बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला. मी तयारीला लागलो, पासपोर्ट वगैरे रेडी होताच. विसा प्रोसेसींग वगैरे सर्व सोपस्कार पार पाडले. मला एक वर्षाचा मल्टी एंट्री नव्वद दिवसांचा विसा मिळाला. मध्यंतरी आणखी दोन जण भारतातून माझ्यासोबत येणार हे कळाले नी एक माघरेबहून. माघरेब नावाचा देश ऐकला नव्हता गूगलल्यावर कळालं की अल्जेरीया लिबीया मोरोक्को वगैरे भागास माघरेब म्हणतात. आम्ही ४ जण ट्रेनींगसाठी तयार झालो. इतर दोघे गुजरातहून येणार असल्याने मी सुध्दा अहमदाबाद- दुबई - कोपनहागेन तिकीट घेतले. मी नंतर पाहील्यावर लक्षात आलं की दिवाळीच्या सुट्ट्या लागूनच येताहेत मग बाॅसची परवानगी घेऊन मी दिवाळी पॅरीसलाच साजरी करायचं ठरवंलं. ठरलं! मी कोपनहेगन ते पॅरीस स्कॅन्ड्न्वीयन एअरलाईन्सचे तिकीट बूक केले. ते मला ९००० (४४युरो) ला पडले. (तिकडच्या मानाने फारच स्वस्त नाही का?) मी तयारीला लागलो. थाॅमस कूकच्या ओफीसला धडका देऊन २०० युरो घेऊन आलो. माझ्यासाठी १०० नी १०० सोबत्यासाठी. “जिथे जाल तिथले व्हा” हा माझा नियम असल्याने तिथे जाऊन त्यांचे पदार्थ खाऊ हे ठरवून जास्त खायचे पदार्थ मी घेतले नाहीत. हा सर्वात चुकीचा निर्णय ठरला :( एक मॅगीचं मोठं पॅकेट घेतलं ते बरं केलं. बरोबर चितळे काजू कतली, हल्दीराम संत्रा बर्फी बळजबरीने देण्यात आली. इतकं गोड मला नकोसं झालं होतं.
शेवटी दिवस ऊजाडला अहमदाबाद एअरपोर्ट ला पासपोर्ट दाखवून प्रवेश केला मी आमचा एक दुसरा बाॅस आणी सार्थक अश्या आम्ही तिघांनी प्रवेश केला. “ऐमीरेट्सला” ला चेकीन करून इमीगिरेशनला पोहोचलो. तिथे आम्ही दोघे पास झालो पण सार्थक (सोबती) अडकला. त्याच्या पासपोर्ट वर नेपाळहून यायचा
शिक्का होता. पण नेपाळला गेल्याचा शिक्का नव्हता. पासपोर्ट ओफीसर नकाराची मान हलवत त्याच्या साहेबाच्या कॅबीन मध्ये गेला. तोपर्यंत सार्थकचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. तो आणी मी पहील्यांदाच विदेशात चाललो होतो. “सु थयो?” म्हणून आमच्या बाॅसने त्याला विचारले. तो हाताने काही नाही म्हणून गेला नी शिक्का मारून पासपोर्ट सार्थकला दिला. आम्ही. सूटकेचा निश्वास सोडला. सार्थक ने प्रचंड धसका घेतला होता. मला ऐअरपोर्टलाच बोलला की तुझ्यासोबत बूक केलेली पॅरीसची फ्लाईट मी रद्द करतो ना कोपनहेगन वरूनच परत येतो. हे लोक मला पकडून जेल मध्ये टाकतील. आम्ही खुप हसलो. त्याला १२ दिवसाचाच विसा मिळाला होता.
आम्ही विमानात प्रवेशलो, मी ह्या आधी इंडीगोचं तीन इकडे तीन तिकडे असे सहाच सीट असलेलं विमान पाहीलं होतं, पण इथे तर प्रचंडं मोठं एका रांगेत दहा सीट असलेलं विमान होतं. फक्त विमानाने लादेनने ट्वीन टाॅवर कसे पाडले हा प्रश्न मला पाडला होता हे विमान पाहून लक्षात आलं का लादेनने केवढं खुळ धडकवलं असावं. चुकीच्या वेळी चुकीचा विचार. प्रवेश केल्या केल्या इतक्या अलिाशान सिट्स वगैरे पाहून मी भारावून देलो पण बाॅसने सांगीतले की आपल्या जागा इकोनोमीत आहेत .हा बिसीनेस क्लास आहे
एका रांगेत खिडकी पकडून बसलो. सार्थक ने खिडकी धरली, ढठरल्याप्रमाणे खिडकीची अदलाबदल दुबइत होणार होती, विमानात प्रचंड सोयीसुविधा होत्या पुढील सीटच्या मागल्या स्क्रिनवर सिनेमा पाहता येणार होता, गेम खेळता येणार होता, एअरशो तसेच विमानाला बसवलेल्या कॅमेराने लाईवही पाहता येणार होतं. एअर होस्टेस ने ऊशी, ब्लॅंकेट नी हेडफोन आणून दिले. मी प्रवासात पाहण्यासाठी “फौदा” नावाची वेबसीरीज डाऊनलोड करून ठेवली होती पण ती ज्यू मुस्लिम संघर्षावर असल्याने प्रवासात पाहू नको असा सल्ला मला आला. फ्लाईट मध्ये वेज हिंदू मील आलं पण ते इतकं चांगलं नव्हतं. दुबईत लॅंडल्यावर आम्ही पुढील कोपनहेगन फ्लाईटच्या गेटवर आलो. येताना प्रचंडं मोठी दुकाने एअरपोर्टभर पसरलेली होती. तीथे गेटवरही सार्थक चा पासपोर्ट भिंग वगैरे लावून चेक करण्यात आला, त्याला पुन्हा धास्ती बसली. मी दुबई एअरपोर्ट वायफायला मोबाईल कनेक्ट केला नी लगेच वेळ आपोआप दुबईप्रमाणे सेट झाली. दुबईहुन फ्लाईट निघाली. मी आता खिडकी पकडली होती. वरून बुर्ज खलिफा दिसली. आकाशातूनही ती इमारत भव्य दिसत होती. समोरच्या स्क्रिनवर दिसत होतं विमान कुठल्या देशावर आहे ते. बराच वेळ समूद्र दिसत हता नंतर विमान इराक वर आलं तेव्हा इराकमधील टेकड्या स्पष्ट दिसत होत्या. हिरवळ नव्हती. मध्ये जेवण नी झोप घेतली. शेवटी कोपनहेगन जवळ आल्यावर ऊठलो. जसजसं कोपनहेगन जवळ येऊ लागलं समुद्रात ऊभारलेल्या पवनचक्क्या दिसू लागल्या. कोपनहेगन ला लॅंड झालो. विमानतळावर आजिबात गर्दी नव्हती, प्रचंडं शांतता होती, काचेच्या पलिकडे विमान लॅंड होत असूनही आवाज नव्हता. लगेज बेल्टवरून ऊचलून आम्ही बाहेर आलो तर प्रचंडं थंडी झोंबली, एअरपोर्ट वातानबकूलीत होते हे लक्षात आले. एक टॅक्सी बूक करून आम्ही आमच्या “अर्बन हाऊस” हाॅटेल कडे निघालो. टॅक्सीवाला तुर्की मुस्लिम होता. आम्हाला भारतातून म्हणजे हिंदू का असे विचारता झाला. नंतर गप्पात इस्रायलचे अत्याचार आमच्या बाॅसला सांगू लागला. आम्ही दोघे खिडकीतून सूंदर इमारती, भव्य ट्रॅफीकरहीत आखीव रेखीव रस्ते डोळे भरून पाहत होतो. आपल्या इथे जसे डबके असते तसे तिथे तळे होते, त्यात बदक होते, भटके कुत्रे, गायी दिसंनात, टॅक्सी म्हणून मर्सीडीज होती. २० मिनीटाने आम्ही हाॅटेलला पोहोचलो. टॅक्सीचे बाल ३५० डॅनीश क्रोन्स झाले होते म्हणजे जवळपास चारेक हजार :(

कोपहेगन मधले ‘अर्बन हाऊस’ हे एक मस्त डॉर्मिटरी - टाईप हॉटेल होतं. काॅमन किचन, खाली छोटा बार, खेळायला टेबल टेनिस, फूटबाॅल वगैरे होतं. इथे मुख्यतः काॅलेजच्या सुट्टीवर आलेले मुलं मुली होते. इथे नवीन समजलं की टॅप वॉटर, म्हणजे बेसीनला येणारं पाणीच लोक पिण्यासाठी वापरतात. वापरायचं वेगळं आणि प्यायचं वेगळं असा काही प्रकार नव्हता. आम्हाला खोली उशीरा मिळणार होती म्हणून आम्ही तिथेच वाट पाहत बसलो. मी क्रीमरोल काढले, डीश आणायला किचन मध्ये गेलो तिथे कुणीतरी बसलं होतं मला वाटलं केअर टेकर असावा मी त्याला विचारलं डीश साठी, तर तो “नो इंग्लीश, स्पॅनीश” असं म्हणाला. मी गूगल ट्रांसलेट वापरून त्याला विचारलं. तो बोलला “या.”
आम्हाला रूम मिळाली. छोटी होती, ४ बेड होते. आम्ही जेवण करूयात म्हणून खाण्याचे पदार्थ काढले. थेपले, खाकरा, भाकरी ह्यांची रेलचेल होती, भरपूर खाऊन आम्ही बाहेर फिरायला निघालो, थोडं आजूबाजूला फिरलो तिथे प्रचंड शांतता होती, बाईक एकही दिसली नाही, सायकल नी चारचाकी शिवाय काहीही दिसत नव्हतं, आपण रस्ता क्राॅस करायच्या बेतात असलो की गाड्या थांबायच्या, आणि ते लोक गाडीतूनच हाताने आदराने जा असं सांगायचे. हॉर्न वगैरे आजिबात कुणी वाजवत नव्हतं. पॅलेस्टीन समर्थक एक बाई तिच्या दोन पोरांना सायकल गाडीत टाकून जोरजोरात स्पीकरवर घोषणा देत फिरत होती तेवढाच काय तो शांतताभंग होत होता. येणारे जाणारे स्त्री पुरूष एकमेकांना स्माईल करायचे, नंतर नंतर मलाही सवय लागली, आणि दिसेल तो/ती मला, नी मी त्याला/तीला स्माईल देऊ लागलो.
तिवोली गार्डन
रेल्वे स्टेशन जवळच तिवोली गार्डन होतं. गार्डनचं तिकीट जवळपास २००० रुपये होतं. आत गेलो नाही कारण संध्याकाळ झाली होती नी वेळ कमी होता. जवळच्याच एका पिझ्झा दुकानात गेलो, तिथे एक पाकिस्तानी पंजाबी मुसलमान नोकरीला होता त्याच्याशी गप्पा मारल्या. तिथे पिझ्झा खाऊन निघालो. फिरताना एका दुकानात कानटोपी पाहीली, तिची किंमत भारतीय रुपयात ५००० होती. मी पुण्यातील रमेश डाईंग मधून ११० रुपयांत टोपी घेतली होती. आमचा बाॅस टोपी आणायचं विसरला होता, किंमत पाहून त्याने टोपी घ्यायचं रद्द करून केजरीवाल सारखा मफलर बांधून फिरू लागला. पुढे एका बुटांच्या दुकानात गेलो, तिथे दोन नेपाळी मुली जाॅबला होत्या त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या की शिकायला आहोत इथे झालं शिक्षण की परत जाणार, नको वाटतं रहायला इथे. परत रूमवर आलो. थोड्या वेळाने रात्री १० वाजता मी आणि विकास फिरायला निघालो, तिथे आजूबाजूला बरेच स्ट्रीप क्लब/बार होते. आम्ही खिडकीतूनच आत काय चाललंय ते बघत चालत होतो बरेच चित्रविचित्र प्रकार होत होते. एका ठिकाणी विकास तपास करून आला १५० ते २०० डॅनीश क्रोन्स प्रवेश शुल्क होतं.
सकाळी नाश्ता करायला आलो, १०० डॅनीश क्रोन्स ( १२०० रूपये) दिले. हाॅट चॉकलेट आयुष्यात पहिल्यांदाच प्यायलो. मी उकडलेली अंडी खाल्ली, इतर पदार्थ काही खाण्यासारखे वाटेनात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पाव ठेवलेले होते. मी चव घेतली. काही खूप आवडले, मी फक्त पाव खाल्ले चविष्ट लागत होते. काही खिशात घेतले, बाहेर फिरायला गेलो की खाऊ ह्या बेताने.
आम्ही कोपनहेगन दर्शन घ्यायचे ठरवले. तिथे हीप हाॅप नावाच्या डबलडेकर बस होत्या. त्या कोपनहेगन दर्शन करवून आणायच्या. १८० डॅनीश क्रोन्स प्रत्येकी देऊन आम्ही त्यात बसलो, २२ स्टाॅप होते, कुठेही उतरायचं, ४५ मिनीटांनी पुढील बस यायची. पहीला स्टाॅप म्यूझियमचा होता, तिथे उतरलो नाही. पुढचा स्टाॅप नदीकिनारी होता, तिथे उतरलो. खूप थंडी वाजत होती, पण वातावरण खूप छान होतं. आम्ही तिथल्या एका काॅफीच्या गाडीवर काॅफी प्यायला गेलो. काॅफीवाला अर्जेंटीनाचा होता, मला बोलला की माझी एक्स भारतात धर्मशाळेत योगा शिकतेय. नदीवर इतक्या थंडीतही काही मुली आंघोळ करत होत्या, आणि पूर्ण उघड्या होऊन कपडे बदलत होत्या, मी काॅफी विक्रेत्याला बोललो की तुझी तर मज्जाय, तो बोलला तुम्ही चुकीच्या वातावरणात आलात ऊन्हाळ्यात जून मध्ये या, हा सर्व परीसर भरलेला असतो, मी त्याला विचारलं की असं पाहत असशील तू तर त्या मुलींच्या लक्षात येईल, तो हातातला काळा गाॅगल दाखवत बोलला “म्हणून तर मी हा काळा गाॅगल घालतो.” मी हसत हसत त्याला हायफाय दिला. अजून एकेक काॅफी होऊन जाऊदे म्हणून विकास नी माझं एकमत झालं पण आमचा कुटिल डाव बाॅसच्या लक्षात आला नी त्याने आमचा बेत हाणून पाडला.
तिथून आम्ही पुढती हीप हॉप धरून एका चर्च ला गेलो, जुने चर्च होते, आत अतिशय सुंदर नी भव्य लाकडी बांधकाम केलेले होते. त्याच्या टाॅवर वरून पूर्ण कोपनहेगन दिसतं असं कळालं, त्यासाठी तिकीट होतं नी मोठी रांग होती.
तिथून आम्ही कोपनहेगन च्या प्रसिद्ध Nyhavn भागातील इमारती पाहण्यास गेलो. तिथे खूप रेस्टोरंट होते, मला मासा चाखायचा होता, पण त्या दोघांमुळे खाता आला नाही, तिथे बरेच फोटो काढले, विकासने वाईन घेतली.

मी हाॅटडाॅग खायला गेलो पण त्याच्यात पोर्क होतं, तिथे एक मोठा जहाजाचा नांगर ठेवलेला होता. एवढा प्रचंड नांगर असू शकतो हे पाहून आश्चर्य वाटलं, तिथून मग पुढची हीप हाॅप पकडून लिटल मर्मेड ला गेलो, छोटसं सुंदर तळ्याकाठचं स्मारक होतं. आवडलं. त्याची प्रतिकृती विकास ने त्याच्या वडीलांना भेट म्हणून १०० डॅनीश क्रोन्स (१२०० ) रुपयात घेतली.
छोटी जलपरी.
पुढे आम्ही नॅशनल म्युझीयमला गेलो, तिथे फुकट तेवढं पाहून त्याच्या समोरच्या गार्डनमध्ये गेलो तिथे बरंच भटकलो, ४ वाजले होते तरी अंधार पडत आला होता, पुन्हा हीप हाॅपच्या बस स्टाॅपवर आलो, तिथे एक ऑस्टृयन ऑस्ट्रीयन नी एक जपानी जोडपं होतं त्यांच्याशी गप्पा मारल्या.
हाॅटेलला आल्यावर मॅगी बनवून खाल्ली, मॅगी बनवताना एक आफ्रीकन व्यक्ती मासा बनवत होता त्या माश्याच्या खमंग वासाने किचन भरलं होतं. हे दोघे पळाले, मी त्याला ऊत्तम मासा बनवलास नाईस स्मेल म्हणुन दाद दिली. मॅगी खाऊन आम्ही हाॅटेलच्या हाॅल मध्ये आलो तिथे आमच्या बाॅसचा मित्र भेटायला आला होता, तो बिहारी होता सांगत होता इथे लवकर नागरीकत्व मिळत नाही, मुलं ऐकत नाहीत, खूप प्रश्न विचारतात. तो गेल्यावर मी किचनमध्ये बाटलीत पाणी भरायला गेलो तिथे एका ब्रिटीश मुलीशी अर्धातास गप्पा मारत बसलो. नंतर थोड्या वेळ मी आणी विकास बाहेर रोडवर टाईमपास करत होतो, एव्हाना तो भाग माझा चांगला पाठ झाला होता, येणारे जाणारे मला पत्ता विचारायचे, रेल्वे स्टेशन ?? दिसवे गो स्ट्रेट टेक लेफ्ट, तिवोली गार्डन? असं जा, रॅडिसन ब्लू? असं जा…!
(क्रमशः)
कोपनहेगनच्या रॅडीसन कलेक्शन समोर दिसलेली एक अलिशान गाडी.

सकाळी लवकर जाग आली. आज कोपनहेगनला आल्याचा तिसरा दिवस होता. इथे एक गोष्ट
मस्त झाली. वेळेच्या फरकामुळे मला पहाटेच जाग यायला लागली. नाश्ता करून मी
ज्यूस घेतले, ते बिन साखरेचे होते. काल मासा बनवणारा आफ्रीकन दिसला, बोलला
तू अजून इथंच आहेस? मी सांगीतलं - “नाही, आज आम्ही जाणार”. चेक आऊट करून
आम्ही हॉटेलच्या लॉकरमध्ये बॅग्स ठेवल्या (१५ डॅनीश क्रोन्स - तीनेक
तासाचे) वॉशरूममध्ये एक टिकली लावलेली सफाई कर्मचारी दिसली, तिला विचारलं,
इंडीयन ? “नाही, नेपाळी आहे” म्हणाली. मागे दोन नेपाळी मुली कामाला आहेत
सांगीतल्यावर म्हणाली की मी त्यांना ओळखते. कोपनहेगनचा शॉपिंग स्ट्रीट
रविवारमूळे बंदं होतं, आम्ही बाजूलाच रेल्वे स्टेशनवरच्या एका मेकप
सामानाच्या दुकानात गेलो. माझं नेट बंदं होतं म्हणून मी तिथेच
मॅकडोनाल्ड्सच्या वायफायला मोबाईल जोडला नी घरी फोन करून काय हवंय ते
विचारलं. आधी बर्याच गोष्टी सिलेक्ट झाल्या पण नंतर किंमत ऐकून सर्व खरेदी
रद्द झाली. पुढे आम्ही तिथल्या बाजारात फिरायला गेलो. तिथे बरेच फोटो
काढले.

मला डेन्मार्कचा झेंडा फार आवडला, कळालं की जगातील सर्वात जुना झेंडा डेन्मार्कचा आहे. १२ व्या शतकापासून एकच झेंडा आहे डेन्मार्कचा.

आम्ही हॉटेलला आलो. जवळच कबाबजी म्हणून एक चिकनवाला होता, तुर्की
लोक होते. तिथे तळलेला लेगपीस मस्त मिळायचा. १७ डॅनीश क्रोन्सचे (२००
रूपये) दोन खाऊन आलो, नी सामान घेऊन रेल्वे स्टेशनला आलो, तिथून मग आम्ही
ओरेंडसूंड पुलाने स्विडनच्या मालमोला आलो. हा पूल समुद्राखालून आहे, पण
रेल्वेतून काही कळालंच नाही. मालमोच्या जवळच्याच एका गावात आमचं ट्रेनिंग
होतं. कंपनीचं हेड ऑफिस स्टॉकहोमला होतं.
मालमोला एक हिंदी बोलणारा व्यक्ती भेटला, अफगाणी होता.
रॅडीसन ब्लू ला चेक-इन केलं. विक्टोरिया नावाची रिसेप्शनिस्ट होती. तिने
पासपोर्ट जमा करून रूम दिले. ४ वाजताच अंधार पडला होता. मी खाली येऊन
विक्टोरीयाकडून वायफाय जोडून घेतलं. तिच्याकडून हॉटेलची सायकल मागीतली.
तिने फॉर्म भरून घेतला - चोरी वगैरे गेली तर पैसे भरून घेतले जातील. इथे
चोरी होते ? मला आश्चर्य वाटले, तिला विचारलं तर ती म्हणाली अजून तरी झाली
नाहीये. तिच्याकडून कुलूप लावणं - उघडणं , रस्त्याचे नियम, ट्राफीक वगैरे
सर्व समजून घेतलं. तिला टाटा बायबाय करून केएफसीच्या दिशेने सायकलवर
निघालो. ५ किमी होतं. बऱ्याच वर्षांनी सायकल चालवत असल्याने मला तीनेक
किलोमीटर गेल्यावर दम लागला. भर थंडीत घामाघूम झालो. जॅकेट - टोपी काढून
बास्केट मध्ये ठेवली. केएफसी पोहोचलो. तिथे सायकल कुठे पार्क करायची कळत
नव्हतं. कुठेही लावली तर दंड लागतो म्हणे. तेवढ्यात एक जोडपं बाहेर आलं,
वाटलं ह्यांना विचारू, बाहेरच ते एकमेकांना चिकटले.
मी तोपर्यंत केएफसीला एक प्रदक्षिणा मारून आलो. तेवढ्यात त्यांचं आटोपलं
होतं, मी त्याला विचारलं “व्हेअर कॅन आय पार्क बाईक?” तो खांदे उडवत
म्हणाला -. “आय डोंट नो ” प्रदक्षिणा वाया गेली. आत जाऊन मी ७० डॅनीश
क्रोन्सचं जेवण घेतलं, बाहेर आलो तर लक्षात आलं टोपी हरवलीय. मी जायला
निघालो. परत घामाघूम झालो. रस्त्यात पाऊस लागला, थोड्याच वेळात बराच पडला.
मी भिजलो पण बरं वाटत होतं. घाम येत नव्हता. थोड्या वेळाने थंडी वाजायला
लागली. पुढे बास्केटमधलं जॅकेट ओलंचिंब झालं होतं. पाऊस चालू होता,
रस्त्यात टोपी सापडली. आनंद झाला कारण टोपी घ्यायला दोनेक हजार रुपये गेले
असते. पाऊस चालू असल्याने चष्म्यातून काही दिसायचं नाही, काढला तरी
दिसायचं नाही. माझा फोन डिस्चार्ज होऊन बंदं झाला होता, मला रस्ता सापडत
नव्हता, सर्व घरं बंदं होती बाहेर कुत्रं, माणूस, गाय काहीही दिसंना.
हॉलिवूड हॉरर सिनेमात दाखवतात तसं वातावरण होतं.

मला भिती वाटायला लागली. प्रचंड थंडी पण वाजत होती. ओला चिंब झालो
होतो. रस्त्यात एक माणूस खांबांचे बल्ब बदलताना दिसला. त्याला रॅडीसन
ब्लूचा पत्ता विचारला त्याने गूगल मॅप पाहून कसं जायचं ते सांगीतलं. मी
निघालो आणि पोहोचलो. हॉटेलला आलो तर माझी अवस्था पाहून विक्टोरीयाने मला
कॉफी दिली. ती पिऊन बरं वाटलं. हॉटेल मधील इतर लोकही माझ्याकडे
आश्चर्याने पाहत होते. मला वाटलं होतं माझा फोन लागत नाही म्हणून माझे दोन
सहकारी चिंतेत असतील पण ते घोडे विकून झोपले होते. रिसेप्शनला चेकीन करनारी
एक मुलगी दिसली ती तोंडावळीवरून भारतीय वाटत होती, ती पुण्यातली निघाली.
दुसऱ्या दिवशी ट्रेनींग सेंटरला पोहोचलो. ट्रेनर्स यायच्या आधी माघरेब
वाला रिझवान भेटला. मोरोक्कोचा होता. त्याच्याशी गप्पा मारत होतो. बरीच ओळख
झाली. तो बोलला की भारत बराच मोठाय. ह्या दोघांनी सांगितलं की “वी आर
फ्रोम द रीजन ऑफ गांधी” - रिझवानला मी सांगीतलं की “ॲंड आयम फ्रॉम द रीजन
ओफ किलर ऑफ गांधी” हे ऐकून तो पोट धरून हसू लागला. नंतर ट्रेनींग सुरू
झालं. दुपारी जेवायला गेलो, तिथलं वेज विकासला गेलं नाही. मी चिकन घेतलं,
फक्त उकडलेलं होतं पण खूपच चविष्ट लागलं. संध्याकाळी हॉटेलला आलो.
विक्टोरीया नव्हती, एंजेला होती. मी सायकल घेऊन केएफसीकजे जायला निघालो, आज
विकासही माझ्या सोबत आला. मी काल फिरून आलो असल्याने त्याला रस्त्यांचे
नियम सांगत होतो. तिथे रस्ता क्रॉस करायचा असेल तर खांबावरचं बटण दाबावं
लागायचं. मग सिग्नल आल्यावरच जायचं. माझे बरेच नियम पाठ झाले होते. काल मी
बराच चुकलो होतो, पण आज व्यवस्थित जात होतो. रस्त्यात आम्ही एका
छोट्याशा माॅलला थांबलो. विकासला रम हवी होती, रिसेप्शनवरच्या माणसाला
इंग्रजी येईना, मग एका मुलीने मदत केली. ती बोलली की इथे रम मिळणार नाही.
तिने फोन मध्ये रम - दुकानाचा पत्ता टाकून दिला. मी तिच्याशी गप्पा
मारल्या, तिची आई नायजेरीयन होती आणि बाप स्वीडिश. जाताना मी
रिसेप्शनवरच्या माणसाला गूगल ट्रांसलेट वरून सांगीतलं की “तू तुझी भाषा
जपतोयस, हे चांगलं काम करतोय.” त्याला आनंद झाला. आम्ही बऱ्याच छोट्या
गल्ल्या ओलांडून दारू दूकानात पोहोचलो. विकासने एक छोटी बाटली घेतली. मग
केएफसी पोहोचलो. विकासनेही चिकन खाल्लं. (कुणाला सांगू नको बोलला). जाताना
मी केएफसीचा काऊंटरवरच्या मुलीशी १५ मिनीटे गप्पा मारल्या. ती लिथूएनीया
देशाची होती, ताशी १०० स्वीडीश क्रोन्स तिचा पगार होता. ती शिकत होती,
कामही करत होती. रुम - भाडं महीना ५००० क्रोन्स (४० हजार भारतीय रूपये)
होतं, जास्त चांगलं घेतलं तर ११००० क्रोन्स. तेवढ्यात तिथे विकास आला, तिने
गप्पा आवरत्या घेतल्या. विकासचं इंग्रजी जेमतेम होतं. त्याने मला विचारलं
“कुछ हुआ?” मी त्याच्याकडे संतापाने पाहीलं. मग हॉटेलला पोहोचलो.
Copenhagen मध्ये बाकी काहीही चोरी झाल्याचं ऐकल नाहीय पण सायकल ( इथे बाईक म्हणतात सर्वजण तिला) हमखास चोरीला जाते. दुकानाबाहेर उभी केली असता भाजी घेऊन परत येपर्यंत गायब अशी परिस्थीती एका परीiचतांची झालेली. बाकी बस मध्ये विसरलेला फोन , टोप्या, स्कार्फ, दुकानाबाहेर किंवा शाळेबाहेर ठेवलेली मुलांची stroller मात्र कुठेही जात नाही. बस प्रवास अती महाग असल्याकारणाने लोकं सायकल ने जाणं पसंत करतात
Copenhagen मध्ये नेपाळी बरेच दिसतात, अगदी साडी नेसलेल्या, सण साजरे करणाऱ्या बायका पण पाहिल्यात.
इथे बऱ्याच ( तरुण व मध्यमवयीन) जनतेला चांगले इंग्लिश येते, तरीही ते डॅनिश मध्येच सुरुवात करतात!
शिकता शिकता पार्ट टाईम जॉब बरेच जण करतात,काहीकाही नोकऱ्या विद्त्यांार्थ्यांसाठी असतात, तया ना student jobs असं म्हणतात
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनिंगला गेलो. ट्रेनर ने आज खाण्यासाठी सँडविच मागवले होते त्यात काही वेज होते तर काहीत पोर्क होतं. ह्या एकाच कारणामूळे रिझवानने आणी आमच्या बाॅसने वेज सॅंडवीचही खाण्यास नकार दिला. मी आणी विकासने ते वेज सँडविच खाल्ले. रिजवानने एका इराकी दुकानातून चिकन शोरमा आणलं होतं मी त्यातून एक घास खाल्ला, आवडलं. त्याला मी दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी एक आणण्यास सांगितलं, विकास बोलला माझी बायको म्हणते “सात समुद्र पार केले की धर्म बुडतोच.”
ट्रेनिंग संपल्यावर साधारण चार वाजता आम्ही बाहेर आलो पाऊस पडत होता आम्ही टॅक्सीची वाट पाहत पेट्रोल पंपावर उभे राहिलो तिथे मी पाहिलं की पेट्रोल भरायला कोणीही नव्हतं लोक यायचे कोड वगैरे टाकून कार्ड स्वाईप करायचे आणि पेट्रोल भरून घ्यायचे. आमच्या ट्रेनर पैकी एक मेक्सीकन होता तोही तिथे आला होता, मी त्याच्याशी ट्रंपतात्यांनी बांधलेली भिंत ते मेक्सीकोचे जंगल वगैरे ह्यावर गप्पा मारत ऊभो होतो. टॅक्सी आली, टॅक्सीचा ड्रायव्हर पाकिस्तानी होता लाहोरचा होता त्याला पंजाबी आणि उर्दू मिश्रित हिंदी यायची त्याची बोलण्याची स्टाईल पाहून मी त्याला विचारले तर तो बोलला माझे गुरु लखनऊचे होते. आम्ही एका मॉलला आलो मॉलमध्ये बरीच गर्दी होती तिथे आम्ही परफ्युम विकत घेतले. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये भारतीय पदार्थ होते मी एक चिकन बसंती नावाची डिश घेतली.
त्यात चिकन राईस आणि सलाड होतं. मला ती डिश आवडली रेस्टॉरंट मध्ये एक बांगलादेशी काका कामाला होते जेवण झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारू लागलो, आजची मॅच पाहिली का बोलले, मी बोललो मी क्रिकेट वगैरे पाहत नाही. ते काका 37 वर्षापासून स्वीडनला होते, मुलं इथेच मोठे झाले शफिक नाव होतं त्यांचं. मला देशाची आठवण येते बोलले, डोळ्यात पाणी होतं. त्यांचे वडील कलकत्त्यात राहायचे, फाळणीनंतर बांग्लादेशात आले. आम्ही मॉल फिरू लागलो मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी एका दुकानात गेलो तिथे थोडा टाईमपास केला तिथल्या मुलीकडून मी स्विडीश भाषेतले दोन शब्द शिकून घेतले, हाय ला हेज म्हणायचं तर बाय-बाय ला हेडो म्हणायचं. रात्री रूमवर आलो मिपाकर सरिता बांदेकरांचा मेसेज होता सकाळी चार वाजता उठून नोर्थन लाईट बघ असं त्या सांगत होत्या. सकाळी चारचा अलार्म लावून झोपलो. अलार्मच्या आवाजाने ऊठलो. खिडकीतून बाहेर पाहिले उत्तरेला, पण काहीही दिसलं नाही रूमचा दरवाजा उघडून बाहेर पाहिलं खूप अंधार होता. भीती वाटली म्हणून बाहेर गेलो नाही. परत झोपलो सकाळी सव्वासातला उठलो. ट्रेनिंग सेंटरला गेलो आजच्या आमच्या ट्रेनर ने आम्हाला तो बाहेर जेवायला नेईल असं सांगितलं. तो आम्हाला एका व्हेज इंडियन रेस्टॉरंट ला घेऊन गेला. मी ट्रेनर बरोबर गप्पा मारत होतो, तो जर्मनीचा होता, रेस्टॉरंटला त्याच्याच गाडीने निघालो होतो. तो आणि मी बऱ्याच गप्पा मारत होतो मी त्याच्याशी “हिटलरचा रशियावर हल्ला करण्याचा चुकलेला निर्णय ते सध्या युक्रेन युद्धामुळे जर्मनीत वाढलेले गॅसचे भाव” अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तो बोलला की “युनो टू मच.” आमच्या दोघांच्या गप्पा सोबतचे दोघे ऐकत होते. विकासने माझं नाव “चालता फिरता विकिपीडिया” ठेवलं. ज्या देशाचा माणूस भेटला त्या देशाच्या विषयावर सुरू होतो बोलला, एवढं जर मशीन बद्दल वाचलं असतंस तर आज तू एक्सपर्ट म्हणून डिक्लेर असतास असंही बोलला. आम्ही रेस्टॉरंट पोहोचलो. एक बडोद्याची मुलगी ते रेस्टॉरंट चालवत होती सोबतचे दोघे तिच्याशी गुजरातीत बोलले, तीला आनंदं झाला. जेवायला लसग्न आणि दाळ होती सलाद आणि भजे पण होते. जेवण नावालाच भारतीय होतं, आम्ही तीला विचारलं तर ती बोलली का ह्या लोकांना असंच आवडतं, भारतीय जेवन दिलं तर ते परत माझ्याकडे येणार नाहीत. आम्ही ट्रेनिंग सेंटरला आलो ट्रेनरला आम्ही बिस्कीट ऑफर केले तो बोलला की मी साखर असलेलं काहीही खात नाही.
आणखी दोन मुली ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेल्या होत्या. त्यातली एक इंडोनेशियाची होती तिने हिजाब घातला होता. ट्रेंनींग संपवून आम्ही हॉटेलला आलो. विक्टोरिया दोन दिवसापासून दिसली नाही म्हणून मी तिच्याबद्दल एंजेलाला विचारलं तर ती तीरसटपणे बोलली “ती एक्स्ट्रा म्हणून काम करते, ती फक्त त्या दिवसासाठीच होती, काही महत्त्वाचं काम होतं का? मला सांग मी करते.”
ट्रेनिंगचा पाचवा दिवस उजाडला होता आणि ट्रेनिंग दुपारी संपली, आम्ही सर्वांच्या भेटीगाठी घेऊन फोटो वगैरे काढून तिघेजण पुन्हा संध्याकाळी रेल्वेने कोपनहेगन जायला निघालो. कोपनहेगनला पोहोचलो, विकास बोलला “आपलं” कोपनहेगन आलं, त्याला खूप आनंद झाला, अर्बन हाऊस ला पुन्हा बॅग आपटल्या. संध्याकाळी आम्ही पुन्हा खालच्या बारमध्ये आलो तिथे बरेच लोक जमलेले होते तिथे टेबल फुटबॉलची टूर्नामेंट भरली होती, मी आणि विकास आमची जोडी बनवून खेळू लागलो आम्ही दोघेही पहिल्यांदाच खेळत होतो तरीही आम्ही ऑस्ट्रेलिया आणि एका अमेरिकन मुलींच्या जोडीला हरवलं आम्ही दोघं जिंकलो, त्या मूलींबरोबर आम्ही फोटो वगैरे काढले, बारवाल्यानेही त्याच्या बार मध्ये लावायला काढले. मी जिंकलेली बिअर प्यायलो नाही मी त्या अमेरिकन मुलीतल्या एकीला दिली, विकास त्याची बियर प्यायला.
दुसऱ्या दिवशी आमचा बॉस कोपनहेगन वरून थेट मुंबईला गेला. आता मी आणि विकास उरलो होतो सकाळी चार वाजता उठलो. तयार होऊन पाच सात ची कोपनहेगन सेंट्रल ते कोपनहेगन एअरपोर्ट तीस युरो देऊन पकडली. एअरपोर्ट वरच्या मॉल वरून डेन्मार्कची आठवण म्हणून एक प्रतिकृती विकत घेतली. आम्ही पॅरिस जाणार होतो. पॅरिस जाण्यासाठी आमची फ्लाईट पहाटे सहा वाजता होती, विकास आणि मी रेल्वेने एअरपोर्टला पोहोचलो एखाद्या मॉलमध्ये असावं असं ते एअरपोर्ट होतं तिथे सिक्युरीटी चेकिन करताना माझ्याकडे असलेली पाणी बॉटल तिथल्या स्त्री सिक्युरिटी गार्डने जमा केली आणि ती मला बोलली की तू भरलेली बॉटल नेऊ शकत नाहीस तुला रिकामी बॉटल न्यावी लागेल, मी तिला विचारलं की बॉटल कुठे रिकामी करू? तर ती बोलली की झाकण उघडून दे मी आत जाऊन रिकामी करून आणून देते. मी झाकण उघडलं तर अर्ध पाणी तिच्या अंगावर आणि अर्ध पाणी माझ्या अंगावर उडालं ते कार्बोनेटेड वॉटर होतं मला वाटलं आता ही माझ्यावर खूप ओरडेल मी तिला सॉरी बोललो, पण ती फक्त “इट्स ओके” बोलली आणि आत जाऊन उरलेले पाणी फेकून मला बॉटल आणून दिली. विकासला माहीत होतं की पाणी कार्बोनेटेड वॉटर आहे पण त्याला माझी मजा पहायची होती म्हणून त्याने मला सांगितलं नाही. नंतर माझ्यावर हसत होता. याचा बदला म्हणून मी त्याला त्याचं ७०० रूपयात विकत घेतलेलं सिगरेट पेटवायचं लाइटर फेकायला सांगितलं. नाही फेकलंस तर तुला धरतील असं बोललो. त्याने पटकन लाईटर फेकलं पण लाईटर फ्लाईट मध्ये अलाऊड होतं , नंतर मी त्याला सांगितलं आणि त्याच्यावर हसलो. आमच्या फ्लाईटला बराच वेळ असल्याने आम्ही गेटवर टाइमपास करत होतो विकास डोक्याखाली बॅग ठेवून तिथल्या बेंचेस वर पाय पसरून झोपला. असा विदेशात हा भारतात रेल्वे स्टेशनला झोपतो तसा झोपलाय हे विचित्र वाटत होतं. मला वाटत होतं कुणीतरी येऊन आम्हाला टोकेल. पण त्यानंतर तिथे थोड्यावेळाने काही मुली आल्या, त्याही ह्याच्या सारख्याच आडव्या झाल्या. फ्लाईटची वेळ झाल्यावर मी त्याला लाथा मारून ऊठवू लागलो तर एका मूलीने माझ्यावर डोळे वटारले. स्कॅन्डेनेवीयन एअरलाइन्सने आम्ही पॅरिस पोहोचलो.
एअरपोर्टच्या बाहेर येताच मी तिथे एका उभ्या कृष्णवर्णीय सिक्यूरीटी गार्डला होटेल कसं जायचं हे विचारलं.
त्याने मला नीट समजावून सांगीतलं, ते मी लिहून घेतलं. तिथे मी माझे तीन तिकीट माझ्या कार्डने काढले, विकासला त्याचे तिकीट त्याच्या कार्डने काढायला लावले हे पाहून तो सिक्युरीटी गार्ड हसला. विकास त्याला बोलला की “ही इज नोट माय
गूड फ्रेंड”. मी त्याला सांगीतलं का “मनी इज माय ओन्ली फ्रेंड” हे ऐकून तो अजून जोरजोरात हसत होता. बस ट्रेन बस असं करत “बेस्ट वेस्टर्न” होटेलला आलो.

83 युरो दिवसाचे पे केले. मॅनेजर येमेन देशाचा वालिदने आम्हाला आम्ही पहिल्यांदा पॅरिसला आलोय आणि त्याची बायको इंडो पाक मिक्स ब्रिडची असल्याने ज्या रूम मधून आयफेल टॉवर दिसेल ती रूम आम्हाला दिली. त्याचे तो दहा युरो जास्त घेतो पण आमच्याकडून घेतले नाही असं बोलला. हे विकासला काही कळालं नाही मी त्याला सांगितलं की तू त्याच्या सासुरवाडीचा आहेस म्हणून त्याने तुला आयफेल टावर रूम मधून दिसेल असा रूम दिला. विकासची नी त्याची मैत्री झाली. रूम लहान होता.
आम्ही जेवण्यासाठी खाली एका इंडियन रेस्टॉरंटला गेलो पण तिथे जेवण खूप महाग होते. मग आम्ही कोपऱ्यावरच्या पिझ्झा हटला गेलो तिथे एक बडोद्याचा मुलगा कामाला होता आणि एक कृष्णवर्णीय होता विकासने त्याला विचारलं की तू की तू कुठल्या देशाचा आहेस? त्याचा चेहरा ऊतरला तो बोलला की मी फ्रेंच आहे. मी विकासला बोललो की परत काळा दिसला तर त्याला देश विचारू नकोस. तो बोलली की “इधर सब कलूटोका राज चल रहा है” दुपारचे दोन वाजले होते आम्ही हॉटेलमधून एक मॅप घेतला. आणि त्या मॅपच्या साह्याने कुठे कुठे फिरायचं ते ठरवून निघालो. रस्त्यात सूंदर सूंदर ईमारती नी लोक दिसत होते.
पहिले आम्ही चार्स दी गाॅल गेटला जाणार होतो, तिथे पोहोचलो तर दिसलं की काहीतरी कार्यक्रम सुरू होता फ्रान्सचा झेंडा फडकवला जात होता, बहुतेक चार्ल्स दी गाॅल दहा अकरा नोव्हेंबरच्या आसपासच खपला असावा. फ्रान्सचे पोलीस आपल्या इथल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या टोप्यांसारखे टोप्या घालून तिथे उभे होते.
मी बॅरिकेट्स लावले होते तिथे उभा राहिलो पण विकास पुढे पुढे जाऊ लागला तिथल्या एका पोलिसाने त्याच्यावर बंदूक रोखून बंदुकीच्या इशाऱ्यानेच त्याला परत जायला सांगितलं. गेट पाहता आला नाही पण मग तिथून आम्ही दोन किमी वरचा आयफेल टॉवर कडे पायी जाऊ लागलो.


सातेक वाजचा पोहोचलो. आयफेल टॉवर खूप मस्त चमकत होता. तिथे पोचल्यावर मी घरी व्हिडिओ कॉल करून आयफेल टॉवर दाखवला. खूप फोटोस घेतले तिथे काही भारतीय हरियाणातील मुले बादलीत बियर आणि पाण्याची बॉटल विकत होते विकास साठी दोन युरोची बियर आणि माझ्यासाठी दोन युरोची पाण्याची बाटली घेऊन आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत उभे राहिलो मी त्यांना विचारलं की तुम्हाला फ्रेंच बोलता येते का मग त्याने मला दाखवलं. दोन मुली जात होत्या त्यांच्याशी तो फ्रेंच मध्ये हे “ब्युटीफुल लेडी सिगारेट्टा?? नी वरून दोनेक शब्द असं काहीतरी बोलला. त्या मूलांनी मला बोंज्यूर आणी मेस्सी हे दोन फ्रेंच शब्द शिकवले. आम्ही टॉवरच्या खाली पोहोचलो. 30 युरो खालून वर जाण्यासाठी लिफ्ट होती आणि 21 युरो देऊन मध्यभागातून लिफ्ट होती पण आम्ही नऊ युरो वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरचं तिकीट घेतलं दुसरा मधला खूपच उंच होता. जात जात खूप थकलो शेवटी पोहोचलो. टाॅवरच्या मध्ये एक दोन ठिकाणा रेस्टोरंट पण होते. संग्रहालय वगैरे पण होतं. वर पोहोचलो. वरून पॅरिस खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होतं. बराच वेळ थांबून आम्ही पाहिलं, पॅरिस डोळ्यात मावत नव्हतं.


ऊतरून यायची इच्छाच होत नव्हती. रात्री साडेअकरा पर्यंत आम्ही वर आयफेल टॉवरवर होतो.
तिथून खाली आलो खाली एक भारतीय विक्रेता पावात चिकन पीस टाकून विकत होता, प्रत्येकी पाच युरो. आम्ही त्याच्याकडून दोन घेतले आणि खाता खाता मी त्याला बोललो की आज दिवाळी आहे आणि तू आम्हाला चिकन खाऊ घालतोयस?? तो बोलला की “पाप फक्त भारतात लागतं विदेशात आल्यावर पाप लागत नाही. खा अजून” असं म्हणून त्याने दोघांच्या प्लेट मध्ये दोन दोन पीस टाकले. आम्ही आमच्या हॉटेलला जाण्यासाठी मेट्रोच्या बोगद्यात आलो बोगद्यात दोन कृष्णवर्णीय गिटार वाजवत “काल्म डाऊन” गाणं म्हणत होते, येणारे जाणारे नाचत होते. खूप मस्त नी आनंदी वातावरण होतं. आम्ही मेट्रो पकडून हॉटेलला एक वाजता पोहोचलो. तिथे कृष्णवर्णीय रिस्प्शनीस्ट होता तेयााल आम्ही फ्राॅस मध्ये इतके काळे लोक कसे विचारलं तेव्हा त्याने अनेक आफ्रीकन देशांची अधिकृत भाषा फ्रेंच आहे असं सांगीतलं, नी तिथून लोक मग ईकडे येतात हे सांगीतले, अनेक आफ्रीकन देशात इंग्रजी ऐवजी फ्रेंच शिकवली जाते हे मलाही माहीत नव्हते. मला वाटलं होतं फ्रेंचही इंग्रजाळलेले असतील पण तंस नव्हतं. फ्रेंच ही खुप ताकदवान भाषाय हे कळालं.
दुसर्या दिवशी विकासला परत भारतात जायचं होतं. त्याचा विसा संपला होता. मी एकटा पॅरिस मध्ये पुढच्या पाच दिवसांसाठी राहनार होतो, मोकळा असनार होतो, मिपाकर चित्रगूप्तकाका जे पॅरीसचा कानाकोपरा फिरलेत त्यांनी मला काय काय पहायचं ह्याचा प्लॅन आखून दिला होता. तो अंमलात आणायचा होता. एकंदरीत खूप मजा येणार होती.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.