Sunday, June 14, 2020

अंबरनाथचे शिवमंदिर


2017-10-09_07.26.51.jpg
उध्वस्त कळसात मुकं शिल्प बोलकी करण्याचा प्रयत्न करत आहे….
          मंदिर शैलीचा आणि विविध शिल्पांचा अभ्यास करताना जुन्या मंदिरांचे माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. देव देवळात तर आहेच पण बारकाईने आणि अभ्यासू दृष्टिकोनातून पाहिल्यास देव शिल्पांमध्ये व ते कोरणाऱ्याच्या हातांमध्ये दिसून येतो. असेच एक उध्वस्त कळसाचे मंदिर मध्य रेल्वेचे स्थानक अंबरनाथ जवळ आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याचाकडे पाहता येते. ऑफिसला जाताना मला रोज ह्याच स्थानकाला पार करून जावे लागते पण तिथे कधी जाण्याचा योग आला नव्हता तो काल आला. तसं पाहिलं तर रविवार म्हणजे हक्काचा लोळत घालवण्याचा दिवस पण शिल्पशैलीचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा पासून लोळायला जीवावरच येत आहे म्हणून ऐतिहासिक भटकंती करायला नेहमी सोबतीला असणारा मित्र ओंकारला सोबत घेतलं आणि सकाळीच लोकल पकडून अंबरनाथला उतरलो. पेटपूजा केली आणि थेट गाठले शिवमंदिर !
2017-10-09_11.44.55.jpg
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन शिल्प परंपरेचे आरंभस्थान मानण्यात येते. हे मंदिर शिलाहार राजघराण्याचा शासक चित्तराज याने बांधवयास घेतले आणि त्याचा मुलगा मामावाणीराज म्हणजेच मुम्मूणी याने इस १०६० ला पूर्ण केले कारण शिलालेखात शके ९८२ असा उल्लेख आहे, या मंदिर शैलीला “भूमीज शैली” असे म्हणतात व ह्या शैलीचे तसेच व्यक्तिगत उल्लेख असलेले हे पहिलं मंदिर आहे. अंबरनाथचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला सभामंडप, अंतराळ व नंतर गर्भगृह आहे. प्रत्येक मंडपाचा कोन एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केलेली आहे. शिवाय भिंतींची मांडणी अशी आहे कि, बाहेरून हे दोन्ही नक्षत्राकृती भासतात. या मंदिराच्या पृष्ठभागावर देवदेवता, अप्सरा, यक्ष, व्याल, गजथर, किर्तीमुख असे शिल्प कोरलेले आहेत. अशाप्रकारे जोत्यावर एक एक स्तरावर नक्षीकाम केलेले आहे. खालील फोटोत पाहू शकता वाद्य वाजवण्यात तल्लीन झाले वादक आणि मध्यभागी नर्तकीने घेतलेला ठेका….
2017-10-09_11.47.15.jpg
वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर बांधलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे. कळस भग्न झालेला असून संपूर्णतः चहू बाजूंनी हे मंदिर शिल्पांनी नटलेले आहे. सुरसंदरी, विष्णू, शिव-पार्वतीचे विविध शिल्प, वराहशिल्प अशी बरीच शिल्प तिथे पहावयांस मिळतात. खुरशिला त्यावर चारही बाजूला असलेला गजथर, त्यावर स्तंभांची आधारशिळा व त्यावर मंडोवर असून पुढे कळस शिल्पकला सुरु होते. जागोजागी फिरवलेली वेलबुट्टीचे नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. या मंदिरावर शिवाचे भक्त शृंगी-भृंगीसुद्धा पहावयांस मिळतात. पत्रलेखिका, दर्पणसुंदरी, बुटकीसखी, नर्तकी, वादक, स्त्री वादक, सुरसुंदरी, योगी, मर्कटछळ, अशी विविध शिल्प कोनाकोनांत लपलेली आढळतात. मंदिराच्या चहू बाजूंना देवकोष्टी आहेत व त्यात विविध देव विराजमान आहेत. मंदिरात जाण्यासाठी तीन दरवाजे असून त्याच्या सर्व बाहेरील बाजूच्या द्वारललाटबिंबावर गजानन कोरलेले आहेत तसेच प्रत्येक खांबावर भारवाहक यक्ष कोरलेले दिसून येतात. द्वारललाटबिंबाच्यावर उत्तररांग व उंबरठ्यावर किर्तीमुख कोरलेले आहेत. मंदिरात प्रवेश करताना थोडंस आश्चर्यचकित व्हायला होतं कारण इथे दोन नंदी आहेत कारण गर्भगृहात दोन लिंग आहेत, असे स्थानिक सांगतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एक लिंग स्वयंभू आहे. द्वाराजवळ असलेला हा नंदी शिल्पकलेच्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो. सभामंडपात आतमध्ये प्रवेश केल्यावर चार भल्या मोठ्या स्तंभांवर पहिला मंडप तोललेला असून खाली एक बऱ्यापैकी मोठा चौथरा आहे ज्यावर एकेकाळी नंदी असू शकतो, असे वाटते. इथूनच वरती पाहिल्यास मधल्या गोलाकार छताची रचना एककेंद्री वर्तुळाची मालिका असल्याप्रमाणे आहे. एका बिंदूभोवती मोठी होत जाणारी वर्तुळ काढली तर नेमके असेच दिसले हे प्रत्यक्षात पाहिल्यावर जाणवते. ह्या प्रकाराला सभापद्म प्रकारचे छत म्हणतात. बाजूला सभामंडपाचे चार-चार खांबांच्या रांगा दोन बाजूला असून संपूर्ण सभामंडप त्यावर तोललेला आहे. ह्या मंडपाचे छत समतलवितान आहे म्हणजेच सपाट आहेत. भारवाहक यक्ष इथे मात्र लक्ष वेधून घेतात. संपूर्ण स्तंभ चहू बाजूंनी शिल्पांनी सजलेले आहेत. त्यावर काही ठिकाणी मैथुनशिल्पसुद्धा आढळतात. स्तंभावर विष्णू, शिव व पार्वती, गणराय तर काही ठिकाणी योगी कोरलेले दिसून येतात. सभामंडपात असलेला परंतु तिथे नंदी नसलेला हा मंडप अंतराळाला चिकटून उभा आहे. हा संपूर्ण मंडप बंदिस्त असल्यामुळे ह्याला गुढमंडपसुद्धा म्हणतात.
गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात.
हे मंदिर पाहताना किती योजनापूर्वक कोरलेले असेल, हे जाणवते. आज शिखर भग्नावस्थेत आहे परंतु पूर्वी ते किती उत्तुंग आणि नक्षीदार असेल ह्याची कल्पना आपल्याला येते. मंडपाच्या शिखराचा आकार पिरॅमिडप्रमाणे कोनासारखा आहे, याला “संवरण” म्हणतात. शिखरांच्या चार कोनांकडे पाहिल्यास खांबाप्रमाणे कोरीवकाम त्याचे केलेले आहे. दुरून पाहिल्यास ते खांबच वाटतात. मंडोवरावर महाकाली, अक्राळविक्राळ अन् भितीदायक कोरलेली आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे चार मुखांचा ब्रम्हदेव इथे दिसतो. ब्रम्हदेवाचे चौथे मुख मागे असून पुढून फक्त तीनच मुख दिसतात. काही ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हातात घेतलेला उंच मुकुट परिधान केलेला विष्णू दिसून येतो. उग्र स्वरूपाची शस्त्रधारी दुर्गा म्हणजे आदिमायेचे संहारक रूपाचे शिल्प इथे पाहता येते. गजासुराचा वध सुद्धा इथे शिल्पात कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने मूर्ती कोरुन कलाकार कलेच्या माध्यमातून देवाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवत असतो. गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जावे लागते. गाभारा अगदी साधा आहे. कोणतेही नक्षीकाम गाभाऱ्यात दिसत नाही. जमिनीतून वर शिवलिंग आल्यामुळे ते स्वयंभू मानले जाते. ह्या लिंगाला मुखलिंग म्हणतात कारण ह्यावर चेहरे कोरलेले आहेत.
2017-10-09_11.43.47.jpg
मंदिराच्या बाजूला पुष्करणी असून त्याच्या चारही कोपऱ्यांवर शिल्प कोरलेली आहेत. एकेकाळी अंबरनाथ गावाच्या बाहेर असलेले हे मंदिर आज मध्यवर्ती ठिकाणी आल्यासारखे वाटते. मंदिराच्या आजूबाजूला बागबगीचा केलेला आहे. तर असे हे मंदिर सेंट्रल रेल्वेचे स्थानक अंबरनाथ इथून चालत अवघे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
या मंदिराचे काही फोटो खास तुमच्यासाठी….
यवनी आक्रमणात कळस तोडला गेला पण आज जे काही शिल्लक आहे ते पाहू शकता….
2017-10-09_11.42.39.jpg
शिलाहारांचे अप्रतिम स्थापत्यकला एकावरएक दगड रचण्यासाठी बाजूला असलेले हॅन्डल….
2017-10-09_11.41.32.jpg
मदमस्त हत्तीला अंकुशाने अंकित करण्याच्या प्रयत्नात असलेला माहूत….
2017-10-09_11.48.19.jpg
तांडव नृत्य
2017-10-09_07.28.27.jpg
वराहवतार
2017-10-09_07.35.52.jpg
दर्पणसुंदरा
2017-10-09_11.40.14.jpg
भारवाहक यक्ष
2017-10-09_09.06.03.jpg
विष्णूवे नमो:
2017-10-09_07.33.56.jpg
अक्राळ विक्राळ महाकाली
2017-10-09_09.04.46.jpg
नरसिंह….
2017-10-09_11.50.26.jpg
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी…. (बुटकी सखी पायात गेलेला काटा काढताना….)
2017-10-09_07.30.44.jpg
एकेकाळी बलाढय रूप धारण करणारी वालधुनी आता ओढ्यासारखी दिसते, खालील फोटोत पाहू शकता किनाऱ्यावर असलेले शिवमंदिर !
IMG_20171008_105828.jpg
ह्या मंदिराला नक्की भेट द्या कारण इतके सुंदर मंदिर पाहण्यासाठी जास्त चालावेही लागत नाही आणि लोकलच्या प्रवासामुळे झटकन पोहचता येते.

बर्‍याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्‍याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्‍यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्‍यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्‍यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा

आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.



देवळाच्या मागील भाग


ही गणेशमूर्ती....


हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.


हे कोरीव खांब ..

आदिमायेचं रौद्ररुप !!

ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प

संपूर्ण देऊळ..



खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्‍याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.

हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्‍यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.


अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,
भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)






No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...