Saturday, June 12, 2021

मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स अमेरीका

 बरेच दिवस घरातील सर्वांनाच कुठेतरी बाहेर जायचं होतं, कुठं ते नक्की ठरत नव्हतं. जुनच्या दुस-या/तिस-या आठवड्यापासुन इथं अमेरीकेत शाळांना सुट्ट्या लागतात, या वर्षी ४ जुलै अमेरीकेचा स्वातंत्र्यदिन शुक्रवारीच आला त्यामुळे बहुतेक कार्यालयांना एक सुट्टी मिळतेच, या सुट्टीचं विशेष म्हणजे हा दिवस ज्या दिवशी येईल त्याच दिवशी सुट्टी दिली जाते. बाकी सगळ्या सुट्ट्या या आठवड्याच्या अधेमधे आल्या तरी सोमवारी नाहीतर शुक्रवारी दिल्या जातात, उद्देश हा की लोकांना सलग ३ दिवसांचा मोठा विकांत मिळावा. त्यामुळे महीनाभर आधी प्लॅनिंग सुरु झाले आणि मिशिगन राज्यात इतकी वर्षे राहुन दरवेळेस मॅकीनॉ आयलंड (Mackinac दुसरा c चा उच्चार silent आहे) अजुन बघितलं नसल्याची खंत उफाळुन बाहेर आली. याच ठिकाणावर बहुमत झालं आणि हॉटलचे बुकींग एकदाचे झाले. तिकडे जास्त खाण्यापिण्याची विविधता किंवा पर्याय नाही हे मित्रमंडळींकडुन ऐकलं होतं त्यामुळे घरातुनच मेथीचे पराठे-चटणी-दही, तिखटमिठाच्या पु-या, आणि दुकानातुन गोळ्या, चिक्की, शेव असं काहीतरी तोंड हलवायला बरोबर बांधुन आम्ही गपपती बाप्पा मोरया करत निघालो.

मॅकीनॉ आयलंड हे हुरॉन (lake Huron) नावाच्या तळ्यावर वसलेलं आहे, हे तळं इतक मोठं आहे की त्याला समुद्रच म्हणता येईल. खाली नकाशात A जिथे दिसतयं ते मॅकीनॉ आयलंड आहे आणि उजवीकडे आहे ते हुरॉन तळं. मिशिगन राज्याची ऊत्तरकडेची बाजु ग्रेट लेक्स या नावाने ओळखली जाते कारण ती तीन मोठ्या तळ्यांनी वेढलेली आहे.

*

या बेटाचे वैशिष्ठ्य असे की या बेटावर १८९८ पासुन मोटर गाड्यांना परवानगी नाही. एका जागेहुन दुसरीकडे जायला साधने फक्त सायकल, घोडागाडी, लहान मुलांची बाबागाडी (stroller) आणि चक्क पायी चालणे. अपंग लोकांच्या व्हीलचेअर, आणि अँब्युलन्स, अग्निशामक दलाच्या गाड्या यांना अर्थातच परवानगी आहे. बेटावरपण एक मोठं हॉटेल आहे, आता सुट्टीमुळे सगळीकडचेच दर जास्त होते. हे ग्रॅन्ड हॉटेल प्रसिद्द तर आहेच आणि यावर हा सिनेमा पण आला होता. परत लेकव्ह्यु, सुट्ट्या वगैरे वगैरे मुळे खिशाला भोक नाही भगदाडच पडायचं त्यामुळे आम्ही दुसरीकडे हॉटेल बुक केले. आमच्या घरापासुन जवळपास पाच तास आम्हाला लागले मॅकीनॉ सिटीत पोचायला. हे शहर बेटाच्या अलिकडे आहे तिथे एका हॉटेलात उतरलो, बॅगा टाकल्या, हॉटेलच्या समोरच झाडांखाली पिकनिकसाठी बाकं (बेंचेस) होती, तिथेच मस्तपैकी जेवण केले.
बेटावर जाणारी बोट पकडण्यासाठी फेअरी स्टॅण्डवर ५-७ मिनिटे चालतच गेलो. बरेच हॉटेल्स शटलची सोयही ठेवतात की जी तुम्हाला फेअरी स्टॅण्डवर नेते पण आम्ही सगळे कारमध्ये बसुन कंटाळलोच होतो आणि हे फारसे लांबही नव्हते. बोटीचे तिकीट काढुन ५-१० मिनिटातच नंबर लागुन बोटीत चढलोसुद्धा, सुट्टी असल्याने सगळीकडे गर्दी जाणवत होती. काही लोकांनी त्यांच्या सायकली पण बोटीत चढवल्या या खरतरं तासावर बेटावर भाड्याने पण मिळतात. पण बरेच लोक त्यांच्या कारच्या मागे, टपावर चढवुन आणत होते, यासाठी बोटीवर वेगळे भाडं पण भरावं लागतं मला त्यांच्या या सगळ्या खटाटोपीचं कौतुक वाटलं. बेटावर सगळ्या गोष्टी महाग आहे हेही कारण असेल आणि कदाचित काही लोकांच्या खास प्रकारच्या सायकली असतात त्यावर त्यांचा जीव असावा असे दुहेरी कारण असावे. दिवस एकदम छान होता, मस्त ऊन पडलं होतं, बोटीला दोन मजले होते, आम्ही लगेच वरच्या मजल्यावर बसुन घेतलं की जिथुन पाण्याचा नजारा नीट दिसेल. बोटीत बसल्यावर आता सगळीकडे जाणवत होती ती पाण्याची आणि आकाशाची निळाई! जणुकाही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती मी तुझ्यापेक्षा अधिक निळा आहे याची.

बा.भ. बोरकरांची ही कविता आठवलीच, (माफ करा पण पूर्ण कविता देण्याचा मोह आवरत नाही).
एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा
दूर डोंगरातला एक जरा, त्याच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा, एक मखमली निळा
इंद्र निळा, त्याला एक गोड, राजबिंडा निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
असे नानागुणी निळे, किती सांगू त्यांचे लळे
ज्यांच्यामुळे नित्य नवे घडे, तुझे माझे डोळे
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
अशा कालिंदीच्या काठी, एक इंदिवर निळा
आपणही होऊ निळ्या, करू त्याच्याशी रंग संग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे, रंग खेळतो श्रीरंग

*

बोटीने लांबुनच मॅकीनॉ पुलाचेपण दर्शन दिले.
*

१५ मिनिटात बोट मॅकीनॉ आयलंडला पोचली सुद्दा आणि हा प्रवास इतका लवकर का संपला असा प्रश्न पडला.

बेटावर पोचल्यावर लगेच डाउनटाउन लागतं तिथ बरीचं दुकानं आहेत, खुपशी सायकली भाड्याने घेण्यासाठी आणि जो इथला प्रसिद्ध चॉकलेट फज (Fudge) मिळतो त्याची आहेत, आम्हाला कुणाला फज फारसा आवडत नाही कारण जास्त गोड आणि एकदम मऊ वाटतो, शेवटी पसंद अपनी अपनी, कोण रे ते म्हणतयं गाढवाला गुळाची...
*.*

मग सगळ्यांनी मस्तपैकी आईसक्रिम घेतले, माझ्या लहान मुलाने (वयवर्षे जेमतेम ३) सांगुन टाकले त्याला आईसक्रिम अज्जिबात आवडलं नाही...कारण ते खूपच गार होतं :). तरीही स्ट्रॉबेरीच्या गुलाबी आणि पिस्ता आईसक्रिमच्या पिस्ता रंगाला भुलुन त्याने अर्धेमुर्धे खाल्लेच. तिथेच कॅरमल पॉपकॉर्नपण मिळत होते तेही घेतले बरोबर न्यायला.

*

अजुनही बरेच वेगवेगळ्या रंगाचे पॉपकॉर्न होते ते बघायला छान वाटत होते.

*

वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली ज्या भाड्याने मिळतात. यात छोट्या मुलाची सायकल वडीलांच्या सायकलशी जोडलेली आहे आणि आईच्या मागच्या बग्गीसारख्या गाडीत छोटे बाळही आहे, त्याला वरुन जाड जाळीचा पडदाही असतो.

*

घोडागाडीची रपेट मारता येते, पण गेल्यागेल्या मी पाहीलं, फक्त दोनच घोडे तगडे असले तरी काय झालं जवळजवळ २०-२५ लोकांना एका चढावर घेऊन चालले होते, माझ्याच पोटात ढवळल्यासारखं झालं आणि ही रपेट नकोच असं वाटलं.

*

गावात एक चक्कर मारुन आल्यावर एका छोट्या टेकडीवर लोक चटई टाकुन निवांत बसले होते, कोणी झोपले होते, आईसक्रिम न आवडणा-यानेपण तासभर झोपुन घेतलं. आम्हीही जरावेळ बसुन तो निवांतपणा अनुभवला. पूर्ण बेटाच्या कडेकडेने चालायला एक वेगळा फुटपाथ आणि सायकली आणि घोडागाडी यांना मुख्य रस्ता आहे म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी एक जरी केलं तरी तुम्हाला बहुतेक सर्व बाजुच्या पाण्याचं दर्शन होतं.

*

नंतर बीचकडे गेलो, इथे पोहायला बंदी होती, फक्त कडेला जाऊन बघु शकता, आणि कितीही वेळ बसु शकता. तिथे बरेच लहान खडे होते त्यात खुपश्या मुलांचा आणि मोठ्यांचाही खेळ चालु होता. मागे परत काही बेंचेस होते आम्ही आता इथेच थांबायचे ठरवले कारण सात वाजले होते आणि ४ जुलैची फटाक्यांची आतषबाजी (फायरवर्क्स) बघायची होतीच. ही एकच अशी मोकळी जागा दिसली जिथे नीट दिसेल. पाण्याचा आवाज फार सुखावह होता, लाटा एकावर एक येत होत्या. इथे दोन बाजुने लाटा आलेल्या लक्षात आल्या, कधीकधी त्यांचा काटकोन होउन जायचा, त्याचा फोटो नीट आलाच नाही.
आम्ही संध्याकाळचं जेवणही तिथेच पिझा/बर्गर एका छोट्या हॉटेलातुन आणुन घेतलं सध्या इथे उन्हाळा असल्याने सुर्यास्त रात्री नऊ-सव्वानऊच्या सुमारास होतो. छान संध्याकाळ होती तरी आता वेध लागले होते ते फायरवर्क्सचे! त्यासाठी जरातरी अंधार पाहीजे, आमच्या आजुबाजुला आता भरपुर गर्दी झाली होती, लोकांनी सगळे बेंचेस भरुन गेले होते, लोक चटई, ब्लॅकेंट्स टाकुन गप्पा मारत होते, खात होते, पित होते. मुलं इकडंतिकडं बागडत होती, काहींकडे फुलबाज्या होत्या. मधेच एकदा एक छोटी मिरवणुक मागच्या रस्त्यावरुन गेली त्यात सैन्यात असलेले काही लोक होते त्यांनी दोन्ही बाजुने अमेरीकेचा मोठा झेंडा आडवा धरला होता आणि त्यांच्यामागे अग्निशामक दलाचा ट्रक हळुहळु येत होता. ब-याच लोकांनी उभं राहुन टाळ्या, शिट्या वाजवुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दहा वाजुन गेले तसा आमच्यातला ब-याचजणांचा धीर सुटु लागला, शेवटची बोट अकरा वाजता सुटणार होती, माझ्या सासुबाईपण आमच्याबरोबर होत्या त्यांना टेंशन होते की इतक्या लोकांना पुरेल इतक्या बोटी नसतील तर आपल्याला परत जायला जागा मिळेल काय? मी मात्र अजुन पाच मिनिटं वाट बघु करुन थांबवुन ठेवत होते कारण इतका वेळ वाट बघुन गेल्यावर नंतर तेच लक्षात राहील, नशिब यावेळेस नव-याचही हेच मत असावं. शेवटी निर्णायक सांगितलं साडेदहाला नाही झाले सुरु तर आपण जाऊया परत, आणि १०:२८ ला धाड धाड धाड आवाज आला, पहील्या काही सेंकदातच डोळ्यांच पारणं फिटलं, माझी लेकही म्हणाली बरं झालो थांबलो इट वॉज वर्थ वेंटींग!

*
*

ही आतषबाजी बघताना मला फक्त तेच आवडतं असं नाही तर ते सगळं वातावरणच छान असतं, इतक्या गर्दीने लोकं रात्रीची उशिरापर्यंत बाहेर असणं, उन्हाळाच्या मुलांना सुट्ट्या त्यामुळे नकळत एक ताण सैल झालेला असतो, दुर्मिळीने मिळणारी दिवसभराची गरम हवा किंवा अशा रात्री किंचीतच असणारी थंडी, लोकांनी लपेटुन घेतलेली ब्लॅकेंटस, आणि एक एक आतषबाजी बघतानाचे निघणारे आ$$$ असे कोरस उद़्गार, सगळचं विलोभनीय. दहा मिनिटे हे बघुन समाधानाने आम्ही बोटीच्या दिशेने निघालो अजुन थोडावेळ आतषबाजी चालु रहाणार होती, पण बोटीवर चढायला फार लांब रांगेत उभं रहायला नको या हेतुने आम्ही निघालो.

रात्रीचे पाणी निळे दिसले नाही तरी तेही देखणे होते आणि पुलही दिमाखपणे उभा होता.

*

बोटीने फेअरी स्टेशनवर सोडल्यावर आम्ही चालतच हॉटेलकडे निघालो. सगळेच दमले होते, रुमवर गेल्यावर कपडे बदलुन सगळेजणच झोपेच्या अधीन झाले उद्या ताहकीमेननचे धबधबे आणि पिक्चर्ड रॉक्स कसे असतील याची स्वप्नं बघत.
तळ टीपा:
१. यातले निळ्या पाण्याचे आणि आतषबाजीचे फोटो आम्ही काढले होते, इतर मी जालावरुन घेतले आहेत.
२. या लेखासाठी मधुरा देशपांडेने मला चांगल्या सूचना केल्या, माझ्या अनेक प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यामुळे औपचारीकता म्हणुन नाही तर कृतज्ञता व्यक्त करायची म्हणुन मी तिची खूप आभारी आहे.


दुस-या दिवशी सकाळी ऊठुन सगळ्यांनी आवरुन घेतले आणि हॉटेलच्या गेस्ट रुममध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो. बहुतेक हॉटेलचे चेकआऊट सकाळी ११ वाजता असते त्यामुळे आम्ही सकाळचे आवरुन झाल्यावर झाल्यावर लगेच हॉटेल सोडले, बॅगा कारमध्ये नेऊन टाकल्या. आणि थोडा वेळ मॅकीनॉ सिटी बघायला बाहेर पडलो. आजही हवा छान होती. शहरात अजुन छोटीछोटी दुकानं होती, जागोजागी फुलं लावुन बेंचेस ठेवले होते, कारंजी होती. मध्येच एका ठिकाणी मुलांना खेळायला छोटे पार्क होते आणि आपल्याकडे जत्रेत असतात तसे गोल फिरणारे घोडयांचे चक्र होतं, मग त्या माणसाला विचारले आता चालु आहे का म्हणुन कारण दहा वाजले तरी तिथे अजुन कोणीच नव्हते. तर तो म्हणाला हो बसवा ना मुलांना, त्याला पैसे दिले आणि पूर्ण चक्र फक्त २ मुलांसाठी चालु करुन दिलं. तेवढ्यात गमंत झाली मुलाला एक शटल दिसली आणि त्याला ती ट्रेनच वाटली म्हणुन मग आम्ही ती बघायला तिच्या मागे गेलो. ती पुढच्या चौकात थांबल्यावर मी ड्रायव्हरला विचारलं की तुमची बस/शटल अमुक अमुक हॉटेलच्या लोकांसाठी असेल ना? तर तो मुलांकडे बघुन म्हणाला तुम्हाला राईड पाहीजे का? मी हो म्हणाल्यावर तो म्हणाला तुम्हाला पाहीजे तिथे बसा मी पुढच्या सिग्नलला वळुन परत माझ्या हॉटेलकडे जाणार आहे पण तुम्हाला बसता येईल. मग मुलांनाच काय मलाही ती राईड घ्यायला खूप छान वाटलं, नंतर त्याला विचारलं की मी तिकीट म्हणुन काही पैसे देऊ का तर तो नको म्हणाला. फक्त त्याने विचारले तुम्ही कोठुन आलात, त्याला आमच्या गावाचं नाव सांगितलं तर त्याने फक्त खंत व्यक्त केली की मी ही त्या बाजुला होतो काही वर्षे आणि तिथल्यासारखं चायनीज इथं मिळत नाही. म्हटलं तर अगदी साधा प्रसंग तो नाहीही म्हणु शकला असता पण त्यान मुलांच मन जाणलं आणि एक आनंदाची आठवण आम्हाला दिली. असा अनुभव अमेरीकेत वारंवार येतो, लोकं ९५% वेळेस मदत करतात किंवा कोण करु शकेल तिकडे तरी पाठवतात, फक्त आपण पुढं होऊन विचारलं पाहीजे.

साधारण अशी शटल होती पण बरीच मोठी ३०-४० लोक बसु शकतील आणि एकदम हवेशीर.

*

यानंतर मात्र आम्ही कारकडे वळलो आणि प्रवास सुरु झाला ताहकीमेननचे धबधबे बघायला. ही जागा तशी फार लोकांना परिचीत नसावी. साधारण दीड-एक तास कारने पोचायला लागला. यामध्ये पण दोन धबधबे आहेत लोअर आणि अपर ताहकीमेनन. प्रथम लोअर फॉल्स बघितले, हे म्हणजे ५ छोटे छोटे मिळुन धबधबे तयार झाले होते. तिथुनच पुढे चार मैल कारने गेल्यावर अपर फॉल्स लागले. दोन्हीकडचे पाणी आधी गढुळ वाटले, पण तो खरतर सिडर नावाच्या झाडाचा/पानांचा अर्क मिसळल्याने झाले असावे, म्हणुन याला रुट बीअर फॉल्स असेही नाव पडले आहे. इथे भरपूर पाय-या उतरुन खाली जावे लागले आणि परत चढाव्या लागल्या त्यामुळे बरेच व्हीलचेअरवाले किंवा गुडघेदुघीने त्रस्त लोक वरतीच बसुन राहीले. हा थोडासा डोंगराळ भाग होता, त्यामुळे लिफ्टसारख्या अधुनिक सोयी इथे नव्हत्या, दुकानही एकच सुविनिअर शॉप कम आवश्यक गोष्टींचेच होते. बाहेरुन येताना फारशी वस्तीही नव्हती त्यामुळे हॉटेल/फास्ट फुड वगैरे काहीच दिसले नाही. बरोबर आणलेले पदार्थ आम्हाला आजही पुरले. राज्याच्या या बाजुला उत्तरेला थंडी अजुन जास्त असते, म्हणजे आता उन्हाळा चालु आहे तरी बाकी ठिकाणांपेक्षा थोडे गारच होते त्यामुळे आम्ही गरम कपडे बरोबर ठेवले होते. थंडीमध्ये हे धबधबे गोठतात आणि हौशी फोटोग्राफर, स्किइंग करणारे यासाठी येतच रहातात.

आहे की नाही रुट बीअर फॉल्स?

*

*

*

इथुन बाहेर पडुन मग लागलो पिक्चर्ड रॉक्सच्या रस्त्याला, परत दीड-एक तास कारचा प्रवास. इथे आणि वरती धबधब्याकडे जातानाही स्पीड लिमिट कमी होतं, त्यामुळे पोचायला जरा वेळ लागला. हा रस्ता आता अगदी एक लेनचा आणि वळणदार होता, दुतर्फा भरपूर झाडं होती, ती ठराविक अंतराने बदलत असल्याचेही लक्षात आले. पानगळतीच्या ॠतुमध्ये इथे पानांचे रंग फार मोहक असतात त्या वेळेस हा फार छान ड्राईव्ह असेल असे वाटुन गेले. खाली नकाशात A जिथे दिसतयं ते परत मॅकीनॉ आयलंड आहे, आणि दोन्ही तळ्यांची नावं आणि ज्या स्थळांना आज भेट देणार होतो ते दाखवले आहेत.

*

जेव्हा आम्ही पिक्चर्ड रॉक्सच्या ग्रॅन्ड मॅरीअस या शहरात आलो, कार लगेच हॉटेलमध्ये घेण्याऐवजी आम्हाला इथे जी क्रुज घ्यायची होती त्या कंपनीच्या ऑफीसात गेलो. एकुण प्रवासात फक्त या क्रुजचे बुकिंग आधी केले नव्हते कारण आम्ही आधीच्या तिन्ही ठिकाणी नक्की किती वेळ घालवणार, तिथे किती आवडेल व एक दिवस मुक्काम तिथे वाढवायला लागेल का, गर्दीचा किती परिणाम होईल या सगळ्याचाच अंदाज येत नव्हता. तर ऑफीसात गेल्यावर कळलं की आजच्या सगळ्या क्रुजची तिकीटे आधीच गेलीत. बरेच लोक तिथे मुक्काम करणार नव्हते त्यांना तसच परत जावं लागलं होतं. मग दुस-या दिवशीचं सकाळी दहाच तिकीट घेतलं आणि हॉटेलवर आलो. आता संध्याकाळ झालीच होती तिथे मस्त स्विमिंग पुल होता दोन-तीन घसरगुंड्यासहीत, मग काय मुलांना तेवढच हवं होतं त्यांनी मस्त पाण्यात डुंबुन घेतलं. नंतर जेवायला गेलो, इथेही विशेष पर्याय नव्हते, टिपीकल अमेरीकन जेवण (सॅलड, बर्गर, स्टेक, फिश). एक पिझा हट बघितल्याच मला आठवतं होतं पण नव-याने मला वेड्यात काढलं. म्हणे ७०-८० मैल मागे होतं तु झोपेत बघितलं असशील, दुस-या दिवशी क्रुज कंपनीच्या अर्ध्या मैलावर पिझा हट दिसल्यावर नवरे लोकांवर विश्वास ठेवायचा नाही अशी समज आली. :)
तिस-या दिवशी परत यापण हॉटेलने नाष्टा देऊन सुखद धक्का दिला, कारण त्यांच्या बेवसाईटवर ब्रेकफास्ट्वर काट मारली होती. म्हणून आम्ही बाहेर जाणार होतो पण तिथल्या स्वागतिकेने (receptionist) कल्पना दिल्याने परत वेळ वाचला. इथेही ११ वाजता चेक आऊट होते, म्हणून नऊ वाजता सगळं आवरुन क्रुज कंपनीच्या ऑफीसमध्ये अर्धा तास आधीच पोचलो.

या दिवशी मात्र गेले २ दिवस असलेलं छान ऊन गायब झालं होतं. रिमझिम पाऊस पडत होता, आदल्या दिवशीही पण नुसतेच २-४ थेंब पडुन सुर्याने परत दर्शन दिलं होतं. तर इथं कंपनीच्या ऑफीसात आल्यावर त्यांनी सांगितले की सध्या थंडरस्टॉर्मची सुचना हवामानखात्याने इश्यु केली आहे. थंडरस्टॉर्म म्हणजे मध्यम वादळ म्हणता येण्यासारखे ज्यात ब-यापैकी वारा, पाऊस, विजा यातलं काही किंवा सगळं येऊ शकतं. अर्ध्या तासात ती संपेल तेवढा वेळ थांबुनच बोटीला निघावं लागेल, जर परत दुसरी सुचना आली तर परत थांबाव लागेल. ही राईड चालु असतानाही सुचना आली तर मागे फिरावे लागु शकते कारण असा धोका त्यांना घेता येत नाही. तसे झाले तर प्रो-रेटा करुन सगळया प्रवाश्यांना तितके पैसे परत मिळतील. मग थोडावेळ कारमध्ये, त्यांच्या दुकानात असा वेळ काढला कारण पाऊस ब-यापैकी येत होता. बोटीच्या जवळ लोकांना सोडायला सुरवात केली होती, दुकानातच एका बास्केटमध्ये भरपूर छत्र्या ठेवलेल्या दिसल्या आणि लोक ते घेऊन जात होते. आधी आम्हाला वाटलं ते विकत घेत आहेत, कारण तिथे साधे रेनकोटपण विकायला होतो. पण त्या माणसाने सांगितले की आत्ता घेऊन जा आणि राईड संपल्यावर परत द्या ही एक गोष्ट फार उपयोगी ठरली, कारण पाऊस उघडण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते.

बोट सुरु व्हायच्या आधी कप्तानाने सांगितले की ज्या कोणाला परत जायचे असेल त्यांनी आत्ताच परत जावे आणि त्यांना तिकीटाचे १०० टक्के पैसे परत मिळतील. अजुन तरी पाऊस आणि वारा आहेच त्यामुळे मी आता तरी वरच्या मजल्यावर आणि मागच्या डेकवर कोणाला सोडु शकत नाही, जर का हवामान सुधारले तर परत नक्की सांगेन तुम्ही कधी बाहेर जाऊन बघु शकता. त्याने लाइफ जॅकेट्स कुठे आहेत तेही सांगितले.

*

पिक्चर्ड रॉक्स (Pictured Rocks) ही क्रुज जवळजवळ ३ तासाची आहे. हे नाव त्याला पडले आहे ते सुपिरीअर तळाच्या काठी १५ मैलांपर्यत असलेल्या मोठमोठ्या खडकांच्या रगांवरुन आणि त्यात दिसणा-या किंवा भास होणा-या चित्रांवरुन. हे खडक नैसर्गिक रीतीने असे झाले आहेत, खडकात असलेल्या जास्त खनिजांमुळे आणि वरुन पडणा-या पाण्यामुळे त्यांचे रंग वेगवेगळे दिसतात. जिथे जास्त लोह होतं तिथले खडक लाल, मॅंगेनिजमुळे काळे-पांढरे, तांब्यामुळे तांबुस-हिरवे. सुपिरीअर तळं हे जगातलं मोठं गोड्या पाण्याचं तळं आहे मागच्या भागातलं हुरॉन तळं ह्याचा तिसरा नंबर लागतो. सुपिरीअर जास्त खोलपण आहे, साधारण खोली ५०० ते १३०० फुटाच्या आसपास आहे, पाणी प्रचंड गार असते. आणि मला बोटीत बसल्यावर पहीले पाच-दहा मिनीटे यावर्षीच झालेला दक्षिण कोरीयातला अपघात आठवत राहीला आणि कप्तानाने सांगितलेल्या गोष्टी गंभीरपणे घ्यायची गरज जाणवली.
बोट अर्ध्या वाटेवर आल्यावर कप्तानाने बाहेर डेकवर आणि वरच्या मजल्यावर जायची परवानगी दिली, पाऊस अजुनही येतच होता, लोक छत्र्या आणि कॅमराची लेन्स सांभाळत फोटो काढुन घेत होते. गंमत म्हणजे येताना पाऊस पूर्ण थांबला आणि परत क्लिकक्लिकाट सुरु झाला. यापुढे वर्णन करणं माझ्या आवाक्याबाहेरच आहे, फोटोवरुन अंदाज यावा.

जाता जाता लागणा-या या छोट्या बेटावर मोजुन ४ घरे आहेत आणि पाचवे हे लाईटहाऊस कम चर्च आहे. हे लाईटहाऊस १८६८-१९१३ पर्यंत दीपस्तंभाचे काम करत होतं.

*.*

याच नाव (American) Indian Head
*

थोडा जवळुन
*

ह्या अधांतरी खडकाच्या मध्यभागी उंच झाड आहे.

*

सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान या घनदाट झाडांचा रंग लाल-पिवळा-केशरी मध्ये बदलत असणार.

*

यामध्ये हत्ती दिसला का?

*

तांबुस आणि हळदी रगांच्या छ्टा आणि उजव्या बाजुला अस्वलासारखे काहीतरी दिसत होते.

*

*

*

या फोटोत वरती काही लोक दिसत आहे तिकडुन चालत वरती जायला वेगळा रस्ता आहे, आम्ही वेळेअभावी आणि पावसामुळेही हे करु शकलो नाही. आणि खाली खडकामध्ये गुहा तयार झाल्यात.
*

*

खरतरं एका सोनेरी संध्याकाळी छान ऊनं पडली असताना हे खडक आणि त्यांचे रंग/आकार बघणं एखाद्या स्वप्नावत वाटावं, त्यातच पानगळतीच्या ॠतुमध्ये (fall season) जर खडकांच्या वरती असणा-या झाडांनी रंगांची उधळण केली असेल तर क्या केहने! पण काही गोष्टींवर आपलं काहीच नियंत्रण नसतं खास करुन निसर्गाच्याबाबतीत. तरी जेवढं पहायला मिळालं त्याने नक्कीच भरुन पावलो, नेहमीच्या रुटीन जगण्याला ह्या विविध रंगांनी आणि मॅकीनॉ आयलंडच्या निळाईने अगदी ताजेतवाने केले.

तळ टीपा:
१. बोटीचा आणि शटलचा फोटो जालावरुन घेतला आहे.
२. या लेखासाठी मधुरा देशपांडेने मला चांगल्या सूचना केल्या, माझ्या अनेक प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यामुळे औपचारीकता म्हणुन नाही तर कृतज्ञता व्यक्त करायची म्हणुन मी तिची खूप आभारी आहे.
३. शेवटचा फोटो पॅनॉरामीक रितीने घेतला होता, पण इथे कसा वाटतोय कळत नाही, कोणाला काही कल्पनेची आईडीया असल्यास कळवावे, आभारी असेन :)


नमस्कार मंडळी !

शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते !

आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore. ७ तास जायला न ७ तास परतीच्या प्रवासाला. तरीही शनिवार - रविवार मध्येच जाऊन यायचंच असा चंग बांधला. म्हणजे, चंग मी बांधला आणि तास-न-तास गाडी चालवण्याची जबाबदारी नवऱ्यावर सोपवून मोकळी झाले.

तर हे Pictured Rocks म्हणजे मिशिगनच्या पार वरच्या टोकाला. मिशिगनची भूमी दोन भागांत विभागली गेली आहे. मला 'peninsula' ला नेमका मराठी प्रतिशब्द माहित नाही. त्यामुळे मी 'Upper Peninsula' ला सरळ "वरचं मिशिगन" म्हणतेय. अमेरिकेच्या या दक्षिण-पूर्व भागात पाच (भले) मोठे तलाव आहेत. इतके मोठे की समुद्राचीच आठवण यावी. पण तरीही गोडं पाणी ... तर या पाच तलावांपैकी एक म्हणजे सुपेरीअर (बाकीचे चार - मिशिगन, एरी, ह्युरोन, ओंटारियो). याच सुपेरीअर तलावाच्या किनारी आहेत हे Pictured Rocks.

यापुढची "चित्तरकथा" ... चित्रांच्या सहाय्याने कथा ... म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात, तसंच काहिसं !

खालचं आणि वरचं मिशिगन जोडणारा - २००७ साली पन्नाशी गाठलेला हाच तो, मॅकिनाव ब्रिज.

जवळ जवळ सव्वा पाचशे फूट उंची आहे या ब्रिजची.

हे इथलं यूपी :)

इथून साधारण तीन तासांची बोटीची सफर होती. या अशा बोटीतून ...

"ग्रॅन्ड आयलन्ड" बेटावरचे जुने लाईट हाउस ...

पाण्यात कोसळलेले कडे

इन्द्रधनुसम रंगीबेरंगी

वेगवेगळ्या खनिजांचा हजारो वर्षांपासून दडलेला खजाना

निसर्गाची किमया - वारा आणि पाणी यांचा मारा सहन करत करत या दगडांनी काय काय म्हणून रूपे धारण केली आहेत बघा

याला नाव दिलं आहे "युद्धनौका"

याला म्हणतात "इंद्रधनूची गुहा"

आणि हा म्हणे "तुटलेला फ्लावरपॉट"

एकला जीव सदाशिव

"तग धरून राहणे" याच याहून चांगला उदाहरण कधी पाहिलंय का ?
या झाडाची मुळ अक्षरशः अधांतरी आहेत कारण त्यांना आधार देणारी कमान ४०/५० वर्षांपूर्वी 'पडली' पाण्यात ...

निळशार - हिरवगार पाणी

साधारण ७०/८० फूट उंचीवरून घेतलेली छायाचित्र

अथांग पसरलेला सुपेरीअर तलाव

याच बोटीवरून सफर घडली होती आम्हाला

हे सारं नैसर्गिक सौंदर्य आठवणींचा एक अनमोल खजिना देऊन गेलं.

या सहलीत सहज जाता येता टिपलेले क्षण ...

तुम्हा सर्वांना ही छायाचित्रे आवडतील अशी अपेक्षा करते !




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...