Thursday, December 3, 2020

अमरावती जिल्हाचे पर्यटन

 

महाराष्ट्रातल्या विदर्भामधे असलेला अमरावती हा जिल्हा अतिशय विस्तीर्ण पसरलेला असुन याला ’अंबानगरी’ म्हणुन देखील ओळख आहे. पुराण काळापासुनचा इतिहास या जिल्हयाला आहे भगवान श्रीकृष्णाने रूक्मीणीला याच नगरीतुन पळवुन नेउन तिच्यासोबत विवाह केल्याचे सांगितले जाते.

Amravati District Information In Marathi

अमरावती जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Amravati District Information In Marathi

अमरावतीचे जुने नाव “उदंब्रावती” असे आहे पुढे अपभ्रंश होउन ’उम्ब्रवती’ आणि त्यानंतर “अमरावती”असे झाले.  अमरावतीचे नाव इथे असलेल्या प्राचीन अंबादेवी मंदीरामुळे पडले आहे.

अमरावतीच्या प्राचीन अस्तित्वाबद्दल जैनांचे भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या इतिहासातुन माहीती सापडते.  त्यांच्या नक्काशीदार शिलालेखात असलेल्या उल्लेखानुसार या मुर्त्या 1097 मधे स्थापीत करण्यात आल्या. गोविंद महाप्रभुंनी 13 व्या शतकात अमरावतीला भेट दिली. असा प्राचीन इतिहास असलेला हा जिल्हा!

अमरावती जिल्हयातील तालुके – Amravati District Taluka List

अमरावती जिल्हयात एकुण 14 तालुके आहेत

1) अमरावती

2) अचलपुर

3) वरूड

4) चांदुर बाजार

5) धारणी

6) मोर्शी

7) दर्यापुर

8) अंजनगाव सुर्जी

9) धामणगाव रेल्वे

10) नांदगाव खंडेश्वर

11) चिखलदरा

12) भातकुली

13) तिवसा

14) चांदुर रेल्वे

अमरावती जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Amravati District Information

  • लोकसंख्या (Amravati District Population) 28,88,445
  • क्षेत्रफळ (Amravati District Area)  12,235 वर्ग कि.मी.
  •  नागपुर शहरापासुन अंतर 152 कि.मी. आणि मुंबईपासुन अंतर 663 कि.मी.
  • राष्ट्रीय महामार्ग 6 हा बडने.यातुन गेला आहे इथुन अमरावती 15 कि.मी. आहे
  •  साक्षरतेचा दर 93.03%
  • मुख्य पिक कापुस असुन आता सोयाबीन हे एक लोकप्रीय पीक झाले आहे, याशिवाय वरूड, मोर्शी, चांदुर बाजार, अचलपुर भागात संत्र्याचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले जात आहे. अंजनगाव सुर्जी आणि अचलपुर मधे केळी आणि खाण्याच्या पानाची मोठया प्रमाणात लागवड केली जाते.
  • चिखलदरा तालुक्यात सफेद मुसळी आणि चेरीचे यशस्वी उत्पादन घेतल्या जाते.
  • अमरावती जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिल्हा आहे.
  • विदर्भातील थंड हवेचे चिखलदरा हे पर्यटनस्थळ याच जिल्हयात असल्याने दुरदुरून पर्यटक येथे येत असतात.
  • मेळघाट व्याघ्रप्रकल्प देखील याच अमरावती जिल्हयात आहे.
  • भारतातील सर्वात मोठे क्रिडा संस्थान ’हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ अमरावतीत असुन त्यामुळे अमरावतीला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे.

अमरावती जिल्हयातील महत्वपुर्ण व्यक्तीमत्व – Famous Personalities Of Amravati

  • संत गाडगे महाराज (थोर समाजसुधारक)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • डॉ. पंजाबराव देशमुख (समाज सुधारक, शिक्षण महर्षी, केंद्रीय कृषी मंत्री)
  • प्रतिभाताई पाटील (प्रथम महिला राष्ट्रपती)
  • डॉ. आबासाहेब खेडकर (महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी चे पहिले राष्ट्रपती)
  • सुरेश भट (कवी, मराठी गझल सम्राट)
  • हेमंत कानिटकर (क्रिकेटर)
  • मोहन देशमुख (अभिनेता)

पर्यटनस्थळं – Amravati Tourism Places

  • चिखलदरा – Chikhaldara

कॉफी चा सुगंध नाकात दरवळायला लागला की समजायचं चिखलदरा जवळ आलं. चिखलद.यातल्या पहाडी भागात कॉफीचे उत्पादन घेतले जाते. अमरावती पासुन 85 कि.मी. अंतरावर असलेले विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणुन चिखलदरा खुप प्रसिध्द आहे.

1118 मीटर उंचीवर असलेल्या चिखलद.याला पहायला लांबलांबुन पर्यटक येत असतात. विदर्भात उन्हाळा मोठया प्रमाणात असल्याने चिखलदरा या ठिकाणी उन्हाळयाच्या दिवसांमधे खुप गर्दी असते. शालेय आणि महाविद्यालयीन सहली इथे येउन सुट्टयांचा आनंद उपभोगतात.

भिमकुंड, वैराट देवी, सनसेट पॉइंट, बिर डॅम, पंचबोल पॉइंट, कालापानी डॅम, महादेव मंदीर, सिमाडोह व्याघ्र प्रकल्प, हरिकेन पॉइंट, मोझरी पॉइंट, प्राॅस्पेक्ट पॉइंट, देवी पॉइंट, गोराघाट, शक्करदरी, सरकारी गार्डन, म्युझीयम, धबधबा, धारखुरा, बकादरी, पंचधारा धबधबा, गाविलगड किल्ला, अशी अनेक ठिकाणं चिखलद.याला आल्यावर तुम्हाला अनुभवता येतील.

विदेशी वन्यजीवांचे देखील इथे वास्तव्य पहायला मिळते.

Best Time To Visit Chikhaldara

जुलै ते फेब्रुवारी हा इथे येण्याकरता उत्तम काळ आहे.

How To Reach Chikhaldara

जवळचे विमानतळ नागपुर असुन. राज्यपरीवहन महामंडळाच्या बसेस, आणि खाजगी वाहनाने देखील इथे पोहोचता येईल.

  • मेळघाट व्याघ्र प्रकल्प – Melghat

उंचच उंच पर्वतरांगांमधे पसरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प अनुभवणे म्हणजे एक अविस्मरणीय सहल आहे. कोरकु आदिवासींचे वास्तव्य असलेल्या या भागात इतर समाजाचेही लोक राहातात.

वाघ, बिबळे, रानगवे, सांबर, भेकर, रानडुकर, माकड, चितळ, नीलगायी, चैसिंगा, अस्वल, भुईअस्वल, रानमांजर, तरस, कोल्हे, लांडगे, ससे, हे प्राणी पहायला मिळतात शिवाय कृष्णमृग, उडत्या खारी, मोर, रानकोंबडया, राखी बगळा, भुर बगळा, करकोचे, बदक, ससाणे, पारवे बुलबुल असे अनेक पक्षी देखील पहायला मिळतात.

पक्ष्यांचे संगीत आणि वाघांच्या डरकाळयांनी पर्यटकांना वेगळीच अनुभुती अनुभवायला मिळते. हा भारतातील सर्वात मोठया व्याघ्रप्रकल्पांपैकी एक असुन 1914 साली अस्तित्वात आला.

नागपुर पासुन याचे अंतर 240 कि.मी. एवढे असुन बडनेरा रेल्वे स्थानकापासुन 110 कि.मी. वर आहे. परतवाडा ते धारणी व बरहाणपुर अशी बससेवा उपलब्ध आहे.

  • अमरावतीची अंबादेवी – Ambadevi Temple Amravati

अमरावतीकरांच्या हृदयात विराजमान झालेली विदर्भवासीयांचे श्रध्दास्थान असलेली अमरावतीची अंबादेवी भक्तांकरता अतिप्रीय असे श्रध्दास्थान असुन सर्वदुर या देवीची ख्याती आहे. भगवान श्रीकृष्णाने याच ठिकाणी अंबादेवीच्या दर्शनाला आलेल्या रूक्मीणीचे अपहरण करून तिच्याशी विवाह केला. मंदीर अतिप्राचीन असुन 12 ही महिने या देविच्या दर्शनाला भाविकांची गर्दी असते. अंबादेवीच्या मंदीरा शिवाय एकविरा देवीचे देखील मंदीर इथे आहे त्या व्यतिरीक्त गणपती, महादेव पार्वती, लक्ष्मी नारायणाच्या देखील आकर्षक मुर्ती इथे विराजमान आहेत.

नवरात्रात मंदीराला आकर्षक रोषणाई केली जाते. लग्न ठरल्यानंतर या देवीचे दर्शन शुभ मानले जाते.

रेल्वे, बसेस, आणि खाजगी वाहनाने देखील अमरावतीला पोहोचुन देवीचे दर्शन घेणे सहज शक्य आहे.

  • गुरूकुंज आश्रम मोझरी – Gurukunj Ashram Mozari

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीपासुन 35 कि.मी. अंतरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थान म्हणजे मोझरी येथील गुरूकुंज आश्रम होय. समाजात रचनात्मक परिवर्तन आणण्याकरता आयोजित वेगवेगळया कार्यक्रमांमधे सहभागी होण्याकरता बरेचजण मोझरी इथे येत असतात.

संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजातील अंधश्रध्दा दुर करण्याकरता अथक परिश्रम घेतले. अंधश्रध्देच्या जोखडातुन समाजाला बाहेर काढण्याकरता आपले आयुष्य वेचले अश्या राष्ट्रसंताचे विचार जाणुन घेण्याकरता एकदा मोझरी ला अवश्य भेट द्यायला हवी. राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्याने मोझरी ला राज्य परीवहन महामंडळाच्या बसने, किंवा कोणत्याही खाजगी वाहनाने आपण येउ शकता.

  • हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ – Hanuman Vyayam Prasarak Mandal

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती मधले एक लोकप्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे. शारीरिक शिक्षणाकरता हे भारतातील एक प्रमुख संस्थान असुन अनेक खेळांच्या प्रशिक्षणाकरता विदयार्थी इथे येत असतात. 1914 च्या सुमारास याची स्थापना झाली असुन सुरूवातीला याला हनुमान आखाडा असे संबोधण्यात येत होते. अनेक राजकिय नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी एचवीपीएम ला आजवर भेटी दिल्या आहेत, भुमीगत असतांना चंद्रशेखर आझाद यांनी देखील काही काळ इथं वास्तव्य केलं होतं.

हाॅकी, शुटिंग, बाॅक्सींग, फुटबाॅल, बास्केटबाॅल, हाॅलीबाॅल, हाॅर्स रायडिंग, स्विमींग, हॅंड बाॅल अश्या अनेक खेळांचे प्रशिक्षण इथे दिले जाते.

  • मुक्तागिरी – Muktagiri

सौंदर्याने नटलेले धार्मीक स्थळ मुक्तागिरी जैनांचे पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणी आजही केशराचा आणि चंदनाचा पाउस पडतो अशी मान्यता आहे. दिगंबर जैन संप्रदायाची एकुण 52 मंदीर निसर्गाच्या सान्निध्यात स्थापीत करण्यात आली आहेत. या ठिकाणच्या सर्व मुर्ती शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत.

मनाला सुख शांतीची अनुभुती देणारे हे ठिकाण पहाण्याकरता हजारो श्रध्दाळु आणि पर्यटक इथे येत असतात. सुमारे साडे तिन करोड मुनीराजांना इथुन आजवर मोक्षाची प्राप्ती झाली आहे. 250 फुट उंच धबधबा सर्वांना आपल्याकडे आकर्षीत करतो आणि निसर्गसौंदर्यात आणखीनच भर घालतो या सर्व मंदीरांच्या दर्शनाकरता तुम्हाला जवळपास 350 पाय.या चढाव्या आणि उतराव्या लागतात.

इथले निसर्गसौंदर्य, शांत वातावरण अनुभवण्याकरता आपण जरूर मुक्तागिरीला भेट द्यायलाच हवी. अमरावतीपासुन मुक्तागिरी चे अंतर 66 कि.मी. एवढे आहे.

  • सालबर्डी – Salbardi

नैसर्गिक निसर्गसंपदेने नटलेले सालबर्डी हे ठिकाण मोर्शी तालुक्यात असुन द.या खो.यांनी वेढलेले हे ठिकाण पाहाण्याकरता शेकडो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मोठमोठया दगडांमधुन वाहणारी नदी, 100 मीटर लांब गुफे मधे असलेले शिवमंदीर, निसर्गानं भरभरून केलेली लयलुट यामुळे इथे आल्यानंतर या ठिकाणावरून परत जाण्याची ईच्छाच होत नाही.

श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाकरता गर्दी होते. या ठिकाणी पावसाळयात आणि हिवाळयात भेट देणे योग्य ठरेल. मोर्शी पासुन सालबर्डी जवळपास 17 कि.मी. वर आहे.

 दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १२ अचलपूरचा किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १२
अचलपूरचा किल्ला ----------------१
(सांभार : सह्याद्री प्रतिष्ठान )

'अचलपूरचा इतिहास म्हणजेच वर्‍हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) शहर. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील 'इल' नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणार्‍या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुर्‍यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वर्‍हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वर्‍हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.

 दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १३ अचलपूरचा किल्ला -----२

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १३
अचलपूरचा किल्ला -----२
बहामनी सत्ताकाळात १३९९ मध्ये आठवा सुल्तान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुल्तानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, यावरून त्या काळातील एलिचपूरचे महत्त्व लक्षात येते. १४२५ पर्यंत अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर इमादशाहीत म्हणजे १४९० ते १५७४ पर्यंत वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला. बरीच वर्षे अचलपूरचा ‘वास्तू इतिहास’ कोराच राहिला. तरीही अचलपूरचे महत्त्व कमी झालेले नव्हते. १५७४ ला वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे आला. निजामशाहीतही हे शहर महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले. सुमारे २६ वष्रे निजामशाहीत राहिलेला वऱ्हाड प्रांत १५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. अबूलफजल हा वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगलांची सत्ता संपूर्ण शतकभर होती. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर व संबंधित किल्ल्यांचे उल्लेख सापडतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रात अजून एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. त्यात मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मोगल काळातच मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या.
चलपूरचा किल्ला-------------------३
१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.
मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.
शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे पण, या जागेचा वापर या ठिकाणी मिळणारा एकांत पाहून नको त्या कामांसाठी केला जात असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात.

अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात. या गतवैभवावर चर्चा करणेच आता अचलपूरकरांच्या नशिबी आले आहे. दोन्ही शहराची तहान पूर्णपणे भागवू शकेल, अशी पाणीपुरवठा योजना अजूनही अस्तित्वात आलेली नाही
*खोलापूर*
हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय मित्र शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेल्या समन्वेषणात येथील पांढरीचा विस्तार आजच्या गावापासून नदीकाठावरील खोलेश्वराच्या मंदिरापर्यंत आढळून आला; परंतु सद्यस्थितीत यातील बरीचशी पांढरी नाहीशी झाली आहे. १९२८-२९ साली खोलापूर येथून प्राप्त रोमन बनावटीच्या मृण्मयी पदकांच्या प्रसिद्धीनंतर या स्थळाचे प्राचीनत्व सर्वप्रथम माहीत झाले. कदाचित याच आधारे कौंडिण्यपूरच्या उत्खनन अहवालातील विदर्भाच्या नकाशात खोलापूर हे सातवाहनकालीन स्थळ म्हणून दाखविण्यात आले असावे. एकोणीसशे साठच्या दशकात केलेल्या येथील उत्खननात एक तलाव आणि दोन भक्कम बांध्याच्या विहिरी (बाव) आढळल्या होत्या. पुढे नव्वदच्या दशकात व्ही. कांबळे आणि एस. नाईक यांना या ठिकाणावरून उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे मिळाली. हे सर्व पुरावे येथील प्राचीन वस्तीचा विस्तार आणि काळ यांचे निदर्शक आहेत.
२००७-०८ आणि २००८-०९ या काळात डेक्कन कॉलेज, पुणे येथील भास्कर देवतारे यांनी या प्राचीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाचे तीन मुख्य हेतू होते: पहिला, येथील पांढरीचा कालानुक्रम समजून घेणे; दुसरा, पूर्णा आणि त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाचा प्राचीन इतिहास जाणून घेणे आणि तिसरा, येथील प्राचीन पीकपद्धतीचा अभ्यास करणे. उत्खनन आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण खोलापूर सहा विभागांमध्ये विभागण्यात आले. यातील एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले. गावालगत नैर्ऋत्येला खोलापूर ते दर्यापूर मार्गावर उजव्या बाजूला जी पांढरी आहे, तिला स्थान (लोकॅलिटी) २ असे संबोधण्यात आले. येथे मिळालेल्या अवशेषांच्या आधारे इ. स. पू. चौथ्या शतकात खोलापूरला प्रथम वस्ती झाली, हे सिद्ध झाले. या स्थानाच्या वरील ५० सें.मी. स्तरातून नक्षीकाम असलेले मातीचे मणी, कर्णालंकार, त्रिरत्न पदक आणि आहत नाणे; तर साधारणत: १·०५ ते १·२ मी. खाली उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे आणि त्यासोबत आहत नाणे मिळाले. २·६ ते २·८ मी. दरम्यान अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केलेले चकतीच्या आकाराचे कर्णभूषण आणि उत्कीर्णीत मुद्रा (head scratcher) मिळाली. या मुद्रेचा उपयोग काय असावा, याबाबत निश्चितपणे सांगणे शक्य नसले, तरी दोन मतप्रवाह आहेत. मोरेश्वर दीक्षित यांनी ‘डोक्यातील कोंडा काढण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावाʼ, असे मत आपल्या त्रिपुरी उत्खनन अहवालात मांडले आहे (१९५५), तर ही मुद्रा ‘पूजा-विधीʼ वस्तू असावी, असे मत रेश्मा सावंत यांनी मांडले. येथील प्राप्त मडक्यांचे काठ व त्यांचे आकार यांच्या स्तरनिहाय अभ्यासातून १·३५ मी. आणि २·४ मी. दरम्यान त्यांच्यात लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे स्थान क्र. २ येथे इ. स. पू. तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत वस्ती होती असे सिद्ध झाले. २·४ मी.पेक्षा खालील पांढरीत नासपती (पेअर) या फळाच्या आकारातील मडक्यांचे काठ बहुसंख्य प्रमाणात मिळाले. अशा प्रकारची काठ असलेली मडकी उत्तर भारतात इ. स. पू. सहाव्या ते तिसऱ्या शतकांत प्रचलित होती. त्यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच उत्तर भारताचा विदर्भाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भौतिक संस्कृतीवरील प्रभाव लक्षात येतो. १·८ मी.पासून वरती विटा आणि कवेलू हे तुकड्यांच्या स्वरूपात आढळले. यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा वापर येथे सुरू झाल्याचे सिद्ध होते. गावाच्या पूर्वेला असलेल्या पांढरीवर स्थान क्र. ५ येथेही वरील काळातील पुरावशेष प्राप्त झाले.
खोलापूर-दर्यापूर मार्गाच्या डाव्या बाजूला स्थान क्र. १ आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननातून खोलापूरपासून साधारणत: ८० किमी. पश्चिमेला असलेल्या प्राचीन भोनशी साम्य दाखविणाऱ्या वस्तू मिळाल्या. ज्यामध्ये माती, अर्धमौल्यवान दगड आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणी आणि अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार हत्यारे आणि इतर पुरातन वस्तू, तसेच ताम्र आणि लोखंडाची उपकरणे यांचा समावेश होतो. तसेच जोड साच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले मातीचे विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्मपदकेही मिळाली. भोन आणि खोलापूर येथील खापरांमध्ये साधर्म्य आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे इ. स. पू. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांत या भागात वस्ती झाल्याचे सिद्ध होते. येथे मिळालेली नाणी पूर्णत: गंजलेली असल्याने ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकली नाहीत. या कालखंडातील पांढरी नदीपासून बरीच जवळ आहे. पांढरीच्या नदीकडील बाजूस आणि दक्षिणेला उंच मातीचे संरक्षक कडे पाहावयास मिळतात. नदीबाजूचा कडा तुटक स्वरूपात नदीकाठाने लांबपर्यंत पसरलेला आहे; तर पूर्वेकडील जमिनीची उंची वाढत गेल्याने दक्षिणेकडील कडा काही अंतरापर्यंत जाऊन सभोवतालच्या जमिनीशी एकरूप झालेला आढळून येतो. दोन्ही कडे ज्याठिकाणी ९० अंशामध्ये मिळतात तेथे उंच मातीचे टेकाड आहे, ज्याला मालाची टेकडी म्हणून गावकरी संबोधतात. या टेकाडावरील उत्खननात वरील काळाशी संलग्न खापरे आणि विटा मिळाल्या. तसेच संपूर्ण टेकाड आणि बाजूचे कडे हे माती टाकून तयार केल्याचे दिसून आले. यावरून स्थान क्र. १ मधील वस्तीचे नदीपासून येणाऱ्या मोठ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी हे मातीचे कडे बांधल्याचे, तर मालाची टेकडी म्हणजे दूरपर्यंत नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरूज असल्याचे सिद्ध झाले.
गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापलीकडे जी पांढरी आहे, तिला स्थान क्र. ६ असे संबोधण्यात आले. येथेही स्थान क्र. १ प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्धमौल्यवान दगड, मृण्मणी व पदके आणि इतर प्रकारच्या पुरातन वस्तू मिळाल्या. हस्तिदंतापासून तयार केलेल्या कंगव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. परंतु १ व ६ या दोन्ही स्थानांवरील नक्षीयुक्त मृण्मणी आणि पदके यांच्यात फरक आढळून येतो. सातवाहन कालखंडाशी निगडित इतर ठिकाणांहून मिळालेल्या अलंकारांशी साम्य दाखवणारे येथील मातीचे अलंकार आहेत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेली मनुष्य आणि युग्मपदके येथे नाहीत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेले आणि आतून पोकळ असलेले मातीच्या प्रतिमांचे अवशेष हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत प्रचलित असल्याचे सर्वमान्य आहे. याआधारे वरील ठिकाणी इ. स. च्या सुरुवातीपासून ते साधारणत: तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्ती असल्याचे सिद्ध होते.
स्थान क्र. ३ गावाच्या सीमेलगत पश्चिमेला असून येथे विटांच्या आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी आहेत. नदीकाठी दोन ठिकाणी प्राचीन विटा आणि कवेलू तयार करण्याच्या अवशेषयुक्त जागा सापडल्या आहेत. प्राचीन धान्यांच्या अवशेषांमध्ये तांदूळ, गहू, उडीद, तूर इ. धान्यांचा समावेश होतो.
यावरून खोलापूरच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कालखंडांत वस्ती झाल्याचे निदर्शनास येते. प्रारंभापासून खोलापूर हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असावे. या प्राचीन स्थळावरून मध्ययुगीन नाणी आणि खापरे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ :
Archaeological Survey of India, ‘IAR-Indian Archaeology : A Review,ʼ New Delhi, 1979-80.
Deotare, B. C.; Shete, G.; Sawant, R. & Naik, S. ‘Preliminary Report on Excavation at Kholapur, District Amravati, Maharashtra,ʼ Man and Environment, 2012.
Jain, B. ‘An Inventory of the Hoards and finds of coins and seals from Madhya Pradesh,ʼ The Journal of The Numismatic Society of India, vol.19, 1957.
Kamble, V. & Naik, S. ‘Pottery Assemblage from Three New Historical/Protohistoric Sites in Purna Valley,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 1995.
Sawant, Reshma ‘Head Scratchers : Fallacy and Reality,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2006-2007.
Shete, G. ‘Kholapur Pottery : An Attempt to Develop a Typological Basis for the Chronological Reconstruction of the Vidarbha Iron Age and Early Historic period,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2014.
समीक्षक – भास्कर देवतारे



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...