Thursday, June 11, 2020

टाकळी ढोकेश्वर आणि पळशी

परवा अहमदनगर जिल्ह्यातील गड, कोट आणि भुईकोट भटकंतीवेळी  असाच योग आला आणि श्रीगोंदा, नगर व पारनेर तालुक्यातील काही ठिकाणी जाणं  झालं. या भटकंतीत  अनेक  ठिकाणच्या  कोट, भुईकोट, ऐतिहासिक गढ्या नि वाडे तसेच लेणी  अन  मंदिरांची भटकंती झाली. पेडगावचा बहादूरगड तसेच श्रीगोंदा नि अहमदनगर येथील भुईकोट त्यानंतर मांजरसुंभा, पेमगिरी हे किल्ले यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होता.

यानिमित्ताने यासंदर्भात एकूण  तीन ब्लॉग लिहिण्याचा मानस असून; त्यातला एक, पेमगिरी, याआधी नुकताच प्रसिध्द केलाय आणि हा दुसरा आता तुमच्यासमोर येतोय..
टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिर व लेणी, जामगावचा भुईकोट, पळशी येथील विठ्ठल मंदिर आणि पळशीकरांचा वाडा नि पारनेर या शहराबद्दल चार शब्द घेऊन! 
तर तिसरा ब्लॉग मात्र पेडगावच्या  बहादुरगड तथा धर्मवीरगडाविषयी असेल आणि तो लवकरच आपल्यासमोर येईल. 

१..  टाकळी ढोकेश्वर येथील
      ढोकेश्वर मंदिर व लेणी 


टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध ढोकेश्वर मंदिर 


महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करताच छानश्या वळणदार रस्त्याने थोडं पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची ही लेणी असलेली एक छोटीशी टेकडी आपल्या दृष्टीस पडते. टेकडीचा हा संपुर्ण परिसर गावाबाहेरील एक माळरान जरी असलं तरी आजमितीला तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले गेले असून शोभेची झाडे व फुलझाडे यांच्यासाहाय्याने येथील परिसर अतिशय सुंदर आणि  सुखावह बनवण्यात आला आहे. त्यामुळे येथे पोहोचताच मन तर अगदी प्रसन्न होतेच होते शिवाय हे स्थळ गावापासून एवढ्या दूर असूनही इथं असं उत्तम व्यवस्थापन करून काही चांगल्याची जोपासना केल्याबाबत कौतुकही  वाटतं. टेकडीवरील या  लेण्यांपर्यंत जाण्यासाठी छानपैकी रुंदसा दगडी पायरीमार्ग बनविण्यात आला  असून यामार्गे साधारण आठ-दहा मिनिटांतच आपण मुख्य  लेण्यांपर्यंत पोहोचतो.
 
टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध लेणी 
टाकळी ढोकेश्वर या गावाजवळील हे ढोकेश्वर मंदिर  खूप प्राचीन मंदिर असून ते  मंदिर डोंगरात कोरलेले आहे.  किंबहुना,  या मंदिरावरूनच या गावाला टाकळी ढोकेश्वर असे नाव पडले आहे. या मंदिरात महादेवाची खूप मोठी आकर्षक अशी  पिंड आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आणि  महाशिवरात्रीला येथे खूप मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील अनेक भाविकही या यात्रेसाठी आवर्जून जमतात.



श्री ढोकेश्वर 

श्री नंदी 

जवळ जाताच अगदी समोर असलेलं मध्ययुगीन प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी जी  खरे तर दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरातन अवशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दगडी फुलं कोरलेली दोन समाधी मंदिरंही दिसतात. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही असंच पडलेलं आपल्या दृष्टीस पडतं. हे बहुदा प्रवेशद्वारावरचं असणार असा अंदाज आहे. इथल्या पायरीमार्गातही अनेक ठिकाणी असे नक्षीकाम असलेले अवशेषस्वरूपी अनेक दगड वापरलेले आपल्याला दिसून येतात. याबाबत या अवशेषांचं नेमकं काय व कसं व्यवस्थापन करावं हे अगम्य असल्यानंच बहुदा ते इतस्ततः विखुरलेले दिसतात. साहजिक आहे, व्यवस्थापनातील सर्वाना वा काहींना याबाबत कल्पना असेलच वा असावी हे अशक्य आहे. खरे तर जवळपासच्या जाणकारांनी या बाबीत लक्ष घालून मार्गदर्शन करणेच  इष्ट ठरेल. आम्ही तेथून निघताना मात्र खटकलेल्या काही गोष्टी तेथील मंदिराची पूजा-अर्चना करणाऱ्या सद्गृहस्थाच्या कानावर घातल्या. 
 
लेण्यांचे प्रवेशद्वार 

टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त असून आत शिरताच दोन्ही बाजुला असलेल्या शालभंजिकेच्या मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. लेण्यांचा सभामंडप हा चार खांबांवर तोललेला असून त्याच्या डाव्या बाजूस भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या दिसून येतात. तिथेच एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्तीही कोरलेली आढळते. गाभाऱ्याच्या प्रवेशदारावर द्वारपालाचं शिल्पही असून आत गाभाऱ्यात एक आगळी व भव्य अशी शिवपिंड असून त्या समोर सभामंडपात नंदीही आहे. गाभाऱ्यात शिवपिंडीभोवती कोरलेला प्रदक्षिणापथ असून या प्रदक्षिणामार्गावर अनेक वीरगळ आज व्यवस्थितरित्या बंदिस्त करून सुरक्षित ठेवलेल्या दिसून येतात. एक मोठा नंदी आणि सर्पशिळाही येथे पहावयास मिळतात. मुख्य लेण्याच्या बाजूलाच  पाण्याचं एक  टाकं असून  बाहेरून डाव्या बाजूला थोडं उंचावरही आणखी एक पाण्याचे टाके आहे;  ज्याला 'सीतान्हाणी' असं संबोधतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात कोरलेल्या खोबण्याही आहेत. 

येथे एक पुजारीही असून त्यांना या लेण्यांच्या इतिहासाविषयी बरंच काही माहिती आहे.  ते तिथं असल्यास व आपल्याला त्यांत रस असल्याचे दाखविल्यास आपणांस याबाबत सहकार्य होऊन त्यांचेकडून  बरीच माहिती मिळू शकते.

हा संपूर्ण परिसर पाहायला साधारण एक तास लागतो. 


येथील आणखी काही  छायाचित्रे  :






---X---X---X ---

२.. पळशीचे विठ्ठल मंदिर, भुईकोट 
     आणि पळशीकर यांचा वाडा 

खरं तर, पळशी, पारनेर ही नावं माझ्या खूपच परिचयाची. म्हणजे, नोकरी निमित्ताने येथून जवळच शिरुरलाच रहात असताना माझ्या कार्यकक्षेत असलेल्या पारनेर तालुक्यातील काही गावांना मी पळशी या राज्य परिवहन मंडळाच्या बसने जायचो- यायचो. त्यामुळे पळशी म्हटलं की लाल डबा अन तिचा तो काळा-पांढरा फलक एवढाच काय तो संबंध! कधी काळी आपण या  पळशीलाही जाऊ, ते ही ऐतिहासिक पर्यटक म्हणून, असं मात्र स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, असतात काही योग..  ते थोडेच सांगून येतात!
पळशी इथं जाणं झालं. पेमगिरीचा किल्ला, तेथील बारव आणि विशाल वटवृक्ष पाहून आम्ही पळशीला पोहोचलो तेंव्हा दुपारचे एक वाजले होते.

     विठ्ठल मंदिर  :

आम्ही प्रथम येथील प्रेक्षणीय असं विठ्ठल मंदीर पाहिलं. नदीकिनारी असल्याने ते अधिक मनोहारी अन रमणीय बनलं आहे. बाहेरचं ते प्रशस्त आवार, तेथील वृक्षराजी, विहीर आणि तेथील स्वच्छता पाहून आकर्षक प्रवेशद्वारातुन आत शिरताना मनी आपोआप भक्तिभाव निर्माण होतो.

पळशीचे श्री विठ्ठल मंदिर .. १
पळशीचे श्री विठ्ठल मंदिर .. २
आत प्रवेश करताच मंदिराचं भव्य आणि सुरेख स्वरुप, आकर्षक शिल्पकला आणि चहुबाजीची तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. मुख्य मंदिर व त्यावरील शिल्पकला, सभामंडप व त्याच्या तिन्ही बाजुंच्या त्या नवविद्याभक्तीचं प्रतिक असलेल्या नऊ पायऱ्या, तो गाभारा व त्यातील  अठरा पुराणांचं प्रतिक असलेले ते अठरा खांब व त्यावरील सुरेख नक्षीकाम, दरवाजाच्या दोन्ही बाजुस रिद्धी-सिद्धीसह गणेश, भैरवाच्या मुर्ती, दरवाजावर चौसष्ट योगिनी, उंबऱ्यावरील दोन्ही किर्तीमुखे, आतील ती शाळीग्राम शिळेतील सावळी विठ्ठलमुर्ती तर बाजुला संगमरवरातील राही-रुख्मिणी, आणि त्यांच्याही बाजुला ज्ञानराज माऊली अन तुकोबाराय.. असं, क्वचितच दिसणारं, विलक्षण शांती-समाधान देणारं ते दिव्य देव-दरबार अन भक्तीमय वातावरण पाहून मन आणि चक्षु अगदी तृप्त-तृप्त होतात.

पळशी गावचे मुळ वतनदार रामराव पळशीकर यांचे चिरंजीव आनंदराव हे पेशव्यांकडे सुभेदार होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराक्रमाने ते सरसेनापती झाले. बहुदा, यामुळंही कदाचित, सुरतेची लुट स्वराज्याकडे घेवून जाणाऱ्या पथकाचा पळशीस मुक्काम झाला व  मुक्कामी सभेत लुटीतील काही अंश पळशी विकासकामी देण्याचं ठरलं; ज्यातुन पळशीभोवती ही भक्कम तटबंदी आणि नदीकाठी विठ्ठल मंदिर, रामेश्वर मंदिर, घाट व सतीची मंदिरे निर्मिली गेली. मंदिराच्या तटावरून  संपुर्ण भोवतालही अत्यंत नेत्रदीपक भावतो. समोरील भुईकोट, त्याच्या तटबंदीचा सुंदर नजाराही आपलं लक्ष वेधतो. हा परिसर पाहून आम्ही भुईकोटाकडेे वळालो.

     भुईकोट :

दुरूनच लक्ष वेधून घेणारी पळशी भुईकोटाची तटबंदी
भुईकोटाचे प्रवेशद्वार
विठ्ठल मंदिराच्या तटबंदीवरुन दिसणारा हा मोहक नजारा जवळून पाहताच अधिकच मोहवून गेला. प्रवेशद्वार अन तटबंदी अजुनही अत्यंत सुंदर अन मजबुत आहे. पण, आत शिरताच, ती दगड-विटांमधील माती/सिमेंटची नवी-जुनी घरे, त्यांची रचना व रंगकाम, आणखी पुढे गल्ली-बोळ, कुठे रस्त्यावर आलेलं सांडपाणी.. आणि मग छोटी-मोठी दुकाने व मंदिरे पाहून एखाद्या गावात प्रवेशल्यासारखे झाले. चार-एक वाडेच काय ते आपल्या जुन्या वैभव अन संस्कृतीची साक्ष पुरवीत असल्याचे दृष्टीस पडले. त्यातल्या एकात साखरपुड्यास आलेल्या महिलांची गजबज, त्यामुळे तिथं जाताच नाही आलं, दुसऱ्याची अवस्था पूर्णतया मोडकळीस आलेली, पण, इथलं मुख्य आकर्षण तो पळशीकरांचा वाडा मात्र पहावयास मिळाला.

       पळशीकर यांचा वाडा :

पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... १


पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... २
पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... ३
पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... ४
हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अतिशय सुंदर अन मनमोहक असा नजारा! सुबक अन ठेंगण्या दरवाजातुन आत प्रवेश करताच मध्यभागी चौक आणि सभोवतीची चौसोपी रचना आपलं लक्ष वेधून घेते. लगोलग तिथला प्रत्येक खांब, त्यावरील मनोहारी नक्षीकामाने आपले मन मोहवतो तर वरील मजल्याचा संपुर्ण पट आपली नजर तिथंच खिळवून ठेवतो. वर्णन काय करता वा छायाचित्रे काय पाहता.. ते प्रत्यक्ष पाहण्यातच अतीव सुख आहे, हे मात्र निश्चित! पुन्हा जावं आणि आणखी निरखुन पाहावं, इतकी सुंदर अशी कलाकुसर असलेलं हे नक्षीकाम पाहून ईथवर आल्याचं सार्थक होतं.
आजमितीला इथं, या वाड्यात, एक कुटुंब रहात असल्याने बऱ्यापैकी निगा राखली जाऊन ऐतिहासिक ॠणानुबंधाचा हा स्तुत्य  असा सांस्कृतिक ठेवा आम्हां भटकंतीकारांची कलातृष्णा निश्चितच तृषार्त करतो. हा ठेवा व त्याची निगा-जपणूक अशीच अन निरंतर राहो, ही मनीषा!
आता, जेंव्हा केंव्हा मी पळशी हे नाव पाहील, वाचेल, ऐकेल तेंव्हा मला तो लाल डबा अन तो काळा-पांढरा फलकच नव्हे, तर, हा भुईकोट, ही मंदिरं आणि ती विशाल तटबंदी अन प्रवेशद्वारही माझ्या नजरेसमोर नक्कीच उभं राहील!
पळशी हे गाव तसं बऱ्यापैकी आत जरी असलं तरी आपली गाडी असेल तर पळशी बरोबरच जामगावचा भुईकोट, टाकळी ढोकेश्वरची लेणी आणि थोडा अधिक वेळ हाती ठेवल्यास पेमगिरीचा किल्ला, तेथील बारव आणि विशाल वटवृक्ष असंही नियोजन, एकदिवसीय, थोडंसं धावाधावीचं, पण, नक्कीच छान होईल. नाहीतर फक्त पळशीसाठी पुण्याहुन थेट बस आहेच की!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...