Saturday, July 26, 2025

history blog back up 1

 
discovermh.com

वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra

Discover Maharashtra

प्राचीन भारतीय मंदिरस्थापत्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विविध कालखंडात झालेली त्यांची निर्मिती किंवा एकाच मंदिरात विविध कालखंडात काही कारणाने झालेले बदल. हे असे बदल महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहायला मिळतात. वर्षानुवर्ष होणारे ऊन-पावसाचे तडाखे, त्यामुळे होणारी दगडाची झीज, परकीय आक्रमणांमुळे झालेली मंदिराची नासधूस अशा अनेक कारणांमुळे मंदिरांच्या वास्तूमध्ये हे बदल वारंवार होत गेले. अशा मंदिरांचा इतिहास आणि त्यांचं स्थापत्य यांचं नीट निरीक्षण केलं तर हे बदल चटकन लक्षात येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर वाईजवळच्या वाकेश्वर इथं पहायला मिळतं.Wakeshwar Temple, Wai.

वाकेश्वर मंदिराची मूळची रचना उत्तर यादवकालीन आहे. परंतु मंदिराचं शिखर साधारण पेशवाईच्या कालखंडात नव्याने बांधलेलं आहे. वाई आणि परिसरात तुरळक आढळणाऱ्या शिवपूर्वकालीन मंदिरांपैकी वाकेश्वर मंदिर एक आहे. अतिशय सुबक आणि भक्कम बांधणी असलेल्या या शिवमंदिराला तितकाच भक्कम तट आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रमुख असे चार खांब आहेत. हे चार खांब आणि आजूबाजूला असलेले वीस खांब यांच्या आधाराने मंदिराचे छत तोलले गेले आहे. हे मंदिर कुणी बांधलं, कधी बांधलं याचे फारसे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु उत्तर पेशवाई कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं म्हणता येईल. सभामंडपातील खांबावर चौकोनी आकारात नक्षी कोरलेली आहे. छोट्याशा असलेल्या अंतरालातून काही पायऱ्या उतरून गेलं की आपण गर्भगृहात प्रवेश करतो. या गर्भगृहातील शिवलिंगाच्या मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे.

मंदिराच्या बाहेरील बाजूस छोट्या जोत्यावर नंदीमंडप आहे. प्रदक्षिणा मार्ग किंबहुना सर्वच मंदिर परिसर घडीव अशा फरसबंदीने सज्ज केला आहे. याच प्रदक्षिणामार्गावर जाऊन बघितलं की यक्ष, शरभ, हत्ती, हरीण यांची शिल्पं कोरलेली आढळतात. मंदिराचे शिखर त्रिस्तरीय स्वरूपाचे आहे. या शिखरावर चुनेगच्ची बांधकामातील मूर्ती कोरलेल्या आढळतात.आज इतक्या वर्षानंतरही या शिखरावरील मूर्ती सुस्थितीत पहायला मिळतात. मुख्य मंदिराला लागूनच एक छोटसं कुंड आहे. परंतु हे कुंड उघड्या स्वरूपाचं नाही. या कुंडाच्या चारही बाजूंनी भक्कम दगडी बांधकाम केलेलं आहे. कुंडात उतरण्यासाठी छोट्या स्वरूपाचं सुबक असं महिरपी कमान असलेलं प्रवेशद्वार आहे. पूर्वीच्या काळी या कुंडाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या परिसरात विठ्ठल-रुक्मिणी, दत्तगुरू यांचीदेखील छोटी छोटी मंदिरे आहेत. तसेच जवळच एका पारावर शंकराचेच छोटेसे मंदिर आहे.

याच परिसरातून एक फरसबंदी वाट खालच्या बाजूला नदीच्या दिशेने जाते. या वाटेने पुढे गेलं की कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र लागतं.नदीच्या काठावर एक सुबक असा घाटदेखील बांधलेला आहे. मुख्य मंदिराच्या तटबंदीला बुरूज आहेत. नदीपात्राच्या दिशेला असलेल्या बुरुजांवर विविध रूपातील मारुतीच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. प्राचीन काळापासून या भागामध्ये शैव आणि गाणपत्य मंडळींचं बऱ्यापैकी वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस याच पंथांच्या काही सत्पुरुषांच्या समाधी पहायला मिळतात. वाकेश्वरचं हे मंदिर बावधन गावाच्या हद्दीत येतं. महाशिवरात्रीला इथं मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रावण महिन्याच्या दर सोमवारीदेखील इथे भाविकांची गर्दी असते.

वाई, जिल्हा सातारा.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

© आदित्य माधव चौंडे.

santsahitya.in

श्री वाटेश्वर मंदिर वाटेगाव - shri vateshwar mandir vategav - sant sahitya


श्री वाटेश्वर मंदिर वाटेगाव

वाटेगाव येथे पुर्वाश्रमीची भोगावती नदी गावाच्या मध्यभागातून वहात आहे. नदीच्या पश्चिम किना-यावर पुरातन हेमाडपंती श्री वाटेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुखी आहे. या मंदिराचे काम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराला पूर्व, दक्षिण, उत्तर तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या गाभान्यातील शिवलिंगापासून अंदाजे चाळीस फूट लांबीचा पुर्वाभिमुखी सभामंडप आहे. या सभामंडपातून आत गाभान्यात असलेल्या.

श्री वाटेश्वर मंदिरातील शिवलिंगास (पिंडीस) सूर्योदयावेळी सूर्यकिरणांचा स्पर्श होऊन किरणोत्सव उत्सवास प्रारंभ होतो. याचा कालावधी २० मिनिटेचा असतो. हा किरणोत्सव ५ दिवस साधारण असतो.

या मंदिराचा वेळोवेळी जिर्णोद्धार झालेला आसून एका मंदिराच्या पायरी वरील शिलालेखात भिडे नामक व्यक्तीचा उल्लेख येतो. हे वाटेगावच प्रमुख ग्रामदेवत आसून मंदिराला उंच तटबंदी व घाट व बुरुज याच्या साह्याने मंदिराची सुरक्षित रचना पाहायला मिळते. मंदिराला ओव-या असून त्यात आत्ता बदल केलेला दिसतो.

 

पावनखिंड-विशाळगडच नव्हे तर ‘पालेश्वर’चा धबधबा, ‘मानोली’ही आहे खास

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम घाटाचे सौंदर्य काय आणि किती वर्णावे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विशाळगड हे निसर्ग संपन्न असलेले पर्यटन स्थ‍ळ होय. अणुस्कुरा खिंड आणि आंबा घाट हे कोल्हापूरच्या बाजारपेठेला कोकण बंदरांशी जोडणारे ठिकाण. (Maharashtra Day Special Explore Sahyadri) अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार 'विशाळगड' आहे. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स, पर्यटक आणि भाविक इथे येतात. राम मंदिर, मलिक रेहान दर्गा याठिकाणे असंख्य हिंदू-मुस्लिम भाविक हजेरी लावतात. खासकरून कर्नाटकातून इथे येणारी भाविकांची संख्या खूप आहे. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पावनखिंड, विशाळगड, पालेश्वर धबधबा, मानोली धरण, कोकण दर्शन अशा असंख्य पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. कोल्हापुरातून विशाळगडला जाणार असाल एका दिवसात ही स्थळे तुम्हाला पाहता येतील. पण थोडी विश्रांती हवी असल्यास यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. दुचाकी-चारचाकीने ही ट्रीप अविस्मरणीय ठरेल. (Maharashtra Day Special Explore Sahyadri)

पैजारवाडी –

कोल्हापुरातून विशाळगडला जात असाल तर वाटेत पैजारवाडी हे गाव लागते. कासवाच्या आकारातील चिले महाराजांचे खूप मोठे मंदिर येथील आकर्षण आहे.

हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मार्गाने पुढे जाताना अनेक भाविक-पर्यटक याठिकाणी आवर्जुन भेट देतातचं.

गरमागरम चहा आणि भजी

गरमागरम चहा आणि भजी

विशाळगड –

गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दमछाक होऊ नये म्हणून गडावर चढताना स्थानिक लोकांची थंडगार पेय असलेली छोटी दुकाने आहेत. वृद्ध लोकांसाठी पालखीप्रमाणे डोली उपलब्ध आहे. विशाळगडावर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे स्वत: पाण्याची सोय करणे, हे कधीही उत्तम.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

विशाळगाडवर राहण्यासाठी छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने मिळतात. पण पाण्याअभावी गडावर अनेक पर्यटक राहत नाहीत. त्याऐवजी जाताना अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी राहणे पसंत करतात.

अमृतेश्वर महादेव मंदिर

अमृतेश्वर महादेव मंदिर

विशाळगडला दोन मार्गाने जाता येते –

१) पावनखिंड मार्गे – बांबवडे-मलकापूर-पांढरपाणी-भात तळी-गजापूर-पावनखिंड लागते. येथून काही किलोमीटर अंतरावर विशाळगडला जाता येते.

विशाळगडावरील जलसाठे

विशाळगडावरील जलसाठे

२) आंबा वाघझरा मार्गे – बांबवडे- शाहूवाडी-मलकापूर-आंबा-विशाळगडला जाता येते. मलकापुरातून विशाळगडला थेट रस्ता आहे.

बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी

बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी

विशाळगडमध्ये काय काय पाहाल?

खोकलाईदेवीचे मंदिर, विशाळगड किल्ला, राम मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, हजरत मलिक रेहान दर्गा (२ दर्गा आहेत), मुंडा दरवाजा, कोकण दरवाजा, अहिल्याबाई समाधी मंदिर, वाघजाई मंदिरे, वीर बाजीप्रभू देशपांडे समाधी, शिवकालीन लहान पूल, मारुती मंदिर, पाण्याच्या टाक्या, गडावर चार दरवाजा, नरसोबा मंदिर, तलाव, टकमक कडा, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, दोन विहिरी (चौकोनी आणि अर्धचंद्राकार विहिर), पंत अमात्य यांच्या जुन्या राजवाड्याचे अवशेष.

रामचंद्र पंत अमात्य वाड्याचे अवशेष

रामचंद्र पंत अमात्य वाड्याचे अवशेष

जुन्या दर्गाजवळ एक मोठे पठार असून याठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळून पाहता येतात. विशालकाय दरी आणि भिरभिरणारा वारा सर्वकाही सुखावह ठरणारे असते.

शिवकालीन पूल (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

शिवकालीन पूल (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

याठिकाणी हत्ती अन्‌ गायब झालेली वरात दगडी स्वरुपात डोंगरामध्ये वसलेली दिसते.

विशाळगडावरील चंद्रकोर विहिर

विशाळगडावरील चंद्रकोर विहिर

गजापुरातून विशाळगडला जाताना कोकणी पद्धतीची कौलारु घरे, कुक्कुटपालन. शेळीपालन करणारे शेतकरी, कोकणी पद्धतीची नऊवारी साडी नेसलेल्या महिला, लाल माती अन् सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा असा निसर्गाचा पसारा दृष्टीत भरणारा आहे.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

याठिकाणाला एकदा का होईना, नक्की भेट द्या.

विशाळगडावरील पाणी

विशाळगडावरील पाणी

काय खाल?

गडावर मात्र स्वत: जेवण बनवावे लागेल. प्यायचे पाणीदेखील याठिकाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते. उन्हाळ्यात रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

कोंबडी वडे थाळी

कोंबडी वडे थाळी

काळी मैना, जांभूळ, काजुचे बोंड, फणस, चिकन्या, नेरली, जरदाळू, शिवाय तमालपत्री याठिकाणी भरपूर प्रमाणात सापडते. (तमालपत्रीची पाने मसाले भात करताना वापरली जातात)

पालेश्वर धरण आणि धबधबा –

मलकापुरातून ३ कि.मी. आतमध्ये हे धरण आणि धबधबा आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटतात.

फोटो – शंभूराज पचिंद्रे

फोटो – शंभूराज पचिंद्रे

कसे जाल?

कोल्हापूर-बांबवडे-मलकापूर बाजारपेठ. बाजारपेठेतून डावीकडे एक रस्ता गेला आहे जो पांढरेपाणी – पावनखिंड मार्गे विशाळगडला जातो. पांढरेपाणीच्या अलिकडे उजव्या बाजूला एक छोटा कच्चा रस्ता गेला आहे, जो पालेश्वर धरण आणि धब्याधब्याकडे जातो.

पावनखिंड आणि धबधबा –

पालेश्वरमधून बाहेर पडल्यानंतर पावनखिंडीकडे जाता येते. पांढरपाणी अशी त्याची मुख्यत: ओळख आहे. पावनखिंडीचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे वर्तुळाकार दिसते. भगवा ध्वज इथे फडकताना दिसतो. इथे पार्किंगची सोय आहे.

घाटातील सुंदर निसर्ग

घाटातील सुंदर निसर्ग

पुढे गेल्यानंतर मोठा बुरुज दिसतो. या बुरुजावर सहजपणे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे गेल्यानंतर इतिहासाची माहिती देणारे फलक इथे दिसतात.

पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना

पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना

बाजीप्रभूंना वीरमरण प्राप्त झाले, त्यामुळे ही जागा पवित्र झाली. अशा या पावनखिंडीत ढाल-तलवारी प्रतिक असलेले बाजीप्रभूंचे स्मृतीस्थान आहे.

लागूनचं मोठा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो. तरुणांची इथे प्रचंड गर्दी असते.

हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या वरून प्रवाहित होणाऱ्या पाण्यात बसून आनंद लुटता येतो. इतरवेळी धबधबा आटला की, या खिंडीत उतरण्याची सोय आहे.

कोंबडी वडे

कोंबडी वडे

अनेक ट्रेकर्स खिंडीतून ट्रेक करण्यासाठी याठिकाणी येत असतात.

बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ

बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ

काय खाता येईल?

उन्हाळ्यात य़ाठिकाणी स्थानिक लोक मसाले ताक, कोकम , सरबत, कोकम फळे, करवंद, जांभूळ, चिकन्या, कलिंगड, चहाची विक्री करतात. तर पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस, मॅगी, मसाले चहा, भजी विकतात. किंवा तुम्ही घरचे जेवण आणून याठिकाणी बसून जेवलात तरी चालते. येथे ऐसपैस जागा आहे.

पावनखिंडीतील धबधबा

पावनखिंडीतील धबधबा

कोकण दर्शन –

'कोकण दर्शन' या नावाने सह्याद्री सनसेट पॉईंट आहे. असंख्य पर्यटक याठिकाणी सुर्यास्त पाहण्यासाठी गाड्या थांबवून उपस्थिती लावतात. कोकणचे दर्शन याठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या एका मागोमाग अनेक विशाल रांगा जवळून पाहता येतात.

दुसरा मार्ग आहे – आंबा घाटातून. आंबा गावातून पुढे गेल्यानंतर वाघझरा हे ठिकाण विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. (कोकणात जाणाऱ्यांसाठी आंबा घाटाची सुरुवात याठिकाणापासून होते) वाघझरा येथे पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय केली आहे. वाघझऱ्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जिथे जंगलाची सुरुवात होते. इथे एक गोड्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. पूर्वी याठिकाणी खुले तळे होते.

विशाळगडावरील तोफेचे अवशेष

विशाळगडावरील तोफेचे अवशेष

मानोली धरण –

आंब्यातून पुढे आल्यानंतर मानोलीचे धरण दृष्टीस पडते. या धरणापर्यंत गाडीने जाता येते. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर खळखळ वाहणारे पाणी, सभोवतालचा सुंदर परिसर अनुभवता येतो. मानोली धरणाच्या साचलेल्या पाण्यात बोटिंग रायडिंगची सोयदेखील आहे. मानोलीतून पुढे गेल्यानंतर एक रस्ता विशाळगडाकडे गेला आहे.

पंत अमात्य राजवाडा – फोटो – शंभूराज पचिंद्रे

पंत अमात्य राजवाडा – फोटो – शंभूराज पचिंद्रे

ट्रीपचा अवधी वाढवला तर बर्कीचा धबधबा देखील पाहता येईल. या धबधब्याला जाण्यासाठी जंगलातून पायवाट असून थोडे चालावे लागते. कोकणात जाणाऱ्यांसाठी पावनखिंडीतून अणुस्कुरा घाटा मार्गे जाता येईल. या मार्गावरून राजापूरला जाण्यासाठी रस्ता आहे.

विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर

विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर

जाण्यासाठीची योग्य वेळ –

वरील सर्व ठिकाणी १२ ही महिने जाऊ शकता. उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटुंबासह जाऊ शकता.

पावसाळ्यात याठिकाणी धो-धो पाऊस पडतो. हा पाऊस जर अनुभवायचा असेल तर नक्की जा! पण, पावसाळ्यानंतर याठिकाणी जाणे स्वर्गाहून कमी नाहीये. हिरव्यागार धरतीने ओढलेली धुक्याची चादर, पडणाऱ्या हलक्या सरी, हवेतील गारवा आणि ओलेचिंब झाडांवरून पडणारे टपटप पाणी, भिजलेल्या रस्त्यावरून प्रवास अनुभवणे हे भाग्यात असावे लागते. हिवाळ्यात विशाळगड पाहणे, डोळ्याचे पारणे फेडणारे ठरते.

अमृतेश्वर महादेव मंदिर (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

अमृतेश्वर महादेव मंदिर (फोटो – शंभूराज पचिंद्रे)

ट्रेकिंग –

तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर तुम्हाला पन्हाळा – पावनखिंड ट्रेकिंग करता येते.

सह्याद्रीच्या रांगा

सह्याद्रीच्या रांगा

आंबा फाट्यावर अनेक दुकाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथून तुम्ही कोरडा खाऊ विकत घेऊ शकता अथवा अनेक चांगले हॉटेल्स असल्यामुळे याठिकाणी जेवणदेखील करू शकता.

 

 trekkersushil.blogspot.com

बेडसे लेणी

Trekker Sushil Dudhane

बेडसे लेणी 

बेडसे गाव 

ता : मावळ 

जि : पुणे 

मार्ग : पुणे (सिंहगड रोड,हिंगणे खुर्द)- देहूरोड फाटा-तळे गाव-पवना नगर कामशेत रोड-बेडसे गाव रोड-बेडसे गाव.

अंतर : ६७ किलोमिटर.

बेडसे गाव : स.स.पासुन उंची ५७७ मी.(१८९३ फुट)

बेडसे लेणी स.स.पासुन उंची : ६९२ मी.( २२७० फुट)

पायथ्या पासुन लेणी पर्यत प्रत्यक्ष चढाई  : ११५ मी.( ३७७ फुट ).

      बेडसे लेणीला जाण्यासाठी आम्ही  वर दर्शविलेल्या मार्गाने खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.कामशेत येथे आम्ही  पुण्यापासुन पासुन जवळपास ५७ किलोमीटर गाडीने प्रवास करुन पोहचलो.कामशेत पासुन आत  कामशेत-पवना नगर रोड ने बौर घाट चढून  बेडसे गावात पोहचलो .कामशेत पासुन जवळपास दहा किलोमीटर गाडी प्रवास करुन व पुण्यापासुन ६७ किलोमीटर प्रवास करुन आम्ही  बेडसे गावात पोहचलो.येथेच आमचे  वाहन  पार्क करुन पायरी मार्गाने मार्गक्रमण चालु केले.

लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पुरातत्व खात्याने   पायर्‍या बांधलेल्या आहेत.

दगडी पायर्‍यांची वाट असल्याने चालताना दमछाक होते.साधारणता अर्धा ते पाऊण तासात, अर्धा किलोमीटर चालून आम्ही लेणी पाशी पोहचलो.

पायथ्या पासुन लेणी पर्यत जाण्यासाठी ४६० पायर्‍या चढून जावे लागले.वर पोहचल्यावर डाव्या बाजुने लेणी पाहायला सुरुवात केली.

     सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह. बेडसे हे पायथ्याचे गाव म्हणून बेडसे लेणी, असे असले तरी ह्या लेण्यांचे मूळ नाव मारकुड  (मारा याचा पर्वत) असे लेण्यातील शिलालेखावरून वाटते.

    संपूर्ण भारतात एकूण १२०० लेण्या आहेत, त्यापैकी १००० हून अधिक एकट्या महाराष्ट्रात आहेत. या १००० पैकी बऱ्याच लेण्या अतिउंच डोंगरावर व दऱ्यामध्ये असल्यामुळे एकट्या पडल्या आहेत. अश्या सगळ्यांपैकी पर्यटकांपासून दूर असलेली लेणी म्हणजे बेडसे लेणी.

   बेडसे लेणी ह्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे गावातील आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे जातांना हे गाव लागते. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे.येथे एक चैत्यगृह काही विहार, खोदीव स्तूप, आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूट  असे नाव प्राचीनकाळी होते असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते.

येथील चैत्यगृह भव्य आहे. याची उंची सुमारे २८ फूट आहे.

 समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे.

चैत्यगृहा समोर मध्यभागी चार खांब आहेत. यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त आहेत. 

यांची रचना अशी अहे की त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे असे दिसते. हे खांब लेण्यांच्या पायापासून थेट छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत. या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. 

छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात. 

अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केले दिसते. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीवकाम आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते. येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत. त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात. त्यावरून तिथे खरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो. व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे.

मुख्य चैत्यगृहाच्या दाराशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. 

या कमानीखाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या दिसोन येतात. यातील मधल्या आणि डावीकडील कमानी खालून चैत्यगृहात जाण्याचे मार्ग आहेत. 

उजवीकडच्या कमानीखाली जाळीदार छिद्रांच्या नक्षीतून सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. 

यातील प्रत्येक चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची नक्षी गुंफलेली दिसते. 

चैत्यगृहीचे छत गजपृष्ठाकृती आहे. या छतातून सव्वीस खांबांची निर्मिती झालेली दिसून येते. 

स्तूपावर त्यावेळेच्या लाकडी छत्रावलीचा खांब आणि त्यावरील कमळाचे छत्र व्यवस्थित स्वरूपात दिसते. या लेण्यात छताला लाकडी तुळया होत्या परंतु त्या चोरीस गेल्या असे सांगितले जाते. 

चैत्यगृहात सुंदर चित्रकामही होते. त्याचे काही अंश इथल्या भिंती-खांबांवर आजही दिसतात.

   बेडसे येथील स्तंभ मौर्य शैलीतील आहेत असे मानतात. तसेच त्यांना त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हंटले जाते. पर्सिपोलिस हे इराणमधील एक प्राचीन शहर होत. मौर्य साम्राज्याचा संबंध येथ पर्यंत होता असे हे स्तंभ दर्शवतात.

एका खोलीच्या द्वारपट्टीवर एक लेख आहे. ‘नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं’ या कोरीव अक्षरांचा अर्थ - नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्याचे दान दिले.

 या लेखात आजच्या नाशिक शहराचा प्राचीन उल्लेख मिळतो.

या लेण्यांच्या बाहेर पाण्याची कुंडे आहेत. यातील एका कुंडावर त्यासाठी दिलेल्या दानाचा लेख दिसून येतो.

संपूर्ण लेणी अभ्यास पूर्वक पाहण्यासाठी एक तास लागतो.

     लेणी पाहुन झाल्यावर, परत पायरी मार्गाने खाली उतरलो.

    बेडसे लेणी पाहुन आम्ही  येथूनच ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या येळघोल ची लेणी पाहण्यासाठी निघालो.

 trekkersushil.blogspot.com

कान्हुर पठार

Trekker Sushil Dudhane

कान्हूर पठार

              नगरकर वाडा 

           २३ फेब्रुवारी २०२०

 ता : पारनेर 

 जि : अहमदनगर 

 मार्ग : पूणे -वाघोली -लोणीकंद -शीक्रापुर -रांजणगाव -मळढन -टाकळी हाजी निघोज -अळकुटि गाव-पिंपळगावरोठा-कान्हुर पठार.

अंतर : पुण्यापासून १३७ किलोमीटर.

 पिंपळगावरोठा  पासून १३ किलोमीटर.

कान्हूर पठार – हे गाव पूर्वी, कान्हूर मल्लाची वाडी या नावाने ओळखले जात. या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे ,

सरदार नारो बाबाजी अभ्यंकर उर्फ नगरकर 

यांचा भव्य वाडा आहे. 

याशिवाय अळकुटी, भाळवणी, नांदूर पठार, देवीभोयरे या गावांनाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

कान्हुरपठारचा प्रतिशनिवारवाडा:

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील सरकारवाडा म्हणजे ऐतिहासिक वास्तूशिल्पच आहे. पुण्यातील पेशवेकालीन शनिवारवाडा सर्वांना परिचित आहे. पण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये कान्हूरपठार सारख्या दुर्गम गावामध्ये हा प्रतिशनिवार-वाडा अजूनही उभा आहे. पेशवेकालीन घटनांचा हा एकमेव मुक साक्षीदार. पुण्यातील शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर असाच देखणा वाडा कान्हूरपठार येथे ‚ असावा असे पेशव्यांना वाटल्याने त्यांचे पराक्रमी व निष्ठावान सरदार नारो बाबजी नगरकर यांना कान्हूरपठार परिसराची जहागिरी देऊन पुण्यातील शनिवार वाड्यासारखाच वाडा बांधून घ्यावा अशी आज्ञा केली. त्यासाठी त्यांनी शनिवारवाडा बांधकामासाठी ज्या कलाकार व कारागीर यांचा वापर केला होता तेच कलाकार व कारागिर कान्हूरपठार येथे पाठवून दिले. काही कालावधीतच,

 पुण्याच्या शनिवार वाड्याप्रमाणेच कान्हूरपठार येथे वाडा बांधून पूर्ण झाला.

 त्यानंतरच्या काळात सरदार नगरकरांनी पेशव्यांच्या पदरी निष्ठा दाखवून अनेक लढायांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखविले. पुण्याच्या शनिवार वाड्याच्या आतील भागातील वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बराच भाग नष्ट झाला आहे. परंतु कान्हूरपठार येथील सरकार वाड्याचा संपूर्ण भाग आजही चांगल्या अवस्थेत 

असून वाड्याला असणारी तटबंदी अजूनही भक्कम आहे.

 वाड्याच्या चारही बाजुंना भक्कम बुरुज असून त्यांची पडझड न झाल्याने उत्तम स्थितीत आहेत. बुरुजांसह तटबंदीचा बराचसा भाग पांढऱ्या शुभ्र मातीत 

बांधला असूनही त्यावेळी मातीवर विशिष्ट प्रक्रिया करुन, त्यात विविध रसायने मिसळून बांधला असल्याने सलग दोन वर्षे अतिवृष्टी होऊनही बांधकाम अजिबात ढासळले नाही हे विशेष! 

वाड्याला बाहेरील बाजूस पूर्व दिशेला भव्य दरवाजा असून तो अजूनही सुस्थितीत आहे.

 मुख्य दरवाजा आतील बाजूस पूर्ण काळ्या पाषाणात घडविलेले प्रवेशद्वार असून त्यांच्या बाहेरील बाजूस पुण्याच्या शनिवारवाड्यासारखी रचना केलेली आढळते. दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर आतील बाजूस तिसरे भव्य प्रवेशद्वार असून सर्व ,

प्रवेशद्वारांचे दरवाजे सागवानी लाकडाचे आहेत.

 त्यावरील नक्षीकाम अलंकारिक स्वरुपाचे असून आतील बाजूस 

तिसरे भव्य प्रवेशद्वार असून सर्व प्रवेशद्वारांचे दरवाजे सागवानी लाकडाचे आहेत. त्यावरील नक्षीकाम अलंकारिक स्वरुपाचे 

असून  पेशवेकालीन कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे.

      आज आम्ही जेव्हा या वाड्याला भेट दिली, त्यावेळेस आम्हाला येथे खुप प्रमाणात वाड्या ची पडझड झालेली नजरेस पडली.

हा वाडा पहिला दुमजली होता.साधारण दहा वर्षांपूर्वी या वाड्याची स्थिती खूपच चांगली होती.गेल्या दहावर्षापासून वाड्या ची अवस्था खूपच बिकट होऊ लागली.

वाडा हळू हळू पाडायला सुरुवात झाली.ही विक्रुत्ती म्हणायची कि काय हे मोठे प्रश्नचिन्ह व शोकांतिका आहे.जुन्या वास्तू जतन करणे हे खरं तर व्हायला हवे.हा वाडा तसा बंद असतो.

आत मधे खुप गवत वाढल्यामुळे

 येथे जाणे जोखीमेचे आहे.विंचू , साप यांचा खुप सुळसुळाट आहे येथे.गेली ३५ वर्ष भालेकर ही वयोवृद्ध व्यक्ती या वाड्याची ईमाने -इतबारी देखभाल करीत आहे.

    येत्या काळात हा वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे , याची पक्की खात्री नाकारता येत नाहि.

  •     समस्त भटक्या मंडळीनी या ठिकाणी लवकरच  अवश्य भेट द्यावी.अन्यथा येत्या काळात हा वाडा नामशेष होऊन , फक्त आठवनी शिल्लक राहतील.

 trekkersushil.blogspot.com

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

Trekker Sushil Dudhane

     ट्रेक वाल्मिकी डोंगर (सात रांजण  डोंगर)

वाल्हे गाव 

   ता: पुरंदर 

     जि: पुणे 

भाद्रपद महिना म्हणजे पित्र पंधरवड्याची  सुरुवात. भाद्रपदात महिन्यात उन्हाची त्रीवता अधिक असते.

     आज १० सप्टेंबर २०१७ आम्ही वाल्मिकी डोंगर(सात रांजण) करण्याचा बेत आखला, व त्या दिशेने खाजगी  चार चाकी वाहनाने  प्रवास सुरु केला.पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी असे  मार्गक्रमण करित वाल्हे या गावी पोहचलो. 

        पुरंदर तालुक्यातील सर्वात पुरातन गाव म्हणुन ज्या गावाची ओळख आहे ते गाव म्हणजे वाल्हे गाव.

आद्य कवि रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी  यांपासुन ते अगदी शिवकालीन व त्याच बरोबर अलीकडे घडलेल्या स्वातंत्र्य संग्रामापर्यन्त इतका मोठा अवर्णनीय ऐतिहासिक वारसा या गावाला लाभला आहे.

    आद्य कवी वाल्मीकी ऋषिनी रामायण घडण्यापुर्वी रामायण लिहले,अन रामायण लिहल्यानंतर तब्बल एका तपानंतर म्हणजे १२ वर्षानंतर रामाचा जन्म झाला असे म्हणले जाते.

वाल्मीकी ऋषी हे आधी एक दरोडेखोर वाल्हया कोळी म्हणुन प्रसिद्ध होते.याच वाल्हया कोळयाने एक माणुस मारला की एक दगड रांजणात टाकत असे, अशाप्रकारे तब्बल सात रांजण भरले इतकी माणसे मारलीत.पुढें नारदमुनीच्या भेटीमुळे वाल्हया कोळयाचा वाल्मिकी ऋषी झाला अशी आख्यायिका आहे.

        वाल्हयाचा वाल्मिकी झाला म्हणुन हे गाव वाल्हे असे  ओळखले  जाते. अशी दंतकथा सुद्धा खुप प्रसिद्ध आहे.

      वाल्मिकी ऋषीची समाधी सुद्धा गावात असल्याने गावाला वाल्मीकनगरी म्हणुन सुद्धा संबोधले जाते.

      शिवकालीन इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजानी आपल्या मुलीला हे गाव आंदण म्हणुन देण्यात आलं होतं असा उल्लेख सापडतो.

     छत्रपती शिवरायांच्या कन्येला फलटण वरून पुणे मुक्कामी घेऊन येत असताना वाल्हे गावा जवळ शत्रू सैनिकांनी हल्ला केला होता पण या वेळी वाल्ह्याच्या चर्मकार समाजातील लोकांनी हातात तलवारी,भाले घेऊन शत्रूवर तुटून पडली व महाराजांच्या कन्येला सुखरूप पुण्याला पोहचविले, त्या वेळी महाराज म्हणाले मी सा-या महाराष्ट्रातील महिलांचे संरक्षण करतोय आणि आज माझ्या मुलीला वाल्हेकर चर्मकार समाजातील बांधवांनी सुखरूप आणले ,मी धन्य झालो.

    त्यावेळी महाराजांनी त्यांना काय इनाम पाहिजे असे विचारले तर त्यांनी संपत्ती,जमीनी अस काही मागितलं नाही,

 त्यांनी महाराजांना अतिशय नम्र पणे महाराजांचे आडनाव मागितले,

   आजही तेच आडनाव आहे

याला ऐतिहासिक पुरावा आहे.

      वाल्हे येथे येस.टी.स्थानकाजवळ माझे चुलते तात्या महांगरे यांचे हॉटेल व घर आहे.त्यांच्या कडे  पोहे व चहा चा बेत झाला.त्यानंतर माझा चुलत भाऊ अमोल, त्याचा मित्र भुजबळ, व पवार यांना सोबत घेऊन, 

वाल्मिकी डोंगराच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

सुरुवातीला सपाटी भागातून मार्गक्रमण केल्यानंतर चढण सुरु झाली.

चढण चढून मध्यावर प्रथम छोटे खाणी देवी चे मंदिर लागले.

दर्शन घेऊन पुढे  निघालो.

थोड्याच  वेळात महादेवाचे एक मंदीर लागते.

महादेवाचे मनोभावे दर्शन घेउन पुढे पद्भ्रमण सुरु ठेवले. 

चढण काही संपत न्हवता.पहिला डोंगर पार करुन, लगेचच दुसऱ्या डोंगरावर पोहचलो.येथून पुढे एका डोंगरावर अजुन एक महादेवाचे मंदीर लागते, परंतू या ठिकाणी जाण्याची वाट बिकट आहे.थोड्याच वेळात आम्ही मंदिरापाशी पोहचलो.

येथे महादेव चे मंदिर आहे.

मंदिराकडे जाणारी वाट खडतर अशी आहे.

     महादेवाचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो येथून, 

समोरच्या उंचावर असलेल्या डोंगरावर वाल्मिकी  डोंगर नजरेस पडतो. 

त्यादिशेने आम्ही पद्भ्रमण सुरु ठेवले. वाटेत दूरवर हरणांचे  कळप दिसले, आता खरी चढाई चालू झाली. 

छातीवर येणारी  त्रिव चढण सुरु झाली,

 वाट अतिशय  घसरडी असल्याने  स्थानिक गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी क्वचितच येतात.तसे पाहिले तर, हे ठिकाण आम्हा ट्रेकर्स  च्या दृष्टीने अपरिचित असेच होते.जेजुरी च्या पुढे  १२ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. या ठिकाणी पदभ्रमण मार्गावर आकाराने मोठ- मोठी दगडी अस्ताव्यस्त विखुरलेली होती.

 हा मार्ग  पार करणे, मोठे आव्हान आमच्यासमोर होते.

आम्ही ते लीलया पणे पार केले. वाल्मिकी डोंगरावर मोठ्या उत्साहात पाऊल ठेवले. 

जवळपास पद्भ्रमण सुरु केल्यानंतर दोन  तासांच्या अथक परिश्रमानंतर  आम्ही वाल्मिक डोंगर/सात रांजन 

येथे  पोहचलो.

 या येथील आख्यायिका अशी आहे की, या डोंगरा लगतच्या परिसरात  वाल्ह्या  कोळी लुटमार करीत असे, व लोकांना मारत असे. एक माणूस मारला कि एक दगड तो एका रांजणात टाकीत असे, असे एक-एक  करता सात  रांजणे भरले होते. नंतर नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी लूटमार करणे सोडले, व तपश्चर्या करीत बसले.१२  वर्षानंतर नारद मुनी परत आले, त्यावेळी ज्या ठिकाणी वाल्ह्या कोळी तपश्चर्या करायला बसले होते, त्या ठिकाणी  वारूळ निर्माण झाले होते.त्यानंतर नारद मुनींनी  त्यांना आयोध्याला नेले, व त्यांच्या कडून रामायण हा महान ग्रंथ लिहून घेतला. तेच वाल्ह्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले.

डोंगरावरून सभोतालचा परिसर खूप सुंदर दिसतो. 

उत्तरेला वाघडर वाडी, दक्षिणेला दातेवाडी, पश्चिमेला वाल्हे, पूर्वेला अंबाची वाडी, गायकवाड वाडी हा सर्व परिसर दिसतो.वरती माथ्यावर थोडा वेळ थांबून ,

नंतर आल्या वाटेने परत वाल्हे येथे पोहचलो. 

येथून जवळच  वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे. 

तेथे जाऊन दर्शन घेतले. व नंतर वीर या गावी  वीर म्हस्कोबा चे दर्शन घेण्यासाठी नीघालो.

विर या गावी पोहचल्यावर नाथ म्हस्कोबा चे दर्शन घेतले.

दर्शन घेउन नंतर पुण्याकडे निघालो.

     आजच्या ट्रेक मध्ये जगन्नाथ पारगे,घोडे, सुनिल घम, राजेश तिखे व मी सुशील दुधाणे यांनी सहभाग घेतला.

 trekkersushil.blogspot.com

आडवाटेवरची भटकंती : काळ भैरवनाथ मंदीर व सोनजाई मंदिराची

Trekker Sushil Dudhane

सोनजाई डोंगर 

ता : वाई 

जि : सातारा 

पायथ्याचे गाव बावधन धनगर वाडा : स.स.पासुन उंची ७३२ मी.(२४०१ फुट)

मार्ग : पुणे-बंगलोर हाईवे-शिवापुर-कापूरहोळ-किकवी-सारोळा-पारगाव  खंडाळा-वाई फाटा-वाई सुरुर रोड-बावधन रोड-बावधन-सोनगिरवाडी रुरल-सोमजी नगर-बावधन धनगर वाडा.

अंतर : 

पुण्यापासुन ८६ किलोमिटर.

वाई फाट्यापासुन ३९ किलोमिटर.

स.स.पासुन डोंगराची उंची: ९३० मी.( ३०५० फुट)

डोंगराची पायथ्यापासुन प्रत्यक्ष चढाई: १९८ मी.( ६५०  फुट)

     सोनजाई डोंगर या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही वरिल दर्शविलेल्या मार्गाने चार चाकी वाहनाने प्रवासास सुरुवात करुन प्रथम,

 बावधन येथील काळ भैरवनाथाचे  मुळ  स्थान असलेल्या मंदीरापाशी पोहचलो .या मंदिरापर्यत  जाण्यासाठी दगडातील पायरी मार्ग आहे.

पायथ्याची उंची स.स.पासुन ६९३ मी.(२२७३ फुट) आहे.

पायरी मार्ग पार करुन आम्ही  पंधरा मिनिटात मंदिरापाशी  पोहचतो.

मंदिराची स.स.पासुन उंची ७५९ मी.( २४९० फुट) आहे.पायथ्यापासुन आम्ही  जवळपास ६६ मी.(२१६ फुट)  उंची पार करुन येथे  पोहचलो.

मंदीर कपारित आहे.मंदिराच्या  गाभाऱ्यात काळभैरव नाथाची मुर्ती , हनुमाची मुर्ती, शिवपिंड, तसेच कासव या सर्व मुर्ती आहेत.

या काळभैरव नाथ मंदिराची एक अख्यायिका येथील स्थानिक लोक सांगतात ती अशी, या गावात ठोंबरे नावाचा एक धनगर राहत असे, तो नेहमी सोनई येथील भैरव नाथाचे दर्शन घेण्यासाठी जात असे.परंतू वृध्दापण आल्यामुळे त्याला सोनई येथील भैरव नाथाचे दर्शनाला जाणे कठिण झाले.त्या वेळी भैरवनाथाने त्याला दृष्टांत देऊन सांगितले की तू माझ्या बरोबर ये, पण माझ्या बरोबर येत असताना मागे वळुन पाहू नकोस.ठरल्या प्रमाणे ते निघाले, परंतू काही अंतर चालल्या नंतर धनगरा ने मागे वळुन पाहिले तर भैरव नाथ गुप्त झाले.ते ज्या ठिकाणी गुप्त झाले, त्या ठिकाणी हे मंदीर आहे.

मंदीर पाहुन आम्ही मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पठारावर फेरफटका मारून आलो .या येथून सभोवतालचा सर्व परिसर खुपच  छान दिसत होता.

फेरफटका मारून आम्ही पुन्हा मंदीरापाशी आलो.

मंदिराच्या मागच्या बाजुला एक छोटे से भुयार आहे, हे छोटे से भुयार पांडवानी केले आहे, असे येथील स्थानिक सांगतात.

     भुयार पाहुन  पायरी मार्ग उतरुन आम्ही परत पायथ्याशी पोहचलो.

      नंतर येथून  तिन किलोमीटर वर असलेल्या बावधन  धनगर वस्तीच्या,

भैरवनाथाच्या मंदिरापाशी पोहचलो.

भैरव नाथ मंदिरा च्या  येथेच  गाडी पार्क केली .जर आपणाकडे महिंद्रा  जीप सारखी वाहने असतील तर आपण घाट रस्त्याने एक किलोमिटर पर्यत वाहन घेउन जाऊ शकता.टू व्हीलर सुद्धा एक किलोमीटर पर्यंत आरामात घेउन जाता येते.

भैरव नाथाचे दर्शन घेउन, 

येथूनच आम्ही  पदभ्रमणाला  सुरुवात  केली .

येथून पाचच मिनिटात आम्हाला ' श्री श्रेत्र  सोनजाई काळूबाई  देवस्थान , बावधन ता..वाई ' असे लिहिलेली कमान लागली.

कमानी तून  आतमधे प्रवेश करुन पुढे निघालो. वाट अतिशय प्रस्त आहे, चार चाकी वाहन आरामात जाऊ शकेल, इतकी मोठी वाट आहे.

कमानी तून प्रवेश केल्यावर खढी चढण व नागमोडी घाट मार्ग असलेला  कच्चा मातीची  वाट सुरु झाली.

दहा मिनिटात आम्ही मारुती मंदीरा पाशी पोहचलो.

येथे दर्शन घेउन पुढे मार्गस्थ झालो .उभी नागमोडी चढण असल्यामूळे चालताना खुपच दमछाक होत  होती.

पायथ्याच्या  भैरव मंदीरा पासुन एक किलोमीटर वर आम्हाला एक  लोखंडी गेट लागले , या ठिकाणा पर्यत आपण गाडी ने प्रवास करुन येऊ शकतो.

या गेट पासुन पुढे वाहनांना प्रवेश बंद असल्याने येथेच चार चाकी व टू व्हीलर गाड्या पार्क केल्या जातात.

येथून पुढे निघालो.

येथून पुढे २८० मी.नागमोडी वळणावर आम्हाला दगडात कोरलेली गणराया ची सुबक मुर्ती नजरेस पडली.गणरायाचे मनोभावे दर्शन घेउन पुढे निघालो.

     येथून पुढे  थोड्याच वेळात  आम्ही  उजव्या बाजूला असलेल्या तळ्या पाशी पोहचलो.

तळे पाहुन पुढे अवघ्या १०० मी.वर  आम्ही सोनजाई मंदिराच्या परिसरात  पोहचलो.

पायथ्याच्या भैरव नाथ मंदीरापासुन येथे आम्ही पाऊण तास व १.४९ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो .सोनजाई मंदीराचा परिसर हा जवळपास वीस एकर मधे विखुरलेला आहे.

या येथे सोनजाई मातेचे  प्राचीन मंदीर आहे.

सोनजाई मंदिराच्या पुढे गेल्यावर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक विधी चे आयोजन करण्यासाठी एक भव्य मोठा हॉल आमच्या नजरेस पडला.

येथून पुढे काळूबाई मातेचे मंदीर लागले .मंदिराच्या मागच्या बाजुला भिमाचे खोरे आहे.

  या भिमाच्या खोऱ्याची एक आख्याहिका सांगितली जाते ती अशी,

   कृष्णा नदी दक्षिण वाहिनी करून ती बावधन वरून पुढे जावी यादृष्टीने भिमाने ती दक्षिणवाहिनी करण्याचा निश्चय केला होता. मात्र हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची अट देवीने घातली होती. त्यानुसार भिमाने एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा संकल्प पूर्ण होऊ शकला असता तर नदीचा प्रवाह नैसर्गिक राहिला नसता. काळुबाई देविने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला होता अशा प्रकारची एक दंतकथा या भागातील लोक आजही सांगतात. या खिंडीला "भीमाचे खोरे" म्हणूनही संबोधले जाते.

ही माहिती आम्हाला येथील सोनजाई मंदीरातील  तुकाराम गिरी महाराज यांनी सांगितली.ते या ठिकाणी १९७२ पासुन मंदिराची देखभाळ करित आहेत.

काळूबाई मंदिराच्या मागच्या बाजुला एक मोठे पठार आहे.हा संपूर्ण परिसर निसर्गाने आच्छादलेला आहे.या येथून संपूर्ण वाई परिसर, पांडव गड, केंजळगड , नागेवडी धरण, धोम धरण, मांढर देवीचा डोंगर हा सर्व परिसर मनमोहक दिसतो.

पठार फिरुन आम्ही  परत मंदीरा पाशी आलो .या येथून आल्या वाटेने परत  पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदीरा कडे निघालो.येथून संपूर्ण उताराची वाट सुरु झाली .अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आम्ही  पायथ्यापाशी पोहचलो.

     पायथा ते सोनजाई मंदीर व पठार आणि  परत पायथ्या शी येउन जाऊन आम्हाला साधारणतः साडेचार किलोमीटर व दोन ते सव्वा दोन तास लागले.

येथून पुढे साधारणतः तिन किलोमीटर अंतरावर नागेवाडी चे धरण आहे.ते पाहण्यासाठी आम्ही निघालो.

        धरण पाहुन आम्ही पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

देवराई - Sacred grove म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. हे परंपरेने चालत आलेले सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य‘च होय.

     देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.

भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार च्या   आसपास  देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडुळांच्या जाती तेथे सापडतात.

    सह्याद्रीच्या कड्या कपारीत हजारो फुट उंचीवर दोन समोर-समोर डोंगरावर सोनजाई देवीचे तर दुसऱ्या डोंगरावर मांढरदेवीचे मंदीर आहे. फार वर्षांपूर्वी पासून या देवींचे नवरात्र काळात मोठ्या भक्ती- भावाने नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. बावधनच्या उत्तरेला तिन  हजार फुट उंच डोंगरावर सोनजाई देवीचे मंदीर आहे.वाई तालुक्‍यात मांढरदेवची श्री काळूआई, रेनावळे येथील श्री काळेश्वरी, ओझर्डे गावातील श्री पद्मावती, आसले गावातील तुळजा भवानी, भुईंज गावातील श्री महालक्ष्मी तसेच सोनजाई गडावर सोनजाई देवीचा जागर नवरात्रात केला जातो.सोनजाई देवीचे नवरात्र उत्सव साजरे करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.सोनजाई देवी देवस्थान व मंगल गिरी महाराजांच्या पुढाकाराने या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते.

   या नऊ दिवसांमध्ये दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी ६ ते ९ पर्यंत सप्तशती पठाण,व हवन, सकाळी १०  ते १२.३०  पर्यंत श्रीमददेवीभागवत कथा, दुपारी १२.३०  ते ४ पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी ४ ते ६  कीर्तन व संध्या आरती, रात्रो ९ ते १० वाजता देवी जागर करण्यात येतो.

    वाईच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वत रांगांमधील डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळेच या डोंगराला सोनजाई डोंगर म्हणतात. डोंगरावर जाण्यासाठी उत्तरेला वाईहून व दक्षिणेला बावधनहून अशा दोन्ही बाजूंनी पायवाट आहे. सोनजाईचे दगडी मंदिर असून, आतमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. मंदिरालगतच्या कुंडात वर्षभर पाणी असते.

 

मनपसंद परंपरा

प्रशांत ननावरे- nanawareprashant@gmail.com

अठराव्या शतकाच्या शेवटाला काळाच्या ओघात सुरू झालेली उपाहारगृहे बंद पडल्यानंतर गेल्या ११५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले आणि मिसळ मिळणारे सर्वात जुने ठिकाण ही वैद्य उपाहारगृहाची ओळख आहे. मिसळ हा या उपाहारगृहातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कारण वैद्य उपाहारगृहात मिळणारी मिसळ ही इतरांपेक्षा वेगळी, पोटभर आणि दिलेल्या पैशाला पुरेपूर न्याय देणारी...

एखाद्या गोष्टीचं अनुकरण करताना त्यात आपले वेगळेपण टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. विशेषत: अशा काळात जेव्हा खाद्य व्यवसाय सुरू करणं ही तितकी सोपी आणि फायदेशील गोष्ट नव्हती; मात्र व्यावहारिकतेच्या सर्व निकषांचा सारासार विचार करून आणि दूरदृष्टी ठेवून रघुनाथ रामचंद्र वैद्य यांनी चालू परंपरेला छेद देणारे एक धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या उपाहारगृहातील त्या लोकप्रिय पदार्थाचा शोध त्यांनी लावला नाही; मात्र एकशे पंधरा वर्षे अविरतपणे ही खाद्यपरंपरा टिकून राहील याची तजवीज मात्र करून ठेवली, असं म्हणावं लागेल.

आज खरंच त्याचा सार्थ अभिमान रघुनाथ यांची चौथी पिढी बाळगून आहे. हा अभिमान केवळ खाद्यपदार्थांचा नाहीए, तर ज्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतला जातो ती वास्तू, तिथल्या वस्तू, काम करणारे कामगार आणि आजूबाजूचा परिसर या सगळ्यांविषयीचा आहे. बुधवार पेठेतील सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक यादरम्यानच्या बगाडे रस्त्यावरील फडके वाड्यात पुण्याच्या संस्कृतीला शोभेल, असा बाज आणि स्वाद असलेले वैद्य उपाहारगृह १९१०पासून मिसळीसाठी पुणेकरांच्या आवडीचे ठिकाण आहे.

कुटुंबाची शेतीवाडी नसल्यामुळे अर्थार्जनासाठी रघुनाथ रामचंद्र वैद्य तळकोकणातील रत्नागिरी परिसरातील उसगाव हे आपले मूळगाव सोडून पुण्यात दाखल झाले. काही काळ पुण्यात भाडेकरू म्हणून वास्तव्य आणि मिळेल ते काम केल्यानंतर एका व्यवसायाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झाले. पुण्यातील लाल महालाच्या समोरच्या बाजूला जोगळेकर उपाहारगृह होते. त्यांचा व्यवसाय चांगला चालत असे. तिथे मिळणारे खाद्यपदार्थ आणि ते खाण्यासाठी होणारी लोकांची गर्दी पाहून आपणही याच व्यवसायात का उतरू नये, या विचाराने त्यांना झपाटलं. लागलीच त्यांनी हॉटेलसाठी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर बगाडे रस्त्यावरील त्या काळी एकशे दहा वर्षांपूर्वीच्या फडके वाड्यातील जागा त्यांना पसंत पडली आणि भाडेतत्त्वावर मिळालीसुद्धा.

बगाडे रस्ता हा त्या काळी लक्ष्मी रस्त्यासारखा वर्दळीचा रस्ता होता. या रस्त्यावर कुंभार समाज, कासार सामाजाची तांबट आळी, मोतीवाला चौकात मोत्याची दुकानं, सोन्या मारुती चौकात सोनाराची दुकानं, बोहरी आळीत होम डेकोरची दुकानं आणि नेहरू चौकात मंडई होती. अजूनही मंडई आहे म्हणा; पण त्या काळी ही मुख्य मंडई होती. पुढे कापड गल्ली. शेतीची अवजारे, शेतसामान, बी-बियाणांची दुकानं, असं करत स्वारगेटपर्यंत हा रस्ता जातो. त्यामुळे हा रस्ता पंचक्रोशीतल्या लोकांकरिता खरेदीचा आणि धंदेवाल्यांसाठी विक्रीचा रस्ता होता. आजूबाजूच्या परिसरातून अनेक भाजीवाले शेतातील भाजी, दुधवाले दूध घेऊन पुण्यात यायचे आणि मालाची विक्री करून परत जायचे. धंदा करून दमलेल्या जीवाला आणि रिकाम्या पोटाला आधार म्हणून काहीतरी खायला लागायचं. त्यांच्याकरिता वैद्य उपाहारगृह ही हक्काची जागा होती. तिथे मिळणारी मिसळ-पुरी, भाजी-पुरी, भजी, बटाटा वडा, शिरा, चहा त्यांच्या परतीच्या वाटेवरील भुकेची गरज भागवत असे.

मिसळ हा त्यातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ होता. कारण वैद्य उपाहारगृहात मिळणारी मिसळ ही इतरांपेक्षा वेगळी, पोटभर आणि दिलेल्या पैशाला पुरेपूर न्याय देणारी होती. वैद्य उपाहारगृहात १९१० पासून मिसळ मिळतेय. मिसळीचा शोध त्यांनी लावला असा त्यांचा अजिबात दावा नाही; मात्र काळाच्या ओघात जोगळेकर, संतोष भुवन ही अठराव्या शतकाच्या शेवटाला सुरू झालेली उपाहारगृहे बंद पडल्यानंतर गेल्या ११५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेले आणि मिसळ मिळणारे सर्वात जुने ठिकाण ही वैद्य उपाहारगृहाची ओळख कधीही पुसली न जाणारी आहे.

पुण्यातील पेठांच्या परिसरात पूर्वी अनेक नाट्यगृहं होती. ही नाटके तीन-चार अंकी असत आणि दोन अंकांमधील मध्यंतर ३०-४० मिनिटांचे असायचे. त्यामुळे नाट्यगृहांच्या परिसरातील हॉटेलं चालायची. नाटकांच्या प्रेक्षकांकरिता रात्रीच्या वेळी उसळ-पुरी, बटाटा वडा, भजी अशा गोष्टी केल्या जायच्या. त्या शंभर टक्के संपायच्याच असं नाही. मग उरलेल्या पदार्थांमधून मिसळीचा जन्म झाला, असं दीपक जोशी सांगतात. दुसऱ्या दिवशी बटाटा वड्याचं सारण, त्यावर मटकीची उसळ, क्रंचीपणाकरिता भजी आणि वडे करताना तयार होणारा चुरा हे पदार्थ वापरून मिसळ तयार केली जायची. वैद्य उपाहारगृह नाट्यगृहांच्या परिसरापासून दोन रस्ते दूर असल्याने त्यांच्याकडे रात्री नाट्यरसिक येण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी, रघुनाथ वैद्य यांनी सकाळी सर्व पदार्थ ताजे तयार करून मिसळ द्यायला सुरुवात केली. त्यातूनच आता त्यांच्याकडे मिळणाऱ्या मिसळीचा जन्म झाला.

मिसळ हे पूर्णान्न आहे, असं जोशी सांगतात. पोहे, बटाटा भाजी, मटकीची उसळ, शेव, चिवडा यामधून कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, स्टार्च यांचा सुयोग्य बॅलन्स साधून एक पोटभर आणि चविष्ट पदार्थ तयार होतो. वैद्य यांच्याकडे मिळणारी मिसळ सुक्या प्रकारात मोडणारी आहे. त्यात टाकण्यात येणारी शेव आणि चिवडा दररोज सकाळी ताजा तयार केला जातो. मिसळीच्या ओल्या भागासाठी एक वेगळी रेसिपी तयार करण्यात येते. त्यावर कोकणाचा पगडा आहे. कांदा, आलं-लसूण, हिरवी मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर याचं वाटण आणि चिंचेचं पाणी यातून तयार होणारा रस्सा मिसळीसोबत; पण वेगळ्या वाटीत दिला जातो.

जो अमर्यादीत असतो. इथल्या कोणत्याही पदार्थामध्ये लाल तिखटाचा वापर केला जात नाही; परंतु हिरव्या मिरचीचा तिखटपणा पदार्थांमध्ये उतरलेला दिसतो, जो शरीराला बाधत नाही. साधारण १९३०-३२च्या सुमारास पुण्यात टोमॅटो मिळायला लागला. तेव्हा आंबटपणासाठी हिरव्या टोमॅटोचा वापर सुरू झाला. हा टोमॅटोवगळता १९१० पासून इतर जिन्नसांमध्ये कोणताही फरक करण्यात आलेला नाही. मिसळीसोबत पूर्वी पुरी मिळायची. थालीपीठ, घावणदेखील दिलं जायचं; पण ते तयार करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ हळूहळू कमी होत गेलं. पुढे १९४०च्या दशकात पूना बेकरी सुरू झाल्यानंतर ब्रेड स्लाईस द्यायला सुरुवात झाली. आजही पूना बेकरीचाच ब्रेड स्लाईस मिसळीसोबत मिळतो. पूर्वी संपूर्ण लोफ यायचा आणि ऑर्डरनुसार त्याचे स्लाईस करून दिले जायचे; मात्र आता स्लाईस कट होऊनच येतात, हाच काय तो फरक.

पूर्वीपासूनच बाजारात अनेक चवीच्या मिसळ आहेत. त्या प्रत्येकीची तऱ्हा वेगळी आहे, म्हणूनच त्याचे नाव मिसळ आहे. दीपक जोशी सांगतात, प्रत्येक मिसळीच्या चवीची जिभेला सवय लावावी लागते. आमच्याकडे ३० टक्के लोकं अशी आहेत, जी गेली २०-३० वर्षे दररोज मिसळ खात आहेत. नवीन पिढीदेखील तितक्याच आवडीने आमची मिसळ खाते. सुरुवातीला शेतकरी, दुधवाले, मग टांगेवाले, मग रिक्षावाले, आजूबाजूच्या परिसरातील दुकानात काम करणारी माणसं, त्यांचे मालक, पुण्याच्या इतर भागातील लोकं आणि पुण्याबाहेरून येणारी माणसं असा वैद्य उपाहारगृहातील मिसळीच्या खवय्यांचा बदलत गेलेला चेहरा आहे. वैद्यचा मेन्यू फळ्यावर लिहिलेला आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ या महिन्यांमध्ये आंबेडाळ मिळते. प्रसादाचा शिरा असतो. बटाटा वडा, बटाटा भजी आणि ऑर्डरनुसार कांदा भजी मिळते. मटारच्या सीझनमध्ये मटार उसळ असते.

चहासाठी येणाऱ्या दुधवाल्यांकडून मुबलक प्रमाणात चिक मिळत असल्याने आता खरवसही तयार केला जातो. इथला चहा स्पेशल आहे. त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर केला जात नाही; मात्र चांगल्या प्रतिचे दूध आणि सर्व घटकांचे योग्य मोजमाप यामुळे वर्षानुवर्षे इथल्या चहाची चव तीच आहे. प्र. के. अत्रे पुण्यातील जोगेश्वरी परिसरात राहायचे. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकवत असताना, वाटेत वैद्यची मिसळ खात असल्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहे. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. स. खांडेकर यांच्या आत्मचरित्रातही वैद्यचा उल्लेख सापडतो. इतकंच नव्हे तर १९१२ साली कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर चहा आणि मिसळ हे मराठीतले दोन नवीन शब्द त्यांना कळल्याचा गमतीदार उल्लेख आहे. गायक वसंतराव देशपांडे, हार्मोनियम वादक अप्पा जोगळेकर आणि विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी वैद्यच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये मिसळीचा आस्वाद घेतलेला आहे.

Pune Food Culture

रघुनाथ रामचंद्र वैद्यांनंतर त्यांचा मुलगा त्रिंबक रघुनाथ वैद्य यांनी १९२८ ते ८७ पर्यंत उपाहारगृहाची धुरा सांभाळली. त्यांना मुलगा नसल्याने आईच्या पिढीतील कुणीच इथे आले नाही; पण मग चौथ्या पिढीतील दीपक जोशी काहीशा अनिच्छेने येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी म्हणून आपली तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडून हा डोलारा सांभाळू लागले; परंतु आता अतिशय प्रेमाने ही परंपरा चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मालकांप्रमाणे येथील कामगारांचीही चौथी पिढी आहे. हे सर्वजण कोकणातील महाड परिसरातील आहेत. कामगारांच्या सोयीसाठी वैद्य उपाहारगृह शिमग्याच्या दोन दिवस आधीपासून गुढीपाडव्यापर्यंत जवळपास वीस-बावीस दिवस बंद असतं आणि मग रामनवमीच्या सुमारास पुन्हा खुलं होतं. सव्वादोनशे वर्षं जुना फडकेवाडा आजही मजबूत आहे आणि त्याच्या अर्ध्या वयाचे वैद्य उपाहारगृह अजूनही आपला चार्म टिकवून आहे. वाड्याच्या लाकडी तुळया, भिडाची टेबलं, आजूबाजूचे आरसे, राजा रवी वर्माचं पेंटिंग आणि ११५ वर्षं जुनी भट्टी हे सर्व याची देही याची डोळा पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. इथे प्रवेश करताना टाईमट्रॅव्हलमध्ये गेल्यासारखं वाटतं. म्हणूनच ही परंपरा अखंडित सुरू राहावी, हीच इच्छा मनी बाळगून, तृप्तीचा ढेकर देत लोकं इथून बाहेर पडताना दिसतात.

शिल्प खजाना

ओंकार वर्तले - ovartale@gmail.com

सासवणे हे गाव कोकणच्या देखण्या परंपरेच्या पंक्तीत बसणारे. या गावात आहे करमरकर शिल्पालय. हे शिल्पालय म्हणजे पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध शिल्पकार कै. विनायक तथा नानासाहेब पांडुरंग करमरकर यांचे राहते घर. या घरातच करमरकर यांनी घडवलेली शिल्पे पर्यटकांसाठी मांडून ठेवली आहेत. यातील प्रत्येक शिल्पाची एक कहाणी आहे. यात आपण नकळत गुंतून जातो.

अलिबागला भेट दिली नाही, असा एकही समुद्रावर प्रेम करणारा दर्दी पर्यटक तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पर्यटनासाठी आपली एक तरी वारी या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर होतच असते. याला कारण मुंबईच्या जवळ असणारे रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पर्यटक अलिबागमध्ये ठरावीक स्थळांना भेट देतात आणि परततात; परंतु अलिबागच्या अगदी जवळच असलेल्या मानवनिर्मित शिल्पांच्या अद्भुत खजिन्याला भेट देत नाही. सुरुवातीला अनेकांना काहीसा धक्का बसेल की हे प्रकरण नक्की आहे तरी काय? यासाठी तुम्हाला अलिबागजवळ असलेल्या सासवणे गावचा रस्ता पकडायला लागेल.

सासवणे हे गाव कोकणच्या देखण्या परंपरेच्या पंक्तीत बसणारे. इथल्या सौंदर्याची सारीच परिमाणे हे गाव घेऊन उभे आहे. या एकाच ओळीत या गावचा महिमा आला. अलिबागकडून रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावर १८ किलोमीटरवर सासवणे गाव आहे. या गावात आलो की करमरकर शिल्पालय कुठे आहे, हे विचारले तर इथले ग्रामस्थ मोठ्या आनंदाने ही जागा दाखवतील. मग आपणही या आगळ्यावेगळ्या ठिकाणी यायचे. हे शिल्पालय म्हणजे पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध शिल्पकार कै. विनायक तथा नानासाहेब पांडुरंग करमरकर यांचे राहते घर. या घरातच करमरकर यांनी घडवलेली शिल्पे पर्यटकांसाठी मांडून ठेवलेली आपल्याला दिसतात. थोडक्यात एकेकाळी वास्तव्य असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरामध्ये हे शिल्पालय साकारले आहे. हे शिल्पालय पाहण्याअगोदर तुम्हाला करमरकर नावच्या अवलियाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.

तसे पाहिले तर करमरकर यांच्या कलेची आणि त्यांनी उभारलेली शिल्पे कळत-नकळत आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला, भारतभर फिरताना, मोठ्या शहरात पाहिलेलीही असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक शिल्पे करमरकर यांनी घडवली. पुण्याच्या शिवाजी प्रीपरेटरी स्कूलच्या आवरात असलेले शिवरायांचे अश्वारूढ असलेले शिल्प तर खूपच प्रसिद्ध झाले. या देखण्या शिल्पामुळे करमरकर यांचे नाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घराघरांत पोहोचले; पण केवळ शिव-पुतळा निर्माता हीच त्यांची ओळख नसून अनेक नावीन्यपूर्ण कलाकृती घडविणारे एक महान शिल्पकार म्हणून ते त्या काळात प्रसिद्ध होते.

२ ऑक्टोबर १८९१ रोजी सासवणे या त्यांच्या गावातच जन्माला आलेले करमरकर हे शिल्पकलेत रमणारे एक अजब व्यक्तिमत्त्व होते. वडील हे गणेश मूर्तिकार. बहुधा त्यांच्यातूनच ही कला या विनायक यांच्यात झिरपली. हा वारसा मग वयपरतत्वे वाढू लागला. लहान वयातच त्यांची कला भिंतींवर, आजूबाजूच्या मंदिरात बहरू लागली. अशातच त्यांनी एक अश्वारूढ शिवरायांचे चित्र काढले आणि अलिबागचे तत्कालीन कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांनी ते पाहिले. त्यांना या चित्राची भुरळ पडली आणि त्यांनी काळाची पावले ओळखून मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे दरवाजे करमरकरांसाठी किलकिले केले. मग करमरकर यांनी पुढील आयुष्यात कधी मागे वळूनच पाहिले नाही.

एका दृष्टीने या इंग्रज अधिकाऱ्याच्या दूरदृष्टीचेच कौतुक करायला पाहिजे. कलेचे शिक्षण घेत असतानाच त्यांना ‘लॉड मेओ’ हे मानाचे पदक मिळाले. ही नवल वार्ता रवींद्रनाथ आणि सुरेंद्रनाथ या टागोर बंधूंना समजली आणि या टागोर बंधूंनी करमरकरांना कलकत्त्याला आमंत्रण धाडले. काही काळ त्यांनी या वंगभूमीत वास्तव्य केले. याच काळात टाटांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठवले. परदेश वारी करून ते पुन्हा मुंबईत परतले. मग त्यांनी मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला.

याच स्टुडिओत कालांतराने त्यांनी शिवरायांचे भव्य अश्वारूढ शिल्प घडवले आणि मग ते महाराष्ट्रात कमालीचे लोकप्रिय ठरले. पुण्याच्या श्री शिवाजी मिलिटरी स्कूलमधील त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळा हा मैलाचा दगड ठरला. आजही हे शिल्प आपल्याला मोहून टाकते आणि मग त्यांनी मागे वळूनच पाहिले नाही. बेल्लूर मठातील रामकृष्ण परमहंस यांचे संगमरवरी शिल्प, मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल यांचे शिल्प असो, की उच्च न्यायालयाच्या आवारातील जस्टीस मुल्ला यांचा पुतळा ही सारी शिल्पे त्यांच्या अभिजातपणाचीच उदाहरणे. त्यांनी विविध राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांना कलेचा चेहरा दिला आणि शिल्पांच्या माध्यमातून भारतभर अनेक ठिकाणी उभारला.

भारत सरकारनेदेखील त्यांच्या कार्याचा गौरव पद्मश्री पुरस्कार देऊन केला. अशा या कलाकाराचे १३ जून १९६७ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईच्या देवनार येथील स्टुडिओमधील अनेक शिल्पे सासवण्याच्या राहत्या घरात हलविण्यात आली. नंतर याच राहत्या घराचे मग रूपांतर झाले ते अद्वितीय अशा संग्रहालयात. एखाद्या कलावंताचे घरच संग्रहालयात रूपांतरित होणे ही तशी दुर्मिळ आणि आपल्या भाग्याचीच गोष्ट. २ ऑक्टोबर १९८६ रोजी त्यांच्या शिल्पांचे अधिकृत शिल्पालयात रूपांतर करण्यात आले. आणि मग महाराष्ट्रातील अवघ्या रसिकांसाठी हे दालन सताड उघडे झाले. ज्याचे शिल्पांवर प्रेम आहे त्याने तर हा खजिना न चुकवावा असाच. थोडक्यात या संग्रहालयाला शिल्पकलेची पंढरीच म्हणायला हवे. याला कारण म्हणजे करमरकरांनी साकारलेली, स्वतः घडवलेली शेकडो शिल्पेही येथे पाहता येतात. खास कोकणी टच लाभलेल्या टुमदार घरासमोर आलो, की करमरकर शिल्प संग्रहालय ही पाटी आपल्याला कंपाउंडच्या आत बोलवते. या संग्रहालयाचे शुल्क अगदी नाममात्र. कौलारू दुमजली घर हेच ते संग्रहालय.

साधेपणा हाच याचा आत्मा. एकदा का याच्या आवारात शिरलो की मग हे शिल्पालय आपल्याशी बोलू लागते. उलगडायला लागते. तुम्ही कलेचे भोक्ते असा वा नसा. हे शिल्पालय तुमच्या मनाचा ठाव घेतेच. अगदी बागेपासून आपला कलेचा प्रवास सुरू होतो. शिल्पालयाच्या दारातच आपल्याला अगदी सजीव वाटतील, अशी शिल्पे दिसतात. यातलाच म्हशीचा पूर्णाकृती पुतळा आपल्याला हात लावून खात्री करण्यास प्रवृत्त करतो, इतका हुबेहूब आहे. हे शिल्प तर इतके वास्तवदर्शी आहे की कोणत्याही क्षणी ही म्हैस उभी राहणार की काय, असे वाटते. याशिवाय अंगणात अनेक प्राण्यांची, माणसांची शिल्पे पाहता येतात. हे पाहत आपण आत शिरायचे. जिन्याने वर वळतानाच एक शिल्प आपल्याला थांबवते. आई तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना त्या तलवारीतून आशीर्वाद देतानाचे हे शिल्प आतल्या कलेची चुणूक दाखवते. पहिल्या पायरीवरच हाती भाला घेतलेल्या मनुष्याचे शिल्पही खासच. वरच्या मजल्यावर गेलो की मग हे दालन अधिकच खुलते. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, आचार्य कृपलानी, न. चिं. केळकर आणि अशी कितीतरी व्यक्तिचित्रे त्यांनी जिवंत केली आहेत. गांधीजींच्या पुतळ्यासाठी स्वतः गांधींनी सीटिंग दिल्याचीही माहिती मिळून जाते. थोडक्यात हा वरचा मजला म्हणजे अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वाची मांदियाळी साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. एकेक शिल्प पाहताना वेळेचेही भान राहत नाही. प्रत्येक व्यक्तिमत्त्व फुलवताना त्यांनी घेतेलेल कष्ट आणि सूक्ष्म निरीक्षण हे वादातीत. मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचा त्यांनी केलेला दांडगा अभ्यासही आपल्याला कळून जातो.

केवळ माणूसच नव्हे तर कुत्रा, मांजर, माकड, त्यांची पिल्ले अशी प्राण्यांची शिल्पेही आहेत. त्यांच्या घरी काम करणारे नोकर, नातेवाईक, कुटुंबातील व्यक्ती या शिल्पासह कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांना इथे शिल्परूपाने साकारले आहे. त्यांच्या शिल्पांमधील बारकावे इतके सूक्ष्मपणे दाखवलेले आहेत की आपण मंत्रमुग्ध होतो. त्यांच्या शिल्पांची मांडणी, रचनाबंध आणि भाव यामुळे ती सजीव वाटतात. या शिल्पांमध्ये ब्रॉन्झ, संगमरवर, सिमेंट, प्लास्टर ऑफ पॅरिस अशा वेगवेगळ्या माध्यमातील नमुने आपल्याला पाहायला मिळतात. गोगलगायीच्या शंखावर बसलेल्या अंध युवतीचे बॉम्बे आर्ट सोसायटीचे प्रथम पुरस्कारप्राप्त शिल्प आणि १९२४ मध्ये निर्मिलेले ‘शंखध्वनी’ (Conch Blower) करणाऱ्या नग्न युवतीचे शिल्प यांसारख्या दुर्मिळ, उत्कृष्ट आणि शंभर वर्षांपेक्षा प्राचीन शिल्पांचे याची देही याची डोळा दर्शन मिळते. स्वत:च्या मुलीची वेगवेगळ्या वयातील आणि भावविश्वातील शिल्पे पाहताना त्यांच्यातला वडील आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच प्रत्येक शिल्पात कलेची, कारागिरीची जादू तर आहेच; पण शिवाय प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य विनायक पांडुरंग करमरकर यांनी मूर्ती घडवताना जागृत केलेले दिसते.

एकंदरीतच प्रत्येक शिल्प हे वेगळ्या धड्यासारखे आहे. त्याची प्रत्येकाची एक कहाणी आहे. यात आपण न कळतपणे गुंतून जातो. डोळ्यात आश्चर्याचे भाव दाटतात. डोक्यात असंख्य प्रश्नांचा गुंता होतो. शिल्पांच्या उच्च निर्मिती-मूल्याची ओळख मनाला होते आणि आपण या कलेच्या सापळ्यात अलगद अडकत जातो. शिल्पांची छायाचित्रे काढताना आपण थकून जातो आणि मग हा उपद्व्याप आपण सोडून देतो. किती फोटो काढणार? ही सारी शिल्पे निर्जीव पण अचानकपणे आपल्याशी कधीही बोलू लागतील की काय, असे काही क्षण वाटूनही जाते आणि हे असे वाटणे हेच या कलेची श्रीमंती दाखविणारे आहे.















 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...