Friday, July 18, 2025

गोलकोंडा.. Click… Capture (by Army)

 https://dhavalr.wordpress.com/

साल २०१८. हैदराबाद मध्ये काम करत असताना हैदराबाद भटकंती साठी वेळ असा मिळतंच नव्हता. एके दिवशी ऑफिसमध्ये अशाच गप्पा टप्पा मारताना एक निरंतर बडबड करणारा बंगाली सहयोगी ‘रणजीत पाल’ म्हणाला की शनिवार-रविवारी तो एकटाच असतो आणि हैदराबाद बघण्याची खूप इच्छा आहे. मलाही हैदराबाद बघायचेच होते. मग काय, तिथल्यातिथे आमचा येणाऱ्या रविवारी सुप्रसिद्ध गोलकोंडा किल्ल्यावर धडक द्यायचा बेत पक्का ठरला.

२७ मे चा रविवार उजाडला. सकाळी सकाळी मी मनिकोंडाला जाऊन माझा वीकएंड स्पोर्ट बॅडमिंटन खेळून आलो. दुपारी खिचडी खाल्ली आणि बाबूमोशायला फोन केला, असे बघायला की रविवारपर्यंत त्याचा गोलकोंडा बघायची इच्छा आणि शक्ती अजून टिकून आहे की नाही! सुदैवाने त्याने आधीच्याच उत्साही स्वरात होकार कळवला.

आम्ही हैद्राबादच्या रखरखीत उन्हाळ्यात दुपारी ३ वाजता भेटायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे मी माझी लाडकी बाईक TVS Victor घेऊन निघालो, रणजित ला वाटेत उचलले आणि रस्त्याच्या डांबरातून वर उठणाऱ्या उकळत्या वाफेचे चटके खात गोळकोंडाकडे मार्गस्थ झालो. वाटेत रणजितची बडबड चालू होती त्यामुळे आम्ही काही वेळातच गोलकोंडाच्या गेटवर पोचलो. बघतो तर त्या उन्हातही ही तूफान गर्दी ! बुरखा घातलेल्या बायका, त्यांची डझनभर  चिल्ली-पिल्ली, खिदळणारी तरुण मुले, नटून थटून आलेल्या तरण्या मुली, वयस्क जोडपी, आणि त्या जत्रेत आम्ही दोघे, एक मुंबईचा मराठी आणि एक बंगालचा बाबू असे गोलकोंडा किल्ल्यात रवाना झालो.

thumbnail (5)

रणजीत आणि मी – गोलकोंडा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी ‘फतेह दरवाजा’ (किल्ला जिंकल्यावर औरंगजेब याच दरवाज्याने आत गेला होता)

अंदाजे ३६५ पायऱ्या चढून वरती गेल्यावर काही अजस्त्र शिळांवर बांधकाम करून एक भव्य वास्तू उभी केलेली दिसते.

thumbnail (4)

शिळांच्या भक्कम पायावर उभारलेले अफलातून बांदकाम

thumbnail (1)

अजूनही काही वास्तू किल्ल्यावर आहेत. पण मुख्य म्हणजे किल्ल्यावरून दिसणारा अख्या हैद्राबादचा विस्तीर्ण, नेत्रदीपक नजारा. वरती आमच्यासारखाच एक भटक्या भेटला. तो म्हणाला की काही वर्षांपूर्वीपर्यंत किल्ल्यात लोक यायचे आणि मातीत काही शोधात बसायचे. मी म्हटलं एवढे काय लपवले होते या किल्ल्यात? तर म्हणाला की इथे जमिनीत गाडले गेलेले हिरे आता आतापर्यंत लोकांना मिळायचे. जुन्या काळात हा किल्ला हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि कोहिनूर हिरा ही इकडचाच आहे. वाह, मी तर काही वेळ वरून किल्ल्याचा खालचा परिसर बघतच राहिलो, चुकून कुठे काही चमकलेले दिसले तर?

thumbnail (2)

आता सेल्फीसाठी इकडे बघत आहे, पण बराच वेळ मी खाली जमिनीत काही चमकत आहे का ते बघत होतो

किल्ल्याच्या मागच्या बाजूला गेलो तर काही मैल अंतरावर हिरव्या हिरव्या झाडांच्या कुशीत कुतुबशाही tomb आपापल्या जागी निवांतपणे बसलेत असे सुंदर दृश्य नजरेस पडले.

तारामतीच्या कुशीत
किल्ला बघून आम्ही खाली उतरलो तेव्हा ५ वाजले होते. आम्हाला गोलकोंडा किल्ल्यातील लाईट & साऊंड शो पण बघायचा होता पण इंग्रजी शो थेट ७ वाजता होता. त्यामुळे आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही तेथूनच अंदाजे ५ कि. वर असलेल्या दुसऱ्या ऐतिहासिक आणि अद्भुतरम्य अशा ‘तारामती बरदारी’ ही वास्तू बघण्यास TVS Victor ला टाच मारली. तिथे जाण्याचा रस्ता आर्मी कॅन्टोन्मेंट मधून जात असल्यामुळे त्या उन्हातही अतिशय रम्य वातावरण होते.

तारामती बरदारीच्या प्रशस्त वाहनतळात आलिशान गाड्यांच्या मधोमध माझी Victor टेकवली. उजवीकडे वरती एक  सुंदर,सुबकशी वास्तू नजरेस पडत होती. आजूबाजूला वर्दळ नसल्यामुळे सर्वत्र शांतता पसरली होती. तेथे खालीच एक खाजगी हॉटेल दिसले, पण त्याची उच्चअभृ थाटणी बघून आम्ही जाण्याचा मोह टाळला. हे खर्चिक आकर्षण मागे सारून आम्ही तारामतीच्या जवळ पोचण्याच्या आतुरतेने मुख्य द्वारापाशी गेलो आणि माना आपोआप खाली गेल्या. द्वार तर चक्क बंद होते. ५ मिनिटे इकडे तिकडे बघितलं आणि निघणारच तेवढ्यात एक खाकी कपडे घातलेला इसम हलत डुलत आमच्यापाशी येताना दिसला. स्वारी जशी पोचली तसे आम्ही धडाधड चौकशीसाठी प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्या. त्याने सरकारी नोकराच्या थाटात निवांतपणे सांगितले की ५ वाजेपर्यंतच वेळ असते आणि आता बंद आहे, तुम्हाला परत यावे लागेल. आम्ही सांगून बघितले की खूप लांबून आलो आहे वगैरे, पण  काही उपयोग नाही झाला. शेवटी निराश होऊन आम्ही वळलो आणि मी लगेच रणजीतला थांबवले. सरकारी नोकर असल्याकारणाने एक शेवटची युक्ती अवलंबवायचे ठरले. मी त्या खाकीवाल्यापाशी गेलो आणि आर्जवी स्वरात परत विनवले, आणि हळूच आम्हाला जाऊ दिल्याच्या बदल्यात तुम्हालाही फायदा होईल असे सुचवले. ही मात्रा लगेच लागू पडली आणि द्वार आमच्यासाठी खुले झाले.

लगबगीने आणि त्याने विचार बदलण्याच्या आत आम्ही आत सटकलो. आत प्रशस्त हिरवेगार लॉन पार करून आम्ही पायऱ्यांपाशी पोचलो. आहाहा काय सुंदर रस्ता होता. एक एक पायरी चढत व वर उभी तारामती बरदारी न्याहळत आम्ही वर पोचलो. वेळ टळून गेल्यामुळे तेथे आता फक्त आम्ही दोघेच होतो. आता ऊनही जरा कमी झाले होते आणि उंची गाठल्याने वारेही जरा थंड होते.

thumbnail (7)

तारामती बरदारीची ऐसपैस वास्तू

या तारामती बारदारी मधून सरळ बघितले तर गोलकोंडा किल्ला आणि त्यावरची वास्तू स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात रणजीतने त्याच्या बंगाली ढंगात शंका उपस्थित केली, “साला यहाँ से तारामती की आवाज गोलकोंडा तक कैसे सुनाई देगा?” जो जास्त फिरलेला नाही अशा कोणाकडून अशी शंका रास्तच होती. कारण त्याच्या नशीबात किल्ल्यावर बसून खाली गावातल्या रेडिओचा आवाज ऐकण्याचे भाग्य नसते. मी दोन मिनिटे डोळे बंद केले आणि विचार केला, त्या काळात आजसारखी वाहने नव्हती, त्यांचा आवाज नव्हता, हवेतले प्रदूषण नव्हते. मग का इथे रात्रीच्या धीरगंभीर शांततेत गात बसलेल्या तारामतीचा मधुर आवाज तिथे गोळकोंड्यात लोडाला टेकून बसलेल्या कुतुबशाहला वेड लावणार नाही. डोळे उघडले आणि रणजीत कडे फक्त बघितलं, त्याला हे सांगून काही उपयोग नव्हता, पटलेही नसते.

FB_IMG_1590635351163

तारामती बरदारी मधून गोलकोंडा किल्ला सहज डोळ्यांनाही दिसतो. त्या काळी तारामतीचे गायन गोलकोंडा वरून ऐकायला मिळाले असते तर…

मी त्या चौथऱ्यावर बसलो जिथे तारामती बसत असणार. त्या पटांगणात फिरलो जिथे तारामती फिरत असणार, त्या गोळकोंड्याकडे बघितले ज्याकडे तारामती टक लावून बघत असणार, असे मनसोक्त इतिहासात डुंबून झाल्यावर आम्ही त्या वास्तूला आणि आम्हाला वर सोडणाऱ्या खाकीवाल्याला निरोप दिला आणि परत साऊंड आणि लाईट शो साठी गोलकोंडा किल्ल्याकडे Victor दामटली.

आलोच… फ़सलोच
परत जाण्याचा रस्ता आलो तोच होता. परत आर्मी कॅन्टोन्मेंट, दुतर्फी झाडांची सुंदर रांग असलेल्या रस्त्यावर चाललो होतो की तेवढ्यात मला झाडांच्या रांगेमधून समोर टेकडीवर गोलकोंडा किल्ला दिसला. असे सुंदर दृश्य दिसताच मी नेहमी करतो ते केले, बाईक बाजूला थांबवली, कॅमेरा काढला आणि त्या सुंदर दृश्याचा फोटो काढला. कॅमेरावरचे क्लीक दाबताच एका शिट्टीचा आवाज ऐकू आला, जणू क्लीकला प्रतिसाद म्हणून शिट्टी वाजली असावी. बघितले तर आर्मी वेशातील एक जवान हातवारे करून आम्हाला त्याच्याकडे यायला सांगत होता.

बाईक ढकलत ढकलत त्याच्यापर्यंत पोचलो. पोचताच त्याने आर्मी गुर्मीत विचारले, “क्या कर रहे थे?” मी म्हटलं गोलकोंडा किला का फोटो ले रहे थे. त्याने आम्हाला नीट न्याहाळले आणि कडक स्वरात विचारले, “यह आर्मी एरिया है. आपको पता नही की आर्मी एरिया में फोटो लेना मना है.”

अर्रेचा हे तर माझ्या लक्षातच आले नव्हते. त्याने आधी आमचे ID कार्ड मागितले. रणजीतने आणि मी आपापली आधार कार्ड निमूटपणे काढून दिली. कोण तुम्ही, कुठे राहता, कुठे काम करता, कुठल्या गावचे वगैरे वगैरे सगळी झाडाझडती पूर्ण झाली. मग त्याने माझा कॅमेरा मागितला. मी लगेच काढून त्याच्या हवाले केला. फोटो बघण्यासाठी तो इकडचं तिकडचं बटण दाबायला लागला. हे बघून मीच त्याला फोटो उघडून दिले. मग त्याने मेमरी कार्ड मधले आमचे सगळे फोटो बघितले. त्यात गोलकोंडा किल्ल्यावरचे आमचे दोघांचे येड्या बागड्या पोज मधले फोटो होते, किल्ल्याचे फोटो व किल्ल्यावरून काढलेले फोटो होते, तारामती बरदारीचे फोटो होते आणि सर्वात वर गरमागरम, ताजा आर्मी कॅन्टोन्मेंट मधून गोलकोंडा किल्ल्याचा नुकताच काढलेला फोटो होता. फोटोमध्ये झाडांच्या रांगांमधून गोलकोंडा किल्ला आणि नेमके याचबरोबर बाजूला आर्मी रंगाने रागावलेल्या भिंतीही टिपल्या गेल्या होत्या. आणि गोची नेमकी इथेच झाली होती. आर्मी भिंती फोटो मध्ये कशा आणि का? फोटो बघितल्यावर तो जवान कॅमेरा घेऊन तडक गेटच्या आत गेला आणि कोणाशीतरी बोलायला लागला. आमच्याकडे बोट दाखवून आणि कॅमेरा दाखवून तो आमच्या गुन्ह्याचे तपशील कोणा वरचा हुद्दा असलेल्या ऑफिसरला देऊ लागला.

एव्हाने रणजीत कावरा बावरा झाला होता. तो जवान बाहेर यायची वाटच बघत होता. बहुतेक त्यांचा काही निकाल लागला नाही आणि माझा कॅमेरा घेऊन तो जवान परत आमच्याकडे आला. मला वाटलं आता रणजीत त्याच्या पाया पडणार. तो जवान गंभीरपणे म्हणाला, “पोलीस के पास देना होगा. यह सिरिअस मॅटर है.” हे ऐकून माझ्या डोक्यात चक्रे फिरू लागली आणि आजची रात्र एका पोलीस स्टेशन मध्ये दिसू लागली. म्हटलं चला एक नवीन अनुभव मिळेल. कारण फोटो एवढाही काही अतिरेकी नव्हता, त्यामुळे आज ना उद्या सोडून देणाराच असे तेव्हा वाटले. पण पोलीस हा शब्द ऐकून रणजीतचे धाबे दणाणले. त्याने भडाभडा बोलायला सुरुवात केली, “ऐसा मत करो सर. पेपर में हमारे फोटो देखेंगे तो माँ-डॅडी को कैसा लगेगा सोचिये सर. हम अच्छे घर के लडके है, कोई ऐसे वैसे लोग नही है सर. आप पोलीस में दोगे तो हम घरमें कैसे मूह दिखायेंगे, जॉब कौन देगा,” वगैरे वगैरे अशी बरीच सेंटी मारली. मी गुपचूप बाजूला उभा राहून काय होतंय ते बघत होतो. माझा मोठा भाऊ आर्मी मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे पण पोलिसांनी पकडले तर नावे फेकू शकतो, इथे हिरव्या पोशाखासमोर त्याचा काही उपयोग नाही असे म्हणून मी गप्प बसलो. ज्या अर्थी इतका वेळ होऊन काही हालचाल झाली नाही म्हणजे इतक्या लगेच ते पोलिसांना सांगणार नाहीत हे मी ओळखले. आता तो ही रणजीतची फिरकी घ्यायला लागला. एव्हाने अर्धा तास सहज उलटून गेला होता आणि आम्ही दोघे तिथेच आर्मी गेटवर अपराध्यांसारखे उभे होतो. ६ वाजले होते आणि संध्याकाळच्या ना उजेड ना प्रकाश अशा अवस्थेत दिवस पोचला होता.

इतक्यात एक पांढरी गाडी आली आणि गेटवर तपासासाठी थांबली. ती गाडी बघताच हा जवान पळत पळत गाडीपाशी गेला आणि कडक सॅल्यूट ठोकला. नक्कीच कोणी मोठा ऑफिसर असणार. गाडीच्या खिडकीमधून परत त्याने आधीचाच फोटोचा किस्सा सांगितलं, पण अतिशयोक्ती सोडून. अर्थात, ही आर्मी होती, बॉलिवूडचा हिंदी सिनेमा नव्हे. त्याने कॅमेरावरचा फोटो  दाखवला, परत आमच्याकडे बोट दाखवले आणि उभा राहिला. पुढची दोन मिनिटे गाडीत बसलेला ऑफिसर काय बोलला माहित नाही. जवानाने परत कडक सॅल्यूट ठोकला आणि आमच्याकडे आला. गाडी गेटमधून आत निघून गेली.

येऊन त्याने परत एकदा आम्हाला नीट न्याहाळले आणि म्हणाला, “तुम बच गये हो. अभी छोड रहा हूं. ऐंदा ऐसी हरकत मत करना.” असं म्हणून त्याने कॅमेरा माझ्या हातात दिला आणि जायला सांगितले. हुश्श. मी लगेच Victor ला किक मारली आणि मस्त संध्याकाळच्या हवेत एका अनपेक्षित संकटातून मुक्त झाल्याचा आनंद घेत घेत गोलकोंडा किल्ल्याकडे निघालो. एरवी निरंतर बडबड करणारा रणजीत आता चिडीचूप झाला होता. आर्मी कॅन्टोन्मेंट पार करून गोलकोंडा किल्ला समोर आल्यावरच त्याला कंठ फुटला.

लाईट आणि साउंड शो साठी अजून अर्धा तास अवकाश होता. तिकीट काढून परत रस्त्यावर आलो तर समोरच एक छोटासा कॅफे दिसला. मी रणजीतला ओढत ओढतच कॅफे मध्ये नेले आणि त्या AC वातावरणात एक थंडगार शेक प्यायला लावला, जेणेकरून त्याचे डोके जरा थंड व ताण जरा कमी होईल. त्या यथावकाश शेकने सुद्धा किमया साधली व त्याची पूर्वरत बडबड परत सुरु झाली. थोडा वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही आजूबाजूचा परिसर धुंडाळून आलो आणि शांत चित्ताने त्या दिवसाच्या अखेरच्या आकर्षणासाठी गोलकोंडा किल्ल्यात शिरलो.

thumbnail (6)

आर्मीच्या थरारक कोंडीनंतर गोलकोंडा किल्ल्यात लाईट आणि साउंड शो ची मजा घेत मी आणि रणजीत बाबू

दुपारपासून आम्ही ऐतिहासिक व कुतुबशाहाचा शिरपेच गोलकोंडा किल्ला बघितला, तारामती बर्दारी सारखी कलेचे काळीज असणारी वास्तू बघितली, गोलकोंडा लाईट आणि साउंड शो बघितला, कॅफे मध्ये थंडगार शेक प्यायलो. अर्ध्या दिवसासात बघण्यासाठी ही खूप सारी आकर्षणे आहेत, नाही का?. पण या सर्वांहून एक अनुभव जो कायम लक्षात राहील तो आहे फोटोमुळे आम्हाला आर्मी ने केलेली Capture!

वास्तविक मी नैरोबी, केनिया मध्ये असताना रोज सकाळी ऑफिसला जाताना आम्हाला इस्रायली एम्बसीच्या रस्त्यावरून जावे लागायचे. तेव्हा एवढ्या कडक सूचना होत्या की मोबाईल तर सोडा, गाडीत बसलेलो असताना मांडीवर ऑफिस बॅगही ठेवायची परवानगी नव्हती. त्याशिवाय अख्या नैरोबीत जेथे कुठे आर्मी कार्यालये असतील तिथे कॅमेरा सोडा, फोनही बाहेर काढायचा नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. अशा कडेकोट वातावरणाचा अनुभ असतानाही हैदराबाद मध्ये गोलकोंडा किल्ल्याजवळ आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये मला एका फोटोसाठी या सगळ्याचा विसर पडला होता.

तो फोटो तर त्या जवानाने कायमचा स्वर्गलोकी पाठवला पण माझ्या डोळ्यासमोर ते सुंदर गोलकोंडा किल्ल्याचे दृश्य, तो सुबक रस्ता आणि ती आर्मीची भिंत आजही जशीच्या तशी दिसत आहे!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...