आजवर आपण ‘राउळी मंदिरी’ या सदरामधून भारतातल्या अनेक पुरातन मंदिरांची ओळख करून घेतली; पण आज परिचय करून घेणार आहोत तो अशा एका मंदिराचा, जे एकाच वेळी पुरातनही आहे आणि नित्यनूतनही. भारतातच काय पण; संपूर्ण जगात एकही असा हिंदू नसेल ज्यानं काशी शहर आणि तिथल्या भव्य काशी विश्वेश्वराचं नाव ऐकलं नसेल. आयुष्यात एकदा तरी काशीला जावं आणि विश्वेश्वराचं दर्शन घेऊन तिथलं गंगेचं पाणी तामिळनाडूमध्ये रामेश्वरी नेऊन तिथं त्या पाण्यानं शिवावर अभिषेक करावा, असं प्रत्येक भाविक हिंदू व्यक्तीला वाटतं.
काशीमध्ये असं काय आहे की, हजारो वर्षांपासून हिंदूंचा जीव काशीमध्ये अडकलेला आहे? तेरा डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये ३३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पा’चं लोकार्पण केलं तेव्हा मी काशीमध्येच होते. जवळजवळ पाच लाख चौरस फूट विस्तार असलेल्या या प्रकल्पानं इंदूर संस्थानची राणी, देवी अहिल्याबाई होळकर यांनी १७८३ मध्ये बांधलेलं विश्वनाथाचं मंदिर थेट गंगाभिमुख केलं. काशी ही काशी आहे ती गंगा नदीमुळे. हिंदूंना सदैव पवित्र असलेली गंगा नदी काशीमध्ये एक खूप मोठं अर्धचंद्राकृती वळण घेते. तिच्या विस्तीर्ण पात्राच्या उत्तरेला, गंगेच्या डाव्या काठावर, वाराणसी वसलेलं आहे. फार प्राचीन काळापासून काशी ही एक पवित्र नगरी मानली गेलेली आहे.
प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे. रामायण, महाभारत, स्कंद, मत्स्य, पद्म आदी पुराणं, बौद्धजातकं, बृहत्संहिता या सर्व ग्रंथांमधून काशीनगरीचा उल्लेख ‘भगवान शिवांची नगरी’ असा आहे.
महाभारतातील एका कथेनुसार, काशीराज दिवोदास हा या काशीचा संस्थापक आहे. त्यानं इंद्राच्या आज्ञेवरून गंगेकाठी हे नगर वसवलं आणि भगवान शिवांना काशीमध्ये येऊन कायम राहायची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन शिव इथं आले आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की, प्रलय आला तरी काशी शिवांच्या त्रिशूळाच्या तीन टोकांवर सुरक्षित राहील, आणि इथं प्राणत्याग करणाऱ्या सर्वांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
साक्षात् भगवान शिव काशीत राहायला आल्यामुळे इतर देव-देवताही इथं वास्तव्याला आल्या आणि मंदिरं घडत गेली. फार प्राचीन काळापासून काशी हे संस्कृत, वेद, ज्योतिष, व्याकरण आदी अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. चिनी प्रवासी ह्यूएन त्संग जेव्हा काशीत आला तेव्हा, ‘आपल्याला शंभर भव्य हिंदू मंदिरं दिसली’ असं त्यानं लिहिलं आहे, तर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ यानं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केलेल्या पाहणीत त्याला जवळजवळ एक हजार मंदिरं आढळली. काशी हे अतिशय सुंदर, श्रीमंत आणि हिंदूंसाठी पवित्र असं शहर होते आणि त्यामुळेच काशीवर इस्लामी आक्रमकांची सतत वक्रदृष्टी राहिली.
काशी हे एक जनपददेखील होतं. ‘बौद्ध अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात तत्कालीन भारतातील सोळा महाजनपदांमध्ये काशीची गणना होत होती. पुढं अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी इथं आपली उपराजधानी स्थापन केली. त्यांनी बाराव्या शतकात बांधलेलं वाराणसीजवळच्या कंदावा इथलं कर्दमेश्वर महादेव हे एकमेव असं मंदिर आहे, जे आक्रमकांच्या विध्वंसापासून वाचलं. ते मंदिर आजही मूळ स्वरूपात कंदावा इथं एका सुंदर पुष्करिणीशेजारी उभं आहे.
कनौजचा राजा जयचंद राज्यावर असताना मुहंमद घोरीनं काशीवर स्वारी करून तिथली मंदिरं तोडली, हिंदूंचं शिरकाण केले आणि प्रचंड लूट केली. हे काशीवर झालेलं पहिलं इस्लामी आक्रमण. पुढं दिल्लीच्या तख्तावर आलेला कुतबुद्दीन ऐबक आणि त्यानंतरचा इस्लामी शासक अलाउद्दीन खिलजी यांनीही काशीवर हल्ला करून इथली हजार मंदिरं नष्ट केली, त्यात काशीविश्वेश्वराचंही मंदिर होतंच. हिंदूंनी ते परत उभारलं, हुसेन शाह शार्की आणि सिकंदर लोदी यांनी परत ते उद्ध्वस्त केलं. हा विध्वंसाचा आणि पुनर्निर्मितीचा क्रम सुरूच राहिला; पण हिंदूंनी कधीही काशीवरचा आपला हक्क सोडला नाही. जितक्या वेळा मंदिर पाडलं गेलं तितक्या वेळा ते परत बांधलं गेलं.
पुढं अकबराच्या काळात त्याचा सेनापती मानसिंह यानं १५८५ मध्ये काशी विश्वनाथाचं भव्य मंदिर नव्यानं बांधलं; पण औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर जमीनदोस्त करून त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूंवर जिझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तिथलं शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापी विहिरीत लपवलं. औरंगजेबानं मंदिराची एक भिंत जाणून-बुजून अर्धीच पाडून तीवर मशीद उभारली; जेणेकरून हिंदूंना हा अपमान सदैव लक्षात राहावा. त्या काळी मंदिराच्या जागेलाच श्रीविश्वेश्वर मानून भक्त नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करत असत. औरंगजेबानं वाराणसीचं नावही बदलून महंमदाबाद असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीमहाराजांना या घटनेनं अपरिमित दुःख झालं होतं. उत्तरेवर स्वारी करून हे मंदिर पुन्हा उभारावं अशी त्यांची खूप इच्छा होती; पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही.
पेशव्यांच्या राजवटीच्या वेळी अहिल्यादेवी होळकरांनी औरंगजेबकालीन मशीद न पाडता ज्ञानवापीतून शिवलिंग बाहेर काढून, सध्या अस्तित्वात आहे ते पंचमंडपयुक्त विश्वनाथाचं मंदिर सतराव्या शतकात बांधलं. पुढं १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगानं या मंदिराचं शिखर सोन्यानं मढवून दिलं. हे मंदिर भारतातल्या सर्व हिंदूंना आकर्षित करतं. सध्या आहे ते मंदिर आकारानं छोटंसंच असलं तरी त्याचं शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे. मागेच श्रीतारकेश्वराचं तसंच एक मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरांना जोडणारा एक स्तंभयुक्त छोटा सभामंडप आहे; पण या मंडपाचं इस्लामी घुमटाकृती शिखर मुख्य मंदिरशिखराशी विसंगत वाटतं.
पूर्वी हे मंदिर काशीच्या अगदी चिंचोळ्या, गजबजलेल्या गल्लीत होतं, त्यामुळे मंदिराचं स्थापत्य नीट दिसायचंच नाही. आजूबाजूला सर्वत्र अस्वच्छता होती. मंदिराबाहेर जेमतेम पन्नास माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती. मंदिराच्या छोट्या आकारामुळे शेजारी असलेल्या औरंगजेबाच्या मशिदीचे घुमट डोळ्यांना जास्तच खुपायचे. आता मात्र मंदिरपरिसराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. मंदिराभोवती बांधण्यात आलेल्या भव्य प्राकारामुळे मंदिर तर नीट बघता येतंच; पण हजारो लोक एकाच वेळी पूजा करू शकतात.
प्रत्येक भारतीयानं काशीला जाऊन हे मंदिर बघितलंच पाहिजे इतकं सुंदर आणि भव्य-दिव्य असं हे मंदिर आता दिसतं.
By शेफाली वैद्य shefv@hotmail.com
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)
मोदींपूर्वी मराठा साम्राज्याच्या महाराणीनं केलं होतं काशी विश्वनाथ धामचं पुनरुज्जीवन|Kashi Vishwanath Corridor
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (PM Modi) काशी विश्वनाथ धाम (Kashi Vishwanath Corridor) हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांचं स्वप्न आता साकार झालं असून आज त्यांच्याच हस्ते या धामचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. पण, काशी विश्वनाथ धामची वैशिष्ट्ये काय आहेत? या धामचं पहिल्यांदा पुरुज्जीवन कोणी केलं होतं? तेच आज आपण पाहुयात.
२४१ वर्षांत तीनदा मंदिराला केलं पुनरुज्जीवित -
गेल्या २४१ वर्षांत काशी विश्वनाथ मंदिराला तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित करण्यात आलंय. या मंदिराला अनेकवेळा नेस्तनाबूत कऱण्याचा प्रयत्न देखील झाला. सुरुवातील मराठा साम्राज्याची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये या मंदिराला पुनरुज्जीवित केलं होतं. त्यानंतर महाराजा रणजीत सिंह यांनी १८५३ मध्ये या मंदिराच्या काही भागाला सोन्यानं मढवलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रकल्पांतर्गत या मंदिरात भव्य कॉरिडॉर बनवण्याचे काम सुरू झाले. भूमीपूजनानंतर सुमारे 2 वर्षे 8 महिन्यांनंतर या ड्रीम प्रोजेक्टचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण कॉरिडॉरच्या उभारणीसाठी 340 कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण खर्चाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे दोन भाग -
काशी विश्वनाथ कॉरिडॉर हे दोन भागात विभागण्यात आले आहे. मुख्य संकुल बांधण्यासाठी लाल रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. कॉरिडॉरमध्ये चार मोठे दरवाजे आहेत, त्याभोवती एक प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर संगमरवरी 22 शिलालेख लावण्यात आले आहेत. त्यावर शंकराचार्य, अन्नपूर्णा स्तोत्र, काशी विश्वनाथ आणि भगवान शंकराशी संबंधित महत्त्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या संकेतस्थळानुसार, हे मंदिर 'सुवर्ण मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.
१६ लाख लाडूंचा प्रसाद -
बनारसमध्येही महिनाभराचा उत्सव साजरा केला जाणार आहे, ज्याला ‘भव्य काशी-दिव्य काशी’ असे नाव देण्यात आले आहे. बनारसमधील एकही कुटुंब किंवा व्यक्ती या कार्यक्रमापासून वंचित राहू नये यासाठी 16 लाख लाडू प्रसादासाठी बनवले जात आहेत. कामगार ते लोकांच्या घरी पोहोचवतील. यासोबतच लोकांना स्मृतीचिन्हही देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.