Sunday, January 28, 2024

सप्तरंग सकाळ

 

भीमबेटका : सृजनात्मक अभिव्यती

भारतीय कलेचा उगम प्रागैतिहासिक काळात झाला. मानवाच्या उत्क्रांतीचं दर्शन हे मानव आणि निसर्ग यांच्या सृजनशील बांधिलकीतून चित्रित होऊ लागलं.
Bhimbetka Rock Art
Bhimbetka Rock Artsakal

- दुर्गा आजगांवकर, ajg.durga17@gmail.com

भारतीय कलेचा उगम प्रागैतिहासिक काळात झाला. मानवाच्या उत्क्रांतीचं दर्शन हे मानव आणि निसर्ग यांच्या सृजनशील बांधिलकीतून चित्रित होऊ लागलं. प्राथमिक स्वरूपाचा मानव हवामानातली स्थित्यंतरं अवलंबत, वेळोवेळी अस्तित्व टिकवताना गुंफा, इतर आश्रयस्थानं अनुभवत होता. जिथं तो वास्तव्यास होता तिथंच दगडांच्या नैसर्गिक पृष्ठभागावर नकळत अथवा जाणिवेनं मूर्त-अमूर्त आकारांची रचना तो करत गेला.

अशा दगडांच्या पृष्ठभागावर रेखाटलेल्या चित्रांचं संचित ‘शैलचित्रं’ म्हणून ओळखलं जातं. ही एक जागतिक घटना आणि कलात्मक अभिव्यक्ती आहे, तीतून प्रागैतिहासिक काळातल्या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा दगडी अवजारांबरोबरच चित्रांतूनही ठोसपणे उमटतो. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तसंच अधिक प्रमाणात मध्य प्रदेशातल्या विंध्य पर्वतरांगा आणि उत्तर प्रदेशातील कैमूर अशा अतिघनतेच्या ठिकाणी ही शैलचित्रं आढळतात.

मध्य प्रदेशातल्या विंध्यपर्वताच्या कुशीत लपलेला विशाल चित्रात्मक कॅनव्हास म्हणजे ‘भीमबेटकाची शैलचित्रं’ (Bhimbetka Rock Art). सन २००३ मध्ये ‘जागतिक वारसास्थळ’ (World Heritage Site) म्हणून भीमबेटका इथल्या गुंफा व चित्रित शैलाश्रये (Rock-shelters) यांना दर्जा मिळाला आणि ती जगप्रसिद्ध झाली. खरं तर नर्मदेच्या काठावरच्या हातनोरा या ठिकाणी, सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा प्रागैतिहासिक काळातला ‘होमिनिड’ मानव वास्तव्यास होता.

मोठ्या प्रमाणात सापडलेल्या प्रागैतिहासिक अवजारांवरून त्याचं अस्तित्व निश्चित होत गेलं. मध्य भारतातल्या दामोह, रायसेन, सोन व्हॅली, महानदी व्हॅली इत्यादी अनेक भागांत हेच दृश्य दिसून येतं. यातल्या रायसेन जिल्ह्यात दहा किलोमीटरवर पसरलेल्या सात टेकड्या आणि सुमारे साडेसातशेहून अधिक शैलाश्रये आहेत. ती ‘भीमबेटका’ या नावानं संबोधली जातात.

भीमबेटकातली शैलचित्रं हे विविध प्रसंगांचं एकत्रित संचित आहे. त्यात सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडतं आणि मानवाचं भूप्रदेशाशी अधिक काळ संलग्न असणं प्रतिबिंबित होतं.

हा वारसा जगासमोर आणण्याचं श्रेय डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर (पुरातत्त्वज्ञ) यांना जातं. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात रेल्वेतून भोपाळ ते इटारसी असा प्रवास करत असताना दूरवर वालुकाश्म शैलाश्रयांची रचना त्यांनी पाहिली व उत्सुकता निर्माण होऊन सर्वेक्षण सुरू केलं.

या शैलाश्रयांमध्ये दडलेल्या चित्रांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यांतून १९७२ मध्ये या प्रस्तरगुहांच्या समान्वेषण संशोधनास सुरुवात झाली. डॉ. वाकणकर, डॉ. वीरेंद्रनाथ मिश्रा, डॉ. यशोधर मठपाल आणि इतर सहकारी यांनी मिळून पाच वर्षं (१९७३-७७) उत्खनन केलं. या उत्खननात स्वित्झर्लंडमधल्या बसेल इथल्या ‘फोक आर्ट म्युझियम’मधल्या सुसान हास यांचाही सहभाग होता.

इथल्या पुराश्मयुगीन अवजारांचं, शैलचित्रांचं उत्खनन हे भारतीय पुरातत्त्वामध्ये महत्त्वाचं योगदान ठरलं. डॉ. वाकणकर यांना ‘भारतीय शैलचित्रांचे जनक’ (Father of Indian Rock Art) म्हणून, तसंच शैलचित्रांच्या संशोधनासाठी पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ. वाकणकरांच्या मते, ‘गोट्यांची/दगडांची अवजारं वापरणाऱ्या अश्मयुगीन संस्कृतीपासून ते अवघ्या ३०० वर्षांपूर्वीच्या गोंड राजवटीपर्यंत सलग इतिहासाच्या खुणा जपणारं हे संपूर्ण भारतातलं एकमेव स्थान आहे.’

भीमबेटकामधल्या चित्रांचा निर्मितिकाळ साधारण इसवीसनपूर्व २० हजार ते इसवीसनपूर्व १० हजार वर्षांपूर्वीचा आहे. असंख्य चित्रांवर चित्रं काढली गेलेली असल्यामुळे एकावर एक थरांची तौलनिक कालगणना ठरवण्यात आली आहे. चित्रांच्या संदर्भात सर्वांत प्राचीन कालखंड (१) उत्तर पुराश्मयुगीन आहे, त्यानंतर कालखंड (२) मध्याश्मयुगीन व कालखंड (३) ताम्रपाषाणयुगीन आहे.

इतकी वर्षं ही चित्रं,त्यांचे रंग कसे काय टिकून असतील याचा अभ्यास करताना, भौगोलिक परिस्थिती आणि त्यांचं त्या काळचं विकसित तंत्र हे केंद्रस्थान बनतं. निवडलेला वालुकाश्म हे त्यांच्या गुणधर्मांमुळे गुहांच्या-दगडांच्या भिंती चित्रांसाठी सहज माध्यम बनले आहेत. आसपासच्या प्रदेशातल्या मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या नैसर्गिक खनिजांपासून सोळाहून अधिक रंग चित्रात वापरण्याचं कौशल्य त्या वेळच्या मानवाकडं होतं हे अभ्यासलं गेलं आहे.

यात मुखत्वे जमिनीच्या थरांमध्ये हिमटाईट या खनिजाचा चुरा आढळला आहे. या खनिजाचा वापर चित्रांमधल्या तांबड्या रंगाच्या छटेतली वैविध्ये आणण्यासाठी, तर पांढरा रंग चुनखडीपासून तयार केला गेला आहे. पाणी, चीकसम घटक, प्राण्यांची चरबी यांतून रंगद्रव्यं वापरली गेली असावीत.

विविध शतकांतले स्तर बारकाईनं पडताळून पाहता, सुरुवातीच्या बहुतेक चित्रांमधले विषय हे वन्यप्राण्यांचे व शिकारीचे प्रसंग, प्राण्यांचे तीसहून अधिक प्रकार, वन्यप्राण्यांशी झगडणारा मानव, धार्मिक लोककलेतली आकारचिन्हे, मिथकं, भौतिक संस्कृती असे एकूणच जीवनशैलीशी निगडित आहेत.

नंतरच्या काळातल्या चित्रांमध्ये पाळीव प्राणी, मिरवणुका व लढाईचे प्रसंगसुद्धा दिसतात. चित्रांतल्या मानवाकृतींत स्त्री-पुरुष, लहान मुलं-मुली असं वर्गीकरण आढळतं. हत्तींवर व घोड्यांवर स्वार झालेल्या मानवाकृती भाले, ढाल-तलवारी व धनुष्यबाण घेऊन चित्रित केल्या गेल्या आहेत, तर काहींना आभूषणं, वेशभूषा प्रदान केल्या गेल्या आहेत.

भीमबेटकामधलं वैशिष्ट्यपूर्ण आणि नाट्यात्मक चित्रण म्हणजे, भलं मोठं ‘रानडुक्कर’; मात्र त्याला बैलासारखी डोक्यावर शिंग आहेत. पण ती गेंड्याच्या शिंगासारखी आहेत. शिंगं, हत्तीसारखी ओठांची रचना आणि सामना करणारी; खरं तर ‘मेलो आता’ अशी भावनात्मक लहानशी मानवाकृती तिथं दिसते आणि त्याचबरोबर खेकडाही दृष्टीस पडतो. गुहेच्या खडकांवर काही अनोखे खोलगट खड्डे/आकार आहेत. हे म्हणजे ‘ऑडिटोरियम गुहे’चं वैशिष्ट्य. संशोधकांच्या मतानुसार, ते धार्मिक हेतूसाठी वापरलं गेलं असावं.

प्रागैतिहासिक चित्रांमधले वन्यप्राणी हे वास्तविक अथवा हालचाली करताना त्रिमितभास दर्शवतात, तर नंतरच्या काळातल्या चित्रांमधल्या प्राण्यांचे आकृतिबंध काहीसे कृत्रिम आणि स्थिर वाटतात.

त्या काळच्या चित्रकारांनी गेंडा, गवा, म्हैस, नीलगाय, हत्ती, वाघ, सिंह, सांबर, हरीण, माकड, रानडुक्कर, कासव, मासा, साप इत्यादी तत्कालीन जैवविविधतेचं, वास्तविक दर्शन घडवलं आहे.

काही चित्रांत शरीराचा आतील भाग क्ष-किरण तंत्रशैलीनं किंवा शरीररचनात्मक रेषांनी अथवा मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या नक्षीनं रेखाटलेला दिसतो. याउलट ताम्रपाषाणयुगीन चित्रांत माळवा मृद्भांड्यांवर आढळणाऱ्या आकारांसारखी जाळी, वेलांट्या किंवा भौमितिक आकार दिसतात. ऐतिहासिक काळातल्या चित्रांमध्ये ब्राह्मी व अलीकडच्या काळातल्या लिपींमध्ये लिहिलेली अक्षरं आढळतात.

सर्व चित्रं उठावदार, लयबद्ध, प्रवाही (Dynamic) असून त्यांच्यातला जोमदारपणा पाहणाऱ्याला जाणवतो. या चित्रांमधून प्रागैतिहासिक ते ऐतिहासिक काळातल्या मानवांची सौंदर्यदृष्टी व कलाकुशलता तर दिसतेच; त्याखेरीज त्या त्या काळातल्या लोकजीवनाविषयीही फार मोलाची माहिती मिळते.

भीमबेटका शैलचित्रशैली विशिष्ट भूप्रदेशाच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारताचा वैभवशाली वारसा आहे. हा वारसा भारताच्या मूळच्या चित्रशैलीचा प्रणेता आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

(लेखिका ह्या चित्रकार, पुरातत्त्व-सहाय्यक संशोधक असून,हैदराबाद इथल्या ‘प्लीच इंडिया फाउंडेश’मध्ये कार्यरत आहेत.)

भीमबेटकामधली गुहाचित्रं

मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी एखादी कला जोपासणं आवश्यकच असतं. चित्रकला ही अशाच अनेक कलांपैकी एक. चित्रकलेचेही विविध पैलू असतात.
Bhima Island cave painting
Bhima Island cave paintingsakal

- अजेय दळवी, ajeydalvi2@gmail.com

मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी एखादी कला जोपासणं आवश्यकच असतं. चित्रकला ही अशाच अनेक कलांपैकी एक. चित्रकलेचेही विविध पैलू असतात. भारतीय चित्रकलेच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंविषयीची ओळख आपण या सदरातून करून घेणार आहोत. चित्रकलेच्या संदर्भात पाश्चिमात्य चित्रशैली आणि आशिया खंडातली चित्रशैली पूर्णपणे भिन्न आहे. तुलना करून पाहताना युरोपीय शैलीमध्ये जसं दिसतं तसं चित्र काढलं जातं.

त्या चित्राचा रंग, छायाभेद, अवकाश या बाबी परस्परांत नकळत मिसळत जातात. त्यातून हुबेहूब दृश्य साकारलं जातं. मात्र, आशिया खंडात; विशेषतः चीन, जपान, भारत इथल्या पारंपरिक चित्रांमध्ये प्रामुख्यानं बाह्य रेषा दिसतात, तसंच चित्रावकाशातले तपशील छायाभेद न करता रंगवले जातात. दृश्यघटक संकल्पनेत रूपांतरित होऊन आशय तयार होतो.

भारतीय चित्रकलेचा आढावा घेताना असं दिसून येईल की इथला समाज, संस्कृती, भिन्न बोलीभाषा, त्यांच्या वेगवेगळ्या लिपी यांचं हे मिश्रण आहे. असं असूनदेखील पूर्ण उपखंडातली चित्रकला ही भारतीय चित्रकला म्हणून सहज कळून येते.

पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती काही लाख वर्षांपूर्वी झाली असावी असं मानलं जातं. तेव्हापासून ते लिखित इतिहासाला प्रारंभ होईपर्यंतच्या विस्तीर्ण काळाला ‘प्रागैतिहासिक काळ’ असं म्हटलं जातं. या काळाचे अश्म, ताम्र, पाषाण व लोहयुग असे ठळक भाग पडतात. या काळांत मानवानं लाकूड, हाडं, शिंगं, यांबरोबरच मुख्यत्वे दगड व नंतर धातू आदी साधनांचा वापर केला.

पुराणाश्मयुगापासून ते नवाश्मयुगापर्यंतचा काळ जगातल्या भिन्न भागांत प्रगतीच्या दृष्टीनं वेगवेगळा मानला जातो. त्याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. तिथून पुढं विचार केला तर सर्वात प्राचीन शिलालेख - इसवीसनपूर्व ३४०० च्या सुमाराचा - इजिप्तमध्ये आढळला आहे. इजिप्त आणि मेसापोटोमिया या प्रदेशांतल्या मानवानं केलेली प्रगती इतरांपेक्षा खूप पुढची होती, असं अभ्यासक नमूद करतात.

यासंदर्भात भारतातल्या प्रागैतिहासिक परिस्थितीचा कलेच्या दृष्टीनं विचार करताना आफ्रिका, युरोप, मध्य अमेरिका, चीन, इंडोनेशिया यांप्रमाणेच भारतातही मानवी अस्तित्वाचे पुराणश्मयुगापासून ते नवाश्मयुगापर्यंत भरपूर पुरावे आढळतात.

उपलब्ध संशोधन आणि पुरावे यांच्यानुसार, भारतातल्या आदिमानवाची अवजारेदेखील प्राण्यांची हाडं, लाकूड आणि दगड यांपासूनच तयार केलेली होती. साबरमती, गोदावरी, प्रवरा या नद्यांच्या काठी, तसंच आंध्र प्रदेशातलं कर्नुल, कर्नाटकातलं बेल्लारी आणि ओडिशा आदी ठिकाणी अशा प्रकारचे अवशेष सापडले आहेत.

हजारो वर्षांच्या या प्रक्रियेत मानवाची प्रगती सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला शिकारीसाठी आवश्यक त्या साधनांचा विकास होत गेला, जो कालांतरानं पुराण अश्मयुगापर्यंत अग्निनिर्मितीच्या कौशल्यापर्यंत झाला. डोंगरकपारीत राहून प्राण्यांची शिकार करून अन्न मिळवण्यापेक्षा, शेती करून धान्य पिकवण्याचा शोध हा मोठा बदल ठरला. नदीकाठावर विकसित झालेलं मानवी जीवन अधिक स्थिर आणि तुलनेनं सुरक्षित झालं. नदीकाठी वस्ती करून लहानशा समाजात मानव एकत्र, समूहानं राहू लागला. संस्कृती, समाज या संकल्पना याच ठिकाणी विकसित झाल्या.

शिकार करून जगणारा भटका माणूस डोंगरकपारींत राहत असे. नदीकाठी स्थिर झाल्यावर त्याची गरज निवाऱ्याची होती. कदाचित सुरुवातीचे आडोसे अगदीच प्राथमिक स्वरूपाचे असतील. झावळ्या, मातीच्या कच्च्या विटा, नंतर अग्नीचा वापर करून पक्क्या विटा या क्रमानं वास्तुकलेचा विकास झाला.

जीवनावश्यक वस्तू, धान्य, पाणी साठवून ठेवण्याच्या गरजेमुळे टोपल्या, मातीची भांडी तयार करायला सुरुवात झाली. सुरुवातीला हातानं आणि नंतर चाकावर भांडी तयार होऊ लागली.

ओल्या मातीवर बिंदू, वक्र रेषा किंवा नागमोडी रेषा, वर्तुळ असं नक्षीकाम होऊ लागलं. नंतर त्यामध्ये पशू-पक्ष्यांचे सांकेतिक आकार, मानवी हालचालींची रेखाटनं अशी भर पडत गेली.

काश्मीर, बंगाल, महाराष्ट्र, मध्य भारत इथं आणि नंतर कर्नाटकाच्या बेल्लारी इथं अशा अवजारांचा मोठा कारखाना उत्खननात सापडला. तेव्हा नवाश्मयुगातली अनेक कलावैशिष्ट्यं दिसून आली. त्याचबरोबर जगभर अनेक ठिकाणी आढळणाऱ्या अश्मयुगीन गुहाचित्रांप्रमाणे भारतात आदमगड, रायगड, सिंगनपूर, जोगीमरा, लिखुनिया, बजारिया अशा ठिकाणी गुहाचित्रं आढळून आली आहेत.

यांमधली सर्वात वैशिष्ट्यपूर्ण घटना सन १९५७ मध्ये डॉ. व्ही. एस. वाकणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या, भीमबेटका इथल्या संशोधनातून, जगासमोर आली. त्या ठिकाणी साधारणतः ६५० लहान-मोठ्या गुहा आढळून आल्या आहेत. फिकट तांबड्या आणि पांढऱ्या रंगाबरोबरच सोळाहून अधिक रंगघटकांचा वापर असणाऱ्या या चित्रांमध्ये जंगली प्राण्यांचा सामना करणारा मानव, शिकारीचे प्रसंग, सुमारे एकोणतीसहून अधिक प्राण्यांचे प्रकार, अनेक प्रकारचे पक्षी, हत्यारं, भौमितिक आकार, तसंच अनेक मूर्त-अमूर्त आकार चित्रित केलेले आहेत.

ही चित्रं बघता, कदाचित मानव तिथं समूह करून राहत असावा, तसंच तिथल्या दीर्घकालीन वास्तव्यात अनेक जणांनी मिळून ही चित्रं रेखाटली असावीत हे जाणवतं. भीमबेटकामधल्या शैलचित्रांमधून मध्याश्मयुगातल्या मानवाचं जनजीवन व्यक्त होतं.

होशंगाबाद आणि पंचमढीजवळच्या सुमारे पन्नास गुहांमध्ये चरणाऱ्या गाई, प्राणी, शिकारदृश्यं दिसतात. सिग्नोर इतल्या चित्रांत सोंड वर केलेले हत्ती, लांब शिंगांची जनावरं, जंगली प्राणी यांच्या शिकारीची दृश्य रंगवलेली आहेत. भारतात अश्मयुगीन गुहाचित्रांविषयी अनेक वर्षं संशोधन सुरू आहे.

चित्रकलेच्या बाबतीत तर धन्य वाटावं असा वारसा भीमबेटकाच्या रूपानं जगासमोर आला आहे. भीमबेटकापासून सुरू झालेल्या चित्रप्रवासात कालांतरानं विविध घटक, वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, संस्कृती, अंतर्गत अनेक आक्रमणं, स्थलांतरं, पर्यावरण, बदलती जीवनशैली असे घटक परिणाम करत गेले. भारतभूमीवर झालेली परकीय आक्रमणं, पारतंत्र्य यांचाही मोठा प्रभाव पडत गेला. मंगोल, पर्शियन, ब्रिटिश, पोर्तुगीज यांच्या राजवटीमुळे अनेक सांस्कृतिक आदान-प्रदान नकळत होत गेले.

काळाच्या प्रत्येक टप्प्यावर भारतीय चित्रशैली अधिक व्यापक, समृद्ध, वैश्विक होत गेली. प्राचीन काळ, सांस्कृतिक विकास, विविध शैली, परंपरांपासून ते चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या अमूर्त कलाशैलीपर्यंतचा अस्सल भारतीय म्हणता येईल असा दीर्घ प्रवास पुढच्या लेखांमधून आपण पाहणार आहोत.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

देवभूमी ‘कसबा’

रत्नागिरी जिल्ह्यात मध्ययुगीन काळातलं एक महत्त्वाचं; पण विस्मृतीत गेलेलं, महाराष्ट्राच्या इतिहासातल्या दुर्दैवी घटनेचा साक्षीदार असलेलं आणि आजही आपला ऐतिहासिक बाज टिकवून ठेवलेलं गाव म्हणजे ‘कसबा संगमेश्वर’.
Devbhumi Kasba Sangmeshwar
Devbhumi Kasba SangmeshwarSakal

कोकण म्हणजे देवभूमी. नारळी-पोफळीच्या बागा, लांबलचक समुद्रकिनारे, छोट्या वस्त्या, टुमदार घरं आणि पाण्याचे असंख्य लहान-मोठे प्रवाह...रत्नागिरी, गणपती पुळे, अलिबाग, तारकर्ली, देवबाग यांसारख्या असंख्य समुद्रकिनारी फिरायला गेल्याशिवाय सुट्ट्या सार्थकी लागत नाहीत हा महाराष्ट्रातल्या लोकांचा ठाम समज आहे. त्यातही, दक्षिण कोकणात पर्यटनस्थळांची संख्या प्रचंड आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मध्ययुगीन काळातलं एक महत्त्वाचं; पण विस्मृतीत गेलेलं, महाराष्ट्राच्या इतिहासातल्या दुर्दैवी घटनेचा साक्षीदार असलेलं आणि आजही आपला ऐतिहासिक बाज टिकवून ठेवलेलं गाव म्हणजे ‘कसबा संगमेश्वर’. रत्नागिरी आणि चिपळूण यांसारख्या महत्त्वाच्या शहरांपासून अगदी सारख्याच अंतरावर वसलेलं हे ऐतिहासिक गाव.

कसबा संगमेश्वर हे जुन्या वस्तीचं गाव आहे. इथं एखादी मोठी बाजारपेठ असावी याचा अंदाज नावावरूनच लागतो. कसब्याचं इतिहासातलं ठळक अस्तित्व आपल्याला जाणवतं ते शिलाहार-कल्याणी चालुक्यकाळात. शिलाहार राजा अपराजित यानं संगमेश्वर आणि काही परिसर जिंकून दक्षिण कोकण भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, तर चालुक्य राजा सोमेश्वर यानं काही काळ आपलं राज्य ‘कसबा संगमेश्वर’मधून चालवल्याचं आपल्या शिलालेखात नोंदवून ठेवलं आहे. एवढंच नव्हे तर, राजा रामचंद्रदेव यादव यांच्याही काळात यादवांनी हा प्रदेश जिंकून घेतल्याची नोंद ताम्रपटात आहे.

कसब्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावात असणारी अठरा मंदिरं. इसवीसनाच्या तेराव्या शतकापासून ते अगदी आजतागायत कसबा गावामध्ये मंदिरांची उभारणी सुरू आहे. अंबरनाथचं शिवमंदिर सोडलं तर, संपूर्ण कोकणात एवढी पुरातन; पण सुस्थितीतली बांधीव मंदिरं कुठंही नाहीत.

या गावातलं सर्वात पुरातन मंदिर म्हणजे ‘कर्णेश्वरमंदिर’. कर्णेश्वर पंचायतन प्रकरातलं. एक मुख्य देवता आणि तिच्या चारही बाजूंनी चार देवता अशा पाच देवतांच्या मंदिरसमूहाला ‘पंचायतन’ असं संबोधलं जातं. कसबा गावातलं सर्वात अलंकृत आणि भव्य असं हे मंदिर आहे असं म्हणता येईल.

कर्णेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे, इथं दशावतारात ‘बलराम’ दाखवण्यात आलाय, तर समुद्रमंथनाचा प्रसंग कोरताना विष्णूच्या ‘कूर्म’ अवताराऐवजी ‘नाव’ दाखवण्यात आली आहे. कसबा हे मध्ययुगात बंदर होतं. आजूबाजूला असणाऱ्या जीवनपद्धतीचा प्रभाव स्थापत्यावर कशा प्रकारे होतो, याचं हे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

भैरव, चामुंडा, नृसिंह यांसारख्या उग्र देवतांचं शिल्पांकन मंदिरावर जास्त प्रमाणात केल्याचं आढळतं, तसंच मंदिराच्या मागच्या बाजूला ‘सूर्यमंदिर’ आहे. कर्णेश्वर मंदिरसमूहातली तीन मंदिरं पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर सूर्यमंदिराचा आजच्या स्थितीत केवळ अंतराळ आणि गाभारा अस्तित्वात आहे. राशिचक्राच्या प्रभावळीत कोरलेल्या सूर्यदेवाच्या प्रतिमेची रचना मात्र विशेष आहे.

संपूर्ण मंदिरपरिसर पाहता ‘कर्णेश्वर’ हे कसब्याचं मूळ दैवत असावं, अशी एकूण शक्यता आहे. कर्णेश्वरमंदिराच्या समोरच ‘वरुणा’ आणि ‘अलकनंदा’ या नद्यांचा संगम झालेला आहे. या संगमावर अठराव्या शतकातलं ‘संगमेश्वरमंदिर’ उभारण्यात आलं आहे. या नदीसंगमाचा उपयोग आजही विविध धार्मिक विधींसाठी करण्यात येतो.

कसबा हे ‘तीर्थ’ म्हणून प्रसिद्ध होण्यामागं असलेली ही भौगोलिक परिस्थितीसुद्धा धान्यात घ्यायला हवी. कर्णेश्वरमंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर ‘सोमेश्वरमंदिर’ आणि ‘काशी विश्वेश्वरमंदिर’ आहे. नागर शैलीच्या या मंदिरांचा स्थापत्यकीय दृष्टिकोनातून निर्मितिकाळ चौदाव्या-पंधराव्या शतकापर्यंत मागं जातो. काशी विश्वेश्वरमंदिर आज तसं भग्नावस्थेत आहे; पण सोमेश्वरमंदिर सुस्थितीत आहे.

कसबा गावाची सर्वात दुर्दैवी आठवण म्हणजे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीमहाराज यांना झालेली अटक. सरदेसायांच्या वाड्याच्या परिसरात मुघल-मराठा सैन्यात धुमश्चक्रीला सुरुवात झाली आणि याच गावाच्या परिसरात शंभूराजे व कवी कलश यांना शत्रुफौजेकडून पकडण्यात आलं. सरदेसाई यांचा हा वाडा गावाच्या मुख्य चौकात, ‘छत्रपती शंभूराजे स्मारका’च्या शेजारी आहे.

या वाड्याच्या बरोबर मागच्या बाजूला काहीशा झुडपांमध्ये लपलेली चार मंदिरं दिसून येतात. ‘कुंभकेश्वरमंदिर’ या नावानं एका मंदिराचा उल्लेख ‘संगमेश्वरमाहात्म्या’त आढळत असल्यामुळे ही मंदिरं ‘कुंभकेश्वर मंदिरसमूह’ या नावानं ओळखली जातात. यातल्या एका मंदिराच्या बाहेरच्या बाजूला विशिष्ट क्रमामध्ये बत्तीस शिल्पं कोरलेली आहेत.

पहिल्या सोळा शिल्पांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती शैव संप्रदाय कशा प्रकारे स्वीकारत असे याचे टप्पे दाखवण्यात आलेले आहेत, तर उरलेली सोळा शिल्पं ही ‘शृंगारिक शिल्प’ असून त्यांच्यामार्फत ‘तंत्रमार्ग आणि तांत्रिक पूजाविधी’ यांचं अंकन केल्याचं आढळतं. वास्तविक, संपूर्ण कसबा संगमेश्वर गावात भैरवाला समर्पित एक-दोन मंदिरं आहेत आणि कित्येक मंदिरांवर भैरवप्रतिमांचं अंकन आहे.

एकट्या कर्णेश्वरमंदिरावर पंधरापेक्षा जास्त भैरव आढळतात. भैरवाचा शैव तांत्रिक संप्रदायाशी अगदी निकटचा संबंध आहे; विशेषतः कापालिक संप्रदायाचा भैरव हा इष्टदेवच आहे. याशिवाय, गावातल्या दोन नृसिंहमंदिरांवर, कर्णेश्वर-कुंभकेश्वरमंदिरावर असणारं ‘विदारण नृसिंहशिल्प’ आणि सरदेसाई यांच्यासारख्या सरदार घराण्याचं असणारं कुलदैवत यावरूनही नृसिंहाचं कसबा गावावर असणारं शतकांचं प्राबल्य आपल्याला जाणवतं.

भैरवाचा कसब्यावर असणारा प्रभाव, चामुंडा-महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवतांचं जाणवणारं ठळक अस्तित्व, लोकप्रिय नृसिंहोपासना आणि बलराम, ब्रह्म, सरस्वती, अनंतशायी विष्णू, नटराज यांसारख्या देवतांची उपस्थिती यांवरून कसबा संगमेश्वर गावावर अनेक संप्रदायांचा पगडा असल्याचं आणि शैव तांत्रिक संप्रदायाचा प्रभाव जास्त असल्याची जाणीव आपल्याला होते.

कसबा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘संगमेश्वरमाहात्म्य’ या सह्याद्रीखंडात लिहिल्या गेलेल्या स्थानपोथीमुळे गावाचं धार्मिक महत्त्वही जाणवतं. शिलाहार, चालुक्य, यादव, बहमनी, सिद्दी, आदिलशाही, मराठे यांसारख्या राज्यकर्त्यांनी हजारो वर्षं कसब्याचं राजकीय महत्त्व टिकवून ठेवलं. गावाची रचना आजही शंभर-सव्वाशे वर्षं जुन्या वाडीसारखीच आहे.

कसब्यात गेल्यावर या गूढरम्य वातावरणात मंदिरांचा फेरफटका करणं ही आनंदाची गोष्ट आहे; तर दुसरीकडं, महापराक्रमी छत्रपती संभाजीमहाराजांच्या अटकेच्या दुर्दैवी घटनेची आठवण अस्वस्थ करून जाते...तर तिसऱ्या बाजूला, छत्रपतींचं रक्षण करण्यासाठी धारातीर्थी पडलेले सुभेदार म्हाळोजी घोरपडे, मराठा वीरयोद्धे आणि शंभूराजेंसमवेत शेवटपर्यंत संकटाशी मुकाबला करणारे कवी कलश यांच्या स्वामीनिष्ठेची गोष्ट ऐकणं म्हणजे स्फुल्लिंग चेतवण्यासारखं आहे. ‘कसबा संगमेश्वर’ असं एकाच वेळी अनेक भावनांची जाणीव करून देत राहतं...

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच. डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

पंच चुली : नातं पांडवांशी

आपल्या भारताचा जाज्वल्य इतिहास हा हिमालयाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाभारत असो वा रामायण, हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता घडविणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांमध्ये हिमालयाचा उल्लेख आहे.
panchachuli mountain five pandavas history significance culture himalaya
panchachuli mountain five pandavas history significance culture himalayaSakal

- उमेश झिरपे

आपल्या भारताचा जाज्वल्य इतिहास हा हिमालयाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. महाभारत असो वा रामायण, हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता घडविणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घटनांमध्ये हिमालयाचा उल्लेख आहे. हिमालयात वसलेले असंख्य पर्वत आजही इतिहासातील या घटनांची साक्ष देतात. यातील एक उल्लेखनीय पर्वत म्हणजे पंच चुली.

महाभारतातील पाच पांडव अर्थात युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांनी हिमालयामार्गे स्वर्ग गाठला, तेव्हा त्यांनी पृथ्वीतलावरील शेवटचे भोजन जिथं केलं, तो पर्वत म्हणजे पंच चुली. या पर्वत शिखर समूहामध्ये पाच शिखरे असून सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणं या शिखरांवरून आकाशाकडं परावर्तित होऊन आसमंत उजळवतात.

तसेच सूर्यास्तानंतर जिवंत चूल जशी असते तसा प्रकाश काही वेळासाठी या पर्वतांमधून दिसून येतो. पाच शिखरे म्हणजे पाच पांडवांचा संदर्भ अन् चुलीसारखं दिसणारं दृश्य या दोहोंमुळं या शिखराला पंच चुली असं नाव पडलं.

सूर्यास्तानंतर दिसणारं दृश्य हे मोक्ष प्राप्तीशी साधर्म्य साधणारं असून याचा संदर्भ पांडवांच्या पृथ्वीवरील शेवटच्या भोजनाशी आहे, असं पायथ्याजवळ असणाऱ्या गावांमध्ये राहणारे स्थानिक आवर्जून सांगतात.

उत्तराखंड राज्यात असलेल्या गढवाल हिमालय अन् नेपाळमध्ये असणाऱ्या गुरन्स हिमालयाच्या दरम्यान असलेली डोंगररांग म्हणजे पंच चुली. वायव्येकडून आग्नेय दिशेकडे पसरलेल्या या पर्वतशिखरांच्या समुदायामध्ये ६३५५ मीटर उंच पंच चुली-१,

६ हजार ९०४ मीटर उंच पंच चुली-२, ६ हजार ३१२ मीटर उंच पंच चुली-३, ६ हजार ३३४ मीटर उंच पंच चुली ४, ६ हजार ४३७ मीटर उंच पंच चुली-५ या शिखरांचा समावेश होतो. सोबतीला ६ हजार ४१ मीटर उंच नागलिंग,

६ हजार ७१ मीटर उंच बैंती, ६ हजार ५३७ मीटर उंच राजरंभा, ६ हजार १०२ मीटर उंच तेलकोट, ६ हजार ४१० मीटर उंच नागलफू व ५७८२ मीटर उंच शदेव या दुर्गम शिखरांचा समावेश होतो.

उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ भागातील मुन्सीयारी हे पिथोरगड जिल्ह्यातील गाव, या शिखर समूहांच्या सर्वांत जवळ असलेली मोठी मानवी वस्ती आहे. हा भाग सध्या येथील पर्यटनामुळं प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो,

तेव्हा पंच चुली शिखर समूहाचं दर्शन घेतलं होतं. गोरी गंगा नदीवर वसलेल्या मुन्सीयारी गावातून पंच चुली शिखरं अगदी स्पष्ट दिसतात. पहाटेच्या वेळी उजळलेला आसमंत अन् संध्याकाळी पर्वतांभोवती असलेला चित्त वेधणारा प्रकाश अगदी मनात घर करून गेला.

या मुन्सीयारी इथंच नंदादेवी मंदिर आहे, या मंदिराच्या मागच्या बाजूस पर्वत शिखरं अगदी खुलून दिसतात. स्वतःचा शोध घेण्यासाठी जी शांती व एकाग्रता हवी असते, ती इथं गेल्यावर मिळते. कदाचित हीच शांती किंवा मोक्ष प्राप्तीची अनुभूती पांडवांना देखील इथंच मिळाली असेल, असा विचार मनात येतो.

गिर्यारोहणाचा विचार करता पंच चुली शिखरांचा समूह हा नेहमीच हटके गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांच्या नजरेत राहिला आहे. १९२९ पासून ब्रिटिशकालीन गिर्यारोहकांनी पंच चुली शिखर समूह चढण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात यश आलं नाही.

पुढं तब्बल ४३ वर्षे भारतीय तसेच विदेशी गिर्यारोहकांनी पंच चुली शिखर गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पंच चुली अबाधितच राहिलं. या पाच शिखरांमधील सर्वांत उंच शिखर असलेल्या पंच चुली-२ शिखराच्या नैर्ऋत्य धारेवर काहीशा खालच्या बाजूस तीन उंचवटे आहेत.

गिर्यारोहक या शिखरवजा उंचवट्यांनाच पंच चुली समूहातील शिखरं समजून चकतात. या ४३ वर्षांच्या काळात असंच झालं असावं, असा गिर्यारोहण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. पंच चुली शिखर समूहातील पहिलं शिखर चढलं गेलं ते म्हणजे ६३५५ मीटर उंच असलेलं पंच चुली- १.

भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील एक आदरणीय नाव असलेल्या मेजर हुकूम सिंह यांच्या नेतृत्वाखाली इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्या संघाने ही कामगिरी केली. १९७२ साली, म्हणजे पंच चुली शिखरावर पहिला प्रयत्न करणाऱ्या ह्यूज रटलेज यांच्या १९२९ च्या मोहिमेनंतर तब्बल ४३ वर्षांनी यश आले.

एका वर्षांनंतर पंच चुली-२ शिखराच्या नैर्ऋत्य धारेनं इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्याच संघानं चढाई करत या शिखर समूहातील सर्वांत उंच शिखर चढाई यशस्वी करण्याची कामगिरी केली. या संघात एकूण १८ गिर्यारोहक सहभागी झाले होते.

गिर्यारोहक महेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली. पंच चुली - १ व २ शिखरांवर यशस्वी चढाई झाल्यावर तब्बल १९ वर्षांनी पंच चुली-५ या ६४३७ मीटर उंच शिखरावर १९९२ साली चढाई यशस्वी झाली तर पंच चुली-४ शिखरावर १९९५ मध्ये न्यूझीलंडच्या गिर्यारोहक संघानं यशस्वी चढाई केली.

पाच शिखरांमध्ये उंचीनं सर्वांत कमी असलेल्या, मात्र चढाईसाठी तितक्याच अवघड असलेल्या पंच चुली-३ शिखरावर २००१ मध्ये यशस्वी चढाई करण्यात आली. पाचही शिखरांवर सर्वांत प्रथम यशस्वी चढाई करण्यामध्ये तब्बल पाच दशकांचा कालावधी लागला, यावरूनच या शिखरांची दुर्गमता, त्यातली कठीणता लक्षात येते.

पंच चुली शिखर समूह हा अद्‍भूत, अगम्य व तेवढ्याच नयनरम्य हिमालयाची साक्ष आहे. या शिखर समूहाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं इथं अनेक आव्हानं आहेत, सोबतीला इथं असणारा नजारा हा तितकाच देखणा आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनं देखील शिखर समूहाच्या जवळ असणारा भाग वेगानं विकसित होत आहे. पांडवांशी थेट संबंध असल्यानं भावनिकदृष्ट्या देखील पंच चुलीचं वेगळं महत्त्व आहे. हिमालयातील हा आगळा वेगळा शिखर समूह एकदा तरी बघायला हवा.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

राजवंश भारती : इक्ष्वाकू राजवंश (सूर्यवंश)

भारताच्या इतिहासातील असा प्रागैतिहासिक कालखंड मौखिक परंपरेने वेद आणि पुराणे यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे.
Sri Rama, the best king of Ikshvaku dynasty

लेखक : ॲड. सुशील अत्रे

जो इतिहास आपल्याला परिचित आहे, त्याच्याही आधी काहीतरी घडून गेलेले असतेच. त्या कालखंडाला म्हणतात ‘प्रागैतिहासिक’. तो इतिहासच असतो; पण त्याचे दृश्‍य, भौतिक पुरावे समोर नसतात.

भारताच्या इतिहासातील असा प्रागैतिहासिक कालखंड मौखिक परंपरेने वेद आणि पुराणे यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. पण, त्याला काल्पनिक म्हणायचे आणि सोडून द्यायचे, ही शिकवण आपल्याच देशातल्या ठराविक विद्वानांनी दिली आणि ती आपण शिरसावंद्य मानली.

त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याआधी जणू भारताला इतिहासच नव्हता, अशा समजुतीत आम्ही वावरलो. पुराण कथांमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींना ‘काल्पनिक पात्रे’ मानण्याची आत्मघातकी सवय आपल्या मुलांना आपण खुशाल लागू करू दिली.

ती वस्तुस्थिती नाही. जरा डोळ्यांवरची झापडे बाजूला करून चिकित्सक वृत्तीने पाहू. (saptarang latest marathi article by sushil atre on rajvansh bharti Ikshvaku Dynasty suryavanshi khandesh nashik)

जगाच्या पाठीवर होऊन गेलेल्या सर्वच प्राचीन संस्कृतींच्या आपापल्या पुराण कथा आहेत. त्यात ‘महाप्रलय’ ही एक कथा प्रत्येक संस्कृतीत आढळतेच, हा केवळ योगायोग नव्हे. ती एक सर्वज्ञात घटना होती, हाच त्याचा अर्थ आहे.

आपल्या पुराणांनुसार हा महाप्रलय येऊन गेला आणि त्यानंतर नवे जग वसले. ही जगबुडीची घटना सुमारे १५/१६ हजार वर्षांपूर्वी घडली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे.

त्या काळी जो नेता होता- राजा होता त्यालाच ‘वैवस्वत मनू’ म्हटले आहे. विवस्वानाचा- सूर्याचा- मुलगा म्हणून वैवस्वत! एका अर्थी प्रलयोत्तर नव्या जगाचा आदिपुरुष.

या मनूला दहा मुलगे व मुलगी होती. त्यातील एकाचे नाव इक्ष्वाकू. तो अत्यंत पराक्रमी व दक्ष राजा होता. त्याच्या नावे त्याचा वंश ओळखला गेला, इक्ष्वाकू वंश. तो ‘सूर्या’चा वंशज म्हणून इक्ष्वाकू वंशाला ‘सूर्यवंश’ही म्हणतात.

या राजवंशाची राजधानी होती अयोध्या. ती स्वत: मनूनेच वसवली म्हणतात. असे म्हणायला हरकत नाही, की भारतातील सगळ्यात प्राचीन- बहुधा आद्य राजवंश म्हणजे इक्ष्वाकू वंश. सगळ्यात प्राचीन वाङ्‍मयात- ऋग्वेदात दहाव्या मंडलात इक्ष्वाकू कुळाचा उल्लेख आहे.

एखाद्या वंशात कोणी प्रचंड कर्तृत्ववान राजा होऊन गेला की तो वंश पर्यायवाचक म्हणून त्याच्याही नावे ओळखला जातो. तसेच, इक्ष्वाकू वंशात पुढे ककुस्थ आणि रघू हे चक्रवर्ती सम्राट होऊन गेले.

त्यांच्या नावावरून हेच कूळ ‘काकुस्थ’ आणि ‘रघूकुल’ म्हणून प्रसिद्ध झाले. या वंशातील सगळ्यात प्रसिद्ध आणि देवस्वरूप राजा म्हणजे अर्थात राजा रामचंद्र, प्रभू श्रीराम. रामरक्षेत रामाचा उल्लेख ‘काकुस्थ’ आणि ‘रघुकुलतिलकम्’, ‘रघुवंशनाथम्’ असा येतो.

राजवंश भारती : विस्तीर्ण भारतीय कालपट...

याशिवाय, रामाच्या पूर्वी होऊन गेलेले इक्ष्वाकू वंशातील प्रसिद्ध राजे कोणते ते पाहा- ज्याच्या नावावरून या धरतीला ‘पृथ्वी’ म्हणू लागले तो राजा पृथू, आद्य चक्रवर्ती सम्राट मांधाता, ऋग्वेदात उल्लेख असलेल्या दाशराज्ञ युद्धाचा नायक राजा सुदास, दुर्वास मुनींचे गर्वहरण करणारा भक्तराज अंबरीष, आदर्श सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, ज्याच्या नावाने समुद्राला ‘सागर’ नाव मिळाले तो राजा सगर, त्याचाच पणतू भगीरथ; ज्याने अफाट प्रयत्नांनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली, तसेच ज्याने प्रत्यक्ष कुबेरावर, स्वर्गावर स्वारी करण्याची तयारी केली होती आणि ज्याच्या नावावरून महाकवी कालिदासाने ‘रघुवंश’ महाकाव्य रचले, तो पराक्रमी राजा रघू, त्याचा नातू राजा दशरथ, त्याचे चारही दिगंतकीर्ती पुत्र- राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सगळेच इक्ष्वाकू वंशातील राजे आहेत.

एवढेच नव्हे, तर जैन पुराणांमध्ये असा एक मतप्रवाह आहे, की इक्ष्वाकू वंशातच पहिले तीर्थंकर श्री ऋषभदेव आणि इतरही अनेक तीर्थंकर जन्मले. तसेच, बौद्ध ग्रंथानुसार बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थ हा शाक्य राजकुमारही सूर्यवंशात जन्माला आला होता.

लव-कुशांनंतर या वंशात जे राजे होऊन गेले, त्यातील ५० व्या पिढीतील राजा म्हणजे ‘बृहद्बल’. हा बृहद्बल महाभारत युद्धात कौरवांकडून लढला आणि अभिमन्यूच्या हाती मारला गेला. याचा अर्थ रामायण ते महाभारत यात सुमारे ५० पिढ्यांचे अंतर आहे.

महाभारत युद्धानंतर राज्यांची समीकरणे पूर्ण बदलली. सारा भारत, सम्राट युधिष्ठिराच्या अधिपत्याखाली आला. कालांतराने उत्तर सूर्यवंश राजा बृहद्क्षण याच्यापासून पुढे सरकला.

सुमारे २७ पिढ्या गेल्यावर, राजा सुमित्र हा कोसलनरेश असताना मगधवंशीय महापद्म नंदाने त्याचा पराभव केला. हा काळ मौर्य साम्राज्य स्थापनेच्या काही वर्षे आधीचा आहे. इथून पुढे ज्ञात इतिहासाचा धागा जुळतो.

इक्ष्वाकू सूर्यवंशात साधारणत: ११७ राजे असे होऊन गेले, ज्यांच्या नावाचा संदर्भ पुराणांमध्ये किंवा महाकाव्यांमध्ये सापडतो.

काही असेही असतील, जे नगण्य असल्याने त्यांचा स्वतंत्र उल्लेख नाही. ते विचारात घेता इक्ष्वाकू वंशाचे सुमारे सव्वाशे राजे आणि शंभरावर पिढ्या भारताच्या इतिहासात वावरल्या आहेत.

वाकाटकांचं रामटेक

रामटेकचा इतिहास सर्व अभ्यासक-संशोधकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतो. रामटेक, मनसर आणि नगरधन हे त्रिकूट पुरातन इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे.
ramtek village vakataka to maratha era historical significance vidarbha
ramtek village vakataka to maratha era historical significance vidarbhaSakal

- केतन पुरी

नागपूरपासून अवघ्या ५० किलोमीटकवर असलेलं गाव...रामटेक. विदर्भातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक. नागपूरकर भोसले आणि पर्यायानं मराठ्यांच्या इतिहासाशी अगदी जवळचं नातं असलेल्या रामटेकचा इतिहास सर्व अभ्यासक-संशोधकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतो. रामटेक, मनसर आणि नगरधन हे त्रिकूट पुरातन इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे.

रामटेक आणि त्याच्या प्राचीनत्वाबाबत कित्येक गोष्टी सांगता येतील. अगदी वाकाटक ते मराठा कालखंडातल्या अनेक वास्तू सुस्थितीत अस्तित्वात आहेत. महाकवी कालिदासाच्या वास्तव्यानं बहरून गेलेल्या रामटेकला नागपूरहून बसनं जाणं जास्त सोईस्कर आहे.

हा डोंगर श्रीरामांच्या वास्तव्यानं पुनित झाला असल्याचं मानलं जातं.तो सातपुडा पर्वतराजीच्या ‘अंबागड’ डोंगररांगेत मोडतो. रामटेकच्या लक्ष्मणमंदिरातल्या शिलालेखामध्ये या भागाचं नाव पुरातन काळात ‘सिंधुगिरी’ ‘तपोगिरी’ असल्याचं आढळतं.

वाकाटक नृपती दुसरा पृथ्वीसेन याच्या मांढळ इथल्या ताम्रपटात या भागाचा उल्लेख ‘रामगिरी’ या नावानं आला आहे. थोर संशोधक, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी महाकवी कालिदासावर सखोल संशोधन केलं आहे.

कालिदासानं ‘मेघदूता’त वर्णिलेले ‘रामगिरी’ म्हणजेच ‘रामटेक’ होय, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. भारतात अनेक ठिकाणी रामगिरी हे स्थान आहे; परंतु कालिदासाचं रामगिरी म्हणजे रामटेक होय, हे आता सर्वमान्य झालं आहे.

स्थानमाहात्म्यानुसार, श्रीराम आणि लक्ष्मण अगस्तीमुनींच्या आश्रमात जिथं वास्तव्याला होते ते हेच ठिकाण. या ठिकाणी असणाऱ्या सर्व राक्षसांचा नाश करण्याची श्रीरामांनी प्रतिज्ञा केली होती. ‘टेक’ या शब्दाचा अर्थ होतो प्रतिज्ञा. म्हणून हा भाग ‘रामटेक’ या नावानं ओळखला जात असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

याशिवाय, ‘मेघदूता’च्या सुरुवातीच्या श्लोकात सीतेच्या स्नानगृहाचे वर्णन आल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे, अगदी कालिदासाच्या काळापासून या भागाचा रामकथेशी असलेला संबंध दिसून येतो.

रामटेकच्या डोंगरावर अनेक मंदिरं आहेत, जलाशये आहेत. इथल्या मंदिरांची निर्मिती सुरू झाली ती वाकाटक काळापासून. हे कार्य अगदी मराठा कालखंडापर्यंत सुरू होते. इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात वाकाटकांचं या प्रदेशावर वर्चस्व होतं.

म्हणजे, जवळजवळ दीड हजार वर्षं हा भाग धार्मिक, तसंच स्थापत्य आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून कायम राहिलेला आहे. इसवीसनाच्या चौथ्या शतकात विदर्भात आणि थोड्याफार प्रमाणात मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयाला आलं.

दोन शाखांमधे विभागलं गेलेलं ‘वाकाटक’ घराणं म्हणजे एक प्रतिष्ठित घराणं. याच घराण्यातल्या ‘वत्सगुल्म’ या शाखेच्या राजांनी अजिंठा लेण्यांमधे आपल्या कलेची छाप उमटवली आणि दुसऱ्या ‘नंदीवर्धन’ शाखेनं विदर्भात अभूतपूर्व राज्यक्रांती केली.

वत्सगुल्म म्हणजे आजचं वाशीम, तर नंदीवर्धन म्हणजे रामटेकजवळ असणारं नगरधन. या नगरधन शाखेनं आपले वैवाहिक संबंध गुप्त घराण्याशी प्रस्थापित केले होते. ‘परममहेश्वर भक्त’ आणि ‘परमभैरवभक्त’ अशी उपाधी लावणाऱ्या रुद्रसेनानं ‘परमभागवत भक्त’ असं बिरुद मिरवणाऱ्या ‘प्रभावतीगुप्त’ या राजकन्येशी विवाह केला.

पतीच्या निधनानंतर प्रभावतीगुप्त हिनं सक्षमपणे राज्यकारभार चालवला. रामटेकवर एक मारुतीमंदिर होतं. गाभाऱ्यात सहा फुटांचा, पूर्णपणे शेंदरानं माखलेला भव्य मारुती होता. काही दशकांपूर्वी पुरातत्त्व-अभ्यासकांचा एक चमू या मंदिराची पाहणी करण्यासाठी गेला.

मंदिरावर असलेला चुन्याचा थर उतरवण्याचं काम सुरू होतं. मंडपाच्या भिंतीवरील चुना निघाला आणि भिंतीवरचा शिलालेख प्रकाशात आला. वाकाटकसम्राज्ञी प्रभावतीगुप्तचा शिलालेख. तिनं हे मंदिर बांधल्याचा उल्लेख त्यात होता.

आतल्या मारुतीचा शेंदूर उतरवला गेला आणि त्या थराखाली असलेली नृसिंहाची भव्य प्रतिमा समोर आली. अतिशय रुबाबात बसलेल्या नृसिंहाच्या उजव्या हातात चक्र होतं. लक्ष्मीशिवाय असणाऱ्या या नृसिंहाला ‘केवल नृसिंह’ या नावानं ओळखलं जातं.

अशीच हुबेहूब प्रतिमा असलेल्या नृसिंहाचं मंदिर बाजूलाच होतं. त्याचं नाव ‘रुद्र नृसिंह.’ आपल्या पतीच्या - रुद्रसेनाच्या - आठवणीत प्रभावतीगुप्त हिनं हे मंदिर बांधून घेतलं. वाकाटककाळात वैष्णव आणि शैव या संप्रदायांचा प्रचार आणि प्रसार फार जोमानं झाला.

महाराष्ट्रात नृसिंहोपासना वाढण्यामागं वाकाटक होते. विदर्भ हा पूर्वमध्ययुगीन काळात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कलास्थापत्याच्या दृष्टीनं कायम केंद्रस्थानी राहिलेला भाग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींचं प्राचीनत्व विदर्भाशी जाऊन पोहोचते. गणेशोपासनेचा पुरातन पुरावा म्हणून वाकाटककाळात आढळून आलेल्या आद्य गणेशप्रतिमांचाही विचार इथं करायला हवा.

दुसरी गोष्ट म्हणजे, वाकाटककालीन ‘केवल नृसिंह’ आणि ‘रुद्र नृसिंह’ ही मंदिरं महाराष्ट्रातली सुस्थितीत असलेली सर्वात जुनी मंदिरं आहेत. महाराष्ट्रातल्या सर्वात पुरातन मंदिरांमध्ये यांचा समावेश होतो. या मंदिरांना दीड हजार वर्षांचा इतिहास आहे.

‘भारताचं सुवर्णयुग’ म्हणून ज्यांची कारकीर्द ओळखली जाते, त्या गुप्त साम्राज्याचे व्याही असलेल्या वाकाटकांनी महाराष्ट्रात कला, साहित्य, स्थापत्य या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. रामटेकवर या दोन मंदिराबरोबरच वराहमंदिर, त्रिविक्रममंदिर या वाकाटककालीन वास्तू आहेत. त्रिविक्रममंदिर पूर्णपणे कोसळलं असलं तरीही या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.

पण रामटेकवर फक्त वाकाटकांच्याच इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत का? नाही, नक्कीच नाही. महाकवी कालिदास, महान चक्रधरस्वामी, म्हाइंभट्ट यांच्याबरोबरच रामचंद्रदेव यादव आणि रघुजी भोसले यांसारख्या क्षत्रीयांनीही आपल्या अस्तित्वाच्या खुणा इथं उमटवल्या आहेत. त्याची माहिती घेऊ या पुढच्या भागात...

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच. डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

हरिश्चंद्र आणि विश्वामित्र

आपल्यापैकी बहुतेक जणांना राजा हरिश्चंद्राची गोष्ट माहिती आहे. मार्कंडेय पुराणातही ही कथा सांगितलेली आहे.
harishchandra and vishwamitra
harishchandra and vishwamitrasakal

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

आपल्यापैकी बहुतेक जणांना राजा हरिश्चंद्राची गोष्ट माहिती आहे. मार्कंडेय पुराणातही ही कथा सांगितलेली आहे. एकदा राजा हरिश्चंद्र जंगलात हरणाचा पाठलाग करत असतो. त्यावेळी अचानक त्याला ‘आम्हाला वाचवा’ असा एका स्त्रीचा आक्रोश ऐकू येतो. हरणाचा पाठलाग सोडून देत राजा मोठ्यानं साद देतो, ‘घाबरू नकोस !

माझ्या सत्तेत कोण दुष्ट व्यक्ती हीन कृत्य करत आहे?’ तो आवाजाच्या दिशेनं जातो. कोणत्याही कामात अडचणी निर्माण करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला विघ्नराज तिथं असतो. विघ्नराज विचार करतो, ‘अत्यंत शूर विश्वामित्रांनी उग्र तपस्येला सुरुवात केलेली आहे. त्यात यशस्वी होण्यासाठी ते कठोर व्रतांचे आचरण करत आहेत. आतापर्यंत कोणालाही न मिळालेले शिव आणि इतर शक्तींविषयीचे ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची इच्छा आहे.

‘विश्वामित्र प्रचंड ऊर्जावान आहेत, तर आम्ही अत्यंत दुर्बल आहोत,’ अशी भीती वाटून (स्त्रीरुपात असलेल्या) विविध सिद्धी किंचाळत आहेत. त्या घाबरून आकुंचन पावत आहेत. यातच, हा राजा इकडेच येत असून वारंवार ‘घाबरू नका, घाबरू नका,’ असे आवाहन करत आहे. मी तत्काळ त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि मला हवं ते साध्य करून घेतो.’

विघ्नराज राजा हरिश्र्चंद्राच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याच्या प्रभावाखाली आलेला राजा संतापून विचारतो, ‘हे सर्व कोण करत आहे? मी अधिपती आहे, सामर्थ्यवान आणि ऊर्जावान आहे आणि मी स्वतः येथे उपस्थित आहे.’ राजाचे हे शब्द ऐकून विश्वामित्र संतापतात. ऋषी कृद्ध होतात, तेव्हा सर्व प्रकारच्या सिद्धी तत्काळ गुप्त होतात.

तपस्येचं मूर्तिमंत रूप असलेल्या विश्वामित्रांना राजानं पाहिलं मात्र, आणि क्षणार्धात भीतीनं त्याला ग्रासलं; त्याच्या पायातलं त्राण गेलं व तो पिंपळाच्या पानांप्रमाणं थरथर कापू लागला. विश्वामित्र म्हणाले, ‘हे दुरात्म्या, इथंच थांब.’ अत्यंत लीन होत राजानं साष्टांग दंडवत घातला आणि तो उत्तरला, ‘हे महापुरुषा, माझा हाच धर्म आहे. माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. हे ऋषिवर! कृपया माझ्यावर संतापू नका. मी केवळ माझ्या धर्माचं पालन करत होतो.

धर्म जाणणाऱ्या पृथ्वीपतींनी दान आणि संरक्षण करावं. धर्माच्या या पवित्र नियमांचं पालन करण्यासाठी त्यानं धनुष्य उचलून लढायला हवं.’ विश्वामित्रांनी विचारले, ‘हे राजा! तू दान कोणाला द्यायला हवं? कोणाचं रक्षण करायला हवं? खरा धर्मपालक असशील, तर माझ्या या प्रश्नांची लगेच उत्तरं दे.’

हरिश्चंद्रानं उत्तर दिलं, ‘उत्तम ब्राह्मणांना आणि ज्यांची निर्वाहाची साधने तुटपुंजी आहेत, त्यांना दान द्यायलाच हवं. भयानं ग्रस्त असल्याचं नेहमी रक्षण करायला हवं. संकट निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात निश्चितपणानं लढायला हवं.’

विश्वामित्र म्हणाले, ‘राजधर्माला शिरोधार्य मानणाऱ्या राजांपैकी तू असशील, तर मग ऐक. मी ब्राह्मण आहे. मला काही तरी प्राप्त करायचं आहे. ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला दक्षिणा दे.’ हे शब्द ऐकल्यानंतर राजानं निःश्वास सोडला. तो विश्वामित्रांना म्हणाला, ‘हे सर्वात्मका ! मनात कोणताही किंतू न ठेवता, मी तुमची काय सेवा करू शकतो, ते सांगा. ती गोष्ट दुष्प्राप्य असली तरी, ती तुम्हाला मिळवून देईनच. सोने, चांदी, पुत्र, कन्या, माझं शरीर, माझं जीवन, राज्य, नगर, समृद्धी किंवा इतर तुम्हाला जे हवं ते सांगा.’

विश्वामित्र म्हणाले, ‘हे राजा! तू मला जी भेट दिली आहे, ती मी स्वीकारलेली आहे. मात्र, त्याआधी तू मला राजसूय यज्ञासाठीची दक्षिणा दे.’ हरिश्चंद्र उत्तरला, ‘हे ब्राह्मण! मी तुम्हाला दक्षिणा देतो. तुमची काय इच्छा आहे, ती सांगा.’ त्यावर विश्वामित्र म्हणाले, ‘वीरपुरुषा ! सर्व समुद्र, भूमी, गावं, अधिवास यांच्यासहित संपूर्ण पृथ्वी आणि रथ, अश्व, हत्ती, संपत्ती आणि इतर सर्वप्रकारच्या ऐश्वर्यासह तुझं सगळं राज्य दे.

तुझी पत्नी, तुझा पुत्र आणि तुझं स्वतःचे शरीर हे मला नको. धर्माचा तू ज्ञाता आहेस, तू जिथं जातोस, तिथं तुझा धर्म जातो( आणि त्यामुळेच, तोदेखील मला नको). बाकी मला सर्व दे.’ चेहऱ्यावर कोणतेही नकारात्मक भाव न आणता, राजानं ऋषींची ती मागणी ऐकली. अत्यंत तृप्त मनानं त्यानं हात जोडले आणि सर्व काही मान्य केलं. विश्वामित्र त्याला म्हणाले, ‘हे राजयोग्या, तू मला राज्य, भूमी, सैन्य आणि ऐश्वर्य दिलेस.

जर माझ्यासारख्या संन्याशाच्या हातात राज्य दिलं आहेस, तर आता त्या संपत्तीचा स्वामी कोण?’ हरिश्चंद्रानं उत्तर दिलं, ‘हे भूदेव! ज्या क्षणाला मी तुम्हाला साम्राज्य दिलं, त्या क्षणापासून तुम्हीच त्याचे स्वामी आहात. तुमच्याशिवाय दुसरा कोण राजा असेल?’ हे ऐकून विश्वामित्र म्हणाले, ‘जर तू मला तुझं राज्य आणि सर्व पृथ्वी दिली आहेस आणि त्या सर्वांचा मी स्वामी आहे, तर मग तू इथून निघून जा.

कमरेची तलवार काढून टाक आणि सर्व अलंकारांचाही त्याग कर. तुझी पत्नी आणि मुलाला बरोबर घे आणि लज्जारक्षणासाठी केवळ झाडांच्या सालींचाच वापर कर.’ ते सर्व काही राजानं मान्य केले आणि पत्नी शैब्य व नवजात पुत्रासह निघून जाण्याची तो तयारी करू लागला.

तो निघून जाणार, इतक्यात विश्वामित्रांनी त्याचा मार्ग अडवला आणि तो राजाला म्हणाला, ‘राजसूय यज्ञाची दक्षिणा मला दिल्याशिवाय तू कुठे निघून जात आहेस?’ हरिश्चंद्र उत्तरला, ‘मी तुम्हाला राज्य दिलं आहे. आता केवळ ही तीन शरीरं इतकंच माझ्याकडं शिल्लक आहे.’ त्यावर विश्वामित्र म्हणाले, ‘ते काहीही असो, तू मला यज्ञाची दक्षिणा द्यायलाच हवी. लक्षात ठेव, ब्राह्मणाला दिलेलं वचन पाळलं नाहीस, तर विनाशाचा धनी होशील.

हे राजा ! राजानं केलेल्या यज्ञात जोपर्यंत ब्राह्मण संतुष्ट होत नाहीत, तोपर्यंत त्यांना दक्षिणा देत राहावे.’ हरिश्चंद्र म्हणाला, ‘पण माझ्याकडं देण्यासाठी काहीही उरलेलं नाही. पुढील काही काळात मी तुम्हाला नक्की देईन.’ विश्वामित्रांनी विचारले, ‘हे प्रजापालका, मी त्यासाठी किती काळ वाट पाहू? माझ्या शापाग्निमध्ये तू दग्ध होण्याआधी मला या प्रश्‍नाचे उत्तर दे.’ हरिश्चंद्रानं उत्तर दिले, ‘हे विप्रवर ! मी तुम्हाला एका महिन्याच्या आत दक्षिणा देईन. सध्या माझ्याकडं कोणतीही संपत्ती नाही.’

दक्षिणेसाठी संपत्ती गोळा करण्यासाठी हरिश्चंद्र काय करतो, ही कथा मी तुम्हाला पुढील सदरात सांगेन.

अनुवाद : सारंग खानापूरकर

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणे आणि वेद तसंच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.)

झुमका गिरा रे... बरेली के बजार में

अनादी काळापासून माणसाला संगीताची गोडी वाटत आली आहे. आनंद व्यक्त करताना लोक काही ना काहीतरी वाजवून आपला आनंद व्यक्त करत असत. आजही करतात. त्यातून वाद्ये निर्माण झाली.
jhumka in bareli
jhumka in barelisakal

अनादी काळापासून माणसाला संगीताची गोडी वाटत आली आहे. आनंद व्यक्त करताना लोक काही ना काहीतरी वाजवून आपला आनंद व्यक्त करत असत. आजही करतात. त्यातून वाद्ये निर्माण झाली. ती वाजवता वाजवता लोकांनी चाली लावल्या. त्या सर्वदूर पसरून लोकसंगीत तयार झालं, लोकगीत साकारलं. जाणकार संगीतकारांनी असं लोकसंगीत व्यवस्थित ‘पॅलिश’ करून आपल्यापर्यंत पोहोचवलं.

सर्वसामान्यांना लोकसंगीत नेहमीच आवडत आलं आहे. रस्त्यानं अल्लाची आळवणी करत जाणारा फकीर किंवा गळ्यात अडकवलेली पेटी आणि ढोलक वाजवत रस्त्यावर गाणं गात रस्त्यावरच्या ‘पब्लिक’ची करमणूक करून पैसे गोळा करणारे भटके लोक हे तर लोकसंगीताचे प्रसारक. हे लोक सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत रस्त्यांवर सहज दिसत असायचे.

‘झुमका गिरा रे’ हे त्याचं स्वरूपाचं साठ वर्षांपूर्वीचं गाणं; पण आजच्या तरुण-तरुणींनासुद्धा हा झुमका भुरळ पाडतोय; त्याचं कारण लोकसंगीत. केवळ रसिकांनाच नव्हे तर, आजच्या काळातल्या संगीतकारांनाही ‘झुमका’ अधूनमधून आव्हान देत असतो. अलीकडेच करण जोहरच्या ‘रॅाकी और रानी’ या चित्रपटात संगीतकार प्रीतमनं मूळच्या ‘झुमका गिरा रे’चा मुखडा मूळ चालीसह एका गाण्याला जोडला काय अन् गाणं हिटच झालं. सध्या जिकडं तिकडं तरुणाई ‘झुमका What झुमका’ असं विचारत असते!

आज २०२४ मध्येसुद्धा टीव्हीवर, समाजमाध्यमांवर ‘झुमका गिरा रे’ धुमाकूळ घालत आहे. अर्जितसिंग आणि जोनिता गांधी यांच्या स्वरातल्या रिमिक्स ‘झुमका’वर आलिया भट्ट आणि रणबीरसिंह हे चांगलेच थिरकलेत. ‘मेरा साया’ या १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं आजही लोकप्रिय असलेलं हे लोकगीत.

राजस्थानातल्या एका गावात एका नर्तकीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे... नर्तकी देखणी आहे... तिचा नाचही दिलखेचक आहे... गावप्रमुख आणि गावकरी असे सगळेच गाण्यात रमले आहेत...पण नर्तकी आहे दरोडेखोरांची हस्तक. तिचे दरोडेखोर साथीदार गावकऱ्यांमधे मिसळून गाणं ऐकत नाच बघत आहेत...मधूनच ते एकमेकांना इशारे करता आहेत...गाववाल्यांना गाण्या-बजावण्यात गुंतवून त्या गावात दरोडा टाकण्याचा किंवा कुणाला तरी पळवून न्यायचा त्यांचा इरादा दिसून येतो.

‘झुमका गिरा रे हाये ऽऽऽऽ’ अशी पहिल्या ओळीलाच दाद मिळते ती ‘हाये ऽऽऽ’ असं गाताना आशा भोसले यांच्या स्वरातला जो ‘कातिलाना अंदाज’ आहे, त्यामुळे. पुढंसुद्धा ‘बरेली के बजार में’ म्हणताना ‘बजार में’ या शब्दांना त्यांनी जोरदार ठसका दिला आहे. आशा भोसले यांच्या या करामतीनं गाणं सुरुवातीलाच चांगली पकड घेतं. आपल्या प्रेमाची कहाणी सांगताना ती ग्रामीण तरुणी सुरुवात तक्रारीच्या सुरात करते.

मध्येच ती लडिवाळपणे ‘लाख मनाया...सैंया ने कलैया नाही छोडी...हाय कलैया नाही छोडी’ असं सांगते, तेव्हा आशा भोसले यांनी जो लाडीक स्वर काढला आहे तो लाजवाब. संगीतकार मदन मोहन यांनी चाल देताना लोकसंगीताचा ठेका बरोबर पकडला आहे.

सुरुवातीचं प्रील्यूड म्युझिक आणि मधल्या इंटरल्यूडला पिपाणी, बासरी, ढोलक, तुणतुणं असं सगळं ग्रामीण वाद्यांचं संगीत हे, जणू एखाद्या जत्रेत ऐकायला मिळणारं संगीत असावं, तसंच कानांवर येतं.

ढोलकचा ताल संपूर्ण गाण्याचा तोल सांभाळतो आणि सगळ्या वाद्यांच्या साथीनं नर्तकीच्या पायातल्या चाळातल्या घुंगरांची छमछम गाण्यात रंगत आणते. चेहऱ्याला कोणताही मेकअप न केलेली एखादी खेडूत यौवना जशी आकर्षक दिसते तसं हे गाणं आहे! त्यातल्या ठसक्यामुळे ते एकदा ऐकलं की दिवसभर गुणगुणावंसं वाटतं.

गीतकार राजा मेहदी अली खाँ यांनी हे गाणं लिहिलं तेव्हा कदाचित त्यांच्या नजरेसमोर ग. दि. माडगूळकर यांची ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला’ ही लावणी असावी अशी शंका येते. बुगडीला हिंदी प्रतिशब्द झुमका आणि ‘सातारा’च्या जागी ‘बरेली’ असा बदल करून हा झुमका बरेलीच्या बाजारात ‘सांडला’ असावा! ‘माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक टकमक मला तो पाहतो’ या पंक्तीसुद्धा ‘सैंया आए, नैन झुकाए, घर में चोरी चोरी’ असं साधर्म्य दिसतं. असो. तरीही ही गीतरचना आहे दाद देण्याजोगीच.

शालीन सौंदर्यपरी साधना ही काही त्या काळातल्या वैजयंतीमालासारखी अथवा हेलनसारखी कसलेली नृत्यांगना नव्हे. तरीही नृत्याचं थोडंफार अंग तिला असावं. रस्त्यावर नाचणारी नर्तकी शोभेल इतपत चांगल्यापैकी नाच तिनं केला आहे. त्यामुळे तिच्या पदन्यासांकडे दुर्लक्ष करून मुद्राभिनयाला झुकतं माप दिलं गेलं आहे. सतत क्लोजअप वापरून तिचं देखणेपण अधिक अधोरेखित करण्यात आलं आहे.

गाण्यातल्या शब्दांचे भाव चेहऱ्यावर दाखवण्यात साधनाही यशस्वी झाली आहे. प्रियकराच्या भेटीचा अनुराग, लटका राग, खट्याळ छेडछाड असं सगळंच. खांद्यावरून पुढं सोडलेल्या दोन लांबसडक वेण्या, परकरवजा घागरा, अंगभर पोशाख, कानात अन् गळ्यात मोठमोठे दागिने यांमुळे ती ‘बंजारन’ दिसते खरी. मात्र, केसांच्या बटा कपाळावर पुढं ओढलेल्या असा तिचा ‘तो सुप्रसिद्ध साधना कट’ इथंपण स्पष्ट दिसतो.

झुमका हरवल्याची गोष्ट गीतामधून लयबद्धरीत्या, गतिमान नृत्याविष्कारातून सांगण्याचा लोकनृत्याचा हा प्रकार दिग्दर्शक राज खोसला यांनी कथेत मुद्दाम गुंफला असावा, असं संपूर्ण गाणं बघून झाल्यावर वाटतं. नर्तनकलेतले करन्यास, नेत्रपल्लवी, घायाळ करणारे कटाक्ष यांचा पुरेपूर वापर या गाण्याच्या वेळी करण्यात आलेला आहे. इतक्या गतिमान नृत्याविष्कारातून हे सारं अचूक टिपण्याचं कॅमेरामनचं कसब वाखाणण्याजोगंच.

गाण्यात पुरुषी आवाजातली एकच ओळ आहे. ‘फिर क्या हुआ?’ असं नर्तकीचा साथीदार तिला विचारतो. हा स्वर कुणाचा असावा याचा तर्क काही लागेना. हा स्वर त्या काळातले रेडिओ अनाउन्सर विनोद शर्मा यांचा आहे. अमीन सयानी यांचे ते समकालीन होत. ही माहिती संगीतकार मदनमोहन यांचे पुत्र संजीव कोहली यांनी मेलवर मला पाठवली.

हे गाणं जरी १९६६ मधलं असलं तरी त्याचे पडसाद आजपर्यंत अधूनमधून उमटत असतात. अलीकडचीच एक घटना अशी.

उत्तर प्रदेशात लखनौ-दिल्ली महामार्गावर बरेली नावाचं गाव आहे. या गाण्यामुळे ते गाव देशभरात चर्चेत आलं. ‘बरेलीत एक ‘झुमका चौक’ असायला हवा,’ अशी गावकऱ्यांची वर्षानुवर्षांची मागणी होती.

अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ‘बरेली विकास प्राधिकरणा’नं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ वरील एका चौकात दोनशे किलो वजनाचा धातूचा झुमका उंच स्तंभ उभारून लावण्यात आला आहे. त्या चौकाचं नामकरण ‘झुमका चौक’ असं करण्यात आलं आहे. अशा रीतीनं बरेलीच्या बाजारात चोपन्न वर्षांपूर्वी हरवलेला ‘तिचा’ झुमका अखेर गवसला म्हणायचा!

(लेखक हे हिंदी सिनेगीताचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

उंच आणि गूढ शिखरं

वर्ष १९७८. विविध रंगांच्या फुला-पानांनी सजलेल्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ इथून सर्वदूर पसरलेला हिमालय बघून मी हरखून गेलो होतो.
himalaya highest peak mount everest travel
himalaya highest peak mount everest travelsakal

- उमेश झिरपे

वर्ष १९७८. विविध रंगांच्या फुला-पानांनी सजलेल्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ इथून सर्वदूर पसरलेला हिमालय बघून मी हरखून गेलो होतो. मागं वळून पाहताना असं जाणवतं, की वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी हिमालयाचं नितांत सुंदर रूप मला बघायला मिळालं, हे माझं खूप मोठं भाग्य.

मी त्या वेळी हिमालय पाहिला अन् ‘लव्ह ऍट फर्स्ट साइट’ म्हणजे काय असतं हे तेव्हा खऱ्या अर्थानं लक्षात आलं. या अवाढव्य हिमालयाच्या कुशीत माझा चंचुप्रवेश झाला. आता साडेचार दशकांनंतर हिमालय माझं दुसरं घर झालं आहे.

हिमालयामुळं मला नवी ओळख मिळाली, हिमालयानं मला जिवाभावाची माणसं दिली, हिमालयामुळं मला एक नवी जीवनशैली समजून घेता आली, आत्मसात करता आली. हिमालयाची वेगवेगळी रूपं मला जाणून घेता आली, यातील सगळ्यात मूर्त रूप व ज्यामुळं हिमालयाची खरी ओळख आहे, ते म्हणजे तिथली पर्वत शिखरं.

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असो वा माउंट कैलास सारखं गूढ शिखर... दोन्हीचं माहेरघर हिमालयच. भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन व भूतान अशा पाच देशांमध्ये पसरलेल्या हिमालयाचा विस्तार उत्तरेकडील काराकोरम पर्वतरांगांपासून सुरू होतो ते थेट भूतान, अरुणाचल प्रदेश जवळ संपतो. खरंतर हिमालय हा देखील विविध पर्वतरांगांपासून बनला आहे.

शिवालिक हिमालय, अतिउंच शिखरांचा ग्रेटर हिमालय, कमी उंचीच्या डोंगरांचा लोअर हिमालय, काहीसा कोरडा असा तिबेटन हिमालय अशाप्रकारे हिमालयातील पर्वतरांगांचे नानाविध प्रकार आहेत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, चोवीसशे किलोमीटर लांब व जवळपास तीनशे किलोमीटर रुंद असलेल्या हिमालयीन पर्वतरांगेमध्ये एकूण १२० हून अधिक अशी शिखरं आहेत, ज्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची ही तब्बल ७ हजार मीटर एवढी आहे.

अशी अवाढव्य शिखरं सापडतात फक्त आणि फक्त हिमालयात. जगात एकूण १४ अशी उंची शिखरं आहेत, ज्यांची उंची ही तब्बल ८ हजार मीटरपेक्षा उंच आहे. यांना अष्टहजारी शिखरं म्हणतात. ही सर्व चौदा शिखरं हिमालयातच.

मला या चौदांपैकी आठ शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण मोहिमांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सर्वोच्च एव्हरेस्ट असो वा दुर्गम तिबेटमध्ये वसलेले माउंट च्यो ओयू. या शिखरांना सर्वार्थानं जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली.

ही शिखरं म्हणजे फक्त दगड माती अन् हिमानं आच्छादलेली प्राकृतिक रचना नाहीयेत, एक-एक शिखर हे तिथल्या निसर्ग संपन्नतेनं, स्थानिक लोकांच्या श्रद्धेनं, भौगोलिक संरचनेमुळं, अध्यात्म अन् पुराणांमध्ये त्याची ज्या पद्धतीनं नोंद घेतली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं ‘युनिक’ आहे.

या वेगळेपणाचा अनुभव मी अनेक वेळा ऐकलाय, वाचलाय, जगलोय. या लेखमालेच्या माध्यमातून हाच अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे. गंगा नदी, जी करोडो लोकांची जीवनदायिनी आहे, या गंगेचा उगम हिमालयातच झालाय.

ज्या दोन नद्यांचा संगम होऊन पुढं गंगा नदी बनते त्यातील एक भागीरथी. या नदीचा उगम ज्या शिखर समूहाच्या परिसरात होतो तो म्हणजे भागीरथी शिखर समूह. सिंधू नदी जिथं उगम पावते तो चंद्रभागा अर्थात सिबी शिखर समूह हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय वेगळा व विलक्षण आहे, यांचा हाच वेगळा गुणधर्म लेखमालेत उलगडणार आहोत.

सोबतच नंदादेवी शिखर माथ्यावर असं काय घडलं जेणेकरून अनेक दशकं ‘नंदादेवी नॅशनल पार्क’ सर्वांसाठी बंद होतं, धौलागिरी व अन्नपूर्णा शिखरांच्या मधून वाहत जाणाऱ्या गंडकी नदीचा भारतातील जीवनमानावर कसा परिणाम होतो व त्यात शिखरांचा नेमका कसा सहभाग आहे,

याची रंजक माहिती या वर्षभरात आपण जाणून घेणार आहोत. कैलास शिखराची गूढकथा, द्रौपदी का दांडा, चौखंबा शिखरांचं जुन्या काळातील महत्त्व, भारताबाहेरील शिखरांचं तिथल्या स्थानिक जीवनामध्ये असलेलं महत्त्व विविध लेखांतून अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असेल.

सोबतच शिखरांचं झालेलं नामकरण, त्यांची मोजली गेलेली उंची, गिर्यारोहण मोहिमा अशा विविध घटनांचाही आढावा आपण घेणार आहोत. पुढच्या भागापासून आपण एक-एक पर्वत जाणून घेऊ या. ही लेखमाला आपल्याला नक्की आवडेल, असा विश्वास आहे.

लालबाग पॅलेस; होळकरांच्या श्रीमंतीचं प्रतीक

भारताच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी असंख्य मराठा वीरांनी सर्वस्व अर्पण केलं.
Lal Bagh Palace

- केतन पुरी

आज १४ जानेवारी. सन १७६१ मध्ये आजच्याच दिवशी पानिपतच्या रणांगणावर मराठे आणि अफगाण यांच्या सैन्यात पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. भारताच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी असंख्य मराठा वीरांनी सर्वस्व अर्पण केलं.

पानिपत हे महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचं महत्त्वाचं पान आहे. याच पानिपतयुद्धातलं महत्त्वाचं सरदारघराणं, ज्या घराण्यानं शंभर-सव्वाशे वर्षं उत्तर हिंदुस्थानचा कारभार चालवला आणि भारतभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे ‘सरदार होळकर घराणं’. अठराव्या शतकात शिंदे-होळकर-भोसले या घराण्यांनी उत्तरेचं राजकारण समर्थपणे सांभाळलं.

होळकरांचं मुख्य ठाणं इंदूर शहरात. याच इंदूरमध्ये होळकरांचा भव्य राजवाडा आहे. महाराष्ट्रातून जाणारे कित्येक पर्यटक या राजवाड्याला भेट देतात; पण ‘लालबागमहाला’विषयी पर्यटकांना फारशी कल्पना नसते.

होळकर घराण्याचं कित्येक वर्षं निवासस्थान असलेल्या या महालाचं वैभव डोळे दिपवून टाकणारं आहे. भारतातल्या अतिश्रीमंत महालांमध्ये या ‘लालबाग महाला’चा समावेश होतो. तुकोजीराव होळकर (द्वितीय) यांच्या काळात सन १८८६ मध्ये या महालाच्या बांधकामाला सुरुवात झाली, तर त्यांचे नातू तुकोजीराव होळकर (तृतीय) यांच्या काळात बांधकाम पूर्ण झालं.

तब्बल ७२ एकर परिसरात पसरलेल्या जागेवर भलामोठा महाल आणि उद्यान तयार करण्यात आलं. आधी या उद्यानात फक्त गुलाबाची फुलं लावण्यात आली होती. फुलांमुळे संपूर्ण परिसर लाल रंगानं सजून जाई, म्हणून या महालाला ‘लाल बाग’ असं नाव देण्यात आलं.

या महालाचं प्रवेशद्वार म्हणजे ‘बकिंगहॅम पॅलेस’ची प्रतिकृती असून ते लंडन इथंच तयार करण्यात आलं आणि समुद्रमार्गे मुंबईला आणि तिथून इंदूरला आणण्यात आलं. महाल तीनमजली असून, एकूण पंचेचाळीसच्या आसपास खोल्या आहेत.

त्यांमध्ये अनेक शयनकक्ष आहेत, दिवाणखाने आहेत, ग्रंथालय-नृत्यकक्ष आहेत. दिवाणखान्यात आणि महत्त्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालिचे आहेत. सर्व महालात आतल्या बाजूनं इटालियन मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.

भिंतींवर सोन्याची कारागिरी आहे. दिवाणखान्याचं छत अतिशय मोठं, आकर्षक आणि श्रीमंती थाटाचं आहे. छतावर ‘ग्रीको-रोमन’ संस्कृतीच्या अनेक देवतांचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे. संपूर्ण महालात अनेक ठिकाणी छतांवर किंवा भिंतींवर आकर्षक चित्रं चितारलेली आहेत.

याचे चित्रकारसुद्धा ग्रीसवरून आल्याची माहिती उपलब्ध आहे. ही चित्रं खास या महालासाठीच तयार करण्यात आली आहेत. यांच्या प्रतिकृती जगात कुठंही उपलब्ध नाहीत. सर्वच खोल्यांमध्ये असणाऱ्या खुर्च्या, लाकडी मेज यांची निर्मिती युरोपातच केली गेली असून तिथून हे सर्व लाकडी साहित्य इंदूरमध्ये आणण्यात आलं.

महालामध्ये सर्वच ठिकाणी केलेलं बेल्जियम काचांचं काम पर्यटकांना आकर्षित करत राहतं. या संपूर्ण महालात असणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था मात्र नदीच्या पलीकडील बाजूला करण्यात आली होती. लालबाग महालाच्या मागच्या बाजूनं एक नदी वाहते. नदीच्या दुसऱ्या बाजूला शाही स्वयंपाकघर होतं. चुलीच्या धुरानं महालाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये हा उद्देश.

महाल आणि स्वयंपाकघर एका मोठ्या भुयारानं जोडलेलं होतं आणि तळघरातून जेवण पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी ‘विद्युत लिफ्ट’ची व्यवस्था करण्यात आली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मानानं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल आणि होळकरांच्या राजेशाही थाटाचं प्रतीक म्हणूनही याकडे पाहावं लागेल.

लालबाग महाल हा अतिशय श्रीमंती थाटाचा आहे. या महालाचे स्थापत्यविशारद होते बर्नार्ड ट्रिग्स. फ्रान्सिसी, आंग्ल आणि इंडो-इस्लामिक स्थापत्यशैलीचं अतिसुंदर मिश्रण या महालात झालेलं आहे.

या महालाची आणि आतल्या मौल्यवान वस्तूंची निर्मिती करण्याची जबाबदारी दोन कंपन्यांकडं देण्यात आली होती. आतल्या शिल्पांचं पॅनेल, ब्राँझपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, आतली चित्रं, दगडी वस्तू आणि लाकडी फर्निचरचं काम ‘मार्टिन अँड कंपनी, चेल्टनहम’ यांच्याकडे देण्यात आलं होतं, तर उर्वरित काम करण्याची जबाबदारी ‘वॉरिंग अँड गिलॉस’ या कंपनीकडे होती.

सन १९७८ पर्यंत या महालात होळकर राजघराणं वास्तव्याला होतं. तुकोजीराव महाराज (तृतीय) यांच्या मृत्यूनंतर मात्र तुकोजीरावांची नात उषाराजे यांनी आपल्या अमलात एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या अखत्यारीत संपूर्ण महालाचा कारभार तब्बल दहा वर्षं सांभाळला.

त्यानंतर, मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी महालाची योग्य देखभाल करण्याच्या उद्देशानं तो महाल सरकारच्या अमलाखाली आणला आणि सन १९८८ पासून लालबाग महाल सरकारच्या नियंत्रणात आहे.

इथल्या उद्यानाला जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. स्थानिकांच्या मते, सरकारनं या महालाची अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली असून, महालातल्या मौल्यवान वस्तूंची उत्तम देखभाल केली जात आहे. सरकारनं या ठिकाणी अतिशय सुंदर संग्रहालय उभारलं आहे.

इंदूरच्या ‘राजवाडा चौका’पासून अवघ्या तीन किलोमीटरवर हे वैभव आहे. अठराव्या शतकात महाराष्ट्रानं साऱ्या भारताचा राज्य कारभार हाकला. इंदूर, उज्जैन, बडोदा यांसारख्या ठिकाणी अतिशय भव्य आणि अतिशय सौंदर्यशाली वास्तू मराठा सरदारांनी उभारल्या. एकदा तरी हे सर्व काही प्रत्यक्ष भेट देऊन अनुभवायलाच हवं.

(लेखक हे सध्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व या विषयावर पीएच.डी. करत असून, पुरातत्त्वीय पर्यटनाच्या माध्यमातून मंदिर, शिल्प, लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)

शैलीदार आविष्कार!

डेवाॅन आणि कॉर्नवॉल प्रदेश इंग्लंडच्या दक्षिण पश्चिमेला वसलेले आहेत. त्या भागात फिरताना आपल्याला वेगवेगळी नैसर्गिक आणि भौगोलिक आकर्षणं बघायला मिळतात.
devon and cornwall area
- विशाखा बाग

भारतीय पर्यटकांमध्ये फारसे परिचित नसलेले इंग्लंडमधील डेवाॅन आणि कॉर्नवॉल प्रदेश समुद्रकिनारे, चुनखडीचे डोंगर, नॅशनल पार्क, जुने चर्च, कॅथेड्रल, किल्ले, नद्या, युनेस्को हेरिटेज साईट आणि हिरव्यागार गवताच्या कुरणांनी आपल्याला मोहवून टाकतात. एक परिपूर्ण पॅकेज तुम्हाला इंग्लंड ट्रिपमध्ये अनुभवायला मिळतं.

समुद्र, बीच, चुनखडीचे डोंगर, नॅशनल पार्क, जुने चर्च, कॅथेड्रल, किल्ले, नद्या, युनेस्को हेरिटेज साईट, आकर्षित करणारी हिरवी गवताची प्रचंड मोठी पसरलेली कुरणं अन् त्याचबरोबर मध्ययुगीन शतकातील गाव असं सर्व तुम्हाला इथे बघायला मिळतं. अशा प्रकारे एक परिपूर्ण पॅकेज तुम्हाला ट्रिपमध्ये अनुभवायला मिळतं. साधारण पाच दिवसांत डेवाॅन आणि कॉर्नवॉल अशा दोन्ही काऊंटीमध्ये आरामात फिरून तुम्ही सर्व गोष्टी बघू शकता.

कॉर्नवॉल प्रदेश कॉर्निश नागरिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर कॉर्निश पेस्टी आणि चहासाठीही ओळखला जातो. त्या काऊंटीच्या एका बाजूला ब्रिस्टॉलची खाडी आणि दुसरीकडे अटलांटिक महासागर आहे. संपूर्ण परिसरात फिरताना, निसर्गसौंदर्य अनुभवताना आणि समुद्र व वेगवेगळ्या बीचना भेट देताना अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. ऑगस्ट ते डिसेंबर आणि एप्रिल ते मे महिन्यांमध्ये तुम्ही या भागात भेट देऊ शकता. या काळात वातावरण खूपच आल्हाददायक आणि साधारण थंड असल्यामुळे फिरायलाही छान वाटतं.

ईचेन नदीच्या काठावर वसलेलं विंचेस्टर गाव कॅथेड्रल सिटी, विंचेस्टर युनिव्हर्सिटी, विंचेस्टर कॉलेज आणि वॉल्सविक कॅसलसाठी ओळखलं जातं. लंडनपासून ते फक्त शंभर किलोमीटरवर आहे. गावाच्या मध्य भागातून नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना छान प्रकारे राखलेली गवताची लॉन आहेत आणि त्यांच्या बाजूने चालत जाऊनच आपण वॉल्सविक किल्ल्यामध्ये पोहोचतो.

प्रचंड भव्य असं सहाव्या शतकात आणि गॉथिक शैलीमध्ये बांधलेलं विंचेस्टर कॅथेड्रल आम्ही आतून बघितलं. महत्त्वाचं म्हणजे युरोपमधलं ते प्रचंड मोठं असं कॅथेड्रल तर आहेच; परंतु इंग्लंडची ख्यातनाम कादंबरीकार आणि प्रसिद्ध लेखिका जेन ऑस्टिन हिची कबरसुद्धा त्यात आहे. ५३,४८० चौरस फुटांत पसरलेल्या कॅथेड्रलला चार लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात.

चर्च ऑफ इंग्लंडच्या अखत्यारीत येणाऱ्या या कॅथेड्रलमध्ये अद्ययावत सायन्स म्युझियम, लायब्ररी आणि इलेक्ट्रॉनिक बायबल अशी मुख्य आकर्षणं आहेत. डेवाॅन काऊंटीमधील एक्झिटर या शहरापर्यंत जाताना मध्ये पुन्हा एकदा आम्ही थांबलो ते अतिशय महत्त्वाचं पर्यटन केंद्र असलेल्या स्टोन हेज या ठिकाणी.

आदिमानवाने किंवा एलिअन्सने पाच हजार वर्षांपूर्वी ब्ल्यू स्टोन आणि सॅण्ड स्टोनने साकारलेलं एक प्रचंड मोठ वर्तुळ म्हणजेच सध्याची युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, स्टोन हेज. पुरातत्त्व शास्त्रज्ञाने आतापर्यंत या ठिकाणाबद्दल वेगवेगळ्या थिअरीज आणि निष्कर्ष काढले आहेत, की नक्की ही दगडांची रांग आणि वर्तुळ कोणी उभं केलं... आदिमानवाने की एलिअन्सने?

एवढे मोठे दगड इथे कसे आणले? मुळात ब्ल्यू स्टोन आणि सॅण्ड स्टोन हा खडक या भागात सहजासहजी अजूनही उपलब्ध नाहीय, मग इतक्या वर्षांपूर्वी ते कोणी, कसे व कुठून आणले? ते अशा वर्तुळाच्या स्वरूपात इथे का मांडून ठेवले आहेत, हे एक प्रचंड मोठं कोडं पुरातत्त्व शास्त्रज्ञाला अजूनही उलगडलेलं नाहीय. हे सगळं बघत असताना आपल्याही मनात दहा प्रश्न उपस्थित होतात आणि आपणही निःशब्द होतो.

या ठिकाणी आदिमानवाच्या त्या काळातील झोपड्यासुद्धा बांधल्या आहेत आणि त्याचबरोबर एक म्युझियमही इथे पर्यटकांसाठी खुलं आहे. व्हिजिटर सेंटरच्या जवळ रेस्टॉरंट आणि रेस्ट रूम्स आहेत; पण मुख्य स्टोन हेज या साईटला भेट देण्यासाठी व्हिजिटर सेंटरपासून दोन किलोमीटरपर्यंत पायी जावं लागतं किंवा बॅटरीवरील गाड्यासुद्धा उपलब्ध आहेत.

पहिल्या दिवशी संध्याकाळी आम्ही येऊन पोहोचलो फक्त दीड लाख लोकसंख्या असलेल्या आणि एक्झी नदीच्या काठावर वसलेल्या एक्झिटर शहरात. रोमन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात एक्झिटर कॅथेड्रल हा एक महत्त्वाचा लॅण्डमार्क आहे. विंचेस्टरप्रमाणेच इथलं कॅथेड्रलही भव्य असून प्रचंड मोठ्या आवारात पसरलेलं आहे.

या शहराच्याही मध्य भागातून एक्झी नदी वाहते. असं असलं तरी या नदीच्या दोन्ही बाजूंना छान बागा, बसायला बाकडी, वॉक-वे आणि नदीमध्ये किंवा नदीच्या आजूबाजूला कुठेही अस्वच्छता, घाण आणि कचरा आढळला नाही. खरं तर परदेशातल्या प्रत्येक नदीच्या आजूबाजूला असंच चित्र असतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो ते थेट डार्टमूरच्या जंगलात. आपल्याला नॅशनल पार्क म्हणजे जंगलच माहिती आहे. इंग्लंडमध्ये मात्र असं कुठेही घनदाट जंगल नाही तरीही डार्टमूर हे नॅशनल पार्क म्हणून ओळखलं जातं. या पार्कमध्ये थोडंफार जंगल, नद्या, खडकाळ प्रदेश आणि लांबवर पसरलेली गवताची कुरणं आणि त्याचबरोबर विविध जातींचे घोडे, मेंढ्या आणि इतर प्राणी पाहायला मिळतात.

साधारण साडेतीन-चार हजार वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले ग्रॅनाईटचे प्रचंड मोठे खडक बघायला मिळतात. कॅम्पिंग, हायकिंग आणि ट्रेकिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज इथे करायला परवानगी आहे. शेरलॉक होम्सच्या ‘द हाऊंड ऑफ द बास्कर व्हिलेज’ कादंबरीतील संपूर्ण घटना या डार्टमूर नॅशनल पार्कच्या परिसरात घडलेली आहे, असं दाखवलं आहे.

या कादंबरीचं कथानक आणि या नॅशनल पार्कचा परिसर हे सगळंच रहस्यमय आणि खिळवून ठेवणारं आहे. डेवाॅन आणि कॉर्नवॉल या दोन प्रदेशांची ट्रिप अजूनही संपलेली नाहीय. नॅशनल पार्कमधली अजून काही ठिकाणं आणि कॉर्नवॉल प्रदेशामधील आकर्षक अन् निसर्गरम्य पर्यटनस्थळं बघूयात पुढील भागात.

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

मालदीवप्रश्‍नी प्रगल्भता हवी

भारत-मालदीव संबंधांवर सध्या जे मळभ आलंय ते समजून घेताना या प्रश्नाकडं वेगळ्या नजरेनं बघायला पाहिजे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
india maldives controversy international relations social media pm modi
india maldives controversy international relations social media pm modiSakal
Summary

भारत-मालदीव संबंधांवर सध्या जे मळभ आलंय ते समजून घेताना या प्रश्नाकडं वेगळ्या नजरेनं बघायला पाहिजे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

भारत-मालदीव संबंधांवर सध्या जे मळभ आलंय ते समजून घेताना या प्रश्नाकडं वेगळ्या नजरेनं बघायला पाहिजे हे लक्षात घेण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यवहार हे सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया आणि तिथल्या मतांवर ठरत नसतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटना या वरवर दिसतात तशा साध्या-सरळ नसतात. या घटना अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. त्या समजून घेताना शहाणपणाबरोबरच प्रगल्भतेची देखील नितांत गरज असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपबद्दलच्या विधानानंतर मालदीवमधल्या तीन मंत्र्यांनी अवमानकारक वक्तव्य केलं आणि मग त्यावरून वाद सुरू झाला. त्या मंत्र्याच्या विधानांबद्दल आपल्याकडं निषेधाचा सूर उमटला.

विशेषतः सोशल मीडियावर मालदीवविरोधाला प्रचंड धार आली आणि या वादात सेलिब्रेटींनी उडी घेतल्यानंतर हा वाद थेट देशभक्तीच्या मुद्द्याशी निगडित झाला. मालदीववर पर्यटनासाठी बहिष्कार टाकून आपण खूप देशभक्ती करीत आहोत अशा हेतूनं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकायला सुरुवात केली.

काही पर्यटकांनी दौरे रद्द केले. मालदीवच्या सरकारनं ही त्या मंत्र्यांची वैयक्तिक भूमिका असून, ही सरकारची भूमिका नाही, असं स्पष्ट केलं. मात्र त्याच वेळी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी चीन दौऱ्यामध्ये ‘तुम्ही आमच्याकडं पर्यटक पाठवा,’ अशी विनंतीही केली.

चीनला मालदीवबरोबर सहकार्य वाढवायचं असल्यानं चीन सरकार काही ठरावीक संख्येपर्यंतच्या पर्यटकांना मालदीवला भेट देण्यासाठी सबसिडी वगैरे जाहीर करून तिथं पर्यटकांचा ओघ वाढेल याकडं लक्ष देऊ शकतं.

मालदीवमधील आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी चीन सरकार असा निर्णय घेऊ शकतं, मात्र लगेच असंच होईल आणि मालदीव-चीन संबंध घट्ट होतील असंही समजण्याचं कारण नाही. आंतरराष्ट्रीय संबंधात खाचखळगे असतातच. २०१३ ते २०१८ या कालावधीत मालदीवबरोबरचे आपले संबंध असे चढ-उताराचेच होते.

मी २००९ ते २०१३ या कालावधीत मालदीवमध्ये काम करीत असताना भारतातील ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा तिथं आले होते. त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, ते माझ्या आजही लक्षात आहे. ते असं म्हणाले होते, ‘आपल्या शेजाऱ्यांची आपणच काळजी घ्यायला हवी अन्यथा ती काळजी दुसरा कोणीतरी घेईल.’

सध्याच्या वादात मला या वाक्याची प्रकर्षानं आठवण येत आहे. मालदीवसारख्या छोट्या देशाची गरज वेगळी असते. भारत आणि मालदीवचा विचार केला, तर अशा छोट्या देशांना (भारताच्या तुलनेत) अनेक पर्याय उपलब्ध असतात.

भारत त्यांना एखादी गोष्ट पुरवत नसेल किंवा त्यांच्या गरजांची पूर्ती भारताकडून होत नसेल, तर ते अन्य पर्यायांचा चटकन विचार करू शकतात. भारतासारखा मोठा देश कुठलाही निर्णय घेताना एका घटनेनं किंवा एखाद्या मुद्द्याचा विचार करून निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी अनेक बाबी त्याला विचारात घ्याव्या लागतात.

भारतानं तिथल्या तीन मंत्र्यांच्या विधानावर राजनैतिक पातळीवर जी पावलं उचलायची होती, ती तातडीनं उचलली. त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून जे सांगायला हवं होतं, ते सांगितलं. एक मोठा देश म्हणून जितकं करता येईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर छोट्या देशांशी वागताना मोठ्या देशांना जे भान ठेवावं लागतं, ते लक्षात घेऊन जे आवश्यक होतं ते सर्वकाही भारतानं केलं.

मालदीवच्या तीन मंत्र्यांनी जे विधान केलं त्याकडं बघताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली लोकशाही गेल्या ७५ वर्षांत वेगवेगळ्या अनुभवांतून प्रगल्भ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पेच किंवा मुद्दे याबद्दल बोलताना भारतीय नेते सावध असतात.

त्यांच्याकडून अशी उथळ विधानं केली जात नाहीत. याउलट मालदीवमधल्या लोकशाहीचा काळ आपल्यापेक्षा अत्यंत कमी आहे. त्यांचे मंत्री नवे आहेत. त्याचबरोबर ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, तो आणि त्यांचा सहकारी पक्ष ‘इंडिया आउट’चा डंका पिटत असतो.

निवडणुकीत भारतविरोधी वक्तव्य करून मोहम्मद मुइझू यांची पार्टी सत्तेवर आली. त्यांना भारतविरोधी माजी अध्यक्ष अब्दुल्ला यांची साथ लाभली आहे. त्यामुळं त्या तीन मंत्र्यांनी आपल्या पक्षाचं धोरण जोरदारपणे मांडण्याच्या नादात ही उथळ वक्तव्यं केली, त्यांच्या विधानांमागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे.

तेथील एमडीपीसारख्या प्रागतिक पक्षांनी भारतविरोधी भूमिका घेण्याचे तोटे तिथल्या सत्ताधाऱ्यांना लक्षात आणून दिले आहेत, मात्र तेथील सत्ताधारी पक्षाला आपलं धोरण बदलायला आणि सध्याचं गढूळ वातावरण निवळायला काही वेळ द्यावा लागेल.

मुळात सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं याची चर्चा झाली, त्यामध्ये अतिउत्साहाचा भाग अधिक होता. लक्षद्वीपचे फोटो पोस्ट करताना काही सेलिब्रेटींनी चुकीचे फोटोही पोस्ट केले. त्यावरून या मंडळीचं या चर्चेतलं गांभीर्य किंवा त्यांचा दृष्टिकोन लक्षात येतो.

‘बॉयकॉट मालदीव’ ही मोहीम चालवताना ‘लक्षद्वीपला चालना मिळावी,’ ‘लक्षद्वीपला आपण जाऊ या’ अशा पोस्ट केल्या गेल्या. हे एका दृष्टीनं बरं झालं मात्र लक्षद्वीप पर्यटनासाठी योग्य आहे किंवा ते भारतात नक्की कुठं आहे याची जाण सोशल मीडियावर अतिउत्साहात प्रतिक्रिया देणाऱ्यांना आहे की नाही याची शंका आहे.

आजही लक्षद्वीपमध्ये तांत्रिक सोयीसुविधा अल्प आहेत. लक्षद्वीपला पर्यटनासाठी जायला तिथं जहाज आणि विमानसेवा मोठ्या प्रमाणात आपल्याला उभ्या कराव्या लागतील. त्या केल्यानंतर मग तिथं आपल्याला जाता येईल.

लक्षद्वीपला जाण्यासाठी आपल्याला परमिटही काढावं लागतं, अशा सर्व पार्श्वभूमीवर मालदीवला लक्षद्वीपचा पर्याय अगदी चटकन उभा करता येणार नाही, याचाही विसर सोशल मीडियावरील अतिउत्साही मंडळींना राहिला नाही.

भारतीय पर्यटक मालदीवला मोठ्या प्रमाणात भेट देतात यात काहीच शंका नाही. कोरोना महासाथीनंतर भारतीय पर्यटकांची मालदीवला जाण्याची संख्या वाढली; पण कोरोना महासाथीपूर्वी चीनमधूनही मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती हा भागही आपण लक्षात घेतला पाहिजे.

मालदीवला पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या माध्यमातून त्या देशाला जी मदत होते, त्यापेक्षा आपण त्या देशाला जी मदत करतो ती खूप व्यापक स्वरूपाची आहे. मालदीवचं स्थान लक्षात घेता आपण त्यांना अनेक जीवनावश्यक गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात पुरवत असतो.

मालदीवमध्ये ३० ते ३५ हजार भारतीय लोक नोकरी करीत आहेत. आपली तिथं गुंतवणूक आहे. या सर्व संबंधांचा विचार करून देशाला म्हणजे नेत्यांना आणि सरकारी पातळीवर परराष्ट्र संबंध हाताळणाऱ्या सर्व मंडळींना व्यक्त व्हावं लागतं.

त्यामुळं सोशल मीडियावर मालदीवविरोधात ज्या तीव्र भावना होत्या, तितकी तीव्रता सरकारी पातळीवर नव्हती याचं कारण या प्रश्नाकडं सोशल मीडियाच्या नजरेनं बघायचं नसतं, तर प्रगल्भपणे बघावं लागतं हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे.

चीन आणि पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध, त्यांची वर्तणूक लक्षात घेतल्यानंतर आपण त्या देशासंदर्भातील एखाद्या मुद्द्याबाबत ज्या आक्रमकतेनं व्यक्त होतो तेवढी आक्रमकता अशा छोट्या देशाच्या बाबतीत प्रत्येक वेळी दाखवायची गरज नसते, उलट मालदीवचं पर्यटन टाळून कृतीमधून अनेक गोष्टी साध्य करता येतात.

कारण अशा छोट्या देशांच्या बाबतीत उलट सावधगिरी ही अधिक बाळगावी लागते. प्रत्येक वेळी देशभक्ती दाखवताना आक्रमकता नव्हे, तर मुत्सद्देगिरीचा अवलंब करायचा असतो हे किमान आंतरराष्ट्रीय संबंधात तरी लक्षात ठेवलंच पाहिजे.

मालदीवबरोबरच्या सध्याच्या वादाबाबत विचार करताना गुंतागुंतीचे मुद्दे प्रगल्भतेनंच समजून घ्यायचे असतात, हे सगळ्यांनीच लक्षात घेणं हा या वादाचा धडा आहे हे नक्की.

शब्दांकन : विनायक लिमये

निसर्गाच्या कुशीतली कलाकुसर

‘वारसा’ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. निरनिराळ्या कालखंडात बांधलेल्या इमारती त्या विशिष्ट काळातील जीवनशैली, बांधकामशैली, इतिहास, मूर्तिशास्त्र यांचा दस्तऐवज असतो.
Heritage Culture
Heritage Culturesakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

‘वारसा’ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. निरनिराळ्या कालखंडात बांधलेल्या इमारती त्या विशिष्ट काळातील जीवनशैली, बांधकामशैली, इतिहास, मूर्तिशास्त्र यांचा दस्तऐवज असतो. त्याच्याकडं कलात्मक दृष्टीनं पाहताना, त्याचं महत्त्व जाणून त्याचं जतन संवर्धन करून आजच्या काळातही हा वारसा उपयोगात ठेवूनही प्रगती साधता येते.

आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या इमारतींच्या मागची संकल्पना, बांधकामाचं तंत्र समजून घेतलं, तर त्यामधील बलस्थानं ओळखून नवनिर्मितीमध्ये त्यांचा अंतर्भाव करता येतो. इमारतींच्या वारशाचं महत्त्व जाणून त्यांच्या जतन-संवर्धनाचं शास्त्र हा वास्तुकलेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक वास्तूचं जतन-संवर्धन हे आव्हानात्मक असतं कारण तिचं बाह्यस्वरूप दिसत असतं पण तिचं बांधकाम, स्थापत्य यांचा तपास करण्याचं शास्त्र दरवेळी नव्यानं अनुभवसमृद्ध करतं.

वास्तुवारसा आणि पर्यटन यांची सांगड अक्कलहुशारीनं घालून प्रगत देश अर्थकारण कसं करतात व आपण कुठं कमी पडतो याचं अवलोकनही गरजेचं आहे. या लेखमालेची सांगता लोकप्रिय शिवमंदिरानं करू या. वाचक - रसिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. सकाळचे विशेष आभार.

शालेय जीवनात भोर-भाटगर-बनेश्वर अशी सहल हमखास असायची. भाटघर धरणाचा जलाशय पाहिल्यावर बनेश्वराच्या जंगलात विसाव्याचं स्थान असायचं. पुण्यापासून केवळ एक तासाच्या अंतरावर घनदाट वनराजीत बनेश्वराचा महादेव एका वेगळ्याच दिमाखात विसावला आहे. बनात राहणारा हा ईश्वर हिरवाई आणि निर्झर पाण्याच्या संगतीत भक्तांना भक्ती आणि निसर्गसौंदर्याचा अमाप आनंद बहाल करतो.

पुणे-सातारा रस्त्यावर पुण्यापासून ३६ किलोमीटर अंतरावर नरसापूर गावात बनेश्वर महादेवाचं मंदिर असून हा परिसर जंगलात आहे. पक्ष्यांचा भरपूर वावर असलेल्या अभयारण्याचाही भाग आहे. बलाबर ग्रे हॉर्नबिलसारखे दुर्मीळ स्थलांतरित पक्षी काही काळ इथे वास्तव्यास येतात. पक्ष्यांबरोबरच दुर्मीळ वृक्षवल्ली अरण्यात आहे.

नीरा नदीची उपनदी शिवगंगा सभोवतीच्या जंगलातून वाहत जाते व पुढं नीरा-नरसिंगपूर इथं भीमा नदीला जाऊन मिळते. मंदिराचा परिसर १५ हजार चौरस फुटांचा असून जंगलाच्या २५ एकराच्या मानानं हा छोटासाच बांधकामाचा तुकडा आहे. शिवगंगा नदीचा परिसर इथं फारच रमणीय असून पर्यटनाची उत्तम जागा आहे.

बनेश्वराचं मंदिर नानासाहेब पेशव्यांनी १७४९ मध्ये बांधलं. त्यावेळी मंदिराच्या उभारणीचा खर्च ११ हजार ४२६ रुपये ८ आणे ६ पैसे इतका आल्याची नोंद आहे. १७३९ मध्ये वसईच्या लढाईत चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांचा पाडाव केला त्यावेळी त्यांनी चर्चच्या काही घंटा विजयाचं प्रतीक म्हणून आणल्या.

पैकी एक घंटा बनेश्वराच्या मंदिरात असून त्यावर १६८३ असं ठळकपणे लिहिलं आहे व वरती येशू ख्रिस्ताच्या क्रॉसची प्रतिमा आहे. अशाच अवजड पोर्तुगीज घंटा भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर, ओंकारेश्वर, वाईच्या शिवमंदिरातही पाहायला मिळतात.

मंदिर परिसरामध्ये काळ्या पाषाणातील मुख्य गर्भगृह व पुढं दगडी मंडप आहे. मंदिर व मंडपासमोरच नंदीमंडप व आवारात चार पाण्याची कुंड आहेत. संपूर्ण मंदिराभोवती पाण्याचा प्रवाहित झरा दगडी वैशिष्ट्यपूर्ण वाहिनीतून फिरतो. दगडात साकारलेली ही अनोखी कलाकृती आहे. घनदाट वृक्षराजीत वसलेल्या मंदिराची वास्तुकला पाण्याच्या प्रवाहाशी निगडित आहे.

हिरवाई, डोंगरातून वाहत येणारे स्वच्छ निर्मळ पाणी आणि दगडांमध्ये त्यांना सांभाळून घेणारी वास्तुनिर्मिती हे या जागेचं वेगळेपण आहे. मंदिराच्या मंडपाला यादवकालीन शैलीचे स्तंभ असून त्यावर दगडी कमानी आहेत. जोत्याच्या दगड कामात हत्ती व फुलांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. मंदिराच्या शिखराच्या तळाशी सपाट प्रतलांचे भाग असून त्यावर मध्यवर्ती तीन घुमट व कडेला स्तंभावर घुमटांची रचना दिसून येते.

एकूण २४ घुमट शिखराच्या तळाशी आहेत व त्याखाली देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचं शिखर अवकाशात झेपावताना निमुळत्या भागात फारशी कलाकुसर नाही परंतु टोकाला तीन निमुळते होत जाणारे पारंपरिक पद्धतीचे घुमट आहेत. या घुमटांच्या तळाशी पुन्हा छोटे ८ घुमट आहेत. शिखराकडं बारकाईनं पाहिल्यावर कारागिरांची ही अदाकारी नजरेस पडते.

मंडपाच्या छतावर छोटं शिखर असून मोठे व छोटे शिखर चुन्यामध्ये प्रमाणबद्धता राखली आहे. शिखरांचं सर्व काम चुन्यामध्ये असून त्यावर रंगरंगोटीचे अनेक थर चढले होते. तसेच उत्कृष्ट प्रतीच्या दगड कामावरही विविध प्रकारचे थर चढले होते. २०२२ मध्ये डिसेंबरच्या दरम्यान दुरुस्त्या करणाऱ्या कारागिरानं जुने ऐतिहासिक चुन्यातील स्टको काम उतरवलं किंवा खरडून काढले.

मंदिर विश्वस्त ‘किमया’ कडे आले तेव्हा अनभिज्ञ कारागिरानं नुकसान करून ठेवलं होतं. किमया वास्तुविशारदांच्या गटानं मंदिर परिसराची रेखांकनं केली. पूर्वी आम्ही मंदिराला भेट दिली असता जिज्ञासेपोटी मंदिर परिसराचे छायाचित्रण केलं होतं. त्याचा उपयोग मंदिराच्या शिखराच्या जतन संवर्धनासाठी झाला.

किमयाच्या गटानं जागेवर तपशीलवार मापं घेऊन रेखांकनं केल्यावर जुन्या छायाचित्रणावरून नियोजित चुन्याच्या कळसाची तपशीलवार प्रमाणबद्ध रेखांकनं कारागिरांसाठी तयार केली. भिंतींच्या दगडावर चढलेले रंगाचे थर कारागिरांनी मेहनतीनं उतरवले आहेत, चुन्यामध्ये मूळ स्वरूपात शिखराचं जतनसंवर्धन पूर्ण झालंय.

परिसरातील इतर मंदिरं, कुंड यांच्या संवर्धनाचं काम टप्प्याटप्प्याने होत राहील. कुंडांमध्ये छोट्या आकाराची अनेक कासवं भक्तांचं व पर्यटकांचं आकर्षण होतं. पण छोट्या कुंडात जास्त कासवांचं शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन होत नसल्यामुळं वनखात्यानं त्यांना इतरत्र हलवलं. एका कुंडामध्ये भव्य गोमुख आहे. त्यामधून आजूबाजूच्या डोंगरातून झिरपणारं स्वच्छ पाणी कुंडात पडतं.

हे पाणी जंगलातून वाहत असताना औषधीवृक्षांच्या मुळांचे अंश त्यात उतरल्यामुळं त्याला औषधी गुणधर्म असल्याचंही मानलं जातं. मंदिर व परिसराचे, पाण्याच्या झऱ्यांचे येणारे प्रवाह यांचे शास्त्रीय विश्लेषण करून पाण्याची शुद्धता, पाणी परिसरात येणं व पुढं प्रवाहित होणं यांचा सांगोपाग अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. पाणी प्रवाहित होताना आजूबाजूचे सांडपाणी, मलनिःसारण पाण्यात मिसळून पाणी दूषित होणार नाही याची सुव्यवस्था करणे हाही जतन संवर्धनाचाच भाग आहे.

फक्त मंदिराचं जतन-संवर्धन नाही तर बनाचं सर्व समावेशक जतन होणं आवश्यक आहे. पाणी, निसर्ग व वास्तुकला इथं परस्परपूरकतेनं नांदत आहेत. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला निसर्गाच्या सान्निध्यातली भक्तिभावाची अनुभूती मिळते. अभयारण्यामुळं मंदिराभोवती होणाऱ्या नको त्या ''विकासाला'' इथे आपोआप मर्यादा पडल्यामुळं मंदिराचं व परिसराचं पावित्र्य राखलं जाते.

कारागरांनी चुन्यामध्ये आपलं कसब पणाला लावून तन्मयतेनं वारसा जपण्याचं काम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं. तेव्हा पुन्हा एकदा भोर-भाटगर-बनेश्वर नाहीतर फक्त बनेश्वरची सहल काढायला काहीच हरकत नाही.

(लेखिका वास्तुविशारद असून जतन-संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे. )

अविभाज्य; तरीही दुर्लक्षित

‘आम्हाला वेगळं गोरखालँड नको, जमिनीवरचा आमचा हक्क हवा आहे’, असं ‘गोरखा विकास परिषदे’नं नुकतंच जाहीर केलं आहे.
one-horned rhinoceros
one-horned rhinocerossakal

‘आम्हाला वेगळं गोरखालँड नको, जमिनीवरचा आमचा हक्क हवा आहे’, असं ‘गोरखा विकास परिषदे’नं नुकतंच जाहीर केलं आहे. ईशान्य भारतातल्या अनेक बंडखोर संघटनांनी मागील काही काळात केंद्र सरकारबरोबर शांतताकरार केले आहेत. मागील काही वर्षांत केंद्र सरकारच्या विशेष धोरणांमुळे ईशान्येतही पायाभूत सुविधांचा, उद्योगांचा विकास होत आहे. आसाम, अरुणाचलमधली वैद्यकीय यंत्रणा तर इतर अनेक पुढारलेल्या राज्यांपेक्षाही सक्षम आहे.

‘भारताबरोबर आमचाही विकास होतो आहे आणि आम्हाला यापुढंही मुख्य प्रवाहात राहायचं आहे,’ असं मत प्रतिष्ठित नागरिक व्यक्त करत आहेत. ही सर्व परिस्थिती, ईशान्येत बरंच काही सुरळीत सुरू आहे, असं दर्शवणारी असली तरी, यापूर्वी बरंच काही सुरळीत नव्हतं, याचीसुद्धा कबुली देणारी आहे.

‘पत्रसूचना कार्यालया’नं महाराष्ट्रातल्या काही पत्रकारांना आठवडाभरासाठी आसाम आणि मेघालयाच्या दौऱ्यावर नेलं होतं. दोन्ही राज्यांमधली पर्यटनस्थळं, विकासकामं, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि विशेषतः मागील दहा वर्षांमध्ये झालेला बदल महाराष्ट्रातल्या जनतेला समजावा हा दौऱ्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.

त्या वेळी आसाम-मेघालयाच्या सौंदर्याचं आणि विकासाचं वर्णन करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, तरीही दौऱ्यादरम्यान पोलिसांच्या, लष्करी अधिकाऱ्यांच्या, तसंच इतर सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या घेतलेल्या भेटींतून जाणवलेला एक सूर अस्वस्थ करत होता. त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालेली- ‘अजूनही आमच्याकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही’, ही खंत बोचत होती.

वास्तविक, अस्वस्थ करणारी ही भावना ईशान्येतल्या नागरिकांच्या मनात आहे ही काही एवढ्यातच नव्यानं समजलेली बाब नाही. यापूर्वी अनेकांनी दौरे करून परिस्थितीची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. तरीही प्रत्यक्ष अनुभवाचा परिणाम होतोच.

हितांचं संरक्षण महत्त्वाचं

‘आसाम रायफल्स’, आसाम पोलिस मुख्यालय, शिलाँगमधली ‘ईशान्य भारत विकास परिषद’ या आणि इतर काही सरकारी संस्थांना दौऱ्यादरम्यान भेट देण्याची संधी मिळाली. ईशान्य भारतातली परिस्थिती, संस्कृती, राजकारण, उद्योग या क्षेत्रांमधल्या घडामोडी त्यांच्या बोलण्यातून समजत गेल्या.

या सर्व गोष्टी आपल्याला आधी का माहीत नव्हत्या? तसं पाहायला गेलं तर, वरवरची माहिती होती, बातम्यांमधून परिस्थितीही समजत होती; पण वास्तव अजूनही वेगळं दिसत होतं. परिस्थिती अस्वस्थ करतच होती; पण भारताचा एक नागरिक असूनही या परिस्थितीबाबत आपण इतके अनभिज्ञ कसे, ही जाणीव अधिक त्रास देत होती. अनेक प्रश्‍न मनात निर्माण होत होते.

भारताच्या इतिहासात ‘ईशान्य भारताचा इतिहास’ आपल्याला कधी तपशीलवार शिकवला गेला का? ईशान्येतल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीबद्दल आपल्याला किती माहिती आहे?(आसाममध्ये सुमारे दोनशे आदिवासी जाती आणि अडीचशे उपजाती आहेत). स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासात ‘आझाद हिंद फौजे’च्या मोहिमेचा भाग वगळता ईशान्येचा उल्लेख कधी आला होता का?

वायव्य दिशेनं भारतावर झालेल्या आक्रमणांची आपल्याला माहिती असते, पूर्वी भारताचा विस्तार वायव्येकडे कुठपर्यंत होता याचीही आपल्याला माहिती असते. एवढी हीच ईशान्येबद्दलची पुरेशी माहिती आहे का? ईशान्येत राजकीय पक्ष कोणते, भाषा कोणत्या, राज्यांच्या राजधान्या कोणत्या? या प्रश्‍नांची उत्तरं मनाला समाधान देणारी नव्हती.

हीच गोष्ट ईशान्येतल्या लोकांना खटकते. म्हणूनच, तिथल्या अनेकांच्या मनात अद्याप तुटलेपणाची भावना आहे. तिथं अनेक वर्षं काम करणाऱ्या इतर राज्यांच्या अधिकाऱ्यांनीही आम्हाला हेच सांगितलं. ईशान्येचा वापर ब्रिटिशांनी कायम ‘बफर झोन’ म्हणून केला. ब्रिटिशांनाही इथल्या आदिवासींनी प्रखर विरोध केला होता.

इथल्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला तरी त्यांनी मूळची संस्कृती सोडलेली नाही आणि या संस्कृतीवर आक्रमण झालेलंही त्यांना खपत नाही. खासी हा प्रमुख आदिवासी-समुदाय आहे. त्यांच्यासह बहुतेक सर्व आदिवासी-समुदायांनी आपापली संस्कृती जपली आहे, अजूनही पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरे केले जातात.

सरकारी व्यवस्थेत हे सर्व जण सहभागी होतात; पण त्यातही त्यांनी स्वायत्तता जपली आहे. म्हणूनच, केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘ईशान्य भारत विकास परिषदे’बरोबरच इथं ‘खासी स्वायत्त जिल्हा परिषदही’ आहे. ही परिषद म्हणजे सरकारबरोबर समन्वयानं काम करणारं समांतर सरकार आहे.

गुन्हेगारी स्वरूपाचे वाद वगळता आदिवासींमधले इतर वाद याच परिषदेच्या माध्यमातून सोडवले जातात. पक्षीय राजकारणाला कोणतंही स्थान नाही. आदिवासींच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी या परिषदेची स्थापना झाली असून त्यांना राज्यघटनेनंच अधिकार दिलेले आहेत.

पाणी, जमीन, जंगल, श्रद्धा, संस्कृती यांबाबत नियम करण्याचे अधिकार या परिषदेलाच आहेत. केंद्र अथवा राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही.

अंतर कधी संपणार?

मेघालय आणि आसाममध्ये फिरताना सामान्य लोक अंतर ठेवूनच बोलत असल्याचं जाणवलं. आशियातलं सर्वांत स्वच्छ गाव असलेल्या मॉलिलोंग या मेघालयामधल्या गावात - जिथं रोज पाचशे पर्यटक भेट देतात - त्या गावातही हाच अनुभव आला. आम्ही ‘सरकारी पाहुणे’ असल्याचं सांगूनही, ‘आधी कळवून यायचं होतं, माहिती द्यायला आमच्याकडे वेळ नाही,’ असं तोंडावर स्पष्टपणे सांगणारे लोक आम्हाला इथं भेटले. ही भावना त्यांच्या मनात कशी रुजली?

भारतातल्या इतर नागरिकांकडून मिळत असलेल्या वागणुकीचाच हा परिणाम असेल का? जम्मू-काश्‍मीरमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाले तर भारतभरातल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या झळकतात, वाहिन्यांचे कॅमेरे तिकडे वळतात. ईशान्य भारत सगळा पर्वतमय आहे. इथंही दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्याविषयीच्या बातम्या कधी बाहेर येतच नाहीत. का त्यांचं तितकं महत्त्व आपल्याला वाटत नाही?

सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून चेरापुंजीची आपल्याला ओळख होती; पण आता इथं पाऊस पडण्याचं प्रमाण कमी झालं आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्यानमारला लागून असलेल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या ‘आसाम रायफल्स’कडून चेरापुंजीजवळील सोहरा पठारावर आता वनीकरण केलं जात आहे. त्याद्वारे पावसाचं प्रमाण पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे.

आपलीसुद्धा जबाबदारी!

हिंसाचार, असंतोष यांचा उद्रेक झाला की ईशान्य भारतातल्या घडामोडी चर्चेत येतात. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला तेव्हा जणू ईशान्य भारत पेटला, असं चित्र काही माध्यमांनी निर्माण केलं होतं. प्रत्यक्षात मणिपूरमधल्या काही निवडक भागांमध्येच अशांतता निर्माण झाली होती आणि उर्वरित मणिपूरसह सर्व ईशान्य भारतात शांतताच होती, हे आसामचे विशेष पोलिस महासंचालक हरमितसिंग यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं.

घुसखोरी, तस्करी या इथल्या राज्यांसमोरच्या मोठ्या समस्या होत्या. म्यानमार, बांगलादेशमधून लोक ईशान्येत घुसत होते. त्यामुळेही अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून घुसखोरीचं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे. तस्करीचं आव्हान अद्यापही आहे.

वर्षभरात जवळपास ११०० ते १२०० कोटी रुपयांची तस्करी याच भागातून होते. यात मुख्य वाटा अमली पदार्थांचा असतो. पूर्वी तरी अफू, गांजाची शेती कारवाई करून नष्ट केली जात असे. आता ‘याबा’ टॅब्लेटसारख्या खिशात मावणाऱ्या नशेच्या गोळ्यांमुळे तस्करी रोखणं हे इथल्या राज्यांसमोर एक आव्हान बनलं आहे.

ईशान्येत इतरही अनेक घडामोडी घडतात, त्याकडेही आपलं लक्ष जायला हवं. या वर्षी एक नोव्हेंबरलाच भारत-बांगलादेश यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचं उद्‌घाटन झालं. या प्रकल्पाशिवाय अनेक रस्ते, रेल्वेप्रकल्प इथं सुरू झाले आहेत. आर्थिक परिवर्तनाचा वेग कमी असला तरी, फारसं खासगीकरण नसलं तरी आणि अद्यापही नोकरीच्या संधी कमी असल्या तरी, बदलाला सुरुवात झालेली आहे.

विकास नाही म्हणून दिल्ली-कोलकता-मुंबईकडे असलेला युवकांचा ओढा कमी करण्यासाठी ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ राबवले जात आहेत. सरकारी प्रयत्नांतून ‘प्राइम स्टार्टअप हब’ सारखी केंद्रे उभी राहत आहेत. ‘प्राइम’च्या माध्यमातून दरवर्षी ५० स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातात.

वर्षभर त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्रपणे काम करण्याचं बळ दिलं जात आहे. पर्यटनक्षेत्राचा वेगानं विकास केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या मोठी आहे. निसर्गसौंदर्य पाहण्याचं तेच समाधान ईशान्येतही सहज मिळू शकतं.

ईशान्य भारत हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे आपण चीनला ठणकावून सांगू शकतो; पण ईशान्येत राहणाऱ्या लोकांना, सर्व भारतीय आपलेच आहेत, आपणही भारतीयांचा अविभाज्य भाग आहोत, असं वाटायला हवं. ही आपली जबाबदारी आहे. या लोकांच्या मनात महाराष्ट्राबद्दल ‘एक सुधारलेलं राज्य’ म्हणून चांगली प्रतिमा आहे. विकासाचं वारं आपल्याकडे उशिरानं पोहोचलं, याची खंत त्यांच्या मनात आहे.

ही खंत आपण दूर करायला हवी. ईशान्येची संस्कृती हा वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचाच एक सुंदर भाग आहे, हे लक्षात घेऊन आणि त्यांच्यावर सांस्कृतिक आक्रमण करण्याची कोणतीही इच्छा न बाळगता आदरानं त्यांच्यात सहभागी झाल्यास तुटलेपणाची भावना दूर होण्यास वेळ लागणार नाही.

हरिश्चंद्र आणि वरुण

हरिश्चंद्र आणि वरुण यांच्याशी संबंधित कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. हरिश्चंद्र हा त्रिशंकूचा पुत्र होता. त्रिशंकूचा जन्म सूर्यवंशात सत्यव्रत म्हणून झाला होता.
harishchandra and varuna
harishchandra and varunasakal

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

हरिश्चंद्र आणि वरुण यांच्याशी संबंधित कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे. हरिश्चंद्र हा त्रिशंकूचा पुत्र होता. त्रिशंकूचा जन्म सूर्यवंशात सत्यव्रत म्हणून झाला होता. त्रिशंकूच्या कथेची वाल्मीकी रामायण, हरिवंश अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कथानकं आहेत. सत्यव्रतानं एका युवतीला तिच्या विवाहसमारंभातून उचलून नेलं. त्याचं तिच्यावर प्रेम होतं.

सत्यव्रतानं ज्या वेळी तिचं अपहरण केलं त्या वेळी विवाहाला वैधता देणारा सप्तपदीचा विधी पूर्ण झाला नव्हता. तो जर पूर्ण झाला असता तर कुण्या दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण केल्याचा दोष सत्यव्रताच्या माथी बसला असता. मात्र, हा विधी संपन्नच झाला नसल्यानं सत्यव्रतानं विचार केला की, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं आणि आपण कोणताही गुन्हा केलेलाच नाही...

काही कथानकांनुसार, त्रय्यारुण हा सत्यव्रताचा पिता होता. भागवतपुराणासारख्या काही ग्रंथांनुसार मात्र त्याच्या पित्याचं नाव त्रिबंधन असं होतं. वसिष्ठ हे राजा त्रिबंधनाचे कुलगुरू होते. वसिष्ठांच्या सल्ल्यानुसार, सत्यव्रताला त्याच्या पित्यानं हाकलून दिलं. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातलं शत्रुत्व तर सर्वांना माहीतच आहे. सत्यव्रतानं तीन गुन्हे केल्याचा वसिष्ठांचा आरोप होता :

वडिलांच्या विरोधात वर्तन करणं, दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करणं आणि गोमांसभक्षण करणं. हा अखेरचा गुन्हा दुष्काळ पडला असताना त्याच्या हातून घडला होता. 

‘त्रि’ म्हणजे तीन आणि शंकू म्हणजे पणाला लावणं. त्यामुळे, ही तीन पापं केल्यानं सत्यव्रत हा ‘त्रिशंकू’ या नावानं ओळखला जाऊ लागला. दरम्यान, राज्यात दुष्काळ पडून अन्न-धान्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली असतानाच्या काळात त्रिशंकूनं विश्वामित्रांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली असल्यानं, त्याची जाणीव ठेवलेल्या विश्वामित्रांनीही आता त्रिशंकूकडे आपली कृपादृष्टी वळवली.

विश्वामित्रांनी आपलं सामर्थ्य वापरून त्रिशंकूला सदेह स्वर्गात पाठवलं. (खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता, त्रिशंकू म्हणजे सदर्न क्रॉस). इंद्र आणि इतर देवांनी त्रिशंकूला स्वर्गातून हाकलून दिलं, त्या वेळी विश्वामित्रांनी त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग निर्माण केला. 

तर, हरिश्चंद्र हा त्रिशंकूचा पुत्र होता. अपत्य नसल्यानं हरिश्चंद्र निराश होता. नारदांच्या सल्ल्यानंतर तो वरुणाकडे गेला आणि त्यानं त्याच्याकडे मदत मागितली. तो म्हणाला, ‘हे देवा! मला पुत्रप्राप्ती होऊ दे. माझ्या पोटी शूर पुत्राचा जन्म झाल्यास मी यज्ञात तुला तो अर्पण करेन.’ वरुणानं ही विनंती मान्य केली आणि हरिश्चंद्राला पुत्र झाला. त्याचं नाव रोहित असं ठेवण्यात आलं. पुत्रजन्म झाल्यावर  वरुणानं हरिश्चंद्राला त्याच्या वचनाची आठवण करून दिली आणि म्हणाला : ‘हा पुत्र मला अर्पण कर.’

त्याला उत्तर मिळालं : ‘प्राण्याचा जन्म होऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतरच तो बळी देण्याच्या योग्य होतो.’

दहा दिवस उलटून गेले.

वरुण परत आला आणि म्हणाला : ‘पुत्र अर्पण कर.’

त्याला उत्तर मिळालं : ‘प्राण्याला ज्या वेळी दात येतात त्या वेळी तो बळी देण्याच्या योग्य होतो.’

ज्या वेळी हे दात आले त्या वेळी वरुण म्हणाला : ‘आता अर्पण कर.’

मात्र तेव्हाही, ‘ज्या वेळी दुधाचे दात पडतात त्या वेळी प्राणी बळी देण्यास योग्य असतो,’ असं उत्तर त्याला मिळालं.

काही कालावधीनंतर वरुण म्हणाला : ‘दुधाचे दात आता पडले आहेत. आता त्याला अर्पण कर.’

त्याला उत्तर मिळालं : ‘प्राण्याला जेव्हा नवीन दात येतात तेव्हाच तो शुद्ध होतो.’

वरुण म्हणाला : ‘त्याचे दात पुन्हा आले आहेत...आता त्याला अर्पण कर.’

त्यावर उत्तर मिळालं : ‘अंगावर चिलखत घालण्याचं वय येतं, त्याच वेळी राजघराण्यातला प्राणी शुद्ध होऊन बळी देण्यास योग्य झाला आहे असं समजतात.’

साहजिकच हरिश्चंद्राचं आपल्या मुलावर प्रेम असल्यानं तो वचनपूर्ती करण्यात अशा प्रकारे चालढकल करू लागला. योग्य वेळ येण्याची कारणं सांगत तो दिशाभूल करत राहिला. वरुण वाट पाहत राहिला. आपले वडील हे सर्व कशासाठी करत आहेत हे रोहितच्या लक्षात आलं.

आपला जीव वाचवण्यासाठी धनुष्य-बाण घेऊन तो जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यावर त्याला समजलं की, वचन पाळण्यात टाळाटाळ केल्याबद्दल वरुणानं हरिश्चंद्राला जलोदराचा त्रास होण्याची शिक्षा दिली आहे. पुन्हा एकदा आपल्या नगरीत जाण्याची रोहितची इच्छा झाली; मात्र इंद्रानं त्याला रोखलं. पृथ्वीवर भ्रमंती करण्याचा आणि काही पवित्र तीर्थांचं आणि क्षेत्रांचं दर्शन घेण्याचा सल्ला इंद्रानं त्याला दिला.

रोहित एक वर्षभर जंगलात राहिला. त्यानंतर इंद्रानं सलग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन आणि रोहितची भेट घेऊन त्याला तोच सल्ला पुनःपुन्हा दिला. सहाव्या वर्षी, भटकंती करत करत रोहित आपल्या नगरीत परतला. परत आल्यानंतर त्यानं अजिगर्त नावाच्या व्यक्तीकडून त्याचा शुन:शेप नावाचा मधला पुत्र विकत घेतला. अजिगर्त हा भृगुकुळातला ब्राह्मण होता. त्याला तीन पुत्र होते.

त्याला आपल्या मोठ्या पुत्रापासून दूर जायचं नव्हतं आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या धाकट्या पुत्राचा विरह नको होता. त्यामुळे, दुसऱ्या क्रमांकाच्या, म्हणजे मधल्या पुत्राची, निवड झाली. रोहितनं आपल्या वडिलांची भेट घेऊन, स्वतःऐवजी शुन:शेप याला ‘अर्पण करण्याचा प्राणी’ म्हणून अत्यंत आदरपूर्वक सादर केलं.

अत्यंत भारावून गेलेल्या हरिश्चंद्रानं आपल्या पुत्राची प्रशंसा केली आणि वरुण व इतर देवांसाठी यज्ञ करून मनुष्य अर्पण केला. यामुळे तो जलोदराच्या त्रासातून मुक्त झाला. या यज्ञासाठी विश्वामित्र, जमदग्नी, वसिष्ठ आणि अयस्य यांनी  पौरोहित्य केलं होतं. इंद्र या यज्ञामुळे संतुष्ट झाला आणि सोनं वितळवून तयार केलेला रथ त्यानं हरिश्चंद्राला भेट दिला.

राजाकडे आणि त्याच्या पत्नीकडे सत्य, स्थैर्य आणि चिकाटी असल्याचं पाहून विश्वामित्र अत्यंत आनंदी झाले आणि त्यांनी दोघांना आशीर्वाद दिले. विश्वामित्रांना शंभर पुत्र होते. त्यांपैकी मधल्या एकाच पुत्राचं नाव मधुछंद असं असलं तरी, ही सगळीच मुलं मधुछंद याच नावानं ओळखली जात असत. भृगुकुळातल्या अजिगर्त ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेल्या शुन:शेप याला विश्वामित्रानं आपला पुत्र म्हणून स्वीकारलं आणि, त्याला आपला मोठा भाऊ म्हणून स्वीकारावं, अशी आज्ञा आपल्या इतर पुत्रांनाही केली.

हरिश्चंद्राच्या यज्ञात शुन:शेपाला बळी म्हणून दिलं जाणार असलं तरी, देवांनी त्याला मुक्त केलं होतं. त्यामुळे तो देवव्रत, म्हणजे देवांनी ज्याचं संरक्षण केलं आहे असा, म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, मधुछंद आणि त्याचे पन्नास भाऊ वगळले तर इतर भावांनी शुन:शेपाला भाऊ म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे विश्वामित्रांनी त्यांना शाप दिला : ‘हे दुष्टांनो, तुम्ही म्लेंच्छ व्हाल.’ हरिश्चंद्राच्या कथेत बहुतेक भाग हा ‘विश्वामित्रांनी त्याची वेळोवेळी घेतलेली चाचणी’ असाच आहे.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

पुरातन मंदिरांची इजिप्शियन संस्कृती

इजिप्त देशाची सर्व मंदिरं तुम्हाला मोहात पाडतात, आकर्षित करतात... इजिप्तला पुन्हा भेट देण्याची इच्छा नक्कीच तुम्हाला होईल एवढी शक्ती त्या मंदिरांमध्ये निश्चितच आहे.
Egyptian culture
Egyptian culturesakal

- विशाखा बाग

इजिप्त देशाची सर्व मंदिरं तुम्हाला मोहात पाडतात, आकर्षित करतात... इजिप्तला पुन्हा भेट देण्याची इच्छा नक्कीच तुम्हाला होईल एवढी शक्ती त्या मंदिरांमध्ये निश्चितच आहे. पुरातन इजिप्शियन संस्कृती, भव्यता आणि गूढता अशा गोष्टींमुळे इजिप्त तुम्हाला बांधून ठेवतं. वास्तुकलेचा एक अतिशय उत्तम नमुना त्यांच्या मंदिरांतून अनुभवता येतो.

इजिप्त देशाची भ्रमंती करायला निघाल्यानंतर अनेकानेक आश्चर्यकारक गोष्टी, पौराणिक कथा आणि हजारो वर्षांपूर्वीपासून उभी असलेली भव्य मंदिरं असं सर्व आपल्याला प्राग इतिहासाची आठवण करून देतं आणि आपलं मन नकळतच त्या विश्वात रमायला लागतं.

इजिप्तमध्ये फिरताना आणि तेथील मंदिरं बघताना आपण नकळत त्या काळात वावरतो आहोत, असंही वाटायला लागतं आणि ही गूढता आपल्याला प्राग इतिहासाच्या खुणा शोधायला अधिक उद्युक्त करते.

इजिप्तचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. लोअर इजिप्त आणि अप्पर इजिप्त. महत्त्वाची सर्व प्रेक्षणीय स्थळं अप्पर इजिप्तमध्येच आहेत. अस्वानमधून साधारण फक्त एका तासात आपण कोमअम्बो इथे येऊन पोहोचतो. कोमअम्बो हे मंदिरसुद्धा नाईल नदीच्या काठावरच आहे. फेरोजच्या काळातील हे मंदिर तीन हजार वर्षं जुनं आहे. क्रूझवरून उतरून फक्त पाचच मिनिटांत आपण तिथे पोहोचतो.

इथे एकसारखी असणारी दोन मंदिरं लागून लागून आहेत. त्यांपैकी पहिलं मंदिर हे नवजीवनाची देवता मगरींसाठी बांधलेलं आहे. दुसरं होरूस देवासाठी म्हणजेच गरुडाचं मंदिर आहे. सोबेक म्हणजेच मगरीचे तोंड असलेला देव. होरूस म्हणजे गरुडाचे तोंड असलेला देव. अशा या दोन देवांची ही मंदिरं आहेत. या मंदिरात आपल्याला मगरीची ममी म्हणजेच थडगी बघायला मिळतात. इथे मगरींसाठीच एक म्युझियमसुद्धा आहे.

संपूर्ण मंदिरभर आपल्याला वेगवेगळ्या आकृती, चित्र आणि मूर्ती कोरून काढलेल्या दिसतात. प्रागैतिहासिक काळात अक्षर लिपी नसल्यामुळे इजिप्शियन लोक प्रामुख्याने चित्र लिपी वापरत होते. ती चित्र लिपी वापरून लिहिलेल्या अनेक गोष्टी आणि पुरावे आपल्याला तिथे दिसतात. येथील सर्वच मंदिरांत देवांची, राजांची आणि गरुडांची चित्रं अन् मूर्ती आपल्याला बघायला मिळतात.

यानंतर पुढे आपण क्रूझने एडफू या गावाला निघतो. चार हजार वर्षांपूर्वी वसलेलं नाईल नदीच्या काठीचं एडफू हे गाव. सातव्या क्लिओपात्रा राणीच्या काळातील म्हणजेच फेरोजच्या काळातील हे मंदिर आहे. मोठ्या प्रमाणात सुस्थितीत राहिलेलं होरूस देवाचं हे मंदिरसुद्धा तीन हजार वर्षं जुनं आहे. होरूस म्हणजे, गरुडाचं तोंड असलेली आकाशदेवता.

नाईल नदीकाठावर पूर्व-पश्चिम असे नदीकडे तोंड करून एडफू मंदिर आपल्याला उभं दिसतं. क्रूझमधून उतरल्यानंतर घोडागाडीने आपण मंदिराकडे जायला निघतो. येथील घोडे मात्र उंच आणि धष्टपुष्ट असे होते. आम्ही अगदी सकाळीच गेलो असल्यामुळे जानेवारीमध्ये चांगलीच थंडी आणि धुकं जाणवत होतं. एडफू गाव बघत पंधरा मिनिटांत आपण घोडागाडीने मंदिरापर्यंत पोहोचतो.

हे मंदिरसुद्धा आपल्याला अजूनही मोठ्या प्रमाणात सुस्थितीत आढळते. प्रचंड मोठे खांब, सभामंडप आणि सर्व ठिकाणी गरुडाचं तोंड असलेल्या देवांच्या आणि गरुडांच्या मूर्तीही आपल्याला बघायला मिळतात. अचानक आपण तीन हजार वर्षांपूर्वीच्या काळात गेलो आहोत, असं मात्र तिथे गेल्यावर लगेच जाणवायला लागतं.

आधी आपल्याला इथे पंधरा मिनिटांची मंदिराबद्दलची एक चित्रफीत दाखवली जाते. त्यामध्ये मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगितला जातो. या मंदिरामध्येसुद्धा आपल्याला जागोजागी चित्र लिपी कोरलेली आढळते. या चित्र लिपीद्वारे तेव्हाच्या लोकांनी अनेक गोष्टी आणि त्याबद्दलची विस्तृत माहिती या मंदिरांमध्ये कोरून ठेवलेली आहे.

नंतरचं महत्त्वाचं आकर्षण होतं, ते म्हणजे ‘व्हॅली ऑफ किंग्स.’ म्हणजेच ख्रिस्तपूर्व दहाव्या ते सोळाव्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या राजांची आणि राजघराण्यातील व्यक्तींची दफनभूमी. राजासोबत अनेक मौल्यवान वस्तूही दफन केल्या जायच्या. एकूण ६५ कबरी इथे आहेत. त्यातील कोणत्याही वस्तू चोरीला जाऊ नयेय म्हणून वाळवंटातील अतिशय आडभागात ही दफनभूमी तेव्हा बांधली गेली होती.

रामसेस दुसरा या राजाच्या मुलांची थडगी आणि त्याची जागा ही सर्वात मोठी आहे. त्यामध्ये १२० खोल्या आणि आणि तेवढेच कॉरिडॉर आहेत. हे फक्त एका राजाबद्दल आहे. अशी अनेक राजांची थडगी आणि कबरी तिथे आहेत. तूतनखामुन या राजाची कबर हे येथील एक मुख्य आकर्षण आहे. प्रचंड मोठ्या जागेत ही व्हॅली पसरली असल्यामुळे आपल्याला इथे फिरण्यासाठी बॅटरीवरच्या गाड्या उपलब्ध आहेत.

यानंतर आम्ही गेलो ते हॅटशेपसूटचे मंदिर बघण्यासाठी. हॅटशेपसूट या राणीला इजिप्तमध्ये त्या काळात प्रचंड लोकमान्यता होती. या राणीने त्या काळात देशात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि आर्थिक दृष्टीनेसुद्धा देशाला सबळ करण्याचा प्रयत्न केला. अतिशय भव्य असलेलं हे मंदिर प्रचंड मोठ्या जागेत पसरलेलं आहे. ८९७ फूट लांब आणि ३४४ फूट रुंद असं हे मंदिर आहे.

या मंदिराला भेट द्यायची असेल, तर तुमची चालण्याची तयारी हवी. वास्तुकलेचा एक अतिशय उत्तम नमुना म्हणून हे मंदिर अजूनही हजारो वर्षांपासून ओळखलं जातं. लाईमस्टोन, सॅड स्टोन आणि ग्रॅनाईटच्या दगडामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. लक्सर (Luxor) या महत्त्वाच्या गावापासून ते जवळ आहे.

नाईल नदीकाठचं अजून एक महत्त्वाचं आणि अतिशय भव्य मंदिर म्हणजे लक्झर टेंपल. संध्याकाळी आम्ही तिथे गेलो होतो. लाईमस्टोनमध्ये बांधलेलं हे मंदिर संध्याकाळ असल्यामुळे विद्युत रोषणाईमुळे अजूनच भव्य आणि गूढ वाटत होतं. पाहताक्षणीच आम्हा सर्वांच्या पसंतीस ते उतरलं. अमून रे या देवासाठी आणि फेरोज राजांच्या राज्यविधींसाठी आणि राज्याभिषेकांसाठी हे मंदिर बांधलं गेलं होतं.

दहा हजार चौरस मीटर जागेत हे मंदिर पसरलेलं आहे. २६० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद एवढ्या जागेत ते बांधलं गेलं आहे. मंदिरामध्ये प्रचंड मोठे लाईनस्टोनचे खांब आहेत. अनेक वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती तुम्हाला इथे दिसतील. याचबरोबर मोठे-मोठे सभामंडप आणि ओपन एअर म्युझियमही इथे आहे.

खांब एवढे प्रचंड मोठे आहेत, की दोन माणसांनी दोन्ही बाजूंनी धरूनही ते दोघांच्या हातामध्ये मावत नाहीत. मंदिराच्या बाहेर एका ओळीत बसलेल्या स्थितीत असलेल्या मनुष्य चेहऱ्याच्या सिंहाच्या अनेक मूर्ती तुम्हाला इथे दिसतील.

अमून रे या देवासाठी बांधलेलं अजून एक मंदिर म्हणजे कारनाक टेंपल. लक्सर याच गावात ते आहे. तेसुद्धा वास्तुकलेचा एक अतिशय उत्तम नमुना आहे. या मंदिराला भेट दिल्यानंतरही त्या काळातील इजिप्शियन लोकांची संस्कृती आणि तेव्हाच्या धर्मानुसार विधिवत केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी अन् त्याबद्दलच्या चित्र लिपी तुम्हाला इथे दिसतील.

या मंदिरात ५० हजार चौरस फुटांचा मोठा सभामंडप आहे आणि साधारण १३४ प्रचंड मोठे खांब इथे तुम्हाला दिसतील. २४७ एकरात हे मंदिर पसरलेलं आहे. परत येताना कैरोमध्ये थांबल्यानंतर तेथील महत्त्वाचं कैरो म्युझियम बघितलं. त्यामध्येसुद्धा तुम्हाला ममीज, पुरातन इजिप्शियन संस्कृतीच्या वस्तू, दागिने, राजांच्या आणि देवांच्या मूर्ती अशा अनेक नावीन्यपूर्ण वस्तू बघायला मिळतात. न चुकवण्यासारखं हे म्युझियम आहे.

मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि मनात घर करणाऱ्या इजिप्त देशाला नक्कीच एकदा तरी भेट द्यायला हवी.

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

gauribag7@gmail.com

वैभवसंपन्न ‘जागतिक वारसा’

भारताच्या पर्यटन क्षेत्रात ज्या भागाला सुवर्ण त्रिकोण म्हणजेच ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटलं जातं, त्या दिल्ली-आग्रा-जयपूरपैकी एक जयपूर सर्वांत जास्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.
City Palace, Jaipur
City Palace, Jaipursakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

भारताच्या पर्यटन क्षेत्रात ज्या भागाला सुवर्ण त्रिकोण म्हणजेच ‘गोल्डन ट्रँगल’ म्हटलं जातं, त्या दिल्ली-आग्रा-जयपूरपैकी एक जयपूर सर्वांत जास्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करते. दिल्ली, आग्र्याला भेट देणारा पर्यटक आवर्जून जयपूरसुद्धा बघतो. मध्ययुगातील मोजक्याच नियोजनबद्ध निर्मिती केलेल्या शहरांपैकी एक म्हणजे जयपूर शहर.

भरपूर संग्रहालयं, प्रचंड प्रमाणात ऐतिहासिक वास्तू, आजूबाजूला बरेच किल्ले, मोठा इतिहास असलेले राजवाडे , कपडे आणि दागिन्यांची बाजारपेठ, जगप्रसिद्ध मिष्टान भांडारं या गोष्टी जयपूरला देशातील सर्वांत प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत नेऊन ठेवतात. शहरात असलेल्या उत्कृष्ट वास्तुशैलीतील अनेक इमारतींमुळं २०१९ मध्ये युनेस्कोनं जयपूरला जागतिक वारसा शहर घोषित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांमुळं इतिहासप्रसिद्ध पावलेले मिर्झा राजे जयसिंह, त्यांचा मुलगा रामसिंह हे इथल्या कछवाह राजपूत घराण्यातले राजे, रामसिंहचा मुलगा जयसिंह (दुसरा) यानं जयपूर शहराची स्थापना केली. त्यापूर्वी राजधानी अंबर अथवा आमेर नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यावर होती. आजूबाजूला तीन किल्ले आणि भव्य तटबंदीने वेढलेल्या जयपूरची निर्मिती ही मराठा साम्राज्याचा जो प्रचंड विस्तार झाला होता त्याचा आमेरला असलेला धोका ओळखून झाल्याचं सांगण्यात येतं. राजघराण्याचं निवासस्थान असलेलं ‘सिटी पॅलेस’ हे शहराच्या येणाऱ्या पर्यटकांच्या आर्कषणांचा केंद्रबिंदू आहे.

१७२७ मध्ये सुरू झालेल्या बांधकामात, राजघराण्यातील पुढच्या पिढ्यांनी १९४९ पर्यंत भर घातली. राजस्थानमधील जुन्या शहरांमध्ये असणाऱ्या मुख्य राजवाड्याला अथवा मुख्य जुन्या शहरात प्रवेश करताना भव्य दरवाजांची निर्मिती केली जायची. तसेच दरवाजे सिटी पॅलेसला सुद्धा आहेत. शहराच्या विविध भागांमधून प्रवेश करण्यासाठी राजेंद्र पोल, वीरेंद्र पोल, उदय पोल हे दरवाजे आहेत. पोल म्हणजे दरवाजा.

सिटी पॅलेसच्या मोठ्या भागाचे रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आलं असून अत्यंत देखणं असं संग्रहालय आहे. वस्त्र दालन, शस्त्र दालन, चित्र दालन, मुबारक महाल, चंद्र महाल, सभा निवास, सर्वतो भवन असे संग्रहालयाचे विविध विभाग आहेत. आवड असेल तर संपूर्ण दिवस येथे जातो.

सिटी पॅलेस वास्तुकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे, याचे उदाहरण म्हणजे `स्किडमोर, ओविंग अँड मेरील`या वास्तू रचनाकारांनी सिटी पॅलेस येथील मयूर दरवाजापासून प्रेरणा घेऊन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल २ ची अंतर्गत रचना केली.

एक प्रकारे शहराचाच भाग असणाऱ्या जवळच्या टेकड्यांवर एका बाजूला आमेर आणि जयगड हे किल्ले आहेत तर दुसऱ्या बाजूला नहार गड हा किल्ला आहे. आमेर हा राजधानीचा किल्ला होता आणि जयपूरच्या स्थापनेनंतर सुद्धा अनेक वर्ष वापरात असल्याने किल्ल्यावरील ८० टक्के वास्तू अजूनही शाबूत आहेत. हा किल्ला ‘जागतिक वारसा स्थळ’ असून दररोज सरासरी पाच हजारापेक्षा जास्त पर्यटक हा किल्ला बघण्यासाठी येतात.

किल्ला चार मुख्य प्रांगणांमध्ये विभागलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला लाइट आणि साउंड शो दररोज सायंकाळी दाखवला जातो. किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास ध्वनिप्रकाश योजनेतून अमिताभ बच्चन यांच्या निवेदनातून समजावून सांगण्याचा उत्तम प्रयत्न वाटला. आमेर किल्ल्याजवळ असलेल्या चील का टिला नावाच्या डोंगरावर जयगड किल्ला आहे.

आमेरपासून जयगडला जाण्यासाठी मोठा भुयारी मार्ग आहे. मध्ययुगीन काळातील जगातील सर्वांत मोठी हलवता येणारी तोफ या जयगड किल्ल्यावर आहे. इथल्या गाइडकडून या तोफेच्या सुरस कहाण्या ऐकायला मिळतात. गमतीचा भाग म्हणजे प्रत्यक्षात ही तोफ कोणत्याच लढाईत वापरण्यात आलेली नव्हती. हा किल्ला अजूनही राजघराण्याच्या मालकीचा आहे.

जयपूरमध्ये अजून एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मिर्झा राजा जयसिंह, रामसिंह यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आलेला संबंध, स्थानिक लोक असतील किंवा ऐतिहासिक स्थळे दाखवणारे गाइड असतील अथवा आजूबाजूच्या राजघराण्यातील लोक असतील, आवर्जून सांगतात.

सिटी पॅलेसप्रमाणं जयपूर शहराच्या अगदी मध्यभागी असलेलं अल्बर्ट हॉल संग्रहालय येथील विविध शस्त्रांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या विविध भागांत अनेक राजवाड्यांची निर्मिती राजघराण्याकडून झाली. त्यातील प्रसिद्ध म्हणजे जलमहाल आणि हवामहाल. गुलाबी शहर अथवा ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आधी गुलाबी अजिबात नव्हतं.

१८७६ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजेच इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा हा जयपूरला भेट देणार असल्यानं त्यानिमित्तानं शहर गुलाबी केलं गेलं आणि नंतर नवीन घरांना सुद्धा तोच पायंडा पडला.

पूर्वीच्या काळात आसपासचे राजे-राजवाडे आणि सरदार घराण्यातील लोक जयपूरला कामकाजासाठी येऊन राहिले आणि त्यांनी त्यांचे राजवाडे मुख्य राजवाड्याच्या अवतीभवती बांधले. आज यातील अनेक राजवाड्यांचं रूपांतर आलिशान हॉटेल्समध्ये आणि संग्रहालयांमध्यं झालंलं आहे. जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलपैकी एक, रामबाग पॅलेस ४७ एकरमध्ये पसरलेलं असून हे या राजवाड्यांपैकीच एक आहे.

सिटी पॅलेसमधून बाहेर पडल्यावर लगेचच इथले मोठे बाजार आहेत आणि या बाजारांना जोडणारे ३०० बाय ३०० फुटांचे भव्य चौक आहेत. या चौकांना चौपार असे म्हणतात. सध्या सर्वांत प्रसिद्ध खरेदीसाठी असलेला बापू बाजार असला, तरी सुद्धा पूर्वी फक्त चार मुख्य बाजार होते. जोहरी बाजार, किशन पोल बाजार, गंगोरी बाजार आणि सिरेह देवरी बाजार.

जयपूरच्या पूर्वांपार चालत आलेल्या रत्नशाळा जगप्रसिद्ध असून अजूनही जगभरातून मोठे उद्योगपती, राजघराणी मौल्यवान रत्न व दागिने खरेदीसाठी जोहरी बाजारात येतात. शोभेच्या वस्तूंची सुद्धा मोठी बाजारपेठ येथे आहे. जयपूरची मिष्ठान्न भांडार परंपरा अतिशय जुनी असून काही दुकानांचा इतिहास तर तीनशे वर्षांपेक्षा जुना आहे. त्यातील लक्ष्मी मिष्ठान्न भांडारमध्ये एकाच छताखाली राजस्थानमधील विविध भागातील मिठाईचे प्रकार चाखता येतील.

जयपूरच्या आसपासचा पन्नास किलोमीटर परिघातील परिसर सुद्धा अतिशय सुंदर असून इतिहासप्रेमींनी, खाद्यप्रेमींनी वेळ काढून भेट द्यावी असा आहे. अलवर, बिशनगढ, कनोटा या ठिकाणांचं आवर्जून नाव घेता येईल. कनोटा येथील पॅलेस सुंदर असून येथील संग्रहालयामध्ये काही जगावेगळी गोष्टी आहेत. ठाकूर अमरसिंह यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जगभर फिरून देशोदेशींच्या पाककृतींच्या तब्बल ४४ खंडांची निर्मिती केली.

ज्यामध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त पाककृती आहेत. यातील काही मोजके पदार्थ तुम्हाला येथील पॅलेसमधील रेस्टॉरंटमध्ये चाखता येतील. जयपूरच्या आसपासच्या जंगलात पूर्वीच्या काळी राजघराण्यातील लोक आणि त्यांचे सरदार शिकारीसाठी जात असत, त्या वेळी राहण्यासाठी त्यांनी आसपासच्या भागात हंटिंग लॉज बांधलेले होते, ज्यांना स्थानिक भाषेत शिकारबाडी असंही म्हणतात.

रामगढ, झलना, सरिस्का हे प्रसिद्ध हंटिंग लॉज आहेत. जयपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. हा परिसर बघण्यासाठी बराच वेळ हाताशी हवा, म्हणूनच या शहराला धावती भेट टाळा, जितकं हळूहळू तुम्ही जयपूर बघत जाल, तितक्या विविध गोष्टी हे शहर तुम्हाला उलगडून दाखवेल.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, त्यांचा भर साहसी पर्यटनावर असतो.)

व्हिएतनामचे पक्षीवैभव

व्हिएतनाम, दक्षिण पूर्व आशियामधील एक देश. एका बलाढ्य देशाला युद्धात शरण न जाणारा अशी ओळख असलेल्या या देशातील पक्षीविविधता प्रचंड आहे.
bird welath in vietnam
bird welath in vietnamsakal

- डॉ. रजनीश घाडी

ठाण्यातील एका पर्यावरणप्रेमीने खास व्हिएतनामला पक्षी बघण्यासाठी सहल काढली. त्या सहलीत काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीरमध्ये भरले आहे, या वेगळ्या उपक्रमाविषयी...

व्हिएतनाम, दक्षिण पूर्व आशियामधील एक देश. एका बलाढ्य देशाला युद्धात शरण न जाणारा अशी ओळख असलेल्या या देशातील पक्षीविविधता प्रचंड आहे. पर्जन्यवन म्हणजेच ‘रेन फॉरेस्ट’ पद्धतीचे वनवैभव या देशाला लाभलेले आहे. या पद्धतीच्या वनांमध्ये अधून-मधून सतत पाऊस पडत असतो, त्यामुळे येथील जंगले वर्षभर हिरवेगार व घनदाट असतात. त्यातील वृक्ष उंच व प्रचंड घेर असलेले तसेच दाट असतात.

अशा वनांमध्ये विलोभनीय, आकर्षक रंगाचे पक्षी पाहता येतात. तीन वर्षे या वनांचा अभ्यास केल्यावर ‘वाइल्डवुड’ या निसर्गप्रेमी संघटनेने येथे पक्षी निरीक्षणासाठी सहल आयोजित करण्याचे निश्चित केले. भारतातून केवळ पक्षी निरीक्षणासाठी क्वचितच कुठलीशी सहल गेली असेल, त्यामुळे या सहलीला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, ती एकाऐवजी दोनदा आयोजित करावी लागली.

तेथील हवामानानुसार जानेवारी व फेब्रुवारी २०२३ मध्ये या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक बॅचमध्ये आठ जण होते. अत्यंत उत्साहात पहिल्या सहलीतील आठ जणांनी मुंबई ते हो ची मिन्ह प्रवास केला. त्यांचे गाईडने विमानतळावर स्वागत केले. बसेसमधून प्रवास सुरू झाला.

दोन टप्प्यात गेलेल्या पक्षीप्रेमी छायाचित्रकार पुढील सात दिवस एका आगळ्यावेगळ्या विश्वात होते. तिथल्या लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह पद्धतीने उडालेला गोंधळ, भारतीय व तत्सम पद्धतीचे जेवण मिळत नसल्याने ब्रेड, जाम, चीझ व फळांवरच दिवस काढावे लागत असताना पाचव्या दिवशी द लाटला पोहोचल्यावर सापडलेले एक भारतीय हॉटेल आणि सर्वांनी तेथे पोटभर केलेले जेवण असा जंगलसफारीव्यतिरिक्त बाह्यअनुभवही सहलीचे वेगळेपण ठरले.

या सहलीचा महत्त्वाचा हेतू हा तेथील पक्षी बघणे हा होता. त्यानुसार चार विविध अभयारण्ये पाहून तेथील पक्ष्यांचे छायाचित्रण केले. येथील पक्ष्यांची छायाचित्रे टिपताना कला फाटोग्राफर्स कलावंतांचा कस लागला. रेन फॉरेस्ट असल्यामुळे दाट वनसंपदा, त्यात पावसाची संततधार, अत्यंत कमी किंवा जवळ-जवळ नसलेलाच सूर्यप्रकाश, धुके या सर्वांचा सामना करतानाच पक्ष्यांचे छायाचित्रण करणे ही एक परीक्षाच त्यांनी पास केली आहे, याची प्रचीती प्रदर्शित झालेल्या छायाचित्रांत येते.

व्हिएतनामच्या दक्षिण प्रदेशात जंगलात चार प्रकारच्या पिट्टा (नवरंग) प्रजाती पाहता येतात. पिट्टा मुळातच अत्यंत आकर्षक पक्षी असतो व येथील चारही प्रजातींची छायाचित्र काढण्याची गोष्ट फोटोग्राफर्सकडून ऐकण्याचा आनंद चित्ररसिकांना या प्रदर्शनात मिळतो. या ब्ल्यू पिट्टा, ब्ल्यू रम्पड पिट्टा, रस्टी नेप्ड पिट्टा व बार बेलिड पिट्टासह सिल्वर पिझन्ट, मुगामकी फ्लायकॅचर, इंडो-चायनिज ब्ल्यू फ्लायकॅचर, इंडो-चायनिज ग्रीन मॅगपाय, स्ट्रीक व्रेन बॅब्लर, स्केली क्राउंड बॅब्लर अशा विविध १२० आकर्षक प्रजातींच्या पक्ष्यांची छायाचित्रणाची मेजवानी या फोटोग्राफर्सना मिळाली.

प्रदर्शनाची संकल्पना

दोन्ही सहली पूर्ण झाल्यानंतर बरेच पक्षी भारतातील फारशा निसर्गप्रेमींना माहीत नसावेत व त्यामुळे त्याचे एक प्रदर्शन करण्याची कल्पना या सहलीत सहभागी झालेल्यांनी सुचवली. या पक्ष्यांची थोडक्यात ओळख इतरांना करून देता येईल, ही संकल्पना मांडताच सर्व सहभागी झालेल्यांनी त्याला पाठिंबा दिला.

त्या दृष्टीने सर्व कामाला लागले आणि निवडक ५६ छायाचित्रे, म्हणजेच सहलीत सहभागी असणाऱ्या प्रत्येक सभासदाची चार छायाचित्रे असे मिळून एकूण निवडक ५६ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आले. १३ डिसेंबरपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू झालेले हे प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यंत निसर्गप्रेमींना बघता येणार आहे.

या प्रदर्शनात सहभागी झालेले बहुतांश व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. काही इंजिनिअर, प्राध्यापक, उद्योजक, शासकीय अधिकारी अशा पदांवर असून, निसर्गप्रेमी छायाचित्रकार आहेत. त्यात डॉ. चेतन पोंक्षे हे प्राणीशास्त्र विषयात पीएच.डी. आहेत. एक चतुर्थांश शतक, त्यांनी उपनगरातील महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांना प्रवासाची व वन्यजीव छायाचित्रणाची विशेष आवड आहे.

डॉ. अतुल देशपांडे हे देशाच्या कानाकोपऱ्यातील दुर्मिळ प्रजातींचे पक्षी टिपण्यात उत्सुक असलेले एक समर्पित वन्यजीव छायाचित्रकार आहेत. डॉ. देवीप्रसाद राव एक कुशल आयुर्वेदिक वैद्य आणि एक उत्साही वन्यजीव छायाचित्रकार आहेत. वैद्यकशास्त्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव आणि छायाचित्रणातील सात वर्षांच्या अनुभवासह, त्यांना त्यांच्या छायाचित्रण कलेतील बारकावे इतरांना शिकवण्यात आनंद मिळतो.

शिवाजी देसाई व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. छायाचित्रण हे आत्म-अभिव्यक्तीचे आणि आनंदाचे साधन आहे. दीपा सपने व्यवसायाने उद्योजक असून त्यांना वन्यजीवांचा छंद आहे. पक्ष्यांमध्ये विशेष स्वारस्य असलेल्या वन्यजीवांचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घनदाट वनक्षेत्र आणि उद्यानांमध्ये वारंवार त्या फिरत असतात.

मंत्रालयात अवर सचिव असलेले दुर्गाप्रसाद मैलावरम हे एक कुशल वन्यजीव छायाचित्रकार आहेत. ज्यांनी देश-विदेशात वन्यजीव टिपण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या. त्याचे कार्य विशेषतः पक्षी आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यावर केंद्रित आहे.

प्रशांत वाघ हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव म्हणून काम करतात. त्यांना प्रवासाची, नवीन ठिकाणे शोधण्याची आवड आहे आणि पक्षी निरीक्षण आवडत्या छंदांपैकी एक. डॉ. इस्माईल सामीवाला एका औषध कंपनीत काम करतात; परंतु वन्यजीव फोटोग्राफीची त्यांची आवड त्यांच्या वीकेंडला आणि मोकळ्या वेळेवर वर्चस्व गाजवते.

सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांसह विविध प्रकारच्या प्राण्यांनी त्यांना फोटोग्राफीसाठी भुरळ पाडतात. नीलांगी मोरे या जे जे स्कूलमधील पदवीधर कमर्शिअल आर्टिस्ट आहेत, वन्यजीव छायाचित्रणाचा छंद विशेषतः ॲक्शन फोटोग्राफीमध्ये त्या निष्णात आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले संतोष कुमार यांना वन्यजीव टिपण्याची आवड आहे.

डॉ. संतोष यांनी देशातील तसेच परदेशातील जंगलांमध्ये प्रवास करून परदेशातील काही दुर्मिळ आणि उल्लेखनीय शॉट्स मिळवले आहेत. लेन्समागील त्यांचे अपवादात्मक कौशल्य त्यांना मिळालेल्या असंख्य पुरस्कारांवरून दिसून येते. आनंद चव्हाण हे बीपीसीएल रिफायनरीचे निवृत्त ऑपरेशन्स व्यवस्थापक.

निवृत्तीनंतर वन्यजीव छायाचित्रण हा त्यांचा प्राथमिक छंद बनला आहे आणि जंगलातील निसर्गाचे सौंदर्य टिपण्यासाठी ते अत्यंत उत्साही आणि समर्पित आहेत. डॉ. मंगेश प्रभुलकर हे प्रख्यात त्वचारोगतज्ज्ञ आणि वन्यजीव छायाचित्रकार आहेत. आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी त्वचाविज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य तज्ज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या वैद्यकीय कौशल्याव्यतिरिक्त, त्यांनी पक्षी, ट्रेकिंग आणि वन्यजीव छायाचित्रणाची आवड जोपासली आहे, ज्यामुळे त्यांना संपूर्ण भारत आणि भारतीय उपखंडात भ्रमंती केली आहे. आतापर्यंत जगभरातील ९२५ पक्ष्यांच्या प्रजातीची नोंद आपल्या कॅमेऱ्याद्वारे केली आहे. स्वाती काळेकर या ग्राफिक डिझायनर आणि फ्रीलान्स आर्टिस्ट आहेत.

त्या फाइन आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. जाहिरात एजन्सीमध्ये काम केल्यानंतर, त्यांना फोटोग्राफी, विशेषतः वन्यजीव आणि निसर्ग फोटोग्राफीमध्ये आवड निर्माण झाली. आपल्या कुशल छायाचित्रण कलेने त्यांनी अनेक रसिकांची वाहव्वा मिळविली आहे.

या प्रदर्शनात सहभागी झालेले आणि ‘वाईल्ड वूड’चे संस्थापक डॉ. सुधीर गायकवाड यांचे ‘सकाळ’च्या अवतरण पुरवणीत ‘पक्षीदर्शन’ हे वाचकप्रिय सदर होते. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते वन्यजीव छायाचित्रणाचा छंद जोपासत आहेत. ते कुशल छायाचित्रकार आहेतच, सोबतच त्यांचे अनुभव ते इतरांसोबत शेअर करून वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात. वन्यजीव स्तंभलेखक म्हणून त्यांचे ३२५ हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

अशा या आगळ्यावेगळ्या विषयांवरील आणि हौस म्हणून छायाचित्रांत रमणाऱ्या मंडळीचे ‘व्हिएतनाम’मधील पक्षीवैभव कलाप्रेमींना खुणावणारे आहे.

वनप्रदेशात वन्यजीव निरीक्षण सहली आयोजित करणाऱ्या ‘वाइल्डवुड’ निसर्गप्रेमी संस्थेने काही महिन्यांपूर्वी दक्षिण पूर्व आशियामधील व्हिएतनाम येथे पक्षी निरीक्षण सहल आयाेजित केली होती. या सहलीत सहभागी झालेल्या छायाचित्रकारांनी तेथील पक्ष्यांची छायाचित्रे काढली आणि त्याचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात भरवले आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून व्हिएतनाममधील पक्षीवैभव जाणून घेण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे.

(लेखक वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असून, पर्यावरणप्रेमी आहेत.)

किल्ले आणि भव्य राजवाडे

आपल्या महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं, गडकिल्ल्यांनी नटलेलं, उत्तम आणि चवदार पदार्थांची रेलचेल असलेलं राज्य म्हणजे राजस्थान.
Rajasthan Pushkarmela
Rajasthan Pushkarmelasakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

आपल्या महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं, गडकिल्ल्यांनी नटलेलं, उत्तम आणि चवदार पदार्थांची रेलचेल असलेलं राज्य म्हणजे राजस्थान. भारतामध्ये सर्वांत जास्त परदेशी पर्यटक ज्या राज्याला भेट देतात ते म्हणजे राजस्थान. पूर्णपणानं ऐतिहासिक पर्यटन स्थळांसाठी हे राज्य प्रसिद्ध असून याचे प्रामुख्याने चार भौगोलिक भाग आहेत.

सर्वांत पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेश, त्या लगत असलेली अरवली पर्वताची रांग आणि त्यालगतचा प्रदेश, पूर्वेकडील बऱ्यापैकी शेतीच्या दृष्टीने समृद्ध असलेला सखल प्रदेश तर सर्वांत पूर्वेकडील एके काळचे बुंदीचे राज्य असणारा मध्यप्रदेश लगतचा भाग, असे मिळून राजस्थान राज्य बनले आहे. स्थानिक लोकांसाठी आणि प्रशासकीय दृष्ट्या पश्चिमेकडील जैसलमेर, बिकानेर येत असलेला भाग म्हणजे थारचे वाळवंट, मारवाड, मेवाड, धुंधर, शेखावटी, हाडोटी, डुंगरपूर हे प्रमुख भाग आहेत.

उदयपूर, जयपूर ,जोधपूर, जैसलमेर, माउंट अबू ही राजस्थानमधील सर्वांत प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत. पर्यटकांकडून प्रथम पसंती या ठिकाणांना दिली जाते. पर्यटकसुद्धा आता चोखंदळ झाल्यानं पुष्कर, रणथंबोर, कोटा, बुंदी, अलवर, बिकानेर यांना सुद्धा पसंती मिळत आहे. अर्थात आपण किती दिवसांसाठी भटकंतीला जाणार आहात त्यावर नेमकी किती ठिकाणं बघता येतील याचा अंदाज येतो.

महाराष्ट्रातून जाणारे बरेच पर्यटक उदयपूर, जोधपूर, जयपूर असं साधारण सात दिवसांचं पर्यटन करून परततात. उदयपूरला पोहोचण्याआधी डुंगरपूर लागते, हे पूर्वीच्या रावळ राजांचे संस्थान. अतिशय सुंदर असे पॅलेस आणि संग्रहालय येथे आहेत. इथला उदय बिलास पॅलेस प्रसिद्ध आहे. यातील काही भागाचं हॉटेलमध्ये रूपांतर केले असून तिथं राहता सुद्धा येतं. त्याच सोबत जुना महाल, गैब सागर हा जलाशय व इथलं विंटेज कारचं संग्रहालय पाहता येईल. दोन दिवसांत डुंगरपूर व आसपासचा भाग बघता येतो. इथून उत्तरेला शंभर किलोमीटरवर उदयपूर आहे. उदयपूर व जवळपासचा परिसर अतिशय प्रेक्षणीय असल्यानं इथं पाचसहा दिवस सुद्धा थांबता येतं.

उदयपूरबद्दल माहिती देण्यापूर्वी काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. महाराष्ट्रातील जवळपास सर्व गड-किल्ले हे सरकारच्या ताब्यात आहेत म्हणजेच एखाद-दुसरा अपवाद वगळता खासगी किल्ले अस्तित्वात नाहीत. परंतु या उलट राजस्थानमध्ये दीडशेपेक्षा जास्त किल्ले आणि शेकडो पॅलेस हे खासगी मालकीचे आहेत. त्यामुळे या खासगी किल्ले आणि राजवाड्यांमध्ये हॉटेल व रेस्टॉरंट आपल्याला दिसतील. या जागेचा इतिहास व तेथील सौंदर्य त्या त्या ठिकाणी राहून अनुभवता येते.

या सर्व खासगी ऐतिहासिक स्थळांच्या मालकांनी मिळून इंडियन हेरिटेज हॉटेल ग्रुपची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष जोधपूरचे राजे गजसिंह आहेत, त्यांच्या वेबसाइटवर या सर्व राजवाड्यांची माहिती मिळू शकेल. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमधील सरकारी मालकीच्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखले असून तेथे कोणत्याही प्रकारचे हॉटेल अथवा रेस्टॉरंट नाहीत.

तत्कालीन मेवाडची राजधानी असलेल्या उदयपूरमध्ये सुद्धा लहान-मोठे असे शेकडो पॅलेस आहेत. इथल्या पिचोला तलावाभोवती हे संपूर्ण जुने शहर असून सर्व प्रमुख ऐतिहासिक स्थळं इथंच आहेत. उदयपूरच्या महाराणांचं निवासस्थान असलेले सिटी पॅलेस व तिथलं संग्रहालय प्रेक्षणीय आहे. इथून जवळच असलेल्या बागोर की हवेली या ठिकाणी राजस्थानमधील लोककलांचं सादरीकरण होतं. तलावाजवळ असलेल्या गंगोर घाट व आमराई घाट यांच्या काठावर अनेक सुंदर रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत.

तिथं राजस्थानमधील प्रसिद्ध अशी दाल बाटी, ५६ भोग थाळी, लाल मास, सफेद मास, जंगली मास, यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल. इथं जवळच्या डोंगरावरच समर पॅलेस म्हणून ओळखला जाणारा सज्जनगड हा किल्ला आहे.

उदयपूरपासून जवळच नाथद्वार हे भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे एक ऐतिहासिक स्थळ असून येथील मंदिरसुद्धा बरेच जुने आहे. वैशिष्ट्यपूर्ण असा नाथद्वारी चहा इथलाच. मेवाडचे कुलदैवत एकलिंगजी महाराज मंदिर आणि राणा प्रताप यांचे प्रसिद्ध हल्दीघाटीचे स्मारकसुद्धा उदयपूरपासून जवळ आहे. उदयपूरकडून जोधपूरकडे जाताना इतिहास प्रसिद्ध असे चितोडगड आणि कुंभलगड हे किल्ले बघून पुढे जाता येईल.

हँडीक्राफ्टची भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून जोधपूरचं नाव आहे. दोन हजार कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल दरवर्षी येथे होते. लाखो परदेशी पर्यटक येथे खरेदीसाठी येतात. शहराच्या मधोमध असलेल्या सरदार बाजारमध्ये सात हजारपेक्षा जास्त दुकाने आहेत. कापड, कातड्यापासून बनवलेल्या वस्तू, लाकडी वस्तू या प्रामुख्याने येथे मिळतात. इथला मेहरानगड किल्ला आणि उमेद भवन पॅलेस हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.

एकेकाळचं इथल्या राजांचं निवासस्थान असलेलं उमेद भवन पॅलेस आता जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलपैकी एक आहे. याचा काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे. ब्ल्यू सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोधपूरमधील जुन्या काळातील या निळ्या घरांच्या मधल्या निमुळत्या रस्त्यांवरून आवर्जून पायी फेरफटका मारावा. जोधपूरवरून जयपूरला जाऊन तिथे भटकंती थांबवता येते किंवा जोधपूर ते जैसलमेर मग पुढे बिकानेर आणि तिथून जयपूर असंही करता येते.

हिवाळ्याच्या दिवसांत गेलात तर जैसलमेरमध्ये वाळवंटाची सफर आणि डून बॅशिंग आवर्जून करावे, शक्य असल्यास वाळवंटात काही ठिकाणी स्थायी कॅम्प आहेत तेथे मुक्काम करावा. जैसलमेरचा किल्ला अतिशय सुंदर असून किल्ल्यात २५० पेक्षा जास्त कुटुंब अजूनही राहतात. त्यामुळे याला लिविंग हेरिटेज असं म्हटलं जातं.

जैसलमेरच्या तुलनेत बिकानेरला फार लोक भेट देत नाहीत, मुख्य टुरिझम सर्किटपासून काही तुटत असल्यानं व नेमकं काय बघावं याची माहिती नसल्यानं बिकानेरच्या दिशेनं फारशी पावले वळत नाहीत. इथला जुनागढचा किल्ला, गजनेर राजवाडा आणि जवळच असलेले अभयारण्य या सगळ्यांला हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. राजस्थान सरकारचं मुख्य पुराभिलेख कार्यालय बिकानेर इथं असून सर्व जुनी कागदपत्रं इथं उपलब्ध आहेत.

देशातलं पहिलं डॉक्युमेंट म्युझियम बिकानेर इथं असून या संग्रहालयामध्ये अतिशय विशेष स्वरूपात बनवली गेलेली छत्रपती शिवाजी महाराज गॅलरी आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजस्थानात उपलब्ध असलेली सर्व तत्कालीन अस्सल कागदपत्रं प्रदर्शन रूपात ठेवण्यात आलेली आहेत. बिकानेरला जाल तेव्हा आवर्जून या संग्रहालयाला भेट द्या.

जयपूर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग इतिहास प्रसिद्ध आणि पर्यटन स्थळांची रेलचेल असलेला असल्याने त्यासाठी वेगळा विशेष लेख आवर्जून लिहावा लागेल. त्यामुळे जयपूरबद्दलची माहिती सध्या राखून ठेवतो. राजस्थानमधील परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली काही ठिकाणी आहेत, जिथं भारतीय पर्यटक क्वचितच भेट देतात. रणथंबोरचा किल्ला आणि तेथील राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे.

४०० पेक्षा जास्त मंदिरं असलेलं पुष्कर हे धार्मिक स्थळ जरी असले, तरी वाराणसीप्रमाणे इथं अनेक परदेशी पर्यटक आकर्षित होतात. दरवर्षी होणारा पुष्कर मेळा प्रसिद्ध असून या मेळा काळात चार लाखांपेक्षा जास्त लोक भेट देतात. राजस्थान मध्ययुगीन काळातील लघुचित्रे, भित्तिचित्रे यांसाठी प्रसिद्ध आहे, बुंदी, किशनगड, कुचामन या ठिकाणांना कला रसिकांनी आवर्जून भेट द्यावी. भटकंतीसाठी राजस्थान अतिशय मोठा प्रदेश असून इतिहासप्रेमी, कलाप्रेमी, खवय्ये अशा सर्व प्रकारच्या पर्यटकांना राजस्थान आकर्षित करतो.

(लेखक जगभर भटकंती करत असतात, साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

पर्वतांबद्दल कृतज्ञता हवी...!

पर्वत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मानव प्रजातीच नव्हे जणू सर्व सजीव सृष्टी या ना त्या कारणानं या पर्वतांवर अवलंबून आहे.
mountain
mountainsakal

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा

हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य

स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

महाकवी कालिदास यांनी लिहिलेल्या ‘कुमारसंभव’ या महाकाव्याची सुरुवात होते देशातील एका पर्वताच्या वर्णनानं आणि तो म्हणजे अर्थातच आपला हिमालय. सर्व पर्वतांचा जणू काही राजा असा हा हिमालय उत्तर दिशेला स्थित आहे. प्राचीन काळापासून पाण्याचा मोठा साठा असलेला हा पर्वत म्हणजे पृथ्वीचा जणू मानदंड आहे, अशा शब्दात कालिदासानं त्याचं वर्णन केलंय.

पर्वत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मानव प्रजातीच नव्हे जणू सर्व सजीव सृष्टी या ना त्या कारणानं या पर्वतांवर अवलंबून आहे. या पर्वतांशी माझा अगदी जवळचा संबंध. गिर्यारोहक म्हणून पर्वतरांगांच्या सान्निध्यात वेळ घालवत असताना पर्वतांशी ऋणानुबंध जोडला गेला तो कायमचाच. अशा पर्वतांचं योगदान साजरा करण्याचा हा दिवस.

११ डिसेंबर म्हणजे जागतिक पर्वत दिन. जगभरात विविध ठिकाणी विस्तीर्ण व विशाल पर्वतांप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी २३ टक्के भूभाग हा पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. तसेच जगातील अंदाजे १५ टक्के लोकसंख्या याच पर्वतांच्या प्रदेशात राहते. उर्वरित ८५ टक्के लोकसंख्या नैसर्गिक स्रोतांसाठी पर्वतांवर अवलंबून आहे. पर्वत, विस्तीर्ण डोंगररांगा या पाणी, ऊर्जा व अन्न यांचे नैसर्गिक स्रोत म्हणून ओळखले जातात, ज्यांवर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे.

या सर्वांचा विचार करता, पर्वतांचं जतन करण्यासाठी, येणाऱ्या काळात त्यांची होणारी हानी टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं २००३ पासून ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करण्याचं ठरविलं. संयुक्त राष्ट्रसंघाचा अन्न व कृषी संघटन विभाग हा दिवस मोठ्या उत्साहात जगभरात साजरा करतो. यासाठी दरवर्षी एक विषय निवडला जातो व त्याच्या आधारे पर्वतांप्रती ऋण व्यक्त केलं जातं.

आम्ही गिर्यारोहक, ज्यांच्यासाठी पर्वत ही कर्मभूमी आहे, जिवाभावाचा सखा आहे, पर्वत दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, हा दिवस मर्यादित समूहांपर्यंत न राहता सर्वव्यापी होणं, ही काळाची गरज आहे. याच प्रेरणेनं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघदेखील संलग्न ३५ हून अधिक जिल्हा संघटनांच्या माध्यमातून, सदस्य क्लबच्या माध्यमातून पर्वत पूजन करून व विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून या वर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करत आहे.

सध्या जगभरामध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हे दिवस साजरे करण्यामागं संबंधित विषयांबाबतीत जागरूकता वाढवणं हा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचं उद्दिष्ट देखील याहून काही वेगळं नाही. या आधी म्हटल्याप्रमाणे पर्वतरांगांवर, तिथं उपलब्ध असलेल्या किंवा त्यातून उगम पावणाऱ्या विविध नैसर्गिक स्रोतांवर जीवनसृष्टी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

या पर्वतरांगांचं संवर्धन करणं, त्याविषयी अधिक जागरूक होणं ही काळाची गरज होत आहे. म्हणूनच ज्यांच्या निसर्गाप्रती जाणिवा- नेणिवा जिवंत आहेत, अशा सर्वांनी पर्वतांप्रती असणारी आस्था जपली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे, किंबहुना त्याचा योग्य प्रसार केला पाहिजे.

डोंगरांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र याची जाण आपल्याला जेवढी असायला हवी तेवढी नाही असं खेदानं सांगावं लागतंय. डोंगर परिसरात मात्र अगदी या उलट भावना आहे. इथं राहणारे नागरिक डोंगरांना देवासमान मानतात. मी हिमालयामध्ये जेवढ्या मोहिमा केल्या आहेत, अगदी ‘माउंट एव्हरेस्ट’वरील मोहीम असो किंवा इतर कोणतीही मोहीम, सर्व मोहिमांची सुरुवात करण्याआधी पर्वतदेवाची, त्या पर्वतांवर असलेल्या देवाची पूजा करून, त्यांचे स्मरण करून, त्यांची माफी मागूनच सर्व मोहिमा सुरू झाल्या आहेत.

अशा मोहिमांमध्ये सहभागी असणारे स्थानिक लोकं पर्वत शिखराची पूजा न करणं अशुभ मानतात. त्यांच्या या प्रथेमागं श्रद्धा जरी धार्मिक असली, तरी त्याचं मूळ हे त्या पर्वतांचं जतन-संवर्धन करणं हेच आहे. हिमालयात असणारी ही प्रथा सह्याद्री पर्वतरांगेला देखील लागू होते.

तुम्ही जर निरखून अभ्यास केला, तर असं लक्षात येईल की सह्याद्रीत देखील कळसूबाई, काळूबाई, चकदेव, भीमाशंकर, सप्तशृंगी, ज्योतिबा आदी अशी अनेक मंदिरं डोंगरात वसलेली आहेत. या मंदिरांचे, पर्यायानं त्या डोंगर परिसराचं पावित्र्य राखणं, याबाबत स्थानिक लोक अत्यंत आग्रही असतात. त्यांचा यामागचा उद्देश हा वरकरणी धार्मिक दिसत असला, तरी ज्या डोंगरांवर आपलं संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे, त्या डोंगरांचं जतन करणं हाच मुख्य उद्देश यातून अधोरेखित होतो.

पर्वतांमुळं आपलं जीवन खूप समृद्ध झालं आहे. मनुष्याच्या विकासात पर्वतांचं खूप मोठं स्थान आहे. आपल्या जगण्यामध्ये पर्वतांचा खूप मोठा वाटा नक्कीच आहे. सध्याच्या युगात तर पर्वतरांगांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गिर्यारोहण, ट्रेकिंग सारखे क्रीडाप्रकार तर फक्त पर्वतांवरच करता येतात. तसेच विविध साहसी खेळांचे नैसर्गिक क्रीडांगण हे पर्वतच आहेत. नेपाळसारख्या देशाची तर संपूर्ण अर्थव्यवस्था फक्त आणि फक्त पर्वतांशीच निगडित आहे. त्यामुळे पर्वतांना आणखी आपलंस करण्याची वेळ आता आली आहे.

मानवानं आपल्या फायद्यासाठी अनेक डोंगर-पर्वत फोडले, त्यातून रस्ते निर्माण केले, तिथल्या खनिज संपत्तीची राजरोसपणे लूट केली. त्यासाठी अक्षरशः डोंगरच्या डोंगर सपाट झालेले आपण बघत आलो आहोत. हिरवेगार पर्वत उघडे बोडके दिसू लागले, भरभरून वाहत असलेल्या नद्या प्लास्टिक आणि अन्य अविघटनशील वस्तूंना कवेत घेऊन वाहू लागल्या, त्यामुळं प्रवाहात अडथळे आले, पाणी दूषित झालं.

जलचर अस्वस्थ झाले आणि किनारे अस्वच्छ होऊ लागले. हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे. पर्वत हा निसर्गाचा खजिना आहे, त्यांचा वापर नक्कीच केला पाहिजे, पण त्याकरिता आपण नेमकं कुठं थांबलं पाहिजे, याची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. पर्वतांसंबंधी आणखी अभ्यास झाला पाहिजे, इथं असणाऱ्या प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल संशोधन झालं पाहिजे, पर्वत हे फक्त उपभोगाचं साधन न राहता आपल्या आयुष्याचा भाग बनविणं आवश्यक आहे.

खरंतर आपल्या नकळत्या वयातच आपली पर्वताशी ओळख होते. इयत्ता दुसरी- तिसरीमध्ये असताना आपण काढलेलं निसर्गचित्र तुम्हाला आठवतं का ? त्यात असतात त्रिकोणी पर्वतरांगा, त्यामधून डोकावणारा उगवता सूर्य, पर्वतावरून वाहणारी नदी, आकाशात उडणारे पक्षी, पायथ्याशी झोपड्या, शेती आणि झाडं. या चित्रात या परिसरात राहणारी माणसंही आपण दाखवतो.

म्हणजे आपल्याला हे आधीपासूनच माहिती आहे की या साऱ्या गोष्टींचा पर्वत या संकल्पनेशी जवळचा संबंध आहे. पण आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण स्वार्थी होतो आणि त्यातून आपला हा बालपणीचा पर्वत मित्र आपणच दूषित करतो. हे थांबलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वतांचं संवर्धन हा पण आपण केला पाहिजे.

यासाठी आवश्यक कृती आपण लवकरात लवकर केली पाहिजे, याची सुरुवात करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस कुठलाच नाही. चला तर मग, पर्वतांना वाचवू, पर्वतांना जगवू, पर्वतांबाबत ऋण व्यक्त करू. उद्याच्या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष आहेत.)

पर्यटनासाठी योग्य धोरण हवं

भारताशेजारी असणाऱ्या देशांपासून जरी सुरुवात केली, तरी यामध्ये तिबेट, भूतानचं नाव घेता येईल.
need proper policy for tourism tibet bhutan
need proper policy for tourism tibet bhutanSakal

- मालोजीराव जगदाळे

भारताशेजारी असणाऱ्या देशांपासून जरी सुरुवात केली, तरी यामध्ये तिबेट, भूतानचं नाव घेता येईल. अत्यंत सुंदर प्रदेश; परंतु परदेशी पर्यटकांना पोहोचण्यास अडचणीचा आणि पर्यटनाला चालना देण्याचं योग्य धोरण नसल्यानं फारसे लोक इकडं फिरकत नाहीत.

एकेकाळी स्वतंत्र देश असलेल्या; पण आता चीनचा स्वायत्त भाग असलेल्या तिबेटला जाण्यासाठी चीन सरकारची विशेष परवानगी लागते. दक्षिण चिनी समुद्रात असलेला तैवानसुद्धा थोडाफार दुर्लक्षित देश आहे. मधल्या काळात दळणवळण चांगलं झाल्यानं तैवानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

दरवर्षी जगातील एकूण आंतरराष्ट्रीय पर्यटकांपैकी चाळीस टक्के पर्यटक फ्रान्स, स्पेन, चीन, अमेरिका, इटली, तुर्की आणि थायलंड या देशांना भेट देतात. या यादीतील पहिल्या वीस देशांमध्ये भारताचा समावेश नसला, तरी आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या माध्यमातून महसूल गोळा करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये मात्र भारत चौदाव्या क्रमांकावर आहे.

इतर देशांमध्ये पर्यटनावर केलेल्या खर्चाच्या बाबतीत भारतीय पर्यटक जगात तब्बल सातव्या स्थानी आहेत. दरवर्षी पर्यटक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असताना मात्र जगात अजूनही असे काही देश आहेत, जे पर्यटकांसाठी अज्ञात आहेत किंवा नावडते आहेत,

जिथं पर्यटन नसल्यात जमा आहे. अतिशय खराब वातावरण, अस्थिर राजकीय परिस्थिती, त्या देशाचं असणारं अडचणीचं भौगोलिक स्थान, पर्यटन धोरण नसणं, पर्यटकांनी येऊच नये अशी परिस्थिती निर्माण होणं अशा अनेक कारणांमुळे काही देश पर्यटकांपासून दूर राहिले.

ईस्ट तिमोर आणि मंगोलिया हे पर्यटकांच्या नावडत्या यादीत अग्रस्थानी आहेत. खरंतर बालीइतकंच सुंदर असणारं तिमोर मात्र कोणतेही पर्यटन धोरण नसल्यानं पर्यटकांपासून वंचित आहे. जगातील सर्वांत विरळ लोकसंख्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाहीच, अफाट पसरलेला देश आणि विमान वाहतूक सुद्धा यथा-तथा यामुळे मंगोलिया अत्यंत सुंदर असून सुद्धा पर्यटकांसाठी खडतर बनलेलं ठिकाण आहे.

मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान आणि रशियाजवळील बेलारुस हे असे देश आहेत, ज्यांनी आवर्जून प्रयत्न केले पर्यटक न येण्यासाठी. उत्तर कोरियाप्रमाणे याही देशात एकाधिकारशाही असल्याने हे देश पर्यटन फ्रेंडली नाहीत.

आफ्रिका खंडामध्ये कायम अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक देश पर्यटकांपासून वंचित राहिले. पण काही देश मात्र बऱ्यापैकी अज्ञात राहिल्याने पर्यटक येथे पोचू शकले नाहीत. मालदीवसारखी सुंदर बेटे असलेला कोमोरोस देश पूर्व आफ्रिकेतील टांझानिया आणि मादागास्कर यांच्यामधील समुद्रात आहे.

इथं पोचण्यासाठी जी कसरत करावी लागते त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांसाठी लपण्याचे उत्तम ठिकाण, असा या देशाबद्दल गंमतीनं उल्लेख केला जातो. इथून जवळच पर्यटकांनी गजबजलेला आणि आफ्रिकेतील एक श्रीमंत देश सेशेल्स आहे.

भारतीयांसाठी सेशेल्स व्हिसा फ्री असल्याने कधी इथं जाण्याचा योग जुळून आल्यास कोमोरोस सुद्धा बघता येईल. पूर्व किनाऱ्याप्रमाणे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर इक्वेटोरीयल गिनी आणि साओ टॉमे हे देश आहेत. क्रूड तेल व्यावसायिकांची ये-जा सोडली तर फारसं कोणीच इकडे फिरकत नाही. पर्यटकांद्वारे जगातील सर्वांत कमी भेट दिले जाणारे हे देश आहेत.

video

मध्य अमेरिकेच्या पूर्वेला असणारी कॅरेबियन बेटे त्यांच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि टुमदार शहरांसाठी प्रसिद्ध आहेत. या कॅरेबियन बेटांची संख्या सातशेहून जास्त आहे. या लहानशा भागात तब्बल ३३ स्वायत्त देश आहेत. इथली वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम दहापेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व करते. यात सर्वांत कमी प्रसिद्ध असलेला देश म्हणजे डॉमिनिका.

एके काळी पायरेट आयलँड म्हणजे समुद्री चाचांचा देश म्हणून हा प्रसिद्ध होता. पायरेट्स ऑफ कॅरेबियन चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण येथे झाले. भारतीय क्रिकेट संघाने देखील या देशातील एकमेव अशा विंडसर क्रिकेट स्टेडियम वर कसोटी सामना या वर्षीच खेळला आहे. असे असून सुद्धा अमेरिका खंडातील सर्वांत दुर्लक्षित देश म्हणून हा गणला जातो.

फक्त एक लाख डॉलर्सची गुंतवणूक करून या देशाचे नागरिकत्व घेता येत असल्यानं अनेक देशांच्या घोटाळेबाज व्यावसायिकांचे हे आश्रयस्थान सुद्धा आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पूर्वेकडील भाग ज्याला मायक्रोनेशिया, मालेनेशिया आणि पॉलिनेशिया म्हणून सुद्धा ओळखले जाते.

या भागात अनेक असे देश आहेत, जे खऱ्या अर्थाने बाकीच्या जगापासून तुटलेले आहेत. या देशांपर्यंत पोचणे हेच मोठे दिव्य असल्याने हे देश पर्यटनापासून कोसो दूर आहेत. मायक्रोनेशिया, मालेनेशिया आणि पॉलिनेशियाच्या या समुद्रात दोन हजारांपेक्षा पेक्षा जास्त बेटे असून फिजी, टुवालु, मार्शल आयलँड, नाऊरू, वानू आटू, टोंगा, कुक आयलँड इ देश आहेत.

फिजी वगळता इतर कोणत्याही देशापर्यंत पोचण्यासाठी नियमित दळणवळण सेवा नाही. जगातील सर्वांत लहान प्रजासत्ताक म्हणून येथील नाऊरू देश ओळखला जातो. फक्त १२ हजार ५०० लोक या देशात राहतात. खोल समुद्रातील जीवसृष्टी, स्कुबा डायव्हिंग तसेच अनेक देशांचे लष्करी तळ यासाठी इथल्या देशांची साधारणतः प्रसिद्धी आहे. येथे पोचणे आणि राहणे अत्यंत खर्चीक असल्याने तुरळक पर्यटक इथं येणं पसंत करतात.

अनेक देश हे भौगोलिक परिस्थितीमुळे कायमच पर्यटकांच्या आवाक्याबाहेर राहिले. त्यातील आवर्जून नाव घेण्याजोगा देश म्हणजे ग्रीनलँड. युनायटेड किंग्डम जसा इंग्लड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडचा मिळून बनला आहे तसाच.

ग्रीनलँड देश किंग्डम ऑफ डेन्मार्कचा भाग आहे. तब्बल २१.६६ लाख वर्ग किलोमीटर प्रदेश व्यापणाऱ्या या देशात मात्र फक्त ५७ हजार लोक राहतात. प्रदेशाची तुलना करता इतक्याच प्रदेशावर भारतात ८० कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. यावरून येथील लोकसंख्या किती विरळ असेल याचा अंदाज येईल. पृथ्वीवरील सर्वांत थंड शहरे या देशात आहेत. ९५ टक्के ग्रीनलँड हा बर्फाच्छादित आहे.

२०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरची पर्यटकांची संख्या तब्बल १४६ कोटी होती. त्यातील ९४ कोटी पर्यटकांनी एकट्या युरोप खंडाला भेट दिली. असे असून सुद्धा युरोपातील काही देश पर्यटनाच्या बाबतीत मागे पडले.

अल्बानिया, मोल्डोवा यांची आवर्जून नावे घेता येतील. अत्यंत सुंदर कॅस्टल, चर्चेस आणि लँडस्केपने अल्बानिया नटलेला आहे, तर अफाट सुंदर वाइन एस्टेट्सचा देश म्हणून मोल्डोवा ओळखला जातो. पण युरोपला भेट देणारे बहुतांश पर्यटक हे फ्रान्स, इटली, स्विस, स्पेन या पश्चिम व मध्य युरोपियन देशांना प्राधान्य देत असल्याने अल्बानिया आणि मोल्डोवा पूर्णपणे झाकोळून गेले.

काही देश खरंच खूप सुंदर असूनही पर्यटनापासून वंचित आहेत. एके काळी पर्यटकांच्या लेखी नसणारे कंबोडिया, व्हिएतनामसारखे देश आता आशियातील सर्वांत जास्त पर्यटक खेचून आणणारे देश झाले आहेत. योग्य पर्यटन धोरण अवलंबवून पर्यटकांसाठी जास्तीत जास्त सोईसुविधा आणि अत्यंत सोपी व्हिसा पॉलिसी असेल, तर अल्पावधीत पर्यटकांचा ओढा या देशांकडे वाढेल, हे निश्चित.

भुरळ पाडणारा इजिप्त

इजिप्त बघितल्यानंतर मुख्यत्वाने जाणवलेलं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या श्रीरामांचा काळ आणि रामसेसे या राजाचा काळ हा एकच आहे.
Egypt Beautiful
Egypt Beautifulsakal

- विशाखा बाग

आश्चर्यकारक आणि चमत्कारिक गोष्टींनी जगाला भुरळ पाडणारा देश म्हणजे इजिप्त. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या संस्कृतीचा वारसा जपून ठेवणाऱ्या भव्य वास्तू प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या असतील तर इजिप्तला भेट द्यायलाच हवी.

इजिप्त बघितल्यानंतर मुख्यत्वाने जाणवलेलं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या श्रीरामांचा काळ आणि रामसेसे या राजाचा काळ हा एकच आहे. इथली मंदिरं बघितल्यानंतरसुद्धा रामायणात घडलेल्या सर्व घटना, कथेतील पात्रं, गरूड आणि विष्णूच्या मूर्ती हे सर्व इथे मुख्यत्वाने आढळून येते.

जानेवारी महिन्यामध्ये आम्ही इजिप्तला गेलो होतो. दहा दिवसांमध्ये व्यवस्थित इजिप्त बघणं होतं. विमानाने एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्ही सरळ गीजा येथे गेलो. कैरोपासूनच आकर्षित करणारी नाईल नदी आपली सोबत करत राहते ते गिजाचे पिरॅमिड बघण्यापर्यंत आणि त्यानंतर अगदी संपूर्ण इजिप्तमध्येसुद्धा. राहण्यासाठी आम्ही गीजामध्ये हॉटेल बुक केलं होतं.

कारण मुख्य आकर्षण म्हणजे गीजाचे पिरॅमिड बघणं हे होतं. जागतिक स्तरावरची अजूनही अतिशय गुढ समजली जाणारी सर्व पर्यटनाची स्थळं ही गिझ्झा इथेच आहेत. परत जाताना आम्ही कॅरोला थांबणार होतो, कारण तिथलं कैरो म्युझियम हे एक सर्वात महत्त्वाचं आणि आवर्जून भेट देण्यासारखं म्युझियम आहे.

इजिप्त देशाचा चेहरामोहरा आणि सगळ्या शहरांची साधारण ठेवण ही आपल्या भारतासारखीच आहे. किंबहुना भारतापेक्षासुद्धा बरीचशी शहर अजूनही खेडवळपणातून पूर्णपणे इथे बाहेर आलेली नाहीत. आपल्याकडे दिसते तशीच गर्दी पायी चालणाऱ्यांची आणि वाहनांचीसुद्धा इथे पदोपदी जाणवते.

अजून एक जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या घरांच्या बिल्डिंगला प्लास्टर केलेलं मला खूप कमी ठिकाणी दिसलं. सर्व भिंती या विटांच्या दिसत होत्या. तसं म्हटलं तर गरिबी या देशात अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे.

पहिल्याच दिवशी संध्याकाळी आम्ही पिरॅमिडच्या बाहेर दाखवला जाणारा लाईट अँड म्युझिक शो बघायला गेलो. चार हजार वर्षांपूर्वींचा फेरोजचा इतिहास, पिरॅमिड बांधण्यामागची संकल्पना, त्याचबरोबर त्या संस्कृतीचा इतिहास असं सर्व म्युझिक शोमध्ये सांगितलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी पिरॅमिड पाहायला गेलो.

जागतिक आश्चर्य समजलं जाणारं आणि त्याचबरोबर शाळेत आपण इतिहासाच्या आणि भूगोलाच्या पुस्तकांमधून शिकलेली आणि पाहिलेली चित्रं डोळ्यांसमोर जेव्हा प्रत्यक्ष येतात, तेव्हा वाटणारा अनुभव हा खरोखर अद्‍भुत असतो. भव्य पिरॅमिड समोर बघितल्यानंतर अतिशय भारावल्यासारखं होतं, हे मात्र नक्की.

अतिभव्य आणि उंच पिरॅमिड डोळ्यात साठवायचे आणि त्याचबरोबर मेंदूला विचार करायला लावणाऱ्या असंख्य प्रश्नांचा भडीमार सहन करायचा अशा दोन्ही शारीरिक क्रिया माझ्याबरोबर एकदम घडत होत्या. थोडक्यात सांगायचं काय तर, आपण अगदी निःशब्द होतो तिथे समोर गेल्यानंतर.

मुख्य तीन पिरॅमिड आहेत, त्यामधीलच एका पिरॅमिडमध्ये आपल्याला आतमध्ये जाऊन आतली रचना बघता येते. Sphinx म्हणजेच दगडांच्या शिल्पाकृती असलेले दोन भव्य सिंह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघतानासुद्धा आपल्याला हीच अनुभूती येते.

कैरोमधून आस्वानला जाताना आम्ही रेल्वेने गेलो. पंधरा तासांचा हा प्रवास वाळवंटामधून आपण सुरू करतो आणि जसजसं आस्वान जवळ यायला लागतं तसतसं आजूबाजूचं चित्र संपूर्णपणे बदलून जातं. विश्वासच वाटत नाही की आपण इजिप्तच्या वाळवंटात आहोत.

सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा गाडीतून बाहेर बघितल्यावर दिसतात ती खजूर, नारळाची झाडं, संत्र्यांच्या बागा आणि अद्ययावत शेती. नाईल नदीचं पात्र इथे प्रचंड मोठं आणि रुंद होते. जीवनदायिनी नदीने इजिप्तच्या या भागाला निसर्गसंपन्न आणि वैभवसंपन्न केलं आहे.

आस्वानचा हाय डॅम म्हणजेच नाईल नदीवरचं सर्वात उंच असलेलं मातीचं धरण. हेही धरण खूप मोठं आहे. नंतर आम्ही एका छोट्या बोटीमध्ये बसून बॉटनिकल गार्डन बघायला गेलो. आता मात्र वेध लागले होते ते नाईल नदीमधून क्रूज घेऊन चार-पाच दिवस नाईल नदीमध्ये फिरण्याचे आणि आजूबाजूची वेगवेगळी शहरं, तिथली मंदिरं आणि पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे.

अबू सिंबेल्स मंदिर बघण्यासाठी भल्या पहाटेच निघावं लागतं. क्रूजमधून पहाटे तीन वाजता निघून आपण संपूर्ण गाड्यांचा ताफा जिथून निघतो, त्या ठिकाणी जातो. तिथून मग जवळपास आठ ते १० बसेस आणि मागेपुढे मिलिटरीच्या गाड्या असा सगळा ताफा अबू सिम्बल मंदिराकडे जायला निघतो. साधारण साडेतीन तासांत आपण अबू सिंबेलला पोहोचतो.

राजा रामसेसे दुसरा आणि राणी नेफरटरी यांच्या नावाने बांधण्यात आलेला अबू सिंबेल हा दोन मंदिरांचा समूह आहे. नासेर या भल्यामोठ्या सरोवराकाठी आणि सुदान या देशाच्या सीमेलगत सध्याचे अबू सिंबेल हे मंदिर उभे आहे. १९६४ पर्यंत ते नाईल नदीच्या काठी होते; पण पाण्याची पातळी वाढायला लागल्यानंतर युनेस्कोच्या साह्याने आणि जगातील सर्व देशांच्या मदतीने इजिप्त सरकारने हे प्रचंड मोठं आणि भव्य मंदिर २०० मीटर मागे हलवून या सरोवराकाठी आणलं.

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाव असलेलं आणि साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं १०० फूट उंच आणि ११५ फूट लांब असलेलं राजा रामसेसे मंदिर सूर्य देवाला समर्पित करण्यात आलं आहे. या मंदिराच्या आतल्या भव्य सभामंडपाचा व्यास ६५ मीटर आणि उंची २३ मीटर आहे. जगातील हा सर्वात मोठा सभामंडप आहे.

संपूर्ण मंदिर आतून बघण्यासाठी, आतमध्ये कोरलेल्या विविध शिल्पकला आणि मूर्तींचा इतिहास समजून घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी असे साधारण दोन तास इथे लागतात. अबू सिंबेल मंदिर बघितल्यानंतर पौराणिक कथांची, इतिहासाची प्रचिती आणि अति भव्यतेची अनुभूती इथे झाल्याशिवाय राहत नाही.

इजिप्तची ही आपली भ्रमंती एका भागात नक्कीच पूर्ण होणार नाही. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली नाईल नदीकाठची विविध शहरं आणि मंदिरं आणि त्याबद्दलची आश्चर्यकारक माहिती बघूयात पुढच्या लेखामध्ये. (पूर्वार्ध)

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

गॉथिक वास्तुशैली

विचार, कल्पना आणि ज्ञानाचा प्रसार इतिहासामध्ये कृत्रिम भू-राजकीय किंवा धार्मिक सीमांवरच थांबला नाही, तर तो सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संवादाचे परिणाम म्हणूनही जास्त पुढे आला.
Gothic architecture
Gothic architecturesakal

- राजेंद्र कोचरेकर

विचार, कल्पना आणि ज्ञानाचा प्रसार इतिहासामध्ये कृत्रिम भू-राजकीय किंवा धार्मिक सीमांवरच थांबला नाही, तर तो सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संवादाचे परिणाम म्हणूनही जास्त पुढे आला. मुंबई पालिकेच्या मुख्यालयाची इमारत गॉथिक वास्तुशैलीतील असणे, हा ब्रिटिश वसाहतवादी सत्तेचा ऐतिहासिक वारसा आहे.

धर्मयुद्धांना ज्याला इंग्रजीमध्ये क्रुसेड्स असं म्हटलं जातं, त्याचा आणि मुंबईतील महापालिकेच्या इमारतीशी अथवा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी राजधानीमधील नॅशनल कॅथेड्रलशी काय संबंध? तुम्हालाही या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं असेल, पण तरीही त्या प्रश्नांचे विश्लेषण करण्याअगोदर मला या दोन इमारतींमध्ये काय साम्य आहे, ते प्रथम सांगणं आवश्यक आहे.

अर्थात हे स्थापत्यशास्त्र इतिहासाच्या विद्यार्थ्यांना किंवा कदाचित माझ्यासारख्या कुतूहलाने या विषयात डोकावणाऱ्यांनाही माहीतच असेल. या दोन्ही इमारतींमध्ये गॉथिक आर्किटेक्चरची महत्त्वपूर्ण रचना आहे. गॉथिक आर्किटेक्चरचे एक वैशिष्ट्यपूर्ण लक्षण अथवा चिन्ह म्हणजे त्याच्या इमारतीला मध्यटोक असलेल्या कमानी असतात.

या कमानीमुळे दगडी इमारतींच्या आत जास्त सूर्यप्रकाश सहज आणणाऱ्या उंच खिडक्या ठेवता येतात. या दोन्ही इमारती युरोपपासून पूर्व आणि पश्चिम भौगोलिक टोकाला दूरदूरवर असल्या तरीही, ऐतिहासिक कारणास्तव त्या पाश्चात्त्य आणि युरोपीय गॉथिक वास्तुशैलीनुसारच आहेत.

युरोपियन वसाहत वारशाचा भाग म्हणून जगभरात इतर अनेक इमारती गॉथिक वास्तुकलेच्या असल्या तरीही याच दोन इमारती मी का निवडल्या याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण त्याचं कारण सांगण्याअगोदर मला आधीच काही वस्तुस्थिती स्पष्ट केली पाहिजे. या युरोपबाहेरच्या दोन्ही इमारती युरोपमधील गॉथिक वास्तुशैलीच्या प्रसिद्धी काळाच्या तुलनेने बऱ्याच नवीन कालखंडात बांधल्या गेल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी १८८४ मध्ये झाली तर अमेरिकेमधील वॉशिंग्टन डीसी शहरामधल्या नॅशनल कॅथेड्रलचे बांधकाम १९०७ मध्ये सुरू झाले. या दोन्ही इमारतींच्या या बांधकामाच्या काळाच्या तुलनेने गॉथिक वास्तुकलेचे वर्चस्व बाराव्या आणि सोळाव्या शतकाच्या मध्यात युरोपमध्ये होते.

हे सर्व पाहिले तर असे लक्षात येईल की, गॉथिक आर्किटेक्चर या विषयामधील बाराव्या आणि सोळाव्या शतकाच्या मध्यात असलेले महत्त्व जरी इतर आधुनिक वास्तुशैलींनी नंतर घेतले असले तरी तुलनेने अलीकडच्या काळापर्यंत गॉथिक आर्किटेक्चरचे अस्तित्व अबाधित होते. फरक एवढाच की आजच्या या शैलीला गॉथिक पुनरुज्जीवन आर्किटेक्चर म्हणून संबोधले जात आहे.

या इमारतींच्या निवडीचे दुसरे कारण म्हणजे गॉथिक आर्किटेक्चर हे केवळ धार्मिक इमारतींपुरते मर्यादित नव्हते, तर धर्मनिरपेक्ष आणि नागरी हेतू असलेल्या मुंबईतील महानगरपालिकेसारख्या इमारतींसाठीसुद्धा ते वापरण्यात आले होते.

गॉथिक स्थापत्य कलेची मला थोडीफार ओळख असली तरी त्याला गॉथिक का म्हणतात, असा प्रश्न नेहमी पडत होता. शेवटी गॉथ आणि विझिगॉथ अथवा व्हीसीगॉथ या जरमॅनिक वंशाच्या जमाती होत्या, ज्यांना रोमन साम्राज्यातील लोक रानटी समजत होते. त्यांनी पाचव्या शतकात बराचसा रोमन प्रांत लुटला आणि बराचसा विध्वंस केला.

मग प्रश्न असा पडतो की, त्यांनी या वास्तुशैलीचा नवीन शोध लावला का? आणि तसे असल्यास युरोपमध्ये गॉथ या वंशाच्या जमातीच्या आगमनाच्या बऱ्याच शतकांनंतरच्या काळात म्हणजे १२ व्या शतकाच्या मध्यात ही वास्तुशिल्प शैली युरोपमध्ये कशी प्रसिद्धीला आली? अलीकडे या प्रश्नांची उत्तरे सापडली.

त्यातून असे दिसून आले की गॉथिक आर्किटेक्चर या नावाचा गॉथ वंश किंवा जमातीशी फारसा संबंध नव्हता. गॉथिक आर्किटेक्चर हे नाव नंतरच्या १४ व्या शतकात पुनर्जागरण किवा इंग्लिशमध्ये रेनेसांस म्हटलेल्या काळात वास्तुकलेच्या या शैलीसाठी वापरले गेले.

ग्रीको-रोमन शास्त्रीय (क्लासिकल) वास्तुशैली इसवी सनाच्या पाचव्या शतकात, रोमच्या विध्वंसापर्यंत पश्चिम रोमन साम्राज्यात प्रचलित होती. शास्त्रीय वास्तुशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वास्तुशैलीमध्ये इमारतीच्या खिडक्या, खांब, भिंती वगैरे प्रमाणबद्ध आणि बांधेसूद असतात. त्यानंतर सहाव्या ते ११ व्या शतकापर्यंत पश्चिम युरोपमध्ये रोमनेस्क नावाची वास्तुशैली प्रचलित होती.

रोमनेस्क वास्तुशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या शैलीच्या इमारती वाटोळ्या कमानीच्या व जाड भिंतींची सजावट अशा असतात. (इथे रोमनेस्क या शब्दाचा संबंध रोम या शब्दाशी नसून तो रोमान्स म्हणजे डेकोरेटिव्ह अशा अर्थाने घेतला जातो.) परंतु गॉथिक वास्तुशैली या अगोदरच्या दोन्ही शैलीपेक्षाही वेगळी होती.

अर्थातच त्या काळात एखाद्या वास्तूचा ‘गॉथिक शैली’तील असा उल्लेख करणे हे फारसे प्रशस्त तर नव्हतेच, परंतु मानहानिकारक होते. कारण, शेवटी गॉथ हे ते लोक होते ज्यांनी इसवी सन पाचव्या शतकात, पूर्वीच्या रोमन वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेच्या इमारतींचा विध्वंस केला होता आणि म्हणूनच गॉथिक शैलीला ग्रीको-रोमन शास्त्रीय वास्तुशैलीपासून वेगळे ठेवण्याचा हेतू होता.

रोमच्या विध्वंसानंतर पाश्चात्त्य रोमन साम्राज्य अंधाऱ्या आणि मध्ययुगीन कालखंडात बुडून गेले होते. म्हणून गॉथिक आर्किटेक्चर ही कदाचित या कारणास्तव दुय्यम दर्जाची वास्तुशैली ठरली असावी. याच वास्तुशैलीने पुढे पश्चिम युरोपमधील अंधारी आणि मध्ययुगीन काळाचे निरंतर प्रतिनिधित्व केले.

तरीही ही गोष्ट वर नमूद केल्याप्रमाणे, पाचव्या आणि ज्या काळात गॉथिक वास्तुकलेच्या प्रगतीचा उदय झाला, त्या बाराव्या शतकातील हे व्यापक अंतर स्पष्ट करत नाही. तसेच जर गॉथिक स्थापत्यकलेचा गॉथ या नावाव्यतिरिक्त गॉथ वंश जमातीशी फारच कमी संबंध असेल, तर या वास्तुशैलीवर कुठल्या गोष्टींचा प्रभाव पडला असेल? या प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात मी सुरुवातीला केलेल्या प्रश्नाशी जाऊन भिडतात, की मग ख्रिश्चन क्रुसेड्स आणि गॉथिक आर्किटेक्चर यांचा काय संबंध आहे?

निश्चितपणे युरोपमधील आधीच्या सहाव्या ते ११ व्या शतकापर्यंत प्रचलित रोमनेस्क वास्तुशैलीचा गॉथिक वास्तुशैलीवर नक्कीच प्रभाव होता; परंतु कला इतिहासकार असेही सांगतात की, १२ व्या शतकाच्या काळात युरोपियन लोकांवर वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्कारांमुळे गॉथिक वास्तुकलेवर इतरही विविध वास्तुशैलींचा प्रभाव पडला होता.

१०९५ पासून सुरू झालेली ख्रिश्चन धर्मयुद्धे ही विविध सांस्कृतिक आदानप्रदानाला चालना देणारी होती. रोम प्रांतामधील पाश्चात्त्य लॅटिन चर्चने प्रेरित केलेल्या या धर्मयुद्धांचा उद्देश जेरुसलेम आणि आजूबाजूचा परिसर इस्लामिक धर्माच्या लोकांकडून ताब्यात घेणे हा होता.

चौथ्या धर्मयुद्धात एक तर जेरुसलेमऐवजी पूर्व ग्रीको-रोमन बायझेंटाईन कॉन्स्टँटिनोपल (आताचे इस्तंबूल) राजधानीला बरखास्त करणे आणि लुटणे हेच सुरू होते. याच क्रुसेडचा एक भाग म्हणून हे युरोपहून आलेले क्रुसेडर्स मध्य पूर्वेतील इस्लामिक संस्कृती आणि बायझेंटाईन संस्कृतीच्या संपर्कात आले.

धर्मयुद्धांव्यतिरिक्त आणखी एक घटना आहे. आठव्या शतकापासून उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रांतातून आलेल्या इस्लामिक मूर्स नावाच्या वांशिक जमातीने आजच्या स्पेन देशामध्ये असलेल्या आयबेरियन द्वीपकल्पात राज्य केले होते. त्या काळानंतर हळूहळू मूर्स आयबेरियन द्वीपकल्पाच्या प्रांतातून मागे मागे सरत हरवले जात होते.

परिणामी पाश्चात्त्य युरोपियन लोकांचा तिथल्या प्रांतामधल्या इस्लामिक मूर्स संस्कृतीशी संबंध आला. त्यामुळे काही इतिहासकारांना असे वाटते की, या सर्व घटनांचा परिणाम म्हणून गॉथिक वास्तुकलेवरदेखील इस्लामिक सारासेन या वास्तुकलेचाही प्रभाव पडला.

गॉथिक आर्किटेक्चरच्या या नावाची उकल होण्याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची जाणीव यानिमित्ताने झाली. माझ्या संशोधन छंदात आणि भौतिक प्रवासात सातत्याने आढळलेल्या आवर्ती विषयाचे हे आणखी एक उदाहरण आहे.

विचार, कल्पना आणि ज्ञानाचा प्रसार इतिहासामध्ये कृत्रिम भू-राजकीय किंवा धार्मिक सीमांवरच थांबला नाही, तर तो सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संवादाचे परिणाम म्हणूनही जास्त पुढे आला. ही गोष्ट विज्ञान, गणित, राजकीय तत्त्वज्ञान आणि आर्किटेक्चरच्या (वास्तुकला/ वास्तुशैली) ज्ञानाबाबतसुद्धा अगदी स्पष्टपणे दिसून येते.

गॉथिक आर्किटेक्चरची कहाणी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. मुंबईतील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गॉथिक वास्तुशैलीतील असणे, हा ब्रिटिश वसाहतवादी सत्तेचा ऐतिहासिक वारसा आहे. ही गोष्ट आणखी समजावण्यासाठी मला त्या कालखंडातील मेडिटरेनियन किंवा भूमध्य समुद्रबाजू प्रांतामधील आणखी एका राजकीय शक्तीचा परिचय करून द्यावा लागेल. व्हेनिस हे भूमध्य समुद्रबाजू प्रांतामधील नगर-राज्य होते.

व्हेनेशियन नागरिक त्यांच्या आर्थिक हितासाठी भूमध्य समुद्र प्रांतामधील इतर राजकीय साम्राज्यांशी व्यापार करत होते. तेव्हा पूर्व रोमन बायझेंटाईन साम्राज्याशीही त्यांचा व्यापार सुरू होता. १४५३ मध्ये बायझेंटाईनची राजधानी कॉन्स्टँटिनोपल पडल्यानंतर मुस्लिम तुर्किक ओटोमन लोकांनी बायझेंटाईन साम्राज्य पूर्णपणे जिंकले. तेव्हासुद्धा व्हेनिस नगर-राज्य ओटोमन आणि ओटोमनचे गुलाम सैनिक मामलुक यांच्यासोबत व्यापार करत होते.

सततच्या व्यापार संपर्कामुळे, व्हेनेशियन लोकांच्या वास्तुशैलीवर बायझेंटाईन आणि इस्लामिक वास्तुशैलीचा प्रभाव पडला. परिणामी व्हेनेशियन लोकांनी त्यांचे स्वतःचे असे व्हेनेशियन गॉथिक आर्किटेक्चर विकसित केले. व्हेनेशियन गॉथिकचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे व्हेनिसमधील पियाझा सॅन मार्को किवा सेंट मार्क चौकामधील डोजे पॅलेस.

पूर्वीच्या डोजे राजवाड्याच्या पुनर्बांधणीचे गॉथिक-शैलीतील काम १३४०च्या सुमारास सुरू झाले होते. तथापि, सुरुवातीचे बांधकाम मुख्यतः व्हेनेशियन सरोवरासमोर असलेल्या इमारती भागावर केंद्रित केले गेले होते; परंतु १४२४ नंतर, पुनर्बांधणीची कामे सेंट मार्क चौकाच्या समोर असलेल्या भागापर्यंत विस्तारत गेली. नवीन भागामध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावर टोकदार कमानी खिडक्यांची रांग आणि तळमजल्यावर तोरणाकृती कमानी असलेला झाकलेला रस्ता असे बांधकाम होते.

गंमत म्हणजे अगदी अलीकडेच वाचलेल्या एका शास्त्रीय लेखातून असेही लक्षात आले की, व्हेनिसबाहेर व्हेनिस गॉथिक आर्किटेक्चरची माहिती जगाला अजूनही झाली नव्हती. त्यामुळे पूर्वेकडील व्हेनेशियन गॉथिक आर्किटेक्चरच्या नेत्रदीपक वास्तूंचा बहर होण्यासाठी व्हेनेशियन लोक कारणीभूत नव्हते. त्याऐवजी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यासाठी काही प्रमाणात ब्रिटिश लोक जबाबदार होते.

व्हेनेशियन लोकांनी त्यांच्या वास्तुकलेची गॉथिक म्हटली जाणारी शैली बायझेंटाईन रोमन्स, तुर्किश ओटोमन्स आणि त्यांचे गुलाम सैनिक मामलुकांकडून किती प्रमाणात घेतली होती, हे ब्रिटिश लोकांना माहिती नव्हते; परंतु तरीही ब्रिटिशांना या वास्तुकलेचे विलक्षण गुण मात्र जाणवले आणि जेव्हा ब्रिटिश व्हिक्टोरियन राजसत्तेने जगभरात आपल्या वास्तू ज्या शैलीत बांधायच्या आहेत त्यासाठी वास्तुशास्त्राचा शोध म्हणा किंवा अभ्यास म्हणा, सुरू केला; तेव्हा त्यांच्या वास्तुविशारदांकडे ब्रिटिश लेखक रस्किनचे ‘स्टोन्स ऑफ व्हेनिस’ नावाचे पुस्तक हाती आले.

रस्किन कला इतिहासकार होते आणि त्यांनी आपल्या पुस्तकात व्हेनिस शहरामधल्या बायझेंटाईन, गॉथिक आणि रेनेसान्स काळात असलेल्या वेगवेगळ्या नमुन्यांच्या वास्तुशैलींचे विश्लेषण केले होते. हे पुस्तक भारतामध्ये थेट ब्रिटिश राज्यसत्ता सुरू होण्याच्या अवघ्या पाच वर्षांपूर्वी म्हणजे १८५१ ते १८५३ च्या दरम्यान तीन खंडांमध्ये प्रकाशित झाले होते.

रस्किनच्या या पुस्तकातूनच व्हेनेशियन गॉथिक ही व्हिक्टोरियन भारताची उत्कृष्ट वास्तुशैली बनली आणि आशियाच्या ब्रिटिश सत्तेच्या प्रदेशाच्या चार टोकापर्यंत ‘उष्णकटिबंधीय गॉथिक’ या अवतारात ती वापरली गेली. मुंबईमधील भव्य छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसची इमारत (त्या काळचे व्हिक्टोरिया टर्मिनस अथवा व्हीटी) ही त्याच गॉथिक शैलीतील आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या असलेल्या टोकदार कमानी, खिडक्यांच्या रांगांची रचना ही व्हेनिसमधल्या डोजे पॅलेसच्या खिडक्यांच्या रांगांसारखीच आहे, यात आश्चर्य काही वाटण्यासारखे नाही. बऱ्याच लोकांच्या दृष्टीने ही इमारत कदाचित जगातील सर्वात मोठी व्हेनेशियन गॉथिक इमारत असावी; परंतु एवढे निश्चित आहे की, ती इमारत युनेस्कोची २००४ सालापासून जगाची वारसा स्मारक स्थान म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.

कदाचित एवढेच पूर्ण नाही असे वाटल्यामुळे युनेस्को संस्थेने २०१८ मध्ये ब्रिटिश राज्य काळातील व्हिक्टोरियन गॉथिक आणि त्या काळात निर्माण झालेली आर्ट डेको वास्तुशैलीच्या मुंबईच्या फोर्ट भागामधील बांधलेल्या ९४ इमारती समूहाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. त्या समूहामध्ये १२ इमारती व्हिक्टोरियन गॉथिक आर्किटेक्चरच्या मधे आहेत. मला माहिती नसलेल्या कारणास्तव मुंबई महानगरपालिकेची इमारत या समूहामध्ये दिसत नाही; पण ती लवकरच या समूहात दाखल झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

(लेखक जागतिक बँकेचे माजी सल्लागार असून, त्यांनी जगभर प्रवास केला आहे.)

इतिहास आणि भक्ती...

पवना नदीच्याकाठी चिंचवड नावाचं गाव वसलं आणि समृद्ध झालं. एके काळी चिंच आणि वड या वृक्षांच्या विपुल हिरवाईनं चिंचवड हे नाव गावाला दिलं असणार.
historical places and devotee chinchwad village pavana river morya gosavi
historical places and devotee chinchwad village pavana river morya gosaviSakal

- अंजली कलमदानी

पवना नदीच्याकाठी चिंचवड नावाचं गाव वसलं आणि समृद्ध झालं. एके काळी चिंच आणि वड या वृक्षांच्या विपुल हिरवाईनं चिंचवड हे नाव गावाला दिलं असणार. चिंच आणि वडाच्या शांत वनराईत महासाधू मोरया गोसावी यांनी वास्तव्य केलं, समाधी घेतली आणि चिंचवडची भूमी पुण्यमय झाली.

मोरया गोसावी यांचे आई-वडील मूळचे कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यामधल्या शाली गावचे रहिवासी. श्री मयूरेश्वराच्या कृपेनं मोरयाचा जन्म झाला. अर्थातच मोरया हे सुद्धा मयूरेश्वराचे भक्त होते. वेदाध्ययन संपल्यावर योगिराज नयनभारती सारखे विद्वान गुरू लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनानं मोरयानं मुळा-मुठेच्या काठी थेऊर इथं चिंतामणीची मनोभावे तपश्चर्या केली. ४२ दिवसांच्या तपश्चर्येला फळ आलं. मोरया गोसावी झाले. अष्टसिद्धी त्यांना वश झाल्या. मोरया गोसावी मोरगावी मयूरेश्वराच्या सेवेत रमले. त्यांच्या अष्टसिद्धी अडचणीत आलेल्यांच्या संकटाचं निवारण करू लागल्या. शांततेचा शोध घेत चिंचवडजवळच्या जंगलात ते पोचले.

दर चतुर्थीला मोरगावची वारी चुकली नाही. मोरगावच्या वाऱ्यांमध्ये मयूरेश्वरानंच मोरया गोसावींना ग्वाही दिली की, ‘मीच आता तुझ्याकडे येतो.’ कऱ्हा नदीकाठच्या गणेशकुंडात चतुर्थीच्या दिवशी मोरया गोसावींनी पाण्यात नेहमीप्रमाणं डुबकी मारली आणि हाती तांदळा आला. साक्षात मोरया हाती आला. याची स्थापना त्यांनी चिंचवडला मंदिरात केली. हेच आजचं मंगलमूर्ती-वाड्याचं स्थान आहे. हा काळ आहे, तेराव्या व चौदाव्या शतकातला.

त्यांचा कालखंड १३३० ते १५५६ असा मानला जातो. मोरया गोसावींचे गुरू नयनभारती गोसावी यांनी समाधी घेतल्यानंतर मोरया गोसावी यांनीही संजीवन समाधी घेण्याचं ठरवलं. अत्यंत समाधानी अवस्थेत त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पुत्र चिंतामणी महाराज यांना सांगितला.

मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३ इसवी सन १५६१ला पवनेच्या काठी श्री साधू मोरया गोसावी यांनी पवित्र ठिकाणी समाधी लावली. आत्मानंदात एकरूप होऊन आत्मरूपात समाधिस्थ झाले. श्री मोरया गोसावींच्या पवित्र समाधी स्थानावर श्री गणेशाची मूर्ती सिद्धी-बुद्धीसहित विराजमान आहे.

आजचं दिसणारं मंदिर हे १८५८ मध्ये चिंतामणी महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी बांधलं, असा उल्लेख असून, हे अत्यंत जागृत असं पवित्र देवस्थान आहे. चिंतामणी महाराजांची वारकऱ्यांना व संत तुकाराम महाराजांना (१५७७-१६८०) देवत्वाची प्रचिती आल्यावर त्यांचा उल्लेख देवा-देव असा होऊ लागला व घराण्याला देव असं नामाभिधान मिळालं.

श्री मोरया गोसावी यांचा जीवनप्रवाह, त्यांच्या आयुष्यातील घटना याबद्दल माहिती उपलब्ध आहे; पण सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या पुण्यमय अशा संजीवन समाधीची वास्तू आणि परिसर हा काळ्या पाषाणातील समृद्ध वारसा आजही पवनेकाठी दिमाखात उभा आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत मोरगाव, थेऊर, सिद्धटेक तसेच मोरया गोसावी समाधी मंदिर व वाड्याचा गणपती अशा स्थानांचा गाणपत्य संप्रदायातील महत्त्वाचा भक्तीचा वारसा तसेच वास्तू-वारसा सांभाळणं व या देवस्थानांचं व्यवस्थापन सुसूत्र ठेवणं अशी फार मोठी जबाबदारी आहे.

वास्तू-वारशाबरोबरच परंपरागत साहित्य, पत्रव्यवहार हाही महत्त्वाचा ऐवज देवस्थाननं सांभाळला आहे. श्री मोरया गोसावी समाधी मंदिराची बांधणी कार्तिक शुद्ध चतुर्थी शके १५८० रोजी सुरू होऊन आषाढ शुद्ध चतुर्थी शके १५८१ मध्ये पूर्ण झाली (२७ ऑक्टोबर १६५८-१३ जून १६५९) १२ हजार ७८५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला समाधी मंदिर परिसर हलक्या उतारानं नदीकाठी उतरत जातो.

दरवर्षी पावसाळ्यात पवना नदी काही काळ दुथडी भरून वाहते आणि मंदिर परिसर व त्यालगतचा देऊळमळा या जागा पाण्याखाली जातात. गर्भगृह पाण्याखाली गेलं, की देव मंदिर परिसराच्या वरच्या पातळीवरच्या शेजगृहात येतात.

नदीकाठी वसलेल्या मंदिर समूहांच्या बांधणीची रचना ते पाण्याखाली जाणार, हे गृहीत धरूनच पुरापासून सुरक्षित पद्धतीनं केली आहे. बांधकाम शैलीत सामग्री, बांधणीचे इतर घटक व सामग्रीचं आकारमान यांचा सांगोपांग विचार करूनच नदीकडेच्या मंदिराच्या उभारणीचं शास्त्र परंपरागत विकसित झालं. पूर्वाभिमुख समाधी मंदिर परिसरात काळ्या घडीव दगडाची फरसबंदी असून, देव वंशातील सप्तपुरुषांच्या समाधीव्यतिरिक्त इतर दहा लहान-मोठी समाधी मंदिरं आहेत.

श्री मोरया गोसावी यांच्या ३०० चौरस फूट गर्भगृहाला ४०० चौरस फूट सभामंडप असून, दगडांचा आकारही मोठा आहे. पाण्याखाली जाणाऱ्या वास्तूसाठी जाड भिंती, कमीत कमी दरज या हिशोबानं चिरे १८ इंच उंच, १६ इंच ते अडीच फूट लांब आकाराचे आहेत.

भिंतींची जाडी चार फूट असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला टक्कर देत चार शतकं इंचभरही न हलता मंदिर उभं आहे. गर्भगृहाचा अंतर्भाग अष्टकोनी असून, त्यापुढील सभामंडप चौकोनी आहे. गर्भगृहाचं छत ‘कोर्बेलिंग’ पद्धतीचं म्हणजे, एकावर एक दगड ठेवण्याच्या पद्धतीनं खालच्या दगडपेक्षा वरचा दगड बाहेर पुढे डोकावतो, त्याच्यावरचा त्याच्याबाहेर या पद्धतीनं वजनांच्या तोलात्मकतेतून बांधण्यात आलं आहे.

यादवकालीन पद्धतीच्या बांधकामाचा पगडा बांधकाम शैलीवर असल्यामुळे घुमटाकार बांधणी अस्तित्वात नाही; पण, सांधे जिथं जोडले जातात त्या ठिकाणच्या ‘स्क्विंचेस’वर बहामनी शैलीचा प्रभाव दिसून येतो. मंडपात उत्तरेला काळ्या दगडातील भव्य शिवलिंग आहे. या ठिकाणच्या पायऱ्यांवरून उतरून श्री मोरया गोसावी समाधीच्या स्थानाकडे गेले, असं सांगितलं जातं. मुख्य मंदिराच्या पूर्वेला मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज यांची समाधी आहे.

चिंतामणी महाराजांच्या समाधिमंडपात उभं राहून पश्चिमेला एका छोट्या खिडकीतून पाहिलं असता थेट मोरया गोसावी समाधी मंदिरातल्या गणपतीचं दर्शन घडतं. तसंच, खाली पाहताच पाच फूट खाली असलेल्या दहा फूट लांब व दहा फूट रुंद खोलीत चिंतामणी महाराज यांची उत्तर-दक्षिण झोपलेल्या अवस्थेतील मूर्तीची समाधी दिसून येते.

इथली समाधिस्थानं जमिनीखाली असल्यामुळे त्यावरील मंदिरं आणि समाध्या यांच्या वास्तुनिर्मितीत उंचीचा उंच-सखलपणा आहे. उंच-सखलपणा सांभाळताना वास्तूंच्या बाह्यरूपात फरक दिसत नाही; पण मंडपात प्रवेश केल्यावर उंचीचा फरक जाणवतो. थंडगार दगडी वास्तूच्या आत प्रवेश केल्यावर मानसिकतेवर नकळत परिणाम घडण्याची प्रक्रिया घडते.

देवस्थानच्या पायऱ्या उतरताना लगतच्या भागांत जुनी मठाची इमारत होती. ही जीर्ण इमारत उतरवून ती जागा आता भक्तांना विसावण्याकरता ठेवण्यात आली आहेत. मंदिर परिसराशी संलग्न ओवऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. इथं दगडी कमान केल्यानं मंदिराच्या वास्तूंशी हा भाग मिळताजुळता दिसून येतो.

श्री मोरया गोसावी यांच्या कालखंडापासून अनेक शतकं इथल्या धार्मिक व सामाजिक कार्याचं महत्त्व होतं. शहाजीराजांच्या काळापासून मोरया गोसावी व पुढच्या पिढ्यांना आलेली पत्रं व सनदा हा ऐतिहासिक दस्तऐवज देवस्थाननं जपला आहे.

मोरया गोसावी हे शिवपूर्वकाळात होऊन गेले; पण, त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात लिहिलेली ४२ पत्रं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या २६० उपलब्ध पत्रांपैकी ४२ पत्रं ही मोरया गोसावी परिवारातील सत्पुरुषांना लिहिलेली आहेत.

शहाजीराजांनी इसवी सन १६२८ ते १६५१ या काळात दिलेली १५ इनाम पत्रं असून, १६१० ते १८५२ या अडीचशे वर्षांच्या काळातल्या ३४० महत्त्वाच्या पत्रांचं अभ्यासपूर्वक संकलन डॉ. अनुराधा कुलकर्णी व अजित पटवर्धन या अभ्यासकांनी केली आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टनं ‘श्री महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेल्या सनदा व पत्रं’ प्रकाशित केली आहेत.

श्री महासाधू मोरया गोसावी मंदिर परिसराच्या जागेवरील अस्तित्वातील वास्तूंची तपशीलवार रेखाचित्रं ‘किमया’ या वास्तुविशारदांच्या उत्साही गटानं कोरोनानंतरच्या बंद काळात पूर्ण केली. नवीन इमारतीची निर्मिती करताना जेव्हा रेखांकनं केली जातात, तेव्हा कल्पकतेला भरपूर वाव असतो. परंतु, शतकांच्या अंतरानं निर्मिती झालेल्या वास्तूंची मोजणी रेखांकनं करताना त्यांची वास्तुशैली, बांधकाम शैली आणि बांधण्याचं प्रयोजन हे समजून घेणंही आनंददायी असतं.

नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना पारंपरिक बांधकाम शैलीचे फायदे समजून घेतले, तर त्यांच्या टिकाऊपणाचं मर्म उमजतं आणि कालप्रवाहात कालबाह्य होण्याच्या ऐवजी त्यांना नवीन तंत्रज्ञानात कसं सामावून घेता येईल, याचा विचारप्रवाह सुरू होतो.

मोरया गोसावी मंदिर परिसराचं रूपांतर नदीच्या पात्रालगत घाटांत होतं. काळ्या पाषाणाच्या चुन्यात बांधलेल्या पायऱ्या नदीपात्रात उतरतात, तेव्हा घाट हा वास्तुशिल्पाचा भाग, पाणी व जमीन यांना सांधणारा नुसता दुवा न राहता,

ते पूर संरक्षणाचं महत्त्वाचं व जमिनीची धूप थांबविण्याचं कार्य, ही महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या भौगोलिक जागेचं ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व जाणून घेताना तिथल्या वास्तुशिल्पांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळते.

जिज्ञासा जागृत असेल, तर वास्तुशिल्पंही तुमच्याबरोबर आपल्या संरचनेच्या अध्यात्माचा संवाद साधू शकतात, हा अनुभव विलक्षण समाधानी असतो. झुळझुळणारी पवना तर गेली पाच शतकं या पवित्र स्थानाचं माहात्म्य शांतपणे अनुभवते आहे; म्हणूनच, दरवर्षी इथल्या वास्तुशिल्पांच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा मोह तिलाही आवरत नाही.

युरोपच्या भटकंतीची पूर्वतयारी

दिवाळीनंतर जोडूनच ख्रिसमस येत असल्यानं एक प्रकारे पर्यटनाचा हा जागतिक ‘पीक सीझन’ असतो. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात जगभरात सगळ्यांत जास्त पर्यटन होतं.
glacier express switzerland
glacier express switzerlandsakal

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

दिवाळी संपता-संपता सर्वांनाच भटकंतीचे वेध लागतात. वातावरणातला थंडावा, सगळीकडचं चांगलं वातावरण, साधारणपणे शाळांना, कंपन्यांना सुट्यांचा हा काळ असल्यानं, भटकंतीसाठी सर्वोत्तम काळ हाच समजला जातो.

दिवाळीनंतर जोडूनच ख्रिसमस येत असल्यानं एक प्रकारे पर्यटनाचा हा जागतिक ‘पीक सीझन’ असतो. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या काळात जगभरात सगळ्यांत जास्त पर्यटन होतं. युरोपातलासुद्धा ‘समर सीझन’ गेली काही वर्षं जास्त गरमाईचा असल्यानं आता बरेच पर्यटक थंडीच्या महिन्यांतही पर्यटनासाठी युरोपचा विचार करत आहेत.

युरोपियन देशांत प्रवासासाठी ‘शेंगेन व्हिसा’ आवश्यक आहे. यापूर्वीच्या लेखांमध्ये या व्हिसासंबंधीची सगळी माहिती दिली होती, ती अवश्य वाचावी. साधारणपणे अप्लाय केल्यावर पंधरा दिवसांत हा व्हिसा मिळतो; परंतु, अपॉइंटमेंट मिळण्यासाठी एक महिना लागू शकतो. त्यामुळे ‘युरोप ट्रीप’चं नियोजन किमान चार महिने अगोदर करणं आवश्यक आहे.

amsterdam
amsterdamsakal

आधी सांगितल्याप्रमाणं या व्हिसामुळे एकाच वेळी २७ युरोपियन देशांचे दरवाजे आपल्यासाठी खुले होतात, तर युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या इतर १७ देशांमध्येही हा व्हिसा असल्यास प्रवेश करता येतो. रोमानिया, सर्बिया, सायप्रस, मॉन्टिनेग्रो, तुर्की या देशांचा त्यात समावेश होतो. पर्यटनाच्या दृष्टीनं युरोपचे प्रामुख्यानं चार भाग पडतात. ईस्टर्न युरोप, वेस्टर्न युरोप, नॉर्थ युरोप आणि सेंट्रल युरोप.

यातील ईस्टर्न युरोप हा भाग एकदम ‘बजेट फ्रेंडली’ समजला जातो, तर आधीच बऱ्याचदा युरोपात गेलेले पर्यटक म्हणजे, ज्यांना आपण ‘सिझंड पर्यटक’ म्हणतो तेच शक्यतो नॉर्थ युरोपला प्राधान्य देतात. नॉर्थ युरोप मुख्य भागापासून थोडा तुटलेला आणि बऱ्यापैकी खर्चिक असल्यानं त्याला शेवटी ठेवलं जातं.

पश्चिमेकडील पोर्तुगाल आणि स्पेन यांची भटकंती पर्यटक मोरोक्कोला जोडून करतात. त्यामुळे हा एक वेगळा वेस्टर्न युरोपचा सेक्शन झाला आहे. याचबरोबर इंग्लंड स्कॉटलंड आणि आयर्लंड हे एक वेगळे सर्किट असून, शक्यतो युरोपबरोबर न करता याची वेगळी भटकंती केली जाते.

भारतीय पर्यटकांसाठी त्यांचं सगळ्यांत आवडतं युरोपीय सर्किट ठरतं ते म्हणजे, सेंट्रल युरोप. आयुष्यात पहिल्यांदाच युरोपात चाललोय आणि कदाचित पुन:पुन्हा येणं जमणार नाही असा विचार करून बहुतांश पर्यटक सेंट्रल युरोपला भेट देणं सर्वाधिक पसंत करतात. सेंट्रल युरोपच्या भटकंतीत नेदरलँड, बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सची धावती भेट, फ्रान्समधील पॅरिस, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इटली यांचा समावेश होतो.

युरोपमधली सगळी सर्किट एकाच भागात सामावून घेणं शक्य होणार नाही, त्यामुळे भारतीय पर्यटकांच्या आवडत्या सेंट्रल युरोपबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे ट्रीप प्लॅन करताना याचा फायदा होऊ शकेल. व्हिसाचे सोपस्कार पार पाडल्यावर युरोपात नेमकं कुठं दाखल व्हायचं आणि कुठून एक्झिट घ्यायची, हे सुद्धा ठरवून घ्यावं.

बरेच लोक एका देशात उतरून दुसऱ्या देशात ट्रीप संपवून तिथून बाहेर पडतात, तर काहीजण जिथं उतरतात तिथूनच युरोपबाहेर पडतात. उदाहरणार्थ, ॲमस्टरडॅममधून सुरुवात करून म्युनिक किंवा पॅरिसला भटकंती संपवतात. तसंच पॅरिस ते पॅरिस असंही करता येतं. या भागातील दळणवळणाची व्यवस्था अतिशय सुकर असल्यानं इथं प्रवास करणं, तसं अडचणीचं नाही.

चार ते सहा महिने अगोदर तिकिटं काढली असतील, तर अगदी रायन एअर, वीझ एअरसारख्या विमान कंपन्यांकडून तिकिटं युरोपांतर्गत प्रवासासाठी तीन ते चार हजारांत मिळतात. युरोपात दोन देशांच्या राजधान्यांना अथवा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बससेवा आहेत. त्यातील एक फ्लिक्स बससुद्धा आहे. याचं तिकीट आगाऊ घेतलं, तर अगदी आठशे रुपयांपासून मिळतं.

या बसचा फायदा असा, की या ‘स्लीपर कोच’असून रात्री एका शहरातून निघालो, की दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या देशातल्या गंतव्य स्थळ असलेल्या शहरात पोहोचता येतं. इथली रेल्वे व्यवस्थाही उत्तम असून, तिचा ‘युरेल पास’ घेता येतो. याचा उपयोग करून या देशांत सहजपणे फिरता येतं. काही ‘स्पेशल ट्रेन’ असतात. त्यासाठी मात्र हा युरेलचा पास वापरून आगाऊ आरक्षण करावं लागतं. ते ‘युरेल’च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मुख्य रेल्वेव्यतिरिक्त काही मोजक्या देशांत अंतर्गत मेट्रोसेवेसाठीसुद्धा हा पास वापरता येतो. स्विझर्लंडमध्ये फिरण्यासाठी असाच एक ‘स्विस पास’ घेता येतो. परंतु ‘युरेल’पेक्षा हा पास वेगळा असून, देशातल्या जवळपास सगळ्याच वाहतुकीच्या साधनांसाठी तो वापरता येतो. म्हणजेच, रेल्वेबरोबर बस, ट्राम, मेट्रो आणि रिव्हर क्रूझसाठीही हाच पास आहे. तसंच, इथल्या जगप्रसिद्ध ‘माऊंटन ट्रेन’साठी या पासधारकांना ५० टक्क्यांपर्यंत तिकिटात सूट मिळते.

‘स्विस पास’वर देशातील ५०० पेक्षा जास्त संग्रहालयांत प्रवेश मिळतो. हा पास तीन, चार, सहा, आठ आणि १५ दिवसांसाठी मिळतो. यातही दोन प्रकार असून, एक म्हणजे सलग वापरायचा पास आहे आणि दुसरा फ्लेक्सिबल पद्धतीचा.

भारतातून युरोपसाठी तीन पद्धतीच्या टूर निघतात. एक म्हणजे ग्रुप टूर, दुसरी स्टॅंडर्ड टूर आणि तिसरी कस्टमाइज टूर. बहुतांश पर्यटक ग्रुप टूरनं जाणं पसंत करतात. याला कारण म्हणजे, या टूरमध्ये महत्त्वाची सगळी ठिकाणं असतात. तसंच नाष्टा, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही यात असतं. इतर दोन प्रकारांपेक्षा याची किंमतसुद्धा कमी असते.

सहपरिवार किंवा मित्रांबरोबर जाण्यासाठी जी प्रायव्हेट टूर असते, ती स्टॅंडर्ड प्रकारात मोडते. तर कस्टमाइज टूरमध्ये मनाप्रमाणं बदल करता येतात. कोणत्या शहरात किती दिवस राहायचं काय-काय बघायचं, ते ठरवता येतं.

युरोपमध्ये ज्या ट्रॅव्हल कंपन्या ऑपरेट करतात, त्यांच्या साच्याबाहेरील या टूर असल्यानं अर्थातच त्याच्या किमती जास्त असतात. यात स्थानिक ट्रान्स्फर जसं की एअरपोर्ट ते हॉटेल आणि हॉटेलपासून आकर्षण स्थळापर्यंत जाणं या गोष्टी स्वतःच्या स्वतःच करता आल्या, तर खर्चाचा मोठा भार कमी होऊ शकतो.

हॉटेल निवडताना आवर्जून शहराच्या मध्यभागी असणारं म्हणजेच, सिटी सेंटरमधलं ठिकाण निवडावं; जेणेकरून मोकळ्या वेळात स्वतःला शहर फिरण्याची संधी मिळेल. युरोपातल्या बहुतांश देशांमधल्या शहरांच्या सिटी सेंटरपासून पायी चालतच निम्मी स्थानिक आकर्षणं बघता येतात. बऱ्याच शहरांमधली स्थानिक संग्रहालयं आणि विविध ठिकाणं कव्हर करणारे सिटी पास असतात, ते आवर्जून खरेदी करावेत.

गर्दीच्या वेळी पॅरिस, रोम, प्राग, ॲमस्टरडॅम यांसारख्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या शहरांतल्या संग्रहालयांच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसतात. पास जवळ असेल, तर हा त्रास टाळता येतो आणि बराच वेळ वाचतो. प्रत्येक देशात काय-काय आणि कुठं-कुठं आहे, याची इत्यंभूत माहिती ‘लोनली प्लॅनेट’सारख्या ‘गाइड बुक’मधून मिळू शकते.

सेंट्रल युरोपची भटकंती सात, दहा, पंधरा ते २१ दिवस अशी करता येते. साधारणपणे दहा-बारा दिवसांसाठी नेदरलँडची राजधानी ॲमस्टरडॅमपासून सुरुवात करून पुढं फ्रान्समधलं पॅरिस, मग स्वित्झर्लंड गाठून जिनिव्हा, मोंट्रो, लुसन, इंटरलाकन बघून ऑस्ट्रियातलं देखणं शहर इंझब्रुकला जाता येईल आणि शेवटी जर्मनीतल्या म्युनिकमध्ये भटकंतीची सांगता करता येईल.

दोन-तीन दिवस आधीचे हाताशी असल्यास यात इटलीसुद्धा ॲड करता येईल. म्हणजे, बारा-तेरा दिवसांत सेंट्रल युरोप सर्किटमधले सहा देश पूर्ण करून, पुढच्या भटकंतीत वेस्टर्न-ईस्टर्न युरोप, स्कँडिनेव्हिया किंवा बाल्कन भागातल्या देशांची भटकंती प्लॅन करता येऊ शकेल.

रोमँटिक व्हेनिस

हॉलीवूड किंवा बॉलीवूडमधील अनेक सिनेमे आणि गाण्यांमधून पाहिलेले व्हेनिससारखे तरंगते आणि कालव्यांचे शहर खरेच सुंदर आहे का, हे पाहण्याची बरीच उत्सुकता होती.
romantic venice
romantic venicesakal

- विशाखा बाग

हॉलीवूड किंवा बॉलीवूडमधील अनेक सिनेमे आणि गाण्यांमधून पाहिलेले व्हेनिससारखे तरंगते आणि कालव्यांचे शहर खरेच सुंदर आहे का, हे पाहण्याची बरीच उत्सुकता होती. हे शहर पाहताच क्षणी तुम्हाला प्रेमात पाडते. रोमँटिक सिटी अशी ओळख असलेल्या व्हेनिसची ट्रीप एकदा तरी नक्कीच करायला हवी.

व्हेनिस शहर संपूर्ण जगभरात तरंगते शहर, कालव्यांचे शहर, वेगवेगळ्या पुलांचे शहर आणि रोमँटिक सिटी म्हणून ओळखले जाते. विनशियन लगूनच्या म्हणजेच खाडीच्या मध्ये १२६ बेटांनी मिळून ते तयार झाले आहे. शहराच्या बरोबर मधून ग्रॅण्ड कॅनल हा एक मोठा कालवा जातो आणि त्याच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे शतकांपासून उभी राहिलेली आहेत. जुलैमध्ये मिलानमधून ट्रेन इटालिया रेल्वेने मी व्हेनिसला गेले होते. सव्वादोन तासांत आपण मिलानहून व्हेनिसला ट्रेनने पोहोचतो. अद्ययावत असलेली ट्रेन २५० किमी ताशी वेगाने धावते.

मी फक्त काही तासच व्हेनिसमध्ये होते. मिलानहून एका दिवसात जाऊन तुम्ही व्हेनिस शहर बघू शकता. स्टेशनवर उतरल्यानंतर समोर दिसणारा व्हेनिस शहराचा पहिलाच चेहरा आकर्षक आणि सुंदर होता. स्टेशनवरून बाहेर आल्यावर समोरच तुम्हाला ग्रॅण्ड कॅनल दिसतो. समोर दिसणारे भव्य कॅथेड्रल आणि त्याखाली वाहत असलेला हा कालवा पाहून व्हेनिसमध्ये पाय ठेवल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच होतो.

जमिनीवरचे कोणतेही रस्ते नसलेल्या व्हेनिसमध्ये ४७२ पूल आहेत. शहरातील सर्व वाहतूक वेगवेगळ्या बोटींनी होत असते. आजूबाजूला असलेला समुद्र, कालवे आणि दोन नद्यांमुळे अनेक शतकांपासून हे शहर व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. नैसर्गिकरीत्या मिळालेल्या भौगोलिक स्थानाचा उपयोग या शहराला पहिल्यापासूनच झाला आहे.

युरोपमधील व्यापाराचे अतिशय महत्त्वाचे केंद्र असलेल्या या शहरातून धान्य, मसाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे कापड त्याचबरोबर नवीन उदयास येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि या कलावस्तूंशी निगडित असलेल्या बाजारामुळे येथील व्यापारी प्रचंड धनवान होते. पैसा आणि कला यामुळे या शहराची चौदाव्या शतकापर्यंत प्रचंड भरभराट झाली. त्यामधूनच व्यापाऱ्यांनी आणि इथल्या राजांनी या शहरात जगविख्यात रोमन आर्किटेक्चर आणि गॉथिक शैलीमधल्या विविध प्रकारच्या इमारती, चर्च आणि कॅथेड्रल बांधले.

St. Mark''s Basilica, Doge''s palace, Rialto Bridge, Teatro La Fenice, Bridge of sighs, Basilica De Santa Maria यांसारख्या जगविख्यात इमारती आणि ग्रॅण्ड कॅनल रियाल्टो मार्केट, सेंट मार्क्स स्क्वेअर, मुरानो यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी इथे होत असते.

जवळपास चार किलोमीटर लांब असलेल्या आणि १६ फूट खोल असलेल्या ग्रॅण्ड कॅनलच्या आजूबाजूला आकर्षक के फेज, रेस्टॉरंट, हॉटेल्स, म्युझियम, चर्च आणि व्यापाऱ्यांचे महाल अशा अनेक गोष्टी तुम्हाला बोटीतून चक्कर मारली की बघायला मिळतात. स्टेशनवरून बाहेर आल्यावर समोर लगेच या पब्लिक ट्रान्स्पोर्ट म्हणजेच बोटींचे तिकीट काढू शकतात.

याशिवाय तरुण प्रेमीजनांसाठी येथील रोमँटिक गंडोला बोटसुद्धा प्रसिद्ध आहे. ‘ब्रिज ऑफ साय’ या पुलाच्या खालून गंडोला बोटीतून गेल्यावर प्रेम अजरामर राहते, अशी आख्यायिका आहे. म्हणून ‘ब्रिज ऑफ साय’ इथे तुम्हाला या बोटी प्रचंड प्रमाणात बघायला मिळतात. सोळाव्या शतकामध्ये बांधलेला ‘ब्रिज ऑफ साय’ म्हणजेच डोजेस पॅलेसमधून जेलमध्ये जाताना लागणारा पूल.

डोजेस पॅलेसमध्ये राजाने शिक्षा सुनावल्यानंतर कैदी जेव्हा जेलमध्ये जात होते तेव्हा त्यांना या पुलावरून शेवटचा व्हेनिसचा देखावा दिसायचा आणि सुस्कारे टाकत ते जेलमध्ये जायचे, म्हणून या पुलाला ‘ब्रिज ऑफ साय’ असे नाव पडले... पण खरंच इथून दिसणारा ग्रॅण्ड कॅनल आणि आजूबाजूचा देखावा खूपच सुंदर आहे.

सेंट मार्क्स स्क्वेअर हा प्रचंड मोठा पसरलेला चौक व्हेनिसमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नेपोलियनने या चौकाला ‘ड्रॉइंग रूम ऑफ युरोप’ म्हणून संबोधले होते आणि आता याच नावाने तो ओळखला जातो. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कारणाने एकत्र येण्यासाठीचा भव्य चौक म्हणून याचा वापर अनेक शतके केला गेला.

सेंट मार्क्स बेसिलिका चर्च म्हणजे व्हेनिसमधले एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. फक्त बाहेरूनच नाही; तर आतूनसुद्धा हे चर्च नक्कीच बघण्यासारखे आहे. त्या बाजूला असलेले घड्याळाचे टॉवर, डोजेस पॅलेस आणि अनेक म्युझियम्स हे बघायला चौकात कायम गर्दी असते.

१५८८ मध्ये बांधलेला रियाल्टो ब्रिज हे एक महत्त्वाचे पर्यटनाचे आकर्षक केंद्र आहे. या पुलावर अनेक हॉलीवूडपटांचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. बांधकामाचा एक उत्तम नमुना अनुभवायला अनेक पर्यटक येथे गर्दी करत असतात. १२ व्या शतकापासून रियाल्टो हा भाग एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि बाजारपेठ होती. या ठिकाणी जायला म्हणूनच हा रियाल्टो ब्रिज बांधण्यात आला. आता या ब्रिजवरून तुम्ही पायी फिरूही शकता आणि ब्रीजच्या खाली असलेल्या मार्केटमध्ये खरेदीही करू शकता.

मुरानो हा सात बेटांचा मिळून तयार झालेला भाग ग्लास आयलँड म्हणून प्रसिद्ध आहे. इथे छोटे छोटे काचेचे कारखाने आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या सुंदर काचेच्या वस्तू आणि आरसे तयार केले जातात. प्रत्यक्ष तुम्हाला इथे काही वस्तू तयारसुद्धा करून दाखवल्या जातात. आवर्जून बघण्यासारखा हा भाग आहे. Ponte Della Accademia हा अजून एक पूल प्रेमीयुगुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या पुलाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे लाकडी आहे.

ग्रॅण्ड कॅनलमधून जाऊन या सगळ्या ठिकाणांचा प्रत्यक्ष अनुभव एकदा घ्यायलाच हवा आणि व्हेनिसची रोमँटिक ट्रीप नक्कीच करायला हवी. ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यांत गेलात, तर तुम्हाला खूप उन्हाचा त्रास सहन करावा लागणार नाही...

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

संसदांच्या संसदेची वारी

थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील संसदेला मोठा इतिहास आहे. या इमारतीबाहेरील महाकाय उंचीच्या घड्याळाचे टोले लंडनमध्ये ऐकू येतात.
England Parliament
England ParliamentSakal

- वैभव वाळुंज

थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील संसदेला मोठा इतिहास आहे. या इमारतीबाहेरील महाकाय उंचीच्या घड्याळाचे टोले लंडनमध्ये ऐकू येतात, तसेच जगाच्या राजकारणातही त्याचे पडसाद कायम घुमत राहतात, असं म्हटलं जातं...

इंग्लंडच्या इतिहासात इथल्या संसदेला फार महत्त्वाचे स्थान आहे, पण त्याचा भारताशीही थेट संबंध जोडलेला आहे. इंग्लंडमधली राजेशाही उलथून टाकण्यासाठी तसेच कालांतराने तिच्यावर अनेक बंधने बसवून राजेशाहीपासून सत्ता हस्तगत करत आपला हुकूम राबवण्यासाठी इंग्लंडमध्ये यादवी युद्धे झाली होती.

या युद्धांमधून अनेक नव्या संकल्पना आणि गोष्टी संसदेच्या समोर आल्या, ज्याचा कित्ता जगातील अनेक नव्याने प्रजासत्ताक होणाऱ्या राष्ट्रांनी गिरवला. म्हणूनच लंडन शहरांमध्ये उभारलेल्या संसदेला मोठं महत्त्व आहे व त्याचा उल्लेख जगभरातील संसदांची जननी म्हणून केला जातो. भारताच्या दृष्टीने १८५७च्या उठावानंतर भारताचा राज्यकारभार इंग्लंडच्या संसदेच्या हाती आला होता.

ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता हाती घेताना इंग्लंडच्या संसदेने भारतावर राज्य करण्यासाठी विविध मंत्र्यांची व मंडळांची नेमणूक केली. म्हणूनच १८५८ ते १९४७ यादरम्यान भारताच्या सर्व राज्यकारभाराची सूत्रे याच इमारतीतून हलवली जात असत. या इमारतीबाहेरील बिग बेन या महाकाय उंचीच्या घड्याळाचे टोले लंडनमध्ये ऐकू येतात, तसेच जगाच्या राजकारणातही त्याचे पडसाद कायम घुमत राहतात, असं म्हटलं जातं.

लंडनमधील अनेक ठिकाणांप्रमाणे आता येथील राजकीय व प्रशासकीय जागाही पर्यटनस्थळ बनले आहेत. त्यामुळे लंडनमधील अनेक प्रशासकीय जागांमध्ये व संसदेमध्ये महिन्याच्या ठराविक वेळी तिकीट काढूनही जाता येते. अनेकदा या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते तसेच जनतेला आपली मत मांडण्यासाठी विविध कायद्यांवरील चर्चेमध्ये खासदारांच्या सोबत बोलवले जाते. यासोबतच संसदेमध्ये अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.

इंग्लंडमधील अनेक शाळांमध्ये राबवला जाणारा एक उपक्रम म्हणजे संसद आठवडा अर्थात पार्लिमेंट विक. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या राजकारणाची तसेच समाजकारणाची व त्या अनुषंगाने येथील इतिहासाची आणि सद्यस्थितीतील नागरिकशास्त्राच्या काही धड्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, हे दाखवण्यासाठी संसदेकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

त्याचा वापर करून लंडनमधील तसेच बाहेरील अनेक शहरांतील शाळांमध्ये संसदेचे काम कसे चालते, याची माहिती देण्याकरिता विद्यार्थ्यांना बोलावले जाते. याचाच एक भाग म्हणजे या उपक्रमासाठी संसदेकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता विविध संसाधने माहितीपत्रके आणि त्याच सोबत अनेक दृकश्राव्य माध्यमातून संसदेची माहिती दिली जाते.

या सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेसाठी काम करणाऱ्या विविध गटांना संसदेमध्ये बोलवले जाते. संसदेत लंडनमध्ये राहणाऱ्या विविध देशांतून आलेल्या समुदायांसाठी अनेक उपक्रमही राबवले जातात. विविध धर्मांच्या व देशांच्या वेगवेगळ्या सणांच्या दिवशी येथे अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

ज्याप्रमाणे संसदेत मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा केला जातो त्याचप्रमाणे ईद आणि दिवाळीनिमित्तदेखील मोठमोठे कार्यक्रम ठेवले जातात. संसदेच्या आवारातच महात्मा गांधींचा पुतळा असल्याने २ ऑक्टोबर तसेच गांधीजींच्या स्मृतिदिनी या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते, ज्यात सामान्य जनतेला सहज सहभाग नोंदवता येतो.

अशा विविध निमित्तांनी माझे संसदेत जाणे झाले. इंग्लंडची संसद अनेकदा आतून पाहता आली. येथील काही बैठकांमध्ये सहभागही नोंदविता आला; तरीही या संसदेची सर्वात आकर्षक बाजू म्हणजे या संसदेचे बांधकाम, त्याचे मिनार आणि त्यात असणारा इंग्लंड आणि पर्यायाने भारत देशाचाही मोठा इतिहास होय. भारतातील संसदेप्रमाणे इंग्लंडच्या संसदेतही दोन सभागृहे आहेत.

यातील एका सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स आणि दुसऱ्या सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड असे म्हटले जाते. याची तुलना आपल्या लोकसभा आणि राज्यसभेशी करता येईल. अनेकदा हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहातील सदस्य अंतर्गत प्रक्रियेतूनही निवडलेले असतात. त्यासोबतच या दोन्ही इमारतींना असणारा अनुक्रमे हिरवा आणि लाल रंग हा इंग्लंडच्या संसदेतच प्रथम वापरला गेला होता, ज्याचे नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह भारताने अनुकरण केले. या दोन्ही सभागृहांसाठी गरजेचे असणारे मीटिंग हॉल या इमारतीत आहेतच, पण त्यासोबत ११ व्या शतकातील प्रसिद्ध वेस्टमिनस्टर हॉल याच्या जवळच आहे.

ही इमारत अकराव्या शतकामध्ये एक राजवाडा म्हणून बांधण्यात आली होती. तो इतिहास मनोरंजक असला तरी तितकाच रक्तरंजितही आहे. राजासाठी बांधण्यात आलेल्या या राजवाड्यामध्ये सुरुवातीच्या काळात राजाची संसद म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या खासदारांच्या बैठका होत असत. नंतर या इमारतीचा व राजाच्या अनेक दालनांचे आगीमध्ये मोठे नुकसान झाले म्हणून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली.

प्राचीन ग्रीक शैलीच्या गॉथिक पद्धतीने बांधल्या गेलेल्या या इमारतीमध्ये एलिझाबेथ टॉवर अर्थात बिग बेन ही सर्वात प्रसिद्ध आणि कुठूनही ओळखता येणारी इमारत आहे. याच्याच आसपास इंग्लंडमधील प्रसिद्ध रक्तरंजित घटना, उठाव, पंतप्रधानांची हत्या आणि अलीकडच्या काळातील काही दहशतवादी हल्लेही झाले. थेम्स नदीच्या किनाऱ्यावरच असल्याने तसेच लंडनमध्ये एकेकाळी असणाऱ्या मोठ्या प्रदूषणाने या इमारतीच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले.

त्यातच लंडनला लागणाऱ्या आगीमुळे बरेचदा या इमारतीत अनेक लोकांचे प्राणही गेले. मात्र इमारतीच्या सजावटीसाठी कुठल्याही खर्चाची कमी इंग्लंडमधील जनतेचा कराच्या पैशातून इथल्या सरकारांनी होऊ दिली नाही. या सर्व घटनाक्रमामध्ये या इमारतीचे महत्त्व टिकून राहिले. म्हणूनच याला युनेस्कोने जागतिक वारसा यादीच्या स्थळांमध्ये सामील केले आहे.

इतिहासाच्या ओघात या ठिकाणी अनेक उलथापालथी घडल्या. राजेशाहीकडून पूर्णपणे लोकशाहीकडे येऊन इंग्लंडमध्ये राजा फक्त नामधारी उरल्यानंतर या इमारतीत संसदेच्या सर्व बैठका होऊ लागल्या. हळूहळू राजाच्या राजवाड्याची मुख्य जागा संसदेतील सदस्यांसाठी वापरली जाऊ लागली. नव्याने बांधकाम झाल्यानंतर या इमारतीमध्ये जवळपास ११०० नव्या खोल्या बनवण्यात आल्या. यातील अनेक खोल्यांमध्ये लोकांसोबत थेट बैठका घेण्यासाठी खासदारांना आपापली वेळ आणि जागा निवडता येते.

यादरम्यान अनेक भारतीयांनीही या इमारतीत वास्तव्य केले व भारत तसेच इंग्लंडच्या एकूण राजकारणावर आपली छाप सोडली. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले दादाभाई नवरोजी हे १८९०च्या दशकामध्ये लंडनमधील एका मतदारसंघातून मजूर पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले. यापूर्वीच्या एका निवडणुकीतही त्यांनी सहभाग घेतला होता, मात्र त्यात पराभव झाल्यानंतर त्यांची इंग्लंडमधील अनेक नेत्यांकडून थट्टा उडवण्यात आली होती.

‘इथल्या संसदेत जाण्यासाठी एखाद्या काळ्या माणसाला इंग्लंडचे नागरिक निवडून देतील, असं मला वाटत नाही’ असा शेरा तत्कालीन सरकारमधील अनेक श्वेतवर्णीय नागरिकांनी लगावला होता. थोड्याच दिवसात लंडनमधील नागरिकांनी आपला खासदार म्हणून निवडून दिलेला पहिला भारतीय अशी नवरोजी यांची नोंद झाली.

एक प्रखर राष्ट्रवादी नेते असल्याने नवरोजी यांनी ब्रिटिश सरकारच्या अनेक धोरणांवर या इमारतीत झालेल्या अनेक चर्चेत कडाडून टीका केली, याचे उल्लेख आढळतात. अर्थात त्यांच्यासोबत ब्रिटिश साम्राज्याचे समर्थक असणारे सर मर्चंरजी भोवनागरी यांनीही या संसदेतून लंडनच्या एका प्रभागातील खासदार म्हणून काम केले. मात्र त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.

आजच्या घडीला इंग्लंडच्या एकूण मंत्रिमंडळातील पंधरा टक्के मंत्री हे भारतीय वंशाचे आहेत तसेच दोन्ही सभागृहातील एकूण खासदारांपैकी ५२ खासदार हे वेगवेगळ्या वंशाचे आहेत. या इमारतीत सध्याच्या घडीला असणारा जगाचा कारभार चालवण्यात अश्वेत व्यक्तींची मोठ्या प्रमाणात निवड होत आहे, याचा पाया एका भारतीयानेच घातला होता.

नंतरच्या काळात भारतामध्ये विधिमंडळाची स्थापना केल्यानंतर त्यात भारतीयांचा सहभाग वाढत राहिला. १९३७च्या निवडणुकांमध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात सत्ता स्थापनेसाठी मते मिळाली तेव्हा अनेक भारतीयांचे या इमारतीत जाणे-येणे वाढले; पण भारतीयांची या इमारतीत राहिलेली सर्वात मोठी आठवण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकारी जेव्हा भारतात मुघल बादशहा जहांगीर याच्याकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारासाठी परवानगी मागायला आला त्या वेळेचे एक रंगीत चित्र. हे चित्र ब्रिटिश संसदेच्या मुख्य भागात टांगण्यात आले आहे.

१९२७ मध्ये संसदेत अनावरण करण्यात आलेल्या या चित्रामध्ये ब्रिटिश अधिकारी सिंहासनावर विराजमान असलेल्या जहांगीर बादशहाकडे परवानगी मागण्यासाठी आला आहे असे दिसते. चित्रात दाखवलेला हा अधिकारी म्हणजे याच संसदेत खासदार म्हणून निवडून आलेला सर थॉमस रो हा व्यक्ती होय. म्हणून या चित्राला खासदारांच्या कार्यालयीन जागेच्या जवळ लावण्यात आले.

भारतीय वंशाचे अनेक नागरिक तसेच खासदार या चित्राच्या भोवती काही काळ थांबूनच पुढे जात असल्याचे लक्षात आले. संसदेच्या आवारात जगाच्या इतर भागांत गेलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या तसेच विविध ब्रिटिश शास्त्रज्ञांच्याही चित्रांचे अनावरण इमारतीत करण्यात आले. २०२०च्या आसपास ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळ सुरू झाल्यानंतर संसदेच्या एकूण इतिहासात गुलामगिरी आणि साम्राज्यवादाचा असलेले स्थान यासंबंधी अनेक चर्चा सुरू झाल्या.

तेव्हा या चित्रसोबत ब्रिटिश संसदेच्या बाहेर उभ्या असलेल्या व्हीन्स्टन चर्चिल आणि साम्राज्यवादी जगाच्या इतर खानाखुणांना सुरक्षित राखण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक उडाली. आजही या इमारतीत मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो व या इमारतीच्या आसपास कुणालाही तंबू उभारणे तसेच नदीच्या भागात होडी घेऊन जाणे याच्यासाठी परवानगी दिली जात नाही.

या इमारतीत आजच्या घडीला भारतीयांनी किती मोठा प्रभाव टाकत आहेत याचा अनुभव पुढील लेखात.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)











 कुदसिया बाग दिल्ली

दिल्ली में बाग़ बगीचे बहुत हैं. ये बाग़ बगीचे आपने भी देखे होंगे और इनमें सैर भी की होगी. तो फिर कुदसिया बाग़ में ऐसी क्या खासियत है? ये कुदसिया बाग़ और उसमें बना छोटा सा आशियाना कुदसिया बेगम ने 1748 में बनवाया था और खासियत ये है की कुदसिया बेगम का असली नाम उधम बाई था. कश्मीरी गेट / सिविल लाइन्स के बीच बना ये बाग़ बहुत बड़ा था उस वक़्त. आजकल का बस अड्डा याने ISBT उसी बाग़ की जमीन पर है.  उस वक़्त यमुना इसके किनारे बहती थी अब थोड़ा दूर चली गई है. अब कुदसिया बाग़ में कुछ खंडहर बचे हुए हैं जो ASI की देख रेख में हैं.

उधम बाई एक नर्तकी थी और दिल्ली दरबार में नाचा करती थी. उधम बाई सुंदर होने के साथ साथ समझदार भी रही होगी और महत्वाकांक्षी भी. कुछ ही दिनों में उसने मुग़ल शासक का दिल जीत लिया या शायद मुग़ल बादशाह मुहम्मद शाह उसे दिल हार बैठा. जो भी हुआ हो उधम बाई अपने उद्यम से बादशाह की तीसरी बेगम बन बैठी. शादी के बाद उधम बाई को मनसबदार का ओहदा भी दिया गया. ये ओहदा बहुत महत्वपूर्ण था क्यूंकि इस मनसबदार होने का मतलब था कि अगर बादशाह कहीं बाहर हो तो राज काज के सारे फैसले मनसबदार ही करेगा. 24 दिसम्बर 1725 को उधम बाई ने एक पुत्र को जन्म दिया जिसका नाम था अहमद शाह बहादुर.

1748 में मुग़ल बादशाह मुहम्मद शाह की मृत्यु हो गई. उन दिनों वैसे भी मुग़ल साम्राज्य लड़खड़ा रहा था. अब उधम बाई का बेटा अहमद शाह बहादुर गद्दी पर बैठ गया. 1748 से लेकर 1755 तक बादशाह बना रहा. एक तो गद्दी के लायक प्रभावशाली और समझदार नहीं था और दूसरे ज्यादातर समय हरम में ही बिताता था. वज़ीर सफ़दर जंग राज काज चलाता था. पर उधम बाई ने कुदसिया बेगम का नाम रखकर कामकाज में हिस्सा लेना शुरू कर दिया. इस कमज़ोर स्थिति को उनके वज़ीर सफ़दर जंग ने पहचान लिया और उसने मराठों के साथ मिलकर हमला बोल दिया. अहमद शाह बहादुर को परिवार समेत जेल में डाल दिया गया. अहमद शाह बहादुर की आँखें फोड़ दीं गईं और वो मरते दम तक जेल में से नहीं निकल पाया. उधर उधम बाई की भी गुमनामी में मृत्यु हो गई. कब हुई ये नहीं पता और कहाँ दफनाया गया ये भी नहीं पता. कहा जाता है की लाल किले में दफनाया गया था. फ़िल्मी स्टाइल की इस कहानी के गवाह हैं कुदसिया बाग़ के खंडहर. ये खंडहर अब चिड़ियों और कबूतरों का बसेरा है या फिर सांझ के झुटपुटे में नशेड़ियों की पनाहगाह है. समय बड़ा बलवान है साब. कुछ फोटो:

बेगम ने 1748 में बनवाया था ये काम्प्लेक्स 

उस वक़्त का महल अब कबूतरों का घर 

कभी अर्श पर कभी फर्श पर, कभी रहगुज़र कभी दरबदर, गमें आशिकी तेरा शुक्रिया, हम कहाँ कहाँ से गुज़र गए !

कुदसिया बेगम की शाही मस्जिद 

कभी इमारत बुलंद थी 















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...