आहे. विशेषत: कैक बंगाली गुलामांना बंगाली भाषा सोडून अन्य कोणतीच भाषा येत नसल्याच्या नोंदी सापडतात. भाषिक, वांशिक आणि धार्मिक प्रतलांवर पाहता केप ऑफ गुड होपमधील गुलाम समाजात मुळातच खूप वैविध्य होते आणि ते मिटवून समान सांस्कृतिक संस्कार करण्याचे धोरणही विशेष जोराने राबवले गेले नाही. त्यामुळे अमेरिकेतील आफ्रिकन वंशीय गुलामांमध्ये पुढे जशी एक विशिष्ट संस्कृती निर्माण झाली तशी इथे होऊ शकली नाही.
गुलामांचे उठाव इ.
या गुलामांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीला ते साहजिकच कंटाळत. मालकांचा जाच असह्य झाला की त्याचा प्रतिकारही करत. अर्थात डच अंमल असेतोवर सशस्त्र उठावात मात्र याचे रूपांतर झाले नाही. तोवर त्यांच्या प्रतिकाराची विविध रूपे असत. सामान्यत: ते नेमून दिलेल्या कामांत टाळाटाळ करत किंवा अधिक त्रास झाल्यास मालकापासून दूर पळून जात. केपच्या वसाहतीजवळच्या डोंगराळ प्रदेशात आश्रय घेत. आधीच वसाहतीची लोकसंख्या कमी, त्यात आसपासचा प्रदेश डोंगराळ. त्यामुळे अशा पळून गेलेल्या गुलामांना पकडणेही कठीण असे. हे मोठ्या प्रमाणावर झाल्यास मात्र डच मालक त्याचा इलाज करत. उदा. इ.स. १७२६च्या आसपास आरॉन नामक बंगाली गुलामाने इतर अनेक गुलामांशी संधान बांधले व ते सर्वजण पळून गेले. इतकेच नव्हे तर त्यांनी कैक महिने केपच्या वसाहतीनजीकच्या शेतजमिनींवर हल्ले केले आणि गुरेढोरेही चोरून नेली. त्यांचा बंदोबस्त करायला तब्बल नव्वद शिपायांची तुकडी पाठवली गेली, आणि एकोणीस गुलामांची धरपकडही झाली. याचा म्होरक्या आरॉन मात्र शेवटपर्यंत हाती लागला नाही. काही जणांनी केपटाऊनजवळच्या टेबल बे येथून बोटींनी युरोपला पळून जाण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला.
पकडलेल्या गुलामांना कडक शिक्षा दिली जाई. सामान्यत: शांबोक नामक एका जाड चामड्याच्या चाबकाने फटकारे मारले जात. याद्वारे पळून जाण्याचे परिणाम किती वाईट आहेत, हे अन्य गुलामांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न असे. केपच्या वसाहतीतील गुलामांविरुद्धच्या बहुतांश फौजदारी केसेसमध्ये पळून गेलेला गुलाम पुन्हा पकडल्यावरच्या शिक्षेचीच उदाहरणे बहुतांशी दिसून येतात.
गुलाम ही मालकाची मालमत्ता मानली जाई. त्यामुळे गुलामांनी आत्महत्या केली तर मालमत्तेचे नुकसान या सदराखाली त्याची नोंद होत असे. आता मेलेल्या गुलामाला काहीही करता येणे शक्य नसले तरी त्याच्या प्रेताची शक्य तितकी विटंबना केली जाई. केपच्या वसाहतीमधील सर्व मुख्य रस्त्यांमधून ते प्रेत फरपटवत नेऊन शेवटी एका कोपऱ्यात टांगले जात असे. मेल्यावरही गुलामांवर अशा प्रकारे अधिकार दर्शवण्याची ही पद्धत होती. कैकदा गुलाम मालकाच्या घरांना आगी लावत. यात बंगाली गुलामांनी अन्य बंगाली गुलामांसोबत एकत्र मिळून कट आखल्याचे दिसत नाही, कारण ते अनेक ठिकाणी विखुरलेले होते. त्यामुळे जिथे शक्य तिथे ते अन्य वंशीय गुलामांसोबत मालकांविरुद्ध बंड करत.
डच अंमल संपून ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर मात्र संघटित उठावांचे प्रमाण वाढले. यात इ.स. १८०८चा कूबर्ग उठाव प्रसिद्ध आहे. हा क्रूरपणे चिरडण्यात आला. यानंतरही दोन उठाव झाले ते चिरडण्यात आले. साधारणपणे ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर अशा उठावांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचे कारण म्हणजे डचांपेक्षा ब्रिटिशांनी गुलामांवर अधिक अत्याचार केले असे नसून, ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, हैतीमधील उठाव, इ. अनेक उठावांची माहिती तोवर केप वसाहतीत पोचल्यामुळे तसे झाले असावे, असा संशोधकांचा तर्क आहे.
पण अमेरिकेसारखे उठाव केपमध्ये झाले नाहीत त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील गुलामांमध्ये वंश, धर्म, भाषा, इ. कोणत्याच पातळीवर पुरेसे साधर्म्य नव्हते आणि केपमध्ये जन्मलेल्या गुलामांपेक्षा बाहेरून आणलेल्या गुलामांची संख्या कायमच अधिक होती. शिवाय कठोर शिक्षांखेरीज गुलामांना नशापाणी करण्यास प्रोत्साहनही दिले जाई, जेणेकरून अंमली पदार्थांवर अवलंबित्व वाढल्यामुळे त्यांना विरोध करणे अधिक जड जावे.
काही अपवादात्मक गुलाम व स्वतंत्र लोक
वरील सर्व माहिती वाचल्यावर वाटेल की केपच्या वसाहतीत बंगाली गुलामांना काहीही अधिकार नव्हतेच की काय? याचे उत्तर थोडेसे गुंतागुंतीचे आहे. 'गुलाम' म्हणून जगताना त्यांना विशेष हक्क नव्हते हे खरेच. पण कैकजणांची गुलामगिरीतून अधिकृतरीत्या मुक्तताही केली गेली व त्यांनी पुढचे जीवन हे स्वतंत्रपणेच कंठले - तशी उदाहरणे ज्ञात आहेत. इतकेच नव्हे तर काही बंगाली लोक स्वत: गुलामांच्या खरेदी-विक्रीचे कामही करत. इ.स. १८१६-३४मध्ये गुलाम बाळगून असणाऱ्या १३१ जणांपैकी १५ बंगाली असल्याची नोंद आहे.
बंगाली गुलामांपैकी बऱ्याच तपशीलवार नोंदी सापडतात त्या अँजेला नामक स्त्रीच्या. 'अँजेला फान बंगाल' अशी तिची नोंद डच साधनांत आढळते. इ.स. १६५०च्या दशकाच्या उत्तरार्धात, म्हणजेच केप वसाहतीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तिला तिचा नवरा व तीन मुलांसह पीटर केंप नामक डच माणसाने बटाव्हिया अर्थात इंडोनेशियात एका पोर्तुगीज चाच्याकडून खरेदी केले व केप वसाहतीचा तत्कालीन गव्हर्नर यान फान रिब्बेक याला विकले. फान रिब्बेकने पुढे इ.स. १६६२मध्ये या पूर्ण कुटुंबाला तेथीलच अब्राहम खाब्बेमा याला विकले. खाब्बेमा याने इ.स. १६६६मध्ये, त्याची बटाव्हियाला बदली झाल्यावर या कुटुंबाची दास्यत्वातून मुक्तता केली. अँजेलाच्या नवऱ्याबद्दल पुढे माहिती मिळत नाही - कदाचित तो मेलाही असावा. पण इ.स. १६६९मध्ये अँजेलाचा आर्नोल्डस विलेम्स बासोन या डच माणसाशी विवाह झाला. बासोन इ.स. १६९८मध्ये मरण पावला, परंतु अँजेला त्यानंतर २२ वर्षे जगली. तत्कालीन समाजव्यवस्था पाहता तिचे जीवन अतिशय अपवादात्मक व उल्लेखनीय म्हटले पाहिजे. ती शेवटपर्यंत टेबल व्हॅली येथे राहिली. वाईन बनवणे आणि माळीकाम असा तिचा व्यवसाय असल्याची नोंद सापडते. तिच्या पदरी तीन पुरुष व दोन स्त्री गुलामही होते. यांपैकी स्त्रियांचे उगमस्थान ज्ञात नसले तरी पुरुष भारतातील असल्याचे ज्ञात आहे. 'Tough businesswoman' असे तिचे वर्णन तत्कालीन साधनांत येते. ही तिला अभावितपणे दिलेली मोठी सलामीच म्हटली पाहिजे.
अँजेलाची मुलगी ॲना हिने तर या बाबतीत आईवरही कडी केलेली आढळते. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरी असलेल्या ओलाफ बर्ग नामक एका स्वीडिश अधिकाऱ्याशी तिने इ.स. १६७८मध्ये लग्न केले व इ.स. १७३४मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत केपटाऊनजवळ Groot Constantia नामक तिच्या इस्टेटची तिने देखभाल केली. नवरा मेल्यावर वारसाहक्काने ही इस्टेट तिच्याकडे आली. Groot Constantia खेरीजही केपटाऊनमधील अनेक घरे तिच्या मालकीची होती. तिच्याकडे सर्व ठिकाणी मिळून तब्बल ६२ गुलाम होते.
याखेरीज लुईस फान बंगाल याचेही अँजेलाच्या आसपासच '"n kleurryke figuur'" अर्थात '"रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्व'" अशा विशेषणाने युक्त बरेच उल्लेख सापडतात. इ.स. १६७३मध्ये याची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात आली, व इ.स. १६७५मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला. यानंतर तो स्वत:ही गुलामांची खरेदीविक्री करू लागला. इतकेच नव्हे, तर विलियम टीरलिंग नामक एका गोऱ्या माणसाला त्याने चक्क नोकरीवरही ठेवले, आणि इतकेच नव्हे तर काही काळाने त्याला कामावरून काढूनही टाकले! पूर्वाश्रमीच्या गुलामासाठी एका गौरवर्णीय व्यक्तीला कामावर ठेवणे आणि काढणे हे तत्कालीन परिस्थिती पाहता अतिशय धाडसाचे काम होते. त्याने पुढे अनेक लग्ने केली, त्यातून त्याला कैक मुले झाली. त्याने अनेक शेतजमिनी, हॉटेल्स इत्यादी विकत घेतल्याच्या नोंदीही आहेत.
गुलाम लोकसमूह व केपटाऊनमधील समाज
कालौघात बंगाली गुलाम केपटाऊन व आसपासच्या समाजात पूर्णत: सामावून गेले. आजमितीस तेथील समाजात खालील प्रमुख समूह आहेत:
१. गौरवर्णीय - इंग्लिश आणि आफ्रिकान्स भाषक
२. आफ्रिकन - युरोपियन मिश्रवंशीय - आफ्रिकान्स भाषक
३. आफ्रिकन वंशीय खोइसान - आफ्रिकान्स भाषक
४. मलय - आफ्रिकान्स भाषक
५. आफ्रिकन वंशीय - खोसा भाषक
यांपैकी क्रमांक ३ ते ५ यांचा गौरेतरांमध्ये समावेश होतो. मलय लोक साधारणपणे सारखीच भाषा, एकच धर्म (इस्लाम), आदींमुळे आपली ओळख आहे तशी टिकवू शकले. मात्र बंगाली गुलाम गौरवर्णीय व गौरेतर या दोन्ही समूहांत मिसळून गेले. स्वतंत्र बंगाली, उदाहरणार्थ वर सांगितलेल्या लुईस व अँजेलासारखे मुक्त लोक, बहुतांशी गौरवर्णीय समूहात सामावून गेले. गौरवर्णीय पुरुषांशी लग्न झालेल्या बंगाली स्त्रियांचे प्रमाण यात अधिक होते. अशा संबंधांतून निर्माण झालेली संतती युरोपीय समाजात सामावून घेण्यास अडचण नसे, कारण मुळात डच किंवा युरोपियन वंशीय स्त्रियाच तिथे अल्प प्रमाणात असल्यामुळे अन्य वंशीय स्त्रियांशी युरोपियन वंशीय पुरुषांनी लग्न करण्याला तितकेसे कमी लेखले जात नसे. पण हेच युरोपियन वंशीय स्त्रियांशी अन्य वंशीय पुरुषांनी संबंध ठेवल्यास त्या पुरुषाला शिक्षा होत असे. याखेरीज काही बंगाली लोक हे मलय व आफ्रिकन वंशीय समूहांतही मिसळल्याच्या नोंदी सापडतात.
गुलामांची मुक्तता व त्यांना केपटाऊन व आसपासच्या समाजात सामावून घेण्यातील एक महत्त्वाची पायरी म्हणजे इ.स. १६८५मध्ये हेंड्रिक एड्रियन फान ऱ्हीड या अधिकाऱ्याने त्यासंबंधीचा काढलेला आदेश होय. यानुसार, कोणत्याही गुलामाने
१. मालकाची सेवा एकनिष्ठपणे व मनोभावे केल्यास
१. त्याच्या सुटकेसाठी १०० फ्लोरिन इतके पैसे भरल्यास
२. त्याला ठीकठाक डच भाषा बोलता येत असल्यास
३. डच चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यास
४. पैसे कमावण्याची क्षमता असल्याबाबत वरिष्ठांची खात्री पटवल्यास
त्याच्या/तिच्या मुक्ततेविषयीचा सरकारी आदेश निघत असे. इ.स. १७९५पर्यंत याचा अंमल होत होता. या अटी तशा कडक असल्यामुळे यानुसार मुक्तता झालेले गुलाम कमीच होते. तरीही इ.स. १७००-१७२० या काळात १४३ गुलामांची मुक्तता केल्याची नोंद आहे व यासाठीची कारणेही तब्बल २३८ आहेत! ११ जणांच्या बाबतीत डच भाषेचे ज्ञान, तर २८ जणांच्या बाबतीत ख्रिस्ती धर्म स्वीकारणे ही कारणे आहेत. परंतु मालकाची सेवा मनोभावे व एकनिष्ठपणे करणे हेच मुख्य कारण ५७ जणांच्या बाबतीत नोंदवल्याचे दिसते.
संख्या, व्याप्ती, इ.
सरतेशेवटी केप ऑफ गुड होपच्या वसाहतीतील बंगाली गुलामांच्या एकूण संख्येबाबत उपलब्ध असलेली माहिती पाहू. इ.स. १६५२ ते १८३४ या काळात केपच्या वसाहतीत एकूण सातेकशे बंगाली गुलामांची नोंद आहे. आता १८२ वर्षांत ७०० म्हणजे वर्षाकाठी जवळपास चार असे सरासरी प्रमाण येईल. हे प्रमाण अतिशय नगण्य आहे किंवा एकही गुलाम असणे हे घृणास्पद आहे, या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी याबद्दलचे सत्य आहे. ७०० हा आकडा मुळात अशा गुलामांचा आहे ज्यांचे -
१. उगमस्थान बंगाल असे स्पष्टपणे नोंदवले आहे.
२. केप ऑफ गुड होपमध्ये त्यांचा प्रवेश तसेच त्यानंतर काही अन्य घटनांची नेमकी नोंद आहे.
डच ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे आजच्या निकषांनी पाहिली तरी बऱ्यापैकी तपशीलवार आहेत आणि शिस्तबद्धरीत्या केलेल्या नोंदीही त्यात सापडतात. परंतु असे असले तरी काही महत्त्वाच्या गुंतागुंतींची दखल घेणे अवश्य आहे. केप ऑफ गुड होपला थेट बंगालहून गुलाम आणत नसत. अनेकदा बंगाल ते बटाव्हिया हा प्रवास प्रथम व्हायचा व तिथून केप येथे गुलाम आणले जात. यात अनेकदा गुलामांचे उगमस्थान कोणते, याची नोंद नसे. कैक गुलामांची तर नोंदणीही केली जात नसे. शिवाय अजून एका गोष्टीमुळे नेमक्या गुलामांची संख्या किती, हे नीट ठरवता येत नाही. ती म्हणजे, समजा, लुईस नामक गुलाम मरण पावला व त्यानंतर लगेचच एक नवीन पुरुष गुलाम आणला गेला. तर या नवीन गुलामाचे नाव कैकदा मरण पावलेल्या गुलामाचेच ठेवले जात असे. त्यामुळे नेमका कोणता लुईस, हे कळणे दुरापास्त! मानवी आयुर्मर्यादेचा निकष लावला तरी मधली अनेक वर्षे नेमकी ओळख कळणे केवळ अशक्यच. आणि समजा निव्वळ नावांवरून अंदाज लावायचा तर कैक गुलामांच्या धर्मांतरानंतर ते सर्व ख्रिश्चन/युरोपियन नावे स्वीकारत. त्यामुळे त्याचीही काही मदत याकामी होत नाही. ख्रिश्चन नावांखेरीज काही हिंदू व मुसलमान नावे सापडतात. आता मुसलमान नाव म्हटले तर निव्वळ तेवढ्यावरून प्रदेश समजत नाही. त्यामुळे हिंदू नावांकडेच लक्ष दिले तरी त्यातही बंगाल की मलबार की कोरोमंडल, हा प्रश्न उरतोच. त्यामुळे उगमस्थानाची थेट नोंद असल्याशिवाय हे सगळंच प्रकरण अंदाजपंचे आहे. यावरून लक्षात येईल की एकूण गुलामांची वास्तविक संख्या ही नोंदणीकृत संख्येपेक्षा अनेकपटींनी असली पाहिजे. कैक हजारांत ही संख्या असेल, हे उघडच आहे.
अशी ही केप ऑफ गुड होपमधील बंगाली गुलामांची कहाणी. गुलामगिरी म्हटले की नशिबी येणारे सर्व भोग या लोकांनी भोगले, आणि गुलामगिरीचे अधिकृतरीत्या उच्चाटन झाल्यावर केपटाऊन व आसपासच्या समाजात ते मिसळूनही गेले. भारताच्या इतिहासात, मुळात या ना त्या कारणाने ब्रिटिशपूर्व काळात भारताबाहेर जाणाऱ्या/नेल्या गेलेल्या भारतीयांना अजूनही म्हणावे तितके महत्त्वाचे स्थान नाही. त्यात गुलामांना तर नाहीच नाही. ऐसी अक्षरेच्या आफ्रिका विशेषांकाच्या निमित्ताने आफ्रिकेत नेल्या गेलेल्या भारतीय गुलामांची कहाणी सांगता आली, याचा आनंद मात्र मला नक्कीच आहे. गुलामगिरी म्हटले की कृष्णवर्णीय, आफ्रिकन वंशीय गुलामच डोळ्यांसमोर येतात. परंतु भारतीय गुलामही मोठ्या संख्येने अनेक देशांत नेले गेले, हा एक दुर्दैवी इतिहास आहे. त्याच्याकडे झालेल्या दुर्लक्षाची या लेखाच्या निमित्ताने थोडी तरी भरपाई होईल, असा मला विश्वास वाटतो.
संदर्भ :
Ansu Datta. FROM BENGAL TO THE CAPE: Bengali Slaves in South Africa from 17th to 19th Century. Published by Xlibris in 2013.
सुदान: वसाहतवाद, स्वातंत्र्य, फाळणी
मूळ लेखक: महमूद ममदानी
- रोचना
प्रा. महमूद ममदानी न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्राचे आणि आफ्रिकन इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक असून भारतीय वंशाचे युगांडन नागरिक आहेत. त्यांचा जन्म १९४६ साली मुंबईत झाला, पण त्यांचे आईवडील दोघेही पूर्व आफ्रिकेच्या टांगान्यीका (आजचे टांझानिया) येथे जन्मले. एकोणिसाव्या शतकात पश्चिम आणि दक्षिण भारतातून पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेला व्यापार आणि नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी त्यांचे कुटुंबही होते. युगांडातच ते लहानाचे मोठे झाले. १९७२ साली युगांडाचा हुकूमशहा इदी अमिन याने तेथील सर्व भारतीय वंशाच्या लोकांची हकालपट्टी केली, पण त्याचा पाडाव झाल्यावर ते युगांडात परतले. अनेक वर्षे ते युगांडाची राजधानी कंपाला येथील मकरेरे विद्यापीठातल्या 'मकरेरे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च'चे संचालक होते. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन विद्यापीठातही त्यांनी दीर्घकाळ प्राध्यापकी केली आहे. आफ्रिका खंडाचा आधुनिक इतिहास आणि राजकारण, युरोपीय वसाहतवाद आणि त्याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम, आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आफ्रिकेतल्या राजकीय घडामोडी आणि समस्या, हे त्यांचा संशोधनाचे विषय आहेत. विशेषकरून वसाहतोत्तर आफ्रिकन समाजांमध्ये झालेल्या वांशिक आणि यादवी युद्धांचा आणि नरसंहारांचा त्यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. Citizen and Subject: Contemporary Africa and the Legacy of Colonialism (१९९६), आणि Neither Settler nor Native: The Making and Unmaking of Permanent Minorities (२०२१) हे त्यांचे नावाजलेले संशोधनग्रंथ.
|
|
Neither Settler nor Native या पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणाचा एक अंश इथे वाचकांसाठी प्रस्तुत केला आहे. वसाहतवादातून निर्माण झालेल्या आधुनिक राष्ट्रांमध्ये आणि राष्ट्रवादामध्ये, "बहुसंख्य" आणि "अल्पसंख्य" समूह कसे व का तयार झाले, हा पुस्तकातील केंद्रवर्ती प्रश्न आहे. ही बहुसंख्य-अल्पसंख्य समूहांची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था कायमस्वरूपी कशी झाली, आणि ठिकठिकाणी, ठरावीक काळांत – उदा. अमेरिकेत, दक्षिण आफ्रिकेत, इस्राइलमध्ये, व सुदानमध्ये – ती शासकीय आणि वैचारिक संदर्भांत राबवली कशी गेली, याचा ऐतिहासिक आढावा ममदानी घेतात. वसाहतोत्तर काळात अशा व्यवस्थेचे वांशिक राष्ट्रवादात, आणि पुढे हिंसाचारात आणि उच्छादात का आणि कसे रूपांतर झाले, याचे ते विश्लेषण करतात. आफ्रिकेत आणि इतर ठिकाणी, वांशिक राष्ट्रवादाऐवजी एक पर्यायी, सर्वसमावेशक अशी राज्यव्यवस्था उदयास येणे कितपत शक्य आहे, व तिचे स्वरूप काय असू शकेल, यावर भाष्य करतात. या अनुषंगांनी आधुनिक राष्ट्रसंकल्पनेची, आणि वसाहती शासन भोगलेल्या निरनिराळ्या प्रदेशांची एक विलक्षण कूळकथाच ममदानी यांनी पुस्तकात मांडली आहे.
प्रकरण ४ सुदानच्या आधुनिक इतिहासाचा आढावा घेते. सुदान हा आफ्रिकेच्या ईशान्येतील मोठा देश. अरब राष्ट्रांमध्येही त्याची गणना होते. दीर्घकाळ अरब आणि आफ्रिकी संस्कृतींची सरमिसळ असलेल्या या देशात ब्रिटिशांची वसाहती राज्यव्यवस्था होती, आणि १९५६मध्ये सुदानला स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय आणि सामाजिक अस्थिरता कायम राहिली. देशाच्या उत्तर आणि दक्षिण विभागांमध्ये संघर्ष वाढत गेला, आणि अखेर यादवी युद्ध झाले; याच काळात दारफुर भागात झालेल्या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले. एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, मूळ सुदानच्या दक्षिण भागाला 'साऊथ सुदान' म्हणून स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले.
...
सुदान: वसाहतवाद, स्वातंत्र्य, फाळणी
आज दोन सुदान देश अस्तित्वात आहेत. पहिला सुदान गणराज्य, ज्याची राजधानी आहे खारतूम, आणि दुसरा दक्षिण सुदान, ज्याची राजधानी आहे जूबा. हे विभाजन यादवी युद्धाचं फलित आहे. दक्षिण सुदानला २०११ साली स्वातंत्र्य मिळालं. या दक्षिण भागात सशस्त्र संघर्ष अजूनही सुरूच आहे, कारण आपापसांत लढणारे वांशिक गट आणि टोळ्या हेच या नवीन राष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचे घटक आहेत. डिसेंबर २०१३मध्ये डिनका आणि नुएर टोळ्या एकमेकांवर तुटून पडल्या. तीन दिवसांतच वीस हजार लोक मरण पावले.
सुदान देशाचा इतिहास जर पुरेसा अवगत नसला, तर हा संघर्ष हिंसेने ग्रासलेल्या आफ्रिकेत, प्राचीन द्वेषांवरून उडणाऱ्या अनेक चकमकींपैकीच एक आहे, यात नवीन काय, असं वाटणं साहजिक आहे. पण दक्षिण सुदानमध्ये जे घडलं, त्याला प्राचीन द्वेष कारणीभूत नव्हते. वास्तविक डिनका आणि नुएर समूह हे काही जुने हाडवैरी नव्हते. त्या भागात वसाहती व्यवस्था स्थापन होण्याआधी त्यांच्यात अशी कधीच जुंपली नव्हती. उलट, अगदी अलीकडेच उभारलेल्या नवीन राज्यव्यवस्थेवर ताबा मिळवण्यासाठी ते एकमेकांशी लढत होते. त्यांना सत्तेचा पुरेपूर लाभ घ्यायचा होता, आणि सत्ता गटांच्या, टोळ्यांच्या चौकटींतूनच गाजवली जाते असा त्यांचा समज पक्का झाला होता. ज्याच्याकडे राज्याची सूत्रं असतील, अर्थात निष्ठावंत लढवय्यांची फौज टिकवण्याकरिता ज्याच्याकडे पुरेसा पैसा आणि शस्त्र आहे, तो आपल्या गटाला द्रव्य, जमीन, नोकऱ्या, व्यापारासाठी सवलती, कंत्राटं, आणि अभय हे सर्व काही पुरवू शकतो, असा हा समज. दक्षिण सुदानमध्ये हीच वस्तुस्थिती आहे, आणि तिला कारणीभूत आहे इथल्या वसाहती शासनातून साकारलेली आधुनिक राज्यव्यवस्था. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी इथे वसाहती राज्य स्थापन केलं, आणि वांशिक गटांमधल्या फरकांना त्यांनी राजकीय वळण, आणि महत्त्व दिलं. सांस्कृतिक बाबींमधल्या फरकांना त्यांनी प्राचीन, टोळीबद्ध समाजाचं, आणि संपूर्ण भिन्नतेचं स्वरूप देऊन त्यांना राजकीय सत्तेशी जोडलं. ब्रिटिश सत्ताधारी जाऊन आता पुष्कळ वर्षं झाली असली, तरी ही वासाहतिक मानसिकता अजून टिकून आहे. आज सुदानमधले या मानसिकतेचे वारसदार आपल्या प्राचीन पूर्वजांप्रमाणे नव्हे, तर ब्रिटिशांप्रमाणे राज्य चालवतात.
सुदान आणि दक्षिण सुदान या देशांनी व्यापलेल्या भूभागात किमान चार-पाचशे वर्षं तरी विविध मानवसमाज वसले आहेत. हे वैविध्य डोळ्यांत भरणारं आहे. मात्र गेल्या शतकातच हे वैविध्य इतक्या संघर्षांचं कारण बनलं आहे. याचं कारण आहे ब्रिटिशांनी उभारलेली अप्रत्यक्ष वसाहती राज्यव्यवस्था, अर्थात इंडिरेक्ट रूल. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, खास करून १९२०च्या दशकात, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुदानचं एका टोळीबद्ध समाजात परिवर्तन केलं. सांस्कृतिक पातळीवर भिन्न असलेले गट यापूर्वी एकमेकांमध्ये अनेक संदर्भांत मिसळत होते. पण नवीन व्यवस्थेत त्यांच्यामध्ये अनेक भौतिक आणि कायदेशीर अडथळे निर्माण केले गेले. लोकांना नव्याने तयार केलेल्या टोळ्यांच्या सीमांपलीकडे लोटून, प्रत्येक टोळीला प्रधान नेमून, या प्रधानांची एक नवीन व्यवस्था वसाहती अधिकाऱ्यांनी उभारली. हा सगळा खटाटोप कशाला, तर वसाहती समाजात अशा टोळीबद्ध जमातींपलीकडे व्यापक एकजूट होऊ नये, म्हणून.
सुदानच्या विविध समूहांना "तुम्ही एकमेकांपासून निराळे आहात", असं वसाहती सत्ताधाऱ्यांनी नव्याने सांगण्याची गरज नव्हती. ते तिथल्या लोकांना माहीत होतंच. ते निराळ्या धर्मांचे होते, विविध भाषा बोलत होते, निरनिराळे प्राणी पाळत होते नि पिकं पिकवत होते, आणि समाजरचनेबद्दलचे त्यांचे विचारही निराळे होते. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्यापिण्याच्या, लग्नसंबंधांच्या, आणि मरणाच्यादेखील, पद्धती निराळ्या होत्या. पण ब्रिटिशांनी या विविधतेला राजकीय महत्त्व बहाल केलं. रोजच्या जगण्यातल्या या वैविध्याला त्यांनी आधिपत्याच्या सीमा ठळक करण्याचं साधन बनवलं, आणि प्रत्येक आधिपत्याला किती सत्ता बहाल करायची, कोणते अधिकार द्यायचे, हे स्वत: ठरवलं.
या प्रकल्पाने दोन ढोबळ प्रकारच्या विविधतेचा पुरेपूर फायदा घेतला: भाषिक आणि वांशिक. अरब आणि इतरांमध्ये भाषेचा फरक होता, आणि सांस्कृतिक पातळीवर साम्य असलेल्या समूहांमध्ये वांशिक विविधता होती. परंतु वसाहती अधिकाऱ्यांनी सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा ठरलेला फरक घडवला – अरब आणि आफ्रिकी लोकांमधला. वंशभेदाच्या युरोपीय विचारांमध्ये मुरलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुदान येथे अरब आणि आफ्रिकी असे दोन ठळक वांशिक समूह एवढेच दिसले; त्यांच्या बाह्य रूपांवरूनच ही बाब स्पष्ट होते असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय, बहुतेक अरब लोक उत्तरेत राहत आणि आफ्रिकी लोक दक्षिणेत हादेखील एक ढोबळ फरक. आणि म्हणूनच उत्तरेकडेचा प्रदेश अधिक प्रगत आहे असा ब्रिटिशांनी निष्कर्ष काढला. त्यांनी अरब लोकांना दक्षिणेत राहणाऱ्या आफ्रिकी जनतेच्या तुलनेत अधिक सुसंस्कृत आणि पुढारलेल्या संस्कृतीचे मानलं. तर, वसाहती व्यवस्थेत अशी सुबक कप्प्यांची उतरंड तयार झाली. उत्तरेकडचा प्रदेश अरबांचा, दक्षिणेकडचा आफ्रिकी गटांचा. खारतूम हे सत्तेचं केंद्रस्थान अरब लोकांकडे राहिलं. दक्षिणेकडच्या प्रदेशात मात्र सत्तेचं एकच केंद्रस्थान नव्हतं; त्याचं शेकडो छोट्या तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आलं. प्रत्येक 'दार', वा तुकडा, हा एका विशिष्ट टोळीचा मायदेश म्हणून नेमला गेला. शिवाय, प्रत्येक टोळीतल्याच एकाला प्रधान नेमून त्याला स्थानिक हुकूमशहा नेमलं गेलं, आणि सर्व प्रधानांना वसाहती सत्तेच्या नियंत्रणात आणण्यात आलं.
तात्पर्य, या व्यवस्थेत एकीकडे आफ्रिकी म्हणून लेखल्या गेलेल्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं गेलं, तर दुसरीकडे अरब म्हणून लेखल्या गेलेल्यांना आफ्रिकी समूहांचे प्रतिस्पर्धी बनवलं गेलं. अमेरिकेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेतल्या वसाहती व्यवस्थेहून ब्रिटिशांच्या वसाहती व्यवस्थेनं इथेच फारकत घेतली. तिन्ही व्यवस्थांमध्ये राज्यव्यवस्थेचं स्वरूप 'अप्रत्यक्ष' होतं, म्हणजे वसाहती सत्ता ही स्थानिक सत्ताधारकांकरवी, आणि स्थानिक, पारंपरिक कायद्यांमार्फतच, गाजवली गेली. स्थानिक लोक विरुद्ध बाहेरून येऊन स्थायिक झालेले वसाहतकार, किंवा 'आदिवासी विरुद्ध अधिवासी' यांच्यामध्ये संघर्ष तिन्हीकडे झाला. यालाच 'सेटलर कोलोनियलिझम' किंवा 'अधिवासी वसाहतवाद' म्हणतात.
पण अमेरिकी आणि दक्षिण आफ्रिकी वसाहती व्यवस्थेतले अधिवासी गोरे, वसाहती सत्ताधारक हेच होते. सुदानमध्ये मात्र एक निराळी आणि महत्त्वाची बाब होती. इथल्या स्थानिक विरुद्ध वसाहतकार या संघर्षात गोरा अधिवासी नव्हता. ब्रिटिशांनी या भूभागात आपल्या वसाहती उभारल्याच नाहीत. उलट इथल्या द्वंद्वात बाहेरून आलेला वसाहतकार हा उत्तरेकडला अरबी-भाषक ठरला. ब्रिटिशांच्या नजरेत अरबी-भाषक हाच उपरा अधिवासी होता. त्यांनी रचलेल्या सुदानच्या इतिहासानुसार, शेकडो वर्षांपूर्वी अरब लोकांचे लोंढे या भूभागात येऊन स्थायिक झाले होते. सोबत त्यांनी इस्लाम धर्म, अरबी भाषा आणि संस्कृती, आणि केंद्रवर्ती राजकीय व्यवस्था – थोडक्यात, सर्व प्रगत संस्कृतीची लक्षणं – आणली होती. या इतिहासकथनात अरबांच्या आगमनामुळे, मूळ आफ्रिकी रहिवासी दक्षिणेकडे विस्थापित झाले होते.
याचा अर्थ असा, की अधिवासी वसाहतवादाला प्रत्यक्षात नव्याने येऊन स्थायिक झालेल्या वसाहतकाराची गरजच नसते. फक्त आदिवासी आणि अधिवासी म्हणून नेमलेले दोन गट अपेक्षित असतात. ब्रिटिशांनी आपल्याबद्दल रचलेला हा उपऱ्या अधिवासाचा इतिहास अरब लोकांनी पूर्णपणे स्वीकारला, आणि सुदान स्वतंत्र देश झाल्यावरही त्यांनी आपली हीच ओळख कायम ठेवली. स्वतःला अरब समजणाऱ्या अनेक प्रभावी विचारवंतांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी सुदानला अरब राष्ट्र म्हणून अधोरेखित करायचे प्रयत्न केले. या मांडणीत सुदानच्या आफ्रिकी जनतेला मात्र कनिष्ठ जातीच्या, मागासलेल्या, राजकीय सत्तेहून सदैव फारकत असलेल्या समाजाचे स्वरूप लाभले.
थोडक्यात, अरब राष्ट्रवाद्यांना ब्रिटिशांनी रचलेल्या उत्तर–दक्षिण द्वंद्वाचं तितकंच आकर्षण होतं. स्वत:ला आफ्रिकी जनतेपेक्षा श्रेष्ठ म्हणवून घ्यायला त्यांना गौरवशाली गतकालाची गरज होतीच. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी सुदानमध्ये दोन इस्लामी सल्तनती स्थापन झाल्या होत्या. पूर्वीकडे फुंज, आणि पश्चिमेकडे दार फुर. दोन्ही राज्यं दक्षिणेतल्या भागांत गुलाम हस्तगत करण्यासाठी नियमित लुटालूट करत. पुढे या सल्तनतींना ओस्मानी (ऑटोमन) साम्राज्यानं गिळंकृत केलं. १८८०च्या दशकात अल-महदी नामक वैभूतिक, मसीहा-सदृश पुढाऱ्याच्या राजकीय नेतृत्वाखाली उत्तरेतले अनेक स्थानिक गट एकत्र आले. अल-महदीने राजकीय आणि धार्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर लोकांना ओस्मानी साम्राज्याविरुद्ध प्रवृत्त केलं. महदीवाद्यांनी कोलमडत्या ओस्मानी साम्राज्यालाच नव्हे, तर १८८५मध्ये ब्रिटिशांनाही पराभूत केलं. यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अरब राष्ट्रवादी इतिहासकारांनी अल-महदीलाच सुदान राष्ट्राचा प्रणेता म्हणून उचलून धरलं. शेकडो वर्षांपूर्वी पुढारलेली संस्कृती सोबत घेऊन सुदानमध्ये येऊन स्थायिक झालेल्या अरब समाजाचा कळसबिंदू म्हणून त्यांनी अल-महदीकडे पाहिलं.
हा इतिहास खोटा आहे. उत्तरेत फक्त अरब लोकांचे वंशज राहत नसून विविध समाजांचे लोक होते. त्यांच्यातल्या अनेकांनी अरबी भाषा, आणि ती बोलणाऱ्या समूहांच्या प्रथा, स्वीकारल्या होत्या. सत्ताधारी गट, आणि दीर्घकाळ आंतरदेशीय व्यापारात आणि देवाणघेवाणीत गुंतलेल्या समूहांचा यात मोठ्या प्रमाणावर समावेश होता. दक्षिणेतसुद्धा काही लोकांनी अरबी भाषा आणि इस्लाम धर्म स्वीकारले होते, आणि उत्तरेप्रमाणेच अरब संस्कृतीचा त्यांच्या प्रथांवर प्रभाव पडला होता. पण ब्रिटिशांच्या लेखी ही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सरमिसळ गौण होती. स्पष्ट वांशिक भिन्नतेची त्यांची चौकट काटेकोर, अचूक आणि जगात सर्वत्र एकसारखी लागू व्हावी, असाच त्यांचा अट्टहास होता. डोळ्यासमोर दिसणारे वरवरचे फरक हेच त्यांनी सत्य मानले. शिवाय, ही वांशिक चौकट त्यांच्यासाठी रामबाण उपाय होती; वसाहती सत्तेखाली दबलेल्या लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याऐवजी एकमेकांवरच खार खाऊन असणं त्यांच्या सोयीचं होतंच. उत्तर-दक्षिणेचं हे द्वंद्व अरब आणि आफ्रिकी लेखल्या गेलेल्या लोकांच्या मनात हळूहळू झिरपत गेलं, आणि दोन्ही भागांतली दरी वाढत गेली. हीच वस्तुस्थिती आहे, आणि हेच योग्य आहे, असं सरतेशेवटी बहुतेक सर्वांनाच वाटू लागलं.
या सगळ्यात, दक्षिण प्रदेश उत्तरोत्तर विभाजित आणि कमकुवत होत गेला. ब्रिटिशांच्या गळचेपीबद्दल, आणि उत्तरेतल्या लोकांना मिळणाऱ्या सवलतींबद्दल तिथल्या स्थानिक लोकांमध्ये राग वाढला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश वसाहती सत्ता संपुष्टात आली. पण उत्तर आणि दक्षिण प्रदेशांत वाढत गेलेल्या अढींचं परस्परविरोधी राष्ट्रवादांमध्ये परिवर्तन झालं. स्वातंत्र्योत्तर राज्यव्यवस्थेवर होणाऱ्या वाटाघाटींमधून उत्तरेतल्या अरब राष्ट्रवाद्यांनी दक्षिणेकडेच्या पक्षांना वगळण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेतले गट सुदानमधून फुटून स्वतंत्र देश स्थापन करण्यासाठी सशस्त्र लढ्याच्या तयारीला लागले. उत्तर आणि दक्षिण विभागांमधल्या सशस्त्र संघर्षाचा पहिला टप्पा १९५५ साली सुरू झाला. १९६३मध्ये तो अधिक तीव्र झाला, आणि १९७२ साली अखेर थांबला. या दरम्यान खारतूमच्या सरकारांत अरबांचेच वर्चस्व होते. या पहिल्या टप्प्याच्या संघर्षात वसाहती व्यवस्थेची चौकट अधिकच भक्कम झाली: सुरक्षितता आणि समृद्धी मिळवण्यासाठी आधुनिक राष्ट्र निर्माण करणे हाच एकमेव मार्ग आहे, ही समजूत दृढ झाली. पण ही राष्ट्रसंकल्पना वांशिक अस्मितेवर आणि विभाजनावर बेतलेली होती. हा विचार स्वातंत्र्योत्तर वांशिक राष्ट्रवादानं पराकोटीला नेला. वसाहती व्यवस्थेमुळे आरंभलेल्या वांशिक हिंसाचाराला तोडगा हा केवळ वांशिक उच्छेद असू शकतो या निष्कर्षावर आफ्रिकी आणि अरब दोघेही पोहोचले.
संघर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र काही महत्त्वाचे बदल झाले. १९८३ साली, बहुसंख्य अरब असलेल्या, पण बव्हंशी धर्मनिरपेक्ष असलेल्या सरकारनं इस्लामी कट्टरपंथियांशी युती केली. असं होताच दक्षिणेतले पक्ष जॉन गरंग याच्या जहाल नेतृत्वाखाली आणि त्याच्या सुदानीज पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (SPLA) छत्राखाली एकत्र आले. जॉन गरंग हा दक्षिणेतला एक बंडखोर नेता होता. पण दक्षिणेतल्या इतर बंडखोरांप्रमाणे त्याला स्वतंत्र देश नको होता; त्याला अखंड सुदान राष्ट्रातच समान अधिकार हवे होते. त्यानं राष्ट्रवादातून निर्माण झालेला, एकाच समूहाच्या किंवा बहुसंख्य अशा अरब, मुसलमान, अथवा आफ्रिकी लोकांवर आधारित वांशिक राष्ट्राला नकार दिला. उलट, त्यानं सर्व वंशांच्या नागरिकांना सुरक्षित स्वदेश मिळवून देणाऱ्या राज्यव्यवस्थेचा आग्रह धरला. गरंगच्या या 'नव सुदान' मांडणीला उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या अनेक वांशिक गटांनी दुजोरा दिला. गरंग स्वतः डिनका गटाचा होता, पण त्याचे अनेक सहकारी नुएर होते. त्याची चळवळ अजिबात टोळीबद्ध नव्हती. पण गरंगची ही सर्वसमावेशक भाषा खुद्द त्याच्याच चळवळीत व्यवस्थितपणे राबवली गेली नाही. वसाहती व्यवस्थेत निर्माण झालेल्या विविध गटांमधल्या अढी चिघळत गेल्या, आणि SPLAमध्येदेखील अनेक गटांची गळचेपी झाली. साहजिकच, चळवळीत फूट पडत गेली.
एकूण, वसाहती व्यवस्थेमुळे सुदानला दोन संघर्षांचा वारसा लाभला. पहिला संघर्ष होता अखंड 'नव सुदान'ची मागणी करणाऱ्यांमध्ये आणि फाळणीद्वारे वांशिक आधारावर स्वतंत्र देश मागणाऱ्यांमध्ये. SPLAने या सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न केला, पण अखेर फुटीरवाद्यांनीच त्यावर कब्जा केला. २००५ साली पाश्चात्त्य देशांच्या मध्यस्थीने SPLA आणि खारतूम यांच्यात युद्धविराम आणि शांततेचा करार झाला. त्यात २०११ साली दक्षिणेत स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर जनतेचा कौल घेतला जाईल असा मुद्दा होता, आणि यात फुटीरतावादी जिंकले. दुसरा संघर्ष दक्षिणेच्या अधिसत्तेवरून डिनका आणि नुएर गटांमधला होता. हे दोन्ही गट १९२०च्या दशकात ब्रिटिशांविरुद्ध, आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खारतूमविरुद्ध एकत्र आले होते. नव सुदान पक्षात आणि फुटीरवाद्यांमध्येदेखील दोन्ही गटांतल्या लोकांचा समावेश होता. पण टोळीबद्ध निष्ठेचे धडे त्यांनीही घेतले होतेच. इतका दीर्घ देवाणघेवाणीच्या इतिहास असूनही, डिनका आणि नुएर गटांमध्ये १९९१मध्ये, आणि पुन्हा २०१३ साली युद्घ झालं. लेखाच्या सुरुवातीला याच संहाराचा उल्लेख मी केला.
वसाहतवादानं वांशिक ओळखींना आणि भिन्नतेला सार्वजनिक जीवनात एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं, आणि वांशिक उच्छेद या संकल्पनेचीच शक्यता निर्माण केली. वसाहतवादानंतर सत्तेची वाटणी संपूर्णपणे वांशिक आधारावर झाली. एका गटाचा उच्छेद करून सत्ता हाती घेणे म्हणजे राज्याची सूत्रेच नव्हे तर तेलाच्या खाणी आणि शेतजमिनींसहित आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारी सहानुभूती आणि आर्थिक मदतही हाती लागणार होती. आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमुळेच तर दक्षिण सुदानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला दुजोरा दिला गेला होता; त्यातून नवीन देश अस्तित्वात आणला गेला होता, आणि त्याला बाल्यावस्थेत साहाय्य केलं गेलं होतं. त्यामुळे उच्छेदापलीकडे कोणीच विचार केला नाही.
असं असता, २०१३च्या तीव्र हिंसाचाराचा अर्थ आपण कसा लावला पाहिजे? कायद्याची सुव्यवस्था कोलमडल्यामुळे असं झालं, हे एक कारण असू शकतं. असं असल्यास विधिनियम पुन्हा राबवून बाधितांना न्याय मिळवून देणे हाच त्यावर उपाय. किंवा, या नरसंहारामुळे मूळ राजकीय व्यवस्थाच मोडकळीला आली आहे; किंबहुना, ठरवून मोडकळीला आणली गेली आहे, हे स्पष्ट होतं, असा एक तर्क लावू शकतो. वसाहती व्यवस्थेला एकसंध सुदान नकोच होता; वांशिक कलहातच त्यांचा फायदा होता. वांशिक आधारावर दक्षिण सुदान स्थापन झाल्यावर वसाहती स्वप्नाचं साहजिकच दु:स्वप्नात परिवर्तन झालं.
दक्षिण सुदानमधल्या नवजात राजकीय व्यवस्थेचं असं मोडकळीला येणं, यावरून त्या व्यवस्थेच्याच पुनर्विचाराची गरज आहे, हेच सिद्ध झालं. कायद्यांच्या वरवरच्या डागडुजीचा काहीच उपयोग होणार नव्हता, पण सरतेशेवटी फक्त डागडुजीच झाली. संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations), आणि अमेरिका, ब्रिटन आणि नॉर्वे या त्रयीच्या मध्यस्थीनं नवजात राष्ट्र जन्माला आलं होतं, आणि त्यांचाच प्रभाव अजूनही कायम आहे. आज दक्षिण सुदानची अशी विचित्र परिस्थिती आहे – तो एक स्वतंत्र देश आहे, पण त्याच वेळी वसाहती शासनाखाली असलेलाही देश आहे. २०१३ साली तेथे आंतरराष्ट्रीय एन.जी.ओ.वाल्यांनी हिंसाचाराच्या चौकशीच्या अंतर्गत 'सत्य आणि सलोखा' (truth and reconciliation) अभियान राबवलं, पण यातून काहीच निष्पन्न झालं नाही; उलट या चौकशीनं मूळ वसाहती वस्तुस्थितीच अधोरेखित केली. दक्षिण सुदानातले वांशिक वैरी एकमेकांशी लढतच राहिले, आणि यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. आज हिंसाचारात भाग घेतलेले फुटीरतावादी आणि भ्रष्ट पुढारीच सरकारात आहेत. २०२०मध्ये पुन्हा एक शांततेचा करार झाला, आणि सरकारचे विभाग सहा मोठ्या वांशिक गटांमध्ये वाटले गेले आहेत. मंत्रीपदाच्या आमिषामुळे या गटांच्या नेत्यांचं तात्पुरतं समाधान झालं आहे. त्या पदांचा वापर ते 'त्यांच्या-त्यांच्या' जनतेला राजाश्रय देण्याकरता करतात. तो स्वीकारून ही जनता त्यांना आखून दिलेल्या भागात कशीबशी दिवस काढते. पण आंतरराष्ट्रीय वसाहती व्यवस्थेचा प्रभाव मात्र होता तसाच कायम आहे.
सुदान असो वा दक्षिण सुदान, राजकीयतेचा आणि राज्यव्यवस्थेचा पुनर्विचार होणं, म्हणजेच अधिवासी-आदिवासी, उत्तर-दक्षिण, अरब-आफ्रिकी, ही द्वंद्वं बाजूला सारणं, आणि आफ्रिकी आदिवासी हे विशिष्ट, टोळीबद्ध, वांशिक गटांचे आणि ठरावीक प्रदेशातच असतात आणि असायला हवेत, या सरधोपट आणि अनैतिहासिक मांडणीचा त्याग करणं. याचा अर्थ सर्व सांस्कृतिक भिन्नतेचाही त्याग करणं अजिबात नसून, या निरंतर असलेल्या भिन्नतेला दिलेलं राजकीय महत्त्व नाकारणं आहे.
लायबेरियातल्या यादवीचा संक्षिप्त इतिहास
- अबापट
लायबेरिया हा आफ्रिकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर वसलेला देश.
याच्या वायव्येला सिएरा लिओन नावाचा पूर्वी ब्रिटिश अधिपत्याखाली असलेला देश, आणि पूर्वी फ्रेंच वसाहती असणारे, उत्तरेचा गिनी आणि पूर्वेचा आयव्हरी कोस्ट. पश्चिमेला अटलांटिक महासागर.
लायबेरियाच्या या तिन्ही शेजारी देशांना १९६०च्या दशकात स्वातंत्र्य मिळालं.
लायबेरिया भारत स्वतंत्र होण्याआधी शंभर वर्षं स्वतंत्र झाला. ते स्वातंत्र्य तसं कृतक होतं, कारण आफ्रिकेतल्या इतर भागांप्रमाणे या भूप्रदेशावर कुठल्याही परकीय राष्ट्राने वसाहत केली नव्हती. त्यामुळे तो स्वतंत्र झाला असं म्हणण्याऐवजी खरं तर निर्माण झाला असं म्हणायला पाहिजे. गंमत म्हणजे या देशनिर्मितीचं मूळ आफ्रिकेत नसून अमेरिकेत आहे.
या देशाची निर्मिती हा एक प्रकारचा, तत्कालीन अमेरिकन सरकारचा लबाड परोपकार होता. अमेरिकेतल्या गुलामांवर आधारित व्यवस्थेतून आलेला एक तथाकथित अपराधगंड, ज्याची परिणती “आपण झालं गेलं विसरून जाऊ आणि या माजी, काळ्या गुलामांना परत एकदा मुक्त, स्वायत्त राहण्याची संधी देऊ; जिथून त्यांना आणलं गेलं त्या, त्यांच्या स्वतःच्या भागात परत उपलब्ध करून देऊ,” असा ‘होलिअर दॅन दाउ स्टॅन्ड’ घेण्यात झाला.
खरं तर ही शुद्ध लबाडी होती. हे सगळं करण्यामागे 'अमेरिकन सोसायटी फॉर कॉलनायझिंग द फ्री पीपल ऑफ कलर ऑफ द युनायटेड स्टेट्स’ किंवा अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटी होती. ही संस्था पूर्णपणे गोऱ्या लोकांची होती. त्यांच्या सदस्यांमध्ये काही थोडे चांगले सदस्य होते, ज्यांची या मुक्त गुलामांना पुढे चांगले आयुष्य मिळावे अशी इच्छा होती. परंतु बहुतांश सदस्य 'बॅक टू आफ्रिका’ या प्रकल्पाकडे गुलामगिरीची पद्धत नष्ट करण्यापेक्षा त्या काळी असलेली गुलामगिरीची पद्धत बळकट करण्याकडे ओढा असलेले होते.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत सुमारे वीस लाख गुलाम होते. परंतु सुमारे चारपाच लाख मुक्त झालेले गुलामही होते. हे माजी गुलाम मुख्यतः अमेरिकेच्या उत्तरेच्या राज्यांमध्ये पसरलेले होते. त्यांनी येनकेन प्रकारेण गुलामगिरीतून स्वतःची सुटका करून घेतलेली होती. हे मुक्त झालेले गुलाम गोऱ्या गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या, स्वतःचे गुलाम बाळगणाऱ्या गोऱ्या लोकांना तापदायक वाटत होते. याचं कारण म्हणजे मुक्त झालेल्या गुलामांना शिक्षण वगैरे घेऊन 'पुढे' जाण्याची आस होती.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जेम्स मॉनरो हेही माजी गुलामांनी उघडपणे शहरांमध्ये मोकळेपणानं असं फिरणंही अत्यंत धोकादायक मानत होते. (विनोद म्हणजे, लायबेरियाच्या राजधानीचं नाव मॉनरोव्हिया , हे यांच्याच नावावरून घेण्यात आलं आहे.)
अमेरिकन काॅलनायझेशन सोसायटीच्या या उपक्रमात सुरुवातीपासून लबाड सुप्त हेतू भरलेले होते. या उपक्रमामुळे मुक्त झालेल्या गुलामांमध्ये फाटाफूट व्हायला लागली. यांतले बरेच मुक्त गुलाम उच्चशिक्षित होते. अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटीनं चक्क काही माजी गुलामांना पळवून नेऊन आफ्रिकेत परत पाठवून दिलं. यामुळे एक प्रचंड मोठा वाद निर्माण झाला. उच्चशिक्षित माजी गुलामांचं असं म्हणणं होतं की काही पिढ्या अमेरिकेत घालवल्यानंतर अमेरिकेत राहण्याचा त्यांचा हक्क हा सर्वसामान्य (गोऱ्या) अमेरिकन नागरिकांच्या इतकाच, समान होता आणि त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध परत त्यांना अजिबात माहीत नसलेल्या आफ्रिकेत परत पाठवून देण्याचा घाट घालणं म्हणजे या समाजाचा अमेरिकन समाजाने केलेला मोठा घात होता. यामुळे गुलामगिरी प्रथेविरुद्ध सुरू असलेल्या मोठ्या चळवळीला खीळ बसणार होती. हा विवाद जाहीररीत्या बरीच वर्षं सुरू राहिल्यामुळे अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटीची इच्छा होती तेवढे माजी गुलाम ते लायबेरियात पाठवू शकले नाहीत.
या लोकांना परत आफ्रिकेत घेऊन जाणारं जहाज १८२०मध्ये अमेरिकेतून निघालं. परंतु त्यांना नक्की कुठे जायचं याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते (सध्याच्या लायबेरियाचा शेजारी असलेल्या) सिएरा लिओनच्या किनाऱ्यावर जाऊन पोचलं. परंतु सिएरा लिओनमध्ये तेव्हा ब्रिटिश वसाहत झालेली होती. तिथे ह्या लोकांना थारा नव्हता, म्हणून मग तसेच हळू हळू आफ्रिकेच्या किनाऱ्यावर दक्षिणेला ते सरकत गेले. आणि ज्याला तेव्हा ग्रेन कोस्ट म्हणत, तिथे जाऊन धडकले. तिथे स्थानिक जमातींचे मुखिया काही भाग विकायला तयार झाले आणि तिथे या लोकांना उतरवण्यात आलं. पुढची वीस वर्षं हळू हळू अजून जास्त जमीन घेण्याचा कार्यक्रम सुरु राहिला आणि तिथे माजी गुलामांच्या वसाहती निर्माण झाल्या.
अमेरिकेत राहण्याला सरावलेल्या या लोकांचे तिथे अतोनात हाल झाले. उपासमार, आजारांच्या साथी आणि स्थानिक टोळ्यांकडून हल्ले झाल्यामुळे यातील काही वसाहती टिकू शकल्या नाहीत. एका अंदाजानुसार आफ्रिकेत पाठवल्या गेलेल्या माजी गुलामांपैकी अर्धी लोकसंख्या पहिल्या वीस वर्षांतच वर लिहिलेल्या विविध कारणांनी नष्ट झाली. या काळात ही लोकसंख्या किती असावी याबद्दल वेगवेगळ्या संदर्भांत वेगवेगळी आकडेवारी सापडते; साधारण वीस हजारांपैकी अर्धे लोक नष्ट झाले असावेत, असं हे सर्व वाचल्यावर वाटतं.
१८४७ साली एक महत्त्वाची घटना घडली. शेजारी असलेल्या सिएरा लिओनच्या वसाहतीत ब्रिटनने आपलं बस्तान चांगल्यापैकी बसवलेलं होतं. अमेरिकी सरकारला या माजी अमेरिकी लोकांचं काय करावं हे कळत नव्हतं. त्यांना आफ्रिकेत आपली वसाहत करण्यात अजिबात रस नव्हता. तेव्हा ग्रेन कोस्टवर उतरलेल्या उरल्यासुरल्या काही हजार माजी अमेरिकी गुलामांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतला आणि अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटीशी असलेले आपले संबंध तोडून टाकले. आणि एक नवं स्वायत्त राष्ट्र स्थापण्याचं ठरवलं, त्याचं नाव ठरलं लायबेरिया.
२६ जुलै १८४७ रोजी मॉनरोव्हियामध्ये एक खास समारंभ करून स्वातंत्र्याची घोषणा केली गेली. अमेरिकेच्या संविधानातलीच भाषा वापरून लायबेरियाचं संविधान लिहिलं गेलं. काही मुख्य फरक केले गेले. एक म्हणजे ‘अमेरिकेत अत्यंत घृणास्पद वागणूक मिळाल्यामुळे, अखेर जनतेने आफ्रिकेत आश्रय घेतला,’ याचा उल्लेख केला. या व्यतिरिक्त या देशाचं नागरिकत्व फक्त काळ्या लोकांनाच मिळेल असाही उल्लेख केला. मॉनरोव्हिया ही राजधानी असेल असे ठरले. देशाच्या सीमा कुठल्या हे तेव्हा माहीतच नव्हतं. त्या ठरवण्यात पुढचा मोठा काळ गेला. ‘The Love of Liberty Brought Us Here’ हे देशाचे ब्रीदवाक्य ठरलं.
देश स्वतंत्र झाला खरा, पण तिथलं आयुष्य अत्यंत खडतर होतं. देश बराच काळ दिवाळखोरीत होता. अमेरिकन कॉलनायझेशन सोसायटीकडून क्वचित येणारा निधी आणि बँकांकडून घेतली जाणारी अत्यंत महाग कर्जं यांवर देशाचा गाडा हळूहळू चालू होता. एका दृष्टीनं तिथे ‘वसाहत करून काही फायदा नाही’ असं वाटत असल्यामुळे देशावर परकीय, आक्रमणं/ वसाहतवादी आक्रमण कधी झालंच नाही. कायमच्या आर्थिक चणचणीमुळे प्रगती आणि विकास राजधानी मॉनरोव्हियापलीकडे कधी पोहोचलेच नाहीत. बराच काळ या देशाला ब्रिटन वगळता आंतरराष्ट्रीय मान्यता कुणीही दिली नाही. (ब्रिटनने एक जुनी गन बोट भेट दिली होती, तीच लायबेरियाच्या आरमारातली एकमेव बोट होती.)
हा देश स्थापित झाला खरा, पण त्या देशाचं राज्य चालवत होते अमेरिकेतून आलेले मूठभर सुशिक्षित माजी गुलाम. त्यांचा या भागात पूर्वापार राहत असलेल्या मूलनिवासी प्रजेबरोबर राजकीय, सांस्कृतिक किंवा भाषिक कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. हाच त्या दोन्ही समुदायांच्या आपसांतल्या तणावाचा मुख्य मुद्दा होता. राज्यकर्त्यांचंअमेरिकी शिक्षण, इंग्रजी भाषा आणि ख्रिस्ती धर्म एका बाजूला आणि स्थानिक प्रजेचे आदिम धर्म, अनेक भाषा, जंगलात शिकार आणि जेमतेम उदरनिर्वाह होईल इतपत शेती आणि आदिम जीवनपद्धती दुसऱ्या बाजूला, असा प्रकार होता. म्हणजे काळ्याऐवजी गोऱ्या लोकांनी वसाहत केली असती तर जी तफावत निर्माण झाली असती तशीच तफावत या दोन्ही समाजांमध्ये होती.
देशाबाहेर मात्र अशी प्रतिमा निर्माण झाली होती की काळ्या लोकांनी काळ्या लोकांसाठी स्थापलेला हा एक स्वायत्त देश आहे. (उर्वरित आफ्रिकेत गोऱ्या देशांच्या वसाहती होत्या.)
हा अंतर्गत तणाव अनेक दशकं सुरू राहिला आणि अखेर १८९०च्या आसपास याचा पहिल्यांदा स्फोट झाला. देशातल्या काही जमाती आणि आणि सरकार यांच्यात हिंसक युद्धं सुरू झाली आणि चालतच राहिली. सरकारनं आपलं सैन्य याच काळात निर्माण केलं. १९२०पर्यंत हे सगळं असंच सुरू राहिलंआणि गुलामांची मुक्तता करण्याच्या उदात्त (!!) हेतूनं स्थापल्या गेलेल्या सरकारनंच पैशांच्या लोभानं गुलामांच्या बेकायदा व्यापारात भाग घ्यायला सुरुवात केली.
'लीग ऑफ नेशन्स'ने केलेल्या चौकशीत असं पुढे आलं की या सरकारने स्वतःचेच नागरिक जहाजांमधून बाहेर पाठवले होते व त्यांचा व्यापार केला होता.
ब्रिटनमधील 'अँटी स्लेव्हरी सोसायटी'ने याची गुप्तपणे माहिती काढण्यासाठी प्रसिद्ध लेखक ग्रॅहम ग्रीन याचा लायबेरियातील दौरा ठरवला. ग्रॅहम ग्रीन व त्याची बहीण बार्बरा ग्रीन यांनी १९३५ साली लायबेरियाच्या अंतर्भागात पायी प्रवास केला (त्या काळातील पद्धतीनुसार बरोबर तीसपस्तीस नोकर घेऊन). त्यांनी त्या सोसायटीला काय रिपोर्ट दिला हे गुलदस्त्यात आहे. परंतु या प्रवासाबद्दल ग्रॅहम ग्रीनने लिहिलेले 'Journey without Maps' हे पुस्तक मात्र प्रसिद्ध झाले. बार्बरानेही या प्रवासाविषयी 'Too late to turn back' हे पुस्तक लिहिले. (मला 'जर्नी विदाउट मॅप्स'पेक्षा 'टू लेट टू टर्न बॅक' हे पुस्तक जास्त आवडले. ग्रॅहम ग्रीनच्या पुस्तकात या प्रवासाबद्दल ललित भाग जास्त आहे. बार्बरा ग्रीनच्या पुस्तकात मात्र काय प्रवास केला आणि काय बघितलं याबद्दल रोकठोक वर्णन आहे जे मला जास्त रोचक वाटले वैयक्तिक आवड म्हण).)
१९७०च्या दशकांपर्यंत मॉनरोव्हियास्थित सरकारने वेळ मारून नेत ‘सर्व काही ठीक आहे’ असा देखावा सुरू ठेवला. निवडणुका होत, त्या मॅनेज केल्या जात. (१९२३ सालची निवडणूक चार्ल्स डी बी किंग यांनी तब्बल ४५ हजार मतं मिळवून जिंकली. या निवडणुकीत मतदार फक्त सहाच हजार होते.) आणि अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांचे वंशजच निवडून येत (कारण मतदारही फक्त याच समाजातील असत).
कायम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशाचे डोळे कायम प्रगत देशातील कोण मदत द्यायला तयार आहे त्यांच्याकडे लागलेले असे.
शीतयुद्धाच्या काळात कधी अमेरिकेला आपला बेस देशात उभा करण्यासाठी परवानगी देण्यासारख्या किरकोळ गोष्टी करत हा देश सत्ताधीशांचीच सत्ता सुरू ठेवण्याइतपत तगून राहत असे. अंतर्गत तणाव तसेच सुरू राहत असत.
१८४७पासून १९८०पर्यंत अशीच परिस्थिती राहिली. अत्यंत कमी संख्या असलेले अमेरिको लायबेरियन्स (अमेरिकेतून लायबेरियात पाठवलेले गेलेले पाश्चात्त्य शिक्षण घेतलेले आफ्रिकन वंशाचे लोक आणि त्यांचे वंशज) हे राज्यकर्ते आणि बहुसंख्य स्थानिक मूलनिवासी लायबेरियन म्हणजे प्रजा.
या दोन्ही गटांत कुठल्याही प्रकारचं भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक साम्य नव्हतं.अमेरिको- लायबेरियन्स मुख्यतः राजधानी व काही किनारपट्टीवरच्या भागांत एकवटले होते. रस्ते आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळे आणि घनदाट जंगल असल्यानं या दोन्ही गटांचा संपर्क फार कमी असे.
या दोन्ही गटांमध्ये तणाव मात्र प्रचंड होता.
यादवी युद्ध १९८० ते २००३
लायबेरियात मोठा राजकीय भूकंप व्हायला १९८० साल उजाडलं. तोपर्यंत, म्हणजे लायबेरिया देश अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १३३ वर्षं, देशाची सर्व व्यवस्था अमेरिको लायबेरियन लोकांच्या हातात एकवटलेली होती.
त्याच्या आदल्या वर्षी तांदळाचे भाव वाढल्यामुळे मोठ्या दंगली झाल्या होत्या आणि त्यामुळे देशाचं स्थैर्य डळमळीत झालं होतंच. परंतु १९८० साली सत्ताबदल झाला, तो अत्यंत रक्तरंजित पद्धतीनं. स्थानिक मूलनिवासी लायबेरियन लोक सत्ता हिसकावून घेताना इतके भयानक क्रौर्य दाखवतील, आधीच्या सत्ताधाऱ्यांचे जाहीर हत्याकांड करतील असा अंदाज कुणालाच आला नव्हता.
१२ एप्रिल १९८०, शनिवार, पहाटे फक्त सतरा सैनिकांनी हा सत्तापालट घडवून आणला. तेव्हापर्यंत सैन्यातील वरिष्ठ पदं फक्त अमेरिको लायबेरिअन लोकांसाठी राखीव ठेवल्यासारखी असत. सैन्यात अगदी कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या सैनिकांनी हा कट घडवून आणला. पहाटे पहाटे अठ्ठावीस वर्षीय मास्टर सार्जंट सॅम्युअल डो याच्या नेतृत्वाखालील एक छोटा गट अध्यक्षीय प्रासादात घुसला. राष्ट्राध्यक्ष विल्यम टोलबर्ट झोपेत असतानाच त्यांना डोक्यात अनेक गोळ्या मारल्या गेल्या. त्यानंतर त्यांच्या पोटात सुरे खुपसून नंतर अवयव छिन्नविच्छिन्न केले गेले. (अनेकांच्या मते या कटवाल्यांना सीआयएची मदत होती. अध्यक्षीय प्रसादाची अंतर्गत रचना कशी आहे वगैरे सर्व माहिती त्यांना पुरविली गेली होती. अजून एक म्हणजे टोलबर्ट यांच्या पत्नीने नंतर सांगितलं की त्यांच्या पोटात सुरा खुपसणारा माणूस 'गोरा' होता). या हत्येनंतर मॉनरोव्हियामधे लगेचच खून व लूटमारीचं सत्र सुरू झालं. जमलेल्या आरोळ्या ठोकणाऱ्या गर्दी/जमावाच्या समोर टोलबर्ट यांच्या मंत्रिमंडळापैकी तेरा लोकांना फरपटत समुद्रकिनाऱ्यावर नेऊन जाहीररीत्या ठार मारण्यात आलं. या सैनिकांच्या टोळीला 'फायरिंग स्क्वॉड' वगैरे म्हणणं हास्यास्पद ठरेल कारण हे मद्यधुंद सैनिक जमावाच्या प्रोत्साहनाने गोळ्या घालून मेलेल्या मंत्र्यांच्या प्रेतांवरही खूप वेळ गोळ्या मारत राहिले.
अनेक दशकं स्थानिकांच्या मनात साठलेल्या आत्यंतिक रागाचं रूपांतर इतरत्र आता धनाढ्य अमेरिको लायबेरियन लोकांच्यावर भयाण हल्ले करण्यात झालं. २००८ साली प्रकाशित झालेल्या 'द हाऊस ऑन शुगर बीच' या पुस्तकात अमेरिकन पत्रकार हेली न कूपर यांनी १९७०च्या दशकात असलेले अमेरिको लायबेरियन लोकांचे असलेले प्राबल्य आणि ज्या क्षणी ते कोसळले त्या काळाचे हृदयद्रावक वर्णन केलं आहे. त्यांच्या स्वतःच्या घरी त्यांच्या आईने 'बलात्कार करा लंयचा तर माझ्यावर करा, माझ्या मुलींना सोडा’ असं सांगून स्वतःला हल्लेखोरांच्या स्वाधीन करून मुलींना वाचविले.
अनेक अमेरिको लायबेरियन लोकांप्रमाणे हेलन कूपर यांनी मिळालेल्या पहिल्या विमानाने लायबेरियातून पळ काढला.
सत्तापालट झाल्यावर सगळीकडे आनंदीआनंद होईल आणि 'आपलं' सरकार चांगला कारभार करून शांतता आणेल असं स्वप्न लगेचच कट करणारे गट एकमेकांवर तुटून पडल्याने धुळीला मिळालं. कटवाल्यांचा असा दावा होता की समाजातील शोषित वर्गावर अन्याय होत असल्याने आम्ही सत्तापालट घडवून आणलेला आहे. हा दावा लगेचच फोल ठरायला लागला. सुरू झालं ते विविध आदिवासी जमाती व टोळ्या यांच्यात एकमेकांविरुद्ध आतापर्यंत कधीही न घडलेलं युद्ध. सॅम्युअल डो हा क्राह्न (Krahn) नावाच्या देशाच्या दक्षिणेत असलेल्या एका छोट्या समाजाचा होता. त्याने आधी इतर कटातील सहकाऱ्यांना बाजूला सारून राष्ट्राध्यक्षपद ताब्यात घेतलं. हाती आलेल्या सत्तेचा वापर करून मॅनो आणि गिओ या देशाच्या मध्यभागातील निंबा कौंटीत राहणाऱ्या तुलनेनं जास्त संख्या असलेल्या समाजातल्या/टोळीतल्या लोकांचे शिरकाण जोरात सुरू केलं.
सर्व समाजांमध्ये आधीपासूनच किरकोळ तणाव होतेच. पण अमेरिको लायबेरियन लोकांचा धनाढ्य प्रस्थापित सत्ताधारी वर्ग आणि उर्वरित स्थानिक शोषित वर्ग यांच्यातील मोठ्या तणावाचा वापर करून या लबाड कटवाल्यांनी सत्ता उलथून लावली खरी, परंतु यापुढे या भ्रष्ट आणि निर्दयी लोकांनी, नवीनच हातात घेतलेल्या सत्तेचा वापर करून इतर समाज/टोळीवाल्यांना हिंसक पद्धतीने नेस्तनाबूत करायला सुरुवात केली.
सॅम्युअल डोच्या दहा वर्षांच्या अंदाधुंद कारभारामुळे आधीच कमकुवत असलेल्या लायबेरियाची स्थिती अजूनच खालावली. सॅम्युअल डोचं सरकार पडणारच होतं. चार्ल्स टेलर नावाचा त्याचाच पूर्वीचा सहकारी आता परागंदा होऊन सॅम्युअल डोच्या विरोधात सज्ज झाला होता. टेलर १९८९ डिसेंबरच्या शेवटाला बंडखोरांचा छोटा गट घेऊन लायबेरियात घुसला आणि सॅम्युअल डो सरकारचा अंतकाळ सुरू झाला.
चार्ल्स टेलरची आई स्थानिक गोला समाजाची होती आणि वडील अमेरिकोलायबेरिअन. निंबा कौंटीमधे असलेल्या सॅम्युअल डोविरोधी जनक्षोभाचा टेलरनं फायदा उठवायला सुरुवात केली. शेजारी देश आयव्हरी कोस्टमधून थोडेसे बंडखोर घेऊन टेलर निंबा कौंटीत घुसला. सुरुवातीला त्याच्याबरोबर जरी अगदी थोडके बंडखोर असले तरीही काही आठवड्यातच मॅनो आणि गिओ समाजातील हजारो लोक त्याला येऊन मिळाले. या सर्व लोकांना सॅम्युअल डोचा बदला घ्यायचा होता.
अनेक महिने टेलरबरोबरचे बंडखोर विरुद्ध सॅम्युअल डोचे निष्ठावान सैनिक यांच्यात देशांतर्गत युद्ध सुरू राहिलं. याच काळात टेलरबरोबरच्या बंडखोरांच्यात फाटाफूट होऊन अनेक नवे फुटीर गट तयार झाले. सप्टेंबर १९९०मध्ये त्यांच्यातीलच एका फुटीर गटाच्या सैनिकांनी सॅम्युअल डोला पकडलं. त्याला अर्धवस्त्र करून, त्याच्या पायांवर गोळ्या मारून त्याचा अतोनात छळ केला. त्याचे कान कापून टाकले. या छळाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही करून ठेवलं. डो मेल्यावर त्याचे प्रेत एका गाड्यावर टाकून राजधानी मॉनरोव्हियातील रस्त्यावर फिरविण्यात आलं.
जादूटोणा वगैरेचं प्रस्थ तिथल्या स्थानिक जमातींमध्ये फार. सॅम्युअल डो जादूटोण्याचा वापर करत असे आणि त्यामुळे तो अतिबलवान झाला आहे असा प्रचलित समज होता. अशाच जादूटोण्याचा वापर करून तो गायब झाला नाहीये, तो खरंच मेला आहे हे लोकांना पटावं म्हणून त्याचं प्रेत राजधानीभर फिरविण्यात आलं.
आणि हा नृशंस अध्यक्ष गेला, आता बरे दिवस येऊ शकतील अशी आशा पुन्हा एकदा धुळीला मिळाली. कारण चार्ल्स टेलरची फौज पूर्ण देश काबीज करण्याइतकी सक्षम नव्हती. पुढचा बराच काळ टेलरचे बंडखोर, सॅम्युअल डो समर्थक सैन्य, आजूबाजूच्या भागातील देशांनी (मुख्यतः नायजेरिया) पाठवलेली शांतीसेना आणि वारंवार इकडून तिकडून फुटून नवनवे तयार होत असलेले बंडखोर गट यांमधील युद्ध देशभर रेंगाळत सुरूच राहिलं. हे युद्ध म्हणजे एक भयाण बेधुंद अराजक होतं. यात भाग घेणारे बंडखोर, सैन्य अत्यंत बेजबाबदार पद्धतीने खूनखराबा, लुटालूट करत होते. यांना पायबंद घालेल अशी काहीही व्यवस्था देश म्हणून, सरकार म्हणून शिल्लक राहिली नव्हती. देशाचे अस्तित्वच जणू पुसल्यासारखे झाले होतं. आफ्रिकेतील जमातींमध्ये असलेली प्रचलित असलेली काळी जादू आणि इतर आदिम समजांचे प्रतिबिंब उघडपणे या युद्धात मोठ्या प्रमाणावर दिसलं. मारलेल्या विरोधी सैनिकांच्या शरीराचे भाग खाणे (ज्यायोगे त्याची शक्ती आपल्याला मिळेल असा समज) हे सर्रास सुरू होतं. आपल्या डोळ्यांदेखत झालेली आपल्या आईवडिलांची हत्या बघितलेले लहान वयाचे सैनिक हेही एके ४७ सारखी स्वयंचलित शस्त्रं हातात घेऊन सूड म्हणून म्हणा किंवा निराशेतून म्हणा, अतोनात अत्याचार करत होते, लोकांना मारत देशभर फिरत होते. ही शस्त्रं त्यांना विविध गटांकडूनच मिळत होती. बऱ्याचदा हे बालसैनिक ड्रग्सच्या अमलाखाली असली कृत्यं करत असत.
लायबेरियातल्या या अनागोंदीवरचा हा युट्यूब व्हिडिओ. (त्यावर वयोमर्यादा आहे. आपापल्या जबाबदारीवर बघावा.)
एक हिंस्र उदाहरण म्हणजे मॉनरोव्हियामधून बाहेर पडण्याच्या रस्त्यावर एका चेक पॉईंटवर कुणी तो चेकपॉईंट ओलांडून जाऊ नये म्हणून चक्क माणसाचं आतडे रस्त्यावर आडवे बांधलेले होतं.
दुसरीकडे एका ठिकाणी कुणाला पकडल्यावर माकडाद्वारे याला ठेवायचं का मारून टाकायचं हे ठरवण्याचा खेळ सुरू असे. माकडानं स्पर्श केला तर त्या माणसाला गोळ्या घालून मारायचं, न केल्यास सोडून द्यायचं असा अतार्किक भीषण प्रकार.
घाना या देशानं शांतीसेना पाठवली म्हणून भडकून जाऊन चार्ल्स टेलरने अनेक पिढ्या लायबेरियात राहिलेल्या पण मुळात घानामधून आलेल्या लोकांना मारून टाकलं.
लायबेरियातील गृहयुद्धाचे परिणाम बाजूच्या देशांमधेही होऊ लागले. लायबेरियातील यादवी युद्ध शेजारच्या सिएरा लिओनमध्ये पसरलं. याचं मुख्य कारण म्हणजे तिथल्या रिव्होल्यूशनरी युनाइटेड फ्रंट (RUF ) नावाच्या बंडखोर गटाला चार्ल्स टेलरने पाठिंबा आणि रसद पुरवली. आरयुएफने सिएरा लिओनचा मोठा भाग व्यापला. यात ज्या भागात हिऱ्यांच्या खाणी होत्या तो भागही होता (RUFच्या स्थापनेत त्यांचा नेता फोडे सांको याच्यासोबत चार्ल्स टेलरही सहभागी होता)
बेकायदा पद्धतीनं मिळवलेल्या हिऱ्यांचा व्यापार करून RUF आणि चार्ल्स टेलरने आपापल्या युद्धखोरीसाठी अमाप पैसा मिळविला. ‘ब्लड डायमंड्’ या गाजलेल्या चित्रपटात सिएरा लिओनमध्ये या काळात घडलेल्या काही घटनांचा आधार घेतला आहे. सिएरा लिओनमधील युद्धात सुमारे पन्नास हजार लोकांनी जीव गमावला आणि पंधरावीस लाख लोक विस्थापित झाले. या लोकांनी शेजारील गिनी आणि आयव्हरी कोस्टमध्ये आसरा घेतला.
लायबेरियात सुरु असलेले गृहयुद्ध पुढील किमान सहा वर्षं सुरूच राहिलं. या काळात नायजेरिया आणि लिबियासारखे देशही यात सारखे हस्तक्षेप करत होते.
१९९७च्या सुमाराला गृहयुद्ध थोडं शांत होऊन संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली निवडणुका घेण्यात आल्या. १९८९ ते १९९७ या काळात सुरू असलेल्या यादवी युद्धात सुमारे दोन लाख लोक मृत्युमुखी पडले.
लायबेरियात यादवी युद्ध थांबून शांतता नांदावी आणि स्थिर सरकार यावे म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय निकराचा प्रयत्न करत होता. या निवडणुकीत चार्ल्स टेलर निवडून आला. टेलरने तोवर जे काही केलं ते माहीत असूनही हवालदिल झालेला आंतरराष्ट्रीय समुदाय निवडून आलेल्या या नव्या राष्ट्राध्यक्षाला सहन करत होता.
अर्थात हे सर्व होऊनही शांतता प्रस्थापित होणे काही शक्य होत नव्हतं. सॅम्युअल डोप्रमाणेच चार्ल्स टेलरही अत्यंत भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार चालवत होता. त्यामुळे या सरकारचा शेवटही आधीच्या सरकारप्रमाणेच होणार हे उघड होतं. चार्ल्स टेलर आणि शेजारील देश गिनी यांचे वैर होतं. त्यामुळे गिनी सरकारच्या पाठिंब्यावर 'लायबेरियन्स युनायटेड फॉर रीकन्सिलिएशन अँड डेमोक्रसी (LURD) नावाचा बंडखोर गट कार्यरत होऊन त्याने लायबेरियात घुसून युद्ध सुरू ठेवलं. ‘आपण यांच्यापुढे कधीही शरण जाणार नाही,' अशी घोषणा जरी चार्ल्स टेलरने केली असली तरीही दोन महिन्यातच स्वतःची सॅम्युअल डोसारखी गत व्हायला नको म्हणून टेलर नायजेरियात पळून गेला व त्याने तिथेच आश्रय घेतला. या सर्व घटना साधारणपणे २००३च्या आसपासच्या. प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर २००६मध्ये नायजेरियाने चार्ल्स टेलरला संयुक्त राष्ट्रांच्या हवाली केलं. आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्याच्यावर युद्धकाळातल्या गुन्ह्यांविरोधात खटला चालवण्यात आला.
१९८० ते २००३ या या २४ वर्षांच्या काळात सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे लायबेरिया देश पूर्ण खिळखिळा झाला. लायबेरियातील प्राथमिक आरोग्य, उद्योगव्यवसाय, शिक्षणव्यवस्था आणि इतर सर्व मूलभूत पायाभूत सुविधा पूर्ण नष्ट झाल्या. देश म्हणूनही त्याचं अस्तित्व जवळजवळ संपल्यात जमा होतं.
२००३मध्ये घानाच्या राजधानीत शांतता समझोता झाला. २००३पासून संयुक्त राष्ट्रं आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांच्या शांतिसेनेने परत युद्ध होणार नाही इतपत शांतता प्रस्थापित केली. या काळात लायबेरियातील स्त्रियांचा शांतता प्रस्थापित करण्यात मोठा सहभाग होता. लेमा गिबोवे नावाच्या स्त्रीच्या नेतृत्वाखाली Women of Liberia Mass Action for Peace नावाच्या संस्थेने सरकारी फौजा आणि विविध युद्धखोर गट यांच्यावर दबाव आणून त्यांना घानामधील 'शांतता चर्चेत' या सर्वांना सहभागी व्हायला लावले. एलेन सरलीफ यांनीही यादवी युद्ध थांबवण्याच्या मोहिमेत पुढाकार घेतला. पुन्हा एकदा शेजारी देशांच्या सहभागाने लायबेरियात बऱ्यापैकी शांतता प्रस्थापित झाली. २००५मध्ये निवडणुका होऊन सरलीफ लायबेरियाच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष झाल्या. एलेन सरलीफ हार्वर्ड पदवीधर होत्या, त्यांना जागतिक बँक आणि सिटी बँकेत काम करण्याचा पूर्वानुभव होता.
२०१८पर्यंत त्याच अध्यक्ष होत्या.
२०११मध्ये लेमा गिबोवे आणि राष्ट्राध्यक्ष सरलीफ यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
लायबेरिया विषयी किमान तीन उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. आधी उल्लेख केलेली ग्रीन भावंडांची ‘टू लेट टू टर्न बॅक’ आणि ‘जर्नी विदाऊट मॅप्स’ ही दोन आहेतच. टिम बुचर या युद्ध पत्रकाराचं 'चेसिंग द डेव्हिल: ऑन फूट थ्रू आफ्रिकाज किलिंग फील्ड्स' नावाचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. बुचरने लायबेरियातील यादवी युद्ध संपता संपता ग्रॅहम ग्रीनने १९३५ साली ज्या मार्गावरून प्रवास केला त्याच मार्गावरून लायबेरियामध्ये प्रवास केला व त्या आधारावर लिहिलेले हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे.
रवांडामधील वंशसंहार
- उज्ज्वला
११ एप्रिल ते १४ मे १९९४ या काळात रवांडा देशातील ५९ हजार तुत्सी लोकांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त लोकांची भोसकून हत्या करण्यात आली. न्यामाता हे ब्युजेसेरा या छोट्या, टेकड्यांनी आणि दलदलीने युक्त प्रांतातील एक छोटेसे गाव. तिथे तुत्सी लोक मोठ्या संख्येने होते. जीव वाचवायला काहींनी चर्चचा आश्रय घेतला, तर काही टेकड्या, जंगले यांत लपू लागले. १४, १५ व १६ एप्रिल रोजी न्यामाताच्या चर्चमध्ये आसरा घेतलेल्या ५ हजार लोकांची कत्तल झाली. त्यात सैनिकांच्या बरोबरीने हुतु जमातीच्या सर्वसामान्य लोकांचा सहभाग होता. मे महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेले हे निर्घृण हत्याकांड अत्यंत पद्धतशीर नियोजन करून घडवले होते. भेदरलेल्या, लपलेल्या तुत्सी लोकांना पाठलाग करून वेचून वेचून मारत होते. हे सर्व दिवसाउजेडी जमेल तितके. मग 'युद्धविराम'. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहात, गाणी म्हणत हल्लाबोल.
या सर्वाचा लेखाजोखा जाँ आत्झफेल्ड या फ्रेंच भाषक पत्रकाराने आपल्या तीन पुस्तकांतून मांडला. त्यातले पहिले 'दाँ ल न्यू द ला व्ही' – उघडेवाघडे आयुष्य – हे या शिरकाणातून वाचलेल्या १४ जणांचे कथन आहे.
दुसरे पुस्तक 'ला सेझों दे माशेत' – सुऱ्यांचा मोसम – तुत्सी लोकांच्या हत्याकांडात सामील झालेल्या व नंतर तुरुंगात टाकलेल्या हुतु समाजातील कैद्यांच्या मुलाखतीवर आधारित हे पुस्तक आहे.
तिसरे, 'ला स्त्रातेजी देझांतिलोप' – काळवीटांचे धोरण, हे तुत्सी लोक या वांशिक कत्तलीनंतर कसे जगत आहेत आणि हुतु व तुत्सी जमातींत सलोखा कसा दुरापास्त आहे यावर प्रकाश टाकते.

२००० साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक १९९७ ते १९९९ मध्ये अनेक खेपा घालून, लोकांना बोलते करत लिहिले आहे. पुस्तकात इतरही काही जणांचा ओझरता उल्लेख आहे.
यातील दाँ ल न्यू द ला व्ही – उघडेवाघडे आयुष्य – या पुस्तकाचा परिचय करून घेण्यापूर्वी थोडा इतिहास पाहू.
-
रवांडा हा देश १८८४ साली जर्मनीच्या संरक्षण छत्राखाली आला.
-
१८९९मध्ये जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीचा अंमल सुरू झाला.
-
१९१६मध्ये (पहिल्या महायुद्धादरम्यान) रवांडावर बेल्जियमने कब्जा केला.
-
१९२२ साली लीग ऑफ नेशन्स या आंतरराष्ट्रीय (वसाहतवादी) संस्थेने रवांडा – उरुंडी हे बेल्जियमच्या आधिपत्याखाली असतील यास मान्यता दिली. (उरुंडीलाच बुरुंडी असे म्हणतात. तेथे वेगळा राजा होता.) मात्र तेथे स्थानिक राजेशाही होतीच.
-
राजाला म्वामी म्हणत व १९३१मध्ये रवांडामध्ये तुत्सी जमातीचा राजा आला - त्याचे नाव म्युतारा (तिसरा). त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला व त्याच्या कार्यकाळात, म्हणजे १९५९पर्यंत रोमन कॅथलिक संप्रदाय तेथे प्रस्थापित झाला.
-
१९३३ साली रवांडा – उरुंडी येथील जनतेला त्यांच्या जमातीनुसार ओळखपत्र मिळाले. हुतुंच्या मानाने तुत्सी किंचित उजळ होते तर हुतु मात्र काळेशार होते. उच्चवर्गीय लोक तुत्सी – राजेशाहीमध्ये सत्ता त्यांच्या हाती होती. बेल्जिअन अधिपत्याच्या काळात हुतुंना कामाला जुंपले जाई व तुत्सींना मुकादमी देत. शाळा, प्रशासन, एकूण समाजात तुत्सींना झुकते माप मिळे.
-
१९४५मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सचे रूपांतर United Nations Organisation [UNO]मध्ये झाल्यावर रवांडा – उरुंडी यांचे विश्वस्तपद हे UNOकडे गेले.
-
१९५७मध्ये हुतु जमातीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
-
२४ जुलै १९५९ रोजी राजाचा मृत्यू झाल्यावर तेथे दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा [Dominique Mbonyumutwa] या राजेशाहीविरोधी हुतु नेत्याचा उदय झाला.
-
३ सप्टेंबर १९५९ रोजी Union NAtionale Rwandaise [UNAR] हा पक्ष स्थापन झाला. तो राजेशाहीच्या बाजूने होता.
-
१ नोव्हेंबर १९५९ रोजी दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा यांच्यावर हल्ला झाला व त्याचा वचपा म्हमहणून हजारो तुत्सी लोकांना ठार मारण्यात आले.
-
१९६०मध्ये निवडणुका जाहीर झाल्या व जानेवारी १९६१मध्ये राजेशाहीविरोधी कौल पडला.
-
२८ जानेवारी १९६१ रोजी दोमिनिक अम्बोन्युम्युत्वा हे प्रभारी राष्ट्राध्यक्ष झाले.
-
बेल्जियमने १ जुलै १९६२ रोजी रोजी रवांडा व बुरुंडी यांना दोन देश म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले. (बुरुंडीमध्ये अजून राजेशाही होती.)
-
२६ ऑक्टोबर १९६२ रोजी ग्रेग्वार कायीबांदा [Grégoire Kayibanda] यांची रवांडाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ते हुतु जमातीचे होते.
-
१९६३ साली तुत्सी जमातीने बुरुंडी देशातून सूत्रे हलवून गनिमी हल्ला केला, त्याचा सूड रवांडातील तुत्सी लोकांच्या हत्येने घेतला गेला.
-
१९६५पर्यंत कित्येक तुत्सींनी देशांतर केले. जवळजवळ निम्मे तुत्सी देशाबाहेर पडले. बर्ट्रांड रसेल यांनी या स्थलांतराची तुलना ज्यूंच्या स्थलांतराशी केली होती.
-
१९७३मध्ये ग्रेग्वार कायीबांदा यांची सत्ता उलथवून ज्युव्हेनाल आब्यारिमाना [Juvénal Habyarimana] या हुतु नेत्याने सत्ता हस्तगत केली.
-
१९९० साली रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट [RPF] या पक्षाने युगांडामधून सूत्रे हलवून हल्ले करण्यास सुरुवात केली व रवांडन नागरी युद्धाला सुरुवात झाली.
-
४ ऑगस्ट १९९३ रोजी टांझानिया येथे रवांडाचे अध्यक्ष आब्यारिमाना व RPFचे नेते यांच्यात करार होऊन हे नागरी युद्ध संपुष्टात आले.
-
६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाचे अध्यक्ष ज्युव्हेनाल आब्यारिमाना यांचे विमान उतरत असताना कोसळून ते ठार झाले. त्यानंतर सुरुवातीला उल्लेख केला ती वांशिक कत्तल घडून आली.
-
पुढे RPFने आधी राजधानी किगालीवर व २१ ऑगस्ट १९९४ रोजी संपूर्ण रवांडावर ताबा मिळवला.
-
८ नोव्हेंबर १९९४ रोजी UN Security Councilने International Criminal Tribunal for Rwanda स्थापन केले व पुढे या वांशिक कत्तलीत सहभागी झालेल्यांना शिक्षा झाल्या.
दाँ ल न्यू द ला व्ही – उघडेवाघडे आयुष्य – प्रथम प्रकाशन सन २०००.
जगले वाचलेले लोक अर्थातच त्या अनुभवांबद्दल तिऱ्हाईताशी – एका गोऱ्याशी – बोलायला फारसे उत्सुक नव्हते. पण जाँ आत्झफेल्ड यांनी तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत त्यांना बोलते केले.
कोण आहेत हे वाचलेले आणि बोलायला तयार झालेले १४ जण? या चौदा जणांत १२ ते ६० या वयोगटातील १० स्त्रिया आहेत.
यातील प्रत्येक आत्मकथनापूर्वी सुरुवातीला काही पाने जाँ आत्झफेल्ड सदर व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची कहाणी सांगतात. त्या व्यक्तीचे घर, दुकान, शेत जिथे कुठे भेटले त्याचेही वर्णन करतात.
हे सगळे तुत्सी जमातीचे, त्यामानाने सधनही आणि अधिक कष्टाळूही. एकीच्या बोलण्यात उल्लेख आहे की जे हुतु तिच्या नवऱ्यासारखे पशुपालन करू लागले होते ते स्वतःला तुत्सी म्हणवत असत. एकंदरीत बहुसंख्य असले तरी हुतु लोकांना काहीसा न्यूनगंड होता. तिने म्हटले आहे की या दोन्ही जमातींतील तेढ मुळात गोऱ्यांनी पद्धतशीरपणे निर्माण केली.
यातील एकेक कहाणी म्हणजे माणसे किती क्रूर असू शकतात याचे उद्विग्न करणारे दर्शन आहे. हे जे हुतु मारेकरी होते त्यांना अँतेरामवे म्हणत. [खेदाची बाब अशी की, 'अँतेरामवे' या शब्दाचा अर्थ 'एकी'! ते त्यांच्या संघटनेचे नाव होते.]
कास्य नियोन्साबा हा बारा वर्षांचा शाळकरी मुलगा चर्चमध्ये लपला होता. तिथे बाँबगोळे टाकून कत्तल झाली. लहान लहान मुलांना चर्चच्या दारात जाळून मारले. शिवाय सुरे घेऊन आत शिरलेले अँतेरामवे भोसकतही होते. दोन दिवसांनंतर त्यांनी चर्चऐवजी जंगलात लपलेल्यांना शोधायला सुरुवात केली. तेव्हा काही मोठ्या माणसांनी आतल्या वाचलेल्या मुलांना बाहेर काढून पाठुंगळी घेऊन जंगलातच आसरा घेतला. एक दिवस हा मुलगा एका अँतेरामवेला सापडलाच. त्याने केलेला वार या मुलाच्या डोक्याला आरपार जखम देऊन गेला. त्याच्यावर एका तुत्सी बाईने उपचार केले. जखमेवर झाडपाला बांधला. तिचा नवरा हुतु होता. त्याने तिला थोडे दूर नेऊन मारून टाकले व काँगोला पळ काढला असे कास्य नियोन्साबाला नंतर कळले. जखम, शिवाय मलेरियाने आजारी पडल्याने त्याला कसे दिवस काढले ते नीट आठवत नाही. आता तो अधूनमधून शाळेच्या वाटेवरच्या त्या चर्चमध्ये जातो, तिथे पडलेल्या कवट्या, हाडे पाहून आधी त्याला रडू येई, आता मात्र तो रडत नाही.
जानेत आयिंकामिये ही सतरा वर्षांची जी मुलगी वाचली, तिच्या दोन लहान बहिणींसमोर त्यांच्या आईचे हात, पाय तोडून अँतेरामवेंनी तिला मरायला सोडून दिले. कहर म्हणजे त्या बाईने याचना केली होती की, मला एका घावात ठार करा. त्यासाठी तिने जवळचे पैसे देऊ केले होते. ही मुलगी थोडी दूर अंतरावर लपली होती, म्हणून वाचली. बहिणीही जखमी झाल्या होत्या. त्यांना ती जगवू शकली, मात्र आईला जगवण्याचा प्रयत्न ३-४ दिवसांनी निष्फळ ठरला. हत्याकांडाचा काळ संपल्यानंतरही त्यांना स्थैर्य असे मिळाले नाही. निरनिराळ्या नातेवाइकांकडे जशी जितकी सोय होईल तशा त्या राहत होत्या. दोन वर्षांनंतर एका बहिणीने काँगोहून निवांतपणे परतलेल्या आईच्या मारेकऱ्याला ओळखले. त्याला मग तुरुंगात टाकण्यात आले.
किबुंगो टेकड्यांच्या आश्रयाला आलेले फ्रान्सिन नियिंतेगेकाचे
कुटुंब सुखासुखी तेथे आले नव्हते. १९६२साली बेल्जियन सैन्याने तिच्या
आईवडिलांना विस्थापित केले होते. हुतु आणि तुत्सी आपापल्या लोकांना धरून,
तरीही शांततामय सहजीवन जगत होते. पण वातावरण सातत्याने गढूळ होत गेले.
चर्चच्या आश्रयाला ते कुटुंबही गेले होते, फ्रान्सिन वाचली, सरपटत, लपतछपत
बाहेर पडली आणि पुढे महिनाभर दलदलीच्या आश्रयाने तगून राहिली. दिवसा चिखलात
लपायचे, रात्री जरा वरच्या बाजूला कोरड्यात जायचे. रोज त्यांना बायकांची
उघडी प्रेते दिसायची कारण मारलेल्या बायकांच्या अंगावरचा चांगल्या
स्थितीतला 'पान्य' नावाचा घोळदार झगाही अँतेरामवे काढून न्यायचे. एका
म्हाताऱ्या बाईबरोबर लपलेली असताना एक दिवस त्या दोघी अँतेरामवेंच्या नजरेस
पडल्या. त्या म्हातारीला त्यांनी मारले आणि ती एकटी कशी असेल म्हणून
चिखलात ढोसायला सुरुवात केली. मग फ्रान्सिनही सापडलीच. तिने त्यांना बाहेर
काढण्याची विनंती केली. तिथे दलदलीत म्हातारीच्या रक्तमांसात नको. त्यांनी
तिला बाहेर फरपटत काढले आणि कपाळावर घाव घातला. मग ते निघून गेले. अनेकदा
अँतेरामवे अशा तऱ्हेने लोकांना मरण्यासाठी सोडून देत व एक दोन दिवसांनी
खातमा करत. ते बहुधा परत यायला विसरले म्हणून मी जगले, इति फ्रान्सिन.
दुसऱ्या दिवशी ती तुत्सी लोकांना दिसली आणि त्यांनी तिला जगवले.
हत्याकांड संपल्यानंतर चार महिन्यांनी फ्रान्सिन आणि तेओफिल यांनी लग्न
केले. त्यांना दोन मुले आहेत आणि शिवाय चार अनाथ मुलांचाही ते सांभाळ
करतात.
जाँव्हिए म्युन्यानेझा हा १४ वर्षांचा मेंढपाळ सांगतो की शाळेत कधी त्याने जमातीवरून कोणी बोलताना ऐकले नव्हते. पण १० एप्रिल (१९९४) रोजी अचानक काही हुतु लोक आले, म्हणाले, "आम्ही तुम्हाला मारणार नाही, पण आम्हाला तुमचं घर हवंय, इथून निघून जा." मग त्याचे कुटुंब किबुंगो टेकड्यांवर राहणाऱ्या त्याच्या आज्याकडे राहायला गेले. दुसऱ्या दिवशी सैन्य चालून आले. त्याच्या काकाने पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मग बाकी सगळे एन्तारामाच्या चर्चकडे पळाले – तो, त्याची आठ भावंडं, आई-वडील, आजी-आजोबा सगळेच. तीन दिवस अँतेरामवे चर्चभोवती वेढा घालून होते. मग त्यांनी आतल्या आणि बाहेरच्या लोकांना मारायला सुरुवात केली. त्याच्या मोठ्या बहिणीने ओळखीच्या हुतुला तिला एका फटक्यात मारण्याची विनंती केली. त्याने तिला गवतावर फरफटत नेऊन मारले. मग कोणीतरी ओरडले, ती तर गर्भार होती. मग तिचे पोट चिरले. जाँव्हिए चर्चमध्ये प्रेतांच्या ढिगात मेल्यासारखा पडून राहिला. त्याला एकाने ढोसून पाहिले. मेला आहे म्हणून सोडून दिले. संध्याकाळी अँतेरामवे निघून गेल्यावर त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने त्याला, त्याच्या धाकट्या बहिणीला शोधून काढले आणि बाहेर नेले. बहीण खूपच जखमी झाली होती. ती वाचली नाही. लवकरच सगळ्यांनी दलदलीत लपण्याचा निर्णय घेतला. मेलेल्यांना पुरण्याएवढी ना हुतुंकडे माणुसकी होती ना तुत्सींकडे उसंत. त्या रक्ताने माखलेल्या प्रेतांच्या वासात, तिथेच आसपास लपण्याची वेळ आल्याने जिवंत राहिलेलेही मरणकळा अनुभवत होते. म्हातारेकोतारे लपायला नकार देऊन मरणाला सामोरे जात होते.
जाँ-बाप्तिस्त म्युनिआँकोरे हा साठीचा म्हातारा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापासून सियुगारो इथल्या शाळेत शिक्षक होता. त्याने १९५९ साली राजाचा मृत्यू झाल्यानंतर हुतु लोकांनी तुत्सी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हापासूनचा काळ अनुभवला होता. बिरुंगा प्रांतात तो राहत होता. हुतु लोक तुत्सी लोकांची घरे शोधून त्यांच्यावर खूण करून ठेवायचे आणि मग रात्री ती घरे जाळत. चर्चमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली तेव्हा बेल्जिअनांनी त्यांना एक फॉर्म भरून मागितला. त्यात कोठे स्थलांतरित व्हायचे आहे ते लिहायचे होते. त्या लोकांच्या जगण्याचा परीघच इतका छोटा होता की त्यांना रवांडाखेरीज काहीच माहिती नव्हते. शेजारच्या काँगो किंवा टांझानियात जायची त्यांची इच्छा नव्हती. ज्यांनी ज्यांनी रवांडा लिहिले, त्यांना नेसत्या वस्त्रानिशी गाडीत घालून ब्युजेसेरा या प्रांतात सोडले कारण तेव्हा तेथे फारशी वस्ती नव्हती. जंगल, आकाश झाकोळून टाकतील एवढ्या त्सेत्से माशा, या सर्वांना तोंड देत, ते सारे हळूहळू तेथे स्थिर झाले. तेथील टेकड्यांवर थोडेफार दोन्ही जमातींचे लोक आधीपासून होते, आणि ते गुण्यागोविंदाने राहत होते. पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तेथे प्रत्येकाला थोडी जमीन देण्यात आली. ती शेतीयोग्य करून घेणे हे अजिबात सोपे नव्हते. ब्युजेसेरा प्रांत हळूहळू अधिक राहण्यायोग्य होऊ लागल्यावर तेथे अधिकाधिक हुतु लोक येऊ लागले. १९७३मध्ये त्यांची तेथील संख्या तुत्सींएवढी झाली. तुत्सी लोक गायी पाळत, ती जणू तुत्सी असण्याची खूण होती. हुतुंना मात्र गायी आवडत नसत. शिरकाण झाले तेव्हा फक्त तुत्सींनाच नाही, त्यांच्या गायींनाही मारले. ब्युजेसेरा प्रांतात सरकारी अधिकारी सगळे हुतुच होते. तुत्सींना मिळणारी नोकरी ही फक्त शिक्षकाची होती. दुसरीकडे कोठे तुत्सी-हुतु यांच्यात चकमक झाली तर लगेच त्याचे पडसाद ब्युजेसेरात पडत. तुत्सींमधील इन्कोतान्यी म्हणजे बंडखोर लोकांना शिक्षकांची फूस असणार असे गृहीत धरून त्यांचा छळ होई. स्वतः जाँ-बाप्तिस्तना एकदा झाडाला बांधून मारणारच होते पण त्यांच्या एका हुतु विद्यार्थ्याने त्यांची बाजू घेतली व बांधलेला दोर तोडला. हुतु-तुत्सी जमातींच्या आपसातल्या संबंधात तणाव–तणावमुक्ती असे चढउतार होत राहिले. पण तुत्सींची चिकाटी, कष्टाळूपणा यांतून ते आपली प्रगतीही करत राहिले. त्यांनी रानटी जनावरांना हुसकून लावले. त्सेत्से माशा माजल्या होत्या त्यांचा नायनाट केला. काहीजण आपला शेतमाल स्थानिक बाजारात आणि पार राजधानी किगालीपर्यंत विकू लागले. वाढते स्थलांतर, मर्यादित जमीन आणि विखारी प्रचार यातून १९९१पासून बिघडत गेलेली परिस्थिती १९९४ साली चिघळली. जाँ-बाप्तिस्त म्युनिआँकोरेंच्या निवेदनात भेदक तटस्थता आहे. "संध्याकाळी जगले वाचलेले आपण सारे एक आणि दिवसा ज्याचा तो"! त्यांचेही बहुतेक सर्व नातेवाईक एकेक करून ठार झाले. नऊ शिक्षकी शाळेतील सहाजण मारले गेले आणि दोघे तुरुंगात – मुख्याध्यापक व एक शिक्षक हुतु होते आणि त्यांचेही हात रक्ताने माखले होते. खात्यापित्या घरातले, शिकलेसवरलेले लोकही इतक्या रानटीपणे वागले याने त्याला आणि वाचकांनाही विषण्णता येते.
आंजेलिक म्युकामान्झी या शिरकाणामुळे विधवाही झाली आणि रोज नव्याने अनाथ होणाऱ्या मुलामुलींची ताई, आईही. ती आणि तिची बहीण लेतिशिया मिळून आठ अनाथांचा सांभाळ करतात. खरे तर तिला राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा देऊन राजधानी किगालीत जाऊन वकील व्हायचे होते. त्यामुळे की काय, पण ती स्थानिक पोशाख न घालता कायम शर्ट-पँटमध्ये वावरते. चर्चच्या दारात बाँबस्फोट झाला तेव्हा ती मागच्या दाराजवळ होती. तिथून सरपटत, लपतछपत ती दलदलीजवळच्या झुडुपांच्या आश्रयाला गेली. तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की पुढचा महिनाभर तिला दिवसा चिखलात लपून राहावे लागणार आहे. लहानग्यांना काठावर झुडुपांत लपवायचे आणि मोठ्यांनी दलदलीत शिरून लपायचे. असे दिवस काढताना कपड्यांची चैन कोणाकडेच नव्हती. कधी रात्री पाऊस आला तर झाडांच्या मोठ्या पानांच्या सहाय्याने चिखल निपटून काढायचा आणि जमिनीवर अंग टाकायचे. रोज आज कोण मेले या माहितीची देवाणघेवाण करायची. ३० एप्रिल रोजी तिच्या डोळ्यांदेखत तिच्या आईचा मृत्यू ओढवला. वडील, मावशी सगळे थोड्याच दिवसांत मारले गेले. भीतीवर मात करून तगून राहणे तिला जमले, पण शांतता प्रस्थापित झाल्यावरही भीती तिच्यात भिनून राहिली आहे असेच तिला जाणवते. या संहारानंतर हुतु बायकांनीदेखील कधी त्यांच्या पुरुषांचे वर्तन अयोग्य होते असे म्हटले नाही की माफी मागितली नाही. वाचलेल्या तुत्सींमध्ये तिला काही प्रवृत्ती दिसल्या. दारु आणि दुःखद घटनांच्या आठवणीत बुडून जायचे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूच्या दर्दभऱ्या कहाण्या उगाळत बसायचे आणि त्यात तपशिलांची सरमिसळ करायची. एक मुलगी आधी आई चर्चमध्ये मेली सांगे, मग दोन वर्षांनी ती दलदलीत मेली असे सांगू लागली. पण या परिस्थितीकडे आंजेलिक सहानुभूतीने पाहते. आई पहिल्याच दिवशी मेली असे स्वतःला सांगण्यामागे आईला फार काळ खडतर आयुष्य जगावे लागले नाही अशी मनाची समजूत असू शकते किंवा आपण आईला दलदलीत मरताना तसेच सोडून दूर गेलो या वास्तवापासून पळ काढणे असू शकते. सत्याला सामोरे जायला त्या मुलीला दोन वर्षे लागली. दुसरी एकजण धडधडीत खूण दिसत असूनही हाताला जखम झालीच नव्हती म्हणते. मग एक दिवस दुसरी कोणी आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगते तेव्हा ती धीर गोळा करून तीही अत्याचाराला बळी पडली होती आणि त्या झटापटीत तिच्या हाताला जखम झाली हे सांगते. असे मानसिक ओरखडे, ताण कितीही सर्वसाधारण आयुष्य जगत असल्याचा आव आणला तरी प्रत्येकाच्या मनात खोल रुतून बसले आहेत.
इनोसाँ ऱ्विलिलिझाचे वडील आधी पशुवैद्याकडे मदतनीस म्हणून काम करायचे. मग त्यांचेही स्थलांतर झाले ते कानोंबे नावाच्या टेकडीवर. तिथे ते मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर मेहनत घेऊ लागले. इनोसाँने रोज २० किलोमीटरची पायपीट करत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. मग तो शिक्षक झाला. त्याने लग्न केले आणि बायकोसह टेकडीपेक्षा न्यामातामध्येच राहू लागला. त्या गावाचा चेहरामोहरा हळूहळू शहरासारखा झालेला होता. तेथे हुतुंपेक्षा तुत्सी संख्येने जास्त होते. १९७२पासून हुतुंची संख्या आणि वागणूक बदलत गेली. १९९४साली हल्ले सुरू व्हायच्या काही दिवस आधी इनोसाँ आपल्या हुतु सहकाऱ्याशी राजधानीत काय वाटाघाटी होत असतील, कधी तोडगा निघेल असे बोलत असताना तो एकदम म्हणाला, आम्ही तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार आहोत. ते इनोसाँने मनावर घेतले नाही. नंतर हल्ले सुरू झाल्यावर तो सहकारी खरेच एका ट्रकवर चढून हल्लेखोरांना तुत्सी लोकांची घरे दाखवत असताना इनोसाँला दिसला. राष्ट्राध्यक्षांचे विमान पडले त्या दिवसानंतर इनोसाँ व त्याचे कुटुंब इतर अनेक जणांप्रमाणे रात्री घरी न राहता रानात आश्रय घेत. एक दिवस सरकारी मुख्यालयात गोळा झालेल्या लोकांना तिथल्या प्रमुखाने सांगितले, तुम्ही कुठेही जा, तुम्ही मरणारच आहात, फक्त माझ्या दारात मरू नका, इथून जा. इनोसाँने चर्चमध्ये न जाता कायुंबा टेकडीची वाट धरली. त्याची बायको, मुलगा जोरात पळू शकत नव्हते म्हणून ते चर्चकडे गेले आणि त्याला ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. पण इनोसाँ एकटाच दुसरीकडे निघून जायला तेवढे एकच कारण नव्हते. त्याच्या कुटुंबाने ठरवले होते की, सगळेच जर मरणार असू तर निदान आपल्या डोळ्यांसमोर आपल्या कोणाचे मरण, तडफड पाहायला नको, आणि बाकीचे तरी सुखरूप असतील अशा आशेवर जगतो माणूस. चार दिवसांनंतर तिथून जीव वाचवून आलेल्या एका बाईने त्याला सांगितले की ते दोघे अतोनात जखमी होऊन पडले होते, वाचण्याची शक्यता नव्हतीच. तरीही एक आशेचा किरण तो मनाशी बाळगून होता की ते मेलेच असे काही त्या बाईने सांगितले नाही. वाचले असू शकतील. कियुंबाच्या टेकडीवर निलगिरी वाढलेली होती. ती झाडे उंच असतात, पण दाट नसतात, त्यांच्या आडोशाने फार काळ लपून राहता येत नाही. त्यामुळे सतत पळत राहणे गरजेचे होते. अँतेरामवे नुसता पाठलागच करीत नसत, तर काळवीटांना जसे एका दिशेला जायला भाग पाडून तेथे दबा धरून बसलेले शिकारी एका फटक्यात अनेकांची शिकार साधत तसेही बहुसंख्यांना हूल देऊन एकाच ठिकाणी गोळा व्हायला भाग पाडत आणि आपला कार्यभाग साधत. त्यांच्या गनिमी काव्याला तसेच उत्तर द्यायला तुत्सींकडे शस्त्रे नव्हती, पण हुतु गात, आरडाओरडा करत टेकडीवर येत. त्यांना हुलकावणी देऊन ते पुढे जातील आणि आपण मागे राहू यासाठी दिशा, गती यांचा जलद अंदाज घेण्यात जे तरुण यशस्वी होत ते दुसरा दिवस पाहू शकत. पण या सगळ्या श्रमांमुळे तहान लागली तर प्यायला पाणीही नव्हते. दिवस पावसाळ्याचे होते तरी जवळ कोणतेच भांडे नव्हते त्यामुळे ओली पाने चोखणे हाच काय तो उपाय होता. कित्येकजण तहान न भागल्याने मेले.
इनोसाँ ऱ्विलिलिझा तुत्सींच्या आणि हुतुंच्या मानसिकतेबाबतही खूप बोलतात. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असताना मरणाची अधिकाधिक मानसिक तयारी आणि तरीही जगण्याची, तगून राहण्याची धडपड याची कशी संगती लावायची ते त्यांना कळत नाही. हुतुंच्या दुष्टाव्याने ते उद्विग्न होतात. मारायचे तर फटकन मारून टाकावे, हातपाय तोडणे, जखमी करून सोडून देणे या मानसिकतेचे कसलेच समर्थन असू शकत नाही. वंशसंहाराची कल्पना हुतुंमधल्या शिकलेल्यांनीच जोपासली, त्यांनी आपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा दुरुपयोग केला असे इनोसाँचे मत आहे. त्याचबरोबर हुतुंनी आपला हेतु साध्य करण्यात फार वेळ घालवला. तुत्सींची संपत्ती मिळवणे, त्याचा आनंद साजरा करणे, आज इतक्या जणांना मारले त्याचा आनंद साजरा करणे – अर्थात दारू पिऊन – यामुळे त्यांच्यात दुसऱ्या दिवशी तितका जोर, जोश नसे म्हणून तुत्सींना जगण्याची संधी मिळाली असेही विश्लेषण ते करतात. पण इतरही अनेकांनी म्हटल्याप्रमाणे जर आणखी एक आठवडा कोणी त्यांच्या साहाय्याला आले नसते तर एकही तुत्सी शिल्लक राहिला नसता हेही ते सांगतात.
मारी-लुइज कागोइते ही चालवते तो पब कमी आणि दुकान जास्त आहे. तिचे आई-वडील शेती करायचे. ती आठवीपर्यंत शिकली. मग एके दिवशी ती न्यामाता येथे तिच्या मावशीकडे गेली असता एकाने तिला पाहून मागणी घातली आणि स्थळात नाकारण्यासारखे काहीच नसल्याने तिचे लग्न लावून दिले. तिचा नवरा लेओनार कष्टाळू होता. त्याने शेतात पक्के घर बांधले. बाजारच्या रस्त्यावर एक गाळा बांधला. मग काही दुकाने बांधली. एक जुना ट्रक विकत घेतला. ते न्यामातामधील पहिले खाजगी वाहन होते. मग फ्रातेर्निते नावाचा पब उघडला. काही रेस्टॉरंटस् उघडली. जमीन, गायी विकत घेतल्या. १९८० साली त्याने दोन नवीन ट्रक विकत घेतले. तो तिथला महत्त्वाचा वाहतुकदारही बनला. तुत्सी लोक भराभर प्रगती करत असल्याचे पाहून हुतु लोकांना त्यांचा मत्सर वाटे. तुत्सी लोक एकमेकांना मदत करत, काही वर्षांनी आपल्या नोकरांनाही स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देत आणि कधीही कर्ज काढत नसत. विमान पडले त्यादिवशी बरेच तुत्सी लेओनारच्या आश्रयाला आले. लेओनारला चकमकींचा बराच अनुभव होता. त्याने तरुणांना कायुंबा येथे पळून जायला सांगितले. पण स्वतः मात्र कोठे जाण्यास नकार दिला. आता पायांना एवढे कष्ट जमणार नाहीत म्हणाला. ११ एप्रिलला, म्हणजे पहिल्याच दिवशी अँतेरामवे त्यांच्या घरावर चालून आले. लेओनारने लगेच दार उघडले कारण त्याला वाटले तो बायका-मुलांना वाचवण्याबद्दल त्यांच्याशी बोलू शकेल. पण त्यांनी दारातच त्याला गोळी मारली. मग सर्व मुलांना एका रांगेत उभे करून पालथे पडायला सांगितले आणि सर्वांची कत्तल केली. त्यात एक हुतु मुलगाही होता. तो आपल्या मित्राशी खेळायला आला होता. मारी-लुइज आपल्या सासूला घेऊन घराच्या मागे असलेल्या टायर्सच्या ढिगात लपली. तिथून तिने त्यांचे सगळ्या प्रकारचे सामान, दारुच्या बाटल्यांचा, धान्याचा साठा ट्रकमध्ये भरत असल्याचे आवाज, आपसात फर्निचरच्या वाटणीवरून भांडण, सारे ऐकले. संध्याकाळी मारी-लुइजची सासू टायरच्या ढिगातून बाहेर येऊन बसली. तिला त्यांनी हटकले. ती म्हणाली, "मी एकटीच कुठे जाणार?" मग त्यांनी तिलाही मारून टाकले व निघून गेले. अशा तऱ्हेने मारी-लुइजचा त्यांना विसर पडला व ती तेव्हा वाचली. तिला एक अनाथ झालेला मुलगा दिसला. त्याला घेऊन तिथे असलेल्या एका शिडीवरून तिने शेजारच्यांच्या अंगणात उडी मारली. तिथे कोणीही नव्हते. मग तिने त्या मुलाला लाकडांच्या ढिगात लपवले आणि स्वतः कुत्र्याच्या खोपटात लपली. तिसऱ्या दिवशी सकाळी तिचा शेजारी फ्लोरिआँ परत आला. तो हुतु होता. तिला पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला सांगितले, सगळे तिचा शोध घेत आहेत, ती त्याच्याकडे सापडली तर त्यालाही मारतील. ती म्हणाली, मग मला मारून टाक. मृत्यू लगेच होईलसे बघ. पण त्याऐवजी त्याने तिला दुसऱ्या एका हुतु बाईच्या घरी सोडले. तिने काही तुत्सींना आपल्या घरात लपवले होते. तिथेही काही दिवसांनी अँतेरामवे आले. त्यांना देण्यासाठी तिने पैसे मागितले. मारी-लुइजने आपल्याबरोबर घरातले पैसे घेतले होते. त्यातले तिला दोनदा थोडेथोडे दिले. एक दिवस फ्लोरिआँ तिला म्हणाला की तुझा शोध जारीने सुरू आहे, तू इथून जा. मग त्याने सैन्याच्या एका ट्रकमधून तिची बुरुंडीपर्यत जाण्याची व्यवस्था केली. त्यासाठीही अर्थातच तिनेच पैसे दिले. मग तो म्हणाला मला काय, त्यावर तिने दोन घरे, मुख्य रस्त्यावरचे दुकान त्याला लिहून दिले. सैन्याचा ट्रक असल्याने त्यांना कोठे अडवले नाही, पण तिचा प्रवास एका पोत्यात बसून झाला. एका जंगलात ट्रक थांबला व तेथून तिला पुढे न थांबता चालत जायला सांगितले. बरेच अंतर कापून ती जंगलाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरहद्दीवर पोहोचली आणि माणसांचे आवाज ऐकून थकून जमिनीवर अंग टाकले आणि तिला झोप लागली. नंतर शरणागतांच्या वस्तीत तिला भेटायला आलेला तिच्या नवऱ्याचा मित्र तिला पाहून ओळखूच शकला नाही. तिचे वजन २० किलोंनी कमी झाले होते, रया पार गेली होती, अंगावर जाडाभरडा कपडा, पाय सुजले होते, अस्वच्छतेने डोक्यात उवा भरल्या होत्या. फ्लोरिआँवरही आता खटला भरला आहे असे तिला कळले. तिने त्याच्या घरात सुरे, चाकू यांची चळत पाहिली होती. तोही दोषी होताच. पण त्याच्याविरुद्ध साक्ष न देण्याचे तिने ठरवले. न्यामाताला परतल्यावर सगळे उजाड, भकास होते. त्यांची संपत्ती तर काही उरलीच नव्हती, ना स्थावर ना जंगम. एक दिवस काही मित्रमंडळींनी तिला थोडे पैसे दिले. त्यातून तिने आपले छोटे दुकान पुन्हा सुरू केले. तिथे लोक तिला संहाराच्या कर्मकहाण्या सांगतात तेव्हा माणसे इतकी स्वार्थी, क्रूर का होतात याची तिला संगती लागत नाही. ती आला दिवस साजरा करते पण आता तिला कशातच रस वाटत नाही. हुतु बायकांशी बोलताना त्या आपला नाइलाजाचा राग आळवतात. कोणीही हुतु कसले पातक केल्याचे कबूल करत नाहीत. त्यामुळे असे काही पुन्हा घडणारच नाही याची तिला खात्री वाटत नाही.
२२ वर्षांच्या ख्रिस्तीन न्यीरान्साबिमानाची आई हुतु, वडील तुत्सी होते. संहारानंतरच्या शांततेत मारान्युन्दोच्या टेकडीवर राहणारी ख्रिस्तीन बोलायला तयार झाली. ती आईवडिलांसोबत १९८०मध्ये ब्युजेसेरा प्रांतात आली. अजून तिथे थोडीफार जमीन मिळत होती. १९९४ साली ती पाचवीत होती. त्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्या भागात अनोळखी, उग्र दिसणारे लोक येऊ लागले होते. ते हुतुंच्या घरी जाऊन हवी ती भांडीकुंडी घेऊन जात. ते अँतेरामवे होते. त्यांनी चर्चला वेढा दिला आणि लोकांना मारले. काही अजून पूर्ण मेले नसतानाच त्यांना पुरले. तेव्हा इतर काहीजण चर्चवर पहारा देत होते. हुतुंनी तुत्सींच्या घरी लुटालूट केली. हे सगळे पाहून हबकलेले हुतुही होते, पण ज्यांनी आपल्या शेजारच्या ओळखीच्या तुत्सींना मदत करू पाहिले, त्यांनाही अँतेरामवेंनी मारून टाकले. चर्चवरील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी अँतेरामवे तिच्या घरी आले आणि त्यांनी तिच्या तुत्सी वडिलांना आई आणि शेजाऱ्यांदेखत कापून काढले. ख्रिस्तीनने अनेक हुतुंनी अँतेरामवेंच्या बरोबरीने तुत्सी नातेवाईक, शेजारीपाजारी, ओळखीचे यांना मारताना पाहिले. संध्याकाळी ते गर्वाने आपला टेकडीवरचा किंवा दलदलीपासचा पराक्रम सांगत. त्यांच्या बायका मांस शिजवत, कारण त्यांनी तुत्सींच्या गायीही मारलेल्या असत. शिवाय मृतांच्या अंगावर मिळालेल्या पैशांतून ते दारू पीत. कोणी किती मारले याची त्यांच्यात चढाओढ लागे. जे मारत नसत तेही आपण मारल्याचे सांगत, नाहीतर त्यांचेही मरण ओढवले असते. रोज सकाळी ते त्यांचा म्होरक्या व्हँसाँ गोलिआथ याच्यापाशी जमत, तो त्यांना त्या दिवसाचे लक्ष्य सांगे – ठिकाण, कसे जायचे आणि किती मारायचे. जे आज्ञा पाळायचे नाहीत, शेतीच्या कामांचे कारण देऊ पाहायचे, त्यांनाही सहज जाताजाता गोळ्या घातल्या जात. जे रक्तरंजित सुरे दाखवू शकत नसत त्यांना लुटीतला वाटा मिळत नसे. मारले, असे नुसते सांगून चालत नसे, दुसऱ्या दिवशी दाखवायला लागे. म्हणूनही कोणाला पुरून टाकत नसत. ख्रिस्तीनला तुत्सी रक्ताची म्हणून काहीजण हिणवत, ती स्वतःला हुतु म्हणवून घेई. एक दिवस काही अँतेरामवे त्यांच्या घरी आले, त्यांनी बरीच लुटालूट केली, तिच्यावर बलात्कार केला. त्यातून तिला दिवस राहिले.
सगळ्या गदारोळात एक दिवस तिनेही तिथून पळून जायचे ठरवले. अंगावर दोनतीन पान्य, एक स्वेटर चढवला आणि पळणाऱ्यांच्या गटात सामील झाली. ते सलग सहा आठवडे पळत होते. कारण युगांडातून तुत्सी चाल करून येत असल्याच्या बातम्या पसरत होत्या. ते सारे जिझेन्यामार्गे कोंगोला पोहोचले. तिथे म्युगुंगा येथील निर्वासितांच्या छावणीत ती दोन वर्षे राहिली. त्या छावणीतले लोक जमेल ते काम करत. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी छोटा व्यापार सुरू केला. ख्रिस्तीन दहा किलोमीटरवर अंतरावरच्या गोमा या गावी चालत जाऊन धुणीभांडी करू लागली, किंवा कधी कोणाच्या शेतात राबू लागली. त्याबदल्यात तिला काही केळी, कंदमुळे मिळत. त्या छावणीत तिची तीच बाळंत झाली. कोणीही तिला आधार द्यायला, देखभाल करायला नव्हते. बाळ-बाळंतीण सुखरूप असले तरी तिची अन्नावरची वासनाच उडाली. तिला घरची आठवण येत होती पण अँतेरामवे भीती घालत की, परतलो तर आपल्याला ठार मारतील. दोन वर्षांनंतर काँगोतील बान्याम्युलिंगे या तुत्सी संघटनेने बंदुकीच्या धाकाने त्यांना छावणी सोडायला भाग पाडले. ते सारे मासीसीच्या डोंगरांकडे जाऊ लागले. पण बान्याम्युलिंगेंनी पुन्हा त्यांची वाट अडवली व एकाने तिला समजावले की रवांडामध्ये शांतता आहे, तिकडे परत जावे. तिने कोणाला मारले नसल्याने तिला तिचे शेतही परत मिळेल. मग तिने उलटा प्रवास करून रवांडा गाठला. तिला तिच्या गावात आई आणि भाऊ भेटले. ते काँगोपर्यंत गेलेच नव्हते. त्यामुळे ते कितीतरी आधी घरी परतले होते. त्यांच्याबरोबर तिला अखेरीस घर गाठता आले. तिला अजूनही शेतातून काँगोच्या वाटेवर पायाखाली प्रेते तुडवत चालत असल्याची स्वप्ने पडतात.
ओदेत म्युकाम्युसोनी ही ख्रिस्तीनपेक्षा एखादे वर्ष आगेमागे. दोघी दोन शेजारच्या टेकड्यांवर राहायच्या, शाळेच्या, बाजाराच्या रस्त्यावर एकमेकींना दिसायच्या. पण त्यांच्यात बोलाचाली नव्हती. ओदेत तुत्सी. तिच्या सगळ्या नातेवाइकांची कत्तल झाली. तिच्या मुलाचा बाप नंतर काँगोला निघून गेला. ती बोलायला तयार झाली, पण तिची तपशीलवार वर्णने रोज बदलत.
ओदेतच्या वडिलांकडे आठ गायी होत्या. पण त्यांनी तिला जास्त शिकू दिले नाही कारण ती चौथी मुलगी होती. युद्धापूर्वीच ती घरकाम, शेतीकाम करू लागली होती. विमान पडले तेव्हा ती किगालीच्या सधन न्याकाबांदा वस्तीतील एका कुटुंबात मोलकरणीचे काम करत होती. मालकीणबाई – ग्लोरिया - तुत्सी होती आणि मालक – जोजेफ – हुतु. मालक कामासाठी केनियाला गेला होता. अँतेरामवे आले, त्यांनी ग्लोरियाला मारले. तिच्या दिराने तिला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ओदेत छोट्या कोठीच्या खोलीत जमिनीवर पडून लपून राहिली. अँतेरामवे घरभर फिरले नाहीत. त्यांना हुतु नवऱ्याच्या अनुपस्थितीत त्याची तुत्सी बायको मारून टाकायची होती, तेवढे करून ते गेले. काही तासांनी मग ते घर लुटायला दुसरे हुतु आले आणि त्यांना ओदेत सापडली. ते तिला मारणारच होते, पण त्यांचा म्होरक्या कालिक्स्त याने त्यांना थांबवले. त्याच्याकडे बंदूक होती. त्याने तिला आपल्यासाठी ठेवून घेतले. त्याच्या घरी चालणाऱ्या चर्चांतून तिला कळले की उन्हाळा येईपर्यंत सगळे तुत्सी मेलेले असतील. मग तिने उगाच बाहेर पडण्याचा धोका पत्करला नाही. जुलैमध्ये अँकोतान्यी येईपर्यंत ती कालिक्स्तकडेच राहिली. मग तो तिला आपल्याबरोबर काँगोला घेऊन गेला. वाटेत ते आधी जिझेन्यीला कालिक्सच्या नातेवाइकांकडे थांबले, काँगोतील म्यग्युंगाच्या छावणीत त्यांनी दीड वर्ष काढले. ती तुत्सी होती हे सगळ्यांना माहिती होते, पण कालिक्स्त अँतेरामवे होता. त्याचा दरारा होता. मात्र तो नसताना सगळे तिला हिणवत. १९९६च्या जून महिन्यात एका गोऱ्या मानवतावादी संस्थेचे ट्रक आले. ते सांगत होते की ज्यांना रवांडाला परत जायचे आहे त्यांनी ट्रकमध्ये बसून घ्यावे. त्यांना ते मोफत सोडतील. कालिक्स्त बाहेर गेला होता. ती एका ट्रकमध्ये चढली. रवांडाच्या हद्दीपर्यंत आल्यावर दुसऱ्या ट्रकमधून त्यांना न्यामातापर्यंत आणून सोडले. मग ती तिच्या कानाझीमधील घर, शेत यांकडे वळली. घर नावालाच शिल्लक राहिले होते आणि शेतजमीन शेतीयोग्य उरली नव्हती. ती काँगोहून परतली हे कळल्यावर तुत्सी तिच्याकडे संशयाने पाहू लागले. त्यामुळे मदत मागायची तरी कोणाकडे असा तिला प्रश्न पडला. एक दिवस तिने ऐकले की पाऊस आला की चर्चजवळ पुरलेले मृतदेह वाहून जातील. मग जे लोक तिथे जाऊन कसेतरी पुरलेले मृतदेह नीट बाहेर काढून त्यांची नीट ओळीने व्यवस्था लावणार होते त्यांच्यात ती सामील झाली. त्यातून मग सर्वांचे एक स्मारक करायचे ठरले. त्या कामात ती गवंड्यांना मदत करू लागली. थोडेफार गवंडीकाम येऊ लागल्यावर आता ती एका गवंड्याच्या हाताखाली छोटीमोठी कामे करते.
एदिथ युवानिलिंगिराचे बालपण अस्थिरच होते. बुरुंडीतून अँकोतान्यींनी रवांडात कोठेही हल्ले केले की त्याचा वचपा तिच्या एन्तारामा भागातील तुत्सींवर निघत असे. ब्युजेसरा प्रांत बुरुंडीला लागून असल्याने या चकमकी तेथे अधिकच होत. मेलेल्या तुत्सींची जागा हुतु शेतकरी घेत. तरी अंतर राखून का होईना, किमान सलोख्याचे व्यवहार होत असत. १९९१ साली पहिले नागरी युद्ध झाले, तेव्हा तिचे लहान मूल पोटातच दगावले. कारण दवाखान्यापर्यंत सरळ रस्त्याने जाणे शक्य नव्हते. तीन वर्षांनंतर जेव्हा राष्ट्राध्यक्षांचे विमान कोसळले तेव्हा रेडिओवरून बाहेर न पडण्याचा सल्ला मिळत होता. सुरुवातीला सगळेच गोंधळलेले होते. पण चार दिवसांनी सगळे पोलीस, सरकारी अधिकारी हुतुंना चिथावू लागले. "बघता काय? या झुरळाना चिरडून टाका!" "तुत्सींना आता थारा नाही. मारून टाका त्यांना तुम्हाला जमेल त्या पद्धतीने." "हे साप आहेत. ठेचा त्यांना. कोणालाही शिक्षा होणार नाही." मग सर्वसामान्य हुतु अँतेरामवेंना त्यांच्या माहितीतील तुत्सींची घरे दाखवू लागले. त्यावेळी एदिथला आठवा महिना होता. तिचे कुटुंब एका हुतु शेजाऱ्याच्या आश्रयाला गेले होते. पण पाचव्या दिवशी त्या शेजाऱ्याने त्यांना घराबाहेर काढले. मग ते आकान्यारु नदीच्या दिशेने निघाले. एका नावाड्याला भरपूर पैसे देऊन नदी ओलांडली आणि जितारामाच्या दिशेने चालत निघाले. अजून जितारामामध्ये हत्याकांड सुरू झाले नव्हते कारण तेथवर बातम्या पोहोचल्या नव्हत्या. सारे निराश्रित बाजाराच्या एका वळचणीला राहत होते. तिथेच एदिथ भर रस्त्यात, भर उन्हात, सर्वांसमोर बाळंत झाली. मग एक दिवस स्थानिक हुतु म्हणाले की तुत्सींना मारायला लोक येणार आहेत. बरेचसे तुत्सी एका फॅक्टरीत लपले. तिथे कोणी चाल करून यायच्या आधी तिथल्या पोलीसाने एका छोट्या टेंपोची व्यवस्था केली. त्यात एदिथसह तिचा नवरा, त्यांचा मोठा मुलगा, नवजात मुलगी, दोन बहिणी, आणि एक नोकर हेही चढले आणि काबागायीकडे जाऊ लागले. जागा नव्हती म्हणून ते सर्व उभ्याने प्रवास करत होते आणि वाटेत सर्वसामान्य हुतु यांना मारूनच टाकायला पाहिजे असे ओरडत होते, फक्त त्यांतल्या कोणी ते पाऊल उचलले नाही म्हणून टेंपो काबागायीपर्यंत गेला. तिथे आश्रितांची खूपच गर्दी होती. हुतुंच्या भीतीने आलेले तुत्सी आणि बुरुंडीतील RPFच्या भीतीने आलेले हुतु. पुरेसे अन्न कोणाला मिळत नव्हतेच. तरीही लहानलहान मुलेही कधी आजारी पडला नाहीत. त्यांनाही बहुधा समजले होते की आजारी पडणे म्हणजे मरण ओढवून घेणे. एक दिवस निर्वासित हुतु आणि तुत्सींमध्ये जुंपली. अँतेरामवेंनी कापाकापी सुरू केली. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर सुरक्षित अंतरावरून ती दृश्ये टिपत होते.
एक जूनपासून सैनिक एक बस घेऊन येत. त्यात तुत्सींना घालून नेत – सगळे उच्चशिक्षित, सरकारी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक अशा शेलक्या लोकांना बसमध्ये चढवत आणि संध्याकाळी रिकामी बस परत येई. २९ जून रोजी एदिथचा नवरा जाँ-द-द्य एनिकुरुनझिझा याला नेले आणि तो नंतर कधीच दिसला नाही. तो एन्तारामामध्ये प्रोफेसर होता. एदिथही सियुगारोच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी एदिथ विधवाही झाली आणि अनाथही. तिचे आई-वडील, सासू-सासरे, भावंडे – कोणीच उरले नाहीत. फक्त मुलगा आणि मुलगी यांना घेऊन ती जेव्हा एन्तारामाला परतली तेव्हा नसलेल्या माणसांच्या आठवणींनी तिला तिथे राहणे नकोसे झाले. म्हणून ती न्यामाताला राहायला गेली. कशातच रस नाही, कोणाचा आधार नाही, कोणी भेटलेच तरी तीच तीच दुःखे उगाळणे यापेक्षा ती धार्मिक बनली. चर्चमध्ये जाऊन खड्या आवाजात येशूला आळवू लागली. आपला नवरा कसा मेला हे न कळण्यामुळे तिला अतीव दुःख होते. तिचा मुलगा तिला विचारतो तेव्हा ती सांगते त्याला अँतेरामवेंनी मारले. मात्र पुढची पिढी विखारी होऊ नये यासाठीही ती त्यांच्याशी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांचे प्रबोधन करते. तुत्सींच्या गुन्हेगारांचा गुन्हा माफीलायक नसला तरी तिने त्यांना माफ केले आहे ते तिला स्वतःला शांतता लाभावी म्हणून.
बेर्थ म्वानाकाबांदी हिला दोन भाऊ आणि नऊ बहिणी होत्या. लहानपणी ते सगळे बरोबरच जंगल तुडवत सियुगारोच्या शाळेत जायचे. शाळेत कधीही जमातींवरून विषय निघायचा नाही. विमान पडले त्या दिवशी ते सगळे घरीच होते. अँतेरामवे टेकड्याटेकड्यांवर जाऊन दंगा करून दहशत माजवत होते. एका केळीच्या बनात तिला त्यांच्या शेजाऱ्याला मारल्याचे कळले. मग ख्रिश्चन देवाच्या दारी काही करणार नाहीत अशा भावनेने सगळे कुटुंबीय टेकडी उतरून एन्तारामाच्या चर्चच्या आश्रयाला गेले. तिथे ते तीन दिवस होते. त्यांना वाटत होते की ते पुन्हा त्यांच्या शेतीच्या तुकड्यावर परत जातील. पण अँतेरामवे तिथेही आले, त्यांनी बाँब टाकून चर्चच्या भिंतीला भगदाड पाडले. आणि ते गाणी गात आत शिरून कापाकापी करू लागले. बेर्थ आणि काही धाडसी भावंडांनी तेथून पळ काढला आणि जे धावत सुटले ते न्यामविझाच्या दलदलीपर्यंत. रात्री मुसळधार पाऊस पडला मग त्यांनी जवळच सियुगारोच्या शाळेत आसरा घेतला. पुढचा महिनाभर तेच. दलदल, शाळा, दलदल. बेर्थ जी थोडीफार अन्नसामुग्री प्रत्येकाने बरोबर घेतली होती त्यातून रोज काहीबाही भावंडांना द्यायची, मग त्यांना दलदलीजवळच्या झुडुपांमध्ये लपवायची. पावसाची उघडीप पडून ऊन पडेल त्यादिवशी ते लपायची जागा बदलायचे कारण वाळलेल्या चिखलात त्यांची उमटलेली पावले दिसायची. हत्यारे गात येत त्यामुळे त्यांची चाहूल आधीच लागे. कधीकधी ते आवाज न करता येऊ पाहात, पण माकडांना त्यांची चाहूल लागून ते आवाज करू लागत. दुपारी साडेचारच्या सुमारास ते निघून गेले की वाचलेले बाहेर येऊन कोण मेले याचा धांडोळा घेत. जे दमलेले असत ते तेथेच दलदलीपासून थोडे दूर आडवे होत, काही शाळेपर्यंत जात. बेर्थच्या कुटुंबाचे शेत तेथून फार लांब नसल्याने ते कधी तिथवर जाऊन काही खायला मिळाले तर आणत. दलदलीमध्ये अनेक दिवस पाहण्यात असलेली एखादी व्यक्ती अचानक दिसेनाशी होई. ती पुन्हा दिसेलच याची शाश्वती नसे. शिवाय अस्वच्छता, डास यांनी अनेकजण आजारी पडत. कित्येकांना हगवण लागे. ३० एप्रिलला बेर्थच्या दोन लहान बहिणी रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. हा आघात बेर्थला सहन झाला नाही. ती वेड्यासारखे बडबडू लागली. तिला मरावेसे वाटू लागले. प्रत्यक्षात तिने लपून राहणे सोडले नाही याचेही तिला राहून राहून आश्चर्य वाटते. जेव्हा अखेरीस त्यांची सुटका झाली तेव्हा ते सारे मूर्तिमंत घाण होते. तीन महिने छावणीत राहिल्यानंतर ती ऱ्युगारामाच्या टेकडीवर परत गेली. सगळ्यांच्या शेतांत गवत माजले होते. आता आसपासची एकूण आठ लहान मुले शाळेत जातात, बेर्थनेही एका लहान अनाथ मुलाला ठेवून घेतले आहे. बेर्थला नर्स व्हायचे होते. पण आता तीही शेतीच करते. या संहाराने लोकांना एकलकोंडे केले आहे. त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. काही लहान मुले अँतेरामवे अँतेरामवे खेळतात, एकमेकांना मारण्याची भाषा बोलतात याने तिला धसकायला होते.
क्लोदीन कायीतेसी ही बेर्थची शेजारीण. तिच्या घराच्या भिंती कच्च्या आहेत. काही झाडांच्या फांद्यांवर माती लिंपून केल्या आहेत. पण तिचे घर थोडे वरच्या अंगाला असल्याने तिच्याकडे बेर्थसारखे पावसाचे पाणी साचत नाही. संहारक हल्ले झाले तेव्हा ती न्यीरारुकोब्वा इथल्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होती. ती सांगते की तिला या घटनांमधून दोन धडे मिळाले. एक, तिच्या किन्यारवांदा भाषेत झालेल्या या संहारक कृत्याच्या क्रूरतेसाठी शब्दच नाही. दुसरा म्हणजे नंतरच्या काळात वाचलेले लोक – भले त्यांनी सारखीच दुःखे भोगलेली असतील, ऐन युद्धात एकमेकांना आधार दिला असेल, एकमेकांच्या डोक्यातल्या ढीगभर उवा काढल्या असतील – आता अत्यंत संकुचित मनोवृत्तीचे बनले आहेत. त्यांच्यात एकोप्याची, सहकार्याची भावना उरलेली नाही. ते खूप आत्मकेंद्री बनले आहेत.
विमान पडल्याची बातमी ऐकून क्लोदीनही किंकवीच्या जंगलात पळून गेली. त्यांनी हल्लेखोरांवर दगडफेक करून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, शेवटी ते चर्चच्या आश्रयाला गेले. बाँब फुटला तेव्हा क्लोदीन चर्चच्या मागच्या दारात होती. टेकड्यांवर अँतेरामवे होते म्हणून ती दलदलीच्या दिशेने पळत सुटली. दलदलीबद्दल ती ऐकून होती, डासांचा सुळसुळाट, सापांचा वावर यामुळे कोणी तेथे शिरत नसत. पण त्यादिवशी जीव वाचवण्यासाठी सगळे त्या दलदलीत घुसले. रात्री निलगिरीच्या जंगलात आणि दिवसा दलदलीत असे त्यांचे आयुष्य चालू झाले. लहान मुलांना दोघातिघांच्या गटाने झाडीत लपवणे, दलदलीत आडवे पडून वरून पाने ओढून घेणे. प्यायला पाणी दलदलीतलेच, मृतांच्या मांसाच्या व्हिटामिन्सने समृद्ध !
अँतेरामवेंची चाहूल लांबूनच लागे. पहिल्या दिवशी त्यांनी काहींना मृदु आवाजात हाका मारल्या, "या बाहेर" म्हणाले, आणि जे खरेच बाहेर आले त्यांना मारून टाकले. तेव्हापासून कोणीही कितीही गलितगात्र असो, आजारी असो, आवाज न करता, त्यांच्या दृष्टीस न पडता लपून राहणे हेच साऱ्यांचे धोरण राहिले. संध्याकाळी जंगलात जी मिळतील ती फळे, कंदमुळे खाऊन तग धरायचा. दिवसभरासाठी काही नेता येण्यासारखी परिस्थिती नसल्याने रात्रीच काय ते खायचे. कोण कोण मेले याचा आढावा घ्यायचा आणि आळीपाळीने झोपून सकाळी पाच वाजताच दलदलीच्या दिशेने निघायचे. भीती मनात घर करून असायची. सुऱ्याचे वार झाले तर किती वेदना होतील याची कल्पना करणे हा क्लोदीनच्या मनाचा चाळा बनला. काही मुलींना लगेच न मारता अँतेरामवे आपल्याबरोबर घेऊन जात. काही दिवसांनी त्यांचा कंटाळा आला की दुसऱ्या. मात्र जिला अंगाखाली घेतले तिला ते स्वतः मारत नसत, दुसऱ्या कोणालातरी ते काम सांगत. मग त्या मुलींना खड्ड्यात, गटारात ढकलून देत. ३० एप्रिलला त्यांनी मोठ्या संख्येने संहार केला. संध्याकाळी प्रेतांचा आणि जखमींचा खच पडला होता. क्लोदीनला वाटले, आपणही दृष्टीस पडावे आणि एकदाचे मरून जावे. पण ना तिने ना दुसऱ्या कोणी अशा प्रकारे हाराकिरी केली. सगळे चिवट आशेवर दिवस काढत होते.
गोरे म्हणतात वंशसंहार हा वेडेपणा होता. क्लोदीन म्हणते ते नियोजनबद्ध कृत्य होते. हुतुंच्या डोळ्यांत तुत्सी सलत होते. त्यांना त्यांची जमीन घ्यायची होती, गुरे मारून खायची होती. त्यासाठी तुत्सींविरुद्ध विखारी प्रचार चालवला होता हेच खरे. गोरे दुतोंडी आहेत. ते या वंशसंहाराने भयचकित होतात, पण त्याचबरोबर तुत्सींनी हे ओढवून घेतले आहे अशी मल्लीनाथीही करतात. त्याचबरोबर बाकीच्या आफ्रिकन देशांनीही तुत्सींना आत्मीयता दाखवली नाही याचीही क्लोदीनला खंत वाटते. या सहानुभूतीच्या दुष्काळातच तुत्सी जगणार हे ती जाणून आहे. ती कधी चर्चमध्ये गेली तर एकच प्रार्थना करते, तिच्यात सूडाची भावना निर्माण होऊ नये. ती लग्न करणारच नाही असे नाही, पण तिच्याबरोबर असलेल्या आठ अनाथांसह तिला कोण कसे पत्करणार हेही वास्तव ती जाणते.
सिल्व्ही युम्युब्येयी ही रवांडाच्या नैऋत्य भागातील ब्युतार या विद्यापीठ असलेल्या गावची. ती युद्धबंदीनंतर न्यामाताला आली तेव्हा तिच्या ओळखीचे कोणीच नव्हते. आता ती तेथे सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करते. सगळीकडचा संहारक उन्माद एकाच वेळी संपला नाही. ब्युजेसेरातला आधी संपला म्हणून ती त्या भागात आली – ती, तिचा नवरा, दोन मुलं, एक ऐन धामधुमीत जन्माला आला होता, शिवाय तिची भावंडे. तेथे सगळ्याचीच चणचण होती. पाणी, अन्न, सरपण, काहीच मिळत नसे. मग तिला एका कॅनेडियन सेवाभावी संस्थेत कर्मचारी भरती होणार असे कळले म्हणून ती गेली आणि तेव्हापासून वाचलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात ती गुंतली.
सकाळी आठच्या सुमारास त्यांना एक गाडी झुडुपांपाशी सोडे आणि संध्याकाळी पाच वाजता न्यायला येई. मग दिवसभर जंगलात, टेकड्यांवर विखुरलेल्या अनाथ मुलांचा शोध घेत, त्यांना छावणीवर घेऊन येत. ती सर्व मुले हबकलेली होती. काहींना व्यक्त होता येत होते, काहींना ते जमत नव्हते. ती नुसती रडत राहात. त्या मुलांना बोलते करण्यासाठी सिल्व्ही त्यांना सांगत असे की, ती त्यांच्यासारखीच या हत्याकांडातून वाचली आहे, तिनेही तिची माणसे गमावली आहेत, अँतेरामवेंना काही फुटांवरून कोणाला तरी भोसकताना पाहिले आहे. मग हळूहळू ते त्यांच्या कहाण्या तिला सांगत. एकदा सांगून झाले की ती मुले अधिकच गप्प होऊन जात. या वाचलेल्या मुलांना आसरा देणे, गरजेच्या वस्तू देणे आणि पोटाला अन्न देणे, गरजेनुसार औषधपाणी करणे हेही तितकेच महत्त्वाचे होते. लहानलहान मुले या धक्क्यातून तशी लवकर सावरली. पण दहाबारा वर्षांच्या पुढची मुले आणि म्हातारी माणसे यांना हे सारे खूप जड जात असल्याचे सिल्व्हीला दिसले. आपण काहीही केलेले नसताना अँतेरामवेंनी आपल्याला का नष्ट करू पाहिले हे त्यांना कळत नाही. जीवनाच्या उंबरठ्यावर असलेले नवतरुण प्रौढांचे आयुष्य जगायला बिचकत आहेत किंवा कसलाही विचार न करता आला दिवस ढकलत आहेत, नवतरुणी कशाही प्रकारे गर्भार राहात आहेत, त्यांना होणाऱ्या बाळाच्या भविष्याची चिंताच नाही असेही सिल्व्हीला दिसले. मात्र जे नवतरुण एकमेकांशी संवाद साधतात, काहीजण तर हुतु मुलांशीही बोलतात, त्यांच्यात तिला आशेचा किरण दिसतो. काँगोहून परतलेली हुतु मुले धड शाळेत जात नाहीत, नुसती भटकत असतात. विचारले, तर त्यांच्या प्रवासाबद्दल सांगतात पण हत्याकांडाचा विषय निघाला की गप्प बसतात. ती कधी कोणाच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलत नाहीत. काहींचे नातेवाईक मेले आहेत, काहींचे तुरुंगात आहेत. का आहेत तुरुंगात असे विचारले, तर उत्तर देत नाहीत. आम्हाला काही माहिती नाही, आजारी होतो, इथे नव्हतोच असेच काहीतरी सांगतात. सिल्व्हीला वाटते की, जोवर ती मुले त्यांच्या भावनांचा नीट निचरा करणार नाहीत तोवर त्यांना मनःस्वास्थ्य लाभणार नाही. त्यासाठी ती त्यांना पुन्हापुन्हा भेटते. तुत्सींनाही आणि हुतुंनाही. रात्री अनेक मुले दचकून जागी होतात, किंचाळतात. त्याने इतर मुलेही जागी होतात मग सारेच आपली दुःस्वप्ने जगतात.
सिल्व्हीची स्वतःची कहाणी औरच आहे. नऊ मुलांतली ती दुसरी. तिचे वडील रवांडाच्या राष्ट्रीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते, आई प्राथमिक शाळेत शिक्षिका. ब्युतारपासून १८ किलोमीटरवरील ऱ्युन्युन्या या उपनगरात एकूण बारा घरांत तिचे सगळे मिळून दोनशेच्यावर नातेवाईक राहात. सर्व प्रकारचे आजी आजोबा, काका, मामा, भावंडे यांच्यात सिल्व्हीचे बालपण आनंदात गेले. त्यांचे शेत असल्यामुळे त्यांना काहीच विकत आणावे लागत नसे. सिल्व्ही समाजशास्त्रात शिक्षण घेत होती, तिचे एका प्राध्यापकाशी लग्न झाले होते, तिने त्यांच्या बागेत फुलझाडे लावली होती.
ब्युतारे येथे हुतु आणि तुत्सी एकमेकांत मिसळत – विशेषतः शिक्षकवर्ग. पण राष्ट्राध्यक्ष आब्यारिमाना यांचे विमान कोसळले आणि सगळेच बदलले. सिल्व्ही म्हणते की तुत्सी आपसात कधी RPF आणि आब्यारिमाना यांच्यातील संघर्षाबद्दल बोलत नसत. बहुधा हुतु कायम राजकीय बाबींबद्दल आपसात बोलत असणार, मात्र त्यांनी त्यांचे विचार कधीच तुत्सींपुढे उघड केले नव्हते. त्यामुळे परिस्थितीला लागलेले वळण तुत्सींसाठी धक्कादायक होते. सिल्व्ही, तिचा नवरा, दोन मुले नेसत्या वस्त्रांनिशी आणि आपली सर्टिफिकेटस् बरोबर घेऊन निघाले. त्यांना दुसऱ्या एका कुटुंबासोबत बुरुंडीला जाण्यासाठी एक छोटा टेंपो केला. बुरुंडीची हद्द फार दूर नव्हती. वाटेत त्यांना काय हाहाकार माजला आहे त्याचे दर्शन झाले. प्रेते, मरणासन्न तडफडणारी माणसे आणि आसुरी आनंद व्यक्त करणारे अँतेरामवे. सरहद्दीवर शेवटचे फाटक लागले. तेथे पळून आलेल्या तुत्सींची एकच गर्दी झाली होती आणि तेथेही अँतेरामवे त्यांच्या मागे लागले होते. सिल्व्ही भीतीने गोठून गेली. ती म्हणते, भीतीने आलेल्या बधीरतेमुळेच ती भीतीवर मात करू शकली. जास्त न ताटकळता तिने व तिच्या नवऱ्याने मुलांना काखोटीला मारून पळायला सुरुवात केली आणि वाट काढत ते बुरुंडीच्या हद्दीत गेले. मागे अनेकजणांना रवांडाच्या हद्दीत प्राण सोडताना तिने पाहिले.
गोऱ्यांच्या एकूण वागणुकीबद्दल तिला राग येतो. त्यांनी कधी नीट आत्मीयतेने परिस्थिती समजून घेतली नाही. टीव्हीच्या प्रतिनिधींनी काँगोहून परतणाऱ्या हुतुंची बिचारे, युद्धात पोळलेले, अशी प्रतिमा केली. RPFने किगालीवर ताबा मिळवला तेव्हा जमातींचे युद्ध तुत्सींनी जिंकले असून ते हुतुंना पळवून लावत आहेत असे वार्तांकन केले. त्यांनी कधी या भयानक हत्याकांडातून हलाखीत तगून राहिलेल्यांच्या कहाण्या शोधल्या नाहीत. मग या तुत्सींची व्यथा सांगणार कोणाला ? त्यामुळे तिला जाँ आत्झफेल्डचे काम महत्त्वाचे वाटते. म्हणून ती त्यांना सहकार्य करायला तयार झाली.
या सगळ्या घटनांमागे तीन कारणे प्रामुख्याने पुढे येतात: पहिले म्हणजे गरिबी. दुसरे अज्ञान. तिसरे प्रचारक आणि प्रचाराला बळी पडणाऱ्यांची संख्या – ८० टक्के हुतु निरक्षर आहेत. त्यांना भडकवणे सोपे होते. या साऱ्यातून काय साधले हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे. कोणीही हुतु कोणाही तुत्सीच्या डोळ्याला डोळा भिडवत नाही. कोणीही तुत्सी आपण आपला जीव वाचवला याबाबत अभिमानाने बोलत नाही. कोणालाच सुरक्षित वाटत नाही हे सिल्व्हीचे भाष्य त्या घटना घडून गेल्यावर ६ वर्षांनीदेखील रवांडातील परिस्थितीवर प्रकाश टाकते.
ऑगस्ट १९९४पासून आता रवांडात RPFची सत्ता आहे. त्यात तुत्सींचे वर्चस्व आहे. सन २०००पासून पॉल कागामे हेच रवांडाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. २००३साली राष्ट्रीय कौल (referendum) घेऊन नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. त्यानुसार तेथे बहुपक्षीय व्यवस्था, लोकशाही, निवडणुका यांना स्थान आहे. प्रत्यक्षात कोणताही पक्ष अस्तित्वात येताना कलम ५४अन्वये कोणताही वंश, जमात, प्रांत, धर्म, लिंगभाव यावर किंवा इतर कोणत्याही दुजाभाव निर्माण करणाऱ्या आधारावर निर्माण झालेला नसावा असे म्हटले आहे. लोकसभा समकक्ष ८० जागांसाठी विविध आरक्षणे आहेत. त्यातील २४ महिलांसाठी असून त्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी करतात. ३ जागा तरुणांसाठी व अपंगांसाठी आहेत, तर उरलेल्या ५३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका होतात, मात्र त्यांत लोकसंख्येनुसार विविध समाजगटांना प्रतिनिधित्व आहे.
UN Security Councilने स्थापन केलेल्या International Criminal Tribunal for Rwanda चे काम अनेक टप्प्यांत होऊन अखेरीस २०१२ रोजी पूर्ण झाले. तोपर्यंत पॉल कागामे यांची सत्तेवरील पकड घट्ट झाली होती आणि एकानुवर्ती कारभाराचे फायदेतोटे रवांडातील जनता भोगत आहे. तेथील लोक अजून दारिद्र्यात आहेत, मात्र Transparency Internationalनुसार आफ्रिकेतील ४७ देशांपैकी रवांडा कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांत मोडतो. 'स्वच्छ' देशांत त्याचा पाचवा क्रमांक आहे.
रंग माझा वेगळा
क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम
सन २००२च्या रोम स्टॅच्यूएटनुसार आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये वर्णभेद (apartheid) हा मानवतेच्या विरुद्ध गुन्हा मानला जाऊ लागला आहे. वर्णभेदाची व्याख्या तेव्हा, "कुठल्याही एका वंशाच्या लोकांना इतर मुख्य प्रवाहातून वेगळे ठेवून, त्यांना त्यांच्या राजकीय व कायदेशीर हक्कांपासून वंचित करणे, आणि अशी राज्यव्यवस्था राबविण्यासाठी कायदे करणे" अशी केली गेली होती. जगातल्या जवळजवळ सर्वच राष्ट्रांमध्ये या प्रकारचे भेदभाव, त्यावरून होणारे तंटे, वांशिक दंगली, मतभेद, वाद इत्यादी अस्तित्वात आहेत. पण वर्णभेदावर आधारित कायदे करून ते राबविणारा दक्षिण आफ्रिका हे पहिले राष्ट्र. कालांतराने इस्रायलनेही असा कायदा केला. बाकी राष्ट्रांत (यांत भारतही अंतर्भूत आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच) हे भेदभाव अलिखित नियमांच्या व रूढींच्या माध्यमाने केले जातात. परंतु त्याला संवैधानिक स्वरूप दिले जात नाही.
त्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने १९४८मध्ये आपल्या देशात वर्णभेद कायदेशीर केला. आपल्याला ढोबळमानाने हे कायदे म्हणजे 'गौरेतरांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करून त्यांचे शोषण करणे' या एकमेव हेतूने केले गेलेले होते असे माहीत आहे. परंतु या वर्णभेदाने कितीतरी गुणी क्रीडापटुंना त्यांचे गुण दाखविण्याची संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर सोडाच, परंतु देशांतर्गत स्पर्धांतही त्यांना संधी न देता, त्यांच्या कामगिरीची दखल न घेता त्यांना सतत अनुल्लेखाने मारले गेले, हे खूपच कमी जणांना माहीत आहे. बेसिल डी ऑलिव्हेरासारखा एखाद्याच खेळाडूला यातून बाहेर पडून, इंग्लंडकडून खेळून स्वतःचे क्रीडाकौशल्य आजमावता आले, त्याचा योग्य उपयोग करून, पैसे कमावून चांगले जीवन जगता आले. पण त्याच्या आधीचे खेळाडू इतके नशीबवान नव्हते.
क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम ही याची ठळक उदाहरणे होत.
| क्रोम हेंड्रिक्स | पापवा शिवगुलाम |
|---|---|
|
![]() |
क्रोम हेंड्रिक्स हा काही निव्वळ 'बरा' क्रिकेटर नव्हता, तर त्याची गोलंदाजी खेळलेल्या व पाहिलेल्या काही इंग्रज फलंदाजांनी त्याची तुलना तत्कालीन थोर गोलंदाज फ्रेड स्पोफोर्थ, चार्ली टर्नर, जे. जे. फेरिस, जॉर्ज लोहमान आदींशी केली आहे. परंतु, क्रोम हेंड्रिक्सबद्दल काहीही लिखित मजकूर फारच मुश्किलीने सापडतात. काही जुन्या, खेळलेल्या सामन्यांची स्कोरकार्ड्स व उतारवयातल्या एका फोटोवरून कल्पना करून १९३०मध्ये बेला फोरसाय या चित्रकाराने काढलेल्या त्याच्या पोर्ट्रेट व्यतिरिक्त या उपेक्षित, तरीही गुणी क्रिकेटपटूबद्दल काहीही लिखित किंवा दृश्य माहिती उपलब्ध नाही, इतक्या थराला जाऊन तत्कालीन दक्षिण आफ्रिकन सरकारने क्रोम हेंड्रिक्सबद्दलची माहिती, आणि त्याचे एकूण जीवनच दडपून टाकले आहे. क्रोम या शब्दाचा आफ्रिकान्स भाषेत अर्थ होतो 'वेडावाकडा'. हे त्याचे टोपणनांव असावे, किंवा त्याला उपहासाने बोलाविण्याकरिता गौरवर्णीय दक्षिण आफ्रिकन्सनी हे नाव ठेवले असावे. किंबहुना, त्याने टाकलेले चेंडू वेडेवाकडे स्विंग व कट होत असल्यानेही त्याला हे नाव दिले गेले असावे. पण १८९० ते १९०० या दशकात क्रोम हेंड्रिक्स हा दक्षिण आफ्रिकेतला सर्वांत वेगवान गोलंदाज होता असे खूप खेळाडूंनी नमूद करून ठेविलेले आहे. त्याने खेळलेले काही तुरळक सामने, ज्यांची स्कोरकार्ड्स पहावयास मिळतात, त्यातली आकडेवारी पाहून याची खात्री पटते. १८९२मध्ये, गोऱ्यांच्या क्लेरमाउंट संघाविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात क्रोम हेंड्रिक्सचे गोलंदाजीचे पृथक्करण ९ षटके, ९ निर्धाव, आणि ९ बळी असे होते. यावरून फलंदाज त्याची गोलंदाजी किती घाबरून खेळत होते याची कल्पना येईल. क्रोम हेंड्रिक्सचा जन्म १८५७ सालचा. म्हणजे १८९२मध्ये तो पस्तिशीचा होता. या वयात जर फलंदाजांना घाबरवून सोडण्याची त्याची क्षमता अशी होती, तर भरात असतांना त्याला कुणीही खेळू शकले नसते. परंतु त्याचा वर्ण चुकीचा होता त्याचा वर्ण गोरा नव्हता, आणि वर्णद्वेष्ट्या, गोऱ्या दक्षिण आफ्रिकनांना त्याला देशाकडून खेळू न देण्यास तेवढे कारण पुरेसे होते. सामने हरलो तरी बेहत्तर, पण गौरेतर खेळाडू संघात असता काम नये असे तत्कालीन दक्षिण आफ्रिकन राजवटीचे धोरण होते.
क्रोम हेंड्रिक्स हा मलय वंशाचा होता. हा जनसमूह पोर्तुगीज, दक्षिण आशियाई, भारतीय, तुर्की, इत्यादि वंशाच्या लोकांच्या वर्णसंकरातून निर्माण झाला होता. ख्रिश्चन, व मुसलमान, धर्माचे हे लोक असत. फ्रैंक रोरो, अहमद दिदिये, बेसिल डी ओलीव्हेरा, ओमार हेनरी हे या वंशाचे प्रमुख क्रिकेट खेळाडू.
१८९६ सालात लॉर्ड हॉक इंग्लंडचा संघ घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला होता. संघात टॉम हेवर्ड (जॅक हॉब्सचा गुरु), सी. बी. फ्राय, सॅमी वूड्स, ह्यु ब्रोमले डेव्हनपोर्ट, इत्यादि प्रतिथयश फलंदाजांचा भरणा होता. या खेळाडूंच्या सरावाकरिता केपटाऊनमध्ये नेट्समध्ये गोलंदाजी टाकण्याची कामगिरी क्रोम हेंड्रिक्स आणि इतर काही अश्वेत गोलंदाजांवर सोपविण्यात आली. परंतु या गोलंदाजांनी कितीही चांगली गोलंदाजी टाकली, तरीही राष्ट्रीय संघाकरिता त्यांचा विचार होणार नव्हता ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमोर गोलंदाजी टाकण्याची ही एकमेव संधी असेल कदाचित, म्हणून क्रोम हेंड्रिक्सने चाळीशीच्या उंबरठ्यावर असतांनाही जीव तोडून गोलंदाजी टाकली. दौरा संपतांना टॉम हेवर्डला "या दौऱ्यावर तुम्हाला कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक त्रास दिला?" असे विचारले असता हेवर्ड म्हणाला, "टेस्ट सामन्यांत एकही गोलंदाजाला खेळतांना मला तिळमात्रही सायास पडले नाहीत. परंतु नेट्समध्ये क्रोम हेंड्रिक्सने मात्र आम्हा फलंदाजांची पाचावर धारण बसविली होती."
१८८९मध्ये दक्षिण आफ्रिका त्यांचा पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळले. त्या सुमारास विलियम मिल्टन हा दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचे सर्वेसर्वा होता. त्यांचे देशभरातील उत्तम क्रिकेटखेळाडूंवर निश्चितच लक्ष असावे. क्रोम हेंड्रिक्सची तुफानी गोलंदाजी त्यांच्या नजरेतून नक्कीच सुटली नसावी. मिल्टन हा तत्कालीन केप कॉलोनीचा पंतप्रधान सेसिल ऱ्होडस याचा उजवा हात होता. सध्याच्या झिम्बाब्वेचे स्वातंत्र्यापूर्वीचे नाव ऱ्होडेशिया हे त्यांच्यावरूनच ठेवलेले होते. गौरवर्णीय हे इतर सर्व वंशाच्या लोकांपेक्षा वरचढ आहेत ही सेसिल ऱ्होडसची उद्दाम धारणा होती. आणि गौरतेरांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा मिळू नये याची पुरेपूर काळजी सेसिल ऱ्होडस घेत असे. १८९२-९३ च्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका एक डाव आणि १८९ धावा इतक्या मोठ्या फरकाने हरले. त्यानंतर केपटाऊनच्या मलय संघाबरोबर इंग्लिश संघ एक सराव सामना खेळला. स्थानिक दक्षिण आफ्रिकन गोऱ्यांना जरी गौरेतर लोकांबरोबर खेळणे अब्रह्मण्यम! वाटत असले, तरी इंग्रजांना त्याचे वावडे नसावे. या सामन्यात क्रोम हेंड्रिक्सने तुफानी गोलंदाजी टाकत ५० धावांत चार बळी घेतले. फलंदाज जॉर्ज हर्नने त्याला दक्षिण आफ्रिकेतला सर्वात वेगवान गोलंदाज म्हटले होते.
१८९४मध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने इंग्लंड दौरा करण्याचे घाटत असतांना क्रोम हेंड्रिक्सचा समावेश राष्ट्रीय संघात असावा असे वाटणाऱ्या हॅरी कॅडवाल्डेर या पत्रकाराने क्रोम हेंड्रिक्सचा संघात समावेश व्हावा म्हणून एक शक्कल लढविली. त्याला गौरवर्णीयांची श्रेष्ठता सिद्ध करण्यापेक्षा आपला राष्ट्रीय संघ खेळात वरचढ असावा असे कॅडवाल्डेर ला वाटत होते. क्रोम हेंड्रिक्सला दक्षिण आफ्रिकन संघाबरोबर इंग्लंडला बॅगेज मास्टर (म्हणजेच साध्या शब्दात हमाल) म्हणून न्यावे आणि सामन्यांत खेळवावे अशी कल्पना त्याने मांडली.
पण स्वाभिमानी क्रोम हेंड्रिक्सने त्याची ही कल्पना हाणून पाडली. हमाल म्हणून संघाबरोबर जाण्यास त्याने केप टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट नकार दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या त्याच्या आशा संपुष्टात आल्या. पण याहून विलक्षण बाब म्हणजे त्याने स्वतःचे अश्वेत असणेही नाकारले. डच वंशाचा बाप आणि सेंट हेलेनामधील आई असल्यामुळे आपण गौरवर्णीयच आहोत असेही तो म्हणाला. सेंट हेलेनातल्या गोऱ्या लोकांचा वर्ण उन्हाने रापल्यासारखा, काहीसा गडद असतो, त्यामुळे माझा वर्ण इतर गोऱ्या लोकांइतका उजळ नाही असेही प्रतिपादन त्याने केले. या मानी क्रिकेटपटूची कायम मानखंडना होत राहिली, आणि त्याने आपला मूळ वंशही नाकारण्यास सुरुवात केली. अनेक वर्तमानपत्रांना, व गोऱ्या लोकांच्या क्लब्सना पत्रे लिहून तो गोऱ्या क्लब्स कडून खेळण्यास पाठींबा मिळविण्याचा तो प्रयत्न करत राहिला, परंतु त्याला कधी यश आले नाही. मलय व इतर अश्वेत क्लब्स कडून तो खेळत राहिला, परंतु त्या सामन्यांचा व त्यातील क्रोम हेंड्रिक्सच्या कामगिरीचा काहीही तपशील मिळत नाही.
परंतु स्वतःला युरोपीय सिद्ध करण्याच्या त्याच्या प्रयत्नात त्याला मृत्यूनंतर यश आले असावे. त्याला व त्याच्या पत्नीला युरोपियन दफनभूमीत दफन करण्यात आले. त्याच्यामुळे क्रोम हेंड्रिक्सभोवतीचे रहस्याचे वलय आणखीनच गडद होत गेले. जॉन्टी विंच, आंद्रे ओडेनडाल व गुलाम वाहेद या क्रिकेट इतिहासकारांनी हेंड्रिक्सचे 'टू ब्लॅक टू वेयर व्हाईट्स' नांवाचे चरित्र लिहिले आहे, पण तुटपुंज्या माहितीच्या आधारे लिहिलेल्या त्या पुस्तकात अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आहेत.
क्रोम हेंड्रिक्सचे इतिहासातले स्थान मात्र पक्के आहे. वर्णाच्या निकषांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यास बंदी घातलेला तो ज्ञात इतिहासातला पहिलाच क्रीडापटू होय.
गोल्फपटू शिवसागर (पापवा) शिवगुलाम मात्र त्यामानाने खूपच नशीबवान. आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करून अजिंक्यपदसुद्धा त्याने मिळविले.
दरबान कंट्री क्लब हा दक्षिण आफ्रिकेतल्या दरबानचा एक अत्यंत प्रतिष्ठित क्लब. गौरवर्णीय गोल्फपटू व त्यांचे भारतीय, मलय व कृष्णवर्णीय वंशाचे अनवाणी 'कॅडीज' यांची तिकडे कायम वर्दळ. १९६३ साली या क्लबच्या गोल्फ कोर्सवर एक अघटित घडले. ३४ वर्षांच्या भारतीय वंशाच्या शिवशंकर (पापवा) शिवगुलाम याला नाताळ ओपन गोल्फ स्पर्धेत गोऱ्या खेळाडूंसोबत बरोबरीने भाग घेण्याची संधी देण्यात आली. १९२८मध्ये या गोल्फकोर्सच्या जवळच एका टिनपाटाच्या पत्र्याच्या झोपडीत पापवाचा जन्म आला होता. अक्षरशत्रू असलेला पापवा मोठा होता होता गोल्फ कोर्सवरची बारीकसारीक कामे करून घरखर्चाला हातभार लावू लागला. गोल्फचे कोणतेही शिक्षण त्याला कुणीही दिलेले नव्हते. हरकाम्यापासून ते कॅडी बनण्याचा प्रवास त्याने आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीच्या बळावर केला होता. फावल्या वेळात तो इतर कॅडीजबरोबर गोल्फ खेळत असे. उसाच्या शेतात वेठबिगारी करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला पेरूच्या झाडाच्या काठीपासून गोल्फचा क्लबही बनवून दिला होता. पापवाची आई अंध होती.
हौशी गोल्फपटू ग्राहम वूल्फबरोबर एकदा पापवा कॅडी म्हणून काम करीत असता, पापवा त्याला कोणत्या होलसाठी कोणता क्लब वापरावा याबद्दल सल्ले देऊ लागला. पापवाचे अचूक सल्ले पाहून वूल्फला त्याच्या गोल्फच्या सखोल ज्ञानाची चुणूक दिसली, व १९५९मध्ये पापवाला वूल्फने डच खुल्या गोल्फ स्पर्धेत उतरवले, आणि अहो आश्चर्यम, पापवा ती स्पर्धा जिंकून दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत अजिंक्यपद मिळवून देणारा पहिला गौरतेर गोल्फपटू ठरला. इतकेच नाही, तर त्याने १९६० आणि १९६३ सालीही ही स्पर्धा जिंकली. १९६१मध्ये दक्षिण आफ्रिकन खुल्या गोल्फ स्पर्धेत त्याला गोऱ्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळू देण्यात आले. तरीही, तो ज्या क्लबमध्ये काम करीत असे, त्या क्लबने त्याला गोऱ्या खेळाडूंबरोबर १९६३ पर्यंत खेळू दिले नव्हते. त्याला धंदेवाईक खेळाडू म्हणून गोल्फ खेळण्याची परवानगीही दक्षिण आफ्रिकेत नव्हती. परिणामी, त्याला अनेकदा स्वखर्चाने हौशी गोल्फपटू खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळात राहाव्या लागल्या, आणि त्यातून पैसाही फारसा मिळत नसे.
दक्षिण आफ्रिकेतील गोल्फ संघटनेची सूत्रे गौरवर्णीयांच्याच हातात होती. त्याचे पदाधिकारी आणि खेळाडू पापवाकडे काहीशा आश्चर्याने, व काहीशा शरमिंदेपणाने बघत असत. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी सरकारच्या नजरेत मात्र पापवा हा बंडखोर अश्वेत समाजकंटक होता. त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणे हे त्यांच्या दृष्टीने राज्यव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे होते.
पण तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर दरबान कंट्री क्लबचे पदाधिकारी काहीसे वरमले असावेत, व त्यांनी नाताळ ओपन स्पर्धेची कवाडे पापवासाठी खुली केली. त्याच्या ड्रेसिंग रूमसाठी एका मिनी व्हॅनमध्ये सोय करण्यात आली, आणि त्याने इतर गौरेतर कॅडीजबरोबर स्पर्धेदरम्यान जेवण घ्यावे असे ठरले. (आपल्याकडेही जातिभेदामुळे, पंचरंगी सामन्यांमध्ये हिंदूंकडून १९०६ ते १९२० खेळणाऱ्या महार समाजातील बाळू पालवणकर यांना इतर खेळाडूंबरोबर जेवण-चहा न घेता ड्रेसिंग रूमच्या बाहेरील व्हरांड्यात/ पायरीवर बसून वेगळ्या भांड्यांमध्ये जेवण- चहा देण्यात येत असे, तसेच.) १९६५मध्ये, गॅरी प्लेयरसारख्या आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या प्रोफेशनल खेळाडूला हरवून पापवा ही स्पर्धा जिंकला. परंतु बक्षीस समारंभासाठी क्लबच्या हॉलमध्ये पापवाला प्रवेश नव्हता. का तर, क्लबचे आपल्या बारमध्ये मद्य विकण्याचे लायसन्स क्लबमध्ये गौरेतर माणसास प्रवेश दिल्यास रद्द केले जात असे. स्पर्धा संपताच धो-धो पाऊस कोसळू लागला. तरीही विजेत्याला इमारतीच्या आडोश्यात पारितोषिक देता येणार नव्हते. शेवटी पापवाला पावसात उभे राहून पारितोषिक स्वीकारावे लागले. निर्विवाद विजेता ठरूनही पापवाच्या वाट्याला अशी मानहानीच आली.

तरीही खचून न जाता पापवाने १९६६ सालीही ही स्पर्धा जिंकली. १९६७मध्ये याने डच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात पीटर टाऊन्सएंडकडून त्याने पराभव पत्करला.
तरीही इतक्या स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवूनही पापवाची दारिद्र्यावस्था दूर झालीच नाही. गोल्फ कोर्सवर शेवटपर्यंत तुटपुंज्या महिना ३५ रँड पगारावर तो कॅडीचे काम करीत राहिला. मुश्किलीने महिन्याचा खर्च भागत असे. हा दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खुल्या गोल्फ स्पर्धेत एक काळ गाजविलेला हा जगज्जेता वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी कष्ट उपसत, खंगून मरण पावला.
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट उलथून पडल्यावर पापवाला उशिरा का होईना गौरविले गेले. मरणोपरांत त्याला २००३मध्ये पंतप्रधान थाबो म्बेकी यांनी 'ऑर्डर ऑफ इखामंगा'ने गौरविले. दरबान मधल्या महानगरपालिकेच्या गोल्फ कोर्सलाही 'पापवा शिवगुलाम म्युनिसिपल गोल्फ कोर्स' असे नाव देण्यात आले. २००५मध्ये त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट काढण्यात आला, आणि २०१५ साली मॅक्सिम पेज यांनी त्याचे चरित्रही लिहिले आहे.
या दोन्ही असामान्य गुणवत्ता असलेल्या खेळाडूंच्या वाट्याला दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेष्ट्या राजवटीत मानहानी, उपेक्षा सोडून काहीही आले नाही. मृत्युनंतर मात्र त्यांचे पोवाडे गायिले जात आहेत.

मला दिलीप प्रभावळकरांच्या हसवाफसवी नाटकातले हृदयाला कायमची जखम करून गेलेले एक वाक्य या दोघांच्या आयुष्याकडे बघून आठवते, "अहो, मेलेल्या माणसाचे पुतळे उभारण्यापेक्षा, जिवंत माणसाचे सत्कार करणे जास्त महत्त्वाचे नाही का?"
साखर उद्योग आणि आफ्रिका
- सई केसकर
१५६६ साली पोर्तुगलची राजकन्या मारिया द आविझ (Maria de Aviz) हिचा विवाह आलेसांद्रो फारनेजे़ (Alessandro Farnese) या पारमाच्या इटॅलियन सरदाराशी झाला. त्या शाही सोहळ्यातलं जेवण फारच गाजलं. त्यांच्या लग्नातली पक्वान्नं साखरेच्या ताटांवर वाढली गेली. ती खाण्यासाठी साखरेचे चमचे होते. पोटात मद्य असणारी नाजूक चॉकलेटं कापायला साखरेच्या सुऱ्या होत्या. मद्य पिण्यासाठी साखरेचे प्याले होते. या सगळ्या भांड्यांतलं अन्न संपल्यावर पाहुणेमंडळी चमचे आणि ताटल्याही मोडून खात होती. एवढंच काय, मेणबत्त्या ठेवण्याची रोशनदानंही साखरेपासून तयार केली होती. पण हे सगळंदेखील त्यानंतर येणाऱ्या देखाव्यासमोर फिकं ठरलं. मारियाला अँटवर्प शहरानं (जिथून मोठ्या प्रमाणावर पोर्तुगिजांचा व्यापार चालायचा) 'रुखवत' दिलं ज्यात साखरेची तब्बल तीन हजार शिल्पं होती. लिस्बन हे तिचं माहेर सोडून ती आता तिच्या सासरी, म्हणजेच नेदरलंडला जाणार होती. पाहुण्यांना तिच्या प्रवासाचा अंदाज यावा म्हणून साखरेचे मासे, होड्या, तिच्या वाटेत लागणाऱ्या शहरांच्या प्रतिकृती, एवढंच नव्हे, तर नवरदेवाचा साखरेचा पुतळाही त्यात होता! घरी जाताना पाहुणेमंडळी यांतल्या काही वस्तू लग्नाची आठवण म्हणून सोबत घेऊन गेली.

प्रतिमा स्रोत : विकीपीडिया
सोळाव्या शतकाच्या आसपास वसाहतवादी राष्ट्रांना ऊस-लागवड करून मोठ्या प्रमाणात साखर तयार करायची पद्धत गवसली. अशा प्रकारे तयार केलेली साखर मायदेशी परत आणून ती महाराण्यांच्या लग्नकार्यांत उन्मादानं उधळली जाऊ लागली. त्याआधी भारतातली साखर अरबांमार्फत युरोपात जात होती. पण ती भयंकर महाग असायची आणि तिचा पुरवठाही नियमित नसायचा. आज सगळीकडे अतिरेकी प्रमाणात साखर सापडते. बाजारात मिळणारे जे खाद्यपदार्थ चवीला थेट गोडही नसतात, त्यांतही मुबलक प्रमाणात साखर असते. पांढरी साखर वर्ज्य करा असा सल्ला मध्यमवयीन लोकांना मिळतोच; पण अलीकडे तान्ह्या बाळांनाही शक्यतो साखर देऊच नका असं डॉक्टर सांगतात. हे असं होण्याआधीची काही शतकं केवळ साखरेसाठी म्हणून माणसानं जग पालथं घातलं. साखरनिर्मितीच्या 'पाककृती’ची उत्तरोत्तर होणाऱ्या तांत्रिक प्रगतीनं 'प्रक्रिया' झाली; साखरेसाठी लढाया झाल्या; मोठमोठ्या मोहिमा आखल्या गेल्या; वसाहती निर्माण झाल्या आणि अनेक निरपराध लोकांचं शोषणही झालं. आज जगभरात ज्या ज्या देशांत मोठ्या प्रमाणावर साखरनिर्मिती होते, त्यांतले बहुतांश देश या इतिहासाचे साक्षीदार आहेत.
साखरेचा पश्चिमप्रवास
भारतीयांना उसापासून साखर तयार करायचं तंत्र इ.स.पूर्व काळापासून ज्ञात होतं. कौटिल्य त्याच्या 'अर्थशास्त्रा'त चार प्रकारच्या साखरेचा उल्लेख करतो. खांडसरी, काकवी, मळी, आणि भुरा (पूड केलेली साखर). खांडसरी या शब्दावरूनच इंग्रजीतला 'कँडी' हा शब्द तयार झाला आहे. त्याच ग्रंथात कौटिल्य 'सगळ्या पिकांमध्ये सर्वांत वाईट पीक कोणतं - तर ते ऊस' असंही सांगतो. उसाची लागवड जमिनीसाठी चांगली नाही, तसंच उसाला भरपूर पाणी लागतं ही माहिती त्या ग्रंथात आहे. उसाची लावणी, सिंचन, कापणी, वाहतूक, आणि त्यातून रस काढण्याची प्रक्रिया अतिशय कष्टप्रद आहे. त्यापुढची पायरी, म्हणजेच स्फटिकरूपी पांढरी साखर तयार करायची प्रक्रिया ही तोडणीपासून रस काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेइतकीच अवघड आहे. आजकाल, काही तासांत शेकडो टन साखर तयार करणारे कारखाने असल्यानं आणि दर काही वर्षांनी साखरेचं अतिउत्पादन होत असल्यानं, साखरेचं सर्वव्यापी असणं आपल्या अंगवळणी पडलं आहे.
आपण खातो ती पांढरी साखर ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन शर्करा एकत्र येऊन तयार झालेली असते. या दोन शर्करांच्या संयुगाला सुक्रोज असं नाव आहे. उसाच्या रसातल्या सुक्रोजचं, ऊस तोडल्यानंतर झपाट्यानं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये विघटन होऊ लागतं. यामुळे सुक्रोजच्या रूपातली स्फटिकरूपी साखर तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, परिणामी आर्थिक तोटा होतो. ते थोपवण्यासाठी, ऊस तोडल्यानंतर शक्य तितक्या लवकर रस काढून उकळायला ठेवावा लागतो. उसाच्या रसातलं आम्ल वाढलं (म्हणजेच pH कमी झाला) तरी सुक्रोजचं विघटन होतं. याउलट, pH सतत सातच्या जवळपास राहिला, की स्फटिकरूपी सुक्रोज तयार होतं. उसाच्या रसात चुना घालून तो उकळला, की स्फटिकरूपी साखर तयार होते हे ज्ञान भारतीयांना इसवी सनपूर्व ३०० वर्षांपूर्वी होतं याचे पुरावे सापडतात. 'शर्करा' हा शब्द इ.स.पूर्व ५०० ते ३०० या कालावधीत कधीतरी वापरला जाऊ लागला होता. अशी स्फटिकरूपी साखर तयार करायचं तंत्र भारतातून इराणमध्ये गेलं आणि तिथेही साखर तयार होऊ लागली. साधारण इ.स. पाचव्या शतकात त्यांना हे अवगत होतं असं दिसतं.
तेराव्या शतकाच्या शेवटाकडे, मार्को पोलो जेव्हा बंगालमध्ये आला, तेव्हा तिथे व्यावसायिक पद्धतीनं साखर तयार होत होती. दिल्लीत साखरेची मोठी बाजारपेठ होती. उसातून रस काढण्याचे नवनवीन मार्ग शोधले जात होते. चांगली साखर कशी तयार करायची याचा अनुभव असलेल्या त्या काळच्या साखर-तंत्रज्ञांची अगदी चांदी होती. इल्बा बोस्मा (Ulbe Bosma), त्यांच्या २०२३ साली प्रसिद्ध झालेल्या 'द वर्ल्ड ऑफ शुगर' या पुस्तकात असं म्हणतात, की मानवी श्रमांचं आणि निसर्गाचं वस्तूकरण करून खासगी भांडवलदारांचा अधिकाधिक फायदा करून देणे अशी जर भांडवलशाहीची (काहीशी मर्यादित) व्याख्या केली, तर तेराव्या शतकात साखर व्यवसायाच्या रूपातून भारतात भांडवलशाही प्रस्थापित झाली होती असं म्हणता येईल.
त्याआसपास आणि नंतर भारतात आलेल्या अनेक परदेशी प्रवाशांनी साखरेबद्दल सुरस नोंदी करून ठेवल्या आहेत. सुरुवातीला साखरेचा व्यापार अफगाणिस्तान – उझबेकिस्तान – आखाती देश असा जमिनीवरून होत असे. त्यानंतर बंगालमधून साखर, मळी, आणि मद्य गंगेमार्गे होड्यांतून समुद्रापर्यंत नेण्यात येऊ लागलं. तिथून समुद्री जहाजांमध्ये चढवून साखर आणि साखरेपासून तयार झालेली उत्पादनं पर्शिया आणि अरबी देशांत जाऊ लागली. पण बंगाल हे निर्यातीचं एकच ठिकाण नव्हतं. फ्रान्सच्या चौदाव्या लुईच्या एका हेरानं ‘पोर्तुगिजांच्या वसईत भारतातील सर्वोत्कृष्ट साखर मिळायची' अशी नोंद करून ठेवली आहे. सुरत, कॅम्बे (खंबाट), बाटीकाला (भटकळ) बंदरांवरूनही साखर मध्यपूर्वेत निर्यात होत असे.
भारतातून निर्यात होत असतानाच, मामलुक साम्राज्याच्या काळात (साधारण तेराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत) इजिप्त हे मुस्लीम आणि ख्रिस्ती देशांना साखर पुरवणारं एक मोठं केंद्र झालं. साखर तयार करायच्या तंत्रज्ञानात, विशेषतः उसापासून कमीत कमी कष्टात रस काढण्याच्या तंत्रज्ञानात, एव्हाना बरीच प्रगती झाली होती. दगडी जाती जाऊन त्यांची जागा आता आडव्या, सहज गोल फिरू शकणाऱ्या रोलर्सनं घेतली होती. साखरेतून मळी वेगळी करायचं तंत्रज्ञानही प्रगत झालं होतं. एकदा तयार केलेली, मळीचा रंग असलेली भुरी साखर ही दूध आणि अंड्याचा पांढरा भाग पाण्यात मिसळून त्यात विरघवून स्वच्छ केली जायची. आजही पाश्चात्त्य देशांमध्ये तयार होणारी 'रिफाइन्ड' साखर ही भुरी, ‘कच्ची’ साखर पुन्हा एकदा विरघळवून रिफाइन केली जाते. भारतात मात्र एकाच प्रक्रियेतून, रिफाइन्ड साखरेइतकी शुभ्र नसली, तरी पांढरी साखर तयार होते. तिला 'प्लान्टेशन व्हाईट' असं नाव आहे.
इजिप्तमधून साखरेचा मोठ्या प्रमाणात व्यापार होऊ लागला आणि हळूहळू साखर ख्रिस्ती साम्राज्यांच्या नजरेत भरू लागली. या व्यापारात राजे, त्यांना भांडवल वा कर्ज देणारे सधन सावकार, आणि जिवाची पर्वा न करता जगभरात कुठेही जायला तयार असणारे खलाशी असे गट असायचे. साखरेला असणारी मागणी आणि साखरव्यापारातून मिळणारं उत्पन्न बघता, वेगवेगळ्या ख्रिस्ती साम्राज्यांनी इजिप्तचा साखरेतला एकाधिकार संपवायचे प्रयत्न सुरू केले. युरोपातल्या त्यातल्या त्यात उष्ण भागांत, उदाहरणार्थ सायप्रसमध्ये, ऊसलागवडीला आणि साखरउत्पादनाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या मध्यात इजिप्तमध्ये पसरलेल्या प्लेगचादेखील साखरउत्पादनावर विपरीत परिणाम झाला. त्यानंतर हळूहळू दुष्काळ, यादवी, दिवाळखोरी अशा अनेक कारणांनी मामलुक साम्राज्याची – परिणामी आजच्या इजिप्तची – साखरेवरची पकड सैल झाली आणि ख्रिस्ती जगाबरोबर असलेला त्यांचा व्यापारही कमी झाला.
वसाहतवाद आणि गुलामगिरी
भारत, चीन, आणि इजिप्त यांसारखे उष्ण कटिबंधातले देश पुरवायचे तेवढी साखर युरोपच्या उष्ण भागांत ऊस लागवड करून तयार करणं शक्य नव्हतं. उपलब्ध भौगोलिक क्षेत्र आणि त्यावर करता येणारं वस्तूंचं उत्पादन यांची कमाल पातळी गाठली जाते, तेव्हा भांडवलशाही नेहमीच जागेची निर्मिती करते. याला आजच्या तांत्रिक भाषेत 'स्पेशियल फिक्स' असं म्हणतात. १४२०मध्ये पोर्तुगिजांनी अटलांटिक महासागरातल्या मदिरा बेटांवर उसाची लागवड सुरू केली. हा साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा आणि मानवतेसाठी दुर्दैवी 'स्पेशियल फिक्स' होता. या बेटांवरचे विविध भाग वेगवेगळ्या सरदारांच्या हवाली करण्यात आले. आणि त्यातून आलेलं उत्पन्न काही हिस्सा राखून मायदेशी पाठवण्यात येऊ लागलं. साजेसं हवामान मिळाल्यामुळे उसाचं उत्पन्न वाढू लागलं. पण तरीही अशा हवामानात काम करणाऱ्या मनुष्यबळाची चणचण भासू लागली. १४४१ साली, अंताम गोन्साल्वेस नावाच्या तरुण आणि धडाडीच्या खलाश्यानं, पोर्तुगालच्या राजकुमार हेन्रीला खूश करायचं ठरवलं. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असताना त्यानं तिथल्या काही स्थानिक लोकांना पकडून नेलं आणि राजासमोर पेश केलं. पाठोपाठच, नुनो त्रिस्ताव नावाच्या खलाश्यानं आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून २३५ आफ्रिकन लोक पकडून आणले. अशा प्रकारे आफ्रिकेतून लोकांना पकडून आणून कोणताही मोबदला न देता काम करून घेता येऊ शकतं ही कल्पना जोर धरू लागली आणि 'साओ तोमे' या आफ्रिकन बेटावर पहिल्यांदा आफ्रिकन लोकांना गुलाम करून साखरउत्पादन सुरू झालं.
लगोलग पेर्नामबुको (Pernambuco) आणि साओ विन्सेंच्ये (Sao Vincente) यांसारख्या उष्ण कटिबंधातल्या बेटांवर आफ्रिकन गुलामांकरवी उसाची लागवड आणि साखरेचं उत्पादन सुरू झालं. पोर्तुगिजांचे हे पहिले काही प्रयोग यशस्वी झाल्यावर इतर वसाहतवादी देशांनीही निर्धोकपणे आफ्रिकेतून गुलाम आणून साखरेसाठी म्हणून वेगवेगळ्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केली.

१४९३मध्ये कोलंबस दुसऱ्यांदा अमेरिकेला पोहोचला. या वेळी त्यानं लागवडीसाठी म्हणून सोबत ऊस नेला होता. कोलंबसनं वसाहतवादी देशांना एक नवीन जग दाखवलं. इंग्रजीत याला 'न्यू वर्ल्ड' असंच नाव आहे. ब्राझील, कोलोम्बिया, पेरू, आणि क्युबा यांसारख्या कॅरिबियन समुद्रातील बेटांवर ऊस लागवडीसाठी पूरक असं हवामान होतं. यथावकाश वसाहतवादी गटांनी इथले विविध प्रांत बळकावले. या राज्यांची आपापसात बरीच लहानमोठी युद्धं होत असत. त्यामुळे ब्राझील कधी पोर्तुगिजांचा असायचा, तर कधी डच सत्तेखाली असायचा. सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत ही सत्तान्तरं होत राहिली. पण ढोबळमानाने बघायचं झालं, तर ब्राझीलची किनारपट्टी आणि मुख्य ब्राझील पोर्तुगिजांचा होता. जमेका, बार्बाडोस आणि वेस्ट इंडिजमधली इतर काही बेटं इंग्रजांची होती. लुईज़ीयाना, आईती (सँ दोमिंग), मार्तिनिक, ग्वाद्लूप यांवर फ्रेंच सत्ता होती. ब्राझील सोडल्यास बहुतांश दक्षिण अमेरिका आणि क्युबा स्पेनच्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. एकमेकांवर कुरघोड्या करून सत्ता जरी बदलत असली, तरी उसाच्या मळ्यांमध्ये अहोरात्र खपणारं मनुष्यबळ मात्र सगळीकडे सारखं होतं – आफ्रिकेतून आणलेल्या माणसांचं.
खडतर समुद्रप्रवास
आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याच्या काही भागाला 'स्लेव्ह कोस्ट' असं नाव पडलं आहे. उत्तरेकडच्या सेनेगालपासून सुरू होऊन दक्षिणेकडील अंगोला या देशांच्या मधल्या ३४०० मैल लांब किनारपट्टीवरून गुलामांचा व्यापार चालायचा. सतराव्या शतकापर्यंत गुलामांच्या खरेदी-विक्रीला संघटित व्यापाराचं स्वरूप आलं होतं. गुलामांच्या वाहतुकीसाठी मोठमोठी जहाजं बाळगणारे आणि गुलामांची बोली लावणारे दलाल तयार झाले. गोऱ्या (उसाची लागवड असलेल्या) मळेधारकांचे आफ्रिकन लोकांची निवड करण्याचे अनेक निकष होते. वय, लिंग, अंगकाठी, कधीकधी जमातही बघितली जायची. कोणत्या जमातीचे आफ्रिकन लोक चांगले गुलाम होऊ शकतात याचाही अभ्यास झाला होता. उदाहरणार्थ, कोरोमांटी जमातीतले लोक बंडखोर असतात, तर इबोस जमातीतले लोक गरीब असतात पण आत्महत्येला बळी पडणारेही असतात असं अनुभवी मालकांचं निरीक्षण होतं! या लोकांना पकडून आणणारे दलाल कुणालाही सोडत नसत, अगदी राजघराण्यातल्या बायकांचीही गुलामगिरीत रवानगी केली जायची.
पकडून आणलेल्या लोकांची सर्जनकडून नीट तपासणी व्हायची. शारीरिक व्यंग असलेल्या किंवा अशक्त असलेल्या ‘नशीबवान’ लोकांना सोडून देण्यात यायचं. मुळातच विवेक बाजूला ठेवून करायची एखादी कृती अंगवळणी पडल्यावर ती करत असताना हळूहळू तिथे विकृतीही उत्पन्न होते. गुलाम निवडण्याच्या पद्धती रूढ झाल्यावर समोर असलेल्या व्यक्तीचा आत्मसन्मान ठेचायच्या विविध प्रथा सुरू झाल्या. लोकांना विवस्त्र करून उड्या मारून दाखवायला लावणे, स्त्री आणि पुरुषांच्या गुप्तांगांची 'नीट' तपासणी करणे अशा पद्धती रूढ झाल्या. गुलामांच्या वाहतुकीसाठी बांधलेल्या जहाजाची रचनाच जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या हेतूनं केलेली असायची. प्रत्येक माणसाकरिता लांबीला पाच फूट, रुंदीला तेवीस इंच आणि उंचीला अकरा इंच इतकीच जागा असायची.

जहाजाचे चित्र येथून
या जागेत प्रवाशांना दाटीवाटीनं झोपावं लागायचं. पुरुषांना साखळदंडांनी बांधून घातलेलं असायचं. स्त्रियांना आणि लहान मुलांना वेगळं ठेवण्यात यायचं. प्रवासादरम्यान जहाजावरचे अधिकारी स्त्रियांवर सतत बलात्कार करत असत. इतक्या हालांत ठेवूनही दलालांना जहाजावरच्या प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा असायचा. कारण जहाजावर मरण पावलेले लोक म्हणजे आर्थिक तोटा! म्हणून दाटीवाटीनं कोंबलेल्या माणसांना दिवसातून एकदा मोकळ्या हवेत नेऊन व्यायाम करण्याची सक्ती केली जायची. काही जणांना असह्य होऊन ते अन्नपाणी सोडून द्यायचे. अशा लोकांना जबरदस्तीनं जेवायला घातलं जायचं. याव्यतिरिक्त, जहाजावरच्या प्रवाशांनी बंड पुकारू नये यासाठी त्यांना सतत बांधून घालायची व्यवस्था करावी लागायची. अनेकदा, बांधून न घातलेल्या स्त्रिया बंड घडवून आणायच्या कारवाया करायच्या पण असे उद्रेक ठेचण्याची क्षमता त्यांना घेऊन जाणारे बाळगून असायचे.
ईप्सित स्थळी पोचल्यावर गुलामांचे बाजार भरवले जायचे. एक मेणबत्ती जळून एक इंच कमी होईपर्यंत बोली घेण्याची प्रथा होती. आणि नंतर विकत घेतलेल्या गुलामांना त्यांचे मालक बरोबर घेऊन जायचे. अशी विक्री झाल्यावर अनेकदा कुटुंबांची ताटातूट व्हायची; आणि आपल्या प्रेमाची माणसं आता कदाचित पुन्हा कधीच भेटणार नाहीत या जाणिवेनं सगळा बाजार आक्रोशानं भरून जायचा. या दिव्यातून बाहेर येऊन नवीन घरी आल्यावर मालकाच्या नावाचा अगर निशाणीचा लोखंडी शिक्का तापवून, त्यांच्या गालावर किंवा खांद्यावर मालकीचा एक व्रण दिला जायचा. जेणेकरून जर कधी एखादा गुलाम पळून गेला तर त्याची मालकी सिद्ध करता यावी. त्यानंतर, त्यांचं मूळ नाव बदलून त्यांना एखादं 'सोपं' नाव दिलं जायचं.

प्रतिमा स्रोत : लूइजियाना डिजिटल लायब्ररी
मळे आणि कारखाने
आफ्रिकेतून 'नवीन जगा'त स्थलांतर झाल्यानंतर उसाच्या मळ्यांत आणि साखर कारखान्यांत गुलाम केलेल्या माणसांना रोज सरासरी अठरा तास काम करावं लागायचं. तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली, तरी आजही गळीत हंगाम चालू असताना एखाद्या साखरकारखान्यात दिवसभर थांबणं कष्टाचं काम असतं. जिथे सतत रस उकळत ठेवलेला असतो ती जागा अशी कितीशी सुसह्य होऊ शकेल? उष्णता, दमटपणा, सतत उडणारे चिपाडांचे कण, संपूर्ण आवारात भरून राहिलेला मळीचा वास यांमुळे आजही साखर-कारखान्यात काम करणं कष्टाचंच आहे. एखाद्या हमरस्त्यावरून जाताना तो परिचित मळीचा वास आला, की जवळपासच कुठेतरी साखर-कारखाना आहे हे लक्षात येतं.
सतराव्या शतकात वाफेवर चालणारे कारखाने आले नव्हते. त्यामुळे रस उकळण्यासाठी लाकूडफाटा किंवा थेट उसाची चिपाडं जाळली जात. उसाचा रस काढणे, तो एका पाठोपाठ एक लावलेल्या मोठमोठ्या बॉयलरांमध्ये उकळणे, चुना वापरून साखर तयार करणे, साखरेपासून वेगळ्या केलेल्या मळीतून पुन्हा साखर किंवा रम तयार करणे - ही सगळी कामं गुलाम करायचे. आजच्या काळात ऊस एकदा गाळपयंत्रात (क्रशरमध्ये) घातल्यावर त्याची साखर होईपर्यंत तिथे प्रत्यक्ष मानवी सहभाग फार कमी लागतो. पण त्या काळी यातली बरीच कामं माणसं थेट, जीव धोक्यात घालून करत असत.

ऊसगाळप (crushing) चालू असताना, अनेकदा काम करणाऱ्या लोकांचे हात गाळपयंत्रात अडकायचे. ते वेळीच सोडवले नाहीत तर व्यक्ती त्या यंत्रात पूर्णपणे खेचली जायची. त्यामुळे एखाद्याचा हात यंत्रात अडकला तर तो कापून टाकण्याशिवाय इलाज नसायचा. अतिश्रमाने, भुकेमुळे ग्लानी येऊन अनेक मजुरांचे हात असे यंत्रांत अडकायचे आणि कापून टाकले जायचे. वोल्तेअरच्या (Voltaire) काँदिदमध्ये (Candide) एक अतिशय बोलकं चित्रं आहे. त्यात एक हात आणि पाय नसलेला कृष्णवर्णीय माणूस समोरच्या सधन दिसणाऱ्या व्यक्तींना उद्देशून म्हणत आहे, "युरोपमध्ये साखर खाता येण्याची ही किंमत आहे."
(गुलाम) स्त्रीच्या बाळंतपणामुळे तिची उत्पादनक्षमता कमी होणं 'परवडत' नसल्यामुळं, गरोदर स्त्रियांना शेवटच्या क्षणापर्यंत कामाला जुंपलं जायचं आणि मूल झाल्यानंतर दोन आठवड्यांत त्या बाळाला झोळीत घालून पुन्हा कामावर रुजू व्हायच्या. ठरावीक काळानंतर बाळाला स्तनपान देण्याची परवानगी स्त्रियांना नसायची, त्यामुळे वृद्ध बायकांकडे मुलं सोपवून त्यांना पीठ आणि पाण्याचं पातळ मिश्रण करून भरवलं जायचं.
ऊसमळ्यांवरची समाजव्यवस्था
मालकाचा किंवा इस्टेटीची देखरेख करणाऱ्या गोऱ्या माणसाचा एक भला मोठा बंगला असायचा. त्याला 'ग्रेट हाऊस' किंवा अशाच प्रकारचं काही नाव असायचं. या बंगल्यात काम करायलाही अनेक गुलाम असायचे. घरात काम करण्यासाठी कृष्णवर्णीय निवडताना, त्यातल्या त्यात गहूवर्णीय, दिसायला सुंदर अशा स्त्रिया निवडल्या जायच्या. बागकाम आणि घरातली इतर कष्टाची कामं करायला पुरुष निवडले जायचे. मळ्यांत आणि कारखान्यांत काम करण्यापेक्षा घरातली कामं सोपी असली तरी सतत गोऱ्या लोकांबरोबर वावर असल्यानं इथलं जगणं जास्त तणावपूर्ण असायचं. क्षुल्लक गोष्टीवरून मालकाचा मार खायची वेळ यायची आणि स्त्रियांवर सतत गोरे पुरुष लैंगिक अत्याचार करायचे. घरातल्या पुरुषाला आवडणाऱ्या गुलाम स्त्रीला सतत त्याच्या बायकोबरोबर राहायला लागल्यामुळे वेगळ्याच प्रकारचा ताण अनुभवावा लागायचा. घरातल्या कृष्णवर्णीय स्त्रियांवर अत्याचार केल्यामुळे किंवा संमतीने प्रेमसंबंध ठेवल्यामुळे मुलं जन्माला यायची. अशी मिश्र वंशांची मुलं जन्माला येण्याचं प्रमाण बरंच होतं; इतकं की गोऱ्या लोकांनी त्यासाठी एक वर्णव्यवस्थाच सुरू केली होती. गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा दोन व्यक्तींच्या (यामध्ये गौरवर्णीय पुरुषच असायचा) अपत्याला 'म्युलाटो' म्हणायचे. म्यूल म्हणजे खेचर - घोडा आणि गाढव यांचं अपत्य! म्युलाटो आणि कृष्णवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला 'सांबो' असं नाव ठेवलं होतं. सांबो आणि कृष्णवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला पुन्हा कृष्णवर्णीयाचा दर्जा मिळायचा. उलट दिशेला - म्युलाटो आणि गौरवर्णियाच्या अपत्याला 'क्वाड्रून' (quadroon) म्हणायचे. क्वाड्रून आणि गौरवर्णियाचं अपत्य 'मस्टी'. मस्टी आणि गौरवर्णीयाचं अपत्य 'मस्टीफिनो'. मस्टीफिनो पुन्हा 'शुद्ध' झाला तर 'क्विनट्रून' (quintroon). क्विनट्रून आणि गौरवर्णीय एकत्र आले तर त्यांच्या अपत्याला 'ऑक्टोरून' म्हणायचे. या शेवटच्या दोन वर्णांना गौरवर्णीयांचा दर्जा दिला जायचा कारण त्यांच्या दिसण्यातून तो स्पष्ट होत असे.
गुलामांची वस्ती मुख्य बंगल्यापासून दूर, जेणेकरून त्यांच्या आवाजांचा आणि वासांचा त्रास होणार नाही अशी असायची. मळेधारक गुलामांच्या अन्नपाण्याची जबाबदारी सहसा घ्यायचे नाहीत. पुरवठा केलाच तर तो अत्यल्प आणि पुरेसा पोषक नसायचा. पण गुलामांना त्यांचं अन्न उगवता/पाळता यावं यासाठी जमिनीचे तुकडे दिले जायचे. हे तुकडे, एका अर्थानं स्वातंत्र्याचे तुकडे होते असं म्हणता येईल. तिथे स्त्रिया त्यांच्या खाद्यसंस्कृतीत वापरली जाणारे कंदं, भाज्या, बिया लावायच्या. ते विकून त्यांना थोडे पैसेही मिळवता यायचे. या शेतीमुळं एक वेगळीच खाद्यसंस्कृती जन्माला आली. लुईज़ीयानातल्या, न्यू ऑर्लीन्सच्या प्रसिद्ध 'गंबो' सूपामागे क्रिओल खाद्यसंस्कृतीचा हा मोठा इतिहास आहे. पश्चिम आफ्रिकेतल्या बांटू भाषेत भेंडीला 'कि गंबो' (ki ngombo) म्हणतात. गंबोमध्ये दाटपणा यावा यासाठी भेंडीचा रस वापरला जातो. म्हणून त्याचं मूळ आफ्रिकेत आहे असं काही जण मानतात. पण असाच दाटपणा यावा यासाठी, फ्रेंच 'रू' (roux) ही गरम तेलात पीठ शिजवून सूपामध्ये घालण्याची पद्धतही वापरतात. त्यामुळे काही लोकांना याचं मूळ फ्रेंच संस्कृतीत आहेत असं वाटतं. तसंच, १७५५मध्ये आताच्या नोव्हा स्कॉशियामधून (Nova Scotia) ब्रिटिशांनी फ्रेंच लोकांना हुसकावून लावलं. त्यांनी मग न्यू ऑर्लीन्समध्ये स्थलांतर केलं. त्या लोकांना 'केजन' (cajun) असं नाव पडलं. गंबोनिर्मितीत केजन मसाल्यांचाही समावेश आहे असंही मत आहे. शिवाय, ससाफ्रास या झाडाची पानंही (फिले पावडर) या पाककृतीत वापरली जातात त्यामुळे अमेरिकेतल्या मूळ इंडियन संस्कृतीचाही प्रभाव या पदार्थावर आहे असं मानलं जातं. या पदार्थावर हक्क सांगणारे, किंवा त्या पदार्थाचं मूळ निर्विवाद आफ्रिकन संस्कृतीत आहे असं न मानणाऱ्या लोकांमुळे, गंबो सूप एक राजकीय मुद्दा झाला आहे. असं असलं तरीही, न्यू ऑर्लीन्सच्या इतिहासात झालेल्या अनेक स्थित्यंतराची साक्ष गंबो देतं.
जुन्या जगातून (म्हणजे युरोप, आफ्रिकेतून) नव्या जगात आलेल्या गुलामांच्या पुढच्या पिढ्यांना 'क्रिओल' संबोधलं जाऊ लागलं. हा शब्द फक्त गुलामांसाठी नसून नव्या जगात जन्माला आलेल्या कोणाही आफ्रिकन किंवा युरोपियन वंशाच्या व्यक्तीसाठी वापरला जायचा. काही पिढ्या नव्या जगात स्थिरावल्यावर, क्रिओल विरुद्ध आफ्रिकन असेही गट गुलामगिरीत असलेल्या लोकांमध्ये तयार झाले. आणि त्यांच्यातही एक उतरंड तयार होऊ लागली.
सतत एकसारखं, तरीही लक्ष देऊन करावं लागणारं कंटाळवाणं, दमवणारं काम करत असताना आफ्रिकन लोक आपल्या संस्कृतीतल्या संगीताचा आधार घ्यायचे. दिवसभराच्या कामाचा थकवा व्यक्त करणारी, आणि गुलामगिरीतून मुक्ती देण्यासाठी देवाकडे साकडं घालणारी अनेक गाणी, उसाची लावणी, तोडणी करताना गायली जायची. आफ्रिकेतून आलेल्या संगीताकडून प्रेरणा घेऊन अमेरिकेतलं जॅझ, ब्लूज, आणि आर 'एन' बी पद्धतीचं संगीत जन्माला आलं. कृष्णवर्णीय लोक, त्यांच्या चर्चमध्ये गाऊ लागले. या गाण्यांमध्ये भाषा जरी इंग्रजी असली, तरी संगीत आफ्रिकेतल्या विविध संस्कृतींतून आलेलं असायचं. याला 'निग्रो स्पिरिच्युअल' (त्या काळी रूढ असलेला शब्द) असं नाव पडलं. पुढे याच संगीतातून, अमेरिकेत गुलाम केलेल्या लोकांची स्वातंत्र्यगीतं तयार झाली.
गुलाम केलेल्या आफ्रिकन लोकांमध्ये धार्मिक लग्नव्यवस्था रुजवण्याला मळेधारकांचा विरोध असायचा. यामागे अनेक कारणं होती. धर्माच्या आधारानं कोणत्याही प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळू नये हा एक हेतू. तसंच, कृष्णवर्णीय बायकांवरची सत्ता गमावण्याची असुरक्षितता. लग्नामुळे हमखास येणाऱ्या संततीचा भारही मालकांना नको होता. मालकांना प्रेमसंबंधांचं वावडं नसलं, तरी कोण कोणाच्या प्रेमात आहे याच्या मागावर ते असत आणि अशा संबंधाबद्दल त्यांना आपणहून माहिती देण्याची सक्तीही गुलामांवर असे. सुरुवातीला, आफ्रिकेतून गुलाम आणले जात तेव्हा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण कमी असायचं. पण हे प्रमाण वाढल्यावरही, मुळातच असुरक्षिततेचं आयुष्य जगत असल्यानं गुलामांना लग्नव्यवस्थेचं फार काही आकर्षण नव्हतं.
आयतीचा 'स्वातंत्र्यलढा'

चित्रश्रेय: द न्यू यॉर्क टाइम्स
१४९२मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस आयतीत (Haiti) पोहोचला. कॅरिबियन समुद्रात क्युबा आणि प्वेरतो रिको या दोन बेटांच्या मध्ये वसलेलं हे बेट आहे. त्यानं त्या बेटाचं नाव इस्पान्योला, म्हणजेच 'छोटं स्पेन' असं ठेवलं. १४९६मध्ये सान्तो दॉमिंगोमध्ये (आजच्या डॉमिनिकन रिपब्लिकची राजधानी) स्पेनची वसाहत स्थापन झाली. पुढे १६९७मध्ये, बऱ्याच लहानमोठ्या लढाया झाल्यावर, स्पेननं त्या बेटाचा पश्चिमेकडचा भाग फ्रेंचांना देऊन टाकला आणि तो सँ दोमांग (Saint Domingue) झाला. १७९१मध्ये तेव्हाच्या सँ दोमांग आणि आताच्या आयतीमध्ये एक अभूतपूर्व बंड झालं. आयती आज पश्चिम गोलार्धातला सगळ्यांत गरीब देश आहे. तसा तो पूर्वी नव्हता. सतराव्या शतकात, आयती फ्रान्सची साखर-वसाहत होती. काप-फ्रॉन्से या आयतीच्या राजधानीत एके काळी इतकी सुबत्ता होती, की तिला 'अँटीलीजचं (Antilles) पॅरिस' म्हणलं जायचं. आयतीमधून युरोपात प्रचंड साखर निर्यात होऊ लागली. त्यामुळे आफ्रिकेतून अटलांटिकमार्गे येणाऱ्या गुलामांपैकी जवळपास ३७% आयतीमध्ये आणले जाऊ लागले. त्यांची संख्या इतकी प्रचंड झाली, की आयातीच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ९०% लोक आफ्रिकेतून आणलेले कृष्णवर्णीय झाले. हा जमाव आपल्यावर भारी पडू शकतो याची सुप्त जाणीव असल्यानं आयतीमधले स्थानिक फ्रेंच राज्यकर्ते गुलामांचा अनन्वित छळ करायचे. त्यांना देण्यात येणाऱ्या अनेक शिक्षांपैकी एक शिक्षा म्हणजे त्यांच्या गुदद्वारात दारूगोळा भरून त्यांना तोफगोळ्यासारखं उडवून टाकायचं. या अशा विकृतींच्या चर्चा फ्रान्सपर्यंत पोहोचल्यावर, त्या थांबवण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडूनही होऊ लागले इतक्या भयानक कृती तिथे होत होत्या.
याचा परिणाम, आणि आपल्या संख्याबळाचा अंदाज या दोन गोष्टींमुळे, आयतीमधल्या गुलामांनी १७९१मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारलं आणि पुढच्या दहा एक वर्षांत ते स्वातंत्र्य मिळवण्यात यशस्वीही झाले. तूसँ लूवेर्त्यूर (Toussaint L’Ouverture) या क्रांतिकारी नेत्यानं त्यांना एकत्र आणलं. फ्रान्सनं लूवेर्त्यूरला तुरुंगात टाकलं जिथे स्वातंत्र्य मिळायच्या एक वर्ष आधी त्याचा मृत्यू झाला. गुलामगिरीत असलेल्या लोकांनी वसाहतवादी राष्ट्रांच्या सत्तेला उलथवून लावून स्वतःचा देश स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. याचा योग्य तो धसका इतर वसाहतवादी सत्तांनी घेतला. आयतीच्या स्वातंत्र्यलढ्याकडे इतर देशांनी जाहीर दुर्लक्ष केलं, पण असं काही आपल्याकडे होऊ नये यासाठी हे देश अधिकाधिक काळजी घेऊ लागले.
फ्रान्सला हा पराभव सहन झाला नाही. स्वतंत्र आयतीवर सतत फ्रेंच आक्रमणाची टांगती तलवार असायची. असं आक्रमण होऊ नये यासाठी फ्रेंच राज्यकर्त्यांबरोबर वाटाघाटी झाल्या आणि त्यातून आयतीनं स्वातंत्र्य मिळवून ज्या मळेधारकांचं आर्थिक नुकसान केलं, त्यांना भरपाई द्यावी असा 'तोडगा' निघाला! आयतीसारख्या नव्या देशाला हे निर्बंध फारच महागात पडले. लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. फ्रेंच राजानं मग त्यांना फ्रेंच बँकांकडून कर्ज घ्यायला भाग पाडलं. एक कर्ज फेडायला इतर अनेक कर्जं घेऊन आयती अधिकाधिक गरीब होत गेला. फ्रेंच बँकांना मात्र यातून धो-धो पैसा मिळाला. तसंच, ज्या सरदारी कुटुंबांना ही नुकसानभरपाई मिळत होती त्यांच्याकडून कर वसूल केल्यानं फ्रेंच राज्यकर्त्यांचाही अप्रत्यक्ष फायदा झाला. आयतीनं फ्रान्सला किती पैसे दिले याचा नेमका हिशोब सापडणं आजही कठीण आहे. पण न्यू यॉर्क टाइम्सनं २०२२ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून तो आकडा आजच्या काळचे साधारण रोख ५६ कोटी डॉलर इतका होतो. एवढे पैसे जर आयतीनं त्यांच्या देशातल्या वीज, रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अशा मूलभूत सुविधांमध्ये गुंतवले असते, तर त्या गुंतवणुकीची एकूण किंमत आज २१०० कोटी डॉलर एवढी झाली असती.
अर्थात, या आर्थिक अधोगतीमागे निर्बंध हे एकच कारण नव्हतं. सरकारी भ्रष्टाचार हेही एक कारण होतंच. पण अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्यावरही हा देश आर्थिक गुलामगिरीत खितपत पडला. या निर्बंधांकडे आणि त्यामुळे आयतीच्या जनतेला आलेल्या गरिबीकडे जगानं सोयीस्करपणे दुर्लक्षच करायचं ठरवलं.
तंत्रज्ञानाची झेप आणि गुलामगिरीचा अंत
१७९४मध्ये वाफेवर चालणाऱ्या गाळपयंत्राचा शोध लागला आणि १७९७ साली, स्पेनच्या क्युबा वसाहतीत पहिलं वाफेवरचं गाळपयंत्र वापरलं जाऊ लागलं. ही यंत्रं अधिकाधिक कार्यक्षम करण्याचे प्रयोग जगभरातच सुरू झाले कारण ऊसगाळप ही साखर निर्मितीतली अत्यंत वेळखाऊ आणि जोखमीची प्रक्रिया होती. १८२० उजाडता, वाफेवरची जवळपास दोनशे गाळपयंत्रं अटलांटिक ओलांडून वसाहतींमध्ये आली होती. एव्हाना, आयतीच्या स्वातंत्र्यामुळे साखरनिर्मितीत पडलेला खड्डा क्युबामध्ये तयार होणाऱ्या साखरेनं भरून काढला होता. तसंच, अमेरिकेतल्या फ्रेंच लुईजियानामध्येही ही यंत्रं येऊ लागली.
याच दरम्यान, उसाव्यतिरिक्त कोणकोणत्या फळांतून, कंदांतून साखर तयार करता येऊ शकते यावर जगभरात संशोधन सुरू झालं. या ध्यासामागे अनेक कारणं होती. पण त्यांतलं मुख्य कारण म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, आणि पोर्तुगाल यांसारख्या देशांची उसापासून तयार झालेल्या साखरेच्या व्यापारावर असलेली घट्ट पकड हेच होतं. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या आपापसातल्या स्पर्धेत एकमेकांना साखर मिळू नये यासाठी विविध क्लृप्त्या काढल्या जायच्या. या संघर्षातूनच युरोपात बिटापासून साखर तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं. ही साखरेसाठीची बिटं म्हणजे आपण खातो ती लाल बिटं नव्हेत. भरपूर सुक्रोज असलेली पांढरी 'शुगर बीट' असतात. ही साखर उसापासून तयार केलेल्या साखरेपेक्षा महाग पडायची, अजूनही महागच पडते; पण युरोपात अनुदान देऊन ती स्वस्त ठेवली जायची/जाते.
बिटापासून साखर तयार करायचं तंत्रज्ञान विकसित होत असताना, जगाला 'व्हॅक्युम पॅन' मिळालं. या शोधामुळे उसाचा रस शंभर अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाला उकळवता येऊ लागला. एडवर्ड चार्ल्स हावर्ड या ब्रिटिश केमिकल इंजिनियरनं हा शोध लावला आणि युरोपातून इतर वसाहतींमध्ये लवकरच व्हॅक्युम पॅन पोहोचलं. यामुळे, साखर तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली आणि जलदही.
व्हॅक्युम पॅनसारखं तंत्रज्ञान जरी उपयुक्त असलं, तरी सगळ्याच उद्योजकांना अशी तंत्रज्ञानं वापरायचा उत्साह नसायचा. विज्ञानाची, बदलाची भीती आणि अंगी मुरलेली सरंजामी वृत्ती या कारणांनी त्यांना गुलामगिरीच अधिक सोयीची वाटायची. पण १८३९ साली आलेलं एक यंत्र मात्र सगळ्यांनाच लवकरात लवकर हवं होतं. साखरेतून मळी वेगळी करण्यासाठी ती आपणहून गळून जाऊ देण्याव्यतिरिक्त काहीच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. १८३९ साली कापड वाळवण्यासाठी म्हणून तयार झालेलं सेंट्रीफ्यूज यंत्र साखर उद्योगात साखरेपासून मळी वेगळी करण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. वाफेवर चालणारी गाळपयंत्रं, व्हॅक्युम पॅन, आणि सेंट्रिफ्यूज या तीनही शोधांनी साखरनिर्मितीचे विविध टप्पे सोपे केले.
याच दरम्यान युरोपात 'एन्लाइटनमेन्ट' चळवळ उदयाला आली. गुलामगिरी बंद व्हायला हवी यासाठी अनेक युरोपियन विचारवंत प्रचार करू लागले. सामान्य नागरिकांनादेखील आफ्रिकन लोकांचे हाल करून निर्मिलेली साखर नकोशी होऊ लागली. इंग्लंडात सर्वांत आधी ही गुलामगिरीविरोधी चळवळ चालू झाली. १८०७ साली ब्रिटननं गुलामगिरीविरोधात कायदा आणून ती बंद करायचा निर्णय घेतला. असं असलं, तरी त्यापुढे अनेक वर्षं ब्रिटनमध्ये गुलामांकरवी तयार केलेली साखर क्युबासारख्या देशांतून येत होती. दुसरीकडे, साखरनिर्मितीचं तंत्रज्ञान अधिक सुरक्षित आणि जलद झाल्यानं उत्पादकांचं मनुष्यबळावरचं अवलंबित्व कमी होऊ लागलं. हे आधुनिक तंत्रज्ञान समजणारे लोकही उच्चशिक्षित गौरवर्णीय होते. हळूहळू जिथे आफ्रिकन गुलाम दिवसभर कष्टाचं काम करायचे, तिथे गोरे अभियंते 'प्रक्रियेची देखरेख' करायला नेमले जाऊ लागले. सगळ्या वसाहतींमध्ये हळूहळू युरोपातून असे अभियंते आणि तंत्रज्ञ येऊ लागले. १८५०-६०च्या आसपास लुईजियानामध्ये अशा तंत्रज्ञांचा पगार महिन्याला १५० डॉलर इतका असायचा (आताचे वार्षिक $७२०००). पिढ्यानुपिढ्या शिक्षणापासूनच नव्हे, तर दोन वेळच्या चौरस आहारापासूनही जे वंचित राहिले होते, त्या आफ्रिकन वंशाच्या लोकांना अशा प्रकारचं तंत्रज्ञान समजून घेऊन त्यातून रोजगार मिळायची संधी दुरापास्तच होती. इतकी वर्षं तंत्रज्ञान मागास आणि जीवावरही बेतणारं असताना ज्यांना सक्तीनं, मोबदल्याविना कारखान्यांत कामाला जुंपलं जायचं, त्यांची जागा तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर भरपूर पगार घेणारे गौरवर्णीय घेऊ लागले.
आयतीचा स्वातंत्र्यलढा त्या देशाला महागात पडला असला, तरी ती घटना दोन्ही बाजूंसाठी एक 'मिसाल' ठरली. अठराव्या शतकात अनेक वसाहतींतून लहानमोठी बंड होऊ लागली. आणि वसाहतवादी शक्तीही गुलामगिरीत असलेल्या लोकांपुढे नमतं घेऊ लागल्या. प्रत्येक वसाहतीचा 'ब्लॅक कोड' असायचा. कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा असावी हे त्यात लिहिलेलं असायचं. कृष्णवर्णीयांच्या सगळ्याच लहानमोठ्या 'गुन्ह्यांसाठी' अतिशय कडक शिक्षा असत. आयतीच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर अनेक वसाहतींतून या शिक्षा सौम्य करण्यात आल्या. आफ्रिकेतून मनुष्यबळ आणण्यावर आता लवकरच बंदी येईल या भीतीनं गुलामगिरीत असलेल्या बायकांना मुलं जन्माला घातल्याबद्दल बक्षिसं मिळू लागली. तसंच गरोदरपणी त्यांना बरा आहार आणि थोडी विश्रांती देण्यात येऊ लागली!
गुलामगिरीचा अंत अचानक झाला नाही. ब्रिटनमध्ये कायदा केला असला, तरी ती वसाहतींतून नष्ट करण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. गुलामगिरीत असलेल्या लोकांकडून साखर तयार करून घेण्यापेक्षा भारतात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करावं अशी एक चळवळ सुरू झाली. भारतातल्या अनेक धनिकांनी आणि संस्थानिकांनी यात पुढाकार घेतला खरा, पण भारतात शेतीशी निगडित समाजव्यवस्था इंग्रज मोडू शकले नाहीत. शेतकरी साखर-कारखान्यांसाठी म्हणून सतत ऊस लावायला तयार होत नसत आणि भारतात खांडसरी उद्योग अनेक शतकं रुजला होता. ती व्यवस्थाही या नवीन कारखान्यांना भीक घालेना. मग ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मॉरिशसकडे मोर्चा वळवला. काहीही असलं तरी जमैका, बार्बाडोसमध्ये ज्या प्रमाणात साखर तयार होत होती तिथवर पोहोचायची क्षमता या नवीन प्रयोगांतून गाठता येईना. मग, ब्राझील आणि क्युबासारख्या अजूनही गुलामगिरीत असलेल्या इतर राष्ट्रांच्या वसाहतींतून ब्रिटनमध्ये साखर येऊ लागली. यासाठी त्या साखरेवर असलेला आयात कर कमी करण्यात आला. अशा प्रकारची साखर ब्रिटनमध्ये येऊ लागल्यावर पुन्हा नागरिकांच्या चळवळींतून त्याला विरोध होऊ लागला. १८३३मध्ये ब्रिटननं 'इमॅन्सिपेशन' कायदा लागू केला. या कायद्यान्वये, वेस्ट इंडीजमध्ये गुलामगिरीत असलेल्या लोकांना मुक्त करून काही वर्षं आहे त्याच मालकाकडे 'अप्रेन्टिस' म्हणून काम करावं असा प्रस्ताव होता. यामागे त्यांना मुक्तपणे कसं जगायचं हे शिकता येईल हा हेतू होता. गुलामगिरीचा अंत एका घावात व्हावा की हळूहळू, याबद्दलही दोन मतप्रवाह होते. इमॅन्सिपेशन कायदा गुलामगिरीत असलेले लोक हळूहळू मुख्य प्रवाहात येऊ शकतील या दृष्टीकोनातून केला होता. तसंच,मळेवाल्यांमध्ये जी घबराट पसरली होती त्यावरही हा मध्यमार्ग होता. ब्रिटिश वसाहतींमधली गुलामगिरी अशी हळूहळू संपली. उत्तर अमेरिकेत गुलामगिरी हवी असणारे आणि तिला विरोध करणारे असे दोन गट पडून यादवी युद्ध झालं. १८६५ साली हे युद्ध संपल्यावर अमेरिकेतली गुलामगिरीदेखील संपली. युरोपातला गुलामगिरीविरोधी सूर ओळखून भांडवलशाहीनं तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मग 'नैतिक साखर' तयार करायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भांडवलशाहीला 'उपरती' झाली आणि ग्राहकांची 'स्वच्छ' साखरेची मागणी नफेखोरीला विशेष धक्का न लागता पूर्ण होऊ लागली. थोडक्यात, गुलामगिरीत असलेल्या लोकांच्या संख्याबळाची आणि उठावाची धास्ती, मायदेशातल्या नागरी चळवळी, आणि साखर उत्पादन सोपं करणारं तंत्रज्ञान या तीन कारणांमुळे हळूहळू गुलामगिरीचा अंत झाला. पण जी व्यवस्था केवळ आर्थिक फायद्यासाठी उभी केली होती, ती राबवत असताना वर्णभेदाची दुर्दैवी परंपरा रुजली. गुलामगिरीच्या बाजूनं युक्तिवाद केले जायचे तेव्हा अनेक वैद्यकीय शोधनिबंध लिहिले गेले, ज्यांमध्ये आफ्रिकन लोकांच्या कातडीची जाडी, त्यांच्या मेंदूचा आकार, त्यांच्या स्वभावाचं 'मानसशास्त्रीय' विश्लेषण करून ते गुलामगिरीसाठीच योग्य आहेत असे निष्कर्ष काढले गेले. हे असे छद्मविज्ञानामुळे रुजलेले समज, विज्ञानाच्या पातळीवर जरी खोडून काढले गेले असले, तरी ते वर्णद्वेषाला पूरक ठरले आणि परंपरेसारखेच चालत राहिले ही खेदाची बाब आहे.
गुलामगिरीचा अंत होण्यासाठी अनेक विवेकी लोक लढले. गुलामगिरीला विरोध करणारे लोक दोन्ही बाजूंना होते. एका बाजूसाठी तो त्यांच्या अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा प्रश्न होता, तर दुसऱ्या बाजूसाठी तो एक महत्त्वाचा नैतिक प्रश्न होता. सत्तेला असे नैतिक प्रश्न विचारणारे नेते दोन्ही समूहांत तयार झाले. पण गुलामगिरी संपली म्हणून एखाद्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला सहज जमीन घेता येऊ लागली का? तर नाही. गुलामगिरीत राहिलेल्या निरक्षर लोकांना नवीन तंत्रज्ञान चालवणाऱ्या अभियंत्यांचे पगार मिळू लागले का? नाही. आफ्रिकन वंशाच्या लोकांप्रति असलेला द्वेष, वर्णभेद संपुष्टात आला का? नाही.
याकडे अजून थोड्या विस्तृत परिप्रेक्ष्यातून बघितलं तर जाणवतं, की एका वर्णाचे मूठभर लोक दुसऱ्या वर्णाच्या असंख्य लोकांवर अशी सत्ता गाजवू शकायचे कारण त्यांच्याकडे भांडवल असायचं. आणि ते वाढवण्यासाठी, कोणत्याही प्रकारे शोषितांवर सत्ता गाजवण्याचा निर्धार असायचा. शोषण करणारे आणि शोषित असे दोन गट असणाऱ्या कोणत्याही समाजव्यवस्थेचं उदाहरण घेतलं तर असं लक्षात येतं, की समाजात असे भेदभाव निर्माण करण्यामागे बहुतेक वेळा सत्ताधीशांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असायचे. सुरुवातीला, राजे, त्यांना भांडवल/कर्ज पुरवणारे सावकार, आणि शूर खलाशी असे गट होते. कालांतरानं त्यांचं सरकारं-बँका-उद्योजक अशा गटांत रूपांतर झालं. हा नवीन त्रिकोण आपल्याला चांगलाच परिचित आहे. साखर सगळ्याच अर्थानं उपयुक्त अशी वस्तू आहे. साखरेची निर्मिती आणि व्यापार प्रस्थापित होण्याआधी, अन्नातल्या गोडीचं सगळ्याच संस्कृतींना अप्रूप होतं. ती मिळवणं सहजसाध्य असण्याचा ध्यास होता. आणि क्रयशक्ती असणाऱ्या लोकांना साखर मिळवून देण्यात उत्पादकांचा आर्थिक फायदा होता. तो पूर्ण करण्यासाठी आर्थिक उलाढाल झाली, मानवी श्रमांचं वस्तूकरण झालं आणि साखरेवर सत्ता, एकाधिकार राखण्यासाठी माणसानं टोकाची धडपड केली. अशीच कॉफीची, किंवा कोकेनचीही कथा लिहिता येईल. साखर, कॉफी किंवा कोकेन ही साधनं होती. ही साधनं नेहमीच अशा 'जड रूपांमध्ये' असतील असं नाही. एखाद्या बंद खोलीत बसून संगणकात टंकलेला 'कोड'ही आज साधन होऊ शकतो. तसंच गुलामगिरीही भौतिक, शारीरिक पातळीच्या पलीकडे गेली आहे. धर्म, वंश, पैसा - अशा प्रकारच्या मानवनिर्मित संकल्पनादेखील शोषक-शोषित परंपरा टिकवून ठेवण्यास पुरेशा ठरतात हे आपल्या आजूबाजूच्या घडामोडींकडे बघून लक्षात येत राहतं. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देणारी लवचीक भांडवलशाही आपल्याला नवनवी रूपं दाखवत असते. नवनवीन प्रारूपं आली, तरीही ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती साठते आहे आणि ज्यांच्याकडे काहीच नाही - असे दोन गट नेहमीच ओळखता येतात. ही व्यवस्था बदलेल असा आशावाद बाळगणं भाबडेपणाचं आहे, पण तिथे किमान न्याय असावा, पर्यावरणाचा, मानवाच्या सर्वांगीण हिताचा विचार आणि पारदर्शकता असावी यासाठी आजही लढा सुरुच आहे.
संदर्भ :
१. Sugar: A Bittersweet History - Elizabeth Abbot
Publisher: Duckworth Overlook, London, 2009
पृष्ठसंख्या : 453
२. The World of Sugar: Ulbe Bosma
Publisher: Harvard University Press, 2023
पृष्ठसंख्या : 464
३. The New York Times 1619 Project
लेखात दिल्याप्रमाणे भारतात प्लॅन्टेशन वाईट साखर तयार होते. ही एकाच प्रक्रियेतून तयार होते. पुन्हा रिफाईन होत नाही. त्यामुळे ती पांढरी करायला ब्लीचिंग एजंट म्हणून सल्फर डायॉक्साईड वापरला जातो. सुरुवातीला उसाच्या रसात आणि नंतर त्याचं सिरप झाल्यावर SO2 वापरला जातो. त्याचप्रमाणे pH योग्य ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
ब्लीचिंग एजंट म्हणून SO2चा वापर नक्की कधीपासून (नि का) सुरू झाला असावा? बोले तो, पूर्वी, एका जमान्यात, या कामाकरिता (जनावरांच्या हाडांपासून बनविलेला) प्राणिज कोळसा (animal charcoal किंवा bone charcoal), (नेमका bleaching agent म्हणून नव्हे, तरी adsorption agent म्हणून) वापरला जात नसे काय? (‘आम्हां भटां’मध्ये अनेकदा अशा साखरेला नाक मुरडण्याची (परंतु तरीही खाण्याची – दुसरा पर्याय नसावा बहुधा!) प्रथा जरी असली, नि अशा साखरेच्या सेवनार्हतेबद्दल शंका जरी उपस्थित केली जात असली, तरीही?)
अंग्रेजांच्या जमान्यात मला वाटते आपल्या महाराष्ट्रात सामान्यतः मिळणारी साखर ही बहुधा मॉरिशसहून आयात केलेली असे. तिला आपल्याकडे ‘मोरस साखर’ म्हणून संबोधीत. माझ्या कल्पनेप्रमाणे, तिच्या उत्पादनात या कामाकरिता अशा प्रकारे हाडांचा कोळसा वापरण्यात येई. (किमानपक्षी, तशी किंवदन्ता तरी होती.) माझ्या आठवणीप्रमाणे, ‘मोर, ससा, आणि खर म्हणजे गाढव, यांच्या हाडांचा चुरा म्हणजे मोरस साखर’ अशी कोटी चिं. वि. जोशींनी एके ठिकाणी केलेली आहे. (कदाचित चिं. विं. ची ओरिजनल कोटी नसेलसुद्धा; केवळ त्या काळात पुण्यातील काही वर्तुळांत प्रचलित असलेल्या कोटीचा चिं. विं. नी पुनरुच्चार केला असेल, कोणास ठाऊक! निदान माझ्या वाचनात तरी ही कोटी चिं. विं. च्या लेखनातून आली. तर ते एक असो.)
तर कुतूहल असे, की ही पद्धत बाजूस सरून त्याऐवजी गंधक-द्वि-प्राणिल हा विरंजक अडत्या म्हणून वापरला जाण्याची प्रथा ही नक्की कोठे, कधी, आणि का अंमलात आली असावी? (अधिक विकीशोध घेतला असता, प्राणिज कोळश्याकरिता वापरात येणारी हाडे ही अनेकदा गायीची आणि/किंवा डुकराची असल्याचे कळते. म्हणजे, १८५७/मेरठच्या पुनरावृत्तीची भीती तर या बदलामागे नसेल? अन्यथा, ‘आम्हां भटां’च्या नाके मुरडण्याला भीक घातली जाऊन बदल होण्याइतकी क्रयशक्ती समाजाच्या केवळ साडेतीन टक्के असलेल्या (नि त्यातही बहुतांशी कनिष्ठमध्यम ते फार फार तर मध्यम वर्गात मोडणाऱ्या) समाजघटकात खाशी नसावी!)
——————————
लेखात ‘भुरी साखर’ असा शब्दप्रयोग वापरलेला आढळला. तो brown sugar अशा अर्थी असावा काय? या शब्दप्रयोगाचे नक्की प्रयोजन काय? (विरोध म्हणून नव्हे, तर कुतूहल म्हणून विचारीत आहे.) म्हणजे, शक्य तोवर मराठी शब्द वापरायचा, म्हणून, की ‘ब्राउन शुगर’ या शब्दप्रयोगातून निदान महाराष्ट्रात तरी काही भलताच अर्थ प्रतीत होतो, म्हणून? (दुर्दैवाने, ‘भुरी साखर’ या शब्दप्रयोगातून — अशा चिजेच्या अस्तित्वाबद्दल आगाऊ कल्पना असल्याखेरीज — कोणताच अर्थबोध होत नाही. नि, ‘ब्राउन शुगर’करिता मराठीत ‘गर्द’ असा जो प्रतिशब्द प्रचलित आहे, तो ‘त्या दुसऱ्या अर्था’ने आहे. मराठीत भाषांतर केले, तर काहीही अर्थबोध होत नाही, नि मूळ इंग्रजी शब्द वापरला, तर भलताच अर्थ लागतो — धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय, अर्थात Damned if you do and damned if you don’t — ही परिस्थिती लेखिकेकरिता अडचणीची आहे खरी!)
(अतिअवांतर: ‘आमच्यांत’ ब्राउन शुगरचे सेवन सर्रास (नि उघडउघडपणे) केले जाते. नि त्याकरिता तिला ‘भुरी साखर’ असा कूटशब्द वापरण्याची गरज आम्हांस भासत नाही. असो.)
——————————
बाकी, लेख अत्यंत माहितीपूर्ण. लेखावर, त्यातील तपशिलांवर कष्ट घेतलेले दिसून येतात. छान!
>>बोले तो, पूर्वी, एका जमान्यात, या कामाकरिता (जनावरांच्या हाडांपासून बनविलेला
हाडांचा चुरा साखर पांढरी करायला नव्हे तर रसातले इन्सोल्युबल कण खाली बसावेत म्हणून वापरला जायचा. In technical terms this is called juice clarification. The phosphates in the bonemeal react with lime and form calcium phosphate that settles down trapping the insolubles. It is called pressmud. This leaves behind a clear syrup which is then bleached again and concentrated. Now, industrial phosphoric acid has replaced bonemeal.
>>प्राणिज कोळसा (animal charcoal किंवा bone charcoal), (नेमका bleaching agent म्हणून नव्हे, तरी adsorption agent म्हणून) वापरला जात नसे काय?
कोळसा कार्बन डायॉक्साईड तयार करण्यासाठी वापरला जाई. सल्फिटेशनच्या आधी कार्बोनेशन प्रक्रिया वापरली जायची. पण ती गंधक जाळण्यापेक्षा महाग पडते. हल्ली अंबानी सल्फरचे सोनेरी गोळे तयार करून देतात जे भट्टीत (kiln) जाळले जातात.
>>भुरी साखर
भावना पोचल्या असतील तर चालवून घ्या
>>बाकी, लेख अत्यंत माहितीपूर्ण. लेखावर, त्यातील तपशिलांवर कष्ट घेतलेले दिसून येतात. छान!
आभार!



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.