Sunday, June 14, 2020

परळी गावातील मंदिर

जड अंतकरणाने निघालो ते परळी गावातील मंदिर पाहायला !

          यादवांच्या आधीचा काळ असेल. परळी गावाच्या अगदी शेवटी दोन भग्न झालेली आणि अखेरची घटका मोजणारी दोन भूमीज शैलीची मंदिरं आहेत. पहिल्या मंदिराच्या समोर समाधी शिळा असून चौकट वितान असलेले गर्भगृह शिल्लक आहे. बाकी सभामंडप संपूर्ण पडला आहे. विष्णूची मूर्ती आणि पिंड असून कळसाची शिळा सरकल्यामुळे पावसाचे पाणी आत पडत आहे. द्वारावर शाखापट्टी व बऱ्याच ठिकाणी आभासी नक्षीचे किर्तीमुख कोरलेले आहे. ह्या मंदिरावर बाकी अतिशय जबरदस्त अशी नक्षीकामयुक्त स्तंभ दिसून येतात. अखंड दगडात कोरलेला स्तंभ आणि त्यावरील नाजूक नक्षीकाम मनाला भावते. ह्या मंदिराच्या समोर रंगशिला आहे ज्यावर एकेकाळी कलाकारांनी कला सादर केलेली असेल. खरंच, इथेच नेमके थोडंस मी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आलो काय वैभव असेल ना ह्या मंदिरांचे ! दुर्दैवाने आज त्या रंगशिलेवर अवशेषांचा धोंडा ठेवलेला आहे.

          अखेरच्या घटका हि दोन्ही मंदिर मोजत आहेत. बाजूला एक प्रशस्त मंदिर असून कितीतरी युद्ध आणि तोडफोड मुकाट्याने सहन करणारा व पाहणारा मानस्तंभ भग्न चौथरावर काळाच्या ओघात काहीसा कमरेत कललेला आहे. ह्या मंदिराच्या तलविन्यासचा विचार केला असता, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह सुस्थितीत आहे. कळस मात्र बुतशिकन पदविधाऱ्यांनी पाडला आहे. त्यामुळे साहजिकच आता दिसणारा कळस अलीकडील आहे.

          मानस्तंभाच्या बाजूला अतिशय दुर्मिळ असे पंचमुखी शिवलिंग असून चार मुख चार दिशांना व एक मुखवटा अर्धवट स्वरूपात दाखवून सदाशिव लिंगाचे अव्यक्त स्वरूप प्राप्त केले आहे. सदाशिव म्हणजे सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान ह्या पाच अवस्था त्यात दर्शविलेल्या असतात म्हणजेच ह्याला पंचवस्थितीत अजून फोडून सांगायचे झाले तर पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश ह्याचे प्रतीक आहे. खालील फोटोत पाहू शकता.

          मंदिरात जाताना बाजूला असलेल्या तटाला खूप अशा विरगळ व सतीशिळा रचून ठेवलेल्या पाहता येतात. काही शिळा ह्या अतिशय दुर्मिळ असून महाराष्ट्रात बाकी ठिकाणी दिसत नाहीत. लढलेल्या खुणा जपत त्या विरगळी व सतीशिळा आज चारही बाजूंनी वाढलेल्या गवतात हरवलेल्या आहेत. त्यावेळी शत्रू चहूबाजूंनी होता आणि हा वीर लढला म्हणून देव व धर्म वाचला आणि म्हणूनच आपण आहोत पण आज चहूबाजूंनी गवत माजले आहे आणि त्यात हा वीर मूकपणे पाहत आहे. वाईट ह्याचे वाटते कि, ऐतिहासिक वास्तू व अवशेषांविषयी आपल्या लोकांमध्ये अजूनही क्रांती झालेली नाही. ह्याच उघड्या मंडपात भग्न नंदी उन, वारा व पाऊस झेलत असून त्याचे शीर आढळत नाहीत. त्यामुळे साहजिकच साधारणतः आज हा दोन तुकड्यात आढळतो. शीर लावण्यासाठी केलेली खोबणी (Internal Locking)दिसून येते, जी शिल्प अभ्यासकाला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. मंदिराच्या बाहेरील बाजूस आभासी व मैथुन शिल्प आहेत.  मैथुनातसुद्धा एक ध्यानस्थ योगी दाखवला असून तो लक्ष वेधून घेतो. ह्या क्रिया एकाग्रतेने पार पाडण्यासाठी तो प्रतिकात्मक दाखवलेला आहे. सभामंडपाच्या आतमध्ये छोटे छोटे सहा दगडी मंडप प्रत्येकी चार गोलाकार व चौकोनी स्तंभांवर पेलून आहेत. रंगशिलेवर त्यावेळचा नंदी आरूढ असून जो त्या ठिकाणावर अलीकडे ठेवल्यासारखा वाटत आहे. ती निरव शांतता आणि एकाग्रता मनाला ऊर्जा मिळवून देते. गाभाऱ्याच्या द्वारावर शाखापट्टी असून किर्तीमुख लक्ष वेधून घेतात. गाभाऱ्यात सयोनिज शिवलिंग असून काळा बेसॉल्ट सौंदर्याने खुलून गेलेला आहे. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आम्ही पडलो. बाजूला मन प्रसन्न करणारा संपूर्ण एका दगडात कोरलेला आभूषणांनीयुक्त असा गणपती बाप्पा ठेवलेला आहे. पाहूनच मन प्रसन्न होत राव ! समोर चिटुकला नंदी असून त्याचा तो निरागस चेहरा ! अहाहा ! काय सांगू हे प्रत्यक्ष पाहून जो आत्मिक आनंद वाटतो, तो कशातच नाही. हे सर्व पाहत असताना एकच जाणवते, ते म्हणजे  “नक्कीच देव इथे आहे.” तिथून काही अंतरावर एक घुमटाकार वास्तू असून बाहेर एक भग्न नंदी आहे व आतमध्ये गाभाऱ्यात प्रचंड पाणी साठलेले आहे. थोडे घाबरतच गवतात पाय ठेवून आम्ही तिथे गेलो; मोबाईलच्या फ्लॅशच्या प्रकाशात आतमध्ये पाहिले व विशेष असे काही दिसले नाही.

          परळीची हि दोन्ही मंदिर मनांत आणि कॅमेरात साठवून त्या कातरवेळी आम्ही नरसोबाच्यावाडीला निघालो. आता मात्र पोटात काव काव सुरु झाली होती. वाटेत पेठ नाक्याला जेवणावर येथेच्छ ताव मारला. नरसोबाच्यावाडीला पोहचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते. शांतता न ढवळता, हळुवारपणे हॉटेलमध्ये झोपी गेलो ते सकाळी फ्रेश होऊन दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषात कृष्णेच्या काठावर त्या मंदिरात वंदन केले आणि निघालो त्या आडवळणावरील स्वर्गात….!

          ओढ लागली होती कोपेश्वराच्या भेटीची ! ओढ लागली होती विविध शिल्प पाहण्याची ! ओढ लागली होती निसर्गाचा आविष्कार दाखवणाऱ्या त्या गर्द वडाच्या झाडांच्या सावलीची ! पावसाने चांगलीच कृपा केली होती आणि सकाळी साडे नऊच्या सुमारास ऐतिहासिक सैनिक टाकळी गावातून खिद्रापुरात पोहचलो. सर्व प्रथम जैन मंदिर आणि त्यावरील शिल्प पाहिली. पुत्रवल्लभा, विषकन्या, विविध नर्तकी पाहून मन सुखावले पण ओढ होती कोपेश्वराची ! पुढच्या पाचच मिनिटांत आम्ही तिथे पोहचलो. कृष्णेच्या काठी महाराष्ट्र आणि पलीकडे कर्नाटक अशी भौगोलिक रचना असलेली हि भूमी ! इथेच पलीकडे कर्नाटकात असलेल्या शहापूर ह्या गावी ह्या मंदिराला उपद्रव देणाऱ्या औरंगजेबाची छावणी पडली होती. ते समजून घेऊन आणि वडाच्या झाडांची माहिती घेऊन आम्ही मंदिराच्या नागरखान्यातून आतमध्ये गेलो. अहो, स्वर्गच ओ ! नुसताच संगमरवरात बांधलेला ताजमहालसुद्धा फिका पडतो ह्या कलाकृतीपुढे ! भरघोस बोलकी शिल्प आणि त्यांचे भाव समजून घेताना त्या शिल्पकारांच्या हातात देवच नांदत होता, ह्याचा प्रत्यय तिथे आल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या सभामंडपात स्तंभावर कोरलेल्या पंचतंत्रातील गोष्टी जेव्हा पाहिल्या तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्या मंदिराविषयी खालील दिलेल्या लिंकवर संपूर्ण माहिती आपण वाचू शकता.
https://survesagar.wordpress.com/2017/05/29/आड-वळणावरील-स्वर्ग-कोपेश/
          जवळ जवळ चार तास मंदिर पाहत समजून घेत आम्ही फिरत होतो कळत नकळत किती लोक आमच्या बरोबर फिरत होती, हे समजलेच नाही. त्यात वयस्कर आजी-आजोबा एकमेकांना आधार देत आमच्या बरोबर माहिती समजून घेत होते आणि पडलेले प्रश्न तिथेच मला विचारून शंका निरसन करून घेत होते. ह्या वयात त्यांचा असलेला उत्साह पाहून मन भरून आले. जड अंतःकरणाने मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला पण तेव्हाच मनांत आले कि, जवळपास असलेले लिंब गावातील शाहू महाराजांनी बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली बारा मोटेची विहीर पाहून जावे. सर्व प्रथम जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ह्या शिल्पांच्या यात्रेत आज क्रिकेटची मॅच होती, हे विसरूनच गेलो होतो. हॉटेलमध्ये जेवताना थोडी झलक पाहून आम्ही निघालो ते थेट शेरी लिंबकडे !
व्वा ! अजोड तंत्रज्ञानाने युक्त भव्य अशी हि विहीर पाहताना काळजाचा ठोका चुकतो राव ! जणू काही एखाद्या इमारतीचे मजले उतरत आम्ही त्या विहिरीत पोहचलो. अफाट पाण्याचा साठा आणि चारही बाजूला असलेले शरभ शिल्प ! शिल्प नावाला ओ, त्या मूर्त्याच होत्या. मागील बाजूला असलेले केवल शरभ शिल्प पाहून मराठ्यांची आक्रमकता दिसून येते. आज मशीनला लाजवेल अशा घडवलेल्या त्या शरभाच्या मूर्त्या इतक्या जिवंत वाटत होत्या कि ते शब्दांत मांडता येणार नाही.

आता सर्व आटपले होते, दौरा सुफळ संपूर्ण झाला होता. कारमध्ये बसून चर्चेत फक्त शिल्पच होते. शरीराने घरी चाललो होतो मन मात्र शिल्पांभोवती घिरट्या मारत होते.
या शिल्प अभ्यास दौऱ्याविषयी खाली काही फोटो जोडत आहे.
परळी गावातील मंदिराच्या बाहेरील हा नंदी

कृष्णा नदीचा काठ व पलीकडे कर्नाटक जिथे औरंगजेबाची छावणी पडली होती.

स्वर्गमंडपाच्या आतून दिसणारे आकाश !

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

बदामी हंपी https://maharashtradeshee.blogspot.com/2026/06/pune-to-gokak.html

    ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे! विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्य...