लेखिका - वंदना पंराजपे
कैलास-मानससरोवर यात्रा करण्यासाठी १लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, कारण तिबेटमधील प्रवासासाठी चीन सरकारला ७०० डॉलर द्यावे लागतात. पासपोर्टही लागतो. त्याशिवाय या यात्रेसाठी 'स्ट्रेसटेस्ट' वगैरेसारख्या महागड्या, पण आवश्यक तपासण्या कराव्या लागतात. आमच्याजवळ पासपोर्ट नाही आणि एवढे पैसेही नाहीत. कैलासयात्रा घडावी असे खूप वाटत असे. पण हे आपल्याला शक्य नाही म्हणून गप्प बसत होतो.
शिवशंभोला आम्हाला यात्रा घडावी असे वाटत होते, म्हणूनच एक दिवस म.टा.मधील एका बातमीकडे लक्ष गेले. गोरेगाव-मुंबई येथील श्री. वाशीकर यांनी ती बातमी दिली होती. 'आदिकैलास-ओमपर्वत यात्रा आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.' फोन नंबरही दिला होता. लगेच त्यांना फोन केला. वाशीकर हे वयोवृद्ध गृहस्थ आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना चीन दौर्यावर गेले होते, तिथे त्यांनी चीनबरोबर करार करुन कैलास-मानस यात्रा पुन्हा सुरू केली होती; जी १९६२च्या लढाई पासून बंद पडली होती. श्री. वाशीकर या यात्रेच्या पहिल्या ट्रीपचे सदस्य होते. आणि आता महाराष्ट्राचे या यात्रेचे ऑनररी सेक्रेटरी आहेत.
वाशीकरांना फोन केला. ते स्वतः भेटले. त्यांनी प्रत्येकी १५०० रुपयांचा ड्राफ्ट 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा त्यांच्या गोरेगावच्या पत्त्यावर पाठवायला सांगितला. एकूण खर्च प्रत्येकी १२,५०० रुपये येईल असे सांगितले. लगेच दोघांसाठी म्हणून ३००० रुपयांचा ड्राफ्ट पाठवला. त्यांनी फॉर्म पाठवले.
जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात एकूण आठ ग्रुप पाठवतात. एक ग्रुप २०/२५ जणांचा असतो. नोंदणी झाल्यावर त्यांनी पाठवलेले फॉर्म भरून, एम.डी. फिजिशियनकडून मेडिकल करून, पोलिस क्लिअरन्स घेऊन ११,००० प्रत्येकीचा 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा ड्राफ्ट फॉर्मसोबत पाठवायचा. आपल्याला हव्या त्या महिन्यातील तारीख आपल्याला निवडता येते. सरकारी नोकरी असलेल्यांना ट्रेकिंगसाठी असलेली स्पेशल भरपगारी रजा मिळते.
दिल्ली ते दिल्ली साधारण २०/२१ दिवसांची यात्रा असते. त्यापैकी दोन दिवस जाताना आणि दोन दिवस येताना असा चार दिवसांचा प्रवास बसने असतो. आणि १६ दिवस पायी किंवा घोड्यावरुन असतो. दिल्लीबाहेरून येणार्यांसाठी रेल्वे यात्रीनिवासात स्वखर्चाने राहण्याची सोय होते. तिथूनच यात्रेला सुरवात होते. यात्रेच्या आदल्या दिवशी इथेच सर्व यात्रेकरूंची मिटिंग होते. ओळखदेख व यात्रेच्या कार्यक्रमाची, तेथील हवामान, संभाव्य धोके याची कल्पना त्यावेळी दिली जाते. दिल्लीपासून महाराष्ट्रातर्फे एक मार्गदर्शक असतो, तर निगमचा मार्गदर्शक काठगोदामला भेटतो.
आम्ही २००२ साली जून महिन्यात गेलो होतो. त्यावेळीचा खर्च मी सांगितला आहे. आता कदाचित जास्त असेल. असो, आता उद्यापासून आपण प्रत्यक्ष यात्रेला निघू.
हर हर महादेव. नर्मदे हर!
भाग-२
प्रथम आदि कैलास येथेच भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान होते.कौरव-पांडवांचे युद्ध संपल्यावर विजयी पांडव भगवंताचे दर्शन घेउन पाप क्षालन करावे या हेतुने कैलासावर येण्यास निघाले,पांडवांच्या हातुन बांधव,गुरू हत्येचे पातक घडले होते त्यामुळे भगवान त्याना दर्शन न देता आणखी वर म्हणजे आत्ताच्या मोठ्या कैलास इथे निघुन गेले.अशी आख्यायिका आहे.आदि कैलास जवळ एक सहा शिखरे असलेला डोंगर आहे,ही शिखरे म्हणजे पाच पांडव आणि द्रौपदी असे मानतात.
आदि कैलास भारताच्या हद्दीत असुन त्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १५७००फूट आहे.मोठ्या कैलासची उंची जवळजवळ १७०००फूट आहे.पार्वती सरोवर साधारण ५कि.मि.घेराचे आहे,तर मानस खुपच मोठे आहे.म्हणून ही यात्रा त्या मानाने सोपी आहे.
आमच्या ग्रुपमध्ये नाशिकहुन आम्ही सौ.वंदना परांजपे,श्री.रत्नाकर परांजपे.सांगली येथुन श्री. फडके,श्री. सुनील शिंदे,नागपुर येथुन श्रीमती मीना पुरोहित,सौ.रोहिणी सन्गवई,डोंबिवली येथुन श्री.पटवर्धन.मुंबई येथुन श्री.तुळापुरकर असे होतो आणि मार्गदर्शक होते श्री.सुनील पित्रे. याशिवाय जयपुर-राजस्थान येथील पाच जणांचे कुटुंब,दिल्ली येथील श्री.कपिल,नागपुर येथील पटेल असे सोळाजण होतो.कुमाऊ मंडल विकास निगम तर्फे बिपीनचंद्र पांडॅ हे मार्गदर्शक होते.
पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता,ओम नमःशिवाय! बम बम भोले!आणि आपली मराठी गणपती बाप्पा मोरया!अशा गजरात बसने दिल्लीहुन प्रस्थान ठेवले.दिल्लीचा उन्हाळा भयन्कर तो रुद्रपुर पर्यन्त आपला पिच्छा पुरवतो.रुद्रपुरला पांडेजी बसमध्ये चढले,आणि आपली ओळख करुन दिली.ते निगम मध्ये पर्यटन संचालक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे ऑफिस नैनिताल येथे आहे.मार्गदर्शकाचे काम त्यानी मुद्दाम मागुन घेतले होते केवळ शिवओम दर्शनासाठी.जेव्हा पुन्हा ही यात्रा सुरु झाली तेव्हा ते एक साधे पोर्टर म्हणुन नुकतेच नोकरीला लागले होते. नबिढांग येथील मुक्कामात प्रथम त्यानाच पर्वतावरील ओम दर्शन झाले.
रुद्रपुर नंतर घाट सुरु होतो,हवा थंड होऊ लागते,निसर्गबहार दिसू लागतो.आणि येते उत्तराखंडातील हिल स्टेशन अल्मोडा.अल्मोडा म्हणजे असंख्य मोड किंवा अनेक वळणा वळणांचे गाव.जिल्हा मुख्यालय आहे.येथे रामक्रुष्ण मिशनची शाखा आहे.स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करीत असताना येथे आले असता तीन दिवस उपाशी व तहानेने व्याकुळ होउन एका ठिकाणी चक्कर येउन कोसळले.तेव्हा एका मुस्लीम बन्धूने त्याना पाणी पाजुन शुद्धीवर आणले,भाकरी खाऊ घालुन,त्यांची सेवा करुन त्यांचा प्राण वाचवला.त्या ठिकाणी विवेकानंद विश्रांतीस्थळ उभारले आहे.
हिरवेगार डोंगर,दाट जंगल,डोंगर उतारावर रंगीबेरंगी फुलांचे गालिचे अशा सुंदर निसर्गाच्या संगतीत ४५०कि.मि. वरील कौसानी येथे निगमच्या रिसॉर्ट मध्ये आपण मुक्कामाला पोहोचतो तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते.
कौसानी हे नाव कौशिकऋषींच्या नावावरुन पडले आहे.कौशिक गोत्र असणारे सारे मुळचे येथील रहिवासी.कौसानीच्या पर्वत रांगेत कोसी नदीचा उगम आहे.कौसानीला उत्तराखंडाचे दार्जिलिंग म्हणतात.येथील डोंगर उतारावर चहाचे मळे मोठे मोहक दिसतात.येथुन हिमालयातील नंदादेवी,कांचनगंगा वगैरे शिखरे दिसतात.सुर्यास्ताचे वर्णन करायला योग्य शब्द सापडत नाहीत,जणू धरतीमातेच्या हिरव्या शालुचा लाल-पिवळा सोनेरी जरतारीचा पदरच तिने डोक्यावरुन पुढे ओढुन घेतला आहे.प्रुथ्वीवर स्वर्गच अवतरला आहे कौसानीत.
महात्मा गांधी काही दिवस येथे राहिले होते.हवा पालटासाठी.ते घर स्म्रुति म्हणून जपले आहे.आता विश्रान्ती.
क्रमशः
भाग ३
दुसरा मुक्काम असतो ३५०कि.मि. वरील धारचुला.कौसानी ते धारचुला हा प्रवासही नितांत सुंदर आहे.वाटेत प्रथम येते बागेश्वर.८०० वर्शापुर्वीचे मंदिर आहे वैजनाथाचे.मंदिरासमोर गोमती नदी आहे.स्वच्छ नितळ पाणी खळखळ वाहत असते,मासेही खुप आहेत.मंदिरातील पार्वतीमातेची अप्रतिम सुंदर मुर्ती शिल्पकलेचा उत्क्रुष्ट नमुना आहे.मुर्तिच्या प्रभावळीवर शिव-पार्वती विवाह सोहळा शिल्पांकित केलेला आहे.मन्दिरा समोर एक मोठा गोल गुळगुळीत दगड आहे,तो एका माणसाला साधा हलवताही येत नाही पण नऊ माणसानी फक्त एक बोट दगडाला लावुन नऊ नऊ नऊ असे म्हटले की तो डोक्या पर्यंत वरती उचलला जातॉ.आठ किंवा दहा माणसानी असे केले तरी तो उचलता येत नाही.
नंतर चिकोडी येथे निगमच्या रेस्टहाउस मध्ये भोजनासाठी थांबतो.चिकोडी येथे सुंदर बागबगिचा आहे,हिमालयाची शिखर शोभा पहाण्या साठी एक निरीक्षण मनोरा आहे,दुर्बिणीची सोय केलेली आहे.भोजन उत्क्रुष्ट असते.भोजनानंतर पुढे येते दीदीहाट.निसर्ग सौंदर्याची लयलुट आहे इथे.रस्त्याच्या एका बाजुला डोंगर दाट व्रुक्षराजीने भरलेला जमिनीवर रंगीबिरंगी फुलाचे गालिचे हिरव्या मखमालीचे.मध्ये रस्ता दुसर्या बाजुला खोल दरी.दरीत खळखळ वाहणारी नदी तिच्या दोन्ही तिरांवरही हिरवळीचा गालिचा पसरलेला.येथ नारायणस्वामी यानी स्थापन केलेले कॉलेज आहे.
पुढे निघालो,ड्रायव्हरने एकदम करकचुन ब्रेक लावला निसर्गदर्शनात रमलेले आम्ही पुढे आदळले गेलो.काय झाले? क्या हुआ? च्या गोंधळात कळले गाडीच्या पुढे एक मोठी घोरपड आली होती,भराभर सगळे खाली उतरलो पाठमोरी दिसली ती लगबगीने डोंगर उतारावरुन गायब झाली,आम्हाला फक्त शेपटीचा फोटो काढता आला.बस निघाली थोड्याच वेळात मेंढ्यांचा मोठा कळप आडवा आला सगळे खाली उतरुन त्यांच्या मऊ केसावरुन हात फिरवण्या साठी धडपडू लागले,यांनी माझ्या खांद्यावर एक पिलू दिले,खुप छान मऊमऊ गोंडस होते.
धारचुला पर्यंत सारा प्रवास घाटाचा आहे,निसर्गाने आपले सौंदर्य इथे नुसते उधळले आहे. रस्ता बरा आहे कारण डोंगर ढासळून रस्ता खचण्याचे प्रकार नेहेमीच होत असतात. धारचुला येई पर्यंत सन्ध्याकाळ झाली.धार म्हणजे पर्वतमाथा आणि चुला म्हणजे चुल.तीन प्रचंड डोंगरांच्या माथ्याचा शिव-पार्वतीचा चुला;धारचुला.
धारचुला येथे निगमचे सुंदर प्रशस्त रेस्टहाउस आहे काली नदीच्या तीरावर.काली नावाप्रमाणे रौद्रभीषण प्रवाह अत्यंत वेगाने रोंरावत धावत असतो.नदीच्या अल्याड भारतचा धारचुला पल्याड नेपाळचा धारचुला आहे.दोन्ही देशात येण्याजाण्या साठी रेस्टहाउस जवळच कालीच्या दोन्ही तीराना जोडणारा झुलता पूल आहे.सकाळी १० ते सन्ध्याकाळी ६ पर्यंत मोकळे व्यवहार होतात,पासपोर्ट व्हिसा वगैरे कटकटी नाहीत.नेपाळ!भारताचा सच्चा आणि एकमेव हिंदू राष्ट्रमित्र.
धारचुलाचा मुक्काम सुखकारक असतो.येथे आपल्या सामानाचे वजन केले जाते,प्रत्येकी फक्त २५किलो वजन बरोबर नेता येते. यात्रेच्या यादीत हे सांगितलेले होते तरिही काही लोकानी अवजड सुटकेस आणल्या होत्या सामानही जास्त होते मग रेस्टहाउसच्या गोडाउन मध्ये ते ठेवले.सर्वांची मेडिकल केली.रेस्टहाउसचे काली सन्मुखचे कॉरिडॉर प्रशस्त आहे,तिथे खुर्च्या टाकुन बसलो गप्पाटप्पा करत.थोडी फोटोग्राफी केली.उद्यापासुन खरी यात्रा सुरु.
क्रमशः
भाग-४
सकाळी गडबड,लगबग सुरु झाली घोडेवाले पोर्टर आले.पुन्हा एकदा बरोबर नेण्याचे प्रत्येकाचे सामान तागडीत टाकुन बरोबर २५ किलो असल्याची खात्री त्यानी केली आपले सामान नेण्यासाठी निगम घोडा-पोर्टर देते,पण स्वतःसाठी घोडा हवा असेल तर त्यासाठी ३५०० रुपये लागत होते.तो घोडा पुर्ण यात्रेत आपल्या बरोबर राहतो दोघाना ७००० रुपये लागले असते आम्ही आपल्या दोन दोन पायांचेच घोडे ठरवले.
आज फक्त १९कि.मि. बसचा प्रवास होता.तवाघाट आले. हा डोंगरमाथ्या वरचा सपाटीचा भाग पार्वतीचा तवा.काली आणि गोरी गंगा या नद्यांचा सन्गम आहे. इथे मोठा हायड्रो पॉवरप्रॉजेक्ट आहे.पाठीला छोटी पिशवी लावून बसला टाटा केला आणि पांगूसाठी डोंगर चढायला सज्ज झालो.पांगू फक्त ९ कि.मि.असे सांगितले होते,उंची ८०००फूट.वाटले दोन तासात सहज पोहोचू आपण रोज एका तासात ५कि.मि. चालतोच.
पण भ्रमाचा भोपळा फुटायला पाच मिनिटेही लागली नाहीत खडीचढण दगडानी बांधलेला खाबडखुबड रस्ता दमछाक करणारा पण शिणवटा कमी करणारा निसर्ग,तहान भागवणारे झुळझूळ वाहणारे झरे,आणि वाटेत कुलम{हिरवे आलुबुखार} विकणारी,लिमलेटची छोटिशी गोळी दिली तरी खुशहोउन खुदुखुदु गोड हसणारी निरागस कुमाऊं खेडूत मुले थकवा जाणवू देत नाहीत.वाटेत एक वाडी लागली तेथील घरी लग्न होते,आम्ही तिथे पोहोचलो तर आमचे खुप प्रेमाने ऊं नमःशिवाय म्हणून स्वागत केले,बसायला घोंगडे दिले,आपुलकीने चौकशी करुन सगळ्याना फराळ दिला,चहा केला.त्याशिवाय लग्नाचे पाहुणे म्हणून प्रत्येकाला टॉवेल भेट दिला.मग आम्हीही सर्वानी मिळून नवर्यामुलीला आहेर दिला.हे आमच्या सारख्या अनोळखी लोकांचे केलेले आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो.
पुन्हा वाटचाल सुरु.पांगुला पोहोचायला सहा तास लागले,सन्ध्याकाळ झाली.थकून गेलो होतो पण मुक्कामावर पोहोचलो आणि निगमच्या हसतमुख कर्मचार्याने ऊं नमःशिवाय म्हणून दिलेले रसना पिताक्षणीच तो थकवा कुठल्याकुठे पळून गेला.वातावरण आल्हाददायक होते.
कुलम एक असे पहाडी फळ,हिरव्या रंगाचे आबटगोड चवीचे.खाल्ले की तहान भागते,शरीरात शक्ती येते.थकवा पळून जातो.
ऊं नमःशिवाय षडाक्षरी महामंत्र प्रत्येकाच्या तोंडी.चालणारा प्रत्येक माणूस समोरासमोर आल्यावर म्हणणारच ऊं नमःशिवाय स्वागतार्थ ऊंनमःशिवाय निरोपार्थ ऊंनमःशिवाय,देवाणघेवाण करताना ऊंनमःशिवाय,आभार मानताना ऊंनमःशिवाय सर्वकाळ ऊं नमःशिवाय.खुप छान पवित्र सुंदर वातावरण आहे या उत्तराखंडाच्या यात्रेत. क्रमशः
भाग-५
आज सोसा-नारायण आश्रम मार्गे सिर्खा. अंतर १६ किमी. उंची ९००० फूट.
पहाटे ५-३० वाजता पराठे, बोर्नव्हिटा असा नाश्ता करुन चालायला सुरूवात केली. पांगूचा अवघड डोंगर उतरून खाली आलो, तर सोसाच्या डोंगराला जोडणारा नदीवरचा पूल पडला आहे असे दिसले. मराठी गाईड सुनील पित्रे आणि पांडेजी यांनी नदीचा उतार शोधला, आणि मग एकमेकांच्या आधाराने सर्वांनी नदी ओलांडली. घोड्यावरुन जाणारे लांबच्या रस्त्याने गेले होते. खरे म्हणजे घोडे गेले तो मोटार रस्ता आहे नारायण आश्रमापर्यंतचा, पण निगम वाहनाची व्यवस्था करत नाही म्हणून डोंगर चढून रस्त्यावर आलो. सोसासाठी पुन्हा डोंगर चढायचा किंवा रस्त्याने सोसा गाव टाळून सरळ नारायण आश्रमाला जायचे असे दोन पर्याय होते. रस्त्याने थोडे लांब पडणार होते, पण डोंगर चढण्याचा त्रास वाचणार होता म्हणून आम्ही रस्त्याने जायचा निर्णय घेतला. साडेदहा वाजता नारायण आश्रमात पोहोचलो.
नारायणस्वामी कर्नाटकातील मोठे इंजिनीयर होते. त्यांनी संन्यास घेतला होता. भारतभ्रमण करीत कैलासयात्रेच्या वेळी ते या कुमाऊं प्रदेशात आले असताना येथील कठीण जीवन, दारिद्र्य पाहून त्यांनी येथेच राहून येथील जनतेसाठी काम करायचे ठरवले. २६ मार्च १९३६ रोजी आश्रमाचा वास्तुमुहूर्त केला. मफतलाल हे प्रसिद्ध उद्योगपती त्यांच्या प्रमुख शिष्यमंडळींपैकी एक होते. त्यांनी या कामी खूप मदत केली. आश्रमांच्या सर्व इमारतींचा प्लॅन स्वतः नारायणस्वामींनी तयार केला आहे. लांबून लांबून दगड आणवले. पाथरवटांकडून चिरे तयार करवून घेतले. लाकडी इमारतीची रचना अशी केली आहे की बर्फ छतावर साठणार नाही, प्रकाश भरपूर येईल पण आतमध्ये थंडी अजिबात वाजणार नाही. हवा खेळती राहील. खिडक्यांची रचना तिहेरी आहे. बाहेर जाळी, मध्ये काच, आत लाकडी दार. बागबगीचा, ध्यानकेंद्र, अन्नपूर्णाभवन, राहण्याच्या खोल्या - सर्वच अप्रतिम आहे. येथे नेपाळी चित्रकाराने काढलेली नैसर्गिक जलरंगातील येशू ख्रिस्ताची दोन चित्रे आहेत. एका चित्रात येशू सुळावर उठून बसलेले आहेत. ही चित्रे शंभर वर्षांपूर्वीची आहेत. नारायणस्वामींच्या पूजेची चांदीची मूर्ती मफतलाल यांनी त्यांना दिलेली आहे.
नारायणस्वामींनी कुमाऊं भागात अनेक शाळा, कॉलेज, दवाखाने, हॉस्पिटल इत्यादी सुरू केली आहेत. सर्व संस्थांचा कारभार भक्तांनी दिलेल्या देणग्यांवर व्यवस्थित सुरु आहे. १९३६ ते १९५४ पर्यंत स्वतः नारायणस्वामी आपले प्रथम अनुयायी ईश्वरीदत्त पांडे यांच्या सहयोगाने पाहात असत. पण १९५४ मध्ये स्वामी अचानक कोणालाही न सांगता आश्रम सोडून निघून गेले. म्हणतात की फक्त सुती लंगोटी बांधून ते गंगा प्रदक्षिणा करत होते. व भिक्षांऽदेही करत होते. पुढे कळले की ९ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी ते कलकत्त्याच्या चित्तरंजनदास हॉस्पिटलमध्ये ब्रम्हलीन झाले.
सध्या आश्रमाचा कारभार श्रीमती द्रौपदीदेवी गर्ब्यांग या पाहतात. या माताजी पदवीधर असून त्यांचे शिक्षण दिदीहाट येथील कॉलेजमध्येच झालेले आहे. प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या आहेत माताजी. वृद्ध झाल्या असल्या तरी उत्साही आहेत. स्वतः आम्हाला सारा आश्रम दाखवला, चहापाणी केले.
नारायण आश्रमापासून सिर्खा ८ किमी आहे. रस्ता कठीणच आहे. चढ-उतार करत दुपारी दीड वाजता सिर्खा येथे मुक्कामी पोहोचलो. "ॐ नमः शिवाय" ने रसना देऊन स्वागत झाले. स्नानासाठी गरम पाणी मिळाले. मग स्नान, कपडे धुणे वगैरे करून भोजनप्रसादाचा आस्वाद घेतला. स्वादिष्ट पोळी-बटाट्याची भाजी, भरपूर सॅलड, गुलाबजामुन असा बेत होता.
थोड्या विश्रांतीनंतर आजूबाजूला हिंडून निसर्गसौंदर्य पहात गावकर्यांशी गप्पाटप्पा मारल्या. रात्री मुगाच्या डाळीची खिचडी भरपूर साजूक तूप घातलेली आणि पापड-लोणचे असे भोजन करून दुलईमध्ये गुडूप झालो.
क्रमशः
भाग-६
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट
आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे. समोर ठाकली होती कठीण रुंगलिग टॉपची खडी चढाई...
थोडे थांबून चालू लागलो. घनदाट जंगल आहे. उन्हाची तिरीपही लागत नाही. सर्वत्र वेळूची - ज्यापासून बासरी बनवतात त्या बांबूची बने होती. त्या बनामधून वारा वेणूनाद घुमवत होता. मोठमोठ्या वृक्षांवरून तशीच मोठ्या आकाराची माणसाएवढी काळ्या तोंडाची पांढर्या रंगाची केसाळ माकडे धुडगूस घालत होती. मी जरा त्यांची मजा बघत उभी राहिले. हे थोडे पुढे गेले होते. मला थांबलेले पाहून म्हणाले, "ती काही त्र्यंबकेश्वरची माकडे नाहीत, येतील अंगावर." मी घाबरले आणि पुढे धावले. दगडाला अडखळले. बूट असूनही पायाची करंगळी मुडपली. आला एकदाचा रुंगलिंग टॉप. सारे पोहोचले होते. आज आम्ही मागे राहिलो होतो. आधी बूट काढून पाहिले. उजव्या पायाच्या करंगळीचे फर्स्ट मेटाकार्पल बोन डिसलोकेट झाले होते. स्ट्रॅपिंग करायला हवे होते. इकडेतिकडे शोधले. लाकडाची मला हवी तशी ढलपी मिळाली. मग स्टिकिंग-प्लास्टरने छानशी स्प्लिंट बनवली आणि करंगळीला स्ट्रॅपिंग केले. सर्वजण माझ्याकडे कुतुहलाने बघत होते. सुनील म्हणाला, "कमाल आहे वहिनी! न घाबरता स्वतःच उपाय केलात!" हे म्हणाले, "अरे ती हेच सारे करत असते तिच्या हॉस्पिटल मध्ये." असो. सर्वानी नाश्ता केला. सुनील पित्रे म्हणाले, "हा टॉप उतरला की थोड्या अंतरावर दोन रस्ते फुटतील. उजव्या बाजूचा रस्ता शॉर्टकट आहे. आपण त्या रस्त्याने जाऊ म्हणजे लवकर पोहोचू." निघालो.
माझा पाय दुखत होता त्यामुळे मला चालायला वेळ लागत होता. सुनील पित्रे माझ्याबरोबर चालत होते. बाकी मंडळी पुढे गेली. त्यांच्याबरोबर पांडेजी गेले होते. रुंगलिंग टॉप उतरला. यथावकाश ते दोन रस्ते आले. बरोबरचे लोक दिसत नव्हते, पण आधी ठरले होते म्हणून मी आणि सुनील पित्रे त्या शॉर्टकटने निघालो. दाट जंगलातून रस्ता जात होता. चिखलही होता. खाजकुयली वारेमाप वाढलेली होती. जपून पावले टाकत होतो. तोच दिसले की दोघांच्याही बुटांवर जळवा चढल्या आहेत. मी घाबरले. सुनील माझ्या पायावरच्या जळवा काढायला लागले. मग मीही धीर करुन त्यांच्या बुटावरील जळवा काढू लागले. या गडबडीत दोघांच्याही हाताला बिच्छू (खाजकुयली) लागली. झाले! 'आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला' अशी आमची अवस्था झाली. जळवा काढू की आग होत असलेल्या हाताला चोळू! सुनीलने जवळच उगवलेल्या पालक नावाच्या वनस्पतीची पाने तोडली आणि त्याचा रस हाताला लावायला दिला. स्वतःच्याही हाताला लावला. क्षणात आग होणे थांबले. खरोखरच देवाची करणी अगाध आहे. बिच्छू आहे तर लगेचच जवळ त्यावर उतारा पालकही त्याच्याच शेजारी तयार ठेवला. दोन्ही संकटांतून त्याच्याच कृपेने बाहेर पडलो आणि पुढे निघालो. थोड्याच वेळात काली नदीवरचा एक झुलता पूल आला. बरोबरचे लोक कसे दिसत नाहीत असा विचार करत पूल ओलांडून पुढे गेलो.
आता नवीनच संकट समोर उभे ठाकले. पुढे रस्ताच नव्हता. डोंगर ढासळला होता. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात रस्ता नसतो. तो आपल्याला तयार करुन घ्यावा लागतो." मी म्हटले, "हरकत नाही. तुम्ही दाखवा तसा मी तयार करते." मग उजव्या हाताने डोंगराचा आधार घेत डाव्या हाताने ढासळलेल्या मातीत वाट तयार करत हळूहळू पुढे जाऊ लागलो. सुनील म्हणाले, "वहिनी हिमालयात डोंगर चढताना कधीही पकडायचे नाही. तर फक्त आपल्या हाताचा पंजा डोंगराच्या भिंतीला दाबून ठेवायचा. कारण हिमालय हा ठिसूळमातीचा पर्वत आहे. आपण एखादा दगड किंवा झुडूप पकडायला जाऊ आणि तो दगड किंवा झुडूप निसटून येईल आणि आपणच पडू." रस्ता तयार करत-करत कसेबसे तो डोंगर चढून वर आलो. वरती सुंदर हिरवळीचा गालिचा पसरलेली प्रशस्त वायवाट विविधरंगी फुलांचे दागिने अंगाखांद्यावर लेवून आमची वाट बघत होती. पाठीवरची पिशवी काढून एका दगडावर बसलो. आमचे सहयात्री कुठेच दिसत नव्हते. पाणी प्यायलो. काय करावे असा विचार करत होतो, इतक्यात हे येताना दिसले. मी भान हरपून त्यांच्याकडे धावले! पाठोपाठ मीना, रोहिणी, सुनील शिंदे आणि पांडेजी आले. माझा जीव भांड्यात पडला. सर्वजण बसलो. ते सगळे दुसर्या रस्त्याने आले होते. तो मुळीच अवघड नव्हता. वाटेत त्यांनी गुटखा नावाची गावठी बटाट्याची स्वादिष्ट भाजी आणि पाव खाल्ला होता. आम्ही त्यांना लांबून डोंगर चढताना दिसत होतो. त्यामुळे ते निर्धास्त होते. सुनील पित्रे म्हणाले, "खरे सांगा वहिनी! तुम्ही घाबरला होता की नाही?" मी म्हटले, "घाबरले होते, पण माझ्या जिवासाठी नाही. कारण मी खाली पडले असते तर तुम्ही कसेही करुन मला वर काढले असतेच. पण तुम्ही जर पडला असतात तर मी काय केले असते? त्या जंगलात फक्त आपणा दोघांशिवाय चिटपाखरुही दिसत नव्हते. म्हणून मी घाबरले होते." असो.
घनदाट जंगल, माकडे, बिच्छू-पालक, ढासळलेला डोंगर अशा भयानकतेबरोबरच मनोहारी सुवासिक फुले, खळखळणारे झरे, बासरीचा नाद घुमवणारा वारा अशी शिणवटा घालवणारी मनोरंजकता असलेला हा पहाटे साडेपाचला सुरु झालेला अठरा किमी आणि साडेनऊ हजार फूट उंचीचा चित्तथरारक प्रवास संध्याकाळी साडेपाचला बारा तासांनी गालागढच्या मुक्कामी सुफळ संपूर्ण झाला..!
क्रमशः
भाग-७
सहावा दिवस.
गालागढ ते बुधी. २२ किमी. उंची १०६०० फूट.
आजही कालच्याप्रमाणेच नाश्त्याचे पार्सल घेऊन प्रस्थान ठेवले. आज हवा कुंद होती, ढगाळ वातावरण होते. पण निसर्ग इतका सुंदर की त्रास अजिबात वाटत नव्हता. थोड्याच वेळात त्या सुप्रसिद्ध ४४४४ खडांज्या समोर ठाकल्या. सुरुवातीला छोट्या टेकडीवर एक सुबकसे मंदिर होते. दर्शन घेतले. तिथे एक गंमत दिसली. देवळाच्या मागच्या बाजूला एका उंचवट्यावर दोन खांबांना एक आडवी तुळई बांधलेली होती आणि तिला मोठी घंटा टांगली होती. तिचे प्रयोजन समजले नाही. कदाचित गावकर्यांशी संपर्क साधण्यासाठी ती योजना असावी.
खडांज्या उतरायला सुरुवात केली. मोठे कठीण होते ते उतरणे! एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला डोंगर. काही ठिकाणी रेलिंग लावलेले आहे, पण त्याची अवस्था यथातथाच आहे. जीव मुठीत धरुन उतरलो त्या खडांज्या. पायवाटेला लागलो. डोंगरातून वाट होती. उजव्या हाताला खोल दरीत कालीमैय्या संतापाने रोंरावत सुसाट धावत होती. तिचे हे रुप पाहून भीतीने गाळण उडाली होती. काही ठिकाणी डोक्याला लागतील अशा उंचीचा कातळ फोडून रस्ता तयार केलेला होता. ठिकठिकाणी डोंगरावरुन कोसळणारे प्रचंड जलप्रपात कालीच्या संतापात भर घालत असतात. काही ठिकाणी अशा जल प्रपाताखालून काढलेल्या रस्त्याने जावे लागते. कानठळ्या बसवणारा कालीच्या पाण्याचा आवाज प्रतिध्वनीरुपाने आपल्या डोक्यावरुनही प्रचंड प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण करतो. एका ठिकाणी डोंगराच्या आधाराने फळ्यांचा पूल असाच एक जलप्रताप पार करण्यासाठी केलेला होता. तो पार करताना खूप भीती वाटत होती. जरासा तोल गेला असता तर त्या प्रवाहात नखही दृष्टीस पडले नसते. पार झालो आणि लगेच असे झाले की आमच्यासोबतच्या पटवर्धनांची हातातील पिशवी पडली आणि क्षणार्धात कालीमध्ये कुठे गडप झाली ते दिसलेही नाही.
याच प्रवासात जिथे १९९८ मध्ये डोंगर ढासळण्याची जी भयानक दुर्घटना घडली होती ते मालपा गाव लागते. त्यात प्रोतिमा बेदी या प्रसिद्ध न्रुत्यांगना-अभिनेत्रीसह त्यावेळचे कैलास यात्रेकरु, घोडेवाले, घोडे, सर्व तंबू, निगमचे कर्मचारी आणि गावकरी, त्यांची घरे, गुरेढोरे, आख्खे मालपा गाव दगडा-धोंड्यांच्या ढिगाखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेला कारणीभूत झालेला जलप्रपात आणि तो ढिगारा ओलांडून जाताना जीव अगदी गलबलुन गेला. आपण आपल्याच भाऊबंदांच्या उरावर पाय ठेवुन त्यांना तुडवत जात आहोत या विचाराने कसेतरीच वाटत होते. जवळच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेले शिवशिल्प आहे. तिथे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली आणि पुढे निघालो.
वाटेत दोन-तीन घरेवजा क्षुधाशांतीगृहे लागली. तिथेच एका ठिकाणी नाश्ता केला. गावकरी हसतमुखाने स्वागत करत होते.
लामारी हे त्यातल्यात्यात मोठे गाव आले. या गावापासून प्लास्टिक-फ्री झोन सुरू होतो. तसेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस चौक्या सुरू होतात. आमच्यातील एका बंधूंनी बिस्किटे खाऊन कागद सवयीने रस्त्यात टाकून दिला. डोंगरात कुठेतरी उभ्या असलेल्या सैनिकाने ते पाहिले आणि खाली आला. बरोबर कागद टाकलेल्या बंधूंजवळ येउन त्यांच्या हातातच तो कागद देऊन शांतपणे म्हणाला, "ये आपने फेका। थैली में रखो और मुकाम पर जाने के बाद डस्टबिन में डालो। ये प्लास्टिक-फ्री झोन है। आपने बोर्ड पढा नही शायद।" किती कर्तव्य तत्परता आणि विनम्रता!
गाला ते बुधी या प्रवासाला लागले बारा तास. बुधीचे मुक्कामाचे तंबू उंच डोंगरावर आहेत. खूप वेळ आधीपासून दिसत होते, पण तिथे पोहोचता पोहोचता नाकी नऊ आले. हा डोंगर खचण्याच्या अवस्थेत आहे. कधीही एखादी दुर्घटना घडू शकेल. पण आहे मात्र खूप सुंदर. हवा थंड. ऑक्सिजनची थोडी कमतरता जाणवते. तंबूंभोवती सुंदर बाग-बगीचा आहे. छान सुखद मुक्काम असतो बुधीचा.
बुधी म्हणजे बुद्धीवान लोकांचा गाव. गावात सगळे शिकलेले. घरटी दोन-तीन जण तरी पदवीधर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आहेत. मोठमोठे हुद्देदार आहेत. अर्थात सर्व शहरात राहतात. कधीतरी सणासुदीला येतात आपल्या गावाला. या गावाच्या खोर्यात निर्माण होते आहे एक मोठे स्पोर्टग्राउंड. तिथे हॉकी, क्रिक्रेट यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळ खेळले जातील.
------
क्रमशः
भाग ८
सातवा दिवस. बुधी ते गुंजी. १७ किमी. उंची १४००० फूट.
पहाटे पाच वाजता आमची विनोबा एक्स्प्रेस निघाली पदयात्रेला. बुधी ते छियालेक हा पहिला ३/४ किमी. चा चढणीचा प्रवास. रिमझिम पाऊस, दाट धुके म्हणजे फक्त पायाखालचेही जेमतेम दिसत होते. समोर ४/५ फुटांवर असलेली व्यक्ती दिसत नव्हती, एवढे दाट धुके होते. हा चढणीचा प्रवास दमछाक करणारा आहे. दर १०/१५ फूट चढणीनंतर श्वास शांत होण्यासाठी थांबावे लागत होते. ऑक्सिजनची कमतरता खूपच जाणवत होती, कापूर हुंगत तोंडात पेपरमिंटची गोळी ठेवून चढावे लागत होते.
छियालेक खिंड आली. टेकडीवर एक चौकी आणि एक टपरी होती. टपरीत नेपाळी वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या, चहाही होता. चौकीत आमच्या नाशिकजवळील येवल्याचा जाधव नावाचा मुलगा सैनिक होता. आमचे मराठी बोलणे ऐकून तो बाहेर आला. आम्ही नाशिकचे आहोत हे समजल्यावर त्याला इतका आनंद झाला की विचारू नका. जणू त्याला त्याचे आई-वडीलच भेटले होते. आम्हांला त्या टपरीत घेऊन गेला. चहा घ्यायला लावला. चहाचे पैसेही दिले त्याने. हो तो सैनिक होता, पोलिस नव्हता फुकट चहा प्यायला. मग मी त्याला घरून नेलेले लाडू देऊ लागले. आधी नको म्हणाला, कारण त्यांना असे कुणाकडूनही काही खायला परवानगी नाही. सिक्युरिटीचा प्रश्न असतो. तो आमच्या बरोबर जवळजवळ पाच किमी चालत आला. तो त्याच्या गस्तीचाच भाग होता. मी पुन्हा आग्रह केल्यावर त्याने एक लाडू खाल्ला. खाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाला आईची आठवण आली. सहा महिने होऊन गेले घरी जाऊन आलो त्याला. मग मलाही रडू आले. ह्यांचेही डोळे भरले. ही आपली लेकरे अशा प्रतिकूल वातावरणात सेवा देतात, डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करतात म्हणून आपण आपल्या घरी बिनधास्त राहू शकतो. जड अंतःकरणाने त्या पोराचा निरोप घेऊन पुढे निघालो.
दमछाक करणारी चढाई संपली होती. आता हिरवळीचे गालिचे, त्यावरील रंगीबेरंगी फुलांची नक्षी, समोर दिसणारी उन्हात चमकणारी शुभ्रधवल हिमशिखरे यांच्या रूपाने आपल्यावर शिवकृपेचा वर्षाव होत असतो. वाटेत छोट्याछोट्या हिमनद्या पार कराव्या लागल्या. याच प्रवासात भारत-चीन युद्धापूर्वीपर्यंत भारत-तिबेट यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले, व आता शिलाजीत या शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषधाच्या चोरट्या व्यापाराचे केंद्र असलेले (या हिमालयाच्या भागात उन्हाळ्यात खडकांवर शिलाजीत ही शेवाळासारखी वनस्पती उगवते) गर्ब्यांग हे गाव लागते. हे गाव भूगर्भातील हालचालींमुळे जसेच्या तसे जमिनीत हळूहळू खचत चालले आहे. पण गंमत म्हणजे घरांच्या छपरावरील एकही धलपीसुद्धा हलत नाही. (इकडील घराच्या छपरावर कौले किंवा झाप नसून दगडाच्याच पातळ चिपांसारख्या दगडी धलप्या तिरप्या बसवलेल्या असतात.) गाव उठवावे अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. पर्यायी जागाही दिल्या आहेत. पण भरघोस उत्पन्नाचे साधन शिलाजित फक्त इथेच होते. त्यामुळे जीव धोक्यात असूनही लोक गाव सोडून जात नाहीत.
याच प्रवासात नेपाळ मधून येणारा पिवळ्याधमक पाण्याचा टेंकर नाला आणि काली यांचा, लाल रंगाच्या पाण्याची कुट्टी नदी व काली यांचा संगम बघायला मिळतो.
सातव्या दिवसाचा कठीण प्रवास ११ तासांनी संध्याकाळी ४ वाजता संपला. गुंजीचे मुक्कामाचे तंबू कुट्टी नदीच्या पैलतीरावर काली व कुट्टीच्या संगमाजवळ दुपारी दोन वाजल्यापासूनच दिसत होते. पण तिथे पोहोचण्यासाठी कुट्टीमैय्या पार करविणारा पूल जवळजवळ ३ किमी अजून पुढे होता; आणि कुट्टीचा प्रवाह इतका वेगवान आहे की तो त्यातूनच चालत पार करणे शक्य नाही. शेवटी आला एकदाचा तो पूल, झाला पार आणि पुन्हा तितकेच मागे येऊन मुक्कामावर पोहोचलो.
हे मुक्कामाचे ठिकाण मोठे आहे; म्हणजे ७/८ मोठे फायबरचे तंबू आहेत. टेलिफोनची सुविधा आहे. इथे पुन्हा मेडिकल चेकअप होते. सगळ्यांनी आपापल्या घरी फोन केले. इकडे स्वयंपाकात कांदा वापरला जात नाही, कारण तो खूप महाग असतो. आमच्यातील राजस्थानी मंडळी त्यामुळे बेचैन होती. गुंजी गाव थोडे मोठे आहे. मग डॉक्टर साहेब गेले गावात कांदे शोधायला. आले घेऊन ६० रुपये किलो दराने एक किलो कांदे. त्यांची बहीण शकुंतला गेली स्वयंपाक घरात. आणि मग बनवली राजस्थानी साककढी चांगली झणझणीत. पोटभर जेवलो सगळेजण. आता विश्रांती.
-----------
क्रमशः
भाग-९
गुंजी. व्यासभूमीचे प्रवेशद्वार. कैलास यात्रेचा बेस कॅम्प. येथे डोंगरावर व्यास मंदिर आहे, छोटे पण सुंदर. येथेच त्यांनी श्रीगणेशाच्या हस्ते १८ पुराणे लिहिवली अशी आख्यायिका आहे. गुंजी, रौकाँग, नम्पा, नाभि आणि कुट्टी ह्या पाच गावांची मिळून होते व्यासभूमी. येथील रहिवासी व्यासऋषींचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणेच बुद्धिवान आणि शिवभक्त. दर राखीपौर्णिमेला या गावांचा गुंजीमध्ये मोठा उत्सव होतो. पारंपारिक नृत्य, पूजा, प्रसाद असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच देश-परदेशात काम-धंद्याच्या निमित्ताने राहात असलेले सर्व नागरिक येतात. पाचव्या दिवशी सारीपाटाचा कार्यक्रम होतो, त्यावेळी प्रत्येक घराण्याच्या नावाने सोंगट्या टाकल्या जातात. ज्याच्या नावाची सोंगटी निघते त्यांचे घराणे पुढील वर्षाच्या उत्सवाचे पहिले मानकरी ठरते.
आठवा दिवस - गुंजी ते कालापानी. फक्त १० किमी. उंची १२,००० फूट. आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात सोपा प्रवास. त्यामुळे मेडिकल चेकअप झाल्यावर नाश्ता करून निघालो. काली रस्त्याच्या जवळून वाहत असते, पण गाला ते बुधी या प्रवासात रौद्रभीषण सोबत करणारी काली येथे मात्र माहेरून सासरी जाणार्या घाबरलेल्या, गोंधळलेल्या अवस्थेतील नववधूसारखी लाजत मुरडत सोबत करत असते, आपण तिच्या माहेरचे पाहुणे असतो ना! जंगलही साधारण आहे. ओक, पाईन, चीड, देवदार यांचे मोठमोठे वृक्ष पण विरळ. चढ-उतारही तसे लहानच. या मार्गाची निर्मिती १८५० मध्ये त्यावेळच्या ११५ रुपयांमध्ये गुंजीच्या पुरणसिंग गुंजीयाल यांनी वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केली.
कालापानीच्या कॅम्पच्या अगोदर १ किमी कालीच्या पात्राजवळ फक्त ५/६ फुटांवर गरम पाण्याचे कुंड आहे. मात्र तिथे जाण्यासाठी ५०/६० फूट खाली उतरावे लागते. निगमने तिथे स्नानासाठी बाथरुम बांधली आहे. बादली, मगही ठेवले आहेत. कुंडातील पाणी बादलीने काढता येते.
कालापानी कॅम्पजवळच कालीचे उगमस्थान आहे. तिथे भारतीय सेनेने मंदिर बांधले आहे. काली डिसेंबरमध्ये गुप्त होते आणि एप्रिलमध्ये पुन्हा प्रगट होते. शास्त्रीयदृष्ट्या डिसेंबरमध्ये उगमाजवळ बर्फ तयार होतो आणि एप्रिलमध्ये वितळतो. दोन्ही वेळा तेथे उत्सव करतात. उगमापासून डाव्या तीराला नेपाळ आणि उजव्या तीराला भारत अशी विभागणी होते. कालापानी येथेच उंच डोंगरावर व्यासऋषींची तपस्या गुंफा आहे. खालून डोंगरावर फक्त एक खोलगट जागा दिसते, प्रत्यक्षात प्रशस्त गुहा आहे.
कालापानीचा मुक्काम विश्रांतीचा असतो. सकाळी आठ वाजता गुंजीहून निघाल्यावर दोन तासांत येथे पोहोचलो होतो. स्नान तर गरम पाण्याच्या कुंडावरच केले होते. मग कपड्यांचा साठलेला भारा धुण्याचा कार्यक्रम केला. पाणी खूपच थंड होते, पण तेथील कर्मचार्याने कपडे धुवायलाही गरम पाणी दिले. नंतर आरामात पुरी-भाजी, डाळभात, पापड-लोणचे, आणि गुलाबजाम. आज एक वेगळी पालेभाजी खायला मिळाली. तिला लसणीचा वास होता. खूपच छान चव होती त्या भाजीची. पोटभर भोजन झाल्यावर चांगली ताणून दिली. संध्याकाळी सैनिकांबरोबर क्रिकेटचा खेळ रंगला. व्यासगुंफा पाहून आलो. थोडी फोटोग्राफी केली. कालीच्या पात्राजवळ पाणचक्की होती. तिथे रोजचे दळण दळतात.
नववा दिवस - अर्धी यात्रा संपूर्ण करणारा. अंतर फक्त १० किमी. उंची १४,००० फूट. रस्ता गुंजी ते कालापानीपेक्षा कठीण आणि चढणीचा. उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवते, पण मार्गक्रमण करीत असताना विविध रंगी फुलांच्या ताटव्यातून सोनेरी हिमशिखरांतून थंड सुखद हवेतून भगवान शिवशंकर आपल्या भक्तांना रिझवत असतात. म्हणत असतात, आस्ते आस्ते चाला माझ्या लाडक्यांनो, या! आता थोड्याच वेळात तुमचा श्रम परिहार होईल, तुम्हांला ज्याची कामना आहे ते माझे ॐ रुपी दर्शन होईल.
आणि नबीढांगच्या मुक्कामी कॅम्पच्या आधी साधारणपणे १ किमी वर पांडेजी म्हणाले, "सामने वो काले पहाडपर देखो!" ओहो! बम बम भोले! उजव्या बाजूला दूरवर निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर सुंदर काळ्या पहाडावर बर्फाचा भलामोठा ॐ चमकत होता. त्या ॐ रूपी परमेश्वराच्या साक्षात् दर्शनाने भावविभोर झालो, शेजारी उभ्या माणसाला विसरलो. ती जिवा-शिवाची भेट होती. सर्वांच्या डोळ्यांना अक्षरशः भावनातिरेकाने धारा लागल्या होत्या. जणू अश्रूंवाटे भक्ती, प्रेम पाझरत होते. याचसाठी केला होता अट्टाहास. दर्शनाने दिवस गोड झाला. नकळत गजर होतो, "जय हो भोलेनाथ, बम बम भोले, हर हर महादेव, ॐ नमःशिवाय!" प्रत्येकाचे हात जोडले गेले. प्रत्येकजण नतमस्तक झाला. पाय तिथेच खिळून गेले, जगच थांबले...
पण मुक्कामाचा कॅम्प तर अजून दूर आहे. शेवटी गाईड स्वतः आधी भानावर आले. त्यांनी सर्वांना भानावर आणले. म्हणाले, "बसा, थोडा वेळ पाणी प्या. मग आपण कॅम्पवर जाऊ. तिथून मनसोक्त दिवसभर हेच दर्शन घेऊ या."
सकाळी सात वाजता स्नानादी उरकून कालापानीहून निघाल्यावर अकरा वाजता नबीढांग म्हणजेच ॐ पर्वताच्या मुक्कामावर पोहोचलो. मनसोक्त ॐ दर्शन होत होते. तंबूत जाण्याची इच्छाच होत नव्हती. पांडेजी म्हणाले, "तुम्ही भाग्यवान आहात. शिवजी़ की बडी कृपा है आप लोगों पर। नाही तर कधी कधी इथे येऊनही मोसम खराब असेल तर ढगांमुळे दर्शन होत नाही. जय हो भोले की! मोठ्या नाईलाजाने तंबूत गेलो. दुपारी भोजनानंतर विश्रांती घेऊन तिथेच मागे सैनिकांनी बांधलेल्या मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिरामागे एका दरीत १९९७ साली कोसळले हेलिकॉप्टर बघायला गेलो. त्या हेलिकॉप्टरमध्ये दिग्विजयसिंग होते. पण त्यांचे दैव बलवत्तर. हेलिकॉप्टर असे पडले की त्यातील कुणालाही इजा झाली नाही की हेलिकॉप्टरला आग लागली नाही. तिथून पुढे मोठ्या कैलासला जाणारी लिपुलेक खिंडीची वाट बघून आलो.
नंतर सर्वांनी मिळून ॐ समोरच्या मोकळ्या मैदानात बसून छोटेसे हवन केले. फडके, पटवर्धन यांनी रुद्र म्हटला, शिवमहिम्न म्हटले. सर्वांना प्रसाद वाटला. इथे सॅटलाइट फोनची सुविधा आहे, म्हणून सर्वांनी घरी फोन केले.
आज वटपौर्णिमा आहे. रात्री अचानक श्वास कोंडतो आहे असे वाटले. जीव गलबलू लागला. अंथरुणात उठून बसले, पण ठीक वाटेना. वाटले, तंबूबाहेर मोकळ्या हवेत जावे म्हणजे बरे वाटेल. बाहेर आले आणि अस्वस्थता कुठे पळून गेली क्षणार्धात हे कळलेच नाही. समोर पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात ॐ असा सुंदर चमकत होता की वर्णन करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. भराभर सर्वांना उठवले, म्हटले बघा. चला, हा क्षण पुन्हा आपल्या आयुष्यात येईल - न येईल... जीवनाचे सार्थक करू या. सर्वजण बाहेर आले आणि अवाक् झाले. मग दुलया बाहेर घेऊन आलो आणि सर्वांनी मोकळ्या मैदानातच बैठक मारली. हळू हळू पहाट झाली. रुपेरी ॐ सोनेरी होऊ लागला. पूर्वा उजळू लागली. आकाशाने केशरी लालसर रुपेरी सप्तरंगी शाल पांघरली. तेजस्वी ॐ दर्शन. आमचे भानच हरवले होते.
पौर्णिमेच्या रात्री पूर्णचंद्राच्या स्वच्छ प्रकाशात ॐ दर्शन हा एक अवर्णनीय अनुभव आहे. इथल्या सारखे निळे गगन आयुष्यात पाहिलेले नसते, प्रत्येकाचा मनमोर नुसता थुईथुई नाचत असतो, गात असतो. निळे गगन निळी धरा...धरा..! स्वच्छ मोकळी हवा, तशात गोड गारवा!



--------
क्रमशः
भाग-१०
दहावा दिवस, अर्धी यात्रा संपन्न झाली. आता यात्रेच्या दुसर्या धेय्याकडे वाटचाल आज वीस कि.मि. चालुन एकदम गुंजी गाठायचे होते. मध्ये कालापानीमध्ये फक्त दुपारचे भोजन घ्यायचे होते. सकाळी दहा वाजता कालापानी मध्ये पोहोचलो. नबिढांग येथुन निघालो तरी सारखे मागे वळून बघत ॐ चे दर्शन घेत होतो, पाय निघतचे नव्हते. पण सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुते तुवा कधी फिरायचे हेच खरे, पुढे जाणेच होते. स्वयंपाक तयार होत होता म्हणून स्नाने उरकुन घेतली. भोजना नंतर निसर्गाचा पुनःप्रत्यय घेत तीन वाजता गुंजीला पोहोचलो.
अकरावा आदिकैलासपतीच्या दर्शनासाठी प्रस्थानाचा दिवस. गुंजी ते कुट्टी २० कि.मि.चा पल्ला उंची १२००० फूट. पहाटे ५-३० ला प्रवासाची सुरवात थोड्या पावसात व कुंद हवेत केली. हवेमुळे चालताना श्वास लागत होता. पहिले पाच कि.मि. फारशी चढण नव्हती पण डोंगराच्या कडेने चालावे लागत होते, खोल दरीत कुट्टी जोशात वाहात होती. तिचे लालसर गढुळ पाणी भितीदायक वाटत होते. थोड्याच वेळात चढण सुरु झाली आणि दाट जंगल सुरु झाले. कुट्टीमैय्याच्या अल्याड-पल्याड भुर्जपत्राची दाट जंगले आहेत. भुर्जपत्र म्हणजे वैदिक कालापासुन आपली पुराणे, वेद वगैरे साहित्य ज्यावर लिहिले गेले ती. भुर्जपत्राच्या व्रुक्षाच्या खोडावरील पातळसाली म्हणजे तो लेखनाचा कागद. हे व्रुक्ष खुप प्रचण्ड आहेत आपल्या कडील मोठमोठे वड-पिंपळाचे व्रुक्ष असतात तसे.
वादळ येउन गेलेले दिसत होते, लॅण्डस्लाइड झालेले होते, मोठमोठी झाडे कोसळलेली होती, रस्ता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खचलेला होता. या २० कि.मि.च्या प्रवासात सहा मोठे मोठे ग्लेशियर पार करावे लागले. बर्फावरुन चालण्याचा अनुभव वेगळाच असतो. बर्फ खचणार तर नाही, वरुन पुन्हा लॅण्डस्लाइड झालेतर, एखादा धोंडा अंगावर आला आणि आपण चिरडलो गेलो तर कसे असे काय आणि किती विचार मनात येत होते सांगू. आपण मेलो तर कैलासात आपली डायरेक्ट एंट्री होईल, आपल्या आयुश्याचे सोने होईल, कारण आपण कैलासाच्या प्रांगणात आहोत भिती मुळे का होईना मुखाने सतत ॐ नमःशिवायचा जप चालू असतो पण आपल्याबरोबरचे दुसरे यात्रेकरू,आपले नातेवाईक आणि निगम याना किती व्याप होईल या विचाराने प्रत्येकाची गाळण उडत होती. पाय बर्फावरुन सटासट घसरत होते सर्वांची लोटांगणे घालुन झाली. पांडेजी म्हणाले, घोड्याच्या टापेच्या खाचेत पाय ठेवत चालायचे कारण तिथला बर्फ घट्ट असतो खचण्याची शक्यता नसते. जीव मुठीत धरुन म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.
शेवटी हा प्रवासाचा कठीण भाग संपला. आता सुरु झाले सुंदर नेबुजीचे जंगल. नेबुजी म्हणजे काटेरी रानटी गुलाबाची बने. विविधरंगी अप्रतिम सुवासाची, विविध प्रकाराची गुलाबाच्या झुडूपांची बनेच्या बने. सगळा शिणवटा कुठल्याकुठे पळून गेला. एका ठिकाणी डोंगरावरुन नऊ धारांमध्ये खाली येणारा दुधा सारखा शुभ्र प्रवाह आहे. हा हिवाळ्यातही गोठत नाही. इथल्या रहिवाश्यांची श्रद्धा आहे की ही दुधगंगा आहे. डोंगरावर असलेल्या त्यांच्या राजुदेवीचा दुधाचा घट फुटला; त्यातील हे दुध वाहते आहे. आमच्या बरोबर सुरज नावाचा नम्पा गावचा रहिवासी सध्या दिदीहाट येथील नारायणस्वामी कॉलेजात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेला मुलगा बर्याच वेळापासुन चालत होता. तो दर शुक्रवारी सुटीसाठी घरी येतो आणि सोमवारी परत जातो. त्याने बरीच माहिती दिली. इथल्या जंगलात पांढरे वाघ, पांढरी अस्वले, कस्तुरीम्रुग आहेत. चालता चालता रौंकांग, नाभि ही चिमुकली गावे मागे टाकुन एक टेकडी चढून नम्पा येथे आलो. तिथे एक टपरीवजा घर-दुकान होते, सुरज आमचा निरोप घेउन गेला. आम्ही थोडावेळ बसावे म्हणून त्या टपरीमधील बाकडांवर बसलो. आमचे मराठी बोलणे ऐकुन आतील भागातुन एक ग्रुहस्थ आले. आम्हाला नमस्कार करुन म्हणाले कसे काय चालले आहे, आवडले का आमच्या या खेडेगावातील काही? आम्ही आश्चर्याने उडालोच. खुपच सुंदर आहे सारे काही, पण तुम्हाला कसे काय मराठी येते? माझे नाव देवीसिंग! मी पुण्याजवळ खडकीला मिलीटरीत खुप वर्षे होतो त्यामुळे मला मराठी येते, तुम्हाला भेटून खुप आनंद झाला. त्यानी मग आम्हाला स्थानिक कोदू या धान्याच्या पीठाचे घावन आणि कच्च्या कुलमचे लोणचे असा नास्ता दिला. परत येताना भुर्जपत्र देईन असेही सांगितले. त्यांचा निरोप घेउन निघालो. आता पुन्हा कठीण चढाई सुरु झाली.
मोठमोठे व्रुक्ष जणू गायबच झाले, खुरटी झुडपे सुरु झाली. आपण धुपारती साठी संध्याकाळी जो धुप जाळतो त्या धुपाची झुडपे, संजिवनी बूटी {लक्ष्मण ज्यामुळे शुद्धिवर आला} यांची झुडपे खुप आहेत. एक मोठी चढण उतरुन खाली आलो. एक मोठा धबधबा डोंगरातुन खाली आला होता, तो पार करण्यासाठी झाडाचा ओंडका आडवा टाकलेला होता. बाप रे! आधी सुनीलने ओंडक्यावर पाय ठेवला तो डगमगला कसातरी तोल सावरुन सुनील पित्रे पार झाला. मग मीना, रोहिणी मग त्यांच्या मागुन सुनील शिंदे गेला. त्याने माझ्या साठी काठी पुढे केली ती धरुन मी पार झाले, नंतर हे आणि पांडेजी आले. समोर दुसरा डोंगर उभा होता. हातातील काठी रोवत आस्ते कदम चालत चढलो एकदाच. समोर इंडो-तिबेट बॉर्डरचे सैनिक पाण्याचे मोठेमोठे कॅन आणि चहाचे थर्मास, बिस्किटे वगैरे घेउन आमच्या स्वागतासाठी हसतमुखाने तयार उभे होते. जयहिंद! ॐ नमःशिवाय म्हणुन आमचे स्वागत करुन आग्रहाने आम्हाला बसवले. कॅम्प अजुन २/३ कि.मि. दुर आहे, दमला असाल म्हणून चहा घेउन आलो असे म्हणून सर्वाना प्रथम पाणी आणि मग चहा बिस्किटे दिली. या आदरातिथ्याने आमचा दमला-भागला जीव विश्रांती पावला. आम्ही अगदी भारावुन गेलो.
कुट्टी हे या गावाचे नाव माता कुंतीच्या नावावरुन पडले आहे. पांडव वनवासात असताना येथे राहिले होते. गावाजवळ मध्यभागी एका टेकडीवर पांडवांच्या वाड्याचे अवशेष आहेत म्हणतात. हा वाडा आठ मजली होता. आता फक्त तळमजला आणि पहिल्या मजल्याचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. सहाजिकच आहे, पांडव ५००० वर्षापुर्वी होऊन गेले. येथील उत्खननात बौद्ध व जैन संस्क्रुतिची काही शिल्पे सापडली आहेत. कुट्टी जवळील डोंगरात सैधव मीठाची खाण आहे. कुट्टी नदीचा उगम याच डोंगरात होतो. एकंदरीत हा वीस किलोमीटरचा प्रवास फारच कठीण.

-------------------------
क्रमशः
भाग - ११
बारावा दिवस. १४ किमीवरील जॉलिंगकाँग; म्हणजेच आदिकैलास-पार्वती सरोवर. उंची १५,७०० फूट. आधी चहा, नंतर बोर्नव्हीटा आणि आलूपराठ्यांचा नाश्ता करून सहा वाजता निघालो यात्रेच्या सांगतेकडे. वाटेत दोन ग्लेशियर पार करावे लागले, पण आता आम्ही अनुभवाने शहाणे झालो होतो. अगदी सहज पार झालो. कठीण चढ-उतार आहेत, पण फुलांच्या गालिच्यांचे सान्निध्य थकवा जाणवू देत नाही. पहाडाच्या भिंतींवर छोटी छोटी बिळे बनलेली पांडेजीनी दाखवली. जोरात वारा वाहतो, त्याच्या घर्षणाने अशी बिळे तयार होतात, असे म्हणाले पांडेजी. या बिळांमध्ये पक्षी घरटी बनवतात. आम्हांला त्या बिळांतून ये-जा करणारे चिमुकले पक्षीगण बघायला मिळाले. या मार्गात मोठे मोठे वृक्ष नाहीत. निरनिराळ्या रंगांची छोट्यामोठ्या फुलांची झुडुपे, उदाची झुडुपे, संजीवनी बूटीची झुडुपे निसर्गदेवतेला सजविण्याची आपली जबाबदारी पार पाडत असतात. थोड्याफार म्हणजे फक्त २००० खडांज्या चढाव्या लागल्या. मध्येमध्ये दाट, पाऊल बुडेल इतक्या मऊ हिरव्यागार मखमली हिरवळीच्या गालिचावरून चालताना थकलेल्या पावलांना आराम मिळवून देत होता. सहा/सात तासांचा प्रवास करून पोहोचण्याआधी २ किमी. आजही इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस स्वागताला हजर होते. चहापाणी घेतले आणि कॅम्पवर पोहोचलो. मौसम खराब झाला होता, आकाश ढगांनी झाकून टाकले होते, कैलास दर्शन कसे होणार?
स्वयंपाक तयार झाला. तंबूसमोर भोजनासाठी बसलो. सैनिक थाळी घेऊन आले. आणेपर्यंत सारे पदार्थ एकदम थंडगार होऊन गेले. भूक लागली होती म्हणून कसेबसे घशाखाली उतरवले. थंडी खूपच वाढली होती. त्यामुळे दुलई पांघरून गुडूप झालो. आमच्यागाठी काही पूर्वपुण्याई होती. मौसम बदलला; स्वच्छ ऊन पडले. आकाश गडद निळाईने झगमगू लागले. उत्साहाने सर्वजण तयार झालो. कँपपासून अगदी जवळ आदिकैलास पर्वत आहे. गेलो, आणि पुन्हा एकदा जिवाशिवाची भेट झाली. समोर सोनेरी उन्हात बर्फाच्छादित पर्वतशिखरावर ध्यानस्थ भगवान शंकराचे मुखदर्शन होत होते. भव्य कपाळ, त्यावरील भस्माचे पट्टे, तिसरा डोळा, अर्धोन्मिलित नेत्रकमळे, नासिका, ओठ सारे स्पष्ट दिसत होते. पायथ्याशी असलेल्या राक्षसताल मध्ये त्याचे मोहक प्रतिबिंब चमकत होते. साक्षात् शिवदर्शनाने मनुष्यजीवनाचे सार्थक झाले. जीवन कृतार्थ झाले. बम बम भोले, हर हर महादेव, ॐ नमःशिवाय! बाजूलाच दुसर्या पर्वताला पहिले तीन उंच शिखरे; मध्ये एक छोटे शिखर मागे दोन उंच शिखरे होती. ते पाच पांडव आणि सहावी द्रौपदी आहेत. महाभारताच्या युद्धानंतर पापक्षालनार्थ परमेश्वराची क्षमाप्रार्थना करण्यासाठी द्रौपदीसह पांडव आले, पण त्यांच्या हातून गुरू आणि बांधवांची हत्या झाली होती. त्यामुळे त्यांना दर्शन द्यायचे नाही म्हणून भगवान तिथून उठून आणखी वर गेले (सध्याचा मोठा कैलास-तिबेट).
बराच वेळ तिथेच खिळून उभे होतो. मग आणखी जवळ जाऊन राक्षसताल पाहिले. खोलवर स्वच्छ नितळ पाण्याचे मोठे सरोवर आहे राक्षसताल. पाण्यावर मावळतीची सूर्यकिरणे अशी चमकत होती की मानों हजारो तारका नृत्य करत होत्या. सौंदर्याची खाण आहे इथे. बहूरत्ना वसुंधरा ही उक्ती येथे सार्थ ठरते.
परतलो कॅम्पवर. छोटेसे हवन केले, आरती केली, साखर-फुटाण्याचा प्रसाद वाटला. रात्री भोजनाची पंगत स्वयंपाकघरातच मांडली, कारण बाहेर थंडीचा प्रचंड कडाका होता. मुगाच्या डाळीची पातळ खिचडी, साजूक तूप, पापड-लोणचे असा भोजन प्रसाद. पण त्याआधी गरम गरम टोमॅटो सूप बटरक्यूब घातलेले. त्यात तळलेल्या टोस्टचे तुकडे, खूपच चविष्ट. भोजनानंतर गाण्याच्या भेंड्या खेळल्या. सैनिकही सामील झाले होते.
तेरावा दिवस. सकाळी स्नान करून चहापाणी, नाश्ता करून पार्वतीसरोवर दर्शन-परिक्रमा करण्यासाठी गेलो. पोहोचायला एक तास लागला. पार्वती सरोवर, स्वच्छ निळे पाणी, त्यात पडलेले निळ्या आकाशाचे प्रतिबिंब, कैलास पर्वत, पार्वती मंदिर, पांडव पर्वत, पार्वती मुकुट पर्वत या सार्यांची प्रतिबिंबेही सुंदर दिसत होती. सारा परिसरच अप्रतीम सुंदर. आमच्याबरोबरच्या दोघा-तिघांनी या पार्वती सरोवरात स्नान केले आणि मग असे कुडकुडले की तिथे आधी शेकोटी पेटवून शेकावे लागले. नंतर पार्वतीमाता मंदिरात जाउन पूजा-अर्चा आरती केली. मंदिर अगदी साधेसुधे, पत्र्याचे उतरते छ्प्पर असलेले आहे. मग निघालो परिक्रमेला. सरोवर उजव्या हाताला ठेवून चालू लागलो. एक ग्लेशियर पार केले तर दोनतीन ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातून जावे लागले. बूट काढून पाण्यात पाय टाकताच पायापासून मस्तकापर्यंत थंड शिरशिरी गेली. दगडधोंड्यांतून कसेतरी पळत प्रवाह पार केले. पाण्यातून बाहेर आल्यावर बसकण मारून पाय कोरडे करीपर्यंत पाय बधीर झाले. चिमटा काढला तरी समजेना. आधी हातावर हात घासून गरम केले आणि मग दोन्ही पावले घासत बसलो. पाय थोडे गरम झाल्यावर लोकरीचे गरम मोजे घालून बूट घातले तरीही जरावेळ चालणे जमतच नव्हते. अशा प्रकारे परिक्रमा पूर्ण करायला पाच तास लागले. कॅम्पवर आल्यावर रुद्राचे हवन केले. पटवर्धन, फडके यांनी रुद्र आणि शिवमहिम्न म्हटले. यात्रेची सांगता झाली.
जाले साधनाचे फळ। संसार झाला सफळ।
निर्गुण ब्रम्ह ते निश्चल। अंतरी बिंबले।।
हिशेब जाला मायेचा। झाला निवाडा तत्त्वांचा।
साध्य होता साधनाचा। ठाव नाही।।
स्वप्नी जे जे देखिले। जागृतीस ते ते उडाले।
सहजची अनिर्वाच्य झाले। बोलता न ये।।
ऐसे हे विवेके जाणावे। प्रत्ययी खुणेसी बाणावे।
जन्म-मृत्यूच्या नावे। शून्याकार।।
_______________



क्रमशः
भाग - १२
चौदावा दिवस. जड अंतःकरणाने पुन्हा येऊ अशी आशा पालवत परतीचा प्रवास सुरू केला. आपल्या सैनिक बंधूंना विचारले, घर कब आओगे? आणि आमच्या व त्यांच्या डोळ्यांना अश्रूधारा कधी लागल्या ते समजलेच नाही. आदिकैलासनाथाचे पुन्हा एकवार दर्शन घेऊन निघालो. निसर्गसौंदर्य डोळे भरुन अंतःकरणात साठवत यथावकाश कुट्टीच्या मुक्कामी परतलो.
आज इथेच मुक्काम असल्याने भरपूर वेळ होता. मग भोजन झाल्यावर कुट्टी गाव बघायला बाहेर पडलो. प्रथम पांडवांचा वाडा बघायला गेलो. तिथे तसे काहीच नव्हते, पण जाणवले की भिंती बांधण्यासाठी वापरलेल्या विटा वेगळ्या होत्या. आकाराने खूप रुंद आणि रंगही लालभडक. वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना मोडकळीस आलेला होता, त्यामुळे वर गेलो नाही. वाड्याबाहेर उत्खननात सापडलेल्या वस्तू ठेवलेल्या होत्या. काही पसरट आकाराची मातीची भांडी आणि काही मजकूर कोरलेले दगडाचे तुकडे वगैरे होते. नंतर गावात गेलो. हे गाव फार पुरातन आहे हे तेथील घरांवर केलेले कोरीव काम पाहून लक्षात येत होते. दरवाजे बारीक वेलबुट्टी, फुले, पाने, स्वस्तिक, कमल वगैरे शुभचिन्हे कोरून सुशोभित केलेले होते. घरे चांगली प्रशस्त आहेत. इतकी प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल हवामान असूनही सर्व लोक हसतमुख, अतिथी देवो भव! असे मानणारे. तिथे शांतीकाकी नावाच्या बुजूर्ग महिला आहेत, नारायणस्वामींनी उघडलेल्या पहिल्या शाळेच्या विद्यार्थिनी. जेव्हा महिलांनी शिकणे म्हणजे महापाप असे मानणार्या काळात मॅट्रीक झालेल्या, आणि सर्व गावाला सुशिक्षित करणार्या. या वयातही त्यांची समाजसेवा चालूच आहे. काकींनी प्रेमाने आम्हांला बसवून घेतले, कोदूचे घावन खायला दिले. डॉक्टर शर्मा (जयपूर) यांच्याशी त्या इंग्रजीतून बोलल्या. या गावात वर्तमानपत्र येण्यास कधीकधी आठ दिवस लागतात पण तो शांतीकाकींकडे येतो. मिलिट्रीच्या सामानाबरोबर त्या पुस्तकेही मागवतात. त्या गावात शाळा चालवतात. मुलींनी शिकावे यावर त्यांचा जास्त भर असतो. शांतीकाकींना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले.
शांतीकाकींचा निरोप घेऊन सैंधव मिठाची खाण बघायला गेलो. डोंगर पोखरून त्यातून खडे काढतात. आम्ही चव घेऊन बघितली, ते सैंधव मीठच होते. हिमालय भूगर्भीय हालचालींमुळे समुद्रातून उठल्यामुळे तयार झालेला आहे हे सिद्ध करणारा आणखी कोणता पुरावा हवा? याच डोंगरात कुट्टीमैय्याचा उगम आहे, मागल्या बाजूला कुठेतरी. संध्याकाळ झाली. आसमानी रंगत मन मोहवून टाकणारी. गर्द निळ्या आकाशाने लालपिवळ्या सोनेरी रंगाची शाल पृथ्वीमातेला जणू पांघरली होती. थंडीचा कडाका वाढला होता, गरमागरम भोजनप्रसाद ग्रहण करून तंबूत गेलो आणि दुलईत गुडूप झालो.
पंधरावा दिवस. गुंजीला मुक्काम. सैनिक, गावकरी, शांतीकाकी या सर्वांचा भावपूर्ण निरोप घेऊन निघालो. पुन्हा लाकडी ओंडक्यावरुन डगमगत पार झालो. डॉगर चढत उतरत आलो. देवीसिंग वाटच पाहात होते. नाश्ता तयार होताच. आज त्यांनी त्यांच्या घरी केलेले नूडल्स बनवले होते आणि पहाडी चहा केला होता, काश्मीरला कावा मिळतो ना तसला चहा. देवीसिंगनी प्रत्येकाला भूर्जपत्रे दिली. त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला.
मोठ्याच हिंमतीने सारी ग्लेशियर पार केली. वादळाने उद्ध्वस्त केलेला मार्ग पार केला. एका ठिकाणी एक मोठा धोंडा होता पिवळ्या रंगाचा. त्यावर वाघाच्या अंगावर असतात पट्टे होते. लांबून बघता एखादा भलामोठा वाघच बसला असावा असे वाटत होते. त्याच्या शेजारी बसून माझा फोटो काढला. म्हटले, बघा मी किती शूर आहे! गुलाबाची फुले पाहून तोडण्याचा मोह होत होता. पण पांडेजींनी सांगितले होते, कुठल्याही झुडुपाला, फुलाला, फळाला हात लावायचा नाही. कोणते काय विषारी असेल, गुंगी आणणारे असेल हे सांगता येत नाही. इकडे काही झाडे म्हणे अशी असतात की त्यांच्या जवळ पशुपक्षी, किडामुंगी, माणूस कुणीही गेले तर ते झाड आपल्या फांद्या खाली आणून त्याला कवटाळते आणि सारा जीवनरस शोषल्याशिवाय सोडत नाही. बाप रे! लांबूनच सुंदर दिसतात फुले, मग तोडायची कशाला? मनाची समजूत घातली (कोल्ह्याला द्राक्षे आंबट) चढाईवरचा घाट रस्ता सुरू झाला. डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला खोल दरीत जोशात धावत कालीला भेटायला कुट्टीमैया चालली होती.
हवा बदलली, मौसम बदलला. नभ मेघांनी आक्रमिले. आता पावले उचलायला हवीत. नाभि, रौंकॉम्ग मागे टाकून गुंजी आले. गावातून कँपकडे आलो. तिथे काहीतरी गडबड असावी असे दिसले. काय झाले असावे? सैनिकांची कसली धावपळ चालली आहे? विचार करतच आवारात शिरलो. सॅक तंबूत ठेवून काय झाले ते बघायला गेलो. मोठ्या कैलास यात्रेच्या पाचव्या बॅचमधील एक महिला पहाटे लिपुलेक खिंडीतून घोड्यावरून जात असताना हार्टअॅटॅकने गेली होती. फक्त ४२ वर्षांची अहमदाबाद - गुजरातची राहणारी होती. बरोबर तिची २० वर्षांची भाची आणि मेहुणे होते. मौसम खराब असल्याने त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर उतरू शकत नव्हते. त्यामुळे बॉडी ठेवण्यासाठी आजूबाजूला असलेला बर्फ गोळा करण्याचे काम चालले होते. एका खाटेवर प्लास्टिक टाकून त्यावर बर्फ, पुन्हा प्लास्टिक, मग बॉडी, त्यावर पुन्हा प्लास्टिक, पुन्हा बर्फ असे ठेवले होते. उद्या आठ लोक तिला घेऊन बुधीला जातील. मौसम बदलला तर बुधीला हेलिकॉप्टर येईल.
भाची अनिताला आमच्या जवळ आणि मेहुणे पुरुषांच्या तंबूत अशी व्यवस्था केली. पोरीने सकाळपासून अन्नाचा कण घेतला नव्हता की पाण्याचा घोट प्यायली नव्हती म्हणून तिला बळेबळे सूप प्यायला लावले. आम्हीही प्यायले. आज कुणालाही भोजन करणे शक्यच नव्हते. रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. झोप येणार नाही; पण पडलो दुलई पांघरुन.
-----------------------
क्रमशः
भाग - १३
सोळावा दिवस. आज २० किमीवरील बुधीला मुक्काम होणार होता.
सकाळी पावणेसहाला चालायला सुरूवात केली. बॉडी चार वाजताच पुढे गेली होती. आठ लोकांनी एवढी जड खाट खांद्यावरून वाहून नेली होती. किती त्रास होत असेल त्यांना? नुसत्या विचारानेही कसेतरी होत होते. अनिता आणि मेहुणे घोड्यावरून आमच्याच बरोबर निघाले. मौसम खराबच होता, पावसाची रिपरिप सुरू होती. रेनकोट घालून हा कठीण चढ-उताराचा रस्ता, तुटक्या फुटक्या खडांज्या. त्यातच रस्ता निसरडा झालेला, रेनकोटमुळे भयंकर गरम होत होते. डाव्या हाताला कालीमैय्याने आज आणखीच रुद्रावतार धारण केलेला होता. नुसत्या आवाजाने धडकी भरत होती. गर्ब्यांगला अनिता आणि मेहुणे यांनी घोडे सोडून दिले. त्यांना फक्त दोघांनाच प्रवास करणे अशक्य झाले म्हणून ते आमच्यासाठी थांबले. आम्ही पोहोचल्यावर ते आमच्याबरोबर चालू लागले. अनिताच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते. साहजिकच होते ते. तिची आत्या गेली होती. छियालेक खिंडीअगोदरचे ग्लेशियर पार करताना त्या दोघांची तारांबळ उडाली. कारण येताना ते घोड्यावरुन आले होते, आणि आज कोणत्या प्रसंगात त्यांना यात्रा अर्धवट सोडून निघावे लागले होते. त्यातच दोन रात्री झोपही नव्हती. ॐ पर्वताच्या नभिढांगहून लिपुलेक खिंडीसाठी ते रात्री १-३० वाजता निघाले होते आणि थोड्याच वेळात अनिताची आत्या घोड्यावरुन पडायला लागली. घोडेवाल्या मुलाला वाटले तिला झोप येत आहे म्हणून तो तिला सावरत 'मॅडम, सोना नहीं!' असे म्हणत राहिला पण ती हाकेला ओ देईना तेव्हा सगळे थांबले आणि बघितले तर ती नव्हतीच. तिला घोड्यावरुन खाली घेऊन सर्वांनी प्रयत्न केला पण... मग एक गाइड आणि हे दोघे, घोडेवाला परत फिरले. वॉकीटॉकीवरून नभिढांगला कँपपोस्टला कळविले. सैनिकही लगेच आले. बाकी यात्रेकरू आणि दुसरा गाईड पुढे गेले लिपुलेक खिंडीमार्गे कैलास दर्शनाला.
अनिताची कशीबशी समजूत घालत कठीण छियालेकखिंड चढलो. मग आला बुधीचा तीव्र उतार. पावसाने रस्ता चिकचिक झाला होता, पाय सटासट घसरत होते. जपून पावले टाकत उतरलो एकदाचे, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. बॉडी एका बाजूच्या तंबूत ठेवली होती. अनिता आमच्याबरोबर आणि मेहुणे पुरुषांबरोबर असे राहिलो. आधी रसना प्यायलो, नंतर भोजन. त्या दोघांची समजूत घालून त्यांनाही जेवायला लावले. मग विश्रांती... थोड्या वेळाने अनिताला झोप लागली. दमली होती बिचारी पोर. तशी लहानच होती ती अशा भयंकर प्रसंगाला तोंड द्यायला. पाऊस पडतच होता, ढगही हटण्याचे नाव घेत नव्हते. उद्या मौसम निवळला तर हेलिकॉप्टर येऊ शकेल, नाहीतर उद्या पुन्हा २५ किमीवरील मांगटीपर्यंत आजच्यासारखीच न्यावी लागेल बॉडी. सगळा कँप गुमसुम होता. रात्री कढी-खिचडी खाऊन आता विश्रांती.
सतरावा दिवस. मौसम सुधारण्याचे काहीच चिन्ह नसल्याने बॉडी पहाटे चार वाजताच रवाना झाली होती. आमच्याही प्रवासात अनितासाठी बदल केला होता. एरवी आदिकैलासचे यात्रेकरू बुधीहून गालागढला मुक्कामाला जातात. नंतर सिर्खा नारायण-आश्रम मार्गे पांगू तवाघाट, धारचुला असा प्रवास असतो. पण आता बुधीहून निघाल्यावर लखनपूरहून खाली उतरून मांगटीला जायचे आणि तिथून बसने धारचुला. या कार्यक्रमामुळे गालागढच्या ४४४४ खडांज्या चढण्याचा त्रास वाचणार होता पण त्यासाठी बुधीहून १८ किमी असलेले लखनपूर दुपारी १२ च्या आत गाठणे आवश्यक होते. सकाळी ५-३० ला चालायला सुरवात केली. अनिताची समजूत घालून तिला घोड्यावरून पुढे पाठवले, कारण तिचे नातेवाईक अहमदाबादहून विमानाने धारचुलाला पोहोचले होते. मौसम खराबच होता, पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. रस्ता भयानक होता. कालच्यासारखेच भरभर चालत होतो. ८-३० ला मालपा आले. आता लखनपूर फक्त सहा किमी राहिले होते. आता उशीर होणार नाही, बाराच्या आत लखनपूरला नक्की पोहोचू या विचाराने जीव भांड्यात पडला.
लखनपूरसाठी कठीण खडांज्यांची चढाई आणि उतरण, पाऊस, रेनकोटमुळे भयंकर गरम होणे यातूनच चालत अकरा वाजता लखनपूर गाठले.
लखनपूर ते मांगटी ५/६ किमी हाही रस्ता चढ-उताराचाच. एका ठिकाणी कालीला आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यावर आले होते. गुढग्याएवढे पाणी होते. वेगवान प्रवाह होता. जवळजवळ ५० फुटांचा रस्ता पाण्यात बुडाला होता. एका बाजूला पर्वत आणि दुसर्या बाजूला खवळलेली कालीमैय्या. आधी सुनील पित्रे, त्यांच्या मागे मी, हे, रिहिणी, मीना, सुनील शिंदे आणि सर्वात मागे पांडेजी असे उजव्या हाताने डोंगराचा आधार आणि डाव्या हाताने एकमेकांची काठी धरुन 'ॐ नमःशिवाय, ॐ नमःशिवाय' म्हणत जीव मुठीत धरून तो रस्ता पार केला. पण समोरून येणारे खांद्यावर छप्पराच्या पत्रांचे ओझे घेऊन बॅलन्स सांभाळत पायात फक्त स्लीपर घालून पूर आलेला रस्ता पार करणारे मजूर, ओझी लादलेले घोडे यांना पाहून आम्ही थक्क झालो. किती हे कठीण जीवन!
डोंगर चढून मांगटीला आल्यावरदेखील बसच्या रस्त्याने खूप वेळ खाली उतरावे लागले, कारण आमची बस आय.टी.बी.टी. च्या कॅंपवर उभी होती. तिच्यातच आमचे जेवणही होते. पोहोचलो एकदाचे बस जवळ. तिथे असलेल्या नळावर हात-पाय धुवून जेवायला बसलो. प्रचंड भूक लागली होती, दमायलाही झाले होते. घोड्यावरून आलेल्या मंडळींचे भोजन झाले होते. अनिता आणि मेहुणे धारचुलाला लगेचच गेले होते. जेवण करताना समजले की बस बिघडली आहे आणि जीपने धारचुलाला जावे लागेल. एक तास वाट बघितल्यावर दोन जीप आल्या. आठ-आठ जण एकेका जीप मध्ये बसून कच्च्या रस्त्यावरून धक्केधुक्के खात ३५ किमीवरील धारचुल्याच्या रिसॉर्टमध्ये तीन तासांनी संध्याकाळी सात वाजता पोहोचलो.
अहमदाबादहून नातेवाईक आल्याने व गुजरातला नेणे शक्य नसल्याने धारचुल्यातच अंत्यसंस्कार केले. निगमला या सर्व प्रकारात ५०,००० रुपये खर्च आला. बॉडी घेऊन येणार्या प्रत्येक मजुराला ३,००० रुपये दिले आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. रात्री अनिता, मेहुणे, त्या महिलेचा पती, आईवडील सर्वजण आम्हाला भेटायला आले. त्यांचे सांत्वन करणे फारच कठीण होते. त्या महिलेचे पतीही यात्रेला आले होते, पण धारचुल्यातील मेडिकलमध्ये ते अनफिट झाले म्हणून ते परत गेले आणि पूर्णतः फीट असल्याने त्यांची पत्नी पुढे गेली होती. पण परमेश्वरेच्छा बलियसी हेच खरे.
एकंदरीत या यात्रेत हे समजले की, कोणत्याही प्रसंगी निगम, सैनिक आणि आपले भारत सरकार यात्रेकरूंच्या पाठीशी ठामपणे उभे असते, मदतीत कुठलीही हयगय करत नाही.
---------------------
क्रमशः
भाग - १४
अठरावा दिवस:
एक दिवस आधी आल्यामुळे आज धारचुल्यातच आरामाचा मुक्काम. पहाटे उठण्याची घाई नव्हती, पाठीवर सॅक घेऊन चालायचेही नव्हते. सारे आरामात आवरून ९-३० वाजता नाश्ता करून नेपाळला गेलो. म्हणजे भारत-नेपाळ यांना जोडणारा कालीमैय्यावरील झुलता पूल पार करून नेपाळच्या धारचुला येथे गेलो. नेपाळी धारचुला गरीब दिसला, व्यापारीही फारसे उत्साही वाटले नाहीत. बाजारात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खूप होत्या, पण त्यांची गॅरंटी नसते. कुठल्याही वस्तूची किंमत विचारली की ते सांगत अमुक इंडियन रुपीज्. कारण नेपाळी रुपयाची किंमत भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. आपल्या जवळ नेपाळी रुपये असावेत म्हणून आपले दहा रुपये देऊन नेपाळी पंधरा रुपये घेतले. दहा रुपयाची एक आणि पाच रुपयाची एक अशा नोटा घेतल्या. ह्यांनी खुखरी नावाच्या नेपाळी सिगारेटचे पाकिट घेतले. मग हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहणार्या रंगीत चादरी घेतल्या कुटुंबातील प्रत्येकाला देण्यासाठी. चादरी चांगल्या निघाल्या, रंगही गेला नाही. आणि खरंच त्या हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड असतात. चादरी खरेदीत आमची फसवणूक झाली नाही. तिथे छान पिकलेली फळे प्लम मिळाली. गोड होती. बाजारात वेगळेच मश्रूम बघायला मिळाले, मोठे मोठे गुच्छ असतात फुलांसारखे मश्रूमचे. थोडावेळ फिरुन परत भारतात परतलो. आम्हीही आता फॉरेन रिटर्न झालो बरं का!
दुपारी भोजनप्रसादानंतर विश्रांती घेतली. अठरा दिवसांनी टी.व्ही.पाहिला. निगमच्या दुकानातून कैलासमानस यात्रेची सी.डी., ॐ नमःशिवाय मंत्रधून असलेली कॅसेट, उत्तराखंडची फ्लोरा अॅण्ड फॉना आणि पर्यटन अशी दोन पुस्तके, ॐ पर्वत, आदिकैलास, पांडव पर्वत, पार्वती मुकुट पर्वत यांचे मोठे फोटो विकत घेतले. संध्याकाळी भारताचा धारचुला बघायला गेलो. तीन दिवसांच्या पावसाने सगळीकडे चिखल झाला होता, रस्ता उखडला होता. टिपीकल भारतीय गाव आहे धारचुला. हुतात्मा स्मारक पाहिले. इतका स्वच्छ सुंदर हिमालय या गावाच्या पाठीशी उभा आहे पण इथे? स्वच्छ हिमालयाचा गचाळ पायथा.
----------------------------
एकोणिसावा दिवस:
आज चंपावतला मुक्कामाला जायचे होते. तीन जीप होत्या प्रवासासाठी. पिठोरागढ या जिल्हा मुख्यालयाच्या शहरापर्यंत सारा मार्ग घाटाचा आहे. पावसाने ठिकठिकाणी लॅण्डस्लाइड झालेले होते, रस्ता काही ठिकाणी खचला होता. निसर्गसौंदर्य अगदी बद्रीकेदार सारखे. वाटेत लागणार्या गावा-गावांत मागील तीन दिवसांत झालेल्या निसर्ग प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. पडलेल्या घराची कुठे डागडुजी चालली होती तर कुठे शेतात आलेला गाळ काढून समतल करणे चालले होते. सगळीकडे अपार कष्ट करणारे गावकरी दिसत होते, इतके गरीब, कष्टाळू तरीही हसतमुख. पिठोरागढच्या निगमच्या रिसॉर्ट मध्ये दुपारचे भोजन घेतले.
लोहाघाटजवळ एका टेकडीवर मायावती आश्रम आहे. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने त्यांचे शिष्य श्री. व सौ. सेवियर या इंग्लिश जोडप्याने स्थापन केलेला अद्वैत आश्रम आहे. या आश्रमात १९०१ मध्ये स्वतः स्वामी विवेकानंद १५ दिवस राहिले होते. अद्वैत आश्रम असल्याने इथे कुठलीही मूर्ती नाही. ज्या खोलीत स्वामीजी राहिले होते तिथे फक्त अगरबत्ती लावून ध्यान-धारणा करतात. सध्याचे स्वामी मुमुक्षानंद ७६ वर्षांचे आहेत. सुंदर बगिचा, नीरव शांतता, हिमशिखरांचे अद्वैत दर्शन होत असते. आश्रमातर्फे एक १०० बेडचे रुग्णालय चालवले जाते. सर्व प्रकारच्या तपासण्या येथे होतात. उत्तम ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, सी. टी. स्कॅन आहे. सर्व आजारांवर गरीबांसाठी मोफत उपचार केले जातात. बाकीच्यांना माफक दरात सर्व सुविधा मिळतात. आश्रमात संस्कृतच्या अभ्यासासाठी बरेच परदेशी विद्यार्थी राहतात.
संध्याकाळी पाच वाजता चंपावतला पोहोचलो. हे रिसोर्टही सुंदर आहे. फ्रेश होऊन गावात असलेले १२०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर पाहण्यासाठी गेलो. मंदिराचे कोरीव काम फार सुंदर आहे. शिवपिंडी भव्य आहे.
-----------------------------
विसावा दिवस:
सकाळी ७ वाजता जीपगाड्या निघाल्या. ९-३० ला घाट संपवून टणकपूरला आलो. इथल्या रिसॉर्टमध्ये नाश्ता केला. टणकपूर हे रेल्वे जंक्शन आहे. नेपाळी धारचुल्यातील लोकांना राजधानी काठमांडूला जायचे असेल तर याच टणकपूर जंक्शनवररून गोरखपूरमार्गे जावे लागते. १०-३० वाजता टणकपूर सोडले. हिमालयाची साथ सुटली. उन्हाळा जाणवू लागला. दुपारी १-३० ला रुद्रपूरला आलो. निगमच्या हॉटेलमध्ये भोजनप्रसाद घेतला. निगमचे गाईड श्री.पांडेजी यांचा निरोप घेतला. ते येथूनच नैनितालला त्यांच्या ऑफिसला जाणार होते. ते नैनिताललाच राहतात. जीप सोडून बसमध्ये बसलो. संध्याकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचलो. एकमेकांचा निरोप घेतला. मराठी सहयात्रेकरुंची गाडी उद्याची आहे म्हणून सर्वांना आमच्या मुलीच्या घरी घेऊन गेलो. ती आम्हाला घेण्यासाठी आली होतीच. एक न विसरता येणारी अनुभवयात्रा संपन्न झाली.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३.
------------------






No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.