आज तारीख आहे १० ऑगस्ट २०२१ आणि पहिल्यांदाच मी ट्रेक पुर्ण व्हायच्या
आधी त्या ट्रेक संबंधी ब्लॉग लिहतोय त्याला कारण पण तसेच आहे, एक तर खूप
वर्षात कुठला ट्रेक केलेला नाही त्यामुळे ट्रेक करून आल्यावर जी लिहायची
हौस असते तीच ट्रेक च्या आधी पासून होत आहे आणि दुसरी गोष्ट या ट्रेक ला
जायचे हे साधारण जुलै च्या पहिल्या आठवड्यात नक्की केले होते त्यामुळे
ट्रेक करण्या साठी थोडी फार पूर्व तयारी जी करतोय ते पण थोडेसे सविस्तर
लिहिता येईल.
अनेक वर्ष हिमालयात एक तरी ट्रेक करावा अशी मनापासून इच्छा होती पण
तेवढे प्रयत्न पण केले नाहीत त्यामुळे तो योग काही जुळून आला नाही पण या
कोविड सारख्या अनिश्चित परिस्थिती मध्ये मात्र योग जुळून आला असे म्हणूयात,
अनिश्चित अशामुळे की अजून पण दुसरी लाट संपली नाही आणि तिसरी लाट येणार का
? परत या राज्यातून त्या राज्यात जाताना ज्या अटी आहेत त्याबद्दल आज
सुद्धा काही स्पष्टता नाही, तरी सुद्धा यंदा जायचेच असे ठरवून मी आणि माझा
एक मित्र आम्ही दिनांक ६ सप्टेंबर ते १२ या कालावधीत तरसर मरसार ह्या
ठिकाणी जायचे निश्चित केले, सुरवातीला ग्रेट लेक्स याठिकाणी जाणार होतो २
सप्टेंबर ही तारीख पण निश्चित झालेली पण काही कारणाने वेळेत बुकिंग केले
नाही त्या मुळे ती तारीख पूर्ण भरली. त्यामुळे थोडी निराशा
आली पण लवकरच पुढच्या तारखा आल्या आणि मग ग्रेट लेक्स करावा की तरसर मरसर
कारण मी पहिल्यांदांच हिमायलायात ट्रेकिंग करता जाणार होतो आणि ग्रेट लेक्स
हा १४५०० फूट उंच आहे आणि तरसर १३५०० फूट त्यामुळे तरसर मरसर करायचेच
नक्की केले आणि मुद्दामून थोडे उशिराचे बुकिंग केले कारण पूर्व तयारी
चांगलीच करावी लागणार होती जी अजून पण सुरु आहे.
आम्ही ज्या संस्थे बरोबर जाणार आहोत त्यांनी ट्रेक ला येण्याअगोदर काही
पूर्व तयारी करायला सांगितली आहे ती खाली दिल्या प्रमाणे करायची होती त्या
साठी पण वेळ पाहिजे होता पाहीजे होता.
३७
मी ५ किमी हे खूपच अवघड लक्ष्य आहे आणि सुरवातीला नक्कीच अवघड आहे, वर्ष
भर नुसते दर शनिवार २ तास बॅडमिंटन या व्यतिरिक्त काहीच हालचाल नव्हती,
त्यामुळे सावकाश सुरवात करून हे लक्ष नक्की गाठता येईल याची खात्री होती,
त्या प्रमाणे १३ जुलै २०२१ ला सुरवात केली आणि १ किमी ने सुरवात केली.
पहिल्या
दिवशी म्हणजे १३ जुलै २०२१, १ किमी धावायला १० मी पेक्षा जास्त वेळ लागला
या गतीने उद्दिष्ट खूपच लांब होते पण रोज थोडे थोडे धावणे वाढवायचे आणि
सर्वात प्रथम सलग न थांबता ५ किमी धावायचे लक्ष ठेवले मग वेळेचे कसे
करायचे ते नंतर पाहू असे ठरवले कधी कधी ढगाळ वातावरण मुळे मोबाइलला GPS
सिग्नल मिळायचा नाही त्यामुळे हे अंतर कधी कधी जास्त व्हायचे आणि
अँप्लिकेशन मध्ये दर ५०० मीटर धावल्या नंतर लागलेला वेळ आणि झालेले अंतर
सांगायचा, मी सुरवातीला १०० मीटर च्या मैदानावर पळायला जात होतो, त्या
मैदानाला १० फेऱ्या मारल्या कि बरोबर १ किमी होते पण कधी ११ फेरी संपत आली
कि व्हायचे पण हळू हळू फेऱ्या वाढवत होतो.
बरोबर
१० दिवसांनी म्हणजे २३ जुलै ला २ किमी चा टप्पा पार केला आणि वेळ १८ मी,
१० दिवसात फक्त १ किमी अंतर वाढले होते अजून मोठा टप्पा गाठायचा होता,
पुढच्या
१० दिवसांनी ३ ऑगस्ट २०२१ ला ३ किमी चा टप्पा पार पडला वेळ लागला २३ मी,
आता वाटायला लागले होते कि पुढच्या १४ मी २ किमी अवघड नाही, जमेल आपल्याला
आणि आता मी दुसरी कडे धावायला जायला सुरवात केलेली तो सलग ७०० मीटर चा
ट्रॅक होता त्यामुळे जरा सोपे वाटत होते.
११
ऑगस्ट २०२१ ला सिंहगड ला जाउन आलो, रोजच्या पळायच्या सरावाचा नक्कीच फायदा
दिसत होता पूर्वी मला गड चढायला ६० ते ६५ मी लागायची या वेळेस मात्र ५१ मी
गड सर झाला होता आणि तुलनेने दम पण कमी लागला होता.
ढगात लपलेला, विना गर्दीचा आणि हिरवा शालु/गालिचा पांघरलेला सिंहगड खूपच मस्त दिसत होता.
अखेरीस
१३ ऑगस्ट २०२१ ५ किमी ३७ मी ३६ सेकंदात जमवले, सोबतीला अनेक गोष्टींची
खरेदी पण सुरु होती मुख्यत: थंडीचे कपडे, डेकॅथलॉन सारखे दुकान असल्या मुळे
बाकी कुठे जायची गरज पण लागत नाही या मुळे हळू हळू सर्व खरेदी पूर्ण झाली,
एक दिवस त्या संस्थे कडून फोन आला कि तुमचे फिटनेस चे स्क्रीन शॉट अपलोड
करा, लगेच त्यांच्या वेब पोर्टल ला जाऊन फिटनेस स्क्रीन शॉट अपलोड केले आणि
एक दोन दिवसात त्यांनी अप्रोव्ह पण केले, आता काहीच अडचण नव्हती ट्रेक ची
तारीख जवळ जवळ येत होती तसे तयारी पण जोरात सुरु केली, डॉ कडून फिटनेस
सर्टिफिकेट आणले त्यात बीएमआय आणि बाकी बेसिक गोष्टी होत्या ते त्या संस्थे
ला पोचल्या वर द्यायचे होते.
सर्व
तयारी जोरात सुरु होती पण २ सप्टेंबर ला सय्यद गिलानी (हुरियत) याचे
वृद्धापकाळाने निधन झाले त्यामुळे श्रीनगर मध्ये संचारबंदी लागली, ताबडतोब
ट्रेक चा व्हाट्स अँप ग्रुप अनेक मेसेज ने भरला अनेकांच्या मनात
अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले त्यातच श्रीनगर मधली इंटरनेट सेवा बंद
करण्यात आली अनेक शंका अनेकांनी उपस्थित केल्या परंतु संस्थेच्या लोकांनी २
दिवस थांबा श्रीनगर मधल्या परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगतो असे कळवले
आणि ३ तारखेला त्यांनी पण सांगितले कि काळजी करण्या सारखे कारण नाही
तिकडच्या लोकांनी बंद पाळला आहे आणि सरकार ने सर्व इंटरनेट सेवा बंद केली
आहे पण बाकी हॉटेल आणि खासगी वाहतूक सुरु आहे, त्यामुळे सगळ्यांची काळजी
मिटली आणि आम्ही ४ तारखेला RTPCR चाचणी करायला गेलो, दुपार पर्यंत त्या
चाचणीचा निगेटिव्ह निकाल पण आला, सर्व सामान पण भरून झाले होते.
५
तारखेला सकाळी पुणे विमानतळा वरून दिल्ली आणि मग श्रीनगर असा प्रवास होता,
सकाळी ९ वाजता विमान निघाले आणि ११:१५ ला दिल्ली विमानतळावर उतरले,
श्रीनगर चे विमान दुसऱ्या टर्मिनल वरून सुटणार होते त्याची वेळ होती १२:२५
म्हणजे मध्ये फक्त १ तास १० मी वेळ होता, विमानातील हवाई सुंदरी ने
चुकीच्या सूचना दिल्या त्यामुळे आमची श्रीनगर चे विमान अक्षरशः सुटता सुटता
राहिले, विमानतळावरील स्पीकर मधून आवाज आला "फायनल कॉल फॉर Mr. Kedar
Barve " हा आवाज ऐकू आला तेंव्हा मी सुरक्षा तपासणी संपवून सर्व सामान गोळा
करून गेट कडे धावत होतो तेंव्हा तिथल्या माणसाने २ मी साठी बस थांबवली आणि
ती बस आम्हाला विमानाकडे घेऊन गेली आणि आम्ही विमानात पोचलो, विमानातील
सर्व प्रवाश्याच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे काय लोकांना वेळेवर यायचे साधे
कळत नाही असे होते, अखेरीस २ च्या सुमारास विमान श्रीनगर ला उतरले आणि
तिकडे परत कोरोना चाचणी करायला लागली इंटरनेट सेवा बंद असल्या मुळे तुमच्या
RTPCR रिपोर्ट ची फेरतपासणी करता येत नव्हती असे कारण देण्यात आले.
विमानतळावरून
बाहेर पडलो, श्रीनगर शहरातील विमानतळ ते शहर हि सेवा देणारी बस बंद मुळे
सुरु नव्हती त्यामुळे खासगी वाहनातून हॉटेल मध्ये उतरलो, तिकडे सामान टाकले
आणि जेवणाची वेळ तर निघून गेलेली त्यामुळे बाहेर जाऊनच काहीतरी खाऊ
म्ह्णून फिरायला बाहेर पडलो, रिसेपशन वरच्या माणसाने पण बिनधास्त फिरा काही
काळजीचे कारण नाही सांगितले पण बंद असल्या मुले ९९% दुकाने बंद होती
त्यामुळे बाहेर काही खायला मिळेल का नाही असे वाटत होते, पण आता बाहेर तर
पडलो होतो आणि दल तलावाच्या एक भाग असलेल्या एका बाजूला जायला निघालो,
एखाद्या शहरातील जुना भाग असतो असा साधारण तो एरिया होता. जुनी घरे, छोटे
रस्ते, जुनी दुकाने आणि त्यांच्या बाजूने तलावाच्या दिशेने जाणारे रस्ते,
रस्ते पेक्षा लाकडी जुने पुलं होते. हे असे मध्ये मध्ये काही जुने पूल
दिसले .
त्यातील काही भागात बोटी पण फिरत होत्या
रस्त्याने फिरताना एक जुने घर दिसले त्याचा फोटो
असेच
फिरत फिरत मुख्य रस्त्याने पुढे गेलो तिकडे नदीम तलाव दिसला, नदीम
तलावाच्या अलीकडे एक नवीन सुरु झालेले हॉटेल होते तिकडे पिझ्झा खाल्ला आणि
तिकडून तलाव पण छान दिसत होता.
नदिम तलाव म्हणजे दल लेकचा एक भाग, संध्याकाळ झालेली आणि मावळतीचा सूर्य खूपच मस्त रंग पसरले होते
थोड्या
वेळ तिकडेच अळम टळम करून परत हॉटेल कडे जायला निघालो, रस्त्यावर लोक भाजी
विकायला बसलेले आणि त्यात कमळाची खालच्या भागाची म्हणजे देठाची भाजी करतात
ती पण विकायला होती आणि ती खायचा पण योग आला, ट्रेक संपल्या वर एका हॉटेल
मध्ये ती भाजी खाल्ली पण फारशी आवडली नाही कारण ती जरा गोड चवीची होती,
स्थानिक लोक त्याला नांद्रु याखनी म्हणतात.
३/४
किमी ची तंगड तोड करून आम्ही हॉटेल वर परत आलो तेंव्हा ८ वाजले असतील थोडा
वेळ इकडे तिकडे करून रात्रीचे जेवण करून झोपलो, दुसऱ्या दिवशी सकाळी एका
ठिकाणी जमून तिथून पुढे आरु या ठिकाणी जायचे होते, पहलगाम पासून १५ किमी
अंतरावर अरु गाव आहे.
श्रीनगरच्या
रिक्षावाल्याचे रेट विमान प्रवास पेक्षा पण महाग आहेत त्यामुळे
रिक्षावाल्या बरोबर घासाघीस करून शेख फिरोझ टूर ठिकाण गाठले, खर तर चालतच
जाणार होतो पण सोबत एक मोठी आणि एक छोटी सॅक होती आणि सकाळी ११ वाजता कडक
उन्ह होते त्यामुळे रिक्षा करणे सोयीचे होते.
शेख
फिरोझ येथे ट्रेक ला येणारे इतर मित्र मंडळी पण जमले होते, थोड्याच वेळात
सगळ्यांची तोंड ओळख झाली काही जण परस्पर अरु या बेस कॅम्प ला येणार होते
त्यामुळे इकडे १० १२ लोक आल्या वर टेम्पो ट्रॅव्हल मध्ये बसून आम्ही अरु
च्या दिशेने निघालो वाटेत एका ठिकाणी काश्मिरी स्थानिक पेय (कहावा) जिकडे
मिळते अश्या एका ठिकाणी गाडी थांबवली व कहावा घेतले.
कहावा
मध्ये केशर, वेलदोडा, बदाम, काजू आणि काही मसाले अशी पावडर स्वरूपात असते व
त्यात गरम पाणी घालतात व साखर किंवा मध घालून पितात, स्थानिक लोक याचा
प्रचार करण्यासाठी काहीपण सांगतात जसे आमच्या गाडी चालकाने सांगितले हे
तुम्ही प्यायला तर तुम्हाला वर उंची वर कसलाच त्रास होणार नाही, पेय
प्यायले आणि खरेदी करून पुढे निघालो, वाटेत जेवण साठी गाडी थांबवली
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सफरचंदाच्या बागा होत्या तिकडेच सफरचंदाचा
ज्यूस घेतला आणि बागेत चक्कर मारली अजून सफरचंदे तयार झाली नव्हती.
साधारण
३ च्या सुमारास अरु या आमच्या बेस कॅम्प च्या ठिकाणी पोचलो, सर्व सामान
आपल्या आपल्या खोल्यां मध्ये ठेवले आणि बाकी फॉर्म , मेडिकल सर्टिफिकेट
सोपस्कार पार पडले
अरु
मधले आमचे राहायचे ठिकाण/बेस कॅम्प, एकदम शांत आणि निसर्ग च्या जवळ असे हे
ठिकाण होते, आजूबाजूला डोंगर उंच झाडे थोड्या जवळून वाहणारी लिद्दरवत नदी,
असे एक्दम चित्रात असते असे ठिकाण होते.
८०००
फूट वर अरु गाव होते आणि एकदम छान हवा होती, दुपारी सुद्धा १५ च्या आसपास
तापमान असायचे, बाकी आवरा आवर करून आम्ही जवळून वाहणाऱ्या लिड्डर नदीच्या
दिशेने फिरायला निघालो, वाटेत रस्त्यावर एक छोटी स्थानिक मुलगी दिसली तिचा
एक फोटो घेतला.
तिच्या आई बरोबर लाकूड फाटा गोळा करायला गेलेली, थोड्या वेळ आम्ही नदी जवळ वेळ घालवला आणि थोडे फार फोटो घेतले
संध्यकाळी
मग सगळे जण आल्यावर एक अधिकृत ओळखीचा कार्येक्रम झाला ज्यात प्रत्येकाने
स्वतःचे नाव आणि सोबत त्या नावाच्या पहिल्या इंग्लिश अक्षराने सुरु होणारे
विशेषण सांगायचे होते आणि पुढच्याने मागच्याचे सांगून स्वतःचे असा एक छान
खेळ आणि ओळख असा कार्येक्रम झाला आणि जेवण करून दुसऱ्या दिवशी सकाळी ८
वाजता निघायचे आहे असा बेत नक्की झाला.
दुसऱ्या
दिवशी सकाळी ७ वाजता चहा नाश्ता आणि जे लोक स्वतःची सॅक उचलून घेणार
नव्हते त्यांना त्यांचे सामान घोड्यांवर देण्या साठी द्यायचे होते,सर्व
तयारी झाली होती आणि सोबत २ स्थानिक वाटाडे पण होते, घोडे वाले सर्व सामान
घेऊन पुढे निघाले आम्ही सर्व जण वॉर्म अप करून निघालो
आज
आमचा पहिला बेस कॅम्प लिड्डरवट या ठिकाणी होता, आणि साधारण ३० ते ४० मी
सुरवातीची चढण होती आणि नंतर जंगलातून जाणारा रस्ता आज १० कि मी अंतर
चालायचे होते.
आज आम्ही जवळपास १००० फूट अजून उंच जाणार होतो लिड्डरवट कॅम्प ९१०० फूट उंची वर आहे.
लिड्डरवट च्या वाटेवर काही फोटो घेतले
इकडे
वाटेत आपल्याला लिड्डर नदी ओलांडावी लागते, लांबून घोड्यांचा मोठा ताफा
सामान लादून येत होता आणि त्यातल्याच एका घोड्यावर हा छोटू मस्त खात
चाललेला.
वाटेत
हे असे एक फुलझाडं दिसले त्याची फुले जाऊन असा रंग झालेला आणि थोड्या
दिवसांनी निळसर होईल असं आमचा वाटाड्या सांगत होता आणि ते खाऊन पहिले तर
मस्त आंबट गोड चव होती.
साधारण दुपारी १ किंवा २ च्या दरम्यान आम्ही आमच्या पहिल्या बेस कॅम्प ला पोचलो
तिकडे आधीच तंबू आणि इतर साहित्य पोचले होते आप आपला तंबू घेऊन प्रत्येकाने तो लावला प्रत्येक तंबू मध्ये २ जण अशी व्यवस्था होती.
त्या
दिवशी दुपारचे जेवण डब्यात भरून दिलेलेच होते ते तिकडे बसून खाल्ले आणि
आजूबाजूच्या परिसरात फेर फटका मारून आलो, जवळच एक प्रचंड मोठा दुभंगलेला
दगड पडलेला.
तिथून जवळच PDA म्हणजेच पहलगाम डिस्ट्रिक्ट असोसिएशन चे गेस्ट हाऊस पण होते पण अतिशय वाईट अवस्थे मध्ये होते.
हिमालय
मध्ये साधारण दर ३० मि मध्ये हवामान बदलत होते आणि त्यामुळे प्रत्येक
डोंगर किंवा त्या भवतालचा प्रदेश सारखा वेगवेगळ्या छटा दाखवायचा, फोटो तरी
किती काढणार ? असे जणू आव्हानच देत असायचा
थोड्यावेळाने
जोरदार पावसाला सुरवात झाली पण नशिबाने २ तासात हा पाऊस थांबला आणि
रात्रीचे जेवण होई पर्यंत आकाश लक्ख मोकळे झाले आणि आकाशात जसा काही
ताऱ्यांचा खच पडला होता, डोळ्याने फोटो काढता यायला हवा होता कारण जे
कॅमेरा मध्ये दिसत नाही ते डोळ्यांनी अतिशय सुंदर आणि वर्णन करून पलीकडचे
होते, आकाशगंगा अतिशय स्पष्ट दिसत होती मग खूप वेळ आकाशगंगा आणि इतर तारे
चांदण्या पहिल्या काही जणांना पडणाऱ्या उल्का पण दिसल्या, एकंदरीत दिवसाचा
शेवट एकदम मस्त झाला.
दुसऱ्या
दिवशी सकाळी आम्हाला ८ वाजता निघायचे होते उद्या आमचा मुक्काम होता
शेकवास, शेकवास अजून जवळ पास २००० फूट उंच होते, अजून तरी Accute Mountain
Sickness चा त्रास काहीच जाणवत नव्हता. पण आज अजून उंच म्हणजे ११००० फुटा
वर जाणार होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार झालो, तंबू आवरला, एकदम स्वछ हवा होती.
थोडे चढून वर गेल्यावर दिसणारे लिड्डरवट कॅम्प चे दृश्य
एकदम उभा चढ नसला तरी सावकाश सावकाश उंची वाढत जात होती.
वाट एकदम मळलेली होती त्यामुळे चालायला काहीच त्रास नव्हता.
वाटेत लिड्डर नदी ओलांडली, तिकडे पाण्याचा प्रवाह पण जोरात होता आणि थेट शिखरांवरून येणारे थंडगार पाणी.
नदी ओलांडून पलीकडे गेलो, अजून बेस कॅम्प यायला १ तास तरी चालायला लागणार होते
वाटेत बोल्डर सेकशन होता, सुरवातीला वाटले बोल्डर सेकशन म्हणजे खूप काही अवघड आहे पण खूपच किरकोळ निघाले.
थोड्याच वेळात कॅम्प साईट वर पोचलो पटापट तंबू लावला आणि सामान आत ठेवतोय तोच पावसाला सुरवात झाली.
पण
नशीब चांगले होते इकडे सुद्धा पाऊस थोड्या वेळ अगदी जोरदार पडला पण
रात्रीचे जेवण होई पर्यंत पूर्ण आकाश मोकळे झाले होते. आज ट्रेक चा दुसरा
दिवस संपला.
तिसऱ्या
दिवसाची सकाळ थोडी ढगाळ होती पण थोड्याच वेळात लक्ख ऊन पडले, आज आम्ही
तरसर तलावा जवळ म्हणजे अगदी तलावाला लागून मुक्काम करणार होतो १२५०० फूट
काल
रात्री भरपूर थंडी पडली होती आणि आज सकाळी छान ऊन पडले होते त्यामुळे
चांगले वाटत होते, सकाळी सर्वानी आवरून कॅम्प साईट रिकामी केली आणि पुढच्या
वाटेला लागलो.
वाटेत एक पठार लागले तिकडे थोडा वेळ घालवला
थोड्याच
वेळात तरसर लेक पाशी पोचलो, कॅम्प साईट रिकामीच होती सगळे जण मागे होते
त्यामुळे हा एक जरा चांगला फोटो मिळाला, आता थोड्याच वेळात सगळे यायला
लागले होते, प्रत्येकाला अगदी तळ्याच्या जवळ तंबू लावायचा होता पण
तळ्याच्या जवळ खूप उतार होता त्यामुळे पाऊस झाला कि पाणी तिकडून जोरात
वाहणार त्यामुळे थोडे अंतर सोडून तंबू लावले.
माझ्या तंबूतून दिसणारा तरसर तळ्याचे दृश्य
तळ्याच्या काठावरून दिसणारी कॅम्प साईट
आकाशात ढग जमा झाले कि तळ्याचा रंग बदलायचा आणि आकाश निरभ्र झाले कि तळ्यातील पाणी एकदम निळंशार दिसायचे
त्या
दिवशी संध्यकाळी भरपूर वेळ होता सगळ्या टीम ने क्रिकेट , बॉल पासिंग असे
पळापळीचे खेळ खेळलो पण कोणालाच काही त्रास झाला नाही पण एक नक्की जाणवत
होते कि थोड जरी पळालो तर या उंची वर लगेच दम लागायचा.
दुसऱ्या
दिवशी आम्हाला तरसर पास वरून सुंदरसर ला जायचे होते पण हे सगळे अवलंबून
होते रात्री किंवा सकाळी पाऊस झाला नाही तर कारण पाऊस झाला तर घोडे सामान
घेऊन वर येऊ शकत नाहीत आणि पूर्ण कॅम्प हे फिरते असल्या मुले सामान आले तरच
पुढे जाणे शक्य होते पण रात्री पाऊस सुरु झालाच साधारण १ किंवा २ च्या
सुमारास सुरु झाला असेल तो चांगला ४ तास पडत होता सकाळी उजाडले तेंव्हा
पाऊस थांबलेला होता आणि हळू हळू धुके पण कमी होत होते त्यामुळे सुंदरसर
नाही निदान तरसर टॉप ला जाऊन मरसर पहायचे आणि परत येऊन मुक्काम करायचा
ठरले.
तरसर तलावाचे पुर्ण दृश्य कॅमेरा मध्ये पकडायचा केलेला प्रयत्न
आता
सुंदरसर चा प्लॅन रद्द झाला होता त्यामुळे जायची घाई नव्हती, तरसर टॉप
फक्त १ तास चालण्याच्या अंतरावर होता त्यामुळे चांगले ऊन पडल्यावर निघालो.
तळ्याच्या
उजव्या बाजूने तरसर टॉप वर जाणारा रस्ता होता, खालचा फोटो तळ्याच्या
बाजूने थोडे पुढे गेल्यावर घेतला आहे, दूरवर कॅम्प साईट दिसत आहे
या
कॅम्प साईट ला खूप थंडी होती त्यामुळे कॅमेरा ची बॅटरी पण उतरायला
लागलेली, शेवटचा एक दिवस राहिला होता तेवढ्या वेळ काही करून टिकवायची होती
म्हणून फोटो पण कमी घेतले आणि रात्री झोपताना बॅटरी बाहेर काढून खिशात
ठेवली आणि स्लीपिंग बॅग मध्ये झोपलो त्याच्या फायदा सकाळी दिसला बॅटरी अजून
थोडी जास्त साथ देईल याची चिन्ह दाखवत होती.
आता हळू हळू वर चढायला लागलो होतो.
सुरवातीला
हळू हळू चढणारी चढण आता एकदम खडी व्हायला लागली, दम लागायला लागला पुढे
असलेले थांबायला लागले, दम खाऊन छोट्या पावलांनी वाटचाल सुरु झाली. अखेरीस
माथा गाठला आणि वर्णन करण्या पालिकडचे दृश्य, डाव्या बाजूला मरसर तलाव
लांबवर दिसत होता आणि उजव्या बाजूला एकदम निळेशार पाणी.
मरसर तलावाच्या बाजूला ढग सारखे येत जात होते त्यामुळे फार कमी वेळ मरसर तलाव चे दृश्य दिसत होते
अतिशय कमाल असे दृश्य या बाजूला तरसर तलावाचे दिसत होते.
सुंदरसर तलावाला जात येणार नाही याचे थोडे वाईट वाटत होते पण तरसर टॉप वरून जे दृश्य दिसते ते पहिल्या वर बाकी काही आठवत नाही.
आमचा स्थानिक वाटाड्या तरसर मरसर तलावाची दंत कथा सांगताना
बाकी
वरती नुसते फोटो सेशन सुरु होते, एकाच्या फोन ला रेंज होती त्या फोन पाशी
टेलीफोन बूथ सारखी लाईन लागलेली, जे वर उशिरा आलेले त्यांना मरसर तळ्याचे
दर्शन झाले नव्हते कारण त्या बाजूला संपूर्ण ढग जमा झालेले.
हळूहळू तरसर च्या बाजूला पण ढग जमा व्हायला लागले,
जवळ जवळ २ तास वरून दिसणाऱ्या हे अतिशय सुंदर दृश्य मनभरून पहिले आणि उतरायला सुरवात केली.
हिमालयातील
काही वेगळी फुले दिसतील असे वाटले होते पण फार असे काही दिसले नाही कारण
आता ऋतू बदलणार होता तरी पण वाटेत काही फुलं होती पण इकडे प्रचंड वारा
असल्या मुले तेवढा चांगला फोटो आला नाही पण फक्त या प्रकारचीच फुले शिल्लक
राहिली होती.
आता जवळपास पूर्ण उतरून खाली आलेलो होतो दूरवर तंबू दिसत होते, ट्रेक संपल्यात जमा होता आता आकाशात ढग पण जमायला लागले होते.
त्या दिवशी अजून एक ब्याच वर आलेली पण त्यांच्या नशिबात तरसर टॉप पण बहुदा
नसावा कारण त्या दिवशी संध्याकाळी जो पाऊस सुरु झाला तो दुसऱ्या दिवशी
सकाळ झाली तरी थांबला नव्हता. त्यात म्हणजे आम्हाला जो तंबू मिळालेला तो
अनेक ठिकाणाहून गळत होता, रात्री ९ च्या सुमारास झोपायचा प्रयत्न केला पण
झोप काही येत नव्हती एक तर अखंड पाऊस सुरु होता आणि कदाचित थंडी आणि जास्त
उंचीवर पटकन झोप पण लागत नाही
किंवा सारखी जाग येत राहते.
गप्पा मारत असताना सहज डोक्यापाशी हात नेला तर बरयापैकी ओले लागले आणि
त्याबाजूला तंबू चे कव्हर पडलेले, हेड टॉर्च लावून पहिला तर माझ्या उजव्या
हाताच्या बाजूने वरून पाणी आत झिरपत होते. ट्रेक पोल चा आधार देऊन तंबू चे
कापड बाहेरच्या बाजूला ढकलल्या सारखे केले पण त्याचा फार काही उपयोग झाला
नाही. आता बरोबर तंबूच्या मधून पाणी गळायला सुरवात झाली तिकडे खाली डबा
ठेवला आणि त्यावर ट्रेक पोल सगळ्यात उंच लेवल ने लावून ठेवला जेणे करून
तंबू वर पाणी साठणार नाही, थोड्या वेळ पाऊस पण कमी झाला, रात्रीचे ११
वाजलेले आणि जोरात पावसाला सुरवात झाली आणि अनेक ठिकाणी पाणी गळायला सुरवात
झाली, अनेक अँगल ने ट्रेक पोल बदलून पहिले पण काही नाही, शेवटी त्यात पण
विनोद केला, मी मित्राला म्हणालो "आभाळच फाटलंय कुठे कुठे टेकू लावणार" पण
खरंच असच बसून राहिलो असतो तर थोड्याच वेळात तंबू मध्ये छोटे तळे तयार
झाले असते, शेवटचा उपाय पॉन्चो काढला आणि बाहेर च्या पावसाची तमा न बाळगता
पूर्ण पॉन्चो उघडून तंबूच्या वर व्यवस्थित टाकला, त्याचा फायदा झाला पाणी
आत झिरपायचे थांबले आणि व्यवस्थित झोपता आले.
आमचा
सुंदरसर चा तर प्लॅन आधीच रद्द झालेला त्यामुळे आज सकाळी उठून लिड्डरवत ला
जायचे आणि मुक्काम करून पुढे अरु असा प्लॅन होता. पण सकाळी सुद्धा पाऊस
सुरूच होता आज इकडून निघायचेच होते फक्त लिद्दरवत ला थांबायचे का तसेच पुढे
जायचे हा प्रश्न होता पण सगळे जण म्हणायला लागले थेट अरु ला जाऊ कारण या
पावसात गळका तंबू आणि आणि भिजलेल्या स्लीपिंग बॅग मध्ये झोपणे शक्य नव्हते
कारण घोड्यवरुन सर्व सामान पुढे जाते त्याला पावसापासून काहीच सरंक्षण
नव्हते म्हणून सगळ्यांनी नक्की केले कि थेट अरु ला जायचे आणि एक दिवस आराम
करून दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून श्रीनगर ला जायचे पण आज त्यासाठी भरपूर
चालणे गरजेचे होते आज थेट अरु म्हणजे २३ कि मी अंतर कव्हर करायचे होते.
आज
सकाळी ९ ला चालायला सुरवात केली आणि संध्याकाळी ७ च्या दरम्यान अरु मध्ये
पोचलो वाटेत अनेक वेळा मागे पडलेल्यां साठी थांबलो आणि मध्ये लिद्दरवत ला
पण थांबलो तिकडे जेवण केले मागून जी batch आलेली ती मुक्कामी होती त्यांना
आमच्या भिजलेल्या अवस्थेकडे पाहून वर जाता येतंय कि नाही याची शंका वाटायला
लागली, सगळे जण तिकडे जमे पर्यंत थांबलो आणि पुढे निघालो, ज्या रस्त्यानी
आलो त्याच रस्त्यानी परत जात होतो फक्त फरक एकच होता येताना पाऊस नव्हता
आणि जाताना भरपूर पाऊस त्या मुळे त्या रस्त्याचे सौंदर्य पूर्ण बदलून गेले
होते. सगळीकडून पाण्याचे धबधबे वाहत होते नदीचे पात्र अजून मोठे झाले होते,
वाटेवर पूर्ण लक्ष देऊन चालावे लागत होते कधी कुठून पाय सटकेल सांगता येत
नाही आणि हे सगळे मात्र कॅमेरा मध्ये टिपता येत नव्हते कारण पाऊस एवढा होता
कि कॅमेरा बाहेर काढणेच शक्य नव्हते.
शेवटी २
किमी तर एवढा उतार आणि घसरडे होते कि आमच्या लीडर ने आव्हान दिले कि आता
फक्त मोजा कोण कितीवेळा पडते आहे पण एकदाही न पडत व्यवस्थित उतरून आलो
काहीजण त्याच दिवशी संध्याकाळी श्रीनगर ला परत गेले आम्ही त्या रात्री
तिकडेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी ३ पर्यंत श्रीनगर मध्ये
पोचलो आणि त्या सकाळी पाऊस उघडला होता पण पूर्ण नाहीच.
बाकी
मग श्रीनगर मध्ये थोडा वेळ होता आणि या वेळचे हॉटेल दल लेक च्या जवळ होते
त्यामुळे थोडी भटकंती आणि थोडी खरेदी असा वेळ घालवायचे ठरवले, हॉटेल ला
पोचलो तेंव्हा जेवणाची वेळ उलटून गेलेली आणि दुपारच्या स्नॅक्स ची वेळ
झालेली त्यामुळे हिम्मत करून श्रीनगर मध्ये पाणी पुरी खाल्ली पण खूपच
अपेक्षा भंग झाला आणि बाकीच्या ऑर्डर रद्द केल्या बाहेर एक भेळ पुरी वाला
उभा होता त्याला तिखट भेळ बनवायला सांगितली त्याने पार जाळ काढला कि लगेच
बाजूच्या गाडीवर आईसक्रीम खाल्ले. संध्याकाळी शिकारा राईड घेतली आणि केशर,
अक्रोड, कहावा ची खरेदी करून आलो. संध्याकाळी वायू वेगाने आणि विमान प्रवास
पेक्षा पण महाग असणाऱ्या रिक्षेवाल्याने एका हॉटेल पाशी आणून सोडले तिकडे
जेवण करून रात्री हॉटेल वर निवांत येऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ची
flight होती.
एकंदरीत अतिशय सुंदर आणि कमी
कष्टाचा ट्रेक एकदम व्यवस्थित पूर्ण झाला आणि जास्त उंचीवर गेल्यावर पण
आपले शरीर त्रास पण देत नाही हे समजले त्यामुळे पुढचा ट्रेक कधी होईल माहित
नाही पण नक्कीच या पेक्षा जास्त उंचीवर चा करायचा हे नक्की
बाकी काश्मीर खरंच खूप सुंदर आहे, स्वर्ग आहे का ? माहित नाही कारण तेवढे काश्मीर मी अजून फिरलो नाही पण सुंदर नक्कीच आहे.
जय हिंद !
http://barvekedar.blogspot.com/2021/09/blog-post.html
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.