अधिक श्रावण मास संपायला ८-९ दिवस शिल्लक राहिले असताना वडिलांनी निज श्रावणी सोमवारी पशुपतिनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा आपल्या 'रावण' बाळाकडे व्यक्त केली. त्रेतायुगातील 'श्रावण बाळाला' आपल्या माता-पित्यांची तीर्थयात्रेची इछा पूर्ण करण्यासाठी कावड खांद्यावर घ्यावी लागली होती, पण कलियुगातील ह्या रावण बाळाला प्रवासासाठीचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने तेवढे कष्ट घेण्याची गरज नसल्याने त्याने त्वरित होकार भरला आणि त्यादृष्टीने तयारी सुरु केली.
श्रावणी सोमवारी 'पशुपतीनाथ दर्शन' निमित्तानं घडणाऱ्या नेपाळ सहलीसाठी अजून कोण कोण येणार ह्याची विचारणा कुटुंबातील अन्य सदस्यांकडे केल्यावर बहीण, भाऊजी, भाचा आणि बायको असे अन्य चार कुटुंबीय तयार झाले तर मोतोश्रींनी गुडघेदुखीच्या त्रासामुळे आता लांबचा प्रवास झेपणार नसल्याचे सांगून आपला असहभाग नोंदवला.
उत्साहाच्या भरात माझ्या ह्या आधीच्या नेपाळ भेटीत जाऊन आलो असल्याने, आणि माझ्यासहित कुटुंबातील कोणालाच आता वन्यपर्यटनात रस उरला नसल्याने 'चितवन'ला वगळून 'जनकपुर', 'काठमांडू', 'पोखरा' अशा ठिकाणांचा समावेश असलेला चांगला १४-१५ दिवसांच्या सहलीचा कच्चा कार्यक्रम मी तयार केला होता पण भाऊजी आणि आमच्या सौभाग्यवतींना रजा उपलब्ध असूनही काही पूर्वनियोजित कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे अचानक सलग एवढे दिवस सुट्टी घेता येणे अशक्य असल्याने आम्हा सहाजणांची विभागणी तीन तीन जणांच्या दोन गटांत करून त्या कार्यक्रमत थोडे बदल करावे लागले.
सर्वात कमी वेळात (साडेतीन तासांत) मुंबईहून नेपाळला पोचण्यासाठी 'मुंबई ते काठमांडू' हवाई प्रवास हा सर्वोत्तम पर्याय असला तरी रस्तामार्गे आणि रेल्वेने असे अन्य वेळखाऊ पर्यायही उपलब्ध आहेत. उत्तराखंड मधल्या 'बनबासा', उत्तर प्रदेशातल्या 'सुनौली' बिहार मधल्या 'रक्सौल', आणि पश्चिम बंगाल मधल्या 'पानीटंकी', ह्या चार बॉर्डर क्रॉसिंग पॉईंट्स वरून बराचसा रेल्वेने + बसने किंवा स्वतःच्या वाहनाने रस्तामार्गे नेपाळमध्ये प्रवेश करण्याचे काही प्रचलित पर्याय आहेत. तसेच दिल्ली ते काठमांडू डेली बस सर्व्हिसचा पर्यायही उपलब्ध आहे पण तो प्रवासही तीस ते बत्तीस तासांचा आहे त्यामुळे मुंबईपासून प्रवासास सुरुवात करायची असल्यास एकंदरीत पाहता हे सर्व पर्याय थोडेफार कमी खर्चिक असले तरी नुसते वेळखाऊच नाही तर खडतरही वाटतात.
आधीच्या नेपाळ ट्रीपमध्ये बघायचे राहून गेलेल्या 'जनकपूरला' ह्यावेळी मला आवर्जून भेट द्यायची होती, पण ते वरीलपैकी कुठल्याच मार्गावर येत नसल्याने वरील सर्व पर्याय आमच्यासाठी निरुपयोगी होते. मग त्या अनुषंगाने शोधाशोध केल्यावर पवन एक्स्प्रेसने मुंबईतील 'लोकमान्य टिळक टर्मिनस' ते बिहार मधील 'जयनगर' असा प्रवास भारतीय रेल्वेने आणि 'जयनगर' ते 'जनकपूर' हा प्रवास नेपाळ रेल्वेने करून जनकपूरला पोचण्याचा झकास पर्याय सापडला. ह्या एकूण प्रवासाचा कालावधी ४५-४६ तासांचा असला तरी कल्याण ते जयनगर पर्यंतचा ३७-३८ तासांचा प्रवास टू टायर एसीने (मग सहा-साडे सहा तासांचा मोकळा वेळ) आणि त्यापुढचा 'जयनगर ते जनकपूरधाम' पर्यंतचा सव्वा ते दीड तासाचा प्रवास एसी चेअरकारने करण्याचे ठरवून हाताशी वेळ कमी असल्याने सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाईटवरून मी, वडील आणि भाचा अशा तिघांची 'कल्याण ते जयनगर' रेल्वे तिकीटे बुक केली आणि मग मागून येऊन काठमांडू पासून आम्हाला जॉईन होणाऱ्या तिघांची 'मुंबई ते काठमांडू' थेट विमान प्रवासासाठी 'इंडिगो'ची तिकिटे बुक केली.
नेपाळ मधली हॉटेल्स भारतातून ऑनलाईन बुक केल्यास रुमच्या भाड्याच्या जवळपास निम्मा कर भरावा लागत असल्याने ती फार महाग पडत असल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल बुकिंग तिथे पोचल्यावरच करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व विमान प्रवास म्हणजे आम्हा तिघांच्या 'जनकपुर ते काठमांडू', तिथून पुढे आम्हा सहा जणांची 'काठमांडू ते पोखरा' आणि 'पोखरा ते काठमांडू' अशा प्रवासांसाठी नेपाळ मधली आंतरदेशीय विमान वाहतूक कंपनी 'बुद्धा एअर'ची तर परतीच्या प्रवासासाठी 'काठमांडू ते मुंबई' ह्या प्रवासासाठी 'इंडिगो'ची तिकिटे बुक केली.
भारत आणि नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा खुली असल्याने उभय देशांच्या नागरिकांना आपल्या शेजारी देशात जाण्यासाठी 'व्हिसा' लागत नसल्याने ते एक काम वाचले होते. सर्वसाधारणपणे भारतीय चलन नेपाळमध्ये सर्रास स्वीकारले जात असल्याचा मला पूर्वानुभव होता, पण आता ती परिस्थिती थोडी बदलली असल्याचे तसेच अनेक ठिकाणी तिथले मनी एक्सचेंजर्स भारतीय ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारत नसल्याचे त्या दरम्यान वाचनात आले असल्याने त्याची खात्री करून घेण्यासाठी थोडी चौकशी केल्यावर त्या माहितीत तथ्य असल्याचे लक्षात आले (आणि पुढे जनकपुरमध्ये काही ठिकाणी भारतीय चलन स्वीकारले जात असल्याचा, तर काठमांडू आणि पोखरामध्ये ते अजिबात स्वीकारले जात नसल्याचा अनुभवही आला).
चलनाच्या बाबतीत दुसरी समस्या म्हणजे आपल्या इथले एजंट्स नेपाळी चलनाचा फारसा साठा ठेवत नाहीत त्यामुळे त्यांचा आणि बँकांचा विनिमय दर जास्त असतो तसेच भारतीय डेबिट आणि क्रेडीट कार्ड्स नेपाळ आणि भूतानमध्ये चालत नाहीत (तसा स्पष्ट उल्लेख आपल्या कार्डांवर असतो),'ट्रॅव्हलर्स चेक्स' वगैरे सारख्या जुनाट संकल्पना व्यवहारातून अगदीच बाद झाल्या नसल्या तरी तो खटाटोप करण्यासाठी वेळ आणि इच्छा नसल्यास भरपूर रोख रक्कम १०० आणि २०० व थोडीफार ५०० भारतीय रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आपल्या जवळ बाळगावी लागते. आमच्या नेहमीच्या एजंटने देखील आम्हाला भारत-नेपाळ सीमेवरील जयनगरला किंवा जनकपुरला आणि विमानाने येणाऱ्यांना काठमांडू एअरपोर्टवर चलन बदलून घेण्याचा सल्ला दिला होता.
अर्थात आम्ही तिघे पुढे जाणार असल्याने मागून येणाऱ्यांना चलनाची फारशी समस्या येणार नव्हती पण किमान आम्ही जनकपुरला पोचताना आणि बाकीची मंडळी काठमांडूला पोचताना अगदी थोडेफार का होईना पण नेपाळी चलन बरोबर असावे असा विचार करून आमच्या सोसायटीच्या नेपाळी वॉचमनला 'जमल्यास पाच हजार नेपाळी रुपयांचा बंदोबस्त' करून द्यायला सांगितले, आणि त्यानेही इमाने इतबारे त्याच्या अन्य सवंगड्यांकडून जमवाजमव करून ते आणूनही दिले होते. अशाप्रकारे सहलीची पूर्वतयारी करून झाल्यावर मग प्रवासाला निघण्याच्या दिवसाचे वेध लागले.
दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ह्या निर्धारित वेळेपेक्षा पंधरा-वीस मिनिटे उशिराने 'पवन एक्स्प्रेसचे' कल्याण स्टेशनवर आगमन झाले. आपापल्या स्थानांवर आसनस्थ होता होता गाडीने प्लॅटफॉर्म सोडला आणि एका प्रवासी कुटुंबाचा लहान मुलगा गाडीत चढलाच नसल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यापैकी कोणीतरी साखळी ओढल्याने स्टेशनवरून पूर्णपणे बाहेर पडण्या आधीच गाडी पुन्हा थांबली. त्या मुलाला गाडीत चढवल्यावर आणि साखळी ओढल्यानंतर होणारे सर्व सोपस्कार पार पडण्यात आणखीन वीस-पंचवीस मिनिटे गेल्याने कल्याणलाच गाडी सुमारे पाउण तास 'लेट' झाली होती. अर्थात गाडी जयनगरला पोचल्यावर पुढचा 'जयनगर ते जनकपुर' प्रवास सुरु होईपर्यंत आम्हाला जवळपास सहा तास टाईमपास करायचा असल्याने गाडी चार-पाच तास लेट झाली तरी आम्हाला फरक पडणार नव्हता उलट तसे झाल्यास ते आमच्या पथ्यावरच पडले असते!
जवळजवळ भारताच्या नैऋत्येच्या एका टोकाकडून ईशान्येच्या एका टोकापर्यंत, महाराष्ट्र - मध्य प्रदेश - उत्तर प्रदेश आणि बिहार अशा चार राज्यांतून घडलेला 'कल्याण ते जयनगर' हा अनेक वर्षांनी केलेला ३७ तासांचा दीर्घ रेल्वेप्रवास गाणी ऐकत, भरपूर झोपा काढत, कधी नावेही न ऐकलेली अनेक सुंदर स्टेशन्स बघत मजेत पार पडला. नेहमीचा चहा, कोरा चहा, अद्रकवाला/मसाला चहा, कमी साखरेचा चहा, बिनसाखरेचा चहा, हाजमोला टी/लेमन टी इतके चहाचे वेगवेगळे प्रकार आता गाडीत मिळतात हे पाहून गंमत वाटली. पॅन्ट्रीचे जेवण आणि नाश्ता फारसा समाधानकारक वाटला नसला तरी डब्यातली स्वच्छता मात्र वाखाणण्यासारखी होती. कल्याणपासून सुमारे १९२५ किलोमीटर्सचा हा रेल्वेप्रवास पूर्ण करून मध्यरात्री दोन वाजता आम्ही भारत-नेपाळ सीमेवरील भारतातले शेवटचे रेल्वेस्थानक असलेल्या 'जयनगर'ला पोचलो.
जयनगरहुन जनकपूरधामला जाणारी गाडी सकाळी साडे आठ वाजताची होती आणि ती नेपाळ रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने तिचे IRCTC किंवा अन्य कुठल्या वेबसाईटच्या माध्यमातून आगाऊ तिकीट काढता येत नाही आणि तिचे तिकीट काउंटर गाडी सुटण्याच्या एक तास आधी म्हणजे सकाळी साडे सात वाजता उघडणार होते त्यामुळे साडे पाच-सहा तास स्टेशनवरच्या वेटिंगरूम मध्ये बसण्यापेक्षा वडिलांना थोडा आराम करता यावा ह्या उद्देशाने स्टेशनपासून ७०-८० मीटर अंतरावरच्या एका लॉजमध्ये एक रूम घेतली आणि त्यात वडील आणि आमच्या सामानाची व्यवस्था लावून मी आणि भाचा टाईमपास करण्यासाठी पुन्हा स्टेशनवर आलो.
पूर्वी दरभंगा पर्यंत असलेल्या लांबच्या आणि पॅसेंजर गाड्या आता जयनगर पर्यंत करण्यात आल्याने आणि त्या इथून अशा आडवेळी सुटत असल्याने मध्यरात्र असली तरी स्टेशन परिसरात आणि प्लॅटफॉर्म्सवर प्रवाशांची वर्दळ बऱ्यापैकी होती. स्टेशनबाहेर तर मध्यरात्रीचे अडीच वाजलेत ह्यावर विश्वासच बसणार नाही असे वातावरण होते. प्रवासी, टांगेवाले, ऑटो/सायकल रिक्षावाले, चहा-नाश्त्याच्या गाड्या आणि उपाहारगृहे देखील चालू होती.
स्टेशनसमोरच्या एका उपहारगृहात चहा-पाणी झाल्यावर नेपाळी चलनाविषयी त्याच्या मालकाला विचारल्यावर त्याने किती रुपये बदलून हवेत असे विचारले, आणि दोन-तीन हजार रुपयांपर्यंत तो स्वतः बदलून देऊ शकत असल्याचे सांगून जास्त हवे असल्यास पाच वाजेपर्यंत थांबा, 'चाचाजी' आल्यावर तुम्हाला जितके हवे तितके चलन बदलून मिळेल अशी माहितीही दिली!
आम्हाला अर्थातच जास्त रक्कम हवी असल्याने ते महामहिम 'चाचाजी' येईपर्यंत आणखीन थोडावेळ टाईमपास करण्यास आम्हाला काही अडचण नव्हती. इकडे तिकडे भटकत, थोड्या थोड्या वेळाने चहा पित पहाटे पाच वाजताच फट्ट उजाडेपर्यंत टाईमपास केल्यावर एकदाचे ते 'चाचाजी' आले असल्याचे कळले.
जयनगर स्टेशनच्या प्रवेशाच्या कमानी खालीच समोरच्या टेबलवर मोठी सुटकेस ठेऊन खुर्चीत बसलेला पासष्ट-सत्तरीच्या एक इसम म्हणजेच 'चाचाजी' ते होते. त्यांच्याभोवती चलन बदलून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक प्रवाशांचे कोंडाळे जमले होते त्यामुळे थोडावेळ समोरच्या गाडीवर परत एकदा चहा पित थांबून ती गर्दी कमी झाल्यावर त्या चाचाजींकडून वीस हजार भारतीय रुपये बत्तीस हजार नेपाळी रुपयांत परावर्तित करून घेतले.
'एका भारतीय रुपयास एक नेपाळी रुपया आणि साठ पैशांचा' भाव त्या चाचाजींनी दिला. हा भाव पुढच्या सर्व सहलीत आम्हाला नेपाळमध्ये सरकारी व्यवस्थापनात असलेल्या पर्यटनस्थळांचे प्रवेश शुल्क आणि पशुपतीनाथ मंदिरात दिलेली देणगी ह्या व्यतिरिक्त अन्य कुठेही मिळाला नाही, अन्यत्र सर्वठिकाणी कमाल 'एका भारतीय रुपयास एक नेपाळी रुपया आणि पन्नास पैशांचा तर किमान एक रुपया आणि तीस पैशांचा भाव मिळाला. त्यावेळी आणखीन दोनेक लाख रुपये त्यांच्याकडूनच बदलून घेतले असते तर सरासरी पंधरा पैशांचा फरक गृहीत धरला तरी किमान तीस हजार नेपाळी रुपये आम्हाला अतिरिक्त मिळाले असते, असो!
एकंदरीत मध्यरात्री केलेल्या स्टेशन परिसरातील भटकंती आणि भेटलेली बिहारी लोकं पहाता बिहार बद्दल जे काही चित्र आपल्या मनात माध्यमांतून आणि चित्रपट पाहून तयार झालेले असते ते कितपत खरे आणि कितपत खोटे असावे ह्याबद्दल शंका निर्माण झाली! अर्थात दुर्गम आणि ग्रामीण भागातील परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल.
जयनगर स्टेशन परिसरातील काही छायाचित्रे:
.
खेचर जोडलेले टांगे
.
सायकल रिक्षा
.
आडवारून झोपलेला माकडवाला आणि बसल्या बसल्या झोपलेले त्याचे माकड 😀
.
चलन बदलून घेण्याचे काम झाल्यावर मग नेपाळ रेल्वेचा प्लॅटफॉर्म आणि तिकीट
काउंटर जे भारतीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्म्स पासून थोड्या अंतरावर आहे, ते
बघून ठेवण्यासाठी एक लांबलचक ब्रिज पार करून तिथे पोचलो. तिकीट काउंटर अजून
बंद असल्याने तिथे व प्लॅटफॉर्मवर एक चहावाला आणि पाच-सहा प्रवासी सोडले
तर फार कोणीच नव्हते.
.
.
.
.
.
वास्तविक भारत आणि नेपाळ मधल्या वेळेत फरक असण्याचे तसे काही भौगोलिक कारण नाही, परंतु नेपाळ माउंट एव्हरेस्टच्या प्रमाणवेळेचे पालन करत असल्याने आपल्या आणि त्यांच्या स्थानिक वेळेत पंधरा मिनिटांचा फरक आहे. त्यांचे घड्याळ आपल्यापेक्षा पंधरा मिनिटे पुढे असल्याने नेपाळी रेल्वेचे भारतातील तिकीट काउंटर देखील आपल्या इथल्या साडे सात ऐवजी त्यांच्या वेळेनुसार पंधरा मिनिटे आधी म्हणजे आपल्या इथल्या सव्वा सात वाजता उघडणार होते. साडेसहा वाजून गेले होतेच त्यामुळे भाचा आधीच तिकिटासाठी पहिला नंबर लावून काउंटरवर उभा राहिला आणि मी तोपर्यंत लॉजवर जाऊन आमचे सामान आणि वडिलांना घेऊन परत तिथे आलो तोपर्यंत सव्वा सात वाजले होते आणि प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या गर्दीने फुलुन गेला होता.
पहिला नंबर लावून भाच्याने तिकिटेही पहिल्या तीन क्रमांकाची मिळवली 😀
ह्या गाडीला एसी चेअरकारचा एकच डबा असून तो फुल झाल्यास 'स्टँडिंग' अलाऊड नसल्याने जनरल डब्याचे तिकीट काढावे लागते, आणि ते डबेही कमी असल्याने त्यात प्रचंड गर्दी होते आणि मुंबईच्या लोकल ट्रेन्स प्रमाणे बसलेल्या पेक्षा उभ्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक अशी परिस्थिती निर्माण होते. नेपाळी प्रमाणवेळेनुसार साडे आठ वाजता येणारी गाडी फार नाही पण पाच मिनिटे उशिराने आली तेव्हा आपल्या इथे आठ वाजून वीस मिनिटे झाली होती. आमच्या जागांवर स्थानापन्न होऊन दहा मिनिटे झाली तरी गाडी काही सुटायचे नाव घेईना, शेवटी आणखीन पाच-सात मिनिटे गेल्यावर एकदाचा तिने प्लॅटफॉर्म सोडला.
चेअरकार
.
'कल, आज और कल' 😀
जयनगर सोडल्यावर नेपाळ मधले लागणारे पहिले स्टेशन 'इनार्वा' आणि मग त्यापुढची 'खजूरी', 'महिनाथपूर', 'वैदेही', 'परवाहा' अशा एकूण पाच स्टेशन्स नंतर जेमतेम दिड तासात आम्ही 'जनकपूरधाम'ला पोचलो. हा संपूर्ण प्रवास 'तराई' क्षेत्रातून म्हणजे गंगेच्या सपाट मैदानी प्रदेशातून झाला, त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट जमीन, हिरवी गार शेते आणि झाडे दिसत होती, ह्या क्षेत्रात डोंगर किंवा टेकड्या चुकूनही कुठे दृष्टीस पडत नाहीत.
.
.
.
.
.
.
"मुस्कुराते रहिये, आप नानिहाल मे है" अर्थात "हसत रहा, तुम्ही आजोळी आला
आहात" अशा शब्दांत मिथिला नरेश 'जनक' राजाची प्राचीन राजधानी आणि
'सीतामाईचे' जन्मस्थान असलेल्या 'जनकपूरधाम' नगरात पर्यटकांचे स्वागत
करणारी जनकपूर रेल्वे स्टेशन वरची पाटी!
जनकपूर स्टेशनवर उतरल्यावर कस्टम्स वाल्यांकडून सामानाची तपासणी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि ई-रिक्षाने मुक्काम करण्यासाठी ठरवलेल्या 'जानकी मंदिर' परिसरात पोचलो. वडील आणि भाच्याला एका उपहारगृहात नाश्ता-कम-जेवण करण्यासाठी बसवून आसपासच्या दोन-चार हॉटेल्स पैकी चांगले वाटलेल्या 'हॉटेल विवान' मध्ये तिघांसाठी एक रूम बुक करून त्यांच्या बेलबॉयला सोबत घेऊन पुन्हा त्या उपहारगृहात आलो आणि नाश्ता-कम-जेवण करून झालेल्या दोघांना सामानासकट त्या बेलबॉय बरोबर हॉटेलवर पाठवून दिले आणि माझा नाश्ता-कम-जेवण उरकल्यावर थोड्या वेळात मी पण हॉटेलवर पोचलो. रात्रीचे जागरण विचारात घेऊन आज दिवसभर फक्त आराम करायचा आणि संध्याकाळी भटकायला बाहेर पडायचे असे आधीच ठरवले होते, अंघोळी-पांघोळी उरकल्यावर मग त्याची अंमलबजावणी करत आम्ही तिघेही सरळ झोपून गेलो.
संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो.
हेच ते जनकपूरचे भव्य आणि अतिसुंदर असे 'जानकी मंदिर'. दोन दिवसांनी म्हणजे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या निमित्ताने ह्या महाल सदृष्य भव्य मंदिरावरही विशेष रोषणाई करण्यात येणार असल्याचे वाचनात आले आहे (असेही हे मंदिर रोजच संध्याकाळी रोषणाई केल्याप्रमाणे सुंदरच दिसते त्यामुळे विशेष रोषणाई केल्यावर ते किती सुंदर दिसेल ह्याचा विचार करतोय 😍) त्यामुळे जानकी मंदिर आणि परिसरातील भटकंती विषयी २२ जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर ह्या मालिकेचा दुसरा भाग प्रकाशित करून त्यात लिहितो.
।। जय श्रीराम ।।
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
क्रमशः
http://www.misalpav.com/node/51896
संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो...
आधीचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १
बाहेर पडल्यावर स्थलदर्शनाची सुरुवात हॉटेल पासून अगदी जवळ असलेल्या जानकी मंदिरापासून करायचा आमचा विचार होता, पण हॉटेलच्या व्यवस्थापकाने तिथून एखाद किमी अंतरावर असलेल्या 'गंगासागर तलाव', 'बाबा भूतनाथ मंदिर 'आणि त्या परिसरात असलेली काही लहानमोठी मंदिरे आज पाहावीत आणि उद्या सकाळी आधी जानकी मंदिर, आणि राम मंदिर व दुपारनंतर तिथून तीन किमी अंतरावर जेथे श्रीराम आणि सीतामातेचा विवाह संपन्न झाला होता तो 'मणी मंडप' पाहावा असे सुचवले. प्रत्येक ठिकाणी आपले घोडे पुढे दामटण्यापेक्षा अनेकदा स्थानिकांनी केलेल्या सूचना अंमलात आणणे श्रेयस्कर ठरते असा आजवरचा अनुभव असल्याने त्याप्रमाणे करण्याचे ठरवून गंगासागर तलावाच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.
इथे सकाळी लवकर उजाडत असल्याने संध्याकाळी अंधारही लवकर पडतो, त्यामुळे सव्वापाच-साडेपाचच्या सुमारासच जानकी मंदिरावरचे दिवे लागलेले त्याच्या समोरून जाताना दिसले.
.
अगदी रमत गमत चालूनही आम्ही जेमतेम पंधरा मिनिटांत त्या भल्या मोठ्या
'गंगासागर' तलावावर पोचलो होतो पण आरती सुरु होण्यास एक तासाहून जास्त वेळ
असल्याने आसपासचा परिसर न्याहाळत हिंडत होतो. तिथे चौपाटीवर असतात
त्याप्रमाणे आईस्क्रीम, भेळ-पुरी आणि अन्य काही खाद्यपदार्थांच्या गाड्या
दिसल्याने हलकीशी पोटपूजा करावी ह्या उद्देशाने प्रचंड आवडणारी पाणी पुरी
खायचे ठरवले. पहिली पुरी तोंडात घातली आणि काय सांगावे महाराजा... इतकी
वाईट पाणीपुरी आपण ह्याआधी आयुष्यात कधीच खाल्ली नसल्याचा साक्षात्कार
झाला. काहीतरी विशेष/अलौकिक असे कौशल्य अंगी असल्याशिवाय इतकी बकवास
पाणीपुरी कोणाला बनवता येणे निव्वळ अशक्य!
'रन' चित्रपटातला 'कौवा बिर्यानी' फेम 'गणेश' (विजय राज) पाणचट चहा मिळाल्यावर "चाय मांगी थी बे... पानी नही" असे चहावाल्याला ऐकवत त्या ग्लासातल्या चहाने हात धुण्याचा एक प्रसंग आहे, त्याच धर्तीवर (पण इथे मूळ ऑर्डरच 'पाणी' पुरीची असल्याने तसला काही डायलॉग मारणे शक्य नसल्याने) पुढच्या पुरीतल्या अत्यंत फिकट पोपटी रंगाच्या पाण्याने हात धुवून इतकी भंकस पाणीपुरी खीलवणाऱ्या त्या महान पाणीपुरीवाल्याला कोपरापासून हात जोडून नमस्कार करावा असा विचार मनात येऊन गेला पण भावनांना थोडा आवर घालून, "बस, आता पाणीपुरी नको, एक प्लेट 'शेव बटाटा पुरी' दे" असे सांगितले. अनुभव सारखाच होता, शेव बटाटा पुरी पण अत्यंत बेचव होती. ह्या पुढे नेपाळमध्ये 'चाट' हा प्रकार कुठेही खायचा नाही असा मनोमन निश्चय करून आम्ही तिथून निघालो (पण पुढे हा निश्चय फार दिवस टिकला नाही, काठमांडूला 'पाटण दरबार स्क्वेअर' जवळ एके ठिकाणी हे दोन्ही पदार्थ चविष्ट मिळाल्याने तो मोडावा लागला 😀)
असो, तिथून निघाल्यावर 'नगर डीहवार मंदिर' पाहून मग आरतीची वेळ
होईपर्यंत संपूर्ण तलावाकाठी बांधलेल्या घाटावरून चक्कर मारत त्याच्या
किनाऱ्यावरची अन्य मंदिरे पाहायला सुरुवात केली.
.
.
गंगासागर तलाव आणि त्याच्या समोरच्या किनाऱ्यावर दिसणारे बाबा भूतनाथ महादेव मंदिर.
.
बाबा भूतनाथ महादेव मंदिर:
महादेवाचे हे मंदिर स्मशानात आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
मिथिला नरेश आणि सीतामाईचे पिता 'जनक' राजांच्या मृत्यनंतर त्यांच्या
पार्थिवावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीला खेटून हे सुंदर
मंदिर आहे. मंदिराच्या आवारात शिव-पार्वतीचे कुठल्याश्या प्रसंगाचे शिल्प
साकारले असून समोर एक पंचमुखी रुद्राक्षाचे मोठे झाड आणि त्यापुढे
स्मशानभूमी आहे.
.
.
.
रुद्राक्षाचे झाड.
हे भूतनाथ मंदिर पाहून झाल्यावर तलावाकाठची अन्य लहान-मोठी मंदिरे पाहात आम्ही पुन्हा गंगारती होणाऱ्या ठिकाणी पोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती.
.
.
.
प्राचीनकाळी हा तलाव पाण्याने भरण्यासाठी गंगाजल आणण्यात आले असल्याची
आख्यायिका असल्याने गंगेसमान पवित्र मानल्या जाणाऱ्या ह्या तलावाकाठी
बऱ्यापैकी भाविक आणि पर्यटक मंडळींच्या उपस्थितीत झालेली तालबद्ध गंगारती
पाहून छान वाटले. आरती झाल्यावर तिथून निघालो. त्या दिवशी रक्षाबंधन होते व
नेपाळमध्ये हा एक महत्वाचा सण म्हणून साजरा केला जात असल्याने कित्येक
उपाहारगृहे कर्मचाऱ्यांअभावी बंद होती, त्यामुळे सकाळच्याच उपाहारगृहात
पुन्हा जाऊन जेवण करून आम्ही हॉटेलवर परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर 'साडे दहाच्या सुमारास जानकी मंदिरात प्रवेशकर्ते झालो.
'
.
सुमारे १२००० वर्षांपूर्वीचा काळ मानल्या जाणाऱ्या 'त्रेता युगात' मिथिला
नरेश जनक राजाच्या राजधानीचे नगर म्हणजे आजचे जनकपूर. इ.स. १६५७ मध्ये ज्या
ठिकाणी सीतेची सोन्याची मूर्ती सापडली त्या ठिकाणी जानकी मंदिर बांधण्यात
आले. जनकराजाला शिव धनुष्याची प्राप्ती, सीतामातेचा जन्म, तिचे वास्तव्य
आणि स्वयंवर ह्या स्थानी झाल्याचे मानले जाते.
आज जे भव्य मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते ते स्वातंत्र्यपूर्व भारतातील ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने १९१० साली बांधले आहे. त्याकाळी नऊ लाख सुवर्णमुद्रा ह्या मंदिराच्या बांधकामासाठी खर्च झाल्या होत्या त्यामुळे स्थानिक लोकं ह्या मंदिराला 'नौलखा मंदिर' ह्या नावानेही ओळखतात. मुघल, हिंदू आणि मैथिली अशा मिश्र वास्तुशैलीत, संपूर्णपणे दगड आणि संगमरवराचा वापर करून बांधलेल्या ह्या तीन मजली महालसदृष्य मंदिरात तब्बल साठ खोल्या असून त्या नेपाळचा ध्वज, रंगीत काचा, कोरीवकाम आणि मिथिला चित्रे, सुंदर जाळीदार खिडक्या आणि सज्जानी सजवलेल्या आहेत.
विवाह पंचमी हा इथला वार्षिक उत्सव असून त्यात सीता आणि राम यांचा विवाह असंख्य पवित्र संस्कार आणि विधींनी साजरा केला जातो. ह्या उत्सवादरम्यान मंदिर अतिशय निगुतीने सजवले जाते. दररोज असंख्य दिवे प्रज्वलित केले जात असून दिवसभर भजने गायली जातात. जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू आणि प्रवासी या पवित्र हिंदू मंदिराला विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विवाह पंचमी उत्सवासाठी साठी मोठ्या संख्येने भेट देतात.
महालाच्या मध्यभागी भव्य-दिव्य असे मुख्य मंदिर असून गाभाऱ्यात अयोध्येत
सापडलेल्या सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आज पर्यंत
पाहिलेल्या असंख्य लहान मोठ्या मंदिरांपैकी मला सर्वात जास्त आवडलेल्या
मंदिरांपैकी एक असल्याने त्याच्या सौन्दर्याविषयी मी फार काही लिहीत नाही,
त्याविषयी मंदिराचे काही फोटोज पाहून आपले मत बनवावे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
महालात एक सांस्कृतिक संग्रहालय आणि ऍनिमेटेड स्वरूपात सीतेचे प्रकट होणे,
तिचे बालपण ते स्वयंवर आणि विवाह असे रामायणातील काही प्रसंग दर्शवणारे
दालन आहे जे पाहण्यासाठी १५ नेपाळी रुपये किंवा १० भारतीय रुपये अशी
नाममात्र प्रवेश फी आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
* आज २२ जानेवारी २०२४ रोजी रामल्लाच्या
प्राणप्रतिष्ठेनिमित्त जानकी मंदिरात १,२५,००० तुपाचे दिवे प्रज्वलित करून
दीपोत्सव साजरा करण्यात येणार होता. त्या दीपोत्सवात मंदिर किती सुंदर दिसत
असेल हे पाहण्यास उत्सुकता असल्याने त्याचे आजचे फोटोज मिळवण्याचा प्रयत्न
आहे, पण तूर्तास ANI ने 'एक्स' वर पोस्ट केलेला ह्या दीपोत्सवाचा छोटा व्हिडिओ येथे पहाता येईल.
ह्या लेखाची लांबी आता आणखीन न वाढवता जानकी मंदिर परिसरातील हनुमान मंदिर आणि विवाह मंडप, तिथून थोड्या अंतरावरचे राम मंदिर आणि मणी मंडपाविषयी पुढच्या भागात लिहितो.
आधीचे भाग:
- नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १
- नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)
२००८ साली युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थळ' घोषित केलेल्या ह्या भव्य-दिव्य आणि अतिशय सुंदर अशा महालसदृष्य जानकी मंदिरातुन बाहेर पडल्यावर आम्ही मंदिराच्या आवारात पुढ्यातच, डावीकडे असलेल्या हनुमान मंदिराकडे आमचा मोर्चा वळवला. ह्या हनुमान मंदिराचा रंग भगवा नसता तर पाहणाऱ्याला तो एखादा दर्गा किंवा लहानशी मशिदच वाटेल ह्यात शंका नाही 😀
जनकपूरचे 'जानकी मंदिर' पाहताना "इतिहासात कधीही कुठल्याही परकीय राजवटीच्या / सत्तेच्या अंमलाखाली न गेलेल्या आणि २००६ पर्यंत अधिकृतरीत्या जगातील एकमेव 'हिंदु राष्ट्र' असा लौकिक मिरवणाऱ्या नेपाळमधली सर्व प्राचीन-अर्वाचीन मंदिरे ही मुख्यत्वे 'नेवारी' व 'पॅगोडा' आणि 'मैथिली' व 'हिंदू' वास्तूशैलीत बांधलेली असताना तिथले हे एकमेव मंदिर 'मुघल, हिंदू आणि मैथिली' अशा मिश्र वास्तुशैलीत का बांधले असावे?" आणि "स्वातंत्र्यपूर्व भारतातील ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने हे जानकी मंदिर नेपाळमध्ये बांधण्याचे काय कारण असावे?" असे दोन प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात हमखास उभे रहातात!
ह्या दोन पैकी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सोळाव्या शतकात बुंदेलखंडातील 'बुंदेली राजपूत' ह्या लढवय्या जमातीचा तत्कालीन प्रमुख आणि त्यानेच स्थापन केलेल्या 'ओर्च्छा' राज्याचा पहिला राजा असलेलया 'रुद्र प्रताप सिंग' (१५०१ - १५३१) ह्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ओर्च्छा', 'बुंदेली-राजपूत वास्तुकला', तिथली 'राम भक्ती' आणि 'राम राजा मंदिर' ह्याविषयीचा थोडा इतिहास जाणून घेणे अगत्याचे ठरते. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दोन कहाण्यांतून मिळते. (आता थोडे अवांतर होणार असले तरी सहृदय मिपाकरांनी सांभाळून घ्यावे!)
सोळाव्या शतकात ओर्च्छा मध्ये किल्ला संकुल, विविध महाल/हवेल्या, मंदिरे बांधताना तिथल्या मूळच्या 'बुंदेली राजपूत' वास्तूशैलीच्या बरोबरीने 'एक मोठा घुमट आणि त्याच्या भोवती चार लहान घुमट' आणि 'महिरपी कमानी' अशा 'मुघल' वास्तुकलेतील (इंडो-इस्लामिक आर्किटेक्चर) वैशिष्ट्यांचाही सुरेखरीत्या वापर केलेला पाहायला मिळतो. मुळात मुघल वास्तुकला / स्थापत्यशास्त्र हे 'स्वयंभू' नसून ते 'पर्शियन वास्तुकला', 'हिंदू' (विशेषतः राजस्थानी आणि बुंदेली राजपूत वास्तुकला') आणि 'इस्लामी वास्तुकला' ह्या तिघांच्या सुरेख संगमातून निर्माण झालेले आहे.
भारतात अयोध्येनंतर ओर्च्छा हे एकमेव असे ठिकाण आहे कि जेथे प्रभू श्रीरामांना केवळ देव म्हणूनच नाही तर राजा म्हणूनही पुजले जाते, त्यामुळे इथले सोळाव्या शतकातील राम मंदिर देखील 'राम राजा मंदिर' म्हणून ओळखले जाते.
ज्याप्रमाणे जनकपूर येथील 'जानकी मंदिर' पाहताना त्याची रचना इतर हिंदू मंदिरांसारखी नसल्याचे लक्षात येते, नेमकी तीच गोष्ट ओर्च्छाचे भव्य 'राम राजा मंदिर' पाहणाऱ्यांनाही जाणवते!
राम राजा मंदिर - ओर्च्छा ▼
ओर्च्छाच्या राम राजा मंदिराची कहाणी...
सोळाव्या शतकातला ओर्च्छाचा राजा 'मधुकर शहा जुदेव बुंदेला' (१५५४ - १५९२) हा भगवान श्रीकृष्णांचा परम भक्त होता तर त्याची पत्नी राणी 'गणेश कुंवरी' ही श्रीरामांची निस्सीम भक्त होती. एकदा राजाने राणीला ब्रज-मथुरेला जाण्याचा आपला विचार असल्याचे सांगत तिलाही बरोबर येण्यास सांगितले पण राणीच्या मनात त्यावेळी अयोध्येला जायचा विचार असल्याने तिने राजासोबत जाण्यास नकार दिला. राजा आपल्या विचारावर ठाम होता आणि राणी आपल्या!
राजाने वारंवार विनंती करूनही राणी आपल्या नकारावर ठाम असल्याचे पाहून क्रोधीत झालेलया राजाने राणीला "अयोध्येला जाऊन भगवान रामाला तुझ्यासोबत घेऊन ये, अन्यथा ओर्च्छाला परत येऊ नकोस" अशी आज्ञा दिली.
राजाज्ञेवरून अयोध्येला पोहोचल्यावर राणीने लक्ष्मण घाटावर भगवान श्रीरामाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. अनेक दिवस कठोर तपश्चर्या करूनही श्रीरामांचे दर्शन न झाल्याने निराश झालेल्या राणीच्या मनात शरयू नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा विचार पक्का झाल्यावर तिच्या भक्तीने प्रसन्न झालेले प्रभू श्रीराम बालरूपात (रामलल्ला) राणीच्या मांडीवर प्रकट झाले आणि तीन अटींवर तिच्यासोबत ओर्च्छाला येण्यास तयार झाले.
- आपण पुष्य नक्षत्रावर प्रस्थान करायचे जेणेकरून साधू संतांच्या सोबतीने आपल्याला ओर्च्छाला पोहोचता येईल.
- एकदा आपण ओर्च्छाला पोहोचलो की, मीच ओर्च्छाचा राजा असेन.
- तुम्ही ज्या ठिकाणी मला पहिल्यांदा जमिनीवर ठेवाल तेच माझ्या वास्तव्याचे कायमस्वरूपी ठिकाण असेल.
प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने कृतार्थ झालेल्या राणी 'गणेश कुंवरीने' त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या.
श्रावण शुक्ल पंचमीला पुष्य नक्षत्रावर बालरुपातल्या प्रभू श्रीरामांसह राणी ओर्च्छाला परत येण्यासाठी निघाल्याची बातमी समजताच आनंदित झालेल्या राजा 'मधुकर शहा जुदेव बुंदेला' ह्यांनी श्रीरामांसाठी एक मंदिर बांधण्यास सुरुवात केली. ओर्च्छाला पोचल्यावर दीर्घ प्रवासामुळे थकलेली राणी तिच्या महालात मुक्कामासाठी थांबली आणि कडेवरील रामलल्लांना आपल्या खोलीत ठेऊन स्नानादिकर्मे उरकण्यासाठी गेली. तिसऱ्या अटीनुसार त्यांना ज्या ठिकाणी जमिनीवर ठेवले तेच बालरूप लुप्त होऊन मूर्तिरूप धारण केलेल्या प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याचे कायमस्वरूपी ठिकाण बनले. तेव्हापासून पूर्वी 'रानी महल' म्हणून ओळखला जाणारा राणीचा महाल 'राम राजा मंदिर' म्हणून ओळखला जाऊ लागला.
बाबराने अयोध्येतील राम मंदिर उध्वस्त केल्यावर नागरिकांनी त्यातल्या अनेक मूर्ती आणि धार्मिक महत्व असलेल्या वस्तू आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या घरी सांभाळून ठेवल्या होत्या. प्रभू श्रीरामांची निस्सीम भक्त असलेल्या राणी गणेश कुंवरीने एक गुप्त मोहीम आखून त्यातल्या कित्येक मूर्ती आणि वस्तूंचा संभाव्य विध्वंस टाळण्यासाठी ओर्च्छाला आणून भक्तिभावाने त्यांचे जतन केले होते. त्यात मागच्या भागात उल्लेख केलेल्या जानकी मंदिरात स्थापन केलेल्या अयोध्येत सापडलेल्या सीतेच्या मूर्तींचाही समावेश होता.
सोळाव्या शतकातल्या इतिहासात खरंतर राणी गणेश कुंवरीचे स्थान खूप मानाचे आहे परंतु दुर्दैवाने हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व कमालीचे दुर्लक्षित राहिले आहे.
ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने हे जानकी मंदिर नेपाळमध्ये का बांधले ह्याविषयीच्या दोन कहाण्या:
- एकदा राणी वृषा भानू नेपाळमध्ये गेली असताना जनकपूरमध्ये आज ज्या स्थानावर 'जानकी मंदिर' आहे त्या ठिकाणी तिचा तंबूत मुक्काम होता. रात्री तिच्या स्वप्नात सीतामाई आली आणि तिने "हे माझे जन्मस्थान असून तू ह्याठिकाणी माझे मंदिर बांध" असे सांगितले.
- आपला लाडका पुत्र कुठलासा गंभीर आजार होऊन कुठल्याही औषधोपचारांनी गुण येत नसल्याने दिवसेंदिवस प्रकृती खालावत जाऊन मरणासन्न अवस्थेत पोचला असताना राणी वृषा भानूने ओर्च्छाचे आराध्य दैवत असलेल्या 'राम राजांना' "आपल्या पुत्राच्या प्रकृतीस आराम पडण्यासाठी सीतामाईच्या जन्मस्थानी तुमच्या सारखेच महालसदृष्य भव्य मंदिर उभारून त्यात राणी 'गणेश कुंवरीने' अयोध्येतुन सुरक्षितपणे आणून राजघराण्याच्या पिढीजात संग्रहात सांभाळून ठेवलेल्या सीतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा" नवस केला होता.
राम राजा तिच्या नवसाला पाऊन तिचा पुत्र त्या गंभीर आजारातून बरा होऊन त्याचा जीव वाचल्याने राणी वृषा भानूने नेपाळमधील जनकपूर ह्या सीतेच्या जन्मस्थानी हे मंदिर बांधले.
वरील दोन कहाण्यांपैकी पहिली कहाणी काल्पनिक तर दुसरी ओर्च्छातली 'राम भक्ती' आणि 'गणेश कुंवरी'चा इतिहास पाहता तर्कशुद्ध आणि अधिक विश्वसनीय वाटते, खरे खोटे देव जाणे!
असो, खालचा ओर्च्छाच्या राजघराण्याचे पिढीजात वास्तव्य असलेला ओर्च्छाच्या किल्याचा आणि राम राजा मंदिराचा एकत्रित फोटो पाहिल्यावर तिथे सोळाव्या शतकापासूनच रुळलेल्या मुघल वास्तुकलेचा प्रभाव पडलेल्या बुंदेली-राजपूत आणि मैथिली अशा मिश्र वास्तूशैलीत हे महालसदृष्य जानकी मंदिर बांधल्याचे लक्षात येते, अर्थात विसाव्या शतकात हे मंदिर बांधताना संगमरवराचा अधिक वापर केल्याने पूर्वी दगडाचा वापर करून बांधलेल्या वास्तुंपेक्षा हे अधिक इस्लामी पद्धतीचे वाटते ह्यात शंकाच नाही!
.
- अवांतर समाप्त 😀
हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यावर जानकी मंदिराच्या मागच्या बाजूला पायी दीड-दोन मिनिटांच्या अंतरावर असलेला 'राम जानकी विवाह मंडप' पाहायला आम्ही निघालो.
वास्तविक राम-सीतेचा विवाह संपन्न झालेला पौराणिक 'मणी मंडप' तीनेक किमी अंतरावर असताना आधुनिक काळात हा वेगळा 'विवाह मंडप' बांधण्याचे काय प्रयोजन असावे हे समजले नाही, कदाचित विवाह सोहळ्यातले काही विधी ह्याठिकाणी झाले असावेत असा आपला एक अंदाज!
छानशा बगीच्यामध्ये पॅगोडा शैलीत बांधलेल्या ह्या संगमरवरी विवाह मंडपात मध्यभागी विवाह प्रसंगीच्या राम-सीतेच्या आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना बसलेल्या ऋषीमुनींच्या आणि काही पौराणिक पात्रांच्या मूर्ती आहेत.
विवाह मंडप पाहून झाल्यावर तिथून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरच्या राम मंदिराच्या दिशेने आमची सात-आठ मिनिटांची पदयात्रा सुरु झाली.
जनकपूरमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेले हे राम मंदिर सतराव्या शतकात 'अमरसिंह थापा' ह्या गोरखाली सेनापतीने नेपाळमधील इतर देवस्थानांप्रमाणेच पारंपारिक पॅगोडा शैलीत बांधले आहे. 'रामनवमी' आणि घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत १५ दिवस साजरा केला जाणारा नेपाळ मधील सर्वात मोठा वार्षिक उत्सव असलेल्या 'दशैन' ह्या दोन प्रसंगी मंदिरात यात्रेकरूंची प्रचंड गर्दी असते.
प्रसन्न वातावरणात विलक्षण शांततेची अनुभूती देणाऱ्या ह्या मंदिर परिसरात थोडावेळ बसून भुकेची जाणीव व्हायला लागल्यावर दोन-सव्वा दोनच्या सुमारास आमाच्या हॉटेलवर परतल्यावर तिथल्याच उपहारगृहात तीन भाज्या, डाळ-भात, चटणी, कोशिंबीर,पापड अशा पदार्थांचा समावेश असलेल्या 'नेपाळी भोजनाचा' आस्वाद घेतला. भाता पेक्षा पोळी/फुलके हे मुख्यान्न असलेल्या माझ्यासारख्याला तिखट चवीचे जेवण आवडले असले तरी पोळी/फुलके/तंदूर रोटीचा अभाव जाणवल्याने समाधान झाले नाही!
जेवण झाल्यावर रूमवर येऊन थोडावेळ टीव्ही बघत लोळत पडून आराम केल्यावर साडे चारच्या सुमारास हॉटेलच्या व्यवस्थापकाने दीड तासासाठी ६०० नेपाळी रुपये अशा भाड्यात ठरवून दिलेल्या ई-रिक्षाने साधारण तीनेक किमी अंतरावर असलेला 'मणी मंडप' पाहायला निघून दहा एक मिनिटांत त्याठिकाणी पोचलो.
त्रेता युगात राम आणि सीतेचा विवाह ह्या ठिकाणी संपन्न झाला होता अशी पौराणिक-धार्मिक मान्यता असलेल्या ह्या स्थानावर प्राचीन वास्तू किंवा त्यांचे अवशेष दृष्टीस पडत नाहीत, पण शहराबाहेर असल्याने इथले शांत-रम्य वातावरण, प्राचीन मणी मंडपाच्या (विवाह मंडप) जागी नव्याने बांधलेलया मंडपात स्थापन केलेली श्री राम-जानकीची मूर्ती, त्याच्या डाव्या बाजूचे हनुमान मंदिर, समोर असलेला तलाव आणि तलावाकाठचे शिव मंदिर अशा गोष्टी एक वेगळीच प्रसन्न अनुभूती देतात!
हनुमान मंदिराची दर्शनी बाजू वगळता गाभाऱ्याच्या बाहेरील तीन भिंतींवर 'हनुमान चालीसा', 'संकटमोचन हनुमानाष्टक' आणि 'श्री बजरंग बाण' अशी स्तोत्रे/दोहे लिहिलेली आहेत. तोपर्यंत पूर्वी कॅसेट्सवर, मग एम पी थ्रीवर, काहीवेळा मंदिरांत स्पीकरवर आणि गेल्या काही वर्षांपासून युट्युबवर ह्यांचे श्रवण अनेकदा केले आहे, परंतु त्यादिवशी पहिल्यांदाच हि स्तोत्रे/दोहे 'वाचली' आणि "अमुक ठिकाणी तमुक केल्यास किंवा नुसते गेल्यासही व्हायब्रेशन्स जाणवतात" वगैरे गोष्टी ऐकून होतो, पण ते नक्की काय असते ह्याचा अनुभव मात्र त्या दिवशी मिळाला. अर्थात कदाचित ते माझ्या 'मनाचे खेळ' असू शकतील, पण जे काही अनुभवले ते वर्णनातीत होते एवढे नक्की!
मणी मंडपासमोरील तलाव आणि शिव मंदिर ▼
तलावाकाठच्या शिवमंदिराच्या शेजारीच एक आश्रम होता आणि तिथे एक व्यक्ती उंटाच्या चार-पाण्याची व्यवस्था बघत होता. नेपाळमध्ये आणि तेही आश्रमात उंट बघून थोडे आश्चर्य वाटले होते. तो मनुष्य "उंट कि सवारी, हलकी हो या भारी, बीस रुपैये सवारी, जनहित मैं जारी..." छाप फेरीवाला तर नक्कीच वाटत नव्हता म्हणून त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा कळले कि तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असून आठेक वर्षांपूर्वी तरुण वयातच संन्यास घेतल्यानंतर 'वीरू' नावाच्या आपल्या लाडक्या उंटाच्या पाठीवर आवश्यक तो शिधा, तंबू, जरूरीपुरते किरकोळ सामान आणि वस्त्रे लादून त्याच्यासमवेत पायी पदभ्रमण करत भारतातलया सर्व तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर आता नेपाळ मधल्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सीमोल्लंघन करून इथे आला आहे.
'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' हि म्हण लहानपणापासून ऐकत आलो आहे, त्याच धर्तीवर ह्या 'संन्याशाचे बिऱ्हाड उंटावर' असल्याचे पाहून त्याच्या पायी तीर्थयात्रेची कमाल वाटली!
असो, तासाभरात मणी मंडप आणि आजूबाजूचा परिसर निवांतपणे बघून आम्ही तिथून निघालो आणि पावणे सहाच्या सुमारास पुन्हा हॉटेलवर पोचलो. वडिलांना रूममध्ये आराम करण्यासाठी सोडून मी आणि भाचा काल रक्षाबंधन निमित्ताने जनकपुरमधली बरीचशी दुकाने बंद असल्याने राहून गेलेली नेपाळी सिम कार्ड्स आणि अन्य काही किरकोळ वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गेलो.
अर्ध्या-पाऊण तासात आमची जुजबी खरेदी आटोपल्यावर आमच्या 'हॉटेल विवान'च्या रूफ टॉप बार अँड रेस्टोरंट मध्ये जाऊन 'ब्लॅक ओक' ह्या नेपाळच्या स्थानिक प्रीमियम व्हिस्कीचा स्प्रिंग रोल्स आणि सी.सी.पी. च्या साथीने निवांतपणे आस्वाद घेत बसलो. आठच्या सुमारास वडिलांना कडक-चिवट पदार्थ चावण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यासाठी आपल्या खिचडीशी मिळता-जुळता एक नेपाळी पदार्थ (ज्याचे नाव आता विसरलो) थोडा मऊसर बनवण्याची सूचना देऊन रूममध्ये पाठवून दिला.
आपली 'ॲपल सायडर' संपवून संथपणे चाललेला माझा 'कार्यक्रम' कधी आटपतो ह्याची वाट बघत मला कंपनी देत बसलेल्या भाच्याच्या संयमाचा अंत न पाहाता साडे आठच्या सुमारास त्याच्यासाठी व्हेज तर माझ्यासाठी चिकन हक्का नूडल्सची ऑर्डर देऊन खान-पान उरकून सव्वा नऊच्या सुमारास आम्ही रूमवर परतलो.
दुसऱ्या दिवशी काठमांडूला जाण्यासाठीची 'बुद्धा एअरवेज'ची आमची फ्लाईट दुपारी पावणे तीनची होती त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचीहि घाई नव्हती आणि केवळ १ तास आधी म्हणजे पावणे दोन पर्यंत एरपोर्टवर पोहोचायचे असल्याने सामानाची आवरा-आवरी वगैरे करायलाही मुबलक वेळ हाताशी होता. वडील रोजच्या सवयीने दहाच्या सुमारासच झोपले होते. मोबाईलवर 'मांगा' वाचता वाचता भाच्यालाही झोप लागली होती. साडे बारा - पाऊण वाजेपर्यंत टिव्ही वर चित्रपट/गाणी बघून मी पण निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
दुसऱ्या दिवशी आम्ही उशिरा म्हणजे साडे दहाच्या सुमारास उठलो तेव्हा सकाळी लवकर उठणारे वडील जानकी मंदिरात जाऊन परत येताना नाश्ता करूनच आले होते. गर्दी नसल्याने मनासारखे दर्शन आणि संपूर्ण मंदिर पाहण्यात त्यांचे दोनेक तास मजेत गेल्याने स्वारी खुश होती! चांगलीच भूक लागली असल्याने पटापट ब्रश करून आम्ही दोघे परवा गेलो होतो त्याच अगदी जवळच्या उपहारगृहात जाऊन छोले-भटुरे-जिलबी असा मालकाने सुचवलेला नाश्ता केला. भटुरे आणि जिलबी एकदम मस्त होती पण 'छोले' म्हणून कबुली चण्यांच्या जागी हिरवे वाटणे वापरलेले बघून गंमत वाटली, अर्थात चवीला तेही चांगलेच लागले ह्यात वाद नाही.
दणदणीत नाश्ता झाल्यावर रूमवर परतून आमच्या आंघोळी-पांघोळी आणि सामानाची आवरा-आवर उरकल्यावर एकच्या सुमारास कालच्याप्रमाणेच हॉटेल व्यवस्थापकाने ४५० नेपाळी रुपये भाड्यात ठरवलेल्या ई-रिक्षाने हॉटेलपासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या जनकपूर एरपोर्टवर पोचलो.
छोट्याशा जनकपूर एरपोर्टवर वेळेआधीच पोचल्याने सुरक्षा तपासणी सुरु होईपर्यंत सुमारे पाऊण तास वाट पाहावी लागली. बोर्डिंग गेट उघडल्यावर मात्र चालत चालत विमानापर्यंत पोचण्यास पाच मिनिटेही लागली नसतील.
सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले...
टीप: ओर्च्छा येथील किल्ला आणि राम राजा मंदिराचे फोटोज जालावरून साभार.
क्रमश:
"सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले..."
विमानातून घडलेले काठमांडू शहराचे विहंगम दर्शन ▼
समुद्रसपाटीपासून जवळपास २४० फूट उंचीवरच्या जनकपूर पासून जवळपास ४३०० फूट उंचीवर असलेल्या काठमांडू पर्यंतचे अंतर सुमारे २२४ कि.मी. आहे. 'चुरिया' (शिवालिक टेकड्या) ह्या हिमालयाच्या बाह्य पर्वतरांगेच्या डोंगराळ भागातून, वळणा वळणांच्या रस्त्यावरून बस किंवा खाजगी वाहनाने पूर्ण करण्यास सात ते नऊ तास लागणारा हा काहीसा खडतर आणि वेळखाऊ प्रवास हवाईमार्गे केवळ २५ मिनिटांत पूर्ण करून साडेतीनच्या सुमारास आम्ही काठमांडूच्या 'त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर' (Tribhuvan International Airport) पोचलो.
प्रवास पंचवीस मिनिटांत पूर्ण झाला असला तरी बॅगेज कलेक्शनसाठी मात्र एक तासापेक्षा थोडा अधिक वेळ लागला. हा खोळंबा होण्यामागे ५३ एअरपोर्टसच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांना अंतर्देशीय विमानसेवेने जोडताना वर्षभरात सुमारे तीन लाख 'टेक ऑफ्स' आणि तेवढीच 'लँडिंग्ज' होणारा नेपाळमधला हा सर्वात 'बिझी' एअरपोर्ट असणे हे एक प्रमुख कारण तर आहेच पण, अंतर्देशीय विमानप्रवास तुलनेने किफायतशीर असल्याने पर्यटकांप्रमाणेच देशाच्या ग्रामीण भागातील लोकही सर्रास विमानप्रवास करताना आढळतात आणि ह्या गावकऱ्यांनी कार्गोमध्ये टाकलेल्या ज्यूट/प्लॅस्टिकच्या गोण्यांत भरलेल्या वस्तूंच्या कुठून गोलाकार तर कुठून टोकदार भागाने डोके वर काढल्याने गोल, लंबगोल, चौरस, आयत अशा कुठल्याही भौमितीय आकारात न बसणाऱ्या ओबडधोबड सामानामुळे तांत्रिक समस्या उद्भवणे हे दुसरे कारणही आहे!
डोमेस्टिक अरायव्हलसाठी येथे असलेली कन्व्हेअर बेल्टची यंत्रणा थोडी जुनाट आहे, त्यामुळे त्याच्या 'प्रदक्षिणा' मार्गात असलेल्या वळणांवर हे ओबडधोबड सामान अडकून बेल्ट निश्चल होण्याचे प्रकार वारंवार घडतात. मग तिथल्या एका कर्मचाऱ्याने बेल्टचा विद्युतपुरवठा बंद केल्यावर दुसऱ्याने असे अडकलेले सामान सोडवल्यावर सुरु केलेली यंत्रणा पुन्हा दुसऱ्या कोणाची 'निर्गुण निराकार' गोण अडकून बंद पडणे ही त्या कर्मचाऱ्यांसाठी नित्याची बाब असली तरी प्रवाशांसाठी मात्र कंटाळवाणी ठरते. आमच्या राशीत कुठले ग्रह बलस्थानी होते माहिती नाही, पण त्यांच्याकृपेने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या दोन्ही डोमेस्टिक लँडिंग्जच्या वेळी हा 'नित्य योग' अनुभवण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते 😀
विस्तीर्ण आवार असलेल्या त्रिभुवन विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी तेथे उपलब्ध असलेल्या शटल बस सेवेचा वापर करून रिंग रोडवरच्या 'एंट्री-एक्झिट' गेटच्या कमानीपाशी उतरून प्रचंड रहदारीचा तो हमरस्ता ओलांडल्यावर समोरच असलेल्या भव्य अशा 'हॉटेल एरो'च्या तळमजल्यावरील त्यांच्याच उपहारगृहात वडील आणि भाच्याला चहा-नाश्त्यासाठी बसवून, तिथून अगदी जवळ असलेल्या, जनकपूरच्या हॉटेल व्यवस्थापकाने काठमांडूतील मुक्कामासाठी सुचवलेल्या एअरपोर्ट जवळच्या तीन-चार चांगल्या हॉटेल्सपैकी एक असलेल्या 'हॉटेल गंबु पॅलेस' मध्ये पोचलो.
नेपाळमध्ये चांगल्या हॉटेल्सची अजिबात कमतरता नाही पण बहुतांश चार-पाच मजली हॉटेल्समध्ये लिफ्टची सुविधा नसणे हि एक समस्या प्रकर्षाने जाणवते. हॉटेल गंबु पॅलेसही त्याला अपवाद नव्हते पण नुकतेच अंतर्बाह्य रंगरंगोटीचे काम पूर्ण झालेल्या ह्या हॉटेलच्या स्वच्छ, टापटीप असलेल्या प्रशस्त रूम्स आवडल्या होत्या आणि "लिफ्ट नसली तर रूम्स शक्यतो पहिल्या मजल्यावरच असाव्यात" हि अपेक्षाही पूर्ण होत होती.
आमच्या तिघांच्या त्या रात्रीच्या मुक्कामासाठी एक आणि दुसऱ्या दिवशी बाकीची मंडळी आम्हाला जॉईन झाल्यावर पुढच्या दोन रात्रींसाठी तीन + पोखराहून परतल्यावर पुन्हा काठमांडूत होणाऱ्या दोन रात्रींच्या मुक्कामासाठी साठी तीन रूम्स एकगठ्ठा बुक करण्याचा प्रस्ताव दिल्यावर व्यवस्थापकाने कॅल्क्युलेटरवर काही आकडेमोड करून दाखवलेला सवलतीच्या दरातील 'ठोक रकमेचा' आकडा समाधानकारक वाटल्याने सौदा 'फायनल' केला आणि हॉटेलच्याच सात-आठ टेबल्स असलेल्या, चहा-कॉफी आणि वेळेनुसार मर्यादित खाद्यपदार्थ मिळणाऱ्या लहानशा उपहारगृहात 'ब्रेड बटर आणि कॉफी' अशी हलकीशी पोटपूजा करत बसलो असताना दिलेल्या निर्देशांनुसार हॉटेलचा कर्मचारी सामानासहित वडील आणि भाच्याला घेऊन तिथे पोचला.
दुसऱ्या दिवसापासून पुढच्या सर्व मुक्कामासाठी दर्शनीभागाकडील रूम्स मिळणार असल्या तरी त्या रात्रीसाठी हॉटेलच्या मागच्या बाजूला मिळालेल्या रूममध्ये स्थिरस्थावर झाल्यावर तिच्या बाल्कनीत उभे राहून आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना हॉटेलच्या मागच्या भागाला लागूनच असलेल्या एका मोठया एक मजली घराच्या चांगल्या लांब-रुंद परसबागेत, सामायिक कुंपणालगत, आपल्यासमोर हारीने रचून ठेवलेल्या मातीच्या कुंड्या छोट्या स्टुलावर बसून लालभडक रंगात रंगवणारा साठीच्या आसपास वयाचा गंजीफ्रॉक आणि हाफपँट परिधान केलेला एक मनुष्य, आणि भिन्न जातीच्या दोन झकास कुत्र्यांच्या गळ्यातल्या पट्ट्यात अडकवलेल्या साखळ्या हातात धरून त्याच्याशी गप्पा मारत उभा असलेला एक बावीस-तेवीस वर्षीय युवक दिसला.
दोन दशकांपूर्वी एका भटक्या कुत्र्याकडून विनाकारण 'श्वानदंश' झाल्यावर पाच इंजेक्शन्सच्या रूपाने दोन-सव्वादोन हजारांचे 'चंदन' दंडावर लावून घ्यायला लागल्यापासून भटक्या कुत्र्यांविषयी माझ्या मनात दया, माया, कणव, सहानुभूती वगैरेचा लवलेशही उरला नसला तरी उत्तम प्रकारे निगा राखलेल्या 'जातिवंत' पाळीव कुत्र्यांविषयीचा स्नेहभाव मात्र किंचितही कमी झालेला नाही. त्यामुळे माझ्यासारख्या 'अंशतः' श्वानप्रेमी माणसाला त्या दोन कुत्र्यांपैकी एक 'रॉटविलर' असल्याचे ओळखता आले असले तरी दुसऱ्या, सर्वांगावर पांढऱ्या आणि काहीशा निळसरपणाकडे झुकणाऱ्या राखाडी रंगाचे, वीतभर लांबीचे केस असलेल्या गुबगुबीत, गोंडस आणि दिसायला अतिशय देखण्या कुत्र्याविषयी जाणून घेण्याची आणि त्याला कुरवाळण्याची इच्छा झाली तिथे, मतलबी माणसांपेक्षा मुके प्राणीच जास्त प्रिय असलेल्या भाच्याला तशी इच्छा झाली नसती तरच नवल होते!
त्या दोन इसमांचे लक्ष आमच्याकडे गेल्यावर हसून हाय-हॅलो-नमस्ते झाल्यावर वडिलांना इथल्या थंड, आल्हाददायक हवेत नको असलेला रूममधला ए.सी. आणि त्यांना टीव्ही बघण्याची अजिबात आवड नसल्याने तोही बंद करून, त्यांच्या आवडीचे ब्लॅक अँड व्हाईट 'पुराने नगमे' युट्युबवर बघण्या/ऐकण्यासाठी आणि 'बुढाऊ' लोकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर टाईमपास करण्यासाठी त्यांचा फोन वाय-फायला कनेक्ट करून दिल्यावर आम्ही खाली उतरून हॉटेलच्या मागच्या कंपाउंड वॉलजवळ जाऊन पलीकडल्या त्या दोन इसमांशी संवाद साधला.
प्राथमिक संभाषणातून 'वीरप्रताप' नावाचा तो मनुष्य दीड महिन्याने येऊ घातलेल्या 'दशैन' ह्या नेपाळमधील सर्वात मोठ्या सण /उत्सवाच्या तयारीसाठी आधीपासूनच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वाढवलेल्या फुलझाडांच्या रोपांचे त्यात पुन:रोपण करून घर आणि आवाराची शोभा वाढवण्यासाठी मातीच्या कुंड्या रंगवण्याचे काम करत असल्याचे आणि 'प्रॉमिस' नामक त्याच्या पुतण्याच्या दोन्ही 'जर्मन ब्रीड' कुत्र्यांपैकी रॉटविलरचे नाव 'कुरो' तर दुसऱ्या देखण्या 'इलो' जातीच्या कुत्र्याचे नाव 'अकामारू' असल्याचे समजले.
लोकं आपल्या पाळीव प्राणी/पक्षांची नावे काय वाट्टेल ती ठेवतात. कोणे एकेकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मांजरीचे नाव 'इंडिया' असल्याचे वाचल्यावर मी जर भविष्यात कधी एखादी कुत्री पाळली तर तिचे नाव 'अमेरिका' ठेवण्याचा निश्चय केला होता, म्हणजे तिला कोणी 'Bitch' म्हंटले कि आपोआप अमेरिकेला शिवी दिल्यासारखे होईल असा बालिश विचार त्यामागे होता 😀 पण इथे गोष्ट वेगळी होती!
मला त्या 'कुरो' आणि 'अकामारू' अशा कुत्र्यांच्या नावातून काहीही अर्थबोध झाला नसला तरी ज्याला व्हायचा त्याला म्हणजे भाच्याला तो झाला आणि त्या नावांच्या जपानी 'मांगा', 'नारूटो' आणि तत्सम 'कॉमिक्स/अॅनीमे'शी असलेल्या कनेक्शन बद्दल त्याने पृच्छा केल्यावर अत्यानंदित झालेल्या 'प्रॉमिस' आणि त्याच्यात 'त्या' विषयावरून अशी काही चर्चा सुरु झाली की त्यातून 'समान शीले व्यसनेषु सख्यम्' म्हणतात त्याप्रमाणे अल्पावधीतच त्या दोघांमध्ये जे मैत्र निर्माण झाले ते पाहिल्यावर "भांजा कुछ मामलों में तो मामाके 'नक़्श-ए-क़दम' पर चल रहा हैं" हे बघून समाधान वाटले!
काहीवेळ औपचारिक संभाषण झाल्यावर "असे लांबून कशाला बोलताय, उडी मारून या इकडे..." असे वीरप्रताप उद्गारल्यावर भाच्याने पडत्या फळाची आज्ञा मानत कुंपणाच्या भिंतीवरून पलीकडे उडी मारून कुरो आणि अकामारूशी खेळायला सुरवात देखील केली. तीन-साडेतीन फूट उंचीची ती भिंत एका ढांगेत ओलांडून पलीकडे जाणे सहजशक्य असले तरी मला मात्र तसे करणे प्रशस्त वाटेना, त्यामुळे दोन-अडीचशे मीटर्स अंतराचा वळसा पडला तरी हरकत नाही पण 'राजमार्गाने' तिथे येतो असे त्याला सांगितले. तसेही मला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर पाहण्याची इच्छा आणि आज हॉटेल बुकिंगसाठी अदा केलेली बयाणा रक्कम वगळता उर्वरित रकमेचा भरणा उद्या करायचा असल्याने नेपाळी चलन घेण्यासाठी मनी एक्स्चेंजमध्येही जायचे होतेच!
सहा-सव्वा सहाच्या सुमारास सूर्य मावळून संधीप्रकाश पडल्यावर रंगकाम थांबवणाऱ्या 'काकाशी' माझ्या कुंपणाच्या अलीकडून आणि भाच्याच्या 'पुतण्याशी' कुंपणाच्या पलीकडे गप्पा सुरूच होत्या. रस्त्याने तिथे कसे यायचे ह्याविषयीच्या सूचना मला देऊन ते तिघे घराच्या पुढच्या बाजूला निघून गेल्यावर मी रूमवर एक फेरी मारून वडिलांना रात्रीच्या जेवणासाठी काय हवे-नको त्याची विचारपूस करून वीरप्रतापच्या घरी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडलो.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी समोर, काठमांडू महानगरातील 'सिनामंगल' ह्या निवासी विभागातल्या आमच्या हॉटेलच्या परिसरात कित्येक लहान-मोठी हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, लॉजेस, होम स्टे'ज आणि उपहारगृहांच्या बरोबरीनेच, मुख्यत्वे एरपोर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारती, स्वतंत्र लहान-मोठे बंगले आणि बैठी घरेही भरपूर असल्याने ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानांचीही रेलचेल होती.
हॉटेलच्या गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळून शंभरेक मीटर्सवरच्या तिठ्ठ्यावर पुन्हा उजवीकडे वळल्या वळल्या दोन मोठी 'बफ' शॉप्स लागली. बरें तर बरें, रेड्याचे मांस विकणारी हि दुकाने एअरपोर्ट ते आमच्या हॉटेलच्या रस्त्यावर नव्हती, नाहीतर उद्या बहीण आणि बायको आल्यावर त्या रस्त्यावरून येता-जाता ह्या दुकानांत टांगलेलली ती भलीमोठी धुडे आणि हॉट चिप्स, केक, पेस्ट्रीज किंवा फरसाण विकणाऱ्यांच्या दुकानातल्या दर्शनी बाजू काचेची असणाऱ्या डिस्प्ले काउंटर सारख्या बहुखणी काउंटर्सच्या विविध खणांमध्ये ठेवलेले रेड्याच्या मांसाचे लहान-मोठे तुकडे आणि अन्य विक्रीयोग्य अवयव अशी दृष्ये त्यांच्या नजरेस पडली असती तर माझी काही खैर नव्हती, कदाचित हॉटेल बदलायची वेळही येऊ शकली असती 😀
एक 'संभाव्य' बाका प्रसंग आपसूक टळल्याच्या नुसत्या कल्पनेनेच मनोमन खूष होत पन्नासेक मीटर्सवर पुन्हा उजवीकडे वळून थोडे चालल्यावर 'एकता गेस्ट हाऊस' असे नाव लिहिलेल्या आणि उजवीकडे बाण दाखवणाऱ्या एका मोठ्या पाटीखाली कुरोची साखळी धरलेला प्रॉमिस आणि अकामारूची साखळी धरलेला भाचा त्यांच्यासाठी अनंतकाळ पुरेल अशा 'त्या' सामायिक आवडीच्या विषयावर चर्चा करत उभे असलेले पाहिल्यावर हे दोघे इथे काय करतायत? हा प्रश्न पडला होता पण त्यांच्याबरोबर आत गेल्यावर त्याचे उत्तर मिळाले.
एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या प्रॉमिसच्या परिवारातील (तो सोडून) नोकरीयोग्य वयाचे सर्व पुरुष 'सिव्हील एव्हीएशन ऍथॉरिटी ऑफ नेपाळ (CAAN)' चे आजी-माजी कर्मचारी आहेत. त्यापैकी वीरप्रताप हा त्याचा थोरला चुलता सेवानिवृत्त झाला असला तरी प्रॉमिसचे वडील, धाकटा चुलता आणि वीरप्रतापचे दोन्ही पुत्र ह्या सरकारी सेवेत कार्यरत आहेत. वीसेक वर्षांपूर्वी CAAN ने सिनामंगल विभागातल्या आपल्या मालकीच्या अतिरिक्त जमिनीवर प्लॉटिंग करून आपल्या कर्मचाऱ्यांना निवासी भूखंड उपलब्ध करून देण्याची जी योजना आणली होती त्या योजनेत वीरप्रताप आणि त्याच्या दोन्ही धाकट्या भावांनी सलग असे तीन भूखंड खरेदी केले होते.
इथून सातेक किलोमीटर अंतरावरील आपली जन्मभूमी असलेल्या जुन्या काठमांडू शहरातील त्यांच्या मूळ घरातून 'त्रिभुवन एअरपोर्ट' ह्या आपल्या कर्मभूमीजवळच्या नव्या घरात स्थलांतरित होताना ह्या हिंदू 'नेवार' कुटुंबाने आपली पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती जपली आणि तीन स्वतंत्र घरे न बांधता तीन प्लॉट्सवर मिळून डाव्याबाजूला एक चांगले मोठे घर आणि उजव्याबाजूला एक मजली गेस्ट हाऊस बांधून बाकीच्या जागेत छानपैकी बागबगीचा तयार केला आहे.
त्यांचे हे 'एकता गेस्ट हाऊस' पण जरा 'हटके' आहे! अन्य हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, लॉजेस, होम स्टे'ज प्रमाणे इथे चोवीस तास किंवा ठराविक 'चेक इन', 'चेक आउट'च्या वेळेनुसार किंवा अमुकेक रात्रींसाठी अशा हिशोबाने पर्यटक आणि अन्य कामासाठी काठमांडूला येणाऱ्या मंडळींना रूम्स किंवा डॉर्मेटरीतले बेड्स दिले जात नाहीत, मुळात हा त्यांचा ग्राहकवर्गच नाही.
मलेशिया आणि कतार, सौदी अरेबिया, यूएई, कुवेत अशा आखाती देशांत नोकरी करणाऱ्या नेपाळी मजूर/कामगार/कर्मचाऱ्यांची संख्या एकवीस लाखांपेक्षा जास्त, म्हणजे त्या देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे साडेसात टक्के इतकी मोठी आहे. त्याव्यतिरिक्त वर्षानुवर्षे भारतात रोजगारासाठी राहणाऱ्या नेपाळी नागरिकांचा आकडाही जवळपास तीस लाखांच्या घरात भरतो. तसेच शिक्षणासाठी दरवर्षी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड, जपान, भारत आणि युनायटेड किंगडम ह्या देशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही एक लाखापेक्षा जास्त आहे. त्यातले परदेशातून सुट्टीवर मायदेशी परतणारे आणि सुट्टी संपवून परदेशी जायला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लाईट घेण्यासाठी काठमांडूला आलेले मजूर/कामगार/कर्मचारी आणि विद्यार्थी असे काही तासांचे 'पाहुणे' हाच 'एकता गेस्ट हाऊस'चा खरा ग्राहकवर्ग!
परदेशातून मायदेशी परतताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या दमल्या-भागल्या प्रवाशांना दूर अंतरावरच्या आपल्या गावी जाण्यासाठी दुसऱ्या अंतर्देशीय विमानाची किंवा संध्याकाळी/रात्री सुटणाऱ्या बसची वेळ होईपर्यंतच्या आठ-दहा तासांच्या प्रतीक्षाकाळात तसेच रात्री-अपरात्रीच्या फ्लाईटसाठी नेपाळच्या कानाकोपऱ्यातून सकाळ/दुपार/संध्याकाळपासूनच बस किंवा अंतर्देशीय विमानप्रवास करून काठमांडूत पोचलेल्या प्रवाशांना विमानतळापासून अगदी जवळ काही तास आराम करण्यासाठी पहिल्या मजल्यावरील प्रत्येकीत आठ कॉट्स असलेल्या चार डॉर्मेटरींमधली एक कॉट ५०० नेपाळी रुपये आणि तळमजल्यावरच्या सिंगल बेडच्या वीस केबिन टाईप छोट्या स्वतंत्र रूम्स प्रत्येकी ७५० नेपाळी रुपये अशा अतिशय वाजवी भाड्यात जास्तीतजास्त बारा तासांसाठी दिल्या जातात. ह्या भाड्यात चहा आणि नेपाळी लोकांच्या रोजच्या आहारातील 'ट्रिनिटी' म्हणून ओळखले जाणाऱ्या 'डाळ-भात-भाजी' ह्या तीन मुख्य अन्नपदार्थांचा समावेश असलेले एकवेळचे अमर्याद शाकाहारी भोजनही अंतर्भूत असते आणि ७ सीटर 'इको' व्हॅनने एरपोर्टचे गेट ते गेस्ट हाऊस आणि उलट अशी २४ तास खाजगी पिकअप/ड्रॉप सेवाही माफक अतिरिक्त शुल्क आकारून पुरवली जाते.
विशेष म्हणजे १२ तासांच्या एका सायकलमध्ये ५२ पाहुणे हाताळण्याची क्षमता असणाऱ्या ह्या गेस्ट हाऊसमध्ये २४ तासात असे अल्पकालीन वास्तव्यासाठी येणारे सरासरी ८० ते ९० 'गेस्ट्स' रोज येत जात असतात. त्यांच्या भोजन आणि चहापाण्याची व्यवस्था कुटुंबातील पाच सदस्यीय महिला मंडळ सांभाळते आणि निवृत्त वीरप्रताप पूर्णवेळ तर बाकीची चार सरकारी नोकरदार पुरुष मंडळी आपल्या शिफ्ट ड्युटीच्या वेळापत्रकानुसार वेळेचे नियोजन करून गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापनात आपआपले योगदान देतात.
आपल्या राहत्या घराच्या आवारातच कुटुंबियांची मेहनत आणि एक ड्रायव्हर आणि तीन हरकामे गडी अशा केवळ चार पगारी निवासी कर्मचाऱ्यांच्या बळावर सर्व खर्च वगळून माझ्या व्यावहारिक आकलनानुसार महिन्याकाठी कमीत कमी साडेसात ते आठ लाख नेपाळी रुपये म्हणजे जवळपास पाच लाख भारतीय रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारे त्यांचे हे 'फॅमिली बिझनेस मॉडेल' मला खूप आवडले.
असो... प्रॉमिस आणि भाच्याबरोबर गेटमधून आत शिरलो तेव्हा उजवीकडे असलेल्या एकता गेस्ट हाऊसच्या (खरंतर ह्याला 'एकटा' गेस्ट हाऊस म्हणणे जास्त योग्य ठरेल 😀) पहिल्या मजल्याच्या स्लॅबला लागून पुढ्यात उभारलेल्या लांब-रुंद पत्र्याच्या शेड मध्ये इमारतीच्या मधोमध असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला रिसेप्शन काउंटरवर आता पूर्ण कपड्यांत उभे असलेले वीरप्रताप 'साहेब' रजिस्टर मधल्या नोंदी पाहून कामगारांना पाहुण्यांच्या रात्रीच्या जेवणाविषयी काहीतरी सूचना देत उभे होते तर डाव्या बाजूला पाहुण्यांच्या जेवणखाण आणि चहापाण्याची व्यवस्था म्हणून तीन लांबलचक डायनिंग टेबल्स एकमेकांना जोडून त्यांच्या भोवती मांडलेल्या वीस-पंचवीस प्लॅस्टिकच्या खुर्च्यांपैकी दहा-बारा खुर्च्यांवर बसून इथे उतरलेली काही नेपाळी पाहुणे मंडळी रूफ माउंटेड स्टँडवर लावलेल्या टीव्हीवर आशिया कप स्पर्धेतला भारत विरुद्ध पाकिस्तानचा पावसामुळे रखडलेला सामना बघत आणि त्यावर तावातावाने चर्चा करत बसली होती.
काउंटरजवळ उभ्या उभ्या वीरप्रताप बरोबर आणखीन थोड्या औपचारिक गप्पा झाल्यावर त्याच्याबरोबर गेस्ट हाऊसचा तळ आणि पहिला मजला पाहून पुन्हा खाली आल्यावर आमचे चहा-पाणी चालू असताना कुत्रे बांधायला शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेलेली दोन्ही पोरं तिथे आली ती आज रात्री काठमांडूतली 'मोस्ट हॅपनिंग प्लेस' असलेल्या 'थामेल' विभागात जाऊन 'चिल' मारण्याचा प्लॅन घेऊनच! पोरांचा प्लॅन मला अर्थातच आवडला असला तरी आज वडिलांना हॉटेलवर मध्यरात्रीपर्यंत एकटे सोडून जाणे योग्य वाटत नसल्याचे सांगून "आज इथेच जवळपास थोडाफार टाईमपास करू आणि उद्या बाकीची मंडळी त्यांच्या सोबतीला आल्यावर हवेतर रात्रभर थामेलमध्ये काय मारायचे तेवढे चिल मारू" असे सांगून त्यांची समजूत काढली आणि साडेसातच्या सुमारास वीरप्रतापचा निरोप घेऊन आम्ही तिघे आसपासचा परिसर फिरायला म्हणून तिथून बाहेर पडलो...
मगाशी इथे येताना आलो होतो त्याच मार्गाने परत जात रिंग रोडवर पोचलो. तिथे असलेल्या तीन-चार मनी एक्स्चेंजपैकी एकात भारतीय चलनाच्या बदल्यात नेपाळी चलन घेतले, ह्या ठिकाणी जयनगर पेक्षा १० पैसे कमी भाव मिळाला. चलनाचे काम झाल्यावर रहदारीने गजबजलेल्या रिंग रोडवर लांबपर्यंत एक फेरी मारत असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईहून ११:२५ च्या फ्लाईटने येणारी बाकीची मंडळी दुपारी २:२० ला काठमांडूत लँड होणार होती त्यामुळे दुपारी त्यांना आणायला एरपोर्टवर जाईपर्यंत जो मुबलक वेळ हाताशी होता त्या रिकाम्या वेळात जवळपासचे काही पाहता येईल का ह्या विषयावर प्रॉमिसशी झालेल्या चर्चेअंती सिनामंगल परिसरातच, आमच्या हॉटेलपासून उण्यापुऱ्या एखाद किमी अंतरावर असलेले 'एव्हिएशन म्युझिअम' पाहण्याचा कार्यक्रम ठरला.
साडेआठच्या सुमारास आमच्या हॉटेलच्या थोडे अलीकडे असलेल्या एका सरदारजीच्या, रुंदीला कमी पण लांबीला जास्त अशा गाळ्यात रेल्वेच्या बोगी सारखी कल्पक अंतर्गत रचना केलेल्या आणि सत्तर-ऐंशी प्रकारचे पराठे मिळणाऱ्या 'पराठा एक्सप्रेस' नामक 'डाइन इन अँड टेक अवे' उपाहारगृहात शिरलो. आधी वडिलांना चावता येईल ह्याची खात्री करून घेतल्यावर त्यांच्यासाठी 'आलू-चीज-पनीर पराठ्याची' टेक-अवे ऑर्डर देऊन तो हातात पडेपर्यंत आम्ही तिघे कोकाकोला रिचवत बसलो. पंधरा-वीस मिनिटांत पार्सल मिळाल्यावर पोरं ते हॉटेलवर वडिलांपर्यंत पोचवून येतात-न-येतात तोच आमच्यासाठी ऑर्डर केलेले 'मिक्स व्हेज पनीर पराठा', 'आलू-गोबी चीज पराठा' आणि 'मुली-गोबी पनीर पराठा' असे तीन पराठे, मस्त घट्ट मलईदार दही, टोमॅटो केचप, एक थोडी कमी तिखट अशी आंबट-गोड लाल चटणी आणि एक भरपूर मिरच्या, पुदिना आणि आलं-लसूण वापरून बनवलेल्या झणझणीत तिखट हिरव्या चटणीच्या साथीने टेबलवर सर्व्ह झाले.
खरंतर प्लेन, आलू, मुली, गोबी, मेथी, प्याज, मश्रुम, चीज, पनीर, एग आणि चिकन अशा दहा-बारा पराठ्याच्या मूळ प्रकारांचे, त्यातल्या मुख्य घटक पदार्थांचे एकमेकांशी कॉम्बिनेशन करून पुन्हा त्याला गार्लिक, शेजवन आणि चॉकलेट अशा फ्लेवर्सची जोड दिल्याने मेनूकार्डवर पराठ्याच्या प्रकारांची संख्या सत्तर ते ऐशींच्या घरात भरत असल्याने त्यांची निवड करण्यास थोडा वेळ लागला असला तरी मागवलेले तिन्ही पराठे चवीला अप्रतिम होते. प्रॉमिसला घरी जाऊन जेवायचे असल्याने त्याने केवळ कंपनी द्यायला म्हणून एखाद दोन तुकडे खाल्ल्याने ह्या ऑर्डरमध्येच आमचे दोघांचे व्यवस्थित पोट भरले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे आवरल्यावर रिंग रोडवरून एव्हिएशन म्युझिअमला जाण्यापेक्षा मागच्या बाजूने गल्ली बोळांतून गेल्यास ते अधिक जवळ पडत असल्याने आधी त्याच्या घरी जाऊन मग तिथून म्युझिअम पाहायला जायचे असे ठरल्यावर साडेनऊच्या सुमारास आमचा निरोप घेऊन प्रॉमिस आपल्या घरी निघून गेला.
------
आदल्या रात्री थोडे लवकर झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी जागही तशी लवकरच आली होती. खाली जाऊन हॉटेलच्याच उपहारगृहात आमचा तिघांचा चहा-नाश्ता-चहा झाल्यावर पुन्हा रूमवर येऊन आंघोळी-पांघोळी उरकल्यावर बाल्कनीतून प्रॉमिसही तयार असल्याचा त्याचा संदेश मिळाल्यावर पुन्हा खाली उतरलो आणि म्युझिअम पाहून थेट एरपोर्टवर जाऊन बाकीच्या मंडळींना घेऊन हॉटेलवर परतायला आम्हाला तीन-सव्वातीन वाजून जाणार असल्याने कुठलीतरी पोथी वाचत बसलेल्या वडिलांसाठी साडे बारा वाजता रूमवर जेवण पाठवून देण्याची सूचना रिसेप्शन काउंटरवर देऊन पावणे दहाच्या सुमारास आम्ही काल रात्री ठरल्या प्रमाणे प्रॉमिसच्या घरी जायला निघालो.
गेस्ट हाउसवर पोचलो तेव्हा प्ले-ग्रुप, नर्सरी ज्या कशात असतील त्याला आज रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने वीरप्रतापच्या थोरल्या मुलाचा एक आणि धाकट्या मुलाचा एक असे दोघांच्या वयात काही महिन्यांचाच फरक असलेले 'अॅबी' आणि 'करण' नावाचे त्याचे दोन भयंकर मस्तीखोर चिमुरडे नातू गेस्ट हाऊसच्या आवारात दंगामस्ती करण्यावरून सकाळी सकाळीच त्याचा चांगला ओरडा आणि धपाटे खाल्याने शेडच्या कंपाउंडकडील बाजूच्या कोपऱ्यात तिथल्या कर्मचाऱ्याला झोपण्यासाठी असलेल्या बेड जवळच्या टेबलवर रडवेल्या चेहऱ्याने पत्त्यांचा डाव मांडून गपगुमान आपला जीव रमवत होते.
वीरप्रतापच्या पुतण्याचे नाव 'प्रॉमिस' आणि नातवाचे नाव 'अॅबी' असल्याचे ऐकल्यावर तिबेटी वंशाच्या बुद्धिस्ट नेपाळी लोकांमध्ये मुलांची इंग्लिश नावे ठेवण्याची फॅशन तशी जुनी आहे पण आता हे फॅड नेपाळी हिंदूंमध्येही आले आहे कि काय अशी शंका तेव्हा आली होती, पण नंतर गप्पांच्या ओघात प्रॉमिसकडे त्याबद्दलची विचारणा केली तेव्हा त्यांच्या ह्या नावांमागची कहाणी समजल्यावर खुलासा झाला.
झाले असे होते की प्रॉमिसचे आपण ज्याला पाळण्यातले नाव म्हणतो तसे राशीवरून ठेवलेले मूळ नाव 'प्रमेष' होते पण त्याची आजी म्हणजे वीरप्रतापची आई तिच्या नेपाळी-नेवारी अॅक्सेंटमध्ये प्रमेषचा उच्चार 'प्रोमेस' असा करायची. घरच्या सगळ्या मंडळींच्या कानावर सतत प्रोमेस... प्रोमेस... हा नामोच्चार पडत असल्याने अल्पावधीतच त्याचा आणखीन अपभ्रंश होऊन त्यांच्याकडून ते प्रॉमिस असे उच्चारले जाऊ लागले आणि त्यातून कागदोपत्रीही त्याच नावाची नोंद झाल्याने ह्या मूळच्या 'प्रमेष' ला 'प्रॉमिस' हे नाव अधिकृतरीत्या कायमस्वरूपी चिकटले 😀
पण त्याच्या मानाने 'अॅबी' जास्त नशीबवान म्हणायचा. त्याच्या जन्माच्या वेळीही ती म्हातारी हयात होती आणि त्याच्या 'अभय' ह्या नावाचा उच्चार ती 'अभे/अबे' असा करायची त्याचे घरच्या मंडळींनी अॅबी करून टाकले, पण ते केवळ घरात हाक मारायचे नाव म्हणूनच राहिले, कागदोपत्री ते अभय असेच आहे.
असो... गेस्ट हाऊसवर फार वेळ न घालवता त्यावेळी तिथे उपस्थित असलेला वीरप्रताप आणि घरात असलेले प्रॉमिसचे आई वडील आणि लहान बहीण व वाहिन्या आणि दोन काकूंना हाय-हॅलो-नमस्ते करून चहा-पाण्यासाठी न थांबता आम्ही तिघे एव्हिएशन म्युझिअमला जायला निघालो आणि काहीशी रस्त्यावरून आणि बरीचशी अरुंद गल्ली बोळांतून पदयात्रा करत आठ-दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो.
नेपाळी युवा पिढीत विमानचालनाबद्दल स्वारस्य निर्माण करणे आणि जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या हवाई क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे असे मुख्य उद्दिष्ट ठेऊन 'वेद उप्रेती ट्रस्ट' आणि 'सिव्हील एव्हीएशन ऍथॉरिटी ऑफ नेपाळ (CAAN)' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०१७ मध्ये निर्माण झालेले हे 'एव्हिएशन म्युझियम' पाहण्यासाठी शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्रधारक विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी १५०/-, नेपाळच्या आणि सार्क देशांच्या नागरिकांसाठी ३००/-, अन्य परदेशी नागरिकांसाठी ५००/- नेपाळी रुपये प्रवेश शुल्क आणि CAAN चे कर्मचारी, एअरलाइन क्रू (पायलट आणि फ्लाइट अटेंडंट) ह्यांना प्रवेश निःशुल्क होता.
पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात असताना वैचारिक अपरिपक्वतेतून घडलेल्या एका गंभीर प्रमादामुळे समाजात 'बॅड बॉय' अशी प्रतिमा निर्माण झालेला आणि CAAN ची चाकरी करण्याची खानदानी परंपरा असलेल्या कुटुंबातला 'प्रॉमिस' आमच्याबरोबर असल्याने आम्हालाही ह्या म्युझियममध्ये निःशुल्क प्रवेश मिळाला. गेटवरच्या सिक्युरिटी गार्डपासून तिकीट खिडकीतले कारकून, संग्रहालयाचे कर्मचारी आणि व्यवस्थापकापर्यंत सर्वच जण एकतर त्याच्या आजूबाजूला राहणारे किंवा फॅमिली फ्रेंड्स असल्याने व्यक्तिगत परिचयाचे होते.
साडे दहाच्या सुमारास आत जाऊन पाहायला सुरुवात केलेल्या ह्या संग्रहालयाच्या उत्पत्ती मागे एका विमान अपघाताची पार्श्वभूमी असलेली कहाणीही रोचक आहे...
३ मार्च २०१५ रोजी इस्तंबूलहुन काठमांडूला येणारे टर्किश एरलाईन्सचे Airbus A330-300 विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यात आले असताना अचानक विमानतळ दाट धुक्याने झाकला गेल्याने दृष्यमानता शून्यवत होऊन वैमानिकांना धावपट्टी दिसेनाशी झाल्याने टचडाऊनच्या वेळी डाव्या बाजूचा 'मेन गिअर' धावपट्टीच्या बाहेर जाऊन टायर्स फुटल्याने विमान सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत धावपट्टीवर घसपटत गेले.
ह्या अपघातग्रस्त विमानात त्यावेळी असलेले २२३ प्रवासी, १ अर्भक आणि ११ क्रू मेम्बर्सना स्लाईड्स वरून बाहेर काढतेवेळी केवळ एका प्रवाशाला किरकोळ दुखापत होण्यावर निभावले. सुदैवाने ह्या क्रॅश लॅण्डिंगमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण घसरत जाताना विमानाचा 'नोज गिअर' निखळून पडल्याने त्याचे पंख, कॉकपीट, दोन्ही इंजिन्स आणि 'फ्युजलाज' (विमानाचा मुख्य सांगाडा) चे मात्र भरपूर नुकसान झाले आणि धावपट्टीही क्षतीग्रस्त झाल्याने आजघडीला काठमांडू, पोखरा आणि लुम्बिनी असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ असले तरी त्यावेळी नेपाळमधले एकमेव असलेले हे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तब्बल चार दिवस बंद राहिल्याने अपघाताच्या दिवशी जगभरातले सुमारे चाळीस हजार प्रवासी नेपाळमध्ये अडकून पडले होते आणि तेवढ्याच संख्येने पुढच्या दिवसाच्या विमान तिकिटांचे रद्दीकरण झाले होते.
दूरपर्यंत वेगात घसपटत गेलेले हे अपघातग्रस्त विमान अशा ठिकाणी जाऊन थांबले होते कि शेजारची दुसरी धावपट्टी वापरणेही अशक्य झाले होते. अवघड ठिकाणी फसलेले हे विमान तिथून हटवून धावपट्ट्या मोकळ्या करण्याचे काम नेपाळच्या आवाक्याबाहेरचे असल्याने ह्या शेजाऱ्याच्या मदतीसाठी ५ मार्च २०१५ रोजी भारताने आपले कच्च्या किंवा खराब धावपट्ट्यांवरही टेकऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता असलेले 'हर्क्युलस C-130' हे विमान 'एअरक्राफ्ट रिमूव्हल किट' सहित पाठवले होते.
पुढे अपघाताची चौकशी आणि विमानाचे सखोल तांत्रिक परीक्षण/तपासणी वगैरे औपचारिकता पूर्ण होण्यात अनेक महिने गेले. वर्षभराहून अधिक काळ त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडून राहिलेले आणि केवळ आठच महिने प्रत्यक्ष सेवेत असल्याने तसे पाहिले तर नवीन म्हणता येईल असे हे विमान दुरुस्त करून पून्हा सेवेत न घेता ते थेट मोडीत काढण्याचा निर्णय टर्किश एअरलाईन्सने घेतला होता.
माजी नेपाळी वैमानिक, विमानचालन प्रशिक्षक आणि परीक्षक, एरियल फोटोग्राफर, 'Everest: From the Air' ह्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक आणि समाजसेवक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या 'वेद उप्रेती' (Bed Upreti) ह्यांनी नेपाळचे 'नागरी उड्डयन प्राधिकरण (CAAN)' आणि 'टर्किश एअरलाईन्स' कडे सदर विमान भंगारात न काढता त्याचे आपल्या 'वेद उप्रेती ट्रस्ट' ह्या कर्करोगी रुग्णांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या सेवाभावी ट्रस्ट मार्फत 'विमानचालन संग्रहालयात' रूपांतर करण्याची ईच्छा व्यक्त केली होती.
वेद उप्रेती ह्यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून २०१४ साली पश्चिम नेपाळ मधल्या धनगढी येथे 'कॉस्मिक एअर' ह्या दिवाळखोरीत गेलेल्या काठमांडूस्थित अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपनीच्या ताफ्यातील मोडीत काढलेले 'फॉकर १०० जेट' (Fokker 100 jet) हे विमान भंगारात विकत घेऊन त्यात नेपाळमधले पहिले 'एअरक्राफ्ट म्युझिअम' सुरु केले होते (ते गेल्यावर्षी पूर्वीची जागा कमी पडत असल्याने महेंद्रनगर (भीमदत्त नगर) येथे मोठ्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे). ह्या एअरक्राफ्ट म्युझिअम पासून मिळणारे उत्पन्न कर्करोग्यांच्या मदतीसाठी वापरले जाते.
वेद उप्रेतींचा हा पूर्वानुभव विचारात घेऊन CAAN ने सिनामंगल भागातल्या आपल्या मालकीच्या जमिनीपैकी थोडी जमीन ह्या एव्हिएशन म्युझियमसाठी उपलब्ध करून देऊन आणि टर्किश एअरलाईन्सने आपले विमान ह्या चांगल्या कार्यासाठी अत्यल्प किमतीत देऊ करून त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि त्यातून हे संग्रहालय जन्माला आले.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या हॅंगरमध्ये टर्किश अभियंत्यांच्या टीमने दीड महिना राबून ह्या विमानाला १० तुकड्यांमध्ये विभाजित केल्यावर ट्रक्सवर हे तुकडे लादून संग्रहालयाच्या जागेवर आणून ते पुन्हा जोडण्यास त्यांना आणखीन दोन महिने लागले. विमानाच्या नुकसानग्रस्त भागांची डागडुजी करून त्याचे एव्हिएशन म्युझियममध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रस्टला आलेल्या एकूण सात कोटी नेपाळी रुपयांच्या खर्चापैकी चार कोटी तीस लाख रुपये कॅप्टन वेद उप्रेती ह्यांनी आपल्या वैयक्तिक कष्टार्जित कमाईतून दिले आणि दोन कोटी तीस लाख रुपये एव्हरेस्ट बँकेकडून कर्जाऊ घेण्यात आले होते.
ह्या संग्रहालयातले प्रमुख आकर्षण असलेल्या ६३.६६ मीटर्स म्हणजे सुमारे २०९ फूट लांबीच्या भल्यामोठ्या आणि खऱ्याखुऱ्या विमानाचे कॉकपीट शैक्षणिक दृष्टिकोनातून मूळ स्वरूपात ठेवण्यात आले आहे. बिझनेस क्लास मध्ये राईट बंधूंच्या यशस्वीरीत्या आकाशात भरारी मारलेल्या पहिल्या विमानाचे मॉडेल ठेवले आहे. इकॉनॉमी क्लास मध्ये तीन विभाग करून त्यातल्या एकात ५०-६० जण बसू शकतील असे विमानोड्डाणाचा आजपर्यंतचा इतिहास दर्शवणारी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणारे छोटे थिएटर, दुसऱ्यात जगभरातल्या प्रवासी एअरलाईन्स आणि हवाईदलांच्या वेगवेगळ्या विमानांची १५० पेक्षा जास्त मिनिएचर मॉडेल्स प्रदर्शित केली आहेत तर तिसऱ्या विभागात वेद उप्रेती ह्यांनी टिपलेल्या हवाई चित्रांचे प्रदर्शन करणारी 'एरिअल फोटो गॅलरी' आणि शेपटीकडच्या भागात एक महागडे उपहार गृह आहे.
'विमानचालन संग्रहालय' असल्याने इथले सर्व स्त्री-पुरुष गाईड्स आणि अन्य कर्मचारी 'फ्लाईट अटेंडंट'च्या गणववेषात वावरतात. ५० रुपये भाड्याने मिळणारा कॅप्टनचा गणवेष (शर्ट आणि टोपी) घालून कॉकपिटमध्ये हेडफोन्स वगैरे लावून फोटोसेशन करून अनेकजण आपले लहानपणी बघितलेले 'पायलट' होण्याचे स्वप्न फोटोरूपाने का होईना पण पूर्ण करून घेताना दिसतात.
सेवेतून बाद झालेले एक खरेखुरे हेलिकॉप्टर हे इथले आणखीन एक आकर्षण आहे आणि मोठ्या बागेचे स्वरूप असलेल्या ह्या संग्रहालयात बाळगोपाळांना आवडतील अशा घसरगुंड्या, झोपाळे आणि काही वैज्ञानिक खेळणी अशा अन्य गोष्टीही इथे आहेत.
एव्हिएशन म्युझियमचे काही फोटोज ▼
कॉकपीट ▼
डॉक्युमेंटरी थिएटर ▼
जगभरातल्या प्रवासी एअरलाईन्स आणि हवाईदलांच्या वेगवेगळ्या विमानांची मिनिएचर मॉडेल्स ▼
विमानोड्डाणाचा इतिहास दर्शवणारी डॉक्युमेंटरी छानच आहे, एरिअल फोटो गॅलरीतले काही फोटोज अप्रतिम आहेत आणि जवळपास सगळ्याच विमानांची मिनिएचर मॉडेल्स प्रेक्षणीय असली तरी एकंदरीत पाहता लहान मुले आणि विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक दृष्टिकोनातून निर्माण केलेले हे संग्रहालय लहान मुलांना खूप आवडेल ह्यात शंकाच नाही पण मोठ्या माणसांना एक 'संग्रहालय' म्हणून त्याकडे पाहताना ते कितपत आवडेल ह्याविषयी मात्र थोडा साशंक आहे. बाकी 'संग्रहालयाला' मोठ्यांकडून दाद मिळो की न मिळो, पण 'एअरहोस्टेस'च्या वेशभूषेत वावरणाऱ्या इथल्या एक से बढकर एक अशा सुंदर सुंदर नेपाळी गाईड मुली पाहिल्यावर ह्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करणाऱ्याच्या सौंदर्यदृष्टीला मात्र भरभरून दाद मिळेल एवढे नक्की 😀
असो... दीड वाजत आला होता आणि भुकेची जाणीवही व्हायला लागली होती. अडीच-पावणे तीन वाजेपर्यंत एअरपोर्टवर पोचायचे असल्याने आता इथेच काहीतरी खाऊन मगच निघू अशा विचाराने विमानाच्या शेपटीतल्या उपहारगृहाकडे आम्ही मोर्चा वळवला.
आकाशात उडणाऱ्या विमानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतींशी स्पर्धा करतील अशाच आता कधीही आकाशी झेप न घेऊ शकणाऱ्या ह्या जमिनीवरील विमानातल्या उपहारगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती असल्या तरी एका चांगल्या उद्देशाने वेद उप्रेतींनी सुरु केलेल्या ह्या संग्रहालयात विनामूल्य प्रवेश मिळाल्याने त्या उद्देशाला हरताळ फासण्यापेक्षा ह्या ना त्या रूपाने आपल्याकडूनही त्याला काहीतरी हातभार लागावा असा विचार मनात आल्यावर त्यात काहीच गैर वाटले नाही.
ग्रिल्ड सँडविचेस, व्हेज पफ्स आणि कोल्ड कॉफी असे पदार्थ ग्रहण करून पोटोबा शांत झाल्यावर साडेतीन तास मजेत व्यतीत करून काहीतरी चांगले आणि 'नेत्रसुखद' पहायला मिळाल्याचे समाधान घेऊन दोनच्या आसपास संग्रहालयातून बाहेर पडून रिंग रोडवर येऊन एअरपोर्टच्या दिशेने जाणारी खाजगी प्रवासी वाहतूकदाराची बस पकडून जेमतेम पाच-सहा मिनिटांत आम्ही एअरपोर्टच्या गेटवर पोचलो. बसचे छापील तिकीट बिकिट असे काही लाड नाहीत, कुठे उतरायचे ते सांगितल्यावर तो सांगेल तेवढी भाड्याची रक्कम दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या कंडक्टरला द्यायची आणि आपल्या स्टॉपचा पुकारा झाला कि उतरायचे. किमान प्रवास भाडे २० रुपये मात्र.
गेटवरून 'इंटरनॅशनल अरायव्हल' कडे जाणारी शटल बस पकडून आम्ही तिथे पोचलो आणि निर्धारित वेळेवर लँड झालेली आमची मंडळी बाहेर येण्याची वाट बघत थांबलो...
टीप: टर्किश एरलाईन्सच्या Airbus A330-300 ह्या अपघातग्रस्त विमानाचे फोटोज जालावरून साभार.
क्रमशः
बौद्धनाथ
नेपाळला भेट देणाऱ्यांसाठी काठमांडू हे एक कोडं आहे. बऱ्याच जणांना ह्याची जाणीव नसते. त्यामुळे काठमांडू म्हणजे बकालपणा, फालतूपणा अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. हे कोडं सोडवायचं असेल तर वेळ द्यावा लागतो. जाण्याआधी योग्य तयारी करून जावं लागतं. तिथे पोहोचल्या नंतर दिसेल ते बघून लगेच मत न बनवता संयम ठेवावा लागतो. असं प्रयत्न करून हे कोडं सोडवता येतं. माझ्या पहिल्या नेपाळ सफरीत मलाही हे कोडं सोडवता आलं नव्हतं. ह्यावेळी मला काठमांडू चांगल्या प्रकारे समजलं, बघता आलं.
ह्यावेळी आम्ही काठमांडूला पोहोचल्यावर संध्याकाळी बौद्धनाथ ह्या ठिकाणी गेलो. तिथे जायच्या आधी दुसऱ्या दिवशीच्या पोखरा जाण्याची तिकिटं काढली होती. त्यामुळे मनामध्ये कुठलाही साशंक भाव न ठेवता तिथे आम्ही तीन तास होतो. आमच्या बाहेरून तीन फेऱ्या आणि आतून एक फेरी झाली. तिथेच जेऊन मग हॉटेल वर परतलो.
![]() |
| बौद्धनाथ |
अनेक शतकांपासून हि जागा तिबेटी बौद्ध तसेच स्थानिक नेपाळी जनतेचे तीर्थक्षेत्र आहे. तिबेट आणि नेपाळ मधल्या जुन्या काळच्या व्यापार मार्गावरच्या ह्या जागी प्रवासी आणि व्यापारी थांबत असत.
| बौद्धनाथ |
![]() |
| सरस्वती |
२०१५ मधे झालेल्या भूकंपात ह्या जागेचे बरेच नुकसान झाले होते. त्यानंतर इथला काही भाग नव्याने बांधण्यात आला.
| एका छोट्याची निरागसता |
काठमांडूला कधी गेलात तर बौद्धनाथ ह्या ठिकाणी संध्याकाळी तीन तास वेळ काढून जा. इथे जेवण्यासाठी अनेक जागा आहेत. जेऊन हॉटेल वर परत जा. दुपारच्या अर्ध्या तासात धावती भेट दिली तर बौद्धनाथ कसा समजेल. आणि हो, जरी आपण इथे एक पर्यटन स्थळ बघायला म्हणून गेलो असलो तरी हे एक धार्मिक स्थळ आहे. इथे अर्ध्या चड्डीवर जाऊ नये. प्रत्येक ठिकाणी चप्पल बूट घालून आत शिरू नये. मुर्त्या, शिलालेख, घंट्या वगैरे तुटलेल्या जीर्ण अवस्थेत असतील तरी त्यांचा आदर ठेवावा. त्यांच्यावर बसून फोटो काढू नयेत. जरी तुम्ही आधुनिक झाल्याने तुमचा धर्म भ्रष्ट झाला असला तरी इतर सगळ्यांचा झालेला नाही. स्तूपाभोवती फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने (clockwise) चालावे. आम्ही म्हणजे कोण, असे उगाच उलट्या दिशेने चालू नये. Remember at all times that while you are seeing the world, the world will see you. हे विसरू नये. तसेही उद्धट आणि बेदरकार म्हणून भारतीय पर्यटक जगभर प्रसिद्ध आहेतच.


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.