Tuesday, April 26, 2022

मिशन काश्मीर

 जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. (यात अनधिकृत पाकव्याप्त प्रदेश 78,114 चौरस किमी, पाकिस्तानने अनधिकृतपणे चीनला सोपवलेला 5,180 चौरस किमीचा प्रदेश आणि चीनकडे असलेला 37,555 चौरस किमी या अनधिकृत ताबा प्रदेशांचा समावेश आहे.) राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे. सर्वात मोठे शहर श्रीनगर हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 1,25,48,926 इतकी असून साक्षरता 68.74 टक्के आहे. राज्याच्या प्रमुख भाषा उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोंगरी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी व दादरी या आहेत. 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर राज्य भारतात विलीन झाले. जम्मू आणि काश्मीर मध्ये एकूण 22 जिल्हे असून काश्मीर, जम्मू व लडाख हे राज्याचे प्रशासकीय तीन विभाग आहेत.

राजतरंगिनी आणि निलमन पुराणातील आख्यानानुसार काश्मीर हे एक मोठे सरोवर होते. कश्यप – ऋषींनी त्यातील पाणी उपसून तयार केलेले निवासस्थान. परंतु भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या भौगोलिक परिवर्तनाचे कारण म्हणजे खडियानगर व बारामुल्ला येथील पर्वतांच्या खचण्यामुळे पाणी निघायला मोकळा मार्ग तयार झाला. अशा प्रकारे पृथ्वीवरील स्वर्ग असणार्‍या काश्मीरची उत्पत्ती इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात सापडते. काश्मीरमध्ये अशोकाव्दारे बौध्द धर्माचा परिचय झाला. कनिष्काव्दारे त्याचा प्रसार करण्यात आला. सहाव्या शतकाच्या प्रारंभी काश्मीरवर हून लोकांचा ताबा झाला. इसवी सन 530 मध्ये स्वातंत्र्यप्राप्ती. परंतु उज्जैनमधील सम्राटांचे पुन्हा वर्चस्व सिध्द झाले. विक्रमादित्य घराण्याच्या अस्तानंतर काश्मीर खोर्‍याला स्वत:चे शासक मिळाले. हिंदू आणि बौध्द संस्कृतीची सरमिसळ झाली. इसवी सन 697 ते 738 काळात प्रसिध्द हिंदू राजा ललितादित्य याचे पूर्वेकडील बंगालपर्यंत, दक्षिणेकडील कोकणपर्यंत, वायव्यकडील तुर्कीस्तानपर्यंत आणि ईशान्यकडील तिबेटपर्यंत अशा चोहोबाजूंकडे राज्याचा विस्तार झाला. राजा ललितादित्य हा घरे बांधण्याकरीता फार प्रसिध्द होता.
तेराव्या व चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुस्लीमांचे काश्मीरमध्ये आगमन झाले. इसवी सन 1440 -77 काळात झैनुल अबीहित तातारच्या हल्ल्यापूर्वी हिंदू राजा सिंहदेव यांचे पलायन. नंतर चकांचे झैन-उल-अबेदिनचा मुलगा हैदरशहावर आक्रमण झाले. त्यांचे राज्य कायम. इसवी सन 1586 मध्ये अकबराने काश्मीर जिंकले. इसवी सन 1572 मध्ये मोगलांच्या हातातून अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दाली यांच्याकडे काश्मीरची सत्ता गेली. या पठाणांचे सदुसष्ट वर्षापर्यंत काश्मीरमध्ये राज्य होते. महाभारतात देखील जम्मूचे नाव नमूद आहे. हडप्पा मधील वस्तू आणि अखनूर येथील मौर्य, कुशान व गुप्त कालखंडातील प्राचीन वस्तू यांच्या नवीन शोधामुळे प्राचीन माहितीला नवीन दिशा मिळते. जम्मूचा प्रदेश बावीस वेगळ्या छोट्या टेकड्यांमध्ये विभाजीत आहे. डोगरा राजा मालदेव याने अनेक प्रांत काबीज केले. इसवी सन 1733 पासून इसवी सन 1782 पर्यंत राजा रणजित देव यांची जम्मूवर सत्ता होती. त्याच्या कमजोर वंशजामुळे, महाराणा रणजित सिंह यांनी हा प्रदेश पंजाबला जोडला. नंतर राजा गुलाबसिंगकडे हस्तांतरण झाले. जुन्या डोगरा कुटुंबातील सर्वात लहान वंशज राजा गुलाबसिंग याचे रणजितसिंहाच्या प्रशासकामध्ये प्रभाव होता. जम्मूचा प्रांत परत हस्तांतरीत झाला. 1947 पर्यंत डोगरा शासनकर्ते होते. 26 ऑक्टोबर 1947 ला महाराजा भारतीय सिंग (ह‍री सिंग) यांची संघराज्याच्या सामीलनाम्यावर स्वाक्षरी होऊन जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र भारतात विलीन झाले.
जम्मू आणि काश्मीर राज्याचा 32 अंश 15’ व 37 अंश 5’ उत्तर अक्षांश आणि 72 अंश 35’ व 83 अंश 20’ पूर्व रेखांश यांच्या दरम्यान विस्तार. भौगोलिकदृष्ट्या राज्याचे चार विभागात विभाजन. पहिला विभाग म्हणजे पर्वतीय व नीम पर्वतीय पठार, कांदीपठार, दुसरा विभाग म्हणजे शिवलिक रांगांसहीत टेकड्यांचा भाग, तिसरा विभाग म्हणजे काश्मीर मधील दरीचा पर्वत आणि पिरपांचाल रांगा, चौथा विभाग म्हणजे लडाख व कारगिल प्रदेशातील तिबेटचा मुलूख.
काश्मीर हे सुंदर डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. म्हणून त्याला स्वर्ग म्हणतात. काश्मीरला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. लडाख सुध्दा लहान तिबेट म्हणून ओळखले जाते. लडाखमध्ये बौध्द संस्कृती पहायला मिळते.
लडाखी भागातील लग्न विधी विशेष आकर्षक आहेत. खाटोक चेन्मो हे लग्न विधीनृत्य फक्‍त कौटुंबिक समुदायासमोर केले जाते, कोम्पा त्सुम-त्साक हे नृत्य तीन यशस्वी पदन्यासाचे आहे. या नृत्याच्या नावातच हे तीन पदन्यास अनस्युत आहेत. जाब्रो हे नृत्य लडाखच्या पश्चिम भागात पहायला मिळते. चाम्स हे नृत्य लामांचे आहे. चाब्स-स्क्यान त्सेस हे नृत्य भांड्यांच्या आधाराने केले जाते. राल्दी त्सेस हे नृत्य तलवार नृत्य असते. अल्लेय यातो या नृत्यात गाण्याचाही समावेश आहे.
पारंपरिक संगीतात खास अशा वाद्यांचा समावेश असतो. सुरना आणि दामन म्हणजे शहनाई आणि ढोल. लडाखी बुध्दांचा संगीत उत्सव हा तिवे‍टियन संगीतासारखाच असतो.
लडाखी हे भारत- तिबेटीयन संस्कृती पाळतात. मुखवट्यांचा उत्सव हा लोकप्रिय उत्सव असतो, लडाखी अन्न हे तिवे‍टीयन अन्नाच्या जवळपासचेच असते. उदाहरणार्थ, थुकपा, नुडल सुप, आणि त्साम्पा. लडाखी लोक आपल्या उत्सवांच्या वेळी सोन्या-चांदीचे दागिने परिधान करतात.
बासोहली पेंटींग हे जम्मू आणि काश्मीर मध्ये लोकप्रिय आहे. लाकडापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. लोकरापासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण करतात. काश्मीरी शालीही प्रसिध्द आहेत. लाकडाच्या बाहुल्या, वुलनचे कोट, कशिदा आणि सुंदर नक्षीकाम काश्मीरात केले जाते. विविध धातूंपासून दागिने तयार करण्याची परंपराही का‍श्मीर परंपरा आहे. पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, हिरे ठेवण्यासाठीच्या पेट्या, फोटो फ्रेम, नक्षीकाम, रंगोटी अशा अनेक बाबी काश्मीरशी संबधीत आहेत.
चाकरी हे खूप लोकप्रिय असे पारंपरिक संगीत आहे. चाकरी हे गाणे आणि संगीत असे मिश्र लोकसंगीत आहे. हार्मोनियम सारखे दिसणारे वाद्य, रूबाब, सारंगी, नॉट, गेगर आणि चिमटा ही ती लोकवाद्य आहेत. या संगीतावर आधारीत लोककथा सांगितल्या जातात. आणि लैला मजनू सारख्या पारंपरिक प्रेमकथाही सांगितल्या जातात.
जम्मू आणि लडाखला सुध्दा स्वत:चे असे सांस्कृतिक स्थान आहे. दुम्हाल हे काश्मीर खोर्‍यातील प्रसिध्द नृत्य आहे. हे नृत्य पुरूषांकडून केले जाते. महिला रूफ नावाचे दुसरे पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. कुड नावाचेही एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. हे नृत्य लोकदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाते. हे नृत्य एक विधी म्हणून केले जाते आणि ते फक्‍त रात्री सादर केले जाते. बाछा नगमा नृत्य हे लग्न समारंभात केले जाते. शक्यतो हे नृत्य तरूणांकडून सादर केले जाते. या नृत्यात सहा किंवा सात तरूण असतात आणि त्यात एक गाणारा प्रमुख नेतृत्व करत असतो. याशिवाय दनदारा नृत्य, लाडीशहा नृत्य आदी नृत्य प्रकारही काश्मीरात प्रसिध्द आहेत.
सुफियाना कलाम हे अभिजात संगीत काश्मीरचे समजले जाते. या संगीताचा स्वत:चा असा राग आहे, ज्याचे नाव माकम असे आहे. संतूर वाद्यावर हे संगीत निर्माण केले जाते. या वाद्यासोबत साज, सतार, वासोल आणि डोकरा ही वाद्यही वाजवली जातात.
हस्तव्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय. राज्यातील रोजगारांमध्ये सर्वात महत्वाचा पर्याय म्हणून पारंपरिक व्यवसाय आहे. हस्तव्यवसायाला प्राधान्य. तसेच देशात आणि परदेशात या हस्त व्यवसायातील उत्पादनांना मोठी मागणी असते. या उत्पादनामध्ये पेपर- मशीन, लाकडी साधने, गालीचा, शाल, नक्षीकाम व इतर साधनांचा समावेश आहे. या उद्योगांतून प्रामुख्याने गालीचाच्या उद्योगातून भरमसाठी विदेशी चलनांची प्राप्ती होते.
सुमारे 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. धान, गहू व मका प्रमुख पिके घेतली जातात. बार्ली, बाजरा व ज्वारीही पिकेही काही भागात घेतली जातात. लडाख मध्ये हरभरा पिकतो.
रामाचा रावणावरील विजय- विजयादशमी – अस्सूज म्हणून साजरा केला जातो. शिवरात्रीचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात होते. ईद-उल-फित्र, ईद-उल-झुला, ईद-मिलाद-उल-नबी आणि मेहराज आलम हे प्रमुख मुस्लीम सण, मोहरम देखील महत्वाचा. जून मध्ये साजरा होणारा लडाख मधील हेमिस गुंपा हा सण विश्वविख्यात आहे. त्यातील मुखवट्यांचे नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य. जानेवारीतील वार्षिक सणात कालिमातेच्या प्रचंड मूर्ती लेहमधील स्पिटुक मठात प्रदर्शित केल्या जातात. हिवाळ्यात साजरा केला जाणारा ‘लोहरी’ रामबाग व सभोवतालच्या खेड्यात साजरा केला जाणारा सिंहसंक्रांती भडेरवा व किस्तवार येथे चैत्रात साजरा केला जाणारा ‘मेला पाट’ हे लोकप्रिय उत्सव आहेत. लोहरी म्हणजेच मकर संक्रांत, बैसाखी, हेमीस, दसरा, दिवाली, बाहु मेला, उरूस, आदी सण काश्मीरात साजरे केले जातात.
जम्मू व काश्मीर मध्ये उर्दु, काश्मीरी, डोग्रा, डोगरी, हिंदी, पहाडी, बाल्टी, लडाखी, पंजाबी, गुजरी, दादरी या भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या तरी अजून काही लोकभाषा राज्यात बोलल्या जातात, त्या खालीलप्रमाणे:
भाषा – कोण बोलतं
बाल्टी - बाल्टी
चाँग्पा - चाँग्पा /चाम्पा
द्रोस्खत, (दोक्पा) - दोख्पा/ द्रोक्पा
गु्ज्जरी - बाकरवाल
लदाखी - बेडा, बोध, गारा, मोन
परीमु - गुज्जर
शिना - ब्रोक-पा

या व्यतिरिक्‍त बाकरवाल, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दर्द, गड्डी, गारा, मोन, पुरीगपा, सीप्पी आदी आदिवासीही काश्मीरात निवास करतात.
अखनूर, अचबल, अथवट्टू, अनंतनाग, अमरनाथ, अवंतीपूर, अलची गोम्पा, कारगिल, किश्तवार, कुड, कोकरनाग, खजियार ग्लेशियर, गुलमर्ग, जम्मू, तरसर व मरसर सरोवर, दाचीगाम अस्वले, नहलगाम थंड हवेचे ठिकाण, पूरमंडल, बाटोट, मनसर सरोवर, लायामारू बौध्द मठ, लेह, वुलर सरोवर, वेरीनाग सरोवर, वैष्णोदेवी, सरसर, सियाचीन ग्ले‍सीयर, सोनमर्ग, श्रीनगर, हरवर, हेमीस उद्यान, डल सरोवर, लडाख, शालीमार बाग, निशात बाग, नुबरा खोरे, बेताब खोरे, बहु किल्ला, लोहचुंबक टेकड्या आदी पर्यटन केंद्रे महत्वाची आहेत.
काश्मीर राज्यात काराकोरम, कार, लडाख, पीरपांजाल, धौलाधार, शिवालिक हे पर्वत असून सिंधू, श्योक, झेलम, चिनाब, रावी, रिहन्द ब्रिनघी, चिपच्याप, दोडा, द्रास, गालवन, इंदूस, लिद्दर, मारखा, नाला पालखू, निलूम, नुब्रा, पुंछ, रांबी, संद्राम, शिंगो, सिंद, सुरू, तावी, तसराप, उझ, वेशाव या नद्या राज्यातून वाहतात.
(हा लेख महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या वेबसाइटवर ‘महाभ्रमंती’ या विभागात ‘सांस्कृतिक भारत’ या माझ्या सदरात प्र‍काशित झाला आहे. या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,
प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.

अगर फिरदौस बर्रूए-जमीनस्तो, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो। . जन्नत अगर कही है तो यही है, यही है, यही है।.

बहुधा जहांगीर म्हणाला किंवा कोणीतरी उर्दु शायर. ज्याने कोणी लिहिले आहे त्याने काश्मीरचे वर्णन करताना सत्यापासुन गुंजभरही फारकत घेतलेली नाही आहे. याहुन योग्य शब्दात काश्मीरचे वर्णन करता येणार नाही. जे डोळ्यांना दिसते ते कॅमेर्‍यात कैद होउ शकत नाही आणि शब्दात वर्णन करता येत नाही. तरीही हा एक तोकडा प्रयत्न काश्मीरची सैर घडवुन आणण्याचा. माझा टंकलेखनाचा वेग महान असल्यामुळे २-३ भागात प्रकाशित करेन.

पुण्यात तापमानाची स्पर्धा ४० च्या अंकाशी व्हायला लागली तसे थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीचे वेध लागले. काश्मीर नक्की केले तेव्हा मनात थोडी धाकधूक नक्की होती. पण दहशतवादाच्या भितीला योग्य ठिकाणी मारुन आम्ही तयारीला लागलो. जास्त 'रिक्स' घ्यायची नसल्यामुळे ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे निश्चित केले. ट्रॅव्हल कंपनीतर्फे जाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे आपल्याला काही करायला लागत नाही. सगळे त्यांच्यावर सोपवुन निवांत बसायचे. आणि अनेक तोट्यांपैकी एक म्हणजे प्रवासाची व्यवस्था काय असेल त्याचा भरवसा नसतो. आमच्या टुर ऑपरेटर ने आम्हाला गो एयर च्या हवाली केले. आईशप्पथ सांगतो गो एयर हा एक थ्रिलींग अनुभव असतो.

बोर्डिंग पास घेतानाच मी काउंटर वरच्या कोस्मेटिक कंपनीची जाहिरात करणार्‍या ललनेला किमान ३ विंडो सीटस द्यायला सांगितल्या. त्यावर तिने केवळ १ उपलब्ध असल्याचे सांगुन माझी बोळवण केली. तसे मला विंडो सीटचे फारसे आकर्षण नाही पण विमानातुन बर्फाचे डोंगर दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे मला खिडकी हवी होती. शेवटी १ खिडकीवर समाधान मानुन विमानात शिरलो. तर माझ्या जागेवर एक ललना आधीच बसलेली होती. माझ्या पुणेरी आवाजात कमाल मार्दव आणुन मी तिला ती माझ्या जागेवर बसल्याची जाणीव जरुन दिली. त्यावर च्यायला आजकाल कोणीही विमानात बसायला लागलय. साधे सीट नंबर्स बघता येत नाहीत असे भाव चेहेर्‍यावर आणुन तिने मला शांतपणे ति तिचीच सीट असल्याचे सांगितले. मग दोन्ही बोर्डिंग पास बघता असे लक्षात आले की सीट एक और आदमी दो अशी नाइन्साफी झालेली आहे. मी तेवढ्याच शांतपणे ही बाब हवाई सुंदरीच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर १५ मिनिटात ४ वेगवेगळ्या लोकांनी आमच्या दोघांचे बोर्डिंग पास चेक केले. माझा वेंधळेपणा लक्षात घेता मी चुकुन मुंबै - दिल्ली - श्रीनगर च्या ऐवजी कन्याकुमारीच्या विमानात नाही ना शिरलेलो याची मी स्वतः ३-४ वेळा खात्री करुन दिली. एव्हाना आजुबाजुच्या लोकांची छान करमणुक सुरु होती. मी सीटपाशीच (म्हणजे माझी असुन नसलेल्या सीटपापा) उभा असल्याने येणार्‍या जाणार्‍या लोकांना त्रास होत होता आणि काय गावंढळ माणूस आहे असे भाव नजरेत आणुन ते मला साइड द्यायला विनवीत होते. एव्हाना आजुबाजुच्या लोकांच्या "गो एयर मध्ये आणि एष्टी मध्ये फारसा फरक नाही", "काळजी करु नका ते तुम्हाला उद्याच्या फ्लाईट मध्ये जागा देतील " वगैरे कमेंट्स पास करुन झाल्या. दुसर्‍या दिवसाच्या विमानातुन जाण्याऐवजी मी मध्ये स्टुल टाकुन बसायलाही तयार होतो. अर्ध्या तिकिटात तसा मी उभा राहुनही गेलो असतो पण वरती हात धरायलाही विमानात जागा नसते त्यामुळे थोडा पिराब्लेम होता.

परत एक हवाई कन्या आली आणि "Sir is your seat number 21 Delta?" असे मंजुळ आवाजात विचारायला लागली. Delta? म्हणजे काय? माझा सीट नंबर तर 21 D होता. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला D म्हणजे Delta. त्या कन्येने शेवटी मला 1 Bravo वर बसायला सांगितले आणि कडकड केल्यावर 1 Alpha वर बसु दिले. Alpha, Delta, Bravo वगैरे शब्द ऐकुन मला एकदम डेल्टा फोर्स मधला सोल्जर झाल्यासारखे वाटायला लागले होते. गो एयर मध्ये जागा मिळणे हे असेही एक युद्धच होते म्हणा. अखेर एक सीट दोघांना दिल्याचा मला फायदाच झाला. पुढच्या तिन्ही सीटवर माझ्याशिवाय कोणीही बसलेले नव्हते.

थोड्याच वेळात खिडकीतुन दिसणारे ढगांचे पुंजके बघायचा मला कंटाळा आला. बाजुला नजर फिरवली तर वॉशरुमच्या बाजुने येउन एक इसम माझ्या शेजारी येउन बसला. पाठोपाठ दुसर्‍याने उरलेली एक सीटही बळकावली. हा काय प्रकार आहे हे मला झेपेना. भारतीय रेल्वेच्या शौचालयात लपून प्रवास करणारे महाभाग मला माहिती होते. पण विमानात पण हा प्रकार चालतो हे मला माहिती नव्हते. शेवटी गो एयर मध्ये काहीही होउ शकते हे मनात बिंबवुन मी गप्प बसलो. थोड्या वेळाने उलगडा झाला की ते लोक "रांगेत" होते. आतला माणूस बाहेर आला की माझ्या शेजारचा तुंबलेला माणूस आत घुसायचा. आता जास्त ताप व्हायला लागला. एवढी घाउक रांग मी याधी कुठल्याही फ्लाइट मध्ये नव्हती बघितली. माणसे यायची कसनुसा चेहेरा करुन बघायची. थोड्या वेळाने नंबर लागायचा. माझ्या बाजुच्या सीटा म्हणजे तुंबलेल्या लोकांसाठी वेटिंग रुमच झाली होती. थोड्या वेळाने एक ४- ५ वर्षाचा पोरगा येउन बसला. दोन मिनिटे त्याने वाट बघितली आणि अखेर म्हणाला "अंकल बहुत जोर की लगी है" मी ब्लँक झालो. काय बोलावे ते कळेना. जोर की लगी है म्हणजे? मी काय करावे अशी अपेक्षा आहे? मी काय सुलभ शौचालयाचा चालक, संचालक, संस्थापक आहे का? मी काय करु शकणार तुला घाईची लागली आहे तर? पण अखेर मुलावर दया येउन मी "रांगेत" उभ्या राहिलेल्या एका माणसाला पोराला पुढे जाउ द्यायची विनंती केली. त्याच्या चेहेर्‍यावर पोरं तुम्ही जन्माला घालणार त्रास आम्हाला होणार असले काहीसे भाव दिसले. पण हो म्हणाला बिचारा. पोर माझे नाही हे त्याला ओरडुन सांगावेसे वाटले. पण काय करणार? गप्प बसलो. हे म्हणजे खाया पिया कुछ् नही गिलास तोडा बाराना टाइप झाले. अखेर एकदाचे विमान दिल्लीला लँड झाले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझे भोग अजुन संपले नव्हते. दिल्ली - श्रीनगर सेक्टरला सेम ताप. परत माझी सीट दुसर्‍याला दिलेली. वर ती बाई ( म्हणजे हवाई बाई. तिला मी मागच्या सेक्टर वर पण हाच प्रकार झाल्याचे सांगितले) मला तोंडभरुन म्हणाली "you should have informed this to the ground staff" मग मात्र माझे डो़के सटकले. माझा पुणेरी बाणा दाखवत मी तिला विचारले "You mean to say that i should have assumed that Go Air ground staff is idiot enough to repeat the same mistake again?" (वाचताय ना मी किती फर्डे इंग्रजी फाडतो ते). अखेर परत अल्फा, ब्राव्हो, डेल्टा चा खेळ खेळत मी एकदाचा स्थानापन्न झालो.

तासाभरातच विमान श्रीनगरपाशी पोचले. आणि खिडकीबाहेर बघुन मी तृप्त झालो. कापूस पिंजुन ठेवावा तसे ढग आणि त्या ढगांआडुन डोकावणारी "स्नो व्हाइट " म्हणजे काय त्याची अनुभुती घडवणारी हिमशिखरे. फोटो न काढण्याची एयर होस्टेसच्या सुचनेला फाट्यावर मारुन कॅमेर्‍याचा क्लिकक्लिकाट सुरु झाला. जे दिसले जे अनुभवले ते याआधी अनेकांनी अनुभवले असेल. युरोप अमेरिका वारी करणार्‍या हाय फ्लायर्स साठी हा नजारा काही नवीन नसेल. पण माझी ही पहिलीचे वेळ होती.

गो एयर चा त्रास आणि तिकीटाचे पैसे वसूल झाले. हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी थी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...