Wednesday, April 27, 2022

लडाखडते दिवस

https://unadkya.com/ladakhadate-diwas-bhag-1-trivikram-shendye-leh-ladakh/

 दिवस पहिला – ०९ जुलै २०१२

काल रात्री सगळी तयारी होईपर्यंत साडेअकरा वाजून गेले, आणि डोळा लागेपर्यंत अडीच..

आज सकाळी आठ – साडेआठ वाजताच मी, राहुल समुद्रावर पोचलो, संजू परस्पर तिकडेच येणार होता, कारण ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात शब्दश: “समुद्र सपाटी” पासून करायची होती, शुभेच्छा द्यायला मित्र आणि नगराध्यक्ष मिलिंदराव कीर येणार होते, त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, आणि जोंधळ्या मारुतीला गाह्राणे घालून निघायचं, असा बेत ठरला होता.

संजू पोचला, पण त्याच्या चेहेऱ्यावरून काहीतरी बिनसल्याचं जाणवलं, आणि त्याचा हात हातात घेतल्यावर लक्षात आलं, अंगात चांगलाच ताप होता. गेले ४/५ दिवस केलेली जागरणं, निघण्याआधी काम संपवण्या साठी केलेली धावपळ- दगदग आता बाहेर पडत होती.
“डॉक्टरला फोन केलाय, जाताना ५ मिनिटं थांबून जाऊया… “बस्स!! परत चर्चा नाही!!”

पावणे नऊ च्या दरम्यान मिलिंदराव आले, आम्हाला काहीही पूर्व कल्पना न देता त्यांनी बरीच तयारी केली होती की.. दोन तीन पत्रकार, फोटोग्राफर, हार तुरे… एकदम सरकारी काम!! त्यांनी वेळ न दवडता निरोपाच्या मोजक्या शब्दात गाड्या सावकाश चालवायचा, सांभाळून जाण्याचा, दररोज घरी आठवणीने फोन करायचा प्रेमळ सल्ला दिला आणि मग सर्वांच्या वतीने सर्व रत्नागिरीकरांतर्फे आमच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

साडेनऊ, पावणे दहाला मांडवीतून निघालो, संजू तर “पेटला” होता, तो आणि राहुल दोघे ठरल्याप्रमाणे डॉक्टर कडे गेले, वैद्यराजांनी औषध तयार करून ठेवली असतील… ती घेऊन त्यांनी माझ्या घरी यायचं, व मग पुढे निघायचं ठरलं, पण आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच…

डॉक्टरनी संजूला बघितलं, १ ताप होता, म्हणून सरळ एक गोळी देवून तिथेच दवाखान्यात झोपवून ठेवलं, म्हणाले ताप उतरेपर्यंत हलायचं नाही..दोन तासांत ताप उतरला तर ठीक, नाहीतर आजचं जाणं रद्द…..
सुदैवाने दुपारी एक च्या दरम्यान संजूचा ताप पूर्णपणे उतरला, आणि मग डॉक्टरनी परत तपासून, वेगळ्या गोळ्या / पुड्या बांधून दिल्या, आणि मग पुढे निघायची परवानगी दिली, ती सुद्धा दररोज त्यांना फोनवर रिपोर्ट करायच्या अटीवर…

अश्या सगळ्यांच्या परवानग्या- निरोप घेऊन निघेपर्यंत दुपारचा दीड वाजला. मग मात्र जास्ती वेळ न काढता रत्नागिरीतून बाहेर पडलो, तरी हातखम्ब्यात पेट्रोल पंपावर १५ / २० मिनिटं गेलीच..
N.H. 17 चालू झाला आणि डोळ्यासमोरून एक एक आठवणी – घटना क्रम जावू लागले….

******

१९८३-८४ पासून YHAI ने भटकायचं कसं ते शिकवलं, एक दिशा दिली. हिमालयाने वेड लावलं ते १९८८ सालच्या ‘पोखरा व्हेली’ ट्रेक ने….. पोखरा शहरात भाड्याच्या मोटरसायकल घेउन फिरायची सोय होती, अनेक लोक तसे हिंडत, मजा वाटली ते बघून.

१९८८ पासून NCC मधून (संजू पाटील ची ओळख तेव्हाचीच ) महाराष्ट्रा बाहेरचा प्रदेश बघायची सवय होऊन गेली, एक दोन टूर कंपन्यांबरोबर फिरलो आणि मग जाणवलं की हे असं बस ने – टुरिस्ट म्हणून दुसऱ्यांच्या घड्याळाला बांधून घेऊन हिंडण्यापेक्षा स्वत: पाहिजे तिथे , पाहिजे तेंव्हा , आणि पाहिजे तितका वेळ थांबत फिरता आलं पाहिजे. हिमालयातल्या ‘रस्त्यांवर ‘ गाडी चालवायचं स्वप्न साधारणतः तेंव्हापासूनच पडायला लागलं….

तसं कोकण रेल्वे च्या कामानिमित्ताने कंपनीची कावासाकी बजाज घेउन १९९२ पासून हिंडत होतो, दीड – दोन वर्षात निदान लाखभर किलोमीटर भटकलो होतो, पण ते काम म्हणून….

१९९५ पासून मग हमारा बजाज.. रत्नागिरी- कोल्हापूर, रत्नागिरी- चिपळूण असे २००, २५० किमीचे प्रवास बाबांच्या स्कुटरने होत होते, पण तो पल्ला पण खूप वाटायचा तेंव्हा…. कारण ते फिरणं पण ‘काम’ होतं…

१९९७ ला पहिली १०० सी सी मोटरसायकल घेतली, आणि मग वेध लागले ते कुठेतरी लांब भटकायला जायचे…एव्हाना मी नीट गाडी चालवू शकतो ह्याची खात्री घरच्या वडीलधाऱ्यांना झाली होती. मग सुरु झाल्या भटकंती या प्रकारात मोडणाऱ्या उनाडक्या….

२००४ ला १५० सीसी ची गाडी घेतली आणि मग मात्र ”उधळलो”!!
आवाक्यातल्या, जवळच्या ठिकाणांची यादी वाढत होती, पण त्याबरोबर एकूणच जबाबदार्`या पण.. त्यामुळे जवळच्या उनाडक्या कमी होऊन वर्षातून एकदाच उनाडायला जायचं चालू झालं, आणि परत लेह(Leh) च्या भुताने मन काबीज केलं.

२००४ ला घरात अधिकृत घोषणा केली की मी बाईक ने लेह(Leh) ला जाणार… पण कोणी जास्ती मनावर घेतलं नाही…
२००५, २००६ , २००७…… घरच्यांना आता ह्या ” लांडगा आला रें आला…” ची सवय झाली होती बहुतेक, दरवर्षी आधी उत्साह दाखवणारे मित्र जायची तारीख महिन्यावर आली की टांग मारतात हे घरात कळून चुकलं होतं.

२००८:- १९८६-८७ पासूनचा माझा ट्रेकिंगचा पार्टनर शेखर मुकादमला म्हणालो, काही झालं तरी या वर्षी जायचं… मार्च पासून तयारी चालू केली, मुंबईचे एक ओळखीचे आघरकर नावाचे गृहस्थ, टूर नेतात ते म्हणाले, “माझ्या तारखांना या, म्हणजे काही अडचण आली तर आमची गाडी पुढे – मागे असेल,….. बघू म्हणालो..
आणि तयारी चालू ठेवली. सर्व्हे ची कामं उरकंत पावसाळ्याची वाट बघणं चालू झालं ……..

******

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे याही वर्षी ३ जणांनी ‘जमणार नाही ‘ म्हणून सांगितलं, एकाला घरचं काम होतं, दोघांना रजा मिळत नव्हती. असो.. मी आणि शेखरने जायचं पक्क केलं, पण दोघंच आहोत हे कळाल्यावर दोघांच्याही घरातून “गाडीने जायचं नाही” असा विरोधी सूर निघायला लागला , शेवटी हार मानून मध्यममार्ग काढला, आणि आघारकारांबरोबर लेह – लडाख(Leh – Ladakh) ची टूर टेम्पो ट्राव्हलर – सुमो ने करून आलो…

अमरनाथ यात्रे वेळी श्रीनगर तर तोंडपाठ झालं होतच. बालताल च्या मुक्कामावरून ‘जोझी ला ‘ कडे जाणारा रस्ता दिसायचा – बोलवायचा… .. त्यापुढे कारगील – लेह – लडाख(Kargil – Leh – Ladakh) !! खडतर… कठीण… पण एक नक्की झालं…. या रस्त्यावरून बाईकने जायची इच्छा अजून तीव्र झाली. ऑगस्ट मध्ये लेहहून परत आल्यावर संजू पाटीलने भर बाजारात दोघानाही शिव्या घातल्या… तो तर लेह(Leh) साठी कधीचा (१९९६ पासून ) तयार होता ..

२०१२ :- जेंव्हा जेंव्हा संजू भेटत होता तेंव्हा “नक्की ना रे ?” ह्या एका प्रश्नात पुढची तयारी करायला हुरूप येत होता, ह्या वेळी माझ्याबरोबर मुंबईचा एक आर्किटेक्ट मित्र सुशील, आणि त्याचे २ मित्र येणार होते, मी, संजू पाटील, संजू वैशंपायन , राहुल सुर्वे असे रत्नागिरीहून आणि ते तिघे मुंबईहून .. ७ जण जायचं पक्के झालो, आणि पुढच्या तयारीला लागलो.

दोन्ही संजू, राहुल बरोबर पहिली अधिकृत मिटींग झाली ती रत्नागिरीचं ग्रामदैवत “भैरीबुवा” च्या पायरीवर, संजू वैशंपायन म्हणाला – पहिली मिटींग “भैरीबुवा” च्या पायाशी झाली ना, आता काहीही अडचण – विघ्न येणार नाही….. झालंही तसंच… त्या मिटींग नंतर तो जो गायब झाला, तो मला, राहुलला आणि संजू पाटीलला डायरेक्ट ऑगस्ट मध्ये भेटला !!!!

साधारण कार्यक्रम रूपरेषा :-

  • १ला दिवस रत्नागिरी ते मनोर ( ४१० किमी )
  • २रा दिवस मनोर ते अहमदाबाद ( ४४५ किमी )
  • ३रा दिवस अहमदाबाद ते अजमेर ( ५२५ किमी )
  • ४था दिवस विश्रांती – (राखीव )
  • ५वा दिवस अजमेर ते पानिपत ( ४६२ किमी )
  • ६वा दिवस पानिपत ते पठाणकोट ( ३९० किमी )
  • ७ वा दिवस पठाणकोट ते श्रीनगर ( ३६० किमी)
  • ८ वा दिवस ( विश्रांती – दुरुस्त्या इ. )
  • ९वा दिवस श्रीनगर ते कारगील ( २०५ किमी )
  • १० वा दिवस कारगील ते लेह ( २३० किमी )
  • ११वा दिवस लेह दर्शन, इनर लाईन परमीट इ.
  • १२, १३, १४, १५वा दिवस लेह व परिसर दर्शन
  • १६ वा दिवस लेह ते सारचू , (२२० किमी )
  • १७ वा दिवस सारचू ते मानली ( २३० किमी )
  • १८ वा दिवस मानली दर्शन
  • १९ वा दिवस मानली ते चंदिगड ( २९० किमी)
  • २० वा दिवस चंदिगड ते दिल्ली ( २५० किमी )
  • २१ वा दिवस गाड्या लगेज करणे
  • २२ वा दिवस दिल्ली ते रत्नागिरी..!!

असं ठरल्यावर २३ दिवस लागणार म्हंटल्यावर माझ्या आर्किटेक्ट मित्राने कुरकुर चालू केली, अर्थात त्याचं पण बरोबर होतं, खाजगी नोकरीत एवढी रजा शक्य नव्हती, त्यामुळे तो गळण्याची शक्यता वाढली, तरी त्याने शर्थीने प्रयत्न केला आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे काढायच्या आधी एक दिवस ‘शक्य नाही’ असं कळवलं, तो नाही म्हणून त्याचे दोन्ही मित्र पण नाहीत.. असो.. गळती लागली… ७ जणांचे ३ जण झालो….

त्यातही राहुल सुर्वे अजून टेम्पररी नोकरीत … त्यामुळे तो यायला तयार होता, पण त्याचा साहेब सोडायला तयार नव्हता … बिलिंग सेक्शन चा माणूस जवळ जवळ एक महिना नाही म्हणजे गोंधळाला आमंत्रण … पण राहुल ची तयारी चालू होती, येताना दिल्ली पासून ट्रेन ने यायचं ठरवलं नाहीतर त्या दोघांच्या रजा संपत होत्या. दिल्ली – रत्नागिरी तिकिटं वेगवेगळ्या ३ दिवसांची आणि तिघांची वेगळी वेगळी काढली, ऐन वेळी गडबड नको…

७ जुलै:- शेवटी राहुलने “नोकरी सोडतो” असं सांगितल्यावर साहेबाने त्याची रजा मंजूर केली, ( गंमत म्हणजे ह्या साहेबाचा ” वरिष्ठ साहेब ” जो माझा १९८५ पासूनचा ट्रेकर मित्र , तो राहुलला लेह(Leh) ला जायला प्रोत्साहन देत होता..) मग राहुल ८ ला सकाळी उड्या मारत आला…” येतोय ” … हुश्श् … त्याच्या पेक्षा मोठा सुस्कारा मी सोडला… नाहीतर परत दोघं……

८ जुलै :- सगळा दिवस मग गडबडीत गेला, संजूच्या ‘अपाचे’ ला सामान बांधण्यासाठी उजव्या बाजूला बसेल अशी एक फ्रेम धनंजय कानिटकरने पटकन करून दिली, मला माझ्या ‘पल्सर’चं जुनं साडीगार्ड तोडून उलटं करून उजवीकडे त्यानेच लावून दिलं होतं, त्याचा खुपच उपयोग झाला.

राहुलची एकच मोठी सॅक होती, पण संजू आणि माझ्याकडे ३, एकात सर्व कपडे, कागदपत्र, येतानाची ट्रेन ची तिकिटं, दुसरीत गाडी दुरुस्तीचं सगळं टूलकीट- यात २ जादा टायर ट्यूब, पंक्चर काढायची सर्व हत्यारं, हवा भरायचा पायपंप, बॅग दुरुस्तीचे पट्टे, इ. व तिसऱ्या ब्यागेत खादाडीचे पदार्थ.. घरच्यांनी तर मी दुष्काळी भागात जातोय असा समज करून घेतल्याने हिचा आकार जरा मोठा..कारण जाताना खादाडी आणि येताना खरेदी केलेलं सामान ठेवता येईल अशी योजना !! हे सगळं सामान मोटरसायकलवर नीट आणि पटापट बांधायची २ – ३ वेळा सवय केली, तरी १० मिनिटं लागत होती. सगळं मनासारखं झालं ते रात्री साडेअकराला….

******

राहुल आणि संजूने हाका – हॉर्न मारून थांबवल्यावर भानावर आलो.पावणेचार वाजले होते, चिपळूणचा बहादूरशेख नाका .. एक दीड वाजता निघाल्यावर विचारांच्या तंद्रीत चिपळूण आलं होतं – भूक पण लागली होती, मग तिथल्याच हॉटेलमध्ये थांबून थोडं खाऊन घेतलं, एव्हाना आमच्या रत्नागिरी – लेह( Ratnagiri – Leh) सफरीची बातमी रत्नागिरीत पसरली होती..

पत्रकार मित्रांचे फोन सुरु झाले.. “आम्हाला का कळवलं नाही ? सुरुवात कव्हर करायला आलो असतो.. इ.इ…. मग मकरंद पटवर्धन ने तर फोनवरच सगळा कार्यक्रम विचारून बातमी बनवली. चिपळूण मधून निघेपर्यंत साडेचार वाजले, म्हणजे ठरल्यावेळेपेक्षा ५ तास मागे … बापरे!!!

चिपळूण मधून निघाल्यावर मात्र फार कुठे थांबायचं नाही असं ठरवलं..वाटेत एकदा थांबलो ते पाऊस चालू झाला म्हणून रेनकोट घालायला, आणि मग खेडमध्ये राहुलच्या गाडीची मराठी नंबरप्लेट बदलून इंग्रजी लावायला.. हो… उद्या महाराष्ट्राबाहेर पडल्यावर त्रास नको.

पाउस त्रास देत होताच,पण कशेडी घाट उतरून रायगड जिल्हा सुरु झाल्यावर रस्त्यावरचे खड्डे पण वाढले, महाड च्या पुढे तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था.. जोडीला पाऊस आणि वाढलेली वाहनांची वर्दळ .. एकंदरीत आज ठरल्या मुक्कामी ‘ मनोर’ ला पोचणार नाही हे निश्चित झालं, पण मग रात्री ११ पर्यंत जमेल तेवढे पुढे जायचं ठरलं , निदान पनवेल- ठाण्यापर्यंत.

आपण रत्नागिरीकर खड्डेमुक्त- भारनियमन मुक्त असल्याने खूप सुखी आहोत, पण हे सुख रत्नागिरीच्या बाहेर गेल्याशिवाय लक्षात येत नाही , इथे रत्नागिरीत ‘घर की मुर्गी- दाल बराबर..” असो..

खड्डे- पाऊस ह्यामुळे वेगावर बऱ्यापैकी परिणाम होत होता, कदाचित घरच्या लोकांचं ” सावकाश जा रे ” फारच मनावर घेतलं असावं, पण पहिल्याच दिवशी सुमारे ३ तास (१२० किमी ) मागे राहिलो आणि रात्री नवी मुंबईला दादाकडे ‘सी वूड्स’ मध्ये मुक्काम ठोकला. पहिल्याच दिवसभरात एकूण ३१५ किमी प्रवास झाला, (दुपारी एक ते रात्री ११.)

क्रमशः

– त्रिविक्रम शेंड्ये

(०९ जुलै २०१२)

दिवस दुसरा – १० जुलै २०१२

सकाळी लवकर निघायचं ठरवून सुध्दा आठ वाजलेच.. पाऊस रात्रभर चालू होता.. बातमी समजल्यावर १० -१५ मेसेज आले होते, त्यावर नजर टाकली, प्रसाद गाडगीळ ने “वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाऊन त्यातून तावून सुलाखून बाहेर या” असा आशीर्वाद आम्हा “3 Idiots” ना दिला होता..

पटापट आवरून दादाने केलेले दडपे पोहे मस्तपैकी हादडून साडेसातला गाडीवर सामान बांधायला सुरुवात केली, रेनकोट हेल्मेट ही अंगडी टोपडी चढवून आठ वाजता निघालो, कालचे १२० किमी संपवून पुढे अहमदाबाद(Ahmedabad) गाठायचं होतं, म्हणजे जवळ जवळ ५३० किमी.

ठाणे(Thane) शहराकडे जाणारा रस्ता सोडून ‘घोडबंदर रोड’ ने NH8 गाठून पुढे जायचं असं ठरलं होतं, संजूची ‘ TVS Apache’ आणि राहुलची ‘Honda Unicorn’ ह्या माझ्या ‘Bajaj Pulser’ पेक्षा नव्या – त्यामुळे जास्त जोरात पाळणाऱ्या.. मग आपसूकच माझ्याकडे ‘Endman’ ची भूमिका आली.. मग मोकळ्या रस्त्यावर कितीही पुढे – मागे राहिलो, तरी शहर आल्यावर एकत्र रहाण्याचे ठरलं, त्यामुळे ठाणं शहराकडे जायच्या चौकात ते दोघेही माझ्यासाठी थांबले, रस्ता चुकण्यापेक्षा सरळ कोणालातरी विचारावं म्हणून मी इकडे- तिकडे बघितलं आणि दोन ट्राफिक हवालदार दिसले, पण ते डिव्हायडर च्या पलीकडे… मग थोडं पुढे जावून रस्ता बदलून त्याच्यापर्यंत पोचलो.. गंमत म्हणजे त्यांना मी माझ्या पिवळ्या रेनकोट मुळे त्यांच्यातलाच वाटलो होतो…

“घोडबंदर रोडला कसं जायचं ?” माझा प्रश्न.
“अहो.. बरोबर जात होतात की… का मागे फिरलात ?” त्यांनी आम्हा तिघांना लांबूनच बघितलं होत..
“खात्री करून घ्यायला.. ” “थँक्स “.. मी.
“एवढं सामान ? कुठे दौरा ?? “
“आज Ahmedabad.. मग Panipat – Srinagar – Kargil – Leh” आता रूट पाठ झाला होता..
” बापरे.. तिघेच ?” डेरिंग आहे ! ” हवालदार चांगल्या मूडमध्ये होते सकाळी..
“तीन जण ऐन वेळेला येत नाही म्हणाले” …मी.

अचानक दुसऱ्या पोलिसाला काहीतरी आठवलं..” काय हो, ‘अमरनाथ’ (Amarnath) तिकडेच ना ?
“हो… Srinagar – Kargil रस्त्यावरुन बालटाल(Baltal) चा फाटा वेगळा होतो” … माझ्या डोळ्यासमोर २००९ ला केलेली अमरनाथची यात्रा आली.
आणि मग जाणवला तो “वर्दी मध्ये असलेला माणूस!!
“पटकन त्या दोघांनी आपापल्या रेनकोटच्या आत खिश्यामध्ये हात घालून २१ – २१ रुपये काढले, एका क्षणात मला खिश्यावरचं एकच नाव वाचता आलं…”…. माने”…. दुसरा अजूनही अनामिक.. पायातले पावसाळी बूट काढून दोघानीही ते पैसे माझ्या हातात दिले…
“देवापुढे ठेवा..” आणि ‘देवाला ‘ पोचवायला मला हात जोडून मोकळे झाले !!
बिनधास्त जा.. चांगल्या कामाला जाताय..!!

पुढे निघून जेमतेम अर्धा तास झाला आणि वसईजवळ संजूची गाडी पंक्चर झाली…

पुढे निघून जेमतेम अर्धा तास झाला आणि वसई(Vasai) जवळ संजूची गाडी पंक्चर झाली…
प्रसाद गाडगीळचा आशीर्वाद खरा होत होता… पण सुदैवाने जेमतेम १०० मीटर पुढे टायरवाला होता, १५ – २० मिनिटात गाडी तयार झाली..

पुढे मनोर(Manor) येईपर्यंत १२.०० वाजले, म्हणजे अजूनही आम्ही अर्धा दिवस मागे होतो..
मनोरला जेवताना संजू ने विचारलं.. “सकाळी त्या पोलिसांनी तुला काय दिलं ?
“काय सांगू ? त्यांच्या पुण्ण्याचं लायसन्स मला दाखवलं म्हणून ?
झाला प्रकार सांगितल्यावर दोघानीही हात जोडले मला पण.. आणि त्यांना पण……

मनोर मागे गेल्यावर खरा NH8 चालू झाला… रुंद चौपदरी रस्ता, तो ही खड्डे नसलेला..
मग काय विचारता..संजू , राहुल सुटले… १०० – १२०.. किमी ने..
एकाची स्पोर्ट्स इंजिनची ‘Apache’ आणि दुसरा २८ वर्षाचा तरुण.. सळसळत्या रक्ताचा .. त्याची गाडी पण जवान..

माझीच गाडी ( आणि मी पण ?) म्हातारी 😛 .. २००४ मधली….८१५०० किमी फिरलेली..जुनं संपत आलेलं इंजिन . त्यात परत कारने फिरणं वाढल्याने ( २००९ पासून ८९००० किमी ) बाईक अतिवेगात चालवायची सवय कमी….
मग ते पुढे जाणारच ना ? साधारण एक- दीड तासाने एकमेकांच्या नजरेत यायचं एवढंच बंधन… मी Endman…

साधारण दर तासाला आम्ही चहा प्यायच्या निमित्ताने थांबत होतो, दुपार नंतरच्या पहिल्या तासा – दोन तासात दोघांचीही वेगाची हौस भागली असावी.. संध्याकाळी ६ वाजता सुरत(Surat) मागे गेलं आणि जाणवलं की आज देखील आपण १००/ १२० किमी मागे आहोत, अहमदाबाद(Ahmedabad) मुक्काम आज शक्य नाही, मग संध्याकाळी न थांबता होता होईतो पुढे जायचं ठरलं. अहमदाबाद कॅन्टोनमेंट(Ahmedabad Cantonement) च्या ऑफिसर्स मेस मध्ये माझ्या अत्तेभावाने रहाण्याची व्यवस्था केली होती, त्या सज्जन व्यवस्थापकाला आम्ही पोचू शकत नाही असं कळवून टाकलं.

साडेसातला ‘भडोच'(Bharuch) मागे गेलं आणि एक विचित्र घटना घडली.. पाऊस.. अंधार..आणि NH8 वर मोठ्या ट्रक्सची अखंड वर्दळ… त्यामुळे तिघेही एकत्रच जात होतो.. मी पुढे.. राहुल मध्ये आणि संजू शेवटी..

अचानक समोरून रस्त्यावर एक दिवा पडताना दिसला, क्षणात लक्षात आलं की कोणती तरी बाईक पडली.. N.H. 17 च्या सवयीने नकळत वेग कमी झाला.. एक मोटरसायकलवाला रस्त्यात पडला होता.. कसा पडला देव जाणे.. माझ्यापाठोपाठ राहुलही थांबला.. मागची ट्रक्सची वाहतूक लक्षात घेऊन माझी आणि राहुलची गाडी अर्धा रस्ता आडेल अशी लावली.

निदान जो पडला होता त्याला उचलावा म्हणून जवळ गेलो, अजून दोन तीन मोटरसायकल थांबल्या , गाडी आणि माणूस रस्त्यातून बाजूला उचलून ठेवला.. आणि झाला प्रकार लक्षात आला.. एक नाही , दोघे पडले होते.. आणि गाडीची दिशा, पडलेलं सामान बघून कळलं की गाडीवाल्याने उजवीकडून ( उलट्या दिशेने येऊन ) गाडी चालवून चालत जाणाऱ्याला उडवले होते.

डाव्या कडेने चालत जाणाऱ्याला समोरून कोणी येईल अशी शक्यता वाटत नव्हती, आणि पावसाच्या मार्.या पासून वाचण्यासाठी छत्री समोर धरून तो चालत होता, गाडीवाला थोडे अंतर वाचवण्यासाठी राँग साईड ने ( ते सुध्दा हायवे वर ) जात होता, त्याला समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशामुळे छत्रीवाला दिसला नाही, छत्रीवाला रस्त्याकडेला बेशुद्धावस्थेत पडला होता.. गाडीवाला शुद्धीवर आला, आणखी दोघं तिघं आले, त्या पैकी एकाने एमब्युलन्स ला फोन केल्यावर आम्ही पुढे निघालो. रात्री बडोद्यात मुक्काम केला, एक टुकार खोली होती, पण पाठ टेकल्यावर मस्त झोप लागली. आजही ठरलेल्या मुक्कामाच्या १२० किमी म्हणजेच अर्धा दिवस मागे होतो, ९ तारखेचा संजूच्या तापामुळे गेलेला वेळ भरून येत नव्हता…

क्रमशः

Leh Ladakh Diaries – Part 3

दिवस तिसरा – ११ जुलै २०१२

सकाळी लवकर बडोद्यातून(Baroda, Now known as Vadodara) निघालो, शहराबाहेर पडून मग ब्रेकफास्ट करायचा असं ठरलं, आणि गाडीला किक मारली, पाऊस तर रात्रभर पडत होता तो चालूच होता, घोळ दुसराच झाला, शहराबाहेर भेटायचं ठरलं, पण मी आणि संजू एका रस्त्याने ,आणि राहुल दुसऱ्या रस्त्याने गेला, जिथे रा.मा ८ चालू झाला तिथे आम्ही त्याची , आणि तो आमची वाट बघत बसलो…

तो १५ किमी मागे होता, मग एक मैलाचा दगड ठरवून तिथे वाट बघत बसलो, तर हा परत चुकून एक्सप्रेस वें वर गेला, तिकडे तर दुचाकीला बंदी.. पोलिसाने पकडून चिरीमिरी घेतली, आणि उलटा पिटाळला.. तो भेटेपर्यंत १ तास वाया गेला… मग चहा पाणी करून रा.मा ८ ला सुटलो…आता अहमदाबाद(Ahmedabad) मागे टाकून पुढचा पल्ला गाठायचा होता..

दुपारी एक च्या दरम्यान अहमदाबाद(Ahmedabad) ला पोचलो, म्हणजे अजूनही बरोबर अर्धा दिवस मागे होतो.धाबाटाईप हॉटेलवर जेवायला म्हणून थांबलो, आणि या सगळ्या ट्रीप मधला पहिला सर्वात कठीण ‘गुगली’ खेळून काढावा लागला..

सकाळी बडोद्यातून(Baroda) निघताना झालेल्या घोळामुळे फक्त चहा – बिस्कीटावर होतो, पाऊस पण चालू होता, चांगली कडकडून भूक लागली होती, संजू धाबेवाल्याशी काय बोलला माहीत नाही, बाहेर येऊन म्हणाला दाल राईस आहे..

ठीक आहे म्हणून गाड्या लावल्या, पेट्रोलींग करणारी गुजरात पोलीस व्हँन(Gujarat Police Van) पण धाब्यावर थांबली होती, ” साब, पापड लगेगा क्या ? ” …..धाबेवाल्याचा प्रश्न !!

तीघांनी एका सुरात हां…. म्हंटल्यावर तो परत किचन मध्ये गायब झाला.
आम्ही गु.पो. च्या गप्पा ऐकत बसलो, त्यांनी पण MH08 म्हणजे कुठे ? अशी चौकस चौकशी केली, मुंबई – गोवा(Mumbai – Goa) च्या मध्ये असं सांगितल्यावर ते परत त्यांच्या गप्पात रंगले.

१५ – २० मिनिटांनी ताटं पुढे आली… बघतो तर काय ? “दाल बाटी ” संजू म्हणाला हे ५ लाडू किंवा तत्सम प्रकार कसे खायचे ?
मी ९२ -९३ च्या दरम्यान एकदा खाल्लं होतं, पण ते तुपाबरोबर, आज तूप इल्ला…फक्त दाल…

मग त्याला “लाडू” फोडून कुस्करायला सांगितले, सौजन्यपूर्ण गु. पो. पण मदतीला आले, मग हॉटेलवाला पण धावला… त्याच्याकडे फक्त ‘दालबाटी होतं, संजूला दाल चावल वाटलं. असो… सगळा काला करून “गोविंदा” केलं आणि निघालो…

आज तूप इल्ला… फक्त दालबाटी…

संध्याकाळी चार साडेचार च्या सुमारास परत एकदा संजूची गाडी पंक्चर झाली…
एक मोठा खिळा आरपार गेला होता, पण परत एकदा सुदैवाने साथ दिली, अर्ध्या किलोमीटरला एक टपरी पंक्चर काढणारा होता, तासाभरात गाडीचं चाक जागेवर..

सव्वापाच साडेपाचच्या दरम्याने परत पुढे निघालो, आता परत काटता येईल तेवढं अंतर जायचं होतं, मूळ कार्यक्रमानुसार आज अजमेर(Ajmer)ला मुक्काम करायचा होता, पण अर्धा दिवस मागेच होतो.. सुदैवाने दर तीन दिवसांनंतर एक राखीव दिवस होता, म्हणून थोडा निश्चिंत होतो, इथे ठीक आहे, श्रीनगर(Srinagar), कारगील(Kargil), लेह(Leh) याठिकाणी हॉटेल आधीच बुक केली होती, जर तिथे एक दिवस उशिरा पोचलो तर गडबड होणार होती, उद्या अजमेर(Ajmer) पासून परत शेड्यूल गाठायला पाहिजे. सर्व ठरवताना वाटेत वाया जाणारा वेळ गृहीत धरला नव्हता, ( फोटो / चुकामुक / पंक्चर / इ.इ.) रस्ता शोधण्यात पण वेळ गेला. एक दिवस हातात आहे हे ठीक, पण ही सवय चांगली नाही.

अजमेर(Ajmer) शक्य नाही हे कळल्यावर पण दिवसाचा उजेड आणि पोटात गेल्यावर गप्प बसलेल्या दालबाटी मुळे पुढे जाता येईल तितकं जायचं असं ठरवून निघालो, हींमतनगर जवळ एका टपरीवर मस्तपैकी चहा घेतला, आणि उदयपूर(Udaipur)च्या दिशेने निघालो, ह्या हींमत नगरच्या चहाची पुढे दररोज मिळणाऱ्या चहा बरोबर तुलना होत राहिली. एकदम झकास!!

दररोज संध्याकाळी गाठणारा पाउस अजून आला नव्हता, त्यामुळे उजेडही बऱ्यापैकी होता, घोडबंदर रस्त्यावरून रा.मा.८(NH08) – मुंबई – आग्रा(Mumbai – Agra) रस्त्यावर गुजरात(Gujarat) चालू झाल्यास एकही खड्डा- खराब रस्ता दिसत नव्हता, चौपदरी रुंद रस्ता, शिस्तीत एका पाठोपाठ जाणारे अवजड माल नेणारे ट्रक, त्यामुळे मी सुध्दा ८० -९० ने गाडी पळवत होतो, ( म्हातारी – म्हातारी म्हणून टीका केलेली माझी Black Princes सुसाट पळत होती, हींमतनगर जवळ एक लक्षात आलं, हातखंब्यात १८ लिटर(18 Ltr) पेट्रोल भरल्यावर ९०० किमी(900km) झाल्यावर मी पेट्रोल भरलं, संजूची ‘अपाचे’ १४ लिटरची, म्हणून त्याने बडोद्याजवळच भरलं, राहुलने अहमदाबाद जवळ, म्हणजे माझी म्हातारीच कमी पेट्रोल मध्ये जास्त कि.मी पळत होती, वेग थोडा कमी का असेना ? बरं वाटलं!!

स्वागतम – वीर भूमि मेवाड , राजस्थान

संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास गुजरात(Gujarat) ओलांडून राजस्थान(Rajasthan) मध्ये प्रवेश केला, परत एकदा चहा ढोसून उदयपूर(Udaipur) कडे निघालो, संजूच्या गाडीचा परत काहीतरी प्रोब्लेम झाला.. मागचा ब्रेक लावल्यावर अख्ख चाक हलायला लागलं, म्हणून जरा हळू झालो, ठरवल्याप्रमाणे मुक्काम जवळ आल्यावर पावसाने सुरुवात केली, सरळ रस्ते आणि आडवा- तिडवा आलेला पाउस, वैतागून उदयपुर(Udaipur) आल्यावर समोर दिसलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला…

क्रमशः

Leh Ladakh Diaries – Part 4

दिवस चौथा – १२ जुलै २०१२

आजचा राखीव दिवस वापरून ठरल्या वेळेला अजमेर मुक्कामी पोचता येणार होतं, म्हणून जरा आरामातच होतो, उदयपुर(Udaipur) चं हॉटेल एकदम मस्त.. म्हंटलं तर शहरात – म्हंटलं तर बाहेर, पण शांत..

हॉटेलपासून जवळ TVSची शोरूम होती, सकाळीच संजू गाडी घेऊन तिकडे गेला, इकडे तिकडे भटकताना मला बजाजची शोरूम दिसली, मी माझी गाडी तिकडे नेली, महाराष्ट्रातून लेह(Leh) ला जातोय ऐकून त्यांनी लगेच गाडी चेकिंगला घेतली, मला, राहुलला चहा दिला, दहा मिनिटात ब्रेक, तेलपाणी बघून, “पुरी दुनिया आरामसे घुमो!!” असा झकास आशीर्वाद दिला,
आणि मजुरी तीस (३०/-)रुपये मात्र !!
“हमारा बजाज..!!”
त्यांनी दिलेल्या फीडबॅक फॉर्म वर मग मी त्यांना भरपूर मार्क दिले.

” हमारा बजाज..!!”

इकडे संजूच्या गाडीचं मागच्या चाकाच्या डिस्क ब्रेकचं बुशिंग गेलं होतं, काल पंक्चर काढताना त्या टायरवाल्याने काहीतरी गडबड केली असणार, ते (बुशिंग रू. ६००/- मात्र) बदलून मिळेपर्यंत दुपारचे १२ वाजले, मग निघालो.

वाटेत नाथद्वारा – राजसमंद नंतर हळदीघाटी लागली..
मेवाड – मारवाड / उदयपुर – जयपूर वेगळा करणारी डोंगररांग..
निसर्ग पण कसा समतोल साधत असतो नां?

YIN YAN चं चक्र आठवलं..
भूमी एकच … पण एका पर्वत रांगेमुळे मनोवृत्तीत किती फरक…
मेवाडचा जाज्वल्य धर्माभिमान एकीकडे..

तर दिल्लीश्वरांना लेकी बाळी देऊन व्यापार उदीम आणि सुबत्ता मिळवणारा मारवाड दुसरीकडे….
राणा प्रतापच्या इतीहासाने पावन झालेली ही भूमी..ह्या पवित्र भूमीतून जाताना पण अंगावर शहारा आला…
हल्लीच्या मुलांना ‘मेवाड’ म्हंटलं की आईस्क्रीम फालुदा आठवतं,राणा प्रताप नाही..
हे दुर्दैव, घाटीत सुद्धा इतिहासाची साक्ष असणाऱ्या जुन्या इमारतींवर जाहीराती, ट्रीप मधून आलेल्या मुला-मुलींची नावे असंच दिसत होतं….

भगवान एकलींगजीच्या साक्षीने घडलेल्या इतिहासाला आपण विसरतोय हे नव्या पिढीचं दुर्दैव तर आहेच, पण जुन्या पिढीचं अपयश देखील आहे. इतिहास पुढच्या पिढीकडे पोचणार कसा??

हळदीघाटी

९ तारखेला कशेडी घाट, आणि कर्णाळा सोडल्यानंतर आलेला पहिलाच “घाट” रस्ता. जरा बरं वाटलं, घरच्या सारखं…

अजमेर गाठायची घाई असल्याने घाटीत जास्ती वेळ न थांबता पुढे निघालो, पण मनाशी हे ठरवूनच.. की निदान इथे तरी परत यायचंच..!!

घाटी संपल्यावर हळू हळू संगमरवरी दगडांच्या वाहतूक करणारे ट्रक दिसू लागले, प्रत्येक ट्रक मध्ये एकच मोठा ठोकळा… अवजड.. सरळ रस्त्यावर सुध्दा रेंगाळत जाणारे ट्रक बघून त्यातल्या वजनाची कल्पना येत होती.चार साडेचार ला पोटपूजा करून परत गाड्यांचे कान पिळले….साधारण रात्री साडे नऊ च्या दरम्यान अजमेरला पोचंलो…

अजमेर जसं ख्वाजा गरीब नवाज साठी प्रसिध्द आहे, तसं तिथल्या ‘पुष्कर’ सरोवरसाठी देखील, त्यामुळे शहरात मिश्र वस्ती आणि मिश्र पर्यटकांचे लोंढे… वाटेत थांबून एकाला रात्रभर राहण्यासाठी चांगलं ठिकाण कोणतं ? असं विचारलं … त्यांनी अंदाज घेतला की हे दर्ग्याला जाणार की पुष्कर ला.????…थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं ” लोढा हवेली” …. चला… वाटेत लोढा हवेली चा जप करत करत शहरात घुसलो… आणि लोढा हवेलीशी पोचलो….रात्रीचे साडे दहा वाजले होते..

लोढा हवेली

जुन्या प्रशस्त हवेली मध्ये आता काळानुसार बदल करून पुष्कर तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून लोढा परिवाराने दान केलेली एक हवेली, पूर्वापार वापर सराय ( धर्मशाळा ) म्हणून …पण ‘धर्मशाळा’ म्हंटल्यावर नजरेसमोर जे चित्र उभं राहतं ते चुकीचं ठरवणारी ही हवेली…

आम्ही पोचलो तेंव्हा सुमारे ४० चारचाकी गाड्या मधल्या चौकात उभ्या होत्या, आमच्या दुचाकी त्यात आरामात राहतील म्हणून खोली दिली, पण नाव नोंदणी करताना नाव- गावं- मुलुख – जात – गोत्र – कुठून आलो- कुठे जाणार- किती जण – शाकाहारी आहोत ना- इतक्या चौकश्या झाल्या.( रजिस्टर वर खरंच इतके रकाने होते… ) तिघांच्या ड्रायव्हिंग लायसंस् ची झेरॉक्स पण घेतली… मजा वाटली.

प्रशस्त – आरामदायक खोली, सुंदर गरमागरम जेवण.. खरं तर जेवणाची वेळ संपून गेली होती, पण तो दयाळू खानावळवाला ‘नाही’ म्हणाला नाही….आम्हाला वाढून त्यांनी परत कामगारांसाठी भात लावला…. जेवणं झाली.. अजून काय हवं ? दिली ताणून मग… ९ तारखेला निघाल्यापासून आज ठरलेल्या मुक्कामी पोचलो होतो, ( खरं तर एक दिवस उशिरा.. ) पण रात्री मिळणारी विश्रांती पुरेशी असल्याने हा दिवस भरून काढता आला.

क्रमशः

Leh Ladakh Diaries – Part 5

दिवस पाचवा – १३ जुलै २०१२

सकाळी जाग लवकर आली, अजमेरच्या दर्ग्याला जाणाऱ्यांची लगबग रस्त्यावर दिसत होती, काहीजण ‘पुष्कर’ ला जायच्या तयारीत… आम्हाला वेध लागले होते ते पानिपतचे. विश्रांतीचा दिवस वापरून अजमेर गाठल्याने आधी ठरवल्या प्रमाणे गाडी नीट तारखांच्या गणितात आली होती, आता परत ३ दिवस प्रवास..!!

रात्री लक्षात आलं नाही, पण लोढा हवेली म्हणजे एक भुईकोट गढीच होती… उंचच उंच भिंती – मजबूत प्रवेशद्वार .. पण एकच…कदाचित दुसरा मार्ग नसावा… नकळत माझ्या मनात शिवाजी महाराजांचं ‘आज्ञापत्र’ आलं..
महाराज म्हणतात, “गडाला एकच दार हा ‘ऐब’- (दोष ) पळाची ( पळायची ) वेळ आली तर दुसरी योजना (वाट) हवी.”

स्वत:च्या सैन्याचं नुकसान न होऊ देता ‘माघार’ घेणं हा एकप्रकारे शत्रूवर मिळवलेला विजयच असतो, हे रजपूत राजांना समजलं असतं तर मेवाड- मारवाडचा इतिहास वेगळा दिसला असता….असो..

दर्ग्याला आलेल्या ३ / ४ महाराष्ट्रीयन गाड्या हवेलीत दिसल्या, पण त्यापैकी कोणी बोलायच्या मनस्थितीत दिसले नाही, आम्ही पटापट सर्व सामान गाडीवर लावून पानिपतच्या रस्त्याला लागलो.

लोढा हवेली प्रवेशद्वार

अजमेर बाहेर पडल्यावर तासाभराने पोटपूजा करून घेतली, आता रस्त्यावर बहुतेक सर्व वहातूक ही संगमरवर – मार्बल च्या ट्रकची होती. दहा- बाराचाकी अवजड ट्रक – त्यात भरलेला एकच मोठा – क्वचित दोन दगडी ठोकळे… खाणीतून कारखान्यात ह्या दगडाच्या लाद्या करायच्या आणि लाद्या भरलेले ट्रक परत व्यापाऱ्यांकडे….

वहातूक इतकी, की आपल्याकडे बैलगाडीमुळे जशी जमिनीत चाकोरी तयार होते तशी ह्या ट्रकच्या रहदारीने चक्क डांबरी रस्त्याला चाकोरी तयार झाली होती. वाटेत बऱ्याच ठिकाणी उलटून पडलेले / कलंडलेले ट्रक दिसत, एकदा तो ठोकळा रस्त्यात पडला, की तो परत उचलत नाही कोणी.. कारण ते वजन उचलायची क्रेन एक तर खाणीत, किंवा कारखान्यात..

सकाळी साडेअकरा बारा च्या दरम्यान किशनगढ लागलं, मार्बल ची मोठी बाजारपेठ…रस्त्याच्या दुतर्फा साधारण १२-१४ किलोमीटर फक्त मार्बल आणि मार्बल..मग त्यात बाकीचे प्रकार पण आले… पण एकही हॉटेल दिसलं नाही… भरपूर पुढे गेल्यावर टपरी सापडली..चहा- बिस्कीट पोटात ढकलून जयपूरचा रस्ता धरला…

ह्या प्रदेशात रस्त्याच्या बाजूला बघण्यासारखं जास्ती काही नाही, थोडी वाकडी वाट करून जायची आमची तयारी नाही… मग काय तर… पिळा गाडीचा कान… दुपारी जयपूर मागे पडलं, परत एकदा चहाचा राउंड झाला, खाणं झालं… रत्नागिरीतून निघताना शेखर म्हणाला होता, तुझे हाल होणार कारण संजू पाटील चहा पीत नाही..
( तसा संजू पाटील रत्नागिरीत मोबाईल पण वापरत नाही, निघायच्या आधी त्याला घरच्यांनी जबरदस्तीने मोबाईल घेऊन दिला ) पण संजूला माझा वाण नाही पण गुण लागला, आणि तो पण माझ्याइतका नाही पण थोडा “चहाबाज” झालाच !!

जयपूरच्या ट्राफिकमधून बाहेर पडायचं दिव्य आटोपल्यावर परत सरळ रस्त्यावर सुसाट निघालो होतो, आज काहीही झालं तरी पानिपत ला पोचायचं होतं, त्या प्रमाणे साधारण चारच्या दरम्यान शहाजहानपूर जवळ रा.मा.८ सोडून हरियाणा राज्यात प्रवेश केला, १० जुलैला घोडबंदर पासून ह्या रस्त्याने आमची सोबत केली होती, ती संपली….चार दिवस बिन खड्ड्याच्या रत्यावर गाडी चालवायला मज्जा आली.

हरियाणा मध्ये आपलं स्वागत आहे..

हरियाणा चालू झालं, आणि वाटेत सर्वत्र खांद्यावर कावड घेतलेले “कावडीये ” दिसायला सुरुवात झाली, उत्तरभारतीयांचे पंचांग १५ दिवस पुढे… त्यामुळे त्यांचे महिने पौर्णिमा ते पौर्णिमा… त्या प्रमाणे श्रावण चालू झाला होता..प्रत्येक गावातून खांद्यावर कावड घेऊन कावडीये हरिद्वारहून गंगा आणायला निघाले होते एका श्रावण सोमवारी भोलेनाथाला गंगाआभिषेक केला की मनोकामना पुरी होते ही श्रद्धा… एकच उत्साह…

आम्ही महाराष्ट्रातून आलोय कळल्यावर होणारं कौतुक स्वीकारत पुढे निघालो….नवीन चौपदरी रस्त्यांचं काम चालू होतं… त्यामुळे अनेक पर्यायी मार्ग.. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे बूट आणि ब्यागा भिजवायला येणारा पाउस, आणि सुपीक मातीचा सामानावर बसलेला चिखल…
रात्री साडेआठला पानिपत – दिल्ली महामार्गावर एक हॉटेल गाठून मुक्काम केला…..

क्रमशः

Leh Ladakh Diaries – Part 6

दिवस सहावा – १४ जुलै २०१२

सकाळी ९ – ९.१५ ला खोली सोडून बाहेर पडलो, सर्व सामान गाडीवर व्यवस्थित लावेपर्यंत साडेनऊ झालेच.. सामान बांधायचे ऑक्टोपस तुटत होते, गाठी मारून मारून लहान होत होते.. दररोज बाजारपेठेत नवीन घ्यायचे असं ठरवत होतो.. पण ते माकडाच्या घरासारखं राहून जात होतं.

चंदिगढ – दिल्ली महामार्गावर निघालो, अर्ध्या पाऊण तासाने कर्नाल जवळ धाबा बघून थांबलो, आलू पराठे (प्राठा) आणि छास.. सुजलाम सुफलाम पंजाब – हरियाणा आल्याची जाणीव झाली, पोटभर ब्रेकफास्ट झाल्यावर बाहेर आलो, तर चार सरदारजी गाड्यांशी उभे… ‘की हाल ..”वगैरे झाल्यावर सहजच पण थोड्याश्या काळजीने म्हणाले, की तशी चिंता नाही, पण गाड्या महाराष्ट्रातल्या आहेत, सामान बांधलं आहे, गाड्या सोडून लांब जाऊ नका, गाड्या दिसतील अश्या जागीच थांबा.. “सामान्य माणसं एक दोन दशकापुर्वीच्या पंजाबातल्या घडामोडींमुळे पोळली होती हे जाणवलं… त्यांच्या शुभेच्छा घेऊन पुढे निघालो…

दुपारी साडेबारा एक ला ‘अंबाला’ गाठलं… संजूची गाडी परत एका टी व्ही एस च्या सर्विस सेंटर मध्ये दाखवली, तासाभराने पुढे निघालो..आज पठाणकोट गाठायचं होत, तिथे आर्मी कॅन्टोन्मेंट मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, रस्ता पण मस्त होता.. सुसाट निघालो…

दुपारी ३ च्या दरम्यान हरियाणा संपून पंजाब मध्ये प्रवेश केला, सकाळचे ‘प्राठे’ आता जिरले होते, म्हणून साडेचारच्या दरम्यान थांबून परत खादाडी केली, आणि निघालो..

संध्याकाळी पाऊस शिडशिडायला सुरुवात झाली, बघता बघता अंधार झाला आणि परत संजू मागे पडायला सुरुवात झाली, अंधार असल्यामुळे एकत्रच जात होतो, तरी अंतर पडत होतं… थोडंसं ट्राफिक, हेडलाईट, डायव्हर्जन… आठ च्या दरम्यान चहा प्यायला थांबलो, आणि संजूने सांगितलं..” अधून मधून गियर बदलायला त्रास होतोय, चौथा आणि पाचवा गियर पडत नाहीये…. देवा रे… पठाणकोट आणखी ७० की.मी. लांब होत.. म्हणजे दीड तास..

पण ह्या गीयरच्या भानगडीने आणखी वेळ लागणार, हे गृहीत धरून जेऊन घ्यायचं ठरवलं.. हॉटेलवाला खुष.. चहाचं गीर्.हाईक जेऊन जाणार.. त्याने पटापट रोटी आणि मिक्स सब्जी बनवली.. जेऊन निघेपर्यंत नऊ झाले…. आणि पठाणकोट गाठेपर्यंत पावणेअकरा.. पठाणकोट गाठल्यावर संजूने सांगितलं.. चौथा आणि पाचवा गियर पडतच नाहीये, सगळा रस्ता तिसऱ्या गीयरमध्ये चालवली…

हे भगवान… भरीत भर म्हणजे मुक्कामाचं ठिकाण पठाणकोट शहरापासून १२ किमी अंतरावर होतं…. “मामून” कॅन्टोनमेंट….. तिथला माणूस इतक्या अदबीने उत्तरं देत होता की रात्री अकरा – सव्वा अकराला त्याला फोन करणं जिवावर येत होतं… त्याने सांगितल्याप्रमाणे डावीकडे… उजवीकडे…. पुलाखालून….. असं वळत साडेअकरा वाजता ‘मामून’ च्या गेट शी पोचलो…..

आधी सगळाच मिलिटरी खाक्या… त्यात परत रात्रीची वेळ…गेटवर सांगितलं.. आमची आत रहायची व्यवस्था केली आहे…त्यांनी शांतपणे गाडी पार्कींग कडे बोट दाखवलं… गाड्या तिकडे उभ्या करून आल्यावर परत चौकशी…ज्याने माझी व्यवस्था केली तो माझा भाऊ दिल्लीत .. त्याला फोन…..त्याच्या युनिटची चौकशी आणि खात्री… त्याने ज्याच्या करवी बुकिंग केलं तो आग्रा कॅन्ट. मध्ये … मग त्याला फोन… परत त्याच्या युनिटची चौकशी.. खात्री करून परत माझ्या भावाला दिल्लीला फोन…

प्रत्येक संभाषणाची सुरुवात “जयहिंद साब… माफ करना…” आणि शेवट जयहिंद साब … गुड नाईट ” असं झाल्यावर आतमध्ये रिसेप्शन ला फोन… कमरा नं.५ के मेहमान आये है… हुश्श… मग आमच्या तिघांच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी… झेरॉक्स नाही.. ओरिजिनल… घ्या बाबानो…सकाळी आठवणीने परत द्या म्हणजे झालं….पण आता झोप आलीय…सगळे सोपस्कार होईतो सव्वाबारा वाजले आणि आम्ही “मामून” च्या गेटमधून आत गेलो..

पण मिलिटरी एरियात राहणं एवढं सोप्प नव्हतं… “मामुन” हे भारतातलंच नाही तर आशियातलं एक मोठ्ठ मिलिटरी स्टेशन आहे… शोधा कमरा नं. ५ !!! रात्री सव्वा बारा वाजता नक्की कुठे जायचं हे माहीत नसताना कॅन्टोन्मेंट च्या रस्त्यावर आम्ही येड्या सारख्या गाड्या चालवत होतो.. शेवटी एक जवान सायकल चालवत आला… बहुतेक रिसेप्शन वरून पाठवला असणार.. आम्हाला रस्ता दाखवून निघून गेला.. पण चेहेऱ्यावरचे भाव तर.. “हल्ली कोणीपण आत रहायला येतं..!!” असे..

आत पोचल्यावर नाईट ड्युटीवरच्या माणसाने स्वागत केलं.. प्रवास कसा झाला.. त्रास नाही नां… मग माफी मागून परत सगळे प्रश्न…परत दिल्लीला फोन… मग परत आग्र्याला …. परत दिल्लीला….. बाहेरच्या विश्वाशी ह्यांचा काहीही संबंध नाही… गेट मधून आलेत… त्यांनी चौकशी केली असेल .. असा हलगर्जी पणा नाही.. काही देणं घेणं नाही… मी माझं ठरलेलं काम करणार…

पण कौतुक म्हणजे दिल्लीतला माझा आतेभाऊ असो.. वा त्याचा आग्र्यातला मित्र… रात्री साडेबारा वाजता देखील दोन किंवा तिसऱ्या रिंगला फोन उचलला जात होता.. “कशाला सारखा फोन करताय… एकदा सांगितलं नां…. ” वगैरे नाही… दरवेळेला प्रश्न विचारणाऱ्या ‘लान्स नाईक’ ला दोन्ही ‘ले. कर्नल’ शांतपणे उत्तरं देत होते…. ह्या सोपस्कारात पाऊण वाजला..

“ज्यांच्या साठी बुकिंग केलं ते आम्हीच ” ह्याची खात्री व्हाया दिल्ली – व्हाया आग्रा पटवून झाली…
बोलताना डझनभर वेळा माफी मागून झाली…आणि एकदाची खात्री पटली… चला.. कमरा नं, ५…!!!
.
.
.
मोहरीचा दाणा देखील टेनिस बॉल एवढा स्पष्ट दिसेल अशा चकचकित पांढऱ्या शुभ्र फरशीवर आम्ही चिखलाने माखलेल्या बॅगज् आणि बूट टेकवले तेंव्हा रात्रीचा एक वाजला होता..!!

क्रमशः

दिवस सातवा – १५ जुलै २०१२

सकाळी ६.३० लाच दरवाजा हलकेच ठोठावून रूम अटेन्डट चहा घेऊन आला..
टेबलावर चहा – बिस्किटं ठेवून ब्रेकफास्ट काय व किती वाजता हवा त्याची चौकशी…माझ्या आणि त्याच्याही डोक्याला फारसा त्रास न् देता मी उत्तरेतला युनिव्हर्सल ब्रेकफास्ट आणायला सांगितला…
आलू पराठे, दही आणि चहा …. ८ वाजता….
एक एक जण आवरात असताना खोलीवर नजर टाकली आणि जाणवलं, केवळ मिलिटरीतले अधिकारीच जिथे राहतात, तिथे रहायला मिळणं हे किती भाग्याचं होतं..
एका बाजूला रायटिंग टेबल, त्या बाजूला भिंतीत छोट बुकशेल्फ, त्यात डिक्शनरी, World Atlas, भारताचा नकाशा, टेबलावर एक डायरी, त्यात एसटीडी कोडं सहित महत्वाच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर, एक रायटिंग पॅड, नीळं, काळं, लाल पेन व शेजारीच एक्स्ट्रा रीफिल्स , पेन्सिल, अशी जय्यत तयारी…
आलेल्या साहेबाला काय लागेल ते सर्व…
पण सर्वात सुंदर व कोणत्याही सेव्हन स्टार हॉटेलात देखील न् दिसणार्.या एका गोष्टीने पटकन डोळे पाणावले….
हे फक्त भारतीय सेनाच करू शकते… काय होतं ते ??
तर एका ए फोर साईझ मध्ये छापली होती ती त्या रूम अटेन्डटची माहिती…
तो केवळ रुमबॉय नाही तर तो भारतीय सेनेतला एक सन्माननीय आणि प्रशिक्षित जवान आहे याची जाणीव तिथे रहाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला – अधिकार्.याला व्हावी यासाठी त्याची माहिती, हुद्दा, त्याचं घर कुठे आहे, त्याच्या घरी कोण कोण आहे, मुलं केवढी आहेत, कितवीत शिकत आहेत याचा सविस्तर तक्ता नीट छापून – लॅमिनेट करून “KNOW YOUR ROOM BUDDY” म्हणून त्या रायटिंग टेबलवर ठेवली होती, त्याच्या घरच्या फोन नंबर सहित…..

बरोब्बर आठ वाजता परत दारावर टकटक झाली, ” रूम बडी” ट्रे घेऊन आला होता, ते कार्ड वाचून झाल्याने आम्हा तिघानाही थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं, त्यालाही आमच्या बरोबर खायचा आग्रह केला, पण नकार मिळणार हे जाणवत होतंच..
मग चहाचा कपच त्याच्या हातात दिला, शेजारच्या बंगल्यात उत्तर विभागाचा मोठा ऑफिसर उतरला असल्याने तो थोडा धावपळीत होता, पण चहा पिताना त्या कार्ड बद्दल विचारलं….तेव्हा म्हणाला,”हां…कभी कभी कुछ साब लोग घर पें फोन करके बात करते है… खैरियत पूछते है…. हमारी बताते है…. हमें भी अच्छा लगता है…”
“अब दो महिने के बाद मै फिल्ड पर जाउंगा…फिर बात नही हो पायेगी…”

आवरून साडे आठ ला गाड्यांना किक मारल्या…आज तर संजूचा सेकंड गियर पण पडत नाहीये… बाहेर पडून लगेच ग्यारेज शोधावं लागणार…
बाहेर मेन गेट शी पोचंलो, तर लायसन्स मिळेनात…
काल ड्युटी वर कोण होता.. त्याला बोलवा.. कुठे ठेवलीत… तिथेच कप्प्यात…
कोणी सांगितलं ते “मान” बघत होता पहाटे…
आता मान गायब…. मग त्याला फोन लावा…
देवा रे… नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न…..
लागला फोन… येतोय…
एक मान आडनावाला न् शोभणांरा उंच – शिडशिडीत सावळा जवान – मुलगा पळत आला,”गाववाले नमस्कार, मी जयंत माने, सातार्.याचा …
“व्वा !! मानेचा “मान” झाला होता तर…
“पहाटे बघितली लायसन्स, तुमासनी भेटायचं होतं म्हणून माझ्याकडेच ठेवली.. ही घ्या.. चला .. पोहे केलेत…
“नको रे बाबा… आधीचं गाडीची गडबड झालीय…
“”त्ये हुईल हो…. चला…
कशीबशी त्याची समजूत काढून पोह्यावरून चहा पर्यंत आणला…
संजूने तो पर्यंत पार्कींग मध्ये चक्कर मारून दोन T V S च्या गाड्या शोधल्या होत्या..
Elementary Watson…!!! इथे गाड्या विकतात म्हणजे सर्विस स्टेशन असणार…
“युरेका” .. अरे.. यां मानेंनी चक्क “महालक्ष्मी टी व्ही एस” चा पत्ताच दिला की..

माने आणि मेन गेट वरच्या बाकीच्यांचा निरोप घेतला तेव्हा सव्वा नऊ झाले होते…
आणि साडेनऊ ला आम्ही ” महालक्ष्मी टी व्ही एस” च्या शो रूम शी उभे होतो…
“SUNDAY CLOSED” चा बोर्ड वाचत…
पण नंतर जे झालं ते केवळ अन् केवळ एखाद्या साऊथ किंवा हिंदी पिक्चर मध्ये शोभणांरं….
शो रूम च्या वरच्या मजल्यावरून एक माणूस आमच्या अस्वस्थ हालचाली बघत होता…
“क्या है बेटा??”
“गाडी खराब हुई है…महाराष्ट्र से आये है… लेह जाना है…” संजू ब्रेथलेस …
” अच्छा !!! पीछे के दरवाजे पें आओ… अंदर बच्चा है वो देखेगा…”
मागच्या दारात अर्ध शटर उघडून एक ४०- ४५ वयाचा “बच्चा” माणूस आत एक नवीन स्कुटी पेपची जोडणी करत होता, गार्ड्स, फुटरेस्ट वगैरे सामान आजूबाजूला काढून ठेवलं होतं… साईड पँनेल काढून इंजिनशी खुडबुड चालू होती…
“हां जी ? “वो उपरवाले साब बोले गाडी दिखाने को….बाबुजी अमृतसर गये नहीं ? निकलते हि होंगे…आप रुको… ये गाडी का P.D.I. है, वो होने के बाद देखुंगा…. ग्यारह बजे तक आ जाओ घुम के…
“नही.. यहीं रुकते है…”( ९.३५ झाले होते… तू गायब झालास तर??)
बैठ जाओ फिर आराम से… ये गड्डी कल देणी है… आज ओके कर देता हुं…
दहा मिनिटांनी ते ग्यालेरीतले ” बाबुजी” तयार होऊन खाली आले…
“बेटा.. मेहमाण महाराष्ट्र से आए है…चाय पिला दे.. गड्डी ठीक कर देना… स्पेअर लगे तो शिव को बुला लेना.. लेकिन उसे ज्यादा देर रोकना मत… मै शाम ताक वापस आता हुं….नही तो तू लॉक लगाके निकल जाना…”
आम्हाला हात दाखवून निघून गेले… बोलण्यात कुठेही आज रविवार… सुट्टीचा दिवस…माणसं नाहीत… स्पेअर मिळणार नाहीत… वगैरे नकारात्मक असं काही नाहीच…….
“बेटा ठीक कर देगा… ” तुम्ही निश्चिन्त रहा…”नंतर खरोखरंच आम्ही तिथे अस्तित्वात नसल्या सारखं तो आणि त्याच्या हाताखालचा मुलगा काम करत होते.. कुठेही टंगळ मंगळ नाही… टाईमपास नाही…पावणे अकराला त्याने चकाचक केलेल्या स्कुटी ला किक मारली… एक चक्कर मारून आला ! ओके !शांतपणे हात वगैरे धुउन पाणी प्याला आणि मग संजूला म्हणाला, दे देओ चाबी… गाडी चालू करून दोन मिनिटं तो फक्त गाडीचे आवाज ऐकत होता.. मग चक्कर टाकून आला..”अगर मै गलत नही हुं तो गिअर शिफ्टर का बेअरींग टूट के इंजिन मे फसा है.. ” चलो .. खोल के देखते है..!!

वर्कशॉप च्या घड्याळात बरोब्बर अकरा चे ठोके पडत होते…मग चालू झालं ते एका निष्णात सर्जन चं काम….एका छोट्या बाकड्यावर ट्रे मध्ये टूल बॉक्स मधली निवडक हत्यारं आली….शेजारीच दुसरं लांब बाकडं आलं…. त्यावर अलुमिनियमचा तेल खाऊन चकचकीत झालेला रिकामा ट्रे…गाडी एलिव्हेटेड ऱ्याम्प वर घेऊन पेट्रोल टाकीवरची फायबर वींग, टाकी इ. पसारा झटक्यात उतरवला गेला…इंजिन आणि गिअरबॉक्स पण पाच मिनिटात खाली आला, पण हे सर्व होताना निघालेले नट- बोल्ट्स हे क्रमाने त्या रिकाम्या ट्रे मध्ये मांडले जात होते… हत्यारांचा बाक रिकामा होत होता, आणि लांबडा बाक भरला जात होता… पण कुठेही अस्ताव्यस्तता नव्हती… नीट शिस्तीत काम चालू होतं….गिअर बॉक्स उघडला आणि मेस्त्रींच्या चेहऱ्यावर हसू आलं… आत्मविश्वासाच..!!
आतल्या बेअरींग ची पार काशी झाली होती…बेअरींग चे बॉलस् विखुरले होते… त्यातले दोन चार गीअरव्हील्स मध्ये अडकून फुटले होते..डॉक्टरनां आजार बरोब्बर समजला होता… आता उपचार चालू….एका कागदावर पंजाबीत लिहिलेली काहीतरी लिस्ट तयार झाली… आणि मग स्पेअरपार्ट वाल्या शिव ला फोन लागला.. “हां भाई, मै…. अच्छा ?…. बाबुजी ने बताया था ?…. आ जाओ फिर….. ओके.. बीस मिनट..”

तो वीस मिनिटांनी येणार… तो पर्यंत एक चहाचा राउंड झाला…… साडेबारा वाजले होते…..आम्ही तिघं शिवची वाट बघत बाहेर गाड्याजवळ बसून राहिलो….पंधरा मिनिटानी एक कार बाहेर येऊन थांबली…आतून एक शेरवानी घातलेला उंच तरुण उतरला….एकंदर कपडे स्वत:चच लग्न कार्य असल्या सारखे… हातात एक मिठाईचा बॉक्स ….आम्हाला “नमस्ते” म्हणून “उस्तादजी… उस्तादजी… आश्या आरोळ्या ठोकत आत गेला… ..त्या शिव चा अजून पत्ता नव्हता…..पाच दहा मिनिटांनी उस्ताद्जी त्या उंचाड्याशी गप्पा मारत बाहेर आले, त्याने जाताना आम्हाला परत हात दाखवला…. त्याला निरोप देऊन आत गेले…..परत बाहेर आले….हातात मिठाई……”लो भाई.. मिठाई खा लो…..”साजूक तुपातला एक एक लाडू पोटात गेल्यावर आम्हाला परत शिव ची आठवण आली…. हा येणार कधी… पार्ट देणार कधी….”उस्तादजी..एक बज गया…. . वो शिव कब आयेगा…. “
“अरे ? तो ये लड्डू किस बात के….
वो शिव ही तो आया था…. आज उसके बेटे का नामकरण है… उसीकी तो मिठाई ले के आया…. सब पार्ट निकाल के दिये.. चला गया..”
डोक्यात उजेड पडला…. ” स्पेअर लगे, तो शिव को बुला लेना.. लेकिन उसे ज्यादा देर रोकना मत…”
देवा रे…. एक माणूस सुट्टीच्या दिवशी, आपल्याच मुलाच्या बारश्याच्या समारंभातून उठून येऊन आमच्या साठी गाडीचे पार्टस आणि मिठाई देऊन गेला तरी आम्हाला पत्ता नाही…. “धन्य!!”
पुढच्या १० मिनिटात तयार गिअर असेम्ब्ली घेऊन उस्तादजी आणि संजू माझी गाडी घेऊन दुसऱ्या एका फिटर कडे जाऊन आले, नंतर १५ – २० मिनिटांनी उघडलेलं सगळं परत जोडायला सुरुवात झाली….गाडी जोडायला सुरुवात झाल्यावर आम्हाला पोटात कावळे ओरडत असल्याची जाणीव झाली….
उस्ताद जी नां विचारलं, काही आणू का?
“आप हो आओ…. मै तीन बजे घर खानां खाने जाउंगा…”
मग दोन गाड्यांवर तिघ जण बाजारात जाऊन छोले भटुरे खाऊन आलो… कारण आता या माणसाने तीन सांगितलं म्हणजे तीन वाजता गाडी तयार असणार हा विश्वास वाटत होता.. मग खाण्यात वेळ जायला नको..
आज परत एकदा शेड्यूल च्या मागे पडलो होतो… तीन वाजता निघून श्रीनगर गाठणं अशक्य होत…….पण जमेल तेवढं पुढे जाऊ असा विचार….पोटपूजा होताना संजू कोणाशी तरी फोन वर बोलत होता, सर्व प्रकार सांगून झाल्यावर मग … हां…. हुं…. बर् … करतो….” दोन वाजले होते… एक तास भर भटकंती करता येणार होती…
अचानक संजू म्हणाला ” अरे….. नारळ मिळतोय का बघुया…. चला… आधीच नवीन ठिकाण… त्यात रविवार… परत दुपारची जेवणाची वेळ म्हणून दुकानं बंद…. नारळ मिळणार कुठे ? किराणा वाल्याकडे नाही…. भाजी वाल्याकडे नाही… शोधून शोधून दमलो …
शेवटी एकाने सांगितले…”भाई वो कोर्नेर पें फ्रूट का ठेला है… वहां जाओ…”
तर आमच्या कोकणातलं “श्रीफळ” पंजाबात लंगडा, माणकुर वा तत्सम “तोतापुरी” आंब्यांशेजारी दिमाखात बसलं होतं… आजूबाजूला अननस, पपई डाळींब…इ. इ. …नारळ हे फळ असल्याचं आता नक्की लक्षात राहील आमच्या..!!

टाईमपास करून आलो तर उस्ताद नी गाडी वाशिंग ला घेतलेली होती…. पावणेतीन वाजता….त्यांचा जुनिअर गाडी धूत असताना त्यांनी माझी आणि राहुलची पण गाडी चालवून बघितली… धुतली…माझी काळूबाई एक नंबर !!
“पुरी दुनिया आरामसे घुमो ” दुसऱ्यांदा ऐकलं…. मस्त वाटलं…..गाड्या धुऊन होईपर्यंत संजूने आणि त्यांनी बिल – स्पेअर्स वेगळे – मजुरी वेगळी… इ सोपस्कार पूर्ण केले… तो पर्यंत बाबुजी परत आले देखील…..
त्यांच्याशी बोलताना कळालेली माहिती आणखीनच थक्क करणारी होती,आमच्या गाडीचं काम करणारा ‘उस्ताद’ – नाव नरेंद्र कुमार, हा T V S च्या नॉर्थ वेंस्ट झोन चा ( पंजाब, दिल्ली, हरियाना, राजस्थान व उत्तर प्रदेश ) सलग तीन वर्ष गोल्ड मेडल मिळवणारा मेकॅनिक होता…
ज्या स्पर्धेत या पाच राज्यातल्या सुमारे ३०० ते ५०० T V S मेकॅनिक्स चा सहभाग असायचा, गाडीचा प्रॉब्लेम ओळखणे, फास्ट डीस्मेंटलिंग आणि असेम्ब्ली वगैरेची परीक्षा !! व्वा !! खरोखर “उस्ताद !!”

बाबूजीं बरोबर फोटो व चहाचा एक राउंड झाल्यावर त्यांच्याच सल्ल्यानुसार जम्मू बायपास करून “उधमपूर” पर्यंत पल्ला मारायचा निर्णय घेतला व उस्ताद आणि बाबुजींचा निरोप घेऊन गाडीला किक मारली..!!

शहरातून बाहेर पडताना चौकात अचानक संजू थांबला… मला आणि राहुलला गाडी त्याच्या गाडीशेजारी लावायला लावली…
“रत्नागिरी अं नी स, भैय्या, आशुतोष, दाभोळकर, श्याम मानव सर, यांच्या सगळ्यांच्या एकवेळ शिव्या खाईन, पण आज हे करणार..!!”
आणि जर्किनच्या आत पोटाशी ठेवलेला नारळ काढून तीनही गाड्या आणि आमच्यावरून “ओवाळून ” काढला..!!

तिघंही न बोलता किक मारून पठाणकोट च्या वाटेला लागलो तेंव्हा साडेतीन- पावणेचार वाजले होते.
संध्याकाळी पाच वाजता “रावी ” ओलांडून जम्मू – काश्मीर या नंदनवनात प्रवेश केला आणि तासाभराने जम्मूला जाणारा रस्ता सोडून उधमपूर रस्त्याला लागलो…
गेल्या पाच दिवसातला “प्लेन्स” मधला प्रवास संपून डोंगर रांगा चालू झाल्या, वळणं – घाट्या पाहून सासरहून माहेरी आलेल्या मुलीला जसं वाटत असेल तसं वाटलं…
जम्मू काश्मीर चालू होताच “आयडिया” चं प्रीपेड कार्ड असलेला मोबाईल बंद झाला…. आता भरोसा सरकारीबी एस एन एल वर… साडेसात – आठ वाजता उधमपूर गाठलं, हाय वे वरच एक बरं हॉटेल बघून मुक्काम केला…. जेवायला जायच्या आधी श्रीनगर च्या हॉटेलवाल्याला आज पोहचू शकत नाही हे कळवलं, ते फोनची वाटच बघत होते, कारणं त्यांच्याकडे असलेला फोन लागत नव्हता , दुसरा नंबर मी दिला नव्हता… त्यांना “उद्या पोचतो ” असं सांगितलं. हॉटेल शेजारीच एका चायनीज रेस्टॉरंट मध्ये खाल्लं अन् झोपलो..!!

क्रमशः













No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...