रोकडोबा वेस/ हरिदास वेस
मनुष्याने जमाव करून राहताना चोर, दरवडेखोरांच्या पासून आणि वन्य
श्वापदांपासून संरक्षणासाठी गांव वसवून राहणे मानवाला आवश्यक वाटले म्हणून
गांवे निर्मीली गेली. पण तिथेही वन्य श्वापदांचा अन् दरवडेखोरांच्यां
त्रासाची भिती होतीच. ग्राम संरक्षणासाठी गाव म्हटले की गावकुस आलेच.
गावकुस असले की वेस हवीच.
पंढरपूराला अशा तीन वेशी अस्तित्वात होत्या. पैकी सर्वात मोठी होती ती
महाद्वार रस्त्यावर कवठेकरांचे दुकान आणि अकरा रूद्र मारूती जवळची महाद्वार
वेस. तिला दोन्ही बाजूला प्रशस्त देवड्या ज्यात बसून रक्षक ग्रामाच
येणाऱ्या जाणारेवर देखरेख ठेवू शकतील अशा. शिवाय पांथस्थांला तिथे बसून
पाणी पिता येईल वा दोन घडी विसावता येईल अशा दो बाजू देवड्या. जी पाहताच
रायगडावरिल भव्य नगारखान्याची वा कोल्हापूरातील भवानी मंडपाजवळील
प्रवेशद्वाराची आठवण व्हावी. अशी दगडी बांधणीची आणि देखणीही होती. १९८०
च्या रस्ता रूंदीकरणात विकासाच्या नावाखाली ती भुईसपाट करण्यात आली. खरे तर
ती पुरातन वारसा म्हणून जतन करायला हवी होती. जसे अंबिकानगर, संभाजीनगर
आदी गावी अनेक वेशी शिल्लक ठेवल्या आहेत तसे.
दुसरी छोटेखानी पण देखणी अशी कुंभार घाटावरची वीटांची वेस. तीही मोडखळीस
आल्याने लोकांना धोका नको म्हणून नुकतीच गतवर्षी पाडण्यात आली.
सांस्कृतिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची असणारी तिसरी वेस
म्हणजे रोकडोबाची वेस अथवा हरिदास वेस.
गावाच्या उत्तर भागात विठ्ठल मंदिराकडून भजनदास चौकाकडे जाण्याचे रस्त्यावर
हिचे स्थान आहे. वेशीच्या आत पंचाळी आणि हरिदास मंडळींची घरे आणि वेशी
बाहेर पिंपळाचे पारावरचे रोकडोबा मारूतीचे मंदिर अशा जागी हि वेस उभी आहे.
हिची बांधणी इसवी सन १६६३ मधे झाल्याचे उल्लेख आहेत. जुन्या कागदपत्रांत
शेजारी रोकडोबा मारूती म्हणून हिचा उल्लेख रोकडोबा वेस असा आहे. तर
हरिदासांची घरे जवळपास असल्याने तिला हरिदास वेस म्हणूनही ओळखतात. आजची
हिची जागा पाहिली म्हणजे जुन्या काळी गावाचा विस्तार केवढा होता हे लक्षात
येते. कारण रोकडोबा मारूती म्हणजे वेशीवरचा मारूती. सोबतच्या
प्रकाशचित्रांत रोकडोबा मारूतीचा पार, पिंपळ एका बाजूला दिसतो आहे. आजही
नगर परिक्रमा करताना या वेशी बाहेरूनच भजनदास चौकातून जावे लागते.
सुमारे १५ फूटाची कमान असलेली ज्यातून आजही ट्रॅक्टरसारखी वाहने जावू शकतील
अशा आकाराची सुमारे २० फूट उंचीची ५ फूट लांबीची दगडी बांधणीची हि वेस
आजहि भरभक्कमपणे उभी आहे. पूर्वी हा रस्ता काळ्या दगडांच्या फरश्यानी
बांधलेला होता. अन् वेशीतून आत जादा रहदारीचा त्रास्त होवू नये म्हणून मोठी
छावणी रस्त्यात उभी रोवली होती. जी आता काढून टाकलीय.
बडोद्याचे गायकवाड सरकारांचा वकिल गंगाधर शास्त्री राजकारणातील
वाटाघाटीसाठी दुसरे बाजीरावाचे भेटीस पंढरपूरी आल्यावर त्यांचा १५ जुलै
१८१५ ला खून पाडण्यात आला. आणि हे गायकवाडी वकिलाच्या खूनाचे प्रकरण
तत्कालिन हिंदुस्थानातील सर्व संस्थानात गाजले. केवळ हिंदुस्थानभरच नव्हे
तर युरोपातही गाजले. परिणामी पेशव्यांचा सरदार त्र्यंबकजी डेंगळ्यांवर
त्याचे खापर फोडून त्याला इंग्रजांंनी शिक्षा केली. तो गंगाधर शास्त्रीचा
गाजलेला खून गंगाधर शास्त्री देवदर्शन आणि कीर्तन श्रवण करून पालखीतून
आपल्या मुक्कामी जाण्यास या वेशीतून बाहेर पडल्यावरच वेशी जवळच झाला.
आषाढी, कार्तिकी च्या यात्रेनंतर महाद्वार काल्या चे समयी हरिदासां कडिल
प्रासादिक पादूका दिंडीसह त्याचे घरातून बाहेर पडून पांडुरंगरायाचे
रावळातून महाव्दार, खाजगीवाले वाडा या मार्गे मिरवून या वेशीतून आत जातात.
त्यावेळी पादुकांवर या वेशीतून लाह्यांची, गुलाल बुक्क्याची उधळण केली
जाते. सर्वांना काल्याचा प्रसाद दिला जातो.
सांप्रत नव्याने पंढरी विकासाच्या गोष्टि घडू लागल्यात त्यातूनच जसे नगर,
संभाजीनगरच्या (औरंगाबाद) वेशी टिकविल्या त्याप्रमाणे पंढरीचा सांस्कृतिक
वारसा, एेतिहासिक महत्व असणारी हि वेस टिकवावी. तीची मोडतोड न होता रस्ता
करावा. ग्रामसंस्कृती जपावी. ही अपेक्षा.
© आशुतोष अनिलराव बडवे पाटिल, पंढरपूर


ज्ञात अज्ञात पंढरपूर ४
सरकार वाडा/ वासकर वाडा

अनादी काळापासून भक्तीची पेठ म्हणून सर्वप्रसिद्ध असणाऱ्या पंढरी नगरीत
अनेक मान्यवर येवून गेले. काहीनी केवळ दर्शन पूजादी धर्मकृत्ये केली,
काहिंनी काही काळ निवास केला काहींनीं कायमचे वास्तव्य केले. यात संत,
महात्म्ये, विद्वत्जन , राजे महाराजे, रंक, राव, साधू, भक्त, अभक्त, हौशे,
गवशे, नवशे सारेच होते. तसा स्थान महिमा असल्यामुळे पेशवाईमधे पंढरपूरामधे
सर्वच सरदारांचा राबता असल्याने त्यांनी पंढरपूरात आपल्या निवासासाठी मोठ
मोठे वाडे बांधलेले दिसून येतात. त्यात सर्वात प्रमुख म्हणजे स्वत: छत्रपती
आणि पेशवे. त्यांनी पंढरीत चंद्रभागा तटावर इथे आल्यावर निवासासाठी अन्
त्या काळातल्या कारभारासाठी म्हणून मोठा टोलेजंग वाडा बांधला तोच हा सरकार
वाडा. आजचा वासकर वाडा.
खाशांच्या निवासासाठी आणि कारभारासाठी म्हणजे हत्ती, घोडे, बैल बारदाना,
घोडागाडी, बैलगाडी, रथ, पालख्या, मेणा याचे साठी म्हणून हा औरस चौरस
प्रशस्त भला मोठा असा सुमारे ४०० x ४०० फुटाचा दगड विटांचे बांधकामाचा वाडा
बांधण्यात आला. तो गावाचे दक्षिण पूर्व बाजून. विचार करून एके अंगाला हा
वाडा बांधल्याचे आपल्या लक्षात येते. कारण एवढ्या मोठ्या सरंजामाला मुबलक
पाणी हवे शिवाय हत्ती, घोडे, उंट, बैल आणि खाश्यांच्या वास्तव्यामुळे
गावाला त्रास नको ही विचारसरणी इथे दिसते. एके काळी इथे हत्ती होते, घोडे
होते, बैल होते, गाई होत्या, उंटही असतील सांडणी पाठविण्यासाठीचे. त्यामुळे
मुबलक जागा हवीच प्रत्येकाची व्यवस्थाही स्वतंत्र हवी. त्यामुळेच आजही
श्रीविठोबाचे रथासाठी वाड्यात स्वतंत्र जागा आहे.
वाड्याचे पुर्वेला सरकाराला साजेसे सुमारे ३० फुट उंचीचे वीटकामाची सुबक
नक्षीकाम केलेले मराठमोळे रांगडे प्रवेशद्वार. त्याच्या वर उजवे बाजूला
मराठेशाहीचा दरारा सांगणारा परमपवित्र असा भल्या मोठ्या लाकडी सोटावर
फडकणारा भगवा ध्वज. तो अडकविण्यासाठीची तगडी व्यवस्था आजही या वाड्यावर हा
ध्वज फडकत आहे. एवढा मोठा धर्मध्वज म्हणजे वाड्याचे वैभवच आहे. केवळ
वाड्याचे नाही तर पंडरीचे मराठेशाहीचे वैभव आहे समस्त वारकऱ्यांचे वैभव
आहे. त्या भव्य दरवाजाचाच फोटो सोबत दिसतो आहे. याला मोठे म्हणजे सुमारे १०
फूट लांबीचे आणि २० फूट उंचीचे भव्य लाकडी प्रवेशद्वार. द्वार बंद केल्यास
जाणे येणेसाठी बारिक ४ फूटी खिंड. याला मोठाला अडसळ वा अडणा. या द्वाराचे
चौकटीचे वरचे अंगाला लाकडी चौकटीवर कोेरीव गणेशपट्टी दिसतेय. त्यावरचे
चौकटीत मध्यवर्ती स्थानी जुन्या मराठी शैलीत श्री विठोबाचे रेखिव चित्र
आहे. त्याचे दोन्ही बाजुला बैठे स्वरूपात गरूड हनुमंत दिसतात. कालौघात
त्याचे रंग उडून गेलेत. जे वै. दादा वासकरांना पुन्हा पहिल्या मराठी बाजातच
चितारायची इच्छा होती पण त्यापूर्वीच त्यांचे देहावसान झाले नाहितर
त्यांनी ते निश्चितपणे केले असते. कारण याच दाराची लाकडे उन्हापावसाने खराब
झाल्याने त्यांनी भलामोठा खर्च करून दुरूस्ती केली होती. तसेच या दाराला
लाकडाचे आयुष्य वाढावे म्हणून वेळोवेळी काव अन् तेल हि दिले गेलेय. या
दाराला एका वेळी तेल द्यायला सुमारे २ डबे तेल लागते. पंढरीतील साऱ्या
लोकांना या वाड्याचे पश्चिम बाजूचे दगडी कमानीचे दाराने जाणे येणे असल्याने
हे दार तुरळकांनाच महितेय. हि पश्चिमेकडील कमानची चांगली झुलणारा हत्ती
सहज आत प्रवेश करेल एवढी मोठी आहे. मात्र याला दरवाजा नाही. पण पुर्वी काही
व्यवस्था असावी कारण कमानीचे अातील बाजूला तशा खूणा दिसतात.
या दोन्ही दारांच्या मधे मोकळे पटांगण ज्याला सर्व बाजूंनी दगडी भिंतीने
बंदिस्त केले आहे. आत पुन्हा जोत्यावरची उभारणी असलेला आतला वाडा. त्यात
जायलाही मोठे लाकडी प्रवेशद्वार ज्याला दोन्ही बाजूने प्रशस्त देवड्या.
आतल्या वाड्यातही मोठे मोकळे अंगण, गाईचा गोठा. समोर दोन ओढीचे लाकडी
कडीपाटाची सरकार कचेरी जिथे पूर्वी मुख्य कारभारी बसून कारभार करीत असत.
त्याचे दोन्ही बाजूला काही खणांची बांधकामे असे हे वाड्याचे चौसोपी स्वरूप.
आजही वारकरी सांप्रदायीक वासकर फडाचा कारभार, मान्यवरांच्या भेटी गाटी याच
ठिकाणी वासकरांचे गादीचे या कचेरीतून होतात. त्या भागाला आजही हि कचेरीच
म्हणतात. पूर्वी तिथे फड चाले तो बोरू चालविणाऱ्या कारकूनांचा अन् आजही फड
चालतो तो टाळ वाजविणाऱ्या वारकऱ्यांचा. त्यावेळी हिंदुस्थानेच राजकारण इथून
चाले तर आज हिंदुस्थानचे अध्यात्मकारण इथून चालते. त्यावेळी मराठमोळ्या
शाही सरदारांची वर्दळ इथे असे आज मराठमोळ्या वारकरी महाराजांची वर्दळ असते.
त्यावेळी हिंदुस्थानावर आपला राजकीय अंमल ठेवणारे या वाड्यात वावरत होते
आजही हिंदुस्थानावर आपला अध्यात्मिक ठसा ठेवणारे वावरताना दिसतात.
या वाड्याच्या इतिहासात सरदार दरकदारांबरोबरच बडवे कुळातील प्रल्हाद महाराज
यांचे वंशातील रामचंद्र प्रल्हाद, अनंत रामाजी या संत कवींचा सहवास लाभलाय
कारण पूज्य मल्लाप्पा महाराज अन् प्रल्हाद महाराज बडवे यांचा स्नेह
जिव्हाळा होता तो त्यांचे दोन्ही वंशात आजही चालतोय. तसेच आळंदिचे आरफळकर
हैबतबाबांपासून शिरडीचे साईबाबा पर्यंतचे संत साधुंचा स्पर्श झालाय तसा
केंद्रीय मंत्री अन् महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदराव पवारांपासून आर
आर पाटीलांपर्यंत अनेक मंत्री येथे येवून गेलेत. तसेच रा स्व संघाचे
सर्वेसर्वा सरसंघचालक मोहनजी भागवत इथे काही काळ वास्तव्यही करून गेलेत.
पेशवाईत वैभवात असणारा हा वाडा १८१८ ला आष्टीच्या लढाईत मराठी सत्तेच्या
पाडावानंतर मात्र केवळ सरकारी वास्तू बनला. मराठा सत्तेच्या पाडावानंतर
इंग्रजी सत्ता आली त्यांनी येथे पंडरपूरची मामलेदार कचेरी चालविली. किती
तरी वर्षे तालुक्याचा कारभार इथुन चालला. ब्रिटिशाविरूद्धचे १८५७ चे समरात
पंढरी नगरीतल्या अन् जवळपासच्या राष्ट्रभक्तांनी जोर केला अन् इथल्या
मामलेदाराचाच मागच्या बोळात खून पडला. इंग्रजांनी त्याचे हल्लेखोर धरून
काही साताऱ्याला पाठविले तर काहिंना या वाड्याचे लिंबाला फाशी दिल्याचे
सांगितले जाते. तो लिंब १० - १२ वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.
खून झाल्यामुळे लोकात या वाड्याविषयी भुतसंचाराच्या गप्पांना उत आला.
परिणामत: असेल किंवा कार्यविस्तारासाठी असेल पण सरकारकडून नवीन कचेरीची
उभारणी करण्यात आली आणि सगळा शासकीय कारभार तिकडे हलला. आता या वाड्याचे
काय करावे म्हणून तो हस्तांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या पण
भुताच्या गोष्टीमुळे कोणीही खरेदीला धजेना.
त्या दरम्यान महान वारकरी प्रभुती वै. मल्लाप्पा वासकरांचे वंशांतील एकनाथ
अप्पा वासकर महाराजांना पंढरपूरात प्रति महिना यावे लागत असल्याने
राहणेसाठी तसेच मोठ्या संख्येने येणाऱ्या त्यांचे फडावरिल वारकरी शिष्यांचे
परिवारासहचे भजन पूजनासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यांनी हि जागा
सरकारकडून खरेदिली. लोकांनी भुताखेताबद्दल त्यांना सांगता ते म्हणाले
आम्हाला भजन पूजन करणाऱ्याना कसले आलेय भुताचे भेव. या पंढरीच्या मोठ्या
भुताने त्याआधीच आम्हाला झपाटलेय. त्यापायीच आम्ही वारंवार पंढरी वारी
करतो. त्यापुढे हि बारिक सारिक भुते आम्हाला काय करतात. ती भुतेच आमच्या
कीर्तन अन् हरिभजनाने पळून जातील. आणि ते खरेच घडले. त्यानंतर इथे कुणाला
बाधा झाल्याचे वा भूत दर्शनाचे कथन कोणी केलेच नाही.
जुन्या काळी वाड्याचे प्रवेशद्वारावर मराठा सत्तेचे राजचिन्ह असणारा
सोनकावेत बुडविलेला भला मोठा भगवा कायम फडकत असे जो विधिवत दसऱ्याला बदलला
जाई. हि सांस्कृतिक परंपरा आजहि वासकर महारांजांकडून सांभाळली जातेय.
सोबतच्या प्रकाशचित्रात डावे अंगाला भगवा दिसतोय तो तोच. पाहणाराला आणि
वाचणाराला खोटे वाटेल, दिसताना तो लहान दिसतोय पण तो ७२ इंच पन्ह्याचे १५
मीटर कापडाचा आहे. त्याला पारंपारिक पद्धतीने रंगविणयासाठी कावही चांगली
अर्धी ठिकं लागते.
या वाड्याचे पटांगणात पूज्य एकनाथ अप्पा वासकारांची समाधी बांधलेली असून एक
छोटेखानी हनुमान मंदिर ही दादा महाराजांनी बांधलेले आहे. समोरच्या भव्य
पटांगणात सूर पाट्या, कबड्डी, हुतूत, हॉकी फुटबॉल बरोबरच भाऊ वासकर बरोबर
क्रिकेटचाही डाव अनेकवेळा रंगत असे जे खेळण्यात माझे अनेक वर्षे गेली आहेत.
याशिवाय वासकरशिष्य असणाऱ्या हेरवाडच्या वै. वा रामभाऊ जोंधळेकडून पट्टा,
विटा, भाला सारख्या मर्दानी खेळाचे पहिले हात अन् चौकही मी खेळलो आहे. सोबत
हा वाडा वासकरांकडे आल्यापासून इथल्या भजन पूजनात कधीही खंड पडलेला नाही.
वासकरांच्या कित्तेक पिढ्या तिथे आनंदाने नांदताहेत. वाड्याचा मराठी पणा
टिकवून त्याचे संरक्षण करताहेत एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील
लोकांना विठ्ठलभक्तीची ओढ निर्माण करण्याचे कार्य करताहेत. हे त्याचे कार्य
अभिनंदनीय आणि आचरणीय आहे.
पंढरीत आलेल्या अनेक महापुरापैकी १९५६ चा महापूर मोठा होता त्यावेळीही या
वाड्याचे जोत्याखालीच पाणी होते. त्यानंतरही अनेक महापूर आले मात्र या
वाड्याला कोणताही धोका झालेला नाही.
एकूणच मराठा इतिहासातील महत्वाच्या घडामोडींचा साक्षी आणि वारकरी
संस्कृतीचा संवर्धक असा हा वाडा यापुढेही भक्तीची पेठ फलविणारा म्हणून
अध्यात्मकार्यी तत्पर राहो.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ५ श्री विष्णुपद मंदिर
आजपासुन मार्गशीर्ष मास सुरु होतो.
पंढरपूरचे भाषेत हा विष्णुपदाचा महिना. त्या निमित्त मी यापूर्वी लिहिलेला विष्णुपद माहात्म्य हा लेख पुन्हा पोस्ट करीत आहे.
चराचरनिर्मितीच्या आधी निर्माण केलेल्या अन् भगवंताच्या सुदर्शनावरी
वसविलेल्या भुवैकुंठ पंढरपूर नगरीच्या अग्नेयेला साधारण १.५ किमी अंतरावर
असणाऱ्या गोपाळपूर जवळ नदिपात्रात पुष्पावती आणि चंद्रभागा नदिच्या
संगमस्थानी हे पुरातन मंदिर आहे.
७ फूट उंचीचे जोत्यावर १२ फूट उंचीचे ३१ x ३१ फूट आकारमानाचे, तसेच १६ दगडी
खांबांवरचे २४ कमानी वर हे दगडी मंदिर उभारले आहे. पैकी दोन खांबावर
उठावाचे विष्णु अन श्रीकृष्ण प्रतिमाही कोरल्या आहेत. जवळच एक लहानश्या
देवळीवजा भिंतीत संगमरवरी विष्णुविग्रहही उभा आहे. किंबहुना हा नव्याने
केलेला असावा
त्याचे एके बाजूला मोठा दगडी सप असून त्याचे बाजूस पुरातन मारूतीही अुभा
आहे. याच सपावर पंढरपूरातील जुने नेते वै. वा बबनराव बडवे यांचे समाधीस्थळ
आहे. येथे आलेले भक्तगण या सपाचा वापर भोजनासाठी वा विसाव्यासाठीही करतात.
जवळच नदिपात्रात कळ लावण्याच्या स्वभावामुळे क्वचितच ज्यांची पूजा केली
जाते त्या नारदमुनींचे मंदिरही आहे. कारण त्यांचे मुखी पुंडलिककिर्ती ऐकून
त्याचे भेटीसाठी गोपांसह येणाऱ्या देवाला पुढे राहून तेच मार्ग दाखवित
होते.
मग सकळ गोप गोपी गोधनें |
संगे घेऊनी गोवर्धनें |
नाना देश दुर्गमस्थाने |
वने उपवने लंघिती ||
मार्गी गीत हास्य विनोद |
गोवळ करिती नाना छंद |
श्रीकृष्णगुणानुवाद |
गात नारद पुढे चालें ||
पंढरीत आल्यावर ते या स्थानी क्षेत्रमुनी पुंडलिकरायाचे संमतीने निवासाला राहिले. त्यामुळे त्यांचे ही इथे मंदिर आहे.
इथे असणाऱ्या नदी संगमास्थळी असणारा संगम दैत्य ओळखून त्या भगवंताने पुढीलप्रमाणे नाश केला.
संगम दैत्य शिलातली |
गुप्त जाणोनि वनमाळी |
वरि उभा राहोनी ते वेळी |
केला तली शतचूर्ण ||
तै श्रीकृष्णाची समपदे |
तैसीच गोपाळाची पदे |
अद्यापी दिसती विसींदे |
मोक्षपदे देकिल्या||
याप्रमाणे कृष्णाची पदे असणाऱ्या या मध्यवर्ती स्थानी सर्वत्र असणाऱ्या
मुर्तीप्रमाणे इथे मात्र मुर्ती नसून भगवंताच्या पायाच्या चिखलात रूतलेल्या
पदचिन्हांची पुजा करण्यात येते. भगवान कृष्णाची या ठिकाणी समचरण आणि
देहुडा चरण दोन्हि पदचिन्हे असून तेथेच लोण्याची वाटी, मुरली ठेवल्याच्या
खुणा तसेच गाईंच्या खुराच्याही खुणा या पदचिन्हांशेजारी पुजेत आहेत. त्याचे
८ कोनी दगडी कठडा केलेला असून पाणी वाहून जाणेसाठी मोरीही आहे.
एवढेच नाही तर सोबतच्या गोपालांची ही पदे इथे उमटलेली आहेत.
पुराणकथे नुसार पवित्र शरिर प्राप्त केलेल्या गयासुराने देवेच्छेप्रमाणे
आपले शरिरावर यज्ञ करणेसाठी जागा करून दिली. त्यासाठी दिव्य शरिर भूमीवर
पाडले त्यावर ब्रह्म्याने यज्ञ केला पण वारंवार हलणाऱ्या गयासूराला स्थिर
करताना विष्णुभगवंताने अनेक यत्न केले तरी तो हले अन् भूमंडळ गदगदे. शेवटी
भगवंताने आपले उजवे पाऊल त्याचे मस्तकावर ठेवले. ती झाली गया. तरी हा असूर
हलला अन् महाविष्णूने त्याचे कमरेवर शिला रोवून त्यावर आपली दोन्ही पाऊली
ठेवल्याने गयासूर स्थिर झाला ती दोन्ही पाऊले म्हणजे पंढरीतील विष्णूपद
स्थान होय. मात्र पिडेने त्रस्त असूनही देवसेवा केल्याने गयासूराच्या
विनंतीप्रमाणे सकल देवांना अन् सरितांना या ठिकाणी येवून त्याचे शरिरी
रहिवास करावा लागला ज्यामुले हे स्थान हिंदुस्थानात सर्व तीर्थे क्षेत्रे
देवस्थळांहून परमपवित्र आहे. ज्याप्रमाणे विष्णुपद आहे तत्दवत देवांची
ब्रह्मपद, रूद्रपद, इंद्रपद, कार्तिकपद, चंद्रपद, सुर्यपद, आहवनीयपद,
गार्हपत्यपद, दक्षिणाग्निपद, सभ्यपद, अवसथ्यपद, गणेशपद, क्रौंचपद,
अगस्तिपद, कश्यपपद, कण्वपद, दधिचीपद अन् मनंगजपद ही १८ पदे आहेत. भगवंतानी
कृष्णरूपातील केलेल्या काल्याचे वेळीच्या खुणा म्हणून वेणू अन् लोन्याची
काल्याची वाटी तसेच गोपदचिन्हे इथे आहेत. तर गोपाळरूपाने आलेल्या इतर
देवांची पदचिन्हेही इथे आहेत. तीच मुख्य पदचिन्हा भोवती बांधकाम करतेवेळी
मालारूपात गोवण्यात आली आहेत.
हिंदु संस्कृतीत जेवढे महत्व गयेला तेवढेच किंबहुना त्याहुन थोडे जास्त या
स्थानाला आहे. कारण गयेला भगवंताचे एकाच पायाची खुण आहे. कारण तिथे एकच पाय
देवाने टेकविला आहे. इथे मात्र देहुडा चरण आणि दोन्ही पायाच्या समभुज अशा
खुणा आहेत. तसेच अन्य १८ देवपदे ही यास्थळी आहेत. त्यामुळे इथे पूर्वजांचे
मोक्षप्राप्तीसाठी अस्थिविसर्जन, पिंडप्रदान अन् श्राद्धादि कर्मेहि केली
जातात. तसेच संगमस्थान असल्याने नारायण नागबळी सारखी धर्मकृत्येही करण्यात
येतात. इथे पिंडदान केले असता सप्तगोत्राचा अन् त्यातील १०१ कुलांचा उद्धार
होतो.
कृष्णावतारात भगवंताने आपल्या गोप गोपिका सवंगड्यांसह रम्य क्रिडा करून
तव धावोनी आले गोवळ |
म्हणती खवळला जठरानल |
कृष्णा भूक लागली प्रबल |
भुकेचि वेळ न सोसवे ||
एक विस्तिर्ण पाहोनी शिळा |
सभोवतां गोपपाळां |
मध्यें शोभे घनसावळां |
गोपाळकाला मांडला ||
शिदोऱ्या सोडोनी खडकांवरी |
एकीकडे गोपहरि |
एकिकडे बैसल्या व्रजनारी |
परि सन्मुख हरि सकलाही ||
गडी म्हणती यदुपती |
तुम्ही आम्ही करूं अंथी पांथी |
जें जें ज्या रूचती |
तें तें अर्पिती कृष्णमुखी ||
याप्रमाणे जिथे काला केला ते हे स्थान. या काल्याची महती मोठी कारण
गगनभरे सुरश्रेणी |
बैसोनिया विमानी |
काला पाहती नयनी |
दिव्य सुमनी वर्षती ||
म्हणती धन्य धन्य गोवळजन |
धन्य धन्य वृक्ष पाषाण |
धन्य धन्य ते स्थान |
जग्जीवन जेथ क्रिडे||
असा येथला महिमा अनेक संतांबरोबरच संत प्रल्हाद महाराज बडवे यांनीहि वर्णिला आहे.
तसेच भगवंताने येथे वेणु नाद केल्याने याला वेणुक्षेत्र असेहि म्हणतात.
पुरातन काली असलेल्या पदचिन्हांसाठी संत धामणगांवकर ( म्हणजे बहुधा बोधले
महाराज असावेत) यांनी सन १६४० मधे येथे पार बांधला. त्यानंतर सन १७८५ मधे
चिंतो नागेश बडवे यांनी सांप्रत असणारे सुंदर दगडी मंदिर बांधले आहे.
प्रतिवर्षी नदिला येणाऱ्या पूराचा महापूराचा विचार करून मंदिराचे बांधकाम
अति दणकट असे करण्यात आले आहे.
श्रीपूरचे आगाशे हे प्रतिमास अमावस्येला पंढरपूरला दर्शनाला येत असत. एका
मार्गशीर्ष अमावस्येला देवाचा रथ मंदिराकडे वाजत आलेला पाहिल्यावर त्यांनी
याबाबत चौकशी करून विष्णुपद दर्शन केले. आणि त्यांनी नदिपात्रात जाण्यासाठी
चा बळकट असा दगडीपूल आणि फरसबंदी रस्ता, घाट यांची बांधणी केली. त्यामुळे
भक्तांची नदिपात्रात चालणेची वणवण संपली.
आळंदीला माऊलींनी समाधी घेतली त्याला भगवंत उपस्थित होते. आपल्याला आता
भक्तभेटी नाही या विचाराने भगवान उदास झाले त्यामुळे आळंदिहून आल्यावर
त्यांनी पंढरी एेवजी इथेच कित्येक दिवस वास्तव्य केले. म्हणून समस्त गावकरी
मार्गशीर्ष महिन्यात नित्य तर सकल वारकरी त्यांचे सवडीने इथे देवदर्शनार्थ
येतात.
साक्षात भगवंताने इथे गोपी अन् गोप जनांसह काला केला जो देवांनाही दुर्लभ
होतो प्रसाद भक्षणार्थ त्यांनी मत्स्यरूपे धारण करूनही कृष्णाने त्यांचे वर
कृपा केवी नाही अन् त्यांना प्रसाद प्राप्त होवू दिला नाही. भक्तांना
मात्र प्रसाद दिला नित्य मिळण्याचा भरवसाही दिला त्याचे स्मरण म्हणून
प्रासादिक सहभोजनही होते. येथे भोजन केले असता अनेक संवत्सरे दुष्टान्न
भक्षण केले तरी त्याचा दोष नष्ट होतो. अन्न दान करून भोजन केल्यास भगवान
विष्णु संतोषतात. इथे विष्णुपदवर देवाला दुग्धाभिषेकाने पुजनाचे महत्व अदिक
आहे. शिवाय प्रसाद भोजनात दही पोहे खाण्याला विशेष प्राधान्य आहे. या
देवस्थानाचे सणसोहोळे अति उत्साहात अन् मोठ्या वैभवात बडवे मंडळींनी
कित्येक शतके सेवाभावी वृत्तीने संपन्न केले आहेत.
मार्गशीर्ष मास समाप्तीला देवाला पुन्हा वाजत गाजत मोठ्या थाटात रथातून मिरवत मंदिरात आणले जाते.



जुन्या काळी पंढरपूरात संत महात्मे वा भक्त रहिवास करित असलेली संत पेठ आणि
जुनी पेठ या वसाहती अस्तित्वात होत्या. कालौघात गावाचा वाढता विस्तार आणि
ग्राम गरजा लक्षात घेता नगरपरिषदेने नव्या पेठेची उभारणी केली. सरदार
खाजगीवाले नगरपरिषदेचे मुख्य असताना नगरपरिषदेने इथल्या जागा लोकांना
दुकाने कशी बांधावी आणि त्यात कशाची विक्री करावी याबाबत करार करून खरेदी
दिल्या. ते खरेदीपत्र खरोखर वाचण्यासारखे आहे. त्याप्रमाणे पेठेची वाढ होवू
लागली. तिलाच नवेपणा असल्याने नवी पेठ म्हणू लागले.
या पेठेत व्यापाऱ्यांची लगबग सूरू झाली. दुकाने उभारली गेली. धान्याच्या
गोण्या आणल्या जावू लागल्या. मोठ्या तागड्या धान्याच्या भाराने खाली वर
होवू लागल्या. लहान तराजूत काजू बदामासारखा सुका मेवा अन् लवंग
वेलदोड्यासारखे मस्ल्याचे पदार्थ तोलला जावू लागला. बाजार वाढला तशी आवक
जावक वाढली. सभोवतालच्या लहान लहान खेड्यातून शेतकरी आपण पिकविलेला शेतमाल
घेवून इथे येवू लागले. इथले व्यापारी तो खरेदून विक्रि करू लागले.
बाहेरगावाचे व्यापारीही खरेदी विक्रीच्या लोभाने पंढरीत येवू लागले.
हमालांची वर्दळ वाढली.
या साऱ्या बाजार माल वाहतूक कामी काळाप्रमाणे वाहतूकी साधन म्हणून बैलगाडी
आणि छकड्याचा वापर होई. क्वचित कोणी टांगा जोडून येणारी वा घोड्यावर येणारी
व्यक्तिही येई. तर परगांवासाठी क्वचित लमाणांचे बैलतांडे वा खेचर तांडेही
माल वाहतूक करत. त्यामुळे या पेठेत म्हणजे नव्या पेठेत बैल, घोडे, खेचरं या
प्राण्याची वर्दळ सदैव राहिली. प्राणी आले की त्यांचे खाण्यासाठी वैरण अन्
पाण्याचीही गरज भासू लागली. येणाऱ्या बाजारकरींनाही पाणी आवश्यक होते.
या अव्याहत काम करणाऱ्या मुक्या जनावरांना आणि लोकांनाही पिण्यासाठी पाणी
आवश्यक असल्याने "दया तिचे नाव भूतांचे पालन" या भूतदयेने मुंबईचे धनिक
वैद्यराज गणपतराव भाऊ कुलकर्णी यांनी पशुदया विचाराने सन १९३२ मधे या
हौदाचे बांधकाम केले आहे. ठिकठिकाणी लोकांच्या सोईसाठी पाणी व्यवस्था करणे
हे आपले कडे कित्येक शतकांपासून चालू आहे. जये शिवरायांचे आजोबा मालोजीराजे
यांनी शिखर शिंगणापूरी येणाऱ्या भक्तजनांचे साठी शिखर तळी तलाव बांधला,
देवी अहिल्याबाईंनी हिंदुस्थानभर पांथस्थासाठी जागोजागो पाण्यासाठी मोठ्या विहिरी बांधलेल्या आहेत. तसाच वारसा पंढरीतही चालला.
गावाचे उत्तर भागात ऐन व्यापारी पेठेत मध्यावर तेही रस्ता सोडून सुमारे १०
फूट व्यासाचे दगडाचे नक्षीदार कुंड. त्याबाहेर सांडलेले पाणी नीटसे वाहून
जाण्यासाठी आणि बाहेर दलदल होवू नये म्हणून केलेली उतरती दगडी फरसबंदी
योजना. सांडपाणी वाहून जाण्यासाठीचे गटार अशी याची बांधणी. सतत पाण्यासाठी
येणाऱ्या गाई आणि बैलांचा विचार करता त्यांच्यात रमणारा त्यांची सेवा
करणारा आणि त्या पशूनांही प्रिय असणारा गोपालकृष्ण हाच देव योग्य वाटल्याने
बहुधा येथे मध्यवर्ती स्थानी दगडी खांबावर भगवान श्रीकृष्णाची सुमारे २.५
ते ३ फूटाची पितळी वेणुवादन करणारी आकर्षक अशी मुर्ती बसविण्यात आली असावी.
त्यामुळेच या हौदाला कृष्णाचा हौद म्हणतात. पूर्वी याला पाण्यासाठी
नगरपरिषदेच्या नळाची कायमची व्यवस्था होती. पशूं प्रमाणे या हौदावर
पाण्यासाठी परगांवचे खरेदीदारी, बाजारकरी, हमाल मंडळीही दुुपारच्या भोजनाला
जमत इथल्या गोड, थंडगार, स्वच्छ पाण्याने हात पाय तोंड धुवून भोजन करून
रूचकर पाणी पिऊन तृप्त होत.
याप्रमाणे पंढरपूरात भादुले चौकातला भादुले हौद जो पंढरपूरतील माजी नगरसेवक
अॅड. वसंतराव तथा बापू भादुले यांचे वडिल नगराध्यक्ष वै. वा भगवानराव
भादुले यांनी बांधला, तसेच पश्चिमद्वार, मेंढे गल्ली, मंडई बाहेर गजानन
महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदि ठिकाणी लहान मोठाले अनेक हौद होते.
शिवाय गौसेवा म्हणून अनेकांचे घराबाहेर मुक्त विहारणाऱ्या गाईंसाठी
पाण्याच्या दगडी डोण्याही हौसेने ठेवलेल्या असायच्या. अशीच चौरस डोणी
शिवतीर्थ रायगडावर नगाराखान्याचे जवळ आहे. मुक्त चतुष्पाद जनावरांना पाणी
पिण्यासाठी अशीच एक दगडी पाण्याची डोणी माझे दारात आम्ही सांभाळून ठेवली
आहे. आमचे मातामह वै. नारायण सिताराम पुजारी ( वस्ताद, कवडे तालिम) याचे
एकनाथ भवन समोरिल घराबाहेर त्यांनीही हि एक दगडी डोणी सांभाळली होती. पण
काय करावे, येणारे लोक त्यात तंबाखू, गुटका थुंकतात, वारकरी बांधव तर
पत्रावळी, केर, खरकटे टाकतात अगदी द्विपाद असून विचारहिन पशूवत वागातात.
अशी गहाण केल्यावर त्यांना समजावत प्रसंगी शिव्या देत डोणी धुवावी लागते.
मगच पाणी भरावे लागते. पण गौ आणि अन्य पशुप्रेमापुढे ते कष्ट कष्ट वाटत
नाहीत. उलट त्यात आनंद होतो. दु: ख वाटते ते द्विपाद जनावारांचे अविचारी
वागण्याचे.
काळाच्या महिम्याने स्वयंचलित वाहने वाढली. बैल बारदाना कमी झाला. घोड्याची
वाहतूक कमी झाली लमाणांची वर्दळ थांबली. व्यापारी वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर,
छोटा हत्ती, माल वाहतूकीच्या रिक्षा ने सुरू झाली त्यातच पशुवाहतूक संपली.
त्यामुळे या हौदाचे महत्व संपले. आता तर लोकांना त्याच्या स्मृतीही
राहिल्या नाहित. पंढरपूरात आता केवळ स्थळ निश्चिती म्हणून कृष्णाचा हौद
सांगितले जाते. नव्या तरूणाईला तर हा हौद आणि त्याचे महत्व माहितही नाही.
त्यांनी तो कधी पाहिलाही नाहि. बाकीचे हौद तर पाडून टाकले गेले. पण हा हौद
अजून शिल्लक आहे.
आता त्याचे सभोवताली जाळी घातली असून वर पत्र्याचे छत आहे. मात्र अतिक्रमीत
टपऱ्यामुळे ना दगडी सुंदर बांधणीचा हौद दिसतो ना पितळेचा भगवात कृष्ण.
दिसतो तो केवळ पत्रा अन् त्यावरचा झेंडा. तरीही काही हमाल आणि व्यापारी,
गावकरी याची नित्यनेमाने स्वच्छता करून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भगवान
कृष्णाचा जन्माचा उत्सव श्रावणात गोकुळअष्टमीला साजरा करतात. पाडव्या
कृष्णाला साखरेची गाठी घालतात.
आजचे घडीला हे ठिकाण म्हणजे केवळ स्थल निश्चितीचे स्थान झाले आहे. खरे तर
तो एखादा सामान्य चौक नसून तो पशुपालक जीवनमान असणाऱ्या अापल्या
पुर्वसुरींच्या संस्कृतीदर्शक सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा पाऊलखुणा आहेत.
त्या वेळीच जपल्या पाहिजेत. नाही काळाचे आघातात पंढरीतील इतर हौद नष्ट झाले
ससा हा ही हौद पडून जाईल, नष्ट होईल. पण हे काम केवळ राजकीय पुढाऱ्यांचे
वा नगरपरिषदेचे नसून सर्वसामान्य पंढरपूरकारांचेही आहे. समाजसेवी संस्थांचे
आहे त्यासाठी लोकसहभाग हवा. कोणाही करो पण हे जपायला हवे.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ७

व्यास तीर्थ आणि व्यास नारायण मंदिर, पंढरपूर
आधुनिक जगतातील सर्वांत प्राचीन ज्ञानसंपदेचे साधन म्हणजे हिंदुंचे वेद
होय. ते अपौरूषेय आहेत. तसेच ते मौखिक पद्धतीने शतकानुशतके जतन केले आहेत
अगदी उकार, वेलांटी, अनुस्वार, काना, मात्राचेच नव्हे तर स्वराघाताताही
कोणताहि बदले होवू न देता. हे या जगतातीतल आधुनिक विद्वानही आश्चर्य
मानतात. अगदी चमत्कारच मानतात. त्यासाठी मौखिक अध्ययन पद्धतीचे तोंड भरून
गुगान गातात. मुळात एकच असणाऱ्या अपौरुषेय वेदांचे संरक्षणार्थ ऋग, यजु:
साम, अन् अथर्व अशा चार विभागात त्याची योजना करणाऱ्या तसेच आपल्या
ग्रंथलेखनकामी साक्षात गणरायाला पाचारून त्यालाच लेखणी बद्ध करायला लावून
महाभारतासारख्या ऐतिहासिक आणि अलौकिक ग्रंथाची निर्मीती करणाऱ्या, १८
पुराणे निर्माण करूनही असंतुष्ट राहिल्याने आत्मसंतोषासाठी कृष्ण चरित्र
सांगणाऱ्या भागवत महापुराणाची निर्मिती करणाऱ्या व्यासांचे मंदिर अखिल
भारतवर्षात क्वचितच अन्यत्र असेल. जसे पंढरीत आहे. हो मी खरं सांगतोय
आपल्या पंढरपूरात महर्षि व्यासांचे मंदिर आहे. विश्वास वाटत नाही ना? मग
प्रत्यक्ष येवून पहाच.
गावाचे उत्तर भागात, अंबाबाई पटांगणाचे पलिकडे आणि रामबाग समोरचे भागात
नदी काठाजवळ हे पुरातन मंदिर आहे. साधारणत: १०० x ९० फुट असा याचा विस्तार
असून दगडी बांधणीचे छोटेखानी असे हे मंदिर आहे. पश्चिमेकडील आकर्षक
प्रवेशद्वाराने आत जाता मधे पुर्वाभिमुख असा सुमारे २० x १५ फूट लांब रूंद
अन् ९ फूट उंचीचा दगडी मंडप दिसतो त्यामागे अंदाजे १० x १० चा गाभारा तोही
दगडी, वर लहानसेच पण दगडी शिखर असलेले असे याचे स्वरूप. याला पूर्वेलाही एक
प्रवेशव्दार आहे. जे नदीकिनारी उघडते पण त्याचा वापर क्वचितच होतो. मधल्या
प्राकारात बाहेर मोकळी जागा सोडून चारी बाजूनी जुन्या काळी साध्या
मराठमोळ्या पद्धतीचे लाकडी खांडा दांड्याचे आच्छादनाचे पडव्या होत्या ज्या
आज दिसत नाहीत. काळाच्या ओघात त्या पडून गेल्या. केवळ चारी बाजूच्या
बाहेरच्या दगडी भिंती अस्तित्वात आहेत. जणू एखादा छोटी कोटच वाटाव्या अशा
या भिंती आहेत. जवळच उत्तर अंगाला एक दास मारूती आहे. ज्याला लहानशी
विटांची घुमटी आहे. गाभाऱ्यात सिंहासनावर लहानशी सुमारे २|| फुटी पद्मासनात
बसलेली व्यासांची मुर्ती असून त्यांनी उजव्या हाती पोथी आणि दुसऱ्या हाती
जपमाला धारण केलेली आहे. मंदिर किती प्राचिन आहे याबद्दल फारसे सांगता येत
नाही मात्र आताचे मंदिर हे ज्योतिपंत महाभागवत नावाचे भक्तांने बांधले हे
निश्चितपणे सांगता येते. या ज्योतिपंतांनी व्यासांची अनन्यसाधारण भक्ति
केली व्यासमुनिंची सबंध हिंदुस्तानात मंदिरे बांधली. तेही एक दोन नव्हे,
थोडी थोडकी १० -२० नव्हे तर १०८ व्यास मंदिरे त्यांनी बांधली. पंढरपूरातील
हे त्यातलेच एक व्यास मंदिर. व्यासांनीही आपल्या भक्ताच्या भक्तीप्रेमापोटी
त्याला काशी विश्वेश्वराचे स्थानी भागवत एेकून संतोषून आपले दर्शन दिले
होते. त्यानंतर ज्योतिपंतांनी तीर्थभ्रमण केले. त्यात पंढरीत आल्यावर इथले
स्थान महात्म्य जाणून हे देवालय उभारले. कारण महर्षी व्यासांनी चंद्रभागा
तटी राहून अनेक वर्षे तप केले. त्यांना पांडुरंगाचे दर्शन झाले. हे स्थान
अति पवित्र आहे हे जाणून व्यास इथेच राहते झाले. या मंदिराचे समोरचे
चंद्रभागेच्या पात्रात व्यासतीर्थ म्हणतात. इथे तप केल्याने व्यासांना
व्यासपण प्राप्त झाले होते. त्यामुळेच यास्थानी व्यासतीर्थाजवळ हे मंदिर
उभारले. दुर्दैवाने या ज्योतिपंता बद्दल विशेष माहिती मिळत नाही. त्यांचे
आई वडिल कोण? ते कोठले? त्यांचे अन्य चरित्र काय? त्यांनी बांधलेली मंदिरे
कोटे कोटे आहेत? आता त्यांची स्तिथी काय? एवढे धनार्जन त्यानी कसे प्राप्त
केले? की त्यांना कोणा धनिकांनी अर्थ सहाय्य केले? असल्यात ते दानशूर कोण?
त्यांचा वंश विद्यमान आहे का? याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. किती
दुर्दैव ना हे? असा संत महात्मा जर पाश्चात्य देशी परदेशी जन्मला असता तर
शेक्सपियरसारके त्याचे घर, दार, वापरत्या वस्तू अगदी गावही परक्यांनी
संरक्षिले असते. पण या बाबतीत आपल्याकडे सगळाच अंधार.
व्यासांच्या महत्तम कार्यामुळे त्यांना नारायणाचे नामाभिधान प्राप्त
झाले. त्यांना साक्षात नारायणच मानून पुज्य केले गेले. त्यामुळेच हे मंदिर
निर्मीले गेले आणि नावही "व्यास नारायण मंदिर" हेच ठेवले गेले. व्यास हे
तसे तपाचरण करत फिरणारे भटके. त्यामुळेच बहुदा पूर्वी येथे फिरत्या गोसावी,
बैराग्यांची वस्ती असायची. त्याचे नियम धर्म ते तिथे चालवायचे. फिरस्त्ये
बैरागी गोसावी ही धर्माचरणाने नियमाचे पालन करत. त्यांचे वापरासाठी म्हणून
पाणी हवे म्हणून चांगले दगडी बांधीव आडाचीही तिथे व्यवस्था आहे. आज नदी
शेजारी असून हा आड निर्जल झाला आहे.
यास्थानी भगवान व्यासांचे पूजन करून दर्शन घेतले असता ज्ञान प्राप्ती
होते. येथे कार्तिक पौर्णिमेला मोठा अुत्सव होत असे तसेच दशाहारातही
भाविकांची मोठी गर्दी असे. आषाढ पौर्णिमा म्हणजे तर व्यास पूजेचा, गुरू
पुजेचा दिवस व्यास तर सगळ्यांचे गुरू "व्यासोच्छीष्ट जग त्रय" या उक्ती ने
त्यांचे कार्य कळते. त्यामुळे त्यादिवशी येथे विशेषत्वाने व्यासपुजन होई.
शिवाय पौष महिन्याचे प्रत्येक रविवारी पंढरी नगरी बरोबरच पंचक्रोशीतील माता
भगिनी व्यास दर्शनाला येथे आवर्जुन येतात. कधीकाळी इथे भागवताबरोबरच इतर
पुराण कथांचे हि कथन चालायचे याचे स्मरण पंढरीतील लोकांकडून एेकायला मिळते.
आळंदींचे दत्तावतारी श्रेष्ट यति, ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे
समाधी मंदिरातील वार्षिकोत्सव तसेच नित्योपचार यांची घडी बसविली, तसेच १२५
वर्षांपूर्वी आळंदीत जीवंत समाधी घेतली, त्या नृसिंह सरस्वति यांनी येथे १२
वर्षे राहून तपाचरण केले आहे. त्यांचे वास्तव्याचे तळघर आजही अस्तित्वात
असून तेथे चौरंगावर स्वामींचे प्रकाशचित्र मांडून त्यासमोर त्यांचे प्रसाद
पादुकांचे ही पूजन होते. स्वामींचे विदर्भ खानदेशातील भक्त आजही या
तपस्थळीचे दर्शनाला येतात.
कधी काळी आस्थेवाईक पद्धतीने याची व्यवस्था ठेवली असेल आज मात्र या महान
महर्षीचे मंदिराची, तपस्थळीची आणि लोक मनाचीही पडझड झाली आहे. तिही इतकी
की पंढरपूरकरांना आपल्या गांवी इतका महान ठेवा आहे हे ही माहित नाही.
इथल्या राजकीय लोकांना माहितेय ती केवळ व्यासनारायण नावाने असलेली
सभोवतालची झोपडपट्टी. निदान त्या गरिबांनी तरी देवाचे अस्तित्व नावाने तरी
का होईना टिकविले आहे. या दिन झोपडपट्टीवासी गरिबांची शाळकरी , होतकरू मुले
अभ्यासाला या मंदिराचे निरव शाततेत बसतात. पंढरीतील वेद अभ्यासक
पाठांतरासाठीही यास्थळी अवश्य बसत असत. याबाबत मुळचे पंढरीचे पुत्र असणारे
अन् आता बहुअंशी विदेशात राहुन हिंदुधर्म पताका फडकाविणारे विद्वत् वर्य
वेदाचार्य संदिपशास्त्री कापसे यांच्या आठवणी अजूही ताज्या आहेत. वेळीच या
मंदिराकडे योग्य तऱ्हेने पुरेसे लक्ष दिले नाही तर काळाच्या पोटात हे ही
मंदिर गडप होईल अन् पंढरी क्षेत्राचा अलौकिक असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक
ठेवा नष्ट होईल. व्यासांचे स्मारक नष्ट होईल. नृसिंह सरस्वतिंचे स्मारक
संपुष्टात येईल. पण देव करो अन् हि आशंका खोटी ठरो हिच त्या व्यास
नारायणाचे चरणी अन् ज्याची भक्ती व्यासांनी केली त्या परमात्मा श्री
कृष्णचरणी विनवणी!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.