Saturday, January 20, 2024

Viarbh Darshan Facebbok page 4

 
अंबाई निंबाई देवस्थान, चिमूर, चंद्रपूर
(Photo - Shailesh Bokade, Nikhil Wadhai)


















भोवरागड किल्ला, धानोरा, गडचिरोली
गडचिरोलीच्या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला वनदुर्ग भोवरागड/भौरागड/भवरागड. आंतरजालावर कुठेच माहिती उपलब्ध नसलेला अज्ञातवासातील किल्ला. धानोरा गावापासून ४ कि.मी अंतरावर सोडे या गावाजवळ पहाडीवर भवरागड किल्ला आहे. तिथे डोंगर कपारीत शिव मंदिर आहे तसेच या पहाडीच्या मागे कठाणी नदी वाहते.
सध्या येथे यात्रा सुरु आहेत त्यामुळे भाविकांची गर्दी बघायला मिळते. गडाच्या पायथ्याशी यात्रा भरते. पायथ्यापासून चढाईला सुरुवात केल्यावर ओबडधोबड दगडांच्या पायऱ्या आहेत तर कुठे सिमेंटच्या पायऱ्या देखील आहेत. मोठ्मोठ्या दगडी शिळांच्या गुहेत शिवलिंग स्थापित आहेत. विदर्भातील लोकांनाही माहित नसलेल्या या किल्ल्याचे पावित्र्य आदिवासी बांधवांनी जपून ठेवले आहे.
(Photo - @middleclasscreator)
 
 
 
लक्कामेडा पहाडी, रेपणपल्ली, गडचिरोली
विदर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत त्यातल्यात्यात गडचिरोली जिल्ह्याने इतिहासाच्या अनेक खाणाखुणा जपून ठेवल्या आहेत. आलापल्ली - सिरोंचा मार्गावरील रेपणपल्ली या ठिकाणापासून काही अंतरावर लक्कामेडा पहाडी आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा पर्वत मन मोहून टाकणारा आहे.
लक्का हा शब्द लख्खा/लाख यापासून बनला आहे तर मेडा/मेटा/मेंढा म्हणजे गड किंवा पहाड. लाख या वृक्षांचा गड म्हणजे लक्कामेडा पहाड हे आदिवासी बांधवांचे पुरातन काळापासून श्रध्दास्थान आहे. येथे वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. एकदा महाशिवरात्रीला आणि दुसरी तेलंगणातील बोनालू या उत्सवात. तेलंगणा राज्यातून सुद्धा असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आदिवासींची मान्यता आहे की येथेच महाभारतकालीन लाक्षागृह बांधण्यात आले होते. पांडवांचे येथे काही काळ वास्तव्य होते. लाक्षागृह कौरवांनी जाळल्यानंतर पांडव एका भुयारातून बाहेर आले होते ते भुयार गुफा आजही येथे आहे असे सांगण्यात येते.
लक्कामेडा फोटोत जेवढा सुंदर दिसत असला तरी गड खूप उंच याची चढाई खूप कठीण आहे. गड चढल्यावर मैदानी प्रदेश आहे. येथे आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. यात्रेदरम्यान येथे नृत्य, संगीत आणि पारंपरिक लोककला साजरी करण्यात येते. येथे लाख वृक्ष आहे त्यांचे पुजन केले जाते.
गडावर काही ठिकाणी जुन्या काळातील चापट विटा विखुरलेल्या आढळून येतात. एका ठिकाणी रचीव दगडांचे बुरुजासारखे दोन उंचवटे आहेत. गडाच्या एवढ्या उंचीवर एक तलाव आहे त्यात नेहमीच पाणी असते. येथे यात्रेदरम्यानच जाता येते इतर वेळेस गडावर कोणीही फिरकत नाही.
प्युअर निसर्ग सौंदर्य आणि ट्रेकिंगचा अद्भुत अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदातरी लक्कामेडाला भेट द्यावी.
 
 
 
 
सुलतानपुरा गढी/किल्ला, अचलपूर, अमरावती
ऐतिहासिक एलिचपुर म्हणजेच आजचे अचलपूर येथील ऐतिहासिक गढी आज आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. एकेकाळी संपूर्ण विदर्भ प्रांतावर राज्य करणाऱ्या या वास्तूचे भंगलेले अवशेष आपल्या गतवैभवाची साक्ष देत आहे.
ऐतिहासिक अचलपूर शहराला बावन्न पुरे आहेत. प्रत्येक पुऱ्याच विशेष काही आहेच. तसेच आजच्या फिरस्तीमध्ये एक वेगळा खास असलेला सुलतानपुऱ्याला लक्ष करून भेट दिली. या भेटीचं विशेष म्हणजे भुईकोट किल्ला. सध्या भग्न अवस्थेत असून सापण नदीच्या तीरावर अंजनगाव - रासेगाव राज्यमार्गावर विटामातीच्या परकोटाने वेढला असून आपले अस्तित्व प्राचीन वास्तू म्हणून टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. तीनशे वर्षांपूर्वीचा असावा असा तेथील जानकार बोलतात. याचा इतिहास असा की, अफगाणिस्थानातून दिल्लीत व्यापार करायला आलेला, पठाण शमशखाॅ याचा मुलगा खमीदखाॅ पन्नी याने नागपूर येथून घोड्यांचा व्यापार सुरू केला. व या नंतर त्यांच्या दोन मुलं सुलतान खान व सरमस्त खान यांनी तो घोड्याच्या व्यापार मध्ये तरबेज होउन, त्या १६९६ साली व्यापारासाठी अचलपूर ची निवड केली व तिथे त्या दोघा भावांनी जागा विकत घेउन सुलतानपुरा व सरमस्तपुरा अश्या दोन वस्ती तयार केल्या व सुलतान खान याने सुलतान गढी बांधली, संपूर्ण बांधकाम हे विटाचे असून याला किल्ल्याचे स्वरूप आहे.
संरक्षणाच्या दृष्टीने शहराचे बाहेर सुरक्षित राजधानी म्हणून तेथून तत्कालीन राजा आपले राज्य सांभाळत असे. राज्यकारभाराची सुत्रे येथून सहज हालत असावी चारही बाजू बंद असलेल्या या भुईकोटाचे दार पश्चिमेकडून असून शत्रूला आत घुसखोरी करण्यास कठीण असावे असा कयास करता येतो. परकीय आक्रमणात पुढे दुर्दशा झाली नंतर सैन्य ठेवण्यासाठी इंग्रजांनी तो ताब्यात घेतला. पुढे त्याचा वापर कडेकोट परकोट असल्यामुळे देवगाई कोंडण्यास झाला. राज्यकर्ते बदलत गेले सोबत अक्षम्य दुर्लक्ष झालं अलीकडे थोडंफार सौदर्यीकरण करण्यात आलं जाणत्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन अधिक लक्ष दिल्यास गत वैभव प्राप्त होऊ शकते. एक मानाचा तुरा म्हणून विद्यार्थी सहलीसाठी व पर्यटकांसाठी. यापुढे अधिक माहिती मिळाल्यास ती जोडण्यात येईल.
(फोटो - प्रविण तायडे, अवि. आर)
(माहिती साभार - प्रविण तायडे, कुणाल सिमा केशव काळे)
 
 
 
 
ऐतिहासिक महाल, खांजमानगर, अमरावती
अचलपूर - पर्सापूर रोडवर हरम गावाच्या जवळच आणि अचलपूर पासून ७ किमी अंतरावर १६ बुरुज असलेले, इतिहासाचा अनमोल ठेवा हृदयात साठवलेले - अज्ञात "खांजेमानगर"
गावात शिरताच आपल्याला एक भव्य आणि सुबक बांधकाम असलेला बुरुज दिसतो. अष्टकोनी आकारांचे हे बुरुज त्यात लाखेचे दगडसुद्धा होते, या पूर्ण गावाला अश्या १६ बुरुजांचा वेढा होता म्हणजे नक्कीच येथे एका छोटेखानी किल्ला वसवण्याची तयारी होती हे नक्कीच.
गावाच्या उत्तरेकडील भागात एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूची सुंदरता त्याकाळात खूप भव्य असावी असा अंदाज बांधकाम बघून येतो. ही वास्तू तीन मजली असून दगड व जुन्या विटांच्या बनावटीत बांधलेली आहे. त्यावर सुंदर असे नक्षीकाम, पाणी जायला कौलारू नाल्या बनवलेल्या आहेत. इमारतीच्या वर दोन मिनार इतिहासाच्या भव्यतेची साक्ष देत डौलाने उभे आहेत. या वास्तूच्या मागच्या बाजूस नदी आहे, म्हणजे इथे एक छोटेखानी भुईकोट किल्ल्या ची योजना होती याचा निश्चित अंदाज बांधता येतो.
जवळच अचलपूर सारखं वैभवशाली शहर असतांना हे शहर वसवण्याचा उद्देश काय? याच बांधकाम अर्धवट का? या सर्व प्रश्नांची उत्तरं निरुत्तर आहेत. अमरावती गॅझेट मध्ये खांजेमानगर एलीचपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव. औरंगजेबाच्या खान- ए-जामाँ वरून याचे नाव खांजेमानगर असे पडले एवढाच उल्लेख आहे पण एवढं नक्की की अचलपूर च्या नवाबाच्या तोडीस तोड म्हणून हे शहर औरंगजेबाच्या आदेशाने खान- ए-जामाँ नावाच्या सरदाराला दिले, पण त्याच्या अकाली निधनाने हे बांधकाम अपूर्णच राहिले ते आजतागापर्यंत. कारण गावातील वृद्ध लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गावाच्या मधोमध एक बगिच्यासारखं बांधकाम होतो पण आज ते शिल्लक नाही. काही जुन्या विहिरी, चुना कुटायचा घाना ही सर्व अवशेष आतापर्यंत काही काळ आधी होती पण आता मात्र ती नामशेष झाली. खांजेमानगर या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एलीचपूर (अचलपूर) ज्या राजाने वसवले त्या इल राजाचे हे जन्मस्थान आहे.
(फोटो आणि माहिती - प्रतीक पाथरे)
 
 
 
केरझिरा देवस्थान आणि पर्यटन स्थळ, गंगाझरी, गोंदिया
गोंदिया-तिरोडा मार्गावर गंगाझरीपासून अवघ्या ५ किमी अंतरावर डोंगरावर वसलेल्या केरझिरा येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. हे देवस्थान शिवभक्तांचे श्रद्धेचे केंद्र आहे.
नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्यात उंच टेकडीवर वसलेल्या भगवान शिवाच्या मंदिर येथे आहे. येथील भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग 3०० ते ४०० वर्षे जुने असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. देवस्थान परिसरात बेलाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पद्मजातीचा वृक्षही आहे. संपूर्ण वनक्षेत्रात हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. प्राचीन ग्रंथानुसार ॠषीमुनी पद्म वृक्षाच्या सात्रिध्यात तपश्चर्या करत असत. त्यामुळे, केरझिरा क्षेत्राचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.
घनदाट झाडांनी वेढलेल्या या परिसरात वर्षभर वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. शतावरी, मुसळी, अडुळसा, जंगली तुळशी, बहावा, गरुड फल्ली, आवळा, बेहाडा, हिरडा, सजा, बिजा आणि इतर मौल्यवान वनसंपदा या वनक्षेत्रात आढळते. गेल्या काही वर्षांत तिरोडा विभागाचे आमदार विजय रहांगडाले यांनी या देवस्थानच्या
विकासासाठी खूप प्रयत्न केले आहेत. तीर्थ क्षेत्र विकास निधीतून या संकुलातील भाविकांसाठी भक्त निवास आणि श्री गणेश, दुर्गा, विठ्ठल रुख्मिणी, आवारात महासरस्वती, राधाकृष्ण आणि साईबाबांची सुंदर मंदिरे बांधली आहेत.
औषधी गुणधर्म असलेले पाण्याचे कुंड
केरझिरा देवस्थानात नैसर्गिक पाण्याची टाकी आहे. जिथून वर्षभर पाणी नैसर्गिकरित्या वाहत असते. पाण्याच्या टाकीजवळ अनेक वर्षांपासून केळीची झाडे आहेत. त्यामुळे, या पवित्र स्थानाचे नाव 'केरझिरा' पडले आहे. या कुंडाचे पाणी औषधी गुणधर्म असलेले आहे. अनेक जटिल आजारांवर उपयुक्त असल्याचेही परिसरातील ज्येष्ठांनी सांगितले आहे.




















मुक्ताई देवस्थान आणि धबधबा, डोमा, चंद्रपूर
डोमा येथील मुक्ताई मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. तेथील धबधब्यात भिजून चिंब होण्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप तिकडे ओढली जातात.
शंकरपूरजवळ हिरव्या वनराईने नटलेला मुक्ताई डोंगर आहे. येथेच जागृत देवस्थान मुक्ताई गुफा मंदिर आहे. लगतच्या डोंगराच्या ४५ फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.
या भागात निसर्गाने अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट, माकडांचा हुपहुप आवाज आणि पाण्याचा सळसळणारा आवाज पर्यटकांना मनसोक्त आनंद देत आहे. याच धबधब्यावर सूर्याचे किरण पडल्यानंतर दिसणारा इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो. धबधब्याच्या बाजूला एक गुहा आहे. ही गुहा धबधब्यापासून वरती डोंगरावर जाते. त्यातून जाताना शरिराला नागमोडी वळण घेत जावे लागते. त्याचाही आनंद पर्यटकांना मिळतो. मुक्ताईच्या निसर्ग सौंदयाचा आनंद घेण्यासाठी लांब अंतरावरील पर्यटकांची खूप मोठी गर्दी दररोज होत असते.
 




























वारी हनुमान मंदिर, वारी भैरवगड, अकोला
वारी हनुमान मंदिर हे बुलढाणा, अकोला व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन आणि प्राणप्रतिष्ठा केलेल्या अकरा हनुमान मंदिर पैकी एक आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये येणाऱ्या वाण धरणाच्या कुशीत वसलेले हे देवस्थान, पर्यटन स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. वाण नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात हनुमानाची भव्य मुर्ती आहे. जवळच हनुमान सागर नावाचे प्रसिद्ध वाण धरण आहे. हिरव्यागार परिसरात वाण नदीचे खळखळते पाणी मनाला शांती देऊन जाते.येथे नेहमीच भाविक व पर्यटकांची गर्दी असते.
वाण नदीच्या पात्रात एक खोल डोह आहे,या डोहाला "मामा भाच्याचा डोह" म्हणून ओळखले जाते. खुप वर्ष पूर्वी या डोहात मामा आणि भाचा पोहायला गेले असता त्यांचा बुडुन मृत्यु झाला,त्यामुळे या डोहाला असे नाव पडले आहे असे सांगतात. या डोहात 100 हुन अधिक लोकांनी प्राण गमवले आहे त्यामुळे यात पोचण्यास मनाई आहे.
प्रसिद्ध हनुमान मंदिर, अखंड गोमुख , मामा भाच्याचा डोह , वाण धारण अश्या या सातपुड्यात वसलेल्या ठिकाणाला अवश्य भेट द्या.
🚩जय हनुमान🚩
 
























 
 पुरातन पायविहीर, पातुर्डा, संग्रामपूर, बुलढाणा











 





सिता न्हाणी गुफा, डोंगरगाव (शंकरपूर), चिमूर, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील डोंगरगाव जवळच मुक्ताई पासून पाच किमी अंतरावर एका डेकडीवर सिता मातेची गुफा कोरलेली आहे. स्थानिक गुफेला सितेची न्हाणी (आंघोळीचे स्थान) म्हणून ओळखतात. गुफेच्या आत सिता मातेची मुर्ती स्थापीत केलेली आहे.
(Photo - Muktai Waterfall)



















महाकाय दगडांची गुफा, झाडापापडा, ता. धानोरा, जि. गडचिरोली
विभाजनपूर्व चंद्रपूरचे (आजच्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचे) इतिहासकार - अण्णाजी जयराम अर्थात अ. ज. राजूरकर (१९२४-१९९२)
चंद्रपूरला स्वत:चा असा वैभवशाली इतिहास आहे हे जगाला दाखवून देणारे अग्रगण्य इतिहासकार म्हणून अ. ज. राजूरकर यांचे नाव घ्यावेच लागेल. १९५६ साली प्रकाशित झालेला त्यांचा 'चंद्रपूरचा इतिहास' हा ग्रंथ चंद्रपूरच्या इतिहासावरील प्रमुख संदर्भग्रंथ आहे. त्याचे प्रकाशन लोकनायक माधव श्रीहरी उपाख्य बापुजी अणे यांच्या हस्ते तर लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थित झाले. त्या ग्रंथास विदर्भाच्या इतिहासाचे पितामह डॉ. यशवंत खुशाल देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी राजूरकरांनी जवळपास १० वर्षे अहर्निश परिश्रम केले. अनेक पोथ्या, हस्तलिखिते, शिलालेख, प्राचीन दस्तऐवज यांचे अध्ययन करून राजूरकरांनी हा ग्रंथ निर्माण केला. त्यासाठी शेकडो गावांना भेटी दिल्या, रानवाटा धुंडाळल्या, किल्ले, मंदिरे, लेणी, गुंफा यांची भ्रमंती केली. डॉ. य. खु. देशपांडे, डॉ. शं. गो. चट्टे, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, सेतू माधवराव पगडी, भाऊजी काकडे इ. ज्येष्ठ प्रभूतींची चर्चाविनिमय करुन गोष्टींची उकल केली व काही मौलिक निष्कर्ष मांडले.
या ऋषित्युल्य इतिहास संशोधकाची जन्मशताब्दी येत्या २७ जानेवारी २०२४ रोजी येत आहे. त्याचे औचित्त्य साधून इतिहासकार अ. ज. राजूरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात त्यांचा जन्मशताब्दीसोहळयाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या प्रसंगी त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित गौरवग्रंथाचे प्रकाशन सुद्धा केले जाणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. चंद्रशेखर गुप्त, डॉ. र. रा. बोरकर या ज्येष्ठ इतिहास संशोधकांची विशेष उपस्थिती राहणार असून ते उपस्थित इतिहास अभ्यासकांना ते मार्गदर्शन करतील. या सोहळ्याच्या प्रसंगी 'गोंडवन इतिहास संशोधन मंडळा'ची स्थापना केली जाणार आहे. चंद्रपूर-गडचिरोलीच्या पर्यायाने गोंडवनाच्या इतिहास संशोधनास चालना देणे व येथील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करणे यांसाठी गोंडवन इतिहास संशोधन मंडळ कटिबद्ध असेल.
ग्रंथाच्या ४ थ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची घोषणा सदर कार्यक्रमात केली जाणार आहे. आगाऊ बुकिंगसाठी ८२३७२ ११८७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.




















सुरजागड किल्ला, एटापल्ली, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड हे एक छोटेसे गांव आहे. निसर्ग सौंदर्य.. हिरवी गर्द झाडी.. वनसृष्टीने नटलेले.. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारणत: दि. 5 व 6 हे दोन दिवस येथे वार्षिक उत्सव भरतो. या उत्सवास सुरजागडची यात्रा किंवा ठाकुरदेवाची यात्रा म्हणतात. गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा प्रमुख उत्सव आहे.
येथे गडावर ऐतिहासिक किल्ला अस्तित्वात आहे. काळ्या पाषाणातील चिऱ्यांच्या भक्कम तटबंदीने का किल्ला बांधलेला आहे. किल्ला निर्माण काळ निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी येथे राजा सुरजत बडवाईक राज्य करीत होता अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. त्याने या भागातील एका उंच पहाडावर दगडी किल्ला बांधला व त्याला सुरजागड हे नाव दिले. कालौघात या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले आहे. आता केवळ किल्ल्याचे भग्न अवशेष शिल्लक आहेत. येथे शासना कडून लोहप्रकल्पास मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर फोटो उध्वस्त महान ऐतिहासिक किल्ल्याची साक्ष आहे.


राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे देशातील एकमेव 'अॅनॉमॉर्फिक स्कल्प्चर', मातृतिर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा
मराठा सेवा संघामार्फत जिजाऊ सृष्टी वर जिजाऊंचे देशातील एकमेव दृष्टीभ्रमावर आधारित 'अॅनॉमॉर्फिक स्कल्प्चर' दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त उभारण्यात आले आहे. याची उंची 30 फूट असून ठराविक अंतरावरून बघितल्यास ही प्रतिमा स्पष्ट दिसते.
- अभय पाटील






पुरातन काळाराम मंदिर, वणी, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील वणी ही ऐतिहासिक नगरी प्रभु रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. श्री राम वनवासात असताना दंडकारण्याचा भाग असलेल्या वणी भागातून दक्षिण भारतात गेले होते. त्यांचा काही काळ सहवास लाभल्यामुळे येथे राम मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर पुरातन असून काळ्या पाषाणातील बांधकाम आहे. मंदिरात सभामंडपा मध्ये प्रवेश करण्याआधी श्री गणेश आणि हनुमान यांच्या सुंदर मुर्तींचे दर्शन होते. सभामंडप दगडी स्तंभावर स्थित आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर जय विजय द्वारपाल आहेत. द्वारशाखेच्या उजव्या बाजूस एक प्राचीन शिलालेख कोरलेला आहे. गर्भगृहात राम सिता यांची सुंदर विलोभनीय मुर्ती आहे. सोबत लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान यांच्या देखील मुर्ती आहेत.
(Photo - Bhushan Dhumne)




















श्री राम मंदिर, लोणार, बुलढाणा
लोणार सरोवराच्या सभोवताली अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकी एक अत्यंत सुंदर मंदिर. प्रभु श्रीराम वनवासात असताना येथून गेले होते म्हणून या मंदिराला राम गया मंदिर म्हणून ओळखले जाते. पश्चिमा भिमुख असलेल्या या मंदिरात फक्त रामाचीच मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजा समोर मारुती असलेली घुमटी आहे. बाजुलाच आणखी एक पुरातन मंदिर भग्नावस्थेत आहे. रामगया हे मंदिर उंच भागावर तिन्ही बाजूने सब्जा असणारे आहे. त्याच्या गर्भगृहावर वीरासनमधील हनुमान आहे. मंदिराच्या आतील राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती निजामाच्या काळात नष्ट झाल्या आहेत. त्याऐवजी आज दुसरी लाकडाची मूर्ती रंग लावून उभी आहे.
येथे उत्खननात एक चतुष्कोणी बारव सापडली. तिला रामकुंड किंवा पुष्कर तिर्थ म्हणून ओळखले जाते. असे सांगितले जाते की प्रभु श्रिरामांनी आपल्या बाणांच्या साहाय्याने या कुंडात गौतमी गंगा प्रकट केली होती. याच कुंडात रामांनी आपले पिता दशरथ राजा यांचे श्राद्ध केले होते. म्हणून आजही लोणार घाटावर कित्येक जमातीचे लोक शतकानुशतके दहासी (तेरसे) पिंडदान करत आले आहेत.






















अद्भुत, अप्रतिम, कोरीव, रेखीव, विलोभनीय अशा मुर्ती...
कलाकाराने प्राण ओतून निर्माण केलेल्या विदर्भातील काही प्राचीन प्रतिमा...



उमा महेश्वर मंदिर, विडुळ, उमरखेड, यवतमाळ



अमृतेश्वर महादेव मंदिर, हरदडा, उमरखेड, यवतमाळ











दिगंबर जैन मंदिर, मुक्तागिरी, मध्यप्रदेश
मुक्तागिरी हे जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण विदर्भ आणि मध्ये प्रदेश च्या सिमेवर असून अमरावती पासून हे ६५ कि.मी. दूर आहे. चिखलदर्यापासून जवळच हिरव्यागार सातपुडा डोंगर रांगांच्या कुशीत ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या 'अतिशय महत्वाच्या क्षेत्रांपैकी' हे एक आहे.
एकदा अवश्य भेट द्या !

































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...