Tuesday, April 26, 2022

मैसूर ,उटी, कुन्नूर

 

२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.

हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले

वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.

वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:

वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.

वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे ;)

लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच

हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर

मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम

बाकी उटी भाग -२ मध्ये. 

 

मैसूर भ्रमंती नंतर आम्ही गाडी करुन उटीला जायला निघालो. मैसूर - उटी हा अवघा ३ - ३.५ तासाचा रस्ता. पण संपुर्ण रस्ताभर मंजील से बेहतर लगने लगे ये रास्ते असेच वाटत राहते. वास्तविक आम्ही गेलो होतो जुलै मध्ये. त्यावेळेस पुण्यात पाउस सुरु झाला होता. पण मैसूर ते उटी या रस्त्यात आम्हाला पावसाचे टिपुस सुद्धा नाही दिसले. पण एकंदर वातावरण खुपच सुंदर होते. निम्म्याहुन आधिक रस्ता बांदिपुर आणि मदुमलाई अभयारण्यातुन जातो. कर्नाटक बाजुचे अभयारण्य बांदिपुर म्हणुन ओळखले जाते तर मदुमलाई तामिळ्नाडुच्या बाजुचे. एरवी हे एकच अभयारण्य. सकाळच्या वेळी रस्ता पुर्ण धुक्याच्या दुलईत वेढला गेलेला होता. ऊटीचे थंडी काय असेल त्याचा प्रत्यय एकदा अभयारण्यात शिरल्यावर यायला लागला. थंड वार्‍याचे झोत अंगावर यायला लागले तसे अधुनमधुन आम्ही काचा बंद करुन गाडीतील वातानुकुलन यंत्रणा चालु करायला सुरुवात केली. AC चे वारे थोडे कमी थंड होते. नंतर मात्र आम्ही हा नतद्रष्टपणा पुर्ण बंद केला. आणि निसर्गाचा आनंद पुर्ण अनुभवला. मैसूर ऊटी साठी AC गाडी उगाच केली असे मात्र नंतर संपुर्ण प्रवासभर राहुन राहुन वाटत होते.

बांदिपुर - मदुमलई ची ही छोटीशी झलकः

अभयारण्यातील रस्त्याने जाताना प्राणी चिक्कार दिसतात. तसे मैसूर च्या प्राणिसंग्रहालयात बरेच प्राणी बघितले होते. पण प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना पारतंत्र्याची एक विषण्ण झालर असते. निसर्गाच्या सान्निध्यातल्या या प्राण्यांना पाहिल्यावर जास्त प्रसन्न वाटते. कदाचित हे मनाचे खेळ पण असतील. पण तसे वाटते खरे. कदाचित त्यामुळेच प्राणिसंग्रहालयातील हत्ती रोडावल्यासारखे वाटतात. मात्र अभयारण्यातील हत्ती, अगदी हत्तीपालन केंद्रातील सुद्धा जास्त तजेलदार वाटले. या अभयारण्यात गाडीतुन खाली उतरायला आणि छायाचित्रण करायला मनाई आहे. आणि पकडल्यावर जबर दंड देखील होतो. आम्हाला हे माहिती नसल्यामुळे आणि आम्हाला महिती नाही हे वनरक्षकांना महिती नसल्यामुळे आम्ही थोडे फोटो काढुन घेतलेच

अभयारण्याच्या या दर्शनाने उटीपेक्षा इथेच कुठेतरी रहावे असे वाटायला लागले होते. तरीही नेटाने ऊटीला गेलोच. आणि मदुमलाईत रहायला नाही मिळाले याचे वाईट वाटले तरी उटीला गेल्याचा पश्चाताप मात्र नाही झाला इतके उटीदेखील सुंदर आहे. उटीला स्थानिक भाषेत उटकमंड असेही नाव आहे. पण कुठेही गेलो तरी पर्यटकांना उटी असेच म्हणताना ऐकले. समुद्रसपाटीपासुन उटी अवघे ७५०० फूट उंचीवर आहे. म्हणजे महाबळेश्वर पेक्षा केवळ ३०००- ४००० फूट उंच. उंचीतील हा फरक अर्थातच हवेत जाणवतो. पुण्यात ज्या वेळेस घामाच्या धारा लागत होत्या आणि महाबळेश्वरात पण थंडी वगैरे वाजत नव्हती तिथे त्याचवेळेस ऊटीला मात्र गुलाबी थंडी पडली होती. (आमच्यासारख्या सडाफटींग माणसांना गुलाबी थंडी कसली म्हणा. नुसतेच इतर जोडप्यांकडे बघुन गुलाबी गुलाबी म्हणायचे :) )

आम्ही पहिल्यांदाच दोडाबेट्टाला गेलो. आधीच उटी उंचावर त्यात दोडाबेट्टा उटीतले उंच शिखर, किंबहुना दक्षिण भारतातले सर्वात उंच शिखर. समुद्रसपाटीपसुन तब्बल ८६४० फूट उंचीवर. इथे आजुबाजुला हरीणे, जंगली अस्वले, ससे, चित्ता, नीलगाय इत्यादी प्राणी आहेत. आम्हाला एकही दिसला नाही. :)

दोडाबेट्टाचा अर्थ काय ते माहिती नाही. पण धुक्याची दुलई हेच नाव त्याला सार्थ ठरेल. दोडाबेट्ट्याला १२ महिने धुके असते. प्रमाण ऋतुप्रमाणे कमीआधिक असते एव्हढेच. दोडाबेट्टा वरुन काढलेली काही छायाचित्रे:

दोडाबेट्टावरुन आम्ही बॉटेनिकल गार्डन गाठले. तब्बल २२ एकरांच्या परिसरात वसलेले हे उद्यान केवळ वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीसुद्धा एक पर्वणी आहे. तिथल्या काही फुलांची ही छायाचित्रे:

उद्यानातील काही लॅण्डस्केप दृष्ये आणि दुर्मीळ वृक्षसंपदा:

उटीच्या रोज गार्डनच्यावर आधी पण एक धागा टाकला होता. तरीसुद्धा त्यातील काही खुप निवडक छायचित्रे इथे परत डकवण्याचा मोह आवरत नाही आहे. रोज गार्डन मध्ये २८०० पेक्षा जास्त जातींचे गुलाब आहेत आणि हे भारतातील अश्या प्रकारचे सर्वात मोठे उद्यान आहे:

वाटले होते त्यापेक्षा हा भाग जरा जास्तच मोठा झाला. त्यामुळे इच्छा असुनही उरलेले फोटो या भागात टाकत नाही आहे. आमच्या प्रवासाच अंतिम टप्पा होते कुन्नूर. शब्दातीत असे ज्या निसर्गाचे वर्णन करता येइल त्याची छायाचित्रे पुढच्या भागात टाकेन आता.

 

सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे. का कोण जाणे पण कुन्नूर मध्ये हे गाणे सारखे गुणगुणावेसे वाटते.

ऊटीमध्ये २ दिवस फिरल्यावर कुन्नूरला जायचे ठरले. बराच उहापोह केल्यावर जाताना टॉय ट्रेनने जावे आणि येताना कारने यावे हा सर्वमान्य तोडगा निघाला.

हीच ती युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणुन घोषित केलेली उटी ते कुन्नूर धावणारी आगगाडी.

ही फुलराणी निलगिरीच्या रांगा चढताना समुद्रसपाटीपासुन ७७०० फूटांचे अंतर पण लीलया चढते आणि निलगिरीतल्या डोंगररांगांचे चढउतार पार करताना अशी काही दिलखेचक दृष्ये आपल्यासमोर सादर करते की त्याला केवळ नजरेच्या कॅमेर्‍यामधुन टिपुन केवळ मेंदुच्या मेमरी मध्येच साठवावे लागते. कुठलेही यंत्र ही दृष्ये परिणामकारकरीत्या टीपण्यास असमर्थ आहे. १९०८ साली गोर्‍या साहेबाने सुरु केलेल्या या फुलराणीला चालवण्यासाठी तामिळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटीचा तोटा होतो म्हणे. पण निलगिरीच्या डोंगररांगांतील अवर्णनीय निसर्गापुढे हा खर्च देखील फारसा काहीच नाही असे वाटत राहते. ट्रेनमधुन काढलेली ही काही छायाचित्रे. पण असे आवर्जुन नमूद करावे लागेल की कुठलाही कॅमेरा या प्रवासाला योग्य न्याय नाही देउ शकत. हा प्रवास डोळ्यातच साठवावा:

या प्रवासात काही क्षण असे येतात की तुम्हाला अक्षरशः विमानात बसल्यासारखे वाटते. दोन्ही बाजुला खोल खोल जाणारी दरी आणि जणु काही आकाशातुन जाणारी आगगाडी. हे क्षण आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पिऊन काढले. छायाचित्रे घ्यायचे देखील भान कोणाला उरले नाही. खालील छायाचित्र काढले तोपर्यंत तो सर्वोच्च उंचीचा पट्टा निघुन गेला होता:

टॉय ट्रेनची ही सफर साधारण तासाभरात संपते. त्यानंतर सुरु होते ती निसर्गाच्या सान्निध्यातील एक प्रदुषणमुक्त आठवण. ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या घडलेले कुन्नूरचे हे पहिले दर्शनः

कुन्नूर हे अश्या काही निवडक पर्यटनस्थळांपैकी काही आहे की जिथे जाउन आल्यावर कोणी विचारले की काय काय पाहिले की तुम्ही आपसुक सांगाल की निसर्ग सोडुन काहीच नाही. इतर कुठल्याही पर्यटनस्थळासारखे इथेही "दाखवायला" काही पॉईंट्स तयार केले गेले आहेत. परंतु ते बघितले नाहीत तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. निसर्गसौंदर्य तिथे ठायीठायी भरलेले आहे. त्यासाठी वेगळ्या पोईंट्सची गरजच नाही आहे मुळात.

ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या धुक्याने वेढलेल्या कून्नूरचे जे दर्शन घडले होते तेच रूप मनात भरुन राहिले आहे. कुन्नूर हे धुक्याने वेढलेले आहे असे म्हणण्यापेक्षा ते धुक्याने ग्रासलेले आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल इतके धुके आहे तिथे. हे काही पुरावे:

धुके, थंडी (परत गुलाबी - उटीसारखीच. किंबहुना थोडीशी जास्तच), नजर जाइल तिथे हिरव्या पाचुने नटलेल्या दर्‍या आणि चहाच्या बागा म्हणजे कुन्नूर. किंबहुना कुन्नूर म्हणजे एक मोठी चहाची बागच आहे असे म्हणता येइल. इथल्या गाईड्सना का कोण जाणे पण इथे मुमताजच्या (शहाजहानची नाही. अपराध मधली मुमताज किंवा गोरे रंग पे ना इतना गुमान कर फेम रोटीमधली) चहाच्या बागा आहेत याचे कोण मोठे अप्रुप आहे. कुन्नूरच्या चहाच्या बागांचे हे काही फोटो:

" alt=""

आम्ही कुन्नूरच्या एकुण वातावरणानेच इतके भारावुन गेलो होतो की विशेष काही वेगळे पोइंट्स बघण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. उगाच इकडेतिकडे भटकण्यात आणि निसर्गाचा पुर्ण आस्वाद घेण्यात आम्हाला जास्त मजा वाटत होती. त्यात वर आमच्या ड्रायवर कम गाईडला आम्ही जेव्हा जेव्हा कुन्नूरला काय बघण्यासारखे आहे हे विचारले तेव्हा त्याने न चुकता आम्हाला "सुसाइड पॉईंट" असे उत्तर दिले होते. हे ऐकुन आम्ही एवढे वैतागलो होतो की शोले मधला "लेकीन ये अंग्रेज लोक सुसाट क्यो करते है" हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे यावर माझा पुर्ण विश्वास बसला होता. शेवटी या सुसाईड पायी या मरगठ्यांनी आपला जीव घेउ नये असा सुज्ञ विचार करुन आमच्या ड्रायवरने आम्हाला डॉल्फिन नोज आणि लॅम्ब रॉक अशी विचित्र नावे असलेल्या आणि अपेक्षेप्रमाणे जिथुन डोल्फिन नोज किंवा मेढा असे काहीच दिसत नाही अश्या पॉइंटसवर नेले. आम्हीदेखील कुठलेच पोइंट्स न बघता परत आलो असे कोणाला सांगुन त्यांच्या कुत्सित नजरांना सामोरे जायला लागु नये म्हणुन निमुटपणे त्याच्या मागोमाग गेलो. इथुन जे नजारे दिसले ते इतर कुठल्याही हिल स्टेशनवर दिसतील असेच होते. पण तरीही नेटाने आम्ही काही छायाचित्रे काढलीच. फरक काय तो इतकाच की इथे कुठेही नजर टाकली तरीही चहाच्या बागा हमखास दिसतात

मी आधीच म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रने सुहाना सफर इथेच लिहिले असणार. बघा "ये आसमा झुक रहा है जमीं पे" याचा प्रत्यय देखील इथे वारंवार येतो:

अश्या या अतिरम्य गावात असेच एक सुंदरसे टुमदार घर बांधुन कायमचे वास्तव्य करावे असे राहुन राहुन सारखे वाटते आहे.

कुन्नूर खुणावते आहे. पण इलाज नाही. पापी पेट का सवाल है. इथेच काम करावे लागणार. त्यामुळे आता थांबतो.

इति मैसूर - उटी - कुन्नूर पुराण संपुर्णम.

 http://www.misalpav.com/node/14111

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...