Monday, August 29, 2022

इतिहासातील गणपती

 

छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताच सण धामधुमीत झाला नव्हता. पण यंदा सगळ्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव जोरदार साजरा होणार असं दिसतंय. ढोलताशाचा गजर, आकर्षक रोषणाई, सजावटीचं साहित्य या सगळ्या रस्ते खुलून गेले आहेत. उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया दाभाडे गणपतीबद्दल.

सरदार खंडेराव दाभाडे आणि पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे वंशज आजही तळेगाव दाभाडेमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दाभाड्यांच्या घरी पूर्वीपासून सात दिवसांचा गणपती बसतो. हा गणपती पालखीतून येतो आणि पालखीतून जातो. एक घरातला आणि एक संस्थानचा असे दोन गणपती बसतात. दाभाडे घराण्याचे पाटील, राजपुरोहित, तिथला भुई समाज, वाजंत्री हे सगळेच वंशपरंपरेने सामील असतात. या सगळ्यांसोबत पालखी गावभर फिरते आणि मग घरी आणून तिची स्थापना केली जाते.

दाभाडे घराण्याचा इतिहास काय?

दाभाडे घराणं मूळचं गुजरातमधल्या बडोद्याजवळ असणाऱ्या दभोई या गावातलं. तिथं राहणारे म्हणून त्यांचं नाव दाभाडे पडलं. मुघलांच्या करामुळे दाभाडे गुजरातमधून निघून नाशकातल्या ओझर इथं स्थायिक झाले. या घराण्याचे बजाजी दाभाडे यांचा मुलगा येसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. छत्रपती शिवरायांना विशाळगडावर पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा मुलगा सरदार खंडेराव दाभाडे आणि त्यांची तिसरी पत्नी उमाबाई दाभाडे हे स्वराज्याच्या उभारणीमधल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत.

 

साताऱ्याच्या खिंडीतील गणपतीचा इतिहास

टिम इ सकाळ

गणपती हा नवसाला पावणारा देव आहे. गणपतीच्या भक्तांची संख्या अफाट आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीचे देवस्थान देशभरामध्ये अनेक आहेत. त्याचप्रमाणे सातारा या ऐतहासिक शहरात सुद्धा नवसाला पावणाऱ्या गणपतीचे अतिशय सुंदर देवस्थान आहे. या शहरात दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याच्या डाव्या बाजूस निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं देवस्थान आहे. नवसाला पावणारा असा प्रसिद्ध खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान या श्रद्धास्थानी भक्तांची गर्दी होत असते. नागरिकांमध्ये सातारकरच नव्हे तर परप्रांतामधून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचा देखील समावेश असतो. येथे पर्यटक फक्त देवदर्शनासाठीच येतात असे नाही तर, ते देवदर्शनाबरोबरच निसर्गरम्य परिसराची मौज अनुभवण्यासाठी येतात. वैशिट्य म्हणजे या ठिकाणाचा एक वेगळा इतिहास आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : हे आहे गणपती स्थापनेचे महत्व, भगरे गुरुजी सांगतात...

१६९८ साली सातारा राजधानी झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा या शहराला राजधानी घोषित केले होते. तेव्हापासून अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण उतारावर गर्द झाडीत ही दोन ठिकाणं होती. इतिहास आपण जाणतोच, औरंगजेबाने मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी साता-यावर स्वारी करून ही राजधानी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्याने साता-याजवळ उत्तरेला करंजे गावी तळ ठोकला.त्याच्या मुलाला म्हणजेच अझिमशहाला सध्याच्या शहापूर ते सज्जनगड भागात तळ देण्यासाठी पाठवलं होत. कपटी औरंगाजेबाने अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला आणि सज्जनगडावर स्वारी केली.

पावसाळ्यात मराठ्यांच्या गनिमी काव्याला बळी पडत हजारो सैनिक मरण पावून हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांनी ताराबाईंकडून किल्ला जिंकून सातारा ही राजधानी केली.

Recommended Articles


हेही वाचा: Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

हे ठिकाण अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत सातारा शहरापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. नागमोडी वळणाच्या स्वच्छ आणि हिरव्यागार घाटात हे ठिकाण आहे. शहरातून तिथे जायच असेल तर स्वतःच खाजगी वाहन असणे आवश्यक आहे किंवा शहरातून रिक्षाही मिळू शकते. वेगळेपण असे आहे कि या देवस्थानला पायी जाणा-यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भागात गणपतीबरोबरच कुरणेश्वर महादेव मंदिर आणि दत्त मंदिरही आहे.

मुघलांकडून मूर्ती फोडली जाऊ नये यासाठी किल्याला वेढा पडल्यावर देवभक्तांनी पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारात नवी मूर्ती बसवल्याचं सांगितलं गेलं. मूर्तीचे स्वरूप बघता ती मूर्ती दगडाची नसावी असा अंदाज आहे.या मंदिराचं आणि मूर्तींच वैशिष्ट्य म्हणजे, मूर्तीच्या मागे आजही मूळ आहे. ती मोकळी करण्याचा विचार अनेकदा झाला पण नकार दृष्टांत झाल्याने आहे त्याच मूर्तीची पूजा सुरू राहिली आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

काही कालावधीनंतर सातारा शहरातील अनेक गणेशभक्त नित्यदर्शनासाठी येऊ लागले.त्यानंतर देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आता ट्रस्टतर्फे वर्षामध्ये भाद्रपद आणि माघ महिन्यात पाच दिवसांचे दोन उत्सव, मंदिरामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी पूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी केले जातात. मंदिराचा जीर्णोद्धार, धार्मिक कार्यासाठी दुमजली इमारत, तसेच परिसरात सुशोभित बालोद्यान, वृक्षारोपण, पथदिवे इत्यादी सोयी ट्रस्टतर्फे करण्यात आल्या आहेत.

श्री गणेश मंदिराच्या पूर्वेस दगडी पाय-या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुरणेश्वर मंदिर आहे. भक्तांच्या सहकार्यातून मंदिरापर्यंत दगडी पाय-या, बालोद्यान, ध्यानकेंद्र, आध्यात्मिक अभ्यासिकाही सुरू आहे. हा परिसर निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने बहरलेला असल्यामुळे गणेशभक्तांबरोबरच पर्यटकांचंही आकर्षण ठरला आहे.

लेेखन - आकांक्षा मानकर

 

पुणे : गुंडांचा गणपती...

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. 'त्याच्या घराजवळील गणपती' असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे.

पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे.सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे.

नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते. ३ एप्रिल १९७५ रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले, तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीच्या कवचाचा एक साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. त्यानंतर केशव रघुनाथ देशपांडे यांनी पाषाणातून हुबेहूब मूर्ती तयार केली. या मूर्तीसाठी वारजे येथील गणपती माळावरून दोन टन वजनाचा दगड निवडण्यात आला होता. त्याच नवीन मूर्तीची आज पूजा केली जाते (१८७६पासून). मूळ मूर्ती गाभाऱ्याच्या मागे ठेवलेली आहे.लोकमान्य टिळकांचे गुरू महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मातुःश्रींनी पुत्रप्राप्तीसाठी येथेच कडक उपासना आणि नवस केला होता.

पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी,असा अंदाज आहे.

 For More Than 13 Years Rak94

Moin Khan

१३ वर्षांपासून मोईन खानकडून बाप्पाची भक्ती; इतरांसाठी ठरतेय आदर्श

जुने नाशिक : ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम हिंदुस्तान हमारा’ या वाक्यास खऱ्या अर्थाने कोणी अस्तित्वात उतरवले असतील तर तो आहे, मोईन खान. गेल्या तेरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अल्ला आणि भद्रकालीचा राजा गणपती बाप्पाची भक्ती करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढेही जीवन असेपर्यंत असेच करत राहणार असल्याचा त्याने निश्चय केला आहे.


सर्वधर्म समभाव संकल्पना राबविणारे क्वचितच आढळून येतात. जातीभेद, धर्मभेदाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करून माणुसकीला काळिमा फासण्याचे काम करत असतात. अशा समाजकंटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम सामान्य कुटुंबातील मोईन खान याने केले आहे. मोईन महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागात ठेकेदारीवर औषध फवारणीचे काम करतो. हे करत असताना दैनंदिन भद्रकालीचा राजा गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीची साफसफाई करण्याचे काम तो करतो. इतकेच नव्हे तर सकाळी सर्वात प्रथम मूर्तीच्या सफाईनंतर पहिली आरती करून मगच आपल्या कामावर जातो. ड्यूटी संपल्यानंतर लहान- मोठे काम करून त्याठिकाणी वेळ घालवतो. मुस्लिम असूनदेखील दैनंदिन नित्य नियमाने त्यास शक्य होईल त्यापद्धतीने बाप्पाची सेवा करतो. चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच मूर्तीला धुवून काढणे, परिसरातील स्वच्छता करणे, आरती करणे, पूजा साहित्याची मांडणी करणे अशी विविध प्रकारची कामे त्यांच्याकडून केली जातात. नटराज मित्र मंडळाकडून कायमस्वरूपी स्थापना केलेल्या भद्रकालीचा राजा गणपतीचे सर्वांमध्ये विशेष श्रद्धा आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. त्या भाविकांमध्ये देखील मोईनची सेवा आकर्षण ठरत असते. शुक्रवार (ता.१०) गणेशोत्सवात सुरवात होणार त्यानिमित्ताने पंधरा दिवसात पूर्वीपासूनच त्याने बाप्पाची मूर्ती धुणे परिसर स्वच्छ करणे अशा विविध प्रकारच्या कामाची तयारी सुरू केली होती. शुक्रवारी शुक्रवारीदेखील सर्वप्रथम सकाळी त्याची हजेरी लागली.

हेही वाचा: 24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!

नटराज बंधू मित्रमंडळातर्फे सर्वधर्मसमभाव संकल्पना जपली जाते. गणेशोत्सवाप्रमाणेच पीरबाबाचा संदलदेखील उत्साहात साजरा केला जातो, तर मग आपण का मागे राहायचे भद्रकालीचा राजा बाप्पाची सेवा करून समाधान वाटते.
- मोईन खान, सेवेकरी.

मोईन खानबद्दल परिसरातील रहिवाशांमध्ये मोठ्या आदराची भावना आहे. अशा व्यक्तीची समाजात आवश्यकता आहे.
- नीलेश शेलार, अध्यक्ष, भद्रकलीचा राजा गणेश मंडळ.

उर्जा आणि अध्यात्मिक अनुभव देणारे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम'

टीम ई सकाळ

लेख - सुनील शिरवाडकर

नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास. आज आपण जाणुन घेतोय भक्तांना दैवी उर्जा आणि आध्यात्मिक अनुभव देणारे, दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेले हे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम' मंदिराचा नाशिकमधील स्थापनेचा प्रवास.

देवळाली गावाजवळुन वाहणारी वालदेवी नदी. तिच्या वळणावर पलीकडे असलेला हिरवागार निसर्गरम्य परीसर. आणि त्यातच स्थित असलेला तो विशाल गणेश. 'अण्णा गणपती' त्याचं नाव.

अण्णा गुरुजी हे दाक्षिणात्य. त्यांना गणपतीचा द्रुष्टांत झाला. आणि मग त्यांनी या गणेशाची स्थापना करण्याचे ठरविले. त्यासाठी नाशिकची निवड केली. वालदेवीच्या किनारी काही वर्षापूर्वी हे मंदिर उभे राहिले.

४२ फुट उंचीच्या या विशाल गणेश मुर्तीची चार दिशांना चार मुखे आहेत. ही चार मुखे म्हणजे सुख, शांती, आयुष्य आणि आरोग्य यांची प्रतिके आहेत. मागील दोन हातात पाश आणि अंकुश हि आयुधे आहेत, तर पुढील दोन हातांपैकी एक गुडघ्यावरुन खाली सोडलेला. आणि दुसरा हात वरदहस्त! अर्थात आशिर्वाद देणारा आहे.

हेही वाचा: दगडी मोदकाचा प्रसाद देणारे बाप्पा "मदन मदोत्कट"

गणपतीची मुर्ती विराट असल्याने त्याचे मंदिर नाही. ती प्रशस्त मोकळ्या जागेवर आहे. त्याच्या सभोवर मात्र लहान लहान मंदिरे आहेत. त्यात मुख्यत्वे आहे नवग्रहांची नऊ मंदिरे. भगवान दत्तत्रेयांचे मंदिर आहे. अक्कलकोट स्वामींचे आहे.

एका बाजूला भगवान शंकर आहे. पार्वती माता आहे. आणि कार्तिकेय सुद्धा आहे. एका प्रकारे भगवान शंकराचा परीवारच येथे आहे.

जेंव्हा येथे शिवलिंग स्थापना झाली, तेव्हा सव्वा लाख लिटर दुधाचा अभिषेक त्यावर करण्यात आला. तसेच जवळपास एक कोटी रुद्राक्ष त्याला अर्पण करण्यात आले. सध्या अण्णा गुरुजींच्या वतीने आलेल्या भाविकांना हे प्रसादरुपी रुद्राक्ष अर्पण करण्यात येतात.

परंतु सध्या मंदिरे बंद आहेत. पण तरीही त्या बाजुला गेलात तर दुरुनही या विशाल अण्णा गणपतीचे दर्शन होऊ शकते. आपल्या भक्तांना दैवी उर्जा आणि अध्यात्मिक अनुभव देणारे, दाक्षिणात्य पध्दतीने बांधलेले हे 'अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठम' नाशिककरांचे नवीन श्रध्दास्थान आहे.

 

सिंधुदुर्ग किल्ल्यातील गणेशोत्सवाचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील लोक उत्सवप्रिय मानले जातात. ऋण काढून सण करण्याचीही इथे परंपरा आहे. एकूणच इथले सर्व सण पाहता त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव होय. घराघरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव आता कोकणातही सार्वजनिक स्वरूपात पुढे येतो हे खरे असले तरी अगदी लोकमान्य टिळकांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी म्हणजे 1695 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी सार्वजनिक स्वरूपात गणपती पुजला होता. अर्थात राजाराम महाराज व लोकमान्य टिळक या दोघांचेही उद्देश वेगळे होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीतील जनजागृतीसाठी हुशारीने या उत्सवाचा वापर केला, तर राजाराम महाराजांनी आपल्या ताफ्यातील सैनिकांनाही या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा उत्सव सुरू केला. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील उत्सवाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम समाजाची 18 घरे आहेत. सध्या किल्ल्यावर 18 पैकी सहा घरांमध्ये गणपती पूजन केले जाते; मात्र या सर्वात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात बसविल्या जाणाऱ्या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. अगदी 16 व्या शतकात हा गणपती बसवला गेला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस हा गणपती बसवला जातो. पाच दिवसांनी त्याचे विसर्जन केले जाते. या काळात मंदिराचे पुजारी त्याची विधिवत पूजा करतात. गेली बरीच वर्षे हा गणपती मालवणमधील वायंगणकर बंधूंच्या मूर्तिशाळेत तयार होतो. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी ही मूर्ती वाजतगाजत किल्ल्यावर नेली जाते. होडीतून मूर्ती नेण्याची प्रथा आजही अबाधित आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे आणि या मंदिरातील गणेशोत्सवास वेगळे स्थान आहे; मात्र याच काळात इतरत्रही गणेशोत्सव साजरे होत असल्याने तसा किल्ल्यावरील गणेशोत्सव सध्या दुर्लक्षितच आहे. या दरम्यानच्या काळात किल्ल्यावर पर्यटकांची गर्दीही कमी असते. दरम्यान, हा गणेशोत्सवाची पाच दिवसांनी सांगता केली जाते. ही विसर्जनाची जागाही पूर्वांपार ठरलेली आहे. समुद्रात एक दगड आहे. या दगडाला स्थानिक लोक धरणांचा दगड असे म्हणतात. याच भागात मूर्ती विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या सार्वजनिक गणेशाची पूजा सकपाळ कुटुंब करते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेवढ्याच भक्तिभावाने या मूर्तीची पूजा मुस्लिम बांधवही करतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवालाही तशीच ऐतिहासिक किनार आहे. त्यामुळेच हा गणेशोत्सव महत्त्वपूर्ण आहे.

 

गणेशाची साडेतीन पीठे

                      आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने  देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या  काळात त्यांची माहिती करून घेउया .या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले  त्या त्या  ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते . 
                               मोरगाव - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.   पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरगाव एस.टी. आहे. 

राजूर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. वरण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली.  कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.  मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर,राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते. 
 पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.     समुद्रामान्थानाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्ना झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धर्निश्वर गणेश' म्हणतात. 
चिंचवड - चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावीच्या मुले याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोर्गावी वारी करीत असत.

सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली. 

 http://ajinkyatarte.blogspot.com/2019/09/blog-post_66.html

 गणरायाच्या प्राचीन मंदिरांच्या अनोख्या कहाण्या
    दिनांक :15-Sep-2021



 महाराष्ट्राला सांस्कृतिक प्राचीन परंपरा लाभलेली आहे. गेल्या अनेक शतकांचा प्राचीन वारसा महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक स्थाने ही भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक दृष्टीने वेगवेगळी आणि महत्त्वाची आहेत.महाराष्ट्रात अनेक जागृत, स्वयंभू देवस्थाने आढळतात. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. तसेच विदर्भातील अष्टविनायक म्हणून ओळख असणारी गणपती मंदिरेही खूप प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश गणेशस्थाने ही स्वयंभू, जागृत असल्याचे सांगितले जाते. या सर्व मंदिराच्या कथा-कहाण्या, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. चला तर मग जाणून घेऊया याबाबत माहिती...
 

 
'जयति गणपती' म्हणजेच कसाब गणपती
'शिक्षणाची पंढरी' म्हणून ओळख असणारे पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवतच. शिवाजी महाराजांच्या वाडा अर्थात शनिवार वाड्यालाच लागूनच कसबा गणपतीचे प्राचीन भव्य व देखणे मंदिर आहे. शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला होता. जिजाबाईंच्या हस्ते कसबा गणपतीची स्थापना केली होती. या गणपती मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला 'जयति गणपती' असे म्हणतात. आधी मूर्ती अतिशय लहान होती मात्र शेंदूराने न्हाऊन निघालेली कसबा गणेशाची मूर्ती तीन फूट उंचीची झाली आहे.

 
दशभुज गणेश
कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हंटलं जातं. चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात. सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे. या मूर्तीची निर्मिती काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितले जाते. अशा प्रकारची दशभुज मूर्ती केवळ नेपाळमध्ये पाहायला मिळते, असे सांगितले जाते.

 
सिद्धिविनायक महागणपती
महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे मंदिर आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देऊळ एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले त्यादरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. १९९५-९६मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले.


​कड्यावरचा गणपती
दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर असलेल्या आंजर्ले गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेले हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली, असावी असे मानले जाते. मंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या ॠद्धि-सिद्धीच्या आहेत. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा इ.स. १७८० मध्ये जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे.

 
रेडीचा द्विभुज गणपती
सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होता. ८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ठ ठिकाणी झोपले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले. सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचा गणपतीने दृष्टांत दिला. त्यानुसार, कांबळी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग आढळून आला. एका महिन्यानंतर, १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे. गणपतीच्या समोर एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोद कामात सव्वा महिन्यांनी सापडला. द्विभुज ही गणपतीची भव्य दिव्य, आकर्षक व प्रसन्न मूर्ती सर्वच भक्तांना भाराऊन टाकते. ही गणपतीची मूर्ती पांडवकालीन असावी, असा अनेकांचा कयास आहे.
 

 
- दिप्ती राखुंडे  


https://www.tarunbharat.net/Encyc/2021/9/15/Unique-stories-of-ancient-temples-of-Ganarayana.html







 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...