Friday, July 18, 2025

Badami… Badaami… Badaaaaami

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Badami… Badaaami… Badaaaaaami

शीतल (माझी अर्धांगिनी) जी पूर्ण निर्णय घेते, तिने आपला निर्णय दिला की ओमला (आमचा ९ वर्षीय मुलगा) रामतीर्थकरांच्या कुलदेवीचे दर्शन घडवून आणायचे. तसे आम्ही ओमबरोबर रामतीर्थकरांच्या तिरुपती देवस्थानी दर्शन घेऊन आलो होतो, नाडकर्ण्यांच्या गोव्यातील मंगेशीकडेही दोनदा जाऊन आलो होतो पण बदामी राहून गेले होते. कधी बोलता बोलता अर्चना वाहिनीने उल्लेख केला होता की त्यांनाही बदामीला जायचे आहे, म्हणून मी आमच्या रामतीर्थकर व्हॉट्सऍप्प ग्रुपवर मेसेज टाकला की आम्ही चाललो आहोत तर कोणाला यायची इच्छा आहे का?

त्वरित अनुजा अईनामदार (चुलत बहीण) व अर्चना-नितीन रामतीर्थकर यांचा होकार आला व मी त्वरित मुंबईहून थेट बदामीला पोहोचवणाऱ्या गदग एक्सप्रेस आगगाडीचे आरक्षण करून टाकले. थोडा विचार विनिमय करून बदामीतील KTDC मौर्य चालुक्य हॉटेलमध्ये ३ खोल्याही आरक्षित करून ठेवल्या. हे सगळे झाले १९ नोव्हेंबर २०१९ च्या आसपास आणि आम्ही जाणार होतो २५-२६ जानेवारी २०२० मध्ये.

तर धवल-शीतल-ओम, नितीन-अर्चना-अनया-निर्मयी, व अनुजा असा ८ जणांचा चमू ठरला. सगळे उत्साहात होते आणि मध्येच डिसेंबर महिन्यात अर्चना वाहिनीचे आजारपण उद्भवले व तिचे व निर्मयीचे येणे रद्द झाले. अर्चनाही हळहळली असेलच पण आम्हीही हळहळलो कारण बदामी देवीचे दर्शन घ्यायचे तिच्या मनात खूप होते. बघता बघता २४ जानेवारी उजाडला, आमचा बदामीला जाण्याचा दिवस.

thumbnail (14)

गदग एक्सप्रेसमध्ये चढण्याआधीचा आनंदी फोटो… जो लवकरच दुसरा रंग घेणार होता

मी, शीतल आणि ओम मुंबईहून रात्री ९.५० वाजता गदग एक्सप्रेस मध्ये बसणार होतो, तर भल्या मध्यरात्री १.१० वाजता नितीन, अनया व अनुजा पुण्यात त्याच गदग एक्सप्रेस मध्ये स्वार होणार होते.

रेल्वे नाट्य
ठरल्याप्रमाणे आम्ही चढलो पण एका नाट्यानंतरच. ठाणे स्टेशन असे आहे की तिथे, रात्र असो वा दिवस, नेहमी झुंबड असते आणि नियोजन शून्य. आमच्या नशीबातही त्या शून्य नियोजनाचा प्रसाद होता. आमची रेल्वे यायला २० मिनिटे उशीर झाला आणि जशी यायची वेळ आली तसे प्लॅटफॉर्मवर डब्यांच्या नंबरचे इंडिकेटर लागायला पाहिजे होते ते लागलेच नाहीत. एका बाईने स्पीकरवर गाडीच्या डब्यांची स्थिती फक्त तोंडी सांगितली व आम्हाला आमच्या नशीबावर सोडून दिले. साहजिकच २ मिनिटात जशी ट्रेन आली तसे आमच्या लक्षात आले की आमचा डबा एकदम पुढे पळून गेला आहे. मग आम्हीही पाळायला लागलो पण डबा एवढा पुढे गेला होता की आमची दौड कमी पडली. तशाच बॅगा घेऊन आम्ही जिथे दौड संपली तिथे असलेल्या AC डब्यात चढलो. मी शीतलला म्हटलं की सर्व डब्बे जोडलेले असतात त्यामुळे काही काळजी नाही. ती आधीच धुमसत होती, कारण तिचे आणि स्पीकरवर सूचना देणाऱ्या बाईच्या मनाच्या तारा जुळल्या होत्या. त्यामुळे तिने मला आधीच सांगितले होते की आपला डबा पुढे येणार आहे चल आपण पुढे जाऊ. पण माझा प्रवासाचा अनुभव सांगत होता की त्या बाईच्या सूचनेवर विश्वास ठेवणयात अर्थ नाही, तिथे स्टॉल वरच्या इसमाला विचारायला हवे, पण तेवढ्यात रेल्वे येऊन ठेपली व आमची दौड सुरु झालेली. तर आम्ही AC डब्यात चढलो व पुढे आमच्या डब्याच्या दिशेने वाट काढत जायला लागलो. तो AC डबा पार करून दुसऱ्या टोकाचे दार उघडले आणि तिथेच अडखळलो. पुढे रास्तच नव्हता. तो डबा बाकीच्या डब्ब्यांना जोडलेलाच नव्हता. आता आली का पंचाईत! तिथेच एक पोलीस बाई उभ्या होत्या. त्यांनी सांगितले की पुढचा डबा General आहे त्यामुळे हे दोन डब्बे जोडलेले नाहीत. पण त्यांनी हे ही सांगितले की पुढचे स्टेशन कल्याणला गाडी ५-१० मिनिटे थांबेल, तिथे परत उतरून तुमचा डबा पकडू शकता. हे ऐकून शीतलची तळपायाची आग मस्तकात गेली. मारक्या म्हशीसारखी नजर रोखत ती मला नावे ठेवू लागली आणि ती पोलीस बाई शीतलला धीर देऊ लागली. १५ मिनिटातच कल्याण स्टेशन आले आणि आम्ही एक डबा सोडून असलेला आमचा S2 डबा सहज पकडला व जाऊन आमच्या बाकांवर हुश्श करून बसलो. आता कुठे शीतलच्या जीवात जीव आला आणि माझी खात्री झाली की रात्री माझ्या जीवाला काही धोका नाही.

सामान लावले आणि ओम बरोबर गप्पा मारत बसलो कारण ओमने आधीच ठरवले होते की ट्रेनमध्ये बसल्यावर काही वेळ तो अप्पर बर्थ वर बसून गप्पा मारणार आहे, म्हणजेच मला प्रश्न विचारणार आहे. आणि तसेच झाले. लवकरच झोपेची वेळ झाली आणि मी तरी गाढ झोपी गेलो.

पुणे नाट्य
जसे पुणे जवळ यायला लागले तसा गारठा अचानक वाढू लागला व उकाड्याचा सराव झालेल्या आम्हा मुंबईकरांनी जे तोडके पांघरूण बरोबर घेतले होते ते घट्ट ओढून घेतले. त्या थंडीतच मध्यरात्री माझा मोबाईल वाजला, बघितले तर नितीन भाऊंचा फोन. म्हटलं पुणे आले वाटते, पण मग मध्यरात्री हा मला का फोन करतोय. मी अर्धवट झोपेतच फोन घेतला व काहीतरी बोललो व फोन कट केला. परत गाढ निद्रेच्या स्वाधीन होणार तितक्यात परत नितीन भाऊंचा फोन. मी झोपेतच विचार केला की त्याला सीट तर माहिती आहेत मग मध्यरात्री १ वाजता चढल्यावर गप झोपून टाकायचे तर हा सारखा आम्ही चढलो हे सांगण्यासाठी माझी झोपमोड का करत आहे. मी परत फोन घेतला व अर्धवट झोपेत काहीतरी बोलून परत कट केला. नशीबाने परत फोन नाही वाजला.

खरी गोष्ट तर दुसऱ्या दिवशी सकाळी उजेडात आली. अर्चना-निर्मयीचे तिकीट रद्द केल्यामुळे बाकीच्यांचे सीट नंबर बदलले होते (रेल्वेचे अजब कारस्थान) व रात्री चढल्यावर नितीन व तिथल्या प्रवाशांचे सौम्य स्वरात वाजले होते. शेवटी मी झोपेतून उठत नाही बघून नितीननेच डोके चालवले व रेल्वेला SMS केला व सुधारित सीट नंबर त्याच्या हाती आले. अर्ध्या तासाने त्यांचा प्रवास सुखकर झाला असे म्हणायला आता काही हरकत नाही.

झुक झुक
सकाळी नेहमीप्रमाणे मला ६-३० वाजता जाग आली. बघतो तर शीतल आणि ओम जागेच. ते सर्वात खालच्या, लोवर बर्थ वर होते आणि मी सर्वात वरच्या अप्पर बर्थवर होतो. रात्री थंडीमुळे आणि अपुऱ्या पांघरुणामुळे रात्रभर त्या बिचाऱ्या पांघरुणाची ओम आणि शीतल मध्ये फरफट चालू होती आणि शेवटी त्याने वैतागून कोणालाच उब दिली नाही. अशा प्रकारे दोघेही रात्री नीट झोपू शकले नाहीत. मी आणि ओम नितीनच्या आसनांकडे जाण्यासाठी निघालोच होतो की नितीनंच आमच्यासमोर प्रकट झाला. मग आम्हा तिघांची वरात २ रांगा सोडून त्यांच्या आसनांकडे गेलो.

thumbnail (15)

सर्व झुक झुकमध्ये एकत्र

अनया उठून बसलेलीच होती. त्यांच्या इथे बाकी सीट रिकाम्याच होत्या. मग असे ठरले की आम्ही तिकडेच यायचे. एव्हाने ८ वाजले होते. त्याआधी बोलता बोलता डब्यातली एक कन्नडा बाईने हिंदीतून असेच सांगितले होते की ट्रेन ९.३० पर्यंत बदामीला पोचेल. ओमने उत्साहाने ही बातमी सर्वांना सांगितली व यावरून त्याची आणि अनुजाची पैज लागली. ओम म्हणाला की ट्रेन ९.३० वाजता पोचेल तर अनुजा म्हणाली की १० वाजता पोचेल. शेवटी १० वाजून गेले आणि तरीही आम्ही ट्रेनमध्येच होतो. दोघेही पैज हरले होते आणि असे ठरले की ओम आणि अनुजा दोघांनी बाकी सर्वांना पार्टी द्यायची.

अनुजाचीही झोप पूर्ण झालेली नसावी कारण ती वरच्या बर्थवर जाऊन आडवी झाली.

thumbnail (8)

ओमने हौसेने प्रवासात वाचायला ‘संताजी धनाजी’ हे ऐतिहासिक आणि त्याच्या भाषेत ‘सप सप’ म्हणजेच कापाकापी असलेले पुस्तक आणले होते. ते नितीनच्या नजरेस पडले आणि बघता बघता त्याने ते वाचायला सुरुवात केली. आणि वाचन तरी कसे, निरंतर, अगदी ट्रेनच्या प्रवासासारखे.

thumbnail (6)

नितीनभाऊंचे निरंतर वाचन, एक नवीन पैलू समोर आला

अनयाचे मोबाईलला श्रवणयंत्र लावून निरंतर गाणी ऐकणे व अधून मधून बाहेरची दृश्ये टिपणे चालू होते.

thumbnail (7)

तर ओम वरच्या बर्थवर चढणे आणि खाली उतरणे अशी गंमत-जंमत कसरत करत होता.

thumbnail (5)

मंकी बाबू

शीतल आणि तिची बहीण राणी (शाळेतून आल्यावर तो त्यांच्याच घरी असतो) त्याला कोकणी प्रथेनुसार बाबू बोलावतात. तिने ट्रेनमध्ये त्याला बाबू बोलावताच अनुजा आत्याने तिच्या अशा काही मिश्किल स्वरात बाबूऊऊउ म्हट्ले की तो पूर्ण खजील झाला. त्यानंतर त्याचे बांबूचं नाव कायम झाले व सर्वांना ओमची बरीच बाबू रूपे पाहायला मिळाली.
नंतर त्याने अनुजा आत्याकडे पत्ते खेळाचा घाट घातला आणि आत्याही खुशीने तयार झाली. मग किती वेळ भिकार सावकार रस्सीखेच चालू होती. ती झाल्यानंतर अनुजाने त्याला नवनवीन खेळ शिकवले, अगदी साध्या पत्त्यांनी उनो (UNO) कसे खेळायचे हे सुद्धा!

thumbnail (16)

‘बाबू’ बरोबर तेवढ्याच उत्साहाने पत्ते खेळताना अनुजा आत्या

मी कधी दारात उभा राहून तर कधी खिडकीतून बाहेरची मनमोहक दृश्ये मोबाईल व कॅमेरा मध्ये कैद करत होतो. शीतल बसल्या जागेवर पेंगत होती नाहीतर काही खाणे येतंय का याची वाट बघत बसली, असा सर्वांचा प्रवास छान चालू होता.

आता बाहेर उन्हाने सर्व लक्ख प्रकाशित केले होते आणि सुंदर नजारे एकापाठोपाठ मागे सरत गेले. नुसती हिरवीगार शेतं नाहीत तर मोठाल्या पवनचक्क्यांची शेतं होती, १५-१७ दरवाजे असलेलं प्रचंड अलमट्टी धरण, त्याचा महाकाय पाण्याचा साठा असलेला पाणलोट परिसर, निळ्याभोर नद्या, विजापूरच्या किल्ल्याची भारदस्त तटबंदी सुद्धा ट्रेनमधून जाताना दिसत होती, जणू ट्रेनमधून आमची धावती टूर चालू होती.

thumbnail (19)

अलमट्टी धरणाचे अनेक दरवाजे. यावरूनच कल्पना करता येते की हे धारण किती मोठं असेल

thumbnail (20)

अलमट्टी धरणाचा पाणी साठा

बदामीत आगमन
शेवटी १०.३० वाजता आमचे बदामी स्टेशन वर आगमन झाले. बाहेर पडलो आणि KTDC मौर्य चालुक्य हॉटेलचा बोर्ड दिसला, फक्त ५.५ कि. मी.
thumbnail (9)

स्टेशनच्या लगेच बाहेर रिक्षांची रांग लागली होती. मी हॉटेल पर्यंतचा भाव विचारला तर सुरुवात झाली रु. २०० पासून, अजून थोडे पुढे जाताच १५० आणि तरी बधत नाही असे बघताच एक रिक्षावाला १०० रुपयात तयार झाला आणि आम्ही त्या टम टम मध्ये बसून बदामीचे चकाचक रस्ते व दुतर्फी पसरलेल्या मोठाल्या शिळा, बदामी बाजार पार करत आमचे हॉटेल गाठले.

thumbnail (10)

टम टम प्रवासाची मज्जा घेत हॉटेलकडे रवाना

हॉटेल नाट्य
रिसेप्शन वर नाव सांगितले व goibibo वर बुकिंग केल्याचे सांगितले आणि त्याने आमच्यावर एक मोठा तोफगोळाच डागला. “तुमच्या ६ रूम आरक्षित आहेत”, तो म्हणाला. आम्ही म्हटलं जर तुम्हाला ६ खोल्या आम्ही भरलेल्या भावात द्यायच्या असतील तर आम्हाला आनंदच आहे. आधी असे प्रसंग ऐकल्यामुळे मी ठामपणे त्याला सांगितले की आमच्या फक्त २ खोल्या आहेत व बाकीच्या खोल्या आम्ही कधीच रद्द केल्या आहेत. नितिनकडे बुकिंगची छापील प्रत होतीच. ५ मिनिटांनी त्याने पुटपुटत व त्याच्याच प्रशासनाला नावे ठेवत आम्हाला २ खोल्या दिल्या. ११ वाजले असल्यामुळे नितीनच्या मते आता नाश्ता करायला हरकत नव्हती पण सर्वांचे मत असे झाले की अशा अडनिड्या वेळी नाश्ता करण्यापेक्षा पटापट आवरून घेऊ आणि एकदम जेवायलाच येऊ.

हॉटेलचा परिसर छान हिरवागार होता. खोल्यांच्या इमारतींमध्येही पुरेपूर अंतर होते व आवारात २ भली मोठी कमीत कमी ५० वर्षे जुनी झाडे पसरली होती. आमच्ये २ खोल्या हॉटेलच्या दुसऱ्या टोकाला सर्वात शेवटी होत्या. त्यामुळे आणखी सामसूम. खोल्याही चांगल्या प्रशस्त व खास करून स्वच्छ आढळल्या त्यामुळे सगळे खुश. मग शीतल, मी आणि ओम एका खोलीत आणि नितीन, अनया आणि अनुजा एका खोलीत असे पांगले.

thumbnail (12)

मनाला निसर्गाची भुरळ घालणारे डौलदार झाड

thumbnail (13)

आमची खोली असलेल्या इमारतीच्या बाहेर

thumbnail (11)

खोलीचे दार उघडले की समोर हा लांबलचक पॅसेज

thumbnail (22)

अनपेक्षित भोजन
जमेल तसे पटापट आवरून आम्ही ठीक १ वाजता जेवायला त्यांच्या हॉटेलमध्ये आलो. शीतलला धास्ती होती की परत नुसता भात आणि रस्सम खावा लागणार की काय? कारण मागच्या वेळी आम्ही जेव्हा बदामीला आलो होतो तेव्हा एक दिवसाची धावती भेट होती आणि जेथे जेवणासाठी थांबलो तिथे फक्त रस्सम आणि भात होता. बदामीला यायच्या २ दिवस आधी आम्ही बेळगावात एका मित्राच्या लग्नासाठी होतो तेथे पण फक्त रस्सम भात. त्यामुळे रस्सम-भात शीतलसाठी अगदी नो नो होता. पण मौर्य चालुक्य हॉटेलने आम्हाला सुखद धक्काच दिला. त्यांच्याकडे चक्क थाळी उपलब्ध होती ज्यामध्ये पोळीही होती. मग काय मी, शीतल आणि अनुजाने क्षणाचाही विचार न करता थाळी सांगितली व नितीन आणि अनयाने बराच वेळ विचार विनिमय करून आलू मटार आणि जीरा राईस मागवला. अर्ध्या तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी जेवण आले आणि आम्ही त्यावर अक्षरशः तुटून पडलो.

thumbnail (21)

जेवणानंतर परत उत्साह संचारला व सेल्फीला सुरुवात झाली… नितीन काकाला न जुमानता

बदामीमध्ये चांगली हॉटेल व राहण्याची व्यवस्था अगदीच थोडकी आहे. बरेच लोक हुबळी, बेळगाव, सोलापूरवरून एक दिवसासाठी बदामीला येऊन परत जातात. त्यामुळे मौर्य चालुक्य मध्ये बस भरून पर्यटक जेवणासाठी येत होते. त्यांच्यासाठी बुफे जेवण वेगळे ठेवले होते, त्यांच्या पॅकेज डील प्रमाणे असावे. असो, आम्ही जेवण एकदम एन्जॉय केले. थाळीत जिलबी गोड पदार्थ होता. त्याची चव इतकी चांगली होती व ओमला खायची होती म्हणून आम्ही अजून एक प्लेट जिलबी मागवली. हो नाही करत शेवटी त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली व आम्ही जिलबी व ताकावर ताव मारला. आता भरलेली पोटे घेऊन रणरणत्या उन्हात बदामीची प्रसिद्ध गुहा चढायची होती.

ती तर एक अतिशय रोमांचकारक आठवण आहे.

क्रमश…

thumbnail

thumbnail (3)

thumbnail (2)

thumbnail (1)

दुसऱ्या दिवशीच्या रोमांचक घटनांसाठी खलील लिंक क्लिक करा:

https://bit.ly/3hNc8BX

 

Badami… Badaami… Badaaaaaami – Part 2

याआधीची मजा जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लीक करा
https://bit.ly/2UzKWwP

आता भरलेली पोटे घेऊन रणरणत्या उन्हात बदामीची प्रसिद्ध गुहा चढायची होती.
ती तर एक अतिशय रोमांचकारक आठवण आहे.

बदामी गुहा
हॉटेलच्या बाहेर आलो की मुख्य रस्ता लागतो. तिथे आम्हाला रिक्षा लगेच मिळाली आणि ५० रुपयात त्याने आम्हाला बदामीच्या प्रसिद्ध गुहांच्या पायथ्याशी सोडले. प्रवेश तिकीट काढून आम्ही गुहेकडे जाणाऱ्या पायऱ्या चढू लागलो. तेव्हा कोणाला कल्पना नव्हती की वर एवढी अप्रतिम शिल्प व छातीत धडकी भरणारे प्रसंग आमची वाट बघत असतील. आधी मी या गुहांमध्ये दोनदा येऊन गेलो आहे, पण प्रत्येक वेळी ती शिल्पे बघून तोंडात बोटे घातलेली आठवतात पण ती नेत्रदीपक शिल्पे काही आठवत नाहीत. त्यामुळे कधीही जावा आणि परत तोंडात बोट घाला हा क्रम ठरलेला.

बदामी गुहेच्या पायथ्याला असलेल्या पार्किंग मधून काढलेला फोटो

एकूण ४ गुहा आहेत. पहिल्या तीन मध्ये हिंदू शिल्पे आहेत आणि शेवटची चौथी जैन गुहा आहे. आम्ही काही पायऱ्या चढून पहिली गुहा गाठली. तिथे उजव्या बाजूला सुंदर पण भव्य नटराज मूर्ती पाषाणात कोरलेली आपले स्वागत करते. त्याच्या मागे, अंधारात डाव्या बाजूला मोरावर स्वार असलेली कार्तिकेयचे शिल्प आहे तर उजव्या बाजूला गणपती विराजमान आहेत. गुहेत अप्रतिम कलाकुसर केलेले खांब आणि बरीच भव्य शिल्पे आहेत.
20200125_142714

तिकडे एक मोठा ग्रुप आला होता व त्यांच्याबरोबर एक बाई गाईड होत्या. चेहेऱ्यावरून व कानातले घातलेले त्यावरून तर त्या मुसलमान वाटत होत्या पण छान मराठीत सर्व माहिती देत होत्या. शीतलने तर त्या ग्रुपमधलीच एक होऊन त्या काय सांगतायत हे बिनधास्त ऐकत त्यांच्या मागे मागे जाणे पसंद केले. मी नेहमीप्रमाणे तोंडात बोट घालून बघत होतो व फोटो काढत होतो तर अनुजा मोबाईलमध्ये त्या त्या गुहेची माहिती वाचून ती शिल्पे बघत फिरत होती व आम्हालाही माहिती सांगत होती. काही वेळातच सर्वांच्या संयमाचा अंत झाला व सगळे त्या गुहेच्या पायरीवर विसावले. अजून ३ गुहा बघायच्या होत्या!

thumbnail (7)

फोटो आहे जैन गुहा ४ बाहेरचा… प्रत्येक गुहेबाहेर हेच दृश्य ठरलेले

माकडा माकडा हुप्प, तुला घाबरतात सगळे खूप
दुसऱ्या गुहेकडे जायला परत काही पायऱ्या चढून जावे लागते. अचानक काहीतरी गडबड झालेली दिसली. बघितलं तर माकड! जास्त करून बायकांकडे खाण्याची पिशवी असते व ते या माकडांना बरोबर मा हीत. त्यातून परत खांद्यावरची पर्स किंवा पिशवी थोडी जरी उघडी दिसली तर ती माकडे लगेच उडी मारतात व आत हात घालू काय असेल ते बाहेर उचकटून काढतात. पण त्याआधीच अर्धे लोक त्यांना हुसकावतात, त्यांच्यापासून लांब जातात तर काही सरळ आपल्याकडची पिशवी फेकून देतात. याचे प्रात्यक्षिक आम्हाला काही वेळातच पाहायला मिळणार होते.

ही माकडे बघून ओम पुरता घाबरला. कसे बसे आम्ही पायऱ्या चढून दुसऱ्या गुहेत पोचलो. या गुहेत तर आणखी भव्य शिल्पे आमची वाट बघत होती. त्यात वामनावतार, वराह अवतार, छतावर मत्स्य चक्र अशी अनेक चक्रावून टाकणारी शिल्पे शेकडो वर्ष या गुहांत तग धरून लोकांना दर्शन देत उभी आहेत. इथेही परत तेच. शीतल त्या गाईड बाईची शेपूटच झाली होती व काय सांगत आहे ते मन लावून ऐकत होती. मी ही काही काही ऐकले पण बाकी बघण्याचाच मोह जास्त होता म्हणून तिथे थांबता आले नाही. अनुजा मोबाईलद्वारे आम्हाला उपयुक्त माहिती पुरवत होती तर ओम अनया ताईला चिकटून होता. तसे एरवीही त्याला कोणालातरी पडकून चिकटायला आवडते, आणि इथे तर माकडांचे वाढीव भय.

गुहेतून बाहेर आलो की थोडं वरती परत काही पायऱ्या जातात व एक कमान दिसत होती. जसे जास्त वर चढत होतो तसे तशी माकडे जास्त दिसत होती व त्यांच्यामुळे झालेली आरडाओरड जास्ती कानावर पडत होती. धीर करून सगळे एकत्र त्या कमानीपाशी आलो. मध्येच डावीकडे माकड दिसायचे, तर कधी उजवीकडे. कमानीपाशी येताच उजवीकडे एक रास्ता होता पण तो लोखंडी दरवाजा लावून बंद करण्यात आला होता.
तिथेच एक उंच झाड होते व कदाचित प्रसाद बरोबर नसल्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून अनुजाने त्या उंच, भक्कम झाडाबरोबर फोटो काढून घेतला 😉

thumbnail (5)

थोडे खाली आता माकडांचे प्रताप वाढले होते. एक माकड तर सर्वांना घाबरवत मध्येच पुढे यायचे, थोडे मागे जायचे व परत पुढे यायचे. जणू ते लढाईच्या पवित्र घेऊन माणसांवर हल्लाच करणार होते. तेवढ्यात त्या गाईड बाईपण तिथे आल्या व आम्ही ती संधी साधून त्यांना त्या बंद रस्त्याबद्दल विचारले. आम्हाला असे कळाले की तो तर बदामीच्या प्रसिद्ध किल्ल्याकडे जाणारा रास्ता आहे. पण पूर्वी काही माथेफिरू लोकांनी वर जाऊन आत्महत्या केली होती किंवा प्रयत्न केले होते म्हणून तो रास्ता कयमस्वरूपी बंद करून टाकण्यात आला. त्यांनी सांगितले की वरती अजस्त्र तोफा ही आहेत पण आता जाता येणे शक्य नाही. आम्ही हळहळलो, आम्ही म्हणजे मी कारण बाकीच्यांना वरती जाण्याची जास्त इच्छा दिसत नव्हती.

thumbnail (3)

उंच पायऱ्या असलेले बदामी किल्ल्याचे प्रवेशद्वार


ती किंकाळी
मी काही पायऱ्या चढून कमानीपाशी पोचलो की मागून एक मोठी किंकाळी ऐकू आली. माझ्यासकट तिथे असलेले सगळे मागे वळाले तर दिसले की कोणीतरी आपली पर्स टाकून दिली होती व समोर एक माकड बसले होते. नीट बघितले तर त्या पर्सच्या मागे तर भेदरलेली अनुजाच उभी होती म्हणजे ती गुहाभेदी किंकाळी अनुजाचीच होती आणि माकडाला घाबरून तिनेच आपली पर्स त्याच्यासमोर टाकली होती. तेवढ्यात माणसांची आरडाओरड सुरु झाली. एक माणूस पळत आला आणि सांगू लागला, मॅडम पर्स उठाव नाही तो बंदर लेकर जायेगा. एक नाही, दोन नाही, लालेलाल झालेली अनुजा त्या पर्स जवळ जायलाच तयार नाही. शेवटी एका माणसानेच तिची पर्स उचलली आणि तिच्या थरथरत्या हातात अडकवली. आश्चर्य म्हणजे २ मिनिटे ती पर्स जमिनीवर असूनसुद्धा माकडाने ती पळवली नव्हती किंवा तसा काही प्रयत्नही केला नव्हता. बहुदा ते माकड त्या कर्कश किंकाळीने एवढे घाबरले की त्याने विचार केला असेल की एवढा मोठा आवाज करणारी ही कुठली तरी मायावी पर्स असणार व घाबरून ते ही लांब पळून गेले.

अशा प्रकारे अनुजाने भिरकावलेली, अनुजाची पर्स, अनुजाच्या किंकाळीने, अनुजाच्या हातात परत आली व अनुजाच्या जीवात जीव परत आला. पण एक गोष्ट खरी की बदामीच्या गुहांनी आतापर्यंत अशी किंकाळी कधी ऐकली नसणार आणि अशी किंकाळी भविष्यातही कधी कोणी ऐकेल असे वाटत नाही.

thumbnail (4)

माकडावरून आठवले, हा बघा आमचा ‘मंकी बाबू’

त्या किंकाळीने पूर्ण रास्ता साफ केला होता व एक ही माकड आसपास दिसत नव्हते. आणि शेवटी आम्ही सर्व पायऱ्या चढून, कमान ओलांडून तिसऱ्या गुहेच्या विस्तीर्ण पटांगणात आलो. या गुहेत शेषनागावर विराजमान विष्णू आहेत व एका बाजूला हनुमान आहेत. याच गुहेत वरती एक रंगीबेरंगी पट्टी दिसते. याचा अर्थ मागे कधी या गुहेमध्य चित्रे व देखावे रंगवले होते जे इतक्या वर्षांनी नामशेष झाले आहेत. या ही गुहेत विष्णू आणि हनुमान या मुख्य शिल्पांशिवाय अनेक आकर्षक शिल्पे बघायला मिळतात.

१२ व्या शतकात
येथून पुढे चार पायऱ्या चढून गेल्यावर चौथी आणि शेवटची जैन गुहा आहे. मला तर ही गुहा बघण्यात फार काही रस नव्हता. डावीकडे खाली अगस्थी सरोवराचे हिरवे पाणी पसरलेले होते व त्याच्या काठावर अनेक घाट व अनेक देऊळे होती. सर्वात टोकाला प्रसिद्ध भूतनाथ देऊळ खास लक्ष वेधून घेते. तिथे उभे राहून हा नजारा पाहत असताना असे वाटते की आपण चक्क १२व्या शतकातच उभे आहोत. शीतल किंवा अनुजा कोणीतरी गुहेत एक फेरी मारून आले व म्हणाले की आत फक्त नागडी शिल्पे आहेत. अर्थात जैन दिगंबर कपडे घालत नाहीत तर शिल्पांना कुठून कपडे घालणार.

thumbnail (6)

बदामीचा प्रसिद्ध अगस्थी तलाव

अशा प्रकारे बदामीच्या ऐतिहासिक ४ गुहा बघून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, म्हणजे गुहेच्या पायथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या उतरू लागलो. उतरताना सर्वांच्या चेहऱ्यावर माकडभय पसरले होते व नजरा सतत डावीकडे, उजवीकडे माकडांना शोधात होत्या. पण या वेळी माकडांनी अजून एका किंकाळीला वाव दिला नाही व आम्ही सुखरूप, कानठळ्या न बसता पायथ्यापाशी पोचलो.

भ्रमण सुरूच
खाली उतरल्यावर गाड्यांचे पार्किंग होते तिथे काही रिक्षा उभ्या होत्या. आता प्रस्थान होते बदामीच्या संग्रहालयाकडे जे अगस्थी तलाव पार केल्यावर लागते. तिथले रिक्षावाले गगनात वावरत होते म्हणून गगनाला भिडणारे भाव सांगायला लागले. मग आम्ही परत मुख्य द्वारापाशी आलो आणि तिकडून शेवटी एक रिक्षावाला ५० रुपयात आम्हाला संग्रहालयापर्यंत सोडायला तयार झाला. मग काय परत रिक्षा सवारी, अनया, अनुजा आणि ओम मागच्या सीटवर धम्माल करत आणि आम्ही तीन वयस्क मंडळी (नितीन, मी आणि शीतल) मधल्या सीटवर, असे धक्के खात खात संग्रहालयाच्या गेटवर पोचलो. समोरच उसाच्या रसाची गाडी बघून सगळ्यांची पावले बाहेरच थांबली व आत जायला कोणी हलेना. असे ठरले की संग्रहालय आधी बघू मग ठरवू. तसे संग्रहालय आहे छोटे, पण बदामी शहराच्या मानाने मोठे. आत प्रत्येक मूर्तीच्या खाली व्यवस्थित माहिती लिहिलेली आढळते.

thumbnail (1)

संग्रहालयाच्या बाहेरच हे मोठाले निवडुंग तुमचे स्वागत करते

पहिल्याच खोलीच्या मधोमध ऐहोले देवळांची प्रतिकृती टेबलावर ठेवली होती. जाताच नितीन त्याला इकडून तिकडून हात लावून निरखून बघू लागला. लगेच मागून शिट्टीचा आवाज आणि एक तरुण रक्षक तरातरा आली आणि नितीनला बजावले, “प्लीज डोन्ट टच एनीथिंग”. तिचा करारी भाव लक्षात ठेवत आम्ही सगळे त्या शांत जागेत वसलेल्या मूर्ती व पाषाण बघू लागलो. वीस एक मिनिटात आमचे संग्रहालय बघून झाले व समाधानाने आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताच आपसूक सगळ्यांचे पाय समोरच्या उसाच्या रसाच्या गाडीकडे वळले. त्याच्या मागे एक अजस्त्र झाड होते ज्याची सावली आमच्यापर्यंत पोचत होती व आम्ही तेथेच कठड्यावर विसावलो. बाजूला एक वयस्क बाई पेरू घेऊन बसली होती. आम्ही रस पितोय तोपर्यंत अनुजा तिच्याकडून पेरू घेऊन आली. मग आम्ही ते ही खाल्ले. उरलेले पेरू आम्ही बरोबर घेऊन जाऊ म्हटले तर त्या पेरूवाल्या बाईने सतर्कतेचा इशारा दिला, पेरू इथेच खावा नाहीतर माकडे मागे लागतील. माकडांचे नाव ऐकताच एका क्षणाचाही विलंब न करता पेरू सर्वांमध्ये वाटला गेला व तिथेच संपवण्यात आला. माकडांना ठेंगा!

भूतनाथ… आम्ही आलो
तृप्त होऊन आमची वाटचाल पुढे असलेल्या भूतनाथ देवळाकडे सुरु झाली. ऊन होते पण जानेवारी महिना असल्यामुळे चटके जाणवत नव्हते. ५ मिनिटात आम्ही अगस्थी तलावाच्या घाटावर जाऊन पोचलो. पोचतास ओमचा हट्ट सुरु झाला, “बाबा मला पाण्यात पाय घालायचा आहे”, आणि पुढच्याच क्षणी, “बाबा, या पाण्यात मगर तर नसेल ना”. आधी त्याला हो म्हटलं आणि नंतरच्या प्रश्नासाठी नाही, आणि मग त्याला बरं वाटलं. वरून परत, ओमला सारखा त्याचा ‘एक जिंदडी’ नाच सगळ्यांना करून दाखवायचा होता. आपण भूतनाथ देवळाच्या इकडे गेलो की मग तू नाच करून दाखव, असे म्हणून कसेबसे त्याला थोपवून ठेवले होते कारण तो नाचत असताना देऊळाचे व तलावाचे बॅकग्राऊंड शूट करताना असेल तर त्या नाचला वेगळीच झळाळी मिळेल असा माझा कयास होता.

डावीकडे एक देऊळ दिमाखात होते. आम्ही त्यालाही भेट द्यायचे ठरवले. देवळात त्याचा राखणदार सोडून दुसरे कोणीच नव्हते. त्यानेच आम्हाला आत नेऊन देऊळ दाखवले व दोन चार वाक्ये जुजबी माहिती दिली व त्यावरून समजले की हे देऊळ ही भूतनाथ देऊळ नं.१ आहे आणि पुढचे देऊळ हे नं. २ आहे. दुपारचे ४.३० वाजले होते व बाहेर ऊन जाणवत होते. भूतनाथ देऊळ नं. २ सहा वाजता बंद होणार होते. म्हणजे अजून १.३० तास शिल्लक होता. मग काय त्या देवळाच्या सावलीतच सगळे विसावले.

अशीही भेट…
मी समोर दिसणाऱ्या नयनरम्य भूतनाथ देऊळाचे फोटो काढायला देऊळाच्या कुंपणापाशी गेलो व फोटो काढू लागलो. मी फोटो काढण्यात दंग होतो पण ५ मिनटात मला उजवीकडून एक सावली माझ्या दिशेने सरकताना दिसली. कदाचित मला भौ करायायला ओम आला असेल, असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले. ही सावली त्या कुंपणावरून माझ्या दिशेने अशी कशी सरकत आहे याचे मला नवल वाटले पण समोरचे छायाचित्र चुकू न देण्याच्या नादात त्याकडे लक्ष दिले नाही. तेवढ्यात मागून नितीनची हाक आली, “धवल, धवल… माकड”. ते ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, व मी माझ्या उजवीकडे पहिले. ती सावली आता अगदी माझ्या डोक्याजवळ आली होती. आणि बघतो तर काय, माझ्यापासून २ फूट अंतरावर, त्या कुंपणावरून एक माकड माझ्या दिशेने चालत येत होते. मी लगेच २ पाऊले मागे सरकलो व ते माकड माझ्याकडे लक्षही न देता सरळ त्या कुंपणावरून पुढे चालत गेले. म्हणजे त्याला माझ्याकडून काही नको होते, फक्त पुढे जायचे होते. ते जाताच मी परत फोटो काढणे चालू ठेवले. अशी माझी एका माकडाबरोबर किंकाळी-शून्य शांत भेट झाली.

देवाच्या दारी, दुपारची न्याहरी
परत देऊळात येऊन बघतो तर काय, एका खांबाचा आधार घेऊन अनुजा विसावली होती, तसेच बाकीच्या प्रत्येक खांबाला टेकून सगळे पेंगुळलेल्या अवस्थेत बसले होते. अगदी माकडांची टोळी कशी दुपारी भरपेट खाल्ल्यावर एका झाडाच्या फांदीवर थोड्या थोड्या अंतरावर बसलेली असते, अगदी तसेच.

मीही एका खांबाचा आधार घेऊन बसलो. ५ मिनिटात शीतलला जाग आली. एक एक करून बाकीचेही पूर्ण जागे झाले. आता काय, तर खाणे. बॅगेतून फरसाण व केक बाहेर पडले व आम्ही खाऊ लागलो. आम्हाला खाताना बघताच तो देऊळाचा रखवालदार, जो इतका वेळ शांतपणे बाजूला उभा होता, तो लगबगीने देऊळाच्या आत गेला व एक काठी घेऊन बाहेर आला. आम्हाला आधी कळेना असे का, पण त्यानेच सांगितले की आता खाणे बघून माकडे लगेच इकडे येतील आणि झालेही अगदी तसेच. डावीकडून २ माकडे पळत आमच्याकडे येत होती. देवळाच्या छतावर एक माकड आधीच येऊन बसले होते, पण त्या रखवालदाराने सगळ्या माकडांना हुसकावून लावले व आम्हाला शांतपणे खाऊ दिले. शीतलने लगेच त्याला केक व फरसाण दिले पण तो घ्यायला तयार होईना. शेवटी आग्रह केल्यावर त्याने केक घेतला, पण तो हातात काठी घेऊन इकडे तिकडे बघत सज्ज राहिला.

मंत्रमुग्ध काळ
वेळ ५.०० – खाऊन सगळे मस्त झाले आणि नंतरच देऊळाच्या बाहेर पडले. बाहेर पडलो तर खाली स्वच्छ घाटाच्या पायऱ्या दिसल्या. मग म्हटलं ओम कधीपासून म्हणत होता पाण्यात पाय घालायचेत, ते इथेच घालू देत. एक एक करून आम्ही सगळेच पायऱ्या उतरून शेवटच्या पायरीवर चपला काढून बसलो व त्या तलावाच्या संथ पाण्यात पाय सोडले. समोर काही अंतरावर एक टायर किंवा लाकडाचा तुकडा तरंगत होता. ओम लगेच घाबरला, की ती मगर तर नसेल ना. यावरून त्याचे नाव पडले घाबरट बाबू.

thumbnail (19)

thumbnail

IMG-20200125-WA0012

आम्ही आता पाण्याच्या पातळी बरोबर होतो या पलीकडचे भूतनाथ देऊळ फारच विलोभनीय दिसत होते. तेवढ्यात एक पक्षी उडत उडत आला आणि पाण्यात झडप घालून त्याने एक मासा पकडला व तसाच पाण्यावरून उडून गेला. अनेक वेळा टी.व्ही. वर बघितलेला प्रसंग आज डोळ्यांदेखत बघितला होता.

पाण्यात पाय घालायला मिळाल्यामुळे ओम खुश होता, तसेच बाकी सगळेही हा निखळ आनंद खुशत उपभोगत होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे भूतनाथ देऊळ सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाले होते व आणखीनच अद्भुत दिसत होते. अर्धा तास आमचे पाय अगस्थी तलावाच्या संथ पाण्यात डुंबत होते आणि मने पाण्यावर तरंगत होती. तेथून उठण्यासाठी कोणाचेच मन तयार नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करून आम्ही पाय पाण्यातून काढून चपलात घातले कारण सूर्यास्तही बघायचा होता व भूतनाथ देऊळ बंद व्हायला जेमतेम २५ मिनिटे उरली होती.

thumbnail (2)

पायऱ्यांवर बसलेलो असताना टिपलेले भूतनाथ देऊळाचे छायाचित्र


सोनेरी सूर्यास्त @ भूतनाथ

बदामीमध्ये सूर्यास्त बघण्यासाठी भूतनाथ देऊळ किंवा बदामी किल्ल्याचा माथा या दोन जागा उत्तम, म्हणून आम्ही सूर्यास्ताचा काळ गाठून भूतनाथ देऊळापाशी लगबगीने पोचलो. दोन चार लोकं सोडून बाकी आम्हीच होतो. आम्ही गेल्यावर जो काही फोटोचा आणि सेल्फीचा सपाटा लावला की तिथे असलेले आपसूक निघून गेले.

देऊळासमोर संथ, आता काळाभोर अगस्थी तलाव, व त्यापलीकडे १२व्या शतकातील वास्तूंच्या, बदामीतील घरांच्या पलीकडे सूर्याचा केशरी गोळा हळू हळू लुप्त होत होता. फोटोग्राफी मध्ये याच वेळेला म्हणतात ‘गोल्डन लाईट’. म्हणजे जेव्हा प्रकाश प्रखरही नसतो आणि कमीही नसतो. अशा वेळी जो प्रकाश आपली त्वचा उजळून टाकतो त्यामुळे फोटो अप्रतिम येतात, अगदी DP वर लावण्यासारखे. मग काय आम्ही असा प्रकाश वाया जाऊ देणार थोडीच होतो. धडाधड फोटो काढण्यात आले, माझा एकट्याचा, माझा आणि शीतलचा, अनुजाचा, अनयाचा, ओमचा, आणि मग आमचा सर्वांचा.

thumbnail (14)

thumbnail (3)

thumbnail (1)

thumbnail

thumbnail (2)

हे सगळे चालू असतानाच नितीन, ओम आणि अनया देवळाच्या कठड्यावर जाऊन बसले. समोर सूर्याने उधळलेल्या सोनेरी, केशरी रंगांनी नटलेले आकाश आम्हाला अप्रतिम देखावा सादर करत होते. तो बघत आम्ही निवांत (म्हणजेच सेल्फीने काढत) भूतनाथ देवळातच बसलो. ५ मिनिटात रखवालदाराच्या शिट्या ऐकू आल्या. ६ वाजले होते, देऊळ बंद करायची वेळ. आता सूर्यास्तही झाला होता आणि प्रकाश अंधुक होऊन फोटो काढणे अवघड झाले, त्यामुळे तिथून निघायला काही त्रास वाटलं नाही.

ओमची ऐतिहासिक ‘एक जिंदडी’
भूतनाथ देवळाच्या गेटच्या बाहेर आलो आणि तरीही ओमचा नाच राहिला होता. आता तर अंधार पडायला लागला होता. नशीबाने लागेचंच उजवीकडे थोडी वाळू होती. मी लगेच ओमला सांगितले की तू इथे नाच कर कारण त्याच्या नाचात एक स्टेप आहे ज्यात त्याने गुढग्यावर जमिनीवर पडायचे आहे. त्या स्टेपमुळे ओमला आधीही दुखापत झाली होती, पण तरी त्याला ती स्टेप करायचीच होती. आता शेवटी नाच दाखवायला मिळणार म्हणून तो ही खुश झाला. मलाही रेकॉर्ड करताना ओमच्या मागे भूतनाथ देऊळ दिसणार म्हणून आनंद झाला.

बाकी सगळॆ समोर पायऱ्यांवर बसले. मोबाईलवर गाणे लावताच ओमचे थिरकणे सुरु झाले व त्याने झोकात आपला नाच सादर केला व टाळ्या मिळवल्या. नाच झाल्यावर मी आणि ओम पायऱ्यांपाशी आलो तर समोर असलेल्या दगडांच्या वाटेवरही नाचासाठी पुरेशी जागा असलेली आढळली. येथून अगस्थी तलावाचे पाणी सुरेख दिसत होते. नितीन, अनुजा, अर्चना आणि अनया यांनी ओमने परत एकदा नाचावे असे सुचवले आणि ओम एका पायावर लगेच तयार झाला. आता जेमतेम ५-१० मिनिटांचा सूर्यप्रकाश उरला होता म्हणून गडबडीने मी परत गाणे लावले व परत ओमने आधीच्याच उत्साहात त्याचा ‘एक जिंदडी’ नाच सादर केला व परत टाळ्या मिळवल्या. मलाही ओमचा नाच व बॅकग्राऊंड मध्ये प्राचीन देऊळ आणि पाणी असा अद्वितीय विडिओ मिळाला (जो आता ओमच्या Youtube channel वर आहे).

https://youtu.be/2XeZXUg-PNo

त्याचा हा नाच करायचा उत्साह एवढा दांडगा होता की मला एकदम ओम एक दीड वर्षाचा असताना बाबांनी आयोजित केलेली ‘ऍडव्हेंचर प्लस’ मधली धम्माल ट्रिप आठवली. तेथे ओमला न चालता येत होते न अजून तो बोलायला शिकला होता पण एक गाणे होते ‘चलो ना नैनों से बाण रे’ एवढे गाणे म्हटले की दुसऱ्याच क्षणाला चिमुकल्या ओमची ‘उम्म्म’ अशी गोड प्रतिक्रिया यायची. कितीही वेळा ते गाणे म्हणा, सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, रात्री म्हणा त्या एका कडव्यानंतर ओमचा ‘उम्म्म’ ठरलेला असायचा.

याही वेळी तोच उत्साह त्याच्या ‘एक जिंदडी’ नाच दाखवण्यात होता.

एक दोन, एक दोन, एक दोन, एक…
सर्वजण खुश होते आणि हाच तो क्षण की जायची वेळ झाली. भूतनाथ देऊळ रस्त्याच्या एका टोकाला आहे. दुपारीच आम्ही आलो तेव्हा इथे कोणती वाहने किंवा रिक्षा दिसत नव्हती म्हणजे या संध्याकाळच्या वेळेला तर कोणते वाहन असणे आणखी अवघड होते. हे हेरून मी सर्वांपुढे आपल्या हॉटेल पर्यंत चालत चालत जायचा पर्याय ठेवला. जाताना बदामी गावही बघता येईल असे गोड गाजरही दिले. लगेच ओम आणि शीतल चालत जायला तयार झाले, मग हळूहळू अनुजा, अनया आणि शेवटी नितीनही तयार झाले किंवा तयार व्हावे लागले. आम्ही संग्रहालयापर्यंत आलो तरी खरंच कोणतेही वाहन दिसले नाही त्यामुळे निरुपायही होता. तर असे आम्ही बदामीच्या ऐतिहासिक रस्त्यावरून चालत निघालो, जेथून शेकडो वर्षांपूर्वी हत्ती घोडे व राजे-राण्या गेल्या असतील.

तसं म्हटलं तर हॉटेल जास्त लांब नव्हते. अनुजाने लगेच गूगल बाबाची मदत घेतली आणि त्याने १.३ कि. मी. एवढेच अंतर दाखवले. मग सगळ्यांना थोडा उत्साह आला आणि चालणे सोपे झाले. पाचच मिनिटात आम्ही भूतनाथ, संग्रहालय, कमानी व इतर ऐतिहासिक वास्तू पार केल्या व बदामीच्या बाजारात आलो. इथे तर अशा सर्व वस्तू दिसत होत्या ज्या बायकांना भुरळ पाडतात. खास करून गावाकडची ताजी भाजी. शीतल, अनया आणि अनुजा बाजारात पांगले व मी आणि नितीन तिथेच तिष्ठत उभे राहिलो. आमच्याकडचे पाणी पूर्ण संपले असल्यामुळे मी एक पाण्याची बाटली घेतली. नशीबाने यांचे बदामी शॉपिंग लवकर आटोपले व आम्ही परत मार्गस्थ झालो. आणखी ५ मिनिटात आम्ही मुख्य रास्ता गाठला. येथून पुढे अनुजाचा गूगल बाबा वेगळाच आतला रास्ता दाखवत होता. बहुतेक चालत जाणाऱ्यांसाठी हा जवळचा असणार. आम्ही तोच रस्ता घ्यायचा ठरवले. हा रस्ता थेट आम्हाला बदामीच्या पोटात घेऊन गेला. पाणी वाहणारे रस्ते, बाजूला उघडी गटारे, रस्त्यावर दिवा नाही, मध्येच अंधार अशा आतल्या आतल्या रस्त्यावरून आम्ही चालत होतो. पण विशेष म्हणजे असे रस्ते असून त्यावर माणसे येत जात होती व असुरक्षित असे कोठेही वाटले नाही. एका ठिकाणी वाटेत रास्ता फारच अंधारात गुडूप होत होता म्हणून आम्ही गूगल बाबाची साथ सोडली आणि तिथे उभ्या असलेल्या काही माणसांना पत्ता विचारला. त्यांनी समोरच्या रस्त्याकडे बोट दाखवले व सांगितले की सरळ मुख्य रस्त्यावर जावा व उजवीकडे वळा म्हणजे तुमचे हॉटेल येईल. त्याप्रमाणे ५ मिनिटात आम्ही आमच्या KTDC मौर्य चालुक्य हॉटेलमध्ये दिवसभराची भटकंती करून ७.३०-८ वाजता परतलो.

पत्ता कट
दिवसभर अधेमधे काही ना काहीतरी चटर पटर खाणे चालू आल्यामुळे भूक अशी कोणालाच नव्हती. सकाळीच ओमची रात्रीची योजना ठरली होती की सगळ्यांनी मिळून पत्ते खेळायचे. तशी योजना चांगली होती पण आता कोणामध्येही पत्ते खेळण्यासाठी त्राण उरला नव्हता. एक तर ट्रेनमध्ये रात्रभर नीट झोप झाली नव्हती व दिवसभर इकडून तिकडे फिरणे चालू होते त्यामुळे आता सगळे मरगळलेल्या अवस्थेत होते. अर्चनाने पराठे बरोबर दिले होते, तेच आम्ही खालले. कोरड्या पराठ्यांबरोबर दही खावे म्हणून रिसेप्शन वर दही पाठवता का म्हणून फोन केला तर त्यांनी आम्ही रूम सर्विस देतंच नाही असे कळवले. झाली का पंचाईत. बाहेर जवळ कोठेही कोणते दुकान नव्हते आणि परत बाजारात जाऊन दही आणायचा कोणामध्येही उत्साह उरला नव्हता. मग आम्ही तसेच चटणीबरोबर पराठे संपवले. मी आमच्या खोलीत गेलो आणि काही वेळ विश्रांती घ्यावी म्हणून बिछान्यावर आडवा झालो ते कधी झोप लागली कळालेच नाही. काही वेळाने जाग आली तर कळाले की पत्ते खेळण्याचा बेत रद्द करण्यात आला आहे.

काळजी
नवीन बातमी अशी होती की या खोलीत मी आणि नितीन झोपणार आहोत व दुसऱ्या खोलीत शीतल, अनुजा, अनया आणि ओम झोपणार. दार बंद करणार तेवढ्यात ओम भाऊ आले, आपण बॉईज बॉईज एकत्र झोपू म्हणत तो आमच्या खोलीत बिछान्यावर आडवा झाला. नितीन एका सिंगल बिछान्यावर निजला व ओम आणि मी एका डबल बिछान्यावर. दमला असल्यामुळे ओम पटकन झोपला. मी आणि नितीन झोपणार तेवढ्यात दार वाजले. बाहेरून बायकी ‘उघड’ असा आवाज आला. मला वाटले शीतल परत कशासाठीतरी आली आहे म्हणून मी वैतागून, “आता काय झाले”, म्हणत दार उघडले, तर समोर अनया उभी.

तिने सांगितले की बाबा, म्हणजे नितीनला, रात्री कधी उठायला लागले तर तोल जायची शक्यता आहे तर दिवा चालू ठेवा. आता कोणाच्याच खोलीत रात्रीसाठी मंद दिवा नव्हता. यासाठीच तर अनया आली होती. आताच त्यांनी हॉटेलला सांगून त्यांच्या खोलीत तो मंद बल्ब बसवून घेतला होता.

मी लगेच फोन केला व ५ मिनिटात हॉटेलचा माणूस आला. त्याने स्पायडरमॅन स्टाईल कपाटावर चढत तो मंद झीरोचा दिवा बसवून दिला. अनयाच्या बाबांच्या काळजीमुळे आमच्या खोलीत मंद दिवा आला व आम्ही त्या दिवसाचा निरोप घेतला.

उद्या बदामीच्या प्रसिद्ध व आम्हा रामतीर्थकरांची कुलदेवी शाकंभरी देवीचे दर्शन घ्यायचे होते. मजा अशी की बदामीत कोणाला शाकंभरी देवी नाव माहीत नाही, त्यांच्यासाठी तर ती बनशंकरी देवी आहे.

असो, आता उद्याची धम्माल उद्या…

क्रमश…

बनशंकरी देवी देऊळ भेट, जत्रा आणि परतीच्या प्रवासाच्या रोमांचक घटनांसाठी खलील लिंक क्लिक करा:

https://bit.ly/2XfNsIY

Badami… Badaami… Badaaaaami – Part 3

याआधीची मजा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

Badami… Badaami… Badaaaaaami
https://bit.ly/2UzKWwP

Badami… Badaami… Badaaaaaami – Part 2
https://bit.ly/2UJYia2


२६ जानेवारी २०२०
आज आमची ट्रेन बदामीहून दुपारी २.२० वाजता होती. त्यामुळे आम्ही आधीच ठरवले होते की कालचा अर्धा दिवस जो हातात होता त्यामध्ये गुहा वगैरे फिरून घ्यायचे आणि आजचा ताजातवाना दिवस शाकंभरी देवीसाठी राखीव ठेवायचा. त्याप्रमाणे सगळे सकाळी लवकर उठले व गरम पाण्याच्या समस्येला तोंड देत सर्वजणांनी पटापट आवरलं. गरम पाण्याची समस्या अशी होती की नितीन जाऊन त्यांना दोनदा सांगून आला आणि नंतर असे कळले की त्यांनी आमच्या इमारतीतच बॉयलर किंवा पंप काहीतरी अजून सुरूच केला नव्हता आणि म्हणून गरम पाणी येत नव्हते.

गणराज्य विशेष
गरम पाण्याच्या धावपळीत मी नितीन बरोबर बाहेर रिसेपशन पर्यंत गेलो होतो. तेव्हा माझ्या कानावर ढोलचा आवाज धडकला. म्हटलं जवळच कुठेतरी २६ जानेवारीचे झेंडावंदन आणि कवायत चालू असणार. परत आलो तर अनुजा बाहेरच होती. ओम ही होता. त्यांना ढोल आवाजाबद्दल सांगितलं आणि आम्ही तिघे झेंडावंदन शोधात बाहेर पडलो. बाहेर आलो तर काय, सगळीकडे काळ्या तोंडाची माकडे बागडत होती. झाडावर, कठड्यांवर, रस्त्यावर बघू तिकडे ही माकडे. घाबरलेल्या ओमला मध्ये ठेवत आम्ही तसेच मुख्य रस्त्याला आलो आणि उजवीकडे आवाजाच्या दिशेने वळालो. काही अंतर जाताच रस्त्याच्या डावीकडे कोणती तरी शासकीय इमारत होती आणि तिकडे झेंडा दिसत होता. आम्ही गेलो तर कळाले की ते फक्त शासकीय झेंडावंदन होते आणि लोकांसाठी नाही. आम्ही तसेच परत फिरलो. ढोल आणि मुलांचा आवाज आता कुठे ऐकू येत नव्हता. बहुदा सकाळच्या हवेत लांबचा आवाज ऐकू आला असणार आणि जवळच आहे म्हणून आम्ही फिरत होतो. परत यायला लागलो तर लोक या काळतोंड्या माकडांना हुस्कावत होते आणि ती माकडे रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे पळत होती. आम्ही सावध होऊन शेवटी आमच्या हॉटेल मध्ये पोहोचलो. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘सत्तांतर’ या पारितोषिक मिळालेल्या माकडांवरच्या पुस्तकामध्ये असे दिले आहे  की काळतोंडी माकडांपासून सावध राहायला हवे. कोकणात कधी या माकडांनी धाड टाकली तर नुसती हुसकावून जात नाहीत व हल्ला ही करतात. ती जवळ आली तर हातात जे काही येईल ते त्याच्यावर भिरकावायचे किंवा मारायचे हाच एक उपाय आहे. एवढे असूनही आम्ही सुखरूप परत आलो होतो हे आमचे नशीब.

आम्ही सगळे ९ पर्यंत आवरून तयार झालो. खोलीत जाऊन बघतो तर काय, अनुजा पलंगावर झोपली होती आणि ओम तिच्या पायांवर आपला तोल सांभाळत उभा राहिला होता. मसाज. एवढ्याने अनुजाचे भागले नाही. मग पूर्ण बॉडी मसाज. अनुजा उताणी झोपली आणि तिने ओमला अख्या अंगावर चालायला सांगितले. ओमचा २० किलोचा देह अनुजा आत्याच्या अंगावरून चालायला लागला तरी ही बाई नुसती हसतीये. म्हटलं काही होत नाही का? अनुजा म्हणाली की ओम चालतोय हे जाणवतही नाही. म्हटलं बरोबर आहे, तुला तर प्रसादाची सवय असणार. ती हसली आणि तिच्यावर उभ्या असलेल्या ओमचा तोल गेला आणि तो पलंगावर पडला. आम्ही सगळे हसत हसत नाश्ता करायला मौर्य चालुक्याच्याच हॉटेल मध्ये धडकलो.

20200126_125802

 ओम आहे की नाही? मला तर प्रसादचीच सवय आहे बाबा

तेथे बुफे मांडून ठेवण्यात आला होता. विचारले तर प्रत्येक माणशी भाव १५० रुपये. नितीन, अनया, अनुजा आणि शीतल बुफे साठी आतुर झाले होते. मी मेनू बघितला तर बुफेतलेच पदार्थ म्हणजे उप्पीट, शिरा वगैरे प्रत्येकी ३५-४० रुपयात मिळत होते. मग मी विचार केला की आपण खाऊन खाऊन किती तर २ डिश खाणार ज्याचे ८० रुपये होणार मग एवढे दुप्पट १५० कशाला द्यायचे, म्हणून मी आधी नुसता उपमा घेतला. बघितलं तर त्यांनी उपमाच एवढा दिला होता की तो खाऊनच पोट भरणार असे वाटले. बाकीच्यांना बुफे मधली इडली विशेष करून आवडली. अनुजानेतर छान छान म्हणत इडलीवरच नाश्ता आटोपला. बाकीचे टोस्ट-बटर-जॅम व बाकी थोडे थोडे खाऊन संतुष्ट झाले. शीतल सारखं म्हणत होती की शिरा खूप छान आहे आणि म्हणाली की मी तुला आणून देते. खाल्ला तर खरोखरच वेलदोडे घातलेला शिऱ्याची चव निराळीच लागली.

रिक्षात ठण ठण
नाश्ता संपवून आम्ही रिक्षाच्या शोधात बाहेर पडलो. नेहमी हॉटेलच्या बाहेरच एक-दोन रिक्षा उभ्या असतात कारण हॉटेल मधले गिऱ्हाईक म्हणजे जास्त भाव लुटता येतो. पण आज कोणीच नव्हते. मुख्य रस्त्यावर आलो तर रस्ता सामसूम. आम्हाला वाटले की रविवार म्हणून रिकामा असेल. आता एकच पर्याय होता की तेथून वर बदामी बस स्टॅन्डच्या मुख्य रस्त्यापर्यंत चालत जायचे कारण तिथे कोपऱ्यावर रिक्षा स्टॅन्ड होता. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण आल्हाददायक होते व आमची वाटचाल प्रसन्न भावनेत झाली.

20200126_092829

बदामी मधला मुख्य चौक. उजवीकडे शाकंभरी देवळाकडे रस्ता जातो आणि डावीकडे एस.टी. स्टॅन्ड आणि त्यापुढे ५ कि.मी. रेल्वे स्टेशन

१०० रुपयात आम्ही टम टम ठरवली आणि बदामी देऊळाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. नेहमीसारखे ओम, अनया आणि अनुजा मागे बसले होते. रस्ता थोडीच विमानतळावरील रनवे सारखा असतो, त्यामुळे ते तिघे दणादण उडत होते व हसत खिदळत प्रवास चालू होता. अनया ताईने ओमला घट्ट पकडून ठेवले होते नाहीतर हलका फुलका ओम मागच्या मागे उडून जायचा!

वाटेत रस्त्याच्या उजव्या बाजूला रजई, चटई, बेडशीट, झोपाळे वगैरे वस्तू मांडलेल्या. लगेच शीतलला येताना ट्रेन मध्ये वाजलेल्या थंडीची आठवण झाली आणि तेथून पांघरून घ्यायची तीव्र इच्छा झाली. पण येताना घेऊ असे ठरले आणि आम्ही १५-२० मिनिटात देऊळ गाठले.

रिक्षावाल्याने एका ठिकाणी रिक्षा थांबवली व म्हणाला, “यहां से टेम्पल जावो.” बघितलं तर इथून टेम्पल तर कुठे दिसत नव्हतं. मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हाचा देऊळाबाहेरचा परिसर आणि आताचा परिसर पूर्णपणे वेगळा होता. पण ज्या अर्थी तो रिक्षावाला म्हणतोय त्या अर्थी इथेच असणार म्हणून आम्ही जाऊ लागलो. दोन पाऊले गेलो तर नजरेसमोर दोन भली मोठी चाके उभी ठाकली. चाकांपासून वर बघितले तर काय आश्चर्य, हा तर सुंदर कलाकुसर केलेला मोठा रथ होता. बघून तरी तो लाकडी वाटत होता पण एवढा उंच आणि भव्य रथ म्हणजे शाकंभरी देवीसाठीच असणार हे निश्चित.

20200126_094227

रथ पार करून पुढे गेलो तर दोन्ही बाजूला जत्रेत असतात तशी दुकाने थाटलेली होती. सकाळची वेळ असल्यामुळे दुकाने बंद होती व आम्ही २ मिनिटातच देऊळाबाहेर पोचलो. बाहेर शीतलने नारळ, गजरा वगैरे घेतले व आम्ही ज्यासाठी बदामीत आलो होतो, देवीचे दर्शन घेण्यासाठी, त्यासाठी देऊळाकडे निघालो. पण तत्पूर्वी कमानीबाहेर तिथल्याच एका दुकानावर बसलेल्या मुलाला आम्हा सगळ्यांचा फोटो काढायला सांगितला. त्याने फोन उभा पकडला, आडवा पकडला, बराच वेळ पकडून ठेवला व घरंदाज फोटोग्राफर सारखे आमचे फोटो काढले. नंतर फोन मध्ये बघितलं आणि तोंडातून आपोआप वाह वाह निघाले.
20200126_095252

बदामी देऊळ, अनया देवी
कमान पार करून आत जाताच दरवाज्याच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन मोठे दगडी दीपस्तंभ द्वाररक्षकासारखे उभे दिसतात. डावीकडच्या दीपस्तंभाच्या खाली कोणती एक दगडी मूर्ती ठेवली होती ज्याला भरपूर शेंदूर आणि कुंकू लावले होते. त्यामुळे त्या काळ्या दगडी दीपस्तंभाला एक वेगळीच झळाळी मिळाली होती. डाव्या दीपस्तंभाच्या मागे एक खिडकी होती जिथे पूजा बुक करू शकता अशी पाटी दिसली.
20200126_100606

इथे अनयाने सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. अर्चना वाहिनीने सर्व साहित्य व्यवस्थित बरोबर दिले होते, त्यामुळे तिकडे साडी, नारळ वगैरे काही घ्यायची गरज नव्हती. कुठे काय करायचे हे अनयाच आम्हाला सांगत होती. त्या पूजा बुक करायच्या खिडकीच्याच बाजूला शिधा खोली होती. तिकडे देण्यासाठीही जे आणले होते ते अनयाने आठवणीने तिकडे पोचते केले.

20200126_100654

शिधा खोलीबाहेर हास्य मैफिल

अनुजा पूजा बुक करायच्या खिडकीवर जाऊन आली तर असे समजले की देवीचा उत्सव चालू असल्यामुळे आता कोणतीही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच होणार आहे. त्यासाठी करायचे असल्यास आता बुकिंग करून ठेवा. पण आम्ही तर त्याच दुपारी माघारी निघणार होतो. पण नंतर असे समजले की जसे तिरुपती मध्ये बालाजीचे दर्शन घेण्यासाठी पैसे देऊन ५०० रुपयात शॉर्टकट घेता येतो तसाच शॉर्टकट घेणे इथेही शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक माणसाचे रु.१०० द्यायचे होते. आम्हाला आधी वाटलं की हे पैसे पूजेसाठी आहेत म्हणून शीतलने आम्हा तिघांचे मिळून २०० रुपये दिले होते ज्याची त्यांनी एक पांढरी आणि गुलाबी पावती दिली. नंतर कळले की ते पैसे शॉर्टकट साठी होते व ओम लहान असल्यामुळे तो या तिकिटातच समाविष्ट झाला. नंतर नितीन, अनया आणि अनुजाचेही असेच पैसे भरले व शॉर्टकट पावती घेतली. तोपर्यंत अनुजा पुढे जाऊन शॉर्टकट मार्ग कोणता हे बघून आलीसुद्धा.

शीतलने देऊळाबाहेर जो गजरा घेला होता तो खूप लांब होता. तिने तो मधून तोडला व एकाचे दोन केले, एक अनयासाठी आणि एक अनुजासाठी. लगेच तिथेच शृंगार रस सुरु झाला. शीतलने अनयाच्या केसात गजरा नाजूकपणे खोचला. गजऱ्याने अनयाचे रूप एकदम खुलले व त्या देऊळाच्या वातावरणात चैतन्यमय झाले.

20200126_101001

अनुजा तिच्या कोणत्या वेगळ्या पूजेची चौकशी करायला दुसरीकडे गेली होती म्हणून तिचा गजरा राहून गेला.
५ मिनिटात अनुजा परतली आणि आम्ही शॉर्टकट साठी सज्ज झालो. साधी रांग मोठी दिसत होती. देऊळाच्या डाव्या बाजूने गेल्यास एक रक्षक एका जिन्याच्या बाजूला बसला होता. अनुजाने तिथूनच जायचा रास्ता आहे असे सांगताच आम्ही त्या रक्षकाला पावत्या दाखवल्या व आत गेलो. इथे गर्दी अजिबातच नव्हती आणि पैशाने आपली किमया दाखवली. आम्ही थेट गाभाऱ्याच्या बाहेर पोचलो व मुख रांगेत सामील झालो. लगेच नितीनने मला सतर्क केले आणि सांगितले की देवीचे दर्शन जोडप्याने घ्यायचे नसते व एकेकटे जायचे असते. माझा यावर विश्वास नसला तरी तशीही शीतल पुढे गेली होती मग दर्शन तर वेगवेगळेच होणार ना असे म्हणून गाभाऱ्यात गेलो. देवीचे छान दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यातून बाहेर पडलो. लगेचच शीतलने अनुजासाठी ठेवलेला गजरा तिला घालायला दिला व तिथेच ती घालू लागली. लगेच देऊळामधला एक वयस्क कार्यकर्ता आमच्याकडे हातवारे करून काहीतरी कन्नड भाषेत सांगायला लागला. मला वाटलं तो म्हणतोय की इथे थांबू नका पुढे जावा. पण अनुजाने नंतर सांगितले की तो सांगत होता इथे शृंगार करू नका बाहेर करा. तसे आम्ही पटांगणात आलो आणि अनुजाने गजरा खोचला.

20200126_101917

अनुजाचा झटपट शृंगार

तिने शीतलने का गजरा घातला नाही विचारले तर कळाले की दोनच गजरे होते व शीतललाही वाटत होते की तिच्या छोट्या केसात गजरा शोभून दिसणार नाही. तेवढ्यात नितीन म्हणाला की देऊळालाल ११ प्रदक्षिणा मारायच्या अशी प्रथा आहे. आम्ही म्हटलं बरं आणि सगळे शाकंभरी देवीच्या देऊळाभोवती गरागरा फिरू लागलो. ओम प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाली की मोजत होता. ११ प्रदक्षिणा पूर्ण होताच आम्ही देऊळातून बाहेर पडलो. कमानीच्या बाहेर येताच काही दुकाने होती. तिथे ओमला हातात घालायला कडे घेतलं. अनुजाने पण काहीतरी घेतलं. अनया चोखंदळपणे बघत होती आणि पसंत न पडल्यास पुढे जात होती. नितीन तिच्या मागे मागे.

20200126_104846

20200126_104821

देऊळाच्या कमानीबाहेर चोखंदळ खरेदी सुरु

अजून बाहेरचा तलाव, परिसर व जत्रा बघायची होती आणि इथेच ११ वाजले होते. एव्हाने बाहेर चांगली गर्दी व्हायला लागली होती. दुकानेही उघडली होती व माणसे वाढायला लागली. बाहेर सगळीकडे एकूणच सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते. देवीदर्शनाला येणारे बहुतांश लोक हे ग्रामीण भागातले वाटत.

शीतलने ज्या वयस्क बाईकडून गजरा घेतला होता त्या बाईकडेच देऊळात जाण्यापूर्वी आम्ही चपला ठेवल्या होत्या. त्या घ्यायला गेलो तर अनुजाने लगेच एक केशरी आणि पांढरी फुले असलेला नाजूक गजरा शीतलसाठी घेतला व तिथेच तिला घातला. शीतलही खूष.

20200126_105429

शीतलचा शृंगार अनोखा – दोन रंगी गजरा

मग तिघींच्या गजऱ्याचे फोटो झाले आणि गजरा शृंगार विधिवत संपन्न झाला.

20200126_105624

गजरा कवीन्स

अनपेक्षित मेजवानी
त्या गर्दीतून वाट काढत असताना एक बाई डोक्यावर भाकरी घेऊन उभी असलेली दिसली. तशा भाकऱ्या आम्ही ट्रेनमधून येताना एक बाई विकत होती. लगेच शीतलची भूक चाळवली. ती बाई रस्त्यापासून थोडे आत आम्हाला घेऊन गेली. ती जागा एक पुरातन वास्तू वाटत होती. चालुक्य काळातील खांबांवर एक दगडी छत उभे होते व खाली बसण्यासाठी चौथरा होता. त्या बाईने आपले टोपले खाली ठेवला व एका हिरव्या प्लॅस्टीकीच्या ताटलीत एक एक जिन्नस भरू लागली. आम्हाला काहीच माहिती नव्हते की ती भाकरीबरोबर काय देणार. आम्ही आपले उभे राहून बघत राहिलो. आधी तिने ताटलीत भाकरी ठेवली, तिच्या बाजूला मटकीची उसळ, तिच्या बाजूला अजून एक भाजी, तिच्याबाजूला दोन प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या आणि मधोमध एका छोटा पेलयात दही एवढे सगळे त्या छोट्या ताटलीत बसवले. वरून परत ताक हवे का विचारले व आम्ही ते ही घेतले.

20200126_110247

खुशीने ताटली घेऊन आम्ही त्या पुरातन वास्तूत बसून खायला लागलो. कोणालाच जास्त भूक नव्हती व प्रत्येक जण एक एक घास घेऊन ते फास्ट केले. तेवढ्यात अनुजा व अनया, ज्यांना या खाण्यात फारसा रस नव्हता, ते बाहेर जाऊन अननसाचे तुकडे व शहाळी घेऊन आले. अशा प्रकारे त्या पुरातन दगडाच्या छताखाली, वैविध्यपूर्ण पदार्थांसह आमची अनपेक्षित मेजवानी संपन्न झाली.

20200126_11041320200126_11115420200126_110855

तेथून आम्ही बदामीच्या प्राचीन तलावाच्या शोधात निघालो. सगळीकडे दुकाने लागली असल्यामुळे तलाव काही नीट दिसायला तयार नाही. एका ठिकाणी आत घुसून तलाव बघता आला पण तिकडेपण कोणती स्वछता नव्हती आणि आम्ही माघारी फिरलो. थोडं पुढे गाड्या पार्क केल्या होत्या. मी तिथे जाऊन बघितलं तर तलावाला कठडा असलेल्या कमानी नजरेस पडल्या आणि मग थोडी ओळख पटली की मागे बघितलेला हाच तो तलाव. मी पुढे जाऊन पटकन एक छायाचित्र टिपले. बाकी सगळीकडे तशीच घाण होती.
20200126_112407

ते होताच आम्ही माघारी फिरलो. आता वेळ झाली होती जत्रेच्या दुकानांमध्ये घुसायचं व मनसोक्त खरेदी करायची. बघू तिकडे रंगांची उधळण होती. बुक्क्याचे डोंगर, गुलालाची डोंगर, गंधांचे गोल गोल गाठे, देवांच्या मूर्ती, फोटो फ्रेम वगैरे वगैरे. अक्खा रास्ता लालेलाल दिसत होता व असे भासत होते की रंगांच्या पायघड्या घातल्या आहेत.

20200126_112934

शीतलला शाकंभरीदेवीची एक छोटी मूर्ती पाहिजे होती, पण तिला हवी होती तेवढी चिंटुकली मूर्ती कोणाकडेच मिळेना. ओम अनुजा आत्याबरोबर होता. मी आणि शीतल काहीतरी बघण्यात मग्न होतो आणि फिरून बघितले तर आजूबाजूला कोणीच दिसेना. नेमके आम्ही जिथे उभे होतो तेथून पुढे रस्त्याला फाटा फुटला होता, एक रास्ता डावीकडे आणि एक रास्ता उजवीकडे. मी आणि शीतलने डाव्या रस्त्यावर शोधायचे ठरवले. बरेच पुढे जाऊन आलो तरी बाकी मंडळी कुठे दिसायला तयार नाहीत. अनुजाला फोन लावला पण तिने फोन नाही उचलला. त्या छोट्याशा गल्लीत इतके लोक आणि इतके रंगीबेरंगी कपडे घालून फिरत होते की त्यामधे कोणाला शोधणे महाकठीण. मग आम्ही परत फिरून उजवीकडच्या रस्त्यावर शोधायचे ठरवले. आधी जिथे थांबलो होतो तिथंपर्यंत आलो. तेवढ्यात मला उजवीकडे आणखी एका छोट्या बोळाच्या तोंडावर अनया आणि नितीन दिसले. हुश्श! सापडले एकदाचे म्हणून आम्ही निश्वास सोडला. त्याच बोळात अनुजा आणि ओम होते, बांगड्या बघत.

आणखी शृंगार
आता शीतलही अनुजाला जाऊन मिळाली. दोघी आवडीने बांगड्या बघू लागल्या आणि मी आश्चर्याने शीतलकडे बघू लागलो, कारण लग्न झाल्यापासून आतापर्यंत शीतलने बांगडी कधी हातात घातली नव्हती. बहुतेक गजरा घातल्यापासून तिला बायकी शृंगार करायची इच्छा झाली असावी. नेहमीप्रमाणे दोन-चार मिनटात शीतलने बांगड्या निवडल्या आणि त्या बांगड्या विकणाऱ्या वयस्क बाईने तिच्या हातात चढवल्या. बाजूला अनुजानेही तिला हव्या असलेल्या बांगड्या चढवून घेतल्या. दोघी खुशीत होत्या व लहान मुले आपले नवीन खेळणे दाखवतात तसे शीतल मला हातातल्या बांगड्या दाखवत होती, तिच्यासाठीही ते हातातले शृंगार साधन नवीनच होतं.20200126_114842

मुसलमानी रक्त
बांगड्यांची खरेदी झाली होती आणि त्याचे किती झाले हे त्या वयस्क बाईला विचारताच तिने हातवारे करत कन्नड भाषेत काहीतरी सांगितले. मग आमची ओळखायची शर्यत सुरु झाली. ५० का? ६०? १००? ८०? ना त्या बाईला आम्ही काय म्हणतोय ते काळात होते ना आम्हाला तिची हातवारी. परत पाच बोटे दाखवून ५० का? असे विचारताच त्या बाईने मान हालवली की हो ५०. आता तिला ५० द्यायचे सोडून शीतलने शहाणपणा केला आणि बाजूला दुसऱ्या  बांगड्यांच्या दुकानावर बसलेल्या एका मुसलमान बाईला विचारले की किती पैसे झाले ते सांगा, आम्हाला काही काळात नाही. लगेच त्या मुसलमान बाईने आपले रक्त दाखवले. तिने लगेच ५० च्या ऐवजी ८० रुपये सांगितले. तिला हिंदी थोडेफार येत होते. ८० ऐकून आमची बांगडी विकणारी बाईही बावचळली, तिला कळत होते की किंमत ५० आहे आणि ८० चूक आहे म्हणून ती ८० ला दुजोरा द्यायला तयार नाही. पण त्या मुसलमान बाईने तिला जबरदस्तीने गप्पा बसवले आणि ८०च आहे म्हणून सांगायला लावले. शेवटी जास्त पैसे देऊन आम्ही मुसलमानी रक्ताचा परत अनुभव आला.

असो त्या मुसलमान बाईच्या लबाडीने ना बांगड्यांची चमक कमी झाली ना शीतल आणि अनुजाच्या चेहेऱ्यावरचे समाधानाचे भाव कमी झाले आणि आम्ही खुशीत पुढे निघालो.

पाणी पाणी रे
१२ वाजून गेले होते. नितीनची सारखी गडबड चालू होती की आपले हॉटेलमधले चेक आऊट वेळ ११ वाजताची आहे आणि आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळे आपण जाऊया. पण मला आणि शीतलला माहीत होते की अशा ठिकाणी विनंती केली की एक दोन तास वाढवून सहज मिळतात. वरून परत आम्ही राहत होतो तिथे बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या मग गडबड कसली. पण नितीन बेचैन झाला होता. नंतर कळाले की नितीन अनयाला गडबड करत होता की लवकर चल लवकर चल, तेव्हा अनया वैतागून म्हणाली, “मला काय सांगताय, मी एकटीने लवकर चालून काय होणार आहे, बाकीच्यांनी ही लवकर यायला हवे ना.”  ते बघून शीतलने सगळ्यांना हाकायला सुरुवात केली.

तेवढ्यात मला एक पाण्याचे दुकान दिसले. त्याच्याकडे २ लिटर बाटल्याही होत्या. मग मी २ दोन लिटर बाटल्या घेतल्या. शीतल आणि अनुजा म्हणत होते की अजून एक घेऊ पण मी म्हटलं की ४ लिटर पाणी बस होईल, कारण त्याचे वजनही ४ किलो होणार होते. माझ्या सॅकमध्येही अजून २ लिटरची बाटली शिल्लक होती (पण हे अनुजाला माहीत  नव्हते). असे म्हणून मी २ बाटल्या घेऊन पुढे चालू लागलो. बघतो तर काय या दोघीनी संगनमत करून अजून एक २ लिटरची बाटली घेतली. मी शीतलला म्हटलं की आता ही बाटली तूच उचलायचीच. असे तू तू मै मै करत आम्ही रिक्षा स्टॅन्ड वर पोचलो.

Badami… Badaami… Badaaaaami चे मूळ स्रोत
विचारले तर एक मुलगा म्हणाला ६ जणांचे ६० रुपये होतील. आम्हाला मौर्य चालुक्य हॉटेल मध्ये जायचंय हे चारदा सांगून आम्ही रिक्षा मध्ये बसलो.

आता हा प्रत्येकी फक्त १० रुपये घेणार होता म्हणजे ही शेअर रिक्षा आहे हे मला लगेच समजले. अजून लोकं बोलावण्यासाठी तो सारखे बदामी बदामी बदामी अशा चढ्या सुरात हाक मारत होता. ते मागे बसलेल्या ओम, अनया आणि अनुजाने बरोबर हेरले.

लगेचच त्याने अजून ३ लोकांना आत बसवले, २ पुढे रिक्षा चालवणाऱ्याच्या शेजारी आणि एक मधल्या सीटवर . म्हणजे जे आम्ही मध्ये तिघे बसायचो ते आता चौघे बसलो. साहजिकच जरा सरकून बसावे लागणार. लगेच शीतलची कुरकुर सुरु झाली. कशाला शेअर रिक्षा केली, सरळ १५० देऊन आपण गेलो असतो. तिची कुरकुर चालू असेपर्यंत आमची रिक्षा बदामीच्या चौकात पोचली सुद्धा. इतर तिघांना तेथे सोडून त्याने आम्हाला मौर्य चालुक्य वर सोडले आणि त्याचे १० रुपये जास्त घेतले.

वेळ झाली होती दुपारचे १.१०. मी रिसेप्शन वरच्या बाईची उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आणि आता आम्ही फ्रेश होऊन चेक आऊट करतो असे सांगितले. तिने काही हरकत न घेता होकारार्थी मान डोलावली. आम्ही भराभर यावरून १.३० पर्यंत सामान घेऊन जेवायला यायचे ठरले. सकाळीच सगळे आवरून ठेवले असल्यामुळे आता कोणालाच वेळ नाही लागला आणि आम्ही सामान घेऊन, चेक आऊट करून १.३० वाजता जेवणाला हजर झालो. खूप भूक कोणालाच नव्हती. सगळ्यांनी फक्त भात खायचे ठरवले.

रिक्षा कडे भिक्षा
खाऊन आम्ही सगळे २.०५ वाजता निघायला तयार. मी हॉटेलच्या बाहेर एका रिक्षावाल्याला विचारले तर तो रु. १५० च्या खाली रेल्वे स्टेशनला यायला तयार नाही. येताना तर आम्ही रु. १०० दिले होते. मी त्याला नाकारले व मुख्य रस्त्यावर आलो. सकाळसारखे आता ही सगळे सामसूम. ज्या काही रिक्षा येत होत्या त्या भरून किंवा अर्ध्या भरून येत होत्या. आता पर्याय उरले दोन, एकतर ५ किलोमीटर साठी १५० रुपये मोजून ती रिक्षा हॉटेल बाहेरची रिक्षा घ्यायची नाहीतर सकाळी आम्ही गाठलेल्या पुढच्या मुख्य चौकात जाऊन रिक्षा स्टॅन्ड वरून रिक्षा घेऊन यायची. दुपारचे ऊन माझी वाटच बघत होते. मी चालत सुटलो. भरभर अंतर कापत मी रिक्षा स्टॅन्ड पाशी आलो तर एक धक्का वाटच बघत होता.

सकाळी जिथे रिक्षांची रांग लागली होती तो चक्क रिकामा होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जेथून बदामी देऊळाकडे रिक्षा जातात तिथे फक्त १ रिक्षा दिसत होती. मी पळतच त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारले. त्याने ही १५० पासून सुरुवात केली. पण जरा घासाघीस केल्यावर तो १२० मध्ये तयार झाला, कदाचित दुपारच्या वेळी त्यालाही जास्त गिर्हाईक अपेक्षित नसावेत. त्याच्याशी बोलताना असे कळाले की देऊळात जत्रा असल्या कारणाने आज गर्दी होती व त्यामुळे रिक्षा कमी होत्या. मी रिक्षात बसतोय तोपर्यंत नितीनचा फोन, “रिक्षा मिळाली का?” मी हो म्हटलं आणि कट केला. २ मिनिटात अर्धा रास्ता आलो की परत नितीनचा फोन. भारीच उतावळा झाला होता. या वेळी विचारले कुठे पोचलस. मी म्हटलं २ मिनिटात पोचतोय आणि परत फोन कट केला आणि पुढच्या २ मिनिटात हॉटेलच्या दारात रिक्षा उभी. वाजले होते २.१५ म्हणजे आमची ट्रेन यायला अजून चांगली २५ मिनिटे उरली होती.

IMG-20200126-WA0009

मी रिक्षा घेऊन येईपर्यंत बाहेर बदामीतील शेवटचे फोटो सेशन सुरु

गूंज उठा आसमान
आम्हाला छान राहायला दिल्याबद्दल आम्ही हॉटेलला धन्यवाद दिले व परत टम टम प्रवास सुरु झाला. आता मागे बसलेले ओम, अनया आणि अनुजा भारीच फॉर्मात होते. त्यांचे ठरले की बदामी देऊळातून येताना रिक्षावाला जसे कन्नडी सुरात Badami, Badaami… Badaaaami ओरडत होते तसे रेल्वे स्टेशन आल्यावर आपण पण ओरडायचे. कारण काय? तर रेल्वे स्टेशन वरून या रिक्षावाल्याला इतर भाडेकरू मिळवायला मदत होईल. त्याची रिहर्सल वाटेतच सुरु झाली आणि हॉटेल ते स्टेशन रस्ता Badami, Badaami… Badaaaami सुराने न्हाऊन निघाला. आम्ही बदामी रेल्वे स्टेशन बाहेर पोचलो तेव्हा या तिघांनी एकाच गलका केला. जर तिथे बदामीला जाण्यासाठी रिक्षाची वाट बघत उभे असते तर खरंच यांचे बोलावणे ऐकून पळत आमच्या रिक्षाकडे आले असते. पण ट्रेन यायची नाही तर जायची वेळ असल्यामुळे परत जाणारे कोणीच नव्हते.

दहशत कायम
अनया सारखे सांगत होती की मागच्या वेळी जेव्हा ते आले होते तेव्हा परत जायला कोणीही नव्हतं आणि गार्डने रामतीर्थकर चढले का याची खात्री झाल्यावरच रेल्वे सोडली होती. सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर आलो तर आम्हाला बसायला जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती. कशी बशी शीतल आणि अनुजाला दोन जागा मिळाल्या, पण त्या अल्पकाळाकरिता ठरल्या. दोन मिनिटातच आमच्या लक्षात आले की प्लॅटफॉर्मवर माकडांनी धुमाकूळ घातला आहे. एक माकड आमच्या वरती खांबावर बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे बघत, कुणाच्या हातात काय आहे, कोण किती बेसावध आहे हा उद्योग चालला होता. मी ट्रेन कुठे पोचली हे बघण्यासाठी फोन बाहेर काढला तर तिथेच बसलेली एक बाई जोरात मला म्हणाली, “ओ, मोबाईल आत ठेवा, माकडे तो ही घेऊन जातात.” मी विचार केला, या सांगणाऱ्या बाईपेक्षा तरी जास्ती विचार करण्याची शक्ती माकडांकडेच असणार, पण माकडाची परीक्षा बघायची कोणाला हौस आहे. मी लगेच फोन खिशात ठेवला. आमच्या बाजूलाच एक तरुण मुलांचा ग्रुप बाकावर बसला होता. त्यांच्या बऱ्याच बॅग त्यांच्या भोवती पसरल्या होत्या. आणि त्यासमोर एक माकड आशेने उभे राहिलेले होते.

तेवढ्यात त्यांच्यातल्या एकाने पेप्सीची छोटी बाटली आणली. ती बाटली बघून ते माकड एक्दम पुढे यायला लागले. सगळे त्याला सांगत होते की आधी पेप्सीची बाटली आत ठेव पण तो पठ्या काही आत ठेवायला तयार नाही. हिरोगिरी करत त्याने एक घोट घेतला. बाटलीचे झाकण उघडलेले दिसताच ते माकड आणखी जवळ आले. हे बघून त्या मुलाची टरकली. त्याने घाबरून ती बाटली सरळ समोर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राकडे बॉल टाकू तशी फेकली. मित्राला याची अपेक्षा नव्हती. त्याने नाखुशीनेच ती पकडली आणि आपल्यामागे लपवली. माकडाने ते बघितले व आपला रोख त्याच्याकडे फिरवला. ते माकड जवळ येताच मित्राने परत बाकावर बसलेल्याकडे बाटली फेकली. आता बाकी सगळे मित्रही त्याच्यावर ओरडू लागले व बाटली बॅगेत ठेवायला सांगू लागले. घाबरत घाबरत त्याने चेन उघडली व बाटली आत टाकली. आता माकडाला काही करता येईना म्हणून ते नाईलाजाने परत वरती खांबावर जाऊन दुसरे सावज शोधू लागले.

मी हा सगळा किस्सा बघण्यात मग्न होतो. फिरून बघितले तर उजवीकडे कोणीच बसलेले नव्हते. शीतल आणि अनुजा घाबरून आणखी मागे जाऊन उभ्या होत्या. अनुजा तर ‘आता इथे परत हेच’ या भेदरलेल्या नजरेने चोहीकडे बघत होती. तिला असं वाटत असणार की सगळी माकडं तिच्याकडेच येणार. गंमत अशी की ते उभे होते त्याच्या डावीकडे एक बाई बसलेली होती व तिच्या हातात होती एक पिशवी. अचानक आरडाओरडीचा आवाज आला म्हणून बघितले तर माकडाने त्या बाईच्या पिशवीतले काहीतरी उचकटून पळवले होते व तो वरती जाऊन बसला. आता झाली का पंचाईत. उजवीकडे ही माकडे आणि डावीकडे तर आणखी माकडे आणि मध्ये अनुजा बाई. काय करू, कुठे जाऊ, ही माकडे आपल्याला आता खातील का गिळतील या विचाराने अनुजा आतुरतेने ट्रेनची वाट बघत उभी होती. आणि कळाले की ट्रेन १० मिनिटे उशिरा येत आहे. नशीब दांडगे असल्यामुळे त्या १० मिनिटात अनुजाला किंवा इतर कोणालाही माकडांनी छेडले नाही. उलट काही लंपट लोकच स्वतः पुढे जाऊन माकडांनी बिस्कीट, चिप्स वगैरे द्यायला लागली होती.

का नाही मग माकडे लोकांकडून हिसकावून घेणार व आमचे मनोरंजन करणार!

i फॉर ऍन i
परत जाताना आमच्या सीट अगदीच जवळ होत्या, एका मागे एक. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रच बसलो. काही वेळातच शीतल झोपायला वर गेली. नितीन संताजी धनाजीच्या शेवटच्या पानात बुडाला, अनया कानाने आणि मनाने मोबाईल वरून वाजणाऱ्या गाण्यात रमून गेली. उरले ओम, अनुजा आत्या आणि मी. ओम नेहमीप्रमाणे अनुजा आत्याच्या गळ्यात पडला, “चल ना अनुजा आत्या आपण ATLAS खेळू.” ओम बोलावताच अनुजाही लगेच तयार झाली आणि सुरु झाला एक लांबलचक ATLAS चा खेळ. मी आणि ओम बऱ्याच वेळी हा खेळ खेळतो. हल्ली त्याच्या डोक्यात क्रिकेटचे वेड जास्त असल्यामुळे व मी सारखा सारखा हा खेळ खेळून कंटाळल्यामुळे सध्या जरा मागे पडला आहे. पण ओमचा हा आवडता खेळातला एक खेळ आहे हे नक्की. यात करायचे काय? तर ही आहे शब्दांची अंताक्षरी. जागेची नावे, माणसांची नावे, खाण्याच्या पदार्थांची नावे अशी अंताक्षरी खेळायची.

तर ओमने फर्माईश केली त्यानुसार माणसांच्या नावांची अंताक्षरी सुरु झाली. सुरुवातीला अनाहूतपणे अनुजा ज्या ज्या माणसांची नावे सांगायची त्यांचा i ने शेवट व्हायचा. उदारणार्थ Avani, Rajani, Panini वगैरे. काही वेळातच ओमची नावांची बाराखडी संपुष्टात आली आणि अनुजा आत्या जे i चे बाउन्सर टाकायला लागली त्याने तो वारंवार क्लीन बोल्ड होऊ लागला. अनया आता मोबाईल सोडून नावांच्या मागे लागली होती. मध्येच ती एक नाव सांगायची मध्येच नितीनकडून एक नाव येऊन धडकायचे. अशी मज्जा मज्जा चालू होती. शेवटी ओम कडे असलेलं सगळे i संपले आणि ओमने माझ्याकडे मोर्चा वळवला, “बाबा सांग ना, सांग ना प्लीज.” मी म्हटलं की तू मला प्रत्येक उत्तराकरिता घरी साठवून ठेवलेल्या असंख्य चॉकोलेट कॅडबरी पैकी १ मला द्यायची. हो नाही, हो नाही करत आमचा हा सौदा पक्का झाला. काही वेळ आमचे नीट चालू होते. प्रत्येक वेळी ओम मला १ चॉकोलेट द्यायचे काबुल करायचा आणि मग रद्द करायचा. काहीही करो अनुजा अत्याकडून i चा पाऊस पडताच राहिला. शेवटी माझ्याकडचेही i संपले आणि मीही माघार घेतली आणि ओम वर भेंडी चढली. जवळ जवळ १ तास हा ATLAS आणि i चा खेळ चालू होता, व शीतल सोडून सगळे त्यात आपसूक ओढले गेले होते.

i  चा दी एन्ड होताच नवीन अंताक्षरी सुरु झाली. ओमचा उत्साह काही मालवला नव्हता आणि त्याला तोडीस तोड अशी अनुजा आत्याही उत्साही दिसत होती.

आता पाळी शहरांची! काही वेळातच आमची रेल्वे बरीच शहरे मागे टाकू लागली. सुरुवातीलाच उमजले की अनुजा अत्याची शहरे आणि देश यांच्याशी मैत्री नाही आहे आणि तिचे भौतिकशास्त्र कच्चे राहिले आहे. लवकरच ओमने तिच्यावर भेंडी चढवली आणि ATLAS चा खेळ संपला. स्कोर झाला अनुजा अत्या-१, ओम-१. आणि त्या दोघांच्या खेळाचा मनमुराद आनंद घेणारे आम्ही सगळे.

शीतलची झोप झाली होती व आता तिचा खाण्याचा शोध सुरु झाला. बराच वेळ झाला तरी कोणताही फेरीवाला कोणताही पदार्थ घेऊन फिरकलाच नव्हता. ट्रेनही अशी की किती वेळ झुक झुक करत चालताच राहिली, कुठे थांबायचे नावच नाही. वरून परत या ट्रेनला पॅन्टरी नव्हती म्हणजे जेवणाची सोया नाहीच. एव्हाने बाहेर सूर्याच्या केशरी रंगाने काळ्या रंगासाठी आकाश मोकळे करून दिले होते. सोलापूर येणार होते ९ वाजता पण तोपर्यंत धीर धरणार कोण, शीतल तर नाहीच नाही! नशीबाने ट्रेन एका कोणत्या स्टेशन वर थांबली आणि एका सहप्रवाशाकडून कळाले की अजून ३० मिनिटे ट्रेन इथेच थांबणार आहे कारण ती वेळेच्या आधी आली आहे आणि पुढे सिग्नल मिळत नाही म्हणून इथेच अर्धा तास आमचा मुक्काम ठरला. ट्रेन तिथे बऱ्याच वेळाने थांबली होती. पण ते स्टेशन इतके लहान होते की तिथे ना कुठला स्टॉल होता ना कोणी काही खाद्यपदार्थ विकणारा माणूस.

20200126_202635

स्टेशनवर ट्रेन थांबली असल्यामुळे दरवाज्यात चौकशी सुरु

योगायोगाने एकुलता एक वडा पाववाला आमच्या डब्याकडे आला आणि आम्ही त्याच्यावर झडपच घातली. त्याच्याकडे होते तेवढे सगळे वाडा पाव आम्हीच घेऊन त्याची टोपली रिकामी करून त्याला माघारी पाठवलं. भराभर सगळे वाडा पाव रिचवू लागले. वरच्या बर्थ वर झोपलेला नितिनही उठला व त्यालाही वडा पाव हवा होता. तेवढ्यात दुसरा वडा पाव वाला हजर, मग त्याच्याकडूनही अजून काही घेतले व हेच आमचे त्या रात्रीचे जेवण झाले. चव बेताचीच होती पण नंतर काही खायला मिळेल, नाही मिळेल या भीतीने सगळ्यांनी ते फस्त केले.

वडा पाव खाऊन झाला, आता चहा पाहिजे. आधीच्याच सहप्रवाशाने सांगितले की पुढे एक चहाची गाडी दिसत आहे तिकडे बघा. ट्रेन सुटायला अजून बराच वेळ होता. शीतल, मी आणि अनुजा दोन डबे पुढे जाऊन त्या गाडीपाशी पोचलो तर तिथे कोणीच नाही. असे कळाले की कोणते कार्य असल्यामुळे चहावाला नेमका आजच आपले बस्तान लवकर बांधून निघून गेलेला. आमची पाऊले रिकाम्या हाती परत आमच्या डब्याकडे निघाली.

नऊ वाजताच अनुजा पेंगायला लागली. तिला बघून शीतलला खात्री पटली की नऊ वाजता झोपणे हे फक्त धवल पुरते मर्यादित नाही तर पूर्ण रामतीर्थकरांचा हा सामान दुवा आहे. अनुजाची झोप बघून आम्ही तिला सर्वात वरच्या बर्थ वर जाऊन झोपायला सांगितले व ती खुशीने झोपी गेली. आम्ही १० वाजेपर्यंत बसलो व मला ही झोप आवरेना. आम्ही सगळ्यांनीच मग झोपायचे ठरवले. परत जातानाही पुणे मध्यरात्री १.३० वाजता येणार होते तर आम्ही ठाण्याला पहाटे ४.२० वाजता पोचणार होतो. झोपतानाच सगळ्यांनी एकमेकांना टाटा बाय बाय करून घेतले. काय माहिती की मध्यरात्री पुणे येताच शीतल थंडीने गारठल्यामुळे अनुजा तिची उबदार शाल शीतलच्या अंगावर घालणार आहे व परत टाटा करून एकमेकांचा निरोप घेणार आहेत. अर्थात मला हे सगळे सकाळीच समजले.

दोन दिवस अगदी मजेत गेले. बदामीत आमच्याकडे एकूण एकच दिवसा असल्यामुळे आराम करायला असा मोकळा वेळ मिळालाच नाही. पण जो वेळ होता तो कायम लक्षात राहील असाच गेला. कोणाची कुरकुर नाही, रुसवा फुगवा नाही, उशीर करणे नाही, मला हेच हवे तेच हवे नाही की दादागिरी नाही. सगळे मस्त, मजेत आनंदी, बदामीत देवीचे दर्शन घ्यायला आलेलो, मजा केली आणि देवीच्या चरणी डोकं टेकून परत आलो.

नितीन – आमच्यात सगळ्यात मोठा. काही गोष्टीत जास्ती काळजी करणे, जे अनाठायी ही नव्हते, तेवढे सोडून तो बाकी सर्व वेळ एकदम मोकळेपणाने वावरला.
IMG-20200127-WA0022

अनया – जाताना इअरफोन व मोबाईलला चिकटलेली ही मुलगी नंतर खुलली. पूर्ण २ दिवस बाबांची, नितीनची काळजी घेत, आणि खास करून देऊळात तर ती ज्या प्रकारे एखाद्या प्रौढ बाईप्रमाणे एकदम जबाबदारीने व समजूतदारपणे वागली ते बघून ही छोटी अनया नाही हे जाणवले.
20200125_173752

अनुजा –  सदा उत्साही, समजूतदार आणि खादाड खाऊ. ट्रेनमध्ये तर i देऊन देऊन कमालच केली. नशीब तिच्या नावात i नाही. लहानात गेली की ती त्यांच्यासारखी लहान होते, आणि मोठ्यात असताना तशीच लहान राहते.
IMG-20200125-WA0039

शीतल – झोप आणि खाणे ही हिची २ आवडती कामे. गरागरा फिरणे हे अगदी ना आवडीचे पण बदामीत सगळीकडे न कुरकुरता फिरली, पायऱ्या चढली आणि संध्याकाळी स्वखुशीने हॉटेलपर्यंतही चालत आली. ही शीतल तर मला माहीतच नाही! बरे वाटले आपल्याला भेटून.
20200125_181046

ओम – हे भाऊ तर गळेपडू. कोणाशीही जमते, सगळ्यांशी पटते आणि कायम काहीतरी खेळायला लागते. कधी अनया ताई अनया चालू, तर कधी अनुजा आत्या अनुजा आत्या चालू, तर कधी मन्चुरिअन मन्चुरिअन चालू.
आणि हो, तोंडाचा पट्टाही कायम चालू.
20200126_105458

धवल, मी – बदामीत आम्ही फक्त १ दिवस होतो. लिहायला सुरु केले तेव्हा वाटले लगेच होईल. पण या एक दिवसात आम्ही एवढी मजा केली की बघता बघता ९००० शब्द कसे रेखाटले कळलेच नाही.
IMG-20200128-WA0028

धन्यवाद नितीन, अनया, अनुजा, शीतल आणि ओम, ही बदामी सहल कायम लक्षात राहील.

समाप्ति.

आता पुढची ‘रामतीर्थकर सहल’ कुठे?

20200126_130449

Share this:

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...