Thursday, December 9, 2021

गोंदेश्वर मंदिर

 

नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते .. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्या पायर्यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.






























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...