Thursday, July 24, 2025

कूर्ग डायरी

 
.
Travel-पर्यटन

कूर्ग डायरी-1

Rate This


मंगळवार

बेंगलुरूच्या विमानतळावर आमचे विमान उतरले तेंव्हा सकाळचे साडे दहा वाजून गेले होते. बेंगलुरूचा हा नवीन विमानतळ मोठा प्रशस्त व नेटका आहे. पण या विमानतळावर येणार्‍या उतारूंची मुख्य अडचण काही वेगळीच आहे. हा नवीन विमानतळ शहरापासून 30-40 किलोमीटर तरी अंतरावर आहे. त्यामुळे विमानतळावरून शहरात जायचे म्हणजे एकतर मोठ्या वाहतूक मुरंब्याला तोंड द्यावे लागते आणि दुसरे म्हणजे टॅक्सीचे भाडे 500 ते 600 रुपये तरी द्यावे लागते. विमान प्रवासचे तिकिट 2000 रुपये आणि टॅक्सी भाडे 600 रुपये हे गणित काही पचनी पडत नाही. विमान तळ बांधतानाच त्यापासून ते शहरापर्यंत जलद वाहतुक सेवा कशी देता येईल याचा विचार आपल्याकडचे नियोजक का करत नाहीत? हे एक कोडेच आहे.

ही अडचण लक्षात घेऊन, आम्ही एक प्रशस्त इनोव्हा टॅक्सी आधीपासूनच ठरवून ठेवली असल्याने आम्हाला विमानतळावरून येण्याजाण्याची काहीच अडचण भासली नाही. ही टॅक्सी व तिचा चालक, पुढचे 5 दिवस, बेंगलुरुच्या विमानतळावर आम्ही परत येईपर्यंत, आमच्या दिमतीस होते. या एकाच गोष्टीमुळे, आमचा एकूण प्रवास अतिशय सुखकर झाला यात शंकाच नाही. आमच्यामधे मी सर्वात ज्येष्ठ नागरिक असल्याच्या नात्याने, चालकाच्या शेजारच्या आसनाचा बहुमान मला मिळाला व दुग्धशर्करा योगाची प्रचिती आली असे म्हटले तरी चालेल. बेंगलुरु शहर गेल्या दहा पंधरा वर्षात अतिशय झपाट्याने वाढले आहे. त्याचबरोबर नवे रस्ते बांधणी पण चालू दिसली. अर्थात स्थानिक लोकांचे या बद्दलचे मत काही मला जाणून घेणे शक्य झाले नाही. पण माझे बेंगलुरुला वास्तव्य होते त्या चाळीस वर्षांपूर्वीच्या काळाच्या मानाने, शहरात खूपच बदल जाणवले. मोठे व प्रशस्त रस्ते, उत्तम बांधणीच्या बसेस या नजरेत भरत होत्या. संपूर्ण शहराच्या बाहेरील बाजूस, एक बहिर्गत वलय रस्ता व त्याच्या थोड्या आत, एक अंतर्गत वलय रस्ता, असे दोन रस्ते शहराच्या बाहेर बांधण्यात आले आहेत. विमानतळ या बहिर्गत वलय रस्त्यावर आहे. त्यामुळे या बहिर्गत वलय रस्त्यावरून येऊन आम्ही अंतर्गत वलय रस्त्यावर आलो व तेथून म्हैसूर कडे जाणार्‍या रस्त्याला, फारशा वाहतुक मुरंब्याला तोंड न द्यावे लागता, येऊन मिळालो. बेंगलुरुची हवा मात्र अतिशय खराब झाली आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या मे महिन्यात, बेंगलुरुचे दिवसाचे कमाल तपमान 30-31सेल्ससच्या पुढे गेलेले मला तरी कधी आठवत नाही. आता मात्र तपमान 37-38 पर्यंत सहजपणे पोचत असावे.

मी चाळीस वर्षांपूर्वी याच रस्त्याने एकदा म्हैसूरबेंगलुरु प्रवास केला होता. त्या वेळेस अगदी छोटेखानी असलेला हा रस्ता आता चार पदरी महामार्ग झाला आहे त्यामुळेच बेंगलुरुची उपनगरे मागे टाकल्यावर रस्ता जवळपास रिकामा झाल्यासारखेच वाटू लागले. अनंत काणेकर या लेखकाने कर्नाटकच्या या भूमीचे वर्णन, ‘निळे डोंगर तांबडी मातीया शब्दात केले आहे. या शब्दांना साजेसे एक चित्रच आता गाडीच्या काचेच्या खिडक्यांच्यातून माझ्या नजरेसमोर साकारू लागले. रस्त्याला लागूनच असलेली हिरवीगार शेते, त्यात मधून मधून डोकावणारी निलगिरीची झाडे, लाल माती व दूर क्षितिजावर दिसणारे निळसर झाक असलेले डोंगर, एखाद्या पिक्चर पोस्ट कार्ड वर असावे तसेच सगळे दिसत होते. ते दृष्य डोळ्यात साठवत असतानाच डोळ्यावर कधी झापड आली ते उमगलेच नाही.

आम्ही श्रीरंगपट्टणच्या थोडे अलीकडे असताना मला जाग आली. गाडीमधे, सगळ्यांच्याच पोटात आता बहुदा कावळे ओरडत असावेत कारण लंच ब्रेक घेण्याची कल्पना लगेच सर्वानुमते मंजूर झाली. गाडीच्या चालकाने थोडे पुढे एक चांगले रेस्टॉरंट असल्याची माहिती दिली व तिथे थांबण्याचे ठरले. कामत या नावाची रेस्टॉरंट्सची साखळी आता महाराष्ट्रात तरी प्रसिद्ध आहे. आता हे श्रीरंगपट्टणचे कामत महाराष्ट्रातल्या कामतचेच भाऊबंद आहेत की नाहीत ते मला कळले नाही. परंतु या कामत मधले दक्षिण भारतीय जेवण मात्र चविष्ट होते एवढे मी खात्रीने म्हणू शकतो.

श्रीरंगपट्टण मधून गाडी जात असताना तिथला दर्या दौलत महाल, वृंदावन बाग यांच्या नावाच्या पाट्या वाचून, पूर्वी केलेल्या सफरींची आठवण झाली परंतु आम्हाला बराच लांबचा टप्पा गाठायचा असल्याने आम्हाला कोठेही थांबणे शक्यच नव्हते. नाही म्हणायला वाटेत एके ठिकाणी कॉफी डे च्या एका रेस्टॉरंटमधे मस्त कॉफी प्यायला मात्र आम्ही थांबलो.

कुशलनगर नावाचे एक गाव आम्ही पास केले तेंव्हा संध्याकाळचे 5 तरी वाजले होते. या गावापासून पुढे एकदम समोरचे चित्र बदललेच. वाईपांचगणी यांच्यामधे असलेल्या पसरणीच्या घाटासारखा हळू हळू चढत जाणारा घाट आमची गाडी चढू लागली. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी दिसू लागली. सिल्व्हर ओक किंवा साग यांचे सरळ सोट जाणारे वृक्ष व त्यावर चढवलेले व लांबून एखाद्या ख्रिसमस ट्री सारखे दिसणारे काळ्या मिर्‍याचे वेल हेच दृष्य आता अगदी कॉमन झाले. हा रस्ता पाहून जर कसली आठवण झाली असली तर महाबळेश्वरच्या रस्त्यांची. फक्त हा रस्ता महाबळेश्वरच्या रस्त्यांच्या निदान चौपट तरी रूंद असावा. अर्धा पाऊण तास गेल्यानंतर गाडी मडिकेरी मधे शिरली.

कर्नाटक राज्याच्या नैऋत्य कोपर्‍यात लपलेला, कूर्ग हा एक छोटासा जिल्हा आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतारावर हे राज्य असल्याने सर्व भौगोलिक परिस्थिती डोंगराळ व दर्‍याखोर्‍यांनी भरलेली आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातला उघडाबोडका व उजाड डोंगराळी भाग येथे नाही. बघावे तिथे गर्द हिरवी गार झाडी बघायला मिळते. उघडे बागडे डोंगर तर बघायलाच मिळत नाहीत. रस्त्याच्या कडेला हिरवी गार झुडपे व वेल आणि त्यावर मधूनच फुललेली सुंदर व चित्ताकर्षक रान फुले. कूर्गमधून प्रवास करताना मन अगदी तृप्त होऊन जाते हे मात्र खरे.

पुढचे पाच दिवस आम्ही राहणार होतो ते आमचे रिसॉर्ट आणखी 5 किलोमीटर तरी पुढे होते. तिथे जाण्यासाठी मडिकेरी गाव क्रॉस करण्याची आम्हाला आवश्यकता होती. मडिकेरी हे गाव वसलेले आहे एका दरीत. त्यामुळे अरूंद, वेडे वाकडे व उंच सखल अशा रस्त्यांचेच प्राबल्य होते. बहुतेक रस्ते सॅन फ्रॅन्सिस्को मधल्या लोम्बार्ट किंवा मोस्ट क्रूकेड स्ट्रीट ची आठवण करून देणारे होते. गावातल्या बहुतेक घरांना मंगलोरी कौलांची लाल चुटुक छपरे असल्याने ती लांबून तरी छान दिसत होती. पण गावात अजून उघडी गटारेच होती आणि एकूण सगळा प्रकार फारसा तरी रोचक वाटला नाही.

गाव सोडल्यावर परत आजूबाजूचे चित्र नयन मनोहर बनले. 5 किलोमीटर पुढे गेल्यावर आमची गाडी एका गेट मधून आत शिरली. समोर दिसत होती केरळी पद्धतीची एक इमारत, झाडांच्या मधे दडलेली.

मध्यभागी एक पाण्याचा छोटासा हौद, चारी बाजूला लाकडी कठडा व त्याच्या मधे मधे बसायला कोच. कठड्याच्या पलीकडेच गर्द झाडी, हात बाहेर काढून स्पर्श करता येईल एवढ्या जवळ. पॅशन फ्रूटच्या रसाच्या पेल्याने आमचे स्वागत करण्यात आले आणि दिवसभराच्या प्रवासाचा ताण तणाव कोठेतरी पळूनच गेला.

8 जून 2010

 
.
Travel-पर्यटन

कूर्ग डायरी- 2

1 Votes


बुधवार

नेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत. काय भानगड आहे म्हणून फ्रेंच विंडोवरचा पडदा बाजूला सारला. बाहेर तर काहीच गडबड दिसेना. सगळे कसे शांत व नीरव भासत होते. पण कानावर प्रचंड कोलाहल तर पडतच होता. शेवटी राहवेना. उठलो व बाल्कनीचे दार उघडले. सोसाट्याचा वारा एकदम आत घुसावा तसा आवाजाचा एक प्रचंड कोलाहल खोलीत घुसला. इंग्रजीमधे एक शब्द आहे Cacophony म्हणून. या शब्दाचा अर्थ मला कधीच नीट समजला नव्हता. आता या क्षणाला कानावर पडणारे ते आवाज ऐकून या शब्दाचा खरा अर्थ मला उमजतो आहे असे वाटले. बाहेर सगळे स्तब्ध होते. मग हा कोलाहल कसला असावा बरे? पण लगेचच डोक्यात प्रकाश पडला. हा सगळा कोलाहल आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेल्या पक्षीगणांचा होता. पक्षी एवढ्या विविध प्रकारचे व एवढे मोठे आवाज काढू शकतात हे मला आतापर्यंत ज्ञातच नव्हते.

आम्ही मुक्काम ठोकला आहे त्या रिसॉर्टची रचना मोठी छान आहे. खरे म्हणजे एका दरीतच हा रिसॉर्ट आहे. दरीच्या वरच्या टोकाला, परिमितीवर, निवासी संकुले आहेत. थोड्या खालच्या पातळीवर निरनिराळी रेस्टॉरंट्स, बच्चे मंडळींसाठी Fun Zone यांची व्यवस्था आहे. त्याच्या खालच्या पातळीवर ऍडव्हेंचर झोन, Gym आणि मसाज पार्लर आहे. या सर्वांच्या मधे व आजूबाजूला गर्द झाडी, इतकी गर्द की या इमारती काही वेळा दिसतही नाहीत. थोडक्यात म्हणजे भेट देणार्‍या पाहुण्यांना, सतत गुंतवून कसे ठेवता येईल हे बघितले आहे. या निवासी संकुलांना, निरनिराळ्या पण अनकॉमन वृक्षांची नावे दिली आहेत. त्यामुळे आम्ही जोजुबा किंवा लोकूचा मधे राहतो आहे हे सांगायला मलाही जरा गंमत वाटली.

या जिल्ह्याचे कूर्ग हे नाव जास्त प्रचलित असले तरी ते आंग्लाळलेले नाव आहे. कन्नड भाषेत या जिल्ह्याचे नाव आहे कोडागु. या कोडागु लोकांची निराळी संस्कृती आहे. ती कन्नड लोकांच्या पेक्षा केरळी लोकांना जास्त जवळची आहे असे माझे तरी मत झाले आहे. या कोडागु जिल्ह्यातले सर्वात महत्वाचे ठिकाण कोणते असे जर स्थानिकांना विचारले तर एक मुखाने उत्तर येते, तालकावेरी. उत्तर हिंदुस्थानात गंगा नदीला जे महत्व आहे ते इथे दक्षिणेत कावेरी नदीला आहे. गंगेला गंगामैय्या म्हणून संबोधण्यात येते. त्याच धर्तीवर कावेरीला कावेरी ताई म्हणतात. खरे तर कन्नड मधे आईला अम्मा असा शब्द आहे. पण कावेरी अम्मा म्हणत नाहीत. मी आमच्या इनोव्हाच्या चालकाला हा प्रश्न विचारायला विसरलो नाही. पण त्याचे म्हणणे पडले की कन्नड मधे ताई म्हणजे सुद्धा आईच. खरे खोटे ते कन्नड भाषीय सांगू शकतील. ही कावेरी ताई उगम पावते कोडागु जिल्ह्यातल्या तालकावेरी या स्थानामधे व म्हणूनच दक्षिण भारतामधे, उत्तरेच्या गंगोत्री सारखेच, तालकावेरी या स्थानाला महत्व आहे. तालकावेरीला उगम पावल्यावर या कावेरी ताई प्रथम श्रीरंगपट्टण जवळून वहातात. या ठिकाणी कृष्णराज सागर हे धरण या नदीवर बांधलेले आहे. प्रसिद्ध वृंदावन बाग याच ठिकाणी आहे. कावेरी नदीवर दुसरे महत्वाचे धरण मेट्टूर येथे तामिळनाडू मधे आहे. शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला तंजौरच्या जवळ जाऊन मिळते.

लवकर निघायचे असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी 11 च्या सुमारास आम्ही तालकावेरीला जायला निघालो आहोत. मडिकेरीच्या साधारण नैऋत्येला जाणारा हा रस्ता अतिशय वळणावळणाचा आणि अरूंद आहे. परंतु आमच्या इनोव्हाच्या चालकाची तो मारुती 800 चालवतो आहे अशी प्रामाणिक समजूत दिसते आहे. साधारण 40 किलोमीटर अंतरावर आमची गाडी थांबते. कावेरी नदीला या ठिकाणी आणखी दोन नद्या येऊन मिळतात असे आमच्या चालकाचे म्हणणे आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर हा संगम लागतो.

खरे म्हणजे या संगमात पाहण्यासारखे काहीच नाही. अलाहाबादचा संगम तर दूरच राहिला पण आपल्या पुण्याचा मुळा मुठा संगमही या संगमाच्या मानाने भव्य दिव्य म्हणता येईल. मुठा उजवा कालवा जर यदाकदाचित मुठा डाव्या कालव्याला मिळाला असता तर जसे दिसले असते तसाच काहीसा हा संगम दिसतो. कावेरी आणि कणिका या नद्यांची पात्रे मला दिसली पण तिसरी सुज्योती नदी काही मला दिसली नाही. जवळच्या एका भाविकाला विचारल्यावर तो ती नदी गुप्त आहे असे म्हणला. म्हणजे पुढे बोलणेच खुंटले. या संगमाच्या जवळ एक केरळी पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार मात्र अतिशय भव्य आणि सुरेख वाटले. आत बरीच छोटी छोटी देवळे दिसली. त्यामुळे हे मंदिर नकी कोणाचे हे लक्षात येईना. एक दोन लोकांकडे चौकशी केल्यावर इश्वर, भंगडेश्वर पासून अनेक नावे समजली. शेवटी पलीकडच्या बाजूस एक इंग्रजी पाटी सापडली व या देवळाला भागमंडलेश्वर म्हणतात असा उलगडा झाला.

संगमावरून आता आमच्या गाडीने कावेरीच्या उगमाकडे जाणारा रस्ता चढायला सुरवात केली आहे. आजूबाजूला परत कूर्ग़सारखीच गर्द झाडी दिसू लागली आहे. 4 किलोमीटर गेल्यावर एका मोकळ्या पटांगणावर गाडी थांबली. समोर छान बांधून काढलेल्या पायर्‍या व एक विस्तीर्ण प्रवेशद्वार दिसते आहे.

शेजारच्या टपर्‍यांच्यातून कावेरीताईंची स्तुतीपर गीते ऐकत आम्ही त्या पायर्‍या चढून वर गेलो. समोर एक पाण्याचे कुंड आहे. या कुंडातच, समुद्रसपाटीपासून 3700 फूट उंचीवर, कावेरी नदीचा उगम झालेला आहे. तिथेच कावेरीचे एक देऊळही आहे. या देवळाचे फोटो काढायला मनाई का आहे याचे उत्तर माझ्या आवाक्याच्या बाहेरचे आहे त्यामुळे मी त्यावर विचार करण्याच्या फंदात सुद्धा पडत नाही. या कुंडातले पाणी खालच्या बाजूला असलेल्या एका गोमुखातून बाहेर येऊन मग लुप्तच होते आहे. अनेक भाविक कावेरीची मनोभावे पूजा करताना दिसत आहेत. कुंडाच्या वरच्या बाजूस अनेक छोटी देवळे आहेत. त्यात बहुतेक देवांनी हजेरी लावलेली दिसली. तालकावेरीचा एकूण परिसर मात्र अतिशय स्वच्छ, नीटनीटका आणि निसर्गरम्य दिसतो आहे. मुद्दाम लक्षात ठेवून पहायला यावे असेच हे स्थळ आहे यात शंकाच नाही.

ताल कावेरीच्या या कुंडामधून लुप्त झालेली कावेरी एकदम भागमंडलेश्वराजवळच प्रगट होते असे भाविकांचे म्हणणे. माझ्या शंकेखोर मनाला हे काही फारसे पटलेले नाही. तालकावेरीलाच कावेरीचा उगम होतो असे कशा वरून म्हणतात कोण जाणे? आपल्या क्षेत्र महाबळेश्वरला 5 नद्या उगम पावतात. या सर्व नद्यांची पात्रे 5 दिशांना गेलेल्या पाहता येतात. येथे तसे काहीच बघता येत नाही.

तालकावेरीच्या कुंडाजवळ उभे राहून सहज उजवीकडे बघितले की चांगल्या बांधून काढलेल्या दोन चारशे पायर्‍या एका टेकडीवर जाताना दिसतात. या टेकडीचे नाव आहे ब्रम्हगिरी टेकडी. या पायर्‍या चढून जायचेच असे मी ठरवतो. नंतर पाय दुखतील वगैरे विचार बाजूला टाकून मधून मधून थोडे थांबत का होईना मी माथ्यावर पोचण्यात यशस्वी होतो. वर गेल्यावर आजूबाजूला नजर टाकल्यावर आत्यंतिक आनंदाने माझे मन भरून गेले. तालकावेरीपासून 300 फूट उंच असलेल्या या टेकडीचा माथा काही फारसा मोठा नाही. 25 फूट व्यासाच्या वर्तुळा एवढाच असावा. पण चारी दिशांना दिसणारे हिरवेगार निळसर डोंगर व दर्‍यांचे विहंगम दृष्य एक विमान प्रवास सोडला तर इतक्या सहजपणे दुसर्‍या कोठे बघणे आपल्याला अशक्यच हे लक्षात आले. ताल कावेरीची ट्रिप नक्कीच सार्थकी लागली होती. मन कोणत्या तरी अनामिक आनंदाने भरून गेले होते. कदाचित एवढ्या भव्य दिव्य निसर्गाशी येथे जी जवळीक साधता आली त्यामुळेही असावे.

परत जाताना मडिकेरीमधे भोजन करण्याचा आमचा बेत चालक महाशय उधळून लावतात. मडिकेरीमधे चांगली रेस्टॉरंट्स नाहीत हे त्याचे मत आम्हाला जरा आश्चर्यजनक वाटले खरे पण ते बहुतेक बरोबर असावे. आम्ही रिसॉर्टला परत येतो. 3.30 ला स्वैपाकघरे बंद होण्याच्या आधी 1 मिनिट आमची ऑर्डर देतो. ब्रम्हगिरीच्या भेटीने पाय चांगलेच बोलू लागले आहेत हे लक्षात आल्याने आता भोजन व नंतर ब्रम्हानंदी टाळी हा बेत ठरल्यासारखाच आहे.

11 जून 2010

 
 
 
 
 
 
 
 

कूर्ग डायरी- 4

Rate This


शुक्रवार

आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर, बच्चे मंडळींनी जाहीरच करून टाकले आहे की ते कोठेही साईट सीइंग करायला येणार नाहीत म्हणून. त्यांना रिसॉर्टच्या फन झोन मधेच खेळायचे आहे. मी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा थोडाफार निष्फळ प्रयत्न करून बघतो व लॉस्ट केस म्हणून सोडून देतो. मुले नाहीत म्हणजे त्यांचे आईबाबा नाहीतच. मग शेवटी आम्हीच ज्येष्ठ नागरिक उरलो, साईट सीईंगला जाण्यासाठी! मडिकेरीच्या जवळच, अबी फॉल्स म्हणून एक धबधबा आहे तो बघायला जाण्यासाठी मग आम्हीच निघतो. या वेळेला जनरल करिअप्पा चौकातून न जाता आम्ही मडिकेरीच्या मंडईच्या बाजूने बाहेर निघतो. हा सर्वच भाग अत्यंत गजबजलेला, गलिच्छ आणि घाणीचे साम्राज्य असलेला असा वाटला. मात्र एकदा गाव ओलांडल्यावर, अतिशय घनदाट झाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागली. अबी धबधब्याकडे जाणारा रस्ता संपूर्ण उताराचाच आहे, हा धबधबा मडिकेरीपासून जेमतेम 4 किलोमीटरवर आहे. जवळच पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. तेथून परत बरेच खाली उतरावे लागते. हा सर्व परिसर कचर्‍याचे साम्राज्य असल्यासारखा होता. प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, कागद, डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचेच सगळीकडे प्राबल्य दिसत होते. जरा पुढे गेल्यावर एक पायवाट लागली पायवाटेच्या दोन्ही बाजूंना कॉफीची झाडे होती. असेच काही अंतर गेल्यावर समोर एक हलता पूल दिसू लागला. या हलत्या पुलाच्या समोरच हा अबी धबधबा आहे.


आमच्या मनात या धबधब्याबद्दल जी काही कल्पना होती ती व प्रत्यक्षातला धबधबा यात जमीन अस्मानाचे अंतर निघाले. मी तसे बरेच धबधबे या आधी बघितलेले आहेत. शाळेत असताना गोकाकचा धबधबा व गिरसप्पा मी बघितला होता. अमेरिकेत, नायगारा धबधब्याला मी भेट दिली आहे. अगदी आपल्या जवळचा म्हणजे वरंधा घाटातल्या शिवथर घळीतला धबधबा मी बघितला आहे. नायगारा तर सोडाच पण या धबधब्याची तुलना गोकाक किंवा गिरसप्याशीही करणे कठिण आहे. हा अबी धबधबा, साधारण शिवथर घळीतल्या धबधब्यासारखाच आहे. पाणी बर्‍याच उंचीवरून खाली येत असले तरी ते टप्या टप्याने येते त्यामुळे निसर्गाचे रौद्र स्वरूप वगैरे काही बघायला मिळत नाही. या धबधब्याचा परिसर साफ ठेवला तर हे एक छान पिकनिकचे स्थान मात्र होईल.

दुपारी 4 च्या सुमारास कॉफीच्या एका मळ्याला भेट द्यायला आम्ही निघालो आहोत. आमच्या बरोबर आणखी दोन तीन फॅमिलीज पण त्यांच्या गाड्यांच्यातून येत आहेत. परत एकदा करीअप्पा चौक आणि वळणावळणाचा उताराचा रस्ता. दहा बारा किलोमीटरवर आमच्या गाड्या एका कॉफीच्या मळ्यामधे येऊन थांबतात. या मळ्याचे मालक श्री. किरण हे स्वत: आम्हाला त्यांचा मळा दाखवणार आहेत. श्री. किरण यांना स्वाभाविकच कॉफीच्या लागवडीबद्दल अफाट माहिती. आहे. माझी कॉफी बद्दलची माहिती, या बिया एक झाडाला येतात इतकीच असल्याने या सर्व गोष्टी अगदी नवीन आहेत. श्री. किरण प्रथम आम्हाला सहसा बघायला न मिळणारी अशी झाडे दाखवतात.

ऍव्हॅकॅडो

व्हॅनिला वेल

ऍव्हॅकॅडो हे पेरूसारखे फळ मला खूप आवडते. त्याच्या गराची पेस्ट करून ती टॅको किंवा एन्चिलाडा सारख्या मेक्सिकन डिशेस बरोबर खायची असते. सबंध फळ निखार्‍यावर भाजून त्यातला गर खायला खूम छान लागतो. या ऍव्हॅकॅडोचे झाड व त्यावर लटकणारी फळे बघणे हे आपल्या देशात तरी दुर्मिळच्. श्री. किरण यांच्या मळ्यावर असे झाड आहे. नंतर दालचिनीचे झाड ते आम्हाला दाखवतात. या झाडाची पाने जरी चुरगळली तरी दालचिनीचा वास येतो. यानंतर व्हॅनिलाचे वेल आम्हाला बघायला मिळाले. या वेलांपासून व्हॅनिलाच्या शिरा बनवण्याची पद्धत अतिशय क्लिष्ट आहे. सध्या सर्व व्हॅनिला सुगंध हा झाडांपासून न बनवता पेट्रोलियम ऑइल मधल्या खाली उरलेल्या कोल टार पासून बनवला जातो ही एक नवीनच माहिती मिळाली.

या नंतर आम्ही कॉफीच्या मळ्याकडे वळतो. भारतात 3 लाख टन कॉफी बियांचे उत्पादन होते. त्यातले 1.20 लाख टनाचे उत्पादन एकटा कूर्ग जिल्हाच करतो. या 3 लाख टनांपैकी 2 लाख टन कॉफी तर निर्यातच होते. श्री. किरण यांच्या मताप्रमाणे कॉफीचे झाड खरे म्हणजे कोठेही वाढू शकते. परंतु अशा झाडाला फळे येण्याची शक्यता कमीच असते आणि फळे आली तरी त्यांना तो कॉफीचा दरवळणारा सुगंध जात्या नसतोच. अशा पिकलेल्या फळांना कोणताच वास नसतो. ही कॉफीची फळे उन्हात वाळवून सुकवली जातात. या सुकवण्याच्या कालात त्या ठिकाणचे हवामान, आर्द्रता यावर वाळलेल्या कॉफी फळातील बियांचा सुगंध अवलंबून असतो. भारतात लागवडीखाली असलेली, अरेबिका व रोबस्टा ही दोन्ही प्रकारची झाडे श्री. किरण दाखवतात. अरेबिका कॉफीचे झाड नाजुक असते. त्याची काळजी ही जास्त घ्यावी लागते. रोबस्टा झाड नावाप्रमाणेच मजबूत असते.

पुढे असलेले झाड अरेबिका मागची रोबस्टा


कॉफीच्या मळ्याची चक्कर झाल्यावर गरमागरम कूर्ग कॉफी आणि बिस्किटे आमची वाट बघत आहेत. या कॉफीची लज्जत काही न्यारीच लागते आहे. या नंतर श्री. किरण आम्हाला एका ग्रीन हाऊस मधे घेऊन जातात. ऍन्थुरियम(Anthurium) या फुलझाडाची ते करत असलेली लागवड बघण्यासाठी. या झाडाची रोपे आयातच करावी लागतात. पण फुलांना बरीच किंमत येते व फुले महिनाभर तरी टिकत असल्याने हा धंदा फायद्याचा ठरत असावा.


कूर्ग़ कॉफीची मस्त चव डोक्यात भिनलेली असतानाच आम्ही रिसॉर्टवर परत येतो. आता सगळ्यांनाच परतीचे वेध लागले आहेत. उद्या सकाळी परत एकदा बेंगलुरू पर्यंतचा प्रवास इनोव्हाने आणि त्यानंतर किंगफिशरचे विमान.

कूर्गचे दिवस तर संपूनच गेले आहेत.

 
 

कूर्ग डायरी- 3

Rate This


गुरुवार

आश्चर्यकारक रित्या, आज आम्ही सर्व जण, न्याहरीसह सगळे आटोपून, सकाळी 7-30 वाजताच तयार आहेत. पावणेआठ पर्यंत, आम्ही परत एकदा कूर्गच्या फेरफ़टक्याला निघालो सुद्धा आहोत. बच्चे मंडळींचा उत्साह समजण्यासारखा आहे कारण आमचा पहिला हॉल्ट आहे एलिफन्ट कॅम्पला.

मडिकेरी गाव सोडून कोठेही जायचे असले तरी जनरल करीअप्पा चौक ओलांडल्या शिवाय कोठेच जाता येत नाही. या चौकात जनरलसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. जनरल करिअप्पा हे भारतीय सैन्याचे पहिले भारतीय प्रमुख होते व त्यांनी आपला कार्यभार 1949 मधे स्वीकारला होता. या जनरल करिअप्पा चोकाच्या जरा अलीकडेच, मडिकेरी गावातला आणखी एक मोठा चौक लागतो. या चौकात सुद्धा एक पूर्णाकृती पुतळा बसवलेला दिसला. परंतु तो पूर्णपणे अच्छादित असल्याने कोणाचा आहे हे कळू शकले नाही. परंतु तो पुतळा जनरल थिमय्या यांचा असावा असे मला वाटते. थिमय्या हे करिअप्पा यांच्यासारखेच भारतीय सैन्याचे प्रमुख होते. त्यांनी 1957 मधे कार्यभार स्वीकारला होता. त्या वेळचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्याशी न पटल्याने त्यांनी 1959 मधे राजिनामा दिला होता परंतु तो स्वीकारला गेला नव्हता. 1961 मधे भारत चीन युद्धाच्या तब्बल 15 महिने आधी ते निवृत्त झाले होते. मडिकेरी सारख्या छोट्याशा गावाने भारतीय सैन्यदलाला दोन भारतीय सेनादल प्रमुख दिले याचा साहजिकच मडिकेरीवासियांना सार्थ गर्व व अभिमान आहे.पण यात फार नवलाचे काही नाही असे मला वाटते. कोडागु लोक हे लढ्वय्ये म्हणून प्रथम पासूनच प्रसिद्ध आहेत आणि सैन्यदलात जाऊन आपले कर्तुत्व दाखवयाला आजही कोडागु तरूण प्राधान्य देतात.

परत एकदा आम्ही कूर्गच्या दर्‍याखोर्‍या पार करून कुशलनगर जवळच्या सपाटीवर आलो आहोत. येथे मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्याला आम्ही लागलो आहोत. हा रस्ता इतका छोटा आहे की समोरून वाहन आल्यास कोणत्या तरी एका वाहनाला मागे जाऊन बाजूला थांबण्यासाठी कोठेतरी जागा शोधावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कॉफीचे हिरवेगार मळे आहेत. या मळ्यांच्यात लावलेली सिल्व्हर ओकची झाडे व त्यांना वेष्टून टाकणारे काळ्या मिर्‍याचे वेल आम्हाला सतत सोबत करत आहेत. या छोट्या रस्त्याने 8 कि.मी. अंतर गेल्यावर एका मोकळ्या जागेवर चालक गाडी थांबवतो. समोर परत एकदा कावेरी ताईंचे दर्शन होते आहे.


दुबारे या गावाजवळ कावेरी नदीचे पात्र भागमंडलेश्वरमधल्या संगमाच्या मानाने बरेच मोठे आहे. सध्या म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस पात्रात असलेल्या खडकांच्या वरून उड्या मारत नदी पार करणे सहज शक्य आहे. आम्ही त्यापेक्षाही सोपा मार्ग म्हणजे लॉन्चने नदी पार करावयाचे ठरवतो. पैलतीरावरच कर्नाटक सरकारचा हत्तींना शिक्षण देण्याचा कॅम्प आहे. समोर दहा पंधरा तरी हत्ती झुलताना दिसत आहेत. जरा वेळाने एक एक एक करून त्यांना कावेरी नदीच्या पात्रात डुंबण्यासाठी आणण्यात येते.

दोन छोट्या हत्तींनी तर पात्रात मस्त लोळणच घेतल्याने तिथे जमलेल्या सगळ्या बालचमूला त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे आंग ब्रशने घासणे त्यावर पाणी टाकणे सहजपणे करता येते आहे. हे हत्तीही बेटे हा सोहळा अगदी आनंदाने उपभोगताना दिसत आहेत. मधूनच एखादा हत्ती सोंडेत पाणी घेऊन जमलेल्या प्रेक्षकांच्यावर फवारून वा काय मजा आलीअसे मनात पुटपुटत असावा असे त्याच्या मिस्किल डोळ्यावरून तरी मला वाटते. यानंतर या सगळ्या गजराजांना, सातू व नाचणीचे भले थोरले रोट, खाऊ घालण्यात आले. बर्‍याच बालमंडळींनी मम म्हणून त्या खाऊ घालणार्‍यांच्या हाताला हात लावून आपली हौस भागवून घेतली.

हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर एक एक करून गजराज त्यांच्या शिक्षणावर निघून गेले व उन्हाचे काय चटके बसत आहेत? हे सगळ्यांच्याच लक्षात आले. जवळच असलेल्या एका स्टॉलवर थंडगार नारळाचे पाणी व खोबरे याचा समाचार घेऊन आम्ही परत कावेरी पार केली व गाडीत जाऊन बसलो.

1959 मधे तिबेटी लोकांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला. या नंतर हजारोंच्या संख्येने तिबेटी निर्वासित भारतात आले. हे तिबेटी निर्वासित भारतात निरनिराळ्या ठिकाणी स्थायिक झाले. दक्षिण भारतात स्थायिक झालेल्या तिबेटी लोकांची सर्वात मोठी वसाहत कूर्ग जिल्ह्यातल्या कुशल नगर जवळ आहे. बायलाकुप्पे या गावाजवळ या तिबेटी लोकांनी एक मोठा मठ स्थापन केला आहे. Great Gompa of Sera Je आणि Sera Mey या नावाने हा मठ ओळखला जातो. या मठावर एक विशाल सुवर्ण कलश उभारण्यात आलेला आहे. तो लांबूनही दिसतो. हा मठ आणि त्याच्या जवळच असलेल्या Mahayana Buddhist University चे प्रार्थना गृह या दोन्ही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. दोन चारशे विद्यार्थ्यांना बसता येईल एवढे हे प्रशस्त सभागृह आहे. एका बाजूला भगवान बुद्ध आणि त्यांचे बुद्धपदाला पोचलेले दोन अनुयायी यांच्या सुवर्ण कांती असलेल्या मोठ्या मूर्ती आहेत. या विद्यापीठाच्या आजूबाजूला असणार्‍या वसाहतीत या तिबेटी लोकांनी आपले सुगंधी द्रव्ये, गालिचे आणि कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे उद्योग चालू केले आहेत. मठाच्या समोरच्या बाजूला या वस्तू विक्री करण्याचे स्टॉल्स मी बघितले. आपला देश सोडून आलेल्या या लोकांनी ज्या चिकाटीने आपले जग पुन्हा उभे केले आहे ते बघून मला कमालीचे आश्चर्य वाटले. बायलाकुप्पे येथील हे तिबेटी मंदीर पहाण्यासारखे आहे यात शंकाच नाही.


आम्ही रिसॉर्टवर परत पोचलो आहोत तेंव्हा दीडच वाजला आहे. भोजन करून मडिकेरी गावात चक्कर मारायचे आम्ही ठरवतो. या गावातली चक्कर मात्र निराशाजनकच वाटली. गावात पहाण्यासारखे किंवा चांगले दुकान असे जवळपास नाहीच. आमचा चालकाने दाखवलेल्या एका दुकानातून मी कूर्गची खास उत्पादने म्हणजे कॉफी पावडर, काळी मिरी आणि इतर काही गोष्टी खरेदी करतो व रिसॉर्टवर परत येतो. बच्चे मंडळी फन झोनमधे व्हिडियो गेम्स वगैरे खेळण्यात गुंग आहेत. मी एका आरामखुर्चीवर टेकतो. डोळे कधी मिटले हे कळतच नाही.

14 जून 2010

 
 
.
Travel-पर्यटन

कर्नाटक मधील समुद्र किनारे – एक फोटोब्लॉग

1 Votes


समुद्र किनारा म्हटला की आपल्याला साहजिकच प्रथम आठवतात ते कोकणचे किंवा गोव्याचे समुद्र किनारे. परंतु गोव्याच्या आणि कारवारच्याही दक्षिणेला काही अप्रतिम सुंदर समुद्र किनारे आहेत. या किनार्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काशीद किंवा मुरूड सारखे व्यापारीकरण अजून झालेले नाही. त्यामुळे प्राकृतिक निसर्ग सौंदर्य भरपूर प्रमाणात पहायला मिळते.

गोकर्ण महाबळेश्वर मंदिराजवळ असलेला हा ओम किनारा. शेजारी असलेल्या खडकांच्या रांगानी अतिशय रमणीय दिसतो. गोव्या प्रमाणेच येथे परदेशी पाहुणे बरेच येतात.

हा मरवंथी किनारा! याचे वैशिष्ट्य म्हणजे या किनार्‍याला लागूनच सुपर्णिका नदी वाहते. रस्त्याच्या एका बाजूला मरवंथी किनार्‍याजवळच्या खुल्या समुद्रातले खारे पाणी तर दुसर्‍या बाजूला गोड्या पाण्याची नदी असे सहसा न आढळणारे चित्र येथे दिसते.

मरवंथी किनार्‍याला लागूनच असलेला हा ट्रासी किनारा! माडाची झाडे, हिरवळ व रुपेरी वाळू यांनी हा अतिशय निसर्गरम्य वाटतो.

अरबी समुद्रा लगतच बैन्दूर ही एक टेकडी आहे. या टेकडीवरून खाली बघितले की घनदाट वृक्षराजी व त्याच्या मागेच समुद्राच्या लाटा दिसतात.

बैन्दूर टेकडीवरून दिसणारा अरबी समुद्र व खाडी.

बैन्दूर टेकडीवर राहण्यासाठी बांधलेले घरकुल.

समुद्रस्नान किंवा नुसतेच डुंबणे यासाठी सर्वात सुरक्षित असलेला सोमेश्वर किनारा. याचा उतार इतका कमी आहे की समुद्राच्या आतपर्यंत बिनधास्त जाता येते.

मुरुडेश्वरचा किनारा; या किनार्‍याजवळ एक शंकराचे देऊळ व गोपूर आहे. शेजारील टेकडीवर शंकराची एक भली थोरली मूर्ती आहे.

मुरुडेश्वर किनार्‍यावरचा सूर्यास्त. नितांत रमणीय व निसर्ग सौंदर्य असलेले कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

28 नोव्हेंबर 2011

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...