हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
सर्वांना नमस्कार. नुकताच उत्तराखंडमध्ये कुमाऊँ परिसरामध्ये फिरण्याचा योग आला. हा योग असतो आणि तो योग असेल तरच फिरणं होतं. अन्यथा कितीही नियोजन करून फिरणं होत नाही. हिमालयामध्ये फिरण्याची ही दहावी वेळ होती. ह्यावेळी हवामान खूप सुंदर होतं, त्यामुळे दूर दूरचे बर्फ शिखर दिसत होते. अनेक ठिकाणी ट्रेकिंग करता आलं. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे दुर्गम अशा मानस सरोवर- कैलास पर्वत यात्रा मार्गावर गूंजी व काला पानी अशा अतिशय दुर्गम जागी जाता आलं. गेल्या वर्षीच २०२० मध्ये इथे जीपचा रस्ता सुरू झाला आहे. रस्ता नव्हेच, जीपचा ट्रेक तो! तिथे फिरण्याचा रोमांचक अनुभव घेता आला. तिथे फिरणं हे जीपसाठी व जीपच्या ड्रायव्हरसाठी तर काहीसं हॉलीवूडपटासारखं होतं. काही हॉलीवूडपट नाही का, एखाद्या साहसी मोहीमेचे असतात, पण ती मोहीम फसते व मग ते एक सर्व्हायव्हल मिशन होतं! गूंजी व काला पानीचा जीप ट्रेक असं सर्व्हायव्हल मिशन झालं होतं! त्याबद्दल आता सविस्तर लिहीणार आहे.
.
१५ दिवस कुमाऊँ परिसरात मनसोक्त फिरता आलं. २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर असा हिमालय सत्संग झाला. कुमाऊँ भागातल्या पिथौरागढ़ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरणं झालं. काही सुंदर ट्रेक्सही केले. माझी पत्नी आशा मूळची तिथली आहे. तिथल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ही कौटुंबिक भेट होती. परंतु त्यासह ज्या ज्या गावांमध्ये फिरत होतो, तिथे सगळीकडे ट्रेकिंग करत होतो. जाण्यापूर्वी काही दिवस त्या भागामध्ये सलग ५५ तास अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक रस्ते काही दिवस बंद होते. त्यामुळे आम्ही जाताना किती फिरता येईल, किती रस्ते सुरू आहेत ह्याबद्दल काहीशी शंका होती. आणि दिल्लीवरून जातानाही त्यामुळे नेहमीच्या टनकपूर- पिथौरागढ़ रस्त्याच्या ऐवजी हल्द्वानी- दन्या- घाट- पिथौरागढ़ असं फिरून जावं लागलं. तिकडे सगळीकडे फिरताना ह्या अतिवृष्टीचे रस्त्यावर झालेले परिणाम दिसत होते. नंतर बरेचसे रस्ते सुरू झाले तरी अनेक ठिकाणी लँड स्लाईडस, रस्त्यावर कोसळणारे दगड, चिखलामध्ये गाडी घसरेल असे अरुंद झालेले रस्ते होतेच. आणि हा थरार थेट परतीच्या दिवशी हिमालय उतरून पायथ्याला येईपर्यंत कायम राहिला!
.
आशा, मुलगी अदू, काही नातेवाईक आणि दोन मित्र ह्यांच्यासह ह्या प्रवासाची सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरला पुण्यावरून ट्रेनने दिल्ली आणि २५ ला सकाळी दिल्लीवरून पिथौरागढ़वरून बोलावलेल्या टॅक्सीने पुढचा प्रवास केला. स्पीतिमध्ये सायकलिंग केल्यानंतर दोन वर्षांनी हिमालय सत्संगाचा योग! हिमालयात जाणं म्हणजे हिमालय बोलावतो तेव्हाच जाणं असतं. कारण किती तरी वेळेस असंही झालंय की, खूप नियोजन केलं, तयारी केली पण जाण्याचा योग ऐन वेळी रद्द झाला! आणि असंही अनेकदा झालंय की, विशेष इच्छा नव्हती, नियोजन तर नव्हतंच, पण तरी हिमालयात जाणं सहजगत्या झालं! हिमालयाने बुलावा दिल्यावर ओ ही दिलीच जाते! आणि मग आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात!
दिल्लीत हजरत निजामुद्दीनवरून सकाळी ८ च्या सुमारास निघालो. प्रवासामध्ये तापी, नर्मदा, चंबळ नद्या लागल्या होत्या. दिल्लीमध्ये यमुनाही भेटली. पुढे गढ मुक्तेश्वरला गंगा दर्शन झालं! उत्तर प्रदेश! मुरादाबाद आणि मग रामपूर असं करून रामपूरपासून आतमध्ये वळालो. 'बा अदब, बा मुलाहिजा! होशियार! नगाधिराज महाराज पधार रहे हैं!' असा भाव मनात येतोय. रुद्रपूर सिटी अर्थात सरदार उधमसिंह नगर जिल्ह्यापासून उत्तराखंड सुरू झाला! आणि हल्द्वानीपासून हिमालयाचे चरण कमल सुरू झाले!
.
भीमतालवरून जाताना
काय तो अजस्र अमानुष नगाधिराज! डोळ्यांनी बघताही येत नाही! सुरुवातीला चरण कमल असलेल्या रांगा दिसतात. एका मागोमाग एक डोंगर रांग! जितके डोंगर चढू तितके पुढचे दिसत जातात! हल्द्वानी सोडल्यानंतर लगेचच अरुंद रस्ता, दरी, डोंगर, हिरवागार निसर्ग ही दृश्य सुरू! हल्द्वानीवरून नैनिताल अगदी जवळ आहे, पण इथला मुख्य रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे आम्ही भीमतालवरून जातोय त्या रस्त्यानेच नैनितालची वाहतुक सुरू आहे. दुपारी ३ वाजले आहेत, त्यामुळे नैनितालवरची वाहनं लगबगीने खाली उतरत आहेत. ड्रायव्हर रफिक़ सराईतपणे 'कट' मारत जीप पुढे रेटतोय! एकदम मोठं वाहन समोर आलं तर कुठे कुठे आम्हांला आधी थांबावं लागतंय, किंवा समोरचं वाहन जागा बघून थांबतंय! किंवा कधी रिव्हर्सही घेऊन मागे जावं लागतं! घाट रस्ता, समोर डोंगररांग आणि वनश्री! रस्त्याच्या काठाला माकडं! अशा काही ठिकाणी हिमालयात सह्याद्रीची आठवण होते. पण ती तेवढ्यापुरतीच! नंतरची भूमिती अन् मितीच वेगळी! रस्त्यावरच्या गाड्यांमध्ये मधूनच काही सुसाट सायकलवाले क्रॉस झाले. हे नक्कीच नैनितालमध्ये कामाला जाणारे असावेत. जाताना मोठ्या गाडीतून ते दुधवाला सायकली नेत असावेत. आणि येताना पंचवीस किलोमीटर उतारावर सुसाट उतरत असावेत. वाटेत एका धाब्यावर थांबून पुढचा प्रवास सुरू. प्रवासातील वळणा- वळणाच्या रस्त्यांशी व घाटामधल्या अनुभवाशी पूर्ण परिचित असल्याने जेवण घेतलं नाही आणि चहाही घेतला नाही.
संध्याकाळी पाचनंतर अंधार व्हायला लागला. ह्या रस्त्याने हल्द्वानी ते पिथौरागढ़ १९५ किलोमीटर आहे. पण पहाडी रस्ता म्हणजे ताशी २५ किमी जेमतेम हा वेग. त्यामुळे पिथौरागढ़ला पोहचायला रात्री उशीर होणार हे नक्की आहे. त्यातही आम्हांला पिथौरागढ़च्या पुढे १८ किलोमीटर असलेल्या सत्गड गावी जायचं आहे. पण नजारे काय अद्भुत! ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मोठं शहरच लागत नाही. अल्मोडा हे जिल्ह्याचं ठिकाण काही किलोमीटर बाजूला ठेवून हा रस्ता जातो. ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयात रात्री वर्दळ असलेला हा रस्ता आहे. आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही हा बंद पडला नाही. त्याउलट टनकपूर ते पिथौरागढ़ हा १५१ किमीचा तुलनेने अधिक सोपा रस्ता ह्या अतिवृष्टीमध्ये ठप्प झाला आहे. एका पॅचला तर दिड किलोमीटर रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे हा काहीसा दूरचा रस्ता घ्यावा लागला.
.
काही डोंगर रांगा चढल्यानंतर हळु हळु रस्ता उंची घेतोय. साधारण १५०० मीटर्स उंचीवर आल्यावर आजूबाजूला देवदारांचं आगमन झालं! सगळीकडे डोंगर- द-या व त्यामध्ये अगदी आतमध्ये असलेली घरं आणि उतारावरची शेती! अंधार पडल्यावर डोंगरामध्ये अधून मधून घरांचे दिवे लुकलुकत आहेत! आणि आकाशात तर चांदण्यांचा पाऊस पडतोय! हुडहुडी आणणारी कडक थंडीही सुरू झाली. रस्ता सतत वळणा वळणाचा. त्यामुळे हा जीपचा प्रवाससुद्धा एक मध्यम दर्जाचा ट्रेक मानला जातो. आणि अनेकांना अगदी सवय असूनही अशा प्रवासाचा त्रास होतो. आता इतका निर्जन भाग आहे की, तासामध्ये दोन- तीनच वाहन क्रॉस होत आहेत. जीपमध्ये नातेवाईक व मित्र असे मिळून सहा जण असल्यामुळे व ड्रायव्हर रफिक़ बोलका व पिथौरागढ़चाच असल्यामुळे गप्पा सुरू राहिल्या. अधून मधून एक एक जण झोप घेत होता. अगदी मंद गतीने प्रवास सुरू राहिला आणि शहर फाटक, दन्या अशी वाड्यांसारखी गावं मागे पडली व घाट नावाच्या जागी हा रस्ता टनकपूर- पिथौरागढ़ महामार्गाला येऊन मिळाला. इथेही थोडा वेळ आधीच लँड स्लाईडमुळे रस्ता बंद केलेला होता. पण आम्ही आलो तेव्हा सुरू झाला आहे. रात्रीचे १० वाजले आहेत! घाट ह्या जागी रस्ता रामगंगा नदी ओलांडतो. पोलिसांनी गाडीची चौकशी करून पुढे जाऊ दिलं! इथून नेपाळ सीमा जवळच आहे! आणि इथून पुढे बॉर्डर रोडस ऑर्गनायजेशनच्या हिरक विभागाची हद्द सुरू होते! पुढे काही ठिकाणी जेमतेम गाडी पास होईल इतका रस्ता उरला होता. किंबहुना तितक्यापुरताच मलबा साफ केला होता. बाकी पावसाने केलेला कहर दिसत होता. डोंगराचे अनेक तुकडे उन्मळून पडले होते, डोंगर खचले होते, दगड आणि राडारोडा सगळीकडे दिसत होता.
.
दिल्लीवरून निघून कधीच बारा तास झाले आहेत. अजूनही वेळ लागणार. अनेकांना उलटीचा व मळमळीचा त्रास झाला. जीप जेव्हा वेगाने वळणं- वळणं घेत जाते तेव्हा पोट सतत हलतं. मी पोट रिकामं ठेवल्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही. छोटी अदू तर झोपून गेली, तिलाही त्रास झाला नाही. अखेर मध्यरात्री १२ वाजता सत्गडला पोहचलो. पण प्रवास अजून पूर्ण झाला नाहीय! सत्गड हे डोंगरावरचं गाव आहे. त्यामुळे इथे पायवाटेने- मुख्यत: पाय-यांनी वर चढून जावं लागतं. हासुद्धा एक १० मिनिटांचा छोटा ट्रेक आहे! पंधरा तास जीपच्या प्रवासाने थकल्यानंतर मोठ्या बॅगा खाली रोडवर एका दुकानात ठेवल्या. इथे सगळे जण एकमेकांच्या ओळखीचे व एकमेकांना जोडून राहणारे! त्यामुळे जड बॅगा दुकानात ठेवल्या. सत्गडचे नवीनजी व अदूचा मावसभाऊ आयुष रस्त्यावर आले आहेत. जीपमधून उतरल्यानंतर इतकी कडक थंडी! रात्रीचे सव्वाबारा वाजलेले आहेत! अक्षरश: दात वाजवणारी थंडी! छोट्या बॅगा घेऊन सगळे निघालो. मी २०१७ मध्ये इथे राहिल्यामुळे मला परिसर ओळखीचा आहे. आणि हिमालयाच्य पुनर्भेटीचा अतीव आनंद आहे! सामान घेऊन चढताना हळु हळु शरीरात ऊब येत गेली. चढताना नवीनजी सहज सांगत आहेत की, परवाच इथे रात्री वाघ येऊन गेलाय. त्यामुळे रात्री कोणीच एकटे बाहेर थांबत नाहीत, अगदी कुत्रे व गुरांनाही घरातच ठेवतात! झोपलेलं पहाड़ी गांव, जवळच असलेलं देवदारांचं घनदाट जंगल आणि दूरवरून दिसणारा ध्वज मंदिरातला दिवा! त्यासह आकाशामध्ये जणू 'प्यार के हजार दीप हैं जले हुए' असे चमचम करणारे तारे! थांबत थांबत, श्वास घेत घेत पंधरा मिनिटांनी नातेवाईकांच्या घरी पोहचलो! ७ वर्षांची अदूही तिची छोटी बॅग घेत बरचसं अंतर चालली व मग मौसाजींनी तिला कडेवर घेतलं. घरी पोहचल्यावर अगदी अगत्यने स्वागत आणि आपुलकी! १८५० मीटर उंचीवरचं सत्गड गांव! अगदी हिमालय की गोद में! आणि गावात अगदी वरच्या बाजूला त्यांचं घर! प्रवासाचा शीण इतका जबरदस्त की, आंघोळ लांबच (इथे थंडीमुळे आंघोळ ऑप्शनला टाकण्याचा विषय), कपडेही बदलण्याची इच्छा होत नाही! पण कसे बसे कपडे बदलले. रात्री ६ वाजता जेवण्याचा माझा नियम बाजूला ठेवला आणि मस्त रोटी- सब्ज़ी व चावल खाऊन घेतलं. नातेवाईकांच्या गच्चीतून ध्वज मंदीराचा दिवा अगदी ठळक ता-यासारखा दिसतोय व त्याच्याच पुढे आकाशात व्याधाचा तारा! आणि किती तरी तारकागुच्छ नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत! एका रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आहे! खरंच नशीबच लागतं हे अनुभवायला. योग नसेल, नशीबात नसेल तर कितीही इच्छा करून हे मिळत नाही! हा जीवनाचा प्रसादच असतो. पुढचे काही दिवस ह्या हिमालयाच्या सत्संगामध्ये अक्षरश: ऐश्वर्य उपभोगण्याचा योग आहे!
.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
माझे हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com
२७ ऑक्टोबर! रात्री खूप लवकर झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. भयंकर थंडी आहे! पण पहाटेचं वातावरण आणि पहाटेचं आकाशही बघण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कुडकुडत बाहेर आलो! आकाशामध्ये जबरदस्त नजारे आहेत. अष्टमीचा चंद्र डोक्यावर असल्यामुळे तारे काहीसे कमी दिसत आहेत. काही वेळ दुर्बिणीतून आकाश दर्शन केलं. पहाटेची वेळ असूनही प्रत्येक घरामध्ये लोक उठलेले दिसत आहेत. सत्गडच्या मुक्कामाचा दुसरा दिवस! पण आज मुक्काम हलवून दुस-या गावात जायचं आहे. नंतर परत सत्गडला यायचं असल्यामुळे थोडंच सामान सोबत घ्यायचं आहे. सगळे उठून रेडी होण्याच्या आधी कसबसं सकाळचं टॉर्चर- टास्क उरकून छोटा ट्रेक करण्यासाठी निघालो.
उताराच्या रस्त्यावरून सत्गड मस्त दिसतंय. थोडं खाली आल्यावर महामार्ग दिसतो. भरभर खाली उतरून धारचुला साईडला फिरायला निघालो. नजारे नितांत सुंदर! ह्या भागामध्ये हा महामार्ग खूप चांगल्या स्थितीत आहे. अधून मधून मिलिट्रीची वाहनं दिसतात. घाट असल्यामुळे सतत वळणाचा रस्ता आहे. सत्गड गावातली रस्त्यालगतची घरं लागली आणि काही अंतराने मोठा उतार सुरू झाला. आणि तिथून दूरवरची हिमाच्छादित शिखरांची रांग डोकावली! अहा हा! सकाळच्या सूर्य किरणांमध्ये चमकणारी शिखरं! आत्ता व्हिजिबिलिटी खूपच चांगली आहे, त्यामुळे अगदी २००- २५० किमी दूर अंतरावरची शिखरं स्पष्ट दिसत आहेत! ऊन्हामध्ये चालल्यामुळे मस्त फ्रेश वाटतंय. थोडा वेळ तिथे थांबून व फोटो घेऊन परत आलो. सत्गडचा छोटाच पण सुंदर ट्रेक करून वर आलो. येताना परत एकदा वाट चुकलो!
सगळे जण हळु हळु रेडी होत आहेत. थोडा वेळ अदूसोबत क्रिकेट खेळलो. तिला इथलं वातावरण खूप आवडलंय. मस्त डोंगराचा परिसर, झाडं, मोकळं अंगण, भेटायला भरपूर लोक आणि लहान मुलं, शिवाय गायी- म्हशी, शेळ्या, कोंबड्या, कुत्रे, मांजरं! ती इथे येतानाच ठरवून आलीय की, ती आमच्यासोबत परत पुण्याकडे येणार नाहीय. दोन महिने तरी मावशीकडे नंतर थांबेल आणि मगच येईल! तीसुद्धा इथे खूप एंजॉय करतेय. आता बॅटने बॉल छान मारते आणि कॅचही मस्त घेतेय! तिच्यासोबत खाली उतरलो आणि रस्त्यावर येऊन थांबलो. यथावकाश सगळे जण खाली उतरले. निघताना दर वेळी अदू न चुकता 'गणपत्ती बाप्पा मोरया' म्हणते! काही जण बसने तर आम्ही एका ओळखीच्यांच्या कारने पिथौरागढ़ला गेलो. तिथे थोडा वेळ मार्केटमध्ये थांबलो. काही वेळ शॉपिंग सुरू होतं. आत्तापर्यंत इथल्या डोंगरांच्या, रस्त्यांच्या व द-यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला आहे, इथे वेगळं सौंदर्य दिसतंय! अगदी चालतं बोलतं आणि जवळून जाणारं नैसर्गिक सौंदर्य! पण अरेरे! त्या सौंदर्याचा फोटो घेता येत नाही! ते फक्त अनुभवता येतंय व मनात साठवून घेता येतंय!
आज जायचं आहे बुंगाछीना आणि अग्न्या ह्या गावांना. हे माझ्या बायकोच्या वडिलांचं होमटाऊन आहे. बुंगाछीना रस्त्यालगत असलेलं गाव आणि तिथून थोडं खाली उतरून अग्न्या गाव. पिथौरागढ़पासून अंतर फक्त २७ किमी. परंतु बसला दिड तास लागला. वाटेत काही ठिकाणी मध्ये पडलेल्या पावसामुळे रस्ता छोटा झालेला आहे. अनेक डोंगर ओलांडत आणि दरीला लागून हा रस्ता जातोय. सगळीकडे अप्रतिम नजारे! इथे प्रत्येक सेकंदाला सुंदर नजारे सुरूच आहेत. बुंगाछीनाला पोहचेपर्यंत दुपार होऊन गेली. तिथून मग वाटेत ओळखीच्या लोकांना भेटत अग्न्या गावाला पोहचलो. हाही सत्गडसारखा छोटा पण सुंदर ट्रेकच आहे. फक्त रस्त्यावरून खाली अर्धा किलोमीटर उतरून जायचं. अगदी सोपी नयनरम्य पायवाट! इथे खूप दिवसांनी सगळे येत असल्यामुळे अगदी गळाभेटी झाल्या. भोटू कुत्र्याने माझीही गळाभेट घेतली आणि दोन्ही पाय उंचावून मला आशीर्वाद दिले! छोटसं अगदी उतारावरच्या शेतांच्या बाजूला वसलेलं गाव. काही वेळ छान भेटी झाल्या. चहाचे राउंडसही झाले. इथे राहणारे प्रदीपदादा त्यांच्या शेतात घेऊन गेले. तिकडेही मस्त ट्रेकच झाला. अरुंद अशा पायवाटेने खाली खाली उतरत गेलो. काही ठिकाणी पाय घसरण्याची भिती होती, पण मस्त वाटलं. तिथे एक झरा व त्यावरचा एक पूलही होता. खूपच आल्हाददायक वातावरण आहे इथलं! एका अर्थाने सगळं स्वप्नवत! बोलता बोलता प्रदीपजी बोलले की ते रनिंग करतात, इकडे फिरतात. त्यांच्यासोबत बोलून सकाळी फिरायला जायचं ठरलं. उरलेला दिवस कौटुंबिक भेटी, गप्पा, गावातल्या गोष्टी ह्यांच्यात गेला. अधून मधून घराच्या थोडं बाजूला येऊन अक्षरश: सर्वोत्तम अशा वॉलपेपरहून सुंदर आणि ख-या दृश्यासमोर शांत बसलो आणि तिथे असण्याचा अनुभव घेतला.
दुस-या दिवशी म्हणजे २८ ला सकाळी प्रदीपजींसोबत निघालो. इथे जवळच एक डोंगरावर मंदिर आहे. तिकडे जाऊ असं ते बोलले. काल आलो तो उतार आता सुंदर चढ आहे. पहाटेची थंडी असली तरी चढून जाताना हळु हळु ऊब येत गेली. बुंगाछीना गावातून त्या मंदिराकडे जाणारा रस्ता मिळाला. जसा जसा रस्ता वर चढला, तसा आजूबाजूचा परिसर दिसायला लागला. काही अंतरावरून तर दूरवर डोंगराच्या मागे लपलेली बर्फाच्छादित शिखरंही दिसली! आणि सकाळच्या लाल ऊन्हामध्ये तीही लाल दिसत आहेत. अद्भुत! मंदिराजवळ गेल्यावर तर खूप मोठी हिमशिखर रांग दिसली! आणि आजूबाजूला दूरदूरची गावं व लांबचे रस्ते दिसत आहेत! थोडा वेळ मंदिराजवळ बसून त्या नजा-यांचा आस्वाद घेतला! तिथे आम्ही उभे असतानाच प्रदीपजी एकदम बोलले की, ते पाहा, समोर कोल्हे दिसत आहेत! समोरच्या झाडीमध्ये दोन कोल्हे पळताना दिसले! नंतर एक कोल्हा तर आमच्याकडेच बघत होता खूप वेळ. त्याचा व्हिडिओ घेतला, पण नेमका कॅमेरा ऑन झाला नाही. आणि थोड्या वेळाने परत आम्ही ज्या रस्त्याने वर आलो होतो, त्या रस्त्यावर एक कोल्हा दिसला. त्याचा मात्र फोटो घेता आला. इथे झाडी घनदाट आहे आणि मोठे डोंगर आहेत. त्यामुळे अनेक वन्य श्वापदांचा वावर असतो. वाघसुद्धा इकडे ब-यापैकी दिसतो. उतरताना सूर्य आणखी वर आल्यामुळे शिखर अजून स्पष्ट दिसत आहेत!
कोल्हा
मंदिर बघून येताना प्रदीपजींनी आणखी वेगळी वाट दाखवली. पहिले मुख्य रस्त्याने बुंगाछीना गावाची बाजारपेठ ओलांडून पुढे गेलो. तिथे रस्त्याला उतार लागला तेव्हा परत शिखरांनी दर्शन दिलं! त्यानंतर प्रदीपजी रस्ता सोडून आतमध्ये वळले. आणि तिथून मस्त पायवाट मिळाली. डोंगरात अशा असंख्य पायवाटा आहेत. सोपीच वाट आहे ही. कुठे दरी जवळून जात नाही किंवा तीव्र चढही नाही. आणि पाय वाट असली तरी दगडांवर पक्की बांधलेली आहे. शेतांमधून- डोंगरातून जाणा-या वाटेचा आनंद घेतला. मनसोक्त फोटो घेतले. हळु हळु ही वाट रस्त्यापासून आत आली आणि डोंग़राकडे वळाली. मध्ये मध्ये छोटी मंदिरं लागत आहेत! इतका शुद्ध निसर्ग आणि इतका आनंद खरंच 'असह्य' वाटतोय! गप्पा मारत फिरत गेलो. काही ठिकाणी दव पडल्यामुळे वाट ओलसर आहे. कुठे कुठे चिखलही आहे. असं करत दूरवर फिरून थेट अग्न्या गावामध्ये उतरलो. मस्त साडेपाच किमी ट्रेक झाला! पण एसी ऑन असल्यामुळे काहीच थकवा वाटत नाहीय! नंतरच्या दिवसात मस्त गप्पा झाल्या. शेतामध्ये फिरणंही झालं आणि गावात वाघ येत असल्याचे अनेक किस्सेही कानावर आले! त्याबद्दल पुढच्या भागामध्ये सविस्तर बोलेन.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने प्रयाण...
गूंजीच्या दिशेने...
२८ ऑक्टोबरच्या सकाळी बुंगाछीना- अग्न्या परिसरामध्ये मस्त ट्रेक झाला. हे गाव अगदी डोंगराच्या मधोमध आहे! नुसतं बसावं आणि समोरचं खरंखुरं वॉलपेपर डोळ्यात साठवावं! सोबतच्यांसोबत मस्त गप्पा होत आहेत. त्या गप्पांमध्ये वाघाचा विषय खूपदा आला. इथे- उत्तराखंड व कुमाऊँमध्ये वाघ नेहमी दिसतात. वाघ इथे तसा अजिबात नवीन नाही. किंबहुना नरभक्षक वाघांच्या कहाण्या व त्यांची शिकार करणारा प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट ह्यांची कर्मभूमी कुमाऊँच आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये पण वाघाच्या दहशतीमध्ये नव्याने वाढ होते आहे. एके काळी वाघ तुलनेने कमी झाले होते. जंगल जसं तोडण्यात आलं तशी वन्य प्राण्यांवर बिकट वेळ आली. त्यामध्ये वाघही अपवाद नव्हते. परंतु अलीकडच्या वर्षांंमध्ये परत वाघाची दहशत वाढली आहे. अगदी सत्गड आणि ह्या अग्न्यासारख्या गावांमध्येही वाघ येतो आणि त्यामुळे दिवसाचं निसर्गरम्य व आल्हाददायक गांव वेगळं आणि रात्रीचं सुनसान गांव वेगळं होतं. रात्री कोणी अंगणाच्या बाहेरही पाऊल ठेवत नाहीत!
इथे वाघ अनेकदा येतो, माणसांनी ओरडा केला की निघून जातो. अधून मधून जनावरं पकडतो. क्वचित एकटा सापडलेला माणूसही मारतो. असाच आम्ही इथे येण्याच्या थोडेच दिवस आधी झालेला किस्सा! इथल्याच एका गावातल्या एका घरामध्ये कोंबड्या पाळलेल्या आहेत. एकदा त्या घरामध्ये कोंबडी कोण विकतं ह्यावरून नवरा- बायकोमध्ये भांडण झालं. दोघांचंही म्हणणं होतं की, मी विकली नाही. कोंबड्या गोठ्यामध्ये होत्या व तिथे गायींचं दुध काढायला घरातल्या बायका रोज जायच्या. एकदा त्या गोठ्यावरच्या गवतामध्ये काही खसखस झालं म्हणून एक जण बघायला गेला. त्याने कोयत्यासारख्या अवजाराने गवताचे भारे हलवले व गवतामध्ये ते अवजार चालवलं. आणि काय! एकदम गवताचे भारे ढकलून गर्जना करून वाघ समोर आला! आणि काही न करता निघूनही गेला! तीन दिवस तो तिथे लपला होता आणि रोज कोंबड्या मारत होता! तिथे दुध काढायला येणा-या बायकांना त्याने काहीही त्रास दिला नाही! आधी सगळे हादरून गेले आणि मग सगळ्यांना वाटलं की, तो वाघ अगदी संत मनाचा असला पाहिजे, इतके दिवस थांबूनही त्याने काही त्रास दिला नाही. फक्त कोंबड्या मारून शांत बसला होता! ह्या प्रसंगामध्ये वाघाने काही केलं नसलं तरी इथे वाघाने अगदी घरातून- अंगणातून मोठा माणूस किंवा लहान मूल उचलून नेल्याचे प्रसंग अनेकदा घडले आहेत. त्यामुळेच रात्री लोक कमालीचे सावध असतात. कुत्र्यांनाही घरातच घेतात. इथे रात्री कुत्र्याच्या गळ्यामध्ये तीक्ष्ण धार असलेला एक धातूचा पट्टा लावून ठेवतात! गंमत म्हणजे आमच्या ह्या गप्पा सुरू असतानाच अंगणात एक माकडांची टोळी आली. आणि ह्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि एक माकडाचं पिल्लू मारलंसुद्धा. असा हा सगळा परिसर आहे!
सकाळी काही वेळाने गावाजवळच्या शेतावर गेलो. अगदी सुंदर अशी पायवाट. इथल्या शेतात खेळणं अदूने खूप एंजॉय केलं. किंबहुना इथली प्रत्येक गोष्ट तिला आवडते आहे, कारण इथलं सगळंच नवीन आणि आवडण्यासारखं आहे. इथे यायचं म्हणून ती कुमाऊनीही थोडी शिकून आली आहे. इथल्या भाषेमुळे एक गंमत मात्र होताना दिसते! अदू मला सध्या "निन्नू" नावाने हाक मारते. आणि इथल्या भाषेमध्ये निन्नू म्हणजे लहान मुलांना झोपवतानाचा शब्द (नीन्दिया आजा रे प्रमाणे). त्यामुळे जेव्हा मला अदू निन्नू म्हणून हाक मारते तेव्हा बायकांना अगदीच वीअर्ड वाटत असणार! असो! नंतरच्या गप्पांमध्ये सोबत आलेल्या मित्रांकडून खूप विशेष गोष्टी ऐकायला मिळाल्या. ते एक एनजीओ फिल्डमधले सर आहेत आणि त्यांनी त्यांच्या करिअरमधले काही किस्से सांगितले. त्यातला एक प्रसंग अगदी आवर्जून सांगण्यासारखा आहे. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी मुलाखतीनंतर एक प्रेझेंटेशन केलं. इंग्रजी चांगलं आलं पाहिजे, असं वाटून त्यांनी ते इंग्रजीतच दिलं. त्यांचं इंग्रजी तेव्हा तितकं चांगलं नसूनही त्यांनी हिंमत केली आणि त्यामध्ये इंग्लिशमध्येच प्रेझेंटेशन केलं. ते करताना अनेक गोंधळ झाले आणि काही इंटरव्ह्यूअर्स त्यांना हसलेसुद्धा. पण ते ठाम राहिले व त्यांनी सगळी मांडणी इंग्रजीतच केली. नंतर एका इंटरव्ह्यूअरने त्यांचं कौतुक केलं व सांगितलं की, मी शांतपणे तुमचं सगळं म्हणणं ऐकत होतो. तुमचं इंग्लिश चुकत होतं, पण माझं तिकडे लक्षच नव्हतं. आणि मला ह्या जॉबसाठी इंग्रजीची गरजही नव्हती. माझं लक्ष फक्त माझ्या रिक्वायरमेंटकडे होतं की, प्रेझेंटेशनमध्ये ज्या गोष्टी हव्यात त्या आहेत का, इकडे होतं. आणि तुम्ही त्या गोष्टी बरोबर न चुकता कव्हर केल्या. त्यामुळे मला तुमचं प्रेझेंटेशन आवडलं. आणि मग ते तिथे सिलेक्ट झाले. छोट्या छोट्या गोष्टींमधून कसं पुढे जाता येतं हे त्या सरांनी त्यांच्या अनुभवातून फार छान सांगितलं.
दुपारी अग्न्यावरून सत्गडला जायला निघालो. सोबत आलेली अदू इकडेच थांबणार आहे. पुढे आम्हांला ज्या ठिकाणी फिरायचं आहे, त्या जागा व ते प्रवास तिच्यासाठी कठीण आहेत, त्यामुळे तिला न घेता सोबत निघालो. निघेपर्यंत आनंदात असलेली व गाडीत बसतानाही अनेकदा आम्हांला बाय बाय करणारी अदू आम्ही खरोखर निघालो तेव्हा मात्र एकदम रडली! तिचा बांध फुटला. एक सेकंद खूपच मनाला चुटपुट लागली. दोन मामा व तिची नानी तिच्यासोबत असल्यामुळे तशी काळजी वाटली नाही. आम्ही जीपने पिथौरागढ़ला पोहचलो, तिथे काही वेळ थांबून अगदी अंधार पडता पडता सत्गडला पोहचलो. तसा अडीच तासांचाच प्रवास, पण अगदी थकवणारा. सतत वळणारे व चढणारे- उतरणारे रस्ते शरीर थकवतात. त्यातही जीप वेगाने वळते, त्यामुळे जीपचा प्रवास जास्त थकवतो. पण त्यानंतर सत्गडची पायवाट चढताना छान वाटलं! पण रात्र होऊनही अजूनही अदूचं रडणं शांत झालं नाही आहे. ती लगेचच घ्यायला ये म्हणते आहे. आणि इकडे आमचं उद्या गूंजीला जाण्याचं बोलणं सुरू आहे. पण सकाळ होईपर्यंत अदू रमली आणि आम्हांला येऊ नका म्हणाली! त्यामुळे आम्ही पुढे जायला मोकळे झालो. तसंही आम्ही काही दिवसांनी इथून गेल्यानंतर अदू महिना- दोन महिने मावशीकडे राहणार बोलली आहेच, सो त्या गोष्टीचीही थोडी तिची तयारी होईल. असा विचार करून आम्ही गूंजीकडे निघालो!
गूंजी! अगदी अनपेक्षितपणे हा प्रवास घडून आला. हासुद्धा एक योग असावा लागतो. आणि नशीबच ते! गूंजीच्या अनुभवाबद्दल लिहीणं अतिशयच त्रासदायक आहे. अंगावर शहारा येतो आणि नको ते रमणीय सौंदर्य परत आठवायला असं होतं! कदाचित आम्ही खूप नियोजन केलं असतं तर गेलोही नसतो. पण अनपेक्षितपणे तिकडे जाणं झालं. तोपर्यंत मला इतकंच माहिती होतं की, गूंजी हे कैलास- मानस सरोवर परिक्रमेच्या मार्गावर म्हणजे पायवाटेवर सीमेजवळचं एक ठाणं आहे. तिकडे जीप जाते किंवा जात असेल ह्यावर माझा विश्वास नव्हता. मला निघताना वाटत होतं की, जेमतेम तवा घाटच्या काही अंतर पुढे गाडी जाईल व तिथूनच आम्ही फिरून येऊ! पण झालं ते वेगळंच! आणि पूर्ण कल्पनेच्या पलीकडे! पहिल्या भागामध्ये उल्लेख केला त्याप्रमाणे हे जवळ जवळ सर्व्हायव्हल मिशन होता होता राहिलं! आणि तिथे जो काही नजारा- निसर्ग बघायला मिळाला व जो अनुभव आला, तो अविस्मरणीय होता. आणि आयुष्यातले कधीही न आठवणा-या दिवसांपैकी तो एक दिवस ठरला...!
सकाळी गूंजीला जाण्याआधी थोडा वेळ खाली उतरून आलो आणि रोडवरच एक छोटा वॉक केला. इथे सगळा परिसर इतका सुंदर आहे की, शांत बसवतच नाही. आणि थोडेच तर दिवस आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न करतो. छोटा वॉक केला आणि मग रोडवरच सगळ्यांना जॉईन झालो. गूंजीच्या दिशेने निघालो. ह्या भागामध्ये पूर्वी अनेकदा फिरलो आहे. २०१३ उत्तराखंड पुराच्या वेळी मदत कार्यात एका टीमचा भाग म्हणून इकडच्या अनेक गावांमध्ये फिरलो होतो. त्यामुळे धारचुला- तवाघाट पर्यंतचा परिसर ओळखीचा आहे. काही दिवसांपूर्वीच्या पावसाच्या खुणा व तुटलेला रस्ता अनेक ठिकाणी दिसतोय. हळु हळु दूरचे पर्वत जवळ येत आहेत! जौलजिबीच्या आधी गोरी गंगा- काली गंगेचा संगम बघितला. काली गंगेच्या पलीकडे नेपाळ! अगदी मोहब्बत के दुश्मनों ने धरती पर खिंची हुई लकीर! दिसताना नदीचे दोन्हीकडचा परिसर सारखाच दिसतो! पण देश वेगळा! धारचुलामध्ये मोबाईलच्या नेटवर्कने राम म्हंटला आणि ख-या अर्थाने अगदी वेगळ्या जागी जाण्याचा प्रवास सुरू झाला! तिथेच एक तास मिलिटरीच्या वाहनांचा ताफा जाण्यासाठी वाहतूक रोखून धरली होती. अनेक मिलिटरीच्या वाहनांमध्ये घोडे दिसले. सोबतचे एक जण म्हणाले की, तिकडे आता पडेल ती थंडी त्या घोड्यांना सहन होत नाही, म्हणून त्यांना खाली उतरवत आहेत. पुढे हळु हळु रस्त्याचा दर्जा ढासळत गेला. आणि तवाघाटच्या पुढे तर रस्ता हळु हळु जीपच्या पायवाटेमध्ये बदलताना दिसतोय! इथून पुढे आमच्या समोर काय आहे, हे कोणालाच माहिती नव्हतं! त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बोलेन.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: है ये जमीं गूंजी गूंजी!
२९ ऑक्टोबरची दुपार! धारचुलाच्या पुढे आलो तेव्हा मोबाईल नेटवर्क गेलं. आणि हळु हळु रस्ताही डोंगरामध्ये छोटा होत चालला. गूंजीला जायचं ठरलं तर आहे, पण रस्ता किती पुढेपर्यंत चालू आहे कल्पना नाही आहे. इकडचे जाणकार तर म्हणत आहेत की, गूंजीपर्यंत आता गाड्या जातात. पण मला शंका आहे. त्यामुळे इथून पुढे जे मिळेल ते पूर्ण अनपेक्षित असणार आहे. तवाघाटच्या जवळ एक जण ओळखीचे आमच्यासाठी रस्त्यात थांबले होते. ते एका अर्थाने आमच्या ह्या गूंजी दौ-याचे संयोजक होते. त्यांनीच सांगितलं की, गूंजीला जा, ॐ पर्वत बघायला मिळेल. ते आमच्यासाठी तिथे थांबले होते आणि आल्यावर त्यांनी आमच्या गाडीचा ताबा घेतला. रस्ता हळु हळु कच्चा होत होता, त्यामुळे आमच्या जीपच्या ड्रायव्हरला त्यापासून आराम मिळाला. अजूनच दाटीवाटीने आम्ही बसलो. आणि मग सुरू झाला एक थरारक प्रवास!
नव्याने जॉईन झालेले जित्तूजी तसे तर ड्रायव्हर पेशातले. पण अगदी ऑलराउंडर माणूस. ड्रायव्हर, टूअर ऑपरेटर, टूरिस्ट गाईड, शेतकरी, ट्रेकर अशा सर्व बाबींमध्ये कुशल. त्यांनी मग सांगितलं की, गूंजीला कसं कसं काय आहे. मी त्यांना एकदा विचारलं की, खरोखर जर गूंजीला जाता येत असेल तर मग इनर लाईन परमिट लागेल ना. त्यावर ते म्हणाले की त्यांची ओळख आहे व त्यामुळे लागणार नाही. मग इकडचे रस्ते किती बिकट आहेत, कसे ड्रायव्हर्स चालवतात ह्यावर त्यांनी माहिती दिली. तवाघाटच्या काही अंतर पुढे गूंजीच्या रस्त्यावर शेवटचं हॉटेल असलेलं गाव लागलं. तिथे दाल- सब्जी- राईस असं जेवण करून घेतलं. लोकांच्या चेहरेपट्टीमध्ये जाणवण्याइतपत फरक पडला आहे! आणि हळु हळु रस्त्यावरच्या रहदारीमध्ये मिलिटरीच्या वाहनांची जास्त संख्या आहे!
जित्तूजी सांगत आहेत की, इथून गूंजीचं अंतर साधारण ४५ किमी आहे. पण पोहचायला पाच तास तरी लागतील. म्हणजे आम्ही जेमतेम अंधार पडण्याच्या आधी गूंजीला पोहचू. हॉटेलचं ते गाव मागे पडल्यावर रस्ता पूर्ण कच्चा झाला. रस्ता नव्हेच आता, आता हा तर ट्रकचं वजन पेलवेल अशी लेव्हल केलेली पायवाटच! तीसुद्धा मधून मधून तीव्र चढ असणारी! संपूर्ण दृश्य, नजारे, आसमंत आणि आजूबाजूचा परिसर सर्वच बदलत चालले! जौलजिबीपासून सोबत आलेली कालीगंगा हळु हळु छोटी होत चालली. तिचं पात्र आता कोसळत्या पहाडी नदीसारखं व पुढे तर धबधब्यासारखं होत गेलं आणि मग ती एका डोंगराआड गेली. आजूबाजूचा निसर्गही बदलत चालला. हळु हळु हिरवा रंग कमी होत जातोय. आणि एकामागोमाग एक बर्फाचे शिखर डोकावत आहेत. एकदम स्पीतिची आठवण करून देणारा निसर्ग आणि तितकच दुर्गम रस्ता! जागोजागी दरीचं तीव्र 'एक्स्पोजर' असलेला रस्ता. आता त्यावर पर्वतावरून कोसळणारे धबधबेही आहेत. काही ठिकाणी तर डायरेक्ट वरून धबधबा रस्त्यावर पडतोय. इतका तीव्र की, त्यामधून गाडी जाताना पाच सेकंदांसाठी पूर्ण विजिबिलिटी जाते. अक्षरश: वायपर्स सुरू करावे लागतात. गंमत म्हणजे त्या धबधब्याच्या पावसात इंद्रधनुष्यही दिसतंय!
एका ठिकाणी मिलिटरीचं एक युनिट लागलं. तिथे काही चहाचे दुकानही दिसले, किंचित वस्ती होती. तिथे थोडा वेळ थांबलो. सोबतचे मित्र व जितूजी तिथल्या सैनिकांशी बोलले. त्यांच्या तिथे सिव्हिलियन्ससाठी काही सुविधा होत्या. मग त्यांच्याशी थोडं बोलणं झालं. आणि त्यांनीच मग आम्हांला चहा- कॉफी दिलं. सशस्त्र सीमा बलाचं हे युनिट. इथली उंची २७०० मीटर्स! म्हणजे आता आम्ही 'अती उंची' म्हणतात त्या उंचीच्या पायथ्याला आलो होतो. इथून पुढे आणखी कठीण होणार हा प्रवास! सोबतच्या काही जणांना थोडा त्रासही सुरू झाला. त्यांना मग माझ्या विविध ट्रेकिंग- सायकलिंगच्या अनुभवांच्या आधारे सावध केलं. इथे येईपर्यंत निसर्ग इतका बदलला आहे की, इथल्या कुत्र्याचे केसही अतिशय दाट आहेत. थंडीसाठी नैसर्गिक व्यवस्था! काही क्षण तिथे थांबून आणि तिथले नजारे फोटोमध्ये घेऊन पुढे निघालो. बर्फाचे शिखर आता अगदी समोर आलेले दिसत आहेत!
इथून पुढे खूप मोठा घाट लागला. कदाचित ह्या पॅचवरचा सर्वांत तीव्र घाट असेल. आता मात्र खरा थरार जाणवतोय. जाणवतंय की, इथे गाडी चालवणं भयानक खडतर आहे. आणि सोबतचे ड्रायव्हर खूप अनुभवी आहेत, ह्याचा खूप आनंद होतोय. मध्ये मध्ये इतका तीव्र चढ आणि पाठोपाठ वळणारा रस्ता! त्यातही अनेक ठिकाणी अरुंद रस्ता, ज्यामुळे वाहनांचं क्रॉसिंग होताना मागे- पुढे करावं लागतंय. मी स्वत: महाराष्ट्रात चारचाकी चालवलेली आहे, पण इथे मी चालवण्याचा विचारही अफॉर्ड करू शकत नाही! हे मैदान वेगळंच! साक्षात दुर्गमता! स्पीतिमध्ये सायकलिंग करताना दुर्गा, दुर्गमगा, दुर्गमस्थाना अशी दुर्गमतेची नावं आठवली होती! हा रस्ता तोच अनुभव परत देतोय. जितूजींनी सांगितलं की, ह्या रस्त्यावर फोर बाय फोर गाड्याच हव्यात. म्हणजे ज्या गाड्यांना मागची चाकंही स्वतंत्र वेग घेणारी असतात अशा गाड्या. आमची बोलेरो तर खूप कमकुवत वाटते आहे. शिवाय सोबत असलेले मूळ ड्रायव्हर व ते गाडी मालकही आहेत- ते बोलले की, नवीन बोलेरोमध्ये आधीच्या बोलेरो गाड्यांसारखा पक्का पिक अप नाहीय! त्यामुळे ती तितकी फास्ट चढत नाहीय. पण जितूजी शिताफीने गाडी नेत आहेत. आमच्यासोबतचे एक सर "मारणे" शब्द सारखे वापरतात. म्हणजे जेवताना पाव भाजी मारली, नैनिताल "मारलं", रिचार्ज "मारलं" वगैरे वगैरे! तसे जितूजी इथे गाडी अक्षरश: मारत आहेत! किती योग्य वेळी ते आमच्या सोबत आले हा आमचा मोठाच आनंद आहे! पण हा आनंद फार वेळ टिकला नाही, कारण त्यांची दुसरीही एक स्वत:ची गाडी होती. आणि तीही मागून येत होती, त्यांनी दुस-या एका ड्रायव्हरला ट्रेनिंगसाठी ती चालवायला दिली होती. पण एका वळणावरून दिसलं की, ती चढतच नाहीय. त्यामुळे काही वेळ वाट बघून शेवटी जितूजी निघाले. त्यांनी काही टिप्स आमच्या ड्रायव्हरला दिल्याच होत्या. तोही बिचारा तयार झाला. भिती तर त्याला होतीच, भितीपेक्षाही गाडीची काळजी होतीच. पण त्यांची गाडीही अडकली होती, त्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांच्या ओळखीचे अनेक गाडीवाले इथे असतात, त्यामुळे त्यांच्याकडे एक व्हॉकी टॉकीही होता. त्यावर ते अधून मधून 'चार्ली वन चार्ली वन' म्हणून बोलायचे. तो नेमका गाडीतरच ठेवून ते गेले.
... आणखी काही तीव्र चढ अक्षरश: कसेबसे गाडीने चढले. श्वास रोखायला लावणारा एक एक चढ. त्यातच सारखं दरीच्या सोबत होणारं क्रॉसिंग. कधी एकदा गूंजी येतंय असं झालं. अखेर तो तीव्र चढाचा पॅच कसाबसा पार झाला आणि गब्रियांग का कोणतं तरी मिलिटरीचं ठाणं आलं. तिथली उंची १२ हजार मीटर्सच्या पुढे होती. म्हणजे आम्ही निश्चितच ३५०० मीटर उंचीवर आलो आहोत. आणि ते जाणवतंय. तीव्र थंडी, आजूबाजूला आणि आता तर मागेसुद्धा बर्फाची शिखर दिसत आहेत. हळु हळु झाडं विरळ होत आहेत. उघडे बोडके डोंगर अगदी जवळ आलेले आहेत. इथल्या चेक पोस्टवर चौकशी झाली आणि गूंजीच्या जत्रेत जातोय असं सांगितलं, तेव्हा जाऊ दिलं. वाटेमध्ये काही ठिकाणी चिखलाचे पॅचेस आहेत, तिथे काळजी घ्या असं सांगितलं. आतापर्यंत जवळ जवळ सगळेच जण गूंजीसाठी डेस्परेट झाले आहेत. कधी येणार गूंजी! ह्यावेळी बाहेरचा सगळा परिसर मात्र हेच म्हणतोय-
गुंजी सी है सारी फ़िज़ा जैसे बजती हो शहनाइयाँ
लहराती है महकी हवा गुनगुनाती हैं तन्हाईयाँ
सब गाते हैं सब ही मदहोश हैं
हम तुम क्यों खामोश हैं
पण परिसर असा आहे की, सगळे जण एका अर्थाने मदहोश आणि खामोश झाले आहेत. आणि ह्याच गाण्यातली पुढची ओळसुद्धा तितकीच आठवतेय-
तन मन में क्यूँ ऐसे बेहती हुयी
ठंडी सी इक आग है
साँसों में है कैसी यह रागिनी (विरळ हवेमुळे!)
ठंडी सी इक आग मात्र पुरेपूर अनुभवता येतेय! लवकरच अंधार पडणार आणि गूंजी अजूनही जवळ आलेलं नाहीय. फक्त त्या ठाण्यानंतर चढ मात्र थांबला आणि चक्क उतार सुरू झाला. पण इथेही काही खरं नाहीय. कारण इथे इतका चिखलाने भरलेली वाट आहे ज्यात अक्षरश: जीप रुतते आहे. तरी ड्रायव्हर अनीलजी काळजीपूर्वक पुढे गेलेल्या वाहनांच्या पाऊलखुणांवरूनच जीप नेत आहेत. पण तरी कुठे कुठे जीपला ग्रिप मिळतच नाहीय. आणि ह्या चिखलामुळे रस्ता भुसभुशीत झालाय. म्हणजे कणकेसारखा. गाडी त्यात आत जातेय आणि मागचं चाक नुसतं फिरत बसतं आणि गरम होतं. तरी रस्त्यावर मिलिटरीचे लोक- इतर गाड्यांचे ड्रायव्हर्स वगैरे कोणी अशा जागेवर आहेत. त्यामुळे आम्ही तिथे अडकलो नाही. पण अशी कसरत दोनदा- तीनदा करावी लागली. अडकता अडकता जीप सुटली. कुठे कुठे ढकलावीही लागली. डोंगर उतरून रस्ता परत एकदा धबधब्यासदृश कालीगंगा नदीजवळ आला. कुठे ती जौलजिबीची रौद्र नदी आणि आता हा सौम्यसा छोटा धबधबा! सहज दगड पलीकडे फेकता येईल असा अरुंद प्रवाह! पुढे पुढे तर तो इतका छोटा झाला की, काही ठिकाणी सहज पायी ओलांडता यावा! पण बाकी नजारा अपूर्व! संध्याकाळच्या लाल प्रकाशातले हिमशिखर अवर्णनीय!
हिमालयाच्या इतकं आत यायला खरंच नशीब लागतं! तेही मानस सरोवर परिक्रमेच्या रूटवर! नशीबात नसेल तर हे जमतच नाही. इतका जबरदस्त हिमालय आणि त्याचा सखोल सत्संग! असा निसर्ग नतमस्तक करतो, आपला अहंकार अशा वातावरणामुळे गळून जातो. जे ध्यान करत नाहीत, त्यांच्याही बोलण्यात आलं की, सोबत प्रवास करणा-या आम्हा सगळ्यांचं काही गतजन्मीचं नातं असलं पाहिजे. त्याशिवाय आम्ही असे एकत्र इथे आलो नसतो! आणि अशा वातावरणात गाडीत पहाडी गाणी वाजत आहेत. त्यातलं एक गाणं विशेष लक्षात राहिलं- ‘तेरो मेरो रिश्तो पीछले जनम वा' असं काहीसं! आणि पुढे पुढे अंधारून आलं आणि गूंजी येतच नाहीय, तेव्हा भितीने मग ॐ नमोs शिवाय असं गाणं सुरू झालं. दूरवर काही वस्तीसारखं दिसतंय आणि मोबाईल टॉवरही दिसतंय. गूंजीच ते! पण ते जवळच येत नाहीय. पुढे गेलं की मधले डोंगर व मधलं अंतर दिसतंय. गूंजीला एक जत्रा आहे व त्यामुळे तिथे अनेक गाड्या जात आहेत. सो रस्ता अगदीच निर्जन नाहीय.
गूंजीच्या अगदी अलीकडे परत एका चेकपोस्टवर तपासणी झाली. आणि इथे मात्र इनर लाईन परमिट विचारले! सोबत जितूजी नव्हते, त्यामुळे त्यांची ओळखही कामी आली नाही. त्यांनी आम्हांला जवळ जवळ खडसावलंच की, तुम्ही परमिट नसतानाही इतके आत कसे आलात, येऊच कसं दिलं वगैरे. शेवटी आमची नीट चौकशी केली आणि अनीलजींचं ओळखपत्र ठेवून घेतल्यावर आम्हांला जाऊ दिलं. जत्रेमुळे अनेक लोक जात आहेत, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो. पण ते बोलले की, परमिट नसल्यामुळे पुढे ॐ पर्वत किंवा आदि कैलास पर्वत बघण्याच्या व्ह्यू पॉईंटला मात्र जाता येणार नाही. तसंही कोणामध्ये तेव्हा गूंजीच्या पुढचा विचार करण्याचंही त्राण नाहीय. कधी एकदा गूंजी येतं आणि आपण अंग टेकतो असं प्रत्येकाला झालं आहे. पण गूंजी काही केल्या येईना. शेवटी व्हॉकीटॉकीवरून जितूजींना फोन लावण्याचे प्रयत्न झाले. पण तसाही संपर्क झाला नाही. रस्त्यावर किलोमीटरचा एकही बोर्ड नाही. गाव जवळ आल्याच्या काहीच खुणा नाहीत. रस्त्यावर लोक मात्र आहेत- मिलिटरी, बीआरओवाले व त्यांचे काही मजूर, काही इतर गाडीवाले. असं करत करत एकदा जेव्हा काही लाईटस आजूबाजूला दिसले तेव्हा चौकशी केली की, गूंजी आलं का! तर ते गूंजीच आहे हे कळालं! हॉटेल- लॉज पुढे असतील असं म्हणून पुढे गेलो तर परत पुढे सुनसान झालं. परत उलटं येऊन चौकशी केली तेव्हा कळालं की हे आणि एवढंच गूंजी आहे! मग एक हॉटेल सापडलं. पण गाडीच्या बाहेर आल्यावरही सुटका नाही. कमालीचा गारठा. हात गार पडत आहेत.
त्या हॉटेलमध्ये चहाची ऑर्डर दिली आणि चौकशी केली. आम्ही मघाशी साधारण ३५०० मीटर उंचीवर होतो व त्यानंतर थोडं उतरलो असलो तरी किमान ३३०० मीटर उंचीवर नक्की असू असं वाटत होतं. चालताना- एकदम हालचाल करताना जरा सावकाश असं सगळ्यांना सांगितलं. सोबत एक १० वर्षांचा मुलगाही आहे, त्याला मात्र प्रवासात काहीच त्रास झाला नाही. मुक्कामाच्या जागेसाठी काही वेळ वाटत होतं की, जितूजी येईपर्यंत थांबावं, कारण ते आल्यावर व्यवस्था करतील असं वाटत होतं. पण हळु हळु थंडी अंगात भिनत चालली व त्यांची वाट पाहण्यापेक्षा आपलीच सोय केलेली बरी असं वाटलं. इथे जत्रेमुळे सरकारी- कुमाऊँ मण्डल विकास निगम चीही व्यवस्था होती. पण त्याऐवजी प्रायव्हेट हॉटेल बघू असं सगळ्यांचं मत पडलं. काही जणांनी तसं यथावकाश हॉटेल शोधलं. सगळे फुल आहेत. पण एका हॉटेल कम होम स्टेमध्ये एका रूममध्ये सगळ्यांची व्यवस्था झाली. नंतर रात्री जेवण केलं. प्रचंड थंडीमध्ये कुडकुडायला होत आहे. पण काय रोमांचक प्रवास होता! तीव्र चढ, घसरणारा रस्ता, दरीची सोबत, कणकेसारखा चिखल आणि उत्तुंग हिमाच्छादित शिखर! खरंच नशीब लागतं अशा जागी यायला! जीवनाने केलेली ही कृपाच! रात्रीच्या अंधारात आसपासचे शिखर नीट दिसत नाही आहेत. ढगही आहेत, त्यामुळे तारेही नीट दिसत नाही आहेत. पण उत्तरेचे तारे आणखी आकाश माथ्याच्या दिशेला सरकलेले दिसत आहेत. आजचा अनुभव इतका जबरदस्त आहे की, त्या थंडीतही तिथल्या तिथे तो रेकॉर्ड करावासा वाटला. प्रवासातले आणखी अनुभव व तपशील इथे ऐकता येतील. काय दिवस आणि काय रात्र आहे ही! उद्या ॐ पर्वत किंवा आदि कैलास जवळून बघायला मिळेल किंवा नाही, पण सगळ्यांना इथून सुखरूप कसं जाऊ, ही काळजी आहे! अक्षरश: श्वास रोखून धरायला लावणारा रस्ता! तिथे वावरताना सतत हेही गाणं आठवतंय-
चलता है जो ये कारवाँ, गूंजी सी है ये वादियाँ
है ये ज़मीं गूंजी गूंजी, है ये आसमां गूंजा गूंजा
हर रस्ते ने हर वादी ने हर पर्बत ने सदा दी
हम जीतेंगे हम जीतेंगे हम जीतेंगे हर बाज़ी
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर
गूंजीचा हँगओव्हर
२९ ऑक्टोबरची रात्र गुंजीमध्ये तशी सगळ्यांनाच कठीण गेली! एक तर अतिशय जास्त थंडी होती. शिवाय उंची साधारण ३३०० मीटर्स असल्यामुळे श्वास घेण्यामध्येही काहीसा त्रास होता. त्यामुळे झोपताना पांघरूण डोक्यावरून घेणं शक्य नव्हतं, त्यात धोका होता. सगळे एकाच खोलीत जमेल तितकी पांघरूणं आणि जाड गाद्या वगैरे घेऊन झोपलो. किती अनपेक्षित जागी आहोत! आणि अगदीच अनप्लॅन्ड प्रकारे! पण हेही तितकंच खरं की, प्लॅन केला असता तर कदाचित आलोच नसतो. कारण सगळे लोक काही त्या अर्थाने भटके किंवा ट्रेकर नाहीट. टूरिस्टच आहेत. त्यामुळे प्लॅन केलं नाही म्हणूनच येऊ शकलो. सगळे जण एकाच खोलीत असल्यामुळे थोडी ऊब मिळाली आणि खोली लाकडी असल्यामुळेही किंचित कमी थंडी जाणवली. अर्थात् व्यवस्थित अशी झोप कोणाचीच झाली नाही. पहाटेपासून सगळे जागे होते. इथलं पहाटेचं आकाश चुकायला नको म्हणून मी बाहेर आलो! पहाटे चंद्र उगवला होता आणि चंद्र प्रकाशात अगदी जवळचे शिखर मस्त चमकत होते! ढग आहेत, त्यामुळे तारे तितके चांगले दिसले नाहीत. आणि थंडी मात्र बोटं सुन्न करणारी आहे! आणि त्याही पेक्षा गमतीची गोष्ट म्हणजे हॉटेलच्या दरवाजापाशी ठेवलेल्या बादलीतलं पाणी गोठलं आहे!! रात्री हॉटेलवाल्याने जरा लांब असलेली बाथरूम दाखवली होती. तिथलं आतल्या प्लास्टीकच्या ड्रमातलं पाणी मात्र गोठलं नाहीय. त्या थंडीमध्ये ब्रश करणं हे एक भीषण दिव्य होतं. कसे बसे अनिवार्य आन्हिकं आवरले. अक्षरश: काही मिनिटांपर्यंत बोटं आखडली होती. आणि श्वास सोडणं म्हणजे निव्वळ धुम्रपान झालं होतं.
हळु हळु सगळेच उठले. बाहेर आवरून आले पण परत येऊन पांघरुणात बसले सगळे. कारण असह्य थंडी! चहाची तीव्र गरज होती (हातांना, चेह-याला आणि जीभेलाही), पण हॉटेलवाले उठले नसल्यामुळे चहासाठी थांबावं लागलं. हळु हळु आजूबाजूचे पर्यटक, गाड्यांचे ड्रायव्हर्स व जत्रेसाठी आलेली मंडळीसुद्धा हॉटेलकडे आली आणि मग वर्दळ सुरू झाली. काल रात्री जेवताना हॉटेलमधले काही अन्य प्रवासी म्हणाले होते की, आदि कैलास व ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी धारचुलावरूनच इनर लाईन परमिट घ्यावं लागतं. ते इथे मिळू शकत नाही. त्यामुळे आदि कैलास व ॐ पर्वताकडे जाणं कठीण आहे. त्यातच आदि कैलासच्या वाटेवर बर्फवृष्टी झाल्यामुळे तिकडे गाड्या जात नाही आहेत. त्यामुळे फक्त ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला जाण्याचा पर्याय आहे. पण तिथेही पुढे लगेचच परमिट विचारतील व तो आम्हांला मिळू शकत नाही आहे. हॉटेलवरून निघण्याच्या सुमारास जितूजी सुद्धा येऊन भेटले. त्यांनी सांगितलं की, त्यांची ती गाडी तिकडेच बंद पडली व पुढे आणताच आली नाही. त्यांच्या ग्रूपमधले काही जण लिफ्ट घेऊन आले तर काही २५ किमी चालत रात्री उशीरा आले. ते बोलले की, ते बाकी ग्रूप्ससोबतच थांबणार आहेत. पण आम्ही थोडा वेळ थांबलो तर आम्हांला ॐ पर्वत व्ह्यू पॉईंटला बाकी गाड्यांसोबत नेतील. पण कोणालाच ते पटलं नाही. थोड्या चर्चेने असं ठरवलं की, जिथपर्यंत जाऊ देतील तिथपर्यंत ॐ पर्वतच्या रोडवर जायचं आणि परमिट विचारून रोखलं की, तिथूनच परत यायचं. म्हणजे थोडक्यात आम्ही काला पानीपर्यंत जायला निघालो!
रस्त्यावरचा बर्फ
काला पानीचा रस्ता तसा ठीक आहे कळालं होतं. साधारण सकाळचे ८.३० पर्यंत निघालो. इथून काला पानी ८ किलोमीटर तरी असेल. काली गंगा नदीचं उगम स्थान! आणि तिथून ॐ पर्वताचा व्ह्यू पॉईंट म्हणजे नाभी ढांग हे आणखी ८ किलोमीटर पुढे आहे! एके काळी इथे यायचं निव्वळ स्वप्नच बघितलं होतं असा हा भाग! अद्भुत! निघताना ड्रायव्हर अनीलजींनी सांगितलं की, सकाळी त्यांनी गाडी धुताना वायपर्स सुरू केले तर वायपर्समधलं पाणी गोठलं होतं! गूंजीमध्ये रस्त्यावर काल जो चिखल होता तो आत्ता सगळा बर्फ झालेला दिसला! कमालीची थंडी वाजतेय. गाडीत सगळे बसल्यावर खूप वेळ हात एकमेकांवर चोळल्यावर बोटं थोडे मोकळे झाले! इथे सगळ्या बाजूंनी डोंगर आहेत, त्यामुळे ऊन मिळायला अजून खूप वेळ लागेल! अगदी कोई मिल गया पिक्चरमधल्या जादूसारखी अवस्था झालीय! ऊन हवंय भरपूर! काला पानीचा रस्ता साधारण खडी रस्ता आहे. चिखल नसल्यामुळे तितकं कठीण गेलं नाही. काल अनीलजी खूप घाबरले होते आणि अजूनही धारचुलाला पोहचेपर्यंत त्यांना चैन नसणार आहे. धबधब्यासारख्या काली गंगेच्या जवळून रस्ता चढत वर गेला. अर्ध्या तासामध्येच काला पानीला पोहचलो! तिथेही रस्त्यावर बर्फ दिसला. बर्फाचा तुकडा हातात घेतला! इथे मात्र सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी अडवलं आणि आम्ही काही न बोलता थोडा वेळ तिथे थांबून परत फिरलो. इथली उंची गूंजीहून आणखी जास्त म्हणजे ३७०० मीटर आहे. इथे समोर असलेल्या डोंगरांच्या मागे असल्यामुळे ॐ पर्वत जवळून दिसला नाही. इथून पुढे तीव्र चढाचा घाट आहे असं कळालं.
परत जाताना गूंजीमध्ये काल संध्याकाळी चहा घेतला त्या हॉटेलमध्ये आलू पराठा व चहा असा मस्त नाश्ता केला. इथे चक्क काही सायकलिस्ट दिसले! पण चौकशी केल्यावर कळालं की, ते गूंजीमध्येच फिरत आहेत व गाडीवर सायकली टाकून आले आहेत. इथे सायकल किंवा कोणत्याही अन्य वाहनापेक्षाही पायी जाणंच सेफ आहे! हाथी ना घोडा, यहाँ बस पैदल ही जाना है! आत्ता ऊन चांगलं पडलंय, त्यामुळे थंडीचा त्रास आता कमी झाला. जास्त वेळ न दवडता आता निघायचं आहे म्हणजे दिवस मावळताना तरी धारचुलाला पोहचता येईल! पण हा प्रवास खडतर असेल. ड्रायव्हर अनीलजींच्या चेह-यावर तणाव स्पष्ट दिसतोय. कालचे मोठे चढ आता उतार होतील. पण तरीही काही ठिकाणी तीव्र चढ आहेतच. आणि चिखलाचे काही पॅचेसही आहेत. आणि पहिल्याच अशा पॅचवर गाडी रुतली! चिखलामध्ये टायर्स जाऊन एक खड्ड्यासारखा भाग झाला होता. त्यामध्ये टायर फसलं. आणि कितीही जोर लावला तरी ते ग्रिप घेत नाहीय. नुसतं आवाज करतंय आणि गरम होतंय. शेवटी सगळे खाली उतरलो आणि गाडी ढकलून बघितली. रस्त्यावरचे इतरही लोक आले. पण तरीही ती ढकलली जात नाहीय. मागून एक मिलिटरीचं वाहन आलं. त्यांनी त्यांच्याकडे दोरखंड होता, त्याने आमची जीप मागे ओढून मोकळी केली. परत जीप नेताना ते अनीलजींना बोलले की, थोडी हलवत- वळवत न्या, म्हणजे पूर्ण चाक खड्ड्य़ात अडकणार नाही व ग्रिप मिळत राहील. त्यांनी प्रयत्न करून बघितले, पण जमलं नाही. मग शेवटी मिलिटरीच्या वाहनातल्या एका ड्रायव्हरने जोर लावून बरोबर जीप त्या पॅचमधून बाहेर काढली! त्यामधून सावरून पुढे जातोय तर आणखी एक असाच पॅच लागला. ह्यावेळी मात्र सगळे आधीच उतरले. अनीलजीही सावध झाले. इथे त्यांनी वेगळ्या प्रकारे जीप नेण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जीप मध्येच जाऊन फसली. इथला चिखल अक्षरश: मऊ कणीकासारखा किंवा स्पंजसारखा झालाय. त्यामध्ये चाक आत जातं पण ग्रिप मिळत नाही. इथेही परत खूप खटपट केली. मघासारखीच दुसरी गाडी मागून आली. तेव्हा ते बोलले की, आता जीप टो करूनच न्यावी लागेल आणि जीप टो करणं त्यांच्या गाडीला शक्य नाहीय! आता मात्र सगळेच चिंतीत झाले. अनीलजी तर अक्षरश: घाबरले होते. थोडा वेळ तसाच प्रयत्न झाला. कधी गाडी मागे ढकलून मोकळी केली, परत जोर लावून आणली. तरी ती फसत होती. काहीच जमत नसताना मागून एक मोठा पिक अप आला. त्या पिक अपच्या चालकाने सफाईने गाडी अक्षरश: नाचत नाचत त्या पॅचवरून उडवली. आम्ही त्या गाडीला थांबवलं व मदत मागितली. तो माणूसही तयार झाला! त्याला फक्त छोट्या गाडीची सवय नव्हती. म्हणून त्याने फक्त अनीलजींची परमिशन मागितली की, गाडी खूप जोराने न्यावी लागेल. इतकी जोराने की, मूळ मालक तितकी रिस्क घेत नाही. उपाय नव्हता, तेव्हा अनीलजींनी रुकार दिला. आणि त्या माणसाने अक्षरश: आडवी- तिडवी उडवत गाडी चिखलातून बाहेर काढली! अक्षरश: उडत उडत! गाडीतलं सगळं सामान आतमध्ये फेकलं गेलं! क्षणभर वाटलं जणू दूसरी गाडीच मागच्या बाजूने वेगात आलीय की काय! इतक्या वेगाने गाडी नेल्यामुळेच ती न अडकता पार झाली! पण इतक्या वेगाने नेण्यामध्ये धोकाही होताच. आम्हांला पुढे रस्त्याच्या पलीकडे उलटलेली एक जीपही दिसली! तो पॅच पार केल्यानंतरही ते अनुभवी ड्रायव्हर आमच्या जीपमध्येच थांबले. अनीलजींनी त्यांना विनंती केली, कारण पुढेही असे पॅचेस होते व त्यांच्याकडे अजून एक ड्रायव्हर त्यांच्या गाडीमध्ये होता!
पुढे रस्त्यावर अनेकदा "शट्ट" असा भाव मनात येत होता, पण गाडी अडकण्याची वेळ कुठे आली नाही. एकदा सगळे खाली उतरलो व त्या ड्रायव्हरने परत एकदा उडत गाडी नेली. त्याव्यतिरिक्त गाडीला अडचण अशी आली नाही. सुदैवाने तिचे सगळे भाग शाबूत राहिले. फक्त खालचा भाग किरकोळ घासला गेला होता. बाकी रस्ता तितकाच रोहमर्षक होता. फक्त हळु हळु हायसं वाटत गेलं की, चला आता हा रस्ता संपणार आहे. परत एकदा रस्त्यावरचे धबधबे लागले, त्यातलं इंद्रधनुष्यही परत अनुभवलं! हळु हळु उंची कमी होत गेली व सूर्य चढत गेला तसा थंडीचा त्रास कमी झाला व सगळ्यांच्या जीवात जीव आला. काली गंगा परत मोठी होत चालली! ह्या नदीची बाल अवस्था ते यौवनावस्था आम्हांला बघायला मिळाली! आसपासचा निसर्गही परत करडेपणाकडून हिरवाईकडे वळाला. तवा घाटच्या साधारण सहा- आठ किलोमीटर अलीकडे नेपाळच्या बाजूला काली गंगेला समांतर पाय-यांची पायवाट दिसत होती! निश्चित पूर्वीच्या काळी हा एक मुख्य पायी वाटेचा रूट असला पाहिजे! अजूनही पाय-या शाबूत असल्याचं ह्या बाजूने दिसतंय. अनेकदा नदीच्या अगदी जवळ येऊन ती पायवाट परत वर चढते व समांतर जाते आहे! तवाघाटमध्येसुद्धा ती पायवाट दिसली!

गूंजीचे स्थान!
खाली नदी व नदीच्या पलीकडे समांतर पायवाट
पुढचा प्रवास आरामात झाला. नशीबाने गाडीही फार मोठं नुकसान होण्यापासून वाचली! अनीलजींच्या जीवात जीव आला! नंतर त्यांनी सांगितलं की, आम्हांला मदत करणारे दुसरे जे ड्रायव्हर सोबत आले होते, त्यांनी दारू घेतली होती. आणि नंतर सत्गडला पोहचल्यावर ते बोलले की, त्यांनीही दारू घेतली होती! अन्यथा त्यांना चालवण्याची हिंमतच होत नव्हती. अगदी स्वाभाविक आहे हे. कारण अशा भयावह रस्त्यावर ड्रायव्हिंग हे अगदीच खडतर काम आहे. आणि अशी इतरही भयानक व थँकलेस कामं ही दारूच्या मदतीनेच तर केली जातात- पोस्ट मॉर्टम असेल किंवा गटर साफ करणं असेल. असो! धारचुलाला पोहचल्यावर जेव्हा नेटवर्क मिळालं आणि फोन सुरू झाला तेव्हा आधी गूंजीबद्दल व्यवस्थित माहिती घेतली! निघण्याच्या आधी जाऊ असं वाटलंच नव्हतं, त्यामुळे ती माहिती बघितली नव्हती! ती बघितली तेव्हा नीट कळालं. की गूंजी अगदी भारत- तिबेट- नेपाळ सीमेलगत आहे आणि ३२०० मीटर उंचीवर आहे! आणि काला पानी तर आता डिस्प्युटेड एरियामध्ये आहे. अगदीच सीमेलगत. आणि नेपाळने काही काळापूर्वीच काला पानीवर दावाही केला आहे. त्यामुळेच कदाचित भारत सरकारने थोडी धावाधाव करून हा ट्रेक रूट बांधला व तिथे यात्रा वगैरेही सुरू केल्या. एका बाजूला वाटतं की, चीनची आपल्यावर खरं तर कृपा आहे. चीनचा शह आहे म्हणूनच आपण इतक्या दुर्गम व कोप-यातल्या भागामध्येही रस्ते व अन्य व्यवस्था निर्माण करतोय. नाही तर अंदमान- निकोबारसारख्या दुर्लक्षित भागांसारखाच हा भाग दुर्लक्षित तर राहिला नसता असा प्रश्न पडतो. इंटरनेटवर गूंजीचं तपमान बघितलं तर पहाटेचं -५ दिसलं! खरंच हा परिसर तर इतका दुर्गम की, तिथे गावसदृश वस्ती आहे, हेच आश्चर्य आहे. तिथे हॉटेल व होम स्टे मिळालं, माणसं मिळाली, हेच आश्चर्य! आणि आता नोव्हेंबरमध्ये गूंजीतले लोक खाली उतरतात. हिवाळ्यात तिथे मिलिटरी वगळता कोणी राहात नाही असं कळालं!
असा हा गूंजीचा थरारक प्रवास! अगदीच अनप्लॅन्ड. आणि म्हणूनच प्रत्यक्षात आला. जर पुरेशी माहिती असती जाता आलं नसतं. अगदी अनीलजीसुद्धा त्यांना रस्ता माहिती नव्हता म्हणूनच तयार झाले होते. नाही तर इतर अनेकांनी आम्हांला नाहीच म्हंटलं होतं. आणि धारचुलावरून फोर बाय फोर जीपवालेच लोक जातात व तेही ४० हजार भाडं घेतात असं कळालं. अनीलजींनी त्यांना हे काहीच माहिती नसल्याने त्यांनी भाडं कमी घेतलं होतं. पण अर्थातच नंतर आम्ही त्यांनाही जास्त पैसे दिले व गाडीला झालेल्या किरकोळ नुकसानाचीही भरपाई दिली. ह्या प्रवासातली आणखी एक आठवण म्हणजे जेव्हा धारचुलामध्ये आम्ही काही लोकांना भेटत होतो, तेव्हा त्यातल्या एकाने आश्चर्य वाटून आम्हांला प्रश्न केला होता की, गूंजीला गेला होता? आणि परतही आलात!!!
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
सत्गड- कनालीछीना ट्रेक
३१ ऑक्टोबरची सकाळ! गूंजीवरून परत आल्यावर सत्गडमधली थंडी किती सुखद वाटतेय! सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय! गूंजीचं गूंजन अजूनही मनात सुरू आहे आणि ते इतक्यात थांबणार नाही! आज सलग दोन दिवसांच्या प्रवासानंतर सगळ्यांनाच आराम करायचा आहे. गूंजीचा प्रवास जीपने केला तरी खडतर होता व तोही एक प्रकारे ट्रेकसारखा थकवतो. त्यामुळे आरामाची गरज आहेच. तरीही इतका सुंदर निसर्ग आणि हिमालय म्हंटल्यावर फिरण्याचा मोह होणारच. आवरून फिरायला जायला निघालो. आणि सोबतचे मित्र व बाकीच्यांनी कनालीछीना ह्या जवळच्या गावात एका व्यक्तीला भेटायला जायचं ठरवलं. त्यानुसार मी माझा ट्रेकिंगचा प्लॅन बनवला. कनालीछीना गांव रस्त्याने इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे. पण इथून येताना ट्रेकची एक वाट आहे. अगदी गावा- गावांमधून येणारी पायवाट. योगायोगाने मला कनालीछीनामध्ये शाळेत जाणा-या एका मुलाची सोबतही मिळाली. ह्या पायवाटांमध्ये वाटाड्या असणं गरजेचं आहे. अन्यथा दिशा कळत नाहीत. असा आजचा ट्रेकिंगचा कार्यक्रम ठरला. फॅमिली व ग्रूपसोबत फिरत असल्यामुळे वेळेच्या मर्यादा आहेत. पण त्यामध्येही मस्त फिरणं होतंय.
सकाळी उठून सत्गडची वाट उतरून हायवेवर आलो. पिथौरागढ़- धारचुला महामार्ग! सत्गडच्या जवळ हा रस्ता अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे. काही वेळ रस्त्यावर फिरण्याचा आनंद घेतला. पुढे जाऊन परत एकदा हिमशिखरांचं दर्शन घेऊन आलो! आणि सोबतचे जीपने निघणार होते, त्यावेळेपर्यंत रोडवर त्यांना भेटलो. कालचे अनीलजीच जीपने कनालीछीनाला सोडणार आहेत. कनालीछीना हे इथलं तालुक्याचं ठिकाण आहे. सत्गडमधले अनेक मुलं- मुली कनालीछीनाच्या शाळांमध्येच जातात. ते रोडने जात नाहीत. मधून ट्रेकचा शॉर्ट कट आहे, त्यावरून जातात. सत्गड़मधला चेतन नावाचा शेजारीच राहणारा मुलगा आहे. त्याला कनालीछीनामध्ये काही काम असल्यामुळे तोही सोबत आहे. त्यामुळे येताना त्याच्यासोबत येऊ शकतो. आणि दोन- तीन दिवस त्याच्यासोबत क्रिकेट खेळत असल्यामुळे चांगली मैत्रीही झाली आहे. जीपने पंधरा मिनिटांमध्ये कनालीछीनाला पोहचलो. तिथे काही वेळ भेटी- गाठी झाल्या. कनालीछीना तालुक्याचं असलं तरी गावच आहे. पण काही दुकानं आहेत. काही शाळा, सरकारी कार्यालयं इ. आहेत. इथे पहाड़ी परिसरामध्ये सपाट जागेची कमतरता असल्यामुळे जिथे कुठे सपाट जागा असते, तिथे मावतील तितकी सरकारी कार्यालयं, दुकानं, मिलिटरीचे युनिटह इ. दिसतात. शिवाय तुलनेने छोट्या गावांमध्येही शहरामध्ये मिळणा-या ब-याच वस्तु मिळतात.
इथे ज्यांना आम्ही भेटलो होतो, त्यांची मोठी बाग आहे. बागेमध्ये संत्र्यासारखं माल्टा नावाचं फळही दिसलं. त्यांनी इथे पॉली हाऊस बांधले आहेत. त्या हाऊसेसच्या आतमध्ये गेल्यावर एकदम ऊबदार वाटलं. तिथलं तपमान नियंत्रित केलेलं असतं. काही दिवसांपूर्वी जो मोठा पाऊस आला होता, तेव्हा इथल्या बागेचंही नुकसान झालं होतं, असं ते बोलले. इथल्या गाठी भेटी झाल्यावर सगळे जण परत जायला निघाले. चेतनचं कनालीछीनामधलं काम झाल्यावर चेतनशी गप्पा मारत मीसुद्धा निघालो. कनालीछीना गावात वरच्या बाजूनेच पायवाट निघाली. माझ्या शूजच्या बाबतीत गंमत झालीय. थोड्याच दिवसांपूर्वी बूंगाछीनामध्ये माझ्या शूजचं सोल फाटलं. त्यामुळे नवीन शूज घ्यावे लागले. इथे शूज कम चप्पल असे फ्लाईटचे शूज सगळे वापरतात. तसेच शूज घेतले. अगदी साधे. पण ग्रीप मस्त आहे. मातीमध्ये किंवा दगडावर अजिबात घसरत नाहीत. ह्या पायवाटेवर लोकांचं जाणं- येणं आहे. आणि वस्तीला तशी लागून लागूनच पाय वाट जाते आहे. मधून मधून झाडीमधून दूरवरचे शिखर दिसतात! इथे सगळीकडे इतका सुंदर निसर्ग आहे की, कुठेही फिरा, कधीही फिरा, लॉटरीच लॉटरी आहे. ह्या प्रसन्नतेचा आणि शांततेचा आनंद घेऊन तितका कमी. त्यामुळे इकडे असताना जेव्हा व जितकं जमेल तितकं फिरत राहणार आहे.
पुढे जाता जाता पाय वाट रस्त्याला मिळाली. थोडं अंतर रस्त्यावरून गेल्यावर परत पाय वाट डोंगरात चढली आणि मग सत्गडमधला चढ लागला. घरं आणि शेतंही लागली. असं करत रमत गमत फिरत तासाभरामध्ये सत्गडला पोहचलो. छोटा पण मस्त ट्रेक झाला. सत्गडच्या घरी गच्चीत मस्त समोरच्या नजा-याचा आणि ऊन्हाचा आनंद घेत थांबलो. नंतर मुलांसोबत क्रिकेट खेळलो. दुपारी दुकानात काही काम होतं म्हणून परत एकदा रोडवर जाऊन आलो, १० मिनिटांचा पण छानसा सत्गड ट्रेक झाला. रात्री काही वेळ थंडीमध्ये शक्य तितकं आकाश दर्शन केलं आणि मस्त लवकर झोपून गेलो. इथली प्रमाण वेळ खरं तर आपल्यापेक्षा दोन तास पुढे आहे! दिवस पहाटे ५ ला सुरू होतो व रात्री ८ ला संपून जातो! पुढच्या दिवसांमध्ये आता आणखी ब-याच ठिकाणी फिरणं आणि ट्रेकिंग होणार आहे.
आज केलेले दोन छोटे ट्रेक.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
१ नोव्हेंबरचा दिवस. सत्गडमधली थंड सकाळ! परवाच्या प्रवासानंतर आता थोडा त्रास होतोय. पोटाला त्रास झाला. तीव्र थंडी, प्रवासाची दगदग आणि हॉटेलचं खाणं ह्यामुळे अखेर त्रास झालाच. त्यामुळे थोडा आराम करावासा वाटला. पण इतकाही त्रास नाहीय की, रोजचा इथलं फिरणं चुकवावं लागेल. त्यामुळे आवरून सत्गड हा गड- उतार होऊन खाली रोडवर आलो आणि फिरण्याचा आनंद घेतला. फास्ट वॉक करताना हळु हळु हुडहुडी कमी झाली आणि ताजं वाटलं. काही अंतर फिरल्यावर परत निघालो. वाटेमध्ये आमच्या एका नातेवाईकांचं हॉटेल आहे. त्यांच्याकडे गरम चहा घेतला. घरी नेण्यासाठी आलू पराठे पार्सल घेतले. तोपर्यंत त्यांच्यासोबत छान गप्पाही झाल्या.
ह्या भागातले अनेक जण शहरांमध्ये स्थायिक आहेत. दिल्ली, मुंबई- महाराष्ट्र अशा जागी ते मुख्यत: गेलेले आहेत. खूप जण हॉटेल लाईनमध्येही काम करतात. घरामधून एक जण तरी बाहेर शहरामध्ये असतो. पण कोरोनाच्या काळामध्ये आलेल्या विपरित परिस्थितीमुळे त्यातले बरेच जण गावी परतले. ह्या नातेवाईकांनी पुण्यातून इकडे परत येऊन आधीचं छोटं हॉटेल परत सुरू केलं. आता ते त्यांना वाढवायचं आहे. पण कोरोनाचा कहर सुरू असताना ते शक्य होत नाहीय. इतरही ठिकाणचे लोक असेच बाहेरगावी गेलेले कोरोनामुळे परत आले आणि आता ते गावातच नवीन उद्योग सुरू करत आहेत. इकडच्या गावांमध्ये उद्योग-धंदे तसे कमीच आहेत. मोठे धंदे तर मोजकेच- शेती, मिलिटरी, पर्यटन किंवा हॉटेल- ड्रायव्हिंग. त्याबरोबर आता जिथे शहर आहेत, थोडी दाट वस्ती आहे, तिथे इतरही व्यवसाय सुरू होत आहेत जसे- जिम, ब्युटी पार्लर, मोबाईल शॉप व इतर. शहरामध्ये काही वर्षं काम करून तरीही गावात स्थायिक होणा-या ह्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. पहाड़ी भागात निसर्गाच्या सान्निध्याचे सर्व लाभ त्यांना मिळतात. पहाडी समज, शहाणपणा, नैसर्गिक साधेपणा हे गुण आहेत व त्याबरोबर शहरामध्ये अनेक वर्षं काम केल्यामुळे बाहेरच्या जगातल्या गोष्टी, नवीन कौशल्ये, बुद्धीमत्तेला पडलेले पैलू अशाही जमेच्या बाजू त्यांना मिळाल्या आहेत! आणि आता ते त्यांच्या गावालाही आणखी समृद्ध करत आहेत. असो.
पराठा पार्सल घेऊन सत्गडला परत आलो. मस्त फिरणं झालं. त्याशिवाय दुपारीही एकदा परत खाली येऊन गेलो. ट्रेकिंगची अशी मस्त चंगळ सुरू आहे. सत्गडसारखं गाव आणि हिमालयाच्या शब्दश: कुशीत राहणारे लोक जवळून बघायला मिळत आहेत. हिमालय, हिमालय म्हणून आपण बाहेरच्या लोकांना खूप कौतुक असतं. खूप ओढ असते. हिमालयात गेल्यावर सर्व शांती मिळेल असं वाटत असतं. पण जे लोक प्रत्यक्ष हिमालयातच राहतात, त्यांच्या बाबतीत कशी स्थिती असेल? इथे त्याचं उत्तर मिळत आहे. इकडच्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्याचे अनेक लाभ आहेतच. पण त्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व आनंदी आनंद व शांती- समाधान आहे का? तर तसं नाही. इकडेही तणाव आहेत. अनेक समस्या आहेत. अंधश्रद्धा, मागासलेपण आहे. त्याबरोबर आरोग्याच्या सुविधांच्या समस्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं शोषण आहे. व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात आहे. अक्षरश: उडता पंजाबसोबत कुठे कुठे तुलना करता येईल इतकी. त्यामुळे इथला सर्व युवा वर्ग तितका सक्रिय आणि चांगल्या कामांमध्ये गुंतलेला आहे, असं म्हणता येत नाही. शिवाय निसर्ग- मानव संघर्ष आहे. नैसर्गिक आपत्तीमधली अनिश्चितता आहे आणि वन्य श्वापदांच्या हल्ल्यांचं सावटही आहे. हे सगळं बघताना वाटतंय की, केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही.
दुपारी थोडा आराम केला. सोबत आलेले मित्र आज परतीच्या प्रवासाला निघाले. आणि अदूचे मामा- मामी दिल्लीवरून पोहचले. आम्ही लवकरच बुंगाछीना गावामध्ये एका पूजेसाठी जाऊ. मामा- मामी दिल्लीवरून बसने थकवणारा प्रवास करून आले तरी थकले नव्हते. मामाने मुलांसोबत क्रिकेट खेळून त्यांना तुफान दमवलं. मुलांना त्याला आउटच करता येत नव्हतं. आणि मामी तर पहिल्यांदाच हिमालयात येत होत्या, प्रवासाचा त्यांना तसा त्रास झाला नाही आणि त्यांनी तर चक्क पिथौरागढ़ ते सत्गड ह्यामध्ये काही अंतर जीपसुद्धा चालवली. अशी गंमत. माझ्या तब्येतीचा मात्र थोडा खेळ झाला. दुपारचं जेवण जेवल्यावर घशाखाली उतरलंच नाही. दिवसभर पोट गच्च राहिलं आणि अखेरीस रात्री उलटी केल्यावर हलकं वाटलं. उद्या बुंगाछीनाला जाऊ आणि तिथे परत एकदा मस्त फिरायला मिळेल. इथे असतानाचा एक एक दिवस पुरेपूर फिरायचं आहे.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक
४ नोव्हेंबरला बूँगाछीना गावामध्ये पूजा पार पडली. उत्तराखण्डमधील सामुदायिक लोक जीवनाचा अनुभव घेता आला. त्या निमित्ताने नातेवाईकांसोबत भेटी गाठी झाल्या. सगळ्यांचे अपडेटस कळाले. आज लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे रात्री सत्गडला पोहचायचं आहे. सर्व नातेवाईकांचा व बूँगाछीना गावातल्या रमणीय परिसराचा निरोप घेऊन निघालो. दिवाळीचा दिवस असल्यामुळे पिथौरागढ़ला जाणा-या शेअर जीप्स मिळत नाही आहेत. त्यातच इथल्या सरकारी बस ड्रायव्हर्सचाही कुठे कुठे संप सुरू आहे. त्यामुळे खूप वेळ रस्त्यावर वाट बघत थांबलो. दुपारच्या उन्हात सुखद वाटतंय. पण हळु हळु संध्याकाळ होतेय, तसं स्वेटर चढवावं लागलं. शेवटी बुंगाछीनामधलाच एक जण त्याच्या जीपने सोडायला तयार झाला. इथे पहाड़ी रस्ते आहेत, त्यामुळे वाहनांचा दर तुलनेने बराच जास्त आहे. सरकारी बस साधारणपणे एका किलोमीटरसाठी दोन रूपये घेते तर शेअर जीप चार किंवा पाच रूपये घेते. त्यातच पेट्रोलचे वाढलेले भाव आणि कोरोनामध्ये आलेली मंदी. इथे मुख्य व्यवसाय असलेला पर्यटन उद्योगही प्रभावित झालेला आहे. असो.
बुंगाछीनावरून पिथौरागढ़ला न जाता एक मार्ग डायरेक्ट कनालीछीनाकडे जातो. हा सत्गडचा शॉर्ट कट आहे. इथून मोठी वाहनं तितकी जात नाहीत. हा एक नवीन परिसर बघायला मिळाला. अगदी डोंगराच्या आतमधून जाणारा रस्ता. वाटेत लागणारी छोटी गावं आणि हिरवागार निसर्ग! अक्षरश: देवदारांचं राज्य! इतके दिवस इकडे फिरत असूनही ह्या रस्त्यावरचे नजारे विशेष भावले. तेव्हाच मनात ठरवलं की, जमेल तसा ह्या रोडवर एक ट्रेक नक्की करेन. आणि काही दिवसांमध्येच तो योग आलासुद्धा. ह्या रस्त्यावर ऑक्टोबरमधल्या पावसामुळे झालेली हानी अजून जाणवते आहे. कुठे कुठे रस्ता अगदीच जेमतेम जीप पास होईल इतका छोटा झालाय. अनेक ठिकाणी काही भाग वाहून गेलाय. आणि दूरवर जे नजारे दिसतात, त्यांच्यातही हिरव्यागार वनश्रीमध्ये मोठे पिवळे पट्टे दिसतात. हे पिवळे पट्टे म्हणजे वस्तुत: लँडस्लाईड झालेल्या जागा आहेत. तिथे पाणी जोराने आल्यामुळे जमीन खचली व रस्ता वाहून गेला. झाडंही कोसळली. दूरवर रमणीय दृश्यांमध्ये हा डाग सगळीकडेच दिसतोय...
५ नोव्हेंबरची सकाळ. सगळ्यांनी मिळून पुढच्या गावाला जाण्याचं ठरतंय. जेव्हा दुपारपर्यंत वेळ आहे, असं लक्षात आलं तेव्हा सत्गडच्या अगदी बाजूला असलेल्या ध्वज मंदिराकडे जायचं ठरवलं. अतिशय रमणीय असा हा ट्रेक पूर्वी केलेला होता. ह्या डोंगरावर ह्या परिसरातलं शिखर आहे. आणि इथलं मंदिर पवित्र मानलं जातं. त्यामुळे थंडीमध्ये इच्छा नसूनही आंघोळ करून घ्यावी लागली. इथल्या ट्रेकबद्दल दोन गोष्टी अशा आहेत की, पायवाट अगदी निर्जन आहे. शिवाय सगळीकडे जंगलाचा परिसर. त्यामुळे शक्यतो एकट्याने जाऊ देत नाहीत. आणि पायवाट तशी सोपी आहे, खूप बिकट नाहीय. पण नेमकी पायवाट कळण्यासाठी वाटाड्या हवा. त्यामुळेच इतके दिवस इथे जाता आलं नव्हतं. पण अखेर तो योग आला आणि माझ्यासोबत १० वर्षांचा आदित्य यायला तयार झाला. तो इथे अनेकदा आलाय, त्यामुळे त्याला सगळी वाट माहिती आहे. त्याच्याबरोबर घरच्यांनी पूजेचं साहित्य, हार- उदबत्ती आणि तिथे मुक्कामी असणा-या साधूबाबांसाठी अन्नही दिलं. आणि निघालो मस्त!
साधारण तीन किलोमीटर चढाच्या वाटेवरचा हा ट्रेक आहे. नवख्या ट्रेकर्ससाठी थोडा थकवणारा व कठीण असेल. पण मला अजिबात थकवणारा वाटला नाही आणि कठीणही वाटला नाही. ह्यामध्ये घनदाट देवदारांच्या राज्यातून पायवाट वर चढत जाते. साधारण १९०० मीटर उंचीच्या सत्गडच्या वरच्या टोकापासून सुरू करून ही वाट २४५० मीटर उंचीच्या ध्वज मंदिरापर्यंत जाते. पुरेशी मोठी वाट आहे व आसपास दाट झाडी आहे. त्यामुळे दरीचं एक्स्पोजर नाही. पायवाटेवर दगड छान बसवले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी भर दुपारीही दवामुळे ओलावा असला तरी पाय घसरत नाहीत. मध्ये मध्ये बसण्याच्या जागाही आहेत. पण ह्यापेक्षा इथे वाघाची भिती जास्त आहे. कारण इकडे अलीकडे वाघाचा वावर खूप वाढला आहे. काही अंतरापर्यंत गवताचे भारे आणणारे लोक ये- जा करतात. पुढे मात्र वाट सरळ शिखराकडे जाते. आम्हाला दोघांना अगदी मंदिर येईपर्यंत कोणीही वाटसरू दिसला नाही.
पर्वतांची दिसे दूर रांग!
पायवाट जशी हळु हळु वर चढली, तसे दूरवरचे नजारे खूपच सुंदर दिसत आहेत. २०१७ मध्ये आलो होतो, तेव्हा आकाश इतकं स्पष्ट नव्हतं. त्यामुळे दूरवरचे शिखर नीट दिसले नव्हते. पण आत्ता ते खूपच सुंदर दिसत आहेत. दूरवरचे हिम- शिखर स्पष्ट दिसत आहेत. अवाक् करणारा अनुभव! त्याबरोबर घनदाट जंगल आणि भर दुपारीसुद्धा थंडी आणि अंधार! मध्येच एका ठिकाणी फडफड असा आवाज आला. एक सेकंद वाघाची भिती वाटली आणि लगेचच कळालं की, हा तर पक्षी आहे. मनसोक्त फोटो घेत घेत साधारण सव्वा तासाने मंदिराजवळ पोहचलो. इथे तीन मंदिर आहेत. एक गुहाही आहे. तिथेही गेलो. इथे राहणारे साधू मंदिर परिसरात नाही दिसले. बाकी काही लोक मात्र दिसले. शंभर एक पाय-या चढून सर्वांत वरच्या मंदिरावर गेलो. मोठी घंटा वाजवली, ती सत्गडमध्येही ऐकू जाते. अप्रतिम नजारे! अक्षरश: एका बाजूला नजरेत न मावणारी हिमशिखर रांग दिसतेय! एका दृष्टीक्षेपात न मावणारी पर्वतांची रांग! खाली सत्गड व बाकीची गावं, दूरवर बारीक रेषांसारखे दिसणारे नागमोडी रस्ते आणि हिमशिखर! विहंगम! खाली सत्गड व बाकीची गावं, दूरवर बारीक रेषांसारखे दिसणारे नागमोडी रस्ते आणि हिमशिखर! आणि अर्थातच अनेक ठिकाणी लँड स्लाईडच्या खुणा. खूप मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतोय! आणि इथे मोबाईलला नेपाळचं रोमिंग लागलं. कारण इथून नेपाळ सीमा जवळ आहे. काही मिनिट इथे ध्यान केलं. आणि परत फिरलो. खालच्या अंगणात एक छोटं मंदिर आहे. आदित्यने मला सांगितलं की, त्याला ह्या मंदिरात भिती वाटते. कारण आतून मंदिराच्या छताकडे बघितलं तर ते खूप जास्त उंच वाटतं आणि बाहेरून ते छोटं दिसतं! आणि खरंच असं जाणवत होतं!
उतरताना वेगाने उतरलो. फक्त एक- दोन ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता होती, तिथे काळजीपूर्वक उतरलो. आणि अर्थातच अप्रतिम नजारे सतत थांबायला भाग पाडत होते. त्यांना मनामध्ये साठवून घेतलं. दुपार होण्याच्या आत घरी पोहचलो. मंदिरात फिरणं व आदित्यची पूजा ह्यामध्ये जास्त गेला, चालणं दोन तासांच्या आत पूर्ण झालं. अतिशय रमणीय असा हा ट्रेक! पण एका अर्थाने खाली शेताचा परिसर येईपर्यंत मनामध्ये वाघाची दहशत आणि धाकधुक होतीच. चालल्यामुळे आलेली उष्णता कमी झाल्यावर परत थंडी सुरू झाली! दुपारी मनसोक्त ऊन खाल्लं आणि मग आणखी एका गावाला जायला निघालो. बस्तड़ी हे गांव २०१६ मध्ये भूस्खलनामध्ये पूर्ण उद्ध्वस्त झालं. अक्षरश: डोंगराच्या ढिगा-याकडे गाडलं गेलं. त्यात आमचेही अनेक नातेवाईक गेले. त्यातून वाचलेले आता जवळच्या शिंगाली ह्या गावी राहतात. पिथौरागढ़- कनालीछीना- ओगला असा मार्ग आहे. ओगलामध्ये हॉटेलमध्ये चहा घेत होतो तेव्हा बाजूलाच कुमाऊँ रेजिमेंटचे जवानही दिसले! संध्याकाळच्या ऊन्हामध्ये हिमशिखर केशरी रंगाचे दिसत आहेत! शिंगालीला पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली. इथेही मला काही अंतर पायी जायचं होतं, पण अंधार पडत असल्यामुळे मला थांबवलं गेलं. खरंच अगदी आतून पहाड़ी प्रदेश बघायला मिळतोय. तिथल्या आयुष्याच्या कॅनव्हासवरचे असंख्य रंग समोर उलगडत आहेत.
.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक
उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक
६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी शिंगाली गावात पोहचलो. तेव्हा मनामध्ये बस्तडी गावातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. ह्या गावातल्या नातेवाईकांकडे मी डिसेंबर २०११ मध्ये एकदाच राहिलो होतो. डोंगर उतारावर आणि दरीच्या थोडं अलीकडे वसलेलं हे गाव आहे. हा सगळा पहाड़ी परिसर. जिथे डोंगर असतात तिथे द-या असतातच. आणि रस्ते तर सतत घाटांचेच असतात. हे गाव अशा जागी हे आहे की, पिथौरागढ़ला परत येताना रस्ता जेव्हा काही घाट चढून परत खाली व दरीच्या पलीकडे समोर येतो, तेव्हा तिथूनही बस्तड़ीचा परिसर दिसतो. ३० जून २०१६ ची रात्र इथे काळरात्र ठरली. खूप मोठा पाऊस सुरू होता. ढगफुटी, वीजांचा कडकडाट आणि साचत चाललेलं पाणी. आणि लोकांना रात्री भितीची जाणीव झाली. सगळे लोक जागे झाले आणि आमच्या नातेवाईकांपैकी गावात होते ते सगळे जण एका घरामध्ये एकत्र आले. आणि पूर्ण गावावरच दरड कोसळली! अचानक झालेल्या पावसामुळे वरच्या बाजूने पाण्याचा खूप मोठा प्रवाह वेगाने खाली आला आणि तो डोंगराच्या क्षमतेपेक्षा मोठा ठरला. त्यामुळे डोंगर कोसळला आणि त्याखाली असलेलं बस्तडी गांव गाडलं गेलं. गावातल्या २१ व्यक्तींचे प्राण त्यात गेले आणि जवळ जवळ सगळं गाव उजाड झालं. आणि डोंगराची माती इतकी जास्त पडली होती की अनेक दिवस शोध करूनही मृतांचे अवशेषही मिळू शकले नाहीत. आमचे त्या वेळी तिथे असलेले अनेक नातेवाईक त्यात गेले. जे योगायोगाने बाहेर होते, तेच वाचले. महाराष्ट्रात २०१४ मध्ये माळीण गावामध्ये जी दुर्घटना घडली होती, काहीशी तशीच ही आपत्ती होती...
ह्या मोठ्या घटनेची कारणं तशी बघितली तर स्पष्ट आहेत. निसर्गामध्ये अचानक काहीच होत नाही. निसर्ग अनेक प्रकारे पूर्व सूचना देत असतो. पण आपण त्यातून शिकत नाही. हिमालयात जसे जसे झाडं कमी होत गेले, निसर्गावरचा मानवी ताण जसा वाढला, तशी तिथली पर्यावरणीय व्यवस्था कमकुवत होत गेली. लँड स्लाईडमध्ये गावंच्या गावं आता अनेकदा गाडले जातात. पण त्याची सुरुवात ही पाण्याच्या अचानक आलेल्या प्रवाहामुळे एक घर वाहून जाणे अशी असते. मानवी कृत्यांमुळे व झाडं विरळ झाल्यामुळे डोंगराचा पाया कमकुवत होतो. शेतीमध्ये बदल झालेले असतात. त्या परिसरामधल्या निसर्गाची काळजी घेणारं मनुष्यबळ स्थलांतरामुळे कमी झालेलं असतं. शिवाय पाणी वाहून जाण्याचे मार्ग ताणामुळे कमकुवत झालेले असतात. आज सगळ्या शहरांच्या जवळपासचे डोंगर अगदी पोखरलेले दिसतात. पाण्याच्या वाहून जाण्याच्या वाटा रोखल्या जातात. त्यामुळे आता प्रत्येक पावसाळाच चिंताजनक ठरणार आहे. त्याबरोबर वातावरण बदलामुळे एकाच वेळी खूप जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलंय. एकदम इतका पाऊस झाला तर तिथली पर्यावरणीय व्यवस्था तो सहन करू शकत नाही... कमी अधिक हे सगळीकडेच होणार आहे. आणि ह्या बाबतीत आपली मानसिकता कशी की सरकारी पातळीवर २०१३ चा उत्तराखंडचा महापूर किंवा ही आपत्ती ह्यांना "दैवी आपत्ती" म्हंटलं जातं!! ह्या अपघातानंतर बस्तड़ी गांव राहण्यायोग्य राहिलं नाही. त्या संदर्भातली एक बातमी इथे वाचता येईल.
ज्यांनी जवळचे लोक गमावले त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली. अशी दुर्घटना वस्तुत: मृत्युचा संदेश असतो की, जागे व्हा, सावध हा. भ्रमात राहू नका. आणि आपण दुस-या कुठल्या जागी असलो तरी हा इशारा आपल्यासाठीही तितकाच लागू आहे. असो. आमचे जे नातेवाईक वाचले, त्यांनी नंतर बस्तडीच्या जवळ असलेल्या व थोडं जास्त सुरक्षित असलेल्या शिंगाली गावामध्ये परत नवी इनिंग सुरू केली. जीवन थांबत नाही. काही प्रवासी उतरले म्हणून ट्रेन थांबत नसते. इथे त्यांनी नवीन घर बांधलं आणि पुढचा संसार सुरू झाला. त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा आधी अंगणातल्या चुलीवर मस्त ऊब घेतली. ह्या भेटीच्या वेळेस त्या आठवणींचं सावट नाहीय. कारण आता साडेचार वर्षं होतील. ट्रेनने नंतर पुढे बरंच अंतर कापलं आहे. इथल्या घरात आता छोटी दोन जुळी बाळं झाली आहेत! इथे अदू २०१७ मध्ये एकदा येऊन गेली होती- दीड वर्षांची असताना. तेव्हा ती ज्या कुत्र्याच्या पाठीवर बसली होती, तो कुत्रा कल्लूही भेटला! बाकी भरपूर गप्पा- टप्पा झाल्या. बाकीचे गप्पांमध्ये व्यस्त असले तरी माझ्या मनातून बस्तड़ीचा विषय जात नाहीय. इथून अगदी पंधरा मिनिट पायवाटेने उतरून गेल्यावर त्या गावात गेलो होतो हे आठवतंय सारखं...
सकाळी लवकर जाग आली. आवरून बाहेर आलो आणि आसपासचा परिसर बघितला. पूर्वी रस्ता शिंगालीला संपायचा. पण आता रस्ता थोडा आतपर्यंत गेलाय. बस्तड़ी गांव नकाशावर आहे व थोडी वस्तीही आहे तिथे. इथे अंगणातूनसुद्धा पंचचूली शिखर सुंदर दिसत आहेत! पूर्वेला डोंगर असल्यामुळे सूर्याचं ऊन यायला मात्र बराच वेळ लागला. तोपर्यंत चहाचे अनेक राउंडस झाले. बाकीच्यांना मुख्य रोडवर ओगला येथे भेटतो असं सांगून निघालो. आधी बस्तड़ीच्या परिसरात गेलो. मला नातेवाईकांनी सांगितलं होतं की, आता तिथे काहीच अवशेष नाही आहेत. तरी एकदा बघावसं वाटलं. गावात उतरणा-या पायवाटेपर्यंत गेलो आणि तिथून परत फिरलो. आता साधारण पाच किलोमीटरचा मस्त ट्रेक करायला मिळणार आहे.
पंचचूली व इतर शिखर दिसत आहेत. इतका सुंदर निसर्ग आहे की, इथे चालणं निव्वळ सुख आहे. अगदी शांत रस्ता, मोकळं आकाश, रमणीय परिसर! और क्या! मनसोक्त फोटो घेत घेत निघालो. दूरवरचे गावंही दिसत आहेत. दूरवरून दिसणारं अस्कोट ओळखू आलं. डोंगरांच्या मध्ये दिसणारे पिवळे पॅचेस लँडस्लाईडसची आठवण करून देत आहेत! रस्ता जसा वळत वळत जातोय तसे अनेक दूरवरचे हिमशिखर वेगवेगळ्या बाजूने दिसत आहेत. खरंच खूप मोठं सुख आहे हे. नशीबच लागत असावं अशा फिरण्यासाठीही. वाटेत छोटी छोटी गावं आहेत. घर रस्त्याच्या खाली असल्यामुळे एका घराची गच्ची रस्त्याला लागून असलेली दिसली. पुढे देवदारांचं सुंदर वन लागलं. तसं इथे वन सगळीकडेच आहे. त्यामुळे रात्री इथे कोणी एकट्याने पायी फिरत नाहीत. हिमालयातील पायथ्यापासून सुरू होणारा पहाड़! असंख्य वळणं, असंख्य डोंगर रांगा- द-या ह्यामधून होणारा त्याचा प्रवास आणि मग हिमशिखरांचा कळस! हिमालयाचा हा आवाका, हिमशिखरांमधल्या कळसामध्येही त्याच्यामागच्या पायथ्याचा पाया बघताना अध्यात्मिक साधनेची आठवण झाली. साधनाही अशीच असते ना. निम्न स्तरापासून असंख्य अनुभव, असंख्य वळणं आणि चढ- उतार घेत पुढे जाणारी. तेही एक शिखरच ना. असो.
तासाभराचा सुंदर ट्रेक झाला आणि ओगलाला पोहचलो. बाकीचे नंतर वाहनाने आले. परत जाताना सत्गडला थांबण्याच्या ऐवजी पिथौरागढ़ला एका नातेवाईकांकडे आलो. दुपारी थोडा आराम झाला. नंतर बाकीचे जणं शॉपिंगसाठी गेले. मी पिथौरागढ़मध्ये माहिती घेतली की, इथे ट्रेकिंगसाठी कुठे फिरायला चांगली जागा आहे. तेव्हा कळालं की, इथे चंडाक हिल म्हणून सुंदर परिसर आहे. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तेव्हा तिथे जायचं ठरवलं. संध्याकाळी पिथौरागढ़मध्ये थोडं फिरलो. इथे तशी थंडी नेहमीच असते. पण कडक थंडी दोन- तीन महिने असते. अर्थात् इथेही आता पूर्वीच्या तुलनेत बर्फ खूप उशीरा आणि कमी पडतो. पूर्वी डिसेंबरमध्ये बर्फ पडायचा. आता लोक सांगतात की जानेवारीमध्ये थोडे दिवसच पडतो.
पण थंडी असतेच. त्यामुळे घरोघरी रूम हीटर आहेतच. त्याशिवाय घरांच्या भिंतीही जाड असतात. शहर बघताना घरांचा हा फरक लगेच जाणवतो. इकडे फिरताना ॐ पर्वताचं पोस्टर शोधतोय, पण कुठेच मिळत नाहीय. आता लवकरच परत जायचं आहे. पण तत्पूर्वी शक्य तितकं फिरल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक
(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)
रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक
७ नोव्हेंबरची सकाळ. कालचा मुक्काम पिथौरागढ़मध्येच होता. दुमजली घर, अंगण आणि अंगणात सुंदर झाडं आणि फुलं! इथे पूर्वेच्या बाजूला मोठा डोंगर नाहीय. त्यामुळे ऊन सकाळी ६ वाजताच आलं. हे घर थोडं उंचावर असल्यामुळे समोर पिथौरागढ़ शहराचा विस्तार दिसतोय. आणि शहराला लागून छोट्या- मोठ्या डोंगर रांगा. इथून चंडाक हिल परिसराचं अंतर साधारण ८ किलोमीटर आहे. तिथून थोडं पुढे मोस्टा मनू मंदिर आहे. तिथपर्यंत फिरायला जायचं ठरवलं. जाऊन येऊन साधारण १८- २० किलोमीटर ट्रेक होईल. कधीही न बघितलेल्या परिसरामध्ये मस्त ट्रेक होईल. पाण्य़ाची बाटली, काही चिक्क्या असं थोडं सामान पाठीवर घेऊन निघालो. रस्ता आधी पिथौरागढ़ शहरामध्ये जाईल आणि नंतर तिथलं मेन मार्केट असलेल्या सिल्थाम परिसरातून चंडाक हिलचा रस्ता मिळेल. ह्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आयटीबीपी आणि बीआरओचे सेंटर्स आहेत. मिलिटरीची ये- जा असतेच. फास्ट वॉक करत वीस मिनिटांमध्ये मुख्य शहरात पोहचलो. इथे नाश्ता करता येईल असं वाटलं. पण थोडं पुढे बघू असं करत करत हॉटेल मागे पडले. आणि सकाळी आठला जास्त हॉटेल सुरूही नव्हते. पुढे चंडाक परिसरात हॉटेल मिळेल असं कळालं आणि सोबतच्या चिक्की खाऊन पुढे निघालो. हळु हळु पिथौरागढ़ शहराची वस्ती विरळ होत चालली आणि लवकरच शांत परिसर मिळाला. इथे अनेक जण सकाळी फिरताना दिसत आहेत. मोकळा परिसर आल्यानंतर चंडाक हिलचा परिसर दूरवरून दिसायला लागला.
उत्तराखण्डमध्ये सर्वत्र मन्दिरं खूप आहेत. ह्या वाटेवरही अनेक मंदिरं लागली. त्यापैकी एक मन्दिर "उल्का माँ" नावामुळे लक्षात राहिलं! रस्ता हळु हळु चढत वर जातोय आणि आजूबाजूचा दूरवरचा परिसर नजरेच्या कक्षेत येतोय. वाटेत कुमाऊँ मण्डल विकास निगमचं पर्यटक निवास लागलं. तिथे ॐ पर्वताच्या फोटोसाठी चक्कर मारली. पण अद्याप हे हॉटेल जागंच झालं नाहीय, त्यामुळे लगेच पुढे निघालो. चंडाक हिल डोंगरावर आहे आणि इथून आणखी पुढे गेल्यावर रस्ता खाली उतरतो तिथे प्रसिद्ध चंडी मंदिर आहे. सूर्य जसा वर चढतोय तसे धुक्यामधून दूरचे हिम शिखर डोकावत आहेत. समोरच्या बाजूला डोंगराच्या खाली अनेक छोटी गावंही दिसत आहेत. एक रस्ता मुख्य रस्त्यापासून वेगळा होऊन खालच्या गावाकडे जातोय. पुढे गेल्यावर ते गाव वरून खूप छान दिसलं. एक पर्यटन स्थळ असल्यामुळे इथला रस्ता खूप चांगला आहे. इथे सायकल चालवायला मजा आली असती. खूप मोठा घाट आणि आजूबाजूला नितांत सुंदर परिसर!
इथे काही मंदिरांच्या पायवाटाही जातात. इथे प्रादेशिक सेनेच्या निगराणीमध्ये एक इको पार्कही आहे. काही वळणं घेऊन रस्ता आता डोंगरावर आला आहे. सगळीकडे देवदारांचं प्रभूत्व! सहा किलोमीटर झाले तरी थकल्यासारखं अजिबात वाटत नाहीय. कारण हा सर्व प्रवास आल्हाददायक अशा नैसर्गिक एसीमध्ये सुरू आहे! शिवाय नजारे इतके अप्रतिम की थकण्याचा प्रश्नच नाही! इथे फिरायला आल्याबद्दल स्वत:ला मनोमन अनेक धन्यवाद देतोय! समोर काही अंतरावर मोबाईलचं टॉवर दिसतंय. म्हणजे ह्या डोंगराचा माथा हाच असेल. पुढे कदाचित रस्ता थोडा खाली उतरेल. इथे काही वस्ती आहे. पराठा मिळेल असं हॉटेल मिळालं नाही. त्यामुळे पुढे निघालो. इथून चंडी- मंदीर आणि मोस्ता- मानू मन्दिराचे मार्ग वेगळे होतात. मोस्ता मानू मंदिराच्या दिशेला वळालो आणि वस्ती जशी किंचित मागे गेली, तसं देवदारांचं एक घनदाट वन समोर आलं! अक्षरश: स्वप्नवत दृश्य! गमतीने मी माझ्या मित्रांना म्हणतोय सध्या की, मी कमालीचा अय्याश झालोय. सतत चंगळ करतोय. सतत आनंदाची लूट करतोय! इतक्या जवळून देवदारांचा सत्संग आणि त्यांच्या पलीकडून डोकावणारे हिमशिखर! लवकरच मोस्ता मानू मन्दिराजवळ पोहचलो. हे शिव मंदिरासारखं मंदिर होतं. आजूबाजूला थोडी घर आणि वस्ती. काही वेळ मंदिरामध्ये शांत बसलो आणि परत निघालो.
परत फिरल्यावर मात्र भूक लागली. इथे आलू पराठा किंवा व्हेज असं हॉटेल चटकन मिळालं नाही. जवळचे हॉटेल नॉन व्हेजचे आहेत. त्यामुळे अखेरीस चहा- बिस्कीट असं खाल्ल. पुढे पिथौरागढ़मध्ये नाश्ता करेन असा विचार करून निघालो. हा परिसर दुस-या बाजूने जातानाही किती वेगळा आणि सुंदर दिसतोय! मी मघाशी ज्या रस्त्यावरून आलो होतो, तो रस्ता वरून मस्त दिसतोय. परतीच्या वाटेवर हलका पण उतार असल्यामुळे थकवा वाटला नाही. शिवाय गेले अनेक दिवस रोज पाच- सहा किलोमीटर फिरतोच आहे. त्यामुळे अजिबातच ताण वाटला नाही. हळु हळु पिथौरागढ़ जवळ येत गेलं. आणि मेन मार्केटपाशी एका ठिकाणी आलू पराठ्याचा नाश्ता केला. सोबतची मंडळी पिथौरागढ़मध्ये एका नातेवाईकांना भेटायला गेले आहेत. मला त्यांनी तिकडे बोलावलं. त्यामुळे रस्ता शोधत तिकडे निघालो. आणखी काही किलोमीटर चालायला मिळालं!
त्यांचं घर पिथौरागढ़मध्ये दुस-या बाजूला आहे. जुजबी पत्त्यानुसार रस्ता विचारत गेलो. काही जणांनी शॉर्ट कट सांगितला, त्यानुसार गेलो. हा रस्ता म्हणजे शहरामध्ये गल्ली- बोळातून जाणारी पायवाट आहे. काही काही ठिकाणी तर ती डोंगरातून व शेताजवळूनही जातेय. पिथौरागढ़च्या अगदी आतून फिरायला मिळतंय! ही पायवाटही मस्त आहे! इथे जिथे कुठे फिरू तिथे सुंदर नजारे आणि ट्रेक आहेच! त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा एकूण १९ किलोमीटर होऊन गेले. चालण्याचा वेळ ३ तास २२ मिनिटं आहे. थकवा इतकाच वाटतोय की, थंडी वाजत नाहीय! नंतर तिथून परत मार्केटमध्ये येताना एक किलोमीटर चाललो आणि संध्याकाळी सत्गडला पोहचल्यावर तिथलाही छोटा ट्रेक केला. त्यामुळे एकूण दिवसभरात मिळून २१ पेक्षा जास्त किलोमीटर झाले. एक अगदी वेगळ्या प्रकारची हाफ मॅरेथॉनच झाली! दुस-या दिवशीचा माझा प्लॅन ठरवून टाकला. बुंगाछीनावरून कनालीछीनामार्गे सत्गडला आलो होतो, तो रस्ता खूपच आवडला होता. उद्या त्या रस्त्यावरच २५ किलोमीटर तरी फिरेन. पहिले तर विचार केला होता की, बुंगाछीनापर्यंत जाईन आणि येताना जीपने येईन. पण मग वाटलं की, त्यामध्ये जास्त वेळ जाईल, जीप लवकर मिळेल असं नाही आणि पैसेही जातील! म्हणून असा विचार केला की, त्या रस्त्यावर अर्धं अंतर जाईन आणि परत येईन. तो रस्ताही फिरायला मिळेल आणि वेळही वाचेल व पैसेही वाचतील! तोही ट्रेक अतिशय जबरदस्त राहिला. त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बोलेन.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)
एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)
८ नोव्हेंबरची सकाळ. लवकरच हिमालयाचा निरोप घ्यायचा आहे! पिथौरागढ़ जिल्ह्यातच पाताल भुवनेश्वर हे अतिशय सुंदर गुहेतलं मंदिर आहे. ते बघायला जाण्याचा प्लॅन सुरू आहे. तिथे दुस-या दिवशी जायचं ठरलं. त्यामुळे आज मला हवा तसा मोठा ट्रेक करता येईल. काल २१ किलोमीटर चाललो होतो आणि आज २६ किलोमीटर फिरेन. त्या दिवशी जीपमधून बघितलेल्या अगदी आतल्या बाजूच्या नितांत सुंदर रस्त्यावर फिरेन. विचार करून कसं व किती दूरपर्यंत जायचं ते ठरवलं. इथे आता शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला सत्गडवरून कनालीछीनापर्यंत मुलांसोबत पायवाटेने जाईन. त्या दिवशी गेलो होतो तीच पायवाट, पण किंचित वेगळ्या बाजूने. आणि कनालीछीनापासून पुढे रस्त्याने फिरेन. आणि येताना कनालीछीनावरून रोडनेच सत्गडला येईन. असे एकूण २६ किलोमीटर व साधारण सव्वाचार तास होतील. सकाळी ८ वाजता मुलांसोबत निघालो. डोंगराच्या आणि शेतांच्या मधून जाणारी पायवाट! हे क्षण अक्षरश: मनामध्ये सामावून घेतोय!
ही पायवाट थोडं पुढे जाऊन परत मेन रोडला मिळते व परत आत शिरते. मुख्य रस्ता जरा फिरून खाली उतरतो. पाय वाट अर्थातच शॉर्ट कटने जाते. छोटी छोटी घरं, झाडी आणि प्रसन्न आसमंत! कडक थंडीनंतर असं ऊन अंगावर घेणं म्हणजे सुख आहे. ह्या पायवाटेलगत काही ठिकाणी गावाच्या अंतर्गत रस्त्याचं काम झालं आहे. कुठे कुठे जीपचा रस्ताही आहे. पण इथे दाट झाडी असल्यामुळे हिमशिखर मात्र त्यांच्यामध्ये लपलेली आहेत. अर्ध्या तासामध्ये कनालीछीनाला पोहचलो. सत्गड जास्त उंचावर असल्यामुळे उतार होता. आणि पुढेही मला अर्ध्या वाटेपर्यंत उतारच उतार लागेल. आणि येताना सगळा चढ असेल. कनालीछीनामध्ये मुलांना बाय केलं आणि थोडं अंतर पिथौरागढ़- धारचुला हायवेवर चालत निघालो. ह्या टप्प्यामध्ये हा मार्ग प्रशस्त आहे आणि खूप पक्का आहे. पूर्वी हिमाचल- लदाख़मध्ये सायकल चालवली होती त्या रस्त्यांची आठवण करून देणारा रस्ता! काही अंतर पुढे गेल्यावर डावीकडे एक फाटा फुटला आणि तिकडे वळालो.
हा अंतर्भागात जाणारा रस्ता अगदी निर्जन आहे. हळु हळु कनालीछीनाच्या आसपासची घरं मागे पडली आणि देवदारांच्या वनाचा प्रदेश सुरू झाला. अक्षरश: देवदारांचं नंदनवनच! ह्या रस्त्यावर वाहतुक अगदी थोडी. त्यामुळे थोड्या वेळानेच एखादी गाडी भेटतेय. क्वचित कोणी बाजूच्या गावामधले ग्रामस्थ. दूरवर दरीच्या पलीकडे ढग दिसत आहेत! खरोखर मी कमालीचा नशीबवान आहे. ओंजळीत मावत नाही इतकं काही मिळतंय. निसर्गाचा सत्संग ओसंडून वाहतोय. शांत वातावरणामध्ये एका लयीत चालत राहिलो. फास्ट वॉक सुरू ठेवला. खूप वेळाने बाजूला काही घरं दिसली. रस्त्यात छोटे छोटे झरे लागत आहेत. कुठे कुठे रस्त्याची हानीही झालेली दिसतेय. काही अंतर meditative songs ऐकत चाललो आणि मग निसर्गाला ऐकत जात राहिलो. अंतराचा एकूण हिशेब करून ठरवलं होतं की, मुख्य रस्ता सोडल्यापासून साधारण आठ किलोमीटर पुढे आलो की परत फिरेन. पुढे एका ठिकाणी लांब एक रस्ता व एक फाटा फुटतोय. कदाचित तिथपर्यंत जाऊन परत येईन. पण रस्ता सरळ नव्हता. पुढे बरीच वळणं लागली. दोन छोटी गावं लागली. ग्वेता आणि कापडी. आसमंत बदलला. पलीकडच्या डोंगररांगा व लँडस्केप दिसायला लागला. पण ते वळण काही आलं नाही! अंतरं इथे अशी फसवी असतात. साधारण साडे अकरा किलोमीटर झाल्यावर परत फिरलो. कारण परत जाताना पायवाटेच्या ऐवजी रस्त्यानेच जाईन, त्यामुळे तिथे अंतर जास्त भरेल.
परत फिरल्यावर एका वेळी अचानक पोटात खड्डा पडला. इथे वाटेत अगदी तुरळक गावं व घरं आहेत. किराणचे दुकानं आहेत. पण चहाचंही हॉटेल दिसलं नाहीय. अर्थात् त्याची कल्पना होतीच. त्यामुळे सोबतच्या चिक्क्यांचा समाचार घेतला. पाणीही पिऊन घेतलं. आता दुपार होतेय, त्यामुळे अधून मधून गरम होतंय. अर्थात् देवदारांचं छत्र सावली देत आहेच. चिक्क्यांचा नाश्ता केल्यानंतर ऊर्जा आली. पण गंमत बघायला मिळाली. ज्या क्षणी शरीर दमतं, त्या क्षणी मनही दमायला लागतं. काही मिनिटांसाठीच पण ताण वाटला की, अंतर जास्त तर होणार नाही? मानसिक दृष्टीने अंतर जास्त वाटलं. पण शरीरात जशी ऊर्जा आली, तरतरी आली, तसं मनही परत ताजं तवानं झालं. आणि पुढचे छोटे टप्पे मनासमोर ठेवले की, आता परत फिरून चार किलोमीटर झाले, म्हणजे साधारण सात किलोमीटरवर हायवे लागेल. तिथून एक किलोमीटर पुढे कनालीछीना आणि मग सहा किलोमीटरवर सत्गड. शिवाय हायवेवर हॉटेलही मिळेल. त्यामुळे नंतर तसा ताण वाटला नाही आणि रमणीय निसर्गाचा आनंद घेता आला. डेस्परेट व्हायला झालं नाही. एका टेंपोवाल्याने माझी चौकशीसुद्धा केली लिफ्ट हवी का. त्याला सांगितलं की फिरायचं म्हणून चालतोय. उलट्या रस्त्याने येताना दुपारचा निसर्ग बघायला मिळाला. काही ठिकाणी झ-यांचं पाणी रस्त्यावर मिळालं. हळु हळु कनालीछीनाच्या खालची घरं दूर डोंगरात दिसायला लागली. वरून जाणारा हायवेही दिसला आणि थोड्याच वेळात हायवेला पोहचलोसुद्धा.
मला अदूने निघताना तिला खेळायला टिश्यु पेपर आणायला सांगितला होता! इथे मेडीकलमध्ये तो नाही मिळाला व एनर्जालही नाही मिळालं. आणि हायवेवर हॉटेलही चांगले वाटले नाहीत. थोडा वेळ बघत राहिलो आणि नंतर वाटलं की, सत्गडच्या खाली रोडवर आता ओळखीचं झालेलं हॉटेल आहे, तिथेच जेवेन. आणि आता अंतरही कमी उरलंय. २१ किलोमीटर पूर्ण झाले आहेत, सो आता ५ किलोमीटरच बाकी आहेत. कनालीछीना गाव हळु हळु मागे पडलं. नवीन तालुक्याचं ठिकाण, त्यामुळे बरीच वस्ती आहे. सरकारी कार्यालयं आहेत. शेती संबंधित दुकानं आहेत. गाव गेल्यानंतर चढ सुरू झाला. आणि पुढे तर घाट म्हणावा असा मस्त रस्ता लागला. अशा रस्त्यांवर सायकलिंगच्या ऐवजी पायी फिरण्याचा आनंद पुरेपूर घेतला. दुपारची वेळ असल्यामुळे व्हिजिबिलिटीसुद्धा चांगली आहे व त्यामुळे आता परत दूरवरची शिखर दिसत आहेत! न थांबता वेगात चालत राहिलो.
छोटा पण मस्त घाट आहे हा. सायकलीवर खरंच मजा आली असती. चढ किमान ६% -७% चा तरी असेल. पायी जाताना चढाचा फरक इतकाच होतो की, वेळ जास्त लागतो. हळु हळु सत्गड जवळ येत गेलं. ते हॉटेल सत्गडमध्येच येतं. तिथे पोहचलो. चहा आणि दोन पराठे खाल्ले. ते सत्गडच्या नातेवाईकांचे नातेवाईकच लागतात. आणि पुण्यात त्यांनी जॉबही केला आहे. त्यामुळे मस्त गप्पा झाल्या. इथे एक भटका भेटला. मोटरसायकलवर तो अयोध्येवरून केदारनाथला जातोय आणि वाटेत लागतील त्या मंदिरांना भेट देतोय. जसे लोक भेटतील, ते जिकडे जा सांगतील, तिकडे तो फिरतोय. इथून तो थल- बागेश्वर- ग्वालदाम मार्गे गढ़वाल भागात जाईल. जेवण झालं, थोडा आरामही झाला. आता फक्त दिड किलोमीटर बाकी. २५ किलोमीटर चालल्यानंतर सत्गडचा ट्रेक छोटा असला तरी तीव्र चढामुळे थोडा कठीण जाईल असं वाटलं होतं. पण एका लयीत- रिदममध्ये व आरामात पोहोचलो. ८ ला निघून साधारण सव्वा वाजता पोहचलो. स्ट्राव्हावर बघितलं तर चालण्याच्या साडेचार तासांमध्ये २६ किलोमीटर झाले आहेत. आणि किती जबरदस्त आतला निसर्ग बघायला मिळाला! जीवनाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत!
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर
थरारक पाताल भुवनेश्वर
काल महाशिवरात्री झाली आणि आज मी एका वेगळ्याच शिव मंदिराबद्दल लिहीणार आहे. उत्तराखंडमध्ये फिरताना तिथे पाताल भुवनेश्वरला जाण्याचा योग आला. हा ट्रेक नव्हता. पण काहीसा ट्रेकसारखाच थकवणारा लांबचा प्रवास होता. हिमालयामधील वास्तव्य संपता संपता ह्या प्रवासाचा योग जुळून आला. ९ नोव्हेंबरची सकाळ. गूंजीप्रमाणेच हा प्रवास जीपने करायचा आहे. पाताल भुवनेश्वर पिथौरागढ़ जिल्ह्यामध्येच आहे, पण जाण्याचा रस्ता बराच फिरून जातो. गंमत म्हणजे आम्ही बुंगाछीनाला काही दिवस राहिलो होतो, तिथून अगदी आतल्या बाजूने पायवाटेने पाताल भुवनेश्वरला जाता येत होतं. पण रस्ता फिरून जातो. सकाळी आठच्या सुमारास सत्गडवरून निघालो. निघताना सत्गडमध्ये एकदम ढग आलेले आहेत. ध्वज मंदिर ढगांमध्ये हरवून गेलंय! ह्यावेळी आम्हांला फिरवणारे चालक आहेत गूंजीच्या वेळी सोबत असलेले जितूजी! गाडीसुद्धा त्यांचीच आहे. पिथौरागढ़च्या जवळ पेट्रोल भरून बुंगाछीना- थल अशा मार्गाने निघालो. निघताना हा प्रवास १२० किलोमीटरचा- म्हणजे किमान पाच तासांचा आहे, ह्याची तितकीशी कल्पना नव्हती. मी ह्या मार्गाने थल- चौकोड़ी- बागेश्वर असं डिसेंबर २०१२ मध्ये एकटा फिरलो होतो, त्याची आठवण होतेय. पिथौरागढ़ला २०११ मध्ये पहिल्यांदा गेलो होतो तेव्हापासून पाताल भुवनेश्वरबद्दल ऐकत आलोय. पण प्रत्यक्ष जाण्याचा योग आज आला आहे!
थल गांवावरून एक रस्ता मुन्सियारीकडे जातो व एक रस्ता चौकोड़ी- बागेश्वरकडे जातो. थल गांव रामगंगा नदीकाठी वसलेलं आहे. मोठं अंतर असल्यामुळे शक्यतो न थांबता प्रवास करत जातोय. थलमध्येही जेव्हा नाश्त्यासाठी हॉटेल मिळालं नाही, तेव्हा मग एका दुकानामधून पॅक केलेलं फास्टफूडचाच नाश्ता केला. हिमालयात कुठेही फिरत असलो तरी उंच पर्वत रांगा, वळत जाणारे घाट रस्ते, डोंगरांच्या मध्ये दरी आणि अगदी दरीमधून वाहणारी नदी, हे दृश्य सदैव दिसतंच! आणि नदीनंतर रस्ता परत वर चढायला लागतो! आणि थलपासून रस्ता जो वर चढतोय, तो चौकोड़ीपर्यंत वर चढतोय. रस्ता वर चढताना परत एकदा दूरवरचे हिमाच्छादित शिखर दिसत आहेत. वर चढल्यावर खालून दिसणारी रामगंगा अजून छोटी दिसतेय. इथे नेमका अदूला उलटीचा त्रास झाला. त्यामुळे चौकोड़ीच्या आधी अगदी घाटामध्ये थोडा वेळ थांबावं लागलं. चौकोड़ी हे २००० मी. उंचीवरचं पर्यटन स्थळ आहे. इथून रस्ता वळाला आणि हळु हळु खाली दरीत उतरायला लागला. पाताल भुवनेश्वर हे दरीमध्ये असलेलं मंदिर आहे.
साधारण १२ वाजता पाताल भुवनेश्वरला पोहचलो. मूळ गावामध्ये आता खूप रिसॉर्टस आणि दुकानं वगैरे झाली आहेत. सोबतच्या जितूजींनी मंदिराबद्दल बरीच माहिती दिली आहे की, इथे आतमध्ये हवा कमी आहे, लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. इथे ३३ कोटी देवता राहतात, इथून गुहेतून जाणारी भूमीगत वाट थेट बद्रीनाथ- केदारनाथकडे जाते, पाताल भुवनेश्वरला दर्शन देताना चार धाम यात्रेचं पुण्य मिळतं वगैरे वगैरे. आणि मंदिर परिसरामध्येही अशाच स्वरूपाची वर्णनं आहेत. मंदिराच्या आतमध्येही गुहेमध्ये अनेक ठिकाणी खडकांमुळे बनलेलेले आकार, गुहेतून वाहणारी जल धारा, गुहेची रचना ह्या सगळ्यांना धरून अक्षरश: शेकडो आख्यायिका आहेत की, इथे सर्व देव राहतात, इथेच ब्रह्मदेव आले होते वगैरे वगैरे. अर्थातच त्या गोष्टी सोडून दिल्या. पण एक नैसर्गिक आणि रमणीय स्थान म्हणून ही गुहा निश्चित एंजॉय करण्यासारखी आहे. आसपासचा परिसरही अगदी रमणीय आहे. हिमशिखर सतत दूरवरून सोबत देत असतात.
गुहेमध्ये उतरताना एक वाटाड्या सोबत होता. आणि गुहेत जाताना वस्तुत: दगडांच्या वाटेने उतरावं लागलं. रॉक क्लाइंबिंग! ९० फूट खोल गुहा आहे. आतमध्ये अनेक छोट्या गुहा/ खोल्या आहेत आणि त्याबद्दलच्या आख्यायिका आहेत. आतली पायवाट ओलाव्यामुळे निसरडी असते. शिवाय जमिनीच्या आत जाण्याचा अनुभव रोमांचक वाटतोच. साधारण अर्ध्या तासामध्ये गुहेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाटाड्याने फिरवलं. कोणालाही श्वास घेताना त्रास झाला नाही. फक्त काही ठिकाणी पाय घसरत होते. आणि चढताना रॉक क्लाइंबिंग आहे, ते अदूला जमेल ना, अशी शंका मनात होती. उतरताना व चढतानाही एक दोरखंड आधाराला असला तरीही पाय ठेवायला जागा कमी पडते. पण अदूने हे रॉक क्लाइंबिंग खूपच आरामात आणि उत्साहात पूर्ण केलं! आतमध्ये काय आहे, कसं जाणार व काय बघणार, हे माहित नसल्यामुळे हे मंदिर बघणं रोमांचक आहे. त्याचा किंचित तणाव वाटला आणि बाहेर आल्यावर अगदी मोकळं वाटलं! सत्गडला सोबत क्रिकेट खेळणारा आणि ध्वज मंदिरावर आलेला आदित्य इथे आला नव्हता. तो गमतीने बॉलिंग करताना (आणि बॅटिंगही करताना!) स्वत:ला बुमराह म्हणायचा! देखो बुमराह की बॉलिंग, असं! त्यामुळे भुवनेश्वरला भेटताना बुमराहला मात्र मिस केलं!
मंदिराच्या बाहेरच एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि निघालो. दुपारचे तीन वाजले आहेत. आता पोहचायला रात्र होणार. हिमालयाच्या घाटांमध्ये दिवसा प्रवास करणं आणि रात्री, ह्यामध्ये फरक पडतो! सोबतचे जितूजी अनुभवी चालक आहेत, त्यामुळे अडचण नाहीय. येताना थोड्या वेगळ्या मार्गाने म्हणजे थल- डिडीहाट- ओगला- कनालीछीना असं आलो. कारण सकाळचा रस्ता रात्रीच्या अंधारात जाण्यासाठी तितका चांगला नव्हता. साडेपाच वाजता अंधार झाला आणि हिमालय अंधारात गुडूप झाला. वाटेमध्ये लागणा-या छोट्या वस्त्या सोडल्या तर बाकी अंधार. पण अंधारातही पहाडात कुठे कुठे दिवे चमकलेले दिसतातच. जितूजींना गप्पा मारण्याची आवड असल्यामुळे खूप गमती सांगत आहेत. त्यांनी आधीही आम्हांला गूंजीबद्दल खूप सांगितलं होतं. त्यावेळी ते बोलले होते की, काली गंगा काला पानीला उगम पावते. पण इथे कालीला काल म्हणजे मृत्युचं किंवा शिवांच्या संहारक स्वरूपातील संगिनीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे काली नदीमध्ये तिच्यात जौलजिबी येथे गोरी गंगा नदी येऊन मिळेपर्यंत कोणतीच पुण्य कामं केली जात नाहीत. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या! त्यामुळे हा प्रवास थकवणारा असला तरी कंटाळवाणा झाला नाही. ओगलापासून पुढे मोठा रस्ता म्हणजे हायवे मिळाला आणि सत्गड जवळ येत गेलं. अर्थात् सत्गडला पोहचल्यानंतरही कडाक्याच्या थंडीत आणि थकलेल्या अवस्थेत दहा मिनिटांचा ट्रेक करायचा आहेच. आणि त्यासाठी मनाने सगळेच थकले आहेत. सत्गडला पोहचलो आणि कसं बसं चालायला लागलो. तेव्हा चढताना सगळ्यांची मन:स्थिती बघितली आणि मोबाईलमध्ये "लक्ष्य" चित्रपटाची गाणी सुरू केली. एक तर सगळे थकलेले आहेत आणि रात्री इथे कोणी अंधारात फिरतही नाहीत. गाणी लावून चढायला लागलो. आजूबाजूला मस्त अंधार आणि आकाशात चमचमणारे तारे!
अदू अनेकदा इथे पायी पायीच चढते. पण आज थकल्यामुळे तिने कडेवर घ्यायला सांगितलं. थोडा वेळ मी आणि थोडा वेळ तिची आई असं करत करत जात होतो. थोडं थांबायचं आणि थोडं तिला चालवायला लावायचं असं करत करत ती वाट पूर्ण झाली. इतकं चढून आलो, आता थोडाच चढ बाकी, आता सोपा रस्ता आला, असं सांगून तिलाही चालायला लावलं. गंमत म्हणजे आमचे सत्गडचे नातेवाईक तिला खांद्यावर बसवून आणि हातामध्ये जड सामान घेऊनही चढू शकत होते. ते आत्ता सोबत असते तर त्यांनी हसत हसत तिला घेतलं असतं! आणखी गंमत म्हणजे एकदा खेळताना अदूने माझा हात त्यांच्या हाताजवळ ठेवला. तेव्हा माझा हात इतकुसा ठरला, अगदीच किरकोळ! त्यांचा हात एकदमच मोठा- कमावलेला! कुमाऊँ प्रदेश हा गोरखांच्या नेपाळच्या अगदी जवळचा व कुमाऊँचे लोक गोरखांचे लहान भाऊ आहेत, ह्याची आठवण झाली! आता लवकरच हिमालयाचा निरोप घ्यायचा आहे! पण अदू मात्र इकडेच तिच्या मावशीकडे थांबणार आहे. त्यामुळे तिला हिमालयाचा सहवास अजून जास्त काळ मिळेल!
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १५ (अंतिम): हिमालयातून परत...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.