अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)
दर
वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा
केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी
महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा
इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान,
कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४००
वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा
इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज
का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा
वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा थोडाफार आढावा घेण्याचा
प्रयत्न मी काही लेखांमधून करणार आहे.
------
१४९२ मध्ये युरोपमधून अशियाच्या शोधात निघालेला कोलंबस उत्तर
अमेरिकेजवळील बेटांवर पोहोचला, आणि त्यानंतर जवळपास १०० वर्षं अनेक
युरोपियन या नवीन जगाच्या सफरीकरता, अधिक जागेच्या शोधाकरता येतच राहिले.
पण त्यांचा हेतू हा सोने, मसाल्याचे पदार्थ यांचा शोध, लूट, धर्मांतर, काही
स्थानिकांना गुलाम म्हणून परत आणणे इथपर्यंतच असे. या नवीन जगात
राहण्याच्या हेतूने कोणीही येत नसे. खरं तर कोलंबसच्या आधीही उत्तर
अमेरिकेत अनेक खलाशांच्या सफरी झाल्याचे पुरावे आहेत. कोलंबसच्या आधी ५००
वर्ष नॉर्वेमधून Leif Eriksson नावाचा खलाशी कॅनडाच्या उत्तर पूर्व
किनार्यावर पोहोचला होता. पण तिथे तो किंवा त्याच्यानंतर आलेले
खलाशी/प्रवासी फारशी वस्ती करुन राहिले नाही. कोलंबसनंतर स्पेनमधून हर्नन
कॉर्टेझ मेक्सिकोला पोहोचला, आणि तिथल्या अॅझ्टेक साम्राज्याबरोबर लढाईत
गुंतला. परंतू स्पेनमधील लोकांनी मेक्सिकोमध्ये स्थलांतर केले नाही.
स्थानिकांवर सत्ता चालवणे, त्यांचे धर्मपरिवर्तन करणे आणि मोठी लूट आपल्या
देशात घेऊन जाणे हेच सर्व युरोपियनांनी पसंत केले. सोळाव्या शतकात ब्रिटिश,
फ्रेंच, स्पॅनिश लोकांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरील काही ठिकाणी
मिलिटरी पोस्ट्स स्थापन केल्या आणि स्थानिकांबरोबर थोडाफार व्यवहार सुरु
केला.
सतराव्या शतकात युरोपातली परिस्थिती चिघळत होती. सतत चालणारी युद्धं आणि
त्यात सुरु असलेला कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट हा वाद याने तेथील
प्रोटेस्टंट लोक पिचून गेले होते. प्रोटेस्टंट पंथाला पाठींबा देणार्या,
सहानुभूती बाळगणार्या लोकांची धरपकड आणि कत्तल या काळात सुरु झाली.
सर्वसामान्यांची आर्थिक स्थितीही आशादायी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये १६०७
मध्ये एका नवीन जगात (न्यू वर्ल्ड) एक नवी सुरुवात करण्याकरता उत्सुक
असलेल्या १०५ पुरुषांना (सैनिक,'जंटलमेन', कारागीर आणि मजुर) घेउन एक जहाज
इंग्लंडमधून अमेरिकेला (सध्याच्या व्हर्जिनिया राज्यातील) जेम्सटाउन या
ठिकाणी पोहोचले. किनार्याचा हा भाग तोपर्यंत युरोपियनांकडून फारसा
'एक्स्प्लोअर' केला गेलेला नव्हता. सुरुवात आशादायक झाली असली तरी काही
काळातच रोगट हवामान, दुषित पाणी, आजार (टायफॉइड, डिसेंट्री), मूळ
रहिवाश्यांशी संघर्ष यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आणि ही वसाहत फारशी
यशस्वी ठरली नाही. नंतरही काही अयशस्वी वसाहतींचे प्रयत्न झाले. १६२०
मध्ये इंग्लंडमधील प्लिमथ या ठिकाणाहून प्युरिटन पंथाचे (इंग्लंडमधील
प्रोटेस्टंट्स) साधारण १०० लोक आणि ३० खलाशी इंग्लंडमधील छळाला कंटाळून आणि
धरपकडीला घाबरुन मेफ्लावर नावाच्या जहाजातून नवीन जगाकडे जायला निघाले.
साधारण २ महिन्यांच्या प्रवासानंतर मॅसेच्युसेट्स राज्यातील एका
किनार्यावर त्यांच्या जहाजाने नांगर टाकले. ही इंग्लिश लोकांची उत्तर
अमेरिकेतली पहिली अधिकृत यशस्वी कॉलनी. या नवीन ठिकाणाचे नाव त्यांनी
प्लिमथ असेच ठेवले.
यानंतर हळूहळू इंग्लंडमधून, आणि युरोपातील इतर भागांमधून लोकांचे उत्तर
अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर स्थलांतर सुरु झाले. या लोकांनी झाडं, जंगलं
साफ करुन राहण्याची व्यवस्था, शेती इत्यादी करता जागा बनवायला सुरुवात
केली. यातील काही लोकांनी तेथील मूळ रहिवाश्यांबरोबर (नेटिव्ह/इंडियन्स)
सलोख्यात राहायचा प्रयत्नही केला, आणि काही वेळा ते यशस्वीही झाले. पण
अचानक आलेले हे लोक आपल्या जागेवर अतिक्रमण करताना, शिकार करताना, नासाडी
करता पाहून नेटीव्ह अमेरिकन त्यांना विरोध करत आणि त्यातून चकमकी होत.
बंदुकांनी लढत असल्याने युरोपियन हे बहुतेक वेळा या चकमकीत जिंकत असत.
नेटिव्हज गनिमी काव्याने, रात्री हल्ला करुन नासधूस करत असत. जसे लोक
वाढायला लागेल तसे अतिक्रमण, आणि संघर्ष वाढायला लागला. अनेक मूळ
रहिवाश्यांच्या जमातीला पूर्वी आलेल्या खलाश्यांचे चांगले अनुभव नव्हते,
कित्येकदा त्यांनी केलेल्या चांगुलपणाचा मोबदला हा फसवणूक आणि लुटीत झालेला
होता त्यामुळे आलेल्या या लोंढ्याबद्दल ते साशंक होते. तरी व्यापार
करण्याच्या हेतुने किंवा नाइलाजाने अनेक जमातींनी या नवीन पाहुण्यांबरोबर
सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या भागात सुपीक जमीनीची
कमी नव्हती, शेती करण्यास भरपूर वाव होता, पण ही शेती करायला मनुष्यबळ
मात्र नव्हते, आणि तिथून सुरु झाली उत्तर अमेरिकेतील स्लेव्हरीला सुरुवात!
स्लेव्हरी किंवा गुलामगिरी ही युरोपियनांकरता नवी नव्हती. स्लेव्हरीचा
इतिहास हजारो वर्षं जुना आहे. ग्रीक, रोमन साम्राज्यात अफ्रिकेतून गुलाम
आणणे, किंवा पराजितांच्या योद्ध्यांना गुलाम बनवणे हे सर्वमान्य होते.
लढाई, रानटी खेळ, राजेरजवाड्यांचे सेवक इत्यादी करता गुलामांची नेमणूक
व्हायची. बरेच गुलाम नंतर मुक्त केले जायचे. त्यांच्या शौर्यावर
सैन्यामध्ये त्यांची बढती होत जायची. अनेकदा गुलामांनी त्यांच्या
लायकीप्रमाणे राजदरबारात काही महत्त्वाची पदे पण भूषविली आहेत. पण युरोपियन
अमेरिकेत आले, आणि या स्लेव्हरी किंवा गुलामगिरीचा एक वेगळा आणि दु:खप्रत
अध्याय सुरु झाला.
शेतीकरता मदत म्हणून १६१९ मध्ये २० गुलामांना अफ्रिकेतून आणले गेले ही
अमेरिकेतील स्लेव्हरीची पहिली नोंद आहे. पण सुरुवातीला आणले गेलेले
स्लेव्हज हे Indentured slaves होते, म्हणजे ते काही दिवसांच्या करारावर
आणले गेलेले होते. कराराच्या मुदतीचा काळ संपल्यावर ते मुक्त होत. केलेल्या
कामाबद्दल त्यांना पैसेही मिळत. ते गुलाम म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध,
कुटुंबापासून तोडून जबरदस्तीने आणले गेलेले असले तरी त्यांच्या नंतरच्या
पिढ्यांवर जे कोसळले त्या मानाने ते भाग्यवान होते. यातील काही स्लेव्हजनी
करार संपल्यावर जमिनी घेऊन स्वतःकरता शेती केल्याच्या नोंदीही आहेत.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ही पद्धत चालू राहिली. या काळात करिबियन
बेटांवरील कापुस, तंबाखु आणि इतर पिके तर ब्राझिल आणि इतर पोर्तुगिज,
स्पॅनिश कॉलनींमध्ये शेती, खाणव्यवसाय वाढायला लागले आणि कामगारांची मागणी
प्रचंड वाढली. त्यांना पगार देणे, ठराविक काळानंतर मुक्त करणे हे मोठ्या
बागायतदारांकरता फायदेशीर ठरेना. माणूस स्वार्थापायी किती खालच्या पातळीला
जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तर-दक्षिण अमेरिकेत युरोपियनांनी
अफ्रिकेतील दलालांसमवेत सुरु केलेला गुलामांचा व्यवसाय! जशी जशी
युरोपियनांनी अमेरिकेतील मूळ रहिवाश्यांकडून अधिकाधिक जागा हिसकावून घेऊन
शेतीची व्याप्ती वाढवली, तशी तशी अफ्रिकेतून गुलामांची आयात वाढत गेली आणि
पुढची अडीचशे वर्षे या गुलामांच्या अनेक पिढ्यांकरता कमालीची क्लेशकारक
ठरली.

(स्रोत - news.emory.edu)
अफ्रिकेतून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत गुलाम आयात करण्याचा जो व्यापार
होता होता त्याला 'ट्रान्स अॅटलांटीक स्लेव्ह ट्रेड' असे नाव पडले. १७व्या
शतकाच्या उत्तरार्धात करिबियन बेटे, दक्षिण आणि उतर अमेरिकेत गुलामांची
मागणी वाढायला लागल्यावर अफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावर गुलामांचा पुरवठा
करणारे दलाल वाढत गेले. या दलालांच्या सशस्त्र टोळ्या आतल्या देशांमध्ये
जाउन लोकांना बळाने, साखळ्या बांधून आणत आणि मोठमोठ्या जहाजांमधून
उत्तर/दक्षिण अमेरिकेला, करिबियन बेटांवर पाठवत असत. यात स्त्रिया, पुरुष
आणि मुलांचाही समावेश असे. एकदा का या दलालांनी पकडले की हे लोक
कुटुंबांपासून नेहेमी करता तुटले जात, पळून जाणेही त्यांच्याकरता जवळपास
अशक्यच असे. जहाजातही हे लोक कमी जागेत, एकमेकांना खेटून, साखळीत जखडून
ठेवले जात. या जहाजातील परिस्थिती इतकी भयंकर असे ही बरेच लोक हे तिथेच
आजारी पडून मरत. पण त्यांच्या जिवाला काही किंमत नव्हती. फुकट मिळालेले लोक
अतिशय स्वस्तात अफ्रिकेतील दलाल विकत असत, आणि मग अमेरिकेला आणले की तेथील
पुरवठादार त्यांची जास्त पैसे देऊन विक्री करत. एकदा एखादा गुलाम विकत
घेतला की ती घेणार्याची मालमत्ता होत असे. मग तिचा वापर कसा करायचा हे
मालक ठरवीत असे. विकत घेणारे लोक त्यांना विविध कामांकरता विकत घेत.
गुलामाच्या वय, लिंग, तब्येत यावर त्याची किंमत ठरे. यात भरपूर घासाघीस
चाले. या सर्वात गुलाम हा एका निर्जीव वस्तुप्रमाणे वागवला जाई. १८व्या
शतकात अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर गुलामांच्या विक्रीकरता मोठी केंद्रे
स्थापन झाली होती.

(स्रोत - http://historynet.com/)

(स्रोत - https://www.nationalgeographic.org/)
अमेरिकेत आलेले हे स्लेव्ह्ज सुरुवातीला गांगरलेले असत. भाषा, चालीरिती
सगळेच वेगळे. सुरुवातीला त्यांना बाप्तिस्मा देऊन खिश्चन बनवण्यात येत
असे. त्यांना नवीन नाव देण्यात येई. त्यांचे आडनाव मात्र मालकाप्रमाणे बदलत
असे. त्यामुळे एकाच गुलामाचे आयुष्यात अनेकदा आडनाव बदलू शकत असे. या
गुलामांचे पूर्वायुष्य पूर्णपणे पुसून टाकून त्यांचे मूळभूमीशी असलेले नाते
हरप्रकारे लवकर तोडण्याचा प्रयत्न होत असे. स्लेव्हज ही मालमत्ता असल्याने
त्यांना अक्षरशः निर्जिव वस्तूंसारखे वागवण्यात येई, त्यांचा भावनांना
काहीही किंमत नसे. त्यांच्याकडून फक्त काम करुन घेणे, जास्तीत जास्त
पिळवणूक करुन फायदा करुन घेणे, कुठलीही छोटी चूक (बहुतेक वेळेला फक्त
मालकाची गैरमर्जी) झाल्यास चाबकाने फटके, सतत अपमान, खच्चीकरण, कमालीची जरब
अशा परिस्थितीत हे स्लेव्ह्ज राहत. त्यांच्यात आपासात लग्ने होत. जास्तीत
जास्त मुले होणे हे मालकाच्या फायद्याचेच असे, कारण मुलांवरही मालकाचा हक्क
असे. मुले सुरुवातीची १०-१२ वर्षं आईवडीलांजवळ राह्त. त्यानंतर अनेकदा
मालक त्यांना दुसरीकडे विकून टाकत असे. यात मुलांच्या, आईवडीलांच्या आर्त
किंकाळ्यांना काहीच किंमत नसे. गुलाम हे मालमत्ता असल्याने ते एका पिढीकडून
दुसर्या पिढीकडे हस्तांतरीत केले जात किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना
भेटवस्तू म्हणूनही दिले जात. तिथेही गुलामांच्या कुटुंबाची ताटातूट होते
असे. स्त्रियांचे आयुष्य अजुन भयंकर असे. जर मालकाची वक्रदृषी पडली तर तिला
कोणीही वाचवू शकत नसे, कारण ती मालकाची मालमत्ता असल्याने तिचा नवरा किंवा
बाप यांचाही तिच्यावर काही हक्क नसे व ते तिच्याकरता काहीही करु शकत नसत.
'तुम्ही काहीतरी पाप केलेले असल्याने तुम्हाला देवाने ही शिक्षा दिली आहे,
तुम्ही कनिष्ठ, दुय्यम आहात, तुम्ही वाईट आहात, देवाचा तुमच्यावर कोप आहे'
वगैरे गोर्या धर्मगुरुंकडून त्यांच्या भोळ्या मनावर बिंबविले जात असे.
त्यांना शिक्षण घेण्यास मज्जाव असे. कुठलाही स्लेव्ह हा चोरुन शिक्षण
घेताना दिसला तर जबर शिक्षा केली जाई. पळून जाताना आढळलेल्या स्लेव्हची
अवस्था तर अतिशय भयंकर होत असे, जेणेकरुन इतर त्यातून धडा घ्यावा. बर्याच
स्त्री गुलामांना मालकांपासून मुले झालेली असायची. अडीचशे वर्षात अमेरिकेत
खूप मोठ्या प्रमाणात मिक्स्ड ब्रीडींग झाले. मात्र या सर्व मुलांमध्ये
अफ्रिकन रक्त असल्याने ते गुलामच रहायचे, आणि शेवटी विकले जायचे.
अमेरिकेला १७७६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तोपर्यंत अमेरिका ही
इंग्लंडची कॉलनी म्हणून ओळखला जायचे आणि त्यांना इंग्लडच्या तिजोरीत कर
भरावा लागायचा. थोडी स्वायत्तता असली तरी महत्त्वाचे निर्णय हे इंग्लंडचा
राजाच घ्यायचा. अमेरिकेतील बुद्धीजीवी नेत्यांना, लोकांना हे सहन होत
नव्हते, आणि तिथे त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात झाली. खरं तर
अमेरिकेत आलेले लोक हे तिथल्या मू़ळ (नेटिव्ह) लोकांची जमीन बळकावून राहत
होते, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्लेव्हरी कमी न होता वाढतच होती. पण याच
राज्यांना इंग्लंडची त्यांच्यावर चाललेली सत्ता मात्र मान्य नव्हती. इंग्रज
सैन्यावर निर्णायक विजय मिळाल्यावर ४ जुलै १७७६ अमेरिकेने स्वतःला
स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर १३ राज्यांनी
बनलेल्या अमेरिकेत स्लेव्हरीच्या प्रश्नावर मात्र मुळीच एकमत नव्हते.
व्हर्जिनिया आणि त्याच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये स्लेव्हरीला पाठींबा तर
व्हर्जिनियाच्या उत्तरेला असलेल्या राज्यांचा स्लेव्हरी बंद करण्याकडे कल
होता.

(स्रोत - https://subratachak.wordpress.com/)
अमेरिकेचे फाउंडींग फादर्स अतिशय विद्वान, धोरणी लोक होते.
त्यांच्यातल्या काहीजणांचा स्लेव्हरी बंद किंवा हळू हळू कमी करत नेऊन बंद
करण्याकडे कल होता (आणि बर्याच जणांकडे स्वतःचे स्लेव्ह्जही होते).
उत्तरेकडील राज्यांमध्ये काही लोक उघडपणे स्लेव्हरीला विरोध करायला लागले
होते. अमेरिका स्वतंत्र झाल्यावर स्लेव्हरी बंद करावी याकरताही काही जणांचा
आग्रह होता. पण अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्यांचा याला विरोध होता.
दक्षिणेत अनेक मोठमोठे बागयतदार (प्लँटेशन ओनर्स) होते आणि त्यांची प्रचंड
मोठी शेती ही या स्लेव्हरीच्या जीवावर चालत होती. या गुलामांमध्ये त्यांची
मोठी आर्थिक गुंतवणूक होती. स्लेव्हरीचा अंत म्हणजे या स्लेव्ह
कष्टकर्यांना पगार द्यायला लागणार, आणि त्याने व्यवसायातला नफा कमी होणार
त्यामुळे स्लेव्हरी बंद करण्यास त्यांनी कडा विरोध केला. स्वातंत्र्य
मिळाल्यावर सुरुवातीच्या १३ राज्यांमधील युनियन टिकवून ठेवण्याकरता
स्लेव्हरीच्या प्रश्नावर काहीही निर्णय घेतला गेला नाही. अमेरिकेच्या हाउस
ऑफ रिप्रेझेंटिटीव्ह मध्ये राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या राज्याला
प्रतिनिधी मिळतात. स्लेव्हना मालमत्ता म्हणून समजले जात असल्याने मतदानाचा
अर्थातच हक्क नव्हता पण त्यांना लोकसंख्येत धरण्याची दक्षिणेतील राज्यांची
इच्छा होती जेणेकरुन संसदेत राज्याचे प्रतिनिधी म्हणजे वर्चस्वही वाढणार.
उत्तरेतील राज्यांना हे दुट्टपी धोरण मान्य नव्हते. त्यामुळे तोडगा म्हणून
प्रत्येक स्लेव्हला लोकसंख्येत तीन पंचमांश (३/५) धरले गेले. स्लेव्ह
मालमत्ता असल्याने त्यांच्यावर कर भरला जात असे, कर भरतानाही माणशी हाच तीन
पंचमांश आकडा धरला गेला. एका मनुष्यप्राण्याला गणताना त्याला पूर्ण माणूस
म्हणून नाही तर ३/५ गणणे या पेक्षा अजून मानहानीकारक आणि लाजिरवाणे काय असू
शकेल! स्लेव्हरीचा सगळा अध्यायच माणुसकीला काळीमा फासणारा होता.
अमेरिकेतील उत्तरेतल्या राज्यांमध्ये ही अमानुष पद्धत बंद करण्याकरता
चळवळ जोर धरत होती आणि शेवटी १८०४ पर्यंत उत्तरेतील राज्यांनी स्लेव्हरी ही
संपुष्टात आणली. इंग्लंड आणि युरोपातही ती या काळापर्यंत हद्दपार झाली
होती. उत्तरेत संपूर्ण अमेरिकेत स्लेव्हरी संपवण्याकरता अॅबॉलिशनिस्ट
मूव्हमेंट सुरु झालेली होती. पण दक्षिणेत मात्र ती जास्त अमानुष होत होती.
याचे एक कारण म्हणजे १८०३ मध्ये अमेरिकेने फ्रांसकडून लुइझियाना पर्चेस
कराराखाली मिळवलेला जमिनीचा खूप मोठा तुकडा! या करारानुसार थॉमस जेफरसनने
मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला पसरलेला विस्तीर्ण, सुपीक जमिनीचा तुकडा
फ्रांसकडून विकत घेतला. लुइझियानाची दमट हवा आणि कमी काळ असणारी थंडी
यामुळे तिथे कापसाच्या पिकाची लागवड चांगली व्हायला लागली. काही
वर्षांपूर्वी कॉटन जिन या यंत्राचा शोध लागला होता आणि कापूस हे अतिशय
नफादायक पीक ठरायला लागले होते. अमेरिकेतील दक्षिणेतून कापूस उत्तरेतील
राज्यात, आणि तेथील कारखान्यांमधून कपड्याच्या रुपांतरात सर्व युरोपमध्ये
निर्यात होऊन जायला लागला. तंबाखु, कापूस, ऊस यांची प्रचंड मोठी शेती
जॉर्जिया, अॅलाबामा, मिसिसिपी, लुइझियाना राज्यांमध्ये वाढली आणि
स्लेव्हचे आयुष्य कमालीचे हालाखीचे झाले. या प्लँटेशन्स मध्ये
स्लेव्ह्जकडून प्रचंड काम करुन घेतले जायचे. अपुरे खाणे, पळून जाण्याचा
प्रयत्न करणार्यांना जबरी शिक्षा, राहायला हालाखीची परिस्थिती, प्लँटेशनचा
मालक, मुकादम यांच्याकडून मारहाण... प्राण्यांपेक्षाही खालच्या पातळीवर या
लोकांना वागविले जाई. या राज्यांमध्ये प्लँटेशन्सवर काम करण्याकरता विकले
जाणे ही स्लेव्ह्जकरता सर्वात भयावह गोष्ट होती.
लुइझियाना पर्चेस नंतर पश्चिमेला वाढलेली अमेरिका

(स्रोत - https://www.enchantedlearning.com_)
अमेरिका स्वतंत्र झाल्यावर १७९० च्या आसपास अमेरिकेत साधारणपणे ७ लाख
स्लेव्हज होते तोच आकडा १८६० पर्यंत ४० लाखापर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या
शतकाच्या सुरुवातीला उत्तरेत अॅबॉलिशन मूव्हमेंट जोर धरत होती, पण
दक्षिणेच्या हातात बर्याच आर्थिक नाड्या असल्याने, आणि त्यांचा स्लेव्हरी
बंद करण्यास कडवा विरोध असल्याने सरकार अजुनही स्लेव्हरी अधिकृतरित्या बंद
करु शकत नव्हते. त्याकरता उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांचे एक मोठे युद्ध
आणि प्रचंड रक्तपात होणे बाकी होते...
स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim - ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass - Frederick Douglass
12 Years a Slave - Solomon Northup
Incidents in the Life of a Slave Girl - Harriet Jacobs
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org
(maitrin.com या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित)
फाउण्डिंग फादर्सचा गुलाम फ्री करण्याकडे कल होता वगैरेही वाचले आहे. पण
जॉर्ज वॉशिंग्टन सोडला तर बहुधा इतर स्लेव्हओनर्सनी ते फ्री केले नाहीत.
त्यामुळे त्यांच्या बाकी थोरपणामुळे याबाबतीत त्यांचे चॅरिटेबल वर्णन
करण्याचा काहींचा कल असतो, तर काही वोक लोक त्यांना आत्ताची मूल्ये वापरून
जोखतात. त्यापेक्षा जे होते त्याप्रमाणे वर्णन करणारे व त्यांच्या मुख्य
कार्यक्षेत्रात महान कामगिरी करणारे हे लोक इतर बाबतीत तेव्हाच्या प्रचलित
समजांप्रमाणे वागत होते हे मान्य करणे व त्यांना आत्ताच्या मूल्यांच्या
चौकटीत बसवायचा खटाटोप न करणे हेच बरोबर आहे. एखाद दुसरी थोर व्यक्ती
काळाच्या खूप पुढे असते पण ते अपवाद.
जेफरसनने गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही, नेटिव्ह अमेरिकन्स,
स्त्रियांचे हक्क याबाबतीतही त्याने काही विशेष स्टॅण्ड घेतला नाही. पण
इतिहासातील जवळजवळ सर्व उदाहरणे अशा अंतर्विरोधाने भरलेली आहेत. "All men"
मधे मुळात स्त्रिया नव्हत्या, इतकेच नव्हे तर सर्व प्रकारचे "Men" सुद्धा
धरलेले नव्हते.
पण त्यामुळे त्यांच्या मुख्य कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. किमान
त्यांनी तेव्हा जे नियम लिहीले त्यातून पुढे कायदेशीर समानता येण्यात -
आफ्रिकन अमेरिकन्स, स्त्रिया, नेटिव्ह अमेरिकन्स वगैरे सर्वांना समान हक्क
मिळण्यात तेव्हा लिहीलेली घटनेची तत्त्वे आड आली नाहीत, हे ही महत्त्वाचे.
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग २)
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)
अमेरिकेतील स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा १८०७ मध्ये लागू झाला. या
कायद्यानुसार अफ्रिकेतून अमेरिकेत गुलामांची आयात करण्यावर बंदी घालण्यात
आली. १८०३ मधल्या लुइझियाना पर्चेस करारानुसार मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला
असलेली जवळपास ८,२७,००० स्क्वेअर मैलाची जमीन अमेरिकेने फ्रांसकडून विकत
घेतली. मिसिसिपी नदीच्या किनार्यावरची दक्षिणेकडील जमीन खूप सुपीक होती.
एवढ्या प्रमाणात सुपीक जमीन उपलब्ध झाल्यामुळे दक्षिणेतील
प्लँटेशन्स/शेतामध्ये वाढ झाली. विविध पिकांची लागवड वाढली आणि शेतातील
कामांकरता जास्त लोकांची गरज भासू लागली. स्लेव्ह ट्रेड वर बंदी
आल्यानंतरही फ्लोरिडा आणि टेक्सास (जे तेव्हा अमेरिकेचा भाग नव्हते) मधून
गुलामांची चोरटी आयात चालू राहिली. या गुलामांना आणणार्या जहाजांच्या
कॅप्टन्सना पकडले तरी फारशी कडक शिक्षा होत नसे. नवीन कायद्यानुसार
गुलामांच्या आयातीवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी अंतर्गत व्यापारावर
मात्र बंदी नव्हती. या काळात स्लेव्ह्जची वाढलेली मागणी आणि बाहेरुन
स्लेव्ह्ज आणण्यावर आलेली बंदी यामुळे अंतर्गत व्यापारात मोठ्या प्रमाणात
वाढ झाली. उत्तरेतील स्लेव्ह्ज हे मुक्त झालेले होते, कुटुंबाबरोबर एकत्र
राह्त होते. या "फ्री" झालेल्या गुलामांना अनेकदा फसवून पळवून आणून
दक्षिणेत दूर कुठेतरी विकून टाकले जात असे. त्यांचा परतीचा मार्ग जवळपास
बंदच होऊन जाई. एक तर त्यांच्यावर विकत घेणारे कोणी विश्वास ठेवत नसत, आणि
खरे बोलल्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अनेकदा दलालांकडून मारहाण व्हायची
त्यामुळे ते सत्य सांगायला घाबरत असत. पळून जाणार्या स्लेव्हजना
पकडण्याकरता शिकारी कुत्रे, बंदुकधारी पोलीस, मालकाची माणसे ही मागावर
असायची आणि २ पायांवर पळण्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा. जाउन जाउन एवढ्या
मोठ्या देशात किती दूर जाणार!

(स्रोत - http://abolition.e2bn.org/ , www.downtoearth.org.in)
या काळात कापुस, ऊस, गहु, कणीस या पिकांची लागवढ वाढली त्याचबरोबर
स्लेव्ह्जची मागणी आणि किंमतही वाढली. इलाय व्हिटनीने कॉटन जिन या यंत्राचा
शोध लावल्यावर कापसातून सरकी (बी) काढणे सोपे आणि वेगवान झाले. पूर्वी ते
काम गुलाम हाताने करत, आणि त्यात खूप वेळ जात असे. पण कॉटन जिनने कापसावर
प्रक्रिया करण्याच पद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणला आणि कापसाची मागणी
प्रचंड वाढली. शेतीत दिवसरात्र काम करण्याकरता चिवट, कामसू स्लेव्ह्ज लागत.
निरोगी पुरुष गुलामाची किंमत स्लेव्हरीच्या सुरुवातीला सतराव्या शतकात १०
डॉलर्सपर्यंत होती, ती "डीप साउथ"मध्ये (लुइझियाना, मिसिसिपी, अॅलाबामा,
जॉर्जिया, साउथ कॅरोलिना) एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत १२००-१५००
डॉलर्सपर्यंत वाढली. किंमत वाढली तशी जास्त कामाची अपेक्षा ठेवली जाऊ
लागली. दक्षिणेतील बागायतदार अतिशय श्रीमंत होते. कापसाच्या पिकाने तर
त्यांच्या संपत्तीत फार मोठी भर पडली होती. पण त्या श्रीमंतीचं वारंही कधी
त्यांच्या स्लेव्ह्जना लागलं नाही. त्यांना दरवर्षी मालकाकडून कपड्यांचा
जोड, मोजे, बूट आणि थंडीकरता कोट मिळे. हे त्यांना वर्षभर पुरवून वापरावे
लागे. लहान मुलांना बहुतेकवेळा काहीच कपडे मिळत नसत त्यामुळे ते उघडेच असत.
या स्लेव्ह्जना दर शनिवारी कणसाचे भरडलेले पीठ, थोडासे डुकराचे मास,
काकवी, एखाद्या दोन भाज्या वगैरे अशी आठवड्याभराकरता शिधा मिळत असे. सगळे
पदार्थ निकृष्ट दर्जाचे असत, प्रमाण कमी असे आणि ते एक आठवडा पुरवावे लागे.
ही शिधा दर माणशी मिळत असे. पुरुषांना जास्त, आणि स्त्रिया-मुलांना कमी.
राबणार्या माणसांना हे जेवण पुरत नसे त्यामुळे त्यांचे पोषण नीट होत नसे.
शेतावर काम करणार्या स्लेव्ह्जना सूर्योदयाच्या आधी घर सोडावे लागे
त्यामुळे रोज भल्या पहाटे त्यांना स्वयंपाक करुन, जेवणाचा डबा घेऊन निघावे
लागे. थोडी मोठी परंतु अजुन कामावर न जाणारी भावंडे लहानांच्या जेवणाची,
संगोपनाची जबादारी घेत. सूर्यास्तानंतरच दिवसाच्या अतीव श्रमानंतर हे
स्लेव्ह्ज घरी येत. कुपोषणामुळे बालमृत्यूदर जास्त तर स्लेव्हजचे
आयुर्मानही कमी असे.
नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया येथील स्लेव्ह्जची परिस्थिती ही "डीप साउथ"
मधल्या राज्यातील स्लेव्ह्जपेक्षा जरा बरी होती. क्वचित काही जणांचे मालक
त्यांना माणुसकीनेही वागवत. काम संपल्यावर इतर मार्गाने अर्थाजन करु देत,
जवळपास विकल्या गेलेल्या मित्रमंडळी किंवा कुटुंबियांना अधुन मधुन भेटू
देत. अर्थात गुलाम हा त्यांचा हा दर्जा तसाच असे, आणि परिस्थिती कधीही बदलू
शकते याची त्यांना सतत जाणीव असे. कधी काही दयाळू मालक त्यांना मृत्यूनंतर
मुक्तही करत असत. पण स्लेव्ह मुक्त करणे म्हणजे पैशावर पाणी सोडण्यासारखे
असल्याने ते फार कमी प्रमाणात केले जायचे. स्वयंपाकघरात, बागेत, घोड्याच्या
पागेत, दाई, नोकर, मदतनीस म्हणून काम करणार्या स्लेव्हचे आयुष्य शेतात
काबाडकष्ट करणार्या त्यांच्या बांधवांपेक्षा थोडे बरे असायचे. परंतु
स्लेव्ह्जना त्यांची जागा दाखवून देण्याकरता त्यांच्यावर वचक ठेवणे आवश्यक
आहे आणि त्याकरता त्यांना नियमितपणे मारहाण, अपमान, खच्चीकरण करणे गरजेचे
आहे अशा विचाराचे मालक आणि मुकादम सर्वच स्लेव्ह राज्यात जास्त होते.
माणूस हा मोठा चिवट प्राणी आहे, आणि ते या गुलामांच्या बाबतीत वेगळे कसे
असेल! या अशा मानहानीकारक जीवनातही कसं पुढे चालत रहायचं, आनंदी रहायचं हे
ते शिकले होते. किंबहुना याशिवाय वेगळे आयुष्यच त्यांना महिती नसल्याने
असेल त्या परिस्थितीतून चांगल्या गोष्टी घडवण्याचा ते प्रयत्न करीत. चार
ठिकाणी विकले जाऊन वेगळं आयुष्य जगून आलेले स्लेव्ह्ज हे बाकीच्या ठिकाणची
इतरांना माहिती द्यायचे. रविवार हा त्यांचा सुटीचा दिवस. इतर दिवशी
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत व्यस्त असलेले हे लोक रविवार सकाळ ही
चर्चमध्ये घालवायचे. जवळच्या शेतातील स्लेव्ह्जशी, तिथे विकल्या गेलेल्या
नातेवाईक, मित्रमंडळींशी भेट होईल. गप्पांना उधाण येई. भक्तीसंगीतात या
लोकांना विशेष रस होता. वेगवेगळ्या प्रकारची गाणी रचून, त्यांना संगीत देउन
ती मिळून गाणे हे त्यांच्या गेलेल्या आठवड्याचा शीण घालवण्याचे साधन असे.
हे अफ्रिकन अमेरिकन गुलाम मूळतः भाविक होते. सगळ्या चिंता येशूवर टाकून ते
जीवन जगत. याच रविवारच्या कार्यक्रमात बरेचदा चोरुन लिहावाचायला शिकवण्याचा
कार्यक्रमही चाले. उत्तरेतून आणली गेलेली मुक्त माणसे ही शिक्षित असत,
तसेच काही स्लेव्ह्जही चोरुन लिहावाचायला शिकलेले असत. या रविवारच्या चर्च
भेटीमध्ये मग चोरुन लिहावाचायची शाळा चाले. स्लेव्हजच्या झोपडीमध्ये
(छोटेसे लाकडी कॉटेज) कुठल्याही प्रकारचे लिहावाचनाचे साहित्य सापडल्यास,
तसेच कुठेही ते शिकताना आढळल्यास त्यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा होत
असे. या लोकांना अशिक्षित ठेवणे हे त्यांच्या मालकांच्या फायद्याचे होते.
पण तरीही त्यांचे शिकणे थांबत नसे. शिकायची, वाचायची, जगात काय चालले आहे
हे जाणून घ्यायची, या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची त्यांची धडपड चालू असे.
अमेरिकन ब्लूज या संगीत प्रकाराचा जन्म हा दक्षिणेतील शेतांमध्ये झाला
आहे. दक्षिणेतल्या शेतात जेंव्हा अनेक स्लेव्हज एकत्र काम करत तेंव्हा शीण
कमी व्हावा, उत्साह वाटावा म्हणून ते समूहाने गाणी गात, तोंडानेच वाद्यांचा
आवाज काढीत. या गाण्यांचे विषय हा बहुतांशी येशू, निसर्ग, काम, त्यांची
परिस्थिती वगैरे हे असत. ही गाणी सकारात्मक असत. बरेचदा त्यांचे शब्द हे
ऐनवेळेला बनत. बरेचदा त्यांच्यातल्याच एखादा आघाडीचा गायक आणि मागे त्याचे
शब्द कोरसमध्ये गाणारी इतर मंडळी असा हा कार्यक्रम चाले. या दक्षिणेतल्या
गुलामांच्या गाण्यांमधून ब्लूज उदयास आले. जाझ या संगीतप्रकाराचा उदयही
न्यू ऑर्लियन्समधील अफ्रिकन अमेरिकन लोकांच्या संगीतातून झाला. R&B,
हिप-हॉप, रॅप, सोल या सर्व संगीतप्रकारांवर अफ्रिकन अमेरिकन संस्कृतीचा
प्रभाव आहे. स्लेव्ह्जनी अफ्रिकेतून ड्रम्स, बाँगो, झायलोफोन आणि इतर
अफ्रिकन वाद्य अमेरिकेत आणली. शेतात, चर्चमध्ये किंवा समुहात गाणी गाताना,
नाचताना थोड्या काळापुरते ते आपले कष्टप्रत आयुष्य विसरुन जीवनाचा आनंद
घेत. संगीत त्यांना सर्व विवंचनांपासून क्षणीक मुक्ती देत असे. या
गुलामांनी आपली खाद्य संस्कृतीही अफ्रिकेतून आपल्याबरोबर आणली. अतिशय
प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं असं एक जग हे या गुलामांनी अमेरिकेत निर्माण
केलं.

(स्रोत - gorhamschools.org)
एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अमेरिकेत अॅबॉलिशन मूव्हमेंट सुरु
झाली. या चळवळीच्या अंतर्गत उत्तरेतील अनेक श्वेतवर्णीय लोकांनी
स्लेव्हरीला विरोध आणि ती रद्द करण्याकरता कायदा करण्यास आग्रह करायला
सुरुवात केली. अमेरिकेच्या फाउंडींग फादर्सपैकी बेंजामिन फ्रॅ़कलिन, थॉमस
जेफरसन यांचे मत हे स्लेव्हरी बंद करण्याला अनुकुल होते, पण अमेरिका
स्वतंत्र झाल्यावर दक्षिणेतील राज्यांच्या दबावामुळे असा काही कायदा बनू
शकला नाही. जेफरसनने १८०७ झाली स्लेव्ह ट्रेड बंद करणारा कायदा आणला, पण
त्याचे इतर प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. स्लेव्हरीला विरोध आणि बंद
करण्याकरता प्रयत्न इतरही काही नागरिकांकडून होत होते. १८१६ साली स्लेव्हरी
बंद करणे, आणि गुलामांना परत अफ्रिकेत पाठवणे या विचाराने एकत्र येऊन काही
नेते आणि नागरिक यांनी American Colonization Society ची स्थापना केली.
१३ राज्यांना घेऊन स्वतंत्र झालेल्या अमेरिकेत एकोणीसाव्या शतकात नवीन
राज्यांची भर पडत होती. कोणत्या राज्यात स्लेव्हरी चालू ठेवायची आणि
कोणत्या राज्यात तिच्यावर बंदी आणायची यावरुन सतत राजकारण होत होते.
उत्तरेतली राजे स्लेव्हरीच्या विरोधात होती तर दक्षिणेतल्या राज्यांना
स्लेव्हरी हवी होती. कोणालाही दुसर्याला वरचढ होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे
नवीन राज्य देशात सहभागी झाले की ते स्लेव्ह स्टेट ठेवायचे की फ्री यावरुन
वातावरण तापत असे. १८२० साली मिझुरी हे राज्य जेंव्हा देशात सामील होणार
होते तेंव्हा मात्र परिस्थिती चिघळली. मिझुरी जेंव्हा राज्य झाले तेंव्हा
दक्षिण आणि उत्तर दोघांनीही त्या राज्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करत
होते. या राज्याने स्लेव्ह स्टेट बनण्याकरता परवानगी मागितली. पण त्यामुळे
अमेरिकन संसदेत स्लेव्ह राज्यांची संख्या वाढली असती, त्यांचे वर्चस्व
वाढले असते, त्यामुळे उत्तरेकडील राज्ये मिझुरी राज्याला स्लेव्ह स्टेटचा
दर्जा देण्यास सहमत नव्हते. बरेच राजकारण होऊन शेवटी एक तोडगा काढण्यात
आला.या तोडग्या नुसार (मिझुरी काँप्रमाइज) स्लेव्ह आणि फ्री राज्यांची
संख्या सारखी ठेवण्याकरता मेन (Maine) या राज्याला फ्री तर मिझुरीला स्लेव
स्टेट म्हणून परवानगी देण्यात आली. तसेच देशाच्या मध्यातून एक काल्पनीक
पूर्व पश्चिम रेषा आखून (अक्षांश ३६° ३०') यापुढे या रेषेच्या उत्तरेला
सामील होणारे राज्य फ्री स्टेट तर दक्षिणेतील राज्य स्लेव्ह स्टेट असेल असा
कायदा मंजुर करण्यात आला. तोडगा काढून मिझुरीला स्लेव्ह राज्य
बनविल्यामुळे उत्तरेत दक्षिणेबद्दल कमालीची नाराजी आणि असंतोषाची भावना
निर्माण झाली. 'मिझुरी काँप्रमाइज' करारामध्ये अमेरिकेतल्या यादवीची बिजे
रोवली गेली. या करारानंतर अॅबॉलिशन मूव्हमेंट जास्त शिस्तबद्द, प्रखर
झाली. विल्यम गॅरिसन लॉइड याने आपल्या काही साथीदारांबरोबर ही चळवळ सुरु
केली. लॉइड हा स्वतः मोठा सुधारक होता आणि त्याच्या वर्तमानपत्रामधून
स्लेव्हरीच्या विरोधात सतत लिहायचा. स्लेव्हरी तातडीने रद्द करुन सर्व
गुलामांना मुक्त करण्याचा अॅबॉलिशनिस्ट्सचा आग्रह वाढायला लागला. तात्वीक
पातळीवर त्यांचा माणसांना गुलाम म्हणून वागवण्यास विरोध होता, आणि एकही नवे
राज्य स्लेव्ह स्टेट बनू नये अशी त्यांची इच्छा होती. न्यूयॉर्क आणि
मॅसॅच्युसेट्समध्ये सुरु झालेल्या या चळवळीला संपूर्ण उत्तरेकडून पाठींबा
मिळायला लागला. १८३० साली अॅबॉलिशन मूव्हमेंट स्लेव्हरी रद्द करण्यामागील
अधिकृत चळवळ बनली.

(स्रोत - http://www.compromise-of-1850.org/missouri-compromise-1820/)
स्वतःच्या फायद्यासाठी स्लेव्हरी सुरु ठेवण्याकरता दक्षिणेकडील राज्ये
करत असलेले राजकारण हे उत्तरेकरता क्लेषकारक होते. दक्षिणेकरता स्लेव्ह्ज
ही त्यांची मालमत्ता होते, त्यात त्यानी प्रचंड पैसा गुंतवला होता आणि
त्यापासून त्यांना फारकत घ्यायची नव्हती. त्यात त्यांचा मोठा तोटा होता.
मिझुरी काँप्रमाइज या करारानंतर उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमधील
अविश्वासाचे आणि तिरस्काराचे वातावरण तीव्र झाले. या सगळ्याचे मूळ असलेले
गुलाम यापासून अनभिज्ञ होते का? उत्तर दक्षिणेच्या सीमेवर असलेल्या
राज्यातील गुलामांना याची कुणकुण लागलेली होती. पण याबद्दल अक्षरही
काढण्याची मुभा नव्हती. डीप साऊथमधील गुलामांना तर अशा काही चळवळीची,
त्यांना मदत करु इच्छीत असणार्या लोकांबद्दल काहीही कल्पना नव्हती. एक तर
त्यांचे आयुष्य शेतामध्ये राबण्यात जायचे, त्यांच्यापर्यंत कुठल्याही
बातम्या कोणत्याही मार्गाने पोहोचत नसत, आणि बहुसंख्य गुलाम हे अशिक्षित
होते, जे शिक्षित होते त्यांना काहीही वाचण्यास मनाई होती. हे स्लेव्ह्ज
उत्तर दक्षिणेच्या मोठ्या राजकारणात फक्त प्यादे होते.
पळून जाउन स्वतःला मोकळे केलेल्या गुलामांमध्ये फ्रेडरिक डग्लस याचे नाव
फार मोठे आहे. हा गुलामीच्या जाचाला कंटाळून उत्तरेला फक्त पळून गेला नाही
तर तिथे गेल्यावर तो अॅबॉलिशनिस्ट चळवळीमध्ये भरती झाला आणि लॉइडबरोबर
ठिकठिकाणी दक्षिणेतील गुलामांच्या आयुष्याबद्दल बोलू लागला. प्रभावी
वक्तृत्वाची त्याला देणगी होती. या पूर्वी फक्त श्वेतवर्णिय लोक या चळवळीत
भाग घेऊन स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल भाषणे देत पण डग्लसच्या रुपाने
लोकांना थेट माजी गुलामाकडून त्यांच्या जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर
जगत असलेल्या जीवनाबद्दल कळायला लागले. डग्लसच्या आगमनाने अॅबॉलिशन
चळवळीचे रुप पालटले आणि लोकांचा पाठींबा अजुन वाढला. सोजर्नर ट्रुथ, हॅरिअट
टबमन ही देखील या चळवळीतील मोठी नावे आहेत. दोघीही जन्मतः गुलाम होत्या
आणि पळून जाऊन त्यांनी स्वतःला मुक्त करवले. त्यानंतर सारे आयुष्य त्यांनी
इतर गुलामांना पळून जाण्यास मदत करण्यात वेचले. स्त्रियांना मतदानाचा हक्क
मिळावा याकरता चालू असलेल्या चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे.
एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत श्वेतवर्णीयांबरोबरच अनेक कृष्णवर्णीय
अॅबॉलिशनिस्ट्स या चळवळीत सहभागी झाले आणि त्यांनी मिळून ही चळवळ पुढे
नेली. पळून आलेल्या गुलामांना सुखरुपपणे सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी
'अंडरग्राउंड रेलरोड' म्हणजेच सुरक्षित घरांनी बनलेल्या मार्गाची दरतूद या
अॅबॉलिशनिस्ट्सनी केली. या ठिकाणचे लोक पळून आलेल्या स्लेव्ह्जना आपल्या
घरी लपवून ठेवत आणि पुढे सुरक्षितपणे पाठवत. अनेक लोकांनी स्वतःला होत
असणार्या त्रासाची तमा न बाळगता स्लेव्हनजा पळून जाण्यास मदत करण्याकरता
या योजनेत भाग घेतला.
फ्रेडरिक डग्लस, सोजर्नर ट्रुथ, हॅरिएट टबमन

(स्रोत - en.wikipedia.org)
ब्रिटनने १८३३ मध्ये आणि फ्रांसने १८४८ मध्ये स्लेव्हरी रद्द करणारा
कायदा आणला. अमेरिकेतही स्लेव्हरी रद्द करण्याबद्दल दबाव येत होता, पण
त्याकाळात सत्तेवर असणारे प्रमुख हे दक्षिणेतील राज्यांच्याबाबतीत मऊ धोरण
असणारे आणि दक्षिणेच्या विरोधात जायला घाबरणारे होते. अशात १८६० मध्ये
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन याची नेमणून झाली.
स्लेव्हरीला विरोध करणारा आणि त्याकरता काहीतरी परिणामकारक उपाययोजना
करण्याची मनापासून इच्छा असणारा हा नेता अमेरिकेच्या लोकांनी निवडून आणला
हे गुलामांचेच नव्हे तर अमेरिकन लोकांचे भाग्य होते. लिंकनच्या
कारकिर्दीतली पुढील ५ वर्षे निर्णायक आणि झंझावती असणार होती.
स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org
(maitrin.com या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित)
माझी अमेरिका डायरी - Pike Place Market, Seattle!
सिएटल आणि “Pike Place Market” हे नाव जोडीनं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होत.
आमचं हॉटेल डाऊनटाऊन मध्ये, मार्केट पासून अक्षरश: सातेक मिनिटे चालत होत.
त्यामुळे चेक इन केलं, बॅगा टाकल्या, आणि आम्ही बाहेर पडलो.
सिएटल सिटी म्हणजे सॅन फ्रान्सिस्को चा बाप आहे असच वाटलं. अरुंद आणि भयंकर
चढ/उतार असलेले रस्ते. चौथ्या ऍव्हेन्यू वरून नजर टाकली की खाली उतरत
जाणारा रस्ता, बऱ्यापैकी अरुंद, दुतर्फा उंचच्या उंच बिल्डींग्स, त्या
उतरत्या रस्त्यांच्या टोकाला सुरू होणार समुद्र.
नियमित दिसणाऱ्या बसेस, बस स्टॉप वरची माणसं , रस्त्याने चाललेले माणसांचे घोळके, तशीच लगबग.

---

अहाहा मुंबई (आणि आता NYC किंवा SF) चीच आठवण झाली. कुठेही नवीन
ठिकाणी गेल तरी नकळत मन मुंबईच्या एखाद्या भागाची छटा / छबी शोधत रहात आणि
ओळखीच्या काही खुणा मिळाल्या की एकदम भारी वाटत.
तर असो, आम्ही फिरत फिरत ह्या Pike Place Market शी पोहोचलो आणि माणसांची
गर्दी कितीतरी पटींनी वाढलेली जाणवली. मार्केट म्हणजे पसरलेल, बैठ, बंदिस्त
संकुलच. त्या गर्दी बरोबर आम्हीही त्या मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसलो.
कसलं, एका बोळकांडातून समोरून, मागून येणाऱ्यांना चुकवत (जे इकडे अगदीच
दुर्मिळ ) आम्ही पण पुढे सरकायला लागलो. थोडं पूढे गेल्यावर अक्षरश:
अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखं वाटलं. जिकडे बघावं तिकडे काही नवलाईच, सुबक,
कलाकुसरीच. एका स्टॉल वर सुंदर विणलेल्या क्रोशाच्या वस्तू तर बाजूच्या
स्टॉल वर अतिशय देखणे, आकर्षक, रंगेबिरंगी काचेचे दिवे, प्राणी, पक्षी,
लोलक. तिथेच बाजूला लाकडी पझल्स, निरनिरळ्या आकाराचे रूबिस्क cubes, लाकडी
३D पझ्झल्स. काय आणि किती बघू, फोटो घेऊ अस होऊन गेलं. अगदी जत्रेत
रमलेल्या मुलासारखी अवस्था झाली. मंडळी पझ्झल्समध्ये रमली. तिथपर्यंत मी
भरभरून रंगीत काचेच्या वस्तूंचे फोटो काढत सुटले.

---

---

---

उजव्या अंगाला एक गल्ली दिसली तिथून आत गेलो तर जणू काही खाली उतरत
चाललेलो. दोन्ही बाजूने, सुंदर, मौल्यवान, दुर्मिळ, लोभस, चित्र विचित्र
अशा सगळ्या वस्तू, पुतळे, खेळणी, रंगेबिरंगी किमती स्टोन्स / खड्यांचे
दागिने, जुनी कॉईन्स, जादूचे साहित्य यांनी सजलेली ती छोटेखानी स्टॉल वजा
दुकानं. जे जे म्हणून मनाला भुलवणारं, रिझवणार अगदी छोट्या बाळगोपाळांपासून
ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणार काही ना काही होतच तिकडे.
मार्केट फिरता फिरता लक्षात आलं, अरे आपण एक एक मजला काही उतरत चाललोय. आणि
त्याच्या नंतरच्या लगेचच्या भेटीत त्याची व्याप्ती जाणवली.

--


---

सेकंड ऍव्हेनुला जी समोरून एक मजली बिल्डिंग दिसते ती, मुख्य पातळीच्या
खाली जात जवळ जवळ १० मजले खोल अशी सरळ वॉटरफ्रंट पर्यंत (समुद्र किनाऱ्या
लगतच्या रस्त्यापर्यंत) जाणारी मोठी बिल्डिंग आहे. एकंदर नऊ एकर एवढा मोठा
परिसर आहे हा. Pike Place Market म्हणजे अमेरिकतेतील सर्वात जुनं आणि मोठं
फार्मर्स मार्केट. १९०७ पासून चालू झालेल. म्हणजे जवळ जवळ ११६ वर्ष जुनं
म्हणता येईल. इथे जवळपासचे शेतकरी, आर्टिस्ट, कोळी, माळी, आचारी
मुख्यत्वे आपली भाजी, कलाकुसर केलेल्या वस्तू, ताजे मासे, फळफळावळ,
अन्नपदार्थ विकतात. मला तर “भुलभुलैय्यामे खोया है जोकर” अस काहीस वाटायला
लागलं.
इकडचा सर्वात लोकप्रिय असलेला भाग म्हणजे Pike Place Fish, अगदी मोठे
मोठे ताजे मासे, खेकडे, कोळंबी वगैरे वगैरे सगळं बर्फात घालून विकायला
मांडून ठेवलेलं असत. एखाद्याने एखादा मासा विकत घेतला की ठेल्याच्या बाहेर
उभा राहिलेला, दोन्ही हातात पकडून (कारण तो तितकाच वजनदार असतो ) गल्ल्याशी
उभ्या असलेल्या माणसाकडे तो मासा फेकतो आणि एकोणी गाणं म्हणत असतो,
बाकीचे त्याचे सहकारीही त्याच्यामागून सुरात सूर मिसळतात. आणि हा सगळा
नजारा टिपायला अनेक पर्यटक आपले कॅमेरे सरसावून तयारच असतात. आम्ही पण दोन
मिनिटं ती गंमत बघितली.
ह्या फिश मार्केट वरून पुढे गेलं कि मग ताज्या भाज्या, ताजी फळं
विकणाऱ्यांची रांगच रांग. तिकडून पुढे येऊन बघतोय तर हा फुलांचा अप्रतिम
नजराणा. रंगेबिरंगी, अनेक वासाची, आकाराची. सूर्यफूल, झेंडू, लिली,
नानाविविध प्रकार. तसेच सुकवलेल्या फुलांचे सुंदर आकर्षक गुच्छ. पापणी न
लवता अगदी बघत रहावस वाटत होत. मी पुढे जात जात झर झर त्यांचे कित्येक
फोटो काढले.

तिथून थोडं पुढे आलं की सुरु होते आर्टिस्ट लोकांची मक्तेदारी, हातांनी
बनवलेले किमती खड्यांचे दागिने, सुगंधी साबण, सुंदर मेटलच्या शोभिवंत
वस्तू, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, फ्रेम्स काय काय होत. आता मात्र वेळही कमी
होता आणि त्या पेंटिंग्ज ची नक्कल करायची इच्छा झाली तर काय घ्या म्हणूनही
त्यांचे मात्र फोटो काढले नाहीत.
सोबत कुठे छानस संगीत, फुलांचे, अगरबत्तीचे, सुग्रास भोजनाचे सुवास, आणि
ह्या साऱ्यात खेकडे, ऑईस्टर, श्रिम्प यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलसमोर
लागलेल्या मत्स्यप्रेमींच्या ह्या भल्यामोठ्या रांगा.
आम्ही काही निवडक पझल, कॉईन्स, मेटलच्या वस्तू खरेदी केल्या, माउंट
रेनिअरच्या प्रसिद्ध, अतिशय गोड चेरी चाखल्या, आणि विमान गाठायचं
असल्यामुळे पाय निघत नसतानाही Pike Place Market चा निरोप घेतला.

--

--

--

http://yogeshtravelphoto.blogspot.com/2018/07/zoo-atlanta-birds.html
Lone Elk Park, St. Louis, Missouri
Lone Elk Park is a county park in the U.S. state of Missouri consisting
of 546 acres (2.21 km2) located in St. Louis County west of the town of
Valley Park.[1] The park is located adjacent to Interstate 44, the World
Bird Sanctuary, Castlewood State Park, and Tyson Research Center.
World Of Coca Cola - Atlanta
The World of Coca-Cola
is a museum, located in Atlanta, Georgia, showcasing the history of The
Coca-Cola Company. The 20-acre (81,000 m2) complex opened to the public
on May 24, 2007, relocating from and replacing the original exhibit,
which was founded in 1990 in Underground Atlanta.[1] There are various
similar World of Coca-Cola stores in locations such as Las Vegas and
Disney Springs.
Google Map Location :
https://www.google.com/maps/dir/''/world+of+coca+cola/data=!4m5!4m4!1m0!1m2!1m1!1s0x88f5047eecc828f3:0x4401b29a011fa7c9?sa=X&ved=0ahUKEwjXkqa8qprcAhWTGnwKHX23AmgQ9RcI2gEwFw
Trip Advisor :
https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g60898-d102626-Reviews-World_of_Coca_Cola-Atlanta_Georgia.html
CNN HeadQuarter - Atlanta
The CNN Center is the
world headquarters of CNN. The main newsrooms and studios for several of
CNN's news channels are located in the building. The facility's
commercial office space is occupied entirely by CNN and its sister
company, Turner Broadcasting System. The CNN Center is located in
Downtown Atlanta, Georgia, adjacent to Centennial Olympic Park.
Google Map Location :
https://www.google.com/maps/dir/''/cnn+headquarters+atlanta/data=!4m5!4m4!1m0!1m2!1m1!1s0x88f50380633ff777:0x89cfb8a124920f1f?sa=X&ved=0ahUKEwiC-_CcpJrcAhWMAHwKHXoCCiYQ9RcIlQIwFw
Trip Advisor Link :
https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g60898-d108697-Reviews-CNN_Studio_Tours-Atlanta_Georgia.html
Zoo Atlanta - Animals
Zoo Atlanta
(sometimes referred as Atlanta Zoo) is an Association of Zoos and
Aquariums (AZA) accredited zoological park in Atlanta, Georgia. The zoo
is one of four zoos in the U.S. currently housing giant pandas.[2] The
current President and CEO of Zoo Atlanta is Raymond B. King.
Google Map Location :
https://www.google.com/maps/dir/''/atlanta+zoo/@33.7340782,-84.4423081,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x88f503c1ec0dd6d9:0x706ecec6466528cc!2m2!1d-84.372268!2d33.734098
Trip Advisor :
https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g60898-d102784-Reviews-Zoo_Atlanta-Atlanta_Georgia.html
Zoo Atlanta - Animals Photography
Zoo Atlanta - Birds
Zoo Atlanta (sometimes
referred as Atlanta Zoo) is an Association of Zoos and Aquariums (AZA)
accredited zoological park in Atlanta, Georgia. The zoo is one of four
zoos in the U.S. currently housing giant pandas.[2] The current
President and CEO of Zoo Atlanta is Raymond B. King.
Google Map Location :
https://www.google.com/maps/dir/''/atlanta+zoo/@33.7340782,-84.4423081,12z/data=!4m8!4m7!1m0!1m5!1m1!1s0x88f503c1ec0dd6d9:0x706ecec6466528cc!2m2!1d-84.372268!2d33.734098
Trip Advisor :
https://www.tripadvisor.com/Attraction_Review-g60898-d102784-Reviews-Zoo_Atlanta-Atlanta_Georgia.html
Zoo Atlanta - Birds Photography