|| श्री गुरवे नम: ||
डिस्क्लेमर : या भटकंती वृत्तान्तामध्ये खादाडीचे फोटो / वर्णन नाही. त्यामुळे काही मिपाकर हा धागा **वर मारतील, याची पूर्ण कल्पना आहे. मात्र त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्याच, तरीही त्यांचं (प्रतिक्रियांचं) स्वागतच असेल (त्यांची प्रतिक्रिया **वर मारली जाणार नाही).
भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली
पाऊस... उन्हाळ्याच्या दाहक उष्म्याने चराचर तगमगत असताना थंडगार शिडकाव्याने प्रत्येक जीव शांत करणारा ऋतू. पाऊस पडला की सगळ्या सृष्टीचा नूरच बदलून जातो. वनस्पतींना पालवी फुटते आणि सगळ्या सृष्टीलाच सर्जनाचे वेध लागतात.
वनस्पतींवर सगळं प्राणिजगत अवलंबून असतं आणि या वनस्पतींचं परागसिंचन अवलंबून असतं मुख्यत: कीटकांवर. मात्र या कीटकांच्या अनिर्बंध वाढीवर नियंत्रण ठेवणार्यांमध्ये प्रमुख आहेत बेडूक, टोड असे उभयचर आणि पाली, सरडे हे सरीसृप (सरपटणारे खवलेकरी). पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये हे जीव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जीववैविध्याने समृद्ध अशा पश्चिम घाटामध्ये या सर्व जीवांच्या अनेक जाती आढळतात. अलीकडेच पश्चिम घाटात केलेल्या पावसाळी भ्रमंतीमध्ये या छोट्या, अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित जीवांशी ओळख झाली.
पावसाळ्यातल्या नवनिर्माणाच्या उत्सवाची जणू ललकारी मिळते ती बेडकांच्या डराव डराव आवाजाने. पावसाळा हा बेडकांचा विणीचा काळ. जवळजवळ आठ महिने जमिनीखाली सुप्तावस्थेमध्ये दडून राहिलेले हे जीव पावसाच्या सुरुवातीला बाहेर येतात ते मुख्यत: पुनरुत्पादनासाठी. पावसाळा संपल्यावर ते पुन्हा दीर्घ सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे त्यांना भेटायचं, तर पावसाळ्याचा मुहूर्त गाठायला हवा, म्हणून थेट आंबोलीला जाऊन धडकलो.
थंड हवेचं ठिकाण म्हणून आंबोली जसं प्रसिद्ध आहे, तसंच मोसीनराम आणि चेरापुंजी यांच्या खालोखाल जास्तीत जास्त पाऊस पडणारं ठिकाण म्हणूनही. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी इथलं दाट पावसाळरान समृद्ध आहे. दाट झाडी आणि चिक्कार पाऊस यामुळे इथे झाडबेडकांच्याही अनेक जाती आढळतात, त्यापैकी एक आहे उडणारा (तरंगणारा) बेडूक (Rhacophorus malabaricus). आणि म्हणूनच ‘उडणार्या (तरंगणार्या) बेडकाचा प्रदेश’ (Land of Gliding Frog) अशीही आंबोलीची आगळी ओळख आहे.
आंबोलीला जायचं कसं – सावंतवाडीहून अनेक बसेस उपलब्ध आहेत. सावंतवाडी-आंबोली बसचा प्रवास साधारणत: एक-दीड तासाचा. घाटातला रस्ता असल्यामुळे प्रवासात विशेषत: पावसाळ्यात सह्याद्रीचं मनोहर निसर्गसौंदर्य बघता बघता आंबोलीला केव्हा पोहोचतो ते कळतही नाही. आंबोलीला राहण्यासाठी अनेक हॉटेल्स, रिसॉर्टस आहेत आणि खाण्यापिण्याची भरपूर सोय आहे.
आंबोलीचं पावसाळ्यातलं जीववैविध्य पाहायचं असेल, तर रात्रीच्या जंगलभ्रमंतीला पर्याय नाही. आम्ही दोन रात्री, तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ मनमुराद भटकलो. स्थानिक आणि बीएनएचएसचे उत्साही तज्ज्ञ मार्गदर्शक सोबत असल्यामुळे आम्हीही बारा-तेरा जण उत्साहाने फिरायला निघालो. संध्याकाळ झाली आणि बेडकांच्या विविध आवाजांनी आसमंत भरून गेला. रिपरिपत्या पावसात, मिट्ट अंधारात झाडाझुडपांमध्ये आवाजाच्या दिशेने शोध घेतल्यावर सर्वप्रथम दर्शन दिलं ते इवल्याशा झाडबेडकाने. आपले गाल (ध्वनिपिशव्या) फुगवून हे महाशय आपल्या प्रियतमेला आवतण देतात आणि इतर नरांना आव्हान देतात. त्वचा अगदी गुळगुळीत, बुळबुळीत. हा आहे बाँबे बुश फ्रॉग (Bombay bush frog, Raorchestes bombayensis).
याच्या आवाजावरून याला ‘टाईपरायटर फ्रॉग’ असंही म्हणतात. याचा आवाज इथे ऐका. (ध्वनिचित्रमुद्रण – वंदन जव्हेरी).
कास्यबेडूक (ब्राँझ फ्रॉग, Bronze frog, Hylarana temporalis). याची पाठ ब्राँझच्या रंगाची. दगडांच्या खबदाडीत राहतो.
दुरंगी (बायकलर्ड) बेडूक (Bicoloured frog, Clinotarsus curtipes). याच्या शरीरावर दोन रंग अगदी स्पष्टपणे वेगळे दिसतात. पाठ तपकिरी-राखाडी, तर गळा-छाती-पोट हा खालचा भाग काळा.
क्रिकेट (Cricket frog, Zakirana sp.) छोटा (३५-४० मि.मी.) बेडूक. नाकापासून पाठीवरून टिरेपर्यंत कमी-अधिक जाडीची पिवळट रेष असते. त्वचा खडबडीत.
आखूडतोंड्या (नॅरो माउथ) रामानेल्ला (Narrow mouth frog, Ramanella mormorata). याचं तोंड आखूड असतं. मध्यम आकाराचा. त्वचा अगदी खडबडीत.
बरोइंग फ्रॉग (Burrowing frog, Spherotheca sp.) मातीत खणण्यासाठी याच्या मागच्या पायांच्या अंगठ्याजवळ एक छोटासा उंचवटा असतो. त्याच्या साहाय्याने जमीन खोदतो.
बेडोम इंदिराना बेडूक. (Indirana beddomii.) मध्यम आकाराचा बेडूक. दगडांच्या खबदाडीत राहतो.
सुरकुत्या बेडूक (रिंकल्ड फ्रॉग, Wrinkled Frog, Nyctibatrachus sp.) : याच्या पाठीवर आडव्या सुरकुत्यांचं जाळं असतं. रंग जवळजवळ काळा. हासुद्धा जोडीदाराला साद घालत होता, त्या आवाजाच्या रोखाने त्याचा शोध घेतला. वेळ : रात्री साडेबारा.
जरा पुढे, एका डबक्याजवळ त्याची अंडीही दिसली. एखाद्या पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी अंडी घालते. एका चिकट पदार्थाने ही अंडी पानाला चिकटलेली असतात. या फोटोमध्ये अंड्यातले अर्धवट वाढलेले बेडूकमासे स्पष्ट दिसताहेत. पूर्ण वाढ झाल्यावर, अंड्यांवर पावसाचं पाणी पडल्यावर हे बेडूकमासे खालच्या पाण्यात सुळकन पडतात, हेसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. त्याचं चित्रीकरण इथे पाहा. (ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी.)
कॉमन झाडबेडूक (Common Tree Frog, Polypedates maculotus) आपल्या कोकणात सर्वत्र आढळणारा झाडबेडूक. आपल्या घराजवळही दिसू शकतो. झाडावर आणि जमिनीवर वावरतो. ‘टक् टक् टक्’ असा आवाज करतो. पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी अंडी घालते. पूर्ण वाढ झाल्यावर बेडूकमासे खालच्या पाण्यात पडतात.
उडता (तरंगता) झाडबेडूक - र्हॅको (Malabar Gliding Frog, Rhacophorus malabaricus). चार-पाच तास अंधारात, रिपरिपत्या पावसात, जळवांचा त्रास चुकवत, वणवण करून शेवटी रात्री सव्वा-दीड वाजता सर्व परिश्रमांचं चीज झालं. आंबोलीची ओळख असलेले हे महाराज दिसले. पश्चिम घाटाचं हे अनोखं वैशिष्ट्य. रंगाने अगदी पानासारखा हिरवागार आणि सडपातळ शरीराचा, मध्यम आकाराचा (नर ६५-७० मि.मी., मादी ७५-८० मि.मी.) हा झाडबेडूक हवेत ८-१० मीटर चक्क तरंगू शकतो. त्यासाठी त्याच्या चारही पायांच्या बोटांना गुलाबीसर रंगाचे पडदे असतात. फोटोमध्ये ते स्पष्ट दिसत आहेत.

एखाद्या पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी फेसाळ घरटं बनवून त्यात अंडी घालते. मग नर त्याचं फलन करतो. मादी बराच काळ अंड्यांवर बसून राहते. अंड्यातले बेडूकमासे पूर्ण वाढल्यावर खालच्या पाण्यात पडतात.
पाण्यापासून थोडेसे दूर राहणारे टोड हे बेडकांचे भाईबंद. यांची त्वचा कोरडी, खरखरीत आणि गठुळीदार (कणीदार) असते. बेडकांच्या वरच्या जबड्यात दात आणि पायांना पडदे असतात, तसे यांना नसतात. जमिनीवर राहायला हे सरावलेले असतात. असं असलं, तरी ते अंडी मात्र पाण्यातच घालतात.
आंबोली टोड (Yellow striped toad / Amboli toad, Xanthophryne tigrinus.) टोडांची छोटी जात (३५-४० मि.मी.). पश्चिम घाटात सर्वत्र – अगदी मनुष्यवस्तीजवळही - आढळतो. पाठीवर पिवळ्या उभ्या पट्ट्यांची नक्षी.
कॉमन टोड (Common toad, Duttaphrynus melanostictus) टोडांची सर्वात मोठी जात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी. पावसाळा हा विणीचा काळ असल्यामुळे ही जोडी जमली होती. हा टोड रात्री खूप मोठ्या प्रमाणात कीटक फस्त करतो.

या उभयचरांप्रमाणेच, कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे प्राणी म्हणजे पाली आणि सरडे हे पायवाले सरीसृप (सरपटणारे खवलेकरी). यातले काही दिनचर, तर काही निशाचर. यांच्या बर्याच जाती दगडाखाली, दगडांच्या खबदाडीत राहतात. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी, इंग्लिशमध्ये म्हणतात ना - ‘Leave no stone unturned’ , त्याप्रमाणे माळावरचा प्रत्येक दगड शब्दश: उचकटला.
ब्रूक्स जंगल पाल (ब्रूक्स गेको, Brooke’s Gecko, Hemidactylus brookii) खडकांवर, दगडांच्या खबदाडीमध्ये राहणारी पाल. दगडाच्या रंगाशी ही अगदी सरूप (Chemoflage) होऊन गेली आहे.

भूचर पाल (ग्राउंड गेको, Ground Gecko, Geckoella dekkanensis.) निशाचर पाल. डोळ्याची बाहुली उभी. राखाडी-तपकिरी मानेवर पाठीवर पाच आडवे पिवळे पट्टे. जमिनीवर आणि झाडावर वावरते.
ठेंगू जंगल पाल (ड्वार्फ गेको, Dwarf Gecko, Cnemaspis sp.) जंगल पालींमधली छोटी जात. हिच्या डोळ्यांची बाहुली गोल असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पिवळ्या रंगाची, इंग्लिश उलट्या ‘व्ही’ ( _/\_ ) आकाराची नक्षी. टेकड्यांवरच्या ओलसर पावसाळरानांमध्ये मुख्यत: खडकाळ भागात सापडते.
इलियट सरडा (Elliot’s Calotes, Calotes ellioti). बागांमध्ये आढळणारा सरडा. शरीरावरच्या हिरवट तपकिरी रंगसंगतीमुळे परिसराशी अगदी सरूप (Chemoflage) होऊन जातो.
सापकिरम
सापकिरम (सिसिलिअन, Ceacilian, Ichthyophis diadem??) : हे सापांसारखे आणि गांडुळासारखे दिसतात, पण हे सापही नाहीत आणि गांडुळासारखे किरम (कणाहीन कृमीही) नाहीत. हे आहेत बेडकांचे भाईबंद उभयचर ‘सिसिलिअन’. यांनाही पाठीचा कणा असतो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे पाय झडून गेले आणि डोळे अगदी छोटे होऊन त्यावर एक संरक्षक पडदा आला. हे जमिनीच्या खाली ओलसर जागी राहतात. गांडुळं आणि मातीतले अगदी छोटे जीव हे त्यांचं खाद्य. याचं दर्शन ही एक पर्वणीच, कारण हे मातीखाली दडलेले असतात.

पश्चिम घाट म्हणजे जीवविविधतेचा खजिनाच. ‘जागतिक वारसा प्रभाग (World Heritage Site)’ म्हणून जगन्मान्यता लाभलेला प्रदेश. त्यामुळे या भ्रमंतीत इतरही अनेक जीव पाहायला मिळाले. त्यांच्याबद्दल दुसर्या भागात.
(क्रमश:)
श्रेयनिर्देश :
छायाचित्रं : स्वानंदी नूलकर
ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी
प्रजातींची ओळख : मृगांक प्रभू
स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शक : महादेव (काका) भिसे व शुभम आळवे
पश्चिम घाट म्हणजे जीवविविधतेचा खजिनाच. ‘जागतिक वारसा प्रभाग (World Heritage Site)’ म्हणून जगन्मान्यता लाभलेला प्रदेश. त्यामुळे या भ्रमंतीत उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक जीव पाहायला मिळाले. त्यांच्याबद्दल दुसर्या भागात.
भाग २ : वनस्पतिसृष्टी, फूलपाखरं, इतर कीटक, कीटकेतर छोटे प्राणी आणि साप
गेल्या वर्षी जुलै २०१४मध्ये उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात गेलो होतो. त्याच्या वृत्तान्ताचा पहिला भाग मिपावर टाकायला ऑक्टोबर उजाडला. त्यानंतर डिसेंबरमध्ये ओरिगामी प्रदर्शन होतं, त्याच्या तयारीला लागलो. प्रदर्शन आटोपल्यावर त्याचा वृत्तान्त लिहिला आणि काही दिवसातच असह्य अशी कंबरदुखी (low back pain) सुरू झाली. इतकी, की त्यामुळे फेब्रुवारीमधला कशेळे कट्टाही हुकला. एप्रिलपर्यंत हा त्रास सुरूच होता. या सर्व गदारोळात, ‘उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात – भाग २’ मिपावर टाकायचा राहून गेला. आता मे २०१५ संपत आला असताना, इतका उशीर झालेला असताना भाग २ टाकावा का? असा प्रश्न पडला. मग ‘It is never too late’, ‘Better late than never’, ‘चांगल्या कामाला उशीर झाला तरी हरकत नाही’, ‘भाग २मध्ये येणार्या प्राण्यांचा पावसाशी तसा काही संबंध नाही’, ‘उशीर झाला तरी मिपाकर आपलेच आहेत (आपण मिपाकरांचेच आहोत), सांभाळून घेतील’ अशी स्वत:च स्वत:ची समजूत घालून भाग २ सादर करतो आहे.
सह्याद्रीत सापडणार्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींपैकी एक म्हणजे ‘कारवी’. अनेक जातींपैकी ही एक जात, उपडी टाकलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून ‘टोपली कारवी’. कारवीच्या एका झुडपाच्या पानांचा फक्त एकच गुच्छ पिवळा दिसतोय.


कारवी सात, आठ किवा बारा वर्षांनी पावसाळ्यात फुलते. जंगलातली सर्व कारवी झुडपं एकाच वेळी फुलतात. सगळं जंगल निळं दिसतं.
जाता जाता : माझ्या अंदाजानुसार या वर्षी २०१५मध्ये पावसाळ्यात सह्याद्रीतली कारवी फुलणार आहे. तेव्हा निसर्गप्रेमी फुलवेड्या मिपाकरांनो, तयार राहा.
नागाच्या फण्यासारखं पान असलेली ही ‘कोब्रा लिली’ आणि रानहळद

पावसाळ्यात जंगलात सर्वत्र दिसणारं दृश्य म्हणजे कवकाचे (Fungiचे) फुटवे, म्हणजेच अळंबी (मश्रूम्स). कवक मृत झाडांवर / फांद्यांवर वाढतात आणि लाकडाचं (लाकडामधल्या सेल्युलोजचं) विघटन करण्याचं महत्त्वाचं काम करतात. जंगलात दिसलेले हे विविध प्रकार.
डेड मॅन्स फिंगर्स, उर्वशी आणि इतर.



गावात ही घंटेसारखी धोतरावर्गीय फुलं दिसली.
फूलपाखरं आणि पतंग
फुलं आहेत म्हटल्यावर फूलपाखरं आणि पतंग आलेच. जंगलात मोठ्या आकाराचीही फूलपाखरं आणि पतंग भरपूर आढळतात. मात्र पॅरिस पिकॉक, रेड स्पॉट ड्यूक अशी काही सुंदर फूलपाखरं दिसूनही त्यांचे फोटो काढता आले नाहीत.
![]() | राणी पाकोळी (ब्लू मॉरमॉन, Papillio polymnestor) भारतातलं क्र. २चं मोठं फूलपाखरू. पंखांचा विस्तार जवळजवळ १०० मि.मी. |
| कॉमन मॉरमॉन (Papillio polytes) हे आपल्या आजूबाजूला सहज दिसणार फूलपाखरू. नर आणि मादी दोघेही अगदी भिन्न दिसतात. याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतात. हा मादीचा फोटो आहे. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. ही मादीसुद्धा तीन वेगवेगळ्या रूपांपैकी एक रूप धारण करते – क्रिमझन रोझसारखं ‘रोम्युलस’, कॉमन रोझसारखं ‘स्टिचिअस’ आणि थोडंफार नरासारखं ‘सायरस’. एकाच जातीची दोनपेक्षा अधिक रूपं असण्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. फोटोमध्ये मादीचं ‘सायरस’ रूप आहे. | ![]() |
| अँगल्ड पियरो (Caleta caleta) हे एक छोटुकलं फूलपाखरू. लायसानिडी या फॅमिलीत छोटी फूलपाखरं येतात. | ![]() |
![]() | मलबार स्पॉटेड फ्लॅट (Calaenorrhinus ambareesa) हे ‘स्किपर’ (हेस्पेरिडी फॅमिलीतलं) फूलपाखरू. या फॅमिलीतली फूलपाखरं विशेषतः अगदी सकाळी किंवा संध्याकाळी दिसतात. कारवीच्या झुडपावर मलबार स्पॉटेड फ्लॅट मादी अंडी घालते. |
| एखाद्या खडकावर किंवा झाडाच्या खोडावर उगवलेल्या दगडफुलासारखा दिसणारा लायकेन (दगडफूल) मॉथ. | ![]() |
![]() | घुबड्या पतंग (आउल मॉथ, Erabus ephesperis) पंखविस्तार १०० मि.मी. पंखांवरच्या दोन मोठ्या ‘डोळ्यांमुळे’ घुबडाच्या डोक्याचा भास होतो. |
आणखी एक पतंग.
अस्वल्या सुरवंट (वूली बेअर अळी). अस्वलासारखा केसाळ सुरवंट म्हणजे बहुधा टायगर मॉथची किंवा लेपर्ड मॉथची अळी असावी. अळीची वाढ होत असताना चार ते पाच वेळा कात टाकते. पहिल्या फोटोमधली अळी कात टाकताना दिसते आहे.

अॅटलास मॉथ (Attacus atlas) हा भारतातला (जगातला??) सर्वात मोठा पतंग. त्याचा पंखविस्तार ३०० मि.मी. (एक फूट) इतका मोठा असतो. त्याच्या वरच्या दोन्ही पंखांच्या टोकावर सापाच्या तोंडासारखी आकृती दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला कोणत्याही प्रकारचे मुखावयव नसतात; म्हणजेच कोशातून बाहेर पडलेला, पूर्ण वाढ झालेला प्रौढ पतंग काहीही खात नाही (खाऊ शकत नाही). त्याची ही अळी. अंगठ्याएवढी जाडजूड. तिने कोष विणायला सुरुवात केल्याचं दिसतंय. म्हणजे महिनाभराने प्रौढ अॅटलास मॉथ बाहेर पडला असेल.
| ‘मधुर’ अळी : नक्की कोणत्या कीटकाची ही अळी आहे, ते माहीत नाही. तिच्या शरीरावर दिसणारे थेंब हे दवबिंदू नसून, तिने स्रवलेल्या एका गोड मधुकराचे थेंब आहेत. विशिष्ट जातींच्या मुंग्यांना हा गोड मधुकर आवडतो, म्हणून त्या मुंग्या या अळीकडे आकृष्ट होतात. या गोड बक्षिसाच्या बदल्यात मुंग्या अळीला संरक्षण देतात. परस्परहितैषी सहजीवनाचं (सिम्बायोटिक रिलेशनशिपचं) एक सुंदर उदाहरण. | ![]() |
इतर कीटक
![]() | नमस्कार किडा (प्रार्थना कीटक Praying Mantis, Mantis religiosa) हा कीटकविश्वातला शिकारी. शिकारीसाठी याच्या हातांची (पायांच्या ‘पुढच्या’ जोडीची) विशिष्ट रचना उपयोगी पडते. अंड्यांच्या रक्षणासाठी मादी एका कडक पिशवीत अंडी घालते. या पिशवीला ‘ऊथेका (Ootheca)’ म्हणतात. |
| एखाद्या झुडपावर फांद्यांच्या बेचक्यात थुंकीसारखं दिसणारं हे आहे एका किड्याच्या - थुंकीकिड्याच्या (Spittle bug Cosmoscarta sp.) पिल्लाने स्वसंरक्षणासाठी बांधलेलं घरटं. | ![]() |
व्हेस्पिड (??) गांधिलमाशी (Ropalia sp. ???)
प्राण्यांची उत्पत्ती आणि एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांचा विकास पाण्यामध्ये झाला. हळूहळू पाण्याच्या बाहेर येऊन काही प्राण्यांनी जमिनीवर राहायलाही सुरुवात केली. मात्र सुमारे २५-३० कोटी वर्षांपूर्वी चार चिमुकल्या पंखांच्या साहाय्याने आकाशही पादाक्रांत करणारे पहिले प्राणी म्हणजे कीटक. त्यातही कीटकांच्या प्राचीनतम घराण्यांपैकी एक आहे Order Odonata - चतुर आणि सुई/टाचणी याचं घराणं. आपल्या लहानपणी आपण चतुर पकडून त्याच्या शेपटीला दोरी बांधून त्याला उडवायचा खेळ खेळलेलो असतो, यापलीकडे आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं.
चतुर आणि टाचणी यांना परिसराचे आरोग्य निदर्शक (Indicators of health of environment) म्हणतात. हे उडता उडता शिकार करू शकतात. माणसांचे सर्वात मोठे शत्रू असलेले मच्छर हे चतुरांचं आवडतं अन्न.
| पावसाळा हा चतुर-टाचण्यांचाही विणीचा हंगाम. टाचणी/सुई (??? Bambootail) जोडी जमलेली आहे. नर शेपटीने मादीची मान पकडतो. मादीने ‘हो’ म्हटल्यावर दोघे वर्तुळाकार स्थितीत येतात आणि मिलन होतं. फोटो फार चांगला नाहीये, क्षमस्व. | ![]() |
निळ्या पंखांचा कीटक आणि जुवेल बीटल

कीटकेतर प्राणी
भुसकट्या (Wood Louse) जंगलातल्या कुजणाऱ्या लाकडाच्या ओंडक्याखाली सापडतो. धोक्याची जाणीव होताच शरीर गुंडाळून घेतो.
>
गोम (सेंटिपेड) आणि स्कुटीजेरा

अष्टपाद (Class Arachnida) वर्गातला कोळी टॅरांटुला. परदेशातल्या टॅरांटुलासारखा हा विषारी नाही.
कोळ्याच्या जाळ्यावरचे दवबिंदू
माळावरचा दगड उचकटला की त्याखाली विंचू, पाल असं काहीतरी सापडतंच. हा विंचू (Palamnaeus sp.) दिसायला छोटासा असला, तरी आम्ही त्याच्यापासून कमीतकमी पाच फूट अंतर राखून होतो. त्याने त्याचा आक्रमक पवित्रा दाखवलाच.

माळावरचा खेकडा
ब्राह्मणी सापसुरळी (स्किंक Mabuya carinata)
जंगलातल्या एका अन्नसाखळीच्या शिखरावर असणारे प्राणी म्हणजे साप. दाट पावसाळरानामध्ये अनेक विषारी / बिनविषारी साप दिसतात. खापरखवल्या, मलबार चापडा अशा काही जाती फक्त पश्चिम घाटातच सापडतात, इतर कुठेही सापडत नाहीत.
बेडोम मांजर्या (Beddome’s Cat Snake Boiga beddomei) निमविषारी.
बेडोम कीलबॅक (Beddome’s Keelback Amphiesema beddomei) बिनविषारी.
खापरखवल्या (Bombay Shiled Tail Uropeltis macrolepis) हा फक्त सह्याद्री पर्वतरांगांमध्येच आढळणारा बिनविषारी साप. झळाळीदार निळा/काळा रंग, निमुळतं होत गेलेलं तोंड आणि तिरकी छाटल्यासारखी जाड शेपटी एवढ्या खुणांवरून सहज ओळखता येतो. गांडुळासारखे छोटे जीव हे त्याचं खाद्य.

| दिवड (Checkered Keelback Water Snake Xenochrophis piscator) पाणथळीत आढळणारा साप. बिनविषारी. याच्याबद्दल गैरसमजच फार - हा साप पाहिल्याचं दुसर्याला सांगणार्याचा म्हणे मृत्यू ओढवतो. तसंच, हा पाण्याबाहेर आला, तर विषारी होतो. | ![]() |
हिरव्यागार चाबकासारखा हरणटोळ (Common Vine Snake, Whip snake, Ahaetulla nasuta) सर्वत्र आढळतो. निमविषारी, चाबकासारखा लांबसडक, त्रिकोणी टोकदार तोंड, मोठ्या गोल सोनेरी डोळ्यांची उभी बाहुली. झाडावर दिसतो. याच्याबद्दल एक समजूत म्हणजे, झाडावरून डंख मारून हा साप आपली कवटी फोडतो.

मलबार चापडा (मलबार पिट व्हायपर Trimeresurus malabaricus) हे पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य. विषारी. सरडे, बेडूक, छोटे पक्षी वगैरे खातो. झाडावर बघायला मिळतो. तसा शांत असला, तरी डिवचल्यावर मात्र हल्ला करतो. या महाशयांचं जेवण झालेलं दिसतंय.

एक अविस्मरणीय अनुभव
रात्रीच्या फेरफटक्यानंतर जंगलात एक अविस्मरणीय दृश्य पाहिलं. एका ठिकाणी सर्वांनी आपले टॉर्च आणि मोबाइल बंद केले. गुडुप अंधार झाला. मग एका झाडाच्या खोडावर हिरवट रंग प्रकाशमान झाला. ही होती स्वयं(जीव)प्रकाशी (बायोल्युमिनसंट) अलगी. पावसाळ्यातच, दाट अरण्यातच दिसते. मागे भीमाशंकर वृत्तान्त लिहिला होता, तेव्हा प्रतिसादामध्ये वल्लींनी अशा प्रकारच्या निळ्या अलगीचा, गोनिदांनी तिला ‘ज्योतीवंती’ असं सुंदर नाव दिल्याचा उल्लेख केला होता, ते आठवलं. आजूबाजूला मिट्ट काळोख होता. अलगीचा प्रकाश इतका मंद होता की फोटो काढणं अशक्यच होतं.
जळवांचा जलवा
पावसाळ्यातल्या ओल्या रात्री जंगलभ्रमंती करायची असेल, तर जळवांना खंडणी म्हणून थोडंसं ‘रक्तदान’ करावंच लागतं. कितीही जामानिमा केला, तरीही जळवा कुठूनतरी कशातरी अंगावर चढतातच. दोन-तीन मि.ली. रक्त पिऊन तृप्त होऊन त्या गळून पडल्यावरच, त्या आपल्या अंगावर चढल्या होत्या याची जाणीव होते. त्यांच्या लाळेतल्या रक्तगोठणरोधक आणि बधीर करणार्या रसायनांमुळे जळू शरीरावर छेद करते ते समजतच नाही. मला चार-पाच जळवा लागल्या. एक तर थेट मानेपर्यंत पोहोचली होती. अशा तर्हेने मी आठ-दहा मि.ली. रक्तदान केलं.
मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब
हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते आहे. ती रोखण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक असतो. स्थानिकांचा सहभाग असेल तर अगदी प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणचंही वन अनाघ्रात राखता येतं. मनोहर (काका) भिसे हे असेच एक स्थानिक. स्वतंत्र व्यावसायिक असलेले काका लहानपणापासूनच निसर्गप्रेमी. इथलं जंगल हेच आपलं सर्वस्व आहे, हे जाणून त्यांनी वनसंवर्धनासाठी ‘मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब’ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे वन मार्गदर्शक म्हणून स्थानिक तरुणांना तयार करणं. शुभम आळवे असाच एक तरुण त्यांच्या तालमीत तयार झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तंत्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायांवर उभा राहिलेला शुभम आज वनविद्येमध्ये इतका तज्ज्ञ झालाय की अनेक उच्चशिक्षित जीवशास्त्र संशोधकही काकांप्रमाणेच शुभमचीही मदत घेतात.
काका, शुभम यांच्यासारखे स्थानिक हीच वनसंवर्धनाची आशास्थानं आहेत. त्यांच्यासारख्यांच्या आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळेच आपलं वनवैभव जोपासलं जाईल याची खातरी वाटते. त्यांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रत्येक वेळी जंगलभ्रमंती केल्यावर अनेक नव्या गोष्टी समजतात. मला किती गोष्टी माहीत आहेत असा भ्रम दूर होऊन, मला आणखी कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या त्याची माहिती होते. दुसऱ्या शब्दात – आपल्या ‘अज्ञानाचं’ ‘ज्ञान’ होतं. हवेत तरंगणारा ‘मी’ जमिनीवर येतो. माझे पाय जमिनीवरच राहतात. म्हणूनच मला जंगलात जायला आवडतं.
श्रेयनिर्देश :
छायाचित्रं : स्वानंदी नूलकर
ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी
प्रजातींची ओळख : मृगांक प्रभू
स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शक : महादेव (काका) भिसे व शुभम आळवे














No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.