Tuesday, November 28, 2023

गाणगापूर माहिती मराठी

https://marathiblogger.com/gangapur-mahiti-marathi/

गाणगापूर म्हणेज दत्तभक्तांची पंढरीच. गाणगापूरला जाण्याची माझी बरेच दिवसांची इच्छा होती. परंतु कामाच्या धामधुमीत अगोदर काही जाणे जमले नाही. आपण वेळ काढला नाही तर थोडी सवड सापडत सुद्धा नाही हे ही खरेच. ह्यावेळेसच्या दिवाळीच्या सुट्ट्यात मात्र मी काही दिवस अजून सुट्या घेतल्या आणि अखेरचे एकदा जाणे नक्की केले.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

रात्रभराच्या प्रवासानंतर सोलापूर आणि तिथून अक्कलकोट असा प्रवास झाला आणि अक्कलकोटला दोन दिवस थांबल्यावर सकाळच्या बसने गाणगापूरला जाणे झाले. अक्कलकोटला मला थांबून निवांत स्वामींचे दर्शन घ्यायचे होते म्हणून मी तिथे मुक्काम करण्याचे अगोदरच ठरवून आलो होतो. हे दोन दिवस मला बरेच सुखावून गेले. स्वामी सेवेत मन कसे प्रसन्न होते हे कुण्या स्वामीभक्ताला वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या उन्हाळ्यात मला अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर अशा तीर्थक्षेत्री जाण्याची अनिवार इच्छा झाली होती आणि इंटरनेट वर तेथील माहिती मी शोधत असो.

अक्कलकोट वरून वटवृक्ष मंदिराच्या (मुख्य मंदिर) जवळूनच सकाळी सकाळीच बस किंवा इतर वाहने गाणगापूरकडे सुटतात. अक्कलकोट ते गाणगापूर अंतर जवळपास ७०-७५ किलोमीटर असावे. खाजगी वाहने त्यांचे वाहन पूर्ण भरल्यावरच निघतात, त्यामुळे मला सकाळी पाच वाजल्यापासून किमान १ तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी एक बस मिळाली. गाणगापूरला बसने जाण्यासाठी मला जवळपास दोन तास लागले असावे. गाणगापूरला पोहोचल्यावर अगोदर मला संगमावर जायचे होते. बसस्टॅण्ड जवळच १०-१५ रुपये प्रति व्यक्ती दराने ऑटो चालतात. संगमावर गेल्यानंतर प्रथम भीमा अमरजा संगमात स्नान केले.

bhima amarja sangam gangapur
भीमा-अमरजा संगम

मुख्य गावाच्या थोडा बाहेर असलेल्या ह्या भीमा अमरजा संगमाचे विशेष महत्व आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज इथेच अनुष्ठान करायचे. आजवर ज्याबद्दल ऐकलेच होते तिथे प्रत्यक्ष आल्यानंतर अवर्णनीय आनंद झाला.

मे महिन्यापासून मला गुरुचरित्र वाचण्याची तीव्र इच्छा होती. दत्तभक्तीच्या संपर्कात मी कसा आलो हे मला सुद्धा माहित नाही. तसा मी सुरुवातीपासूनच थोडा धार्मिक आहे आणि बालपणी अनेक धार्मिक ग्रंथांचे पठण कळत नकळत केले आहे. त्यामध्ये नवनाथ पोथी सुद्धा मला आठवते. पण २०२० च्या दत्त जयंतीच्या दिवशी घडलेल्या एका आनंददायक गोष्टीमुळे माझा तीव्र ओढा ह्या भक्तिमार्गाकडे वळला असावा आणि त्याच घटनेनंतर माझ्या मनात असे शक्तिशाली भक्तितरंग निर्माण झाले असावेत. असो.

त्यानंतर तीन चार महिन्यात माझ्या वाचनात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आले. गुरुचरित्र समजून मी ऑनलाइन पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत बोलावले. ते मिळाल्यावर समजले की दोन्ही ग्रंथ वेगवेगळे आहेत. गुरुचरित्र वाचनासाठी कडक नियम असतात असे कोठेतरी वाचल्यावर नंतर वाचूया असे ठरवले. त्यातही संगमावर गुरुचरित्र वाचण्याचा योग यावा अशी मनोमन इच्छा होती. ती ह्या भेटीत पूर्ण झाली.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

अक्कलकोटला वास्तव्याला असतांना एका भक्ताने तुम्ही संगमावर संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, म्हणजे तुमच्या कमी वेळेत ते पठण पूर्ण होईल व तुमची संगमस्थळी गुरुचरित्र वाचनायची इच्छा देखील पूर्ण होईल असे सांगितले. त्यामुळे मी अक्कलकोटहून येतांनाच संक्षिप्त गुरुचरित्र सोबत आणले होते.

bhima amarja sangam
संगमस्थळीचा औदुंबर वृक्ष

संगमावर आता श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी चांगली सोय झाली आहे. बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करतांना दिसतात. अशा भक्तिभावाच्या वातावरणात, जिथे अनेक जण श्री गुरुचरित्राचे पठण करत असतात आपल्या केलेल्या पारायणाने एक आनंददायक अनुभव वाटून जातो.

संगमस्थळीच एक मंदिर आहे आणि तिथून गाणगापूरकडे परत जातांना भस्माचा डोंगर आहे. इथे चालत जाता येते, फार दूर नाही. इथले भस्म म्हणजे आता मातीच्या स्वरूपात आहे आणि ते भाविक थोडे खोदून सोबत नेतात मी सुद्धा थोडे भस्म घेतले आणि परतीचा ऑटो पकडून मंदिरात आलो.

Gangapur mahiti marathi

bhasma hill ganagapur
भस्माचा डोंगर

तिथे येण्यापर्यंत बारा साडेबाराचा वेळ झाला होता आणि मंदिराजवळ भिक्षा मागणाऱ्यांची गर्दी होती. मला काही अन्नदान करण्याची इच्छा असल्यामुळे मे तसे केले व नंतर दर्शनासाठी लांब रांगेत लागलो.

ही रांग मंदिराच्या बाहेरून सुरु होते आणि वरच्या मजल्यावरून हळू हळू पुढे सरकत मग परत खाली मंदिरात उतरते. ह्या रांगेत गर्दी असल्यामुळे मला अडीच तीन तास लागले असावे. त्यापेक्षा खालीच प्रथम मंदिरात प्रवेश करून काही देणगीची पावती फाडल्यास वेगळ्या लहान रांगेत लागत येते असे कुणीतरी सांगत असल्याचे मी ऐकले होते. मला ह्यातील नक्की काही माहित नाही परंतु ज्यांना वेळेची कमी आहे त्यांनी अशा बाबतीत चौकशी करून पाहावी. कदाचित उपयोगी होईल.

Gangapur mahiti marathi

निर्गुण पादुकांचे दर्शन मात्र मला झाले नाही. कुणीतरी सांगत होते कि निर्गुण पादुकांचे दर्शन फक्त सकाळीच होते. आता पुढच्या गाणगापूर भेटीत दोन तीन दिवस मुक्काम करून सगळीकडे निवांत थांबून दर्शन घेण्याची इच्छा आहे दत्त महाराजांची कृपा झाली तर तोही योग येईलच ह्यात शंका नाही.

संध्याकाळच्या वेळेस निघत असलेली महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याची मला इच्छा होती. ही इच्छा त्याच दिवशी परत निघणे असल्यामुळे शक्य झाले नाही, पण नेहमी बघत असलेल्या काही युट्युब चॅनेल वर होत असलेले पालखी सोहळ्यातील मूर्तीचे दर्शन मला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूस झाले. तेव्हा ही मूर्ती पालखी सोहळ्यासाठी सजवली जात होती. माझ्यासाठी आश्चर्य म्हणजे मी मनोमन हीच मूर्ती शोधत होतो.

gangapur mahiti marathi

अति गर्दीमुळे गाभाऱ्यातील दर्शन मला फार वेळेस होऊ शकले नाही. गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन अजून एकदा व्हावे असे माझ्या खूप मनात होते. तेव्हा काही लोकांचे दर्शन मागील बाजूने विशेष रांगेत होत होते. तिथे उभा झाल्यावर, -पुढे चला, पुढे चला- असे कुणी ओरडले व मी सहज रांगेत लागलो आणि लगेच परत गाभाऱ्यात जाता आले. त्यानंतर चांगले दर्शन झाल्याने मनाला प्रसन्न वाटले.

माझ्या मनातील दोन्ही इच्छा अशा विनासायास पूर्ण झाल्या. नंतर बराच वेळ मी मंदिराच्या आवारात मी बसून होतो आणि मनोमन परत लवकर येऊ द्या म्हणून इच्छा सुद्धा होत होती.

Gangapur mahiti marathi

मग मंदिरातून निघाल्यावर कल्लेश्वर देवालय जाणे बाकी होते. बाहेर पडल्यावर कुणाला रस्ता विचारला तर चालत पायी जात येते असे कुणीतरी सांगितले. माझेकडे जास्त ओझे नसल्याने मी चालत गेलो. अंदाजे एक किलोमीटर अंतर असेल. कुटुंब सोबत असल्यास किंवा वेळ कमी असल्यास काही वाहन करून जाणे मला जास्त योग्य पर्याय वाटला. शेवटी प्रवासात कमीत कमी थकणे जास्त योग्य वाटते.

kalleshwara temple gangapur
कल्लेश्वर देवालय

परतीसाठी बसस्टॅन्ड वर बराच वेळ गेला आणि येणाऱ्या बस सुद्धा गर्दी घेऊनच येत होत्या. कसेतरी एका बसमध्ये जागा मिळवून मी अक्कलकोटला परत आलो आणि तिथे एक दिवस थांबून मग परत घराकडे परतलो.

अक्कलकोट आणि गाणगापूर मधील हे चार दिवस मला खूप ऊर्जा देऊन गेले. आध्यात्मिक स्तरावर काहीतरी अतीव आनंद वाटला. आता पुढील भेटीची आस आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...