Sunday, November 26, 2023

आशियाई स्थापत्य वैभव – चांदीचे नसलेले रजतमंदिर गिंकाकु-जी

 


सामना ऑनलाईन

>> डॉ. मंजिरी भालेराव

क्योते या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात 17 जागतिक वारसा स्मारके आहेत, त्यापैकी एक गिंकाकु-जी मंदिर. याचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. चांदीचे मंदिर बांधण्याची योजना पूर्ण झाली नसली तरी अवलोकितेश्वराचे स्थान असलेले हे मंदिर याच नावाने ओळखले जाते.

जपानची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्योतोचे थोडेफार महत्त्व आपण मागच्या काही लेखांत पाहिले. या शहराच्या परिसरात जपानचा इतिहास आणि संस्कृतीचे विलोभनीय पुरावे दाखवणारे अनेक अवशेष पहायला मिळतात. खुद्द जपानमधल्या लोकांना या सांस्कृतिक वारशाचा खूप अभिमान आहेच, पण जगभरातून येणारे पर्यटकसुद्धा इथे खूप गर्दी करतात. अशा या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात आज 17 जागतिक वारसा स्मारके आहेत. त्यापैकी एक म्हणजे गिंकाकु-जी. या मंदिराच्या नावाचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. जसे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर या परिसरात आहे तसेच, किंबहुना त्यापासून स्फूर्ती घेऊन चांदीचे मंदिर बांधण्याची योजना झालेली होती, पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. ओशिकागा योशिमित्सुच्या स्मरणार्थ जसे किंकाकु-जी बांधले गेले तसेच त्याचा नातू ओशिकागा आशिकागा योशिमासा याच्या इच्छेखातर या स्थळी गिंकाकु-जी हे मंदिर बांधले गेले. या दोन्ही मंदिर संकुलांच्या विकासातही साम्य आहे. आधी निवृत्तीनंतरचा राजवाडा असलेले हे स्थळ ओशिकागा आशिकागा योशिमासाच्या मृत्यूनंतर एका झेन बौद्ध मंदिरात रूपांतरित झाले. कान्नोन-देन किंवा अवलोकितेश्वराचे स्थान असलेला मंडप हे येथील मुख्य सभागृह आहे. ते दुसऱया मजल्यावर आहे. त्याच्यावर चांदीचा मुलामा लावायची मुळात योजना होती, पण ती कधीच पूर्ण झाली नाही.तरीही त्याच नावाने या मंडपाची प्रसिद्धी झाली आणि आज ते रजत किंवा चांदीचे मंदिर नावाने प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे मूळ नाव हिगाशियामा जिशो-जी असे आहे. मुरोमाची शोगुनपैकी आठवा शोगुन म्हणजे अशिकागा आशिकागा योशिमासा. तो वयाच्या नवव्या वर्षी कुटुंबप्रमुख झाला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शोगुन झाला. त्याने त्याच्या आयुष्यात स्वत:ची सौंदर्यदृष्टी वापरून अनेक स्थळे विकसित केली. साधेपणा हा त्याच्या विचारांचा आणि सौंदर्याच्या संकल्पनेचा स्थायिभाव होता. याच विचारांमधून प्रसिद्ध अशी हिगाशियामा संस्कृती विकसित झाली. यामध्ये जगप्रसिद्ध जपानी चहा पिण्याचा समारंभ, फुलांची सजावट (इकेबाना), बागेची वैशिष्टय़पूर्ण रचना, नोह नाटय़ प्रकार, काव्य तसेच जपानी स्थापत्य यांचा समावेश होतो. या कला खास जपानच्या वैशिष्टय़पूर्ण कला म्हणून पुढे प्रसिद्ध झाल्या, पण त्यांचा उगम या काळात झाला होता. त्याच प्रकारे त्याने आपला हिगाशियामा राजवाडाही बांधला. इ.स. 1460 मध्ये या मंदिराचे बांधकाम करायला सुरुवात झाली, पण मध्ये ओनिन युद्धाच्या काळात यात काही काळ खंड पडला. नंतर परत त्याचे बांधकाम सुरू झाले. इ.स. 1485 मध्ये तो बौद्ध भिक्षू बनला. हिगाशियामा या क्योतोजवळ असलेल्या डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांना क्योतोच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

इ.स.1490 मध्ये अशिकागा आशिकागा योशिमासा याच्या मृत्यूनंतर हा राजवाडा आणि परिसर यांचे रूपांतर झेन बौद्ध मंदिरात झाले. योशिमासा याचे मृत्यूनंतरचे बौद्ध धर्मातील नाव जिशो- इनदोनो होते. त्यावरून या मंदिर संकुलाचे अधिकृत नाव जिशो-जी असे पडले. ते रिन्झाई झेन पंथाच्या शोकोकु शाखेशी संलग्न आहे. रिन्झाई झेन पंथाची शोकोकु ही एक स्वतंत्र शाखा आहे. शोकोकु-जी हे क्योतोमधले एक अतिशय महत्त्वाचे बौद्ध मंदिर आहे. पूर्वी क्योतोमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली पाच बौद्ध मंदिरे प्रसिद्ध होती. त्यापैकी एक म्हणजे शोकोकु-जी होते. त्या मंदिराची स्थापनासुद्धा अशिकागा आशिकागा योशिमात्सु या आशिकागा योशिमासाच्या आजोबांनी केली होती. त्यांनीच किंकाकु-जी म्हणजे सुवर्णमंदिराचीही रचना केली होती. योशिमासानेही किंकाकु-जी या सुवर्ण मंदिराला एक भेट देऊन त्याप्रमाणे आपल्या मंदिराची रचना करायचे ठरवले. त्याच वेळेस त्याने कान्नोन-देन हे दुसऱया मजल्यावरचे सभागृह चांदीचा मुलामा देऊन सजवायचे ठरवले होते, पण दुर्दैवाने त्याच्या आधीच योशिमासाचा मृत्यू झाला होता. चांदीचा मुलामा देऊन सभागृह सजवण्याचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले, पण पुढेही कोणी ते पूर्ण केले नाही. 16व्या शतकात या परिसरात झालेल्या युद्धात मुख्य इमारत सोडून संकुलातील बाकीच्या सगळ्या इमारती जळून खाक झाल्या. पुढे 17व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचा मोठय़ा प्रमाणावर जीर्णोद्धार झाला.

या मंदिराच्या परिसरात असलेल्या बागेत हिरवळ, पाणी, खडक अशा गोष्टींचा सुरेख वापर केला आहे, पण सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिथे असलेली पांढरीशुभ्र वाळू ! मंदिराच्या अंगणात पसरलेल्या या वाळूमुळे या मंदिर परिसराचा मनावर एक वेगळाच प्रभाव पडतो. किंकाकु-जी मंदिराच्या छतावर जसा सोनेरी फिनिक्स पक्षी बसवला आहे तसाच इथे चंदेरी फिनिक्स पहायला मिळतो. 1994 साली क्योतोमधील 17 स्मारकांना जागतिक वारसा हा दर्जा मिळाल्यामुळे इथे अशी गर्दी होणे स्वाभाविकच आहे, पण क्योतोमधील मंदिरांच्या आवारातील सुंदर बागांच्या क्रमवारीत गिंकाकु-जीच्या बागेचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्यामुळेही या परिसरात येणारे पर्यटक चांदीचा मुलामा नसला तरी या रजतमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर संकुलात प्रचंड गर्दी करतात.

manjirib24@gmail.com

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

संस्कृती सोहळा – देशापल्याडचे गणराया

सामना ऑनलाईन

अभय कुलकर्णी 

आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे.  कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा तर महाराष्ट्राच्या लोकोत्सवातील एक महत्त्वाचा उत्सव आहे.   आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगभरात स्थायिक झालेले मराठी जन गणेशोत्सव साजरा करत असतात, पण त्यापूर्वीपासून, अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत.  या बहुतेक देशांमध्ये आजही गणेशपूजनाची परंपरा आहे.

कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याकडे नेहमीच गणेशपूजनाने केली जाते.  अग्रपूजेचा मान हा नेहमी श्री गणेशालाच दिला जातो. मात्र अनेक परदेशांतही गणेशपूजन केले जाते. त्यापैकी काही देशांत पूर्वापार ही प्रथा आहे; तर काही देशांत आपल्याकडून ही प्रथा घेतली गेली आहे.

सम्राट अशोकाच्या कन्येने नेपाळची सध्याची राजधानी असलेल्या काठमांडू येथे गणेश मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. नेपाळमध्ये पूर्वीपासूनच गणेशपूजन केले जात होते. तिथे गणेशाला ‘सूर्यविनायक‘ या नावानेही ओळखले जाते. तिथे विघ्नविनाशक देवता म्हणून गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. नेपाळप्रमाणेच तिबेटमध्येही याच प्रकारे गणेशपूजन केले जाते. तेथील प्राचीन मठांमध्ये गणेशाच्या पूजनाची परंपरा आहे. नवव्या शताब्दीच्या पूर्वार्धात तिबेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गणेशपूजन सुरू झाले. भूतपिशाच आणि दुष्ट शक्तींचा विनाशकर्ता म्हणून तिथे गणेशाची ओळख आहे. म्यानमारमध्येही गणेशपूजन केले जाते. तेथील बौद्ध मंदिरांतही गणेशमूर्ती आढळतात.

जावामध्ये सापडलेली गणेशमूर्ती आज लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली गेली आहे. इंडोनेशियातील हिंदू लोकही गणेशाची पूजा करतात. बाली द्वीपावर राजाराणीच्या मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तींच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जात असे. श्रीलंकेत कोलंबोपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या कदरगाम येथे गणेशाचे भव्य मंदिर आहे. बोर्नियोमध्ये गणेशपूजनाची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. कंबोडिया आणि थायलंडमध्येही गणेशपूजनाची प्राचीन परंपरा आहे. कंबोडियाची प्राचीन राजधानी अंगारकोट येथे तर गणेशमूर्तींचा खजिनाच सापडला आहे. विविध प्रकारच्या रंगरूपात तिथे गणेशमूर्ती सापडल्या आहेत. ‘प्राहाकनैत’ या नावाने कंबोडियात गणेशपूजा केली जाते. चीनमध्ये गणेशाला ‘कुआन शी तिएन’ या नावाने ओळखले जाते. तिथे ‘कांतिगेन’ या नावानेही गणेशाला ओळखले जाते.

जपानमध्ये गणेशाला ‘कांतिगेन’ या नावाने ओळखले जाते. येथील मूर्तींना दोन किंवा चार हात असतात.  जपानमधील कोयसान संतसुजी विहारात चार ओळीत गणेशाची चित्रे मांडण्यात आली आहेत. त्यात युग्म गणेश, षड्भुज गणेश, चतुर्भुज गणेश आणि सुवर्णगणेश ही प्रमुख चित्रे आहेत.

कालांतराने गणेशाच्या पाच रूपांचे जपानमध्ये पूजन केले जाऊ लागले. कोंगो जाई तेन हे पहिले रूप होय. यालाच छत्रविनायक असे म्हणतात. गणेशाच्या दुसऱया रूपाला कोंगो जिकीतेन किंवा माल्य विनायक असे म्हणतात. तसिरा कांतिगेन किंवा भाग्यविनायक हा तिसरा गणपती होय. गेंगो एतेन हा चौथा गणपती. यालाच धनुर्विनायक या नावानेही ओळखले जाते. जेबु कुतेन हा पाचवा गणपती म्हणजे खड्गविनायक. जपानमध्ये सर्वसामान्यपणे गणेशपूजन केले जाते. चीनच्या तून हू आग येथे सन 644 मध्ये एका पर्वतावर गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याखाली चिनी भाषेत लिहिले आहे की, हा हत्तींचा राजा आहे. चीनमध्ये उभे राहून एकमेकींना आलिंगन देणाऱया दोन गणेशांची मूर्ती आढळते. म्यानमारमध्ये गणपतीला महापिनी, नेपाळमध्ये हेरंब विनायक, मंगोलियात घोटाकर आणि तिबेटमध्ये सोकापरक या नावाने ओळखले जाते. जावामध्ये गणपतीला कालांतक म्हणतात. येथील चंडिबनोन नावाच्या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाबरोबच गणपतीची मूर्तीही आहे. इंडोनेशियात गणपतीला बोरोगणेश म्हणतात.

अफगाणिस्तानात कुशाणपूर्व काळापासून गणेशपूजेची प्रथा होती. पश्चिम इराणमधील लुरिस्तान येथे करण्यात आलेल्या उत्खननात इ. स. पू. 1200 ते 1000 या काळातील गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अहुरमज्दा या नावाने इराणी लोक गणेशाची पूजा करतात.  इराणमधील गणपती खड्गयोद्धा स्वरूपाचा असून तो नावाप्रमाणेच योद्धा आहे.

हिंदुस्थानपासून दूरवर असलेल्या देशांचा विचार करता ग्रीसमध्ये ओरेनस नावाच्या देवाची पूजा केली जाते. त्याचे स्वरूप बऱयाच अंशी गणेशाच्या स्वरूपाशी जुळणारे आहे. इजिप्तचा इतिहासकार हर्मिज याच्या मते ओरेनस हा सर्व देवांच्या आधी पुजला जाणारा देव आहे. तो बुद्धीचा देव असून त्याचे नाव एकहोन आहे. एकदंत या नावाशी या नावाचे साम्य आढळते. त्यामुळे हे गणेशाचेच वर्णन असावे असे मानले जाते.  ब्राझीलमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे अशा प्रकारच्या देवतेचे मेसिकोतील लोक आजही पूजन करतात. बुद्धीची रोमन देवता जेनस हिलासुद्धा हत्तीचे मस्तक असते. ती गणेशाच्या समकालीन मानली जाते. तिचे पूजनही मंगळवारीच केले जाते. अठराव्या शतकातील संस्कृतचे प्रकांड पंडित विल्यम जोन्स यांनी जेनस आणि गणेश यांची तुलना करून असा निष्कर्ष काढला आहे की, गणेश आणि जेनस यांच्यात कमालीचे साम्य आढळते. गणेशाची सर्व वैशिष्टय़े जेनसमध्येही आढळतात. रोमन आणि संस्कृत शब्दांच्या उच्चारांतही साम्य आढळते. जेनस आणि गणेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हनोई येथे विघ्नेश्वर असे गणपतीचे नाव असून तो कमळात बसलेला असतो. ‘गणेश- अ मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड’नुसार, जगाच्या कित्येक भागांत गणेशपूजनाची प्रथा सुरू होती आणि या मूर्तींच्या आकारांत आणि प्रकारांत विभिन्नता आढळते. प्राचीन काळात हिंदुस्थानी संस्कृती दूरवर पसरलेली होती हेच यावरून सिद्ध होते.








No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...