तयारी
तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले.
गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले.
लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.
- LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
- Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
- स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
- थंडीचे आणि साधे पायमोजे.
- एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
- ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
- बलक्लावा आणि राईडींग मास्क.
- किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
- गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
- थर्मल वेअर्स.
- थंडीचे जॅकेट.
- एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
- एक बॅकपॅक / सॅक.
- सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
- सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
- २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
- दोरी / रोप.
- सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
- आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
- पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
- गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
- आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
- गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
- गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
- गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अॅक्सलरेटर केबल.
- जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
- चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
- पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
- भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
- वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)
वरचे सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तर कांही अत्यावश्यक सामान / खाद्यपदार्थ एकावर एक अशा दोन तीन पिशव्यांमध्ये व्यवस्थीत गुंडाळून व वरती रबरबँड ने पक्के जखडून घेतले होते.
वरचे सगळे सामान बॅगेत भरून आणि बॅग गाडीला बांधून एक १५-२० किमीची राईड केली आणि बॅग नीट बसत आहे का ते चेकवले.
निघण्याची तारीख शेवटपर्यंत नक्की होत नव्हती. शेवटी २६ मे ला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची घोषणा झाली आणि २७ ला निघण्याचे ठरले..!
चला तर मग.. जॅकेट चढवा, हेल्मेट घाला आणि लेहवारी साठी सज्ज व्हा..!!!
(क्रमशः)
सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले.
दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या. थोडे फोटोसेशन झाले.
बॅगांची बांधाबांधी सुरू असताना...

तयारी झाली...!!!!

सर्वांचा निरोप घेतला. बॅगा गाडीला नीट बांधल्या आहेत याची खात्री केली आणि आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर वाकडजवळ एके ठिकाणी पेट्रोल भरून घेतले. आता पुढचा थांबा लोणावळा असणार होता. सोबत घ्यायच्या खाद्यपदार्थांमध्ये चिक्कीची खरेदी लोणावळ्याला ओरिजिनल मगनलाल कडे होणार होती.
तासाभरातच मगनलाल कडे पोहोचलो. खरेखुरे (ओरिजिनल.!) मगनलाल चिक्कीवाले माझ्या एका मित्राचे मित्र आहेत. ते भेटले. त्यांनी सामान लादलेल्या गाड्या आणि आमचा एकंदर अवतार बघून सगळी चौकशी केली आणि चिक्की थोडी आणखी काळजी घेवून पॅक करून दिली व महत्वाचे म्हणजे एकावर एक अशा दोन-तीन कॅरीबॅगमध्ये पॅक करून दिली.
लोणावळा, खंडाळा, एक्प्रेसवेचा लहानसा सेक्शन असे करत करत पनवेलला आलो आणि रस्ता चुकलो. मुंब्र्याच्या भाऊगर्दीतून आणि वैतागवाण्या ट्रॅफिकमधून शेवटी ठाण्याच्या घरी पोहोचलो. वाटेत रस्ता चुकल्याने तासभर उशीर झाला होता.
ठाण्याला पोहोचल्यावर महत्वाचे काम केले म्हणजे माझ्या खचाखच भरलेल्या बॅगेमधून कधीतरी लागेल, बॅकपचा बॅकप असे सोबत घेतलेले बरेचसे सामान कमी केले. माझ्या बॅगा जातानाच ओसंडून वाहत होत्या त्यामुळे तेथे खरेदी केलेले सामान कोठे ठेवणार हा प्रश्न होताच. शेवटी सामानात बरीच काटछाट केली. उदा. संपूर्ण ट्रीपसाठी ३ ड्रायफिट टीशर्ट आणि बर्फात घालण्यासाठी दोन पूर्ण हातांचे टीशर्ट इतकेच कपडे सोबत घेतले.
थोड्या वेळात बाहेर पडलो. माशांची खरेदी केली आणि संध्याकाळी विजय व रोहितने झकास फिश फ्राय बनवले. :)
**************************************
दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठलो. सगळे आवरले व साडेचारच्या दरम्यान बाहेर पडलो. आज शक्य झाले तर उदयपूर गाठण्याचा मानस होता. ठाण्यातून सकाळी सकाळी घोडबंदर रोड आणि वसईच्या पुलावरून NH8 चा प्रवास सुरू केला. मुंबई बाहेर पडल्यानंतर एके ठिकाणी पेट्रोल भरून घेतले. मी उत्तरायणच्या वेळी याच रस्त्यावरून प्रवास केल्याने हा रस्ता एकदम भारी आहे व काहीच अडचण येणार नाही असे अपेक्षित होते. त्याप्रमाणे एका लयीत प्रवास सुरू झाला.

सुरत जवळ एके ठिकाणी हॉटेल मध्ये थांबलो. इडली वडा आणि सामोसा असा नाष्टा केला. महत्वाचे म्हणजे इरसाल बुवांना फोन केला आणि आमचे स्टेटस सांगीतले व सध्या रस्त्यांची काय परिस्थीती आहे आणि पुढे कोणता रस्ता घ्यावा याचा सल्ला घेतला. इरसाल बुवांनी फोनाफोनी करून मला हलोल-गोध्रा हाच सोयीचा रस्ता आहे असे कळवले.
आमचा प्रवास सुरू झाला...
लेह आणि काश्मीर परिसरात जास्तीत जास्त वेळ घलवावयाचा असल्याने आम्ही लवकरात लवकर गुजरात-राजस्थान-हरियाणा पट्टा पार करणार होतो त्यामुळे वाटेत कुठेही फारसे थांबे होत नव्हते.
नॅशनल हायवे ८

थोड्या वेळात गाड्यांचा वेग आपोआप कमी झाला कारण पुढे भलेमोठे ट्रॅफिक जाम दिसत होते. रस्त्यावर पुढे ट्रकची मोठी रांग दिसत होती. आंम्ही ट्रकच्या बाजुबाजुने हॉर्न देत देत थोडे अंतर कापले. ट्रकची रांग संपतच नव्हती. पुढे एके ठिकाणी एका गाववाल्याने आंम्हाला थांबवले व "हाईवे से बहुत टाईम लगेगा आप यहां मुडके गांव से होकर जावो" असा सल्ला दिला. मी पूर्वी एकदा आणंद ते बडोदा प्रवासात असा उद्योग केल्याने त्याच्या सल्ल्यावर विश्वास ठेवला व एका गावाच्या दिशेने गाडी वळवली. थोडे अंतर कापताच आणखी एक जण भेटला ज्याला असेच पुढे हायवे ला जायचे होते. मग त्याच्या मागे मागे १०/१२ किमी अंतर कापून आंम्ही पुन्हा हायवेला आलो. येथे नवीनच स्टोरी. ट्रकची रांग होतीच, मात्र पोलीसांनी आंम्हाला सरळ हायवे पार करून येणार्या रस्त्याला समांतर असणार्या एका शेतातल्या रस्त्यात घालवले. आता तेथून तापलेल्या मातीतून आणि कच्च्या रस्त्यावरून प्रवास सुरू झाला. हळू हळू पुन्हा १०/१२ किमी अंतर शेतातून पार केल्यानंतर शेवटी एकदाचे हायवेला आलो.
वडोदरा आले आणि इरसाल बुवांनी सांगीतल्या प्रमाणे ट्रॅफिक वाल्या अहमदाबाद रस्त्याला टाटा करून हलोल-गोध्रा कडे गाड्या वळवल्या.
(फोटो अंतर्जालावरून साभार..)
या रस्त्यावर वेगळेच नाटक होते. सामान्यतः दुचाकी म्हटल्यावर आम्हाला नेहमी एकदम बाजुची, डावीकडची लेन घ्यायची सवय आहे. तशीच येथेही डावीकडची लेन घेतली तर टोल नाक्यानंतरचा रस्त्याचा डिव्हाईडर संपलाच नाही. सलग ७-८ किमी अंतर कापले तरी आंम्ही सर्व्हिस रोडवरच्या खाचखळग्यात कूर्मगतीने जात होतो आणि इतर वाहने बाजुनेच गुळगुळीत रस्त्यांवरून सुसाट धावत होती. शेवटी एकदाचा मुख्य रस्त्याला लागणारा चौक आला आणि तेथे एका घोळक्याने आंम्हाला अडवले.
घोळक्यातला एक जण : रिसीट ले लो भैय्या.
मी : काहेकी रिसीट?
तो भला माणूस : टोल है.
मी : टू व्हीलर के लिये टोल??? रिसीट दिखाओ. (खोटे पावती पुस्तक छापून पैसे गोळा करणारी मंडळी पाहिली आहेत त्यामुळे माझा सावध पवित्रा)
तो भला माणूस : ये लो.. देखो.
(मी पाहिले तर ओरिजिनल वाटावी अशी पावती होती.)
मी : ठीक है. ये लो. असे म्हणून पैसे दिले.
तोपर्यंत विजयने त्यांना गार पाणी आहे का असे विचारले आणि व्हॅनमधून गार पाणी भरलेल्या बाटल्या आमच्याकडे सुपूर्त झाल्या.
तितक्या वेळात त्या घोळक्यातल्या लोकांचे कुतुहल जागृत झाले होते.
घोळक्यातून सवाल आला : कहाँ जा रहे हो?
रोहित : लेह-लदाख जा रहें हैं.
दुसरा सवाल : ये कहाँ है?
रोहित : कारगिल के पास हैं.
यावर त्यांना वाटले आंम्ही सैनीक आहोत. गाड्या, एकसारखे जॅकेट आणि एकसारखे बुट असेही कारण असेल.
माझ्याकडून टोल घेणारा आता समोर आला. "पहले बता देते तो हम आपसे पैसा ही नहीं लेते. आप तो हमारे लिये वहाँ जा रहे हो. आपकी वजह से तो हम यहाँ आराम से रहते हैं - माफ करना भाईसाहब गलती हो गई हमसे.."
मला प्रचंड अवघडल्यासारखे झाले. शेवटी त्याने केलेले बरोबर आहे अशी त्याची समजुत घातली आणि आंम्ही फिरायला चाललो आहे असे त्याला पटवल्यावर तो बाबाजी शांत झाला.
वडोदरा-हलोल हा अप्रतीम रस्ता आणि तसाच पुढे हलोल-गोध्रा रस्ता पार केल्यानंतर मोडासा जवळ आलो आणि एका सिंगल रस्त्याने शामलजी नामक एका गावात पोहोचलो. येथे आंम्ही पुन्हा नॅशनल हायवे ८ वर येणार होतो. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. एक झकास ढाबा बघितला आणि दाल मखणी रोटी वगैरे ऑर्डर दिली.


गुजरात-राजस्थान-हरियाणा आणि पंजाब मध्ये मिळणारे जेवण निव्वळ लाजवाब असते असे अनेकदा ऐकले होते. ते तसे का असते याचा अनुभव येत होता.
जेवण झाल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. गुजरात आणि राजस्थानातल्या जमीनीचा पोत आणि हायवे शेजारी दिसणारे डोंगर वेगळेच दिसत होते. रखरखाट सुरू झाला होता. प्रचंड उन्हात गाड्या चालवताना गरम हवेच्या झोतांनी अंग अक्षरशः भाजुन निघत होते. बलक्लावा, मास्क, ग्लोव्ह्ज अशी सगळी आयुधे गार पाण्यात भिजवून परिधान केली तरी पाचव्या मिनीटाला सगळे वाळून जायचे व गरम हवेचा तडाखा पुन्हा सुरू होत होता. परिस्थीती इतकी वाईट होत होती की हेल्मेटची काच आणि गॉगल असतानाही बारीक धुळ डोळ्यांमध्ये जात होती, डोळे ती धूळ बरोब्बर नाकाजवळ जमा करत होते आणि कांही वेळाने गरम हवेच्या झोताने त्या धु़ळीमधले असेल नसेल तितके पाणी गायब होवून ते सगळे प्रकरण खड्यांसारखे घट्ट होत होते व टोचत होते. हा अनुभव नवीन होता. त्यामुळे थांबल्यानंतर डोळे साफ करणे गरजेचे झाले होते.
असाही एक राजस्थान मधला रस्ता..

प्रचंड ऊन आणि गरम हवेवर उतारा म्हणून मी पाण्याने भरलेली व टोपण काढलेली बाटली जॅकेटच्या आत ठेवली. गाडी चालवताना गरम व्हायला लागले की ती बाटली बाहेरून थोडी दाबायची. टीशर्ट आणि जॅकेटवर पाणी पसरले जायचे आणि तात्पुरता गारवा तयार व्हायचा.. तेव्हढेच बरे वाटत होते.
संध्याकाळी सातच्या सुमारास उदयपूरला पोहोचलो. वाटेत बायपासजवळच एक हॉटेल मिळाले. तेथे सामान टाकले. फ्रेश झालो. आज इतक्या गरम हवेतून प्रवास केला होता की सॅकमधले कपडे, खाद्यपदार्थ इतकेच काय तर पाऊचमधील फेसवॉश, तेल वगैरे सगळे गरम झाले होते.
हॉटेल मधल्या मॅनेजर मुलाने जवळच्या एका ढाब्याचा पत्ता दिला व तेथे फोन करून "हमारे मेहमान है" अशी खास सिफारिस केली. त्या ढाब्यावर अप्रतीम दाल-बाटी खाल्ली.
आजच्या दिवसात आंम्ही ७४० किमी च्या आसपास अंतर पार केले होते.
**************************************
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. आवरले. माझा नेमका उजवा हात, त्यातही मनगट दुखायला लागले होते. उदयपूरहून निघाल्यानंतर थोड्या वेळात नाष्ट्याला थांबलो. हाताचे दुखणे वाढतच चालले होते. अॅक्सलरेटर पिळून पिळून बहुदा मनगटाचे स्नायू दुखायला लागले होते. एके ठिकाणी आलू पराठ्याचा नाश्ता केला व पुन्हा दिल्ली कडे कूच केले.
राजस्थान मधून जाताना आता सतत मोठाल्या संगमरवराची वाहतूक करणारे ट्रेलर दिसू लागले होते. आपल्याला नेहमी दिसणारे आयशर, 407 सारखे ट्रक दिसण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते.

विश्रांती

असाच एक टोल नाका..


राजसमंद-ब्यावर-अजमेर अशी ठिकाणे एका लयीत मागे पडत होती. कंटाळा आला की थांबणे, मिळेल ती खादाडी करणे, उसाचा रस, सरबत वगैरे पोटात ढकलून उन्हाळ्यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू होते.
अजमेर बायपास रस्त्यावरून जाताना एके ठिकाणी आंम्ही थांबलो होतो तोच एक लाल रंगाची सँट्रो आमच्या शेजारी कचकचून ब्रेक मारत थांबली. गाडी रस्त्यावरच सोडून गाडीचा ड्रायव्हर आणि शेजारचा उतारू गडबडीने उतरले
त्या हिरोने गाडी अशी थांबवली होती.

तो उतरला माझ्याकडे आला.
"मै अमुक अमुक क्राईम ब्रांच जोधपूर."
मी : (मनातल्या मनात - आँ..?????) बोलिये सर.
क्राईम ब्रांच जोधपूर : क्या बात है.. कहाँ जा रहें है आप? बहुत अच्छी बात हैं.. आपका एक फोटो लेना हैं मुझे. (हे सगळे एका दमात.)
मी : (अविश्वासाने) आप क्राईम ब्रांचसे हो?
क्राईम ब्रांच जोधपूर : हाँ जी.
मी : (शांतपणे..) आपका आयडी दिखाओ.
त्या "क्राईम ब्रांच जोधपूर" चा चेहरा पडला. सोबतच्या साथीदाराला म्हणाला. "अपणा आयडी लेलो जरा"
मी आयडी बघितला तर हे साहेब प्रिझन्स डिपार्टमेंटचे कॉन्स्टेबल होते. मग त्यांना आमचे फोटो काढायला परवानगी दिली.
..आणि अचानक आमच्या पुढे साहेबांनी बाँब टाकला.
मै वैसे कविताएं भी करता हूं.. फलाणा फलाणे के साथ स्टेजपे जा चुका हू.. आणि असे बरेच काही बोलून साहेबांनी स्वतःची महती सांगितली.
आपको कुछ पंक्तियाँ सुनाना चाहता हूं..!!
त्यानंतर राजस्थानातल्या गरम वातावरणात, टळटळीत दुपारी, अजमेरच्या रस्त्यावर कविसंमेलन सुरू झाले.
आवेशपूर्ण कविता ऐकताना विजय आणि रोहित


या एकंदर प्रकरणात मला हसू आवरत नव्हते त्यामुळे मी क्लिकक्लिकाट करत आवाज न करता हसत होतो. :D
शेवटी त्या साहेबांना वाटेला लावून आंम्ही पुन्हा गाडीवर स्वार झालो.
दुपारनंतर जयपूरजवळ आंम्ही एका वेगळ्याच प्रदेशात प्रवेश केला. कुंद वातावरण होते आणि सगळीकडे धूळच धूळ भरली होती.


त्या धुळीच्या ढगात प्रवेश केल्यानंतर थोडे अंतर सावकाश गाडी चालवली. नंतर तो ढग मागे पडला.

रस्ता खूपच चांगला होता.. फक्त लहान गाड्या कमी प्रमाणात होत्या. ट्रकचे राज्य सुरू झाल्यासारखे सगळीकडे ट्रकच ट्रक दिसत होते.


थोडा वेळ गेला की पुन्हा पुन्हा विश्रांती साठी थांबत होतो. अत्यंत चांगल्या रस्त्यांमुळे अंतर मात्र लवकर पार होत होते.
विश्रांती.

यथावकाश रेवारी नंतर डावीकडे वळण घेतले व झज्जर कडे गाड्या वळवल्या. दिल्लीतील वाहने आणि ट्रॅफिकला टाळण्यासाठी आंम्ही हरियाणाच्या खेड्याखेड्यातून प्रवास करणार होतो.
रेवारी-झज्जर-रोहतक रस्ता कल्पनेपेक्षा चांगला निघाला.

दिवस कलल्यानंतर झज्जर पार केले आता मुक्काम कुठे करायचा वगैरे बोलणे सुरू होतेच. अचानक रोहतकच्या दिशेने जाताना काळ्याकुट्ट ढगांची दाटी दिसली. रस्ता आंम्हाला बरोब्बर तिकडेच नेत होता. आमच्या डोक्यावर निरभ्र आकाश आणि समोर एखाद्या बोगद्यात जावे तसे ढगांच्या बोगद्यात आंम्ही जाणार होतो. दहा-पंधरा मिनीटातच आंम्ही त्या काळ्या ढगांच्या बोगद्यात प्रवेश केला. दिवसा उजेडी अंधारल्यासारखे वातावरण झाले होते त्यात भर म्हणजे त्या ढगांमधून अव्याहतपणे विजा कडकडत होत्या. आंम्ही शक्य तितक्या वेगाने अंतर कापण्याचा प्रयत्न करत होतो.. आता प्रचंड वेगाने वारा सुरू झाला. इतका वारा मी कधीही अनुभवला नव्हता. आमच्या गाड्या रस्त्यावरून बाजुला फेकल्या जावू लागल्या. आंम्ही कसेबसे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु शक्यच होत नव्हते.
शेवटी पजेरो आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्या बाजुला थांबलेल्या बघुन आंम्हीही मुकाट एका धाब्याजवळ गाड्या थांबवल्या. धाबामालक एकदम दयाळू होता त्याने आंम्हाला गाडीसकट आत घेतले आणि टेबले खुर्च्या हलवून गाड्यांसाठी जागा करून दिली.

वादळाचा व्हिडीओ.
यथावकाश वादळ संपले. आंम्ही जेवण आटोपून धाब्यावरच मुक्काम करणार होतो. मात्र थोड्यावेळाने तेथे हळूहळू गिर्हाईके येवू लागली आणि मग आंम्हाला साक्षात्कार झाला की हा २४ तास चालणारा धाबा आहे. आपल्याला झोप मिळण्याची सुतराम शक्यता नाही. शेवटी त्या मालकाचे आभार मानून रात्री दहा नंतर बाहेर पडलो व प्रचंड पावसात व ठीकठाक वार्यात १५-२० किमी प्रवास करून रोहतक मध्ये पोहोचलो.
रोहतकमध्ये हरियाणवी खातीरदारीचा वेगळाच नमुना बघायला मिळाला.
तेथे पोहोचल्यानंतर एके ठिकाणी पानपट्टीजवळ तीन चार जण उभे होते, मी त्यांच्यासमोर गाडी थांबवली व "रहनेका इंतजाम" विचारला.
त्यातल्या एकाने दोन पावले मागे जावून माझ्या गाडीचा नंबर नीऽऽऽट बघितला आणि एकदम विचारले.
महाराष्ट्रसे आएं हो??
मी : जीं हाँ, वो आँधी-बारीश में फस गएं थे इसलिये लेट हो गएं. कोई हॉटेल बता दो.
मग त्यांच्यातल्या त्यांच्यात चर्चा झाली. तीनो खुल्ले तो है.. काहेको महंगा हॉटेल? अशी त्यांच्यात परस्पर चर्चा सुरू झाली. तितक्यात माझ्या गाडीचा नंबर बघणारा बोलता झाला.
तो : देखो भाई, अपणा एक घर ऐसेही पडा हुआ है. कोई रहता नही है. सब कुछ इंतजाम हैं. क्यों हॉटेल में जाते हो.. मेहमान लोग हो.. चलो अपणे घर.
मी : नहीं भाई साहब, बारीश कीचडसे बहोत गंदे हो चुके है.. घर में कैसे आएंगे? आप हॉटल बता दो.
तो : अरे चिंता मत करो. चलो हमारे साथ. कुच उन्नीस बीस हुआ तो हमे माफ भी कर देना..
मी : नहीं भाई साहब, बहोत शुक्रिया.. लेकिन आप हॉटलही बता दो.
मग शेवटी त्याने पुन्हा घोळक्यात बोलून थ्रीस्टार वगैरे हॉटेलचा पत्ता न देता. एका चांगल्या AC हॉटेलचा पत्ता दिला.
यथावकाश ते हॉटेल सापडले व भन्नाट घडामोडींनी भरलेला दुसरा दिवस संपला होता.
(क्रमशः)
लेह-लदाख - पानिपत.
सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.
पानिपत.. आपल्या सर्वांचा एक हळवा कोपरा.
"२ मोत्ये गळाली, २७ मोहरा हरपल्या, सव्वा लाख बांगडी फुटली" त्या ठिकाणी जाण्याचे कितीतरी वर्षांपासून ठरवले होते. ते आज जमले होते.
पानिपत युद्धस्मारकाचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वाराच्या आत दुचाकींसाठी मुबलक जागा होती

तेथेच असलेले हे दोन फलक

अधिक माहिती देणारा आणखी एक..

यातली अधिसूचना संख्या म्हणजे सर्क्युलर नंबर असावा पण तारीख..??

स्मारकाकडे जाणारा रस्ता..

हे स्मारक म्हणजे एक मोठे उद्यान आहे..

उद्यानाचा आणखी एक व्ह्यू..

कालच्या वादळाचा तडाखा येथेही बसला होता, जागोजागी पाणी साठले होते. त्यातून वाट काढतानाच अचानक स्मारकाने दर्शन दिले.

स्मारकाच्या जवळ भरपूर पाणी साठले होते. एका ठिकाणी बुट काढून ठेवले व अनवाणीच त्या पाण्यातून स्मारकाकडे गेलो.


स्मारक..

तेथेच हा एक माहिती फलक होता.

__/\__

तेथेच शेजारी एका ठिकाणी ही दोन भित्तीचित्रे कोरली होती


स्मारकाच्या आवारात एके ठिकाणी दोन मिनीटे बसलो. पुन्हा स्मारकासमोर जावून डोके टेकवले व बाहेर पडलो.
बाहेर पडून कर्नालच्या रस्त्याकडे गाड्या वळवल्या व कर्नाल मार्गे चंदीगडला पोहोचलो. येथे विजयच्या गाडीचे सर्विसींग करावयाचे होते.
आयुष्यात केंव्हा ना केंव्हा भेट द्यायच्या ठिकाणांमधले एक महत्वाचे ठिकाण आज सर केले होते. __/\__
(क्रमशः)
*******************
(हा भाग छोटा आहे याची कल्पना आहे. मात्र पानिपत स्मारकाच्या भेटीसोबत आणखी काही जोडणे शक्य झाले नाही.)
पानिपत ते चंदीगड हा रस्ता इतर कोणत्याही रस्त्याप्रमाणे चांगला रस्ता होता. आंम्ही आता दिल्ली चंदीगड रस्त्यावरच होतो. हरियाणातला खेड्याखेड्यांमधून प्रवास करताना एक मजा दिसत होती. कोणत्याही वस्तूची पाटी लिहिताना मजेदार शब्दरचना केली होती. धाब्याबाहेर पराठेंही पराठे, मेडीकल बाहेर दवाईयाँही दवाईयाँ, हार्डवेअरच्या दुकानाबाहेर टाईलेंही टाईलें असा सगळा प्रकार बघताना मजा वाटत होती, शेवटी एकदाचे "हेल्मेटेंही हेल्मेट" अशीही पाटी दिसली. :)
(अशोक जैन यांच्या "राजधानीतून.." या पुस्तकातला एक उल्लेख आठवला. एका कोण्या अरोरा नामक माणसाने चालवलेल्या वधूवर-सुचक मंडळाची जाहिरात "रिश्तेही रिश्ते" अशी केली होती)
चंदीगड..

येथे ऊसाच्या रसामध्ये पुदिना घातलेला होता. असा रस पुण्यात एके ठिकाणी मिळत होता पण त्यावेळी प्यावासा वाटला नाही. येथे मात्र पर्याय नव्हता. :)
यथावकाश चंदीगडला पोहोचलो. विजयच्या अकिला चे सर्विसिंग करून घ्यायचे होते. त्या शोरूममध्ये गाडी सोडली आणि आंम्ही त्याच मालकाच्या फियाट शोरूमच्या कस्टमर लाऊंजमध्ये डुलक्या घेत बसलो.
चंदिगड एकदम "प्लॅन्ड सिटी" आहे, सगळे सेक्टर्स असल्यामुळे पत्ते लगेच सापडतात वगैरे गोष्टींचा अनुभव येत होता. मोबाईलच्या मॅपमध्ये सगळे चौकोन चौकोन दिसत होते. भारी शहर वाटले.
थोड्यावेळाने पुढ्यात पाणी आले, चहा आला आणि नंतर त्या शोरूमचा मालकही आला. आमचा एकंदर अवतार पाहून कुठे चाललात असेही विचारले. त्या पट्ठ्याने एक काम केले म्हणजे आंम्हाला श्रीनगर, पटनीटॉप आणि मनाली वगैरे ठिकाणचे त्याचे ओळखीचे सगळे पत्ते दिले. कुठे काय बघायचे आणि कसे जायचे याचे नीट मार्गदर्शन केले आणि त्या त्या लोकांना फोनही करून ठेवले. एकदम रंगेल सरदार होता. (त्याच्याबद्दल इतकेच - बाकीचे इथे लिहू शकणार नाही.) :-))
चंदिगड मध्ये वेगवेगळ्या भवनांमध्ये राहण्याची जागा शोधून शेवटी जाट भवन मध्ये हवी तशी जागा मिळाली. तेथे मुक्काम ठोकला.
या गडबडीत संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आराम करायचा व रात्री एखाद्या ठिकाणी जेवण चापायचे असा प्लॅन होता. माझी गाडी भवनामध्ये इकडून तिकडे करताना मागच्या चाकातून कट्ट कट्ट असा आवाज येवू लागला. चेन, चाक वगैरे सगळे नीट बघितले तरी आवाजाचा उगम कळत नव्हता. शेवटी पटकन मोबाईलवर रॉयल एन्फिल्डचे शोरूम शोधले. ते जवळच होते. सामान खोलीमध्ये टाकले आणि आम्ही तिघे गडबडीने शोरूमच्या दिशेने गाड्या पळवल्या.
शोरूम सापडले पण त्यांचे वर्कशॉप दुसर्याच सेक्टरमध्ये होते. त्यात त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा आंम्हाला कळेनात..
"आप यहाँ से सीधा जावो, लाईट पॉईंट के पास लेफ्ट लेल्लो, बाऽऽदमे इक ऑर लाईट पॉईंट आयेगा.. वहाँसे राईट लेल्लो. उत्थे ही है.."
मग उलगडा झाला लाईट पॉईंट म्हणजे सिग्नल..!!!!
बर्र बाबा दे पत्ता असे म्हणून त्याचे व्हिजिटींग कार्ड घेतले व निघालो. बर्याच फेर्या घातल्यावर ते वर्कशॉप सापडले. तो म्हणाला उद्या या. मग आंम्ही कसे पुण्याहून आलो आहोत, लेह लदाखला चाललो आहोत, उद्या मनालीला जायचे आहे अशी सगळी कॅसेट वाजवली. मग बाबाजी प्रसन्न झाला आणि आतून एक कामगार सगळी हत्यारे घेवून आला. त्याने आधी तो कट्ट कट्ट आवाज ऐकला आणि आवाज ऐकून बेअरींग गेले आहे असे सांगितले.
मी तत्काळ असहमती दर्शवली आणि "अभी २५०० किमी पहलेही बेअरींग बदला हुआ है!" अशी माहिती दिली.
मग चाक खोलले आणि त्याने सांगितले की "आपका तो रिम गया है" आता १५००० किमी मध्ये आणि दिडच वर्षात रिम कशी जाईल हा प्रश्न होता पण ती वाद घालण्याची वेळ नव्हती. मग त्याला रिम बदललायला सांगितले तर तो म्हणाला, "वो काम शोरूम में होता है.." परत आंम्ही अनेक "लाईट पॉईंट" पार करत शोरूमला आलो आणि रिम बदलून घेतली.
(येथे परत आल्यानंतर गाडीचे चेकअप करून घेतले असता इथल्या माणसाचे म्हणणे असे होते की रिम गेली नसणार, हब गेला असणार आणि फक्त हब बदलायला हवा होता - पण हे सगळे येथे परत आल्यानंतर!!)
चंदिगडमधल्याच एका झकास धाब्यावर जेवलो आणि आजचा दिवस संपला..
*******************************************************************
दुसर्या दिवशी सकाळी उठलो, आवरले आणि निघालो. आज मनाली गाठायचे होते. होशियारपूरच्या दिशेने हायवे वर प्रवास सुरू झाला आणि पंजाबमधील शेती, गार हवा, सलग चालणारे ट्रॅक्टरचे थवे वगैरे मागे पडत होते.
काही काही ठिकाणी शेतीला लागणारे मशिनचे अजस्त्र प्रकारही कूर्मगतीने जात होते.
थोडा वेळ गेल्यानंतर हायवेचा प्रवास संपला आणि घाट सुरू झाला..
विजय - घाटात..

घाटामध्ये झकास झाडी होती. एकदम उंचावरून प्रवास असल्याने दर्या डोंगर सगळे वातावरण सुंदर दिसत होते.


वळणावळणाचे रस्ते...




विश्रांती पायजेच की वो...

रस्ता एकदम गर्द झाडीतून जात होता. पण सिंगल रस्ता असल्याने वेग आपोआपच कमी झाला होता. एकमेकांना रस्ता देत, समोरच्या वाहनांचा अंदाज घेत प्रवास सुरू होता.
गर्द झाडीतला रस्ता



देवभूमीत पोहोचल्यानंतर आकाशाचा रंगही बदलला होता..

हा फोटो काढताना विजय त्याच्या कॅमेर्यासोबत काहीतरी खुडबुड करत होता...

...आणि हा फोटो काढताना सुद्धा..!!! :D

ही कसली झाडे असतात? मेपल वुड का? यालाच देवदार म्हणतात का?

येथून पुढे गेल्यानंतर बियास नदीची सोबत सुरू झाली. एका काठाने रस्ता होता. मध्ये प्रचंड खळखळाट करत नदी वाहत होती आणि नदीच्या दुसर्या काठ म्हणजे अजस्त्र डोंगर होता.


हा रस्ता एकदम भारी होता. डेडली म्हणायला हरकत नाही. रस्याला कठडे नव्हते, वळणांचे बोर्ड क्वचितच दिसत होते. नेमकी मला येथे झोप येवू लागली. थोडा वेळ तशीच गाडी चालवल्यावर मी सरळ गाडी बाजुला घेतली आणि एका मंदिराच्या ओसरीवर ताणून दिली.
विजय आणि रोहित फोटोग्राफी करत टाईमपास करत होते. अर्धा तास झकास झोप झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू केला.
दोन एक किमी गेल्यानंतर अचानक जोऽऽऽऽरात एका स्फोटाचा आवाज ऐकू आला. आंम्ही टरकलो आणि नक्की कुठे काय झाले ते गाडी चालवता चालवता बघू लागलो.. तर आमच्या शेजारच्या डोंगरावर सुरूंगाचा स्फोट झाला होता.

येथून पुढे आल्यानंतर अचानक आंम्ही एका बोगद्यात प्रवेश केला. खूऽऽऽऽप लांब आणि वळणे वळणे असलेला बोगदा होता. त्यातून गाडी चालवताना जे अनुभवले ते शब्दातीत होते. या बोगद्याचे नांव मला माहिती नाही - कोणाला माहिती असल्यास कृपया कळवावे.
तो बोगदा खूपच भारी होता..!!!!!
यथावकाश कुल्लू मागे पडले.


कुल्लू ते मनाली रस्त्यावर भीषण ट्रॅफिक होते, रस्त्याच्या बाजुला सगळे रिव्हर राफ्टिंगवाले तंबू ठोकून बसले होते त्यामुळे त्यांच्या कस्टमर्सच्या गाड्या ट्रॅफिकमध्ये वाटेत होत्याच.
येथेच एक मजा झाली..
पुढे चारचाकी वाहनांची रांग लागली होती आणि आंम्ही गाड्यांच्या डावीकडून हळूहळू रस्ता असेल तसा मार्ग काढत होतो. येथे रस्ता एकदम अरूंद होता त्यामुळे समोरच्याने दार उघडले तर आमच्यापैकी कोणीतरी नक्की दुचाकीसकट त्याच्या गाडीत घुसला असता. त्यामुळे एकदम काळजीपूर्वक चाललो असताना अचानक समोरच्या गाडीची काच खाली झाली, मी लगेच वेग कमी केला तर एका नवविवाहितेचा मेंदी आणि चुडा सह हात बाहेर आला आणि एक कुरकुरे चे रिकामे पाकिट खाली पडले.
हिरव्यागार झाडीत.. बियास नदीच्या शेजारी.. झकास वातावरणात असे काहीतरी केले गेलेले बघून मराठी रक्त जागे झाले.. त्या कन्येने काच खाली करण्याआधीच मी तेथे पोहोचलो होतो. मी शांतपणे गाडी तिच्या शेजारी थांबवली, गाडीवरून वाकून ते पाकिट उचलले आणि तिच्या हातात दिले. पुढे काय झाले आहे ते तिला कळण्यापूर्वी मी पुढे गेलो होतो.. :=))
मागून विजय हे सगळे बघत आणि तुफान हसत गाडी चालवत होता.
मनालीला पोहोचलो तर तेथे एन्ट्री टॅक्स आणि काहीतरी पैसे भरावे लागत होते. तेथे चेरी आणि स्ट्रॉबेरी विकणार्या बायकांनी लगेच घोळका केला..

मी गाडी वाटेत लावून चेरी खात होतो म्हणून अचानक एक पोलीस आला आणि गाडी बाजुला घ्या असे म्हणाला. माझ्या हातात चेरी होत्या. त्या ठेवायला जागा नाही म्हणून मी पटापट चेरी तोंडात भरून घेतल्या. मी नक्की काय करतो आहे ते त्या बायकांना सुरूवातीला कळाले नाही आणि नंतर कळाल्यानंतर त्यांनी एकदम हसायला सुरूवात केली. माझे चेरींनी भरलेले मारूतीसारखे तोंड घेवून मनाली मध्ये प्रवेश केला. मी अगदी सावकाश एक एक चेरी चवीने खाऊन नंतर एकदम बिया थुंकून दिल्या. ;)
मनाली ला पोहोचलो तेंव्हा गाडीची अवस्था अशी झाली होती..

आणि आंम्हा तिघांची अशी..

मनालीला चंदीगडवाल्या सरदारने दिलेल्या एका हॉटेलवाल्या मॅडमच्या रेफरन्सने माल रोडवर एका हॉटेलमध्ये रूम मिळाली.
संध्याकाळी बर्फाने आच्छादलेले डोंगर सुंदर दिसत होते..


उद्या खरा प्रवास सुरू होणार होता.
(क्रमशः)
https://www.misalpav.com/node/36732
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.