Tuesday, April 26, 2022

पुणे ते लेह

भाग १ - पूर्वतयारी)

कुठून बरं सुरवात करावी ?
हां. साल २०११. पुण्यातील एका टूर ऑपरेटरने लडाख भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवले होते. लडाख हा भाग तोपर्यंत मला ऐकून माहित होता. इंटरनेट वापरत असलो तरी त्याचे तितके ऍडिक्शन झाले न्हवते. त्यामुळे कधीच गूगल मध्ये 'लडाख फोटोज' असे सर्च पण केले न्हवते. लडाख भाग किती सुंदर आहे हे तेव्हा पहिल्यांदा फोटोंचे प्रदर्शन बघितल्यावर समजले आणि लवकरच इकडे जायचे हे मनाशी पक्के ठरवले.

सर्वप्रथम २०१२ साली कंपनीतील आम्ही काही जणांनी मिळून लडाखला जायचे ठरवले. दिल्ली पर्यंत विमानाने जाऊन तिथून बसने मनालीला जायचे आणि मनालीतून बाईक भाड्याने घेऊन लडाख पालथा घालायचा आणि विमानाने परत यायचे. बस इतकाच प्लॅन ठरला. त्यानंतर पुढे ट्रिप संदर्भात कुणाचीच कसलीही हालचाल नाही. ते वर्ष निघून गेले. 'ठीक है यार. अगले साल जरूर जायेंगे' असे म्हणत पुढच्या वर्षीचा वादा करण्यात आला.

'अगले साल' आले. आणि २०१२ प्रमाणेच निघून गेले. 'जायेंगे. इस साल तो पक्का जायेंगे' असे म्हणून कुणीच गेले नाही.

साल २०१४. ह्या वेळी आम्ही आणि अजून दोन विवाहित जोड्या ह्यांनी मिळून जायचे असे ठरवले. पण जून महिना आला आणि काही अपरिहार्य कारणामुळे एका जोडीने रद्द केले. एकाचे रद्द होताच दुसऱ्या जोडीचे पण पाय गळपटले आणि त्यांनी पण रद्द केले. आणि मग बहुमत गमावताच आम्ही पण रद्द करून टाकले.

लडाखला पोचायला २ रस्ते आहेत.
१) श्रीनगर ते लेह - हा रस्ता अंदाजे १५ मे ते १५ ऑक्टोबर चालू असतो. उर्वरित काळ बर्फवृष्टीमुळे बंद असतो.
२) मनाली ते लेह - हा रस्ता अंदाजे जून ते सप्टेंबर चालू असतो. बाकीचे ८ महिने बर्फवृष्टीमुळे बंद.
२०१५ आणि २०१६ ला मी ह्या काळात भारताबाहेर असल्याने ही दोन्ही वर्षे पण निघून गेली. पण ह्या वर्षी मात्र काहीही झाले तरी जायचेच असा निश्चय केला. ३ जून २०१७ ही पुण्याहून निघायची तारीख ठरवली. कंपनीत दोन महिने आधीच दोन आठवड्याची सुट्टी टाकून ठेवली. अंदाजे रोज कुठपर्यंत जायचे आणि लडाख मध्ये काय बघायचे ह्याचा एक प्लॅन बनवला.

एवढ्या लांब गाडी घेऊन? त्यापेक्षा विमानाने श्रीनगरला जा. तिथे भाड्याची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन फिरा आणि विमानाने परत या.
काश्मीरला कशाला जाताय ? तिथलं वातावरण कसं आहे ते बघताय ना टी.व्ही. वर.
तिथे हवा विरळ असते. ऑक्सिजन कमी असतो. मुलाला त्रास होईल. नका जाऊ.

सल्ल्यावर सल्ले मिळत होते. एकतर मी तिथे जाऊ नये किंवा गेलो तरी पुण्याहून गाडी चालवत जाऊ नये हे सांगणारे. अर्थात त्यात चुकीचे असे काही नाही. कारण त्यामागे आपली काळजी असते. पण मी मात्र आपली गाडी घेऊनच जायचे ह्या निर्णयावर ठाम होतो. कारण असा प्रवास करणारा मी काही पहिला न्हवतो. कित्येक लोकांनी हा प्रवास लहान मुलांना सोबत घेऊन केलेला आहे. अजून एक म्हणजे विमानाने तिथे जाऊन येणे आणि तिथे भाड्याची गाडी करणे म्हणजे खर्च आवाक्याबाहेर गेला असता. तसेच मला स्वत:ला एक लांबची रोड ट्रिप करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. लडाखला जायचे ते तिथले सौंदर्य पाहण्यासाठी आणि तिथल्या असलेल्या किंबहुना नसलेल्या रस्त्यांवरून प्रवासाचा/गाडी चालवण्याचा अनुभव घेण्यासाठी. मग भाड्याची गाडी/ड्रायव्हर घेऊन त्यांच्या तालाने फिरल्यास हे कसे जमायचे?

अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे जाणारे रस्ते जेमतेम ४ ते ५ महिने सुरु असतात. रोज वेगवेगळ्या वेबसाईटवर रस्ते चालू झाले आहेत का नाही हे चेक करत बसलोच होतो. http://www.leh.nic.in/ ह्या साईटवर रस्ते चालू आहेत का बंद ह्याचा स्टेटस सतत टाकला जातो. पण त्यापेक्षा वर्गीस खान यांची http://vargiskhan.com साईट चेक करणे उत्तम. कुठपर्यंतचा बर्फ क्लिअर केलाय ? अंदाजे कधी रस्ता चालू होईल? सद्यस्थिती प्रवासास कशी आहे? ह्याची इत्यंभूत माहिती वर्गीस खान ह्यांच्या साईट वर असते.

गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी बर्फवृष्टीमुळे रस्ते चालू होण्यास उशीर होईल असे समजले. तरी देखील श्रीनगर लेह रस्ता मे महिन्याच्या शेवटी चालू होईल आणि त्यामुळे 3 जूनला निघण्यास काहीही अडचण नाही असा विश्वास वाटत होता. म्हणून २६ मे ला BSNL च्या कर्वे रोड वरच्या ऑफिस मध्ये गेलो आणि पोस्टपेड सीम कार्ड घेतले. कारण लडाख भागात BSNL आणि एअरटेल ह्यांचेच पोस्टपेड नेटवर्क आहे. त्यातही जो अतिशय दुर्गम भाग आहे तिथे चुकून चालले तर फक्त BSNL. सीम कार्ड घेऊन घरी येऊन बातम्या लावल्या तर बुऱ्हाण वाणीचा उत्तराधिकारी सबझार अहमद भट याला भारतीय सैन्याने ठार मारल्याची बातमी आली होती. अपेक्षेप्रमाणे ह्यामुळे श्रीनगर मध्ये दगडफेक सुरु झाली आणि कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे लडाखला श्रीनगर वरून जाण्याचा पर्याय बंद झाला. तर मनाली लेह महामार्ग अजून चालूच झाला न्हवता व लवकर होणार देखील न्हवता. मग शेवटी विचार करून ३ जूनचा मुहूर्त १० जून पर्यंत पुढे ढकलला. पण १० जूनला पण श्रीनगर मधील परिस्थिती तंगच होती. तर मनाली लेह महामार्ग दोन दिवसांपूर्वीच चालू झाला होता. पण तो कोणत्याही क्षणी दुरुस्तीसाठी पुन्हा बंद केला जाईल अशी सूचना होती. तसेच रस्ता खूपच भयानक कंडिशन मध्ये असून जून मध्ये शक्यतो येऊ नका अशी सूचना काही साईट्सवर होती. शेवटी १० जूनचा प्लॅन पण आदल्या दिवशी रद्द केला. ह्या वर्षी पण ही ट्रिप हुकणार असेच वाटू लागले. परत सुट्टी रद्द करून २४ ऑगस्ट ही तारीख ठरवली. BSNL चे सिम कार्ड परत करून टाकले. उगाच एक महिन्याचे बिल भरावे लागले.

२४ ऑगस्ट आला. दोन्ही रस्ते चालू होतेच. त्यामुळे निघूया, जे काय होईल ते होईल असा विचार करून निघालो. जाण्यापूर्वी २२ ऑगस्टला परत BSNL चे सिम कार्ड घेतले. सिम घेऊन ऑफिसच्या बाहेर आलो आणि अचानक माझ्या मोबाईलची रेंजच गेली. ३ आठवड्यापूर्वी कोराईगड किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा तो तिथल्या तळ्यात पडला होता पण तरीही व्यवस्थित चालू होता. आणि असा अचानक ऐन मोक्याच्या वेळी गचकला. मग एकच मोबाईल घेऊन पूर्ण प्रवास केला.

जवळ घेतलेले महत्वाचे सामान
१) खाण्याचे पदार्थ - चिवडा, बदाम, खजूर, बाकरवडी, बिस्कीट, आवळा कँडी, साखर वगैरे

२) वैद्यकीय सामान - मुलाची ताप, उलटी वगैरेची औषधे

३) बेसिक मेडिकल किट - आयोडेक्स, मूव्ह, बाम, ऍनासिन, बँडेज वगैरे

४) कोका-२०० - तिथल्या विरळ हवेचा त्रास होऊ नये ह्यासाठी कोका-२०० नावाच्या होमिओपॅथिक गोळ्या डॉक्टरने लिहून दिल्या आणि श्रीनगर पासून खायला सुरवात करा असे सांगितले. प्रवासाच्या एक दिवस अगोदर गोळ्या घेऊन आलो. ह्या गोळ्यांचा काही फायदा झाला असे वाटत नाही. मी श्रीनगर आणि सोनमर्ग मध्ये ह्या गोळ्या खाल्ल्या पण नंतर खाल्ल्याचं नाहीत. पण मला काही त्रास झाला नाही. तर नेहमी गोळ्या खाऊन देखील बायकोला थोडा त्रास झालाच.

५) कापूर - विरळ हवेचा त्रास झाल्यास थोडा वेळ कापूर हुंगायचा असे डॉक्टरने सांगितले होते.

गाडीसाठी बरोबर घेण्याचे महत्वाचे सामान -
१) पंक्चर रिपेअर किट - लडाख भागात मैलोनमैल मानवी वस्ती नाही. त्यामुळे हे किट आणि पंक्चर कसे काढायचे याचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही गोष्टी जवळ नसल्याने एका मुलाचे झालेले हाल पुढे सांगेनच.

२) पम्प - गाडीतील 12v सप्लाय वर चालणारा हवा भरण्याचा पम्प. मी हा ऍमेझॉन वरून घेतला. साधे हाताने हवा भरायचे पण पम्प मिळतात पण त्याने हवा भरायची वेळ आल्यास खूप त्रास होऊ शकतो. कारण ह्या भागात असलेल्या विरळ हवेमुळे थोडे जरी काम केले तरी थकवा येतो.

३) कपडे धुण्याच्या पावडरचे छोटे पॅकेट्स - हे गाडीसाठीच. कारण गाडी पंक्चर झाल्यास हे पॅकेट पाण्यात मिसळून ते पाणी टायर वरून फिरवतात आणि जिथे बुडबुडे येतील तिथे पंक्चर आहे असे ओळखले जाते.

४) एक लांब आणि जाड दोरी - गाडी कुठे बंद पडली तर तिला टो करता यावी ह्यासाठी.

५) गाडीची बॅटरी - जर बॅटरीची कंडिशन योग्य नसेल जर ती जाण्यापूर्वीच बदलावी. मी सहा महिन्यांपूर्वीच नवी बॅटरी बसवली होती. बॅटरी खात्रीची नसल्यास जम्प स्टार्ट केबल सोबत न्याव्यात.

६) टायर - नवीन टायर टाकून एक वर्ष झाले होते आणि त्यांच्यात थ्रेडींग चांगले शिल्लक होते. जर टायर गुळगुळीत झाले असतील तर ते बदलूनच जावे. लडाख मधील खराब रस्त्यांवर टायर खराबच होणार आहेत. मग अगोदर जाऊन येऊ नी मग बदलू असे करू नये.

७) ब्रेक पॅड्स - हे पण नवीन टाकले होते ४ महिन्यांपूर्वी.

८) क्लच प्लेट्स - व्यवस्थित होत्या. नसल्यास बदलाव्यात हे उत्तम.

९) काही जण एक-दोन लिटर इंजिन ऑइल, कूलंट वगैरे पण घेऊन जातात सोबत. पण ह्याची तुम्हाला काहीच गरज पडणार नाही असे मला चंदीगड मध्ये गाडीचे सर्व्हिसिंग करताना तिथल्या सर्व्हिस ऍडव्हायजरने सांगितले. त्यामुळे मी नाही घेतले. पण घेतलेले उत्तम.

१०) गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्र

इतर
हातोडी, इलेक्ट्रिशियन वापरतात तसली काळी टेप, एक मोठी प्लास्टिक शीट, हॅन्ड ग्लोव्हज, जॅकेट वगैरे.

प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीचे सर्व्हिसिंग अत्यावश्यक आहे. माझ्यासाठी गाडीच्या सर्व्हिसिंगचा तर मोठाच जोक झाला. सर्व्हिसिंगसाठी मी १९ ऑगस्टला पुण्यातील प्लॅनेट फोर्डच्या शोरूमला फोन करून २२ ऑगस्टची अपॉइंटमेंट बुक केली. आणि २१ ऑगस्टला शोरूम मधून फोन आला की त्यांच्याकडे संप चालू झालाय त्यामुळे सर्व्हिसिंग बंद झालेय. (आता तर प्लॅनेट फोर्डची पुण्यातील तिन्ही शोरूम बंद झालीत). मग पुण्यातील फोर्डच्या बाकीच्या शोरूमना फोन केले. पण कुठेही फोन उचलला गेला नाही. मग बाहेरच्या स्थानिक मेकॅनिक कडून सर्व्हिसिंग करण्यापेक्षा चंदीगड मध्ये सर्व्हिसिंग करू असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे चंदीगड मधील सलुजा फोर्ड मध्ये अपॉइंटमेंट बुक करून ठेवली आणि तिथे सर्व्हिसिंग केले.

'भाई. गलतीसे पाकिस्तान मत जाना. अभी भी तुम्हारी जरुरत है टीमको' वगैरे पांचट जोक मारत ऑफिस मधल्या सहकार्यांनी प्रवासाला शुभेच्छा दिल्या. सगळे सामान डिकीत टाकले. जोडीला लॅपटॉप, कॅमेरा, ज्यादाची हार्ड डिस्क घेतली. गाडीचा ट्रिप मीटर शून्यावर सेट केला आणि अखेरीस २४ ऑगस्टला रात्री ९ वाजता पुण्याहून प्रवासाची सुरवात झाली.

https://www.misalpav.com/node/41490

भाग 2 - पुणे ते शामलजी

२४ ऑगस्ट
तर रात्री ९ ला पुण्याहून (कोथरूड मधून) निघालो आणि लगेच चांदणी चौकातून बायपासवर गेलो. आजचे लक्ष होते फक्त १३५ किमीवर असलेले नवी मुंबईतील कोपरखैरणे. रस्त्याची मुंबईहून पुण्याकडे येणारी बाजू वाहनांनी खचाखच भरलेली होती. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी अपेक्षितच होती. साडेनऊच्या सुमारास एक्सप्रेस वे वर पोचलो. माझा सर्वात आवडता रस्ता. पाऊस देखील नव्हता त्यामुळे ११ ते ११:१५ पर्यंत कोपरखैरणेला पोचू असा अंदाज होता. १० च्या दरम्यान लोणावळ्याजवळ अमृतांजन पुलाच्या थोडे अलीकडे पोचलो तर पुढे सगळ्या गाड्या थांबलेल्या. जवळपास १० मिनिटे झाली तरी गाड्या काही पुढे सरकेनात. काही लोक मग पुढे जाऊन काय झालेय ते बघून आले तर अमृतांजन पुलाजवळ भयानक अपघात झाला होता असे समजले. अर्धा तास थांबल्यावर शेवटी १०:३० ला रस्ता वाहतुकीस मोकळा झाला पण तरीही वाहतूक संथच होती. कारण रस्ता मोकळा होताच प्रत्येकाला पुढे जायची घाई झाली. त्यामुळे लोकांनी कशाही गाड्या घुसवायला सुरवात केली आणि मुंबईला जाणाऱ्या मार्गावर गाड्यांच्या ५-६ लेन तयार करून टाकल्या. जोडीला जोरदार पाऊस देखील सुरु झाला. हळू हळू पुढे जात असताना अपघात स्थळ दिसले. एक ट्रेलर आणि ४ कारचा अपघात झाला होता. खरोखरच भयानक अपघात झाला असणार. कारण ट्रेलरची चालकाची केबिन एका बाजूने पूर्ण चेपली होती. एका कारचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन गेला होता. इतकी चक्काचूर झालेली गाडी मी कधीच बघितली न्हवती. एक नॅनो मागच्या बाजूने निम्मी उध्वस्त झाली होती. अजून दोन गाडयांना थोडे नुकसान झाले होते. पुढे कुसगाव टोल नाका ओलांडताच गाडीने वेग पकडला आणि रात्री कोपर खैरणेला पोचलो तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते.
##################################################################

२५ ऑगस्ट
आज लवकर निघून शक्य होईल तितके अंतर कापायचे असे ठरवले होते. काल रात्री झोपायला उशीर होऊन देखील पहाटे ५:३० ला जाग आली. सगळे आवरून ७:२० ला कोपर खैरणेतून गूगल मॅप्सने दाखवलेल्या रस्त्याने निघालो. अगोदर ऐरोली टोल नाका आणि त्यानंतर अवघ्या ५ मिनिटात मुलुंड टोल नाका ओलांडला. कदाचित गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने असेल पण रस्त्यावर अजिबात गर्दी न्हवती. घोडबंदर रोड मार्गे राष्ट्रीय महामार्ग - ८ वर गेलो. जोरदार पावसाला सुरवात झाली होती. वसई बायपास, वाडा, मनोर झपाट्याने मागे टाकले. ह्या सगळ्या भागात प्रचंड हिरवळ होती.

मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग ६ पदरी आहे. पण हा रस्ता महाराष्ट्राच्या हद्दीत तितकासा चांगला नव्हता. त्याच्या जोडीला पूर्ण महामार्गावर खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे महामार्गाच्या तिन्ही लेन अडवून हळूहळू जाणारे किंवा मोठमोठ्या मशिनरी घेऊन जाणारे अगणित ट्रक.

काय आहे बरं हे?

तुम्ही हॉर्न द्या नाहीतर अजून जे काही शक्य असेल ते करा. तुम्हाला साईड दिली जाणार नाही. हे दृश्य पुढे राजस्थान ओलांडेपर्यंत कायम होते. गुजरात मधील माणसे ट्रक सोडून दुसरे कोणतेही वाहन घेत नसावेत अशी शंका यावी इतके ट्रक. महाराष्ट्र गुजरातच्या सीमा जिथे संपतात/सुरु होतात तिथल्या चेकपोस्ट वर जितके ट्रक उभे होते तितके ट्रक मी तरी आयुष्यात एका ठिकाणी कधीच बघितले नव्हते. १०:४५ च्या दरम्याने एक ब्रेक घेऊन प्रवास पुढे सुरु केला. वापी, वलसाड, नवसारी झपाट्याने मागे टाकत पलसाना गाठले. पलसाना जवळ सुरतला फाटा लागतो. इथून सुरत अंदाजे २५ किमीवर आहे. 'अगोदर सुरतला जाऊ आणि मग पुढे जाऊ' अशी कल्पना बाजूच्या सीटवरून आली. 'आपण लडाखला कमीत कमी सामान घेऊन जाणे गरजेचे आहे. परतीच्या प्रवासात आपण इथूनच येणार आहोत त्यामुळे खरेदी वगैरे येताना पाहू.' असे सांगून मी चाणाक्षपणे बेत हाणून पाडला.

३:१५ च्या दरम्याने वडोदरा आले.
वडोदराचा बायपास

वडोदराला बायपास वरूनच बाय बाय केले आणि वडोदरा-हलोल-गोध्रा ह्या गुजरात राज्य महामार्गाने प्रवास सुरु केला. रस्त्याचा दर्जा चांगला होता. फक्त रस्त्यावर जिथे जिथे मोठी मोठी गावे आहेत तिथे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग ह्यामुळे थोडी चिडचिड झाली. ह्या पूर्ण रस्त्यावर खाजगी (पांढरी नंबर प्लेट असलेल्या) कारला टोल द्यावा लागत नाही. आम्हाला गोध्राला बायपास करून पुढे लुनावडाला जायचे होते. पण आम्ही चुकून गोध्रा मध्ये शहरात शिरलो. त्यामुळे तिथे थोडा वेळ वाया गेला. रस्त्याच्या बाजूने हिरवीगार शेते, स्वच्छ नद्या दिसू लागल्या. असेच एका ठिकाणी थांबून थोडा टाईमपास केला. खालील फोटोत दिसणाऱ्या शेतांमध्ये ३-४ मोर बागडताना दिसले.

हिरवेगार शेत

संध्याकाळ झाली होती तरी अजूनही गणपतीच्या मूर्ती उंटाच्या रथामधून वाजत गाजत नेल्या जात होत्या.

संध्याकाळ

आता मुक्काम कुठे करायचा ह्याची चर्चा सुरु झाली. उदयपूर का शामलजी चर्चा होऊन अगोदर उदयपूर ठरले पण परत निर्णय फिरवून शेवटी शामलजीच फायनल केले. शामलजी मध्ये लॉज शोधण्यासाठी बस स्थानकाजवळील एका टपरीवर चौकशी केली. शामलजी मधल्या कृष्ण मंदिराची स्वत:ची व्यवस्था आहे किंवा इथे बाजूबाजूला दोन लॉज आहेत असे टपरीचालकाने सांगितले. अगोदर मंदिर पाहू मग लॉज वर जाऊ असे ठरवून मंदिरात गेलो. पण अंधार झाला असल्याने ते बाहेरून नीट बघता आले नाही. त्यामुळे उद्या सकाळी प्रकाशात पाहू असे ठरवून मंगलमूर्ती नामक लॉज गाठला. लॉजकडे पाहून आज आपल्याला निश्चित भूत दिसेल असे वाटू लागले. पण परत दुसऱ्या लॉजवर जाऊन तिथली रूम चेक करण्याची ताकद अंगात न्हवती. म्हणून मंगलमूर्तीवरच सामान टाकले. १००० रु.त A C रूम मिळाली. जेवण चवदार बनवले होते लॉजच्या कुकने. चपाती मात्र बिनमिठाची होती. दुपारी भरूच जवळ जेवण केले होते तिथे सुद्धा चपाती बिनमिठाची होती. इथल्या चपात्यांमध्ये मीठ घालत नसावेत बहुतेक. जवळपास ६४० किमी प्रवास करून आजचा दिवस संपला. एका दिवसात ६०० किमी पेक्षा जास्त गाडी चालवण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. ह्यापूर्वी पुणे ते गावी (कणकवली) असे ३५० किमी वगैरे गेलो होतो. पण एका दिवसात ६०० किमी जाण्याची कधी वेळच आली न्हवती. आता उद्याचे लक्ष होते राजस्थान मधले चांदवाजी.

शामलजी ते शाहपुरा)

२६ ऑगस्ट
आज देखील लवकर तयारी करून ६:४५ ला मंगलमूर्ती लॉजवरून निघालो. ५ मिनिटात शामलजी बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मंदिरात पोचलो. हे मंदिर ११ व्या शतकात बांधले असून कृष्ण किंवा विष्णूला समर्पित आहे अशी माहिती विकिपीडियावर आहे.

शामलजी मंदिर

मंदिराची कलाकुसर अतिशय सुंदर आहे. बाहेरच्या भिंतींवर कोरलेले हत्ती, सैनिक, देवतांच्या मूर्ती व अन्य नक्षीकाम फारच अप्रतिम आहे.

मंदिराची कलाकुसर

७:१५ ला मंदिरातून निघून राष्ट्रीय महामार्ग ८ वर आलो. शामलजी पासून १०-१२ किमी अंतर गेल्यावर राजस्थान सुरु होतो. शामलजी ते गुजरात/राजस्थान सीमा हे १०-१२ किमी आणि राजस्थान मधील पहिले १५ किमी महामार्ग अतिशय भयानक स्थितीत होता. मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करता येईल इतके मोठे खड्डे होते काही ठिकाणी. नंतर मात्र रस्ता उत्तम होता. मोठमोठी मशिनरी घेऊन जाणारे ट्रक सोबतीला होतेच. काही ट्रक तर इतके मोठे होते की त्यांना ५०-६० च्या आसपास चाके असावीत. ८:१५ च्या सुमारास एका धाब्यावर चहा पिण्यासाठी थांबलो. ढाब्याच्या मागे एक पांढरा पर्वत दिसत होता. हा एक प्रकारचा दगड असून त्याच्या मुर्त्या बनवतात अशी माहिती एकाने दिली.

पांढरा पर्वत

ढाब्यावरच्या बरणीत गठीया नामक वेगळाच पदार्थ होता. चहा गठीया खाऊन प्रवास पुढे सुरु झाला. आजचा आमचा प्रवास खूपच थांबत थांबत चालला होता. कारण एकच. राजस्थान म्हणजे प्रचंड मोठे राजवाडे किंवा वाळूचे वाळवंट आणि प्रचंड ऊन असे मला अपेक्षित होते. पण इथे राजस्थानात प्रवेश केल्यापासून आम्हाला दिसणारे दृश्य एकदम वेगळे होते. रस्त्याच्या बाजूने छोट्या छोट्या टेकड्या, त्यावर खुरटे हिरवेगार गवत आणि ह्या सर्वांच्या जोडीला प्रचंड स्वच्छता. त्यामुळे आम्ही दर ५ मिनिटांनी थांबत होतो. प्रत्येक वेळी एखाद्या जागी थांबलो की 'आता हा शेवटचा स्टॉप. मग डायरेक्ट उदयपूर' असे स्वतःला बजावायचो. पण इतका सुंदर निसर्गरम्य परिसर पाहून आपोआप थांबले जात होते. राजस्थान मध्ये इतका हिरवागार भाग देखील आहे हे मला माहीतच न्हवते.

९ वाजता एका हॉटेलवर नाष्टा केला.
'राजस्थान में तो बहुत हरियाली है और काफी साफ सुथरा है' मी हॉटेलच्या मालकाला बोललो. तो खुश झाला.
'यहां ऐसे ही हरियाली होती है. आप बारिश के मौसम मे आये है इसलिये बहुत खूबसूरत है नजारा. यहां से आगे उदयपूर तक नजारा और भी अच्छा होगा. हमको कभी भी पाणी की कमी नहीं होती. १५ फीट पर पाणी मिल जाता है. रेगिस्तान उधर जैसलमेर साईड. इधर रेगिस्तान नहीं.' - इति हॉटेल मालक. मग कुठून आलाय, कुठे निघालाय वगैरे चौकश्या झाल्या. पुण्याहून लडाखला कारने निघालोय हे ऐकून त्याने कौतुक केले. हॉटेल मालकाचा निरोप घेऊन प्रवास सुरु केला आणि उदयपूर गाठले. शामलजी ते उदयपूर ह्या प्रवासासाठी तब्बल साडेतीन तास घेतले होते आम्ही. वास्तविक हे अंतर विनाथांबा गेले तर जेमतेम २ तासात पार होऊ शकते. काल रात्री उदयपूरला न येता शामलजी मध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला होता. नाहीतर हे सर्व निसर्गसौंदर्य रात्रीच्या अंधारात दिसलेच नसते.

उदयपूर जवळ आम्ही चुकीचा बायपास घेतला. फक्त २ लेनचा आणि ट्रकची प्रचंड वाहतूक असलेला हा रस्ता पार करण्यात अर्धा तास गेला. त्या रस्त्याने सुखेरला आलो. सुखेर, नाथद्वारा, राजसमंद पटापट ओलांडले. नाथद्वाराच्या पुढे मशिनरी वाहून नेणारे ट्रक जाऊन त्याजागी प्रचंड मोठे संगमरवरी दगड खाणीतून घेऊन जाणारे ट्रक दिसू लागले.

संगमरवरी दगड घेऊन जाणारा ट्रक

ह्या ट्रकच्या चालकाशी दोन शब्द बोललो. 'ह्या भागात संगमरवराच्या खाणी आहेत. हा दगड किशनगडला कारखान्यात पाठवला जातो. तिथे त्यापासून फारशी बनवतात' अशी माहिती ट्रक चालकाने दिली. प्रवास पुढे चालू. उदयपूरच्या पुढे हिरवळ कमी झाली होती, रखरखाट जाणवत होता आणि प्रचंड ऊन होते. राजसमंदच्या पुढे एका पूर्णपणे बांबूपासून बनवलेल्या धाब्यावर जेवणासाठी थांबलो. दुपारची जेवणाची वेळ असून देखील ढाब्यावर अजिबात गर्दी न्हवती आणि आम्ही एकमेव ग्राहक होतो. त्यामुळे ढाबा चांगला नसेल अशी शंका आली. पण नंतर जे चवदार जेवण समोर आले त्यावरून ती खोटी ठरली. जेवण आणून देणाऱ्या मुलाला आम्ही जेवण चांगले होते असे सांगितले. तो खूप खुश झाला. 'हमारा कूक है ही बढिया.' असे म्हणून त्याने जेवणानंतर बिलाबरोबर बडीशेपच्या ऐवजी जी चोकोलेट्स आणली होती ती सगळी जबरदस्ती मुलाच्या खिशात कोंबली. ह्या भागात पाण्याची वगैरे परिस्थिती कशी असते असे विचारल्यावर 'हम बहुत सोच समझकर इस्तेमाल करते है. इसलिये कभी कम नहीं पडता'असे म्हणाला. जेवण आटोपून पुढे निघालो. भीम नामक गाव आले. इथे जत्रा भरली होती आणि त्यासाठी निम्मा हायवेच वाहतुकीला बंद करून टाकला होता. कसलेतरी झेंडे घेऊन लोक नाचत होते. अरुंद रस्त्यावरून प्रचंड वाहतूक चालू असल्याने इथे थोडा वेळ वाया गेला. भीम मधून बाहेर आलो आणि लगेच अजमेर, जयपूरला उजवीकडे वळा असे दर्शवणारा बोर्ड दिसला. पण गूगल मॅप मात्र सरळ जा असे दर्शवत होते. आम्ही उजवीकडचा रस्ता घेतला तर 'Take a U -Turn' असे प्रेमळ आवाजात गूगल मॅप मधली महिला बजावू लागली. आता कुणाचे खरे समजावे हा प्रश्न होता. मग तिथल्या एका हॉटेल मालकाकडे चौकशी केली. जुन्या हायवेवर खूप गर्दी असते. हा नवीन हायवे (NH -१४८ D) आहे. ह्यावरून गेल्यास ब्यावर आणि अजमेर वाटेत लागत नाही. आणि सरळ किशनगडला जात येते अशी माहिती हॉटेलमालकाने दिली. मग गूगल मॅप्सला बंद केले आणि NH -१४८ D वरून निघालो.

NH -१४८ D

जवळपास ७० किमीचा हा दुपदरी रस्ता कल्पना करता येणार नाही इतका गुळगुळीत होता. वाटेत फारशी लोकवस्ती नाही आणि वाहतूक देखील नगण्य. अंदाजे ७० किमी जाऊन लांबा गावाजवळ किशनगडला जाण्यासाठी डावीकडे वळलो. ४:१५ च्या दरम्यान किशनगड ओलांडले. दुदू जाऊन पिंक सिटी जयपूर आले. पिंक सिटीला बायपासनेच बाय बाय केले तेव्हा ६ वाजून गेले होते. चांदवाजीच्या थोडे अगोदर एक वालुकामय टेकडी दिसली. तिथे जवळ जाऊन बघितले तर ती एकदम मऊ अशी वेगळ्याच प्रकारची माती होती. वाळू वाटत न्हवती. आमच्या प्लॅन प्रमाणे आज आम्ही चांदवाजीमध्ये राहणार होतो. पण आज आपण अजून थोडे अंतर जाऊ शकतो असा विचार करून पुढे जाऊ आणि शाहपुरा मध्ये मुक्काम करू असे ठरवले. शाहपुरा येताच महामार्गावरून शहरात शिरलो. तिथल्या एका काकांना विचारले तर त्यांना लॉजची काहीच माहिती नव्हती. ते मला तिथल्या एका दुकानदाराकडे घेऊन गेले.
'गांव में कुछ लॉज नही है. आप फ़िरसे हायवे पर जाईये. ३ किलोमीटर की बाद मिलन लॉज आयेगा. वो अच्छा है.' - दुकानदार काका
जवळपास ३० हजार लोकसंख्येच्या ह्या शहरात लॉज नाही हे ऐकून नवल वाटले. काकांचे आभार मानून परत महामार्गावर आलो. ३ किमी झाले, ४ झाले, ५ झाले तरी मिलन लॉज काही दिसलाच नाही. 'कुठे नेऊन ठेवलाय मिलन लॉज ?' असे वाटले. रस्त्याच्या कडेने इतका भयाण अंधार होता की त्यामुळे लॉज येऊन गेलेला आपल्याला दिसलाच नसेल असे वाटून आम्ही निराश झालो. बघू आता पुढे काय मिळतेय का असे ठरवून पुढे निघालो आणि अचानक मिलन लॉज दिसला. काकांनी ३ किमी सांगितले होते पण प्रत्यक्षात ते अंतर जवळपास ८ किमी होते. असो. लॉज ठीक होता. बाहेर व्यवस्थित गवत, झोपाळे, थोडी खेळणी देखील होती. प्रचंड उकाडा असल्याने ए.सी. रूम घेतली. फक्त १२००/- रु. सामान रूमवर टाकून खाली जेवायला गेलो. मेनू कार्ड मध्ये सगळ्या पंजाबी डिश. दाल बाटी सोडून तुमची कुठली स्पेशल डिश आहे का इथली असे विचारल्यावर 'हमारा स्पेशल सिर्फ दाल बाटी. और दाल बाटी तो अब हमारे लोग भी नहीं खाते तो आप क्या खाओगे. सबको पंजाबी ही चाहिये.' असे लॉजच्या मॅनेजरने प्रांजळपणे सांगितले. मग पंजाबी जेवण करून लॉजच्या लॉनवर अर्धा तास फेऱ्या मारल्या. शामलजी ते उदयपूर आरामात प्रवास करून देखील आज ६२० किमी अंतर कापले होते. आता उद्याचे डेस्टिनेशन होते चंदीगड.

 

भाग ४ - शाहपुरा ते जम्मू

 

२७ ऑगस्ट
आज सकाळी ७:१५ ला चंदीगडला जाण्यास निघालो. तसे मध्यरात्री पण निघू शकलो असतो. कारण मध्यरात्रीच्या २:३० पासून मी जागाच होतो. अनोळखी ठिकाणी मला बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. यावर काही उपाय ?

जरी चंदीगड फक्त ४६० किमी असले तरी वाटेत आम्हाला पानिपतजवळ काला आम्ब ह्या ठिकाणी पानिपत युद्धाचे स्मारक बघायला जायचे होते. राष्ट्रीय महामार्ग ८ वरून प्रवास सुरु झाला. आज वातावरण फारच उदासवाणे वाटत होते. हवेत प्रचंड धूळ आणि धुके होते. ह्या महामार्गाचा जयपूर ते दिल्ली भाग तितकासा खास नाही. एंट्री आणि एक्झिट सिस्टीम एकदम फालतू. कुठूनही कसेही रस्ता ओलांडणारे लोक, मनसोक्त हुन्दडणाऱ्या गाई आणि बैल, उलट्या दिशेने येणारे मोठमोठे ट्रेलर सगळं आहे ह्या महामार्गावर. ह्या रस्त्यावर देखील प्रचंड संख्येने ट्रक. निमरानाजवळ एक ट्रेलर अचानक मधल्या लेन मधून उजवीकडच्या फास्ट लेन मध्ये घुसला. जर ब्रेक मारायला मला २ सेकंद उशीर झाला असता तर आमची केवळ लडाख न्हवे तर आयुष्यरूपी ट्रिपचं इथे संपुष्टात आली असती. गुजरात, राजस्थान, हरयाणा इथले ड्रायव्हिंग अत्यंत रॅश आणि 'आली लहर केला कहर' प्रकारचे वाटले. लेन बदलताना आपण इंडिकेटर देणे, ज्या लेन मध्ये आपल्याला जायचे आहे त्या लेन मधली सर्व वाहने निघून केली आणि दुसरे कोणतेही वाहन जवळपास नाही ह्याची खात्री पटल्यावरच त्या लेन मध्ये घुसतो. पण इथे असला प्रकार दिसला नाही. डायरेक्ट घुसवायची गाडी. बाकीचे जाईनात का तिकडे बोंबलत. दुचाकीवर तर किमान तीन मोठी माणसे असलीच पाहिजेत.

शेवटी एकदाचा हरयाणात पोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना बाबा राम रहीम प्रकरणामुळे सरकारने हरयाणामध्ये इंटरनेट सेवेवर तात्पुरती बंदी घातलेली आहे असे बातम्यांमध्ये सांगितले जात होते. आता काला आम्बला जावे का न जावे हा प्रश्न होता. कारण आपण काला आम्बला गेलो आणि काही कारणाने पानिपत मध्ये संचार बंदी वगैरे लागली तर अडकून पडायचो. त्यामुळे काला आम्बचा प्लॅन रद्द करून सरळ चंदीगड गाठावे आणि काला आम्बला परतीच्या प्रवासात जावे असे ठरवले.

माजरा गुरुदास आले. मुंबईपासून साथ देणारा NH ८ सोडून इथे NH ३५२ वर गेलो. रेवाडी ओलांडताच वाटेत एका ठिकाणी पोलिसांनी थांबवले. माझे ओळखपत्र तपासून त्यांच्याकडच्या वहीत नाव, गाव, कुठे जाणार त्याची नोंद केली. काश्मीरला जातोय असे ऐकताच 'इधर और उधर दोनो जगह टेन्शन है. सोच लिजिए एक बार फिर'. असे पोलीस म्हणाला. पण आता मागे फिरायचे नाही हा निश्चय पक्का होता. पुढे निघालो. झज्जर, रोहतक झपाट्याने मागे टाकले. रोहतक वरून पुढे पानिपत साठी NH ७०९ वरून प्रवास करावा लागतो. NH ३५२ आणि NH ७०९ दोन्ही अप्रतिम होते. रोहतकचा बायपास तर अतिशय सुंदर. या दोन्ही महामार्गांवर कारसाठी ९० किमी/तास वेगमर्यादा आहे. इकडे घाट वगैरे प्रकार नाही. एकदम सरळसोट रस्ता. भरीला महामार्गावर अजिबात गर्दी न्हवती. त्यामुळे अंतर झपाट्याने कापले जात होते. हरयाणाच्या प्रवासात रस्त्याकडेने भाताची शेते आणि निलगिरीची झाडे ह्यांचीच सोबत होती.

हरयाणा मधील भात शेती

ह्या भात शेतीचा मंद सुवास दरवळत होता. अतिशय प्रसन्न वाटले.

पानिपत जवळ येत होते आणि डोक्यात परत विचार सुरु झाले. परतीच्या प्रवासात आपण नक्की कधी पानिपत जवळ असू ह्याची खात्री नाही. जर रात्रीचे आलो तर स्मारक बघता येणार नाही. त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घेतलेला निर्णय फिरवून आत्ताच काला आम्बला जायचे असा ठरवले. पानिपत शहरात प्रवेश करून काला आम्बला जायला निघालो. गूगल मॅप्सने अतिशय भयानक रस्ता शोधून दिला. एका ठिकाणी तर रस्ताच संपला आणि समोर होते घाण पाण्याने भरलेले प्रचंड मोठे डबके. त्याच्या खोलीचा काहीच अंदाज येईना म्हणून थांबलो. तर समोरून एक रिक्षावाला आला आणि त्याने बिनधास्त यायला सांगितले. मग ते डबके पार करून परत एका रस्त्यावर आलो. यथावकाश १२:३० च्या दरम्यान स्मारकाजवळ पोचलो. जवळपास तासभर गेला स्मारक बघण्यात.

पानिपत युद्धाचे स्मारक

स्मारक ९ ऑगस्ट १९९२ रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. स्मारकाची अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था राखलेली आहे. दीडच्या दरम्यान काला आम्बमधून परत निघालो. पानिपत मधील बेशिस्त ट्रॅफिक आणि गर्दीने भरलेला बाजार पार करून पुन्हा महामार्गावर आलो. एका ढाब्यावर जेवण केले. आपल्याकडील मे महिना वाटावा इतके गरम होत होते. सूर्य अक्षरश: भाजून काढत होता. त्यामुळे जास्त जेवण गेलेच नाही. कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला ओलांडून शेवटी एकदाचा संध्याकाळी ४:४५ च्या दरम्यान चंदीगड मध्ये प्रवेश केला.

चंदीगड हे भारतातीलच न्हवे तर जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे असे वाचले ऐकले होते. त्याची झलक शहरात प्रवेश करतानाच दिसली होती. शहरात जंगल नसून जंगलात चंदीगड शहर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चंदीगड मध्ये सरळ जाट भवनला गेलो. तिथे ए. सी. रूम फक्त ८०० रू. मध्ये मिळाली. सामान रूमवर टाकून आंघोळ करून थोडेफार चंदीगढ बघावे म्हणून बाहेर पडलो. महत्वाच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी करून घेतल्या. (प्रत्यक्षात पासपोर्टची एक प्रत सोडली तर अन्य कुठल्याही कागदाची पुढे गरज पडली नाही). अत्यंत चांगल्या दर्जाचे, आखीव रेखीव आणि खड्डेविरहित सरळसोट रस्ते, व्यवस्थित चौक, ट्रॅफिक सर्कल्स, डावीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी सिग्नलला न थांबता एक्सिट घेण्याची सोय, सगळ्या वाहनचालकांना/पादचाऱ्यांना नीट दिसतील अशा जागी लावलेले सिग्नल, रस्त्याच्या कडेने कोणतेही अतिक्रमण नसलेले फूटपाथ व त्यावर देखील ओळीने झाडे, मोठं मोठ्या गार्डन्स, काही सेक्टर्स मध्ये शॉपिंग साठी दुकाने आणि तिथे देखील पार्किंगची केलेली पुरेशी व्यवस्था. त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावण्याची गरज नाही. विकसित देशांतल्या कुठल्याही शहराशी तोडीस तोड आहे चंदीगड.

चंदीगड

गूगल मॅप मध्ये देखील चंदीगड बघितल्यास फक्त चौकोन चौकोन दिसतात. ह्यापूर्वी दिल्लीला काही वेळा जाणे झाले होते. दिल्लीचा देखील बराच भाग व्यवस्थित विकसित आहे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर आपली शहरे पण व्यवस्थित विकसित करता येतात तर. इतकी झाडे असून देखील हवेत उकाडा प्रचंड होता. अगदी मुंबईत असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे पाय खूप दुखू लागले. जाट भवनला फक्त शाकाहारी जेवण मिळते. त्यामुळे तिथे जेवण करण्याचा पर्याय बाद करून मोबाईलवर दुसरे पर्याय शोधायला सुरवात केली. एका ठिकाणी एक आईस्क्रीमवाला होता. त्याच्याकडून आईस्क्रीम घेतले. 'यहां पाल धाबा फेमस है. उधर जाईये' - आईस्क्रीमवाल्याने पर्याय सुचवला. म्हणून पाल ढाब्यावर गेलो. तिथे अफगाणी चिकन व अन्य काही प्रकार खाऊन चालत चालत जाट भवन गाठले. ह्यावेळी वेळ न्हवता. भविष्यात पुन्हा एकदा चंदीगड मध्ये येऊन निवांत राहण्याची इच्छा आहे.
########################################################################################

२८ ऑगस्ट
आजचे मुख्य काम होते गाडीचे सर्व्हिसिंग. गेल्या ३ दिवसाच्या प्रवासात गाडीतून हे सामान काढ, ते सामान काढ असे केले होते पण ते त्याच्या मूळ बॅगेत परत न जाता तसेच गाडीत विखुरलेले पडलेले होते. त्यामुळे शोरूमला जाण्यापूर्वी गाडीत अस्तव्यस्त पडलेले सगळे सामान नीट बॅगांमधे भरून टाकले. ९ वाजताची अपॉइंटमेंट होती पण वेळेच्या १० मिनिटे आधीच हजर झालो. शोरूमच्या सर्व्हिस मॅनेजरने पहिला नंबर बुक केलाच होता. गाडीचे रेग्युलर चेक करून झाले. गेले काही महिने मला गाडीच्या चावीत एक समस्या जाणवत होती. चावी स्टिअरिंग मध्ये अडकूनच बसायची.
'ये प्रॉब्लम आपको छोटा दिखता है. लेकिन असल में बहुत बडी समस्या बन शकता है. आपकी 'की' बार बार अटक रही है. एक दिन ऐसा आयेगा की ये 'की' बिलकुल काम करना बंद कर देगी.' - सर्व्हिस मॅनेजर
मग ती 'की सिस्टिम' पण बदलून टाकायला सांगितले. कारण नेमके लडाखच्या दुर्गम भागात पोचलो आणि तो 'एक दिन' तिथे आला असता तर भयानक हाल झाले असते. ह्याचा एक दुसरा फायदा पण झाला. तो म्हणजे आम्ही घरातून निघताना गाडी खरेदी करताना मिळालेली दुसरी चावी घरभर शोधाशोध करून पण सापडली न्हवती. की सिस्टिमच बदलल्याने दोन नव्या चाव्या मिळाल्या. गाडीचे सर्व्हिसिंग पूर्ण होईपर्यंत तिथेच शोरूमला बसून घड्याळाकडे बघत राहणे हे एकच काम उरले होते. गाडी किती वाजता परत मिळेल ह्यावर आपण आज कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याचा अंदाज बांधायला चालू केला. कमीतकमी पठाणकोट तरी गाठूच हे नक्की केले.

Men At Work

थोड्या वेळाने बाहेर जाऊन एका कर्मचार्यांशी बोलत बसलो. तो मूळचा मनालीचा होता. आमच्या प्लॅन प्रमाणे आम्ही चंदीगड मधून होशियारपूर पठाणकोट मार्गे सांबाला जाऊन तिथून जम्मूला बायपास करून उधमपूर, पटनीटॉप असे जाणार होतो. पण 'सांबा ते उधमपूर भाग बराच असुरक्षित आहे. त्या रस्त्याने तुम्ही जाऊ नका. आज जम्मूला जा आणि तिथून उधमपूर मार्गे श्रीनगरला जा असे त्याने सुचवले. म्हणून आम्ही देखील आज जम्मूला जायचे नक्की केले. तसेच फोर्डची एक वर्षाची assured सर्विस घेण्याचे त्याने सुचवले. ह्यात तुमची गाडी कुठे बंद पडली आणि चालू झालीच नाही तर कंपनी स्व:खर्चाने जवळच्या शोरूम पर्यंत टो करून घेऊन जाते. १०८४ रु. भरून ती assured सर्व्हिस पण घेऊन टाकली. लडाख मध्ये रस्ते भयानक असल्याने गाडीचा खालचा भाग बऱ्याच ठिकाणी घासला जातो. त्यामुळे गाडीचा कोणता भाग सांभाळला पाहिजे तसेच ज्यादा इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल बरोबर घ्यावे का ह्याची देखील चौकशी केली.
'आप सिर्फ ऑइल संप डॅमेज ना हो इतना देखिये. फोर्ड के बाकी पार्टस बहुत स्ट्रॉन्ग रहते है. उनको जनरली कुछ डॅमेज नही होगा. इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कूलंट साथ लेने की कोई जरुरत नहीं. आपको उसकी जरुरत नहीं पडेगी' - कर्मचारी

ऑइल संप कुठे असतो ते मी पूर्वी एकदा बघून ठेवले होते.

दुपारी १:०० वाजता गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झाली. बिल भरत असतानाच 'अभी लंच ब्रेक हुआ है. आप भी यहीं से खाना खाकर जाईये' असे सांगून सर्व्हिस मॅनेजरने तिघांनाही तिथेच जेवण आणून दिले. त्यांचे आभार मानून शेवटी दुपारी १:३० वाजता चंदीगड मधून निघालो. चंदीगड मधून बाहेर पडताच न्यू चंदीगड लागले. पण इथे फारशी घरे न्हवती. फक्त प्लॉटिंग केलेले दिसले. आता प्रवास सुरु झाला पंजाब मधून. रुपनगर मार्गे होशियारपूर गाठले. पूर्णपणे दुपदरी असलेला हा रस्ता अतिशय उत्तम असून रस्त्याच्या कडेने हिरवीगार तांदळाची शेते होती.

पंजाबमधील शेती

लस्सी हा प्रकार तितकासा आवडत नसूनही केवळ पंजाब मध्ये आलोय म्हणून पिऊन बघावी ह्या याउद्देशाने गर्हद्दीवाला गावाच्या थोडे अगोदर एका अतिशय साध्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये लस्सी पिऊन बघितली. चव आवडली. प्रवासास निघताना अतिरिक्त डिझेल साठी कॅन घेण्याचे राहूनच गेले होते म्हणून एक २० लिटरचा कॅन घेतला. दासूया जवळ NH -४४ सुरु झाला. पठाणकोट मध्ये पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. पठाणकोट हा पंजाबचा शेवटचा जिल्हा असून इथून पुढे जम्मू काश्मीरची हद्द सुरु होते. पठाणकोटची सीमा पाकिस्तानला भिडलेली आहे. पठाणकोट मध्ये चहा पिऊन पुढे निघालो. लखनपूर आले. हे पंजाब मधून जम्मू काश्मीरला जाताना लागणारे जम्मू काश्मीर मधील पहिले गाव आहे. जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला लखनपूर मध्ये प्रवेश कर द्यावा लागतो. टोल बुथच्या जवळ पोचतच होतो तोच माझ्या पुढे असलेला ट्रक अचानक थांबला. आणि त्या ट्रकच्या पुढे असलेली एक SUV एकदम रस्ता सोडून ९० अंशात वळली आणि डिव्हायडर वरून जाऊन मधल्या गॅप मध्ये अडकली. बरेचसे पोलीस धावत आले. नक्की काय झाले ते कळलेच नाही. बहुतेक ट्रकने तिला ठोकले असावे. पण आवाज तर काही आलाच न्हवता. ७:२० च्या दरम्यान लखनपूरला टोल भरून जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केला. आतापर्यंत उत्तम दर्जा राखलेल्या NH-४४ ची काश्मीर मध्ये प्रवेश करताच दैना उडालेली होती. जिओ, व्होडाफोनची रेंज पण गायब झाली म्हणून खास ह्या प्रवासासाठी घेतलेले BSNL चे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले. तर नेट चालूच होईना. ग्राहक सेवा केंद्राशी ३-४ दा संपर्क साधला पण काहीच उपयोग झाला नाही. लखनपूर ते जम्मू ह्या ९० किमीच्या प्रवासात उखडलेला रस्ता, भयाण काळोख आणि रस्त्याच्या बाजूने अत्यंत गचाळ गावे ह्यांचीच सोबत होती. रात्री ९ च्या सुमारास जम्मू आले. हा आम्ही केलेला एक मूर्खपणा होता. जम्मूत आत न जाता हायवे वरच लॉज शोधला असता तर बरे झाले असते असे नंतर वाटले. एक फ्लायओव्हर ओलांडून थोडे पुढे आलो. तिथे दोन माणसे भेटली. त्यांना बस स्टॅण्डचा रस्ता विचारला. तिथे नक्कीच लॉज मिळाला असता. त्या माणसांनी सांगीतल्याप्रमाणे मागे फिरून बस स्टॅन्ड जवळ आलो. तिथून एका छोट्या रस्त्यावर जाऊन गाडी लावली आणि लॉज शोधायला गेलो. रिलॅक्स नावाचा एक लॉज दिसला. फक्त ७०० रु. मध्ये एसी रूम मिळाली. रूम काही तितकीशी खास न्हवती. पण आता दुसरा लॉज शोधण्याचे पेशन्स संपले होते. एकतर निघायला उशीर झाल्याने पोचायला उशीर झाला होताच. प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे आता दुसरा लॉज शोधत बसण्यापेक्षा कशीतरी एक रात्र काढू असा विचार करून तिथे रूम घेऊन टाकली. लॉज जवळच एका हॉटेल मध्ये ह्या प्रवासातील सर्वात बेचव नॉन व्हेज जेवण खाऊन आजचा दिवस संपला. खरा प्रवास उद्यापासून सुरु होणार होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...