उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १ - पूर्वतयारी ... !
चंदन
यांच्या 'अतुल्य भारत' मधील लेह-लडाख वाचत असताना लेह मधल्या ढगफुटीची
बातमी आली आणि गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर -
द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा
प्रवास केला होता ते सर्व क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. आम्हाला
वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो
ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप
असतील अशी मनाला खात्री आहे. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे
गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव
मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून
श्रद्धांजली. का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे
म्हणते आहे. त्या १३ दिवसांचा सफरनामा येथे मांडतोय. अपेक्षा आहे आपल्याला
आवडेल.
*********************************************************************************************************************
लडाखला जाण्याचे २००३ पासून मनात होते. दरवर्षी एप्रिल महिना आला की लडाखचा विषय उचल खायचा आणि जून सुरू होता-होता ह्या-ना-त्याकारणाने 'ह्या वर्षी नाही रे शक्य. पुढच्या वर्षी बघू.' अश्या एका वाक्याने तो गुंडाळला जायचा. ह्यावर्षी मात्र जानेवारी महिन्यातच मी हा विषय उचलला आणि अभिजितला म्हटले,"काहीही झाले तरी ह्यावर्षी लडाख सर करायचेचं." अभिसुद्धा वाट बघत होताच. मग सुरू झाली तयारी एका अविस्मरणीय प्रवासाची. एक असा प्रवास जो आम्हाला आयुषभरासाठी अनेक आठवणी देउन जाणार होता. काही गोड तर काही कटु. आमच्यात नवे बंध निर्माण करणार होता तर मनाचे काही बंध तोडणार सुद्धा होता. पूर्व तयारीची संपूर्ण अघोषित जबाबदारी प्रामुख्याने अभिने उचलली होती. त्याला हवी तिथे आणि जमेल तशी मदत मी करणार होतो. ह्या बाइक ट्रिपमध्ये भारत-चायना सीमेवर असणारे १५००० फुटांवरील 'पेंगोंग-त्सो' व 'त्सो-मोरीरी' आणि '१८३८० फुटांवरील जगातील सर्वोच्च उंचीचा रस्ता खरदूंग-ला' ही मुख्य उदिष्ट्ते होती. तसेच झोजी-ला, द्रास - कारगिल ह्या 'ऑपरेशन विजय' च्या रणभूमीला भेट देणे हे सुद्धा आम्हाला अनुभवायचे होते. १९९९च्या कारगिल युद्धाला बरोबर १० वर्षे पूर्ण होत होती आणि १५ ऑगस्टचे निम्मित साधून आमच्या लडाखच्या सफरीचा योग जूळून आला होता.
एक मेल टाकली आणि बघता बघता १५ जण तयार झाले. अभि आणि माझ्या बरोबर मनाली, ऐश्वर्या, पूनम, कविता, दिपाली, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य आणि शोभित असे पटापट तयार झाले. आशिष, कुलदीप, शमिका, साधना आणि उमेश हे जायच्या आधी काही दिवसात टीममध्ये आले तर कविताचे ऐन वेळेला काही कारणाने यायचे रद्द झाले. जेंव्हा लडाखला जायचे ठरले तेंव्हा बाइकने जायचेचं असे काही पक्के नव्हते पण मला स्वतःला आणि इतर अनेकांना लडाख बाइकवरुन करायची उत्कट इच्छा होती. खर्चाचे गणित जूळवणे, बाइकवरुन जाण्याचा रूट ठरवणे, त्यासाठी लागणारी तयारी, जमेल तिकडचे रहायचे बुकिंग करणे, ११ हजार आणि अधिक फुटांवर स्वतःच्या आणि बाइकच्या तब्येतीची काळजी घेणे ह्या अश्या अनेक बाबींवर अभिने मेल्स टाकायला सुरवात केली होती. बाइक रायडर्समध्ये म्हणजेच मी, अभिजित, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य यांच्यात ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले आणि त्यासाठी आम्ही ६-७ जूनला 'राजमाची बाइक ट्रिप'ला गेलो. ह्या ट्रिपचा आम्हाला लडाखला बराच फायदा झाला.
जून संपता-संपता नाही म्हटले तर बरीच तयारी झाली होती आणि म्हटले तर बरीच राहिली सुद्धा होती. सगळ्याची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. निघायच्या आधी म्हणजेच २ ऑगस्टला अभिने शेवटची ग्रुप मीटिंग घेतली. त्यात असे ठरले की अभिजित हे ट्रिप 'लिड' करेल. सर्वानुमते निर्णय घेतले तरी अंतिम निर्णय त्याचा असेल. त्याच्या अनूपस्थितीत मला 'डेप्युटी लीडर'ची जबाबदारी दिली. आमच्या दोघांशिवाय प्रत्येकाला अनुभव मिळावा म्हणुन 'दररोज वेगवेगळा लीडर' ठेवायचा असे ठरले होते. लडाखची सर्व पूर्वतयारी झाली होती. ग्रुप मीटिंग झाल्यावर सर्व बायकर्स् तिकडून निघाले ते थेट वांद्रे (बांद्रा) स्टेशनला बाइकस लोड करायला .....
२ ऑगस्टच्या रात्री उशिराने 'जम्मू-तवी'साठी सर्व बाइकस वांद्रे (बांद्रा) स्टेशनवर चढवल्या. त्यावेळेला पुढच्या १४ दिवसात नेमके किती कि.मी. होतात ते मोजण्यासाठी आशीषने गाडीच्या स्पीडोमिटरचा एक फोटो घेतला. ७ ऑगस्टला सकाळी अभि- मनाली आणि उमेश, साधना, आदित्य, ऐश्वर्या असे ६ जण जम्मूकडे रवाना झाले. अमेय म्हात्रे, कुलदिप आणि पूनम हे तिघे १ दिवस आधीच जम्मूला रवाना झाले होते. वेगवेगळ्या वाटेने सर्वजण जम्मूला पोचायच्या आधी त्यांना 'वैष्णवदेवी'ला जाउन यायचे होते. तर आशीष, दिपाली, अमेय साळवी आणि शोभीत हे विमानाने जम्मूला शनिवारी दुपारी लैंड झाले. मला कामावरून निघायला काही कारणाने १ दिवस उशीर झाल्याने मी जम्मूला उशिराने पोचणार होतो.
तिकडे जम्मूला दुपारी ३ च्या आत अमेय आणि आदित्यने रेलवे पार्सल ऑफिसमधून त्यांच्या गाडया उचलल्या. पण माझी, अमेय आणि अभीची अश्या अजून ३ गाडया उचलायच्या होत्या. त्यांचे पेपर अभिकडे होते आणि नेमकी (खरं तरं रेलवेच्या शिरस्त्याप्रमाणे असे म्हणायला काहीच हरकत नाही) जम्मू-तवी लेट झाली. ३ च्या आसपास स्टेशनच्या आसपास पोचूनदेखील गाडीला असा काही सिग्नल लागला की काही सुटायचे नाव नाही. संध्याकाळचे ५ वाजत आले तशी दोन्हीकडून फोन फोनी सुरू झाली. आशिष - अमेय स्टेशनवर तर अभी गाडीमध्ये. शेवटी अभी पेपर घेउन गाडी मधून उतरला आणि रेलवे ट्रैकमधून जवळ-जवळ २ कि. मी. पळत-पळत स्टेशनला येउन पोचला. चायला... कमालच केली पठ्याने... अखेर सर्व गाडया उचलल्या. गाडीला कुठे काय डॅमेज झाले आहे ते पाहिले आणि बघतोय तर काय सर्वांच्या गाडीला कुठे ना कुठे डॅमेज झालेलेच होते. ते सर्व नीट करून घेतले. आल्या-आल्या छोटे छोटे प्रॉब्लम सुरू झाले होते. त्यात आम्ही जी सपोर्ट वेहिकल सांगितली होती तो ड्रायवर आलाच नाही. मग सर्व सामान बाइक्सवर लोड फेऱ्या करत जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलवर पोचवले.
त्यावेळेला मी तिकडे मुंबईला पोचलो होतो आणि निघायच्या आधीची आमची शेवटची तयारी करत होतो. इकडे जम्मू-काश्मिर टूरिझमच्या हॉटेलकडे सर्वांचा टिम डिनर रंगला होता. एक वेगळाच उत्साह होता प्रत्येकाच्या चेह्ऱ्यावर. अनेक वर्षांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे ह्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. जेवणानंतर ठरल्याप्रमाणे एक मीटिंग झाली. उदया खऱ्या अर्थाने मोहिमेचा पहिला दिवस होता. सकाळी-सकाळी जम्मूवरुन निघुन संध्याकाळपर्यंत श्रीनगर गाठायचे होते.
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग २ - काश्मिर हमारा है ... !
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ला सर्वजण जम्मूहून श्रीनगरसाठी कुच झाले. अभि-मनाली, ऐश्वर्या-आदित्य, अमेय-कुलदीप, आशिष-उमेश आणि अमेय-दिपाली असे १० जण बाइकसवर तर साधना, पूनम, शोभित असे तिघे गाड़ीमध्ये बसले होते. हो.. हो.. तीच गाडी जी आम्ही जम्मूला पोचलो तेंव्हा यायला हवी होती; नशीब आज तरी तो उगवला. मी आणि शमिका पहाटेच मुंबईवरुन निघून श्रीनगरसाठी रवाना झालो होतो. पहाटे ६:३०च्या त्या फ्लाईटमध्ये चक्क 'अभिनेता नसरुद्दीन शाह' यांची भेट घडली. काही कामानिमित्त ते सुद्धा श्रीनगरला निघाले होते. न विसरता त्यांची स्वाक्षरी घेतली. विमानाने दिल्ली- हरियाणा मागे टाकले तसे देवभूमी हिमाचल आणि जम्मू - काश्मिरच्या सुंदर नयनरम्य पर्वतरांगा दिसू लागल्या. उंचच-उंच शिखरे आणि त्यांना बिलगणारे पांढरेशुभ्र ढग, शिखरांच्या उतारांवर असलेले ते सूचिपर्णी वृक्ष आणि डोंगरांच्या पायथ्याला असलेली हिरवीगार शेती. त्यामध्येच दिसणारी छोटी-छोटी गावे आणि त्यांना जोडणारे रस्ते. स्वर्ग ह्यापेक्षा वेगळा असू शकेल ??? काही वेळात आम्ही त्याच दृश्यात विलीन होणार होतो.
मी आणि शमिका श्रीनगरला पोचलो तेंव्हा सकाळचे १० वाजत आले होते. दूसरीकडे संपूर्ण ग्रुपचा प्रवास राष्ट्रीय महामार्ग - १ म्हणजेच NH - 1 वरुन सुरू झाला होता. जम्मू ते लेह ह्या संपूर्ण मार्गाची जबाबदारी भारतीय सेनेच्या सिमा सडक संगठन म्हणजेच B.R.O. - Border Road Organization कडे आहे. जम्मू ते श्रीनगर अंतर आहे ३४३ किमी. आज पहिल्याच दिवशी तसा लांबचा पल्ला गाठायचा होता. सर्वजण जम्मूवरुन निघाले आणि कटरा, उधमपुर, जजरकोठली पार करत 'पटनीटॉप'ला पोचले. 'पटनीटॉप' ची उंची ६६९७ फुट आहे. तिकडून बटोत, रामबन, बनिहाल अशी एकामागुन एक शहरे पारकरत अथकपणे श्रीनगरकड़े.
निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेला हा प्रदेश. वळण लागत होती आणि प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं वेगळ रूप दाखवत होता. एके ठिकाणी '1st view of kashmir valley' असा पॉइंट लागतो. इकडे काहीवेळ थांबून 'काश्मिरचा नजारा' पाहिला. रस्त्याच्याकडेला उभे असताना कुलदीपने त्याचे हेलमेट खाली पाडले. खाली म्हणजे चांगले २० एक फुट खाली. मग काय कुठून तरी त्याने रस्ता शोधला आणि उतरला खाली. हेलमेट मिळाले पण त्याचे व्हायसर तुटले होते. तिकडून निघालो आणि पुन्हा एकदा 'लक्ष्य श्रीनगर.' अनंतनागच्या आधी 'जवाहर टनेल' लागले. ह्याची लांबी २.७ किमी. इतकी आहे. गंमत म्हणजे हे टनेल उंचीला फार तर १२-१५ फुट असेल आणि रुंदीला १० फुट. शिवाय आतमध्ये कुठलेच लाइट्स नाहीत बरं का ... तेंव्हा 'काळा चष्मा काढा' आणि हेडलाइट्स फूल ऑन. जरा चुक झाली तर काय होइल हे सांगायला नकोच. टनेल पारकरून बायकर्स अनंतनागकडे निघाले तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. सर्व बाइक्स् आता वेगात पळत होत्या. मात्र गाडीच्या वेगापेक्षा मनातले विचार जोरात पळत होते.
तिकडे श्रीनगरमध्ये मी आणि शमिका होटेल वरुन निघालो आणि श्रीनगर फिरायला निघालो. सर्वजण श्रीनगरला पोहचेपर्यंत हातात वेळ होता म्हटले चला भटकून येऊ या. लालचौकला गेलो आणि असेच बाजारात भटकत राहिलो. असाच एक विचार मनात आला... "असे काय वेगळे आहे इकडे?" आपल्यासारखेच तर आहे सर्व काही. डोंगर, नदया, निसर्ग, शहरे, दुकाने आणि हो माणसेसुद्धा. पण तरीसुद्धा इकडे काहीतरी वेगळे आहे. होय... ती एक जखम जी कोरली गेली ६० वर्षांपूर्वी. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण सोबत मिळाला विभाजनाचा शाप देखील. त्यात पाकिस्तानने काश्मिरवर आक्रमण केल्याने राजाहरीसिंग यांनी घाईने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. अगतिक होउन त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि नकळत भारताचा प्रवेश झाला एका चक्रव्यूहात. ज्यात तो शिरला खरा पण आज ६० वर्षांनी देखील बाहेर पडायचा मार्ग शोधतोय.
२१ ऑक्टोबर १९४७ ची काळरात्र. पाकिस्तानी सैन्याने काश्मिर सरहद्दीवरील 'डोमेल' ह्या चौकीवर फंदफितुरीने हल्ला चढ़वून ती काबिज केली. मेजर जनरल अकबरखान याच्या नेतृत्वाखाली रावळपिंडी मुख्यालयात शिजत असलेल्या 'ऑपरेशन गुलमर्ग'ची यशस्वी सुरवात झाली होती. २२ तारखेला काश्मिर राज्याच्या सैनिकी हालचाली सुरू झाल्या आणि ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांनी उरी येथे पोचून तिथल्या नदीवरील पुल उडवून दिला. पाकिस्तानी सैन्याला नविन पुल बांधून पुढे सरकायला २४ तास लागले. ह्या लढाईमध्ये ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांना वीरमरण आले मात्र हा अत्यंत महत्वाचा वेळ लढाईची अधिक तयारी करायला त्यांनी मिळवून दिला होता. परिस्थिती आता आपल्या हाताबाहेर गेली आहे असे समजताच राजा हरीसिंग यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि मग भारतीय सैन्याने भरलेली डीसी३ - डाकोटा कंपनीची खाजगी विमाने श्रीनगरला उतरु लागली. भारतीय सैन्य प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला प्रखर प्रतिकार करू लागले. बारामुल्ला येथे ले.कर्नल रणजीत रॉय (मरणोपरांत महावीरचक्र), बदगाम येथे मेजर सोमनाथ शर्मा (मरणोपरांत परमवीरचक्र) आणि शेटालोंग येथे ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने अतुल्य पराक्रम गाजवत ७ नोव्हेंबरपर्यंत भाडोत्री सैन्याला माघारी माघारी पिटाळायला सुरवात करून दिली.
पाकिस्तानी सैन्याने ५००० भाडोत्री टोळीवाल्यांना हाताशी धरून पुंछ, जजरकोटली, राजौरी, झंगड, मीरपुर, अखनूर, कठुआ अश्या सर्व महत्वाच्या शहरांना वेढा घालता होता. १६ नोव्हेंबर पासून मेजर जनरल कलावंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली २६८ इंफंट्री ब्रिगेड, ब्रिगेडिअर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ५० पॅराशूट ब्रिगेड आणि ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली १६१ इंफंट्री ब्रिगेड पुढची चाल करून गेल्या. २ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशेराच्या लढाईमध्ये 'नाइक जदुनाथ सिंग'याने अतुलनीय पराक्रम करून ते भारतीय सैन्याला जिंकून दिले. ह्यात त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या असीम शौर्याची दखल घेउन त्यांना मरणोपरांत परमवीरचक्र बहाल केले गेले. पुढे ८ एप्रिल रोजी भारतीय सैन्याने राजौरीवर अखेरचा हल्ला चढवला. माघारी पळणाऱ्या पाकी सैन्याने जागोजागी सुरुंग पेरले होते. लेफ्टनंट राघोबा राणे ह्या इंजिनिअर दलाच्या अधिकाऱ्याने जिवाची पर्वा न करता ३ दिवस आणि ३ रात्र सतत काम करून सर्व सुरुंग निष्प्रभ करण्याचे कार्य पार पाडले. त्यांचे हे कार्य 'परमवीरचक्र'च्या तोडीचे होते. अर्थात तो सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. १९४७-४८ ची लढाई जम्मू ते लेह ह्या संपूर्ण भागात लढली गेली होती आणि १ जानेवारी १९४९ ला झालेल्या युद्धबंदीनूसार ती थांबली... थांबवली गेली...
मनातले विचार थांबले तेंव्हा माझ्यासमोर अथांग 'दल सरोवर' पसरले होते. निळेशार आणि शांत... एक शिकारा केला आणि आम्ही त्या सरोवरातून फिरायला निघालो.
अभिला फोन केला तर ते श्रीनगरच्या आसपास पोचले होते आणि कुठेतरी चहा प्यायला थांबले होते. ८ वाजत आले तेंव्हा मी पुन्हा हॉटेलवर पोचलो आणि जेवणाची ऑर्डर देउन टाकली. सर्वजण आल्या-आल्या भूक-भूक करणार हे मला माहीत होते. बऱ्याच उशिराने ९ च्या आसपास अखेर टीम पोचली. सर्वजण फ्रेश झाले आणि मग आम्ही जेवून घेतले. पहिल्याच दिवशी बाइक्स् चालवून सर्व थकले होते पण झोपायच्या आधी ठरल्याप्रमाणे नियमानूसार दिवसाअखेरची मीटिंग झाली. उदया किती वाजता निघायचे आणि वेळेचे गणित अजून चांगले कसे मांडायचे ते सर्व ठरले. उद्याचे लक्ष्य होते... 'द्रास - कारगिल'ची रणभूमी...
पुढील भाग : ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ३ - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !
आज होता मोहिमेचा दूसरा दिवस... आणि आजचे लक्ष्य होते 'द्रास - कारगीलची रणभूमी'. श्रीनगरपासून द्रास १६६ कि.मी. लांब आहे. तर त्या पुढे ५७ कि.मी. आहे कारगील. आजचा टप्पा सुद्धा तसा लांबचा होता. त्यात सर्वांनाच कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. ७ च्या आसपास सर्व उठले आणि आवरून सकाळी ७:३० वाजता सर्वजण न्याहारी करायला हजर होते. चहा आणि ब्रेड-बटर सोबत मस्तपैकी आलूपराठे सुद्धा हाणले. ड्रायवरला सकाळी ९ला हजर रहायला सांगीतले होते त्यावेळेला तो पोचला. गाड़ी लोड केली, सर्व बाइक्स् तपासल्या आणि रवाना झालो आजच्या लक्ष्याकड़े. द्रास-सोनमर्गकड़े जाणारा रस्ता 'दल सरोवर' पासूनच पुढे जातो. १५ मिं.मध्ये दल सरोवरला पोचलो. काल संध्याकाळी जसे नीळेशार आणि शांत वाटत होते तसे आता नव्हते. प्रचंड उन लागत होते. जम्मू आणि श्रीनगरला सुद्धा तापमान २८ डिग. च्या वरतीच होते. थंडीचे कपडे घेउन आलेलो खरे; पण त्यांचा अजून तरी काहीच उपयोग होत नव्हता. नाही म्हणायला बाइक वर वारा लागायचा पण थांबलो की घाम निघायचा अक्षरशः
पहिल्या दिवसापासून त्रास देणाऱ्या ड्रायवरने इकडे भलताच त्रास दिला. म्हणतो कसा,"मे यहा लोकल एरियामे नही रुकूंगा. आसपास गाड़ी नही घुमाउंगा. उसके लिए यहाकी गाड़ी करो अलगसे." त्याला म्हटले 'तू बस शांत. आम्ही तुझ्या मालकाशी बोलतो.' ते सगळ प्रकरण निस्तरेपर्यंत बराच वेळ वाया गेला. सर्वजण शिकारामध्ये बसून फोटो वगैरे काढून आले आणि थोडी फार शोपींग पण झाली. आधीच ड्रायवर आणि मग त्याच्या मालकाबरोबर झालेल्या वादामूळे अभिजित वैतागला होता. त्यात ड्रायवर गाड़ी पुढे न्यायला तयार नव्हता आता. त्यावर सर्वजण शोपींग करून गाड़ीमधल्या सामानाचे वजन वाढवून आल्याने तो सर्वांवर डाफरला. बरोबरच होते त्याचे... आता गाडीच कॅन्सल झाली असती तर ते सामान काय डोक्यावर घेउन जाणार होतो आम्ही. हे सर्व सुरू असताना मी शमिकाला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेलो. तिला काल रात्रीपासून श्वास घ्यायला थोडा त्रास जाणवत होता. म्हटले अजून उंचीवर जायच्याआधी काही गड़बड़ नाहीना ते बघून घेउया. शिवाय साधना आणि उमेश श्रीनगर यूनीवरसिटीला गेले होते. त्यांना '१५ ऑगस्ट'बद्दल तिथल्या काही मुलांची मते हवी होती. तिकडे जे काही ती मुले बोलली ते खरेच खेदजनक होते. आजही तिथे बऱ्याच लोकांना काश्मिर (खास करून श्रीनगर आणि आसपासचा परिसर) स्वतंत्र हवे आहे. त्यांना भारत नको की पाकिस्तान. 'हम आझाद होना चाहते है.' हे नेहमीचे वाक्य. हे सर्व फुटेज १५ ऑगस्टला दाखवायचे असल्याने ते पोचवायला साधना तशीच IBN-लोकमतच्या श्रीनगर ऑफिसला पोचली. दुपारचे १२ वाजत आले होते आणि आमच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला होता. तिकडे मालकाशी बोलल्यावर ड्रायवर पुढे सरकायला तयार झाला होता पण त्याला २ दिवसात काहीही करून 'लेह'ला पोचायचे होते. नाही पोचलो तर तो आम्हाला जिकडे असू तिकडे सोडून परत निघणार असे त्याने स्पष्ट सांगीतले. आम्ही म्हटले बघुया पुढे काय करायचे ते.
दुपारी १ च्या आसपास दल सरोवराच्या समोर असलेल्या 'नथ्थू स्वीट्स' कड़े जेवलो. कारण एकदा श्रीनगर सोडले की सोनमर्गपर्यंत तसे कुठेही चांगले होटेल नाही. आधीच उशीर झालेला होताच म्हटले चला इकडे जेवून मगच निघुया आता. जेवण झाल्यावर मस्तपैकी गुलाबजाम हाणले. आमचे जेवण होते न होते तोपर्यंत साधना आणि उमेश तिकडे येउन पोचले. वेळ नव्हता म्हणुन त्यांनी थोडेसे घशात ढकलले आणि आम्ही अजून उशीर न करता सोनमर्गकडे निघालो. आता शोभितच्या ऐवजी ऐश्वर्या गाडीत बसली. श्रीनगर ते सोनमर्ग अंतर आहे ९५ की.मी. बरोबर २ वाजता श्रीनगर सोडले. आता कुठेही न थांबता संध्याकाळपर्यंत किमान द्रासला पोचायचे असे ठरले होते. एकदा का अंधार झाला की 'झोजी-ला'च्या पुढे सिक्युरिटी प्रोब्लेम होऊ शकतात. बाइक्स् वरुन आशीष, अमेय साळवी, अभिजित, अमेय म्हात्रे आणि आदित्य पुढे निघून गेले. तर त्या मागुन मी, शमिका, साधना, उमेश आणि ऐश्वर्या गाडीमधून येत होतो. जसे आम्ही श्रीनगरच्या बाहेर पडलो तशी गर्दी संपली आणि सुंदर निसर्ग दिसू लागला.
हिरवी गार शेते आणि त्यामधून वेगाने जाणारे आम्ही. गाड़ी थांबवून त्या शेतांमध्ये लोळावेसे वाटत होते मला. पण तितका वेळ नव्हता हातात. श्रीनगर नंतर पाहिले मोठे गाव लागते ते 'कंगन'. त्या मागोमाग लागते 'गुंड'.
गुंड मधून बाहेर पड़ता-पड़ता आपल्याला 'सिंधू नदीचे पहिले दर्शन' होते. ह्याठिकाणी आम्ही काही वेळ थांबलो आणि मग पुढे निघालो. आता बाइक्स् मागे होत्या आणि आम्ही पुढे. वाटेमध्ये लागणारी छोटी-छोटी गावे पार करत पोचलो 'गगनगीर'ला. ह्या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. गाडीच्या ड्रायवरला डिझेल भरायचे होते म्हणुन तो थांबला. वाटेमध्ये उमेशने मस्त शूटिंग केले. गाड्या पेट्रोलपंपला पोचतील त्याचे शूटिंग करायचे म्हणुन आम्ही दोघेही आमचे कॅमेरे घेउन सज्ज होतो. एक एक करून सर्व बायकर्स् पोचले. ५ वाजत आले होते आणि पटकन एक चहा ब्रेक घ्यावा असे ठरले. शेजारीच मिड-वे टी-स्टॉल होता. टीम मधले फोटोग्राफर कुलदीप आणि अमेय आसपासचे फोटो घेण्यामध्ये गुंतले होते. तिकडे ऐश्वर्याची तब्येत जरा डाउन व्ह्यायला सुरू झाली होती. नाही म्हणता म्हणता ४० मिं. गेली आणि आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. मोठाच ब्रेक झाला ज़रा... गाडी निघाली आणि त्यामागे अभि-मनाली निघाले. आता आशिष आणि शोभित गाडीमध्ये बसले तर मी आणि शमिका बाइकवर पुढे निघालो. अमेय साळवीने गाडी काढली आणि लक्ष्यात आले की त्याच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले आहे.
आता आली का अजून पंचाइत. एक तर आधीच उशिरात उशीर; त्यात अजून एक
प्रॉब्लम. अमेयने गाडीचे चाक काढले. तो पर्यंत अमेय म्हात्रे मागच्या गावात
टायरवाला शोधायला गेला. तेवढ्या वेळात पुढे गेलेला अभि फिरून पुन्हा मागे
आला आणि अमेय साळवी बरोबर चाक घेउन रिपेअर करायला घेउन गेला. आम्ही बाकी
तिकडेच त्यांची वाट बघत बसलो होतो. एवढ्या वेळात बसल्या-बसल्या मी आणि
मनालीने पुन्हा एकदा चहा घेतला. आज काही आपण द्रासला पोहचत नाही हे
आम्हाला समजले होते. आता सोनमर्गला राहण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण सोनमर्ग सोडले की पुढे झोजी-ला पार करून द्रासला पोहचेपर्यंत रहायची तशी सोय नाही.
शिवाय तासभराच्या आत अंधार पडणार होताच. पुढे गेलेली गाड़ी सोनमर्गला पोचली
आणि आम्ही अजून गगनगीरला पडलेलो होतो. अभ्या-अमेय परत यायच्या आधी
सोनमर्गवरुन आशिषचा फोन आला.
"पुढचा रस्ता बंद आहे रे. झोजी-लाच्या
पुढे 'माताईन' गावाजवळ सिंधू नदीवरचा ब्रिज पडला आहे. आर्मी- B.R.O. चे काम
सुरू आहे. उदया दुपारपर्यंत रस्ता सुरू होइल अशी माहिती आहे." बोंबला
... एकात एक ... प्रॉब्लम अनेक. त्यांना तिकडे रहायची सोय काय ते बघायला
सांगितले. आणि अभि - अमेय आल्यावर आम्ही निघालो सोनमर्गच्या दिशेने. अंतर
तसे फार नव्हते पण संध्याकाळ होत आली तसा हवेत जरा गारवा जाणवू लागला.
३०-४० मिं. मध्ये आम्ही सोनमर्गमध्ये प्रवेश केला.
दोन्हीबाजूला बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली होती. सोनमर्ग ८९५० फुट उंचीवर आहे. आम्ही पोचलो तो पर्यंत उमेश आणि आशिषने रहायची- खायची जागा बघून ठेवली होती. संध्याकाळी ८ च्या आसपास तिकडे जेवलो आणि दिवसा अखेरची एक मीटिंग घेतली. तसे आज विशेष काही झालेच नव्हते पण उदया पहाटे-पहाटे लवकर निघून 'लेह'ला किंवा त्याच्या जवळपास तरी पोचायचेचं असे ठरले. ८:३० च्या आसपास रहायच्या जागी जायला निघालो. ही जागा कुठेतरी ३-४ कि.मी आत डोंगरात होती. एकतर सगळा अंधार पडला होता आणि हा गाडीवाला सुसाट पुढे निघून गेला. आम्ही बाईकवर मागुन येतोय रस्ता शोधत-शोधत. डोंगराच्या पलीकडून बारीकसा उजेड येताना दिसत होता. मी, अमेय आणि आदित्यने गाड्या तीथपर्यंत नेल्या. नशीब तिकडे पुढे गेलेले सर्वजण सापडले. सामान उतरवले आणि राहायला मिळालेल्या २ खोल्यांमध्ये शिरलो. ऐश्वर्याची तब्येत बरीच खराब झाली होती. अंगात ताप भरला होता. शोभितचे अंग सुद्धा गरम लागत होते. दोघांना आवश्यक त्या गोळ्या दिल्या आणि सर्वजण झोपी गेलो. पण शांतपणे झोपतील तर ना. कुलदीप, अमेय आणि उमेश बाहेर पडले आणि ट्रायपॉड लावून चंद्राचे फोटो काढू लागले. ११ वाजले तरी ते काही झोपेना. शेवटी १२ च्या आसपास सर्वजण झोपी गेलो. उदया पहाटे ४ ला उठून ५ वाजता सोनमर्ग सोडायचे होते. ब्रिज सुरू झाला की त्यावरुन पहिल्या गाड्या आमच्या निघाल्या पाहिजे होत्या ना...
पुढील भाग : 'द्रास'ला पोचता-पोचता ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ४ - 'द्रास'ला पोचता-पोचता ... !
"कोंबडी पळाली ... तंगडी धरून ... लंगडी घालाया लागली ..." ह्या गाण्याने सर्वजण पहाटे सव्वाचारला जागे झाले. आधी 'पहाटे-पहाटे मला जाग आली' ... हे गाणे लावणार होतो पण लवकर आणि उशिरा झोपलेले सर्वजण उठावे म्हणुन मुद्दामून मी हे गाणे गजर म्हणुन लावले होते. आंघोळी वगैरे करायच्या नव्हत्याच त्यामुळे फटाफट बाकीचे उरकले, सामान बाहेर काढले आणि ५ वाजता निघायला आम्ही तयार झालो. सोनमर्ग सारख्या उंच ठिकाणी किमान पहाटे तरी थंडी वाजेल हा आमचा भ्रम निघाला. एका साध्या टी- शर्ट मध्ये मी पहाटे ५ वाजता तिकडून बाइकवरुन निघालो. खाली मार्केट रोडला आलो तर आमचा ड्रायवर अजून गाड़ीमध्ये झोपलेलाच होता. त्याला उठवला. त्याला बोललो,'गाड़ी मध्येच झोपायचे होते तर खाली कशाला आलात? वर तिकडेच झोपायचा होत ना गाड़ी लावून. आता अजून उशीर होणार निघायला' काही ना बोलता तो आवरायला गेला. बाजुलाच एक होटेल सुरू झालेले दिसले तिकडे चहा सांगितला आणि बाकिच्यांची वाट बघत बसलो. एक तर मोबाइल नेटवर्क नव्हते त्यामुळे वरती फोन सुद्धा करता येइना. श्रीनगर सोडले की कुठलेच नेटवर्क लागत नाही. तसे BSNL लागते अध्ये-मध्ये. अखेर ६ नंतर सर्वजण खाली पोचले. नाश्ता उरकला आणि झोजी-ला मार्गे कुच केले द्रास - कारगीलकडे.
आज सर्वात पुढे मी-शमिका आणि अमेय-दिपाली होतो. बाकी सर्व त्यामागे होते. सोनमर्ग सोडले की लगेच 'झोजी-ला'चा भाग सुरू होतो. 'ला' - म्हणजे इंग्रजीमधला 'पास' हे लक्ष्यात आला असेलच तुम्हाला. बरेच पण 'झोजि-ला पास' असे जे म्हणतात ते चुकीचे आहे. तासाभरात झोजी-लाची 'घुमरी' चेकपोस्ट गाठली. इकडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि माणसाला नाव, गाड़ी नंबर आणि तुमचे लायसंस नंबर याची नोंद करावी लागते. तिकडे आपल्या बायकर स्टाइलने बाइक सर्वात पुढे टाकली आणि चारचाकी गाड्यांच्या पुढे आपला नंबर लावून पुढे सटकलो सुद्धा. आज आम्हाला कुठेच जारही वेळ घालवायचा नव्हता. सोनमर्गच्या ८९५० फुट उंचीवरुन आता आम्ही हळू-हळू वर चढत १०००० फुट उंचीपर्यंत पोचलो होतो. हे झोजी-लाचे काही फोटो.
हा संपूर्ण रस्ता कच्चा आहे. कुठे मातीच माती तर कुठे वरुन वाहत येणारे पाण्याचे प्रवाह. सलग ५-१० मी. रस्ता सलग चांगला असेल तर शपथ. तरी नशीब उन्हाळ्याचा अखेर असल्याने वाहून येणारे पाणी कमीच होते. इथे आता भुयारी मार्ग होतोय अशी पक्की बातमी आहे. कदाचित रस्ते चांगले होतील. पण झोजी-लाचा थरार कमी होईल की काय!!! सोनमर्गनंतरचा सर्व भाग हा L.O.C. म्हणजेच 'ताबा सिमा रेषा'च्या अगदी जवळ आहे. जस-जसे पास चढू लागलो तस-तसे एक-एक शहिद स्मारक दिसू लागले. १९४८ पासून येथे अनेक वीरांनी आपल्या मात्रुभूमीच्या रक्षणार्थ जीवन वेचले आहे. त्यासर्वांच्या आठवणीत येथे छोटी-छोटी स्मारके उभी केली गेली आहेत. काही ठिकाणी थांबत तर काही ठिकाणी मनोमन वंदन करत आम्ही अखेर झोजी-लाच्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११५७५ फुट..
आमच्या समोर होती नजर जाईल तितक्या दूरपर्यंत पसरलेली उंचचं-उंच शिखरे आणि त्यामधून नागमोडी वळणे घेत वाहत येणारी सिंधू नदी. झोजी-ला वरुन दिसणारे ते नयनरम्य दृश्य डोळे भरून पाहून घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. चढायला जितका वेळ लागला तितकाच वेळ उतरायला लागणार होता कारण रस्ता तसाच खराब होता. मध्येच कुठेशी चांगला रस्ता लागला की आम्ही सर्वजण गाड्या सुसाट दामटवायचो. ९ च्या आसपास झोजी-ला पार करून 'मेणामार्ग' चेक पोस्टला १०३०० फुट उंचीवर उतरलो.
इकडे सुद्धा पुन्हा नाव, गाड़ी नंबर आणि लायसंस नंबर याची नोंद केली. डाव्या बाजूला बऱ्याच चारचाकी गाडया थांबून होत्या. चौकीवर असे कळले की पुढचा रस्ता अजून सुद्धा बंदच असून दुपारपर्यंत सुरू व्हायची शक्यता आहे. आता आली का पुढची अडचण. काय करायचे ह्याचा विचार सुरू असतानाच एक व्यक्ती आली आणि आम्हाला विचारू लागली. 'कुठून आलात? आम्ही म्हणालो 'महाराष्ट्र म्हणजे मुंबई - ठाणे वरुन आलोय.' ती व्यक्ती होती आपल्या मराठीमधले कलाकार 'प्रदीप वेलणकर'.
त्यांनी MH-02, MH-04 अश्या नंबर प्लेट बघून लगेच ओळखले असणार की हे तर मराठी मावळे. काहीवेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि आम्ही पुढे निघालो. जिथपर्यंत रस्ता सुरू आहे तिथपर्यंत जाउन बसायचे आणि रस्ता सुरू झाला की पुढे सुटायचे असे ठरले. मेणामार्ग वरुन थोडेच पुढे 'माताईन' गाव आहे. तिथपर्यंत पोचायला फारवेळ लागला नाही. १० वाजता आम्ही तिकडे पोचलो होतो. गेल्या २४ तासांपासून ब्रिजच्या दोन्ही बाजूला वाहनांची ही....... लांब रांग लागली होती. ड्रायवरने गाडी रांगेत लावली. आम्ही मात्र बाइक्सवर अगदी पुढपर्यंत गेलो. ब्रिजच्या आधी थोडा उतार होता तिकडे गाड्या लावल्या आणि काय चालू आहे ते बघायला पुढे गेलो. B.R.O. चे काही कामगार आणि तिकडच्या पोस्टवरचे जवान भरभर काम उरकत होते.
एक मेजर आणि एक कर्नल कामावर देखरेख करत सर्वांना सुचना देत होते. कुलदीप आल्यापासून फोटो काढत कुठे गायब झाला ते पुढचे तास दोनतास कोणालाच माहीत नव्हते. आशिष तर सर्वात पुढे जाउन नदी किनारी उभा राहून कामावर देखरेख करू लागला. मी तिकडे थोडावेळ थांबलो मग कंटाळा आला. पुन्हा माघारी आलो आणि आम्ही गप्पा मारत बसलो. अजून १ तासाभरात ब्रिज सुरू होईल अशी आशा होती. पण कसले काय १२ वाजत आले तरी अजून सुद्धा ब्रिज उघडायचा पत्ताच नाही. श्या ... आता आज सुद्धा आम्ही काही लेह गाठु शकणार नव्हतो हे निश्चित होते. किमान कारगील तरी गाठू अशी आशा होती. पण नंतर मनात विचार आला की आज ब्रिज ओपन झालाच नाही तर ??? लटकलो ना. एक तर पुन्हा झोजी-ला क्रोस करून मागे सोनमर्गला जा; नाहीतर इकडेच कुठेतरी रहायची सोय बघा. आधीच सॉलिड भूक लागली होती. आशिष आणि मनाली काही खायला मिळते का ते बघायला गेले पण आसपास काही म्हणजे काही मिळत नव्हते. अभि आणि मी नकाशा काढून पुढचे अंतर किती आहे, संध्याकाळपर्यंत कुठपर्यंत जाता येईल, तिकडे रहायची सोय काही आहे का... ह्या सगळ्याचा विचार करत बसलो होतो. आसपास अजिबात झाडी नव्हती आणि उन तळपत होते म्हणुन २ बाइक्सच्या मध्ये एक चादर अडकवली आणि त्या सावलीमध्ये ३-४ घुसले. बाकी काहीजण गाडीमध्ये बसले तर काही समोर असणाऱ्या शाळेत जाउन बसले. एका जागी थांबून मला आता कंटाळा यायला लागला होता. म्हणुन मी आसपास फोटो काढायला गेलो.
उत्तुंग कडे असणारे डोंगर आणि त्याला न जुमानता अगदी वर टोकाशी भिडणारे पांढरेशुभ्र ढग ह्यांचा एकच मेळ जमला होता. त्या दोघांनी आकाशात एक सुंदर चित्र निर्माण केले होते. पायथ्याला पसरलेले हिरवे गालीचे त्या दृश्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकत होते. काहीवेळ फोटो काढले आणि पुन्हा गाडीपाशी आलो. तितक्यात एक मुलगा कुठूनसा आला आणि ओरडू लागला. 'बाबा MH-०४ गाडी'. त्याच्यामागुन त्याचा तो बाबा आला आणि त्यांनी विचारले 'ठाणे का?' मी म्हटले 'होय'. मी असे ऐकून होतो की लडाखला जाणाऱ्या लोकांमध्ये मराठी लोकांचा बराच वरचा नंबर आहे. गेल्या ३-४ दिवसात ते प्रकर्षाने जाणवत होते. मुंबईवरुन आलेल्या त्यालोकांशी काहीवेळ गप्पा मारल्या. आल्यापासून तसा गायब असलेला कुलदीप कुठूनसा आला आणि ऐश्वर्या, आदित्य, पूनम आणि अमेयला घेउन नदीकाठी फोटोग्राफी करायला गेला. मी आणि साधना पुन्हा आपल्या नोट्स काढायच्या कामाला लागलो.
३ वाजत आले तशी आर्मीच्या लोकांची हालचाल सुरू झाली. 'ये वाली गाडी पीछे लो. सामनेसे अभि गाडियां आने वाली है.' ब्रिज सुरू होण्याची लक्ष्यणे दिसू लागली तर. आम्ही भराभर बाइक्सवर सवार झालो आणि त्या ट्राफिकमधून जाण्यापेक्षा बाजुच्या गवतात बाइक टाकल्या. आणि सुसाट ब्रिज पार झालो. इकडून द्रास अवघे ४० की.मी होते. तेंव्हा आता थेट द्रासला जाउन थांबायचे, काहीतरी खायचे आणि द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायचे असे ठरले. पुढचा रोड इतका मस्त होता की आम्ही बाइक किमान ८० च्या स्पीडला पळवत होतो. झोजी-ला वरुन द्रासला जाताना डाव्या बाजूला आर्मीचे 'High Altitude Training School' आहे. त्याच्या लगेच पुढे जम्मू आणि काश्मिर रायफल्सचे ट्रेनिंग स्कुल आहे. त्याला आता कॅप्टन विक्रम बत्रा (PVC) यांचे नाव देण्यात आले आहे. ४० मिं. मध्ये आम्ही द्रास मध्ये पोचलो होतो. द्रास ... ऊँची ९८५० फुट फ़क्त. तरीसुद्धा जगातली लोकवस्ती असलेली दुसऱ्या क्रमांकाची थंड जागा असे ज्याचे वर्णन केले जाते ते द्रास.
छोटुसे आहे द्रास. फार मोठे नाही. गावामधून जाणाऱ्या रस्त्यावरच दुकाने आहेत. आम्ही एक ठिकसे होटेल शोधले आणि शिरलो आत. 'होटेल दार्जिलिंग'. जे होते ते पोटात टाकले. काही फोन करायचे होते ते केले. हे सर्व आटपेपर्यंत ५ वाजत आले होते आणि आमच्यामागुन सर्व चारचाकी गाड्या कारगीलकडे रवाना झाल्या होत्या. आता कारगीलला जाउन रहायची जागा मिळणे थोड़े कठिण वाटत होते तेंव्हा आज द्रासलाच रहायचे असे ठरले. शिवाय सकाळी बरी असलेली ऐश्वर्याची तब्येत आता पुन्हा ख़राब व्हायला लागली होती. सर्वानुमते आम्ही आज एकडेच रहायचे ठरवले आणि जागेच्या शोधात निघालो. २ मिं. वरच सरकारी डाक बंगला होता तिकडे खोल्या मिळाल्या. ६ वाजता सर्व सामान खोलीत टाकले आणि निघालो द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायला... नेमक्या काय भावना होत्या आमच्या 'वॉर मेमोरियल'ला जाताना???
पुढील भाग : अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ५ - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !
"ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते."
ज्यांनी 'आपल्या उदयासाठी स्वतःचा आज दिला' अश्या वीर जवानांचे स्मरण आणि आपल्या आयुष्यातले काही क्षण त्यांना अर्पण करावे याहेतूने आम्ही 'द्रास वॉर मेमोरिअल'ला भेट द्यायला निघालो होतो. डाक बंगल्यावरुन बाहेर पडतानाच समोर 'टायगर हिल' दिसत होते. त्याच्या बाजुलाच पॉइंट ४८७५ म्हणजेच ज्याला आता 'कॅप्टन विक्रम बत्रा टॉप' म्हणतात ते दिसत होते. संध्याकाळ होत आली होती. द्रासवरुन पुढे कारगीलकडे निघालो की ७ की.मी वर डाव्या हाताला वॉर मेमोरिअल आहे. द्रासमध्ये सध्या पंजाबची माउंटन ब्रिगेड स्थित आहे. २६ जुलै २००९ रोजी संपूर्ण भागात आर्मीने १० वा कारगील विजयदिन मोठ्या उत्साहात आणि मिश्र भावनांमध्ये साजरा केला. एकीकडे विजयाचा आनंद तर दूसरीकडे गमावलेल्या जवानांचे दुखः सर्व उंच पर्वतांच्या उतारांवर '10th Anniversary of Operation Vijay' असे कोरले होते.
खरं तरं २६ जुलैलाच या ठिकाणी यायची इच्छा होती. मात्र मी कामावर असल्याने ते शक्य झाले नाही. तेंव्हा १५ ऑगस्टला जोडून या ठिकाणी भेट द्यायची असे आधीच नक्की झाले होते. लडाख मोहिमेचे महत्वाचे उद्दिष्ट हेच होते. २० एक मिं. मध्ये मेमोरिअलला पोचलो. परिसर अतिशय शांत आणि पवित्र वाटत होता. सध्या ह्या स्मारकाची जबाबदारी '२ ग्रेनेडिअर' ह्या रेजिमेंटकडे आहे. 'Indian Army - Serving God and Country With Pride' हे प्रवेशद्वारावरचे वाक्य वाचून नकळत डोळे पाणावले गेले.
मुख्य प्रवेशद्वारापासून खुद्द स्मारकापर्यंत जाणाऱ्या पदपथाला 'विजयपथ' असे नाव दिले गेले आहे. या पदपथावरुन थेट समोर दिसत होते एक स्मारक. ज्याठिकाणी पर्वतांच्या उत्तुंग कडयांवर आपल्या जवानांनी प्राणांचे बलिदान दिले त्याच ठिकाणी त्या वीरांचे एक सुंदर स्मारक उभे केले आहे.
त्या विजयपथावरुन चालताना मला आठवत होती १० वर्षांपूर्वीची ती एक-एक चढाई... एक-एक क्षणाचा दिलेला तो अथक लढा. धारातीर्थी पडलेले ते एक-एक जवान आणि ते एक-एक पाउल विजयाच्या दिशेने टाकलेले. १९९८ चा हिवाळ्यामध्येच पाकिस्तानी सैन्याने घुसखोरीची संपूर्ण तयारी केली होती. या ऑपरेशनचे नाव होते 'अल-बदर'. पाकिस्तानी ६२ नॉर्थ इंफंट्री ब्रिगेडला याची जबाबदारी दिली गेली होती. झोजी-ला येथील 'घुमरी' ते बटालिक येथील 'तुरतुक' ह्या मधल्या द्रास - कारगील - तोलोलिंग - काकसर - बटालिक ह्या १४० की.मी च्या पट्यामध्ये ५००० पाकिस्तानी सैनिकांनी सुयोग्य अश्या ४०० शिखरांवर ठाणी प्रस्थापित केली होती. हा साराच प्रदेश उंचचं-उंच शिखरांनी व्यापलेला. हिवाळ्यामध्ये तापमान -३० ते -४० डिग. इतके उतरल्यावर माणसाला इकडे राहणे अशक्य. भारतीय सेना हिवाळ्याच्या सुरवातीला विंटर पोस्टवर सरकल्याचा फायदा घेत करार तोडून पाकिस्तानी सैन्याने ह्या संपूर्ण भागात घूसखोरी केली आणि १९४८ पासून मनाशी बाळगगेले सुप्तस्वप्न पुन्हा एकदा साकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपलीच इंच-इंच भूमी पुन्हा मिळवण्यासाठी मग भारतीय सेनेने एक जबरदस्त लढा देत पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवून दिले. जगातल्या लढण्यासाठी अत्यंत प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या युद्धभूमीवर अवघ्या ३ महिन्यांच्या आत त्यांनी शत्रूला खडे चारून अक्षरश: धुळीत मिळवले. झोजी-ला ते बटालिक ह्या २५० की.मी. लांब ताबारेषेचे संरक्षण हे १२१ इंफंट्री ब्रिगेडचे काम होते. ह्या भागात १९४८ मध्ये झालेल्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने मोठ्या मुश्कीलीने हा भूभाग परत मिळवला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये सुद्धा ह्या भागात तुंबळ लढाया झाल्या होत्या.
४ मे ला बटालिकच्या जुब्बार टेकडी परिसरात घूसखोरी झाल्याची बातमी मिळाल्यानंतर आर्मीची हालचाल सुरू झाली. ७-८ मे पासून परिसरात जोरदार तोफखाने धडधडू लागले आणि पाहिल्या काही चकमकी घडल्या. पुढच्या काही दिवसात संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे हे लक्षात आल्यावर वातावरणाशी समरस होत भारतीय सेना पुढे सरकू लागली. पण हे सर्वसामान्य लोकांसमोर यायला मात्र २५ मे उगवला. जागतिक क्रिकेट करंडकाच्या सोहळ्यात गुंतलेल्या भारतीयांना - खास करून पत्रकारांना इतर गोष्टींकडे बघायला वेळ होताच कुठे???
२६ मे रोजी वायुसेनेची लढाउ विमाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू करीत आसमंतात झेपावली. दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी फ्लाइट ले. नाचिकेत यांचे विमान 'फ्लेम आउट' झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले तर त्यांना शोधण्यात स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा हे पाकिस्तानी सैन्याच्या हातात सापडले. या नंतर मात्र वायुसेनेने मिराज २००० ही लढाउ विमाने वापरली ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या कुमक आणि रसद वर परिणाम झाला. 'ऑपरेशन सफेद सागर' हे 'ऑपरेशन विजय'च्या जोडीने शेवटपर्यंत सुरू होते.
दुसरीकडे भारतीय सेनेने २२ मे पासून सर्वत्र चढाई सुरू केली होती. १५००० फुट उंचीच्या तोलोलिंग आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच एरिया फ्लैट, बरबाद बंकर या भागात १८ ग्रेनेडिअर्सने हल्लाबोल केला. ह्या लढाई मध्ये ३ जून रोजी ले. कर्नल विश्वनाथन यांना वीरमरण आले. ११ जूनपर्यंत बोफोर्सने शत्रूला ठोकून काढल्यावर १२ जून रोजी तोलोलिंगची जबाबदारी २ 'राजरीफ'ला (राजपूत रायफल्स) देण्यात आली. १२ जूनच्या रात्री मेजर गुप्ता काही सैनिकांसोबत मागच्याबाजूने चाल करून गेले. ह्या लढाईमध्ये मेजर गुप्ता यांच्या सोबत सर्वच्या सर्व जवान शहीद झाले पण तोलोलिंग मात्र हाती आले. भारतीय सेनेचा पहिला विजय १२ जूनच्या रात्री घडून आला. त्यानंतर मात्र भारतीय सेनेने मागे पाहिले नाही. एकामागुन एक विजय सर करीत ते पुढे सरकू लागले. १४ जूनला 'हम्प' जिंकल्यावर २ राजरिफच्या जागी तिकडे १३ जैकरीफ (J & K रायफल्स) ने ताबा घेतला आणि १४ जूनला त्यांनी 'रोंकी नॉब' जिंकला.
आता लक्ष्य होते पॉइंट ५१४०. ह्यावर १३ जैकरीफ दक्षिणेकडून, २ नागा बटालियन पश्चिमेकडून तर १८ गढवाल पूर्वेकडून चाल करून गेल्या. २० जून रोजी पहाटे ३:३५ ला कॅप्टन विक्रम बत्राच्या डेल्टा कंपनीने पश्चिमेकडच्या भागावर पूर्ण भाग हातात घेतला. १६००० फुट उंचीवर त्यांचे शत्रुशी रेडियो वर संभाषण झाले. पलीकडचा आवाज बोलत होता, 'शेरशहा, ऊपर तो आ गए हो, अब वापस नही जा सकोगे.' शेरशहा हे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे लढाईमधले टोपण नाव होते. शेरशहा कडून लगेच प्रत्युत्तर गेले. 'एक घंटे मे देखते है, कौन ऊपर रहेगा.' आणि १ तासात त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. समोरून येणाऱ्या गोळीबाराला न जुमानता ५ जवान घेउन ते शत्रुच्या खंदकला भिडले. २ संगर उडवले आणि शत्रुच्या ३ सैनिकांशी एकट्याने लढून ठार केले. पॉइंट ५१४० जिंकल्यावर रेडियोवर आपल्या कमांडिंग ऑफिसरला सांगितले. 'सर, ये दिल माँगे मोअर'. पुढे पॉइंट ४८७५ च्या लढाईमध्ये ५ जुलै रोजी शेरशहा उर्फ़ कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. 'रायफलमन संजय कुमार' यांनी पॉइंट ४८७५ वर अत्तुच्च पराक्रम करत १३ जैकरीफला 'फ्लैट टॉप'वर विजय प्राप्त करून दिला. ह्या दोघांना 'परमवीर चक्र' प्रदान केले गेले.
यानंतर पॉइंट ५१००, पॉइंट ४७००, थ्री पिंपल असे एकामागुन एक विजय मिळवत भारतीय सेनेने अखेर ३ जुलैच्या रात्री १६५०० फुट उंचीच्या 'टायगर हील'वर हल्लाबोल केला. ८ सिख, १८ गढवाल आणि १८ ग्रेनेडिअर्सने आपापले मोर्चे जिंकत आगेकूच सुरू ठेवली होती. ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव यांनी ह्या लढाईमध्ये अत्तुच्च पराक्रम केला. त्यांना 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले. अखेरचा हल्ला १८ ग्रेनेडिअर्सच्या कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी चढवला आणि विजय प्राप्त केला. 'Sir. I am on the Top' अशी आरोळी त्यांनी रेडियोवर ठोकली.
कारगील येथील पॉइंट १३६२० ह्या ठिकाणी लढाईमध्ये कश्मीरासिंगचा एक हातच धडा वेगळा झाला. त्याने स्वतःचा हात स्वतःच उचलून घेतला आणि इतर सैनिकांनी त्याला आर्मी हॉस्पिटलकडे नेले. वाटेमध्ये तो आपल्या लढाईची झटपट त्या २ सैनिकांना सांगण्यात मग्न होता. अचानक एकाने विचारले,"कश्मीरा, टाइम काय झाला असेल रे?"कश्मीराने उत्तर दिले,"माझ्या त्या तुटलेल्या हातावर घड्याळ आहे. तूच बघ ना."
दोस्तहो ... आता काय बोलू अजून ??? खरंतरं मला पुढे काही लिहायचे सुचत नाही आहे. इतकच म्हणीन...
When you go home, tell them of us & say,
for your tomorrow we gave our today"
ऑपरेशन विजयमध्ये शहीद आणि जखमी झालेल्या सर्व १०९१ अधिकारी आणि जवानांची नावे...
स्मारकासमोर २ मिं. नतमस्तक होउन त्यांना मूक श्रद्धांजली वाहिली आणि बाजूला असलेल्या शहीद ले. मनोज पांडे 'एक्सिबिट'मध्ये गेलो. प्रवेशद्वारातून आत गेलो की समोरच शहीद ले. मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफनी बांधलेला आणि हातात इंसास रायफल असलेला अर्धाकृति पुतळा आहे. त्यांच्यामागे भारताचा तिरंगा आणि ग्रेनेडिअर्सचा कलर फ्लॅग आहे.
उजव्या हाताला 'कारगील शहीद कलश' आहे. ह्यात सर्व शहीद जवानांच्या पवित्र अस्थि जतन केल्या गेल्या आहेत. कारगील लढाईमध्ये वापरलेल्या, शत्रुकडून हस्तगत केलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी आत मांडल्या आहेत. या लढाईमध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र मिळालेल्या वीरांचे फोटो आहेत. तोलोलिंग, पॉइंट ४८७५, टायगर हिल वर कोणी कशी चढाई केली त्याचे मोडल्स बनवलेले आहेत.
लढाईचे वर्णन करणारे शेकडो फोटो येथे आहेत. हे फोटो बघताना उर जसा अभिमानाने भरून येतो तश्या हाताच्या मुठी सुद्धा घट्ट होतात. आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिले आहे ते पाहून डोळे भरून येतात. एक वेगळीच विरश्री अंगात भिनते. कुठल्या परिस्थितिमध्ये आपल्या वीरांनी हा असीम पराक्रम केला हे एक्सिबिट बघून लगेच समजते. काहीवेळ तिकडे असणाऱ्या सैनिकंशी बोललो. अधिक माहिती घेतली.
८ वाजत आले होते तेंव्हा तिकडून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा मेमोरियल
समोर उभे राहिलो. दिवस संपला होता. एक जवान शहीद स्मारकासमोर ज्योत पेटवत
होता. त्याला प्रतिसाद म्हणुन बहूदा ते शहीद वीर वरुन म्हणत असतील. 'कर चले हम फिदा जान और तन साथियों ... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...'
तिकडून निघालो तेंव्हा आमच्यापाशी एक अनुभव होता. असा अनुभव जो आम्हाला
कधीच विसरता येणार नव्हता. ते काही क्षण जे आम्हाला त्या थरारक रणभूमीवर
घेउन गेले होते. शहीद कॅप्टन विक्रम बत्राचा फोटो आणि शहीद ले.
मनोज पांडे यांचा पुतळा पाहून अंगावर अवचित उठलेला तो शहारा मी जन्मभर
विसरु शकणार नाही. त्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनिकांचे स्मरण करण्यासाठी मी
इकडे पुन्हा-पुन्हा येइन. जसे-जेंव्हा जमेल तसे...
पुन्हा एकदा माघारी निघालो. ८:३० वाजता डाक बंगल्यावर पोचलो. ड्रायवर अजून सोबतचं होता. आम्हाला उदया लेहला सोडुनच तो परत जाणार होता. जेवणानंतर उदयाचा प्लान ठरवला. कारगील बेसला जास्त वेळ लागणार असल्याने साधना, उमेश, अमेय म्हात्रे, ऐश्वर्या आणि पूनम गाडीमधुन येणार होते. बाकी सर्व बायकर्स पुढे सटकणार होते. सकाळी ६ ला निघायचे असे ठरले आणि सर्वजण झोपेसाठी पांगलो. द्रास पाठोपाठ आता उदया कारगील शहर बघायचे होते आणि त्याहून पुढे जाउन कुठल्याही परिस्थितीमध्ये लेह गाठायचे होतेच...
लढाईचे संदर्भ - 'डोमेल ते कारगील' - लेखक मे. जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे.
पुढील भाग : 'फोटू-ला' - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ६ - फोटू-ला - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !
आज होता मोहिमेचा चौथा दिवस. सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण द्रासवरुन लेहकडे कुच झाले. आज कारगीलमार्गे 'नमिके-ला' आणि 'फोटू-ला' असे २ पास फत्ते करत लेहच्या पठारावर उतरायचे होते. जम्मूपासून निघालेले आम्ही १५ वेडे अथकपणे ५०९ की.मी.चे अंतर पार करत आपल्या लक्ष्याकडे झेप घेत होतो. आजचे अंतर होते ३१९ की.मी. आणि हे अंतर आज आम्ही काहीही झाले तरी गाठणार होतोच. आज पुन्हा एकदा मी आणि अमेय साळवी सर्वात पुढे सुटलो. पहिले लक्ष्य होते द्रासपासून ५७ की.मी.वर असणारे कारगील. पोटात काहीतरी टाकल्याशिवाय काही सूचायचे नाही आणि जमायचे देखील नाही हे पक्के ठावुक असल्याने तासा-दिडतासामध्ये तिकडे पोचून पहिले उदरभरण करायचे असे ठरवून आमचे घोडे सुसाट दामटवले. पुन्हा काही वेळात डाव्या हाताला 'द्रास वॉर मेमोरिअल' लागले. पण न थांबता 'बाये का सल्युट' देत आम्ही भरधाव तसेच पुढे निघालो. वळणा-वळणाच्या त्या रस्त्यावरुन सकाळच्या प्रहरी बाइक पळवायला मज्जा येत होती. ठंडी नव्हती पण हवेत थोड़ासा गारवा होता. मस्त वाटत होते. एके ठिकाणी रस्ता आम्हाला वर-वर घेउन गेला. उजव्या हाताला डोंगर तर डाव्या हाताला खाली सिंधूनदीचे पात्र. मी सर्वात पुढे होतोच. अचानक रस्ता झपकन असा उजवीकडे वळला की मला रिअक्शन टाइम खुप कमी मिळाला. पण तितक्याच वेगाने मी बाइक उजवीकडे वळवली. जरा समोर गेलो असतो तर काय झाल असत ते सांगायला नकोच. एकदम छाती भरून आली आणि मी बाइक स्लो केली. एकदम मनात काहीतरी विचार येउन गेला. हूश्श्श्... आता वर-वर गेलेला तो रस्ता आता जोरात खाली उतरु लागला आणि त्या ठिकाणी डाव्या हाताने नदीचा अजून एक फाटा येउन मिळत होता.
सुंदर दृश्य होते ते. विविध रंगाची फूले तिकडे फुलली होती. बाजुलाच आर्मीच्या महार रेजिमेंटची छोटीशी पोस्ट होती आणि उजव्या हाताला त्याच रेजिमेंटचे एक शहीद स्मारक होते. आम्ही सर्वच तिकडे फोटोग्राफी करायला थांबलो. द्रास - कारगिलच्या मध्ये ताबारेषा अतिशय जवळ म्हणजे अवघे ८-१० की.मी इतकी जवळ आहे आणि सिंधूनदीचे अनेक फाटे-उपफाटे भारत - पाकिस्तान सरहद्दीमधून पार होतात. ह्या संपूर्ण भागावर लक्ष्य ठेवण्यासाठी जागो जागी छोटे-छोटे बंकर्स उभारून पोस्ट तयार केल्या आहेत. कमीतकमी सैन्यानिशी जास्तीतजास्त भागावर लक्ष्य ठेवता येइल अशी रचना येथे केली आहे. नदीच्या पलीकडे जायला आर्मीने ठिकठिकाणी छोटे-छोटे पुल बांधले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला प्रवेश निषिद्ध आहे. पलिकडच्या बाजूला डोंगरांवर जाणाऱ्या वाटा स्पष्ट दिसतात. त्या नक्कीच 'बॉर्डर पीलर'कडे जात असतील. जेंव्हा थांबलो होतो तेंव्हा लक्ष्यात आले की भूक वाढते आहे. अभिने आणलेली चिक्की पोटात ढकलली आणि पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला अजून एक मेमोरियल दिसले. मी बाइक उजव्या हाताला नेउन थांबवली. त्यावर लिहिले होते 'हर्का बहादुर मेमोरियल'.
ह्या मेमोरियलबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. बहुदा हे नविन बांधले गेले आहे की काय अशी शंका आली. पण नाही हे मेमोरियल तर इकडे खुप आधीपासून आहे असे कळले. त्या स्मारकाच्या समोर असणाऱ्या ब्रिजला 'हर्का बहादुर ब्रिज' असे नाव आहे. १९४८ मध्ये काश्मिरवर जेंव्हा आक्रमण झाले तेंव्हा हा ब्रिज 'सुभेदार हर्का बहादुर' यांनी २३ नो. १९४८ रोजी जिंकून पाकिस्तानी सैन्याची अगेखुच रोखली होती.
त्यांना मनोमन वंदन करत आम्ही पुन्हा एकदा वेगाने कारगीलकडे सरकलो. राहिलेले ५ की.मी अंतर पार करून सकाळी ८ वाजता आम्ही कारगीलमध्ये पोचलो. ठरल्याप्रमाणे गाड़ी आर्मी बेसकडे निघून गेली होती. आम्ही मात्र नाश्ता करायला एक होटेल शोधले.
'होटेल शहनवाझ' एकदम छोटूसे होते पण जागेपेक्षा कार्यकारणभाव महत्वाचा नाही का ??? गरमागरम पराठे दिसल्यावर आम्ही बाइक्स् बाजूला पार्क केल्या आणि घुसलो आत. इतके जण सकाळी-सकाळी बघून तो पण गांगरला बहुदा. पण मग नवाझ साहब सुरू झाले. तो बनवतोय आम्ही खातोय ... तो बनवतोय आम्ही खातोय ... कोणी थांबतच नव्हते. एकदाचे उदरभरण झाले आणि मग आम्ही पुढे निघालो.
कारगीलची उंची ८५४० फुट आहे आणि हे लडाखमधले लेह नंतर दूसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे. मार्केटमधून बाहेर पडले की २ रस्ते लागतात. समोर जाणारा रस्ता 'झंस्कार'ला जातो तर डावीकडचा रस्ता ब्रिज पार करून वर चढतो आणि पुढे लेहकडे जातो. ह्याच ठिकाणी उजव्या हाताला कारगील ब्रिगेड स्थित आहे. साधना आणि उमेशला इकडे बरेच शूटिंग करायचे होते पण अजून परमिशन मिळत नव्हती. शेवटी असे ठरले की गाड़ी मागे राहील आणि काम झाले की बाइक्सना कव्हर करेल. साधना - उमेशला शूटिंग संपवायला २ तास मिळणार होते. सोबत अमेय म्हात्रे, शोभीत आणि पूनम होतेच. अमेयने कारगील लायब्ररीला देण्यासाठी काही पुस्तके आणली होती. तीही त्यास तिकडे द्यायची होती. आम्ही बाकी सर्व १० जण मात्र पुढे निघालो. ब्रिज पार करून लेहच्या रस्त्याला लागलो. जसे वर-वर जाऊ लागलो तसे सिंधू नदीकाठी वसलेल्या कारगीलचा नजारा दिसू लागला.
पण आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली. सोनमर्ग - झोजी-लापर्यंत असणारा निसर्ग आता वेगळे रूप दाखवू लागला होता. आता हिरवा निसर्ग नव्हता तर सर्व काही रखरखीतपणा होता. पण त्याचे सौंदर्य सुद्धा वेगळेचं होते. खाली नदीकाठी मात्र शेती दिसत होती. डोंगर मात्र उघडे बोकडे. श्रीनगरपासून बाइक्स्मध्ये पेट्रोल नव्हते ते इकडे टाकुन घेतले आणि मग पुढचे लक्ष्य होते - 'मुलबेक'.
डाव्याहाताला दुरवर जुब्बार - बटालिकच्या डोंगरसरी साद घालत होत्या. ह्याच ठिकाणाहून तर सुरू झाली होती घुसखोरी. बटालिकच्या भागात मुख्य ३ रिड्ज आहेत.जुब्बार, कुकरथांग-थारू आणि खालुबार. ह्या ठिकाणी ठाणी बनवून 'चोरबाटला' खिंड जिंकून लेहच्या काही भागावर कब्जा करायचा पाकिस्तानचा डाव स्पष्ट झाला होता. भारतीय सेनेतर्फे १२ जैकरीफ (J & K रायफल्स), १ बिहार आणि १/११ गुरखा रायफल्स यांना ह्या भागाची जबाबदारी दिली गेली होती. २९ मे रोजी 'मेजर सर्वानन' यांनी जुब्बारवर जबर हल्ला चढवला. शेवटच्या अवघ्या २०० मी अंतरावर असताना त्यांच्यावर शत्रुने बेधुंद गोळीबार सुरू केला. त्यांच्या सोबत सर्वात पुढे 'लान्सनायक शत्रुघ्नसिंग' आणि जवान प्रमोद होते. इतक्यात एका गोळीने प्रमोदचा वेध घेतला. तो क्षणात खाली कोसळला. मेजर सर्वानन यांनी शत्रुघ्नसिंगच्या पाठीवर थाप मारत 'बढ़ते रहो' असा इशारा केला. ते स्वतः त्याला ओलांडून पुढे जातात न जातात तोच ३ गोळ्या त्यांच्या डोक्यातून आरपार गेल्या आणि ते जागीच कोसळले. शत्रुघ्नसिंगच्या पायात सुद्धा गोळ्या घुसल्या होत्या पण बहुदा त्याला थंडीमूळे तितकी वेदना जाणवत नव्हती. आपला पहिला हल्ला फसला आहे हे समजुन आल्यानंतर तो ४-५ तास निपचित पडून राहिला. अंधार पडल्यावर त्याने रांगायला सुरवात केली. उजव्या पायाला आधार मिळावा म्हणुन त्याने बूटाच्या लेसने तो डाव्या पायाला बांधला. दिवसा झोपून रहायचे आणि रात्री मुंगीच्या वेगाने रांगत तळाकडे सरकत रहायचे हा त्याचा क्रम ७-८ दिवस सुरू होता. एव्हाना पायाची जखम पूर्णपणे चिघळून त्यात अळ्या होऊ लागल्या होत्या. अखेर तो आपल्या सैनिकांना सापडला. स्वतःच्या मनोबलावर त्याने खरच पुनर्जन्म मिळवला होता. अखेर २९ जून रोजी १ बिहारने जुब्बारचे ओब्झरवेशन पोस्ट जिंकून शत्रूला मागे रेटले.
अखेरच्या हल्ल्यासाठी १ बिहारला मदत म्हणुन २२ ग्रेनेडिअर्सची १ कंपनी आणली गेली. ५ जुलैच्या संध्याकाळी थोडे उशिराने शत्रूची मोठी कुमक येताना दिसल्यावर 'रॉकेट साल्वो'ने (MBRL) अचूक मारा केला आणि क्षणार्धात तो साठा उद्वस्त केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै आपण 'जुब्बार टॉप' जिंकून घेतला. लागलीच पुढे आगेकुच करत १ बिहारने ७ जुलै रोजी पॉइंट ४९२४ सुद्धा जिंकला. तिकडे दुसरीकडे १२ जैकरीफ आणि १/११ गुरखा रायफल्स यांनी खालुबार भागात पॉइंट ४८१२, पॉइंट ५२५०, पॉइंट ५२८७ हे सर्व जिंकून घेतले होते. खुद्द खालुबारच्या लढाईमध्ये १/११ गुरखा रायफल्सच्या 'लेफ्ट. मनोजकुमार पांडे' यांनी असीम पराक्रम केला. खांदयात आणि पायात गोळ्या लागलेल्या असताना देखील आपल्या तुकडीसकट त्यांनी शत्रुच्या बंकर्सवर 'आयो गुरखाली'ची आरोळी ठोकत हल्ला चढवला. खालुबार हाती आले पण लेफ्ट. मनोज पांडे यांना वीरमरण आले. अर्थात त्यांचे हे शौर्य परमवीर चक्रच्या मानाचे ठरले. पॉइंट ५२०३, पॉइंट ४१०० आणि आसपासचा सर्व भाग १२ जुलैपर्यंत भारतीय सैन्याने ताब्यात घेतला होता. चोरबाटला खिंडीवर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव पूर्णपणे फसला होता...
आपल्या सैन्याच्या विरश्रीला - बलिदानाला मनोमन एक सलाम केला आणि आमचा वेळेचा डाव मात्र फसू नये म्हणुन आम्ही आता वेगाने पुढे निघालो.
मजल दरमजल करत आता आम्ही पोचलो 'लोचुम्ब' ह्या ठिकाणी. छोटेसे गाव होते. पुढे बघतो तर काय हे ट्राफिक. वाहनांची मोठी रंग लागलेली. कळले की समोरून आर्मीचा कोंव्होय येतोय. चांगल्या ५०-६० गाड्या आहेत. आम्ही बाइक कधी उजव्या तर कधी डाव्याबाजूने काढत पुढे सरकत राहिलो. अखेर एके ठिकाणी मात्र अडकलोच. ट्रकच्या उजव्याबाजूने बाइक जेमतेम जाइल इतकीच जागा होती. शिवाय उजव्या बाजूला ६-८ फुट खोली होती. अभिने बाइक पुढे टाकली आणि त्याची अंगाने बारीक डिस्कवर निघून सुद्धा गेली. आशिषने कुलदीपची यामाहा तर अशी झुपकन काढली की उतरून पुढे फोटो काढायला गेलेला कुलदीप मागे फिरेपर्यंत आशिष ट्रकच्या त्याबाजूला पोचला सुद्धा होता. आता होत अमेय. त्याने गाडी टाकली खरी पण एका क्षणाला त्याला असे कळले की आता पुढे जायचे असेल तर उजवा पाय टेकवून बाइक उजवीकडे झुकवायला हवी. तो उजवीकडे पाय टेकवणार तोच त्याला कळले की अरे... पाय टेकवायला तर जागाच नाही आहे. एव्हाना बाइकचा तोल उजव्याबाजूला जायला सुद्द्धा लागला होता. आता अमेय आणि मागे बसलेली दिपाली हमखास पडणार होते. पण नेमके त्याच वेळेला दीपालीने तिच्या डाव्या हाताने सहजच ट्रकला पकडले. खरंतरं तिला माहितच नव्हते की बाइक उजव्या बाजूला पडणार आहे. नशीब पडायचे वाचले दोघे. तिला तसेच पकडायला ठेवायला सांगून मग अमेयने बाइक कशीतरी पुढे काढली. त्या मागुन आदित्यने ऐश्वर्याला आणि मी शमिकाला खाली उतरायला सांगीतले. बाइक्स पुढे काढल्या आणि ट्राफिक सुटायची वाट बघू लागलो. जवळ-जवळ ४० मिं. नंतर अखेर पुढे जायला वाट मिळाली.
तिकडून निघालो तेंव्हा ११:१५ वाजले होते. आता कुठे ही न थांबता मुलबेकला
पोचलो. कारगीलनंतर लडाखमध्ये प्रवेश केला की सर्व काही बदलते. निसर्ग आणि
राहणारी लोक सुद्धा. लोचुम्बपासून सर्व बुद्धधर्मीय लडाखी लोकांची वस्ती
सुरू होते. मुलबेक येथून बौद्धमठ म्हणजेच गोम्पा (Monestry) सुरू होतात.
मुलबेकचे मुख्य गोम्पा डोंगरावर आहे तर रस्त्याच्या उजव्या हाताला अजून एक
गोम्पा आहे. आम्ही बरोबर १२ वाजता तिकडे पोचलो. तिकडून कारगीलमध्ये साधनाला
कॉल केला तेंव्हा कळले की त्यांना अजून वेळ लागणार असल्याने त्यांनी गाडी
पुढे पाठवून दिली आहे आणि ते स्वतः काम झाले की वेगळी गाडी करून
रात्रीपर्यंत लेहला पोचतील. भूका लागल्या होत्या तेंव्हा गोम्पा बघून
खादाडी करायची असे ठरले. गोम्पाच्या बाहेरच फिरती घंटा आहे. प्रत्येक
गोम्पा बाहेर अशी १ तरी घंटा आपल्याला बघायला मिळतेच. खिडक्या आणि दरवाजे
यावर
सर्वत्र असणारे रंग आपले लक्ष्य वेधून घेतात. मुलबेक गोम्पामध्ये प्रवेश
केल्या-केल्या एक मोठी कोरलेली प्रतिमा आहे. ती कोणाची आहे ते कळायला मार्ग
नाही. तिकडे असलेले मोन्क म्हणजे भिक्षु काही बोलायला तयार नव्हते.
आतमध्ये एक चांगला ५ फुट मोठा दिवा होता. तो कधीच विझत नाही. तिकडे बुद्ध
प्रतिमेला नमन केले आणि समोर असलेल्या छोट्याश्या दुकानामध्ये शिरलो.
त्याच्याकडे खायला काहीच नव्हते त्यामुळे फ़क्त चहा - बिस्किट खाल्ले आणि
तसेच न जेवता पुढे सुटलो.
१२:३० ला तिकडून निघालो तेंव्हा सर्वांनी पाणी भरून घेतले. आता पुढे बराच वेळ पाणी सहज मिळत नाही. दुपारच्या त्या रखरखत्या उन्हामध्ये आम्ही १०४२० फुट उंचीवरुन अजून वर-वर चढत होतो. आता लवकरचं नमिके-ला लागणार होता. ह्या संपूर्ण रस्त्यात न एक झाड़ होते न एके ठिकाणी पाणी. वाळवंटचं होते हे एक प्रकारचे. हिवाळ्यामध्ये इकडे 'कोल्ड डेसर्ट' बनते. हा संपूर्ण रस्ता कच्चा होता. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. BRO चे हजारो कामगार कामावर लागले होते. तासाभरात मी-शमिका आणि अभि-मनाली १२००० फुट उंचीवर नमिके-लाच्या 'वाखा' पोस्टला पोचलो. खाली बघतो तर बाकी ३ बायकर्स थांबले होते. म्हटले ब्रेक घ्यायला थांबले असतील. पण नाही.. बघतो तर काय कुठल्यातरी एका बाइकला बाकी पिलियन रायडर्स धक्का देत होते. अभ्या आपला इतक्या लांबून आणि वरतून त्यांना हाका मारतोय. जाणार होत्या का त्यांना ऐकायला... नशीब मागुन येणाऱ्या एका गाड़ीसोबत आशिषने निरोप धाडला की कुलदिपची यामाहा हाचके खाते आहे. चढत नाही आहे. मग काहीवेळ आशिषने यामाहा सिंगल रायडर आणली आणि कुलदिप दुसऱ्या एका गाडीमध्ये लिफ्ट घेउन वाखापर्यंत आला. तिकडे पुन्हा थोडा वेळ दम घेतला आणि कुलदिपच्या गाडीला दम घेऊ दिला. पुढे तसा चढ नव्हता.
नमिके-ला पार करून आम्ही पुन्हा ११७२५ फुट उंचीवर 'खांग्रन'ला उतरलो. तिकडे चेकपोस्टला पुन्हा एंट्री केली आणि पुढे सटकलो. आता रस्ता पुन्हा वर चढू लागला. दूर-दूरपर्यंत सावली नव्हती. सर्वत्र वेगवेगळ्या रंगांचे उघडे डोंगर पाहण्यासारखे होते. कधी लालसर तर कधी तपकिरी, कधी हिरवट मातीचे तर कधी पिवळ्या. त्या-त्या रंगांची खडी रस्त्यावर पसरलेली असायची. त्या खडीवरुन बाइक सरकू नये ही सावधगिरी बाळगत ते आगळे-वेगळे सृष्टिसौंदर्य अनुभवत आम्ही पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी पुन्हा आर्टिलरीच्या ४-६ गाड्या समोरून आल्या. बोफोर्स तोफा घेउन त्या द्रास - कारगीलकडे जाताना दिसल्या. उगाचच मनात वेगळाच विचार येउन गेला. तो झटकून पुढे निघालो. पुढे काही वेळात अचानक कुठून तरी हाक आली. 'जय.... महाराष्ट्र...' खरंतरं मी दचकलोच. बाजूला बाइक थांबवली तर रस्त्याचे काम करणाऱ्यावर देखरेख करणारा एक जवान धावत आला. साताऱ्याचा निघाला की तो. आम्हाला भेटून त्याला एकदम बरे वाटले. आम्हाला सुद्धा त्याला भेटून बरे वाटले. थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो.
आता आम्ही फोटू-ला चढू लागलो होतो. एकदम मस्त रस्ता सुरू झाला होता. 'फोटू-ला'चा नविनच बनवलेला चकचकित डांबरी रस्ता. बाइकचा स्पीड वाढवला आणि वेळ मारायला लागलो. गोल-गोल फिरवत वर नेणारा तो रस्ता मला भलताच आवडला. झोजी-ला आणि नामिके-लाच्या कच्च्या रस्त्यांनंतर हा रस्ता म्हणजे एक सुखद धक्काच होता म्हणा ना. कुलदिप पुन्हा बराच मागे राहिला होता. पण आता फोटू- लाच्या टॉप पॉइंटला जाउनाच थांबायचे असे आम्ही ठरवले. बरोबर ३:१५ वाजता आम्ही 'फोटू-ला'च्या टॉपला होतो. आत्तापर्यंतची गाठलेली सर्वोच्च उंची. १३४७९ फुट. फोटू-ला हा श्रीनगर ते लेह ह्या मार्गावरचा सर्वोच्च उंच पॉइंट आहे. काही वेळात मागुन अमेय-दिपाली आणि आदित्य-ऐश्वर्या येउन पोचले. पण कुलदिप आणि आशिषचा काही पत्ता नव्हता. एका येणाऱ्या ट्रकला थांबवून विचारले,"कोई बाइकवाला दिखा क्या रुका हुआ? कोई मेसेज है क्या?" तो ट्रकवाला बोलला,"मेसेज नाही. आदमी है." बघतो तर काय त्या ट्रक मधुनच आशिष खाली उतरला. कुलदिप मागुन यामाहा सिंगल राइड करत पोचलाच. कुलदिपच्या मागुन आमची सपोर्ट वेहिकल सुद्धा येउन पोचली. ४ वाजत आले होते. साधनाला फोन केला तर ती मुलबेकच्या आसपास पोचल्याचे कळले. अजून बरेच अंतर जायचे होते आणि पोहचेपर्यंत रात्र होणार हे नक्की होते. आता अजून उशीर न करता आम्ही सर्व निघालो ते लेहच्या पठारावर उतरून 'लामायुरु' गोम्पाकडे...
पुढील भाग : ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ७ - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !
फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन निघालो ते सुसाट वेगाने खाली उतरत अवघ्या ३० मिं. मध्ये 'लामायुरु गोम्पा'ला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पोचलो. आता उजव्या हाताचा रस्ता पुढे अजून खाली उतरत लामायुरु गोम्पाकडे जात होता. पण हा रस्ता खालच्या बाजूला पूर्ण झालेला नसल्याने अजून बंद करून ठेवला होता. डाव्या हाताचा रस्ता पुढे 'खालत्से'मार्गे लेहकडे जात होता. खालत्सेवरुन एक रस्ता पुन्हा लामायुरु गोम्पाकडे येतो असे कळले. पण त्या रस्त्याने फिरून लामायुरुला यायचे म्हणजे २२ कि.मी.चा फेरा होता. ते शक्य नव्हते कारण इथेच इतका उशीर झाला असता की रात्रीपर्यंत लेह गाठणे अशक्य झाले असते. दूसरा पर्याय होता बाइक्स रस्त्यावर ठेवून पायी खाली उतरायचे आणि वर चढून यायचे. त्याला किती वेळ लागु शकेल हे पाहण्यासाठी एका कच्च्या वाटेने मी आणि अभि थोड़े पुढे चालून गेलो. अवघे ५ मिं. सुद्धा चालले नसू पण अशी धाप लागली की काही विचारू नका. बाइकवर असेपर्यंत हे काही तितके लक्ष्यात आले नव्हते. जरा चाल पडल्यावर अंदाज आला की हवेतला प्राणवायु कमी झालेला आहे आणि आता प्रत्येक हालचाल जपून करायला हवी. ५ वाजता आम्ही निर्णय घेतला की लामायुरु बघण्यासाठी खाली न उतरता आपण पुढे सरकायचे. कारण उतरून पुन्हा वर येईपर्यंत सर्वांची हालत नक्की खराब झाली असती आणि त्यात बराच वेळ वाया गेला असता हे नक्की. त्या निर्णयावर बरेच जण नाराज झाले कारण लामायुरु ही लडाख भागातली सर्वात श्रीमंत गोम्पा असून बघण्यासारखी आहे. आम्ही नेमकी ती बघायची मिस करणार होतो. पण पर्याय नव्हता आमच्यापुढे. आम्हाला फक्त एका ठिकाणाचा विचार न करता पूर्ण ट्रिपचा विचार करणे भाग होते. ५ वाजता आम्ही सर्व 'खालत्से'मार्गे लेहकडे कुच झालो. आता ड्रायवरला कुठेही न थांबता थेट लेहमध्ये रेनबो गेस्ट हाउसला पोच असे आम्ही सांगितले.

'जुले' .............................................
लडाखी भाषेत जुले म्हणजे hello ... असाच भेटलेला एक मुलगा 'जुले' करणारा...
लामायुरुला जाणारा तो नविनच बनवलेला मस्त रस्ता सोडून आम्ही पुन्हा कच्च्या रस्त्याला लागलो. ३-४ दिवसात अश्या रस्त्यांवरुन बाइक चालवून-चालवून आता बाइकमधून खड-खड-खड-खड असे आवाज येऊ लागले होते. फोटू-ला उतरताना पकडलेला ५०-६० चा स्पीड आता एकदम नामिके-ला इतका म्हणजे ३० वर आला होता. ह्या रस्त्यावर सुद्धा सर्वत्र छोटी-छोटी खडी पसरली होती. नामिके-ला पेक्षा सुद्धा जास्त. त्यात एकदम शार्प वळण आले की आमचा स्पीड एकदम कमी होउन जायचा. एकदा-दोनदा माझ्या बाइकचे मागचे चाक थोडेसे सरकले सुद्धा. बाकी बायकर्स बरोबर सुद्धा हे झाले असावे. पण आम्ही सगळेच सावकाशीने उतरत होतो. मला लगेच आपल्या सह्याद्रीच्या घाटात लिहिलेले बोर्ड आठवले. 'अति घाई संकटात नेई'. म्हटले उशीर झाला तरी चालेल पण एवढा पॅच नीट पार करायचा. बऱ्यापैकी खाली उतरून आलो. दुरवर खाली आमची गाड़ी पुढे जाताना दिसत होती.
इतक्यात २ जवान आमच्या समोर आले आणि त्यांनी आम्हाला 'थांबा' अशी खूण केली. "आगे सुरंगकाम शुरू है. थोडा रुकना पड़ेगा" हे असे इकडे अध्ये-मध्ये सुरूच असते. कुठे माती घसरून रस्ता बंद होतो. तर कधी B.R.O. रस्त्याच्या डागडूजीची कामे करत असते. २० मिं. तिकडे थांबून होतो. अभिजित तर चक्क रस्त्यावर आडवा होउन झोपला होता. सकाळी ८ वाजता खाल्लेल्या पराठ्यानंतर एक चहा सोडला तर कोणाच्या ही पोटात तसे काही गेले नव्हते. पाणी पिउन आणि सोबत असलेले ड्रायफ्रूट्स यावर आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आता ६ वाजत आले होते आणि आम्हाला अंधार पडायच्या आत जास्तीतजास्त अंतर पार करायचे होते.
डोंगरांचे विविध प्रकार आज बघायला मिळत होते. कधी सपाट मातीचे तर कधी टोके काढल्यासारखे. कधी वाटायचे चोकलेट पसरवून टाकले आहे डोंगरांवर.
अखेर संध्याकाळी ६:१५ ला म्हणजेच बरोबर २ तासात फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन ९६०० फुट उंचीवर खालत्सेमध्ये उतरलो. बघतो तर काय एक छोटेसे होटेल दिसले. मी लागलीच 'दहिने मुड' केले आणि बाइक पार्क केली. इकडे मस्तपैकी चपाती-भाजी, दाल-चावल, मॅगी, ऑमलेट असे बरेच काही खायला होते. तूटून पडलो सर्वजण. चांगले ४० मिं. जेवण सुरू होते. वेळ किती लागतोय ह्याची पर्वा कोणाला राहिली नव्हती. आता अंधारात तर अंधारात पण आज लेहला पोचायचे हे नक्की होते. अंधार पडल्यामुळे आमची फोटोगिरी बंद झाली होती आणि त्यासाठी पुन्हा इकडे पुढच्या २-३ दिवसात चक्कर मारायची असे ठरले.
आता आम्हाला अजून ९० की.मी. अंतर पार करून जायचे होते. ७ वाजता तिकडून निघालो आणि खालत्से गावातून पुढे जाऊ लागलो. बघतो तर काय.. आमची गाडीसुद्धा गावातल्या एका होटेलमधून नुकतीच निघून पुढे चालली होती. आता कुठेही थांबणे नव्हते. खालत्सेनंतर नुसरा - उलेटोप - मिन्नू - अलत्ची अशी एकामागुन एक गावे अंधारात पार करत आम्ही लेहकडे सरकत होतो. खालत्से पुढचा रस्ता एकदम चांगला होता. गाड़ी मागुन आता सर्वात पुढे कुलदीप होता. नामिके-ला आणि फोटू-ला चढताना मागे राहिली त्याची यामाहा आता कोणाला ऐकत नव्हती. मध्ये-मध्ये तर तो गाड़ीला सुद्धा मागे टाकत होता. मी बरोबर मध्ये होतो. माझ्या पुढे अमेय तर आदित्य - अभि मागे होते. आजचा संपूर्ण वेळ सिंधूनदीचे पात्र आमच्या सोबत होते. रस्ता एका डोंगरावरुन आम्हाला दुसऱ्या डोंगरावर घेउन जायचा. २ डोंगर जोडायला BRO ने लोखंडी ब्रिज बांधले आहेत आणि त्यावर लाकडी फळ्या टाकल्या आहेत. त्यावरून कुठलीही गाडी गेली की ह्या फळ्या अश्या वाजतात की कोणाचे लक्ष्य नसेल तर तो खाडकन दचकेल.
साधारण ९ च्या आसपास मिन्नूला पोचल्यावर अमेयच्या बाइकमधले पेट्रोल संपायला आले होते. अभिने त्याच्याकडे असलेले एक्स्ट्रा पेट्रोल त्याला दिले आणि तिकडूनच 'रेनबो गेस्ट हाउस'ला फोन करून आम्ही ११ पर्यंत पोचतोय हा निरोप दिला. इतका वेळ मी-शमिका मात्र ह्यांची वाट बघत अंधारात हळू-हळू पुढे सरकत होतो. त्या तिकडे दाट अंधारात थांबूही शकत नव्हतो. शेवटी एक गुरुद्वारा आला तिकडे थांबलो. कुलदीप गाडी बरोबर पुढे निघून गेला होता. मागुन सर्वजण आल्यावर आम्ही पुन्हा शेवटचे २५ की.मी चे अंतर तोडायला लागलो.
अचानक काही वेळात सर्वांच्या बाइक्स स्लो झाल्या. कितीही रेस केल्या तरी स्पीड ३०च्या पुढे जाईनाच. चढ आहे म्हटले तर तितकाही नव्हता. नंतर लक्ष्यात आले... अरे आपण 'मॅगनेटिक हिल'च्या आसपास तर नाही ना... अंधारात मात्र काही कळण्यासारखे नव्हते. तो टप्पा पार झाल्यावर बाइक्स पुन्हा पळायला लागल्या आणि आम्ही अखेर 'सिंधू पॉइंट'ला पोचलो. १० वाजत आले होते त्यामुळे सिंधू नदीचे ते मनोहारी दृश्य काही दिसणार तर नव्हते पण इकडून लेह सिटीचा भाग सुरू होतो. ह्या पॉइंटला 'लडाख स्काउट्स' लडाखच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. १० मिं. मध्ये लेह विमानतळ पार करून लेहच्या मुख्य चौकात पोचलो. गाडी गेस्ट हाउसला पोचली होती. आमचे सर्व सामान उतरवुन अमेय म्हात्रे आम्हाला घ्यायला पुन्हा त्या चौकात आला होता.
अखेर १६-१७ तासाच्या अथक प्रवासानंतर रात्री ११ वाजता सर्वजण 'रेनबो'ला पोचलो. इतकी रात्र झालेली असून सुद्धा 'नबी' आणि त्याची बायको आमची वाट बघत जागे होते. आल्यानंतर खरंतरं सर्व इतके दमले होते की कधी एकदा बिछान्यात अंग टाकतोय असे झाले होते. पण त्यांनी 'खाना खाए बगेर सोना नाही' अशी प्रेमाने तंबीच दिली. सर्वजण जेवलो आणि झोपायच्या आधी छोटीशी डे एंड मीटिंग घेतली. १२ वाजता साधना आणि उमेश सुद्धा येउन पोचले.
४ दिवसाच्या अथक प्रवासानंतर आणि अनेक अनुभव घेत जम्मू पासून ८२८ की.मी अंतर पार करत आम्ही त्या ११००० फुट उंचीच्या पठारावर विसावलो होतो. पुढचे ४ दिवस अजून अनेक असे अनुभव घेण्यासाठी...
पुढील भाग : लडाखचे अंतरंग ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ८ - लडाखचे अंतरंग ... !
आज बरेच दिवसांनंतर तसा थोडा निवांतपणा होता. ना लवकर उठून कुठे सुटायचे होते ना कुठे पुढच्या मुक्कामाला पोचायचे होते. काल रात्री लेहला आल्यापासून जरा जास्त बोललो किंवा जिने चढ-उतर केले की लगेच दम लागत होता. रात्री नुसते सामान खोलीमध्ये टाकेपर्यंत धाप लागली होती. येथे आल्यानंतर वातावरणाशी समरस होणे अतिशय आवश्यक असते. आल्याआल्या उगाच दग-दग केल्यास प्राणवायूच्या कमतरतेने प्रचंड दम लागणे, डोके जड होणे असे प्रकार घडू शकतात. तेंव्हा आल्यावर थोडी विश्रांती गरजेची असते.
सकाळी ८ वाजता आम्ही नाश्ता करायला टेबलावर हजर होतो. मस्तपैकी लडाखी ब्रेड सोबत चहा - कॉफी, बटर - जाम आणि ज्यांना हवे त्यांना ऑमलेट असा नाश्ता तयार होता. साधना काल रात्री १२ वाजता आल्यानंतर काहीही न खाता झोपली होती. त्यामुळे ती कालचे तिचे किस्से सांगण्यात मग्न होती. ते दोघे मागे राहिले होते न काल. फोटू-लाच्या छोटूश्या रस्त्यावरुन अंधारातून वेडीवाकडी वळणे घेत येताना दोघेही आम्हाला सारखे फोन करत होते. पण फोन लागतील तर ना इकडे. साधनाने नंतर सांगितले मला की तिला त्यांचा 'दि एंड' होणार असेच वाटत होते. आज सकाळी मात्र खुश होती एकदम. सर्वच आनंदात होते तसे. मोहिमेचा पहिला टप्पा सुखरूपपणे पार झालेला होता.
नाश्ता करता करता सर्वजण आप-आपल्या घरी आणि मित्र-मैत्रिणींना फोन करत होते. मोकळ्या हवेवर फूलबागेच्या शेजारी बसून गप्पा टाकत नाश्ता करायला काय मस्त वाटत होते. खरचं. मस्तच होते ते गेस्ट हाउस. छोटेसे असले तरी अगदी घरासारखे. पुढचे ४ दिवस तर आम्ही त्याला आपले घरच बनवून टाकले होते. हवे तेंव्हा या आणि हवे तेंव्हा जा. नबी आणि त्याच्या कुटूंबाने देखील आमचे अगदी घरच्यांसारखे आदरातिथ्य केले. नाश्ता आटोपल्यानंतर ठरल्याप्रमाणे मी, अभिजित, आदित्य, अमेय साळवी, कुलदिप असे ५ बायकर्स बाइक रिपेअरसाठी घेउन गेलो. तिकडे गेले ३ दिवस ऐश्वर्याची तब्येत खालीवर होत असल्याने पूनम तिला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेली. मनाली, उमेश आणि आशिष गेस्ट हॉउसच्या फुलबागेत फोटो टिपत बसले होते. शमिका आणि दिपाली 'असीम' म्हणजे नबीच्या पोराबरोबर खेळत होत्या. कसला गोड पोरगा होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये मस्त मिक्स झाला तो आमच्यात. मज्जा, मस्ती आणि मग त्याचे फोटो काढणे असे सर्व प्रकार सुरू होते.
१२ वाजता आम्ही सर्व बाइक्स रिपेअर करून घेउन आलो. लंच झाला की आसपास फिरायला जायचे असा प्लान केला. ऐश्वर्याने मात्र बाहेर न पडता पूर्ण दिवसभर आराम करायचा असे ठरवले होते. दुपारचे जेवण झाल्यावर ३ वाजता आम्ही फिरायला बाहेर पडलो. दुपारी ३ वाजता सुद्धा लेह मार्केटमध्ये बरीच गजबज होती. आमचे गेस्ट हाउस मार्केटच्या पलिकडच्या टोकाला असल्याने मार्केट मधुनच जावे लागायचे. मार्केटमधून खाली उतरून खालच्या चौकात आलो की एक मोठी कमान लागते. लडाखी पद्धतीचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार. काल रात्री आलो तेंव्हा नीट बघता आले नव्हते तेंव्हा आत्ता जरा नीट थांबून पाहिले.
इकडून रस्ता अजून खाली उतरत जातो आणि त्या मुख्य चौकात येतो. इकडून समोरचा रस्ता श्रीनगरकडे जातो. त्याच रस्त्याने आम्ही काल आलो होतो. डाव्या हाताचा रस्ता जातो सरचूमार्गे मनालीकडे. या ठिकाणी डाव्या हाताला लेह सिटीमधला एकमेव पेट्रोलपंप आहे. तेंव्हा आम्ही आमच्या लंचनंतर बाइक्सना सुद्धा त्यांचा खाऊ दिला हे सांगायला नकोच. चौकातून निघालो आणि मनालीकडे जाणाऱ्या रस्ताने १८ की. मी. अंतर पार करून काही मिनिटात थेट 'ठिकसे गोम्पा'ला पोचलो. (इकडे मात्र 'गोन्पा' असे लिहिले होते) 'गोम्पा'ला मराठीमध्ये 'विहार' असा शब्द आहे. आपल्याकडे कार्ला-भाजे सारख्या बुद्ध गुंफांचे विहार प्रसिद्द आहेतच.
ठिकसेकडे येताना मध्ये 'सिंधूघाट दर्शन' आणि 'शे पॅलेस' ही ठिकाणे लागतात. मात्र आम्ही ह्या जागांवर परत येताना वळणार होतो. एका छोट्याश्या डोंगरावर ठिकसे गोम्पा वसलेली आहे. पाहिल्या-पहिल्याच एकदम प्रसन्न वाटले. ठिकसे ही लडाख भागामधल्या अत्यंत सुंदर गोम्पांपैकी एक असून १४३० साली बनवली गेली आहे. प्रवेशद्वार विविध रंगांनी सजवलेले आहे. आत गेलो की उजव्या हाताला अनेक प्रकारची फूले त्यांच्या रंगांनी आपले लक्ष्य वेधून घेतात. डाव्या हाताला काही दुकाने आहेत. येथे काही खायला आणि काही माहिती पुस्तके मिळतात. गोम्पामध्ये प्रवेश करण्यासाठी ३०/- प्रवेश फी द्यावी लागते.
थोड्या पायऱ्या चढून वर गेलो. रस्त्यावरुन येताना जसे ठिकसेचे सुंदर दृश्य दिसत होते तसेच दृश आता ठिकसेवरुन सभोवताली दिसत होते. नकळत आम्ही सर्व फोटो टिपायला थांबलो. आशिष मात्र एकटाच अजून थोडा वर पोचला होता. आम्ही जेंव्हा अजून वर जाण्यासाठी पुढे निघालो तेंव्हा आशिष कमरेवर हात ठेवून वरतून आमच्याकडे बघत होता.
डोक्यावरती काउबॉय हॅट, अंगात फुल स्वेटर आणि जिन्स... मागुन येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे एक वेगळाच इफेक्ट तयार झाला होता. ते बघून मला उगाच याराना पिच्चरमधल्या 'ये सारा जमाना ... ' गाण्यामधल्या अमिताभच्या जॅकेटची आठवण झाली. त्यात नाही का ते लाइट्स लावले आहेत. तसाच चमकत होता दादाचा स्वेटर. पुन्हा त्याचे फोटो शूट झाले आणि मग आम्ही अजून वर निघालो.
कुठल्या ही गोम्पामध्ये तुम्हाला खुप फिरत्या घंटा बघायला मिळतील. गोम्पामधली घंटा क्लॉकवाइज म्हणजेच आपण देवाला प्रदक्षिणा मारतो त्याच दिशेने फिरवायची असते. चांगला दिड-दोन मीटरचा व्यास असतो एका घंटेचा. ती घेउन गोल-गोल फिरायचे. तिला वरच्या बाजूला एक लोखंडी दांडी असते ती दुसऱ्या दांडीला आपटून घंटानाद होतो. या संपूर्ण मार्गावर उजव्या हाताला छोट्या-छोट्या घंटा बनवलेल्या आहेत. त्या सर्व फिरवत वर जायचे. मजेचा भाग सोडा पण फिरत्या घंटा म्हणजे गतिमानतेचे आणि समृद्धीचे प्रतिक मानल्या गेल्या आहेत. तीच गतिमानता आणि समृद्धी भगवान बुद्ध सर्वांना देवोत हीच सदभावना ठेवून आत प्रवेश केला.
गोम्पाच्या मुख्यभागात प्रवेश केला की प्रशस्त्र मोकळी जागा आहे. आतमध्ये बोद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रार्थना सभागृह आहे. आम्ही गेलो तेंव्हा नेमकी तिथल्या लामांची प्रार्थना सुरू होती. खुप जुन्या ग्रंथांचे ते मोठ्याने पठण करत होते. त्यांचा तो आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमत होता. आम्ही अर्थात अनवाणी पायांनी कुठलाही आवाज न करता आत गेलो. आतील संपूर्ण बांधकाम लाकडाचे आहे. सभागृहाच्या शेवटी अजून एक खोली होती.
तेथे भगवान बुद्ध आणि काही इतर मूर्ती होत्या. फ्लॅश न वापरता फोटो घ्यायला परवानगी होती. त्यापाहून आणि फोटो काढून बाहेर आलो. लामांचे पठण करून संपले होते. आम्ही आता प्रार्थना सभागृह पाहिले. दलाई लामांचा फोटो आणि इतर अनेक जुन्या मुर्त्या तेथे होत्या. पण नेमकी माहिती द्यायला कोणी नव्हते तिथे.तिथून बाहेर पडलो आणि समोर असणाऱ्या पायऱ्या चढून खोलीमध्ये गेलो. शेवटच्या पायरीवर पाउल ठेवल्यानंतर अवाक् बघत रहावे असा नजारा होता.
भगवन गौतम बूद्धांची जवळ-जवळ ३ मजली उंच मूर्ती डोळे दिपवून टाकत होती. जितकी प्रसन्न तितकीच प्रशत्र. अहाहा... मुकुटापासून ते खाली पायांपर्यंत निव्वळ सुंदर... रेखीव... अप्रतिम कलाकुसर... कितीतरी वेळ मी त्या मूर्तीकडे पाहतच बसलो होतो. मूर्तीला प्रदक्षिणा मार्ग आहे. आपण प्रवेश करतो तो खरंतरं २ रा मजला आहे. त्यामुळे बाकी मूर्ती खाली वाकून बघावी लागते. संपूर्ण मूर्तीचा फोटो वाइडलेन्सने तरी घेता येइल का ही शंकाच आहे.
मूर्तीसमोर काही वेळ बसलो आणि मग तेथून निघालो. बाहेर पडलो तरी माझ्या मनातून ती मूर्ती काही जात नव्हती. अखेर तिकडून निघालो आणि बाइक्स काढल्या. आता पुढचे लक्ष्य होते 'शे पॅलेस'. लेहच्या दिशेने घोडे म्हणजे आमच्या बाइक्स पळवल्या आणि १० मिं. मध्ये 'शे पॅलेस 'पाशी येउन पोचलो.
'शे' हे मुळात गोम्पा होते. १६५० मध्ये देलडॉन नामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे 'सिंगाय नामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवणीमध्ये राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होते. आता सध्या येथे फार कोणी रहत नाही. गोम्पाची काळजी घेणारे काही लामा आहेत बास.
राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. खुपश्या खोल्या बंदच आहेत. असे म्हणतात की ह्या राजवाडयाखाली २ मजली तळघर आहे. काय माहीत असेलही. पण आम्ही काही ते शोधायचा प्रयत्न केला नाही. एक चक्कर मारली आणि 'शे'चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलो. ठिकसेप्रमाणे येथे सुद्धा ३ मजली उंच बुद्ध मूर्ती आहे. तितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहे. आम्ही येथे पोचलो तर एक मुलगी बुद्धमूर्तीचे स्केच काढत होती. सुंदर काढले होते तिने स्केच. काही वेळात तिकडून निघालो आणि पुन्हा खाली आलो. लेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला स्तुपाशी साधर्म्य दर्शवणारे एकावर एक दगड रचलेले दिसतील. कधी कुठे डोंगरावर तर कुठे छोट्याश्या प्रस्तरावर. 'शे' मध्ये असे चिक्कार छोटे-छोटे दगडी स्तूप दिसले. मग मी सुद्धा एक बनवला आणि त्याचा छानसा फोटो घेतला.
फोटो खरच मस्त आला आहे. मला स्वतःला खुप आवडला. बघा तुम्हाला आवडतो का ते.
उमेशने काढलेला 'कलर फ्लॅग्स'चा हा फोटो हा आमच्या लडाख मोहिमेमधला सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक आहे.
५ वाजून गेले होते आणि अजून २ ठिकाणी जायचे होते आम्हाला. तेंव्हा इकडून सुटलो आणि थेट पोचलो 'सिंधूघाट' येथे. सिंधू नदीवर बांधलेला हा एक साधा घाट आहे. खरे सांगायचे तर ह्यापेक्षा जास्त सुंदर आणि स्वच्छ सिंधू नदी आम्ही आधीच्या ५ दिवसात पाहिली होती. शिवाय इकडे प्रवाह तितका खळखळ वाहणारा सुद्धा नव्हता. संथ होते सर्व काही.
नदीपलीकडचे डोंगर मात्र सुरेख दिसत होते. लडाखमधल्या डोंगरांच्या रंगांनी मला खरच वेड लावले. त्यावर झाडे नसून सुद्धा किती छान दिसायचे ते. वेगळ्याच पद्धतीचे सौंदर्य होते ते. इकडे फोटो मात्र मस्त काढले आम्ही. इकडे काही मराठी लोक भेटले. त्यांनी सुद्धा विचारपुर केली बरीच. कुठून आलात? बाइक्स वर? अरे बापरे !!! .. वगैरे झाले. तिकडून निघालो ते थेट लेह सिटीमध्ये असणाऱ्या शांतीस्तूप येथे.
शांतीस्तूपला पोचलो तेंव्हा खरंतरं अंधार पडायला फार वेळ नव्हता. १५-२० मिं. मध्ये वर पोचलो. शांतिस्तूप हे एक प्रकारचे शिल्प आहे. स्तुपापर्यंत चढून जायला पायऱ्या आहेत. तेथे 'बुद्धजन्म' आणि 'धम्मचक्र' अशी २ प्रकारची चित्रे काढलेली आहेत.
स्तुपासमोर प्रशत्र मोकळी जागा असून येथून लेह सिटीचे सुंदर दृश्य दिसते. काही मिनिटे इकडे बसलो. इतक्यात स्तुपाच्या पायर्यांवरुन व्हायोलिनचे सुर ऐकू येऊ लागले. बघतो तर काय. एक लामा मस्त व्हायोलिन वाजवत होता. कुठलीशी छानशी शांत धून होती. त्या नयनरम्य संध्याकाळला साजेल अशीच.
त्याच मुडमध्ये तिकडून निघालो. आज निवांतपणे बरेचसे लेहदर्शन झाले होते. आता अजून एक लक्ष्य होते. काय विचारताय!!! मार्केटमध्ये जाउन 'हॉटेल ड्रिमलँड' शोधायचे. त्याकामाला २ जण लागले बाकी आम्ही बायकर्स पेट्रोलपंपला पोचलो. उदयाच्या घोड़दौडीसाठी टाक्या फूल करून घेतल्या. तितक्यात ड्रिमलँडचा पत्ता लागल्याची खबर आली. मग आमचा मोर्चा तिकडे वळला. सर्वजण ९ वाजता बरोबर हॉटेल ड्रिमलँडला पोचलो. पण बरेच दिवसांनी एकदम 'ठिकसे' जेवलो. जेवण आटपून गेस्ट हाउसला पोचलो आणि ११ वाजता मीटिंग घेतली.
लडाखमधले पहिले मोठे लक्ष्य उदया पूर्ण करायचे होते आणि आम्ही सर्व त्यासाठी सज्ज झालो होतो...
पुढील भाग : 'चांग-ला' १७५८६ फुट उंचीवर ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ९ - 'चांग-ला' आणि पेंगॉँग-सो ... !
कालच्या थोड्या विश्रांतीच्या दिवसानंतर लडाखमध्ये समरस होत आलो होतो. आज एक मोठे लक्ष्य गाठायचे होते. जगातील तिसरा सर्वोच्च रस्ता 'चांग-ला' (१७५८६ फुट) फत्ते करून भारत - चीन सीमेवरील 'पेंगॉँग-सो'चे सौंदर्य अनुभवायचे होते. 'सो' (त्सो) म्हणजे तलाव. लडाखमधल्या प्रेक्षणीय स्थळापैकी महत्वाचा असा हा लेक आज आम्ही बघणार होतो. पहाटे-पहाटे ४:३० वाजता उठलो आणि आवरा-आवरी केली. चहा-कॉफी बरोबर ब्रेड-बटर पोटात ढकलले. ५ ला निघायचे होते ना. पण सर्वांचे आवरून गेस्टहाउस वरुन निघायला ५:४५ झाले. तसा फ़क्त ४५ मिं. उशीर झाला होता पण ही ४५ मिं. आम्हाला चांगलीच महागात पडणार होती. का म्हणताय... पुढे कळेलच की. अजून एक मिनिट सुद्धा न दवडता आम्ही पुन्हा एकदा मार्ग घेतला मनालीच्या दिशेने. कालपासून आम्ही गाडी बदलली होती. नवा ड्रायव्हर लडाखी होता.
६:१५ च्या आसपास पुन्हा एकदा शे आणि ठिकसे गोम्पा पार करत आम्ही 'कारू'ला पोचलो. चीन सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या ह्या मार्गावरची ही पहिली चेक पोस्ट. पहाटे-पहाटे आम्ही तेथे पोचलो तेंव्हा सर्व जवान परेडसाठी निघाले होते. आर्मी ग्रीन कलरचे वुलन जॅकेट आणि वुलन कैपमध्ये ते सर्वजण एकदम स्मार्ट दिसत होते.
तिथून पुढे निघालो आणि थोड़े पुढे जातो न जातो तो मागुन अमेय साळवी आम्हाला जोरात हार्न देऊ लागला. मी थांबलो पण अमेय म्हात्रे बराच पुढे निघून गेला होता. मला वाटले बाइकला परत काही झाले की काय. पण नाही, अभीने मागुन फोन केला होता की परमिट क्लिअरन्ससाठी त्याला पुन्हा कारू पोस्टला मागे जावे लागेल. बायकर्सना थांबवले नव्हते आर्मी पोलिसांनी मात्र त्यांनी गाडी अडवली होती. अमेय म्हात्रे तर पुढे निघून गेला होता पण मी आणि अमेय साळवी तिकडेच थांबलो. आमचे बाइक नंबर्स अभीकडे असल्याने आम्हाला मागे जायची गरज नव्हती. बराच वेळाने पुढे गेलेला अमेय म्हात्रे परत येताना दिसला. बहुदा त्याला आणि पूनमला कळले असावे की अरे.. आपल्यामागुन तर कोणीच येत नाही आहे. ६ की.मी पुढे जाउन म्हणजे जवळ-जवळ 'शक्ती'पर्यंत पुढे जाउन आला तो. ७ च्या आसपास मागुन सर्वजण आले आणि मग आम्ही पुढे निघालो. जास्तीत जास्त वेगाने पुढे सरकून वेळ कव्हर करायची हा आता आमचा प्रयत्न होता.
काही मिनिटांमध्ये १३५५० फुट उंचीवर 'शक्ती' या ठिकाणी पोचलो. अमेय इकडूनच तर परत आला होता. आणि याच ठिकाणाहून सुरू होतो जगातील तिसरा सर्वोच्च पास. 'चांग-ला'चा रस्ता फोटू-ला इतका चांगला नसला तरी नमिके-ला सारखा खराब सुद्धा नव्हता. पहिलाच नजारा जो समोर आला तो बघून तर मी अवाक होतो. दूरपर्यंत जाणारा तो सरळ रस्ता टोकाला जाउन डावीकडे वर चढत जात होता आणि चांगला ३-४ की.मी.चा U टर्न घेउन मागे फिरत होता.
हा ड्रायव्हर चांगला होता. हवी तशी गाडी मारत होता. सर्वजण एकाच पेस मध्ये कुठेही न थांबता बाइक्स दामटवत होते. माझ्यामागून शमिकाची आणि अभीच्या मागुन मनालीची धावती फोटोग्राफी सुरू होती पण अमेय आणि कुलदिप यांना मात्र फोटो घ्यायला थांबावे लागायचे. पण मग तो गेलेला वेळ ते कव्हर करायचे. तो एक मोठा U टर्न मारून आम्ही थोडे वर पोचलो. बघतो तर काय ... अजून तसाच एक U टर्न. आधीचा डावीकडे होता आणि हा उजवीकडे इतकाच काय तो फरक. आणि तो U टर्न चढून वर गेलो की पुढे अजून एक डावीकडे वळत जाणारा प्रचंड असा C टर्न. मनात म्हटले हा 'चांग-ला' चांगलाच आहे की. मागच्या खालच्या बाजूला दुरवर शक्ती गावाबाहेरील शेती दिसत होती. मनोहारी दृश्य होते ते. आजुबाजुला सर्व ठिकाणी ना झाडे ना गवत पण बरोबर मध्यभागी हिरवेगार पुंजके.
ते दृश्य मागे टाकुन आम्ही पुढे निघालो. दुसऱ्या U टर्नच्या मध्ये आपण पोचतो तेंव्हा आपण १७००० फुट उंचीवर असतो. ह्याच ठिकाणी 'चांग-ला'ची पहिली चेकपोस्ट लागते. 'सिंग इज किंग' असे लिहिले आहे इकडे. २ सिख लाइट इंफंट्रीचे एक प्लाटून स्थित आहे. इथपासून रस्ता थोडा ख़राब आहे. कितीही वेळा रस्ता बनवला तरी बर्फ पडला की सर्व काही वाहून जाते आणि परिस्थिति जैसे थे. तेंव्हा BRO ने इकडे रस्ते किमान ठिकठाक करून ठेवले आहेत. जसजसे वर-वर जात होतो तसा रस्ता अजून ख़राब होत जात होता. मध्येच एखाद्या वळणावर बाइक वाहत्या पाण्यामधून घालावी लागायची तर कधी पाण्यामुळे वाहून गेलेल्या खडबडीत रस्तामधून. असेच एक डावे वळण लागले. वाहत्या पाण्यामधून उजव्या बाजूने रापकन बाइक काढली आणि मग पुढे जाउन थांबलो. बाकीचे सुद्धा सिंगल सीट तेवढा भाग पार करून आले आणि मग पुढे निघालो. 'शक्ति' पासून सुरू झालेला चांग-ला संपतच नव्हता. एकामागुन एक U टर्न आणि चढतोय आपला वर-वर. कारूपासून निघून ४३ किमी. अंतर पार करून पुढे जात-जात अजून २ मोठे U टर्न पार करत आम्ही अखेर चांग-ला फत्ते केला. उंची १७५८६ फुट. फोटू-ला मागोमाग गाठलेली सर्वोच्च उंची. तो क्षण अनुभवायला आम्ही थोडावेळ तिकडे थांबलो.
वर पोचल्या-पोचल्या दिसला तो इंडियन आर्मीने लावलेला बोर्ड. १७५८६ फुट उंचीवर काय करावे आणि काय करू नये हे त्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिले आहे. वरती चांग-ला बाबाचे मंदिर आहे. येथे असणाऱ्या सर्व जवानांचे आणि येणाऱ्या सर्व पर्यटकांचे चांग-ला बाबा भले करो अशी मनोकामना येथे आर्मीने केली आहे.
२ सिख लाइट इंफंट्रीचे अजून एक प्लाटून वरती आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी इकडे सर्व सोई आहेत. शौचालय आहे, वैद्यकीय सुविधा आहे. खायला हवे असेल तर इकडे एक छोटेसे कॅंटीन आहे. चहा मात्र आर्मीतर्फे मोफत दिला जातो. अर्थात बिनदुधाचा बरं का.. त्या ठिकाणी दूध आणणार तरी कुठून नाही का!!!
बाजुलाच एक छोटेसे शॉप आहे. तिकडे पेंगोंग संदर्भातले काही टी-शर्ट्स, कप्स, मिळतात. आम्ही सर्वांनी आठवण म्हणुन काही गोष्टी विकत घेतल्या. तिकडे हरप्रीतसिंग नावाचा जवान होता. त्याच्याबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या. गेल्या २ वर्ष ते सर्वजण तिकडे आहेत. फारसे घरी गेलेले नाहीत. तो आता घरी जाणार आहे. चांगली २ महीने सुट्टी आहे. खुशीत होता तो. आम्हाला सांगत होता. "बास. अब कुछ दिन और. ३ गढ़वाल आके हमें रिलीफ करेगी. फिर मै अपने गाव जाऊंगा छुट्टी पे." त्याला शुभेच्छा दिल्या आणि परत येताना भेटू असे म्हणुन तिकडून निघालो. आता लक्ष्य होते चुशूल येथील 'तांगसे' पार करून 'पेंगॉँग-सो' गाठणे...
९:३० वाजत आले होते. आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. ११ वाजायच्या आत 'शैतान नाला' काहीही झाला तरी पार करणे गरजेचे होते. चांग-ला वरुन निघालो आणि पलिकडच्या 'सोलटोक' पोस्टकडे उतरलो. आता पुढचे लक्ष्य होते ४० की.मी पुढे असणारे 'तांगसे'. ८०-९० च्या वेगाने आता त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमच्या गाड्या भरधाव वेगाने दौड़त होत्या. उजव्या हाताला नदीचे पात्र, डाव्या हाताला मिनिटा-मिनिटाला रंग बदलणाऱ्या उंच डोंगरसरी आणि समोर दिसणारे निरभ्र मोकळे आकाश. क्षणाक्षणाला वाटायचे की येथेच थांबावे. थोडावेळ येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा.
पण नाही. शैताननाला डोक्यात शैतानासारखा नाचत होता. तो गाठेपर्यंत आता कोठेही थांबणे शक्य नव्हते. १०:४५ च्या आसपास 'तांगसे' (तांगत्से) ला पोचतो न पोचतो तोच मागुन अजून काही बाइक्सचे आवाज येऊ लागले. काल पेट्रोलपंपवर भेटलेला पुण्याचा ग्रुप होता. सर्व गाड्या MH-12. त्यातले अर्धे पुढे निघून गेले तर काही मागे होते. तांगत्से चेकपोस्टला एंट्री केली आणि भरधाव वेगाने शैताननाल्याकडे सरकलो. चांग-ला नंतरच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे स्थित असणाऱ्या रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्स' असे म्हणतात. सध्या येथे गढवाल रेजिमेंटची पोस्टिंग आहे. चांग-लापासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी चुशूल वॉर्रीअर्स कडे आहे.ज्यावेळी मी ह्या ठिकाणावरुन पास झालो तेंव्हा 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज दिसली. आणि माझ्या मनात लोकसत्तामध्ये वाचलेली एक बातमी आठवली. जी जागा मला आयुष्यात एकदा तरी बघायची होती आज त्या ठिकाणी मी आलो होतो. ती बातमी.. तो लेख.. जसाच्या तसा इकडे देतो आहे.
*****************************************************
'चुशूल' हे नाव भारताच्या युद्धविषयक इतिहासात सदैव अभिमानाने घेतले जाईल असे...
सियाचेनजवळ रजांगला सीमेवर तांगत्से नामक चौकी आहे. त्या चौकीच्या हद्दीतलं हे ठिकाण. १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं, तेव्हा मेजर सैतानसिंहांची ११८ जवानांची तुकडी तिथं होती. १८ नोव्हेंबरचा तो दिवस होता. चिनी सैन्याच्या तुकडय़ा तांगत्से चौकीवर कब्जा मिळवून रजांगलच्या सीमा सुरक्षा चौकीकडेआक्रमण करायला लागल्या, तेव्हा याच सैतानसिंहानं आपल्या ११८ जवानांना, प्राणांचं बलिदान देण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत १३ व्या कुमाऊँ रेजिमेंटचे ते जवान पुढे सरकत होते. पण लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करत पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांपुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. अशातच एक गोळी सैतानसिंहांच्या दिशेनं आली आणि तिनं त्यांचा वेध घेतला. हरफुलसिंह नामक हवालदारानं ते पाहिलं आणि त्यांना उचलून मागच्या बाजूस नेण्याचा प्रयत्न केला. सैतानसिंहांनी त्याला रोखलं. त्यांनी त्याला तांगत्से चौकीच्या दिशेनं दारूगोळा आणण्यासाठी पिटाळलं आणि जखमी अवस्थेत झुंज सुरूच ठेवली.
हरफुलसिंह तांगत्सेला पोचला, ती चौकी आपण गमावली असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तिथले सैनिक लेहकडे गेल्याचं त्याला कळलं. मेजर सैतानसिंहांना आपली गरज आहे याचं स्मरण होताच हरफुलसिंह माघारी फिरला. पण परत येईपर्यंत त्याला पाहावं लागलं ते धारातीर्थी पडलेलं सैतानसिंहांचं कलेवर. ते दिवस बर्फाच्या वादळाचे होते. युद्धबंदी झाल्यावर भारतीय सैन्यातील काही मंडळी तिथं पोचली तेव्हा बर्फाखाली गाडले गेलेले सैतानसिंहाचे आणि त्यांच्या ११६ साथीदारांचे मृतदेह त्यांना मिळाले. त्या सर्वावर अंत्यसंस्कार करून मंडळी परतली. ग्रीष्म ऋतु सुरू झाला, तसं बर्फ वितळायला लागलं. त्या चौकीवर पुन्हा एकदा भारतीय सैनिक गेले तेव्हा तिथे अनेक चिनी सैनिकांचे मृतदेह पडले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या मृतदेहांची मोजणी करण्यात आली, तेव्हा ११०० चिनी सैनिकांना मरणाला सामोरं जावं लागलं असल्याचं निष्पन्न झालं. मेजर सैतानसिंहांचा तो पराक्रम पुढल्या वर्षी ‘परमवीर चक्रा’चा मानकरी ठरला.
मेजर सैतानसिंहाची ही आठवण आजही तिथं अभिमानानं सांगितली जाते.
सैतानसिंहाचा आत्मा आजही त्या चौकीच्या आसपास फिरत असतो अशी समजूत आहे. आणि
त्यामुळेच त्याचा गणवेश, त्याचं सामान, त्याच्या वापरातील वस्तू आजही
त्याच्या सहकाऱ्यांनी जशाच्या तशा जपून ठेवल्या आहेत. त्याचा पगार म्हणे
आजही त्याच्या नातेवाईकांना पूर्वीसारखाच दिला जातो. त्या युद्धात
सैतानसिंह मेजर होता. युद्धात धारातीर्थी पडतानाही त्याचा हुद्दा तोच होता.
आता बढत्या मिळत मिळत तो ब्रिगेडियरच्या हुद्याला जाऊन पोचला आहे. अन्य
सैन्याधिकाऱ्यांप्रमाणेच त्यालाही तंबू आहे. त्याच्या सेवेत सैनिक आहेत.
त्याच्या वाहनावर आजही चालकाची नियुक्ती आहे. तो सुटीवर जायला निघतो तेव्हा
त्याचं अंथरुण-पांघरुण, सामान घेऊन एक सैनिक त्याला जवळच्या रेल्वे
स्थानकावर सोडायला जीप घेऊन निघतो. सुटी संपायचा दिवस येतो तसं त्याला
आणण्यासाठी जीप रेल्वे स्थानकावर जाते, जीपमध्ये कुणीतरी बसलं आहे अशा
थाटात त्याचे सहकारी ती जीप घेऊन परत येतात. सैतानसिंहाच्या निवृत्तीच्या
दिवसापर्यंत हा प्रकार असाच सुरू होता. आता बहुधा तो थांबला आहे. पण हे
सारं वाचायला मिळालं ते ‘जम्मू काश्मीरचा सफरनामा’ या श्रीकांत जोशी लिखित
पुस्तकात. (पृष्ठ क्र. ७२ आणि १०१ वर)
*****************************************************
चुशूल ग्लेशिअरमधून वाहून येणाऱ्या त्या प्रवाहाला म्हणजे नाल्याला 'मेजर शैतानसिंह' यांचे नाव दिले गेले आहे. तिकडे पोचलो तेंव्हा ११:३० वाजले होते आणि शैतान नाला हा काय भयाण प्रकार आहे ते समोर दिसत होते. हा तर रस्तामध्ये घुसलेला नाला होता. नाही नाही.. दगडगोटयानी भरलेला उतरत नाल्यापलीकडे जाणारा रस्ता...!!! नाल्यामध्ये चांगले फुट दिडफुट पाणी वाहत होते. बाइकवरुन हा पार करायचा??? तसे सहज शक्य होते.आम्ही अंदाज लावला. १२ वाजत आले आहेत म्हणजे आता ग्लेशिअरमधून वाहुन येणाऱ्या पाण्याची पातळी पुढच्या २-३ तासात नक्की वाढणार आहे. आत्ता गाड्या टाकल्या तरी परत येताना त्या काढता आल्या नाहीत तर ??? लटकलो ना... आता कळले सकाळच्या ४५ मिं. चे महत्त्व. आम्ही जरा तासभर लवकर येथे पोचलो असतो तर बाइक्स घेउन अजून ४ की.मी पुढे पेंगॉँग-त्सो पर्यंत जाता आले असते. आता मात्र बाइक्स एकडेच ठेवणे भाग होते. आर्मीचा एक ट्रक होता त्यात बसलो आणि शेवटचे ४ की.मी. त्या ट्रकने प्रवास करून 'पेंगॉँग-सो' पर्यंत पोचलो. असा प्रवास मी जन्मात कधी केलेला नाही ना कधी करेन. एक-न-एक हाड निखळून पडते आहे की काय असे वाटत होते.
शैताननाल्याचा हा एक फोटो. फोटो बघून तुम्हाला कल्पना येइल की हे काय प्रकरण होत ते...
'पेंगॉँग-सो'ला पोचलो तेंव्हा दिवसाभराचे पडलेले सर्व कष्ट विसरलो होतो. अगदी हे सुद्धा की आम्ही पहाटे ५ नंतर काहीही खाल्लेले नाही आहे. पेंगॉँग-सो - वर्णन करता येणार नाही असे सौंदर्य. जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. अवर्णनातीत असे पांढरेशुभ्र सुंदर आकाश आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.
खरे सांगायचे तर माझ्याकडे अजून शब्दच नाहीत ते सौंदर्य तुमच्यासमोर मांडायला. पेंगॉँग-सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आणि गंमत म्हणजे हा तलाव खाऱ्या पाण्याचा आहे. हिवाळ्यात जोरदार हिमवर्षाव सुरू झाला की हा संपूर्ण तलाव गोठतो. इकडच्या उन्हाळ्याच्या सुरवातीला बर्फ वितळून शैताननाला रौद्ररूप धारण करतो. ह्या संपूर्ण वेळात इकडे कोणीही जा-ये करू शकत नाही. जून नंतर थोडे फार पलीकडे जाता येते. इकडे थांबायला खुपच कमी वेळ मिळाला होता. आम्हाला घेउन आलेला ट्रक परत जाउन पुढच्या लोकांना इकडे आणणार होता त्यामुळे आम्हाला आता निघावे लागणार होते. मन मारून ट्रकमध्ये बसलो आणि इकडे लवकरच पुन्हा येणार असे नक्की केले. फक्त येणार नाही तर इकडे किमान १ दिवस राहणार. त्या ट्रकमधून पुन्हा एकदा शैतान नाल्यासमीप पोचलो. त्या ४०-४५ मिं. मध्ये प्रवाह वाढलेला जाणवत होता. बरं झाला बाइक्स पाण्यात नाही टाकल्या ते. बाइक्स ताब्यात घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. दुपारचे २ वाजत आले होते आणि आता सर्वांना भूका लागल्या होत्या.
एके ठिकाणी होटेलचा तंबू लावलेला दिसला. त्याच्याकडे फक्त मॅगी होते. त्याला म्हटले आण बाबा जे काय आहे ते. काहीतरी जाऊदे पोटात. आधी चांग-ला आणि मग शैताननाला दोघांनी चांगलीच वाट लावली होती. थोड़ा थकवा जाणवत होता. आता बायकर्स चेंज केले आणि ३च्या आसपास आम्ही निघालो पुन्हा एकदा लेहकडे. तांगसे, सोलटोक ह्या भागातले नदीचे पात्र वाढलेले कळत होते. मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने थोड़ा वेळ वाया गेला. मध्येच एके ठिकाणी एक मोठा प्रस्तर लागला. त्याचा आकार बेडकासारखा होता. त्याला आम्ही 'चांग-ला बेडूक' असे नाव दिले.
परतीच्या मार्गावर कुठेही न थांबता आम्ही पुन्हा एकदा 'चांग-ला'ला पोचलो तेंव्हा ६ वाजत आले होते. तिकडे पुन्हा हरप्रीतसिंग बरोबर परत थोड्या गप्पा मारल्या. शक्तिला पोचायला अजून २१ की.मी.चा घाट उतरून जायचे होते. त्या उतारावर बायकर्स तर सुसाटच पण आमचा गाडीवाला पण भन्नाट सुसाट मध्ये गाडी उतरवत होता. शक्ती - कारू पार करत ८:३० वाजता लेहमध्ये पोचलो. दिवसाभरात काय खाल्ले होते? २ चहा आणि १-२ मॅगी बास...!!! तेंव्हा ज़रा ठिक जेवुया म्हणुन पुन्हा एकदा ड्रीमलैंडला गेलो. बटर चिकन, चीज-गार्लिक नान आणि सोबत जीरा राईस असे तब्येतीत जेवलो. ११ च्या आसपास पुन्हा गेस्ट हाउसला आलो तेंव्हा अंगात त्राण नव्हते. झोपायच्या आधी मीटिंग मात्र झाली. अभीने मात्र सर्वांची खरडपट्टी काढली. सकाळी झालेल्या थोड्या उशिरामुळे पेंगोंगला जास्त वेळ देता आला नव्हता म्हणुन तो बराच अपसेट होता. ५-६ तास बाइक वरुन इतके अंतर पार करून गेलो आणि भोज्जा करून परत आलो असे काहीसे आज झाले होते. बायकिंगला मात्र कैच्याकै भारी मज्जा आली होती. खरच आम्ही अजून लवकर निघायला हवे होते. पण जे झाले ते झाले.. आता पुढे ही काळजी घ्यावी लागेल हे मात्र नक्की होते. १२ वाजून गेले होते आणि सुरू झाला होता १५ ऑगस्ट. भारताचा स्वतंत्रता दिवस. उदया लवकर उठून आम्हाला लेहच्या पोलो ग्राउंडला परेड बघायला जायचे होते. तेंव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत निद्रेच्या अधीन झालो.
पुढील भाग : १५ ऑगस्ट ... सैनिकहो तुमच्यासाठी... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १० - लेहमधील १५ ऑगस्ट ... !
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने कालचा थकवा आणि शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. कालच्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिराने झोपून देखील सर्वजण ७:३० वाजता निघायला हजर होते. हलकासा नाश्ता केला आणि पोलो ग्राउंडकडे निघालो. लेह मार्केटच्या थोड वरच्या बाजूला आहे हे पोलो ग्राउंड. फार मोठे नाही आहे पण ह्या सोहळ्यासाठी पुरेसे असे आहे. जम्मू-काश्मिरप्रमाणे इकडे परिस्थिति नसल्याने तशी फारशी सिक्युरिटी नव्हती. झेंडा वंदनासाठी विविध दलाचे, अनेक शाळा-कोलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रिय छात्र सेनेचे कडेट्स त्यांच्या बर्रेटवरच्या लाल हायकलमध्ये उठून दिसत होते. ह्या सर्वात 'महिला दले आणि छात्र सेनेच्या मुली' यांची संख्या लक्षणीय होती. नागरीकांची उपस्थिती सुद्धा खुप जास्त होती. मला खरच समाधान वाटले. श्रीनगर प्रमाणे इकडे वातावरण नाही. इकडे प्रत्येकाला लेह-लडाख हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे मनापासून वाटते.
आमच्यापैकी ज्यांच्याकडे SLR होते त्यांना जरा जवळून फोटो घेता यावेत म्हणुन नबी (गेस्टहाउसचे मालक) यांनी अमेय, उमेश आणि कुलदीप या तिघांना आत नेले. आम्ही बाकी सर्वजण जरा लांब उभे होतो. बरोबर ८:३० वाजता प्रमुख पाहूणे आले आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. 'जन गण मन'चे सुर घुमु लागले. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आम्ही निश्चल उभे होतो. आम्हाला आज एक वेगळाच आनंद येत होता. नेहमीप्रमाणे शाळा-कोलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा न करता आम्ही एका निराळ्याच ठिकाणी तो साजरा करत होतो. झेंडावंदन झाल्यावर सर्व दलांनी राष्ट्रध्वजासमोरून संचलन केले. मला माझ्या कोलेजचे दिवस आठवत होते. असा एक १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी गेला नाही जेंव्हा मी घरी बसलो असेन. प्रत्येकवेळी कोलेजमध्ये तयारी करण्यात, मार्चिंगची प्राक्टिस करण्यात एक उत्साह असायचा अंगात. कोलेज संपल्यावर कामाला लागल्यापासून २ वर्षे ते सर्व काही चुकत होते. त्यामुळेच बहुदा आज एक निराळे समाधान मला लाभले.
*****************************************************
सैनिकांना उद्देशून लिहिलेले पत्र...
सैनिकहो ... स्वातंत्रोत्तर काळात गेल्या ६० वर्षात जेंव्हा-जेंव्हा शत्रुंनी सीमेवर यूद्धे छेडली, तेंव्हा-तेंव्हा आपण मोठ्या तत्परतेने मात्रुभूमीच्या रक्षणार्थ धावून गेलात. वारा-वादळे, उन-पाऊस, हिमवर्षाव आणि जगातल्या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहिलात. १९४८ च्या डोमेल पराक्रमापासून ते कारगिल युद्धापर्यंत आणि आत्तापर्यंत सुरु असलेल्या दहशदवाद विरोधातील सैनिकी जिद्दीला आणि अतुलनिय पराक्रमाला आमचा मानाचा त्रिवार मुजरा.
राष्ट्रभावनेच्या उद्दात्त हेतूने प्रेरित होउन, वैयक्तिक प्रश्नांना बगल देउन आपण या भुमीचे आधारस्तंभ बनता, तेंव्हा कुठे आमच्यासारखे तरुण आपणास निवांतपणे हे पत्र लिहू शकतात. या देशात आजही जिजाऊँसारख्या माता आपल्या शिवबांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत व शिवछत्रपतींसारखे पुत्र निर्माण करत आहेत. आपल्या प्रत्येकात आज सुद्धा शिवछत्रपतींचा एक अंश आहे आणि म्हणूनच आपली राष्ट्रभावना प्रचंड उच्च आहे. युद्धसदृश्य किंवा युद्ध परिस्थितिमध्ये अनेक दिवस अन्न-पाण्याशिवाय राहून, शत्रूला हुलकावण्या देत, अंगावर प्रचंड वजन घेऊनसुद्धा काटक व चपळ राहून, एका दमात प्रचंड अंतरे पार करीत आपण यशस्वी होता. अखेरच्या टप्यात शत्रूच्या नरडीचा घोट घेत देशाचा झेंडा मोठया अभिमानात पर्वत शिखरावर रोवता, तेंव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. आज शत्रू फक्त सीमेवरच नव्हे तर सर्वत्र आहे. त्यास शोधून परास्त करण्याचे कर्तव्य आमचे देखील आहे. आम्ही ते पार पाडू याची आपण खात्री बाळगावी. आज प्रत्येकजण सिमावर्तीभागात जाउन सैनिकांशी संपर्क साधू शकत नसला तरी अशा मोहिमांमुळे हे शक्य होत असते. माझ्या सैनिकांनो, इकडे प्रत्येकाला तुमची आठवण आहे. काळजी आहे. सर्वात मुख म्हणजे सार्थ अभिमान आहे. आपण या देशाचे खरे आधारस्तंभ आहात. आपणास मनापासून मनाचा मुजरा. भारत माता की जय ... !
*****************************************************
सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की १५ ऑगस्टचा दिवस तसा मोकळाच होता. आजच्या दिवसात दुपारी शॉपिंग उरकून बघायच्या राहिलेल्या 'अल्ची गोम्पा' आणि 'मॅग्नेटिक हिल' ह्या जागा बघायच्या होत्या. दुपारच्या जेवणापर्यंत शॉपिंग उरकायचे आणि लंच करून फिरायला निघायचे असे ठरले. आता सुरू झाली मार्केटमधली भटकंती. कूणी ह्या दुकानात शिरले तर कोणी त्या. लडाखला एम्ब्रॉयडरी केलेले खुप छान छान टी-शर्ट मिळतात. मी खुप सारे बनवून घेतले तसे. शिवाय आम्ही सर्वांनी एक टिम टी-शर्ट बनवून घ्यायचे ठरवले. काळ्या रंगाच्या टी-शर्टवर 'जम्मू ते लेह' आणि 'लेह ते दिल्ली' असा नकाशा बनवून घेतला. ह्या संपूर्ण रस्तामध्ये जी-जी महत्वाची ठिकाणे आणि पासेस आम्हाला लागले ते उंचीसकट त्यावर शिवून घ्यायचे होते. कारागीर ईब्राहीम भाईला सर्व डिटेल्स दिले आणि १ दिवसात ऑर्डर पूर्ण करून ठेवायला सांगितली. हे सर्व होईपर्यंत सर्वजण खरेदी संपवून एका होटेलमध्ये घुसले होते. जेवाय-जेवाय केले आणि भटकायला निघालो.
दुपारी अल्ची गोम्पासाठी पुन्हा खालसेच्या दिशेने निघालो. आम्ही सर्वजण बाइक्स ७०-८० च्या स्पीडला टाकत एकदम फुल तू राम्पार्ट रो... ४ च्या आसपास डावीकडे अल्ची गोम्पाचा बोर्ड दिसला. आम्ही हायवे सोडून डावीकडे ब्रिज पार करत नदी पलीकडे गेलो आणि पुढे लगेच मॉडर्न व्हिलेज ऑफ़ अल्ची लागले. अल्ची गावत पोचलो आणि १००० वर्षे जुने 'गोम्पा' बघायला गेलो. गोम्पाकडे जाताना आजूबाजूला सगळीकडे सफरचंद, पीच आणि जर्दाळूची झाडे होती. खुद्द गोम्पामध्ये प्रवेश केल्या-केल्या समोरच एक जर्दाळूचे झाड़ होते आणि त्याला अश्शी खालपर्यंत जर्दाळू लागलेली होती. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. गोम्पा राहिले बाजुलाच आणि आम्ही तुटून पडतो त्या जर्दाळूच्या झाडावर. एकदम असा हल्लाबोल केल की काय विचारूच नका. हे तोड़.. ते काढ.. गाडीच्या हेलमेट मध्ये भरून घेतली इतकी जर्दाळू तोडली.
अल्ची गोम्पामध्ये फोटो काढायला बंदी आहे शिवाय प्रवेश करायला ३० रुपये प्रवेश फी आहे. रिनचेन झांग्पो (Rinchen Zangpo) याने १००० साली ह्या गोम्पाची स्थापना केली. बाहेरील ३ मजली बांधकाम पूर्णपणे लाकडाचे आहे. येथे एकुण ३ विहार आहेत. पहिल्या विहारात मातीच्या बनवलेला अत्यंत जुन्या ३ बुद्ध मुर्त्या येथे आहेत. २ मजली तरी नक्की असाव्यात. हा प्राचीन कलेचा वारसा जपला नाही तर लवकर त्या नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. पुढच्या विहारामध्ये सुद्धा काही जुन्या बुद्ध मुर्त्या आहेत पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भिंतीवर काढलेली निरनिराळ्या देवांची भित्तिचित्रे. ह्यामध्ये आम्हाला ३ ठिकाणी चक्क 'श्री गणेशाची प्रतिमा' आढळून आली. बाकी बरीच चित्रे आता पाण्यामुळे अस्पष्ट झाली आहेत. तिसऱ्या आणि सर्वात शेवटच्या विहारामध्ये सर्वात विलोभनीय आहे डाव्या भागात असलेली सहस्त्रहस्त असलेली भगवान बुद्ध यांची धातूची मूर्ती. या शिवाय उजव्या भागात भगवान् बुद्ध आणि त्यांचा परिवार यांच्या धातूच्या प्राचीन मुर्त्या आहेत. ह्या सर्व मुर्त्या अतिशय सुंदर असून त्यांची चांगली निगा राखली गेली आहे. त्यांचे दर्शन घेउन ५ वाजता तिकडून निघालो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
परतीच्या मार्गावर सासपोल मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेली सफरचंदाची झाडे पाहून मोह आवरला नाही. शेवटी बाईक रस्त्याच्या बाजूला लावली आणि चढलो बाजुच्या भिंतीवर. झाडाची एक डहाळी रस्त्यावर बाहेर आली होती त्यावरून सफ़रचंद तोडली. लहानपणी कुठे कोणाच्या बागेत असे आंबे नाहीतर चिकू तोडायचो त्याची आठवण आली एकदम. पुढे निघालो तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावांमधून लडाखी घरांचे दर्शन होत होते.
कुठे माती-विटांची तर कुठे सीमेंटची घरे. पण काही वैशिष्ट्ये असलेली. मोठ्या-मोठ्या लाकडी खिडक्या आणि त्यावर नक्षिकाम असणारी घरे. घरांच्या छतावर चारही बाजूने मातीचे साचे करून त्यात छोटी झाडे लावलेली असतात. या शिवाय शुभचिन्हे म्हणुन छतावर बहुरंगी पताका ज्याला 'प्रेयर फ्लाग्स' असे म्हणतात त्या लावतात. छोटेसे पण टुमदार असे हे लडाखी घर.
आता थेट 'मॅग्नेटिक हिल'ला पोचलो. इकडे रस्त्याच्या मधोमध एक चौकोन काढला आहे. त्यात गाडी उभी केली की मॅग्नेटिक इफेक्ट जाणवतो म्हणे. वेगाने जाणाऱ्या गाडीचा स्पिड सुद्धा कमी होतो, एक्सेलरेट केली तरी गाडी पळत नाही असे ऐकले होते. असे काहीसे आमच्यासोबत येताना झाले होते. कुलदीपने तर चौकोनामध्ये स्वतः उभे राहून उड्या मारून पाहिल्या. मी म्हटले 'तुझ्या अंगात काय मेटल आहे का?' आदित्यला बाईकवर इफेक्ट जाणवत होता मला मात्र तेंव्हा अजिबात जाणवला नाही.म्हणुन मग मी बाईक रस्त्यावरुन खाली टाकली आणि अक्षरश: त्या 'हिल'वरती जिथपर्यंत बाईक जाईल तिथपर्यंत नेली. चढवताना मज्जा आली पण जशी ती चढायची थांबली तशी फिरवताना मात्र लागली बरोबर. कशीबशी न पड़ता फिरवली आणि सुसाट वेगाने उतरायला लागलो. अर्धातास तिकडेच नव-नवीन प्रयोग करत होतो आम्ही. जसा अंधार पडत आला तसे आम्ही तिकडून निघालो. परतीच्या वाटेवर अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळाला. डोंगर, सूर्यकिरणे आणि ढग यांचा सुंदर मिलाफ.
८ वाजता सर्वजण गेस्टहॉउस वर पोचल्यावर 'जेवायला कुठे जायचे' हा एक यक्ष प्रश्न होता. २ दिवस ड्रीमलैंड मध्ये जेवलो होतो तेंव्हा तिकडे नको जायला असे ठरले. मी ड्रीमलैंडच्या अगदी टोकाला 'मोनालिसा' म्हणुन मस्त गार्डन रेस्तरंट शोधले. आज जेवणासोबत चिकन आणि वेज 'मोमोस' खाल्ले. जेवण आटपून ११ वाजता होटेल वर परत आलो. उदया सकाळी खर्दुन्ग-लासाठी लेह सोडायचे होते. सामानाची बांधाबांध केली आणि झोपी गेलो. आजच्या लेह मधल्या झेंडावंदनानंतर उदया झेंडा रोवायचा होता तो जगातल्या सर्वोच्च रस्त्यावर. तो क्षण अनुभवायला आम्ही सर्वच उत्सुक होतो. आता प्रतीक्षा होती ती उद्याच्या सुर्योदयाची...
पुढील भाग : खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग ११ - खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !
दिनांक १६ ऑगस्ट. मोहिमेचा दिवस नववा. आजचे लक्ष्य होते १८३८० फूटावरील जगातील सर्वोच्च रस्ता - खर्दुंग-ला. खुद्द स्वतःला आणि स्वतःच्या बाईकला सुद्धा तिथपर्यंत नेण्यासाठी सर्वजण आसुसलेले होते. या मोहिमेमध्ये अनेक अनुभव आले, येत होते पण हा अनुभव सर्वोच्च असणार होता याची प्रत्येकाला खात्री होती. आज आमचे ते स्वप्न पूर्ण होणार होते. सकाळी नाश्ता करून लेह सोडले तेंव्हा पासून मनात एक वेगळीच बेधुंद लहर संचारली होती. खाली येउन लेह मार्केटमध्ये न शिरता मागच्या बाजूने थेट 'खर्दुंग-ला'च्या वाटेला लागलो.
अवघ्या ३० मिनिट्स मध्ये 'गंग्लोक' या ठिकाणी १३२०० फुटावर पोचलो होतो. पण तिथे न थांबता आता थेट १८३८० फुटावर थांबायचे असे ठरले होते. मध्ये एके ठिकाणी दगडाचा बेडूक बनवलेला दिसला. रंग मारून डोळा वगैरे काढला होत त्याला. 'त्सोलटोक'मध्ये सुद्धा आम्हाला असाच बेडकासारखा दिसणारा एक मोठा प्रस्तर दिसला होता पण त्याला रंग वगैरे नव्हता फसलेला. हा भन्नाटच होता. आम्ही ह्याला 'खर्दुंग फ्रॉग' असे नाव ठेवले.
वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता ... एक U टर्न आणि मग विरुद्ध दिशेला वळून पुन्हा वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता. जस-जसे वर चढत होतो तसे वाऱ्याचा जोर अधिक-अधिक जाणवत होता. वाऱ्याच्या विरुद्ध बाजूने बाईक फूल रेस केली तरी २०च्या स्पीडला सुद्धा चढत नव्हती तर U टर्न मारून वाऱ्याच्या दिशेने बाईक चढावर सुद्धा ४० च्या स्पीडला व्यवस्थित पुढे जात होती. गंग्लोक मागे टाकत ८ च्या सुमारास १७००० फूटावरील 'साऊथ पुल्लू' गाठले.
या ठिकाणी खर्दुंग-लाची दक्षिणेकडची चेकपोस्ट आहे. इकडे कळले की उदया संपूर्ण खर्दुंग-ला कामानिमित्त बंद असणार आहे. आली का अजून एक पंचाइत. आता 'नुब्रा-हुंडर'ला जाउन रहायचा प्लान रद्द करावा लागणार होता. कारण आज राहिलो तर उदया पण रहावे लागणार म्हणजेच परतीच्या प्लानचे वाजले न तीन-तेरा. तेंव्हा न रहता आज संध्याकाळपर्यंत परत यायचा प्रयत्न करायचा असे नक्की केले. तशी तिकडे एंट्री केली आणि पुढे निघालो. ह्या पुढचा रस्ता मात्र कच्चा आहे. कुठे मध्येच रस्ता वरुन वाहणारे पाणी, तर कुठे कडयावरुन घरंगळत आलेले छोटे-मोठे दगड आणि रस्त्यावरील बारीक खडी. लेह पासून ३४ की.मी. च्या अंतरात छोटे-मोठे अडथळे पार करत आम्ही बरोबर ९ वाजता 'खर्दुंग-ला'च्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११००० वरुन थेट १८३८० फुट.
१८३८० फुट... जगातील सर्वोच्च वाहतुकीचा रस्ता. काय वाटत असेल ते शब्दात नाही सांगता येत. संपूर्ण ट्रिपचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. थंडी जास्त नसली तरी जोराचा वारा असल्याने गार वाटू लागले होते. फारवेळ इकडे थांबणे शक्य नसल्याने ते क्षण मनात साठवून घेतल्यावर आम्ही सर्वांनी तिथे काही फोटो काढले. सोबत नेलेला तिरंगा तिकडे फडकवला. आमच्यापैकी कोणालाच इकडे श्वास घ्यायचा कसलाच त्रास झाला नाही. अर्थात मनात तशी भीती आधीपासून ठेवून आल्यास तसा त्रास होऊ शकतो. तेंव्हा इकडे यायचे तर मानसिक दृष्टया कणखर होउनच.
अधिक वेळ न दवडता पुढे निघालो आणि १८ की.मी. खाली उतरत उत्तरेकडच्या १६००० फूटावरील 'नॉर्थ पुल्लू' चेकपोस्ट वर पोचलो. तिकडच्या जवानांनी सुद्धा 'आज परत या नाहीतर परवा' असेच सांगीतले. ११ वाजत आले होते आणि अजून बरेच अंतर पुढे जायचे होते. मी सुसाट वेगाने सर्वात पुढे निघालो होतो. 'नॉर्थ पुल्लू'नंतर 'खर्दुंग' गाव लागले. तिकडे सुद्धा एक छोटेसे गेस्टहाउस आहे. म्हटले चला अगदीच अडकलोच तर इकडे सोय होऊ शकेल रहायची. खर्दुंग मागे टाकत मी-शमिका पुढे जात होतो पण मागे कोणीच येताना दिसत नव्हते. अखेर बराच वेळाने १२ च्या सुमारास मी एके ठिकाणी थांबलो. दूर-दूर पर्यंत रस्तावर बाईक्स दिसत नव्हत्या. मागुन बाकी सर्व येईपर्यंत मी ब्लॉगसाठी नोट्स काढत बसलो तर शमिका आसपासचे फोटो घेत होती. त्याचवेळी तिने घेतलेला माझा हा फोटो. एक भारीच गंमत आहे ह्या फोटोमध्ये. कळते आहे का ते बघा.
मी नोट्स काढत असतानाच आर्मीचा एक ट्रकसमोर येउन थांबला. त्यातल्या जवानाने मला विचारले, 'कुठून आलात? मुंबईहून?' मी म्हटले 'होय'. कोल्हापुरचा होता तो जवान. त्याच्याबरोबर ५ एक मिं. गप्पा मारत होतो तोच मागुन बाकी सर्वजण दिसायला लागले. कोणीतरी आपल्या गावचे भेटले ह्या आनंदात तो पुढे निघून गेला. मला सुद्धा खुप बरे वाटते त्याला भेटून. सर्व आल्यावर आम्ही ठरवू लागलो. १२ वाजले होते आणि आता निर्णायक वेळ आली होती. काय करायचे? अजून किती पुढे जायचे? हुंडरला पोचणे शक्य होते पण परत येताना उशीर झाला तर? की ईकडूनच परत फिरायचे? असे ठरले की एक वेळमर्यादा नक्की करून त्या वेळेला तिकडून परत फिरायचे. मग जिथे असू तिथून म्हणजे तिथूनच. आता कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. सुसाट वेगाने सर्वजण पुढे निघालो. अभि-मनाली सर्वात मागे होते. त्यात मनाली तिच्या कॅमेरामधून शूट करत होती. उजव्या हाताला सिंधू नदी सतत साथ देत होती. क्षणा-क्षणाला तिचे पात्र रुंद होत जात होते.
आम्ही खाल्सर, डिस्किट अशी महत्वाचे गावे पार करत पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'सुमुर' फाटा लागला. या ठिकाणी एक रस्ता हा 'सियाचिन बेस'कडे म्हणजेच 'सुमुर'कडे जातो. या ठिकाणी प्रवेश करायला अजून वेगळी परवानगी लागते. आम्ही मात्र दुसऱ्या रस्त्याने 'हूंडर'कडे निघालो. १ वाजत आला होता आणि अजून सुद्धा हुंडर बऱ्यापैकी लांब होते. उजव्या हाताला सोबत करणाऱ्या सिंधू नदीने आता रौद्र रूप धारण केले होते. एका डाव्या वळणावर तिचे पात्र इतके मोठे झाले की बघून सुद्धा उरात धडकी भरेल. असे रौद्र विस्तीर्ण आणि घोंघावत वाहणारे पात्र मी आधी कधीच पाहिले नव्हते. दोन्ही बाजूला नजर जाइल तिथपर्यंत फ़क्त नदीचे पात्र. नजर अडत होती ती दोन्ही बाजूला असणाऱ्या पर्वत रांगांवर. निसर्गापुढे मनुष्य खरच किती खुजा आहे हे अश्यावेळी कळते. निसर्गत जावे ते ह्याच करीता. आपला असलेला-नसलेला सर्व अंहकार गळून नाही पडला तरच नवल.
रस्ता आता डावीकडे नदी पासून दूर-दूर जाऊ लागला आणि दोन्ही बाजूला दिसू लागले वैराण असे वाळवंट. त्या वाळवंटामधून आता आम्ही जात होतो. दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता कस मस्त वाटता होता. बाईक चालवायला तर पर्वणीच. ह्या रस्ताला माझ्या 'होंडा युनिकोर्न'ने ह्या ट्रिपमधला सर्वात जास्त स्पीड गाठला. 115 kmph. इतक्या वेगात तर माझ्या बाईकचे पुढचे चाक उडायला लागले होते. मग गुपचूप वेग कमी करत ८०-९० वर आणला. इतका चांगला रस्ता तर आपल्याकडे सुद्धा नाही. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये BROच्या 54 RCC ने हा रस्ता अतिशय उत्तम ठेवला आहे. नुब्रा-हुंडर ह्या संपूर्ण भागातल्या रस्त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आम्ही तो रस्ता पार करत हुंडरला पोचलो. सर्वात आधी मी तिकडे पोचतो न पोचतो तोच मला समोर एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते cafe 125 आणि खाली काय लिहिले होते ते फोटो मध्ये वाचा.
आता हा असा बोर्ड दिसल्यावर पुढे काय झाल असेल ते सांगायला हवे का? मी तिकडेच गाडी बाजूला लवली आणि आत नेमकं काय-काय मिळतय ते विचारून आलो. इतक्यात मागून अमेय, अभिजित, आदित्य येताना दिसले. रस्त्याच्या मधोमध उभा राहून मी त्यांना बाईक्स बाजूला घ्यायला लावल्या. अर्थात सर्वांनाच भूका लागल्या होत्या. पण इकडे असे काही खायला मिळेल असे वाटते नव्हते आम्हाला. समोसा - जिलेबी पासून साधा आणि मसाला डोसा सुद्धा मिळत होता इकडे. आम्ही तर अक्षरश: सुटलो होतो. यथेच्छ जेवलो आणि मग निघालो हुंडर मधील 'डबल हंप कॅमल' बघायला.
येथे त्यावर बसून राइड्स घेता येतात. पण आम्हाला मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही. राहता आले असते इकडे तर मजा आली असती पण ते काही आमच्या नशिबी नव्हते. दुपारी बरोबर ३:३० ला आम्ही तिकडून परतीच्या मार्गाला लागलो.
बायकर्स सुसाट वेगाने मध्येच पुढे जायचे तर मध्येच फोटो काढायला म्हणुन मागे रहायचे. पुन्हा तो दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता लागला. तिकडून खर्दुंग गावात पोचलो तेंव्हा ४:३० वाजत आले होते. बाकी बायकर्स मागे राहिले होते म्हणुन एका दुकानात थांबून चहा-कॉफी मागवली. मागाहून बायकर्स आलेच. मग आमच्या बाइक्सना सुद्धा सोबत असलेले एक्स्ट्रा पेट्रोल प्यायला दिले. 'निघा.. निघा .. चला निघा.' मी बोंबा मारत होतो. ५:३० च्या आधी पुन्हा एकदा 'खर्दुंग-ला'चा टॉप गाठायचा होता. गाड़ी मधून निघालो तसे पूनमला लक्ष्यात आले की तिचा कैमेरा सापडत नाही आहे. तिला वाटते की राहिला त्या दुकानमध्येच. पण तो अमेय-कुलदीपने लपवून ठेवला होता. ते तिला समजायला तसा बराच वेळ गेला. दूसरीकडे दिपालीला तिचा कैमेरा कुठे आहे ते आठवत नव्हते. शोभितला दिला आहे की कुठे काय माहीत? सगळा गोंधळ. पण कशासाठी सुद्धा आम्ही थांबलो नाही. पास बंद झाला असता तर आमची बरोबर बोंब लागली असती. खर्दुंगच्या १४७३८ फुट उंचीवरून १८ की.मी चे अंतर वर चढत पुन्हा एकदा १८३८० फुटावर येत खर्दुंग-ला फत्ते केला.
एका दिवसात २ वेळा. ६ वाजता तिकडे कोणी-कोणी नव्हते. अगदी आर्मीचे जवान सुद्धा बाहेर नव्हते. वारा इतक्या सोसाट्याचा सुटला होता की काही क्षणात आम्हाला थंडी वाजायला लागली. तिकडे फार वेळ न थांबता आम्ही पुन्हा लेहच्या दिशेने उतरत पुढे निघालो. उतरताना आमच्या ट्रिपचा पाहिला अपघात झाला. उतरताना आशिष आणि साधना पडले दोघे बाईकवरुन. तिघांना सुद्धा काहीच लागले नाही. म्हणजे आशिष, साधना आणि बाईकला सुद्धा... अर्थात हे आम्हाला खाली पोचलो तेंव्हा कळले.
गंग्लोक पार करत ७ वाजता पुन्हा एकदा लेहमध्ये पोचलो. खरंतरं आम्ही सकाळी सर्व खोल्या रिकाम्या केल्या होत्या तरी सुद्धा 'नबी'ने आमची रहायची सोय व्यवस्थित केली. पोचल्यानंतर उमेश सर्वांचे फोटो घेत होता. त्यात हा माझा ८ दिवस बाईक चालवल्यानंतरचा फोटो.
सर्व आवरून उद्याचा प्लान फायनल केला. उदया सकाळी लेह सोडायचे होते आणि परतीच्या मार्गाला लागायचे होते. इतक्या दिवसात मनात साठवलेले अनेक क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तिकडून निघूच नये असे वाटत होते पण ते काही शक्य नव्हते. उद्या अजून काय नविन अनुभव येणार आहेत ह्याचाच विचार करत रात्री पाठ टेकली...
पुढील भाग : त्सो-मोरिरी - अवर्णनीय असे सृष्टिसौंदर्य ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १२ - 'त्सो-मोरिरी' अवर्णनीय असे ... !
मोहिमेच्या ९ व्या दिवशी अखेर आम्ही लेह सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मू ते लेह ह्या ४ दिवसाच्या आणि लेहमधील ४ अश्या एकुण ८ दिवसात अनेक अनुभव घेउन आम्ही मनालीमार्गे दिल्लीसाठी निघालो होतो. गेल्या ८ दिवसात कारगिल - द्रास, नुब्रा - खर्दुंग-ला, पेंगोंग - चांग-ला अश्या अनेक ठिकाणी भेट देऊन तृप्त झालेले आम्ही आता 'त्सो-मोरिरी'कडे निघालो होतो. वाकड्या मार्गाने पुन्हा एकदा चीन सीमारेषेवर जायचे आणि मग तिकडून 'त्सो-कार'च्या रस्त्याने खाली सरचूला उतरायचे असे आमचे ठरले होते. सकाळी नाश्त्याला सर्वजण हजर झाले तेंव्हा ऐश्वर्याला लक्ष्यात आले की गेले २-४ दिवस झाले तिचा 'चीज'चा डब्बा दिसत नाही आहे. "तूला माहीत आहे का रे?" तिने आदित्यला विचारले. तितक्यात दीदी बाहेर आल्या आणि त्यांनी विचारले, "क्या धुंड रहे हो?" तर अमेय हाताने चौकोनी आकार दाखवत बोलला,"वो त्रिकोणी डब्बा था न. वो कहा है?" (मराठी लोकांचे हिंदी...) आता डब्बा होता चौकोनीच. हाताने त्याने सुद्धा चौकोन दाखवला पण बोलला मात्र त्रिकोणी. मी म्हटले काय रे,"आज इतक्या दिवसांनी विरळ हवेचा त्रास व्हायला लागला की काय? हा.. हा.." असो तो डब्बा काही शेवटपर्यंत मिळाला नाही. ८:३० च्या आसपास आवरून झाल्यावर बाइक्स वर सामान लोड केले. गाड़ीचे काही काम असल्याने आम्ही उशिराने निघणार होतो.
जाण्याआधी 'नबी'च्या फॅमिलीसोबत एक ग्रुप फोटो काढायला आम्ही विसरलो नाही. गेल्या ५ दिवसात खरच अगदी घरच्यासारखे राहिलो होतो आम्ही इकडे. त्यांचा मुलगा असीम तर आम्हाला सोडायला तयारच नव्हता. शेवटी एका मोठ्या चोकलेटवर आम्ही आमची सुटका करून घेतली.पण त्याने पुन्हा यायचे प्रोमिस आमच्या कडून घेतलेच. आम्ही सुद्धा ११ वाजता त्सो-मोरिरीच्या दिशेने निघालो. आम्ही निघालोय हे सांगायला अभीला फोन लावतोय तर तो काही लागेना तेंव्हा बायकर्स आतल्या रस्त्याला लागले हे समजुन आले. आता लवकरात लवकर अंतर गाठून बायकर्सना कधी गाठतो ते बघायचे होते.
तासाभरात म्हणजे १२ च्या आसपास 'उपशी'ला पोचलो होतो. इकडून एक रस्ता मनालीकडे जातो तर दूसरा 'सुमधो' मार्गे 'त्सो-मोरिरी'कडे. सुमधोच्या मार्गाने आम्ही पुढे निघालो तशी सिंधु नदी पुन्हा आमच्यासोबत यायला निघाली. कधी आमच्या सोबत वहायची तर कधी आजुबाजुच्या डोंगरांना वळसा मारत उलट्या दिशेने वाहत जायची. दुपारी १:१५ च्या सुमारास उपशी - सुमधो मार्गावरील 'गयाक' हे महत्वाचे गाव लागले. पण इकडे काहीतरी खायला मिळेल ही आशा खोटीच निघाली. गाडीमध्ये सोबत जे काही होते ते खात-खात तसेच पुढे निघालो. बायकर्सचा सुद्धा पत्ता नव्हता. किती पुढे निघून गेले होते काय माहीत. फोन सुद्धा लागत नव्हते कोणाचे.
इतक्यात २ च्या सुमारास 'कियारी' गावापासून ६ किमी. अंतरावर आमची गाडी बंद पडली. सर्व प्रयत्न करून झाले पण काही केल्या सुरू होईना. १ तास असाच वाया गेला. मागुन दुसरी गाडी पाठवायला आम्ही दुसऱ्या एका गाडीसोबत निरोप सुद्धा धाडला. पण निरोप जाउन दुसरी गाडी यायला किमान ३ तास जाणार ह्या अंदाजाने आम्हाला इकडेच संध्याकाळ होणार हे समजुन आले होते. पुन्हा एकदा वेळेचा बट्याबोळ.
असेच रस्तावर बसलो असताना समोरून आर्मीचा कोन्व्होय येताना दिसला. त्यातील जवानांनी थांबून चौकशी केली आणि पुढे 'कियारी चेक पोस्ट जा' कोणीतरी ते फोन लावून देतील असे सांगितले. मग शोभित मागुन येणाऱ्या एका गाड़ीतून पुढे गेला. आम्ही बाकी सर्व तिकडेच बसलो होतो. इतक्यात मागुन अजून एक ट्रावेल्सची गाडी आली. त्यातला ड्रायव्हर तेनसिंगच्या ओळखीचा होता. त्याने चक्क गाडी चालू करून दिली. स्पार्कप्लग मध्ये काहीसा प्रॉब्लम होता. ३ वाजून गेले होते आणि आम्ही अजून त्सो-मोरिरी पासून बरेच लांब होतो. आता अगदी जेवायला सुद्धा कुठेही थांबणे शक्य नव्हते. गाडी सुरू झाल्यावर पुढच्या १० मिं मध्ये कियारी चेकपोस्टला पोचलो. तिकडे शोभित सुद्धा भेटला. कियारी चेकपोस्टला A.S.C. म्हणजेच 'आर्मी सप्लाय कोअर'चा मोठा बेस होता. सध्या तिकडे Bombay Sapers 128 Field Coy स्थित आहे. तिकडच्या सुभेदारने आमची बरीच मदत केली. २-३ तास आधी मुंबईचे काही बायकर्स सुद्धा इकडून पुढे गेले आहेत असे सुद्धा त्यांच्याकडून कळले. भुकेले बायकर्स सुद्धा इकडे थांबले होते. सुभेदारने दिलेले काजू-बदाम आणि केळी खाऊन मग पुढे गेले होते. पण त्या आधी तो सुभेदार बोलायला विसरला नव्हता. 'कयू आतेहो यहाँ? क्या देखने? है क्या यहाँ? नंगे पहाड़? पैसा बहोत है क्या तुम्हारे पास. हम को तो आना पड़ता है लेकिन तुम कयू आतेहो?' उद्विग्न मनाने बोलत होता बहुदा. एकजण धीर करून बोलला 'आपसे मिलने आये है साबजी' तसा एकदम खुश झाला आणि मग काजू-बदाम- केळी. ती स्टोरी ऐकून तिकडून निघालो. आवश्यक फोना-फोनी झाली होती. ३:३० होउन गेले होते. अजून सुद्धा बरेच अंतर जायचे होते. केशर, नुर्नीस अशी गावे मागे टाकत आम्ही 'किदमांग'ला पोचलो. डोंगरांनी आपला रंग आता बदलला होता. काळ्यावरुन आता ते जांभळ्या रंगाचे झाले होते. उजव्या बाजूला सिंधुनदी तर डाव्या बाजूला जांभळ्या रंगाचा सडा पसरला होता. त्यांच्यावरुन ऊन परावर्तित झाले की ते लख-लख चमकायचे.
त्या डोंगरांच्या सोबतीने आम्ही ४:३० च्या आसपास 'चूमाथांग'ला पोचलो. पोटात सणसणीत भूक लागली होती. स्त्याच्या दोन्ही बाजूला २ होटल्स बघून आम्ही 'जेवायला थांबुया' असे बोलायच्या आत तेनसिंगनेच गाडी थांबवली. 'खाना खाके आगे जायेंगे' असे बोलून तो उतरला. आम्ही सुद्धा भुकेले होतो. आता इकडे जे मिळेल ते खाऊन पुढे जायचे होते. नेहमी प्रमाणे माग्गी आणि चावल-राजमा. बायकर्स सुद्धा इकडेच जेवून आत्ताच पुढे गेले आहेत असे कळले. २० मिं मध्ये तिकडून जेवून पुढे निघालो आणि ५ वाजता 'माहे' चेक पोस्ट गाठली. तिकडे एंट्री केली आणि 'सुमधो'कडे निघालो. अर्ध्यातासात 'सुमधो' गावात पोचलो. इकडून एक रस्ता 'त्सो-कार'मार्गे पांग-मनालीकडे जातो तर दूसरा आत 'कार्झोक'ला. ७ वाजायच्या आत 'कार्झोक' म्हणजेच त्सो-मोरिरीच्या काठाला असणाऱ्या गावात आम्हाला पोचायचे होते. अजून सुद्धा चक्क ६० किमी अंतर बाकी होते. पाहिले २५ किमी.चा रस्ता चांगला आहे पण नंतरचा कच्चा आहे असे तेनसिंग बोलला होता. 'अब थोडा संभालके बैठो. मै गाडी भगाने वाला हू. अँधेरा होने से पाहिले हमें कार्झोक पहुचना होगा. नहीं तो एंट्री नहीं मिलेगी' असे बोलून त्याने गाडी सुसाट मध्ये घेतली.चांगला रस्ता कमीतकमी वेळेत त्याला पार करायचा होता. तेनसिंगची बडबड सुरूच होती, 'इस ढलान से निचे जायेंगे तो कैमेरा तयार रखना. त्सो-मोरिरी दिखने वाला है आपको पहिली बार. आप फोटो तो निकालेंगे ही. लेकिन ज्यादा टाइम नहीं है अपने पास.' आता आम्ही कैमरे सरसावून बसलो ते त्सो-मोरिरी च्या पहिल्या दर्शनासाठी. आणि पाहतो तर काय ................
निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांची रेखीव अशी
मांडणी. काही हिमाच्छादित तर काही रांगडे. उघडे-बोडके असले तरी आगळेच असे
सौंदर्य. मावळतीच्या उन्हाची एक चादर त्यावर पसरली होती. डोळेभरून ते दृश्य पाहून घेतल्यावर पुढे निघालो. आता पुढे तर संपूर्ण कच्चा रस्ता होता. माती
आणि भुसभुशीत वाळू. वाळूचे एक मोठेच्या मोठे पठारच. एकामागुन एक वेगवेगळे
डोंगर, रस्ते बघत आम्ही जगावेगळे अनुभव घेत होतो. त्सो-मोरिरीच्या वरती
डाव्या बाजूला दुरवर आता एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र ढगाने स्वतःचे अस्तित्व
बनवले होते. एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या ब्रशने आकाशात एक चित्र निर्माण
करावे असा तो पसरला होता.
आम्ही जस जसे पुढे जात होतो तसतसे त्या ढगचे रंग बदलत होते. मावळती बरोबर आता सूर्य सुद्धा त्यात स्वतःचा लालसर रंग भरत होता. काही क्षणात पचिमेकड़े कडा पूर्ण लालसर झाली आणि त्याचे प्रतिबिंब त्सो-मोरिरीमध्ये चमकू लागले. ढगाने आणि पाण्याने स्वतःचे आधीचे रंग बदलत नवे रंग धारण केले. निसर्गाचा तो खेळ बघत बघत आम्ही त्सो-मोरिरी च्या अगदी काठावर पोचलो.
पुढे गेलेले बायकर्स सुद्धा इकडेच भेटले आम्हाला. आता त्सो-मोरिरीला
शेवटचा वळसा मारत आम्ही 'कार्झोक'कडे निघालो. त्सो-मोरिरी म्हणजेच कार्झोक १५०७५ फुट उंचीवर
आहे. बरोबर ६:५० ला आम्ही कार्झोक चेक पोस्टला एंट्री केली आणि रहायच्या
जागेच्या शोधात निघालो. इकडे राहण्यासाठी टेंट्स आहेत हे आम्हाला माहीत
होते पण ते ३५००/- (डबल बेड) इतके महाग असतील हे नव्हते माहीत. याचे कारण
असे की या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये भारतियाँचे प्रमाण अत्यल्प आहे. येथे
सर्व फिरंगी येतात. पुढे कार्झोक गावात स्वस्तात 'होम स्टे' मिळेल असे
त्याने आम्हाला सांगितले. पुढे बघतो तर काय... इतक्या आत आडवाटेला १०००
च्या आसपास लोकवस्ती असलेले
गाव असेल असे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते.
ते सुद्धा स्वतःची बाजारपेठ असलेले. पुढे कार्झोक गावात 'मेंटोक' म्हणुन छोटेसे १ मजली 'गेस्ट हॉउस' सापडले. अवघ्या ४००/- एक खोली. जेवायला सुद्धा बनवून देऊ असे म्हणाले पण शमिका आज जेवण बनवायच्या मुड मध्ये होती. 'तुम्ही फ़क्त सामान दया. आम्ही घेऊ बनवून' असे बोलली. तिला मदत करायला पूनम सुद्धा किचन मध्ये शिरली. बाकी मी, अभी, उमेश, आशिष फोटो ट्रांसफरच्या कामाला लागलो होतो. तर दमलेल्या ऐश्वर्या आणि साधना कधीच झोपी गेल्या होत्या. जेवणाआधी मस्त पैकी चहा-कॉफी झाल्याने सर्वच ताजेतवाने झाले. रात्री १० च्या आसपास शमिका आणि पूनमने बनवलेले चविष्ट जेवण जेवून आम्ही सर्व निद्राधीन झालो. संध्याकाळी त्सो-मोरिरीच्या नितांत सुंदर दर्शनाने पेंगोंगच्या वेळचे दुख्ख थोडे कमी झाले होते. तिकडे नं देता आलेली वेळ इकडे थोड़ी भरून निघाली होती. परतीच्या प्रवासाचा पाहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उदया लक्ष्य होते काश्मिरला अलविदा करत पांगमार्गे 'सरचू' गाठायचे...
पुढील भाग : त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १३ - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !
पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावर कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावर चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो.
पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करायला लागल्यावर शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच बाजूने नेली आणि........................
सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.
त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता. आता लवकरात लवकर त्सो-कार मार्गे पांग गाठणे महत्वाचे होते कारण तिकडून पुढे आम्ही दुसरी गाडी केली होती. तेनसिंगला पुन्हा आज लेहला पोचायचे असल्याने तो आम्हाला १२ च्या आत सोडणार होता. पुन्हा एकदा वाळूचे पठार पार करत पक्या रस्त्याला लागलो आणि वेगाने 'सुमधो'कडे निघालो. १० वाजून गेले तेंव्हा फाट्यापाशी आलो. इकडून डाव्या हाताने 'त्सो-कार'कडे निघालो. इकडून पुढचा रस्ता चांगला असेल असे वाटले होते पण नाही; पुढचा रस्ता परत कच्चा आणि वाळूचा. बाईकचा स्पीड देखील २५-३० च्या पुढे नेता येत नव्हता. अशात रस्ता मध्येच खाली-वर जायचा तर कधी अचानकपणे उजवी-डावीकडे. अश्यावेळी मागच्याला बाईक वरुन इतरून चालत यावे लागायचे तर कधी-कधी रायडरला सुद्धा बाईक ढकलत पुढे न्यावी लागायची.
११:३० च्या आसपास अचानकपणे एके ठिकाणी मला गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि मी-शमिका डाव्याबाजूला वाळूमध्ये धसकन पडलो. इतक्या सावकाश पडलो की कोणालाच काही लागले नाही पण कपड्यात सर्व ठिकाणी वाळू मात्र शिरली. गाडी चालवण्यात आजपर्यंत एकदा सुद्धा ब्रेक न घेतलेल्या अमेय साळवीने त्याची बाईक आता उमेशकडे दिली होती. मी पडल्यावर काही मिंनिट्समध्ये एका उजव्या चढावर उमेश आणि शोभीत सुद्धा वाळूमध्ये पडले. उमेशच्या हाताला आणि पोटाला मात्र थोड़ेसे लागले होते. सर्वजण तिकडेच थांबलो. ज़रा दम घेतला. 'बरेचदा अपघात परतीच्या प्रवासात होतात' हे मला पक्के ठावुक होते. त्यामुळे 'ह्या पुढे गाडी अजून नीट चालवा रे' असे सर्वांना सांगून आम्ही पुढे निघालो. निघून ५ मिं. होत नाहीत तो आदित्य-ऐश्वर्याने पुढचा नंबर लावला. कुठूनसा एक कुत्रा भुंकत आला आणि दचकून आदित्यचा तोलच गेला. त्सो-कारच्या त्या वाळवंटामध्ये अवघ्या १५ मिं मध्ये आम्ही एकामागुन एक असे आम्ही ३ बायकर्स धडपडलो होतो. नशिबाने कोणालाही जास्त लागले नव्हते. गाड्या सुद्धा शाबूत होत्या. कधी एकदाचा हा कच्चा रस्ता संपतोय आणि पक्क्या रस्त्याला लागतोय असे आम्हाला झाले होते. १२ वाजत आले तसे दुरवर त्सो-कार दिसायला लागले.
सकाळी १ चहा घेउन निघलेलो आम्ही ह्या आशेवर होतो की किमान त्सो-कारला तरी काही खायला मिळेल. त्सो-कारला उजव्या बाजूने वळसा मारत पुढे निघालो. रस्ता ज़रा बरा होता म्हणुन सर्व बायकर्स वेगाने पुढे निघाले. मी मात्र फोटो घ्यायला ज़रा मागे थांबलो. काही वेळातच काळा कुळकुळीत असा नविनच बांधलेला पक्का डांबरी रस्ता सुरू झाला. 'अरे वा... चमत्कारच आहे ...' असे बोलून मी सुद्धा फटकन बाईकचा वेग वाढवत पुढच्यान्ना गाठले. अवघ्या १ किमी अंतरावर तो 'पक्का डांबरी रस्ता' संपला पण उजव्या बाजूला एक टेंट सदृश्य होटेल दिसले. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच....
बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता. बाईकवर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ीमध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.
ज्या शोर्टकटने तेनसिंग आम्हाला घेउन गेला त्या रस्त्यावरुन त्याची गाडी तर व्यवस्थित निघून गेली; आम्ही मात्र लटकलो. पुन्हा एकदा मागच्याला उतरवत तर कधी बाईक ढकलत वाळू खात-खात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. किमान १०-१२ किमी.चा फेरा नक्कीच वाचला होता. आता पक्का डांबरी रस्ता लागला. चला आता पुढे तरी नीट मस्तपैकी जाऊ ह्या कल्पनेने मन सुखावले. पण काही कल्पना किती क्षणभंगुर ठरतात नाही...!!!
२-३मिन. मध्ये तो सुखद रस्ता संपला आणि त्या पुढचा ३७ कि.मी.चा पांग पर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिशय भयानक अश्या परिस्थितिमध्ये आम्ही पार केला. पूर्ण रस्त्याचे काम सुरू होते. दुपारच्या त्या रणरणीत उन्हात चांगली किलोभर वाळू खात आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. कधी बाईक सांभाळत तर कधी ती वाळूवरुन कशीबशी न पड़ता सरकवत. एका मोठ्या पठारावरून तो कच्चा रस्ता जात होता. उजव्या आणि डाव्या बाजूने असंख्य छोटे-छोटे रस्ते येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्सनी बनवून ठेवले होते. ज्या जागेवरून ट्रक गेला असेल तिकडची वाळू दाबली गेली असल्याने त्याच जागेवरून आम्ही बाईक पुढे काढत होतो नाहीतर बाईक पूर्णवेळ ढकलतच न्यावी लागेल की काय असे वाटत होते. अखेर एके ठिकाणी आम्हाला उतरावेच लागले. बाईक्स जास्तीतजास्त पुढे नेउन पिलियन रायडरला आम्ही खाली उतरवले. मात्र कुलदीपने अमेय म्हात्रेला बरेच आधी उतरवले असल्याने तो जवळ-जवळ २५० मी. अंतर तरी चालून आला असेल. आल्यानंतर कुलदीपला शिव्या पडल्या हे काही वेगळे सांगायला नकोच... दुरवर रस्ता वर चढत चांगला होत जातोय असे दिसू लागले आणि आम्ही आमच्या बाईक्सचा वेग वाढवला. पांगच्या ४ किमी. आधी रस्ता पुन्हा एकदा पक्का होत घाट उतरु लागला. खाली दुरवर काही दुकानी आणि गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. आम्ही समजलो.. हुशश्श्श्....... आले एकदाचे पांग.
पांगला गाडी मधून पुढे गेलेले सर्व टीम मेंबर्स भेटले. हातात तसा जास्त वेळ नव्हता पण किमान चहा घेउन फ्रेश झालो. कुलदीप आणि अमेय साळवीच्या बाईक्सना सुद्धा भूका लागल्या होत्या, त्यांची भूक भागवली. उगाच आमच्या बाईक्स निषेध करू नयेत म्हणुन त्यांना सुद्धा थोड़े खायला दिले. थकलेल्या रायडर्स आणि पिलियन रायडर्सनी आपल्या जागा गाड़ीमध्ये बदलल्या आणि अर्ध्यातासात आम्ही तिकडून पुढे सटकलो. फोटो काढण्याची शुद्ध राहिली नव्हती. अजून सरचू बरेच लांब होते. अंधार पडायला अवघे ३ तास उरले होते. त्याआधी 'लाचूलुंग-ला' आणि 'नकी-ला' पार करणे आवश्यक होते. तासाभरात 'लाचूलुंग-ला' समोर उभा राहिला. फोटू-ला, खर्दुंग-ला, चांग-ला असे एक-सो-एक अनुभव पाठीशी असल्याने लाचूलुंग-लाच्या १६६१६ फुट उंचीला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तो पार करत आम्ही पुन्हा १००० भर फुट खाली उतरलो आणि लगेच 'नकी-ला' कडे मोर्चा वळवला. ६ वाजत आले होते आणि हवेत आता गारवा जाणवू लागला होता. नकी-ला च्या १५५४७ फुट उंचीवर पोचलो तेंव्हा इतकी थंडी वाढली की मी-शमिकाने बाईक थांबवून जाकेट्स अंगात चढवली. तिकडे मागे अमेयच्या बाईकवर बसलेल्या पूनमने पायात फ़क्त फ्लोटर्स घातल्याचे लक्ष्यात आले. ४ वाजता पांगला असताना ती गाडीमधून बाईकवर शिफ्ट झाली होती ते सुद्धा पायात सोक्स न घालता. आता थंडीने तिचे पाय गारठले होते. माझ्याकडे असलेले शमिकाचे एक्स्ट्रा सॉक्स तिला दिले तेंव्हा कुठे तिच्या जिवातजीव आला.
नकी-ला उतरु लागतो तसे २१ लूप्स समोर येतात. खाली-खाली उतरत जाणारा २१ वळणे असलेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. पांगच्या वाळवंटामधून इकडे आल्यावर तर हा रस्ता आम्हाला स्वर्गाहून सुंदर असा भासत होता. शिवाय रुक्ष, झाडे नसलेल्या प्रदेशाच्या जागी आता हिरवी झाडे दिसू लागली होती. २१ लूप्सचा रस्ता १५३०२ फुट उंचीवरून सुरू होत १३७८० फुट उंचीवर येउन संपतो. म्हणजेच अवघ्या ८-१० किमी मध्ये थेट १५०० फुट खाली. २१ लूप्स जिथे संपतात तिकडे 'ब्रांडी नाला' आहे. ह्याचे नाव ब्रांडी नाला का ते माहीत नाही पण २१ लूप्स उतरल्यावर बहुदा ब्रांडी सारखी झिंग चढत असावी. आम्हाला तरी मस्तच झिंग चढली होती. ब्रांडीची नाही तर किमान रायडिंगची तरी. इकडून सरचू २१ किमी. लांब आहे. नाल्यावरचा ब्रिज पार करून पुढे निघालो. अंधार पडत आला असल्याने आमचा वेग पुन्हा कमी झाला होता. शिवाय रस्ता सुद्धा बराच वळणा-वळणाचा होता. ७:३० वाजता आम्ही सरचू मध्ये प्रवेश केला. गाडी पुढे गेली होती आणि रहायची सोय गाडीच्या ड्रायव्हरनेच केली होती. तेंव्हा आम्हाला आता त्या अंधारात त्याला शोधणे भाग होते. सरचूवरुन सुद्धा जवळ-जवळ ८ किमी. पुढे आलो तरी कोणी भेटेना. हवेत चांगलीच थंडी वाढली होती. टेम्परेचर ९ डिग. झाले होते. अखेर आर्मी पोलिसांच्या सांगण्यावरुन सर्वांना तिकडच्या एका चेकपोस्टवर थांबवले आणि मी-अभिजित शोधाशोध करायला अजून पुढे निघालो. एका कैंपसाइटवर चौकशी करत असताना समोरून एक गाडी येताना दिसली. मी धावतच रस्त्यावर पोचलो आणि गाडीला हात केला. अंदाज बरोबर निघाला होता. उमेश ड्रायव्हरला घेउन आम्हाला शोधायला मागे आला होता. शेवटी ९ च्या आसपास सर्व साइटवर पोचलो. रात्रीच्या जेवणावर आजचे एक-सो-एक किस्से एकमेकांना सांगत, ऐकवत वेळ भुर्रकन निघून गेला.
आज खरच भन्नाट दिवस होता. जरी गेल्या २ दिवसात आम्ही लेहवरुन निघून 'त्सो-कार'मार्गे सरचूला आल्याने 'तांगलांग-ला' (जगातील सर्वोच्च द्वितीय उंचीचा पास - उंची १७५८२ फुट) आम्ही स्किप केला तरी सुद्धा 'त्सो-कार - पांगचा रुक्ष वाळवंटी प्रदेश' आणि मग 'नकी-ला, २१ लूप्स - सरचूचा हिरवागार प्रदेशात बाईक चालवायला मज्जा तर आलीच होती त्याशिवाय सर्वांच्याच कणखर मनोवृत्तीचा कस लागला होता. उद्याची आखणी करून आम्ही सर्व झोपी गेलो. उद्याचे लक्ष्य होते 'बारालाच्छा-ला' आणि 'रोहतांग पास' करत मनाली ... अर्थात काश्मिरला टाटा करत हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश..........
पुढील भाग : रोहतांगचा चिखल सारा ... !
उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १४ - रोहतांगचा चिखल सारा ... !
लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला. बराच वेळ होता म्हणुन आसपासचे फोटो काढत बसलो. रात्री इकडे आल्याने कैंपसाइट नेमकी कशी आहे ते सकाळी कळले.
रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार गालिच्यावर डोंगरांच्या पाय्थ्याला असणाऱ्या या साइटचे सौंदर्य काही वेगळेच होते. दुरवर बारालाच्छा-लाचे पर्वत दिसत होते. पहाटे-पहाटे त्या पर्वतांवर जमलेल्या ढगांमुळे मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली. काही वेळात त्याच दिशेला आम्हास कुच व्हायचे होते. आमची पेटपूजा आणि सर्वांच्या बाईक्सची पेट्रोलपूजा झाल्यावर आम्ही बारालाच्छा-लाच्या दिशेने निघालो. एव्हाना सर्वजण आटपून निघायला तयार झाले होते.
सरचूवरुन पुढे निघालो तेंव्हा ७:३० होउन गेले होते. ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पुढे रोहतांग जवळ पाउस नक्की आपल्याला गाठणार तेंव्हा आत्ता जास्तीतजास्त अंतर कमीतकमी वेळात पार करायला हवे होते. बारालाच्छा-ला पार करताना १३२८९ फुट उंचीचा फार त्रास झाला नाही. तासाभरात तो पार करून 'झिंग-झिंग बार' या ठिकाणी आम्ही पोचलो. 'झिंग-झिंग बार' म्हणजे खादाडीचे ठिकाण. एक छोटेसे पण मस्तसे टुमदार टेंट होटेल आहे इकडे. तिकडे नाश्ता घेतला.
एक जोडपे हे होटेल चालवते. त्यांच्या मुलाने म्हणजे समीरने आम्हाला
त्याची छोटी सायकल चालवून दाखवली. वेळ मस्त गेला तिकडे. पण उशीर सुद्धा
झाला. ड्रायव्हरसाठी हे सर्व नेहमीचेच होते तेंव्हा तो बोंबा मारत होता पण
आम्हाला मात्र हे सर्व नवीन आणि वेगळे होते ना. तिकडून निघायला जवळ-जवळ
९:३० होउन गेले. 'जिस्पा'च्या दिशेने पुढे निघालो तशी झटाझट उंची कमी होत
होती. 'दारचा'ला पोचलो आणि पावसाचे आगमन झाले. अगदी
भुरभूरत पडणारा पाउस. अंगाला न लगता भिजवणारा. जिस्पा मागे टाकत किलोंगच्या
दिशेने निघालो तसे पाउस वाढतोय हे लक्ष्यात आले. वळणा-वळणाच्या त्या
रस्त्याचा मनालीला गाडीमध्ये बसून त्रास व्हायला लागला होता तेंव्हा ती
पुन्हा अभीच्या मागे बाईकवर बसली आणि शोभित गाडीमध्ये आला. पावसामुळे
बायकर्स मागे पडले होते आणि आम्ही गाडीमधून वेगाने पुढे जात होतो. मध्ये
एके ठिकाणी 'स्पिती व्ह्याली' कडे जाण्याचा रूट दिसला.
ट्रेक्किंगसाठी हा एक पर्वणी असलेला भाग. किलोंगला पोचलो आणि बायकर्सची वाट
बघत थांबलो ज़रा. एक चहा घेतला आणि ज़रा मोकळे सुद्धा झालो.
पावसाने भलतीच गर्दी केली होती. मागुन एक-एक बायकर येताना दिसू लागले तसे आम्ही पुढे निघालो.
ह्या पुढचा संपूर्ण रस्ता म्हणजे स्वर्गाकडे जाणारा की काय असेच वाटत होते. डोंगरांची आणि झाडांची दाटी वाढली होती पण रस्त्याची रुंदी काही वाढत नव्हती... एका बाजूला पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला दरी. आपल्या माळशेज - ताम्हीणी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जसे हिरवेगार दृश्य दिसते तसे काहीसे दृश्य सगळीकडे दिसत होते. मधून-मधून एखादा धबधबा डोंगरातून डोके वर काढी. दुरवरच्या पर्वतांवर वृक्ष आता त्या कडयान्ना भीत नव्हते. कितीही उंच आणि सरळसोट कडा असला तरी त्याला न जुमानता ते सूचिपर्णी वृक्ष आकाशाला भिड़त होते. त्यांच्या पायथ्याला खाली दरीपर्यंत हिरवळीचे गालीचे पसरलेले होते. दरीमध्ये फुलांनी, छोट्या छोट्या घरान्नी आणि रस्त्यांनी नक्षीकाम केले होते.
आता आम्ही गोंधला, सिस्सू पार करत 'काकसर'कडे निघालो होतो. (बटालिकचे काकसर हे नव्हे. ते द्रास जवळ येते.) सिस्सू येता येता आम्ही घाटाच्या रस्त्याने पूर्ण खाली उतरत नदीकाठी आलो आणि ब्रिज पार करत दुसऱ्या बाजुला पुन्हा वर चढू लागलो. जेंव्हा बऱ्यापैकी उंचीवर गेलो तेंव्हा उजव्या हाताला एक भला मोठा धबधबा नजरेस पडला. फोटोमध्ये बघाल तर २ टप्प्यामध्ये पडणाऱ्या ह्या धबधबाचा १ टप्पा किमान ४००-५०० फुट होता. वरच्या ग्लेशिअर मधून निघून तो नदीसोबत पुढच्या प्रवासाला निघाला होता. ते दृश्य पाहण्यासाठी काही क्षण तिकडे थांबलोच. "चलो अभी. खाना भी खाना है आगे जाकर." ड्रायव्हरच्या वाक्याने भानावर आलो आणि पुढे निघालो. २ वाजत आले होते. पावसात भिजतभिजत सर्व 'काकसर'ला पोहोचलो आणि एक मस्त होटेल सापडले. तिकडचा हिमाचली टोपी आणि कोट घातलेला मालक 'चाचा' पण मस्त होता. गरमागरम रोटी आणि सोबत चण्याची भाजी. सोबत कसलीसी चटणी होती. नंतर डाळभात.
३ वाजता तिकडून पुढे निघालो. मनालीसाठी अजून ७० किमी अंतर जायचे होते आणि मध्ये उभा होता 'रोहतांग पास'. इकडे पडलेल्या धो-धो पावसाने आमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हा कोणालाच कल्पना नवहती. ड्रायव्हरला होती नक्कीच पण तो काही आधी आम्हाला तसे बोलला नाही. इकडून १४ किमी. 'रोहतांग टॉप' आणि पुढे ८ किमी उतरून पलिकडे 'मोहरी' हा बेस. बस ड्रायव्हर इतकेच सांगत होता. सकाळपासून बाईकवर असलेले भिडू आता गाडीत बसले आणि गाडीमधले बाईकवर. काकसरवरुन निघालो तेंव्हा समोर रोहतांग टॉपला असणारे पावसाळी ढग बरेच काही सांगून जात होते. निघाल्यावर अवघ्या मिनिटाभरात आत्ता पर्यंत पक्का असलेला रस्ता कच्चा झाला आणि सुरू झाला एक 'चिखलराडा' जो पुढचे २ तास सुरू होता.
संपूर्ण १४ किमीच्या चढणीवर एके ठिकाणी सुद्धा रस्ता चांगला राहिलेला नव्हता. मोठ्या मोठ्या वाहनांनी होत्या-नव्हत्या रस्त्याचे कल्याण करून ठेवले होते. हे एक-एक मोठे-मोठे खड्डे. त्या खद्यांमधून चिखल निघून रस्त्यावर छोटे-छोटे डोंगर बनले होते. झिप-झाप-झुप अशी वेडीवाकडी बाईक चालवत चिखलाने आणि पाण्याने खड्डे चुकवत आम्ही टॉपकडे निघालो होतो. चारचाकी गाडयान्ना काय मागुन वेगाने येत होर्न मारायला. बालान्स तर बाइकवर आम्हाला करावा लागतो ना. तरी बराचवेळ आमची गाडी मागुन आम्हाला कव्हर फायर देत होती. हे.. हे.. जसजसे वरवर जाऊ लागलो तशी वळणे अधिक शार्प होऊ लागली. ह्यात प्रॉब्लम असा होता की जाणाऱ्या-येणाऱ्या गाडयान्नी रस्त्यावरचा सर्व चिखल एका कोपऱ्यात येउन जमा केला होता. त्यातून बाईक वर चढवणे आता अजून कठीण झाले होते. जवळून टर्न मारावा तर बाईक टायरला तितकी ग्रिप मीळणे शक्य नव्हते. शिवाय वरुन पाउस सुरूच होता की. पडायची भीती जास्त होती. तेंव्हा गरज पडली की पुन्हा मागच्याला उतरवून बाईक वर चढ़वायची असे प्रकार सुरू झाले. गेले २ दिवस वाळवंटामध्ये अनुभव घेउन आता तो चिखलात राबवत होतो आम्ही.
अखेर तासा-दीडतासाने सर्वजण कुठे टेकत, कुठे थांबत पावसात भिजत रोहतांगटॉपला पोचले. आणि मग सुरू झाला उतरणीचा प्रवास. हलक्या वजनाचे अभी-मनाली आधीपासून पुढेच होते. अमेय साळवीची बाईक ज़रा बसकी आणि मोठ्या हँडलची असल्याने तो बराच आरामात येत होता. मी, कुलदीप आणि आदित्यमध्ये होतो. सर्वांच्या मानाने बहुदा कुलदीपला जाड टायरच्या यामाहाचा ग्रिपसाठी बराच फायदा झाला इकडे. उतरणे अधिक कठीण जाणवत होते. कोपऱ्यावरचा चिखल वाढला होता आणि त्यातून बाईक्स सरकू लागल्या होत्या. आता कितीही उशीर होत असला तरी घाई करायची नाही हे स्पष्ट तत्व होते. एकेठिकाणी मागुन येणाऱ्या ट्रकला पुढे जाऊ देण्यासाठी मी अगदीच बाजुला गेलो. आता वाटल पडलोच. नशिबाने वाचलो. दुसऱ्या एके ठिकाणी तर पुढच्या गाडीच्या इतक्या जवळ आलो की आता थांबावे लागणार स्पष्ट होते. पण पाय टेकायचे कुठे? दोन्ही बाजुला फुट-अर्धाफुट चिखल. ट्रकच्या टायरने बनलेल्या रूटवरुन बाईक हाकत होतो आम्ही. अखेर एके ठिकाणी उजवा पाय टेकलाच. टेकल्या-टेकल्या लागला सरकायला. परत उचलला आणि टेकवला. पण तो कसला राहतोय. सरकतोच आहे तो आपला. मनात आले आता पडलोच आपण पक्के चिखलात. पण नाही. कसाबसा काही सेकंद उभा राहिलो आणि लगेच बाईक त्या गाडीच्या पुढे टाकली. आता मागुन येणाऱ्या एका सुद्धा गाडीला मी पुढे जाऊ देत नव्हतो. बरोबर ना... रिस्क कोन ले? बऱ्यापैकी खाली आल्यावर चिखल कमी झाला. पाउस सुद्धा बंद झाला होता. २ तास त्यांने पक्की परीक्षा पहिली होती रायडिंगची.
ज़रा खाली 'मोहरी' दिसत होते आणि एकदम दुरवर बिआस नदीकाठचे मनाली शहर सुद्धा. बिआस नदी रोहतांग मधुनच उगम पवते. मोहरीला पोचलो, चहा घेतला आणि पुन्हा एकदा मोकळे झालो. फार वेळ नव्हता थांबायला. अजून मनाली गाठायला २ तास होते.इकडून पुढचा रस्ता एकदम मस्त होता. मख्खन के माफिक स्मूथ. संध्याकाळ होत आली होती तेंव्हा समोरून येणारे ट्राफिक सुद्धा फार नव्हते. गुलाबा (९३९७ फुट) - केठी - पालचन अशी गावे मागे टाकत आम्ही मनालीला जवळ करत होतो. इतक्यात पुढे रस्त्यावर ट्राफिक दिसले. ही..... लांब रांग. बघतोय तर एका ट्रकचा विली झाला होता. फोटो बघा म्हणजे कळेल मी काय बोलतोय ते.
भन्नाटच प्रकार होता हा. लोखंडी सळ्यान्नी ओव्हरलोड केलेला ट्रक सरळ-सरळ उभा झाला होता. नशीब त्या ड्रायव्हरचे डावी-उजवीकडे नाही कलंडला. सर्व बायकर्स इकडे येउन पोचलो त्या आधीच गाडी इकडे पोचली होती. आम्ही येउन पोचलो तसे जमलेले सर्व देशी -विदेशी पर्यटक आमचे इतर टीम मेंबर्स असे सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. त्या टाळ्या रोहतांगच्या यशस्वी रोहणासाठी होत्या. काहीवेळ खरेच मस्त वाटते आम्हाला. आता आम्ही त्या ट्राफिकमधून बाईक्स पुढपर्यंत काढल्या. ट्रकच्या बाजूने पुढे जायला वाट दिसली तिकडून बाइक्स एक-एक करून पुढे काढल्या. आमचे ५ मेंबर्स गाडीसकट मात्र मागे अडकले होते. पण म्हणुन आम्ही सुद्धा तिकडे थांबून न रहता पुढे जाउन बाकी व्यवस्था बघणे महत्वाचे होते. गरज पडलीच तर मनालीहून त्यांच्यासाठी दुसरी गाडी पाठवणे महत्वाचे होते. अंधार पड़ता-पड़ता भांग गाव पार करत मनालीमध्ये प्रवेश केला आणि नदीकाठचे होटेल बिआस गाठले. अडकलेल्या मेंबर्सचा अपडेट घ्यावा म्हणुन फोन केला तर ते सुद्धा तिकडून निघाले असे कळले. गाडी आली तेंव्हा ९ वाजले होते. सामन रूम्स मध्ये लावले आणि अंगावरचा चिखल राडा साफ़ करून 'चंद्रताल'ला जेवायला गेलो. ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती... झोपायला ११ वाजले. बिछान्यावर पडलो तेंव्हा मला आजची बाईक राईड राहून राहून आठवत होती. अगदी आत्ता सुद्धा तितकीच लक्ष्यात आहे... रोहतांगचा चिखलराडा पार करून आता आम्ही उदया बिआसच्या सोबतीने 'चंदिगढ़ मार्गे दिल्ली'साठी निघणार होतो...
पुढील भाग : बिआसच्या सोबतीने ... !
... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... !
ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील
मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा
पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते.
अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे
इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. 
आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???
माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही.
आज सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे... कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राड्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत. म्हणूनच जेंव्हा लडाखमधल्या ढग फुटीची बातमी मला समजली तेंव्हा हे सर्वकाही डोळ्यासमोर उभे राहिले.
या लेख मालिकेतून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की हे लिखाण तुम्हाला नक्कीच आवडले असेल. काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन...
२ वर्षापूर्वी आम्ही पार पडलेल्या लेह - लडाख ह्या आनंदमय सफारीचा हा व्हिडिओ वृतांत...
ह्या संपूर्ण मोहिमेचे शुटींग आणि पुढचे एडिटिंग वगैरे वगैरे आयबीन - लोकमतने केले होते.
एकूण रेकोर्डिंग ५ भागात...


















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.