https://samantfort.blogspot.com/2022/06/offbeat-shangarh-pundrik-rishi-lake.html
| Shangarh Medow |
हिमाचल प्रदेशात अशी अनेक सुंदर ठिकाण आहेत, जी अजून प्रसिध्दीच्या झोतात आलेली नाहीत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे शानगड. मनाली सारख्या गर्दीने भरलेल्या ठिकाणापासून जवळ असूनही शानगड अजूनही शांत आणि गजबजाटा पासून दूर आहे. शानगडला तीन ते चार दिवस मुक्काम करुन शानगडचे मुख्य आकर्षण असलेले मेडोज (Medow) म्हणजेच गवताळ कुरणं, धबधबे, पक्षी निरिक्षण आणि जंगलातले छोटे ट्रेक्स करता येतात. यशिवाय पुंडरिक ऋषी सरोवराचा छोटा एक दिवसाचा ट्रेक करता येतो. रुपी रैला (रोपा) धबधबा, रुपी रैलाचे जुळे मनोरे (Twin Towers) , देवरी जवळ असलेली पहाडातील गाव आणि मंदिरे अशी आजुबाजूची ठिकाण पाहाता येतात. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यांना याठिकाणी पाहाण्या सारख (ए़क्स्प्लोर करण्यासारख) भरपूर काही आहे.
![]() |
| Shangarh Medows |
शानगड हे हिमालयाच्या कुशीत “सैंज व्हॅली” मध्ये वसलेले टुमदार गाव आहे. सैंज व्हॅली ,पार्वती व्हॅली, जीवा नाल व्हॅली, आणि तिर्थन व्हॅली ही चार ठिकाणं मिळुन ११०७ स्क्वेअर किलोमीटरचे " ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क" तयार झालेले आहे. १००० प्रकारच्या वनस्पती, ३१ जातीचे प्राणी आणि २०९ प्रकारचे पक्षी असलेल्या या ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कला २०१४ मध्ये "UNESCO World Heritage Site" हा दर्जा मिळाला आहे. या नॅशनल पार्क मध्ये असलेल्या जीवा नाल्या पासून उगम पावणारी सैंज नदी पुढे डोंगर दर्यातून वाट काढत लाजरी गावाजवळ बियास नदीला जाउन मिळते. या नदीच्या खोर्यात सैंज हे बाजारपेठ असलेले मोठे गाव आहे. औट बोगद्या पासून निघणारा वळणावळणांचा रस्ता सैंज नदी काठाने सैंज गावात पोहोचतो. वाटेत नदीवर दोन मोठे विज निर्मिती प्रकल्प आहेत. सैंज गावच्या पुढे रोपा गाव आहे. या रोपा गावापासून उभ्या चढणीचा ७ किलोमीटरचा रस्ता आपल्याला निसर्गरम्य शानगड गावात घेऊन जातो. इसवीसन २०१५ मध्ये हा रस्ता तयार झाला. त्यापूर्वी रोपा गावातून चालत जावे लागत होते.
| Shangarh Thach/ Bugyal |
शानगडचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथले मेडोज (Medow) म्हणजेच गवताळ कुरणं. पहाडी भाषेत या गवताळ कुरणांना "थाच" म्हणतात, तर तिबेटी भाषेत "बुग्याल" म्हणातात. डोंगर उतारावर चारही बाजूंनी पसरलेले देवदार वृक्षांचे जंगल अचानक या गवताळ कुरणापाशी थबकलेल आहे. झाडांची रांग जिथे संपते तेथून दूरवर पसरलेले हिरवगार गवताळ कुरण आहे. कुरणात चरणारी गुरं , त्यामागे दाट जंगल , जंगलावरुन डोकावणारी डोंगररांग आणि मागे डौलात उभ असलेल पार्वतीच हिमाच्छादित शिखर असं नजरबंदी करणार अफ़ाट दृश्य इथुन पाहायला मिळत. या निसर्ग दृष्याला धक्का न लावता त्याच सौंदर्य अजून खुलवणार लाकडी बांधणीच शंकर मंदिर या कुरणाच्या कोपर्यात आहे. हे गवताळ कुरण पवित्र स्थळ आहे . त्यामुळे या ठिकाणी खाणे, पिणे, गाणी लावणे, कचरा करणे इत्यादी गोष्टींना मज्जाव आहे. सुर्यास्ता नंतर कुरणांवर जाण्यास मनाई आहे. या गवताळ कुरणा भोवती असलेल्या धार्मिक संकल्पनेमुळे हे कुरण इतके वर्षे अबाधित राहिले असावे.
![]() |
| Mahadev Mandir, Shangarh |
या कुरणातून गावात टॉवर सारखी दिसणारी एक लाकडी इमारत आपल्याला खुणावत असते. कुरणातून गावात जाणार्या पायवाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर घरांच्या दाटीत असलेल्या शांग्चुल महादेव मंदिरा जवळ आपण पोहोचतो.
शांग्चुल महादेव मंदिर
हे टॉवर सारखे दिसणारे मंदिर लाकडी वासे आणि दगड वापरुन बांधलेले आहे.. दगडांची एक रांग आणि त्यावर लाकडी वाशांची एक रांग अशाप्रकारे दगड आणि वासे एकमेकांवर रचुन हे मंदिर बांधलेले आहे. दगडांमधील लाकडी वाशांवर कोरीव काम केलेले आहे.
| Shangchul Mahadev Temple, Shangarh |
मंदिराच्या भव्य लाकडी प्रवेशव्दारावर अप्रतिम कोरीव काम आहे. त्यात दशावतार कोरलेले आहेत. ( मंदिर शंकराचे असूनही प्रवेशव्दारावर दशावतार कोरलेले आहेत.) प्रवेशव्दाराच्या वर असलेल्या दोन मजल्यांना कोरीवकाम केलेले कमानदार सज्जे आहेत. त्यावर मंदिराच्या गाभार्यात शंकराची मुर्ती व पिंड आहे. मंदिराच्या उतरत्या छपराला छोट्या घंटा टांगलेल्या आहेत. वार्यामुळे होणारा त्यांचा किनकिनाट मन प्रसन्न करुन जातो.
| Shangchul Mahadeo Temple, Shangarh |
![]() |
| Wood carving |
पहिल्या दिवशी शानगड थाच (Medow) आणि शांग्चुल
महादेव मंदिर पाहून झाल्यावर दुसर्या दिवशी सकाळीच शानगड पासून ३ किलोमीटर अंतरावर
असलेला "बार्शानगड ( Barshangharh) धबधबा पाहायला जावे. शानगडमधून एक कच्चा रस्ता जंगलातून
दरीच्या काठाने फ़िरत-फ़िरत धबधब्या पर्यंत जातो. या रस्त्यावर
असलेल्या पहिल्याच मोठ्या ओढ्याच्या पुलाखाली पाणचक्की आहे. ओढ्यातले
पाणी एका लाकडी पाटाव्दारे या पाणचक्कीत वळवलेले
आहे. या पाण्याच्या शक्तीवर चक्की फ़िरवून धान्य दळले जाते.
रस्त्याच्या दुतर्फ़ा फ़ुललेली फ़ुल, वहाणारे ओढे
ओलांडत रमतगमत तासभरात आपण धबधब्याकडे जाणार्या पायवाटेवर पोहोचतो. इथे दाट जंगल आहे. इथे असलेल्या मोठ्या वृक्षांखाली बसण्यासाठी देवदारचे ओबडधोबड ओंडके व त्यावर
फ़ळ्या टाकून बाकडे बनवलेले आहेत. त्यावर थोडावेळ विश्रांती घेऊन
आजुबाजूला दिसणार्या पक्षी आणि फ़ुलपाखरांचे निरिक्षण आणि छायाचित्रण करण्यात मस्त
वेळ जातो. या भागात आढळणार्या Yellow Beeled Blue
Magpie या लांबलचक शेपटी असलेल्या सुंदर पक्ष्याचे प्रथम दर्शन मला इथेच झाले.
इथुन पुढे धबधब्या पर्यंत १० मिनिटाची खडी चढण आहे. ती चढून गेल्यावर धबधब्याचा आवाज कानावर पडतो, समोर कड्यावरुन कोसळणारा सुंदर धबधबा
दिसतो. धबधब्याच्या नादाला छेदत जंगलातून येणारे पक्ष्यांचे आवाज,
धबधब्याच्या पाण्यावर पडलेल्या उन्हामुळे मध्येच उमटणारे इंद्रधन्युष्य
पाहात तिथे बसले की वेळ कसा जातो कळत नाही. शानगड ते बार्शानगड धबधबा हे अंतर जाउन येऊन ६ किलोमीटर आहे. या कच्च्या रस्तावरुन कारनेही जाता
येते. पण चालत जाण्यात जास्त मजा आहे. सकाळ
धबधब्यावर घालवल्यावर संध्याकाळी गावातली एखादी पायवाट पकडून फ़िरायला जाता येते किंवा
“थाच”ला जाऊन किंवा एखाद्या कड्यावरुन सुर्यास्त
पाहाता येतो.
| Yellow Beeled Blue Magpie |
| Yellow Beeled Blue Magpie |
तिसर्या दिवशी रुपी रैला धबधबा , रैलाचे जुळे मनोरे (Twin Towers) , देवरी जवळ असलेली पहाडातील गाव आणि मंदिरे अशी आजुबाजूची ठिकाण पाहाण्यासाठी गाडी भाड्याने करावी लागते. शानगड ते शानगड ८० - ८५ किलोमीटर अंतर आहे. पण ही ठिकाण एकमेकांपासून लांब आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या डोंगरांवर असल्यामुळे घाट चढावे आणि उतरावे लागतात. या भागात दिवसातून एखाद दुसरी बस असल्याने ही तीन ठिकाणे पाहाण्यासाठी २५००/- रुपये टॅक्सी भाडे घेतात. शानगडचा घाट उतरुन रोपा गाव ओलांडल्यावर उजव्या बाजूला सैंज नदीवरचा पूल लागतो. हा पूल ओलांडाल्यावर वीज निर्मिती केंद्राच्या बाजूने रस्ता धबधब्याकडे जातो. गाड्यांसाठी पार्किंग आहे तेथुन कच्च्या रस्त्याने आणि पुढे पाउलवाटेने १५ मिनिटे चालल्यावर आपण धबधब्यापाशी पोहोचतो. हा धबधबा बार्शानगड धबधब्या पेक्षा सुंदर आणि मोठा आहे. धबधब्या जवळ उभ राहून त्याच नितळ , थंड पाणी थेट अंगावर घेता येत.
| Rupi Raila waterfall |
| Plembeous Water Redstart |
या ठिकाणी मला Plembeous Water Redstart या निळ्या रंगाच्या छोट्या पक्षाची
सुंदर छायाचित्र मिळाली. घरटं बांधण्यासाठी तो काड्या जमा करत होता. मनाजोगी काडी सापडल्यावर आणि ती घरट्यात रचून आल्यावर तो धबधब्या जवळील पाण्यात
असणार्या एका मोठ्या खडकावर जाऊन बसत होता. शत्रुला घरट्याचा
सहजासहजी पत्ता लागू नये यासाठी पक्षी थेट घरट्यात न जाता मध्ये एखादा थांबा घेतात.
हि त्यांची नेहमीची जागा असल्याने तो पक्षी निर्धास्त होता आणि मला मनसोक्त
छायाचित्र मिळाली.
| Rupi raila Twin Towers |
| रुपी रैलाची मधील आजी |
| खिडक्यांच्या चौकटीवरील नक्षीकाम |
शानगडहून रोपाला जेवढ उतरलो त्याच्या दुप्पट वर चढत होतो . जिथे थोडीशी सपाटी होती तिथे शेती आणि वस्ती दिसत होती. दूर खाली सैंज नदीवरचा वीज प्रकल्प दिसत होता. धबधब्या पासून १५ किलोमीटरवर मुख्य रस्ता सोडून एक छोटा रस्ता रैला गावातील जुळ्या मनोर्यांकडे जातो. जेमतेम एक गाडी जाईल अशा छोट्या रस्त्याने १.५ किलोमीटर गेल्यावर थेट जुळ्या मनोर्यांच्या खाली पोहोचलो. रस्त्याच्या कडेला गाडी लावून थोड्या पायर्या चढून गेल्यावर दोन मनोर्यांच्या मध्ये पोहोचलो. शानगड मध्ये पाहिलेल्या महादेव मंदिरांसारखेच हे मनोरे होते. मनोर्यांची दार बंद होती, म्हणुन बाजूला असलेल्या घरात डोकावलो तर एक बाई हातमागावर शाल विणत होती. मनोरे पवित्र स्थळ असल्याने आणि आता धोकादायक स्थितित असल्याने फ़क्त पुजारी आत जातो असे तिने सांगितले. त्यातल्या एक मनोरा दुरुस्त करुन त्याची रंगरंगोटी केलेली होती. तर दुसरा मनोरा धोकादायक स्थितीत होता. या मनोर्यांना "ठाकुर की कोठी /धलियारा कोठी" या नावाने ओळखतात. त्याच्या आतील रचना पाहायला मिळाली नाही , त्यामुळे ती राहाण्यासाठी वापरली जात होती की देऊळ होते हे कळले नाही. या कोठीच्या खिडक्यांच्या चौकटीवर नक्षीकाम दिसत होते. खिडक्या बाहेरच्या बाजूला रुंद आणि आतल्या बाजूला निमुळत्या आहेत. या रचनेमुळे थंडीत आत मध्ये उबदार राहात असावे.
चौथ्या दिवशी पुंडरिक ऋषी सरोवर हा ट्रेक करण्यासाठी शानगडहून सकाळची बस पकडून रोपा गाठले. रोपाला ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कचे गेस्ट हाऊस रस्त्याला लागूनच आहे. या गेस्ट हाऊसच्या बाजूने एक कच्चा रस्ता सराहन गावापर्यंत जातो. पुंडरिक ऋषी सरोवर आणि मंदिर याच गावात आहे. हिमाचल मध्ये फ़िरतांना अनेक छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत असे कच्चे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेत झालेले दिसत होते. जीप सारखे वाहान या रस्त्यावरुन जाते. ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी झिरपते अशा अवघड वळणावरचा थोडासा भाग सिमेंट कॉन्क्रिटने बांधून काढलेला दिसतो. या रस्त्यामुळे या दुर्गम भागात राहाणार्या लोकांची चांगली सोय झालेली आहे. रोपाहून कच्च्या रस्त्याने दाट जंगलातून चालत निघालो. डाव्या बाजुला एक ओढा खळखळाट करत वाहात होता . त्या ओढ्या वरचा पुल ओलांडून चढाईला सुरुवात केली. कच्चा रस्ता बनवलेला असला तरी गावातील लोक पायवाटाच वापरत असल्याने त्या ठळक आहेत. त्या पायवाटांनी चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने भरपूर पक्षी दिसत होते. वाटेत पिवळ्या तांबूस रंगाच्या फ़ळांनी लगडलेली झाड दिसत होती. पुढे एका गावाजवळ ते झाड पुन्हा दिसल्यावर गावतल्या लोकांना विचारल. ते जंगली जर्दाळुच झाड होते. आपल्याला बाजारात मिळणार जर्दाळुच फ़ळ मोठ असते हे छोट होते. त्याने झाड हालवल्यावर भरपूर फ़ळ पडली. त्यातली काही खाल्ली. खूप मधुर होती.
(या आधी ऑस्ट्रीयातल्या वाचाऊ व्हॅलीत अशी जर्दाळूने लगडलेली झाडं पाहीली होती. (ब्लॉग वाचण्यासाठी लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2020/07/offbeat-austria-wachau-valley.html)
![]() |
| Pundarik Lake trek route |
रोपा पासून ५ ते ६ तासात आपण सराहन
गावात पोहोचतो. गावात चार कार उभ्या
होत्या, आणि बाजूच्या छोट्याश्या मैदानात १०-१५ लोक जमून चर्चा करत होते.
चौकशी केल्यावर कळल की, आता देवरी आणि रोपा
दोन्ही कडून कच्चा रस्ता झालेला आहे. पण तो पावसाळ्यात वापरता
येत नाही. त्यासाठी पक्का रस्ता लवकर बांधावा असे निवेदन देण्यासाठी ही मिटींग होती.
त्यांना पुंडरीक सरोवराची दिशा विचारुन पायवाटेने शेतं ओलांडत थोडेसे
चढुन गेलो. शेतं संपल्यावर जंगलाच्या अलिकडे एक घर होत.
पायवाट चुकून आम्ही घराजवळ पोहोचलो होतो. व्हराण्ड्यात
दोन बायका आणि पुरुष गप्पा मारत बसले होते. त्यांना रस्ता विचारल्यावर
त्या पुरुषाने इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला चला
मी तुम्हाला सगळा परिसर दाखवून आणतो. त्याच नाव लाला होते.
तो देवरी जवळच्या गावात राहातो आणि ट्रेक गाईडच काम करतो. ऑस्ट्रेलियन ग्रुपला घेऊन तो इथे आला होता. त्यातील एक
मुलगा २० वर्षापूर्वी त्याच्या आई वडिलांबरोबर या भागात ट्रेकला आला होता. त्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी तो परत इथे आला होता. तो ग्रुप आजच परत मनालीला गेल्यामुळे लाला मोकळा होता. त्यामुळे त्याने आम्हाला
परिसर दाखवायची जबाबदारी स्वत:हुन घेतली.
![]() |
| Pundrik Lake |
त्या घराच्या मागून जाणार्या पायवाटेने
५ मिनिटे चालल्यावर आम्ही पुंडरीक सरोवराजवळ आलो. तिन्ही बाजूला जंगलांनी वेढलेले डोंगर आणि एका
बाजूला गवताळ कुरण, त्यावर चरणारी गुर अस सुंदर दृश्य होत. कुरणात एका बाजूला पुंडरिक ऋषींच
लाकडी छोट मंदिर होत. सरोवरात गवत माजलेल होत आणि त्यात कोणी उतरु नये यासाठी त्या संपूर्ण सरोवराला
कुंपण घालतेल होत. यात्रेच्या
दिवशी फ़क्त सरोवरात स्नानाला जाता येत असे लालाने सांगितले. सरोवराच्या
बाजूने जाणार्या पायवाटेने आम्ही चालायला सुरुवात केली. लालाने
सांगितलेल्या एका दंतकथेनुसार सरोवराच्या ठिकाणी पूर्वी लोक शेती करायचे. एकदा लोक
शेतीची काम करत असतांना समोरच्या डोंगरावर एक कुत्रा आला आणि त्याने मनुष्यवाणीत सांगितले
की थोड्या वेळात मोठा पाऊस येणार आहे. सर्व लोकांनी इथून निघून
जावे. पण कुत्र्य़ाच्या बोलण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केल.
थोड्याच वेळात जोरात पाऊस आला आणि त्याबरोबर डोंगरातून पाण्याचा लोंढा
चिखल ,गाळ, राडारोडा घेऊन आला . शेतात काम करणारे सगळे लोक त्याखाली गाडले गेले. समुद्राची जमिन वर उचलली गेल्यामुळे बनलेल्या ठिसुळ हिमालयात भूस्खलन ही काही
नवीन गोष्ट नाही. पूर्वी कधी काळी इथे घडून गेलेल्या
अशाच एखाद्या घटनेची आता दंतकथा झालेली असावी. लाला कडून कथा ऐकता ऐकता आम्ही सरोवराला
अर्धी फ़ेरी मारली होती. समोर एक आडवी पायवाट
लागली. ही पायवाट थेट शानगडला जाते असे लालाने सांगितले.
या वाटेने पुंडरिक लेक ते शानगड अंतर कापायला ६ तास लागतात, वाटेत दोन धबधबे लागतात. ट्रेकचा विषय निघाल्यावर त्याला
या परिसरात कुठे कुठे ट्रेक करता येईल अस विचारल्यावर त्याने १) समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून राजथाटी १ दिवसाचा ट्रेक,
२) राजथाटी -बुंगा -
थिनी - रोपा हा तीन दिवसाचा ट्रेक आणि ३) शानगड अर्ध्या दिवसाचा ट्रेक करतात
असे सांगितले. ट्रेक गाईड , गावात राहाण्याची
, जेवणाची सर्व सोय तो करुन देतो.
| जीजी |
| Carving Pundarik Temple |
| Carving on Entrance, Pundrik Mandir |
| Pundrik Temple |
सरोवराच्या बाजूची पायवाट सोडून
आम्ही उजव्या बाजूच्या देवदारच्या जंगलात शिरुन वर चढायला सुरुवात केली. थोडे चढून गेल्यावर ब्रम्हा -
विष्णुच्या मंदिरा जवळ पोहोचलो. हे मंदिर २० वर्षापूर्वी
बांधलेले आहे. मंदिर पाहून पायवाटेने सरोवराच्या विरुध्द बाजूला
चालायला सुरुवात केली . थोड्याच वेळात खाली एक छोटस "थाच"
(मैदान) दिसायला लागल . त्यात एक लाकडी मंदिर होते. डाव्या बाजूला शाळा होती. शाळेतली मुलमुली थाच मध्ये
खेळत होती. थाच मध्ये असलेले मंदिर पुंडरिक ऋषीच होते.
लाकडी मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम होते. मंदिर वर्षातून ठराविक वेळीच उघडत
असल्याने आत जाता आले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालून आतल्या
कोरीव कामाची छायाचित्र घेतली. मंदिराच्या उजव्या बाजूला थोडे
खाली उतरुन गेल्यावर एक नैसर्गिक गुहा आहे. तिथे अनेक झेंडे आणि
त्रिशुळं लावलेली होती. इथल्या देवाच नाव "जीजी" असून त्याला नवस बोलला
जातो आणि तो पूर्ण झाला की झेंडे आणि त्रिशुळ अर्पण करतात. या
भागातली सगळी ठिकाण बघून झाली होती. परतीचा प्र्वास करुन पुन्हा
रोपाला उतरायला २ ते ३ तास लागणार होते. लालाने आम्हाला त्या
ऐवजी देवरीला जा असे सांगितले. तिथून ४ वाजताची बस मिळेल.
आम्हाला देवरीच्या वाटेला लावून लालाने आमचा निरोप घेतला. आम्ही पाऊण तासात देवरीला पोहोचलो. बसने सैंज आणि तिथून
टॅक्सीने शानगड गाठले. ( देवरीला ११ , २ आणि ४ वाजता बस आहेत त्या सैंज पर्यंत
जातात)
शानगड आणि परिसर अजूनही टुरिस्ट डेस्टीनेशन न झाल्याने स्थानिक लोक व्यवस्थित माहिती देतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता मदतही करतात. ट्रेकही स्थानिकांना माहिती विचारुन करता येतात. कुठेही धोका जाणवत नाही उलट स्थानिक योग्य माहिती देतात. ट्रेक न करता फक्त आराम , वाचन करण्यासाठी ही शानगड ही उत्तम जागा आहे.
| School near Pundrik Rishi Mandir |
शानगड मध्ये राहून शानगड थाच (Medow) , शांग्चुल महादेव मंदिर ,बार्शानगड ( Barshangharh) धबधबा पाहायला गाडीची आवश्यकता नाही. या भागात बसेस कमी असल्यामुळे आजूबाजूची ठिकाण फ़िरण्यासाठी एक दिवस गाडी करावी लागते.
| Greay Bushchat करडा गप्पीदास |
| Russet Sparrow लाल गौरय |
शानगड मध्ये दुकान, चहाच्या टपर्या किंवा नाश्ता जेवण करण्यासाठी हॉटेल्स, खरेदीसाठी दुकान नाहीत. त्यामुळे फिरण्या बरोबर खरेदी करणार्यांची निराशा होऊ शकते.
जाण्यासाठी :- चंदीगड - मनाली रस्त्यावरून चंदीगडहून मनालीच्या
दिशेने जाताना, मनालीच्या अलीकडे ७० किलोमीटर (२ तास) अंतरावर औट नावाचे गाव आहे. या गावाच्या अलीकडे बोगदा आहे. बोगदा जिथे सुरु होतो त्या ठिकाणी उजवीकडील
रस्ता सैंज मार्गे शानगडला जातो. इथून शानगड ३४ किलोमीटर
अंतरावर आहे. या फाट्यावरुन
सैंजला जाण्यासाठी जीप आणि बसेस मिळतात.
बस :- HRTC च्या बसेस औट, कुलू इत्यादी ठिकाणाहून सैंज पर्यंत जातात. औट टनेल जवळ असलेल्या फाट्यावर त्या थांबतात. पुढे सैंज मधून प्रायाव्हेट टॅक्सी करून शानगड गाठावे लागते .
औटहुन थेट शानगडला जाण्यासाठी दिवसातून एकच बस संध्याकाळी ४ वाजता आहे. ही बस शानगडला ५.४५ पर्यंत पोहोचते. रात्री थांबून सकाळी ७.३० वाजता पुन्हा औटला जाते.
कार / जीप :- दिल्ली, चंदीगडहुन येणाऱ्या बसेस पहाटेच औटला पोहोचतात. त्यावेळी औट टनेल जवळ न उतरता औट गावात उतरून तेथून टॅक्सी करावी. औट ते शानगड १८०० ते २०००/- रुपये भाडे घेतात .
औट टनेल जवळ उतरल्यास तिथे शानगडसाठी शेअर टॅक्सी ८००/- किंवा पूर्ण टॅक्सी बुक केल्यास १८०० ते २०००/- रुपये भाडे घेतात .
विमानमार्गे :- जवळचा विमानतळ भुंतर ५३ किलोमीटर अंतरावर आहे. भुंटरहुन टॅक्सीने (वरील मार्गने) शानगडला जाता येते.
ट्रेनने :- जवळचे रेल्वे स्टेशन जोगिंदर नगर शानगड पासून १२३ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून टॅक्सीने थेट शानगडला जाता येते.
| Golden Emperor |
राहाण्यासाठी :- शानगड मध्ये हळुहळु हॉटेल्स उभी राहात आहेत. सध्या झोस्टेल, होस्टेलीअर, आणि अनेक होम स्टेज शानगड मध्ये आहेत. त्यांची ऑनलाइन बुकींग उपलब्ध आहेत. आम्ही ४ दिवस झोस्टेल मध्ये राहिलो होतो. डॉर्मेट्री ते डिलक्स रुम असे पर्याय तिथे आहेत. लोकेशन, जेवण, नाश्ता उत्तम आहे.
![]() |
| Beas River ,Aut |
खाण्यासाठी :- अनेक स्थानिक लोकांशी गप्पा मारल्यावर कळल की इथला स्थानिक पदार्थ "सिड्डु" आहे. सणासुदीला हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ दोन प्रकारे बनवतात. अक्रोडची पेस्ट घालून किंवा बटाटे घालून. अक्रोड पेस्ट घालून बनवलेला उच्च दर्जाचा समजला जातो. झोस्टेलच्या शेफ़ला आम्ही अक्रोड्चा सिड्डु बनवायला सांगितला , दोन सिड्डु मध्येच आम्ही गार झालो. सिड्डु हा करंजी सारखा दिसतो .बाजरीच्या पिठाच्या करंजीत अक्रोड, आलं, लसूण, मिरची, कोथिंबिर एकत्र करुन मिक्सरला लावून त्याच सारण (स्टफ़िंग) बनवतात, ते या करंजीत भरले जाते. करंजी उकडून घेतात. त्यावर तूप चोपडतात. सिड्डु तिखट चटणी बरोबर खाल्ला जातो. यात वापरले जाणारे सर्व पदार्थ उष्ण आहेत. इथल्या थंड वातावरणात भरपूर कॅलरीज मिळण्यासाठी उपयुक्त आहे.
![]() |
| Siddu सिड्डु |
जाण्यासाठी योग्य वेळ :-
| Shangarh |
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणारी आमच्या कौटुंबिक हिवाळी गटाची सहल काही वैयक्तिक कारणांमुळे या वेळी लवकर घेण्यात यावी का अशी विचारणा केली होती त्यास सर्वांकडून होकार मिळाला. कॅलेंडर बघितले. दिवाळी ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात होती. सुट्यांमध्ये पर्यटन स्थळांना गर्दी असते त्यामुळे यापूर्वीच सहल घ्यायचे ठरून ऑक्टोबरचा पहिला व दुसरा आठवडा सहलीसाठी निश्चित झाला. बघता बघता सहलीसाठी सोळा जणांची नोंदणीही झाली.
साधारण नऊ मुक्काम व रेल्वे प्रवासासहित बारा दिवसांची सहल करण्याचे
ठरले. सहलीचा साधारण कालावधी ठरल्यानंतर सहलीस कुठे जायचे याचा विचार सुरु
झाला. पट्टडक्कल-ऐहोले-बदामी-हंपी-गोकर्ण अशी सहल कधीपासून खुणावते आहे पण
ऑक्टोबरमध्ये कदाचित उष्णेतेचा त्रास जाणवेल म्हणून उत्तरेकडील राज्यात सहल
घ्यावी असा विचार सुरु होऊन हिमाचल प्रदेशावर स्थिरावला. हिमाचलची
शिमला-कुल्लू-मनाली अशी सहल आधी केली असल्याने त्याचा विचार सोडला व कांगडा
व चंबा जिल्ह्यातील धर्मशाळा, पालमपूर, डलहौसी भागात सहलीस जाण्याचे ठरले.
साधारण भटकंतीचा प्रदेश दर्शविण्याकरिता कच्चा नकाशा
उत्तर-पश्चिमी हिमालयाच्या धौलाधर (धवल धार)पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश. वर्षातील जवळपास बाराही महिने या पर्वतशृंखलेतील शिखरे हिमाच्छादित असतात. , खोरी, प्राचीन मंदिरे, मठ, सरोवर ऐतिहासिक भव्य किल्ला असेलेला हा नितांत सुंदर प्रदेश तसेच हिंदू, मुघल, बौद्ध असा विविध धर्म आणि संस्कृती लाभलेला प्रदेश.
हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी काळ हा बाराही महिने अनुकूल आहे. मार्च ते
मध्य जुलै महिन्यात येथे आल्हाददायक वातावरण असते. अनेक प्रकारचे ट्रेकही
याच काळात केले जातात. मध्य जुलै ते सप्टेंबर हा पावसाळी काळही काही
पर्यटकांना आकर्षित करतो.
मध्य सप्टेंबरला पाऊस थांबतो व येथपासून नोव्हेंबरचा काळ हा पर्यटनासाठी
खूपच आल्हाददायक व साहसी उपक्रमांसाठी पर्वणी . या काळात संध्यकाळ/रात्र
मात्र अतिशय थंड असते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे थंडीने गोठवणारे महिने.
बर्फाच्छादित शुभ्र पर्वतरांगा व हिमवृष्टी अनुभवायची असेल तर हा काळ
उत्तम.
हिमाचल प्रदेश विषयी काही संक्षिप्त सामान्य माहिती
राज्य स्थापना : २५ जानेवारी १९७१
एकूण जिल्हे : १२
प्रशासकीय भाषा : हिंदी
इतर मुख्य भाषा : पहाडी
राजधानी : शिमला (उन्हाळी), धर्मशाळा (हिवाळी)
राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फुल
(सहलीत एके ठिकाणी हिमाचल प्रदेश पर्यटन मंडळातर्फे लावलेल्या पाटीचा टिपलेला फोटो )
काही भौगोलिक माहिती
सीमा : उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत.
क्षेत्रफळ : ५५,६७३ चौ.किमी
समुद्र सपाटीपासून उंची : सुधारणे ३५० मीटर ते ७००० मीटर
व्यवसाय: शेती,पर्यटन हे मुख्य व्यवसाय
मुख्य शेती उत्पादने : गहू, बटाटे, तांदूळ, आले. फळे :सफरचंद
प्रमुख औद्योगिक व्यवसाय: फळ प्रक्रिया उद्योग
प्रमुख नद्या :चिनाब,रावी,सतलज,बियास,यमुना
नेहमीप्रमाणे सहलीचे ठिकाण ठरल्यानंतर सर्व तयारी म्हणजे सहलीचा साधारण आराखडा तयार करणे , जाण्या येण्यासाठी सोईस्कर रेल्वे गाड्या शोधणे व त्यानुसार सहलीसाठी निघण्याचा व परतण्याचा दिवस निश्चित करणे, रेल्वेतून उतरल्यापासून परतीच्या रेल्वे स्थानकावर येईपर्यंत संपूर्ण सहलीसाठी खाजगी वाहन निश्चित करणे, हॉटेल्स शोधून निश्चित करणे इ. कामे सुरु झाली. खर्चाचा साधारण अंदाज सांगितल्यावर आपापल्या सोईनुसार सगळ्यांनी पैसेही जमा करायला सुरुवात केली.
रेल्वेने जायचे झाल्यास धर्मशाळेसाठी पंजाबमधील पठाणकोट हे सोईस्कर रेल्वे स्टेशन.जळगांवहून येणार पर्यटक जास्त असल्याने मुंबईला येऊन पश्चिम रेल्वेने पठाणकोटला जाण्यापेक्षा मुंबई-नाशिककरांनी भुसावळला यावे व सर्वांनी एकत्रितपणे पुढचा प्रवास सुरु करावा असे ठरले. त्यानुसार पठाणकोटला सकाळी पोहोचवणारी पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस सोईस्कर ठरणार होती. गाडीला जळगाव थांबा असला तरी भुसावळहून आरक्षण कोटा जास्त असल्याने सर्व तिकिटे एकाच डब्यात मिळण्याची शक्यता जास्त होती व झालेही तसेच. काहींना अटारी-वाघा सीमा बघण्याची खूप इच्छा होती त्यामुळे परतीच्या प्रवासात पठाणकोटला न येता अमृतसरला जाण्याचे ठरले. आमची परतीची काही तिकिटे पश्चिम रेल्वेच्या गोल्डन टेम्पल गाडीची तर काही भुसावळला जाणाऱ्या गाडीची काढली.
सहलीसाठी हॉटेल्सचा शोध घेणेही सुरु होते. धर्मशाळा परिसरात मॅक्लीऑडगंज
भागसु, नड्डी इ. ठिकाणी पर्यटक जास्तकरून भेट देतात. त्यामुळे याच भागात
हॉटेल शोध सुरु केला. बाजारपट्यात अगदी हजार-बाराशे रुपयांपासून रूम दिसतात
पण ग्रुपच्या हिशोबाने एकाच हॉटेलमध्ये सहा-सात रूम उपलभद्ध असणारे
बऱ्यापैकी हॉटेल मिळत नव्हते. सहलीच्या सर्व ठिकाणी HPTDC चे हॉटेल
मिळण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे यावेळी राहण्यासाठी आम्ही आमच्या
बजेटमध्ये बसणारे थोडे वेगवेगळे पर्याय निवडले. रोजच्या रोज सामानाची
बांधाबांध करावी लागू नये याकरिता सहलीच्या प्रत्येक भागात एकेका ठिकाणी
दोन दोन मुक्काम करायचे ठरले.
सोळा जणांच्या ग्रुपकरीता आम्ही १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी शोधत होतो.
पण मॅक्लीऑडगंज वगैरे काही परिसरात रस्ते अरुंद असल्याकारणाने मोठ्या
गाडयांना मज्जाव आहे. तेथील दलालाच्या सांगण्यानुसार आम्ही एक १२ आसनी
टेम्पो ट्रॅव्हलर व एक इनोव्हा क्रिस्ता अशा दोन गाड्या संपूर्ण सहल
कालावधीसाठी निश्चित केल्या.
सहलीचा दिवस जवळ येऊ लागला आणि अचानक काही जणांनी त्यांच्या अथवा घरातील व्यक्तींच्या स्वास्थ्य वषयक तक्रारींमुळे माघार घेण्यास सुरुवात केली. बघता बघता सहलीतील सदस्यांची संख्या निम्म्यावर आली. रेल्वे, हॉटेल्स, खाजगी गाड्या सर्वांसाठी आगाऊ रक्कम देऊन झाली होती. अशा परिस्थितीत काही आरक्षणे रद्द केल्यास आर्थिक फटका बसणार होता. दोन पर्याय होते. सहल रद्द केलेल्या लोकांकडून हा खर्च वसूल करणे किंवा उरलेल्या लोकांवर अधिकचा भार टाकणे. दोन्हीही गोष्टी मनाला पटत नव्हत्या. याच कारणाने तिसरा पर्याय बदली पर्यटक मिळवण्याच्या दृष्टीने मित्र-परिवारात चौकशी सुरु केली. मिपावर सुद्धा हाक देण्याचा विचार मनात घोळत होता. पण ओळखीतच सहलीस तयार असणारी दोन दाम्पत्य मिळाली. बारा जण जमले. भटकंतीसाठी दोन गाड्या ठरवल्याचा निर्णय पथ्थ्यावर पडला होता. छोटी गाडी रद्द करण्याची दलालाला विनंती केली ती मान्य झाली. आता एकच १२ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर असणार होती. खर्च बराच कमी झाला. हॉटेलच्या रूम बुक करतांना एकेक-दोन दोन रूम कमीच ठरवल्या होत्या. तोही खर्च आटोक्यात आला. आता प्रश्न होता नवीन सदस्यांसाठी पठाणकोट जाण्यासाठी रेल्वे तिकिटांचा. मुंबई, पुणे, भुसावळ कुठूनही कुठल्याच गाडीची आणि कुठल्याच दर्जाची तिकिटे शिल्लक नव्हती. शेवटी सहल रद्द केलेल्यांच्या तिकिटावरच नवीन लोकांना घेऊन जायचे ठरवले. जरूर पडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची तयारीही ठेवली. नको असलेली तिकिटे रद्द केली.
अखेर सहलीचा दिवस उजाडला. मुंबईकरांनी दुपारीच सेवाग्राम एक्सप्रेस गाडीने भुसावळला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठले.
गाडी वेळेवर सुटली. कसाऱ्याचा हिरवाईने नटलेला निसर्गसुंदर घाट पार झाला.
हळूहळू नाशिक-मनमाड मागे टाकत पाचोरा या आमच्या मूळ गावच्या रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे फलाटावर भाचा स्वागताला हजर होता. सोबत आमच्या सहल प्रवासात उपयोगी पडावी म्हणून गोणीभर मधुर,रसाळ घरच्या शेतातील मोसंबीही आणली होती.
थोडंसं बोलणं होतं न होतं तेव्हड्यात गाडी सुटली आणि थोड्या अवधीतच
भुसावळला पोहचली. याच फलाटावर पुढच्या प्रवासासाठी पुण्याहून येणारी
जम्मूतावी गाडी पकडायची होती. त्यामुळे सामान घेऊन जिने चढ-उतर करायचा
त्रास वाचणार होता. गाडीला उशीर झाला तर पुढची गाडी चुकू नये याकरता थोडी
लवकरच पोहोचणारी गाडी पकडली होती पण येथपर्यंत गाडी वेळेत आल्यानेआता
पुढच्या प्रवासासाठी तब्ब्ल चार तास वाट बघावी लागणार होती. प्रतिक्षालयात
सामान ठेऊन एकाला नजर ठेवायला बसवले व आम्ही असेच इकडे तिकडे भटकायला बाहेर
पडलो. थोड्याच वेळात इतर जळगांवकर मंडळी सुद्धा येऊन पोहचली. चार मुंबईकर
सहल रद्द केलेल्या जळगावकरांच्या तिकिटावर प्रवास करणार होते त्यांना
प्रवासापुरती मूळ तिकीटवाल्यांची आधार कार्ड दिली.
प्रतिक्षा संपली. पठाणकोटला जाणारी गाडी अगदी वेळेवर भुसावळला आली.
रात्रीचे दोन वाजले होते. आमच्या बर्थवर लोक डाराडूर झोपलेले होते.
त्यांना उठवून आम्ही स्थिरावेपर्यंत थोडा वेळ गेला. तेव्हढयात तिकीट
तपासनीस आला. बारा जणांची मिळून तीन वेगवेगळी तिकिटे होती. त्याला तपासावी
वाटली अशी कोणतीही तीन नावे त्याने घेतली. प्रत्येकाचे ओळखपत्र पहिले,
त्यावरील फोटो पाहिला व सर्वजण आल्याची नोंद करून निघून गेला. वास्तविक
ज्यांची ओळखपत्रे बघितल्या गेली त्यातील एक प्रवासी डमी होता. घाई गर्दीत
त्याच्याकडून थोडीशी चूक झाली होती जी आमच्यासाठी फायदेशीर ठरली होती.
आम्ही सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतरही संपूर्ण प्रवासात ३-४
वेळा तिकीट तपासनीस (TTE) आले परंतु ते फक्त नवीन स्थानकांहून चढलेल्या
प्रवाशांची तिकिटे तपासण्यापुरतेच.
AC डब्यात करोना काळात बंद केलेली पांघरून सेवा सुरु झाल्याचे माहित होते
पण मुंबईहून निघाल्यानंतर आम्हाला रेल्वेकडून निरोप मिळाला की झेलम गाडीला
ही सुविधा नाही. त्यामुळे जळगावकरांना आमच्यासाठी अंथरून-पांघरून आणायला
सांगितले त्याचा चांगला उपयोग झाला. दुसरा दिवस व रात्र संपूर्ण रेल्वे
प्रवास होता. प्रवासासाठी घरूनच जेवण बांधून आणले होते त्यामुळे बाहेरून
काही जास्त विकत घ्यावे लागले नाही.
तिखट, गोड पुरी, तिळाची,शेंगदाण्याची चटणी,गुळ, साजूक तूप, कैरी, कांदा, लोणचे, पापड असे जास्त दिवस टिकाऊ पदार्थ
नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी, गाण्याच्या भेंड्या व पुरुष मंडळींनी रमीचा डाव टाकून वेळ घालवण्यास सुरुवात केली.
संपूर्ण प्रवासात वेळेवर धावणारी गाडी अखेरच्या स्थानकाआधी थोडी रखडली.
येथे फलाटावर बरेच स्थानिक लोक जमलेले दिसत होते. चौकशी केली असता कळले की
कोणीतरी लष्करी अधिकारी निवृत्त होऊन गावी परत आला होता त्याच्या
स्वागत-सत्काराला सर्व जमले होते. निवृत्त अधिकाऱ्याला त्यांचा एक फोटो घेऊ
का असे विचारला असता आमच्या ग्रुपच्या माणसांनाही त्यांच्या सोबत उभे करून
नंतर फोटो घ्या असे त्यांनी सुचवले.
यानंतर थोडी गंमतच झाली. अधिकाऱ्याबरोबरचे लोक पुढे निघून गेले होते. आम्ही कोणाबरोबर फोटो काढला त्यांचे नाव तरी माहित असावे म्हणून त्यांनाच विचारले त्याबरोबर ते मिश्किल हसले. अर्थात नाव समजलेच 'चरणजित सिंगजी'.
अखेर थोड्या वेळाने गाडी हलली आणि पठाणकोट स्टेशनला उतरायची तयारी सुरु झाली
क्रमश:
पुढच्या भटकंतीसाठी ठरविलेली गाडी रेल्वे स्थानकाबाहेर येऊन थांबल्याचा तासाभरापूर्वीच फोन आला होता. स्थानकाबाहेर येऊन गाडीचा मालक, चालक यांची भेट झाली. सर्व सामान टेम्पो ट्रॅव्हलरच्या टपावर चढवल्या गेले.
गाडीचा मालक आम्ही रद्द केलेली छोटी गाडी घेऊन दुसऱ्या पर्यटकांना घेण्यास आला होता. आम्हाला भेटून तो लगेच निघून गेला.आणि आमचा प्रवास हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेकडे प्रवास सुरु झाला . १०-१५ मिनिटातच पंजाबची हद्द सोडून आम्ही हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. वाटेत नूरपूर हे मोठे ठिकाण. येथून डलहौसी, धर्मशाळा वगैरे ठिकाणी जाण्यासाठी फाटे फुटतात. येथे एके ठिकाणी ओळीने काही ढाबे होते. त्यातल्याच एकावर गाडी थांबवली. गरम गरम आलू-प्याज , पनीर, मिक्स पराठे सोबत दही, भाजी, मॅगी असा पोटभर नाश्ता झाला व पुढे निघालो.
पठाणकोट पासून धर्मशाळा अंतर साधारण ८०किमी असून वळणावळणाच्या घाटरस्त्यामुळे दोन अडीच तास लागतात. पठाणकोट (पंजाब) ते जोगिंदरनगर (हि.प्र.) या दरम्यान छोटी (Narrow Guage ) रेल्वे धावते. या मार्गावरील कांगडा स्टेशन पासून धर्मशाळा फक्त १७ किमीवर आहे परंतु रेल्वे खूपच धीम्या गतीने चालते व या मार्गावर फेऱ्याही कमी आहेत त्यामुळे रोडने प्रवास करणे सोईस्कर. विमानाने धर्मशाळेला पोहचायचे असेल तर जवळचे गग्गल/कांगडा विमानतळ अवघ्या १५ किमीवर आहे.
नूरपूरहून धर्मशाळेला पोहचण्यास दोन तास लागणार आहेत. तोपर्यंत धर्मशाळेविषयी थोडेसे जाणून घेऊया.
धर्मशाळेची भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात. एक अप्पर धर्मशाळा आणि दुसरा लोवर धर्मशाळा. मॅक्लिओडगंज हा भाग अप्पर धर्मशाळा म्हणून ओळखला जातो. बहुतेक पर्यटन स्थळे याच भागात आहेत. लोवर धर्मशाळेत काही हिंदू, बौद्ध मंदिरे, क्रिकेट स्टेडियम, युद्ध वीर स्मारक उद्यान इ. पाईन -देवदार वृक्ष यांच्या सानिध्यात सुंदर धबधबे , ओढे आणि थंड वातावरण यामुळे धर्मशाळा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.
१९०४ च्या दरम्यान धर्मशाळेच्या फोर्सिथगंज आणि मॅक्लिओडगंज या भागात व्यापार, व्यववसाय भरभराटीला होता. कांगडा जिल्ह्याचे सरकारी कार्यालय केंद्र म्हणूनही याची ओळख होती. परंतु ४ एप्रिल १९०५ रोजी आलेल्या पहाटेच्या भूकंपात संपूर्ण परिसर उध्वस्त झाला. रिश्टरस्केलवर ७.८ च्या या विनाशकारी भूकंपात २०००० हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले, ५३ हजाराहून अधिकचे पशु गमावले तर लाखाहून अधिक इमारतींची पडझड झाली.
यानंतर सरकारी कार्यालये येथून इतरत्र हलविली गेली. येथे राहिले फक्त कारागृह आणि पोलीस स्टेशन. त्यानंतर १९४७ पर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी हे फक्त विश्रांतीसाठीचे ठिकाण बनले. १९५९ मध्ये भारत सरकारने १४ व्या दलाई लामा, तेन्झिन ग्यात्शो यांना राजकीय आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. दलाई लामा यांच्या सोबत हजारो तिबेटी निर्वासित आले. त्यांची संस्कृती टिकवण्यासाठी या भागात तिबेटी लोकांनी अनेक धार्मिक तसेच शैक्षणिक स्थळे उभारली. यानंतर परत एकदा या भागात व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला गती येण्यास सुरुवात झाली.
आमचे हॉटेलही याच भागात नड्डी येथे आरक्षित केलेले होते. साधारण ११ वाजता मॅक्लिओडगंजपासून जवळच असलेल्या नड्डी येथील हॉटेलवर (ड्रॅगन रिसॉर्ट) पोहचलो.
नड्डी सूर्यास्त बघण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण. हॉटेलच्या दोन इमारती आहेत त्यामधली प्रत्येक मजल्यावर दोन रूम असलेली एक इमारत दोन दिवसांकरिता आमच्यासाठी राखीव होती. तळ मजल्याची गच्ची म्हणजे पहिल्या मजल्याचा भला मोठा सज्जा, पहिल्या मजल्याची गच्ची म्हणजे दुसऱ्या मजल्याचा सज्जा आणि परत दुसऱ्या मजल्याची गच्ची म्हणजे सर्वाना एकत्र येण्याची जागा.
आमची दुसऱ्या मजल्यावरची प्रशस्त रूम. थंड पडू नये म्हणून सर्व फर्निचर, भिंती व छत लाकडी.
बाल्कनी व गच्चीतून दिसणारा नजारा
आज आमच्याकडे भटकंतीसाठी अर्धाच दिवस होता. सकाळी पोटभर नाश्ता झाला असल्याने दुपारचे जेवण टाळून, ताजेतवाने होऊन लगेच बाहेर पडलो. नड्डीहून मॅक्लिओडगंज जाताना वाटेतच दल सरोवर आहे. देवदार वृक्षांची किनार लाभलेले एक लहानसे नयनरम्य ठिकाण. जातायेता केव्हाही येथे उतरता येणार असल्याने गाडीतूनच बघत पुढे निघालो.
१०-१५ मिनीटांत (३ किमी) 'सेंट जॉन चर्च इन वाईल्डनेस' येथे पोहचलो. रस्त्याच्या कडेलाच घनदाट देवदार वृक्षांच्या झाडीत असलेले हे चर्च पाद्री जॉन यांना समर्पित आहे. १८५२ मध्ये निर्मित चर्चची दगडी इमारत अतिशय देखणी असून खिडक्यांना बेल्जियम काचेची सुंदर तावदाने आहेत.
काही फोटो
चर्चच्या मागच्या बाजूस १८६३ मध्ये मरण पावलेल्या ब्रिटिश व्हॉइसराय आणि गव्हर्नर जनरल जेम्स ब्रूस (1861-63) यांचे त्यांच्या विधवा पत्नीने उभारलेले थडगे/स्मारक आहे. जेम्स ब्रूस हे ब्रुसचाआठवा वंशपरंपरागत कुलप्रमुख (8 thEarl of Elgin)होते. ते धर्मशाळेच्या सौंदर्याच्या अक्षरश: प्रेमात पडले होते. स्कॉटलँड या त्यांच्या मूळ ठिकाणची सुंदरता व तितकेच सुंदर असलेले हे ठिकाण त्यांना मंत्रमुग्ध करीत असे.
१९०५ च्या भूकंपात मरण पावलेल्या ब्रिटिश सैनिकांची थडगीही येथे आहेत
आज नवरात्रीचा नववा दिवस. रंग गुलाबी . एक ग्रुप फोटो बनतोच. चर्चच्या आवारात देवदार वृक्षांच्या पार्श्वभूमीवर आमचा ग्रुप फोटो
येथून पुढे तीन किमीवर मॅक्लिओडगंजची बाजारपेठ सुरु झाली. तिबेटी लोकांच्या वस्तीमुळे लहान ल्हासा (तिबेटमधील ल्हासा)म्हणूनही ओळखले जाते. बौद्ध मठ आणि बुद्ध मूर्तींचे समूह हे येथील पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे..रस्ते अरुंद असले तरी वाहने अत्यन्त शिस्तीत चालविल्या जात असल्याने गोंधळ नव्हता. काही ठिकाणी वाहतूक पोलीस वॉकीटॉकीद्वारे दुसऱ्या टोकाच्या पोलिसांशी संपर्क साधत एकतर्फी रहदारी सोडून गर्दीला नियंत्रित करीत होते. येथून पुढे निघालो. मॅक्लिओडगंजपासून अवघ्या २-३ किमी अंतरावर आपण भागसुला पोहचतो. येथे प्राचीन भागसु नाग मंदिर आहेजे जे सर्प देवता व शंकराला समर्पित आहे. सध्याचे भागसू नाग मंदिर 19व्या शतकाच्या सुरुवातीला 1 ल्या गुरखा रायफल्सने बांधले आहे असे कळते.
मंदिराच्या मागेशनी मंदिर आहे.
मंदिराच्या बाजूलाच पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेला तलाव आहे ज्यात भाविक स्नान करू शकतात.
मंदिरापासूनच पुढे काही पायऱ्या व चढाव चढून गेल्यावर सुंदर धबधबा दिसतो. हा भागसु धबधबा म्हणूनच ओळखला जातो. भेट देण्यासाठी पावसाळ्यानंतरचा काळ उत्तम असला तरी हा बाराही महिने वाहणारा धबधबा आहे. धबधब्यात न उतरताही लांबूनसुद्धा याचे दृश्य सुंदर दिसते. आम्ही मात्र अगदी नदीच्या पात्रात उतरून याचा आनंद घेतला. थंडगार पाण्यात पाय बुडवताच दिवसभराचा प्रवासाचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला.
कालचक्र मंदिर
मॅक्लिओडगंजच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या एका चिंचोळ्या गल्लीत असलेले हे तिबेटी शैलीतील सुंदर मंदिर. तळ मजल्यावर एका खोलीत विशाल मंत्र चक्र असून बाहेर अनेक छोटी मंत्र चक्र आहेत. मंत्र चक्र फिरवल्याने प्रत्यक्ष मंत्र घोष न करताही पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. भिंतींवर सुंदर म्युरल्स आहेत. सार्वजनिक शिक्षण प्रसार केंद्र म्हणून या मंदिराचा उपयोग केला जातो.
येथून जवळच दलाई लामा टेम्पल आहे पण संध्याकाळचे पाच वाजत आले होते आणि आम्हाला सूर्यास्त बघायला नड्डीला पोहचायचे होते त्यामुळे तिकडे जाणे रहित करून मुख्य चौकात आलो. येथे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत पण भागसुनागला मोमोज खाल्ले असल्याने भूक नव्हती. फक्त आईस्क्रीम घेतले आणि गाडीकडे निघालो.
वाहनांची गर्दी होती पण रहदारीत कुठे अडकलो नाही. सूर्यास्त होण्याचा अर्धा-पाऊण तास आधीच नड्डी सूर्यास्त पॉइंटला पोहचलो. येथून आमचे हॉटेल हाकेच्या अंतरावर असल्याने आता पुढे गाडीची आवश्यकता नव्हती म्हणून गाडी हॉटेलला पाठवून दिली. मुख्य रस्त्यापासून थोडेसे खालच्या बाजूला डोंगराच्या उतारावर सूर्यास्ताची वाट बघत फोटोग्राफीही सुरु होती. छोटे छोटे दगड एकमेकांवर रचण्याचा खेळही सुरु होता.
हळू हळू सूर्य अस्ताला जाऊ लागला. आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी मोक्याच्या जागा पकडल्या.
क्षणाक्षणाला आकाशाच्या छटा बदलू लागल्या.
सूर्य अस्ताला गेला आणि आम्ही परत फिरलो. हॉटेलवर पायी परतेपर्यंत अंधारही पडायला सुरवात झाली.
रूमवर जाऊन ताजेतवाने झालो व परत सर्व शेकोटीच्या कार्यक्रमाला एकत्र आलो. दिवसभरातले अनुभव, गप्पागोष्टी, गाणी, नाच यात तास-दीड तास कसा निघून गेला कळलेच नाही.
सहलीत नव्यानेच सामील झालेले दाम्पत्य विजय-वनिता यांनी "ऐ मेरी जोहरा जबीं तुझे मालुम नहीं तू अभी तक है हसी और मै जवान" गाणे म्हणत सुंदर नृत्यही केले.
अचानक आलेल्या काही अडचणींमुळे यावेळी सहलीत तीन वेगवेगळी कुटुंबे सामील झालेली होती. या कार्यक्रमामुळे मात्र सर्वांची भीड चेपली व तीन परिवाररांचा मिळून आता एकच मोठा परिवार बनला होता.
जेवणाचे टेबल लागले होते. जेवण आटोपून सर्व आपापल्या रूमकडे वळले.
क्रमश:
आज सहलीचा दुसरा दिवस. पहाटे लवकरच जागआली. बाल्कनीतून पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इमारतीच्या गच्चीतून अजून सुंदर नजारा दिसणार होता म्हणून वर आलो. आमच्या आधीच उठलेले काही जण दूरवर सूर्योदय पॉइंटला पोहचले होते. सूर्य पाठीमागच्या डोंगरातून वर येत होता त्याची किरणे समोरच्या शिखरांवर पडून उजळायला सुरुवात झाली होती.
आज चहाही गच्चीतच मागवला
काही दिवसात हेच पर्वत व परिसर बर्फाच्या चादरीत लपेटला जाईल. आता पर्वतशिखरे हिमाच्छादित व्हायला सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीचा फोटो (सौजन्य:ड्रॅगन रिसॉर्ट, नड्डी)
आजच्या भटकंतीसाठी निघायचे होते. सगळ्यांना पटापट आवरून नाश्त्यासाठी जमायला सांगितले.आजचे मुख्य आकर्षण कांगडा किल्ला पाहून दुपारनंतर लोअर धर्मशाळेतील प्रेक्षणीय स्थळे असा कार्क्रम ठरला होता.साडेनऊला बाहेर पडलो. मक्लाईडगंजपासून कांगडा किल्ला साधारण २८ किमी. सव्वा तासात किल्ल्याला पोहचलो. गाडी थेट किल्ल्यापर्यंत जाते.
प्रत्येकी रु.२५/- भरून आवारात प्रवेश केला
भारतीय पुरातत्व विभागाच्या एका पाटीवरून घेतलेली काही माहिती
या भागात सापडलेल्या अश्मयुगीन हत्यारांवरून कांगडा व आसपासचे क्षेत्र इ.स.पूर्व ५०००० ते २०००० प्राचीन असावे असे सिद्ध होते ज्या काळात मानव शिकार-संग्राहक प्रकारात मोडत असे. त्यानंतर रोर नामक भागातून इ.स.पूर्व २०००० ते १०००० या काळातिल काही नवपाषाण हत्यारे मिळाली ज्यावेळी मानव कृषी जीवनाकडे प्रगत झाला होता. याच भागात इ.स.पूर्व १२०० वर्षांपूर्वी सापडलेला लोखंडी वस्तरा लोहयुगाची साक्ष देतो. पठ्यार व खनियारा येथून इ.स. पूर्व दुसऱ्या व पहिल्या शतकातील सापडलेल्या तीन शिलालेखांतून या भागाचे त्या काळातील अस्तित्व लक्षात येते. येथे सापडलेल्या ताम्र. रजत नाण्यांवरून वेळोवेळच्या कांग्रा राजांची व दिल्लीच्या मुस्लिम राज्यकर्त्यांची साक्ष मिळते. प्राचीन त्रिगर्त राज्य (आजचे कांगडा) म्हणजे सतलज, रावी आणि व्यास नद्यांच्या मधील पहाडी भूभाग तसेच जालंधरचा मैदानी भूभागापर्यंत पसरलेले होते. असे मानतात की यामधील नगरकोट (कांगडा) अतिशय महत्वपूर्ण भाग होता व याची स्थापना महाभारत युद्धसमाप्तीनंतर राजा सुशर्मा चंद्र याने लगेचच केली होती.कोट कांग्रा किंवा नगरकोट याबद्दलचा पहिला उल्लेख सन १००९ मध्ये महम्मद गझनीने केलेल्या आक्रमणाचा मिळतो. त्याने आपला राज्यपाल येथे नियुक्त केला होता ज्याला दिल्लीच्या तोमर शासकांनी नंतर लावले व किल्ल्याचा ताबा जातोच राजघराण्याकडे दिला. इ.स. १३३७ मध्ये मोहम्मद तुघलकने किल्ल्याचा ताबा मिळवला व त्यानंतर सन १३५१ मध्ये त्याचा वारस फिरुझशाह तुघलक याचा अधिकार या किल्ल्यावर आला. सन १६२१ मध्ये जहांगीरने १५ महिन्यांच्या घेराबंदीनंतर किल्ला जिकून घेतला व सैफ अली खानला राज्यपाल म्हणून नियुक्त केले. सैफ अली खानच्या मृत्यूनंतर मुघल क्षीण पडले व सॅन १७८६ मध्ये शक्तिशाली राजा संसारचंद्र द्वितीय याने किल्ल्याचा ताबा मिळवला. राजा संसारचंद् याला याला आपले शेजारील राज्यकर्ते, अमरसिंग थापा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी गुरखा व शेवटी महाराजा रणजितसिंग या शीख नेतृत्वाशी सामना करावा लागला. अखेर सन १८०९ मध्ये त्याला समर्पण करावे लागले व किल्ला शिखांच्या ताब्यात गेला. त्यानंतर इतर राज्यांबरोबर हाही किल्ला सन १८४६ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
बाणगंगा आणि मांझी (पाताळगंगा) या दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या एका उंच- अरुंद लांबट डोंगरपट्टीवर हा प्राचीन किल्ला आहे. भारतातील बहुधा सर्वात जुना किल्ला. किल्ल्याच्या तटबंदीचा घेर जवळपास चार किमी. आहे. किल्ल्याने पन्नासच्या वर आक्रमणे झेलली. अनेक जय-पराजय पहिले. अनेक राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात बांधलेली वास्तुशिल्पे, मंदिरे पहिली. १९०५ च्या विनाशकारी भूकंपात किल्ल्यास अतोनात नुकसान झाले. भारतीय पुरातत्व खात्याने संवर्धन केल्याने आजही हा किल्ला दिमाखात उभा आहे.
किल्ल्यावर पोहचण्यासाठी आपल्याला अनेक दरवाजे पार करावे लागतात.
प्रथम दरवाजा आहे “रणजित सिंग द्वार”. हा दरवाजा पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांनी बांधला. दरवाजा भव्य व कमानदार आहे.
या दरवाजातून आत आल्यावर थोडी मोकळी जागा आहे व त्या पलीकडे अजून एक कमान असलेला दरवाजा आहे. याला अहिनी दरवाजा म्हणतात. मध्ये थोडी मोकळी जागा आहे तेथे बसून किल्ल्याविषयी थोडी माहिती घेतली.
किल्ल्यासाठी आपण तिकीट काढतो तेथेच बाजूला ऑडिओ गाईडची सुविधा मिळते (खाजगी).आपल्याला हेडफोन व सोबत माहिती भरलेले उपकरण मिळते. सोबत ठिकाणांचे अनुक्रम क्रमांक दिलेला किल्ल्याचा नकाशाही दिला जातो. नकाशा व उपकरण कसे वापरायचे त्याची माहिती देतात. एकच उपकरण घेऊन एकाने माहिती ऐकायची व त्याने ती इतरांना द्यायची असे चालले असते. पण सर्वांची चालण्याची गती सारखी असणार नव्हती. म्हणून आम्ही तीन उपकरणे घेतली म्हणजे कोणी मागे पुढे झाले तरी अडचण येणार नव्हती. (दर २००/-प्रत्येकी होता पण आम्ही तीन घेतल्याने एकूण ४५०/- देण्याचे ठरले)
अहिनी दरवाजा
याच्या पलीकडे प्रशस्तअंगण असून पुढे तिसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत, बाजूला भिंत असून प्रत्येक मजल्यावर चौकोनी खिडक्या आहेत (जंग्या?). या खडक्या प्रत्येक पायरीच्या बाजूला एक याप्रमाणे दिसतात.
बाजूच्या भिंतीत दरवाजाच्या डाव्या बाजूस गणेश तर उजव्या बाजूस देवी दुर्गेची सुंदर प्रतिमा आहे. मध्यभागी एक हरीण व गळ्यात उडतारुमाल (ध्वज? काय असावे?) दिसतो.येथे आणखीही काही प्रतिमा आहेत जसे गणेश व हनुमान इ.
चवथा दरवाजा आहे "अमिरी दरवाजा" अमीरी दरवाजापासून पायऱ्या लागतात
येथे वळण घेऊन रस्ता पाचव्या क्रमांकाच्या दरवाजाकडे जातो.
पाचवा दरवाजा म्हणजे तीन वेगवेगळ्या उंचीच्या कमानी असलेली संरचना आहे. हा दरवाजा “जहांगीरी दरवाजा” म्हणून ओळखला जातो. कांगडा विजयाच्या स्मरणार्थ स्वतः जहांगीर या मुघल सम्राटाने या दरवाजाचे निर्माण केले होते. जहांगीर दरवाजा पार केला की किल्ल्यापर्यंत पोहचायचा आपला एक टप्पा पार होतो.
येथून दिसणारे दृश्य
यापुढे उंच दगडी तटबंदी असलेल्या एका चिंचोळ्या वाटेने आपल्याला पुढे जावे लागते. हा म्हणजे अंधेरी दरवाजा. अंधाऱ्या मार्गामुळे कदाचित याला अंधेरी नाव असावे.
येथे पुढील दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर वर बसून थोडी विश्रांती घेतली.
पुढील द्वार म्हणजे म्हणजे किल्ल्याच्या रहिवासी संकुलाकडे घेऊन जाणारा दरवाजा. हा दरवाजा 'दर्शनी दरवाजा' म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या एका बाजूस गंगा तर दुसऱ्या बाजूस यमुनेची प्रतिमा आहे. गंगा तिचे वाहन मगर तर यमुना तिचे वाहन कासवासहित दिसते.
दर्शनी दरवाजातून आत जाताच प्रशस्त अंगण लागते. सुरवातीलाच भव्य प्राचीन पिंपळवृक्ष आहे.
याच्या बाजूला दर्शनी दरवाजाच्या उजव्या बाजूने अंगणाकडे तोंडकरून काही खोल्या आहेत ज्या बहुदा येथील संकुलात असलेल्या पुजारी लोकांचे वास्तव्य असावे. बहुतेक खोल्यांचे छत, दरवाजे खिडक्या नाहीत. बहुतेक भूकंपात खूप पडझड झाली असावी. पडझड झालेल्या इमारतींचे अवशेष येथे नजरेस पडतात.
अंगणाच्या पलीकडे राजवाड्याच्या पडक्या वास्तूकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांमुळे डावा व उजवा असे दोन भाग पडतात.
उजव्या बाजूस लक्ष्मी नारायण मंदिर होते आता त्याचा फक्त चौथरा, बांधकामातील काही अवशेष व पाठीमागील भिंतच शिल्लक आहे.
आतल्या बाजूने सामान्य वाटणाऱ्या या लक्ष्मी नारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवर मात्र अत्यन्त सुंदर कोरीव काम आहे. ही भिंत उभारण्यास दहा वर्षे लागली असे कळते.
जवळून दिसणारी भिंत
डाव्या बाजूस अंबिका मातेचे मंदिर आहे. मंदिराच्याच मागे जैन मंदिरही आहे.
गणपती जैन तीर्थंकर. शिव-पार्वती, विष्णू, ब्रह्मा यांच्या लहान प्रतिमा तसेच हनुमान, नरसिंह इ. प्रतिमाही आहेत
अंबा माता मंदिर परिसर
पायऱ्या चढून गेल्यावर महाल दरवाजा लागतो.
महाल आता अवशेष रूपातच दिसतो.येथे पाण्याचे टाके, भूमिगत खोल्या नजरेस पडतात. येथून पुढे दगडी बांधकामा ऐवजी वीट बांधकाम दिसायला सुरुवात होते.
पाठीमागे पाहिल्यास सुरुवातीचा प्राचीन भव्य वटवृक्ष दिसतो
पुढे किल्याचा शेवटचा भाग म्हणजे एक प्रशस्त बहुभुज बुरुज आहे. येथून आसपासच्या भागावर नजर ठेवण्यात येत असावी. येथून निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो.
किल्ला पाहून झाला. झरझर उतरायला सुरुवात केली. किल्याच्या प्रवेश द्वाराजवळच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने उभारलेले छोटेसे संग्रहालय आहे ते पहिले.
संग्रहालयात फोटो घेऊ देत नाहीत पण बाहेर खूप स्तंभ, भग्न मूर्ती व इतर अवशेष आहेत त्यांचे फोटो घेता आले.
महिषासुरमर्दिनी, घटपल्लव स्तंभ अवशेष, स्तंभ अवशेष, गंगा (१३-१४ व्या शतकातील), यक्ष
देवी, भारवाहक, उडते यक्ष
थोडी चालण्याची तयारी असेल तर धर्मशाळा सहलीत कांगडा किल्ला हे पाहायलाच हवे असे एक ठिकाण आहे.
बाहेर पडलो. लिंबू सरबत, मोमोज,चहा असे ज्याला हवे ते घेतले व गाडीत बसलो. सकाळी पोटभर नाश्ता होत असल्याने दुपारी जेवणाची जरूर भासत नव्हती. जरूर पडल्यास फळे, घरून आणलेला खाऊ गाडीत बसूनच खाल्ला जात होता. त्यामळे वाचलेला वेळ एखाद दुसरे जास्तीचे पर्यटन स्थळ बघण्यास उपयोगात येत होता. यानंतर सहलीच्या राहिलेल्या सर्व दिवसातही हाच क्रम सुरु राहिला.
(खाऊ: खाऱ्या पाण्यात उकळून वाळवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भिजत घालून नंतर, उकळून-वाळवून-वाळूत भाजून (फोडून) तयार केलेले गहू, डिंकाचे लाडू, चिवडा इ. कितीही दिवस टिकेल असा भरपूर खाऊ सोबत होता)
दुपारचा एक वाजला होता. धर्मशाळेकडे परत निघालो. पुढचे ठिकाण होते हिमाचल प्रदेशच्या युद्ध वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक. पाऊण तासात येथे पोहचलो.
प्रवेश फी रु.२०/- प्रत्येकी भरून उद्यानात प्रवेश केला.
पाईन वृक्षांच्या झाडीत उंच-सखल जमिनीवर हे सुंदर उद्यान आहे. वेळोवेळी झालेल्या युद्धात वीरमरण आलेल्या योध्यांची नावे येथे काळ्या दगडात उंच लाद्यांवर कोरलेली आहेत. उद्यानातील पायवाटांवरून फेरफटका मारायला छान वाटते.
उद्यानाच्या बाहेर रणगाडा, तोफ, ठेवलेली आहे तसेच पाकिस्तानचा जप्त केलेला एक रणगाडाही आहे. या ठिकाणास भेट देण्यासाठी अर्धा-पाऊण तास पुष्कळ आहे.
येथून पुढचे ठिकाण हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असणार होते. अंतर फक्त अडीच किमी. पुढच्या पाचच मिनिटात येथे पोहचलो.
प्रवेश फी व भेटीची वेळ
२३००० आसन क्षमता असलेले हे स्टेडियम हिमाचल प्रदेश क्रिकेटच्या रणजी मॅचेस तसेच काही आंतर राज्य क्रिकेट खेळांसाठी वापरले जाते. किंग्स इलेव्हन पंजाबचे होम ग्राउंड म्हणून काही IPL च्या मॅचेसही येथे खेळल्या गेल्या आहेत. तसेच काही एकदिवसीय आणि टेस्ट मॅचेस खेळल्या गेल्या आहेत.
स्टेडियमची इमारत
स्टेडियमचे मैदान देखभाल दुरुस्तीच्या कामास्तव खोदलेले आहे हे कळल्याने मूळ स्टेडियम कसे दिसते त्याचा अंदाज यावा म्हणून स्टेडियमच्या बॅनरचा फोटो काढून घेतला.
स्टेडियम मध्ये प्रवेश केल्यावर दिसणारे दृश्य. मागे धौलाधर (धवलधार) पर्वत रांग.
मैदानात देखभाल, दुरुस्तीचे काम सुरु होते. खोदकाम केलेले मैदान.
खेळ सुरु नसतांनाही खेळाची मजा अनुभवणारे आमच्या ग्रुपचे प्रेक्षक
अर्धा तास थांबून बाहेर आलो. बाहेर खाद्य पदार्थांचे काही स्टॉल आहेत. चहापाणी झाले. अर्ध्या तासात पुढच्या ठिकाणाला पोहचलो. हे एक धार्मिक स्थळ आहे.
कुनाल पथरी किंवा कपालेश्वर माता मंदिर.
51 शक्तीपीठांपैकी हे एक ठिकाण म्हणजे 'कुणाल पत्थरी मंदिर'. असे मानतात की सतीच्या शरीराचा कपाळाचा भाग या ठिकाणी पडल्याने याला कपालेश्वरी माता मंदिर असेही म्हणतात.(खरं तर कपाळ म्हणजे कवटीचा वरचा गोलाकार भाग इथे अपेक्षित आहे) हा भाग उलट ठेवल्यावर परातीसारखा भासतो. स्थानिक कांगडी भाषेत पीठ मळण्याची लाकडी परात असते तिला कुनाल असे म्हणतात. मंदिरात मातेच्या मूर्तीवर अशा आकाराची दगडी कुणाल असल्याने मंदिर कुनाल पत्थरी मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की कुनाल मधील पाणी कधीच आटत नाही. भक्तांना हेच पाणी तीर्थ म्हणून दिल्या जाते जे अतिशय गुणकारी आहेअसे सांगितल्या जाते.
मंदिराचा परिसर अतिशय रम्य असून आजूबाजूला चहाचे मळेही आहेत.१५-२० मिनिट येथे थांबून परत निघालो.
वाटेत चहाचे मळे आहेत तेथे थोडावेळ रेंगाळलो. महिला पर्यटकांनी मळ्यात भरपूर फोटो काढले.
संध्याकाळचे पाच वाजले होते. अजून एखादे ठिकाण बघायचा विचार होता पण आमच्या चालकाची आता जास्त कुठे थांबायची इच्छा दिसत नव्हती कारण आज दसरा हा सणाचा दिवस होता आणि चालक स्थानिक म्हणजे धर्मशाळेचाच असल्याने त्याला लवकरात लवकर घरी पोहचण्याची ओढ असावी. आम्हीही आवरते घेतले. सहाच्या आत हॉटेलला परत आलो. उद्या सकाळी लवकर यायच्या बोलीवर गाडी चालकाला सुटी दिली .
रिसॉर्टला पोहचल्यावर कालच्या प्रमाणेच आजही शेकोटीभवती गप्पागोष्टी रंगल्या. केक कापून मोठ्या बहिणीचा वाढदिवसही साजरा केला गेला.
उद्या हॉटेल सोडायचे असल्याने रात्रीच सर्व आवराआवर करून झोपी गेलो.
क्रमश:
आजही लवकरच जाग आली. काही जण लवकरच सूर्योदय पॉइंटला निघून गेले होते. आम्ही मात्र गच्चीत गरमागरम चहाचे घोट घेत सभोवतालच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात सामावून घेत बसलो.
आज धर्मशाळेची काही पर्यटन स्थळे व प्रवासातील काही ठिकाणे बघत
पालमपूरला पोहचायचे होते. आज हॉटेल सोडायचे असल्याने रात्रीच सर्व आवराआवर
करून बॅगा भरून ठेवल्या होत्या. रात्री सुटीवर गेलेला आमचा चालकही लवकरच
हजर झाला होता. सकाळचा नाश्ता व हॉटेलचे बिल वगैरे चुकते करून दहाच्या
सुमारास बाहेर पडलो.
दोन दिवसात जाता येता दल लेक दिसत होते पण आज गाडीतून उतरून बघायचे ठरवले
होते. पाचच मिनिटात लेकला पोहचलो. दल लेक म्हटले की श्रीनगरचे विस्तीर्ण
सरोवर, हाऊस बोट, शिकारा नजरेसमोर तरळते पण आता समोर दिसत होते ते याच
नावाचे पण भिन्न असे सुंदर लांबट आकाराचे लहानसे सरोवर. सरोवराच्या एका
बाजूस छोटेसे मंदिर आहे. सरोवराच्या पलीकडील बाजूने देवदार वृक्षांनी
नटलेली चढत जाणारी सुंदर पर्वतरांग आहे.
छोटीशी पिकनिक व फोटोग्राफीसाठी एक छान ठिकाण.
१५-२० मिनिट येथे रेंगाळून धर्मशाळेकडे निघालो. धर्मशाळेपासुन साधारण पाच किमीवर खनियरा या छोट्याशा गावी रस्त्यालगतच असलेल्या 'अघांजर महादेव' मंदिराजवळ पोहचलो. गाडीतून उतरताच समोर मंदिर परिसराचे प्रवेश द्वार व मंदिराची रस्त्याकडे भिंत दिसत होती. समोरचे दृश्य बघून येथे थांबावे का सरळ पुढच्या ठिकाणी जावे असा विचार मनात येत होता. आलोच आहोत तर पाच-दहा मिनिट एक नजर टाकून पुढे जाऊ असा विचार करून आम्ही मंदिर परिसरात दाखल झालो. मंदिर साधारण ५०० वर्षांपूर्वीचे आहे असे सांगतात. काही दंतकथांनुसार महाभारत काळात अर्जुन कैलास पर्वताकडे जात असताना शंकरांनी या ठिकाणी त्याला दर्शन दिले होते व कौरवांवर विजय मिळवाल असा वरही दिला होता. अघांजरचा चा अर्थ पाप नाश करणारा असा आहे असे वाचल्याचे स्मरते. मंदिर सुरेख असून परिसर अतिशय शांत व निर्मळ आहे.
बाबा गंगा भरती यांनी प्रज्वलित केलेली धुनी येथे आहे. ५०० वर्षांपासून ती अखंड तेवत आहे असे सांगतात.
मंदिर धौलाधर (धवलधार) पर्वतरांगेच्या पायथ्याशी असून मागील बाजूस जंगल असून डोंरातून वाहत येणारी नदी आहे.
उतारावरील नदीपात्रात मोठं मोठे खडक आहेत. काही पायऱ्या उतरून तेथे पोहचता येते.
काठावर शंकराची पिंड आहे. दगड धोंड्यांमुळे खळाळत वाहणारे पाणी व त्यातून निर्माण झालेला छोटासा धबधबा खूप सुंदर आहे.
नदीपात्रात उतरून तसेच या खडकांवर बसून सगळ्यांनी खूप धमाल केली. निघावेसे वाटत नव्हते पण अजून पुढची ठिकाणे व प्रवासास वेळ कमी पडू नये म्हणून बाहेर पडलो. स्वत: आयोजित सहलीचा हा मोठा फायदा की जेथे फक्त ५-१० मिनिट वेळ देणार होतो तेथे आम्ही चक्क तासभर वेळ दिला होता.
पुढचे ठिकाण येथून फक्त २-३ किमीवर असलेले नॉर्बुलिन्गका इन्स्टिट्यूट.
तिबेटमधे Norbulingka म्हणजे Treasure Garden किंवा समृद्धी बाग .
(ऐतिहासिक बागांसाठी Lingka हा शब्द तिबेटमधील ल्हासा किंवा इतर शहरांमध्ये
वापरल्या जातो). तिबेटमधील ल्हासा येथील दलाई लामांचे उन्हाळी निवास्थान
'नॉर्बुलिन्गका' यावरून Norbulingka Institute हे नाव आले आहे.१९९५ मध्ये
स्थापित या या संस्थेचा उद्देश तिबेटियन संस्कृतीचे जतन करणे असा आहे.
तिबेटियन कला शिकणाऱ्यांसाठी येथे वर्ग घेतले जातात. तिबेट संस्कृती
विषयीचे तीन वर्षांचे उच्च शिक्षणही येथे दिले जाते. सुतारकाम, लाकूड
कलाकृती व लाकूड रंगकाम, शिवणकाम, लाकूड व धातू शिल्प , थांका पेंटिंग
(बुद्धाच्या जीवनावर आधारित प्रसंग कापडावर चितारने. यांना चौकट करीत
नाहीत. वापर नसेल तेव्हा गुंडाळी करून ठेवले जातात) इ. अनेक कला येथे
शिकविल्या जातात.
मुख्य मंदिराची इमारत एकमजली असून ती 'Seat of Happiness Temple' नावाने
ओळखली जाते. आतमध्ये बुद्धाची चार मीटर उंचीची मूर्ती आहे जी येथले मुख्य
शिल्पकार स्व. चेन्मो पेम्बा डोरजे यांनी साकारली आहे. भिंतींवर बुद्ध तसेच
चौदावे दलाई लामा यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग चितारले आहेत.
लॉसेल डॉल म्युझियम: तिबेटी बाहुल्यांचा वापर करून पारंपारिक तिबेटी देखावे सादर केले आहेत.
येथील कारागीर व प्रशिक्षणार्थी यांनी बनविल्या अनेक वस्तू येथील दुकानात
विकल्या जातात. यातून होणारा नफा तिबेटी निर्वासितांसाठी मदतीसाठी वापरला
जातो.
नॉर्बुलिन्गका संस्था पाहून पुढच्या प्रवासास सुरुवात केली. अकरा किमीवर
(साधारण अर्धा तास) अजून एक धार्मिक स्थळ लागले ते म्हणजे 'चामुंडा देवी
मंदिर'
मंदिर ७०० वर्ष जुने आहे असे सांगितले जाते असले तरी सध्याचे बांधकाम
आधुनिक दिसते. मुख्य मंदिरात चामुंडा देवीची मूर्ती दिसते. (येथे फोटो
घेण्यास मनाई आहे) देवीच्या बाजूला हनुमान आणि भैरवाच्या प्रतिमा आहेत.
मंदिराच्या बाजूला काही पायऱ्या उतरून गेल्यावर एक गुहा दिसते जेथे
नैसर्गिक दगडी शिवलिंग आहे. लिंगाची नंदिकेश्वर म्हणून पूजा केली जाते,
दर्शन घेऊन बाहेर आलो. चहा, पाणी घेऊन पुढे निघालो. पंधरा मिनिटात (सात
किमी) गोपालपूर येथील प्राणी संग्रहालय 'धौलाधर नेचर पार्क' येथे पोहचलो.
सन १९९२ मध्ये स्थापित हे लहानसे प्राणिसंग्रहालय आहे. उद्यान सोमवारी बंद असते. प्रवेश फी थोडी जास्त वाटली.
हिमालयीन काळे अस्वल, सांबर, चित्ते येथे पाहायला मिळतात. लांबपर्यंत
जाणाऱ्या एकाच मुख्य रस्त्याचा बाजूला असलेल्या बंदिस्त कुंपणांमध्ये
आपल्याला हे प्राणी दिसतात.
प्राकृतिक निसर्ग सौंदर्य वगळता संग्रहालय काही विशेष वाटले नाही. संग्रहालय पाहताना दोन्ही बाजूने दाट झाडी असलेल्या रस्त्याहून फिरतांना चांगले वाटत असले तरी सकाळपासून बरेच चालल्यामुळे कंटाळा यायला सुरुवात झाली होती त्यामुळे लवकरच बाहेर पडलो.
पालमपूर येथील आमचे मुक्कामाचे ठिकाण येथून फक्त १४-१५ किमी अंतरावर
होते. अर्ध्या तासात पोहचलो. मॅक्लीऑडगंज ते पालमपूर अंतर फक्त ४५ किमी
असले तरी थांबे घेत आल्याने आम्हाला सहा तास लागले होते. आज पाहिलेली सर्व
ठिकाणे धर्मशाळेत राहूनही करता येणे शक्य आहे. तरीही एका वेगळ्या ठिकाणचे
वास्तव्य, वेगळे वातावरण अनुभवता यावे म्हणून मुक्काम हलवला होता.
आमचे हॉटेल म्हणजे एक 'होम स्टे' असलेला स्वतंत्र बंगला होता. हॉटेलचे नांव
'रुपायन होम स्टे '. बंगल्यात पाच खोल्या असून बंगल्याच्या बाजूला अजून
तीन कॉटेज आहेत.बंगल्यात १५-२० जण व इतर कॉटेजमध्ये १०-१२ जणांची राहण्याची
व्यवस्था होऊ शकते. आम्ही फक्त १२ जण असल्याने बंगल्यात प्रत्येक खोलीत
दोघे व एका फॅमिली कॉटेजमध्ये आम्ही दोघे अशी ऐसपैस व्यवस्था झाली.
सर्व सामान ज्याच्या त्याच्या रूमवर पोच झाल्यावर ताजेतवाने होऊन परत बाहेर पडलो. आजची संध्याकाळ पालमपूर पासून पाच किमीवरील 'सौरभ वनविहार' ला घालविण्याचे ठरवले. क्वाथ (Kwath) या छोट्याशा गावातील न्यूगल खडच्या किनारी असलेल्या या विहारला आम्ही १५-२० मिनिटात पोहचलो. (स्थानिक भाषेत नदीला खड म्हणतात). प्रवेश फी प्रत्येकी २०/- रु. आहे.
उद्यानात पांढऱ्या रंगाचे मोठे मोठे खडक असून फिरण्यासाठी छोटे छोटे दगड्गोटे वापरून केलेल्या पायवाटा आहेत.
हे उद्यान १९९९ च्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅ. सौरभ कालिआ यांना समर्पित आहे. १९७६ ला जन्मलेल्या कॅ. सौरभ यांचे शिक्षण पालमपूर झाले. येथील शेतकी महाविद्यालयातून १९९७ मध्ये त्यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. कारगिल युद्धाच्या वेळी सीमा रेषेवर गस्त घालीत असतांना यांच्यासहित सहा सैनिक शत्रूच्या ताब्यात सापडले. २२ दिवस त्यांचा अतोनात छळ करण्यात आल. वयाच्या अवघ्या २३ वर्षी व्या वर्षी त्यांना वीर मरण आले त्यानंतर ९ जून १९९९ रोजी त्यांचे पार्थिव भारतीय लष्कराला सोपविण्यात आले.
पुढे आल्यावर एक तलाव आहे व त्यात बोटिंगची सुविधा आहे. तलावावर एक सुंदर पूल आहे. त्याच्या बाजूलाच कारगिल युद्धाचा देखावा साकारला आहे. मोठे मोठे खडक त्यामागे लपलेले भारतीय आणि पाकिस्तानी हत्यारी सैनिक, प्रत्यक्ष लढाई सुरु आहे असा प्रसंग बघून कोणालाही स्फुरण चढावे असा देखावा.
सर्व फिरून उद्यानाच्या बाहेर आलो. नदी पार करून ज्या नवीन पुलावरून
आमची गाडी आली होती त्याला समांतरच तारेच्या दोरखंडांनी पेललेला जुना झुलता
पूल आहे. अनेक वर्ष दोन तीरांवरील अनेक गावांना जोडणारा हा अतिशय महत्वाचा
पूल होता. सध्या फक्त पादचारी पूल म्हणून याचा वापर होतो. पुलावरून नदी,
धौलाधर पर्वत यांचे नयनरम्य दर्शन होते.
आजच्या दिवसातील आमचे हे शेवटचे ठिकाण होते त्यामुळे घाई नव्हती. नदी पात्रातील खडकांवर पाण्यात पाय सोडून बसलो. दिवसभराचा सर्व थकवा क्षणात विसरलो. हळूहळू सर्वजण वय विसरून बालपणात गेले. एकमेकांवर पाणी उडव, कुणाला पाण्यात ढकल असे खेळ सुरु झाले.
आज सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला वाहत्या पाण्यात खेळायची मजा सर्वांनी अनुभवली. अंधार पडायला सुरुवात झाली आणि आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी परत फिरलो.
क्रमश:
कालची संध्याकाळ पालमपूर येथील सौरभ वनविहारला फेरफटका मारून खूपच छान
व्यतीत झाली होती. पालमपूर म्हणजे धौलाधर पर्वतरांगेच्याकुशीतील एक नयनरम्य
ठिकाण. कांगड्यातील धर्मशाळा-मॅकलॉडगंजनंतर पालमपूर हेच मोठे शहर. येथील
निसर्ग व आजूबाजूच्या परिसरातील किल्ला, मंदिरे या गोष्टींमुळे पर्यटनासाठी
हे एक उत्तम ठिकाण. येथील थंड व आर्द्र वातावरण, पाऊस तसेच नदी, ओढे
यामुळे मिळणारे मुबलक पाणी, पाण्याचा निचरा व्हावा म्हणून जमिनीचा उतार असे
चहाच्या पिकासाठी अगदी उत्तम वातावरण. ब्रिटिशांनी या गोष्टी हेरून येथे
चहा माळ्यांची लागवड केली.
धर्मशाळेत चहाच्या बागा पाहून झाल्या होत्या, यापूर्वीच्या सहलींमध्ये
मुन्नार तसेच दार्जिलिंग येथेही चहाच्या मळ्यांमध्ये फिरणे झालेले असल्याने
आज आम्ही तिकडे फिरकणार नव्हतो. पहाटे जाग आल्यावर सकाळचा फेरफटका
मारण्यासाठी बाहेर पडलो. आमचे हॉटेल महामार्गावरील बाजारपेठेपासून बरेच
आतमध्ये (४ किमी) मारन्डा या छोट्याशा गावात होते.
हॉटेलच्या एका दिशेस महामार्गाकडे जाणारा चिंचोळा रस्ता व दोन्ही बाजूला
दाट झाडी असलेले जंगल आहे. काही जण या बाजूस भटकायला बाहेर पडले.
झाडीतून दिसणारा सूर्योदय
आम्ही विरुद्ध दिशेने चालू लागलो. चौकशीत समजले की पालमपूर रेल्वे
स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हळूहळू चालत स्टेशनला पोहचलो. अजून
स्टेशनला जाग आलेली दिसत नव्हती.
पठाणकोट ते जोगिंदरनगर या दरम्यान ही नॅरो गेज (अडीच फुटी) रेल्वे चालते. अत्यंत धीम्या वेगामुळे पर्यटकांसाठी सोईस्कर नसली तरी स्थानिक लोकांसाठी खूपच उपयोगी. स्टेशनच्या बाहेर छोटीशी हेरिटेज गॅलरी आहे पण बंद असल्याने बघता आली नाही
स्टेशनवर एका फळ्यावर खूपच रोचक माहिती वाचायला मिळाली. दुसऱ्या
महायुद्धाच्या काळात १९४२ साली नगरोटा ते जोगिंदर नगर या मधील संपूर्ण
रेल्वेच उचलून युरोपला नेण्यात आली होती. त्यानंतर १२ वर्षांनंतर लालबदूर
शास्त्री यांच्या प्रयत्नाने १९५४ मध्ये ती पुन्हा सुरु करण्यात आली.
आता विद्युतीकरण किंवा आधुनिकीकरण झाल्याने बरीच उपकरणे बदलली आहेत. विस्मृतीत जाणारी काही जुनी यंत्रणा येथे पाहण्यास मिळाली.
रुळांचे सांधे बदलण्यासाठीचे खटके व टोल देण्यासाठी वापरात असलेले उपकरण.
सिग्नल यंत्रणा
रेल्वे स्टेशन आतील बाजूने व वेळापत्रक
स्टेशनच्या फलाटावर तसेच रुळांमधून चालत फेरफटका मारला. येथेच रुळांवर
चालणारी ट्रॅक्टर उभी असलेली पहिली. यांचा उपयोग बहुतेक देखभाल
दुरुस्तीच्या कामांसाठी होत असावा.
आज अनपेक्षितरित्या प्रभातफेरीतच एका सुंदर ठिकाणाला भेट दिल्या गेली होती. थोडावेळ थांबून हॉटेलला परत आलो.
सर्व आटोपून साडेनऊच्या सुमारास भटकंतीसाठी गाडी निघाली. कांगडा-मंडी
हायवेला लागल्यावर पाऊण तासात (१८ किमी) बैजनाथ या ठिकाणी पोहचलो. येथील
मंदिर खूप सुंदर आहे. आमच्यातील काही जणांना पॅराग्लायडिंग करायचे होते
त्यामुळे येथे न थांबता आधी 'बीर' येथे जाऊन परतीच्या वेळी हे ठिकाण
पाहण्याचे ठरले. बैजनाथमध्ये रस्ता काही भागात अरुंद असल्याने एकेरी वाहतूक
सोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा आहे. सर्व चालकही शिस्तीत वाहने चालवत
असल्याने कुठेही कोंडीत न अडकता पुढे निघालो व पुढच्या अर्ध्या तासात बीर
येथे पोहचलो.
बीर हे जोगिंदर नगर व्हॅलीतील एक छोटेसे खेडे. भारतातील पॅराग्लायडिंगचे
प्रमुख ठिकाण म्हणून बिरची ओळख आहे. तिबेटी समुदायाचाही येथे रहिवास असून
अनेक बुद्धमठ येथे आहेत.
बीर हे पॅराग्लायडर उतरण्यासाठीचे ठिकाण असून बिलिंग हे उड्डाणाचे ठिकाण
आहे. त्यामुळे हे ठिकाण बीर-बिलिंग म्हणूनच ओळखले जाते. हे
पॅराग्लायडिंगसाठी जगातील दोन नंबरचे उंच ठिकाण मानले जाते. १९१५ साली
भारतातील पहिली विश्व पॅराग्लायडिंग प्रतियोगिता येथे भरवली गेली होती.
बिरहून बिलींगचे रस्त्याने अंतर जवळपास १५ किमी असून दोन्ही ठिकाणांच्या
उंचीत ८०० मीटर इतका फरक आहे. पॅराग्लायडिंगच्या तिकीट किमतीतच बीर पासून
बिलिंगसाठी खाजगी गाडीने आपल्याला सोडण्यात येते, हवेत उडण्याच्या २०
मिनिटाच्या वेळात आपल्याला बीर व्हॅलीचे अद्भुत दर्शन होते. तिकीट खर्च
जवळपास २५००/- अधिक गोप्रो कॅमेरा ५००/-.
बिरला आमच्या गाडीच्या मालकाने सुचवलेल्या एजंटकडे आम्ही पोहचलो व
तिकीटाची चौकशी केली. बिरला वातावरण स्वच्छ असले तरी बिलींगला दाट धुके
असल्याने वाट पाहावी लागणार होती. हे लोक वॉकीटॉकी द्वारे बिलिंगशी सतत
संपर्क साधून होते. वातावरण निवळण्यास कमीतकमी एक दीड तास तरी वेळ लागेल
असे सांगण्यात आले. थोडा वेळ त्यांच्या कार्यलयाच्या बाहेर बसूनच वाट
पहिली. आजूबाजूचा परिसर खूपच रम्य दिसत होता.
येथेच कामशेत येथे स्वत:ची पॅराग्लायडिंग संस्था असलेले श्री. कुलकर्णी
यांची भेट झाली. (मध्यभागी हॅट घातलेले). ते व त्यांचे जावई तीन
आठवड्यांपासून येथे मुक्काम ठोकून होते. देश-विदेशच्या विद्यार्थ्यासाठी
सोलो पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण वर्ग ते येथे चालवतात.
बसून कंटाळा यायला लागल्यावर थोडा फेरफटका मारला. जवळच
पॅराग्लायडरसाठीचा लँडिंग पॉईंट दिसला. येथे प्रशिक्षणार्थींचे बरेच वर्ग
सुरु असलेले दिसले. मधूनच काही सोलो पॅराग्लायडर्स उतरतांना दिसत होते.
परत येऊन चौकशी केली. लहरी हवामानाने आम्हाला निराश करण्याचेच ठरवले
होते. आज पॅराग्लायडिंगचा कार्यक्रम संपूर्ण दिवसासाठी रद्द करण्यात आला
होता. थोडे निराश झालो तरी काही हरकत नाही आपण दुसरे एखादे ठिकाण पाहू असे
म्हणून आम्ही आमचा मोर्चा येथील एका बुद्ध मठाकडे वळवला.
पालपुंग शेराबलिंग मठ वस्तीपासून थोडाअलिप्त व शांत ठिकाणी आहे. ५०० पेक्षा जास्त भिक्षूंची येथे राहण्याची व्यवस्था आहे.
भव्य बुद्ध मूर्ती. हा भविष्यातला बुद्ध आहे असे सांगण्यात आले. समोरच
विरुद्ध बाजूस बुद्धाची दुसरी लहान मूर्ती आहे जी भूतकाळातील मानल्या जाते.
भूतकाळापेक्षा भविष्यकाळासाठी विचार मोठे असावेत ही यामागची भावना.
थोडावेळ थांबून परतीच्या मार्गाला लागलो. सकाळी बघायचे बाकी राहिलेले
बैजनाथ मंदिर येथे येऊन पोहचलो. बैजनाथ एकेकाळी किराग्राम म्हणून ओळखले जात
असे. बैजनाथ मंदिर हे वैद्यांचा देव म्हणून शिवाला समर्पित आहे. रावणाने
शंकराची उपासना केली होती व शंकर प्रसन्न झाल्यावर त्यांना लंकेला
चलण्याविषयी विनंती केली होती. शंकराने नकार न देता लिंगस्वरूपात लंकेस
घेऊन जाण्यास सुचविले. अट होती वाटेत लिंग जमिनीवर ठेवायचे नाही. काही
कारणाने लिंग या जागेवर ठेवल्या गेले व ते कायमस्वरूपी येथे रुजले. या
विषयी थोड्याफार फरकाने अनेक दंतकथा ऐकावयास मिळतात. शिवाचे उपासक मनुका व
आहुका या दोन भावांनी १३ व्या शतकात या प्राचीन शिवलिंगासाठी मंदिर बांधले
असे समजते.
मुख्य रस्त्याच्या बाजूलाच हे पश्चिममुखी मंदिर असून मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अखत्यारीत आहे.
प्रवेश द्वाराच्या बाजूलाच गणेश व हनुमानाच्या मूर्ती आहेत
अनेक भग्न शिल्प, अवशेष प्रवेशद्वाराजवळच्या बंद खोलीत लोखंडी जाळीतून पाहावयास मिळतात.
प्रवेश करताच होणारे मंदिर दर्शन
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एकामागे एक असे दोन नंदी आहेत. पहिला नंदी
एका छोट्याशा मंडपात असून तो बसलेल्या स्थितीत आहे.दुसरा नंदी उभा असून
याला मंडप वगैरे काहीही नाही. दोन नंदी असण्याचे कारण समजले नाही.
गर्भगृहात दगडी शिवलिंग व गणेश, विष्णू,लक्ष्मी च्या मूर्ती आहेत.
मंडपाचे छत
मंडपाच्या दोन्ही बाजूस (डाव्या व उजव्या) खिडक्या असून खिडकीच्या
खांबांवर सुंदर मूर्तिकाम केलेले आहे. दोन्ही खिडक्यांचा एकत्र केलेला फोटॊ
मंदिराच्या आतील खांब,तुळ्या तसेच मंदिराच्या बाह्य भिंतींवर नर्तक,
वादक, अनेक देव देवता यांच्या प्रतिमा दिसतात. काही शिल्प ओळखता आली तरी
माझ्यासाठी हे कठीण काम. येथे कोणी गाईडही मिळेना जो माहिती देऊ शकेल.
भरपूर सुंदर सुंदर शिल्प आहेत येथे. सगळेच देता येणार नाहीत पण त्यातील
काही फोटो एकत्र करून देत आहे. सोयीसाठी काही फोटोंना क्रमांकही दिले आहेत.
जाणकारांनी प्रतिसादात यांची ओळख सांगितल्यास नंतर लेखात ही माहिती जोडता
येईल.
गंगा-यमुना?
?
सूर सुंदरी?
?
?
कुबेर,राम?
बाह्य भिंत
मंदिराच्या दगडी कुंपणाच्या भिंतीवरही आतल्या बाजूने काही शिल्प दिसतात.
?
मंदिर नदीकडच्या बाजूने
येथून दिसणारा नदीकडचा भाग. (व्यास नदीची सहाय्यक नदी बिनवा)
मंदिर पाहून पालमपूरलसाठी परत निघालो. थोडावेळ बाजारपट्ट्यात फेरफटका मारला आणि अंधार पडता पडता हॉटेलवर परत आलो.
क्रमश:
आज पालमपूरचे हॉटेल सोडून डलहौसीला मुक्कामी जायचे होते त्यामुळे सकाळी
उठून बाहेर फेरफटका मारायचा विचार रद्द केला. आमच्या फॅमिली कॉटेजला आतूनच
लाकडी जिना असलेली व छपराच्या तिरक्या भागात अजून एक खोली होती ज्यात ३-४
जणांची झोपण्याची व्यवस्था सहज होऊ शकेल. या खोलीच्या खिडकीतूनच सूर्योदय व
हॉटेलच्या मागील डोंगरावरील उतरणीवरचे चहाचे मळे दिसत होते.
'रुपायन 'होम स्टे ' बद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास:
* वाजवी दरात राहण्याची व खाण्याची सुंदर व्यवस्था. फक्त आपलाच ग्रुप असेल तर अधिक छान.
* नाश्ता/जेवण उत्कृष्ठ . व्हेज-नॉनव्हेज दोन्ही उपलब्ध. जेवणासाठी काय पाहिजे ते मात्र आधी सांगून ठेवावे लागते.
* आम्हा महिलांसाठी एक खूपच सोयीची सुविधा मिळाली ती म्हणजे वॉशिंग मशीन.
सगळ्यांनी गेल्या ४-५ दिवसातील साठलेले कपडे धुण्यासाठी याचा पुरेपूर फायदा
घेतला.
* विनयशील कर्मचारी वर्ग
* एकच आवडले नाही ते म्हणजे बाथरूमसाठी देण्यात आलेले टॉवेल. अगदी कळकट व
उबट वास. आम्ही स्वत:कडचे वापरले. व्यवस्थापिकेकडे तक्रारही दिली व नवीन
आणण्याविषयी सुचवले.
* स्वतःचे वाहन असेल तरच सोईचे. महामार्गापासून बरेच आतमध्ये.
सकाळी दहाच्या सुमारास नाश्ता आटोपून व सगळे बिल वगैरे देऊन हॉटेल सोडले.
आजच्या पालमपूर -डलहौसी प्रवासातील पहिले ठिकाण होते कांगडा येथील शक्तीपीठ वज्रेश्वरी किंवा बज्रेश्वरी मंदिर. प्रवास साधारण एक तासाचा व अंतर ३३ किमी.
कांगडा शहरातच स्टेशनपासून ३ किमीवरील हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे.शहरातच असल्याने व धार्मिक महत्त्वामुळे हे अतिशय गर्दीचे ठिकाण.
असे मानल्या जाते कि सतीचे जळालेले स्तन येथे पडल्याने ५१ शक्तिपीठांपैकी
हे एक शक्तीपीठ मानल्या जाते. स्तनांची पिंडी स्वरूपात (पिंडी म्हणजे असा
नैसर्गिक दगड ज्याला कोणताही विशेष आकार नाही) पूजा केली जाते,
एक अशीही आख्यायिका आहे कि महिषासुराशी झालेल्या युद्धात देवीला अनेक जखमा झाल्या होत्या ज्या या ठिकाणी लोणी लावून बऱ्या झाल्या. अजूनही दर मकर संक्रान्तीला मूर्तीवर विधिपूर्वक लोणी लावून ही परंपरा साजरी केली जाते.
असेही मानतात की महाभारताच्या काळात पांडव वनवासात असतांना देवीने
त्यांना दृष्टांत देऊन या ठिकाणी मंदिर बांधण्यास सांगिले. त्यानुसार एका
रात्रीत त्यांनी येथे (नगरकोट:आजचे कांगडा)) हे मंदिर बांधले.
मंदिराची पुनर्बांधणी संसारचंद प्रथम यांनी इ.स. 1440 मध्ये केल्याचे
वाचनात आले आहे. १९०५ च्या भूकंपात मंदिराची पडझड झाली होती परंतु पुरातत्व
खात्यातर्फे याची परत बांधणी करण्यात आली.
पार्किंगमध्ये गाडी लावल्यावर काही अंतर आपणास पायी चालत जावे लागते.
उंचावर चढत जाण्याऱ्या रस्त्यावर दुतर्फा पूजाविषयक सामग्रीच्या दुकानांची
रांग आहे. रांग, गर्दी यामुळे मंदिरात फोटो काढता आले नाहीत. जे दोन चार
फोटो मिळाले ते येथे देत आहे.
पाठीमागच्या बाजूने मात्र मंदिराचा एक बऱ्यापैकी फोटो मिळाला.
येथून पुढे डलहौसीला जायचे होते पण थोडे फेऱ्याने गेले तर वाटेत 'मसरूर रॉक टेम्पल' म्हणून एक चांगले ठिकाण पाहण्यास मिळणार होते. गाडीचा चालक नाही म्हणाला कारण त्याला तशा सूचना नव्हत्या. गाडीच्या मालकाला फोन लावला. खूप फेरा पडेल, वेळ होईल, डलहौसीला जाण्यासाठी मुख्य रस्ताच चांगला आहे वगैरे कारणे सांगून झाली. वेळ झाला तरी चालेल पण आम्हाला हे ठिकाण बघायचेच आहे म्हटल्यावर त्याने चालकाला तशी सूचना दिली व आमची गाडी मसरूर मंदिराच्या दिशेने निघाली. आजूबाजूचा डोंगराळ परिसर खूपच रम्य वाटत होता. वाटेत १५ किमीवरच डावीकडचा एक फाटा "ज्वालामुखी मंदिर" या शक्तिपीठाकडे जात होता. येथून मंदिर फक्त २० किमी इतक्या अंतरावर होते. मंदिर कालीमातेला समर्पित असून मंदिरात मातेची मूर्ती नाही. असे मानतात कि सती मातेची जीभ या ठिकाणी पडली होती. अखंड तेवत असलेल्या ज्वालेच्या स्वरूपात या ठिकाणी मातेची पूजा केली जाते. खडकाच्या कपारीतून निघणाऱ्या ज्वालामुखीच्या वायूमुळे हि ज्वाला अखंड तेवत राहते. आमच्याकडे वेळ कमी असल्याने हे ठिकाण न बघताच आम्ही पुढे निघालो.
कांगड्यापासून साधारण दीड तासात ३६ किमीचे अंतर पार करून आम्ही मसरूर येथे पोहचलो.
शैल मूर्तिकला मंदिर किंवा मसरूर रॉक कट टेम्पल
व्यास नदी असलेल्या कांगडा खोऱ्यातील एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर उभे आहे. वाळुकाश्म खडकांमध्ये कोरलेले एक मंदिर संकुलच येथे आहे. मूळ १९ मंदिरे येथे असावीत पण सध्या त्यातील काहीच मंदिरे शिल्लक आहेत. मंदिर कधी निर्माण केले त्याचा कालावधी निश्चित नसला तरी आठव्या -नवव्या शतकातील असावे असे मानतात. १९०५ च्या भूकंपात याची पडझड झाल्याचा खुणा दिसतात. मंदिराच्या देखभालीचे काम सध्या पुरातत्व खात्याकडे आहे.
एकोणीस मंदिरांपैकी १६ मंदिरे एकाच खडकात कोरीव काम करून घडवलेली आहेत. मंदिरे कैलास लेण्यांप्रमाणे आधी कळस व नंतर पाया याप्रमाणे घडवण्यात आल्याचेही सांगितले जाते. सध्या दिसत आलेल्या १५ मंदिरांपकी फक्त मध्यभागी असलेले मुख्य मंदिरच आतून कोरलेले आहे. बाकी सर्व मंदिरांचा फक्त बाह्य भाग सुंदर शिल्पानी नटलेला आहे. मंदिर निर्माण होत असतानाच ठिसूळ खडकांमुळे शिल्प कोरण्यास अडचण येत असावी ज्यामुळे काम अर्धवट सोडण्यात आले असावे असाही एक अंदाज.
स्थानिक भाषेत मुख्य मंदिर "ठाकूरद्वारा' म्हणून ओळखले जाते.
प्रवेशद्वार, सभामंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वारावर
असलेल्या शंकराच्या प्रतिमेवरुन हे मंदिर शिवाला समर्पित असावे. गर्भगृहात
राम ,सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या दगडातील सुंदर मूर्ती आहेत ज्या बहुदा
नंतरच्या काळात येथे स्थापित करण्यात आल्या असाव्यात.
आमचा एक ग्रुप फोटो
धौलाधर पर्वत रंगाच्या दिशेने म्हणजेच पूर्वोत्तर दिशेने मंदिराचे प्रवेशद्वार असून समोरच आयताकृती असे पाण्याचे भव्य कुंड आहे. बाह्य भिंतींवर विष्णू, दिक्पाल, सूर्य, अग्नी, शिव, पार्वती, स्कंध -कार्तिकेय, यांच्या प्रतिमा आहेत तसेच कमल, कल्पवृक्ष, कल्पलता इ. रचना दिसतात.
पडझड झाल्याच्या किंवा खचल्याच्या खुणा. निश्चित कधीच्या असाव्यात ते सांगता येत नाही.
मंदिर संकुल बघत शेवट्पर्यंत आल्यावर एक छोटीशी वाट टेकडीवर जाते.
टेकडीवर गेल्यावर मंदिर, तलाव व धवलधार पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते.
येथेच एका खोलीत गजांच्या आड ठेवलेल्या भग्न मूर्ती, शिल्पाचे अवशेष पाहावयास मिळतात.
खाली उतरून तलावाच्या बाजूने फेरफटका मारला. तलावात मंदिराचे सुंदर प्रतिबिंब दिसते.
एक छोटीशी टपरी होती व समोरच लाकडी फळकुट टाकलेले एक टेबल होते त्यावर बसून मस्तपैकी गरमागरम मॅगी, चहा-नाश्ता झाला.
जवळपासच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिकसाठी हे एक खूप सुंदर ठिकाण आहे तर शिल्प प्रेमींसाठी हे न चुकवण्याजोगे ठिकाण.
संकुलाच्या बाहेर येऊन आमच्या गाडीजवळ पोहचलो. येथे दोघेजण एका छोट्या
टेम्पोत सफरचंदाच्या पेट्या विकत होत. सुरवातीला मिळालेली मोसंबीची गोनी
संपत आली होती म्हणून काहीतरी नवीन हवेच होते. येथे आसपास कुठेही
सफरचंदाच्या बागा नाहीत. टेम्पो शिमल्याहून आला होता. सहाशे रुपयाला १६
किलोची पेटी सांगताबरोबर आम्ही खुशीत खरेदी केली. पैसे देऊन झाले आणि
इतकावेळ गम्मत पाहणाऱ्या आमच्या अबोल चालकाने तोंड उघडले 'आपने बहोत पैसे
दे दिये, इसका तो पाँचसौ भी ज्यादा था '.
दुपारचे तीन वाजून गेले होते. थोड्याच वेळात गाडी डलहौसीच्या दिशेने
धावायला लागली . अजून जवळपास सव्वाशे किमीचा प्रवास करायचा होता. कांगडा
जिल्ह्यातील किंवा कांगडा खोऱ्यातील भटकंती संपवून अंधार पडत पडता आम्ही
चंबा जिल्ह्यात /चंबा खोऱ्यात प्रवेश करणार होतो.
क्रमश:
कांगडा व चंबा सहल : भाग ७: डलहौसी परिसर
काल अंधार पडल्यावर आम्ही डलहौसीला येऊन पोहचलो होतो. समुद्रसपाटीपासून साधारण ६५०० फूट उंचीवरील हे ठिकाण. सध्या अतिशय थंड तरीही खूपच आल्हाददायक वातावरण. ब्रिटिश वास्तुकला, सुंदर चर्च, पाइन्स ,देवदार, ओक, रोडोडेंड्रॉन. अशा अनेक वेगवेगळ्या वनस्पती असलेली दाट झाडी तसेच धौलाधर पर्वतरांगेतील उत्तुंग शिखरे हे येथील प्रमुख आकर्षण.
१८४५ च्या अँग्लो-शीख युद्धानंतर पंजाबचे राज्यकर्ते युध्दाच्या खर्चाची नुकसानभरपाई ब्रिटिशांना देण्याबद्दल बांधील होते. १८५० काळात ब्रिटिश विश्रांतीसाठी व आरोग्य केंद्रासाठी हिल स्टेशनच्या शोधात होते. त्यांच्या नजरेत भरलेल्या धवलधार पर्वत रांगांमधील पश्चिमेकडील पाच टेकड्या याकरिता त्यांनी ताब्यात घेतल्या. (कथलॉग, पोट्रेन, तेहरा/तेराह , बाक्रोटा आणि भांगोरा ) बदल्यात राजाची खंडणी काही प्रमाणात कमी केली गेली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांचे नाव या शहरास देण्यात आले. (माहिती संग्रहित)
हिमाचल प्रदेश पर्यटन विकास मंडळाची दोन हॉटेल्स डलहौसीत आहेत. पैकी हॉटेल गीतांजलीत आम्ही काही खोल्या आधीच आरक्षित केलेल्या होत्या. जुन्या काळच्या एकमजली लाकडी बांधकाम असलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे रूपांतर होटेलमध्ये करण्यात आले आहे. उतारावर असल्याने हॉटेलमध्ये पोहचण्यासाठी रस्त्यापासून पायऱ्यानी थोडे खाली उतरावे लागते.सामान घेऊन चढ उतर करण्यास जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो पण हॉटेलचे कर्मचारी मदत करतातच त्यामुळे शक्यतो अडचण येत नाही. थोडे नूतनीकरण केल्यास हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर सहज होऊ शकेल. पण नकोच. हिल स्टेशनला सर्वसामान्यांना परवडतील अशी चांगली हॉटेल्स कमीच असतात. त्यामुळे आहे ते चांगलेच.
आमचे हॉटेल 'गीतांजली'
हॉटेल डलहौसीच्या 'ठंडी सडक' वर आहे. कमी सूर्यप्रकाशामुळे रस्त्याला असे नाव दिले गेले आहे. रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर व दुसऱ्या बाजूस जुन्या इमारती व हॉटेल्स. त्यांच्यामागे काही ठिकाणांहून दिसणाऱ्या 'पांगी' पर्वतरांगा. (डलहौसीत एक गरम सडकही आहे)
भरपूर उंची असलेल्या प्रशस्त खोल्या . कांगडा परिसरात कुठेही जास्त थंडी जाणवली नाही. परंतु आता जास्त उंचीवर आल्याने हेवेत चांगलाच गारठा होता. त्यामुळे येथील रूम हिटर चांगलेच कामात आले.
सकाळी नाश्ता आटोपून भटकंतीसाठी निघालो. उंचीवरून थोडे खाली येऊन चमेरा सरोवर येथे जाण्याचे ठरवले. अवघ्या एक-दिड तासात आणि २५-३०किमी अंतर पार करून आपण येथे पोहचतो. रावी खोऱ्यातच मणिमहेष येथे उगम पावणाऱ्या रावी नदीवरील चमेरा धरणाच्या जलसाठ्यामुळे हे सरोवर तयार झाले आहे. अनेक प्रकारच्या जलक्रीडा येथे करता येतात.
उंचावरून दिसणारे चमेरा धरण व सरोवर
थोड्याच वेळात धरणाजवळील तलेरू या बोटिंग पॉइंटला पोहचलो.
जलाशयाच्या पाण्यात बोटीने फिरून धवलधार पर्वतरांगा, पाइन वृक्षांचे दादाट जंगल यांचे रमणीय दृश्य अनुभवायचे होते. तिकीट खिडकीवर जाऊन अर्ध्या तासासाठी रु.४००/- (जीएसटी सहित) याप्रमाणे १२ जणांचे रु.४८००/- भरले.
आम्हाला बोटीत जाऊन बसण्यास सांगण्यात आले. आम्ही तिकीटाची मागणी केली असता नकार मिळाला. तुम्ही जीएसटी सहित वसुली करीत आहात तर तिकीट तर दिलेच पाहिजे असे म्हटल्यावर जीएसटी आम्हाला भरायचा आहे तो आम्ही भरू तुम्ही सहलीला आला आहात, बोटींचा आनंद घ्या असे उत्तर मिळाले. (तुम्ही सहलीचा आनंद लुटा, आम्ही तुम्हाला लुटू असेच काहीतरी म्हणायचे असेल) बरीच हुज्जत घालूनही तिकीट मिळेना. आजूबाजूला चौकशी करता कंपनीचे कंत्राट संपलेले असूनही ते धंदा करीत असल्याचे समजले. आज भ्रष्ट व्यवस्थेचा फटका मात्र आम्हाला बसला होता. मुलीने गुगलवर कुठेतरी याबद्दलचा रिव्ह्यू टाकला. शेवटी निषेध व्यक्त करून दिलेले पैसे परत घेतले व काठावरूनच येथील सौंदर्याचा लाभ घेतला.
सरोवराच्या बाजूलाच असलेल्या स्टॉलवर ताजे खाद्यपदार्थ बनवून मिळतात. तेथेच थोडे खाऊन डलहौसीला परत निघालो.
दुपारचा एक वाजला होता. डलहौसीच्या सुभाष चौकला पोहचलो . प्रदीर्घ काळ तुरुंगात राहिल्यानंतर झालेल्या आजारातून बरे होण्यासाठी १९३७ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे डलहौसीत वास्तव्यास होते.
सुभाष चौकाच्या बाजूलाच छोट्याशा टेकडीवर 'सेंट फ्रान्सिस चर्च' आहे. या कॅथलिक चर्चला भेट दिली. सगळीकडे प्रचंड धुके व अतिशय थंड असे वातावरण होते. भर दुपारी संध्याकाळ झाल्याचा भास होत होता. दगड व लाकूड यांचा वापर करून बांधण्यात आलेली ही अतिशय देखणी इमारत आहे.
सुभाष चौक ते गांधी चौक पायी फिरणे हाही येथील पर्यटनाचा एक भाग. अनेक छोटी मोठी कपडयांची, खाद्यपदार्थ , भेटवस्तू वगैरेंची दुकाने येथे आहेत. आम्हीही चालत गांधी चौकला पोहचलो.
चौकाला लागूनच 'सेट जॉन चर्च' आहे . 1863 मध्ये बांधलेले हे प्रोटेस्टंट चर्च डलहौसीचे सर्वात जुने चर्च तरीही, गजबजलेल्या भागातील सुंदर इमारत.
चौकातच GPO ची इमारत असून त्यातच तिबेटियन मार्केट आहे. तिबेटियन मार्केट उबदार कपडे, कार्पेट, हस्तकलेच्या वस्तू इ. साठी प्रसिद्ध आहे.
किरकोळ खरेदी करत 'ठंडी सडक' ने रमतगमत हॉटेलला पोहचलो. रात्रीच्या जेवणात खीर प्राशन करत आज कोजागिरीही साजरी केली.
क्रमश:
आज डलहौसीहून मुक्काम हलवून खज्जियारला जायचे होते. आतापर्यंचा गीतांजली
हॉटेलचा अनुभव खुपच चांगला होता. येथील खोल्या, अतिथ्यशील कर्मचारी, जेवण
सर्वच चांगले. नाश्ता वगैरे आटोपून बिल भरण्यासाठी काउंटरला पोहचलो. हिमाचल
प्रदेश पर्यटन मंडळाच्या हॉटेलचे ऑनलाईन बुकिंगची सोय आहे व तिचा फायदा
आम्ही घेतला होता. बुकिंग करतांना एकाच वेळी अनेक खोल्यांचे एकत्र बुकिंग
करता येते. ऐनवेळी आमच्या सहलीतील काही जण कमी झाल्याने आठ दिवस आधी आम्ही
दोन खोल्या रद्द करण्याचे ठरविले. पण मंडळाच्या साईटवर आपल्या आरक्षणातील
एक किंवा काही खोल्या रद्द करण्याचा पर्यायच नाही. एका तिकिटावरचे सर्व
आरक्षणच रद्द होते. तसे झाले तर आर्थिक फटकाही बसला असता आणि ऐनवेळी नवीन
आरक्षणही मिळाले नसते. शिमल्याच्या मुख्य कार्यालयात ई मेलवर संपर्क साधून
खोल्या रद्द झाल्या पण परताव्याच्या रकमेची वजावट हॉटेलमधील जेवण खर्चात
केली जाईल असे आम्हाला कळविण्यात आले. काउंटरवर मात्र आम्हाला असे काहीच
कळविण्यात आलेले नाही असे सांगण्यात आले. आम्हाला आलेला ई मेल दाखविल्यावर
संगणकात काहीतरी खुडबुड केल्यावर अखेर त्यांना तो मेल मिळाला व आमच्या
बिलाचा मार्ग मोकळा झाला. वास्तविक पर्यटन व्यवसायात अशी अडचण नेहमीच येत
असणार तरी सुधारणा का नाही? सरकारी यंत्रणा इतकी सुस्त का? वेळोवेळी
सॉफ्टवेअर अपडेट करणे इतके अवघड आहे का? बुकिंग करताना पैसे आगाऊ घेतले
जातात. ज्या खात्यातून पैसे आले तेथेच परतावा लगेच का मिळू नये? अनेक
प्रश्न आहेत पण बाकी अनुभव खूप चांगले असल्याने काही गोष्टींकडे दुर्लक्ष
केले.
डलहौसी ते खज्जियार अंतर फक्त २० किमी किंवा एक तास. पण वाटेतील ठिकाणे
पाहत तेथे पोहचायला आम्हाला संध्याकाळ होणार होती. डलहौसीत राहूनही सर्व
ठिकाणे करता येण्यासारखी आहेत पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे एका वेगळ्या
ठिकाणी राहण्याचा अनुभव घेण्याचा दृष्टीने आम्ही मुक्काम हलविण्याचे ठरवले
होते.
आजचे पहिले ठिकाण डलहौसीतीलच 'पंचपूला"
काही साहसी खेळ, आणि काही ट्रेकचा सुरवातीचा पॉईंट याकरिता हे ठिकाण
प्रसिद्ध. उंडोंगरातून खाली येणार झरा, हिरवीगार झाडी असे शांत व रमणीय
वातावरण. अनेक झऱ्यांचे पाणी येथे एकत्रीत होते जो डलहौसीच्या काही
भागांसाठी पाण्याचा स्रोत आहे.
स्वातंत्र्य सैनिक सरदार अजितसिंग यांचे स्मारकही येथे आहे.
झऱ्याच्या बाजूने थोडेसे वर जाऊन फोटोग्राफी केली व परत फिरलो. पायथ्याशी भेटवस्तू, गरम कपड्यांची बरीच छोटी छोटी दुकाने आहेत. घरासाठी लाकडी फळीवर अगदी ५-१० मिनिटात नाव लिहून देणारे अनेक चित्रकारही येथे आहेत. अशा वेगवेगळ्या नेम प्लेट बनवायची थोडीशी आवड मुलीला असल्याने तिने वेगवेगळ्या आकाराच्या काही फळ्याच तेव्हड्या विकत घेतल्या.
डलहौसी ते खज्जियार रस्ता खूप सुंदर आहे. डलहौसीतून बाहेर पडता पडता दिसणाऱ्या
रहिवाशी शाळा, त्यांची रंगसंगती, त्यांच्या बाजूचे कुंपण व त्यांनी राखलेले
सुंदर बगीचे यामुळे येथून प्रवास करायला खूपच छान वाटते. त्यापुढे
गेल्यावर दिसणारे लांबपर्यंतचे डोंगर, दऱ्या यामुळे खज्जियारपर्यंचा छोटासा
प्रवास खूपच हवाहवासा वाटणारा. डलहौसी पब्लिक स्कुलच्या आवारातील बीजी'स पार्क (Beeji's Park)
हे असेच एक सुंदर ठिकाण. भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या मुलांना
पाठविणाऱ्या सर्व आईंना हे ठिकाण समर्पित. युद्धासाठी वापरात आलेली काही
आयुधे, त्यांच्या प्रतिकृती येथे ठेवण्यात आल्या आहेत. १०-१५ मिनिट येथे
थांबून फोटोग्राफीसाठी हे एक सुंदर ठिकाण.
येथून थोड्याच वेळात आम्ही लक्कड मंडी भागात पोहचलो. येथून डलहौसी भागातील सर्वात उंच शिखर 'दैनकुंड'
साठी ट्रेकची सुरुवात होते. झाडीतून सळाळत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संगीतमय
आवाज निर्माण होतात त्यामुळे हे ठिकाण 'सिंगिंग हिल्स' म्हणूनही ओळखले
जाते.
बेस कॅम्प पासून ४ किमीचा हा ट्रेक अगदी अवघड नसला तरी बऱ्यापैकी थकवणारा
आहे. शिखरापर्यंत जाण्यासाठी काही ठिकाणी काँक्रिटच्या पायऱ्या (दिड-दोन
किमी) तर काही ठिकाणी चढ उताराचा कच्चा रस्ता (दिड-दोन किमी) आहे. चढायला
सुरुवात केल्यावर उजव्या बाजूस दूरपर्यंत पसरलेली लष्करी वायू दल तळाची
जागा दिसते.
जसजसे उंच जावे तसे डोंगर-दऱ्या यांचे नजारे अधिकच सुंदर भासू लागतात. सुरुवातीला काही पायऱ्या चढल्यावर ग्रुपमधील काही जण थांबायचा विचार करत होते परंतु इतके सुंदर वातावरण व दृश्य पाहून हळू हळू का होईना पण वरपर्यंत पोहचायचेच असा सगळ्यांनी निर्धार केला.
शिखर. शिखराहून ३६० अंशात या भागाचा सुंदर नजारा दिसतो.
शिखराच्या मागे पोहलाना देवीचे सुंदर मंदिर आहे.
येथून कैलास पर्वताचे दर्शन होते.
येथील स्टॉलवर चहापाणी झाले.
थोडे थांबून उतरायला सुरुवात केली. बारा वाजता चढायला सुरुवात केलेला हा ट्रेक संपवून आमही दोन वाजता परत खाली पोहचलो होतो.
येथून पुढच्या १०-१५ मिनिटात 'काला टॉप' अभयारण्यात
जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी पोहचलो. (परत लक्कड मंडी येथूनच) रस्ता दगड
धोंड्यांचा असल्याने आपली गाडी येथेच सोडलेली बरी. देवदारच्या घनदाट
जंगलातून पुढे तीन किमी चालत जाण्यास खूप आवडले असते पण नुकतेच दैनकुंडचा
ट्रेक केल्याने चालायची ताकत नव्हती. येथून सहा आसनी छोट्या गाड्या
भाड्याने मिळतात त्यापैकी दोन ठरवल्या, यांचे निश्चित असे दर नाहीत.
जाऊन-येऊन एका गाडीचे रु.१०००/- दिले. कालाटॉप साठी प्रत्येकी प्रवेश फी
नाही परंतु प्रति गाडी २५०/- भरावे लागतात ते आमच्या गाडी भाड्यात (म्हणजेच
एक हजारात) समाविष्ट आहेत असे सांगण्यात आले. तिकीट नाही मिळाले. अडीचशे
रुपये कोणाच्या खिशात गेले माहित नाही.
ओक,पाईन ,देवदार वृक्षांनी नटलेली हिरवाई व त्यामधून नजरेस पडणाऱ्या
पर्वतरांगा. दरी-खोरी हे येथील वैशिष्ठ. अभयारण्यात अस्वल, बिबट्या,
कोल्हे, वानर यांचा वावर आहे. जाताजाता अनेक ठिकाणी उन्मळून पडलेले
मोठेमोठे देवदार वृक्षही दिसत होते.
अशाच एका आडव्या पडलेल्या देवदार वृक्षाच्या लांबच लांब बुंध्यावर चढून परिसराचा आनंद उपभोगणाऱ्या आम्ही सर्व जणी
सन १९२५ मध्ये बांधलेले वन विभाग विश्रामगृह(समुद्रसपाटीपासून उंची ८०००
फूट).याचे बुकिंग बहुतेक वनविभागाच्या मुख्य कार्यालयातूनच केल्या जाते.
(डलहौसी किंवा चंबा असावे)
येथून दिसणारी दरी व पर्वत रांगा. दरीतून हळूहळू वर येणाऱ्या ढगांचे विलोभनीय दृश्य
थंड वातावरणात मिळालेली गरमागरम भजी.
साडे चार वाजले होते.विश्रामगृहाच्या हिरवळीवर बसून थोडा आराम केला व निघालो. एकही प्राणी नजरेस पडला नाही पण येथील हिरवाई, डोंगर पाहून मन तृप्त झाले होते.
आणि पुढील फक्त पाऊण तासात आम्ही 'मिनी स्वित्झर्लंड अर्थात खज्जियार' या ठिकाणाला पोहचलो.
धुक्यात हरवलेले आमचे हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाचे हॉटेल 'देवदार"
तळमजल्यावरील चार जणांसाठीची सुंदर खोली
क्रमश:
पुढील व अंतिम भाग लवकरच
BTW , तिकडे सगळीकडे मॅगीच खातात का ? (भजी आहेत फोटोत तरी सर्वांचेच हिमाचलातले वृत्तांत मॅगीयुक्त असतात म्हणून विचारले) :-)
तिथल्या थंड हवेत (पटकन बनवून मिळणारा) गरमागरम पदार्थ म्हणून बरेचसे
(सो कॉल्ड हेल्थ कॉन्शस) पर्यटक 'मॅगी' खातात. वास्तविक हिमाचल प्रदेश
मध्ये जेवण आणि अल्पोपाहारासाठी अन्य पदार्थही उपलब्ध असतात.
कुलू मध्ये काबुली चण्यांची उसळ (छोले), विविध चटण्या आणि दही घातलेले
'समोसा चाट' एकदम वर्ल्ड फेमस, मनाली आणि सिमल्यात तर जे आवडीचे ते छान
चवीचे मिळेल अशी परिस्थिती (बटाट्याचे पदार्थ सोडून, कारण तिथले बटाटे
चवीला खूपच गोड असतात, त्यामुळे मलातरी आवडत नाहीत.).
खज्जियार आणि सिमल्यातल्या ('ऐतिहासिक सिमला करार' ज्या बंगल्यात झाला होता
त्या) परिसरात मिळणारा 'आलू पराठा' थोडा वेगळाच भासला! तव्यावर भाजलेला
'आलू पराठा' आक्खाच्या अक्खा मोठया कढईत तळून मग सर्व्ह करतात. मी हेल्थ
कॉन्शस वगैरे प्रकारात मोडणारा नसलो तरी हा प्रकार पूर्णपणे खाऊन संपवणे
माझ्या आवाक्या बाहेरचे आहे 😀
अर्थात वर उल्लेखिलेले पदार्थ हे 'स्ट्रीट फूड' प्रकारात मोडणारे आहेत, हॉटेल्स आणि रेस्टोरंटस मध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतात ह्याची नोंद जरूर घ्यावी! बाकी आड वाटेवर / तिबेटी लोकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी 'मोमो'ज आणि वाशाळ 'चाउमिन' पेक्षा मॅगी खाण्याला प्राधान्यक्रम देणे अनिवार्य ठरते
खाज्जियार हे चंबा खोऱ्यातील ६५०० फूट उंचीवरील एक हिल स्टेशन .
स्वित्झर्लंडशी उष्णकटिबंधीय साम्य असलेले हे ठिकाण म्हणजे सुमारे ५ किमीचा
परीघ असलेले एका मोठ्या खोलगट बशीच्या आकाराचे हिरवेगार कुरण आणि
मध्यभागात एक सुंदर तळे. कुरणात चरणारे प्राणी, कुराणाच्या पलीकडील बाजूस
दिसणारे पर्वत व त्यावरील देवदार वृक्षांचे दाट जंगल याचे नेत्रसुखद दर्शन.
कुरणाच्या एका कोपऱ्यात (रस्त्याच्या बाजूने) १२ व्या शतकातील खाज्जिनाथ
मंदिर हे येथील आणखी एक आकर्षण. १९९२ मध्ये स्विस दूत यांनी खज्जियारला भेट
दिली तेव्हा ते खूप प्रभावित झाले व या ठिकाणाची भारतातील 'मिनी
स्वित्झलँड' म्हणून त्यांनी घोषणा केली.
काळ संध्यकाळीच खज्जियारला पोहचलो होतो. हॉटेल लगतच हे मिनी स्वित्झर्लंड
म्हटले जाणारे सुंदर ठिकाण आहे. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या
कुरणात येऊन यथेच्छ फेरफटका मारला. दिवसाच्या वेगवेळ्या वेळात निसर्गाचे
बदलणारे रूप पहिले.
आज सकाळी उठून फेरफटका मारून रम्य सकाळ अनुभवली.
चम्बाच्या मंदिरांविषयी ऐकले होते. त्यांच्या वेगळेपणामुळे आज ही मंदिरे
बघायची ठरवले . खज्जियारपासून साधारण २०-२२ किमी व वेळ एक तास लागणार
होता.
चलो चम्बा
वळणा वळणाच्या रस्त्याने गाडी घाट उतरू लागली. हा रस्ताही निसर्गसौंदर्याने
परिपूर्ण आहे. थोड्याच वेळात चम्बाच्या 'चोगान' ला येऊन पोहचलो.
(चोगान':एक मैदान जेथे सभा, मेळे आयोजित केले जातात) याच्या आसपासच आम्हाला
बघायची ती मंदिरे होती.
याच मैदानात दोन दिवसानंतर मोदीजींची सभा होणार होती त्यामुळे रस्ते, मैदान सगळीकडे पोलिसांचा खूप बंदोबस्त होता.
'चोगान'
दहाव्या शतकात राजा साहिल वर्मन याने मुलगी चम्पावतीच्या म्हणण्यानुसार आपली राजधानी भारमौरहून येथे आणली व राजधानीचे नामकरण मुलीच्या नावावरून चंबा असे केले.
चम्बाची पाषाण व लाकडी छत असलेली मंदिरे
चम्बाची बहुतेक मंदिरे दगडी बांधकाम असलेली नगारा शैलीत (किंवा शिखर
शैलीत)आहेत. या शैलीतील मंदिरांचे दोन प्रकार दिसून येतात. टेकडी व मैदानी
प्रकारातील मंदिरे. टेकडी प्रकारात मंदिरे आतून कोरीवकाम किंवा चित्रकला
केलेली तर मैदानी प्रकारात बाह्य भागावर कोरीव काम केलेली दिसून येतात.
चम्बाच्या मंदिरांमध्ये बाह्य भागावर विपुल प्रमाणात कोरीव काम आहे.
मंदिराच्या भिंतींचे पाऊस किंवा हिमवृष्टीपासून रक्षण व्हावे या दृष्टीने
शैलीत थोडा बदल केला गेला असावा. मंदिराच्या शिखराजवळ बाहेरील बाजूने
गोलाकार लाकडी छत दिलेले दिसते. देवदार वृक्षांच्या मजबूत लाकडामुळे ही छते
हजार वर्षांनंतरही आज चांगल्या स्थितीत टिकून आहेत.
लक्ष्मी नारायण मंदिर (चंबा येथील मुख्य मंदिर)
राजा साहिल वर्मन याने १० व्या शतकात या मंदिर संकुलाचे निर्माण केले. शिखर
शैलीतील सहा मंदिरांचा हा समूह. मंदिरे शंकर, विष्णू व कृष्णाला समर्पित
आहेत. मुख्य मंदिरातील विष्णूची मूर्ती हि विंध्य पर्वतातून आणलेल्या
संगमरवरी दगडातून तयार केली गेली आहे. असे म्हणतात की राजाची दहा पैकी नऊ
मुले मूर्तीसाठी दगडाच्या शोधात मध्य भारतात आली होती जी त्यांच्यावरील
हल्ल्यात मरण पावली. मूर्ती घडवण्याबद्दल राजाची अपार श्रद्धा होती व
त्यामुळेच त्याने दहाव्या मुलालाही शिळा आणण्यास पाठविले. त्याने आणलेल्या
संगमरवरी शिळेतून नारायणाची सुंदर मूर्ती साकारल्या गेली.
मंदिर संकुल प्रांगणाच्या प्रवेश द्वारासमोर गरुड स्तंभ असून त्यावर पितळेची गरुड मूर्ती आहे.
प्रवेश केल्यावर नंदी मंडप असून पुढे मुख्य लक्ष्मी नारायण मंदिर आहे.
प्रवेश द्वारावर गंगा यमुना आहेत. वर सांगितल्याप्रमाणे सर्व मंदिरांना
शिखराजवळ लाकडी छत असून बाह्य भागावर सुंदर मूर्तिकाम व नक्षीकाम दिसते.
संकुलातील मंदिरे :
१. लक्ष्मी-नारायण (मुख्य मंदिर)
२. राधा कृष्ण
३. चंद्रगुप्त
४. गौरी शंकर
५. त्रंबकेश्वर
६. लक्ष्मी दामोदर
लाकडी छत
हरी राय मंदिर
चम्बाचे मैदान 'चौगान' च्या अगदी बाजूस हे मंदिर आहे. मूर्ती ९-१०व्या
शतकातील असून मंदिर ११व् व्या शतकातील आहे. विष्णूची वैकुंठ स्वरूपातील
दागिन्यांनी नटलेली सुंदर मूर्ती आहे.
चंपावती मंदिर
अकराव्या शतकात राजा साहिल वर्मन याने आपल्या मुलीच्या नावे हे मंदिर
बांधले. हे मंदिरही चोगान च्या जवळच (पोलीस स्टेशनच्या मागे) आहे. यामागची
कथा अशी सांगितली जाते की चंपावती नेहमी एका ऋषींना भेटण्यासाठी जात असे.
राजाने संशय घेऊन ऋषींच्या खोलीत प्रवेश केला. खोलीत कोणीही नव्हते. राजाला
प्रायश्चित्त म्हणून उभ्या असलेल्या जागीच मंदिर बांधण्याबद्दल आकाशवाणी
झाली.
येथे अजूनही काही चांगली ठिकाणे आहेत जसे चामुंडा मंदिर, सुई माता मंदिर
,अखंड चंडी पॅलेस,रंगमहाल, म्युझिअम इ. पण आवरते घेतले. अशीही दोन
दिवसांनी मोदीजींची सभा असल्याने गर्दी खूप होती आणि खाज्जियार पासून बरेच
खाली आल्याने वातावरणातही थोडा उष्मा होता . एक वेगळ्या प्रकारची मंदिरे
पाहायची होती ती बघून झाली असल्याने खज्जियारसाठी परत निघालो.
(ज्यांना इतिहास, प्राचीन मंदिरे वगैरेची आवड आहे त्यांनीच इकडे फिरकावे
बाकीच्यांनी खज्जियारला थांबून हिल स्टेशनची मजा अनुभवावी. दोन्ही
ठिकाणांच्या उंचीत साधारण १८०० फुटांचा फरक असल्याने येथील वातावरण व
शहरातील गर्दी यामुळे फिरणे थोडेसे कंटाळवाणे होऊ शकते म्हणून एक फुकटचा
सल्ला)
दुपारी अडीचच्या सुमारास परत खज्जियारच्या जवळ पोहचलो. वाटेत एक उंच शंकराची मूर्ती दिसली. येथेच जगदंबा मातेचे मंदिर होते. दर्शन घेऊन परत हॉटेलवर आलो.
खोलीतून दिसणारा नजारा
माकडांपासून खुप सांभाळावे लागते.
तळ्याकाठी फिरायची हौस अजून पूर्ण झाली नव्हती पण बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडे थांबून बाहेर पडलो. भरपूर फोटो काढले व येथील फोटोग्राफरकडूनही काढून घेतले.
हॉटेलच्याच कडेने रस्त्यापलीकडे 'खज्जीनाग मंदिर '
आहे. मंदिर १२ व्या शतकातील असून नागांचा राजा खाज्जिनाग ह्याची मूर्ती
आहे.मंदिराला उतरते स्लेट दगडाचे छत असून इतर काम खांब वगैरे लाकडी आहे.
१६ व्या शतकात राजा बालभद्र वर्मन यांच्या काळात लाकडापासून बनविलेल्या पांडवांच्या पाच पूर्णाकृती मूर्ती येथे आहेत.
हिडिंबा व शिवाचेही छोटेसे देऊळ आहे.
उद्या सकाळी अमृतसरकरिता निघायचे असल्याने आवराआवर करून लवकरच झोपी
गेलो. सकाळी सातलाच बिल भरून गाडीवर सामान लादले. हॉटेलमधील अनुभव खूपच
चांगला होता. खज्जियारला मुक्काम करावयाचा असेल तर हॉटेल 'देवदार' सारखे
चांगले ठिकाण शोधूनही सापडणार नाही. गाडी परत डलहौसीमार्गे धावू लागली.
डलहौसीच्या बिजीज पार्कजवळचा सुंदर रस्ता परत एकदा अनुभवला.
साडे आठ नऊच्या दरम्यान एका ढाब्यावर नाश्त्याकरिता थांबलो. वनविभागाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचा हिमाचल प्रदेश,, जम्मू -काश्मीर व पंजाबच्या सीमेवरच्या निसर्ग सुंदर जागेवर असलेला हा ढाबा.
काही मिनिटातच आम्ही हिमाचल प्रदेशची हद्द ओलांडून पंजाबच्या सीमेत प्रवेश केला.
ही लेख मालिका हिमाचल प्रदेशच्या कांगडा व चंबा पुरतीच मर्यादित ठेवण्याचा विचार असल्याने इथेच संपवीत आहे.
यानंतर अमृतसर येथेही काहींनी एक तर काहींनी दोन रात्र मुक्काम करून
अटारी-वाघा बॉर्डर, सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग , श्री दुर्ग्याना तीर्थ
इ. ठिकाणांना भेट दिली.
आधीच्या काही भागातील प्रतिक्रियेत सहलीचा कार्यक्रम व खर्चाबाबत काहींनी चौकशी केली होती त्याबद्दल माहिती खाली देत आहे
सहलीची रूपरेषा
सहल खर्चात समाविष्ट गोष्टी:
* मुंबईपासून पठाणकोट व अमृतसर ते मुंबई रेल्वेचा ससंपूर्ण रेल्वे प्रवास वातानुकूलित.
* पठाणकोटला उतरल्यापासून ते परतीच्या ठिकाणापर्यंत भटकंतीसाठी सर्व दिवस खाजगी वाहन
* पूर्ण जेवणखर्च
* सर्व ठिकाणांची प्रवेश फी , गाईड खर्च, टीप
अंदाज येण्यासाठी प्रवासासहित संपूर्ण १२ दिवसांचा प्रत्येकी खर्च


















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.