Thursday, December 3, 2020

बेंगळुरू

 बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...

................
पर्यटकांना आकर्षित करणारे दक्षिण भारतातील बेंगळुरू हे शहर एक सुंदर शहर असून, ते सर्वच क्षेत्रांतील लोकांचे आवडते ठिकाण आहे. बंगलोर किंवा बेंगलोर या नावाने ओळखल्या जात असलेल्या या शहराचे, २०१४मध्ये बेंगळुरू असे नामकरण करण्यात आले. व्यापार, उद्योग, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, चित्रपट स्टुडिओ यासंबंधी येणारे लोक आणि पर्यटक यांची येथे सतत गर्दी असते. बेंगळुरूला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख ठिकाण म्हणून जगाचे नकाशावर बेंगळुरूचे स्थान आहे. शैक्षणिक क्षेत्रात मेडिकल, इंजिनीअरिंग, कायदा, व्यस्थापन, सीए, सीए या क्षेत्रांत उच्च शिक्षण मिळण्याचे ते ठिकाण आहे.
बेंगळुरू
शहाजीराजांना आदिलशहाने बेंगळुरूची जहागिरी दिली होती. त्यामुळे बेंगळुरूचे महाराष्ट्राशी अतूट नाते आहे. बेंगळुरू हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हटल्यास वावगे होणार नाही. येथून चेन्नई, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी येथे सहज जाता येते. 

बेंगळुरू पॅलेस

बेंगळुरूचा इतिहास :
इ. स. पू. १०००च्या आधीची लोहयुगातील दफनभूमी कोरोमंगल भागात आढळली आहे. तसेच इसवी सनापूर्वीची रोमन व ऑगस्टस सीझर यांची नाणी येथे सापडली आहेत. त्यावरून पाश्चिमात्य व्यापार-उदीमाची साक्ष मिळते. इ. स. ८६०मध्ये गंगा राजा इरेगंगा प्रथम याच्या शासनकाळात बेगुर नागेश्वर मंदिर बांधण्यात आले. राजा चोल प्रथम याच्या कारकिर्दीत १००४मध्ये चोल राजकुमार राजेंद्र चोल याने गंगा राजाला पराभूत करून या भागावर कब्जा केला. १११७मध्ये तालाकड लढाईत होयसळ राजा विष्णुवर्धनाने चोल राजांना पराभूत केले. १४व्या शतकात हा भाग विजयनगर साम्राज्यात समाविष्ट झाला. विजयनगरनंतर हा भाग आदिलशाहीत आल्यावर याची सुभेदारी शहाजीराजांकडे होती. त्यानंतर हा भाग मुघलांनी घेतला व बेंगळुरू शहर म्हैसूरच्या वाडियार राजांना विकत दिले. ब्रिटिश येईपर्यंत हे शहर त्यांच्या ताब्यात होते. असा या शहराचा थोडक्यात इतिहास आहे. विस्ताराने देणे येथे शक्य नाही.

बेंगळुरूमधील पर्यटनस्थळे :
 

शासकीय म्युझियम

शासकीय म्युझियम : हे भारतातील सर्वांत जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. हे आता पुरातत्त्व संग्रहालय असून आणि जुनी आभूषणे, शिल्पकला, नाणी आणि शिलालेख यांसह अनेक पुरातत्त्वीय आणि भू-गर्भीय वस्तूंचा दुर्मीळ संग्रह येथे आहे. या संग्रहालयामध्ये टिपू सुलतानाचे किल्ल्याचे मॉडेल, तंजावर शैलीतील चित्रेही आहेत. संग्रहालयात विविध जुनी वाद्ये पाहायला मिळतात. जुनी भांडी, होयसळ, चालुक्य काळातील शिल्पे, चंद्रावली येथील उत्खनात सापडलेली जुनी भांडी, कोडागू येथे सापडलेली हत्यारे येथे पाहायला मिळतात.

बेंगळुरू पॅलेस

 

बेंगळुरू पॅलेस : शहराच्या मध्यभागी असलेला हा महाल बेंगळुरूच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुंदर बागेच्या सान्निध्यात असलेल्या या पॅलेसची वास्तुकला ट्यूडर शैलीवर आधारित आहे. हा महाल सुमारे १५४ एकरांवर पसरलेला आहे. हा महाल इंग्लंडच्या विंडसर पॅलेससारखा दिसतो. ४५०० चौरस फूट क्षेत्रावर बांधलेला हा विशाल महाल १८७८मध्ये बांधण्यात आला. म्हैसूरच्या राजांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बेंगळुरूमध्ये वास्तव्यासाठी हा पॅलेस बांधण्यात आला. हा राजवाडा अतिशय मोहक असा आहे. यात ग्रीक डच शैलीतील, तसेच राजा रविवर्मा यांची चित्रे पाहण्यास मिळतात. वाड्यातील सुंदर नक्षी कोरलेले लाकूडकाम व फर्निचर प्रसिद्ध लॅझुरस कंपनी आणि जॉन रॉबर्टस् कंपनी यांच्याकडून मागविण्यात आले आहे.

के. व्यंकटप्पा आर्ट गॅलरी

के. व्यंकटप्पा आर्ट गॅलरी : हे स्थान कलाप्रेमींचे आकर्षण आहे. या आर्ट गॅलरीमध्ये सुमारे ६०० चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रकार के. व्यंकटप्पा यांच्या चित्रांचा संग्रह येथे मांडण्यात आला आहे. ते अवनींद्रनाथ टागोर यांचे यांचे शिष्य होते. के. के हेब्बर आणि शिल्पकार राजाराम यांच्या कलाकृतींचे संग्रहदेखील यात आहेत. कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले चित्रकार के. के. हेब्बर यांनी १९९३मध्ये व्यंकटप्पा आर्ट गॅलरीला आपला संग्रह दान केला. संग्रहालयाचे नियोजन पाच मजल्यांचे होते. परंतु केवळ तीन मजले बांधले गेले आणि संपूर्ण इमारत वातानुकूलित केली गेली.
बेंगळुरू मत्स्यालय

बेंगळुरू मत्स्यालय : हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सरकारी अॅक्वेरियम म्हणूनही ओळखले जाते. कब्बन पार्क परिसरात प्रवेशद्वाराजवळच हे मत्स्यालयआहे. १९८३मध्ये याची स्थापना झाली. येथे नाना प्रकारचे शोभिवंत रंगीत मासे बघण्यास मिळतात. याची इमारत तीन मजल्यांची आणि अष्टकोनी आहे. तळमजल्यावर कार्यालय आणि प्रयोगशाळा आहे. पहिल्या मजल्यावर १४ मोठ्या टाक्या आहेत आणि दुसऱ्या मजल्यावर दोन रांगांत ६९ टाक्या आहेत. हे मत्स्याल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी बंद असते. एरव्ही दररोज सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत्स्यालय पर्यटकांसाठी खुले असते.
नंदी मंदिर

नंदी मंदिर : विजयनगर साम्राज्यात केम्पे गौडा यांनी १५३७मध्ये विजयनगर वास्तुशास्त्रीय शैलीत हे मंदिर बांधले. त्यांनीच बेंगळुरू शहर स्थापन केले. मंदिराच्या गाभाऱ्यात भारतातील मोठ्या नंदींपैकी एक नंदी विराजमान आहे. हा नंदी एकाच दगडात कोरलेला आहे. श्री शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे हे मंदिर आहे. याच्या बाजूलाच रॉक गार्डन आणि दोड्डा गणेश मंदिर आहे.
विधानसौध

विधानसौध (विधानसभा) : हे ठिकाण बेंगळुरूच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे. कर्नाटकचे दिवंगत मुख्यमंत्री के. हनुमंथय्या यांना या कामाचे श्रेय दिले जाते. याचे १९५१मध्ये सुरू झालेले बांधकाम १९५४मध्ये संपले. ७०० फूट लांब व ३५० फूट रुंद अशी ही भव्य इमारत आहे. या इमारतीचे आर्किटेक्चर न्यू-द्रविडीयन शैलीवर आधारित आहे. याशिवाय, इमारतीचे काही भाग कर्नाटक सचिवालय म्हणूनदेखील कार्यरत आहेत. याची दर्शनीय बाजू आकर्षक असून, जमिनीपासून पहिल्या मजल्यापर्यंत २०४ फूट लांब अशा ४५ पायऱ्यांचे विस्तीर्ण बांधकाम केले आहे. त्यांच्या समोरच मध्यावर ४० फूट उंचीच्या १२ ग्रॅनाइट खांबांवर घुमट आहे. संध्याकाळी दिव्यांच्या उजेडात ही इमारत अधिक आकर्षक दिसते.
शासकीय म्युझियम

बेंगळुरू हे सर्व विमान, रेल्वे व रस्त्याने देशाच्या सर्व भागांशी जोडलेले आहे पावसाळा सोडून सर्व ऋतूंमध्ये येथे जाण्यास हरकत नाही. सर्व प्रकारचे भोजन मिळण्याची, तसेच राहण्याची उत्तम सोय असलेले हे ठिकाण आहे. पुढील भागात आपण बेंगळुरूमधील आणखी काही ठिकाणे व आसपासची ठिकाणे पाहू.

बेंगळुरूमधील उद्याने आणि बरेच काही...
लालबाग उद्यान (फोटो : विकिपीडिया)

बेंगळुरू हे प्रामुख्याने उद्यानांचे आणि तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच येथे अनेक संग्रहालयेसुद्धा आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण बेंगळुरूचा संक्षिप्त इतिहास, तसेच तेथील काही ठिकाणांबद्दल पाहिले. आजच्या भागात पाहू या येथील उद्याने, संग्रहालये आणि अन्य काही ठिकाणांबद्दल... 
..........
 
जुने वृक्ष

लालबाग : हा भारतातील सुंदर बगीच्यांपैकी एक आहे. १८व्या शतकात हैदर अली याने याची निर्मिती केली आणि टिपू सुलतानाने त्याचा अधिक विस्तार केला. दीड चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला सुंदर तलावही येथे आहे. अफगाणिस्तान आणि फ्रान्समधून आणलेल्या दुर्मीळ प्रजातींच्या वनस्पती हे बागेचे वैशिष्ट्य. त्यातील सुंदर, लाल गुलाबामुळे उद्यानाचे नाव लालबाग असे ठेवले गेले आहे. येथे एक काचघर असून, तेथे पुष्प प्रदर्शन भरविले जाते. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी बगीचा सुशोभित केला जातो. २४० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानात उष्णकटिबंधीय वनस्पतींचा मोठा संग्रह असून, येथे एक हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. 
कमलपुष्प तलाव

या बागेची शोभा वाढविणारे एक ठिकाण म्हणजे कमलपुष्प तलाव. वनस्पती संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बगीचा खुला असतो. १८५६मध्ये हा बगीचा अधिकृत बोटॅनिकल गार्डन म्हणून घोषित करण्यात आला. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसप्रमाणे बागेच्या आत एक ग्लास पॅलेस बनविण्यात आले आहे. लालबाग येथील खडक सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीचा असून, तो पृथ्वीवरील सर्वांत जुन्या खडकांपैकी मानला जातो. 
अल्सूर लेक

अल्सूर लेक :
१२३ एकरावर असलेला हा बेंगळुरूमधील मोठा तलाव आहे आणि त्यात अनेक छोटी बेटे आहेत. याला हलसुरू तलाव असेही म्हणतात. शहराच्या पूर्वेकडे असलेला हा तलाव केम्पेगौडाच्या काळात बांधला गेला; पण त्याचे नूतनीकरण तत्कालीन कमिशनर लुई बेंथॅम बॉवरिंग यांनी केले. 

कब्बन पार्क : हे उद्यान ३०० एकरावर विस्तारलेले असून, बेंगळुरूच्या हृदयस्थानी आहे. १८७०मध्ये मेजर जनरल रिचर्ड सॅंकी यांनी १०० एकर जागेवर हे उद्यान उभे केले. या सार्वजनिक उद्यानाचे नाव प्रथम ‘मीड्स पार्क’ असे ठेवले गेले. त्या वेळचे कमिशनर सर मार्क कब्बन (क्यूबॉन) यांचे नाव नंतर उद्यानाला दिले गेले. १९२७मध्ये श्री कृष्णराज वाडियार यांच्या राजवटीचा रजत महोत्सव साजरा करताना उद्यानाचे नाव बदलून, श्री चामराजेंद्र वाडियार (१८६८ ते १८९४) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामराजेंद्र पार्क असे नाव देण्यात आले. हिरवाईने नटलेल्या या उद्यानात अनेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. हिरव्यागार लॉन्समधील पदपथावरून फिरताना सुखद अनुभव मिळतो. या उद्यानात वनस्पतींच्या स्वदेशी आणि विदेशी अशा सुमारे ६८ प्रजाती आणि ९६ गुणधर्म असलेल्या सुमारे सहा हजार वनस्पती आहेत. पार्कमध्ये आर्टोकार्पस, बहावा, फायकस, अरोकेरिया, बांबू, टॅबुबिया अशी अनेक विदेशी प्रजातीची झाडे आहेत. ऑस्ट्रेलियातून आणलेली सिल्व्हर ओक आणि गुलमोहर ही झाडे येथेच प्रथम लावली गेली. 
रात्रीच्या वेळचा इस्कॉन मंदिराचा देखावा

इस्कॉन मंदिर : बेंगळुरूतील सुंदर संकुलांपैकी हे एक संकुल आहे. या संकुलात अनेक प्रगत गोष्टी आहेत. यामध्ये मल्टि-सिनेमा थिएटर, संगणक साह्याने सादरीकरण होणारे थिएटर आणि वैदिक ग्रंथालयातील उपदेशात्मक लायब्ररी यांचा समावेश आहे. या मंदिराच्या सदस्यांना राहण्यासाठी येथे उत्तम सुविधादेखील आहे. इस्कॉन मंदिर मुख्य पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. हे मंदिर पारंपरिक आणि आधुनिक आर्किटेक्चरच्या दाक्षिणात्य शैलीत बांधले आहे. भक्तांसाठी सर्व सुविधादेखील उपलब्ध आहेत. इस्कॉन मंदिरच्या प्रांगणात सहा मंदिरे आहेत. राधा आणि कृष्णाचे मुख्य मंदिर, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद, व्यंकटेश्वर, प्रल्हाद-नरसिंह, श्रीला प्रभुपाद आणि कृष्ण ब्रह्म ही ती मंदिरे होत. उत्तर बेंगळुरूमधील राजाजीनगरमध्ये जगातील सर्वांत मोठे इस्कॉन मंदिर आहे. 
विश्वेश्वरय्या संग्रहालय

विश्वेश्वरय्या औद्योगिक व तांत्रिक संग्रहालय : कस्तुरबा रोडवरील या संग्रहालयाला सर एम. विश्वेश्वरय्या यांचे नाव देण्यात आले आहे. येथे अनेक विषयांची वेगवेगळी दालने बघण्यास मिळतात. कब्बन पार्कमध्ये ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावर इमारत बांधण्यात आली. १४ जुलै १९६९ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले. 
इंजिन हॉल

येथील दालने अशी – 

इंजिन हॉल :
उद्योगात वापरल्या जाणाऱ्या विविध कारची इंजिन्स, जेट विमान इंजिन आणि इतर यांत्रिक डिव्हाइसेसचे प्रदर्शन.

हाउसिंग्ज वर्क गॅलरी : इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनांद्वारे मशीन्सच्या मूलभूत तत्त्वांची व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. येथे खेचण्याची यंत्रणा, गियर, गतिमान स्थानांतर करण्याचे विविध मार्ग, लीव्हर्स, झुबकेदार विमान आदींचा समावेश आहे. दुसरा भाग रोजच्या जीवनात या साध्या मशीन्सच्या वापराशी संबंधित आहे. 

मजेदार विज्ञान गॅलरी : ध्वनी, प्रकाशीय, द्रव, गणित आणि धारणा यांच्या विज्ञानावर आधारित प्रदर्शन 

इलेक्ट्रो-टेक्निक गॅलरी : वीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण यावर आधारित प्रदर्शन. या गॅलरीमध्ये ऑरस्टेडचे प्रयोग, बारलोचे व्हील, आणि फारडे यांच्या रिंगसारख्या शास्त्रीय प्रयोगांचा समावेश आहे. 

दी स्पेस : येथे भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रदर्शन आहे. गॅलरीची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाला वाहिलेली भारतातील ही पहिली विज्ञान गॅलरी आहे. 

बायोटेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन गॅलरी : जैवतंत्रज्ञानातील मूलभूत गोष्टींवर आणि त्याच्या प्रयोगांवर आधारित असलेली ही गॅलरी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बीईएल) सहकार्याने २९ जून २००४ रोजी याचे उद्घाटन झाले. ही गॅलरी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांवर मार्गदर्शन करते. 

मुलांसाठी विज्ञान गॅलरी : येथे मुलांसाठी विविध विज्ञानविषयक प्रयोग आहेत. येथे एक प्रचंड पियानो आहे, त्याचे वादन करण्यासाठी मुले त्यावर नाचू शकतात. डायनासोर ऑलिव्ह गॅलरी प्रदर्शनात स्पिनोसॉरसची हलती प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती डोके, हात आणि शेपूट हलवू शकते.

राइट ब्रदर्स गॅलरी : येथे राइट ब्रदर्सच्या फ्लायरचे एकास एक प्रमाणाचे मॉडेल, आणि फ्लाइट सिम्युलेटर आहे.
टिपू समर पॅलेस

टिपू समर पॅलेस : हे बेंगळुरूमधील ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाण म्हणून ओळखले जाते. हा किल्ला त्याच्या काळाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. या पॅलेसमध्ये टिपू सुलतानाचे ग्रीष्मकालीन वास्तव्य असायचे. इंडो-इस्लामिक आर्किटेक्चरचे हे उदाहरण आहे. हैदरअली याने या महालाच्या बांधकामाची सुरुवात केली व टिपू सुलतानाने तो १७९१मध्ये पूर्ण केला. महालाच्या समोर कर्नाटक सरकारच्या बागकाम विभागाने एक बाग आणि लॉन केले आहे. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानाचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने या इमारतीचा वापर सचिवालयसाठी केला. तेथे असलेले टिपूचे सिंहासन तोडून त्यांनी ते विकून टाकले. तळमजल्यावर आता संग्रहालय करण्यात आले आहे. 

जवाहरलाल नेहरू प्लॅनेटरियम : बेंगळुरूमधील टी. चौधिया रोड येथे हे प्लॅनेटरियम आहे. ते १९८९मध्ये कार्यान्वित झाले. येथील तारांगण घुमट ५० फूट व्यासाचा आहे. तेथे २२५ प्रेक्षक बसू शकतात. दररोज दोन शो दाखवले जातात. मुलांना, तसेच पर्यटकांना तारांगणाचे दर्शन घडविले जाते. तसेच आकाशाची सुंदर माहिती दृकश्राव्य पद्धतीने दिली जाते. हे ठिकाण आवर्जून पाहण्यासारखे आहे. दुपारी तीन आणि चार वाजता कार्यक्रम दाखविले जातात. 

विशाल शिवमूर्ती
 
 
 
गवी गंगाधरेश्वर मंदिर : हे मंदिर बसवानागुडीजवळ वसलेले आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. बेंगळुरूच्या जुन्या मंदिरांपैकी हे एक आहे. ते केम्पेगौडा यांनी १६व्या शतकात, पाच वर्षांच्या तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बांधले होते. हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या मंदिरात एक नैसर्गिक गुहा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भक्त येथे एकत्र होतात. 

विशाल शिवमूर्ती : ६५ फूट उंचीची विशाल शिवमूर्ती हे बेंगळुरूचे आकर्षण आहे. मुरुगेशपाल मॉलच्या मागे ही पद्मासनातील मूर्ती असून, कैलासातून वाहणाऱ्या गंगा नदीचा सुंदर देखावा उभा करण्यात आला आहे. मूर्तीसमोर छोटा तलावही करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी ही मूर्ती खूप छान दिसते. 

गांधी भवन : महात्मा गांधींच्या जीवनाची आठवण करून देणारी ही इमारत कुमार गोरपा मार्गावर आहे. या इमारतीत गांधीजींच्या बालपणाच्या काळापासून, त्यांच्या आयुष्यातील अंतिम दिवसापर्यंतचे क्षण चित्रांद्वारे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय गांधीजींनी स्वत: लिहिलेल्या पत्रांची प्रतिकृती, त्यांच्या वापरातील मातीची भांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठीची भांडी इत्यादी वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. 

फिल्मसिटी :
हे बेंगळुरूचे लोकप्रिय मनोरंजन पार्क आहे. कार्टून सिटी येथे विविध आकर्षणे आहेत. येथे वॉटर पार्कही आहे. अभिनव स्टुडिओमध्ये डिनो पार्क, प्रेतबाधित हवेली, मिरर भुलभुलैया आहे. तसेच साहसी खेळ आहेत. 
फिल्मसिटी
दर्गा : दरगाह हजरत तवक्कल मस्तान हा सुफी संतांचा बेंगळुरूमधील सर्वांत जुना दर्गा बेंगळुरूमध्ये आहे. 

चौदिया मेमोरियल हॉल : हा हॉल व्हायोलिनच्या स्वरूपात बांधला गेला आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध सारंगी आचार्य टी. चौदिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा हॉल बांधण्यात आला. हा वातानुकूलित हॉल अनेक पारंपरिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो.

बेंगळुरूच्या आसपास :
बाणेरघट्टा वन्यजीव अभयारण्य : १९७०मध्ये बेंगळुरूजवळ बाणेरघट्टा वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले. १९७४मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या पार्कचा एक भाग बायोलॉजिकल पार्क म्हणून घोषित करण्यात आला आहे. आपण या अभयारण्यात बंद पिंजऱ्याच्या गाडीतून प्रवेश करतो. बाहेर वाघ-सिंहांचे राज्य असते. या पार्कमध्ये अजगर, किंग कोब्रा, बंगाली वाघ, आशियाई सिंह, बिबटे, गवे, साळिंदर, फुलपाखरे असे नानाविध प्राणी बघण्यास मिळतात. येथे मत्स्यालयही आहे. हे ठिकाण बेंगळुरूपासून २५ किलोमीटरवर आहे.

नागेश्वर मंदिर : बेंगळुरूजवळील बेगूर या जुन्या गावामध्ये बेंगळुरूपासून १३ किलोमीटरवर नागेश्वर मंदिर आहे. हे मंदिर गंगा राजवटीत बांधले गेले. बेगुरला वेपपूर असे संबोधले गेले होते, असे शिलालेखावरून दिसते. हा शिलालेख इ. स. ५८०मधील आहे.

चन्नपटना : हस्तशिल्प, खेळणी, चंदनी लाकडाची शिल्पे यासाठी प्रसिद्ध असलेले हे बेंगळुरू-म्हैसूर मार्गावरील एक ठिकाण आहे. उत्पादनांमध्ये चमकदार रंगीत लाकडी खेळणी, दरवाजे, पडदे, पावडर बॉक्स, नॅपकिन, रिंग्स, ज्वेलरी यांचा समावेश आहे. 

देवेनहल्ली किल्ला : हा किल्ला १५०१मध्ये अवती वंशाच्या मल्लबाईरगौडा यांनी बांधला. देवनाडोडी येथील देवप्पाच्या संमतीने हा किल्ला तयार झाला. किल्ला १७४७पर्यंत अवती शासकांच्या ताब्यात राहिला. काही काळ मराठा अंमल होता. परंतु हैदर अलीने त्यावर कब्जा केला. टिपू सुलतानाच्या पाडावानंतर कॉर्नवॉलिसने किल्ल्यावर कब्जा केला. 

रामदेवारा बेटा : ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटाचे शूटिंग येथे केले गेले. रामगिरी पर्वत हे रामनगर शहराजवळील एक खडकाळ टेकडीचे ठिकाण आहे. 
सावनदुर्ग


सावनदुर्ग :
हा आशियातील मोठा मोनोलिथिक पर्वत समजला जातो. ट्रेकिंगसाठी हे उत्कृष्ट ठिकाण समजले जाते. १८८१मध्ये कर्नल ब्रॅनवेल यांनी येथे उत्खनन केले होते. त्या वेळी एका माणसाचा सांगाडा येथे सापडला होता. त्याच्या कपाळावर जखमेची खूण होती. हे स्थळ बेंगळुरूपासून ५० किलोमीटरवर आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...