Saturday, June 12, 2021

ड्रेस्डेन - प्राग

 एखाद्या शहराला भेट द्यायची असं खूप डोक्यात असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जमत नाही. मग पुन्हा एप्रिल-मे महिन्यात लागून चार दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे कुठेतरी जाऊ शकतो असा विचार मनात येतो. मग दोघांनाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. हवामानाचे अंदाज घेत, हातातला वेळ आणि खर्च, आपल्याला काय बघायचं यावर चर्चा होतात. उन्हाळा सुरु होतोय, तेव्हा यावेळी शांत, रम्य अशा ठिकाणी जाऊया असे ठरते. पण नियोजन काहीच होत नाही. ऑफिस आणि इतर कामाच्या गडबडीत हे मागे पडते आणि म्हणता म्हणता सुट्ट्यांना अगदी एक आठवडा राहतो. आता आधी ठरवले होते त्या ठिकाणाची तिकिटे अशक्यप्राय महाग झालेली असतात. मग तुझ्यामुळेच ही पण सहल होणार नाहीये टाईप ची भांडणे होतात. भांडणाचे वादळ शांत झाले की मग हळूहळू पुन्हा कुठ जायचे ही मुख्य चर्चा सुरु होते आणि अचानक दोघांकडूनही या बरेच दिवसांपासून मनात असलेल्या एकाच शहरावर शिक्कामोर्तब होतं - ड्रेस्डेन. पूर्व जर्मनीतील सॅक्सोनी या राज्याची राजधानी. दुसऱ्या महायुद्धात अतिप्रचंड नुकसान सोसाव्या लागणाऱ्या शहरांपैकी एक प्रमुख शहर. आणि मग तिथपर्यंत जातोय तर एक दिवस जवळच असलेले अजून एक प्रसिद्ध शहर - प्राग. चेक रिपब्लिक या देशाची राजधानी. २ महिन्यांपासून रखडलेल्या सहलीचे बुकिंग अचानक एका रात्रीत मार्गी लागतात. बॅग्स भरून होतात आणि सहलीचा दिवस उजाडतो.

सुट्टी असल्याने जर्मनीकर सुस्तावले होते. या दिवसात युरोपात प्रामुख्याने दिसणारी रेपसीड ची पिवळी फुले आजूबाजूच्या शेतांमध्ये डोलत होती. जसे जसे पुढे जाऊ लागलो, तसतशी तशी ही पिवळी फुले अधिकाधिक दिसू लागली. सगळीकडे हिरवेगार डोंगर, त्या डोंगरांमध्ये मधूनच कुठूनतरी दिसणारे पिवळ्या फुलांचे गालिचे, त्याच्या जवळपास पन्नास शंभर घरांची लोकवस्ती असलेली टुमदार खेडी, खेड्याची ओळख म्हणून उंच दिसणारे चर्च, सगळीकडे दिसणाऱ्या पवनचक्क्या आणि निळे निरभ्र आकाश. या अवर्णनीय दृश्याने जरा मागे जावे तोवर एखादा छोटासा घाट. त्या वळणदार रस्त्यांवरून आजूबाजूला दोन मिनिटे फक्त डोंगर आणि शेवटचा वळसा घालून जेव्हा गाडी घाट संपण्याच्या वाटेवर येते, तेव्हा अचानक विस्तीर्ण अशी पिवळीधमक रेपसीडची शेते आणि त्यासोबतीला हिरव्या पिवळ्या रंगसंगतीने आच्छादलेले डोंगर आणि शेती. मुळातच सुंदर दिसणारी ही फुले शेजारच्या हिरव्या शेतांनी अजूनच खुलत होती. आजूबाजूच्या गावांमध्ये अजूनही विशेष वर्दळ दिसत नव्हती. या शांत वातावरणात उगीचच चर्च मधून घंटेचे सूर कानावर पडत आहेत असा भास होत होता. एकीकडे गाडीतल्या गाण्यांची साथ होती. मधूनच सुसाट वेगाने जाणाऱ्या पोर्शे, फरारी चा आवाज येत होता. गाडीच्या वेगामुळे चांगले फोटो काढणे शक्य नव्हते. तरीही शक्य तेवढे क्लिक्स सुरु होते.

https://lh3.googleusercontent.com/-go0G8CTxQtA/U6afkgmWy-I/AAAAAAAADCc/586UdKZiEyk/w866-h577-no/DSC_0010.JPG

https://lh6.googleusercontent.com/-_DEppbmrNFw/U6aflsGN4FI/AAAAAAAADCs/LpTKPlTr_g4/w866-h577-no/DSC_0018.JPG

https://lh6.googleusercontent.com/-QwGuNICnHUM/U6aflt7hknI/AAAAAAAADCo/hhm--5fjVYE/w866-h577-no/DSC_0023.JPG

https://lh5.googleusercontent.com/-cNZ6ji9h864/U6agEfTNLJI/AAAAAAAADDk/KwoWLK8sP_M/w866-h577-no/DSC_0324.JPG

https://lh6.googleusercontent.com/-Shc-7T8lNGk/U6agOSoCjHI/AAAAAAAADD8/VHZxHgvxHzw/w866-h577-no/DSC_0336.JPG

https://lh4.googleusercontent.com/-1yP5BMlaZMg/U6agRaj4kbI/AAAAAAAADEM/z1kZs01_Dj0/w866-h577-no/DSC_0345.JPG

सगळीकडे दिसणाऱ्या पवनचक्क्या
https://lh6.googleusercontent.com/-FLhJqMCYBiE/U6agQkiZpmI/AAAAAAAADEE/DBQD5EXm3Xc/w866-h577-no/DSC_0362.JPG

जसे राज्य बदलते तसे इतर काही भौगोलिक बदल जाणवू लागतात. जेव्हा सॅक्सोनीत शिरलो, तेव्हा पठारी प्रदेश जास्त दिसत होता. थोड्याच वेळात ड्रेसडेन च्या पाट्या दिसू लागल्या. हॉटेल वर जाऊन सामान टाकले आणि लगेच शहराकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. बसने अर्ध्या तासात ड्रेस्डेन च्या मध्यवर्ती स्थानकावर पोहोचलो.

महायुद्धाचे परिणाम जर्मनीतील अनेक शहरांना भोगावे लागले. परंतु ड्रेस्डेन हे त्यापैकी सर्वाधिक नुकसान झालेले शहर. येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर १९४५ साली झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. युद्धानंतर पुन्हा सगळे नव्याने बांधले गेले. पूर्व पश्चिम एकत्रीकरण होण्यापूर्वी पूर्व जर्मनीतील हे महत्वाचे स्थानक होते. २००२ साली आलेल्या पुराने पुन्हा एकदा या स्थानकाला हिसका दिला. त्यानंतर पुन्हा बांधकाम करण्यात आले. कुठल्या वर्षी कसे बांधकाम झाले, महायुद्धात काय नुकसान झाले आणि नुतनीकरण कसे होत गेले ही सगळी माहिती तपशीलवार लिहिलेले माहितीफलक इथे वाचायला मिळतात. पोटपूजा करता करता हे सगळे वाचून झाले. येथील स्थानक हे जर्मनीतील इतर स्थानकांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने बांधले गेले आहे. ड्रेस्डेन चे मुख्य स्थानक (आंतरजालावरून साभार)

https://lh5.googleusercontent.com/-7uyok6QPy8s/U6afcOxnCLI/AAAAAAAADCU/BycoyQeQAb8/w865-h577-no/1024px-Dresden-Germany-Main_station.jpg

इतरत्र न्याहाळत एक चक्कर मारली. आणि सिटी सेंटर ला जाण्यासाठी कुठली ट्राम आहे याची माहिती काढून पुढे निघालो. शहरातील इमारती आणि रचना यांचे बर्लिनशी थोडेफार साधर्म्य जाणवले. आजूबाजूच्या इमारती, खास युरोपियन पद्धतीची पण तरीही थोडासा स्वतःचा वेगळेपणा जपणारी घरे आणि विस्तीर्ण आणि सगळीकडे दिसणाऱ्या ऐतिहासिक वास्तू. आणि या सगळ्या वास्तूंवर सर्वत्र चढलेला काळा रंग. (इतिहासातील एका काळ्या पर्वाची आठवण सतत करून देणारा ?) प्रथमदर्शनी यामागे युद्धकाळात झालेले बॉम्बिंग कारणीभूत असावे असा माझा अंदाज होता. परंतु आंतरजालावर दिलेल्या माहितीप्रमाणे नैसर्गिक रित्याच या दगडी इमारती काळ्या पडल्या आहेत अशी माहिती मिळाली. कुठल्याही कारणाने असले तरीही ते नजरेला खुपत होते. पण मूळ इमारती मात्र सुंदर आहेत.

प्रमुख स्थळांपैकी फ्राऊएनकिर्श (Frauendkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च आणि ग्रीन व्होल्ट संग्रहालय (Green Vault) या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पुढचा एक दिवस राखीव होता. त्यामुळे इतर ठिकाणी जाण्यासाठी हा दिवस मोकळा होता. मध्यवर्ती भागात वसलेल्या या काही वास्तू.

https://lh3.googleusercontent.com/-xkr521egtGU/U6afu5qtjZI/AAAAAAAADC4/T018gf0P2M4/w385-h577-no/DSC_0030.JPG

https://lh6.googleusercontent.com/-SfaceQS4hyM/U6afuwsktpI/AAAAAAAADC8/pDlYAvOCEf0/w866-h577-no/DSC_0034.JPG

https://lh4.googleusercontent.com/-NlVnOoKNX9M/U6af7IStANI/AAAAAAAADDY/zJFJNfX_Nec/w866-h577-no/DSC_0040.JPG

इथेच सेम्पर ओपेरा जगातील काही नावाजलेल्या ओपेरा हाउस पैकी एक आहे. येथील तिकिटे आधी काढलेली नव्हती. वेळेवर दोन्ही दिवस इथे तिकीट काढण्याचा प्रयत्न असफल ठरला. *sad* इच्छा असूनही बघता आले नाही. पुन्हा कधी जायला जमले तर आधीच तिकिटे काढून ठेवायची हे पक्के केले आहे.

https://lh4.googleusercontent.com/-20WPkXv9V1c/U6afwcN8ruI/AAAAAAAADDE/rMjE8nGaXZg/w866-h577-no/DSC_0039.JPG

इथे उतरून एक फेरफटका मारला. थोडेफार फिरून त्स्विंगर राजवाड्यापाशी ( Zwinger palace ) आलो. या राजवाड्यावर देखील बॉम्बिंग झाले. युद्धोत्तर काळात शक्य तेवढी दुरुस्ती करण्यात आली. बाहेरील बागेतला प्रवेश आणि राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर चा प्रवेश विनामूल्य आहे. आतमध्ये एक पोर्सीलेन संग्रहालय आणि इतर काही वस्तूंचे संग्रहालय आहे. त्यातही बराचसा भाग नूतनीकरणासाठी बंद आहे. वेळेचा अंदाज घेता फक्त बाहेरून बघणे शक्य वाटत होते. आधी बाहेरील बागेत फेरफटका मारला आणि राजवाड्याच्या गच्चीवर गेलो.

भव्य राजवाड्यातील बाग आणि पर्यटक
https://lh4.googleusercontent.com/-y2vzU7f2-ww/U6af7va7wuI/AAAAAAAADDc/40JRInmOAzU/w866-h577-no/DSC_0057.JPG

https://lh3.googleusercontent.com/-1X_Ze9ICrPM/U6af60bN2_I/AAAAAAAADDU/DuVRCPq-Qk0/w866-h577-no/DSC_0056.JPG

ओपेरा हाउस पासून दिसणारा ड्रेस्डेन महाल जेथे आता ग्रीन व्होल्ट आणि इतर काही संग्रहालये आहेत. याविषयी पुढील भागात येईलच.

https://lh4.googleusercontent.com/-ndzZtER9eVI/U6agGAe1X2I/AAAAAAAADD0/IoU0u_2IPNg/w866-h577-no/DSC_0064.JPG

तासभर येथे फिरत नाही तेवढ्यात अचानक विजांचा कडकडात सुरु झाला. आभाळ भरून आले. हवामानाचा अंदाज पाहिला तर पुढचे ३ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तसाही प्रवासाचा थकवा आला होता. हे सगळे बघता इथून लगेच काढता पाय घेतला आणि कमीत कमी पावसात हॉटेल वर पोहोचलो. पुढचा दिवस होता प्राग चा. प्राग आणि उर्वरीत ड्रेस्डेन लवकरच…
क्रमशः

प्राग ही चेक रिपब्लिक या देशाची राजधानी. ड्रेस्डेन पर्यंत जातोय तर मग प्राग ला जाऊन येऊ शकतो हे खरं तर कारण. चेक हा देश शेंगेन देशांमध्ये येतो त्यामुळे शेंगेन देशांमधील व्हिसा इथे चालतो. परंतु या देशाचे चलन मात्र वेगळे आहे. ड्रेस्डेन मध्ये असतानाच क्रोन घेतले होते. ड्रेस्डेन ते प्राग हा २ तासांचा प्रवास आहे. ट्रेन चे आरक्षण आधीच केले होते. या रेल्वेत केबिन्स होते आणि प्रत्येक केबिन मध्ये ६ जणांसाठी बसण्याची सोय होती. आम्ही एका केबिन मध्ये बसलो तेव्हा तिथे एकच जण बसला होता. थोड्या वेळातच खास सहप्रवासी गप्पा सुरु झाल्या. गेल्या २ वर्षात अनेक प्रवास झाले पण प्रत्येक वेळी सोबतचा तेवढा मनमोकळा असेलच असे नाही हे माहित होते. पण त्यानेच सुरुवात केली. तुम्ही कुठे चालला आहात? फिरायला की काही कामासाठी? प्रागला फिरायला जातोय असे सांगितले. मग जर्मनीत कुठे राहता यावर आदानप्रदान झाले. आणि मग नेहमीचा खास प्रश्न आला. तुम्ही भारतीय का? मग पुढे प्रवासभर भारत हा विषय गप्पांना पुरला. हा बर्लिन चा माणूस होता. त्याच्या ऑफिसमध्ये दोन भारतीय मुली आहेत, त्यांच्या नावांचे उच्चार त्याला कसे कठीण जातात, त्याला भारतात कधीतरी फिरायला यायचे आहे वगैरे झाले. मग इथे जर्मनीत कधीपासून आहोत, काय करतो इत्यादी औपचारिक संवाद झाले. भारतीय अन्न या भारताबाहेर प्रचंड औत्सुक्य असणाऱ्या खास विषयावर चर्चा झाली. एकाच देशात खाद्यपदार्थांमधील असणारे इतके वैविध्य चर्चेचा विषय ठरले नाही तर नवल. गप्पांच्या नादात प्राग पंधरा मिनिटांवर आले आहे असे लक्षात आले. बरेच दिवसांनी सहप्रवाशांसोबत गप्पा मारत झालेला प्रवास छान वाटला. याशिवाय या प्रवासातील अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता हा नदीच्या काठाने जातो. शिवाय रेपसीड ची शेते आणि हिरवेगार डोंगर सोबतीला होतेच. चेक आणि जर्मनीतील घरे, हवामान यावर तुलना सुरु झाली. घरांची पद्धत तीच असली तरीही अगदीच छोटी आणि बरीचशी जुनी/पडकी घरे दिसत होती. रस्त्यावरील पाट्या आणि इतर ठिकाणीही भाषेतले बदल दिसू लागले आणि थोड्याच वेळात प्राग च्या स्थानकावर उतरलो.

https://lh3.googleusercontent.com/-abdTz3DV4Kc/U6sK7w7gtTI/AAAAAAAADHA/t7TRoG-HXo4/w866-h577-no/DSC_0068.JPG

प्राग मधील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील किल्ला, चार्ल्स ब्रिज, डान्सिंग हाउस आणि जुने शहर (old town).
रस्त्यावरच्या पाट्या आणि दिशादर्शक बघत बघत मुख्य किल्ल्याकडे निघालो. वाहतुकीचे नियम बरेच धाब्यावर बसवलेले वाटत होते. पार्किंग चेही नियम सरळ तोडले होते. आडव्या उभ्या कशाही पद्धतीने गाड्या उभ्या होत्या. पाकीटमार, भुरटे चोर या गर्दीत असतील हे जाणवत होते. तुमच्याकडे डॉलर किंवा युरो असतील तर चलन बदलून मिळेल असे रस्त्यात मधेच येउन कानात कुजबुजणारे देखील अनेक होते. इतर काही शहरांपेक्षा इथे अधिक सतर्क राहायला हवे हे दिसत होते. पुढे एका ठिकाणी गर्दी दिसली म्हणून थांबलो तर हे दिसले. केवळ एका काठीच्या आधाराने अधांतरी मांडी घालून हा मुलगा बसला होता. हे असे प्रकार पुढेही अनेक ठिकाणी दिसले. हे नेमके कसे करतात याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. पण फारशी माहिती मिळाली नाही. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आवडेल.

https://lh4.googleusercontent.com/-Tk9JTiGopWk/U6sLIm83QQI/AAAAAAAADHQ/YlFSs1w6E0E/w360-h540-no/DSC_0074.JPG

लागून सुट्ट्या आणि उन्हाळा यामुळे पर्यटकांची लक्षणीय संख्या दिसत होती. शहरातील इतर काही इमारती.

https://lh4.googleusercontent.com/-L9I9xlLpdKk/U6sK6enuS-I/AAAAAAAADG4/orJ_G5yV_q8/w810-h540-no/DSC_0071.JPG

https://lh4.googleusercontent.com/-ev1ZiCc-K80/U6sLAYdefVI/AAAAAAAADHI/DK7Cq8Hlf8A/w810-h540-no/DSC_0072.JPG

इथून पुढे चालत चालत चार्ल्स ब्रिज वर आलो आणि दिसली ती अजूनच तुफ्फान गर्दी. पाय ठेवायला जागा नाही असे म्हटले तरीही अतिशयोक्ती ठरणार नाही इतकी. धक्का बुक्की करत आणि या एकदम भारतातल्या स्टेशन वर आल्याचा फील घेत ब्रिज वर आलो. गर्दी, हवामान, अस्वच्छता यामुळे थोडे पूर्वग्रह दुषित झाले होते त्यात या पुलावर येउन थोडी भर पडली. पुलाच्या काठावर असणारे अनेक पुतळे आणि शिल्पं सुंदर होती पण सगळी काळी पडलेली. जसे ड्रेस्डेन मध्ये होते, पण इथली परिस्थिती फारच वाईट होती. त्यावर दिसणारी ग्राफिटी, काही इमारतींच्या जवळ दिसणारी डबकी, सगळीकडे दिसणारी घाण हे आनंददायी वाटत नव्हते. दिसणारा नदीचा किंवा इतर आजूबाजूचा देखावा हा देखील किल्ल्याचा अपवाद वगळता फार वेगळा असा नाही. यापेक्षा युरोपातील काही इतर ठिकाणे जी पर्यटनस्थळे म्हणून विकसित झालेली नाहीत ती मागे पडली का असा प्रश्न मनात येत होता.
चार्ल्स ब्रिज वरून दिसणारे प्राग.

https://lh4.googleusercontent.com/-zhWQcx0D16M/U6sLfLJbfZI/AAAAAAAADH4/mdpDcBrutxc/w810-h540-no/DSC_0091.JPG

https://lh5.googleusercontent.com/-vTVohOZVRwg/U6sLiWu3PeI/AAAAAAAADII/AhUnvoX1_ws/w810-h540-no/DSC_0092.JPG

https://lh4.googleusercontent.com/-BW1Ry177zbw/U6sLg3yIeNI/AAAAAAAADIA/OxOPKQ9tdaw/w810-h540-no/DSC_0094.JPG

शहराच्या जुन्या भागात दिसणारे हे खगोलशास्त्रीय घड्याळ. या ठिकाणी देखील गर्दीमुळे फोटो काढता आले नाहीत आणि बारकाईने काही बघताही आले नाही. पण हे कोरीवकाम निश्चितच अवर्णनीय होते.

https://lh4.googleusercontent.com/-z7rSl60zTEM/U6sLRDpN7AI/AAAAAAAADHg/FlWf45rS0ms/w360-h540-no/DSC_0077.JPG

किल्ल्याच्या जवळ असताना दिसलेल्या काही इतर इमारती. काही पडझड झाल्यासारख्या वाटल्या. पण तरीही सगळ्या वास्तू लक्षवेधी आहेत.

https://lh6.googleusercontent.com/-vo860whXSNE/U6sLNWOkxUI/AAAAAAAADHY/S3PPGMFNpts/w810-h540-no/DSC_0078.JPG

https://lh6.googleusercontent.com/-HmsrpemtaRA/U6sLVK6ZfxI/AAAAAAAADHo/fztw2J4NR68/w810-h540-no/DSC_0080.JPG

पुढे चालत राजवाड्यापाशी पोहोचलो. बाहेरून भव्य दिव्य दिसणारा हा किल्ला युनेस्को वर्ल्ड हेरीटेज मध्ये येतो. ऑन लाइन तिकिटे काढता येत नाहीत त्यामुळे आधी आत जाउन तिकीट कुठे काढता येईल हे शोधत होतो. बरीच मोठी रांग दिसत होती. पण तिकिटे कुठे मिळतील याचा एकही बाण दिसत नव्हता. एक दोन लोकांना विचारून पाहिले तर यांना इंग्रजीचा गंधही नव्हता. या रांगेच्या शेवटपर्यंत गेलो तेव्हा लोकांकडे तिकिटे दिसत होती. एक पोलिस किंवा सुरक्षारक्षक फिरत होता त्याला विचारले. साहेबांना इंग्रजी समजेना. एक एक शब्द सांगितला तेव्हा त्याने फक्त 'तिकडे' म्हणून हात केला. आता या 'तिकडे' ला जाण्यासाठी परत आलो त्याच रस्त्याने गेलो आणि अजून शोधाशोध केली तेव्हा तिकीट घर दिसले. एक छोटासा दरवाजा आणि बाहेर पुन्हा शंभर दीडशे लोकांची रांग. तीही विस्कळीत. पुढे सरकत सरकत आत गेलो तेव्हा तिथे ३ खिडक्या होत्या. कुणीही कसेही कुठल्याही रांगेत घुसत होते. कसेबसे तिकीट काढले आणि बाहेर येउन पुन्हा पहिल्या रांगेत लागलो. तीन वेगवेगळ्या प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. २५० क्रोन चे एक सर्किट ए चे तिकीट आणि ३५० क्रोन चे सर्किट बी चे तिकीट आणि ३५० क्रोन चे सर्किट सी चे तिकीट. यापूर्वी रिव्ह्यूज वाचले होते त्यावरून सर्किट बी चे तिकीट बरे पडेल असे वाटले. यात महालातील ४ दालनांमध्ये आणि गार्डन मध्ये प्रवेश मिळतो. ऑडीओ गाईड चे पुन्हा ३५० क्रोन. या तिकीट काढण्याच्या गर्दी आणि त्रासाला वैतागून ऑडीओ गाइड रद्द केले. चारही दालनांमध्ये फिरण्यात अंदाजे २ ते अडीच तास पुरतात. सर्वप्रथम गेलो ते येथील प्रमुख चर्च मध्ये.

https://lh5.googleusercontent.com/-YQ-V9bs_4gg/U6sLq1WBU0I/AAAAAAAADIQ/ZnSG5NL86f4/w810-h540-no/DSC_0118.JPG

https://lh6.googleusercontent.com/-AGbP7g26IK4/U6sL79921fI/AAAAAAAADIo/vwXSDYFxKo0/w810-h540-no/DSC_0127.JPG

https://lh4.googleusercontent.com/-D8_tkId-uo0/U6sMNbWqDoI/AAAAAAAADJA/DwaSkKddA3g/w810-h540-no/DSC_0149.JPG

आतील भितींवर रंगवलेली सुरेख चित्रे.

https://lh4.googleusercontent.com/-xzSQX4s4gpg/U6sMJzv1ptI/AAAAAAAADI4/BGWtjkRN4-o/w822-h548-no/DSC_0147.JPG

https://lh4.googleusercontent.com/-XLN_2NFYMmo/U6sMGVHKCfI/AAAAAAAADIw/TREOj63lBAI/w810-h540-no/DSC_0128.JPG

https://lh5.googleusercontent.com/-m6ZVQnbZ6FI/U6sL1o1_UUI/AAAAAAAADIg/cMb2ZDvp0uc/w866-h577-no/DSC_0123.JPG

प्रत्येक ठिकाणी दिसणारे चित्र हे अधिकच सुंदर आहे असे वाटत होते. प्रत्येक रंगसंगती आकर्षक होती. ख्रिस्ती धर्मातील काही दंतकथा शिल्पांच्या स्वरुपात मांडल्या होत्या. इथे एखाद्या मंदिरात दर्शनाच्या मुख्य गाभाऱ्या जवळ असते तशी सगळीकडे गर्दी होती. पुढे चालण्यापेक्षा आपोआप ढकलणे चालू होते.

चर्च आणि आतला मुख्य पॅलेस बघून नंतर सेंट जॉर्ज बेसिलिका या तिसऱ्या दालनाकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी मात्र थोडी निराशा झाली. आत फारशा काही वस्तूही नव्हत्या. प्रत्येक संग्रहालयात वस्तू असल्या पाहिजेच असे नाही. पण निदान ती वास्तू बघताना एखादे रिकामे घर बघतोय असे होऊ नये. त्या ठिकाणाची, तेथील इतिहासाची माहिती देणारे, नेमके आपण काय बघतोय याविषयी सांगणारे माहितीपर फलक कुठे दिसले नाहीत. ही माहिती वाचण्यात रस असूनही काही दिसत नव्हते. याविषयी माहिती आंतरजालावर शोधणे सहज शक्य असले तरीही नेमके त्या ठिकाणी बघताना माहिती मिळाली तर ती जास्त चांगली वाटते. ऑडीओ गाईड वरून काही मिळत असेल परंतु फार नाही असे ऐकिवात आले.

किल्ल्यावरून दिसणारे प्राग आणि चार्ल्स ब्रिज

https://lh3.googleusercontent.com/-n2dTI3dzym4/U6sMUJv2jzI/AAAAAAAADJI/TYGC9wvEzFk/w810-h540-no/DSC_0163.JPG

अपेक्षेपेक्षा बराच लवकर हा संपूर्ण परिसर फिरून झाला. थोड्याच वेळात परत खाली उतरलो. आता भूक लागली होती त्यामुळे एक हॉटेल शोधू असा विचार केला. या पंधरा मिनिटात मुसळधार पाउस सुरु झाला. आता समोर जे हॉटेल दिसले, तिथेच बसणे सोयीस्कर होते. वेळ होता पण इतर सगळी भटकंती होणे शक्य नाही हे लक्षात आले. पावसाने थांबायचे नाही असे ठरवले होते आणि त्यामुळे हॉटेल मध्ये बसण्याला पर्याय नव्हता. इथे तरी किती वेळ बसणार म्हणून शेवटी उठून मुख्य स्थानकाकडे निघालो. मेट्रो घेऊन स्टेशन वर आलो आणि थोड्याच वेळात माझ्या पर्स ची चेन उघडी आहे असे लक्षात आले. आतले वॉलेट मारले गेले होते. आधीच सगळा दिवस पाउस आणि गर्दीने 'उत्साहवर्धक' होता म्हणून हे अजून एक नवीन. प्राग किंवा इतरही युरोपातील मोठ्या शहरात पाकीटमारी चालते हे ऐकून असूनही, आजूबाजूला अनुभवले असुनही मेट्रो मध्ये चढताना बहुधा दुर्लक्ष झाले होते. *sad* नशीबाने युरो चालत नाहीत म्हणून त्यात एकही दमडी नव्हती. चिडचिड झाली, त्रागा झाला पण नुकसान झाले नाही हे बरे होते. कार्ड ब्लॉक करण्यासाठी फोनाफोनी झाली. दिवसाचा शेवट अजूनच निराशाजनक ठरला. परतीचा प्रवास सुरु झाला.

इतर जवळच्या देशांच्या तुलनेत थोडा बेशिस्त कारभार, भव्य आणि सुरेख किल्ला, तेवढेच सुंदर चर्च, आकर्षक चित्रे आणि शिल्पं, योग्य माहितीचा अभाव, पाकीटमार, हवामान खात्याचा नेहमीप्रमाणे चुकलेला अंदाज, त्यादिवशी असलेली अतिप्रचंड गर्दी अशा मिश्र भावनांनी हा दिवस संपला. एकुणात एक पर्यटनस्थळ म्हणून व्यक्तीशः प्राग थोडे ओव्हर रेटेड किंवा हाईप्ड (मराठी?) वाटले. एक दिवस घालवायला उत्तम पण मस्ट व्हिजीट च्या यादीत नसले तरी चालणारे.

दुसऱ्या दिवशी ड्रेस्डेन मधील संग्रहालये मात्र भान विसरून पाहण्यासारखी होती. त्याविषयी, पुढील भागात…


. जेवणासाठी - तुमचे अहो शाकाहारी असतील तर खूपच कमी ऑप्शन्स मिळतील. प्राग किंवा चेक चा एखादा खास खाद्यप्रकार माहित नाही. येथील डम्पलिंग्स बद्दल ऐकले आहे पण खाल्ले नाहीत. पण चिकन सहज मिळेल, त्यासोबत उकडलेले बटाटे किंवा सॅलड इ. शाकाहारी असतील तर फ्रेंच फ्राइज, आणि व्हेज पिझ्झा किंवा व्हेज बर्गर तत्सम प्रकार. बटाट्याचे चिप्स, रोल्ड पेस्ट्रीज, इत्यादी प्रकार रस्त्यावर छोट्या गाड्यांवर मिळतील. या रोल्ड पेस्ट्रीज पूर्व युरोपातील वैशिष्ट्य आहे. मस्त लागतात.

तिथले खगोलशास्त्रीय घड्याळ किंवा किल्ल्याचा देखावा वगैरे. चार्ल्स ब्रिज आणि किल्ल्याची रेखाटने पण छान मिळू शकतात. पण या रस्त्यावर विकणाऱ्या लोकांकडून शक्य तेवढे बार्गेन करण्याचा प्रयत्न करायचा. पर्यटक बघून फसवणूक होऊ शकते.
क्रमशः


सकाळी उठून पुन्हा ड्रेस्डेन च्या मुख्य स्थानकावर नाश्ता करून पुढे निघालो. फ्राउएनकिर्श (Frauenkirche) म्हणजेच येथील प्रमुख चर्च. जर्मन भाषेत फ़्राउ म्हणजे स्त्री. इंग्रजीत चर्च ऑफ अव्हर लेडी म्हणजेच मदर मेरी चे चर्च. ड्रेस्डेन मधील इतर इमारतींप्रमाणेच या चर्चला महायुद्धाचे परिणाम भोगावे लागले. दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वी ड्रेस्डेन वर जे बॉम्बिंग झाले, त्यात आजूबाजूच्या इमारतींना लागलेल्या आगीच्या झळा चर्च पर्यंत पोहोचून येथील लाकडी बाक आणि इतर अनेक वस्तू जळून खाक झाल्या. शिवाय अनेक ठिकाणी पडझड झाली. महायुद्ध, त्यातून झालेले नुकसान आणि अजूनही जतन करून ठेवलेले काही अवशेष यांचे एक संग्रहालय तळमजल्यावर आहे. हे अवशेष जतन करण्यामागे असे कधीही पुन्हा घडू नये, शांतता नांदावी हा हेतू आहे. वरच्या मजल्यापर्यंत देखील जाता येतं. वरून संपूर्ण ड्रेस्डेन शहराचा सुरेख देखावा दिसतो. आम्ही गेलो त्यावेळी प्रार्थना सुरु होणार होती आणि त्यामुळे बहुधा तेवढा वेळ वर जाण्यास प्रवेश बंद केला होता. प्रार्थनेसाठी गर्दी वाढली होती आणि काही भाग बंद होता. नंतर दुपारहून परत येऊ असा विचार करून इथे फारसे न थांबता परत आलो. नंतर वेळ मिळालाच नाही याचे वाईट वाटले. फोटोग्राफी ला परवानगी नव्हती. त्यामुळे जेवढे पहिले तिथे फोटो काढता आले नाहीत. बाहेरून दिसणारे फ्राउएनकिर्श.

https://lh5.googleusercontent.com/-_QxChEj1m0U/U7FHLisQWQI/AAAAAAAADLc/vL5w1aSCgyE/w356-h534-no/DSC_0170.JPG

इथून पुढे ड्रेस्डेन च्या मुख्य महालाकडे जाताना लागते ती ही भिंत म्हणजेच फ्युर्स्टेनवेग (Fuerstenweg).

https://lh5.googleusercontent.com/-OhB5bj2jLAo/U7FHObJ-XHI/AAAAAAAADLs/I2m5PrBrK3c/w801-h534-no/DSC_0174.JPG

https://lh5.googleusercontent.com/-hpge4G32C_o/U7FHQesi_II/AAAAAAAADME/I2I78vRAi1s/w801-h534-no/DSC_0177.JPG

१०० मीटर लांब आणि १० मीटर उंच असलेली ही संपूर्ण भिंत म्हणजेच ड्रेस्डेन महालाचाच एक भाग आहे. १८७१ ते १८७६ च्या काळात या राज्याच्या राज्यकर्त्यांची ८०० वर्षांची परंपरा साजरी करण्यासाठी ही रंगवली गेली. पुढे हवामानाचे विपरीत परिणाम जेव्हा जाणवू लागले, तेव्हा ड्रेस्डेन मध्येच तयार केलेल्या माइसेन पोर्सीलेनच्या (Maissen Porcelain) टाइल्स ने ही पुन्हा बांधण्यात आली. ड्रेस्डेन चे राज्यकर्ते, त्यांच्या अनेक पिढ्या, शिवाय ड्रेस्डेन मधील काही प्रसिद्ध शास्त्रज्ञ, कारागीर यांची ही चित्रे इथे काढली आहेत. जगातील सगळ्यात मोठे पोर्सीलेन चे काम म्हणून ही भिंत ओळखली जाते.

याच मार्गाने पुढे जाउन ड्रेस्डेन महालात पोहोचलो. संपूर्ण युरोपात प्रसिद्ध असा ड्रेस्डेन महाल म्हणजेच फार पूर्वीच्या काळापासून सॅक्सोनी राज्याच्या राजघराण्याचा महाल. येथील राजघराणे हे युरोपातील सधन
राजघराण्यांपैकी एक. घराण्याच्या ऑगस्ट द स्ट्राँग आणि त्याचा मुलगा ऑगस्ट तिसरा यांनी खास आवडीने जगभरातील उत्तमोत्तम आणि कलात्मक वस्तू आपल्या दालनात जमवल्या. ग्रीन व्होल्ट हे येथील पहिले संग्रहालय या राजाने स्वतः लक्ष देऊन बनविले. पुढे त्यानेच या दालनाचा विस्तार केला. फार पूर्वीच्या काळात हे संग्रहालय त्याने आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने मर्यादित लोकांसाठी खुले केले. त्याच्या शत्रुंसाठी देखील हे एक अप्रूप होते. महायुद्धाच्या काळात महालाचे बरेच नुकसान झाले. परंतु असे काही होऊ शकते याचा अंदाज घेऊन येथील सर्व प्रमुख वस्तू दुसरीकडे हलविण्यात आल्या. त्यामुळे त्या वाचल्या आणि आता महालाचे नुतनीकरण केल्यानंतर परत आणल्या गेल्या. आता येथे विविध संग्रहालये आहेत. ऐतिहासिक ग्रीन व्होल्ट आणि नवीन ग्रीन व्होल्ट संग्रहालय ही प्रमुख. याशिवाय ऱ्यूस्टकामर (शस्त्रालय), कॉईन कॅबीनेट आणि फोटो आणि चित्रांचे संग्रहालय. यापैकी ऐतिहासिक दालनासाठी ऑन लाइन तिकीट आरक्षण करणे अत्यावश्यक आहे. दिवसभरात काही ठराविक वेळांचे स्लॉट असतात. त्या त्या वेळेलाच आत सोडले जाते. इतर दालनांमधील प्रवेश कुठल्याही वेळी चालतो. फोटोग्राफीला कुठल्याच दालनात परवानगी नाही. त्यामुळे येथील सगळे फोटो आंतरजालावरून घेतले आहेत. हे योग्य आहे असेही वाटले कारण बरेचदा अशा काही ठिकाणी मग फोटो काढण्यालाच महत्व येतं आणि मूळ आनंद हरवून बसतो. तिकिटा सोबत ऑडीओ गाईड मिळते. शिवाय प्रत्येक दालनात संक्षिप्त स्वरुपात माहिती दिलेली आहे. आमचे ऐतिहासिक दालनाचे तिकीट दुपारी २ वाजता साठी होते. त्यामुळे नवीन ग्रीन व्होल्ट कडे पहिला मोर्चा वळवला.

या दालनातील प्रमुख कलाकृती म्हणजेच औरंगजेबाच्या वाढदिवसाचा सोहळा. भारत आणि तेथील औरंगजेब हा राजा, त्याचा राजदरबार, त्याची संपत्ती, हे सगळे भारताबाहेरही नावाजले होते. याविषयी येथील राजाने वाचलेल्या पुस्तकात जे काही लिहिले होते त्यावरून राजाने स्वतः हे कारागीरांकडून बनवून घेतले होते. यात ४९०९ हिरे, १६० रुबी, १६ मोती, १६४ पाचू आणि १ इंद्रनील वापरला गेला आहे. कितीही वेळ पहिले तरी समाधान होत नाही अशी ही अजरामर कलाकृती आहे.

https://lh4.googleusercontent.com/-RZTkp-wEtjY/U7FHPOyLtyI/AAAAAAAADL4/vhSMTPkxb3E/w802-h534-no/aurang.jpg

यात इतर राजे त्याच्यासाठी भेटवस्तू आणत आहेत, अनेक प्रकारची वाद्ये आहेत आणि इतर अनेक बारकावे सुरेख साकारले आहेत.
याशिवाय देश विदेशातून आयात केलेल्या अनेक रत्नजडीत वस्तू आहेत. यात गुजरात मधून आयात केल्या गेलेल्या अनेक मोत्याच्या वस्तू आहेत. प्रत्येक कलाकृती ही वेगळी आहे. स्त्रियांचे दागिन्यांचे प्रकार, दागिन्यांच्या पेट्या, रत्नजडीत तलवारी, अनेकविध आरसे, चहा कॉफी चे कप, वाइन ग्लासेस, पोर्सीलेन ची भांडी, मेणबत्त्यांच चे स्टँड, विविध पद्धतीची घड्याळे आणि अजून बरेच काही. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. काही खोल्या या केवळ कुणा राजपुत्राच्या हट्टापायी नवीन केल्या गेल्या तर काही मोडल्या गेल्या. नवीन येणाऱ्या प्रत्येक पिढीने आपल्या परीने यात बदल केले.

इथे कितीही थांबलो तरीही मन भरणार नव्हते. ऐतिहासिक दालनातील प्रवेश २ वाजता म्हणून आता बाहेर पडणे आवश्यक होते. पोटपूजा करून २ वाजता ऐतिहासिक दालनात गेलो. इथे प्रवेशाची संख्या मर्यादित आहे. पुन्हा प्रत्येक वस्तू ही अवर्णनीय होती. आत अंबर, चांदी, हस्तिदंत इत्यादी चे एकेक दालन आहे. काही निवडक दालने आणि वस्तू. (सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.)

https://lh4.googleusercontent.com/-PatzScjjn60/U7FHoIpt86I/AAAAAAAADNE/WpjqoLHUfwo/w605-h478-no/Gr3.jpg

https://lh6.googleusercontent.com/-vLhcu3m-z5o/U7FHh39JAYI/AAAAAAAADMg/t78FJgN8XBs/w610-h479-no/Gr2.jpg

https://lh4.googleusercontent.com/-8S8Yq2WMgfo/U7FHhxLu2dI/AAAAAAAADMs/P_vm9wiNr5c/w619-h480-no/Gr4.jpg

https://lh5.googleusercontent.com/-gsyI6i9e8t8/U7FHiEQWewI/AAAAAAAADMk/7Biz6msC5O8/w347-h482-no/Gr6.jpg

https://lh4.googleusercontent.com/-Gb7NRlqN_-o/U7FHid9RO5I/AAAAAAAADM0/o2KTsa3V2gw/w611-h449-no/Gr7.jpg

https://lh4.googleusercontent.com/-LF_EaHjy9xA/U7FHPma0IMI/AAAAAAAADL8/f_FN2_Rj3zg/w801-h534-no/green4.jpg

रत्नजडीत तलवारी, दागदागिने आणि शोभिवंत वस्तू या सगळ्या बघता बघता पाय थकले होते पण बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. भिंतींचे रंगकाम, त्यावर कोरलेली नक्षी, युद्धात वापरण्याचे पेहराव, भिंतींवरील कोरीवकाम, सुंदर कमानी असलेले दरवाजे, सुंदर रंगवलेली छत, बघत रहावीत अशी झुंबरे, सुरेख शोभिवंत वस्तू आणि तेवढीच कलात्मक मांडणी, प्रत्येकाविषयी दिलेली योग्य माहिती या सगळ्यामुळे ही भेट अविस्मरणीय ठरली. कुठलाही फोटो काढता आला नाही परंतु एक अजरामर संग्रहालय पाहिल्याचे समाधान घेऊन बाहेर पडलो. इथलीच इतर २ दालने पाहिली आणि परत हॉटेल वर परतलो.

ड्रेस्डेन शहरातील भटकंती संपली होती. सगळ्या इमारतींचे महायुद्धात त्यातही विशेष करून १९४५ सालच्या बॉम्बिंग दरम्यान अतीव नुकसान झाले. परंतु युद्धोत्तर काळात या सगळ्या गोष्टी शक्य तेवढ्या प्रमाणात पुन्हा बांधण्यात आल्या. एवढेच नव्हे, ऐतिहासिक वारसा म्हणून उत्तम संग्रहालायांच्या रुपात जगासमोर आणल्या गेल्या आणि आजही तेवढ्याच आत्मीयेतेने जतन केल्या जात आहेत. या सगळ्यासाठी या लोकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. इतिहास, संग्रहालय बघणे यात रस असेल आणि ड्रेस्डेन च्या जवळपास कधीही येणे झाले तर आवर्जून भेट द्यावीच असे हे शहर आणि संग्रहालय. शेवटचा आणि परतीचा दिवस होता येथून जवळच असलेल्या बास्टाय च्या परिसराचा. त्याविषयी पुढील आणि अंतिम भागात...
क्रमशः


सहलीचा शेवटचा दिवस उगवला. सॅक्सॉन स्वित्झर्लंड हा ड्रेस्डेन पासून अंदाजे पाउण तासावर असणारा परिसर. एल्बं नदी, आजूबाजूचे डोंगर, आणि वर्षानुवर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून, झीज होऊन तयार झालेले उंचच उंच खडक असा हा परिसर. अठराव्या शतकात स्वित्झर्लंड मधले दोन कलाकार त्यांच्या काही कामासाठी जेव्हा या भागात आले, तेव्हा त्यांना दूरवर हे डोंगर दिसले. हा निसर्ग आणि हे डोंगर त्यांना त्यांच्या मायभूमीशी साधर्म्य साधणारे वाटले. म्हणून त्यांनी या परिसराला आधी जर्मन स्वित्झर्लंड नाव दिले. कालांतराने त्याची ओळख सॅक्सॉनी हे या राज्याच्या नावावरून सॅक्सॉन स्वित्झर्लंड अशी झाली. या परिसरातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे बास्टाय (Bastei). हजारो वर्षांपूर्वी झीज होऊन तयार झालेली ही उंचच उंच अशा खडकांची रांग. येथील अद्भुत निसर्गाने अनेक चित्रकारांना आपल्याकडे आकर्षित केले. त्याचबरोबर अनेक साहसी लोकांसाठी रॉक क्लाइम्बिंग करता हा परिसर प्रसिद्ध होता. राथेन (Rathen) हे या ठिकाणच्या पायथ्याचे गाव. नदीच्या एक काठावर हे गाव आणि दुसऱ्या काठावर बास्टाय. गाडीने या ठिकाणी पोहोचलो. इथपर्यंत येण्यासाठी ड्रेस्डेन हून ट्रेन देखील आहेत. ट्रेन किंवा गाडीने येउन पुढे नदीच्या पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी फेरी आहे.
राथेन चा पायथा आणि फेरीतून दिसणारा परिसर.

https://lh4.googleusercontent.com/-erG0yxSeomQ/U7e_wI3gDiI/AAAAAAAADPk/AwaEMlWGy7o/w866-h577-no/DSC_0186.JPG

इथे नदीचे पात्र फार मोठे नाही. लगेचच दुसऱ्या बाजूला पोहोचलो. पुढे वरपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहेत. एक पायऱ्यांचा मार्ग आहे, काही वेगवेगळ्या अंतराचे चढत जाण्याचे मार्ग आहेत. याविषयीची सगळी माहिती लिहिलेले फलक आहेत. आम्हाला वेळेचा अंदाज घेता पायऱ्यांचा मार्ग सोयीचा होता. त्याप्रमाणे निघालो.
सकाळी लवकरची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती. एकीकडे वाहत जाणारी एल्बं नदी, तिच्या तीरावर वसलेली कौलारू घरे, दूरवरची शेतं आणि एका बाजूला उंचच उंच खडक. थोड्या थोड्या अंतरावर आजूबाजूचे बघण्यासाठी जागा केलेली आहे. मधेच एखादा उंच खडक. त्यावर पुन्हा चढून जाण्यासाठी पंधरा वीस पायऱ्या, अरुंद वाट आणि वरून दिसणारे विहंगम दृश्य. त्यात भर म्हणून दूरवर दिसणारी रेपसीड ची शेते आणि वरून मधूनच डोकावून जाणारा सुर्य. आजूबाजूला सगळी जर्मन वानप्रस्थाश्रमी मंडळी, काहींच्या सोबत त्यांची नातवंडे, काही आज्यांचा ग्रुप, त्यांची चालणारी खुसुर फ़ुसुर आणि या सगळ्यांचा उत्साह बघून आनंदित झालेलो आम्ही. मधेच अशा दुसऱ्या ठिकाणाहून दिसणारे पर्यटक. अशा अनेक जागांवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळून परत पुढचा मार्ग सुरु.

https://lh5.googleusercontent.com/-2KpX0B7a1tg/U7e_xI1B2nI/AAAAAAAADPw/LPDuRaFBtnM/w866-h577-no/DSC_0198.JPG

https://lh5.googleusercontent.com/-nWtr-Q44ejs/U7e_-bAQbuI/AAAAAAAADP4/kgmxlcUQJBI/w866-h577-no/DSC_0214.JPG

राथेन स्थानकाहून नुकतीच निघालेली ट्रेन. ड्रेस्डेन प्राग हा लोहमार्ग या भागातून जातो.

https://lh6.googleusercontent.com/-fai_JURXzPA/U7fACceVLlI/AAAAAAAADQA/LnIcqRJoZWU/w866-h577-no/DSC_0222.JPG

हळूहळू हे खडक अधिकाधिक दिसू लागतात. जवळ दिसू लागतात. चढत चढत वर पोहोचलो की वर लागतो तो हा बास्टाय पूल. अशा अनेक खडकांना एकत्र बांधण्यासाठी आधी येथे लाकडी पूल बांधला गेला. १८५१ साली हा पूल पुन्हा ने नवीन बांधण्यात आला.
पुलाची सुरुवात.

https://lh4.googleusercontent.com/-HPDUfWev0Qk/U7fAD78FVtI/AAAAAAAADQI/mMuJqabgxlk/w385-h577-no/DSC_0226.JPG

पुलावरून दिसणारे दृश्य आणि दुसऱ्या बाजूला दिसणारे पर्यटक.

https://lh3.googleusercontent.com/-ZcIY_Nn-3G8/U7fAK7rk1II/AAAAAAAADQQ/MrDMHrYeHjw/w866-h577-no/DSC_0238.JPG

https://lh5.googleusercontent.com/-Q4X5tQRCuTY/U7fAS4rKwvI/AAAAAAAADQY/W6JJWJDZ3TY/w866-h577-no/DSC_0240.JPG

इथेच एक किल्ला होता जो नामशेष झाला. तिथून अजून वेगळा नजारा दिसतो म्हणून या एवढ्या भागात जाण्यासाठी नाममात्र तिकीट आहे. उर्वरीत संपूर्ण परिसरातला प्रवेश विनामूल्य आहे. इथे काही छोटे पूल बांधले आहेत.

https://lh6.googleusercontent.com/--i4a-XY3Sns/U7fA1N3yf9I/AAAAAAAADRQ/KMvu2ea3KCg/w866-h577-no/DSC_0285.JPG

किल्ल्याच्या बाजूने दिसणारा बास्टाय पूल.

https://lh3.googleusercontent.com/-cyKkswtpDzY/U7fA1mqFyLI/AAAAAAAADRY/Y2F5a4q_Kng/w866-h577-no/DSC_0291.JPG

अंधश्रद्धा जगात सगळीकडे आहेत हे पुन्हा बघायला मिळाले. पुलावर उभे राहून दोन फुट पलीकडे असणाऱ्या या कपारीत पैसे गेले तर इच्छा पूर्ण होते म्हणून अनेक लोक नशीब आजमावत होते. बाकी ठिकाणी पै पै चा हिशोब ठेवणारे जर्मन्स, इथे मात्र सढळ हस्ते दान करीत होते. आमच्या समोर तरी कुणाचेही पैसे तिथे पडले नाहीत.

https://lh4.googleusercontent.com/-N91c8XCu7nU/U7fAnLWoFfI/AAAAAAAADQ4/-EeLhn2P8l0/w866-h577-no/DSC_0278.JPG

पुलावरून पुढे गेलो की पुन्हा प्रत्येक बाजूने वेगळे खडक आणि या पुलाचा वेगवेगळ्या उंचीवरून देखावा दिसतो.

https://lh3.googleusercontent.com/-d27rEJ9LDYo/U7fAYCkzJcI/AAAAAAAADQg/8gMM7b3rf6c/w866-h577-no/DSC_0263.JPG

https://lh3.googleusercontent.com/-4KQldCtKnh0/U7fAaFAHV3I/AAAAAAAADQo/6E6mIAOe9Po/w866-h577-no/DSC_0266.JPG

वेगवेगळ्या बाजूने सगळा परिसर बघून झाला. आता घरी परतण्याची वेळ झाली होती. इथपर्यंत चढून मग परत उतरायला सुरुवात केली.

https://lh6.googleusercontent.com/-LUU_FeXudJ8/U7fAjsZAGTI/AAAAAAAADQw/CvelMcAMv7s/w866-h577-no/DSC_0271.JPG

खाली उतरलो आणि फेरीने नदीच्या अल्याड येउन गाडीने परत घराचा रस्ता धरला.

खास युरोपीयन पर्यटन स्थळांमध्ये तेवढे नाव नसलेले पण भावून टाकणारे ऐतिहासिक ड्रेस्डेन, अतिप्रसिद्ध पण थोडी निराशा करणारे प्राग आणि विदेशी पर्यटकांसाठी अगदीच अनभिज्ञ असा बास्टाय परिसर बघून परतीचा प्रवास सुरु झाला. चार दिवसांच्या सुट्ट्यांचा शेवटचा दिवस म्हणून रस्त्यांवर गाड्यांची जत्रा भरली होती. एकीकडे रेपसीड ची शेते आणि पवनचक्क्या सोबतीला होत्या. एक आठवणीत राहील अशी सफर संपली आणि सोबतच ही लेखमाला सुद्धा...


कोपनहेगन डायरी - भाग ७

 प्रसिद्ध Tivoli Garden आणि नाविन्यपूर्ण Freetown Christiania

 कोपनहेगन हे छोटंसं शहर तरीही त्यात बघण्यासारखे बरेच काही आहे. १७ व्या शतकात बांधलेला "Round Tower" हा शहराच्या मध्यवर्ती Indre By नावाच्या भागात आहे. टॉवरच्या सर्वात वरच्या भागात खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. टॉवरच्या आतमध्ये वर चढण्यासाठी अश्वारूढ होऊन चढू शकतो असा जिना (Equestrian staircase) आहे. फार उंच नसला तरी टॉवर वरून शहराचे विहंगम दृश्य दिसते.

Round Tower

मागील एका लेखामध्ये कोपनहेगन शहराचे वर्णन करताना "horizontal skyline broken only by the spires and towers of its churches and castles" असे जे मी म्हटले होते ते किती योग्य आहे हे राऊंड टॅा‌‌‍वर वरून बघताना झटकन लक्षात येते.

 


कोपनहेगन सेंट्रल स्टेशनला लागूनच इथला प्रसिद्ध "Tivoli Garden" हा amusement park आहे. १८४३ साली उघडलेला हा पार्क जगातल्या सगळ्या जुन्या अम्युजमेंट पार्क मधल्या नंबर ३ वर आहे. डिस्नेलँड किंवा इतर आधुनिक अम्युजमेंट पार्कच्या तुलनेमध्ये हा खूपच छोटा आणि साध्याच राईडस असलेला पार्क आहे. पण नावातच बाग असा शब्द असलेला हा पार्क अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी, झाडं, तळे, कारंजी व हिरवळीने नटलेला आहे. वेगवेगळ्या थीम वर कल्पकतेने बांधलेल्या अनेक सुंदर इमारती, नाट्यगृह हेही तिथे आहे. जरा जास्त वेळ असलेले पर्यटक Ny Carlsberg Glyptotek, National Museum, Opera, Aquarium, Zoo या स्थळांना देखील भेटी देतात.




 


पण कोपनहेगन मध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये आणखीन एक जागा खूप लोकप्रिय आहे ती म्हणजे "Freetown Christiania". शहरातल्या एका छोट्याशा भागामध्ये ९०० ते १००० लोकांचा एक समुदाय राहतो. जगातील एकमेव अशी ही जागा काय आहे ते प्रथम जाणून घेऊया. त्यासाठी या जागेचा थोडासा इतिहासही समजून घ्यावा लागेल.


 





या जागी १६०० च्या शतकात मिलिटरी वस्ती व Naval Base होता. त्यासाठी इथे अनेक इमारती, बराकी बांधल्या गेल्या. नंतर तिथून सैन्य हलवण्यात आले आणि ही सर्व जागा बराच काळ निर्मनुष्य पडून होती. १९७१ पासून हळूहळू अनेक लोकांनी या जागांवरती अवैध कब्जा करायला सुरुवात केली. सुरुवातीला गरीब लोक इथे जास्त होते. पण नंतर हळूहळू त्याचं स्वरूप बदलू लागलं. सरकारच्या विचारांच्या विरोधात असलेली, बंडाळी केलेली किंवा नाराजी दाखवणारी, जी अनेक लोकं  होती, मुख्यतः अनेक लेखक, गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार तसेच समलिंगी विचाराचे असलेले असे सर्व या ठिकाणी वस्तीला येऊ लागले. आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या सरकारवर अवलंबून न राहता स्वतः स्वावलंबी व्हायचं या विचाराने झपाटलेल्या या लोकांनी सरकारची कोणतीही मदत न घेता इमारतींची डागडुजी, स्वतः वीज निर्मिती व पुरवठा, पाणी, सॅनिटेशनची सोय इ. स्वतःच्या प्रयत्नातून निर्माण करून स्वतंत्र अशी स्वतःची जीवनशैली व अस्तित्व तयार केले.


 

आता या समुदायाचे उद्दिष्ट एक स्वयंशासित समाज निर्माण करणे आणि त्याद्वारे प्रत्येक व्यक्ती संपूर्णपणे स्वावलंबी करणे हेच होते. त्यातूनच Freetown Christiania चा जन्म झाला. यांनी स्वतःचे वेगळे असे नियम केले. त्यातच इथे ड्रग्जचा व्यापार वाढू लागला. त्यामुळे डॅनिश सरकार बरोबर यांचा संघर्ष ही वाढला. २०१० पासून इथली स्थिती पुष्कळशी सुधारली आहे. इथले लोक आता बहुतांश सरकारी कायदे मानतात.

पण मग आता अजूनही ही जागा का बरं प्रसिद्ध आहे?

 

कारण अजूनही इथे free living च्या विचाराचे लोक राहतात. आजही या भागात काही नियम त्यांचेच चालतात. या भागामध्ये कार आणायला किंवा पार्क करायला परवानगी नाही. इथे फोटो, व्हिडिओ काढण्याला ही बंदी आहे. अफू, गांजा इत्यादी सारख्या ड्रग्सची विक्री आणि वापर सर्रास इथे होताना दिसतो. इथल्या वेगवेगळ्या इमारतींवर सुंदर ग्राफिटी केलेली आढळते. तसेच अनेक ठिकाणी दगड, लाकूड, धातू यांच्या बनवलेल्या सुंदर कलाकृती दिसतात. हे सर्व पाहायला तसेच अनेक प्रसिद्ध म्युझिक बँडस, शोज, आर्टिस्ट यांना ऐकायला, बघायला खूप प्रमाणात पर्यटक येथे येतात. कोपनहेगन मधलं मिशेलिन स्टार प्राप्त, नंबर एकचे  "नोमा" नावाचे  रेस्टॉरंट ही याच भागात आहे. वर्षभर आधीपासून जिथे बुकिंग करावे लागतं अशा या जागी जगातल्या अनेक नामवंत लोकांनी हजेरी लावली आहे. असं हे कुप्रसिद्ध, लोकप्रिय आणि एकमेव ठिकाण म्हणजे Freetown Christiania.

 

तर अशा या सुंदर शहराला भेट द्यायला नक्की या हो !!!

 

नीना वैशंपायन


http://mitramandal-katta.blogspot.com/p/kopenhegen-diary.html


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...