प्रस्तावना
मनोरंजक प्रवासाचे वर्णन सर्वांनाच आवडते. शिवाय तो प्रवास जर जगातील सर्वात मोठ्या अंतराचा आणि सर्वात मोठ्या काळाचा असला तर त्याचे वर्णन रंजक वाटले नाही तरच आश्चर्य नव्हे काय? आणि मुख्य गंमत म्हणजे तो प्रवास अजूनही चालूच आहे... दोन लाख वर्षे पुरी झाल्यानंतर आणि सगळी पृथ्वी व्यापून टाकल्यानंतरही चालूच आहे! हा प्रवास आहे तुमचा, माझा, आपल्या सर्वांच्या पूर्वजांचा... आणि मानवी आठवणीपूर्वीच्या पूर्वजांचाही.
आपल्या सर्वांनाच कधी न कधी "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" प्रश्न सतावत असतात. मग त्यांची उत्तरे जो तो आपापल्या परीने धर्म, अध्यात्म, गुरू, वगैरे, वगैरेने शोधायचा प्रयत्न करतो. शास्त्रज्ञ म्हणजे माणसेच ना! त्यांनाही ह्या प्रश्नांनी सतावले नसते तरच नवल! त्यांनी अर्थातच शास्त्रीय पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न सुरू केला. शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे पण प्रयत्न अजून चालूच आहेत. मात्र आतापर्यंत हाताला जे लागले आहे ते स्तिमित करणारे आहे... मुख्य म्हणजे शास्त्रज्ञांचे हे प्रवासवर्णन केवळ समजूत, अंधश्रद्धा किंवा अंदाजावर अवलंबून नसून शास्त्रीय पुराव्यांवर आधारलेले खणखणीत नाणे आहे. शिवाय जसजसे नवीन पुरावे हाती येत आहेत तसतसे त्यांच्या आधारे हे प्रवासवर्णन बदलून ते अधिक विश्वासू आणि सत्याच्या अधिक जवळ आणण्यास शास्त्रज्ञांची अजिबात ना नाही. आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांत गेल्या एक दोन दशकांत जनुकशास्त्रातील आणि कार्बन डेटिंग तंत्रातील क्रांतिकारी संशोधनाने जी प्रचंड भर घातली आहे ती केवळ अतुलनीय आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाणारी जनुके खोटे बोलू शकत नाहीत तसेच अणूंमधून होणारा किरणोत्सर्ग फसवाफसवी करत नाही! त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये मानवाच्या अतिप्राचीन जगप्रवासातील अनेक सत्ये खात्रीलायकरीत्या उघड झाली आहेत. त्यामुळे आता "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? " या प्रश्नांची अधिकाधिक खात्रीलायक उत्तरे सापडत आहेत. मग काय? चलणार ना या जगातल्या सर्वात महान प्रवासाचे पुनरवलोकन करायला आणि स्वतःच्या मनातील प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे शोधायला?
आधुनिक मानवाचा प्रवास सुरू झाला साधारण दोन लाख वर्षांपूर्वी. पण हा प्रवास करणार्या व्यक्ती या पृथ्वीवरचे सर्वप्रथम प्रवासी होते काय? छे, छे, अजिबात नाही! त्यांच्या काही कोटी वर्षे अगोदर त्यांच्या पूर्वजांनी आपल्या मूळ स्थानावरून अनेक दशसहस्त्र किमी पर्यंत प्रवास केलेला होता. त्यामुळे आपला मुख्य प्रवास जरी दोन लाख वर्षांचा असला तरी त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आपल्याला अजून बरेच मागे जावे लागेल...
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील बरेचसे भूभाग (आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, इ.) एकमेकाला जोडलेले होते. त्या वेळेस प्लेसियाडापीस (Plesiadapis) या प्रजातीचे प्राणी आताच्या अमेरिकन खंडाच्या भूमीवर अस्तित्वात होते आणि पुढच्या काळात ते आशिया व आफ्रिकाभर पसरले.
आफ्रिकेमध्ये साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी प्लेसियाडापीसपासून प्रायमेट (Primates) या प्रजातीच्या अनेक प्राण्यांची उत्क्रांती झाली. या प्रजातीत अगदी Madame Berthe's mouse lemur नावाच्या केवळ ३० ग्रॅम वजन असणार्या छोट्या प्राण्यापासून ते २०० किलो वजन असणार्या गोरीलासारख्या मोठ्या प्राण्यापर्यंत अनेक प्राण्यांची गणना होते.
ही आहेत आता सद्या आस्तिवात असलेल्या काही आधुनिक प्रायमेट प्राण्यांची चित्रे (जालावरून साभार)...
वरील प्राण्यांबरोबरच प्रायमेट प्रजातीत एक खास शाखा विकसित झाली. या शाखेतल्या मूळ पूर्वज प्राण्यांतून ८० लाख पूर्वी प्रथम गोरीला आणि ५० लाख वर्षांपूर्वी चिंपँझी वेगळे झाले... आणि त्या कालावधित मध्येच सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी अलग झालेल्या एका शाखेपासून आदिमानव व मानव प्रजाती उत्क्रांत झाल्या. थोडक्यात म्हणजे "माकडापासून मानव उत्क्रांत झाला नाही" तर “आदिमानव, मानव आणि महामाकडे या प्रजाती एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाल्या आहेत." त्यामुळे आधुनिक मानवाच्या सर्वात जवळची प्राणीशाखा असलेल्या चिंपँझी आणि मानवाच्या जनुकांत ९८.४% साम्य आहे असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का?! किंवा वेगळ्या प्रकारे म्हणायचे तर चिंपँझी आणि माणसात जे प्रचंड फरक आहेत ते ७० लाख वर्षांच्या कालावधीत स्वतंत्रपणे विकसित झालेल्या फक्त १.६% जनुकीय सामग्रीत साठवलेले आहेत!
अतीअतीप्राचीन प्रायमेट प्रजातीपासून उत्क्रांत होत आता अस्तित्वात असलेले मानवाच्या जवळपास येणारे प्राणी, आदिमानव आणि आधुनिक मानव कसे उत्क्रांत झाले हे दाखविणारा आराखडा (जालावरून साभार)...

असो, सुरुवातीलाच जनुकशास्त्राच्या गुंतागुंतीत जास्त न घुसता (पुढच्या भागांत योग्य ठिकाणी ते विस्ताराने येणे जास्त योग्य होईल) सर्वांना अधिक रोचक वाटेल अश्या भागाकडे वळूया.
ज्यांचे आणि आपले पूर्वज एक होते हे शास्त्रीय पुराव्याने सिद्ध झालेल्या आदिमानवांची (आपल्या दूरच्या नातेवाईकांची) थोडी खबरबात घेतल्याशिवाय ह्या प्रवासाची पूर्वतयारी अपूर्ण राहील. ही आहे त्यांची तोंडओळख...
३५ लाख वर्षांपूर्वी: Australopithecus afarense : हे आदिमानव दोन पायांवर उभे राहू आणि चालू शकत होते. मात्र ते फक्त आफिकेतच राहिले आणि मुख्यतः: झाडांवर वस्ती करत असत.
२० लाख वर्षांपूर्वी: Paranthropus boisel: हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही. यांचे दात सद्याच्या मानवाच्या दातांपेक्षा चारपट मोठे होते आणि चावायला कठीण असणार्या वनस्पती खाण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे.
२० लाख वर्षांपूर्वी: Homo habilis: हे आधुनिक मानवाचे (म्हणजे आपले) बहुतेक सर्वात पहिले पूर्वज असावेत. यांच्यामध्ये हुशार असल्याची लक्षणे होती. हे हत्यारे बनवणारे पहिले आदिमानव होत. यांनी आपल्या आहारात प्राण्यांच्या मांसाचा प्रथम उपयोग सुरू केला. मात्र प्राण्याची शिकार करण्याची पात्रता त्यांच्यात नव्हती व हे मांस मृत प्राण्यांपासून मिळालेले (इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतून अथवा मेलेल्या प्राण्याचे) असे. हे आदिमानवही आफ्रिका सोडून बाहेर फिरायला गेले नाही.
१५ लाख वर्षांपूर्वी: Homo ergaster: यांचा मेंदू पूर्वीच्या आदिमानवांपेक्षा बराच मोठा होता. ह्यांची हत्यारे अधिक सुधारलेली होती आणि ते कसबी शिकारी होते. हे आपले पूर्वज असण्याची बरीच शक्यता आहे. हे आदिमानव प्रवासी होते. ते आशियात पसरले आणि त्यांना तेथे Homo erectus या शास्त्रीय नावाने ओळखले जाते.
५ लाख वर्षांपूर्वी: Homo heidelbergensis: हे आदिमानवही भटके होते आणि ५ लाख वर्षांपूर्वी ते युरोपमध्ये पसरले होते. त्यांचे हत्यारे बनवण्याचे व शिकारीचे कसब वाखाणण्याजोगे होते. हे आपले पूर्वज नक्की नाही पण नियांडरथाल (Neanderthal) या आदिमानवाचे हे पूर्वज असावे.
२ लाख वर्षांपूर्वी: Homo neanderthalensis: २ लाख ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच शेवटच्या हिमयुगापर्यंत हे आदिमानव युरोपचे सर्वेसर्वा होते. मात्र हिमयुगाच्या शेवटाला उष्ण होत गेलेल्या वातावरणामुळे आधुनिक मानवाने युरोपमध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आणि ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत हे आदिमानव जगातून नष्ट झाले. मात्र हे आधुनिक मानवाच्या काळात आस्तित्वात असलेले आदिमानव नक्की कोणत्या कारणाने नष्ट झाले हे खात्रीलायक रित्या अजून माहिती झालेले नाही.
अश्या या पार्श्वभूमीवर साधारण दोन लाख वर्षांपूर्वी पूर्वोत्तर आफ्रिकेच्या (आताच्या इथिओपिया-केनिया-तांझानिया या भागात) एका Homo Sapiens या प्राण्याच्या जमातीची निर्मिती झाली… हाच तो आधुनिक मानव. इतर सर्व Homo प्रजाती काळाच्या ओघात नामशेष होऊन गेल्या आहेत. या आपल्या शेवटी उरलेल्या एकुलत्या एका प्राणीजमातीचे (species) शास्त्रीय नाव आहे Homo sapiens sapiens.
आजच्या घडीचे सर्व मानव या एकाच Homo sapiens sapiens जमातीचे सभासद आहेत... मग ते कोणत्याही रंगाचे, बांध्याचे अथवा देशाचे रहिवासी असले तरीही.
हा Homo sapiens sapiens सुधारलेला, मोठ्या मेंदूमुळे हुशार, हत्यारे बनवण्यात वाकबगार, कुशल शिकारी आणि भटका प्राणी निघाला. पुढच्या भागापासून आपण त्याच्या भटकंतीच्या सुरस कथांची वर्णने वाचत त्याच्याबरोबर कल्पनेच्या भरार्या घेत भटकूया आणि त्याचबरोबरच "मी कोण आहे? कुठून आलो? कसा आलो? वगैरे, वगैरे" या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया.
मग काय, वाट कसली बघताय? करा सुरू प्रवासाची तयारी ! काय समजलात? हा चांगला दोन लाख वर्षांच्या मुदतीचा "पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" आहे, राजे !
(क्रमशः )
=====================================================================
महत्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
आपल्याला साधारणतः ५०००- ७००० वर्षांचा इतिहास ज्ञात आहे ( इसपू ३००० वर्षे ) ..
या कालावधी मधे एखाद्या जीवाची उत्क्रांती झाल्याचे आढळले आहे का ?
१. केवळ ५०००- ७००० वर्षांचा नव्हे तर आपण जो साडेसहा कोटी वर्षांचा इतिहास बघतो आहोत तो केवळ अंदाज (थिअरी) नसून शास्त्रीय (जनुकीय आणि कार्बन डेटींग) पुराव्यांनी सिद्ध झालेले सत्य आहे. त्या शास्त्रीय पद्धतींची आणि पुराव्यांची माहिती पुढे येईलच. या पद्धती वापरून एखादा प्राणी इतर दोन प्राण्यांच्या जमातीचा काही हजार, लाख अथवा कोटी वर्षापूर्वीचा पूर्वज होता की नाव्हता हे खात्रीलायकरित्या ठरवता येते.
२. प्राण्यांच्या उत्क्रांतीत ७००० वर्षे हा अत्यंत कमी काळ आहे. लेखातलेच उदाहरण पाहिले तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आस्तित्वात असलेल्य प्रायमेट्सच्या एका शाखेपासून गोरिलंचे पूर्वज ८० लाख वर्षांपूर्वी, आपले पूर्वज ७० लाख वर्षांपूर्वी आणि चिंपांझींचे पूर्वज ५० लाख वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यांनंतर आपल्या (मानवांच्या) शाखेतून वेगवेगळ्या जीवांची (स्पेसिज) उत्क्रांती व्हायला ३५ लाख, २० लाख, १५ लाख, ५ लाख आणि २ लाख वर्षे लागली आहेत. याचे कारण म्हणजे सर्वसाधारणपणे जोपर्यंत जनुकांचा संच खूप वेगळा झाल्यामुळे दोन प्राण्यांत संकर होऊ शकत नाही तोपर्यंत त्या प्राण्यांना वेगळ्या स्पेसिज मानले जाउ शकत नाही.
पूर्वतयारी - हवामान
आता जायचे नक्की झाल्यावर प्रवासाची पूर्वतयारी करणे आलेच. असल्या मोठ्या प्रवासासाठी खूप तयारी करायला लागते हे काय सांगायला नको. पण या खास सहलीची बरीचशी व्यवस्था मी तुमच्यासाठी अगोदरच केली आहे, तेव्हा निश्चिंत रहा. तरीसुद्धा सहलीची मजा पूर्णपणे उपभोगायला आपल्याला महत्त्वाच्या दोन गोष्टी नीट समजावून घेणे जरूरीचे आहे. त्या म्हणजे फिरायच्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज आणि आपल्याला योग्य वाटेवरून नेणारे मार्गदर्शक. तेव्हा त्यांची थोडी माहिती घेऊ या.
हवामान
सत्तर लाख वर्षांपूर्वी उत्तरपूर्व आफ्रिकेत प्रायमेट्समधली वेगळी झालेली एक शाखा काही जगावेगळे करेल अशी खास लक्षणे तिच्यात सुरुवातीला तरी दिसत नव्हती. हे प्राणी इतर प्रायमेट्स सारखेच त्यांच्या आयुष्याचा बहुतेक सर्व काळ उष्णप्रदेशिय वर्षारण्यांमधे झाडांवरच काढत होते. त्या काळी जंगलांत फिरत असणार्या श्वापदांच्या मानाने हे प्राणी अगदीच कमकुवत होते. त्यांच्याकडे अजस्त्र शरीर, टोकदार नखे अथवा तीक्ष्ण दात नव्हते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी झाडांच्या पर्णभारात लपून राहून आणि जरूर तेव्हा झाडांच्या फांद्यांवर इकडून तिकडे पळण्याच्या आपल्या चापल्ल्याच्या जोरावर त्या प्राण्यांनी पुढची जवळ जवळ ३५ लाख वर्षे काढली. या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते. या काळात या शाखेत अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या. आजूबाजूचा सतत (अर्थातच पृथ्वीवरील उत्क्रांतीच्या भाषेत सतत याचा अर्थ काही हजार अथवा काही लाख वर्षांच्या मुदतीत असा आहे) बदलणार्या वातावरणाचा आणि इतर परिस्थितीचा परिणाम होऊन त्यातल्या अनेक नामशेष झाल्या तर काही थोड्याच कश्याबश्या तग धरून जिवंत राहिल्या आणि परिस्थिती सोईस्कर बनताच परत जोमाने वाढू लागल्या.
ही बदलणारी परिस्थिती म्हणजे फक्त आजूबाजूचे हवामान आणि प्राणी एवढीच नव्हती. कारण अशी परिस्थिती फक्त एका प्राण्याच्या अथवा प्राणी समुदायाच्या जीवनावर प्रभाव पाडू शकेल. सर्व जमातीवर दीर्घकालीन प्रभाव पाडण्यास आजूबाजूची परिस्थिती सर्व जीवन एकतर उद्ध्वस्त किंवा सबळ होईल इतक्या प्रचंड प्रमाणात बदलली पाहिजे. असे दीर्घ परिणाम करण्याची ताकद मुख्यतः पृथ्वीवर काही ठरावीक कालखंडांनी येणार्या हिमयुगांत होती. हिमयुगांमुळे पृथ्वीवरच्या हवामानात झालेल्या दीर्घ आणि प्रचंड उलथापालथींनी दर काही लाख वर्षांनी पृथ्वीवरील प्राण्यांनी राहण्यास आणि वंशवृद्धी करण्यास योग्य अश्या जागा सतत बदलत राहिल्या.
गेल्या साठ कोटी वर्षांपासून, साधारणपणे दर वीस कोटी वर्षांनी, काही लक्ष / दशलक्ष वर्षांच्या कालावधीचे हिमयुग अवतरत होते आणि वनस्पती व प्राणी जीवनाची वाताहात करत होते. गेल्या २० लाख वर्षांत त्यांच्या वारंवारतेचे प्रमाण बरेच वाढले आहे आणि या कालावधीत ध्रुवीय बर्फाचे प्रमाण २० वेळा लक्षणीय प्रमाणात कमीजास्त झाले आहे. हिमयुगांमुळे अतिथंड होणारा पृथ्वीचा बराच मोठा भूभाग प्राण्यांच्या वस्तीला अयोग्य तर होत होताच पण ध्रुवीय प्रदेशांत समुद्रातले बरेचसे पाणी गोठून बर्फाच्या स्वरूपात अडकून पडल्याने समुद्रातील पाण्याची पातळी अगदी १००-१३० मीटरपर्यंत खाली जात होती आणि हिमयुग संपून परत वातावरण उष्ण झाले की तेवढीच वर येत होती. पाण्याची पातळी खाली गेली की उघड्या पडलेल्या समुद्रतळाने अनेक भूभाग एकमेकाला जोडले जात होते आणि त्यांना पायी अथवा कामचलाऊ होड्या वापरून पादाक्रांत करणे शक्य होत होते. तर पाण्याची पातळी वर गेली की दोन भूभागांत शे-दोनशे किलोमीटर अथवा जास्त दुरावा निर्माण होऊन त्यांचा लाखो वर्षे एकमेकापासून संबद्ध तुटत होता. हजारो-लाखो वर्षांमध्ये या वेगळ्या झालेल्या दोन भूभागांतील जीवांत संपूर्णपणे वेगळी जनुकीय सामग्री उत्क्रांत होत होती आणि त्यामुळे तेथील भूभाग, वातावरण व इतर परिस्थितीत तगून राहणार्याची पात्रता असणारे जीव शिल्लक राहत होते... ते न जमणारे नष्ट होत होते.
याशिवाय हिमयुगाने धृवप्रदेशांत गोठवून ठेवलेल्या पाण्याने तेथील भूमी बर्फाळ-निर्जन-निष्प्राण बनत होती. तर त्या बर्फरूपात अडकलेल्या पाण्यामुळे इतर ठिकाणी होणार्या पाण्याच्या आणि पर्यायाने पावसाच्या कमतरनेने तेथील विशाल वर्षारण्ये नष्ट होऊन तेथे भयानक वाळवंटे बनत होती. याच कारणाने ज्या उत्तर आफ्रिकेत एके काळी घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते आणि जिराफासारखे मोठे मोठे शाकाहारी प्राणी होते तेथे आज जगातले सर्वात मोठे रखरखीत सहारा वाळवंट आहे. तसेच आजच्या थंड प्रदेशीय ब्रिटिश बेटांवरही एका कालखंडात घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते व सद्या आफ्रिकेत असलेले प्राणी राहत होते तर दुसर्या एका कालखंडात बारा महिने बर्फाळ भूभाग आणि आता फक्त ध्रुवीय प्रदेशात दिसणारे रेनडियर, ध्रुवीय अस्वले यांच्यासारखे प्राणी राहत होते!
पृथ्वीच्या वातावरणावर आणि पर्यायाने जीवांवर प्रचंड परिणाम करणार्या दुसर्या महत्त्वाच्या घटना म्हणजे पृथ्वीच्या पोटातील आग बाहेरच्या वातावरणात ओकणारे ज्वालामुखींचे महाप्रचंड उद्रेक. हा प्रकार काही कोटी वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. अश्या उद्रेकामुळे वातावरणात उडालेल्या धूर आणि राखेने सूर्यकिरण शेकडो-हजारो वर्षांपर्यंत रोखून ठेवल्यामुळे हिमयुगाची सुरुवात झाली किंवा चालू असलेल्या हिमयुगाच्या कालखंडात आणि प्रखरतेत भर पडली असे अनेकदा झालेले आहे. सद्या तुलनेने थंड झालेल्या पृथ्वीवर असे प्रकार जरी कमी प्रमाणात होत असले तरी आईसलँड मधील Eyjafjallajökull ज्वालामुखीच्या सन २०१० मध्ये झालेल्या उद्रेकाने हवेत पसरलेल्या राखेने संपूर्ण युरोपभरची विमानसेवा जवळ जवळ दहा दिवस ठप्प केली होती, हे आठवत असेलच. पृथ्वीवर याच्या अनेकपटींनी जास्त हाहा:कार माजवू शकणारी सुप्त ज्वालामुखींची स्थाने अजूनही अस्तित्वात आहेत. पण दु:खात सुख इतकेच की असा उद्रेक काही हजार ते काही लाख वर्षांतून एकदाच होण्याची शक्यता आहे. पण तो जर झाला तर पृथ्वीवरचे जीवन उद्ध्वस्त करण्याची अथवा नाहीसे करण्याची त्याची क्षमता असू शकते !
अशा या बदलणार्या परिस्थितीला तोंड देण्यास प्रत्येक वनस्पतीला अथवा प्राण्याला कितपत जमते यावर ती जमात शिल्लक राहणार की नामशेष होणार हे ठरत होते. हवामानाच्या बदलांमध्ये टिकून राहण्यासाठी बहुतांश प्राण्यांना भूभागावरचे सहाय्यक हवामान जसजसे सरकत दुसरीकडे जाई तसतसे तिकडे स्थलांतरित होण्याशिवाय किंवा ते जमले नाही तर नष्ट होण्यापलीकडे काही उपाय नव्हता. बिचार्या वनस्पतींना तर स्थलांतराचा पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांतल्या नवीन वातावरणाला तोंड देण्याची क्षमता असणार्या कणखर वनस्पती शिल्लक राहत व इतर नष्ट होत होत्या.
जीवांच्या या होणार्या फरपटीचे मुख्य कारण म्हणजे हवामानाचा आणि इतर प्रतिकूल परिस्थितीचा प्रतिकार करणारी साधने स्वकृतीने बनवण्याएवढी पात्रता कोणत्याही जीवात वीस लाख वर्षांपूर्वीपर्यंत आलेली नव्हती. अशी पात्रता जेव्हा अगदी थोड्याफार प्रमाणात ज्याच्यात येऊ लागली तो Homo ergaster हा प्राणी १५ लाख वर्षांपूर्वी झाडांवरून खाली उतरून जमिनीवर इतर प्राण्यांशी स्पर्धा करत, त्यांना तोंड देत, आत्मविश्वासाने आपल्या दोन पायावर चालू लागला आणि नंतर आफ्रिका खंड सोडून पुढच्या काही लाख वर्षांत हळू हळू Homo erectus या नावाने आशियाभर पसरला. तशीच अजून एक Homo heidelbergensis या नावाचा प्राणी ५ लाख वर्षापूर्वीपर्यंत आफ्रिकेतून बाहेर पडून युरोपात पसरला आणि त्याच्यातूनच Homo neanderthalensis विकसीत झाला. Homo erectus ने आशियात जवळजवळ १० लाख वर्षे तर Homo heidelbergensis व Homo neanderthalensis या दोघांनी मिळून युरोपमध्ये जवळजवळ ५ लाख वर्षे निरंकुश सत्ता गाजवली.
हे सगळे होत असताना Homo प्रजातीतील एक शाखा आफ्रिकेतच विकसित होत होती. या प्राण्याचा विकास आणि पृथ्वीचे वातावरण व इतर परिस्थितीतील बदलांचे या प्राण्यावर झालेले परिणाम, तसेच त्याने केलेल्या उलाढाली व प्रवास; या सगळ्यात आपण पुढच्या काही भागांत खूप बारकाव्यांसकट सामील होणार आहोत.
पण त्याआधी आपण आपल्या प्रवासाच्या प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या भरवशावर प्रवास करायचा त्या वाटाड्यांच्या कर्तबगारीची आणि कामाच्या पद्धतीची माहिती मिळाल्याशिवाय आणि त्यांनी दिलेल्या माहितीची विश्वासार्हता पटल्याशिवाय आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे आणि पुरेपूर अनुभवता येणार नाही.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
35 लाख ते 70 लाख वर्षांपूर्वी जगाचा नकाशा नेमका कसा होता? खंड अलग झालेले होते का, का काही एकमेकांना जोडलेलेच होते?
ती चित्रे (जालावरून साभार) अशी आहेत...
.
.
.
या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.
हे तुम्ही उदधृत केलेले वाक्य सुरुवातीच्या काळातल्या (७० लाख ते ३५ लाख वर्षांपुर्वींच्या) आदिमानवांबद्दल लिहीलेले आहे. आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांप्रमाणे २० लाख वर्षांपूर्वी Homo habilis ने प्रथम मांस खाण्यास सुरुवात केली पण तो स्वतः शिकार करत नव्हता... स्कॅव्हेंजर होता हा उल्लेख पहिल्या भागात आला आहेच.
प्राचीन प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या सापडलेल्या दातांच्या रचनेवरून व दातांना चिकटलेल्या अन्नकणांच्या पृथक्करणातून खात्रीने ठरवल्या जातात (ह्या पद्धतीची तोंडओळख पुढच्या तिसर्या भागात येत आहे). त्याशिवाय जबड्याच्या रचनेवरून आणि जबड्यांच्या स्नायूंच्यामूळे जबड्यांच्या हाडांवर झाल्या असलेल्या खुणांवरूनही प्राण्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल अंदाज बांधला जातो.
हल्लीच एप्स झाडांच्या फांद्या तोडुन त्याचं एक टोक चावुन
भाल्यासारखं टोकदार करुन छोट्या प्राण्यांची शिकार करुन खातात अशी एक
डॉक्युमेंटरी पाहीली.
१. साधने बनवणे हे केवळ मानवाचे राखीव कौशल्य नाही तर ज्यांना ग्रेट एप्स असे संबोधले जाते ते गोरिला आणि विशेषतः चिंपांझी प्राथमिक प्रकारची साधने बनवतात. पण ते अजून तरी या प्राथमीक अवस्थेतच अडकलेले आहेत. या विषयावर बरेच संशोधन चालू आहे. काही इतर प्राणी आणि पक्षांमध्येही काड्या वापरून कीटकांना झाडाच्या सालीतून अथवा त्यांच्या वारूळातून बाहेर काढून गट्टम करण्याची कृती दिसून येते. कच्चा माल वापरून अधिकाधीक सुधारलेली साधने बनवणे आणि ती प्रथा पुर्वांपार चालवत अत्यंत प्रगत अवस्थेला नेणे हे आतापर्यंत फक्त आधुनीक मानवालाच (Homo sapiens sapiens) जमले आहे.
२. आजची काही माकडे मांस खातात म्हणून सरसकट सर्वच आदिमानव मांस खात असणार असे निदान काढता येत नाही. मानवाच्या जवळपास येणार्या ग्रेट एप्सपैकी गोरिला किटक खाणे सोडले तर शाकाहारी आहे; तर चिंपांझी बराचसा शाकाहारी आणि थोडासा मांसाहारी आहे.
अवांतरः माणसाच्या मांसाहारी बनण्याबद्दलची एक थियरी अशी आहे: आदिमानव झाडावरून खाली उतरला ते दलदलीत वाढणार्या वनस्पतीचे रसदार कोवळे कोंब आणि देठ खाण्यासाठी. दलदलीत वावरण्यासाठी त्याला दोन पायावर उभे राहणे भाग पडले. वनस्पतींबरोबर दलदलीतल्या पाण्यात सापडणारे मासे त्याचे खाद्य झाले. हा काळ माणसाच्या मेंदूची झपाट्याने वाढ होण्याचा होता... या वाढीत जनुकीय बदलाचा किती भाग होता आणि सामिष खाद्याचा त्याला किती हातभार लागला याबद्दल दुमत आहे... मात्र या दोन्ही गोष्टींचा माणसाच्या उत्क्रांतीला फार मोठा हातभार लागला हे नक्की.
साधने वापरण्यावरुन एकदमच आठवलं, असं ऐकलंय की अस्वलं देखील काड्या
वापरुन झाडाच्या ढोलीतले वगैरे किटक खातात. तसेच फांदी वापरुन उंचावरचं
पोळं पाडण्याचा प्रयत्न करतात. साधनं वापरण्याची ही प्राथमिक पायरी असावी.
आणि अस्वलं अजूनतरी त्यापलिकडं गेलेली नसावीत त्यामुळं उत्क्रांतीच्या
प्राथमिक पायरीवरच त्यांची वाढ खुंटली आहे असं म्हणावं का?
(उत्क्रांतीवरुन आठवलं, किटकनाशकांशी सामना करण्याची झुरळांची शक्ती सर्वात
जास्त असते असं म्हणतात. एखाद्या किटकनाशकाच्या काही काळच्या वापरानंतर
झुरळांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये त्या किटकनाशकाशी लढण्याची जनुकिय
उत्क्रांती की कायसं होते म्हणे.)
२. मनुष्याच्या मांसाहारी (मिश्राहारी) असण्याबद्दल असा युक्तीवाद नेहमी ऐकला जातो की जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्या दातांची रचना सुळेविरहीत असते अन मनुष्याला मांसाहारी प्राण्यांप्रमाणे दातांची रचना लाभली आहे. त्याबद्दलही अधिक काही माहिती असेल तर लिहा की. :)
माणसाच्या मिश्राहारी असण्याबद्दल हे माझे मत आहे:
माणूस मुळात शाकाहारी प्राण्यापासून उत्क्रांत झाला आहे. तो नैसर्गीक मांसाहारी नसून ती त्याची उपार्जीत आवड (acquired taste) आहे. त्यामुळे माणसाकडे नैसर्गीक / उपजत शिकार करण्याचे अवयव म्हणजे तीक्ष्ण नखे, सुळेदार दात, प्राण्यांचे कच्च्या मांसाचे कातडीसकट लचके तोडून चावायची ताकद असणारा जबडा, इत्यादीपैकी एकही गोष्ट नाही.
पण या सर्व गोष्टींवर माणसाच्या मेंदूच्या ताकदीने मात केली... मेंदूचा उपयोग करून माणसाने प्राणी पकडण्यासाठी / त्यांची शिकार करण्यासाठी / त्यांचे मांस खाण्याजोगे बनवण्यासाठी साधने / हत्यारे बनवली आणि मांस (व इतर अन्न) शिजवण्यासाठी अग्निवर सुरक्षित ताबा (controlled fire) मिळवला... आणि उरलेला इतिहास आपण सर्व जाणतोच !
पूर्वतयारी - आपले मार्गदर्शक
मार्गदर्शक
या अगोदर सांगितलेले पृथ्वीच्या हवामानातले बदल, त्यांत होणारी जीवनाची वाटचाल (अथवा फरफट) आणि आधुनिक मानवाच्या सहलीचा मार्ग शास्त्रीय पुराव्यासकट आपल्याला दाखवणार्या काही खास मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. कारण त्यामुळे आपल्याला आपला प्रवास खरंच योग्य आणि विश्वासू मार्गाने चालला आहे याची खात्री पटेल आणि मग आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे लुटता येईल. यातला प्रत्येक मार्गदर्शकावर अनेक दशके संशोधन झाले आहे आणि शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. विस्तारभयास्तव येथे आपण त्यांची फक्त तोंडओळखच करून घेणार आहोत.
आपल्या सहलीचे मुख्य मार्गदर्शक खालीलप्रमाणे आहेत
१. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या निर्जीव खाणाखूणा
२. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म)
३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती
४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्या
प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी
जनुकशास्त्राची शाखा
५. वरील सगळ्या आणि इतर पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology)
या सहलीचे आणखीही बरेच छोटेमोठे मार्गदर्शक आहेत. पण या लेखमालिकेच्या व्याप्तीत ते सगळे बसवणे शक्य नाही. तरीसुद्धा आपल्या सहलीतील अनाकलनियता शक्य तेवढी काढून टाकून आणि शक्य तेवढ्या संशयाचे निराकरण करण्यासाठी वरच्या मुख्य मार्गदर्शकांची पुरेशी तोंडओळख करून घेणे जरूर आहे.
१. प्राचीन हवामानामुळे बनलेल्या आणि आजवर शाबूत राहिलेल्या खाणाखूणा
समुद्रात व भूमागावर जमत जाणार्या थरांमध्ये प्राचीन काळात तयार झालेल्या आणि नष्ट झालेल्या त्याकालच्या अनेक खाणाखूणा शिल्लक राहतात. उदाहरणार्थ एकमेकावर जमलेले वाळूचे थर दबून बनलेले वालुकाश्म आणि त्यांच्यात अडकलेले त्या त्या वेळेस जिवंत असलेले जीव अथवा मेलेल्या जिवांचे सांगाडे. तसेच ज्वालामुखींच्या उद्रेकांच्या वेळेस उडालेली आणि नंतर वालूकाश्मात अथवा जमिनीच्या थरांत गाडली गेलेली राख आणि इतर द्रव्ये. हे पुरावे अनेक कारणांनी जमिनीखालून बाहेर उघड होतात... उदाहरणार्थ, नदीच्या प्रवाहाने झालेली जमिनीची झीज, हिमनद्यांच्या प्रवाहाने खरवडले जाणारे जमीनीचे प्राचीन थर, उत्खननात किंवा अपघाताने सापडलेले प्राचीन अवशेष, इत्यादी.
हे सगळे पुरावे धृवीय प्रदेशांतल्या हजारो-लाखो वर्षे न वितळलेल्या बर्फातही सापडतात. ध्रुवीय बर्फाचे अनेक मीटर खोलपर्यंतचे नमुने (core samples) काढून त्यांची छाननी करण्याचे तंत्र फार विकसित झालेले आहे. या बर्फात अनेक दशलक्ष वर्षांपुर्वीचे पुरावे अगदी मूळ स्वरूपात बंद आहेत. हेच तत्व वापरून समुद्रतळाचेही नमुने मिळविले जातात. हे दोन्ही प्रकारचे नमुने--- त्यांच्यात प्राचीन काळची परिस्थिती न बदलता बंदिस्त असल्याने--- शास्त्रिय संशोधनात फार महत्वाचे आणि विश्वासू पुरावे ठरले आहेत.
२. प्राचीन प्राण्यांचे आजवर शाबूत राहिलेले अवशेष किंवा त्या अवशेषांचे ठसे (जीवाश्म)
ह्या मार्गदर्शकांची ओळख आपल्याला शाळेच्या पुस्तकात होते. परंतू हे शास्त्र आता इतके पुढे गेले आहे की १९९७ साली इथिओपियातील हेर्टो नावाच्या खेड्याजवळ सापडलेली एका लहान मुलाची कवटी काही शे चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या २०० तुकड्यांपासून पुनःनिर्मीत करण्यात आली. ती कवटी मानवी उत्क्रांतीच्या प्रवासाच्या संशोधनातला एक फार महत्वाचा पडाव ठरली आहे. या एकाच उदाहरणावरून या शात्राच्या वाढलेल्या आवक्याची पुरेशी कल्पना यावी
३. १ व २ क्रमांकांच्या मुद्द्यात मिळलेल्या सजीवांच्या अवशेषांचे अथवा निर्जीव खाणाखूणांचे विश्लेषण करण्याच्या पद्धती
यात अनेक आधुनिक शास्त्रांचा उपयोग केला जातो. या पद्धती आता इतक्या प्रगत झाल्या आहेत की लाखो-करोडो वर्षे जुन्या नमुन्याचे पृथक्करण करून त्याचे रासायनीक, जीवरासायनीक व आण्वीक गुणधर्म व वय (नमुना किती वर्षे जुना आहे) हे ठरवता येते. या प्रकारच्या काही महत्वाच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेतः
अ) प्राचीन जैवीक पुराव्यातील DNA चे पृथ़क्करण: या पद्ध्तीने तर प्राचीन जैवीक इतिहासाबद्दलचे ज्ञान "केवळ अंदाज / थिअरी" वरून एकदम पुढे आणून "विश्वासू पुरव्यांवर आधारलेला इतिहास" या पाहिरीपर्यंत पोहोचवले आहे.
याबबतीत माहिती येथे रोचक पद्धतीने दिलेली आहे.
ब) रेडिओमेट्रीक डेटींग : प्राचीन पुराव्याचे वय ठरवण्यासाठी या शास्त्राची मदत होते. पृथ्वीवर नैसर्गीकपणे बरीच किर्णोसर्गी मूलद्रव्ये अतीसुक्ष्म प्रमाणात आहेत. किर्णोसर्गामुळे रेणूंच्या अनेक घटकांचे उत्सर्जन होते आणि त्यांचे एका मूलद्रव्यातून दुसर्या मूलद्रव्यात परिवर्तन होते. ह्या प्रक्रियेचा वेग मोजून तो रेणू ज्या अवशेषापासून पासून मिळवला होता त्याचे वय ठरवता येते. यासाठी Uranium-lead, Samarium-neodymium, Potassium-argon, Rubidium-strontium, Uranium-thorium आणि Radiocarbon dating अशा अनेक पद्धती विकसीत केलेल्या आहेत. कोणता पदार्थ तपासायचा आहे आणि तो कोणत्या काळातला असावा यावरून कुठली पद्धत जास्त योग्य ते ठरवले जाते.
४. प्राचीन प्राण्यांपासून (यात मानवही आला) आज अस्तित्वात असणार्या प्राण्यांपर्यंत संक्रमित झालेल्या जनुकांतील दुव्यांचे विश्लेषण करणारी जनुकशास्त्राची शाखा
मानवाच्या इतिहासात मानवाच्या सहलीच्या मार्गांचे आणि वेळापत्रकाचे खणखणीत पुरावे जनुकशात्राने द्यायला सुरूवात केली आणि मानवाच्या इतिहासातील असंख्य रहस्ये विश्वसनिय पुराव्यांसह उघड झाली. मुख्य म्हणजे मानवी इतिहासातील असंख्य रुढीवादी आणि वंशवादाच्या खोट्या भाकडकथांवर रचलेली अनेक "तथाकथीत थियरींची" असत्ये जनुकशास्त्रीय पुराव्यांनी मोडीत काढली आहेत. अश्या या खास मार्गदर्शकाबद्दल थोडी सुगमशास्त्रीय माहिती घेतल्याने आपल्या बर्याच शंकांचे निराकरण होईल.
माणसाच्या शरीरात एकूण ५,००० ते १०,००० कोटी पेशी असतात.
(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)
माणसात तांबड्या रक्तपेशीचा अपवाद वगळता या सर्व पेशीत पेशीकेंद्र (Nucleus) असते आणि प्रत्येक पेशीच्या पेशीकेंद्रात गुणसूत्रांच्या (chromosomes) एकूण २३ जोड्या असतात.
(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)
गुणसुत्रे एकाच लांबच लांब DNA च्या अणूंनी बनलेली असतात आणि त्यांचा आकार एखाद्या लांब शिडीला पीळ दिल्यावर कसे दिसेल तसा असतो.
(चित्र जेनुग्राफिक प्रोजेक्टच्या सौजन्याने. Photo courtesy of The Genographic Project.)
गुणसूत्रांतील DNA च्या साखळ्यांध्ये माणसाच्या पेशींना काम करण्यास आवश्यक असणार्या प्रोतीन्सचे आणि इतर गुणधर्मांचे (कातडीचा रंग, डोळ्याचा रंग, इ.) आराखडे साठवणारे भाग असतात. त्यांना जनुके (gene) म्हणतात. माणसात २०,००० ते २५,००० जनुके असतात.
हजारो-लाखो वर्षांच्या कालावधीवर होणार्या बदलांना तोंड देण्यासाठी एक नैसर्गीक प्रकारे घडणारी एक घटना कामी आहे. ही घटना होते आहे म्हणूनच अगदी एकपेशीय अमिबापासून ते माणसाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाच्या कार्यात कोणताही बाह्य हस्तक्षेप न होऊनही पृथ्वीवरचे जीवन केवळ अबाधित राहिले एवढेच नव्हे तर अधिकाधिक प्रगत प्राण्यांत उत्क्रांत होत गेले आहे.
ती नैसर्गिक घटना म्हणजे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाताना प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकांत (DNA च्या रचनेत) कधीमधी होणारे छोटे छोटे बदल... याला शास्त्रीय भाषेत उत्परिवर्तन (mutation) म्हणतात. ही प्रक्रिया प्रजननासाठी बनविल्या जाणार्या पेशींच्या निर्मितीच्या वेळेस सहजपणे होते... तिचा आजूबाजूच्या वातावरणाशी काहीही प्रत्यक्ष संबद्ध नसतो. पण तिचा होणारा अप्रत्यक्ष परिणाम असा की; अश्याप्रकारच्या हजारो-लाखों घटनांमधल्या बहुतेक निरुपयोगी असतात तर काही शरीरीक दोषही निर्माण करतात; पण त्यातले एखादे उत्परिवर्तन नवीन पिढीमध्ये असा काही फरक घडवून आणते की त्यामुळे नविन पिढीला बदललेल्या परिस्थितीला तोंड देणे शक्य होते. त्यामुळे ती पिढी प्रतिकूल परिस्थितीत तगून राहते आणि योग्य परिस्थिती मिळाल्यावर वाढून वरचढ बनते. हे न घडलेल्या प्राण्यांच्या पिढ्या बदलास यशस्वी तोंड न देवू न शकल्याने नष्ट होतात. महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रक्रियेत केवळ प्राण्याच्या शारीरिक ताकदीला महत्व नसून त्याचा बदललेल्या परिस्थितीचा सामना करण्याच्या सर्वांगीण पात्रतेला महत्व आहे. आणि हीच गोष्ट डार्वीनच्या थियरीचा गाभा आहे.
आवांतरः याला अपवाद सुरू झाला Homo ergaster या प्रजातीपासून
ज्यांच्यापासून पुढे नैसर्गिक पद्धतीने होणार्या या घटनेच्यावरच केवळ
अवलंबून न राहता त्यात स्वतःच्या मेंदूच्या ताकदीची भर घालून साधने बनवायला
आणि निसर्गाला सक्रिय तोंड द्यायला सुरुवात केली. पण ही मेंदूची शक्तिही
Homo ergaster (आणि पुढच्या सगळ्या Homo ना) या नैसर्गीक घटनेद्वारेच
मिळालेली आहे !
या उत्परिवर्तनांचा अजून एक उपयोग आपल्याला झाला आहे. अशी अनेक उत्परिवर्तने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जात जात आता आस्तित्वात असणार्या पिढी पर्यंत पोहोचलेली आहे. यामुळे जर आपण जर आता आस्तित्वात असणार्या जागोजागच्या मानवांच्या जनुकांतली उत्परिवर्तने शोधून ती जगाच्या नकाश्यावर मांडली तर त्या उत्परिवर्तनांच्या प्रवासाचा मार्ग म्हणजेच मानवाच्या प्रवासाचा मार्ग रेखांकीत होईल. परंतू हे करण्यात एक फार मोठी समस्या होती. माणसाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांतील दर जोडीतले एक मातेकडून तर दुसरे पित्याकडून मिळते हे आपण सर्व जाणतोच. या गुणसूत्रांचे प्रदान होण्याचा काही हजार पिढ्यांचा हिशेब मांडला तर मग या सर्व गुणसूत्रांची इतकी सरमिसळ होते की शेवटच्या पिढीची जनुके कोठून कोठे कशी आली हे ठरवणे केवळ अशक्यच वाटते नाही का? पण त्यावरही शात्रज्ञांना उपाय सापडला आहे.
शात्रज्ञांनी जी शक्कल शोधून काढलीआहे, ती थोडक्यात अशी:
अ) पेशीकेंद्र सोडून पेशीत अजून एका ठिकाणी, मायटोकाँड्रीया मध्ये, जनुके असतात त्यांना mtDNA म्हणतात. मातेच्या अंड्याचा पित्याच्या शुक्राणूच्या डोक्याबरोबर संयोग होवून अंडे फलीत होते आणि त्या फलीत पेशीतून माणसाची निर्मिती होते, हे आपल्याला माहित आहेच. शुक्राणूंमध्ये फक्त पित्याची गुणसुत्रे असतात, मायटोकाँड्रीया नसतात. याचा अर्थ असा की mtDNA केवळ मातेकडूनच मुलांकडे जातात आणि त्यांतील फक्त मुलीच ते mtDNA पिढी दरपिढी संक्रमीत करू शकतात. याचा अर्थ असा की जर mtDNA वरची उत्परिवर्तने आपण रेखांकीत केली तर मागे जात जात आज जिवंत असणार्या मानवांच्या मूळ आईपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि तसेच करून शात्रज्ञ आजच्या सर्व मानवांच्या २ लाख वर्षांपूर्वी आस्तित्वात असणार्या केवळ एकाच आईपर्यंत पोहोचले आहेत !
ब) मानवाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांपैकी एक फार खास आहे, ती आहे लिंग ठरवणारी जोडी... यातील दोन गुणसूत्राना X आणि Y असे संबोधतात. पुरुषांमध्ये या जोडीत X आणि Y अशी गुणसूत्रे असतात तर स्त्रियांत X आणि X अशी असतात हे सर्वांना ठावूक आहेच. याचा अर्थ असा की Y गुणसूत्र पुरुषाकडून फक्त पुरूष मुलाकडे जाते... त्याची सरमिसळ होत नाही. त्यामुळे वरच्या सारखेच Y गुणसूत्रावरची उत्परिवर्तने रेखांकीत करत मागे जात जात आज जिवंत असणार्या मानवांच्या मूळ पित्यापर्यंत शास्त्रज्ञ पोचले आहेत..
क) स्टॅटिस्टीक्स वापरून या उत्परिवर्तनांचे कालमापन करून कोणते उत्परिवर्तन किती वर्षांपूर्वी झाले असावे हे ही ठरवता येते. त्यामूळे ते उत्परिवर्तन ज्याचात / जिच्यात झाले तो / ती माता / माता केव्हा आस्तित्वात होते हे ठरविले जाते.
हे तंत्रज्ञान वापरून आतापर्यंतच्या पुराव्यांवरून आज जिवंत असणारे जगातील सर्व मानव उत्तरपूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीत २ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.
सद्या एकूण १,५०,००० च्या वर उत्परिवर्तने वापरून हे नकाशावर माडणे चालू आहे. जर कोणाला त्याच्या पुर्वजांनी आताच्या जागेपर्यंत येईपर्यंत कसकसा प्रवास केला हे जाणून घ्यायचे असले तर https://genographic.nationalgeographic.com/ या संस्थळावर संपर्क साधून एक किट मागवून घ्यावे. त्याच्या सहाय्याने स्वतःच्या तोंडातील काही पेशी पाठवल्यास या प्रोजेक्टतर्फे त्या पेशीतील जनुकांचे विश्लेशण करून ती माहिती तुम्हाला दिली जाते. याशिवाय मानवशास्त्राच्या एका फार महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतल्याचे समाधान तुम्हाला मिळेल ते अलाहिदा.
५. वरील सगळ्या आणि इतर सर्व पुराव्यांची सांगड घालून विश्वासू शास्त्रीय निष्कर्षांपर्यंत पोहोचवणारे मानववंशशास्त्र (Anthropology)
माववंशशास्त्र हे आपण अगोदर ओळख करून घेतलेल्या सर्व आणि इतर काही पुरावे पुरवणार्या शास्त्रांची सांगड घालून त्यातून मानवाच्या भूतकाळाबद्दल एकसंध उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र आहे. त्यातली काही मह्त्वाची उपशास्त्रे खालील प्रमाणे आहेत.
अ) जनुकीय मानवंशशात्र (Genetic anthropology): याची आपण वर ओळख करून घेतली आहेच. निर्विवाद पुरावे देण्याच्या याच्या क्षमतेने आजच्या घडीला या शात्राने मानववंशशास्त्रातील मानचे पान पटकावले आहे.
ब) पुरातत्त्व मानववंशशास्त्र (Archaeological anthropology): प्राचीन मानवी अवशेषांचे पुरावे आणि जनुकीय पुरावे जर जुळून आले तर मग त्यापेक्षा अधिक विश्वसनीय काय असणार. शिवाय हे जुळणे हे दोन्ही शास्त्रे विश्वासार्ह मार्गावरून चालली आहेत याचा एक मोठा पुरावा असतो.
क) भाषिक मानववंशशास्त्र (Linguistic anthropology): भाषेला मानवी जीवनात आणि संस्कृतीत किती महत्वाचे स्थान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रवास करताना मानव आपली भाषा बरोबर घेऊन गेला आणि जपत राहिला. त्यामुळे आदिभाषेपासून निर्माण होणार्या भाषा आणि त्यांची आधुनिक भाषांपर्यंत झालेली वाटचाल आपल्याला मानवाचा प्रवासाचा अभ्यास करण्यास मदत करतात. आजच्या जगातले ४५% लोक ज्या भाषा बोलतात त्यांना "इंडो-युरोपिअन भाषा" असे म्हणतात. हे का? याचे उत्तर आपल्याला आपल्या प्रवासात मिळेलच !
आपल्या मार्गदर्शकांचा इतका पूर्वपरिचय झाल्यावर आता त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री पटायला हरकत नाही. त्यामुळे यापुढे प्रवासात जी काही आश्चर्यकारक माहिती मिळणार आहे तिची मजा नि:शंकपणे घेणेही सुकर होईल. तर कसा कंबर आणि पुढच्या भागापासून अनेक सहस्त्र किमी चा आणि २ लाख वर्षांच्या मुदतीचा प्रवास करायला तयार व्हा !
(क्रमशः )
=====================================================================
महत्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
काही मांडणी किंचित खटकली.
ती नैसर्गीक तजवीज म्हणजे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाताना प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकांत (DNA च्या रचनेत) कधीमधी होणारे छोटे छोटे बदल...
म्यूटेशन्स होणं ही सोय म्हणणं किंचित चुकीचं आहे. म्यूटेशन्स होतात, तेव्हा त्या डीएने कॉपी करण्याच्या 'चुका' असतात. या चुका टळाव्यात किंवा कमी व्हाव्यात याचीही यंत्रणा जननप्रक्रियेत असते. शेकडा नव्याण्णव वेळा या चुकांमुळे तयार होणाऱ्या प्राण्यात काही ना काही बिघाड असतो. अत्यंत विरळा बाबतीत झालेला बदल हा 'चांगला' ठरतो. त्यामुळे या चुकांना सोय म्हणणं ठीक वाटलं नाही. अर्थातच हा पेडॅंटिक मुद्दा आहे.
२ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.
मायटोकॉंड्रिअन इव्ह आणि वाय क्रोमोझोम ऍडम ही जोडी नव्हती. ती सर्वात
पहिली माणसं नसून सर्व मानवांचे सर्वात अलिकडचे पूर्वज होते. याचा अर्थ
त्याकाळी ते दोघेच होते असा घेतला जाऊ नये.
Mitochondrial Eve is estimated to have lived about 200,000 years ago.
Y-chromosomal Adam lived between 237,000 and 581,000 years ago.
तजवीज हा शब्द योग्य अर्थ सांगत नाही हे ध्यानात आणून दिल्या बद्दल धन्यवाद ! खरतर म्युटेशन ही नैसर्गीकरित्या घडणारी घटना आहे आणि तिचा निरुपयोगीपणा / चांगले / वाईट परिणाम यापैकी केवळ चांगल्या परिणामांवर उत्क्रांती मुख्यतः अवलंबून असल्याने कदाचित माझ्या लेखनात त्या गोष्टीला झुकते माप मिळाले. आता त्या परिच्छेदात योग्य ते बदल केले आहेत.
@ राजेश घासकडवी, शिल्पा ब आणि मन१: मी माझ्या लिखाणात "मायटोकॉंड्रिअन इव्ह" आणि "वाय क्रोमोसोम अॅडम" हे शब्द न वापरता मुद्दाम "एक पुरूष" आणि "एक स्त्री" हे शब्द वापरले आहेत.
कारण वाय क्रोमोसोम अॅडम आस्तित्वात असण्याच्या काळात (२३७,००० आणि ५८१,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात) मायटोकॉंड्रिअन इव्ह किंवा आधुनीक मानव आस्तित्वात नव्हता. म्हणजे "वाय क्रोमोसोम ऍडम" हा मानव नव्हता तर आदिमानव होता आणि आधुनिक मानवाचा पूर्वज होता.
मायटोकॉंड्रिअन इव्ह मात्र आधुनिक मानवाच्या उत्पत्तीच्या काळात आस्तित्वात होती. तिचा किंवा तिच्या मुलीचा "वाय क्रोमोसोम ऍडमच्या त्या स्त्रिला समकालीन असणार्या पुरुष वारसाशी" संबंध येउन आधुनिक मानव उत्क्रांत झाला हे मात्र नक्की, कारण आधुनिक मानवात या दोघांची जनुके आहेत.
अर्थात याचा असाही अर्थ नाही की त्या काळात हे दोनच मानवप्राणी (एक पुरुष व एक स्त्री) होते... (पुढच्या भागात याचा संदर्भ येईलच, पण इथे मुद्द स्पष्ट करण्यासाठी थोडेसे) २ लाख वर्षांपूर्वी साधारण दहा हजाराच्या आसपासच आधुनिक मानव शिल्लक उरले होते आणि त्यातील फक्त एका जोडीचीच संतत्ती आजच्या घडीला जिवंत आहे (कारण त्यांच्यात "मायटोकॉंड्रिअन इव्ह" आणि "वाय क्रोमोसोम ऍडम" या दोघांचे जीनपूल आहेत) ... इतर वारसरेखा निर्वंश झाल्या आहेत.
म्हणजेच, आजचे सर्व मानव २ लाख वर्षापुवी आस्तित्वात असणार्या एक पुरूष आणि एक स्त्री या जोडीपासूनच निर्माण झालेले आहेत.
मला
डी.एन.ए क्षेत्राबद्दल तसंही फार कुतुहल वाटतं. एका शरीरातील सर्व डीएनए
हॅड टु टेल जोडली तर पृथ्वी ते सूर्य अंतर ७० वेळा येणं-जाणं होईल इतकी
त्याची लांबी होते म्हणतात.
हे आश्चर्यकारक वाटत असेल तर अजून हे एक सत्य बघा:
माणसाच्या शरीरात एकूण ५,००० ते १०,००० कोटी पेशी असतात. तांबड्या रक्तपेशी सोडून इतर प्रत्येक पेशीत पेशिकेंद्र असते. प्रत्येक पेशिकेंद्रात त्या माणसाची इथंभूत माहिती (उंची, रंग, अवयव, इ.)तर असतेच पण त्याशिवाय अंडे फलित झाल्यापासून त्या एका पेशीपासून ५,००० ते १०,००० कोटी पेशींचा संपूर्ण माणूस कसा बनणार, कोणत्या पेशी कोणत्या अवयवात केव्हा रुपांतरीत होणार, तो वयात केव्हा येणार, म्हातारा केव्हा होणार, इत्यादी सर्वांच्या DNA च्या कोडाची आणि तो कोड प्रत्यक्षात आणण्याच्या जवळ जवळ ६० ते ८० वर्षे अथवा जास्त वेळाच्या वेळापत्रकाची एक कॉपी असते. एका पेशिची लांबी १ ते १०० मायक्रोमीटर असते आणि पेशिकेंद्राचा आकार पेशीच्या आकाराच्या १/१० ते १/१०० इतका लहान असतो.
इतक्या लहान जागेत इतकी माहिती साठवणारा आणि ती एवढ्या कालावधीवर ९९.९९% टक्के वेळा बरोबर एक्झीक्यूट करणारा संगणकीय कोड माणसाला कधीपर्यंत बनवता येईल?
डी एन ए मध्ये माणसाची इत्थंभूत माहिती असते असे तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून दिसते. समजा नुकतेच एक बाळ जन्मले आहे. त्याचा डीएनए आपल्याला अॅनलाईझ करून काय काय माहिती प्रेडिक्ट करता येऊ शकेल ?
एका DNA मध्ये ही सगळी माहिती नसते. पेशीकेंद्रात असणारे ४६ क्रोमोसोम्समध्ये (२३ जोड्या) प्रत्येकी एक DNA चा अणू असतो आणि त्यांत ही माहिती साठवलेली असते. लेखातल्या DNA च्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे DNA पिळलेल्या शिडिप्रमाणे असतात. आणखी एक चमत्कारपूर्ण माहिती म्हणजे या शिडीच्या दोन बांबूना फक्त चारच, हो चारच प्रकारच्या अमायनो आसिडचे रेणू एकत्र बांधून ठेवतात आणि त्यातही अडेनाईन फक्त थायमिनबरोबर आणि ग्वानीन फक्त सायटोसाईनबरोबर सांधा करू शकते म्हणजे या चार अमायनो अॅसिडसच्या दोनच पायाभूत जोड्या (बेस पेअर्स) शक्य असतात. पण एवढी कमी फ्लेक्सिबिलिटी वापरून निसर्गाने ३०० कोटी बेस पेअर्सच्या वेगवेगळ्या लंबीच्या आणि सिक्वेन्सच्या साखळ्या बनवल्या आहेत... अशा प्रत्येक साखळीत एक मानवी गुणधर्म (स्ट्रक्चर / फंक्शन) निर्माण करणार्या प्रोटीनचा कोड असतो... संगणकीय परिभाषेत '{' पासून '}' पर्यंतची इन्स्ट्रक्शन असे म्हणायला हरकत नाही ! एका क्रोमोसोममधल्या साखळ्या एकमेकाला जोडून असतात आणि त्या सगळ्या मिळून एका क्रोमोसोममधला एकच एक DNA चा अणू बनतो.
थोडक्यात (अमिनो आसिडस् --> बेस पेअर्स) --> डि एन ए --> जीन --> क्रोमोसोम --> (सगळे ४६ क्रोमोसोम मिळून) ह्युमन जिनोम अशी रचना आहे.
एक महाप्रचंड प्रोजेक्ट करून माणसाच्या सगळ्या जिनोमची रचना मॅप करून झाली आहे (हुश्य्श्य !!!) काही जीन्सचा रोगांशी असलेला संबद्ध फार पूर्वीपासून माहिती होताच. पण आता उरलेल्या प्रत्येक जीनच्या कोडाची आणि त्याच्या माणसातल्या कार्याची छाननी सुरू आहे. ह्यातून पुढे काहितरी प्रचंड क्रांतीकारक (बरे की वाईट जीनास ठावूक ;) ) बाहेर येणार हे नक्की.
आवांतर : याव्यतिरिक्त बाळाला मिळणारे DNA म्हणजे मायटोकाँड्रियल DNA, जे फक्त मातेकडूनच मिळतात आणी पेशीकेंद्रात नसून त्याच्या भोवतीच्या सायटोप्लाझममध्ये असतात हे आपण लेखात जाणून घेतले आहेच. मायटोकाँड्रिया म्हणजे पेशीतली उर्जा निर्माण करणारी जनित्रे (पॉवर जनरेटर) असतात. मायटोकाँड्रियल DNA चे अणू आकाराने पिळलेल्या शिडिसारखे नसून वर्तुळाकार असतात.
जनूकशास्त्रात जेवढे खोलात जावू तेवढे 'डोक्याचे लय भुस्काट' होते हे मात्र खरे ;)
बेसीक युनीट जीन, कारण एक जीन = एक प्रोटीन = एक 'स्ट्रक्चरल / फंक्शनल' गुणधर्म.
हे जीन सलगपणे एकमागे एक जोडून एक DNA चा अणू बनतो.
त्या एकाच अणूची गुंडाळी + थोडे प्रोटीन व RNA चे बायडिंग मिक्चर = क्रोमोसोम.
एका पेशीकेंद्रातल्या क्रोमोसोमच्या २३ जोड्या = जिनोम.
एक ह्युमन जिनोम = २० ते २५,००० जीन
समजा नुकतेच एक बाळ जन्मले आहे. त्याचा डीएनए आपल्याला अॅनलाईझ करून काय काय माहिती प्रेडिक्ट करता येऊ शकेल ?
त्याकरिता बाळाच्या जन्मापर्यंत वाट बघायची गरज नसते. बाळ आईच्या पोटात
एका पिशवित (amniotic sac) असलेल्या द्रवपदार्थात (Amniotic fluid) तरंगत
असते. या द्रवाचा थोडासा भाग सिरिंजने काढून त्यातील बाळाच्या पेशितील
पेशिकेंद्रांतून DNA मिळवून त्याची तपासणी करण्याचे तंत्र फार पूर्वी
विकसित झाले आहे. जर मातापित्यांमधे अगोदर निदान झालेले जनुकीय दोष असतील
आणि त्यांचे संक्रमण होऊन बाळामध्ये काही गंभीर आजार/दोष होण्याची शक्यता
असेल तर, ते बाळ आईच्या पोटात असतानाच अशी तपासणी करून त्याचे निदान करता
येते व त्यावर बाळास जन्म देणे हे योग्य की अयोग्य हे मातापित्याना ठरवता
येते.
हे करावे की नाही आणि केल्यास गर्भारपणाच्या कोणत्या काळात करावे याचे प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे आहेत.
आफ्रिकेतल्या सफरी आणि आफ्रिकेबाहेरचे पहिले पाऊल (२ लाख ते १३५,००० वर्षांपूर्वी)
जनुकशास्त्राने मानवाच्या उत्क्रांतीमधील अनेक जुन्या वंशवादी थियर्या केराच्या टोपलीत भिरकावून दिल्या आणि मानवाची उत्पत्ती २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये झाली असा सिद्धांत तर मांडला. पण जोपर्यंत त्याला त्या काळातल्या प्राचीन मानवी अवशेषाची साथ मिळत नव्हती तोपर्यंत सिद्धांत पूर्णपणे सिद्ध होऊन शास्त्रीय सत्य म्हणणे कठीण जात होते. विशेषतः अगोदरच प्रस्थापित झालेल्या काही सिद्धान्ताचे पुरस्कर्ते तरी ते मानणे कठीण होते. गंमत म्हणजे आफ्रिकेत उत्क्रांत होऊन आधुनिक मानवाच्या १०-१५ लाख वर्षे अगोदर जगभर पसरणार्या आदिमानवांचे अवशेष सापडत होते पण आधुनिक मानवाचे १ लाख वर्षांअगोदरचे शास्त्रीय कसोट्यांवर खात्रीलायकपणे खरे उतरणारे अवशेष मिळत नव्हते.
ही समस्या दूर केली इथिओपियातील ओमो किबिश नावाच्या ठिकाणावर मिळालेल्या आधुनिक मानवी अवशेषांनी. त्यांचे वय २ लाख वर्षे ठरवले गेले. नंतर इथिओपियामध्येच हेर्टो नावाच्या खेड्यात सापडलेल्या तीन मानवी कवट्यांच्या जीवाश्मांनी. Potassium-argon रेडिओ-डेटिंग पद्धतीने या जीवाश्माचे वय १५४,००० ते १६०,००० वर्षे ठरविले. हे सगळे आधुनिक मानवाचे सर्वात प्राचीन अवशेष. त्यामुळे त्यांना खास Homo sapiens idaltu ह्या सबस्पिसिजचा मान दिला गेला. यातले idaltu म्हणजे मराठीत "थोरले" ! नंतर त्यांच्या शेजारीच सन १९९७ मध्ये एका पाणघोड्याच्या कवटीचा जीवाश्म गोळा करताना एकूण दहा मानवी कवट्यांचे अवशेष, दगडी हत्यारे आणि काही प्राण्याचे अवशेष सापडले. शात्रज्ञांच्या दृष्टीने हे एक भांडारच होते. त्यातल्या एका मुलाच्या कवटीचे शेकडो चौरस मीटरवर विखुरलेले २०० पेक्षा जास्त भाग शास्त्रज्ञांनी परिश्रमाने गोळा केले आणि ते जोडून त्या कवटीची जुळवणी केली. जुळवणीनंतर असे दिसून आले की ती कवटी मुलाच्या मृत्यूनंतर साफ करून तिच्या तुटलेल्या कडा घासून गुळगुळीत बनवल्या होत्या आणि बहुतेक ती कोणत्यातरी समारंभात (worshipping ritual) वापरले जाणारे उपकरण असावे असे दिसत होते. यावरून या ठिकाणी आणि वेळेस माणूस केवळ अस्तित्वात नव्हता तर मानवी संस्कृती स्थापन होण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट होत होते. या सगळ्या पुराव्यांनी जनुकीय शास्त्राने मांडलेल्या सिद्धांतांना अवशेषांचे सबळ पुरावे मिळून त्यांचा निर्विवाद विश्वासूपणा सिद्ध झाला. मग मात्र विरोधकांनाही माघार घेऊन आपल्या संशोधनात जनुकशास्त्राचे आधुनिक हत्यार सामील करणे भागच पडले. यामुळे सर्व संशोधनात एकसूत्रीपणा आला आणि येथून पुढे जनुकशास्त्राला मानवी इतिहासाच्या संशोधनात अग्रगण्य स्थान मिळाले.

आवांतरः मानवी जीनोमवर चाललेल्या संशोधनाने भविष्यात शक्य
असलेल्या अनेक शतकोटी डॉलर्सच्या फायद्यावर डोळा ठेवून औषधे बनवणार्या
अनेक महाकंपन्याही हिरीरीने या संशोधनात उतरल्या आहेत. अर्थात यात जगावेगळे
अथवा बेकायदेशीर असे काही नाही. अशा संशोधनाचा फक्त मानवाचा इतिहास माहिती
करुन घेण्यापलीकडे सध्याचे मानवी जीवन सुधारण्यासाठीही उपयोग व्हावा ही
इच्छाही त्यामागे आहेच. मात्र सुरुवातीला त्यातील काही कंपन्यांनी मानवी
जीनोम (किंवा त्याचा भाग) पेटंट करण्याचा प्रयत्न केला. याला शह म्हणून या
क्षेत्रात कार्यरत असणार्या अनेक Not-for-Profit संस्थांनी स्वतःचे संशोधन
public platforms वर आणि जालावर सर्वांसाठी विनामूल्य खुले करण्यास
सुरुवात केली. काही बाबतीत कायद्याचे निर्णयही Not-for-Profit वाल्यांच्या
बाजूने लागले आहेत त्यामुळे आता पूर्णपणे माहीत झालेल्या मानवी जीनोमच्या
रचनेवर सर्व मानवजातीचा हक्क आहे. फक्त काही खास शोधपद्धती आणि जनुकिय
रोगावरच्या उपचारपद्धतीचे पेटंट घेता येते.
आता येथून पुढे हा आधुनिक मानव कुठे कुठे गेला याचा शोध जास्त जोमाने सुरू झाला. पण आपल्या मूळ जागेपासून जवळ जवळ ४०,००० वर्षे तो आपली जागा सोडून जाण्याच्या फंदात पडलेला दिसत नाही. त्याचे मुख्य कारण त्या काळी झालेला हिमयुगाचा कहर हे असावे... या काळाचे "मदर ऑफ आईस एजेस" असे केले जाते. त्याने मानवाला पूर्व आफ्रिकेत केवळ खिळवून ठेवले एवढेच नव्हे तर अनेक जणांचा बळी घेतल्याने आधीच मोजकी असलेली Homo sapiens sapiens ची संख्या १०,००० पर्यंत खाली आली होती. थोडक्यात आधुनिक मानव जवळ जवळ निर्वंशतेपर्यंत (near-extinction event) पोहोचला होता आणि कसाबसा तगून होता.
मात्र १६०,००० वर्षांपूर्वी हवामानात थोडी सुधारणा होऊ लागल्यावर त्यांच्यातल्या भटक्यांची चुळबूळ सुरू झाली. त्यांचे चार गट रिफ्ट व्हॅली सोडून बाहेर पडले. सुरुवातीला ह्या सगळ्यांची जीवनपद्धती जगण्यासाठी शिकार करणे आणि फळे व कंदमुळे गोळा करणे (hunter-gatherer) याभोवती गुंफलेली होती. नक्की कशामुळे हे मानव आपली मूळ जागा सोडून बाहेर पडले याचा फक्त अंदाजच बांधावा लागतो. बहुतेक जास्त आणि सहज शिकार मिळत असलेल्या भूमीच्या शोधात हे मूळ जागेपासून दूर जात जात हळू हळू सर्व आफ्रिकेत पसरले असावे.
हे मार्गक्रमण खालील चित्रात दाखवले आहे...

१. त्यांचा एक जथा दक्षिणेकडे जात जात केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. त्यांचे आताचे वारसदार म्हणजे आफ्रिकन पिग्मीज जे अजून hunter-gatherer आहेत आणि कालाहारी मधले Khoisan Bushmen, ज्यांच्यातले काही जण hunter-gatherer आहेत तर इतर गोपाल झाले आहेत.
२. दुसरा जथा दक्षिण-पश्चिमेस काँगोच्या नदीच्या खोर्यात पोहोचला. यांचे वंशज बांटू भाषा बोलतात. हे उत्तम शेतकरी बनले आणि यांनी सहाराच्या दक्षिणेकडील भागात लोखंडाचा वापर सर्वप्रथम सुरू केला. ते नंतर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वळले. त्यांनी सर्व आफ्रिकाभर बांटू भाषा आणि शेतीचा प्रसार केला.
३. तिसरा जथा पश्चिमेकडे जात जात आताच्या आयव्हरी कोस्ट पर्यंत पोहोचला आणि त्यांनी तेथे शेती सुरू केली. यांच्यातल्या काही उत्तरेकडे गेलेल्यांच्या वंशजांना आता बर्बर म्हणून ओळखले जाते. बर्बर पारंपरिक गोपालक आहेत.
४. चवथा जथा इथिओपियात जवळच थोडेसे उत्तरपूर्वेला गेला.
हवामान आणि अन्नाची उपलब्धता ही दोन कारणे सर्व प्राण्यांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरत आली आहेत. प्राचीन मानवही याला अपवाद नव्हता असेच दिसते. आफ्रिकेच्या उष्णप्रदेशीय गरम हवेला आणि तेथील वर्षारण्यांवर अवलंबून असलेल्या जीवनशैलीला सरावलेल्या मानवाला आफ्रिकेतच भरपूर शाकाहारी आणि मांसाहारी आहार उपलब्ध होता. त्याचबरोबर त्या वेळेस उत्तरेकडे असलेल्या हिमयुगीन अतिथंड हवेमुळे त्याला आफ्रिका सोडून जाणे योग्य वाटले नसावे किंवा तसे करण्याची निकडही भासली नसावी.
याचा अर्थ असा नाही की त्या काळात धाडसी धडपडे प्रवासी अजिबात नव्हते ! मात्र सहलीची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने त्यांनाही हवामानाच्या भरवशावर सहलीचा आराखडा ठरवावा लागत होता. हिमयुगात तापमान खूप खाली जात असले तरी थोडे जास्त थंड (glacial period) आणि थोडे जास्त गरम (inter-glacial period) असे तापमानाचे चढउतार सतत चालू असतात. या हवामानाच्या बदलाने आफ्रिकेला इतर जगाशी जोडणार्या केवळ दोनच मार्गांची उघडझाप होत होती आणि सर्वसाधारणपणे एका वेळेस एकच मार्ग खुला होत असे. ते मार्ग खालीलप्रमाणे होते:
१. उत्तरेकडे "आताचा इजिप्त --> सिनाइ मार्गे आशिया": हवा गरम झाली की या मार्गाने युरेशियात शिरकाव शक्य होत असे.
२. दक्षिणेकडे "आताचा इथिओपिया --> जिबूती --> येमेन": हवा थंड झाली की धृवाजवळ गोठून अडकलेल्या पाण्यामुळे समुद्राची पातळी खाली जावून आफ्रिका ते येमेन पायी अथवा कामचलावू तराफ्यांनी जाणे शक्य होत असे.
एका छोट्या गरम हवामानाच्या कालखंडाचा फायदा घेत आफ्रिकेतून सर्वात पहिला बाहेर पडणारा जथा १२०,००० वर्षांपूर्वी इथिओपियातून निघाला आणि नाईल नदीच्या काठाने उत्तरेकडे जात जात सिनाईमार्गे लेव्हांत (Levant) पर्यंत पोहोचला हे तेथे गुहांत सापडलेल्या आधुनिक मानवांच्या सांगाड्यांवरून सिद्ध झाले आहे.
या प्रवासाचा मार्ग खालच्या चित्रात लाल रंगाने दाखवला आहे.

लेव्हांत म्हणजे आधुनिक इजिप्तच्या सिनाई पासून आधुनिक टर्कीच्या अंतोलिया राज्यापर्यंतचा भूमध्य समुद्राभोवतालचा अर्धचंद्राकृती भूभाग. यात आजचे सिनाई, जॉर्डन, इझ्रेल, लेबॅनॉन, सिरिया, इराक व टर्कीचा अंतोलिया हे भूभाग सामील आहेत. लेव्हांतला मानवी प्रवासात फार महत्वाचे स्थान आहे आणि "सुपिक चंद्रकोर" (The fertile Crescent) म्हणूनही ओळखले जाते.
या जथ्याचा प्रवासाबद्दल पुढच्या भागात अधिक माहिती येईल.
=====================================================================
आतापर्यंत आपण मानवाच्या दोन लाख वर्षांच्या प्रवासापैकी जवळ जवळ अर्ध्या काळाचा मार्ग चाललो आहोत. हा मार्ग बराच सरळ आणि साधा होता. शिवाय सुरुवातीचा काल असल्याने वेग खूप कमी होता. पुढे अजून वेगवान, जास्त धाडसी आणि यापेक्षा खूप मोठे मार्गक्रमण करायचे आहे !
आतापर्यंत बर्याच जणांच्या मनात "हाच मार्ग होता किंवा हीच वेळ होती हे कशावरून नक्की समजायचे?" असा विचार खचितच आला असणार. तेव्हा आताच जर ही शंका दूर केली तर हेच नव्हे तर पुढचे अधिक गुंतागुंतीचे मार्ग समजायला मदत होईल. हा लेख सुगम ठेवण्यासाठी शास्त्रीय माहितीच्या खूप खोलात न जाता या पद्धतीची केवळ तोंडओळख करून घेऊया.
प्रवासाचा मार्ग निश्चित कसा करतात?
त्या काळचा मानवाचा सुरुवातीचा प्रवास मजल दरमजल जमिनीवरून चालत अथवा तुलनेने बर्याच उथळ पाण्यातून चालत अथवा अत्यंत प्राथमिक अवस्थेतील तराफे व होडक्यांनी झाला आहे. त्यामुळे आजच्या सारखे भरा बॅग आणि पोचा दिवसभरता पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या ठिकाणी असे शक्य नव्हते. हा प्रवास एका पिढीत काही किलोमीटर (शंभर किमी म्हणजे डोक्यावरून पाणी गेले !) असे. शिवाय मूळ जथ्यातले काही लोक पुढे जात असत काही वाटेवरच कायमची वस्ती करत असत कारण हा प्रवास कोण्या एका गंतव्य स्थानाला जाण्यासाठी नसून मुख्यतः राहण्यासाठी चांगले ठिकाण आणि खाण्यासाठी चांगले व सहज मिळाणारे अन्न शोधण्यासाठी होता. अर्थातच या प्रवासात मूळ स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत मानवी वस्तीची साखळी निर्माण होत गेली. एवढ्या मोठ्या प्रवासात या साखळीला सहाजिकपणे अनेक फाटे फुटले... माणसाच्या भूमीप्रेमामुळे काही अपवाद वगळता ही साखळी आणि तिचे फाटे बर्यापैकी सलग राहिले आहेत. सद्याच्या सहज आणि वेगवान प्रवासाच्या काळातही जर आजच्या लोकसंखेसंबद्धीचे आकडे पडताळले तर असेच दिसते की ९०% टक्के किंवा जास्त लोक आपल्या आठवणीतल्या पूर्वजांच्या वस्तीच्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपासच राहत आहेत.
एवढ्या पूर्वतयारीनंतर आता खालील चित्र बघूया:

असे समजूया की मानवी जथा जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या जनुकांत 'अ' आणि 'ब' उत्परिवर्तने होती. अर्थात ही उत्परिवर्तने पिढ्या दर पिढीत पुढे जात आज अस्तित्वात असणार्या पिढीपर्यंतच्या जनुकात दिसतील.
पण नंतर काही पिढ्यांमध्ये नवीन उत्परिवर्तने निर्माण होत राहणारच. समजा त्या जथ्याच्या दोन शाखा वेगळ्या मार्गांवरून प्रवास करू लागल्या आणि एका शाखेत 'क' तर दुसरीत 'ड' उत्परिवर्तन निर्माण झाले. अर्थातच ही उत्परिवर्तने पुढच्या सर्व शाखावार पिढ्यांत दिसतील.... आणि असेच प्रवासाच्या शेवटच्या स्थानापर्यंत पुढे चालू राहील.
वरच्या विश्लेषणावरून असे दिसते की आपण जर जगातल्या अनेक स्थानांवर असलेल्या आजच्या मानवांची जनुके गोळा केली आणि त्यांच्यातील उत्प्रिवर्तनांचे विश्लेषण करून ती जगाच्या नकाश्यावर त्या व्यक्तीच्या आजच्या स्थानाप्रमाणे मांडली, तर आपल्याला मानवाचे मूळ स्थान, त्याचा प्रवासाचा (फाट्यांसह) मार्ग अगदी त्याच्या वंशजांच्या आजच्या स्थानापर्यंत ठरवता येतो.
लाखो लोकांची जनुके गोळा करणे, त्यांची महत्वाची १,५०,००० उत्परिवर्तने आहेत की नाहीत यासाठी अचूक तपासणी करणे, ती माहिती जगाच्या नकाश्यावर मांडणे आणि त्यावरून विश्वासू निष्कर्ष काढणे ही वर सांगितली एवढी सोपी कृती नाही हे सांगायला नकोच ! या कामाकरिता संशोधकांचे अतुलनीय श्रम आणि खास निर्माण केलेले बरेच संगणकीय हार्डवेयर आणि सॉफ़्टवेयर कामी येत आहे.
प्रवासाचा काल निश्चित कसा करतात?
याकरिता गणितीय अथवा सांख्यिकी (statistics) पद्धत वापरली जाते. किती पिढ्यांमध्ये एक उत्परिवर्तन होवू शकेल याचे खूप निरीक्षणे करून आणि शास्त्रीय प्रतिमाने (models) वापरून शास्त्रज्ञांनी उत्परिवर्तनाचे वय नक्की करण्याची एक पद्धत बनवली आहे. मात्र हा पुरावा गणितीय असल्याने त्यावर शंभर टक्के विश्वास तेव्हाच ठेवला जातो जेव्हा त्याच्याशी जुळणारा काहीतरी सबळ जीवशास्त्रीय पुरावा मिळतो... अन्यथा त्याचे स्वरूप केवळ सिद्धांत / थियरी असेच राहते. याच कारणाकरिता जनुकशास्त्राने ठरवलेले मानवाच्या मूलस्थानाची जागा इथिओपियामधील ओमो किबिश आणि हेर्टोमध्ये आधुनिक मानवाचे जीवाश्म मिळाल्यानंतरच शास्त्रिय सत्य म्हणून पक्की झाली.
असो. आतापर्यंत आपली शास्त्रिय पृष्ठभूमी बर्यापैकी मजबूत झाली आहे. पुढच्या भागापासून आपण आपले लक्ष केवळ पुढच्या प्रवासाची मजा घेण्यावर केंद्रित करू शकू.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
बाकी इथिओपियापासूनच सगळे मानव इतस्ततः फुटले असावेत हे रोचक आहे. साधारणपणे असे किती जीवाश्म सापडलेत "अर्ली होमो सेपियन्स" चे? म्हणजे साधारणपणे इसपू ४०,००० ते इसपू १,६०,००० पर्यंतचे किती अवशेष सापडलेत माणसाचे? थिअरी मांडायला जे पुराव्याचे रॉ मटीरिअल आहे त्याचा साईझ कितपत आहे असा एक प्रश्न. इतिहासातले सिद्धांत मांडताना पुराव्याचा साईझ कितपत मिळतो याचा काहीएक अंदाज आहे. प्रीहिस्टरीबद्दल माहिती नसल्याने आणि अभ्यासाचा विषय अजूनच प्राचीन कालखंड असल्याने याबद्दल कुतूहल वाटते.
एकूण किती हे निश्चित माहिती नाही पण माझ्या वाचनात आलेले एक लाख वर्षांपूर्वीचे आधुनिक मानवी जीवाश्म १५-२० च्या वर गेले नाहीत. पण त्याकाळचे एवढे जीवाश्म संशोधनाला खूप झाले. काही हाडांच्या तुकड्यावरून आख्ख्या प्राण्याची प्रतिमा बनवण्याइतके हे शास्त्र पुढे गेले आहे. त्यातच जर जीवावशेष सापडला तर त्यातील DNA चे पृथक्करण करून, त्यावरून कृत्रीम DNA बनवून, तो प्राणी जिवीत करण्यासाठी लोकांचे हात शिवशिवत आहेत :) DNA मध्ये किती माहिती दडलेली असते हे आतापर्यंतच्या लेखांत व चर्चेत आपण पहिले आहेच.
उदाहरणार्थः
१. शनिदार (कुर्दिस्तान, इराक) येथे सापडलेला जीवाश्म वापरून बनविलेले नियांडरथाल आदिमानवाचे डोके...
![]()
२. मेट्मान् (जर्मनी) येथील नियांडरथाल संग्रहालयात बनवलेल्या नियांडरथाल पुरूष आणि स्त्री च्या मूर्ती...
(वरची दोन्ही चित्रे जालावरून साभार)
धन्यवाद. शास्त्र आता पुढे गेले असले तरी हे सगळे जीवाश्म सापडले तेव्हा तितके पुढे गेले असेल का? एक आपली सहज शंका.
अन निअँडरथल पाहून अजून एक शंका. थोडेसे वाचलेय, पण बरेच काही विसरलोय.
तर निअँडरथल टिपिकल युरोपियन गोरेछाप दिसताहेत. सध्याच्या युरोपियन डीएनए मध्ये निअँडरथलचा काहीही समावेश नाही की कसे? मी वाचल्याप्रमाणे अन आठवते त्याप्रमाणे आफ्रिकेतले मानव युरोपात जाण्याअगोदर निअँडरथलचा बहुधा निर्वंश झाला होता. होमो सेपियन अन निअँडरथल यांचे आपसात इंटरब्रीडिंग झाले नव्हते इ.इ.
अद्ययावत संशोधन याबद्दल काय सांगते? साधारणपणे मी वर लिहिले तसेच आहे की काही डीटेल्स मिसिंग आहेत?
होमो सेपियन अन निअँडरथल यांचे आपसात इंटरब्रीडिंग झाले होते अन अजुनही युरोपिअन लोकांमधे जास्तीत जास्त ३ % पर्यंत नियांड्राथॉलचे जीन्स सापडतात असे प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे. युट्युबर थोडं शोधलं तर त्या शास्त्रज्ञाच्या प्रयोगांचे व्हीडीओ सापडतील.
शास्त्र आता पुढे गेले असले तरी हे सगळे जीवाश्म सापडले तेव्हा तितके पुढे गेले असेल का?
अवशेष सापडले तेव्हा शास्त्र पुढे गेले नसले तरी एकदा सापडलेला पुरावा शास्त्रज्ञ जिवापाड जपतात... अगदी बँकेतल्या लॉकरमधल्या सोन्यापेक्षा जास्त ! मग जेव्हा अधिक पुढारलेली पद्धती विकसीत होते तेव्हा तो पुरावा परत तपासला जातो आणि त्यासंबद्धीच्या माहितीची विश्वासार्हता नविन माहितीप्रमाणे बदलली जाते.
असे झाल्याने एक क्रांतिकारक शोध लागलेला आहे... ही घटना मानववंशास्त्रातली एक फारच रोचक गोष्ट आणि मैलाचा दगड आहे.
अगदी पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत आफ्रिकेत राहिलेले मानव आणि युरोपमध्ये असलेले मानव यांच्यातला दुवा सापडत नव्हता. कारण सबसहारामधील १५,००० ते ६०,००० वर्षांपूर्वीचा त्याबाबतीतला सबळ मानवी अवशेषाचा पुरावा मिळत नव्हता. पण १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या एका युनिव्हर्सिटी प्रोफेसरने सन १९५० मध्ये त्याच्या पुर्वांपार जमिनीत नदीशेजारी मिळालेली एक जराशी विचित्र वाटणारी कवटी त्याला भेटायला आलेल्या एका पाश्च्यात्य मानववंशशास्त्रज्ञाला दाखवली. त्या एकोणपन्नास वर्षांच्या काळात कवटी मिळालेल्या जागेच्या आजूबाजूचा सगळा भाग बदलून शास्त्रीय संशोधनाला नाकाम झाला होता. यामुळे साधारणपणे ती कवटीही निरुपयोगी पुरावा समजली गेली असती. पण शात्रज्ञाच्या ध्यानात आले की कवटीच्या आतल्या मेंदूच्या पोकळीत काही carbonate sand matrix प्रकारचा गाळ अजूनही अडकून राहिलेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्या चुटकीभर पुराव्यावर आणि कवटीवर केलेल्या संशोधनात खालील तथ्ये सापडली:
१. कवटीचे वय ३६,००० वर्षे आहे (हे त्या गाळाच्या रेडिओ डेटिंगने समजले)
२. कवटी आताच्या आफ्रिकन माणसाशी थोडीशीच पण सुरुवातीच्या युरोपियन माणसाशी पूर्णतः जुळते आहे.
यावरून प्राचीन आफ्रिकन मानवाचा आणि प्राचीन युरोपियन मानवाचा संबद्ध पहिल्यांदाच निशंकपणे सिद्ध झाला. हा शेवटचा पुरावा मिळून हे सिद्ध झाले की "आपण सगळेच मूलतः आफ्रिकन आहोत".
आधुनिक मानव पुंजक्या-पूजक्यांनी जागोजागी उत्क्रांत झाला आणि त्यामूळे युरोपियन ग्रेट, आशियन ओके आणि अफ्रिकन मागासलेले अशी थियरी मांडणार्यांची बोलती बंद झाली. त्यानंतर त्या थियरीची गोष्ट शास्त्रिय वर्तुळाच्या चर्चेतून बाद झाली आहे.
***इतर सगळे प्रश्न आपल्या प्रवासातले महत्वाचे मुद्दे आहेत. आत्ता त्रोटक उत्तरे देण्यापेक्षा ती राखून ठेवत आहे. पुढे योग्य जागी विस्ताराने येतील.***
खरेतर रेसिझम च्या मागे तर्कशास्त्र आहे असे च दिसतय.
तर्कशास्त्रापेक्षा त्याला "तर्कटशात्र" हे नाव जास्त संयुक्तीत आहे. गोरा
रंग म्हणजे जास्त सुधारलेला माणूस असे म्हणणे आणि पांढर्या रंगाच्या
गाड्या जास्त चांगल्या असतात असे म्हणण्याइतकेच बरोबर आहे.
कारण आतापर्यंतच्या शास्त्रिय संशोधनात असे सिद्ध झाले आहे की "समान संधी दिली असता बुद्धिमत्ता आणि कातडीचा गोरेपणा याचा अर्थाअर्थी (कॉजल रिलेशनशीप) काही संबंद्ध नाही." किंबहुना (अनेकातले एक महत्वाचे कारण, अधिक परिश्रम करण्याची तयारी असल्याने) बौद्धीक स्पर्धेत कॉकेशियन (गोरे) मुलांपेक्षा आशियाई मुले आता पाश्चिमात्य देशांत वरचढ ठरू लागली आहेत. काही बाबतीत (उदा. अॅबस्ट्रॅक्ट थिंकिंग, इ) अशियाई मेंदू जास्त प्रगत आहे असे आढळून आले आहे.
प्रागैतिहासिक काळच्या शोधासाठी भोपाळ जवळील भीमबैठिका या जागी पुष्कळ
उत्खनन केले गेले आहे. मी स्वतः अश्या एका शिविरात भाग घेतला होता.
त्यावेळी स्वतः डॉ. वाकणकर तिथे होते. त्यांची तारीफ करावी तेवढी कमीच. ते
स्वतः उत्तम चित्रकार होते, आणि अतिशय प्रेमाने ते आम्हाला सर्व दाखवत,
शिकवत असत. भीमबैठिका चा शोध त्यांनीच लावला होता. ते भोपाळ ते नागपूर
ट्रेन प्रवास करत असता त्यांना दूर विचित्र आकरचे खडक दिसले, म्हणून उतरून
जंगलातून पायी जाऊन शोध घेतला. तिथे अनेक गुफाचित्रे त्यांना मिळाली.
त्यावरून ही जागा प्रागैतिहासिक काळातील मानवाचे वसतिस्थान असावे असा तर्क
करून केलेल्या उत्खननात पुढे अनेक गोष्टी सापडल्या. मी गेलो होतो,
तेंव्हासुद्धा तिथे पोचायचे म्हणजे आधी ट्रेन, मग ट्रकवाल्यांना थांबवून
त्यांचे बरोबर जाणे, मग अनेक किलोमीटर पायी जंगलातून जावे लागे. मात्र
तिथले प्रचंड खडक खूप दुरूनही दिसत असल्याने रस्ता चुकण्याची भिती नव्हती.
तिथे एक बाबाजी रहात असे, त्याला वाकणकरांचे नाव सांगितले, की रहाण्याची
जुबबी सोय (गुफेत) करून देई.
आता भीमबैठिका कसे आहे ठाउक नाही. बहुधा सर्व प्रसिद्ध टूरिष्ट
जागांप्रमाणे तिथेही कोक, बर्गर, कुरकुरे वगैरे मिळत असेल आणि त्यांच्या
प्लास्टिक कचर्यातून वाट काढत जावे लागत असेल.
भीमबैठिका चे फोटो:

धन्यवाद ! हा तर एक मोठा (पण दुर्लक्षित) खजीनाच पुढे आणलाय तुम्ही !
मुद्दा समजला आणि त्यातील खरेपणाबद्दलही संशय नाही... फक्त सहमती नाही ती सरसकटीकरणाला. काही खडे आहेत म्ह्णून सगळेच तांदूळ फेकणे योग्य नाही. शात्रज्ञही माणसेच आहेत आणि राजकारण, स्वत्वाचा गर्व, इ भावना त्यांच्यातही आहेतच.
पूर्वी युरोपच्या वांशीक वरिष्ठतेची थियरी मांडणारे शास्त्रज्ञ गोरे होते. पण वरच्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे ती थियरी खोडून टाकणार्या पुराव्यांचा पाठपुरावा करून "आपण सर्व आफ्रिकन" हे सिद्ध करणारे संशोधकही गोरेच होते.
गेल्या काही दशकांत जनुकीय शास्त्र इतके पुढे गेले आहे आणि त्यात सर्व देशाच्या आणि वंशांच्या शात्रज्ञांचा इतका सहभाग आहे की एखाद्याचा खोटेपणा बाहेर येण्याला कदाचित थोडा वेळ लागेल पण तो नक्की बाहेर येईल. हल्ली एका जणाचे कोणतेही संशोधन इतर अनेक जणांनी (पियर्स) सिद्ध केल्याशिवाय मान्य होत नाही.
नेटिव्ह इंडियनांचे पूर्वज हे सुद्धा अमेरिकेबाहेरून आले होते, असे 'सिद्ध' करण्यात आले होते.
हे खरे आहे. हे कसे आपण पुढच्या भागांत बघूच. पण नेटिव्ह इंडियनांचे
पूर्वजच नाही तर सगळ्याच मानवांचे पूर्वज (फक्त काही इथिओपियन सोडून)
त्यांच्या आताच्या जागी आफ्रिकेतूनच गेलेले आहेत... फरक फक्त ते किती शतके /
हजारो वर्षांपूर्वी आताच्या जागेवर पोहोचले या प्रश्नाचे उत्तर कोण
मूलनिवासी आणि कोण उपरे हे ठरवायला कामी येतो.
सुप्रसिद्ध 'Archaeopteryx' हा बनावटी की खरा, यावर उलट सुलट मते वाचायला मिळतात.
हयाबाबतीत मत देण्याएवढा माझा अभ्यास नाही. पण याचबरोबर "माणूस चंद्रावर
उतरला नाही. ती नासाची होक्स होती", "९/११ला पेंटॅगॉनवर विमान पडले नाही",
"अमेरिकन संरक्षणखात्याने / सि आय ए ने त्यांना सापडलेल्या उडत्या तबकड्या
आणि परग्रहावरची माणसे एरिया ५१ मध्ये वाळवंटात लपवून ठेवली आहेत",,,,,,
अश्या असंख्य गोष्टी जालावर सतत घिरट्या घालत असतात. माझा कल साधारणपणे
पियर रिव्ह्युव्ड / पियर कन्फर्म्ड शास्त्रिय संशोधनावर विश्वास ठेवण्याकडे
आहे. आजच्या घडीला तरी तेच जास्तीत जास्त "विश्वासू" सत्य आहे.
पहिली महाआपत्ती आणि दुसर्या सफरीची सुरुवात (११५,००० ते ७५,००० वर्षांपूर्वी)
आफ्रिकेतून सर्वात पहिला बाहेर पडणारा जथा १२०,००० वर्षांपूर्वी इथिओपियातून निघाला आणि नाईल नदीच्या काठाने उत्तरेकडे जात जात सिनाईमार्गे लेव्हांतमध्ये पोहोचला हे आपण मागच्या भागात पाहिले आहेच. बराच काळपर्यंत या जथ्यापासून सर्व युरोपियन आणि बहुतेक आशियाई लोकांची उत्पत्ती झाली असा समज होता. मात्र नंतर हाती आलेल्या पुराव्यांनी असे सिद्ध झाले की तो जथा लेव्हांतच्या पुढे जाऊ शकला नाही. एवढेच नाही तर साधारण ९०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्यातले सर्वजण नष्ट झाले. कारण त्या जथ्यातील मानवांच्या जनुकांचा पुढे कोठेच ठावठिकाणा लागत नाही. या सर्वनाशाची काही कारणे खालीलप्रमाणे असावीत:
१. ९०,००० वर्षांच्या आसपास हिमयुगाचा कहर झाला होता, त्याने पृथ्वीच्या वातावरणातले बरेच बाष्प शोषून घेतले होते. त्यामुळे केवळ लेव्हांतच नव्हे तर उत्तर आफ्रिकेचा परिसरही रखरखीत वाळवंट झाला होता. अश्या तऱ्हेने परतीचा मार्ग बंद होऊन लेव्हांतमध्येच अडकून पडलेले उष्णप्रदेशीय वर्षारण्याची सवय असलेले मानव हिमयुगाच्या थंडीचे आणि वाळवंटाचे बळी झाले.
२. थंडीच्या कडाक्यामुळे पूर्वीपासून युरेशियात प्रस्थापित झालेल्या नियांडरथालनाही दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले... यामुळे ते लेव्हांतमध्येही घुसले. थंडीला सरावलेल्या आणि संख्येने अधिक असणार्या नियांडरथाल आदिमानवांपुढे उष्ण हवामानाची सवय असलेल्या मोजक्या संख्येच्या आधुनिक मानवांचा निभाव लागला नाही.
कारणे कोणती का असेनात, मात्र मानवाच्या आफ्रिकेबाहेरच्या पहिल्या सफरीचा दुर्दैवी अंत होऊन त्या जथ्याचा सर्वनाश झाला हे नक्की. कारण ९०,००० वर्षांपूर्वींनंतर ४५,००० वर्षांच्या कालावधीत लेव्हांत अथवा युरोपमध्ये आधुनिक मानवाच्या काहीच खाणाखुणा मिळत नाहीत. त्यानंतर एकदम ४५,००० वर्षांपूर्वी तेथे 'क्रो मॅग्नन' मानव अवतीर्ण झाल्यावरच आधुनिक मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे परत सुरू झाले. या नविन मानवाने मात्र नियांडरथालवर मात करून हळू हळू सर्व युरोप पादाक्रांत केला. तो कोठून आणि कसा आला त्याबाबत आपण नंतर त्या कालखंडात जाऊ तेव्हा विस्ताराने बघू.
तर मग, ९०,००० वर्षांपूर्वी निसर्गाच्या एका फटक्याने मानवाची कथा मूळपदावर आली आणि त्याचे परत अस्तित्व फक्त आफ्रिकेतच शिल्लक राहिले...

लेव्हांतमध्ये हे निसर्गाचे भयानक नाट्य संपत आले होते त्याच सुमारास उत्तर आफ्रिकेत तयार झालेल्या वाळवंटामुळे वेगळे पडलेल्या दक्षिणेकडील मानवांना त्याच हवामानाच्या बदलाने आफ्रिका सोडण्याची अजून एक संधी उपलब्ध करून दिली. रक्तसमुद्राचे (Red Sea) दक्षिण टोक फक्त २५ किमी रुंद आणि १३७ मीटर खोल आहे. तेथील असंख्य खडकांमुळे या भागाचे नाव बाब अल मंदाब (Gates of Grief उर्फ दु:खाचा दरवाजा) असे पडले आहे.
हिमयुगाच्या वाढणार्या कडाक्याने ध्रुवीय प्रदेशांत खूपसे पाणी बर्फरूपात अडकून राहू लागल्याने अगोदरच कमी असलेली बाब अल मंदाबची रुंदी आणि खोली अजूनच कमी कमी होत चालली होती. त्यातच त्या बदललेल्या हवामानाने वाळवंटी उत्तर आफ्रिकेला जवळ असलेल्या इथिओपियामध्येही अन्नाची कमतरता भासू लागली होती. मात्र रक्तसमुद्राच्या दुसर्या किनार्यावरील येमेनमध्ये अजूनही थंड आणि पाणथळ जागा शाबूत होत्या. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे इथिओपियातील मानवांना उथळ समुद्र पार करून पलिकडे जाणे भाग पडले.
अशा तर्हेने मानव ८५,००० वर्षांपूवी आफ्रिकेतून दुसर्यांदा बाहेर पडून मध्यपूर्वेच्या दक्षिण समुद्रकिनार्यावर पोहोचला...

आफ्रिकेतल्या जंगलातील आणि गवताळ प्रदेशातील प्राणी आणि वनस्पतींना खायला सरावलेल्या मानवांना हवामानात होणार्या फरकाने विरळ होत जाणार्या जंगलातून समुद्रकिनार्यांवर येणे आणि खाण्याच्या सवयी बदलणे भाग पाडले होते.
१२५,००० वर्षापूर्वीपासून मानवांना समुद्रातून मिळणार्या अन्नाची चांगली सवय झाली होती याचे पुरावे समुद्राच्या किनार्यावर सापडलेल्या शिंपल्यांच्या अवशेषांवरून आणि ते काढण्यासाठी दगडापासून बनवलेल्या साधनांवरून दिसते. याच सुमारास आधुनिक मानवाच्या मेंदूची वाढ जोराने सुरू झाली. यात या नवीन प्रकारच्या आणि भरपूर मिळणार्या अन्नाचा सहभाग होता. कारण जमिनीवरच्या प्राण्यांची शिकार करणे हे श्रमाचे आणि जोखमीचे काम होते. त्यापेक्षा मासेमारी करून अथवा शिंपल्यापासून अन्न मिळवणे खचितच सोपे आणि कमी धोकादायक काम होते. बाब अल मंदाब पार केल्यावर तर एका ठिकाणचे अन्न कमी होत असे तेव्हा किनारपट्टीवरून अजून थोडे पुढे जाऊन वस्ती करणे, तेथील अन्न कमी झाले की नंतर तिथून थोडे पुढे जाणे अशी मजल दरमजल वाटचाल चालू झाली होती... या जीवनपद्धतीला "बीच कोंबिंग" असे म्हणतात.
या सफरीच्या वेळेस मात्र सराव झालेले हवामान आणि अन्नाची चांगली सोय यामुळे मानव बहुतांश समुद्रकाठ पकडूनच पुढे जात राहिले. बाब अल मंदाब पार करून मानव अरेबियाचा दक्षिण किनारा, भारताचा प्रथम पश्चिम किनारा मग पूर्व किनारा, तेथून ब्रह्मदेशाचा किनारा असे जात पुढे सुमात्रा, जावा आणि शेवटी परत किनारपट्टीने वर वळून बोर्निओमार्गे साधारण १०,००० वर्षांनंतर चीनच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचला.

हा मार्ग पाहताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या काळाच्या समुद्रातल्या कमी पाण्यामुळे आजचे आणि त्या काळाचे समुद्रकिनारे यांत खूप फरक होता. आजच्या घडीला ते समुद्रकिनारे १०० ते १३० मीटर खोल पाण्यात बुडालेले आहेत. आजच्या इंडोनेशिआतील बरीच बेटे त्या काळी एकमेकांना जोडलेले (सलग) भूभाग होते. त्यामुळे ही बर्याच लाब अंतराची सफर काहिश्या सोयीस्कर भौगोलीक परिस्थितीत झाली असे म्हणायला हरकत नाही.
या मानवांनी बरोबर आणलेल्या मायटोकाँड्रियल DNA च्या अनेक उत्परिवर्तनांपैकी L3 नावाचे एकच उत्परिवर्तनच आज मानवांत शिल्लक आहे. त्यामुळे त्याला Out-of-Africa Eve line असे म्हणतात आणि ते उत्परिवर्तन ज्या स्त्रीकडून मानवाला मिळाले त्या सैधांतिक स्त्रीला (ही इव्ह म्हणजे सापडलेला सांगाडा अथवा जीवाश्म नाही तर जनुकशास्त्रिय सिद्धांत आहे) आफ्रिकेबाहेरच्या सर्व मानवजातीची (आशियन, ऑस्ट्रेलियन, युरोपियन आणि मूल अमेरिकन यांची) जननी समजले जाते.
हे सर्व मानव एकाच काळात आफ्रिकेतून बाहेर पडले की बर्याच कालावधीत एका मागोमाग एक अश्या अनेक जथ्यांनी बाहेर पडले याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत होत नव्हते. प्रथम "एकच जथा" थियरीला बहुमत होते पण नक्की उत्तर कोणालाच माहित नव्हते. जनुकीय शास्त्राने या कोड्याचे निर्विवाद उत्तर दिले. १९२३ साली एका ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञाला एका ऑस्ट्रेलियन मूलनिवासीने भेट दिलेल्या केसांतील जिनोम सन २०११ मध्ये वेगळा केला गेला आणि तो आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये राहणार्या मानवांच्या जिनोमबरोबर पडताळून पाहण्यात आला. त्या जिनोमचे आफ्रिकन माणसाच्या जिनोमशी सर्वात जास्त साम्य होते. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलियात गेलेले तेथील मूलनिवासींचे पूर्वज पहिल्या जथ्यांमधले होते आणि नंतर एका मागोमाग एक बाहेर पडलेल्या अनेक जथ्यांतील मानव आशिया व युरोपमध्ये पसरले.
ऑगस्ट २०१२ मध्ये "बीच कोंबिंग लाइफस्टाइल" थियरीला एक हलकासा सुखद धक्का बसला. त्या महिन्यात शास्त्रज्ञांना लाओसच्या उत्तर भागातील एका चुनखडीच्या गुहेत आधुनिक मानवी कवटीचे तुकडे सापडले. त्यांचे वय ६३,००० ते ४६,००० वर्षांच्या मध्ये कोठेतरी असल्याचे ठरवले गेले. म्हणजे एकंदरीत हे दुसर्या सफरीतले प्रवासी अगदीच भित्रे नव्हते म्हणायचे ! कारण समुद्रकिनारा सोडून शेकडो किलोमीटर आत जात त्यांनी लाओस, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमधील डोंगर पालथे घातले होते असे दिसते !
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
दुसरी महाआपत्ती आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात (७४,००० ते ५२,००० वर्षांपूर्वी)
आतापर्यंत १०,००० वर्षे मानवाची सफर कोणत्याही मोठ्या अपघाताशिवाय पुढे चालली होती. पण बराच काळ शांत राहिलेल्या नियतीचे जरा वेगळेच बेत चालले होते. ७४,००० वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरच्या गेल्या २० लाख वर्षांतला जगातील सर्वात जास्त सक्रिय असलेल्या तोबा ज्वालामुखीचा महाभयानक उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की त्याच्यामुळे १०० X ३० किलोमीटर आकाराचे तोबा सरोवर तयार झाले...

या महाउद्रेकाने इतकी राख वातावरणात उधळली गेली की त्यामुळे आताचा सर्व भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेचा काही भाग १ ते ५ मीटर जाडीच्या राखेच्या थराने झाकले गेले. ही राख ग्रीनलँडमधील बर्फाच्या आणि भारतीय महासागराच्या समुद्रतळाच्या कोअरमध्ये सापडते. या पुराव्याच्या साहाय्याने हा उद्रेक ७४,००० वर्षांपूर्वी झाला असे निदान करण्यात आले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ह्या ज्वालामुखीने वातावरणात उधळलेल्या राखेने पुढच्या काही काळात (काही शे अथवा हजार वर्षे) सूर्यकिरणांना अडवल्यामुळे आणि हवा दूषित केल्यामुळे जगभर महाभयानक जीवहानी झाली.
या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राख आणि धुराचा मुख्य रोख उत्तरपूर्वेकडे होता आणि त्याच्या चपाट्यात मुख्यतः भारताचा भूभाग येऊन तेथील जीवन समूळ नष्ट (mass extinction) झाले आणि काही काळाने (म्हणजे काही शे अथवा हजार वर्षांनी) तेथे परत मानवी वस्ती झाली. ह्याचा जनुकशास्त्रीय पुरावा भारतातील M आणि R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तनांत सापडतो तो असा:
१. मानव प्रथम भारतात आला आणि त्यानंतर पूर्व आशियात गेला हे आपण पाहिले आहेच. म्हणजे भारतातील मूळ उत्परिवर्तने पूर्व आशियातील उत्परिवर्तनांपेक्षा जुनी असायला पाहिजेत. पण खरी परिस्थिती याउलट आहे, भारतातील काही मूळ मायटोकाँड्रियल उत्परिवर्तने पूर्व आशियापेक्षा जास्त 'तरुण' आहेत. हे ज्वालमुखीच्या उद्रेकानंतर उलट दिशेने प्रवास झाल्यानेच शक्य आहे.
२. पूर्वेकडील R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन व पश्चिमेकडील M मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन ही दोन्ही भारतात असणे आणि ती तोबाच्या उद्रेकानंतर भारतात येणे हे तोबाच्या कहराने भारतातील मानवी जीवन बराच काळ पूर्ण नष्ट झाले आणि नंतर दोन्ही बाजूचे लोक भारतात आले असल्यासच शक्य आहे.
३. दक्षिण भारतात ज्वालापूरम येथे तोबा ज्वालामुखीच्या राखेच्या वरच्या आणि खालच्या जमिनीच्या थरांत सापडलेली दगडी हत्यारे आणि त्यांची वये हे सिद्ध करतात की तोबाच्या उद्रेकापूर्वी आणि नंतर भारतात मानव संस्कृती होती. ही गोष्टही या सिद्धान्ताचे समर्थन करते.
४. जनुकशास्त्राने ठरवलेला कालखंड आणि इतर पुराव्यांनी ठरवलेले कालखंड एकमेकाशी जुळणेही या मताला बळकटी देते.
तोबाच्या महाउद्रेकाचा झालेला अजून एक परिणाम म्हणजे भारताच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील आशियाई मानवांत झालेला जनुकीय फरक आणि त्यामुळे त्यांच्या बाह्यरूपात पडलेला फार मोठा फरक... "दक्षिण आशियावर झालेल्या ज्वालामुखीच्या राखेने तेथील पूर्णपणे नष्ट झालेले जीवन व त्यामुळे फार मोठ्या कालखंडाकरिता विभाजित राहिलेले त्याच्या दोन बाजूचे मानवसमूह" याचा हा परिणाम आहे... जनुकशास्त्रात या genetic furrow असे म्हणतात.
या महाआपत्तीतून उरलेल्या आणि सावरलेल्या मानवांची वंशविच्छेदाला तोंड देत परत भटकंती सुरू झाली. ही वाटचाल मुख्यतः चार दिशांनी झाली...

१. एक जथा पुढे मार्गक्रमण करत चीनमध्ये पुढे जाऊ लागला.
२. दुसरा जथा थोडा दक्षिणपूर्वेस निघाला आणि पापुआ न्यू गिनीत साधारण ४०,००० वर्षांपूर्वी पोहोचला.
३. तिसरा जथा जरा जास्त धाडशी होता. तो होडक्यांचा वापर करून दक्षिणेकडील टिमोर बेटावर पोहोचला आणि तेथून पुढे त्याने उत्तर ऑस्ट्रेलियात Arnhem Land येथे पदार्पण केले. या चवथ्या जथ्यातील मानवांनी नेहमीची बीच कोंबिंग लाइफस्टाइल सोडून जरा धाडसी प्रवास केला. त्यांच्याबद्दल थोडी जास्त माहिती घेऊया.
या मानवांनी बोटीचा वापर केला या दाव्याला बळकटी देणारे हे उत्तर ऑस्ट्रेलियात सापडलेले जगातील सर्वात जुने होडीचे चित्र...
येथे पहा.
प्रथम यांच्या ऑस्ट्रेलियन पदार्पणाचा काल ४०,००० वर्षांपूर्वीचा असावा असा समज होता. पण radiocarbon dating पेक्षा जास्त सुधारीत luminescence dating of silica हे तंत्र प्रगत झाल्यावर हा काळ ६०,००० ते ५०,००० वर्षापूवीच्या कालखंडातील असावा असे ठरविले गेले आहे. या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी सद्याच्या पातळीपेक्षा ८० मीटर खाली होती, याचीही या मानवांना मदत झाली. त्या काळानंतर ही पातळी भरभर वाढू लागली, इतरांना ऑस्ट्रेलियात जाणे कठीण झाले आणि नंतरची काही दशसहस्त्र वर्षे त्या खंडाचा आणि तेथील मानवांचा इतर जगाशी संबंध तुटला ही तथ्येही जुन्या कालखंडाच्या बाजूनं आहेत.
मात्र जनुकशास्त्राचे पुरावे अजून पुढे जाऊन असे दर्शवितात की ऑस्ट्रेलियात मानवाचा शिरकाव ६८,००० वर्षांपूर्वींइतका जुना असावा. त्या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी गेल्या एक लाख वर्षांतली सर्वात कमी होती, हे तथ्यही या काळाच्या अंदाजाला बळकटी देते. मात्र याला आधार देणारे जीवावशेष मिळेपर्यंत तो एक सिद्धांतच राहील. असो.
या मानवांनी त्यानंतर हळू हळू त्या काळी सुपीक, जंगलांनी भरलेले आणि प्राणिजीवनाने समृद्ध असलेले ऑस्ट्रेलिया पादाक्रांत करून ५०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्याचा दक्षिण किनारा गाठला.
४. तोबाच्या कहरातून सावरलेले मलाय व्दिपकल्पातील काहीजण उलट फिरून ब्रह्मदेशाच्या दक्षिण किनार्यावरून परत भारतात शिरले. ते त्यांच्या पूर्वजांच्या मार्गानेच पण या वेळेस विरुद्ध दिशेने प्रथम भारताच्या पूर्व किनार्याने आणि नंतर पश्चिम किनार्याने सिंधू नदीच्या खोर्यापर्यंत आले. तेथे त्यांची आफ्रिकेतून बाहेर पडणार्या पुढच्या टोळ्यांशी गाठ पडत राहिली असणारच. मात्र या सगळ्यांना पुढची १०,००० वर्षे हिमयुगाच्या प्रभावाने तयार झालेल्या मध्य आशियातील वाळवंटाने आणि थंडीने रोखून धरले. ५०,००० वर्षांपूर्वी हवामानात बदल होऊन अरेबियन वाळवंट आणि 'सुपीक चंद्रकोरी' चे पाणथळ हिरव्या भूमीत परिवर्तन झाले तेव्हाच त्यांना उत्तरपश्चिमेकडे पुढची वाटचाल करणे शक्य झाले.

हवामानाच्या बदलांचे दाखलेही यालाच अनुमोदन देतात. गेल्या एक लाख वर्षांमध्ये लेव्हांत किंवा "सुपीक चंद्रकोर" काही छोटे सुधारलेल्या हवामानाचे काळ (interstadials) सोडले तर कडकडीत थंड वाळवंट होते. या वाळवंटाने मानवाची युरोपमध्ये जाण्याची वाट रोखून धरली होती. मात्र ६५,००० वर्षांनंतरच्या कालखंडात चार वेळा हवामानात काही काळ फरक पडून हा भाग काहीसा गरम आणि पाणथळ झाला होता. यातला शेवटचा सर्वात जास्त गरम व मोठा (५,००० वर्षे) असलेला कालखंड ५१,००० वर्षांपूर्वी सुरू झाला. हा काल इतका गरम होता की त्यामुळे दक्षिण आशियातही जास्त पर्जन्यवृष्टी होऊन झालेल्या अन्नाच्या मुबलकतेमुळे तेथील लोकसंखेतही परिणामकारक वाढ झाली. या सगळ्याचा परिणाम दक्षिण आशियातून टर्की व बल्गेरिया मार्गे दक्षिण युरोपाकडे मानवी स्थलांतर होण्यात झाला.
दुसरा शक्य असणारा मार्ग म्हणजे सिंधूच्या खोर्यातून काश्मीरमार्गे मध्य आशिया. येथे ४०,००० वर्षांपूर्वी मॅमथची (प्राचीन अजस्त्र आणि केसाळ हत्तीसदृश प्राणी) शिकार करण्याइतपत कौशल्य असलेले मानव होते. ते पुढे उरल पर्वतांतून पश्चिमेकडे आताच्या रशिया, झेक रिपब्लिक मार्गे जर्मनीत गेले असावेत.
या पाचीन प्रवासात सहाजीकच माणूस आपली भाषा बरोबर नेत राहिला. अर्थात तिच्यात काल आणि स्थलमानाप्रमाणे बदल होत गेले. पण आजही मानवाच्या भारत ते युरोप या मार्गांवरील ४३९ आधुनिक भाषांचा इतका जवळचा संबंध आहे की त्यांचे भाषाशास्त्रात "इंडो-युरोपियन" या सुपरफॅमिलीत वर्गिकरण केलेले आहे. यातल्या २११ भाषांचे वर्गिकरण "इंडो-आर्यन" असे आहे.
इंडो-युरोपियन भाषांची यादी येथे मिळेल. आजच्या घडीला जगातील निम्मे म्हणजे अंदाजे ३०० कोटी लोक इंडो-युरोपियन भाषा बोलतात. जगातल्या जास्तीत जास्त भाषिक असणार्या २० पैकी १२ भाषा इंडो-युरोपियन आहेत, त्या अशा: स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बंगाली, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालिअयन, पंजाबी आणि उर्दू.
इंडो-युरोपियन भाषांची स्थाने दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)...
सद्याच्या युरोपातील लोकांमध्ये असलेले जनुकीय पुरावेही त्यांचे पूर्वज ५०,००० वर्षांपूर्वी दक्षिण आशियातून आले असे दाखवतात असे सिद्ध झाल्यावर तर "युरोपमध्ये वेगळ्या मानवी संस्कृतीची स्वतंत्र सुरुवात होऊन ती वेगाने प्रगत झाली आणि मग त्यांनी ती प्रगती इतर ठिकाणी पसरवली" ही कल्पना पूर्णपणे खोटी ठरली. अजून एका कपोलकल्पित स्वप्नावर आधारलेल्या सिद्धान्ताला (थियरीला) जनुकशास्त्राने सुरुंग लावला आणि अगोदर आशियात झालेल्या सगळ्या मानवी सुधारणांचा फायदा युरोपात उशीरा घुसणार्या मानवांना झाला हे तथ्य सर्वमान्य झाले !
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
इतर भागांप्रमाणेच छान. भारतात अधिक 'तरुण' म्यूटेशन्स सापडतात, तर मग जुनी का सापडत नाहीत? हा प्रवास भारतमार्गेच झाला असं पहिल्या चित्रातून दिसलं...
दुसरं मला नेहमीच कुतुहल वाटत राहिलेलं आहे... या काळात मानवाची लोकसंख्या किती होती, कशी बदलत गेली याचे काही अंदाज आहेत का? एके काळी दहा हजार पर्यंत कमी झाली होती असा उल्लेख आला होता. तसंच या उत्पातातही प्रचंड जीवितहानी झाली असावी. याबाबतीत काही प्रकाश पाडता येईल का?
तोबाच्या उद्रेकाने सर्व दक्षिण आशिया १ ते ५ मीटर जाडीच्या राखेने झाकून गेला होता. शिवाय वातावरण दुषित झाले होते. त्यामुळे त्या काळात तेथील सर्व जीवन (यात वनस्पतीही आल्या) काही शे ते हजार वर्षेपर्यंत नष्ट झाले होते. त्यामुळेच भारताच्या पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे (मंगोलियन वंशाचे) लोक यांच्या इतका मोठा फरक निर्माण झाला.
पूर्वेकडून परत फिरलेल्या लोकांबरोबर त्यांची जुनी मुटेशन्स परत आलीच पण वंश पुढे जाताना नवीन निर्माण होणारी (तरूण) म्युटेशन्स पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे (ब्रम्हदेश --> पूर्व भारत --> पश्चिम भारत) उलट्या दिशेने आली. येथे तरूण हा शब्द म्युटेशन्सच्या आस्तित्वात येण्याच्या काळासंदर्भात वापरलेला आहे.
सुरुवातीच्या काळात आफ्रिकेतल्या मानवांची संख्या १०,००० होती, हा जनुकीय सिद्धांताने काढलेला निष्कर्ष आहे. मानव इतरत्र पसरू लागल्यावर अंदाज बांधणे कठीण तर आहेच पण तो अल्गोरिदम प्रचंड गुंतागुंतीचा होतो आणि त्याचे निष्कर्ष तितकेसे विश्वासू राहत नाहीत. बहुतेक यामुळेच पुढच्या प्राचीन लोकसंख्यांचे खात्रीचे अंदाज असलेले दुवे माझ्यातरी वाचनात आलेले नाहीत.
एखादा मॅमथचा सांगाडा सापडला असावा. त्या सांगाड्यावरून त्याची शिकार झाल्याचा निष्कर्ष निघाला असेल.
उदा:- जबडा किंवा डोळेव इथे विशेष आकाराच्या हत्यारांनी जखम केल्याची
निशाणी वगैरे. थोडक्यात अशा जखमांचे अस्तित्व सिद्ध झाले असेल की ज्या
निसर्गतः होणे शक्य नाही, कुणीतरी नेम धरुन त्या केल्या असाव्यात.
अर्थात हा माझ अंदाज.
हे पुरावे तेथे सापडलेल्या मॅमथच्या हाडांच्या आणि आधुनीक मानवी हत्यारांच्या स्वरूपात आहेत.
अश्या मोठ्या आणि उंच प्राण्याची सुरक्षित शिकार करण्यासाठी भाल्यासारखे तीक्ष्ण आणि फेकून मारता येणारे हत्यार असणे जरूर होते. त्याचप्रमाणे अशी कठीण आणि धोकादायक शिकार करण्यासाठी मानवांच्या मोठ्या समुहाने एकत्र येऊन सुसंबद्धपणे आराखडा करून मग ठरवल्यानुसारच प्रत्येकाने आपली कृती करणे अत्यंत जरूरीचे होते. या सगळ्या गोष्टींचा मानवाची सामाजीक आणि बौद्धीक सुधारणा होण्यात फार मोठी मदत झाली असणार. किंवा अशा प्रकारची सुधारणा मानवात झाल्याने तो ही शिकार जास्त सुरक्षितपणे करू शकला असेल. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट पहिली झाली असली तरी या दोन गोष्टीचा एकमेकावर परिणाम पूरक होता. यामुळे हा काळ मानवाच्या प्रगतीत महत्वाचा समजला जातो.
अवांतरः
१. मॅमथची शिकार करणारा आधुनिक मानव पहिला शिकारी नव्हता. कारण नियांडरथाल आणि होमो इरेक्टसही ही शिकार त्याच्या अगोदर काही लाख वर्षांपासून करत होते. नियांडरथालच्या युरोपात मिळालेल्या अवशेषांवरून असे दिसते की त्यांची हत्यारे तुलनेने बोथट आणि बरीचशी ओबडधोबड होती त्यामुळे त्यांना प्राण्यांच्या खूप जवळ जाऊन हल्ला करणे भाग पडत असणार. याची परीणती जखमा आणि जीवीतहानीत होत असणार. नियांडरथालच्या सापडलेल्या हाडांवर असलेल्या जखमांच्या खाणाखूणा या सिद्धांतास पाठींबा देतात.
२. युक्रेनमध्ये नियांडरथालने मॅमथची हाडे (कवट्या, जबडे, सुळे आणि पायाची हाडे) वापरून बनवलेले एक मोठे "घर" सापडले आहे. त्यांत उष्णतेसाठी २५ शेगड्याही होत्या ! यावरून असे दिसते की नियांडरथालमध्येही सामाजीक जीवनपद्धती विकसित झालेली होती.
मॅमथची शिकार मुख्यतः अन्नासाठीच होत होती. विकसित होणार्या सामाजिक व्यवस्थेने एकत्र राहणार्या पण अजून दीर्घ काळ अन्नाची साठवण करण्याची समज न आलेल्या मानवी समुदायाला एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात अन्नपुरवठा करण्याचे साधन असेच मॅमथचे स्थान त्यावेळेस मानवी जीवनात होते असे म्हटल्यास खोटे ठरणार नाही.
मानवांनी केलेला शिकारीचा अतिरेक हे युरोप, अशिया आणि ऑस्ट्रेलियातले मॅमथ नष्ट होण्याचे एक फार महत्वाचे कारण आहे असा एक सिद्धांत आहे. प्राणीमित्रांचा विरोध असतानाही गेल्या एकाच शतकात माणसाच्या शिकारीने नष्ट झालेल्या किंवा नष्ट होऊ घातलेल्या प्राण्यांची यादी पाहिली तर हा सिद्धांत फार चूक असेल असे वाटत नाही. :)
हे मॅमथ म्हणजे हत्तीचे पुर्वज दिसतायत. हे जर खरच हत्तीचे पुर्वज असतील तर असे म्हणता येईल की मानवात जशी उत्क्रांती झाली तशी प्राण्यांमधेही होत असणार. उदा अफ्रिकन हत्ती आणि भारतिय हत्तीत जाणवण्या इतका फरक असतो. म्हणजे मानवा प्रमाणे इतर प्राणी देखील रहाण्या साठी / जगण्यासाठी नवनवीन जागा शोधत फिरत होते / असतात असे म्हणता येईल का? मानव मंगळावर वस्ती करता येईल का याची चाचपणी करत आहे तो पण याच प्रेरणेमुळे का?( हे दोन्ही या लेखमालेचे विषय नाहीत पण फक्त कुतुहल वाटले म्हणुन विचारले.)
दुसरी शंका म्हणजे हा सगळा प्रवास अफ्रीका अशिया युरोप आणि ऑस्ट्रेलिया असा दिसतो. पण कोलंबस जेव्हा अमेरीकेत गेला तेव्हा त्याचे स्वागत रेड इंडियन माणसांनीच केले. ते तिकडे कधी आणि केव्हा पोचले?
हे मॅमथ म्हणजे हत्तीचे पुर्वज दिसतायत.... अफ्रिकन हत्ती आणि भारतिय हत्तीत जाणवण्या इतका फरक असतो. ..
मॅमथ हत्तींचे पूर्वज नाहीत तर मॅमथ व हत्तींचे पूर्वज एकाच प्राण्यापासून
साधारण ५० लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाले (जसे मानव व ग्रेट एप्स एकाच
प्राण्यापासून उत्क्रांत झाले तसे) आणि अगदी ४,५०० वर्षांपूर्वी मॅमथ नष्ट
होइपर्यंत ते दोघे बरोबरीने रहात होते. मात्र त्यांच्या जीनोममध्ये खूप फरक
पडला असल्याने त्यांच्यात संकर शक्य नव्हता.
आफ्रिकन (Loxodonta ) आणि भारतिय (Elephas) हत्ती हे एकाच प्राणी फॅमिलीतले आहेत. त्यांच्यामधले दिसणारे बाह्य फरक हे त्या जमाती एकमेकापासून दशहजारो / लाखो वर्षे दूर राहिलेल्यामुळे झालेल्या स्वतंत्र उत्परिवर्तनाचा परिणाम आहेत.
मानवा प्रमाणे इतर प्राणी देखील रहाण्या साठी / जगण्यासाठी नवनवीन जागा शोधत फिरत होते / असतात असे म्हणता येईल का?
सुरक्षितपणे जिवंत राहणे आणि वंशवृद्धी करणे ह्या सर्वच प्राण्यांच्या
मूलभूत प्रवृत्ती आहेत. त्याकरिता (१) 'राहण्यासाठी पूरक व सुरक्षित
परिस्थिती (यात हवामान आलेच)' आणि (२) 'जगण्यासाठी योग्य व पुरेसे अन्न' ही
दोन कारणे सर्वकाल सर्वच प्राण्यांच्या (यात मानवप्राणीही अंतर्भूत आहे)
स्थलांतरासाठी कारण ठरत आलेल्या आहेत... गम्मत म्हणजे, नीट विचार केला तर
असे दिसेल की, आजही हीच मूळ दोन कारणे तशीच्यातशीच कायम आहेत !!!
मानव मंगळावर वस्ती करता येईल का याची चाचपणी करत आहे तो पण याच प्रेरणेमुळे का?
वरच्या प्रश्नाच्या उत्तरातच या प्रश्नाचे उत्तरही आहे.
पण कोलंबस जेव्हा अमेरीकेत गेला तेव्हा त्याचे स्वागत रेड इंडियन माणसांनीच केले. ते तिकडे कधी आणि केव्हा पोचले?
याचे सविस्तर उत्तर जेव्हा सफर पुढे जात अमेरिका खंडात जाईल तेव्हा येईलच.
डायनासोर्सच्या
विनाशाला तोबा सारखीच घटना कारणीभूत आहे असं कुठेतरी वाचलं होतं... त्या
घटनेचे रिपल इफेक्ट तोबाच्या वेळी जाणवण्याइतपत होते कि कसे? त्याचा वेगळा
परिणाम मानव वंशावळीवर दिसुन येतो काय?
अंदाजे ६.५ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या एका विनाशात पृथ्वीवरील जीवनापैकी 17% families, 50% genera आणि 75% species नष्ट झाल्या. त्यांतच डायनॉसॉर्स नष्ट झाले. या विनाशाचे नक्की कारण अजून माहित नाही... पण जी अनेक कारणे सांगीतली जातात त्यातली खालची महत्वाची आहेतः
१. साधारण ५-१५ किलोमीटर व्यासाची उल्का पृथ्वीवर (मेक्सिकोच्या युकातान व्दिपकल्पावर) आदळून उधळलेल्या धुळीने सुर्यकिरणांना अडवून हिमयुग निर्माण केले. कडाक्याच्या थंडीच्या परिणामाव्यतिरिक्त हवामानाच्या फरकाचा अजून एक परिणाम म्हणजे वनस्पती (जंगले) प्रचंड प्रमाणात नष्ट झाल्या... अर्थातच शाकाहारी डायनॉसॉर्सची उपासमार झाली.
२. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावरच्या डोंगरावरच्या ज्वालामुखींचे उद्रेक... हा उद्रेक तोबासारखाच पण अनेक पटींनी जास्त तिव्रतेचा आणि एक/काही हजार वर्षे चालू असलेला होता.
वरचा काळ ६.५ कोटी वर्षांपूर्वीचा असल्याने त्याचा तोबाच्या उद्रेकाशी (७४,००० वर्षांपूर्वीचा काळ) संबद्ध असणे शक्य नाही.
तोबाचा परिणाम म्हणुन मानवी चेहेरे पूर्व-पश्चिम असे बदलले गेले
कि काहि कारणाने काहि विशिष्ट मानव समुह तोबोत्तर काळात टिकुन राहिला व
त्याचाच चेहेरा पूर्व दिशेला मिळाला?
तोबाच्या उद्रेकामुळे दक्षिण आशियातील जीवन नष्ट झाले आणि तेथे अनेक शे/हजार वर्षे जीवन नांदू शकले नाही. मात्र त्यामुळे संपूर्णपणे विभागलेले भारताच्या दोन बाजूचे मानव समुह मोठ्या कालखंडाकरिता वेगळे राहिले. ते एकमेकात मिसळू शकले नाहीत, त्यांच्यातील उत्परिवर्तने संपूर्णपणे स्वतंत्रपणे होत राहिली आणि त्याचा परिणाम म्हणून या दोन मानवसमुहांचे सद्याचे बाह्यस्वरूप इतके वेगळे दिसते.
तोबाच्या राखेने समुद्री जीवांमधे देखील काहि दृष्य परिणाम घडवुन आणले काय? ते परिणाम मानवावर झालेल्या परिणामांशी जुळतात काय?
तोबाच्या उद्रेकाने जमिनीवरच्याप्रमाणेच पाण्यातले असंख्य जीव नष्ट झाले. पण वर सांगीतल्याप्रमाणे जशी जमिनीवरच्या प्राण्यांची (आणि मानवांची) खूप कालावधीसाठी पूर्ण विभागणी झाली तशी पाण्यामध्ये शक्य नव्हती. अर्थातच भारताच्या पुर्वेकडील आणि पश्चिमेकडील जलचर अशी विभागणी अपेक्षित नाही.
इंडो-युरोपियन
भाषा हा मात्र लै नंतरचा प्रकार आहे. १० हजार वर्षांपलीकडे ते असणे शक्य
नाही असे म्हणतात. तो एक अर्थात पूर्णच वेगळा प्रकार आहे म्हणा. असो.
मला वाटते तुमची "भाषांची वये" आणि "लिखीत भाषांच्या सापडलेल्या पुराव्यांची वये" या दोन फार वेगळ्या गोष्टीत गल्लत होतेय.
Australopithecine आदिमानवांत ग्रेट एप्सपेक्षा फार वेगळी संवादक्षमता नव्हती याबाबत शात्रज्ञांचे एकमत आहे. मानवात आदिभाषेचा (proto-language) वापर केव्हा सुरू झाला याबाबत अजून शात्रज्ञांचे एकमत नाही... काहिंच्या मते Homo habilis ने २३ लाख वर्षांपूर्वी, काहींच्या मते Homo erectus ने १८ लाख वर्षांपूर्वी, तर इतर काहिंच्या मते Homo heidelbergensis ने ६ लाख वर्षांपूर्वी तीचा वापर सुरू केला. मात्र शारिरीक दृष्ट्या पूर्ण उत्क्रांत झालेल्या Homo sapiens मध्ये १ लाख वर्षांपूर्वींनंतर लवकरच कधितरी आपल्याला आता मान्य असलेले गुणधर्म असलेल्या भाषा उत्क्रांत होऊ लागल्या याबाबत बहुतेक सर्वांचे एकमत आहे. हा काळ मानवाच्या आफ्रिकेतूबाबाहेर पडून अशियात येण्याच्या अगोदरचा आहे.
माणसे जसजशी जास्त जास्त दूरची वाटचाल करू लागली आणि त्यांच्यातले भौगोलीक अंतर वाढू लागले तसे रोजच्या वापरातील फरकाने भाषांत फरक होत गेले. मात्र मूळ भाषेचे काही विशेष तसेच पुढे जात राहिले आणि त्यांत अजून नविन भर पडत राहिली... ज्यांचा उपयोग करून भाषांचे वर्गीकरण केले जाते. हा भाषेच्या उत्क्रांतीच्या आणि जनुकीय उत्परिवर्तनांच्या उत्क्रांतीचा पाया एकाच प्रकारचा आहे... म्हणजे जुने बरोबर घेउन वाटचाल आणि त्यांत नविन भर ! (अर्थात यांत जनुकीय उत्क्रांतीचा भाषेच्या उत्क्रांतीशी परस्पर संबध लावलेला नाही, फक्त या दोन उत्क्रांतींतिल साम्यस्थळ नोंदवले आहे.)
सर्व भाषा प्रथम मुख्यतः खाणाखूणा आणि काही प्रमाणात ध्वनीचा वापर करून उत्क्रांत होत गेल्या. यात त्याकाळची गरज हे एक मोठे कारण होते. उदा. आफ्रिकेतल्या बहुतेक सगळ्या भाषांत चक् चक् असे काहिसे आवाज आहेत. प्राण्यांनी मानवी आवाज ऐकून बुजून जाऊन पळून जावू नये म्हणून त्यांची शिकार करताना असे जंगलात सामान्य वाटणारे आवाज वापरून एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी या खुणांचा अगदी सुरूवातीपासून उपयोग केला जात असावा. आणि आता ते आवाज आफ्रिकाभरच्या बर्याच भाषांत फारसा बदल न होता तसेच वापरले जातात... आज अन्नासाठी शिकार आवश्यक नसली तरी!
सुरुवातीला सर्व भाषा बोलीभाषाच होत्या आणि त्यांची वाटचाल मानवाच्या वाटचालीबरोबर "स्मृती-श्रुती" अशीच झाली. याच कारणाने सर्व खूप जुने साहित्य काव्यमय आहे... लयबद्ध रचनेमुळे माहिती, लक्षात ठेवायला सोपी आणि सहज बदल न होता मूळ रुपात पिढ्या न पिढ्या पुढे नेणे शक्य झाले. अर्थात काव्यात्मकतेने आणि गायनाने माहिती मनोरंजक होऊन तिच्याबद्दल आकर्षण कायम ठेऊन ती पुढे नेणे शक्य झाले, हा एक अजून फायदा होताच.
पुढची पायरी म्हणजे मानव चिन्हे वापरून भाषा "लिहू" लागला... झाडाच्या पानावर, लाकडावर, ओल्या मातीच्या पाट्यांवर, नाण्यांवर, दगडांवर, वगैरे, वगैरे. यातले बहुतेक सर्व प्राचीन पुरावे त्यांच्या नश्वरतेमुळे काळाबरोबर नष्ट झाले... त्यानंतरच्या काळातले काही (विषेशतः दगड व धातूंवरचे) शिल्लक राहिले... त्यातले काही आतापर्यंत सापडले आहेत. अर्थात जे सापडले आहेत त्यांचे महत्व वादातीत आहे, मात्र ते पुरावे सगळी कहाणी सांगू शकत नाहीत. आजच्या भाषांतील जुने अवशेष आणि त्यांचा एकमेकाशी असणारे संबद्ध यांची वये ठरवण्याची साधने पूर्वी नव्हती... त्यामुळे त्याबाबतीत थियरीच्या पुढे प्रगती नव्हती. जनुकशास्त्राने मानवाच्या प्रवासाची दिशा आणि वेळ नक्की करण्यासाठी जे पुरावे द्यायला सुरूवात केली आहे आणि ते भाषाशात्रातही फार महत्वाचे ठरू लागले आहेत.
याबाबतीत जालिय उत्खनन करताना भाषांच्या आजच्या वापराप्रमाणे काढलेला खालील नकाशा सापडला...
मला वाटते तुमची "भाषांची वये" आणि "लिखीत भाषांच्या सापडलेल्या पुराव्यांची वये" या दोन फार वेगळ्या गोष्टीत गल्लत होतेय.
नाही. भाषांची वये अन लिखित पुराव्यांची वये हे वेगळे असतात हे मला अर्थातच मान्य आहे. पण काही लिंग्विस्ट लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भाषा बदलाचा वेग तसा जास्त असतो. अन भाषा ५-७ हजार वर्षांनंतर पूर्णपणे वेगळी बनते.
तुमचे बाकीचे विवेचन अर्थातच सुसंगत आहे, पण भाषा रीकन्स्ट्रक्ट करायचे प्रयत्न जे होतात त्यांत एका पॉइंटनंतर खूप मर्यादा येतात, काही अॅझम्प्शन्स मांडावीत तर कशाचीच धड शाश्वती देता येत नाही. विशेषतः जे "कोअर" असते त्याबद्दल. १० हजार वर्षांनंतरही कोअर कितपत शिल्लक राहते, मला कल्पना नाही. मी याबद्दल फारसे वाचलेले नाही आणि जे थोडेथोडके वाचलेय त्यानुसार फारसे काही शिल्लक राहत नाही. असो.
विशेषतः जे "कोअर" असते त्याबद्दल. १० हजार वर्षांनंतरही कोअर कितपत
शिल्लक राहते, मला कल्पना नाही. मी याबद्दल फारसे वाचलेले नाही आणि जे
थोडेथोडके वाचलेय त्यानुसार फारसे काही शिल्लक राहत नाही. अगदी खरे !
याकरताच केवळ भाषाशास्त्रिय पुराव्यांवर (शब्द, व्याकरण, वगैरे) अवलंबून न राहता आणि विशेषतः बर्याच अपभ्रंशित झालेल्या भाषाशास्त्रिय पुराव्यांना (जे बरेचसे व्यक्तिसापेक्ष असू शकतात) जनुकशास्त्राने सिद्ध केलेल्या वंशावळीचा खात्रीचा पुरावा जोडून त्याचा विश्वासूपणा पडताळून आता अनेक दशहजार वर्षे मागे जाता येते.
जनुके खोटे बोलत नाहीत (म्हणजे त्यांनी दिलेले पुरावे व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि ते इतर शास्त्रज्ञांना स्वतंत्ररित्या परत पडताळून खात्री करता येण्याजोगे असतात) त्यामुळे ते स्वतंत्रपणे वापरता येतात अथवा इतर सिद्धांतांना विश्वासू मापदंड म्हणूनही वापरता येतात.
याकरताच केवळ भाषाशास्त्रिय पुराव्यांवर (शब्द, व्याकरण, वगैरे) अवलंबून न राहता आणि विशेषतः बर्याच अपभ्रंशित झालेल्या भाषाशास्त्रिय पुराव्यांना (जे बरेचसे व्यक्तिसापेक्ष असू शकतात) जनुकशास्त्राने सिद्ध केलेल्या वंशावळीचा खात्रीचा पुरावा जोडून त्याचा विश्वासूपणा पडताळून आता अनेक दशहजार वर्षे मागे जाता येते.
जनुके खोटे बोलत नाहीत (म्हणजे त्यांनी दिलेले पुरावे व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि ते इतर शास्त्रज्ञांना स्वतंत्ररित्या परत पडताळून खात्री करता येण्याजोगे असतात) त्यामुळे ते स्वतंत्रपणे वापरता येतात अथवा इतर सिद्धांतांना विश्वासू मापदंड म्हणूनही वापरता येतात.
जनुके हे वादातीत पुरावे आहेत याबद्दल दुमत होण्याचे कारणच नाही. पण भाषा आणि ती भाषा बोलणार्यांच्या जनुकांचा संबंध लावताना लै केअरफुल राहिले पाहिजे. यासंबंधी काही लिंक्स असतील तर कृपया द्याव्यात, वाचायला आवडेल.
पण भाषा आणि ती भाषा बोलणार्यांच्या जनुकांचा संबंध लावताना लै केअरफुल राहिले पाहिजे.
नक्कीच. हा प्रकार मुख्यतः भाषाशात्राद्वारे केलेले अस्पष्ट दावे तपासून
बघायला करतात... उलट्या दिशेने नाही. नक्कीचे दुवे जरा हुडकून मग डकवतो.
आवांतर :
१. Caste bar on marriages became entrenched 2000 years ago, genetic study finds: आजच्या The Times of India च्या जालिय आवृत्तीत आलेली ही बातमी येथे पहा. प्राचीन तारखा नक्की करण्यासाठी जनुकशास्त्र कसे उपयोगी पडते याचा हा एक उत्तम पुरावा आहे.
२. India lost 220 languages in last 50 years, survey finds: ही पण The Times of India त आजच आलेली एक बातमी येथे पहा.
(अर्थात
यांत जनुकीय उत्क्रांतीचा भाषेच्या उत्क्रांतीशी परस्पर संबध लावलेला
नाही, फक्त या दोन उत्क्रांतींतिल साम्यस्थळ नोंदवले आहे.) याबाबतचे
वरचे ढीस्क्लेमर मूळ प्रतिसादात दिले होते. मात्र ते साम्यस्थळ इतके समान
आहे की त्याचा उल्लेख केल्यशिवाय पुढे जाणे ठीक वाटले नाही, इतकेच.
अर्थात, महत्वाचा मुद्दा असा की प्रथम स्थलांतर आणि नंतर राजकीय / आर्थिक / सामाजीक कारणांनी एका भाषेचे दुसरीवर आक्रमण होत होते, होत आहे आणि होत राहील... यातल्या नंतरच्या कारणांचा प्रभाव पडून अनेक भाषा इतक्या बदलल्या आहेत की त्यापुढे जनुकीय सरमिसळ काहीच नाही ! तसेच एक भाषा जरी आक्रमकतेने दुसरीवर प्रभाव पाडत असली तरी दुसर्या भाषेचाही आक्रमक भाषेवर कमी पण काहीना काही प्रभाव पडतच असतो. एकंदर हे प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचे आणि कदाचित् त्यामुळेच प्रचंड आकर्षक आहे ;)
युरोप व ऑस्ट्रेलियात पुढे वाटचाल आणि उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात पदार्पण (५२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी)
शेवटच्या हिमयुगातील सर्वात गरम असलेल्या ५,००० वर्षांचा कालच्या कालखंडाने मानवाला युरोपमध्ये शिरकाव करण्याची संधी प्राप्त करून दिली या बाबत संशोधकांचे एकमत आहे. पण हे मानव कोठून आले याबाबत फार पूर्वीपासून अनेक अंदाज, सिद्धांत आणि समजुती होत्या. अगदी पाच दहा वर्षांपूर्वीपर्यंत जनुकशास्त्राने निर्विवाद पुरावे द्यायला सुरुवात करेपर्यंत कोणताच दावा मग तो कितीही सामान्य पुराव्यावर अवलंबून असला तरी पूर्णपणे खोडून काढणे शक्य नव्हते... कारण त्या काळापर्यंत याबाबतीत बहुतेक सर्व अंदाज, सिद्धांत आणि समजुती अश्याच सबळ नसलेल्या पुराव्यांवर अवलंबून होत्या ! हा सगळा गुंता उलगडणारा शास्त्रीय प्रवास खूपच रोचक आहे, म्हणून त्याबाबत थोडी माहिती घेऊ या.
लेव्हांत मार्गे ५०,००० वर्षांपूर्वी युरोपमध्ये प्रवेश केलेल्या मानवांच्या वंशजांत U5 हे युरोपातले सर्वात जुने आणि आजतागायत शिल्लक असलेले उत्परिवर्तन सापडते. याचा अर्थ असा नाही की हेच एक उत्परिवर्तन झाले... या कालावधीत नक्कीच अजून अनेक उत्परिवर्तने निर्माण झाली असणार, मात्र आजतागायत हे एकच शिल्लक राहिले आहे आणि त्या काळाची इतर परिवर्तने असणारे वंश नष्ट झाले आहेत. त्यामुळे U5 ला सर्व युरोपची जननी समजले जाते.
"U" आणि U5 ही तिची पाचवी मुलगी (आणि युरोपची आई) मायटोकाँड्रियल इव्ह सारख्याच जनुकशास्त्राने सिद्ध झालेल्या सैद्धांतिक मातृवंशावळी आहेत. मानवाच्या युरोप प्रवेशाच्यावेळी निर्माण झालेले U5 हे उत्परिवर्तन आर्मेनिया, तुर्कस्तान, अझरबैजान आणि कुर्दिस्तानापासून सुरू होऊन पूर्व, मध्य आणि दक्षिण युरोपमध्ये गेले... स्पेनच्या बास्क प्रांतातील जुन्या जमातीत हे उत्परिवर्तन मूळ रूपात कायम आहे. (हे फक्त तेथेच तसे मूळ स्वरुपात का राहिले? याचे कारण पुढच्या भागात येईल). हा युरोपातील प्रवासाचा मार्गही तेथल्या त्या काळच्या हवामानाशी मिळता जुळता आहे, कारण हिमयुगाच्या त्या काळात उत्तर युरोप आणि स्कँडेनेव्हिया थंडीच्या कडाक्याने गोठलेले भूभाग होते आणि तेथे मानववस्तीसाठी योग्य परिस्थिती नव्हती.
"U" ची वंशावळ जरी लेव्हातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तरी अतिपूर्वेत तिचा पूर्ण अभाव आहे. मात्र तिची एक प्राचीन बहिणवंशावळ अरबी खाडीच्या पूर्व किनाऱ्याच्या आणि भारतीय महासागराच्या किनाऱ्याच्या मार्गाने (आताच्या इराण, पाकिस्तान मार्गे) भारतातील "U2i" शी जोडलेली आहे.
अजून फार खोलात न जाता हे सगळे मातृवंशपुराण सोपे करून असे आहे :
१. आफ्रिकेत मायटोकाँड्रियल इव्ह ही आज जिवंत असणाऱ्या सगळ्या मानवांची जननी आहे.
२. मायटोकाँड्रियल इव्हच्या आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या मुलींपैकी "L3" ह्या एकुलत्या एका मुलीची वंशावळ जिवंत आहे... म्हणजे ती अफ्रिकन सोडून इतर सर्व मानवांची जननी आहे.
३. "L3" ची मुलगी "N" (Nasreen).
४. "N" ची मुलगी "R" (Rohani).
५. "R" ची मुलगी "U" (Europa).
६. "U" ची मुलगी "U5", जी सगळ्या युरोपियन मानवांची जननी आहे.
"U" ची आई "R" आणि आजी "N" ही उत्परिवर्तने दक्षिण आशिया सोडून इतर कोठेच सापडत नाहीत. आणि भारतात सापडणारी "R" ची अनेक उपउत्परिवर्तने इतर कोठेच सापडत नाहीत आणि त्यांच्यावरून केलेला "R" च्या वयाचा अंदाज ५५,००० वर्षांपूर्वीचा आहे. हा काळ मानवाच्या युरोपात शिरण्याच्या काळाच्या (५०-५१,००० वर्षांपूर्वीच्या) अगोदरचा आहे. यावरून युरोपियन मानव भारतीय उपखंडातून पुढे तेथे गेला हे सिद्ध होते.
=====================================================================
दक्षिण युरोपमध्ये मानवाचा शिरकाव होत होता त्या वेळेस मानवाचा वावर सर्व ऑस्ट्रेलियाभर पसरला होता. ऑस्ट्रेलियात पदार्पण करणाऱ्या आधुनिक मानवांना तेथे कोणताच प्रतिकार झाला नाही कारण ते तेथे पाय ठेवणारे पहिले मानव होते आणि आतापर्यंतच्या तीसएक हजार वर्षांच्या शिकारीच्या अनुभवामुळे इतर प्राण्यांचा त्यांना फार प्रतिकार होणेही शक्य नव्हते. पण याचा अतिरेकी परिणाम असा झाला की मानवाने तेथील बरेचसे प्राणीजीवन गट्टम करून नष्ट केले. यात ऑस्ट्रेलियात प्राचीनकाळी असणाऱ्या मॅमथसारख्या प्रचंड प्राण्यांचाही समावेश होता. काही शास्त्रज्ञांच्या मते या मानवांनी आपल्या अग्नीसंबद्धीच्या ज्ञानाचा उपयोग जंगले जाळून प्राण्यांची शिकार करण्यासाठीही केला.

=====================================================================
उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात पदार्पण (४५,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी)...
मागच्या सगळ्या सफरींप्रमाणेच पुढची वाटचालही काही मुख्य नियमावली पाळत पुढे चालू राहिली, ती नियमावली अशी :
१. जीवनाला आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांपासून फार दूर भटकू नका.
२. नियमित पावसाची हमी असणाऱ्या भागातच वस्ती अथवा प्रवास करा.
३. प्रवास करताना वाळवंटी अथवा उंच डोंगर असलेला भूभाग टाळा.
४. प्रवास समुद्रकाठाने अथवा नदीकाठाने आणि मुबलक शिकार असलेल्या भागातून करा.
४५,००० वर्षापुर्वी सुधारणाऱ्या हवामानाचा फायदा घेत लेव्हांतमधले काही मानव दक्षिणेकडे वळून इजिप्तमार्गे उत्तर आफ्रिकेत भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्याने पुढे निघाले. त्यांची पुढची वाटचाल बहुतांशी वरची नियमावली पाळत पुढे सुरू राहिली.
मात्र यावेळेपर्यंत अशियातील मानव समुद्राकिनारा सोडण्याचे धाडस करू लागले होते. आफ्रिका सोडल्यावर समुद्रकिनाऱ्याने पुढे पुढे जाताना त्यांना दर शंभरएक किलोमीटरला आडव्या येणाऱ्या खाड्या पार करत जावे लागले होते. त्यामुळे त्यांच्यातले काही मळलेली वाट सोडून नदीकिनारा धरून उत्तरेस जाण्याचे धाडस करू लागले असावेत. नदीकिनाऱ्याने असलेले भरपूर वनस्पतीजन्य अन्न आणि गोड्या पाण्याच्या साठ्याजवळ मिळणारी भरपूर शिकार ही कारणेही त्यांना आकर्षक वाटली असावी. मात्र जास्त उत्तरेकडे गेल्यावर कमीत कमी ३ किलोमीटर उंच असणार्या हिमालय पर्वताच्या रांगांचा मोठा अडथळामध्ये येत होता. त्याचबरोबर जास्त जंगली प्रदेशात गेल्यास त्यातल्या श्वापदांचा धोकाही होता. तरीसुद्धा ४५ ते ४०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात हे अडथळे पार करून मानवांच्या अनेक धाडसी जथ्यांनी यशस्वी गिर्यारोहण करत उत्तर आशियात प्रवेश केला.
हे प्रवास मुख्यतः नदीकिनार्यांना धरून उत्तरेकडे जाणार्या चार मार्गांनी झाले...

१. एक मार्ग सिंधू नदीच्या काठाने वर जात जात कश्मीरमार्गे मध्य आशियात (आताच्या ताजिकिस्तान, किर्घिस्तान आणि कझाकिस्तान मध्ये) शिरला. या मार्गातले काहीजण जरा जास्त पश्चिमेकडे जात अफगाणिस्तानमार्गे खैबर खिंड पार करत मध्य आशियात पोहोचले. हा दुसरा मार्ग वाटेत असलेल्या वाळवंटी प्रदेशामुळे जरी जास्त खडतर होता तरी या धाडसी प्रवाश्यांना अशक्य मुळीच नव्हता.
मध्य आशिया आणि पूर्व चीनचा शिनजियांग प्रांत आज जरी वाळवंटी असले तरी त्याकाळी ते हिरविगार कुरणे आणि नद्या असलेले समृद्ध भूभाग होते. त्याकाळी तेथे वाढलेले मॉस, लिचेन्स, गवत आणि छोटी झुडूपे हे मॅमथ, घोडे, बायसन, जायंट हरिण आणि रेन्डियर यांचे आवडते खाद्य होते. असा या भागात असलेला आवडत्या अन्नाचा मुबलक साठा हे मानवासाठी एक फार मोठे आकर्षण होतेच ! या भागाला तेथिल मॅमथच्या मुबलकतेमुळे "मॅमथ स्टेप्पे" असे नाव पडले आहे.
२. दुसर्या भागातले म्हणजे हिमालयाच्या पुर्वेच्या बाजूने जाणारे चार मार्ग होते. आताच्या बांगलादेशातून वाहणार्या ब्रम्हपुत्रा नदीच्या काठाने; ब्रम्हदेशातून वाहणार्या सालवीन नदीच्या काठाने; व्हिएतनाममधील मेकाँग नदीच्या काठाने; आणि चीनमधील यांगत्सेच्या काठाने ते मार्ग उत्तरेकडे गेले. या चारही महानद्या दक्षिणपूर्व तिबेटमध्ये एकमेकाजवळ उगम पावून १५० किलोमीटरपर्यंत एकमेकापासून फक्त काही किलोमीटर अंतरावरून वाहतात. या नद्यांच्या प्रवाहांनी बनलेल्या कमी उंचीच्या दर्या आणि खोर्यांनी या मानवाना तिबेटच्या दक्षिणपूर्वेस पोचायला मदत केली. तेथून ते पुढे तिबेट, मध्यपूर्व आणि मंगोलियापर्यंत पसरले. यातला शेवटचा यांगत्सेवरचा मार्ग अजूनही चीन-तिबेट व्यापारासाठी वापरात आहे.
३. समुद्रकिनार्याने अगदी पुढे जाऊन चीनमध्ये पोहोचलेले काही मानव मागे फिरून काही काळानंतर रेशिम मार्ग म्हणून प्रसिद्ध झालेल्या मार्गावरून पश्चिमेकडे निघून मॅमथ स्टेप्पेपर्यंत पोहोचले.
४. या वरच्या जथ्याच्याही पुढे गेलेले आणि आताच्या रशियाच्या अतीपूर्व भागात पोहोचलेल्या मानवातील काहीजण परत फिरून पश्चिमेकडे निघाले आणि मॅमथ स्टेप्पेपर्यंत पोहोचले. यांच्यातले काही त्याकालच्या उथळ समुद्रमार्गाने साखालीन (सोहालिन, कोरफुतो) बेटामार्गे जपानमध्ये गेले.
हा सगळा प्रवास जरी ४२-४०,००० वर्षांपूर्वी सुरू झाला असला तरी जवळ जवळ ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मानवी लाटांच्या स्वरुपात अव्याहत चालू होता. त्याकाळातल्या हिमयुगाच्या मधून मधून येणार्या गरम कालखंडांनी (interstadials) या प्रवाश्यांना खूपच मदत केली.
अशा तर्हेने आशियाचा (अतीउत्तरेकडचा सायबेरिया सोडता) बहुतेक सगळा भाग मानवाने पादाक्रांत केला.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
युरोप आणि आशियातील पुढची वाटचाल आणि अमेरिकेत शिरकाव (४०,००० ते २२,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
पुढचा प्रवास सुरू करण्याअगोदर जरा दोन नैसर्गिक आश्चर्ये पाहून पुढे जाऊया.
वॉलेस रेखा
आल्फ्रेड रसेल वॉलेस या चार्ल्स डार्वीनच्या समकालीन शात्रज्ञाने एक फार आश्चर्यकारक सत्य नोंदवून ठेवले आहे. त्याने मलाय आणि इंडोनेशियन व्दीपसमुहामधे नकाश्यावर बोर्निओ आणि सेलेबेस बेटांच्या मधून जाणारी आणि बालीच्या पूर्वेकडे असणारी एक रेषा आखली, तिला वॉलेस रेखा असे म्हणतात.
या रेषेच्या जवळची बेटे जरी एकमेकापासून अगदी जवळ असली तरी... या रेषेच्या पश्चिमेस असलेल्या बेटांवर फक्त आशियन प्राणी आणि पूर्वेस असलेल्या बेटांवर फक्त ऑस्ट्रेलियन प्राणी आहेत. त्यांच्यात सरमिसळ झालेली नाही. हिमयुगाच्या अगदी कडाक्यातही हे दोन भूभाग पाण्याने विभागले होते त्यामुळे हे झाले असावे इथपर्यंत ठीक आहे. पण गमतीची गोष्ट अशी की काही थोडेसे अपवाद सोडता बहुतेक सगळ्या पक्षी जमातीही ही रेखा ओलांडून ओलांडून थोडेसे दूर असलेल्या रेषेपलीकडच्या बेटावर उडून जात नाहीत !
ही रेखा दाखवणारा इंटरअॅक्टिव्ह नकाशा येथे पहा.
=====================================================================
होमो फ्लोरेसिएन्सिस (Homo floresiensis) अथवा हॉबिट्स
इंडोनेशियाच्या फ्लोरेस नावाच्या बेटावर सन २००३ मध्ये सापडलेल्या काही मानवी अवशेषांनी शात्रज्ञांत मोठी खळबळ उडवली. या सांगाड्यांवरून असे दिसत होते की ती पूर्ण वाढीच्या मानव / मानवसदृश प्राण्याची हाडे होती... पण त्यांची उंची साधारण १.०६ मीटर म्हणजे साडेतीनफूटीच होती !
या भागात फार काळापासून बुटक्या जमातीचे तुरुतुरु धावणारे लोक बधितल्याच्या अनेक दंतकथा पसरलेल्या होत्या. त्यांच्यामुळे चर्चेला अगदी उधाण आले. पण येथे सापडलेल्या सांगाड्यांची वये ९४,००० ते १३,००० वर्षांमध्ये होती. त्यामुळे त्या मानवांना किंवा हॉबिट्सना प्रत्यक्ष धावताना बधितल्याच्या कथा केवळ मानवी कल्पनेचा आविष्कार होता हे नक्की झाले.
हे क्रॅनिओस्टेनॉसिस / मायक्रोसेफॅली (एका आजार, ज्याच्यात कवटीची हाडे सामान्य वेळेच्या अगोदर एकमेकाला कायम सांधली जातात आणि त्यामुळे कवटीचा आकार खूप लहान राहतो) या रोगाचे शिकार असलेले आधुनिक मानव होते असाही एक सिंद्धांत मांडला गेला. मात्र आता बहुतेक शास्त्रज्ञांचे असे एकमत झाले आहे की ते Homo floresiensis या स्पेसिजचे वेगळे मानव व आधुनिक मानवाचे चुलत भाऊ होते आणि साधारण १३,००० वर्षांपूर्वी नष्ट झाले.
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी (वॉशिंग्टन, डी सी) मधील Homo floresiensis च्या अवशेषांच्या आधारे बनवलेला डोक्याचा पुतळा (आंतरजालाच्या सौजन्याने)...
=====================================================================
या थोड्याश्या गमतीदार अवांतरानंतर आपला प्रवास परत सुरू करूया.
४०,००० वर्षांपूर्वी मध्य आशियातील काही धाडसी मंडळी उरल पर्वताच्या उत्तरेकडे आर्क्टिक सर्कल ओलांडूनही अधिक उत्तरेला पोहोचली होती !
मात्र ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मध्यउत्तर आशियात मानवाने बर्यापैकी बस्तान मांडले होते. हा मुख्यतः दक्षिण रशियातील अल्ताय (Altai) पर्वत आणि बैकल तळ्यापासून (Lake Baikal) ते पूर्वेकडच्या अल्दान (Aldan) नदीपर्यंतचा भाग त्या काळी जंगलाने भरलेला आणि प्राण्यांनी समृद्ध होता. त्याच्या मोहाने पूर्व युरोपातीलही काही टोळ्यांनीही या भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे सापडतात. पण त्यांचा प्रभाव खोलवर मध्य अथवा दक्षिण चीनपर्यंत पोहोचलेला दिसत नाही.
या काळात या मानवांचा नियांडरथाल आणि होमो इरेक्टस यांच्याशी संपर्क आला. जरी हे दोन मानव एकमेकाबच्या बाजूला हजारो वर्षे राहिले तरी त्यांचा संबद्ध फार जवळचा होता असे दिसत नाही. कारण आधुनिक मानवात नियांडरथालची फक्त १ ते ४ % जनुके आहेत.
साधारण ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत नियांडरथाल नष्ट झाले होते... ते का? याचे नक्की उत्तर अजून माहीत झाले नाही. पण जास्त सुधारलेल्या होमो सेपियन बरोबरच्या चढाओढीत ते हरले किंवा कोण्या रोगाच्या साथीचे बळी ठरले असे दोन मुख्य सिद्धांत आहेत. यातला पहिला सिद्धांत जास्त योग्य वाटतो... नियांडरथाल तुलनेने बुटके पण जाड्या बांध्याचे होते त्यामुळे त्यांना अधिक अन्नाची गरज असे. त्यांची हत्यारे तुलनेने खूपच बोथट आणि जुनाट प्रकारची होती त्यामुळे त्यांची शिकार करण्याची पद्धत धोकादायक आणि कुवत कमी होती. त्यामानाने आधुनिक मानव उंच आणि सडपातळ होते व त्यांची अन्नाची गरज तुलनेने कमी होती. त्यातच शारीरिक चपळपणामुळे, सुधारलेल्या मेंदूमुळे आणि सुधारलेल्या हत्यारांमुळे त्यांची शिकारीची क्षमता बरीच जास्त होती. अर्थात आधुनिक मानवापुढे नियंडरथालचा टिकाव लागला नाही.
आतापर्यंत जास्त अनुभवी झालेले आणि अन्नाच्या मुबलकतेने संख्या वाढलेल्या चुळबुळ्या मानवांना एका जागेवर फार काळ थांबता आले नाही. त्यातले काहीजण मॅमथ स्टेप्पे पासून वेगवेगळ्या दिशांनी दूर भटकायला लागले होते...

१. मध्य आशियाच्या पूर्वेकडच्या भागातले मानव हिमयुगाच्या थोडासा कमी होणार्या कडाक्याचा फायदा घेत पश्चिमेकडे निघाले आणि पूर्व युरोपात पोहोचले. त्यातले काहीजण थंडीला न जुमानता सरळ उत्तरेकडे निघाले आणि आता ज्याला आपण स्कँडिनेव्हिया म्हणतो त्याच्या अतीउत्तर टोकापर्यंत पोहोचले... हेच ते आर्क्टिक किंवा उत्तर धृवप्रदेशीय किंवा उत्तर टंड्रा भागात राहणार्या सामी अथवा लाप लोकांचे पूर्वज.
२. वरच्या लोकांच्या पूर्वेकडे असणारे मध्य आशियन पूर्वेकडे निघाले आणि बरीच मजल दरमजल करत सायबेरीयाच्या अतिपूर्व टोकाला पोहोचले.
३. व ४. चार महानद्यांच्या काठाने मध्य आशियात पोचलेले मानव आणि समुद्रकाठाने चीनमार्गे सायबेरियात पोहोचले मानव हे दोघेही उत्तरपूर्वेस जात जात वरच्या दुसर्या क्रमांकाच्या जथ्याच्या जवळपास सायबेरीयाच्या अतीपूर्व टोकावर पोहोचले.
=====================================================================
अमेरिकेत प्रवेश (२५,००० ते २२,००० वर्षांपूर्वी)
आजच्या घडीला सायबेरिया आणि अलास्का बेरिंग समुद्राने / खाडीने (Bering Strait) विभागले गेलेले आहेत. त्या काळात चालू असलेल्या शेवटच्या हिमयुगाच्या कडाक्याने (Last Glacial Maximum, LGM) समुद्राच्या पाण्याची उंची १०० मीटरपर्यंत खाली गेल्यामुळे तेथे उघड्या पडलेल्या जमिनीचा बेरिंगिया नावाचा १३ लाख चौरस किलोमीटर आकाराचा खंडप्राय भूभाग होता आणि त्याने सायबेरिया आणि अलास्काला जमिनीने जोडले होते.
सायबेरियाच्या पूर्व भागात अनेक ठिकाणाहून मानवी टोळ्या आल्या असल्या तरी तो भूभाग बराच मोठा असल्याने आणि प्रत्येक टोळीची पोचण्याची वेळ वेगळी असल्याने त्यांच्यात फार थोडीशीच सरमिसळ झाली. त्यामुळे अमेरिकेत अनेक विभिन्न जनुकीय (A, B, C, D आणि X ) आणि सांस्कृतिक वंशावळी स्वतंत्रपणे शिरल्या आणि विस्तार पावल्या. अमेरिका खंडाच्या प्रचंड आकारामुळेही या वंशावळींना एकमेकापासून दूर राहणे आणि स्वतंत्रपणे विस्तारणे शक्य झाले.
मानवाचा अमेरिकेत प्रवेश मुख्यतः दोन प्रकारे झाला...

एक जथा पूर्वीचा बीच कोंबींगचा अनुभव वापरत किनारपट्टीने जात प्रथम अलास्का आणि नंतर अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरून खाली जात राहिला. पाण्यातून होणारा हा प्रवास जास्त वेगाने झाला असे दिसते. एक विशेष म्हणजे हे होडकी वापरणारे बीच कोंबर ज्या जमातीतून पुढे आले त्यातले पूर्व इंडोनेशियात मागे राहिलेले मानवही दर्यावर्दी होते. त्यांनी १७,००० वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण आणि दक्षिणपूर्व प्रशांत महासागरातील बेटे (पॉलिनेशिया) काबीज केली होती.
दुसरा मार्ग पहिल्याच्या उत्तरेकडून आणि पूर्णपणे जमिनीवरून अथवा बर्फावरून प्रथम सरळ पश्चिमेकडे गेला आणि नंतर खाली वळून १९,००० ते १६,००० वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर पेन्सिल्वानिया आणि दक्षिण कॅरोलायना येथे पोहोचला.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
या वॉलेस लाईनचा संबंध भूकंपप्रवण क्षेत्र/ रेखा याच्याशी असू शकेल का?
म्हणजे instinctively प्राण्याना कळले की या भागातली जमीन/ पाणी थरथरतंय... तिथे जायचं नाही... असं काही?
ही रेषा युरेशियन सूंदा भूमीपृष्ठ आणि ऑस्ट्रेलियन साहूल भुमीपृष्ठ यांच्या संधीची रेषा आहे आणि तिच्या दोन बाजूचे भूभाग सतत पाण्याने विभागलेले राहिले आहेत, त्यामुळे प्राणीजीवन वेगळे आहे. मात्र काही पक्षी ही रेखा का ओलांदून जात नाही याचे कारण अजून माहित नाही. याचे भूकंप हे कारण नक्की नाही.
Homo floresiensis हॉबिट!! हे निअँडर्थल मानवाला जवळचे होते का? त्यांचंही वर्णन जवळपास येणारं दिसतंय.
Homo या ग्रेट एप्सच्या प्रजातीमधून Australopithecus अनेक आदीमानव उत्क्रांत होत राहिले आणि सरतेशेवटी आधुनिक मानव उत्क्रांत झाला. Australopithecus प्रजातीत H. habilis, Homo ergaster, Homo erectus, Homo heidelbergensis, Homo neanderthalensis, इंडोनेशियाती फ्लोरेस बेटावर अवशेष सापडलेले Homo floresiensis and चीनच्या ग्वांगशी झुऑन प्रांतात रेड डियर आणि लाँगलीन गुहेत अवशेष सापडलेले Red Deer Cave people अशा अनेक स्पेसिज निर्माण झाल्या.
याचा अर्थ असा की Australopithecus पासून सर्व आदीमानवांचे व आधुनिक मानवाचे (Homo sapiens) पूर्वज उत्क्रांत झाले. म्हणून ह्या सगळ्या स्पेसिज एकमेकाचे चुलत (? मावस) नातेवाईक म्हणायला हरकत नाही.
***
Homo sapiens सोडून बाकी सगळ्या स्पेसिज एक एक करत नष्ट झाल्या आहेत आणि फक्त तीन स्पेसिज आधुनिक मानवाच्या कालखंडात जिवंत होत्या...
Homo neanderthalensis: साधारण २४,५०० वर्षांपुर्वीपर्यंत
Homo floresiensis: साधारण १३,००० वर्षांपूर्वीपर्यंत
Red Deer Cave people: साधारण ११,५०० वर्षांपूर्वीपर्यंत
***
Homo neanderthalensis पुरुषांची सरासरी उंची १६४ ते १६८ सेमी म्हणजे साधारण साडेपाच फूट आणि स्त्रियांची १५२ ते १५६ सेमी म्हणजे साधारण पाच फूट होती; ते शरिराने धिप्पाड होते, सरासरी वजन पुरुषाचे ७८ व स्त्रीचे ६६ किलो होते; आणि त्यांचा पुर्ण वाढ झालेला मेंदू आकाराने आधुनिक मानवापेक्षा मोठा. त्यांच्यातील काही जणांची कातडी उजळ वर्णाची आणि केस तांबडे असावे असा अनुकशास्त्रीय अंदाज आहे.
Homo floresiensis हे खूप खुजे म्हणाजे साधारण साडेतीन फुटी उंचीचे, गडद वर्णाचे आणि त्याच्या कवटीचा आणि मेंदूचा आकार आधुनीक मानवापेक्षा खूप छोटा (४२६ घन सेमी) आणि साधारण चिंपँझीएवढा होता.
तिसरी महाआपत्ती
इतक्या मोठ्या प्रवासात सगळे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आणि जेवढा प्रवास मोठा तेवढे प्रचंड उलथापालथ घडविणारे प्रसंगही येणारच हे पण अपेक्षित आहेच. मात्र अश्या महाआपत्ती मानववंशावर दर वेळेस काही खास फार दूरगामी परिणाम करून जात होत्या. अश्याच एका महाआपत्तिची सुरुवात २२,००० वर्षांपूर्वी झाली आणि अर्थातच तिच्यात नेहमीप्रमाणेच हवामानाने मुख्य खलनायकाची भूमिका बजावली.
२२,००० वर्षांपूर्वी आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाचा शेवटचा अतिथंड कालखंड ((Last Glacial Maximum) सुरू झाला. जसजसा थंडीचा कडाका वाढू लागला, तसतसे जमिनीचे स्वरूपही बदलू लागले. उत्तरेकडची अतिथंड प्रदेशाची रेखा खाली सरकत ५५ अंश अक्षांशापर्यंत खाली आली (सद्याच्या काळात ही रेखा, जिला आर्क्टिक वर्तूळ म्हणतात, ६६ अंश अक्षांशावर आहे). तिच्या उत्तरेकडील सर्व जमीन बर्फाच्या जाड थराने झाकून गेली आणि तेथे आर्क्टिक (बर्फाळ) वाळवंट झाले. अर्थातच तेथील बहुतेक सर्व वनस्पती आणि प्राणी जीवन उद्ध्वस्त झाले. हाच प्रकार सर्व उंच पर्वतराजी असलेल्या (हिमालय, आल्प्स आणि पायरेनेस) प्रदेशांत होऊन तेथील अतीथंड भूभाग विस्तारले. ज्यांना थोड्यांना जमले ते मानव दक्षिणेकडे सरकत राहिले. पण निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या या अतीथंड भागांतील मानवासकट बहुतेक सर्व जीवन नष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीत अडकलेल्या या मानवांतील काही छोटे मानवसमूह काही मोजक्या ठिकाणी (मुख्यतः ५५ अंश अक्षांशाच्या जवळपास) त्याच्या मेंदूच्या ताकदीवर थंडीपासून संरक्षण करत आणि मिळेल त्या अन्नावर गुजराण करत तगून राहिले... हे उत्तरेकडचे निर्वासित मानव (refugees) जेथे तगून राहिले त्या ठिकाणांना glacial refuges असे म्हणतात. या प्रत्येक रिफुज मधल्या मानवांचा संबद्ध इतर रेफुजेसमधल्या मानवांपासून पूर्णपणे तुटला होता.
हवामानाच्या प्रभावामुळे बर्फाळ प्रदेशात बनलेली जी रेफुजेस (refuges) खूप संकुचित आणि स्पष्ट सीमा असणारी होती, ती खालच्या नकाश्यात तांबड्या ठिपक्यांनी दर्शविली आहेत...

युरोपातील refuges खालीलप्रमाणे होती...
१. पायरेनीज पर्वताच्या दोन्ही बाजूस असलेला आताच्या स्पेनमधील बास्क विभाग: आजही बास्क लोक जनुके, भाषा आणि संस्कृतीने आजूबाजूच्या लोकांपेक्षा वेगळे आहेत. स्पेनपासून वेगळे होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या चळवळीने ते मधून मधून बातम्यात असतात. तेथील प्राचीन टोकदार दगडी हत्यारे (Solutrean) दक्षिण रिफुजेसमधील मानवांच्या हत्यारांपेक्षा (Epi-Gravettian) खूप वेगळी होती. ही कारागिरी त्यांना बहुतेक उत्तरपश्चिम युरोपातून हवामानाच्या फरकाबरोबर दक्षिणेकडे सरकलेल्या मानवांपासून मिळालेली होती.
२. आताच्या इटलीमध्ये अनेक छोट्या पण एकमेकाशी संबद्ध असलेल्या टोळ्यांच्या स्वरूपात.
३. आताच्या युक्रेनमध्ये काळ्या समुद्राच्या व कार्प्याथियन पर्वताच्या उत्तरेस आणि Dnepr व Don या नद्यांच्या काठावरच्या प्रदेशात.
४. कार्प्याथियन पर्वताच्या दक्षिणेस असलेला आताच्या स्लोवाकियातला एक छोटा भाग.
५. मोल्डावियातल्या Dnestr नदीच्या खोर्याचा भाग.
हवामानाचा प्रभाव उत्तरेकडच्या भागात खूप प्रखर असला तरी तो त्या भागापुरताच मर्यादित नव्हता. धृवप्रदेशात अडकलेल्या पाण्यामुळे कमी झालेल्या पावसामुळे बहुतेक सर्व पृथ्वीच्या जीवनावर परिणाम झाला. दाट वर्षारण्ये असलेल्या भागांच्या ठिकाणी जेथे थोडाबहुत पाऊस टिकून होता तेथे झुडुपे असलेले गवताळ प्रदेश निर्माण झाले आणि जेथे पावसाचे मोठा अभाव झाला तेथे रखरखीत उष्ण वाळवंटे निर्माण झाली.
आफ्रिकेचा उत्तर भाग उष्ण ओसाड वाळवंट झाले; पश्चिम किनार्यावरिल विषुववृत्तावरचा थोडासा भाग पुरेश्या पावसामुळे वर्षारण्य टिकवून होता; आणि उर्वरित सर्व आफ्रिकेचे फार तर खुरटी झुडुपे असलेल्या गवताळ (कालाहारी) प्रदेशात रूपांतर झाले. या खुरट्या झुडूपे असलेल्या गवताळ भागांत एकमेकापासून संबद्ध तुटलेल्या मानवी वस्त्या (scrubby refuges) तयार झाल्या. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतल्या मानवांचा संबंध तर सहारा वाळवंटाच्या प्रसरणाने पूर्णपणे तुटला.
५५ अंश अक्षांशाच्या दक्षिणेकडच्या इतर सर्व आशियाचे गवताळ जमिनीत रूपांतर झाले. फक्त दक्षिणपूर्व आशिया आणि चीनच्या दक्षिण भागातील वर्षारण्ये पावसामुळे टिकून राहिली. संपूर्ण भारतातील अरण्ये नष्ट होऊन तेथेही गवताळ प्रदेश झाला. या सर्व गवताळ प्रदेशांत जागोजागी एकमेकापासून संबद्ध तुटलले मानवांचे गट (scrubby refuges) निर्माण झाले.
हिमयुगाच्या प्रभावाने खाली गेलेल्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीमुळे दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील समुद्रकिनार्यांवर मोठमोठे नवीन भूभाग उघडे झाले. अर्थातच थंडीपासून दूर पळणारे मानव तेथे पसरले. थंडीच्या कडाक्यापासून बचाव करत मध्य आशियातील काही मानव पुर्वीच्याच चार महानद्यांच्या काठावरच्या मार्गांनी पण आता उलट दिशेने दक्षिणेकडे परत फिरले. पण यातले फार थोडेच हा प्रवास यशस्वीपणे करू शकले. कारण जनुकीय पुरावा सांगतो की दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील बहुतेक सर्व मानव या निसर्गाच्या प्रकोपातून उरलेल्या मूळ स्थानिक लोकांपासूनच आलेले आहेत.
ऑस्ट्रेलियातील सर्व अरण्ये नष्ट झाली आणि त्यांचे वाळवंट किंवा फार तर गवताळ प्रदेशात रूपांतर झाले. तेथील उरलेल्या मानवी जथ्यांचा संबद्ध एकमेकापासून तुटला.
अमेरिका खंडाला हवामानाचा मोठा फटका बसला. तेथील सर्व जंगले नष्ट झाली आणि रखरखीत उष्ण अथवा बर्फाळ थंड वाळवंटे निर्माण झाली. मात्र आश्चर्यकारकरीत्या ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेस असलेल्या बेरिंगियामध्ये दोन glacial refuges तगून राहू शकली ! मात्र त्यांच्या दक्षिणेकडे अमेरिकेच्या पूर्वकिनार्यावरील थोडेसे मानव सोडता इतर सर्वजण नष्ट झाले.
वांशिक विलगन
हवामानाच्या या सगळ्या उलथापालथी काही शतके चालू होत्या. काही ठिकाणी हे परिणाम प्रखर आणि फार कमी वेळेत तर काही ठिकाणी हळू हळू झाले. बहुतेक वनस्पती, प्राणी आणि मानव नष्ट होत राहिले. ज्यांना जमले ते जीव दक्षिणेकडे स्थलांतर करत राहिले. या शिल्लक उरलेल्या (उत्तरेकडच्या स्थलांतरित आणि अगोदरच दक्षिणेत वसलेल्या) जीवांत तगून राहण्यासाठी अर्थातच जीवनमरणाची स्पर्धा झाली असणार... यात प्राणी-मानवात ही स्पर्धा जितकी झाली असणार तेवढीच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्तच स्पर्धा सुपीक मेंदू असणार्या मानव-मानवांत झाली असणार.
या सगळ्याची परिणती जीवांची संख्या कमी होण्यात झाली... यात जैविक प्रजाती कमी होण्याबरोबर शिल्लक उरलेल्या प्रत्येक प्रजातितील सदस्यांची संख्या चिंताजनक म्हणावे इतकी कमी होण्यात झाली. उरलेले मुठभर मानवी समूह केवळ छोट्या संखेचे झाले इतकेच नाही तर एकमेकापासून मोठ्या भौगोलिक अंतराने पूर्णपणे विभागले गेले... ते अगदी काही हजार वर्षांनी हवामान सुधारेपर्यंत. अर्थातच या प्रत्येक छोट्या समुहातली जनुकीय उत्परिवर्तने स्वतंत्रपणे होत गेली आणि त्यांचे बाह्यरूप एकमेकापासून वेगळे करत राहिली.
आफ्रिकेतून बाहेर पडलेला मानव पूर्वी हळू हळू पुढे सरकत असताना एक प्रकारची मानवी साखळी बनत गेली होती. मागे स्थायिक झालेल्या आणि पुढे गेलेल्या मानवांचा संपर्क पूर्णपणे तुटत नव्हता... किंबहुना एकमेकाचे नातेवाईक असल्याने त्यांची देवाण घेवाण चालूच असणार. त्याचबरोबर आफ्रिकेतून एकामागोमाग एक बाहेर पडणार्या जथ्यांच्या पुढे जाण्याबरोबर ही सरमिसळ अधिकच होत गेली असणार. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शेजारच्या मानवा-मानवात एकदम वेगळे बाह्यरूप दिसण्याइतपत बदल न दिसता असा बदल फार मोठ्या अंतरावर असलेल्या आणि फार मोठा काळ संबद्ध नसलेल्या मानवांमध्येच होत होता. या पद्धतीला प्रथम धक्का दिला तो तोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने... त्याने मानवजमातिची पौरात्य आणि पाश्चिमात्य अशी खूप वेगळे बाह्यरूप असलेल्या मानवांत विभागणी केली.
शेवटच्या हिमयुगाच्या तडाख्याने तर मानवी स्थलांतराची पद्धतीच पूर्णपणे बदलून टाकली. जनुकशास्त्रिय पुरावे असे सांगतात की या हिमयुगाच्या तडाख्याने वेगळे झालेले मानवी समूह हवामान सुधारू लागल्यानंतरही फार दूर जाण्याचे टाळत आपापल्या खंडांत फक्त आजूबाजूलाच विस्तारले आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण केल्या. अगदी ५०० वर्षांपूर्वीपर्यंत त्यांनी आपल्या भूभागात येऊ पाहणार्या नवख्या लोकांचा यशस्वी सामना केला... किमान इतपत की त्यामुळे स्थानीक जमातींत जनुकीय आणि बाह्यरुपात फार सरमिसळ होऊ दिली नाही. म्हणजे अगदी आधुनिक वसाहतवादाचा उदय होईपर्यंत एका खंडाचे/उपखंडाचे लोक मोठ्या संख्येने दुसर्या खंडात/उपखंडात स्थलांतरित होऊ शकले नाहीत. अशा तर्हेने स्वतंत्रपणे होणार्या जनुकीय उत्परिवर्तनांमुळे व स्वतंत्र सामाजिक विकासामुळे प्रत्येक मानवी समूहाचे बाह्य (शारीरिक), भाषिक आणि सांस्कृतिक वेगळेपण वाढत जाऊन आज अस्तित्वात असणारे वेगवेगळे मानव वंश निर्माण झाले. मात्र हे जनुकीय फरक स्वतंत्र जीनस/स्पेसीज (genus/species) तयार होण्याच्या जवळपासही पोहोचत नाहीत. त्यामुळे देश, भाषा, वंश, रंग, चेहेरपट्टी, अंगकाठी, इ. वरवरची आवरणे जरी वेगवेगळी "दिसत" असली तरी थोडीशी कातडी खरवडली की आपण सगळेच आफ्रिकेतून बाहेर पडून निसर्गाच्या कुंभमेळ्यांत एकमेकापासून दुरावलेले Homo sapien sapien भाऊबंदच आहोत !
गंमत अशी की "थोडीशी कातडी खरवडणे" हा एक वाक्प्रचार असला तरी जनुकशास्त्रिय तपासणीसाठी हीच सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे !!!
(क्रमशः )
.
माहितीची सलगता कायम ठेवण्यासाठी हा भाग जरा लहान ठेवला आहे.
मानवाच्या सफरीचा पुढचा महत्वाचा अध्याय दोन भागात विभागला जाऊ नये याकरिता
हे आवश्यक होते.
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
उत्तरेकडे एव्हढा हाहाकार माजला असताना माणसाने वेळीच स्थलांतर का नाहि केलं? अतिथंड कालखंड जाणावण्या इतपत तीव्र होत असताना मानवाने आपला तंबु फार अगोदर हलवायला हव होता ना... कि त्या काळी माणासाला कुठल्या दिशेला प्रस्थान करायचे हेच कळले नाहि?
स्थलांतरीत मानवाने स्थानीक मानवासोबत भिडण्यालायक मानवसंख्या त्या काळी होती का?? दहा-पंधरा लाख लोकांनी स्थलांतर केलं तरी त्यांचा स्थानीकांशी संबंध येण्याचे चान्सेस कमि असावेत... अवाढव्य इक्वेटर वर एव्हढी मानव संख्या म्हणजे किस झाड कि पत्ती...
या भागातल्या कालखंडाच्या आधीपर्यंत मानव केवळ छोट्या छोट्या भटक्या टोळ्यांमधेच फिरत होता आणि हवामान व अन्न ही दोन मह्त्वाची कारणे त्याला जिकडे नेतील तेथे प्रतिक्रियेच्या (reactionary behaviour) स्वरुपात जात होता. विचारपूर्वक आखलेला मार्ग चोखाळत नव्हता. त्यामुळे हवामानाचा अगोदर अंदाज बांधून त्याप्रमाणे स्थलांतर असा काही प्रकार झाला नाही असेच दिसते. त्यामुळे स्थलांतरातही हवामान आणि प्रवासाच्या धोक्यांमुळे बरीच प्राणहानी होऊन केवळ मोजकेच लोक दक्षिणेला पोहोचू शकले असावेत अन्यथा त्यांची जनुके आजच्या पिढ्यांत जास्त प्रमाणात सापडली असती.
त्याकाळची सर्व मानव जमातीची लोकसंख्या काही लाखातच असावी आणि या आपत्तीने ती काही हजारांपर्यंत खाली आली होती. हवामान सुधारल्यावर ती वाढू लागली... पण प्रत्येक टोळीतील मोजकेच मानव जिवंत राहिल्याने व शिवाय हजारो वर्षे इतर टोळ्यांच्या संपर्काशिवाय राहिल्याने त्यांची संतत्ती एकसारखी पण इतर रेफुजेसमधल्या टोळ्यांपेक्षा वेगळी दिसायला लागली.
शेवटच्या हिमयुगाच्या तडाख्याने तर मानवी स्थलांतराची पद्धतीच पूर्णपणे बदलून टाकली. जनुकशास्त्रिय पुरावे असे सांगतात की या हिमयुगाच्या तडाख्याने वेगळे झालेले मानवी समूह हवामान सुधारू लागल्यानंतरही फार दूर जाण्याचे टाळत आपापल्या खंडांत फक्त आजूबाजूलाच विस्तारले आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण केल्या
ही राष्ट्र आणि राष्ट्रीयत्व ह्या आजच्या संकल्पनांची प्राथमिक अवस्था म्हणावी काय?
लेखमाला सुरेख चालू आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
बहुतेक होय. हजारो वर्षे एकाच भूभागाला जखडून राहिल्याने त्याच्या
स्वामित्वाची भावना झाली असावी. मात्र माझी जमीन, माझा देश वगैरे भावना
नंतर जमिनीचा उपयोग शेतीसाठी सुरू झाल्यावर तिच्यातून मिळणारे फायदे कायम
ठेवण्यासाठी आल्या असाव्यात. नंतर सुधारलेल्या हवामानामुळे संख्येने आणि
भूभागाने विस्तारलेल्या जनसमुदायाला एकत्र आणणारे नायक तयार होऊन राष्ट्र
आणि राष्ट्रीयत्व ह्या संकल्पनांची सुरुवात झाली असावी.
आता
लिंक लागली. म्हणजे ASI हे तोबा च्या उद्रेकानंतर आग्नेय आशियातुन भारतात
सरकले. ASI आणि ANI ह्यांचे admixture ही खुप अलीकडची घटना असल्याचेही
वाचण्यात आले.
http://blogs.discovermagazine.com/gnxp/2013/08/indo-aryans-dravidians-an...
आणखी एक शंका होती. तुम्ही M haplogroup बद्दल लिहिले नाही. L3 ला दोन मुली होत्या. M आणि N. M चा उगम भारतात आहेत असं म्हटलं जातं. भारताच्या ६०% लोकांमधे M haplogroup आढळुन येतो आणि आफ़्रिकेत तो खुप कमी आढळुन येतो. Out of Africa थिअरीत ह्याचं काय स्पष्टीकरण दिलं आहे? कि Out of Africa थिअरीला M चा भारतीय उगम मान्यच नाहीये? ह्यासंदर्भात अधिक माहिती मिळेल का?
L3 च्या दोन मातृवंशावळी M आणि N. त्यापैकी N मध्ये R आणि तिच्यामध्ये U आणि पुढे तिच्यामध्ये U5 मातृवंशावळी निर्माण झाल्या.M उत्परिवर्तन फक्त दक्षिण आशिया व दक्षिणपूर्व आशियात असून या उत्परिवर्तनाचा मानवाच्या तोबोत्तर उलट (पूर्व ते पश्चीम) प्रवासाचा मार्ग नक्की करण्यासाठी कसा उपयोग झाला ते सहाव्या भागात आले आहे.
अच्छा म्हणजे L3 भारतात आली आणि तिने M ला जन्म दिला.
पण असंही वाचण्यात आलंय की मदागास्कर मधे M24 आणि उत्तर आफ़्रिकेतील काही
भागात M1 हे तुलनेने तरुण उप उत्परिवर्तने आढळुन आलेली आहेत, म्हणजे
भारतातुन मानव पुन्हा आफ़्रिकेत गेला की भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट आणि
मदागास्कर प्लेट एकत्र असतांना M उत्परिवर्तन घडुन आले?
भारतीय प्लेट, आफ़्रिकन प्लेट आणि मदागास्कर प्लेट एकत्र असतांना M उत्परिवर्तन घडुन आले?
ह्या प्लेट जोडलेल्या होत्या तो काळ २० कोटी अथवा जास्त वर्षांपूर्वीचा
आहे. त्यामानाने माणसाचा सगळा काळ गेल्या दोन लाख वर्षांचा आहे आणि तो
अफ्रिकेतून बाहेर पडून आशियात आला तो काळ जास्तीत जास्त ९०,०००
वर्षांपूर्वीचा आहे आणि M उत्परिवर्तन ६०,०००वर्षांपूर्वी आस्तित्वात आले.
अर्थात मानवाचा एकूण इतिहास भूपृष्टांच्या हालचालींच्या मानाने यकश्चित
आहे... त्यांचा एकमेकाशी काहिही संबद्ध नाही.M भारतातून M1 मध्य आशियात सुपीक चंद्रकोरीच्या भागात व तेथून परत आफ्रिकेत उतरलेल्या एका छोट्या जथ्यातून तेथे गेले. मात्र हा मानवाच्या एकूण प्रवासातला मोठा टप्पा नाही. आफ्रिकेतली मूळ उत्परिवर्तने L आणि त्याचे उपभाग आहेत... त्यातले फक्त L3 हे आफ्रिकेबाहेर पडलेल्या आणि आज आस्तित्वात असणार्या मानवांत आहे.
खालील चित्रात उत्परिवर्तनांचा एकूण प्रवास दाखवला आहे (जालाच्या सौजन्याने) ...
आज आस्तित्वात असणार्या सगळ्या मानवांचे मूळ पूर्वज (Y chromosome Adam उर्फ सैद्धान्तीक मूळ पुरुष आणि Mitochondrial Eve उर्फ सैद्धान्तीक मूळ स्त्री हे दोन्ही) फक्त आणी फक्त आफ्रिकनच आहेत.
उत्परिवर्तने फक्त त्यांच्या उप/उपौप वंशावळी (हॅप्लोगृप) कोणत्या भूभागात आस्तित्वात आल्या आणि कोणत्या भूभागांतून प्रवास करत कोठपर्यंत पोहोचल्या हे ठरवायला मदत करतात.
ASI आणि ANI ह्यांचे admixture ही खुप अलीकडची घटना असल्याचेही वाचण्यात आले.यासंदर्भात तुम्ही दिलेल्या लिंकपेक्षा (जी मला उगाचच भडक केलेली आणि त्यामुळे अनेक डिस्क्लेमर्ससह असलेली आढळली) ही मी अगोदरच दिलेली सहाव्या भागातील लिंक पहा. तीच माहिती जास्त स्पष्ट आणि समतोलपणे दिलेली आहे.
मात्र या दोन्हीतल्या "In ancient times, over 4000 years ago, there were two separate populations based in north and south India with no mixing." या वाक्याला अजून इंडिपेंडंट पियरची पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे ती अजूनतरी एक थियरी आहे. शिवाय हे मानले तर मग तोबानंतरच्या ७०,००० ते ४,००० वर्षांपूर्वीतच्या भल्यामोठ्या कालखंडात भौगोलिकदृष्ट्या जवळ राहणार्या ASI आणि ANI यांचा संबद्ध अजिबात का आला नाही हा प्रश्न बाकी राहतोच.
हिमयुगाची शास्त्रीय व्याख्या म्हणते की असा काळ की त्यांत दीर्घ काळाकरिता वातावरण इतके थंड असते की त्यामुळे पृथ्वीच्या फार मोठ्या भागावर आणि मोठ्या पर्वतराजींमध्ये (हिमालय, आल्प्स, इ) बर्फाचे मोठे थर साठतात/ वाढतात. या व्याख्येप्रमाणे आपण अजूनही शेवटच्या हिमयुगातच आहोत.
हिमयुगात सतत एकदम थंड वातावरण नसते तर जरा जास्त थंड कालखंड (glacials) आणि जरा कमी थंड कालखंड (interglacials) असतात. सद्या आपण २६ लाख वर्षांपूर्वी सुरू झालेल्या Pliocene-Quaternary glaciation नावाच्या आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाच्या १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका interglacial मध्ये आहोत.
खालील चित्रात हिमयुगाचे कालखंड दिसत आहेत (जालाच्या सौजन्याने)...
.
.
हिमयुग कसे सुरू होते याबद्दल शास्त्रज्ञांत पूर्णपणे एकमत नाही. मात्र काही कारणे त्या प्रक्रियेवर परिणाम करतात ती अशी:
१. पृथ्वी स्वतःभोवती २३.५ अंश तिरक्या अक्षाभोवती फिरते त्यामुळे निरनिराळे ऋतू होतात हे सर्वांना माहिती आहेच.
२. पृथ्वी त्या अक्षाभोवती सरळपणे न फिरता थरथरत फिरते (वॉबल)... साधारणपणे जसा भोवरा फिरताना दिसतो तशी.
३. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत न फिरता लंबगोलाकार कक्षेत फिरते आणि त्यामुळे तिला मिळणार्या सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण तिच्या सूर्यापासून असणार्या अंतराप्रमाणे कमीजास्त होते.
वरच्या १ ते ३ कारणांमुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या जागांवर पडणार्या सूर्याच्या ऊर्जेचे प्रमाण कमीजास्त होऊन बर्फाचे थर कमीजास्त जाडीचे होण्यात होतो. या सगळ्या प्रक्रियेला Milankovitch cycles असे म्हणतात.
४. मोठ्या कालखंडावर पाहता सूर्यापासून उत्सर्जित होणारी ऊर्जा कमीजास्त होताना दिसते.
५. मोठ्या कालखंडावर होणारी भूपृष्ठाची हजारो किलोमीटरची हालचाल सूर्याच्या पृथ्वीवर पडाणार्या ऊर्जेला पकडून ठेवण्याची क्षमता बदलतात.
६. वरच्या कारण ५ आणि पृथ्वीच्या फिरण्यातल्या बदलाने समुद्रातील थंड आणि गरम पाण्याचे प्रवाह त्यांची दिशा बदलून बर्फाचे प्रमाण कमी अथवा जास्त होते.
७. पृथ्वीच्या एखाद्या मोठ्या भूपृष्ठाची उंची (पृथ्वीच्या बदलांच्या भाषेत) एकाएकी कमीजास्त होणे... उदा भारतीय प्लेट युरेशियन प्लेटला धडकून हिमालय तयार झाला आणि तिबेटचे २४ लाख चौ किमी चे उंच आणि थंड पठार तयार झाले.
८. मधूनच होणारे ज्वालामुखींचे मोठे उद्रेक आणि त्यामुळे होणारे वातावरणावरचे परिणाम. हे कधी आणि किती क्षमतेचे होतील आणि त्यांचा वातावरणावर नक्की काय परिणाम होईल यांचा नीट पत्ता अजून तरी लागलेला नाही.
९. जर वातावरणावर प्रचंड परिणाम करण्याएवढी मोठी एखादी उल्का पृथ्वीवर आदळली तर तिचे होणारे परिणाम. हे आपण मधून मधून बातम्यांत वाचत असतो... पण हे कधी होईल याच नक्की पत्ता कोणालाच नाही.
१०. मानवाची पर्यावरणातली ढवळाढवळ : काही शात्रज्ञांच्या मते खनिज तेलाच्या वापराने झालेल्या आणि सतत होत असणार्या बदलाने वातावरणाचे तापमान वर जात आहे आणि त्यामुळे पुढचे हिमयुग साधारणपणे १५ लाख वर्षे पुढे गेले आहे !
हुश्श ! ही झाली फक्त काही महत्त्वाची कारणे ! यावरून तुमच्या ध्यानात आले असेलच की हे हिमयुग कधी संपेल आणि पुढचे कधी सुरू होईल याबाबत अजून बरेच अज्ञान आहे. शिवाय यातील काही गोष्टी इतक्या अनिश्चित आहेत की आताच नक्की अंदाज बांधणे शक्य नाही.
अमेरिकेत दक्षिण दिशेने स्थलांतर (१९,००० ते १२,५०० वर्षांपूर्वीपर्यंत)
मागच्या भागात आपण पहिले की हिमयुगामुळे पृथ्वीचा जवळ जवळ सर्व उत्तर गोलार्ध थंडीच्या कडाक्याने एकतर थंड वाळवंट किंवा पावसाच्या कमतरतेने रखरखीत उष्ण वाळवंट झाल्यामुळे काही मानव बर्फाळ, काही गवताळ तर फार थोडे जंगली रेफुजेसमध्ये छोट्या छोट्या टोळ्यांच्या स्वरूपात अडकून पडले. या सगळ्या बदलांत मानवांना जीवनमरणाच्या संघर्षाला तोंड द्यावे लागले आणि प्रचंड जीवहानी झाली. परत एकदा मानव जमात सर्वनाशाच्या जवळ पोहोचून कशीबशी तग धरून राहिली.
मात्र एका भूभागातील स्थलांतर जरा वेगळे होते... तो भूभाग म्हणजे अमेरिका खंड. हिमयुगाचा तडाखा सुरू होण्यापूर्वी उत्तर अमेरिकेत सहा फुटांपर्यंत मोठी शिंगे असलेले मोठे गवे, उंट, स्लॉथ, चितळ, बैल, मांजर प्रजातितील मोठ्या जाती, मॅमथ आणि मॅस्टॉडॉन (मॅमथ आणि हत्तींचे चुलत भाऊबंद) यांचे मोठे रानटी कळप होते. अर्थात उत्तरेकडचे हवामान जसजसे थंड होऊ लागले तसे हे प्राणी आणि मानव दक्षिणेकडे सरकू लागले. फार पूर्वी बेरिंगिया ओलांडून अमेरिकेत आलेल्या या मानवांची संख्या मुळातच मूठभर होती. त्यातच हवामानामुळे त्यात घट झाली. मात्र दक्षिणेकडे सरकणार्या या मानवांना विरोध करायला तेथे अगोदरपासून अस्तित्वात असलेले मानव नव्हते. या दृष्टीने ते इतरांपेक्षा नशीबवान होते, हे एक दु:खात सुख !
१९,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात बेरिंगियातील रिफुजेसमधल्या मानवांना बर्फाने आणि थंडीने जखडून ठेवले होते. त्यांना हालचाल करायला हवामान सुधारण्याची वाट पाहणे भाग होते. पूर्व किनार्यावरून आणि उत्तर अमेरिकेत मार्गक्रमण करणार्या टोळ्या नष्ट झाल्या होत्या. १९,००० वर्षांपूर्वी जास्तीत जास्त दक्षिणेकडे पोहोचलेल्या अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरच्या मानवांना या हवामानाच्या फरकाचा तडाखा जरासा कमी आणि उशीरा बसला. शिवाय बेरिंगियातील रिफुजेसमधील मानवांप्रमाणे ते चारही बाजूंनी बर्फाने घेरले गेले नव्हते. अर्थातच या कालखंडात तेच काय ते स्थलांतर करू शकले. ते किनारपट्टीचा मार्ग चोखाळत मध्य अमेरिकेत आणि नंतर दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्व किनार्यावर पसरले.

१५,००० वर्षांनंतर हवामान जरा सुधारू लागल्यावर बेरिंगियाच्या दक्षिणेकडील रिफुजमध्ये अडकलेल्या टोळ्या हालचाल करू लागल्या. त्यातले काही मानव पूर्व किनारपट्टीने दक्षिणेकडे स्थलांतर करू लागले. १५,००० ते १२,५०० या केवळ अडीच हजार वर्षांत त्यांनी दक्षिण चिलीच्या किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. पूर्वेच्या किनार्यावरून स्थलांतर करणारे मानवही या वेळेत ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या किनार्याने थेट अमेरिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचले होते. त्यांच्यातले काही धाडसी मानव किनारपट्टीचा पारंपरिक ओळखीचा आणि तुलनेने निर्धोक मार्ग सोडून अमेरिका खंडाच्या मध्यभागातही पसरले.
हे मार्गक्रमण खालच्या चित्रात दाखवले आहे...

या स्थलांतराचे एक विशेष म्हणजे ह्या मानवांच्या टोळ्या स्वतंत्रपणे मार्गक्रमण करत राहिल्या. त्यामुळे जसजसे ते कायम वस्ती करू लागले तसतश्या वेगवेगळे शारीरिक आणि सांस्कृतिक रूप असलेल्या मानव संस्कृती जागोजागी स्वतंत्रपणे विकसीत होत गेल्या. हे वेगळेपण आजच्या काळातही शाबूत आहे. मुख्य म्हणजे या वेगळेपणाचे पुरावे त्यांच्या जनुकांत अजूनही सापडतात... या प्रत्येक जमातीत त्यांनी त्यांच्या आशियातील मूळ भूमीतून बेरिंगियामार्गे बरोबर आणलेली जनुके सरमिसळ न होता अजून शाबूत आहेत. तसेच उत्खननात सापडलेली त्यांची हत्यारे त्यांच्या आशियाई पूर्वजांच्या हत्यारांशी जुळतात.
खालील चित्र जनुकशास्त्रिय दृष्टीने स्वतंत्र टोळ्यांचे अमेरिकेतले मार्गक्रमण दाखवते (www.bradshawfoundation.com च्या सौजन्याने)...
हे का झाले याबद्दल शास्त्रज्ञांत अजून एकमत नाही. याची बरीच कारणे असू शकतात, पण दोन सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. पहिले कारण असे की ह्या टोळ्या अमेरिकन भूमीच्या अफाट पसार्यामुळे एकमेकापासून विभागून राहिल्या असाव्या आणि त्यांच्या संख्येच्या मानाने मुबलक अन्नपुरवठ्यामुळे त्यांना एकमेकाशी झगडण्याची गरज भासली नसावी. दुसरे कारण असे की या टोळ्या वेगवेगळ्या काळात दक्षिणेकडे सरकल्या आणि त्यामुळे त्यांचा एकमेकाशी संबद्ध आला नाही. त्या काळचा स्थलांतराचा वेग पाहिला तर १०-१५ वर्षांच्या किंवा कमी फरकाने निघालेल्या टोळ्या एकमेकाबद्दल पूर्ण अनभिज्ञ असू शकतात. या दोन कारणांपैकी एकामुळे किंवा दोन्हींमुळे तसे झाले असावे. परंतु सद्या यातील पहिल्या कारणाचे पुरावे जरा जास्त सबळ आहेत.
दक्षिण अमेरिकेत प्रथम पाय ठेवणार्या मानवांबद्दलही अनेक सिद्धांत प्रचलित होते.
त्यातल्या एका सिद्धांताप्रमाणे दक्षिण अमेरिकेत प्रथम पाऊल ठेवणारे मानव ऑस्ट्रेलिया अथवा पॉलिनेशियामधून समुद्रमार्गे आले. कारण तेथे सापडलेल्या जुन्या मानवी कवट्यांचे अवशेष प्राचीन आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियातील कवट्यांशी मिळते जुळते आहेत. त्यामानाने नवीन कवट्यांच्या अवशेषांचे चीन आणि मंगोलियातील मंगोलियन वंशाच्या कवट्यांशी जास्त साधर्म्य आहे.
दुसर्या सिद्धांताप्रमाणे यातले पहिले मानव दक्षिण आशिया-ऑस्ट्रेलिया-दक्षिण चीन-बेरिंगिया मार्गे हिमयुगाचा कहर सुरू होण्याअगोदर अमेरिकेत शिरले आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे दक्षिण अमेरिकेत पोचले असावेत व त्यानंतरच्या हिमयुगाचा कहर कमी झाल्यावर मंगोलियन वंशाचा पगडा असणारे मानव तेथे पोचले असावे.
यातल्या दुसर्या मताला आजच्या घडीला जास्त पुष्टी मिळत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक नविन पुरावे हे सिद्ध करतात की बेरिंगियाला पूर्वीच्या समजाप्रमाणे एक सरळसोट किनारा नव्हता. तेथे अनेक बेटे, दलदलीचे भाग आणि उथळ पाण्याचे भूभाग होते. या सगळ्यांचा आशियाच्या किनारपट्टीने पुढे सरकणार्या पट्टीच्या बीचकोंबरनी मॅमथ आणि इतर प्राण्यांचा मागोवा घेत अमेरिकेत प्रवेश करायला नक्कीच फायदा घेतला असणार. त्यामानाने ऑस्ट्रेलियापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेपर्यंत समुद्रप्रवास करण्याइतपत त्या काळच्या बीचकोंबर्स कडे असलेल्या होड्या प्रगत नव्हत्या.
=====================================================================
उत्तर अमेरिकेत मानवाचे पुनःप्रसरण (१२,५०० ते १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत)
सर्वसाधारणपणे प्रवासात मूळ जागी असलेली असलेली जनुके आणि उत्परिवर्तने घेऊन प्रवासी जथे पुढे जातात आणि त्यांच्यात नवीन "तरुण" उत्परिवर्तने तयार होत जातात. म्हणजे अमेरिकेत उत्तरेला जास्त मूळ जनुके आणि नवीन उत्परिवर्नांचा अभाव असायला पाहिजे. उत्तर अमेरिकेतली जनुकीय विभागणी याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचे कारण हिमयुगाच्या कहरात दडले आहे.
हवामानात होणार्या बदलाने मानवांना उत्तर अमेरिका सोडून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कसे जायला भाग पाडले हे आपण पाहिले. त्या काळात उत्तर अमेरिकेत असलेल्या लहानसहान वस्त्या नाहीश्या होऊन त्यांचा काही पूर्व किनार्यावरचे अपवाद वगळता मागमूसही उरला नाही हे आपण अगोदर पाहिले आहेच. साधारण १२,५०० वर्षांपूर्वी हवामान सुधारू लागले आणि बर्फ वितळू लागला तसे बेरिंगियातले आणि उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागातले लोक उत्तर अमेरिकेतल्या उत्तरेकडच्या निर्मनुष्य भागांत पसरू लागले. अर्थातच या भागांतल्या मानवांत दक्षिणेकडील मानवांपेक्षा जास्त 'तरुण' उत्परिवर्तने आढळतात !
हे उत्तर अमेरिकेतले ५५ अंश अक्षांशाच्या उत्तरेकडचे पुनःप्रसारण खालच्या चित्रात दाखवले आहे...

या सगळ्या जनुकीय गडबडीत अजून एक महत्त्वाचा घोळ होता. तो म्हणजे अतीउत्तरेकडच्या अमेरिकन जमातींची जनुके दक्षिणेकडच्या जमातींकडून येणार्या जनुकांच्यापेक्षा खूपच वेगळी आहेत. आणि ही जनुके हवामान सुधारल्यावर आशियातून आलेल्या नवीन मानवी लाटांबरोबर आली असे म्हणावे तर तसेही नव्हते, कारण ती नजीकच्या भूभागातील आशियाई जमातींच्या जनुकांपेक्षा बरीच वेगळी आहेत.
सन १९९६ मध्ये या सगळ्या रहस्याचा उलगडा पीटर फोस्टर, अंतोनिओ तोरिनि आणि हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञांच्या गटाने केला. बेरिंगिया हिमयुगात कमी झालेल्या समुद्राच्या पाण्यामुळे आशिया व अमेरिकेला जोडणारा भूभाग होता हे अगोदरपासून माहिती होते. पण या गटाच्या पुराव्यांनी दाखवले की २५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इथला १३ लाख चौ किमी चा भूभाग हिमाच्छादित नसून गवताळ टंड्रा प्रदेश होता आणि तेथे शाकाहारी प्राण्यांचे कळप होते. त्या काळचा तेथला उन्हाळा हल्लीपेक्षा थंड होता पण आश्चर्यकारकरीत्या त्या काळचा हिवाळा हल्लीपेक्षा जास्त गरम होता ! आणि हा मानवासाठी रहायला तुलनेने सुसह्य भूभाग (रेफुज) २२,००० ते १५,००० वर्षांपूर्वीच्या कालखंडात इतर जगापासून (पूर्व आशिया व अमेरिकेपासून) त्याच्या चारहीबाजूस असलेल्या बर्फाळ वाळवंटाने पूर्णपणे अलग झालेला होता. याचमुळे अतीउत्तर अमेरिकेतल्या ना-देने आणि ईन्विट-अल्युट या जमातीत आशियातून आलेली A1 / A2 मूळ जनुके आहेत पण त्यांची इतर उत्परिवर्तने सर्व आशियाई व अमेरिकन लोकांपेक्षा फार वेगळी आणि जास्त तरुण आहेत.
उत्परिवत्नांचे पुरावे वापरून जनुकीय नकाशे बनवण्याचे तंत्र विकसित करण्यात हान्स युर्गन बांडेल्ट या शात्रज्ञाचा सिंहाचा वाटा आहे.
=====================================================================
भारतीय प्रस्तरकला (Indian Rock Art)
"फार महत्त्वाच्या प्राचीन भारतीय ठेव्यांबद्दल (नेहमीचीच) कमालीची अनास्था" हे वर्णन भारतीय प्रस्तरकलेला तंतोतंत लागू होते.
जगात एकूण तीन ठिकाणी महत्त्वाचे प्रस्तरकलेचे खजिने आहेत... भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. यातल्या भारत सोडून इतर ठिकाणच्या कलांच्याबद्दल भरभरून वाचायला मिळते आणि त्यांचा पर्यटनासाठीही कल्पक उपयोग झालेला आहे. केवळ भारतीय प्रस्तरकलेचा उल्लेख अभावानेच आढळतो. गंमत म्हणजे यांत शात्रज्ञांच्या सो कॉल्ड कंपूबाजीचा अजिबात हात नाही, कारण पाश्चिमात्य संशोधकांच्या लेखनात या अनास्थेबाबत सतत आश्चर्य व्यक्त केले जाते !
भारतातील ही प्राचीन कलाक्षेत्रे इतर खंडांतील कलेपेक्षा जास्त संख्येने आणि जास्त मोठ्या भूभागावर आहेत... आतापर्यंत एकूण तेरा राज्यांत ७०० पेक्षा जास्त ठिकाणी ही कला सापडली आहे. ही कलाक्षेत्रे जवळ जवळ सर्व भारतभर पण प्रामुख्याने भारताच्या मध्य भागात आहेत. फार मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर असूनसुद्धा उत्तरेकडच्या कुमाऊ पासून आंध्रप्रदेशातल्या चंद्रमौली पर्यंत या कलेतील विषय, आकार आणि संकल्पनांत आश्चर्यकारक समानता आहे (Kumar 1992: 56). ही कला बहुतांशी प्रस्तरचित्रांच्या स्वरूपात तर फार थोड्या ठिकाणी प्रस्तरावरच्या कोरीवकामाच्या स्वरूपात आहे. अश्या कलेच्या व्यवस्थापनाबद्दलचा आपला पूर्वेतिहास बघता अजून बरीच कला कोठेतरी कडेकपारीत पडून असली किंवा कोणत्या तरी "विकासाच्या" बांधकामांत नष्ट झाली असली तरी आश्चर्य वाटायला नको. असो.
या कलेत अर्थातच मुख्यत: ती निर्माण केली गेली त्या काळची स्थिती, मानव आणि प्राणी यांचे चित्रण आहे. या सगळ्यातले वैविध्य युरोपियन कलेपेक्षा अधिक आहे हे आतापर्यंत सर्वमान्य झाले आहे. उदाहरणार्थ:
१. चंबळच्या खोर्यातल्या कलेत जवळ जवळ ३० वेगवेगळे प्राणी आहेत (Badam & Prakash 1992).
२. मानव आणि प्राण्यांचे आकार काही ठिकाणी फक्त बहिर्रेखांनी दर्शवले आहेत तर इतर ठिकाणी रेषा अथवा इतर प्रकारे भरीव आहेत.
३. एका चित्रात गरोदर मातेच्या पोटातले बाळ एक्स रे मध्ये दिसावे त्या प्रकारे दाखवले आहे !
४. या कलेत मानवांच्या अनेक अवस्था... उभे, बसलेले, धावणारे, नाचणारे, शिकार करणारे, पायी अथवा घोड्यावरून शस्त्रे घेऊन लढणारे, इ... दाखवलेल्या आहेत.
ही कला पाहण्यासाठी आणि अधिक माहितीकरिता या दुव्यावर पाहणी करावी. तेथून अजून काही दुवे मिळू शकतील.
(क्रमशः )
=====================================================================
महत्त्वाचे दुवे
१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/
युरोपियन वसाहतवादामुळे जरी युरोपियन लोकांनी जगभर वसाहती स्थापन केल्या असल्या तरी युरोपियन व इतर वंशांची सरमिसळ अत्यंत कमी म्हणजे १ % पेक्षाही कमी झाली आहे. उदा. युरोपियन वसाहती भारतात १५० वर्षांपेक्षा जास्त होत्या पण भारतीय-युरोपियन (उदा. अॅग्लो-इंडियन) लोकांचे प्रमाण नगण्यच (१ % पेक्षा कितितरी कमी) आहे. त्याविरुद्ध भारतभर पौरात्य (ब्रम्हदेश आणि मलायन द्विपकल्पातून मागे फिरलेले) आणि पाश्चिमात्य (आफ्रिका अथवा मध्य आशियातून आलेले) लोकांची गेल्या काही सहस्त्र वर्षांत भरपूर सरमिसळ झालेली आहे... हे भारतियांच्या वर्ण, शारिरिक रचना, भाषा आणि चालीरिती यांच्या एकते/अनेकते-वरूनही बरेच स्पष्ट दिसते.
ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कॅनडा, युएसए व दक्षिण अफ्रिकेमध्ये युरोपियन मोठ्या संख्येने गेले आणि कायमस्वरूपी राहिले. पण स्थानीक लोकांबरोबर त्यांचे रोटीबेटी व्यवहार तुलनेने तसे नगण्यच राहिले आहेत.
जनुकीय उत्परिवर्तने ही सर्व मानवांत नैसर्गिक रितीने सतत होतच असतात. आपण फक्त त्यांचा मानवांच्या मोठ्या स्थलांतरासाठी किंवा एखाद्या समाजाच्या / व्यक्तीच्या वंशावळीचा शोध घेण्यासाठी उपयोग करतो.
उत्खनन अजुनही चालू आहे...अजुन अनेक गोष्टी मिळण्याची शक्यता आहे,अधिक माहिती नंतर जोड़तो.

उत्खनन अजूनही चालू आहे, कदाचित पूर्ण संकृती उजेडात येऊ शकेल
तुम्ही दिलेले दुवे नोंदवून ठेवलेले आहेत. शांतपणे नीट वाचले जातील.
जरा गडबडीत केलेल्या जालीय उत्खननात विकीवर हा खालचा दुवा सापडला,,, त्यांत चाळीच्या वर संदर्भ आहेत...
http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6bekli_Tepe
म्हणजे काही दिवसांच्या वाचनाची सोय झाली :)
उत्तर युरोपमध्ये पुन:प्रसरण
साधारणपणे १०,००० वर्षांपूर्वी आतापर्यंतच्या शेवटच्या हिमयुगाच्या शेवटच्या तुलनेने गरम (interglacial) कालखंडाची सुरुवात झाली... तो कालखंड अजून चालू आहे हे आपण मागे पाहिले आहेच. आता आपण त्या कालखंडाच्या साधारण मध्यावर आहोत... पण खनिज तेलाचा वाढलेला वापर, वातावरणातील ओझोनच्या थराला पडलेले व वाढत चाललेले छिद्र आणि इतर काही कारणांनी हा "गरम" कालखंड लांबला जाऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे !
वाढणार्या पावसाच्या प्रमाणाने भूमध्य समुद्राच्या किनार्यांवर अनेक ठिकाणी वर्षारण्ये अथवा गवताळ भाग निर्माण झाले. आता जगातले सर्वात मोठे वाळवंट असलेल्या सहारामधील भागात जंगले होती आणि सद्या पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत दिसणार्या प्राण्यांनी भरलेला होता. त्याबाबतचा पुरावा म्हणजे मध्य सहारात त्या काळच्या गवे, हत्ती, गेंडे, पाणघोडे, जिराफ, ऑस्ट्रिच आणि हरिणांची यांची चित्रे आणि खोदकाम असलेली प्रस्तरकला. हे कलाविषय अगदी ५,००० वर्षांपूर्वीपर्यंत, हा भाग वाळवंट बनायला सुरुवात होईपर्यंत चालू होते आणि नंतर त्यांची जागा उंटांच्या चित्रांनी घेतली.
सद्याच्या नायजरमधील जिराफांच्या मूळ आकाराइतकी मोठी आणि सुंदर प्रस्तरचित्रे (वय १०,००० ते ८,००० वर्षे) जालावरून साभार...

वाढणार्या तापमानामुळे १०,००० वर्षांपूर्वी उत्तर युरोपचे हवामान सुधारू लागले आणि तेथून पूर्वी पीछेहाट झालेल्या मानवाने परत एकदा तिकडे पसरायला सुरुवात केली...

मॅमथ स्टेप्पेच्या पूर्व भागातले मानव सायबेरियात पसरले तर मध्य आशियातले रशिया आणि पूर्व युरोपमध्ये गेले.
३०-४०,००० वर्षांपूर्वी युरोपात पसरणार्यातले काही मानव त्या काळी स्कँडिनेव्हिया व ब्रिटनपर्यंत पोहोचले होते. मात्र हिमयुगाच्या कडाक्याने २५,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्यातले सर्वजण एकतर नष्ट झाले अथवा परत फिरले होते. यानंतर हा भूभाग १०,००० वर्षांपूर्वीपर्यंत निर्मनुष्य राहिला होता. आता सुधारणार्या हवामानाचा फायदा घेत रेनडियरच्या कळपांचा मागोवा घेत काही मानव परत उत्तरेस स्कँडिनेव्हियापर्यंत पोहोचले तर समुद्राच्या पाण्याच्या कमी पातळीचा फायदा घेत काहीजण ब्रिटनमध्ये पोचले.
अशा तर्हेने युरोपच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिणपश्चिमेस असलेल्या रेफुजेसमधल्या मानवांनी पूर्ण युरोप आणि सायबेरिया काबीज केला. पृथ्वीचे असे एकही खंड शिल्लक राहिले नाही की जिथे मानवाचा वावर नव्हता... जगातल्या सर्वात नवीन प्राण्याने सर्व पृथ्वी पादाक्रांत केली आणि दोन लाख वर्षांपूर्वी सुरू झालेली महासफर संपली !
=====================================================================
प्रवासाच्या अंतिम कालखंडात झालेले मानवाच्या जीवनपद्धतीतील क्रांतिकारी बदल
आफ्रिकेतून बाहेर पडल्यावर प्रथम सतत भटकत असल्याने आणि शेवटची काही हजार वर्षे प्रतिकूल हवामानाला तोंड देत रेफुजेसमध्ये वास्तव्य असल्याने आतापर्यंत मानवाची जीवनशैली "छोट्या (१० ते फार फार तर १०० च्या) गटांत राहणारे आणि जमिनीवर नैसर्गिकरीत्या असणार्या रानटी वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळणार्या अन्नावर गुजारा करणारे प्राणी." अशीच होती. निसर्गावर पूर्णतः अवलंबून असल्याने मानवाचे फार मोठे गट बनणे किंवा फार मोठी लोकसंख्या होणे शक्य झाले नव्हते. हिमयुगाच्या या शेवटच्या तडाख्याने तर अन्नाची अधिकच कमतरता निर्माण होऊन सर्व पृथ्वीवरच्या मानवांची एकूण संख्या काही दशलक्षांतच मोजता येईल इतकी कमी झाली होती.
या काळातील सुधारणार्या हवामानाबरोबरच अजून एक नवी वस्तुस्थिती निर्माण झाली होती. पूर्वी गटांच्या लाटांलाटांनी पुढे जाणार्या मानवाला आता एका जागेवर (रिफूजेसमध्ये) खूप काळ अडकून पडल्याने एकाच जागेवर टिकून राहण्याचे फायदे कळले होते (? सवय झाली होती). थोडक्यात माणूस केवळ भटक्या न राहता जागा-जमीन यांचा विचार करू लागला. सततची भटकंती आणि नवीन जागेशी मिळवून घेताना होणारी फरपट थांबली. संथ जीवनपद्धतीमुळे प्रसवदर वाढला. अर्थातच जादा अन्नाची आणि ते राहण्याच्या जागेपासून जवळच असण्याची गरज भासू लागली. तसेच 'मिळेल ते आणि मिळेल तेव्हा' अशा प्रकारची अन्नाची अनिश्चितता नाहीशी करण्यासाठी त्याला गरज वाटली असावी. स्वत:च्या संरक्षणातील जमिनीत उपयोगी वनस्पती आणि प्राणी वाढवल्याने हे जमू शकेल हे त्याच्या ध्यानात आले असावे. कोणत्या जमिनीत कोणत्या उपयोगी वनस्पती चांगल्या प्रकारे वाढतात ह्याची नोंद घेतली गेली असेल. त्यांत कोणत्या वनस्पती आणि त्यातही त्यांच्या कोणत्या जाती जास्त उपयोगी हे अनेक वर्षांच्या अनुभवाने आणि काही प्रायोगिक चुकांच्या (trial and error) मार्गाने मानव शिकत गेले असणार. अशा वनस्पतींची उत्तम वाढ ज्या जमिनीत नैसर्गिकपणे होत आहे तिच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करून अन्नाची सुरक्षित तरतूद होऊ शकते हे हुशार मानवाच्या ध्यानात आले असेल. अर्थात हे सगळे कोणत्या क्रमाने घडले हा वादाचा विषय होऊ शकतो... पण हे सगळे घडत गेले हे मात्र नक्की. यातूनच शेतीचे व्यवस्थापन विकसित झाले. रोजचे अन्न रोज मिळवणारा, हातावर पोट बाळगून भटकणारा मानव हळूहळू एका जागी स्थिर होऊन अन्नाचे जास्त मोठ्या काळासाठीचे (शेतीचे) व्यवस्थापन करण्याकडे वाटचाल करू लागला... अन्नाचा साठा करून तो हवा तेव्हा वापरण्याचे फायदे शिकू लागला. येथूनच धान्याच्या शेतीची आणि फळझाडांच्या लागवडीची सुरुवात झाली.
रोज शिकारीला जाण्यातला धोका आणि अनिश्चितता दूर करण्याच्या दृष्टीने अन्नासाठी काही प्राण्यांचा साठा राहण्याच्या जागेजवळ करण्याची कल्पनाही यातूनच आली असणार. कालांतराने यातले काही प्राणी मानवी सहवासाने निर्धोक होतात (माणसाळतात) आणि त्यांचे प्रजनन होऊन / करवून वास्तव्याच्या ठिकाणाशेजारी कायमची निर्धोक अन्नाची व्यवस्था होऊ शकते हे चलाख माणसाच्या ध्यानात आले नसते तरच नवल होते. शेती करण्यासाठी आणि वाहनासाठी प्राण्यांचा कल्पक उपयोग डोकेबाज (?आळशी) माणसाने शोधला आणि प्राणी पाळण्याला अजून एक नवीन अर्थ निर्माण झाला !
प्रथम पश्चिम आशियात शेळ्या, मेंढ्या, डुकरे व गुरे पाळण्याला आणि नंतर गाढवे, घोडे आणि उंट पाळायला सुरुवात झाली. त्याच सुमारास दक्षिण आणि पूर्व आशियात गुरे, डुकरे आणि कोंबड्या पाळायला सुरुवात झाली. मात्र अमेरिकेत टर्की आणि लामा (दोन्ही शब्द प्राण्याची नावे या अर्थाने) सोडून इतर प्राणी पाळल्याचे दिसत नाही. वर्षारण्ये असलेल्या आफ्रिकेतल्या भूभागात तर अगदी आलिकडच्या काळापर्यंत कोणत्याही प्राण्याला पाळल्याचे दिसत नाही.
संरक्षित क्षेत्रात आणि अन्नाच्या मुबलकतेत राहू लागल्यावर दर गटाची लोकसंख्या वेगाने वाढू लागली आणि वाढणार्या तोंडांना अन्न पुरवायला नियोजन करून वनस्पतींची शेती करणे आवश्यक झाले. हे चक्र दर फेरीमागे त्याच्यातल्या कार्यकारणाला (जास्त अन्नसुरक्षा म्हणजे जास्त लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त अन्नाची गरज) अधिकाधिक मजबूत बनवत राहिले.
याबाबतीतला गेल्या १०,००० वर्षांतला तंत्रज्ञान आणि प्रगतीचा आलेख साधारण असा मांडता येईल: (वपू = वर्षांपूर्वी)
१०,००० वपू : शेतीची सुरुवात. १०,००० ते ६,००० वपू च्या कालखंडात हवामानातील बदलामुळे वाढलेल्या मोसमी पावसाने याला बरीच मदत केली.
९,००० वपू : सिरीया आणि टर्कीमध्ये जवस अथवा आळशीची लागवड... याचा दुहेरी उपयोग होता: खोडापासून मिळणार्या धाग्यापासून वस्त्रे बनवणे आणि बियांपासून तेल मिळवणे. सन २००९ मध्ये रिपब्लिक ऑफ जॉर्जियामधल्या एका गुहेत जवसापासून तयार केलेले विणलेले आणि गाठी मारलेले धागे सापडले आहेत... त्यांचे वय ३०,००० वर्षे आहे; त्यामुळे जवसाचा इतिहास परत नव्या पद्धतीने लिहिला जाईल असे दिसते !
८,००० वपू : पूर्व भूमध्य समुद्राच्या भागात कडधान्यांचा (Beans) वापर.
७,००० वपू : अमेरिकेत मका, भोपळा, कडधान्ये आणि मिरचीचा वापर.
६,००० वपू : पाकिस्तानात कापसाची पैदास आणि अफगाणिस्तानात द्राक्षांची पैदास.
५,००० वपू : चीनमध्ये सोयाबीन, भात, गहू, बार्ली आणि मिलेट्स (ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, इ.) ची लागवड.
४,००० वपू : पूर्व भूमध्य समुद्राच्या भागात ऑलिव्ह, पीच आणि अॅप्रिकॉटची लागवड.
अजून काही थोडे...
३,००० वपू : फिनिशियन लोक भूमध्य समुद्रात आणि पॉलिनेशियन प्रशांत महासागरात सफरी करू लागले.
२,००० वपू : वरच्या खलाश्यांना मोसमी वार्यांचा फायदा घेऊन सफरी करणे जमू लागले.
१,००० वपू : जगाची लोकसंख्या अंदाजे २५ ते ३५ कोटीमध्ये असावी.
आता : जगाची लोकसंख्या ७१७ कोटीचा आकडा ओलांडून पुढे गेलेली आहे. जगाची लोकसंख्या मोजणारे घड्याळ आणि प्रत्येक देशाची लोकसंख्या पाहण्यासाठी येथे टिचकी मारा... या क्षणाला असलेली जगाची लोकसंख्या
*****
जसे शेतीमुळे अन्नाची सोय झाली तसेच शेतीसाठी कामासाठी जास्त हातांची गरजही निर्माण झाली. वाढत्या प्रजनन क्षमतेने ही गरज पुरवण्यासाठी हातभार लावला. याचा परिणाम मानवांच्या छोट्या टोळ्या मोठ्या समुदायात रूपांतरित होण्यात झाला. अर्थातच त्यांना एकाच उद्देशाने एकत्रित ठेवून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीचा सकारात्मक उपयोग करण्यासाठी वागण्याचे नियम, नीतिमत्ता, सामाजिक उतरंड, इ. तयार झाल्या असणार. हे सर्व कधी गोडीगुलाबीने पण बर्याचदा ताकदीच्या बळावर झाले असणार. स्वत:चे आणि स्वजनांचे संरक्षण करण्यासाठी ताकद लागते हा मानवासाठी काही नवीन धडा नव्हता. इतर सबळ प्राण्यांच्या मानाने जेमतेम किंवा अपुरी शारीरिक ताकद असतानाही आपल्या मेंदूच्या ताकदीच्या बळावरच मानव आतापर्यंत इतर सर्व प्राण्यांना आणि निसर्गाला तोंड देत केवळ तगूनच राहिला नव्हता तर आतापर्यंतचा पृथ्वीवरचा सर्वात प्रबळ प्राणी बनला होता. याच मेंदूचा वापर करून तो सामाजिक प्रगती करू लागला... त्यातूनच गट - मोठा गट - खेडे - शहर - राज्य - साम्राज्य निर्माण होत गेले असणार.
मानवाचा सुपीक मेंदू त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, दगड-माती-झाडे-प्राणी-नद्या-समुद्र-डोंगर-आकाश-तारे यांचा अर्थ आणि संबंद्ध लावायचा प्रयत्न करत राहिला. यातूनच भौतिक आणि आधिभौतिक कल्पना निर्माण होत गेल्या. हुशार मंडळींनी त्यांना समजलेला अर्थ इतरांना सांगून सगळ्यांचा फायदा व्हावा असे पाहिले असेल... तर त्यापेक्षा "जास्त हुशार" मंडळींनी त्या ज्ञानाचा उपयोग करून स्वत:कडे जास्तीत जास्त फायदा कसा राहील / येईल याकरिता केला. याची परिणती वेगवेगळ्या कल्पना - भाषा - धर्म - राज्ये - साम्राज्ये - संस्कृती उभ्या राहण्यात, वाढत राहण्यात, एकमेकाशी चढाओढी करण्यात झाली. त्यातल्या काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आजपर्यंत टिकून आहेत, त्यातल्या काही भविष्यात प्रबळ होतील, काही नाहीश्या होतील तर काही नवीन जन्म घेतील. मानव अस्तित्वात असेपर्यंत हे चक्र असेच चालू राहील. असो.
एकूण काय, संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करून झाल्यावर मानवाची प्रवासाची संधी कमी झाली आणि मग त्याने आपल्या चळवळ्या शारीरिक आणि बौधिक ताकदीचा जमिनीवर आणि दुसर्या मानवांवर हक्क गाजवण्यासाठी उपयोग करायला सुरुवात केली... मानवी जीवनात एक नवीन युग सुरू झाले !
=====================================================================
शेवटचे पान
नमस्कार रसिक वाचकहो !
आज ही लेखमाला पुरी करताना एक खास समाधान मनात आहे. मानववंशशास्त्र हा
माझ्या औपचारिक शिक्षणाचा भाग कधीच नव्हता. पण त्याची कधीकाळी (यासाठी एकच
प्रसंग सांगता येणार नाही) तोंडओळख झाली आणि तेव्हापासून तो माझ्या
मनामध्ये कायम घर करून बसलेले कुतूहल बनून राहिलेला आहे. मी त्याबद्दलचे जे
काही थोडे ज्ञानकण जमा केले त्याचे हेच एकमेव कारण.
एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ममत्व असले की तिच्याबद्दल इतरांशी चर्चा
करताना जरा जास्तच मजा येते. या दृष्टीने या लेखमालेच्यामुळे मला आलेली
मजा कल्पनातीत आहे. यासाठी तुम्हा सर्व वाचकांचे जेवढे आभार मानावे तेवढे
कमीच आहेत.
माझा लिखाणाचा उत्साह सतत वाढवत ठेवल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांना खास धन्यवाद !
ह्या लेखमालेचा विषय जरी मळलेल्या वाटेवरचा नसला आणि गुंतागुंतीचा असला
तरी त्याच्याबाबत खूप जणांना कुतूहल आहे हे माहीत होते. त्यामुळे भाषा आणि
माहिती या दोन्ही जास्तीतजास्त वाचकांना समजण्यास सोप्याच नव्हे तर रोचकही
असाव्या असा प्रयत्न होता. त्याकरिता अनेक ठिकाणी माहितीची काटछाट करावी
लागली. मात्र यामुळे झालेल्या त्रुटी चोखंदळ वाचकांनी प्रतिसादातील चर्चा
करून भरून काढल्या, त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद ! त्यांच्या चौकस
सहभागाने मला पूर्वी वाचलेले संदर्भ परत चाळण्यासाठी भाग पाडले, ते शोधताना
कधीकधी नवीन संदर्भही हाती लागले. त्यामुळे या सतत वेगाने पुढे जात
असलेल्या शास्त्राच्या माझ्या ज्ञानाची काही ठिकाणी उजळणी झाली तर काही
ठिकाणी त्यात भर पडली... हा अजून एक मोठा फायदाच झाला.
थोडक्यात, या लेखमालेने माझा खूप फायदा झाला आहे. त्यातला काही फायदा,
आनंद आणि माझ्या या छंदाचे थोडेसे वेड मी वाचकांपर्यंत पोहोचवू शकलो असेन
अशी आशा आहे.
(समाप्त)
समुद्रकाठी सामुद्रीक प्राण्यांची (मासे, शिंपले, इ.) उप्लब्धता असते आणि किनारपट्टीवरून लवकर पुढे जाता येते. ही परिस्थिती बीच कोंबर्स आणि फोराजर्स (चपखल मराठी शब्द सापडले नाहीत) साठी योग्य असते. कारण तिथले अन्न कमी वाटू लागले की जलद पुढे सरकायला बरे. समुद्राकाठच्या खारट जमिनीमुळे शेती शक्य नसते.
याविरुद्ध; नदीच्या गोड्या पाण्यामुळे आणि तिने वरच्या भूभागातून वाहून आणलेल्या गाळामुळे झालेल्या सुपीक जमिनीमुळे शेतीला योग्य परिस्थिती असते. एकाच जागेवर कायम मानवी वस्ती आणि (धान्याची आणि पाळीव प्राण्यांची) शेती या दोन्हीसाठी गोड्या पाण्याची सतत आणि मुबलक उपलब्धता अत्यंत आवश्यक असते. सुरुवातीच्या काळी उघड्या समुद्रातून लांबवर वहातूक करण्याइतकी साधने नव्हती, पण समुद्रकाठाने प्रवासासाठी वापरात आणल्या जाणार्या होड्या नदीतल्या निर्धोक प्रवासाला आणि व्यापाराला पुरेश्या होत्या. त्यामुळे एकाच जागी वस्ती करण्यास नदीकाठ हे सर्व तर्हेने सोईचे ठरले. सहाजीकच बहुतेक सगळ्या संस्कृती नदीकाठाने विकसित झाल्या.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.