Monday, June 21, 2021

मेघालय माहिती

 

सांस्कृतिक भारत : मेघालय

मेघालय हे भारतातील उत्तर- पूर्व राज्य असून शिलाँग ही या राज्याची राजधानी आहे. राज्याची स्थापना 2 जानेवारी 1972 रोजी झाली आहे. मेघालयचा संस्कृत अर्थ मेघाच्‍छादित प्रदेश असा होतो. शिलाँगला पूर्वेतले स्कॉटलंड म्हटले जाते. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. पण 21 जानेवारी 1972 ला खासी, गारो आणि जैंटिया टेकड्या मिळून या तीन जिल्ह्यांना स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. आता राज्यात सात जिल्हे आहेत. मेघालयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे 3,211,000 इतकी असून राज्याचे क्षेत्रफळ 22,429 चौरस किमी इतके आहे. राज्याची साक्षरता 75.78 इतकी आहे.

मेघालयाच्या उत्तर आणि पूर्व ‍सीमेला आसाम आणि दक्षिण व पश्चिम सीमेला बांगला देश आहे. मेघालयात मेघांचे निवासस्थान (मेघ अधिक आलय) म्हणून मेघालय नाव. पहाडी प्रदेश. येथे प्रामुख्याने खासी, जैंटिया आणि गारो जमातीची वसाहत आहे. मेघालयाच्या मध्य आणि पूर्व भागात खासी आणि जैंटियाच्या टेकड्या. भव्य पठार, उतरते गवताळ प्रदेश, टेकड्या, नद्या व दऱ्यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. पठाराच्या दक्षिणेकडील भागाला खोल दऱ्या, खिंडी आणि सरळ उभ्या दरडी आहेत. पायथ्याशी अरूंद सपाट मैदानाचा पट्टा थेट बांगला देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेला भिडला आहे.

मेघालय हे कृषीप्रधान राज्य आहे. यातील 80 टक्के लोकसंख्या आपल्या उदरनिर्वाहासाठी कृषीवर अवलंबून आहे. शेतीला पोषक हवामानामुळे हे राज्य प्रगतीपथावर आहे. उष्ण कटीबंधीय व समशितोष्ण वातावरणात फळे व भाज्यांच्या उत्पादनाला येथे जास्त वाव असतो. तांदूळ या प्रमुख पिकाखेरीज संत्रे, अननस, केळी, फणस, उष्ण प्रदेशातील फळे, आलूबुखार, पियर, पिसेस इत्यादी फळांचे उत्पादन होते. बटाटे, हळद, आले (अद्रक), काळे मिरे, पोफळी (सुपारी), आखूड धाग्याचा कापूस, ताग, मेष्टा व मोहरी इत्यादी रोख उत्पन्न देणारी पिकेही घेतली जातात. भुईमुग, सोयाबिन, सूर्यफूल यांचे उत्पादनही राज्यात होते.
शिलाँगपासून अकरा किमी अंतरावरील मीठ या खेडेगावात पाच दिवस चालणारा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. खासी का पामब्लॅग असे त्याचे नाव. वार्षिक नोगक्रेम हा प्रसिद्ध सण. यालाच नोकक्रिमचे नृत्य असेही संबोधले जाते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात खासी लोकांचा शदसुकम्यानीसम नावाचा धार्मिक उत्सव शिलाँगला साजरा करतात. जुलैमध्ये जायटियाम इथे जोवाई लोक देहदिएनख्लम नावाचा चैतन्यमय उत्सव साजरा करतात. ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बांगला नावाचा एक उत्सव सलजॉगला (सूर्यदेव) प्रसन्न करण्यासाठी गारो जमातीतील लोक हा सण साजरा करतात.

निसर्गदत्त सृष्टीसौंदर्य मेघालयात पहायला मिळते. मेघालय हे सृष्टीसौंदर्याने नटलेले राज्य आहे. शिलाँग हे राजधानीचे शहर. अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. येथे वर्डस लेक, लेडी हँड्री पार्क, पोलो ग्रांऊड, छोटे प्राणी संग्रहालय, एलिफंटा धबधबा, शिलाँग पीक, गोल्फ कोर्स, गरम पाण्याचे झरे, चेरापुंजी, जोवई, तुरा, नरतियांग या सारखी अनेक रमनीय स्थळे पहायला मिळतात.
इंग्रजी ही मेघालयची राज्य भाषा असली तरी काही स्थानिक भाषा इथे बोलल्या जातात त्यापैकी खासी, पनार आणि गारो या आहेत. मेघालयातील भाषा आणि ती भाषा बोलणारे लोक खालील प्रमाणे :

भाषा आणि ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे – असमिया – मान; बाईटे - मिझो–बाईटे; बोडो – बोडो कचारी, राभा कचारी; गुटोब – गडाबा; खासी – जैंटिया खासी; खासी-भोई; खासी-खिनरियान; खासी-लिगम; कोच – कोच.

बोरो कचारीस, चकमा, दिमासा, कचारी, गारो, हजोंग, हमार, जैनतीया, सेंतेंग, पनार, वार, भोई, लेंगंगम, कोच, कुकी, चांगसन, चों‍गलोइ, डोऊंगेल, गमालहो, गांगटे, गुइटे, हन्नें‍ग, हाऊकीप, हाऊपीट, हाऊलाइ, हेंगना, होन्सुग, खावाथलांग, खोथालंग, खेलमा, खोलहोन, कीपगेन, लहोजेम, लुफेंग, मांगजेल, मिसाओ, रियांग, सायरहेम, सेलनाम, सिंगसन, सीतलहो, सुकटे, थाडो, थांगेजन, उइबुह, वाइफेइ आदी आदिवासी मेघालयात वास्तव्य करतात.

मेघालय हे ख्रिश्चन धर्मिय राज्य समजले जाते. भारतात ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर इथल्या आदिवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. खासी, गारो आणि जैंटिया ह्या आदिवासींची श्रीमंत सांस्कृतिक परंपरा मेघालयाला लाभली आहे. लाकूड, बांबू आणि ऊसांपासून ते वेगवेगळ्या कलाकुसरी करीत असतात. त्यांचे पारंपरिक वाद्य सुद्धा याच वस्तुंपासून बनवलेले असतात. कार्पेट आणि सिल्क काम सुद्धा इथे परंपरेने चालत आलेले आहे. हस्तकला व्यवसाय आणि बाहुल्यांच्या कलाकृती इथे पहायला मिळतात.

मेघालयातली नृत्य हे उघड्या आकाशाखाली केले जातात. जन्मोत्सव, उत्सव, सण, लग्न विधी, प्रेम आदीत अनेक प्रकारचे ड्रम आणि वाद्य बडवले जातात. सरोवर, टेकड्या, धबधबे आदी ठिकाणी ही नृत्य व गाणी सादर केली जातात. या वेळी विविध प्रकारची वाद्य वाजवली जातात. ढोल, दुतारा, गिटार, बासरी, पिंगाणी, कामट्या या प्रकारची वाद्य इथे प्रचलित आहेत.

मेघालयाचे प्रसिद्ध पारंपरिक नृत्य म्हणजे नॉनगक्रेम हे नृत्य. हे नृत्य धार्मिक नृत्य असून देवाला धन्यवाद देण्यासाठी केले जाते. साधारणत: ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हे नृत्य सादर केले जाते.

शाद सुक मायसियम नावाचे नृत्य रंगीबेरंगी कपडे घालून सादर केले जाते. हिवाळ्यात खासी टेकड्यांच्या भागात हे नृत्य प्रचलित आहे. कुवारपणातले हे पारंपरिक नृत्य असते. परंपरेने चालत आलेली वेषभूषा या नृत्याच्या वेळी केली जाते. या वेळी पार्श्वसंगीतासाठी ड्रम्स, पाईप वाजवले जातात. या वाद्याला तंगमुरी असे म्हणतात आणि हे वाद्य इतर वाद्यांची राणी समजली जाते.

बेहदिनखलम नावाचा अजून एक नृत्य प्रकार असून तो वर्षातून एकदा पावसाळ्यात जुलै महिन्याच्या आसपास केला जातो. जैंटिया या जमातीतील हे प्रसिद्ध प्रवासी नृत्य आहे. चांगल्या गोष्टींच्या उन्नतीसाठी हे नृत्य केले जाते. वांगला उत्सव (गारो), डोरसेगटा नृत्य, लाहो नृत्य असेही अजून काही नृत्य मेघालयात प्रचलित आहे.

सोहरा (चेरापुंजी) हे शहर खासी टेकड्यांवर असून जगातील सर्वात जास्त पाऊस इथे होतो. हा पाऊस केवळ पावसाळ्यातच नसतो तर इथे रोज पाऊस असतो. ब्रम्हपुत्रा, कोपीली, मायनटडू, पियाइन, सोमेश्वरी या नद्या मेघालयातून वाहतात तर खासी, गारो, जयतियारांगा हे पर्वत पहायला मिळतात.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ.सुधीर राजाराम देवरे 
मोबाइल: 75886 18857



रात्री ८:२० ला आम्ही गुवाहाटीला परतीच्या विमानात चढलो. पुढचा स्टॉप दिल्ली, ३ तास थांबून पुन्हा भल्या पहाटे पुण्याचे विमान. लिहायला मोकळा वेळ असल्याने गेल्या १० दिवसांत अनुभवलेल्या गोष्टींची मनात उजळणी सुरु झाली. वास्तविक या ट्रिपबद्दल लिहायचे २-३ दिवसांपूर्वीच मनात आलेले. IMG_20181229_063231 पण गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये त्यावेळी लिहिणे शक्य झाले नाही. आणि नेहमीप्रमाणे नुसते प्रवासवर्णन लिहिण्यापेक्षा यावेळी आडवाटेला भेटलेली मंडळी; त्यांचे, या ईशान्य-पूर्वेतल्या जागांचे वेगळेपण, मिळालेले अनुभव, त्याहीपेक्षा अनुभवातून मिळालेल्या शिकवणी याबद्दल लिहिण्याची इच्छा होत आहे. घरचा प्रवास लांबचा आहे, पण हळूहळू झोपसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, बघू सुरुवात तरी करतो.

बहुराष्ट्रीय कंपनीत, आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी असणाऱ्या काहीश्या सक्तीच्या रजेची सवय झालेली आहे. हा तसा सुट्ट्यांचा काळ त्यामुळे फिरताना प्रवास आणि राहणे-खाणे उगाच महाग पडते, यावर उपाय म्हणून आमची अर्धे वर्ष सरल्या-सरल्या डिसेंबरातल्या प्रवासाची जुजबी ठरवा-ठरावी झालेली असते. पण यावर्षी काही व्यावसायिक कारणांनी पावसाळा सरेपर्यंत डिसेंबरातल्या सुट्टीची खात्री नव्हती. तसेच, या मोसमात सह्याद्रीतले ट्रेक भरपूर केले मात्र कुठलीही मोठी सुट्टी घेतली नव्हती. पण नवीन ऑफिसातल्या वरिष्ठानी, ‘वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात

rhdr
our x-mus gift

ऑफिसात दिसू नकोस’ असा प्रेमळ सल्ला वेळीच दिल्याने सुट्टीच्या प्लॅनिंगला सुरुवात झाली. गेल्यावर्षी युथ हॉस्टेल सोबत १० दिवस गोवा-कर्नाटकाच्या जंगलात भटकल्यानंतर, याही वर्षी कुठेतरी ऑफ-बिट ठिकाणी जावे असे मनात होते. हो, सुमुद्र आणि दारू या दोन गोष्टींव्यतिरिक्त गोव्यात गर्दीपासून दूर असलेली पाहण्यासारखी वेगळी ठिकाणे भरपूर आहेत. फक्त शोधण्याची इच्छा हवी. गेल्यावर्षीसुद्धा फेसबुकवर टाकलेल्या गोव्यातल्या फोटोंच्या ठिकाणांची चौकशी बऱ्याच जणांनी केली, तशीच चौकशी आत्ता ईशान्य-पूर्वेतल्या जागांसाठीसुद्धा होत आहे, पण अजून कोणत्याही फोटोमध्ये ठिकाणाची माहिती दिलेली नाही.

smartcapture

गोव्याला संरक्षित अभयारण्यात राहिलो-फिरलो होतो पण तिथे फिरण्याची सरळसोट परवानगी मिळत नसल्याने ती ठिकाणे पर्यटक किंवा गर्दीच्या आवाक्याबाहेरची आहेत त्यामुळे फोटोंमध्ये कदाचित लोकेशन टॅग केले होते. पण यावेळी गेल्या १० दिवसात पाहिलेल्या नितळ-निळ्याशार पाण्याच्या प्रवाहात पडलेली प्लॅस्टिकची वेष्टने, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या मनाला डाचत आहेत आणि या फोटोंपायी तो कचरा टाकण्याची मानसिकता असलेले अजून १० लोक तिकडे पोहूचू नयेत यासाठी असलेला हा तोकडा प्रयत्न आहे. असो.

नवीन वर्ष स्वागताला सरळधोपट परदेशवारीहि सहज करता आली असती पण आमचे हरहुन्नरी मित्र पुष्कर मेहेंदळे यांनी याआधी महिनाभर भारताच्या ईशान्य-पूर्व भागात केलेली बॅगपॅकिंग टूर आणि लहानपणापासून ईशान्य-पूर्वेतील राज्यांना भेट देण्याची माझी इच्छा; त्यामुळे लागलीच पुष्करकडून डिसेंबरच्या १० दिवसात ईशान्य-पूर्व भारतात काय-काय बघता येईल याची चाचपणी केली. सौन्च्या सुट्टीचे गणित डामदौल असल्याने, पुण्याच्या मित्र परिवारात डिसेंबरातले प्रवासाचे समीकरण वर-वर मांडून ठेवले. IMG_20181230_220043प्रथमेश नान्नजकरने लागलीच सोबत यायची तयारी आणि तिकिटे काढायला होकार देऊन टाकला. दिवाळीच्या आसपास प्रवासाची तिकिटे काढली. पण एकाच किमतीत जास्त फिरायला मिळत असेल तर आमच्यासारख्या भटक्यांना का नाही आवडणार? झाले, ईशान्य-पूर्व सोबत कोलकात्याचीही वर्णी आमच्या यादीत लागली. पुणे-कोलकाता-गुवाहाटी हा प्रवास,फक्त पाठीवर मावेल एवढे सामान आणि पुढचे-पुढे बघू असे ठरले. सामानाची जास्त काळजी नव्हती, अगदी मोजून सांगायचे तर एअरपोर्ट चेक-इन काउंटरला तिघांच्या १० दिवसांच्या बॅगपॅकचे प्रत्येकी वजन साधारण ७ किलोग्रॅम भरले.

पण फिरायचे काय-कसे? आणि राहायचे कुठे? सगळे हवेत होते. पुष्करने ७-८ ठिकाणे, राहायच्या काही जागा आणि प्रवासाला कुठे काय मिळेल ते साधारण सांगितलेले. माझ्यामते भटकंती हि अशीच ठिपक्यांच्या चित्राप्रमाणे असावी. साधारण रूपरेषा दिसावी पण ठिपक्या ला ठिपका जोडत, गाव-माणसांचे रंग भरत ती पूर्ण व्हावी. घरून निघतानाच पूर्ण चित्र घेऊन निघालो तर परतेपर्यंत ते जपण्याचा प्रयत्न करावा लागतो. एखादा ठिपका सोडण्याची किंवा हवा तो रंग भरण्याची मोकळीक मिळत नाही. गुवाहाटीतल्या एखाद्या पॅकेज-टूर ऑपरेटर सोबत मोलभाव करून अधिकाधिक ठिकाणांना भोज्या करण्यासाठी धावणारी अनेक लोकं प्रवासात भेटली. याच्या अगदी उलट आवडेल त्या ठिकाणी वाटेल तेवढे दिवस राहिलेले अवलियेसुद्धा भेटले. आमची गणती कुठे होत होती यात ? लहानपणी फीरताना देश-विदेशातील बॅगपॅकर्स पाहिले कि, हे लोक असे कसे महिनोन्महिने प्रवास “मॅनेज” करतात याचे अप्रूप वाटे. पण आता त्यातली गंमत हळूहळू कळू लागली आहे; त्याहीपेक्षा आवडू लागली आहे. असाच एक जर्मनीतला बॅगपॅकर ‘लिओ’ या प्रवासात कुठल्याश्या कोनाडातल्या खेड्यात भेटला. जर्मनीतल्या एका प्रतिष्ठित विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्समध्ये मास्टर्स करणारा आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा हा विशीतला पठ्ठया एका सेमिस्टरचा ब्रेक घेऊन “इंग्रजी शिकण्याच्या बहाण्याने भारतात” आलेला. गाठीला फ्रीलांसिन्गच्या प्रोजेक्ट्स मधून कमावलेले पुरतील एवढेच पैसे. दिवसाचे निश्चित ७०० रुपये बजेट, मग त्यासाठी कुठेही राहण्याची आणि काहीही खाण्याची तयारी. वाट नेईल तसा पुढचा प्रवास.

IMG_20181229_062743
with Leo & Shridhar

जुजबी गणित मांडले तरी १८० दिवस गुणिले ७०० रुपये म्हणजे फक्त सव्वा लाख रुपये; आयुष्यभर पुराणाऱ्या अनुभवासाठी? महाग आहे का? त्याच्यामानाने आम्ही ‘पैशाने’ फार श्रीमंतीत रहात होतो; प्रत्येकी साधारण १५०० रुपये प्रत्येक दिवसाला. लिओ सारखीच गोष्ट ६ महिन्यांच्या सिबॅटीकल सुट्टीवर देश-विदेश भटकून त्याच कोनाडातल्या खेड्यात भेटलेल्या बंगलोरच्या श्रीधरची. कदाचित तीच गोष्ट हाताचे पैसे सांभाळत अजून किती दिवस फिरायला मिळेल याचा हिशोब सांगणाऱ्या इस्राईलच्या नितांत सुंदर नितसांची. गोष्टी सारख्याच पण अनुभवांचं गाठोडं प्रत्येकाचं आपल्या सोबत. स्वतःला जमेल झेपेल तेवढं.

कामाच्या व्यापात डिसेम्बरचा दुसरा आठवडा उजाडला तरी तिकिटांव्यतिरिक्त तयारी काहीच नव्हती. शेवटी सौनी थोडा कडक पवित्र घेऊन फोनवरून आडवाटांना राहायची जुजबी व्यवस्था केली. या फोनाफोनीचा फायदा पुढे बराच झाला. कसा ? ते पुढच्या भागात. क्रमश:

मोहक ईशान्य-पूर्व – भाग-२ : कोलकातावारी

img_20181223_060830शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसातून घरी आल्यावर जमेल तशी सॅक भरून आम्ही कोलकात्याला जाणारे विमान पकडायला धावलो. कोलकाता म्हणजे मुंबापुरीची अगदी जुळी बहीण. वास्तु-रचनेत दिसणाऱ्या ब्रिटिश काळाच्या समांतर खुणा, तोच गजबजलेपणा, तशीच लगबगीनं धावणारी माणस, एकाच रंगाच्या टॅक्सी, हुबळी नदीकीनारी असल्याने थोडासा दमटपणा, मोहरीच्या मसाल्यात बनवलेल्या माशाचा दर्प, पार्क-स्ट्रीट सारखी उच्चभ्रू वस्ती आणि अगदी क्रॉफर्ड मार्केट-भेंडीबाजार सारखा बकालपणासुद्धा तसाच. कोलकाताचा थांबा जेमतेम २३-२४ तासाचा, त्यामुळे राहण्यासाठी स्वतात-मस्त आणि पायी-फिरायला सोयीचे पडेल असे हॉटेल पार्कस्ट्रीट भागातल्या प्रसिद्ध फ्लरी’स बेकारीच्या समोरच्या गल्लीत, गूगल मॅप वर आधीच पाहून ठेवलेले. कोलकाताला पोहोचेपर्यंत जरी रात्रीचे २ वाजले, तरी ओला-उबरच्या सोयीमुळे हॉटेलात पोहोचायला फारसा त्रास झाला नाही. पण रात्री २:३० ला रिकाम्या रस्त्यावर सिग्नल पाळणारी आमची टॅक्सी आणि अन्य पेपर-दुधाचे टेम्पो पाहून, सिग्नल पाहिल्यावर रंग-आंधळे होणाऱ्या आम्हा पुणेकरांना थोडे अवघडल्यासारखे वाटले. img_20181222_104906

दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यालगत जुगाडांतून बनवलेल्या कोळशाच्या भट्टीवर कुल्हडचा चहा घेऊन, नाश्ता करण्यासाठी फ्लरी’सकडे निघालो. img_20181222_113509वाटेत अनेक जुन्या पुस्तकांचे स्टॉल्स आणि परदेशात सर्रास दिसणाऱ्या स्ट्रीट-परफॉर्मर्स सारखी आपली कला सादर करणारे विविध कलाकार दिसले. थोडी स्ट्रीट-फोटोग्राफी झाली. फ्लरी’सला अगदी सकाळी ९.३० ला सुद्धा वेटिंगची रांग मिळाल्याने नाश्ता, दुपारच्या जेवणाच्या हिशोबानेच झाला. ‘इंग्लिश-ब्रेकफास्ट’ किंवा आम्ही केलेला ‘ब्रंच’ हि ब्रिटिश सोडून गेलेल्या गोष्टींपैकी नक्कीच img_20181222_123524-1img_20181222_120256 एक चांगली गोष्ट, यामुळे अगदी संध्याकाळपर्यंत काही खायची गरज पडली नाही. पोटोबा झाल्यानंतर पावणे दोनशे वर्षे जुने, गॉथिक शैलीत बनवलेले सेंट पॉल कॅथेड्रल पाहून व्हिक्टोरिया मेमोरियल आणि संग्रहालयाकडे पावले वळवली. img_20181222_133803
img_20181222_134642 हिरव्यागार पार्कस्ट्रीट मैदान परिसरातून चालताना दक्षिण मुंबईमधल्या आझाद-ओव्हल मैदानांची आठवण आली. भारतातल्या काही सुंदर वास्तूंमध्ये गणना होत असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियल परिसरात ब्रिटिश राजवटीच्या अनेक खुणा पहायला मिळतात. इतिहासाची आवड असल्याने तास-दोन तास ते सर्व पहाण्यात सहज निघून गेले. पण img_20181222_141716img_20181222_152240त्यात लक्षात ठेवण्यासारख्या दोन गोष्टी दिसल्या, त्या म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस यांची जेम्स वेल्स यांनी काढलेली मूळ पोर्ट्रेटस.

क्रिकेटचा फॅन असल्याने कोलकात्याला गेल्यावर बाहेरून का होईना भारतातील क्रिकेटचे नंदनवन, ईडन-गार्डन स्टेडियम पाहण्याची फार इच्छा होती, त्यामुळे व्हिक्टोरिया मेमोरियलच्या दारात पिवळी टॅक्सी पकडुन ईडन-गार्डन स्टेडियमला चक्कर मारून जवळच्या ट्राम स्टेशनला  उतरलो. पण ट्राम्सचा सध्या असलेला अवतार आणि गती यामुळे ट्राम सफारीचा प्लॅन गुंडाळून टॅक्सिनेच संध्याकाळच्या चहासाठी हुबळी नदीकिनारचे मिलेनियम पार्क गाठले. येथे गोव्याप्रमाणे नाच-गाण्यासोबत बोटीतून नदीची सफर करता येते पण वेळेचे गणित जुळले पाहिजे. हिवाळा असल्याने ४:३० ला सूर्य परतीच्या मार्गावर होता. शहराचा गजबजाट पाठीशी ठेऊन, कातरवेलेला हावडा ब्रिजवरील लुकलुकणार्या दिव्यांखालून मंदपणे वाहणाऱ्या हुबळी काठी शांतपणे चहा पिण्याची मजा वेगळीच. img_20181222_171456

There is always a harmony in chaos, but you need to soak the chaos to detach the harmony.  – ©omkardhulap

हुबळी नदीवर असलेला प्रसिद्ध हावडा ब्रिज आणि सध्यामध्येच बांधलेला विद्यासागर सेतू (केबल सस्पेन्शन ब्रिज) img_20181223_061219कोलकात्याला हावड्यासोबत जोडतात. २५०-300 रुपयांमध्ये एक टॅक्सी चालकाला पटवून, दोन्ही ब्रिजची सफर करून पुन्हा हॉटेलात आलो. एव्हाना फक्त ६.३० वाजलेले तरी बऱ्यापैकी अंधारून आलेलं, त्यात सुरु झालेली थंडी आणि सकाळपासून बाहेर भटकत असल्याने थोडं फ्रेश होऊन, गरम कपडे घेऊन पुन्हा खाद्ययात्रेला बाहेर पडलो. ख्रिसमसच्या दिवसांत पार्कस्ट्रीट भागाला अगदी जत्रेचे स्वरूप येते. गणपतीच्या दिवसात पुण्याच्या पेठांमध्ये किंवा मुंबईला लालबाग-img_20181222_192244परळला दिसतो तसा काहीसा माहोल. रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई, फूटपाथवर नानाविविध कला सादर करणारे कलाकार, ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, img_20181222_204720जवळच्या उद्यानात चालू असलेला पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम आणि या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारे लोक. दुर्गापूजे व्यतिरिक्त img_20181222_203703कोलकात्याला भेट देण्यासाठी कदाचित हाच काळ योग्य असावा. रस्त्यालगत नावही माहित नसलेली वेगवेगळी बंगाली मिठाई, नूडल्स सूप, भाज्या आणि चिकन एकत्र करून बनवलेले व्हिएतनामी खाद्यपदार्थ, कोलकात्याचा प्रसिद्ध काठी रोल, आईस्क्रीम एवढेसगळे यथेच्छ हादडल्यावर कलकत्ता मीठा पान चघळत रात्री हॉटेलवर परत आलो ते पुढच्या मुख्य प्रवासाला निघण्यासाठी. मेघालयाला जाण्यासाठी…

img_20181223_060553पहाटे ३ ला टॅक्सी ड्रायव्हरचा पत्ता विचारण्यासाठी फोन आला. आम्ही पुन्हा तेच बिनकामाचे सिग्नल पाळत रिकाम्या रस्त्यावरून पहाटे ५.३० चे गुवाहाटीला जाणारे विमान पकडण्यासाठी कोलकाता विमानतळाकडे निघालो. गुवाहाटी ते शिलॉंग प्रवासासाठी पवनहंस हेलिकॉप्टरची सोय आहे पण रविवार असल्याने ती बंद होती. राज्य परिवहनाच्या बसेसचा काही भरोसा नसल्याने गुवाहाटी विमानतळाच्या टॅक्सी स्टॅन्ड मध्ये थोडी घासाघीस करून टॅक्सी ने शिलॉंगच्या दिशेने निघालो.

ईशान्येकडून दक्षिणेकडे हिमालयाला कापत बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात वसलेल्या गुवाहाटीमध्ये खूप पाणथळ जागा आहेत. याच्या अगदी उलट शिलॉंग, पूर्णपणे डोंगरात वसलेले शहर. शिलॉंगची उंची ५००० फुटांपेक्षा जास्त, त्यामुळे गुवाहाटी ते शिलॉंग महामार्ग संपूर्णपणे घाटरस्ता. जसे शिलाँग जवळ येऊ img_20181223_145633लागते तसा निसर्ग आणि तपमान बदलासोबत मुखत्वे करून माणसांच्या दिसण्यामध्ये होणार बदल सहज लक्षात येतो. दुपारी साधारण २-३ ला खचाखच गर्दीने भरलेल्या पोलीस बाजारला टॅक्सी सोडून पायी हॉटेलकडे निघालो. स्वस्तातली रूम वेळेत रिकामी न झाल्यामुळे अधिक चांगली रूम कमी किमतीत मिळाली. हॉटेल ऑनलाईन बुक न करून फिरण्याचा अजून एक फायदा. कडाक्याच्या थंडीमुळे संध्याकाळी अमृतुल्यच्या img_20181223_152123२ फेऱ्या झाल्यावर क्षीण घालवण्यासाठी जवळच असलेल्या वॉर्ड्स लेकला चक्कर मारण्यासाठी निघालो. चारही बाजूनी हिरव्यागार डोंगरांच्या खोबणीत वसलेला जलाशय. शिलॉंगला “स्कॉटलंड ऑफ img_20181223_214901

ईस्ट” का म्हणतात त्याचे उत्तर देणारा परिसर.  सूर्यास्तापर्यंत निवांत वेळ काढून खरेदीसाठी शिलॉंग मार्केटकडे मोर्चा वळवला. दुपारी रस्त्यात दिसलेल्य्या पोलीस बाजार परिसरातील कपड्याची दुकाने पाहून, सौनी या बाजारात यायचा हट्ट न केला असता तरच नवल. त्यात प्रथमेशला देखील कानटोपी वैगैरे घ्यायची होती त्यामुळे “बाजार भेट” बहुमतात होती. हरतऱ्हेचे फॅशनेबल कपडे कमी किमतीत मिळत होते, पण बॅगपॅकिंग टूर असल्याने सोबतचे सामान मोजकेच होते त्यामुळे थोड्याफार खरेदीनंतर माझी सुटका झाली. img_20181223_215718सकाळपासून प्रवासामुळे व्यवस्थित खाणेपिणे झालेले नव्हते त्याचे उट्टे काढण्यासाठी पोलीस बाजार भागातल्या चांगल्या हॉटेलात चायनीज जेवणावर आडवा हात मारून राहायच्या ठीकाणी परतलो.

पुढे जायचे ठिकाण होते तळ दिसणाऱ्या निळ्याशार नदीचे गाव, दावकी.

img_20181225_100245

मोहक ईशान्य-पूर्व – भाग-3 : निळंशार डावकी

दुसऱ्या दिवशी पहाटे 1-2 °C तापमान होते. हॉटेलात नाष्टा आटपून जुना बाजारच्या दिशेने निघालो. हाड गोठवणारी थंडी असल्याने तोंडातून वाफा निघत होत्या. रस्त्याला चढ-उतार असल्याने जुना बाजारला पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक झाली. थोडी घासाघीस करून प्रति माणशी १०० दराने एका जुनाट जीपमध्ये बसलो. जीप फार जुनाट आणि ड्रायव्हरसुद्धा जख्खड दिसत असल्याने जीप भरण्यास खूप वेळ जात होता. आमच्या सारखे तीन परप्रांतीय जीप मध्ये बसलेले पाहिल्यावर अजून एक उत्तर भारतीय कुटुंब जीपमध्ये बसण्यास तयार झाले. त्यांच्या सोबत २ लहान मुलं होती. शेवटी बराच वेळ जाऊनसुद्धा गिऱ्हाईक येत नाही म्हटल्यावर ड्रायव्हरने गाडी काढली. अंतर जवळपास ८० किलोमीटर, पण डोंगराळ भाग असल्याने आणि अधे-मध्ये पॅसेंजरची चढ-ऊतर करत डावकिला जाण्यासाठी साडे तीन – चार तास लागले. वाटेत सकाळच्या कोवळ्या उन्हात गवतावर गोठलेले दवबिंदू हिर्यांसारखे चमकत होते. शिलॉंगपेक्षा डावकिचीची उंची बर्‍यापैकी कमी आहे त्यामुळे येईल संपूर्ण रस्ता घाट मार्ग. वाटेत जयंतीया टेकड्यांचे मस्त दर्शन होते.

Dawaki River

दुपारी साधारण बाराच्या सुमारास दावकीला पोहोचलो. डावकी नदीच्या काठावर वसलेले गाव. भारत-बांगलादेश बॉर्डर पोस्ट असल्याने आर्मीचा खूप राबता, पण बॉर्डरचे गांभीर्य कमीच. मजा म्हणून भारतीय पर्यटक बांगलादेश हद्दीत जाऊन फोटो काढून येतात. निळयाशार दावकि नदीमुळे, पर्यटकांची खच्चून गर्दी. पण आम्हाला दावकीला राहायचे नसल्यामुळे बाजारात त्यातल्या त्यात एका बर्‍या हॉटेलात थोडेसे खाऊन आम्ही नदीकिनार्याकडे निघालो. एव्हाना डोक्यावर आलेल्या सूर्यकिरणांनी नदीचा तळ उजळून टाकलेला. इथे पुन्हा थोडी घासाघीस करून एका स्वस्त बोटीतून आम्ही नदीच्या वरच्या अंगाला छोटी सैर केली. परदेशातील पर्यटन स्थळांच्या तोडीस-तोड जागा पण बेशिस्त पर्यटक आणि प्राथमिक पर्यटन सुविधांचा अभाव त्यामुळे डावकितून लवकर निघण्याचे ठरवले.

खुपसाऱ्या पर्यटकांची मेघालय वारी दावकितून माघारी फिरते, पण आमचा त्या दिवशीचा मुक्काम दावकी नदीच्या पलीकडच्या तीरावर, वरच्या अंगाला असलेल्या Shnongpdeng या गावी करायचे ठरले होते. अंतर अवघे 8 किलोमीटर पण विरुद्ध दिशेला असल्याने कोणी टॅक्सीवाला येण्यास तयार होईना. एक पोरसवदा टॅक्सीवाला तयार झाला, जॉन, वय जेमतेम 18. पुढे फार किस्से केले या नमुन्याने. नवीकोरी मारुती झेन टॅक्सी, पण हिंदी किंवा इंग्रजी बोलण्याची अडचण. त्यामुळे ‘आयेगा’, ‘जायेगा’ आणि ‘अंक’ या मर्यादित शब्दात आमचे बोलणे झाले. डावकी नदीच्या काठाने डोंगराच्या कडेवरुन आमचा प्रवास सुरु झाला. रस्ता अगदी खराब आणि निमुळता, जेमतेम एक छोटी गाडी जाईल एवढाच. एका बाजूला सरळ दावाकी नदीपात्रात उतरणारा कडा आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. वाटेत दरांग नावाचे गाव लागले, हावभावावरून जॉन त्याच गावचा राहणारा हे समजले. Shnongpdeng ला आमची राहण्याची सोय जोनाथन नावाच्या एका माणसाने फोनवरून केलेली. पण एवढे आड वाटचे खेडे असल्याने आणि फोनला जेमतेम रेंज असल्याने परतण्यासाठी काही साधन मिळेल की नाही याची चिंता होती. अचानक आजूबाजूची झाडी कमी झाली आणि रस्ता थोडा रुंद होऊन संपला. रस्ता जरी संपलेला असला तरी जाणवले की आम्ही अजून बऱ्यापैकी उंचीवर आहोत आणि नदी खूप खाली आहे. ड्रायव्हर जॉनने आम्हाला गाडीतून उतरण्याचा इशारा केला आणि Shnongpdeng आल्याची खूण केली.काही माणसांसोबत पहिल्या भेटीतच सूर जुळतात तसा काहीसा अनुभव. सदैव हसतमुख आणि आम्हाला पर्यटकांपेक्षा घरच्या पाहुण्यासारखी वागणूक देणारा, जोनाथन. आम्ही वाट चुकून नये म्हणून हातची काम सोडून दोन तास रस्त्यावर वाट बघत बसलेला आणि गाडीतून उतरताच स्वतःहून पुढे येऊन ओळख करून देणारा. इंग्रजीची समज जेमतेम पण संवादात अजिबात अडचण जाणवली नाही. टॅक्सी परत जाण्याआधीच जोनाथनला आमची परतीच्या प्रवासाची अडचण सांगितली. जोनाथनने ड्रायव्हर जॉनला त्यांच्याच बोलीभाषेत, आम्हाला कधी आणि कुठे परत न्यायचे ते समजावले. जॉन सोबत भाषेची अडचण आणि स्वभावात स्थिरता नसल्याने तो परत येईल याची शंका आमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली; तेव्हा जॉन आला नाही तर मी तुमची दावकीपर्यंत परतीची व्यवस्था करीन हा विश्वास देऊन जोनाथन आम्हाला घेऊन गावाकडे निघाला.

Shnongpdeng या गावाबद्दल लिहावे तेवढे थोडे. भारताच्या नकाशावर सापडणार पण नाही एवढेसे गाव. पण डोंगर उतारावरून दूरवरचे गाव पाहिले आणि क्षणात प्रेमात पडलो. जोनाथनला अजून एक दिवस राहायला मिळू शकते का याची विचारणा केली. बुकींग नसल्याचा अजून एक फायदा मनमुराद कुठेही आणि कितीही दिवस राहण्याची मुभा.

Shnongpdeng

ख्रिसमसचे दिवस असल्याने कॅम्प साईट बहुतांशी रिकामी होती. रस्त्याच्या खाली डावकी नदीच्या काठावर वसलेले Shnongpdeng गाव. जेमतेम साठ-सत्तर घरं, टुमदार चर्च , प्राथमिक शाळा आणि फुटबॉल ग्राउंड. दावकी नदीचे खडकाळ पात्र रुंद पण डिसेंबरचा महिना असल्याने पाण्याचा प्रवाह खूप कमी झालेला. जोनाथनकडून समजले की हीच नदी पावसाळ्यामध्ये तीस चाळीस फूट उंचीवरून वाहते. बाजूच्या खडकांवर पाण्याच्या पातळीच्या खुणा आणि केबल सस्पेन्शन ब्रिजची उंची पाहून त्यात तथ्य असावे हेही जाणवले. याच ठिकाणी नदीवर पावसाळ्यासाठी केबल सस्पेन्शन ब्रिज ची सोय आहे पण तो खूप उंचीवर असल्याने दैनंदिन वापरासाठी गावातील लोक बांबू पासून बनवलेला कमी उंचीचा ब्रिज दरवर्षी नदीवर बांधतात. नदीच्या दोन्ही तीरांवर 2-3 कॅम्प साईट होत्या. गावाकडच्या बाजूची कॅम्प साईट ही गावाने सामुदायिकरित्या चालवलेली Community Managed Campsite होती. प्रत्येकाच्या कामाच्या वेळा सर्वसंमतीने ठरलेल्या. कामाचे स्वरुप सुद्धा सर्वसंमतीने ठरलेले ज्यात नदीपात्रात कॅम्प-साईट सेटअप करण्यापासून ते पर्यटकांना कयाकिंग, स्नोरकेलींग, क्लिफ जम्पिंग, बोट राईड सारख्या खेळांमध्ये मार्गदर्शन करण्यापर्यंत. कॅम्प-साईटवर पूर्ण गावचा मालकी हक्क आणि कॅम्प मधून मिळणारा निधी गावाच्या विकासासाठी. बाकी डोंगरउतारावर प्रत्येकाची सुपारीची स्वतंत्र शेती. नदीच्या पलीकडच्या तीरावर खाजगी कॅम्प साईट होत्या, ज्यात एक होती जोनाथन आणि त्याच्या परिवाराची. आधी सांगितल्याप्रमाणे, मेघालयात मातृसत्ताक समाज पद्धती असल्याने गावातली सर्व महत्त्वाची पदे महिलांकडे आणि वारसा हक्काने मिळणारी वडिलोपार्जित मिळकत सुद्धा घरातील मुलींना मिळते. अजून अविवाहित असल्याने जोनाथन त्याच्या बहिणी सोबत कॅम्प साईट चालवत होता. एव्हाना दुपारचे अडीच-तीन वाजलेले, पण सूर्यास्त लवकर होत असल्याने आम्ही तंबूमध्ये सामान टाकून बोटीतून फिरण्यासाठी निघालो. Shnongpdeng दोन डोंगरांच्या बेचक्यात असल्याने अंधार लवकर पडतो; त्यात दावकी नदी वरच्या अंगाला बर्‍यापैकी खोल होते. व्हर्टिगोचा थोडा त्रास असल्याने, 100-80 फूट नितळ पाण्याखाली दिसणारे बोल्डर पाहून थोडे अस्वस्थ वाटले. पण परतीच्या प्रवासात संध्याकाळची शांत वेळ, जोनाथन सोबत चाललेल्या गप्पा आणि शिळ वाजवत मासे पकडणारे २-३ गावकरी पाहून दिवसभरच्या प्रवासाचा क्षीण मिटला. त्या रात्री आमच्या व्यतिरिक्त नदीपलीकडच्या तीरावरील कॅम्प साईट मध्ये कोणी पर्यटक नव्हते, त्यामुळे रात्रीला जेवताना सोबत म्हणून जोनाथन आणि ख्रिसमसनिमित्त शिलाँग वरून आलेल्या त्याच्या बहिणीं आल्या.

Shnongpdeng ला अजून एक दिवस राहणार असल्याने, दुसऱ्या दिवशी काय करता येईल याची चर्चा झाली. Mawlynnong, आशियातील सर्वात स्वच्छ खेडे आणि झाडांच्या जिवंत मुळांपासून विणलेला living root bridge बघण्यासाठी जाण्याचे ठरले. पण जाणार कसे? कारण आमच्याकडे ठरवलेली गाडी नव्हती. उपाय, दुसऱ्या दिवशी आम्हाला नेण्यासाठी जॉन येणार असल्याने, ठरलेल्या ठिकाणा ऐवजी, त्याच्यासोबत वरील दोन ठिकाणे पाहून पुन्हा परत यावे आणि जॉनला तिसऱ्या दिवशी थोड लवकर पुढल्या मुक्कामी नेण्यास सांगणे. भाषेची प्रचंड अडचण असल्याने एवढं त्रांगड गणित जॉनला समजावणार कसं हा एक प्रश्न होता. त्यात ख्रिसमसचा दिवस असल्याने जोनाथन काही मदत करू शकणार नव्हता. उद्याचं उद्या बघायचं ठरवून झोपलो. कॅम्प पूर्ण रिकामा असल्याने आम्ही नदी जवळचां एक मोठा टेन्ट पकडला. रात्रीच्या शांततेत नदी अलीकडच्या तीरावरील चर्चमधून मिडनाईट मास, क्रिसमस कॅरल आणि घंटानाद व्यवस्थित ऐकू येत होता. सकाळी लवकर उठलो पण मेघालय भारतीय प्रमाण वेळेच्या बर्‍यापैकी पुढे असल्याने सकाळी ६ वाजता देखील १० -११ वाजल्यासारखा सूर्यप्रकाश होता. नदीकिनारी उन्हात मस्त नाश्ता वगैरे उरकून कॅम्प साईट च्या आसपास फोटोग्राफी केली. नाश्ता करताना नदी पलीकडच्या तीरावर लक्ष दिले तर दिसले की गावातली भरपूर लहान मुले कम्युनिटी मॅनेज कॅम्प साईट साफ करत आहेत. “Community” या संकल्पनेची व्याख्या किती वेगळी आणि सक्षम असू शकते याची जाणीव झाली. सकाळी थोडा वेळ असल्याने काया-किंग आणि स्नॉर्कलिंग केले. जोनाथनने या दोन्ही गोष्टी नवीनच विकत आणलेल्या आणि तोदेखील ट्रायल साठी कोणीतरी शोधत होता. त्यावर आमचे आयतेच फावले. मनसोक्त काया-किंग आणि स्नॉर्कलिंग साठी कोणतेही पैसे मोजावे लागले नाहीत.

मजा झाल्यावर आवरून पटापट सॅक भरली आणि महत्वाच्या समाचा पिठू घेऊन जॉनची वाट बघायला रस्त्यावर येऊन उभे राहिलो. जॉन आल्यावर तोडक्या-मोडक्या संभाषणाने आणि खुणांनी त्याला आमचा बदललेला प्लॅन समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याकामी साधारण पास झालो आहे असे वाटल्यावर निघालो. Shnongpdeng ते Mawlynnong अंतर जेमतेम 40 किलोमीटर पण संपूर्ण घाटरस्ता असल्याने जाण्यासाठी दोन तास लागले. जॉन ‘ज्या’ पद्धतीने गाडी चालवत होता त्यामुळे मला झोप लागणे शक्यच नव्हते. पण पाठीमागच्या सीटवर प्रथमेश आणि गायत्री घोडे विकून झोपलेले. मेघालयाला मारुती स्टेट का म्हणतात? त्याचे उत्तर मला त्यादिवशी मिळाले. भारतात, मारुती कंपनीच्या सर्वात जास्त गाड्या मेघालयामध्ये आहेत. खराब – लहान रस्ते, दुर्मिळ सधनता त्यामुळे छोट्या आणि भारतीय वातावरणाला साजेशा गाड्या घेण्याकडे लोकांचा कल. या प्रवासात मला आसाम मधून आलेल्या गाड्यांव्यतिरिक्त दिसलेल्या सर्व गाड्या मारुती कंपनीच्या होत्या. मुळात या भागातली सर्वच खेडी सुंदर आणि टापटीप, लहानांना स्वच्छतेचे बाळकडू मिळत असण्याचा हा परिणाम. Shnongpdeng ला राहत असल्यामुळे Mawlynnong थोडे अतिशयोक्तीक वाटले.

Bangladesh View-Point Bamboo Machan

वाटेत एका ठिकाणी 60 ते 70 फूट उंच बांबूच्या मचाणावरून बांगलादेश व्हू पॉईंट बनवलेला. एकतर बाजूला असलेल्या दाट झाडीमुळे काही दिसत नव्हते, त्यात आवाज करणाऱ्या आणि हलणाऱ्या त्या बांबूच्या मचाणावर फार काळ थांबवले नाही. living root bridge ला देखील खूप गर्दी होती त्यामुळे तिकडून सुद्धा लवकर निघालो. लवकर निघण्याचं एक वेगळ कारण पण होतं. पण त्याआधी जॉनला पुढच्या मुक्कामाचं ठिकाण समजल आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि सकाळी येण्याची वेळ घड्याळ दाखवून वदवून घेतली.

संध्याकाळी फक्त आम्हाला Shnongpdeng चर्चमध्ये खास आमंत्रण होतं. आमच्यासाठी गावातल्या सर्व लहान मुला मुलींनी मिळून क्रिसमस कॅरल गाउन दाखवल्या. त्या साठ सत्तर घरांच्या गावात लहान मुला-मुलींची संख्या लक्षणीय होती. गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळीं सोबत गावातल्या प्रत्येक घरासमोर चॉकलेट किंवा इतर खाऊ जमा करण्यासाठी फिरून आलो. त्या दिवशी रात्री कॅम्प मध्ये बेंगलोर वरून आलेल्या देहरादूनच्या तीन मुली भेटल्या. त्या लक्षात राहण्याचे कारण, त्यांनी सोबत आणलेल्या ट्रॉली बॅग्स. नदी पात्रातल्या लाकडी ब्रिज वरून ट्रॉली बॅग घेऊ शकत नसल्याने त्यांना भर अंधारात केबल सस्पेन्शन ब्रिज वरून नदी पार करावी लागली होती. जेवणानंतर कॅम्प फायर पेटवून आम्हा सर्वांचा शहरी गप्पांचा फड जमला. त्यादिवशी शेजारच्या कॅम्पमध्ये देखील एक बँड ग्रुप आलेला असल्याने jamming session सुरू होत. एकंदरीत टीव्हीवर दिसणार्या कॅम्प-ग्राउंड सारखे चित्र होतं आणि Shnongpdeng गावातील दिवे आज जरा दूर लुकलुकत होते.

Goodbye Shnongpdeng

सकाळी लवकर आटपून निघालो पण Shnongpdeng मधून पाय निघत नव्हता. शेवटी जोनाथन चा निरोप घेऊन Shnongpdeng ला परत भेट देण्याची गाठ मनाशी बांधत रस्त्याच्या दिशेने निघालो. ठरल्याप्रमाणे आणि आमच्या नशिबाने जॉन वेळेवर गाडी घेऊन आला. गाडीत सामान भरून आम्ही पुढच्या मुक्कामी, चेरापूंजीला जाण्यासाठी निघालो.

एकंदरीत जॉनची गाडी चालवण्याची पद्धत माहीत असल्यामुळे आणि जाण्याचे ठिकाण त्याला कितपत समजले आहे याची शंका असल्यामुळे मला गाडीत झोप लागली नाही. पण नेहमीप्रमाणे प्रथमेश आणि गायत्रीची थोड्याच वेळात विकेट पडली. Shnongpdeng ते चेरापुंजी हे अंतर साधारण 115 किलोमीटर आहे. परतीच्या शिलॉंग रस्त्यावरच अर्ध्यात डावीकडे फाटा आहे. येताना जीप वाल्याने तो फाटा आधीच दाखवून ठेवला होता. त्यामुळे जॉनने तो फाटा चुकल्यावर मनात शंका आली, लागलीच गाडी बाजूला घेण्यास सांगून खाणाखुणांनी आपण कुठे चाललोय हे परत विचारले. थांबलेली गाडी आणि आमचा तोडका मोडका संवाद त्यामुळे मागच्या सीटवर बसलेले प्रथमेश आणि गायत्री पण उठले. चेरापुंजीला खांसी भाषेमध्ये सोहरा म्हणतात. सोहरा आणि शिलॉंग मध्ये गफलत केली हे समजल्यावर जॉन कडून “भुल गया” हे उत्तर ऐकून मी कपाळावर हात मारायचां बाकी होतो. झोपलो नाही म्हणून वेळेची खोटी आणि प्रवासाचा फुकट भुर्दंड वाचला. लगताच्याच फाट्यावरून सोहराचा रस्ता धरला.

भाग-4 : रखरखीत सोहारा

चेरापुंजी किंवा स्थानिक भाषेतलं सोहारा. लहानपणापासून जगात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख. जास्त पाऊस म्हणजे मनात चेरापुंजीच हिरवागार चित्र, लहानपणापासून कोरलेल. पण टॅक्सीमधून उतरलो आणि डोळ्यांवर विश्वास बसेना. सर्वत्र रखरखाट नावाला एक झाड जवळपास नाही. खिडकीतून डोकावून जॉनला पुन्हा विचारले, नक्की हे सोहराच आहे ना? पण तेवढ्यात आम्हाला हवी असलेली चौकातली पाटी दिसली; लोअर सोहरां. चेरापुंजी चुनखडीच्या दोन विस्तीर्ण पाठरांवर वसलेलं आहे. डोंगरांच्या उंचीनुसार अप्पर आणि लोअर सोहारां. वर्षानुवर्षे प्रचंड पाऊस सोसून माती संपूर्णपणे वाहून गेलेली आणि शेवटी खाली उरलेला चुनखडक. गावात शेती नाही की झाडं नाहीत. चुनखडकात पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते त्यामुळे पावसाळा संपला की रखरखाट. अगदी टँकरने पाणीपुरवठा होतो. पण हे पावसाचे पाणी वर्षानुवर्षे वाहून आसपासच्या चुनखडीच्या दगडांमध्ये प्रचंड मोठ्या आकाराच्या गुहा तयार झाल्या आहेत. त्यातल्या काही मोठ्या आणि सुरक्षित गुहा पर्यटकांना पायी पाहता येतात. बाकी बऱ्याच गुहा पर्यटकांसाठी अपरिचित, स्थानिकांच्या सहभागाने, केव्ह एक्सपीडिशन सारख्या खेळांना या भागात प्रचंड वाव आहे. जी जंगल- झाडी आहे ती सर्व दऱ्यांमध्ये. उघडेबोडके डोंगर आणि घनदाट दऱ्या, असे चेरापुंजी.

लोअर सोहाराला हवामान खात्याचे डॉपलर रडार आहे; त्याला अगदी लागून आमचे होस्टेल होते. टॅक्सीतून उतरून हॉस्टेल शोधताना एक म्हातारा माणूस जुनी मारुती ८०० पार्किंगमध्ये लावताना दिसला, हे जॉन पॉल काका. सुरुवातीच्या हस्तांदोलन आणि जुजबी बोलण्यात ते आमच्या होस्टेलचे मालक आहेत असे समजले. वास्तविक हा ६५ -७० वर्षाचा माणूस शिलांगला बायकोच्या घरी राहतो. लग्नानंतर नवर्याने बायकोच्या घरी राहणे ही इथली सामान्य रीत. घरचा मोठा पोल्ट्रीचा व्यवसाय, काही हॉटेल्सचा पसारा आणि चेरापुंजी हे माहेर. गायत्रीने फोन वरून होस्टेल बुक करताना आम्ही मुंबईहून येणार आहोत, सोबत गाडी नाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतोय हे समजल्यावर जॉन पॉल काका स्वतः शिलॉंगवरून 50-60 किमी गाडी चालवत आम्हाला भेटायला आले.

काकांनी, आमचा फिरण्याचा कार्यक्रम विचारला आणि होस्टेलच्या एका खोलीत सामान टाकून जवळच्या हॉटेलात पटकन जेवून येण्याची सूचना केली. लोअर सोहराच्या मुख्य चौकात उघडी असलेली दोन तीन हॉटेल्स आणि सरकारी कार्यालयात चालणारी काही दुकाने सोडल्यास पूर्ण सामसूम. रस्त्यावरून क्वचित एखादी आसाम नंबरची गाडी जात-येत होती.

रस्त्यावर कोणतेही वाहन दिसत नसल्याने, फिरण्याची काय व्यवस्था करावी ह्या विचारात होतोच पण तो प्रश्न जॉन पॉल काकांनी सोडायला. जेऊन आल्यावर, “चला मी तुम्हाला सोहरा फिरवतो, गाडीत बसा”, असे सांगून काका पार्किंग मधली मारुती ८०० बाहेर काढायला गेले. पैशाची काही बोलणी नाही. आम्हाला सर्वज्ञात असलेली तीन-चार ठिकाणे फिरायची होती; त्या हिशोबाने आम्ही आपआपसांत खाणा-खुणांनी काकांना साधारण किती पैसे द्यायचे ते ठरवले आणि त्यांच्या गाडीतून निघालो. काका, चाळीस-पन्नासच्या वेगात, रस्त्यावरील ओळखीच्यांना हात करत, आमच्याशी गप्पा मारत, वेगात जाणाऱ्याला जागा देत, गावातल्या जागा दाखवत एकदम आरामात गाडी चालवत होते. सूर्यास्त लवकर होत असल्याने सर्व ठिकाण पाहून होतील की नाही याची आम्हाला चिंता, पण काका निवांत. सुरुवातीला चेरापुंजीचा प्रसिद्ध सेव्हन-सिस्टर्स वॉटरफॉल पाहून आम्ही एका आड रस्त्यानं निघालो. कित्येक किलोमीटर बाजूने एकही गाडी गेली नाही. सोबत नवीन माणूस असल्याने मनात थोडी धाकधुक. थोड्यावेळाने एका घाटात गाडी थांबवत, काकांनी रस्त्याशेजारी असलेल्या लाकडी पायर्‍यांवरुन खाली दरीत उतरायला सांगितले. डोंगर कड्यावर बांबू बांधून केलेल्या निसरड्या पायऱ्या. अर्धा पाऊण तासाचा ट्रेक त्यामुळे ते स्वतः आले नाहीत. पण आम्हाला, पर्यटकांना अपरिचित धबधबा बघायला मिळाला. तांबूस रंगाच्या चुनखडीवर निळ्याशार डोहातून ओसंडून वाहणार पाणी, शेवाळ्याची हिरवी-पिवळसर झाक, आजूबाजूला गच्च झाडी. वॉलपेपर्स किंवा कॅलेंडर पाहिलेल्या धबधब्यासारखे दृश्य. खुप फोटो काढले आणि परत निघालो.

छोटा ट्रेक आणि पावसाळी वातावरणामुळे चहाची तलफ लागलेली. ती लवकरच क्षमली. पुढचा थांबा नोहकलिकाई धबधबा. थोडेफार पर्यटक असल्याने चहापाण्याची दुकाने होती. पुढे आम्ही निघालो दोन गुहा बघण्यासाठी मौसमाय आणि आर्वाह. एका वेळेला काही हजार माणसं मावतील एवढ्या मोठ्या आकाराच्या आणि अजून पूर्ण उत्खनन न झालेल्या. गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आणि जीवाश्म बघायला मिळातात. पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने गुहांमध्ये दिवाबत्तीची सोय आणि बाहेर प्राथमिक पर्यटन सुविधा आहेत. अशा प्रकारचे पर्यटन स्थळ माझ्या माहितीत भारतामध्ये एकमेव असावे.

Mawsmai Cave

काकांचा परिचय दांडगा. प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरून येईपर्यंत पार्किंग मध्ये समवयस्क मित्र-मैत्रिणी जमवून गप्पा रंगलेल्या. एव्हाना अंधार आणि थंडी पडायला सुरुवात झालेली, पण काकांनी एक शेवटचे ठिकाण पहाण्यासाठी जाऊ म्हणून गळ घातली. काळ्याकुट्ट अंधारात साधारण अर्धा-पाउण तास प्रवास करून आम्ही एका स्मशानासमोर येऊन थांबलो. खासी लोकांमध्ये अंतिम विधी झाल्यानंतर त्याजागी मोठी सलग शिळा (मोनोलिथ) उभी केली जाते. स्मशानात अशा अनेक शिळा जवळ-जवळ उभारलेल्या दिसतात. या भागात अशा काही मोनोलिथ पार्कना पर्यटक दिवसा भेटी देतात; पण रात्रीच्या अंधारात काही तासांपूर्वी भेटलेला माणूस तुम्हाला अशा निर्मनुष्य ठिकाणी फिरायला घेऊन जाणं थोडं विचित्र आहे. काकांनी गाडी थांबून हेड लाईट बंद केले आणि आम्हाला गाडीतून उतरून पायी एका बाजूच्या शिळांपलीकडे जाण्यास सांगितले. त्या बाजूने आकाश थोडे उजळलेले होते. पण आमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून त्यांनी गाडी आणि हेडलाईट पुन्हा चालू केले आणि चला आपण जाऊ म्हणून स्वतः गाडीतून खाली उतरले. शिळा पार करून काहीशे फूट अंतर गेल्यावर लक्षात आले की आम्ही एका कड्यावर आहोत, खालून नदी वाहते आणि समोर बांगलादेशाचा क्षितिजापर्यंत दिसणारा सपाट मैदानी प्रदेश. समोर काही शहर-खेड्यांचे असंख्य लुकलुकणारे दिवे दिसत होते. रात्री विमानाच्या खिडकीतून खाली दिसते तसे खूप सुंदर दृश्य. हे काकांचं कॉलेजच्या दिवसात मित्रमंडळी सोबत दारू पीण्याचं ठिकाण. मघाशी कट्ट्यावर जमलेल्या मित्रमंडळी पैकी कोणीतरी ही सुपीक कल्पना काकांना सुचवलेली. स्थानिक लोकांसोबत फिरण्याचा फायदा. संध्याकाळी साधारण जेवण्याच्या वेळेपर्यंत आम्ही हॉस्टेलला परतलो. काहीही ठरलेले नसल्याने काकांना शब्दांआडून फिरवण्याचे किती पैसे झाले विचारले, पण यावर उत्तर मिळले ते पूर्ण अनपेक्षित..

“Money ? It was a Christmas gift from me.” 

भाग-५ : शेवटचा टप्पा

From left John Paul, Paul Jr., Omkar, Paul Sr., Prathamesh, Gayatri

सोहराच्या हॉस्टेलमध्ये रात्री जेवण झाल्यावर जॉन पॉल काकांच्या आणखीन दोन सहकाऱ्यांची ओळख झाली पॉल ज्युनिअर आणि पॉल सीनियर. कोणीही कोणाचे नातेवाईक नव्हते, फक्त उंची आणि कदाचित वयातील फरकामुळे ज्युनिअर किंवा सिनियर. एकंदरीत या पॉल त्रयीला पाहून चेरापुंजी मध्ये नावांचा दुष्काळ पडल्यासारखे वाटले. जॉन पॉल काकांनी पुढचा प्रवास ठरवण्यात खूप मदत केली. दुसऱ्या दिवशी या संपूर्ण ट्रिपचा शेवटचा टप्पा सुरू झाला. चेरापुंजीच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट दऱ्यांमध्ये फिरण्याचा.

न लागणारे सामान हॉस्टेलवर ठेवून, दोन दिवसाचे मोजके सामान छोट्या पिठूमध्ये भरले. लोअर सोहरामधून सकाळी साडेआठला मेघालय स्टेट ट्रान्सपोर्टची बस जाते. कड्यावरच्या सर्व गावांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव पर्याय. तिकीट निव्वळ दहा रुपये. त्यामुळे माणसं, फळ, भाज्या, दूध, मांस, पत्र, पेपर सर्व याच बसमधून. बस कितीही भरलेली असली तरी जागा सर्वांना. कपड्यांवरून जरा “पावणे” दिसत असल्याने बसमध्ये चढल्या चढल्या कंडक्टरने प्रथमेशला ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ढकलले. ड्रायव्हरचे केबिन पूर्णपणे रेडमीटने भरलेले. पण पर्याय नसल्याने नेहमी सोवळ्यात वावरणारा प्रथमेश त्या ढिगावर जाऊन बसला. ड्रायव्हर केबिनमध्ये एकच जागा त्यामुळे मी आणि गायत्री दरवाज्यापाशीच उभे राहिलो. प्रवास साधारण तासाभराचा पण खांसि लोकजीवनाचे रंग जवळून दाखवणारा. याच प्रवासात, मेघालय वारीचा वृत्तान्त लिहिण्याची खुणगांठ बांधली.

तेरणा गावापाशी बस सोडली. पुढचा पूर्ण प्रवास पायी. रस्त्याची थोडी चौकशी करून गावातल्या घरांशेजारून मार्ग काढत खाली दरीत उतरायला सुरुवात केली. तीव्र उतार, सिमेंटच्या काँक्रिटच्या, कमी रुंदीच्या तीन-साडेतीन हजार पायऱ्या. आम्हाला Nongriat या गावातला डबल रूट ब्रिज पाहून, पुढे रेनबो धबधबा बघून मिंटिंग नावाच्या खेड्यात राहण्यास जायचे होते. गुगल मॅपवर पायवाटा दिसत नाहीत आणि दऱ्यांमध्ये मोबाईलचे नेटवर्क नाही त्यामुळे संपूर्ण ट्रेक करताना हाताने कागदावर काढलेल्या कामचलाऊ नकाशावर पूर्ण भिस्त.

ट्रेक तसा कठीण श्रेणीतील. सुरवातीच्या पायऱयांमुळे काही हजार फूट उंची दीड – दोन तासात कमी होते आणि तापमान अगदी एक आकड्यावरून १०-१५ अंशांनी वाढते; त्यामुळे पाणी पिण्यावर लक्ष नसेल तर डी-हायड्रेशन मुळे स्नायू मध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता अधिक. नेमका हाच त्रास मला आणि गायत्रीला झाला. तरी वेळेसोबत स्पर्धा करत आम्ही रेनाबो वॉटर फॉल पाहून Nongriat मध्ये दाखल झालो. पुढे मिंटिंग चा रस्ता साधारण चाळीस मिनिटांचा पण सुर्यास्ताला काही मिनिटेच शिल्लक असल्याने डबल रूट ब्रिजपाशी अजिबात न थांबता पुढे निघालो. जंगलातल्या दरी मधली अनोळखी पायवाट आणि जेमतेम प्रकाश, पण आमच्या नशिबाने एक जर्मन जोडप मीटिंग कडेच निघाले होते. Nongriat मध्ये काही दिवस राहिल्याने त्यांना जवळच्या परिसरातल्या पायवाटा परिचयाच्या होत्या. त्यामुळे आम्ही थोडे निर्धास्त होऊन त्यांच्या मागे निघालो. वाटेत मनरेगाच्या कुठल्याशा योजनेवर काम करणाऱ्या काही बायका दिसल्या. त्यांच्यासोबतच्या बोलण्यात, आम्ही फोनवरून बुक केलेले होम-स्टे त्यातल्याच एका बाईचे असल्याचे समजले. तिने आम्हाला तिच्या घराचा साधारण रस्ता समजावून पुढे जाण्यास सांगितले. गावात जाण्या-येण्यास त्या जंगलातल्या पायवाटेखेरीज दुसरा पर्याय नाही पण गावात वीज पोहोचलेली.

मीटिंग गावापासून साधारण नजरेच्या टप्प्यात, भर जंगलात उंचावर बांधलेल्या तीन लाकडी खोल्या. दोन खोल्यात राहण्याची सोय आणि एकामध्ये स्वयंपाकघर. आंघोळ बाथरुमची सोय बाहेर. बाजूला झर्यातून वळवलेले २४ तास वाहते पाणी. थोडीशी मोकळी जागा आणि उघड्यावर डायनिंग. सगळं अगदी साधं जेवढ्यास तेवढं. पण या रात्री खरी रंगत आणली ती लिओ आणि श्रीधरने. (मोहक ईशान्य-पूर्व – भाग-१ : प्लॅनिंग) प्रचंड गप्पा आणि हेवा वाटावा असे त्यांचे प्रवासाचे किस्से ऐकत पत्त्याचे नवे-नवे डाव रंगले. सकाळी सर्वांचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.

आदल्या दिवशीचा क्षीण आणि पुन्हा साडेतीन हजार पायर्‍यांची खडी चढाई. पण वेळेला एका पावलाचाच विचार करत पुन्हा तेरणा गावात येऊन पोहोचलो. दिवसातून एकदाच बसची सोय असल्याने आधी ठरल्याप्रमाणे पॉल जुनियर आम्हाला सोहराला घेऊन जाण्यासाठी हजर होता.

हॉस्टेलला पोहोचेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ उलटून गेलेली पण संध्याकाळच्या चहाऐवजी मस्त जेवण केले. कदाचित प्रचंड थकवा आणि भूक यामुळे त्या दिवशीचे जेवण या पूर्ण प्रवासातले सर्वात उत्कृष्ट जेवण वाटले. त्यादिवशी सोहराच्या पाणी टंचाईचा अनुभव आला. होस्टेलमध्ये पाण्याचा टँकर आलेला नसल्याने थोडी गैरसोय झाली, पण एकंदरीत संपूर्ण प्रवासाचा क्षीण आलेला असल्याने संध्याकाळी सहालाच ट्रेकच्या अवतारातच सर्वजण झोपून गेलो.

पुढच्या दिवशी जॉन पॉल काका अजून राहण्याचा आग्रह करत होते. त्यांना आम्हाला अजून काही अपरिचित ठिकाणे दाखवायची होती. पण आता परतीचे वेध लागलेले असल्याने काकांचा निरोप घेऊन जूनियर पॉलच्या टॅक्सिने शिलाँगकडे निघालो. वाटेत पॉल जूनियरसोबत दिलखुलास गप्पा मारत, बांगलादेशची जन्मकथा सांगणारे वायुदलाचे संग्रहालय, एलिफंट वॉटरफॉल आणि शिलाँग व्हू पॉइंट पाहून शिलॉंग मधल्या लैतमुख्रा भागातल्या हॉटेलात येऊन पोहोचलो. लैतमुख्रा भागातले कॅफे प्रसिध्द आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताला बाजार अधिक छान सजलेला. त्यात दीड एक आठवड्यांनी आम्हाला निवांत संध्याकाळ मिळाली असल्याने चांगल्या हॉटेलात जेवण झाले. थोडाफार श्रमपरिहार. पुढचा दिवस मेघालय आणि एकंदर ईशान्य- पूर्वे मधला शेवटचा दिवस. सकाळी शिलाँग मार्केट परिसरातून गुहावटी विमानतळासाठी टॅक्सी बुक केली, पण वाटेत गुवाहाटी स्थित आसाम राज्य संग्रहालय आणि कामाख्या मंदिर दाखवण्याच्या अटीवर. जाताजाता जमेल तेवढे गुवाहाटी पण बघण्याचा प्रयत्न.

रेल्वे आणि विमान वाहतूकीमुळे गुवाहाटी, ईशान्य -पूर्वेतील महत्वाचे मोठे शहर त्यात नवीन वर्षातील पहिला आठवड्याचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी होती. आम्ही सुद्धा याच गर्दीचा भाग होत संध्याकाळी धावत-पळत विमानतळावर पोहोचलो…

– ओंकार धुळप

https://omkardhulap.wordpress.com/2020/11/26/travel-northeast-5/




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...