>> डॉ. मंजिरी भालेराव
होर्यु-जी मंदिर हे जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास, या विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.
जपानमधील नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक. त्याची सविस्तर माहिती आपण गेल्या काही लेखांमधून पाहतो आहोत. या मंदिराच्या परिसरातील वास्तूंची माहिती पाहत असताना तिथे असलेली निरनिराळी सभागृहे, त्यामधील मूर्ती, चित्रे यांची माहिती आपण पहिली. जपानमधील सर्वात प्राचीन म्हणता येतील अशा बोधिसत्त्वांच्या लाकडी मूर्ती इथे मिळाल्या होत्या. या मूर्ती म्हणजे फक्त जपानसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी, विशेषत बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण होर्यु-जी मंदिर परिसरात मिळालेला खजिना इथेच संपत नाही. एक अतिशय आगळीवेगळी, एकमेवाद्वितीय अशी वस्तू या ठिकाणी मिळाली, ती म्हणजे एक लाकडी मंदिर. हे गौतम बुद्धासाठी केलेले तामामुशी मंदिर. हे छोटेसे लाकडी मंदिर साधारण 7 फूट उंचीचे आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात किंवा त्याधीच त्याची निर्मिती झाली असावी असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. अशा प्रकारचे हे पूर्व आशियातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याला तामामुशी मंदिर (तामामुशी नो झुशी) या नावाने ओळखले जाते. तामामुशी हे एका किडय़ाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर दोन खाली आणि दोन वर असे चार पंख असतात. त्यामध्ये वरचे पंख हे सप्तरंगी चमचमणारे असे असतात. या मंदिराच्या नावामध्ये या चमकदार पंख असलेल्या किडय़ाचे नाव आहे. कारण त्याच्या बाह्य बाजूवर हे पंख चिकटवले होते. एका चौरस पीठावर उभी असलेली हे एक लाकडाची छोटीशी इमारतच आहे. 233 सें. मी. (7 फूट 8 इंच) अशा उंचीचे हे मंदिर कला, स्थापत्य आणि त्याची ऐतिहासिकता यासाठी जपानच्या राष्ट्रीय खजिन्याचा एक भाग झाले आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांना व मौल्यवान वस्तूंना National Treasure of Japan असा दर्जा दिला जातो.
या तामामुशी मंदिराच्या बाबतीत केन्शिन नावाच्या एका भिक्षूने तेराव्या शतकात काही लिखाण करून ठेवले आहे. त्यानुसार हे मंदिर तामामुशी या नावाच्या एका किडय़ाच्या पंखांनी सजवले होते. ते मुळात राजकुमार शोतोकुच्या पत्नीची आई महाराणी सुइको हिचे होते. इसवी सनाच्या सातव्या शतकात बांधलेल्या मंदिरांच्या शैलीबद्दल स्पष्ट असे पुरावे बांधीव स्थापत्यात आज पहायला मिळत नाहीत. कारण अनेक मंदिरांची पुनर्बांधणी झाली, पण या मंदिरामुळे प्राचीन मंदिराचे संपूर्ण स्वरूप आणि स्थापत्य शैली आजही आपल्याला पहायला मिळते. या मंदिराच्या आतमध्ये कान्नोन (पद्मपाणी अवलोकितेश्वर) आणि बुद्धाच्या बसलेल्या अवस्थेतील ब्राँझच्या मूर्ती होत्या. याच्या चारही बाजूला चित्रे काढली होती. ती आजही पहायला मिळतात. त्यामध्ये समोरच्या बाजूला चार दिशांच्या लोकपालांपैकी दोन लोकपाल, तर बाजूच्या दोन दरवाजांवर कमळावर उभे असलेले दोन बोधिसत्त्व चित्रित केले आहेत. त्यांचे हात धर्मपाप्रवर्तनमुद्रा दर्शवणारे आहेत. यामधून ते जगातील सर्व जिवांना आश्वस्त करीत आहेत अशी कल्पना आहे. याशिवाय बौद्ध भिक्षू, काही आकाशात उडणारी दैवी व्यक्तिमत्त्वं, काही दैवी परिसर, उडणारी व्यक्तिमत्त्वं, काही प्राणी इत्यादीची चित्रेसुद्धा पहायला मिळतात. यातील काही प्रसंग हे निर्वाणसूत्र तसेच सुवर्णप्रभाससूत्र यामध्ये असलेल्या सूत्रांवर आधारित आहेत. या मंदिरामध्ये बुद्धाच्या तीन मूर्ती तसेच चार लोकपाल, हिंदू देवता लक्ष्मीसारखी समृद्धी देणारी देवता ‘किचिजोतेन’ यांच्याही मूर्ती आहेत. शोतोकु आजारी असताना या मूर्तींची निर्मिती करायला सुरुवात झाली, पण त्या पूर्ण व्हायच्या आत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अपामे अमिताभ आणि भैषज्यगुरूच्या मूर्ती याच काळात बनवल्या गेल्या. तोरी बुस्शी या सुप्रसिद्ध कलाकाराने या मूर्ती बनवल्या होत्या. शाक्यमुनी बुद्धाच्या बरोबर असलेल्या एका बोधिसत्त्वाच्या प्रभावळीवर एक कोरीव लेख आहे. त्यामध्ये ही सगळी माहिती दिली आहे.
जपान सरकारने सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा अनेक वस्तू या मंदिराच्या परिसरातून जमा केल्या आहेत, पण यापैकी जवळ जवळ तीनशेपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू आज टोकियो येथील पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयात आहेत. त्यामध्ये एका सिद्धम लिपीत ताडपत्रावर लिहिलेल्या संस्कृत हस्तलिखिताचाही समावेश होतो. अशा प्रकारे हे होर्यु-जी मंदिर जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास तसेच विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. जपानच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ‘निहोन शोकी’ या ग्रंथातील संदर्भ पडताळून पाहण्यासाठी, त्यांची सत्यासत्यता ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या भौतिक साधनांचा अपरंपार उपयोग होतो. जगाच्या इतिहासामध्ये इतक्या प्राचीन काळातील लाकडाच्या वास्तूंचे आणि वस्तूंचे फार थोडे पुरावे शिल्लक आहेत. त्यामुळे या सगळ्या खजिन्याची प्राचीनता आणि त्यांचे विविध प्रकार पाहता जपानच नव्हे, तर संपूर्ण जगाचा हा वारसा आहे असे म्हणता येईल.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)
manjirib24@gmail.com
आशियाई स्थापत्य वैभव – जपानमधील होर्यु-जी मंदिर
>> डॉ. मंजिरी भालेराव
जपानमध्ये मंदिर स्थापत्याला सुरूवात होण्याच्या काळात नारा प्रांतातील
इकारुगा गावात बांधलेले होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन
मंदिरांपैकी एक आहे. इसवी सन 607 मध्ये बांधलेले हे मंदिर म्हणजे एक बौद्ध
मठ तसेच एक बौद्ध शैक्षणिक केंद्रही होते. होर्यु-जी मंदिर व यासोबत असणारी
बौद्ध स्मारके युनेस्कोद्वारे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आली
आहेत.
जपानमध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारण इ.स.च्या 7व्या शतकात कशी झाली हे आपण मागच्या भागात पहिले. यामध्ये राजकुमार शोतोकू याचा मोठा सहभाग होता. नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे त्यापैकीच एक आहे. जपानमधील आज उभ्या असलेल्या सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. मुळात हे मंदिर इसवी सन 607 मध्ये राजकुमार शोतोकू याने बांधले होते. हे मंदिर म्हणजे एक बौद्ध मठ तसेच एक बौद्ध शैक्षणिक केंद्रही होते.
जपानमध्ये बहुतेक सगळ्या इमारती लाकडात बांधत असत. तसेच हे मंदिरही लाकडाचा वापर करून बांधले होते. जपानच्या इतिहासाची माहिती सांगणाऱया ‘निहोन शोकी’ या ग्रंथातून या काळाची पुष्कळ माहिती मिळते. इ.स. 607 मध्ये हे मंदिर जरी बांधले गेले तरी इ.स.670 मध्ये या मंदिरावर वीज पडली आणि त्याला मोठी आग लागली होती, अशीही नोंद या ग्रंथात केलेली आहे. या आगीमध्ये केवळ हे मंदिरच नाही, तर आसपासच्या सर्व लाकडी इमारती जळाल्या होत्या. त्यानंतर त्यांची पुनर्बांधणी केली गेली, पण तेव्हापासून त्या आज तिथे उभ्या आहेत. इथली मुख्य मंदिराची इमारत तर जगातल्या सर्वात जुन्या लाकडी इमारतींपैकी एक आहे असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी एक पॅगोडा आहे. तोसुद्धा जगातील सर्वात जुन्या लाकडी इमारतींमध्ये गणला जातो. या मंदिराला 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. ‘होर्यु-जी परिसरातील बौद्ध स्मारके’ हे जपानमधील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं पहिले स्थळ आहे. मात्र यामध्ये केवळ होर्यु-जीच नाही, तर इकारुगामधील होक्की-जी मंदिराच्या आवारातील इमारतींनाही हा दर्जा दिलेला आहे.
अगदी सुरुवातीला हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा त्याचे नाव ‘वाकाकुसादेरा’ असे होते असे मानले जाते, पण जेव्हा ते जुने मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि नंतर नवीन मंदिर उभारले गेले तेव्हा त्याचे नाव बदलून होर्यु-जी असे ठेवले गेले. ‘भरभराटीला येणाऱया धर्माचे मंदिर’ असा या नावाचा अर्थ आहे. या मंदिराची उभारणी राजकुमार शोतोकूच्या वडिलांच्या स्मरणार्थ केलेली होती. मंदिरात ‘याकुशी न्योराई’ म्हणजे गौतम बुद्धाच्या ‘भैषज्यगुरू’ या रूपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ‘भैषज्यगुरू’ म्हणजे भक्तांचे आजार बरे करणारा बुद्ध. हे आजार जसे शारीरिक असतात तसेच मानसिकसुद्धा असतात. भक्तांची दु:खं कमी करणारा, वेदना कमी करणारा तसेच महायान बौद्ध धर्मात आध्यात्मिक उन्नतीसाठी बुद्धाच्या या रूपाची उपासना केली जाते. मृत व्यक्तींच्या स्मरणार्थसुद्धा याकुशी न्योराई याची पूजा केली जाते. जपानमधील प्राचीन मंदिरांमध्ये बहुतेक वेळा बुद्धाच्या या रूपाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. काळाच्या ओघात याची जागा ‘जिझो’ म्हणजे ‘क्षितिगर्भ’ या ‘बोझुत्सू’ म्हणजे बोधिसत्त्वाने घेतली. आपल्या वडिलांना मृत्यूनंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणूनही कदाचित या मंदिराची उभारणी राजकुमार शोतोकू याने केली असावी.
आज या मंदिराच्या संकुलाचे ‘साइ-इन‘ आणि ‘तो-इन’ असे दोन भाग आहेत. त्यापैकी पश्चिमेकडील भागाचे नाव ‘साइ-इन’ आहे आणि तिथे ‘कोंदो’ म्हणजे सभागृह किंवा मंदिर आणि पाच मजली पॅगोडा आहे, तर ‘तो-इन’ या पूर्वेकडील भागात अष्टकोनी आकाराचे ‘युमेदोनो’ (स्वप्नातील सभागृह) आहे. याशिवाय या मंदिर संकुलात भिक्षूंसाठी निवासस्थान, व्याख्यानासाठी सभागृह, ग्रंथालय आणि भोजन कक्षही आहेत. येथील ‘युमेदोनो’ येथे पूर्वी राजकुमार शोतोकू याचा राजवाडा होता. तोही आगीत जळाला. त्यानंतर इथे ही अष्टकोनी इमारत बांधण्यात आली. ही इमारत राजकुमार शोतोकूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बांधली गेली. खुद्द गौतम बुद्ध राजकुमार शोतोकूच्या रूपात इथे आले होते आणि त्यांनी तिथे ध्यानधारणा केली अशी आख्यायिका या परिसरात प्रसृत झाली होती. त्यामुळे काळाच्या ओघात या इमारतीला ‘युमेदोनो’ हे नाव मिळाले. 1939 साली झालेल्या उत्खननात या राजवाडय़ाचे अवशेष सापडले होते.
‘साइ-इन’ या भागात उभा असलेला पाच मजली पॅगोडा 32.45 मी. उंच आहे.
त्याच्या मधोमध असलेला स्तंभ लाकडीच आहे. ‘डेन्ड्रोनोलाजी’ नावाच्या
शास्त्राrय परीक्षणामुळे काळाच्या ओघात झाडावर तयार होणाऱया वलयांच्या
शास्त्राrय अभ्यासानंतर झाड नेमके कधी तोडले याचा अंदाज करता येतो. त्या
अभ्यासानंतर असे लक्षात आले की, या पॅगोडय़ामध्ये असलेल्या मूलस्तंभाचे
लाकूड इ.स.594 मध्येच तोडले होते. पॅगोडय़ाच्या तळाशी गौतम बुद्धाच्या
हाडाचा तुकडा असलेला अस्थिकरंडक आहे असे मानले जाते. 1958 साली झालेल्या
डागडुजीमध्ये तो करंडक थोडा काळ त्याच्या जागेवरून सरकवला होता अशी नोंद
झाहे. याच ‘साइ-इन’ या भागात ‘कोंदो’ म्हणजे मुख्य मंदिरही आहे. या
मंदिराचा आकार 18.5 मी. x 15.2 मी. असा आहे. ही इमारत दुमजली आहे. पहिल्या
मजल्यावर दोन स्तरांचे छत आहे, तर वरच्या मजल्यावर एकच छत आहे. या छतांचे
बाहेरील कोपरे पाकार आहेत. पहिल्या मजल्यावरील सभागृहात काही प्राचीन
चित्रे शिल्लक होती. त्यापैकी काही चित्रांना हानी पोचली. 26 जानेवारी 1949
रोजी या जेव्हा या परिसरातील इमारतींचे संवर्धनाचे काम चालू होते त्या
वेळेस अपघाताने या सभागृहास आग लागली. 1954 मध्ये हे काम पूर्ण झाले, पण
शेवटी आता जे काही शिल्लक आहे त्यामध्ये फक्त 15 ते 20 टक्के भाग हा
प्राचीन मंदिराचा आहे. बाकीची पुनर्बांधणी झाली आहे. जो भाग जळाला होता,
तोसुद्धा अतिशय काळजीपूर्वक एका पक्क्या इमारतीत हलवला आहे. त्यामुळे
भविष्यामध्ये या विषयावर काम करणाऱया अभ्यासकांना तो उपलब्ध असेल. या
इमारतीमध्ये बऱयाच मोठय़ा संख्येने चित्रे काढली होती. त्या चित्रांच्या
शैलीवर अजिंठा आणि दुन हुआंग येथील चित्रशैलींचा मोठा प्रभाव पाहायला
मिळतो. या मंदिरात अजूनही काही मौल्यवान गोष्टी सापडल्या. त्यांना
होर्यू-जी येथे सापडलेला खजिना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या
खजिन्याची माहिती पुढच्या भागात पाहू या. (क्रमश:)
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)
manjirib24@gmail.com
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.