Wednesday, July 23, 2025

माझी न केलेली "मानस"परिक्रमा

 

मला स्वतःला भटकंतीची फार हौस नाही. म्हणजे असंच हेलिकॉप्टरने उचलून वगैरे गंतव्य स्थळी नेऊन अलगद सोडलं तर चालेल, पण आधीपासून तयारी, सामानाची बांधाबांध, परदेशी किंवा तत्सम प्रवासासाठी कागदपत्रं जमवणं याचा मला बर्‍यापैकी कंटाळा आहे. आणि ते बरंचसं मूडवरही असतं म्हणा! तर ते असो. पण आमच्या भाओजींना, म्हणजे नणंदेच्या मिस्टरांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. आणि ते मस्त प्रवास प्लान वगैरे करून किंवा केसरीच्या मदतीने करतातही. त्यांची फार इच्छा होती, कि एकदा अमरनाथ आणि एकदा कैलास-मानस हे दोन्ही घडावं! आणि ईश्वरी कृपेने ते घडलंही! सोबतीला त्यांनी माझ्या नवर्‍याला घ्यायचं पक्कं केलं आणि मग संपूर्ण शहरी-आणि त्यातही आयटी नोकरदार- असलेल्या माझ्या नवर्‍याची तशी तयारी करायला सुरूवात झाली.
२०२३ मधे हे दोघं अमरनाथला जाऊन आले. पहलगाम च्या बाजूने चढाई आणि बालतालकडून उतरण असा काहीतरी प्लान झाला होता. नणंद नाशकात असते. त्यामुळे नवरा इथून नाशकात, मग तिथून दिल्ली, मग पुढचा प्रवास होता. पुण्यातून निघून तो अर्ध्या वाटेवर पोहोचला आणि लँडस्लाईडची बातमी सकाळच्या बातम्यांत झळकली! पण आता तयारी झाली आहे, आणि असं काही ना काही घडणार याची अगोदरच कल्पना दिलेली असते त्यामुळे "पुढचं पुढं बघू" असं ठरवून दोघांचा प्रवास सुरू झाला. आता या गोष्टीला २ वर्षं झाली, त्यामुळे सगळंच काही आठवत नाहिये. पण ३ दिवस थांबावं लागल्यामुळे "आलोच आहोत आणि तिथे जायला काही अडचण नाही तर वैष्णोदेवी करू" म्हणून प्लानमधे नसलेली यात्राही घडली होती! पण एकूणच तो प्रवास त्रासदायक झाला होता. म्हणजे अमरनाथाचं दर्शन झाल्यावर सगळाच शीण गेला हेही खरंच, "याचिसाठी केला होता अट्टाहास" अशी भावना होती हेही नक्की, पण आम्ही घरी बसून जी काही काळजी केली त्याला तोड नाही! कारण मुक्काम लांबल्यामुळे ऐन वेळी जिथे रहावं लागलं ते घर शब्दशः शत्रूशी संबंधित स्थानिकांचं होतं (हे आम्हाला नंतर पुण्यात येऊन सांगितलं, पण वर्णनावरून जोखीम समजली होती), वैष्णोदेवी करताना पाय दुखावल्यामुळे नवर्‍याच्या पायाचा एक्सरे काढावा लागला, शिवाय न्यूज चॅनेलवरचे किंचाळे लोक देत असलेल्या बातम्या अशा बर्याच कारणांमुळे आमची डोकी काळजीने बिघडली होती. शेड्यूल बदलल्यामुळे चालण्याचे दिवस कमी झाले आणि तट्टू करावा लागला. भयाण दर्‍या, अपरिचित आणि सतत बदलणारं हवामान, दुर्दैवाने नजरेसमोर घडलेला अपघात आणि डोळ्यासमोर एका यात्रिकाचा मृत्यू हे सगळं आजूबाजूला असताना मनोधैर्य टिकवणं कठीण खरंच ... पण एकदाची ती यात्रा सुफळ संपूर्ण झाली. ज्या दिवशी हे दोघं अमरनाथाचं दर्शन घ्यायला पोहोचले त्या दिवशी मीही शांत बसून शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं होतं. माझा नमस्कार इथूनच!

पुढचं वर्षं नीट गेलं आणि २०२४ मधे कधीतरी अचानक "कैलास परिक्रमा करूया का?" असा प्रश्न आला. नुसतीच "आहे आपली एक इच्छा" असणं वेगळं आणि ते पुन्हा मनात येऊन त्याचा पाठपुरावा करणं वेगळं. अमरनाथ यात्रेवेळी आम्हाला काहीही पूर्वानुभव नव्हता. डिकॅथलॉनमधे जाऊन खरेदी करून येणे, खव्याच्या पोळ्या-लाडूवगैरे खाऊचे पदार्थ देणे इतपतच काहीतरी केलेलं आठवतंय. बाकी व्हिसा वगैरे भानगडी नव्हत्याच. पण या वेळी मीपण जरा जास्त मनावर घेतलं. चीनचा व्हिसा वगैरे लागणार होता. मुख्य म्हणजे पूर्ण प्रवास परमुलुखात असणार होता. सरकारी व्यवस्था घ्यावी तर महिन्याभराची सुट्टी य दोघांनाही मिळणार नव्हती त्यामुळे मॅक्स हॉलिडेजकडून बुकिंग साठीची जमवाजमव सुरू झाली. लेटेस्ट फोटो पाहिजेत, २ वर्षांत वजन वाढलंय त्यामुळे पुन्हा कापडेखरेदी करावी लागेल...तर्‍हाच वाढल्या!

"हे काय? आज चक्क ब्लेझर? माझ्याबरोबर येताना? लक्ष्मी रोडवर निघालो असूनही?" हे प्रश्न मी गिळले. अनुभव हो अनुभव! आम्हां उभयतांच्या वाटणीचं मी एकटीच बोलते आणि त्यामुळे विचार करून गोष्टी ओळखायला वेळच मिळत नाही असं त्रांगडं होतं असं नवर्‍याचं म्हणणं. या वेळी धोरणीपणाने मी गप राहिले त्यामुळे "मी उगीचच का घालेन ब्लेझर? ऐकलं नाहीस का मगाशी ... फोटो लागणार आहेत... लक्ष कुठे होतं!" वगैरे संवाद टळला. एरवी माझ्याबरोबर येताना, त्यातही लक्ष्मी रोडसारख्या ठिकाणी, शक्य तेवढा कर्तव्यपूर्ती चेहरा करून "इकडची स्वारी" येते. वधस्तंभाकडे निघालेला वसंतसेनाघातकी चारुदत्त वगैरे..... असोच. पण एकदम असा संवाद टळत नाही ना! "उमाचे फोटो कुठे काढले होतेस? जरा बरे आले होते." याचं "बरे" म्हणजे "मस्त" हे आता मला समजलंय. त्यामुळे मी स्टुडिओचं नाव सांगितलं. खरं हे उगीचच होतं. कारण तिचे बिचारीचे युनिफॉर्म घालून, २ वेण्या कंपल्सरी असे साधे आयकार्ड फोटो होते! पण तेवढ्यात संधी साधून मी "तसंच जाऊ मग गावात खरेदीला. ऑन द वे आहे स्टुडिओ" म्हटलं. पण पहिला प्रस्ताव पटत नसतोच.
"म्हणजे मला कपडे बदलायला मिळणार नाहीत का शॉपिंगच्या आधी? ब्लेझर मिरवत येऊ? की तो अडकवायला कार आणू? आणि पार्किंगचं काय मग?"
"ओह तेही आहेच नै का! मग असं करू, महेशचौकात जाऊ, तिथे फोटो काढू. घरी येऊन तू साधे कपडे घाल. मग बाजारात जाऊ".
हे पटलं. आणि त्या घोळात शॉपिंग कॅन्सल झालं. पण फोटोंचं काम निपटलं! हा पहिला टास्क डिसेंबरात पार पडला. मग रोजच्या व्यायामाची भर पडली. तोवर मिस्टर सौरभ बोथ्रांनी आमच्या कुटुंबावर योगमोहिनी घातलीच होती. थोडे दिवस मीही केलं, मग माझं बंद झालं. पण नवरा, आई-बाबा (साबा-साबु) नियमित करत होते. वीकेंडला भरपूर चालणं सुरू झालं होतं. दोघा यात्रींची हळूह्ळू तयारी सुरू झाली. आम्ही अजून मेन फ्रेममधे फारसे नव्हतो.

 

(डिस्क्लेमर : या भागात काही दुकानांची नावं मी लिहिली असली तरी तो फक्त तयारीचा भाग म्हणून सांगायच्या ओघात ती लिहिली आहेत. कोणत्याही दुकानाची जाहिरात नाही. माझा कोणत्याही दुकानाशी संबंध नाही.)

फोटो काढले तो महिना होता डिसेंबर २०२४. जायचं असेल तर जुलै मधे हे तर ठरलं. मार्चपर्यंत (२०२५) विशेष काहीच चालू नव्हतं. उलट तुडूंब काम, लेकीची परीक्षा असंच चालू होतं. हो नाही करत मे महिन्याची सुट्टी लागली लेकीला आणि इकडे यांची कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली. मी जेमतेम ३-४ दिवस आईकडे जाऊन आले आणि माझाही कामाचा व्याप होताच! जूनमधे लेकीची शाळा सुरू झाली. एव्हाना व्हिसाची तयारी झाली होती. मॅक्स हॉलिडेज कामाला लागले होते. आषाढवारीच्या निमित्ताने आळंदी-पुणे पायी वारी करून नवर्‍याने मनातल्या मनात यात्रेचा श्रीगणेशा केला होता.
मग एक दिवस मला नवर्‍याचा फोन आला. "स्कॅन्ड फोटो मिळत नाहियेत. स्टुडिओत फोन कर". आणि मग २-३ तास खर्चून स्टुडिओच्या माणसाला हाताशी धरून विनंती करून ओरिजनल फोटो मिळाले एकदाचे!

आता शेवटचे २ वीकेंडस उरले होते आणि आम्ही खरेदीला निघालो. पहिली वारी अर्थात डिकॅथलॉन. त्या आधी कॅम्पात वाईल्डफ्राफ्ट मधे गेलो. तिथे खास ट्रेकर्स / अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स साठी लागणारं सगळं साहित्य असतं एवढंच मला माहिती होतं. मग तिथे गेलो आणि ट्रेकिंग बॅग्स, शूज असं बरंच काहीबाही बघून काहीही न घेता एसजीएस मॉलकडे मोर्चा वळवला. सांगितलं ना, पहिला प्रस्ताव पटत नाही. डिकॅथलॉनला गेलो आणि मग तिथे २-३ तास घालून थोडीफार खरेदी केली. त्यात बर्‍याच प्रकारचे एक्झरसाईझ बॉल्स बघून मी "टाचदुखीसाठी काही आहे का हो?" असा प्रश्न विचारून एक अ‍ॅक्यूप्रेशर बॉल पर्समधे पाडून घेतला. एव्हाना ४ दुपारची भुकेची वेळ टळून चहाच्या वेळेकडे वाटचाल झाली होती.
"हां, डबे आणलेस ना? मस्त जागा बघून जेवूया."
"मी नाही आणले. मला वाटलं येऊ वेळेवर."
"कमाल आहे! इतका स्वयंपाक करून ११:३० नंतर निघालो, तर मला वाटलं तो घेशील जेवायचं बरोबर"
"नाही घेतलं. चल घरी"
"आंईं...... पाय दुखले गं माझे! भूकपण लागली. चला आता. किती वेळ खरेदी करता! मला सायकलपण नाही घेतली नवीन!"
आमची वरात घरी. ४ नंतर लंच + डिनर एकत्रच झालं. पण वेळ घालवून चालणार नव्हतं. आता लेकीला घरी अभ्यासाला बसवून (आणि तिची समजूत काढताना नाकी दम येऊनही) आम्ही पुन्हा डिकॅथ मधे (यू नो! डिकॅथ! हं!) आलो. आता मात्र उरक वाढवला. मगाशी सगळ्या वस्तूंच्या जागांचा अभ्यास केला होता तो कामी आला. जॅकेट, पोंचो अशी मोठी खरेदी केली. खरंतर नवरा कधीकाळी ४ वर्षं न्यूयॉर्कात होता आणि बर्फात घालायचे कपडे होते आमच्याकडे. पण आता कपड्याचंही वजन कमीच हवं होतं म्हणून पुन्हा सव्यापसव्य चालू होतं. इथे लवकर आवरलं आणि मग आम्ही लोकरीचा स्वेटर वगैरे घ्यायला बुधवारात प्रकाश डि. स्टोअरमधे गेलो.
"तुम्ही आता जिथे कुठे जात तिथून मला एखादा... काय तो तुमचा श्रफ का काय तो.. घेऊन या. सहज जमलं तरच आणा." -आई म्हणाल्या होत्या. त्यांना मॉर्निंग वॉकसाठी श्रग हवा होता. प्रकाशमधे थर्मल वेअरचा जोड, -३० मधे चालतील असे हातमोजे, पायमोजे, श्रग अशी खरेदी झाली. लेकीने समजुतीने अभ्यासाला बसायचं कबूल केलं म्हणून तिला छोट्या दुकानातून २ मस्त स्टोल्स घेतले. शिवाय डिकॅथमधे एक छान वुलन शर्ट-पायजमा मिळाला तोही घेऊन ठेवला होता. डिसेंबरातच आम्ही याच दुकानातून जेव्हा मला स्वटर्स घेतले तेव्हाच नवर्‍यालाही १ घ्यायला लावला होता बळंबळंच.
"बघ, तेव्हा घेतला होता म्हणून बरं की नै? आताचा तेवढा वेळ वाचला नाही का?"
"हो ना."
बायको बरोबर आणि आपण माघार घ्यायची वेळ आली की २ शब्दांत वाक्यच संपतं.

आता मोर्चा केबिन बॅगसाठी. तीही अर्थातच होती. पण भाओजींनी अजून काहीतरी इन्पुट्स दिले होते. त्यांना मॅक्स हॉलिडेज कडून काहीतरीगाईडलाईन्स मिळत होत्या. नवरा अर्थातच जास्त बैजवार वाचत नसावा (असं मला वाटत होतं. खखो तोच जाणे.) पण भाओजी नीट सगळं सांगत होते म्हणूनही आम्ही निश्चिंत होतो. मग पेशन्स संपले आणि आता पुरे असं वाटून आम्ही तिथूनही निघालो. एव्हाना १० वाजले होते. नाही म्हटलं तरी थोडी भूक लागलीच होती. घरी फोन करून लेकीला खाऊन घे म्हटलं.
"आपल्या जेवणाचं काय आहे?" मग मात्र मी सकाळपासूनचा धावपळीचा दिनक्रम सांगून "माउ आणि आई-बाबांना पुरेल इतकं आहे, बाकी काहीही नाहिये" म्हटलं. खरेदी बरीचशी निपटल्यामुळे तोही रिलॅक्स झाला होता. मग एक हॉटेल शोधून तिथे मस्त जेवलो. खूप दिवसांनी अनपेक्षितपणे डिनरडेट झाली!

मोठी खरेदी संपली होती. केबिन बॅगचा प्रश्न सोडवायचा होता याच कारण, बॅगची मापं सांगून "तश्शीच आणा हं" असा बहुधा आग्रह झाला असावा. मधल्या काळात मी मायबोलीचं टुमणं वाजवतच होते. अनयाकडचे आंबे खाल्ल्यामुळे घरी ती सगळ्यांना (ऐकून तरी) माहिती होती. तिनेच कैलास- मानसपरिक्रमा करून लेखमालाही लिहिली आहे म्हटल्यावर जरा आधार वाटला. मग मीही इन्पुट्स द्यायला सुरूवात केली. मग! सोडते का काय! भले माझी मजल पर्वतीपण का नसेना! मी तिच्याशी बोलून नवर्‍याला तिचा नंबर दिला.
"कधीही फोन कर, मी जितकं जमेल तितकं सांगेन सगळं" म्हणून तिने मला आश्वस्त केलं. असंच बोलता बोलता एक दिवस नवर्‍याने "त्यांच्याकडून ती फिल्टरची बाटली आण" म्हणून ३-४ वेळा सांगितलं. मी म्हटलं अशीच कशी आणू? आधी तिला फोन करायला हवा, ती घरी कधी आहे ते विचारायला हवं... तिच्या बाबांना जरा बरं नव्हतं... एकदम बाटली कशी आणू?
"मी केला होता फोन त्यांना. जा तू कधीही आणि आण बाटली"
आं? कधी केला होता फोन? मला कसं माहिती नाही? तू बोलला का नाहीस? आणि तू चक्क माझ्या मैत्रिणीला फोन केला होतास? तेही मायबोलीवरच्या? कम्माल केलीस की? ----- हे सगळं मनात. कारण तो भयंकर नेमकं, मुद्द्याचं बोलतो. एरवी शांत आहे. पण किती शांत असावं माणसाने! त्यालाही काही लिमिट्स आहे की नाही! ---- हेही मनातच.

मग एका सुदिनी मी अनयाकडे गेले. अळूची पानं आणायची होती. बाटलीही आणली. तेव्हा ती म्हणाली, की "आमचा मस्त लाँग कॉल झाला आणि मी भरपूर माहिती सांगितली आहे!" मी थक्क झाले! मग अर्थातच माफक गॉसिपही केलं आणि घरी आले.

खव्याच्या पोळ्या मागच्या यात्रेतच हिट झाल्यामुळे याही वेळी ऑर्डर दिली होती. (तुम्हाला काय वाटलं, घरी केल्या?? अंहं! कैत्तरीच!) मूगडाळ भाजून दळून आणली . तूप कढवून ठेवलं. रात्री सगळं छान भाजून लाडवाचं मिश्रण करून ठेवलं. दुसरे दिवशी आई - बाबांनी लाडू वळून ठेवले होते. माझं रोज कामावर जाणं, लेकीची शाळा-ग्राऊंड, नवर्‍याचं हापिस हे सगळं चालूच होतं. तशातच मी एकापाठोपाठ एक करत सलग ३ दिवस इंटर्व्यू देऊन आले (पुढे काही विशेष न होता मी आहे त्याच ठिकाणी अजून काम करतेय तो भाग सोडुन देऊ.)

त्यात ओरिजनल कागदपत्रं, जी स्कॅन करून आधी पाठवली, तीच नेमकी आता सापडत नाहीत असा साक्षात्कार उद्या निघायचंय तर आज दुपार संपताना झाला.
"आता माळ्यावर काय बघायचंय?"
"प्रिंटर काढून बघायला हवा."
"का? त्याचं काय आता? कधीचाच बंद झालाय ना तो?"
"हो. स्कॅनर चालतोय पण. त्यानेच स्कॅन करून घेतली होती."
"आई गं तू रद्दीची पिशवी का ओतलीस?"
"अगं चुकून गेलंय का यात ते बघते."
"मग माझी हार्मोनिअमपण बाहेर काढून बघ. प्रिंटर त्याच्यावरच ठेवला होता बाबाने. स्कॅन करताना चुकून फटीतून गेलं असेल..."

इथून पुढचं लिहित नाही. तुमची तुम्ही कल्पना करा. एजन्सीत फोन करून हा घोळ सांगून झाला होता. पण नंतर त्या दिशेने काहीच बातमी नव्हती. नशिबाने, जुन्या आवृत्तीतल्या दोन्ही मूळ प्रती होत्या त्यावर निभेल असं वाटत होतं. शिवाय दिलीत जर पासपोर्टचं काम झालं तर मग प्रश्नच नव्हता. साधारण ११ वाजून गेले असतील आणि मला "अय्या, चिवडा करायचा राहिलाच" हा साक्षात्कार झाला. मग ११ नंतर चिवडा करायची सुरूवात झाली. एव्हाना पॅकिंग आवरत आलं होतं. लेकीच्या जिवाची उलघाल होत होती. एक तर आमचा पसारा, तिची सकाळची शाळा, बाबा २ आठवडे नाही म्हणून नाराजी, त्यात कागदपत्र मिळत नाहीत तर बाबाला अडवतील का? चिनी लोक त्रास देतील का? याचा ताण ... पोर अगदी सुकून गेली. तशीच दमून झोपली. १ वाजेपर्यंत सगळं आवरून मी खोलीत आले. विस्थापितांच्या छावणीचं स्वरूप आलं होतं खोलीला. झोपण्यापुरती जागा करून घेतली. नवरा अजूनही लॅपटॉपवर काय करतोय म्हणून बघायला आले.
"बस इथे. हे बघून ठेव सगळं." म्हणून त्याने महत्त्वाची कागदपत्रं दाखवून ठेवली. हा क्षण मला सांभाळणं अवघड जात होतं.
"मेडिक्लेम सही केलेला असतो यात्रेआधीच. काही हेलिकॉप्टर इमरजन्सी वगैरे आली तर... आणि हे नंबर्स आहेत सगळे..."

मी गप्प आणि तो बोलतोय असं फार कधी होत नाही. आणि हे असं बोलणं मला ऐकवतही नाही. पण घेत होते ऐकून.
"सुखरूप परत यायचंय आणि यालच तुम्ही. मला यातलं काहीही वापरायची गरज पडायला नकोय." असं सांगून हुंदका गिळून मी आडवी झाले. झोप कुठली लागायला!

दुसरे दिवशी त्याला शिवाजीनगरपर्यंत मी सोडून आले. जाताना नणंदेच्या धाकटीसाठी चित्रकलेचे स्पेशल कागद बाबांनी वेगळ्या पिशवीत दिले होते. ती पिशवी नाशिक ला उतरताना बसमधे विसरायचा रिवाज पार पडला, पण चक्क मी गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता आणि हे नवर्‍याला समजलं होतं म्हणून ती पिशवी ताब्यात घेता आली. माझी जुनी सवय आहे ही. एसटीने जाताना नंबर मी घरी लोकांना कळवून ठेवते. या वेळी अगदी कळावून नाही ठेवला, पण एसटी निघाली आणि मी बसस्टॉपवर आले तर मलाही बस लगेच मिळाली घरी यायची. म्हणून मी लगेच फोन करून त्याला कळवलं... "ही बघ तुमची बस MHXX XXXX" बाहेर पडली ना? मलापण स्वारगेटपर्यंत बस मिळाली, मी निघाले." असा फोन केलेला त्याच्या लक्षात होता. त्यामुळे लगेच काम झालं.

एका छान प्रवासाची सुरूवात झाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...