https://maitri2012.wordpress.com/page/2/
एक अनुभव ( चित्रकथा )
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया समोरच्या १९०३ साली बांधलेल्या भव्य ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये आम्ही प्रवेश केला. स्वागत करायला सुंदर मुले मुली हजर होत्या. सर्वांनी आमच्या गळ्यात तुळशीमाळा घातल्या, एकीच्या हाती तबक त्यात निरांजन होते. त्याने आम्हाला ओवाळले. कपाळावर हळद कुंकू लावले. हातात गुलाबाचे फुल आणि तांब्याचा भोकाचा पैसा दिला. अस्सल भारतीय पद्धतीने केलेले स्वागत अनुभवले. खरे म्हणजे चाट पडलो. हॉटेलात राहायला येणाऱ्या सर्व देशी परदेशी पाहुण्यांचे असे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते, असे नंतर कळले.
आणि हॉटेलमधील खोलीच्या किल्ल्या दिल्या लिफ्टनं सतराव्या मजल्यावर पोचलो. खोलीत जाऊन खिडकीपाशी उभे राहिलो तर समोर विशाल समुद्र पाहिला. पुन्हा अनेक वर्षांनी डोळे दिपले. खाली नजर केली तर गेटवे ऑफ इंडियाच्या छपराचे घुमट दिसत होते. अनेक वर्षांपूर्वी गोपाळ बोधे यांनी आकाशातून काढलेल्या गेटवेचे वृत्तपत्रात पाहिलेले छायाचित्र डोळ्यासमोर आले. समुद्र पाहून आनंद होण्यासाठी वयाचे बंधन नसते.

खूप उंचावरून खाली पाहायला नेहमीच मजा येते. मूळ दगडी इमारतीशेजारी बांधलेल्या उंच इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरून ताज महाल हॉटेल वेगळे दिसते. समोर अथांग सागर दिसतो

जवळ जवळ दोनशे फूट उंची वरून गेटवे ऑफ इंडिया छोट्याश्या मॉडेलसारखा दिसतो.
वरून
पाहत असताना अनेक गट एकमेकांपासून थोडे दूर दूर उभे असलेले दिसतात. पण
सगळ्या पाहुण्यांचा हेतू एकच असतो. विशाल गेटवे ऑफ इंडियाकडे आणि पूर्वी न
पाहिलेल्या समुद्राकडे बघत राहायचे .
ज्या गगनचुंबी हॉटेलात आम्ही राहिलो त्यात नाविन्यपूर्ण काहीच नसले तरी उंचावरून समुद्र पाहत राहणे हा विरंगुळा होता. त्याचा भरपूर लाभ घेऊन सकाळच्या न्याहारीची वेळ झाल्याने तळमजल्यावर आलो तिथल्या हॉलमध्ये अनेक पदार्थ टेबलांवर मांडून ठेवले होते. न्याहारी करण्यात खूप वेळ गेला. त्यानंतर आवडीचा कार्यक्रम होता. तो म्हणजे हेरिटेज वास्तूत मनसोक्त फिरणे. एकामागून एक कक्ष पाहत गेलो. एकशेवीस वर्षे जुनी दगडी इमारत डोळे दिपवते. कारण दैनंदिन जीवनात असे जिने, गालिचे, हंड्या झुंबरे किंवा कोरीव काम कधी पाहायला मिळत नाही. कॉरिडॉर सुंदर कमानींनी सजवला होता. शंभर वर्षे जुने पंखे, शिसवींच्या खुर्च्या, छोटे झोपाळे, नक्षीदार दरवाजे, फुलदाण्या, कुंड्या आणि त्यात लावलेली फुलझाडे, सगळेच वैशिठ्यपूर्ण होते.

Grand Stair
सव्वाशे
वर्षांपूर्वी या इमारतीतले जिने लखलखत्या दागिन्यांसारखे आहेत .
पाय-यांच्या विहिरीत (बारवीत) खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या असतात तश्या
पायऱ्या कॅंटीलिव्हर करून त्या वर वर नेल्या आहेत . ते काम अप्रतिम आहे

Gothic Arch B
बाराव्या
शतकात फ्रान्समध्ये जन्माला आलेली गॉथिक शैली युरोपभर पसरली आणि तिचा
प्रभाव १४०० पर्यंत राहिला. परंतु इंग्रजांचे राज्य असताना मुंबईत गॉथिक
शैलीचे पुनर्जीवन झाले होते. तिला मुंबई गॉथिक असे नाव मिळाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका अशी उदाहरणे
आहेत. सीताराम खंडेराव वैद्य हे याच शैलीत काम करत होते त्यामुळे त्यांच्या
रचनेत गॉथिक कमानीचा वापर होत होता. वरील चित्रात ते पहायला मिळेल.
ताजमहाल हॉटेल १९०३ साली बांधले तर गेटवे ऑफ इंडिया १९२४ साली. एकवीस वर्षे लोक समुद्राकडे पाठ करून हॉटेलकडे पहात होते; ते गेटवे उभा झाल्यावर सगळे हॉटेलकडे पाठ करून गेटवे च्या कमानी मधून समुद्र पाहायला लागले.
पण कोणत्याही ऋतूत विशेषतः धो धो पाऊस पडत असताना आणि प्रचंड लाटा उसळत असताना वातानुकूलित खोलीत बसून समुद्राकडे पाहता यावे अश्या ताजमहाल हॉटेलची रचना रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य आणि मिर्झा यांनी केली आहे. लहान मोठ्या सगळ्यांना उसळत्या लाटांचे पाणी अंगावर घ्यावेसे वाटते. ती मजा खोलीत बसून येणार नाही. खंडेराव वैद्य हे स्टीव्हन्सचे सहाय्यक होते. त्या स्टीव्हन्सनं मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, चर्चगेटजवळचे काळ्या दगडातील पश्चिम रेल्वेचे कार्यालय, सेलर्स होम तसेच बडोद्याच्या प्रतापविलास राजवाडा (जिथे आता रेल्वेची प्रशिक्षण देणारी महत्वाची शाखा आहे ). मुंबईच्या दृश्य चित्रात सुंदर इमारतींची भर घातली आहे. त्यांच्या मुलाने मुंबईतील रीगल सिनेमाची रचना केली होती. जी इतक्या वर्षानंतर आजही आधुनिक वाटते.
ताजमहाल हॉटेलची रचना करण्याचे काम जमशेदजींनी स्टीव्हन्स किंवा अन्य
इंग्रज वास्तुतज्ञाला सोपवण्याऐवजी रावसाहेब सीताराम खंडेरावांना ते दिले
याचे कौतुक वाटते. जमशेटजी गुणग्राहक होते हे नक्की. अनेक कोटी रुपये खर्च
करून लोकांना पसंत पडेल अशी रचना करावी लागेल हे त्यांना माहित होते .
त्यांची अपेक्षा रावसाहेब सीताराम खंडेरावांनी पूर्ण केली.
.
एकशे वीस वर्षाच्या दीर्घ काळात या हॉटेलने अनेक चढउतार पाहिले. पहिल्या
महायुद्धाच्या काळात त्याचा उपयोग मिलिटरी हॉस्पिटल म्हणून केला गेला
तेव्हा सहाशे खाटांची सोय केली होती. २००८ साली अजमल कसाब आणि त्याच्या
साथीदारांनी हॉटेलवर हल्ला करून एकतीस माणसे मारली आणि आग लावली. ताज महाल
हॉटेलचे छायाचित्र अनेक दिवस लोक टीव्हीवर पाहत होते. ती इमारत जगभरच्या
लोकांच्या स्मृतीत जाऊन बसली. इतके चित्रदर्शन खुद्द ताजमहालच्या वाट्याला
आले नाही. इथे नामवंत लोक राहून गेले. त्यात सॉमरसेट मॉम, वादक ड्यूक
इलिंगतों, लॉर्ड माऊंटबॅटन, बिल क्लिंटन, बराक ओबामा यांचा समावेश होतो.
आम्हीही तिथे एक दिवस राहिलो याचा आनंद झाला.
सौजन्य :-
आमच्या मुलीने काही वर्षांपूर्वी आईवडील व सासूसासरे यांना पंचतारांकित जीवनाचा अनुभव घेण्याची संधी दिली होती त्याचीच चित्रकथा
[ सर्व प्रकाशचित्रे प्रकाश पेठे यांच्या संग्रहातून ]
– ©️ प्रकाश पेठे




