Friday, December 27, 2024

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप

 

मारुतीच्या शेपटी सारखा वाढतच चाललेल्या लॉकडाऊन कालावधीचा फारच कंटाळा आलेला असतानाच्या काळात मिपावर दुर्गविहारी ह्यांची गोव्यातल्या किल्ल्यां बद्दलची सुंदर माहितीपुर्ण लेखमालिका आणि गोरगावलेकर ताईंची कोकण व तळ कोकणातल्या भटकंतीची मस्त मस्त प्रवासवर्णने वाचून असे काही टेम्पटेशन आले होते की ह्या आधीच्या कोकण-गोवा भेटींमध्ये तिथल्या अनेक बघायच्या राहिलेल्या गोष्टी पहाण्यासाठी प्रवासावरचे निर्बंध थोडेफार शिथिल झाल्यावर त्वरीत ह्या ठिकाणांना भेट देण्यापासुन स्वतःला रोखू शकलो नाही.

COVID-19 मुळे लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध स्थानिक परिस्थिती नुसार काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात कायम असल्यामुळे तर काही अन्य कारणांमुळे ठरवलेल्यापैकी सगळीच ठिकाणे पाहता आली नसली तरी काही किल्ले, मंदिरे आणि समुद्रकिनारे अशा याआधी न बघीतलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात केलेल्या कोकण, तळ-कोकण आणि गोवा सफरीत बघता आल्या.

बायकोचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असले तरी असे अचानक पंधरा-वीस दिवसांसाठी बाहेर पडणे तिला शक्य नव्हते मग एकट्यासाठी कार घेऊन जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याने माझ्या ‘पल्सर १५०’ ह्या बाईक वरून ही सोलो रोड ट्रिप करण्याचा निर्णय घेतला.

कोकण, तळ कोकण आणि गोव्यातल्या अनेक भागांत पर्यटन तसेच इतरही काही कारणांसाठी कित्येकदा जाणे झाले असले तरी किनारी मार्गाने मात्र कधी प्रवास घडला नव्हता त्यामुळे ज्या ठिकाणचे रस्ते सुस्थीतीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली तेवढा प्रवास किनारी मार्गाने करायचे ठरवले आणि त्या अनुषंगाने गुगल मॅप्सच्या सहाय्याने प्रवासाचे सोयीस्कर मार्ग, एकुण अंतर ह्याचा अभ्यास करून मुक्कामाची ठिकाणे निश्चित करायला घेतली.

थोड्या अभ्यासांती खालील प्रमाणे
ट्रिपचा कच्चा आराखडा तयार झाला.

जातानाच्या प्रवासात
पेण - भरणे नाका - रत्नागिरी - कुडाळ ह्या प्रत्येक ठिकाणी १ रात्र मुक्काम.

पाचव्या दिवशी गोव्यात पोहोचल्यावर ४ ते ५ रात्री करमळीला मुक्काम करुन
गोव्यातील शक्य तेवढे किल्ले पाहुन झाल्यावर कुडाळ - रत्नागिरी - भरणे नाका असा उलट क्रमाने परतीचा प्रवास करत ह्या तिन्ही ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रत्येकी ४ ते ५ रात्री मुक्काम.

करमळी, कुडाळ, रत्नागिरी आणि भरणे नाका ह्या ठिकाणांना केंद्रस्थानी ठेउन त्यांच्या आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जाऊन येऊन होणाऱ्या सुमारे दोन हजार किलोमीटर्सच्या ह्या प्रवासासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतील ह्याचा अंदाज आला. अर्थात एवढे दिवस लागण्यामागे दोन कारणे होती.

पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे आता काही त्रास होत नसला तरी आधी केलेल्या अति बाईकिंग मुळे मणक्यातली गॅप कमी होऊन उद्भवलेल्या नर्व्ह कॉम्प्रेशनच्या समस्येमुळे असह्य पाठदुखीने बेजार होऊन गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये ॲडमीट व्हावे लागले होते.

तिथून सुटका होताना मिळालेला (पण माझ्यासाठी प्रत्यक्ष आचरणात आणण्यास अशक्य कोटीतला असा 😀) 'ह्यापुढे कधीही बाईक न चालवण्याचा' डॉक्टरी सल्ला खुंटीला टांगून ही सफर बाईकवरून करण्याचा मांडलेला प्रस्ताव घरच्या मंडळींकडून बिनविरोध पास करून घेण्यासाठी सलग मोठ्या अंतराचे टप्पे गाठण्याचे टाळुन एखाद दुसरा अपवाद वगळता दिवसभरातला प्रवास जास्तीत जास्त शंभर ते सव्वाशे की.मी. एवढा मर्यादित राहील अशा प्रकारे दौऱ्याची एैसपैस आखणी केली होती.

आणि दुसरे कारण म्हणजे पुर्वीपासुनच पर्यटन करताना घाई-गडबड, अनावश्यक दगदग टाळुन शरीराला व पर्यायाने मनाला कष्ट / त्रास होऊ न देता निवांतपणे आणि प्रसन्न चित्ताने भटकंती करत पर्यटन स्थळांचा आनंद घेणे पसंत असल्याने रोज प्रवास न करता अधेमधे विश्रांती घेण्यासाठी काही मोकळे दिवसही त्यात धरले होते.

सर्व प्रवासासाठी ठरवलेल्या मार्गांचे आणि पर्यायी मार्गांचे गुगल मॅप्सवर साठवून ठेवलेले नकाशे आणि मुक्कामासाठी निश्चित केलेली ठिकाणे ह्या दोन गोष्टी सोडल्या तर कुठलेही नियोजन नसलेली पण त्यामुळेच अगदी लवचिक, स्वछंद, उनाड अशी ही भटकंती होती.

एक दिवसही कुठल्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा नसल्याने अमुक तारखेला तमुक ठिकाणच्या हॉटेलमध्ये बुकिंग केले आहे म्हणून त्या दिवशी तिथे पोचलेच पाहिजे असेही काही बंधन नव्हते त्यामुळे आणखीन दोन-चार दिवस वाढले किंवा कमी झाले तरी काही फरक पडत नव्हता.

ऑफिसची कामे मार्गी लावल्यानंतर २० जानेवारी २०२१ रोजी घरी जेवण झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास मी सहलीला सुरुवात केली आणि प्रवासातील पहिला टप्पा गाठण्यासाठी पेणच्या दिशेने निघालो.

पळस्पे फाट्यावर चहा पिण्यासाठी एक दहा-पंधरा मिनिटांचा थांबा घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करून सव्वा पाचच्या सुमारास ७५ की.मी. चा प्रवास पूर्ण करून पेणच्या जवळ असलेल्या आमच्या विकएंड होमवर पोचलो.

घरी जाऊन थोडावेळ आराम केला आणि मग फ्रेश होऊन एका पूर्व नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी साडे सहाला खाली उतरलो.

पहिल्या लॉकडाऊनचा संपूर्ण कालावधी मी ह्या ठिकाणी व्यतीत केलेला असल्याने आता इथला मित्रपरिवार चांगलाच विस्तारला आहे. मी आज इकडे मुक्कामाला येणार आहे हे माहित असल्याने आमच्या घरापासून चालत पाच सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर संध्याकाळी सात वाजता आमची सहा जणांची मैफिल रंगणार होती तिथे जायला चालत निघालो.

माझ्या आधी दोन मेम्बर्स चिकन आणि ब्लेंडर्स प्राईडच्या २ बाटल्या घेऊन तिथे पोचले होते. आज काय विशेष विचारले तर म्हणे स्टार्टर म्हणुन कौलावर बनवलेला चिकन सुक्खा आणि नंतर जेवायला शाही बिर्याणी असा मेनू ठरवला आहे.

रायगड जिल्ह्यात फार्म हाऊसवर होणाऱ्या पार्टीज मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यांमध्ये जणू काही अलिखित नियम असल्या प्रमाणे स्टार्टर म्हणुन बहुतेक वेळा 'पोपटी' लावली जाते.
मातीच्या मडक्या मध्ये तळाला आणी मधे भांबूर्डीचा पाला वालाच्या/पावट्याच्या शेंगा, बटाटे, अंडी आणि चिकन अशा गोष्टी भरल्यावर पुन्हा भांबूर्डीचा पाला भरून मडक्याचे तोंड बंद केले जाते. मग ते मडके उपडे ठेऊन त्याच्या भोवती लाकडे आणी भरपूर पेंढ्याचा ढीग रचून जाळ पेटवला जातो. त्यात घातलेल्या वालाच्या/पावट्याच्या शेंगा, बटाटे, अंडी आणि चिकन अशा गोष्टी भांबूर्डीच्या पाल्यातील पाण्याच्या अंशावर चांगल्या शिजतात आणि चवीलाही फार छान लागतात.

पोपटी बरेचदा खाल्ली आहे आणि आवडतेही, इतकेच नाही तर मला ती लावताही येते. पण आज ह्या मंडळींनी कौला वरचे चिकन ही काहीतरी नवीनच टूम काढली होती. निदान माझ्यासाठी तरी हा प्रकार नवीन होता.

फार्म हाऊसचा केअर टेकर आणि त्याची बायको हा पदार्थ बनवण्यासाठी चिकन मॅरीनेट करण्याच्या तयारीला लागले तोवर बाकीचे तीन मेम्बर्सही हजर झाले.

सगळ्यांच्या गळाभेटी झाल्यावर मग प्याले भरले गेले आणि गप्पा सुरू झाल्या.
ह्या पाच जुन्या मित्रांच्या ग्रूपमध्ये माझा प्रवेश गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात झाला असला तरी आम्हा सर्वांचे खुप घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत.

धमाल मस्तीच्या वातावरणात मीठ आणि चाट मसाला भुरभुरलेल्या काकडी, गाजर, टोमॅटो आणि बिटच्या चकत्या खात व्हिस्कीचा पहिला राउंड झाल्यावर एकाने ते कौलावरचे चिकन बनवायला घेण्याचे फर्मान सोडले.
केअर टेकरने त्यासाठी बाहेर काही दगड रचून चुल वगैरे मांडुन त्यावर दोन कौले ठेउन बाकी सगळी तयारी केलेली होतीच, फर्मान ऐकल्यावर त्याने जाळ पेटवला. मला तो प्रकार कसा बनवतात हे बघायची उत्सुकता होती त्यामुळे मीही बाहेर आलो.

कौलावरचे चिकन

1

2

बनवताना तेलाचा मुबलक वापर करावा लागत असला तरी हा पदार्थ त्यावर थोडे लिंबु पिळुन खाताना चवीला मात्र एकदम झकास लागत होता. सलाड आणि ह्या चिकन सुक्खा सोबत चौथा राउंड सुरू असताना साडे दहाच्या सुमारास आमच्या बरोबर असलेल्या मित्राच्या हॅाटेलचा कर्मचारी रिक्षाने शाही बिर्याणीचा टोप, रायता आणि पापड घेउन आला.

साडे अकरा वाजता जेवण झाल्यावर दोन गाड्यांतुन सर्व जण आपापल्या घरी जायला निघालो. अगदीच जवळ घर असल्याने पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मला सोडल्यावर बाकीची मंडळी पेणच्या दिशेने निघुन गेली.

उनाड भटकंतीच्या सलामीचा दिवस आणि गोव्याला जाण्यापुर्वीचा ‘वॅार्म अप’ छान झाला होता 😀

उद्याचा भरणे नाक्यापर्यंतचा प्रवास १४५ कि.मी. चा होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत निघुन अगदी रमत गमत गेलो असतो तरी पाच वाजेपर्यंत पोचणे सहज शक्य असल्याने सकाळी लवकर उठण्याची गरज नव्हती.


कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २

सकाळी नऊच्या सुमारास जाग आली.

काल येताना दुध आणायचे राहुन गेले होते पण घरात Dairy Whitener होते, ते घालुन चहा बनवून प्यायला आणि नाष्ट्यासाठी पेण मधील श्री ऊपाहार हॅाटेलचे मेनु कार्ड बघुन ‘आज स्पेशल’ विभागात वारा नुसार दिलेल्या यादीतील गुरूवारी मिळणाऱ्या छोले भटुऱ्यांची ॲार्डर व्हॅाट्सॲपवर दिली.

ह्या हॅाटेल मध्ये अजुन प्रत्यक्षात कधी गेलो नव्हतो पण होम डिलेव्हरी मिळत असल्याने पहिल्या लॅाकडाऊन काळात इथून नाश्ता/जेवणासाठी बरेचदा मागवलेले सर्वच पदार्थ छान असायचे.

मेनू कार्ड

पलीकडून साडे दहा पर्यंत डिलेव्हरी मिळेल असा रिप्लाय आल्यावर मग अंघोळ आणि बाकी सर्व तयारी झाल्यावर पार्सलची वाट बघत बसलो. सांगीतलेल्या वेळेवर डिलेव्हरी मिळाली. नाश्ता झाल्यावर परत चहा करून प्यायला आणि कप, प्लेट्स धुण्याचे कंटाळवाणे काम उरकल्यावर साडे अकराच्या सुमारास पुढच्या प्रवासाला निघालो.

खोपोली - पेण हायवे वरून पेण बायपास रोडसाठी उजवे वळण घेऊन दहा मिनिटात तरणखोपला पोचून डावे वळण घेतल्यावर राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (NH-66) वरून पुढचा प्रवास सुरु झाला.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असले तरी अजून पूर्वीसारखी प्रचंड राहादारी सुरु झाली नसल्याने दोन वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पर्यंतचा १२० किलोमीटर्सचा पल्ला गाठता आला.
कशेडी घाट सुरू होण्याआधी चहा पिण्यासाठी थांबुन हात पाय थोडे मोकळे झाल्यावर पुढच्या २५ कि.मी. अंतराच्या प्रवासाला सुरूवात केली.

घाटात एके ठिकाणी उलटलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजुला करून रस्ता मोकळा करण्याचे काम चालु असल्याने जवळपास अर्धा तास वाहतुक बंद पडली होती. त्यामुळे उरलेले अंतर कापायला बराच वेळ लागला आणि साडे तीनच्या सुमारास भरणे नाक्याच्या ३ कि.मी. अलिकडे, हॅप्पी पंजाबी ढाब्याच्या अगदी समोर असलेल्या ‘पार्थ पॅालिमर्स’ ह्या माझ्या मामे भावाच्या (बोली भाषेत कुठल्याही कंपनीची असली तरी सिंटेक्स ची टाकी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या 😀) पाणी साठवण्याच्या टाक्या (Plastic Water Storage Tank) बनणाऱ्या फॅक्टरीत पोचलो.

हा भाऊ नवी मुंबईला रहात असला तरी कामा निमित्त महिन्यातले साधारणपणे पंधरा-वीस दिवस त्याचा ह्या ठिकाणी मुक्काम होतो. त्याच्या वैयक्तिक वापरासाठी दोन आणि ॲाफीस साठी दोन अशा चार खोल्या फॅक्टरीच्या आवारात बांधलेल्या असल्याने इथे माझी रहाण्याची उत्तम सोय होती.

गेट अडवुन उभ्या असलेल्या ट्रक मध्ये लोडींगचे काम चालु असल्याने बाईक बाहेर रस्त्यावरच उभी करून ट्रकच्या बाजुने आत शिरल्यावर भावाला भेटून रूममध्ये सामान टाकले आणि फ्रेश झालो. आता भुक लागली होती आणि तोही मी येईपर्यंत जेवायचा थांबला असल्याने मग दोघांनी समोरचा हॅप्पी पंजाबी ढाबा गाठला.

हा धाबा चांगला मोठा आहे. सात-आठ वर्षांपूर्वी भावाने पनवेलहुन त्याचा प्लॅंट इथे शिफ्ट केल्या पासुन अनेकदा ह्या ठिकाणी येणे होते. कोकणात किंवा गोव्याला जाता-येतांना जेवायला आम्ही शक्यतो ह्याच धाब्यावर येतो. इथले व्हेज - नॅानव्हेज सगळे पदार्थ चविष्ट असतात.

धाब्यावर गेलं की टेबल खुर्चीवर बसुन जेवण्यापेक्षा मधे लाकडी फळी ठेवलेल्या खाटेवर मस्तपैकी मांडी घालुन बसुन जेवायला आवडत असल्याने आम्ही खाटा टाकलेल्या सेक्शन मधे जाऊन बसलो. चार वाजत आले होते त्यामुळे ह्या आडनीड्या वेळी काय मागवायचे ह्यावर विचार करत न बसतां सरळ दाल तडका, बटर रोटी आणि मसाला ताक अशी ॲार्डर देऊन मोकळे झाल्यावर शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या.

माझा भटकंतीचा कच्चा आराखडा ऐकुन तो चांगलाच ऊत्तेजित झाला. लॅाकडाऊन मुळे सहा महिने फॅक्टरी बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गेले चार महिने इथेच तळ ठोकुन कामगारांच्या बरोबरीने स्वत: राबत असल्याने बिचारा शरीराने आणि मनाने थकला होता. त्यालाही एका ब्रेकची नितांत गरज होती.

कोकणातल्या दुर्गम खेड्यापाड्यांतील वस्त्यांना पाण्याच्या साठवणुकीची व्यवस्था करून देणे तसेच ग्रामीण भागांतील शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवुन देण्याचे सेवाभावी काम करणाऱ्या एका NGO ची घाऊक प्रमाणातली पाण्याच्या टाक्यांची ॲार्डर पुर्ण करण्याच्या कामात तो सध्या व्यस्त होता.
पुढच्या दोन दिवसांत त्याचे हे काम पुर्ण होणार असल्याने मी उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्याऐवजी आणखीन दोन दिवस थांबुन निघालो तर त्यालाही माझ्या बरोबर ह्या सफरीवर येणे शक्य असल्याचे त्याने सांगितल्यावर “एक से भले दो” म्हणत आनंदाने त्याचा प्रस्ताव मान्य करून उत्साहाच्या भरात कचा कच हिरव्या मिरच्या खात, ताक पित जेवण झाल्यावर आम्ही फॅक्टरीत परत आलो.

सात वाजता जवळच्या कळंबणी गावात रहाणारा मशिन ॲापरेटर आणि एक स्थानिक हेल्पर मशिन बंद करून घरी जायला निघे पर्यंतचा वेळ प्रोडक्शनची प्रोसेस बघण्यात मस्त गेला. वर्क शेडच्या मागे बांधलेल्या खोपटात रहाणाऱ्या दोन परप्रांतीय हेल्पर्सनी बाकीची आवरा आवर करायला घेतल्यावर आम्ही रूम मध्ये आलो.

मागच्या खोपटात रहाणारे पंकज आणि बाबु हे झारखंडचे दोन वीस-बावीस वर्षीय हेल्पर्स स्वयंपाकाचे काम आळीपाळीने करत असल्याने शुद्ध शाकाहारी असलेल्या भावाला घरगुती जेवण मिळत असल्याने त्याच्या जेवणाची सोयही चांगली होते.

रात्री साडे नऊच्या सुमारास हॅप्पी धाब्यावरून मागवलेल्या तंदुर रोट्या आणि पंकजने कच्चे टोमॅटो घालुन बनवलेली हरभऱ्याची उसळ टाईप चवीष्ट भाजी असे जेवण झाल्यावर आवारातच शतपावली घालुन आम्ही रूमवर परतलो. थंडी चांगलीच जाणवत असल्याने उबदार पांघरूणात शिरल्यावर झोपही पटकन लागली.


सकाळी दहाच्या सुमारास जाग आली. ब्रश करून वर्क शेड मध्ये आलो तेव्हा भावासहित सगळे जण कामाला लागलेले दिसले. खोपटात बाबूने कांदे पोहे आणि चहा बनवून ठेवला होता तिकडे चक्कर टाकली आणि चहा नाश्ता केल्यावर पुन्हा वर्क शेड मध्ये आलो तेव्हा तयार झालेली 2 टाक्यांची आजची पाहिली बॅच ओव्हरहेड क्रेनच्या साहाय्याने मशीन मधून बाहेर काढण्याचे काम चालू होते.

पोत्यामधून आलेल्या पावडरचे पूर्णपणे तयार झालेल्या टाकीत रूपांतर होण्याची प्रक्रिया फार रंजक असते!

त्या दिवशी आणि त्याच्या पुढच्या दिवशी उत्पादन प्रक्रिया नुसती बघत न बसता त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने वेळही मजेत गेला आणि ओव्हरहेड क्रेन ऑपरेट करून वजनदार धातूचे मोल्ड्स उचलून मशीनच्या चक मध्ये व्यवस्थित बसवता येणे, मशीनच्या तळाशी असलेल्या गॅस बर्नर्स मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने चक वर सतत फिरत असणाऱ्या मोल्ड्सच्या आत कच्च्या मालाच्या स्वरूपात भरलेले प्लास्टिकचे दाणे/पावडर वितळल्यावर ते द्रवरूप प्लास्टिक मोल्डच्या तळाशी आणि तोंडाशी समप्रमाणात पसरण्यासाठी, काही लीव्हर्स पुढे मागे करत मशीन सी-सॉ सारखी हलती ठेवणे, निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा मशीन मधले मोल्ड्स क्रेनने बाहेर काढून थोड्या अंतरावर नेऊन ठेवणे, मोल्ड्स थंड झाल्यानंतर त्यातून तयार झालेल्या टाक्या बाहेर काढल्यावर त्यावर स्क्रीनच्या साहाय्याने ब्रॅण्डिंग करणे अशा खूप काही नवीन गोष्टी शिकून त्या प्रत्यक्षात करायलाही मिळाल्या.

ऑर्डर पूर्ण होण्यासाठी आवश्यक तेवढे उत्पादन झाल्यावर फॅक्टरीची धुरा ऑपरेटर आणि कामगारांच्या हाती सोपवून 24 तारखेला जेवण करून दुपारी एक वाजता आम्ही दोघे रत्नागिरीला जायला निघालो.

हा प्रवास किनारी मार्गाने करायचे ठरवले होते. तिथून 33 की.मी. वर असलेल्या दापोलीच्या एका डीलरकडे भावाचे थोडे काम असल्याने तिथे एक दहा-पंधरा मिनिटांचा थांबा घेतल्यावर पुढे 30 की.मी. प्रवास करून दुपारी साडे तीनला दाभोळ-धोपावे फेरी बोटी साठी असलेल्या धक्क्यावर पोचलो.

1

बाईक फेरी बोटीत चढवून खाडी ओलांडून धोपावेच्या धक्क्यावर उतरल्यावर दाभोळ पॉवर स्टेशनच्या परिसरातून मार्गक्रमण करत पुढे तवसाळला जाण्यासाठी 47 की. मी. चा प्रवास सुरु केला.
गुहागर, पालशेत, नागझरी, वेळणेश्वर, हेदवी अशी ठिकाणे मागे टाकत संध्याकाळी सहाच्या सुमारास जयगड-तवसाळ फेरी बोटिंसाठीच्या धक्क्यावर पोचलो.

Sunset
तवसाळच्या धक्क्याच्या थोडे अलीकडे टिपलेले सूर्यास्ताच्या आधीचे दृष्य.

आम्ही तवसाळ धक्क्यावर पोचायच्या आधी 5:40 ची बोट निघून गेल्याने पुढच्या 6:40 च्या बोटीसाठी जवळ जवळ पाऊण तास वाट बघावी लागली.

धक्क्यावरून दिसणारी काही दृष्ये
2

3

4

5

6

7

सात-सव्वा सातच्या सुमारास खाडी पलीकडच्या धक्क्यावर उतरून रत्नागिरी-पावस रस्त्यावरील कोळंबे फाट्याजवळ असलेल्या मामाच्या घरी जाण्यासाठीचा 53 की. मी. अंतराचा प्रवास सुरु झाला.

जयगडसाठीच्या धक्क्यावरून झालेले चंद्रदर्शन

8

पर्यटकांसाठी किनारी मार्गांवरचे हे फेरी बोटिंचे प्रवास एक अनुभव घ्यायला किंवा गंम्मत म्हणुन ठीक आहेत पण तासातासाने असलेल्या फेऱ्या आणि गाड्या चढवणे उतरवणे ह्यात वेळ मात्र खूप जातो, त्यात काही कारणाने फेऱ्या रद्द झाल्या तर मग तिष्ठत बसण्याशिवाय पर्याय नसतो.
भरपूर वेळ हाताशी असेल तरच ह्या मार्गाने प्रवास करावा अन्यथा आपला नेहमीचा NH 66 महामार्गच बरा ही गोष्ट ह्या प्रवासाच्या निमित्ताने लक्षात आली.

नऊ वाजता कोळंबे फाट्याच्या अलीकडे नव्याने सुरु झालेल्या एका हॉटेल मध्ये जेवण करून दहाच्या सुमारास तिथून 1 की. मी. वर असलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. शेजारच्यांकडून मामाच्या घराची चावी घेऊन सामान आत टाकले आणि फ्रेश होऊन थोडावेळ गच्चीत जाऊन बसलो.

"आज नऊ तासात जवळपास 165 की. मी. प्रवास झाला होता. गुगल मॅप्स वर बघता हा प्रवास NH66 वरून 135 की. मी.अंतराचा झाला असता आणि चार तासात पूर्ण करता आला असता."

अकरा वाजेपर्यंत निरभ्र आकाशातील तारे बघत गच्चीत बसून गप्पा मारल्यावर खाली आलो आणि निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


आधीचे भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २

सकाळी दहा-सव्वा दहाच्या सुमारास जाग आली ती गाईंच्या हंबरण्याने.
रात्री मेन गेट कडी लावून बंद करायचे राहून गेल्याने बंगल्याच्या आवारात काही गाई आणि वासरे शिरली होती.
मामाने मोठ्या हौशीने कंपाउंडच्या आतल्या बाजूने वाफे बनवून काही झाडांची रोपे लावली होती त्यांची वाट लागू नये म्हणुन लगबगीने बाहेर येऊन त्या गुरा-ढोरांना पिटाळून लावले.

भावाने ह्या कामासाठी बाहेर पडायला टंगळ-मंगळ केली असली तरी गुरांना हुसकावतानाचा माझा फोटो मात्र तत्परतेने टिपला 😀

गुरे हाकताना

उठायला चांगलाच उशीर झाला होता आणि दोघांच्याही अंगात प्रचंड आळस भरला असल्याने आज कुडाळला जाण्याचा बेत रद्द करण्यात आला. मग घरातच मिल्क पावडर वापरून बनवलेल्या चहा सोबत बाकरवडी-चिवडा अशी हलकीशी पोटपूजा उरकून घेतली.

ठाण्याला रहाणाऱ्या मामाने गावी आपले हक्काचे घर असावे अशा उद्देशाने बांधलेल्या ह्या बंगल्यात कायम स्वरूपी कोणी राहत नसले तरी घर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे.

जाता येतानाच्या प्रवासात पाचेक दिवस इथेच मुक्काम करायचा विचार असल्याने येताना भरणे नाक्यावरून आम्ही फ्रोझन पराठ्यांची पाकीटे आणलेली होती, फक्त भाजी घरी बनवावी किंवा हॉटेलमधून पार्सल आणावी लागणार होती.

एकच्या सुमारास भावाने कोळंबे फाट्यावर जाऊन शेव भाजी पार्सल आणल्यावर तव्यावर पराठे भाजून जेवण झाल्यावर तीन वाजेपर्यंत थोडी झोप काढली.

सकाळी अंघोळीला फाटा दिला होता त्यामुळे समुद्रावर जाऊन डुंबण्याच्या विचाराने साडेतीन वाजता तिथून पंधरा-सोळा की. मी. वर असलेल्या 'पूर्णगड' किल्ल्या जवळच्या गावखडी बीच वर जायला निघालो.

पूर्णगड गाव आणि गावखडी गावाला जोडणारा मुचकुंदी खाडिवरील पूल ओलांडला की लगेच उजव्या बाजूला सुरूच्या बनांमागे लपलेला हा बीच फारच छान आहे.
ह्या भागात पर्यटकांची वर्दळ नगण्य असल्याने इथे अजिबात गर्दी नसते, त्यामुळे हा समुद्रकिनारा पण एकदम स्वच्छ आहे.

गावखडी बीच 1

गावखडी 2

उजवीकडे मुचकुंदी नदी समुद्राला येऊन मिळाल्याने तयार झालेली खाडी तर समोरच्या टेकडीवर गर्द झाडीत लपलेला पूर्णगड किल्ला.

गावखडी 3

गावखडी बिचचा 360 अंशांतला छोटासा व्हिडीओ.

पाच-सव्वा पाच पर्यंत येथेच्छ समुद्रस्नान झाल्यावर तिथून निघालो आणि हाताशी वेळ होता म्हणुन परतीच्या रस्त्यावर पावस बुद्ध विहाराच्या फाट्यावर उजवीकडे वळून मावळंगे गावात राहणाऱ्या आईच्या मावस भावाकडे एक धावती भेट द्यायला निघालो.

पावस, कोळंबे ह्या ठिकाणी आधीही येणे झाले असले तरी मी अद्याप मावळंग्याला ह्या मामाकडे कधीच आलो नव्हतो, पण बरोबर असलेल्या भावाचे इथे बऱ्याचदा येणे झाले असल्याने मुख्य रस्त्यावरच्या गोगटे स्टॉपवर बाईक उभी करून अधे मधे चिऱ्याच्या पायऱ्या असलेल्या उताराच्या रस्त्याने दोन अडीचशे मिटर चालत खाली येऊन मामाच्या घरी पोचण्यास काही अडचण आली नाही.

तिथे पोचल्यावर मात्र इतक्या वर्षांत इथे का नाही आलो ह्याचा पश्चाताप झाला.

मस्त मोठठे कौलारू घर, घराच्या मागे नारळ, सुपारी, आंबे, फणसांची बाग आणि बागेच्या मागे खाडी. दिलखुष नजारा एकदम!

चहा पाणी झाल्यावर मागे बागेत फेरफटका मारायला निघालो तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. खाडी किनाऱ्यावरची काही नारळाची झाडे मामाने एका 'माडी' विक्रेत्याला कराराने दिली आहेत त्याचा मनुष्य संध्याकाळची माडी झाडावरून उतरवायला आला होता.
त्याच्या कडून नुकत्याच उतरवलेल्या मडक्यातून एक तांब्याभर माडी घेऊन प्यायल्यावर अस्सल माडीची चव कशी असते ते समजले आणि आत्तापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार पाच वेळा माडी विक्री केंद्रावर पांढऱ्या रंगाचा, गोडसर चवीचा जो पाणचट द्रवपदार्थ प्यायला होता ती खरी माडी नव्हतीच हा साक्षात्कारही झाला

मग थोडावेळ झोपाळ्यावर बसून गप्पा टप्पा झाल्यावर (कधी नाही ते) साडे आठ वाजताच कोकणस्थी पद्धतीचे साधेच पण रुचकर जेवण करून आम्ही मुक्कामी जायला निघालो.

साडे नऊ वाजता मुक्कामी परतल्यावर खाऱ्या पाण्यात डुंबणे झाले असल्याने शॉवर घेऊन कालच्या प्रमाणेच गच्चीत जाऊन बसलो आणि उद्याचा कार्यक्रम ठरवायला घेतला.
आज बाहेर पडायलाच उशीर झाल्याने पूर्णगड किल्ला पाहता आला नव्हता त्यामुळे उद्या किल्ला आणि पावसच्या मंदिरात जायचे ठरवले आणि थोडावेळ गच्चीत टाईमपास करून मग साडे अकराच्या सुमारास झोपायला खाली आलो.


सकाळी साडे नऊच्या आसपास आम्ही उठलो आणि चहा-पाणी झाल्यावर कोळंबे फाट्यावरच्या एका स्नॅक्स कॉर्नर मध्ये जाऊन ग्रील्ड सँडविच आणि कॉफी असा नाश्ता करून तिथूनच दुपारच्या जेवणात पराठ्यांबरोबर खायला एक मिसळ आणि एक्सट्रा उसळ घेऊन घरी परतलो.

आरामात अंघोळी-पांघोळी आणि जेवण झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास पूर्णगड किल्ल्यावर जायला निघालो.
पूर्णगडावर जाण्यासाठीचा रस्ता थोडा फसवा आहे. किल्ला रस्त्याच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर असला तरी पावस - अडीवरे रस्त्यावर गावखडी पुलाच्या अलीकडे मुख्य रस्त्यावरून डावीकडे खाली उतरणाऱ्या उताराच्या रस्त्यावरून गेल्यावर पुलाच्या खालून उजवीकडे जाणाऱ्या खाडी किनाऱ्यावरच्या रस्त्याने आपण पूर्णगड गावात पोचतो.

टेकडीच्या उतारांवर पूर्णगड गाव वसलेले आहे आणि गावातल्या बाईक जाऊ शकेल अशा अरुंद चढणीच्या रस्त्यावरची देवळे, घरे मागे टाकत काही मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर येऊन उभे ठाकतो.

गडाच्या वाटेवरची देवळे.

मंदिर 1

मंदिर 2

मंदिर 3

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी एक छोटेसे मारुती मंदीरही आहे पण ते बंद होते.

सरकारने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी करून तो पर्यटकांना भेटी साठी खुला केल्यावर लगेचच आम्ही तिथे पोचलो होतो.

महाराष्ट्रातल्या अनेक जलदुर्गांपैकी एक असलेल्या आणि अतिशय प्रेक्षणीय अशा ह्या पूर्णगड किल्ल्याचा दुर्दैवाने लिखित इतिहास उपलब्ध नाही त्यामुळे त्याचे निर्माण आणि नावा बद्दल ठोस माहिती मिळत नाही.
सर्वसामान्यपणे हा किल्ला शिलाहरांच्या काळात प्रथम बांधला गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पुनरबांधणी केली. पुढे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी त्याचा विस्तार केला आणि पुढच्या काळात तो पेशव्यांकडून इंग्रजांकडे गेला असे मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले त्यातला हा शेवटचा किल्ला, त्यामुळे महाराजांचे किल्लेबांधणीचे काम हा किल्ला बांधून पूर्ण झाले म्हणुन ह्याचे नाव पूर्णगड.

खरे खोटे देव जाणे!

पूर्णगडाचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एका बाजूला रस्ता, एका बाजूला विशाळगडापाशी उगम पाऊन पूर्णगडाच्या पायथ्याशी सागरात विलीन होणारी मुचकुंदी नदी (अशाप्रकारे दोन गडांना जोडणारी ही एकमेव नदी असावी बहुतेक), एका बाजूला अथांग समुद्र तर मागे गर्द झाडी.

ह्या किल्ल्याचे आणखीन एक (विचित्र) वैशिष्ट्य म्हणजे आत विहीर किंवा पाण्याचा अन्य कुठलाही स्रोत नाही.
पण काहीही असले तरी चिऱ्याच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला आहे मात्र प्रेक्षणीय! आणि नुकतेच केलेले डागडुजीचे कामही त्याच्या सौन्दर्याला बाधा न आणता सफाईदारपणे केले आहे.

पूर्णगड किल्ल्याचे काही फोटोज

a

b

c

d

e

f

g

h

i

j

k

वृंदावन

m

n

o

p

Q

r

समुद्र

किल्ल्याचा कानाकोपरा नीट बघत त्यावरून दिसणारी विलोभनीय दृष्ये डोळ्यात साठवून घेत बराच वेळ तिथे व्यतीत करून आम्ही साडेचारच्या सुमारास खाली उतरलो आणि तिथून अगदी जवळ असलेल्या गावखडी बीचवर आलो. कालच्या प्रमाणे आज पाण्यात न डुंबता थोडावेळ इथे वाळूवर बसून टाईमपास केल्यावर परतीच्या मार्गावरील पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे जायला निघालो.

t

मंदिरात पोचलो तेव्हा सहा वाजत आले होते. कोविड परिस्थितीमुळे विश्वस्त मंडळातर्फे समाधी मंदिर आणि आसपासच्या वास्तू बंद ठेवण्यात आल्या होत्या पण विठ्ठल रखुमाई मंदिरात बाहेरून दर्शन घेता येत होते ते ही सहा वाजता बंद होणार होते त्यामुळे आधी तिथे जाऊन जाळीच्या बंद दारातून दर्शन घेतले.

ह्या मंदिरात आधीही येणे झाले होते आणि आम्ही दोघेही सश्रद्ध असलो तरी अध्यात्मिक वृत्तीचे नसल्याने बाकीची ठिकाणे बंद असली तरी काही गमावल्यासारखे वगैरे वाटले नाही.

मंदिर परिसरात असलेल्या बाकड्यांवर थोडावेळ बसलो. ह्या मंदिराचा परिसर खूप मोठा आणि निसर्गरम्य असून तिथे विलक्षण शांतता मात्र नक्कीच अनुभवता येते, प्रसन्न वाटतं एकदम.

सात वाजता तिथून निघून कोळंबे फाट्यावरचे एक बार अँड रेस्टोरंट गाठले. दोन दोन पेग झाल्यावर तिथेच जेवण करून साडे नऊला मुक्कामी परत आलो.
थोडावेळ गच्चीत बसून घरच्यांशी फोना फोनी झाल्यावर साडे दहा अकराच्या सुमारास झोपून गेलो.

क्रमश:


आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३

रात्री लवकर झोपल्याने सकाळी जाग देखील लवकर आली. सुर्योदयानंतरच्या प्रसन्न वेळी बंगल्याच्या मागे असलेल्या विहीरीच्या बाजुला खुर्चा टाकुन चहापान झाल्यावर कुडाळला जाण्यासाठी तयारी करायला घेतली.

सूर्यबिंब

नऊच्या सुमारास बाहेर पडुन चावी शेजाऱ्यांच्या हवाली केल्यावर नाश्ता करण्यासाठी कोळंबे फाट्यावरचे स्नॅक्स कॅार्नर गाठले. घावन चटणीच्या जोडीला गरमागरम बटाटा भजी असा भरपेट नाश्ता झाल्यावर शेजारच्या पेट्रोल पंपावर गोव्याला पोचण्यापुरते पेट्रोल भरून प्रवासाला सुरूवात केली.
आजचा कुडाळ पर्यंतचा प्रवास १४३ किलोमीटर्सचा होता.

map

पावस, पुर्णगड, कशेळी गाव, अडीवरे अशी ठिकाणे मागे टाकत राज्य महामार्ग क्रमांक ४ वरून राजापुर पर्यंतचा प्रवास सुरू होता. भरपूर चढ-उतार आणि अगदीच तुरळक रहदारी असलेला हा रस्ता फारसा रूंद नसला तरी आजुबाजुचा परिसर न्याहाळत त्यावरून मार्गक्रमण करायला मजा येत होती.

रस्ता-१

रस्ता-२

रस्ता-३

पन्नासेक कि.मी. अंतर पार केल्यावर साडे अकराच्या सुमारास राजापुरात उतररण्यासाठी असलेल्या घाट रस्त्याच्या फाट्यावर लिंबु सोडा पिण्यासाठी एक थांबा घेतला.
त्या फाट्यावर उजवीकडे वळून किमान अंतरात भरपूर उंचीवरून समुद्रसपाटीवर आणणाऱ्या, अतिशय धोकादायक वळणांच्या आणि तीव्र उताराच्या रस्त्यावरून घाट उतरायला सुरूवात केली.
रस्ता उतरत असताना थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर नव्याने बांधण्यात येत असलेल्या अर्जुना नदीवरच्या ह्या मार्गावरील सर्वात उंच पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे दिसत होते.
घाट उतरल्यावर राजापुर गावातल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ लागल्यावर पुढचा प्रवास कॅांक्रिटीकरण झालेल्या प्रशस्त चौपदरी रस्त्यावरून सुरू झाला.
नव्याने बनलेला झकास रस्ता आणि तुरळक रहदारी असल्याने आज मुक्काम करायचा असलेल्या कुडाळ एम.आय.डी.सी. तल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विश्रामगृहापर्यंतचा ९० कि.मी. चा प्रवास अवघ्या सव्वा तासात पुर्ण करून आम्ही दुपारी दिडच्या सुमारास रेस्ट हाऊसवर पोचलो.

रेस्ट हाऊस

काल रात्री केलेल्या फोनाफोनीत भाऊजींना (मोठ्या बहिणीच्या मिस्टरांना) आज आम्ही ह्या रेस्ट हाऊसवर मुक्कामाला येत असल्याचे कळवल्यावर त्यांनी इथला एक सुईट (Suite) आम्हाला उपलब्ध करून देण्याची सूचना इथल्या अधिक्षक अभियंता साहेबांना फोन करून देउन ठेवली होती.

रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याने उघडून दिलेल्या एक्झिक्युटीव्ह सुईट मध्ये सामान ठेउन फ्रेश झालो.
मा. नारायण राणे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कुडाळ औद्योगिक क्षेत्रात निर्माण होउन नऊ-दहा वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या सामाईक सुविधा केंद्रातल्या (Common Facility Centre) ह्या रेस्ट हाऊसमध्ये कोकण-गोवा भेटीत अनेकदा मुक्काम केलेला असल्याने रेस्ट हाऊसची व्यवस्था बघणारे काही निवासी/स्थानिक कर्मचारी, आचारी परिचयाचे झाले होते.

आपल्या पसंतीनुसार चांगले शाकाहारी/मांसाहारी जेवण ॲार्डर प्रमाणे मिळण्याची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध असली तरी भटकंतीच्या काळात जेवणाच्या वेळा अनिश्चित असल्याने एखाद दुसरा अपवाद वगळता इथे जेवण्याचा योग सहसा येत नाही.
आज आम्ही किती वाजता पोहोचू ह्याचा आगाऊ अंदाज नसल्याने आमचे जेवण बनवायला सांगितले नव्हते तरी पॅंट्रीची व्यवस्था बघणाऱ्याने ते तासाभरात बनवून देण्याची तयारी दाखवली होती पण भुक लागलेली असल्याने जवळच्या एका रेस्टॅारंट मधे जाऊन पंजाबी थाळी खाणे पसंत केले.

साडेतीनच्या सुमारास जेवण करून परतलो तेव्हा रेस्ट हाऊसच्या आवारात, डाव्या बाजुच्या मोकळ्या जागेतील लॅानवर छोटासा स्टेज उभारून कुठल्यातरी कार्यक्रमासाठी सजावट करण्याचे काम चालू असलेले दिसले.
रूममध्ये जात असताना तिथल्या परिचयाच्या एका कर्मचाऱ्याने अधिक्षक अभियंता साहेब कार्यालयात आले असल्याची माहिती दिली. मगाशी आम्ही इथे पोचल्याचे आणि रूम ताब्यात मिळाल्याचे कळवुन त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन करण्याची औपचारिकता पुर्ण केली होती पण आता ते इथे आलेच आहेत तर त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी ह्या विचाराने कार्यालयात गेलो.
नमस्कार चमत्कार आणि भाऊजींची वास्तपुस्त करून झाल्यावर अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. दिड-दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या इथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यावेळी कोविड निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेली रिटायरमेंट पार्टी आज संध्याकाळी इथे होणार असुन त्याची तयारी बाहेर चालु असल्याचे त्यांच्या कडुन समजले आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रणही त्यांनी आम्हाला दिले.

आमच्या कुटुंबातली मंडळी दत्तोपासक असल्याने विविध दत्त क्षेत्री जाणे नित्याचे आहे. २०१९ च्या कोकण भेटीत श्री दत्तांचे चौथे अवतार मानले जाणारे, घोरकष्टोधरणस्तोत्र रचीते श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) ह्यांचे जन्मस्थान असलेल्या, कुडाळ पासुन चौदा-पंधरा की.मी. अंतरावरच्या माणगाव (सिंधुदुर्ग जिल्हा) इथल्या श्री दत्त मंदिरात सहकुटुंब सह परिवार दर्शनासाठी आलो असताना ह्या रेस्ट हाऊसवर तीन दिवस मुक्काम केला होता.

त्या दौऱ्यात भाऊजीही सोबत असल्याने एम.आय.डी.सी. च्या रिजनल ॲाफीसमधल्या अनेक अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. आजच्या रिटायरमेंट पार्टीचे ‘उत्सवमुर्ती’ हे त्यावेळी ओळख झालेल्या अधिकाऱ्यांपैकीच एक होते. इतकेच नव्हे तर त्या रात्री मी भाच्याला गोव्यातला कॅसिनो दाखवायला घेऊन जाणार असल्याचे कळल्यावर रात्रभराच्या जागरणानंतर (आणि अर्थातच मी मद्यपान केलेले असणार हे गृहीत धरून 😀) सकाळी परतीच्या प्रवासात मला गाडी चालवावी लागु नये म्हणुन त्यांनी ड्रायव्हरसहीत त्यांची गाडी आम्हा दोघांना देण्याचे सौजन्यही दाखवले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यात अवघडलेपणा वगैरे वाटणार नसला तरी मला रिटायरमेंट पार्टी हा प्रकारच मुळात आवडत नाही.
अधिकारी पदावरून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीची रिटायरमेंट पार्टी असली तर खाण्या-पिण्याची आणि थोडीफार मनोरंजनाची उत्तम व्यवस्था ह्या जमेच्या बाजु असल्या तरी पाठीमागे शिव्या देणाऱ्या सहकाऱ्यांनी / हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दांभिकपणे स्तुतिसुमने उधळत ठोकलेली भाषणे आणि काही नातेवाईक मंडळींची काव्यप्रतिभा जागृत होउन त्यांनी प्रसवलेल्या कविता ऐकणे हे प्रकार फार डोक्यात जातात.
अशा प्रसंगी केक कशासाठी कापतात हा प्रश्नही मला नेहमी पडतो. पुर्वी वाढदिवसा पुरतां मर्यादीत असलेला हा प्रकार आता बारसे, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, उद्घाटन समारंभ, रिटायरमेंट पार्टी अशा कार्यक्रमांत पहायला मिळतोच आहे पण त्यापुढे जाउन काही अतिउत्साही मंडळी अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानात आणि तेराव्यालाही केक कापण्याचा पायंडा पाडतील की काय असेही वाटु लागले आहे 😀

उच्चपदस्थांचं एकवेळ ठिक आहे त्यांच्यासाठी अशा रिटायरमेंट पार्टीज थ्रो करणे हा स्टेटस सिंबॅाल असु शकतो आणि त्यांना प्रायोजकही असतात. पण हल्ली पेन्शन नसलेले नगरपालिका/महानगरपालिका/बॅंकेतले लिपिक, शिपाई, सफाई कर्मचारीही अंधानुकरणातून उत्पनाचा प्रमुख स्त्रोत बंद झाला असताना शंभर-सव्वाशे टाळकी जमवून निवृत्तीनंतरची गुजराण व्यवस्थीतपणे चालावी म्हणुन मिळालेल्या रकमेतुन लाखभर रूपये अशा अनावश्यक सोहळ्यांवर खर्च करताना बघीतले की थोडं विचित्र वाटतं.

असो, फारच विषयांतर झालंय 😀
तर आजच्या पार्टीला जाणे टाळण्यासाठी बहाणा शोधताना सहज पटण्यासारखे एक जेन्युईन कारण सापडले. आम्ही गोव्याला सहलीसाठी म्हणुन चाललो असल्याने अशा समारंभात घालण्यासाठी योग्य असे कपडे आम्ही बरोबर आणले नसल्याने कार्यक्रमस्थळी येऊ शकत नाही पण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना खाजगीत नक्की भेटुन जाऊ असे सांगुन वेळ मारून नेली आणि चहापान झाल्यावर त्यांचा निरोप घेऊन तिथून निघुन चारच्या सुमारास रूमवर परतलो.

आता उरलेल्या वेळात आराम करणे आणि टिव्ही वर पिक्चर/गाणी बघणे एवढेच काम होते.
सह-सव्वा सहाच्या सुमारास “हॅलो माईक टेस्टींग वन…टु…थ्री…फोर…” असा आवाज बाहेरून आल्यावर लवकरच कार्यक्रमाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज आला.
रिकाम्या हातांनी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जायला नको म्हणुन आम्ही तयार होऊन बाहेर पडलो आणि तिथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडाळ बस स्टॅंड जवळच्या दुकानातून एक पुष्पगुच्छ घेऊन परतलो.

कमी आवाजात संगीत वाजत असलेल्या कार्यक्रमस्थळी बऱ्यापैकी निमंत्रीत मंडळी जमलेली दिसत होती. रेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ कोणाशीतरी बोलत उभा असलेला, आमच्याबरोबर गोव्याला आलेला साहेबांचा ड्रायव्हर भेटला. जवळपास पावणे दोन वर्षांनी आमची अशी अचानक भेट झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
किती नंबरच्या रूम मधे उतरला आहात आणि किती दिवसांचा मुक्काम आहे वगैरे चौकशी करून झाल्यावर त्यानेही पार्टीला येताय ना असे विचारल्यावर अभियंता साहेबांना दिलेले कारण पुढे करून तिथे येणार नसल्याचे सांगितल्यावर साहेब अत्ता कुटुंबासह अमुक नंबरच्या रूममध्ये तयार होत असुन तिथे त्यांची भेट घेता येईल अशी उपयुक्त माहिती त्याने दिली.
त्याच्या सांगण्याप्रमाणे करून रूममध्येच साहेबांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचा आग्रह झाल्यावर पुन्हा तीच कॅसेट वाजवून पार्टीला येण्याबद्दलची असमर्थता व्यक्त केल्यावर त्यांनी आमच्या रूममध्येच खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था करून देण्याची सूचना त्यांच्या मुलाला व आमच्या बरोबर असलेल्या त्यांच्या माजी ड्रायव्हरला देऊन ते बाहेर कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर आम्हीही रूममध्ये येऊन आमचा टि.व्ही बघण्याचा कार्यक्रम कंटीन्यु केला.
साडेसातच्या सुमारास रेस्ट हाऊसचा कर्मचारी पार्टीस्थळाहून व्हेज मंचुरियन, चिकन लॅालीपॅाप, वेफर्स असे स्टार्टर्स आणि ड्रायव्हर महाशय एक VAT 69 ची बाटली घेऊन आले.

पुर्वीच्या सिनेमातल्या व्हिलन, स्मगलर वगैरे मंडळींकडे किंवा कुठल्या राय साहब, बिझनेसमनची श्रीमंती दाखवण्यासाठीच्या दृष्यांमध्ये हटकून दिसणारी आणि जवळपास सगळ्याच परमीट रूम्स, पब्ज मधल्या बार काउंटरवर गडद हिरव्या रंगाच्या व आकर्षक आकाराच्या बाटलीत दिमाखात मिरवणारी, क्वचीत प्रसंगी पार्टीज वगैरे मध्ये दिसणारी, उंची मद्यात गणना होणारी, पण नियमित सेवन करणारा अतिशय कमी ग्राहकवर्ग असलेल्या VAT 69 ह्या ब्लेंडेड स्कॅाच व्हिस्की विषयी “हा ब्रॅंड इतकी वर्षे भारतात कसा काय टिकुन आहे?” हा प्रश्न पंधरा एक वर्षांपूर्वी मला नेहमी पडायचा.
पुढे मित्रमंडळींपैकी काहीजण राजकीय क्षेत्रात तर काहीजण सरकारी नोकरीत अधिकारी पदावर स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्याकडून ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
देशभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय विभागांकडुन निघणाऱ्या निविदांवर कामे करणारी छोटी-मोठी कंत्राटदार मंडळी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, महापौर, तहसीलदार, जिल्हधिकारी, अभियंता आणि वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना टेंडर पास झाल्यावर तसेच कामाचे पैसे मिळाल्यावर आणि दिवाळी तसेच ३१ डिसेंबरला नववर्षाच्या निमित्ताने कृतज्ञतापूर्वक भेट म्हणुन देत असलेल्या वस्तुंमध्ये VAT 69 चा क्रमांक फार वरचा आहे.
दर वर्षी हजारोंच्या संख्येने टेंडर्स निघत असतात आणि तीची विक्री बिनबोभाट होत असते.

असो, आधी विषयांतर आणि आता फारच अवांतर झालंय 😀

आमचा खानपानाचा कार्यक्रम सुरू असताना पूर्वीचे साहेब निवृत्त झाल्यावर आता त्यांच्याजागी आलेल्या नवीन साहेबांच्या सेवेत रूजू झालेले ड्रायव्हर महाशय तास-दिड तास रूममध्ये आमच्याशी गप्पा मारत बसले होते. त्याच्या बोलण्यात आमच्या मागच्या भेटीत त्याला घडवलेल्या गोव्यातल्या कॅसिनो वारीचा विषय सातत्याने येत होता.
त्याने केलेले कॅसिनोचे, तिथल्या वातावरणाचे मौजमजेचे कौतुकमिश्रीत रसभरित वर्णन ऐकल्यावर भावाची तेथे जाण्याची इच्छा जागृत झाली नसती तरच नवल वाटले असते!
मग काय, एकट्याने तिथे जाण्यात अजिबात मजा नसल्याने गेल्या सहा वर्षांतल्या प्रत्येक गोवा भेटीत एक रात्र कॅसिनोत घालवण्याची परंपरा मोडत, आधी ठरवलेल्या सोलोट्रिपमधल्या गोवा भटकंतीच्या कार्यक्रमातून वगळलेल्या कॅसिनो भेटीचा समावेश करणे क्रमप्राप्त झाले.
बाटलीतले अर्ध्याहुन थोडे अधिक मद्य रिचवुन झाल्यावर शिष्टाचाराचे पालन (आणि त्यांची अव्यक्त अपेक्षापुर्ती) करीत उरलेला ऐवज ड्रायव्हर आणि रेस्ट हाऊसच्या आचाऱ्यासाठी म्हणुन त्यांच्या हवाली केला आणि पार्टीस्थळाहुन आलेल्या मालवण स्पेशल कोंबडी वडे, व्हेज पुलाव, आणि सोलकढी असे छान जेवण झाल्यावर थोडावेळ टि.व्ही बघत टाईमपास करून साडेदहाच्या सुमारास झोपलो.

सकाळी साडे नऊ पर्यंत मस्त झोप झाल्यावर रेस्ट हाऊसच्या आचाऱ्याने काल देऊन ठेवलेल्या सुचनेप्रमाणे बनवलेल्या मालवणी पद्धतीच्या आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी असा नाश्ता आणि चहा झाल्यावर आरामात अंघोळी वगैरे उरकुन साडे अकराच्या सुमारास करमळीला जायला निघालो.
NH-66 वरून प्रवास सुरू होता. झाराप, सावंतवाडी, इंसुली अशी ठिकाणे मागे टाकत बांद्याला महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर पत्रादेवीचा चेकपोस्ट पार करत तासाभरात सुमारे ५० कि.मी. अंतर कापल्यावर पेडण्याजवळ चहापान आणि पेट्रोल भरण्यासारख एक थांबा घेतला. महाराष्ट्रापेक्षा जवळपास अकरा रूपयांनी स्वस्त दरात पेट्रोल भरून टाकी फुल केली आणि पुढचा प्रवास सुरू केला.
रेस्ट हाऊस पासुन ८६ कि.मी. अंतराचा प्रवास पुर्ण करत तीनच्या सुमारास करमळी रेल्वे स्टेशनजवळ रहाणाऱ्या मामे बहिणीच्या घरी पोचलो.
कुडाळहुन निघताना फोन करून अंदाजे पोचण्याची वेळ कळवुन ठेवलेली असल्याने बहिणाबाईंनी साग्रसंगीत स्वयंपाक करून ठेवला होता.
फ्रेश झाल्यावर कोवीड परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भेट न होऊ शकल्याने बऱ्याच साठलेल्या गप्पांचा कोटा संपवत जेवण झाल्यावर रात्री कॅसिनोमध्ये जाण्याचा कार्यक्रम ठरल्याने जागरण होणार होते त्यामुळे साडे चार ते साडे सहा मस्तपैकी झोप काढुन चहापान उरकल्यावर आम्ही तीघंजण बहिणीच्या कारने वीस कि. मी. वर असलेल्या दोना पावला (Dona Paula / डोना पॅाला) बीचवर पोचलो.

पणजीला खेटुन असलेल्या ह्या खेडेगावाचे नाव स्थानिक ग्रामस्थांनी १७८२ साली निवर्तलेल्या तत्कालीन पोर्तुगीज व्हॅाइसरॅायची मुलगी ‘दोना पावला’ हिच्या नावावरून ठेवले गेले असे म्हणतात. पण तिच्याबद्दल अनेक दंतकथा असल्याने नक्की इतिहास काय होता हे कळायला मार्ग नाही!
एक दंतकथा सांगते की पोर्तुगीज व्हॅाइसरॅायची मुलगी असलेली ‘दोना पावला’ नावाची तरूणी एका स्थानिक मच्छिमाराच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्याची तीची इच्छा तीच्या बापाला पसंत नसल्याने तीने दोना पावलाच्या टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे हे ठिकाण आज गोव्यातील प्रेमी जीवांचा स्वर्ग (Lover’s Paradise) म्हणून ओळखले जाते. ‘एक दुजे के लिये’ ह्या कमल हसन आणि रती अग्निहोत्रीची प्रमुख भुमिका असलेल्या हिंदी चित्रपटाचे बरेचसे शुटींग इथेच झाले होते. पण दुसरी कहाणी काही वेगळेच सांगते.
इतिहास काही का असेना पण मुंबईच्या मलबार हिल सारखा उच्चभ्रू दर्जा प्राप्त असलेल्या ह्या ठिकाणचा सुंदर बांधीव समुद्र किनारा, 'इमेज ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे शिल्प, गोव्याच्या राज्यपालांचे (किल्लेवजा महालरूपी) भव्य निवासस्थान असलेले ‘राजभवन’ (पुर्वीचे पोर्तुगीज नाव Palacio do Cabo) अशी आकर्षणे असल्याने दोना पावलाला पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती असते.

आम्ही ह्या ठिकाणी पोचलो त्यावेळी बऱ्यापैकी अंधार पडला असल्याने काढलेले फोटो चांगले नाही आले म्हणुन जालावरचे तीन फोटोज खाली देत आहे.

दोना पावला बीच
दोना पावला बीच

इमेज ऑफ इंडिया
इमेज ऑफ इंडिया शिल्प

राजभवन
राजभवन

इथल्या बांधीव धक्क्यावरच्या बेंचवर बसुन निवांतपणे समोरचा समुद्र आणि आसपासचा परिसर न्याहाळत असताना आमच्या शेजारच्या बेंचवर, खालती समुद्रात गळ टाकुन बसलेल्या एका साठ-पासष्टच्या आसपास वय असलेल्या गृहस्थाला मासा पकडण्यात यश आलेले दिसले.
त्यानंतर कितीतरी वेळ ते गृहस्थ उभे राहुन सतत आपली जागा बदलत, आपण पतंग उडवताना कधी हापसतो तर कधी ढील देतो त्याप्रमाणे हातातल्या फिशींग रॅाडच्या रिलचे लिव्हर उलट सुलट फिरवून कधी वाईंड तर कधी अनवाइंड करत असल्याचे बघुन कुतुहल वाटल्याने त्यांच्याजवळ जाउन हा काय प्रकार आहे ते बघु लागलो. माझी उत्सुकता पाहील्यावर आज चांगलाच मोठा मासा गळाला लागल्याने उत्तेजीत झालेल्या त्या काकांनी स्वत:हुन माहिती द्यायला सुरूवात केली.

गळाला लागलेला मासा पंधरा ते वीस किलो वजनाचा आणि ताकदवान असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
मला त्यातले काही कळत नसल्याने त्यांच्या सांगण्यावर अविश्वास दाखवण्याचा उद्देश नव्हता पण माझ्याकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी “Hold this rod and feel it” असे सांगीतल्यावर तो फिशींग रॅाड हातात धरला तेव्हा त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे जाणवले!
पंधरा -वीस मिटर अंतरावर असलेल्या गळाच्या टोकाला नक्की काय लागलंय ते अंधारात दिसत नव्हते पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो कुठला मासा असेल तो पाण्याच्या पृष्ठभागावर न येता आपली सुटका करून घ्यायच्या प्रयत्नात ताकद पणाला लावत ज्यावेळी समुद्रात पाच-दहा मीटर आत जात होता त्यावेळी रिल अनवाइंड करायचे आणि तो थोडा दमल्यावर डावी किंवा उजवीकडे वळला की आपणही त्या दिशेने सरकत हळू हळू रिल वाइंड करत त्याला जवळ आणायचे.
पाच-सात मिनीटे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटाटोप केल्यावर मात्र मला कंटाळा आला आणि हातालाही रग लागल्यावर रॅाड त्यांच्या हाती सुपुर्द केला.
खरंतर जे काही गळाला लागलं होतं ते बघायची उत्सुकता होती पण त्या माशाची पुर्ण दमछाक होउन तो सुटकेचे प्रयत्न करणे सोडुन देईल तोपर्यंत त्याला बाहेर काढता येणार नाही तसे केल्यास धागा तुटण्याची शक्यता असुन सर्व मेहनत पाण्यात जाईल तसेच ही प्रक्रिया पुर्ण व्हायला अजुन पाऊण एक तासाचा वेळ लागु शकतो असे त्यांनी सांगीतल्यावर मात्र त्यांना शुभेच्छा देउन तिथुन काढता पाय घेतला.
गळ टाकुन मासे पकडणे संयमाची कसोटी पहाणारे काम असते हे माहिती होते पण त्यात इतक्या भानगडी असतात ह्याची कल्पना नव्हती.
असो, त्या निमित्ताने थोडी नवीन माहीती व एक वेगळा अनुभव मिळाला आणि वेळही मजेत गेला.
साडे आठच्या सुमारास तिथुन निघुन मिरामार बीचवर आलो. कोवीड कालीन निर्बंधांमुळे इथल्या चाट, भेळपुरी व अन्य खाद्यपदार्थांचे स्टॅाल्स, हातगाड्या बंद ठेवण्यात आल्याने इतर वेळी प्रकाशात न्हाऊन निघणारा, पर्यटक आणि स्थानिकांच्या गर्दीने फुलुन जाणारा हा बीच त्यावेळी अंधारात बुडालेला पाहुन कसेसेच वाटले. आल्यासारखे पाच-दहा मिनीटे तिथे वाळुत बसुन निघालो.

मिरामार बीच
अंधारात बुडालेल्या मिरामार बीचवर बसलेली भावंडे

नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली.

कॅसिनो प्राईड
कॅसिनो प्राईड (फोटो जालावरून साभार)

प्रवेशाची तिकीटे घेऊन आम्ही मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो.


कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४

गोवा.
सुमारे साडे चारशे वर्षे पोर्तुगिज अंमलाखाली राहीलेले आणि १९६१ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० मे १९८७ रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेले भारताच्या नकाशावरील एक छोटेसे राज्य.

निसर्गाचा प्रचंड वरदहस्त आणि थोडासा वेगळाच सांस्कृतीक वारसा लाभलेल्या ह्या चिमुकल्या राज्यात देशी-विदेशी पर्यटकांचा कायम राबता असतो त्यामुळे राज्याच्या महसुलात पर्यटन व्यवसायाचा वाटा फार मोठा आहे.

गोव्याला भेट देणाऱ्या मंडळींपैकी कुणाला तिथले निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, पोर्तुगिज स्थापत्यशैलीतल्या पुरातन वास्तु बघण्यात रस असतो तर कुणाला तिथे स्वस्त दरात मिळणारे मद्य किंवा मत्स्याहार आकर्षित करत असतो. काहीजण फक्त आराम करायला येतात तर काहीजण निव्वळ कुठेतरी फिरायला जायचंय, तर गोव्याला जाऊ अशा विचाराने येतात.

प्रत्येक नावाजलेल्या पर्यटनस्थळाच्या काही काळ्या बाजु असतात त्याला गोवाही अपवाद नाही. पर्यटनाव्यतिरीक्त तिथला वेश्याव्यवसाय, अंमलीपदार्थांची तुलनात्मकरित्या सहज उपलब्धता आणि जुगाराला अधिकृत मान्यता प्राप्त असलेले कॅसिनो ह्या गोष्टीही मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांना वारंवार गोव्याला येण्यास आकर्षित करतात.

नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीपर्यंत गोव्यातील वास्को-द-गामा (वास्को) शहराजवळचा ‘बायना बीच’ वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून (कु)प्रसिद्ध होता.
खरंतर किनाऱ्यावरच्या एखाद्या शॅक मधुन बिअरच्या बाटल्या घेउन आम्हा कॉलेजकुमार मित्रमंडळींना वाळुवर निवांतपणे बसुन बियरचे घुटके घेत, गप्पा गोष्टी करत समोर पसरलेला समुद्र न्याहाळत बसण्यासाठी हे ठिकाण त्यावेळी फार मस्त वाटायचे, पण टपरीवजा बार काउंटर्सच्या सोभोवती डिजे साउंड सिस्टिमवर जोरदार संगीत वाजत असलेल्या ह्या समुद्रकिनाऱ्याचा वापर प्रामुख्याने ओपन एअर पिकअप जॅाईंट म्हणुन होत असल्याने इथे स्थानिक मंडळी आणि कुटुंबीयांसोबत आलेले पर्यटक मात्र फारसे फिरकत नसत.
पुढे तिथे अंमली पदार्थांचा व्यापार, लुटमार, परदेशी महिला पर्यटकांचा विनयभंग, हत्या वगैरेंसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आकडा वाढु लागल्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन सरकारने वेश्याव्यवसायाचे हे केंद्र उध्वस्त केले.
आता तिथे वॅाटर स्पोर्ट्स, आयुर्वेदीक मसाज वगैरेंसाठी बऱ्यापैकी पर्यटक सहकुटुंब येत असले तरी पुर्वीची मजा राहिली नाही त्यामुळे ह्या ठिकाणाचे चैतन्य हरवल्यासारखे वाटते 😀
माहीती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इतर व्यवसायांप्रमाणे ह्या व्यवसायाचे स्वरूपही बदलले असल्याने आता अशा विशिष्ट ठिकाणच्या ‘बाजारा’ ची गरजही उरली नाहीये त्यामुळे विकेंद्रीकरण झाले असले तरी केवळ ‘ह्या’ कारणासाठी गोव्याला भेट देणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.

साठच्या दशकात अमेरीकेत उदयाला येउन सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत जगभर पोचलेली हिप्पी संस्कृती गोव्यात रूजली, फोफावली नसती तरच नवल!
उत्तर गोव्याच्या बारदेश तालुक्यातील हणजुणे (अंजुना) गांव तर त्यावेळी हिप्पी लोकांचे हक्काचे ठिकाण बनले होते.
स्थानिक लोकजीवनावरील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या ह्या प्रदेशाला सत्याऐंशी साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळेपर्यंत असलेली अकार्यक्षम पोलीस यंत्रणा व अंमलीपदार्थविरोधी कायद्यांचा अभाव अशी हिप्पी जीवनशैलीसाठी पोषक परिस्थिती असल्याने गोवा अमेरिका आणि युरोपातल्या हिप्पींना आकर्षित करत होता. ‘हिप्पी ट्रेल’ (Hippy Trail) अंतर्गत युरोप ते आशिया ६००० मैलांचा प्रवास जमीनीवरून करत फार मोठ्या प्रमाणावर ही मंडळी गोव्यात येत असत.
एकाच ठिकाणी दिर्घकाळ वास्तव्य करणे त्यांच्या विचारधारेत बसत नसले तरी त्यांच्यापैकी कित्येकजण गोव्यत कायमचे स्थाईक झाले आहेत.

ऐंशीच्या दशकात बदललेल्या भूराजकीय परिस्थितीमुळे हिप्पी ट्रेलचे इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तानातुन जाणारे प्रवासाचे मार्ग बंद झाल्याने आणि युरोप, अमेरिकेत हिप्पी चळवळीला उतरती कळा लागल्यावर पाश्चात्य देशांतुन येणाऱ्या हिप्पींचे प्रमाण घटत जात आज ते अत्यल्प झाले असले तरी गोव्याला जागतीक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यात हिप्पी लोकांनी दिलेले योगदान नाकारता येत नाही, त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.

आता हिप्पी गेले असले तरी त्यांच्या संस्कृती/जीवनशैलीचा प्रभाव इथे अजुनही दिसुन येतो. आपल्या परतीच्या प्रवासासाठी किंवा वास्तव्य कालावधी वाढणार असल्यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपल्या बरोबर आणलेले परदेशी सामान/वस्तु विकण्यासाठी सत्तरच्या दशकात अंजुना बीचवर सुरू केलेले ‘Flea Market’ त्या परिसरात अजुनही टिकुन आहे. नोव्हेंबर ते एप्रिल ह्या कालावधीत दर बुधवारी भरणाऱ्या ह्या बाजाराचे स्वरूप आता बदलले आहे. हिप्पी विक्रेत्यांची जागा तिबेटी, नेपाळी, काश्मिरी, उत्तर आणि दक्षिण भारतीय तसेच स्थानिकांनी घेतली आहे. (कोविड निर्बंधांमुळे हा बाजार आमच्या ह्या गोवा भेटीच्यावेळी बंद होता.)

हिप्पी पर्वात अंजुना आणि आसपासच्या बागा, कळंगुट, हरमल (आरंबोल) अशा समुद्रकिनाऱ्यांवर विविध अंमली पदार्थांच्या नशेत पंग होऊन ट्रान्स मुझिकच्या तालावर रात्रभर रेव्ह पार्ट्या चालत.
आजही अशा पार्ट्या चालू आहेत फक्त ठिकाणे बदलली आहेत आणि पाश्चात्य देशांतून आलेल्या हिप्पींची जागा भारतीय नव-हिप्पींनी घेतली आहे.

Low-to-Medium BPM सायकॅडेलीक ट्रान्स संगीत आवडत असल्याने 2015 मध्ये पुण्यातल्या ‘ब्लु फ्रॅाग’ येथील पार्टीमुळे माहिती झालेल्या ‘गोवा गिल’ ह्या वयोवृद्ध डिजेच्या पुढे गोव्याला वॅगॅटोर येथील Origen Jungle Club मध्ये झालेल्या, तर ‘राजा राम’ ह्या डिजेच्या Hill Top Goa अशा दोन ओपन एअर क्लब्ज मध्ये रात्रभर चालणाऱ्या रेव्ह पार्टीजना आवर्जुन उपस्थितीही लावली आहे. गंमत म्हणजे ‘गोवा गील’ आणि ‘राजा राम’ ही नावे भारतीय वाटत असली तरी हे दोघे मुळचे अनुक्रमे अमेरिकन आणि ॲास्ट्रेलियन डिजे आहेत!

देशी- विदेशी डिजेंच्या अशा पार्टीजचे पास बुक माय शो आणि ॲानलाईन तिकीट विक्री करणाऱ्या तत्सम वेबसाईट्स, फेसबुक पेजेसवर राजरोसपणे उपलब्ध होत असल्याने मुंबई, पुणे, बंगरूळु, हैदराबाद ही महानगरे आघाडीवर असली तरी भारतातल्या जवळपास सर्व शहरांतुन अशा पार्टीजना तरूणाईचा भरघोस प्रतिसाद मिळतो तसेच विदेशी पर्यटकांची उपस्थितीही लक्षणीय असते.

व्यक्तिगत आयुष्यात अशाप्रसंगी "been there... done that..." असा दृष्टिकोन सदैव बाळगूनही का कोणास ठाऊक पण, गांजा पासुन कोकेन पर्यंत नानाविध प्रकारच्या नशा करून भोवताली सायकॅडेलीक संगीतावर थिरकणारी कोवळ्या वयातली कॉलेजवयीन मुलं-मुलीं, तरूण-तरूणी पाहुन येणारी खिन्नता व त्यांना जाणते-अजाणतेपणी हे अमर्याद स्वातंत्र्य आणि पैसा पुरवणाऱ्या त्यांच्या पालकांविषयी मनात उफाळून येणारा लाक्षणिक राग अशा भावना दूर सारून ह्या पार्टीज एंजॅाय करणे सुरूवातीला थोडेसे कठीण गेले असले तरी, 'शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न असुन आपल्याला कोणाच्या खाजगी/वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा वा ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही' ह्याची खूणगाठ मनाशी पक्की केल्यावर ते जमु लागले!

वेगवेगळ्या कारणांसाठी गोव्याला अनेकदा भेट दिलेली असल्याने तिथल्या काही स्मृती ह्या लेखाच्या निमित्ताने डोके वर काढत आहेत त्यामुळे बरंच अवांतर झाले आहे तेव्हा आता मालिकेतील ह्या भागाचा मुख्य विषय, म्हणजे कॅसिनोकडे वळतो 😀

"नऊच्या सुमारास आम्हाला मांडवी नदीच्या किनाऱ्यावरच्या ‘कॅसिनो प्राईड’ च्या तिकीट काउंटरपाशी सोडुन बहिण घरी निघुन गेली आणि आम्ही प्रवेशाची तिकीटे घेऊन मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटीवर असलेल्या कॅसिनो पर्यंत पोचवणाऱ्या लॅांचची वाट बघत जेट्टीवरच्या खुल्या प्रतिक्षालयात जाऊन बसलो…"

तिथे दहा-बारा मिनिटे वाट बघितल्यावर लॉंच आली आणि पुढच्या काही मिनिटांत आम्ही ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचलो!

casino pride
.

कित्येक हॅालिवुड चित्रपटांतुन विशेषत: बॅांड पटांतुन आपल्याला कॅसिनोंचे दर्शन घडत असते. त्यांतून कॅसिनोंची आकर्षक सजावट, तिथला ग्लॅमरस / स्टाईलीश स्री / पुरूषांचा सहज-बिनधास्त वावर, मद्यपान, वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारी खेळांत होणारी खेळाडूंची हार-जीत अशी दृष्ये आपल्या परिचयाची झालेली असतात.

अशा झकपक,चैतन्यमयी वातावरणाची आवड असल्यास किंवा ते अनुभवायची इच्छा असल्यास त्यासाठी अमेरिकेतील ‘लास वेगास’ (Las Vegas), चीनचा एक प्रांत असलेल्या मकाउ (Macau) अशा कॅसिनोंची पंढरी म्हणून ओळख निर्माण झालेल्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्या देशात जाण्याची गरज नाही, तो अनुभव आपल्याला गोव्यात अगदी सहज घेता येतो.

ग्लॅमरस माहौल, खाणे-पिणे, मनोरंजन, नाईट लाईफ, मौज-मस्तीची आवड/आकर्षण तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीविषयी खुला दृष्टीकोन बाळगणाऱ्यांनी आपल्या गोवा भेटीत एखाद्या कॅसिनोला आवर्जुन भेट द्यावी, त्यांच्यासाठी २४/७ सुरू असणाऱ्या ह्या ठिकाणी घालवलेले दिवसातले काही तास असोत की संपुर्ण रात्र असो, तो चांगल्या आठवणींच्या कप्प्यात जपला जाण्यासारखा एक यादगार अनुभव असेल हे नक्की! पण जर 'जुगार', 'मद्यपान', 'मौजमजा', 'छानछौकी', 'विलासीवृत्ती' विषयी घृणा, तिरस्कार, नावड अशा कुठल्या विशिष्ट किंवा नकारात्मक भावना मनांत असतील तर अशा व्यक्तींनी मात्र (विकतचा) मनस्ताप टाळण्यासाठी चुकुनही तिकडे फिरकू नये!

असो... भारताच्या भुमीवर जुगाराला कायदेशीर मान्यता नसल्याने कायद्यातल्या पळवाटा शोधून गोवा सरकारने मांडवी नदीत नांगरून ठेवलेल्या बोटींवर ‘तरंगत्या’ कॅसिनोंसाठी परवानगी दिल्यावर १९९९ साली पहिला कॅसिनो सुरू झाला आणि आजघडीला गोव्यातल्या कॅसिनोंची संख्या पंधरा-सोळाच्या घरात पोचली आहे. त्यातले बरेचसे आकारमानाने भव्य असे कॅसिनो हे मांडवी नदित नांगरून ठेवलेल्या जहाजे/बोटी/यॅाट्सवर तरंगत्या स्वरूपात असले तरी नंतर कायदे आणखीन वाकवत / त्यातल्या आणखीन पळवाटा शोधत जमीनीवरच्या काही पंचतारांकीत हॅाटेल्स व रिसॅार्ट्स मध्येही लहान-मोठे कॅसिनो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली व ते यथावकाश सुरूही झाले. पण अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये ‘लाईव्ह टेबल्स’ ना परवानगी नाही, तेथे फक्त ईलेक्ट्रॅानीक/संगणकाधारीत मशिन्सवर जुगार खेळवला जातो आणि प्रवेश शूल्कही तरंगत्या कॅसिनोजपेक्षा कमी असल्याने त्याला पर्यटकांपेक्षा स्थानिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळु लागला.

"मध्यंतरी स्थानीक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी कॅसिनोत चालणाऱ्या जुगाराच्या नादाला लागुन आपले संसार उध्वस्त केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आणि त्यातुन लोकांमध्ये गोवा सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्यावर स्थानीकांना अशा जमीनीवरील कॅसिनोजमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती."

आजघडीला गोवा सरकारच्या महसुलात कॅसिनोंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा प्रचंड मोठा आहे. गोव्यातील खाण उद्योगावर प्रतिबंध आल्यानंतर महसुलात झालेली मोठी घट भरून काढण्यास ह्या कॅसिनोंनी सर्वात जास्त हातभार लावला आहे. कॅसिनोंमुळे स्थानिकांतही जुगारी वृत्ती वाढून कित्येक संसार उध्वस्त झाल्यामुळे बहुतांश स्थानिकांची मानसिकता कॅसिनोविरोधी असली आणि वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला जात असला तरी दुर्दैवाने ते बंद करण्याची हिंम्मत कुठलाही राजकीय पक्ष वा नेता दाखवू शकलेला नाही हि वस्तुस्थिती आहे. विरोधात असताना कॅसिनो बंद करण्याच्या घोषणा/आश्वासने सर्वच राजकीय पक्ष/नेते नेहमी देत असतात, पण सत्तेवर आल्यावर मात्र त्यांची भाषा बदलते. ह्याला आपल्या स्वच्छ चारित्र्य आणि साध्या रहाणीसाठी कित्येकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर हे देखील अपवाद नाहीत. त्यांनीही विरोधात असताना कॅसिनो वरून बरीच आग पाखड केली होती पण सत्तेत आल्यावर महसुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या विरोधात कारवाई करणे कसे अशक्य आहे वगैरे वगैरे असा सूर लावला होता. अर्थात ह्यात त्यांचा काही दोष आहे असेही नाही पण सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची आगतिकता त्यातून स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे तर कॅसिनो बंद केल्यास गोव्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघेल अशी परिस्थिती आज आहे!

असो,
कॅसिनो म्हणजे ‘जुगारी अड्डा’ हे एक पक्के समीकरण आहे, किंबहुना जुगार हाच कुठल्याही कॅसिनोचा मुख्य व्यवसाय /उद्दिष्ट असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करूनही पर्यटकांना सहकुटुंब ह्याठिकाणी आपला वेळ मजेत घालवतां येतो.
जुगार खेळण्यासाठी असलेल्या गॅम्बलींग एरीया व्यतिरीक्त खान-पान आणि करमणुकीसाठी चांगले उपहारगृह, बार, बुफे लंच / डिनरसाठी डायनिंग एरिया, नाच-गाण्याचे व अन्य मनोरंजनपर कार्यक्रम, लहान मुलांसाठी विशेष विभाग, सेल्फी पॉईंट, निवांत बसण्यासाठी (आकारमानानूसार बोट/जहाज/यॅाट ज्यावर कॅसिनो असेल त्याचा) ‘डेक’ अशा अनेक गोष्टी ह्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे एका नव्या पैशाचाही जुगार न खेळता गॅम्बलींग एरीया पासुन ते कॅसिनोचे अन्य मजल्यांवरील इतर सर्व विभाग पहात फिरत, खाण्या-पिण्याचा आस्वाद घेत नाच-गाणे बघण्यात चार-पाच तास किंवा संपुर्ण रात्र कशी पसार होते त्याचा पत्ताही लागत नाही!

मांडवी नदीतल्या तरंगत्या कॅसिनोंसाठीचे प्रवेश शुल्क हे प्रत्येक कॅसिनोगणिक वेगवेगळे असते. सर्वसाधारणपणे किमान प्रवेश शुल्क सोमवार ते शुक्रवार प्रतिव्यक्ती १५०० रुपये तर शनिवार आणि रविवार साठी प्रतिव्यक्ती २००० रुपये एवढे असते. तिथे भेट देण्याआधी आपण प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क, उपलब्ध सेवा/सुविधा, नियमावली, ड्रेसकोड, त्या दिवसासाठीच्या विशेष ऑफर्स / पॅकेजेस विषयींची माहिती त्यांच्या वेबसाईटवर बघून, त्यांची तुलना करून आपल्यासाठी योग्य कॅसिनोची निवड करू शकतो. वर उल्लेख केलेल्या बुफे लंच / डिनर अशा खान-पान आणि करमणूकीसाठीच्या बहुतांश गोष्टी कॅसिनोच्या प्रवेश शुल्कात समाविष्ट असतात आणि तिथले उपहारगृह आणि बार त्याला अपवाद असले तरी गॅम्बलिंग एरियामध्ये टेबलवर विनामूल्य अमर्याद 'ड्रिंक्स' आणि 'स्नॅक्स' पुरवले जातात (त्यासाठी खेळण्याची सक्ती नाही, फक्त गॅम्बलिंग टेबलजवळ बसणे वा उभे राहणे आवश्यक असते.)

काही कॅसिनोजमध्ये सहसा (किंवा शनिवार/रविवार असल्यास) प्रवेश तिकिटासोबतच तर काहींमध्ये थोडेफार अधिकचे पैसे भरून खेळण्यासाठी ठराविक रकमेच्या OTP (one time play) चिप्स दिल्या जातात. कॅसिनोत 'जुगार' खेळण्यासाठी देण्यात आलेल्या अशा 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स रुपी कागदी कूपन्सचा उपयोग खरंतर अतिशय मर्यादित स्वरूपात करता येतो आणि त्या थेट 'एनकॅश'करता येत नाहीत. रुलेट (Roulette) आणि स्पिन व्हील (Spin Wheel / Wheel of fortune) अशाप्रकारच्या खेळांत आणि त्यातही फक्त 'एकास एक' चा (१:१) भाव देणाऱ्या 'बेट्स' खेळण्यासाठी काही निवडक टेबल्सवर त्यांचा वापर करता येतो. असे असले तरी संयम राखत 'टुकू टुकू' खेळून नशिबाची साथ मिळाल्यास आपण प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल करण्यात तरी यशस्वी होऊ शकतो, फक्त एक पथ्य मात्र पाळायचे, 'आपण इथे जुगार खेळण्यासाठी आलो नसून केवळ एक छानसा अनुभव घ्यायला आलेलो आहोत' हे कदापि विसरायचे नाही, आणि आपल्याला मिळालेल्या 'प्रोत्साहनात्मक' ओटीपी चिप्स जरी आपण गमावल्या तरी अधिकचे पैसे खर्च करून चुकूनही नवीन चिप्सची खरेदी करायची नाही. अगदी टेबलवर अन्य कोणी कितीही जिंकत असताना दिसत असले तरीही!
---
असो, तर ‘कॅसिनो प्राईड’ मध्ये पोचल्यावर आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये प्रवेशकर्ते झालो. दोघांना मिळालेल्या एकूण १००० रुपये दर्शनीमूल्याच्या ओटीपी चिप्स वापरून तिथे 'रुलेट' खेळत असताना माझे व्हिस्कीचे दोन पेग्स आणि भावाची दोन ग्लास बियर रिचवून झाली आणि मिळालेल्यापैकी ओटीपी 'पेपर कूपन्सना' सहाशे रुपये मूल्याच्या 'कॅश' करता येण्यायोग्य 'प्लास्टिक' प्लेयिंग चिप्स मध्ये परावर्तित करण्यात यश मिळवून आम्ही साडे दहा-पावणे अकराच्या सुमारास बुफे डिनरचा आस्वाद घेण्यासाठी लिफ्टने वरच्या मजल्यावरील डायनिंग हॉलकडे मोर्चा वळवला.

Roulette
Roulette
.
अगदी 'आहाहा' म्हणावे अशाप्रकारचे नसले तरी बऱ्यापैकी चांगल्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेले जेवण झाल्यावर मनोरंजन कक्षात कोकणी भाषेतील गाण्यांवर झालेला समूहनृत्याचा कार्यक्रम बघून पुन्हा आम्ही गॅम्बलींग एरीयामध्ये आलो.
'बिगिनर्स लक' (Beginner's luck) म्हणतात त्याप्रमाणे आमच्या बंधुराजांचे नशीब जोरावर होते आणि आता जास्त परतावा देणाऱ्या बेट्स खेळण्यासाठी हातात प्लास्टिक चिप्सही होत्या. ह्या भांडवलाच्या जीवावर त्याने रुलेट मध्ये दीड-दोन तासात बऱ्यापैकी माया जमवल्यावर मग आम्ही 'Spin Wheel', 'Baccarat', 'Black Jack', अंदर बाहर, इंडियन फ्लश आणि स्लॉट मशिन अशा वेगवेगळ्या देशी-विदेशी जुगारी खेळांमध्ये नशीब आजमावत पहाटे चार पर्यंत टाईमपास केल्यावर मग 'कॅसिनो प्राईड २' ह्या त्याच ऑपरेटरच्या मांडवी नदीतील आकाराने थोड्या लहान असलेल्या दुसऱ्या कॅसिनोमध्ये जायला निघालो.

Baccarat
Baccarat
.
Black Jack
Black Jack
.
मी आतापर्यंत गोव्यातल्या पाच वेगवेगळ्या कॅसिनोंना भेट दिली आहे पण त्यातले 'कॅसिनो प्राईड' (Casino Pride), 'डेल्टीन रोयाल' (Deltin Royale) आणि 'डेल्टीन जॅक' (Deltin Jaqk) हे तीन माझ्या विशेष आवडीचे आहेत. ह्या तिघांची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत. 'कॅसिनो प्राईड' मला आवडतो कारण त्याचे भव्य स्वरूप आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असूनही ह्याचे प्रवेश शुल्क तुलनेने सर्वात किफायतशीर आहे आणि विशेष म्हणजे एकाच तिकिटात आपण ह्याच कंपनीच्या इथे असलेल्या दोन कॅसिनोंना भेट देऊ शकतो! 'कॅसिनो प्राईड' वर कंटाळा आला तर 'कॅसिनो प्राईड २' वर जायचे, तिथे कंटाळा आला तर पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर परत यायचे, त्यासाठी दोन्ही ठिकाणी विशेष लॉन्च सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.

अर्थात 'कॅसिनो प्राईड' ची शिफारस मी फक्त मित्रा-मित्रांचा ग्रुप जाणार असेल तरच करतो, पण जर बरोबर स्त्री/स्त्रिया असतील तर मात्र प्रवेश शुल्क बऱ्यापैकी जास्त असले तरी 'डेल्टीन रोयाल' किंवा 'डेल्टीन जॅक' अशा ठिकाणी जाण्याची आग्रही शिफारस करेन. बाकी गोष्टींत/सोयी-सुविधांमध्ये फारसा फरक नसला तरी ह्या दोन ठिकाणी येणारा क्राऊड तुलनेने 'क्लासी' असल्याने स्त्रियांना सहज/मोकळेपणी वावरण्यासाठी कॅसिनो प्राईडपेक्षा इथले वातावरण पोषक/अनुकूल असते. पण बरोबर जर सगळेच पुरुष असतील तर कॅसिनो प्राईड हे माझ्यामते 'बेस्ट' आणि एकदम 'पैसा वसूल' ठिकाण आहे.

असो, 'कॅसिनो प्राईड' वरून लॉंचने आम्ही पहाटे सव्वा चार-साडे चारच्या सुमारास 'कॅसिनो प्राईड २' वर पोचलो तेव्हा तिथली गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. चालू असलेल्या टेबल्सवर तुरळक खेळाडूंची उपस्थिती असल्याने ह्याठिकाणी निवांतपणे बसून, शेजारी लावलेल्या स्टूलवर पद्धतशीरपणे सर्व्ह केलेल्या मद्याचा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत, अधून मधून बेट्स टाकत रुलेट खेळण्याची मजा घेता आली. काही बेट्स मध्ये हार तर काहींमध्ये जीत असा सिलसिला चालू होता. साडे सहाच्या सुमारास बहुतांश टेबल्स खेळाडूंअभावी बंद होऊ लागल्यावर आम्हीही तिथून काढता पाय घेतला आणि बहिणाबाईंना आम्हाला पिकअप करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता काल आम्हाला सोडलेल्या ठिकाणीच परत यायला सांगितले असल्याने तो पर्यंतचा जवळपास दोन तासांचा वेळ घालवण्यासाठी पुन्हा 'कॅसिनो प्राईड' वर आलो.

आता इथलीही गर्दी ओसरल्याचे दिसले. गॅम्बलिंग एरियामध्ये तुरळक टेबल्स चालू होती आणि उपस्थितांपैकी बहुतांशजण पेंगुळलेले दिसत होते तर जुगारात बऱ्यापैकी पैसे हारलेले 'ग्रेट गॅम्बलर्स' झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करताना दिसत होते. एकंदरीत रात्री इथे असलेले उत्साही, चैतन्यमयी, जोशपूर्ण वातावरण आता मात्र अगदीच निरुत्साही, ढेपाळलेले वाटायला लागले होते. किनाऱ्यावर परतण्यासाठी पर्यटकांची लॉंचसाठीची रांगही वाढत चालली होती. हाताशी अजून जवळपास तासाभराचा वेळ होता म्हणून आतल्या उपहारगृहातून चहा खरेदी करून आम्ही बाहेर ओपन डेकवर टाईमपास करण्यासाठी येऊन बसलो.
एकंदरीत रात्र मजेत गेली होती, खाऊन पिऊन प्रवेश शुल्कासाठी भरलेली रक्कम वसूल होऊन बंधुराजांचे भाग्य बलवत्तर असल्याने २२०० रुपयांची अतिरिक्त कमाईही झाली होती!
कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो.

"कॅसिनोमध्ये फोटो काढण्यास मनाई असल्याने ह्या भागात फोटो खूपच कमी टाकले आहेत, हि कमतरता पुढील भागांतून, जे गोव्यातले किल्ले आणि समुद्रकिनारे ह्यावर असतील त्यातून भरून काढण्यात येणार आहे 😀 तसेच लेखात जे फोटो दिले आहेत ते 'कॅसिनो प्राईड'च्या वेबसाईटवरून साभार घेतले आहेत."

कॅसिनो मधे फोटोज् न काढू देणे ही स्त्रेटेजी आवडली आहे

ते लाख फोटो काढायला परवानगी देतील हो, पण तिथे नित्यनेमाने येणारी अट्टल जुगारी मंडळी त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करतील त्याचे काय 😀

मुंबई, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि राजस्थानातील असंख्य व्यावसायिक, व्यापारी आणि बडी धेंडं खास खेळण्यासाठी म्हणुन संध्यकाळी विमानाने येऊन सकाळी परत घरी जातात तर काही जण आठवडाभरासाठी तळ ठोकून लाखो रुपयांची हार-जीत करतात! बरं घरी बायको-पोरांना काय थापा मारून येत असतील तो वेगळाच विषय आहे, पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा 'टिक-टॉक क्वीन', 'इन्स्टा गर्ल' बरोबर त्यांचा टिपलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि चुकून त्यांच्या बायको-पोरांच्या पाहण्यात आला तर नसती आफतच ओढवायची की हो 😀 😀 😀

आता कॅसिनो आतून पहायची हुरहूर लागली आहे !

जरूर पाहून या... तुम्हाला नक्कीच मजा येईल!

पण कॅसिनोत 'लकी चार्म' म्हणुन मिरवायला बरोबर आणलेल्या कुणा...
यावरून गंमत आठवली
एकदा मी आणि मित्र असे आम्ही भटकंती करीत ऑस्ट्रेलयातील उत्तरेला गेलो असताना एक जंगलातील अगदी नयनरम्य आणि विशेष म्हणजे उत्तम लाकडी कोरीव काम असलेले ट्री टॉप रिसॉर्ट दिसले .. बघुयात कसे काय म्हणून बघत होतो आणि त्यावेळी मीत्र विडिओ घेत होता .. थोडयावेळाने तेथिल मॅनेजर आला आणि म्हणाला कि कृपया घेऊन नका विडिओ... मित्राने हो म्हणले आणि विडिओ घेणे थांबवले .. पुढे तो मॅनेजर गप्पा मारता मारता म्हणाला काही नाही वाईट वाटूनघेऊन नका पण काय आहे कि आमचे हे छोटेखानी हॉटेल फक्त "तो आणि ती" साठी खास असले तरी प्रत्येक तो च्या बरोबर येणारी "ती" हि त्याची बायकोच असते असे नाही >>>>>
असो हे ते ठिकाण https://www.booking.com/hotel/au/secrets-on-the-lake.html?activeTab=phot...

 बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे तिथे पोल डान्स , बेली डान्स च्या शो ला एन्ट्री असते... डेक वरची एन्ट्री खूप महाग होती... सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..

बिग डॅडी मध्ये साडेचार हजार किंवा जास्त चे तिकीट आहे

हे त्यांचे पॅकेज आहे, प्रवेश शुल्क इतर दिवशी २०००/ २५०० आणि विकएंडला ३०००/३५०० च्या आसपास असते. प्रत्येक कॅसिनोचे प्रवेश शुल्क आणि अन्य पॅकेजेस वेगवेगळी आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळे 'इव्हेंट्स' आयोजित केले जातात त्यामुळेही शुल्क बदलत असते. सर्वसमावेशक पॅकेजेस खूपच महाग असतात त्यासाठीच जाण्या आधी त्यांच्या वेबसाईट बघणे श्रेयस्कर!

सर्वात खाली एक कंपार्टमेंट होता ते नो लिमिट होता.. पण त्याची एन्ट्री काही सांगितली नाही..

पर्यटकां व्यतिरिक्त त्यांचा आपला आपला नेहमीचा ग्राहकवर्ग असतो. मोठ्या स्टेक्स खेळणाऱ्या अशा VIP खेळाडूंसाठी/सभासदांसाठी अशी राखीव कंपार्टमेंट्स/टेबल्स असतात.
'बिग डॅडी' चे प्रवेशशुल्क हे एकंदरीत तिथल्या सेवा-सुविधांच्या मानाने 'ओव्हर प्राईस्ड' वाटल्याने मला आवडलेल्या ३ कॅसिनोंच्या यादीत त्याचा समावेश केला नाहीये.

कपिलमुनी हे असल काहि अस्त भारतात ?

चौकस साहेब काय समजता काय तुम्ही आमच्या भारताला 😀 ऑ?

राजमुंद्री (Rajahmundry/Rajamahendravaram) हे आंध्र प्रदेशातील गोदावरी तिरावरचे एक शहर तिथल्या इस्कॉन मंदिर आणि कोटिलिंगेश्वर ह्या प्राचीन मंदिरासाठी पर्यटक / भाविकांमध्ये प्रसिद्ध असले तरी एकेकाळी चालुक्यांची राजधानी आणि'तेलगु' भाषेचे जन्मस्थान मानले जाणाऱ्या ह्या शहरात काय काय गोष्टी चालतात हे समजले तर डोळे पांढरे व्हायची वेळ येईल 😀
अर्थात सगळ्या ऍक्टिविटीज अनधिकृत असल्या तरी 'एका रात्रीसाठी' देशभरातून तिथे येऊन जाणाऱ्यांच्या सोयीसाठी ४-५ लाख लोकसंख्येच्या ह्या शहरात 'एअरपोर्ट' सुद्धा आहे!

अर्थात राजमुंद्री हे फक्त नमुन्यादाखल एक उदाहरण झाले, अशी कितीतरी 'hidden secretes' विलासीवृत्तीच्या राजे, महाराजे, बादशहा, नवाबांचा इतिहास लाभलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेली आहेत ज्यांची माहिती गुगल/विकीपीडियावर मिळणार नाही, ती शोधून अनुभवावी लागतात 😀 😀


राजमुंद्री इतके लांब जायला नको

आपले आवडते तीर्थ स्थळ मुंबई पासून केवळ ६५ किमी अंतरावर असलेले टिटवाळा हे सुद्धा अशाच सुरस आणि चमत्कारिक कारणासाठी "माहितगार लोकांमध्ये" प्रसिद्ध आहे.

मुंबईहून दुपारी कामासाठी नाशिकला जाणारे व्यावसायिक वाट वाकडी करून टिटवाळ्यात येतात.

तेथे सर्व तर्हेची हॉटेल्स लॉजेस तासाचा बोलीवर किंवा रात्रीच्या बोलीवर उपलब्ध आहेत.

तेथे आपले "मित्र" आपल्याला "सुंदर आणि तरुण मैत्रिणीबरोबर" सहवास घडवून आणतात.

सकाळ झाली कि श्री महागणपतीचे दर्शन घयायचे आणिआपल्या व्यवसायासाठी कूच करायचे.

सात आठ वर्षांपूर्वी मी सहा महिने तेथे समाजसेवा म्हणून जात असताना मला हे विराट दर्शन झाले.

या आडवाटेच्या गावी इतकी हॉटेल्स कशी काय? या विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून हि सुरस आणि चमत्कारिक माहिती बाहेर आली

आताची पिढी फार चोखंदळ आहे हो खरे साहेब, त्यांना 'ह्या' कारणासाठी टिटवाळ्याला जाणे डाऊन मार्केट वाटते. त्यापेक्षा ते सरळ खार, बांद्रा किंवा अंधेरीला जाणे पसंत करतात.
सिने/टेलिव्हिजन अभिनेत्री, मॉडेल बनण्याच्या इच्छेने मुंबईकडे धाव घेणाऱ्या सुंदर, तरुण मुलींची अजिबात कमी नाही. त्यामुळे एक फ्लॅट चार-पाच जणींत शेअर करणाऱ्या अशा बिच्चाऱ्या स्ट्रगलर्सना आपला अवाढव्य खर्च भागवण्यासाठी तास-दोन तास किंवा रात्रभरासाठी नवीन नवीन मित्रांची गरज पडत असते.
हा, पण तिथे जाण्यात टिटवाळ्याला जाण्याच्या तुलनेत खर्च चौपट-पाचपट होतो पण त्या बिच्चाऱ्या होतकरू स्ट्रगलर्सना आर्थिक मदत केल्याचे पुण्यही पदरात पडते आणि स्वप्नातही ज्यांना हात लावायची त्यांना हिम्मत होणार नाही अशा सौन्दर्यवतींचा त्यांच्याच फ्लॅटवर 'सहवासही' घडतो 😀

असो, वरील 'पोल डान्स' विषयीच्या प्रतिसादात आलेला 'राजमुंद्री' चा उल्लेख हा दोन-पाच हजारांचा खुर्दा खिशात खुळखुळवत टिटवाळ्याच्या चादरबदलू लॉज/हॉटेल्स मध्ये जाऊन आपला कार्यभाग साधणाऱ्या 'बालवाडी' कॅटेगरीतल्या कोणा आंबटशौकिन टॉम, डिक आणि हॅरीच्या संदर्भात केला नसून 'एका रात्रीत' किमान दोन-पाच लाख ते कमाल कितीही दौलतजादा करू शकणाऱ्या 'डॉक्टरेट' कॅटेगरीतल्या विलासीवृत्तीच्या राजे-महाराजे, बादशहा, नवाबांचे 'ऊंचे' शौक ठेवणाऱ्यांच्या संदर्भात केला होता.
दोन्ही ठिकाणी चालणाऱ्या अ‍ॅक्टिव्हीटीज मध्ये 'स्त्रीदेह' हा कॉमन फॅक्टर असला तरी त्याच्या उपयोगातील 'वैविध्याच्या' बाबतीत राजमुंद्री आणि टिटवाळ्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याबाबतीत राजमुंद्री ह्या शेषनागापुढे टिटवाळा हे गांडूळ आहे! त्यामुळे विविक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्याची मनीषा बाळगणाऱ्यांसाठी मुंबईपासून सुमारे ११५० किमी लांब असले तरी राजमुंद्रीला जाणे त्यांना भागच 😀
अर्थात सगळ्या अ‍ॅक्टिव्हीटीज अनधिकृत असल्याने ह्या विषयावर सार्वजनिक असो वा खाजगीत, पण अधिक बोलणे मला योग्य वाटत नाही त्यामुळे इथेच थांबतो.

इति लेखनसीमा!


याच धर्तीवर मुंबईच्या समुद्रात कॅसिनो का चालू होत नाहीत

मध्यंतरी ह्यावर विचार चालू असल्याच्या बातम्या येत होत्या पण बारगळलेला दिसतोय तो विचार.
समुद्रात असे काही करायचे झाले तर केंद्राच्या अनेक खात्यांच्या/विभगांच्या परवानग्या लागतील, बिमारू राज्य नसल्याने महसूलाच्या मुद्द्यावर केंद्राकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यताही कमीच, निर्णय लाल फितीत अडकून पडण्याची शक्यता अधिक आणि लोकांचा विरोध होईल ते वेगळेच त्यामुळे महाराष्ट्रात कॅसिनो सुरु होणे एकंदरीत महाकठीण काम!

भारतात गोव्याबाहेर आजघडीला फक्त सिक्कीम मधील गंगटोक येथे 'Deltin Denzong' हा एकमेव कॅसिनो सुरु आहे. दमण येथे 'The Deltin' ह्या पंचतारंकित रिसॉर्टमध्ये तब्बल ६०००० चौ. फू. क्षेत्रफळावर आलिशान कॅसिनो बनवण्याचे काम चालू होते आणि तो २०१७ मध्ये सुरु होणार होता पण अजूनही लाल फितीत अडकल्याने कंपनीची शेकडो कोटींची गुंतवणूक अडकून पडली आहे.



कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

"कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... "
-----

दुपारी दोन वाजता बहिणीने जेवणासाठी उठवले. अंघोळी-पांघोळी उरकल्यावर छोले-पुरी, गुलाबजाम आणि सांबार भात असे जेवण झाल्यावर तयार होऊन बहिणीच्या घरापासून ५५ - ५६ की. मी. अंतरावरच्या, सव्वा-दीड तासाचा प्रवास असलेल्या प्राचीन 'तांबडी सुरला महादेव मंदिरात' जायचा विचार केला होता पण त्यावेळी करोना निर्बंधांमुळे मंदिर दुपारी तीन वाजताच बंद होत असल्याचे समजल्यावर तो बेत रद्द केला.

पोर्तुगीज राजवटीत त्यांच्या आधीपत्या खालील प्रदेशातल्या हिंदू, मुसलमान धर्मियांवर बळजबरीने कर्मठ ख्रिस्ती धर्म लादण्यासाठी १५६०-१५६१ मध्ये सुरु झालेल्या 'द गोवा इन्क्वीजीशन' (The Goa Inquisition) अंतर्गत जे अनन्वित अत्याचार केले गेले त्यात १५६६ ते १५६८ ह्या काळात गोव्यातली जवळपास सर्व (७५० पेक्षा जास्त) प्राचीन मंदिरे उध्वस्त केली गेली.

'पोर्तुगीज अर्काईव्हज' (Portuguese Archives) मधल्या १५६९ सालच्या एका राजपत्रात भारतातल्या पोर्तुगीज वसाहतीतली सर्व हिंदू मंदिरे जाळली अथवा जमीनदोस्त करण्यात आली असल्याची नोंद आहे.

पण मुख्य वस्ती पासून दूर जंगलात (मोलेम अभयारण्याच्या परिसरात / Mollem National Park) असल्याने १२ व्या शतकात यादव राजा रामचंद्र ह्यांच्या मंत्र्याने बेसॉल्ट दगडांत बांधलेले आणि उत्तम शिल्पकलेने सजलेले हे प्राचीन मंदिर धर्मांध ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या आणि प्रशासकांच्या अत्याचारांपासून बचावले. आजघडीला हे मंदिर गोव्यातले सर्वात प्राचीन मंदिर म्हणुन ओळखले जाते.

अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले हे प्राचीन महादेव मंदिर 6-7 वर्षांपूर्वीच्या एका गोवा भेटीत पाहिले आहे, ते ह्या भेटीत पुन्हा पाहता नाही आले. त्यामुळे त्याविषयी इथे जास्ती लिहीत नाही, पण गेल्यावर्षी फेसबुक वर प्राचीन वास्तुकला/स्थापत्य/संस्कृती विषयक एका ग्रुपवर ह्या मंदिराचा परिचय करून देण्यासाठी एक सचित्र लघुलेख लिहिला होता त्याची लिंक इच्छुकांसाठी देतो.
Tambdi Surla Mahadev Temple - Goa

तांबडी सुरलाचा बेत रद्द झाल्यावर मग साडे तीनच्या सुमारास मी आणि भाऊ दक्षिण गोव्यातील सालसेत (साष्टी) तालुक्यातील 'कुडतरी' (कुर्तरीम / Curtorim) इथे असलेल्या माझ्या बायकोच्या आजोळी जायला निघालो आणि तासाभरात ३७ की. मी. चा प्रवास पार पाडून तिच्या आजोबांच्या (आईच्या वडिलांच्या) पोर्तुगीज कालीन घरी पोचलो.

house 1
.
house 2
.
house 3
.
प्रत्येक वेळी गोव्याला आलो की आम्ही आजोबांची सदिच्छा भेट घ्यायला अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण आवर्जून ह्या ठिकाणी येऊन जातो.
पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा यायची. अनेक जुन्या गोष्टी समजायच्या, माहिती मिळायची. पण आता आजोबा बरेच थकले आहेत. यंदा त्यांनी एक्याण्णवव्या वर्षात पदार्पण केले आहे, तब्येतही नरम-गरम असते आणि गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांची श्रवणशक्ती कमी कमी होत त्यांना अजिबात ऐकू येईनासे झाल्याने आता त्यांच्याशी संवाद असां होत नाही, पण तिथे गेलं की त्यांना बरं वाटतं.

गोव्यातली जुनी घरं चांगली मोठी असतात त्याला हे रघुनाथरावांचं (आजोबांचं) पोर्तुगीज कालीन घरही अपवाद नाही. जुने वाडे / घरांची आवड असलेले अनेक मिपाकर आहेत, कितीतरी गोवेकरही मिपावर आहेत त्यांना माहिती असेलच पण ज्यांना त्याविषयी कुतूहल किंवाआवड असेल त्यांच्यासाठी घरातील अंतर्भागाचे/काही खोल्यांचे फोटोज खाली देत आहे.
.
house 4
.
house 5
.
house 6
.
house 7
.
house 8
.
house 9
.
house 10
.
house 11
स्वयंपाकघर.
.
house 12
स्वयंपाकघर.
.
house 13
अडगाळीची खोली.
.
पोर्तुगीज राजवटीत ही मोठाली घरे रंगावायला सरकार पैसे देत असे!

बायकोच्या आजोबांची आणि मामा, मामीची भेट झाली. मामाचा मोठा मुलगा नोकरी निमित्ताने तर धाकटा मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
चहा-पाणी झाले. मग घराच्या मागे असलेल्या त्यांच्या बागेत फेरफटका मारून परतल्यावर इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू असताना मामीने बनवलेले गरमा गरम ब्रेड रोल्स आणि कोक असा अल्पोपहार झाला.

सगळ्यांचा निरोप घेऊन सव्वा सात वाजता आम्ही तिथून जायला निघालो त्यावेळी मामाही आम्हाला मेन रोड पर्यंत सोडण्याच्या बहाण्याने निघाला तेव्हा मामीने हसत हसत मामाला "जावई आलाय म्हणुन जास्ती रंगात येऊ नका... लिमिट सांभाळा आणि लवकर घरी या..." अशी इशारेवजा सूचना देऊन पत्नीधर्माचे काटेकोरपणे पालन केले 😀

घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कुडतरी बस स्टॅंड जवळच्या एका बारमध्ये आम्ही तिघे प्रवेशकर्ते झालो.
गोव्याची 'उराक' मला प्रचंड आवडते, पण अजून तिचा सिझन सुरु व्हायला दीड-दोन महिने अवकाश होता म्हणुन माझ्यासाठी दुसऱ्या पसंतीची 'कोकोनट फेणी', मामासाठी 'बिअर' आणि आता जाताना भावाला बाईक चालवावी लागणार असल्याने त्याच्यासाठी 'मिरिंडा' ची ऑर्डर दिली!

सव्वा आठ पर्यंत तिथला कार्यक्रम आटपून मामाचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि पावणे दहा वाजता मुक्कामी पोचलो. आम्हाला विशेष भूक नसल्याने आमचे जेवण बनवू नकोस असे बहिणीला आधीच कळवले होते तरी तीने 'इडली फ्राय' करून ठेवला होता तो खाल्ला.

काल रात्रीची झोप पूर्ण झाली नव्हती आणि उद्या पासून दक्षिण गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची होती त्यामुळे फार वेळ गप्पा वगैरे मारत न बसता साडे दहाच्या सुमारास निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
----------

सकाळी उठायला साडे नऊ वाजले, म्हणजे तसा उशीरच झाला होता. संकष्टी चतुर्थी असल्याने बहिणीचा उपास होता म्हणुन तीने साबुदाण्याची थालीपीठे करण्याचा घाट घातला होता. थालीपीठे बनण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याने मी आणि भावाने चहा बिस्किटे खाऊन अंघोळी उरकून घेतल्या.

साजूक तुपावर भाजलेल्या साबुदाण्याच्या खमंग थालीपीठांच्या जोडीला दही, लिंबाचे (उपासाचे) लोणचे आणि केळी असा दणदणीत नाश्ता (नाश्ता कसला Brunch) झाल्याने दुपारी जेवायची गरजच उरली नव्हती 😀

कंपनीच्या कामासाठी आठवडाभर मुंबई हेड ऑफिसला गेलेले बहिणीचे मिस्टर आज संध्याकाळी परतणार होते आणि त्यांना आणायला तिला गाडी घेउन एअरपोर्टला जायचे असल्याने आजच्या दक्षिण गोव्यातल्या किल्ले दर्शनासाठी मी आणि भाऊ दोघेच जाणार होतो. पण अकराच्या सुमारास आम्ही निघण्याच्या तयारीत असताना भाऊजींनी त्या कामासाठी ड्रायव्हर अरेंज केला असल्याचे कळवणारा फोन तिला आला तसा आमचा प्लॅन बदलला!

मग बहिणीची किचनमधली जुजबी आवरा आवरी आणि तयारी झाल्यावर आम्ही तिघेजण निघेपर्यंत साडे अकरा वाजले. ड्रायव्हरला द्यायला कारची चावी समोरच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या दक्षिणात्य कुटुंबाकडे ठेऊन माझी बाईक आणि बहिणीची ऍक्टिवा घेऊन आम्ही निघालो.

साईट सिइंगची सुरुवात शेवटच्या टोकापासून करण्याची सवय माझ्या अंगावळणी पडली असल्याने दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या'काणकोण' (कॅनाकोना / Canacona) तालुक्यातील 'काबो-डी-रामा' (Cabo de Rama) ह्या संपूर्ण गोव्यातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन किल्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोव्यातील शेवटच्या किल्ल्याच्या दिशेनी प्रवास सुरु झाला.
.
map
.
वास्तविक 'काबो-डी-रामा' हा भौगोलिकदृष्ट्या गोव्याच्या दक्षिणेकडचा शेवटचा किल्ला नाही. त्यापुढेही 'अंजेदिवा' नावाचा एक फार प्राचीन (अवशेषरुपी) किल्ला 'अंजदीप' नावाच्या बेटावर आहे पण आता त्या बेटावर भारतीय नौदलाचा तळ असल्याने तिथे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही.

'अंजदीप' हे बेट गोव्याच्या मुख्यभूमीपासून लांबवर, कर्नाटकातील कारवारच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ असले तरी त्यावर प्रशासन गोवा सरकारचे आहे. अशी गंमत गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही टोकांना बघायला मिळते. उत्तरेकडे 'तेरेखोल' (Terekhol / Tiracol) किल्ल्याच्या बाबतीत तर दक्षिणेकडे अंजदीप बेट आणि त्यावरच्या 'अंजेदिवा' किल्ल्याच्या बाबतीत.

तेरेखोल हे गाव भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यात असले तरी तिथला 'तेरेखोल किल्ला' आणि त्याच्या आसपासचा थोडा प्रदेश मात्र गोवा सरकारच्या अखत्यारीत येतो. तर 1961 साली भारतीय सेनेने 'ऑपरेशन विजय' सुरु करून गोवा, दिव-दमण आणि अंजदीप (अंजेदिवा) बेट पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केल्यावर ते गोवा राज्याचा भाग बनले.

विशेष गोष्ट म्हणजे 1498 साली दर्यावर्दी 'वास्को-डी-गामा' आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या रूपाने समुद्रमार्गे येऊन भारताच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवणारे युरोपीयन लोकं देखील पोर्तुगीजच होते आणि 1961 साली 'ऑपरेशन विजय' नंतर भारत सोडून जाणारे सर्वात शेवटचे युरोपीयन शासकही पोर्तुगीजच होते!

असो, करमळी पासून 57 किमीचा प्रवास रमत गमत दोन तासात पार करून आम्ही दुपारी दीड वाजता 'काबो-डी-रामा' किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.

cabo 1
.
तीन बाजूने पाणी आणि एका बाजूला जमीन अशी भौगोलिक स्थिती असणाऱ्या समुद्रात शिरलेल्या जमिनीच्या टोकाला आपण भुशीर म्हणतो त्यालाच पोर्तुगीज भाषेत 'काबो' (Cabo) म्हणतात. साडे-चार ते पाच एकर क्षेत्रफळ व्यापणारा हा किल्ला अशाच एका भुशीरावर बांधलेला आहे.

प्रभु श्री रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात सीतामाई आणि लक्षमाणसह कर्नाटकातून ह्याठिकाणी येऊन काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे ह्या भुशीराला 'राम भुशीर' किंवा 'रामाचे भुशीर' असे नाव पडल्याची दंतकथा आहे. पुढे ह्या रामाच्या भुशीराचे पोर्तुगीज राजवटीत 'काबो-डी-रामा' असे भाषांतर झाले.

अतिशय निसर्गरम्य परिसरात चिऱ्यांनी (जांभा दगडात) बांधलेल्या आणि पूर्वी खोलगड म्हणुन ओळखला जाणाऱ्या ह्या किल्ल्याचा ताबा इतिहासात अनेकवेळा मराठे, मुस्लिम राज्यकर्ते, आणि पोर्तुगीजांकडे फिरता राहिला. सोंधे संस्थानाकडून हैदरअली कडे मग पुन्हा सोंधे संस्थानाकडे जात शेवटी 1791 मध्ये ह्या किल्ल्याचा ताबा पूर्णपणे पोर्तुगीजांकडे आला तो थेट 1961 पर्यंत.

किल्ल्याच्या मध्यभागी आजही वापरात असलेला एक चर्च सोडला तर बाकी सर्व भाग्नावशेष उरले आहेत, पण अजूनही सुस्थितीत असलेल्या मजबूत तटबंदीवरून आपण बऱ्यापैकी लांब फेरफटका मारत आसपासचा नयनरम्य परिसर पाहू शकतो.

'काबो-डी-रामा' किल्ल्याचे आणि परिसराचे काही फोटोज -
.
cabo 2
प्रवेशद्वार ओलांडल्यावर समोर ठेवलेली तोफ.
.
cabo 3
किल्ल्याला जमिनिपासुन वेगळे करणारा खंदक.
.
cabo 4
बुरुजावरची तोफ.
.
cabo 5
दुसर्‍या बुरुजावरच्या दोन तोफा.
.
cabo 6
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 7
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 8
किल्ल्यावरच्या वास्तुंचे भग्नावषेश.
.
cabo 9
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा १
.
cabo 10
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा २
.
cabo 11
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ३
.
cabo 12
किल्ल्यावरुन दिसणारा देखावा ४
.
cabo 13
.
फारच प्रेक्षणीय परिसर असलेल्या ह्या किल्ल्यात सुमारे दीड तास व्यतीत करून आम्ही परतीच्या वाटेवरील पुढचे किल्ले बघायला निघालो.

किल्ल्यापासून दीड किलोमीटर पुढे गेल्यावर 'काबो-डी-रामा व्हयू पॉईंट' (Cabo De Rama Viewpoint) असे ठिकाण आहे तिथून लांब पर्यंत पसरलेल्या समुद्रकिनाऱ्याचे खूप सुंदर दृष्य बघायला मिळते. त्या ठिकाणी टिपलेले दोन फोटोज -

cabo 14
.
cabo 15
.
.
ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला...

क्रमश:

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

"ह्याठिकाणी असलेल्या एका दुकानात 'खारा' लिंबू सोडा पिऊन तरतरीत झाल्यावर 10 किमी वर असलेल्या 'बेतुल' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधण्यात आलेल्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला..."

Map
.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचे काही किल्ले जिंकले, काही किल्ल्यांची डागडूजी केली, तर काही किल्ले नव्याने बांधले. महाराष्ट्रात मोक्याची ठिकाणं पाहून महाराजांनी अनेक किल्ले बांधले आहेतच, पण गोव्यामध्ये देखील त्यांनी बरंच वर्चस्व निर्माण केले होते त्याचा साक्षीदार आहे 'बेतुल' हा छत्रपतींनी गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला!.
दक्षिण गोव्यातील वेर्णे (Vernem) गावाजवळ उगम पावलेली साळ नदी (Sal River) सोळा किलोमीटरचा प्रवास करत बेतूल येथे अरबी समुद्रात विलीन होते. तिच्या नदीमुखावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून स्वराज्याचे पाईक असलेल्या बाल्ली (बाळ्ळी/Balli) च्या हवालदारांनी केपे (Quepem) तालुक्यातील बेतुल ह्या ठिकाणी १६७९ साली हा 'बेतूल' किल्ला बांधला.

Board
.
साळ नदी हि एकप्रकारे पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्यातली नैसर्गिक सीमारेषा होती, नदीच्या उत्तरेकडील काठापासून पोर्तुगीजांचे राज्य होते तर दक्षिणेकडील काठापासून मराठ्यांचे राज्य होते. हा किल्ला बांधण्यामागे महाराजांचा आपल्या सीमेचे रक्षण हा हेतू तर होताच पण त्याच बरोबर साळ नदीतून साष्टी (Salset) प्रांतात पोर्तुगिजांचा बराच व्यापार त्याकाळी चालत असे त्यावर ह्या मोक्याच्या ठिकाणी किल्ला बांधून महाराजांनी कर आकारणीहि सुरु केली होती.
पुढच्या काळात सोंधेकरांकडून १७६३ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तो थेट १९६१ पर्यंत.

दुर्दैवाने आज ह्या किल्ल्याचा केवळ एक बुरुज आणि त्यावरील लांब पल्ल्याची एक तोफ वगळता बाकी काहीही बांधकाम दृष्टीस पडत नाही. पण असे असले तरी किल्ल्याचा परिसर, इथले ग्राम रक्षक राखणदेवाचे छोटेखानी 'खाणेश्वर' मंदिर आणि बुरुजावरून दिसणारी दृश्ये अतिशय प्रेक्षणीय आहेत.
बेतूल किल्ल्याचा बुरुज आणि परिसराचे काही फोटोज-

बुरुज १
शाबूत असलेला किल्ल्याचा एकमेव बुरुज.
.
बुरुज २
बुरुजावरची साळ नदीमुखाच्या दिशेने रोखलेली लांब पल्ल्याची तोफ.
.
तोफ
.
बेतूल बीच
बुरुजावरून समोर दिसणारा पांढऱ्या वाळूचा अतिशय सुंदर असा 'बेतूल बीच' (Betul Beach), बीचच्या उजवीकडे साळ नदी तर पुढ्यात आणि डावीकडे अरबी समुद्र.
.
बेतूल बीच २
किल्ल्या खालचा खडकाळ समुद्र किनारा.
.
बेतूल बीच ३
.
बेतूल बीच ४
किल्ल्याच्या उजवीकच्या टेकडीवर लांबवर दिसणारे दीपगृह, खाली दगडांवर पाण्यात गळ टाकून मासे पकडणारे स्थानिक.
.
lighthouse
दीपगृहाचा झूम करून काढलेला फोटो.
.
we ३
बुरुजावर उभी तीन भावंडे.
.
temple १
बुरुजा जवळचे खाणेश्वर मंदिर.
.
ग्रामरक्षक 'राखणदेव' खाणेश्वर .
.
नदीमुखात उभ्या मच्छीमारी नौका.
.
बेतूल किल्ला पाहून आम्ही तिथून ३७ किमी. अंतरावरच्या श्री शांतादुर्गा मंदिराकडे जायला निघालो. वाटेत 'बोरी' (Borim) इथे रस्त्याच्या उजव्या बाजूला नव्याने बनलेले छानसे साईबाबा मंदिर दिसले. पश्चिम शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यात संगमरवरी सजावटीचे काम सुरु असले तरी मंदिर दर्शनासाठी खुले होते.

साईबाबा मंदिर, बोरी
.
साईबाबा मंदिर, बोरी
.
बोरीच्या साईबाबा मंदिरापासून ६ किमी अंतरावर असलेल्या श्री शांतादुर्गा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो तर आमच्या स्वागताला उभा असलेला हा बोर्ड दिसला -

नोटीस बोर्ड
.
मंदिरातले सगळे पुजारी कोविड पॉजिटीव्ह झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंदिराजवळील शीतपेय विक्रेत्या महिलेने दिली. अर्थात पर्यटकांना मंदिरात प्रवेशबंदी असली तरी स्थानिकांना ओळखपत्र दाखवून सकाळी ८ ते १२:३० आणि दुपारी २:३० ते ६:३० अशा वेळांत प्रवेश दिला जात होता. मग बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन, मंदिराचे २-४ फोटो काढले.
.
श्री शांतादुर्गा मंदिर १
.
श्री शांतादुर्गा मंदिर २
.
मंदिराजवळच्या दुकानात शीतपेये पिऊन आम्ही पुढे फर्मागुडीचे 'श्री गोपाळ गणपती मंदिर' आणि त्याच्या समोरच असलेला 'छत्रपती शिवाजी महाराज किल्ला' (Ponda Fort / Farmagudi Fort) बघायला निघालो. फर्मागुढीला पोचलो तेव्हा किल्ला बंद व्हायची वेळ होत आली असल्याने उपलब्ध असलेल्या कमी वेळात आधी किल्ला पाहून नंतर मंदिरात जायचे ठरवले.

ponda fort १
.
सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधलेला 'फोंडा किल्ला' (Ponda Fort) हा 'फर्मागुढी किल्ला' (Farmagudi Fort) नावानेही प्रसिद्ध असला तरी आता 'छत्रपति शिवाजी महाराज किल्ला' म्हणून ओळखला जातो.

१६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले तेव्हा फोंडा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अपयश आले. पुन्हा १६७५ साली जोरदार आक्रमण करून महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला पण १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिकून घेतला.
संभाजी राजांच्या शासन काळात येसाजी कंक फोंडा किल्ल्याचे किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी ३००० सैन्यासह हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी केलेल्या आक्रमणात अवघ्या ३०० मावळ्यांसह लढताना येसाजी कंक जायबंदी झाले होते तर त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा धारातिर्थी पडला होता. पण किल्ला राखण्याचा पराक्रम त्यांनी केला होता.

अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे खंदक, तटबंदीचे प्राचीन अवशेष आता शिल्लक नाहीत आज जो किल्ला दिसतो त्याचे बहुतांश बांधकाम नव्याने केले आहे.

छत्रपति शिवाजी महाराज किल्ल्याचे काही फोटोज-

ponda fort २
.
ponda fort ३
.
ponda fort ४
.
ponda fort ५
किल्ल्यावरुन दिसणारे 'श्री गोपाळ गणपती मंदिर'
.
ponda fort ६
.
ponda fort ७
.
ponda fort ८
.
हा किल्ला लहानसा असला तरी, त्याचा परिसर, महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बगीचा प्रेक्षणीय आहे. अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यावेळी किल्ल्यातून बाहेर पडून आम्ही समोरच्या 'श्री गोपाळ गणपती मंदिरात प्रवेश केला.

गोपाळ गणपती मंदिर १
.
प्राचीन आणि अर्वाचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचा संगम बघायला मिळणाऱ्या गोमंतकातील फारच थोड्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून ह्या सुंदरशा छोटेखानी मंदिराचे बांधकाम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री. दयानंद बांदोडकर ह्यांनी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीची २४ एप्रिल १९६६ रोजी ह्या नव्या मंदिरात स्थापना केली.

ह्या ठिकाणी असलेल्या मूळ जुन्या मंदिराबाबत एक कहाणी सांगितली जाते ती अशी कि, बांदिवड्याचे राजे असलेल्या सौंधेकरांच्या पदरी चाकरीस असलेल्या 'हापो' नावाच्या गुराख्याला सुमारे १०० वर्षांपूर्वी माळरान असलेल्या ह्या पठारावर गाई चरायला घेऊन आला असताना ह्याठिकाणी फूटभर उंचीची श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली आणि त्याने नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली होती. गोपालन करणारा गुराखी म्हणजे 'गोपाळ' आणि गोपाळाने स्थापन केलेला हा गणपती असल्याने त्याचे नाव 'गोपाळ गणपती'.

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आहे. मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असून येथे दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.. यादिवशी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री भजन आणि अन्य कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गुढी उभारण्याची ह्या मंदिरात प्रथा आहे.

याशिवाय संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते आणि भाविकांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. आम्ही गेलो होतो त्यादिवशी संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला श्रींचे दर्शनहि घडले आणि रोषणाईही पाहायला मिळाली तसेच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असूनही करोना पर्वातील निर्बन्धांमुळे फार गर्दीही नव्हती.

गोपाळ गणपती मंदिर २
.
गोपाळ गणपती मंदिर ३
.
गोपाळ गणपती मंदिर ४

फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत आणि त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी केला जातो. फर्मागुढीचे पठारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायम या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची आणि हिंदू धर्मियांची श्रद्धा आहेच पण विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मंदिराला आवर्जून भेट देतात. हे मंदिर किल्ल्याच्या समोरच असल्याने किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना आपसूक देवदर्शनही घडते.

(गेल्यावर्षी मिपाच्या श्रीगणेश लेखमाला २०२१ मध्ये माझा 'श्री गोपाळ गणपती मंदिर (फर्मागुढी, गोवा)' हा लेख प्रकाशित झाला होता त्यामुळे काही वाचकांना हा किल्ला आणि ह्या मंदिराची माहिती आधी वाचल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.)

फर्मागुढीचा किल्ला आणि मंदिर पाहून सव्वा सात वाजता आम्ही १८ किमी अंतरावरच्या आमच्या मुक्कामस्थळी करमळीला जायला निघालो. भाऊजी घरी पोचल्याचा फोन येऊन गेला होता. त्यादिवशी चंद्रोदय लवकर म्हणजे रात्री ८:३६ ला असल्याने बहिणीला घरी परतल्यावर उपास सोडायला उशीर व्हायला नको म्हणून तो प्रेमळ नवरा सव्वा आठच्या सुमारास 'वरण भाताचा' कुकर लावून ठेवणार होता. दुपारचे जेवण स्किप झाल्याने तेवढ्याने माझे आणि भावाचे पोट भरणार नव्हते म्हणून त्याआधी थोडीशी पोटपूजा करण्यासाठी वाटेत जुन्या गोव्यातल्या (Old Goa) 'रसोडा' (Rasoda) ह्या ऑथेंटिक उत्तरभारतीय चवीचे पदार्थ मिळण्याचा दावा करणाऱ्या महागड्या राजस्थानी उपहारगृहात जाऊन बहिणीच्या शिफारशीवरून 'राज कचोरी' आणि 'सामोसा चाट' असे चविष्ट पदार्थ खाल्ले आणि घरी जेवणानंतर सर्वांसाठी म्हणून चार 'ड्राय फ्रुट मिल्क शेक' पार्सल घेतले. ह्या सहा नगांचे बीलच जवळपास १५०० रुपये मात्र झाले, पण आमच्यासाठी हि कॅसिनो कडून मिळालेली 'ट्रीट' असल्याने त्याचे काही विशेष वाटले नाही 😀

साडे आठच्या सुमारास रसोडा मधून निघून पाच-सात मिनिटांत मुक्कामी पोचल्यावर फ्रेश होऊन भाऊजींनी बनवलेला गोडं वरण भात मस्तपैकी तूप, मीठ, लिंबू पिळून बहिणीने तळलेल्या मिरगुंडां सोबत खाल्ला आणि थोडा वेळाने पार्सल आणलेले ड्राय फ्रुट मिल्कशेक चवीने रिचवल्यावर काहीवेळ गप्पागोष्टी आणि सव्वादहाच्या सुमारास उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेलेल्या ह्या बहिणीच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर सर्वांचे बोलणे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याची तशी काही घाई नव्हती पण अंधार लवकर पडत असल्याने शक्यतो लवकर निघून उत्तर गोव्यातले किल्ले पाहायला सुरुवात करायची असल्याने साडेदहा- पावणे आकाराच्या सुमारास झोपून गेलो.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

आधीचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

सकाळी आठ वाजता उठून तयारी झाल्यावर नाश्त्याला दही आणि टोमॅटो केचपच्या साथीने मेथीचे पराठे खाऊन आम्ही साडे नऊच्या सुमारास करमळी पासून ४६ कि.मी. अंतरावरच्या 'हळर्ण' किल्ल्यापासून (अलोर्ना किल्ला / Alorna Fort ) सुरुवात करून नंतर 'कोलवाळ', 'शापोरा' आणि 'अग्वाद' हे उत्तर गोव्यातील चार किल्ले आज पाहायचे असे ठरवून निघालो.

”map”/

सोमवारची सकाळ असल्याने कामावर जायला निघालेल्यांची वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने होती त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले होते, परिणामी मांडवी नदीवरचा पूल ओलांडायलाच वीस-पंचवीस मिनिटांऐवजी पाऊण तास लागला. सव्वा अकराच्या सुमारास हळर्ण किल्ल्याच्या आधी चौदा किमी. वर असलेल्या कोलवाळ गावात पोचलो तेव्हा उजवी कडे वळल्यास 'थिवीचा किल्ला' (Thivim Fort) म्हणूनही ओळखला जाणारा 'कोलवाळ किल्ला' (Colvale Fort) अगदी जवळ असल्याचे गुगल मॅप दर्शवत होता म्हणून आधी तो बघायचे ठरवले.

मॅप फॉलो करत थोडे पुढे गेल्यावर गावातून जाणाऱ्या एका अरुंदशा रस्त्याच्या डावीकडे हि 'कोलवाळ किल्ला' नावाची पार खंडर स्वरूपात अस्तित्वात असलेली वास्तू दृष्टीस पडली.

”Colvale-Fort”/

उत्तर गोव्यातल्या बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावाच्या परिसरात सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी तीन किल्ले बांधले होते. त्यातले दोन किल्ले कालौघात पूर्णपणे नष्ट झाले असून हा कोलवाळ किल्ला तेवढा चिऱ्याच्या (जांभा) दगडांत बांधलेला एक बुरुज आणि अन्य बांधकामाचे किरकोळ भग्नावशेष अशा स्वरूपात शिल्लक उरला आहे.

कोलवाळ किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

कोलवाळ किल्ल्याचे प्रवेशद्वार


थोडेफार भग्नावशेष सोडून ह्या लहानशा किल्ल्यात पाहण्यासारखे खरंतर काही नाही. आतली एकमेव विहीर देखील दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याने तुडुंब भरलेली आहे. एकंदरीत इथे जे काही पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याच्या गतवैभवाबद्दल कुठलीही कल्पना येत नाही आणि किल्ल्याची दुरावस्था बघता स्थानिकांची आणि सरकारची उदासीनता त्याला कारणीभूत असावी हे लक्षात येते. पुरातत्व खात्याने हा किल्ला संरक्षित स्मारक असल्याचा छोटासा बोर्ड बाहेर रस्त्यावर लावला असला तरी मुळात जतन/संवर्धन करण्यासारखे विशेष काही उरलेच नाहीये.

काल पाहिलेल्या 'बेतूल' किल्ल्याचा पण केवळ एक बुरुज तेवढा शाबूत होता पण किमान तिथली लांब पल्ल्याची तोफ आणि आजूबाजूचा परिसर तरी अतिशय प्रेक्षणीय असा होता, पण इथे अक्षरशः काहीच बघण्यासारखे नसल्याने वेळ वाया गेल्यासारखे वाटले.

असो, बाराच्या सुमारास इथून चौदा किमी वर असलेला 'हळर्ण किल्ला' पाहायला आम्ही निघालो. पंधरा मिनिटांत आठएक किमी अंतर पार केल्यावर भावाला चहा प्यायची इच्छा झाल्याने 'पिर्णा' (Pirna) गावातल्या चौकात एक थांबा घेतला.

फेब्रुवारीच्या त्या पहिल्याच दिवसाने गोव्यातल्या थंडीचे सूप वाजल्याची जाणीव करून दिली होती. एकतर दुपारचा सव्वा बाराचा सुमार, त्यात गेल्या बारा दिवसात कधीही जाणवला नव्हता असा उकाडा जाणवत होता त्यामुळे मी चहा पिण्याऐवजी चहावाल्याच्या शेजारीच असलेल्या 'रुक्मिणी बार अँड रेस्टॉरंट' मध्ये जाऊन मस्तपैकी चिल्ड बिअर पिणे पसंत केले. तसाही काल संकष्टी असल्याने बहिणीच्या इच्छेचा मान राखत चक्क गोव्यात असून सुद्धा 'ड्राय डे' पाळला होता. त्याची कसर आज भरून निघणे स्वाभाविकच होते 😀

पाऊण वाजता तिथला कार्यक्रम आटपून निघालो आणि एक वाजण्याच्या सुमारास हळर्ण किल्ल्या (Alorna Fort) जवळ पोचलो.

”Alorna-Fort-1”/
”Alorna-Fort-2”/

वळणावरून दिसणारा किल्ल्याचा कॅप्सूल बुरुज

”Alorna-Fort-3”/

किल्ल्याच्या अगदी समोर असलेली शापोरा नदी

”Alorna-Fort-4”/

हळर्ण किल्ल्याचे प्रवेशद्वार

”Alorna-Fort-5”/

आत प्रवेश करताच दुतर्फा ठेवलेल्या तोफा

प्रवेशद्वारातून आत शिरताच उजव्या बाजूच्या तोफेच्या मागच्या अंधाऱ्या देवडीत आराम करण्यासाठी पहुडलेल्या किल्ल्याच्या सुरक्षारक्षकाने डाव्या बाजूच्या तोफेवर ठेवलेल्या रजिस्टर मध्ये नाव, गाव, फोन आणि गाडी नंबर अशी माहिती लिहून आत जाण्याचे फर्मान सोडले. त्याप्रमाणे करून आम्ही आत प्रवेशकर्ते झालो आणि किल्ला पाहायला सुरुवात केली.

सावंतवाडीचे संस्थानिक 'खेम सावंत' ह्यांचा १७०९ साली मृत्यू झाल्यानंतर गादीवर बसलेले त्यांचे पुतणे 'फोंड सावंत' ह्यांनी आपल्या शासनकाळात पोर्तुगीजांना शह देण्यासाठी त्याकाळी सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखाली असलेल्या हळर्ण ह्या गावी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शापोरा नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला बांधला होता. पुढे १७४६ साली तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी किल्ल्याचे नूतनीकरण केल्याच्या खुणाही आढळतात जसे की खास पोर्तुगीज शैलीत नंतर बांधून काढलेला कॅप्सूल बुरुज.

जांभ्या दगडाचा वापर करून चहुबाजूने बांधलेली मजबूत तटबंदी, चारही कोपऱ्यांत चार बुरुज आणि बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी चढावाच्या मार्गिका अशी ह्या किल्ल्याची संरक्षणात्मक रचना आहे. आतली अनेक बांधकामे कालौघात नष्ट झाली असली तरी एक तीन खोल्यांची बैठी चाळवजा इमारत, विहीर, किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही सुस्थितीत आहेत. तसेच आजूबाजूचा परिसरही प्रेक्षणीय आहे आणि खाजगी वाहन असल्याशिवाय इथे पोचणे बरेचसे अवघड असल्याने गर्दीही नसते त्यामुळे शांतपणे आजूबाजूचा निसर्ग अनुभवत खूप मोठाही नाही आणि लहानही नाही असा हळर्ण किल्ला पाहणे हा एक छान अनुभव ठरतो.

हळर्ण किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

पहिला फोटो


सुंदरसा हळर्ण किल्ला पाहून आम्ही इथून जवळपास ३० किमी अंतरावर असलेला शापोरा (Chapora Fort) हा पुढचा किल्ला पाहायला मार्गस्थ झालो.

”Map-2”/

चाळीसेक मिनिटांचा प्रवास केल्यावर चांगलीच भूक लागली असल्याने दुपारी सव्वा दोनच्या सुमारास म्हापसा येथील गोविंद फॅमिली रेस्टॉरंट येथे जेवणासाठी एक थांबा घेतला. तिथे पंजाबी थाळी आणि लस्सीचा आस्वाद घेऊन भरल्या पोटाने शापोरा किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आणि साडेतीनच्या आसपास किल्ला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंग लॉट मध्ये बाईक लावून टेकडी चढायला सुरुवात केल्यावर पंधरा-वीस मिनिटांत शापोरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो.

”x”/

शापोरा किल्ल्याचे प्रवेशद्वार

”x”/

तटबंदीवर उजवीकडे दिसणारा कॅप्सूल बुरुज

सोळाव्या शतकात उत्तर गोव्यातील आजच्या बार्देश (बारदेश/Bardez) तालुक्यात शापोरा नदीच्या नदीमुखाजवळच्या टेकडीवर आदिलशाहीत बांधला गेलेला हा किल्ला 'शाहपुरा' नावाने ओळखला जात होता. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी त्या प्रदेशावर ताबा मिळवल्यावर त्यांच्या राजवटीत 'शाहपुराचा' अपभ्रंश 'शापोरा' असा झाला.

छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३ मध्ये हा किल्ला जिंकून घेतल्यावर दिल्लीच्या तख्तावर बसण्याच्या महत्वाकांक्षेपोटी शंभूराजांशी हातमिळवणी केलेला औरंगजेबाचा बंडखोर पुत्र 'मोहम्मद अकबर' हा १६८६ साली संभाजी महाराजांनी त्याला पर्शियाला पाठवेपर्यंत काही काळ इथे तळ ठोकून राहिला.

पुढच्या काळात किल्ल्याचा ताबा सावंतवाडी संसंस्थानाकडे गेला मात्र त्यांना केवळ दोन वर्षेच हा किल्ला आपल्या अधिपत्याखाली राखता आला. त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर १७१७ मध्ये किल्ल्याचे मोठ्याप्रमाणावर नूतनीकरण केले आणि खास पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सूल बुरुज व आणीबाणीच्या काळात निसटून जाण्यासाठी खाली समुद्र किनारा आणि शापोरा नदीच्या काठापर्यंत जाणारे भुयार असे काही वैशिष्ट्यपूर्ण बदल किल्ल्याच्या रचनेत केले.

१७४१ मध्ये सावंतवाडी संस्थानाच्या अधिपत्याखालील पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्याने त्यांच्या अंमलाखालील प्रदेशाची सीमा उत्तरेकडे अधिक विस्तारली गेल्याने ह्या किल्ल्याचे लष्करीदृष्ट्या महत्व कमी झाले. पुढे १८९२ मध्ये पोर्तुगीजांनी शापोरा किल्ल्याचा वापर पूर्णपणे थांबवल्यावर मात्र त्याची रया गेली असली तरी आजघडीलाही ह्या भव्य किल्ल्याच्या मजबूत तटबंदीचा बराचसा भाग, कॅप्सूल बुरुज आणि किल्याचे मुख्य प्रवेशद्वार शाबूत आहे.

पूर्ण स्वरूपातला 'किल्ला' म्हणून इथे फार काही बघायला मिळत नसले तरी ह्या प्रशस्त किल्ल्याचे आवार आणि आजूबाजूला दिसणारे समुद्र, वॅगॅटोर बीच,शापोरा नदी आणि वनराईचे नयनरम्य असे देखावे मात्र खूपच प्रेक्षणीय आहेत.

शापोरा किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

किल्ल्यावरून दिसणारा अरबी समुद्र


शापोरा किल्ला पाहून साडेचारच्या सुमारास आम्ही आजच्या दिवसात पाहायचा ठरवलेला शेवटचा किल्ला म्हणजे 'अग्वाद किल्ला' पाहायला निघालो. सहा वाजता किल्लाप्रवेश बंद होत असल्याने अधे मध्ये कुठेही न थांबता कांडोळी (Condolim), कळंगुट (Calangute) अशा गावांतील गजबजलेल्या रस्त्यांवरून मार्ग काढत पस्तीस चाळीस मिनिटांत सतरा कि.मी. चा प्रवास पूर्ण करत किल्ल्याच्या समोरच्या पे अँड पार्क मध्ये बाईक लावून सव्वापाचच्या सुमारास तिकीट काउंटर गाठले पण प्रवेश मोफत होता.

”x”/

अग्वाद किल्ल्याचे तिकीट काउंटर

पोर्तुगीजांच्या समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराच्या सुरुवातीच्या कालखंडात हॉलंडचे रहिवासी म्हणजे 'डच' हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. ह्या डच लोकांनी सतराव्या शतकाच्या सुरुवातीला इ.स. १६०४ मध्ये मांडवी नदीमुखात सात जहाजांच्या मदतीने पोर्तुगीजांच्या व्यापारी जहाजांची एक महिनाभर पूर्णपणे नाकाबंदी केली होती.

मांडवी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या 'रिस मागोस' (Reis Magos Fort) आणि दक्षिण किनाऱ्यावरच्या 'गॅस्पर दिआस' (Gaspar Dias Fort) ह्या पोर्तुगीजांच्या दोन्ही किल्ल्यांवर तोफा होत्या पण त्यांची मारक क्षमता कमी पल्ल्याची असल्याने नदीमुखात नांगरून ठेवलेली 'डच' जहाजे त्यांच्या निशाण्याच्या टप्प्याबाहेर होती. त्यामुळे हि नाकाबंदी भेदण्यासाठी त्यावेळी पोर्तुगीजांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

ह्या घटनेतून बोध घेऊन लगोलग त्यांनी आपली बंदरे आणि व्यापारी मार्ग सुरक्षित करण्याच्या उद्देशाने झुआरी नदीमुखावर 'मोर्मुगाओ' (मुरगाव किल्ला / Mormugao Fort) तर मांडवी नदीमुखावर 'अग्वाद' (आग्वाद किल्ला / Aguada Fort) असे दोन किल्ले बांधायला घेतले.

१६०६ साली 'अग्वाद पॉइंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरवजा टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८० मीटर्स उंचीवर बांधण्यात आलेला हा 'अग्वाद किल्ला' म्हणजे सतराव्या शतकातील पोर्तुगीज संरक्षणात्मक स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. ह्या प्रशस्त किल्ल्यातील प्रमुख आकर्षणे म्हणजे इथली पाणी साठवण्यासाठी बांधलेली विशाल टाकी आणि प्राचीन 'दीपगृह'

टीप: वरील माहिती किल्यात लावलेल्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील फलकांवर लिहिलेल्या माहितीबरहुकूम आहे, जालावर मिळणाऱ्या माहितीत सनावळींमधे तफावत आढळून येते. त्या फलकांचे फोटोज खाली स्लाईड-शो मध्ये दिले आहेत.

”Water-Tank”/

पाणी साठवण्यासाठी बांधलेली टाकी

पोर्तुगीज भाषेतील 'अग्वाद' (Aguada) शब्दाचा मराठीत अर्थ 'पाण्याचा स्रोत' असा आहे. मांडवी नदीमुखाच्या उत्तर दिशेला असलेल्या ह्या किल्ल्यात पिण्यायोग्य गोड्यापाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत. ह्या नैसर्गिक स्रोतांतून मिळणारे पाणी ह्या विशाल भूमिगत टाकीत साठवले जात असे आणि लांबच्या समुद्री सफरीवर निघालेल्या जहाजांना पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था ह्या अग्वाद किल्ल्यातून केली जात असे.

”Light-House-1”/

दीपगृह

”Light-House-2”/

दीपगृह

अग्वाद किल्ल्यात पाहायला मिळणारे १३ मीटर्स उंचीचे 'दीपगृह' (Light House) आशिया खंडातले सर्वात जुने दीपगृह मानले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी १८६४ साली हे दीपगृह बांधण्यापूर्वी 'हिल ऑफ पायलट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजीतल्या टेकडीवर मोठा जाळ पेटवून पोर्तुगीज जहाजांना मार्गदर्शन केले जात असे. काही तांत्रिक दुरुस्त्या करून शंभर वर्षांपेक्षा थोडा अधिक काळ हे दीपगृह वापरात होते. १९७६ साली किल्ल्याच्या उत्तरेकडे एक नवीन दीपगृह बांधून ते सेवेत आल्यावर ह्या प्राचीन दीपगृहाचा वापर बंद करण्यात आला.

अग्वाद किल्ल्याचे 'अप्पर अग्वाद' (१६०६ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीवरील पठारावरचा मुख्य किल्ला) आणि 'लोअर अग्वाद' (१६१२ मध्ये बांधलेला डोंगरवजा टेकडीच्या पायथ्याशी नदीमुख आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेला किल्ल्याचा भाग) असे दोन भाग आहेत.

लोअर अग्वादच्या दक्षिणेकडील (नदीमुखाकडील) भागाचा उपयोग 'अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार' (Antonio de Oliveira Salazar) ह्या पोर्तुगालच्या हुकूमशहाच्या राजवटीत त्याच्या राजकीय विरोधकांना कैदेत ठेवण्यासाठी इथल्या मूळच्या जुन्या छोटेखानी तुरुंगाचा विस्तार करून ह्या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कारागृह म्हणूनच केला जाऊ लागला होता.

पुढे अधिकृतपणे त्याचे रूपांतर 'अग्वाद मध्यवर्ती कारागृहात' (Aguada Central Jail) झाले आणि २०१५ सालापर्यंत हे गोव्यातले सर्वात मोठे 'मध्यवर्ती कारागृह' म्हणून ओळखले जात होते. २०१५ मध्ये इथल्या सर्व कैद्यांना कोलवाळ इथल्या मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आल्यावर गोवा पर्यटन विकास महामंडळाने हे कारागृह आपल्या ताब्यात घेतले आणि ह्या तुरुंगाचे रूपांतर आता गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पोर्तुगीज राजवटी विरोधात आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि बलिदान दिलेल्या अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून केंद्र सरकारच्या 'स्वदेश दर्शन' योजनेअंतर्गत सुमारे 22 कोटी रुपये खर्चून एक 'स्वातंत्र्य संघर्ष संग्रहालयात' करण्यात आले आहे.

१९ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीत ह्या कारागृहात ठेवण्यात आलेल्या टी. बी. कुन्हा आणि राम मनोहर लोहिया ह्या मुक्ती सैनिकांना समर्पित केलेले दोन खास सेल ह्या संग्रहालयात आहेत.

लोअर अग्वादच्या पश्चिमेकडील (अरबी समुद्राकडील) बराचसा भाग १९७४ साली सुरु झालेल्या ताज हॉटेल्स ग्रुपच्या (Taj Hotel Group) 'ताज फोर्ट अग्वाद रिसॉर्टने' (Taj Fort Aguada Resort) व्यापलेला आहे.

अग्वाद किल्ल्याच्या फोटोंचा स्लाईड-शो

पहिला फोटो


चारशे वर्षांपेक्षा जुना असूनही छान देखभाल राखली गेल्याने सुस्थितीत असलेला हा प्रेक्षणीय असा अग्वाद किल्ला पाहून साडेसहाच्या सुमारास आम्ही ३० कि.मी. वर असलेल्या करमळीला जायला निघालो. रस्त्यात काही ठिकाणी ट्राफिक लागल्याने तासाभरात मुक्कामी पोचलो तेव्हा भाऊजीही ऑफिसहून घरी आले होते. मग फ्रेश होऊन मी, भाऊ आणि भाऊजी असे तिघे आठच्या सुमारास बाहेर पडलो आणि चालत चालत करमळी रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या 'विल्शा बार अँड रेस्टॉरंट' मध्ये प्रवेशकर्ते झालो.

रुचिपालट म्हणून मालिबु (Malibu) ह्या कॅरेबियन रम बेस्ड कोकोनट लिकरच्या जोडीला आमच्या दोघांसाठी स्टार्टर म्हणून 'तंदूर लॉलीपॉप' आणि भावासाठी 'फिंगर चिप्स' अशी ऑर्डर दिली गेली. निवांत गप्पा मारत २-२ पेग्ज झाल्यावर साडेनऊच्या सुमारास आमच्या शुद्ध शाकाहारी बहीण आणि भावासाठी ह्याच हॉटेलमधून सोलकढी, पनीर पराठे आणि काश्मिरी पुलाव पार्सल घेऊन भाऊ घरी निघून गेला तर मी आणि भाऊजी जवळच असलेल्या एका गाडीवर मिळणारे 'रस-ऑम्लेट' खायला गेलो.

जुन्या गोव्यातून करमळी स्टेशनकडे येतानाच्या रस्त्यावर स्टेशनच्या अलीकडे एका स्थानिक दांपत्याचा आपल्या घरासमोर हातगाडी लावून अंडी आणि चिकनच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. बाकीचे पदार्थही चविष्ट असतात असे ऐकून आहे पण इथे मिळणारे 'रस-ऑम्लेट' विशेष प्रसिद्ध आहे. डबल किंवा सिंगल ऑम्लेटवर ओतलेला चिकनचा रस्सा आणि पाव अशा स्वरूपात मिळणारा हा पदार्थ खायला चार-पाच किलोमीटरच्या परिघात राहणारी कित्येक मंडळी नित्यनेमाने येतात. मी इथे पहिल्यांदाच हा प्रकार खाल्ला आणि मलाही तो आवडला.

खाणे झाल्यावर तिथून रमत गमत निघालो आणि साडेदहाच्या सुमारास घरी पोचलो. आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो.


क्रमश:



कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९


"आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो..."

आजच्या दिवसात विशेष काही भटकंती करायची नसल्याने सकाळी चांगली दहा -सव्वा दहा पर्यंत झोप काढल्यावर चहा पिऊन अंघोळी-पांघोळी उरकून ताजेतवाने होईपर्यंत अकरा वाजले. भाऊजी निरोप वगैरे घेण्याची औपचारीकता पूर्ण करण्यासाठी आमची झोपमोड न करता नऊ वाजता ऑफिसला गेले होते, आणि ही दोन ढोणकुरे आज लवकर उठणार नाहीत ह्याची खात्री असल्याने बहिणीनेही नाश्ता बनवण्याच्या भानगडीत न पडता सरळ जेवणच लवकर बनवायला घेतले होते.

सुकं खोबरं घालून बनवलेली कार्ल्याची सुकी भाजी, फुलके, चटणी, कोशिंबीर आणि तिची स्पेशालिटी असलेला 'नारळी भात' असा सुटसुटीत मेनू होता. आलम दुनियेत अशा चवीचा नारळी भात तिच्याशिवाय अन्य कोणी बनवू शकत नाही ह्या गोष्टीवर आम्हा तमाम कुटुंबियांची-नातलगांची गाढ श्रद्धा आहे! गुळाच्या पोळ्यांसाठी 'संक्रांतीची' आणि नारळी भातासाठी 'नारळी पौर्णिमेची' वाट बघण्याची आमच्याकडे पद्धत नाही. हे पदार्थ त्या दोन विशिष्ट दिवसांसहीत वर्षभरात अधून-मधून केव्हाही बनवून आवडीने खाल्ले जातात आणि ज्या घरात, जिने कोणी हा घाट घातला असेल ती मावशी/ मामी/ आत्या/ काकू/ बहीण/ वहिनी हि तिच्याकडूनच घेतलेली लिखित रेसिपी समोर असतानाही प्रत्येकवेळी नारळीभात बनवताना ह्या बहिणीला फोन करून त्रास देण्याच्या परंपरेचे कसोशीने पालन करतात. अर्थात तयार झालेला नारळीभात उत्तम होतो ह्यात शंका नाही पण तरीही त्याला ती विशिष्ट चव मात्र येत नाही, हि कदाचित आमची अंधश्रद्धा असेल 😀

असो, आवडीच्या पदार्थांचा समावेश असलेले जेवण करून साडेबाराच्या सुमारास आम्ही बहिणीचा निरोप घेऊन पणजीच्या दिशेने निघालो. वीस-पंचवीस मिनिटांत पणजीला पोचल्यावर भावाला त्याच्या पाच वर्षांच्या मुलासाठी थोडेफार गोवा स्पेशल कपडे आणि खेळणी घ्यायची हुक्की आली म्हणून बांदोडकर मार्गावर बाईक पार्क करून आम्ही चालत पणजी मार्केटकडे आमचा मोर्चा वळवला.

पंधरा-वीस मिनिटांत त्याची खरेदी आटपेल असा माझा प्राथमिक अंदाज होता पण दुकानात शिरल्यावर जेव्हा त्याने बायकोला व्हिडीओ कॉल करून फोन मुलाला द्यायला सांगितले आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून दुकानातले विविध कपडे दाखवत रंग आणि डिझाईन विषयी त्याच्याशी लाडी-लाडी चर्चा सुरु केली तेव्हा मला समोरचा धोका स्पष्ट दिसून आला! आता ही खरेदी कितीवेळ चालेल आणि कितीवेळ आपल्याला हे कौतुक सहन करत उभे राहावे लागेल किंवा किती दुकाने फिरत तंगडतोड करावी लागेल ह्याचा नेम नाही ही गोष्ट लक्षात आल्यावर मी तिथून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि बाईकची चावी त्याच्याकडे सुपूर्द करून इथून निघाल्यावर 'रिस मागोस' किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही थोडावेळ 'बसण्यासाठी' ठरवलेल्या ठिकाणी जायला पुढे निघालो.


लांबवर दिसणारा मांडवी नदीवरचा नवा पूल

दुपारची वेळ असल्याने मोकळ्या ढाकळ्या बांदोडकर मार्गावरून काही फोटो काढत छोटीशी पदयात्रा करून मी मांडवी नदी किनाऱ्यावरील 'वॉटरमार्क' ह्या फ्लोटिंग लाउंज & बार मध्ये प्रवेशकर्ता झालो आणि विशाल नदीपात्राचा जास्तीत जास्त भाग दृष्टीस पडेल असे टेबल निवडून त्यावर स्थानपन्न झालो.
ह्या ठिकाणी कॉकटेल्स छान मिळतात पण टळटळीत दुपार असल्याने हार्ड-ड्रींक मागवण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे एक माईल्ड बिअर ऑर्डर करून तिचा आस्वाद घेत, काही वेळासाठी लाभलेला एकांत एन्जॉय करत आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना मन एकदम भूतकाळात गेले आणि सुमारे अडीच दशकांपूर्वी म्हणजे विसाव्या शतकाची अखेरची पाच वर्षे आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीची दोन वर्षे, आम्ही तीन मित्रांनी सलग सात वर्षे प्रतिवर्षी गोव्यात होणाऱ्या आमच्या पंधरा-वीस दिवसांच्या वास्तव्यात केलेल्या अनेक गमती-जमती, अनुभवलेले सुवर्णक्षण, त्यातून मिळालेले व्यवहारज्ञान आणि आलेले वास्तवाचे भान अशा अनेक गोष्टी चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यांसमोर तरळू लागल्या.
***

बहुरंगी, बहुढंगी आणि बहुभाषिक असा आमचा कॉलेजचा ग्रुप बऱ्यापैकी मोठा होता, त्यात बरीचशी मुले आणि थोड्याफार मुली असे सगळे मिळून सुमारे बावीस जण. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ह्या म्हणीची सत्यता आपापल्या आई-बाबांना पटवून देण्यासाठीच जणू ज्यांचा जन्म झाला असावा अशा सगळ्या मुलांचा त्यात भरणा! कुठलीही गोष्ट किंवा कृती करण्याआधी काही विचार करायचा असतो अथवा एखादी गोष्ट/कृती केल्या नंतर होणाऱ्या परिणामांचा तरी विचार करायचा असतो वगैरे गोष्टी तेव्हा आमच्या गावीच नव्हत्या. "आली लहर.... केला कहर" म्हणतात तसे सगळेच त्या टाईपचे.

तर अशा ह्या आमच्या ग्रुपने एके दिवशी आमच्या कॉलेजच्या एका प्राध्यापकांना भर वर्गातून मारत-झोडत खाली मैदानात आणून त्यांनी परिधान केलेल्या 'सफारी'च्या पार चिंध्या करून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्याचा प्रताप करून कॉलेजमध्ये प्रचंड तणावग्रस्त परिस्थिती निर्माण केली होती.
खरंतर ताबडतोब कॉलेजमधून आमची हाकालपट्टी करण्याची आमच्या प्राचार्येची तीव्र इच्छा होती आणि "I don't want rowdies like you in my college" अशा स्पष्ट शब्दांत त्याचे सूतोवाचही आपल्या दाक्षिणात्य ॲक्सेन्ट मध्ये त्या मोहतरमांनी केले होते, पण प्रकरण थोडे वरच्या लेव्हलला गेले आणि ज्या मुलीमुळे हा प्रसंग उद्भवला होता, केवळ तिनेच नव्हे तर आमच्या आणि दुसऱ्या डिव्हिजन्समधल्या अनेक विद्यार्थिनींनी त्या प्राध्यापकांच्या गैर वर्तणुकीचा पाढा कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीसमोर वाचल्याने ते आणखीन नं ताणता त्यावर पडदा टाकण्याचा 'योग्य' निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.

तोपर्यंत बाहेर केलेल्या उपदव्यापांतल्या बहुतांश गोष्टी कधीच घरापर्यंत पोहोचू न देण्याची क्षमता आणि खबरदारी आम्ही बाळगून असलो तरी कॉलेजच्या ज्या दोन पिउन्सवर प्रत्येकाच्या घरी जाऊन पालकांना कॉलेजमध्ये बोलावणे करणारी नोटीसरुपी आमंत्रण पत्रिका देण्याची जवाबदारी सोपवली होती, त्यांनी आधी आम्हाला भेटून त्याबद्दलची कल्पना देत त्यांच्या मजबुरीविषयी सांगत एकप्रकारे अभय मागितले होते, त्यावरून आणि एकंदरीत बाकीचे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तसेच टीचिंग/नॉन टीचिंग स्टाफच्या नजरा आणि देहबोलीवरून घडल्या प्रसंगाने त्यांच्या मनावर आलेले दडपण किंवा आमच्यामुळे निर्माण झालेली दहशत स्पष्टपणे जाणवली असली तरी ती बाब गौण ठरावी असा आमच्याबद्दलचा धसका खुद्द आमच्या सर्वांच्या घरच्यांनी घेतला होता.

आजही समोर आले तर ज्यांच्या पायांवर आदराने डोके टेकवावे असे वाटणारा शिक्षकवृंद तोपर्यंत लाभला असल्याने पवित्र समजल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या प्रध्यापाकांबरोबर आम्ही केलेल्या प्रकाराबद्दल ना कुठली खंत त्यावेळी वाटली होती ना कुठला पश्चाताप झाला होता, ना आजही त्या कृतीबद्दल कुठली खंत वाटते ना कुठला पश्चाताप होतोय पण... आज इतक्या वर्षांनी त्या प्रसंगाबद्दल लिहिताना आम्हा सर्वांच्याच अतिशय सरळमार्गी जीवन जगणाऱ्या पालकांची त्यावेळची मनस्थिती काय झाली असेल? त्यांच्या मनाला त्यावेळी किती यातना झाल्या असतील? ह्याचा नुसता अंदाज लावतानाही अंगावर शहारे आले.

असो... त्या प्रसंगातून "जे होते ते चांगल्यासाठीच" ह्याची प्रचिती आम्हाला पुढे यायची होती!
***

मित्र-मैत्रिणींच्या अशा मोठ्या ग्रुप्समध्ये सहसा सब-ग्रूप्स असतात त्याप्रमाणे आमचा सहा जणांचा एक सब-ग्रूप होता. त्यातही पुन्हा तीन घनिष्ठ मित्रांचा असा आमचा एक कोअर ग्रुपही होता. त्यातल्या एका मित्राचे वडील पूर्वी कळव्याच्या 'मफतलाल' कंपनीत 'सांस्कृतिक आणि पर्यटन' विभागाची जवाबदारी सांभाळत होते. साडेतीन हजार कामगार काम करीत असलेली ही मोठी कंपनी १९८९ साली बंद पडल्यावर त्यांनी इतरत्र नोकरी न शोधता स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरु करून आपला पूर्वानुभव, कठोर परिश्रम आणि कल्पकतेच्या जोरावर पाच-सहा वर्षांत तो भरभराटीलाही आणला होता.

बृहन्मुंबई महापालिकेचा (BMC) मोठ्या संख्येने असलेला कर्मचारी/अधिकारीवर्ग आणि विक्रोळी स्थित 'गोदरेज' ह्या बड्या कंपनीचे काही हजारांच्या संख्येत असलेल्या कामगार/कर्मचाऱ्यांचे मोठे ग्रुप्स आणि त्या सर्वांची मित्रमंडळी/नातेवाईक हे त्यांच्या पर्यटन व्यवसायाचे प्रमुख आधारस्तंभ होते. काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कलकत्त्या पासून जैसलमेर पर्यंत, थोडक्यात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशा जवळपास संपूर्ण भारतभरात वर्षभर आयोजित होणाऱ्या पॅकेज टूर्सची कुठलीही छापील जाहिरात न करता देखील केवळ 'माऊथ पब्लिसिटी' च्या बळावर त्या सर्व टूर्सचे बुकिंग फुल होत असे.
पुढे त्यात एका नामांकित शिक्षण संस्थेची भर पडल्याने मुंबई-ठाणे परिसरातल्या अनेक उपनगरांत शाखा असलेल्या त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वार्षिक सहलींच्या व्यवस्थापनाचे काम त्यांच्याकडे आले होते. त्यातल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारीत असलेल्या 'गोवा' आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातल्या 'दिल्ली-आग्रा-फतेहपुर सिक्री' अशा दोन्ही सहलींना भरघोस प्रतिसाद मिळत असे.

व्यवसायाच्या वाढत्या व्यापाबरोबरच काकांना (म्हणजे मित्राच्या वडिलांना) मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली असतानाच्या सुमारासच उपरोल्लिखित 'प्रताप' आम्ही केला होता. आम्हा सर्वांचे चिंताक्रांत पालक आपापल्या परीने त्या परिस्थितीवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात असताना ह्या काकांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी एका रविवारी आम्हा दोन उर्वरित मित्रांच्या घरी येऊन ती आमच्या आई-बाबांसमोर मांडली,

"आपली मुलं हुशार आहेत पण त्याचबरोबर थोडी चक्रम आणि बेजवाबदार पण आहेत. त्यांचा फावला वेळ आणि ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर उद्या आपल्या डोक्याचे ताप ती खात्रीने वाढवतील, तेव्हा त्यांच्या कॉलेजला सुट्ट्या असताना त्यांना माझ्यासोबत टूर्सवर घेऊन जाईन, त्यातून मलाही व्यवसायात मदत होईल आणि फिरण्याबरोबरच त्यांनाही दोन पैसे मिळतील व थोडी जवाबदारीही येईल."

त्या परिस्थितीत इतका चांगला प्रस्ताव आमच्या घरच्यांना अमान्य होण्याचा प्रश्नच नव्हता आणि आम्हा 'द थ्री मस्केटीअर्स' साठी तर हि छ्प्परफ़ाड ऑफर होती. भटकंतीची आम्हाला भरपूर आवड असली तरी तोपर्यंत घरच्यांबरोबरच्या लांबच्या कौटुंबिक सहली, एखाद दुसरा चार-पाच दिवसांचा अपवाद सोडता मित्र-मैत्रीणींबरोबरच्या एखाद-दोन दिवसीय पिकनिक्स आणि ट्रेक्स एवढ्यापुरती ती मर्यादित होती, पण आता आमच्या भटकंतीचा कॅनव्हास विस्तारणार होता!

सुरुवातीला शनिवार-रविवार जोडून काही हौसिंग सोसायट्यांच्या 'अलिबाग-किहीम-नागांव बीच' अशा एक रात्र मुक्कामाच्या आणि पावसाळ्यात 'माळशेज घाट' अशा छाट-छुट, एक-दोन दिवसीय सहलींतून सहल व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे गिरवल्यावर मग १९९५ च्या ऑक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीत झालेले 'खग्रास सूर्यग्रहण' बघण्यासाठी खास 'खगोल मंडळाच्या' सुमारे २५० सभासदांसाठी आयोजित केलेल्या बुंदेलखंड (उ.प्र.) मधील हमीरपूर आणि दिल्ली- आग्रा-फतेहपुर सिक्री-लखनौ अशा सात रात्री, आठ दिवसांच्या सहलीवर काका आम्हाला घेऊन गेले होते त्यावेळी अत्याधुनिक उपकरणांतून निसर्गाचा अद्भुत खेळ अर्थात 'खग्रास सूर्यग्रहण' पाहण्याचे भाग्य आणि त्याच बरोबर पर्यटकांचा आकाराने मोठा ग्रुप हाताळण्याचा अनुभवही मिळाला होता.

त्या ट्रीप वरून परतल्यावर महिन्या-दिड महिन्याने, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हा तिघांना काकांनी त्यांची नवी कोरी 'टाटा सुमो' आणि ड्रायव्हर देऊन एका 'विशेष मोहिमेवर' गोव्याला पाठवले होते.

वर उल्लेख केलेल्या शिक्षण संस्थेच्या विविध उपनगरांतील शाळांच्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या 'गोवा' सहली जानेवारी महिन्यात दहावीच्या प्रिलिम्स सुरु झाल्यावर एका पाठोपाठ एक अशा पाच बॅचेस मध्ये होणार होत्या. प्रत्येक बॅच मध्ये जवळपास १०० ते १५० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे वर्गशिक्षक. ह्या सर्वांच्या प्रवास, निवास आणि खानपानाच्या चोख व्यवस्थेची पूर्वतयारी म्हणून गोव्यातल्या स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सशी फोनवर केलेली प्राथमिक बोलणी ॲडव्हान्स देऊन पक्की करण्याआधी त्या व्यवस्थेसाठी त्यांच्याकडून मिळालेल्या सर्व पर्यायांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल काकांना देण्याची कामगिरी आम्हाला बजावायची होती, एकप्रकारे ती आमची परीक्षाच होती म्हणा ना!

त्यावेळी म्हापश्यातल्या शिरसाट लॉजमध्ये आमचा मुक्काम होता. पुढचे दोन दिवस स्थानिक एजंट्सनी सुचवलेल्या म्हापसा आणि पणजीतल्या ट्रान्सपोर्टर्सच्या ऑफिसना भेट देऊन त्यांच्या बसेसची कंडिशन पाहणे आणि हॉटेल्स मध्ये जाऊन त्यांच्या रूम्स, तिथल्या सोयी-सुविधा आणि स्वच्छता, एवढ्या जणांसाठी चहा, नाश्ता आणि जेवण बनवण्यासाठी ते देऊ करत असलेल्या स्वयंपाकघराची पाहणी आणि अखंडित एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या पुरवठ्याची खातरजमा करण्यात गेले.
प्रत्यक्ष पाहणीअंती ह्या सर्व गोष्टी आम्हाला अजिबात समाधानकारक वाटल्या नव्हत्या. शाळकरी मुले असली म्हणून काय झालं एकेका रूममध्ये तिच्या आकारानुसार पाच ते सात जण कोंबायचे, त्यात दोन किंवा तीन जण बेडवर तर बाकीचे खाली टाकलेल्या एक्स्ट्रा मॅट्रेसेस वर झोपणार आणि असल्या जुनाट, खटारा बसेस मधून प्रवास करणार हे आम्हाला बिलकुल पटले नव्हते.

संध्याकाळी पणजीतल्या शेवटच्या हॉटेलची पाहणी केल्यावर तिथून जवळच असलेल्या एका "आगे दुकान, पीछे मकान" टाईप घरगुती बार अँड रेस्टोरंट मध्ये बिअरचा आस्वाद घेत काकांना काय रिपोर्ट द्यायचा ह्यावर आम्ही चर्चा करत बसलो होतो. आमची चर्चा आणि काउंटरवर बसलेल्या गप्पिष्ट मालकाच्या चौकशांना टेबलवर बसून आम्ही देत असलेली उत्तरे आमच्या शेजारच्या टेबलवर बसून तळलेल्या बांगड्याचा साथीने बिअर रिचवत बसलेल्या एका तरुणाच्या कानावरही पडत होती. आम्ही गोव्यात कुठल्या कामासाठी आलो आहोत आणि त्यात कुठल्या अडचणी आहेत हे लक्षात आल्यावर त्याने बसल्या जागेवरूनच,
"हाय... मायसेल्फ विली, बट आय ॲम नॉट सिली... " असा मिश्कीलपणे स्वतःचा परिचय देत "तुमची हरकत नसल्यास ह्या कामात मी तुम्हाला थोडीफार मदत करू शकतो!" असे उद्गारता झाला.

एकंदरीत त्याचे राहणीमान आणि देहबोलीवरून तो सभ्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटल्याने आम्ही त्याला आमच्या टेबलला जॉईन होण्यास सांगितले.
कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पोर्तुगीज अशा पाच भाषा अस्खलितपणे बोलणारा पंचवीस-सव्वीस वर्षांचा हा विल्यम मस्करेन्हस उर्फ 'विली' आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या रिअल इस्टेट एजन्सीच्या व्यवसायात होता. कैक वर्षांपासून गोव्यातील खाणींमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगार/कर्मचाऱ्यांची वाहतूक हाताळण्याच्या पिढीजात व्यवसायात असलेलया, आणि पणजीच नव्हे तर संपूर्ण गोव्यातले व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील 'बडे प्रस्थ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका कुटुंबाच्या नव्या पिढीतला एक वारस ह्या विलीचा वर्गमित्र होता. शेकडो बसेसचा ताफा आपल्या पदरी बाळगणाऱ्या ह्या ट्रान्सपोर्टरची भेट घेतल्यास तुमचे काम सहजरित्या होऊ शकते असे त्याने आम्हाला सांगितले आणि बार मालकानेही त्याला दुजोरा दिला.

संध्याकाळी सहा-सव्वा सहाचा सुमार होता, सात वाजता पणजीतले सर्व व्यवहार बंद होऊन बाहेरून आलेल्यांना इथे कर्फ्यू लागलाय कि काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला अजून पाऊण तास तरी बाकी असल्याने उद्या त्याची भेट घेण्यापेक्षा आजच घेऊ असा विचार करून आम्ही विलीला सोबत येण्याची विनंती केली आणि त्याने ती मान्य केल्यावर तिथून उठून सरळ त्या ट्रान्सपोर्टरचे ऑफिस गाठले.

ऑफिस एकदम टकाटक होते. आमच्या आधी आलेली एक पार्टी केबिन मधून बाहेर पडण्याची वाट बघत फार वेळ नाही पण पाच-दहा मिनिटे आम्हाला रिसेप्शनमध्ये बसावे लागले. केबिनमध्ये गेल्यावर विलीच्या मित्राने ज्या प्रकारे त्याचे स्वागत केले ते पाहिल्यावर मात्र ते खरोखरचे जुने मित्र असल्याची आमची खात्री पटली आणि त्याच्याविषयी मनात जी काही थोडीफार शंका होती ती पण दूर झाली.

सुमारे पाऊण तास चाललेली आमची मिटिंग छान झाली होती. आमचे गोव्याला येण्याचे प्रयोजन, गरजा आणि अपेक्षा व्यवस्थितपणे समजून घेतल्यावर त्याने काही आकडेमोड करुन मुंबई-ठाण्याहून मुलांना गोव्याला आणणे, त्यांना गोवा फिरवणे आणि पुन्हा मुंबई-ठाण्याला नेऊन सोडण्यासाठी होणाऱ्या प्रवासखर्चाचे अंदाजपत्रक तयार करून देत, त्यांच्या ताफ्यातील टॉप कंडिशन मधल्या बसेस देण्याचे आश्वासन तर दिलेच, वर "उद्या दुपारपर्यंत मला वेळ द्या, भावंडांशी चर्चा करून मुलांच्या ॲकोमोडेशनची व्यवस्था आणि भटकंतीचा कार्यक्रमही तयार करून देतो" असे सांगून दुसऱ्या दिवशी चार वाजता पुन्हा भेटण्याची वेळ दिली.

त्याचे आभार मानून ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा साडे सात वाजून गेले असतील त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सर्वत्र सामसूम झाली होती त्यामुळे मगाशी अर्धवट सोडलेला 'कार्यक्रम' पूर्ण करण्याचा आणि पणजीतच जेवण करून म्हापश्याला परतण्याचा आमचा विचार बारगळण्याची चिन्हे दिसत होती पण "मगाचच्याच बार मध्ये परत जाऊ, त्याचा मालक मागेच राहतो , तिथे बिअर पण मिळेल आणि तुमच्या जेवणाचीही काहीतरी सोय होईल" असे विलीने सांगितल्यावर सगळ्यांच्यात पुन्हा उत्साह संचारला 😀

पुन्हा तिथे पोचल्यावर दुकानाच्या बंद दरवाज्याआड आमचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडला. तिथून अगदी जवळ रहात असलेल्या विलीने बिअर साठी कंपनी दिली पण जेवणासाठी त्याला घरी जाणे भाग असल्याने तो थांबणार नव्हता. निघताना दुसऱ्या दिवशी चार वाजता त्याच्या व्यावसायिक कारणांमुळे तो आमच्याबरोबर येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करून उद्या तुम्ही जाऊन या आणि संध्याकाळी साडेपाच नंतर इकडे आलात तर आपली इथेच भेट होईल असे सांगून त्याने आमचा निरोप घेतला.

रात्री दहाच्या सुमारास लॉजवर परतल्यावर तिथून काकांना फोनवर गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडींचा सविस्तर वृत्तांत सांगितल्यावर पोरं नुसताच आगाऊपणा करत नसून सोपवलेले काम मनापासून करतायत हे बघून ते पण खुश झाले होते!

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत इकडे-तिकडे फिरत टाईमपास केल्यावर ठरलेल्या वेळी आम्ही ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसवर पोचलो. विलीच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे येण्या जाण्याचे दोन दिवस आणि गोवा भटकंती साठी तीन दिवस असा त्या शिक्षण संस्थेला आणि आम्हाला अपेक्षित असल्यापेक्षा चांगला, एकूण पाच दिवसांचा मस्त कार्यक्रम तयार करून ठेवला होता आणि मुलांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठीही एक ठिकाण शॉर्टलिस्ट करून ठेवले होते, त्याने सोबत दिलेल्या त्याच्या कर्मचाऱ्याबरोबर आम्हाला आता तिथे प्रत्यक्ष भेट देऊन ते ठिकाण पसंत पडल्यास त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम तेवढे बाकी होते.

तिथून निघून मांडवी नदी ओलांडल्यावर जेमतेम २-३ किमी अंतरावरच्या 'ब्रिटोना' येथे असलेल्या एका सरकारी विश्रामगृहात आम्ही पोचलो. ह्या विश्रामगृहाचे स्वरूप मात्र नेहमीपेक्षा थोडे वेगळे होते. पोर्तुगीज शासनकाळात बांधण्यात आलेल्या तीन किंवा चार चांगल्या प्रशस्त खोल्या असलेल्या १५-२० बैठ्या बंगल्यांचा तो एक समूह होता. भरपूर मोकळी जागा, छान सावली देणारी मोठी झाडे आणि एकाबाजूला नदीपात्र असे ते रिसॉर्ट सदृश्य ठिकाण आम्हाला बघताक्षणीच आवडले होते. त्याचा फारसा वापर होत नसल्याने थोड्या साफ-सफाईची गरज होती पण ती करवून घेणे सहजशक्य होते.

तिथून पुन्हा ऑफिसवर आल्यावर आम्हाला ते ठिकाण पसंत असल्याचे सांगून व्यवहाराची बोलणी करायला घेतली. सदर सरकारी विश्रामगृह शैक्षणिक संस्थांना नाममात्र शुल्क आकारून वापरायला दिले जात होते. त्याची मंजुरी मिळवण्यासाठी संस्थेच्या लेटरहेडवर विनंती अर्ज करणे आणि शुल्क भरणे एवढीच काय ती औपचारिकता त्यासाठी आवश्यक होती. थोड्याफार वाटाघाटी करून ॲडव्हान्स वगैरेची रक्कम ठरवून त्याच्या सही-शिक्क्यानिशी लिखित एस्टीमेट आणि विश्रामगृह मिळण्यासाठी द्यायच्या विनंती अर्जाचा मसुदा घेऊन आम्ही तिथून निघालो.

बाहेर पडल्यावर एका पी.सी.ओ. मधून काकांना फोन करून सर्व अपडेटस देऊन संस्थेच्या लेटरहेडवर मसुद्याबरहुकूम टंकलेला अर्ज आणि ॲडव्हान्स देण्यासाठीचे पैसे घेऊन गोव्याला येण्यास सांगितले. आवश्यक ती जमवाजमव करून ते तीन किंवा चार दिवसांनी मुंबई-गोवा खाजगी डेली सर्व्हिसच्या बसने इकडे येणार होते. त्यामुळे अर्थातच तेवढे दिवस आम्हाला 'जीवाचे गोवा' करण्यासाठी रान मोकळे मिळाले होते 😂

निव्वळ 'योगायोगाचा' बळावर सर्व कामे कल्पनेपेक्षा जलदगतीने आणि व्यावहारिकदृष्ट्या सगळ्याच पक्षांना फायदेशीर ठरतील अशा प्रकारे झाली होती.
शालेय सहलीवरून रात्रीचा प्रवास करत परतणाऱ्या एका बसला घोटी जवळ भीषण अपघात होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनेच्या तात्कालिक पार्श्वभूमीवर सर्व प्रवास दिवसा व्हावेत अशी त्या संस्थेची मुख्य अट होती तिला विलीच्या मित्राने फायदेशीर करून दाखवले होते. येताना आणि जाताना दिवसाचा प्रवास असल्याने त्याने २ X २ ऐवजी ३ X २ बसेस घेण्यास सूचवले त्यामुळे जिथे १०० मुलांसाठी तीन ३५ सीटर २ X २ बसेस लागणार होत्या तिथे दोन ५१ सीटर ३ X २ बसेस मध्ये काम भागणार होते. असे करण्यातून कमी होणारा प्रवासखर्च कंपनीला म्हणजे पर्यायाने काकांना थोडा अतिरिक्त नफा मिळवून देणार होता.
सरकारी विश्रामगृह मिळणार असल्याने हॉटेल मधील वास्तव्यावर होणारा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने पर्यायाने विद्यार्थ्यांसाठी प्रतिडोई कमी होणारा सहल खर्च त्यांच्या पालकांसाठी लाभदायी ठरणार होता.
विलीच्या मित्राला प्रतिवर्षी पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या ह्या सहलींच्या रूपाने आमच्याकडून नियमित व्यवसाय मिळणार होता.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक अप्रत्यक्ष असा 'आर्थिक' लाभ जो खरंतर विलीच्या मित्राच्या खिशात जाणार होता तो त्याने 'उदारपणे' आम्हा तिघांना मिळेल ह्याची काळजी घेतली होती 😀

शाळेत आम्हाला (नक्की कितवीत असताना ते नाही आठवत) इंग्रजी विषयात 'प्रॉफिट' कि 'व्हॉट इज प्रॉफिट' अशा काहीतरी शीर्षकाचा एक फार छान धडा होता. त्यात 'प्रॉफिट' म्हणजे नफ्याची अतिशय सुंदर व्याख्या दिली होती. 'एखाद्या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना त्यातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळणारा लाभ म्हणजे प्रॉफिट' असा काहीसा त्याचा सारांश होता. वरील व्यवहार त्या व्याख्येप्रमाणे सर्वांसाठी लाभकारक ठरणार होता!

कोण, कुठला हा 'विली'? पटकथेत नसलेल्या एखाद्या पात्राने अचानक एंट्री घ्यावी आणि सर्व प्रमुख पात्रांवर कडी करत भाव खाऊन जावे त्याप्रमाणे चोवीस तासांपूर्वी अशा नावाची कोणी व्यक्ती पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे ह्याचाही थांगपत्ता नसलेल्या आम्हाला तो अचानक भेटतो काय, स्वतःहून मदतीची तयारी दाखवतो काय, आणि अल्पावधीत आमचे कार्य तडीस नेण्यास हातभार लावतो काय, हा सगळा निव्वळ योगायोग नाहीतर काय? अर्थात असे योगायोग प्रत्येकाच्या जीवनात सदैव घडत असतात, त्यांचे बाहू पसरून स्वागत करणे हे मात्र आपले काम. ठरवलेल्या गोष्टी कधी होतात तर कधी बिघडतात आणि कधी बिघडलेल्या गोष्टीही अनपेक्षितपणे अजून चांगल्याप्रकारे घडत असतात. 'Face life as it comes... This is the true spirit.' म्हणतात ते खोटे नाही!

असो, तर ह्या यशाच्या खऱ्या मानकऱ्याला त्याचे श्रेय देण्यासाठी आम्ही पुन्हा त्या कालच्या बारमध्ये पोचलो तेव्हा काल सांगितल्याप्रमाणे विली तिथे होता. सर्व अपडेट्स दिल्यावर "दुसऱ्या दिवसापासून तीन-चार दिवस आम्ही मोकळे असल्याने आता आम्हाला तू गोव्याचे अंतरंग दाखव" अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याची कामे आटपून दुपारनंतरचा वेळ आमच्याबरोबर फिरण्यासाठी देण्याचे मान्य केल्यावर उत्साहाच्या भरात त्याला बिअरने अंघोळ घालायचीच काय ती बाकी ठेवली होती, अशी दणदणीत पार्टी आम्ही त्यादिवशी केली.

मग काय, दुसऱ्या दिवसापासून पुढचे तीन दिवस सकाळी उठुन चहा-नाश्ता झाल्यावर उत्तर गोव्यातल्या एखाद्या बीचवर जाऊन शॅक मधून घेतलेल्या बिअर पित समुद्रात डुंबत राहणे, तिथेच कुठेतरी जेवण करून लॉजवर परतल्यावर आंघोळी-पांघोळी उरकून थोडावेळ वामकुक्षी घेऊन चार-साडेचार वाजता पणजीतुन विलीला उचलून रात्री उशिरापर्यंत गोव्याचे अंतरंग बघत फिरणे हा दिनक्रमच होऊन गेला. काकांनी गाडी आणि ड्रायव्हर सोबत 'बरोबर असू देत' म्हणत खर्चायला पैसेही बऱ्यापैकी दिले होते त्यामुळे आर्थिक बाजूही भक्कम होती.

भटकंतीच्या पहिल्याच संध्याकाळी विली महाशयांनी आम्हाला वास्कोतील 'बायना बीच'चे दर्शन घडवले. गोव्यातील 'मोस्ट हॅपनिंग प्लेस' असलेल्या ह्या ठिकाणाला तिथे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने सरकारने पुढे उध्वस्त केल्याने राष्ट्रीय संपत्तीचे मात्र भरपूर नुकसान झाले 😀
भारतातल्या भारतात सहजपणे पुरवले जाणारे 'शौक' करण्यासाठी मग देशातल्या असंख्य 'आंबट शौकिनांना' नाईलाजाने ज्यादा पैसे खर्च करून पार थायलंड मधल्या 'बँकॉक' पर्यंत जाण्यास भाग पाडले गेले. ह्या सर्व प्रकारामागे भारतातला पैसा परदेशाकडे वळवण्यासाठी केलेले एखादे मोठे 'आंतरराष्ट्रीय षडयंत्र' असावे कि काय अशी शंका अधून-मधून मनात डोकावते 😂

असो, मग दुसरी संध्याकाळ मांडवी नदीतील क्रूझवर आणि एका 'डिस्कोथेक' मध्ये तर तिसरी संध्याकाळ 'प्रायव्हेट बीच पार्टी' एन्जॉय करण्यात गेली.
रात्रभर प्रवास करून काका चौथ्या दिवशी सकाळी गोव्याला पोचल्यावर मग विलीच्या मित्राकडे जाऊन पुढचे सोपस्कार पार पाडले. विश्रामगृहाचे मंजुरीपत्र दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत मिळणार होते त्यामुळे आमचा मुक्काम आणखीन एका रात्रीसाठी वाढला होता. त्याच्या पुढच्या दिवशी सर्व कामे आटपल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला होता.

कामानिमित्ताने घडलेल्या ह्या सात-आठ दिवसांच्या गोवा सफरीत आम्ही भरपूर मजा-मस्ती करून झाली होती आणि स्थलदर्शनाची राहिलेली कसर पुढच्या महिन्यात व्याजासकट भरून निघणार असल्याने 'पांचो उंगलीया घी मैं...' अशी त्यावेळची परिस्थिती होती आणि प्रत्यक्ष सहली सुरु झाल्यावर '...और सर कढाई मैं' हे त्यास जोडले जाउन "पांचो उंगलीया घी मैं और सर कढाई मैं" अशी ती म्हण पूर्णत्वास जाणार होती!

क्रमशः

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १०

दुपारी तीनच्या सुमारास पणजी मार्केटमधली आपल्या मुलासाठीची गोवा स्पेशल कपडे आणि खेळण्यांची खरेदी एकदाची आटपून भाऊ मी बसलो होतो त्या मांडवी नदी किनाऱ्यावरील 'वॉटरमार्क' ह्या फ्लोटिंग लाउंज & बार मध्ये येऊन पोचला तोपर्यंत नुकतीच मी दुसरी बिअर ऑर्डर करून झाली होती. आरामात बसून ती रिचवेपर्यंत साडेतीन वाजून गेले. मग तिथून उठून नदीच्या पलीकडे थोड्या अंतरावर दिसणारा 'रिस मागोस' किल्ला पाहायला आम्ही निघालो.


वॉटरमार्क मधून नदीच्या पलीकडे दिसणारा रिस मागोस किल्ला जवळ वाटत असला तरी रस्त्याने मोठा वळसा घेऊन जावे लागत असल्याने ते अंतर आठ किमी भरले. टेकडीवर असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचल्यावर तिथल्या रखवालदाराने उद्या ह्या ठिकाणी कोणा केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत गोवा सरकारचा कुठलासा शासकीय कार्यक्रम होणार असून आत त्याची तयारी सुरु असल्याने आज दुपारी एक नंतर पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद असल्याचे सांगितले. अर्थात किल्ल्याच्या आत जाण्यास परवानगी नसली तरी वरती त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन टेकडीवरून आसपासचा नजारा बघता येणार असल्याने आमच्या सामानाची राखण करण्याची जवाबदारी त्या रखवालदारावरच सोपवून वरती जाऊन काही फोटो काढले.


वरच्या फोटोत ज्याची माहिती दिली आहे ते झाड

मी हा किल्ला आधी बघितलेला होता पण भावाला तो बघता आला नाही म्हणून त्याचा मात्र थोडा हिरेमोड झाला! मिपाकर दुर्गविहारी ह्यांनी 'रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort आणि ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )' ह्या त्यांच्या लेखात रिस मागोस किल्याची छान सविस्तर आणि सचित्र माहिती दिली आहे, इच्छुकांनी ती जरूर वाचावी.

रिस मागोस किल्ला परिसरात थोडेफार फोटो काढून साडेचारच्या सुमारास आम्ही कुडाळच्या दिशेने प्रस्थान केले.

पेडण्याला पेट्रोल भरण्यासाठी एक थांबा घेऊन बाईकची टाकी फुल केल्यावर पत्रादेवी चेकपोस्ट जवळ आल्यावर गोव्याच्या हद्दीतच माझीही टाकी फुल करून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या 'रवींद्र बार अँड रेस्टोरंट' येथे दुसरा थांबा घेतला तेव्हा पावणे सहा वाजत आले होते. रिस मागोस किल्ला बघायला न मिळाल्याने बराच वेळ वाचला होता त्यामुळे तिथून फारतर पस्तीस-चाळीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कुडाळ मुक्कामी इतक्या लवकर पोहोचून तरी काय करायचे असा विचार करून ह्याठिकाणीच निवांतपणे 'बसून' नंतर तिथेच पोटपूजा उरकून मगच पुढे जाण्याचे ठरवून टाकले.

आज दुपारपासून चालकाची भूमिका स्वीकारायला लागलेल्या भावाला मात्र रेस्ट हाऊसवर पोहोचेपर्यंत 'कोरडा' उपवास घडणार होता, पण त्याच्या मनाची तेवढी तयारी झालेली होती.

जवळपास दोनेक तास तिथे निवांतपणे बसून 'पान-खान' उरकल्यावर तिथूनच एक काजु फेणीचे बाटली पार्सल घेऊन आठच्या सुमारास पुढचा प्रवास सुरु करून बैलगाडीच्या वेगाने रस्ता कापत करत नऊच्या थोडे आधीच कुडाळला रेस्ट हाऊसवर पोचलो. बंधुराजांचा फेणीचा दुसरा पेग संपायच्या आतच लोळत पडून टीव्ही बघता बघता मला केव्हातरी झोप लागून गेली.

*****

दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला आम्हाला चांगलाच उशीर झाला होता त्यामुळे आधी नाश्ता आणि त्यानंतर अंघोळी पांघोळी वगैरे उरकेपर्यंत दुपारचे साडे बारा वाजून गेले होते. आज तळकोकण दर्शनाची सुरुवात 'देवबाग' पासून करायचे ठरवून पाऊणच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो.

रेस्ट हाऊस पासून देवबाग पर्यंतचा चाळीस किमी अंतराचा प्रवास दीडेक तासात रमत-गमत पूर्ण करून साधारण सव्वादोनच्या सुमारास देवबागला ज्या ठिकाणी कर्ली नदी अरबी समुद्राला येऊन मिळते त्या 'संगम पॉईंट' जवळ पोचलो.

संगम पॉईंटकडे जातानाच्या रस्त्यावर 'मोबरेश्वर' मंदिरापर्यंत गाड्या जाऊ शकतात. मंदिराजवळ सावलीत बाईक पार्क करून, मोबरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही संगमावर जायला निघालो.

देवबागला जाऊन आलेल्यांना त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीची कल्पना असेल परंतु तिथे न गेलेल्यांना त्याची व्यवस्थित कल्पना यावी म्हणून जालावरून घेतलेली एक ड्रोन इमेज खाली देत आहे.


वरच्या फोटोत डावीकडे अरबी समुद्र, उजवीकडे कर्ली नदी आणि मध्ये सफेद-सोनेरी वाळूचा सुंदर किनारा लाभलेला 'संगम पॉईंट'

संगम पॉईंटवरून टिपलेली कर्ली नदीकडच्या बाजूची आणि अरबी समुद्राची काही विलोभनीय दृश्ये ▼


संगम पॉईंटवर लावलेला एक फलक

कोकणात-तळकोकणात अनेक समुद्र किनाऱ्यांवर देवस्थाने आहेत त्यामुळे असे फलक दृष्टीस पडले तरी त्यामुळे पर्यटकांना विचलित व्हायचे कारण नाही!
ह्याच देवबागमध्ये अरबी समुद्राच्या बाजूची जी किनारपट्टी आहे (वरती दिलेल्या द्रोण इमेजमध्ये डावीकडे दिसणारी) त्यावर अनेक स्थानिकांनी प्रायव्हेट बीचची सुविधा असलेले होम स्टे'ज, कॉटेजेस, आणि काही हॉटेल्स आणि बीच रिसॉर्ट्सही बांधली आहेत. त्याठिकाणी मुक्काम केल्यास कल्पनेपलीकडच्या सुविधा अनुभवता येऊ शकतात.

आम्ही तीन मित्रांनी २०१५ मध्ये इथल्या एका पाच-सहा कॉटेजेस असलेल्या 'गावठी' रिसॉर्टमध्ये २ रात्री मुक्काम केला होता त्यावेळी खूप छान अनुभव आला होता.

त्या कॉटेज वाल्याने आम्हाला मद्यपानासाठी सुरुवातीला झावळ्यांच्या छपराखाली लावून दिलेल्या ह्या टेबल खुर्च्या जसे ऊन उतरू लागले तशा पायाचा घोटा बुडेल इतक्या पाण्यात नेऊन लावून दिल्या.ओहोटीची वेळ असल्याने लाटा आमच्यापासून सात आठ फूट लांब अंतरापर्यंत येऊन परतू लागल्या कि त्याचा कर्मचारी स्वतःहून येऊन आमचे टेबल खुर्ची पुढे नेऊन लावून द्यायचा आम्ही फक्त आपापले ग्लास त्यावेळी उचलून उभे राहायचो, आणि टेबल खुर्च्यांची पुढे मांडणी झाली की त्यावर जाऊन बसायचो. बऱ्यापैकी अंधार पडल्यावर हा खेळ थांबला तेव्हा मागे वळून बघितल्यावर लक्षात आले आपण आपल्या कॉटेज पासून किती लांब आलोय ते!

काही जोडपी आणि एक सात-आठ फक्त महिलांचा ग्रुपही त्यावेळी त्याठिकाणी मुक्कामाला होते. पण कोणालाच कोणाचा काही त्रास नव्हता, सगळेजण आपापल्या विश्वात मश्गुल होऊन 'एंजॉय' करत होते.

त्यानंतर प्रत्येकवेळी कुडाळ येथे मुक्काम करूनच ह्या परिसरात फिरणे झाले त्यामुळे इच्छा असूनही ह्या ठिकाणी पुन्हा मुक्काम काही करता आला नाही. अर्थात तळकोकण फिरण्यासाठी कुडाळ येथे मुक्काम करून आसपासचा परिसर फिरणेच पर्यटकांना सर्वच दृष्टीने सोयीस्कर पडते. पण वॉटरस्पोर्टस आणि सकाळी लवकर करायच्या काही ऍक्टिव्हिटीज साठी देवबागला एखाद रात्रीचा मुक्काम करणे देखील आनंददायी ठरू शकते. परंतु मद्यप्रेमी मंडळींनी मात्र तारकर्ली असो की देवबाग ह्या ठिकाणी किंवा तळकोकणातल्या (मालवण,कुडाळ, कणकवली सोडून) अन्य कुठल्या ठिकाणी मुक्काम असेल तर आपापला दारुगोळा सोबत नेणे उत्तम, हॉटेल/रिसॉर्टवाल्यांकडून घेतल्यास अवाच्या सव्वा किंमत तर आकारली जातेच पण हवा तो 'ब्रँड' मिळेलच ह्याची कोणतीही शाश्वती नसते, "त्यांच्याकडे जे असेल तेच मिळेल"!

असो... करोना काळातले निर्बंध शिथिल झाल्यावर गोव्यात पर्यटक येण्यास सुरुवात झाली असली तरी सिंधुदुर्गात येण्यास फारसे कोणी उत्सुक नसावे बहुतेक, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स, अन्य ऍक्टिव्हिटीज आणि बीच रिसॉर्ट्स वगैरे सगळे काही बंद होते आणि आम्ही दोघेजण सोडून त्यावेळी देवबागमध्ये अन्य कोणीच पाहुणे दिसले नाहीत. अर्धा-पाऊण तास संगम पॉईंटवर मजेत घालवून तिथल्याच 'हॉटेल नरेंद्र सावली' ह्या सुरु असलेल्या एकमेव उपहारगृहात मिसळ पाव आणि बटाटा भजी हे उपलब्ध असलेले दोन पदार्थ खाऊन आणि कोकम सरबत पिऊन थोडीशी पोटपूजा उरकून घेतली आणि सहा किमीवर असलेल्या तारकर्ली बीचकडे मोर्चा वळवला





वीसेक मिनिटांत तारकर्ली बीच जवळ पोचलो तर समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड धोंडे रचून तो तात्पुरता बंद केल्याचे दिसले. मग बाईक तिथेच ठेऊन त्या दगडांवरून थोडी कसरत करत फार आत पर्यंत न जाता काही अंतरावरूनच थोडेफार फोटो काढले.


▲तारकर्ली बीचवरुन लांबवर दिसणारा मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला (फोटो झूम करून काढल्याने दूर अंतरावरचा किल्ला पुरेसा स्पष्टपणे दिसत नाहीये)

सामान्य परिस्थितीत पर्यटकांची भरपूर वर्दळ असणारा परंतु त्यावेळी नजर जाईल तिथपर्यंत अक्षरशः चिटपाखरूही दृष्टीस न पडलेला तारकर्ली बीच पाहून कसेसेच वाटल्याने त्याठिकाणी पाच-सात मिनिटांपेक्षा अधिक वेळ न घालवता तिथून पस्तीस किमी अंतरावर असलेल्या वालावलला जायला निघालो. मधेच काही चांगले दिसले तर थांबून फोटो काढत प्रवास सुरु होता.


तारकर्लीचे श्री दत्त मंदिर



कर्ली नदीवरील पूल


पुलाच्या डाव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य (१)


पुलाच्या डाव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य (२)


पुलाच्या उजव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य १


पुलाच्या उजव्या बाजूचे निसर्ग सौंदर्य २


त्यावेळी उदघाटनाच्या प्रतीक्षेत असलेला चिपी विमानतळ

मस्तपैकी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या दुसऱ्या द्वाराजवळ जवळ पोचल्यावर ऐतिहासिक वास्तू/वस्तू/मूर्ती/शिल्पे अशा गोष्टींविषयी प्रचंड आस्था असल्याने त्याठिकाणी उकिरड्यावर टाकून दिलेली एक वीरगळ पाहून सुन्न झालो.

आसपासच्या फुलं, नारळ, पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानदारांकडे त्या प्रकाराबद्दल विचारणा केल्यावर कोणालाच त्या ऐतिहासिक ठेव्याविषयी काडीचीही किंमत असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे त्यावेळी पहिल्यांदाच बाईक घेऊन ह्या ठिकाणी आल्याचा पश्चाताप झाला. चारचाकी नेली असती तर सरळ ती वीरगळ गाडीत टाकून घरी घेऊन आलो असतो!

असो, वालावलचे हे लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याचा परिसर खूप छान आहे.


लक्ष्मीनारायण मंदिर


लक्ष्मीनारायण मंदिराला लागून असलेल्या तलावाकाठचे लहानसे शिव मंदिर


लक्ष्मीनारायण मंदिराला लागून असलेला तलाव


तलावाच्या पाण्यात दिसणारी मावळत्या सूर्याची दोन प्रतिबिंबे

लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्याचा परिसर पाहून झाल्यावर तिथून अर्धा किमी अंतरावर असलेल्या कर्ली नदीवरच्या फेरी बोटींच्या धक्क्यावर पोचलो.

कर्ली नदी


कर्ली नदीतले काळसे बेट

ह्याठिकाणी कर्ली नदीतल्या खाजगी मालकीच्या बेटाभोवती बोटीतून फेरी मारत एकाबाजूला खारफुटी तर दुसऱ्या बाजूला कांदळवन पाहणे हा खूप छान अनुभव असतो परंतु आम्हाला ह्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला होता आणि तोपर्यंत बोटिंग बंद झाले होते त्यामुळे काठावरूनच आसपासचे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घेऊन कुडाळ मुक्कामी परतण्यासाठीचा प्रवास सुरु केला.

साधारण अर्ध्या तासात ११ किमीचा प्रवास करून सातच्या सुमारास रेस्ट हाऊसवर पोचलो. बऱ्यापैकी वेळेत पोचल्यामुळे रेस्ट हाऊसच्या आचाऱ्याला माझ्यासाठी मालवणी वडे आणि भावासाठी पोळ्या अशा विशेष सूचनांसहित आमच्या दोघांसाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था करायला सांगितली आणि काल गोव्याहून परतताना आणलेली काजू फेणीची बाटली काढुन तिचा आस्वाद घेता घेता उद्याच्या तेरेखोल, रेडी, शिरोडा, उभादांडा अशा भटकंतीचा कार्यक्रम ठरवून टाकला. साडेनऊच्या सुमारास रेस्ट हाऊसच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण झाल्यावर थोडावेळ टीव्ही बघत टाईमपास करून साडेदहा-पावणे आकाराला निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

क्रमशः


आज भटकंतीचा चवथा दिवस . तीन दिवस होऊन गेले, अनेक किनारे पाहिले तरी अजून समुद्राच्या पाण्यात डुंबायचे बाकीच होते . आज ती इच्छा सुद्धा पूर्ण करून घेतली.

नाश्ता वगैरे आटोपला. किनारे पाहून झाले होते. यानंतर कुठल्याही किनाऱ्याला जायचे नव्हते . परत एकदा पाळोळेचा किनारा नजरेत भरून घेतला आणि हॉटेल सोडले . हॉटेल थोडं महागडं असलं तरी खूप चांगली सुविधा मिळाली . परत कधी येणं झालं तर येथेच उतरायला आवडेल .

आज काही मंदिरे पाहत पणजीला पोहचायचे होते . गाडीवाले जाण्या - येण्याचे दोन्ही बाजूचे अंतर मोजतात त्यामुळे येथून गाडी केली किंवा बाहेरून गाडी बोलावली तरी खर्च तेव्हडाच लागणार होता . पणजीला आमच्या ओळखीतली एक गाडी होती तीच बोलवायचे ठरले . गाडीवाल्याने सांगितले मला स्थानिक लोक हॉटेलवर येऊ देणार नाहीत, तुम्ही काणकोण बस स्थानकावर या, मी तेथे तुम्हाला भेटेन .
आम्हालाही स्थानिकांचा रोश ओढवून घ्यायचा नव्हता . रिसेप्शनला जाऊन काणकोण साठी गाडी बोलावली . चालकाशी त्यांचे फोनवर कोंकणी भाषेत चाडी,चाडी असे असे काही बोलणे सुरु होते . नंतर कळले की कोणकोणला चार्डि किंवा चौरी असेही म्हणतात. कण्व ऋषींच्या वास्तव्यामुळे या भागास 'कण्वपुरम' असे नाव पडले व कालांतराने त्याचा उच्चार कोणकोण असा झाल्याचे समजते .
दहा - पंधरा मिनिटात चार्डि बस स्थानकावर पोहचलो . ठरल्याप्रमाणे गाडीचे तीनशे रुपये चुकते केले . आमची पणजीहून निघालेली गाडी आमच्या आधीच येथे येऊन पोहचली होती . काणकोण रेल्वे स्टेशनच्या ईशान्येस असलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी निघालो .
गावडोंगरी किंवा श्रीस्थळ येथील निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात वसलेले हे महादेवाचे मंदिर आहे .

सभामंडपानंतर येणाऱ्या मंदिराच्या अंतराळात काष्ठशिल्प असलेले सहा सुंदर खांब आहेत . यावर रामायण , महाभारतातील प्रसंग अतिशय सुंदरतेने कोरले आहेत. अंतराळाच्या छतावरही सुंदर नक्षीकाम आहे . गाभाऱ्यात महादेवाची शिवपिंडी आहे . प्रवेशद्वाराला चांदीची चौकट असून त्यावर यक्ष , किन्नर आहेत .

अमृत मंथन काष्ठ शिल्प ?

(प्रचेतस माहिती सांगू शकतील. कृपया मदत करा )

मंदिर परिसरात अनेक देवालये आहेत .
हे काशी पुरुष मंदिर . यातही काष्ठ शिल्प असलेले सहा सुंदर खांब आहेत .

सुंदर प्रदक्षिणा मार्ग

काही रथ


मंदिर परिसर

एक विठ्ठल रुक्मिणी मंदिरही दिसले .

पणजीच्या दिशेने निघालो आणि लेकीने सुचवलेले एक ठिकाण आठवले ते म्हणजे ' Sadolxem Bridge'. चालकाला हे ठिकाण माहित नव्हते . गुगलचा नकाशा बघून आमची गाडी उलट दिशेने म्हणजेच पेंगिंगच्या दिशेने धावू लागली . (ओळखीतली गाडी ठरविल्याचा हा एक फायदा ) गुगलने थोडासा चकवा दिला पण वाटेत विचारणा केल्यावर लगेच ठिकाण सापडले . या भागात हा पूल 'ब्लु ब्रिज' म्हणून ओळखला जातो .
सदोलक्सम (उच्चार माहित नाही ) हे एक छोटेसे गाव. तळपोना नदीमुळे हे गाव दोन भागात विभागले गेले आणि या पुलामुळे ते परत जोडले गेले आहे . पोर्तुगीज वसाहती काळातील हा एक सुंदर वारसा आहे . राज्याच्या दक्षिण भागात प्रवेश करणे, व्यापार इ .सोयीसाठी पुलाची उभारणी केली गेली . पुलावरून छोट्या गाड्या जाऊ शकतात . पुलाच्या आजूबाजूने असणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे फोटोग्राफी व निवांत फेरफटका मारण्यासाठी हा पूल सध्या लोकप्रिय होत आहे . निळा रंग बराचसा उडाला आहे तरी या पुलाची सुंदरता लपत नाही

तळपोना नदी

थोडे रेंगाळून निघालो पुढच्या ठिकाणाकडे . दोन तासांचा प्रवास करून आम्ही पोहचलो श्री शांता दुर्गा मंदिराजवळ. फोंडा बस स्थानकापासून सुमारे तीन किमी अंतरावरील हे मंदिर कवळे गावात आहे . मंदिर पूर्वाभिमुख असून प्राकाराच्या बाहेरच एक सुंदर तलाव आहे .

दोघांनी हाफ पॅन्ट घातल्याने मंदिर परिसरात प्रवेश तर मिळाला पण मुख्य मंदिरात जाऊ दिले नाही . परत बाहेर येऊन सोवळे नेसून (भाडे २ ० रुपये) आत यावे लागले

देवालयाच्या समोरच एक सुरेख उंच दीपमाळ आहे

गाभाऱ्यात शांतादुर्गेची मूर्ती सिंहासनावर अधिष्टित आहे . देवालयाच्या डावीकडील मंदिरात श्री नारायणाची पाषाणमूर्ती आहे . मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत त्यामुळे आतील फोटो नाहीत .

येथून पुढे तासाभरात पोहचलो ते प्रियोळ येथील श्री मंगेश देवालयाला . फोंडा तालुक्यातील प्रियोळ गांव व आसपासचा परिसर मंगेशी नावाने ओळखला जातो . श्री शांता दुर्गा मंदिराप्रमाणे हे मंदिरही पूर्वाभिमुख असून येथेही एक सुंदर तलाव आहे .

देवालयाच्या समोर उंचच उंच सुंदर दीपमाळ दिसते . मंदिराच्या तिन्ही बाजूस अग्रशाळा आहेत .

देवालयाच्या गर्भगृहात श्री मंगेशाची मूर्ती आहे . (मंदिरात फोटो घेऊ देत नाहीत ) या मंदिरातही तोकडे कपडे घालण्यावर निर्बंध आहेत. आपण काळजी घ्यावी .
मंगेशी मंदिर पाहून संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही पणजीत दाखल झालो . येथे आजच्या मुक्कामासाठी गोवा पर्यटन मंडळाच्या 'पणजी रेसिडेन्सी ' मध्ये आमच्या रूम आरक्षित होत्या . आज जाण्या येण्याचे अंतर पकडून गाडीने एकूण सव्वा दोनशे किमी अंतर कापले होते . गाडीवाल्याने ४ ५ ० ० /- मागितले ते दिले व उद्या सकाळी दहाला ये असे सांगून त्याला मोकळे केले .
आज सकाळच्या नाश्त्यानंतर काहीच खाल्लेले नव्हते . आधी रूममध्ये थोडे खायला मागवले व नंतर तासभर आराम . उत्तर गोव्याला पूर्वी दोन वेळा ओझरती भेट दिली होती . त्यावेळेपासून गोव्यातील कॅसिनो एकदा तरी बघायचे असे मनात होते . मिपाकर टर्मिनेटर यांचा कॅसिनोंवरील कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५ हा भाग वाचल्यापासून हि इच्छा प्रबळ झाली होती आणि आम्ही दोघींनी नाही म्हटले तरी दोन्ही मित्र ऐकणार नव्हतेच . कॅसिनो बघायचा हा उद्देश समोर ठेवूनच आजचे हॉटेल बुक केलेले होते . मांडवी नदीच्या किनारी अगदी रस्त्यालगत हे हॉटेल आहे यातील नदीच्या बाजूकडील AC Deluxe रूम मधून मांडवी नदीचा नजाराही दिसतो त्यामुळे याच रूम आम्ही घेतल्या होत्या . कपड्यांच्या बाबतीत पुरुषांना कॅसिनोत प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड असतो असे वाचले होते . जसे शॉर्ट्स , स्लिव्हलेस टी शर्ट , चप्पल घालून येण्यास बंदी आहे . महिलांना मात्र असा कोणताही नियम नाही . त्याप्रमाणे साडेसातला आम्ही बाहेर जाण्याची तयारी केली .
हॉटलच्या समोरचा रस्ता ओलांडला की लगेच सगळ्या कॅसिनोच्या तिकीट विक्री काउंटरची रांगच लागते .
कॅसिनो प्राईड , डेल्टीन रोयाल',  'डेल्टीन जॅक' अशी एक एक ठिकाणी चौकशी करीत पुढे जात होतो . कुठे दोन, कुठे अडीच कुठे तीन हजार असे वेगवेगळे दर व त्यानुसार सुविधाही वेगवेगळ्या . असे करत करत आम्ही बिग डॅडी पर्यंत पोहचलो . येथे तर अजून जास्त दर होते . तरुण वयोगटासाठी वेगळा दर वगैरे . आम्हाला लागू होईल असा तिकिटाचा दर ४ ५ ० ० /- इतका ऐकून परत पहिल्या ठिकाणापर्यंत चालत आलो . पण तिकीट काढायचे मन होईना . तिकिटांसाठी रांगेत जास्त गर्दी नव्हती आणि आजूबाजूलाही स्त्रिया अगदीच कमी होत्या.बिग डॅडीला तर स्त्री - पुरुषांची झुंबड उडाली होती आणि त्यांचे पेहराव वगैरेही खूपच सुंदर वाटत होते . त्या क्षणाला तरी आम्हाला बिग डॅडी शिवाय दुसरा पर्याय दिसला नाही . परत येऊन प्रिमिअम श्रेणीची चार तिकिटे घेतली . यात अमर्याद जेवण/पेयपान , सर्व मजल्यांवर/डेकवर प्रवेश इ . गोष्टी समाविष्ट होत्या .
किनाऱ्यापासून नदीतल्या तरंगत्या कॅसिनोपर्यंत एका छोट्या बोटीने आपल्याला नेले जाते .

आपला कॅसिनोत प्रवेश होतो .

तळमजल्यावर जुगाराची रांगेने खूप टेबल लागलेली होती . काही लोक ससराइतपणे खेळत होते , काही आमच्यासारखेच तेथील वातावरणात सरवण्यासाठी अंदाज घेत नुसतेच इकडून तिकडे फिरत होते . तेथली झगमगाट पाहून गांगरल्यासारखे झाले . तेथल्याच एका कॅश काउंटरवर आमची तिकिटे दाखवून आमच्या हिश्श्याच्या प्रत्येकी ५ ० ० रु . च्या दोन OTP चिप्स घेतल्या . मध्यभागी थोड्या थोड्या वेळाने पोल डान्सचा कार्यक्रम सुरु होता . आम्ही चिप्स खिशात ठेवून न खेळताच वरच्या मजल्यावर गेलो . येथेही खालच्या मजल्याप्रमाणे जुगाराची वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची खूप टेबल्स होती . सराईतपणे पत्ते वाटले जात होते . येथेही अधून मधून पोल डान्स सुरु होता . चिप्स खिशात तशाच ठेवून वरच्या मजल्यावर गेलो . आता भूक लागली होती त्यामुळे येथे न थांबता अजून वरच्या मजल्यावरच्या उपहारगृहात गेलो . टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या . स्टेजवर बेली डान्स , इतर नाच गाणी व करमणुकीचे कार्यक्रम सुरु होते . आमच्या मनगटावर बांधलेली प्रिमिअम फीत पाहताच हवे ते व हवे तितके पेय मिळत होते . व्हेज, नॉनव्हेजचे बुफे डिनर काउंटर लागलेले होते .
करमणुकीचे कार्यक्रम बघता बघता बारा वाजून गेले . पेयांचे काउंटर बंद झाले . गर्दी ओसरायला लागली . या गडबडीत डेकवर जायचे आम्ही विसरलोच . प्रिमिअम तिकीटामुळे आम्हाला तेथे प्रवेश होता . डेकवर गेलो . येथेही खाण्यापिण्याची व्यवस्था होती . करमणुकीच्या कार्यक्रमाचे स्टेजही होते . पण आता बारा वाजून गेल्याने सर्व बंद झाले होते .

दोन चार फोटो काढले आणि तळमजल्यावर आलो . नशीब आजमावायचे होते . माझ्या चिप्सही नवऱ्याकडे दिल्या . कोणते गेम होते मला सांगता येणार नाही . चार चिप्सच्या आमच्याकडे आठ झाल्या पण थोड्याच वेळात सर्व संपल्या . त्यामानाने यांच्या मित्राचे नशीब चांगले होते . त्याने सहा हजारांच्या चिप्स मिळवल्या . मिळाल्या तेव्हड्या पुरे झाल्या असे म्हणून कॅश काउंटरला जाऊन रोख करून घेतल्या . रात्रीचा दीड वाजला. आम्ही छोट्या बोटीने किनाऱ्यावर पोहचलो . येथून पाच-सात मिनिटात चालत हॉटेलला पोहचलो.

आज सहलीचा पाचवा आणि शेवटचा दिवस . आज आम्हाला परतीच्या प्रवासासाठी करमळीहुन दुपारी अडीचची गाडी होती, तोपर्यंत अजून एकदोन पर्यटन स्थळे पाहता आली असती पण आम्ही टाळले . सकाळी आरामात उठलो . सर्व आवरून हॉटेलच्या उपाहारगृहात जाऊन फुकटच्या नाश्त्याचा आस्वाद घेतला . तोपर्यंत दहा वाजले .
रूम मधून दिसणारी मांडवी नदी आणि पूल

करमळीला जाण्यासाठी बोलावलेली आमची गाडी वेळेवर हजर झाली . आज काही भेटवस्तू , लहान मुलांचे कपडे वगैरे खरेदी करायची होती . गाडीवाल्याने आम्हाला मार्केटमध्ये आणून सोडले . येथील खरेदी आटोपल्यावर परत गाडीत येऊन बसलो . दोन्ही मित्रांची काहीतरी कुजबुज सुरु होती. थोडा अंदाज आला पण जेव्हा गाडी एका वाईन शॉप समोर थांबली तेव्हा अंदाज खरा होता हे जाणवले . दुकानात चौकशी केली असता परवाना घेतल्यास प्रत्येकी दोन बाटल्या बरोबर घेऊन जाता येईल असे समजले . प्रत्येकी वीस रुपये भरून चौघांचेही परवाने घेतले . दोन्ही मित्रांनी चार चार बाटल्या खरेदी केल्या .

परवान्याप्रमाणे रोड, रेल्वे , जल मार्गे दमनपर्यंत यांची वाहतूक करता येणार होती . परवान्यावर काय खरडले तेही नीट वाचता येत नाही . नियम निश्चित काय असतील याची कल्पना नाही . स्टेशनवर सामानाची तपासणी होते . सापडल्यास या वस्तू तेथेच सोडाव्या लागतात असेही काही जण सांगतात . स्टेशनला पोहचलो . गाडीवाल्याला अर्धा दिवस गेला होता . त्याने बाराशे रुपये मागितले ते दिले आणि त्याचे आभार मानून निरोप घेतला . फलाटावर आलो .

गाडी लागलेलीच होती . सामानाची कुठलीही तपासणी झाली नाही. गाडी वेळेवर निघाली आणि रात्री अकराला आम्ही पनवेलला उतरलो .
थोडासा खर्चाचा तपशील
१ . जातांना रेल्वे विस्टा डोम व येतांना २ AC प्रवास - 4500 /- प्रत्येकी
२ . हॉटेल मुक्काम खर्च (चार मुक्काम ) - 12600/- प्रत्येकी
३ . स्थानिक भटकंतीसाठी चारचाकी , दुचाकी - 2700/- प्रत्येकी
३ . कायाकिंग व बोटिंग - 1200/- प्रत्येकी
४. जेवणखर्च,पेयपान - 3500/- प्रत्येकी
५ . कॅसिनो - 4500/- प्रत्येकी
एकूण खर्च - 29000/- प्रत्येकी

रेल्वेचा विस्टाडोम प्रवास , रस्त्याने चारचाकी व दुचाकीने केलेली रोमांचक भटकंती , जलमार्गे समुद्रात फेरफटका, किल्ला , किनारे , मंदिरे , कयाकिंग, कॅसिनो अशी विविधरंगी सफर हे या सहलीचे वैशिष्ठ .

समाप्त





















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...