Friday, July 18, 2025

नैरोबी, केनिया

 

ना अमीबा ना भारताचा नकाशा…

नैरोबीत पाय ठेवल्यापासून खमंग, चविष्ठ खाण्याशी माझा संबंध पूर्णपणे तुटला गेल्यासारखे झाले होते. आज ब्रेड, उद्या मंडाझी (ब्रेड व केकचे कॉकटेल) , परवा विकतची ३५ रुपयांची अर्धकच्ची ब्राउन चपाती (गव्हाची), तेरवा भात आणि कच्या भाज्या तर कधी अगदीच काही खायला नसेल तर MTR चे आंबट, पॅक्ड रेडीमेड भाज्या.

अशा अवघड काळात शेवटी नाईलाज झाला आणि मी गव्हाचे पीठ गॅलेरीया मॉलमधून आणले. After all, Necessity is the mother of all invention (in my case, action). एका शनिवारी वेळ मिळाला आणि पोळी करायचा बेत पक्का केला (तयार भाज्या आणल्या होत्या पण त्याबरोबर खायला पोळी नव्हती, म्हणून). शीतल (माझी सौ) ला फोन केला आणि झटपट पोळीची रेसिपी विचारून घेतली.

मुहूर्त उजाडला संध्याकाळी ६ वाजता. पोळी करताना काय काय साहित्य लागते ते मनात चारदा आठवले आणि त्याप्रमाणे कप मध्ये पाणी, तेलाची बाटली, तवा (इकडे पॅन), नुसते पीठ एका डब्यात वगैरे वगैरे तयारी केली. गव्हाच्या पीठाने पाण्याचा पहिला थेंब प्राशन केला ६.२० वाजता. पुढची १५ मिनिटे  मी कणीक मळत  होतो. शीतलने थोडी मळून झल्यावर तेल घालायला सांगितले होते, पण किती ते माहीत नव्हते. एका हाताने बाटलीटून तेल ओतण्याची करामत करता करता जरा जास्ता तेल पडले आणि व्हायचा तेच झाला… कणीक सैल झाली.

मग एक छोटासा pause घेतला. लहानपणी आई पोळ्या करतानाचे दृष्य डोळ्यासमोर आणले आणि आश्चर्य म्हणजे ते आले सुद्धा, अगदी स्पष्टपणे. ते चित्रा असे होते… मोठ्या परातीत कणीक मळ मळ मळायची आणि मळून झल्यावर तो कणकेचा जरा घट्टा गोळा एका बाजूला करून ठेवायचा. मी माझ्या  कणकेकडे बघितले. तिचा डोळ्यासमोरील चित्रासाखा जरा घट्टा गोळा होण्यासाठी अजून बरेच परिश्रम बाकी होते. मी पोळ्या लाटताना त्यावर घालायचे पीठ त्या अर्ध मळलेल्या कणकेत घालायला सुरूवात केली. जास्त तेलामुळे कणीक सैल झाली होती. मी पीठ टाकत गेलो आणि हळू हळू डब्ब्यतले सगळे पीठ कणकेने खुषीने स्वीकारले. आता जरा कणीक आईच्या कणकेसारखी घट्टा झाली होती. हुशशशश… अगदीच काही चित्रविचित्र प्रकार झाला नव्हता नशीब… आता पर्यंत तरी.

मग मी परत डब्बा पीठाने भरला कारण आता पोळीच्या रोकेटाचे Stage 2 मध्ये प्रवेश होणार होता. कणकेने बरबटलेला हात स्वच्छ धुतला आणि पोळी लाटायला घेतली. दोन दिवस आधीच मे उचुमी मॉल मधून लाकडी पोळपाट विकत घेतले होते (इकडे ऍल्यूमिनियमचे किंवा स्टीलचे पोळपाट मिळत नाही). पोळपाटावर थोडे पीठ पसरले… परत आईच्या पोळ्या डोळ्यासमोर आणल्या… मग लक्षात आले की आईच्या पोळपाटाच्या मध्यावर पीठ असायचे आणि त्यावर मग कणकेचा गोळा ठेवायची. चला, परत पोळपाटभर  पसरलेले पीठ मध्यभागी गोळा केले. एक छानसा कणकेचा गोळा पोळपाटावरच्या पीठावर ठेवला आणि पोळी लाटायला सुरूवात केली. आता बघू भारताचा नकाशा होतोय की अमीबा… की अजून काही. लाटायला लागल्याबरोबर कणिक सैरभैर पाळायला लागली, बहुतेक तेल जास्त झालं असणार. मग माझे लाटणेही कणकेच्या मागे लागले… उभी लाटली, आडवी लाटली, कडांना सपाट केले, त्यावर आणखी पीठ ओतले आणि अखेर पोळीने आकार घ्यायली सुरूवात केला. नशीबाने आणि आईच्या कृपेने पोळी, पोळी म्हणण्यासारखी एकदाची लाटली गेली. हूशशश … Stage २ complete.

आता Stage 3 सुरू… भाजणे. या वेळेपर्यंत मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. कणीक मळणे आणि पोळी लाटणे यापेक्षा पोळी भाजणे हे सोपे काम होते. मी उत्साहाने गॅस पेटवला आणि तवा गरम करायला ठेवला. २ मिनिटांनी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पॉळीने पॅनवर आपली पाठ टेकली. गॅस मोठ्ठा केला होता जेणेकरून पोळी मस्त खरपूस भाजली जाईल. आता फक्त पोळी उलटी करायची, पोटावर भाजायची आणि खुसखुशीत पोळी खायला मी तयार!

wp_20161001_19_34_33_pro

१ मिनिट झाले… मी पोळीची पाठ बघितली तर ती अजून पिवळीच होती.. त्यावर काळे फोड नव्हते आले. अजून १ मिनिट थांबलो तरीही तेच… माझ्या पोळीची भाजून घ्यायची तयरीच दिसत नव्हती. मी पॅन उचलून गॅस बघितला आणि FAIL FAIL FAIL!  चा एरर मेसेज डोळ्यांपुढे चमकला. गॅस ने मान टेकली होती, आणि टेकता टेकता माझ्या पोळीला सुरुंग लावला होता. निळी ज्योत मंदपणे माझ्याकडे बघून हसत होती, आणि हसता हसता निवली सुद्धा. तरीच माझी पोळी भाजली जात नव्हती! नकळत माझ्या मुखातूनही हसू बाहेर पडले. जेव्हा आपण नियतीपुढे निरूपाय असतो तेव्हा हसणेच बरे.

आता काय करायचे? पोळी तर अर्धीकच्ची  राहिली होती. तेवढ्यात समोरच्या ओव्हनकडे लक्ष गेले आणि डोक्यात वीज चमकली. ताबडतोब पोळी ओव्हनमध्ये स्थलांतरित केली आणि २ मिनिटांचा टाइमर लावला. न राहवून मी ओव्हनच्या काचेतून आत डोकावले तर पोळी शांतपणे गोल गोल फिरत होती आणि काही ठिकाणहून टुम्म फुगायला लागली होती. मी विचार केला, चला पोळी नाही तर फुलकी तरी खायला मिळेल. २ मिनिटे झाली आणि मी खूषीने ओव्हनचे दार उघडले. मी माझ्या आयुष्यातली स्वतः केलेली पहिले मऊ मऊ पोळी हातात घ्यायला उत्सुक होतो. प्लेट बाहेर काढली आणि अलगदपणे दोन्ही हातांनी पोळी उचलली.

परत हसू फुटले. ओव्हनने माझ्या स्वप्नातल्या मऊ पोळी चे चक्क खाकर्‍यात रुपांतर करून टाकले होते!

हरकत नाही… अमीबा आणि भारताचाचा नकाशा तरी बघायची वेळ आली नाही. तत्क्षणी मी त्या कुरकुरीत खाकऱ्याचा  आनंद उपभोगला. पोळी  हातात आली नव्हती पण यापुढे आपल्याला पोळी करता येईल हा मोलाचा आत्मविश्वास नक्कीच हाताला लागला होता. आता वेध भाजीचे!

wp_20161001_19_43_34_pro

Share this:

 

मनाच्या चौकडीतून बाहेर उडी…

नैरोबीत येताना अनेक गोष्टी आणायच्या विसरल्या , काही गोष्टींची गरज आहे ते इथे आल्यावर उमजले. पण दोरीची उडी मी लक्षात ठेवून आणली होती… थोडासा दूरदर्शिपणा अंगी आहे म्हणा. सेप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच (मी 27 ऑगस्टला नैरोबीमध्ये आलो) मी त्यांचे उद्घाटन केले. पहिल्या २०…३०…४० उड्या मारून झाल्या आणि पायात दोरी अडकली. परत उड्या मारायला सुरू केले, परत तेच. एकदा झालं, दुसर्यांदा झालं, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा… आणि हे दोरीचे आणि पायांचे प्रेमप्रकरण चालूच राहीले. पुण्याला गेल्यावर मी न चुकता घरच्या गच्चीवर, सकाळच्या मंत्रमुग्ध, शुद्ध हवेत दोरीच्या उड्या मारायचो. तेव्हा तर न अडकता ५००-६०० उड्या सहज व्हायच्या… जास्त ही. आणि इथे जेमतेम ३०-४० उड्या झाल्या की अडखळतोय… हे असं का होत आहे ते काही केल्या कळेना.

दोरी नवीन असल्यामुळे मला वाटले की त्याची लांबी जास्त किंवा कमी असेल म्हणून अडकती आहे. मग ती कमी जास्त करून बघितली, तरी काही फरक नाही. मनगटाभोवती दोरीचा एक विळखा मारून उड्या मारून बघितल्या, एका बाजूची लांबी कमी केली, दोन्ही बाजूची करून बघितली पण सर्व प्रयत्न  व्यर्थ. शेवटी वैतागून त्या दिवशी मी उड्या मारायचंच बंद केलं. म्हटलं आज अडकत असेन, उद्या होईल ठीक.

मध्ये काही दिवस गेले आणि परत एका रम्या सकाळी दोरीच्या उड्या मारायचा योगा आला. दार उघडले, बाहेर पॅसेज मध्ये गेलो, एक दीर्घ श्वास घेतला आणि मागचं सगळं विसरून नव्या जोमाने उड्या मारायला सुरू केले. 40 एक उड्या झाल्या आणि दोरी पायात! न विचार करता पुन्हा सुरू केले आणि लगेचंच परत अडखळलो. आता विचार करणे भाग होते. दोन मिनिटे डोकं खाजवले तेव्हा लक्षात आले की दोरी नेहमी डाव्या पायतंच अडकती आहे. का? हे काही केल्या कळेना. त्या दिवशीही मला अर्धवटच उड्या सोडून द्याव्या लागल्या. आणखी दोन-चारदा असेच झाले. शेवटी नशीबालाच विचार करणे भाग होते.

आता गंमत अशी की मी राहत असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये माझी खोली (तशी प्रशस्त 2 BHK खोली आहे) बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आहे. पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीकडे जाण्याचा मार्ग चालायला प्रशस्त् पण दोरीच्या उड्या मारायला थोडा अरुंदच. एका बाजूला स्टीलचा कठडा आहे आणि दुसऱ्या बाजूला खोल्यांची भिंत आणि जिथे भिंत नसेल तिथे तसाच दुसरा स्टीलचा कठडा. या दोन्हीच्य मधली जागा जेमतेम १ ½ फुट. अशा अरुंद जागेत उड्या मारताना मला सारखं वाटायचं की जरा जरी एक इंच हात मोकळा केला तरी कठड्याला लागेल.

blackrose-passage

एक दिवशी मी अख्ख्या अपार्टमेंट ची चक्कर मारली. पाय मोकळे करायला म्हणून नव्हे तर दोरीच्या उड्या मारायला कुठे जरा प्रशस्त जागा आहे का ते बघायला. एक जागा होती स्विमिंग पूलच्या बाजूला. पण ती फारच उघड्यावर होती आणि तिथली फरशी ही सपाट नव्हती. जरा फिरल्यावर लक्षात आले की तळमजल्यावर पॅसेज चांगला ४ फूट तरी रुंद आहे. चला निश्चय पक्का, पुढच्या वेळी इथेच उड्या मारायच्या.

दिवस उजाडला आणि मी तुरुतुरु खालच्या मजल्यावर उतरलो आणि ठरवलेल्या जागी उड्या मारायला सुरू केले. काय आश्चर्य ! पुण्यात जमायच्या तशाच अगदी २०० उड्या मी सहज, न अडखळता मारल्या. या जागेत मला एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. कुठे हात आडायचा प्रश्ना नाही, दोरी अडकणार नाही की आखडून उड्या मारायचा प्रश्न नाही. त्या दिवशी मी ६०० उड्या मारल्या आणि फक्त एकदाच अडखळलो.

पण काय माझ्या खोली बाहेरची जागा खरंच अरुंद होती? तसे पहिले तर आतापर्यंत केव्हाही माझा हात किंवा दोरी कधीच कठड्याला लागली नव्हती. याचा अर्थ असा तर नाही ना की मनाने स्वतःहून, स्वतःसाठी एक चौकात आखून ठेवली होती, आणि मोकळ्या जागेच्या भासाने त्या चौकडीतून बाहेर उडी मारली?

काही का असेना, दोरीच्या उड्या मारणे तरी सुरू झाले आहे!

ता. क. हे लिहिताना एक विचार अचानक याच मनात चमकला. आता आपल्याला मनाच्या चौकटीची माहिती तर झाली आहे, मग का नाही उद्या या चौकटीबाहेर डोकावून बघायचं? म्हणजेच त्या निमुळत्या जागेतच दोरीच्या उडयामारायच्या? ठरलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणता म्हणता त्याच १ १/२ फुटाच्या जागेत मी न अडखळता २५० उडया मारल्या. म्हणजे ती चौकट आता पुरती पुसली गेली आहे.

 

आग्रह आणि निग्रह

5 फेब्रुवारी 2017, नैरोबी, केनिया

मी मुळचा अस्सल पुणेकर, राहणीमानाने आणि स्वभावानेही. तर हा पुणेकर पैशाच्या आणि कारकिर्दीच्या लोभाने मुंबईत स्थलांतर झाला. ते वर्ष होते २००२. SIMC (सिमबाइयोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्यूनिकेशन) जिथे मी  पदवीयुत्तर शिक्षण पूर्ण केले तिथले जिवाभावाचे मित्रा मुंबईतच होते म्हणून त्या माया नगरीत माझे स्थलांतर जरा सोपे गेले.

तसे मुंबईत सोपे काहीच नसते. रोज मला कलानगर मधल्या बिन काचांच्या उघड्या घरातून मुंबईच्या चिकचिक्या दुपारी पोटाची खळगी भरण्यासाठी अर्धा एक किलोमीटर पायपीट करावी लागायची. एवढे करून खायला काय… रोज तेच तेच हॉटेल मधले पाणचट जेवण. ते जेवून कंटाळा यायचा पण पर्याय नव्हता. त्यावेळी ३५ रुपयांचे जेवणही खूप महाग वाटायचे कारण मुंबईत नोकरीचा शोध सुरू होता… कमाई थंड होती… थंड काय भोपळाच म्हणा ना. मग घामाने ओथंबलेल्या अवस्थेत पायपीट करून, उकिरडयात बांधलेला पूल पार करून बान्द्रा (वेस्ट) ला एक ‘अनलिमिटेड’ खाणावळ होती तिकडे नाइलाजाने मी कधी कधी जात. पण अनलिमिटेड जरी असला तरी एप्रिलच्या जीवघेण्या गर्मीच्या महिन्यात एवढ्या लांब चालत जायचे जिवावर यायचे. जे पाणी प्यायचो त्याच्या दुप्पट घाम वसूल करून जायचा. असो, तर असे हे मुंबईतले सुरुवातीचे दिवस कायम आठवणीत राहतील असे होते.

सर्व काही वाईट होते असे नाही… मनमोकळ्या गप्पा मारता येतील असे मित्र होते, बान्द्राची चकचकाट होती, मुंबईचा रोमांच होता आणि मी होतो. हळू हळू मुंबईने मला तिच्यात सामावून घेतले.

बघता बघता एका छोट्या ऍडव्हर्टायझिंग एजेन्सी मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर आणखी मोठ्या, आणि शेवटी देशातील अग्रगण्य एजेन्सी मध्ये (JWT -जे. वॉल्टर थॉंप्सन मध्ये ) काम करायचे माझे स्वप्न पूर्ण झाले. तिथे माझा पगार काही जास्त नव्हता, पण तीर्थरुपांच्या मदतीने मुंबई नगरीत हक्काचे घर झाले. कुठे विचारता? मुंबई ‘सबर्ब्स’ म्हणवल्या जाणार्‍या कांदिवली येथील चारकोप मध्ये ! पाचव्या मजल्यावरचे घर होते सुंदर.  देशातील सर्वात महागड्या शहरात घर झाले, आता लगीन घाई! नशीबाने घरापाठोपाठ सुंदर बायको ही दिली, आणि चारकोपमध्ये आमचा चिमणा-चिमणीचा सुखी संसार सुरू झाला.

आमचे घर होते चारकोप, सेक्टर ५ मध्ये. तेथून २ एक किलोमीटर अंतरावर एकसर परिसरात शीतलची सक्खी मावशी fish-plateराहायची. आम्ही अधूनमधून कधीतरी तिच्या घरी जायचो. कोकणी असल्याने घरी माशाचे जेवण कायम असायचे. त्यांचा स्वभावही एकदम बोलका, त्यामुळे त्यांच्या घरी संकोच कधी वाटायचा नाही. कोकणी लोकांच्या घरी केलेले माशाचे जेवण म्हणजे स्वर्गातली मेजवानीच याचा प्रत्यय मला त्या दिवसात झाला. मावशीचे घर एका सुबक सोसायटीमध्ये तळमजाल्यावर होते. मी आणि शीतल कधी हुक्की आली तर एखाद्या रविवारी माझ्या विक्टर बाईक वरुन त्यांच्या घरी जायचो. जेवणासाठी नाही हो, तर त्यांना भेटायला. जेवणाचा आग्रह तर कायम ठरलेला. कोकणी लोकांचा घरी मनापासून केलेला जेवणाचा आग्रह अनुभवण्यात वेगळीच मजा असते. माझे तर नशीब बलवत्तर होते.

अशाच एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो. कशाकरिता ते काही आता आठवत नाही, पण एकटाच गेलो होतो. रात्री ८ – ८.३० ची वेळ होती. मी त्यांच्या बाहेरच्या खोलीत माझ्या आवडीचा शिवाजी महाराजांचा घोड्यावर स्वार असा अप्रतिम पुतळा बघत बसलो होतो. काकांनी तो कधी काळी ग्रँट रोड  परिसरातून आणला होता. आता तसा सुंदर पुतळा मिळणे असंभव. त्या दिवशी मला लगेच निघायचे होते, बहुतेक काही महत्त्वाचे काम असावे, किंवा थांबायचा माझा पुणेकरी मूड नसावा. तेवढ्यात मावशी बाहेर आल्या, “आता जेवूनच जावा”, मनापासून आग्रह झाला. एरवी कोणी माशाच्या जेवणाला नाही म्हणायचे धारिष्ट केले नसते. पण मी  राहिलो पुणेकर. लवकर जायचे होते त्या कारणाने नकार दिला. आता त्या राहिल्या कोकणी. दुसऱ्याच क्षणी माझ्या हातातली विक्टर बाईकची किल्ली त्यांनी आपल्या ताब्यात कधी घेतली ते मला कळले ही नाही. “आधी जेवा मगच किल्ली देईन”, त्यांच्या आग्रहाने परिसीमा गाठली.

त्या क्षणी मला त्या विकृत असण्याचा भास झाला. कारण मुंबईत खार (वेस्ट) या उच्चभृ परिसरात राहत असताना, आमच्या घर मालकिणीने मला एकदा असेच त्यांच्या घरी अडकवून ठेवले होते. “माझे म्हणणे ऐक नाहीतर जाऊ देणार नाही”, अशी त्या घर मालकाच्या  बायकोची  वल्गना होती. त्याचे दडपण म्हणा किंवा कदाचित त्याचा राग मनात घर करून बसला असावा. त्यांनी  माझ्या हातातून विक्टरची किल्ली काढून घेतली तेव्हा त्या अनुभवाचा मनात स्फोट झाला. राग अनावर झाला. मनात मावशींबद्दल टोकाचा तिरस्कार निर्माण झाला. किल्ली हस्तगत केल्यामुळे, आता त्यांच्या हातचे माशाचे जेवण जेवणे प्राप्त झाले. जेवलो खरं, पण माझ्या क्रोधित मनाने  त्या चविष्ट जेवणाची चव हिरावून घेतली होती. जेवण उरकले तेव्हा कुठे किल्ली हाती आली. तडक मी किक मारली आणि घर गाठले. परत कधी त्यांच्या घरी पाय न ठेवायचा संकल्प करूनच.

दरम्यान पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शितल गरोदर राहिल्याने आमचे वास्तव्य कांदिवलीहून सीवूड्स येथे हलले. काळ सरकत गेला आणि २०१६ साल उजाडले तेव्हा नशीबाने मला आफ्रिका खंडात केनिया येथे काही काळासाठी स्थलांतरित केले होते. इथे मी एकटाच होतो. रोजच्या खाण्याचे वांदे! इथले जेवण म्हणजे बिन तिखट, बिन मसाला, असे बेचव. काही दिवसातच वीट आला, बेचव जेवणाचाही आणि इथल्या भरगोस किमातींचाही. आता स्वतः जेवण बनवणे भाग होते.

आज रविवार, सुट्टीचा दिवस. आज मी पुढच्या आठवड्यसाठी भाजी बनवण्यात आणि आजच्या जेवणाची सोय करण्यात अक्खा दिवस घालवला. स्वतः  जेवण बनवणे हे केवढे अवघड आणि वेळखाऊ काम असते याचा प्रत्यय झाला. चवीचा तर पत्ताच नव्हता. आयते मिळाले असते तर किती बरे झाले असते हा विचार चटकन  मनात येऊन गेला.

आणि तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर एकसरच्या मावशी झळकल्या. काय त्यांचा तो आग्रह, त्यांचा जिव्हाळा, आणि त्यांचा निग्रह. त्या दिवशी मला त्यांचा राग आला होता. त्यांच्या आक्रमक आग्रहाची अतिशय चीड आली होती. पण आज जेव्हा मला स्वतःच्या हातचे बेचव खाणे भाग पडत आहे  तेव्हा  न राहून मावशींच्या आग्रहाची  आठवण येते. असा मायेचा आग्रह अनुभवायला खरंच नशीब लागते. त्या वेळी चविष्ठ जेवणाला मुकलो याचे आज खंत वाटतंय, पण आता उपयोग काय? नशीबात होते तेव्हा मी ते उपभोगू शकलो नाही. आणि आता जेव्हा हवेसे वाटत आहे तेव्हा उपभोगता येणे शक्य नाही.

जे मायेचे जेवण मुकलो त्याचे भान राहीले हेच नशीब समजून मी आपला निरोप घेतो.

 

D A K T A R I

केनिया भूमीत पहिल्यांदा पाय ठेवून आता ५ महिने उलटले. आयुष्याच्या साखळीत बरेच नवीन अनुभव जोडले गेले. मी राहात असलेल्या ब्लॅकरोझ अपार्टमेंटमधले केबल चॅनेल्स अगदी गरीब श्रेणीतले मानायला काहीच हरकत नाही… दोन इंग्रजी सिनेमा चॅनेल, दोन बातम्यांचे चॅनेल, दोन स्पोर्ट्स चॅनेल आणि दोन केनियन चॅनेल्स एवढेच काय आमचे केबल विश्व. आता तुम्ही म्हणाल हे केबल चॅनेल्स मध्ये आलेच कुठून? तर या सर्व चॅनेल्स मध्ये एक विशेष म्हणजे त्या दोन केनियन चॅनेल्स पैकी एक चॅनेल! बघू तेव्हा त्यावर जंगलातले बुवा, मानवी हाडांचे सापळे, तांत्रिक, मांत्रिक, चेटूक विद्या, नरबळी, पशुहत्या, वगैरे गोष्टीच चालेल्या दिसत. मी  सुरुवातीला एक-दोनदा आवर्जून तो चॅनेल पहिला. नंतर ट्रंप नावाचे त्याहून भारी करमणूक अस्त्र सापडले आणि लक्ष आपसूक तिकडे वळले.

परवा रोजच्यासारखे सकाळी 9 वाजता मी तयार होऊन आम्हाला ऑफीस मध्ये पोहोचवणाऱ्या गाडीत जाऊन बसलो. बाजूला सदा हसतमुख आणि माझा प्रवासी मार्गदर्शक ‘जॉर्ज’ ड्राइवर बसला होता (त्यानेच मला नैरोबीतल्या सर्व मटाटू मार्गांची माहिती पुरवली ज्यामुळे माझे बरेच पैसे वाचले). पाच एक मिनिटात आमची गाडी नैरोबीच्या दुतर्फा झाडांनी नटलेल्या रस्त्यावरून ऑफिसच्या दिशेने धावू लागली. मध्येच ‘मंडाझी’ घेण्यासाठी एक खोपट्यासमोर थांबलो. मी मंडाझी घेत असताना त्याच खोपट्याच्या बाजूला एक गोरा गोमटा माणूस मोट्ठी हॅट घालून बाकावर भाजी निवडत बसला होता. त्याला पाहून मनात काहीतरी खटकले, हा गोरा माणूस रस्त्याच्या कडेला या काळ्या (केनियन) लोकांमध्ये बसून भाजी का बरं निवडतोय?

डोक्यात हे कोडे घेऊन मी गाडीत बसलोच होतो की जाणवले, जॉर्जचा आणि रवीचा (माझा सहकारी) त्या गोऱ्या  माणसाबद्दलच विषय चालू होता. “ही अल्बाइनो लोकं दिवसाच दिसतात, रात्री ते बाहेर पडत नाहीत”, जॉर्ज सांगत होता. मध्येच उडी मारल्याने मला काही संदर्भ लागेना, “का?” मी सहजपणे विचारले.

“कारण रात्री यांच्या जीवाला धोका असतो”

परत, “का?”

“ब्लॅक मॅजिक. ब्लॅक मॅजिक करणारे लोक त्यांना मारतात कारण त्यांचे अवयव गुणकारी मानतात”

माझ्यासाठी ही माहिती कोरी करकरीत होती, “इथे नैरोबीतही ब्लॅक मॅजिक करणारे लोक आहेत?”

जॉर्ज: हो… पण त्यांचे अवयव इकडून टान्झानिया मध्ये पाठवतात…इकडे मारतात आणि तिकडे पाठवतात.”

अजून एक प्रश्न, “कोण मारतं यांना?”

जॉर्ज, “हे DAKTARI करणारे लोक… सगळीकडे त्यांच्या पाट्या असतात.”

गाडी चालवता चालवता अचानक त्याने रस्त्याच्या डावीकडे दिमाखात उभ्या असलेल्या झाडाकडे बोट दाखवले. त्या झाडावर एक काळ्या रंगाची चौकोनी पाटी लटकत होती. त्यावर इंग्रजीत ‘DAKTARI’ आणि त्या खाली ३-४ ओळी स्वाहिली भाषेतलिहिल्या होत्या. “हे बघ, ही पाटी ब्लॅक मॅजिक डॉक्टरची आहे”, जॉर्ज ने खुलासा केला. मी ती पाटी नीट बघेपर्यंत आमच्या गाडीने तिला राम राम ठोकला होता. जॉर्जला ते बहुदा कळाले, “काळजी करू नकोस. तुला अशा पाट्या सगळीकडे दिसतील”, त्याने मला धीर दिला. मी लगेच रस्त्याच्या दुतर्फा टकामका बघू लागलो. एका वळणावर जॉर्जने आणखी एक पाटी दाखवली. त्यावर ही  ‘DAKTARI’ असे ठळक शब्दात आ
णि त्याखाली स्वाहिलीत काही लिहिले होते. २ मिनिटातच तिसरी पाटी, चौथी पाटी. चक्क आमच्या ऑफीसच्या उच्चभ्रू  परिसरातही एक डाकटरी पाटी आढळली!wp_20170210_09_21_03_pro

मी कुतूहलापोटी जॉर्जला विचारले, “हे ब्लॅक मॅजिक डॉक्टर नक्की करतात तरी काय?” “ओह… ते सगळं करतात, पैशाच्या समस्या, आजार, कोणाविरुद्ध  कारस्थान वगैरे वगैरे. आता तर हे खूप वाढेल, निवडणुका आल्या आहेत ना.” मला काही कळेना, इथे निवडणुकांचा काय संबंध? त्याने माझ्या बाळबोध प्रश्नाला संयमितपणे उत्तर दिले, “निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध उभ्या उमेदवारला पाडण्यासाठी बरेच उमेदवार मंडळी या डाकटरीकडे धाव घेतील.”

नैरोबी सारख्या प्रगत शहरात ब्लॅक मॅजिकचे साम्राज्या एवढे पसरलेलं बघून मला धक्काच बसला. २ मिनिटे शांततेत गेली.

जॉर्जने स्वतःच माहिती चालू ठेवली, “बरेच लोक यांच्याकडे कौटुंबिक किंवा वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी जातात. म्हणजे समजा माझी बायको तुझ्याबरोबर असेल तर मी DAKTARI कडे जाईन  आणि ब्लॅक मॅजिक करेन. म्हणजे जेव्हा
तुम्ही ‘ऍक्शन’ मध्ये असाल तेव्हा अचानक स्तब्ध व्हाल!”

ते ऐकून दुसर्‍याच क्षणी मी स्तब्ध अवस्थेत गेलो. आता DAKTARIच माझी काय ती मदत करू शकेल, नाही का?

 

wp_20170211_10_29_01_pro

ता. . – मी DAKTARI बोर्डचे मोबाईलने फोटो घेतले आणि सरळ ऑफिस मध्ये आलो. फोटो ब्लॉग वर टाकण्यासाटी गडबडीने मोबाईल कॉम्पुटरला जोडला. एरव्ही जोडल्या जोडल्या मोबाईल आपल्या पोटात जे काय साठवलेलं असेल ते लगेच कॉम्पुटर स्क्रीन वर ओकतो, पण या वेळा असे काही होईना. मी दोन मिनिटे वाट बघून दुसऱ्या कॉम्पुटरला मोबाईल जोडून बघितला तरीही काही नाही. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आता प्रश्न होता की त्यातले DAKTARI चे फोटो बाहेर काढायचे कसे?
असे तर नाही ना की ते फोटो सहजासहजी सर्वत्र पसरू नयेत म्हणून DAKTARI नेच ही शक्कल लढवली होती… शेवटचा प्रयत्न करून बघितला होता?

असो, काही वेळाने त्याचा प्रभाव बहुदा कमी झाला असावा. मला ही एक युक्ती सुचली. मी मोबाईल वरून फोटो स्वःत ला ए-मेल वर पाठवले आणि तेव्हा कुठे हा ब्लॉग तुमही वाचू शकताय!

Share this:

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...