Sunday, November 26, 2023

भटकंती; केरळातील विलोभनीय धबधबे


सामना ऑनलाईन

>>प्रा. वर्षा चोपडे

आपला हिंदुस्थान देखणा आणि सारे जहां से अच्छा आहे. देशातील धुक्याने आच्छादलेली शिखरे, उत्साही प्रवाह, धबधब्याची विहंगम रूपे, हिरवेगार जंगल, विविध वृक्षवेली आणि निसर्गाचा उत्तम आनंद लुटण्यासाठी एखाद्या अद्भुत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर केरळला आवर्जून भेट द्या. केरळमध्ये एकूण 27 अप्रतिम सुंदर धबधबे आहेत. केरळमधील धबधबे त्याच्या मोहक सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जी नैसर्गिक दृश्ये आपण बघतो त्याला तोड नाही. येथील धबधब्यांच्या वाटेवरचे स्वर्गीय वातावरण, सुपारी, मिरपूड, आले आणि मसाल्यांच्या बागा आपल्या अनोख्या सुगंधाने मन बेभान करतात. केरळात अनेक धबधबे आपण बघू शकतो आणि त्यात तुडुंब भिजू शकतो. परिवारासोबत त्याचा आनंद लुटू शकतो. मी भेट दिलेले काही धबधबे मला अवर्णनीय वाटतात. कारण स्वच्छ नितळ पाणी आणि सुरक्षित जंगल मन भारावून टाकतात, तर पहिला धबधबा आहे अथिरपिल्ली धबधबा. त्रिशूर जिह्यातील चालकुडी तालुक्यातील अथिराप्पिल्ली पंचायतीमध्ये चालकुडी नदीवर स्थित आहे. कोची शहरापासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर असून ‘बाहुबली’ सिनेमात हा धबधबा अप्रतिम चित्रित केला आहे. त्यामुळे पर्यटक मुद्दाम या धबधब्याला भेट देतात. अथिरापिल्ली फॉल्स हा केरळमधील सर्वात मोठा धबधबा आहे आणि त्याला ‘दक्षिण हिंदुस्थानातील नायगारा’ असे टोपणनाव आहे. पण आता ‘बाहुबली’ सिनेमामुळे पर्यटक याला ‘बाहुबली धबधबा’ म्हणून संबोधतात. थिरापिल्ली ते वाझाचल धबधबा या मार्गावर रस्त्याच्या अगदी जवळ आणखी एक धबधबा आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘चारपा धबधबा’ म्हणतात. जवळच असलेला एझात्तुमुघम प्रकृति ग्रामम् येथील वाढाचल धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे. पावसाळय़ात जून-सप्टेंबरला लाखो पर्यटक फॉल्स आणि वाझाचल पिकनिक स्पॉटला भेट देतात. अथिरप्पिली हे तामीळनाडू आणि केरळला जोडणाऱया राज्य महामार्गावर घनदाट जंगलात वसलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला परवानगी नाही. दोन्ही बाजूंच्या चौक्या संध्याकाळी साडेसहा वाजता बंद होतात. त्यापूर्वी सर्व वाहनांना दोन्ही चेकपॉइंटमधून बाहेर पडावे लागते.

दुसरा धबधबा थुशारागिरी. कोझिकोडपासून 50 किमी अंतरावर असलेल्या थुशारागिरी धबधब्यात एरत्तुमुक्कू, माझविल चट्टोम आणि थुंबिथुल्लम पारा यांचा समावेश आहे. येथे ट्रेकिंगद्वारे किंवा वाहनाने सहज पोहोचता येते. धबधब्यांमुळे पर्वताच्या शिखरावर तयार झालेल्या सुंदर चांदीच्या मुकुटावरून थुशारागिरी किंवा ‘मिस्ट-कॅप्ड पीक्स’ हे नाव पडले आहे. पश्चिम घाटातून उगम पावणारे दोन प्रवाह येथे मिळून चालीपुझा नदी बनते. नदी तीन धबधब्यांमध्ये वळते आणि एक बर्फाच्छादित स्प्रे तयार करते, ज्यामुळे ‘थुशारागिरी’ हा शब्द आहे. ज्याचा अर्थ बर्फाच्छादित पर्वत असा आहे. पावसाळा आणि हिवाळय़ाचा काळ या धबधब्यास भेट देण्यास उत्तम आहे. अनेक पर्यटक येथे धबधब्याचा आनंद लुटतात. तुषारगिरी धबधब्याजवळ चाळीपुझा येथे तुषारगिरी पूल आहे. हा केरळमधील सर्वात उंच कमान पुलांपैकी एक आहे.

तिसरा पलारुवी धबधबा. हा धबधबाही अत्यंत प्रसिद्ध आहे. केरळ-तामीळनाडू सीमेजवळ स्थित पलारुवी धबधबा, थेनमालाच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रमुख आकर्षण आहे. पलारुवी म्हणजे ‘दुधाचा प्रवाह’. या धबधब्यात पाणी 300 फूट उंचीवरून खडकांमधून खाली येते. हे एक आनंददायक पिकनिक स्पॉट बनले आहे, जिथे कोणीही विनाव्यत्यय विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो. फेसाळणारे पाण्याचे प्रवाह, चांदीसारखा चमचमणारा आणि थंड वातावरण असलेला हा धबधबा डोळय़ांचे पारणे फेडतो. पलारुवी कोल्लमपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे आणि या जल-स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना सुमारे चार किमी खोल जंगलात जावे लागते. धबधब्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सरकारी वाहन व्यवस्था आहे. त्यामुळे वेळ असेल तर स्वर्गीय केरळला आणि या धबधब्याला जरूर भेट द्या.
– varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

भटकंती – केरळचे वायनाड इडक्कल लेणी

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळमधील वायनाड जिल्हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. केरळ, तामीळनाडू आणि कर्नाटक. खरं तर, केरळचा हा एकमेव जिल्हा आहे ज्याची सीमा इतर दोन राज्यांशी आहे. वायनाडचा हिंदू धर्माशी संबंध हजारो वर्षांपूर्वीचा आहे. हिंदूशिवाय मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच आदिवासी समुदाय येथे आनंदाने राहतात. आश्रमकोळी (वाल्मिकींचा आश्रम), योगीमुला, रामपल्ली, सीता मंड, पुथडी आणि चोरुपुरा ही ठिकाणे रामायण काळाशी संबंध दर्शवतात. रामायण, महाभारत आणि दक्षिण भारत यांचा संबंध असावा. कारण प्राचीन मंदिरे आणि पौराणिक गोष्टीत त्याचा उल्लेख आढळतो. पुलपल्ली येथे सीता-लव-कुश मंदिर असल्याची स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि पुलपल्ली येथेच देवी सीतेने लव आणि कुशला जन्म दिला अशी मान्यता आहे. आश्रम सुंदर आहे. पुलपल्ली सीता-लव-कुश मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिर वायनाड जिह्यात आहे. तेथील आदिवासी समुदाय भगवान  राम आणि सीता यांना त्यांच्या स्वतच्या कुटुंबातील व्यक्ती मानतात. राक्षस बाणासुरमला आणि भगवान कृष्ण यांच्यातील युद्ध बाणासुरमालावर झाले होते. असे मानले जाते की, युद्धादरम्यान कृष्णाने बाणासुराचा करम (हात) कापला आणि म्हणून त्या जागेचे नाव कराबनाम पडले. बाणासूर टेकडीच्या पायथ्याशी असलेले कराबनाम मंदिर या जिह्यात  प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, रावणावर विजय मिळविण्यासाठी ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाखाली भगवान रामाने तिरुनेल्ली मंदिरात प्रार्थना केली. वायनाड जिह्यात  वाल्मिकींचा आश्रम, बाणासूर सागर धरण, कुरुवा आयलॅन्ड, कोडे तलाव, थोलपेटी वन्य जीव अभयारण्य, बांबू कारखाना, वायनाड वन्य जीव अभयारण्य, सोचीपारा फॉल्स, फँटम रॉक, नीलिमाला ह्यू पॉइंट आणि इतर प्रेक्षणीय स्थळे आपण बघू शकतो. हिंदुस्थानला खूप प्राचीन संस्कृतीचे लेणे लाभले आहे. देशातील विविध राज्यांत पुरातन लेण्या आहेत आणि त्याचा इतिहास वेगवेगळा आहे. इडक्कल लेणीहिंदुस्थानातील केरळमधील वायनाड जिह्यातील कलपेट्टापासून 25  किमी (15.5 मैल) दूर इडक्कल येथे दुर्गम ठिकाणी दोन नैसर्गिक गुहा आहेत. त्या म्हैसूरच्या उंच पर्वतांना मलबार किनाऱयावरील बंदरांशी जोडणाऱया प्राचीन व्यापारी मार्गाजवळ अंबुकुट्टी माला येथे समुद्रसपाटीपासून 1,200  मीटर आणि 3,900  फूट उंचीवर आहेत. गुहांच्या आतील भागात सचित्र लेखन आहे, जे या प्रदेशात  वस्ती असल्याचे सूचित करतात. ब्रिटिश काळात 1890 मध्ये तत्कालीन मलबार राज्याचे पोलीस अधिकारी फ्रेड फॉसेट यांनी या गुहांचा शोध लावला होता, पण कयास आहे की आदिवासींना ही लेणी परिचित असावी. त्यांनी  मानववंश शास्त्राrय आणि ऐतिहासिक महत्त्व लगेच ओळखले होते. आणि त्यावर  एक लेख लिहिला होता त्यामुळे अनेक पर्यटकांमध्ये या लेण्यांबाबत आकर्षण निर्माण झाले. इडक्कलच्या पाषाणयुगीन लेण्यावरील कोरीवकाम दुर्मिळ आहे.

खडकाचा तुकडा फुटल्यामुळे 30 फूट खोल भाग आहे. येथे एका बाजूला लाखो टन वजनाचा खडक आहे जो गुहेचे ‘छत’ असल्यागत भासते. गुहेत जे कोरीव काम तसेच मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्यांचे आणि काही अज्ञात चिन्हे बघून असे  वाटते की, इडक्कल लेण्यांमध्ये इतिहासात वेगवेगळय़ा ठिकाणी अनेक वेळा विविध समुदायांची वस्ती होती.

या गुहेला ‘अम्पकुठय  माला’ असेही म्हणतात. कारण रामाचे पुत्र लव आणि कुश यांनी डोंगरावर बाण मारून गुहा निर्माण केली होती असे मानले जाते, पण चित्रांचा सिंधू संस्कृतीशी संबंध असावा असा तर्क आहे.

केरळ राज्य पुरातत्व विभागाचे इतिहासकार लिहितात, ‘येथील प्रतीकांचा शोध हा हडप्पा संस्कृतीशी मिळताजुळता आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने द्रविडीयन संस्कृती आहे आणि सांस्कृतिक प्रसार झाल्याची साक्ष आहे. सिंधू संस्कृती अचानक नाहीशी झाली असे मानणे चुकीचे आहे. इरावथम महादेवन, सिंधू खोरे आणि गेहसूस लिपींचे अभ्यासक म्हणाले की, हे निष्कर्ष अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि ऐतिहासिकदृष्टय़ा त्याला महत्त्व आहे. केरळमधील ही लेणी प्रसिद्ध असली तरी  शेंथुरिनी (शेंदुर्नी) जंगलातील पाषाणयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेश आणि रामायण यांचा संबंध आहे, परंतु दक्षिण हिंदुस्थान आणि रामायण, महाभारत यांच्या संबंधावर अभ्यासकांनी आपले मत मांडणे जरुरी असून त्यामुळे अनेक शंकांचे समाधान होण्यास मदत होईल हे नक्की.

varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.

भटकंती – केरळमधील प्राचीन शिवमंदिरे

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळ कोट्टायाम जिह्यात वसलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्याने आणि आध्यात्मिक महत्त्वाने आकर्षित तर करतेच, पण वेंबनाड सरोवराने वेढलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या सुंदर पाणवठे आणि शांत वातावरणाने मोहीत करते. हेच ठिकाण वायकोम सत्याग्रहाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जो सत्याग्रह झाला होता त्याचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पेरियार रामासामी यांनी केले होते. एर्नाकुलम, अलप्पुझा आणि कोट्टायम येथून वायकोमला सहज पोहोचता येते. येथील पन्ना मुरिन्जापुझा बॅकवॉटर आणि हिरवा गालिचा विणलेला निसर्ग पर्यटकांना वेड लावतो.

परंपरेनुसार केळीच्या पानांवर दिल्या जाणाऱ्या ओनासाध्याचा (केरळी जेवण) आणि गोड ताडीचा आस्वाद घेणे आनंददायी अनुभव आहे. येथील मुख्य आकर्षण श्री वायकोम महादेव मंदिर हिंदू देव शिवाला समर्पित आहे. हे मंदिर अशा काही मंदिरांपैकी एक आहे जे शैव, शिव आणि वैष्णवांचे अनुयायी, विष्णूचे अनुयायी या दोघांनीही पूज्य मानले आहे. वायकोममध्ये शिवाला प्रेमाने ‘वायकोम स्वामी वैक्कथप्पन’ म्हटले जाते. येथील शिवलिंग हे हिंदू धर्माच्या दुसऱया युगातील त्रेतायुगातील असल्याचे मानले जाते आणि हे मंदिर केरळमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते.

पारंपरिक कथेनुसार खरा नावाचा राक्षस शैव विद्या उपदेश म्हणजे शैव धर्माचे ज्ञान मिळाल्यावर मलयवनातून सध्याच्या तामीळनाडूतील चिदंबरम या पवित्र शहरात गेला आणि तेथे त्याने मोक्षप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या आणि ध्यानधारणा केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि त्याने मागितलेले सर्व वरदान दिले आणि त्यांच्यापासून काढलेली तीन महान लिंगे त्याला दिली. शिव यांनी खराला मोक्ष मिळविण्यासाठी लिंगांची पूजा करण्यास सांगितले आणि ते अदृश्य झाले. खरा राक्षसाने ती शिवलिंगे त्याच्या उजव्या हातात, एक डाव्या हातात आणि गळय़ात घातली व तो तीन लिंगांसह हिमालयातून दक्षिणेकडे परत येत होता. या ठिकाणी आल्यावर थकवा जाणवला म्हणून त्याने शिवलिंग खाली ठेवली. विश्रांतीनंतर जेव्हा त्याने शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हलले नाही. तेवढय़ात आकाशवाणी झाली. “जो माझा आश्रय घेईल त्याला मी मोक्ष देऊन येथेच राहीन!” खराने शिव यांची अट मान्य केली आणि मुक्ती मिळाल्यानंतर शिवलिंगांना व्याघ्रपद नावाच्या ऋषींच्या ताब्यात देऊन त्यांना संरक्षण आणि पूजा करण्यास सांगितले. मल्याळम दिनदर्शिकेनुसार वृचिका अष्टमीच्या दिवशी शिव आणि पार्वती व्याघ्रपदा ऋषींच्या समोर प्रकट झाले. शिवपार्वतीने हे स्थान ‘व्याघ्रपदपुर्म’ म्हणून ओळखले जाईल असा आशीर्वाद दिला.

व्याघ्रपद यांनी काही काळ भक्तिभावाने पूजा चालू ठेवली आणि शिव इच्छेनुसार तीर्थयात्रेला निघून गेले. एके दिवशी परशुराम त्या ठिकाणाहून जात होते. शुभचिन्हे आणि काही चमत्कारिक जाणवले म्हणून ते थांबले असता त्यांना स्वर्गीय किरण उत्सर्जित करणारे एक शिवलिंग पाण्यात बुडलेले दिसले. ते खरा राक्षसाने ठेवलेले शिवलिंग असल्याचे त्यांना समजले. परशुरामांनी विचार केला की, पृथ्वीवरील सर्वात पवित्र व्याघ्रपदपुर्मा हे स्थान मुक्ती प्राप्त करू इच्छिणाऱया भक्तांसाठी एक उत्तम आश्रय असू शकते. त्यांनी प्रार्थना व पवित्र मंत्रांचे पठण करून येथे शिवलिंगाची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव पत्नी पार्वतीसह परशुरामांसमोर प्रकट झाले. हे शिवलिंग त्यांचे परमभक्त परशुरामांनी रीतीरिवाजांनी आणि संस्कारांनी पवित्र केले आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.

आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या परशुरामांनी येथे एक मंदिर बांधले आणि गावातील एका उच्चभ्रू ब्राह्मणाकडे सोपवले. शिवाची पूजा करण्यासाठी आवश्यक पवित्र मंत्र, कार्यपद्धती, श्लोक शिकवले आणि त्यांना मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून दीक्षा दिली. परशुरामांनी संपूर्ण मंदिर ब्राह्मणाला दान केले आणि अंतर्धान पावले. मंदिर व त्याच्याशी निगडित चालीरीती आणि संस्कार हे परशुरामांनीच नियोजित, निश्चित केले आहेत अशी श्रद्धा आहे.

गावकरी सांगतात जुन्या काळात हे मंदिर 108 कुटुंबांच्या मालकीचे होते. काही वादांमुळे ते दोन गटांत विभागले गेले. त्यातील एक गट राजाच्या बाजूने सामील झाला. त्यांच्यातील वाद आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत गेली. एके दिवशी दुपारच्या वेळी दुभंगलेल्या गटाचा एक गट मंदिरात आला. एका गटाचा प्रमुख नजलाल नंबुथिरी पूजा थांबवण्यासाठी मंदिरात घुसला. त्या वेळी देवतेला अर्पण केलेले अन्न नैवेद्य मंडपाच्या हॉलच्या पश्चिमेला ठेवले जात असे. नजलाल नंबूथिरी यांनी पश्चिम दरवाजातून प्रवेश केला आणि शिवाची पूजा, नैवेद्य विस्कळीत केला. परत जाताना त्याला एका विषारी सापाने दंश केला. पश्चिमेकडील दरवाजाबाहेर त्याला मृत्यूने गाठले. त्यानंतर गाभाऱयाचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि गर्भगृहाच्या आतून एक स्वर्गीय आवाज ऐकू आला, “हा पश्चिम दरवाजा आता उघडू नये!” नजलाल नंबुथिरीच्या पूजेच्या व्यत्ययाविरुद्ध शिवाचा ाढाsध भक्तांनी बघितला. नंबुथिरीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या प्रांगणाचा पश्चिम दरवाजा कायमचा बंद करण्यात आला आहे. हे मंदिर केरळमधील सर्वात मोठय़ा मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसर आकर्षक आहे. नदीच्या वाळूने सपाट केलेला परिसर चारही बाजूंना चार गोपुरम किंवा प्रवेशद्वाराच्या बुरुजांसह कंपाऊंड भिंतींनी संरक्षित आहे. मंदिर उत्तर-दक्षिण दिशेला पाच अंश झुकलेले आहे. गर्भगृह वरवर पाहता गोलाकार आकाराचे आहे आणि त्यावर तांब्याचे पत्रे, दोन दालने आहेत. केरळमधील हे एकमेव मंदिर आहे, ज्यात अंडाकृती आकाराचे गर्भगृह आहे. पण बाहेरून ते गोलाकार मंदिरासारखे दिसते. अप्रतिम मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. मुख्य मंडप, पहिला खांब असलेला सभा मंडप, कक्ष आकाराच्या दगडी आणि एकाच लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. भिंती आणि खांब खूप मजबूत आहेत. गर्भगृह कक्ष पूर्णत दगडात बांधलेले आहे आणि छताचा चौकोनी आकार आहे. गर्भगृहातून सहा पायऱया ओलांडून गेल्याशिवाय आपल्याला शिवलिंगाचे दर्शन घेता येत नाही. या मागचे विलक्षण सत्य असे की, या सहा पायऱया ओलांडणे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सरी स्वभाव या सहा अशुद्धता सोडून देणे आणि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करणे होय.

varshakisane@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

मंदिरांच्या प्रदेशात

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

हिंदुस्थानचे केरळ राज्य देशी आणि परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण केरळ स्वच्छता आणि सुंदर निसर्ग, प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ आणि विविध देवतांचे निवासस्थान यासाठी ओळखले जाते. अलाप्पुझाचे बीचेस आणि बॅक वॉटर अप्रतिम आहेत, पण अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझापासून तीन किमी पूर्वेला करुमाडी हे गाव आहे. या भागातील श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर भेट देण्यासारखे आहे. करुमाडी गावातील श्रीकृष्ण मंदिराजवळ करुमादिक्कुत्तन, अर्धी तुटलेली बुद्ध मूर्ती सापडली होती. हे विहार बुद्धाच्या काळ्या ग्रॅनाइटच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ही बुद्ध मूर्ती 9व्या शतकापासून 14व्या शतकाच्या कालखंडातील आहे, असे इतिहासकार सांगतात. असे म्हणतात की, या काळात केरळमध्ये बौद्ध धर्माची भरभराट झाली. या विहाराला  राज्याच्या इतिहासात आणि पर्यटनात खूप स्थान आहे, कारण केरळमध्ये बुद्धाची मूर्ती असलेले हे एकमेव विहार शिल्लक आहे.

केरळच्या प्रदेशात अय राजा वरगुणाच्या काळात बौद्ध धर्माची भरभराट झाली. त्याच्या कारकिर्दीत, बौद्ध भिक्षूंनी बुद्धाला समर्पित अनेक मंदिरे आणि मठांची रचना केली. पण जसजसा हिंदू राजाने प्रदेश ताब्यात घेतला तसतसा बौद्ध धर्म हळूहळू राज्यातून नाहीसा होऊ लागला. खरे तर अल्लापुझा आणि कुलियनच्या किनारी भागातून बुद्धाच्या मोठय़ा प्रमाणात प्रतिमा उत्खननात सापडल्या आहेत.

पण करुमादिकुटन मंदिरातील बुद्धाची मूर्ती या सर्वांच्या वर आहे. या मंदिरातील बुद्धाची मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. असे मानले जाते की हे मंदिर एका बौद्ध भिक्खूने बांधले होते, जे बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी केरळमध्ये आले होते. या काळ्या ग्रॅनाइटच्या बुद्ध मूर्तीबद्दल आणखी एक भाग म्हणजे ती अर्धी तुटलेली आहे. दलाई लामा यांनी 1965  मध्ये करुमाडीला भेट दिली होती. सत्ता असताना प्रत्येक धर्माच्या प्रमुखाने आपल्या धर्माला महत्त्व दिल्याचे लक्षात येते.

  त्याचप्रमाणे अदूरपासून सुमारे 11 किमी अंतरावर असलेल्या पल्लीक्कल येथे बुद्ध मूर्ती मस्तक नसलेली आढळली. करुणागपल्ली येथील बुद्धाची मूर्ती, मंदिराच्या कुंडात सापडलेली ही मूर्ती कदाचित आजपर्यंतची सर्वोत्तम मूर्ती आहे. केरळ राज्य पुरातत्व विभागाने 1980 पर्यंत ते ताब्यात घेतले तेव्हापर्यंत अनभिज्ञ स्थानिक लोकांनी त्या मूर्तीची माहिती नसल्यामुळे सामान्य दगडासारखा कपडे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला. ही मूर्ती सध्या कृष्णपुरम पॅलेस संग्रहालय, कायमकुलम येथे संरक्षित आहे.

थोडय़ा किलोमीटरवर इतरही मंदिरे आहेत, पण जवळचे कृष्ण मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जे चेंबकसेरीचे तत्कालीन शासक श्री पूरदम थिरुनल देवनारायणन थमपुरन यांनी 15 व्या – 17 व्या काळात बांधले होते. अंबालापुझा श्रीकृष्ण मंदिराला दक्षिणेकडील द्वारका म्हणून संबोधले जाते. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर भगवान कृष्णाला पार्थसारथीच्या रूपात विराजमान करते – महाभारत युद्धादरम्यान घेतलेला भगवान कृष्णाचा एक पैलू, भगवान कृष्ण येथे उन्निकन्नन (बाल कृष्ण) म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील कृष्णाची मूर्ती काळ्या ग्रेनाईट दगडात कोरलेली असून उजव्या हातात चाबूक आणि डावीकडे शंख आहे. असे मानले जाते की एक दिवसीय पूरदम थिरुनल थमपुरन आणि संत विलवामंगलम स्वामीयार बॅक वॉटरच्या बाजूने प्रवास करत होते आणि तेवढय़ात त्यांना बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. अशी आख्यायिका आहे की, कृष्णाचे निस्सीम भक्त संत विलवामंगलम स्वामीयार यांना पिंपळाच्या झाडावर बासरी वाजवताना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. देवाचे अस्तित्व जाणवून थंपुराने या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. गुरुवायूर मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती 1789 मध्ये टिपू सुलतानच्या छाप्यांमध्ये सुरक्षिततेसाठी येथे आणली गेली होती. हे मंदिर त्याच्या अद्वितीय प्रसादम, (प्रसाद) स्वादिष्ट अंबालापुझा पल्पयासम – तांदूळ, दुधापासून बनविलेले गोड खिरीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

त्याचप्रमाणे हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध कला प्रकार – ओट्टामथुल्लल यांच्या जन्माशी संबंधित आहे. प्रख्यात मल्याळम कवी कलक्कथ्थु कंचन नांबियार यांनी अंबालपुझा मंदिर परिसरात या अनोख्या कलाप्रकाराला जन्म दिला. कुंजन नांबियार यांनी वापरलेला मिझावू (परफॉर्मिंग आर्टस्मध्ये तालवाद्य म्हणून वापरला जाणारा एक मोठा तांब्याचा ड्रम) आजही मंदिरातील एका कडय़ामध्ये जतन केलेला आहे. थुन्जाथु एझुथाचन, ज्यांना मल्याळम भाषेचे जनक मानले जाते, त्यांनी मंदिरात अध्यात्म रामायणम किलिपट्टू (रामायण आणि महाभारतम किंवा महाभारताचा अनुवाद) लिहिला असे मानले जाते. या दोन मूर्ती एकाच काळ्या ग्रॅनाइट पाषाणात बनवलेल्या आहेत.

श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर जवळ जवळ आहे. या भागात गेलात तर या दोन्ही मंदिरास भेट देता येते आणि निसर्गासोबत ऐतिहासिक दोन्ही मंदिरेही बघता येतात. अलाप्पुझा येथील रेल्वे स्टेशन राज्यातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते मार्च हा आहे.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.) 

varshakisanc@gmail.com




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...