Thursday, June 11, 2020

अंधारबन : एक वर्षा भटकंती

अंधारबन  :

भिरा धरण, कोलाड (रायगड)
ते
पिंपरी_जलाशय - सिनेर खिंड, मुळशी (पुणे)



अंधारबन :कुंडलीका दरी 

मध्येच जाग आली म्हणून सहज बाहेर पाहिलं तर बऱ्यापैकी उजाडू लागलं होतं नि भोवताल निरखता लक्षात आलं की बसने पुणे-माणगाव मुख्य रस्ता तर मागे टाकलाच होता; नि, आता ताम्हिणी घाटही बाजुला करून ती 'भिरा'च्या दिशेने धावत होती. वेग तर साधारणच होता. कारण, सारा भोवताल दाट-विरळ अशा धावत्या धुक्यानं भरलेला होता आणि जिथं कुठं नि जेंव्हा जेंव्हा ते विरळ होत होतं तेंव्हा त्या विरळतेतून आम्हांस दिसत होते ते रस्त्याकडेचे, आमच्या डाव्या बाजुचे, ते ऊंचच ऊंच नि भरदार यष्टीचे डोंगर.. कुठं काळे, कुठे करडे तर कुठे बहुरंगी हिरवे.. ज्यांच्या अधे-मधे असलेल्या अनेक लहान-मोठ्या घळ्यांमधून वाहणाऱ्या त्या लोभस जलप्रपातांनी नटलेले..

आणि, सोबतीला त्या पठार-रानांनी अगदी गच्च अशीच हिरवाई; तर, उजव्या बाजूला ती भयावह खोली असलेली दरी जी आज तिच्यातल्या त्या नैसर्गिक सौंदर्यानेच अधिक लक्ष वेधून घेत होती. आता बसनं कुठंतरी जरा वेळ थांबावं आणि हे 'मधुर मध' आम्हांस चवीनं चाखायाची संधी द्यावी, असं मनात येतं ना येतं तोच, 'बोला-फुलाला गाठ पडणं' म्हणतात ना, अगदी तसंच झालं नि पुढच्याच मिनिटाला मोठा गलका झाला नि अशीच एक बहारदार जागा पाहून बस थांबलीही! कारण सर्वांच्याच मनी ते आलं होतं.

मग काय, अशी संधी कोण सोडणार? 'करंटा'च तो! पण, सुदैवाने असं 'कपाळ' असलेला एकही 'जीव' आज आमच्यात नव्हता. बस थांबताच एकच कल्ला झाला नि झोप झाली, कमी झाली, नाही झाली याची कसलीही चिंता न करता अगदी सर्वच 'नशीबवान' खाली उतरले. रस्ताही तसा अरुंदच असल्याने बस चांगलीच आत दाबून लावण्याची काळजी घेत आमचा 'सारथी'ही आमच्यात सामील झाला नि आम्ही सर्वच 'मधुररसपाना'साठी त्या दरीच्या बाजुला धावलो अन पुलाच्या कठड्यासारखी अत्यंत सुरक्षित अशी जागा हेरुन दरी न्याहाळू लागलो.

भिरा रस्त्याने जाताना रस्त्यात मध्येच मिळालेले 'हिरवं सोनसुख'..

प्रचंड खोली असलेली ती दरी.. तीमधील ते दाट-विरळ असं इकडून तिकडे धावतं धुकं.. जणु पिंजल्या कापसाचे झुबकेच! आणि त्यांची ती धावाधाव. त्या धावाधावीत थोडयाशा विरळतेतूनही दृष्टीस पडणारं दरीमधील ते विलोभनीय सौंदर्य, ती रंगी-बेरंगी, लहान-मोठी घरे अन ती घरे मिळून बनलेल्या तशाच लहान-मोठ्या रंगीबेरंगी लोकवस्त्या, हिरव्या रंगातील बहुविध छटा असलेल्या त्या बहारदार गालिच्याला तशीच बहुरंगी, बहुढंगी नक्षीदार कलाकुसरच जणु! अहाहा, किती सुंदर! अगदीच 'वडील' असं होतं ते दृष्य!

असं वाटत होतं की, काही वेळ इथंच बसावं.. सारा भोवतालही मस्त धुक्यानं पुन्हा-पुन्हा आच्छादित व्हावा.. मग त्यानं थोडं विरळही होत जावं.. अन, आपणही नेमकी तीच संधी साधत त्याखालील ते जग.. जग ? जग कसलं? स्वर्गच तो! त्याला मस्त निरखावं.. मध्येच, मुद्दाम, वाऱ्याच्या एखाद्या खोडील झुळकेनंही अवतरावं.. खोड काढल्यासारखं सारं धुकं पळवावं.. मग, त्या धुक्यानंही धूम-धावाधाव करावी अन त्या  धावाधावीत ते निसर्गदृश्यच गायब व्हावं. राग येऊन आपण काहीबाही बोलणार, तोवर, लगेचच त्या झुळकेनंही वरमावं, लाजत-मुरकत मंद व्हावं आणि मग धुक्यानंही आपली धाव मंदावत थोडं-थोडं विरळ व्हावं आणि आपलं राहिलेलं निसर्ग-सौंदर्य-रसपान पुरं करु द्यावं! व्वा, सुख.. सुख, यापरते ते काय असे! एक अप्रतिम निसर्गसौंदर्याचा हा दिलखुलास ठेवाच की!
या मधुर सौंदर्याचं रसपान बऱ्यापैकी झालंच होतं, तरीही निघावं, असं मात्र मुळीच वाटत नव्हतं. पण तेवढ्यात, लहरी 'पाऊसमामा'ची एक शानदार लहर आली. तिनं आम्हांला वेळेची जाणीव करु देत लगबगीनं बसमध्ये बसवलं नि सोबतही निघाली. खरं तर, मन भरलं नव्हतंच, तरीही, निघावं लागणारच होतं. तिचंही बहुदा मन भरलं नव्हतंच जणु! त्यामुळंच सोबत निघता निघता काही मिनिटांतच तिनंही उग्र रूप धारण केलं आणि जवळजवळ वीसेक मिनिटं चांगलंच 'छम छ्मा छम' केलं. ती  'छम छमा छम' संपेतो आम्ही भिरा वसाहतीत पोहोचलो होतो.
अंधारबन म्हटलं की भ्रमंतीची सुरुवात पिंपरीकडूनच, हे जणु ठरलेलंच! पण, हे अलिखित असल्यानं, आम्ही मात्र आमची आजची अंधारबन भटकंती भिऱ्याकडून सुरु करणार होतो अन समाप्ती, अर्थातच पिंपरीकडे! आणि, उद्देश म्हणाल, तर या भल्याशा नि धुंद-फुंद अशा वातावरणात जर चढाईच नसेल तर त्या भ्रमंतीत काय हंशील? नाही का..! पिंपरीकडून सुरुवात करता भ्रमंतीअखेरीस लागणारा तो संपूर्ण उतार इकडून केलेल्या भ्रमंतीत अगदी सुरुवातीलाच लागत असल्यानं सलग चढाईचं 'निव्वळ सोनेरी सुख' पदरात पडणार असतंय.
साहजिकच, पिंपरी ते भिरा अशी माझी ही केवळ एकच नि ती म्हणजे पहिलीच भटकंती, सन २०१२/१३ मधली. बाकीच्या तीन नि आजची ही चौथी, या साऱ्या इकडूनच! भिरा ते पिंपरी अशाच! एखादं वर्ष चुकलं असेन, नाही तर दरवर्षी, अगदी नेमानेच!


 माय कुंडलिका
भिऱ्यात पोहोचताच अगदीच सोयीस्कर वळण घेत आमची बस भल्याशा त्या विशाल वटवृक्षाच्या बाजूस आड बाजूला जाऊन उभी राहिली आणि एक एक करीत आम्ही उतरु लागलो. बसमधून उतरता उतरता माझी नजर बाहेरील प्रशस्त अंगणावर भिरभिरत होती. एवढ्यात मलाच हाक ऐकू आली. मी आवाजाकडे पाहिलं. नजरानजर झाली. माझी नजर खरे तर त्यालाच शोधत होती. पण, त्यानेच आधी हेरलं. विशाल होता तो, विशाल पडवळ.. आजचा आमचा.. नि याआधीच्या माझ्या दोन वेळच्या इथल्या भटकंतीचा मार्गदर्शक-साथी. आता तो पिंपरीतच 'स्वराज हॉटेल' चालवतो. त्या आधीच्या दोनमध्ये होता.. त्याचाच मामेभाऊ संजय ढमाले. संजयचे वडील, प्रभाकरमामाही हे काम करत असत. भटकंती-भाषेत हे 'वाटाडे'! इथला भूगोलच काय, इतिहास आणि 'समाज'शास्त्रही यांच्या चांगलंच 'डोक्या'त आहे!
का ते माहीत नाही, पण, 'वाटाडे', 'वाटाड्या' हे शब्द, मला काहीसे उद्धटच वाटतात. त्यामुळं मी त्याचा उच्चार सहसा नाहीच करत अन उल्लेखही टाळतो. तर.. हा विशाल, आजचा आमचा मार्गदर्शक-साथी, आमची वाट पाहत केंव्हाचा थांबला होता. नजरानजर होताच छानपैकी 'रामराम-सामसाम' झाला. आज उशीर चांगलाच झालेला होता. मग, तातडीनं, कमी वेळातला नाश्त्याचा उत्तम पर्याय, चहा-दूध अन टोस्ट/बिस्किट्स.. इ. ची मुबलक सोय करुन घेत सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला नि अगदी कमी वेळातच उदरभरण करुन विशालच्या साथीनं भ्रमंतीला सुरुवात केली.
एव्हाना नऊ झालेले. पुढच्या दहा-एक मिनिटांतच आम्ही भिरा धरणाजवळ पोहोचलो. तेथील कर्मचाऱ्यांच्या विनंतीस मान देऊन धरणभिंत संपेपर्यंत छायाचित्रे काढण्याचं टाळत आम्ही संपूर्ण धरणभिंत अगदीच शांतपणे पार करत विरुद्ध टोकाला व्यवस्थित पोहोचलो.


 भिरा जलाशय परिसर 

इथं येताच, सुरु झालं ते इतका वेळ रोखून धरलेलं ते धरण परिसराचं मधुरसौंदर्यरसपान! इथं आल्या आल्या, अगदी सर्वप्रथम नजरेत भरतो तो विस्तीर्णसा जलाशय! त्यावर त्यानं पांघरलेली ती धुक्याची भली मोठी दुलई.. थर तर इतका जाड की जणु त्यावरुन दुडूदुडू पळावं! पाण्याचं दर्शन तर निव्वळ आभासच! आणि, त्या विशाल जलसागराच्या मागे दोन्ही बाजूस थाटात उभे ते ऊंचच ऊंच नि बलदंड डोंगर.. डावीकडचा तो खजिना, त्याजवळ थोडा मागे सुपा व तिथली उर्वरित डोंगररांग..! अन अगदी मधोमध, त्या सिनेर खिंडीतून  धोधावत आलेलं ते कुंडलिकेच पात्र आणि ती दरीही.. त्याच बाजुला, पण थोडं आणखी उजवीकडे, तो.. देवकुंड परिसर आणि अगदीच उजवीकडे तो.. दिलखुलास लेंडी सुळका नि करड्या-हिरव्या रंगात नटलेला त्याचा तो भोवताल! शिखरंही मस्त त्या धुक्याने लपेटलेली, जणू रुपेरी मुकूट ल्यायलेली! नजरेतही सामावत नव्हतं असं ते बहारदार दृष्य पाहून आम्हां सर्वांचंच भान हरपलं, मनही हरकलं.. अगदी तुष्ट-संतुष्ट झालं.. नजरेचं पारणंच फिटलं. भूतलावरील हा स्वर्गच जणु!
पण, आधीच उशीर झालेला असल्यानं निघणं भाग होतं. तदर्थ, अधिक वेळ न दवडता, तिथलं ते सारं सुख.. काही नजरेत सामावून घेत तर काही छायाचित्रांत साठवत आम्ही तिथून निरोप घेतला. पुढील भटकंतीही आमची वाट पाहत होतीच, स्वर्गसुखाचे आणखी दरवाजे सताड उघडे करीत! भिरा धरण मागे टाकत मग आम्ही त्यातूनच प्रवेशते झालो.
आता थोड्याच वेळात सुरु होणार असते ती खजिन्याची चढण.. सुमारे चार-पाच कि.मी. ची. मुरमाड-डोंगराळ अन नळीच्या वाटेची तर अधून मधून कुठं बांधीव पायरीवाटेचीही. एव्हाना साडेनऊ होऊन गेलेले. हवेतील गारवाही बराचसा कमी झालेला. अशा परिस्थितीतच पंधराएक मिनिटांतच आम्ही एका ओढ्यावर येतो. हा असतो गावदरीचा ओढा, ज्यावर असतो एक साकव.. लोखंडी तुळईच आडवी टाकून बनवलेला. हा इथला एक अत्यंत थरारक आणि तितकाच धोकादायक असाच टप्पा! या पुलावरुन हा ओढा पार करणं, हे त्याहून अधिक धोक्याचं नि कमालीचं जोखीमभरं साहस! साहजिकच, बरेच गट हा पूल टाळून, थोडं पुढून पण त्याच ओढ्यावर असलेल्या तुलनेनं सोप्या लाकडी साकवावरून हा ओढा पार करतात. इथं हाताला कमरेच्या उंचीचा लाकडी आधारही आहे. आता हा बराचसा जुना झाल्याने व मोडकळीस आल्याने त्याच्याच अलीकडे आणखी एक लाकडी साकव नव्याने बनवला गेला आहे. इथं नुकतंच एक छोटेखानी टपरीवजा चहापाणी केंद्रही उभं राहिलंय नि त्यांच्याकडूनच या नव्या नि मजबूत साकवाची निर्मिती झाल्याचं कळते.
मला नेमकं आठवत नाही, पण, सहा-सात वर्षं झाली असतील. बहुदा सन २०१३ असावं. मी असाच पुण्यातील एका गटाबरोबर इथं आलो होतो. अगदी पहिल्यांदा. त्यावेळी 'अंधारबन' ही आजच्या इतकी 'उजेडा'तील' भटकंती नव्हती. किंबहुना ती एकदम नवी अन नवखी अशीच भ्रमंती होती नि केवळ पुण्यातले फक्त दोनेक गटच या मोहिमेचं आयोजन करीत होते. पुन्हा त्यांच्याबरोबर भटकंती न झाल्यानं त्यांचं नाव नाही आठवत, पण, मला वाटतं, त्या दोनपैकी एक 'फॉलिएज आऊटडोअर्स' असावा; आणि दुसरा म्हणजे मी ज्या गटाबरोबर ही भटकंती केली तो गट !

हे मात्र माझं भाग्य खरेच की मला ही भटकंती खूप आधीच करायला मिळाली. तर, 'मतलब की बात' ही की, या टप्प्यावर येताना त्यावेळी मी सर्वात पुढं होतो नि समोरुन एका आजोबांना (वय सुमारे सत्तर-पंचाहत्तर) या नाजूक साकवावरून काठी टेकवत अगदी आरामात चालत येताना मी पाहिलेलं. 

हीच वाट असावी असं समजून मीही या पुलाकडेच वळालो. एकावेळी एकचजण जाऊ शकत असल्यानं आजोबा त्या साकवावरून अलीकडे येईपर्यंत मी वाट पाहिली. मग मोठ्या हुरूपाने निघालो. पण, जेमतेम चार-सहा पाऊलेच चाललो असेन, नसेन पण पुढचे पाऊल काही माझ्याकडून टाकवेना. जाम भीती वाटली. पुन्हा मागे वळताना तर भीतीने गाळणच उडाली. पण, मग तसाच हळूहळू पण पूर्ण काळजी घेत कसाबसा गेल्यापावली मागे आलो. सावकाश पण सुरक्षित! मागे पाहतो तो बाकी सारे सवंगडी थोडं पुढून, त्या लाकडी साकवावरून पलीकडे गेलेही होते.


 गावदरीच्या ओढ्यावरील विद्युत् तुळयांच्या आधारे बनवलेला साकव..

"इकडून या, काका" म्हणून त्यांनी आवाजही दिला पण अगदी आरामात तो साकव ओलांडणाऱ्या त्या आजोबांमुळे प्रचंड प्रेरित झालेलो मी काही मागे हटण्यास तयार नव्हतो. नंतरचा एक प्रयत्नही वाया गेला. आता यशस्वी माघार घ्यावी की काय असा विचार मनी आला खरा, पण, पुन्हा वळसा मारुन येण्यापेक्षा, 'करु आणखी एक प्रयत्न' म्हणून मी पुन्हा सिद्ध झालो. पण पुन्हा तेच. 'पुढचे पाढे पंचावन्नच!' 'काय करु.. करू की नको?', असं उगीचच 'ऑथेल्लो' व्हायला झालं. आता शेवटचाच प्रयत्न म्हणून पुन्हा धाडस केलं नि जमलं मात्र.. पण माकडचालीसह इतर चाली रचूनच! पूर्ण सावध, सावकाश नि शिस्तीत आणि पाठपिशवी पंचाने पाठ-पोटाला जाम बांधूनच! जीव तेंव्हाच भांड्यात पडला जेंव्हा तो ओढा पार झाला. पण, 'मर्मा'ची बात एकच अन ती म्हणजे.. तदनंतरही, निदान चार वेळा तरी मी अंधारबन नक्कीच केला असेन. प्रत्येकवेळी धावत पळतच इथं यायचो, पुलाला नीट निरखायचो, एक-दोन पावलंही टाकून पाहायचो; पण त्यावरून चालत तर नाहीच पण वाकुन, बसूनही जायची एकदाही हिम्मत नाही झाली! 'जीव ओढ्यात पडेल' की काय, याचीच काळजी लागून राहायची. आजही मी, असाच इथं येत, धाडस न झाल्यानं पुन्हा मागे फिरत, इतरांप्रमाणेच त्या लाकडी साकवावरूनच तो ओढा ओलांडला.

मग पुढे तसंच चढाई करीत आम्ही निघतो. काही वेळातच 'बोरीचा खडक'ही पार होतो. पुढे काही वेळाने बाजूला एक वाट गेलेली दिसते व दूरवर काही रम्य प्रपातही धोधावत असल्याचं दृष्टीस पडतं. बहुदा ही 'आवळी' असावी आणि  तसंच सरळ पुढे 'आवळीचा घाट' व धनगरांची वस्ती. पुढे निघणारच असतो पण त्या प्रपातांचा मोह होऊन आम्ही थोडी वाकडी वाट करीत तिकडे वळतोच. थोडं आत जाताच समोर एक छानशी अन छोटीशी सपाटी दिसते. मग तिथं थोडं स्थिरस्थावर होत भोवतालचं निरीक्षण सुरु होतं अन काही संधी-भुकेलेल्यांचं खान-पानही. मग तिथली ती रम्य हिरवाई, ती दरी, त्यापलीकडील ते उंच नि भरदार डोंगर, त्यावरुन कोसळणारे ते प्रपात सारं काही डोळ्यांत नि कॅमेऱ्यात साठवत काही वेळातच आम्ही मागे फिरतो नि पुन्हा 'खजिन्या'ने चढाईला भिडतो. एव्हाना साडेअकरा झालेले असतात. हा 'खजिना' आम्हांला हिरडीपर्यंत साथ देणार असतो नि अद्याप वाटचालही बरीच शिल्लक असते.


 'खजिन्या'च्या अलिकडील एका माळावरील हे एक बहारदार असं निसर्गदृष्य।।
खजिन्याच्या या वाटेसंदर्भात एक कथा (दंतकथा की आख्यायिका?) अशी सांगितली जाते की या वाटेवरून खूप आत काही अंतरावर एक  'दरवाजा' आहे, पण तो कशाचा आणि कसला हे मात्र आज कोणाला माहीतही नाही नि सांगताही येत नाही. मात्र, तिथं जायचं झालं तर शेवटपर्यंत अत्यंत शुद्ध नि पवित्र मनानेच जावं लागतं अन्यथा खैर नाही, असंही सांगितलं जातं. त्यामुळं, जीवावर बेतेल या भीतीतुन तिथपर्यंत जाण्याचा आजतागायत कोणी प्रयत्नही केलेला नाही. एकदा एक म्हातारी, चुकून की मुद्दाम, तिकडे गेली नि तिला तो दरवाजा दिसला. अनेकांना ती 'चला, मी तुम्हांलाही दाखवते', असंही म्हणायची; पण, भीतीमुळे तिच्या साथीनं कधी कुणी गेलं नाही. लवकरच तिचे डोळे मात्र गेले, ती दृष्टिहीन झाली, असं सांगतात. पुर्वीच्या काळी ही वाटही, एक व्यापारी मार्ग असल्याने, वसूल होणारी जकात, आणि इकडची-तिकडचीही मिळून कदाचित, इथं साठविली जात असावी.. म्हणून हा खजिना नि मग त्याला दरवाजाही! आणि तिथं, त्याच्या जवळपास जाणंही त्याकाळी सामान्यांना निषिद्ध असेल  म्हणून जिवाच्या भीतीची जोड लावत पुढची कथा बनली असावी, असा काहीतरी कयास बांधता येईल. इतरही अनेक ठिकाणी धन-संपत्तीच्या अशा काही जागा असल्याचे व त्यांचं रक्षण नाग-सर्पांकडून केलं जातं, अशा कथाही आपण अनेकदा ऐकतो. असो.
पुढे असंच पूर्ण हरित अशा रानानं, पण चढाई असल्यानं दमट नि थकल्या वातावरणात, साधारण तासा-दीडतासाची चढाई होते नि अचानक समोरच्या झाडांमधील फटीतून  दोनेक घरं दृष्टीस पडतात. आणखी थोडं  पुढे जाता आणखी काही घरे.. अर्थात, आता 'हिरडी' गाव आलेलं असतंय आणि दुपारचा एक वाजून गेलेला असतोय. खरं तर, मोठ्या भुकलाडुंचा आस्वाद घेण्याची वेळ झालेली. इथलं तलावाकाठचं शिवकालीन शिवमंदिर नि परिसर खूपच सुंदर आहे. मग, तिथं जाऊन थोडा  विसावा नि भोजन घ्यावं  की काय, असाही एक पर्याय निघाला, पण, मुळात अधिकचा वेळच हाती नसल्यानं तिथंच, कुणी घरांच्या ओट्यावर तर कुणी सपरांत, ज्यानं-त्यानं आपापल्या सोयीची जागा निवडून क्षुधाशांती करुन घेतली. थोडा विसावाही घेतला अन शिणले-भागले जीव पुन्हा आपल्या वाटेला बिलगले.


 तलावाकाठचं शिवकालीन शिवमंदिर

वातावरणातील दमटपणा अजुनही कायम होता. खरे तर पावसाची नितांत गरज होती. आम्हांला नि गाववाल्यांनाही! त्यांना आमच्यापेक्षा खूपच अधिक. पण, गाववाल्यांना अंदाज विचारता, "आज काय दिसत न्हाय गड्या..!" अशीच प्रतिक्रिया.. आणि, "त्याचं काय खरं न्हाय" अशी पुस्तीही जोडून मिळाली.
हिरडी तर सोडलं होतंच. एवढ्यात एक गट समोरून आला. याआधीही तीनेक गट गेलेले. एका नितांत सुंदर अशा या भटकंतीला इतक्या आशेने आलेली ही सगळी मंडळी.. "मौसमी तंगडतोड आणि जराही पाऊस नाही, इतके का फुटक्या नशिबाचे आपण.." असंच मनात म्हणत असणार! पण काय करणार ना? आपल्या हातात का आहे या बाबी!


आमची दमदार वाटचाल चालूच होती. 'घानामाची' अजून यायची होती. बहुदा आम्ही 'बोरीचा खडक' (या वाटेवरील हा आणखी एक..) पार करुन 'चिपाडाच्या माळा'वर आलेलं असू. पण म्हणतात ना, इथल्या पावसाचा काही भरोसा नाही. शेवटी, तसंच झालं. अखेर, त्या निसर्गानेच मनावर घेतलं आणि काही क्षणांतच 'घन घन माला नभी दाटल्या'. अंधारुनही आलं. 'ढगांशी वारा झुंजला', 'झाडा-झाडांमध्येही तो गर्द घुसला', 'पंखही घरट्या-घरट्यांत जाऊन मिटले', जणु आख्खं 'नभ'च उतरु आलं!' 'मनमोराचा पिसाराही फुलला'. मग, त्या वरुणराजालाही काही राहवलं नाही. त्यानं, त्या तीनही कळा, 'खाड, खाड, खाड' अशा एकाच दमात दाबल्या नि लागलीच 'टीप-टीप-टीप' सुरु झालं. मग 'ताड-ताड-ताड' आणि त्यानंतर तर 'धाड-धाड-धाड'ही! तो चांगलाच कोसळू लागला. इतक्या जोशात की, काही मिनिटांतच, 'साऱ्या झाडांची इरली भिजली', सारं बन 'चिंब थर थर वलं झालं', तिथल्या एकूणएक जीवांमध्ये उत्साह संचारला नि अगदी कमी वेळातच इथं, तिथं, सर्वत्र पाण्याचे लहान-सहान ओहळ-ओघळ ओघळू लागले. सुरुवातीला दुडदुडणारे ते आता चांगलंच 'बाळसं' धरल्यागत धो-धो धावू लागले. आजूबाजूच्या छोट्या-छोट्या पाऊलवाटाही जलमय होऊन चमकू लागल्या. आनंदातिशयाने खुळखुळू लागल्या. जणु पाऊसगाणेच गुणगुणू लागल्या.. "चाक धूम धूम! चाक धूम धूम..!"



 पावसाच्या पाण्याने क्षणांत नहाऊन निघालेली धरणी

सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. मग, आम्हांपैकी ज्यांना-ज्यांना सोसवलं त्यांनी-त्यांनी आपलं 'अंग झिम्माड' करुन घेतलं. इतरांनी मात्र आपल्याकडील पावसाळी अस्त्रं लपेटत अन 'पंख मिटून' घेत एकमेकांना बिलगणं पसंत केलं. अन तो? तो मात्र कसलेही आढेवेढे न घेता चांगलाच कोसळला. अगदी बेफाम, बेधुंद अन मनसोक्त! आम्ही मात्र, आता हा काही नमतं घेत नाही, असं पाहून नि उगाच उशीरही नको म्हणून, त्या जोमदार पावसातही दमदार वाटचाल चालुच ठेवली. अख्खी 'घानामाची' पार झाली, पुढे 'कोकमीच्या धसी'नं चढुनही झालं, तेंव्हा कुठं दोन तासांपासून चाललेला तो 'धो-धो' आता काहीसा थांबला होता. तो थांबला जरुर होता तरी त्याच्या पाऊलखुणा मात्र मागे शिल्लक होत्याच.
सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला. मग, आम्हांपैकी ज्यांना-ज्यांना सोसवलं त्यांनी-त्यांनी आपलं 'अंग झिम्माड' करुन घेतलं. इतरांनी मात्र आपल्याकडील पावसाळी अस्त्रं लपेटत 'पंख मिटून' घेत एकमेकांना बिलगणं पसंत केलं. अन तो? तो मात्र कसलेही आढेवेढे न घेता चांगलाच कोसळला. अगदी बेफाम, बेधुंद अन मनसोक्त! आम्ही मात्र, आता हा काही नमतं घेत नाही, असं पाहून नि उगाच उशीरही नको म्हणून, त्या जोमदार पावसातही दमदार वाटचाल चालुच ठेवली. अख्खी 'घानामाची' पार झाली, पुढे 'कोकमीच्या धसी'नं चढुनही झालं, तेंव्हा कुठं दोन तासांपासून चाललेला तो 'धो-धो' आता काहीसा थांबला होता. तो थांबला जरुर होता तरी त्याच्या पाऊलखुणा मात्र मागे शिल्लक होत्याच.


 वर्षावर्षावानंतरचे अंधारबन .. १ 

वर्षा वर्षावानंतरचं अंधारबान.. २
पाउलवाटांतून पाऊसपाणी खळाळा वाहत होतं. बाजूची ती माय कुंडलिकाही धुक्यानं पूर्ण व्यापली होती. जिथं कुठं नि जेंव्हा ते विरळ होई त्यातून समोरील त्या मोहक दरीचं रमणीय दर्शन घडत होतं.तिचं पात्र दिसत नव्हतंच, कारण ते खूपच खोल; मात्र, आजूबाजूच्या डोंगर परिसरातून धो-धो धावत-धडपडत, हिंदकळत-ठेचाळत आलेले ते जलप्रवाह मात्र त्या माईच्या काठावरून अगदी फेसाळत्या जलप्रपाताच्या रुपात स्वतःला बिनदिक्कत झोकून देत त्या खोल दरीत मनमुरादपणे कोसळत होते. 'रवि काय पाहिल नि कवी काय लिहिल' असं ते अफलातून, स्वप्नवत, स्वर्गवत असं सौंदर्य, आज इथं, आमच्या समोर, मस्त, धुंद-फुंद फुललं-खुललं होतं.
दूरवरपर्यंत जिकडे-तिकडे डोंगर-शिखरांवर धुक्याची वलयं अद्यापही शांतपणे रेंगाळत असलेली दिसून येत होती. हिरवाई, धुके नि धबधबे यामुळे एकूणच सारा परिसर अधिक स्वच्छ, अधिकच हिरवाकंच आणि अत्यंत मनमोहक असा बनला होता. आता पाऊसही थांबलेला होता. साहजिकच, इतका वेळ 'विश्राम' अवस्थेत असलेले सारे 'क्लिक-क्लिक' 'सावधान' होत 'क्लिकक्लिकाट' करु लागले होते. यथेच्छ छायाचित्रण होतं नि वेळेचा अंदाज घेत, आवरतं घेत, आम्ही पुन्हा आमची वाट पकडतो.
अशात लागलेला 'बोकड्याचा ओढा' पार करुन आम्ही वर निघालो. पुढे वाटेतच एक रानडुक्कर पकडीचा सापळाही दिसला. झुळझुळतं पाणी, थोडाफार चिखल, पालापाचोळा यांची संगत चालूच होती. आता आम्ही 'तांबडी'त होतो नि आमची पाऊलवाटही तांबडी माती अन पावसाचं पाणी एकत्र होऊन मजेदार बनली होती. आम्ही चालत होतो की खेळत होतो, याचाही आम्हांस विसर पडला होता. 'आपट्याचा टेप' पार झाला आणि आता 'मंडपाची व्हळ' लागली. इथं काही आदिवासी खेकडे भाजण्यात नि त्याची भाजी करण्यात मग्न असल्याचे दिसले. त्यांच्याशी थोडा संवाद साधत ही 'व्हळ'ही आम्ही पार केली. पुढं 'जांभळीचा टेप' लागला. एव्हाना पाऊस बराच ओसरलेला. पण आम्ही अजूनही स्वर्गातच, मात्र या दारी होतो. खुललेला निसर्ग अजूनही मोहनिय होता. थोड्याच वेळात आम्ही भटकंतीच्या अंतिम टप्प्यात पोहोचणार होतो.


 वर्षा वर्षावानंतरचं अंधारबान.. ३
अगदी शेवटी का होईना, पावसानं हजेरी लावून चांगलीच मजा आणली. वातावरण नि परिसराला तो जागला. तो ज्या पद्धतीनं अवतरला, कोसळला त्यात त्यानं ताम्हिणीचं नाव सार्थ केलं.. महाराष्ट्राची चेरापुंजी ना ती! अंधारबनातलं आमचं आजचं वास्तव्यही त्यानं बहारदार केलं.. आमची भ्रमंती अगदी सोनेरी केली आणि यामुळं प्रत्येकाचा आनंदमयी झालेला चेहरा पाहून याक्षणी आम्हीच या जगातले सर्वाधिक समाधानी लोक असु, असंच आम्हांला वाटत होतं. कारण, आज आम्ही अंधारबनातलं सर्वोच्च सुख अनुभवत होतो. श्रीमंत, खूप  खूप श्रीमंत झालो होतो.
होय!
कारण,
'अंधारबन' मुळी आहेच तसं..
'बहुरंगी', 'बहुढंगी' नि 'बहुरूपी'!
'बेफाम', 'बेभान', 'बिनतोड' नि 'बहारदार'!
आणि, त्यामुळेच..
'बहुश्रुत' नि 'बहुचर्चित' अन निव्वळ 'बावनकशी' भ्रमंती!
_अंधारबन..
आहेच एक अंधारी बन. इथली झाडीच इतकी दाट की सूर्यकिरणे इथं जमिनीवर पोहोचण्यास लाजतात!
_अंधारबन.. होय, हे ही खरंय की, हे बन जरी 'अंधारी' असलं तरी इथलं निसर्गसौंदर्य मात्र डोळ्यांत 'उजेड' पाडील इतकं अफलातून आहे!
_अंधारबन.. इथं आपणांस पाहायला मिळतो काळा-पांढरा पिंजलेला मुलूखभर कापूस!
_अंधारबन.. इथं पाहायला मिळतो त्या कापसाशी झुंजणारा मदमस्त असा धुंद-फुंद वारा!
_अंधारबन.. आपण इथं पाहतो मस्त, मनमौजी धुक्याचा लपंडाव!
_अंधारबन.. हे आहे एक अमाप आणि धुंआधार पावसाचं वन!
_अंधारबन.. म्हणजे अगणित धबधब्यांचं गाव!
_अंधारबन.. आहे.. तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, देवससाणा, बहिरी ससाणा, रानमैना, पहाडी पोपट, शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल,  तृणचिमणी, तुरेवाला चंडोल, स्वर्गीय नर्तक, वेडा राघू असे विविध पक्षी..
अन
तेरडा, कारवी, सोनकी, रानभेंडी, रानहळद, लक्ष्मीपुष्प, आभाळी तथा नीळवंती, अग्नीशिखा तथा कळलावी, कल्पेंद्र इ. रानफुलांनी बहरलेलं एक बन!
_अंधारबन.. म्हणजे पिंपरी-भिरा असा केलात तर बिलकुल चढाई नसलेली एकमेव भ्रमंती!
_अंधारबन.. म्हणजे प्रचंड पाऊस, ओसंडून वाहणारे ओढे, वाटेत आडवी पडणारी झाडे आणि यामुळे  दीड-दोन महिन्यांपर्यंत रहदारीच बंद असणारी अफलातून जंगलवाट!



 वर्षा वर्षावानंतरचं अंधारबान.. ४
इथला उन्मादक सुखाचा वावर आता आवरता घेत आम्ही असंच त्या माईच्या काठाने निघालो. आजूबाजुचा रम्य निसर्ग न्याहाळता न्याहाळता आम्ही, अंतिम टप्पा, 'सिनेर खिंडी'जवळ कधी आलो ते कळलेदेखील नाही. आता तेवढा 'माकड्याचा ओढा' पार केला की आजची ही भ्रमंती जवळजवळ संपणारच होती. जवळ येताच लक्षात आलं की, पाण्याला बऱ्यापैकी 'ओढ' आहे. मग 'एव्हरेस्टर भगवान'ने पुढाकार घेऊन दोर बाहेर काढला, खरं तर त्याची गरजच पडली नाही, पण सुरक्षितता केंव्हाही बरीच ना! इतरांनीही तोवर उताराच्या बाजूला सुरक्षितता व आधार या हेतुतून मानवी साखळी धरलेली. त्यामुळं थोड्याच वेळात सर्वांनी अतिशय सुरक्षितरीत्या तो ओढा पार केला.

मग, 'जांभळीच्या टेपा'ने वर निघत वाटेतल्या 'वाघजाई'ला नमन केलं. तसंच थोडं पुढं होत आदरणीय नावजींच्या स्मृतीलाही अभिवादन करीत पुढे निघालो. पुढे गाडीतळ नि त्यापुढील 'पऱ्ह्याच्या माळा'ने निघत, थोडी भातखाचरं पार करीत 'सेलीचा टेप', 'वाकड्या फोंडयाचा माळ' पालथा घालून पिंपरी गाठलं तेंव्हा जीवात जीव आला.

 वर्षा वर्षावानंतरचं अंधारबान.. ५ व ६ 
 वर्षा वर्षावानंतरचं अंधारबान..  ७ नि ८.
समोरच रस्त्यावर उभ्या असलेल्या आमच्या बसकडे धाव घेतली, आळीपाळीने सर्वांनी 'ओले'ते दूर करुन व 'सुके' ते परिधान करीत स्वतःला अधिक आरामशीर बनवलं नि पिंपरीतील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जमा होत तिथंच बनवलेल्या ताज्या नि सुमधुर सायंभोजनाचा आस्वाद घेतला आणि त्या 'बन' आणि 'माई'ला निरोप देत नि आदरणीय  नावजींच्या नेतृत्वाखाली सिंह-प्रताप स्मरत पुण्याकडे प्रस्थान केले.
सुरुवातीस मीही ही भटकंती 'पिंपरी ते भिरा' अशीच केलेली. पण, हे मात्र नक्कीच खरं की, उलट मार्गाने, अर्थात, 'भिरा ते पिंपरी' अशी करता ती आगळी-वेगळी तर वाटलीच अन् भावलीही अधिक!

कालही असंच काही घरगुती कामानिमित्तानं तिथं, जवळच, पौडला जाणं झालं होतं. अगदीच जवळ आल्यानं 'अंधारबन'चं आकर्षण काही स्वस्थ बसु देईना. मग, मनानं उचलच खाल्ली. मग वाट थोडी लांबवायचीच हे नक्की करीत तिथून निघालोच. अशीच एक 'पिल्लू-भटकंती' (ना की धावती भेट) करायच्या हेतुतून. पौडवरून बस पकडली नि थेट वांद्रे फाटा गाठला. आधीच संपर्क झाल्यानं विशाल तिथं येऊन थडकला होताच. मग जाता जाता त्याच्याच साथीत 'स्वतंत्रता टोक' तथा 'येढ्याच्या दांडा'वर थोडा स्थिरावलो. तलावाकडेही जराशी वळलो. नव्यानेच तारेचे सुरक्षा कुंपण लावलेलं दिसलं. त्यामुळे या बाजूने आता प्रवेश नियंत्रित झालाय. तसेच तिथल्या स्वैरविहारासही चाप लावल्याचं समजलं. सुरक्षिततेच्या दृष्टीने हेही बरंच झालं म्हणायचं. चालता चालता अंधारबनच्या भ्रमंतीमार्गावरही नुकतीच एक दरड कोसळल्याचं व तिला वनखात्यानं त्याच आठवड्यात साफही केल्याचं समजलं. त्वरेने कार्यवाही झाल्यानं बरंही वाटलं. भिऱ्याच्या अलीकडील 'गावदरीच्या ओढ्या'वरील लाकडी साकवही जीर्ण व नाजूक झाल्याने त्याच्या थोडं अलिकडे आणखी एक लाकडी साकव, तिथं  नुकत्याच झालेल्या हॉटेलमालकाकडून नव्यानं बनवण्यात आल्याचेही समजलं. मग वाटेने थोडं  खाली उतरत प्रथम आदरणीय 'नावजीं' व नंतर 'वाघजाई'ला नमन करून आशीर्वाद घेतले. आणखी थोडं पुढे जात 'पायऱ्या' ओलांडत 'माकड्याचा ओढ्या'तही थोडे पाय ओले करुन घेतले नि 'सिनेर खिंडी'ला निरोप देत इनामाच्या माळावरील 'स्वराज'कडे मोर्चा वळवला. तिथं पोहोचताच ते प्रशस्त घर, अंगण नि अगदी देशी, टर्की कोंबडी ते बदक, राजहंसाच्या सान्निध्यात प्रसन्न चहा-पाणी झालं. माझंही गाव, लहानपण डोळ्यांसमोर तरळून गेलं. अंधारबनच्या या आधीच्या सर्वच स्मृतींना उजाळा देत थोड्या गप्पा झाल्या. मग 'बहिरी', 'भिशा', 'केकताई', 'गायदरा', 'तिवई', 'घुबाडी', 'फडई', 'कुंबळदरा' अशा एक ना अनेक, रम्य नि भव्य डोंगरांच्या कुशीत पहुडलेलं ते ५०-६० घरांचं छोटेखानी 'पिंपरी'ही, सहजच, एक चक्कर मारत नजरेखाली घातलं. ढमाले मामांकडेही चक्कर मारली नि पुन्हा 'स्वराज'कडे येत, तिथंच त्या 'इनामाच्या माळावर, विशाल विकसित करीत असलेल्या 'कृषी पर्यटन केंद्र' तथा नियोजित मंगल कार्यालय आवारातही मुक्त फिरलो. निरीक्षण-गप्पा-सूचना झाल्या. रात्री सुह्रद वातावरणात मस्त भोजनाचा आस्वाद घेतला. पुन्हा गप्पा झाल्या नि काहीही घाई नसल्याने दुसऱ्या दिवशी निवांत आवरून सावकाशीनं विशालचा निरोप घेतला.
'अंधारबन'ची ही भ्रमंती प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय केवळ वाचून-ऐकून अनुभवणं नि समाधान पावणं, यात मात्र खरेच काहीही 'राम' नाही. आणि, आता हे प्रत्येक भटक्याला उमगलं आहे. त्यामुळं, मूळ भटका काय नि हवसे-नवसे काय, सर्वच 'जन' आज इथल्या प्रत्यक्ष अनुभूतीसाठी धडपडताना दिसताहेत.

त्यामुळे, आज 'अंधारबन' 'चांगलंच 'उजेडबन' झालंय. तसंच, बाजूचं 'देवकुंड'ही बेफाम बहरलंय. परवा 'हरिहर'ही असाच ओसंडून वाहिल्याचं फेसबुकवरच्या विविध 'पोष्टी'तुन उमगलं. आनंद आहे, जर निसर्गप्रेमी वाढतच असतील तर!  निसर्ग सौंदर्य हे एक अफलातून असंच आकर्षण आहे आणि त्याकडे आकर्षिले जाणे, हे ही नैसर्गिकच आहे. आणि.. निसर्ग तर सर्वांचाच आहे, सर्वांसाठीच आहे. पण, त्यातला आनंद 'लुटण्या'साठी हो केवळ.. ना की प्रत्यक्ष  निसर्ग! की  इथलं प्राणीजीवन!! इथलं एक पान जेव्हा तोडलं जातं, तेव्हा ते झाड, ती लता-वेल तर दुखावतेच.. आणि शिवाय, जर कदाचित, त्यावर काही कीटकांची अंडी, अळी असतील, कोळ्याचं घर असेल तर त्यांनाही  धोका पोहोचतो. आणि, हे ज्याला कळतं असेच निसर्गप्रेमी आपल्याला हवेत. मात्र, याचा पोसही गावी नसलेल्या  उगा वळवळणाऱ्या 'अळ्या' नकोत.

गडकिल्ल्यांसारखी अनेक 'पवित्रस्थळं'ही आज अशाच काही अळ्यांमुळे 'परवानगी-स्थळं' होऊ घातलीत. या अळ्या.. 'कोशा'तून बाहेर येत पूर्णावस्थेत जाण्याऐवजी त्या 'अळ्या'च राहणं पसंत करताहेत. आणि या, या आगळ्या-वेगळ्या 'अळ्या'च आज अनेक जंगलवाटांवर, विविध गडकिल्ल्यांवर आणि पर्यटनस्थळीही वावरु इच्छित आहेत. त्यांना कशाचाच पोस आणि 'पोच'ही नाहीय्ये, आणि हेच, हेच अत्यंत खेदजनक आहे.

खूप खूप वर्षांपूर्वी 'माउलीं'नी विश्वाच्या कल्याणासाठी 'पसायदान' मागितले होते. या पोच हरवलेल्यांना त्याचा 'अर्थ' कधी कळणार? ते तर स्वतःच्याच 'मतलबा'त रममाण आहेत. हे 'दुरितांचे तिमिर'च आहेत नि ते जायलाच हवेत. ही केवळ 'खळांची व्यंकटी' आहे अन ती सांडायलाच हवीय. आणि म्हणूनच, या 'भूवरील' 'निसर्गनिष्ठांची मांदियाळी' या सत्कार्यासाठी सदोदित कार्यरत हवी. आपल्या भोवताली अद्यापही 'कल्पतरुंचे' अनेक 'आरव' आहेत. अनेक 'चेतना चिंतामणीची गावं'ही आहेत. माऊलींना गुरु निवृत्तीनाथांचा वरदहस्त होता; आपणही या 'आरवां'चा वरदहस्त घेऊ या नि प्रत्येकानं 'ज्ञानदेव' बनून त्या 'विश्वात्म्या'ला भजू या. त्याच्याकडे हेच 'पसायदान' मागू या, की या आगळ्या-वेगळ्यांच्या 'सत्कर्मी रति वाढो'. अन, एवढ्याने नाहीच भागलं तर आपल्यातलेच काही 'तुकोबा' बनतील अन या 'नाठाळांच्या माथी काठी' हाणतील! मग मात्र, आपल्याला हवा असलेला, स्वधर्मरुपी सूर्याचा उदय.. आपणांस हवी असलेली ती रम्य सकाळ, अर्थात, आपणांस हवा असलेला तो निसर्ग आपण नक्कीच पाहू शकू, अशी, आशा नव्हे, खात्रीच आहे.

आज अनेक गडांवर संवर्धनकार्य सुरु आहेत. माऊली-तुकोबांचे अनेक शिष्यही येथ निर्माण झालेले आपण पाहत आहोत. आता तो दिवस दूर नाही. पसायदान पदरी पडलं तर ठीकच.. मग या 'अंधार'अळ्या 'सत्कर्मी' बनतीलच अशी आशा बाळगू या; अन्यथा काष्ठप्रहार हा आहेच!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...