Thursday, June 11, 2020

टाकळी, पळशी, जामगाव नि पारनेर

३.. जामगावचा भुईकोट  :

पारनेरपासून साधारण बारा कि.मी. वर असलेला व ज्यात महादजी शिंदे यांचा वाडा आहे, असा जामगावचा भुईकोट तथा नगरकोट निश्चितच पाहण्यासारखा आहे. सन १९५५ मध्ये हा व श्रीगोंदा येथील भुईकोट, असे दोन्ही भुईकोट महादजी शिंदे यांचे वंशज श्री. जिवाजीराजे शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात दिला असून आज या कोटात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने  शिक्षण पदविका महाविद्यालय चालविले जात आहे.


 पूर्वाश्रमीचे जामगाव भुईकोटाचे तथा  महादजी शिंदे यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार अर्थात आजचे रयत शिक्षण संस्थेचे अद्यापक महाविद्यालय प्रवेशद्वार 

जामगावचा हा भुईकोट सुमारे शहाऐंशी  एकरभर जागेत वसला असून त्याला कोट व परकोट अशी दुहेरी तटबंदी आहे आणि विशेष म्हणजे अजूनही ती बव्हंशी सुस्थितीत आहे. मागे असलेल्या टेकडीपर्यंत दोन्ही बाजूने ही तटबंदी वर चढवून हा कोट अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळेच कोटाचे आतले बाजूस, टेकडीवर, राजपरिवारासाठी असलेला वाडा, जणू बालेकिल्लाच आहे. या कोटास एकोणीस बुरुज नि चार दरवाजे आहेत; पैकी, यातील पूर्वाभिमुख प्रवेशद्वार सोडलं तर उर्वरित तीनही दरवाजे आजमितीला पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
पूर्वाभिमुख दरवाजातून आतमध्ये प्रवेश करताच डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर आपल्याला दगडी बांधकाम असलेलं एक मंदिर दिसते; ते राममंदिर असून त्यात राम- लक्ष्मण- सीता यांच्या मुर्ती आहेत तर त्याच्यासमोर एक छोटे घुमटीवजा मंदिर असून तेथील हनुमानाची मूर्ती चांगलीच भव्य अशी पंधरा फुट उंचीची आहे.  या राममंदिरासमोरच, दुसरे एक मंदिर असून ते विठ्ठल रखुमाईचे आहे. ही मंदिरे दुर्लक्षित असल्याने अस्वच्छही आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचे बंद केलेले दोन दरवाजे आहेत. दोन्ही मंदिरे पाहून परत वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. यात उजव्या बाजूला तीन कमानी असलेली एक मस्जिद दिसते तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारतही पाहायला मिळते.


भुईकोटाची बुरुजरचना 
शिंदे यांच्या वाडयालादेखील चहुबाजूने अखंड दगडी तटबंदी असुन या तटबंदीत मुख्य दरवाजाशेजारी दोन व तटबंदीमध्ये सहा असे भक्कम आठ बुरुज आणि पूर्व, पश्चिम व उत्तर अशा  तीनही बाजूस तीन मोठे दरवाजे आहेत. यातील पुर्वेकडील दरवाजा दगडांनी बंद केलेला आहे. मुख्य दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूने वरील बाजुस जाण्यासाठी जिना असुन दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्याही आहेत. किल्ल्याचा दरवाजा अजूनही भक्कम स्थितीत दिसत असून या बुरुजांवरून कोटाची संपूर्ण तटबंदी न्याहाळता येते. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात.

जामगाव भुईकोटातील अंतर्गत रचना .. वाड्याच्या चौकात महाविद्यालयाने फुलविलेली औषधी वनस्पती बाग 
शिंदे यांचा हा वाडा तीनमजली व दोनचौकी आहे. वाड्यासमोर उजव्या बाजूला दगडी बांधकामाची साधारण दिडेकशे फुट खोल अशी प्रशस्त विहिर असून विहीरीतील पाणी खेचण्यासाठी मोटेची व्यवस्थाही आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर छान नक्षीकाम असून त्यावर शिंदे घराण्याचे राजचिन्हही कोरलेले दिसते. चौकाच्या रचनेत दोन भाग तथा टप्पे असून खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही  टप्प्यांत आज छानपैकी बाग फुलविण्यात आल्याचे दिसते. वरच्या रचनेत बव्हंशी शोभेची तर खालच्या टप्प्यातील रचनेत सगळीच झाडे ही औषधी वनस्पती आहेत. हे दोन्हीं टप्पे एकमेकांना, दोन टप्प्यातील पायरीमार्गाने जोडलेले आहेत. या बागेला कर्मवीर भाऊराव पाटील औषधी वनस्पती बाग असे नावही दिलेले आहे. किल्याच्या तटबंदीबाहेरही सुंदर अशी सागबागही महाविद्यालयाकडून बनवण्यात आलेली असून एका बुरुजाच्या बाह्यबाजूस तसे लिहिलेले आढळून येते. खालील टप्प्यावरुन वर चढून गेल्यावर मुख्य दरवाजातून आत जाण्यापूर्वी भिंतींवर आजमितीला  आपल्याला कर्मवीरांच्या जीवन व कार्याचा पट आणि शिंदे राजघराण्याची वंशावळ व कार्य इ. नमूद केलेले दिसून येते. बाजूस, 'ही मालमत्ता खाजगी असून ती पाहण्यासाठी पूर्वपरवानगी व पाहण्यापूर्वी ओळखपत्र दाखवून तशी नोंदवहीत नोंद करणे आवश्यक असल्याचे तसेच झाडे, वनस्पती यांना हात न लावणे, पाणी जपून वापरणे, वाड्याच्या आतील व बाहेरील बाजूस, भिंती-बुरुजांवर काही लिहून विद्रुपीकरण न करणे नि विशेष म्हणजे वाड्याचे आतील व बाहेरील बाजूची छायाचित्रे काढू नयेत', असेही महाविद्यालयाच्या वतीने नमूद केलेले आहे.
राजदरबाराच्या चौकामध्ये असणाऱ्या प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम आहे. वाड्याच्या एका कोपऱ्यात महादेवाचे लहानसे मंदिर आहे. वाड्याच्या मजल्यावर जाण्यासाठी सोप्यांमध्ये दोन्ही बाजूला जिने काढलेले आहेत. वाड्यातील महालांना 'रंगमहाल', 'मछलीमहाल', 'आंबेमहाल' व 'मुदपाकखाना' अशी नावे दिलेली आहेत. वाड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची पडझड झालेली असून तिसऱ्या मजल्यावर भिंतीमधे काही ठिकाणी कोठारे आढळतात. वाड्याच्या भिंतीतही जंग्या असुन वाड्याच्या गच्चीवरून कोटाचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो.


 महाविद्यालयाने आपल्या आवारात जोपासना केलेला व रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असलेला  वटवृक्ष.. 
संपुर्ण कोट पाहाण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात. महाविद्यालयास सुट्टी असलेल्या दिवशी गेल्यास वाडा पूर्णपणे फिरता येतो. जामगाव किल्ल्याबाहेर असलेले मध्ययुगीन चक्रधर मंदीर देखील पाहण्यासारखे आहे.

४.. पारनेर  :

पुण्याहून आल्यास पुणे–अहमदनगर रस्त्यावरील शिरूर गाव ओलांडले की नदी पार केल्यानंतर आपण शिरूर, अर्थात पुणे हद्द संपवून पारनेर अर्थात अहमदनगर हद्दीत प्रवेश करतो. शिरूरहून  साधारणपणे साडेसात-आठ कि.मी. वर डावीकडे पारनेर फाटा लागतो. या फाट्याने आत साधारण चार-साडेचार कि.मी.वर सुप्रसिद्ध 'राळेगण (सिद्धी) हे गाव व त्या पुढे साधारण तेरा कि.मी. वर 'पारनेर' हे तालुक्याचे गाव लागते.
या गावची सीमा विस्तार-वाढीमुळे रुंदावली असून पूर्वी गावाभोवती असलेली तटबंदीही आज दिसत नाही; मात्र, गावच्या पूर्व व पश्चिम बाजुस वीस-पंचवीस फूट उंचीचे एकेक असे दोन दरवाजे व त्याच्या बाजूंस बुरुज तेवढे पहायला मिळतात. हे दोन्ही दरवाजे गावच्या बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याने एकमेकांना जोडले गेलेले आहेत.

पश्चिम दरवाजाच्या बाजूस दोन बुरूज असून पैकी एक आज पुर्णपणे नामशेष झालेला आहे तर दुसरा कसाबसा तग धरून आहे. शेजारीच एक मारुती मंदीर असून या मंदिरआवारात चार वीरगळ अर्धवट गाडलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. एक 'पंजात हत्ती पकडलेले शरभशिल्प' व एक 'कोरीव मुर्ती' असे दोन अवशेष मात्र मारुती मंदिराशेजारी उघड्यावरच ऊन, पाऊस झेलत तशाच पडून असलेले पहावयास मिळते.

पारनेरचा पूर्व दरवाजा 
पूर्व दरवाजाच्या बाजूसही दोन बुरूज असून यातील एका बुरुजावर बाहेरील बाजुस तीन दगडावर देवनागरी लिपीत एक शिलालेख कोरलेला दिसुन येतो. दोन्ही बुरुजांना बाहेर, खालील बाजुस पाणी बाहेर सोडण्यासाठी व्याघ्रमुखही बसविलेले आहेत. बाहेरील बाजुस समोरच एक कोरीव दगडी खांब असलेले प्राचीन शनी मारुती मंदीर असून या मंदिराच्या आवारात देखील एक 'शरभशिल्प, दोन विरगळ व एक तोफगोळा' असे अवशेष पडून आहेत. उजव्या बाजूस काही अंतरावर एक दगडी बांधकामातील चौकोनी आकाराची, वापरात नसल्याने मोठया प्रमाणात गाळ व कचरा साचलेली, पायरी-बारव असून तीमध्ये एका दगडावर देवनागरी लिपीत 'शके १६८८' असे कोरलेले आहे. समोरच काही अंतरावर एक दर्गाही दिसुन येतो. दुसऱ्या दरवाजापासून साधारणपणे तीनेकशे फुटांवर अधिक सुरक्षिततेच्या हेतुतून परकोटसदृश बांधकाम केलेले दिसत असून त्याचा दरवाजा मात्र आज ढासळलेला आहे. बाजूंस असलेले दहा फुट उंचीचे दोन बुरूजही असून समोरच नव्याने बांधलेले गणेशमंदिरही आहे.
या गावात, आतल्या बाजूस, साधारणपणे दीड-दोन एकरात सरदार दाभाडे यांचा जुना वाडाही आहे, जो आज पूर्णपणे पडझड झालेला आहे. या ठिकाणी नगरपंचायतीची सुसज्ज प्रशासकीय इमारत बनवण्याचा पारनेरकरांचा मानस आहे.
साधारणतः अर्ध्या तासात हा परिसर पाहून होतो.

     पारनेरच्या आसपासची आणखी काही ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळे :

पारनेरच्या पश्चिमेस गणेशखिंडीमध्ये भालचंद्र गणपती नामक एक देवस्थान असून मूळ पारनेरमधीलच स्वातंत्र्यसेनानी सेनापती महादेव बापट हे ब्रिटिश काळात या ठिकाणी भूमिगत राहून गावठी बॉम्ब बनवायचे. या प्रकरणी त्यांना ब्रिटिशांकडून पकडण्यातही आले होते. आज पारनेरकरांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या राहत्या जागीच एक छानसे हुतात्मा स्मारक बनवले असून  एक 'सांस्कृतिक सभागृह' म्हणून याचा वापर केला जातो. तसेच अगदी रास्त दरात येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक, व राजकीय कार्यक्रमांस अनुमती दिली जाते व झालेल्या अर्थलाभातून या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती केली जाते.

 पारनेरजवळील श्री सिद्धेश्वर मंदिर
पारनेरपासून जवळच साधारण चार कि.मी. वर एक छानसं पुरातन सिद्धेश्वर मंदिर असून ही पाराशर ऋषींची तपोभूमी होती, असं स्थानिक सांगतात. आत खोलवर असलेल्या गाभाऱ्यात शिवपिंड असलेल्या या मंदिराच्या आवारात गरम पाण्याचे कुंडही आहेत, असेही सांगितले जाते. या मंंदिराभोवतालचा  परिसरहीी अगदी निसर्गरम्य असाच आहे.
छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून ख्याती पावलेले, महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून ज्यांचा सहभाग होता असे गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक हे ही अहमदनगरचेच!
त्यांचं मूळ गाव नगर तालुक्यातील 'शिंगवे' (नाईक) तर जन्मगाव तथा मुळ  गाव पारनेर जवळील हंगा हे होय, असं पारनेरकर अभिमानानं सांगतात. येथून जवळच नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथेही त्यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं  जातं. हेरगिरीनिमित्ताने ते नेहमी फिरत असत. सांगली जिल्ह्यातील बाणूरगड तथा भूपाळगड येथे या महान गुप्तहेराची समाधी आहे.
पारनेरहून साधारण तीस कि.मी. असलेलं पिंपळगाव (रोठा) गावाजवळील कोरठण येथील खंडोबा मंदीर, टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध जलकुंड तथा रांजणखळगे, आदरणीय आण्णा हजारेंचं राळेगण (सिद्धी), श्री.संत निळोबाराय यांची समाधी असलेलं व पंचक्रोशीत प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेलं पिंपळनेर  ही सर्व ठिकाणे अवश्य पहावीत, अशीच आहेत.
टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे व निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर या दोहोंची  सीमाहद्द विभागणाऱ्या कुकडी नदीतील जगप्रसिद्ध रांजणखळगे व दोन्ही तीरावरील मातामंदिरे 
याशिवाय 'अळकुटी' येथील 'सरदार कृष्णाजी कदमबांडे' यांचा वाडा, 'कान्हूर (पठार)' येथील 'सुप्रसिद्ध पानिपत योद्धे 'नारो बाबजी अभ्यंकर' यांचा 'नगरकरवाडा' ही यात सामावून घेता येतील अशी काही ठिकाणं आहेत. अजून शोध घेतला तर आणखीही काही ठिकाणं नक्कीच सापडतील.
शिवाय, परतीचा प्रवास रांजणगाव (गणपती) मार्गे केल्यास अष्टवनायकांपैकी एक अशा महागणपतीचे मनस्वी दर्शनही घडू शकेल.  मात्र, यासाठी स्वत:चे वाहन नि तीन दिवस जर उपलब्ध केले तर मित्रमंडळी तथा कुटुंबासह हे एक 'मुक्त नि सुखावह' असं ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन तर नक्कीच होईल यात शंका नाही!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...