Tuesday, January 23, 2024

रोझेटो गावाची कथा

 https://maitri2012.wordpress.com/

Posted on

विद्या नारायण वाडदेकर

पेन-रोझेटो गावाची स्वागतशिला

१९७४ च्या सुमारास अद्भुत म्हणून रोझेटो (Roseto) गाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. कशासाठी ? ठणठणीत हृदयाच्या निरोगी गावकऱ्यांसाठी! यावरून, एखाद्या समुदायात जर व्यक्तिंव्यक्तिंतील घनिष्ठ जवळिकीमुळे हृदयविकारांचा दर कमी रहात असेल तर या घटनेला, वैद्यकीय परिभाषेत, ‘रोझेटो परिणाम (Roseto effect)’ म्हटले जाऊ लागले.

पेन्सिल्वेनियात असलेले, रोझेटो हे १८८२-१९१२ दरम्यानच्या काळात वसत गेलेले गाव आहे. या गावाचे बारसे खरे पाहिल्यास ‘न्यू-इटली’ नावाने व्हायचे होते. कारण, येथील सर्व रहिवासी इटलीतून स्थलांतरित झालेले होते. परंतु अधिक विचारांती, या गावातील सर्वजण इटलीच्या, एड्रियाटिक किनाऱ्याजवळील फोगिया प्रांतातील ‘रोझेटो व्हॅल फोर्टोर’ या गावातून आलेले असल्याने, गावाचे बारसे ‘रोझेटो’ असे करण्यात आले. इटलीत ‘रोझेटो’ शब्दाचा अर्थ आहे ‘गुलाबाची बाग’! ( लेखात यापुढे, सोयीसाठी, इटलीतील ‘रोझेटो’चा उल्लेख ‘इटली-रोझेटो’ आणि पेन्सिल्वेनियातील रोझेटोचा उल्लेख ‘पेन-रोझेटो’ असा केलेला आहे.)

पेन-रोझेटोचा लिखित गौरव

आसपासच्या गावांपासून अलिप्तपणे जगणाऱ्यांचे एक आत्ममग्न गाव, हे ‘पेन-रोझेटो’चे समर्पक वर्णन ठरेल. या गावाला उजेडात आणले ते स्टेवर्ट वुल्फ (Stewart Wolf) या डॉक्टरानी. वुल्फ यांचा पचनक्रिया आणि जठराचा विशेष अभ्यास होता. ओक्लाहोमा विद्यापीठातील वैद्यकीय विभागात ते अध्यापन करत होते. रोझेटोपासून जवळच असलेल्या पेन्सिल्वेनियातील स्वतःच्या शेतावर ते उन्हाळ्याची सुट्टी नित्यनेमाने घालवत असत. असे असूनही वुल्फना जवळच्याच पेन-रोझेटो गांवाविषयी काहीच माहित नव्हते.

असे असताना वुल्फकडून रोझेटोबद्दल जगाला कसे कळले असेल? त्याची कथा विलक्षण आहे. १९५० च्या उत्तरार्धांत उन्हाळ्याच्या सुट्टीवर असताना, एका स्थानिक वैद्यकीय मंडळाने, वुल्फना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते. व्याख्यानानंतर स्थानिक डॉक्टरांपैकी बेंजामिन फाल्कोनि (Benjamin Falcone) यांनी वुल्फ यांची संध्याकाळी अनौपचारिक भेट घेतली. गप्पांच्या ओघात डॉ. फाल्कोनि यांनी वुल्फना सहजच स्वतःचा एक व्यावसायिक अनुभव सांगितला. डॉ. फाल्कोनि सतरा वर्षे पेन-रोझेटोपासून जवळच आपला दवाखाना चालवत होते. आजूबाजूच्या अनेक गावातून त्यांच्याकडे रुग्ण येत असत. परंतु, जवळपास १६०० वस्तीच्या पेन-रोझेटो गावातून त्याच्याकडे क्वचितच येणाऱ्या रुग्णात ६५ वर्षांखालचा हृदयरोगी त्याना आढळला नव्हता! फाल्कोनिंचा हा अनुभव वुल्फ यांच्यासाठीही आश्चर्यकारक होता.

याचे कारण, १९५० च्या दशकात कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारी ओषधे उपलब्ध नव्हती. हृदयाघात रोखणारी आक्रमक औषधयोजनाही अस्तित्त्वात नव्हती. या काळात अमेरिकेत हृदयाघात तर एखाद्या साथीच्या रोगासारखा आढळत होता. ६५ वर्षांखालच्या पुरुषांमध्ये तर  हृदयाघात हेच मृत्यूचे महत्त्वाचे कारण होते. या पार्श्वभूमीवर, फाल्कोनिंच्या मते पेन-रोझेटो गावात ६५ वर्षांखालचा एकही हृदयरोगी न सापडणे, हे साधारण बुद्धिच्या कुणालाही पटण्यासारखे नव्हते.

फाल्कोनिंच्या अनुभवाचा छडा लावायचे वुल्फनी ठरवले. ओक्लाहोमा विद्यापीठातील त्यांचे विद्यार्थी आणि सहकारी यांची त्यानी मदत घेतली. गावातील रहिवाशांचे, गतवर्षांचे मिळतील तितके जुने, मृत्युंचे दाखले वुल्फनी मिळवले. फाल्कोनिंकडील गावकऱ्यांच्या वैयक्तिक वैद्यकीय नोंदींचे विश्लेषणही केले. त्या आधारे वुल्फनी गावकऱ्यांचा वैद्यकीय इतिहास आणि कौटुंबिक आजार-वंशावळी तयार केल्या. १९६१ पासून वुल्फनी गावकऱ्यांचा एक प्राथमिक अभ्यास हाती घेतला. रोझेटोतील महापौरांनी तर या अभ्यासासाठी आपल्या चारही भगिनी मदतीला दिल्या आणि गावच्या नगरपरिषदेची खोलीही वापरायला दिली. महापौरांनी काम करणाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची सोयही केली. तसेच तपासणीसाठी रक्ताचे नमुने गोळा करणे आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) काढणे, या कामांसाठी गावात छोट्याछोट्या टपऱ्या बांधून दिल्या. वुल्फ आणि त्यांचा विदा गोळा करणाऱा गट, सलग चार आठवडे पेन-रोझेटोमध्ये कार्यरत होता. पेन-रोझेटोच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य देत गावातील प्रत्येकाला स्वतःची माहिती देण्यासाठी पाचारण केले.

परिश्रमपूर्वक गोळा केलेल्या या माहितीतून मिळालेले निष्कर्ष धक्कादायक होते. पेन-रोझेटोमधील ५५ वर्षांखालील एकही व्यक्ती हृदयाघात किंवा हृदयविकाराने मरण पावली नव्हती! ६५ वर्षांवरील पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण संपूर्ण अमेरिकेच्या प्रमाणाच्या निम्मेच होते. पेन-रोझेटोमध्ये निरनिराळ्या कारणांनी होणाऱ्या मृत्युंचा दर अपेक्षित मृत्युदराच्या ३० ते ३५%नी कमी होता. तात्पर्य, पेन-रोझेटो गावाचे आरोग्य उल्लेखनीय होते.

पेन-रोझेटोतील लोकांच्या आश्चर्यकारक निरोगीपणामागील कारणे शोधण्यासाठी वुल्फनी खास प्रयत्न करायचे ठरवले. त्यानी ओक्लाहोमातील समाजशास्त्रज्ञ, आपले मित्र, जॉन ब्रुन (John Bruhn), यांची मदत घेतली. दारोदार जाऊन मुलाखतींद्वारा माहिती गोळा करण्यासाठी, वुल्फनी वैद्यक किंवा समाजशास्त्र विषय अभ्यासणारे विद्यार्थी नेमले. मुलाखतींतून मिळालेली माहितीही विस्मयकारक होती. पेन-रोझेटोमध्ये आत्महत्त्या नव्हत्या. दारूच्या आहारी गेलेले कुणी नव्हते. मादकद्रव्यांचे व्यसन कुणालाही नव्हते. गुन्हेगारीही फारच कमी होती. गावकऱ्यांपैकी कुणीही कल्याणकारी योजनेचे लाभार्थी नव्हते. म्हणजे गावात गरीबी नव्हती. खास करून, जठररसज व्रणाविषयी (peptic ulcers), विचारलेल्या माहितीवरून कुणालाही असे व्रण नव्हते. या माणसांचे मृत्यू हे वृद्धत्त्व या एकमेव कारणाने होत होते. तर असे होते हे निरोगी आयुष्य जगणाऱ्यांचे, आगळेवेगळे पेन-रोझेटो!

पेन-रोझेटोमधील लोकांचे आरोग्य किती अंगांनी चांगले आहे, यावर मुलाखतींतून शिक्कामोर्तब झाले तरी त्यामागचे कारण वुल्फना सापडले नव्हते! वुल्फना यासंदर्भांत आणखी विचार करणे भाग होते. यानंतर, त्यांच्या मनात आलेला पहिला विचार आहाराचा होता. जुन्या जगातून आणलेल्या आहारसवयीमुळे पेन-रोझेटोतील लोक अमेरिकन लोकांहून अधिक निरोगी असतील का? पण विचारांती आहार हे खरे कारण नसल्याचे वुल्फ यांच्या लगेच लक्षात आले.  कारण, पेन-रोझेटोतील लोक इटलीतील जुन्या प्रथेनुसार आॉलिव्ह-तेल न वापरता डुकरांची चरबी आहारात अधिक वापरत होते. इटलीतील पिझ्झा म्हणजे पापड आणि त्यावर रचलेले टोमॅटो, कांद्याचे काप! या उलट पेन्सिल्वेनियातील पिझ्झा म्हणजे पावाचा जाड काप, त्यावर रचलेले मांसाचे काप/तुकडे आणि कधीतरी अंडेही! इटली-रोझेटोमध्ये बिस्कीट आणि तरल्ली (taralli, जाड, कुरकुरीत वेटोळे) यासारखे गोडधोड फक्त नाताळ आणि इस्टर या दोन सणांच्या दिवशीच खाल्ले जाते. पेन-रोझेटोतले लोक वर्षभर केव्हाही गोडधोड खात.  वुल्फ यांनी जेव्हा आहारतज्ज्ञांकडे पेन-रोझेटोमधील लोकांच्या आहाराचे विश्लेषण करून मागितले तेव्हा, त्यांच्या सर्वसाधारण आहारांतील एकूण उष्मांकांपैकी ४१% केवळ चरबीतूनच आलेले असल्याचे आढळले. थोडक्यात, पेन-रोझेटोमधील लोक अधिक प्रमाणात अरबट-चरबट खाणारे तर, इटली-रोझेटोतील लोक संयमित आहार घेणारे होते. म्हणजे आहाराच्या आधारेही पेन-रोझेटोमधील लोकांच्या निरोगीपणाचे स्पष्टीकरण मिळत नव्हते.

त्यानंतर वुल्फनी व्यायामाच्या अंगाने विचार केला. पेन-रोझेटोमधील लोक दररोज सूर्योदयाला उठून योगाभ्यास करतात किंवा अंदाजे ९-१० कि.मी. जलद चालतात, असेही आढळले नव्हते. म्हणजे व्यायामाचा मुद्दाही त्यांच्या चांगल्या आरोग्यामागे नव्हता. विशेष म्हणजे, पेन-रोझेटोमधील काही लोकांना अतिधूम्रपानाची आरोग्य विघातक सवय होती. काही लोक तर स्थूलही होते. तरीही त्यांचे आरोग्य चांगले होते!

आता आहार आणि व्यायाम हे जर चांगल्या आरोग्याचे कारण नसेल तर मग अनुवंशिकता हे कारण असेल का, यावर वुल्फ विचार करू लागले. त्यांना आढळले की पेन-रोझेटो समूह, म्हणजे एकमेकांशी अत्यंत घट्ट संबंध असलेल्या व्यक्तिंचा समूह! इथल्या सर्वांचेच मूळ निवासस्थान एकच, इटली-रोझेटो! त्यामुळे पेन-रोझेटोतील लोकांमधील अनुवंशिक काटकपणामुळे त्यांचे रोगांपासून संरक्षण होत असावे. म्हणून वुल्फनी पेन-रोझेटोतील लोकांचे अमेरिकेत इतरत्र राहणारे नातेवाईक शोधून काढले. त्यांच्या वैद्यकीय नोंदींच्या आधारे या नातेवाईकांचे जीवनही पेन-रोझेटोतील लोकांसारखेच उल्लेखनीय आरोग्याचे आहे का, ते तपासले. पण तसे ते नव्हते. म्हणजे पेन-रोझेटोतील लोकांच्या चांगल्या आरोग्याचा उगम अनुवंशिकतेत नव्हता!

पेन-रोझेटो जिथे वसलेय ते ठिकाणच लोकांच्या चांगल्या आरोग्यामागे असेल, अशी एक शक्यता वुल्फना वाटली. लागलीच त्यानी पेन-रोझेटो इतका आकार, विस्तार असलेली, त्यासारखे पर्यावरण असलेली आणि लोकसंख्या कष्टाळू स्थलांतरित युरोपियनांची असलेली, जवळपासची दोन गावे: नाझर (Nazareth) आणि बँगोर (Bangor) निवडली. या दोन गावातील लोकांच्या वैद्यकीय नोंदी मिळवल्या आणि अभ्यासल्या. परंतु, निवडलेल्या दोन्ही गावांतील ६५ वर्षांवरच्या पुरुषांमध्ये हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पेन-रोझेटोच्या तिप्पट होते. म्हणजे, गावाचे वैशिष्ट्यपूर्ण वस्तीस्थान, हा मुद्दाही निकालात निघाला. अर्थांत, संशोधनाचा पुढील मार्ग बंद!

आहार, व्यायाम, अनुवंशिकता आणि वस्तीस्थान या गोष्टींपैकी जर एकही बाब पेन-रोझेटोतील लोकांच्या निरोगी स्वास्थ्याचे रहस्य उलगडण्यास समर्थ नसेल तर, पेन-रोझेटो हे गाव स्वतःच त्यामागचे कारण असले पाहिजे, असे वुल्फना वाटू लागले. त्यामुळे त्यानी गावाचाच अभ्यास करायला सुरुवात केली. गावातून फेरफटका मारताना ब्रुन आणि वुल्फ यांच्या लक्षात आले ते असे: पेन-रोझेटोचे रहिवासी नियमितपणे, वरचेवर एकमेकाना भेटतात, रस्त्यात थांबूनही दुसऱ्या इटालियन रहिवाशाशी गप्पा मारतात, परसात दुसऱ्यासाठी स्वयंपाक बनवतात, त्यांची समाजरचना विस्तारित कुटुंबांची असते. त्यामुळे अनेक घरात एकाच छताखाली तीनतीन पिढ्या गुण्यागोविंदाने नांदतात. आजीआजोबा कुटुंबात सन्मान मिळवून असतात. ‘अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल’ या गावच्या एकमेव चर्चमध्ये सर्वजण सामुदायिक प्रार्थना करतात. यातून त्यांच्या मनावर एकजुटीचा आणि शांततेचा होणारा सुपरिणाम दोघांनी पाहिला. केवळ दोन हजारांच्या वस्तीसाठी रोझेटोमध्ये बावीस स्वतंत्र नागरी संस्था वुल्फना आढळल्या. या संस्था समुहाची विशिष्ट समतावादी नैतिकता जपत होत्या. यातून श्रीमंताना त्यांच्या संपत्तीचे वा शक्तीचे प्रदर्शन करण्यापासून रोखले जाई, तर अपयशी लोकांना अपयशावर मात करायला मदत केली जाई.

पेन-रोझेटो येथील अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल चर्च

दक्षिण इटलीतील शेतकरी संस्कृती पूर्व पेन्सिल्वेनियाच्या डोंगराळ भागात रुजवताना मूळच्या  इटली-रोझेटो रहिवाशांनी अशी एक सक्षम, संरक्षणात्मक, सामाजिक रचना निर्माण केली. की ज्यामुळे गाव आधुनिक जगाच्या रेट्यापासून सुरक्षित राहील. यावरून वुल्फना पेन-रोझेटोतील लोकांच्या निरोगीपणामागची दोन कारणे लक्षात आली. एक कारण, त्यांचे मूळचे जग कष्टाधारित आहे. दुसरे कारण, त्यानी स्वतःसाठी डोंगराळ भागांतील लहानशा गावांत निर्माण केलेले नवे, सामाजिक परंपरा जपणारे, अत्यंत सुरक्षित जग!

या संशोधनातून हृदयविकारामागील खरी कारणे, पर्यायाने दीर्घायुष्याचे रहस्य वुल्फ आणि ब्रुन याना उलगडले. या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय आस्थापनांना आरोग्य आणि हृदयविकार याबद्दल पूर्णपणे नवीन मार्गाने विचार करणे आवश्यक असल्याचे, पटवून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले. हृदयविकाराचा विचार करताना त्या रुग्णाच्या वैद्यकीय तपशिलांच्या पलीकडे जाऊन रुग्ण कोणत्या संस्कृतीचा आहे, त्यांचे मित्र, कुटुंबीय कोण आहेत, आणि त्याच्या कुटुंबाचे गाव कोणते आहे, या बाबींचाही विचार केला पाहिजे, असे वुल्फ आणि ब्रुन सांगत. कारण, माणूस म्हणून असलेली आपली ओळख, आपल्या जगांतील जीवनमूल्यांवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांवर अवलंबून असते. समूह व्यक्तिला किती सांभाळतो यावर तिच्या आरोग्याचा दर्जा ठरतो. अनुभवाच्या या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये वुल्फ यांनी एक धाडसी भाकीत नोंदवून ठेवले होते: पेन-रोझेटोतील लोकांनी जर आपली पारंपरिक मूल्ये आणि वर्तन सोडून दिले तर, त्यांच्याकडे असलेली हृदयरोगांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती ते गमावून बसतील.

१९७३ मध्ये वुल्फनी जेव्हा पेन-रोझेटोवरील अंतरिम अहवाल सादर केला, तेव्हा पेन-रोझेटोचा मृत्युदर बँगोरच्या मृत्युदराइतकाच वर चढलेला दिसला. १९८५ मध्ये, म्हणजे २५ वर्षानी, वुल्फ आणि सहकाऱ्यानी मूळ संशोधनाची पुनरावृत्ती केली. त्या संशोधनाचा अहवाल १९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आला. यात मूळ सर्वेक्षणातील लोकांपैकी ८९% लोकांकडून माहिती मिळवली होती. हे लोक १९८५ च्या पेन-रोझेंटोच्या एकूण लोकसंख्येच्या ६०% होते.

अतीवेगवान सामाजिक बदलाच्या रेट्यात पेन-रोझेटोमधील लोकांतील हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांचे प्रमाण शेजारच्या गावांच्या किंवा संपूर्ण अमेरिकेच्या प्रमाणाजवळ बऱ्यापैकी पोहोचले होते. अपघातांमुळे होणारे मेंदूतील रक्तस्त्रावाचे (Cerebrovascular accidents) प्रमाण १९६० च्या तुलनेत दुपटीहूनही अधिक झाले होते, याचा संबंध अयोग्य आहाराशी काडीमात्रही नव्हता. कारण, आहारात फारसे बदल झाले नव्हते आणि जे झाले होते ते आरोग्याला उपकारकच होते. पेन-रोझेटोतील लोकांच्या रक्तांतील कोलेस्टेरॉलची संपृक्तता २५ वर्षांच्या काळात बदललेली नव्हती! पेन-रोझेटोतील लोकांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांचे कारण ‘सामाजिक बदल’ हेच दिसत होते. म्हणजे, वुल्फ यांचे १९६३ मधील भाकीत खरे ठरले होते!

१९८५ मध्ये घेतलेल्या मुलाखतीतून अनेक सामाजिक बदल पेन-रोझेटोमधील लोकांत झालेले वुल्फना आढळले. समाजव्यवस्थेचे केंद्र कौटुंबिक गरजांकडून वैयक्तिक गरजांकडे सरकलेले दिसले. कौटुंबिक मृत्यू हा पूर्वी निसर्गचक्राचा भाग म्हणून, इतरांच्या मदतीने सहज स्वीकारला जात असे. पंचवीस वर्षांनंतर, मृत्युतल्या कुटुंबाच्या सातत्याची जाणीव, प्रिय व्यक्तिच्या मृत्युचे दुःख कमी करण्यास, निरुपयोगी ठरलेली दिसली. पूर्वीची एकमेकांत वाटून घेण्याची वृत्ती. स्पर्धेत परिवर्तीत झालेली दिसली. समूहाच्या नैतिकतेची जागा वैयक्तिक प्रतिष्ठा आणि शक्ती प्रदर्शनाने घेतली गेली होती. तीन पिढ्या नांदणारी घरे नाहीशी झाली होती. १९६० ते १९८० दरम्यान लोकसंख्या जरी ८%नी घटली तरी, त्याच प्रमाणात घरांची संख्या वाढली होती. प्रकर्षाने जाणवणारा सामाजिक बदल म्हणजे वृद्ध लोकांची देखभाल घरातच करण्याऐवजी त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जात होती. अशा या वेगवान सामाजिक बदलांचा नकारात्मक परिणाम पेन-रोझेटोतील लोकांच्या आरोग्यावर, पर्यायाने दीर्घायुष्यावर उघडपणे झाला होता.

१९२० ते १९३९ दरम्यान पेन-रोझेटोतच जन्मलेल्यांचा संबंध, परक्या देशात आल्यानंतर कराव्या लागणाऱ्या कष्टांशी आणि सोसाव्या लागणाऱ्या अपमानांशी, तडजोडींशी दुरान्वयेही राहिला नव्हता. रुढींची इतकी मोडतोड झाली होती की अपत्यांना आजी-आजोबांची नावे ठेवण्याची प्रथा गायब झाली होती. व्यक्तिने मिळवलेल्या यशाचे आणि संपत्तीचे प्रदर्शन समाजात करणे, पूर्वी अमान्य होते, परतु, नव्या पिढीत तसे करण्याचा नवा प्रघात पडला. यातून टोकाची स्पर्धात्मक मानसिकता बळावली होती.

पेन-रोझेटो गावाच्या या गोष्टीचा संदेश हाच दिसतो की निरोगी राहण्यासाठी समूह म्हणून जगणे फार आवश्यक आहे. अर्थांत, एकट्याने राहण्याऐवजी समूहात रहा. सर्व काही वाटून घ्या. अनावश्यक स्पर्धा टाळा. सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हा! हा संदेश तुम्हाला परिचित वाटतोय का? नक्कीच! हजारो वर्षांपूर्वी भारतीय ॠषींनी, विद्वानांनी उपनिषदात  दिलेला पुढील मंत्र पहा:

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

हजारो वर्षांपूर्वी द्रष्टेपणाने दिलेल्या या मंत्रात आपले वर्तन, जगणे कसे असावे, हेच तर सांगितले आहे! ज्यांची जीवनशैली या मंत्रावर बेतलेली आहे, अशा अनेक पिढ्या भारतात पूर्वी होत्या असणार! त्यामुळे, शोध घेतला असता तर, १९६० मध्ये भारतांतील अनेक गावांत ‘रोझेटो परिणाम’ आढळला असता. तुम्हाला काय वाटते?

संदर्भ:
Bruhn, John G. and Stewart Wolf. The Roseto Story: An Anatomy of Health. Norman, OK: University of Oklahoma Press, 1979. pp.158.
[ सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून ]
 – ©️ विद्या नारायण वाडदेकर
wadadekarvidya@rediffmail.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...