बघता बघता २०२१ हे वर्ष संपत आलंय. कोरोनानं आपल्या सर्वांचं आयुष्य बदलून टाकलंय. या दोन वर्षांत अनेकांच्या कोणी ना कोणी जवळच्या व्यक्तीचा वियोग झाला, तेव्हा अनेकांचा अधिक विश्वास बसला, की आयुष्य हे फार छोटं आहे, आपलं जगायचंच राहून गेलं तर? आणि मग काही लोकांनी त्यांच्या जगण्याचा ‘प्राधान्यक्रम’ बदलायला सुरुवात केली. तुम्ही असा विचार करताय की नाही अजून? मित्रांनो, आपला जन्म फक्त बिलं भरण्यासाठी किंवा मरण्यासाठी झाला नसून खऱ्या अर्थानं जगण्यासाठी झालाय हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रवासाला प्राधान्य देणारेही काहीजण तयार झाले आहेत. नवीन वर्षात अनेकांचे बऱ्याच ठिकाणी फिरायला जाण्याचे संकल्प असतीलच. थोडक्यात, हा सारा खटाटोप कशासाठी? तर नवं विश्व पाहण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि सुख-दुःखांना सामोरं जात खूश राहण्यासाठी…!
सतत खूश राहणं हीदेखील एक कला आहे. दुसऱ्यांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंगही कमी होतो. पण त्याहून भारी म्हणजे स्वतःकडून प्रवासाच्या, जगण्याच्या, अनुभव कमवण्याच्या आणि जास्तीत जास्त खूश राहण्याच्या अपेक्षा ठेवूया की…! ते साधंसोपं आहे तसं पाहिलं गेलं तर… असेच बहुसंख्य लोकं, जे जास्तीत जास्त खूश असतात ते आपल्या जवळच राहतात, हे तुम्हाला माहितीये का? त्या देशातील स्थानिक लोक सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदाला महत्त्व देतात. हा देश म्हणजे आपला शेजारी भूतान…! हा देश त्याच्या अद्वितीय तत्त्वज्ञानासाठी ओळखला जातो; सकल राष्ट्रीय आनंद (Gross National Happiness) आणि हाच त्यांच्या विकास धोरणाचा देखील एक भाग आहे.
शांग्री-ला व्हॅली (Shangri La)
नंदनवन भौतिक जगात अस्तित्वात असल्यास, ते भूतानमध्ये असेल. ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांच्या १९३३ च्या ‘लॉस्ट होरायझन’ या कादंबरीत वर्णन केलेलं शांग्री-ला हे कुनलुन पर्वतातील एक काल्पनिक ठिकाण आहे. आश्चर्यकारकपणे सुंदर भूतानने आपल्या संसाधनांचं इतक्या चांगल्या प्रकारे जतन केलं आहे आणि आपल्या संसाधनांचा इतका हुशारीनं वापर केला आहे, की भूतानला त्याच्या समृद्धतेमुळे आणि देशाच्या निसर्ग आणि पर्यावरणासाठी असलेल्या आसक्तीच्या भावनेमुळे शेवटचं शांग्री-ला म्हटलं गेलं आहे. भारत आणि चीनमधील हिमालयात खोलवर वसलेला एक छोटा, भूपरिवेष्टित देश भूतानमध्ये उंच पर्वत आणि खोल दऱ्या आहेत, ज्यामुळे विखुरलेल्या लोकसंख्येच्या वस्तींची ठिकाणं आहेत.
भूतानमध्ये स्थिर राजकीय आणि आर्थिक वातावरण आहे. सामाजिक विषमतेच्या समस्या आणि प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करून, अत्यंत गरिबी कमी करण्यात आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी या देशानं प्रचंड प्रगती केली आहे. पूर्वेकडील हिमालयाच्या शिखरांमध्ये, उंच इमारतींपेक्षा अधिक पर्वतीय मठांसह (Monasteries), भूतान हे हिमालयातील शेवटचं जिवंत राज्य आहे, जे आपल्या संस्कृती आणि परंपरांना शौर्यानं चिकटून आहे. परंतु हे ऐतिहासिक बौद्ध एन्क्लेव्ह हळूहळू आधुनिक होत आहे, त्यांच्या स्वतःच्या अटींवर. थोडक्यात काय, तर बदल हा होतच असतो. काही प्रमाणात आपली चौकट आखून बदल केले जातात एवढंच. मुळातच तेथील लोक भारीयेत. त्यांच्याशी संवाद साधला की लगेचंच आपलेपणा दिसतो. मी मागच्याच आठवड्यात लिहिलं होतं की, जे प्रवासी डोंगरात वेळ घालवतात, ते एका सकारात्मक शक्तीने किंवा ऊर्जेने जगताना दिसतात. भूतानमधील तर सर्वच नागरिक डोंगरांत राहतात. सहज विचार करा की काय कमालीची लोकं असतील तिथली...!
भूतानची लोकसंख्या साडेसात ते आठ लाख असून, थिम्फू (Thimphu) ही राजधानी आहे. भूतानची राष्ट्रीय भाषा झोंगखा (Dzongkha) आहे. भूतानला बाइक राइड किंवा ड्राइव्ह करण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही. अतिशय भन्नाट रोड आहेत. या देशात तर हमखास बजेट ट्रॅव्हल होऊ शकतं. भूतानला मार्च ते मे महिना आणि ऑक्टोबर – नोव्हेंबर हे महिने फिरण्यासाठी चांगले समजले जातात. भूतानचं एकमेव वास्तविक शहर; थिम्पूचं वीकेंड मार्केट, संग्रहालयं आणि बिअर आणि व्हिस्की बार अफलातून आहेत आणि येथे निवांत वेळ घालवता येतो. तक्तशांग गोएम्बा (टायगर्स नेस्ट मठ), देवदूतांच्या केसांना त्या जागी ठेवलं आहे. जगात बऱ्याच ठिकाणी लोक धार्मिक असतात, हे वेळोवेळी दिसून येतं. आपण प्रवास करताना रुढी-परंपरा समजून घ्यायच्या, तेवढीच ज्ञानात भर पडत राहते. Punakha Dzong ही भूतानची सर्वांत सुंदर इमारत असून, मो (MO-Mother) व पो (PO-Father) या नद्यांच्या संगमावर आहे. बुमथांग (Bumthang) खोऱ्यातील सातव्या शतकातील प्राचीन मंदिरं, पवित्र स्थळं आणि रोडोडेंड्रॉनची जंगलं ही न विसरता पाहिलीच पाहिजेत.
चांगंगखा लखांग हा थिम्फू खोऱ्याकडं वळणाऱ्या एका छोट्या टेकडीवर वसलेला मठ तेराव्या शतकात बांधला गेला. बुद्ध डोर्डेन्मा; या ठिकाणी बसलेली बुद्धमूर्ती आहे. ब्राँझचा हा पुतळा आकर्षक आहे. ‘Suspension Bridge’ फोटोसाठी अथवा निवांत थांबण्यासाठी मस्त आहे. पारो (Paro) येथे रिंचेन पुंग झोंग ही जुनी अप्रतिम वास्तू आणि भूतानचा वारसा कॅप्चर करणारे, तसंच देशभरातून प्रदर्शित केलेल्या चांगल्या जतन केलेल्या कलाकृती या राष्ट्रीय संग्रहालयात पाहायला मिळतात. जलदापारा राष्ट्रीय उद्यान हे हिमालयाच्या पूर्वेकडील पायथ्याशी वसलेलं असून, तिथेच जवळ गोरुमारा राष्ट्रीय उद्यानही आहे. ही दोन्ही वन्यजीव अभयारण्यं सिंगल हॉर्नड गेंडा, हत्ती आणि बंगाल वाघ, ठिपकेदार हरणं, बार्किंग डीअर, सांभर हरणं, बायसन इत्यादींसाठी प्रसिद्ध आहेत. भूतानची रेड पांडा व गव्हाची बिअर फेमस आहे.
मित्रांनो, भूतानचा पर्यटनस्थळ म्हणून विचार केला की सकल राष्ट्रीय आनंद, धनुर्विद्या, फडफडणारे प्रार्थना झेंडे, मुखवटा नृत्य, भिक्षू, रोडोडेंड्रॉन जंगलं, एक परोपकारी राजा आणि महागडं दैनंदिन पर्यटक शुल्क हे सारं डोळ्यांसमोर येऊन उभं राहतं. खरंच भूतान एक छोटासा पण भन्नाट देश आहे. भारतातून बाहेर जाऊन पटकन एखादा देश हिंडायचा असेल, तर भूतानला ७/८ दिवस निवांत जाऊन यायचं. शुद्ध हवा आणि शांतता मिळेल. या प्रवासातून नवचैतन्य प्राप्त होईल. खूश होण्यासाठी आपल्या कमाईतील थोडा तरी पैसा स्वतःच्या प्रवासावर खर्च करा आणि आपलीच जिंदगी वसूल करा... कारण कोरोनानं दाखवून दिलंय जगायचं कसं...! तर या निमित्ताने नवीन वर्षासाठी काही ना काही प्रवास करण्याचे प्लॅन्स आखा आणि त्यांना प्राधान्यक्रम देऊन प्रत्यक्षात उतरावा. सदिच्छा सर्वांना...
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
By प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com
भूतान हा भारतीय उपखंडातील सर्वाधिक ‘ॲव्हरेज हॅपिनेस इंडेक्स’ असलेला
आपला सख्खा शेजारी देश. या देशाला भेट देण्याची तीव्र इच्छा अनेक
दिवसांपासून होतीच. पण कोरोनापश्चात सोलो ट्रॅव्हलिंगवर बंदी आल्यामुळे मग
सोबत्याचा शोध सुरू झाला. ट्रेकिंग आणि प्रवासाची आवड असलेला नाशिकचा
मित्र प्रकाश जोशी सोबत यायला तयार झाला. मग इंटरनेटवरून भूतानबद्दलची
माहिती घेण्यास सुरुवात केली. देश, धर्म, चलन, भाषा, अंतरे, वेश, बंधने
शोधत गेलो (काही गोष्टींमध्ये नंतर तफावत आढळली).
प्रवासाची प्राथमिक व्यवस्था पार पडल्यावर आम्ही अखेर जयगाव या भारतीय
सीमेवरील शेवटच्या गावामध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रॅव्हल
एजन्सीच्या कार्यालयात हजर झालो. लिली नावाची व्यवस्थापिका, विशिष्ट भूतानी
वेशभूषेतील गाइड पासन आणि ड्रायव्हर छोरतेन तिथे हजर होते. पासनने विशिष्ट
रंगाचा ‘घो’ म्हणून ओळखला जाणारा गणवेश घातला होता. त्याच्याजवळ एक रंगीत
शालही होती. या शालीच्या रंगावरून ही व्यक्ती कोणते काम करत असेल, हे
लक्षात येते; उदाहरणार्थ, शासकीय कर्मचारी, धर्मविषयक काम, सामान्य नागरिक,
मंत्री, राजा वगैरे. प्रत्येकासाठी वेगळ्या रंगाची शाल असते.
ओळखीचे आणि फिया वगैरे प्राथमिक सोपस्कार पार पडल्यावर ड्रायव्हर छोरतेन
आमचे सामान घेऊन गाडीकडे गेला, तर गाइड पासन आम्हाला घेऊन इमिग्रेशन
ऑफिसकडे. पंधरा मिनिटांत तेथील काम होऊन आम्ही भूतानच्या फुटशोलिंग या
शहराकडे निघालो. फुटशोलिंगपासून राजधानी थिम्पूपर्यंत पावणेदोनशे
किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल सहा तास लागले, कारण संपूर्ण प्रवासात
डोंगर-दऱ्या, भरपूर वळणे होती. पण रस्त्यातील निसर्गाची श्रीमंती, पाईन
वृक्षांच्या रांगा, डोंगरांचे लेअर, त्यामधील रंगछटा, सूर्याचे लाइट इफेक्ट
न्याहाळताना स्वतःला विसरून गेलो. रस्त्यामध्ये काही मॉनेस्ट्री आणि घरे
पाहायला मिळाली. सर्वांची रचना एकसारखी आणि रंगकामसुद्धा विशिष्ट
रंगसंगतीमध्ये होते. प्रवासात अनेक ठिकाणी विविध रंगांच्या पताका, झेंडे
दिसत होते. तर काही ठिकाणी फक्त पांढऱ्या रंगाचे ध्वज दिसत होते.
उत्सुकतेपोटी पासनला विचारले असता, रंगीत झेंड्यांमधील प्रत्येक रंग
पंचमहाभूतांपैकी एकाचा आहे. या पताका, झेंडे वाऱ्याने जितके फडफडतात तेवढी
आमची समृद्धी वाढत जाते, असे त्याने सांगितले. मग हे फक्त पांढरे झेंडे
कशाचे? तर ते कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ लावले जातात.
त्यांच्या फडफडण्याने दिवंगत व्यक्तींच्या आत्म्याचा मुक्ती मिळण्याकडे
प्रवास सुरू होतो, असे मानले जाते. तर, मानवी दोषांपासून मुक्त होण्यासाठी
१०८ झेंडे लावले जातात, असेही पासनने सांगितले.
पांच्छू आणि वांग्छू या दोन नद्यांचा संगम आणि सर्वत्र हिरव्यागार
डोंगरांच्या रांगा… एका ठिकाणी नदीवरचा नवीन पूल आणि पूर्वीचा लोखंडी पूल
यांच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर धबधबा चार चाँद लावत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या वेटरने बेल वाजवून ‘कुझुझांगपो ला’ असे
म्हणून नाश्ता दिला. नंतर रिसेप्शनिस्टने ‘कुझुझांगपो ला’ म्हणजे गुड
मॉर्निंग अशी माहिती पुरवली. रात्रभरची कडकडीत थंडी आता सकाळी कोवळ्या
उन्हाबरोबर हळूहळू गायब होत होती आणि साइट सीइंगसाठी एक प्रसन्न दिवस आमची
वाट पाहत होता.
राजधानीच्या शहराचे प्रथम दर्शन विलोभनीय होते. संपूर्ण शहरात फक्त एकाच
चौकामध्ये ट्रॅफिक पोलिस होते, पण ट्रॅफिक सिग्नलसुद्धा नव्हते. तरीही
संपूर्ण प्रवासात आम्ही आमच्याच काय, पण इतर गाड्यांचेसुद्धा हॉर्न ऐकले
नाहीत. न राहवून मी छोरतेनला विचारले, ‘इथे गाड्यांना हॉर्न तरी आहेत का?’
‘आहेत, पण आम्ही ते क्वचितच वाजवतो. ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक वाहने फक्त
हॉर्न वाजवतात,’ असे त्याने सांगितले. शहरात सर्वत्र स्वच्छता दिसत होती,
मात्र तेवढे स्वच्छता कर्मचारी दिसत नव्हते. पासन म्हणाला, ‘आमच्या
परिसराची स्वच्छता ठेवणे हे आम्ही स्वतःचे कर्तव्य समजतो.’ थोडक्यात, ‘माझा
देश माझी जबाबदारी’ असे प्रत्येकाचे वर्तन असते.
‘सिंपली भूतान’ या लिव्हिंग म्युझियममध्ये आम्ही गेलो. प्रवेश करतानाच
‘अरा’ नावाच्या तांदळाच्या पेयाने आमचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आम्ही
भूतानमधील घरांची रचना आणि बांधकाम कसे होते याचे दालन बघायला गेलो.
मुख्यतः पाइनचे लाकूड आणि कॉम्प्रेस्ड चिखल यापासून घरे तयार केली जात, आता
सिमेंटचा वापर करण्यात येतो आहे अशी माहिती तिथे मिळाली. भूतानची
खाद्यसंस्कृती, कृषी उत्पादने, स्वयंपाकघरे, तेथील सरंजाम इत्यादी गोष्टी
पाहिल्यावर आम्हाला एका हॉलमध्ये बसण्यास सांगितले. तिथे ‘बटर टी’ देण्यात
आला आणि नंतर चार-पाच महिला कलाकारांनी सुंदर शिस्तबद्ध असे नृत्य केले.
ज्या गाण्यावर त्यांनी नृत्य केले, त्यामध्ये मुख्यत्वे आमचे स्वागत आणि
भूतानचे वर्णन होते.
म्युझियममध्ये एके ठिकाणी मात्र आम्ही स्तब्ध झालो. एक प्रौढ माणूस
यंत्रावर शोभेच्या वस्तू तयार करत होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या
साहाय्याने त्याचे हे काम चालू होते. या व्यक्तीला तिथल्या राणीने आश्रय
आणि उपजीविकेचे साधन दिले होते. अशा सुमारे चार हजार लोकांना सरकारने आधार
दिला आहे.
त्यानंतर तिरंदाजीचे प्रांगण आहे. तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ
आहे. १४० मीटर अंतरावरून अचूक लक्ष्यभेद करणारे तिरंदाज येथे आहेत. आम्हाला
मात्र पंचवीस फुटांवरचे लक्ष्य आणि प्रत्येकी दोन वेळा संधी देण्यात आली.
एका सहप्रवाशाकडून लक्ष्यभेद होताच तेथील चार-पाचजणींनी ‘सेलिब्रेशन डान्स’
केला.
बाहेर पडून आम्ही भूतानमधील सर्वात उंच आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या
बुद्धांच्या मूर्तीकडे वळलो. अतिभव्य अशी ही ब्राँझची मूर्ती घडवताना
कलाकारांनी अनेक वर्षे आपली कारागिरी पणाला लावली असणार, असे वाटून गेले.
नंतर आम्ही ‘टाकेन’ या भूतानच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संवर्धन
केंद्रास भेट दिली. बोकडासारखे तोंड आणि उर्वरित शरीर गोवंशाचे, असा हा
प्राणी तिथे पाहायला मिळाला. तसेच त्याच्या निर्मितीबाबतची कथादेखील समजली.
त्या कथेनुसार, एक तांत्रिक शक्ती धारण करणारा एक साधू एका घरामध्ये
जेवणासाठी गेला. यथेच्छ मांसाहार केल्यावर तेथील एका भक्ताने त्यांच्या
शक्तीबद्दल शंका उपस्थित केली. तेव्हा या साधूने नुकत्याच ग्रहण केलेल्या
दोन प्राण्यांच्या शरीराचा उर्वरित भाग एकत्र करून या प्राण्याची निर्मिती
केली. टाकेनशिवाय तेथे विविध प्रकारची हरणे आणि एक याकची जोडी पाहायला
मिळाली.
रविवार असल्याने इतर शासकीय ठिकाणे म्हणजे संग्रहालये, ग्रंथालये बंद
होती. त्यामुळे पासनने आम्हाला ‘डोच्युला पास’ येथे नेण्याचे ठरवले. सुमारे
चोवीस किलोमीटर अंतर गेल्यावर घाटाच्या मध्यावर एका सपाट जागेवर १०८
स्तूपांची निर्मिती केली होती. पूर्वीच्या काळी या घाटामध्ये झालेल्या
लढाईत मृत्यू झालेल्या सर्व सैनिकांसाठी हे स्तूप उभारण्यात आले होते.
विशेष म्हणजे धारातीर्थी पडलेल्या शत्रुसैन्यातील सैनिकांच्या नावेसुद्धा
स्तूप उभारले होते. प्रत्येक स्तूप पूर्णतः बंद असतो व त्यामध्ये
देवतांच्या मूर्ती जतन केल्या जातात.
परतीच्या प्रवासात पासनला कंठ फुटला आणि तो सांगू लागला… ‘आमच्या
देशामध्ये राजेशाही, लोकशाही आणि धर्मसत्ता एकत्रित हातात हात घालून काम
करतात. वीस जिल्ह्यांमध्ये वीस किल्ले आहेत आणि तिथून विविध मंत्रालयांचे
काम चालते. संपूर्ण देशामध्ये उपजीविकेचे साधन नाही असा कोणीच नाही.
कोरोनाच्या काळामध्ये आम्हा चार हजार गाइडना काम नव्हते तेव्हा सरकारने
दरमहा प्रत्येकी दहा हजार रुपये पगार दिला. देशाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये
आमचे राजे स्वत: सहभागी असतात. आता तुम्ही पाहिलेल्या डोच्युला पासच्या
युद्धातसुद्धा ते सहभागी होते. कुटुंबरचेनेमध्ये एकत्र कुटुंबपद्धती मोठ्या
प्रमाणावर असली, तरी हल्ली एकल कुटुंबपद्धतीही काही ठिकाणी दिसत आहे.
दुर्दैवाने घटस्फोट घेण्याची वेळ आल्यास त्याची नोंद सरकारकडे करावी लागते,
तरच दुसरे लग्न करता येते आणि असेही तीनदा करण्याची मुभा आहे. लग्नाची
नोंदणी केली असल्यासच होणाऱ्या अपत्याला नागरिकत्व मिळते.’
येताना एका मॉनेस्ट्रीवर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिले होते. हे जोंगा
या स्थानिक भाषेत आहे काय, असे विचारता पासन म्हणाला, ‘नाही हे संस्कृत
आहे. गुरू रिंपोचे यांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार
करण्यापूर्वी आम्ही सर्व हिंदू होतो. आजही आमच्याकडे अंत्यसंस्कार दहन
पद्धतीनेच होतात.’
पासनने बोलता बोलता आमच्या ज्ञानात बरीच भर घातली. भारतीय लष्करच
भूतानचे संरक्षण करते, पण तिथे रॉयल भूतान आर्मी नावाचे त्यांचेही सैन्यदल
आहे. सैनिकांचे प्रशिक्षण भूतानमध्ये, तर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मात्र
भारतात होते. त्यांच्याकडे दोनच टीव्ही चॅनल आहेत आणि त्यावर ऐंशी टक्के
वेळा धार्मिक कार्यक्रमच असतात. काही वृत्तपत्रे आहेत, पण त्यांचा खप
मर्यादित आहे. तसेच इंटरनेट, मोबाईल यांचा वापरदेखील कामापुरताच आहे. मुख्य
भाषा ‘जोंगा’ वगळता बाकी सर्व विषय इंग्रजीतूनच शिकवले जातात. त्यामुळे
प्रत्येकाला इंग्रजी समजते.
हे ऐकत असतानाच एका डोंगरावर धुळीचे लोट उठताना दिसले. तिकडे पाहत पासन
म्हणाला की तिथे वणवा पेटला आहे. आता १०-१५ मिनिटांत नारंगी जॅकेट
घातलेल्या स्वयंसेवकांची गर्दी होईल. बसमधून ते तिथे जाऊन आग विझवूनच
संध्याकाळी परत येतील. आमच्याकडे प्रत्येकजण काही वर्षे ‘स्वयंसेवक’ म्हणून
निःस्वार्थ काम करतो.
संध्याकाळी अंधार लवकरच पडला. हॉटेलबाहेर पडलोच नाही. सकाळी पुन्हा
स्वच्छ सूर्यप्रकाश! आजच्या दौऱ्याचा मुख्य आकर्षण बिंदू असलेले ठिकाण
म्हणजे ‘टाकसंग मॉनेस्ट्री’. तासाभराचा प्रवास केल्यावर पारोच्या पुढे
पंधरा किमीवर आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. बेस कॅम्पवरून पाहताना टाकसंग
मॉनेस्ट्री जवळ असेल असे वाटले. परंतु, पासनने सांगितल्यानुसार, दोन डोंगर
संपूर्ण ओलांडल्यावर तिसऱ्या डोंगरातील मोठ्या कातळावर हे धर्मशिल्प आहे.
समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंच असलेल्या या चढाईमध्ये दर दहा मिनिटांनंतर
थांबून श्वासांचे संतुलन करणे भाग पडत होते. प्रकाश ट्रेकर असल्याने त्याला
या गोष्टींचा सराव होता. तसेच सोबतच्या कच्च्या भिडूचा आत्मविश्वास कसा
वाढवत न्यायचा हे त्याला ठाऊक होते. तिथे प्रत्यक्ष पोहोचल्यावर मात्र
डोळ्याचे पारणे फिटले. सर्व कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले. थकवा पळून
गेला. सर्व बाजूंनी हिरव्यागार दऱ्या आणि डोंगर, मधूनच डोळे मिचकवणारा
सूर्य आणि भव्य अशा कातळावर असलेले मॉनेस्ट्रीचे भव्य बांधकाम… अनोखेच
दृश्य होते ते!
विश्रांतीच्यावेळी दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. एक म्हणजे, गुरू
रिंपोचे या ठिकाणी तीन वर्षे तीन महिने तीन दिवस धर्मप्रसाराच्या कामासाठी
राहिले होते आणि एका महिला साधूने उडत्या घोड्याचे रूप घेऊन त्यांना इथे
पोहोचवले होते, अशी कथा सांगितली जाते. दुसरे म्हणजे, काही वर्षापूर्वी
येथे आग लागल्याने संपूर्ण मॉनेस्ट्री जळाली होती, ती पुन्हा उभारायला
चार-पाच वर्षे लागली.
एकूण सुमारे १६,८०० पायऱ्यांचा प्रवास पूर्ण करायला आम्हाला पाच तास
लागले. मात्र परत येताना एक ७२ वर्षांच्या आजी पाठीवर ओझे घेऊन हसतमुखाने
वर जाताना दिसल्या. त्या वरच साधूंच्या वस्तीच्या ठिकाणी राहतात असे समजले.
येताना एका घाटाच्या टोकावर थांबलो. बरेच पर्यटक तिथे थांबले होते. समोरच
‘पारो’ हे भूतानचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळाले. जगातील
सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक. दरीमध्ये विमान उतरवायचे, तेही छोट्या
रन वेवर हे मोठ्या कौशल्याचे काम आहे आणि फक्त दहा पायलटनाच याची परवानगी
आहे.
साक्षीदाराला वकिलाने फिरवून फिरवून तेच प्रश्न विचारावेत तसे आम्ही
पासन आणि घोरचेनला छळत होतो. त्यांच्या सर्व उत्तरांचे सार म्हणजे… आमचा
देश आनंदी आहे, कारण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त धर्मनिष्ठ वज्रयान बौद्ध,
राजेशाही, लोकशाही आणि धर्मसत्ता यांचा सुरेख मेळ, प्रत्येक नागरिकाची
उपजीविकेची व्यवस्था, राजावर व निसर्गावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा, संपूर्ण
देशामध्ये हत्याबंदी, दोन महिने मांसाहार वर्ज्य, किमान अपेक्षा आणि माझा
देश, माझी जबाबदारी! एवढ्या छोट्याशा दौऱ्यामधून एखाद्या देशाबद्दल अंदाज
बांधणे म्हणजे अक्षरशः शितावरून भाताची परीक्षा करण्यासारखेच आहे. असा
विचार करत भूतानमधून परत भारतात प्रवेश केला. जयगावमध्ये दोन्ही भाषा आणि
चलने चालतात. थोडीशी खरेदी केल्यावर परतीच्या प्रवासात चहाचे मळे आणि
भूतानच्या आठवणी यामध्ये बागडोगरा विमानतळ कधी आले समजलेच नाही.
आनंद मिळवण्यासाठी जगाच्या पाठीवर इतर वेगवेगळ्या देशांत चाललेली
माणसांची धडपड आणि भूतानमधील जीवन यांची तुलना करता आपण नक्की कशाचा त्याग
करून काय मिळवत आहोत असा प्रश्न पडला. एवढ्यात परतीच्या प्रवासाची
अनाउन्समेंट झाली…